रोहिणी गवाणकर, सौजन्य – लोकसत्ता
ग्रामीण महिलांनी स्वातंत्र्यलढय़ात सक्रिय सहभाग घेतला होता. विधायक कामांद्वारे तसेच भूमिगतांना मदत करून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली आहे. ६२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्ताने ज्ञात-अज्ञात महिला स्वातंत्र्यसैनिकांचे हे स्मरण..
———————————————————————————————————————————–
१९२१ साली पुणे जिल्ह्यातील मुळशी गावात नीरा व मुळा या नद्यांच्या संगमावर टाटा वीज कंपनी धरण बांधून विजेचा प्रकल्प सुरू करणार होती. या धरणामुळे ५०० चौरस मैलांचे क्षेत्र पाण्याखाली बुडणार होते. त्यात शेतकऱ्यांची उपजाऊ शेतंही पाण्याखाली जाणार होती. १६ एप्रिल १९२१ रोजी सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली मुळशी सत्याग्रहाची सुरुवात झाली. महाराष्ट्रातला हा पहिलाच मोठा सत्याग्रह. या सत्याग्रहात पहिल्यांदाच स्त्रिया सहभागी झाल्या. या सत्याग्रहात ग्रामीण स्त्री प्रथमच रस्त्यावर उतरली.
मुळशीच्या सत्याग्रहाला महात्मा गांधींनी पाठिंबा दिल्यामुळे शेतकऱ्यांना हुरूप आला. हा सत्याग्रह १९२४ पर्यंत चालू होता. ग्रामीण स्त्रिया सत्याग्रहाच्या कल्पनेने भारावून गेल्या होत्या. जाईबाई भोई ही एक निरक्षर बाई. बहुसते हे तिचे गाव. तिने ग्रामीण महिलांना सत्याग्रहासाठी संघटित करून धरणविरोधी सत्याग्रहाचे नेतृत्व केले. कंपनीच्या संरक्षकांनी जाईबाईला जबरदस्त मारहाण केली. इतकेच नव्हे तर तिची अब्रू लुटण्याचाही प्रयत्न केला. एवढे होऊनही जाईबाईने महिलांचा मोर्चा काढला. तिला व तिच्या सहकारी स्त्रियांना तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. सरस्वतीबाई भुस्कुटे हिने तर तान्हे बाळ व म्हातारी सासू यांना घेऊन सत्याग्रह केला. जिथे सुरुंग पेरले होते, त्यावर बसूनच हा सत्याग्रह केला. सर्व सत्याग्रहींना तीन महिन्यांची सक्तमजुरी व पन्नास रुपये दंड व दंड न दिल्यास आणखी तीन महिन्यांची कैद अशी शिक्षा झाली. येरवडा तुरुंगात या सत्याग्रहींचा खूप छळ झाला. पण कुणीही शरणागती पत्करली नाही. भारतात स्त्री-सत्याग्रहींनी अहिंसात्मक मार्गाने दिलेला विसाव्या शतकातील हा पहिलाच लढा. तोही महाराष्ट्रातील ग्रामीण महिलांनी दिला, ही विशेष अभिमानाची गोष्ट.
१९३० मध्ये जंगलचा सत्याग्रह बागलाण- बिळाशी येथे झाले. जेव्हा जेव्हा पोलीस सत्याग्रहींना पकडून नेत, त्या- त्या वेळी स्त्रिया पोलिसांना घेराव घालत. स्त्रियांचा घेराव मोडून काढण्यासाठी पोलीस त्यांच्यावर लाठी चालवीत. चंद्राबाई व तानूबाई बाबर या दोन स्त्रियांनी कराडजवळच्या तांबवे सत्याग्रहाच्या वेळी तर अधिकाऱ्यांची हत्यारेही हिसकावून घेतली. एका रेंजरची बंदूकही त्यांनी काढून घेतली. वनसंरक्षकाच्या लाठय़ाकाठय़ा आपल्या ताब्यात घेतल्या. या त्यांच्या कृत्याबद्दल दोघींनाही सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली.
