मंगला सामंत, सौजन्य – लोकसत्ता
अनेक भाषा, असंख्य जाती, त्यामुळे हिंदूंची एकजूट ही मोठी अडचण असावी. त्यामुळे गोहत्या, मंदिर-मस्जिद वाद, हिंदूंचे धर्मांतर हे तकलादू मुद्दे समस्त हिंदूंच्या भावना भडकविण्याची सामायिक शस्त्रे म्हणून वापरले जातात. धर्मांतरामागोमाग लगेच जोडून येणारा विषय म्हणजे ‘हिंदूंचे जागरण!
‘ ‘जागरण‘ म्हणजे काय, ते नेमके कोणी करायचे, या जागरणाचे विषय कोणते असावेत, हे मात्र इतक्या वर्षात हिंदू नेत्यांना स्पष्ट करता आलेले नाही.
——————————————————————————————————————
हिंदूंच्या अनेक भाषा, असंख्य जाती, त्यामुळे त्यांची एकजूट ही हिंदू-धर्मांधाच्या समोरील मोठी अडचण असावी. त्यामुळे एक गोहत्या, दुसरा मंदिर-मस्जिद वाद, तिसरे हिंदूंचे धर्मांतर हे तकलादू मुद्दे समस्त हिंदूंच्या सामायिक भावना भडकविण्याची सामायिक शस्त्रे म्हणून हिंदू नेते वापरताना दिसतात.
प्रत्येक धर्मीयाला आपला धर्म श्रेष्ठ वाटतो. तसा तो हिंदूंनाही वाटतो, पण मग इतक्या श्रेष्ठ धर्मात जातीय तुच्छता ठासून भरलेली कशी?हा प्रश्नदेखील वरील तीन दुरुपयोगी शस्त्रांना धार काढीत राहिल्यामुळे टाळता येतो. शिवाय संधी निर्माण होईल, तसतसा तो तो मुद्दा विकोपास न्यायचा असतो. काही वर्षांपूर्वी एकदम ‘गोहत्या‘ प्रश्न ऐरणीवर आणला गेला होता, पण त्याभोवती फार संख्येने हिंदू गोळा होत नाहीत, हे लक्षात आल्याने, तो मुद्दा सध्या तिसर्या क्रमांकावर टाकण्यात आलाय. भाजपाने दिल्लीचे तख्त मिळवले, पण ‘हिंदूंवर या देशात भयानक अन्याय, अपमान होताहेत‘ हे तुणतुणे वाजत तर ठेवायला पाहिजे. मंदिर-मस्जिद वाद आता जुना झाला. त्यामुळे ‘हिंदूंचे धर्मांतर‘ हा सध्याचा मुख्य मुद्दा केला गेला आहे.सध्याचे हिंदुत्वाचे चलन म्हणजे ‘हिंदूंचे धर्मांतर!‘ धर्मांतरामागोमाग लगेच जोडून येणारा विषय म्हणजे ‘हिंदूंचे जागरण!‘
गेली काही वर्षे, हिंदुत्ववादी नेते ‘धर्मांतराबाबत हिंदूंचे जागरण व्हायला पाहिजे‘ असे म्हणतात, पण मग हे ‘जागरण‘ म्हणजे काय? ते नेमके कोणी काय करायचे? किमान हेसुद्धा इतक्या वर्षात हिंदू नेत्यांना स्पष्ट करता आलेले नाही. अत्यंत संदिग्ध, विचारशून्य, द्वयर्थी, कधी विसंगत तर कधी दुटप्पी आणि बहुधा घूमजाव विधाने करण्यात हिंदू नेत्यांचा हात (म्हणजे तोंड) कुणीच धरू शकणार नाही.त्यामुळे ‘जागरण‘ हा शब्दही तसा संदिग्धपणे वापरला गेलेला! त्याचे वेगवेगळे अर्थ प्रत्येक हिंदू जाती, व्यक्ती, विचार, स्वभाव, वृत्ती यानुसार अन्य हिंदूंनी यथेच्छ व्यक्त करावेत आणि गोंधळ शक्य तो वाढवावा, असाही उद्देश असावा. म्हणून हिंदूंना मिळालेल्या या अनाहूत अधिकाराचा फायदा घेऊन हिंदूंच्या जागरणाचे विषय कोणते असावेत, ते आपण इथे पाहू या.
