‘पिपांत मेले’ मत-मतांतरे

Posted: डिसेंबर 8, 2009 in सामाजिक

सौजन्य – लोकसत्ता

मर्ढेकरांच्या ‘पिपांत मेले’ या कवितेने आजवर चर्चेचा एवढा प्रचंड धुरळा उडविलेला आहे, की अजूनही तो खाली बसलेला नाही. या कवितेवरील मत-मतांतरे..

म. वा. धोंड :
प्रत्येक कविता आपल्याला कळलीच पाहिजे, असा हट्ट धरण्यात अर्थ नाही. संतांच्या काव्यात अशा कित्येक कूट रचना आहेत, त्या कुठे आपल्याला उलगडतात? एवढे मागेही जायला नको. ग्रेसच्या कविता मला आवडल्या तरी अजिबात कळत नाहीत. नाही कळली तर सोडून द्यावी, हे उत्तम! पण ही कविता तशी सहजपणे झटकून टाकता येत नाही. या कवितेने मर्ढेकरांच्याच नव्हे, तर मराठी कवितेनेही नवे क्रांतिकारी वळण घेतले. यामुळे हिला मराठी कवितेच्या जडणघडणीत मानाचे स्थान आहे.

विजया राजाध्यक्ष :
‘पिपांत मेले’ या कवितेच्या पूर्वार्धात उंदरांचे मरण ही घटना आहे. ‘गरीब बिचारे’ बिळात जगलेले उंदीर. ते ‘पिपांत’ शिरले व तेथेच उचकी देऊन मेले. त्यांचे जगणे बिळापुरते मर्यादित आणि मरणही निरुपद्रवी. हे मरण कुणीही मान न मुरगळता आपोआप आलेले. (माना पडल्या, मुरगळल्याविण.) उंदरांच्या जीवनात आसक्ती नव्हती. (कारण ओठांवरती ओठ नुसते मिळालेले.) ती आसक्ती मरतानाही लाभली नाही. ही संज्ञेच्या जन्मजात व संपूर्ण अभावाची साक्ष. संज्ञेवाचून शृंगार जसा हलका (‘संज्ञेवाचून संभोगाची/ अशीच कसरत असते हलक्या’. कां. क. क्र. ४१) तसे संज्ञेवाचून जगणेही. सगळा सक्तीचा मामला. स्वेच्छेला अवसरच नाही. उंदीर रात्री मेले. त्यानंतर दिवस उजाडला. मरताना उघडय़ाच राहिलेल्या उंदरांच्या डोळ्यांत हा ‘दिवस सांडला’ (उजेड शिरला)- आणि उंदरांच्या शरीरातले (गात्रलिंगांचे) उरलेसुरले सत्त्वही या नव्या दिवसाने निपटून (धुऊन) घेतले. अत्यंत केविलवाणे असे हे मरण आहे.

प्रभा गणोरकर :
या कवितेचा अर्थ सांगताना एकतर तो गोळाबेरीज सांगितला आहे- ती ‘दुबरेध’ कविता, हे गृहीत धरून. ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ ही लिंगसूचक प्रतिमा म्हणून कविता ‘अश्लील’- पण मर्ढेकरांना अश्लील कसे म्हणायचे, म्हणून मग गोळाबेरीज अर्थ चाचरत मांडण्याचाही एक प्रकार वर्गा-वर्गात चालतो. बेकलाइटी म्हणजे कृत्रिम असे म्हटले जाते. कधी उंदरांचे जहरी डोळे (का? तर विष पोटात गेल्याने उंदीर मेले ना, म्हणून?), तर ‘मधाळ पोळे’ म्हणजे त्या उंदरांच्या अंगावर घोंगावणाऱ्या माश्या इथपर्यंतदेखील अर्थ सांगण्याची मजल गेली. हे सारे मर्ढेकरांच्या कवितेत अनावश्यक अर्थ कोंबणे आहे. असा प्रकार मर्ढेकरांच्या अनेक कवितांच्या बाबतीत झालेला आहे. ‘पिपांत मेले’ ही खास मर्ढेकरी शैलीतली, अत्यंत सूचक, पण स्पष्ट अर्थ सांगणारी एक सरळ कविता आहे. ती आजच्या अनैसर्गिक जीवनरीतीचे वर्णन करू इच्छिते. ‘पिपांत मेले’ हा आधुनिक माणसांच्या विपरीत स्थिती-दशेचाच आणखी एक निराळा पैलू. जरा वेगळ्या शैलीतला. प्रतिमांनी कूट बनवलेला, एवढेच.

