Archive for जून, 2010

हुसेन जमादार,  सौजन्य – मटा


इस्लाममधील समतावादी तत्वामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात इस्लामविषयी आदरभाव होता, परंतु भारतात तो समाजवादी आशय लोप पावल्यामुळे त्यांना दु:खही झाले होते. इस्लाममध्ये वंश आणि वर्ग यांच्या सीमा ओलांडून विविध लोकांना बंधुत्वाच्या भावनेने एकत्र बांधण्याची क्षमता असली तरी भारतीय मुसलमानांतील जातीव्यवस्था नष्ट करण्यात त्यास यश आलेले नाही.

‘मुस्लिम समाजातील काही रुढींबद्दल आणि त्याहुनही त्यात बदल घडवू पाहणाऱ्या इच्छेचा त्यांच्यातील अभाव याविषयी डॉ.आंबेडकरांनी प्रखर टिका केलीली आहे. उदा. मुस्लिम महिलांतील बुरखा पध्दती. त्याबद्दल ते म्हणतात,’ रत्यावरुन चालत जाणाऱ्या या बुरखाधारी महिला हे भारतात आढळणाऱ्या अगदी हिणकस दृश्यांपैकी एक दृश्य आहे. पडदा पध्दतीमुळे मुस्लिम महिलांच्या शारीरिक रचनेवर अनेक दुष्परिणाम होतात. अनेमिया, क्षय, दातांचे विविध रोग, यासारख्या रोगांना त्या बळी पडतात. पाठीत बाक निर्माण होणे, हात-पाय वाकडे होणे इत्यादी. या पडदा पध्दतीमुळे मुस्लिम महिला बौध्दिक व नैतिक पोषणापासून वंचित ठेवल्या जातात. त्यांना बाह्य जगापासून पूर्णत: विभक्त केल्यामुळे कुटूंबातील लहान-सहान भांडणामध्ये त्या गुंतून राहतात. परिणामत: त्या कोत्या मनाच्या व संकुचित दृष्टिच्या बनतात. आंबेडकरांच्या मते, पडदा पध्दतीमुळे हिंदूना सामाजिकदृष्टया मुस्लिम समुदायापासून विभक्त करण्याचे कार्य घडत आहे. जे भारतातील सामाजिक जीवनाच्या विनाशाचे एक कारण आहे.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खंत आहे की, मुस्लिमांनी त्या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केल्याचा एकही पुरावा आढळत नाही.

डॉ. आंबेडकरांनी भारतीय मुस्लिम समाजाच्या सामाजिक जीवनाबरोबरच राजकीय जीवनातील भूमिका अधोरेखित करताना म्हटले आहे की, मुस्लिमांना राजकारणात काहीही रस नाही.धर्मातच त्यांना मुख्यत: रस आहे. मुस्लिम मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी ज्या अटी घातल्या जातात त्या अशा – उमेदवाराने स्वखर्चाने मशीदीतील जुने दिवे काढून त्या जागी नवे दिवे लावावे, जुन्या सतरंज्या फाटल्याने त्या नव्या आणाव्यात, मशिद मोडकळीस आल्याने तिची दुरुस्ती करावी! मुस्लिम राजकारण हें प्रामुख्याने पुराहितप्रवण आहे, आणि त्याला फक्त एक फरक कळतो, तो म्हणजे हिंदू व मुसलमांनातील फरक. मुस्लिम समाजातील राजकारणात जीवनाच्या कुठल्याही ऐहिक व धर्मनिरपेक्ष घटकाला स्थान नाही. डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘त्यांना अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, त्याविरुध्द एखाद्या संघटित समाज सुधारणा चळवळीचा अभाव होय.’ हिंदूंमधील निदान काही घटकांमध्ये अशी या सामाजिक दोषाबाबत जाणीव निर्माण झाली आहे, आणि त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत, त्याप्रमाणे मुस्लिमांमध्ये अशी चळवळ राहोच, पण या दोषांची जाणीवही निर्माण झालेली नाही.’

इस्लाम हा सर्व लोकांना सर्व काळ सर्व परिस्थितीत योग्य ठरणारा वैश्विक धर्म आहे, हे मुस्लिमांचे मुलभूत गृहीत याला कारणीभूत आहे, असे अनेक विचारवंतानी स्पष्टीकरण दिलेले आहे.

भारतातील मुसलमानांमध्ये परिवर्तनाच्या वृत्तीचा जो अभाव दिसून येतो, याचे कारण भारतीय समाजातील विशिष्ट स्थानामध्ये शोधले पाहिजे. त्याला प्रामुख्याने हिंदू वातावरण हळूवार परंतू सातत्यपूर्ण रितीने त्याच्यावर अतिक्रमण करीत असते.ते त्याच्या गैरमुसलमानीकरण करीत आहे,असे त्याला वाटते. या संथपणे चाललेल्या इस्लामपासून परावृत्त करण्याच्या प्रक्रियेपासून बचाव म्हणून आपल्या समाजाला काय उपकारक आणि काय हानीकारक ठरेल याची चिकित्सा न करता जे जे इस्लामिक तें ते जतन करण्याचा त्यांना अट्टाहास करावा लागत आहे. दुसरे, भारतातील मुसलमानांस ज्या राजकीय वातावरणात रहावे लागत आहे, ते वातावरणसुध्दा प्रामुख्याने हिंदूच आहे. त्यामुळे आपण दडपले जाऊ आणि या राजकीय दडपणामुळे मुसलमान हे एका शोषित वर्गात ढकलले जातील अशी त्यांची भावना झालेली आहे.

राजकीय व सामाजिकदृष्टया हिंदूद्वारे होणाऱ्या अतिक्रमणापासून स्वत:चा बचाव करावा लागणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्टया हिंदूद्वारे होणाऱ्या अतिक्रमणापासून स्वतःचा बचाव करावा लागणार आहे. ‘ही जाणीवच माझ्या मते भारतीय मुस्लिम इतर देशातील मुस्लिमांच्या तुलनेत सामाजिक सुधारणेच्या बाबतीस मागास असल्याचे प्राथमिक कारण आहे. जागा व पदांसाठी हिंदूशी सातत्याने भांडण्यातच त्यांची सर्व शक्ती खर्च होत आहे. सामाजिक सुधारणेच्या प्रश्नासाठी वेळ देणे, त्यासंबंधी विचारमंथन करणे आणि अवसर उपलब्ध करुन देणे या बाबी घडत असताना दिसत नाहीत. आणि जरी तसे काही घडले तरी हिंदू व हिंदूधर्माच्या उपद्रवाविरुध्द कुठल्याही किंमतीवर सामाजिक- धार्मिक संघटीत फळी उभी करु पाहणाऱ्या सांप्रदायिक तणावातून निर्माण होणाऱ्या इच्छेखाली दबून जाते, दडपले जाते.’

”भारतातील मुस्लिम समाजाच्या राजकीय कुंठितावस्थे विषयीदेखील हेच स्पष्टीकरण लागू होते. मुस्लिम राजकारणी जीवनाच्या इहवादी घटकांना त्यांच्या राजकारणाचा आधार बनवू इच्छित नाहीत. कारण त्यामुळे हिंदूविरोधी लढयात त्यांचा समुदाय कमजोर होईल, असे त्याना वाटते. गरीब मुस्लिम, गरीब हिंदूशी एकजूट करुन श्रीमंताकडून न्याय मिळवण्यासाठी झटणार नाहीत. जमीनदारांच्या जुलमाला विरोध करण्यासाठी हिंदू कुळाबरोबर मुस्लिम कुळे एकत्र येणार नाहीत. असे का? उत्तर सरळ आहे. कुळाला असे वाटते की, जर त्याने जमिनदारीविरोधी मोहिमेत भाग घेतला तर त्याला एखाद्या मुस्लिम जमिनदाराविरोधात लढावे लागेल. त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की, एखाद्या श्रीमंत मुस्लिमाचे, मुस्लिम जमिनदाराचे अथवा मुस्लिम गिरणीमालकाचे नुकसान होणे म्हणजे मुस्लिम समाजाची हानी करणे होय. कारण त्यामुळे हिंदू समाजविरोधी लढयात तो समाज कमजोर होण्याची शक्यता आहे.’

मुस्लिम समुदायावर डॉ. आंबेडकरांनी केलेली ही टीका आणि त्याच्याबद्दल व्यक्त केलेली नकारात्मक मते आंबेडकर कसे मुस्लिमविरोधी होते, हे दर्शविण्यासाठी हिंदुत्ववाद्यांना उत्साहवर्धक वाटत असतील. परंतु काय हे खरे आहे? त्यात एक अंशसुध्दा तथ्य नाही. मुस्लिम समाज इतका -हासशील व अंतर्लक्षी का आहे याबद्दल डॉ. आंबेडकरांचे विश्लेषण वाचल्यास वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे हे लक्षात येते. ‘प्रतिगामीपणा हा मुस्लिमांचा स्थायीभाव आहे. इस्लाम त्याच्या पलिकडे इतर विचारांना मान्यता देत नाही. त्यातच मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाची कारणे शोधावी लागतात’. – हे भारतीय मुस्लिम समाजाच्या प्रतिगामी स्वरुपाबद्दल दिले जाणारे एकसाची स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे नाकारतात. त्यांना हे स्पष्टीकरण असमर्थनीय वाटते. कारण इतर देशातील मुस्लिमांनी इस्लामचा त्याग न करता मूलगामी सुधारणा घडवून आणल्या आहेत.भारतातील मुस्लिमांच्या मागासलेपणाचे कारण त्यांना त्यांच्या भोवतालच्या वैशिष्टयपूर्ण हिंदू वातावरणात सापडते. हिंदू समाजात इतरांना सहभागी करुन घेण्याची वृत्ती नाही. तिचे स्वरुप प्रभावशाली आहे. अंगभूतपणे हिंसक आहे. हिंसा हे सर्व हिंदू देवतांचे वैशिष्टय आहे. त्यांचे प्रभुत्व अमान्य करणाऱ्या लोकांसाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्यास हे सक्षम नाहीत. आणि त्यामुळे हे कट्टर पुराणमतवादी बनले आहेत. या सत्य परिस्थितीच्या प्रकाशात डॉ. आंबेडकर हे मुस्लिमविरोधी होते अथवा नव्हते हे वाचकच चांगल्या प्रकारे ठरवू शकतील, असे डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी म्हटले आहे.

डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर १४-१५ वर्षात महाराष्ट्रात मुस्लिम सत्यशोधक मंडळ नावाचे प्रबोधनवादी आंदोलन उभे राहिले. मरहूम हमीद दलवाईंच्या नेतृत्वाखाली २२ मार्च १९७० रोजी पुण्यात स्थापना झालेल्या या चळवळीचा प्रस्तुत लेखक संस्थापक सभासद असून १९७१ ते १९८० या काळात पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे. सध्या सरचिटणीस आहे. आम्हा प्रबोधनवादी कार्यकर्त्यांना डॉ. आंबेडकरांची वरील मांडणी अत्यंत तर्कशुध्द व वस्तुस्थितीदर्शक आहे, असे वाटते. किंबहूना मुस्लिम सुधारकांच्या डोळयात अंजन घालणारी आहे. आम्ही मुल्ला-मौलवीना जबाबदर धरुन चळवळीची आखणी करीत गेलो. मुस्लिम स्त्रीवर होत असलेले अन्याय उदा. तोंडी तलाक कायद्याने बंद झाला पाहिजे, सवतबंदीचा कायदा भारतीय मुस्लिमांना लागू करावा, पुढे चालून समान नागरी कायदा व्हावा अशी भूमिका मांडत आलो.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा जाहीरनामा म्हणतो- ”भारतीय मुस्लिम समाजापुढे स्वातंत्र्योत्तर काळात नवी आव्हाने उभी राहिली आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळातील सर सैयद अहमदखान यांचा मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि ऐहिक दृष्टिकोनातून मुलभूत बदल घडवून आणण्याचा आरंभीचा प्रयत्न वगळल्यास एरवी निराशाच पदरी येते. भारतीय मुस्लिम समाज या सर्व काळात आपल्या अल्पसंख्यांक स्थानाविषयी विनाकारण अतीव जाणीव बाळगून आपल्या सनातन, परंपरागत श्रध्दा कवटाळून बसलेला आणि बहुसंख्य हिंदू समाजविरोधी आंदोलने करीत राहिला. सर सैयद अहमदखानाच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या मुस्लिम सुधारणांचा गाडादेखील अखेरीला विभक्तवादाच्या दलदलीत रुतून गेला. पाकिस्तानची निर्मिती आणि भारतातील हिंदू-मुस्लिम संबंधातील तफावाचा इतिहास सर्वांना माहीत आहेच.”

