Archive for ऑगस्ट, 2009


अतुल देऊळगावकर, सौजन्य – लोकसत्ता

“माझ्या नसानसात भारतीयता भिनलेली आहे. भारताविषयीची माझी दृष्टी भाबडी असता कामा नये. कुठल्याही तर्काच्या कसोटीवर माझे विश्लेषण घासूनपुसून पाहता आले पाहिजे, असा माझा कटाक्ष होता. त्यामुळे एखाद्या पाश्चात्याच्या तटस्थपणातून मी भारताकडे पाहू शकलो. कठोर टीकाकाराच्या भूमिकेतून मी भारतीय परंपरेची शक्तिस्थळे आणि दुबळेपणा उमजून घेतला होता. म्हणूनच भारताला आधुनिक रुपडे आणण्याची आस मला लागली होती”

-पं. जवाहरलाल नेहरू (१९४६)


डोळ्यांदेखत एकजण दुसऱ्याच्या पोटात सुरा खुपसतो, रक्ताचे थारोळे साचते. हे सारे अकरा वर्षांचा कुमार अवाक होऊन पाहतो आहे. त्याचे वडील भोसकला गेलेल्याला पाणी पाजवतात, रुग्णालयात घेऊन जातात. तो वाचत नाही. हे दृश्य तो बालक जन्मभर विसरू शकत नाही. ‘मारणारा हिंदू, मरणारा मुस्लिम’ असा धार्मिक चष्मा त्याला मिळाला नव्हता. जात, धर्म, भाषा, प्रांत ह्य़ा क्षुद्र सीमांच्या पलीकडे पाहण्याची गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांची वैश्विक दृष्टी त्याला लाभली होती. मरणारा बेकार होता. काम का मिळत नाही? माणूस जीवे मारायला का व कधी तयार होतो? कठोपनिषदात बालक नचिकेत मृत्यूचे रहस्य उलगडण्याकरिता यमाचा पिच्छा पुरवतो. त्याप्रमाणे ‘हा कुमार’ हिंसेचा उगम शोधायला निघाला. १९४२ च्या महाभयंकर दुष्काळाच्या आठवणी त्या बालमनाला दुस्वप्नासारख्या होत्या. गोदामात धान्याच्या पोत्यांची थप्पी असूनही गोदामाबाहेर हाडाचे सापळे का हिंडतात? याचा ‘अर्थ’बोध करून घेण्यासाठी अमर्त्य कुमार सेन झटत राहिला. त्यातून दुष्काळाचे व भुकेचे अर्थशास्त्र जगासमोर आले. टागोर यांच्या मानवतावादी विचारांचा विस्तार अमर्त्य सेन यांनी केला.
मध्य युगात रुतलेल्या सुस्त भारताला आधुनिकतेकडे खेचून आणणारा रथ गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी तयार केला. महात्मा गांधी आणि पं. नेहरू यांनी त्या रथाला ओढणाऱ्या अनेक पिढय़ा घडवल्या. प्राचीन काळापासून पौर्वात्य व पाश्चात्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना अशी अनेक द्वंद्वे चालत आली आहेत. ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधण्याची किमया टागोर, गांधी व नेहरू यांनी साधली. विक्रम साराभाई, सत्यजित राय, लॉरी बेकर, अमर्त्य सेन यासारख्यांनी त्यांचा वारसा प्रगल्भ करून आधुनिकता रुजविण्याचे कार्य केले. टिकवून धरावी अशी भारतीय परंपरा कोणती? भारताने नवतेमधील कशाचा स्वीकार करावा? परंपरा आणि आधुनिकतेचा संगम कसा घडवावा? याचा सखोल आणि चिकित्सक मागोवा घेऊन टागोर, गांधी व नेहरू यांनी विचार आणि कृती दिली. संस्थांची रचना केली. भारतीय लोकशाहीने साठ वर्षांत केलेल्या प्रगतीचा पाया या तिघांनी घातला, याचा विसर पडणे कृतघ्नपणाचे ठरेल.

आधुनिकतावादानंतर जगभरात उत्तर आधुनिक वादाने थैमान घातले. विघटन, भंजन, उध्वस्तीकरण हाच कार्यक्रम झाला. काळाच्या ओघात कुठलाही बदल घडविण्याच्या अग्रभागी राहणाऱ्या मध्यमवर्गाची संवेदनशीलता नाहीशी होत गेली. इतरेजनांबद्दल तुच्छता व मग्रुरी हे मध्यमवर्गीयांचे व्यवच्छेदक लक्षण ठरू लागले. पैसा कमावणारा यंत्रवत व आत्ममग्न समाज पाहून १९९१ साली सत्यजित राय यांना सुसंस्कृतता (व ते स्वत) ‘आगंतुक’ असल्याची खात्री वाटू लागली. १९९२ साली बर्लिन भिंत पाडून जग एकवटण्याची सुरुवात झाली. त्याच वर्षी तालिबानी अफगाणिस्तान सोडून काश्मीरमध्ये घुसले आणि बाबरी मशीद उद्ध्वस्त करून भारतात तालिबानीकरणाचा आरंभ झाला. राष्ट्रीय पक्ष क्षीण होत चालले, संघटना संपुष्टात येऊ लागल्या, संवाद नाहीसा होऊन समाजात हिंसक उद्रेकाचे प्रमाण वाढू लागले. भारतापुढे भविष्यात काय वाढून ठेवले आहे?

दारिद्रय व विषमतेच्या पर्यावरणातील अशांत पर्वातून आपण कसे बाहेर पडणार? प्रादेशिक अस्मिता वरचढ ठरून तुकडे पडतील? अशा अनेकविध कूट समस्यांनी ग्रासलेल्या भारताने विचार कसा करावा? भारतामधील घडामोडींमुळे अस्वस्थ होऊन अर्थतज्ज्ञ डॉ. अमर्त्य सेन त्यासंबंधी सातत्याने चिंतन करीत आहेत. व्याख्याने व निबंधातून त्यांचे विचार आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. ‘द ऑग्र्युमेंटेटिव्ह इंडियन’ या ग्रंथातून डॉ. सेन यांनी भारतीय इतिहास आणि संस्कृतीमधील सार्वकालिक विचारांचे सत्व आपल्याला काढून दिले आहे. स्त्रिया आणि कष्टकरी चळवळीमधील ज्येष्ठ कार्यकर्त्यां श्रीमती शारदा साठे यांनी ‘वाद-संवादप्रिय भारतीय’ हा या मौलिक ग्रंथाचा अनुवाद मराठी वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.

महती वादसंवादाची!
सेन यांनी प्रस्तुत ग्रंथामध्ये ‘अभिव्यक्ती आणि बहुविधता’, ‘संस्कृती आणि परस्परसंवाद’, ‘राजकारण आणि निषेध’, ‘बुद्धिप्रामाण्य आणि ओळख’ अशा चार भागांतील प्रत्येकी चार प्रकरणांमधून सविस्तर व सखोल मांडणी केली आहे. ‘वाद-संवादातून चातुर्य येते’, या सुभाषिताची प्रचिती भारतीय इतिहासात वारंवार येते. वेद, उपनिषद काळ असो वा रामायण, महाभारताचा काळ, मंडण व खंडण हा सार्वजनिक जीवनाचा अविभाज्य घटक होता. या सार्वजनिक वादविवाद सभेत जातीभेद वा लिंगभेद नव्हता. प्रत्येकाला मोकळेपणाने विचार मांडण्याची मुभा होती. भारतीय युक्तिवादाची परंपरा ही कुणाचीही मक्तेदारी नव्हती. आद्य शंकराचार्याना विचार करण्यास भाग पाडणारा चांडाळ होता. रामायणात रामावर कडाडून टीका करणारा जाबाली होता. याज्ञवल्क्य ऋषीला गार्गी धर्मशास्त्रातील कूटप्रश्न विचारते. द्रौपदीने केलेल्या प्रश्नांच्या भडिमारापुढे धृतराष्ट्र, विदूर, भीष्माचार्य दिङमूढ होतात. इतकेच काय, रक्तरंजित युद्ध करण्यापेक्षा सत्तेचा त्याग हा उत्तम पर्याय युधिष्ठिर निवडतो. त्यावेळी द्रौपदी म्हणते, ‘आपण राजाधिराज, इंद्राप्रमाणे शूर आहात, अवघ्या पृथ्वीवर प्रदीर्घ काळ राज्य केले आहे. आता आपल्याच हाताने ते राज्य भिरकावून देत आहात. आपल्याला शौर्य कर्म करावयाचे नसेल तर क्षत्रियाचे प्रतीक असलेले हे धनुष्य द्या फेकून! केसांची वेणी करून घ्या. मग खुशाल आयुष्यभर पवित्र अग्नीला आहुती देत बसा’. द्रौपदीचा युधिष्ठिराशी संवाद केवळ भावनिक नाही. समर्पक उपमा, रुपक यांची पखरण करीत केलेली ती तर्कशुद्ध मांडणी होती. पुढे युद्धभूमीवर कृष्ण व अर्जुन यांच्यातील प्रदीर्घ संवाद गीतेमधून व्यक्त झाला आहे. तात्त्विक व नैतिक प्रश्नांमुळे अर्जुन विषण्ण झाला होता. त्याच्या सर्व शंका व संशय नाहीसे करून त्याने युद्धास सिद्ध होईपर्यंत कृष्णाने केलेले तर्कशुद्ध संभाषण गीतेच्या अध्यायातून आढळते.

‘महापुरुष असो वा ग्रंथ, कोणाचेही प्रतिपादन हे अंतिम प्रमाण मानू नका. बुद्धीस पटले तरच त्याचा स्वीकार करा’, हा संदेश हीच भारतीय विचार परंपरेची अमूल्य देणगी आहे. याचे अनेक दाखले अमर्त्य सेन देतात. प्राचीन भारतात धार्मिक कर्मठपणाला समाजातील कनिष्ठ वर्गाकडून सतत आव्हाने दिलेली आहेत. जातीव्यवस्था घडत गेली तेव्हा श्रेष्ठत्वाच्या उतरंडीवर घणाघाती हल्ले झाले आहेत. भृगू भारद्वाजांना विचारतात, ‘आपण सारी ईश्वराची लेकरे आहोत, तर मुलांचे वर्ण भिन्न कसे असू शकतील?’ यक्ष व कूट प्रश्नांच्या आधारे तर्काच्या कसोटीवर प्रत्येक बाब तपासून पाहणे, शंका व संशय घेणे ही प्राचीन भारतामधील सहजप्रवृत्ती झाली होती. ‘बाबा वाक्यं प्रमाणं’ मानणाऱ्यांना भारतीय इतिहासात प्रतिष्ठा नव्हती. त्यातूनच चार्वाकांचा नास्तिकवाद विस्तारत गेला. मृगजळाप्रमाणे इंद्रियास कधी भास होऊ शकतात. धूर असेल तर आग असण्याची शक्यता असते, एवढेच सांगता येते’, असे लोकायत दर्शन सांगते. कनिष्ठ जातींना मिळणारी वागणूक असह्य़ झाल्यामुळेच सहन न झाल्यामुळेच बौद्ध व जैन धर्माची स्थापना झाली. त्याकाळात वाद-संवादामुळे मतांतर व त्यातून धर्मातरे झाली आहेत. सामाजिक भेदभावाचा धिक्कार करणाऱ्या हिंदू भक्ती पंथ तसेच मुस्लिम सुफी पंथांचा सहज प्रसार मनपरिवर्तनामुळेच झाला होता. सहिष्णुता व सौहार्दाचे वातावरण तयार करण्यात ऐतिहासिक भूमिका बजावणारे सम्राट अशोक, अकबर हे हिंदू नव्हते. विणकर कबीर, चांभार रविदास, सेना न्हावी, नरहरी सोनार हे कवी तर मीराबाई, मुक्ताबाई, दयाबाई, अंदलबाई, सहजोबाई या कवयित्रींच्या भजनांची समाजमनावर छाप अजूनही आहे. विचारमंथनाची प्रक्रिया खोलवर रुजल्यामुळे समाजातील सर्व थरातून अभिव्यक्तीचा तो आविष्कार होता. इसवी सन १००० सालापर्यंत अवघ्या जगावर भारतीय विज्ञान, तत्वज्ञान आणि गणिताचा दबदबा निर्माण झाला होता. त्याचा पाया हा बहुविधतेच्या ऐतिहासिक परंपरेने रचला होता.

वादसंवाद परंपरांमुळे भारतीय उपखंडातील सामाजिक व सांस्कृतिक जगाची जडणघडण होत गेली. त्यामुळेच बहुविधता हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. भारतीय लोकशाही ही ब्रिटिशांच्या प्रभावाची निष्पत्ती असल्याची ग्वाही अनेक स्वयंघोषित बुद्धिवादी देतात. अतिप्राचीन काळापासून चालत आलेल्या वादसंवाद परंपरांमुळे आपल्या लोकशाहीची पाळेमुळे खोल रुजली आहेत, हा इतिहास त्यांना माहीत नसतो. असे नसते तर ब्रिटिश साम्राज्यांच्या अधिपत्यापासून मुक्त झालेल्या शंभर राष्ट्रांमध्ये लोकशाही सारखीच दिसली असती, असा बिनतोड युक्तिवाद सेन करतात.

प्राचीन भारतामध्ये कालगणना करण्यासाठी सात प्रकारच्या दिनदर्शिका उपलब्ध होत्या. खगोलशास्त्र व गणिताचा गाढा अभ्यास असल्याशिवाय दिनदर्शिका तयार करता येत नाही. इसवी सन पूर्व ३१०२ साली कलियुग कालगणना पद्धतीचा आरंभ झाला. त्यातील अचूक गणिती पद्धतीच्या नोंदी पाहून आज कुणीही थक्क होईल. चार लाख बत्तीस हजार वर्षांचे कलियुग हे चार युगातील सर्वात लहान युग आहे. कृत युग हे कलियुगाच्या चौपट, द्वापार युग हे तिप्पट तर त्रेता युग हे कलियुगाच्या दुप्पट होते. ‘कलियुग दिनदर्शिकेमधून त्या काळातील ग्रहताऱ्यांची अचूक स्थिती लक्षात येते’, असा गौरव गणितज्ज्ञ लाप्लेस यांनी केला होता. सेन यांनी बुद्धनिर्वाण, महावीरनिर्वाण शक, बंगाली व कोल्लम यांसारख्या इतर दिनदर्शिकांचा अभ्यास करून त्यांच्यामधील विविधता आणि एकतेकडे लक्ष वेधले आहे.

इतिहासाची महत्ता सांगतानाच सेन वर्तमानाकडे येतात. केवळ संख्यांचा आधार घेऊन भारताला हिंदुत्ववादी ठरविण्याच्या विकृत खटाटोपाचा खरमरीत समाचार घेतात. कडव्या हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या राजकीय पक्षांना स्वातंत्र्य चळवळीपासून आजतागायत कधीही जनाधार मिळालेला नाही. आजही भारतीय जनता पक्षाला ३० टक्क्य़ांपेक्षा अधिक मते मिळू शकत नाहीत. बाबरी मशीद उद्ध्वस्त करणे, गुजराथमध्ये मुस्लिमांवर निर्घृण अत्याचार करणे, असे हिंसाचार करून धर्माच्या पायावर राजकीय फायदा उठवता येत नाही. जागरुक मतदारांना धार्मिक अस्मितेपेक्षा भूक, रोजगार, शिक्षण, आरोग्य हेच प्रश्न महत्त्वाचे वाटतात. हे अनेक निवडणुकांमधून व्यक्त झाले आहे, हेच भारताचे वैशिष्टय़ आहे.

चिनी विकासापासून बोध
भारत व चीन यांच्यात व्यापारी संबंध पूर्वापार चालत आले आहेत. बौद्ध धर्मामुळे देवाणघेवाण वाढत गेली. पहिल्या सहस्रकात भारतीय विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी चिनी विद्वान मोठय़ा संख्येने येत असत. चिनी प्रवाशांनी तसेच विद्वानांनी भारतीय शिक्षण व आरोग्यव्यवस्थेला आदर्श म्हटले आहे. हा इतिहास रम्य वाटला तरी वर्तमानात भारतीय शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील अवस्था दयनीय आहे. शिक्षणाचा प्रसार आणि उत्तम सार्वजनिक आरोग्य यांच्यामुळे जागतिकीकरणानंतर चीनला आंतरराष्ट्रीय व्यापारात हनुमान उडी घेता आली. निर्यात होणाऱ्या वस्तूंचे उत्पादन करण्याकरिता चीनमध्ये कामगारांना प्रशिक्षित केले जाते. जागतिक बाजारपेठेत उतरायचे असेल तर गुणवत्ता उच्च दर्जाची असावी लागते. अनुरूप शिक्षण व चांगले आरोग्य असल्यास उत्पादन व सेवा यांचा दर्जा टिकून राहतो. जागतिक बाजारपेठेत चीनने स्थान मिळवताच तिथे नोकऱ्या वाढू लागल्या. या विकासप्रक्रियेपासून भारताने बोध घेतला पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन अमर्त्य सेन करतात.

‘राजकीय समानता आली तरी सामाजिक व आर्थिक विषमतेमध्ये भारतीय लोकशाही आयुष्य कंठणार आहे’. १९५० साली डॉ. आंबेडकरांनी प्रजासत्ताकावर केलेले मार्मिक भाष्य आजदेखील तंतोतंत लागू पडते. १९४३ नंतर दुष्काळामुळे भूकबळी झाले नाहीत, याचे श्रेय भारतीय लोकशाहीला आहे. गेल्या साठ वर्षांत आयुष्यमान व दरडोई उत्पन्न वाढले. तरीदेखील आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. काही महानगरांमधील मोजक्या लोकांभोवती जागतिकीकरणाचा फायदा एकवटला आहे. ‘विषम संधी हा आपल्या लोकशाहीवर लागलेला कलंक आहे. निरक्षरता, अनारोग्य, अपूर्ण जमीन सुधारणा व शेतीविकासाची उपेक्षा अशीच चालू राहिली तर अशांतता व असुरक्षिततेमुळे लोकशाही धोक्यात येऊ शकते’, या प्रखर वास्तवाला सेन भिडवतात. त्याचबरोबर उपाययोजनादेखील सुचवतात. प्राथमिक शिक्षणाच्या व्यवस्थापनाची पुनर्रचना करावी. शाळेच्या व्यवस्थापनात वंचित समाजगटाच्या पालकांचा समावेश करावा, अशा अनेक धोरणात्मक सूचनाही सेन करतात.

महाभयंकर हिंसा आणि पर्यावरण विनाश यामुळे सध्या जग अंधारून गेले आहे. तर्क वा युक्तीने संवाद साधता येण्याची क्षमता नसणारे निर्बुद्ध बळाच्या आधारे मते लादू पाहतात, असे लोक सर्व काळात, सर्व धर्म व पंथात असतात. लोकशाही व समाजस्वास्थ्य धोक्यात येण्याचे प्रसंग येत असतात. आज समस्त जनता हवालदिल झाली असून, हे भीषण वातावरण त्यांना नकोसे झाले आहे. विविध पद्धतीने जनता त्यांच्या भावना व्यक्त करीत आहे. आणि हीच आशा आहे. बदल व्हावा ही अभिव्यक्ती महत्त्वाची असते. त्यातूनच युक्तिवाद व वादसंवाद झडू लागतात. मोठय़ा परिवर्तनाची ती नांदी असते. कुट्टकाळ्या ढगांनी दाटी केली तरी काही क्षणात रुपेरी कड अवतरते आणि आसमंत उजळून जातो. निरंतर चालू राहिलेल्या वादसंवाद परंपरेने भारतावरील अनेक सावटे दूर केली आहेत. त्यामुळेच वादसंवाद परंपरा हीच भारतीयत्वाची ओळख आहे, हे सेन साधार दाखवून देतात.

