अतुल देऊळगावकर, सौजन्य – लोकसत्ता
सर्व काळातील विद्वानांना मुळांचा शोध घेण्यासाठी किंवा वर्तमानाचा अन्वय लावण्यासाठी इतिहासात खोल उडी मारण्याची ऊर्मी होत असते. अलेक्स हॅले यांची ‘द रूट्स’ ही अभिजात कादंबरी अमेरिकेमधील कृष्णवर्णीयांच्या यातनांचा मागोवा घेत आफ्रिकेपर्यंत जाते. सतराव्या शतकापासून आधी युरोप व नंतर अमेरिकेने आशिया व आफ्रिकेला वसाहती बनविल्या. आफ्रिकेमधील कोटय़वधी कृष्णवर्णीयांवर गुलामगिरी लादली. १५३६ ते १८४८ अशी तब्बल ३१२ वर्षे आफ्रिकेतून गुलामांची विक्री होत असे. ‘‘वसाहती केलेल्या देशांमधील संपत्ती आणि कृष्णवर्णीयांचे श्रम या पायावर युरोप व अमेरिकेने औद्योगिक क्रांती केली. आशियाई व आफ्रिकी देशांच्या दारिद्रय़ाचे हेच कारण आहे. ’’ १९६८ साली नोबेल विजेते अर्थवेत्ते गुन्नार मिर्दाल यांनी ‘एशियन ड्रामा- एन्क्वायरी इन टू पॉव्हर्टी ऑफ नेशन्स’ या त्रिखंडीय ग्रंथातून वसाहतवादाचे अर्थकारण मांडले. आजही जागतिक अर्थ- राजकारणच नव्हे तर पर्यावरणवादी विचारांवरसुद्धा मिर्दाल यांच्या विचारांचा प्रभाव आहे. ‘‘श्वेतवर्णीयांनी साहित्यामधून, आशियाई व आफ्रिकी देश हे रानटी, असंस्कृत, आळशी व नालायक असल्याचे दाखले देण्याचा प्रघात घातला. आपण गुलाम असणे हेच योग्य असे ठसविण्याकरिता कृष्णवर्णीयांमध्ये जबरदस्त न्यूनगंड व अपराधगंड निर्माण करणे आवश्यक होते. हे कार्य श्वेतवर्णीय साहित्यामधील प्रतिमांनी केले.’’ असा ‘ओरिएंटॅलिझम’चा सिद्धांत एडवर्ड सैद यांनी १९७४ मध्ये मांडला. या विचारांचा साहित्यिक उद्रेक म्हणजे गेली ३४ वर्षे वाचकांना खेचून घेणारी ‘द रूट्स’! श्वेतवर्णीयांनी केलेले क्रूर अत्याचार आणि त्यांनी लादलेल्या अनैतिहासिक व अनैतिक प्रतिमांमुळे कृष्णवर्णीयांच्या खच्चीकरणाचा समाचार हॅले यांनी घेतला. तसेच आफ्रिकन संस्कृतीचा समृद्ध इतिहास आणि अस्सल प्रतिमा सादर केल्या.
भारतीय इतिहास आणि संस्कृतीमधील टिकवून धरण्याजोगे आणि जाळून टाकण्याजोगे काय आहे, याची चिकित्सा अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन करीत आहेत. भारतापुढे भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? दारिद्रय़ व विषमतेच्या पर्यावरणातील अशांतपर्वातून आपण कसे बाहेर पडणार? प्रादेशिक अस्मिता वरचढ ठरून तुकडे पडतील? अशा अनेकविध कूट समस्यांनी ग्रासलेल्या भारताने विचार कसा करावा? ‘द ऑग्र्युमेंटेटिव्ह इंडियन’, ‘आयडेंटिटी अॅण्ड व्हायोलन्स’ आणि ‘द आयडिया ऑफ जस्टिस’ या ग्रंथांतून सेन यांनी भारतीय संस्कृतीसंबंधीचे प्रदीर्घ चिंतन आपल्यापर्यंत पोहोचविले आहे. सलमान रश्दी यांना कादंबऱ्यांमधून इस्लामी संस्कृतीचा चिकित्सक वेध घ्यावासा वाटतो. अशा जागतिक कॅनव्हासवर मराठी वाचक राजमान्य राजश्री भालचंद्र नेमाडे यांच्या ‘हिंदू – जगण्याची समृद्ध अडगळ’बद्दल दांडगी आशा बाळगून होते. वलयांकित नेमाडे आणि त्यांचे ३० वर्षांपासूनचे संशोधन सर्वच काही त्या कादंबरीला गूढ करण्यास पूरक होते.
