Archive for ऑगस्ट 29, 2010

जयसिंगराव पवार , सकाळ, २० जुन, २००९

खरे तर हा इतिहासाच्या क्षेत्रातील प्रश्‍न आहे; पण गेले काही दिवस महाराष्ट्रातील समाजकारण व राजकारण अशा दोन्ही क्षेत्रांत तो गाजतो आहे. त्याला अनेक संदर्भ आहेत. इतिहासाचा संदर्भ एकाच गोष्टीशी असतो आणि ती गोष्ट म्हणजे निखळ ऐतिहासिक सत्य. वरील वादाच्या बुडाशी असणाऱ्या सत्याचा मागोवा घेण्याचा हा एक प्रयत्न.
गेली जवळजवळ ४० वर्षे महाराष्ट्रात चौथी इतिहासाचे पुस्तक चालू होते. या वर्षी त्यात काही सुधारणा, काही नवी भर घालून त्याची नवी सुधारित आवृत्ती नुकतीच “बालभारती’तर्फे प्रकाशित करण्यात आली. या आवृत्तीसाठी जी तज्ज्ञ समिती नेमण्यात आली होती, तिचा मी सभासद होतो. गेले काही दिवस या वादाच्या निमित्ताने माझ्यावरही टीकाटिप्पणी झाली. तेव्हा या प्रश्‍नामधील समितीची व माझी भूमिका मी स्पष्ट करू इच्छितो.
टीकाकारांचा मुख्य आक्षेप असा, की नव्या पुस्तकात दादोजींचा “शिवरायांचे गुरू’ म्हणून असलेला उल्लेखच वगळण्यात आला आहे. वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजींचा शिवरायांचे गुरू म्हणून जुन्या पुस्तकात कुठेच उल्लेख नाही. तेव्हा तो वगळण्याचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. जुन्या पुस्तकात पान क्रमांक १६ वर दादोजींच्या देखरेखीखाली पुणे प्रांती शिवरायांचे कोणकोणत्या विषयांचे शिक्षण झाले याचे वर्णन आहे. त्यावरून दादोजी हे “शिक्षक’ म्हणून पुढे येतात; गुरू म्हणून नव्हे. गुरू जीवितकार्याची प्रेरणा देतो. शिक्षक व्यावहारिक ज्ञान देतो.
उपरोक्त वर्णनाच्या शेजारच्याच पानावर दादोजींच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचे शिक्षण चालू असल्याचे चित्र आहे. नव्या पुस्तकात उपरोक्त वर्णन व हे चित्र बदलून त्या ठिकाणी शहाजीराजांचे चित्र घातले आहे. तसेच पुणे जहागिरीत दादोजींच्या ऐवजी शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या शिक्षकांनी शिवरायांना विविध कला व शास्त्रे शिकवली, असा नवा उल्लेख केला आहे.
कळीचा मुद्दा हा आहे. टीकाकारांचे म्हणणे असे, की जातीय संघटनांच्या दबावाखाली तज्ज्ञ समितीने हा बदल कोणताही पुरावा नसताना केला आहे!