एकविसाव्या शतकातील भारतात १००० पुरुषांमागे ९३० स्त्रिया आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गर्भाचे लिंग जाणून घेतल्यावर मुलींचा नाश करण्याचे प्रमाण वाढत आहे. १९८६ साली जगभरातील १० कोटी बालिकांना ‘गायब’ करण्यात आले, या वास्तवाने सेन दुखी होतात. पंजाब, हरयाणा, गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये त्यात आघाडीवर आहेत. त्यामानाने पूर्व व दक्षिणेकडील राज्यात परिस्थिती बरी आहे. हा लिंगभेद समाजस्वास्थ्य बिघडवून टाकणारा आहे. मातांचे मोठय़ा प्रमाणावर कुपोषण होते. त्यामुळे कमी वजन व आजार घेऊनच बालकांचा जन्म होतो. पुढे बालपणातील कुपोषणामुळे अनेक व्याधी जडतात. यापासून सुटका झाली असेल तर शिक्षण, नोकरी, व्यवसाय, संशोधन, राजकारण सर्वच क्षेत्रात स्त्रियांना मिळणाऱ्या सुविधांपासूनच विषमता चालू होते. गुणवत्ता असूनही महिलांना संधी नाकारण्याची मानसिकता आजही तेवढीच आक्रमक आहे. त्यामध्ये गरीब व श्रीमंत असा वर्गभेद करता येत नाही. अमेरिकेत दरवर्षी १५ लाख महिलांवर बलात्कार होतात, याकडेही सेन लक्ष वेधतात. आपल्या संस्कृतीची वैशिष्टय़े कोणती? इतिहास कसा वाचावा? याचा वस्तुपाठ प्रस्तुत ग्रंथ देतो. भूतकाळाचे भान व वर्तमानासाठी कृती आराखडा सेन सादर करतात. शारदा साठे यांच्यामुळे अमर्त्य सेन यांचा हा विचारप्रवर्तक ग्रंथ मराठीतून उपलब्ध झाला आहे. तो न वाचण्याचा गुन्हा मराठी वाचकांनी करू नये.

ऑग्र्युमेंटेटिव्ह इंडियन
लेखकअमर्त्य सेन, अनुवाद– ‘वादसंवादप्रिय भारतीय’ –शारदा साठे, पृष्ठे४१४. किंमत ३२५/-, प्रकाशकपेंग्विन प्रकाशन,

अच्युत गोडबोले, सौजन्य – लोकसत्ता

साऱ्या जगाला भेडसावणारा फायनान्शियल क्रायसिस मुळात सुरू झाला तो अमेरिकेपासून, खरं तर वॉल्स स्ट्रीटवरच्या लोभी, हावरट आणि सट्टेबाजांनी लादलेल्या सबप्राइम क्रायसिसपासून. नुकत्याच संपलेल्या जी-२० परिषदेत त्याचे पडसाद उमटलेच. ओबामांनी या क्रायसिसची नैतिक जबाबदारी स्वीकारलीच, पण हा क्रायसिस एकटय़ा अमेरिकेकडून सोडवला जाईल अशा भ्रमात जगानं राहू नये, त्यासाठी सर्वाचे मिळून एकत्रित आणि एकदिशा प्रयत्न उभे करावे लागतील असा ठोस आग्रहही त्यांनी या परिषदेत मांडला, त्या निमित्ताने..

==================================================================================
आताच्या आर्थिक अरिष्टाविषयीच्या जवळपास सगळ्याच चर्चामध्ये ‘सबप्राइम क्रायसिस’चाच प्रामुख्यानं उल्लेख होतो. एवढंच नव्हे तर सबप्राइम क्रायसिसमुळेच हे आर्थिक अरिष्ट ओढवलं, नाहीतर आर्थिक विकास हा असाच झपाटय़ानं होत राहिला असता, असं काही लोकं आपल्याला सांगत असतात. थोडक्यात अमेरिकेतल्या ‘वॉल्स स्ट्रीट’वरच्या काही लोकांचा हावरटपणा, सट्टेबाजी आणि लोभी वृत्ती हीच या अरिष्टाला कारणीभूत आहे. हे वाईट घटक अर्थव्यवस्थेतून जर काढून टाकता आले आणि सट्टेबाजीवर नियंत्रण आणलं तर अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालेल’, असंही आपल्याला वारंवार सांगण्यात येतं- अगदी जोसेफ स्टिगलिट्झसकट सगळ्यांकडून!

पण यामध्ये एक गोष्ट विसरली जाते की अशा तऱ्हेची सट्टेबाजी किंवा आर्थिक बुडबुडे हे म्हणजे आत्ताच्या मुक्त बाजारपेठेवर आधारलेल्या अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक आहेत. ते त्यापासून वेगळे करता येत नाहीत. उलट अशा बुडबुडय़ांमुळेच खऱ्या अर्थव्यवस्थेला आतापर्यंत चालना मिळत आलीय. याचं कारण जसजशा अॅसेटस्च्या (उदा. घरं, शेअर्स, सोनं..) किमती खूप वेगानं मोठय़ा प्रमाणात वाढत जातात तसतसं ज्यांच्याकडे असे अॅसेटस् आहेत अशा मध्यम आणि उच्चमध्यमवर्गीय लोकांना ‘आपल्याकडली संपत्ती अतोनात वेगानं वाढतीय, आपण आता श्रीमंत झालो आहोत; आता आपल्याला खर्च करायला काय हरकत आहे?’ असं साहजिकच वाटायला लागतं. आणि मग ही मंडळी खऱ्या अर्थव्यवस्थेत जाऊन टीव्ही, फ्रीज, कॉम्प्युटर, एअरकंडिशनर, मोटरगाडी अशा अनेक गोष्टी विकत घेतात, मॉल्समध्ये जाऊन ब्रँडेड शर्ट आणि शूज वगैरे वस्तू खरेदी करतात, हॉटेल्समध्ये जाऊन राहतात, परदेशप्रवास करतात आणि ब्युटीपार्लर्स आणि सौंदर्यप्रसाधनांवर पैसे उडवतात. (यालाच सर्वसाधारणपणे प्रस्थापित माध्यमं आणि अर्थतज्ज्ञ ‘प्रगती’ असं म्हणतात!) पण या सगळ्यांमुळे या सर्व (चैनीच्या) वस्तूंची खऱ्या अर्थव्यवस्थेत मागणी वाढते. याबरोबरच मग उद्योजक त्या वस्तू तयार करण्याकरता गुंतवणूक करून नवीन कारखाने काढतात. हे उद्योग निघाल्यावर अनेकांना (बहुतांशी सुशिक्षित आणि मध्यमवर्गीयांना) नोकऱ्या मिळतात. त्यामुळे त्यांचं उत्पन्न वाढतं आणि ते पुन्हा खऱ्या अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू खरेदी करायला लागतात. अशा तऱ्हेनं बुडबुडय़ांमुळे खऱ्या अर्थव्यवस्थेत मागणी व त्यामुळे गुंतवणूक व त्यामुळे रोजगार आणि उत्पादन वाढून तेजी येते. थोडक्यात ही अर्थव्यवस्थेतली प्रगती ‘नॉर्मल’ नसते. ती बुडबुडय़ांमुळेच मुख्यत्वेकरून निर्माण होते. त्यामुळेच ती निरोगी आणि टिकाऊ नसते. म्हणजेच प्रथम १९९० च्या दशकात इंटरनेटचा आणि नंतर २००० च्या दशकात हाऊसिंगचा असे बुडबुडे निर्माण झाले नसते, तर खऱ्या अर्थव्यवस्थेतही मंदी अनेक वर्षांपूर्वीच बघायला मिळाली असती आणि आज जसे दिसताहेत तसे बेकारांचे तांडे अनेक वर्षांपासून रस्तोरस्ती फिरायला लागलेले दिसले असते, असं बऱ्याच अर्थतज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळेच हे बुडबुडे म्हणजे या अर्थव्यवस्थेचाच एक अविभाज्य भाग आहे. ती त्यातली विकृती नाही किंवा त्यातला तो अपवाद (अॅबरेशन) नाही. सध्याची निओलिबरल मुक्त अर्थव्यवस्था सट्टेबाजीवरच अवलंबून आहे. ही सट्टेबाजी थांबवली तर खरी अर्थव्यवस्थाही मंदावेल. म्हणूनच सट्टेबाजीवर नियंत्रण ठेवणं हे सत्ताधाऱ्यांना एवढं कठीण जातंय. कारण तसं केलं तर पुन: मंदीला आमंत्रणच दिल्यासारखं आहे. म्हणजे आपण आर्थिक बुडबुडय़ांना अपवाद मानून उगाचच दोष देता कामा नये. दोष द्यायचाच असेल तर तो सध्याच्या अनियंत्रित, अर्निबध मुक्त बाजारपेठेवर चालणाऱ्या निओलिबरल अर्थव्यवस्थेलाच दिला पाहिजे.
आर्थिक बुडबुडय़ांमुळे निर्माण होणारी आर्थिक वाढ निरोगी, टिकाऊ, भक्कम नसते. एकतर यामध्ये उच्चवर्गाला उपयोगी अशाच चैनीच्या वस्तूंचं जास्त प्रमाणात उत्पादन होतं व दुसरं कारण म्हणजे जागतिकीकरणात स्पर्धेमुळे जास्तीतजास्त यांत्रिकीकरण करण्याच्या नादामध्ये शिकलेल्या, कुशल अशा कर्मचाऱ्यांनाच जास्त पगाराच्या नोकऱ्या मिळतात. त्यामुळे अर्थव्यवस्थेत पैसा खेळतो, जीडीपी वाढतो, पण सर्वसामान्यांचा रोजगार मात्र फारसा वाढत नाही. उलट गरीब-श्रीमंत दरी मात्र प्रचंड वाढते. केन्सला स्वत:ला या आर्थिक बुडबुडय़ांविषयी आणि त्यांच्यामुळे होणाऱ्या जीडीपी ग्रोथविषयी फारशी आस्था नव्हती. सट्टेबाजीच्या वित्तभांडवलाला तो ‘रेन्टियर’ म्हणत असे आणि त्याचं ‘मर्सी किलिंग’ केलं पाहिजे म्हणजे, त्याला नष्ट केलं पाहिजे, असं तो म्हणे. या वित्त भांडवलाच्या लहरीमुळे आर्थिक बुडबुडे निर्माण होऊन त्यामुळे खऱ्या अर्थव्यवस्थेतली वाढ होण्यापेक्षा राष्ट्रातील मागणी आणि गुंतवणूक हे योग्य ठेवण्याचं काम सरकारनं करून आर्थिक प्रगती साधावी, असं केन्स म्हणे. यालाच तो ‘सोशलायझेशन ऑफ इन्व्हेस्टमेंट’ म्हणे.

ही मंदी का येते याचं मात्र ठोस कारण अजून प्रस्थापित अर्थतज्ज्ञांना सापडलेलं नाही. त्याच्याविषयी अनेक थिअरीज आहेत. एक मात्र खरं की जर जनतेमध्ये प्रचंड विषमता असेल तर उत्पादन झालेल्या सगळ्या वस्तू खरेदी करण्याची क्षमता ही जनतेकडे नसते आणि त्यामुळे वस्तू बाजारात पडून राहायला लागतात. यामुळे आहे तोच माल खपत नाही. मग ‘नवीन उत्पादन कशाला करा?’ या विचारानं उद्योग वाढत नाहीत. आहेत ते कारखाने बंद पडतात. आणि त्यामुळे कर्मचारी बेकार होतात आणि जनतेची खरेदीक्षमता आणखीनच घटते. यामुळे आणखीनच कारखाने बंद पडतात. आणि हे चक्र चालूच राहतं. या तऱ्हेने जर राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपीच्या) वाढीचा दर हा जर घटला (जसा भारताचा १०% वरून ६.५% वर आलाय) तर त्याला ‘स्लो डाऊन’ म्हणतात. पण जर ओळीनं सहा महिने राष्ट्रीय उत्पादनच कमी होत गेलं (जीडीपी वाढीचा दर निगेटिव्ह होत गेला) तर त्याला मंदी किंवा ‘रिसेशन’ म्हणतात आणि ही मंदी खूपच खोलवर आणि जास्त काळ टिकणारी असेल तर त्याला महामंदी किंवा ‘डिप्रेशन’ असं म्हणतात. १९२९ ते १९३९ च्या दरम्यान ‘ग्रेट डिप्रेशन’ होऊन गेलं आणि त्यानंतर ८० वर्षांनी पुन्हा एकदा महामंदीची लक्षणं आज आपल्याला दिसताहेत!

मुक्त बाजारपेठेत एकतर मंदी येणंच शक्य नाही आणि आली तरी बाजारपेठेच्या नियमांप्रमाणे परिस्थिती आपोआपच सुधारेल असं अतिउजव्या मार्केट फंडामेंटलिस्ट माणसांचं म्हणणं केन्सच्याही काळात होतं. उदाहरणार्थ मंदीच्या वेळी माणसं खर्च करणार नाहीत आणि त्यामुळे बँकेत बचत करतील आणि नफ्याची खात्री नसल्यामुळे ते पैसा बँकांकडून उद्योजक गुंतवणूक करण्यासाठी कर्जाऊ घेणार नाहीत. त्यामुळे बँकेकडे पैसे पडून राहतील, आणि मागणी- पुरवठा या तत्त्वाप्रमाणे बँकेकडे पैशांचा पुरवठा जास्त झाल्याने पैशाचा दर (म्हणजेच व्याजदर) घटेल. एकदा तो घटला की आता बचत करून काय फायदा म्हणून ग्राहक जास्त पैसे खर्च करायला लागतील आणि मालाची मागणी वाढवतील. आणि मग ती वाढलेली मागणी पूर्ण करण्याकरता कमी व्याजानं कर्ज उपलब्ध असल्यामुळे आता उद्योजक गुंतवणूक करायला लागतील, त्यामुळे रोजगार आणि उत्पादन वाढून मंदी संपेल अशी ही थिअरी होती. पण तसं घडलं नाही. कारण केन्सच्या मते मंदी सौम्य असेल, तरच व्याजदर कमी करून ग्राहकांना खर्च करायला आणि उद्योजकांना गुंतवणूक करायला उद्युक्त करणं हे मॉनेटरी उपाय लागू पडणारे होते. जर मंदी तीव्र असेल आणि उद्योजकांना माल खपण्याची आणि म्हणून नफ्याची खात्रीच नसेल तर व्याजदर कितीही कमी केला तरी ते गुंतवणूक करून रिस्क कशाला घेतील? १९२९ च्या महामंदीत हेच घडलं आणि आताही तेच घडतंय. १९९० च्या दशकामध्ये जपानमध्ये व्याजदर शून्य करूनही गुंतवणूक आणि उद्योग वाढले नाहीत आणि सध्याच्या महामंदीतसुद्धा फक्त मॉनेटरी पद्धतीने (उदा. व्याजदर कमी करून) ते सुटतील असं वाटत नाही, पण तरीही हा खेळ चालू आहे.

आजच्या मंदीत निदान भारतीय प्रस्थापित अर्थतज्ज्ञांना असं वाटतंय की उद्योजक गुंतवणूक करायला तयार आहेत, पण त्यांना कर्ज द्यायलाच बँकांकडे पैसे नाहीत. यालाच ‘लिक्विडिटी क्रंच’ असं म्हणतात. हा अर्थव्यवस्थेत खेळणारा पैसा सी.आर.आर. (कॅश रिझव्र्ह रेश्यो)नं नियंत्रित केला जातो. बँकांकडल्या ठेवींपैकी काही पैसा रिझव्र्ह म्हणून त्यांना आर.बी.आय.कडे ठेवावा लागतो. या प्रमाणाला (उदा. १० टक्के) सी.आर.आर. म्हणतात. बँकेकडे समजा १०० रु. ठेव असेल आणि त्यातले १० रु. रिझव्र्ह ठेवले तर बँकेला ९० रु. कर्जाऊ देता येतात. आता हे ज्याला मिळतील तो जेव्हा त्याच्या बँकेत जमा करेल, तेव्हा त्या बँकेला त्यातले ९ रु. रिझव्र्ह ठेवून ८१ रु. कर्जाऊ देता येतात. अशा तऱ्हेनं १०० रु.च्या ठेवीमुळे १०० + ९० + ८१..= १००० रु. कर्जाऊ देता येतात म्हणजेच तेवढे पैसे अर्थव्यवस्थेत खेळायला लागतात. म्हणजे मूळ ठेवींच्या १० पट! हाच सी.आर.आर. २० टक्के असता तर ठेवींच्या ८० टक्केच कर्जाऊ देता आले असते आणि लिक्विडिटी १०० + ८० + ६४ + ..= ५०० रु.नंच वाढली असती. म्हणजे फक्त पाच पट, थोडक्यात जेवढा सी.आर.आर. कमी तेवढी लिक्विडिटी जास्त, म्हणजेच बँकेकडे कर्जाऊ देण्यासाठी पैसा जास्त. पण गोची ही की जर मंदी तीव्र असेल आणि मालाला मागणीच नसेल तर कर्ज कितीही उपलब्ध असलं आणि ते उद्योजकांनी घ्यावं म्हणून आकर्षक करण्यासाठी व्याजदरही कितीही कमी केला तरीही उद्योजक तो का घेतील? म्हणूनच केन्सच्या मते तीव्र मंदीमध्ये सी.आर.आर. आणि व्याजदर कमी करण्यासारखे मॉनेटरी उपाय कुचकामी ठरणार होते.

केन्सने महामंदीत सुचवलेला उपाय म्हणजे फिस्कल पॉलिसीचा. सरकारला करांमधनं उत्पन्न मिळत असतं आणि सरकार खर्चही करत असतं. सरकारी खर्च जर करांएवढाच असेल तर त्याला ‘बॅलन्स्ड बजेट’ असं म्हणतात, तो करांपेक्षा जास्त असेल तर त्याला ‘डेफिसिट बजेट’ असं म्हणतात, आणि तो करांपेक्षा कमी असेल तर त्याला ‘सरप्लस बजेट’ असं म्हणतात. मंदीतून बाहेर येण्याकरिता केन्सनं सुचवलेला उपाय हा सोपा होता. त्याच्या मते सरकारी खर्च हा मोठय़ा प्रमाणावर वाढवून त्यातून सर्वसामान्यांमध्ये भरमसाठ रोजगार निर्माण केला पाहिजे. खरं तर ‘फुल एम्प्लॉयमेंट’ हे त्याचं ध्येय होतं. यामध्ये ‘सर्वसामान्यांना रोजगार’ हे महत्त्वाचं आहे. हे केन्स समाजवादावरच्या विश्वासामुळे म्हणत नव्हता, तर त्याच्या अर्थशास्त्रावरच्या विश्वासामुळे म्हणत होता. त्याच्या मते गरीब लोकांमध्ये जेव्हा वाढीव उत्पन्न हाती येतं, तेव्हा ते बहुतांशी खर्च होतं (त्यांची ‘मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू कन्झ्यूम’ जास्त असते) पण तोच पैसा फक्त श्रीमंतांच्या हातात राहिला तर तो खर्च/ गुंतवणूक होण्याऐवजी त्याची बचतच जास्त होण्याची शक्यता असते. (त्यांची ‘मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू कन्झ्यूम’ कमी असते) यामुळे गरिबांमध्ये रोजगार निर्माण झाला, तरच तो पैसा खर्च होऊन बचत न होता अर्थव्यवस्थेत जाईल आणि मालाची मागणी वाढेल. अशा वेळेला जर व्याजदर कमी असतील तर उद्योजक पैसा कर्जाऊ घेऊन गुंतवणूक करतील आणि मंदीतून बाहेर येता येईल. हे होता होता अर्थातच अनेक रस्ते, शाळा, दवाखाने आपल्याला बांधता येतील आणि त्यातून सामाजिक प्रगतीसुद्धा बरीच होईल, असं केन्सचं म्हणणं होतं आणि हे करताना सरकारी खर्च करांपेक्षा बराच वाढला आणि ‘डेफिसिट बजेट’ करावं लागलं तरी हरकत नाही, असं केन्सनं मांडलं. कालांतरानं अर्थव्यवस्था ठाकठीक झाल्यावर जीडीपी आणि करांमार्गे होणारं सरकारी उत्पन्न वाढलं की मग हे डेफिसिट कमी करता येईल, असा हा प्लॅन होता. पण केन्स हा समाजवादी मुळीच नव्हता. सरकारी खर्चामुळे मागणी वाढून खाजगी गुंतवणूक वाढली आणि पुन्हा अर्थव्यवस्थेचं गाडं नीट चालायला लागलं की सरकारनं पुन्हा सगळं खासगी उद्योगावर सोपवावं असं तो म्हणे. यालाच तो ‘प्रायमिंग दी पंप’ म्हणे.