भारताला सर्वधर्मीय राष्ट्रीयता निर्माण करण्याच्या झालेल्या सर्व प्रयत्नात एक मूलभूत चूक सतत होत राहिली आहे. ती अशी की, हिंदू समाजाला आधुनिक, विशाल आणि पुरोगामी बनवण्याच्या आड येणाऱ्या जुनाट धर्मनिष्ठा बदलण्याचा एक सततचा प्रयत्न चालला असतानाच मुस्लिम समाजाच्या काल- विसंगत अशा परंपरागत श्रध्दांना हात न लावण्याचा आटापिटा मुस्लिम समाजाकडून करण्यात येत होता. आणि बहुसंख्य हिंदू समाजातील परिवर्तनवादी मंडळीदेर्खींल या प्रक्रीयेला कळत न कळत हातभार लावीत होता. आज देखील या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. याचा परिणाम म्हणजे हिंदू समाजात आधुनिक राष्ट्रवादाचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि समानतेच्या आधुनिक मानवी मूल्यांचे प्रवाह तुलनेने अधिक बळकट होत गेले आणि मुस्लिम समाज मात्र आपल्या जुन्याच श्रध्दांना चिकटून राहिला. सुशिक्षित मुस्लिमांची मजल यामुळे विभक्तवादी प्रवृत्तीपलिकडे कधी जाऊ शकली नाही. बदललेल्या परिस्थितीचे आव्हान यामुळेच मुस्लिम समाज स्वीकारु शकला नाही.

भारतातील हिंदू आणि मुसलमान समाजातील ही प्रबोधनाची दरी भरुन काढल्याशिवाय खऱ्या अर्थाने या दोन्ही समाजाचे संबंध सुधारणार नाहीत, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणार नाही, आणि नव्या भारतातील प्रजासत्ताकात मुस्लिम समाज राष्ट्रजीवनाचा एक सन्माननीय घटक म्हणून नांदू शकणार नाही. आपण लोकशाही जीवनपध्दती स्विकारलेली असल्याने या प्रबोधनाची निकड निर्माण झालेली आहे. त्याशिवाय समाजातील सर्व क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता निर्माण होणार नाही व लोकशाहीचा पाया कमकुवतच राहील.

हे कार्य व्हावे म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. ‘सत्यशोधक’ शब्दाला महाराष्ट्राच्या जीवनात एक विशिष्ट अर्थ आहे. त्यामध्ये सामाजिक सुधारणांच्या प्रखर आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. या मंडळाचे ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ हे नाव ठेवताना महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची जाणीव या मंडळाच्या संस्थापक सभासदांपुढे आहे.”

आता बदललेल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा विचार करता मंडळाने आपली भूमिका बदलली आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी प्रथमच मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांचा विचार करुन न्या. सच्चर समितीचा अहवाल पंतप्रधानांना सादर करण्यात आला आहे. त्याचा निष्कर्ष लिहीताना न्या. सच्चरनी असे नमूद केले आहे की, इथल्या बी.सी. समाजापेक्षाही येथील मुस्लिम समाज मागासलेला आहे. जे हिंदूत्ववादी पक्ष आणि संघटना म्हणत होत्या की, मुसलमानांचे लाड होतात. त्यांच्या मुस्काटात सणसणीत चपराक न्या. सच्चरनी लावलेली आहे.

या अहवालाला घेऊन मुस्लिम समाजात काम करण्याची गरज वाटली. कारण अहवाल येऊन वर्ष उलटले तरी मुस्लिम समाजाला त्याची माहिती नव्हती. इंटरनेटवर असलेला हा जवळ जवळ पाचशेहे पानांचा रिपोर्ट कोण वाचणार? मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमॉक्रसी, मुंबई या संघटनेने त्यावर एक परिषद आयोजिली होती. त्याला आम्ही उपस्थित राहिलो व तेथे त्यांनी ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’मध्ये प्रसिध्द केलेला संक्षिप्त रिपोर्ट मिळाला. त्याचे मराठी व हिंदीमध्ये भाषांतर करुन महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या सहाय्याने पुस्तिका प्रसिध्द करुन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ५० गावातून मुस्लिमांच्या सभा घेतल्या. इतरही मंडळी या विषयावर काम करीत आहेत. त्या अंमलात आल्या तर मुस्लिम समाजाला फायद्याचे ठरणार आहे. पण या शिफारशी अमलात आणा म्हणून मुस्लिम समाजाचा रेटा निर्माण झाला तरच शासन त्या अंमलात आणील. म्हणून वरील प्रयत्न केले. परंतु त्याची एक चळवळ निर्माण होत नाही. छुट-पुट सभा होतात असे चित्र दिसले. असे का होते याचे उत्तर डॉ. आंबेडकरांनी केलेल्या वरील विवेचनात सापडते.

काही ठिकाणी मुस्लिमांनी अशी भिती व्यक्त केली की, आधीच इथे मुस्लिमांचे लाड होतात अशी ओरड सुरु असताना आम्ही सच्चर आयोग लागू करा अशी मागणी सुरु केल्यास काय होईल? तेव्हा सर्वोदय मंडळ व तुमर्चीं संघटना असा एकत्रित कार्यक्रम घेऊ म्हटल्यावर त्यानी ते मान्य केले व तशी परिषद घेण्याचे मुस्लिम समाजातील नेत्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य मुस्लिमांना एकत्र करुन काम करण्याची गरज आहे.

नुकतीच धुळयाला दंगल झली. तेथे सर्वोदय मंडळाची टीम गेली होती. दहा दिवस कर्फ्यु होता. ३ तास कर्फ्यु उठल्यावर आम्ही गांधींच्या पुतळयासमोर दोन दिवस सर्व धर्म प्रार्थना घेतली. दंगलीत ज्यांची घरे जळाली त्या मंडळींना भेटायला गेलो. गजानन कॉलनीमधील बरीच घरे जाळण्यात होती. पाच किलोचे गॅस सिलींडर वापरुन घरे पेटविली असे आम्हाला सांगण्यात आले. बाहेरुन आलेली मंडळी होती. तोंडाला रुमाल बांधलेली मंडळी होती. नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये मुस्लिम मंडळींचा कँप होता. तेथील लोकांची घरेदेखील वरीलप्रमाणे जाळली होती. अनेक ठिकाणची मंडळी तेथे होती.काही जण तर दंगली सुरु झाल्यावर घराला कुलूप लावून आली होती. आज घराची अवस्था काय आहे त्याना माहित नव्हते.

तेथे चार मौलाना होते. मौ. मजहरुद्दीन, मौ.मुक्तार, मौ.अबुल आस, मौ.मुक्ती कशिम. ही मंडळी स्थानिक टी. व्ही. वरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन करत होती.

त्यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाने दहशतवादाचा पुतळा जाळण्यासाठी मिरवणूक काढली होती. (खरे पाहता या त्यांच्या कृतीचे स्वागत व्हायला हवे होते.) परंतु हिंदू रक्षक समितीने अशी भूमिका घेतली की, दहशतवादी मुस्लिमच आहेत व तेच दहशतवादाचा पुतळा जाळतात म्हणजे काय?आपण त्यांच्या विरुध्द सभा घेऊ. व त्यांनी मुस्लिम दंगे घडवतात अशा आशयाचे डिजिटल बोर्डस् लावले व ते बोर्ड फाडल्यावरून दंगल सुरू झाली. येत्या निवडणूकीवर डोळा ठेवून हे घडले आहे, असे अनेकांनी सांगितले.

परंतु दोन्ही समाजातील स्रीयांना ही दंगल पसंत नसल्याचे दिसले.नेहमी आपण शेजारी शेजारी राहणार आहोत असे कसे जगता येईल? असे त्या म्हणत होत्या. तेव्हा दोन्ही समाजातील स्रिया व मुलांना घेऊन शांती मोर्चा काढावा असे आम्ही ठरविले व जिल्हाधिकारी श्रीमंती प्राजक्ता लवंगाारे यांची भेट घेतली. त्यांनी या कल्पनेचे स्वागत केले परंतु १४४ कलम उठल्यानंतर करु असे म्हणल्या.

वरील मौलानांनी आम्ही हिंदू समाजाबरोबर बसून बोलू इच्छीतो. एकमेकांची काय चूक आहे यावर चर्चा करू असे म्हणाले. तोही एक मार्ग हाताळून पहाता येईल.

हिंदू रक्षक समितीमध्ये बजरंग दल व इतर हिंदूत्वावादी संघटना आहेत. त्यांची भूमिका आक्रमक आहे.समन्वयाची नाही. याचे आणखी एक उदाहरण सांगता येईल. भाजप व संघ परिवाराने बाबरी मशिद उध्वस्त केल्यानंतर देशात हिंदू-मुस्लिम विद्वेषाचे वातावरण निर्माण झाले. यावर मार्ग काढवा म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाने तडजोडीचा एक मुद्दा पुढे केला की, मुस्लिम समाजाने बाबरी मशिदीच्या जागेवरील ताबा सोडून द्यावा. हिंदू समाजाने राम मंदिराबरोबर दुसरीकडे बाबरी मशिद बांधावी आणि इथून पुढे कोणत्याही मंदिर मशिदीचा प्रश्न उपस्थित न करता १९४७ ची स्थिती जैसे थे मान्य करावी.

हा तडजोडीचा मुद्दा घेऊन मुस्लिम सत्यशोधक मंडळ महाराष्ट्रात व देशभर सद्भावना यात्रा काढू इच्छित होते.आम्ही पुण्यात पत्रकार बैठक घेऊन जाहीर केले.तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडीया यांनी पुण्यात जाहीर केले की, ‘यह अच्छी बात है, हम राम जन्मभूमि की जगह ले लेंगे और काशी मथुरा के लिए और लढ़ेंगे’ तोगडीयांच्या या आढयताखोर भूमिकेमुळे मंडळाची सद्भावना यात्र निघू शकली नाही. हिंदूत्ववादी संघटनांच्या या आक्रमक भूमिकेचा पुढचा भाग म्हणजे भारत हे हिंदू राष्ट्र आहे ही भूमिका.