सिंधू संस्कृतीचा संशोधक खंडेराव यांची मोहेनजोदडो ते मोरगाव (खानदेशातील) भ्रमणगाथा असा विस्तीर्ण अवकाश ‘हिंदू’ने घेतला आहे. ६०३ पानांतील ६ प्रकरणांमधून व्यक्त झालेला आशय दोन-चार परिच्छेदांत सांगणे अशक्य आहे. अफगाणिस्तानमधील शरयू नदीपासून राजस्थानच्या सरस्वती नदीपर्यंत सप्तसिंधू, भूप्रदेशाचा नकाशा जगासमोर आणल्यामुळे सर्वचर्चित झालेला खंडेराव याच्या नजरेतून लोकजीवनाविषयीची प्रदीर्घ मांडणी समोर येते.
मोहेनजोदडोमधील उत्खनन पाहत असताना त्याला पाच हजार वर्षांपूर्वीच्या सिंध संस्कृतीमधील खेडे आणि त्याचे मोरगाव यात साम्य आढळते. त्यातून गावाची आठवण तीव्रतेने होते. गावातील आत्या आठवते. फाळणीपूर्वी ही आत्या पेशावरमधील महानुभव पंथाच्या आश्रमात गेलेली होती. उत्खनन आणि आत्याचा शोध हे दोन हेतू घेऊन खंडेराव पाकिस्तानात पोहोचला आहे. खूप प्रयत्न करूनदेखील आत्याचा ठावठिकाणा लागत नाही. त्याच सुमाराला त्याचे वडील विठ्ठलरावांची प्रकृती खालावल्याचा निरोप आल्यामुळे खंडेराव मोरगावकडे निघतो. या प्रवासातील लहानपणापासून आतापर्यंतच्या सर्व आठवणींचा पट कादंबरीमधून येतो.
मुलामध्ये जीव अडकलेले विठ्ठलराव खंडेराव परत आल्यावर त्याच्या मांडीवरच अखेरचा श्वास घेतात. प्रचंड जमीनजुमल्याचा वारस खंडेराव रीतिरिवाजानुसार सर्व उत्तरक्रिया करतो. खंडेरावला उदंड व संपन्न आयुष्य लाभावे ही परमेश्वराकडे आळवणी करणारा गोंधळ चालू होतो. इथे कादंबरीचा शेवट होतो.
स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळातील मोरगाव व खानदेशमधील ग्रामसंस्कृतीविषयी खंडेराव याची मते विस्ताराने येत जातात. एकत्र कुटुंबपद्धतीमधील नाती व ताणतणाव, आनंद व दु:ख, आपुलकी व तेढ दिसत जाते. अलुतेदार-बलुतेदार यांनी चालवलेला गाव उलगडत जातो. गावगाडय़ामधील करुण कहाण्या समजतात. काळाच्या ओघात गावातील वातावरणातील बदल खंडेराव सांगतो. त्याच्या कथनातून ‘संशोधक वृत्ती’ जाणवत नाही. वेळोवेळी तो केवळ शेरेबाजी करत जातो.
कादंबरी वाचल्यावर हाताला काही लागत नाही. जुनी शब्दकळा, भाषेचे पोत व लोकगीतांचे वैभव लक्षात येते. पण त्यातून लेखकाला नेमके काय सांगायचे आहे, हेच समजत नाही. ‘‘दोन ताना चांगल्या घेतल्या म्हणजे गायन चांगलं होत नाही. गाण्यातून विचार व्यक्त झाला तर ते खरं गायन!’’ असं पं. कुमार गंधर्व म्हणत.
