Posts Tagged ‘जीवन’

पु. ल. देशपांडे, सौजन्य – मटा

मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास ‘ढोरं , गॅंवार , शूद्र , पशु ,नारी , ये सब ताडनके अधिकारी ‘ म्हणतो , म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं ,खेडवळ माणसं , इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत!

बायकांना नव-यांनीलाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांतसर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातचअसं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे.स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचाआहे.

‘ उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो ‘ ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं कामकरायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा.

हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी , मुल्ला , शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे.

‘ मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है ?’ असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की ‘ शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे , वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही! ‘ आमचे तुकोबा विचारतात , ‘ ऐसे कैसे रे सोवळे , शिवता होतसे ओवळे ?’ह्मा सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल ?

त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या ख-या उपासकाला आणि रसिकाला तरराष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको.म्हणूनच केशवसुतांनी ‘ ब्राह्मण नाही हिंदुही नाही , न मी एक पंथाचा | तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा | खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख ,कूपातिल मी नच मंडूक | मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे ‘ असं विचारलं आहे.

मुखमें रामनाम बगलमे छुरी , ह्मा तत्वाचं आचरण करणा-याविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक , कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले , जातिभेदाचं पोषण करणा-याविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास ‘ सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही ‘असं सांगत उभा राहिला.

यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला ‘ मानुषेर धर्म माणसाचा धर्म ‘म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्मा प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल.

‘ नान्य: पंथा अथ:नाय विद्यते ‘- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही ‘ समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन , धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे.

‘ हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही ‘ असं म्हणूनआंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन , अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहेआणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे….

( राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण)

गोविंद तळवलकर , सौजन्य – मटा

(लेख ३ जाने २००८ रोजी प्रकाशित झाला होता.)

इतिहासातील सनावळ्यांनी अनेक महत्त्वपूर्ण घटनांची नोंद घेतलेली असते. त्या घटनांनी अर्थातच त्या त्या काळात दूरगामी परिणाम घडवलेले असतात. मग ती ब्रिटिश साम्राज्याचा भारतात पायाघालणारी प्लासीची लढाई असो की १८५७चे भारतीय स्वातंत्रयुद्ध असो , आज तेथपासून अणुयुगापर्यंत झालेल्या प्रवासात त्या घटनांचे महत्त्व कितपत उरले आहे ,असा प्रश्न पडू शकतो. अडीचशे वर्षांतील अशा घटनांचा अभ्यासपूर्ण आढावा.

ब्रिटिशांच्या भारतातील साम्राज्याचा पाया ज्या प्लासीच्या लढाईने घातला , तिला यंदा अडीचशे वषेर् पूर्ण झाली. त्याचबरोबर १८५७च्या उठावाला आणि मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेस दीडशे वषेर् झाली असून , लोकमान्य टिळकांच्या दीडशेव्या जन्मतिथीची सांगताही या वषीर्च झाली.

अखिल भारतीय काँग्रेसमध्ये पहिली मोठी फूट पडल्याला या डिसेंबरमध्ये शंभर वषेर् होतात आणि रशियन क्रांतीला नव्वद. महात्माजींनी दक्षिण आफ्रिकेत सत्याग्रह सुरू केला , तो शंभर वर्षांपूवीर् सप्टेंबरमध्ये. आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे अमेरिकन स्वातंत्र्य युद्धात अमेरिकनांचा पराभव होण्याची शक्यता निर्माण झाली असता , ज्याच्या प्रयत्नांमुळे फ्रेंचांनी अमेरिकेस लष्करी मदत पाठवली , त्या लाफाए याच्या जन्मास याच वषीर् अडीचशे वषेर् पूर्ण होतात.

या सर्व घटनांचा आजच्या दैनंदिन जीवनाशी संबंध येत नाही. तथापि ऐतिहासिक घटनांपासून काही निष्कर्ष निघतात आणि त्यांपासून काही धडेही घ्यायचे असतात. इतिहासाची पुनरावृत्ती होत नाही ; पण काही प्रवृत्ती , उणीवा इत्यादींची मात्र होते.

प्लासीची लढाई आणि १८५७चा उठाव या दोन्ही वेळी हिंदी लोकांचे अंगभूत दोष सारखेच होते , असे दिसून येईल. दोन्ही वेळी सामाजिक शिस्तीचा अभाव होता आणि मध्यवतीर् सत्ताकेंद नव्हते. शिवाजी महाराजांच्या उदयकाळीही या प्रकारची परिस्थिती होती. आज्ञापत्रात म्हटले आहे- ‘ कोणाचा अन्याय न करावा ही यांची बुद्धीच नाही. बळकट व्हावे ;दुसऱ्याचे घ्यावे ; दावेदरवडे करावे हा त्यांचा सहज हव्यास. राज्यशासन येईल हे जाणोन , हे अगोदरच दुसऱ्याचा आश्रय करतात. देश मारितात- परचक्र आले म्हणजे वतनाच्या आशेने अगोदरच सलुख करतात. तिकडील भेद इकडे व इकडील भेद तिकडे करून राज्यात शत्रूचा प्रवेश करतात.’

प्लासीची लढाई होण्यास बंगालचा नवाब सिराज उद्दौलाचा उद्दामपणाचा कारभार तसेच फंदफितुरी कारणीभूत होती. त्याचा आजोबा अलिवदीर् खान याने त्याला वारस ठरवले , हे अलिवदीर्खानाची मुलगी- घसिटा बेगम हिला मान्य नव्हते. सरसेनापती मिर जाफर हा राज्य मिळवण्यास अधीर होता. सिराजच्या कारभारावर व्यापारी मंडळी नाराज होती आणि त्यांचे नेतृत्व करत होता महताब चंद. हा सावकारी व व्यापारी करत असे. जगत सेठ या नावाने तो ओळखला जात होता.

सिराजने कोलकाता इथल्या ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यातील किल्ला हस्तगत केल्यामुळे तिच्या व्यापारास ‘ खो ‘ बसला. किल्ला परत घेण्याची तिची आकांक्षा होती. या कामी लाच व फंदफितुरी करण्यासाठी कंपनीला जगत सेठ व इतर व्यापाऱ्यांचा उपयोग झाला. सिराज व मिर जाफर यांच्यातील स्पधेर्चा फायदा घेऊन मिर जाफरला कंपनीकडे वळवण्यासाठी जगत सेठ यास फार सायास पडले नाहीत.

ईस्ट इंडिया कंपनीने रॉबर्ट क्लाइव्ह याची कोलकातातील किल्ला ताब्यात घेण्याच्या मोहिमेचा प्रमुख म्हणून नेमणूक केली. सिराजची राजधानी मुशिर्

दाबाद इथे होती. त्याने प्लासीपाशी सैन्यासह तळ टाकला. बंगालीत या छोट्या गावाचे नाव आहे पोलाशी किंवा पलाशी. पोलाशी म्हणजे पळस. पळसाची अनेक झाडे असलेले हे गाव पोलाशी म्हणून ओळखले जाते.

सिराजकडे जवळजवळ पन्नास हजार सैन्य होते ; पण प्रत्यक्ष लढाईत पाच हजारच सहभागी झाले. सिराजला फ्रेंचांच्या ७५ तोफांची मदत होती. ईस्ट इंडिया कंपनीचे सैन्य तीनएक हजार होते. यात एकविसशे हिंदी शिपाई आणि नऊशे ब्रिटिश अधिकारी होते. कंपनीकडे सिराजपेक्षा कमी तोफा होत्या.

‘ प्लासीची लढाई ‘ असे म्हटले जात असले तरी लढाई म्हणावी अशी काही झाली नाही. सिराजच्या सैन्याने २३ जून १७५७ रोजी सकाळी सातला तोफा डागल्या. तथापि , क्लाइव्हचे सैन्य दूर असल्यामुळे ते तोफांच्या माऱ्यात आले नाही. दुपारी बारा वाजल्यानंतर तास-दीड तास पाऊस पडला. कंपनीने आपल्या तोफा व दारूगोळा झाकून ठेवण्याची दक्षता घेतली , तशी फ्रेंचांनी घेतली नाही. सिराजचा तोफखाना पावसामुळे निकामी झाला , हे क्लाइव्हला समजले नव्हते. पण सिराजचा तोफखाना बंद असल्याचे पाहून त्याने चढाई केली , तेव्हा सिराजच्या सैन्याने पळ काढला. मिर जाफर मदतीला आला नाही. सिराजचे बरेचसे सैन्य लढलेच नाही आणि त्याचे बरेच नुकसान झाले. मग क्लाइव्हने मिर जाफर नवाब म्हणून मान्य केला. कंपनी आणि क्लाइव्हसह सर्व इंग्रज अधिकारी यांना बरीच लूट मिळाली.

क्लाइव्ह कोलकात्यात विजयी वीर म्हणून आला. त्याचे स्वागत करणाऱ्यांत राजा नबकृष्ण देव हे सावकार व इतर तत्सम लोक पुढे होते. पळसाची पाने लालभडक असतात. प्लासीच्या लढाईनंतर ब्रिटिशांचा साक्षात कारभार जिथे होता , तो भाग नकाशात लाल रंगाने दाखवला जाऊ लागला आणि अंकित अशा संस्थानिकांच्या ताब्यातील भाग पिवळ्या.

यानंतर शंभर वर्षांनी कंपनीच्या विरुद्ध उठाव झाला. पहिले स्वातंत्र्ययुद्ध असा त्याचा गौरव आज केला जातो. तथापि त्यानंतर लगतच्या काळात इतिहासाचार्य राजवाडे ,वासुदेवशास्त्री खरे , शेजवलकर इत्यादींनी या उठावाची कठोर चिकित्सा केली होती. त्यांनी सतत ‘ बंड ‘ हाच शब्द वापरला. विष्णुशास्त्री चिपळूणकर हे देशाभिमानी व धर्माभिमानी. त्यांनी ५७ सालच्या बंडाबद्दल लिहिले , ‘ १८५७ साली एकदम साठ पलटणी उठून स्वातंत्र्याचा झेंडा उभारतात. पण या झेंड्यात व इंग्लंड , फ्रान्स ,अमेरिका येथील बंडांत अतिशय अंतर आहे. वरील देशांतील दंगे कराच्या बाबतीत झाले आणि इकडे १८०७ व ५७ साली बंडे झाली , त्यास कारण देशाभिमान बिलकूल नसून केवळ धर्माभिमान होय. आमच्या देशात अभिमान चढवावयाची बाजू कोणती ?तर यज्ञोपवित , गोब्राह्माण इत्यादी. स्वातंत्र्य , जन्मभूमी या शब्दांत वरच्यासारखा प्रभाव प्राच्य देशांत थोडाच आढळतो ?’

इतिहासाचार्य राजवाडे यांनी म्हटल्याप्रमाणे शस्त्र व शास्त्र या जोरावर इंग्रजांनी १८५७च्या बंडात विजय मिळवला. इंग्रजांकडील शस्त्रे ही इंग्लंड व युरोप यांत विकसित होत असलेल्या शास्त्रातून निर्माण होता होती. आपला समाज अध:पतित अवस्थेत (डिकॅडन्ट) होता ; तर त्यांचा वधिर्ष्णू होता. प्लासीनंतर शंभर वर्षांत आपले संस्थानिक व राजे , तसेच त्यांचे प्रधान आणि समाजाचे धुरीण यांना कोणाला कंपनीच्या राज्याचा विस्तार का होत आहे ? त्यांच्यापाशी विद्या आहे ती काय आहे ?त्यांचा देश कसा आहे ? इत्यादी चौकशी करून आपली राज्यव्यवस्था सुधाराविशी वाटली नाही.

युरोपात तिथल्या चर्चने मध्ययुगापासूनच नव्या विद्येचा प्रसार सुरू केला होता. प्राचीन ग्रीक विद्येचा प्रभाव पडून वैचारिक क्रांती झाली व त्यापाठोपाठ धामिर्क सुधारणा होऊ लागल्या. यातून विज्ञानाच्या विविध शाखांत आश्चर्यकारक प्रगती होऊ लागली आणि तंत्रज्ञान विकसित झाले. यातून औद्योगिक क्रांती झाली आणि तिचेच वारस इथे राज्यविस्तार करू लागले.

त्यांना इथे भूमी भुसभुशीत लागली. आपले लोक शौर्यात इंग्रजांना हरणारे नव्हते. पण शिस्तीचा अभाव , जुनाट शस्त्रे आणि लष्करी व्यूहरचनेतील जुनाटपणा याचबरोबर सर्व पातळ्यांवरील नेतृत्वाचा नादानपणा यामुळे पराभव अटळ होता. वासुदेवशास्त्री खरे लिहितात की , ‘ हिंदुस्थान इंग्रजांनी घेतले नसते तर फ्रेंचांनी घेतलेच असते. ‘यासारखे मत कार्ल मार्क्सनेही व्यक्त केले आहे. त्याने इंग्रज साम्राज्यशाहीवर टीका केली खरी ; पण इंग्रजांमुळे भारत आधुनिक युगात येण्यास मदत झाली , असे मत दिले आहे. त्याने असाही सवाल केला की , ‘ ब्रिटिशांनी हिंदुस्थान पादाक्रांत केला नसता तर तुर्क , इराणी वा रशियन यांनी केला असता. ते आपल्याला पसंत पडले असते काय ?’

प्लासीनंतर शंभर वर्षांत इंग्लंड व युरोपमधील क्रांतिकारक स्थित्यंतर इथल्या राज्यर्कत्यांनी समजून घेतले नाही. फ्रेंचक्रांती आणि त्यापूवीर्चे अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध यांनी नुसती राज्यक्रांतीच घडवून आणली नाही , तर नवे विचार प्रसारित केले. थॉमस पेन याने मानवी हक्कांचे महत्त्व प्रतिपादिले आणि अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धाच्या प्रमुखांवर त्याचा प्रभाव होता. अमेरिकन प्रजासत्ताकाचे प्रणेते वॉशिंग्टन , जेफर्सन ,हॅमिल्टन , मॅडिसन , फ्रॅन्कलीन , अॅडॅम्स इत्यादींनी प्रजासत्ताकाचे नवे तत्त्वज्ञान तयार केले. फ्रेंचक्रांतीने युरोपमधील सरंजामशाहीचा अंत करण्याची प्रक्रिया सुरू केली. १८५७च्या धुरिणांना याची काहीच कल्पना नव्हती व ती करून घेण्याची उत्सुकताही नव्हती. तसेच असे पर्यायी तत्त्वज्ञान त्यांच्यापाशी नव्हते. नकाशाचे शास्त्रच माहीत नसल्यामुळे सर्व भारताचा नकाशा त्यांच्यापाशी नव्हता , मग जगाचा कोठला असणार? कोपरनिकस , गॅलिलिओ , न्यूटन इत्यादींच्या वैज्ञानिक शोधांमुळे औद्योगिक क्रांतीला प्रेरणा मिळाली आणि विविध ज्ञानशाखा प्रगत होत गेेल्या. हे सर्व संचित ज्यांच्या मागे उभे होते त्यांच्यापुढे हरिविजय आणि पांडवप्रताप यांची पारायणे करणाऱ्यांचा प्रभाव पडणे अशक्य होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अद्ययावत व परंपरागत अशा दोन शब्दांत या दोन संस्कृतींचे वर्णन केले असून परंपरागत संस्कृतीचा पराभव अटळ मानला.

वास्तविक उठाव करण्यात इंग्रजांच्या सैन्यातल्या शिपायांचा पुढाकार होता आणि संस्थानिक व राजेरजवाडे हे शिपायांच्या दबावामुळे उठावात सामील झाले. त्यांपैकी काहींची संस्थाने डलहौसीने खालसा केली नसती , तर ते बंडात सामील झाले नसते. यामुळे ज्या उत्तर भारतात बंडाचा जोर होता , त्यातले अनेक राजे बंडापासून अलिप्त होते. सबंध भारताचा विचार केला , तर फार थोडा प्रदेश बंडात सामील होता आणि ते चालू असताना मुंबईत इंग्रजी विद्या देणारे विद्यापीठ स्थापन झाले.

ज्यांचे शासन खिळखिळे होते , त्यांना उठाव करायचा तर राजकीय व लष्करी या दोन्ही पातळ्यांवर नेतृत्वाची साखळी हवी , याची जाणीव नसावी हे स्वाभाविक होते. तसेच बंड यशस्वी झाले असते तर कोणत्या प्रकारची राज्यव्यवस्था ते आणणार होते ? पुन्हा लहान-मोठी राज्ये देशभर पसरली असती आणि ती एकमेकांशी जमेल तेव्हा लढत बसली असती.

इंग्रजांनी जिथे कारभार सुरू केला होता , तिथल्या व्यापाऱ्यांना शांतता हवी होतीच. पण सामान्य लोकांनाही हवी होती. इंग्रजी शिक्

षणामुळे तयार होत असलेल्या पिढीलाही या विद्येचे महत्त्व वाटू लागले. यामुळे दादाभाई ,भांडारकर , रानडे , सुरेन्दनाथ बॅनजीर् इत्यादी इंग्रजी विद्या आत्मसात करणारे आपले नेते १८५७विषयी फारसे लिहिताना वा बोलताना आढळणार नाहीत. नव्याने मिळालेल्या विद्येकडे ती पिढी आकषिर्त झाली ; पण त्याचबरोबर इंग्रजी राज्यातील दोष आणि आपल्या समाजाची दुरवस्था याबद्दल ती जागरुकही झाली. त्या काळात डॉ. भाऊ दाजी यांच्यासारख्यांची इंग्रजी कारभारावरील टीका बरीच जहाल होती आणि नंतर दादाभाईंनी संपत्तीचा ओघ इंग्लंडकडे कसा जात होता याचे विवेचन केले. हे नव्या विद्येचे फळ होते.

यातून अखिल भारतीय काँग्रेसचा जन्म झाला. प्रतिनिधित्व नाही तर कर नाही , ही अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धातील घोषणा काँग्रेसच्या पहिल्या पिढीच्या नेत्यांनी ऐकली होती. त्यांनी यातला प्रतिनिधित्वाचा भाग उचलला. या सुमारास व नंतर काही काळ सशस्त्र प्रतिकार व व्यक्तिगत खून हेही तंत्र काहीजणांनी अवलंबिले. प्रत्येक समाज मुक्ततेचे प्रयत्न करू लागतो तेव्हा याच उपायांचा अवलंब होतो. नंतर सामूहिक प्रतिकार वा आंदोलन यांचा मार्ग स्वीकारला जातो. आपल्या समाजाच्या आथिर्क दुरवस्थेची कारणमीमांसा नव्या नेत्यांनी केली आणि जबाबदार राज्यपद्धतीची मागणी केली. अमेरिकन स्वातंत्र्ययुद्धात प्रतिनिधित्व नसेल तर कर नाहीत हे सूत्र होते. म्हणजे ते बहिष्काराचे सूत्र होते.

आपल्याकडे बहिष्काराची घोषणा बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ झाली. तिचे प्रवर्तक व पुरस्कतेर् सुरेन्दनाथ बॅनजीर् , अनेक बंगाली नेते व लोकमान्य टिळक होते. स्वदेशी , राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार अशी सूत्री होती. बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ ब्रिटिश मालावरील बहिष्कार बंगालमध्ये सुरू झाला , तेव्हा त्याची व्याप्ती देशभर असावी , ही जहालांची मागणी होती ; तर नेमस्तांना बंगालच्या बाहेर बहिष्कार नको होता. या वादावरून काँग्रेसमध्ये फूट पडली आणि जहालांना पक्षातून बाहेर जावे लागले. परंतु यामुळे काँग्रेसला मजबूत करण्यात नेमस्त यशस्वी झाले नाहीत आणि काँग्रेस दुर्बळ झाली. काँग्रेसच्या स्थापनेनंतर बावीस वर्षांनी ही मोठी फूट पडली. (स्वातंत्र्यानंतरही बावीस वर्षांनी काँग्रेसमध्ये फूट पडावी हा योगायोग विलक्षण म्हटला पाहिजे.)

पहिल्या महायुद्धानंतर रशियाला व जगाला हादरा देणारी घटना घडली व ती म्हणजे रशियात १९१७ झालेली कम्युनिस्ट क्रांती. तिला या वषीर् नव्वद वषेर् पूर्ण होतात. महायुद्धात रशियाची चांगलीच दमछाक झाली. जर्मनीने रशियाशी स्वतंत्रपणे तह करण्याची तयारी दाखवली होती. पण इंग्लंड , फ्रान्स व अमेरिका या दोस्त देशांनी अशा तहाची कल्पना त्याज्य ठरवली. काही तज्ज्ञांचे असे मत आहे की , रशियाशी जर्मनीचा वेगळा तह अगोदरच झाला असता , तरी जर्मनीचा पराभव करण्याचे दोस्त राष्ट्रांचे उद्दिष्ट सफल झाले असतेच आणि रशियात झारची सत्ता बोल्शेविकांना नष्ट करता आली नसती. ते काहीही असो ; रशियात झालेली क्रांती ही कम्युनिझम या तत्त्वावर आधारलेली होती. हे सर्वंकष तत्त्वज्ञान होते व आहे. यामुळे रशियन क्रांती ही केवळ राज्यक्रांती नव्हती. रशिया आणि सर्व जग यांची सर्वांगीण व्यवस्था पूर्णत: वेगळ्या पायावर उभी करण्याचे उद्दिष्ट या क्रांतीने समोर ठेवले होते.

मार्क्सच्या भाकिताप्रमाणे प्रगत भांडवलशाहीची जागा कामगारांच्या हुकूमशाहीने घेतली जाणार होती. तशी क्रांती इंग्लंड , अमेरिकेत व्हायला हवी होती ; कारण तिथे प्रगत भांडवलशाही होती. पण तसे न होता मागासलेल्या , शेतीप्रधान रशियात कम्युनिस्ट पक्षाने सत्ता काबीज केली. नंतरही चीन व व्हिएतनाम या शेतीप्रधान देशांतच कम्युनिस्ट सत्ताधारी झाले. रशियन क्रांतीचे हे स्वरूप लक्षात घेऊन जॉर्ज केनान या रशियाविषयक तज्ज्ञाने म्हटले की , कम्युनिझममुळे रशिया बदलला असला, तरी रशियामुळे कम्युनिझम कसा व किती बदलला याचीही दखल घेतली पाहिजे.

कामगारांच्या हुकूमशाहीची घोषणा रशियन नेत्यांनी केली असली , तरी कामगारांच्या हाती सत्ता नव्हती. लेनिनला जो व्यावसायिक क्रांतिकारकांचा वर्ग अपेक्षित होता ,त्याच्याकडे सत्ता आली. रोझा लक्झेम्बर्गने तेव्हाच इशारा दिला होता की ,कामगारांच्या हुकूमशाहीच्या नावाखाली एका पक्षाची व पक्षाच्या नावावर एका गटाची हुकूमशाही स्थापन होईल आणि मग एका व्यक्तीची. तसेच झाले आणि स्टालिनशाहीने थैमान घातले.