‘भारतात इतर धर्मांचे लोक आहेत.आम्ही मुस्लिम आहोत. फाळणीनंतर फक्त २० टक्के मुस्लिम पाकिस्तानात गेले. ८० टक्के मुस्लिम मेरा देश मेरी मिट्टी म्हणतात. इथे राहिले आहेत, ते मुख्यतः धर्मांतरीत आहेत. आम्ही कांही अरबस्तानातून आलेलो नाही. हिंदु धर्मातील चातुरर््वण्य व्यवस्थेने केलेल्या अनन्वित अत्याचारामुळें हिंदू धर्मातील विशेषत: अस्पृश्य जमातीने हिंदू धर्म टाकून कोणी मुस्लिम, कोणी ख्रिश्चन तर कोणी बौध्द धर्म स्विकारला आहे. त्यामुळे आम्ही आज मुस्लिम असलो तरी आम्ही या देशाचे भूमिपूत्र आहोत.तेंव्हा आम्हां सर्वाना घेऊन हिंदू राष्ट्र बनवावे लागेल व भारताची धर्मनिरपेक्ष घटना कायम ठेवूनच ते करावे लागेल. तसेच जो जो भारतीय वंशांचा आहे (मग त्याचा धर्म कोणताही असो) त्या प्रत्येकाला इथे राहण्याचा व आपला विकास करून घेण्याची संधी असली पाहीजे,अशी व्यवस्था असणारे हिंदू राष्ट्र असायला आमची हरकत असणार नाही.’

या संदर्भात डॉ. आंबेडकरांनी झरज्ञळीींरप ेी ींहश झरीींळींळेप ेष खपवळर या पुस्तकात आपली भूमिका मांडली आहे की, ‘हिंदू राज्या’विषयी मुस्लिमांच्या मनातील कुशंकांचा आधार नष्ट करुन आंबेडकर जाहिरपणे भविष्यवाणी करतात,’ हिंदु राज्य अस्तित्वात आले तर ते या देशासाठी फार भयंकर संकट ठरेल यात शंका नाही. हिंदू काहीही म्हणोत, परंतू हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांना उपद्रवकारक आहे. त्याबाबतीत तो लोकशाहीशी विसंगत आहे. त्यामुळें कोणत्याही परिस्थितीत ‘हिंदू राज्या’ला प्रतिबंध केलाच पाहिजे. ‘अनेक देशांमध्ये बहुसंख्यांक-अल्पसंख्यांक हा विवाद असला तरी कुठेही जमातवादी राज्य उदयाला आल्याचे दिसत नाही. उदा. कॅनडामध्ये ब्रिटीशराज, दक्षिण आफ्रीकेमध्ये डचराज, अथवा स्वित्झर्लंडमध्ये जर्मनराज आले नाही, असे ते नमुद करतात,’ एखाद्या देशातील विविध समुदयांच्या सापेक्ष क्षमतांमध्ये लक्षणीय तफावत असल्यामुळेच जमातवादी राज्य संभावते. जमातवादाला राजकारणाला मध्ये परवानगी न दिल्यामुळेच या देशांना जमातवादी राज्यांचा उदय रोखता आला आहे.’

हिंदू धर्मातील साम्राजवादी वैशिष्ठयांमुळे अल्पसंख्यांकांसाठी शांततामय सहजीवन जगण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण होऊ शकेल, या बददल डॉ.आंबेडकर जरी साशंक असले तरी मुस्लिमांच्या अल्पसंख्यांक जमादवादाचीसुध्दा ते हयगय करीत नाहीत. जमातवादाचा राक्षस निर्माण करण्याबद्दल त्यांना दोष देत ते म्हणतात,’ हिंदू महासभा आणि त्यांच्या हिंदूशाही व हिंदू राज्याच्या घोषणांबद्दल मुस्लिम आक्रोश करत आहेत,पण या साठी कोण जबाबदार आहे?

हिंदू महासभा आणि हिंदू राज्य या मुस्लिमांनी मुस्लिम लिग स्थापन करुन स्वत:वर ओढवून घेतलेल्या अनिवार्य अशा दैवी शिक्षा आाहेत. ही क्रिया आणि प्रतिक्रिया आहे. एकीमुळे दुसरीला बळ मिळते. फाळणी नव्हे, तर मुस्लिम लिगचे विसर्जन आणि हिंदू मुस्लिमांच्या मिश्र पक्षाची स्थापना हाच हिंदू राज्याचे पिशाच्च गाडून टाकण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे.’ हिंदू व मुस्लिमांचा मिश्र पक्ष स्थापण्यात त्यांना कोणतीच अडचण दिसत नाही. ‘हिंदू समाजात असे अनेक कनिष्ठ स्तर आहेत, की ज्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि सामाजिक गरजा बहुसंख्य मुस्लिमांप्रमाणे आहेत आणि जे शेकडो वर्षापासून त्यांचे साधे मानवी हक्कही नाकारणाऱ्या व हिरावून घेणाऱ्या उच्च जातीय हिंदूपेक्षा मुस्लिमांबरोबर समान ध्येय गाठण्यासाठी एकत्र येण्यासाठी निश्चितच तयार होतील.’ आंबेडकरांना हे साहसवादी वाटत नाही.१९२०ते १९३७ या काळात माँटेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणांर्गत बहुसंख्य प्रांतात मुस्लिम, ब्राम्ह्मणेतर आणि मागासवर्गीय यांनी एकत्र येऊन या सुधारणा राबवल्या, याची ते आठवण करुन देतात. त्यांच्या मते,’ हिंदू व मुस्लिमांमध्ये जातीय सलोखा राखून हिंदू राज्याचा धोका नष्ट करण्याची ही सर्वात फलदायी पध्दत आहे.’

(लेखक मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक – सदस्य असून मुस्लिम समाजात जागृती घडवून आणण्याचे कार्य गेली चार दशके अविरतपणे करीत आहेत.)

– डॉ. अभय बंग, सौजन्य – अनुभव मासिक

पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने “आजचा काळ, आजचे साहित्य’ या विषयावरील “युनिक फीचर्स’ने संपादित केलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते झालं.

या भाषणात त्यांनी साहित्यिकांकडून समाजाला असलेल्या अपेक्षा मांडल्या आहेत, मात्र “तंबाखूने रंगवलेला पैसा संमेलनात नको’ या त्यांच्या विधानावरच प्रामुख्याने चर्चा घडली, त्यामुळे मूळ भाषणातील महत्त्वाच्या मुद्‌द्यांकडे दुर्लक्ष झालं, म्हणून “अनुभव’च्या वाचकांसाठी त्या मुद्‌द्यांशी संबंधित भाषण इथे प्रकाशित करत आहेत.

————————————————

मी साहित्यिक नसल्याने साहित्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे मी साहित्याविषयी जवळपास बोलणार नाही. पण मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठीपण म्हणजे काय याविषयी बोलणार आहे. या स्मरणिकेचा विषय “आजचा काळ आणि आजचं साहित्य’ असा आहे, त्या अनुषंगानेही मी काही बाबींकडे सर्व साहित्यिकांचं लक्ष वेधू इच्छितो.

संकुचित सांस्कृतिक दृष्टीचं आव्हान
मराठी भाषी आणि महाराष्ट्र यांच्या अस्मिता आणि ओळखी विषयी सध्या बराच राजकीय वाद सुरू आहे. स्वत:ला “राष्ट्र’ नव्हे, “महाराष्ट्र’ म्हणवणारा हा प्रांत आहे. “महाराष्ट्र’ही दर्पोक्ती आहे का? की ही साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा आहे? माझं असं मानणं आहे, की “महाराष्ट्र’ ही दर्पोक्तीही नाही आणि भूभाग वाढवण्याची साम्राज्यवादी आकांक्षाही नाही. ही आमची आध्यात्मिक आकांक्षा आहे. आम्हाला आमचं हृदय इतकं व्यापक करायचं आहे की ते “महाराष्ट्र’ व्हावं! त्यामुळे महाराष्ट्र ही भौगोलिक आकांक्षा नाही, ती आध्यात्मिक आकांक्षा आहे. “महाराष्ट्र’ हे नाव निवडून आपण सर्व मराठी मंडळींनी अशी घोषणा केलेली आहे, की आम्ही भौगोलिकतेच्या सीमा ओलांडून, स्थानिकतेच्या आणि संकुचिततेच्या सीमा ओलांडून आमच्या हृदयाचं महाराष्ट्र करू. तसं केलं नाही तर “राष्ट्रा’च्या पोटामध्ये “महाराष्ट्र’ कसा बरं मावणार आहे?

आज काही राजकीय शक्तींमुळे आपल्यासमोर, महाराष्ट्रासमोर हे एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही भारतात कुठेही जा, महाराष्ट्रातील काही मंडळींच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राविषयी बराच गैरसमज आढळतो. म्हणूनच आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे, की महाराष्ट्र ही साम्राज्यवादी संकल्पना नसून एक आध्यात्मिक घोषणा आहे. ही घोषणा मोठी कालानुरूप आहे.
जागतिकीकरणाच्या जमान्यात स्थानिकतेचा आग्रह टिकणार नसला तरी महाराष्ट्रात आज काही छोटे-मोठे तंटे, वाद उद्‌भवत आहेत. मुंबईकरांना कधी दक्षिण भारतीय चालत नाहीत, कधी उत्तर भारतीय चालत नाहीत. पुण्याचं आधी झपाट्याने औद्योगीकरण झालं आणि नंतर आयटी कंपन्या आल्या, त्यामुळे पुण्याचं पुणेरी स्वरूप बदलतं आहे. त्याची खंत वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पुण्याचं पुणेरीपणच गेलं तर गंमत काय राहिली?

पण प्रश्न असा आहे, की हे सर्व कसं टाळता येईल? आम्हाला जागतिकीकरणाचे आर्थिक आणि राजकीय फायदे हवे आहेत, पण सांस्कृतिक परिवर्तन नको आहे, ही एक असंभव मागणी आपण करतो आहोत. “हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू’ हे जगातलं मॅनेजमेंटमधलं अव्वल क्रमांकाचं मासिक आहे. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी एक कव्हरस्टोरी आली होती. त्यांनी अशी मांडणी केली, की जे शहर जगातून कुठूनही आलेल्या माणसाला परकेपणाचा भाव तर देणार नाहीच, उलट आपलेपणाचा भाव देईल, त्या शहराकडे जगातील बुध्दिमत्तेचं मानवीय भांडवल वळणार आहे. अशा सर्वसमावेशक सांस्कृतिक निर्देशकांवर त्यांनी रॅंकिंग केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की अमेरिकेतील ऑस्टिन नावाचं एक छोटंसं शहर वैश्विक संस्कृतीच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचं शहर ठरलं. या निरीक्षणानंतर दोनच वर्षांनी अमेरिकेमध्ये सर्वात झपाट्याने वाढणारं शहर कोणतं असा शोेध घेतला गेला तेव्हा प्रथम क्रमांकावर ऑस्टिनच आलं. जे शहर त्या शहराबाहेरच्या लोकांना आपलेपणाचा भाव देईल, परकेपणाचा भाव निर्माण करणार नाही त्या शहराचाच आर्थिक विकास आणि राजकीय विकास होणार आहे, ही बाब त्यातून स्पष्ट झाली. त्यामुळे जागतिकीकरणामुळे येणारा आर्थिक विकास हवा पण सांस्कृतिक बदल नको, अशी अशक्य मागणी आपल्याला करता येईल का?

दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरची माणसं आल्याने आमची संस्कृती बिघडते, आमची संस्कृती लयाला जाते, वाहून जाते, अशी मानसिक असुरक्षिततेची भावना पसरलेली दिसते. अशी भावना पसरण्याचं प्रमुख कारण कदाचित संस्कृती म्हणजे काय याविषयीच आपल्या मनामध्ये काही तरी गफलत असावी, काही तरी गोंधळ असावा असं मला वाटतं. नऊवारी साडी, की तलवार- फेटा, की शिवराळ भाषा, की पुरणपोळी- तुळशीवृंदावन अशा काही सवयींमार्फत आपण आपली संस्कृती व्याख्यित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या गोष्टी बदलणाऱ्या आहेत, बदलतही आहेत. हे बदलायला बाहेरच्या माणसाची गरज नाही. महाराष्ट्राच्या नव्या आधुनिक पिढीने या सगळ्या गोष्टींचा केव्हाच त्याग केलेला आहे. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीमध्ये मराठी संस्कृती म्हणजे काय? स्थानिकतेचा आग्रह आणि संकुचित सांस्कृतिकवाद याचा राजकीय आग्रह धरून महाराष्ट्राचा विकास होणार आहे का, असा प्रश्न आहे.

