Archive for एप्रिल 23, 2010

नरेंद्र दाभोलकर, सौजन्य – सकाळ

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसे संघटन म्हणून आगळे-वेगळे आहे. महाराष्ट्रव्यापी, सतत उपक्रमशील, जातीधर्मापलीकडे गेलेले, उक्ती व कृती यात सुसंगती राखणारे असे तर ते आहेच. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे समितीला हजारो कार्यकर्ते आहेत; पण स्वतःच्या मालकीचे वा भाड्याचे एक खोलीचेही ऑफिस नाही, कोणतीही सरकारी ग्रॅंट वा देशीविदेशी फंडिंग नाही.

अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य चालू झाले त्याला पाव शतक झाले. संघटना म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अस्तित्वात आली त्याला तर फक्त वीस वर्षे झाली. समिती सध्या द्विदशकपूर्ती वर्ष साजरे करत आहे. खरे तर हा कालावधी मूल्यमापनासाठी, लेखाजोखा उलगडण्यासाठी उघडच अपुरा आहे. समितीबाबत थोडे वेगळे घडले ते हे, की या संपूर्ण काळात समिती व तिचा विचार सतत बहुचर्चित राहिला. महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतातही या विषयावरचे एवढे व्यापक कार्य व संघटन दुसरे नाही, या वास्तवाचाही तो परिणाम आहे.