प्रभाकर पाध्ये :
या कवितेत काव्यानंद आणि नेहमीचा व्यावहारिक आनंद यांत तडाख्याचा फरक आढळतो. व्यवहारात आनंद देणारा विषय तर नाहीच, पण व्यवहारात किळस आणणारा विषय म्हणजे पाण्यात बुडून मेलेले उंदीर हा विषय येथे निवडलेला आहे. (हा प्लेगचा उंदीर नाही, याबद्दल आपण कवीचे आभार मानू या!) नुसता विषय नव्हे, तर मेलेल्या उंदराचे काही किळसवाणे वर्णनही केलेले आहे. ‘माना पडल्या’, ‘पिपांत मेले उचकी देऊन’, ‘गात्रलिंग अन् धुऊन घेउन’, ‘ओठांवरती ओठ मिळाले’ हे शब्दप्रयोग किळसवाणी दृश्येच निर्माण करतात. मग प्रश्न असा, की अशा किळसवाण्या विषयाने आणि वर्णनांनी काव्यानंद कसा निर्माण होईल?
यमके, अनुप्रास, अर्थाचे खटके यामुळे आनंद होईलच असे नाही. कारण या सर्व गोष्टींमुळे त्या किळसवाण्या वर्णनांकडे लक्ष वेधले जाते. माझ्या मते, या कवितेमुळे जो काव्यानंद निर्माण होण्याची शक्यता आहे, तो तिच्यात आलेल्या तात्त्विक विचारांमुळे. या कवितेच्या मधोमध आलेली ही काव्यपंक्तीच पाहा :
जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.
या दोन ओळींवरून हे स्पष्ट आहे की, या कवितेत जीवनाचे काही तत्त्वज्ञान ग्रथित झालेले आहे.
गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन
त्याचप्रमाणे-
उदासतेला जहरी डोळे;
पुन्हा
मधाळ पोळे;
ओठांवरती जमले तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!
या सर्व ओळींतून जीवनाचे विफल, उदासवाणे तत्त्वज्ञान सांगितलेले आहे. मनुष्य साधारणपणे आपल्या संकुचित जीवनात (बिळांत) जगत असतो. कधीतरी तो जीवनाच्या चावडीवर फेकला जातो. त्याला इच्छा असो वा नसो, जगावेच लागते. उदासवाणे जीवन जगावे लागते. जगताना काही माया, काही श्रेय जमा झाले तरी ते तकलादूच असते. दुर्दैव असे की, जगता जगताच जगण्याची गोडी लागते. पण जगणे सक्तीचे, तसेच मरणेही सक्तीचे. असे पराभूत, निष्फळ, तगमगणाऱ्या जीवनाचे तत्त्वज्ञान या कवितेत सांगितलेले आहे. हे नुसत्या उंदराच्या जीवनाचे तत्त्वज्ञान नव्हे. हे तुम्हा-आम्हा मानवाच्या जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. येथे उंदीर हे नुसते प्रतीक आहे. मानवाचे प्रतीक!