माझी अशी भावना आहे, की या बाबतीत महाराष्ट्राला मार्गदर्शन आणि नेतृत्व राजकीय लोकांकडून नको आहे, तर ते साहित्यिकांकडून हवं आहे. आपण पूर्वकालीन तीन साहित्यिकांकडे वळून बघू या. आपले आद्य साहित्यिक ज्ञानेश्र्वर काय म्हणाले? ते म्हणाले, “आता विश्र्वात्मके देवे…’, दुसरे साहित्यिक तुकाराम काय म्हणाले?… ” तुका आकाशाएवढा…’ आणि तिसरे साहित्यिक विनोबा म्हणाले, “जय जगत्‌!’ आजपासून शंभर-दोनशे-तीनशे वर्षांनी आजच्या कोणत्या साहित्यिकांचं साहित्य वाचलं जाईल हे मला माहीत नाही, पण ज्या तीन साहित्यिकांचं साहित्य जरूर वाचलं जाईल असं मला व्यक्तिश: वाटतं ते असतील ज्ञानेश्र्वर, तुकाराम आणि विनोबा. या तिघांनी आपल्याला अगोदरच सांस्कृतिक मार्गदर्शन केलेलं आहे, की महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय? या तिघांनीही जी विश्र्वबंधुत्वाची घोषणा दिली आहे तो मराठीपणा आहे की नाही? मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक नवी वैश्र्विक मराठी संस्कृती व विश्र्वमानस निर्माण व्हायला हवं. परंतु निव्वळ दुबई आणि मॉरिशसमध्ये संमेलनं घेऊन ते निर्माण होणार नाही. आपण आपल्या दृष्टीत बदल घडवत आणला आणि आपलं हृदय व्यापक केलं तरच हे शक्य आहे. आपलं हृदय खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आणि त्याही पलीकडे वैश्र्विक झालं तरच वैश्र्विक मराठी संस्कृती निर्माण होऊ शकेल.

ही विश्र्वधर्मी मराठी संस्कृती प्रत्यक्षात येण्यासाठी साहित्य संमेलन आणि साहित्यिक यांनी नेतृत्व करणं अपेक्षित आहे. आजचे साहित्यिक असं नेतृत्व देऊ शकतील का? अख्खा महाराष्ट्र याकरता आपल्याकडे बघणार आहे.

साहित्यिकांनी कालभेदी दृष्टी द्यावी

काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे लोक एखादं नवं संशोधन करण्यापूर्वी त्याआधीच्या वैज्ञानिकांनी काय केलं होतं याचा शोध घेतात. त्या सोबतच काही जण तर ज्या विषयासंबंधी संशोधन करू इच्छितात त्याबद्दल साहित्यिकांनी काय लिहिलेलं आहे हे बघत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वैज्ञानिकांच्या अस्सल बुद्धिनिष्ठ दृष्टीला जे दिसत नाही ते बऱ्याचदा साहित्यिकांना दिसत असतं. साहित्यिकांना आजचंही वास्तव दिसत असतं आणि भविष्यकाळाचंदेखील दिसत असतं. याचा अर्थ असा, की आपल्याला कालभेदी दृष्टी हवी असेल तर साहित्यिकांकडे जावं लागतं.

शरत्‌चंद्र चट्टोपाध्यायांची एक अतिशय सुंदर कादंबरी आहे- “पथेरदाबी’. भारताच्या राजकारणात गांधी आणि सुभाष यांच्यामधला अहिंसा आणि हिंसा यांचा साधनशुद्धी बाबत जो संघर्ष नंतर राजकीय पटलावर घडला त्याच्या अनेक दशकांपूर्वी “पथेरदाबी’मध्ये सव्यसाची आणि भारती यांच्या वैचारिक आणि नैतिक संघर्षामधून शरदबाबूंनी तो रेखाटलेला होता. रवींद्रनाथ टागोरांची एक नृत्यनाटिका आहे- “रक्तकरबी’. रशियातील क्रांती होण्यापूर्वी रवींद्रनाथ टागोरांनी होऊ घातलेल्या राजकीय क्रांतीचं आणि त्या हिंसक क्रांतीमधून निर्माण होणाऱ्या समस्यांचं अतिशय सुंदर चित्रण त्यात केलेलं होतं. आणि सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे आपण सगळेच ऐकतो, की रामायण घडण्यापूर्वीच वाल्मीकींनी रामकथा लिहिली होती….या उदाहरणांचा अर्थ असा, की काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते व त्यातून त्यांना येणारा भविष्यकाळ दिसू शकतो.

ईशावास्योपनिषदात विनोबांनी “कवी म्हणजे क्रांतदर्शी’ असे म्हटले आहे. “ऋषी’ या शब्दाची विनोबांनी मोठी सुंदर फोड केली आहे. “ऋष’ म्हणजे बघणे, निरीक्षण करणे. जो काळाच्या अंधारातून पुढच्या काळात बघू शकतो तो “ऋषी’! ज्ञानेश्र्वर, तुकाराम, विनोबा, शरत्‌चंद्र, रवींद्रनाथ टागोर हे सगळे कवी व ऋषी होते. त्यांना ती कालभेदी दृष्टी होती.

मराठी साहित्यामध्ये अशी दृष्टी आम्हाला हवी आहे. परंतु मराठी साहित्य तर बऱ्याच प्रमाणात भूतकाळामध्येच रमताना दिसतं. भूतकाळ आमचाच आहे. आमच्याच संस्कृतीचा, परंपरेचा आहे. त्याच्याविषयी प्रेम वाटणं अगदी स्वाभाविक आहे, आवश्यकही आहे. पण आम्ही त्याच्यामध्येच रंगून चालेल, अडकून कसं चालेल? म्हणून किमान काही साहित्यिकांनी तरी आम्हाला ऋषीसारखी कालभेदी पुढची दृष्टी द्यावी, पुढच्या समाजाचं दर्शन द्यावं, ही आमची अपेक्षा आहे. भविष्यकाळ कोणत्या दिशेने जाणार आहे, आम्ही कसं वागावं, या व अशा प्रश्नांबाबत आम्हाला दृष्टीची गरज आहे.

तीन प्रमुख वैश्विक प्रश्र्न

आज तीन प्रमुख वैश्र्विक प्रश्न उभे आहेत- पहिला आहे भांडवलशाहीचं पाप, दुसरा आहे पृथ्वीला ताप आणि तिसरा आहे धार्मिक हिंसाचाराचा शाप. भांडवलशाही असं म्हणाली, की माणसाच्या व्यक्तिगत, अपरिमित लोभाच्या प्रेरणेतूनच समाजाचा आर्थिक विकास होत असतो. ऍडम स्मिथ तसं म्हणाला आणि आम्ही सगळे जगभर त्या पद्धतीने वागत सुटलो. या अपरिमित लोभामुळे, अनियंत्रित लोभामुळे, बॅंकर्सनी केलेल्या प्रचंड घोटाळ्यांमुळे, चुकांमुळे आज जागतिक मंदी आलेली आहे. भांडवलशाहीच्या पापाखाली लोभाची समस्या लपलेली आहे. अपरिमित लोेभ योग्य आहे का, त्यावर आधारित अर्थरचना शक्य आहे का? ही एक मोठी वैश्र्विक समस्या आपल्यापुढे आज उभी आहे.

दुसरी समस्या पृथ्वीला आलेला ताप ही आहे. अनियंत्रित यंत्रवाद, निसर्गाला नष्ट करणं आणि चंगळवाद यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला इकडची काडी तिकडे हलवायची नाही. कोणतेही शारीरिक श्रम करायचे नाहीत. पण अमाप भोग हवा. त्यामुळे आम्हाला पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, कोळसा पाहिजे, वीज पाहिजे, कारखाने पाहिजेत. या सगळ्यातून वैश्र्विक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामानात बदल (क्लायमेट चेंज) हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याच्या विस्तृत वर्णनात जाण्याची गरज नाही. कारण आपण वर्तमानपत्रात वाचत असतो की ग्लोबल वॉर्मिंगचे किती प्रचंड गंभीर परिणाम होणार आहेत!

तिसरी समस्या आहे, धार्मिक हिंसाचाराचा शाप. आधी इराणमध्ये घडू लागलं. मग अफगाणिस्तानमध्ये घडायला लागलं. पुढे पाकिस्तानमध्ये घडायला लागलं. आता हे लोण मुंबईला नि पुण्यालाही आलं आहे. कोणीही या शापापासून मुक्त नाही. आयर्लंडमध्ये ख्रिश्चनांनी वेडाचार केला. आयआरएने अनेक दशकं धार्मिक हिंसाचार नि दहशतवाद केला. नंतर शिखांनी केला, मुस्लिमांनी केला, आणि आता हिंदूही करायला लागले आहेत.

शंभर वर्षांपूर्वी 1909 साली एका चाळीस वर्षांच्या माणसाने या तीन प्रमुख समस्या आपल्या कालभेदी दृष्टीने पाहिल्या आणि इंग्लंडमधून दक्षिण आफ्रिकेत परत जाताना जहाजावर त्याने एक छोटेखानी पुस्तक घाईघाईने लिहिलं. ते लिहिताना उजवा हात जेव्हा थकायचा तेव्हा तो माणूस डाव्या हाताने लिहायचा. हा माणूस होता मोहनदास करमचंद गांधी. . पुस्तकाचं नाव आहे- “हिंद स्वराज’. “हिंद स्वराज’मध्ये महात्मा गांधींनी भारतीय समाजाला या तीनही समस्यांविषयी सावध केलेलं आहे. पाश्र्चात्त्य समाजाची दिसत असणारी समृद्धी आणि भरभराट, त्यांचा अतिरेकी यंत्रवाद आणि अपरिमित भोगवाद, आणि समाज बदलायला हिंसेवरती असलेला त्यांचा विश्र्वास, या तिन्हींकडे इंग्लंडमधले भारतीय तरुण तेव्हा आकर्षित होत होते. या तीनही चुकांपासून गांधींनी भारतीय माणसाला तेव्हा सावध केलं होतं. “हिंद स्वराज’मध्ये त्यांनी यावर उपायही सांगितलेले आहेत. गांधीजींनी जे उपाय सुचवलेले आहेत ते आज कालानुरूप असल्यामुळे मी त्यांचा ऊहापोह आणि चर्चा करतो आहे.