चरण बिळाशी जंगल सत्याग्रहात सागवान तोडून आणून त्यावर स्त्रियांनी काँग्रेसचा झेंडा फडकवला. या झेंडय़ाभोवती मैनाबाई धनगर, धोंडूबाई मस्कर, राजूताई कदम यांनी कडे करून हा झेंडा पोलिसांना उतरवू दिला नाही. ५ सप्टेंबर १९३० रोजी दस्तुरखुद्द सातारचे कलेक्टर तिथे पोहोचले. राजूताई कदमने ध्वज लावलेल्या सागवानाला घट्ट मिठी मारली. पोलिसांनी तिला प्रचंड मारहाण केली. या सत्याग्रहात ५० स्त्रियांना अटक झाली. त्यात सुलोचना जोशी, धोंडीबाई मटकर, बयना रामगर, मुक्ताबाई साठे यांचा समावेश होता. पैकी सुलोचना जोशी या येरवडय़ाच्या तुरुंगात रक्ताचे जुलाब होऊन मरण पावल्या. कमलाबाई शेडगे या तुरुंगातच बाळंत झाल्या. पण तुरुंगातील हालअपेष्टांमुळे त्यांचे बाळ दगावले. विदर्भातही व्यापक प्रमाणावर जंगल सत्याग्रह झाले. त्यात ओक कुटुंबातील तीन स्त्रियांनी सत्याग्रहात भाग घेतला होता.
१९४० साली पुणे जिल्ह्यात सासवड, इंदापूर, नीरा या गावी स्त्रियांनी उत्स्फूर्तपणे सभा घेऊन युद्धविरोधी भाषणे व घोषणा दिल्या. गांधीजींनी जो वैयक्तिक सत्याग्रह सुरू केला होता, त्यात सत्याग्रहींची निवड गांधीजींनीच केली होती. वैयक्तिक सत्याग्रह सर्वाना खुला करावा, अशी मागणी पुणे जिल्ह्यातून व इतरही ठिकाणाहून होऊ लागली. गांधीजींच्या आदेशाची वाटही न बघता ठिकठिकाणी स्त्रिया युद्धविरोधी भाषणे देऊन घोषणा देऊ लागल्या. अनेक ठिकाणी असे उत्स्फूर्त सत्याग्रह झाले. त्यात दुर्गाबाई जोग, तानूबाई मोगी, अंबूबाई भोसले, लक्ष्मी वैद्य यांना शिक्षाही झाल्या. अहमदनगर व सातारा जिल्हा, ठाणे, पूर्व तसेच पश्चिम खानदेशमधील ग्रामीण स्त्रियांनी उत्स्फूर्त सत्याग्रह केले. त्यातील बहुतेक सर्वानाच ३ ते ६ महिन्यांची शिक्षा झाली.
१९४२ च्या चले जाव आंदोलनापर्यंत निरनिराळ्या आंदोलनांतील सहभागामुळे ग्रामीण महिलांनाही राजकीय जाणीव झालेली दिसते. मुळशी सत्याग्रह, जंगल सत्याग्रह, झेंडा सत्याग्रह व उत्स्फूर्तपणे केलेले वैयक्तिक सत्याग्रह या सर्वात दलित स्त्रियाही होत्या. दलितांच्या उद्धाराकरिता अथक प्रयत्न करणाऱ्या मालवणच्या म्हाळसाबाई भांडारकर, नगरच्या जानकीबाई आपटे यांनी दलित स्त्रियांनाही गांधीजींच्या चळवळीच्या मार्गावर आणून सोडले. ग्रामविकास, सूतकताई, हरिजन वस्तीतील कार्य, खादीची विक्री इत्यादी कार्यातही ग्रामीण स्त्रीचा मोठाच हातभार होता. फैजपूर काँग्रेस अधिवेशनात ग्रामीण स्त्रिया स्वयंसेविका होत्या. या अधिवेशनातली प्रदर्शने स्त्रियांनीच मांडली होती. त्यात त्यांनी खादी व कुटीरोद्योगातील वस्तूंची विक्री केली. डॉ. उत्तमराव पाटील यांची आई (अभिनेत्री कै. स्मिता पाटीलची आजी) या अधिवेशनापासून काँग्रेसच्या कामात सक्रिय झाली. त्यांना मार्शल लॉ तोडल्याबद्दल १९४१ मध्ये नऊ महिन्यांचा तुरुंगवास झाला. पुढे १९४२ सालीही तुरुंगवास घडला. परंतु बऱ्याच आजारी पडल्याने त्यांना सोडण्यात आले. भूमिगत मुले व सून यांच्याशी त्यांची अखेर दृष्टिभेटही झाली नाही.