 • कार्यावरचे आक्षेप
  म. गांधी म्हणत, “कोणतेही कार्य उपेक्षा, उपहास, संघर्ष, समन्वय व मान्यता या टप्प्यांतून पुढे जाते, स्थिरावते. समितीच्या वाट्याला हे आक्षेप व अवहेलना भरपूर आली. बुवांच्या चमत्कारांचे सादरीकरण जादूचे चिल्लर प्रयोग मानले गेले. “विज्ञान व शिक्षणाच्या प्रसारातून आपोआप जे घडून येणार आहे, त्यासाठी कशाला हा आटापिटा?’, असे तिरकसपणे विचारले गेले. अगतिक समाजजीवन माणसांना अंधश्रद्धेला शरण जाण्यास भाग पाडते. तेव्हा या समाजव्यवस्थेविरुद्ध प्रथम लढा, असा सल्ला मिळाला. “अंधश्रद्धांच्या नावाने श्रद्धांना धक्का द्याल, तर खबरदार’ असे इशारे मिळाले. “फक्त हिंदूंचेच अंधश्रद्धानिर्मूलन करता का? ब्राह्मणी कर्मकांडाबद्दल का बोलत नाही?’ हे टोमणे तर होतेच.
 • कामाचा आलेख
  या सर्वांना तोंड देत समितीचे कार्य स्थिरावले. शेकडो बाबा, बुवा, मांत्रिक, भगत यांची भांडाफोड केली गेली. कपडे अचानक फाडणे, पेटणे, घरावर आपोआप दगड येणे, अन्नात राख-विष्ठा मिसळली जाणे, डोळ्यांतून- कानातून खडे येणे, हे सर्व प्रकार गूढ, भीतीदायक भानामतीचे मानले जातात. वीस वर्षांत समितीकडे 250 हून अधिक भानामतीची प्रकरणे महाराष्ट्रभर आली. ती शंभर टक्के यशस्वीपणे थांबवण्यात आली. फलज्योतिषाला, भ्रामक वास्तुशास्त्राला शास्त्रीय आधार नाही, या विरोधात अथक प्रबोधन राबविले गेले. ज्योतिषाची भारतातील पहिली शास्त्रीय चाचणी समितीने घेतली (त्यात ज्योतिषी सपशेल नापास झाले) डॉ. जयंत नारळीकरांच्या सहीने वास्तुशास्त्राचा वैज्ञानिक जाहीरनामा प्रसिद्ध केला. जन्मकुंडली हा व्यक्तीच्या दैववादाचा नकाशा मानून त्याची होळी केली गेली. चमत्कार करून दाखवणाऱ्यासाठी 21 लाख रुपयांचे आव्हान दिले. लोकवर्गणीतून हे पैसे जमवले. शोध भूताचा – बोध मनाचा, चमत्कार सत्यशोधन, डाकीण प्रथाविरोधी प्रबोधन अशा धडक मोहिमा राबवल्या गेल्या. शिक्षक व विद्यार्थी यांच्यासाठी वैज्ञानिक जाणिवा प्रशिक्षण प्रकल्प गेले दीड तप राबवला. दहा हजार शिक्षक शिबिरातून गेले. सुमारे दोन लाख विद्यार्थी परीक्षांना बसले. “फिरते नभांगण’ संपूर्ण महाराष्ट्रातल्या शाळेत नेले. “राज्यव्यापी खगोलयात्रा’, “सर्पयात्रा’ काढली. महाराष्ट्रामधील चळवळीतील सर्वाधिक खपाचे मासिक समिती चालवते. प्रकाशित पुस्तकांनी अर्धशतक ओलांडले. दर वर्षी आपल्या सर्व कार्यकर्त्यांमार्फत जवळपास दोन हजार व्याख्याने चमत्काराच्या प्रात्यक्षिकांसह महिला, गावकरी, विद्यार्थी यांना देणारे समिती हे महाराष्ट्रातील एकमेव संघटन आहे. धार्मिक कर्मकांडांना विधायक पर्याय दिले. 
  देवदासी – पोतराज यांना जटामुक्त केले. पुरोहित, मुहूर्त, खर्च टाळून म.फुले यांच्या सत्यशोधकी पद्धतीने दोनशेपेक्षा अधिक विवाह लावले. सुमारे 150 यात्रांतील पशुहत्या प्रबोधनाने थांबवल्या. पर्यावरणसुसंगत गणेशविसर्जनासाठी “विसर्जित मूर्ती दान करा’ या उपक्रमात प्रतिवर्षी हजारो गणेशमूर्ती दान मिळवल्या. प्रदूषण टाळून त्या निर्गत केल्या. फटाकेमुक्त दिवाळी, कचऱ्याची वा दुर्गुणांची होळी या मोहिमांना मोठा पाठिंबा मिळाला. आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाह लावण्यासाठी अधिकृत सक्षम केंद्रे चालवणारी समिती ही एकमेव संघटना असावी. जादूटोणाविरोधात कायदा भारतात सर्वप्रथम महाराष्ट्रात व्हावा, यासाठी गेली पंधरा वर्षे समितीने केलेला अथक संघर्ष सर्वज्ञात आहे.
 • होकारात्मक प्रतिसाद
  “या सर्वांतून काय साधले? अंधश्रद्धा तर वाढतच आहेत,’ असा आक्षेप कोणी घेऊ शकेल, तो मर्यादित अर्थाने खरा आहे आणि सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीत लढताना काहीसा अपरिहार्य आहे. पुरेसे झाले नाही; पण काहीच झाले नाही असे नाही. महाराष्ट्रात आता अंधश्रद्धेचा कोणताही प्रकार कोठेही घडला, तर समिती त्यावर प्रकाश टाकेल, कृती करेल, असा विश्‍वास जनमानसात निर्माण झाला आहे. देवळाच्या कळसावरून मुले खाली झोळीत टाकणे यांसारख्या बाबीत जिल्हाधिकारी स्वतःच्या पुढाकाराने खटले दाखल करू लागले आहेत. याच निर्धारातून प्रशासन काही ठिकाणी यात्रेतील पशुहत्या रोखते आहे. रखडलेला कायदा मार्गी लागण्याची शक्‍यता आहे. सत्यसाईबाबांची पाद्यपूजा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केलीच; पण त्याबाबत यच्चयावत प्रसारमाध्यमांनी त्यांना धारेवर धरले. हे बदल समितीच्या कार्यामुळेच घडून आले, असा दावा नाही; पण समितीच्या या विषयातील सातत्याच्या कार्यातून हे घडून येण्यास अधिक अनुकूलता लाभली, हे नक्कीच सत्य आहे.
 • प्रतिकूल वास्तव
  अंधश्रद्धानिर्मूलन क्षेत्रातील कार्याचा संबंध श्रद्धा या शब्दाशी येतो. श्रद्धा हा शब्द अटळपणे धर्माशी जोडलेला आहे. सध्या तर धर्म, जात, रूढी, परंपरा हे सर्व फार संवेदनशील विषय झाले आहेत. बनवले गेले आहेत. धर्मनिरपेक्षतेचा आग्रह मागे पडला आहे. धर्म व जात यांच्या अस्मिता टोकदार बनवणे चालू आहे. धर्मनिरपेक्षतेचा विचार भारतीय संविधानात आहे; पण प्रत्यक्षात सांस्कृतिक राष्ट्रवादाकडे वाटचाल चालू आहे. धार्मिक सण, उत्सव, व्रतवैकल्ये, यज्ञयाग यांना उधाण आणले जाते आहे. लोकांच्या विचार करण्याच्या शक्तीची बधिरीकरण करणारी ही प्रक्रिया आहे. बाबा, बुवा हे जणू उद्योग बनले आहेत. संबंधितांचे अनेकमार्गी हितसंबंध त्यात निर्माण झालेले आहेत. बुवाबाजी करणाऱ्यांच्या भोवती राजकारणी लोक गर्दी करत आहेत. त्यांचा एकमेकांना आंजारण्या-गोंजारण्याचा सिद्धसाधकाचा खेळ चालू आहे. ज्यांनी लोकमानसाचे नेतृत्व करावयाचे, ते अंधश्रद्धांचा अनुनय करत आहेत. विशेषतः काही इलेक्‍ट्रॉनिक्‍स प्रसारमाध्यमे अंधश्रद्धांचा जणू रतीबच घालत आहेत. सामान्य माणूस दैनंदिन जीवनातील वाढत्या अडचणींनी भांबावलेला, घाबरलेला आहे. त्याला त्याच्या अगतिकतेवर अंधश्रद्धेचा उतारा भ्रामक समाधान देतो आहे. या सर्व वास्तवाला भिडत काम करण्याचे आव्हान आहे.
 • काय संकल्प आहे?
  वीस वर्षांच्या वाटचालीत समितीकडे कार्यक्षेत्राबद्दलची एक वाढती जाण निर्माण झाली आहे. त्याचा वापर करून, नियोजन करून, प्रशिक्षण करून चमत्कार, बुवाबाजी, विविध स्वरूपाच्या शोषण करणाऱ्या अंधश्रद्धा या विरोधात अधिक प्रखर, संघटित संघर्ष करावा लागणार आहे. कायद्यामुळे त्याला अनुकूलता लाभेल; पण त्यापलीकडेही करण्यासारखे बरेच शिल्लक राहते. समिती ते करेल. मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांत आजही मनोरुग्णतेचा आविष्कार असणारा भानामतीसारखा प्रकार मोठ्या प्रमाणात आढळतो. सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्राला ही बाब भूषणावह नाही. समिती ही भानामती निर्धारपूर्वक हद्दपार करणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी विशेषतः बी.एड, डी.एडचे विद्यार्थी हे समितीच्या प्रबोधनाचे लक्ष्य आहे. उद्या शिक्षक होणारी ही ग्रामीण भागातील तरुण पिढी आहे. त्यांच्या जाणिवांना योग्य दिशा दिली, तर उद्याच्या महाराष्ट्राचे मन घडविणे सोपे जाणार आहे. या विद्यार्थ्यांसाठी सहा महिन्यांचा “विवेकी युवाशक्ती फाउंडेशन कोर्स’ समितीने तयार केला आहे. चालूही केला आहे.

