Archive for जून 19, 2010

प्रकाश बाळ, सौजन्य – मटा
मालेगाव पुन्हा एकदा प्रकाशझोतात आलं आहे, ते मुस्लिमविषयक प्रश्नामुळंच. ताजं निमित्त घडलं आहे, ते त्या गावातील पाच मुस्लिम कुटुंबांना उलेमांनी धर्मबहिष्कृत केल्याचं.

अशा या घटना किंवा फतवे काढल्यानं वाद निर्माण होण्याचे प्रसंग आज एकविसाव्या शतकात थांबवता येणार नाहीत काय?

निश्वितच येतील. मात्र त्यासाठी गरज आहे, ती मुस्लिम समाजातील शहाण्या-सुरत्या लोकांनी एकत्र येऊन मूलभूत विचार करण्याची आणि तसा विचार करण्यासाठी बहुसंख्याक समाजातील शहाण्या-सुरत्या लोकांनी त्यांना पाठबळ देण्याची. भारतीय मुस्लिमांपुढील खरा पेच आहे, तो पश्विम आशियातील मुस्लिम समाजाची भारतीय शाखा म्हणून राहायचं की, भारतीय समाजाची मुस्लिम शाखा म्हणून जगायचं, हाच. भारतीय समाजाची मुस्लिम शाखा म्हणून जगण्याचा निर्णय येथील मुस्लिम समाजानं घेतला, तर त्यासाठी त्याला मूलभूत विचार करण्याची गरज भासणार आहे…आणि त्याची सुरुवात कुराणापासूनच होते.

कुराणाचे दोन सरळ भाग पडतात. एक मक्केतील व दुसरा मदिनेतील. मक्केतील बहुतांश आयती प्रेषितांच्या ‘रसूल’ या भूमिकेतून आल्या आहेत. धर्माची उदात्त तत्त्वं या आयतीत सांगितली आहेत. उलट मदिनेतील आयती या प्रेषितांच्या ‘राष्ट्रपती’ या भूमिकेतून आल्या आहेत. प्रेषितांच्या आयुष्यातील मदिनेचा काळ हा संघर्षाचा होता. त्यांना मक्का सोडून मदिनेला जावं लागलं होतं. त्यामुळं कुराणातील या काळातील आयतींना त्या संघर्षाचा काळाचा तत्कालीन संदर्भ आहे. मक्केतील आयतीप्रमाणं त्या कालातीत अशा स्वरूपाच्या नाहीत. विशेष म्हणजे काळाच्या संदर्भात कुराणाचा अर्थ लावायला हवा, असं प्रेषितांचंही म्हणणं होतं. म्हणूनच त्यांनी ‘इज्तिहाद’ची संकल्पना मांडली.

या संकल्पनेची पार्श्वभूमीही आज लक्षात ठेवली जाणं गरजेचं आहे.

पैगंबरांनी येमेन या प्रांताचा सुभेदार म्हणून मुआद याची नेमणूक केली. त्यावेळी कारभार करताना न्यायदानाची तुझी पद्धत कशी असेल, असा प्रश्न पैगंबरांनी त्याला विचारला. कुराणातील तत्त्वांच्या आधारे मी न्यायदान करीन, असं उत्तर मुआदनं दिलं. त्यावर ‘कुराणात प्रत्येक परिस्थितीत न्याय देण्याच्या दृष्टीनं तत्त्व न मिळाल्यास काय करशील?’ असा दुसरा प्रश्न पेषितांनी मुआदला विचारला. तेव्हा पैगंबरांच्या आदर्श जीवनातील घटनांच्या आधारे मी न्यायदान करीन, असं मुआदचं उत्तर होतं. त्यानंही पैगंबरांचं समाधान झालं नाही. माझ्या जीवनातील घटनांमुळंही न्यायदान करणं जर अशक्य झालं तर काय करशील, असा प्रतिप्रश्न त्यांनी मुआदला केला. तेव्हा समाजातील विचारवंंतांची मदत मी घेईन, असा जबाब मुआदनं दिला. विचारवंंत काही सर्वज्ञानी नसतात, त्यांनाही काही गोष्टी कळत नसतात, मग काय करशील, असा सवाल प्रेषितांनी केला. शेवटी मुआद म्हणाला की, मी माझी सदसद्विवेक बुद्धी वापरीन आणि न्याय करीन. हे उत्तर प्रेषितांनी मान्य केलं. मुआदचं हे चौथं उत्तर म्हणजेच इज्तिहाद. ही संकल्पना आपली सदसद्विवेकबुद्धी वापरण्याचा हक्क प्रत्येक श्रद्धावानाला देते..

जेथे मुस्लिम बहुसंख्य नाहीत, तेथे इतर धमीर्यांच्या राज्यात कसं राहायचं, कसं वागायचं, आपलं धर्माचरण कसं करायचं, हा इस्लामधमीर्यांच्या दृष्टीनं कळीचा प्रश्न असतो. पण या संदर्भात पैगंबरांनीच आपल्या कृतीनं काही दाखले देऊन ठेवले आहेत. मदिनेत असताना तेथील बहुधमीर्य समाजात वेळ पडल्यास इतर धमीर्यांशी सहकार्य करण्यास हरकत नाही, असा दाखला पैगंबरांनी आपल्या कृतीनं घालून दिला आहे. पैगंबरांच्या याच दाखल्याचा वापर मौलाना आझाद यांनी स्वातंत्र्य चळवळीत मुस्लिमांनी कसं सहभागी होणं आवश्यक आहे, हे पटवण्यासाठी केला होता.