गांधीजींनी सांगितलेले उपाय

आज आमच्यासमोर उभे ठाकलेले तीनही प्रश्र्न “बाह्य’ जगातले आहेत. भांडवलशाही, चंगळवाद, यंत्रवाद, हिंसा हे सगळे प्रश्र्न “बाह्य’ आहेत. पण गंमत अशी की या सगळ्यांवर गांधींनी सांगितलेले उपाय मात्र “आंतरिक’ आहेत. गांधी म्हणतात, की “स्वराज्य’ म्हणजे “स्वत:चं’ राज्य नाही, तर “स्व’वरती राज्य. स्वराज्य म्हणजे “मला राज्य करण्याचा अधिकार पाहिजे’ असं आपण म्हणतो. पण हा माणूस तर म्हणतो, “बाबा रे, प्रथम स्वत:वर राज्य करायला शीक.’ स्वत:वर राज्य कसं कर? कसं शीक? या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरंही गांधींनी आपल्या पुस्तकात दिली आहेत. उपायही सांगितले आहेत. गांधींनी लोभावर उपाय सुचवला आहे तो अपरिग्रहाचा. जास्त संग्रहच करू नका, आणि तुमच्याकडे जी काही संपत्ती आहे ती समाजाची आहे, अशा विश्र्वस्तवृत्तीने त्याचा समाजाकरता उपयोग करा. भांडवलशाहीचा नारा आहे- “फ्रीडम ऑफ डिझायर’. पाश्र्चिमात्य जगात या नाऱ्याचं प्रचंड कौतुकही आहे. अमेरिकेत तर “फ्रीडम ऑफ चॉइस’ असणं हे जणू कोणत्याही समाजव्यवस्थेची सगळ्यात अंतिम कसोटी आहे. “फ्रीडम ऑफ चॉइस’ असं म्हणताना त्यांना अभिप्रेत असतं, की “वुई मस्ट हॅव अनलिमिटेड फ्रीडम ऑफ डिझायर’!- आम्हाला जे जे हवं आहे, आम्ही जे इच्छिलं आहे ते आम्हाला अपरिमित मिळायला पाहिजे. गांधी असं म्हणतात, की आपल्याला “फ्रीडम ऑफ डिझायर’ नव्हे तर “फ्रीडम फ्रॉम डिझायर’ हवं आहे. डिझायरवर विजय मिळवा, सर्व प्रश्र्न आपोआप सुटतील.

यंत्रवाद आणि चंगळवाद यावर गांधी अुपाय सांगतात शरीरश्रम आणि मित-भोग, म्हणजेच आपल्या गरजा कमी करा. अपरिमित गरजा कुणालाच पूर्ण करता येणार नाहीत. “देअर इज इनफ ऑन द अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड, बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड.’ आणि धार्मिक हिंसेवर तर त्यांनी अर्थातच सर्वधर्मसमभाव आणि अहिंसा हे उत्तर दिलेलं आहे.

“अति’ आणि “गती’च्या वेडाने बेभान झालेल्या आधुनिक माणसाला गांधींनी “हिंद स्वराज’मधून सावधगिरीचा इशारा दिला आहे. आजच्या आधुनिक युगातले जितके काही अतिरेकाचे प्रश्र्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं गांधींनी “हिंद स्वराज’मध्ये दिली आहेत, तीही शंभर वर्षांपूर्वी. गांधीजींना प्रश्र्नही दिसतात आणि उत्तरंही दिसतात. याचा अर्थ गांधी कालभेदी साहित्यिकाच्या अटी पूर्ण करतात. आम्हाला आमच्या साहित्यिकांकडून गांधींसारखी कालभेदी दृष्टी हवी आहे, मार्गदर्शन हवं आहे.

चळवळीचे दिवस संपले हा भ्रम

ज्या तीन शापांचा मी उल्लेख केला त्यांच्यापासून शापमुक्ती कशी होणार, असा प्रश्र्न अनेकांना पडलेला आहे. एक व्यथा आपण वारंवार ऐकतो; विशेषत: साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांतली जी मंडळी आहेत त्यांना ही व्यथा अधिकच आहे. त्यांचं म्हणणं असं, की आजकाल समाज परिवर्तनाच्या चळवळीच दिसत नाहीत. चळवळी लोपल्यामुळे माणसांमध्ये जी घुसळण होत होती ती थांबली. आणि चळवळीच नसतील तर आपल्या समाजाचे प्रश्र्न कसे सुटणार?

माझी अशी नम्र समजूत आहे, की चळवळींचे दिवस गेले हा दृष्टीचा प्रश्र्न आहे. चळवळींचे दिवस गेलेले नाहीत, चळवळींचं स्वरूप बदललं आहे. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात बहुतेक मुख्य बदल हे मोठ्या राजकीय चळवळींच्या माध्यमातून घडले आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळी असोत, मजुरांच्या चळवळी असोत, काळ्या लोकांच्या चळवळी असोत, पीस मूव्हमेंट्‌स असोत की शेतकरी चळवळ असो या सर्व चळवळी हजारो-लाखो लोकांच्या सहभागातून घडल्या आहेत. त्यामुळे लाखो माणसं रस्त्यावर येत आहेत, त्यांचा कुणी एक नेता असणार आहे, त्यांची एक विचारसरणी असणार आहे, त्यांचा एक झेंडा असणार आहे, त्यांची एक घोषणा असणार आहे, कार्यक्रम असणार आहे आणि हजारो-लाखो लोक त्याचं अनुसरण करणार आहेत या प्रकारच्या चळवळींची आम्हाला सवय झाली आहे. आताशा अशा प्रकारच्या चळवळी दिसत नसल्याने आम्ही म्हणतो की चळवळी मागे पडल्या आहेत. गोष्ट खरी आहे की अशा प्रकारच्या चळवळी दिसत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की समाजपरिवर्तनाची प्रक्रियाच थांबली आहे.

चळवळी थांबल्या पण परिवर्तन चालू आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स मात्र बदललं आहे, आणि ते आपल्यासाठी अतिशय अनुरूप आहे, आपल्याला, सामान्य माणसाला सक्षम करणारं आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स असं बदललं की राजकीय नेतृत्व आणि राजकीय चळवळींच्या मार्फत होणाऱ्या परिवर्तनाऐवजी आता हे परिवर्तन माणसा-माणसांच्या पातळीवर घडतं आहे. ह्युमन बीइंग इज द युनिट ऑफ चेंज. माणसाचं मानस आणि माणसाचं रोजचं जगणं हे परिवर्तनाचं कुरुक्षेत्र बनलं आहे. टीव्हीच्या जमान्यात माणसांना आता हजारो-लाखोंच्या संख्येने एकत्र येण्याला फुरसत राहिलेली नाही. राजकिय नेत्यांच्या सभांनाही आता माणसं मोठ्या संख्येने एकत्र येत नाहीत म्हणून गर्दी जमवण्यासाठी फिल्मस्टार आणावे लागतात. मात्र राजकीय नेत्यांच्या मागे माणसं येत नाहीत याचा अर्थ माणसं बदलत नाहीत असा नाही. माणसं आपापल्या जागी बदलताहेत आणि माणसा-माणसांत संथ बदलाची एक प्रक्रिया घडते आहे.

एक साधं उदाहरण घेऊ. योगाच्या चळवळीत रामदेवबाबा आता आता आले; पण अन्यथा गेली ऐंशी वर्षं योगाची चळवळ जगभर पसरते आहे. आज अमेरिकेतली पाच ते दहा टक्के लोकसंख्या योग शिकलेली आहे आणि नियमितपणे योग करते आहे. जगभरात आज कोट्यवधी लोक योग करतात. ही चळवळ कशी पसरली? माणसाकडून माणसापर्यंत, अशा रीतीनेच ती पसरली.

लोकांची जीवनशैली बदलते आहे. मुली शिकायला लागल्यात.माणसं आता आरोग्यासाठी चालायला लागली आहेत, व्यायाम करायला लागली आहेत. लोकांची जीवनशैली कशी बदलली? त्यामागे कुणी राजकीय नेता होता की कोणती राजकीय चळवळ होती? -असं काही नव्हतं. एका माणसात परिवर्तन झालं, त्याने दुसऱ्याला सांगितलं, त्याने तिसऱ्याला सांगितलं. चौथ्याने पाहिलं, अनुसरण केलं. हीच आहे “मॅन टु मॅन प्रोसेस ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन’. हे सांस्कृतिक परिवर्तन आहे. हे माणसाच्या हृदयात घडणारं परिवर्तन आहे. आज घडणाऱ्या परिवर्तनाचं गतिशास्त्र हे असं आहे!

माणसांच्या विचारात आणि आचरणात परिवर्तन घडवून आणण्याची अशी विलक्षण हातोटी गांधींमधे होती. “खादी’ हा अतिशय साधा वाटणारा कार्यक्रम त्यांनी दिला होता; परंतु त्यातून स्वत:चे आचार-विचार बदलण्याचा कार्यक्रमही अंतर्भूत होता. खादीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, गरिबासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, पर्यावरणासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, मित-भोग किंवा साध्या राहणीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, स्वातंत्र्य चळवळीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो आणि स्वत:च्या हाताने सूत कातल्याने मी शरीरश्रमासोबतही स्वत:ला जोडून घेऊ शकतो. परिवर्तनाच्या सहा मूल्यांसोबत मी स्वत:ला जोडून घेऊ शकतो. गांधींनी खादीमार्फत वस्त्रसंस्कृतीत क्रांती तर घडवलीच, परंतु किमान सहा मूल्यांबाबत स्वत:च्या आचार-विचारात परिवर्तन घडवून आणण्याची कृतीही घडवून आणली. नेहरू, पटेल, सुभाष या सगळ्या विदेशांत शिकलेल्या बॅरिस्टरांना गांधींनी स्वयंपाकघरात जशी भाजी चिरायला लावली तसंच सूतही कातायला लावलं. राजकीय क्रांतीच्या अगोदर गांधींनी सांस्कृतिक क्रांती सुरू केली.

मित्रांनो आपलं रोजचं जगणं हा आपला जाहीरनामा असतो. माझं रोजचं जगणं हा माझा सांस्कृतिक जाहीरनामा असतो. आणि खरं म्हणजे आजचा माणूस असं म्हणतो आहे, की हाच माझा राजकीय जाहीरनामादेखील आहे. माझ्या रोजच्या जगण्यातूनच मला जग कसं हवं आहे हे मी प्रगट करतो आहे.

थोडक्यात सांगायचं, तर व्यक्तिव्यक्तींचे विचार बदलले तर जग बदलतं, माणसाचं आचरण बदललं तर जग बदलतं. आणि हे आपल्याला सक्षम करणारं अशाकरता आहे कारण माझं रोजचं जगणं बदलायला मला कोणत्या राजकीय नेत्यावर अवलंबून राहावं लागत नाही. माझं रोजचं जगणं बदलणं हे माझ्याच हातात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते “स्वराज्य’ आहे. माझं रोजचं जगणं कसं असावं ते मीच ठरवू शकतो, मी स्वत:च स्वत:ला बदलवू शकतो. या अर्थाने परिवर्तनाच्या चळवळीचा केंद्रबिंदू आता मी स्वत:च आहे. प्रत्येक नागरिकाला केवढी शक्ती देणारी ही दृष्टी आहे! हे सांस्कृतिक परिवर्तन राजकीय परिवर्तनापेक्षा सामान्य माणसासाठी अधिक अनुकूल आहे, त्यामुळे ते लोकशाहीसाठीही अधिक अनुकूल आहे. इथे सत्ता ही खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या हातात आहे. पाच वर्षांनी एकदा मतदान करण्यापुरती ही सत्ता मर्यादित नाही. रोजच्या जगण्याची, रोजच्या मतदान करण्याची ही सत्ता आहे. मी काय नेसतो, मी काय खातो, मी काय वाचतो, मी पायी चालतो की मोटार वापरतो, हे सर्व जग म्हणजे जग कसं असावं याबद्दलचा जग बदलायचा माझा जाहीरनामा आहे. तो मी रोज जाहीर करू शकतो, रोज प्रगट करू शकतो, रोज तसं जगू शकतो आणि रोज मी जग बदलवू शकतो.

