Archive for ऑगस्ट, 2010

जयसिंगराव पवार , सकाळ, २० जुन, २००९

खरे तर हा इतिहासाच्या क्षेत्रातील प्रश्‍न आहे; पण गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तो गाजतो आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. इतिहासाचा संदर्भ एकाच गोष्टीशी असतो आणि ती गोष्ट म्हणजे निखळ ऐतिहासिक सत्य. वरील वादाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथी इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा, काही नवी भर घालून त्याची नवी सुधारित आवृत्ती नुकतीच “बालभारती’तर्फे प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती, तिचा मी सभासद होतो. गेले काही दिवस या वादाच्या निमित्ताने माझ्यावरही टीकाटिप्पणी झाली. तेव्हा या प्रश्‍नामधील समितीची व माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो.
टीकाकारांचा मुख्य आक्षेप असा, की नव्या पुस्तकात दादोजींचा “शिवरायांचे गुरू’ म्हणून असलेला उल्लेखच वगळण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून जुन्या पुस्तकात कुठेच उल्लेख नाही. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जुन्या पुस्तकात पान क्रमांक १६ वर दादोजींच्या देखरेखीखाली पुणे प्रांती शिवरायांचे कोणकोणत्या विषयांचे शिक्षण झाले याचे वर्णन आहे. त्यावरून दादोजी हे “शिक्षक’ म्हणून पुढे येतात; गुरू म्हणून नव्हे. गुरू जीवितकार्याची प्रेरणा देतो. शिक्षक व्यावहारिक ज्ञान देतो.
उपरोक्त वर्णनाच्या शेजारच्याच पानावर दादोजींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण चालू असल्याचे चित्र आहे. नव्या पुस्तकात उपरोक्त वर्णन व हे चित्र बदलून त्या ठिकाणी शहाजीराजांचे चित्र घातले आहे. तसेच पुणे जहागिरीत दादोजींच्या ऐवजी शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या शिक्षकांनी शिवरायांना विविध कला व शास्त्रे शिकवली, असा नवा उल्लेख केला आहे.
कळीचा मुद्दा हा आहे. टीकाकारांचे म्हणणे असे, की जातीय संघटनांच्या दबावाखाली तज्ज्ञ समितीने हा बदल कोणताही पुरावा नसताना केला आहे!
हा घ्या अस्सल पुरावा
समितीने केलेला बदल मनाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नाही. समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे. कर्नाटकात शहाजीराजांच्या पदरी ७० पंडित होते. त्यापैकी कवींद्र परमानंद हा एक होता. त्याने महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या आज्ञेने काव्यमय शिवचरित्र संस्कृतमध्ये रचले आहे. त्याने म्हटले आहे, की जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूंच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्‍लोक-७०-७१)
पुढे शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली चालूच राहिले. शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची आणि जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो, की शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्‍वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्‍लोक २५-२७)
शिवभारतकार पुढे म्हणतो, की शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्‍वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्‍वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, विष उतरवण्याची कला, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्‍लोक ३४-४०)
सारांश, शिवरायांना शिक्षण देण्यासाठी शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापकवर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. या अध्यापक वर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल, दादोजींची नाही. दादोजी हे काही विविध कला व शास्त्रे जाणणारे पंडित नव्हते. त्यांच्या अंगी प्रशासनकौशल्य होते. त्यानुसार ते शहाजीराजांच्या जहागिरीची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम निष्ठेने व सचोटीने करत होते. पण इथे शिवाजीराजांच्या शिक्षणाशी काही संबंध असण्याची गरज नाही. शिवभारतकार तर दादोजींचा नामोल्लेखही करत नाही.
तज्ज्ञ समितीने काय केले?
जुन्या पुस्तकात दादोजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले आणि घोडदौड, तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती, प्रशासन, न्यायनिवाडा या विषयांत ते तरबेज झाले, असे म्हटले आहे. या विधानास शिवरायांच्या मृत्यूनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीतील उल्लेख पुरावे म्हणून पुढे केले जातात. शिवचरित्रकार श्री. मेहेंदळे यांनी दादोजी हा शिवरायांचा गुरू म्हणून फक्त बखरीतच उल्लेख असल्याचे म्हटले आहे. (डीएनए ता. ४.६.२००९)
आता समितीसमोर असा प्रश्‍न उभा राहिला, की शिवकालीन अत्यंत विश्‍वसनीय असणाऱ्या खुद्द शिवरायांच्या आदेशाने लिहिलेल्या परमानंदाच्या शिवभारतातील मजकूर प्रमाण मानायचा, की शिवरायांनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेला बखरींतील मजकूर प्रमाण मानायचा? समितीने शिवभारतातील मजकूर प्रमाण मानून शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी नेमलेल्या शिक्षकांकडून झाले, असे नव्या पुस्तकात नमूद केले आहे. चित्रातही शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले, असे दाखविले. इतिहासलेखनशास्त्राला धरूनच ही कृती आहे.
ज्या शिवभारताच्या आधारावर आम्ही इतिहासाची उपरोक्त पुनर्मांडणी केली आहे, त्या शिवभारताचा इतिहासलेखनाच्या संदर्भात गौरव करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्‍वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.” (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, दुसरी आवृत्ती, १९९८)
अशा या शिवकालातील “समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय’ साधनाबद्दल श्री. मेहेंदळे एक शब्दही आता काढत नाहीत. का? शिवभारतातील पुरावा बखरीतील पुराव्याच्या विरोधात जातो म्हणून?
सत्य कोण लपवून ठेवत आहे?
तज्ज्ञ समितीने केलेल्या उपरोक्त बदलावर हल्ला करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”इतिहासाच्या (या नव्या) पुस्तकात करण्यात आलेले फेरबदल हे कोणतेही नवीन पुरावे अथवा माहितीशिवाय केले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीपासून हेतुपुरस्सर काही गोष्टी लपवून ठेवण्याचा (हा) प्रकार घातक आहे.” (सकाळ ः ६.६.०९)
तज्ज्ञ समितीने नवीन पुरावे पुढे आणले नाहीत हे खरे; पण जे अस्सल पुरावे आतापर्यंत अंधारात हेतुपुरस्सर (?) ठेवले गेले ते उजेडात आणले आणि त्यावर आधारित इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे, हे श्री. मेहेंदळेही मान्य करतील. आम्ही नव्या पिढीपासून ऐतिहासिक सत्य लपवून ठेवत नाही. उलट त्यावरची धूळ झटकून ते चकचकीत करत तिच्यासमोर ठेवत आहोत.
श्री. मेहेंदळे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. अतिशय चिकित्सक पद्धतीने त्यांनी शिवचरित्राचे तीन मोठे खंड प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये “शिवाजीची साक्षरता’ या नावाचे एक परिशिष्ट असून त्यामध्ये शिवराय हे साक्षर होते हे सिद्ध करण्यासाठी शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ बंगळूर मुक्कामी केल्याचा शिवभारतातील संदर्भ घेतला आहे (श्री राजा शिवछत्रपती, खं. १, भाग २, पृ. ७११). तथापि त्या परिशिष्टात पुढे शहाजीराजांनी शिवरायांबरोबर पुणे प्रांती धाडलेल्या शिक्षकांनी कोणकोणत्या विद्या व कला शिकवल्या, याचा उल्लेख दिलेला नाही. कारण तसा तो दिला असता तर पुणे जहागिरीत दादोजींनी शिवरायास शिक्षण दिले या बखरीवर आधारित प्रस्थापित इतिहासास छेद दिला गेला असता. तेव्हा नव्या पिढीपासून काही गोष्टी कोण लपवून ठेवीत आहे? आणि त्यामागचे रहस्य काय?
साक्षात्कार माझा आणि मेहेंदळेंचाही
सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर एक क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजींचा उल्लेख शिक्षक म्हणून (गुरू नव्हे) केल्याचे श्री. मेहेंदळे वारंवार पत्रकार परिषदेत व दूरदर्शनवर माझे पुस्तक दाखवून सांगतात. तसेच मी आता जातीय संघटनांच्या दबावाखाली माझे मत बदलले आहे, असे सांगून “आता जयसिंगराव पवारांना काय साक्षात्कार झाला? असा काय इतिहास पुढे आला? हे त्यांनी मलाही सांगावे,’ असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७।०६।०९) त्याला जाहीर उत्तर देणे गरजेचे आहे.
माझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझ संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले, की दादोजी हे शिवरायांचे गुरू, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असल्याचे एकही उल्लेख समकालीन साधनात नाही. माझे हे मत मी २४ एप्रिल २००६ च्या पुण्यातील एका जाहीर परिसंवादात परखडपणे मांडून पूर्वीचे माझे मत बरोबर नसल्याचेही नमूद केले होते. या गोष्टीस आता तीन वर्षे होऊन गेली. तेव्हा मला काही साक्षात्कार झाला असेल तर तीन वर्षांपूर्वी आणि तोही अभ्यासाअंती झाला आहे, बिनपुराव्याचा नाही. पण आता श्री. मेहेंदळ्यांच्या साक्षात्काराविषयी काय? त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत? असा आताच त्यांना काय साक्षात्कार झाला आहे?
वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजी हे शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा एकही समकालीन पुरावा नसल्याने श्री. मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात मौन बाळगले आहे. तथापि, बालभारतीच्या इतिहास पुस्तकात दादोजी शिवरायांचे गुरू परस्पर दाखवले गेले तर मनातून त्यांना हवेच आहे. त्याला त्यांचा विरोध तर नाहीच, उलट तसा आग्रह आहे.
खरोखरच दादोजी शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा समकालीन पुरावा पुढे आणला गेला तर आम्ही स्वागतच करू. कारण सत्यावर आधारित इतिहासाच्या पुनर्मांडणीस नेहमीच वाव असतो व तो असायला हवा.

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य-लोकप्रभा

परलोक निर्माण करण्यासाठी आत्म्याचे अस्तित्व, त्याचे अमरत्व, स्वर्गातील सुख, नरकातील दु:ख व परमेश्वर या संकल्पना समाजात दृढ व्हाव्या लागतात. मग या संकल्पनांचे नैतिक समर्थन करण्याची गरज वर्चस्व टिकवण्यासाठी प्रस्थापितांमध्ये निर्माण होते. म्हणून सुखवस्तू वर्गातील विचारवंत परलोक उभा करतात.
—————————————————————————————————————————

मृत्यूनंतर काय होते, परलोक म्हणजे काय, सृष्टीची निर्मिती कशी झाली, दु:खापासून मुक्ती कशी मिळवायची; हे धर्माचे क्षेत्र मानले जाते. पण कोणताही धर्म इहलोकाचा विचार आपल्या कक्षेतून कधीच सोडत नाही. धर्म एक सामाजिक वास्तव असतं, अधिकार गाजवणारी संस्था असतो. प्रत्येक धर्माने आपल्या अनुयायांसाठी काही श्रद्धा, चाली-रीती बंधनकारक करून ठेवलेल्या असतात. इहलोकात पाप काय, पुण्य काय, हे स्वतंत्र बुद्धीने ठरविण्याचा अधिकार अनुयायांना नसतो. तो विचार परलोकातून आलेल्या आदेशानुसार केला जातो. ही परलोकातील माहिती उपलब्ध होते कशी? ते ज्ञान उच्चकोटीच्या काही साक्षात्कारी माणसांना किंवा परमेश्वराने निवडलेल्या खास व्यक्तींना होते. ते अतींद्रिय असते. अशा व्यक्ती धर्मसंस्थापक किंवा धमार्ंतर्गत पंथाच्या संस्थापक बनतात. या ज्ञानावर आधारलेले पवित्र ग्रंथ, त्यावरील टीका, भाष्ये त्यातील वादविवाद, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास म्हणजे धर्मशास्त्र. अनुयायांना ते दुबरेध असते. म्हणून त्यात काय सांगितले आहे, धर्माचरण म्हणजे काय, आपला धर्म सर्वश्रेष्ठ कसा, हे लोकाना समजावून सांगण्याचे काम धर्मशास्त्रज्ञ करतात. धर्मशास्त्रज्ञांखेरीज धर्माला पुरोहित लागतो. धार्मिक विधींचा तो जाणकार असतो. म्हणजे एकप्रकारचा तंत्रज्ञ होय. देव व माणूस यांच्यातला तो दुवा ठरतो. हिंदूंमध्ये पुरोहित म्हटले की ब्राह्मणच डोळ्यासमोर येतो. पण समाजशास्त्रीय अभ्यासानुसार केवळ २० टक्के पुरोहितच ब्राह्मण असून ८० टक्के ब्राह्मणेतर आहेत. या व्यवस्थेत संत बसत नाहीत. संत वेगळे व गॉडमेन वेगळे. गॉडमेन हे इहलोकात वावरणारे देहधारी लोक असतात. खरा संत धर्माच्या बऱ्याच परंपरा, रुढी धुडकावून लावतो. तो आध्यात्मिक असतो, पण रुढार्थाने धार्मिक नसतो. थोडक्यात, धर्मसंस्थापक, धर्मशास्त्रज्ञ व पुरोहित हे परलोक संकल्पनेचे आधारस्तंभ असून परलोकाच्या नावाने चाललेला इहलोकाचा व्यवहार हेच धर्माचे स्वरूप असते.

