नवीन काळे, सौजन्य – लोकसत्ता
तुम्हाला खरंच असं वाटतं का, की या देशाला काही भवितव्य नाही? इथली माणसं कधीही सुधारणार नाहीत? लोकशाही, कायदेकानू या गोष्टी निर्थक झाल्यात?
तुम्ही या मतांशी ठाम असाल तर हा लेख तुमच्यासाठी आहे!
‘हिवरे बाजार’चं नाव ऐकलंय? नाही ना? हिवरे बाजार हे नगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. हिवरे बाजार समजून घेण्यासाठी इथली २० वर्षांपूर्वीची स्थिती पाहायला हवी. कसं होतं हे गाव?
गावात दारूच्या भट्टय़ा होत्या. इथून आजूबाजूच्या गावांना दारूचा मुबलक पुरवठा होत होता. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, आर्थिक स्थैर्य हे शब्द कानावरून गेले तरी खूप- अशी एकंदरीत परिस्थिती. एखाद्या पोलीस अधिकाऱ्याची बदली ‘शिक्षा’ म्हणून इथे होत असे. ‘कुछ नहीं होगा इस गाव का!’ अशीच धारणा होती.
‘होती’ असं म्हणतोय त्या अर्थी आत्ता तशी परिस्थिती नाही, हे उघड आहे. पण कसं आहे आताचं ‘हिवरे बाजार’?
गावाची लोकसंख्या चौदाशेच्या आसपास. गावात एकही प्रौढ माणूस बेरोजगार नाही. गावातल्या २२६ घरांना आज आर्थिक स्थैर्य प्राप्त झालंय. शेती व दुग्धउत्पादन हे मुख्य व्यवसाय. या व्यवसायातून गावातली तीन कुटुंबे आज ‘मिलेनियर’ झाली आहेत! (त्यांचं वार्षिक उत्पन्न दहा लाखांच्या वर आहे.) या व्यवसायात स्त्रियाही अग्रेसर आहेत. गावात ऊस लागवडीला बंदी आहे. कारण त्याला भरपूर पाणी लागतं. मुख्य पीक- कांदा. गावाने जलसंधारणाच्या योजना राबवून असा काही चमत्कार घडवून आणलाय, की वर्षभरात शंभर मि. मी. पाऊस पडूनसुद्धा गावातल्या २५३ विहिरींना बाराही महिने पाणी असतं. गावात सोळा हातपंप आहेत. गावातल्या डोंगरांवर गुरांना चरणं गावाच्या कायद्याविरुद्ध आहे. त्यामुळे चाऱ्याचं इतकं नियोजन होतं, की गावात चारा पुरतोच, शिवाय आजूबाजूच्या गावातले लोकही इथला चारा घेऊन जातात. चराईबंदीचा आणखी एक फायदा असा की, डोंगरावर पडणारं पावसाचं पाणी वाहून जात नाही. ते नैसर्गिकरीत्या अडवलं जातं आणि जमिनीत मुरतं. थोडक्यात- गाव ‘सुजलाम्-सुफलाम्’ आहे.
ज्या गावात एकेकाळी फक्त दारूच्या भट्टय़ा होत्या, त्या गावात आता दारू सोडाच, पान-सिगारेट, तंबाखू, गुटखा सगळ्याला बंदी आहे. संपूर्ण नशाबंदी!