‘जागरणा‘चा मुख्य विषय आहे की, हिंदूंचे धर्मांतर यापुढे होता कामा नये. मात्र या विषयाला जोडून,आपल्या देशात फक्त हिंदूंचेच धर्मांतर कसे काय होते? हा उपविषय त्या जागरणाच्या अजेंड्यावर हवा, असे आम्हाला वाटते. म्हणजे असे की, ख्रिश्चन, बौद्ध, जैन वा शिखांचे धर्मांतर या देशात होत नाही. शीख मुस्लिम झाले, मुस्लिम ख्रिश्चन होताहेत, जैन बौद्ध होताहेत (सर्वजण सक्तीने बरं का!) असे कुठे काही आढळत नाही. अगदी ७०० वर्षांपूर्वी या देशात येऊन गुजराती भाषा व वेष घेणारे पारशीसुद्धा हिंदू झालेले नाहीत. मग ज्या देशात ८० टक्के हिंदू आहेत आणि संसदेत तेवढ्याच टक्क्यांनी हिंदू राज्यकर्ते असताना, इथल्या हिंदूंचेच तेवढे धर्मांतर का होते आहे? हे पहिले जागरण सर्व हिंदूंचे व्हावे, असे आम्हाला वाटते.
हिंदू धर्म सहिष्णू, उदार आहे म्हणून हिंदू कधी कुणाचे धर्मांतर करीत नाहीत, असा एक समज आहे. समजा एखाद्या परधर्मीयाने हिंदू व्हायचे ठरवले तर त्याला कोणत्या जातीत आपण ढकलायचा? कारण हिंदू हा कधीच जातविरहित नसतो. जात ही हिंदूंना जन्माने प्राप्त होते. बाहेरून कोणीही हिंदूंच्या कुठल्या जातीत येत नाही. अशी हिंदू धर्मातील जखडलेली अवस्था असताना उगीच उदारकीचे श्रेय खिशात घालून हिंदू धर्माने ‘आम्ही कोणाचे धर्मांतर करीत नाही,‘ असे म्हणत फिरण्याचे काही कारण नाही.हिंदूंना एक वेळ मशिदी पाडता येतील, पण एकगठ्ठा मुस्लिमांना वा ख्रिश्चनांना ते हिंदू धर्मात सामावून घेऊ शकणार नाहीत, हे सत्य समजण्यासाठी हिंदूंचे दुसरे जागरण व्हायला हरकत नाही.
धर्मांतर हे दोन प्रकारांनी होत असते. एक जबरदस्तीने आणि दुसरे म्हणजे स्वेच्छेने! स्वेच्छेने केलेले धर्मांतर हा घटनात्मक अधिकार असल्याने त्याच्या विरोधात आपल्याला बोलता येणार नाही. तेव्हा फक्त सक्तीच्या धर्मांतराचा मुद्दा आपण पाहू. अशा सक्तीच्या धर्मांतराचे दोन प्रकार आढळतात.
१. जादा कर लादून वा छळ करून केलेले धर्मांतर
२. आमिषे दाखवून केलेले धर्मांतर.
यापैकी पहिल्या प्रकारातील ‘जादा कर लावून‘ धर्मांतर करण्याचे सुलतानी युग संपलेलेच आहे. शिवाय छळ करून धर्मांतर होणे ही फार काळ लपून राहणारी बाब नव्हे आणि त्याकरिता शिक्षा करणारे कायदे अस्तित्वात आहेतच. छळ करून सक्तीचे धर्मांतर हे स्वतंत्र भारतात शिक्षापात्र कृत्य असल्याने आजच्या काळात असे धर्मांतर अशक्य आहे.