साहित्यिकांकडून सांस्कृतिक परिवर्तनाची अपेक्षा

रोजच्या जगण्यात जो बदल घडतो त्यालाच सांस्कृतिक परिवर्तन म्हणतात. जग बदलायची आणखी एक पद्धत विनोबांनी सांगितली आहे. ते असं म्हणतात, की जुन्या शब्दांवर नव्या अर्थांचं कलम करणं म्हणजे सांस्कृतिक परिवर्तन, अहिंसक परिवर्तन. असं परिवर्तन घडवण्याची शक्ती साहित्यिकांमध्येच असू शकते. आणि म्हणून सांस्कृतिक परिवर्तन ही जग बदलण्याची पद्धत तुमच्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आणि साहित्यिकांच्याही हातामध्ये अतिशय मोठी प्रभावी साधनं देणारी गोष्ट आहे.

हे परिवर्तन कोण करेल? माझा असा समज आहे, की सर्वप्रथम विज्ञान हे परिवर्तन आणते आहे. दुसरा प्रभावी घटक असतील स्त्रिया. कारण समाजाच्या संस्कृतीचं वहन मोठ्या प्रमाणात स्त्रियाच करतात. तरुण पिढी हा तिसरा महत्त्वाचा घटक असणार आहे, कारण ते उद्याच्या जगाची घोषणा आहेत. चौथं स्थान रिक्त आहे. आणि मला त्या चौथ्या स्थानावर साहित्यिकांच्या आगमनाची वाट आहे. साहित्यिकांनी आजच्या काळाला अनुरूप अशा प्रकारच्या समाजपरिवर्तनाचं नि सांस्कृतिक परिवर्तनाचं नेतृत्व करावं, अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे.

या साहित्य संमेलनात अशा प्रकारच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या मूल्यांचं दर्शन व्हावं, अशी आपली सर्वांची किमान अपेक्षा राहणार आहे. हे सर्वसमावेशक संमेलन व्हावं, अशी आपली अपेक्षा राहणार आहे. महाराष्ट्रातले जे काही संकुचित वाद आहेत त्यांनी यामध्ये अडथळा बनू नये. सर्वांचं हृदय व्यापक व्हावं. मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर, असले वादच यात येऊ नयेत, अशी आम्हाला अपेक्षा राहील. जे विश्र्वहृदय आम्ही जगाकडून अपेक्षा करतो, त्याची सगळ्यात पहिल्यांदा साहित्यिकांकडून आम्ही अपेक्षा करणार आहोत. साधेपणा आणि मितव्ययता यांचं दर्शन या संमेलनातून व्हावं, अशी अपेक्षा राहणार आहे.

महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे आजचे जे भडकते प्रश्न आहेत त्यांची यादी मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही, कारण ती सगळ्यांना माहीत आहेच. परंतु साहित्याचा, साहित्यिकांचा जीवनासोबत काही तरी अनुबंध या संमेलनात प्रकट व्हावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. साहित्यामध्ये निव्वळ स्वत:वरच भाळणं असा नार्सिसिझम्‌ व्यक्त होऊ नये, तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहोत, त्यांचं आम्ही देणं लागतो, हे प्रकट व्हावं. महाराष्ट्र जळतो आहे. आम्ही त्याचा भाग आहोत की नाही, आम्हाला देणंघेणं आहे की नाही, याचा जरूर विचार व्हायला हवा.

इथं एक कविता आठवते. आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये सहाराचं वाळवंट आहे. एके काळी ते सगळं जंगल होतं. पण जंगल तुटत गेलं, त्याचं वाळवंट होत गेलं. जसाजसा निसर्ग नष्ट होतो आहे, सहाराचं वाळवंट मोठंमोठं होत आहे. आणि सहाराचं वाळवंट आफ्रिकेमधे दक्षिणेकडे पसरतं आहे. एक कवी म्हणतो,

“सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स अँड साऊथवर्ड्‌स.

स्लोली, बट रिलेन्टलेसली, इंच बाय इंच
सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स’.
आफ्रिकेच्या उत्तरेमध्ये जी माणसं आहेत युरोप-अमेरिकेमधली, ती काय म्हणणात? जाऊ द्या ना, सहारा गेलं दक्षिणेकडे तर आमचं काय बिघडलं? आम्ही उत्तरेला सुरक्षित आहोत. आफ्रिकेला नष्ट होऊ द्या. त्यांना हा कवी सांगतो,
“डोन्ट लाफ ओ फूल्स इन द नॉर्थ
द अर्थ इज राऊंड’.
त्यामुळे प्रश्न असा आहे, की आज महाराष्ट्र जळत असताना साहित्यिक आणि साहित्य संमेलन कुठे उभं राहणार? सहाराच्या दक्षिणेला लोकांसोबत उभं राहणार की उत्तरेच्या मूर्खांमध्ये उभं राहणार? आम्ही जनतेच्या प्रश्नासोबत स्वत:ला जोडून घेणार, की आम्ही म्हणणार, अजून माझ्या दारावर थाप पडलेली नाही! जर्मनीत जेव्हा एकेका स्वातंत्र्याचा संकोच होत होता, तेव्हा कवी म्हणाला,
“प्रथम त्यांनी ज्यूंना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी ज्यू नाही.
नंतर कम्युनिस्टांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी कम्युनिस्ट नाही.
त्यानंतर विचारवंतांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो
की मी विचारवंत नाही.
आणि आज माझ्याच दारावर टकटक होत आहे.
पण आता मदतीला धावून यायला कुणीच शिल्लक उरलेलं नाही.’
जेव्हा अख्खा महाराष्ट्र दुष्काळात, आत्महत्यांत, बालमृत्यूंत, कुपोषणात, हिंसाचारात, असंख्य प्रश्नांत अक्षरश: जळतो आहे, तेव्हा साहित्य संमेलन कुठे उभं राहणार?
निवड आपल्या सर्वांना करायची आहे.

शब्दांकन : शुभदा चंद्रचूड


पु. ल. देशपांडे, सौजन्य – मटा

मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास ‘ढोरं , गॅंवार , शूद्र , पशु ,नारी , ये सब ताडनके अधिकारी ‘ म्हणतो , म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं ,खेडवळ माणसं , इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत!

बायकांना नव-यांनीलाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांतसर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातचअसं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे.स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचाआहे.

‘ उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो ‘ ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं कामकरायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा.

हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी , मुल्ला , शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे.

‘ मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है ?’ असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की ‘ शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे , वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही! ‘ आमचे तुकोबा विचारतात , ‘ ऐसे कैसे रे सोवळे , शिवता होतसे ओवळे ?’ह्मा सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल ?

त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या ख-या उपासकाला आणि रसिकाला तरराष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको.म्हणूनच केशवसुतांनी ‘ ब्राह्मण नाही हिंदुही नाही , न मी एक पंथाचा | तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा | खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख ,कूपातिल मी नच मंडूक | मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे ‘ असं विचारलं आहे.

मुखमें रामनाम बगलमे छुरी , ह्मा तत्वाचं आचरण करणा-याविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक , कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले , जातिभेदाचं पोषण करणा-याविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास ‘ सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही ‘असं सांगत उभा राहिला.

यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला ‘ मानुषेर धर्म माणसाचा धर्म ‘म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्मा प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल.

‘ नान्य: पंथा अथ:नाय विद्यते ‘- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही ‘ समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन , धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे.

‘ हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही ‘ असं म्हणूनआंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन , अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहेआणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे….

( राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण)

प्रकाश बाळ, सौजन्य – मटा
मालेगाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे, ते मुस्लिमविषयक प्रश्नामुळंच. ताजं निमित्त घडलं आहे, ते त्या गावातील पाच मुस्लिम कुटुंबांना उलेमांनी धर्मबहिष्कृत केल्याचं.

अशा या घटना किंवा फतवे काढल्यानं वाद निर्माण होण्याचे प्रसंग आज एकविसाव्या शतकात थांबवता येणार नाहीत काय?

निश्वितच येतील. मात्र त्यासाठी गरज आहे, ती मुस्लिम समाजातील शहाण्या-सुरत्या लोकांनी एकत्र येऊन मूलभूत विचार करण्याची आणि तसा विचार करण्यासाठी बहुसंख्याक समाजातील शहाण्या-सुरत्या लोकांनी त्यांना पाठबळ देण्याची. भारतीय मुस्लिमांपुढील खरा पेच आहे, तो पश्विम आशियातील मुस्लिम समाजाची भारतीय शाखा म्हणून राहायचं की, भारतीय समाजाची मुस्लिम शाखा म्हणून जगायचं, हाच. भारतीय समाजाची मुस्लिम शाखा म्हणून जगण्याचा निर्णय येथील मुस्लिम समाजानं घेतला, तर त्यासाठी त्याला मूलभूत विचार करण्याची गरज भासणार आहे…आणि त्याची सुरुवात कुराणापासूनच होते.

कुराणाचे दोन सरळ भाग पडतात. एक मक्केतील व दुसरा मदिनेतील. मक्केतील बहुतांश आयती प्रेषितांच्या ‘रसूल’ या भूमिकेतून आल्या आहेत. धर्माची उदात्त तत्त्वं या आयतीत सांगितली आहेत. उलट मदिनेतील आयती या प्रेषितांच्या ‘राष्ट्रपती’ या भूमिकेतून आल्या आहेत. प्रेषितांच्या आयुष्यातील मदिनेचा काळ हा संघर्षाचा होता. त्यांना मक्का सोडून मदिनेला जावं लागलं होतं. त्यामुळं कुराणातील या काळातील आयतींना त्या संघर्षाचा काळाचा तत्कालीन संदर्भ आहे. मक्केतील आयतीप्रमाणं त्या कालातीत अशा स्वरूपाच्या नाहीत. विशेष म्हणजे काळाच्या संदर्भात कुराणाचा अर्थ लावायला हवा, असं प्रेषितांचंही म्हणणं होतं. म्हणूनच त्यांनी ‘इज्तिहाद’ची संकल्पना मांडली.

या संकल्पनेची पार्श्वभूमीही आज लक्षात ठेवली जाणं गरजेचं आहे.

पैगंबरांनी येमेन या प्रांताचा सुभेदार म्हणून मुआद याची नेमणूक केली. त्यावेळी कारभार करताना न्यायदानाची तुझी पद्धत कशी असेल, असा प्रश्न पैगंबरांनी त्याला विचारला. कुराणातील तत्त्वांच्या आधारे मी न्यायदान करीन, असं उत्तर मुआदनं दिलं. त्यावर ‘कुराणात प्रत्येक परिस्थितीत न्याय देण्याच्या दृष्टीनं तत्त्व न मिळाल्यास काय करशील?’ असा दुसरा प्रश्न पेषितांनी मुआदला विचारला. तेव्हा पैगंबरांच्या आदर्श जीवनातील घटनांच्या आधारे मी न्यायदान करीन, असं मुआदचं उत्तर होतं. त्यानंही पैगंबरांचं समाधान झालं नाही. माझ्या जीवनातील घटनांमुळंही न्यायदान करणं जर अशक्य झालं तर काय करशील, असा प्रतिप्रश्न त्यांनी मुआदला केला. तेव्हा समाजातील विचारवंंतांची मदत मी घेईन, असा जबाब मुआदनं दिला. विचारवंंत काही सर्वज्ञानी नसतात, त्यांनाही काही गोष्टी कळत नसतात, मग काय करशील, असा सवाल प्रेषितांनी केला. शेवटी मुआद म्हणाला की, मी माझी सदसद्विवेक बुद्धी वापरीन आणि न्याय करीन. हे उत्तर प्रेषितांनी मान्य केलं. मुआदचं हे चौथं उत्तर म्हणजेच इज्तिहाद. ही संकल्पना आपली सदसद्विवेकबुद्धी वापरण्याचा हक्क प्रत्येक श्रद्धावानाला देते..