गावातल्या सगळ्या घरांना सारखा रंग! प्रत्येक घरावर घराच्या मालकाचं नाव सुंदर अक्षरांत लिहिलेलं. गावातले रस्ते सीमेंट-काँक्रीटचे. प्रत्येक घराला स्वतंत्र शौचालय. शासनाचे ग्रामस्वच्छतेचे सगळे पुरस्कार या गावाला मिळाले आहेत, हे वेगळं सांगायची गरज नाही. ही स्वच्छता बाराही महिने असते. गावातली कुठलीही महिला फुंकणी वापरून स्वयंपाक करीत नाही. त्यांच्या दिमतीला १३० बायोगॅस आहेत. गावाचं स्वत:चं देखणं मंगल कार्यालय आहे. गावातली जमीन, घर बाहेरच्या माणसाला विकण्यास परवानगी नाही. जमीन विकत घ्यायची एखाद्याची ऐपत नसेल तर चार शेतकरी एकत्र येऊन त्याला मदत करतात; पण गावातली जमीन बाहेरच्याला विकली जात नाहीत. संपूर्ण गाव साक्षर आहे. गावात टुमदार शाळा आहे. शाळेला भव्य पटांगण आणि स्टेज आहे. शाळेच्या भिंती माहिती, चित्रं, सुविचारांनी नटल्या आहेत. शाळेच्या आवारातच शाळेचं स्वयंपाकगृह आहे. शाळेच्या भिंतीवर सोमवार ते शनिवार दिला जाणारा मेनू (त्यातील पौष्टिक अन्नघटकांसहित) लिहिलेला आहे. एका भिंतीवर शाळेचा नकाशा आहे. मुला-मुलींसाठी वेगवेगळी शौचालयं आहेत. त्यावर ‘पाणी टाकलं ना?’ अशी प्रेमळ विचारणा आहे. अपंग मुलांसाठी वेगळ्या शौचालयाची सोय आहे. शाळेतली उपस्थिती व निकाल १०० टक्के आहे. प्रत्येक वर्गाला ग्रामपंचायतीतर्फे एक ‘किट’ देण्यात आले आहे. त्यात पावडर, तेल, साबण व नेलकटर ठेवण्यात आले आहे.
आणखी काही ऐकून कोसळायचंय?
संपूर्ण गावाचा एकच गणपती असतो!
गावातले बरेच रस्ते गावकऱ्यांनी श्रमदानातून बांधले आहेत. गावातल्या मुलाचं लग्न होणार असेल तर या मुलाचं आणि गावात नवीन येणाऱ्या सुनेचं ‘एच. आय. व्ही. सर्टिफिकेट’ ग्रामपंचायतीत सादर करण्याची सक्ती आहे. गावात एकही दवाखाना नाही. कारण तिथे कोणाला आजारच नाही होत! एका डॉक्टरने दवाखाना थाटायचा अयशस्वी प्रयत्न केला होता. पण पेशंटस्च न फिरकल्याने तो गाशा गुंडाळून निघून गेला. दवाखाना नाही, यात काही चमत्कार वगैरे नाही. स्वच्छता आणि आरोग्य यांच्यातला परस्परसंबंध गावकऱ्यांनी नेमका ओळखलाय. त्याचंच हे फलित!
सरपंच पोपटराव पवार व त्यांचे ग्रामस्थ सहकारी यांनी या गावात घडवून आणलेला चमत्कार एका रात्रीत झालेला नाही. बदलामुळे होणारे चांगले परिणाम सगळ्यांनाच हवेहवेसे वाटतात; परंतु ही ‘बदल प्रक्रिया’ खूप संघर्षांची आणि तापदायक असते. पोपटराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे बदल घडवून आणण्यासाठी किती ताप सहन केला असेल, हे कल्पनेनंच समजून घ्या.
‘हिवरे बाजार’च्या या यशानं आपल्या ‘सो कॉल्ड’ शहरी माजावर आणि सुसंस्कृतपणावर आपल्याला जे प्रश्न पडलेत, त्यांची प्रामाणिकपणे उत्तरं द्यायचा प्रयत्न आपण करू या. नेहमीची नऊ तेवीसची लोकल आज सोडून देऊया. थोडा वेळ निवांतपणे स्वत:पाशीच बसू या. शहरीकरणाच्या सुविधा मिळविण्यासाठी गहाण टाकलेला आरसा थोडय़ा मुदतीसाठी परत आणूया आणि त्यावरची धूळ पुसून लख्ख आरशात स्वत:चं प्रतिबिंब पाहूया. स्वत:शी प्रामाणिक राहून काही प्रश्न स्वत:ला विचारूया.
