Archive for ऑक्टोबर, 2010

डॉ. सदानंद मोरे, सौजन्य – साप्ताहिक सकाळ

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यासंबंधीची चर्चा आधुनिक महाराष्ट्रात लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांनी सुरू केली, असे म्हणायला हरकत नाही. महाराजांच्या कार्याचा अन्वयार्थ लावण्याचे काम यापूर्वी कोणी केलेच नव्हते, असे नाही. आज्ञापत्राच्या कर्त्याने शिवाजीराजांनी नूतन सृष्टी निर्मिली असे म्हटले होते. त्याचे हे छोटेसे वाक्‍य केवढे अर्थगर्भ आहे!

परंतु, आधुनिक काळात आपला युरोपातील ज्ञानविज्ञानाशी संबंध आला व आपण त्यांच्याकडून घेतलेल्या नव्या “कॅटेगरिज’मधून विचार करू लागलो. आपल्याच जुन्या इतिहासाचा अन्वयार्थ नव्या संकल्पनांच्या साहाय्याने करू लागले. लोकहितवादींनी नेमके हेच केले. त्यांनी पूर्वजांवरील टीकेचा अतिरेक केला असे नेहमी म्हटले जाते. त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे, पण मुळात ते परंपरेकडे अगदी वेगळ्या नजरेतून पाहात असल्यामुळे त्यांना ती परंपरा तशी दिसू लागली. ही वेगळी नजर त्यांना इंग्रजी शिक्षणातून मिळाली होती.

लोकहितवादींनी बंड आणि क्रांती यांच्यामध्ये भेद केला. शिवाजी महाराजांनी केलेले कृत्य हे साधे बंड नसून, क्रांती म्हणजे रिव्होल्यूशन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. प्रचलित राज्यव्यवस्थेला उलथून टाकून दुसरी राज्यव्यवस्था स्थापन करते, ही बाब बंड आणि क्रांती या दोन्ही घटनांमध्ये समान असते; परंतु बंड म्हणजे फक्त सत्तांतर. या सत्तांतरामुळे नव्याने अस्तित्वात आलेली राज्यव्यवस्था अगोदरच्या राज्यव्यवस्थेहून मूल्यदृष्ट्य वरच्या पायरीची असेलच असे नाही. क्रांतीमुळे होणारे सत्तांतर मूल्याधिष्ठित असते व त्यामुळेच त्यातून निर्माण झालेली राज्यव्यवस्था ही अगोदरच्या राज्यव्यवस्थेपेक्षा उच्चतम असल्याचा दावा करता येतो. औरंगजेबाने विजापूरची आदिलशाही बुडवली व त्यामुळे ते राज्य दिल्लीच्या मोगल पातशाहीचा हिस्सा बनले; परंतु आदिलशाहीपेक्षा मोगल पातशाही ही उच्च कोटीची होती, असे कोणी म्हणत नाही. ते केवळ राज्यांतर होते, क्रांती नव्हती. शिवाजीराजांनी घडवून आणलेल्या सत्तांतराला क्रांती म्हणताना लोकहितवादींच्या डोळ्यांसमोर अर्थातच अमेरिकन आणि फ्रेंच राज्यक्रांत्या होत्या. अमेरिकन क्रांतीमुळे अमेरिकन संस्थाने इंग्लंडच्या साम्राज्यवादी जोखडातून मुक्त झाली व तेथे लोकशाही नावाच्या मूल्यव्यवस्थेला मानणारे नवे स्वतंत्र राष्ट्र उदयास आले. फ्रेंच राज्यक्रांतीने फ्रान्समधील राजेशाही संपुष्टात आणून तेथे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यत्रयीवर आधारलेली राज्यव्यवस्था स्थापण्याचा प्रयत्न केला.

प्रसिद्ध शतपत्रांमधील 1848 मध्ये छापलेल्या 25 क्रमांकाच्या या पत्रात लोकहितवादींनी “मूल्य’ हा जाडा शब्द वापरला नाही. ते या संदर्भात राज्यसुधारणा हा शब्द वापरतात; परंतु मूलभूत राज्यसुधारणा मूल्यानुसारच असतात. त्यामुळे तो शब्द आपण निर्धोकपणे वापरू शकतो.

लिबर्टी म्हणजे “स्वातंत्र्य’ हा अमेरिकन क्रांतीचा परवलीचा शब्द होता. जगप्रसिद्ध लिबर्टीचा पुतळा हे त्याचे प्रतीक होय. फ्रेंच क्रांतीने स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे तीन शब्द परवलीचे केले. हीच ती तीन मूल्य होत. ही मूल्ये आपण बौद्ध धर्मापासून घेतली असे डॉ. आंबेडकर म्हणत. आता शिवराज्याला क्रांती म्हणायचे असेल तर अशी काही मूल्ये त्यामागे होती काय याचा धांडोळा घेतला पाहिजे.

फ्रेंच क्रांतीतील मूल्यांचा उद्‌घोष या क्रांतीचे अग्रदूत असलेल्या रुसो, व्हॉलतेर अशा विचारवंतांनी केला होता. तसे कोणी विचारवंत शिवक्रांतीच्या मागे पार्श्‍वभूमी म्हणून उभे होते काय, या प्रश्‍नाचे होकारार्थी उत्तर इतिहासकार त्र्यं. शं. शेजवलकर यांनी दिले आहे. त्यांच्या मते स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन मूल्यांचा उद्‌घोष अनुक्रमे रामदास, एकनाथ आणि तुकाराम या संतांनी केलेला आढळतो.

शेजवलकरांचे हे मत फार महत्त्वाचे आहे. आधुनिक युरोपाच्या इतिहासाची सरणी मध्ययुगीन महाराष्ट्राला लावणे हे कदाचित कोणाला विपरीत वाटेल; परंतु मूल्यविचारसुद्धा परिस्थितीच्या संदर्भात सापेक्षतेने आणि साक्षेपाने करायचा असतो, हे विसरता कामा नये. येथील परिस्थितीत स्वातंत्र्य याचा अर्थ एकदम वयात आलेल्या सर्व स्त्री-पुरुषांना मतदानाने सरकार निवडण्याचा अधिकार, असा घेता येणार नाही हे उघड आहे.

शेजवलकरांनी शिवशाहीची जी तात्त्विक भूमिका सूत्ररूपाने सांगितले. तो न्या. म. गो. रानडेकृत मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाच्या मीमांसेचा म्हटले तर सारांश आहे, म्हटले तर विश्‍लेषण आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी मराठ्यांच्या सत्तेच्या उदयाची मीमांसा करताना संतांच्या कार्यामुळे शिवाजी महाराजांना अनुकूल वातावरण लाभले असल्याचे निदर्शनास आणले. राजारामशास्त्री भागवंतांचेही असेच मत होते. याच संदर्भात भागवत धर्म असा शब्दप्रयोग केला गेला. रानडे भागवतांचा भागवत धर्म पुरेसा समावेशक असल्यामुळे त्यात समर्थ रामदासांनी निर्देशलेल्या महाराष्ट्र धर्माचाही समावेश होत होता. वारकरी संतमालिकेतील ज्ञानेश्‍वर आणि नामदेव शिवकालापासून बऱ्याच अंतरावर असल्याने आणि एकनाथ नुकतेच होऊन गेलेले व तुकाराम अंशतः व रामदास पूर्णपणे समकालीन असल्यामुळे शेजवलकरांनी एकनाथ, तुकाराम व रामदास यांना शिवरायांच्या वैचारिक मशागतीचे श्रेय दिले. अशाप्रकारे लोकहितवादींनी चालना दिलेली मांडणी शेजवलकरांच्या हातून पूर्ण झाली.

शेजवलकरांनी लोकहितवादींच्या मर्मदृष्टीला अगदी मनापासून दाद दिलेली आहे. 28 मे 1848 या दिवशीच्या “प्रभाकरा’त आणलेल्या लोकहितवादींच्या उपरोक्त पत्राचा संदर्भ देऊन शेजवलकर लिहितात, “”इंग्लंडच्या इतिहासाचे दूध पिऊन पुष्ट झालेला हा पुण्याचा तरुण सरदार या प्रकाराकडे इतक्‍या शांतपणे पाहू शकला, ही अत्यंत कौतुकाची गोष्ट वाटते. मार्क्‍सच्या कम्युनिस्ट मॅनिफेस्टोचे वर्ष म्हणून या सालाकडे लाल डोळे करून पाहणाऱ्या साम्यवाद्यांनी यावरून पुष्कळ शिकण्यासारखे आहे.”

शेजवलकरांनी फ्रेंच राज्यक्रांतीतील तीन मूल्यांचा उल्लेख “मानवेतिहासाची प्रस्थानत्रयी’ असा करतात.

शेजवलकरांचे वैशिष्ट्य म्हणजे ते या तीन मूल्यांच्या परस्परसंबंधांचा आणि त्यांच्यातील प्राधान्यक्रमाचीही चर्चा करतात. या बाबतीतील त्यांचा अंतिम सिद्धान्त असा आहे, की “”पूर्ण, चिरंजीव, निःसंदिग्ध व प्रभावी स्वातंत्र्य अपेक्षित असले तर मात्र, समता व बंधुता या गोष्टी तितक्‍याच पूर्ण, शाश्‍वत व निःसंदिग्ध असाव्या लागतील.”

एके काळी पूर्ण स्वातंत्र्य उपभोगणारा आपला देश पारतंत्र्यात का गेला, याचे शेजवलकरांनी दिलेले उत्तर असे आहे, की “”अंतर्बाह्य समता व बंधुता यांच्या अभावामुळे आपण स्वातंत्र्यास वाचवले.”

आपण स्वातंत्र्य का गमावले या प्रश्‍नाचे उत्तर मिळाले म्हणजे आपण गमावलेले स्वातंत्र्य परत संपादन कसे केले, याचे उत्तर सहज मिळण्यासारखे आहे. गेलेले स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी मराठ्यांची एकी होणे गरजेचे होते. शेजवलकर सांगतात, की “”समतेच्या व बंधुतेच्या तत्त्वामुळे एकी शक्‍य झाली. तसेच समता व बंधुता ही क्रांतीची मूलतत्त्वे निर्माण झाल्यामुळे शिवकालीन समाज स्वातंत्र्य मिळवू शकला.”

लोकहितवादी सूचित शिवक्रांतीच्या स्वरूपाचे विवरण करताना शेजवलकर एक साधारण सिद्धान्त बांधतात, तो असा “”सामाजिक क्रांती होऊन प्रथम समता व बंधुता निर्माण झाल्यावाचून या देशाला स्वातंत्र्यलाभ नाही, हाच इतिहासाचा संदेश आहे.”