सरकारनं पैसे खर्च केले की ते कोणाला तरी मिळकत म्हणून मिळतात. त्यांच्या ‘मार्जिनल प्रॉपेन्सिटी टू कन्झ्यूम’प्रमाणे या मिळकतीपैकी पुन्हा ते लोक काही बचत करतात तर काही खर्च (ग्राहक खरेदीसाठी तर उद्योजक गुंतवणुकीसाठी) करतात. पुन्हा एकाचा खर्च हा दुसऱ्याची मिळकत असल्यामुळे काही लोकांची मिळकत त्यामुळे वाढते. त्यातला पुन्हा काही भाग खर्च होतो आणि तीच इतर काहींची मिळकत बनते. असं हे चक्र चालू राहून सुरुवातीला केलेल्या खर्चाच्या अनेक पट एकूण राष्ट्रीय मिळकतीत भर पडते. यालाच ‘मल्टिप्लायर इफेक्ट’ असं म्हणतात. अर्थात सरकारच्या ऐवजी खासगी उद्योजकांनी जरी गुंतवणूक केली तरी हा ‘मल्टिप्लायर इफेक्ट’ होतोच. फक्त फरक हा की महामंदीच्या वेळी खासगी उद्योजक ही गुंतवणूक करायला तयार होत नाहीत. म्हणून तर सरकारवर ही गुंतवणूक करायची पाळी येते!

इथे एक प्रश्न पडतो. तो म्हणजे कर कमी केले तर लोकांच्या हातात पैसा जास्त खेळणार नाही का? आणि मग तो ते खर्च करणार नाहीत का? (ग्राहक वस्तू खरेदीसाठी आणि उद्योजक गुंतवणुकीसाठी) आणि त्यामुळे आपण मंदीतून बाहेर येऊ शकणार नाही का? याचं उत्तर पुन्हा सरळ आहे. एक तर करांचे दर कमी केले तर पैसे श्रीमंतांचे जास्त वाचतात आणि जर मालाला मागणी कमी असेल तर ते गुंतवणूक कशाला करतील? ते बचतच करतील म्हणून पैसा हा गरिबांच्या हाती जास्त खेळला पाहिजे. यामुळे करांच्या स्लॅब्ज बदलून जर गरिबांवरचे कर कमी केले तर त्याचा फायदा नक्कीच होईल, पण वरच्या मिळकतीवरचे करांचे दर कमी करून महामंदीतून बाहेर येता येणार नाही.

पण एवढं असूनही याला केन्सच्या काळातही अति उजव्या मार्केट फंडामेंटलिस्ट लोकांनी विरोध केलाच. त्यांना कुठलाही सरकारी हस्तक्षेप मान्य नव्हता. मार्क्स तर सोडाच, पण केन्सच्याही विचारसरणीला ते डावे म्हणायला लागले. याचं कारण सरकार जे पैसे खर्च करतं ते सरकारने गोळा करण्याऐवजी आमच्या हातात ठेवले असते तर आम्हीच ते गुंतवले असते; थोडक्यात सरकारी गुंतवणुकीमुळे आमची गुंतवणूक हटवली जाते, असं खासगी उद्योगाचं आणि म्हणूनच अति उजव्या मार्केट फंडामेंटलिस्ट लोकांचं म्हणणं होतं. यालाच अर्थशास्त्रात ‘क्राऊडिंग आऊट’ म्हणतात. फिस्कल पॉलिसी वापरून ‘डेफिसिट बजेट’ करायला अतिउजव्यांचा विरोध असण्यासाठी इतरही कारणं होती. उदाहरणार्थ डेफिसिट बजेटमुळे महागाई वाढते, असं त्यांचं म्हणणं होतं आणि याचं कारण जेव्हा सरकारी खर्च होतो (उदा. रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य) तेव्हा त्याचा रोजगारावर आणि दीर्घकाळात राहणीमानात आणि लोककल्याणात फरक पडत असला तरी ताबडतोब बाजारात त्या प्रमाणात वस्तू येत नाहीत. त्यामुळे तेवढय़ाच वस्तूंमागे जास्त पैसा खरेदी करण्यासाठी फिरायला किंवा स्पर्धा करायला लागतो आणि त्यामुळे वस्तूंच्या किमती म्हणजेच महागाई वाढते. केन्सला बेकारी हा सगळ्यात मोठा शत्रू वाटे, तर उजव्या मॉनेटरिस्टांना महागाई हा सगळ्यात मोठा शत्रू वाटे. महागाई वाढली तर आपल्या चलनाची इफेक्टिव्ह किंमत कमी होईल. (तेवढय़ाच चलनात कमी वस्तू खरेदी करता येतील) आणि त्यामुळे आपल्या चलनाचा परकीय चलनाच्या तुलनेत दर घसरेल, शिवाय जर महागाई १० टक्क्यांनी वाढली, तर गिऱ्हाईकाला ठेवींवर व्याजाचा मिळणारा किंवा बँकेला उद्योजकांच्या कर्जावर मिळालेल्या व्याजाचा पैसा हा इफेक्टिव्हली तेवढाच राहिला पाहिजे, या कल्पनेनं व्याजदर वाढवावे लागतील आणि त्यामुळे गुंतवणूक घटून अर्थव्यवस्था थंडावेल, एकूणच अर्थव्यवस्था अस्थिर होईल असा तो युक्तिवाद होता.

या विरोधाला न जुमानता रुझवेल्टनं मोठय़ा प्रमाणावर सरकारी गुंतवणूक करायला सुरुवात केली. त्यामुळे बराच रोजगार वाढला. पण १९३७-३८ साली उजव्यांच्या दबावाखाली रुझवेल्टला डेफिसिट बजेटऐवजी बॅलन्स्ड बजेट स्वीकारावं लागलं. त्यामुळे पुन्हा सरकारी खर्च कमी झाला, रोजगार घटला आणि मंदीनं पुन्हा डोकं वर काढलं. यानंतर १९३९ साली युद्ध चालू झालं आणि मंदीतून युरोप आणि अमेरिकेला जर कोणी खरं वाचवलं असेल, तर ते युद्धानंच! युद्धावर होणाऱ्या खर्चामुळे सरकारी खर्च वाढून प्रचंड रोजगारनिर्मिती झाली होती. आणि केन्सच्याच तत्त्वाप्रमाणे पण अत्यंत वाईट मार्गाने ही मंदी शेवटी एकदाची संपली!

दुसऱ्या महायुद्धानंतर १९७२ पर्यंतचा काळ हा भांडवलशाहीतली सोनेरी र्वष म्हणून प्रसिद्ध आहे. या काळात कुठलंच मोठं अरिष्ट आलं नाही आणि कुठलाच मोठा बुडबुडाही तयार झाला नाही. १९७३ नंतर अमेरिकेमध्ये ‘फिक्स्ड एक्स्चेंज रेट’ जाऊन ‘फ्लोटिंग एक्स्चेंज रेट’ आला आणि परकीय चलनामध्ये सट्टेबाजी सुरू झाली. या काळामध्ये अमेरिका आणि युरोपमधल्या मॅन्युफॅक्चरिंगमधला नफ्याचा दर खूपच घटला. आता त्यामुळे पैसे कुठे गुंतवावेत हे उद्योजकांना कळेनासं झालं. त्यावेळी उद्योजकांना पैसा हा वस्तूंच्या उत्पादनात गुंतवण्याऐवजी शेअर मार्केट, म्युच्युअल फंड आणि परकीय चलन यांच्या सट्टेबाजींमध्ये गुंतवावासा वाटला. या भांडवलालाच ‘वित्तीय भांडवल’ (फायनान्स कॅपिटल) असं म्हणतात. यानंतर १९७९ साली व्होकर कमिटीनं वित्तीय भांडवलावरचे र्निबध काढून टाकले. मग तर वित्तीय भांडवलाचा सुळसुळाट वाढला आणि त्याचे अनेक प्रॉडक्टस आणि डेरिव्हेटिव्हज् तयार झाले. याच काळात जागतिकीकरण आणि इंटरनेट यांच्या वाढीमुळे हे वित्तीय भांडवल जगभर कुठेही अर्निबधपणे फिरू लागलं. मग पैसा अमेरिकेतल्या कुठल्या शेअर्समध्ये गुंतवायचा की कोरियातल्या कुठल्या कंपनीत की भारतातल्या इन्फोसिसमध्ये? याचा अभ्यास करून सल्ला देणारे सट्टेबाजीतले एक्स्पर्ट, एमबीए फायनान्स मंडळी गलेलठ्ठ पगारांवर हे सल्ले द्यायला लागली.

आता बँकांचंही स्वरूप बदललं. पूर्वी बँका ग्राहकांकडून ठराविक व्याजावर (उदाहरणार्थ ८%) ठेवी घेत आणि उद्योजकांना जास्त (उदाहरणार्थ १५%) व्याजावर कर्जाऊ देऊन त्यातल्या फरकावर उत्पन्न कमवत असत. पण आता बँकांना हा पारंपरिक जुनाट उद्योग कमी नफ्याचा वाटल्यामुळे त्यांनी ‘इन्व्हेस्टमेंट बँकस्’ काढल्या. यातूनच जे. पी. मॉर्गन, गोल्डमन सॅक्स, मॉर्गन स्टॅनली अशांसारख्या कंपन्या निघाल्या. मग सट्टेबाजींमध्ये पेंशन फंडज् आणि ए.आय.जी. सारख्या इन्श्युरन्स कंपन्यासुद्धा उतरल्या आणि या सगळ्यांनी वित्तीय भांडवलाचा एक प्रचंड मोठा डोलाराच उभा केला. एवढंच नव्हे तर या वित्तीय भांडवलाच्या सट्टेबाजीत वस्तूंच्या उत्पादनापेक्षा जास्त नफा असल्यामुळे मोठमोठय़ा पारंपरिक उत्पादक कंपन्याही त्यातच उतरल्या. जनरल इलेक्ट्रिक (जी.ई.) नं ‘जी.ई. कॅपिटल’ काढली. ती एवढी वाढली की त्यांच्या एकूण नफ्याच्या ४०% नफा जी.ई. कॅपिटलमधून त्यांना मिळे. भारतातही टाटा कॅपिटल, एल. अॅण्ड टी. फायनान्स वगैरे अनेक कंपन्या निघाल्या आणि एकूणच जगभर सट्टेबाजी चालू झाली. पण ही सट्टेबाजी किती दिवस टिकणारी होती? कारण या सट्टेबाजीच्या खाली खरी अर्थव्यवस्था (रिअल इकॉनॉमी) ही होतीच. आणि ती काही तेवढय़ा वेगानं वाढत नव्हती. थोडक्यात हा एक फुगा होता आणि तो केव्हा तरी फुटणारच होता.

१९९० च्या दशकात निर्माण झालेला इंटरनेटचा डॉट कॉम फुगा २००० सालानंतर फुटला. हा फुटल्यानंतर लोक खर्च करायचे थांबतील आणि खरी अर्थव्यवस्था मंदीत लोटली जाईल या भीतीनं अमेरिकन फेडनं व्याजदर प्रचंड कमी केले. याच काळात भारत आणि चीन देशांची निर्यात वाढल्यामुळे त्यांना त्यांच्या डॉलर्सचं काय करावं हे समजत नव्हतं. त्यांनी मग हे पैसे अमेरिकेला कर्जाऊ देऊन त्या मोबदल्यात फिक्स्ड डिपॉझिटस्ची सर्टिफिकेटस् घेतली. अमेरिकेच्या जागतिक अर्थव्यवस्थेवर असलेल्या वर्चस्वामुळे डॉलरचा भाव वाढतच चालला होता. यामुळे आपली डिपॉझिटस् सुरक्षित आहेत आणि त्यावर मिळणारं उत्पन्न हे या ठेवलेल्या ठेवींवरचं व्याज आणि डॉलरचा वाढलेला भाव या दोन्ही स्वरूपात मिळाल्यामुळे रिटर्न चांगला मिळेल या विचारांनी अमेरिकेमध्ये परदेशातून डॉलर्स येतच राहिले आणि अमेरिकेवरचं कर्ज वाढतच राहिलं. आता या आलेल्या पैशाचं करायचं काय म्हणून अत्यंत कमी व्याजदरानं लोकांना घरासाठी कर्ज देणं हे त्यांची कर्ज फिटवण्याची पात्रता न बघता सुरू झालं. यातून हौसिंगचा बुडबुडा निर्माण झाला. या घरकर्जावर सिक्युरिटायझेशन सारख्या प्रक्रियेनं अनेक कर्जाची गुंतागुंतीची भेंडोळी तयार झाली. यात जगातल्या अनेक कंपन्यांनी पैसे गुंतवले. हे चालू असताना पुन्हा आपण श्रीमंत आहोत या कल्पनेनं लोकांनी रिअल इकॉनॉमीमधल्या वस्तू (टीव्ही, फ्रीज, गाडय़ा..) खरेदी करायला सुरुवात केली आणि त्यामुळे खऱ्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळाली.

२००७-०८ मध्ये हा हौसिंग बबल फुटला आणि अमेरिका व युरोपमधल्या सट्टेबाजीमध्ये गुंतलेल्या डझनावारी कंपन्या कोसळल्या. फॉरेन एक्स्चेंज व्यवहारात दोन प्रकार असतात. एक ‘करंट अकौंट कन्व्हर्टिबिलिटी’ (उदा. आपण जेव्हा परदेशी जाताना रुपयाचे डॉलर्स करून जातो, तो व्यवहार) आणि दुसरा म्हणजे ‘कॅपिटल अकौंट कन्व्हर्टिबिलिटी’ (ज्यामुळे एका देशातला माणूस हा दुसऱ्या देशात शेअर्स किंवा जमीन किंवा कंपन्या यांच्यात गुंतवणूक करू शकतो किंवा त्या विकत घेऊ शकतो). भारतामध्ये करंट अकौंट कन्व्हर्टिबिलिटी बरीच शिथिल केली असली तरी कॅपिटल अकौंट कन्व्हर्टिबिलिटी ही पूर्णपणे नसल्यामुळे भारतीय कंपन्या या हौसिंग बबलमध्ये फारशा गुंतवणूक करू शकल्या नाहीत आणि म्हणूनच त्या आणि त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था या दोन्ही वाचल्या. त्यांच्या इतर काही बाबी पटल्या नाहीत तरी याचं खरं श्रेय डाव्या पक्षांना दिलं पाहिजे. प्रस्थापित माध्यमं आणि नि:पक्षपातीपणाचा बुरखा घेतलेली बरीच वर्तमानपत्रं याचा उल्लेख आवर्जून टाळतात ही लाजिरवाणी गोष्ट आहे. कारण जेव्हा सरकार ‘फुल कॅपिटल अकौंट कन्व्हर्टिबिलिटी’चा विचार करत होतं तेव्हा त्याला विरोध हा डाव्या पक्षांनीच केला होता आणि अतिउजव्यांनी ‘डावे पक्ष प्रगतीच्या कसे आड येत आहेत’ अशी टीका केली होती. ती मात्र सगळीकडे भडकपणे दाखविण्यात आली होती!

आता माझ्या मते जागतिक अर्थव्यवस्थेपुढे तीनच उपाय आहेत. एक म्हणजे एका नव्या बुडबुडय़ाची वाट बघणं (नॅनो टेक्नॉलॉजी? बायोटेक्नॉलॉजी?..) दुसरा म्हणजे कुठेतरी मोठं युद्ध सुरू करणं. हे दोन्ही उपाय खात्रीचे तर नाहीतच पण महाभयंकर आहेत! पण तिसराही एक मार्ग आहे तो म्हणजे केन्सच्या तत्त्वाप्रमाणे भरमसाट सरकारी खर्च करून सर्वाना जास्तीत जास्त रोजगार पुरवणं. यासाठी क्रुगमनसारख्या अनेकांच्या अंदाजाप्रमाणे फक्त अमेरिकेत तीन लाख कोटी डॉलर्स गुंतवण्याची गरज आहे, पण ओबामांनी फक्त ७७,५०० कोटी डॉलर्सएवढेच खर्च करायचं योजलं आहे. म्हणजे प्रत्यक्ष गरज आहे त्याच्या जवळपास एकचतुर्थाश. आणि तरीही निओलिबरल अतिउजव्यांकडून (सगळे रिपब्लिकन आणि काही डेमोक्रॅटस् यांच्याकडून) या लहान रकमेलासुद्धा ‘हा तर समाजवाद आहे’ अशासारख्या हास्यास्पद कारणांनी प्रचंड विरोध झाला. पुन्हा फक्त सी.आर.आर. आणि व्याजदर कमी करून आपण बाजारपेठेवर भरवसा ठेवून ठप्प बसावं असा विचार कित्येकांनी मांडायला सुरुवात केली. जर ही सरकारी गुंतवणूक मोठय़ा प्रमाणावर झाली नाही तर ही महामंदी आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे! अर्थात डब्ल्यू.टी.ओ.च्या नियमांप्रमाणे अनेक राष्ट्रांवर डेफिसिट एका मर्यादेपेक्षा (उदा. जी.डी.पी.च्या तीन टक्क्यांपेक्षा) जास्त वाढवता कामा नये ही बंधनं आहेत आणि हे डेफिसिट जर का वाढवलं तर परकीय सट्टेबाजीचं भांडवल (एफ.आय.आय.) आपल्या शेअर मार्केटमध्ये येऊन आपल्या शेअर्सची किंमत उंच ठेवणार नाही आणि या देशातून पलायन करेल म्हणून त्यांना खूश ठेवण्यासाठी जगभरातली बरीच सरकारं आपणहूनच डेफिसिट फार वाढवू देत नाहीत. भारतही त्याला अपवाद नाही. त्यामुळे त्यांना फक्त व्याजदर, सी.आर.आर. अशा मॉनेटरी उपायांवरच समाधान मानावं लागतं, पण मंदी तीव्र असेल तर हे उपाय फारसे उपयोगी पडत नाहीत हे आपण बघितलंच आहे.

यातले बुडबुडय़ाची वाट बघणं किंवा नवीन युद्ध करणं हे उपाय पोरकट तरी आहेत किंवा अमानुष तरी. अमेरिकेवर आजच १० लाख कोटी डॉलर्सचं कर्ज आहे आणि ते दिवसेंदिवस वाढतंच आहे. कारण नसताना केलेल्या इराक युद्धामुळेच ते कर्ज तीन लाख कोटी डॉलर्सनं वाढलं आणि त्यात लाखो लोकांचे जीव गेले आणि कोटय़वधी बेघर झाले. यामुळे मंदीतून बाहेर येण्यासाठी युद्ध करण्याऐवजी तोच पैसा कल्याणकारी शिक्षण, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर अशा रोजगार निर्माण करणाऱ्या गोष्टींवर खर्च केला तरच त्यातून चांगल्या तऱ्हेनं मंदीतून बाहेर येता येईल. अर्थातच त्याला अतिउजव्यांचा विरोध होतोच आहे आणि होतच राहील. ओबामांनी उचललेलं पहिलं पाऊल पुरेसं नसलं तरी ते योग्यच दिशेनं आहे. म्हणून आपण त्याचं स्वागत करायला हवं. भारतातही नुसतेच सी.आर.आर. आणि व्याजदर यांचे मॉनेटरी खेळ खेळण्यापेक्षा/ बरोबरच मोठय़ा प्रमाणावर सरकारी गुंतवणूक वेगवेगळ्या क्षेत्रात (विशेषत: शिक्षण, आरोग्य, वीज, पाणी..) झाली पाहिजे आणि ती होण्यासाठी सरकारवर आपण दबाव आणला पाहिजे तरच आपण स्लो डाऊनमधून सुखरूपपणे यातून बाहेर पडू.