रशियात जीवनाच्या सर्वांगांचा विकास होणार होता ; पण त्याने सर्व लक्ष केंदित केले ते लष्करी सार्मथ्यावर. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिका व रशिया या दोनच महासत्ता शिल्लक राहिल्या. केवळ लष्करी सार्मथ्यावर राज्य चालत नाही. सोव्हिएत युनियनला याचा अनुभव आला आणि क्रांतीनंतर त्र्याहत्तर वर्षांत केवळ कम्युनिस्ट पक्षाची सत्ता नष्ट झाली नाही , तर सोव्हिएत युनियन व त्याचे साम्राज्यच संपुष्टात आले. रशियातील राजवट फार काळ टिकणार नाही , असे वीस सालात लेनिनची मुलाखत घेऊन सांगणाऱ्यांत बर्ट्रांड रसेल हे अग्रभागी होते.

भारतात काँग्रेसच्या राजकारणाला १९२० सालापासून महात्मा गांधींनी वेगळे वळण लावले. त्यापूवीर् इतका मोठा भारतीय समाज आंदोलनात उतरला नव्हता. ही राष्ट्रीय आंदोलने आणि दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंडची झालेली दुरवस्था याचा परिणाम इंग्रजांचे राज्य करण्याचे सार्मथ्य संपुष्टात येण्यात झाला व भारत स्वतंत्र झाला. त्याबरोबर देशाची फाळणी झाली. त्या कारणास्तव हिंदू-मुस्लिम तेढ कमालीची विकोपाला गेली. त्या काळात शांतता व सलोखा यांचा संदेश देणारा महात्मा जातीय राजकारणाने अंध झालेल्यांच्या विद्वेषाचा लक्ष्य झाला व त्याचा बळी घेतला गेला.

आजही हा प्रश्ान् सुटलेला नाही. त्यातच पाकिस्तानने दहशतवादी धोरणाचा अवलंब करून भारतात उत्पात घडवून आणण्याचे धोरण अवलंबिले आणि ज्या पाकिस्तानच्या दडपशाहीपासून पूर्व बंगालला भारताने मुक्त केले , तो बांगलादेश बनून भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या गटांना आश्रय देत आहे.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर प्रजासत्ताकाची घटना तयार झाली. तिचे प्रमुख निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना हे एक साधन आहे ; तीमधील तत्त्वे अमलात आणून सामाजिक व आथिर्क विषमता तशीच चालू राहिली तर घटना निरर्थक होईल ,असा इशारा दिला होता. खुद्द बाबासाहेब ज्या अस्पृश्य गणलेल्या समाजात जन्माला आले होते , त्याची अस्पृश्यता नष्ट करण्याचे परिणामकारक धोरण अमलात येत नाही, हे पाहून जो हिंदू धर्म आम्हाला अस्पृश्य मानतो तो सोडून आम्ही बौद्ध धर्माचा स्वीकार करतो , अशी घोषणा बाबासाहेबांनी केली. याप्रमाणे आंबेडकर व त्यांच्या अनुयायांनी धर्मांतर केल्याला या वषीर् पन्नास वषेर् होतात.

बाबासाहेबांनी ज्या सामाजिक व आथिर्क विषमतेचा प्रश्ान् उपस्थित केला होता , तो महात्मा फुले यांनी एकोणिसाव्या शतकात मांडला हो

ता. हा सामाजिक व आथिर्क विषमतेचा प्रश्ान् आजही भेडसावत आहे. गेल्या काही वर्षांत अर्थव्यवहारावरील अनेक निर्बंध उठले वा सैल झाले आहेत. पण मूठभर व्यक्ती अब्जाधीश झाल्याने व लष्करी सार्मथ्य वाढल्यामुळे कोणताही देश महासत्ता होत नाही. बकाल शहरे व भकास ग्रामीण भाग ; अनेक गावांत शाळेचा अभाव आणि शाळा असली तरी शिक्षकांचा अभाव ; अशी परिस्थिती असताना महासत्तेची भाषा करणे ही एक क्रूर थट्टा ठरते.

गेल्या साठ वर्षांतील आपल्या प्रयत्नांतून आणि त्याचबरोबर गेल्या काही वर्षांत बदललेल्या आथिर्क धोरणामुळे विकासाचा मोठा टप्पा गाठला गेला आहे. पण यापुढे विकास करायचा आणि जुने व नवे प्रश्ान् सोडवायचे , तर ज्या काही पायाभूत सुविधा हव्यात त्यांत ऊर्जा ही सर्वात महत्त्वाची आहे. वीज आणि सोव्हिएत म्हणजे कम्युनिझम असे लेनिनचे समीकरण होते. ते रशियाने गाठूनही कम्युनिस्ट राजवट नष्ट झाली , ही गोष्ट वेगळी.

धरणे , कोळसा अशी साधने वीजनिमिर्तीसाठी आहेत. पण संसदीय पद्धती स्वीकारूनही ज्याप्रमाणे संसदीय वृत्ती आपल्या राजकीय पक्षांत रुजलेली नाही ,त्याचप्रमाणे आथिर्क विकासाचे ध्येय स्वीकारूनही त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा पुरवण्याचा प्रश्ान् आला की , आंदोलने , बहिष्कार आणि हिंसाचार यांचा आगडोंब उसळतो. विकासाच्या योजनांमुळे विस्थापित होणाऱ्यांना वाजवी भरपाई मिळाली पाहिजे , ही न्याय्य मागणी आहे ; पण सर्व आंदोलक केवळ हाच प्रश्ान् हाती घेत नाहीत. काही तर कारखाने हवेत की नको , असा प्रश्ान् विचारून जी अर्थव्यवस्था कोठेही यशस्वी झाली नाही , तिचा आग्रह धरतात. शेतीप्रधान समाज कंगालच राहणार. लोकसंख्यावाढीला आळा बसत नसल्यामुळे शेतीवरील लोकसंख्येचा भार अतोनात वाढला आहे. तेव्हा कारखानदारी आवश्यक आहे.

भारत आज अणुयुगात प्रवेश करत आहे. आपण क्षेपणास्त्रे यशस्वीपणे तयार करत आहोत आणि अणुबॉम्बचे स्फोटही केले. पण ऊर्जानिमिर्तीच्या साधनांची मर्यादा लक्षात घेता अणूपासून वीजनिमिर्ती करण्याशिवाय तरणोपाय नाही. ती करताना अमेरिका व इतर देशांची मदत घेणे भाग आहे. बुश सरकारने सहकाराचा प्रस्ताव मांडला आणि आपल्या अणुशास्त्रज्ञांनी तो तपासला. आपली ऊर्जा निर्माण करणारी व बॉम्ब तयार करणारी केंदे वेगळी केली असून करार केवळ ऊजेर्साठी आहे. ज्या हाइड कायद्यावरून गदारोळ उठवला आहे , तो अमेरिकन सरकारला बंधनकारक नसून केवळ सल्ला देणारा आहे , असा बुश प्रशासनाने खुलासा केला आहे. पण डाव्यांनी व भा.ज.प.ने करार हाणून पाडण्याचा चंग बांधला आहे. यात भा.ज.प. तर दुटप्पीपणाच दाखवत आहे. अणुस्फोट त्याच्या नेतृत्वाखालील सरकारने केले. ते जाहीर करताना संसदेची अनुमती घेतली नव्हती. आताच्या सरकारने असे आश्वासन दिले नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चिटणीस करात यांना अमेरिकेशी संबंधच नको असून त्या पक्षाने मनमोहन सिंग सरकारबरोबर वागताना वाटमाऱ्यांचे धोरण अवलंबिले आहे. याचवेळी चिनी अध्यक्षांनी चीन व अमेरिका यांच्यातील सहकार्याचे स्वागत करून अधिक सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली , हे विशेष. बंगालचे मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य इंग्रजीतील ‘ आय ‘ हे अक्षर साम्राज्यवादाची (इंपिरियालिझम) आठवण करून देत नसून गुंतवणुकीची (इन्व्हेस्टमेंट) देते असे म्हणतात व व्हिएतनामचे उदाहरण देतात. त्यांचे भाईबंद मात्र ही वस्तुस्थिती मान्य करत नाहीत.

डाव्यांच्या धोरणामुळे चीन व पाकिस्तान आनंदित झाले असतील. ज्यांनी पक्षांतर्गत वाद , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरण इत्यादींबाबत जन्मभर रशिया व नंतर चीनच्या ओंजळीने पाणी प्यायचे व्रत पाळले , ते स्वातंत्र्य व सार्वभौमत्वाचे आपणच पाठीराखे असल्याचा दावा करतात हे विशेष. काहीही करून केंद सरकार व काँग्रेस पक्ष कमालीचा दुर्बल केला , तर पुढील निवडणुकीत आपल्या वाटमारीच्या धोरणाचा अधिक लाभ उठवता येईल असा कयास असावा. म्हणजे प्लासीच्या लढाईपासून दिसणारीच ही प्रवृत्ती आहे. एक पराभूत झालेला वैचारिक पंथ आणि त्याची त्याहून पराभूत झालेली व्यवस्था येथे यशस्वी होणार नाही व होऊ नये.

उत्तम कांबळे, सौजन्य – सकाळ

डाळ महागलेली, तांदूळ महागलेला, एकूणच जगणं महागलेलं, सोबतीला पाणी आणि विजेची टंचाई आहेच. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात, त्यांचीही पूर्तता होऊ नये, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. अशा वेळी सामान्य माणसानं ज्यांच्याकडे उत्तरासाठी पाहायचं, ती राजकीय मंडळी मात्र भावनेच्या राजकारणात मश्‍गूल आहेत. कधी भाषेची, कधी भावनांची, तर कधी प्रांताची आरोळी ठोकत आहेत.

महाराष्ट्रात नेहमीइतकी नसली, तरी थोडीफार थंडी आहे. तिचा लोकांना त्रास होऊ नये, वातावरण तप्त नसले, तरी ऊबदार राहावे यासाठी राजकारण्यांनी पुन्हा चर्चेसाठी गरमागरम विषय घेतले आहेत. रोज असा कोणता ना कोणता विषय येतो आणि तो याच सामान्यांना त्यांच्या मूळ प्रश्‍नांकडून गर्रकन वळवतो व आपल्या आंबट-गोड चर्चेकडे लक्ष वेधून घेतो. चर्चेसाठी कोणते विषय कधी आणायचे यासाठी महाराष्ट्रातील राजकारण्यांकडे असणारी कल्पकता जगातल्या अन्य कोणत्याही राजकारण्यांकडे नसेल. नवे सरकार सत्तेवर येऊन आज फेब्रुवारीच्या सात तारखेला 93 इतके दिवस पूर्ण होतील. पुढच्या रविवारी सरकार शंभर दिवसांचे होईल. निवडणूक काळात दिलेल्या आश्‍वासनांकडे सत्ताधारी लक्ष देतील आणि विरोधक त्यांना भाग पाडतील, असे वाटत होते. नागपूरचे अधिवेशन नेहमीप्रमाणे मोर्चे, निदर्शने आणि मेळाव्यांनी गाजले. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला तो बिनविषयाचे (र्खीीीशश्रशीी झेश्रळींळली) राजकारण करण्याचा.

मराठी-अमराठी…
चर्चेसाठी कोणताच विषय मिळाला नाही, तर “मराठी-अमराठी’ हा कधीही मदतीला येणारा हुकमी विषय आहे. या विषयाचा कीस पाडण्याचे प्रयोग होतात. कधी तेंडुलकरांच्या, कधी आझमींच्या, कधी कोणा उद्योगपतीच्या विधानावर मुंबईला हलवण्याचा प्रयत्न होतो. मुंबई कुणाची, असा एक अवघड प्रश्‍न मांडला जातो. मुंबई महाराष्ट्राची याविषयी शंका कुणालाच नाही; पण याच एक सनातन प्रश्‍नावर चर्चा करण्याचा मोह भल्याभल्यांना होतो. मुंबई चर्चेत येते; पण विकासात येत नाही. मराठी माणूस चर्चेत येतो; पण तो मुंबईत तग धरेल, अशी व्यवस्था नाही. ती तशी करावयाची कुणाला इच्छा आहे, की नाही, हाच प्रश्‍न आहे. मग कधी टॅक्‍सी ड्रायव्हर चर्चेचा विषय बनतो, कधी पाववडा, तर कधी कांदापोहे… वाढत्या बर्गरविरुद्ध, वाढत्या चायनीजविरुद्ध वडापाव किंवा कांदापोहे कसा टिकाव धरणार, याचा फॉर्म्युला कुणाकडे नाही. राजकीय बनलेले हे दोन पदार्थ हॉटेल मॅनेजमेंटमधून कसे हद्दपार झाले, याची चौकशी कोणत्याही शाखेने केली नाही. जेव्हा हे पदार्थ वादासाठी कमी पडायला लागतात, तेव्हा मग कोथळा गाजायला लागतो. तो कमी पडला, की नामफलक गाजायला लागतात. ते कमी पडू लागले, की निर्माण न होणाऱ्या नोकऱ्यांचा प्रश्‍न गाजतो. महाराष्ट्रात नेमक्‍या नोकऱ्या किती तयार होतात, त्यावर अधिकार सांगण्यासाठी कोणती भलीमोठी रांग आहे आणि रांगेत राहूनही ज्यांची मनगटे रिकामीच राहणार आहेत, त्यांचे काय करायचे, यावर कधी चर्चेचा फड रंगलेला नाही. दर वर्षी मराठी शाळा बंद पडत आहेत. त्या जागी मॉडर्न इंग्लिश स्कूल उभ्या राहत आहेत. मराठीसाठी गळे काढणाऱ्यांनी बंद पडणाऱ्या किती शाळा वाचवल्या आणि महाराष्ट्राबाहेर जाणारे किती उद्योगधंदे रोखून धरले, हा प्रश्‍न आता विचारायला हवा.

उदय नव्या सेन्सॉरचा
राजकारण्यांचे एक बरे असते. त्यांना कुठेही कबुतराप्रमाणे घुटर्रगुम करता येते. कोणत्याही विषयात असलेले आणि नसलेले राजकारण त्यांना बाहेर काढता येते. अगदी “झेंडा’ आणि “शिक्षणाच्या आयचा घो’ यांसारख्या चित्रपटांचेच उदाहरण घ्या. हे चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वीच सारा महाराष्ट्र ढवळून काढण्याचा महापराक्रम राजकारण्यांनी केला. गावाकडचा शेतकरी धान्याच्या राशीतील पहिली मूठ जशी ग्रामदेवतेला वाहतो, तसा आता “पहिला शो’ राजकारण्यांच्या दरबारात करावा लागतो. अभिव्यक्तीसाठी मानेच्या शिरा ताणेपर्यंत बोलणारे आणि चित्रपट काढणारे काही लोकही अशा दरबारात हजेरी लावून डावा-उजवा कौल घेतात, ही आणखी वेगळी गोष्ट.
पूर्वी चित्रपटांच्या श्रेयनामावलीत कुणी विचारवंत, कुणी समाजसेवक, कुणी एक चळवळ यांची नावे यायची. आता ती जागा राजकारणातील बाहुबलींनी घेतलीय. कुणा तरी दादा-अण्णा किंवा संघटनेचे नाव सुरवातीला दिसते. अगोदर त्यांच्यासाठी नमन झाले, की मग सिनेमा सुरू होतो. कायदेशीरदृष्ट्या अस्तित्वात असलेल्या सेन्सॉरच्या बाहेर नव्या सेन्सॉरचा उदय लोकशाहीत अशा प्रकारे होतो आहे. उद्या कदाचित या शक्ती स्वतःच चित्रपटवाल्यांना विषय पुरवतील. एक यादी तयार करतील. यादीबाहेर जाण्यास कदाचित बंदीही घालतील.

चित्रविचित्र विधानांचा पूर
स्वतंत्र विदर्भाचा प्रश्‍न एक स्वतंत्र प्रश्‍न आहे; पण अशा प्रश्‍नासाठी नक्षलवाद्यांची मदत घ्यावी की नाही, अशी चर्चा सुरू झाली. नक्षलवादी म्हणजे दहशतवादी आणि लोकशाहीचे मारेकरी आहेत, असे सांगणारे आता नक्षलवाद्यांमध्ये नवे रूप पाहू लागले आहेत. अशा प्रकारे नक्षलवाद्यांच्या उदात्तीकरणाचे नेमके परिणाम काय होतील, हेही सांगायला कोणी तयार नाही.

आणखी काही चित्रविचित्र विधानांवरही राजकारणातील हवा थोडीफार गरम झाली. जातपडताळणीसाठी आदिवासी बांधवांची “डीएनए’ चाचणी घेतली पाहिजे, असे विधान बबनराव पाचपुते यांनी केले. अर्थात, हे विधान व ही योजनाच अव्यवहार्य! एकाची “डीएनए’ चाचणी करायची म्हटली, की अकराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. लाखो आदिवासींसाठी एवढे पैसे कोणत्या तिजोरीतून आणणार, समजा पैसे आणल्यावर प्रयोगशाळा कोठून येणार? त्या आणायच्या असतील, तर मग आपल्याच नात्यागोत्यातील कुणाला तरी खासगीत प्रयोगशाळा सुरू करा, असे सांगण्याची वेळ येणार. अर्थात, हा सारा प्रकार एका दिवसासाठीचा नाही; पण बबनरावांनी विधान केले आणि ते मोकळे झाले. मग अशा मंत्र्यांचीच डीएनए चाचणी करा, अशी मागणी पुढे आली. लक्ष्मणराव ढोबळ्यांचे दांडकेही असेच गाजले किंवा गाजवण्यात आले. असे कितीतरी विषय सांगता येतील, की ज्यांना आगा-पिछा नाही किंवा जे भावनाप्रधान आहेत आणि त्यावरच आपण चर्चा करीत आहोत. या चर्चेतून कुणाला काय मिळणार, असा प्रश्‍न उचित ठरणार नाही; कारण असे प्रश्‍न नेहमीच निरुत्तरित राहतात. नितीन गडकरी यांनी मोदी आणि गांधी यांची केलेली तुलना असो किंवा मुंबईत हल्ल्याच्या वेळी बिगरमराठी बांधवांनीच तिचे रक्षण केले, हे राहुल गांधींचे विधान असो… सारे काही भावना कुरवळणारे किंवा ओरबडणारे आणि त्यावर राजकारणाचे पातेले ठेवणारे, असेच काही आहे.

‘उगवती’कडे पाहणार की नाही?
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची लाट आता कुठे थोडीफार ओसरत असतानाच महाराष्ट्रात नव्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची लाट सुरू झाली. गेल्या 30-35 दिवसांपैकी प्रत्येक दिवस महाराष्ट्रातील कोणा तरी मुलखातून कोणा तरी विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी आणतो. एरवी एखादा दारू ढोसून मरण पावला, तरी आपण भरपाई देतो. झाडावरून पडून किंवा विजेचा तडाखा सोसून मरण पावला, तरी भरपाई देतो. अशी भरपाई देऊ नये, असे कोणी म्हणणार नाही. गरिबांचे संसार उघड्यावर पडणार नाहीत, याची काळजी कल्याणकारी राज्यात घ्यावीच लागते. एरवी पुढारी अशा कुटुंबीयांकडे जातात. त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतात. पाच हजारांची मदत देऊन माध्यमातील दहा हजारांची जागा अडवतात, तो भाग वेगळा; पण अशी करुणा विद्यार्थ्यांबाबत का येत नाही? महिनाभरात 65 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करणे, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. उद्याचा देश ज्यांच्या खांद्यावर उभा राहणार आहे, ते खांदे देशाऐवजी मरण का वाहून नेत असतील, याचा गांभीर्याने कोणी विचार केला नाही. शिक्षणव्यवस्थेविषयी कुणी गंभीर चर्चा केली नाही. काही अपवाद वगळता पालकांचे अश्रू पुसण्यासाठी कुणी गेले नाही, की कुठे शोकसभाही भरली नाही. मृत्यूला सामोरे जाण्याचा प्रयत्न उगवतीने करू नये यासाठी सरकारने कोणता कार्यक्रम आखला आणि राबविला आहे, असा प्रश्‍न आज नसेना का; पण डोळ्यांतील पाणी सुकल्यानंतर तरी काही अभागी पालक विचारतील.

पाणी, वीज टंचाईचे करणार काय?
मार्च उजाडण्यापूर्वीच महाराष्ट्रातील 20 हजार 240 गावांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. मार्च संपला, की हा आकडा आणखी फुगेल. मुंबईत पाणीटंचाई वाढतेय. उर्वरित महाराष्ट्रातही टॅंकर पळू लागले आहेत; पण ते पळूनपळून किती पळणार? जर विहिरींनाच तहान लागत असेल, तर पाणी कोठून आणणार? प्रश्‍न पाण्याचा जसा निर्माण होतो आहे, तसाच तो विजेची टंचाईही घेऊन येतो. महाराष्ट्राला रोज तीन-चार हजार मेगावॉट विजेची टंचाई आहे. पुढच्या महिन्यात ती आणखी वाढेल. दिल्लीपती थोडे फार प्रसन्न झाले आणि दाभोळने खरोखरच निर्मिती वाढवली, तरीही लोडशेडिंग संपणार नाही. नागरिकांना याबाबत विश्‍वासात घेणे, त्यांना दिलासा देणे, उपलब्ध साधनसामग्रीत जगण्याचे नवे मार्ग सांगणे आदी अनेक गोष्टी राजकारणी करू शकतात; पण प्रश्‍न घेऊन राजकारण करायचेच नाही, असा जणू एक अलिखित सिद्धांतच झाला आहे. तोच रोज रोज गिरवला जातोय.

महागाईचे चटके सामान्यांनाच
वाढती महागाई हा आणखी एक ज्वलंत विषय. जगभरच महागाईने आपला जबडा पसरला आहे. या कालखंडात तरी शिधावाटप दुकाने सक्रिय आणि प्रामाणिक असावीत, माणूस जगवण्याच्या प्रयत्नातील त्रुटी संपून गती यावी, जनजागर व्हावा, असा कार्यक्रम कुणाच्याच अजेंड्यावर नाही. महागाईचे चटके सामान्यांनाच बसतात. पुढाऱ्यांना, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना महागाई शोधूनही सापडत नाही. सरकारी खर्चातूनच त्यांना चंगळवादी जीवन उपभोगता येते. उदाहरण म्हणून खासदाराला नियमाप्रमाणे मिळणाऱ्या सवलतींचा तक्ता दिला आहे. हा लेख लिहीत असतानाच माझ्या एका सहकाऱ्याने मला तो पाठवला आहे. असो. कधी तरी कुणाचे तरी तोंड काळे केले आणि कॅमेऱ्यात स्वतःला फिट केले की झाले आंदोलन, अशी धारणा अलीकडे वाढीला लागली आहे. एकीकडे महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव आणि दुसरीकडे प्रश्‍नांचा हा चक्रव्यूह… असे चित्र आहे. हे सर्व बदलण्यासाठी संवेदनशील राजकारण्यांची गरज असते; पण पाण्याप्रमाणेच याही गोष्टीचा दुष्काळ महाराष्ट्रात वाढतो आहे. सागरातील खारे पाणी एखाद्या वेळी पाण्याप्रमाणे पैसा ओतून गोडेही करता येते; पण संवेदना जन्माला घालण्यासाठी अजून तरी कोणी लॅबमध्ये प्रयोग केलेला नाही.