शेजवलकरांना हे असे सिद्धान्त करावे लागले याचे तत्कालीन कारण म्हणजे तेव्हा 1941 साली (महाराष्ट्रासह) भारत देश ब्रिटिश अमलाखाली होता. महाराष्ट्रात कॉंग्रेस आणि हिंदुमहासभा यांच्यात तीव्र स्पर्धा होती. सावरकरांसारख्या एखादा दुसरा अपवाद सोडला तर हिंदुमहासभेचे बहुतेक लोक जातिभेद निर्मूलनादी सामाजिक सुधारणांना विरोध करीत होते. इतिहासाचार्य राजवाड्यांची विचारसरणी त्यांना शिरोधार्य असे. राजवाडे समतेच्या तत्त्वज्ञानाचे पूर्ण विरोधक. त्यांच्या मते राज्य मिळणे वा गमावणे या गोष्टींचा सामाजिक समता वगैरे गोष्टींशी काही संबंध नसतो. ज्याच्या तलवारीची लांबी जास्त किंवा ज्याच्या तोफाबंदुका अधिक पल्लेदार, तो जिंकतो.

राजवाडे यांनी लावलेल्या मराठ्यांच्या इतिहासाला अनुसरून राजकारण करणारे तेव्हाचे लोक असे म्हणत, की शिवकालात जातिव्यवस्था, स्त्रियांवरील बंधने, बालविवाहाची प्रथा इ. समतेच्या विरुद्ध प्रथा असूनही ज्या अर्थी स्वराज्य मिळाले, त्या अर्थी समता आणि स्वातंत्र्य यांचा काही अन्योन्यसंबंध नाही. सबब सामाजिक गुंत्यांच्या सोडवणुकीत शक्तीचा अपव्यय करून स्वातंत्र्य लांबणीवर टाकणे उचित ठरणार नाही.

आधी सामाजिक, की राजकीय या विषयावर लोकमान्य टिळक आणि गोपाळराव आगरकर यांच्यात झालेला वाद सर्वश्रुत आहे. आगरकर राजकीय स्वातंत्र्यासाठी सामाजिक सुधारणा स्थगित ठेवण्याच्या विरुद्ध होते, पण टिळक सामाजिक सुधारणा नकोतच असे म्हणत नव्हते. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सुधारणा आपल्या आपण व आपल्या पद्धीने करू, असा त्यांचा आशावाद होता; परंतु लोकमान्यांची परंपरा सांगणारी, स्वराज्य पक्ष, प्रतिसहकार पक्ष, लोकशाही स्वराज्य पक्ष आणि हिंदुमहासभा अशा क्रमाने गांधीजींना विरोध करणाऱ्या या मंडळींना सामाजिक समतेचे जणू वावडेच होते. शेजवलकरांचे लेखन हे मुख्यतः या मंडळींचा प्रतिवाद करण्यासाठी झालेले आहे.

भरीत भर म्हणजे ही मंडळी शिवाजी आणि मराठ्यांचा इतिहास यांचे नेहमी उदात्तीकरण करायची. हिंदुराष्ट्रवादाचे समर्थन करण्यासाठी त्यांचा उपयोग करायचा. साहजिकपणे उपरोक्त मूल्यत्रयीतील स्वातंत्र्याचेच महत्त्व अधोरेखित होऊन उर्वरित पायाभूत मूल्यांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे शेजवलकरांनी उल्लेखलेल्या तीन संतांपैकी दोघांना दूर सारून एकट्या रामदासांनाच सर्व श्रेय देणारा इतिहास त्यांनी रचला.

या सगळ्या परंपरेचा प्रतिवाद शेजवलकरांनी क्रांतीच्या मूलतत्त्वांचा महाराष्ट्रेतिहासातील अनुक्रम या लेखातून केलेला आहे. शिवकार्याची क्रांती असा यथार्थ व यथोचित गौरव करणाऱ्या लोकहितवादींना अशा क्रांतीतील सामाजिक आशयाचीही कल्पना होती, म्हणून तर त्यांनी आयुष्यभर ज्ञातिबांधवांचे शिव्याशाप झेलत समतेच्या तत्त्वाचा पुरस्कार केला. या तत्त्वाचे महत्त्व पटल्यामुळेच रानडे आणि भागवत यांनी संतांच्या कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. तत्त्वांच्या या प्रस्थानत्रयीतील स्वातंत्र्याला बाजूला काढण्याच्या राजवाड्यांच्या राजकारणातील डावपेचांचा एक भाग भागवत धर्मापासून महाराष्ट्र धर्म बाजूला काढणे हा होता. “”मराठा तितुका मेळवावा। महाराष्ट्र धर्म वाढवावा” असे रामदास म्हणाले. ते नेमके केव्हा असा आडव्यात जाणारा प्रश्‍न न विचारता सुद्धा असे म्हणता येते. मराठ्यांनी एक झाल्याशिवाय महाराष्ट्र धर्म वाढणे शक्‍य नव्हते आणि मराठा तितुका मेळवण्याची कामगिरी भागवत धर्माच्या संतपरंपरेने समता आणि बंधुता या मूल्यांच्या आधारे बजावल्यामुळेच महाराष्ट्राच्या स्वातंत्र्याची म्हणजे स्वराज्याची बोलणी शक्‍य झाली.

ज्याला आपण आधुनिकीकरण म्हटले, त्याच्यासाठीसुद्धा उपरोक्त तत्त्वे आवश्‍यक असतात, असे शेजवलकरांच्या लेखनातून निष्पन्न होते. “”शिवाजीने महाराष्ट्राच्या इतिहासाला जी कलाटणी दिली होती, तिच्यामागे आधुनिकीकरणाचे तत्त्वज्ञान होते. त्याने पश्‍चिम किनाऱ्यावरील दरवाजे उघडून पाश्‍चात्त्य सुधारणेच्या काळात इकडे आणण्याची तजवीज चालविली होती. परक्‍यांच्या व्यापाराला तर उत्तेजन द्यावयाचे, पण त्याबरोबर आरमार वाढवून त्यांचे —– करावयाचे, असा दुहेरी बेत शिवाजीने आखलेल्या अमात्यांच्या ———-वरून’ वरून स्पष्ट होतो.”

शेजवलकरांचा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा शिवराजांचे मोठेपण एका वेगळ्या पद्धतीने अधोरेखित करतो. “”सध्या सर्व इतिहासविवेचक अशी समजूत करून बसले आहेत, की हिंदुस्थानच्या स्थितीत अठराव्या शतकात काही सुधारणा शक्‍यच नव्हती. म्हणजे, पर्यायाने कोणा ना कोणा पाश्‍चात्त्य राष्ट्राचे प्रभुत्व मागेपुढे हिंदुस्थानावर होणे अपरिहार्य होते! ही विचारसरणी आम्हास मुळीच मान्य नाही. सतराव्या शतकापर्यंत अशी अंतर्गत सुधारणा मुसलमान राज्यकर्त्यांकडून अपेक्षित होती. कारण मक्का-मदिना, कायरो-इस्तंबूतपर्यंत त्याची “आमद्रफ्ती’ पूर्वीच चालू होती, पण सुधारणेपेक्षा संस्कृतीचा अनाधुनिक मूर्खपणाचा मार्ग औरंगजेबाने पत्करल्यामुळे ती नष्ट झाली. म्हणून शिवाजीला हिंदूंचे पुढारीपण स्वीकारून या सुधारणेचा पुरस्कार करणे भाग पडले! धर्मप्रकरणी शिवाजींचे वर्तन तत्कालीन युरोपच्या शंभर वर्षे पुढे होते.”

शेजवलकरांचे निरीक्षण यथार्थच आहे, पण शिवाजीमहाराज धर्माच्या बाबतीत युरोपच्या असे शंभर वर्षे पुढे जाऊ शकले, याचे कारणच मुळी हा धर्मविचार महाराष्ट्रात त्यांच्या अगोदर तीनशे वर्षे सातत्याने चालूच होता, हे आहे.

ग्रॅंट डफ काहीही म्हणो, मराठ्यांचे स्वराज्य हे केवळ आकस्मित योगायोग नव्हता, ती शिवक्रांती होती. तो वणवा नसून, समतेची अरणी आणि बंधुभावाचा मंथा या उपकरणांनी केलेले स्वातंत्र्याग्नीचे मंथन होते.

सौजन्य – लोकसत्ता, १४ मार्च २०१०

‘लोकसंस्कृती’चे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ रविवारी पुण्यात ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते देण्यात आला. या समारंभात डॉ. ढेरे यांनी  केलेले  भाषण.

आज त्रिदल फाउंडेशनच्या वतीने मला माझ्या ध्यासभूमीच्या कर्नाटकाच्या, म्हणजेच दक्षिण भारताच्या मातीतल्या एका फार मोठय़ा साहित्यकाराच्या हातून ‘पुण्यभूषण’ पुरस्कार दिला जातो आहे आणि माझ्या जिव्हाळ्याच्या परिवारातला एक प्रतिभावंत मराठी साहित्यकार माझ्याविषयीच्या प्रेमानं त्यासाठी इथे उपस्थित आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा योग आहे.

माझी मूळ माती मावळची आहे, पण माझ्या तेरा-चौदा वर्षांच्या वयापासून गेली सहासष्ट वर्षे ज्ञानाचा फाळ लावून पुण्यानं मला नांगरलं आहे आणि आज आलेल्या पिकाचं कौतुक करण्यासाठी, सोन्याच्या नांगरानं पुण्यभूमी नांगरणाऱ्या शिवरायांची प्रतिमाच ‘त्रिदल’नं मला दिलेली आहे. मनात आनंद आहे आणि संकोचही आहे. सभासंमेलनं आणि भाषणं यांच्या वाटेला मी फारसा गेलेलो नाही. सार्वजनिक क्षेत्रातला वावरही मी शक्यतो टाळत आलो आहे. लेखन-संशोधन हीच माझी आवडीची, आग्रहाची आणि समाजसंवादाची मुख्य वाट राहिली आहे.

फार क्वचित मी व्यासपीठावर आलो आहे आणि थोडंबहुत बोललो आहे. पण त्या अपवादप्रसंगी मला फार संकोचल्यासारखं, अवघडल्यासारखं वाटत आलं आहे. माझ्यामध्ये आहे तो अंदर मावळातल्या एका अगदी लहानशा खेडय़ातला एक सामान्य मुलगा. सहासष्ट र्वष पुण्यात घालवूनही तो मुलगा, पुण्यावर प्रेम करत असला तरी पुण्यातल्या नागर जीवनाला सरावलेला नाही. उन्हाळ्यात अनवाणी पायांनी माळरानावरच्या शेण्या वेचणं किंवा झाडाच्या वाळक्या काटक्या गोळा करून आजीला स्वयंपाकासाठी आणून देणं तसं सोपं होतं. पावसाळ्यात स्वत: इरली विणून, रानभाज्या खुडून आणणं किंवा भातकापणी झाल्यावर खाचरातला सरवा गोळा करून आणणं सोपं होतं.