पी साईनाथ, सौजन्य – इ सकाळ,

शब्दांकन – विश्वास पाटील

“सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचा २९ वा वर्धापनदिन सोहळा एक ऑगस्ट रोजी साजरा झाला. मॅगसेसे पुरस्कारविजेते ज्येष्ठ पत्रकार व “द हिंदू’चे संपादक (ग्रामीण विकास) पी. साईनाथ सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते. “भारतीय राजकारण आणि ग्रामीण विकास’ या विषयावरील त्यांच्या व्याख्यानाचा संपादित भाग.

===================================================================
राजकारण आणि ग्रामीण विकास हा व्याख्यानाचा विषय आहे. आज ऑगस्टची एक तारीख आहे. परंतु माझ्या दृष्टीने जुलै महिना अधिक महत्त्वाचा आणि चर्चेचा होता. कारण या महिन्यात देशात दोन परस्परविरोधी गोष्टी घडल्या. एक होती, जगातील सर्वांत स्वस्त मोटारगाडी “नॅनो’ रस्त्यावर आली आणि त्याच वेळी भारताच्या इतिहासात प्रथमच तूरडाळीचे भाव गगनाला भिडले.
खाद्यान्नाच्या किमती आणि अन्नधान्याचे संकट आज अचानक उद्‌भवलेले नाही. त्यास २००४ पासूनची किमतीतील चढ-उतार कारणीभूत आहे. हा दर आज कुठपर्यंत पोचला आहे बघा. २००४ पासून ०८ पर्यंतचे सरकारी माहितीचे आकडे पाहा. २००८ पर्यंत तांदळाचा भाव ४५ टक्के वाढला. गहू ६२ आणि मीठ ६० टक्के वाढला. खाद्यान्नांच्या दरातील सरासरी वाढ ५२ टक्के झाली आहे. २००८ ते ०९ मार्चपर्यंत ८ ते ९ टक्के दर आणखी वाढले. त्यानंतर दरवाढ दोन महिने थांबली. कारण तोंडावर निवडणुका होत्या ना!

हेतू प्रामाणिक असल्यास मार्ग निघेल
निवडणुकीनंतर पुन्हा दरवाढ झाली. परंतु हेच थोडे मागे जाऊन पाहा. २००४ ला जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या, तेव्हा तूरडाळ ३४ रुपये किलो होती. २००८ मध्ये हाच दर ५४ रुपयांवर गेला. आज हाच दर मुंबईत ९४ रुपये, तर बंगळूरमध्ये १०४ रुपये किलो आहे. सामान्य लोकांनी जगायचे कसे? असंघटित क्षेत्रांसाठीच्या राष्ट्रीय आयोगाचे संकेतस्थळ तुम्ही पाहू शकता. प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अर्जुनसिंग गुप्ता या आयोगाचे अध्यक्ष आहेत. आयोगाच्या संकेतस्थळावर पहिल्याच पानावर असे लिहिले आहे की, ८३ कोटींहून अधिक (८३.६ कोटी) भारतीय जनतेचे रोजचे उत्पन्न २० रुपयांपेक्षा कमी आहे. त्याच देशात तूरडाळीचा दर १०४ रुपये आहे. राजकारण व ग्रामीण विकास या विषयाबद्दल आपल्याला विचारमंथन करायचे असेल तर दोन महत्त्वाच्या बाबी मी आपल्यासमोर ठेवू इच्छितो. हवे तर त्यास दोन तत्त्वे म्हणता येतील. त्यातील एक हे आहे की, देशाच्या या स्थितीला स्वीकारण्यासाठी तुम्ही अत्यंत प्रामाणिक असायला हवे आणि तितक्‍याच प्रामाणिकपणे हे पाहिले पाहिजे, की कोणती धोरणे चुकीची ठरली आहेत. ही चुकीची धोरणे बदलण्यासाठी आपण काय करू शकतो, कोणत्या प्रकारची धोरणे आपल्याला आवश्‍यक आहेत, कोणत्या प्रकारची आर्थिक धोरणे देशाला स्वीकारावी लागतील, याचा विचार करायला हवा. दोन्ही पातळीवर हेतू प्रामाणिक ठेवून आपण विचार केल्यास मार्ग निघू शकेल.

महाराष्ट्रातील स्थितीवर चर्चा नाही
महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलेला आर्थिक पाहणी अहवाल पाहा. हा राज्य सरकारचा दस्तऐवज आहे. प्रत्येक वर्षी राज्य सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा अहवाल विधिमंडळासमोर ठेवते; परंतु जे मुद्दे या अहवालात मांडले आहेत, त्यातील एक ओळही लोकांमध्ये चर्चेला आलेली नाही. प्रसिद्धिमाध्यमेही त्याबद्दल काही लिहायला तयार नाहीत.
या आर्थिक पाहणी अहवालात जे लिहिले आहे, ते या राज्याचा जबाबदार नागरिक म्हणून आपण कृपया वाचले पाहिजे. महाराष्ट्राची स्थिती इतकी वाईट असूनही वाईट या गोष्टीचे वाटते की त्याबद्दल सार्वजनिक जीवनात कुठलीच चर्चा होत नाही. हा अहवाल काय सांगतो? या अहवालाचे पान क्रमांक ११ वर पाहा. जागतिक मंदीपूर्वी जी स्थिती होती, तीबाबतचा उल्लेख त्यात आहे. जगामध्ये गेल्या सप्टेंबरमध्ये आर्थिक संकट सुरू झाले. अमेरिकेत “वॉल स्ट्रीट’ कोसळला. आता जी मी आकडेवारी सांगत आहे ती आर्थिक संकट येण्यापूर्वीची आहे हे ध्यानात घ्या. या अहवालामध्ये लिहिले आहे, की गेल्या तीन वर्षांत (२००५ ते ०८ पर्यंत) म्हणजेच छत्तीस महिन्यांत महाराष्ट्रातील २० लाख नोकऱ्या गेल्या. रोजगारनिर्मितीचा दर चार कोटी ३० लाखांवरून चार कोटी दहा लाखांवर घसरला आहे. याचाच अर्थ २० लाख नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागले आहे. एका नोकरदारावर किमान पाच जणांचे कुटुंब अवलंबून असते, असे गृहीत धरले तरी महाराष्ट्रातील एक कोटी मराठी जनतेला याचा तडाखा बसला आहे; परंतु त्याबद्दल कुठेच चर्चा व्हायला तयार नाही.

विषमतेची प्रचंड मोठी दरी
महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात गेल्या पंधरा वर्षांत मोठ्या प्रमाणावर आर्थिक विषमता पसरत असल्याचा अनुभव आहे. मी त्यासंबंधीची काही आकडेवारी आपल्याला देत आहे. भारतात २००७ ला करोडपतींची गणती करण्यात आली. करोडपती सोडून द्या; कारण प्रत्येक शहरात आता करोडपती अनेक आहेत. त्यामुळे आपण अब्जाधीशांच्या गणतीकडे जाऊ आणि तेदेखील रुपयांतील अब्जाधीश नव्हे; तर डॉलरमधील. भारतात २००७ मध्ये असे ५३ अब्जाधीश होते. त्यातील तब्बल २३ जणांचे पत्ते मुंबईतील आहेत. ५३ मधील २३ मुंबईतील आहेत. आणखी आठ ते दहा मुंबईतीलच आहेत; परंतु ते राहतात बाहेर. काही स्वित्झर्लंडमध्ये, काही पॅरिसमध्ये, तर काही अन्य कोणत्या तरी देशात राहतात इतकेच. मुंबईत इतके अब्जाधीश, डॉलरपती राहतात हे वाचून खूप बरे वाटते; कारण मीदेखील मुंबईकर आहे. परंतु बृहन्मुंबई महापालिकेने अलीकडेच एक सर्वेक्षण केले आहे. ते कुठेही प्रसिद्ध होऊ दिलेले नाही. त्यामध्ये म्हटले आहे, की मुंबईतील एकतृतीयांश म्हणजेच ६० लाख लोक दारिद्य्ररेषेखालील आहेत. त्यांचा दैनंदिन खर्च १९ रुपयांपेक्षा कमी आहे. ६० लाख लोक जे एकोणीस रुपयांपेक्षा कमी खर्च करतात, त्याच शहरात २३ अब्जाधीश (डॉलरपती) आहेत. अशी विषमतेची प्रचंड मोठी दरी असलेला समाज आपण फार काळ एकत्र बांधून ठेवू शकत नाही. हा माझा पहिला मुद्दा आहे. गरीब-श्रीमंतामध्ये केवढी मोठी दरी आहे. हे समाजाच्या चांगल्या आरोग्याचे लक्षण खचितच नव्हे. जो महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्याच महाराष्ट्राचा दारिद्य्ररेषेखालील लोकसंख्येच्या बाबतीत मात्र खालून तिसरा क्रमांक. आपल्यानंतर आहे उत्तर प्रदेश आणि बिहार. बाकी सर्व राज्ये आपल्या पुढे आहेत. महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या एकतृतीयांश लोक आजही दारिद्य्ररेषेखाली राहतात. इतकी वाईट स्थिती असल्याबद्दल महाराष्ट्राला माफ करता येणार नाही.

आपण आता केंद्रीय अर्थसंकल्पावर दृष्टिक्षेप टाकू. अर्थमंत्री प्रणव मुखर्जीनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात कुणाला काय मिळाले याचा ताळेबंद पाहू लागल्यास काही गोष्टी नजरेत येतात. गेल्या वर्षी केंद्र सरकारने करोडो शेतकऱ्यांना ६० हजार कोटींची कर्जमाफी दिली. त्या वेळी देशभरातून टीका झाली. मोठमोठ्या संपादकांनी या निर्णयावर टीकेची झोड उठवली. केंद्र सरकार शेतकऱ्यांवर पैशांची उधळपट्टी करत असल्याची ओरड झाली. करोडो शेतकऱ्यांना ६० हजार कोटी, तर प्रत्येकी एका शेतकऱ्याला किती रक्कम मिळाली असेल, याचा अंदाज तुम्हीच बांधू शकता. या अर्थसंकल्पात व प्रत्येक अर्थसंकल्पात एक वेगळे पान असते. त्यामध्ये महसुली तूट (रेव्हेन्यूज फॉर गॉन) दाखविलेली असते. ती करसवलतीची असते. ही करसवलत कार्पोरेट सेक्‍टरसाठी व बड्या उद्योजकांसाठी दिली जाते. मोजक्‍या दोनशे ते तीनशे कंपन्यांसाठी ही सवलत दिली जाते. करोडो शेतकऱ्यांना ६० हजार कोटी आणि दोनशे-तीनशे कंपन्यांना ६८ हजार ९१४ कोटी. याला कोणी विरोध केला? महाराष्ट्र हे सर्वांत श्रीमंत राज्य. अनेक अंगांनी महाराष्ट्र भारतात श्रीमंत मानला जातो. येथेदेखील एकतृतीयांश लोक दारिद्य्ररेषेखाली राहतात. त्याबद्दल तुमच्या-माझ्या मनात कधी तरी संवदेना जाग्या होणार आहेत का, आपण वैश्‍विकीकरणानंतर खूप प्रगती केल्याचे सांगतो, मानतो. मला लाभ झाला, तुम्हालाही लाभ झाला असेल; परंतु खालच्या स्तरातील ५० टक्के गोरगरीब जनतेला काय मिळाले ?
साईनाथ यांनी शेतीचे प्रश्‍न, ग्रामीण विकास, केंद्र आणि महाराष्ट्र सरकारची धोरणे यावर अभ्यासपूर्ण प्रकाश टाकला. आकड्यांच्या आधारे त्यांनी मांडलेले चित्र विदारक होते. त्यांनी सोडवणुकीचे मार्गही सुचविले.

उपाययोजना….
शेतीचे प्रश्‍न, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, वाढती आर्थिक असमानता हे प्रश्‍न मांडल्यानंतर ते सोडविण्याचे उपाय काय, असा प्रश्‍न साहजिकच उपस्थित होतो. त्याचा विचार करताना मला जे उपाय सुचतात ते असे –
१) शेती हे असे क्षेत्र आहे, की जो त्यामध्ये काम करतो तो तोट्यात असतो. सरासरी उत्पन्न शेतीत सर्वांत कमी आहे. म्हणून मला असे वाटते, की शिक्षण आणि आरोग्यसेवेप्रमाणेच शेतीलाही सार्वजनिक सेवा क्षेत्राचा दर्जा द्या. आरोग्य व शिक्षण क्षेत्राला केंद्र व राज्य सरकार जसे आर्थिक पाठबळ देते तसेच पाठबळ शेतीलाही मिळायला हवे.
२) संसदेचे वर्षातून एक अधिवेशन फक्त शेतीच्या प्रश्‍नांवर चर्चा करण्यासाठी घ्यायला. प्रत्येक अधिवेशनात तुम्ही बहिष्कार टाकून, सभात्याग करून आणि वाद घालून किमान २० दिवस वाया घालवत असता. मग त्यातील शेतीच्या प्रश्‍नांसाठी चर्चा करण्यासाठी दहा दिवस उपयोगात आणले तर बिघडले कुठे? एक लाख २२ हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केल्या आहेत. संसदेने त्यावर चर्चा केलीच पाहिजे. नुसत्या आत्महत्याच नव्हे तर देशातील शेतीवर जे संक आले आहे, त्याचा विचार केला पाहिजे. शेतकऱ्यांच्या प्रत्येक प्रश्‍नाची चर्चा तिथे झाली पाहिजे.
३) शेती क्षेत्रात सरकारची गुंतवणूक वाढली पाहिजे. ही गुंतवणूक दोन किंवा पाच टक्के वाढवून भागणार नाही. ती भरघोस हवी. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना (१९९०) त्या वर्षी एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या १४.६ टक्के गुंतवणूक शेतीमध्ये गुंतवण्यात आली होती. आज हीच गुंतवणूक सहा टक्‍क्‍यांपेक्षाही कमी आहे. याचाच अर्थ ग्रामीण भारतातील गुंतवणूक दर वर्षी ३० हजार कोटी रुपयांनी कमी होत चालली आहे. मग संकटे का येणार नाहीत? मला आश्‍चर्य याचेच वाटते, की हे संकट बळावलेले नाही.
४) शेतकऱ्यांनीही गांभीर्याने विचार करायला हवा व बदल स्वीकारायला हवेत. महाराष्ट्राच्या पीकपद्धतीमध्ये तातडीने बदल होण्याची गरज आहे. आता ज्या पद्धतीने शेती सुरू आहे, ती यापुढे चालणार नाही. रासायनिक खतांचा बेसुमार वापर झाला आहे. त्यामुळे जमीन मरून गेली आहे. त्याबाबत शेतकऱ्यांनी फेरविचार करायलाच हवा.
५) पाण्याचे खासगीकरण कोणत्याही स्थितीत होऊ देता कामा नये. पाणी ही सार्वजनिक संपत्ती आहे, तिच्यावरील मालकी ही सार्वजनिकच राहायला हवी.
६) या सगळ्या संकटांवर मात करण्यासाठी राज्य घटनेतच खूप काही उपाययोजना आहेत. राज्य घटनेत मूलभूत अधिकाराच्या नंतर घटक राज्यांसाठी मार्गदर्शक तत्वे आहेत. मोफत आणि सक्तीचे प्राथमिक शिक्षण, निवारा, पोषणमूल्ये असलेला आहार ही राज्यांची जबाबदारी असेल. या गोष्टी मिळवण्यासाठीच आपण सर्वांनी स्वातंत्र्याची लढाई लढलो. त्यापासून आपण कशी फारकत घेऊ शकतो?
७) पीकपद्धतीतील बदलाबरोबरच सध्या सुरू असलेला पाण्याचा बेसुमार वापर थांबवायलाच हवा. पिकांच्या विविध जाती याबाबतही विचार केला पाहिजे. यामध्ये केंद्र सरकार बरेच काही करू शकते. राष्ट्रीय कृषी विकास आयोगाचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ एम. एस. स्वामिनाथन यांनी चार खंडांमध्ये केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला आहे. त्याच्या शिफारशी लागू कराव्यात. परंतु सरकारने अद्याप त्याला हातदेखील लावलेला नाही. परंतु सरतेशेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते, धोरणामध्ये, तंत्रज्ञानामध्ये कितीही बदल झाले तरी तुमच्या मनामध्ये आस नसेल तोपर्यंत बदल अशक्‍य आहे.

सारंग दर्शने, सौजन्य – म टा

हिंदुस्थानच्या भूमीवर पाऊल टाकल्यापासूनच ब्रिटिशांनी ‘ फोडा आणि राज्य करा ‘ असे ब्रीद चालवले. इथल्या संस्थानिकांना परस्परांच्या विरोधात लढण्यासाठी ‘ तैनाती फौजा ‘ पुरवण्याचा धंदा हा त्याचाच भाग नव्हता का ?

आज ‘ अखंड भारत ‘ असता तर त्याची लोकसंख्या असती किमान १४५ कोटी. या लोकसंख्येत मुस्लिम असते ४५ कोटींच्या वर. मुस्लिमांच्या संख्येचा हिशेब मांडायचा कारण देशाची फाळणी झाली तीच धामिर्क पायावर. ‘ मुस्लिम ‘ हे स्वतंत्र राष्ट्र आहे आणि त्यांना त्यासाठी स्वतंत्र , हक्काचा भूभाग हवा , असा युक्तिवाद तेव्हा झाला. तो यशस्वीही झाला. मुस्लिमबहुल असा भारताचा पश्चिमेचा भाग पश्चिम पाकिस्तान झाला तर पूर्वेकडचा भाग पूर्व पाकिस्तान झाला. दोन भूभागांमध्ये हजारो मैलांचे अंतर असणारा हा देश तुटला तो १९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धानंतर. मग पूवेर्कडे बांगला देश जन्माला आला. तेव्हापासून आजवर तरी भारतीय उपखंडाच्या नकाशात नव्या रेषा ओढल्या गेलेल्या नाहीत.

१५ ऑगस्ट १९४७च्या मध्यरात्री दीडशे वषेर् फडकणारा युनियन जॅक खाली उतरवून ब्रिटिशांनी चंबुगबाळे आवरले आणि राणीच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळला असला तरी भारताची फाळणी करून आपण दक्षिण आशियात जबरदस्त पाचर मारून ठेवली आहे ; याचा आनंद ब्रिटिशांना नक्कीच होत असणार. फाळणीनंतर ब्रिटिश कॅबिनेटला एक फ्यूचरिस्टिक अहवाल सादर करण्यात आला. त्यात म्हटले होते , ‘ एकसंध राष्ट्र म्हणून उभे राहण्यात भारत कधीच यशस्वी होणार नाही. कारण देश बांधण्यासाठी अनुकूल पार्श्वभूमीच भारताच्या इतिहासात नाही. याउलट पाकिस्तानला एकसंध उभे राहण्यासाठी इस्लामचा आधार आहे. त्याच्या आधारावर उभे राहिल्यावर फुटीर प्रवृत्ती फोफावणार नाहीत. अडथळे आणणाऱ्या शक्तीही माजणार नाहीत. ‘ ( निदान अहवाल लिहिणाऱ्या) इंग्रजांची भविष्याचा वेध घेण्याची दृष्टी व अक्कल किती कोती होती , याचा पुरावा म्हणून हा अहवाल जितका महत्त्वाचा आहे ;तितकाच त्यांनी भविष्यात कोणाच्या बाजूने उभे राहण्याचे आधीच ठरवले होते , याचा ढळढळीत दाखला आहे.