लोकांचे प्रश्‍न घ्या अजेंड्यावर
राजकारण्यांच्या अजेंड्यावर लोकांचे प्रश्‍न किती आहेत आणि राजकीय साठमाऱ्या किती आहेत, हे लोकांनीच विचारायला हवे. बरोबर आठ दिवसांनी म्हणजे 14 फेब्रुवारीला राज्य सरकारचे नवे शंभर दिवस पूर्ण होतील. तेव्हा तरी हे प्रश्‍न विचारायला हवे आहेत. विरोधकांनीही विचारायला हवेत. कुणाच्या अंगावर किती सोने याचे मोजमाप करण्याऐवजी सर्वार्थाने अडचणीत सापडलेल्या आणि आपल्या डोक्‍यावर एक लाख 80 हजार कोटींचे कर्ज घेऊन थकलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण करणार की नाही, असाही प्रश्‍न आहे. विषयहीन राजकारण पुढाऱ्यांचे भले करेल कदाचित; पण सामान्य माणसाला त्याचा काय लाभ?

असा हा आजचा महाराष्ट्र
* 35 दिवसांत सुमारे 70 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
* सुमारे 21 हजार गावांचे घसे पडले कोरडे
* भारनियमनाचा हंगाम सुरूच राहणार
* महाराष्ट्राच्या डोक्‍यावर एक लाख 80 हजार कोटींचे कर्ज
* रोजगारनिर्मितीला नाही वेग, अनेक उद्योग जाताहेत महाराष्ट्राबाहेर.
* मुंबईसह ठिकठिकाणी मराठी शाळा बंद होताहेत.

राजकीय अजेंड्यावर…
* मराठी-अमराठी वाद
* चित्रपटाचे राजकारण
* परवान्याचे राजकारण
* जुन्या वादाची नव्याने धुणी-भांडी
* प्रतीकात्मक आंदोलने

कशी समजणार यांना महागाई
लोकप्रतिनिधींना महागाई लवकर का कळत नाही त्याचे हे एक कारण. प्रत्येक खासदाराला मिळणाऱ्या पुढील सवलती पाहा…
* मासिक वेतन 12,000 रुपये
* कामकाजासाठी मासिक खर्च 10,000 रुपये
* कार्यालयीन खर्च 14,000 रुपये
* प्रवासभत्ता (किलोमीटरला आठ रुपयांप्रमाणे) 48,000 रुपये
* अधिवेशन काळात रोज 500 रुपये
* रेल्वेत प्रथम वर्गातून देशभर कुठेही कितीही प्रवास
* विमानात बिझनेस क्‍लासमधून पत्नी किंवा पीए सोबत 40 वेळा मोफत प्रवास
* घरगुती वापरासाठी 50 हजार युनिटपर्यंत वीज मोफत
* स्थानिक संपर्कासाठी एक लाख 70 हजार कॉल मोफत
* कार्यालयासाठी काही अत्यावश्‍यक वस्तू / सुविधा
* प्रत्येक खासदारावर सरकारी तिजोरीतून दरमहा अंदाजे 2.66 लाख आणि वर्षाला 32 लाख रुपये खर्च
* सर्व म्हणजे 534 खासदारांवर वर्षाला सरकारी तिजोरीतले होतात 855 कोटी रुपये खर्च
* मंत्र्यांचा तोरा न्यारा

भाई वैद्य, सौजन्य – सकाळ

शब्दांकन – प्रदीप कुलकर्णी

महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. त्यानिमित्त सुरू केलेल्या “सुवर्णमहोत्सवी महाराष्ट्र’ या मालिकेतील हा दुसरा भाग, महाराष्ट्राच्या राजकीय वळणांचा! मराठी माणसाने अनेक राजकीय लढाया पाहिल्या आहेत, अनुभवल्या आहेत; पण सध्या मात्र तो राजकारणाबाबत उदासीन झाला आहे. राजकारणात सक्रियतेने काही करणे सोडा, तो मतदानही करेनासा झालाय. काय कारण असावे याचे, महाराष्ट्राच्या राजकारणाने आतापर्यंत कोणती वळणे पाहिली आहेत, त्यावर हा दृष्टिक्षेप.

—————————————————————————————————————–

रणभेरी आणि तुताऱ्यांच्या निनादात १ मे १९६० रोजी पहाटे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याची निर्मिती राजभवनामध्ये जाहीर करण्यात आली. या महाराष्ट्रनिर्मितीचे स्वरूप आणि त्यातील नावाचा गोंधळ विलक्षण होता. आधी त्रिराज्य योजना; नंतर विशाल द्वैभाषिकाचा कारभार, पुढे मुंबई राज्य आणि अखेरीस महाराष्ट्र राज्य अशा तऱ्हेचे नामकरण निश्‍चित झाले. नाव मुंबई राज्य असावे, असा आग्रह पं. नेहरूंनी अखेरपर्यंत धरला होता; परंतु तो फार काळ टिकला नाही. मात्र, संयुक्त महाराष्ट्र हे नाव येणार नाही, याची मात्र पक्की खबरदारी घेण्यात आली. सकाळचा समारंभ आणि सायंकाळची शिवाजी पार्कवरील सभा ही बहुतांश सरकारी व काही प्रमाणात कॉंग्रेसपक्षीय झाली.

वास्तविक, ज्या नेत्यांनी गेली चार वर्षे संयुक्त महाराष्ट्रनिर्मितीसाठी जिवाचे रान केले, त्यांच्यासहित हा कार्यक्रम झाला असता तर ते औचित्यपूर्ण ठरले असते. सकाळ व सायंकाळच्या सभेमध्ये हुतात्म्यांचे स्मरण करण्याचेही भान कोणाला राहिले नव्हते, ही गोष्ट मात्र खटकण्यासारखी होती. महाराष्ट्र राज्य झाले; परंतु सीमा भागाचा प्रश्‍न लटकतच राहिला, तो आजपावेतो. 

निर्मितीची उद्दिष्टे काय होती ?
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीची उद्दिष्टे काय होती, हे या निमित्ताने समजावून घेणे उचित ठरेल. जुलै १९५७ मध्ये “संयुक्त महाराष्ट्र’चे सरचिटणीस एस. एम. जोशी यांनी समितीची घटना जाहीर केली. तीत जी उद्दिष्टे ग्रथित केली होती ती पुढीलप्रमाणे ः
१) मराठी भाषकांचे एकात्म सलग राज्य
२) लोकसत्ताक समाजवादी महाराष्ट्र
३) सामाजिक जीवनाची सहकारी तत्त्वावर फेररचना
मात्र, यशवंतराव चव्हाण यांनी १ मे १९६० रोजी जी उद्दिष्टे सांगितली, ती काहीशी वेगळी होती. 
अ) मराठी बांधव एका राज्यात आणणे
ब) ग्रामीण विकासावर भर देणे
क) कृषी, वीज व छोटे उद्योग यांचा विकास करणे
ड) महाराष्ट्राचे औद्योगीकरण करणे 
समिती व सत्ताधारी कॉंग्रेस या दोहोंनी मिळून जी उद्दिष्टे मांडली, त्यांना विकासाचा मापदंड म्हणून मानता येईल. आपण कितपत यशस्वी झालो आहोत, हे त्याच्या निकषावरच ठरविता येईल, असे मला वाटते. 

सत्तेचे राजकारण दोन विभागांत
या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाचा मागोवा घेताना महाराष्ट्रातील सरकार, विरोधी पक्ष व जनआंदोलने यांचा विचार करणे आवश्‍यक आहे. गेल्या ५० वर्षांत पुलोदची दोन वर्षे व युतीची पाच वर्षे सोडता, कॉंग्रेस पक्ष हाच सत्ताधारी होता; तेव्हा त्या पक्षाच्या अनुषंगाने अधिक सविस्तर विचार करणे योग्यच होईल. 

माझ्या मताने गेल्या ५० वर्षांतील सत्तेच्या राजकारणाची विभागणी दोन खंडांत करता येईल. १९८० पर्यंतचा वीस वर्षांचा एक विभाग आणि त्यानंतरचा दुसरा विभाग. पहिल्या वीस वर्षांत यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील व शरद पवार हे दिग्गज नेते अधिकारावर होते. सहकाराच्या दृष्टीने हे तर सुवर्णयुगच मानले जाते. महाराष्ट्रनिर्मितीबरोबर यशवंतराव चव्हाणांनी कृषी-औद्योगिक विकासाची मांडणी केली. ही गोष्ट या अर्थाने विशेष मानली पाहिजे, की तत्कालीन पंतप्रधान नेहरूंच्या डोळ्यांपुढे केवळ औद्योगिक विकासाची परिकल्पना प्रामुख्याने होती. वास्तविक या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. यशवंतरावांनी आपल्या संकल्पनेनुसार सहकारी साखर कारखाने आणि पंचायत राजनिर्मितीला विशेष प्राधान्य दिले. त्यामुळे ग्रामीण भागाचे रूप पालटले आणि ग्रामीण नेतृत्व धडाडीने पुढे आले. मात्र, भाटघर येथे आचारसंहितानिर्मितीसाठी जी बैठक झाली होती, तिचे निष्कर्ष मात्र त्यांनी मान्य केले नाहीत. हा राजकीय स्थित्यंतराचा काळ आहे, अशी सबब त्यांनी पुढे केली होती. 

कृषिविकासावर लक्ष केंद्रित
वसंतराव नाइकांनी, “महाराष्ट्र अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण झाला नाही तर मी फाशी जायला तयार आहे,’ अशी धडाडीची घोषणा करून कृषिविकासावर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी संकरित बी-बियाण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या काळात १९७२ चा दुष्काळ गुदरला आणि पुढे त्यांनी पागेपुरस्कृत रोजगार हमी योजनेला चांगल्या तऱ्हेने चालना दिली. त्याआधारे शेतकरी वर्ग दुष्काळाचा मुकाबला करू शकला. त्यानंतर आलेल्या शंकरराव चव्हाणांनी सिंचन प्रकल्पावर विशेष भर दिला. १८ वर्षांच्या कॉंग्रेसच्या राजवटीनंतर दोन वर्षांची पुलोदची राजवट शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली १९७८ मध्ये स्थापन झाली. त्या काळात निहाल अहमद या रोजगार हमी मंत्र्याने सुमारे ७५ लाख शेतकऱ्यांना रोजगार मिळवून दिला. पुलोद सरकारने सवलतीत शेतीपंपांची वीज, कापूस एकाधिकार योजना आणि सहकारी संस्थांना विशेष चालना यावर भर दिला. या २० वर्षांच्या कालखंडानंतर कृषी-औद्योगिक विकासाची कल्पना मागे पडू लागली. सिंचनावर कितीही भर दिला तरी महाराष्ट्राची सिंचन व्यवस्था १३-१४ टक्‍क्‍यांच्या आसपासच रेंगाळत आहे. सुमारे एक कोटी शेतकऱ्यांपैकी ८० टक्के शेतकरी कोरडवाहूच आहेत आणि कोरडवाहू असून, त्यांची विशेष दखल घेतली गेली, असे मात्र म्हणता येणार नाही. शंकरराव चव्हाण १९७५ ते १९७८ या काळात मुख्यमंत्री होते; परंतु त्यांचा काळ संजय गांधींची मनधरणी करण्यात आणि मिसाबंदी म्हणून कोणाला तुरुंगात टाकायचे, या विचारातच अधिक गेला. त्यानंतर दोन वर्षे पुलोदचे सरकार आले; परंतु १९८० च्या निवडणुकीनंतर इंदिरा गांधी पंतप्रधान होताच त्यांनी ते सरकार बरखास्त केले आणि पहिल्या वीस वर्षांचा कालखंड संपला.

१९८० नंतर सहकारक्षेत्राची घसरण 
१९८० नंतर जी सरकारे दुसऱ्या कालखंडात आली, ती दुबळी, दिशाहीन, उद्योगपतींना साथ देणारी किंवा खाबू सरकारे ठरली. या काळात काही दिग्गज नेतेही मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले; परंतु केंद्र सरकारच्या बदलत्या राजकारणाच्या पार्श्‍वभूमीवर ते काही विशेष कामे करू शकले नाहीत. 
त्यातील वसंतदादा पाटलांनी विनाअनुदान तत्त्वाचा शिक्षणात पुरस्कार करून शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा केला. माजी शिक्षणमंत्री मधुकररराव चौधरी यांनी त्यांना भेटून परोपरीने सांगण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. शिक्षणासाठी कर्नाटकाकडे जाणारा खासगी पैसा आपल्याकडे का ओढायचा नाही, असाच प्रतिप्रश्‍न त्यांनी केला. त्या काळात सहकार क्षेत्राची जी घसरण सुरू झाली, ती काही वसंतदादांना थोपविता आली नाही. परिणामी, त्यांनीच सुरू केलेला सांगलीचा कारखाना बंद पडलेला आज आपण पाहत आहोत. 

“महर्षीं’चा अस्त; “सम्राटां’चा उदय
१९९३ ते ९५ या काळात शरद पवार मुख्यमंत्री होते. त्यांनी उद्योगपतींना अधिकाधिक सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र, कृषी क्षेत्रात फलोद्यान प्रकल्पाला त्यांनी विशेष चालना दिली. या मोठ्या नेत्यांशिवाय जे अन्य नेते मुख्यमंत्रिपदी आले, त्यांची खुर्ची केंद्र सरकारच्या धोरणामुळे नेहमीच अस्थिर राहिली.

इंदिरा गांधी व त्यानंतरच्या सर्व कॉंग्रेसी नेत्यांची भूमिका अशी राहिली, की राज्यामध्ये कोणीही प्रबळ नेता बनता कामा नये. बॅ. अ. र. अंतुले यांच्या काळापासून राजरोस भ्रष्टाचाराला चालना मिळाली. त्यांच्या आधी मोरारजीभाई देसाई पंतप्रधानपदी असताना साखरेचे भाव दोन रुपयांपर्यंत खाली आणून त्यांनी शहरी नागरिकांना खूष केले. परिणामी, उसाचे क्षेत्र कमी झाले. साखर उत्पादन घटले आणि साखरधंद्यात “ऑन मनी’ घुसला. त्यातून सहकारमहर्षी संपुष्टात आले आणि साखरसम्राट उदयास आले. सहकार क्षेत्राला ग्रहण लागण्यास तेव्हापासून सुरवात झाली. वसंतदादांच्या विनाअनुदान तत्त्वामुळेही शिक्षणमहर्षी पडद्याआड गेले आणि तेथेही शिक्षणसम्राटांचे साम्राज्य निर्माण होऊ लागले. आज शिक्षण इतके महाग बनले आहे, की शिक्षण व्यवस्थेतून बहुजन समाजाचीच हकालपट्टी होऊ घातलेली आहे. अकरावीच्या प्रवेशाला दहा ते वीस हजारांपर्यंत आज सरसहा मागणी होऊ लागलेली आहे. 
६ डिसेंबर १९९२ ला बाबरी मशीद पाडली गेली आणि सबंध देश जातिवादाच्या वावटळीत अडकला. रथयात्रेच्या सुमारास देशभर झालेल्या दंग्यांमधून हजारभर निरपराध व्यक्ती प्राणास मुकल्या. त्याचा सूड म्हणून दाऊद इब्राहिमने मार्च १९९३ मध्ये मुंबईत अनेक स्फोट घडविले आणि त्यात २५७ निरपराध नागरिक मृत्युमुखी पडले. त्याच्या आधीच मुंबईत झालेल्या जातीय दंग्यात ९५० नागरिकांची हत्या झाली. परिणामी, सुधाकरराव नाईक यांना जावे लागले आणि शरद पवार मुख्यमंत्री झाले; परंतु त्यानंतरच्या निवडणुकीत शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती सत्तेवर आली. 

मुंबईवर हल्ला – चौकशी समितीचे ताशेरे
विलासराव देशमुख हे दोनदा मुख्यमंत्री होते; परंतु त्यांना एकदा टंचाईग्रस्त राज्याला तोंड द्यावे लागले होते; तर दुसऱ्या वेळेला दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला करून १८१ लोकांचे बळी घेतल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद सोडावे लागले. दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा मुकाबला पोलिसांनी मोठ्या शर्थीने केला व हौतात्म्यही पत्करले; मात्र दहशतवाद्यांच्या अद्ययावत शस्त्रास्त्रांपुढे त्यांच्या जुनाट शस्त्रांचा टिकाव लागू शकला नाही. चौकशी समितीने याबद्दल सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. 

पायाभूत क्षेत्रातील स्थिती चिंताजनक
गेल्या ५० वर्षांत विविध क्षेत्रांमध्ये काय घडले आणि त्या क्षेत्रात आज काय स्थिती आहे, हे पाहणे उद्‌बोधकच ठरेल. शेतीचा विचार करताना शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा प्रश्‍न अक्राळविक्राळ बनून आपल्यापुढे उभा राहतो. गेल्या १५ वर्षांत देशात एक लाख ८२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 
त्यात ज्यांच्या नावावर सात-बारा नाही, अशी कुळे आणि स्त्रिया यांचा समावेश या यादीत नाहीच. कारण सात-बारात नाव नसेल तर तो शेतकरी कसला? भले तो पिढ्या न्‌ पिढ्या शेती करीत असेल तरीही सरकार त्याची दखल घेऊ शकत नाही. या आत्महत्यांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची संख्या थोडीथोडकी नाही. खुद्द पंतप्रधानांनाच धावत येऊन विदर्भासाठी “पॅकेज’ जाहीर करावे लागले. परंतु मृत्यूनंतरची आर्थिक मदत शेती सावरण्यासाठी कशी उपयोगी पडणार? महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतकऱ्यांचे प्रमाण, विजेचा तुटवडा, ग्रामीण भागातील दिवसेंदिवस चालणारे भारनियमन आणि कृष्णा खोऱ्यातील पाणी अडविण्याबाबत झालेली चालढकल या सर्व गोष्टी चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. 

सहकाराला भ्रष्टाचाराची कीड
भारतातील ४१५ एसईझेडपैकी जास्तीत जास्त एसईझेड महाराष्ट्रात असल्याचा दावा राज्य सरकारने केला आहे. उद्योगधंद्यांसाठी शेतीची जमीन घेऊन मोबदल्यात पैसे देऊन भागणार आहे का? शेतमालकाशिवाय शेतीवर अवलंबून असलेल्या अन्य लोकांच्या पुनर्वसनाचा विचार सरकारने डोळ्यांआड केला आहे, हे विसरून चालणार नाही. सहकार क्षेत्रात एके काळी महाराष्ट्र आघाडीवर होता. शेतकऱ्यांची पहिली सहकारी संस्था १९ व्या शतकात महात्मा फुले यांनी पुरंदर तालुक्‍यात उभारली होती. आजही सहकारी संस्थांचे जाळे फार मोठे आहे. ती तर सत्ताकेंद्रे बनली आहेत; परंतु भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांची कीड या क्षेत्राला लागली आहे. सहकार क्षेत्रात आता सुरवातीच्या अध्यक्षांचा नातू सत्तेवर आलेला आहे. पंडित नेहरूंचा पणतू घराण्यामुळे सत्तेवर येतो, तर सहकार क्षेत्रात त्याचे अनुकरण करायला काय हरकत आहे, असा साळसूद विचार नेतेमंडळी करत असावीत. 

शिक्षण क्षेत्रातील स्थिती अशोभनीय
शिक्षणात “पीपीपी’ म्हणजे “सार्वजनिक-खासगी सहभाग’ हे तत्त्व धुमाकूळ घालत आहे. वास्तविक 
बहुसंख्य शिक्षण संस्था या खासगीच असतात; मात्र शासकीय अनुदानामुळे त्या सरकारी मानल्या जात असत; परंतु आता विनाअनुदान तत्त्वामुळे स्वच्छंदी व नफा कमावण्यास मुक्त अशा शिक्षण संस्थांचा अमाप बुजबुजाट सर्वत्र माजलेला आढळतो. महात्मा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या महाराष्ट्रातही हे घडावे, यापरते दुर्दैव ते कोठले? केंद्र व राज्य सरकारे मिळून २००७-२००८ मध्ये शिक्षणावर राष्ट्रीय उत्पन्नाच्या २.८४ टक्के केवळ खर्च करण्यात आला; परंतु त्याही पुढचा मुद्दा असा, की महाराष्ट्राने मात्र त्यांच्या राज्य उत्पन्नाच्या फक्त दोन टक्के खर्च शिक्षणावर केला आहे, ही गोष्ट पुरोगामी महाराष्ट्राला नक्कीच शोभणारी नाही. सुधाकरराव नाईक शिक्षणमंत्री असताना त्यांनी मुलींचे शिक्षण मोफत करण्याचे ठरविले, या विशेष गोष्टीचा इथे आवर्जून उल्लेख करणे योग्य होईल. 

“कोवळी पानगळ’ची स्थिती आहे तशीच
आरोग्यासाठी महाराष्ट्र सरकार राज्याच्या “सकल घरेलू उत्पन्ना’च्या केवळ एक टक्काच खर्च करीत आहे. राज्यात ४३ हजार ७११ गावे असून, प्राथमिक आरोग्यकेंद्रे मात्र १ हजार ८०९ आहेत, हे चित्र विचित्र आहे. आदिवासींच्या लाखो मुलांच्या कुपोषणाची आकडेवारी डॉ. अभय बंग यांनी “कोवळी पानगळ’ या अहवालात दिलेलीच आहे. त्यात अजून विशेष फरक झालेला नाही. डॉ. अभिजित वैद्य यांनी नुकतेच “अर्धपोटी कष्टकऱ्यांचा आवाज’ या नावाने आरोग्य सेनेचे सर्वेक्षण-अध्ययन प्रसिद्ध केलेले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार रोजगारावर असलेल्या व कुटुंबाचे सरासरी उत्पन्न ५ हजार ७८१ रुपये असलेल्या कुटुंबांना सुमारे ५० टक्के खर्च खाण्यावरच करावा लागतो. त्यांच्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की अशा रोजगार असलेल्या कुटुंबांपैकी २४ टक्के कष्टकरी हे कुपोषित आहेत. आश्‍चर्य याचे वाटते, की ही कुटुंबे सरकारच्या दारिद्य्ररेषेच्या व्याख्येत बसत नाहीत. 

रोजगाराची स्थिती दिवसेंदिवस बिकट
रोजगाराच्या क्षेत्रात ही गोष्ट उघड आहे, की बेरोजगारी वाढत आहे. फार मोठ्या प्रमाणावर मंदीच्या आधीपासूनच कामगारकपात सुरू आहे. मुंबईतील तीन लाख गिरणी कामगारांपैकी आता तेथे कोणी उरलेले नाही. ऍम्युनिशन फॅक्‍टरीमध्येही कामगारकपात सुरू आहे. औद्योगीकरण व कामगारकपात या दोन्ही गोष्टी एकाच वेळी जोर धरीत आहेत. रोजगारापैकी ५६ टक्के रोजगार शेतीत आहे; परंतु तेथील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. 