१९४२ च्या लढय़ात उल्लेखनीय कामगिरी बजावली सातारा जिल्ह्य़ातील ग्रामीण महिलांनी. साताऱ्यात पत्री सरकारचे दोन गट होते. वाळवे गट व कुंडल गट. ही नावे त्या- त्या गावांवरून पडली होती. दोन्ही गटांचे काम एकच होते. वाळवे गटात राजमती बिरनाळे ऊर्फ जैनाची ताई हिने वाळवे तालुक्यातील दरोडेखोरांनाही धडा शिकवला होता. जैनाची ताई बंदूक चालवे. धुळे खजिना लुटीशीही तिचा प्रत्यक्ष संबंध होता. कुंडल गटाने तुफान सेना नावाची सेना तयार केली होती, तर वाळवे गटाने आझाद हिंद फौजेतील दोन जवान प्रशिक्षक म्हणून नेमून आझाद हिंद सेना तयार केली होती. लीला पाटील (डॉ. उत्तमराव पाटील यांची पत्नी) यांना घातपाती कृत्याबद्दल साडेसात वर्षांची शिक्षा झाली होती. पण येरवडय़ाच्या तुरुंगातून त्यांनी पलायन केले. गर्भवतीचा वेश घेऊन त्या खऱ्या बाळंतिणीसोबत पत्री सरकारच्या हद्दीत पोहोचल्या. लीला पाटील या तुफान सेनेत कॅप्टनच्या हुद्दय़ावर होत्या. त्यांनी ग्रामीण महिलांना संघटित केले. या महिलांनी बंदुका चालविण्याचे शिक्षण घेतले. भूमिगतांना अन्न व स्फोटक साहित्य पोहोचविणे, प्रसंगी त्यांना आश्रय देऊन लपविणे, ही कामे त्या करीत. भूमिगतांना मदत केल्याबद्दल अनेकींना सहा महिन्यांपर्यंत शिक्षाही झाली. याच आरोपावरून सांगलीजवळच्या गावातील सीताबाई माळी व कोल्हापूरची काशीबाई हणबर आणि नागनाथ नायकवडींची आई यांचा पोलिसांनी अमानुष छळ केला. नाना पाटील यांच्या एका भाषणात ते म्हणाले होते की, ‘आमच्या आया-बहिणींनी प्राणांची बाजी लावून आम्हाला लपविले, जो भाकरतुकडा दिला, ती आमच्या चळवळीला मोठी देन होय. त्यांचे हे ऋण फार मोठे आहे.’ नानांचे हे विधान पत्री सरकारमधील स्त्रियांच्या कामाचे मोल कळायला पुरेसे आहे.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. पण गोवा व मराठवाडा स्वतंत्र झाले नव्हते. हैदराबादच्या निजामाने दमनाचा कहर चालवला होता. हैदराबाद संस्थान स्वतंत्र करून भारतीय संघराज्यात सामील झाले पाहिजे, या मागणीसाठी जी चळवळ झाली, तोच हैदराबाद मुक्तीसंग्राम होय. मराठवाडा मुक्तीसंग्रामात ग्रामीण महिलांनी मोठे कार्य केले. मराठवाडा हा तसा मागासच भाग. तिथल्या समाजजीवनावर निजामी राज्यकर्त्यांची भाषा, राहणी व संस्कृतीचा थोडाफार परिणाम होताच. बायका तर घराचा उंबरठा ओलांडणेही कठीण. अशा परिस्थितीत तिथल्या स्त्रियांना एकत्र आणून त्यांच्याकडून दारूगोळ्यांची ने-आण करणे, मुक्तीसंग्रामातील त्यांच्या कार्याचे महत्त्व पटवून