देवळात आजारी मामांऐवजी जाऊन पोथ्या-पुराणं वाचणं सोपं होतं. पण तिथून निघून, म्हाताऱ्या आजीचं बोट धरून चाललेल्या धाकटय़ा बहिणीच्या पाठोपाठ, आजारी मामांसोबत शहर पुण्यात पहिलं पाऊल ठेवताना छातीत जी धडधड झाली होती आणि नळाच्या तोटीतून धो-धो पाणी अचानक येताना पाहिल्यावर जो धसका बसला होता, तो धसका आणि ती धडधड, अजून ऐंशीव्या वर्षीही माझ्या मनात कायमच आहे.

‘शाकुंतल’ नाटकात कण्वांच्या शकुंतलेला राजाघरी पोचवण्यासाठी दोघे ऋषिकुमार जातात. रानावनात वाढलेल्या त्या कुमारवयीन मुलांना राजधानीत प्रवेश केल्यावर, आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या परिसरात पाय ठेवल्यासारखं वाटतं. शहराबद्दलची माझी खरीच भावना उघड करणारा तो प्रसंग दृष्टांत म्हणून मी गमतीनं नेहमीच इतरांना सांगत आलो आणि आता ‘पुण्यभूषण’ पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झालं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यात बॉम्बस्फोट झाला हा कसला योगायोग आहे. हे शहर आगीच्या ज्वाळांनी वेढलं जाण्याच्या अवस्थेपर्यंत खरोखरीच पोचेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. माझ्या कल्पनेतलं पुणं वेगळंच होतं. आठ-नऊ वर्षांचा असताना देवराम अभंग नावाच्या माझ्या शिक्षकांच्या तोंडून मी पुण्याचं खूप वर्णन ऐकलं होतं. तेव्हा मित्राला पत्र लिहितो आहे, अशी कल्पना करून, माझ्या कल्पनेतल्या पुण्याविषयीचा एक निबंधही लिहिला होता. पुण्याला जाण्याची तेव्हा विलक्षण ओढ होती. प्रत्यक्षात पुण्याला आलो तेव्हा बरोबर थोडे कपडे आणि भांडी यांचं ओझं होतं. भर माध्यान्हीच्या उन्हात पाय पोळत होते आणि शनिवारवाडय़ाची प्रचंड भिंत पाहून जीव दडपला होता.

पुढे मात्र याच पुण्यानं मला अक्षरश: मातीतून वर काढलं. काहीच नव्हतं माझ्याजवळ. जन्मतारखेचा दाखला नव्हता, की कुठलीही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला नव्हता. पण त्यावेळच्या अत्तरदे नावाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माझी केवळ तोंडी परीक्षा घेऊन मला पाचवीच्या वर्गात प्रवेश दिला. एकेका वर्षांत दोन दोन इयत्तांचा अभ्यास करत गेलेली र्वष मी भरून काढली आणि दिवसा पोटापाण्याचे उद्योग धुंडाळत सरस्वती मंदिर रात्रशाळेतून शिक्षण पूर्ण केलं.
त्या काळात भेटलेल्या कितीतरी शिक्षकांची आज मला आठवण येते. शिक्षण माणसाला घडवतं याचा अनुभव देणारे शिक्षक होते ते. त्यांनी नुसती पाठय़पुस्तकंच शिकवली नाहीत; तर मला जगायला शिकवलं. चांगल्या गोष्टींचा ध्यास लावला. म्युनिसिपालिटीच्या आठ नंबरच्या शाळेत मला बोरकर गुरुजी भेटले आणि मला कवितेची गोडी लागली. मन पाझरत ठेवणाऱ्या, यक्षिणीच्या त्या अद्भुत कांडीचा स्पर्श मला बोरकर गुरुजींमुळे झाला आणि दु:ख- दारिद्रय़ाचा विसर पाडणाऱ्या एका विलक्षण जगात मी प्रवेश करू शकलो. पुढे मीही कविता लिहिल्या, स्तोत्रं आणि आरत्या लिहिल्या, मित्रांबरोबर सविता मंडळ स्थापन केलं, नभोवाणीसाठी संगीतिका लिहिल्या.

संशोधनाकडे वळल्यावर कविता लिहिणं थांबलं, बोरकर-माडगूळकरांबरोबरच्या खासगीत रंगणाऱ्या मैफिली थांबल्या, पण कविता सोबतीला राहिलीच. माझ्या शैलीचा ती अविभाज्य भाग बनली. ती अर्थात स्वाभाविक गोष्ट. पण त्याहीपेक्षा तिनं दिलेलं मोठं देणं म्हणजे संशोधन; हाही एक प्रातिभ व्यापारच असतो याची जाणीव.

केवळ माहितीचे भारे जमवणं म्हणजे संशोधन नव्हे. अनेकदा असं माहितीच्या संकलनाचं काम काही क्षेत्रात, काही पातळ्यांवर आवश्यक असतं आणि महत्त्वाचंही असतं. पण शेवटी संदर्भाचे दुवे जुळवत, त्यातून विषयाच्या, व्यक्तींच्या, काळाच्या आकलनापर्यंत पोचणं ही प्रतिभाबळानंच घडणारी गोष्ट असते. कवितेनं मला संशोधनाच्या प्रांतातही कायम सर्जनाशी बांधून ठेवलं. तिनं मला तर्ककर्कश होऊ दिलं नाही. भावात्मतेपासून दूर जाऊ दिलं नाही आणि अगदी निकरानं विरोधाला तोंड देण्याची वेळ आली, तेव्हाही आपल्याला सापडलेल्या सत्याला सोडून जाऊ दिलं नाही. नव्या-जुन्या कविता आजही पुष्कळ सोबत करतात. भरवसा देत राहतात.

सत्याच्या जातीला दु:ख असे मिळणारच
दु:खातून करुणेचे मर्म सहज कळणारच

अशी मुक्तिबोधांची एक कविता आहे. कवितांचे असे दिलासे माझ्या वाटेवर सारखे भेटत राहिले. मी निवडलेलं अभ्यासाचं क्षेत्रंच असं आहे, की तिथे आत जायचं तर मानव्याच्या महाद्वारातूनच जावं लागतं. संतपरंपरा आणि लोकपरंपरा हे माझे अभ्यासाचे विषय. मला या अभ्यासानं माझ्या लहानपणाचं भान दिलं, तरी त्याची खंत मिटवली आणि मोठय़ा गोष्टींचा ध्यास लावला. ज्ञानाचं अपारपण दाखवलं, अखंडत्व दाखवलं, उदारपण दाखवलं आणि समन्वयाचा साक्षात्कार घडवला.

विविध ज्ञानशाखांचा समन्वय करतच मी माझी अभ्यास साधनं, अभ्यासक्षेत्रं आणि अभ्यासदिशा विस्तारू शकलो. सर्वसामान्य माणसांविषयीचं प्रेम हा इथल्या लोकपरंपरेचाच नव्हे तर संतपरंपरेचाही गाभा आहे. या गाभ्याशी जाण्याची वाट मी सिद्ध करू शकलो आणि तिथंपर्यंत पोचल्यानंतर, इथल्या सार्वजनिक जीवनात न वावरताही माणसांचं अलोट प्रेम मला मिळालं. माझ्यासारख्या पोरकेपणाचा अनुभव घेतलेल्या, वेदनांनी पोळलेल्या आणि व्यवहारात अडाणी राहिलेल्या माणसासाठी या प्रेमाचं मोल किती आहे हे कसं सांगू? आधी पुण्यानं आणि मग सगळ्याच मराठी जगानं मला माझ्या दुबळेपणासकट स्वीकारलं. मर्यादांसकट स्वीकारलं. अगदी फाटका माणूस होतो मी. जवळजवळ रस्त्यावर वाढत होतो; पण आबासाहेब मुजुमदार, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, दत्तो वामन पोतदार अशा त्या काळातल्या पुण्यातल्या थोर शास्त्री-पंडितांनी माझ्यासारख्या दरिद्री, अल्पवयीन आणि अल्पज्ञानी मुलाला अगदी सहज जवळ केलं.

पुणं हे माझी ज्ञानाची भूक वाढवणारं आणि पुरवणारं एक मुक्त विद्यापीठ झालं. मोठय़ा माणसांचं दर्शन घडवणारं आणि मला माझ्या ज्ञानधर्माची दीक्षा देणारं महाकेंद्र झालं. या शहरानंच मला सामान्य माणसांमधल्या भलेपणाचा आणि सामर्थ्यांचा अनुभव दिला. खऱ्या समाधानाची आंतरज्योत पेटवणारी पुस्तकं आणि त्या पुस्तकांतून भेटणारे कित्येक महान लेखक, कवी, चिंतक मला इथेच सापडले. सहासष्ट वर्षांपूर्वी इथे येताना मी जो कुणीच नव्हतो, तो इथे येऊन अभ्यासक झालो, संशोधक झालो आणि मुख्य म्हणजे माणूस झालो. पुण्याचं माझ्यावर हे ऋण आहे.

खरं तर आता मागे वळून पाहताना, मला वाटतं आहे की, ऐंशी वर्षांच्या आयुष्यात आपण केलेलं सगळं लेखन म्हणजे ऋणमुक्त होण्यासाठीचं एक तर्पणच आहे.

वडील गेल्यानंतर तेराव्या दिवशीच, प्रायोपवेशनानं स्वत:ला संपवून, अवघ्या एकविसाच्या वर्षी, स्त्रीत्वाच्या कणखर निग्रहाचं दर्शन घडविणाऱ्या माझ्या आईला आणि भागवतधर्माचं सार जगणाऱ्या, गावकुसाचा आधार बनलेल्या माझ्या आजीला ते तर्पण आहे. इतिहासरचनेची दृष्टी मला देणाऱ्या आणि सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासातलं मिथकांचं सामथ्र्य माझ्यासमोर उलगडणाऱ्या राजवाडय़ांना ते तर्पण आहे. मला समन्वयाची दृष्टी आणि समग्रतेचं भान देणाऱ्या न्यायमूर्ती रानडय़ांना ते तर्पण आहे. लोकपरंपरेच्या अभ्यासाचा पैस दाखवणाऱ्या कर्वे-चापेकरांना, ज्ञानाचा प्रचंड विस्तार पेलू पाहणाऱ्या भारताचार्य वैद्यांना, चित्रावांना, इरावतीबाईंना, तर्कतीर्थाना आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या दादा पोतदारांना ते तर्पण आहे.