बचत गट –  अंतःप्रवाहातील मूक क्रांतीच
या काळ्या बाजूबरोबरच काही चांगल्या बाबींचाही आवर्जून उल्लेख करायला हवा.
महाराष्ट्रातील २८ हजार ९३५ ग्रामपंचायतींमध्ये सुमारे ४३ टक्के म्हणजे ७९ हजार ६१९ स्त्री-सदस्य आहेत आणि अल्पबचत गटांची महाराष्ट्रातील संख्या २ लाख २५ हजार ८५६ आहे. त्यांनी १ कोटी ७० लाख व्यक्तींना अल्प कर्जपुरवठा केलेला आहे. ही एक प्रकारची अंतःप्रवाहात चाललेली मूक क्रांतीच आहे. तिचे भविष्यात मोठे परिणाम होतील. मात्र, महाराष्ट्रातही एक हजार पुरुषांमागे केवळ ९०० स्त्रिया आहेत, ही विसंगती नजरेआड करता येणार नाही. 
विरोधी पक्ष काय करीत आहेत?

या सर्व परिस्थितीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधी पक्ष काय करीत आहेत, असा प्रश्‍न उपस्थित करणे अत्यंत सयुक्तिक आहे. माझ्या मते, काही विरोधी पक्ष पुरोगामी आहेत, तर काही जातीयवादी आहेत. पुरोगामी विरोधी पक्षांमध्ये शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनता दल यांचा उल्लेख करावा लागेल. हे सर्व विरोधी पक्ष आज तरी संकटग्रस्त आहेत. फाटाफुटीने जराजर्जर झालेले आहेत. धनसत्ता, बाहुसत्ता व जाती-जमातवाद यांच्या प्राबल्यामुळे विचारधाराअधिष्ठित पक्षांचे महत्त्व कमी कमी होत आहे. जागतिकीकरणाचा हा एक राजकीय दुष्परिणाम आहे. १९७४ मध्ये पुणे विद्यापीठाने एक परिसंवाद घेतला होता. त्याचे संकलन “बदलत्या महाराष्ट्राचे स्वरूप’ या शीर्षकाखाली प्रा. मा. प. मंगुडकरांनी प्रसिद्ध केले आहे. त्यात तत्कालीन कुलगुरू प्रा. राम जोशींनी, सध्या एकप्रभावी पक्षपद्धती आहे, असा निबंध मांडलेला आहे. सर्वच वक्‍त्यांनी विरोधी पक्षांच्या दुर्बलतेवर भाष्य केलेले आहे. प्रजा समाजवादी पक्ष तर जनता पक्षात विलीन झाला. शेतकरी कामगार पक्ष मार्क्‍सवाद व जातीयवादाच्या घेऱ्यात अडकला. कम्युनिस्टांमध्ये विभागणी होऊन मार्क्‍सवादी अलग झाले. डावा साहसवाद व उजवा सुधारणावाद या चर्चेतच कम्युनिस्ट अडकून पडले. जनता पक्षातून लोकदल व भाजप बाहेर पडल्यावर समाजवाद्यांनी बाहेर पडून फेरसंघटन करण्याऐवजी जनता पक्षाला समाजवादी रंग देण्याचा भ्रम बाळगला आणि अखेरीस हा पक्ष कॉंग्रेसी संस्कृतीतील देवेगौडांच्या हाती जाऊन क्षीण बनला. रिपब्लिकन पक्षाच्या फाटाफुटीबद्दल बोलावे तेवढे थोडेच आहे. जातिआधारित पक्ष वाढविण्याची कल्पना त्यांना मर्यादित करीत आहे. 

वास्तविक, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना डॉ. राममनोहर लोहिया, एस. एम. जोशी, आचार्य अत्रे यांना घेऊन व्यापक पक्ष स्थापन करायचा होता. त्यांनी निर्माण केलेल्या रिपब्लिकन पक्षाच्या भूमिकेत पक्ष बौद्ध धम्माधिष्ठित नव्हता; परंतु हे भान त्यांच्या वारसदारांना राहिले नाही. आता हे पक्ष आपापसांत आघाड्या करतात आणि नंतर त्या बिघडूनही जातात. भांडवलशाही व जातीयवाद यांच्या विरोधात तिसरी शक्ती उभी करण्यास हे पक्ष आज तरी अपयशी झालेले आहेत. 

जागतिकीकरण व जमातवाद या दोन अक्राळविक्राळ शत्रूंशी मुकाबला करण्यासाठी पॅंथर ते नक्षलवादी अशी व्यापक आघाडी करण्याशिवाय काही पर्याय आहे, असे मला तरी दिसत नाही. 

पक्षांबरोबर जनसंघटनाही महत्त्वाच्या 
जातिवादी पक्षांमध्ये पूर्वीचा जनसंघ व आताचा भारतीय जनता पक्ष, शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा उल्लेख करावा लागेल. जातिवादी पक्षांच्या राजकारणाला पाच वर्षांतच लोक कंटाळले. द्वेषाधारित राजकारण हा त्यांच्या आचारातील-विचारांतील गाभा आहे.

“बुद्ध व गांधी यांनी भारत स्त्रैण (बायकी) केला,’ असे म्हणणारे विरोधी पक्ष तद्दन हिंसावादी आहेत. त्याची मांडणी संघाचे माजी सरसंघचालक के. सुदर्शन यांनी आणि त्यापूर्व गोळवलकर गुरुजींनी करून ठेवलेलीच आहे; परंतु पुरोगामी विरोधी पक्षांत फाटाफूट झाल्यामुळे जे क्षेत्र रिकामे झाले, त्यात शिरकाव करणे, या पक्षांना सहज शक्‍य झाले. मात्र, भारतीय जनता त्यांचे स्वरूप आता समजू लागली आहे, असे दिसते. 

सत्ताधारी, विरोधी पक्ष यांच्या बरोबरच जनसंघटनांचे महत्त्व फार मोठे आहे. त्यातील कामगार संघटनांचे क्षेत्र विशाल आहे. परंतु विविध राजकीय पक्षांनी आपापल्या कामगार संघटनांच्या राहुट्या स्वतंत्र ठेवल्यामुळे कामगारशक्ती एकवटली जात नाही. कामगारांना संरक्षण देणारे बहुतेक सर्व कायदे विविध सरकारांनी पातळ केल्यामुळे कामगारांची शक्ती क्षीण झाली आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची त्यांची शक्तीही कमकुवत झाली आहे. सध्याचे वातावरण पाहून न्यायालयेही संपाला विरोध करीत आहेत. संघटित कामगारांची ही स्थिती; तर त्यांच्यापेक्षाही बारा पटींनी अधिक असलेल्या ३७ कोटी असंघटित कष्टकऱ्यांची काय अवस्था असेल? पेन्शन, विमा व वेतनसंरक्षण यासाठी डॉ. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली असंघटित कष्टकरी आवाज उठवीत आहेत; परंतु सरकार तिकडे दुर्लक्ष करीत आहे. मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली देशातील शंभर जनसंघटनांनी राष्ट्रीय जनसंघटनांचा (छअझच )समन्वय निर्माण केला. या समन्वयाने विकासाच्या संकल्पनेपुढे प्रश्‍नचिन्ह उभे केले. मोठे कारखाने, मोठी धरणे, आर्थिक विकास दरवाढ म्हणजेच विकास का, हा प्रश्‍न त्यांनी समाजापुढे ठेवला; परंतु देशातील विचारवंत, सार्वजनिक माध्यमे आणि प्रमुख नेते त्या विषयाला पुरेशी चालना देत नाहीत. सरकार तर “उद्योगधंदे हेच विकासाचे इंजिन’ असे मानून आपली पाश्‍चात्त्य विकास संकल्पना भारतीय समाजावर लादत आहे. देशात हजारो जनसंघटना आहेत; परंतु त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. त्यांच्यामध्ये राजकारणाची जी घृणा निर्माण झाली आहे, त्यामुळे त्यांच्या सांस्कृतिक क्रांतीची संकल्पनाही अधांतरी ठरत आहे. त्यांनी आपापसात समन्वय साधून पर्यायी राजकीय शक्ती उभी केली, तर ते खचितच परिणामकारक ठरतील.

स्वप्नांचा ताळेबंद मांडण्याची वेळ

या सर्व राजकीय आढाव्यानंतर प्रश्‍न उरतो, तो म्हणजे महाराष्ट्राचे स्वप्न काय होते आणि आज वास्तव काय आहे, हा.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अध्वर्यू एस. एम. जोशी सर्वत्र सांगत असत, की “”समाजवादाचा पाळणा देशात प्रथम महाराष्ट्रात हलणार.” जाती-धर्म-भाषा यांना छेद देऊन जनतेची ही चळवळ उभी राहिली. एकात्म राज्याच्या निर्मितीसाठी १०५ हुतात्म्यांनी बलिदान केले. आंध्रप्रमाणे हिंसाचाराचे थैमान न मांडता अत्यंत शांततेच्या मार्गाने, व भाषिक द्वेषभावनेला थारा न देता अभूतपूर्व रीतीने जनतेने लढा दिला. त्या वेळी जनतेच्या डोळ्यांपुढे जी स्वप्ने होती, ती वास्तवात आलीत की नाही, किती आलीत आणि किती राहिलीत, याचा ताळेबंद मांडण्याची वेळ आता आलेली आहे.

महाराष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवप्रसंगी हा ताळेबंद पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शक ठरेल, असा मला भरवसा आहे. 
– भाई वैद्य 

पांडुरंगशास्त्री आठवले, सौजन्य – म टा

।। श्रीयोगेश्वरोविजयतेतराम्।।

आज धर्म शब्द उच्चारला की सर्वप्रथम आपल्या डोळ्यासमोर हिंदु , ख्रिश्चन ,पारशी , मुस्लिम अशी नावे येतात. त्यानंतरविचार येतो तो प्रत्येक धर्मानी सांगितलेल्या धामिर्क कर्मकाडांचा. प्रत्येक धर्म एक धामिर्क शिस्त सांगतो. या कर्मकांडांचे स्वरूप आज रुक्ष , अर्थहीन होत आहे. त्यामुळे सुशिक्षित लोक या कर्मकांडांना कंटाळले आहेत. त्यांना ही कर्मकांडे नको आहेत.

दुसऱ्या बाजूला धर्माच्या नावाने अनंत भेद उभे राहिले आहेत. ते अगदी विकोपाला गेले आहेत. ज्या धर्माने विषमता काढायची तोच धर्म विषमता उभी करताना दिसतो आहे.

तसेच धर्म फक्त विविध चमत्कार , भीती आणि रुढीग्रस्ततेत अडकून पडला आहे. असा धर्म आमच्या दैनंदिन जीवनात काहीच परिणाम करताना दिसत नाही. या उलट समाज जीवन धर्मामुळे उध्वस्त होताना दिसत आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून धर्म शब्दाचाच आज ऊबग आला आहे.

धर्मामधून बुद्धिप्रामाण्य निघून गेलं. अर्थहीन गोष्टी करणे म्हणजे धर्माने वागणे असं स्वरूप आलं. राणा प्रतापने प्रतिज्ञा केली होती की , जोपर्यंत मायभूमीला स्वतंत्र करीत नाही तोपर्यंत गवतावर झोपेन आणि पानाच्या पत्रावळीवर भोजन होईल. त्यानंतर आजचे राजपूतही तो धर्म पाळतात. ते काय करतात ? कापसाच्या मऊ गादीवर झोपतात पण गादीखाली गवत ठेवतात. चांदीच्या ताटात जेवतात पण त्या ताटाखाली पत्रावळ ठेवतात. हे केलं की ते स्वत:ला धामिर्क समजतात एरवी जीवनभर लाचारी करतील पण हे केलं की धर्म पाळला. अशी ही कृति अर्थहीन झाली. शिवाजी महाराज जेव्हा आग््याहून निसटले तेव्हा औरंगजेबाने मिर्झाराजे जयसिंगांवर ठपका ठेवला होता. तुम्ही आणि शिवाजी एकाच जातीचे असल्यामुळे निसटून जायला तुम्हीच त्यांना मदत केली असा आरोप ठेवला. त्यावेळी भर दरबारात मिर्झाराजांनी सांगितले की मी माझे कुलदैवत एकलिंगजीची शपथ घेऊन सांगतो की , हे मी केलेलं नाही. तुम्ही फर्मावित असाल तर अजूनही त्याला पकडून आणतो. माझ्या मुलासाठी शिवाजीच्या मुलीची मागणी करतो. लग्नासाठी त्याला घरी बोलावतो व दगा देऊन त्याला पकडतो. 

पण जर कोणी या मिर्झाराजेंना त्यावेळी सांगितले असते की , असे केल्याने तुमच्या हातून फार मोठा अधर्म होत आहे. तुम्ही अधामिर्क आहांत , तर त्यंानी तात्काळ सांगितले असते की मी आणि अधर्म ? हे शक्यच नाही. ही माझी शेंडी पहा. शास्त्रात जेवढी लांब ठेवायला सांगितली आहे तेवढी मी ठेवली आहे. मी दर सोमवारी शंकराला अभिषेक करतो मग मी अधामिर्क कसा ?

खऱ्या अर्थानी जो अधर्म आहे तोच धर्माच्या नावानी प्रतिष्ठा पावला. बुद्धिप्रामाण्य निघून गेले. त्यामुळे धर्मात वहीम घुसला. काही चतुर लोक त्याचा उपयोग करून धर्माच्या नावाने भीती उभी करू लागले आणि त्यावर आपली उपजीविकाही चालवू लागले. तुम्ही एकादशी केली , उपास केला की धामिर्क व एखादा उपास करत नसेल तर त्याला अधामिर्क समजू लागले.

एकादशी करणारा काय करतो ? तर रोजच्या पोळी-भाजी ऐवजी साबुदाणा खातो. साबुदाण्यात पोळीपेक्षा कोणते जास्त आध्यात्मिक मूल्य आहे ? असा उपवास , एकादशी का करायची ? हे मूळ मुद्देच माणूस विसरला. तथाकथित धामिर्क लोकही हे असे का हे समजावून देत नाहीत. बुद्धिमान लोकांना तर याबाबतीत विचार करायलाच वेळ नाही. त्यांना धर्म च नकोसा झाला आहे. कोणाला राष्ट्राभिमानी म्हटले तर आनंद होतो. समाजवादी म्हटले तर , गौरव वाटतो पण धामिर्क म्हटले की तोंड वाकडं करतो. आज दुजाभाव-परकेपणा म्हणजेच धर्म. धर्माच्या बाबतीत बुद्धी चालवायचीच नाही असं जणूं ठरवूनच टाकलं आहे. आजच्या तरुणांचे प्रश्न आहेत मूतीर्ची पूजा का करायची ? देवाची स्तुति का करायची ? भक्ती कशाला ? एकादशी कशासाठी ?साबुदाण्याला आध्यात्मिक मूल्य असेल तर तांदळाला का नाही ? याची उत्तरे कोणी देईल काय ?कोणीच ती उत्तरे देत नाही. यामुळे धर्म रुढीग्रस्त झाला आहे. फक्त शेंडी , जानवं , टिळे , टोपी ,गंध आणि माळा म्हणजेच धर्म , एवढाच धर्म राहिला. मग प्रश्न येतो असा धर्म काय कामाचा ?असा धर्म का टाकून देऊ नये ?

परंतु त्यापुढे एक प्रश्न आहे. की , धर्म टिकला कसा ? धर्मामध्ये एक जबरदस्त शक्ती आहे. ती अतुलनीय आहे. युरोपमध्ये बघितले तर ज्युलियस सीझर , ऑगस्टस् सीझर असे कित्येक प्रभावीराजे होऊन गेले. त्यांची नावे पुसली गेली. त्यांचे कायदे पण राहिले नाहीत. पण मोडका-तोडका रोमन कॅथलिक धर्म अजून टिकला आहे.

आपल्या देशातही हर्ष-चंदगुप्तासारखे पुष्कळ राजे होऊन गेले. त्यांना लोक विसरले पण श्रावणी सोमवार अजून शिल्लक आहे. मोडका तुटका असेल पण आहे. धर्मसत्ता अजून टिकून आहे आणि ती मानवी मनावर अधिराज्य करत आहे. विश्वावर राज्य करणारी ही शक्ती एवढी प्रभावी असेल तर त्या शक्तीचा विचार करावा लागले. ऋषिंनी धर्म का सांगितला हे मागे जाऊन पहावे लागेल.

शब्दांकन सीमा भानू, सौजन्य : इ-अनुभव मासिक

हेमलकशाच्या जंगलात तीन दशकांहून अधिक काळ मानवसेवा केलेल्या डॉ.प्रकाश आणि मंदा आमटे यांना नुकतंच मॅगसेसे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यांच्या कार्याची महती आता लोकांना पटली, परंतु तीस-पस्तीस वर्षांपूर्वी त्यांना कोणत्या परिस्थितीतून जावं लागलं? हेमलकशातील सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगताहेत खुद्द डॉ.प्रकाश आमटे.
“समकालीन प्रकाशना’तर्फे लवकरच प्रकाशित होत असलेल्या पुस्तकातील निवडक भाग.

—————————————————————————————————————————–

1970 सालची गोष्ट. एमबीबीएसची शेवटची परीक्षा संपल्यावर मी आणि थोरला भाऊ विकास दोघेही नेहमीप्रमाणे घरी गेलो. बाबा अचानक म्हणाले, “”आपण भामरागडला जाऊया.” आनंदवनपासून 250 किलोमीटरवरचा चंद्रपूर जिल्ह्यातला भाग; नंतर तो गडचिरोली जिल्ह्यात आला. महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशच्या सीमेवरचा हा प्रदेश. पूर्ण जंगलाने व्यापलेला. माडिया गोंड जमातीच्या आदिवासींची तेथे वस्ती आहे, एवढंच ऐकून माहीत होतं. बाबा त्यांच्या लहानपणी तिथं गेले होते. आम्ही तिथं आधी जायचा प्रश्नच नव्हता. आपण सहलीला चाललोय, असं बाबा म्हणाले खरं, पण त्यांच्या मनात काय आहे हे तेव्हा आम्हां कुणालाच माहीत नव्हतं.
बाबा, ताई, मी, विकास, मधुभाई पंडित इतर दोघं-चौघं, स्वयंपाकी असे आम्ही साताठजण निघालो. वाटेत नद्या, ओढे लागले. काहींना पाणी होतं. काहीना नव्हतं. रस्ते कच्चे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी भामरागडला पोचलो. तिथं त्रिवेणी नद्यांचा संगम पाहिला. झाडाखालीच मुक्काम केला. शेकोटी पेटवून गप्पा मारत बसलो. तिथंच चूल मांडून स्वयंपाक करायचो.

या काळात आजूबाजूच्या गावातही हिंडलो. तिथले आदिवासी अगदी जरूरीपुरते कपडे घातलेले किंवा तेही न घातलेले. शरीरं खंगलेली. आमची गाडी गावात शिरली की ते जंगलात पळून जायचे. जनावरं माणसाला घाबरतात हे माहीत होतं, पण माणूसही माणसाला घाबरतो याचं नवल वाटायचं. एखादा थांबलाच आणि त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केला, तर भाषेचा अडथळा यायचा. आम्ही इथं नुसतं सहलीला आलो नाही, हे कळत होतं पण बाबा काही स्पष्टपणे बोलत नव्हते.

शेवटी तिसऱ्या दिवशी आम्ही निघायचं ठरवलं. निघताना बाबा म्हणाले, “”तुम्ही इथली परिस्थिती पाहिलीच आहे. इथं माणूस माणसाला घाबरतोय. कुपोषण आहे. या लोकांचा बाहेरच्या जगाशी काही संबंधच नाही. आता आनंदवनाचं काम मार्गी लागलंय, तेव्हा माझी इच्छा आहे की आता इथं काम करावं. बाबा तेव्हा 56 वर्षांचे होते. मी 22 वर्षांचा. सर्वसाधारण माणूस साठीला निवृत्त होतो आणि आता या वयात बाबांनी हे नवं काम अंगावर घ्यायचं, तेही अशा दुर्गम भागात हे काही बरं वाटत नव्हतं. पण बाबांना विरोध करणार कसा? त्यांनी एकदा एखादी गोष्ट ठरवली की ठरवली ! मी चट्‌कन त्यांना म्हणालो, “”या वयात तुम्ही हे कसं करणार? मी तुम्हाला जॉईन होणारच आहे, तर मी इथं काम करतो.” बाबा उघडपणे आम्हाला काही म्हणाले नव्हते, पण त्यांच्या मनात बहुधा असंच काहीतरी होतं. त्यामुळं ते खूप खूष झाले.

अर्थात, हा निर्णय मी भावनेच्या भरात घेतला होता असं नाही. बाबांच्या बरोबर काम करायचं ठरलेलंच होतं. आम्ही दुसरं काही करू असं बाबांना आणि ताईलाही वाटत नव्हतं. नागपूरसारख्या शहरात राहून आणि मेडिकल कॉलेजमध्ये साडेचार वर्षं काढूनही वेगळं काही करावं, खूप पैसे मिळवावेत अशी भावना कधी मनात आली नव्हती. आम्ही ज्या साध्या वातावरणात वाढलो होतो त्याचा आमच्यावर इतका प्रभाव होता की, यापेक्षा दुसरं आयुष्य हवं असं कधी वाटलंच नाही. त्यामुळे बाबांना मदत करायची हे तर नक्कीच होतं. मग ती आनंदवनात केली काय आणि भामरागडला केली काय!

अर्थात त्यावेळेस आनंदवनातलं काम बऱ्यापैकी स्थिरावलं होतं आणि भामरागडला मात्र सुरुवात करायची होती. तिथं प्रत्यक्ष गेल्यानं आणि राहिल्यानं, हे किती अवघड आहे याची झलक मिळाली होतीच. तरीही किंवा म्हणूनच इथं आपल्या मदतीची जास्त गरज आहे, असं मला वाटलं आणि मी लगेच निर्णय घेतला.

हा निर्णय झाला त्यानंतर अनेक वर्षांनी मी कुठंतरी वाचलं की, “”बाबांच्या साठाव्या वाढदिवशी प्रकाश त्यांच्याकडे गेला आणि त्यांना म्हणाला की, “”आजच्या दिवशी तुम्हाला भेट म्हणून मी माझे हातच देतो.” प्रत्यक्षात असं काही झालं नव्हतं. बाबा कवी होते आणि ते बऱ्याचदा काव्यात बोलायचे. पण त्यांचा हा गुण माझ्यात अजिबात नाही. मला असं बोलणं कधी जमलंच नाही. त्यामुळं झालं ते अगदी साधं-सरळ. बाबांना या भागात काही काम करावंसं वाटत होतं आणि त्यांची तब्येत नि वय यामुळं ही नवीन जबाबदारी मी माझ्याकडं घेतली एवढंच! या निर्णयाने आपल्या आयुष्याची दिशा ठरतेय आणि ही वाट बरीच अवघड आहे, याची जाणीव मला तेव्हा नव्हती असं नाही. पण बाबा-ताईंना अशाच परिस्थितीतून वाट काढताना पाहिल्यामुळं असेल, तसंच तरूण वयामुळंही असेल त्याचं फारसं दडपण आलं नाही, एवढं नक्की.