हिंदुस्थानच्या भूमीवर पाऊल टाकल्यापासूनच ब्रिटिशांनी ‘ फोडा आणि राज्य करा ‘ असे ब्रीद चालवले. इथल्या संस्थानिकांना परस्परांच्या विरोधात लढण्यासाठी ‘ तैनाती फौजा ‘ पुरवण्याचा धंदा हा त्याचाच भाग नव्हता का ? हिंदू-मुस्लिम दरीमुळे ‘ फोडा आणि राज्य करा ‘ या मतलबाचे रूपांतर त्यांना सहज ‘ फोडा आणि (मगच) राज्य सोडा ‘ यात करता आले. स्वातंत्र्य देण्याची वेळच आली तेव्हा ब्रिटिशांनी ते रक्तरंजित आणि खंडित स्वरूपात भारताच्या पदरात टाकले. त्यावेळी झालेल्या कत्तली , अत्याचार , हिंसाचार , असंख्यांच्या वाट्याला आलेले निर्वासितपण या साऱ्यामुळे स्वातंत्र्याच्या आनंदाला काळिमा लागला. दुदैर्वाची गोष्ट म्हणजे इतका भयानक नरसंहार होईल ; याचा अंदाज आमच्या राष्ट्रीय नेत्यांना आलाच नाही. तो टाळण्यासाठी केलेले प्रयत्नही अपुरे ठरले. फाळणीच्या काळात झालेला हिंसाचार हा एकाच देशात राहणारे सहवासी किती टोकाचे वैरी बनू शकतात , याचा सर्वांच्याच डोळ्यांत अंजन घालणारा धडा होता.

पण ब्रिटिशांचे फाळणीचे हे कारस्थान यशस्वी झालेच नसते तर ? आपले सर्व धर्मांचे राष्ट्रीय पुढारी परस्परांच्या गळ्यात गळे घालून सामंजस्याने नांदले असते , हिंदू-मुस्लिम एकजूट उभी ठाकली असती , वायव्य सरहद्द प्रांतापासून चितगांवच्या टेकड्या व ढाक्यापर्यंतच्या एकसंध देशाला स्वातंत्र्य मिळाले असते , तर काय झाले असते ? अशा भारताचे आजचे स्वरूप , चित्र काय असते ? ‘ हिंदू आम्ही भीती कुणाची जगती आम्हाला ‘ असे म्हणत ‘ अखंड भारता ‘ चा अखंड जप करणाऱ्या राष्ट्रभक्तांचे स्वप्न साकारले असते का ? तो ‘ हिंदुस्थान हिंदूंचा ‘ झाला असता का ? काहींना वाटते त्याप्रमाणे हा अखंड भारत एव्हाना महासत्ता बनून गेला असता का? जगाच्या राजकारणात आज आपला आवाज ऐकला जातो , त्यापेक्षा अधिक ऐकला गेला असता का ? पाकिस्तानबरोबरची चार युद्धे टळून रोजचा प्रचंड संरक्षणखर्च वाचला असता का? काश्मीरचा प्रश्ान् निर्माणच झाला नसता का ? दहशतवादाचा फटका कधी बसलाच नसता का ? मुंबई , हैदराबाद , अजमेर अशा रोजच्या रोज होणाऱ्या जखमा टळल्या असत्या का ?आज आपण कसे असतो ?

हे सारे प्रश्न काल्पनिक वाटत असले तरी फाळणी झाल्यावरही एकसंध भारताचे स्वप्न अनेक नेत्यांच्या मनात काही काळ रुंजी घालत होते. ही फाळणी फार काळ टिकणार नाही. हे तात्पुरते आलेले संकट आहे , आज ना उद्या भारत आणि पाकिस्तान पुन्हा एक होतील , असा विश्वास पंडित नेहरूंपासून अनेक नेत्यांनी उघडपणे व्यक्त केला होता. दोन्ही देशांच्या सीमा लवचिक ,सैलसर राहतील आणि एकमेकांच्या देशात आरामात जाता येईल , असेही या नेत्यांचे स्वप्न होते. हे भावाभावांचे भांडण आहे. आज ना उद्या मिटेल. सीमा पुसल्या जातील , असल्या भाबड्या स्वप्नांच्या कशा चिंध्या झाल्या हे पुढे दिसलेच. भाऊ व शेजारी तर सोडाच भारत व पाकिस्तान ही शत्रुराष्ट्रे झाली. काश्मिरातल्या पहिल्या घुसखोरीपासून कारगिलच्या विश्वासघातापर्यंत हे दुष्मनीचे रक्त सतत ठिबकते आहे.
फाळणी ही आधुनिक भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी इष्टापत्ती ठरली आहे! स्पष्टच सांगायचे तर नवा भारत जन्माला येताना लाभलेले ते एक वरदान होेते. फाळणी केल्यामुळे भारताचा दूरगामी फायदा होणार आहे , अशी शंका जरी ब्रिटिशांना आली असती तरी त्यांनी ही फाळणी होऊ दिली नसती. सुदैवाने , आपण फाळणी करून भारत व भारतीय उपखंडाला कायमचे पंगू करून ठेवतो आहोत , याच भ्रमात ब्रिटिश राहिले. त्यांचा हा भ्रम आपल्या पथ्यावर पडला. फाळणी होणे हे अंतिमत: आपल्या हिताचे आहे ; हे त्यावेळी वल्लभभाई पटेलांसारखे अपवाद वगळता फारसे कुणाला पटले नाही. आपल्या मातृभूमीची फाळणी झाली , ही वेदना कित्येकांना वर्षानुवषेर् मनातून काढून टाकता आली नाही. मूर्खांच्या नंदनवनात वावरणाऱ्यांना तर अजूनही ‘अखंड भारता ‘ ची स्वप्ने पडतात! वास्तव आणि वर्तमानाशी संबंधच नसलेल्या अशा लोकांचा अपवाद सोडला तरी एकविसाव्या शतकाच्या आठव्या पायरीशी उभे राहून इतिहासाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची , इतिहासातले ‘ बे कं बे चे जुने परोचे ‘ पुसून टाकण्याची निर्मळ हिंमत किती जणांमध्ये आहे ? इतिहासाचा अर्थ प्रत्येक पिढीने स्वतंत्रपणे लावला पाहिजे. तसा तो लावला नाही तर इतिहास हा पुढच्या वाटचालीतील सृजनशील साथीदार न होता निव्वळ ओझे बनून जाईल. त्यामुळेच भारत-पाकिस्तान फाळणीची गाथा आपापले झेंडे रोवून बसलेल्या मठ्यांच्या आश्रयाला जाऊन वाचता येणार नाही. भारताच्या वर्तमानाशी आणि भविष्याशी तिची नाळ जोडायला हवी.

भारत , पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांकडे स्वतंत्रपणे पाहिले किंवा त्यांची तुलना केली तर काय दिसते ? कोणताही आथिर्क , सामाजिक निकष आज भारताला सरस ठरवतो. स्वातंत्र्यानंतर नव्वदीच्या दशकात येईपर्यंत ‘ हिंदू रेट ऑफ ग्रोथ ‘ म्हणून जग आपल्याला हिणवायचे. ‘ हिंदू रेट’ म्हणजे दरवषीर्चा विकासदर अडीच ते साडेतीन टक्के! पण आता तो १० टक्क्यांच्या आसपास पोहोचला आहे. भारतात लोकशाही टिकणार नाही , भारताचे तुकडे पडतील अशा शंका घेणाऱ्या तर कितीतरी चोपड्या दाखवता येतील. इंदिरा गांधी यांची पंतप्रधान असताना हत्या झाली (३१ ऑक्टोबर , १९८४) तेव्हाही अनेकांना भारत आता एकसंध राहणे कठीण ; अशी (सानंद) भीती वाटली. मिझोरम , नागालँड , आसाम , पंजाब , काश्मीर इत्यादी राज्यांमधल्या फुटीर चळवळी , ‘ एलटीटीई ‘ सारखे संकट , नक्षलवाद्यांचा नऊ राज्यांमध्ये पडलेला विळखा या साऱ्यांना तोंड देऊनही भारत आज नुसता टिकला नाही , तर वेगाने विकसित होतो आहे. कोणी कितीही शिव्या दिल्या तरी लोकशाहीचे चार स्तंभ आणि पाचवा स्तंभ म्हटली जाणारी स्वयंसेवी चळवळ यांनी देश तोलून धरला आहेच. भारतातली लोकशाही परिपूर्ण नसेलही पण पंडित नेहरू म्हणत त्याप्रमाणे ‘ लोकशाहीच्या दोषांवरचा उपाय म्हणजे आणखी लोकशाही ‘ हाच नाही का ? ‘ माहितीच्या अधिकारा ‘ सारखे शस्त्र सामान्य नागरिकांच्या हातात आल्याने आमची लोकशाही आणखी भरीव होते आहे. साठ वर्षांच्या प्रवासात नवजात राष्ट्र म्हणून एकदाही आमची लोकशाहीवरची सामूहिक श्रद्धा डळमळीत झाली नाही. उलट आमचा मतदार मस्तवालांनाही धूळ चारून धडा शिकवतो , याचा आम्हाला अभिमान वाटतो. साहित्य , संगीत ,योग , तत्त्वज्ञान , धर्मविचार , समाजसेवा , चित्रपट , उच्च शिक्षण , उद्योग , संशोधन , अण्वस्त्र व अंतराळविद्या , इन्फमेर्शन टेक्नॉलॉजी या व अशा असंख्य क्षेत्रांमध्ये भारतीयांनी स्वदेशात व परदेशांत देदीप्यमान कामगिरी केली आहे.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान व बांगलादेश यांच्यातल्या गेल्या सहा दशकांमधल्या राजवटी ,लष्करशाह्या , कत्तली , लोकशाहीचे खून , धर्मांधता , दहशतवादाचा भस्मासुर , दारिद्य ,अल्पसंख्य हिंदू-ख्रिश्चन-बौद्धांचा होणारा छळ , आथिर्क विकासातली पराधीनता , खोलवर रुजलेला भारतद्वेष , बांडगुळी संस्कृती रुजवण्याची धडपड याकडे बघायला हवे. पाकिस्तान व बांगलादेश या दोन्हींना इथे एकाच मापाने मोजल्याचे आश्चर्य वाटेल. पण गेल्या दोन-अडीच दशकांत बांगलादेशातील राजवटी पाकिस्तानला मागे टाकतील इतक्या भारतद्वेष्ट्या व धर्मांध झाल्या आहेत. दहशतवाद्यांचे तळ पाकिस्तानात जास्त की बांगलादेशात असा प्रश्ान् पडावा ,अशी स्थिती आहे. बांगलादेश हा पाकिस्तानचा भाऊ शोभावा असाच ‘ पूर्व पाकिस्तान ‘ झाला आहे! पाकिस्तानात भारतातून स्थलांतरित झालेल्या मुस्लिमांना ‘ मुहाजिर ‘ म्हणून बरोबरीची वागणूक देत नाहीत , हे आपण ऐकत आलो. बांगलादेशात स्थिती निराळी नाही. तिथे बिहारमधून मोठ्या आशेने गेलेल्या लक्षावधी मुस्लिमांना मालकीचे घर नाही , हक्काचा रोजगार नाही , नागरिकत्वाचा टिळा नाही. त्यांची चौथी पिढी रस्त्यावर भणंग वाढते आहे. त्यांना वेठबिगार म्हणून राबवले जाते. पाकिस्तान व बांगलादेश या आज एकाच नाण्याच्या दोन बाजू ठरल्याने आपण १९७१मध्ये केलेली पाकिस्तानची फाळणी तरी योग्य होती का , असा प्रश्ान् उभा ठाकला आहे. नसती झाली फाळणी तर परस्परांची एकमेकांना डोकेदुखी तरी राहिली असती. आता दोघेही स्वतंत्रपणे हातात हात घालून भारताचा सूड घ्यायला सज्ज झाले आहेत!

जन्नतची स्वप्ने पाहात पाकिस्तान व बांगलादेशात गेलेल्या मुस्लिमांची व्यथा सांगून प्रख्यात पत्रकार एम. जे. अकबर अलीकडेच एकदा भारतीय मुस्लिमांना उद्देशून म्हणाले , ‘ लक्षात ठेवा, तुम्ही र्फस्ट क्लास नेशनचे र्फस्ट क्लास सिटिझन्स आहात. ते आहेत थर्ड क्लास देशांचे सेकंड क्लास सिटिझन्स. भारत महासत्ता म्हणून ओळखला जाईल तेव्हा तुम्ही त्या महासत्तेचे अभिमानी नागरिक असाल. ‘

एम. जे. अकबर उल्लेख करत असलेले ‘ महासत्तेचे स्वप्न ‘ आता जवळ आल्यासारखे वाटतेय. ‘माझ्याच हयातीत मला अर्धपोटी गरिबीचा अंत पाहायला मिळेल ,’ अशी आशा अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांना वाटते आहे. फाळणी न होता भारत आज ‘ अखंड ‘ असता तर हे महासत्तेचे स्वप्न पडले असते का ? ‘ व्हिजन २०२० ‘ पाहता आली असती का ? येत्या वीस वर्षांत एकाही भारतीयाला उपाशी झोपू देणार नाही , अशी जिद्द बाळगता आली असती का ? या सर्व प्रश्ानंची उत्तरे ‘ नाही ‘ अशीच आहेत. आपला इथवर प्रवास तर झाला नसताच ; पण आपल्या देशाचे तारू कुठे भरकटले असते , किती खडकांवर आदळून फुटले असते , किती रक्तबंबाळ झाले असते , कितीवेळा यादवी झाली असती याची कल्पनाही नकोशी वाटते.

जिना यांची मुस्लिम लीग व काँग्रेस यांची तडजोड होऊन साऱ्या सत्तास्थानांचे समसमान वाटप झाले असते असे गृहीत धरले तरी जिनांनाही धुडकावून लावणारे कडवे गट पाकिस्तानातच निपजले होते , हे विसरता येत नाही. जिनांनी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळण्यापूवीर् तीन दिवस केलेले ‘ सेक्युलर ‘ भाषण कडव्या नेत्यांना मुळीच आवडले नव्हते. जिनांची धर्मांध मुस्लिम हत्या करतील की काय , अशी भीती निर्माण झाली. पुढे ‘ पाकिस्तान मुस्लिम लीग ‘ चे अधिवेशन झाले तेव्हा पक्षाच्या नावातला ‘ मुस्लिम ‘ शब्द काढून टाका , अशी सूचना जिनांनी केली. तेव्हा त्यांना गप्प बसवण्यात आले.

असल्या धर्मवेड्या अनुयायांसह जिना भारतात राहिले असते तर रात्रंदिन युद्धाचाच प्रसंग उभा ठाकला असता. वल्लभभाई पटेल यांनी ज्या शिताफीने साडेपाचशे छोट्यामोठ्या संस्थानांचे विलिनीकरण करून टाकले तसे ते अखंड भारतात शक्य झाले असते का , याचा विचार करण्यासारखा आहे. जुनागढ , हैदराबाद यासारख्या हेकट संस्थानिकांच्या हट्टाला नक्कीच मग धामिर्क रंग चढला असता आणि हिंदू-मुस्लिम संघर्षाला निमंत्रणच मिळाले असते. आम्ही स्वतंत्र देशाची मागणी सोडली ना , मग आमच्या या मागण्या मान्य करा , अशा ‘ ब्लॅकमेल ‘ धमक्या झेलणे , हा इथल्या राज्यर्कत्यांचा दिनक्रम होऊन बसला असता. मुस्लिमांची मते मिळवण्यासाठी भारतात किती खालच्या थराचा अनुनय होऊ शकतो , याचा अनुभव अनेकदा आला आहे. (आठवा: शाहबानोला पोटगी देण्याचा सवोर्च्च न्यायालयाचा निर्णय अर्थहीन होण्यासाठी राजीव गांधी सरकारने केलेली कायद्यातील दुरुस्ती) अशा अनुनयात मुस्लिम समाजाचे काहीच हित नसते. अखंड भारतातील मुस्लिमांची मतपेढी आजच्यापेक्षा कितीतरी मोठी असती. ती राखण्यासाठी राजकारण्यांनी भलत्या तडजोडी केल्या असत्या तर आपल्या लोकशाहीलाच एक दिवस नख लागल्याशिवाय राहिले नसते. स्वातंत्र्यानंतरही मुस्लिम लीगच्या झेंड्याखाली बहुसंख्य मुस्लिम राहिले असते तर देशातील राजकीय ध्रुवीकरण चमत्कारिक पद्धतीने झाले असते. आक्रमक हिंदुत्वाला भरघोस प्रतिसाद मिळण्यासाठी १९८९पर्यंत वाट पाहावी लागली ;तितकी अखंड भारतात पाहावीच लागली नसती. एकीकडे धर्मांध मुस्लिम लीग आणि दुसरीकडे आक्रमक हिंदुत्ववाद यांच्या संघर्षात सहिष्णू भारतीय परंपरेचा वारसा निकालात निघाला असता. १९९२च्या डिसेंबरात पाडलेल्या बाबरी मशिदीचे चिरे आजतागायत भारतमातेला वारंवार जखमी करत आहेत. अखंड भारतात अशा किती जखमा तिला सोसाव्या लागल्या असत्या कुणास ठाऊक! फाळणी झाली नसती तर भारताचा रोज रक्तबंबाळ होणारा लेबनॉन तरी झाला असता किंवा सोविएत युनियनची जशी कित्येक शकले उडाली तशी अवस्था भारताची झाली असती. अशा स्थितीत कसला आथिर्क विकास अन् कसला सामाजिक न्याय ? कसली लोकशाही आणि कसली भारतीय संस्कृती ?

फाळणी झाल्यामुळे ज्यांना वेगळे व्हायचे होते ते गेले. आता उरलेल्यांनी नीट एकत्र राहायचे आहे, हा संदेश न सांगताही सर्वांना

समजला. ज्या मुस्लिमांनी पूर्व किंवा पश्चिम पाकिस्तानात न जाता भारतात राहण्याचा निर्णय घेतला त्यांना पाठोपाठच देशाची घटना , लोकशाही , निवडणुका ,न्यायव्यवस्था हे आधुनिक राष्ट्रजीवनाचे घटक स्वीकारावे लागले. स्वातंत्र्यानंतर भारतात मुस्लिम लीगच्या जात्यंध राजकारणाला फार मोठे बळ मिळू शकले नाही ; हे यासंदर्भात आवर्जून लक्षात ठेवायला हवे!

खरेतर स्वातंत्र्य मिळाले तेव्हा भारताने कितीतरी शतकांनी मोकळा श्वास घेतला! ब्रिटिशांच्या नव्हे तर कित्येक शतके चाललेल्या आक्रमणांचा शेवट झाला होता. ती सगळी आक्रमणे पचवून काही हजार वषेर् जिवंत राहिलेल्या भारतीय संस्कृतीला स्वातंत्र्याने नवसंजीवनी दिली. फाळणी न होता स्वातंत्र्य मिळाले असते तर ही नवसंजीवनी मिळालीच नसती. उलट धर्मांध मुस्लिम आणि धर्मांध हिंदू शक्तींनी परस्परांशी लढताना भारतीय संस्कृतीचा गळा घोटला असता! सुदैवाने तसे न झाल्याने भारतीय संस्कृतीला ‘ नवा अवकाश ‘मिळाला आहे. भारतात लोकशाही कशी टिकली ? याचे अनेकांना कुुतूहल वाटते. पण भारताच्या मातीलाच सहिष्णुतेचा अत्तरगंध आहे. लोकशाहीला या प्राचीन सहिष्णुतेचा स्पर्श झाल्यानेच आधुनिक मूल्ये व व्यवस्था भारताला परकी वाटली नाहीत. पाकिस्तान , बांगलादेशात लोकशाहीचे जे धिंडवडे निघाले आहेत , ते पाहता फाळणी झाली नसती तर आपल्याला इतक्या निकोपपणे लोकशाही राबवता आली असती का , अशी शंका मनात घर करते.

स्वातंत्र्यानंतर आता साठ वर्षांनी ‘ फाळणी चूक की बरोबर ?’ ‘ फाळणी टाळता आली नसती का?’ असल्या प्रश्नांची चर्चा बंद केली पाहिजे. फाळणीबद्दल ज्या नेत्यांना दोष दिला जातो त्या सर्वांचे खरेतर आपण ऋणी राहायला हवे. फाळणी हे भारताला लाभलेले स्वातंत्र्याइतकेच मोलाचे वरदान आहे ; हे आपल्याला ज्या दिवशी समजेल त्या दिवशी इतिहासाकडे पाहण्याची नवी निर्मळ दृष्टी लाभल्याशिवाय राहणार नाही. या नव्या दृष्टीतच भारताचेच नव्हे तर साऱ्या भारतीय उपखंडाचे भविष्य घडविण्याची ताकद सामावलेली असेल!