मी तर्पणाची भाषा करतो आहे म्हणून परंपरावादी धार्मिकाचा आरोप कुणी माझ्यावर करेलही, पण परंपरा आणि परिवर्तन यांची सहृदय, तरी निर्भय चिकित्सा मी आयुष्यभर करत आलो आहे. मी सश्रद्ध माणूस आहे. श्रद्धेचं सामथ्र्य अनुभवानं जाणणारा माणूस आहे. पण रूढ कर्मकांडापलीकडे जाण्याचा आणि ‘कर्माचे डोळे ज्ञान, ते चोख होआवे’ या ज्ञानदेवांच्या इशाऱ्याला सजगपणे स्वीकारत पुढे जाण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो आहे.
श्रद्धेची तपासणी करण्याची वेळ आली तेव्हा ती करायला मी कधी कचरलो नाही आणि सांप्रदायिक श्रद्धांनी घातलेल्या मर्यादा ओलांडून, संशोधनानं समोर ठेवलेल्या सत्यांकडे जाताना मी कधी पाऊल मागे घेतलं नाही. एखाद्या धर्मकार्याइतक्या निष्ठेनं मी लेखन करत राहिलो आहे; किंबहुना लेखन-संशोधन हाच माझा स्वधर्म राहिला आहे.

खरं म्हणजे आज धर्म किंवा जात हा शब्द उच्चारणंही अवघड झालं आहे. धर्मद्वेषाचा आणि जातिद्वेषाचा आज उठलेला गदारोळ कमालीचा क्लेशकारक आहे. जाती मिटवण्याची भाषा बोलत, आपण जातीयवादच धगधगत ठेवतो आहोत. निधर्मी राष्ट्रवादाची भाषा बोलत धार्मिक अहंतांना आणि स्वतंत्र प्रादेशिक अस्मितांना खतपाणी घालतो आहोत.

धर्माची सांगड आपण कायम नीतीशी घालत आलो आहोत. धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेत ती स्वाभाविक प्रक्रियाच होती. पण आज नवसमाजरचनेचा प्रयत्न करताना आपण धर्म दूर सारला, तशी नीतीही दूर सारण्याची अक्षम्य चूक केली आहे. धर्म कोणताही असो, किंबहुना धर्म असो किंवा नसो, नैतिकता ही माणसाच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्याचं संवर्धन करणारी गोष्ट आहे. त्याच्या सामूहिक जगण्याचं निरोगी नियमन-संगोपन करणारी शक्ती आहे. त्या नैतिकतेचा सर्व क्षेत्रांमधला पाडाव आज कोणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारा आहे.

ज्ञानाचं क्षेत्रही आज कमालीचं गढूळ आणि अशुद्ध झालं आहे. लोकपरंपरा आणि संतपरंपरा यांच्याइतक्याच आस्थेनं मी एकोणिसाव्या शतकातल्या प्रबोधन परंपरेचा विचार करीत आलो आहे आणि त्या परंपरेत उदयाला आलेल्या प्रखर विवेकवादाकडे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राने कशी पाठ फिरवली आहे हे पाहात असताना कमालीचा व्यथित झालो आहे. गावाकडे याच दिवसात शिमग्याची सोंगं निघायची. सर्वसामान्य माणसाचा शीणभाग घालवणारी ती एक निरागस उत्सवी मौज होती. पण आज आपल्याला ज्ञानवंतांची सोंगं घेऊन वावरणारी सामान्य वकुबाची विषारी महत्त्वाकांक्षा, स्वार्थाध स्पर्धावृत्ती आणि फुटीरतेला पोसणारी विकृतीच वेळीअवेळी समोर नाचताना दिसते आहे.

राजवाडय़ांच्या निरीक्षणाचा, जिज्ञासेचा आणि विश्लेषणाचा वारसा मिळालेल्या अभ्यासकांच्या पिढय़ा याच पुण्यात माझ्यामागे उभ्या होत्या तेव्हा जातीजमातींचा विचार म्हणजे आपला समाज समजून घेण्याचं साधन वाटायचं. एखाद्याची जात समजली, कुलदैवत समजलं किंवा ग्रामनाम समजलं तरी आपल्या बहुजिनसी समाजातल्या माणसांच्या स्थलांतरांची, उपजीविकांची, जीवनशैलीची, स्वभाववैशिष्टय़ांची आणि गुणधर्माची ओळख पटत जायची. एकूणच आपली सामाजिक – सांस्कृतिक घडण समजत जायची. माणसं समजून घेण्याचीच ती एक वाट होती. त्या वाटेवरून चालताना भूतकाळाच्या निबिड अंधारातून, संस्कृतीची न समजलेली, न दिसलेली अस्तित्व प्रयोजनं उजेडात आणताना मानवी जीवनाच्या अर्थपूर्णतेजवळ जात राहिल्याची एक भावना मनात असायची. माझं सगळं संशोधन या भावनेनं भारलेल्या अवस्थेतच झालं आहे. संप्रदायांचा समन्वय, उपासनांचा समन्वय, सामाजिक- प्रादेशिक धारणांचा समन्वय – विसंगतीचं आणि विरोधाचं विष पचवीत एका उदार, सहिष्णू, सहृदय आणि सत्त्वशील अशा महासमन्वयाकडे जाणं ही भारतीय संस्कृतीची आणि मराठी संस्कृतीचीही आजपर्यंतची आत्मखूण राहिली आहे आणि या खुणेची ओळख पटवणं हेच माझ्या कामाचं आंतरउद्दिष्ट राहिलं आहे.

पूर्वी माझे चित्रकार स्नेही अनंतराव सालकर यांच्या आग्रहानं, त्यांच्याबरोबर मी अनेकदा पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या भेटीला गेलो आहे. स्वामी तेव्हा क्षीण अवस्थेत अंथरुणावर पडून असायचे. एका भेटीत सालकर स्वामींना म्हणाले, ‘यांना अजून खूप काम करायचं आहे, पण प्रकृती साथ देत नाही. सतत आजारपण पाठीला लागलं आहे. यांना काही उपाय सांगा.’ स्वामी किंचित हसले. म्हणाले, ‘‘लहान मूल असतं, खेळत असतं अंगणात. जोवर ते खेळात दंग असतं तोवर त्याला कशाचं काही वाटत नाही. पडणं-झडणं, खरचटणं त्याला काही भानच नसतं. मग केव्हातरी आई हाक मारते. खेळ थांबतो, मूल भानावर येतं आणि आईजवळ गेल्यावर नंतर मग त्या लागण्या-पडण्याच्या वेदना जाणवून रडू येतं. पण तेव्हा काळजी घ्यायला, कुशीत घ्यायला आई असतेच. तुम्हीही एक खेळ मांडला आहे. संशोधनाचा खेळ. तो मनापासून खेळत राहा. आई बोलावून घेईल तेव्हा पडण्या-झडण्याच्या जखमांची काळजी ती घेईलच.’’
स्वामी म्हणाले ते फार खरं होतं. मी एक खेळ मांडला आणि आजपर्यंत भान विसरून तो खेळत राहिलो आहे आणि खेळही असा मिळाला आहे की स्वत:ला देऊन टाकल्याखेरीज तो खेळताच येत नाही. स्वरूपानंदांचीच एक ओवी आहे-

व्हावया वस्तूची प्राप्ती। साधक साधना करिती।
परि ते वस्तू आहुती। साधकाचीच मागे।।

वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, परब्रह्माचा साक्षात्कार व्हावा म्हणून साधक साधना करतात खरी; पण त्या ब्रह्माला हवं असतं ते साधकाचंच समर्पण. संपूर्ण समर्पण. तुमचाच प्राण, तुमचीच आहुती त्याला हवी असते. मी माझ्या ज्ञानब्रह्मापुढे अशा आहुतीच्या तयारीनं उभा राहिलो आहे.

अतुल देऊळगावकर, सौजन्य – लोकसत्ता

सर्व काळातील विद्वानांना मुळांचा शोध घेण्यासाठी किंवा वर्तमानाचा अन्वय लावण्यासाठी इतिहासात खोल उडी मारण्याची ऊर्मी होत असते. अलेक्स हॅले यांची ‘द रूट्स’ ही अभिजात कादंबरी अमेरिकेमधील कृष्णवर्णीयांच्या यातनांचा मागोवा घेत आफ्रिकेपर्यंत जाते. सतराव्या शतकापासून आधी युरोप व नंतर अमेरिकेने आशिया व आफ्रिकेला वसाहती बनविल्या. आफ्रिकेमधील कोटय़वधी कृष्णवर्णीयांवर गुलामगिरी लादली. १५३६ ते १८४८ अशी तब्बल ३१२ वर्षे आफ्रिकेतून गुलामांची विक्री होत असे. ‘‘वसाहती केलेल्या देशांमधील संपत्ती आणि कृष्णवर्णीयांचे श्रम या पायावर युरोप व अमेरिकेने औद्योगिक क्रांती केली. आशियाई व आफ्रिकी देशांच्या दारिद्रय़ाचे हेच कारण आहे. ’’ १९६८ साली नोबेल विजेते अर्थवेत्ते गुन्नार मिर्दाल यांनी ‘एशियन ड्रामा- एन्क्वायरी इन टू पॉव्हर्टी ऑफ नेशन्स’ या त्रिखंडीय ग्रंथातून वसाहतवादाचे अर्थकारण मांडले. आजही जागतिक अर्थ- राजकारणच नव्हे तर पर्यावरणवादी विचारांवरसुद्धा मिर्दाल यांच्या विचारांचा प्रभाव आहे. ‘‘श्वेतवर्णीयांनी साहित्यामधून, आशियाई व आफ्रिकी देश हे रानटी, असंस्कृत, आळशी व नालायक असल्याचे दाखले देण्याचा प्रघात घातला. आपण गुलाम असणे हेच योग्य असे ठसविण्याकरिता कृष्णवर्णीयांमध्ये जबरदस्त न्यूनगंड व अपराधगंड निर्माण करणे आवश्यक होते. हे कार्य श्वेतवर्णीय साहित्यामधील प्रतिमांनी केले.’’ असा ‘ओरिएंटॅलिझम’चा सिद्धांत एडवर्ड सैद यांनी १९७४ मध्ये मांडला. या विचारांचा साहित्यिक उद्रेक म्हणजे गेली ३४ वर्षे वाचकांना खेचून घेणारी ‘द रूट्स’! श्वेतवर्णीयांनी केलेले क्रूर अत्याचार आणि त्यांनी लादलेल्या अनैतिहासिक व अनैतिक प्रतिमांमुळे कृष्णवर्णीयांच्या खच्चीकरणाचा समाचार हॅले यांनी घेतला. तसेच आफ्रिकन संस्कृतीचा समृद्ध इतिहास आणि अस्सल प्रतिमा सादर केल्या.