या सुमारास परीक्षेचा निकाल लागून आम्ही दोघंही पास झालो. त्यानंतर एका वर्षाची इंटर्नशिप. शेवटचे तीन महिने इंटर्नशिप कुठल्यातरी खेड्यात करावी लागते. आनंदवन हे खेडंच आहे. त्यामुळे आम्ही तिथंच राहिलो. यानंतर खरं तर मी लगेच भामरागडला गेलो असतो, पण तिथं काम करायला अजून जागा मिळाली नव्हती. तेव्हा वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. बाबांनी त्यांना विनंती केली की, भामरागड भागात 50 एकर तरी जागा मिळावी. त्यासाठी आवश्यक ती कागदपत्रंही आम्ही तयार करून पाठवून दिली होती. नाईकांनी संबंधित अधिकाऱ्यांना यांना पाहिजे ती जागा द्या, असं सांगितलंही होतं. भामरागड परिसरात काम करायचं बाबांच्या इतकं डोक्यात होतं की, पुन्हा 1971 साली सुमारे पन्नास तरुणांची सहल घेऊन ते या भागात गेले होते. यापैकीच अजित मळकर्णेकर, नागेश हटकर हे पुढे माझ्याबरोबर काम करायला लागले.

बाबा दुखऱ्या पाठीच्या उपचारांसाठी इंग्लंडमध्ये होते, त्याच दरम्यान शासनाकडून पत्र आलं की, तुमच्या नियोजित प्रकल्पासाठी भामरागडजवळ हेमलकसा इथं जागा आहे, ती बघून घ्या. बाबा नसल्यानं आमचे ट्रस्टी पावडे वकील व विनायक तराळे यांच्याबरोबर मी ती बघायला गेलो. पहिल्यांदा तरी ही जागा सोयीची वाटली नाही. पण तेव्हा असा विचार केला की, आता या जागेला नाही म्हणालो, तर पुन्हा कधी मिळेल कुणास ठाऊक! निर्णय आम्हालाच घ्यायचा होता. “हो’ म्हणून टाकलं. जागा मिळणार हे नक्की झालं.

पण प्रत्यक्षात जमीन हातात यायला पुढं अजून तीन वर्षं लागली. त्यामुळे वेळ घालवण्यासाठी म्हणून मी पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं ठरवलं. पण नागपूरला गेलो तेव्हा कळलं की ऍडमिशनची मुदत संपून गेली आहे. मग डॉ. सुशीला नायर यांचं “कस्तुरबा ट्रस्ट’चं “महात्मा गांधी मेडिकल कॉलेज’ होतं तिथं प्रवेश घेतला, मी सर्जरीला आणि विकासनं मेडिकलला. मंदाची आणि माझी ओळख इथंच झाली. तिनं ऍनेस्थेशियाच्या अभ्यासक्रमासाठी तिथं त्याच वर्षी प्रवेश घेतला होता. तिलाही नागपूर कॉलेजला ऍडमिशन मिळाली नव्हती. त्यामुळं तीही “कस्तुरबा’मध्ये आली होती. मी सर्जरी विभागात आणि ती ऍनेस्थेटिस्ट, त्यामुळे आमची सतत भेट होणं साहजिकच होतं.

यातला मजेचा भाग असा की, मंदाही आमच्या मेडिकल कॉलेजमधूनच डॉक्टर झालेली. ती माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी त्यामुळे मला एक वर्ष सिनियर होती. तरीही कॉलेज एकच. पण आम्ही दोघांनीही एकमेकांना आधी पाहिलेलं नव्हतं. त्यामुळे भेटणं, बोलणं तर दूरच. ती कॉलेजक्वीनच होती. दिसायला चांगली, त्यामुळे तिच्याशी बोलायला, लग्न करायला खूपजण इच्छुक होते. आणि मी इतका नाकासमोर बघून चालणारा की मला तिचं नावही माहीत नव्हतं!

पण ओळख झाली आणि एकत्र काम करताकरता इतर गोष्टींवरही गप्पा होऊ लागल्या आणि लक्षात आलं की आपली वेव्हलेंग्ध जमतीये. आपल्याला एकमेकांबरोबर असणं आवडतंय. पण माझा स्वभाव इतका संकोची की, मी हे तिला स्पष्टपणे सांगणं शक्यच नव्हतं. तीही काही बोलली नाही. आमच्या दोघांपैकी कुणीच एकमेकांना “प्रपोज’ वगैरे केलं नाही. आपले स्वभाव जुळताहेत हे लक्षात आल्यावर लग्न करायचं, हे मनात ठरलेलंच होतं. हे थोडंसं “अनरोमॅंटिक’ वाटेल. पण आमचे दोघांचे स्वभाव लक्षात घेतले तर त्याला हे सुसंगतच होतं.

शिक्षणानंतर मी काय काम करणार आहे, त्याची मंदाला कल्पना होती आणि माझ्याबरोबर ते काम करायची तिची तयारीही होती. तिनं तो भाग पाहिलेला नसूनही. आणि मला हे विशेष वाटत होतं. बाबांचं नाव तिनं ऐकलं होतं, त्यांच्या कामाबद्दल तिला थोडीफार माहिती होती, पण ती ज्या कुटुंबातून आली होती, त्यांना सामाजिक कामाची पार्श्वभूमी अजिबातच नव्हती. त्यामुळेच मंदानं माझ्याशी लग्नाला तयार होणं हे आश्चर्य होतं. प्रेमात पडल्यावर वातावरण भारलेलं असतं त्यामुळे कित्येकदा माणूस भावनेच्या भरात निर्णय घेतो. पण मला मंदाचं कौतुक एवढ्यासाठी जास्त वाटतं की, आपल्या पुढच्या आयुष्याबद्दल तिला फक्त ऐकीव माहिती असतानाही तिनं माझ्यावर विश्वास ठेवून निर्णय घेतला. हे आयुष्य किती खडतर असेल, याची कल्पना हेमलकसाला गेल्यावर तिला आली. पण तरीही तिनं तो निर्णय कायम ठेवला आणि निभावला. अगदी सहजतेनं आणि आनंदानं.

मुलींशीच काय कुणाशीच जास्त न बोलणारा मी, पण ज्याअर्थी मंदाशी माझी इतकी मैत्री झाली आहे त्याअर्थी काहीतरी गडबड आहे, हे विकासनं ओळखलं. बातमी बाबांपर्यंत गेली. त्यांनी दोघांनाही भेटायला बोलावलं. पहिला प्रश्न त्यांनी विचारला की, “”तू काय काम करणार आहेस याची माहिती हिला आहे का?” मी म्हटलं, “”सांगितलंय. आणि तिच्या मनाचीही तयारी आहे.” त्यावर बाबांनी निर्णय दिला, “”तयारी पक्की असेल, तर जास्त दिवस थांबू नका. परीक्षा नंतर देता येईल, आधी लग्न करा.”

मंदा माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी. शिवाय विकास माझ्याहून मोठा. त्याच्याआधी माझं लग्न करायचं, त्यामुळं ताईला हे फारसं पसंत नव्हतं. पण बाबा ठाम होते आणि त्यांच्यापुढं बोलायची कुणाची प्राज्ञा नसे.

लग्न आनंदवनात होणार, हे नक्की होतं. कारण तिथले कुष्ठरोगी उठून नागपूरला कसे येणार? आणि ते तर लग्नात हवेतच. लग्न पारंपरिक पद्धतीनं न करता वेगळ्या पद्धतीनं करावं, असं मला वाटत होतं. बाबांचा अर्थातच त्याला पाठिंबा होता. लग्नात भटजी नकोत कारण ते संस्कृतमध्ये काय म्हणतात कुणास ठाऊक! “देणंघेणं’ अर्थातच नव्हतं. अगदी एकमेकांना हातरूमालही द्यायचा नाही, असं बाबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. 1972 साली मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे लग्नात गोडधोड, जेवणावळी नसतील, असंही ठरलं.

मंदाच्या आईवडिलांचंही वैशिष्ट्य की, त्यांनी कशालाच विरोध केला नाही. मुलीच्या निवडीलाही नाही आणि नंतर लग्न करायच्या पद्धतीलाही नाही. रजिस्टर लग्न मात्र नको, असा आग्रह त्यांनी धरला. ताईलाही तसंच वाटत होतं. रजिस्टर लग्नात नुसते दोघे एकमेकांना हार घालतात, असं लग्न नको, असं म्हणण पडलं. शेवटी मधला मार्ग काढला. सर्वोदयी कार्यकर्ते मामा क्षीरसागर नेहमी आनंदवनात यायचे. त्यांना सांगितलं, तुम्ही आमचं लग्न लावा. फक्त सप्तपदी करायची आणि मंत्र मराठीतून म्हणायचे. ते आनंदानं तयार झाले.

मुहूर्त बघायचा नव्हता. रविवार असल्याने 24 डिसेंबर 1972 हा दिवस निवडला. त्या दिवशी योगायोगानं साने गुरुजींची जयंती होती. बाबांनीच मंगलाष्टकं तयार केली होती. लग्नातली सजावटही पानांची रांगोळी, धान्याची रांगोळी अशी नैसर्गिक होती. सकाळी नऊ वाजता विधींना सुरुवात झाली आणि 10 वाजता लग्न लागलं. डॉ.आंबेडकरांचा मोठा फोटो लावला होता. त्याला नमस्कार करून समारंभ संपला. जेवणावळी नव्हत्याच. सगळ्या निमंत्रितांना पेढा दिला. आनंदवनात जेवायला त्यादिवशी मसालेभात केला होता. सगळ्या पारंपरिक गोष्टींना फाटा देऊन पण सगळ्या नातेवाईकांना, मित्रमंडळींना सहभागी करून घेतलेलं, असं हे लग्न होतं.

लग्न झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्ही हेमलकसाला गेलो. नंतर तिथून ताडोबाला. तिथंच एक रात्र मुक्काम केला. लग्न झाल्या झाल्या आम्ही जंगलात आलो आणि इथंच काम करणार, या गोष्टीचं तिथल्या फॉरेस्ट ऑफिसरना फार कौतुक वाटलं. मंदानं आनंदवन, सोमनाथचे प्रकल्प पाहिले होते. तिथं त्या वेळी बऱ्याच सुधारणा झाल्या होत्या. शहराच्या ते जवळ होतं. हेमलकशाला असंच काहीतरी असेल, असं तिला वाटलं असणार. प्रत्यक्षात तसं ते अजिबातच नव्हतं. तरीही ती शांत राहिली.

लग्न झाल्यावर हेमलकसा-ताडोबा मुक्काम आटोपल्यानंतर आम्ही दोघंही नागपूरला परतलो. नागपूरच्या जवळ “अशोकवन’ हा अजून एक कुष्ठरोगी पुनर्वसन प्रकल्प आकाराला येत होता. तिथं आम्ही राहिलो. तिथून नागपूरला ये-जा करायचो. व्यक्तिगत आकसापोटी नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश नाकारला गेला, पण नागपूरच्याच इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला. पण तिथली रजिस्ट्रारची जागा ही स्थानिक लोकांसाठी होती, त्यामुळे मला प्रवेश मिळाला तरी प्रत्यक्ष काम करता येत नव्हतं. नुसतं यायचं, स्वतः काही करायचं नाही, फक्त दुसरे ऑपरेशन कसं करताहेत ते लांबून बघायचं. हे आवडत नव्हतं. पण माझ्यापुढं पर्याय तरी काय होता?

दरम्यान मंदानं तिचं शिक्षण संपल्यावर गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी सुरू केली. तिला तेव्हा 850 रुपये पगार मिळायचा. आमच्या दोघांचा खर्च त्यातून सहज भागायचा. मनासारखं काम करायला न मिळाल्यानं माझी अस्वस्थता वाढत होती. हेमलकसाच्या जागेसाठी अर्ज देऊन तीन वर्षं होत आली होती. आणि याच सुमारास हेमलकसा आणि नागेपल्ली या दोन्ही जागांचे अर्ज मंजूर झाल्याचं पत्र सरकारकडून मिळालं. ही मंजुरी देण्याआधी आम्हाला अजून दोन जागा दाखवल्या होत्या. त्यातल्या एका जागेजवळ नाला होता. त्याचं पाणी तुम्हाला वापरता येईल, असंही सांगितलं होतं. या जागा होत्या त्रिवेणी संगमाजवळ, आत्ताच्या जागेपासून अजून थोड्या लांब. आता पावसाळ्यात एकच नदी पार करायला लागते. ह्या जागांसाठी दोन नद्या पार कराव्या लागल्या असत्या आणि पावसाळ्यात अजून हाल झाले असते. त्यामुळे आम्ही त्यांना नकार दिला.

आनंदवनातून हेमलकसा अडीचशे किलोमीटरवर; पण रस्ते खराब. काही ठिकाणी रस्तेच नाहीत. त्यामुळं तिथं जायला एक दिवस लागायचा. नंतरच्या टप्प्यात ओढे, नदी आहेत. पावसाळ्यात ते भरून वाहायचे. अशा परिस्थितीत वाटेत मुक्काम करायला एक जागा असावी म्हणून “नागेपल्ली’ची जागाही मागितली होती.

जागा मंजूर झाल्याचं पत्र मिळताच बाबा आपल्या काही कार्यकर्त्यांसह हेमलकसाला जाऊन धडकले. 23 सप्टेंबर 1973 या दिवशी त्यांनी तिथं डेरा टाकला. याच दिवशी “लोकबिरादरी प्रकल्पा’च्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रारंभ झाला. वास्तविक मी चार-पाच महिन्यांनी येणार होतोच; पण बाबा कुणासाठी थांबून राहणारे नव्हतेच. “”तू तुझ्या वेळेला ये. मी कामाला सुरुवात करतो,” असं म्हणून ते गेलेच.

हेमलकसाची जागा मूळची वनखात्याची. त्यांनी ती महसूल खात्याला दिली आणि त्यांनी बाबांना- म्हणजे महारोगी सेवा समितीला दिली. बाबांनी तिथं जाऊन झाडं तोडायला सुरुवात केली, कारण राहण्यासाठी थोडी तरी जागा मोकळी करणं गरजेचं होतं. वनअधिकारी आले आणि त्यांनी “”तुम्ही बेकायदेशीरपणे आमच्या जागेत कसे घुसलात?” असा आक्षेप घेतला. बाबा म्हणाले, “”कागदोपत्री जागा माझी आहे.” त्यावर ते म्हणाले, “”पण त्याच्यावरची झाडं ही आमची मालमत्ता आहे. त्याला तुम्ही हात लावू शकत नाही.” ते ऐकेनात. त्यामुळं मोठा पेच निर्माण झाला.

खरंतर, बाबा थेट हेमलकसाला गेले आणि त्यांनी कामाला सुरुवात केली, हे त्या वनअधिकाऱ्याला खटकलं होतं. थोडक्यात, त्याला महत्त्व न दिल्यानं तो चिडला होता. तेव्हा खोत नावाचे एक अधिकारी तिथं होते. त्यांनी या अडचणीतून मार्ग काढला. “”झाडं ही वनखात्याची संपत्ती आहे ना, मग त्याची किंमत तुम्ही वसूूल करा” असं त्यांनी वनअधिकाऱ्याला सुचवलं. त्याची जी काही किंमत ठरवण्यात आली ती बाबांनी दिली आणि हे प्रकरण मिटलं.

सोमनाथला “कार्यकर्ते निर्माणा’ची श्रमसंस्कार शिबिरं व्हायची. अजूनही होतात. त्यातून हजारो मुला-मुलींनी विधायक काम करायची प्रेरणा घेतली आहे. त्यातील पाच-सहा कार्यकर्त्यांना घेऊन सुरुवातीला बाबा गेले. त्यांच्याबरोबर बरे झालेले पाच कुष्ठरोगीही होते. विकासनं ट्रक खरेदी केला होता. हेमलकसाला येण्या-जाण्यासाठी आणि सामान नेण्यासाठी त्याचा खूप उपयोग झाला.

हेमलकसाची जागा ताब्यात घेतल्याचं मला जानेवारी 1974 मध्ये कळलं आणि मग मी माझं शिक्षण सोडून तिथं जायचं ठरवलं. मी जे काही करत होतो त्यात मला अजिबात आनंद वाटत नव्हता. त्यामुळे हेमलकसाला जायला मी खूपच उत्सुक झालो होतो. त्यामुळे सर्जरीची परीक्षा तोंडावर आली असताना ती सोडून मी हेमलकसाला जायचा निर्णय घेतला. बाबांना त्याचं खूप वाईट वाटलं. मी शिक्षण पूर्ण करावं, थोडासा अनुभवही घ्यावा, असं त्यांना वाटत होतं. पण माझं मन आता नागपुरात रमत नव्हतं. त्यामुळे तेही काही बोलले नाहीत. मात्र नंतर काही दिवसांनी त्यांच्या इच्छेनुसार आमचे स्नेही डॉ. वैद्य यांच्याकडे घटप्रभेला जाऊन मी वीस दिवस हॉस्पिटलचा अनुभव घेतला.

मार्च 1974 मध्ये मी हेमलकसाला गेलो. बाबांनी तोपर्यंत पॅरामेडिकल सेवा द्यायला सुरुवात केली होती. कामाची थोडी सुरुवात झाली की मग मंदानं यायचं, असं ठरवलं होतं. शिवाय तिनं विशिष्ठ काळासाठी बॉंडही लिहून दिला होता. त्यामुळं ती नागपूरलाच राहिली. ती पुढं डिसेंबर 1974 मध्ये नोकरी सोडून हेमलकसाला आली.

हेमलकसाच्या तेव्हाच्या परिस्थितीची कल्पना आज तो भाग बघणाऱ्यांना येणार नाही. तेव्हा तिथं नुसतं दाट जंगलं होतं. झाडं एवढी मोठमोठी वाढलेली की सूर्यप्रकाशही आत यायचा नाही. तिथं आवाज होते ते वन्यप्राण्यांचे आणि दूरवरून वाहत असलेल्या नदीचे. साप, विंचू यांचं अस्तित्व पावलापावलावर होतं. आरोग्यसेवा नाही अशा खेड्यात जाऊन काम करणं, ही गोष्ट तुलनेने सोपी असते. तिथं राहायची जागा, पाणी अशा प्राथमिक गोष्टी बहुधा असतात. निदान आजूबाजूला माणसं तरी असतातच असतात. हेमलकसात या कुठल्याच गोष्टी नव्हत्या. तिथं फक्त जंगलच जंगल होतं.

बाबांच्या बरोबर अजित मळकर्णेकर, नागेश हटकर, राज सुलाखे हे कार्यकर्ते होते. त्यानंतर जगन मचकळे, दादा पांचाळ हेही 1974 सालीच आले. दादा पांचाळ सोमनाथच्या शिबिराला आले होते. त्यांनी आपलं शिक्षण सोडून दिलं आणि ते हेमलकसाला आले. जगन हा मूळचा नांदेडचा. तोही शिबिराला आला होता आणि खूप प्रभावित झाला होता. बाबांनी त्याला “”या प्रकल्पासाठी नागेपल्लीला राहशील का” म्हणून विचारलं आणि तो लगेच तयार झाला. पाठोपाठ विलास मनोहर, गोपाळ फडणीसही आले. शरद कुलकर्णी, मुकुंद दीक्षित हे होतेच. नंतर जगदीश गोडबोलेही पुण्याहून काही दिवस येऊन राहिला.

सुरुवातीचं काम जरा जास्त कठीण होतं, कारण आम्हाला राहण्यासाठी काहीतरी सोय करायला हवी होती. झाडाखाली किती दिवस राहणार? मग प्रकाश पेडणेकर नावाच्या कार्यकर्त्याने एक झोपडी बांधली. त्यासाठी आधी झाडं तोडून थोडा भाग साफसूफ करून घ्यायला लागला. कार्यकर्ते कमी असल्यानं सगळे एका झोपडीतच राहायचे. पुढं मंदा आल्यावर झोपडी लहान पडायला लागली. मग ती मोठी केली. मग इतरही एक-दोन झोपड्या बांधल्या.
जागा मिळाली होती, पण पाण्याची सोय नव्हती. शेजारी नाला होता. त्याच्या शेजारी एक तात्पुरती विहीर खोदली. विहीर कसली, खड्डाच! ते पाणी पिण्यासाठी वापरायचो. वापरायचं पाणी नदीवरून आणायचो. नदी दोन-अडीच किलोमीटरवर होती. आम्ही सगळे शक्यतो नदीवरच अंघोळीला जायचो. सुरुवातीला टॉयलेट्‌सची सोय नव्हती. कशी असणार? त्यामुळे सगळं उघड्यावरच. छोट्या झोपडीत राहायचो. झोपडी म्हणजे काय, दोन खाटा टाकता येतील एवढीच. मला या सगळ्याची थोडीफार सवय होती, मंदाला मात्र हे सगळंच नवीन होतं.

बाबांनी काही कुष्ठरोग्यांना प्रकल्पावर आणलं होतं. हे सगळे बरे झालेले होते. पण तरीही समाज, त्यांचं कुटुंब त्यांना स्वीकारायचा नाही. त्यांचं पुनर्वसन कसं करायचं, याच्यावर बाबांनी खूप विचार केला होता. कुष्ठरोग्यांना आत्मविश्वास परत मिळवून द्यायचा, हे तर बाबांच्या सगळ्या कामामागचं उद्दिष्ट होतं. लोक स्वीकारत नाहीत, म्हटल्यावर त्या माणसाला परत वैफल्य येणार! तसं होऊ नये म्हणून बाबांनी या सगळ्यांना वेगवेगळ्या कामांत गुंतवलं. ज्याला ज्यात रस आहे ते काम शिकवलं. त्यामुळे हे सगळे शेती, नर्सरी, लाकूडकाम, विटा बनवणं, अशी कामं करायचे. त्यामुळे ते गुंतूनही राहायचे आणि समाज स्वीकारत नाही याचं दुःखही कमी व्हायचं. बाबांचे शंकरदादा म्हणून एक सहकारी होते, जणू त्यांचा उजवा हातच. तेही कुष्ठरोग झाल्यानेच आनंदवनात आले होते. माणूस कर्तबगार. त्यांनी पुढं सोमनाथचा प्रकल्प सांभाळला. बाबांनी अशा कितीतरी जणांत आपण खूप काही करू शकतो, हा विश्वास निर्माण केला. असेच काही कार्यकर्ते त्यांनी हेमलकसालाही आणले होते. झाडं तोडणं, खोदाई करणं, कच्चे रस्ते करणं, ही कष्टाची कामं त्यांनी केली. आम्ही सगळे त्यांना मदत करत होतोच; पण त्यांनी या सगळ्यासाठी खूप कष्ट घेतले. काही दिवसांच्या सततच्या परिश्रमानंतर थोडी मोकळी जागा तयार झाली, ज्यात झोपडी उभारली गेली. कुष्ठरोगी कार्यकर्त्यांसाठी राहायला एक शेडही तयार केली. याशिवाय धान्य ठेवायला, स्वयंपाक करायला एक शेड तयार केली. धान्याची पोती ठेवायला लाकडाचा एक प्लॅटफॉर्म बनवला. कारण धान्य खाली ठेवलं तर त्याला वाळवी लागणार. त्याच शेडच्या सारवलेल्या भागात स्वयंपाकी स्वयंपाक करायचा. निदान डोक्यावर गवताचं का होईना छप्पर आलं. पाण्याची थोडीफार सोय झाली. स्वयंपाकाचा शिधा बरोबर आणला होताच. अशा तऱ्हेनं आम्ही त्या जंगलाला घर बनवलं. सोबत वन्यप्राणी होतेच. कोण कुठून एकदम दत्त म्हणून उभा राहील, याची खात्री नव्हती. पण काही का असेना, आमच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली.