भारतीय संस्कृतीला नेमाडे हे ‘हिंदू’ संस्कृती असं संबोधतात. (या गोंधळाबद्दल विस्ताराने लिहिता येऊ शकते.) तथापि या संस्कृतीची बलस्थाने व कमकुवत दुवे कोणते, हे स्पष्ट होत नाही. अमर्त्य सेन यांना संपूर्ण भारतीयांनी शतकानुशतके जपलेली वादसंवाद परंपरा महत्त्वाची वाटते. ‘‘विणकर कबीर, चांभार रवीदास, सेना न्हावी, नरहरी सोनार हे कवी तर मीराबाई, मुक्ताबाई, दयाबाई, अंदलबाई, सहजोबाई या कवयित्रींच्या भजनांची समाजमनावर छाप अजूनही आहे. विचारमंथनाची प्रक्रिया खोलवर रुजल्यामुळे समाजातील सर्व थरांतून काव्याचा आविष्कार शक्य झाला. इसवी सन १००० सालापर्यंत अवघ्या जगावर भारतीय विज्ञान, तत्त्वज्ञान आणि गणिताचा दबदबा निर्माण झाला होता. त्याचा पाया हा बहुविधतेच्या ऐतिहासिक परंपरेने रचला होता; परंतु कनिष्ठ जातींना मिळणारी वागणूक असह्य झाल्यामुळे बौद्ध व जैन धर्माची स्थापना झाली. त्या काळात खंडणमंडण, वाद-संवादामुळे मतांतर व त्यातून धर्मातरे झाली आहेत. सामाजिक भेदभावाचा धिक्कार करणाऱ्या हिंदू भक्ती पंथ तसेच मुस्लीम सुफी पंथांचा सहज प्रसार मनपरिवर्तनामुळेच झाला होता’’ असे विश्लेषण सेन यांनी केले आहे. पुरातत्त्व संशोधक असूनही खंडेराव यांच्या बोलण्याला अशी खोली येत नाही.
कृषी संस्कृतीच्या काही उजळ बाजू असल्या तरीही ती सरंजामशाहीला पोषकच होती. लोकशाही व आधुनिकीकरणामुळे आपली सत्ता धोक्यात येईल या भीतीने सरंजामदार घाबरले होते. सर्वाना समान प्रतिष्ठा हे आधुनिक मूल्य स्वीकारण्यास जमीनदार तयार नव्हते. अशा मध्ययुगात रुतलेल्या सुस्त भारताला आधुनिकतेकडे खेचून आणणारा रथ ओढणाऱ्या अनेक पिढय़ा रवींद्रनाथ टागोर, महात्मा गांधी आणि पं. नेहरू यांनी घडविल्या. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधण्याची किमया टागोर, गांधी व नेहरू यांनी साधली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आधुनिकतेला वेगळे परिमाण दिले. ‘नव्या वाऱ्याचा स्पर्श होऊ न देणारे खेडे हे साचलेले डबके आहे’ असे त्यांना वाटत होते. समान संधी ही शहरात मिळू शकेल हा विश्वास त्यातून स्पष्ट दिसत होता.
नेमाडे यांचा खंडेराव हा आधुनिकतेचा कडवा विरोधक आहे. त्याची कारणे मात्र कादंबरीत सापडत नाहीत. ‘कोसला’पासून ‘झूल’पर्यंतच्या प्रवासात नेमाडे यांचे प्रतिनिधी आधुनिकतेला नाकारत आले आहेत. या प्रवाहांचे मूळ अस्तित्ववादी आणि उत्तर आधुनिक (पोस्ट मॉडर्निझम) विचारांमध्ये सापडते. ‘‘माणसाच्या असण्याला, इच्छेला काही अर्थ आहे काय, सभोवतालच्या सत्तेपुढे व्यक्ती क्षुद्र आहे. माणूस ही एक व्यर्थ यातना आहे. आपल्या इच्छेविना आपण जन्माला येतो आणि मरतो. मृत्यू ही एकमेव निवड आपण करू शकतो. जगण्यातील अर्थ शोधणे ही अर्थशून्य धडपड आहे’’ असे निर्थकतेचे तत्त्वज्ञान आकर्षक व आक्रमकरीत्या मांडले जात होते. कुटुंब, शासन व सर्व प्रकारच्या सत्ता नाकारणारे नेमाडे यांच्या चार नायकांची नाळ अस्तित्ववादाशी जोडलेली आहे.