भारतीय इतिहास आणि संस्कृतीमधील टिकवून धरण्याजोगे आणि जाळून टाकण्याजोगे काय आहे, याची चिकित्सा अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन करीत आहेत. भारतापुढे भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? दारिद्रय़ व विषमतेच्या पर्यावरणातील अशांतपर्वातून आपण कसे बाहेर पडणार? प्रादेशिक अस्मिता वरचढ ठरून तुकडे पडतील? अशा अनेकविध कूट समस्यांनी ग्रासलेल्या भारताने विचार कसा करावा? ‘द ऑग्र्युमेंटेटिव्ह इंडियन’, ‘आयडेंटिटी अ‍ॅण्ड व्हायोलन्स’ आणि ‘द आयडिया ऑफ जस्टिस’ या ग्रंथांतून सेन यांनी भारतीय संस्कृतीसंबंधीचे प्रदीर्घ चिंतन आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. सलमान रश्दी यांना कादंबऱ्यांमधून इस्लामी संस्कृतीचा चिकित्सक वेध घ्यावासा वाटतो. अशा जागतिक कॅनव्हासवर मराठी वाचक राजमान्य राजश्री भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’बद्दल दांडगी आशा बाळगून होते. वलयांकित नेमाडे आणि त्यांचे ३० वर्षांपासूनचे संशोधन सर्वच काही त्या कादंबरीला गूढ करण्यास पूरक होते.

सिंधू संस्कृतीचा संशोधक खंडेराव यांची मोहेनजोदडो ते मोरगाव (खानदेशातील) भ्रमणगाथा असा विस्तीर्ण अवकाश ‘हिंदू’ने घेतला आहे. ६०३ पानांतील ६ प्रकरणांमधून व्यक्त झालेला आशय दोन-चार परिच्छेदांत सांगणे अशक्य आहे. अफगाणिस्तानमधील शरयू नदीपासून राजस्थानच्या सरस्वती नदीपर्यंत सप्तसिंधू, भूप्रदेशाचा नकाशा जगासमोर आणल्यामुळे सर्वचर्चित झालेला खंडेराव याच्या नजरेतून लोकजीवनाविषयीची प्रदीर्घ मांडणी समोर येते.

मोहेनजोदडोमधील उत्खनन पाहत असताना त्याला पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंध संस्कृतीमधील खेडे आणि त्याचे मोरगाव यात साम्य आढळते. त्यातून गावाची आठवण तीव्रतेने होते. गावातील आत्या आठवते. फाळणीपूर्वी ही आत्या पेशावरमधील महानुभव पंथाच्या आश्रमात गेलेली होती. उत्खनन आणि आत्याचा शोध हे दोन हेतू घेऊन खंडेराव पाकिस्तानात पोहोचला आहे. खूप प्रयत्न करूनदेखील आत्याचा ठावठिकाणा लागत नाही. त्याच सुमाराला त्याचे वडील विठ्ठलरावांची प्रकृती खालावल्याचा निरोप आल्यामुळे खंडेराव मोरगावकडे निघतो. या प्रवासातील लहानपणापासून आतापर्यंतच्या सर्व आठवणींचा पट कादंबरीमधून येतो.

मुलामध्ये जीव अडकलेले विठ्ठलराव खंडेराव परत आल्यावर त्याच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतात. प्रचंड जमीनजुमल्याचा वारस खंडेराव रीतिरिवाजानुसार सर्व उत्तरक्रिया करतो. खंडेरावला उदंड व संपन्न आयुष्य लाभावे ही परमेश्वराकडे आळवणी करणारा गोंधळ चालू होतो. इथे कादंबरीचा शेवट होतो.

स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील मोरगाव व खानदेशमधील ग्रामसंस्कृतीविषयी खंडेराव याची मते विस्ताराने येत जातात. एकत्र कुटुंबपद्धतीमधील नाती व ताणतणाव, आनंद व दु:ख, आपुलकी व तेढ दिसत जाते. अलुतेदार-बलुतेदार यांनी चालवलेला गाव उलगडत जातो. गावगाडय़ामधील करुण कहाण्या समजतात. काळाच्या ओघात गावातील वातावरणातील बदल खंडेराव सांगतो. त्याच्या कथनातून ‘संशोधक वृत्ती’ जाणवत नाही. वेळोवेळी तो केवळ शेरेबाजी करत जातो.

कादंबरी वाचल्यावर हाताला काही लागत नाही. जुनी शब्दकळा, भाषेचे पोत व लोकगीतांचे वैभव लक्षात येते. पण त्यातून लेखकाला नेमके काय सांगायचे आहे, हेच समजत नाही. ‘‘दोन ताना चांगल्या घेतल्या म्हणजे गायन चांगलं होत नाही. गाण्यातून विचार व्यक्त झाला तर ते खरं गायन!’’ असं पं. कुमार गंधर्व म्हणत.

भारतीय संस्कृतीला नेमाडे हे ‘हिंदू’ संस्कृती असं संबोधतात. (या गोंधळाबद्दल विस्ताराने लिहिता येऊ शकते.) तथापि या संस्कृतीची बलस्थाने व कमकुवत दुवे कोणते, हे स्पष्ट होत नाही. अमर्त्य सेन यांना संपूर्ण भारतीयांनी शतकानुशतके जपलेली वादसंवाद परंपरा महत्त्वाची वाटते. ‘‘विणकर कबीर, चांभार रवीदास, सेना न्हावी, नरहरी सोनार हे कवी तर मीराबाई, मुक्ताबाई, दयाबाई, अंदलबाई, सहजोबाई या कवयित्रींच्या भजनांची समाजमनावर छाप अजूनही आहे. विचारमंथनाची प्रक्रिया खोलवर रुजल्यामुळे समाजातील सर्व थरांतून काव्याचा आविष्कार शक्य झाला. इसवी सन १००० सालापर्यंत अवघ्या जगावर भारतीय विज्ञान, तत्त्वज्ञान आणि गणिताचा दबदबा निर्माण झाला होता. त्याचा पाया हा बहुविधतेच्या ऐतिहासिक परंपरेने रचला होता; परंतु कनिष्ठ जातींना मिळणारी वागणूक असह्य झाल्यामुळे बौद्ध व जैन धर्माची स्थापना झाली. त्या काळात खंडणमंडण, वाद-संवादामुळे मतांतर व त्यातून धर्मातरे झाली आहेत. सामाजिक भेदभावाचा धिक्कार करणाऱ्या हिंदू भक्ती पंथ तसेच मुस्लीम सुफी पंथांचा सहज प्रसार मनपरिवर्तनामुळेच झाला होता’’ असे विश्लेषण सेन यांनी केले आहे. पुरातत्त्व संशोधक असूनही खंडेराव यांच्या बोलण्याला अशी खोली येत नाही.

कृषी संस्कृतीच्या काही उजळ बाजू असल्या तरीही ती सरंजामशाहीला पोषकच होती. लोकशाही व आधुनिकीकरणामुळे आपली सत्ता धोक्यात येईल या भीतीने सरंजामदार घाबरले होते. सर्वाना समान प्रतिष्ठा हे आधुनिक मूल्य स्वीकारण्यास जमीनदार तयार नव्हते. अशा मध्ययुगात रुतलेल्या सुस्त भारताला आधुनिकतेकडे खेचून आणणारा रथ ओढणाऱ्या अनेक पिढय़ा रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि पं. नेहरू यांनी घडविल्या. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधण्याची किमया टागोर, गांधी व नेहरू यांनी साधली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिकतेला वेगळे परिमाण  दिले. ‘नव्या वाऱ्याचा स्पर्श होऊ न देणारे खेडे हे साचलेले डबके आहे’ असे त्यांना वाटत होते. समान संधी ही शहरात मिळू शकेल हा विश्वास त्यातून स्पष्ट दिसत होता.

नेमाडे यांचा खंडेराव हा आधुनिकतेचा कडवा विरोधक आहे. त्याची कारणे मात्र कादंबरीत सापडत नाहीत. ‘कोसला’पासून ‘झूल’पर्यंतच्या प्रवासात नेमाडे यांचे प्रतिनिधी आधुनिकतेला नाकारत आले आहेत. या प्रवाहांचे मूळ अस्तित्ववादी आणि उत्तर आधुनिक (पोस्ट मॉडर्निझम) विचारांमध्ये सापडते. ‘‘माणसाच्या असण्याला, इच्छेला काही अर्थ आहे काय, सभोवतालच्या सत्तेपुढे व्यक्ती क्षुद्र आहे. माणूस ही एक व्यर्थ यातना आहे. आपल्या इच्छेविना आपण जन्माला येतो आणि मरतो. मृत्यू ही एकमेव निवड आपण करू शकतो. जगण्यातील अर्थ शोधणे ही अर्थशून्य धडपड आहे’’ असे निर्थकतेचे तत्त्वज्ञान आकर्षक व आक्रमकरीत्या मांडले जात होते. कुटुंब, शासन व सर्व प्रकारच्या सत्ता नाकारणारे नेमाडे यांच्या चार नायकांची नाळ अस्तित्ववादाशी जोडलेली आहे.

१९६० ते ७०च्या दशकात जगभर आधुनिक विचारांना नाकारणारा उत्तर आधुनिक विचार रुजू लागला. ‘‘आपल्या अस्तित्वाचा आपणच अर्थ शोधावा. कोणतीही संकल्पना एकसंध नसून तुकडय़ांनी (फ्रॅग्मेंट्स) बनलेली असते. यापुढे महासिद्धांतांचा (मेटॅ थिएरी-समाजवाद, मार्क्‍सवाद, उत्क्रांतिवाद) काळ गेला. महाकथनांची (ग्रँड नॅरेटिव्ह-रामायण, महाभारत) अपेक्षा धरू नका. सर्व प्रकारच्या संरचना (स्ट्रक्चर) या अनैसर्गिक असल्यामुळे त्या संपवायला हव्यात.’’ असा तो जाहीरनामा होता. नेमाडे यांच्या पाचही कादंबऱ्यांमधील व्यक्तिरेखा या उत्तर आधुनिकवादाचा पुरस्कार करतात. त्यामुळेच त्यांना आधुनिकतेचे वावडे असते. ‘कुठलाही आदर्शवाद स्वीकारणे, म्हणजे स्वत:ला बंदिस्त करून घेणे. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते, त्यामुळे व्यक्तीचा विचार घेणे म्हणजे विभूतिपूजा करीत स्वत:ला गहाण टाकणे. माझ्यावर कुठल्याही सत्तेचे नियंत्रण नको. मला वाटतं तसं मी वागणार,’ या सूत्राला मराठी साहित्यात बौद्धिक प्रतिष्ठा देण्याचे कार्य तेंडुलकर, नेमाडे व आळेकर यांनी केले.