इथं आल्यावर बऱ्याच गोष्टी प्रयोग करत, चुकत शिकलो. उदाहरणार्थ, घड्याळ दुरुस्ती, ट्रान्झिस्टर दुरुस्ती, हातपंप कसे दुरुस्त करायचे वगैरे. या छोट्या छोट्या गोष्टींसाठी चंद्रपूरला जाणं शक्य नव्हतं. बाकी भांडी घासणं, कपडे धुणं, स्वच्छता या कामांची सवय होतीच. आनंदवनात असताना आम्ही या सगळ्यात ताईला मदत करायचो, त्यामुळं इथंही त्याचं काही वाटलं नाही.

मी आणि माझे सहकारी इथं आल्यावर बाबा परत गेले. पण ते भेटायला यायचे, राहायचे. हेमलकसातलं हवामान एकदम टोकाचं. उन्हाळा खूप कडक, तशीच थंडीही. पाऊस तर एकदा कोसळायला लागला की, थांबायचं नावच घेत नाही. नागेपल्ली हा आमचा “बेस कॅंप’. तिथून हेमलकसा 65 किलोमीटरवर. उंचावर. त्यामुळे हा सगळा रस्ता चढाचा. तेव्हा तर रस्ता असा नव्हताच. सगळा कच्चा रस्ता. वाटेत आठ-दहा ओढे, नाले आणि नदी. हेमलकसात पाऊस सुरू झाला की उंचावरचं ठिकाण आणि जंगल त्यामुळे बदाबद कोसळायचा. हे पाणी खाली वाहत गेलं की, ओढ्या-नद्यांना पूर यायचा आणि रस्ते बंद व्हायचे. मग आम्ही इकडे आणि बाकीचं जग तिकडे. एकमेकांशी काही संपर्कच नाही. जून ते डिसेंबर या काळात सगळंच बंद.

बाबांना हेमलकसाला राहावंसं वाटायचं. कारण पावसामुळे नंतर पुन्हा सहा महिने गाठ पडणार नसायची. इकडे आभाळ भरून आलेलं. पाऊस पडतोय. निघावं की नाही, असं वाटायचं. पाय निघायचा नाही. पण जास्त वेळ थांबलं तर नदी भरणार तर नाही, अशी काळजी. मग ते घाईघाईने निघायचे. कारण नदी पार झाली नाही तर ते अडकून बसणार, तेही पूर ओसरेपर्यंत. तो ओसरायला कितीही दिवस लागू शकतात. वाटेतले ओढेही भरल्याने ते परतही येऊ शकणार नाहीत. ते गेले तरी काळजी वाटत राहायची. कारण आम्हाला ते अडकले की व्यवस्थित पोहोचले, हे कळायलाही काही मार्ग नसायचा.

तेव्हा रस्तेच नसल्यामुळे हेमलकसात बस वगैरे येण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे बाबा ट्रकनं यायचे. नंतर नदी पार करून यायला लागायची ती डोंग्यातून. डोंगा म्हणजे लाकडाचा ओंडका कोरून केलेली छोटी होडी. ती पाण्याच्या एक इंच वर राहते. बाबा एरवी एकदम डॅशिंग. त्यांना घोड्यावर बसण्यापासून ते विहीर खोदण्यापर्यंत सगळ्या गोष्टी यायच्या. फक्त पोहायला यायचं नाही. त्यांना पाण्यापासून धोका आहे, असं कुठल्या तरी ज्योतिष्यानं बाबांच्या वडिलांना सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी बाबांना पाण्याजवळ जाऊच दिलं नव्हतं. त्यामुळं त्यांचं पोहायला शिकणं राहूनच गेलं.

एकदा ते, मी आणि मंदा डोंग्यातून नदी पार करून येत होतो. यात पोहायला येणारा मी एकटाच. मंदालाही पोहता येत नाही. बाबा चेष्टेनं म्हणाले, “”काय रे, आत्ता होडी बुडली तर कुणाला वाचवशील? मला की हिला?” मी अर्थातच निरुत्तर झालो. पुढं बाबांना तब्येतीमुळं होडीतून येणं जमायचं नाही. मग ते नदीच्या काठापर्यंत ट्रकमधून झोपून यायचे आणि कांदोडीला मुक्काम करायचे. ते आलेत हा निरोप घेऊन तिथून जगन 30 किलोमीटर सायकल दामटत यायचा. मग आम्ही बैलगाडी घेऊन जायचो. सहसा बाबा सकाळी निघून दुपारपर्यंत पोचायचे. जगन निरोप घेऊन आला की आम्ही लगेच बैलगाडी घेऊन निघायचो. पोचायला रात्र व्हायची. तिथंच मुक्काम करायचा. त्यांना घडलेल्या बऱ्या-वाईट घटना सांगायचो. सकाळी ते आनंदवनाकडे आणि आम्ही हेमलकसाला यायला निघायचो. डिसेंबर ते जून त्यांच्या खूप चकरा व्हायच्या. आम्हाला काळजी वाटायची. पण ते ऐकायचे नाहीत.

आनंदवनातून गाडी आली की प्रत्येकवेळी अमुकअमुक गोष्टी गेल्याच पाहिजेत, याच्यावर त्यांचा कटाक्ष असायचा. याचं कारण आम्ही जंगलात राहत असल्यानं आम्हाला काहीच मिळायचं नाही. सगळं धान्य, सामान, भाजीपाला, औषधं हे आनंदवनाहून यायचं. विकास स्वतः ट्रक चालवत हे सगळं आणायचा. आम्ही थोडीफार शेती सुरू केली होती, भाजीपाला लावला होता; पण तरीही ते पुरेसं नव्हतं. ज्या सहा महिन्यांत आमचा संपर्क तुटायचा, त्या सहा महिन्यांत तिथलाच भाजीपाला उपयोगाला यायचा. त्या काळासाठी डाळ, तांदूळ, कांदे, बटाटे भरून ठेवायचो.

हेमलकसाभोवती छोटी छोटी शेकडो गावं असतील. तिथं राहणारे आदिवासी पिकवलेलं धान्य खायचे नाहीत. फळं, कंदमुळं आणि प्राणी मारून खाणं, हाच त्यांचा आहार. त्याशिवाय या परिसरात वनखात्यातील मोजकी माणसं असायची. त्यामुळे तिथं दुकानं कसली असणार? दुकानं होती ती तीन-चार किलोमीटरवर भामरागडला आणि तीही अगदी किरकोळ माल, कांदे, बटाटे वगैरे ठेवायचे. ते आणायचं तर डोंग्यातून जावं लागायचं. शिवाय त्या वस्तू महाग असायच्या. त्यामुळं आम्ही आनंदवनातून येणाऱ्या शिध्यावरच अवलंबून होतो.

बाबांप्रमाणे ताईही बऱ्याचदा यायची. तिची चार महिन्यांतून एक तरी फेरी असायचीच. तिलाही या सगळ्या प्रवासाचा त्रास व्हायचा. ट्रक, पुढं डोंगा आणि त्यानंतर 15 किलोमीटर चालत यायला लागायचं. पण आम्हाला प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय तिचं समाधान व्हायचं नाही. तरुण मुलं अशी जंगलात राहताहेत म्हणून तिला वाईट वाटायचं. ताई आली की काय काय घेऊन यायची! त्यामुळे ती आली की आमची दिवाळी असायची. इथल्या दमट हवेत तेव्हा पीठ टिकायचं नाही. चार-आठ दिवसांत त्याला अळ्या लागायच्या. त्यामुळे ताजं पीठ आलं की चारेक दिवस पोळ्या मिळायच्या. एरवी वरणभात आणि कांदा-बटाट्याची आलटून-पालटून भाजी, असंच आमचं जेवण असायचं. लहान असताना मी भात कधीच खायचो नाही. मला पोळीच लागायची. मात्र इथं ही साधी गोष्टही मिळू नये, म्हणून ताईला फार वाईट वाटायचं. आम्ही जातं नेलं होतं. पोळ्या खायची इच्छा झाली की आमच्यातले दोघंजण जात्यावर बसून पीठ दळायचे. मग ते पीठ चार दिवस पुरवून पोळ्याच खायच्या!

आनंदवनात काही निमित्ताने गोड झालं तर आम्हाला मिळत नाही, म्हणून त्यांच्या घशाखाली ते उतरायचं नाही. विकासही जास्तीत जास्त वेळा येऊन आम्हाला काही कमी पडत नाही ना बघायचा. सगळ्यांनाच हे जंगलात राहताहेत तर त्यांना कमी त्रास व्हावा, असं वाटायचं.

कुठल्याही आई-वडिलांना आपण कष्ट केले तरी आपली मुलं सुखात राहावी, असं वाटतंच. त्यामुळे त्यांचा जीव तुटायचा. विशेषतः पावसाळ्यात सगळे मार्ग बंद व्हायचे, तेव्हा तर ते फारच कासावीस व्हायचे. अर्थात आम्हाला त्याचं काही वाटायचं नाही. कारण मनाची तयारी होती. तरुणवय असल्याने उभारी होती.
या वेळेस आम्हाला प्रत्येकी 150 रुपये पगार मिळायचा. राहणं, जेवणं-खाणं हे प्रकल्पावरच होत असल्यानं आणि खर्च करायला काही निमित्तच नसल्यानं ते पैसे खूपच होते. आमचं “किचन’ तेव्हा कमी लोक असल्यानं एकच होतं. ते पुढंही तसंच राहिलं. आमचं कुटुंब हे आमचं दोघांचं कधीच नव्हतं. ते सगळे मिळून असलेलं मोठं कुटुंबच होतं. मी सोडलो तर सगळे सुरुवातीला एकेकटेच होते. प्रत्येकाच्याच खाण्याच्या आवडीनिवडी होत्या, पण त्या पुरवणं शक्यच नव्हतं. त्यामुळं आमचा मध्यप्रदेशचा स्वयंपाकी जो स्वयंपाक करेल तो डोळे मिटून खायचा, हे पथ्य आम्ही कटाक्षानं पाळलं. अगदी मीठ नसेल तरी काही बोलायचं नाही.

आम्ही सगळेच आपापली कुटुंबं सोडून इथं नवीन घर करायला आलो होतो. उमेद असली, तरी आजूबाजूचं वातावरण सरावाचं व्हायला वेळ गेला. मला झोपडीत राहायची सवय होती. साप, विंचवाची सवय होती. कष्टाचीही सवय होती. पण आजूबाजूला माणसं नसताना राहायची अजिबात सवय नव्हती. माझे सगळेच सहकारी माझ्याच वयाचे होते. एकाच ध्येयानं भारून एकत्र आले होते. पण कधीकधी आमचेही मतभेद व्हायचे. अशा वेळेस मन कुणाजवळ मोकळं करणार? सल्ला कुणाला मागणार? ही स्थिती माझीच नाही, सगळ्यांचीच होती. आयुष्याची सुरुवात करण्याच्या वयात आम्ही सगळेच खूप दूर आलो होतो, जिथं आम्हाला आमचे कुटुंबीय मनात असूनही आधार देऊ शकत नव्हते. शिवाय एवढ्या लांब, संपर्क नसलेल्या ठिकाणी राहिल्यानं त्यांची खूप काळजी वाटायची. त्यामुळे जोपर्यंत काही निरोप-बातमी कळत नाही, तोपर्यंत सगळं चांगलं आहे, असं समजायचं. या गोष्टीची आम्ही स्वतःला सवय लावून घेतली. “नो न्यूज इज गुड न्यूज’.

आम्ही ज्यांच्यासाठी एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत राहत होतो ते आदिवासी मात्र आमच्या वाऱ्यालाही उभे राहत नव्हते. त्यांचंही बरोबरच होतं… त्यांना आम्ही परग्रहावरून आलेले प्राणी वाटत असणार. त्यांची भाषा आम्हाला येत नव्हती, त्यामुळं त्यांना समजावणं शक्य नव्हतं. ती भाषा शिकायची तर त्यांच्याशी काहीतरी संपर्क तरी व्हायला हवा; तोच होत नव्हता. त्यामुळं खूप त्रास व्हायचा. या सगळ्याची कल्पना आधी नव्हती असं नाही, पण प्रत्यक्ष त्या परिस्थितीला सामोरं गेल्यावरच त्याची तीव्रता आणि आधी न जाणवलेल्या गोष्टी कळायला लागल्या.

चार लोकांत असताना एकाकी, उदास वाटलं तर मन रमवायचे मार्ग असतात. वाचन, संगीत. कुणी सिनेमाला जाऊन बसतो, तर कुणी मित्रांकडे जातो. इथं तसं काहीच नव्हतं. जंगलातली नीरव शांतता एक-दोन दिवस बरी वाटते, पण कधी कधी ती अंगावरही येते, विशेषतः तुम्ही अशा मनःस्थितीत असाल तर.
याच सुमारास मंदा नोकरी सोडून आली होती. तिची अवस्था तर अजून वाईट. एक तर हे सगळं आयुष्यच तिच्यासाठी नवीन. एक मी सोडलो, तर तिला मोकळेपणी बोलायलाही कुणी नव्हतं. प्रकल्पावर लग्न झालेले आम्हीच. माझी बहीण रेणुका काही दिवस राहिली होती; पण नंतर तीही नर्सिंगसाठी म्हणून परत गेली. रस्ते नाहीत, बस नाहीत. त्यामुळे मंदाचे आईवडीलही लग्नानंतर सात-आठ वर्षं हेमलकसाला येऊ शकले नाहीत. बहिणीही खूप नंतर आल्या. त्यामुळे तिलाही कुटुंबाचा आधार नव्हता. तिला काही बोलावंसं वाटलं, तर तिथं काम करणाऱ्या शांताबाई म्हणून होत्या त्यांच्याशी ती बोलायची. तेव्हा दळणवळणाच्या फोनसारख्या इतर सोयीही नव्हत्या. या सगळ्याचा आम्हा सगळ्यांनाच त्रास झाला. बाबा असले, तरी त्यांना सगळ्या अडचणी सांगणं शक्यच नव्हतं. पण त्यातून चांगली गोष्टही घडली. आपल्याला येणाऱ्या अडचणींना आपणच तोंड द्यायचं आहे, हे लक्षात घेऊन आम्ही त्यातून वाट काढायला शिकलो. दुसरं म्हणजे सततच्या सहवासानं, अडचणी एकत्र सोडवण्यानं आम्ही सगळे खूप जवळ आलो. त्यातून आमचं सगळ्यांचं असं एक कुटुंब तयार झालं.

सुरुवातीला हेमलकसात संपर्काची काहीच साधनं नव्हती. फोन वगैरे जाऊ दे, रस्तेही नव्हते. तेव्हा नागेपल्लीच्या प्रकल्पाची जबाबदारी स्वीकारलेला जगन मचकाळे हाच आमच्यातला आणि आनंदवनातला दुवा होता. विशेषतः पावसाळ्यात जेव्हा संपर्क पूर्णपणे तुटायचे आणि अशा वेळेस काही महत्त्वाचा निरोप, सामान पोचवायचं असेल, तर आम्ही पूर्णपणे जगनवर अवलंबून असायचो. तेव्हा त्याच्याकडं सायकलशिवाय वाहन नव्हतं. ती सायकल दामटत तो तब्बल 65 किलोमीटर निरोप द्यायलाही यायचा. कधी काही महत्त्वाची औषधं किंवा इतर आवश्यक सामान पोचवायला लागायचं. पावसाळ्यात इतर गाड्या येणं शक्यच नव्हतं. जगन ते सायकलवर ठेवायचा. वाटेत दहा-बारा नाले, नदी असायची. बऱ्याचदा हे सगळं दुथडी भरून वाहत असायचं. एका तीरावर सायकल ठेवून जगन हे सगळं सामान हातात घेऊन पाण्यातून पलीकडच्या तिरावर जायचा. मग परत येऊन सायकल हातात घेऊन जायचा. सामान बरंच असेल तर त्याला अशा दोन-तीन फेऱ्या करायला लागायच्या. सामानाच्या ओझ्याने भरलेली सायकल ओढ असलेल्या पाण्यातून नेणं कठीण होतं, म्हणून हा सारा खटाटोप. पुन्हा पुढच्या नाल्यापर्यंत सायलकवरून रपेट. पाणी आलं की पुन्हा थांबायचं. पाणी जास्त असेल, तर ते उतरायची वाट बघत त्या निर्मनुष्य जंगलात तासन्‌ तास थांबून राहायचं. हे तो वर्षानुवर्षं करत आला आहे, तेही हसतमुखानं.

हेमलकसात अशा एक ना अनेक अडचणी होत्या, पण हळूहळू त्यांची आम्हाला सवय होत गेली. दरम्यानच्या काळात मंदा प्रेग्नंट होती. इथं खाणंपिणं सगळंच मर्यादित. तिनं या वेळी ताज्या भाज्या खायला हव्यात. त्या कुठं मिळणार? कपूर नावाचे ट्रक ड्रायव्हर तेव्हा त्या भागात बाबूंची वाहतूक करायचे. त्यांना याचं खूप वाईट वाटायचं. ते चंद्रपूर, नागपूरला गेले की तिकडून येताना हमखास ताज्या भाज्या घेऊन यायचे. त्यांच्याबरोबरचे संबंध खूप टिकले. त्यांच्या मुलांबरोबरही आमचे अजून संबंध आहेत. अशी सहृदयता आम्ही खूप अनुभवली. हे तरुण इथं सगळं सोडून येऊन बसलेत, त्यांना मदत करावी, अशी इच्छा तिथं येणाऱ्या प्रत्येकालाच व्हायची आणि त्यांनी ती यथाशक्ती केलीही.

ताईला हे कळलं तेव्हा ती येऊन मंदाला तिथून घेऊन गेली. पावसाळ्यात तिला तिथं ठेवणंही धोक्याचंच होतं. पिलूचा जन्म 9 ऑगस्ट 1975चा, नागपूरचा. त्या वेळेस मंदाचे वडील पक्षाघाताने खूप आजारी होते. तिच्या आईची खूप धावपळ व्हायला लागली. म्हणून पिलू झाल्यावर लगेच ताईनं मंदाला आनंदवनात आणलं. मला मात्र पिलूबद्दल काहीच कळलं नव्हतं. त्यांनी तिकडून पत्र टाकलं होतं. पण एवढ्या पावसात ते माझ्यापर्यंत कसं पोचणार? बाबांनी जगनला फोन केला; पण पाऊसच एवढा होता की तो सायकलनंही येण्याच्या परिस्थितीत नव्हता. त्यामुळे मला बातमी कळलीच नाही. हेमलकसा उर्वरित जगापासून तुटलेलं होतं.

दुसरीकडे, मी हेमलकसाला येऊन वर्ष होऊन गेलं तरी म्हणावे तसे पेशंटही येत नव्हते. आदिवासी नसलेले, छोटे दुकानदार, जंगलखात्यातले लोक उपचारासाठी यायचे. पण ज्यांच्यासाठी आम्ही खऱ्या अर्थानं इथं आलो होतो त्यांचा विश्वास अजून मिळवू शकत नाही, याची खंत वाटायची. त्यासाठी काय करावं हे कळत नव्हतं. मलेरिया, मॅनेन्जायटिस हे इथले मुख्य आजार. त्याशिवाय झाडावरून पडून हात-पाय मोडणं, सर्पदंश, अस्वलाच्या हल्ल्यामुळं जखमी होणं, हेही नेहमीचंच. तेव्हा मलेरियाची साथ आली होती. गावोगाव फिरायचो. हेमलकसाच्या आसपास शेकडो छोटी गावं आहेत. गावं म्हणजे छोट्या वस्त्याच. 250-300 लोकसंख्येच्या 10-15 किलोमीटरवरच्या गावी जाऊन लोकांनी दवाखान्यात यावं असं आम्ही सांगायचो, समजावण्याचा प्रयत्न करायचो. पण भाषेची अडचण मोठी होती. मराठीतील एकही शब्द माडिया भाषेत नाही. ती पूर्णपणे वेगळीच भाषा आहे. ती भाषा शिकावी कशी असाही प्रश्न होता. कारण लोक खाणाखुणांनी का होईना, संवाद साधायला, समोर यायलाही तयार नव्हते.

माडिया गोंड आदिवासी फारसे कपडे वापरत नाहीत. आता काळ बदललाय. पण पूर्वी कमरेला बांधलेलं एक फडकं, एवढाच त्यांचा पोशाख. यापेक्षा जास्त कपड्यांसाठी त्यांच्याकडे पैसे कुठून असणार? आणि त्यांना गरजही वाटत नव्हती. लहान मुलं तर तेवढेही कपडे घालायचे नाहीत. अगदी नुकतं जन्मलेलं मूलही तसंच उघडं असायचं. कितीही थंडी असो, पाऊस असो – यांचा वेष ठरलेलाच. आमचे कपडे बघूनही त्यांना परकेपणा वाटण्याची शक्यता होती.
मला स्वतःला कपड्यांचा अजिबात शौक नव्हता. लहानपणापासून मी खादीच वापरत होतो. सुरुवातीला ताई माझ्यासाठी कपडे घ्यायची, नंतर मंदा घेऊ लागली. कॉलेजमध्ये असताना मी शर्ट-पॅंट घालायचो. हेमलकसाला आल्यावर पायजमा- शर्ट घालायला लागलो. तरीही कुडकुडणाऱ्या थंडीत हे आदिवासी उघडे राहतात, हे पाहून आपण पूर्ण कपडे घालतोय याची लाज वाटायला लागली. मग अर्धी पांढरी पॅंट आणि कोपरीसारखा अर्ध्या बाह्यांचा बनियन, असे कपडे मी घालायला सुरुवात केली. नंतर हेमलकसात सगळ्याच कार्यकर्त्यांनी हे कपडे घालायला सुरुवात केली. शक्य तेवढी काटकसर करायची म्हणून मी तेल, कंगवाही वापरणं बंद केलं. टायरच्या चपला घालायला सुरुवात केली. केस कापण्याची हेमलकसाला सोय नव्हती, तेव्हा मी स्वतःचे आणि इतरांचेही केस अनेकदा कापले आहेत.