१९६० ते ७०च्या दशकात जगभर आधुनिक विचारांना नाकारणारा उत्तर आधुनिक विचार रुजू लागला. ‘‘आपल्या अस्तित्वाचा आपणच अर्थ शोधावा. कोणतीही संकल्पना एकसंध नसून तुकडय़ांनी (फ्रॅग्मेंट्स) बनलेली असते. यापुढे महासिद्धांतांचा (मेटॅ थिएरी-समाजवाद, मार्क्सवाद, उत्क्रांतिवाद) काळ गेला. महाकथनांची (ग्रँड नॅरेटिव्ह-रामायण, महाभारत) अपेक्षा धरू नका. सर्व प्रकारच्या संरचना (स्ट्रक्चर) या अनैसर्गिक असल्यामुळे त्या संपवायला हव्यात.’’ असा तो जाहीरनामा होता. नेमाडे यांच्या पाचही कादंबऱ्यांमधील व्यक्तिरेखा या उत्तर आधुनिकवादाचा पुरस्कार करतात. त्यामुळेच त्यांना आधुनिकतेचे वावडे असते. ‘कुठलाही आदर्शवाद स्वीकारणे, म्हणजे स्वत:ला बंदिस्त करून घेणे. कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते, त्यामुळे व्यक्तीचा विचार घेणे म्हणजे विभूतिपूजा करीत स्वत:ला गहाण टाकणे. माझ्यावर कुठल्याही सत्तेचे नियंत्रण नको. मला वाटतं तसं मी वागणार,’ या सूत्राला मराठी साहित्यात बौद्धिक प्रतिष्ठा देण्याचे कार्य तेंडुलकर, नेमाडे व आळेकर यांनी केले.
कालांतराने १९८०च्या दशकात नेमाडे यांनी देशीवादाची (नेटिव्हिझम) मांडणी केली. १९९०च्या दशकात जागतिकीकरणामुळे देशी संस्कृती धोक्यात येत असल्याची भीती त्यांना वाटू लागली. ‘दोन भिन्न संस्कृती एकमेकांच्या संपर्कात आल्यावर सांस्कृतिक बदल सुरू होतात. सशक्त संस्कृतीसमोर संपून जाण्याचे भय अशक्त संस्कृतीला होऊ लागते. त्यातून स्थानिकांची स्वदेशीवादाची चळवळ उभी राहते.’ असे प्रमेय मानववंशशास्त्रज्ञ राल्फ लिंटन यांनी मांडले होते. एडवर्ड सैद यांचा ‘ओरिएंटॅलिझम’ आणि लिंटन यांच्या विचारांचे स्वैर रूपांतर करून नेमाडे यांनी देशीवादाचे अजब रसायन तयार केले. वास्तविक दोन भिन्न संस्कृती संपर्कात आल्यावर तीन शक्यता संभवतात. शरणागती पत्करून प्रगत संस्कृतीमध्ये सामील होते, कधी प्रगत दोन्हींचा संगम होऊन नवी संस्कृती तयार होऊ शकते. तर केव्हा दुसऱ्या संस्कृतीला नाकारण्यासाठी अनेक आघाडय़ांवर संघर्ष करते. ‘बाहेरचे आल्यामुळे आपण संपून जाऊ’ हा भयगंड (झेनोफोबिया) घेऊन असंख्य स्थानिकांनी चळवळी केल्या आहेत. त्यातूनच परकीय, स्थलांतर करणाऱ्यांना नकार येतो. शिवसेना व मनसे या त्याच्या महाराष्ट्री आवृत्त्या आहेत. (धोक्याची आरोळी ठोकल्याने नेतृत्वदेखील आपसुक चालून येते हा एक हमखास फायदा आहे.)