पण मानवाच्या इतिहासात परलोक ही संकल्पना आली कधीपासून? प्राथमिक अवस्थेतील समाजात परलोक नव्हता. तेव्हा श्रद्धा होत्या, दैवते होती. त्यांच्यात तारक व मारक असा भेद होता. मृत्यू टळावा, आपत्तींपासून रक्षण व्हावे, अन्न-पाणी मिळावे एवढय़ासाठीच देवतांची करुणा भाकली जात असे. परलोक निर्माण करण्यासाठी आत्म्याचे अस्तित्व, त्याचे अमरत्व, स्वर्गातील सुख, नरकातील दु:ख व परमेश्वर या संकल्पना समाजात दृढ व्हाव्या लागतात. अशा संकल्पना जन्मास येण्यासाठी कष्ट करणारा व विचार करणारा, अशा दोन वर्गात समाजाची विभागणी व्हावी लागते. कष्ट करणाऱ्या श्रमातून निर्माण होणारे उत्पादन, कष्ट न करणाऱ्या जमीनदार सदृश वर्गाला आयते मिळते, तेव्हा त्याचे नैतिक समर्थन करण्याची गरज निर्माण होते. कारण या अल्पसंख्य वर्गाला बहुसंख्याकावर वर्चस्व प्रस्थापित करायचे असते. असे समर्थन इहलोकवादाच्या आधारे होऊच शकत नाही. म्हणून या सुखवस्तू वर्गातील विचारवंत परलोक उभा करतात. जगाच्या उत्पत्तीचे गूढ सोडवतात.

सृष्टी कोणी निर्माण केली?
परमात्मा, गॉड, अल्लाह याने!

का? त्याला तशी इच्छा झाली म्हणून. माणसाच्या वाटय़ाला एवढे दारिद्रय़, दु:ख का? तो पापी आहे म्हणून. हे पाप पूर्वजन्माचे असो किंवा ‘ओरिजनल सिन’चे. असो.

हे मनात बिंबल्यावर माणूस भयभीत होतो. व परमेश्वराचे म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या मानवी प्रतिनिधींचे दास्य पत्करतो आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांचे मुकाटय़ाने पालन करतो. धर्मसत्ता, राजसत्ता व अर्थसत्ता यांचा त्यात सामायिक लाभ असतो. यातून एक व्यवस्था किंवा प्रस्थापना निर्माण होते. ती पवित्र मानली जाते.

पण याचा अर्थ धर्म ही केवळ अफूची गोळी आहे असा नव्हे. धर्माचा तसा वापर करता येतो एवढाच याचा अर्थ आहे. धर्माची विधायक बाजूसुद्धा पहावी लागते. माणसाला त्याच्या रानटी बर्बर अवस्थेतून बाहेर काढण्याचे पहिले श्रेय धर्माकडे जाते. त्याला मर्यादा पालनाचे नीतीचे, अनुशासित सामूहिक जीवन जगण्याचे पहिले धडे धर्मानेच दिले. धर्मामुळेच ज्ञान-तत्वज्ञान व वैचारिक मंथन यांची सुरुवात झाली. विचाराला शिस्त लागली. शिवाय धर्मशास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळेच धर्म या सामाजिक संस्थेचा, ज्ञानाचा व मानवी संकल्पनांचा इतिहास उभा करणे शक्य झाले. अर्थात ज्ञान-तत्वज्ञानाची पाळेमुळे ते ज्या परिस्थितीत उदयाला आले त्यात दडलेली असतात. त्याला त्या त्या काळाच्या मर्यादा असतात. म्हणून धर्मशास्त्राचे योगदान आजच्या संदर्भात तपासून पहावे लागते. इच्छेतून सृष्टीची निर्मिती झाली हा चैतन्यवाद (स्पिरिच्युअलिझम)आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. जड सृष्टीतूनच सचेतन सृष्टी निर्माण झाली असे मानणे म्हणजे जडवाद (मटेरिअलिझम). जडवाद तर्क व अनुमान यावरून कधीच सिद्ध होत नसतो. त्यासाठी प्रायोगिक विज्ञान व तंत्रज्ञान यांचा पुरेसा विकास व्हावा लागतो. जडवाद निरीश्वरवाद, इहवाद हे पूर्वीपासून होते, पण तर्क व अनुमान यांवर आधारलेले होते.

सर्व मानवी व्यवहार स्थल-कालबद्ध असतात, अंतिम सत्य असे काहीच नसते. हे जाणण्यासाठी मार्क्‍सवादी व्हावे लागत नाही. मानवी भूतकाळाच्या सूक्ष्म अभ्यासातून व विज्ञानाच्या इतिहासातून ते कळते. सत्यशोधन करताना एखादी पवित्र संकल्पना किंवा पूज्य व्यक्ती आड येत असली तर तिला बाजूला सारण्याची मानसिक तयारी म्हणजे डावा विचार. जे प्रस्थापित आहे, प्रतिष्ठित आहे ते योग्य आहे असे मानणे हा उजवा विचार. माणसात या दोन्ही प्रवृत्ती कमी-अधिक प्रमाणात कार्यरत असतात. म्हणून जीवनात विसंगती निर्माण होतात आणि विसंगती हेसुद्धा मानवी जीवनातील एक सत्य आहे. त्यालाही सामोरे जावे लागते.

प्रायोगिक विज्ञानाची सुरुवात गॅलिलिओ (१५६४-१६७२) पासून झाली असली तरी १७-१८-१९ व्या शतकातील प्रगतीचे टप्पे ओलांडत ज्ञानाच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली ती विसाव्या शतकात. अणुविज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूविज्ञान, गणित, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, मनोविज्ञान व तत्तवज्ञान यातील संशोधनातून एकीकडे विशेषज्ञांचा काळ आला तर दुसरीकडे असंख्य ज्ञानशाखा कधी नव्हत्या इतक्या एकमेकींजवळ आल्या. ज्ञानाचे एकीकरण होऊन माणसाला आपण कोण आहोत व काय नाही हे चांगले कळून चुकले. विचारवंतांच्या आशावादाला तडा गेला. ज्ञानातील ही क्रांती धर्मशास्त्रज्ञांना पचणे अशक्य होते. म्हणून वैज्ञानिक परिभाषेच्या नव्या आकर्षक मद्यकुंभातून ते जुनीच मदिरा देत राहिले आहेत. उत्क्रांतिवादाला अमेरिकेतसुद्धा आजही विरोध आहे. अशा बाबतीत प्रश्न हितसंबंध सांभाळण्याचा बनतो, सत्यशोधनाचा राहत नाही.

पण विसाव्या शतकात डाव्या विचारसरणीनेसुद्धा वेगवेगळ्या मानवतावादी वाटा शोधून काढल्या. त्यांचे सार थोडक्यात असे सांगता येईल: माणूस ही देवाची खास लाडकी जमात नव्हे. अन्य प्राण्यांतीलच तो एक सदस्य आहे. माणसाला असलेली बुद्धी ही देवाची देणगी नसून उत्क्रांतीत त्याने प्राप्त करून घेतलेली उपलब्धी आहे. देवाला विरोध नाही, पण देव ही संकल्पना व्यक्तिनिष्ठ (सब्जेक्टिव) आहे. आपण धरून चालतो तसा माणूस रॅशनल प्राणी नाही. तो मिथके व प्रतिके बनविणारा, त्यांना पूजणारा व दुसऱ्यांच्या प्रतिकांचा तिरस्कार करणारा व त्यासाठी हिंसेवर उतरणारा प्राणी आहे. तो अपूर्ण आहे. श्रद्धा व बुद्धी ही दोन्ही त्याची आयुधे आहेत. दोहोंचा तो सदुपयोग व सर्वनाश घडवून आणणारा दुरुपयोगही करू शकतो. निसर्गाचे कवींनी रंगविलेले रोमॅण्टिक चित्र केवळ किंचित सत्य आहे. निसर्ग आपली माता आहे, पण ती निष्ठुर आहे. आपल्या अपत्यांची तिला दयामाया नाही. ‘निसर्गाकडे चला’ म्हणजे नेमके कुठे चला हे माणसाला कळत नाही. मानवी अस्तित्व हेतूहीन व विवेकशून्य आहे.

हे विदारक सत्य माणूस पेलू शकत नाही. त्याला मृत्यूचे भय असते म्हणून तो अमरत्वाच्या शोधात असतो. आपल्या एकाकीपणात व दु:खात परमेश्वर त्याला मोठा भावनिक आधार वाटतो. मृत्यूनंतर सर्वकाही संपत नाही, त्यानंतरसुद्धा आशा आहे सांगणारा परलोक हा त्याची भावनात्मक गरज आहे. त्या श्रद्धेच्या आधारे तो निकोप सदाचारी जीवन जगू शकत असेल तर त्यात वाईट काय? वैफल्यग्रस्त आयुष्य कंठत राहण्यापेक्षा ते केव्हाही श्रेयस्कर. आणि असे मानणारे डावे विचारवंत स्वत: परलोकवादी नाहीत. फक्त त्यांना धर्मशास्त्रांची अधिकारशाही व कुणाचीही हुकूमशाही मान्य नाही. त्यांनी देवाला नव्हे, पण माणसाला ओळखले आहे. देवाच्या शोधात ते कधीच नव्हते. म्हणून परलोक व मृत्यूनंतरचे जीवन या संकल्पनांकडे उदार व सहिष्णू दृष्टिकोनातून पाहण्याचा धडा ते बुद्धिवाद्यांना देतात. त्याचबरोबर धर्माच्या नावाखाली चाललेला धुमाकूळ धिक्कारतात.