पेशंट न यायला भाषा, कपडे यापेक्षाही मोठी अडचण होती, ती म्हणजे अंधश्रद्धा. हे लोक शिकलेले नसले, तरी आम्ही त्यांच्यासाठी आलो आहोत, त्यांच्यावर उपचार करायची आमची इच्छा आहे, हे त्यांना कळत होतं; पण अनेक वर्षं चालत आलेल्या प्रथांना ते मोडू शकत नव्हते. प्रत्येक गावात एक मांत्रिक असायचा. कोणी आजारी पडलं तर त्यानं या मांत्रिकाकडंच उपचारासाठी जायचं, हा रिवाज होता. त्याला अर्थातच फारशी माहिती नसायची. पण किरकोळ जडीबुटीची औषधं तो द्यायचा, अंगारेधुपारे करायचा. कधी कधी पेशंट बरा व्हायचा, बऱ्याचदा नाही. पण या मांत्रिकाऐवजी आमच्याकडे आलं तर दैवी कोप होईल, अशी समजूत या लोकांत होती. त्यामुळे ते आमच्याकडे यायला घाबरायचे.

हेमलकसाजवळच्या एका छोट्या गावात मादी नावाचा मुलगा होता. त्याला फीटचा त्रास व्हायचा. इथं थंडी प्रचंड आणि तिच्यापासून बचावासाठी दुसरी काही साधनं नाहीत. त्यामुळे लोक शेकोटी पेटवून अगदी जवळ झोपायचे. असे झोपले असतानाच हा मुलगा फीट आल्यामुळे शेकोटीत पडला आणि तीस-चाळीस टक्के भाजला. पारंपरिक उपाय केले; पण त्यानं फरक पडला नाही, म्हणून शेवटी गावातले लोक धीर करून त्याला आमच्याकडं घेऊन आले. या सगळ्यात काही दिवस निघून गेले होते. त्याच्या भाजल्याच्या जखमांना इन्फेक्शन होऊन त्यात अळ्या झाल्या होत्या. (कुष्ठरोग्यांवर उपचार करताना मी हे पाहिलं होतं. कुष्ठरोगात संवेदनाच होत नाहीत, त्यामुळे जखम झाली तरी कळत नाही. त्यामुळे त्या जखमेत अळ्या-पू होणं हे प्रकार नित्याचेच.) मी या मुलाची जखम स्वच्छ करून त्याला औषध लावलं आणि त्याला अँटिबायोटिक्सच्या गोळ्या दिल्या. त्यानं अशा गोळ्या त्यापूर्वी कधीही घेतल्या नसल्यानं त्याच्यावर त्याचा परिणाम लवकर झाला. त्याचं फीट येणं कमी व्हावं म्हणून त्याही गोळ्या दिल्या. तो खडखडीत बरा झाला. जो मुलगा मरायला टेकला होता तो आता महिन्याभरात चालतोय, नेहमीची कामं करतोय म्हटल्यावर त्याचा चांगला परिणाम झाला. मग अजून काहीजण आले. त्यांना डायरिया झाला होता. औषधानं तेही बरे झाले.

हे सगळे पेशंट आसपासच्या गावांतून यायचे. आसपासची गावं म्हणजे कमीत कमी 15-20 किलोमीटर. तेवढं अंतर हे लोक सहज चालतात. काहीजण 100-150 किलोमीटरवरूनही यायचे. पेशंट अगदीच वाईट परिस्थितीत असेल तर त्याला ते स्वतः बनवलेल्या “स्ट्रेचर’वरून आणायचे. कापडाची झोळी करून किंवा बांबू एकमेकांना बांधून त्याला झाडाच्या सालीचा दोर बांधायचा, तिसरा बांबू मध्ये टाकायचा आणि त्या झोळीत पेशंटला झोपवून आणायचं.हा त्यांचा स्ट्रेचर. बाज किंवा ज्याला खाट म्हणतात ती उलटी करायची आणि त्याच्या पायांना दोरी बांधून दोघांनी वाहून आणायचं, अशीही पद्धत होती, अजूनही आहे. दोघांचे खांदे दुखतात म्हणून बरोबर आणखी चार-सहाजण येतात. पेशंट असा वाटेतल्या सगळ्या गावांतून आमच्याकडे यायचा. तो बरा झाला पाहिजे, हाच आमचा ध्यास असायचा, कारण नाही बरा झाला, तर त्याचा मृतदेह पुन्हा तसाच गावागावांतून जाणार. बाकीचे लोक ते सगळं बघणार आणि त्यांच्यावर त्याचा विपरीत परिणाम होणार. तसं घडू नये म्हणून येणारे पेशंट बरं होणं आवश्यक होतं. याचं खूप दडपण यायचं. आम्ही दोघंच डॉक्टर. त्यात पुन्हा आमचं ज्ञान पुस्तकी. प्रत्यक्ष अनुभव काही नाही. त्यामुळे पुस्तकं बघून, आपसात चर्चा करून उपचार कसे करायचे, हे ठरवायचो.

एकदा अशाच एका माणसाला लांबच्या गावाहून चार-पाचजणांनी उचलून आणला. तो बेशुद्ध होता. बेशुद्ध असल्याने त्याला काय होतंय, हे कळायला मार्ग नव्हता. मलेरिया, मॅनेन्जायटिस काहीही असू शकत होतं. आमच्याकडे इतर तपासण्या करून निदान करायला काही साधनंही नव्हती. इतर कुणाचा सल्ला घ्यायचा तर फोन नव्हता. कंदिलाच्या उजेडात त्याला पाहिलं. एकमेकांशी बोलून काही औषधं दिली. आपल्या भरवशावर त्याला घेऊन आलेत, त्याला बरं वाटेल ना, या विचारात रात्रभर झोपच आली नाही. तिसऱ्या दिवशी तो शुद्धीवर आला आणि हायसं वाटलं. येताना खांद्यावरून आलेला पेशंट जाताना आपल्या पायांनी चालत गेला.

लोकांना असे अनुभव येऊ लागल्यामुळे हळूहळू का होईना, पण परिस्थिती थोडी अनुकूल बनत गेली. पण लोक अजूनही मांत्रिकाकडे जायचे. एकतर त्याच्याबद्दल विश्वास होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे, अंधश्रद्धेच्या पगड्यामुळे भीतीही होती. पण त्याच्या उपायांनी बरं वाटलं नाही, तर “”तुझ्याकडून बरा झाला नाही, आता डॉक्टरकडं जाऊन बघतो,” असं सांगून आमच्याकडं यायचा धीटपणा काहीजण दाखवू लागले होते.

मांत्रिकांचा आम्हाला विरोध होता. साहजिकच आहे. आमच्यामुळे त्यांच्या पोटावर पाय येत होता. एकदा एका मांत्रिकाचीच मुलगी तापानं आजारी पडली. त्यानं त्याच्या पद्धतीनं उपाय केले; पण तिला बरं वाटेना. मुलगी हातची जाते की काय, या भीतीनं तो तिला आमच्याकडं घेऊन आला. तिला औषधं दिली, सलाइन लावलं. ती वाचली. त्यामुळे त्याचा आणि त्याच्यासारख्या काहींचा विरोध कमी झाला.

पण कधी कधी आम्हालाही आजाराचं निदान करता यायचं नाही. कधीकधी पेशंट उपचारांना प्रतिसाद द्यायचा नाही. अशा वेळेस बरोबरचे लोक म्हणायचे, याला बाहेरचीच बाधा झाली आहे. याला मांत्रिकच बरा करेल. मग वाईट वाटायचं. कारण एकदा पेशंटला घेऊन गेले की गेले. तो परत यायचा नाही. तो थांबला असता तर त्याच्यावर वेगवेगळे उपचार करून बघितले असते, असं वाटत राहायचं. शेवटी आम्ही आपसात विचार करून एक तोडगा काढला. जर पेशंट लगेच बरा झाला नाही, तरी त्याला घेऊन जाऊ नका, अशी विनंती आम्ही त्याच्या नातेवाईकांना करायचो. तुमच्या मांत्रिकालाही इथंच बोलवा. त्यालाही उपचार करू दे, आम्हीही उपचार करतो. कुणाकडूनही तो वाचणं महत्त्वाचं, असं सांगू लागलो. अंगारे-धुपाऱ्यांनी पेशंट बरा होणार नाही, तो औषधांनीच बरा होईल, हे आम्हाला माहीत होतं; पण त्या लोकांना समजावून सांगणं कठीण होतं, म्हणून मग हा मार्ग काढला. त्यामुळे काहींचं श्रेय मांत्रिकाकडं गेलं असेलही; पण आम्हाला उपचार करायला मिळाले आणि रोगी बरा झाला, हे महत्त्वाचं होतं. या उपायानं मांत्रिकांचाही विरोध जवळजवळ संपला.
त्याकाळी आम्ही सगळेच बांबूच्या पट्‌ट्या मारलेल्या झोपडीत राहत होतो. त्यामुळे पेशंट आले की. त्यांच्यावर उघड्यावरच उपचार करायचो. झाडाखाली किंवा कुठंही एक मांडव टाकलेला असे. तिथं ते राहायचे, कारण ते बऱ्याच लांबून, सत्तर-ऐंशी किलोमीटरवरूनही आलेले असायचे. बरोबर आठ-दहाजण असायचे. ते परत कसे जाणार? मग पेशंटला बरं वाटेपर्यंत ते सगळे तिथंच राहायचे. तिथंच अन्न शिजवून खायचे. अजूनही हीच पद्धत आहे. मात्र आता मांडवाऐवजी शेड आहे. त्याला “घोटूल’ म्हणतात. आता दवाखान्याची इमारत झाली असली, तरी गंभीर पेशंट दवाखान्यात आणि बाकीचे बाहेर राहणंच पसंत करतात.

आमच्या कार्यकर्त्यांपैकी पाच-सहाजण आम्हाला दोघांना मदत करायचे. आम्ही पेशंटकडून उपचारासाठी एक पैसाही घेत नव्हतो. औषधंही आम्हीच द्यायचो. त्यांची परिस्थिती डोळ्यांसमोर होती, त्यामुळं पैसे घ्यायचा प्रश्नच नव्हता. औषधं आणि इतर साधनं आनंदवनातून यायची. त्यामुळं सुरुवातीपासूनच आमचं धोरण अगदी काटकसरीचं होतं. जितके पैसे वाचवता येतील तितके वाचवायचे. पेशंटचं बॅंडेज तयार करणं, स्टरलाइज करणं, जखमा बांधणं, अशी छोटी छोटी कामंही खूप महत्त्वाची असतात. आमचे कार्यकर्ते त्यासाठी मदत करायचे. मंदा ज्या आयुर्वेदिक कॉलेजमध्ये नोकरी करायची तिथं फारशी ऑपरेशन्स नसल्यानं फार काम नसायचं. त्यामुळे या वेळात नर्सेसबरोबर गप्पा मारताना त्या बॅंडेज तयार कशा करतात, हे तिनं शिकून घेतलं होतं. त्याचा इथं उपयोग झाला. ते तिनं इतरांनाही शिकवलं. दवाखान्यात जे गाऊन लागायचे तेही तिनंच शिवले. त्यासाठी शिवणाचं मशिनही मागवलं होतं. मांजरपाटाचे हे कपडे स्वस्त आणि टिकाऊ होते. त्यातले काही गाऊन अजूनही आहेत.

हेमलकसा परिसराला डॉक्टरची गरज आहे, हे आम्हाला माहीत होतं. त्यामुळं आम्ही तिथं गेल्यावर पेशंटची रीघ लागेल, असं वाटत होतं. प्रत्यक्षात तसं काही झालं नाही. त्यामुळे सुरुवातीला धक्काच बसला होता, पण नंतर नंतर गाडी रुळावर येत गेली. आता गरजेचं होतं ते तिथली भाषा शिकणं. ती शिकल्याशिवाय त्यांना आम्ही त्यांचे वाटणार नव्हतो.

माडिया भाषेत उच्चार करण्याची विशिष्ट पद्धत हाच त्या भाषेचा “बेस’ आहे. ही भाषा मराठीहून अगदी वेगळी. तापाला या भाषेत “दंड’ म्हणतात. “यॉव’ म्हणजे पाणी. इथल्या वनखात्याच्या माणसांना ही भाषा माहीत होती. त्यांच्याकडून काही शब्द लिहून घेतले. पेशंटचीही मदत घेतली. त्याला खाणाखुणांनी विचारायचो, तुला काय झालंय? मग तो आधी खुणांनी सांगायचा आणि त्याच्या भाषेत बोलायचाही. पोट दुखतंय, साप चावला, अस्वलानं मारलं वगैरे. मग ते शब्द लिहून ठेवायचो. त्याचा अर्थही मराठीत लिहायचो. यातून व्यवहारातले शब्द शिकलो. हळूहळू “तू काय करतोस? गावाचं नाव काय? किती लांब आहे?’ हे विचारायला लागलो. दुभाष्या नसल्यानं त्रास व्हायचाच. मग कधी कधी गावात जाऊन तिथल्या लोकांशी संवाद साधायचा प्रयत्न करायचो. त्यातून हळूहळू जरुरीपुरती माडिया भाषा कळायला लागली.

भाषा येत नव्हती तेव्हा औषधं कशी घ्यायला सांगायची, हा मोठा प्रश्न होता. त्यांनी औषधं, गोळ्या कधी बघितल्याच नव्हत्या. गोळ्यांचं रॅपर कसं काढायचं हे माहीत नव्हतं. लोक त्याच्यासकट गोळ्या खायचे. त्यांना औषधाचं प्रमाणही कळायचं नाही. कधी कधी सगळं औषध एकदम घेतलं तर बरं वाटेल, असं वाटल्यावरून सगळ्या गोळ्या एकदम खायचे. असे दोन-तीन प्रकार घडले. असं झालं की, त्याला उलटी करायला लावून ते जास्तीचं औषध त्याच्या पोटातून बाहेर काढायचो. असं काही घडलं की भीती वाटायची. पहिला डोस आम्ही आमच्या हातानं तोंडात टाकायचो. पण नंतरच्या डोसाचं काय? वेळा कशा सांगणार? त्यांना घड्याळच माहीत नाही. मग सूर्याच्या स्थितीप्रमाणं उगवताना, डोक्यावर आल्यावर, मावळताना अशा वेळा समजावून सांगायचो. तरीही धोका होताच. पेशंट आमच्यासमोर असताना आमचं लक्ष असायचं. तो निघून गेला तर आता हा कसं औषध घेईल, याचं दडपण यायचं.

माडिया गोंड ही आदिवासी जमात खूपच मागासलेली आहे, याची कल्पना होती. बाबा जेव्हा भामरागडला सुरुवातीला घेऊन आले तेव्हा ते डोळ्यांनी पाहिलेलंही होतं. पण यांना लिहिता-वाचता येत नाही, कपडे घालायची सवय नाही, दुसरी भाषा येत नाही, एवढंच यांचं मागासलेपण मर्यादित नाही, याची जाणीव इथं आल्यावरच झाली. इतकं कमालीचं अज्ञान आणि इतकं अफाट दारिद्र्य, ज्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. गरिबीमुळं दोन वेळच्या खाण्याची मारामार. त्यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळे ते मिळवायच्या तजविजीत. खाणं काय, तर कंदमुळं, आंबील, भात आणि मिळतील ते प्राणी. अगदी मुंग्यांची चटणीही ते करून खातात. कारण यापलीकडे काही दुसरे पर्याय असतात याची जाणीवच नाही. त्यामुळे कुपोषण प्रचंड. सगळेचजण खंगलेले. माझ्या दवाखान्यात आलेल्या एका मध्यमवयीन पुरुषाचं वजन अवघं 23 किलो होतं. माणसं ऐन तारुण्यात सुरकुतलेली. त्यांचं वय त्यांच्या दिसण्यावरून कळणारच नाही. त्यांच्या मुलाबाळांच्या वयावरून ते ओळखायचं. पण ते वय आणि समोरची व्यक्ती यांचा ताळमेळ कुठं बसणारच नाही, इतकी फसगत होते.

गरिबीमुळं शिक्षण घ्यायला वेळ नाही आणि शिक्षण नाही म्हणून गरिबी हटत नाही, असं हे दुष्टचक्र सतत सुरू. त्यात मोठ्या प्रमाणावर अंधश्रद्धा. हे इतके स्वतःच्या कोषात अडकलेले की बाहेरचा वाराही त्यांना सहन न होणारा. त्यांना साबण त्याच्या रंगामुळं, गुळगुळीतपणामुळं खाण्याची वस्तू वाटायचा. कलिंगडासारखी फळं त्यांनी कधी बघितली नव्हती. आंबा वगैरे तर फार दूरची गोष्ट. हे सगळं पाहिलं की मन उदास व्हायचं. आपण इथं काम करायला आलोय, पण हे सगळं आपल्याच्यानं निभेल ना, असं वाटायचं. (त्यांच्याकडे बघून आम्ही आमच्या गरजा खूप कमी केल्या. इथली छोटी मुलं थंडीत तशीच वावरतात, हे बघून मला इतक्या वर्षांत कधी स्वेटर घालावासा वाटला नाही. मी नाही म्हणून मंदानंही घातला नाही आणि आम्ही घालत नाही म्हणून तिकडं आनंदवनात ताईनंही स्वेटर घालणं बंद केलं. इथं वीज येईपर्यंत तीही पंख्यासारख्या गोष्टी वापरत नव्हती.)

मात्र मला वाटायचं की, या आदिवासींत अंधश्रद्धा आहे, अगदी कमालीची आहे, ती असूही नये. पण आपण त्याच्यावर नुसती टीका करणं योग्य नाही. याचं कारण आपण शिकलेलो आहोत आणि त्यामुळे चांगलं-वाईट आपल्याला कळतं, असं आपल्याला वाटतं. त्यांनाही त्यांच्या समजुतीप्रमाणं ते करताहेत तेच चांगलं, असं वाटत असणार. आपण एकदम बाहेरून येऊन “तुम्ही करता ते वाईट’ असं सांगितलं तर त्यांना कसं पटेल? पण आमच्या काही कार्यकर्त्यांनी सुरुवातीला त्यांच्या काही पारंपरिक चालीरीतींवर आक्षेप घ्यायचा प्रयत्न केला. त्यावर ते म्हणाले, “”आम्ही तुम्हाला निमंत्रण दिलं होतं का इथं या म्हणून? मग आमच्या गोष्टींत ढवळाढवळ कशाला करता?” तो एक मोठा धडा होता. खरोखरच हे लोक आपल्याला बोलवायला आले नव्हते. त्यांचं तुमच्यावाचूनही चाललेलंच होतं. आपण आपल्या समाधानासाठी इथं आलेलो आहोत. इथं असणं ही आपली गरज आहे, त्यांची नव्हे. हे जाणवल्यावर मग आपोआप काही गोष्टी सोप्या झाल्या. त्यातून कळलं की हे बदल असे घाईनं होत नसतात. वर्षानुवर्षं माणसं जे करत आली आहेत ते आपण जाऊ आणि बदलू, असं होत नाही. हे बदल हवेत असं त्यांना स्वतःला ठरवू दे. मग ते हळूहळू बदलतील. त्यासाठी आधी त्यांच्या मनात आपल्याबद्दल विश्वास तयार व्हायला हवा. त्यांचं प्रबोधन करण्याऐवजी त्यांना पर्याय देऊया आणि आशा करूया की ते योग्य तेच निवडतील.

त्या वेळी काम करायची अशी आमची काही “सिस्टीम नव्हती. आम्ही सगळेच तरुण होतो. अनुभव नव्हता. सल्ला द्यायलाही कुणी नव्हतं. त्यामुळं आयुष्य जसं समोर येईल, तसं त्याला तोंड देत गेलो. सगळे वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेलो. वेगवेगळ्या विचारांचे. त्यामुळे मतभेद व्हायचे. बऱ्याचदा मूळ मुद्दा बाजूला राहून इतर गोष्टींवरच चर्चा व्हायची आणि मग आपल्याच कामाचं खूप दडपण यायचं. हा डोंगर कसा पार होणार, असं वाटायचं. अशा वेळेस एक पथ्य पाळलं ः मनाविरूद्ध घडलेल्या घटनांची चर्चा करायची नाही. चांगलं तेवढं घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. मुळात आमच्या सगळ्यांची वेव्हलेंग्थ जुळलेली होती. प्रत्येकालाच इथं काम करायचं होतं. ते महत्त्वाचं होतं. त्यामुळं आपण हे जे प्रवाहाविरुद्ध काम सुरू केलंय, ते चालू राहावं यासाठी खूप काळजी घ्यावी लागली, तडजोडी कराव्या लागल्या. सगळ्यांनाच…

डॉ. प्रकाश आमटे
लोकबिरादरी प्रकल्प,
हेमलकसा, पो. भामरागड, जि. गडचिरोली, 444703.
ई-मेल :  lbprakalp@lycosmail.com
संपर्क :  अनिकेत आमटे : 9423208802

– एच. एम. देसरडा
( माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ ), सौजन्य – लोकसत्ता

भारताची आज सर्वांगीण प्रगती होत आहे असं सांगितलं जातं. ते अजिबातच खोटं नाहीये. मात्र प्रगतीची आणि विकासाची गंगा अजूनही समाजाच्या सर्व थरांपर्यंत पोहोचलेली नाही. याची जाणीव असूनही तिकडे संबंधित दुर्लक्ष करतात, हीच मोठी चिंताजनक बाब आहे…

——————————————————————————————————————————

उत्पन्न व संपत्तीची भयानक असमानता, गोरगरीबांची दैना, धनदांडग्यांचा चंगळवाद, नैसगिर्क संसाधनाची बरबादी, पर्यावरणाचा विनाश, सामाजिक विसंवाद व मानवी हक्काची पायमल्ली, हे आजमितीला भारतासमोरील मुख्य राष्ट्रीय प्रश्न आहेत. यासंदर्भात संयुक्त राष्ट्र संघटना, विविध आंतरराष्ट्रीय संस्था, भारत सरकारनियुक्त आयोग, सत्यशोधन समित्या, अभ्यास गट तसेच राष्ट्रीय नमुना पाहणी संघटना यांनी संकलन व विश्लेषण केलेली अधिकृत आकडेवारी आज विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. यापैकी बरीच माहिती इंटरनेटद्वारे सहज उपलब्ध होते.