असंख्य आक्रमणे सहन करताना टाकाऊ असलेले टाकून नव्याचा स्वीकार केल्यामुळेच भारतीय संस्कृती (हिंदू नव्हे) आजवर टिकून राहिली आहे. विज्ञानामुळे शेती व गावे, उत्पादन व सेवा यांचे स्वरूप बदलत गेले. शहरीकरणामुळे मानवी नाते व संबंधांमध्ये बदल झाला. आधुनिक व शहरी हे उफराटेच असतात, असा नेमाडे यांच्या प्रतिनिधींचा ग्रह दिसतो. ‘गावातील रहिवासी हे अधिक नीतिमान व उदात्त असतात. हे आधुनिकतेच्या लाटेत नष्ट होणार नाहीत. कारण हिंदू लोक सगळी अडगळ तळघरात जपून ठेवतात,’ असे भाकीत ‘हिंदू’मधील खंडेराव करतो. त्याला युरोपी आधुनिकतेचा तिटकारा आहे. ‘‘युरोपी संवेदनवर्चस्वामुळे आलेली रोगट स्वच्छता-साबण, पावडरी छानछोकी? एका बादलीत सगळे घाण कपडे खंगाळून मग दुसऱ्या एका स्वच्छ बादलीत ते धुऊन काढणं-साबणाची गरज काय?’’ असा सवाल खंडेराव विचारतो. त्यानंतर तो राख, शिकेकाई यांची महती सांगतो. यातून वाचकांनी काय अर्थ काढायचा? आधुनिकतेने बहाल केलेल्या सर्व वस्तू व उपकरणे (ट्रॅक्टर, टीव्ही, मोबाइल) या बाह्यांगांचा सहज स्वीकार करायचा, परंतु आधुनिक विचाराचे अंतरंग नाकारायचे ही दांभिकता कित्येक सुधारणांच्या आड येत आहे. गेल्या शतकात सतीबंदी, बालविवाह, स्त्रीशिक्षण, राखीव जागा यांना सक्त विरोध करणारी तर आता, कुटुंबनियोजन, मुलीचा जन्म, आंतरजातीय विवाह यांना नाकारण्यामागे हीच मानसिकता आहे. ‘‘सीमेंट-काँक्रीटचं घर पाहिजे, परंतु संडास आत नको. बाहेर जाणे हे देशीपणाचे वाटते.’’ असा बाणा घेतल्यामुळेच साठ टक्के भारत उघडय़ावर बसतो. त्यामुळे सर्व जलस्रोतांची नासाडी होऊन रोगराई पसरत आहे. ही मानसिकता असेपर्यंत देशाला व महाराष्ट्राला स्वच्छ पाणीपुरवठा अशक्य आहे. असे तज्ज्ञांचे मत आहे. ‘ग्रामीण व देशी ते सारे काही श्रेष्ठ’ हे सुलभीकरण, ‘पूरब और पश्चिम’ दाखवणाऱ्या मनोजकुमारी धाटणीचे होते. नेमाडे फक्त तात्पर्य सांगून मोकळे होतात. विस्ताराने भाष्य करण्याची रीत त्यांना मान्य नसावी. आधुनिकीकरणानंतर जगभरात शेतीचे युग जाऊन यंत्रयुग व त्यानंतर संगणक युग आले. विज्ञानामुळे असंख्य सोयीसुविधा सर्व लोकांपर्यंत गेल्या. याबद्दल खंडेराव चकार शब्द काढत नाही.
नेमाडे यांचा निवेदक खंडेराव यांना व्यक्तिस्वातंत्र्य, स्त्रीवाद ही पाश्चात्त्य थोतांड वाटतात. युरोपी व स्त्रीवादीचा (त्याच्या शब्दात स्त्रीवादिणी) पदोपदी धिक्कार करतो. परंतु त्यामागील कारण समजत नाही. वानगीदाखल एक परिच्छेद पाहू. ‘‘साधू तेल्याच्या दोन बायकांबद्दल मारकिस द सादू या हेिडगखाली ग्रामीण अर्थव्यवस्थेत दोन लग्नाच्या बायका कशा फायदेशीर असतात आणि सबंध समाजाची लैंगिक नीतिमत्ता निरोगी ठेवतात याच्या नोंदी प्रिझनर्स ऑफ झेंडी या भागात सगळा लभान्यांचा इतिहास, मोरगाव विमेन : मोर दॅन विमेन, डायरीच्या या भागातील मंडीची (संशोधिका) निरीक्षणं तर आधुनिकतावाद्यांना, स्त्रीवाद्यांना आणि फ्रॉइड संप्रदायाला अडचणीची ठरली आहेत. पाश्चात्त्य, विचारवंत समजतात तशी स्त्री ही वैश्विक कोटी आहे काय? स्त्री ही संकल्पना समाजशास्त्रीय की जीवशास्त्रीय? तिसऱ्या जगातील हिंदू स्त्रियांची बाजू कोण्या युरोपी स्त्रीवाद्यांनी समजून घेतली आहे का? भांडवलशाही, वसाहतवाद, राष्ट्रीयता यांद्वारे स्त्रियांचं जास्तीत जास्त शोषण युरोपी समाजांनीच केलं आहे. त्याविरुद्ध या युरोपी स्त्रीवादिणी कधी उभ्या राहिल्या का?’’