…………………………

भविष्यात एक ना एक दिवस भारताला पुन्हा एकसंध राष्ट्र बनावेच लागेल , याबाबत माझ्या मनात तीळमात्र शंका नाही. कदाचित् तसे एकसंध राष्ट्र बनण्याच्या प्रक्रियेतला अपरिहार्य टप्पा म्हणजे आज पत्करावी लागणारी फाळणी होय.
– पंडित जवाहरलाल नेहरू , २९ एप्रिल , १९४७.  कृष्ण मेनन यांना लिहिलेले पत्र

भारत आज आपला काही भूभाग तात्पुरता गमावत आहे. पण अधिक परिपूर्ण राज्य मिळाल्याने आपला मोठाच फायदा झाला आहे. फाळणीचे तोटे खूप आहेत , यात शंकाच नाही. पण फाळणी न होण्याने याहून मोठे तोटे झाले असते.
– सरदार वल्लभभाई पटेल , २३ जून , १९४७  द टाइम्स ऑफ इंडिया

न सुटलेली काही कोडी

आज बांगलादेशात असलेल्या चितगांव टेकड्यांचा भाग बौद्धबहुल होता. तिथल्या रहिवाशांना यायचे होते भारतात. प्रत्यक्षात फाळणी झाली तेव्हा जावे लागले पूर्व पाकिस्तानात. हा निर्णय नेमका का झाला ?

फाळणी झाली तेव्हा पंजाबचा गुरुदासपूर हा जिल्हा मुस्लिमबहुल होता. पण तो भारतात टाकायचे ठरले. माऊंटबॅटनने भारताला झुकते माप दिले , असा पाकिस्तानचा समज.

भारताच्या फाळणीचा अंतिम आराखडा बनवणारे सर सिरिल रॅडक्लिफ यांनी देश सोडून जाताना सारी कागदपत्रे जाळून का टाकली ?

…………………………..

आजचा भारत

क्षेत्रफळ: ३३ लाख चौरस किमी
लोकसंख्या: ११३ कोटी
हिंदू: ८१ टक्के , मुस्लिम: १३ टक्के
बौद्ध: ०. ७६ टक्के , ख्रिस्ती: २.३४ टक्के
शीख: १.९४ टक्के , जैन: ०.४० टक्के
इतर: ०.४४ टक्के
लोकसंख्या वाढीचा वेग: १.५ टक्के
दरडोई सरासरी वाषिर्क उत्पन्न:
सुमारे २८ हजार रुपये
आथिर्क वाढीचा वेग: ९.५ टक्के
चलनवाढीचा दर: ४.२ टक्के
सरासरी आयुर्मान: ६७
साक्षरता: सुमारे ७० टक्के

………………………………………….

आजचा पाकिस्तान

क्षेत्रफळ: ८ लाख ०४ हजार चौरस किमी
लोकसंख्या: १७ कोटी
मुस्लिम: ९७ टक्के
हिंदू: १.५ टक्के
इतर: १.५ टक्के
लोकसंख्या वाढीचा वेग: २.४
दरडोई सरासरी वाषिर्क उत्पन्न: सुमारे २८ हजार रुपये
आथिर्क वाढीचा वेग: ६ टक्के
चलनवाढीचा दर: ८ टक्के
सरासरी आयुर्मान: ६५
साक्षरता: सुमारे ६३ टक्के
————————-
आजचा बांगलादेश

क्षेत्रफळ : १लाख ४४हजार चौरस किमी
लोकसंख्या: १५ कोटी
मुस्लिम: ८७ टक्के
हिंदू: १२ टक्के
बौद्ध: ०.६ टक्के
ख्रिस्ती: ०.४ टक्के
लोकसंख्या वाढीचा वेग: १.३
दरडोई सरासरी वाषिर्क उत्पन्न: सुमारे १८ हजार रुपये
आथिर्क वाढीचा वेग: ५.३८ टक्के
चलनवाढीचा दर: ६.३२ टक्के
सरासरी आयुर्मान: ६३
साक्षरता: सुमारे ६० टक्के
………………………………………

हे आज लक्षात आहे का ?

* फाळणी होणार हे दिसू लागल्यावर मुस्लिम लीगचे बंगाली नेते एच. एस. सुऱ्हावदीर् आणि फॉरवर्ड ब्लॉकचे नेते शरच्चंद बोस (नेताजी सुभाषचंद बोस यांचे बंधू) यांनी ‘ एकसंध बंगाल ‘ ची मोहीम सुरू केली. हा ‘ एकसंध बंगाल ‘ भारत किंवा पाकिस्तानात सामील होणार नव्हता. तो एक स्वतंत्र राष्ट्र असणार होता. या प्रस्तावावर महात्मा गांधी आणि महंमद अली जिना या दोन्ही नेत्यांशी चर्चाही झाल्या.

* ऑगस्ट १९४७ मध्ये पंजाबातील अमृतसरमध्ये सर्वाधिक रहिवासी होते ते मुस्लिम.

* पाकिस्तान जसा पूर्व आणि पश्चिम असा दोन भागांत देण्यात आला तसा पश्चिम पाकिस्तानला ओलांडून गेल्यावर असणारा वायव्य सरहद्द प्रांत हा ‘ पश्चिम भारत ‘ करा , अशी मागणी खान अब्दुल गफारखान म्हणजेच सरहद्द गांधी यांनी केली होती.

* पूर्व पाकिस्तान (आजचा बांगलादेश) व पश्चिम पाकिस्तान यांना जोडण्यासाठी भारताच्या भूभागातून एक कॉरिडॉर असावा , अशीही मागणी काही काळ जोर धरत होती.

पु ल देशपांडे

चंद्रपूर येथील अखिल भारतीय दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ४ मार्च १९८९ ला पुलंनी केलल्या भाषणातला अंश…

आयुष्यात माणसाला निखळ माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा देणारा मंत्र मला केशवसुतांच्या मळ्यास माझ्या कुंपण पडणें अगदी न मला साहे या ओळीत सापडला. शाळकरी वयापासून आजतागायत केशवसुतांना मी अनेक वेळा भेटत आलो. माझ्याप्रमाणे तुमच्यापैकी अनेकांसाठी केशवसूत आजही गातचि बसले आहेत. वाढत्या वयाबरोबर आसपास पाहायला लागल्यावर वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाच्या मळ्याला जात, धर्म, राष्ट्रीयत्त्वाच्या भ्रामक कल्पना, देव, पाप-पुण्य, स्वर्ग-नरक, पुनर्जन्म, पूर्वजन्म, कर्मविपाक अशा नाना प्रकारची नाना कारणांनी उभारलेली असंख्य कुंपणं दिसायला लागली.

ऐहिक आणि पारलौकिक दहशतीच्या दगडांच्या भिंतीची ती कुंपणं होती. अशा या अंधा-या वातावरणात जगणा-यांच्या जीवनात वीज चमकावी, गडगडाट व्हावा, मुसळधार पाऊस कोसळून नांगरल्याविण पडलेल्या भूमीवर नवं पीक येण्याची चिन्हं दिसावी अशी अवस्था झाली. बाबासाहेबांनी एक नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असलेलं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे धम्म धम्म या शब्दानं समाजात माणसाचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी धम्म म्हटलं. बाबासाहेबांनी एका धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला, असं झालं नाही. तर, निखळ प्रज्ञा आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला. अंधश्रद्धांवर आधारलेल्या जीवनपद्धतीकडून प्रेम आणि निर्मळ बुद्धीच्या बळावर चालणा-या जीवनपद्धतीचा त्यांनी स्वीकार केला. या बुद्धिनिष्ठ जीवनपद्धतीचं नाव धम्म असं आहे.

बाबासाहेब हे सामाजिक शोषणाच्या पाळामुळाशी जाऊन कुदळ चालवणारे पहिले क्रांतिकारक म्हणायला हवेत. उन्मत्ताच्या टाचेखाली रगडल्या जाणा-या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. चवदार तळ्याचं पाणी सर्वांना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रुढी पाळणा-या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनवण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती.

दलित साहित्याचं जे सूर्यकूल आपण मानतो त्याची पहाट महाडच्या क्षितीजावर फुटली होती, असं म्हणायला पाहिजे. शरसंधानासारखं हे शब्दसंधान होतं. एका नव्या त्वेषाने पेटलेल्या कवींना आणि कथा-आत्मकथा-कादंबरीकारांनी या प्रतिमासृष्टीतून वास्तवाचं जे दर्शन घडवलं, ते साहित्यात अभूतपूर्व असं होतं. जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्चनीच भेद ठरवणा-या रुढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. बहुजन हिताय बहुजन सुखाय हीच मुळी या साहित्याची मूळ प्रतिज्ञा आहे. वास्तवाशी इमान राखून तिथे पदोपदी जाणवणा-या अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे, या ध्येयाने प्रेरित झालेले हे साहित्य जन्मजातच दुय्यम दर्जाचे, असा साहित्यिक हिशेब मांडणा-यांना दलित साहित्य हा शब्द खटकणारच.

दलित शब्दाची व्याप्ती लक्षात न घेणा-यांना दलित संमेलन हा सवतासुभा वाटतो. पण ही विचारसरणी नवी नाही. माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, हा विश्वव्यापी विचार घेऊन लढलेल्या आंबेडकरांना हिंदू समाजातल्या अस्पृश्यांचे पुढारी म्हणून एका कुंपणात टाकून देण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणेने निर्माण झालेल्या साहित्यालाही अशाच प्रकारचं लेबल लावून त्यामागील व्यापकता आकुंचित करण्यात आली तर त्यात नवल नाही. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल. पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे, असं मी मानतो.

अनिल अवचट, सौजन्य – मटा

महात्मा गांधींकडे हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र नेमकं सापडलं तरी कधी? ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते.

काय गंमत आहे, आपल्यावर कोणाकोणाचे परिणाम आहेत, हे आपल्यालाच ठाऊक नाही. मागे कुणाबरोबर जोतीराव फुल्यांविषयी भरभरून बोललो, तेव्हा समजलं, आपल्यासाठी जोतीराव काय आहेत ते. परवाही पर्यावरणवादी चळवळीत ओढला गेलेला एक तरुण पोरगा म्हणाला, काही म्हणा, ‘तो म्हातारा म्हणत होता, ते बरोबर होतं.’

मी विचारलं, ‘कोण म्हातारा?’

तो हसला व म्हणाला, ‘गांधीजी.’

मी थक्क झालो. तो ‘म्हातारा’ म्हणाला म्हणून नव्हे; तर त्याला गांधीजी जवळचे वाटतात, बरोबर वाटतात, म्हणून. ते जाऊनही छप्पन्न वषेर् झाली, तरी! ही काय जादू आहे? कुठेही जा; जागतिकीकरणाचा विषय असो, शेतीचा, पाण्याचा, बाजाराचा… अगदी नद्यांच्या प्रदूषणाचा; त्या त्या ठिकाणचे कार्यकर्ते चर्चा करून संपवताना म्हणताना ऐकतो की, कधी नव्हेत इतके गांधीजी आज रेलेव्हंट ठरले आहेत. या समस्यांचा विचार करताना त्यांनी काय म्हटले आहे, हे पाहूनच पुढे जावे लागते… वगैरे वगैरे.

एकीकडे गांधींचा खून करणाऱ्यावर नाटकं येताहेत, काहीजण तर फाळणीचा दोष गांधीजींवरच ठेवताहेत. पाकिस्तानला पंचावन्न कोटी गांधीजींनी द्यायला लावले, हा त्यांचा गुन्हा मानतात. फाळणीच्या काळात माझ्या मामाने सांगितलेली हकिगत अशी, की एक माणूस त्याला म्हणाला, ‘गांधी कुठे आहे, बघायचेय?’ असं म्हणून त्यानं चपलेवरचा पाय उचलला, तर चपलेवर बरोबर टाचेखाली गांधीजींचा पेपरमध्ये आलेला फोटो फाडून चिकटवलेला. एका नि:शस्त्र माणसावर एवढे का चिडत होते हे लोक? त्यांचा जनमानसावरचा असलेला प्रभाव म्हणून? मग तो का होता, आणि आपल्याला का ते साधले नाही, असा विचार न करता ऐंशी वर्षांच्या नि:शस्त्र म्हाताऱ्यावर कुणी गोळी झाडावी? माझा एक तरुण मित्र सांगत होता, त्याचे कॉलेजातले मित्र तर गांधींचा उल्लेख बुढ्ढा, टकल्या असा करतात. कोणी त्यांना हे शिकवले?

काहीजणांनी गांधीजींच्या मुलाची व्यथा मांडली आहे. त्यांनी मुलांना नीट वागवले नाही, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, इत्यादी. ते खरेच आहे. पण हे अनेक महापुरुषांबाबत झालेले दिसते. सर्व माणसे सर्वच बाबतीत बरोबर किंवा यशस्वी असतात, असं नसतं. सुभाषबाबूंच्या बाबतीतही गांधीजींचे चुकले असणे शक्य आहे. त्यांनी स्वत:च आपल्या हिमालयाएवढ्या चुका झाल्याचे लिहिले आहे. त्यांच्या दीर्घ आयुष्यात सगळेच बरोबर, योग्य असेच ते वागले, हे शक्य नाही. पण तरीही त्यातनं गांधीजी काही उतरतात का?

****

अठ्ठेचाळीस साली मी चार वर्षांचा होतो. गांधीवधानंतर उसळलेल्या दंगलीची थोडीफार आठवण आहे. ब्राह्माण मंडळी गांधीहत्येला ‘गांधीवध’ असे संबोधत असत. गावात नव्वद टक्के मराठे. माझे वडील त्यांचेच डॉक्टर. पण जमावाने आमचा दवाखाना फोडून उद्ध्वस्त केला. सकाळी मी घाबरत जरा जवळ गेलो, तर रस्त्याभर केसपेपर्स. रस्ता पांढराच दिसला. त्या काळात आम्ही कोणी घराबाहेर पडत नव्हतो. घरात सर्व घाबरलेले वातावरण. कुणी कुणाशी बोलत नव्हतं. तो भीतीदायक सुन्नपणा मला अजूनही आठवतोय. नंतर जरा वाढत्या वयात कळले, की वडिलांना ठार मारायला लोक त्यांना शोधत होते. राजाराम पाटील आणि भगवंता पाटील या वडिलांच्या मित्रांनी त्यांना लपवले, म्हणून ते वाचले. नाहीतर आमचे-माझे-काय झाले असते, कोण जाणे. पुढं वातावरण निवळलं. नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत हा भेद बाजूला पडून गाव ढवळलं गेलं.

सावरकरांची ‘माझी जन्मठेप’ वाचलं. मेडिकल कॉलेजमध्ये मी मॅगेझिनचा संपादक होतो. पानभर सावरकरांचा फोटो छापून ते मॅगेझिन त्यांना अर्पण केलं होतं. गांधीजी दूरचे वाटत. त्यांची अहिंसा बावळटपणा वाटे. क्रांतिकारकांची चरित्रे वाचल्यावर तर हे मत पक्कं होत होतं. खेड्यातनं शहरात आल्यावर ब्राह्माण असण्याचं एकाकीपण संपलं होतं. सर्व थरांतल्या पोरांच्या दोस्त्या होत होत्या.

या सगळ्यात कुठं तरी गांधीजी भेटले असावेत. मेडिकलला आम्ही अभ्यास मंडळ काढायचं ठरवलं. लाजिरवाण्या परिस्थितीतल्या आपल्या देशाला जगात ताठ मानेनं कसं जगता येईल, यावर तावातावाने विचार करायचो. देश म्हणजे नुसता नकाशा किंवा जमिनीचा तुकडा नव्हे; तर तिथं राहणारा समाज, तिथली गरीब माणसं… या समीकरणापर्यंत आलो, म्हणून बचावलो. नाही तर आम्ही ‘जाज्वल्य राष्ट्रप्रेमी’ झालो असतो. आणि समाज बघायचा राहिलाच असता, आणि गरिबांचं खरंखुरं जीवन, त्यांचे प्रश्न तर या जन्मात दिसले नसते.

****

आमचं वर्ध्याला शिबीर होतं.

इथं काही गांधीवादी लोकांची ओळख झाली. त्यातले एक आठवताहेत, ते अण्णासाहेब सहसबुद्धे. हिरवट घारे डोळे, टक्कल, सरळ नाक. शेती हा त्यांचा खास विषय. आम्ही त्यांच्याशी वाद घालत होतो, ‘सशस्त्र क्रांती झाली पाहिजे, त्याशिवाय हे प्रश्ान् सुटणार नाहीत.’ ते चिडून निघून जातील असं वाटलं होतं. उलट हसून ते म्हणाले, ‘बरोबर आहे. आपण सशस्त्र क्रांती करायला माझी काही हरकत नाही. किती लोक त्याच्यासाठी तयार आहेत? किती लोक तुमच्या मागे येतील? सरकार उलथवायचे झाले, तर सैन्याचा मुकाबला कसा करणार? असं समजू की तेही आपण करू शकलो, तरी भारतातल्या लाखो गावांमध्ये जाऊन शेतीसुधारणा, जातिभेद निर्मूलन, अंधश्ाद्धा निर्मूलन हे करायला किती कार्यकर्ते लागतील? ते कोण तयार करणार. समजा तेही झालं आणि शेतकरी या बदलांना तयार नाही झाले, तर काय? की त्यांनाही गोळ्या घालायच्या? असे किती लोकांना गोळ्या घालणार? या सगळ्यांनी आपल्याविरुद्ध उठाव केला तर?…’

बाप रे… आम्ही हा विचारच केला नव्हता. सर्व प्रश्ानंची उत्तरं सशस्त्र क्रांतीतून मिळतील, असं समजत होतो; पण अण्णासाहेबांनी तो विचार फक्त शेवटपर्यंत नेऊन दाखवला आणि माझे डोळेच उघडले. मग त्यांचं म्हणणं मी लक्ष देऊन ऐकू लागलो.

वर्धा शिबिराच्या निमित्ताने पवनारला विनोबांच्या आश्रमाला आम्ही पाचएकशे तरुणांनी भेट दिली. विनोबांविषयीही मनात अढी. कधी थट्टाही करायचो. आम्ही आश्रमात गेलो तेव्हा कळले की, ‘ते मौनात आहेत. तुम्ही प्रश्ान् विचारा, ते पाटीवर लिहून उत्तरे देतील.’ काय बोअर प्रकार हा, असं म्हणत एका मंडपात रांग करून बसलो. हिरवी कानटोपी, पुढे थोडे हूड असलेली घालून ते आले आणि आमच्या प्रश्ानेत्तराच्या सुरुवातीलाच त्यांनी मौन सोडून उत्तरं द्यायला सुरुवात केली. तासभर ते बोलले. मला सगळ्यात आवडली, ती त्यांची प्रसन्न सुंदर भाषा! असं सहज आणि सुंदर मराठी त्यापूर्वी ऐकलं नव्हतं. त्यांचे युक्तिवादही त्या वेळी स्फुरलेले, चपखल होते. शहरं खेड्यांचं कसं शोषण करतात, हे सांगताना म्हणाले, ‘शहरट लोक असतात ना, त्यांना सगळीकडचं उत्तम ते हवं असतं. तसे ते हावरटच,’ असं म्हणून छान, लहान मुलासारखे हसले. पुढे म्हणाले, ‘कृष्ण गवळणींना उगाच अडवीत होता का?’ मी चक्रावलोच.

‘ या शहरट लोकांना खेड्यातलं सगळं हवं असतं. दूध होतं खेड्यात, पण खेड्यातल्या लोकांना प्यायला मिळत नाही. म्हणून कृष्णानं शहराकडे दूध विकायला निघालेल्या गौळणींना अडवलं…’

ही त्यांची संगती अजब होती, पण हळूहळू पटतही होती! नंतर ‘ती’ गांधीजींची झोपडी बघायला गेलो. मला ती बाहेरूनपेक्षा आतूनच आठवतेय. कुडाच्या भिंती मातीनं सारवलेल्या. जमिनी शेणात सारवलेल्या. त्यांच्या बसायच्या खोलीत अंधार-प्रकाशाचा छान मेळ होता. म्हटलं तर अंधार, पण अप्रत्यक्ष प्रकाशही. या माणसाला या बाबतीतली एवढी प्रगल्भ दृष्टी होती?