जेथे मुस्लिम बहुसंख्य नाहीत, तेथे इतर धमीर्यांच्या राज्यात कसं राहायचं, कसं वागायचं, आपलं धर्माचरण कसं करायचं, हा इस्लामधमीर्यांच्या दृष्टीनं कळीचा प्रश्न असतो. पण या संदर्भात पैगंबरांनीच आपल्या कृतीनं काही दाखले देऊन ठेवले आहेत. मदिनेत असताना तेथील बहुधमीर्य समाजात वेळ पडल्यास इतर धमीर्यांशी सहकार्य करण्यास हरकत नाही, असा दाखला पैगंबरांनी आपल्या कृतीनं घालून दिला आहे. पैगंबरांच्या याच दाखल्याचा वापर मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिमांनी कसं सहभागी होणं आवश्यक आहे, हे पटवण्यासाठी केला होता.

अरबस्तानातील सतत संघर्ष करणाऱ्या युद्धखोर टोळ्यांना एकत्र आणून त्यांना एका समान श्रद्धेच्या धाग्यानं बांधून ठेवण्यासाठी ‘ईश्वराचे आपण लाडके आहोत, पूवीर्च्या सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टी इस्लाममध्ये सामावलेल्या आहेत, तोच एकमेव धर्म उरला पाहिजे व त्याच्या प्रचाराची जबाबदारी आपल्यावर ईश्वरानंच टाकली आहे, अशी शिकवण पैगंबरांनी दिली. सहाव्या शतकातील अरबस्तानात एक नवा समाज निर्माण करण्यासाठी हे सांगणं पैगंबरांना आवश्यक होतं. त्यांना विविध स्थानिक पंथ व ख्रिश्वन आणि ज्यूंच्या प्रभावाला तोंड देत आपला धर्म प्रस्थापित करायचा होता. आज शेकडो वर्षांनंतर तोच दृष्टिकोन बाळगला जाणं हे कालबाह्यतेचं लक्षण आहे.

‘जेव्हा मी धर्माबद्दल आज्ञा देतो, तेव्हा तिचा स्वीकार करा, पण ज्यावेळी मी ऐहिक गोष्टीबाबत आज्ञा देतो, तेव्हा मी मानवापेक्षा जरादेखील वेगळा नसतो’, असं पैगंबरांनीच म्हणून ठेवलं आहे. म्हणूनच ‘धर्म’ कोठे संपतो आणि ‘ऐहिका’ला कोठे सुरूवात होते, याचा निर्णय घेऊन हे दोन धागे वेगवेगळे करून त्याची निरगाठ सोडवणं, हाच मुस्लिम समाजापुढील आजचा खरा पेच आहे.

इस्लामची तत्त्वं पाळल्यामुळं निर्माण झालेली आपली ओळख गमावली, तर दोन-तीन पिढ्यांतच आपलं अस्तित्व संपून जाईल, अशी भीती बहुसंख्य मुसलमानांना वाटते. पण धामिर्कदृष्ट्या मुसलमानांना आपली ‘मुस्लिम’ म्हणून असलेली ओळख पुसून टाकण्याची गरजच नाही. धर्म व संस्कृती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इस्लाम जगात जेथे जेथे पसरला, त्यापैकी अनेक ठिकाणी तो स्थानिक संस्कृतीत रुजला.

ही घडी पुन्हा बसवण्यासाठी मुस्लिमांना अंतर्मुख होण्याची नितांत आवश्यकता आहे. भारतीय वातावरणाशी मिळतेजुळते घेणाऱ्या आणि तसं करण्यास पाठबळ देणाऱ्या ‘सुधारणावादी इस्लाम’चा विचार होणं गरजेचं आहे. पैगंबरांनीच म्हणून ठेवलं आहे की, एकवेळ अशी येईल की, इस्लामच्या स्वरूपात बदल होऊ शकेल. आणि असं करण्यासाठी जी यंत्रणा लागेल ती ‘इज्मा (विचारवंतांशी सल्लामसलत), इज्तिहाद (काळानुसार कुराणाचा अर्थ लावण्याची मुभा) आणि कयास (सदसद्विवेक बुद्धीनं श्रद्धावानांनी कुराणाच्या आज्ञांचा लावलेला अर्थ) पुरवेल.

असं घडून येण्यासाठी बहुसंख्याक समाजाची साथ मिळायला हवी. बहुसंख्याक समाजातील सर्वसामान्य मुसलमानांच्या समस्यांबद्दल अज्ञानी असतात. बहुसंख्याक समाजानं आपला नकारात्मक जातीयवाद हा कार्यक्षम विधायक मानवतावादात रूपांतरित केला पाहिजे. बहुसंख्याकांनी मुस्लिमांप्रती सहअनुभूतचा- सहानुभूतीचा नव्हे- उदार विधायक दृष्टिकोन स्वीकारायला हवा. हिंदू धर्म आणि हिंदुत्व एक नाहीत. ज्यांना हिंदुत्व हवं आहे, त्यांना हिंदू धर्म हा एकसाची सांस्कृतिकतेत बंदिस्त करायचा आहे. त्यांना ‘हिंदूंचा पाकिस्तान’ हवा आहे. असं करू पाहणारे हे बहुसंख्याक समाजातही अल्पमतातच आहेत, हे मुस्लिमांनीही लक्षात घेतलं पाहिजे

अशा मूलभूत विचाराला मुस्लिम समाजात सुरुवात होईल, तेव्हाच मालेगावसारख्या घटना कालबाह्य होत जातील.

दत्तप्रसाद दाभोलकर , सौजन्य – लोकसत्ता

संयुक्त महाराष्ट्राचा अमृतकलश बरोबर घेऊन नेहरू, यशवंतराव चव्हाण वगैरे मंडळी शिवतीर्थावर जमली होती त्या वेळची गोष्ट. १०५ हुतात्म्यांच्या रक्ताची शपथ आता सुटली होती. साऱ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही मराठी माणूस आनंदात कसा चिंब भिजून निघाला होता. सारा महाराष्ट्र एकसंध एकजीव होऊन बाहेर पडला होता. पाटसकरांचा पराभव करीत नौशेर भरुचाला आम्ही निवडून दिले होते. आम्ही जात आणि धर्म विसरलो होतो. आम्हाला तोडणाऱ्या त्या भिंती आम्ही आमच्या मनात जमीनदोस्त केल्या होत्या. अमरशेख, नौशेर भरुचा, आंबेडकर, एस. एम. जोशी यांचा धर्म आणि जात कोणी काढली असती तर त्याच्या कानाखाली आवाज काढून आम्ही मोकळे झालो असतो!

आमचे स्वप्न सत्य बनून समोर आले होते. मराठी माणूस आता फक्त शेतमजूर, घरगडी किंवा गिरणी कामगार राहणार नव्हता. तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर, चोखा मेळा यांच्या भाषेचा वनवास आता संपला होता. ज्ञानेश्वरीच्या बरोबर ‘विज्ञानेश्वरी’ आता आम्ही खेडय़ापाडय़ांतून झोपडीझोपडीतून देणार होतो. खरे तर आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान खेडय़ापाडय़ांतील माणसांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचल्याने, कोयनेची वीज दारात पोहोचल्याने, उद्योगांचे जाळे महाराष्ट्रभर पसरल्याने त्या झोपडय़ा, झोपडय़ा उरणार नव्हत्या, त्यांची छोटी टुमदार घरे बनणार होती. मराठी माणूस आता मुंबईत बिचकणार नव्हता. कारण खाजगी व सरकारी कचेऱ्या त्याच्या भाषेत बोलणार होत्या-‘हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, हिला बैसवू वैभवाच्या शिरी’ ही कवीउक्ती कृतीत येणार होती!

असे असले तरी आम्हा मित्रमंडळींच्या दृष्टीने काही वांदे होते. पारशी कॉलनीतील आमचे मित्र आम्हाला चिडवत असत, ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची!’ एक खटय़ाळ मित्र तर यांच्यापुढे गेला! ‘मराठा गडी यशाचा धनी’ म्हणून आम्ही शाळेत फळ्यावर जे लिहिले होते त्यातल्या ‘गडी’ या शब्दाखाली तो लाल खडूने एक छान जाड रेघ ओढून गेला!-सारी शाळकरीच मुले, त्यांचीही काही चूक नव्हती. संयुक्त महाराष्ट्र निर्माण करताना कटुता वाढली होती. आम्हाला त्यांचा राग यायचा नाही तर त्यांची कीव यायची. -आम्ही म्हणायचो, ‘चिडा बच्चमजी चिडा हवे तेवढे! आता संयुक्त महाराष्ट्र झालाय. माझ्या कामगार बांधवांचे आणि मराठी भाषेचे वाईट दिवस आता संपलेत. तुम्ही जरूर महाराष्ट्रात राहा.-पण महाराष्ट्रात राहावयाचे असेल तर तुम्हाला मराठी शिकावे लागेल!’

आता पन्नास वर्षे मागे पडलीत. त्या मुलांचे सोडा; आमची आणि आमच्या नेतेमंडळींची मुले-नातवंडे इंग्रजी माध्यमात शिकलीत. आणखी एक भलतेच आक्रीत घडलेय. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’नेही ‘करवट’ बदललीय. मुंबईत ती भांडी घासायला मिळत नाहीत तर बिहारी माणसे ती येथे येऊन घासताहेत म्हणून राडा करीत मराठी तरुण रस्त्यावर उतरलेत!

आज महाराष्ट्रात ३२ टक्क्यांहून अधिक लोक दारिद्रय़रेषेखाली आहेत. म्हणजे मुंबई आमच्या ताब्यात असताना आमचे दारिद्रय़रेषेचे प्रमाण भारताच्या सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे. महाराष्ट्रातील दारिद्रय़रेषेचे प्रमाण बिहार, उत्तर प्रदेशशी स्पर्धा करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत आमच्याशी स्पर्धा करण्याची हिंमत कोणत्याही राज्यात नाही.

५० वर्षांत हे असे का झाले, हे प्रथम लक्षात घ्यावयास हवे. संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून प्राणाची बाजी लावलेल्या कृष्णा देसाई यांना मराठी तरुणांनीच राडा करून संपवले. आणि या खुनी तरुणांना वाचविण्यासाठी मराठी बोलताही न येणाऱ्या एका वकिलाला आणून त्याला मुंबईत प्रस्थापित व्हावयास मदत केली. मराठी बोलताही न येणाऱ्या माणसांना महाराष्ट्राचे खासदार म्हणून आम्ही राज्यसभेत पाठविले. महाराष्ट्र आणि मुंबई आमच्या हातात असताना, साथीच्या रोगासारख्या, परप्रांतीयांच्या नव्हेत तर बांगलादेशीयांच्या झोपडपट्टय़ा आम्ही मुंबईत वाढावयास दिल्या.

मुंबईतील मराठी माणसांनी ‘राडा संस्कृती’ रुजवली. मुंबईत राहतात त्यापेक्षा खूप अधिक मराठी माणसे महाराष्ट्राबाहेर भारतभर राहतात. मात्र ज्या ज्या वेळी मुंबईत मराठी माणसांनी राडा केला तेव्हा भारतभर या मराठी माणसांना जगणे कठीण केले गेले. साऱ्या भारतभर ‘राडा करणारा प्रदेश’ म्हणून महाराष्ट्र बदनाम झाला. मुंबईतील भूखंडाचे श्रीखंड आणि राडा संस्कृतीतून हाती आलेल्या अमाप पैशाच्या जोरावर नेते मंडळींनी महाराष्ट्रातील गावोगावचे राजकारण नासवले.