नेमाडे यांना स्त्रीवादी चळवळीचे योगदान पूर्णपणे नाकारायचे आहे काय? जगभरच्या पुरुषांनी स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली. आधी धर्म व पुढे भांडवलशाहीने स्त्रीला वस्तू करून टाकल्याचे प्रखर वास्तव युरोपातील महिला विचारवंतांनी आणले. सिमॉन द बोव्हा, केट मिलेट यांनी ‘आपला युरोप कित्ती छान’ अशी उथळ भूमिका घेतली नाही. हिंदू स्त्रियांचा कैवार घेणारे नेमाडेप्रणीत भाष्यकार, ‘दोन बायका समाजाची लैंगिक नीतिमत्ता निरोगी ठेवतात,’ असे कसे म्हणू शकतात. वर्ग, वर्ण व लिंग यांच्यावरून होणारा भेदाभेद नष्ट करणाऱ्या विसाव्या शतकातील चळवळींमुळे अवघ्या मानवतेला उन्नत केले. या चळवळींचा उगम भारतातून (देशी) नाही म्हणून त्यांना नाकारणार?
नेमाडे यांच्या खंडेराव यांनी नावडत्या स्त्रियांकरिता वापरलेली भाषा पाहा. ‘स्त्रीवादाविरुद्ध आम्ही सगळ्यांनीच चर्चासत्राच्या आधीच नीट तयारी केली होती. एकच फाडफाड बोलणारी प्रतिस्पर्धीण होती. होस्टेलमधली बेलाबाला नावाची आगाऊ स्त्रीवादी उघडय़ा छातीची चंट मुलगी.’ स्वप्नाळू व भाबडय़ा परिवर्तनवादी विद्यार्थ्यांविषयी उल्लेख कधी ‘समाजवादी संघटनांमधल्या लग्नावर आलेल्या इंटरकाष्टा प्रेमविवाही पोरापोरींना तर ही तुरुंगात जाण्याची सुवर्णसंधी’ असा येतो. तर कधी ‘अडकले झवाडे युवकयुवती क्रांतिकारक मंडपात’, असा येतो. ही भाषा कोणती संस्कृती व सहिष्णुता दाखवतात? स्त्रियांच्या छाती व पाठीच्या वर्णनातून काय साधतात? विशीच्या वयात इतरेजनाविषयीची तुच्छता व शरीर आकर्षण समजून घेता येते. चाळिशीनंतर उदारता येत जाते. मतभेद असूनही व्यक्त करण्यात प्रगल्भता येते. अशा खुणा खंडेरावमध्ये सापडत नाहीत.
कादंबरीमधील भाषा ही त्या पात्रांची आहे, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. परंतु शब्दांची, विशेषत: विशेषणांची निवड ही लेखकाचीच असते. लेखकाची सभ्यता ही ‘निवडक’ असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येते. साने गुरुजींच्या साहित्याला, नेमाडे श्रेष्ठ मानतात. असे असेल तर साने गुरुजींच्या उदार अंत:करणाचा नेमाडे यांना स्पर्श झाल्याचा पुरावा सापडत नाही. एकीकडे साने गुरुजी, तुकाराम व वारकरी परंपरा तर दुसरीकडे बेबंद व्यक्तिवाद या दोन टोकांमध्ये, त्यांचा लंबक दुसरीकडेच जाऊन अडकला आहे.
आविर्भाव पुरातत्त्व संशोधनाचा असला तरी त्यात शोधवृत्तीचा पुरता अभाव आहे. मलिक अंबर याने महाराष्ट्र धर्माची स्थापना केली. राम हा मुंडा जमातीचा होता, या विधानांना आधार देण्याचे कष्ट नेमाडे यांनी घेतले नाहीत. इतिहासाच्या आकलनाचे हे गोंधळ आहेत.
तात्त्विक बैठक, आदर्शवाद व व्यापक राजकीय विचार या सर्वाचे वावडे असेल तर लैंगिकतेवर लक्ष अधिकाधिक केंद्रित होते, अनावश्यक विस्तार आणि अघळपघळ गप्पा सुरू होतात. पुन्हा एकदा होस्टेल, कॉलेज, विद्यापीठ व तिथले राजकारण सांगावेसे वाटते. आव तोच आणि भाव तसाच! सामाजिक परिघ मोठा नाही, सांगण्यासाठी विशाल आणि व्यापक विचार नाही. त्यामुळे आत्मकेंद्री वर्णनांचा पूर लोटतो. शब्दवैचित्र्य, शब्द चमत्कृती व तिरकस शैली हीच हत्यारे बनतात. त्यातून कधी कधी गंमत वाटू शकते. हेच अस्त्र वारंवार वापरणाऱ्याकडे आयुधांचा साठा कमी असतो. सदैव तिरकस बोलण्यात आपली बुद्धी पणाला लावणाऱ्यांना इतर कुठलेही बौद्धिक आव्हान दिसत नाही. नेमाडे यांची पात्रे त्याच वाटेने जातात.