पुढे काही वर्षांनी लॉरी बेकरविषयी पुस्तक वाचलं. हा सैनिक. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रह्मादेशच्या लढाईवरून घरी इंग्लंडला परत चालला होता. त्यानं पेपरमध्ये गांधींविषयी खूप वाचलं होतं. ‘हा कोण माणूस, बघून तरी जाऊ या’ असं म्हणून गांधीजींना भेटायला गेला. गांधीजींनी त्याला विचारलं, ‘इंग्लंडला जाऊन काय करणार?’

‘ मी आर्किर्टेक्ट आहे. तो व्यवसाय करीन.’

गांधीजी म्हणाले, ‘मी खरा आर्किर्टेक्ट कोणाला म्हणतो, माहीत आहे? जो 25 मैलाच्या परिघातून बांधकाम साहित्य मिळवतो तो.’

लॉरी बेकर चक्रावलाच. तो इंग्लंडला गेला. प्रॉपर्टी विकून भारतात परत आला. केरळमध्ये स्थायिक झाला आणि गांधीजींच्या व्याख्येप्रमाणे विटांचा जास्तीत जास्त वापर करून हवेशीर, सुंदर घरं बांधली. त्याला ‘ब्रिक मॅन ऑफ इंडिया’ असं संबोधतात.

गांधीजींच्या एकेका वाक्याने अनेकांनी त्यांची त्यांची आधीची जीवनं फेकून देऊन पूर्णपणं वेगळा रस्ता धरला आहे. कसा होत असेल हा बदल? त्यांच्या करिष्म्यामुळे का? मला वाटतं, त्यांच्या अल्पाक्षरी, पण जगावेगळ्या दृष्टिकोनामुळं असेल.

अभय बंग एक मोतीलाल नेहरूंची गोष्ट सांगतो. ते बडे वकील, अमीर. गांधीजींनी जाहीर केलेला दांडीचा मिठाचा सत्याग्रह त्यांना हास्यास्पद वाटला. एवढं मोठं ब्रिटिश साम्राज्य. या मूठभर मीठ करण्यानं त्यांच्यात काय फरक पडणार? त्यांनी गांधीजींना या व्यर्थपणाविषयी लांबलचक पत्र लिहिलं. गांधीजींची तार आली, ‘करके देखो.’

त्या दिवशी अलाहाबादमध्ये या सत्याग्रहाला पाठिंबा देणारी सभा होती. ‘म्हातारा म्हणतोय तर जाऊ सभेला.’ तसं जाहीर होताच सभेला जाण्यापूवीर्च त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी पोलिसांना विनंती करून गांधीजींना तार केली. ‘करनेसे पहलेही देख लिया.’ जवाहरलाल, वल्लभभाई आणि कितीक गांधीजींच्या एका भेटीत पूर्ण बदलून गेल्याची उदाहरणं आहेत. काय होतं त्यांच्यात? काटकुळा, उघडा कृश देह, पडक्या दातांचं हास्य.

पडके दात वार्धक्यामुळे पडले नव्हते, तर दक्षिण आफ्रिकेत गोऱ्यांविरुद्ध लढा उभारला असताना एका गोऱ्या आणि एका पठाण तरुणाकडून बेदम मारहाणीत पाडले गेले होते. नंतर हे दृश्य पाहणाऱ्या एका गोऱ्या महिलेनं त्यांना हॉस्पिटलात दाखल केलं. तिथे हिंदी समाजाचे लोक जमले. त्या तरुणांवर पोलिस कंप्लेट करूयात, त्यांना जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे, असं लोक म्हणू लागताच त्याही अवस्थेत गांधीजी म्हणाले, ‘चळवळ करताना वैयक्तिक त्रास होतो. त्याबद्दल मी तक्रार करणार नाही. चळवळीत सर्वांवर होणाऱ्या अत्याचाराची आपण जरूर दाद मागू’ म्हणून पोलिस तक्रार केली नाही. नाहीतर त्या मुलांना नक्कीच शिक्षा होऊ शकली असती. गांधीजींचं हे वेगळेपण. नंतर त्या मुलांनी येऊन गांधीजींकडे क्षमायाचना केली.

गांधीजींकडं हे शहाणपण, वेगळेपण उपजत होतं का? की कुठला तरी साक्षात्काराचा क्षण होता? त्यांना सत्याग्रह हे तंत्र कधी सापडलं?

गांधीजींचं तंत्र घडलं ते दक्षिण आफ्रिकेत. माझी समजूत ते तिथं दोन/चार वर्षं असतील एकूण. पण तिथं ते 21 वर्षं होते. तिथं ज्या खटल्यात त्यांना तिथल्या वकिलाच्या मदतीला पाठवलं होतं, तिथं दुसऱ्या पाटीर्ला भेटून त्यांनी कोर्टाबाहेर तडजोड घडवून आणली. जी बाजू सत्य असेल, त्यांचेच वकीलपत्र घेत. त्यामुळे कमाई कमी. म्हणून गरजा कमी केल्या. जाती-धर्मांमध्ये विखुरलेल्या हिंदी समाजाला एकत्र आणून लढा उभारला.

पण असं त्यांना करावंसं नेमकं कधी वाटलं?

दोन घटना फार हृद्य आहेत.

नाताळला तिकीट असतानाही गोऱ्यांनी त्यांना र्फस्ट क्लासमधून प्लॅटफॉर्मवर सामानासहित फेकून दिलं. ही घटना खूप आधीपासून माहीत होती; पण पुढचं वाचलं तेव्हा निराळा बोध झाला. रात्रीच्या वेळी, कडाक्याच्या थंडीत तिथल्या वेटिंग रूममध्ये गांधीजी रात्रभर बसून राहिले. जवळचं सामान उघडून स्वेटर, शाल, पांघरूण काढता येणं शक्य होतं; पण तसं केलं नाही. रात्रभर काय विचार केला असेल त्यांनी? कदाचित इथे अन्यायाचा प्रतिकार करण्याचा निश्चय झाला असेल. कदाचित सत्याग्रह ही कल्पनाही सुचली असेल; पण त्या रात्रीनंतर ते आमूलाग्र बदलले, हे साऱ्यांच्याच लक्षात आलं.

दुसरी घटना त्यानंतरची.

घोडागाडीत-व्हिक्टोरियात बसले असताना गोरा सोजिर आला. त्यानं, मला आत बसू दे, तू घोडागाडी चालवणाऱ्या कोचमनच्या शेजारी बस, असं सांगितलं. ते गांधींनी मान्य केलं. तसं पुढं जाऊन बसलेही. काही वेळानं गोऱ्याला कोचमनशेजारी बसून सिगरेट पिण्याची लहर आली. तो परत गांधींना उठायला सांगू लागला. गांधींनी त्याला नकार दिला. त्यानं आणि कोचमननं गांधीजींना बडव बडव बडवलं. गांधीजींनी बाजूची पितळी दांडी घट्ट धरून ठेवली, ती सोडली नाही. शेवटी त्या दोघांनी तो नाद सोडून दिला.

ती पकडलेली दांडी, हा सत्याग्रहाचा जन्म असावा. मी प्रतिकार करणार नाही, पण दांडीही सोडणार नाही. सविनय कायदेभंगाच्या या तंत्रापुढं नंतर ब्रिटिश साम्राज्यही डळमळलं, एवढी या साध्या सोप्या तंत्रात ताकद होती. हे तंत्र गांधीजींनी ‘थोरो’कडून घेतलं का? थोरो हा एक पिढी आधीचा. थोरोच्या मृत्यूनंतर गांधीजींचा जन्म झालाय. अमेरिकेतला तत्त्वज्ञ हेन्री डेविड थोरो याचं वॉल्डन (मराठीत दुर्गा भागवतांनी भाषांतर केलेलं ‘वॉल्डनकाठी विचार विहार’) हे पुस्तक वाचल्यावर मी कॉलेजात असताना झपाटून गेलो होतो. शहरातील कृत्रिमतेला कंटाळून तो वॉल्डन तळ्याकाठी राहू लागला. स्वत:च्या हातानं झोपडी बनवली. तो लिहितो, ‘आपण आपलं घर बनवायचा आनंद सुताराला का देतो, हे कळत नाही.’ (खरं तर त्यालाही तो मिळत नाही) आसपासच्या जमिनीत धान्य उधळून, खतपाणी, मशागत न करता येईल त्या धान्यावर, फळांवर गुजराण करू लागला. त्याचे निबंध वाचण्यासारखे आहेत. ‘रविवार’, ‘फिरणे’ यातच सिव्हिल डिसओबिडियन्स हाही आहे. म्हणजेच सविनय कायदेभंग. या अन्यायी सरकारला कर भरणं, म्हणजेही त्या अन्यायात सहभागी होणं; म्हणून कर भरणार नाही, अशी भूमिका घेतली आणि त्यासाठी शिक्षा भोगायला तयार आहे, असंही म्हटलं. सरकारने त्याला अल्पकाळ तुरुंगातही टाकलं. जॉन रस्किनच्या ‘अनटू दि लास्ट’ या पुस्तकाप्रमाणंच थोरोविषयी त्यांनी वाचलं होतं का? माहीत नाही; पण शक्य आहे.

गांधीजींच्या साध्या राहणीची सुरुवात आफ्रिकेत झाली. ती पुढं त्यांनी आणखीनच साधी केली. ओरिसात एक दरिदी स्त्री पाहिली. तिच्यापाशी एकच पातळ विरलेलं वस्त्र होतं. त्यामुळं ती परत परत तेच घालत असे. हे पाहून गांधीजींचे मन कळवळले. त्यांनी टोपी आणि अंगरख्याचा त्याग केला आणि पंचावर राहू लागले. मग ते कुठेही असोत; कोणाला, अगदी व्हॉइसरॉयला भेटायला जायचे असो. ते नुसते गांधी नव्हते, तर भारतातल्या गरीब माणसाचं प्रतीक होते. ते सतत काही शोधत होते. या देशाला परवडेल अशा जीवनपद्धतीचा शोध घेत होते. ती आधी स्वत: जगून पाहत होते.

आज ‘साधी राहणी’च्या बरोबर उलट्या दिशेने आपण चाललो आहोत. त्यातनं काय निष्पन्न होतंय? निसर्गाची भयानक लूट आणि त्यातून होणारं कायमचं नुकसान, प्रचंड कचरानिमिर्ती आणि त्यातून जीवसृष्टीला होणारा धोका, पृथ्वीचं वाढतं तापमान आणि त्यातून विरघळणारे ध्रुव आणि त्यातून पाण्याखाली जाणारी बेटं आणि बंदरं… त्यापेक्षा गांधी काय सांगत होते, ते ऐकले असते तर? खेड्यातलं अन्न, कापूस, दूध खेड्यातच वापरा. काही गरजा शेजारच्या खेड्याकडून भागवा. गाव स्वच्छ ठेवा. मैल्यातून, शेणातून खत निर्माण करा. गायी, बैल जोपासून गोधन वाढवा. सृष्टी, प्राणी यासहित चांगले जीवन जगा… यात थट्टा करण्याजोगं काय होतं? आज कोल्हापूर भागातलं दूध टँकरमधून मुंबईला पाठवण्यात सृष्टीवर किती ताण देतोय आपण? बहुसंख्य प्रश्न शहरांच्या बेसुमार वाढीमुळंच निर्माण झाले आहेत. खेडी भकास झाली. तिथले कारागीर डुबले आणि शहरात येऊन काय मिळालं? तर झोपडपट्टी, प्रदूषित जीवन. आता तर कामगारांची गरज नसलेल्या कारखान्यांमुळं बेकारीही. परत परत गांधीजी आता अधिक बरोबर ठरताहेत.

गांधीजींकडून आणखी एक गोष्ट मला नेहमी शिकावीशी वाटते. गांधी सिनेमात एक दृश्य आहे (आणि ते अनेकांनी लिहूनही ठेवले आहे.) नेहरू, पटेल आदी मंडळींची महत्त्वाच्या विषयावर बैठक चालू असते. गांधीजी एकदम उठतात. सगळे आश्चर्यानं पाहू लागतात. ते म्हणतात, ‘माझ्या बकरीला चारा घालायची वेळ झाली.’ सगळ्यांच्या चेहेऱ्यावर वैताग, काय हे खूळ असा भाव. मला हा प्रसंग फार ठसला. देशाचा कारभार करणं हा जसा जीवनाचा भाग आहे, तसा बकरीला चारा घालणं हाही.

दुसरा प्रसंग. मी एका डॉक्युमेंटरीत पाहिलेला. गांधीजी दिल्लीतल्या व्हॉइसरॉय हाऊसवर बोलणी करायला गेलेले. बोलणी संपवून रात्री उशिरा घरी परत निघतात. ते ‘हरिजन वस्ती’मध्ये उतरलेले. व्हॉइसरॉयनी दिलेली गाडी नाकारून शांतपणं मोकळा रस्ता चालताना दिसतात. इकडे त्या बोलण्यातून काय निष्पन्न झाले, याविषयी त्यांचे सहकारी, पत्रकार थांबलेले; पण गांधीजी काही मैल एकटे चालत गेले. ते त्या चळवळीच्या गतीच्या वावटळीत. कधी भिरभिरले नाहीत, कधी उडून गेले नाहीत. ते आपल्या गतीनं चालत राहिले. ते असामान्य असले तरी त्यांनी आपल्यातलं सामान्यत्व जपलं. म्हणून सामान्य माणसांना ते आपले वाटले असले पाहिजेत.

गांधीजींच्या चळवळीत खूप माणसे घडली. काही स्वातंत्र्य चळवळीत होती, काही विधायक, तर काही दोन्हीतही. गांधीजींनी कुणाला गोशाळा काढायला सांगितलं, तर कुणाला निसगोर्पचार आश्रम; कुणाला शौचालयावर संशोधन, तर आणखी कुणाला आणखी काही आणि ही माणसं बिनतक्रार आयुष्यभर त्या कामात राहिली. त्या माणसांचीही आपापली वैशिष्ट्ये सांभाळून. कुडाळचे अप्पा पटवर्धन हे असेच विलक्षण व्यक्तित्व. त्यांचं ‘माझी जीवनयात्रा’ हे आत्मचरित्र वाचलं आणि चकित झालो. तुरुंगात त्यांनी भंगीकाम पाहिलं. स्वत: करायची तयारी दाखवली; पण तुरुंगाधिकाऱ्यानं परवानगी दिली नाही. कुडाळमध्ये परत आल्यावर बादली- खराटा घेऊन सक्काळी भंग्यांमध्ये (आता आपण त्यांना मेहतर म्हणतो) मिसळले. पुढं त्यांनी अनेक प्रयोग केले. चराचे संडास, सोपा संडास… इ. आज बिंदेश्वरी पाठकांनी भारतभर बांधलेली सुलभ शौचालये हा अप्पांचा सोपा संडासचीच जवळची आवृत्ती. नाशिकजवळ गंगापूरला भाऊ नावरेकरांनी हेच काम पुढं चालू ठेवलं. आता त्यांची मुलं काम करीत आहेत. त्यांनी बायोगॅसचा सुटसुटीत प्लँट तयार केला आहे आणि जागोजाग जाऊन तो ते करून देतात. तोडणकर गुरुजीही असेच संडास या समस्येला वाहिलेले. संडास ही काय प्रतिष्ठितपणं उच्चारायची गोष्ट झाली? त्याकडं डोळेझाक करीतच आपण ती समस्या आणखी वाढवून ठेवली आहे. खेड्यापाड्यात स्त्रियांनी पहाटे किंवा रात्री उशिरा गटानं जाऊन बाहेर रस्त्याकडेला बसावं आणि गाडीचा प्रकाश पडला की उभं रहावं… किती लाजिरवाणी अवस्था. शेतं गावाला खेटायला आली आणि अशा जागा नष्ट झाल्या. शहरात त्यापेक्षा वाईट अवस्था. मागे पंचगंगा या कोल्हापूरच्या नदीची पाहणी केली होती. गावातलं बहुतेक सर्व ड्रेनेज कुठल्याही प्रक्रियेशिवाय पंचगंगेत सोडलेलं. पुढची गावं तेच पाणी पितात. आज बहुतेक सगळ्या नद्यांची गटारं करून टाकलीत आम्ही. मैला हे उत्तम खत देतं, स्वयंपाकाला इंधन देतं. ते न घेता त्याची महाभयानक समस्या करून बसलोय. गांधींची थट्टा करू शकता; पण मग या समस्याही सोडवून दाखवाव्यात.

मी ‘साधना’ साप्ताहिकात काम करताना अनेक गांधी परंपरेतल्या लोकांशी संबंध आला. आचार्य भागवत यायचे. ते गेल्यावर मी त्यांच्यावर विशेषांक काढला होता. दादा धर्माधिकारींशीही स्नेह जमला. त्यांचे व्यवस्थित, पूर्वग्रहविरहित विचार मला फार आवडायचे. ‘स्त्री-मुक्ती’वरचे त्या वृद्धाचे विचार इतके पुढचे, की आम्हालाही न झेपणारे. बाबा आमट्यांच्या ‘ज्वाला आणि फुले’, ‘वर्कर्स युनिव्हसिर्टी’ या पुस्तकांनी असेच भारलेले. सोमनाथ शिबिरात एका सवोर्दयी वृद्धानं मला वळकटी बांधायला शिकवलं होतं. त्यांची पांढरट जाड सतरंजी गुंडाळलेली ती खास सवोर्दयी गठडी होती. कुणी माणसं शिक्षणक्षेत्रात होती. ‘नई तालीम’ ही र्वध्याची शाळा म्हणजे मुक्त शिक्षणाची आद्य शाळाच.

गांधी परंपरेतला फसलेला प्रयोग म्हणजे भूदान, असं मी समजायचो. विनोबांची यात्रा पुढं गेली की, दान केलेली जमीन मालक परत घ्यायचे… वगैरे. पुण्याला धनंजयराव गाडगीळांचे भाषण होते. ते मार्क्स प्रवाहातले अर्थशास्त्रज्ञ समजले जात. ते केंद सरकारत प्लॅनिंग कमिशनचे अध्यक्षही होते. ते म्हणाले, ‘भारतातल्या समस्या सोडवण्यासाठी आपण जगाकडं पाहतो. साम्यवाद, समाजवाद असे काही मार्ग आहेत. भारतीय परिस्थितीवर भारतातून निघालेले एकमेव उत्तर म्हणजे भूदान चळवळ होय. ती भले अशयस्वी ठरेना का; पण जगाला आथिर्क प्रश्ानवरचा भारतातून पुढं अलेला हा एकमेव उपाय आहे.’ तेव्हा मी चमकलोच होतो.

मी साधनेचा संपादक असताना स्वातंत्र्य मिळून 25 वर्षं पूर्ण झाली होती. सगळीकडे 25 वर्षांत आम्ही काय मिळवलं, तर भाक्रानान्गलसारखी धरणं, भिलाई वगैरे कारखाने असे फोटो येत. गांधीजींचं एक वाक्य मी वाचलं होतं, ‘देशाच्या प्रगतीचा निकष एकच, की ती प्रगती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचली आहे की नाही, हा!’ त्याला ते अंत्योदय म्हणत. म्हणून मी तो विशेषांक दलितांनीच लिहावा, त्यांना या देशाविषयी काय वाटतं हे त्यांनी निर्भयपणं लिहावं, असं आवाहन करून तो अंक छापला; पण ते कटू सत्य कित्येकांना पचलं नाही आणि गदारोळ झाला. अंकाचं दहन झालं. माझी आणि यदुनाथजींची प्रेतयात्रा काढून त्याचंही दहन झालं. (माझ्या प्रेतयात्रेबरोबर मीही चालत होतो!) आज वरच्या वर्गाची, उच्च मध्यमवर्गाची स्थिती सुधारतेय. त्यांच्या आकर्षक कॉलनीज्, त्यांच्यासाठी उत्तम शाळा, भव्य हॉटेल-रेस्टारंट्स उभी रहात आहेत. त्याला आम्ही प्रगती समजतोय; पण खाली गाडली गेलेली, चेपली गेलेली माणसं? कर्जबाजारी शेतकऱ्यांचे गळफास! आपण खालच्या माणसापासून सुरुवात केली असती, तर एवढी झकपक नसती दिसली; पण माणसं चार घास सुखानं खाऊ शकली असती. गांधीजींचा आधुनिकतेला विरोध नव्हता; पण माणसांना सुखी करणारा समाज महत्त्वाचा. त्याला अनुरूप आधुनिकता त्यांना मान्य होती. आजची कामगारविरहित कारखानदारी त्यांनी कधीच मान्य केली नसती. शूमाखरचं ‘स्मॉल इज ब्यूटिफूल’ इथं आठवलं. गांधीजींचा अवाढव्यतेला विरोध होता; कारण त्याखाली सर्वसामान्य माणसं चिरडून जातात म्हणून.