देणे यासाठी श्री. रं. देशपांडे तथा एस. आर. गुरुजी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या त्यांच्या कार्याबद्दल मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर त्यांना ‘मराठवाडय़ाचे कर्वे’ हा बहुमानाचा किताब मिळाला. मुक्तीसंग्रामात स्त्रियांच्या गटसभा घेणे, मिरवणुका काढणे, सत्याग्रहींची व्यवस्था करणे, बॉम्ब ठेवण्याच्या जागी टेहळणी करणे इत्यादी कामे त्यांनी केली. सेलूच्या गीताबाई चारठाणकर या सीमेवरून शस्त्रास्त्रे आणण्यात पटाईत होत्या. आशाताई वाघमारे याही भिंगरीसारख्या खेडय़ापाडय़ांत हिंडत. मराठवाडा मुक्तीसंग्रामातील कार्याबद्दल दगडाबाई देवराव पाटील धोपटेश्वरकर हिला ‘वीर महिला’ हा किताब मिळाला. ती होमगार्डच्या वेशात फिरे. ती जवळ जंबिया बाळगत असे. तिने खेडुत स्त्रियांचे संघटन केले. १५ ऑगस्ट १९४७ ला गावातल्या प्रत्येक घरावर तिने तिरंगा फडकवला होता. तिचे हे काम मराठवाडा स्वतंत्र होईतो सुरूच होते. त्यामुळे सरकारी अधिकारी हात धुऊन तिच्या मागे लागले. तिने सीमेवरच्या एका खेडय़ात स्थलांतर केले व तिथून तिने निजाम हद्दीत शिरून पोलीस चौक्या जाळणे, सरकारी जंगले जाळणे असे उद्योग करून निजाम सरकारला जेरीस आणले. लाडसवंगी येथे लोक व रझाकार यांच्यात लढाई जुंपली. रझाकारांनी ६०-७० जणांना एका खोलीत अन्नपाण्याविना कोंडून ठेवले. दगडाबाईने गौळणीच्या वेशात रात्रीच्या वेळी लाडसवंगी ते औरंगाबाद हे २५ मैलांचे अंतर पायी चालून औरंगाबादच्या ठाण्यावर तक्रार नोंदविली. त्यानंतर सरकारी चक्रे फिरली व दोन-तीन तासांतच कैदी सुटले. स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेण्यात संसाराची अडचण होते म्हणून या स्त्रीने स्वत:च आपल्या नवऱ्याला दुसरा संसार थाटून दिला. या लढय़ात पुंजाबाई बुजरी, पोसनाबाई राजलिंग, गंगाबाई लक्ष्मण, बाळूबाई पानसरे, लक्ष्मीबाई मयेकर व गोदावरी रेळे या स्त्रिया हुतात्मा झाल्या.
अशा प्रकारे स्वातंत्र्यलढय़ात महाराष्ट्राप्रमाणेच देशभरातील ग्रामीण स्त्रियांनी सक्रिय सहभाग घेतला होता. इतिहासतज्ज्ञ आर. सी. मुजुमदार यांनी स्वातंत्र्यलढय़ातील स्त्रियांच्या सहभागावर फारसा प्रकाशझोत टाकलेला नाही. परंतु कुणी कौतुक केले नाही तरी इतिहास हा इतिहासच राहणार आहे. आज ना उद्या या स्त्रियांच्या कार्यावरही अभ्यासक संशोधन करतील अशी आशा आहे. ६२ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त या ज्ञात-अज्ञात स्त्री-स्वातंत्र्यसैनिकांना प्रणाम!