कालांतराने १९८०च्या दशकात नेमाडे यांनी देशीवादाची (नेटिव्हिझम) मांडणी केली. १९९०च्या दशकात जागतिकीकरणामुळे देशी संस्कृती धोक्यात येत असल्याची भीती त्यांना वाटू लागली. ‘दोन भिन्न संस्कृती एकमेकांच्या संपर्कात आल्यावर सांस्कृतिक बदल सुरू होतात. सशक्त संस्कृतीसमोर संपून जाण्याचे भय अशक्त संस्कृतीला होऊ लागते. त्यातून स्थानिकांची स्वदेशीवादाची चळवळ उभी राहते.’ असे प्रमेय मानववंशशास्त्रज्ञ राल्फ लिंटन यांनी मांडले होते. एडवर्ड सैद यांचा ‘ओरिएंटॅलिझम’ आणि लिंटन यांच्या विचारांचे स्वैर रूपांतर करून नेमाडे यांनी देशीवादाचे अजब रसायन तयार केले. वास्तविक दोन भिन्न संस्कृती संपर्कात आल्यावर तीन शक्यता संभवतात. शरणागती पत्करून प्रगत संस्कृतीमध्ये सामील होते, कधी प्रगत दोन्हींचा संगम होऊन नवी संस्कृती तयार होऊ शकते. तर केव्हा दुसऱ्या संस्कृतीला नाकारण्यासाठी अनेक आघाडय़ांवर संघर्ष करते. ‘बाहेरचे आल्यामुळे आपण संपून जाऊ’ हा भयगंड (झेनोफोबिया) घेऊन असंख्य स्थानिकांनी चळवळी केल्या आहेत. त्यातूनच परकीय, स्थलांतर करणाऱ्यांना नकार येतो. शिवसेना व मनसे या त्याच्या महाराष्ट्री आवृत्त्या आहेत. (धोक्याची आरोळी ठोकल्याने नेतृत्वदेखील आपसुक चालून येते हा एक हमखास फायदा आहे.)

असंख्य आक्रमणे सहन करताना टाकाऊ असलेले टाकून नव्याचा स्वीकार केल्यामुळेच भारतीय संस्कृती (हिंदू नव्हे) आजवर टिकून राहिली आहे. विज्ञानामुळे शेती व गावे, उत्पादन व सेवा यांचे स्वरूप बदलत गेले. शहरीकरणामुळे मानवी नाते व संबंधांमध्ये बदल झाला. आधुनिक व शहरी हे उफराटेच असतात, असा नेमाडे यांच्या प्रतिनिधींचा ग्रह दिसतो. ‘गावातील रहिवासी हे अधिक नीतिमान व उदात्त असतात. हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट होणार नाहीत. कारण हिंदू लोक सगळी अडगळ तळघरात जपून ठेवतात,’ असे भाकीत ‘हिंदू’मधील खंडेराव करतो. त्याला युरोपी आधुनिकतेचा तिटकारा आहे. ‘‘युरोपी संवेदनवर्चस्वामुळे आलेली रोगट स्वच्छता-साबण, पावडरी छानछोकी? एका बादलीत सगळे घाण कपडे खंगाळून मग दुसऱ्या एका स्वच्छ बादलीत ते धुऊन काढणं-साबणाची गरज काय?’’ असा सवाल खंडेराव विचारतो. त्यानंतर तो राख, शिकेकाई यांची महती सांगतो. यातून वाचकांनी काय अर्थ काढायचा? आधुनिकतेने बहाल केलेल्या सर्व वस्तू व उपकरणे (ट्रॅक्टर, टीव्ही, मोबाइल) या बाह्यांगांचा सहज स्वीकार करायचा, परंतु आधुनिक विचाराचे अंतरंग नाकारायचे ही दांभिकता कित्येक सुधारणांच्या आड येत आहे. गेल्या शतकात सतीबंदी, बालविवाह, स्त्रीशिक्षण, राखीव जागा यांना सक्त विरोध करणारी तर आता, कुटुंबनियोजन, मुलीचा जन्म, आंतरजातीय विवाह यांना नाकारण्यामागे हीच मानसिकता आहे. ‘‘सीमेंट-काँक्रीटचं घर पाहिजे, परंतु संडास आत नको. बाहेर जाणे  हे देशीपणाचे वाटते.’’ असा बाणा घेतल्यामुळेच साठ टक्के भारत उघडय़ावर बसतो. त्यामुळे सर्व जलस्रोतांची नासाडी होऊन रोगराई पसरत आहे. ही मानसिकता असेपर्यंत देशाला व महाराष्ट्राला स्वच्छ पाणीपुरवठा अशक्य आहे. असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘ग्रामीण व देशी ते सारे काही श्रेष्ठ’ हे सुलभीकरण, ‘पूरब और पश्चिम’ दाखवणाऱ्या मनोजकुमारी धाटणीचे होते. नेमाडे फक्त तात्पर्य सांगून मोकळे होतात. विस्ताराने भाष्य करण्याची रीत त्यांना मान्य नसावी. आधुनिकीकरणानंतर जगभरात शेतीचे युग जाऊन यंत्रयुग व त्यानंतर संगणक युग आले. विज्ञानामुळे असंख्य सोयीसुविधा सर्व लोकांपर्यंत गेल्या. याबद्दल खंडेराव चकार शब्द काढत नाही.

नेमाडे यांचा निवेदक खंडेराव यांना व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीवाद ही पाश्चात्त्य थोतांड वाटतात. युरोपी व स्त्रीवादीचा (त्याच्या शब्दात स्त्रीवादिणी) पदोपदी धिक्कार करतो. परंतु त्यामागील कारण समजत नाही. वानगीदाखल एक परिच्छेद पाहू. ‘‘साधू तेल्याच्या दोन बायकांबद्दल मारकिस द सादू या हेिडगखाली ग्रामीण अर्थव्यवस्थेत दोन लग्नाच्या बायका कशा फायदेशीर असतात आणि सबंध समाजाची लैंगिक नीतिमत्ता निरोगी ठेवतात याच्या नोंदी प्रिझनर्स ऑफ झेंडी या भागात सगळा लभान्यांचा इतिहास, मोरगाव विमेन : मोर दॅन विमेन, डायरीच्या या भागातील मंडीची (संशोधिका) निरीक्षणं तर आधुनिकतावाद्यांना, स्त्रीवाद्यांना आणि फ्रॉइड संप्रदायाला अडचणीची ठरली आहेत. पाश्चात्त्य, विचारवंत समजतात तशी स्त्री ही वैश्विक कोटी आहे काय? स्त्री ही संकल्पना समाजशास्त्रीय की जीवशास्त्रीय? तिसऱ्या जगातील हिंदू स्त्रियांची बाजू कोण्या युरोपी स्त्रीवाद्यांनी समजून घेतली आहे का? भांडवलशाही, वसाहतवाद, राष्ट्रीयता यांद्वारे स्त्रियांचं जास्तीत जास्त शोषण युरोपी समाजांनीच केलं आहे. त्याविरुद्ध या युरोपी स्त्रीवादिणी कधी उभ्या राहिल्या का?’’

नेमाडे यांना स्त्रीवादी चळवळीचे योगदान पूर्णपणे नाकारायचे आहे काय? जगभरच्या पुरुषांनी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली. आधी धर्म व पुढे भांडवलशाहीने स्त्रीला वस्तू करून टाकल्याचे प्रखर वास्तव युरोपातील महिला विचारवंतांनी आणले. सिमॉन द बोव्हा, केट मिलेट यांनी ‘आपला युरोप कित्ती छान’ अशी उथळ भूमिका घेतली नाही. हिंदू स्त्रियांचा कैवार घेणारे नेमाडेप्रणीत भाष्यकार, ‘दोन बायका समाजाची लैंगिक नीतिमत्ता निरोगी ठेवतात,’ असे कसे म्हणू शकतात. वर्ग, वर्ण व लिंग यांच्यावरून होणारा भेदाभेद नष्ट करणाऱ्या विसाव्या शतकातील चळवळींमुळे अवघ्या मानवतेला उन्नत केले. या चळवळींचा उगम भारतातून (देशी) नाही म्हणून त्यांना नाकारणार?

नेमाडे यांच्या खंडेराव यांनी नावडत्या स्त्रियांकरिता वापरलेली भाषा पाहा. ‘स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनीच चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती. एकच फाडफाड बोलणारी प्रतिस्पर्धीण होती. होस्टेलमधली बेलाबाला नावाची आगाऊ स्त्रीवादी उघडय़ा छातीची चंट मुलगी.’ स्वप्नाळू व भाबडय़ा परिवर्तनवादी विद्यार्थ्यांविषयी उल्लेख कधी ‘समाजवादी संघटनांमधल्या लग्नावर आलेल्या इंटरकाष्टा प्रेमविवाही पोरापोरींना तर ही तुरुंगात जाण्याची सुवर्णसंधी’ असा येतो. तर कधी ‘अडकले झवाडे युवकयुवती क्रांतिकारक मंडपात’, असा येतो. ही भाषा कोणती संस्कृती व सहिष्णुता दाखवतात? स्त्रियांच्या छाती व पाठीच्या वर्णनातून काय साधतात? विशीच्या वयात इतरेजनाविषयीची तुच्छता व शरीर आकर्षण समजून घेता येते. चाळिशीनंतर उदारता येत जाते. मतभेद असूनही व्यक्त करण्यात प्रगल्भता येते. अशा खुणा खंडेरावमध्ये सापडत नाहीत.

कादंबरीमधील भाषा ही त्या पात्रांची आहे, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. परंतु शब्दांची, विशेषत: विशेषणांची निवड ही लेखकाचीच असते. लेखकाची सभ्यता ही ‘निवडक’ असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. साने गुरुजींच्या साहित्याला, नेमाडे श्रेष्ठ मानतात. असे असेल तर साने गुरुजींच्या उदार अंत:करणाचा नेमाडे यांना स्पर्श झाल्याचा पुरावा सापडत नाही. एकीकडे साने गुरुजी, तुकाराम व वारकरी परंपरा तर दुसरीकडे बेबंद व्यक्तिवाद या दोन टोकांमध्ये, त्यांचा लंबक दुसरीकडेच जाऊन अडकला आहे.

आविर्भाव पुरातत्त्व संशोधनाचा असला तरी त्यात शोधवृत्तीचा पुरता अभाव आहे. मलिक अंबर याने महाराष्ट्र धर्माची स्थापना केली. राम हा मुंडा जमातीचा होता, या विधानांना आधार देण्याचे कष्ट नेमाडे यांनी घेतले नाहीत. इतिहासाच्या आकलनाचे हे गोंधळ आहेत.