द्विदशकपूर्ती वर्षात किमान दोन हजार विद्यार्थी हा अभ्यासक्रम पार पाडतील, असा समितीचा प्रयत्न राहील. पर्यावरणपूरक गणेशविसर्जनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश व महाराष्ट्र शासनाची भूमिका समितीच्या कार्याला पूर्ण पाठिंबा देणारी आहे. याची अंमलबजावणी अडखळत होते आहे. त्यासाठीचा दबाव समिती निर्माण करेल. दिवाळीतील दारूकाम सर्वप्रकारे हानिकारक असते. शालेय विद्यार्थ्यांना प्रभावित करून, पालकांच्या सहमतीने फटाके शोभेची दारू यासाठी उधळल्या जाणाऱ्या पैशातील काही भाग खाऊ, खेळणी, पुस्तके इकडे वळविण्याचा प्रयत्न मागील वर्षी यशस्वी झाला.
 
यंदा आठ हजार शाळांतील हरित सेनांना बरोबर घेऊन 20 वर्षे पूर्ण होत असताना तब्बल वीस कोटी रुपयांचे फटाके यंदा वाचविण्याचा समितीचा प्रयत्न राहील. फिरते नभांगण, सर्पयात्रा, खगोलयात्रा हे तर आता समितीच्या वार्षिक कार्यक्रमाचेच भाग झाले आहेत; मात्र द्विदशकपूर्ती वर्षानिमित्त सगळ्यांत महत्त्वाची मोहीम आहे “वारसा समाजसुधारकांचा-अंधश्रद्धा निर्मूलनाचा- विवेकाचा’ महाराष्ट्रातल्या समाजसुधारकांच्या कामाशी यथाशक्ती स्वतःचे नाते जोडत महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांत आम्ही जाणार आहोत. युवकांना तो समजावून सांगणार आहोत. त्यांना रुचेल पचेल असा कृतिकार्यक्रमही देणार आहोत. तीन टप्प्यांत पन्नास दिवस चालणाऱ्या या यात्रेत नवे दोन हजार विवेकसाथी नोंदविण्याचा आमचा संकल्प आहे. उद्याची धुरा समर्थपणे पेलणारे ते भावी सहकारी बनतील, असा आमचा प्रयत्न राहील.
 
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती तसे संघटन म्हणून आगळे-वेगळे आहे. महाराष्ट्रव्यापी, सतत उपक्रमशील, जातीधर्मापलीकडे गेलेले, उक्ती व कृती यात सुसंगती राखणारे असे तर ते आहेच. याशिवाय महत्त्वाचे म्हणजे समितीला हजारो कार्यकर्ते आहेत; पण स्वतःच्या मालकीचे वा भाड्याचे एक खोलीचेही ऑफिस नाही, कोणतीही सरकारी ग्रॅंट वा देशीविदेशी फंडिंग नाही. सभासदत्वासाठी व्यसन करावयाचेच नाही, अशा आज कालबाह्य वाटणाऱ्या अटी अत्यावश्‍यक आहेत. मोर्चाला रेल्वेचे तिकीट काढूनच यायचे, असा दंडक आहे.

घरचे खाऊन संसार, व्यवसाय सांभाळून झटणारे, झपाटलेले हजारो कार्यकर्ते हीच समितीची ताकद आहे. विचार ज्या वेळी जनसमुदायाची पकड घेतो, त्या वेळी तो भौतिक शक्ती बनतो, असा समितीचा विश्‍वास आहे. त्यासाठी व त्या दिशेने अंधश्रद्धा निर्मूलनाचा प्रवास विवेकशक्ती संघटित व सक्रिय होईपर्यंत करण्याची जिद्द समिती बाळगून आहे.