थोडक्यात, छळाने, जबरदस्तीने हिंदूंची धर्मांतरे होत नाहीत. आता आमिषे दाखवून धर्मांतर होते आहे का, हे तपासणे एवढा भाग हिंदूंच्या जागरणाचा बाकी आहे, तो आपण पाहू.
एखादी गोष्ट सोडून देण्याच्या बदल्यात, जर काही मोठे घबाड मिळणार असेल, जसे पूर्वी जहागिरी, सुभेदारी, मनसबदारी, राजदरबारात नेमणूक असे फायदे मिळवले जात असत, त्याला प्रलोभने वा आमिषे म्हणतात. रियासतकार, सरदेसाई यांनी आपल्या ‘मुसलमानी रियासत‘च्या दोन खंडांमधून अशा आमिषाच्या लोभाने धर्मांतरे केलेल्यांची माहिती दिली आहे, ती खालीलप्रमाणे.
१. इमादशाही स्थापन करणारा फत्तेऊल्ला इमादशहा, हा मूळचा तेलंगी ब्राह्मण होता. त्याने ‘इमाद उल्मुक‘ किताब घेऊन इस्लाम धर्म स्वीकारून मुस्लिम राज्यकर्त्यांकडून वर्हाडची सुभेदारी मिळवली. (पृष्ठ २२७)
२. निजाम-उल्मुक-बहिरी हा दक्षिणेकडील वजीर, मूळ हिंदू होता. (पृष्ठ २२१)
३. तुघलक घराण्यातील एका सुलतानाने गुजरातच्या सुभेदाराचा बंदोबस्त एका शूर हिंदू पुरुषाकरवी करवला. त्याला मुज्जफरखान हा किताब देऊन गुजरातची सुभेदारी दिली. त्याच्याच मदतीने तुघलक सुलतानाने हिंदू देवालयांचा विध्वंस केला. पुढे या हिंदू सुभेदाराने ‘मुज्फरशहा‘ नावाने १३९६ मध्ये स्वतंत्र नाणे पाडून, मशिदीत ‘खुत्बा‘ वाचून घेतला. (पृष्ठ १९१)
४. १३९६मध्ये काश्मीर येथे सिकंदर नामक तुर्कवंशीय मुस्लिम राज्यावर होता. त्याच्या पदरी जो मुसलमान प्रधान होता, तो मूळचा हिंदू ब्राह्मण होता. याच्या मदतीने सिकंदराने काश्मीरमधील, अनेक देवळे पाडून स्वतःला ‘मूर्तिनाशक‘ असे पद जोडले. त्याच्या कारकीर्दीत बहुतेक काश्मिरी हिंदू मुसलमान झाले. (पृष्ठ २९७)
५. दिल्लीवर राज्य करणारा सुलतान फिरोजशहा तुघलक याच्या पदरी असणारा वजीर मकबूलखान हा तेलंगणातील उच्च कुळातील हिंदू! मुस्लिम धर्म स्वीकारल्यावर, या वजिराच्या प्रत्येक मुलामुलीस एक हजाराचे वेतन फिरोजशहाने करून दिले. (पृष्ठ १५४)
६. उदेपूरचा राणा प्रतापसिंह याचा भाऊ संगराजित हा मोगलांना मिळाला होता. त्याचा मुलगा हा पुढे जहांगीराचा सर्वात मोठा सरदार महाबतखान म्हणून नावारूपास आला.