याचा अर्थ असा नव्हे की आमच्या पूर्वजांना हे सर्व आधीच गवसले होते. अनेक चुकीच्या पवित्र धार्मिक संकल्पना मोडीत काढणारे संशोधन ज्यांनी केले ते वैज्ञानिक तत्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत वगैरे ज्यू व ख्रिश्चन होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी कठोर आत्मपरीक्षण केले. धर्मसत्तेशी व राजसत्तेशी लढा दिला, छळ सोसला, त्याग केला. तेव्हा कुठे सत्याचा विजय झाला. भारतीय मानसिकता मात्र आजही मध्ययुगीन आहे. तिला आत्मपरीक्षणाची गरजच वाटत नाही. भूतकाळाच्या उदात्तीकरणात आम्ही आत्मगौरव उपभोगतो. तिला आत्मपरीक्षणाची गरजच वाटत नाही. भूतकाळाच्या उदात्तीकरणात आम्ही आत्मगौरव उपभोगतो. इहलोक व परलोक यातील अंतरच आम्ही नष्ट केले आहे.

डॉ. अभय बंग, सौजन्य – दै.लोकमत (मंथन पुरवणीतुन, १५ ऑगस्ट २०१०)

उंच होत जाणाऱ्या पिरॅमिडच्या रुंद तळाशी  गोरगरिबांची, स्त्तिया आणि आदिवासींची ऊर्जा सामावलेली आहे. या माणसांना सबळ होण्यासाठी साधने पुरवणे, त्यांचे प्रश्न शोधून, त्यांना सोबत घेऊन उत्तरे शोधणे हे मोठे आव्हान आहे. ती सामान्य वाटणाऱ्या अडाणी माणसांकडे असते…त्यांच्याकडे जा !

——————————————————————————————————————————–

ज्ञान-विज्ञानातली नवनवी संशोधने नव्या, आधुनिक जगाचा पाया रचत आली आहेत. त्या आधारानेच आजच्या जगाची घडण झाली आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध, वाहने-टेलिफोन आणि टेलिव्हिजनचा शोध, रोगप्रतिबंधक लसी आणि जीवनसत्त्वांचा शोध अशा संशोधनांनी जग बदलत गेले. देशोदेशीचे सर्व सत्ताधीश नेते, अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यापेक्षाही जगभरातल्या सर्वसामान्य माणसांचे आयुष्य बदलण्याचे, घडवण्याचे श्रेय आधुनिक ज्ञान-विज्ञानाला अधिक जाते.

‘देशाच्या आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान करून दहा टक्के विकास दर कसा गाठता येईल?’ – या कळीच्या प्रश्नाला प्रचंड महत्त्व आलेले आपण पाहातो. त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा असा एक प्रश्न आहे –

संशोधनाची प्रक्रिया अधिक गतिमान करून या देशातल्या ज्ञान-विकासाचा दर अधिकाधिक कसा वाढवता येईल?’

– पण हा प्रश्न सोपा नाही.

त्यात अनेक कळीचे मुद्दे आहेत. गुंतागुंत आहे.

जे अभ्यास आणि संशोधन करतील, ज्ञानाचा विकास करतील; त्यांचा ज्ञानावर हक्क असेल आणि त्या ज्ञानाच्या-संशोधनाच्या आधारावर जे जग उभे राहील त्या जगावरही ज्ञानाच्या निर्मात्यांचीच मालकी राहील. ज्यांच्याकडे ज्ञानाची मालकी अगर माहिती नाही, ते सारेच गुलाम बनतील.
हे वास्तव एका नव्या समीकरणाला जन्म देते.

यापुढच्या जगात आर्थिक विषमतेपेक्षाही ज्ञान-विज्ञान-संशोधनाच्या क्षमता आणि शक्यतांमधली विषमता अधिक भयंकर, जीवघेणी ठरेल.
अशा काळात समाजातल्या सर्व स्तरांवरील लोकांना संशोधनात, ज्ञानाच्या निर्मितीत सहभागाची संधी दिल्याखेरीज लोकशाही व्यवस्थेचा गाडा सुरळीत चालू शकणार नाही.

हे प्रत्यक्षात आणता येऊ शकेल का?
कशा रीतीने?

गडचिरोली जिल्ह्यातील साधारणत: १०० गावे ही गेल्या अनेक वर्षांपासून माझी शाळा आहे. इथे मी शिकत असतो.
आदिवासी पट्टा. विकासापासून दूरच राहिलेला. शेती आणि जंगलातल्या लाकूडफाट्याच्या आधाराने तग धरून जीव जगवणारी खेडुत माणसे. अशिक्षित. काही तर निरक्षरच. रूढ भाषेत ज्यांना अडाणी म्हणतात अशा या माणसांनी गेल्या २५ वर्षात आम्हाला केवढे शिकवले. लोकांबरोबर-लोकांसाठीच्या संशोधनाची, अभ्यासाची रीत आणि या संशोधनातले काही कळीचे नियम आम्ही इथेच शिकलो.

त्यातला पहिला नियम.
एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठीचा अभ्यास – संशोधन तो प्रश्न जिथे आहे त्या भागात जाऊन, तिथे राहूनच केले पाहिजे. जिथे संशोधनाची साधने विपुल असतात अशा एखाद्या सुसज्ज प्रयोगशाळेत अगर विद्यापीठात बसून नव्हे. अशा ठिकाणी अतिमहत्त्वाकांक्षा आणि फर्निचर – एवढेच फक्त असते.
हगवणीने बेजार होऊन मरणाऱ्या माणसांची भूमी शोधत रॉबर्ट कॉक दहा हजार मैलांचा प्रवास करून गेला तेव्हाच त्याला कॉलऱ्याचे मूळ असलेला बॅक्टेरिया सापडला होता. तो आधी इजिप्तला गेला. मग भारतात आला. त्या सागरी भ्रमंतीच्या अखेरीस त्याचे संशोधन पूर्णत्वाला गेले. त्यानंतरच रॉबर्ट सूक्ष्मजंतूशास्त्र या नव्या शाखेचा पाया रचू शकला.

जिथे प्रश्न असेल तिकडे जा… तुम्ही स्वत:च ‘एक प्रश्न’ असता तिथेच घुटमळू नका; हे याचे सार !

मी आणि राणी.
आम्ही दोघेही भारतात डॉक्टर झालो. पुढे अमेरिकेत जाऊन ‘पब्लिक हेल्थ’ या विषयातले धडे घेतले आणि काम करायला पुन्हा भारतात परतलो तेव्हा आमच्यासमोर एक प्रश्न होता.

भारतातल्या सर्वसामान्य माणसांचे आरोग्य कसे सुधारता येईल?

नवे-नवखे होतो तेव्हा धडपडलो. ठेचकाळलो. चुकत गेलो. त्या चुकांमधून दुसरा धडा शिकलो.
एखादा विषय माझ्या स्वत:च्या बुद्धीला उत्तेजन / आव्हान देतो म्हणून त्या विषयावरच्या अभ्यासाला-संशोधनाला हात घालणे हे काही खरे नव्हे. तुम्ही ज्या लोकांसाठी ज्या लोकांबरोबर काम करता, त्या समूहाच्या गरजांमधून समोर येईल तोच तुमच्या अभ्यासाचा विषय ! जगभरातल्या संशोधकांच्या गटाला महत्त्वाचा वाटतो, तो नाही !

असे महत्त्वाचे विषय कुठे सापडणार? कसे सापडणार?

तिसरा महत्त्वाचा नियम –
ज्याच्यावर काम करण्यासाठी अख्खे आयुष्य अपुरे पडेल असे अनेक अत्यंत महत्त्वाचे विषय आपल्या अवतीभवती अक्षरश: विखुरलेले असतात. ते वरवर अत्यंत सामान्य दिसतात. कमी महत्त्वाचे वाटतात. आणि बौद्धिक आव्हाने अंगावर घ्यायला आसुसलेल्या संशोधकांचे तिकडे लक्षच जात नाही. प्रत्यक्षात अत्यंत सामान्य दिसणाऱ्या, तात्कालिक वाटणाऱ्या विषयातच जगाला नवी दिशा देणाऱ्या संशोधनाची बीजे असतात. झाडावरून खाली पडणारे सफरचंद या घटनेत काय असे जगावेगळे होते? पण न्यूटनला ते ‘दिसले’. अशी सफरचंदे रोज आपल्या आजूबाजूला पडतच असतात.

—————————————

भारतातल्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या म्हणजे प्राधान्याने कोणत्या?
त्यातल्या कोणत्या समस्येवर तातडीने संशोधन-अभ्यास करण्याची निकड आहे? कोणाला विचारावे?
आम्ही आजूबाजूच्या चाळीस गावातल्या बाया-बापड्यांना बोलावले आणि एक साधा प्रश्न विचारला,
‘तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कसला आहे?’
बाया म्हणाल्या, ‘आमची पोरं दगावतात, भाऊ !’

आम्ही कामाला लागलो. संशोधन अभ्यासाची पद्धत ठरवली. आमच्या आरोग्यसेवकांनी – बेअर फूट डॉक्टर्स असतात तशा बेअर फूट संशोधकांनी आजूबाजूच्या ८६ गावातल्या बालमृत्यूंची नोंद करण्याचे मोठे काम तडीला नेले. २० वर्षांपूर्वी केलेल्या या अभ्यासातून एक महत्त्वाचे निरीक्षण आमच्या हाती लागले.

जन्माला आल्यानंतरचे पहिले २८ दिवस हा आमच्या भागातल्या नवजात बालकांसाठी सर्वात धोक्याचा काळ असतो. जवळपास ७५ टक्केबालमृत्यू याच काळात होतात. (जागतिक तज्ञांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सबंध जगभरात दरवर्षी सुमारे ४० लाख बालमृत्यू होतात आणि त्यातले सुमारे ११ लाख बालमृत्यू भारताच्या नशिबी लिहिलेले असतात.)

या बाळांना कसे वाचवता येईल?
आजारी पडलेल्या नवजात बालकांना तत्काळ इस्पितळात दाखल करावे, असे वैद्यकशास्त्र सांगते.
पण इथे तर इस्पितळे शेकडो किलोमीटर्सवर आणि जी आहेत तीही मरणाऱ्या बाळाच्या आई-बापाला न परवडणारी. त्यातून जुन्या प्रथा परंपरा आणि समजुतींचा घट्ट पगडा. ओली बाळंतीण आणि तिचे बाळ या दोघांनाही घराबाहेर पडण्याची बंदी.

याचा अर्थ बाळ आणि त्याची आई औषधोपचारापर्यंत, इस्पितळांपर्यंत पोचणे मुश्कील… मग वैद्यकीय सेवाच त्यांच्या घरी पोचवल्या तर?
पण मग हे काम करणार कोण?

त्या बाळाच्या आईला आणि आजीलाच ‘बाळाची काळजी कशी घ्यावी’ हे शिकवले तर?
प्रत्येक गावातली एक बाई निवडून तिला पुरेसे प्रशिक्षण, अत्यावश्यक साधने आणि ती साधने वापरण्याचा सराव दिला तर? – तर मग तीच त्या दुर्गम भागातल्या बालरोग तज्ञाचे काम-तात्पुरते का असेना – करू शकेल.

संशोधनाच्या शास्त्रीय परिभाषेत बोलायचे तर यातूनच ‘सर्च’चे नवे मॉडेल जन्माला आले. होम-बेस्ड न्यूबॉर्न केअर !
नवजात बालकांना त्यांच्या घरीच वैद्यकीय सेवा पुरवण्याची व्यवस्था.

——————————————————————–
आमचे हे मॉडेल डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल्स किवा कसल्याही अत्याधुनिक, महागड्या साधनांवर अवलंबून नाही. गावातल्या बायकांनाच नवजात बालकांची काळजी घेण्याचे मूलभूत तंत्र शिकवून बालमृत्यूला आळा घालणारी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न या मॉडेलमध्ये आहे.