नकार आणि केवळ नकारात धोका असतो. नकाराच्या कृष्णविवराकडील प्रवासाचा अंतिम टप्पा मृत्यूच्या पोकळीकडे घेऊन जातो. याची प्रचीतीदेखील येत गेली. नकारघंटा वाजविणारे काही काळ चमकून नाहीसे झाले. त्यांच्या अभिव्यक्तीला पूर्णविराम मिळाला. काहींनी आत्महत्येचा मार्ग निवडला. नकारवादी मंडळींनी लक्षात ठेवला तो आल्बेर कामूचा ‘आऊटसायडर’ (१९४२)! अनेक पिढय़ांना त्यानं पछाडून टाकलं. त्याचा नायक मेर्सो जगभरच्या तरुण पिढीचा नायक झाला. ‘आऊटसायडर’ वाचणं हा प्रौढ होण्याचा एक मार्ग होता असं म्हटलं जायचं. जगाला नाकारणारा मेर्सो तत्त्वज्ञानातील अतिशय मूलभूत प्रश्न उपस्थित करतो. मूल्यं हरविलेल्या, दांभिक जगात जगायचं कसं या यक्ष प्रश्नातून त्याचा कोंडमारा होतो. आयुष्याच्या निर्थकतेची भयाण जाणीव आल्बेर कामूनं करून दिली होती. त्याच कामू यांनी ‘‘जगणे आणि विसंगतीविरुद्ध बंड करून उठणे हेच जीवनाचे सार्थक आहे. जो नकार आणि स्वीकार दोन्ही करू शकतो, तोच खरा बंडखोर!’’ असंदेखील कामूनी म्हटलं आहे. (दि रिबेल- १९५१) ‘‘मी अस्तित्ववादी नाही, सर्व नाकारत कुठलीही भूमिका न घेण्यात शहाणपण नाही’’ अशी त्यांची वाटचाल होती.
१९९१ नंतरच्या ‘आदर्शवादाचा अंत’ झालेला काळ संबोधले जाते. आता लंबक दुसऱ्या टोकाला गेला. मी, मी आणि केवळ मीच! ‘मी माझ्या भौतिक परिस्थितीमध्ये बदल घडविणार..’ हा अग्रक्रम झाला. फक्त स्वत:कडेच लक्ष पुरविताना आजूबाजूला अजिबात न पाहण्याचा वसा सर्वत्र पसरला गेला. संपत्तीची निर्मिती वाढत चालली त्याचसोबत भुकेले व अर्धपोट वाढू लागले. जगाचे पर्यावरण नासून गेले. उत्तर आधुनिक मानसिकतेमधून आलेली जीवनशैली संपूर्ण जगासाठी घातक आहे. त्या मार्गाने पुढे गेल्यास पर्यावरणाचा आणि पृथ्वीचा अंत अटळ आहे. अशा कडेलोटाला आपण आलो आहोत, असं वैज्ञानिक बजावत आहेत. ‘आदर्शवादाचा अंत’, ‘इतिहासाचा शेवट’ अशा कितीही घोषणा झाल्या तरी जग बदलण्याचा मुद्दा हा सदासर्वकाळ कळीचा असतो आणि असणार आहे. बदलाची प्रक्रिया गतिमान व व्यापक करण्याची जबाबदारी राजकारण व समाजकारणावर आहे आणि हे बदल टिपणारे साहित्यच टिकत असते. १९६० नंतरच्या मराठी साहित्याने विचारविश्वाला विशालता येऊ दिली नाही. त्यामुळे जीवनदृष्टी देण्याचा प्रश्नच नव्हता.