हा घ्या अस्सल पुरावा
समितीने केलेला बदल मनाच्या लहरीवर अथवा कुणाच्या दबावाखाली केलेला नाही. समकालीन पुराव्याच्या आधारावर केलेला आहे. कर्नाटकात शहाजीराजांच्या पदरी ७० पंडित होते. त्यापैकी कवींद्र परमानंद हा एक होता. त्याने महाराष्ट्रात येऊन शिवरायांच्या आज्ञेने काव्यमय शिवचरित्र संस्कृतमध्ये रचले आहे. त्याने म्हटले आहे, की जिजाबाई व शिवराय कर्नाटकात बेंगळूर मुक्कामी असता शिवराय ७ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांना तेथील गुरूंच्या मांडीवर बसवून त्यांच्या शिक्षणाचा प्रारंभ केला. (अध्याय ९, श्‍लोक-७०-७१)
पुढे शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली चालूच राहिले. शिवराय १२ वर्षांचे झाल्यावर शहाजीराजांनी त्यांची आणि जिजाऊंची पाठवणी पुणे प्रांती केली. त्यावेळी परमानंद म्हणतो, की शहाजीराजांनी त्यांच्याबरोबर हत्ती, घोडे, पायदळ, ध्वज, खजिना, विश्‍वासू अमात्य, पराक्रमी सरदार आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विख्यात अध्यापक दिले. (अध्याय १०, श्‍लोक २५-२७)
शिवभारतकार पुढे म्हणतो, की शहाजीराजांनी पाठवून दिलेल्या या अध्यापकांनी श्रुती, स्मृती, पुराणे, रामायण व महाभारत, राजनीतिशास्त्र, बहुविध भाषा, पद्यरचना, सुभाषिते, काव्यशास्त्र, फलज्योतिष, सांग धनुर्वेद, अश्‍वपरीक्षा, गजपरीक्षा, अश्‍वारोहण, गजारोहण, तलवार, पट्टा, भाला, चक्र इत्यादी शस्त्रे चालवण्याची कला, बाहुयुद्ध, युद्धकला, दुर्ग दुर्गम करण्याचे शास्त्र म्हणजे दुर्गशास्त्र, दुर्गम अशा शत्रुप्रदेशातून निसटून जाण्याची कला, शत्रुपक्षाचे इंगित जाणण्याची कला, जादूगिरी, विष उतरवण्याची कला, रत्नपरीक्षा अशा अनेक विषयांत शिवरायांना प्रवीण केले. (अध्याय १०, श्‍लोक ३४-४०)
सारांश, शिवरायांना शिक्षण देण्यासाठी शहाजीराजांनी निरनिराळ्या कलांत व शास्त्रांत निष्णात असणारा एक अध्यापकवर्गच शिवाजीराजांबरोबर कर्नाटकातून पाठवला होता. या अध्यापक वर्गावर देखरेख होतच असेल तर राजमाता म्हणून जिजाबाईंची होईल, दादोजींची नाही. दादोजी हे काही विविध कला व शास्त्रे जाणणारे पंडित नव्हते. त्यांच्या अंगी प्रशासनकौशल्य होते. त्यानुसार ते शहाजीराजांच्या जहागिरीची चोख व्यवस्था ठेवण्याचे काम निष्ठेने व सचोटीने करत होते. पण इथे शिवाजीराजांच्या शिक्षणाशी काही संबंध असण्याची गरज नाही. शिवभारतकार तर दादोजींचा नामोल्लेखही करत नाही.
तज्ज्ञ समितीने काय केले?
जुन्या पुस्तकात दादोजींच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले आणि घोडदौड, तलवारबाजी, भालाफेक, तिरंदाजी, कुस्ती, प्रशासन, न्यायनिवाडा या विषयांत ते तरबेज झाले, असे म्हटले आहे. या विधानास शिवरायांच्या मृत्यूनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेल्या बखरीतील उल्लेख पुरावे म्हणून पुढे केले जातात. शिवचरित्रकार श्री. मेहेंदळे यांनी दादोजी हा शिवरायांचा गुरू म्हणून फक्त बखरीतच उल्लेख असल्याचे म्हटले आहे. (डीएनए ता. ४.६.२००९)
आता समितीसमोर असा प्रश्‍न उभा राहिला, की शिवकालीन अत्यंत विश्‍वसनीय असणाऱ्या खुद्द शिवरायांच्या आदेशाने लिहिलेल्या परमानंदाच्या शिवभारतातील मजकूर प्रमाण मानायचा, की शिवरायांनंतर शे-दीडशे वर्षांनी लिहिलेला बखरींतील मजकूर प्रमाण मानायचा? समितीने शिवभारतातील मजकूर प्रमाण मानून शिवरायांचे शिक्षण शहाजीराजांच्या देखरेखीखाली आणि त्यांनी नेमलेल्या शिक्षकांकडून झाले, असे नव्या पुस्तकात नमूद केले आहे. चित्रातही शहाजीराजांच्या देखरेखीखाली शिवरायांचे शिक्षण झाले, असे दाखविले. इतिहासलेखनशास्त्राला धरूनच ही कृती आहे.