हे मॉडेल विकसित केल्यानंतर आम्ही पाठपुरावा जारी ठेवला. पाहणी अद्ययावत ठेवली. गडचिरोली जिल्ह्यातल्या ३९ गावांत आमच्या प्रयोगाच्या पहिल्या तीन वर्षात (१९९५-९८) नवजात अर्भकांचा मृत्युदर ६२ टक्क्यांनी खाली आला. बालकांचे मृत्यू रोखले गेल्याने ते प्रमाण १२१ वरून ३० वर आले. अख्ख्या देशाने समोर ठेवलेले हे लक्ष्य आम्ही उर्वरित (प्रगत) देशाच्या कितीतरी आधी गाठू शकलो.

हे संशोधन पुढे ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय विश्वातल्या अत्यंत प्रतिष्ठित प्रकाशनात प्रसिद्ध झाले आणि जागतिक पातळीवर ‘ट्रेण्ड सेटर’ ठरले. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांनी त्यांच्याकडे हा प्रयोग करण्याची तयारी चालवली आहे. देशाच्या खेड्यापाड्यात या प्रयोगाचा अंगीकार करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला. बालमृत्यू रोखण्यासाठी हा प्रयोग सर्व विकसनशील देशांनी राबवावा, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने गेल्याच वर्षी जारी केले.

गेल्या २४ वर्षात याच रितीने केलेली किमान चार संशोधने गडचिरोलीच्या जंगलातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. महत्त्वाची ठरली. गडचिरोलीतल्या लोकांसाठी इथल्या लोकांबरोबरच केलेल्या अभ्यासाच्या, संशोधनाच्या निष्कर्षांवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आरोग्य धोरणे ठरवली गेली.
‘योग्य आकाराची तरफ मला कुणी आणून दिली तर मी ही अख्खी पृथ्वीसुद्धा हलवून दाखवीन,’ असे आर्किमिडीज म्हणाला होता.

– तोच अनुभव आम्ही गडचिरोलीत घेतला. ‘ज्ञान’ ही नव्या युगातली तरफच आहे. अनेक पारंपरिक समज या तरफेच्या साहाय्याने उलथून टाकता येतात. खेड्यापाड्यात राहाणाऱ्या गरीब अशिक्षित आदिवासींना बरोबर घेऊन त्यांच्यासाठी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष नवी दिल्लीपासून न्यू यॉर्कपर्यंत आणि लंडनपासून जीनिव्हापर्यंतच्या विचारांना संपूर्णत: नवी दिशा देण्याइतके महत्त्वाचे, सामर्थ्यशाली असू शकतात.
लोकांबरोबरच्या या संशोधनाला पाच महत्त्वाचे आधार असावे लागतात.

१) लोकांना त्या अभ्यासाची गरज असली पाहिजे.
२) तो अभ्यास लोकांच्या सहभागातून झाला पाहिजे.
३) नेमके काय आणि का चालू आहे, ते लोकांना स्पष्टपणाने कळलेले असले पाहिजे.
४) त्या अभ्यासाचा, निष्पन्न होणाऱ्या निष्कर्षांचा लोकांना वापर करता आला पाहिजे.
५) या अभ्यासावर लोकांची मालकी असली पाहिजे.

– हे सारे कुठे सापडू शकेल?

दिवंगत सी.के. प्रल्हाद यांनी मांडलेली संकल्पना वापरून एवढंच म्हणता येईल. – पिरॅमिडमच्या तळाशी ! तिथेच सारी संपत्ती दडलेली असते आणि भविष्यही ! उंच उंच होत जाणाऱ्या पिरॅमिडच्या रुंद होत जाणाऱ्या तळाशी गरीब माणसे असतात. स्त्तिया असतात. आदिवासी आणि खेडुत असतात. या शक्तीहीन माणसांना साधने पुरवणे, त्यांना सबळ होण्यासाठी मदत करणे म्हणजे त्या पायाशी दडलेल्या सुप्त शक्तीला हाकारे घालणे. लोकसहभागातून केलेला अभ्यास संशोधन आणि कृतिशीलतेच्या प्रेरणेतून हे घडू शकते.

नव्याने आर्थिक, औद्योगिक क्षितिजावर उदयाला येणाऱ्या देशांमध्ये जगाच्या व्यवहारात आमूलाग्र बदल घडवू शकणाऱ्या नव्या संशोधनांना बहर आला आहे, तो उगीच नाही. या गरीब देशांकडे अत्याधुनिक संशोधनासाठी लागणारा पैसा नसेल, महागडी तंत्रवैज्ञानिक सामग्री आणि सुविधा नसतील; पण या देशांकडे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे – माणसे.

इंटरनेट आणि संगणकांनी जोडल्या गेलेल्या या आधुनिक जगात माहिती मिळण्याची सुविधा-अॅक्सेस सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध आहे. प्रत्येक मानवी मेंदूमध्ये प्रश्न विचारण्याची अंगभूत क्षमता असते. तशीच उत्तरे शोधण्याची प्रेरणाही असतेच. प्रश्न विचारू शकणाऱ्या, उत्तराचे पर्याय शोधू शकणाऱ्या प्रत्येक माणसाला संशोधक-अभ्यासक होण्यासाठी प्रशिक्षित केले जाऊ शकते.

– हे प्रत्यक्षात शक्य आहे का?
या प्रश्नाचे उत्तर एका चिनी कवितेत मला सापडले होते. तेच येथे देतो.

लोकांकडे जा.
त्यांच्याबरोबर त्यांच्यातले होऊन राहा.
त्यांच्यावर प्रेम करा.
त्यांचे ऐका.
त्यांना जे समजते, माहिती असते तिथून प्रारंभ करा.
त्यांच्याजवळ जे आहे; त्या पायावरच नवे जीवन उभारा.

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य – लोकप्रभा, दिवाळी २००९

“मुघल सम्राट अकबर हा धार्मिक सहिष्णुतेचा आदर्श म्हणून पाहिला जातो. त्याचा पराक्रम, त्याची विद्वत्ता आणि त्याची गुणग्राहकता याच्या दंतकथा आजही सजीव आहेत. मात्र अकबराच्या थोरवीची दुसरीही एक बाजू आहे.”

————————————————————————————————————————————-

अकबर हे सर्वपरिचित नाव. बिरबलाच्या सुरसकथा बादशहाला विस्मृतीत जाऊ देत नाहीत. शिवाय अकबराची एक प्रतिमा हिंदी सिनेमांनी उभी करून ठेवली आहे. ‘अनारकली’मधील मुबारक (१९५३), ‘मुघल-ए-आझम’मधील पृथ्वीराज कपूर (१९६०), ‘मीरा’मधील अमजद खान (१९७९) व ‘जोधा-अकबर’मधील हृतिक रोशन (२००८) हे लोकांसमोरील अकबर. याखेरीज आमच्या प्रस्थापित सेक्युलर प्रतिमेचे ठळक प्रतीक म्हणूनही अकबराला वापरले जाते. इतिहासात अकबराला ग्रेट म्हटले आहे. शाळेत तेच शिकविले जाते. पण अकबर थोर नव्हताच म्हणणारे हिंदू अभ्यासक आहेत. एवढेच नव्हे तर अकबराचा तिरस्कार करणारे मुसलमानच जास्त भरतील. मात्र पुष्कळांना याची कल्पना नसते. अशा परिस्थितीत अकबर हा केवळ इतिहासातील एक पाठ राहत नाही. भारतातील हिंदू-मुस्लिम संघर्ष व समन्वय यांच्या यशापयशाचे व त्यासंबंधीच्या आमच्या मानसिकतेचे तो एक प्रतीक ठरतो. सुशिक्षितांना संभ्रमात टाकतो. म्हणून अकबर खरोखर ग्रेट होता काय, या प्रश्नाला सामोर जाणे आवश्यक वाटते.

अकबराला समजून घेण्यासाठी त्याच्यावर झालेल्या परस्परविरोधी संस्कारांची मुळे शोधली पाहिजेत. प्रथम त्याची वांशिक-भाषिक पूर्वपीठिका लक्षात घेऊ. ज्यांना आपण मोगल बादशहा म्हणतो ते खरे तुर्क होते, मंगोल नव्हते. बाबराची आई चेंगीजखानाच्या वंशातील मंगोल व बाप तिमूरच्या वंशातील तुर्क होता. पण बाबराला गलिच्छ रानटी मंगोलांचा तिटकारा होता. तो स्वत:ला तुर्क म्हणवीत असे. पण गंमत अशी की, हे पुढारलेले साक्षर तुर्क मूळचे मंगोलच होते. ११-१२ व्या शतकांत ज्या मंगोल टोळ्यांनी मंगोलियातून मध्य आशियात स्थलांतर केले त्या तुर्की बोलू लागल्या म्हणून तुर्क झाल्या. नंतर १३व्या शतकापासून मंगोलियातील ज्या बर्नर टोळ्यांनी पश्चिम आशिया व युरोपात धुमाकूळ घातला त्या मंगोल तुर्कामध्ये पुन्हा तीन प्रकार. ११-१२व्या शतकात ज्यांनी इराण, अरबस्तान वगैरे जिंकत इस्लाम स्वीकारून युरोपात धाडी घातल्या ते सेल्जुक तुर्क व पुढे सोळाव्या शतकात प्रबळ झाले ते ऑटोमन तुर्क. पण ज्यांनी खबरखिंड पार करून हिंदुस्थानकडे मोर्चा वळविला ते चघताइ तुर्क. चघताइ तुर्की ही तिमूरची भाषा होती. तीच हिंदुस्थानातील बाबरवंशियांची कौटुंबिक भाषा म्हणून १७६० पर्यंत प्रचलित होती. इराणी भाषेत मंगोलना मुघुल म्हणतात. इराणी भाषा व संस्कृतीच्या प्रभावामुळे मुघुल शब्द बाबरवंशियांना चिकटला व मुघुलचे मोगल झाले. अकबरावर काही जुनाट मंगोल-तुर्क संस्कार आढळतात त्याची ही कारणमीमांसा.

पण त्याचबरोबर उपजत स्वतंत्र बुद्धी असलेल्या अकबराला बाबर व हुमायुनकडून सहिष्णुता व औदार्य यांचे धडे मिळालेले होते. बाबराचे डायरीवजा आत्मवृत्त त्याच्या दूरदर्शी सूज्ञपणावर प्रकाश टाकते. त्याने आपल्या वंशजांना दिलेला सल्ला थोडक्यात असा – या देशात निरनिराळ्या धर्माचे लोक राहतात. त्यांच्या भावना व चालीरीती लक्षात घेऊन त्यांच्यावर राज्य करावे. त्यांची धर्मस्थळे पाडू नयेत. पराभूत झालेल्यांवर अत्याचार करू नये. आपलेच अनुयायी तसे करीत असतील तर त्याला कठोरपणे आळा घालावा. शिया व सुन्नी संघर्षांकडे दुर्लक्ष करावे. अन्यथा इस्लाम कमकुवत होईल. इस्लामचा प्रसार तलवारीच्या जोरावर करू नये. मने जिंकल्याने जितलोक कृतज्ञ राहतील व आपल्याला त्यांच्यावर सुरळीतपणे राज्य करता येईल.

हुमायूननेही अकबराला अशाच प्रकारचा उपदेश केला होता – Directive Principles of State Policy च्या तोडीचे त्याला महत्त्व आहे. अकबराच्या आचरणात विकृत क्रौर्य व सुसंस्कृत औदार्य यांचे विसंगत संस्कार कार्य करताना दिसतात त्याची ही पाश्र्वभूमी.