तात्त्विक बैठक, आदर्शवाद व व्यापक राजकीय विचार या सर्वाचे वावडे असेल तर लैंगिकतेवर लक्ष अधिकाधिक केंद्रित होते, अनावश्यक विस्तार आणि अघळपघळ गप्पा सुरू होतात. पुन्हा एकदा होस्टेल, कॉलेज, विद्यापीठ व तिथले राजकारण सांगावेसे वाटते. आव तोच आणि भाव तसाच! सामाजिक परिघ मोठा नाही, सांगण्यासाठी विशाल आणि व्यापक विचार नाही. त्यामुळे आत्मकेंद्री वर्णनांचा पूर लोटतो. शब्दवैचित्र्य, शब्द चमत्कृती व तिरकस शैली हीच हत्यारे बनतात. त्यातून कधी कधी गंमत वाटू शकते. हेच अस्त्र वारंवार वापरणाऱ्याकडे आयुधांचा साठा कमी असतो. सदैव तिरकस बोलण्यात आपली बुद्धी पणाला लावणाऱ्यांना इतर कुठलेही बौद्धिक आव्हान दिसत नाही. नेमाडे यांची पात्रे त्याच वाटेने जातात.

नकार आणि केवळ नकारात धोका असतो. नकाराच्या कृष्णविवराकडील प्रवासाचा अंतिम टप्पा मृत्यूच्या पोकळीकडे घेऊन जातो. याची प्रचीतीदेखील येत गेली. नकारघंटा वाजविणारे काही काळ चमकून नाहीसे झाले. त्यांच्या अभिव्यक्तीला पूर्णविराम मिळाला. काहींनी आत्महत्येचा मार्ग निवडला. नकारवादी मंडळींनी लक्षात ठेवला तो आल्बेर कामूचा ‘आऊटसायडर’ (१९४२)! अनेक पिढय़ांना त्यानं पछाडून टाकलं. त्याचा नायक मेर्सो जगभरच्या तरुण पिढीचा नायक झाला. ‘आऊटसायडर’ वाचणं हा प्रौढ होण्याचा एक मार्ग होता असं म्हटलं जायचं. जगाला नाकारणारा मेर्सो तत्त्वज्ञानातील अतिशय मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. मूल्यं हरविलेल्या, दांभिक जगात जगायचं कसं या यक्ष प्रश्नातून त्याचा कोंडमारा होतो. आयुष्याच्या निर्थकतेची भयाण जाणीव आल्बेर कामूनं करून दिली होती. त्याच कामू यांनी ‘‘जगणे आणि विसंगतीविरुद्ध बंड करून उठणे हेच जीवनाचे सार्थक आहे. जो नकार आणि स्वीकार दोन्ही करू शकतो, तोच खरा बंडखोर!’’ असंदेखील कामूनी म्हटलं आहे. (दि रिबेल- १९५१) ‘‘मी अस्तित्ववादी नाही, सर्व नाकारत कुठलीही भूमिका न घेण्यात शहाणपण नाही’’ अशी त्यांची वाटचाल होती.

१९९१ नंतरच्या ‘आदर्शवादाचा अंत’ झालेला काळ संबोधले जाते. आता लंबक दुसऱ्या टोकाला गेला. मी, मी आणि केवळ मीच! ‘मी माझ्या भौतिक परिस्थितीमध्ये बदल घडविणार..’ हा अग्रक्रम झाला. फक्त स्वत:कडेच लक्ष पुरविताना आजूबाजूला अजिबात न पाहण्याचा वसा सर्वत्र पसरला गेला. संपत्तीची निर्मिती वाढत चालली त्याचसोबत भुकेले व अर्धपोट वाढू लागले. जगाचे पर्यावरण नासून गेले. उत्तर आधुनिक मानसिकतेमधून आलेली जीवनशैली संपूर्ण जगासाठी घातक आहे. त्या मार्गाने पुढे गेल्यास पर्यावरणाचा आणि पृथ्वीचा अंत अटळ आहे. अशा कडेलोटाला आपण आलो आहोत, असं वैज्ञानिक बजावत आहेत. ‘आदर्शवादाचा अंत’, ‘इतिहासाचा शेवट’ अशा कितीही घोषणा झाल्या तरी जग बदलण्याचा मुद्दा हा सदासर्वकाळ कळीचा असतो आणि असणार आहे. बदलाची प्रक्रिया गतिमान व व्यापक करण्याची जबाबदारी राजकारण व समाजकारणावर आहे आणि हे बदल टिपणारे साहित्यच टिकत असते. १९६० नंतरच्या मराठी साहित्याने विचारविश्वाला विशालता येऊ दिली नाही. त्यामुळे जीवनदृष्टी देण्याचा प्रश्नच नव्हता.

नोबेल सन्मानित जर्मन साहित्यिक गुंथर ग्रास यांच्या ‘द टिन ड्रम’ (१९५९) कादंबरीचा निवेदक ऑस्कर मॅझरेथची शारीरिक वाढ खुंटलेली आहे. ‘‘छोटय़ा अपघाताने तिसऱ्या वर्षांपासून माझी वाढ थांबली असं सगळे समजतात, ते सपशेल चूक आहे. मी माझी वाढ थांबविण्याचा निर्णय घेतला. सगळं जग मला लहान मानत होतं. माझी मानसिक वाढ व्यवस्थित असल्यामुळे मला सर्व काही कळत होतं.’’ ऑस्कर त्याच्या आत्मनिवेदनात सांगतो. मराठी साहित्यामधील बहुतेक नायकांचं नातं थेट त्या ऑस्करशी आहे. फरक एवढाच आपल्या नायकांचं शारीरिक वय वाढत गेलं तरी त्यांची मानसिक वाढ कुंठित झाली आहे. विशीवर त्यांचं अपार प्रेम असल्यामुळे विशी न ओलांडण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. कॉलेजजीवनामधील स्मरणरंजनात आयुष्य घालविणारे अनेकजण असतात.

त्याने तरुणपणी भर समुद्रात लघवी केली
आणि उरलेलं आयुष्य
समुद्राची उंची किती वाढली
हे मोजण्यात घालवली

असा, या गतरंजनाचा मर्मभेद विंदांनी केला आहे. नेमाडे, आळेकरांचे नायक या गर्तेत अडकून राहिले. त्यांचं विश्व त्यांच्याभोवतीच फिरतं. बाहेरच्या बदलत्या अर्थ-राजकारणाचा अदमास लावण्याची त्यांची कुवत नाही.

एकविसाव्या शतकातील प्रश्नांचे स्वरूपच जागतिक आहे. पर्यावरण, अर्थ-राजकारणामुळे सर्व राष्ट्रांना एकत्र येणे भाग आहे. भूक व दारिद्रय़ाचा प्रश्नदेखील स्थानिक उरत नाही. त्या समस्येमधून निर्माण होणारे अतिरेकी जगाला वेठीला धरतात. या जटिल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उदार व सहिष्णू विचार तारू शकतील, असं अनेक क्षेत्रांमधील विद्वान सांगत आहेत. हे वैश्विक भान यावयाचे असेल तर मराठी साहित्याला आत्ममग्नता सोडावी लागेल; परंतु त्याआधी तुच्छता व बेपर्वाईचा वसा देत, निष्क्रिय व उदासीन करणाऱ्या नकाराला गाडून टाकावं लागणार आहे. कृती करण्यास उद्युक्त करणारे विचार दिले नाहीत तर पुढच्या पिढय़ा माफ करणार नाहीत.

ज्ञानयोगी

Posted: ऑक्टोबर 8, 2010 in Uncategorized

अनिल शिदोरे, सौजन्य – लोकसत्ता

अभयची भेट पहिल्यांदा कधी झाली ते नीटसं आठवत नाही. तीस-एक वर्षांपूर्वी वध्र्याला एकदा जंगल जमिनीच्या प्रश्नावर आदिवासी कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. तेव्हा शरद कुलकर्णीना भेटायला तो आला असताना भेटला असावा असं वाटतं. पण खात्री नाही. तो तेव्हा भेटण्याच्या आधी डॉ. सुखात्मे आणि डॉ. वि. म. दांडेकरांशी वृत्तपत्रातून चर्चा करणारा, वाद घालणारा, शास्त्रीय मांडणी करून माणसाला जगायला किमान उष्मांक किती लागतात, हे सांगणारा एक तरूण डॉक्टर म्हणून महाराष्ट्राला आणि मला माहीत होताच. त्याच्याशी प्रत्यक्ष भेट आणि मैत्री त्यानंतर दहा-एक वर्षांनी झाली.

आज एक सामाजिक संशोधक म्हणून, शास्त्रीय अभ्यासक म्हणून, उत्तम लेखक, प्रभावी वक्ते असून, महाराष्ट्रभूषण म्हणून डॉ. अभय बंग यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे. असे हे डॉ. अभंय बंग २३ सप्टेंबरला आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण करत आहेत. महाराष्ट्रातल्या मोजक्या, जाणत्या आणि आदरणीय व्यक्तींपैकी आज डॉ. अभय बंग एक असले, तरी मी मात्र आज लिहिताना ‘माझा मित्र अभय’ याच नात्यानं लिहिणार आहे. कारण तशा भूमिकेतून लिहिलं नाही तर मला लिहिताच येणार नाही.

अभयचा जन्म पन्नास सालचा. स्वातंत्र्य मिळून तीनच वर्षे झालेली. पं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली उभ्या देशाला उभारी आलेली आणि अभय लहान होता. प्राथमिक शाळेत होता. तेव्हा विनोबांच्या भूदान पदयात्रेनं देशात समाजकारणाचा नवा आयाम बसवण्याचं काम चाललेलं! अभय अगदी तरूण होता, तेव्हा जगभर, देशात, ठिकठिकाणी संघर्षवादी तरूण आंदोलनांचा मार्ग स्वीकारत होते. अभय चाळीस वर्षांचा होता, तेव्हा देशभरात आर्थिक सुधारणांचं ताजं, जोमदार वारं सुटलेलं! अभयची साठी त्याही अर्थानं आपल्या सर्वाना, महाराष्ट्राला काळाच्या एका टप्प्याची जाणीव करून देणारी!

या सर्व काळात अभयची भेट वेगवेगळ्या कारणांनी होत राहिली. काही प्रकल्पांवर, उपक्रमांमध्ये आम्ही एकत्र कामही केलं. खूप बोललो, चर्चा केली. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, या प्रत्येक भेटीत अभयकडे सांगण्याजोगं काहीतरी होतंच. काहीतरी असायचंच. मग तो रोजच्या रोज भेटताना असो किंवा सध्या भेटतो तसं चार-सहा महिन्यांनी असो. अभयकडे काहीतरी असतंच; सांगण्याजोगं, देण्याजोगं!