याच कालखंडात महाराष्ट्र व मुंबई यांच्या दृष्टीने एक सर्वात भयावह गोष्ट घडली. मुंबईतील गिरणी कामगार हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचा कणा होता. मुंबईतील गिरणी कामगार हा मुंबई आणि महाराष्ट्र यांना जोडणारा सेतू होता. हे कामगार मनाने आपल्या खेडय़ात गुंतलेले होते. तेथील एखाद्या तरुणाला मुंबईत यावयाचे असेल तर तो चक्क मुंबईत येऊन गिरणी कामगाराच्या चाळीतील गॅलरीत आपली पथारी पसरे. चाळीतील सार्वजनिक सुविधा वापरी आणि दिवसभर हिंडून मुंबईत उद्योगधंदा शोधे. मुंबईत होणारी खेडय़ांतील मराठी तरुणांची आवक प्रामुख्याने अशा प्रकारे होत असे. ती आपली ‘सप्लाय लाइन’ होती. मुंबईतील गिरण्या बंद पडल्या त्या वेळी दीड-दोन लाख मराठी कामगार बेकार झाले. प्रत्येक कामगाराचे कुटुंब होते. दहा लाख मराठी माणसे मुंबईच्या बाहेर फेकली गेली. मुंबईत येणारी मराठी माणसांची सप्लाय लाइन  तुटली. आता मुंबईच्या झोपडपट्टीत येऊन राहू शकणारा व वणवण करीत काम शोधणारा बिहारी तरुण मुंबईत भरती झाला.

हे घडत असताना ‘मला काय त्याचे?’ म्हणून मुंबईतील मराठी माणसे आणि त्यांना नाचवणारे मराठी पक्ष व नेते शांत राहिले; त्यांनी याविरुद्ध राडा वगैरे राहू देत, साधी मुंबई बंदसुद्धा केली नाही. किमान गिरण्यांच्या जागांवरचा कामगारांचा हक्क वसूल केला असता.. आपण त्या जागांवर बहुगुणांचे ‘चिपको आंदोलन’ करू शकलो असतो.. कदाचित आजही करू शकू. पण आपण असले काही अजिबात करणार नाही.. प्रेताच्या टाळूवरील लोणी खावे त्याप्रमाणे या जागा विकत घेण्यासाठी आपले नेते धडपडताहेत.

महाराष्ट्र उद्योगधंद्यात नव्हता. व्यापारातही नव्हता. पण शिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र अभिमानाने दिमाखात उभा होता. महात्मा फुलेंनी ‘इतुके अनर्थ एका अविद्येने केले’ हे बहुजन समाजाला पटवून दिले आणि पहिले सक्षम पाऊल उचलून, पुण्यात एका ब्राह्मणाच्या वाडय़ात, आपल्या सहधर्मचारिणीबरोबर दलित मुलींसाठी, भारतातील पहिली शाळा काढली. भारतरत्न कर्वेनी स्त्री-शिक्षणाचाच नव्हे तर विधवाविवाहाचा आणि विधवाशिक्षणाचा पाया घातला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र दिला आणि तो उपेक्षित समाजाने झेलला. आणि आमच्या कर्मवीर अण्णांनी, महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर सबंध जगात प्रथमच श्रमावर आधारित स्वावलंबी शिक्षण बहुजन समाजातील वंचित मुलांसमोर ठेवले. स्वावलंबी शिक्षणातून कर्तबगार तरुणांची एक पिढी महाराष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी मैदानात उतरली.

आज परिस्थिती काय आहे? साखरसम्राटांना खिशात घालतील असे शिक्षणसम्राट; त्यांच्या शिक्षणसंस्थांमधील घोटाळे; साटेलोटे करून आपले दुय्यम सहकारी त्यांना जपणारे राज्यकर्ते. महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था या दुष्ट चक्रातून बाहेर कशी काढावयाची याचा विचार करावयास हवा. शिक्षणसम्राटांना मिळणाऱ्या नफ्यापैकी ८०-९० टक्के नफा आपणाला ग्रामीण विभागातील प्राथमिक शिक्षणाकडे वळविण्यापासून सुरुवात करावी लागेल.

गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्राची खरी ओळख आपण पुसून टाकली आहे. ‘विचार’ हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आधार आहे. गुजरातच्या, व्यापारातून आलेल्या समृद्धीचे कारण सांगताना दादूमिया एकदा म्हणाले होते, ‘गुजरातमध्ये बनिया बनिया असतोच. पण ब्राह्मणही बनिया असतो. क्षत्रिय आणि शूद्रही बनिया असतो. वर्णाश्रमधर्म मोडून व्यापार सर्वत्र रक्तात भिनलाय! महाराष्ट्रात घृणास्पद वर्णाश्रमधर्म पार मोडून लखलखता विचार देणारे महापुरुष निर्माण झाले. आगरकर, टिळक, विनोबा भावे, सावरकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू, भारतरत्न आंबेडकर लखलखते विचार घेऊन हे महापुरुष पुढे आले. साऱ्या भारताने विस्मयचकित होऊन त्यांच्याकडे पाहिले आणि आजही त्यांच्या विचारांच्या आधाराने भारतातील वैचारिक चळवळींची आणि राजकीय पक्षांची वाटचाल चालू आहे.
मात्र गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्रात आलेल्या राडा संस्कृतीने महाराष्ट्रातील एकही वैचारिक चळवळ वा आंदोलन वाढू दिले नाही. ‘शेतकरी संघटना’, ‘अंनिस’, ‘दलित पँथर’,  ‘एक गाव एक पाणवठा’ यातील प्रत्येकाचे प्राक्तन महाराष्ट्रातील ‘राडा संस्कृतीने’ ठरविले. वैचारिक चळवळी वाढावयास एक वातावरण लागते. शांतपणे विचार केला तर राजर्षी शाहू, आंबेडकर, महात्मा फुले अगदी सावरकर पेशवाईत वाढू शकले नसते किंवा अगदी इंग्रज राजवटीतसुद्धा लोणी येथे झालेल्या ‘सनातन धर्म’ परिषदेने सावकरांना सुनावले होते, ‘आज पेशवाई असती तर शूद्रांबरोबर भोजन करणाऱ्या आणि शूद्र-ब्राह्मण विवाह करणाऱ्या या धर्म मोडणाऱ्या पापी माणसाला पेशव्यांनी हत्तीच्या पायाखाली देहान्त प्रायश्चित्त दिले असते!’ इंग्रज राजवट गेली. पेशवाईही आली नाही. मात्र ४० वर्षांत राडा संस्कृतीने महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या वैचारिक चळवळी मोडीत काढल्या.

ते असो! एका अगदी वेगळ्या गोष्टीचा आपण शांतपणे विचार करावयास हवा. एखाद्या भाषक विभागाची अस्मिता व ओळख टिकविण्यासाठी व त्याची प्रगती करण्यासाठी त्या भाषक विभागाचे ‘एकक’ असणे गरजेचे आहे का? महात्मा गांधींनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे व वैचारिक चळवळींचे मोहोळ असे म्हटले होते. त्या वेळी ‘महाराष्ट्र’ म्हणून काही अस्तित्वात नव्हता. मुंबई प्रांतात सिंध, कराची वगैरे प्रदेश होते- गुजरातचा भाग होता, कर्नाटकचा थोडा भाग होता. सबंध विदर्भ त्या वेळी वेगळा होता. मराठवाडय़ाचे सहा जिल्हे निजामी राजवटीत होते. गोवा पार्तुगीज अंमलाखाली होता. तरीही महाराष्ट्र हा ‘महाराष्ट्र’ म्हणूनच ओळखला जात होता. बडोदा, इंदूर, हैदराबाद, दिल्ली येथील महाराष्ट्र मंडळे दिमाखात उभी होती. चांगले साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. महाराष्ट्रात सामील होण्याचे नाकारणाऱ्या गोव्यात आजही पुणे, मुंबई, सातारा यापेक्षा अधिक आपुलकीने आणि दिमाखात साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात आणि आज जर आपण पुन्हा महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावे की होऊ नये यासाठी सार्वमत घेतले तर विलिनीकरणाच्या बाजूने तेव्हापेक्षा कमी मते पडतील. गोव्यात परप्रांतीयांचे प्रमाण वाढले हे त्यामागचे कारण नव्हे; तेथील मराठी माणसांशी बोललो तर वेगळे राहून शहाणपण केले,असेच प्रामुख्याने का ऐकायला मिळते?

भाषेची व भाषक विभागाची अस्मिता, स्वाभिमान जपण्यासाठी व वाढविण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी भाषक विभागाने एकत्रच राहावयास हवे का? हिंदी भाषक विभाग, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार असा विखुरलेला आहे. छोटी राज्ये, प्रगतीच्या दृष्टीने अधिक सक्षम असतात असेही अहवाल आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांची मानसिकता वेगळी आहे का? त्यांना एकत्र ठेवून आपण तीन पायांची शर्यत खेळतोय का? हा देश प्रामुख्याने भाषांचे नव्हे तर जातींचे संघराज्य आहे आणि भाषावार प्रांतरचनेत एखाद्या जातीची अघोषित हुकूमशाही निर्माण होण्याचा धोका आहे का? आर्थिक स्तर, साधनसंपत्ती आणि मानसिकता वेगळी असलेल्या विभागांची भाषेच्या नावावर तीन पायांची शर्यत केली तर त्यातून फरपटच हातात येत राहणार का? विदर्भामध्ये सुविधांचा अनुशेष, पश्चिम महाराष्ट्रात श्रीमंती सूज आणि मुंबईत मृगजळ मराठी माणूस कवटाळून बसणार..

आज मुंबईत ४० टक्क्यांहून कमी मराठी माणसे राहतात. पण महाराष्ट्रातील सर्व खेडी आणि शहरे अंधारात ठेवून शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना वीज न देता महाराष्ट्र मुंबईला २४ तास मुबलक वीज पुरवतो. मॉल आणि आयपीएलचे क्रीडा संकुल यांनासुद्धा आपले जनरेटर्स लावा असे का म्हणू शकत नाही? पाणी महाराष्ट्राचेच मात्र ६० टक्क्यांहून अधिक परभाषिक असलेल्या मुंबईला आपण सर्वाधिक पाणी देतो. तेसुद्धा फार स्वस्त दरात. मुंबईत पाणी साडेतीन रुपये हजार लिटर्स. सातारा येथे सदर बझार विभागात १० रुपये हजार लिटर्स, ते पण मुंबईला मिळते त्याच्या १० टक्के. केंद्र सरकार मुंबईतील सागरी सेतूसारख्या उपक्रमाला हजारो कोटी रुपये देते. त्या वेळी साऱ्या भारतातील लोकांना वाटते महाराष्ट्राला केवढे झुकते माप! पण त्याचा मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांना तरी कितीसा फायदा असतो?

५० वर्षांनंतर काही नवी रचना आपण शोधावयास हवी का? महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असे छोटे विभाग करावेत. मुंबई केंद्रशासित करावी. मात्र मुंबईपासून महाराष्ट्राला आज जे महसुली उत्पन्न मिळते ते पुढील १०० वर्षे केंद्राने चलनवाढीतील वाढीप्रमाणे महाराष्ट्राच्या या पाच विभागांना समान वाटून द्यावे. ही रचना अनेकांना चुकीची वाटेल. बरोबर असली तरी त्यात अनेक त्रुटी असतील, पण विचार हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आधार आहे हे मान्य करून राडा संस्कृतीला न घाबरता यावर चर्चा तरी करावयास नको का? आपण असे काही करणार नसू तर आणखी ५० वर्षांनी गावोगावी ‘भांडी घासा आमची’ असे परप्रांतीयच म्हणत असतील.. किंबहुना आजच त्याची ठाणे, नाशिक अशा ठिकाणी सुरुवात झाली आहे.