आता अकबराच्या काळ्या बाजूचा प्रथम विचार करू. दिल्लीत हुमायूनला मृत्यू आला तेव्हा १३ वर्षांचा अकबर पंजाबात स्वारीवर होता. कळनौर येथे त्याचा राज्याभिषेक झाला. बैरामखानाच्या पालकत्वाखाली त्याने पहिली लढाई जिंकली ती पानिपतची दुसरी लढाई (१५५६). हेमू या हिंदू सरदारने दिल्लीत स्वत:ला विक्रमादित्य घोषित केले होते. त्याची ताकद खूपच जास्त होती. पण हेमूच्या डोळ्यात बाण लागून तो बेशुद्ध पडला अन् त्याच्या सैन्यात पांगापांग झाली. या तुर्काची हिंदूंबरोबर झालेली ही पहिलीच लढाई. हेमूचे मुंडके काबूल व धड दिल्लीला धाडण्यात आहे. नंतर दिल्लीत बायका-मुलांसह हिंदूचीसर्रास कत्तल करण्यात आली एवढेच नव्हे तर चेंगीजखान व तिमूरच्या राक्षसी परंपरेनुसार मुंडक्यांचा मनोरा बनविण्यास आला.

पुढे १५६१ साली अधमखानाला माळव्यावर धाडण्यात आले तेव्हा बाजबहादूरशहाने पळ काढला. तरी राणी रुपमतीवर हिजडय़ाकरवी तलवारीने जखमा करण्यात आल्या. तिने विष पिऊन मरण पत्करले. नंतर जनानखान्यातील तरुण मुलींना ताब्यात घेऊन इतर सर्वाची सर्रास कत्तल करण्यात आली. मात्र ही बातमी कळताच अकबर व्यथित झाला. अधमखानाला आळा घालण्यासाठी त्वरित माळव्याला जाऊन धडकला. अकबराच्या मनात मानवता जागृत झाल्याचे हे लक्षण होते. (अधमखानाचा पुढे कडेलोट करण्यात आला.)

अकबराला बरेच राजपूत राजे अंकित झाले तरी मेवाड व त्याच्या प्रभावाखालील संस्थाने त्याला दाद देत नव्हती. म्हणून मेवाडचा मानबिंदू असलेल्या चितोड किल्ल्यावर स्वारी करून त्याने तो जिंकला (१५६८). पण त्यात स्वत:चे अतोनात नुकसान करून घेतले. किल्ल्यात निवडक सैन्य ठेवून राणा उदयसिंग परिवार, संपत्ती व फौज घेऊन पहाडात निघून गेला होता. अकबराने प्रथम सुरुंगांचा वापर केला. पण त्यात सापडून त्याचेच दोनशे योद्धे मृत्युमुखी पडले. शिवाय मेवाडी बंदुका वरून अचूक लक्ष्य टिपीत. अकबराला खालून वर तोफा डागणे सोयीचे नव्हते. म्हणून किल्ल्यापर्यंत मोठी फौज सुखरूपपणे पोहोचविण्यासाठी त्याने सबात तंत्राचा वापर केले. सबात म्हणजे जमिनीवर बांधलेला भुयारी मार्ग. तोसुद्धा १० घोडेस्वार एका रांगेत दौडत जातील इतका रुंद व हत्तीवरील स्वार भाल्यासकट उभा राहील इतका उंच. त्यावर लाकडी तुळ्या व गेंडय़ाची कातडी यांचे छप्पर. बांधकाम चालू असताना रोज किमान २०० कामगार शत्रूच्या हल्ल्याला बळी पडत. तरी इरेला पेटलेल्या अकबराने सैन्य किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचविले. किल्लेदार जयमला गोळी लागली. पाठोपाठ किल्ल्यातून आगीचा डोंब उसळलेला दिसला. राजपूत स्त्रियांनी जोहार केला होता. मेवाडींनी शरणागती जाहीर केली. मोगल सैन्यात विजयाचा उन्माद चढला, त्यात शरणार्र्थीचे नाटक करून बाहेर पडलेले १००० मेवाडी बंदूकधारी मोगलांच्या हातावर तुरी देऊन पहाडात नाहीसे झाले. हे कळताच अकबर भडकला. त्याचे सैन्य किल्ल्यात शिरले तेव्हा तेथे ४० हजार माणसे होती. ते बहुतेक सर्व शेतकरी होते. सूडाच्या पोटी अकबराने त्यांची सर्रास कत्तल करविली. पुढे १५७६ ते १५८७च्या काळात राणा प्रतापला नमविण्यासाठी अकबराने काय काय केले त्याचा सारांश सोबत वेगळा दिलेला आहे.

अकबराला शिकारीचा षौक होता. ही शिकार म्हणजे निर्दयतेचा नंगानाच होता. हा राक्षसी खेळ मूळचा मंगोल लोकांचा. धाडसी अकबराला तो भावला. त्यात सैनिकांना लढाईचे प्रशिक्षण मिळे. शिकारीच्या निमित्ताने बाहेर पडून आजुबाजूच्या राज्यांत दहशत पसरविणे हाही त्यामागचा हेतू होता. त्याची पद्धत अशी- निवडलेल्या जंगलाला सुसज्ज सैन्याने वेढा द्यायचा. ढोल-ताशांच्या आवाजात घेरलेल्या प्राण्यांना लहान क्षेत्रात कोंडायचे. मग शिकार सुरू. पहिली संधी अकबराची. नंतर इतरांना चान्स. १५६७ साली साठ मैल व्यासाचे वर्तुळ घेरून त्याने पाच दिवस शिकारीत घालविले. यात सर्व प्राणी सर्रास मारले जात, असंख्य माणसे मृत्युमुखी पडत, झाडे तोडली जात व प्रदेश उजाड होई. पण एकदा अकबराला अचानक उपरती झाली. दयाबुद्धी जागृत झाल्याने भेदरलेल्या प्राण्यांना मुक्त करण्याचा त्याने हुकूम दिला. अकबर इतका क्रूर होता हे एक सत्य आहे.

त्याची एवढीच बाजू लक्षात घेतली तर त्याला ग्रेट म्हणता येणार नाही. पण त्याच्यात परिवर्तनही होत गेले. (मंगोलियासुद्धा आज एक आधुनिक राष्ट्र बनला आहे) शिवाय मध्ययुगीन इतिहास जगात धर्मछळ, अत्याचार, लूटमार, बलात्कार, गुलामगिरी व जनानखाने यांनी बरबटलेला आहे. त्याच पाश्र्वभूमीवर अकबराचे मूल्यमान केले पाहिजे. मोगल साम्राज्याचा तो खरा संस्थापक. हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले सर्वात मोठे साम्राज्यसुद्धा त्याचेच ठरते. (अशोकाचे साम्राज्यदेखील मानले गेले तसे एक छत्री नव्हते) काबूल ते बंगाल, काश्मीर ते खानदेशपर्यंतचा प्रदेश त्याने समान राज्यव्यवस्थेखाली आणला. त्यात १५ प्रांत होते. शहाजहानच्या वेळी ते २२ पर्यंत गेले याचे श्रेय अकबराला द्यावे लागते. शिवाय यातून त्याने काय साधले त्याला अधिक महत्त्व आहे.

वयाच्या १९ व्या वर्षी (१५६२) आपले धोरण राबविण्यासाठी अकबर स्वतंत्र व समर्थ झाला. आग्रा येथे त्याने राजधानी वसविली. तेथील लाल किल्ला नव्याने बांधून काढला. दिल्लीला सिकंदर लोदीपासून (१५५६) शहाजहानपर्यंत (१६३९) महत्त्व नव्हते. १५७१ ते १५८५ च्या काळात फतेहपूर सिक्री ही त्याची राजधानी होती. तेथे त्याने नवीन शहर वसविले. पण त्याचे स्वरूप केवळ शाही छावणी (royal camp) सारखे होते. त्याचा सूफी गुरू सलीम चिश्तीचे गाव म्हणून केवळ सिक्रीची निवड झाली होती. आज त्याचे world’s most perfectly preserved ghost town हे वर्णन समर्पक ठरते. ते काही असले तरी अकबराच्या बहुतेक सर्व क्रांतिकारक सुधारणा १५८५ पर्यंत आग्रा फतेहपूर सिक्री येथून जाहीर झाल्या हे महत्त्वाचे.

अकबराकडे स्वतंत्र बुद्धी व ऐतिहासिक दृष्टी होती. त्याने पाहिले, हिंदुस्थानात पूर्वी एकामागे एक अशा नऊमुस्लिम राजवटी होऊन गेल्या त्यांचे सरासरी आयुष्य ४० वर्षांवर भरत नाही. यातून त्याने धडा घेतला. बहुसंख्य असलेल्या हिंदूंना सतत दुखवून केलेले राज्य फार काळ टिकत नाही हे ओळखले. म्हणून बहुसंख्य लोकांना हे राज्य आपले वाटावे यासाठी त्याने काही दृश्य प्रतीके वापरली. इमारतींची शैली शक्यतो हिंदू पद्धतीची म्हणजे कमान व घुमट नसलेली वापरली. जेथे इस्लामच्या भावनिक गरजेचा प्रश्न असेल तेथे कमान-घुमटांना स्थान दिले. याखेरीज स्वत:चे व्यक्तिमत्त्वही त्यानुसार घडविले. दाढी न ठेवणे, राजपूतधर्तीची पगडी वापरणे, कपाळाला तिलक लावणे वगैरे.

जे ठरविले ते त्याने आचरणात आणले. प्रसिद्ध गायक तानसेन, कवी फैझी, संगीततज्ज्ञ बाजबहादूरशहा, सर्वश्रुत बिरबल यांना राजाश्रय दिला. हिंदूंना नोकऱ्या दिल्या, महत्त्वाच्या पदांवर नेमले. मथुरा क्षेत्राचा यात्राकर हटविला. मुख्य म्हणजे खास हिंदूविरोधी असलेला जिझिया कर रद्द केला (१५६४). हा कर ज्यू व ख्रिश्चनांकडून वसूल केला जात नसे. जकात म्हणजे आयात कर सर्व व्यापाऱ्यांवर होता. पण मुसलमानांवर २.५ टक्के, ज्यू-ख्रिश्चनांवर ३.५ व हिंदूंवर ५ टक्के. बहुतेक सर्व वस्तू जकातमुक्त करून अकबराने हा प्रश्न सोडविला. हिंदूंमधील सतीची चाल बंद करविली. बालविवाहला बंदी घातली. गाय-बैल, म्हशी, घोडे अशा प्राण्यांची हत्या थांबविली. सरकारी तिजोरीतून दानधर्मासाठी मक्का व मदिनेत पैसे पाठविले जात ते बंद केले (१५७९). प्रतिवर्षी होणाऱ्या स्वत:च्या अजमेर यात्रा थांबविल्या (१५८०). बऱ्याच मुसलमान राजांनी राजपूत स्त्रियांशी लग्ने केली, पण आपल्या हिंदू पत्न्यांना त्यांची पूजाअर्चा खाजगीरीत्या चालू ठेवण्याची मुभा दिली ती फक्त अकबराने. आपण उचलीत असलेली कोणतीही पावले इस्लामविरोधी नाहीत असा दावा तो करीत असे. ७-८व्या शतकात एका देशात केलेले कायदे १६-१७ व्या शतकात दुसऱ्या देशात लागू पडत नाहीत, असे त्याचे मत होते. तरी त्याची सर्वात धक्कादायक कृती म्हणजे मझर (१५७९). उलेमांमध्ये एकमत न झाल्यास बादशहाचा निर्णय सर्वावर बंधनकारक राहील हा आदेश, अर्थात धर्मसत्तेपेक्षा राजसत्ता श्रेष्ठ ठरविणे.