अगदी परवाचीच गोष्ट पाहा. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्याविषयी आम्ही बोलत होतो. ‘सध्याची स्थिती अशी आहे की, सरकारनं आणीबाणी जाहीर करावी’, असं काहीसं मी म्हटल्याबरोबर अभयनं एक उत्तम रेखीव आणि प्रखर अभ्यासू माडंणी केली. त्या विषयातल्या खाचाखोचा सांगितल्या. तेव्हा त्याने १८६०च्या आसपासच्या लंडनमधील सार्वजनिक स्वच्छतेविषयीच्या एका मोठय़ा लोकचळवळीची माहिती तर दिलीच, पण तशीच चळवळ आता महाराष्ट्रात, मुंबई-पुण्यासारख्या शहरांतही करायला हवी, असं सांगितलं. लोकांच्या चळवळीसाठी काय करायला हवं, हेही मांडलं.

तो अवघी पाच-एक मिनिटं बोलला असेल-नसेल, पुढे कित्येक दिवस त्यानं दाखवलेल्या दिशेनं मी शोधत राहिलो. मला त्यातून कितीतरी गोष्टी सापडल्या. अभयचं हे मोठं वैशिष्टय़! सतत दक्ष, जिवंत असं मन आणि तत्पर, तीक्ष्ण अशी बुद्धी! यातून अभय प्रासादिक विद्वतेचं, शहाणपणाचं दर्शन कायम देतो आणि ही फक्त देवाची देणगी आहे, असं मला मुळीच वाटत नाही.

एखाद्या गोष्टीवर, मग तो लेख असो, भाषणाची तयारी असो किंवा एखादा अहवाल असो, अभय जे काही कष्ट घेतो त्याला तोड नाही. पुन:पुन्हा घोटून घोटून, तपासून, फेरफार करून तो जी अस्सल गोष्ट आपल्यासमोर ठेवतो, तो लख्ख शुद्ध आणि तेजस्वी असा मानवी आविष्काराचा नमुना असतो. अचूक, तरीही रंजक, आकर्षक असं स्वच्छ शहाणपण त्यातून समोर येतं. ज्ञानयोगीच तो! त्यानं स्वत:वर ज्या पद्धतीनं काम केलं आहे, आपल्या मनाची – विचार कसा करावा याची- जी एक शिस्त बसवली आहे, स्वत:ला जसे पैलू पाडले आहेत; त्याची कथा त्यानं एकदा त्याच्याच अभ्यासू पद्धतीनं पुढच्या पिढीसमोर ठेवावी. खूप गुणी मुलांचं आयुष्य बदलेल त्यानं! अर्थात हेही त्याचं संचित तो पुढच्या पिढीला देण्याचं काम त्याच्या ‘निर्माण’मधल्या ताज्या प्रयत्नांद्वारे करतो आहेच.

अभयचा मूळ पिंड काय, असं म्हटल्यास तो अभ्यासकाचा, संशोधकाचा आणि द्रष्टय़ा विचारवंताचा आहे, असं मी म्हणेन. त्यानं आणि राणीनं मिळून लाखो बालमृत्यू वाचवले असतील. जगातल्या बऱ्याच देशांनी आणि आपल्या देशातल्या बऱ्याच राज्यांनी आता बालमृत्यू वाचविण्यासाठी हीच पद्धत अंगिकारली आहे. कामाचा विस्तार या अर्थानं खूपच व्यापक पल्ला आज अभयने – राणीच्या आणि शोधग्रामच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं – गाठला आहे. त्यावर एकदा स्वतंत्रपणे लिहायला हवं.

मला आजही बऱ्याच वर्षांपूर्वीचं गडचिरोलीच्या जवळचं, झाडांनी आच्छादलेलं मैदान आठवतं. एका संध्याकाळी अभय मला तिथं घेऊन गेला होता आण एका छोटय़ा ढिगाऱ्यावर उभं राहून, ‘इथं आपण आता ‘सर्च’ हलवू’ असं म्हणाला होता. आज मी जेव्हा जेव्हा शोधग्रामला जातो, तेव्हा मला तो प्रसंग आठवतो आणि त्या जागेवर अभयनं आणि राणीनं जो काही सुंदर आश्रम उभा केला आहे त्याचं अप्रूप वाटतं. शोधग्रामच्या त्या वातावरणात मला अभयचा नेटकेपणा, काटेकोरपणा, शिस्त, कल्पकता आणि राणीचं मार्दव, सर्जनशीलता, आस्था यांचा विलक्षण संगम झालेला दिसतो.

१९९२ च्या आसपास गडचिरोली जिल्हा दारूमुक्त व्हावा म्हणून चळवळ चालली होती. गावागावांत बैठका चालू होत्या. आपल्या गावातून दारू हटवावी म्हणून बायकांनी जोर लावला होता. त्या आंदोलनाचं नेतृत्वही अभयकडे होतं. तो ज्या तन्मयतेनं, मनाचा ठाव घेत गावात लोकांशी संवाद साधायचा तो अनुभव, त्याची ती प्रतिमा माझ्या आठवणीत अजूनही ताजी आहे. पुढे त्यानं संशोधनाचा ज्ञानमार्ग स्वीकारला आणि त्यात खूप प्रवास केला. पण लोकांशी बोलणं, त्यांना प्रोत्साहित करणं, संघटित करणं, लढाईला तयार करणं यातही तो खूप वाकबगार आहे. तिथली मुलूखगिरी आणि त्यातला मोह अभयनं नंतर टाळलेला दिसतो.

आमचं महाराष्ट्रभर बालमृत्यूविषयक सर्वेक्षण चालू होतं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत, गावांत, वस्त्यांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्याचं काम आम्ही करत होतो. या कामाची आखणी, नियोजन अभयने अत्यंत चोख केलं होतं. आम्हाला प्रशिक्षण दिलं होतं. प्रत्यक्ष गावात जाऊन माहिती मिळवावी, कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून आम्ही दोघं मिरज तालुक्यातल्या एका गावात पोहोचलो. पूर्वी सव्‍‌र्हे झालेल्या एका घराची, तिथल्या बाळाची माहिती घ्यायला अभयने सुरुवात केली. अभय शांतपणे एक-एक प्रश्न विचारत होता. बाळाची आई तिच्या गतीनं उत्तर सांगत होती. त्या बाळाच्या तब्येतीविषयी चौकशी करता करता एकूणच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा वेध घेतला जात होता. पद्धतशीरपणे, शांतपणे, शास्त्रोक्त पद्धतीने! खूप उशीर होत होता. पोटात भुकेनं कावळे ओरडत होते, पण तब्बल दोन तास अभयची ती विचारपूस चालू होती. माझ्या आयुष्यात पाहिलेली सामाजिक क्षेत्रातली ती सर्वात उत्तम मुलाखत!

त्या दिवशी मला त्याचं जे दर्शन झालं, ते मी कधीही विसरणार नाही. विसरू शकणारच नाही. मला तो पुढय़ात बाळ ठेवून त्याच्याकडे बघणारा, गंभीर मुद्रेचा; पण शांत, अविचल, शहाणा असा योगीच वाटत होता. ज्ञानयोगी! दोन दशकांची खडतर तपस्या पाठीशी असताना ज्या तन्मयतेनं, एकाग्र चित्तानं तो ज्ञानाचा शोध घेत होता, ती अवस्था फारच थोर होती. एखाद्या महान गायकाची उत्तम गाताना असते, तशी ज्ञानी, योगी भावमुद्रा!

अभय थोर आहे, असं माझं मत आहे. मी त्याला असं म्हणणं कदाचित त्याला आवडणार नाही. कदाचित आम्ही भेटल्यावर तो तसं म्हणेलही, पण आज मला ते सांगू दे.

आज तो साठ वर्षांचा झाला आहे, पण त्याचा शोध संपलेला नाही. स्वत:वर काम करणं तर त्यानं अजिबात थांबवलेलं नाही. कालपरवाच त्यानं नव्या कुठल्या दोन गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवलं आहे, ते सांगितलं. नित्य नवा विचार, नवी प्रमेयं, नव्या पद्धती, नवी माहिती, नवं संशोधन याची तपासणी चालूच आहे आणि ज्ञानाच्या, विचारांच्या क्षेत्रात पूर्ण रममाण होऊन त्याचा आनंद देण्याघेण्याचं अभयचं कामही!  अभयबरोबर अनुभवलेले क्षण माझ्या आयुष्यातला मोठा ठेवा आहे. खूपच मोठा ठेवा! कितीतरी गोष्टी मी अभयकडून शिकलो. कामाची शिस्त, पद्धत, चिकाटी-चिवटपणा, खडतर अभ्यास, ज्ञानाचा शोध. कितीतरी गोष्टी!

सध्या आमची क्षेत्रं खूपच वेगळी झाली आहेत. आमचा संवाद तरीही चालू आहे. त्याला त्याविषयी कुतूहल आहे. मागे मला तो म्हटला होता, ‘अनिल, तू राजकारणाचं नवं क्षेत्र स्वीकारलं आहेस. खूप वेगळं क्षेत्र आहे ते. त्या राजकारणात काहीही होऊ दे बाबा, पण तू सगळ्या गोष्टी नीट लिहून ठेव. मागाहून त्यावर लिहिता येईल.’ इथंही मला त्यानं अभ्यासच करायला सांगितला आहे. राजकारणातले वेगवेगळे पदर समजून घ्यायला, नोंदी ठेवायला सांगितले आहे. त्याच्या मते सारं संपतं; पण ज्ञान नाही, ज्ञानाचा शोध नाही. अगदी राजकारणाच्या क्षेत्रातदेखील!

अभय माझा मित्र आहे हे माझं भाग्य आहे. अभय महाराष्ट्रात काम करतो, मराठीत लिहितो ते महाराष्ट्राचं भाग्य आहे. प्रत्येकानं आपापल्या भाग्याचं काय करायचं हे ठरवायचं असतं. तसंच महाराष्ट्रानंही ठरवायचं आहे, अभय बंग यांच्या ज्ञानसाधनेचा उपयोग आपण कसा करावा ते!

त्याच्या साठाव्या वर्षी आमचं एवढंच मागणं आहे की, डॉ. अभय बंग यांनी आजवर आपल्याला जे दिलं, तसं ते आणखी देत राहोत. अनेक र्वष, अनेक दशकं! आज त्याच्या साठाव्या वाढदिवसादिवशी त्याच्या कामास आणि ज्ञानसाधनेस माझ्या शुभेच्छा!