Archive for ऑगस्ट 9, 2009

इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांत महाराष्ट्र या संज्ञेचा आढळ पहिल्यांदा दिसून येतो. परंतु, महाराष्ट्र या शब्दाच्या व्युत्पत्तीविषयी विद्वानांत एकमत नाही. पां. वा. काणे यांच्या मते “महान राष्ट्र’ यावरून महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. राजारामशास्त्री भागवत यांनी, “मरता तव हटता’ अशी मरहठ्ठ शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे.

———————————————————————————————————————————————
“महाराष्ट्र’ या शब्दाची व्युत्पत्ती आणि त्याचा अर्थ यांबद्दल विद्वानांत एकमत नाही. प्राचीन भारतीय वाङ्‌मयामध्ये दक्षिणापथ या संज्ञेचा वापर जास्त आढळून येत असून, नर्मदेचा दक्षिण तीर ते कन्याकुमारी एवढ्या मोठ्या भागाचा दक्षिणापथ असा निर्देश केला जात असे. सातवाहनांच्या शिलालेखांत दक्षिणापथाचा उल्लेख येतो. यावरून असे दिसते, की महाराष्ट्र या संज्ञेचा वापर नंतरच्या काळामध्ये सुरू झाला असावा. इसवीसनाच्या पाचव्या-सहाव्या शतकांमध्ये महाराष्ट्र या संज्ञेचा आढळ पहिल्यांदा दिसून येतो. “महाराठी’ या शब्दाचा वापर सातवाहनांच्या लेखात, त्याचप्रमाणे त्यांच्या उत्तरकाळातील काही नाण्यांवर आढळून येतो. महावंस या बौद्धग्रंथात “महारठ्ठ’ या शब्दाचा उल्लेख आहे. या ग्रंथातील निर्देशानुसार बौद्ध भिक्षू मोगली पुत्र तिस्स याने इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकात महिसमंडळ, वनवासी, अपरांतक, महारठ्ठ येथे बौद्ध धर्मोपदेशक पाठविले होते. यावरून महारठ्ठ हे नाव इसवीसनपूर्व तिसऱ्या शतकापासून रूढ असावे. रविकीर्तीच्या लेखात चालुक्‍यवंशीय दुसरा पुलकेशी हा तीन महाराष्ट्रकांवर राज्य करीत होता, असे उल्लेखिलेले आहे. ऐहोळे शिलालेखात (इसवीसनपूर्व ६३४) उल्लेखिलेली तीन महाराष्ट्रके कोणती, याबद्दल निश्‍चित उलगडा होत नाही. काही विद्वानांच्या मते विदर्भ, कुंतल आणि महाराष्ट्र अशी तीन वेगवेगळी महाराष्ट्रके असू शकतील….
चिं. वि. वैद्य यांच्या मते इसवीसनपूर्व ६०० च्या सुमारास आर्य लोक दक्षिणेत आले आणि गोपराष्ट्र, मल्लराष्ट्र, पांडुराष्ट्र इत्यादी वसाहती करून स्थायिक झाले. अशोकाच्या शिलालेखात जो “रास्टिक’ लोकांचा उल्लेख आढळतो, ते हेच लोक होत. आंध्रभृत्य म्हणजेच सातवाहन यांच्या साम्राज्यात ते एका सत्तेखाली येऊन त्यांचे एक मोठे राष्ट्र निर्माण झाले व या मोठ्या राष्ट्रालाच महाराष्ट्र असे नाव पडले. 
अशोकाच्या शिलालेखात दक्षिणेतील रट्ट लोकांनाच रास्टिक असे म्हटले असून, त्याचेच संस्कृत रूप “राष्ट्रिक’ झाले, असे रा. गो. भांडारकर यांनी आपल्या अर्ली हिस्टरी ऑफ द डेक्कन या दख्खनच्या प्राचीन इतिहासविषयक ग्रंथात म्हटले आहे. अशोकाच्या शिलालेखात एके ठिकाणी “महाभोज’ असा उल्लेख आहे. जसे भोज लोक स्वतःला महाभोज म्हणवून घेत, तसेच या प्रदेशात राहणाऱ्या राष्ट्रिकांनी स्वतःला महाराष्ट्रिक किंवा “महारट्ट’ असे म्हणवून घेतले आणि ते ज्या देशात राहत, त्या देशाला महारट्ट व संस्कृतमध्ये महाराष्ट्र असे नाव पडले. 
राजारामशास्त्री भागवत यांच्या मते संस्कृत नाटकांमध्ये येणारा “मरहट्ट’ हा जनवाचक शब्द “मऱ्हाठा’ शब्दाची प्रकृती दिसतो. “मऱ्हाटा’ म्हणजे “मरता तव हटता’ (मरतो तेव्हा हटतो) अशी त्यांनी मरहठ्ठ शब्दाची लोकगुणवाचक व्युत्पत्ती सांगितली आहे. 
“ज्ञानकोश’कार केतकर महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती सांगताना महार आणि रट्ट यांच्या एकीकरणाची कल्पना मांडतात. त्यावरून केतकरांनाही ही लोकवाचक संज्ञा मान्य असल्याचे दिसते. 
महामहोपाध्याय पां. वा. काणे यांच्या मते “महान राष्ट्र’ यावरून महाराष्ट्र या शब्दाची व्युत्पत्ती झाली आहे. महाराष्ट्र हे नाव कोणत्याही वंशावरून किंवा जातीवरून पडलेले नसून, ते देशाच्या विस्तारावरून पडले असावे. 
“महाराष्ट्र म्हणजे महंत राष्ट्र म्हणोन महाराष्ट्र’ असा उल्लेख महानुभावी ग्रंथकारांच्या “आचारमहाभाष्या’तही मिळतो. 
(संदर्भ – मराठी विश्‍वकोश, खंड १२, पृष्ठ १४७० व १४७१)