ज्या शिवभारताच्या आधारावर आम्ही इतिहासाची उपरोक्त पुनर्मांडणी केली आहे, त्या शिवभारताचा इतिहासलेखनाच्या संदर्भात गौरव करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”शिवभारत हे शिवचरित्राचे एक समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय साधन आहे. परमानंदाचे शिवकालीनत्व अनेक पुराव्यांनी सिद्ध आहे. आपण हे काव्य शिवाजीच्या सांगण्यावरून रचले असल्याचे परमानंद सांगत असल्याने आणि त्याची विश्‍वासार्हता वारंवार प्रत्ययास आली असल्याने ते शिवाजीचे अधिकृत चरित्र आहे, असे समजण्यास हरकत नाही. परमानंदाला शिवचरित्राची जवळून माहिती होती आणि या ग्रंथात ती प्रामाणिकपणे नमूद केल्याचेही आढळून येते. त्याचप्रमाणे या ग्रंथात दिलेल्या माहितीस इतर विश्‍वसनीय साधनांकडून दुजोरा मिळतो.” (शिवभारत, संपा. स. म. दिवेकर, दुसरी आवृत्ती, १९९८)
अशा या शिवकालातील “समकालीन आणि अतिशय विश्‍वसनीय’ साधनाबद्दल श्री. मेहेंदळे एक शब्दही आता काढत नाहीत. का? शिवभारतातील पुरावा बखरीतील पुराव्याच्या विरोधात जातो म्हणून?
सत्य कोण लपवून ठेवत आहे?
तज्ज्ञ समितीने केलेल्या उपरोक्त बदलावर हल्ला करताना श्री. मेहेंदळे यांनी म्हटले आहे, “”इतिहासाच्या (या नव्या) पुस्तकात करण्यात आलेले फेरबदल हे कोणतेही नवीन पुरावे अथवा माहितीशिवाय केले गेले आहेत. त्यामुळे नव्या पिढीपासून हेतुपुरस्सर काही गोष्टी लपवून ठेवण्याचा (हा) प्रकार घातक आहे.” (सकाळ ः ६.६.०९)
तज्ज्ञ समितीने नवीन पुरावे पुढे आणले नाहीत हे खरे; पण जे अस्सल पुरावे आतापर्यंत अंधारात हेतुपुरस्सर (?) ठेवले गेले ते उजेडात आणले आणि त्यावर आधारित इतिहासाची पुनर्मांडणी केली आहे, हे श्री. मेहेंदळेही मान्य करतील. आम्ही नव्या पिढीपासून ऐतिहासिक सत्य लपवून ठेवत नाही. उलट त्यावरची धूळ झटकून ते चकचकीत करत तिच्यासमोर ठेवत आहोत.
श्री. मेहेंदळे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक आहेत. अतिशय चिकित्सक पद्धतीने त्यांनी शिवचरित्राचे तीन मोठे खंड प्रकाशित केले आहेत. त्यामध्ये “शिवाजीची साक्षरता’ या नावाचे एक परिशिष्ट असून त्यामध्ये शिवराय हे साक्षर होते हे सिद्ध करण्यासाठी शहाजीराजांनी शिवरायांच्या शिक्षणाचा प्रारंभ बंगळूर मुक्कामी केल्याचा शिवभारतातील संदर्भ घेतला आहे (श्री राजा शिवछत्रपती, खं. १, भाग २, पृ. ७११). तथापि त्या परिशिष्टात पुढे शहाजीराजांनी शिवरायांबरोबर पुणे प्रांती धाडलेल्या शिक्षकांनी कोणकोणत्या विद्या व कला शिकवल्या, याचा उल्लेख दिलेला नाही. कारण तसा तो दिला असता तर पुणे जहागिरीत दादोजींनी शिवरायास शिक्षण दिले या बखरीवर आधारित प्रस्थापित इतिहासास छेद दिला गेला असता. तेव्हा नव्या पिढीपासून काही गोष्टी कोण लपवून ठेवीत आहे? आणि त्यामागचे रहस्य काय?