अरबस्तानातील सतत संघर्ष करणाऱ्या युद्धखोर टोळ्यांना एकत्र आणून त्यांना एका समान श्रद्धेच्या धाग्यानं बांधून ठेवण्यासाठी ‘ईश्वराचे आपण लाडके आहोत, पूवीर्च्या सर्व धर्मांतील चांगल्या गोष्टी इस्लाममध्ये सामावलेल्या आहेत, तोच एकमेव धर्म उरला पाहिजे व त्याच्या प्रचाराची जबाबदारी आपल्यावर ईश्वरानंच टाकली आहे, अशी शिकवण पैगंबरांनी दिली. सहाव्या शतकातील अरबस्तानात एक नवा समाज निर्माण करण्यासाठी हे सांगणं पैगंबरांना आवश्यक होतं. त्यांना विविध स्थानिक पंथ व ख्रिश्वन आणि ज्यूंच्या प्रभावाला तोंड देत आपला धर्म प्रस्थापित करायचा होता. आज शेकडो वर्षांनंतर तोच दृष्टिकोन बाळगला जाणं हे कालबाह्यतेचं लक्षण आहे.

‘जेव्हा मी धर्माबद्दल आज्ञा देतो, तेव्हा तिचा स्वीकार करा, पण ज्यावेळी मी ऐहिक गोष्टीबाबत आज्ञा देतो, तेव्हा मी मानवापेक्षा जरादेखील वेगळा नसतो’, असं पैगंबरांनीच म्हणून ठेवलं आहे. म्हणूनच ‘धर्म’ कोठे संपतो आणि ‘ऐहिका’ला कोठे सुरूवात होते, याचा निर्णय घेऊन हे दोन धागे वेगवेगळे करून त्याची निरगाठ सोडवणं, हाच मुस्लिम समाजापुढील आजचा खरा पेच आहे.

इस्लामची तत्त्वं पाळल्यामुळं निर्माण झालेली आपली ओळख गमावली, तर दोन-तीन पिढ्यांतच आपलं अस्तित्व संपून जाईल, अशी भीती बहुसंख्य मुसलमानांना वाटते. पण धामिर्कदृष्ट्या मुसलमानांना आपली ‘मुस्लिम’ म्हणून असलेली ओळख पुसून टाकण्याची गरजच नाही. धर्म व संस्कृती या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. इस्लाम जगात जेथे जेथे पसरला, त्यापैकी अनेक ठिकाणी तो स्थानिक संस्कृतीत रुजला.

ही घडी पुन्हा बसवण्यासाठी मुस्लिमांना अंतर्मुख होण्याची नितांत आवश्यकता आहे. भारतीय वातावरणाशी मिळतेजुळते घेणाऱ्या आणि तसं करण्यास पाठबळ देणाऱ्या ‘सुधारणावादी इस्लाम’चा विचार होणं गरजेचं आहे. पैगंबरांनीच म्हणून ठेवलं आहे की, एकवेळ अशी येईल की, इस्लामच्या स्वरूपात बदल होऊ शकेल. आणि असं करण्यासाठी जी यंत्रणा लागेल ती ‘इज्मा (विचारवंतांशी सल्लामसलत), इज्तिहाद (काळानुसार कुराणाचा अर्थ लावण्याची मुभा) आणि कयास (सदसद्विवेक बुद्धीनं श्रद्धावानांनी कुराणाच्या आज्ञांचा लावलेला अर्थ) पुरवेल.

असं घडून येण्यासाठी बहुसंख्याक समाजाची साथ मिळायला हवी. बहुसंख्याक समाजातील सर्वसामान्य मुसलमानांच्या समस्यांबद्दल अज्ञानी असतात. बहुसंख्याक समाजानं आपला नकारात्मक जातीयवाद हा कार्यक्षम विधायक मानवतावादात रूपांतरित केला पाहिजे. बहुसंख्याकांनी मुस्लिमांप्रती सहअनुभूतचा- सहानुभूतीचा नव्हे- उदार विधायक दृष्टिकोन स्वीकारायला हवा. हिंदू धर्म आणि हिंदुत्व एक नाहीत. ज्यांना हिंदुत्व हवं आहे, त्यांना हिंदू धर्म हा एकसाची सांस्कृतिकतेत बंदिस्त करायचा आहे. त्यांना ‘हिंदूंचा पाकिस्तान’ हवा आहे. असं करू पाहणारे हे बहुसंख्याक समाजातही अल्पमतातच आहेत, हे मुस्लिमांनीही लक्षात घेतलं पाहिजे

अशा मूलभूत विचाराला मुस्लिम समाजात सुरुवात होईल, तेव्हाच मालेगावसारख्या घटना कालबाह्य होत जातील.