काही वेळा चर्चा सुरू होते, की ‘स्वातंत्र्य कोणी मिळवलं?’ मला वाटतं, अनेकांनी. 1857च्या लढ्यापासून तो गांधीप्रणीत चळवळीपर्यंत. पण भारतातल्या सर्वसामान्य माणसांपर्यंत स्वातंत्र्याची इच्छा कोणी निर्माण केली, या प्रश्ानला मात्र एकच उत्तर मी देईन, गांधीजी. भारतव्यापी, सर्व थरांमध्ये प्रभाव टाकलेली ही एकच व्यक्ती. बाकीच्यांची वर्तुळं लहान आहेत.

गांधीजींचा प्रभाव जगावर होता, हे 2000 साली ‘मिलिनियम’वर प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची निवड सुरू झाल्यावर कळलं. लेखक, नेते, शास्त्रज्ञ, कलावंत सगळी नावं मागं पडली, आणि दोन उरली. एक आइनस्टाईन आणि दुसरे गांधीजी. त्यात आइनस्टाईनला जास्त मतं पडली आणि ते सर्वात प्रभाव पाडणारी व्यक्ती ठरले. पण गांधीहत्या झाल्यावर आइनस्टाईन काय म्हणाला होता, माहीत आहे? तो म्हणाला की, ‘गांधींसारखी महान व्यक्ती कधी काळी जन्मली होती आणि या भूतलावर चालली होती, हे पुढच्या पिढ्यांना खरं वाटणार नाही.’ (लॉर्ड माऊंटबॅटन हे शेवटचे व्हाइसरॉय आणि ब्रिटिश राजघराण्यातील. त्यांनी म्हटलं आहे, ‘इतिहासाच्या पानावर गांधीजींचं नाव ख्रिस्त आणि बुद्ध यांच्या बरोबरीनं लिहिलं जाईल.)

माटिर्न ल्यूथर किंग या कृष्णवणिर्यांच्या नेत्याचं चरित्र वाचताना त्यानं गांधीजींविषयी जागोजाग कृतज्ञता व्यक्त केल्याचं दिसलं. पुस्तकाच्या फोटो विभागात त्याच्या खोलीत त्याच्या मागे गांधीजींचा फोटो लावलेला होता. अमेरिकेसारख्या पिस्तुलगच्च देशात, त्यातही कृष्णवणीर्य समाजात अहिंसक चळवळ रुजवण्याचं काम तो करू शकला, हे गांधी-विचाराचं यश. कॅलिफोनिर्यामध्ये असलेल्या मेक्सिकन मजुरांचा नेता सीझर शॅवेझ असाच. अहिंसक चळवळी तर करायचाच; पण प्रश्ान् तडीला लावण्यासाठी गांधीजींसारखी वीस-वीस दिवसांची उपोषणे करायचा. त्याच्याही खोलीत गांधीजींचा फोटो. माटिर्न ल्यूथर किंग आणि सीझर शॅवेझ यांचा प्रभाव इतर हिंसक चळवळींपेक्षा जास्त टिकून राहिलाय आणि त्यांनी मनं जोडण्याचं अपूर्व काम केलंय.

मधू लिमयांबरोबर उत्तर प्रदेशात प्रवास करताना त्यांच्याशी खूप गप्पा व्हायच्या. गांधीहत्या झाली, तेव्हा ते दूर युरोपातल्या कुठल्या छोट्या देशात होते. रेडिओवर ही बातमी ऐकून विमनस्क होऊन रस्तोरस्ती भटकत होते. एका प्रौढ माणसानं त्यांना थांबवलं. विचारलं, ‘तुम्ही भारतीय का?’ हे ‘हो’ म्हणताच त्या गृहस्थांनी यांचे खांदे गदा गदा हवलत म्हटलं, ‘व्हाय डिड यू किल् गांधी? तुम्ही काय समजता, गांधी काय फक्त तुमचेच होते?’

हे ऐकून मी शहारलोच. त्या जगाच्या पाठीवरच्या कुठल्या देशातल्या माणसाला गांधीजी ‘त्याचे’ वाटावेत आणि आम्ही त्यांना ओळखू नये?

आणखी एका गोष्टीचं मला प्रचंड आश्चर्य वाटतं. इतक्या वर्षांच्या अविश्रांत लढ्यानंतर, अनेकदा भोगलेल्या तुरुंगवासानंतर स्वराज्य मिळालं. अशा कार्यक्रमाचे नायक कोण असायला हवे होते? तर गांधीजी; पण त्यांना नोआखालीत उसळलेल्या दंगली शांत करण्याचं काम महत्त्वाचं वाटलं आणि या सोनेरी क्षणाकडं त्यांनी पाठ फिरवली. आज काहीजण फाळणीला गांधीजींना जबाबदार धरतात. हेही जगातलं महान आश्चर्यच मानायला हवं. त्यांनी फाळणी होऊ नये, म्हणून जिवाचं रान केलं; पण शेवटी त्यांच्या शिष्यांनी- पंडित नेहरू आणि लोहपुरुष वल्लभभाई पटेलांनी- गांधीजींना बाजूला सारून फाळणी मान्य केली.

पंचावन्न कोटींबाबतही तसेच. त्या करारात भारताने ते द्यायचे मान्य केले होते. तर ते वचन आहे, आणि ते पाळा, असे गांधींनी म्हटले; तर ते फाळणीचे गुन्हेगार ठरतात! दंगलीचे डोंब उसळलेले असताना, सर्वत्र लाल कारंजी उडत असताना गांधीजी एकटेच असे की जे तिथे जाऊ शकले आणि त्यांचे आतले बळही असे, की त्यांच्या अस्तित्वाने दोन-तीन दिवसांत दंगल शांत झाली. ज्यावेळी त्यांचे शिष्य स्वराज्यातले पहिले झेंडावंदन करीत होते, त्यावेळी गांधीजी सामान्यांचे अश्रू पुसत होते. त्यांना स्वराज्यापेक्षाही माणुसकीचा धर्म मोठा वाटत होता.

माझ्यावर गांधीजींचे वेगळेच उपकार आहेत.

त्यांची ‘आत्मकथा’ वाचताना लहानपणी त्यांनी सोन्याच्या कड्याचा तुकडा चोरून विकला होता. बाहेर मांसाहारही केला होता. मीही लहानपणी घरातल्या कपाटाल्या काही नाण्यांच्या चोऱ्या केल्या आहेत. त्याची खंत अजूनही वाटत असते. त्यातून सिगारेट ओढायला शिकलो. पुढं ते सगळं वाहून गेलं, म्हणून योगायोगाने वाचलो. गांधीजींना चोरी केल्याचा पश्चाताप झाला आणि स्वत: होऊन वडलांपाशी जाऊन गुन्हा कबूल केला तो यांच्या आणि वडलांच्या अश्रूत वाहून गेला. हे वाचून मी शहारलो. गांधी आपल्यासारखेच चुका करणारे होते; पण मग ते ‘गांधीजी’ कसे झाले? तर स्वत:मधल्या चुकांकडे स्वत:च परखडपणे पाहाणं, आणि दुरुस्त करायचा प्रयत्न करणं, ही स्वत:स सतत शुद्ध ठेवण्याची प्रक्रिया त्यांनी लहानपणापासून चालू ठेवली. म्हणून ते विश्वव्यापी झाले. आपण तसे करू या का? त्या काळात मी धामिर्क मार्गात होतो. ध्यान करायचो. निविर्चार होण्याची वाट पाहण्यापेक्षा मी दिवस समोर आणू लागलो. मला काही गांधीजी व्हायचे नव्हते. फक्त कालच्यापेक्षा आज चांगला माणूस व्हायचं होतं. हे जेव्हा सुरू केलं, तेव्हा लक्षात आलं, की आपण दिवसाकाठी बऱ्याच चुका करतोय. माझ्यामधल्या अहंकाराचं तर कधी कावेबाजपणाचं, कधी उथळपणाचं, तर कधी इतरांवर इंप्रेशन मारणाऱ्या स्वभावाचं दर्शन होऊ लागलं. ज्या व्यक्तींना माझ्याकडनं त्रास झाला असेल, तर नंतर त्याच्याकडे जाऊन कधी माफी मागू लागलो, तर कधी खंत व्यक्त करू लागलो. काही चुका परत परत होताना दिसत. त्या मी ओलांडू शकत नसे; पण त्या चुका आहेत, एवढं तरी मनाला जाणवू लागलं. या प्रक्रियेत अध्यात्म सुटलंच. काय करायचाय मोक्ष आणि जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका? त्यापेक्षा चांगला माणूस किंवा चांगला होऊ इच्छिणारा माणूस म्हणून जगूयात की.

मग हा अनुभव मी इतरांना सांगू लागलो. यासाठी ज्ञानाची, शिक्षणाची, साधनेची काही गरज नाही. प्रत्येक माणूस हे करू शकतो. कधी ना कधी चांगल्या माणसांचा समाज निर्माण होईलही. हे गांधीजींचं माझ्यावरचं ऋण.

या वर्षातच मला र्वध्याला जाण्याचा योग आला. तिथल्या विभा गुप्ताने ‘ग्रामीण तंत्रज्ञान परिषद’ आयोजित केली होती. तिथे जुने गांधीवादी भेटले, तसेच आज खेड्यापाड्यात काम करणारे तरुणही. कोणी बांबू हा विषय घेतलाय, तर कोणी संडास; कोणी शेतीमधले प्रयोग करतंय, तर कोणी तलम खादी काढायचा ध्यास घेतलाय. कुणी जुन्याचं उत्खनन करतोय, तर कोणी जुन्या नव्याचा मेळ घालत बसलाय… असा सगळा पागलखाना.

दांडीयात्रेच्या समाप्तीचा तो दिवस. म्हणून आम्हाला सेवाग्राममधल्या ‘बापू कुटी’ला सक्काळीच नेणार होते. त्यामुळे मी आनंदून गेलो होतो. किती वर्षांनी परत बघणार ती कुटी. माझं इंप्रेशन तसंच रहावं, निदान कमी तरी होऊ नये, असं वाटत होतं. पण त्या परिसरात पाऊल टाकल्यावर मन प्रसन्न झालं, ते अखेरपर्यंत. झाडं-झाडं बरीच आणि मधे मधे बरीच कौलारू, मातीची टुमदार घरं. वर नळीची कौलं. सारवलेल्या मातीचा छान, डोळ्यांना त्रास न देणारा रंग. बाहेर व्हरांडे. त्याला जे खांब उभे केले, ते कुठेही न आकार दिलेले वासे. लाकूड कामास तेलाचा काळा रंग; मातीच्या रंगाला किंचित उठाव देणारा. मोकळ्या परिसरात आम्हा सगळ्यांना बसवलं. आश्रमातल्या लोकांमागोमाग आम्ही ‘आश्रम भजनावली’तल्या प्रार्थना म्हटल्या. तो काळ हळूहळू अंगावर चढू लागला. काय असेल त्यावेळी इथं वातारण. नेहरू, पटेल, आजाद, गफारखान… अशी माणसं इथं कितीदा आली असतील आणि अशीच इथं वावरली असतील. प्रार्थनेलाही बसली असतील. इथल्या प्रत्येक सामान्य माणसामध्ये एका ध्येयामुळं असामान्यत्व संचारलं असेल. चढाओढ असलीच तर ती त्यागाची. समर्पणाला सीमाच नसेल आणि या सगळ्यामागं एक जादूभरलं व्यक्तित्व असेल, गांधीजी.

प्रार्थना संपल्यावर सगळे पांगले.

मी बापू-कुटीकडे निघालो. यावेळी आणखी वैशिष्ट्यं जाणवली. आपल्या भिंती कुडाच्या, मातीने सावरलेल्या होत्या आणि त्या वरून मोकळ्या ठेवल्या होत्या. त्यामुळं सगळं घर वरून एकमेकांशी जोडलं गेलेलं. खालीही तसंच. कुठे सहसा दारं नाहीत. होते ते फक्त आडोसे. अप्रत्यक्ष प्रकाश सर्वत्र झिरपत होता.

गांधीजी बसत, तिथं पुढं डेस्क आणि मागे टेकायला जरा उभा उंच पाट होता. मला खरं तर अशा गोष्टीचं फार अगत्य नाही. परदेशप्रवासात पूवीर्च्या मोठ्या लेखकांची, नेत्यांची घरं दाखवत. ते कुठं बसत, कुठं झोपत, कुठं लिहीत… असं दाखवायचे. वाटायचं, असतील; पण ते नाहीत, तर त्या वस्तूंचं काय एवढं? बाहेर व्हरांड्यात आलो. एका खांबाला टेकून बसलो. बाकीचे माझे मित्र त्या परिसरात हिंडत होते. याही कुटीत कुणी मधूनच येऊन जात होतं. मी बसलो त्या आडोशाआडच गांधीजींची ती बसायची जागा होती.

पिशवीतून कार्ड काढलं, आणि त्यावर पेन्सिलनं कसलं तरी चित्र काढू लागलो. मनातलं झाड हळूहळू वर येत होतं. भोवतीचा विसर पडला. एकदम समोर लक्ष गेलं. गांधीजींची जागा दिसली. भास झाला, की गांधीजी तिथं बसले आहेत आणि हसून मला येण्याची खूण करत आहेत. मला गंमत वाटली. या भासाला मी आपण होऊन चालना दिली. काय होईल पुढं? गांधीजी माझं चित्र पाहतील आणि हसतील छान.

ते पडक्या दातांचं निर्मल हासू…

-अनिल अवचट

शशी थरूर

माझ्या मते भारत हा एक विचार आहे. हा एक देशाचा विचार आहे. एकता येथील संस्कृती आहे. समृद्ध वैविध्य हे या प्रजासत्ताकाचे वैशिष्ट्य आहे.

मी अनेक वर्षांपासून अमेरिकेत आहे आणि या देशाबाबत असे बोलले जाते की तो एखाद्या वितळत्या भांड्यासारखा (मेल्टींग पॉट) आहे. ही संकल्पना पंधराशे वर्षांपूर्वी असती तर भारताला ती अधिक लागू पडली असती. कारण सगळ्या जगभरातील लोक भारतात आले होते. ते येथेच राहिले आणि येथे सर्व प्रकारच्या लोकांचे एक अभिसरण झाले. या समरसतेचेच आपण प्रतिनिधी आहोत.

अमेरिका हे आज वितळते भांडे असेल तर भारत जेवणाचे ताट आहे. कारण या ताटात वेगवेगळ्या प्रकारच्या प्रादेशिक वाट्या ठेवल्या आहेत. या वाट्यात विविध पदार्थ आहेत. या पदार्थांचे एकूण मिळून जे काही मिश्रण आहे, ती भारतीय संस्कृती आहे.

काही लोक म्हणतात, की भारतात जन्माला आलेला तोच भारतीय. कारण त्याच्या ह्रदय आणि आत्म्याला भारतात आकार मिळाला आहे. असे असेल तर मग भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या आणि इंग्लंडमध्ये जन्मलेल्या एनी बेझंट भारतीय नव्हत्या? मक्केमध्ये जन्माला आलेले मौलाना अब्दूल कलाम आझाद भारतीय नव्हते? असे असेल तर मग सोनिया गांधी भारतीय का नाहीत?

वैविध्य आणि वादांचा देश
विस्टन चर्चिल यांनी एकदा म्हटले होते, की भारत एक केवळ भौगोलिक अभिव्यक्ती आहे. त्याचवेळी भारत हा केवळ एक देश नाही, असेही ते म्हटले होते. वास्तविक चर्चिल यांचे भारताविषयीचे मत कधीच चांगले नव्हते. पण इथे त्यांचे म्हणणे खरे आहे. भारत खरोखरच एक असामान्य देश आहे आणि भारताइतकी विविधता आणि वाद एकात एक गुंफलेला दुसरा देशही या जगात नसेल. या देशात भौगोलिक विविधता आहे, स्थानिक वैविध्य, स्थितीतील वैविध्य, हवामानाचे वैविध्य, भाषा, संस्कृती, भोजन या सार्‍यांत वैविध्य आहे. हे सगळे एका देशात गुंफले आहे. आजही राष्ट्रीय पातळीवर झालेल्या आंदोलनांतून विरोधाभास असूनही भारत महान आहे, हेच अधोरेखित झाले आहे.

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या बाबतीत म्हटले होते, की भारत एक मिथक आहे. एक विचार आहे. हा स्वप्न आणि विशिष्ट दृष्टिकोन असणारा देश आहे. आमच्या देशात बर्फाची चादर असलेली शिखरे आणि घनदाट जंगले आहेत. येथे सतरा विविध भाषा बोलल्या जातात. तब्बल बावीस हजार बोली बोलल्या जातात. जगातील हा एकमेव देश असेल जिथे एवढ्या विविधतेतही एकता आहे. आपल्या या देशात दहा लाखाहून अधिक लोक वेगवेगळ्या ३५ भाषा बोलतात. ८० टक्के लोक शेतीवर आधारीत आहेत. जगातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेली शहरेही याच देशात आहेत. गरीबी आणि बेरोजगारीही येथे आहे. पण तरीही एका मोगल सम्राटाने म्हटले होते, की या पृथ्वीवर स्वर्ग कुठे असेल तर तो येथे आहे, येथे आहे, येथे आहे.

भारत असा देश आहे, जिथे आजही ५१ टक्के लोक निरक्षर आहेत. निरक्षरतेचे एवढे प्रमाण असूनही या देशाने प्रशिक्षित इंजिनियर्स व शास्त्रज्ञांची फौज निर्माण केली आहे. यातील अनेक जण अमेरिकेतील संगणक व्यवसायावर राज्य करत आहेत.

गरीबी, मागासपणा आणि इतर अनेक अडचणी असूनही या देशाने इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक अद्ययावत सॉफ्टवेअर तयार केले आहेत. हे सॉफ्टवे्र आज अमेरिकेतील अनेक कंपन्या वापरत आहेत.

भारतात किमान पाच धर्मांचा जन्म झाला आहे. शास्त्रीय नृत्याच्या तीन शैली आहेत. येथे ८५ राजकीय पक्ष आहेत आणि तीनशे पद्धतीने बटाट्याचा वापर स्वयंपाकात केला जातो. मया सगळ्यामुळेच भारत नेमका काय आहे, हे सांगणे, त्याची व्याख्या करणे अवघड आहे.

भारताच्या बाबतीत महात्मा गांधींनी एकदा म्हटले होते, की हा असा देश आहे, की याच भूमीवरून जगात हवा वाहेल. आज वॉलमार्टपासून मायक्रोसॉफ्ट, मॅकडोनाल्डपासून नॅसडॅकची हवा भारताच्या मार्गे वाहत आहे. अमर्त्य सेनपासून लक्ष्मी मित्तल अख्ख्या जगाला हलवत आहेत. आपल्या गुणांनी संपन्न असलेले या भूमीचे पुत्र आज जगभरात आपला व आपल्या देशाचा अमीट ठसा उमटवत आहेत.

(शशी थरूर संयुक्त राष्ट्रसंघात मोठ्या अधिकारपदावर आहेत. ते मान्यवर स्तंभलेखक व कादंबरीकार आहेत. चेन्नईमध्ये भारतीय प्रजासत्ताकाच्या सुवर्ण जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हे भाषण केले होते.)