साक्षात्कार माझा आणि मेहेंदळेंचाही
सुमारे ३०-३२ वर्षांपूर्वी मी शिवकालावर एक क्रमिक पुस्तक लिहिले होते. त्यात मी दादोजींचा उल्लेख शिक्षक म्हणून (गुरू नव्हे) केल्याचे श्री. मेहेंदळे वारंवार पत्रकार परिषदेत व दूरदर्शनवर माझे पुस्तक दाखवून सांगतात. तसेच मी आता जातीय संघटनांच्या दबावाखाली माझे मत बदलले आहे, असे सांगून “आता जयसिंगराव पवारांना काय साक्षात्कार झाला? असा काय इतिहास पुढे आला? हे त्यांनी मलाही सांगावे,’ असा जाहीर सवाल विचारतात. (राष्ट्रगीत, ७।०६।०९) त्याला जाहीर उत्तर देणे गरजेचे आहे.
माझे हे पुस्तक उपलब्ध शिवचरित्रांच्या अभ्यासावर आधारित होते. तो काही माझ संशोधनात्मक ग्रंथ नव्हता. पुढे जेम्स लेन प्रकरणानंतर दादोजीचा प्रश्‍न महाराष्ट्रात ऐरणीवर आला आणि अनेक सामाजिक संघटनांनी व शिवप्रेमींनी माझ्याकडे दादोजीच्या गुरुपदाविषयी विचारणा केल्यावर मी खास सवड काढून सर्व समकालीन साधने तपासली. अभ्यासाअंती माझे असे ठाम मत बनले, की दादोजी हे शिवरायांचे गुरू, शिक्षक, पालक किंवा मार्गदर्शक असल्याचे एकही उल्लेख समकालीन साधनात नाही. माझे हे मत मी २४ एप्रिल २००६ च्या पुण्यातील एका जाहीर परिसंवादात परखडपणे मांडून पूर्वीचे माझे मत बरोबर नसल्याचेही नमूद केले होते. या गोष्टीस आता तीन वर्षे होऊन गेली. तेव्हा मला काही साक्षात्कार झाला असेल तर तीन वर्षांपूर्वी आणि तोही अभ्यासाअंती झाला आहे, बिनपुराव्याचा नाही. पण आता श्री. मेहेंदळ्यांच्या साक्षात्काराविषयी काय? त्यांनी २५०० पानांचे शिवचरित्र लिहिले; पण दादोजी शिवरायांचे गुरू होते, असे कुठेच म्हटले नाही. शिक्षक होते, पालक होते असेही म्हटले नाही. मग आताच ते दादोजींची खिंड का लढवीत आहेत? असा आताच त्यांना काय साक्षात्कार झाला आहे?
वस्तुस्थिती अशी आहे, की दादोजी हे शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा एकही समकालीन पुरावा नसल्याने श्री. मेहेंदळे यांनी आपल्या शिवचरित्रात मौन बाळगले आहे. तथापि, बालभारतीच्या इतिहास पुस्तकात दादोजी शिवरायांचे गुरू परस्पर दाखवले गेले तर मनातून त्यांना हवेच आहे. त्याला त्यांचा विरोध तर नाहीच, उलट तसा आग्रह आहे.
खरोखरच दादोजी शिवरायांचे गुरू/शिक्षक असल्याचा समकालीन पुरावा पुढे आणला गेला तर आम्ही स्वागतच करू. कारण सत्यावर आधारित इतिहासाच्या पुनर्मांडणीस नेहमीच वाव असतो व तो असायला हवा.