हा देश शेतीप्रधान आहे हे ओळखून शेती व शेतकरी यांच्या हिताच्या सुधारणा अकबराने केल्या. शेतीची कामे ऋतूंवर अवलंबून असतात त्यासाठी चांद्रपंचांग उपयोगी पडत नाही. म्हणून त्याने सौर पंचाग सुरू केले. (त्यात कालमापनासाठी हेजिराच्या जागी स्वत:च्या राज्याभिषेकापासून नवा शक सुरू केला) शेतसारा पद्धत सुधारण्यात राजा तोडरमलचे खास योगदान होते. त्याने शेतसारा वस्तूंऐवजी पैशात घेण्यास सुरुवात केली. दळणवळणासाठी महामार्ग तयार केले. याची सुरुवात आधी झालेली असली तरी आता मोठय़ा प्रमाणावर रस्त्याची गरज होते. त्याने सिंधू नदीवर पूल बांधला. खबरखिंडीतून प्रथमच वाहने जाऊलागली. मात्र त्या काळात महामार्गाचा अर्थ वेगळा हेता. चोर-लुटेऱ्यांच्या भयापासून मुक्त असलेला व सैन्याच्या हालचालींमुळे आजूबाजूच्या शेतांची नासाडी झाल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची हमी असलेला कच्चा रुंद रस्ता म्हणजे नॅशनल हायवे. कायद्याने दारूबंदी होती. पण तिचा अतिरेक व्यवहार्य ठरत नाही म्हणून त्याने परवानाधारकांसाठी किल्ल्याबाहेर दारूचे दुकान ठेवले. त्यामुळे अकबरविरुद्ध खूप अफवा पसरल्या.

त्याला धर्माच्या तौलनिक अभ्यासात रस होता. फतेहपूर सिक्रीच्या इबातखान्यात तो उलेमा, जेसुर पाझर, पारशीदस्तुर, जैनमुनी, हिंदूसंत अशांशी थेट संवाद साधत असे. सर्व धर्माना सामायिक असलेले देवशास्त्र (theology) शोधणारा त्या काळातला तो थिऑसॉफिस्टच होता. त्याला अतिंद्रिय साक्षात्कारही होत. सूफी संत मीर अबुल लतीफ याच्या सुलह-इ-कुल म्हणजे धर्मसहिष्णुता या मूल्यावर त्याचा विश्वास होता. त्यामुळे त्या काळात दक्षिणेत सूफींनी धर्मप्रसारासाठी अत्याचार घडविले तसे अकबराच्या राज्यात करणे त्यांनी शक्य नव्हते. त्याने स्वत:च्या नेतृत्वाखाली दिने इलाही (देवाचा धर्म) या धर्माची स्थापना केली. तो प्रयोग यशस्वी होणे शक्य नव्हते. पण त्यातून अकबर नवा धर्म स्थापन करीत होता की इस्लाममधील कडवेपणा काढून टाकण्याचा एक उपाय शोधत होता हा वादाचा विषय आहे. व्हिसेंट स्मिथने ‘The Divine Faith was a monument of Akbar’s folly, not of his wisdom’ असे म्हटले आहे.

अकबराने इतिहास घडविला, इतिहासाची साधने गोळा केली, एवढेच नव्हे पुढच्या पिढय़ांसाठी नवी साधने निर्माण करून ठेवली. अबुल फजलच्या नेतृत्वाखाली मोठे रेकॉर्ड ऑफिस होते. त्यात दोन कारकून रोजच्या घटना बारीकसारीक तपशिलासह लिहून ठेवण्याचे काम करीत. अबुल फजलचे ‘अकबरनामा’ (आजची छापील पाने २,५०६) व ‘ऐने अकबरी’ (१,४८२ छापील पाने) हे ग्रंथ माहितीचे खजिने होत. ‘ऐने अकबरी’ म्हणजे इतिहास ज्ञानकोश शब्दकोश, गॅझेटियर, अलमनॅक असे सर्वकाही आहे. समकालीन युरोपमध्येसुद्धा अशा दर्जाचा ग्रंथ दाखविता येत नाही. भारताची लोकसंख्या तेव्हा ११ कोटी असणार असा विश्वासार्ह अंदाज ‘ऐने अकबरी’मुळेच वर्तविता आला. ‘गीता वाचली नाहीत तरी चालेल, पण ऐने अकबरी जरूर वाचा’ इति ग. ह. खरे. भाषांतर विभागही सतत कार्यरत होता. बदायुनी चार वर्षे महाभारताचे पर्शियनमध्ये भाषांतर करीत होता. तो अकबराच्या धार्मिक धोरणाचा कट्टर विरोधक. त्याने अकबराविरुद्ध जे लिहून ठेवले ते दोघांच्या मृत्यूनंतर सापडले. चित्रकला विभागही खूप मोठा होतो. असंख्य चित्रकारांना त्यात उत्तेजन मिळाले. त्यातून सूक्ष्मचित्रशैली (मिनिएचर स्टाइल) विकसली. सचित्र ग्रंथांची निर्मिती झाली पर्शियन भाषेतील तुतीनामा अकबराच्या पाहण्यात आला. त्यात शुकसप्पती, पंचतंत्र, सिंदबादनामा वगैरेतील निवडक ५२ कथा होत्या. त्यातला अप्रस्तुत धार्मिक भाग वगळून सोप्या भाषेत लिहिण्याचे काम अकबराने अबुल फजलवर सोपविले. सचित्र तुतीनामा आज इंग्रजीत उपलब्ध आहे. अकबराला फारसे लिहिता-वाचता येत नसले, तरी त्या काळातल्या बादशहापुढे ती मोठी अडचण नव्हती. त्याने सुरू केलेल्या चित्रकला व शिल्पकलेचा खरा विकास झाला तो मात्र जहांगीर व शहाजहानाच्या काळात. हे सर्व करीत असताना अकबर इस्लामची बंधने ओलांडून जात होता. त्यामुळे त्याला शत्रूही खूप निर्माण झाले होते. त्याचे अखेरचे दिवस फार दु:खात गेले. तिन्ही पुत्रांनी मन:स्ताप दिला. दोघे दारूपायी गेले. सलीमने अबुल फजलचा खून करविला. बादशहाच्या दु:खात सहभागी होणाऱ्या व्यक्ती उरल्या फक्त तीन. आई हमीदा आणि फैजी व बिरबल हे दरबारी. तरी सलीम (जहांगीर)साठी त्याने लिहवून ठेवलेला अखेरचा उपदेश असा- ‘आपल्या राजकीय धोरणाच्या आड धर्माचा विचार येऊ देऊ नकोस. कुणालाही शिक्षा देताना सूडबुद्धीने हिंसक बनू नकोस. आपल्याला गोपनीय सल्ला देणाऱ्या विश्वासू जाणकारांचा योग्य आदर कर. कुणी मनापासून दिलगिरी व्यक्त केली तर त्यांना मोठय़ा मनाने माफ कर.’

असा होता बादशहा अकबर. वरील लेख व सोबत जोडलेले चौकटींतील मजकूर वाचून झाल्यावर ‘अकबर खरोखर थोर होता काय?’ याचे उत्तर ज्याचे त्याने ठरवावे.

अकबर आणि राणा प्रताप
अकबराचे मूल्यमापन राणा प्रतापचा विचार केल्याखेरीज पूर्ण होत नाही. मेवाडचा हा महाराणा आपल्या २५ वर्षांच्या करकीर्दीत (१५७२ ते १५९७) बलाढय़ मोगल बादशहाला पुरून उरला. या संघर्षांत अकबर विजयी झाला, पण प्रताप हरला नाही, बादशहा थकून गेला पण राणा दमला नाही हे एक विस्मयकारक सत्य आहे. अकबराने चितोड जिंकले (१५६८) तेव्हा युवराज असलेला प्रताप २७ वर्षांचा होता. मेवाडची युद्धनीती ठरविण्यात तेव्हापासून त्याचा हात होता. राणा उदयसिंग परिवारासह पहाडात पळाला. राजपिपलापासून गोगुंधापर्यंत अस्थायी राजधान्या करीत तो फिरत होता. गोगुंदा येथे उदयसिंगाचा अंत होताच प्रताप सत्तेवर आला तेव्हा अर्धे मेवाड त्याच्याकडे होते. मेवाड सोडून बहुतेक सर्व राजपूत राजे अकबराने वश करून घेतले होते. म्हणून मेवाड मोगलांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न बनला. शिवाय गुजरातच्या वाटेवरील तो काटा होता. तरी अकबराने समेटाचे प्रामाणिक प्रयत्न केले हेही खरे. प्रतापलासुद्धा शांतता हवी होती. मोगल दरबारात हजर राहण्यापासून सूट व अंतर्गत स्वातंत्र्य या अटींवर प्रतापही तहास तयार होता. पण अकबराने ही संधी घालविली.

अकबराने १५७६ ते १५७८ या काळात मेवाडवर पाच स्वाऱ्या केल्या. प्रथम मानसिंगला धाडले. हळदीघाटची प्रसिद्ध लढाई झाली. प्रताप हरला पण आपल्या चेतक घोडय़ावर बसून पहाडात नाहीसा झाला. यामुळे त्याची शक्ती व प्रतिष्ठा कमी झाली नाही. मग अकबराने स्वत: गोगुंदा काबीज केले. पण राणा हाती लागला नाही. नंतर शाहबाजखानाला पाठविले. तो तीन महिन्यांनी खाली हात परतला. अब्दुर्रहीम खानेखानच्या स्वारीत त्याचा सर्व परिवार मेवाडींच्या हाती लागला. तो प्रतापने सन्मानपूर्वक परत पाठविला. अखेर जगन्नाथ कछवाहला धाडण्यात आले. तो दोन वर्षे मेवाडमध्ये व्यर्थ भटकला. १५७८ नंतर अकबराला मेवाडकडे लक्ष द्यायला वेळच झाला नाही. एक संघर्ष संपला. प्रतापने १२ वर्षे लढण्यात व उरलेली बारा वर्षे जन्मभूमी व प्रजेच्या विधायक सेवेत घालविली. मेवाडने पुन्हा समृद्धी व सुखशांती अनुभवली. प्रतापने विपत्तीत दिवस काढले हा गैरसमज होय. मेवाडच्या संपत्तीचे एक अंशही अकबराच्या हाती लागला नाही. प्रतापच्या मृत्यूची बातमी कळतांच अकबर आनंदला नाही, खिन्न होऊन बसला. अखेर प्रतापपुत्र अमरसिंहाने १६१४ साली जहांगिराशी तह केला तोसुद्धा प्रतापच्याच अटींवर!