७. बंगालचे राज्य शमसुद्दीन या सुलतानाकडून कंस नामक हिंदू जमीनदाराने बळकावले. त्याचा मुलगा जितमल याकडे हे राज्य आल्यावर त्याने जलालुद्दीन हे नाव व मुसलमान धर्म स्वीकारला. (पृष्ठ ३०१)
८. सिंध प्रांतात जाम या सुमेरवंशीय राजपूत घराण्याने १३३६ मध्ये राज्य स्थापन केले. राणा जाम तिमाजी मरण पावल्यावर त्याच्या पुढील रजपूत राजाने मुसलमानी धर्म स्वीकारला, त्यांची नावे जाम सलातीन, जाम निजामुद्दीन, जाम फत्तेखान. तेव्हापासून जाम म्हणजे मुसलमानी राजे समजले जाऊ लागले. (पृष्ठ ३११)
९. बर्हाण म्हणजे हल्लींचे बुलंद शहर. त्यावर १०९८ मध्ये गझनीच्या महंमदाने स्वारी केली. तेथील हरदत्त राजा महंमदाला शरण आला आणि त्याने दहा हजार अनुयायांसह मुसलमानी धर्म स्वीकारला. (पृष्ठ ३५१)
१०. केरळचा राजा, मलबारचा पेरुमाळ राजा, तर कालिकतचा सामुरी राजा ही मुस्लिम धर्म स्वीकारल्याची आणखी काही राजेशाही उदाहरणे. हे सर्व उच्चवर्णीय राज्यकर्ते होते. ब्राह्मण म्हणजे हिंदू धर्माचे शिरोमणी होते. तरी त्यांनी लालसेने हिंदू धर्म सोडला. कधी सत्तेचा स्वार्थ तर कधी मुस्लिम सुलतानाची खुशामत करण्याचा पुरुषार्थ, यामुळे ही धर्मांतरे झाली. निव्वळ स्वतःचाच धर्म या हिंदू उच्चवर्णीयांनी बदलला नाही तर राज्यातील हजारो नागरिकांना मुस्लिम करून टाकले. देवालये फोडण्यास परकीय मुसलमानांना सहाय्य केले. आज राममंदिराबाबत गळे काढणार्या हिंदू धर्माभिमान्यांनी इथल्या आजच्या गरीब मुसलमानास वेठीला धरण्यापूर्वी आपल्या पूर्वज हिंदूंच्या इतिहासाची पाने उलटून, स्वतःचे पहिल्या प्रथम एक ‘ऐतिहासिक जागरण‘ घडवून आणावे.
आता सामाजिक इतिहासाकडे पाहू. हिंदू धर्म वैचारिक पातळीवर पटला नाही म्हणून अनेक उच्चवर्णीय हिंदूंनी १९व्या शतकात आपला धर्म बदलून ख्रिश्चन धर्म पत्करला. त्यात कवी ना. वा. टिळक आणि पंडिता रमाबाई अग्रणी आहे. आता हिंदू धर्मात विचारांना न पटणारे काय आहे? त्याकरिता आणखी एक जागरण गरजेचे आहे.
हिंदू धर्मातील असंख्य स्त्रियांचीही धर्मांतरे झाली. ती कशी? अनेक हिंदू राजांनीराजकीयघबाडे मिळविण्यासाठी आपल्या मुली मुसलमान सुलतानांना व बादशहांना दिल्या. त्या सर्व स्त्रियांची अपत्ये मुसलमान झाली. अकबराची राणी जोधाबाईचा मुलगा जहांगीर होता, हे सर्वांना माहीत आहेच.
शिवाय विधवा स्त्रियांचा हिंदू धर्माने २०व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत जो छळ मांडला होता, त्यातून काहीजणींनी जीव दिले. ज्यांना हे करता येणं शक्य नव्हतं त्या असंख्य हिंदू विधवांनी घरातून पळून जाऊन मुसलमान पुरुषांच्या बायका होऊन बुरख्याआड तोंड लपविले. मीनाकुमारी आणि नर्गीस यांच्या मातृ कुलातील स्त्रिया हिंदू होत्या. जागतिक पुरुषप्रधान कायद्यानुसार स्त्रीच्या मुलांनी बापाचाच धर्म लावणे सक्तीचे असल्याने अशा हिंदू मातांपासून निपजलेल्या पिढ्या परधर्मात ढकलल्या गेल्या.आईचा धर्म लावण्याची मुभा असती, तर काही संख्या तरी हिंदू राहिली असती. या मुद्द्यावर हिंदूंचे एक सणसणीत ‘पुरुषप्रधान जागरण‘ होऊन जाऊ देत.