नोबेल सन्मानित जर्मन साहित्यिक गुंथर ग्रास यांच्या ‘द टिन ड्रम’ (१९५९) कादंबरीचा निवेदक ऑस्कर मॅझरेथची शारीरिक वाढ खुंटलेली आहे. ‘‘छोटय़ा अपघाताने तिसऱ्या वर्षांपासून माझी वाढ थांबली असं सगळे समजतात, ते सपशेल चूक आहे. मी माझी वाढ थांबविण्याचा निर्णय घेतला. सगळं जग मला लहान मानत होतं. माझी मानसिक वाढ व्यवस्थित असल्यामुळे मला सर्व काही कळत होतं.’’ ऑस्कर त्याच्या आत्मनिवेदनात सांगतो. मराठी साहित्यामधील बहुतेक नायकांचं नातं थेट त्या ऑस्करशी आहे. फरक एवढाच आपल्या नायकांचं शारीरिक वय वाढत गेलं तरी त्यांची मानसिक वाढ कुंठित झाली आहे. विशीवर त्यांचं अपार प्रेम असल्यामुळे विशी न ओलांडण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. कॉलेजजीवनामधील स्मरणरंजनात आयुष्य घालविणारे अनेकजण असतात.
त्याने तरुणपणी भर समुद्रात लघवी केली
आणि उरलेलं आयुष्य
समुद्राची उंची किती वाढली
हे मोजण्यात घालवली
असा, या गतरंजनाचा मर्मभेद विंदांनी केला आहे. नेमाडे, आळेकरांचे नायक या गर्तेत अडकून राहिले. त्यांचं विश्व त्यांच्याभोवतीच फिरतं. बाहेरच्या बदलत्या अर्थ-राजकारणाचा अदमास लावण्याची त्यांची कुवत नाही.
एकविसाव्या शतकातील प्रश्नांचे स्वरूपच जागतिक आहे. पर्यावरण, अर्थ-राजकारणामुळे सर्व राष्ट्रांना एकत्र येणे भाग आहे. भूक व दारिद्रय़ाचा प्रश्नदेखील स्थानिक उरत नाही. त्या समस्येमधून निर्माण होणारे अतिरेकी जगाला वेठीला धरतात. या जटिल परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी उदार व सहिष्णू विचार तारू शकतील, असं अनेक क्षेत्रांमधील विद्वान सांगत आहेत. हे वैश्विक भान यावयाचे असेल तर मराठी साहित्याला आत्ममग्नता सोडावी लागेल; परंतु त्याआधी तुच्छता व बेपर्वाईचा वसा देत, निष्क्रिय व उदासीन करणाऱ्या नकाराला गाडून टाकावं लागणार आहे. कृती करण्यास उद्युक्त करणारे विचार दिले नाहीत तर पुढच्या पिढय़ा माफ करणार नाहीत.
नेमाड्याना विचारवंत बनण्याची उबळ आली. त्यासाठी त्यानी हिंदू धर्मावर लाथा झाडल्या आहेत. त्या आणखी दोघातिघाना लागल्या तर काय बिघडले?
lekh changala aahe”BHALCHANDRA NEMADE” kasehi asale tari te mahan lekhak aahet
माझी हिंदू वाचून काढायची उत्सुकता बर्यापैकी संपवलीत तुम्ही इथे.
धन्यवाद!
mhanaje ase kunihi kahihi lihale tar tumhi tumache vichar badalata watate…
Kosala mule dokyat hava gelele nemade kahihi baralat aahet,vatel tya mulakhati detayet,Prasidhisathicha ha ek banav vattoy.Madhyamani far mahatwa devu naye.Chhan lekha lihila aahe.atishaya abhyaspurna aahe.
Jyana Nemade Samajale nahit tar to tyancha Dosh Nahi….Astat ki Kahijan ase…changalyala Nave thevanare!!!
प्रिय खंडेराव,
स.न.वि.वि.
तू दक्षिण भारतातल्या पश्चिम किनाऱ्याजवळील उत्तर महाराष्ट्रातल्या पूर्व खानदेशात मोरगाव खेड्यात जन्मला. हा तुझा परिचय सर्व संशोधकांच्या माना उंचावणारा आणि तो तुझ्या पुढील वाटचालीस प्रेरणा देणारा व उंत्कंठा वाढविणारा होता.
खंडेराव, स.न.वि.वि.
तुला 26 जानेवारीचं सैन्याचं संचलन पाहाताना एकसारख्या युनिफॉर्ममधले सैनिक मारायला तयार ठेवलेल्या कोंबड्यांसारखे वाटतात.हाच का तुझा देशीवाद ! हा देशद्रोह आहे, खंडेराव !