अकबराचा शिवाजी महाराजांकडून गौरव
औरंगजेबास सडेतोड पत्र १६७९
‘‘तुम्ही आपल्याच धर्माचा अभ्यास केला तर तुम्हांला कळून येईल की इस्लाम धर्मात परमेश्वराला अखंड ब्रह्मांडनायक (रब्बुल आलमीन) म्हटले आहे, केवळ मुसलमानांचा नायक (रब्बुल मुसलमीन) नव्हे. सर्व लेकरे परपेश्वराची आहेत आणि ती आपापल्या परीने परमेश्वराला भजतात. मुसलमान मशिदीत बांग देतात तर हिंदू मंदिरात घंटा वाजवतात. परमेश्वराने – त्या चित्रकाराने – ही दोन्ही चित्रे काढली आहेत. त्यांपैकी एकाला चांगले आणि दुसऱ्याला कनिष्ठ म्हणणे म्हणजे परमेश्वराला नावे ठेवण्यासारखे आहे. या दृष्टीने तुम्ही परमेश्वरविरोधी आहात, आम्ही नाही. तुमच्या पूर्वजांनी सर्व प्राणिमात्र हे परमेश्वराचे अपत्य जाणून त्यांच्यात कोणताही भेदभाव केला नाही. त्यामुळे त्यांचे राज्य वाढत गेले. तुम्ही मात्र जिझिया कर लोकांवर लादला. अनाथ, अपंग, म्हातारे-कोतारे, साधू, जोगी इत्यादींकडून तुम्ही जिझियाच्या निमित्ताने पैसे गोळा करीत आहात. पराक्रमी तैमूरच्या घराण्याची कोण ही नाचक्की? तुमच्या राज्यात सगळे खंक झाले आहेत. असंतोष उफाळून आला आहे. तुमचे साम्राज्य घटत चालले आहे. हा तुमच्या असहिष्णुतेचा परिणाम. सहिष्णुता आणि औदार्य यामुळे व्यक्ती आणि संस्था उत्कर्ष पावतात. असहिष्णुतेमुळे ती रसातळाला जातात हे लक्षात ठेवा. तुमच्या या असहिष्णू धोरणामुळे तुमच्या साम्राज्याचा नाश होणारच आणि तो नाश मी करणार आहे.’’
(बाबर व हुमायून यांचे धार्मिक धोरण कट्टर नव्हते. तरी पूर्वीपासून चालत आलेला जिझिया कर अकबराने प्रथम रद्द केला. जहांगीर व शाहजान यांच्या काळात तेच धोरण चालू राहिले. औरंगजेबाने जिझिया कर पुन्हा लागू केला (१६७९). या सर्वाची जाणीव वरील पत्रात दिसून येते. तैमुरच्या घराण्याला श्रेय देणे ही राजनीतीची भाषा होय. खरे कौतुक आहे ते अकबराचे)

भाषाभगिनींचे मधुर मीलन
मोगलांची राजभाषा फारसी, कौटुंबिक भाषा तुर्की, कुराणाची भाषा अरबी या सोडून इतर एतदेशीय भाषांना हिंदवी म्हटले जाई. त्यात हिंदी, मराठी वगैरे सर्व भाषा येते. अकबराच्या काळात फारसी व संस्कृत जाणणाऱ्या पंडितांना खूपच उत्तेजन मिळाले. फारसी व संस्कृत एकाच कुळातल्या असल्यामुळे हिंदूना जवळ करण्यासाठी फारसी सोयीची पडली. अकबर व जहांगीर यांच्या दरबारात संस्कृत-हिंदी मिश्र कविताही पेश केल्या गेल्या. एक उदाहरण पहा –
एकस्मिन् दिवसे अवसानसमये
मैं था गया बागमें।
काचित् तत्र कुरंगबाळनयना
गुल तोडती थी खडी।
त्वां दृष्टवा नवयौवनाम् शशिमुखीम्
मै मोहमे जा पडा।
नो जीवामि त्वयाविना श्रृणु सखे
तू यार कैसे मिले।

कवी खानइखनान आहे. खानइखनान (Lord of Lords) ही बादशहाने बहाल केलेली पदवी होती. खान हा मंगोल शब्द इस्लामपूर्व आहे. वरील कविता अकबर किंवा जहांगिराच्या काळातली असू शकते. अशा काव्यांची खुमारी जाणणारे हिंदू-मुसलमान रसिक दरबारात होते हे विशेष.

अकबरविरोधी मुसलमान
मेहदवी चळवळ
अकबराविषयी हिंदू व युरोपीय इतिहासकार गौरवाने बोलतात, पण अकबराचा मित्र आइने अबरीकार (अबुल फजल) सोडला तर मुस्लिम परंपरा अकबरावर सततची कठोर टीका करीत आलेल्या आहेत. मोगल साम्राज्य आरंभ होण्यापूर्वीच भारतात मेहदवी चळवळीचा आरंभ झाला होता. भारतात मुसलमानांचे एक सारखे विजय का होत नाहीत? मध्य आशिया चटकन् शंभर टक्के मुसलमान झाला तसा भारत मुसलमान का होत नाही? उलट सूफींवर हिंदू तत्त्वांचा प्रभाव का वाढतो? हे प्रश्न या चळवळीसमोर होते. सर्व मुस्लिम राज्यकर्त्यांना सारे हिंदुस्थान दारुसलाल मरायचे होते. बाबर व हुमायून फार धार्मिक नव्हते. पण शेरशहा सूरवर मेहदवी चळवळीचे संस्कार होते. त्याच्या काळी पवित्र मदिना, मक्का शिया इराणच्या आधिपत्त्याखाली होती. म्हणून या सुन्नी राजाने इराणवर हल्ला करण्याचे ठरविले होते. अकबराने इस्कलाम द्रोह करण्यास आरंभ केला. त्यावेळी उलेमांनी त्याच्याविरुद्ध कुकरचे फतवे दिले आहेत.

वहाबी चळवळ
मुस्लिम विचारवंतांनी अकबराचा सदैव एकमुखाने तिरस्कार केलेला आहे. यातील एकमुखाने हा शब्द महत्त्वाचा आहे. तथाकथित राष्ट्रवादी मुसलमान अकबराचा गौरव करताना शहाजहान, जहांगीर, औरंगजेब यांचाही एकाच ओळीत गौरव करून टाकतात. म्हणजे अकबराचा गौरव दृढराज्य निर्माण करण्यासाठी इतकाच शिल्लक राहतो.. ज्यांना आपण राष्ट्रीय मुसलमान म्हणून ओळखतो त्यांची सर्वात मोठी संघटना जमियत उल् उलेमा संपूर्णपणे वहाबींची संघटना होती, आजही आहे.. मूर्तिपूजकांच्या हातून पुन्हा इस्लामच्या हाती सत्ता आणावी हा चळवळीचा हेतू होता. (प्रथम मराठे, मग शीख, नंतर इंग्रज हे काफर त्यांना शत्रू होते.)

गहलोत राणा जीती गयो!
अकबराचे काळी मोंगलांचे आधिपत्य मान्य करण्यापूर्वी राजपुतांनी जसा झगडा दिला तसा अल्लाउद्दिनचे वेळी महाराष्ट्राने दिलेला नाही. एखाद दुसरा राजा किंवा जहागीरदार लढला एवढेच.
– नरहर कुरुंदकर

प्रकाश बाळ, सौजन्य – दै.लोकमत
नुसता भारतीयत्वाचा जप करून काय उपयोग? आधी समाजातील विविध ओळखी व अस्मिता ‘राष्ट्रीयत्वा’त समाविष्ट कराव्या लागतील. आपल्या राज्यघटनेचं स्वरूप ‘युनिटरी’ व आशय ‘संघराज्यात्मक’ आहे. ही रचना बदलून राज्यघटना ‘संघराज्यात्मक ‘ आणि आशय ‘युनिटरी’ अशी नवी रचना करावी लागेल.

घटनात्मक, राजकीय प्रक्रिया सशक्त करताना दुष्टचक्रात अडकलेलं राजकारण ‘मोकळं’ करावं लागेल…
———————————————————————

बेळगाव व बाभळी या दोन मुद्द्यांवरून गेला महिनाभर महाराष्ट्रातील राजकारणात सत्ताधारी व विरोधक यांच्यात कधी नव्हे ती किमान सहमती झाल्याचं चित्र उभं राहिलं होतं. हे चित्र क्षणभंगूरच ठरणार, हे आधीचा अनुभव सांगतच होता. तसंच या वेळीही झालं. सर्वोच्च न्यायालयातील प्रकरणाचं निमित्त होऊन हा प्रश्न उफाळून आला आणि त्यावरून मराठी व कानडी अस्मितेचे अंगार फुलवण्यात आले. मग नेहमीप्रमाणं निदर्शनांचं नाटक पार पडलं. पंतप्रधानांकडं सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेण्याचा सोपस्कारही पार पडला आणि पुन्हा सारं काही शांत झालं. तसं ते होत असतानाच तिकडे आंध्र प्रदेशातील राजकारणात कुरघोडी करण्यासाठी तेलगू देशमच्या चंद्राबाबू नायडू यांनी महाराष्ट्रातील बाभळी बंधाऱ्याची वाट आपल्या कार्यकर्त्यांसह धरली. तेलगू व मराठी अस्मितेची टक्कर होण्याचा प्रसंग आला. सर्वसंमतीनं महाराष्ट्र विधानसभेचं कामकाज एक दिवस स्थगितही करण्यात आलं. चंद्राबाबू यांना तुरुंगात ठेवलं म्हणून तिकडं आंध्रात बंदची हाक देण्यात आली. येथे महाराष्ट्रात चंद्राबाबू यांनी उठवलेला बांभळीचा प्रश्न हा राजकीय स्टंट मानला गेला. आता दोन्ही राज्यांची चांगलीच जुंपणार असं वाटत असतानाच महाराष्ट्रानं चंद्राबाबू व त्यांच्या कार्यकर्त्यांना विमानात बसवून आंध्रात पाठवून दिलं.
अशा रीतीनं बेळगाव आणि बाभळी या दोन मुद्द्यांवरून महाराष्ट्रात अस्मितांचा कल्लोळ बघायला मिळाला.

अर्थात महाराष्ट्र हा काही अपवाद नाही. देशातील बहुतेक सर्व राज्यांत असा अस्मितांचा उद्रेक अधून मधून सुरू असतो आणि आता अशा उद्रेकांमुळं जनतेला काही काळ तरी आपल्या बाजूला वळवता येतं हे लक्षात आल्यामुळं राजकारणी मंडळी तसा तो घडवून आणायचे बेतही आखत असतात. मध्यंतरी मणिपुरी व नागा यांच्यातील वाद पेटला होता. तामिळी अस्मितेचं धुमारे सतत धगधगतच असतात. तामिळी भाषा संमेलनात त्याचं प्रत्यंतर कालपरवा आलंच होतं. अशा रीतीनं अलीकडच्या काळात हा अस्मितांचा कल्लोळ देशभर निनादताना आढळून येत असतो. साहजिकच भारतात एकवाक्यता नाही, हा देश फुटीच्या दिशेनं तर वाटचाल करीत नाही ना, अशीही शंका व्यक्त केली जाताना दिसते.

प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, अस्मिता ही काही वाईट गोष्ट नाही. अस्मिता ही प्रेरक शक्ती असते. जर अस्मिता नसेल तर व्यक्ती, समूह आणि देशही स्वत्वहीन बनू शकतात. मात्र एकाची अस्मिता ही दुसऱ्याला बाधक असता कामा नये आणि अस्मितेचा अतिरेक टाळायला हवा. राष्ट्रीय आणि प्रादेशिक अस्मिता यांच्यात संघर्ष होता कामा नये. पण आपल्या देशात तसं होताना दिसतं, त्याचं कारण ‘भारतीय’ अस्मितेत इतर प्रादेशिक अस्मिता सामावून घेण्यात आपल्या राज्यकर्त्या वर्गाला आणि समाजातील धुरिणांना गेल्या सहा दशकांत आलेलं अपयश.