सुधीर रसाळ :
मर्ढेकरांच्या काव्याने नवे वळण घेतल्यानंतर लिहिलेल्या सुरुवातीच्या कवितांपैकी ही एक कविता आहे. या सुरुवातीच्या काळात मर्ढेकर आपली कविता तीव्र उपहासाने संपविताना दिसतात. या कवितेची ‘पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!!’ ही शेवटची ओळ अशीच तीव्र उपहासपर आहे. या ओळीत समाधानाचा व्याजस्वर असून तो असमाधानाचे सूचन करीत आहे. ‘न्हाणे’ या शब्दातून हवी असलेली गोष्ट विपुल प्रमाणात मिळणे हा लक्ष्यार्थ प्राप्त होतो. उदाहरणार्थ- एखाद्याचे ‘प्रेमाने न्हाऊन निघणे’. वाईट व नको असलेल्या गोष्टी जर विपुल प्रमाणात मिळाल्या, तर त्यासाठी न्हाऊन निघणे हा शब्द आपण सामान्यत: वापरत नाही. या उंदरांना ‘ओल्या’ पिंपाकडून जगण्यासाठी सामग्री हवी होती. ओठांवर पोळे जमावे आणि सहजपणे मध मिळावा, असे त्यांना वाटत होते. परंतु त्यांना मिळाले मरण. त्यांचे मध चाखायला आसुसलेले ओठ फक्त एकमेकांना लागले. पोळे बेकलाइटी नसते आणि त्यातून मध खरोखरच टपकला असता तर ते मधाने न्हाऊन निघाले असते. पण याउलट, त्यांच्या गात्रलिंगावर दिवस सांडला. कोरडय़ा, प्रकाशमान दिवसानेच त्यांना न्हाऊ घातले. संपन्नता, समृद्धी आणि जीवन यांचे वैपुल्य त्यांना हवे होते. त्याऐवजी त्यांना उदासता, वैफल्य आणि शेवटी मृत्यू प्राप्त झाला.

निशिकांत ठकार :
‘पिपांत मेले..’पासून ‘पिपांत न्हाले’पर्यंतच्या काव्यजाणिवेत उचकी देण्याचा एक अंतिम क्षण आहे. बिळात जगलेले उंदीर पिपांत मरताना ‘उचकी’ देऊन मरतात. वस्तुत: उंदीर आचके देऊन मरतात. पण आचक्याची उचकी करून मर्ढेकरांनी मरणक्षणी पूर्वस्मृतींची मानवी जाणीव सूचित केली आहे. या उंदरांना बिळातले जगणेच आठवत असणार, म्हणूनही ते ‘गरीब बिचारे’.
आधी मेले, मग शेवटी न्हाले (कारण िपप ओले.) अशा अंत्यविधीचे हे मूषक महानिर्वाण आहे! ‘न्हालेल्या’ गर्भवतीची सुंदर उत्प्रेक्षा मांडणाऱ्या कवीला पिपांत न्हालेल्या उंदरांचे बीभत्स वास्तव आपल्या कवितेत मांडावेसे वाटते, हा त्या कवीच्या व्यापक मानवी संवेदशीलतेचाच प्रत्यय होय.

(पद्मगंधा प्रकाशनाच्या ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ या प्रा. एस. एस. नाडकर्णी संपादित ग्रंथातून साभार)

प्रथम प्रसिद्धी : ‘अभिरुचि’ ऑक्टो.-नोव्हें. १९४६, पृ. ८९.
समाविष्ट : ‘मर्ढेकरांची कविता’ (मौज प्रकाशन,  मुंबई),
प्रथमावृत्ती :  फेब्रुवारी- १९५९.

पिपांत मेले ओल्या उंदिर;
माना पडल्या, मुरगळल्याविण;

ओठांवरती ओठ मिळाले;
माना पडल्या, आसक्तीविण.

गरिब बिचारे बिळांत जगले,
पिपांत मेले उचकी देउन;

दिवस सांडला घाऱ्या डोळीं
गात्रलिंग अन् धुऊन घेउन.

जगायची पण सक्ती आहे;
मरायची पण सक्ती आहे.

उदासतेला जहरी डोळे
काचेचे पण;

मधाळ पोळे;
ओठांवरती जमले तेंही
बेकलाइटी, बेकलाइटी!

ओठांवरती ओठ लागले;
पिपांत उंदिर न्हाले! न्हाले!

बाळ सीताराम मर्ढेकर

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s