पोपटरावांसारखे द्रष्टे सरपंच आणि तिथले चौदाशे ग्रामस्थ हीसुद्धा आपल्यासारखीच हाडामांसाची माणसं. ‘आम्ही मराठी आहोत म्हणून एकत्र येऊ शकलो नाही,’ ही आपण वापरत असलेली पळवाट त्यांच्याकडेही होती. मग त्यांना जमू शकतं, तर आपल्याला का नाही? मुंबई किंवा देश सुधारण्याचा भाबडा आशावाद थोडासा बाजूला ठेवूया. पण आपण राहत असलेला परिसर, कॉलनी, सोसायटी आपण बदलू शकतो की नाही? आपल्या विभागात ‘एक गाव, एक गणपती’ ही कल्पना राबवू शकतो की नाही? दिवसागणिक खर्च होणाऱ्या नैसर्गिक साधनसंपत्तीचं चांगल्या पद्धतीनं नियोजन व्हावं म्हणून काही अभिनव उपक्रम राबवू शकतो की नाही? इतरांना बदलण्याच्या फंदात न पडता आधी स्वत:लाच बदलू शकतो की नाही?
आजवर २३ लाख लोक ‘हिवरे बाजार’ बघून गेलेत. त्यांत देशी-विदेशी अभ्यासक होते. विद्यार्थी होते. माझ्यासारखे काही उत्सुकतेपोटी गेलेले होते. आजही पोपटराव आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा उत्साह दांडगा आहे. पोपटरावांचे विचार त्यांच्या बाजूला बसून ऐकायची संधी मिळाली. पोपटरावांचं एक वाक्य सारखं कानात घुमतंय. ते म्हणाले, ‘विकास साधण्यासाठी पैशांची फारशी आवश्यकता नसते. तिथल्या लोकांनी आधी आपली मानसिकता बदलायला हवी. ती एकदा बदलली, की पुढच्या बऱ्याच गोष्टी सोप्या होत जातात!’ हिवरे बाजार सोडता सोडता ग्रामपंचायतीजवळचा एक बोर्ड वाचनात आला. त्यावर एक साधं, पण सुंदर वाक्य लिहिलेलं आहे- ‘आम्ही केलं, आपण करूया.’
परतीसाठी एस. टी.त बसलो. हिवरे बाजारचा हँगओव्हर जाता जात नव्हता. सगळ्या गावाचं रूप आठवून आठवून मनात आलं- ‘कुछ हो सकता है इस देश का!’ हा लेख वाचून तुम्हालाही तेच वाटलं तर ते यश ‘हिवरे बाजार’चं आहेच, पण त्याहून अधिक तुमच्या मनात डोकं वर काढू पाहणाऱ्या आशावादाचं आहे! संघर्षांच्या या प्रवासातली पहिली परीक्षा तुम्ही पास झाला आहात. अभिनंदन!
————————–
या गावाबद्दल आय बी एन लोकमत वाहिनीवर “हिरव्यागार गावाची गोष्ट” अश्या शिर्षकाचा रिपोर्ताज दाखवण्यात आला होता. तो इथे पाहु शकता –
.
Dear Deepak,
Blog is very nice. collection of best articles in one single blog is good idea. keep it up.
Best luck
Tejas
Thanks Tejas for the encouragement.
खूप छान लेख आहे …आणि मौलिक माहिती….धन्यवाद. खरय ठरवलं तर आपण सगळ साध्य करू शकतो…
खरंय. आणि अशी उदाहरणे हा विश्वास दृढ करतात. आपण हे बदलु शकतो !
प्रतिक्रियेकरिता आभारी आहे.
खुपच मस्त लेख आहे. प्रत्येक गावात एक पोपटराव का नसतात?
🙂
aapanach houyaa popatarao ! kaay harakat aahe?
NY-USA
9-8-10
Greatest.
KHUP SHAN LEKH AAHE …….AASN VATAT JAUN HE EKDA TARI BAGHAVE…..
pls give me hivare bajar contact nos
सुंदर
अशी सर्व गावे असावीत ,म्हणजे भारत खरा सुखी होयील.
हिवरे बाजारचा फार चांगला विकास झाला आहे