भारत हा बहुसांस्कृतिक देश आहे आणि बहुविधतेतून एकता साधली आहे, अशी खुशीची गाजरं आपण नेहमी खात असतो. प्रत्यक्षात ‘भारत हा माझा देश आहे’ हे वाक्य पाठ्यपुस्तकातच राहिलं आहे. आजही जातिपातीच्या, वंशाच्या, भाषेच्या, प्रदेशाच्या ओळखी तेवढ्याच प्रखर राहिल्या आहेत. खरं तर आपण सर्वात शेवटी भारतीय असतो. वस्तुत: भारत हे आज राष्ट्र म्हणून आपण मानत असलो तरी ते तसं पूर्वापार कधीच नव्हते. याचं कारण ‘राष्ट्र-राज्य’ ही संकल्पना नेपोलियनोत्तर युरोपात साकारली गेली. ब्रिटिशांनी ‘भारत’ हा भूभाग आपल्या प्रशासकीय गरजांसाठी आणि साम्राज्यवादी रणनीतीचा भाग म्हणून एक केला. त्यांनी रेल्वे बांधली. रस्त्यांचं जाळं विणलं. प्रशासकीयदृष्ट्या त्यांनी हा ‘भारत’ आपल्या अंमलाखाली आणला. पण ‘भारत’ तयार झाला, तरी ‘राष्ट्र’ निर्माण झालं नाही.

ईशान्य भारताचंच उदाहरण घेता येईल. नागा, मिझो इत्यादी वांशिक गट ‘भारता’त आणण्यात आले. पण ते सर्वच दृष्टीनं इतर समाजघटकांपासून पूर्ण वेगळे होते. नागा, मिझो इत्यादी घटकांची वांशिक जवळीक आग्नेय आशियातील तशाच गटांशी होती. शारीरिक ठेवणीपासून ते जीवनपद्धतीपर्यंत त्यांचं सगळंच वेगळं होतं. अगदी भौगोलिकदृष्ट्याही विचार करता आग्नेय आशियातील मेकाँग नदीच्या खऱ्यापासून सुरू होणारं पर्जन्यारण्य अखंडपणे या भागापर्यंत येऊन पोचत होतं. ‘अॅज द क्राऊ फ्लाईज’ या इंग्रजी म्हणीप्रमाणं अंतराचा विचार केल्यास या भागाला व्हिएतनाममधील हनाई हे दिल्लीपेक्षा जास्त जवळ आहे. ब्रिटिशांनी ‘भारता’ला स्वातंत्र्य दिल्यावर या घटकांना हा आपला देश वाटलाच नाही. त्यांनी स्वत:चा स्वातंत्र्याचा वेगळा झेंडा फडकावला. आज ६० वर्षांनंतरही नागांची ही ‘स्वातंत्र्यकांक्षा’ लष्करी बळापासून सर्व उपाय करूनही आपल्याला शमवता आलेली नाही. मिझोंना आपण मुख्य प्रवाहात आणू शकलो. पण त्याचवेळी इतर वांशिक गटही स्वतंत्रतेची मागणी करीत उभे राहत गेले. त्यांनाही ‘भारत’ आपला वाटेनासा झाला आहे. तेही ‘परकीया’च्या विरोधात उभे राहू लागले आहेत. या ‘परकीयां’त नुसते बांगलादेशीय नाहीत, तर ते बिहार, ओरिसा, बंगाल इत्यादी प्रांतातून आलेले ‘भारतीय’ही आहेत.
त्याचीच पुढची पायरी आपल्याला राज ठाकरे यांच्या उत्तर भारतीयांच्या विरोधातील आंदोलनात दिसते.

मात्र नागा, मिझो या वांशिक गटांच्या बंडाचा झेंडा स्वातंत्र्यानंतर लगेचच उभारला गेला. तसं ईशान्येतील इतर वांशिक गटांनी केलं नाही. सत्तरच्या दशकाच्या अखेरीपासूनच ईशान्येत ‘परकीयां’च्या विरोधातील भावना बळावत गेली. त्याच्या आधी दशकभर मराठी माणसाचं राज्य निर्माण होऊनही ‘मराठी माणसाचं हित जपलं जात नाही’ या कारणास्तव इकडे महाराष्ट्रात सेनेचा उदय झाला होता. विकासाच्या एका टप्प्यावर आर्थिक कोंडी झाल्याच्या काळात ही आंदोलनं व अशा संघटना उभ्या राहत गेल्या. यानंतरच्या काळातच प्रादेशिक व जातीच्या आधारांवरील पक्षांचं पेवही फुटल्याचं आपल्याला दिसून येतं.

‘भारता’त अनेक ‘राष्ट्रं’ आहेत, याची जाणीव आपल्या नेतृत्वाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून होती. म्हणूनच काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात प्रांतीय स्वायत्ततेचा ठराव संमत केला जात असे. या स्वायत्ततेच्या द्वारे प्रांतांतील भाषिक, वांशिक गटांना भारतात राहतानाही आपापलं वेगळेपण टिकवता येईल, अशी नेतृत्वाची कल्पना होती. पण फाळणीचे राजकारण झालं आणि नंतर प्रत्यक्षात फाळणीच्या वेळी जो नरसंहार झाला, त्यानं नेतृत्व हादरून गेलं. आता प्रांतीय स्वायत्तात दिली तर फुटीरतावादी शक्ती प्रबळ बनतील आणि देशाच्या ऐक्यालाच बाधा येऊ शकते ही भावना नेतृत्वात निर्माण झाली. पण ‘भारता’तील वैविध्य आणि त्याला एका साचेबंद चौकटीत बसवण्याचा प्रयत्न निष्फळ ठरण्याची शक्यताही नेतृत्वाला पटली होती. म्हणूनच केंद्र सक्षम ठेवतानाच राज्यांना अधिक अधिकार मिळतील, अशा रीतीनं राज्यघटनेचा आराखडा बनवण्यात आला. राज्यांचे अधिकार, केंद्राचे अधिकार आणि दोघांचे मिळून संयुक्त अधिकार, अशी तिहेरी रचना करण्यात आली. त्यामुळं राज्यघटनेचे स्वरूप ‘युनिटरी’ राहिलं तरी त्यात ‘संघराज्यात्मक’ आशयही तयार झाला. अशा प्रकारे तयार झालेल्या घटनेच्या अंमलबजावणीमुळं एका ‘भारतीयत्वा’त विविध अस्मिता सामावून घेता येतील, असं नेतृत्वाला वाटत होतं.
स्वातंत्र्यानंतर ज्या काँग्रसच्या हाती सत्ता आली, त्या पक्षाचं स्वरूपही सर्वसमावेशक होतं. आपलं हित हा पक्ष जपेल, असं समाजातील सर्व घटकांना वाटत होतं. मात्र भाषिक अस्मितेचा उद्रेक स्वातंत्र्यानंतर पहिल्या दशकातच उफाळून आला. तरीही नेहरूकालीन काँग्रेस पक्ष तसा सर्वसमावेशकच राहिला होता. राज्यांतील नेतृत्वाला केंद्रीय नेत्यांपर्यंत आपआपल्या प्रांतातील जनतेच्या भावभावना कळवता येत होत्या आणि केंद्रीय नेतृत्वही त्याला प्रतिसाद देत होतं. ‘पक्षश्रेष्ठी’ ही संस्था काँग्रेसमध्ये तयार झालेली नव्हती. भारतीय राजकारणातील नेहरू पर्व संपल्यावर इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसचं स्वरूप पालटत गेलं. ‘पक्षश्रेष्ठी’ निर्माण झाले. पक्षाचं संघराज्यात्मक स्वरूप मोडीत निघत गेलं. पक्षात सत्तेचं केंद्रीकरण झालं आणि त्या अनुषंगानं राज्यकारभाराचंही केंद्रीकरण होत गेलं. राज्यघटनेतील ३५६व्या कलमांचा उपयोग याच काळात सर्वाधिक झाला. याचा परिणाम असा झाला की, काँग्रेसही आपलं हित जपू शकत नाही, ही भावना राज्या-राज्यांत रुजू लागली आणि प्रादेशिक पक्षांचं पेव फुटलं. या प्रक्रियेची परिणती राजकारणातील एकपक्षीय वर्चस्व संपून आघाड्यांचं पर्व सुरू होण्यात झाली आणि त्यानं राजकारण अस्थिरही बनवलं. अशा अस्थिर राजकारणात तगून राहण्यासाठी जनतेच्या भावनांना हात घालणं हा सर्वात सोपा उपाय राजकारणी मंडळींना दिसला आणि त्यांनी अस्मितांचा कल्लोळ घडवून आणण्यास सुरुवात केली.

त्यामुळंच बेळगाव आणि बाभळी अशी प्रकरणं घडत असतात.
यावर उपाय काय?

उपाय आहे, तो नुसता भारतीयत्वाचा जप करीत बसण्याऐवजी समाजातील विविध ओळखी व अस्मिता ‘राष्ट्रीयत्वा’त सामावून घेण्याची घटनात्मक व राजकीय प्रक्रिया सुरू करण्याचा. त्यासाठी आपल्या राज्यघटनेची ‘युनिटरी’ स्वरूप व आशय ‘संघराज्यात्मक’ ही जी रचना आहे, ती बदलावी लागेल. आता राज्यघटना ‘संघराज्यात्मक’ आणि आशय ‘युनिटरी’ अशी नवी रचना करणं भाग आहे. जेथे स्वरूप ‘युनिटरी’ असताना ‘संघराज्यात्मक’ आशयच पाळला गेला नाही, तेथे रचनाच ‘संघराज्यात्मक’ बनवली, तर आजचे राजकारणी ‘युनिटरी’ आशय पाळण्याची शक्यताच नाही, असा आक्षेप घेतला जाऊ शकतो. आजची एकूण सत्तेच्या राजकारणाची रीत बघता, ही भीती अगदीच अनाठायी आहे, असंही म्हणता येणार नाही. पण आपला समाज हा बहुसंख्य हिंदूंचा आहे आणि हिंदू धर्म (हिंदुत्ववाद नव्हे) हा सर्वसमावेशकच आहे. त्यामुळं आपल्या समाजाचा जो स्थायीभाव आहे, तो फुटीरतावादी प्रवृत्तीस पोषक नाही. हा समाज प्राचीन काळापासून सर्वांना सामावून घेत आला आहे. मात्र या समाजात अनेक ‘राष्ट्रं’ आहेत आणि ती अधून मधून भांडणतंटा करीतही एकमेकांबरोबर पिढ्यान्पिढ्या नांदत आली आहेत हे भारतीय समाजाचं बलस्थान आहे.

अर्थात हे काही जादूची कांडी फिरवल्याप्रमाणं चुटकीसरशी होणार नाही. त्यासाठी मोठं विचारमंथन व्हायला हवं आणि त्यातूनच हे ‘अमृत’ बाहेर पडू शकतं. घटनात्मक बदलाच्या जोडीला राजकीय प्रक्रियाही तेवढीच सशक्त आणि मुख्यत: निरोगी करावी लागेल. त्यासाठी प्राथमिक गरज आहे ती निवडणुकीच्या कायद्यात दोन मुख्य सुधारणा करण्याची. फौजदारी गुन्हे नोंदवलेल्या कोणत्याही व्यक्तीला निवडणुका लढवण्यास बंदी करणं आणि निवडणुकांसाठी राजकीय पक्षांना लागणारा पैसा मिळवण्याची कायदेशीर चाकोरी तयार करणं, या त्या दोन मुख्य सुधारणा आहेत. पैसा आणि सत्ता या दुष्टचक्रात आज आपलं राजकारण जे सापडलं आहे आणि त्यासाठी राज्यघटना, कायदे व राज्यकारभार यांना जे वेठीला बांधलं जात आलं आहे, त्यातून सुटका करवून घेण्याचा हाच एकमेव मार्ग आहे.

असं जरा आपण काही कालबद्धरीत्या करू शकलो, तरच आज बघायला मिळत असलेला अस्मितांचा कल्लोळ थांबू शकेल आणि अस्मितांचा अतिरेक संपून खऱ्या अर्थानं सशक्त ‘भारतीयत्वा’ची जडणघडण होईल.