त्याशिवाय हिंदू धर्मातील स्वतःला ‘उच्च‘ समजणार्या जातींनी अनेक कारागीर व कष्टकरी जमातींना त्याचप्रमाणे स्वच्छतेशी संबंधित काम करणार्या असंख्य जातींना कित्येक शतके अपमानाची, तुच्छतेची, वेळप्रसंगी जनावरांच्याही खालची वागणूक दिली. अशा असंख्य जातींनी हिंदू धर्मच सोडून देऊन अपमान, अवहेलनेपासून स्वतःची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. आजही भारतातील अनेक भागांत अशा प्रकारचा जातीय छळ चालू आहे. हिंदू धर्माचा अभिमान सर्व जातींना वाटण्याबाबत कोणते वास्तव आज शेकडो शतके नुकसान करीत आहे, त्याबाबत समस्त हिंदूंचे एक उपजागरण व्हावे.
हिंदू जागरणाचे इतके विविध विषय जर अभ्यासले गेले, तर आजमितीला भारतात सुमारे ३० कोटी लोक अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण या मूलभूत गरजांपासून वंचित आहेत, इतके किमान हिंदुत्ववाद्यांना समजेल, अशी अपेक्षा करू या. या गरजा पुरविण्यासाठी कोणत्याही धर्माचे समाजसेवक पुढे आल्यास हा वंचित वर्ग त्यांना परमेश्वरस्वरूप मानतो. त्यांनी सांगितल्यानुसार तो आचरण करतो. आज कित्येक वर्षे या देशात टाकून दिलेली मुले, बेघर, भटकती मुले ख्रिश्चन मिशनरीजनी गोळा करून त्यांना जगवले, माणूस केले, भले ती मुले ख्रिश्चन झाली असतील, पण ‘माणूस‘ झाली हे महत्त्वाचे नाही का? नाहीतर त्यांच्यातून हिंदू गुंड निपजले असते, त्यांचा काय उपयोग होता?
देशात हिंदू धनिकांची संख्या कमी नाही. पण रोमारोमात परजातींबद्दल तुच्छता भरलेली ही मंडळी, आपले पैसे संगमरवरी देवळे बांधणे, देवाला सोन्याचा मुकूट, हिरे, चांदीच्या पालख्या वाहण्यात घालवतात. ते लाखो, कोट्यवधी रुपये असंख्य हिंदू गरिबांना मूलभूत गरजा देण्यासाठी वळवावेत म्हणून हिंदूंचे आणखी एक जागरण गरजेचे आहे.
पूर्वज हिंदू उच्चवर्णीय राज्यकर्त्यांनी सत्ता, जहागिर्या, वतने अशा आमिषांना बळी पडून केलेल्या धर्मांतराबाबतच झापडे लावायची आणि आजच्या हिंदू गरिबांच्या आत्यंतिक तातडीच्या गरजांना आमिषे, प्रलोभने अशा संज्ञा देत हिंदूंनी आकांत करायचा, हा निव्वळ त्यांचा स्वार्थच नाही तर प्रच्छन्न दुष्टपणाही आहे, विकृती आहे.असले रिकामटेकडे हिंदुत्व सोडून दिले जावे, म्हणून हृदयसम्राटांपासून ते माथेफिरू हिंदू-अभिमान्यांपर्यंत सार्यांचेच जागरण अपेक्षित आहे आणि ते व्हावे हेच ‘जागरण‘ या शब्दाचे फलित वाटते.