मात्र खेदाची बाब ही की, राज्यकतेर् व अभिजन महाजन समर्थक तज्ज्ञ त्यांच्या सोयी व हितसंबंधानुसार या आकडेवारी-वस्तुस्थितीचे अर्थ लावतात. दुसरे, लोकप्रबोधन व जाणीवजागृतीच्या दृष्टीने आणखी एक महत्त्वाचा अडसर आहे. तो म्हणजे ही सर्व माहिती इंग्रजी भाषेत व तत्त्वप्रचुर व्यावसायिक परिभाषेत असते. त्यामुळे ती जनसामान्यांपर्यंत पोहचत नाही. जे इंग्रजी वाचू शकतात त्यांनाही ती नेमकेपणे कळतेच असे नाही. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन जनजागरणाचे व्यापक प्रयत्न होणे गरजेचे आहे.
आथिर्क उदारीकरणाचे धोरण अवलंबल्यानंतर देशाचा विकास जलद वेगाने होत असल्याचा प्रचार जोरात चालू आहे. निर्यातवाढ, परकीय गंगाजळीत वाढ, परकीय गुंतवणूक वाढ ही याची प्रचीती असून, चौफेर जागतिकीकरणाचे धोरण अवलंब केल्यास दारिद्य, कुपोषण, बेरोजगारी व सामाजिक-आथिर्क शोषण व विषमतेचे प्रश्न बोलता बोलता सुटतील, असा युक्तिवाद हिरीरीने केला जातो. भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हा ठाम विश्वास होता. म्हणून तर त्यांनी ‘इंडिया शायनिंगचा’ नारा दिला.

जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली. मात्र त्यांच्या जागी सत्तेवर आलेल्या काँग्रेसच्या संयुक्त पुरोगामी आघाडीने तेच धोरण अट्टाहासाने चालू ठेवल्यामुळे उत्पन्न व संपत्तीची असमानता वेगाने वाढत आहे. या संदर्भात अर्जुन सेनगुप्ता समितीने मांडलेली आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी आहे. असंघटित क्षेत्रातील व्यवसाय व रोजगाराची स्थिती जाणून घेण्यासाठी नेमलेल्या या राष्ट्रीय आयोगाने म्हटले आहे, की देशातील ७७ टक्के (८४ कोटी) लोकांचा दररोजचा दरडोई खर्च २० रु.पेक्षा कमी आहे. याचा अर्थ ज्या उच्च विकासाच्या आरत्या ओवाळल्या जात आहे, त्यापासून ८४ कोटी लोक दूर आहेत. सेनगुप्ता आयोगाची ही आकडेवारी राष्ट्रीय नमुना पाहणीच्या २००४-०५ साली झालेल्या ६१व्या फेरीवर आधारित आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्यांना दररोज एक डॉलरपेक्षा कमी उत्पन्न आहे अथवा खर्च करावयास मिळतात, त्या सर्वांना गरीब मानले जाते. या व्याख्येतून भारतातील हे ८४ कोटी लोक दारिद्यरेषेखाली आहेत! तात्पर्य, ज्या आथिर्क प्रगतीचे गोडवे गायले जात आहेत, त्याचा कोणताही फायदा या ७७ टक्के लोकांना झालेला नाही. एकापरीने मनमोहनसिंग सरकारला सत्याची जाणीव करून देणारा हा अहवाल आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये.

अर्जुन सेनगुप्ता अहवालाची चर्चा होत असतानच आणखी एका अभ्यासाने त्यास वेगळ्या पद्धतीने दुजोरा दिला आहे. हा अहवाल आहे इंटरनॅशनल फूड पॉलिसी रिसर्च इन्टिट्यूटचा. या अहवालात म्हटले आहे की, जगातील ८५ कोटी लोकांना उपाशी रहावे लागते. यापैकी सुमारे २५ टक्के लोक भारतात आहेत. या संस्थेच्या जागतिक भूक निदेर्शांकात भारताचा क्रमांक ११८ देशांत ९४वा आहे. या भूक निदेर्शांकात चीन ४७ व्या क्रमांकावर आहे व पाकिस्तान ८८व्या!

भारतातील एवढ्या मोठ्या प्रमाणातील भूक व उपासमारीचे एक महत्त्वाचे कारण हे आहे की, जवळपास निम्मी बालके कुपोषित व कमी वजनाची आहेत. गर्भवती स्त्रिया, स्तनपान देणाऱ्या माता आणि बालकं यांना पुरेसा व संतुलित आहार न मिळाल्यामुळे ते कायम वेगवेगळ्या आजारांना बळी पडतात, ही बाब राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सवेर्क्षणात प्रकर्षाने सामोरी आली आहे.

मानव विकासाबाबत गेल्या काही वर्षांत भारताचा क्रमांक १२७वरून १२६वा झाला होता. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार तो १२८वर गेला आहे! मात्र जगाच्या डॉलर अब्जाधिशांच्या यादीत भारताचा क्रमांक चौथा आहे. उत्पन्न व संपत्तीची वाढती असमानता हे बहुचचिर्त जागतिकीकरणे आगेकूच करणाऱ्या विकासाचे (?) व्यवच्छेदक लक्षण आहे, ही बाब विसरता कामा नये. हे भारतातच घडत नसून सध्याच्या बाजारवादी विकास-खाजगीकरण-जागतिकीकरणाच्या (एलपीजी) विकासनीतीचा तो अविभाज्य भाग आहे हे नाकारण्यात काय हशील?

या संदर्भात हेलिसिंकी (फिनलँड) येथील विकास अर्थशास्त्रांच्या जागतिक संस्थेने दिलेली आकडेवारी बोलकी आहे. त्यानुसार अतिश्रीमंत अशा जगातील दोन टक्के प्रौढ लोकसंख्येकडे निम्म्याहून अधिक जागतिक कौटुंबिक संपत्ती आहे, तर तळच्या ५० टक्के लोकसंख्येकडे एक टक्का संपत्ती आहे. खरेतर आता आंतरराष्ट्रीय मुदाकोष (आयएमएफ) आणि अन्य संस्थांनीदेखील याकडे लक्ष वेधले आहे.

भारतातील दारिद्य, कुपोषण, बेरोजगारी, असमानता, संपत्तीचे केंदीकरण याबाबत भरपूर आकडेवारी व विश्लेषण उपलब्ध आहे. यााबाबतची ताजी आकडेवारी हे दर्शविते की, १९९१-२००२ या काळात व्यक्तिगत संपत्तीची असमानता व दरी अधिकच वेगाने वाढली आहे. तरीसुद्धा भारत ‘महासत्ता’ होणार, भारतीय कंपन्या व उद्योजक ‘बहुराष्ट्रीय’ होत असल्याचा प्रचार सध्या धुमधडाक्याने चालला आहे.

ही वाढती असमानता-अमानुषता माणुसकीला कलंक आहे. मानवीहक्कांची तर त्यामुळे पायमल्ली होत आहेच; मात्र सोबतच ती पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत घातक व धोकादायक आहे. हवा, पाणी-अन्न साखळीचे प्रदूषण व विषारीकरण यामुळे रोगराई, आजारात वाढ होत असून, आधीच कमी असलेल्या वनक्षेत्रावर व गोरगरीबांच्या उत्पन्नावर त्याचा फार प्रतिकूल परिणाम होत आहे. जैविकविविधता वेगाने कमी होत असल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या आदिवासी, मच्छिमार, शेतकरी, शेतमजूर व कारागीर यांना परिसरात मिळणाऱ्या चरितार्थासाठी आवश्यक वस्तू व संसाधनांची उपलब्धता अनिश्चित आणि कमी होत आहे. चारा-पाणी-सरपण यासाठी देशभर कोट्यवधी स्त्रियांना मैलोगणिक पायपीट करावी लागते. याखेरीज विकास प्रकल्पाच्या उभारणीसाठी आदिवासी व गोरगरीबांचे विस्थापन होते आहे. आजपर्यंत विविध धरणे, वीज व औद्योगिक-व्यापारी प्रकल्पांसाठी पाच कोटीहून अधिक लोकांचे विस्थापन झाले असून, त्यापैकी फार थोड्यांचे नीट पुनर्वसन झाले आहे.

सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरनमेंटच्या नागरिकांच्या पर्यावरण अहवालापासून आर. के. पचौरी (यंदाच्या शांतता नोबल पुरस्काराचे सहमानकरी) यांच्या अध्यक्षतेखालील हवामानातील बदलाबाबतच्या समितीने याबाबत जे वास्तव मांडले आहे, त्याचा आपले राज्यकतेर् गांभीर्याने विचार करत नाहीत. विकासाची मुख्य कसोटी समता व सातत्य असावयास हवी, हे सर्व सूज्ञ लोक मानतात. मात्र भारतातील विकास प्रक्रिया या दृष्टीने किती विरोधाभासी व विसंगत आहे, हे उपरनिदिर्ष्ट आकडेवारी व विश्लेषणातून सिद्ध होते. याबाबत आपण केव्हा ठोस कृती करणार, हा कळीचा प्रश्न आहे!

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

तत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केले होते। ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम!’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे!’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहे?आपल्यातला ‘मी’चा उगम व विकास, त्यातून येणारा ‘अहं’ आणि त्या एकाच ‘मी’चे होणारे अनेक आविष्कार हे केवळ ‘मेंदू’पुरते मर्यादित ठेवता येत नाहीत, असेही शास्त्रज्ञांचे मत आहे.

मी कोण आहे? कुठून आलो? कुठे जाणार आहे? हे वा असे प्रश्न सर्वाना कधी ना कधी पडतातच. विशेषत: कुणाच्या मृत्यूनंतर वा स्मशानात जाऊन आल्यानंतर. ती सुन्न भावना फार काळ टिकत नाही आणि प्रत्येक जण दैनंदिन व्यवहारात पूर्ण बुडून जातो. कधी ते दु:ख दीर्घकाळ मनातल्या मनात स्रवत राहते, कधी आटून जाते; पण प्रत्येकाला आपणही मरणारच आहोत, याची मनोमन खात्री असतेच. मरण म्हणजे पूर्णविराम!जवळजवळ सर्वानाच जीवनाची आसक्ती असते. (आत्महत्या करणाऱ्यांनासुद्धा मरणाची आसक्ती नसते. त्यांची जगण्याची आसक्ती इच्छेनुसार पुरी होत नाही म्हणून ते आत्महत्या करतात. म्हणजेच आत्महत्यासुद्धा जीवनासक्तीचाच एक आविष्कार- कितीही विरोधाभास त्यात वाटला तरीही!) या दुर्दम्य (आणि अनाकलनीयही) जीवनासक्तीमुळेच माणसाला ‘अमर’ व्हावे असे वाटू लागले. अगदी प्राचीन काळी, माणसाच्या प्राथमिक अवस्थेत, जोपर्यंत त्याला मरणाची अपरिहार्यता ध्यानात आली नव्हती, तोपर्यंत ‘अमरत्वा’ची संकल्पना निर्माण झाली नाही; परंतु मेलेली व्यक्ती ‘परलोकी’ म्हणजे दुसऱ्या ‘प्रकारच्या’ जीवनविश्वात गेली, असे मानले जाऊ लागले. अनेक अंधश्रद्धांचा उगम या जीवन-मरणाच्या गूढामुळे झाला आहे.

त्या ‘गूढा’चा वैज्ञानिक भेद करण्याचे एका प्रसिद्ध गणिती व शास्त्रज्ञ व्यक्तीने ठरविले. त्याचे नाव थॉमस डोनाल्डसन. गणित, जीवशास्त्र आणि ‘इन्फर्मेशन सायन्स’ (‘माहितीशास्त्र’ असे याचे भाषांतर होऊ शकत नाही) यात प्रदीर्घ संशोधन केलेल्या डोनाल्डसनलाही तेच प्रश्न पडले होते, जे सामान्यांना आणि भल्या भल्या तत्त्वज्ञांनाही पडतात- मी कोण आहे? कुठून आलो आणि कुठे जाणार आहे?जेव्हा डोनाल्डसनने या प्रश्नांचा विचार सुरू केला तेव्हा त्याला त्यातील उपप्रश्न अधिक भेडसावू लागले. ‘मी कोण आहे?’ या प्रश्नापेक्षा ‘मी म्हणजे कोण,’ हे अगोदर ठरवावे लागेल आणि हा ‘मी’ किंवा ‘अहं’ नक्की कुठे व कसा निर्माण होतो, तेही.‘मी’पणाची जाणीव आणि माझे ‘अस्तित्व’ आपल्या मेंदूत ठरते, असे त्याला वाटले. पण त्याचबरोबर त्याला जन्म-मृत्यूचे रहस्यही भेदायचे होते. अचेतन वस्तूला- म्हणजे खडक, दगड, धोंडे, वाळू यांना जीवसृष्टीचे नियम, म्हणजे जन्म-विकास-विनाश/ मृत्यूचे चक्र लागू नसते. हे कळण्यासाठी अर्थातच ‘वैज्ञानिक’ असण्याची गरज नव्हती. डोनाल्डसनचा जन्म १९४५ चा. दुसऱ्या महायुद्धानंतरचा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर विज्ञान-विचाराने, प्रयोगशीलतेने आणि धाडसी कल्पनांनी एकच झेप घेतली होती. अणुविभाजनापासून- कॉम्प्युटर्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीपर्यंत आणि जेनेटिक्स/डीएनएपासून विश्वाच्या जन्मकहाणीपर्यंतच्या संशोधनाचा प्रचंड विस्तार आणि विकास गेल्या ६०-७० वर्षांत झाला आहे. हे सर्व विज्ञान जरी सुमारे पाच-सहाशे वर्षेच ‘वयाचे’ असले तरी गेल्या ६०-७० वर्षांमधील त्याची झेप अक्षरश: अचाट आहे!

डोनाल्डसन पंचविशीत असतानाच त्याला वाटू लागले की, ‘मरण’ ही गोष्टच ‘अनैसर्गिक’ आहे! कारण शरीर हे एक यंत्र आहे. हृदयक्रिया बंद पडली की माणूस मरतो असे आपण मानतो. ‘मरतो’ म्हणजे ‘सचेतन’ माणूस ‘अचेतन’ होतो. कृत्रिमरीत्या हृदयक्रिया चालू ठेवण्याचे, इतकेच नव्हे तर एकाचे हृदय दुसऱ्याला लावण्याचे, हार्ट ट्रान्स्प्लॅन्टचे, शल्यशास्त्र तेव्हा प्रचलित होते. त्यानंतर ‘ब्रेन डेड’ची संकल्पना आली. जोपर्यंत ‘मेंदू’ मृतवत होत नाही, तोपर्यंत एखादी व्यक्ती ‘मेली’ असे मानता येणार नाही असे वैज्ञानिकांनीच नव्हे तर न्यायालयांनीही मान्य केले. त्यानंतर वैद्यकविश्वात ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्टस्’चे प्रयोग व चर्चा सुरू झाली. ससे, डुक्कर, वानर यांच्या मेंदूंवर आणि त्यांच्या ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्ट्स’चे प्रयोग करण्यात येऊ लागले.तोपर्यंत तत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केलेलेच होते. ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम!’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे!’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहे?डोनाल्डसनचे मत होते की, मेंदू हे ते विचारकेंद्र.

वयाच्या ४३ व्या (१९८८ साली) वर्षी डोनाल्डसनला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. तपासणी केल्यावर लक्षात आले की त्याच्या मेंदूवर एक छोटासा ‘टय़ूमर’ आहे. आपल्याला कॅन्सर झाला आहे हे लक्षात आल्यावर त्याने स्वत:वरच प्रयोग करून घ्यायचे ठरविले. त्याने काही शल्यविशारदांना सांगितले की ‘‘नाहीतरी मी लवकरच मरणार आहे. मी जिवंत आहे तोवरच माझा मेंदू ‘क्रायोनिक’ शस्त्रक्रिया करून काढून घ्या. जेव्हा केव्हा, म्हणजे पाच-पन्नास वर्षांनी या कॅन्सरवर उपाय सापडेल तेव्हा ती शस्त्रक्रिया करा आणि ते डोके परत जोडून टाका. माझे धड आणि डोके मायनस ३२० फॅरनहाइट तापमानात ठेवा. त्या तापमानात ते खूप काळ आहे त्या स्थितीत राहू शकेल. उपाय सापडेपर्यंत शरीर व डोके त्या स्थितीत ठेवण्यासाठी दर वर्षांला एक लाख डॉलर खर्च येईल. मी पैशाची सोय करून ठेवीत आहे.’’ डोनाल्डसनच्या या सूचनेवर शल्यविशारदांची बैठक झाली. त्यांनी म्हटले की, जिवंत असताना मेंदू बाजूला काढणे म्हणजे डोनाल्डसनला ठार मारणे आहे. तो कायद्याने खून ठरेल. त्यामुळे तसे करणे शक्य नाही. डोनाल्डसन जिद्दीला पेटला होता. त्याने अमेरिकन न्यायालयाला विनंती केली, की विज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि माणसाला अमरत्व प्राप्त करण्याच्या प्रयोगांसाठी त्याला तो प्रयोग करण्याची परवानगी द्यावी.न्यायालयाने परवानगी नाकारली. डोनाल्डसन ज्या संस्थेमार्फत हा प्रयत्न करीत होता त्याचे संस्थेचे नाव आहे अल्कर लाइफ एक्स्टेन्शन फाऊंडेशन (Alcor Life Extension Foundation). या संस्थेचे तेव्हा अध्यक्ष होते कार्लोज मोंड्रागॉन. अध्यक्षांनीही न्यायालयाला सांगितले की, ‘‘हा खून मानला जाऊ शकत नाही. कारण उपाय मिळताच आम्ही डोके त्या शरीराला जोडून त्याला ‘शुद्धीवर’ आणणार आहोत.’’ या संस्थेच्या मते तो मरणार नाही तर अ‍ॅनास्थाशिया दिलेल्या रुग्णाप्रमाणे ‘सस्पेन्डेड’ जीवनस्थितीत असेल.’’ न्यायालयाने या संस्थेचे म्हणणे स्वीकारले नाही.

‘क्रायोनिक सस्पेन्शन ऑफ लाइफ’ ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेवर अधिक संशोधन सुरू होण्यापूर्वी अमेरिकेत ‘लाइफ एक्स्टेन्शन सोसायटी’ स्थापन झाली होती. डोनाल्डसन हा जिद्दीचा भविष्य-वेधी वैज्ञानिक होता. त्याने आजारी असतानाच अमरत्वाच्या शक्यतेविषयी आणि ‘२४ व्या शतकातील आरोग्या’विषयी प्रबंध लिहिला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ‘मेंदूत’ साठविलेली सर्व माहिती (म्हणजे आठवणी, विचार, भावना, ज्ञान इत्यादी) कॉम्प्युटरप्रमाणे जशीच्या तशी राहील आणि ती पुन्हा प्राप्त करता येईल. न्यायालयाने परवानगी न दिल्यामुळे त्याने असे मृत्युपत्र केले की तो मरताक्षणी त्याला वैद्यकीय शीतपेटीत ठेवण्यात यावे. तीन वर्षांपूर्वी (जानेवारी १९, २००६) डोनाल्डसन रूढ अर्थाने मरण पावला आणि आता त्याच्या शरीरावर A-1097 हा क्रमांक चिकटवून त्याचा देह शीतपेटीत ठेवण्यात आला आहे. असे आणखीही काही देह त्या प्रयोगशाळेत आहेत. परंतु त्यांना मृतदेह असे म्हणता येणार नाही आणि ते ज्या पेटीत बंद आहेत, तिला ‘शवपेटी’ असेही म्हणता येणार नाही.डोनाल्डसनला ‘मी कोण आहे? कुठून आलो? आणि कुठे जाणार आहे,’ हे प्रश्न पडले होते, पण त्यातल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याने ‘शोधले’ होते. ते उत्तर होते, ‘मी कुठेही जाणार नाही! शिवाय मी पुन्हा शुद्धीवर येईन तेव्हा तो पुनर्जन्म नसेल. कारण मी मेलेलो नाहीच- फक्त दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत आहे!’रेमंड कुर्झवेल हा एक जगप्रसिद्ध फ्यूचरॉलॉजिस्ट म्हणजे त्रिकालवेधी शास्त्रज्ञ विचारवंत आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्या गतीने विज्ञान-तंत्रज्ञान विकासते आहे ते पाहता पुढील ४०-५० वर्षांतच ‘लाइफ एक्स्टेन्शन’चे प्रयोग सिद्ध होतील.या संबंधात, याच स्तंभातून लिहिताना यापैकीकाही मुद्दे पूर्वी मांडले होते. परंतु तेव्हा ‘मी कोण आहे?’ या विषयावरील संशोधन आज कुठपर्यंत आले आहे त्याचे संदर्भ दिलेले नव्हते.

‘मी कोण आहे,’ याबद्दलची मुख्य मांडणी आता समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. अर्थातच जीवशास्त्रात आणि मेंदूविषयक झालेल्या संशोधनाच्या मदतीने. डग्लस हॉपस्टअ‍ॅटर (Douglas Hofstadter) आणि डॅनिएल डेनेट (Daniel Dennett) यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी एक पुस्तक प्रसिद्ध केले. ‘The Mind’s I’ हे त्या पुस्तकाचे नाव. आपल्यातला ‘मी’चा उगम व विकास, त्यातून येणारा ‘अहं’ वा ‘इगो’ आणि त्या एकाच ‘मी’चे होणारे अनेक अविष्कार हे केवळ ‘मेंदू’पुरते मर्यादित ठेवता येत नाहीत असे त्यांचे मत आहे.त्यातूनच आता ‘कॉन्शियस स्टडीज्’ ही नवीन संशोधन शाखा जन्माला आली आहे. प्रत्येक व्यक्तीचा एका मोठा ‘कॉन्शियसनेस कॅनव्हास’ असला तरी त्याच्या स्वभावाचे वेगवेगळे आविष्कार होतात. एखादी अतिशय व्यवस्थितपणे वागणारी व्यक्ती एकदम विचित्र वागते, एखादा साधा माणूस खूनही करायला प्रवृत्त होतो (पूर्वी कधीही गुन्हेगारी प्रवृत्ती नसलेला), किंवा इतर वेळेस समजूतदारपणे वागणारी व्यक्ती एकदम बेभानपणे आणि बेदरकारीने वागते वगैरे वगैरे. डॅनिएल डेनेट या विचारवंत संशोधकाने लिहिलेल्या ‘Brainstorms : Philosophical Essays on Mind and Psychology’ या पुस्तकात माणसाच्या मनाचा, मेंदूचा, व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा शोध घेताना असेही म्हटले आहे की, एकच ‘मी’ आहे असे गृहीत धरता कामा नये.

‘स्किझोफ्रेनिया’ वा दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे संशोधन सिग्मंड फ्रॉइडने व इतर काही मानसशास्त्रज्ञांनी एकोणिसाव्या शतकातच सुरू केले होते.आता विज्ञान व तत्त्वज्ञान एकमेकांत अशा रीतीने मिसळून जाऊ लागले आहे की, शरीरशास्त्र व जीवशास्त्रापासून, न्यूरॉलॉजी व मेंदूविषयक संशोधनापासून मानसशास्त्र आणि समाजशास्त्र वेगळे करणे अशक्य होत आहे.समाजच नसेल, सामाजिक/ कौटुंबिक/ सांस्कृतिक जीवनच नसेल तर ‘मी’ आणि ‘अहं’- इगो जन्मालाच येत नाही! पृथ्वीवर एकच माणूस जन्माला आला असता तर ‘मी’चा उगम झालाच नसता. इतके कशाला, रॉबिन्सन क्रूसोला तो जंगलात एकटा सापडल्यावर इतर माणसांबरोबर स्वत:चाही नवा शोध लागत होता!