Archive for डिसेंबर, 2010

डॉ. सदानंद मोरे, सौजन्य – साप्ताहिक सकाळ

एखाद्या लोकसमूहामध्ये एकत्वाची जाणीव निर्माण झाली म्हणजे त्या लोकांच्या राष्ट्राचा उदय झाला, असे स्थूलमानाने म्हणता येईल. जोतिराव फुले यालाच एकमय लोक असे म्हणतात. अशा प्रकारच्या एकत्वाची जाणीव ज्या घटकांमुळे निर्माण होऊ शकते त्यांच्यामध्ये वंश, धर्म, भाषा यांचा समावेश होतो. व्यापक अर्थाने संस्कृतीलासुद्धा असा घटक मानायला हरकत नाही. आता यातील कोणत्या घटकाला केव्हा प्राधान्य मिळेल, याचा काही नियम सांगता येत नाही. बॅ. महंमदअली जीना यांनी भारतीय उपखंडात मुसलमान धर्मीयांचे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात असल्याचा आग्रह धरला आणि त्याचे अंतिम पर्यवसान पाकिस्तानच्या निर्मितीत झाले, हे सर्वज्ञात आहे. तथापि नंतरच्या काळात पूर्व पाकिस्तानातील लोकांना त्यांची भाषा ही धर्मापेक्षा अधिक महत्त्वाची वाटायला लागली आणि त्यांनी अलग होऊन बांगलादेशाची निर्मिती केली, हा आपल्या डोळ्यासमोर घडलेला इतिहास आहे.

वंशाने आणि धर्माने ज्यू किंवा यहुदी असलेले लोक जगभर विखुरले होते. ते ज्या ज्या देशात गेले तेथील लोकांच्या त्या त्या भाषा त्यांनी आत्मसात केल्या. त्यांच्यात एकतेची जाणीव ओतप्रोत होती; परंतु आपल्या वंशाची मूळ भाषा ते विसरले होते. परंतु तरीही त्यांनी आपली मूळ भूमी मिळवण्यात व नंतर आपल्या मूळ हिब्रू भाषेचे पुनरुज्जीवन करण्यात यश मिळवले. त्यांचा राष्ट्रवाद निदान सध्या तरी सर्वात बळकट असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारच्या एका शीख राष्ट्राची निर्मिती पूर्वी महाराजा रणजितसिंगांनी केली होती. या सर्व पसाऱ्यात लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे, आधुनिक काळात- विशेषतः युरोपियन राष्ट्रांमधील साम्राज्यवादी स्पर्धेमुळे राजकीय सत्ता या गोष्टीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. म्हणजेच राज्य हा घटक निर्णायक ठरू लागला.

पूर्वीच्या व्यक्ती निदान भारतीय उपखंडात तरी या घटकाला फारसे महत्त्व नव्हते. भारत नावाचे राष्ट्र अस्तित्वात होते; परंतु राज्य नव्हते असे म्हटले जाते, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या भाषा, अनेक जाती या सर्व गोष्टी जमेस धरूनही येथे एकमयपणाची भावना जागृत होती. ती कालानुरूप वेगवेगळ्या माध्यमांतून प्रगट व्हायची, एवढेच. काशीच्या गंगेचे पाणी कावडीने भरून ती कावड रामेश्‍वराच्या समुद्रात रिकामी करायची, हे या एकतेचे प्रतीकात्मक प्रगटीकरण आहे. ते धार्मिक असल्याने फारसे बिघडत नाही.

शंकराचार्यांनी देशाच्या चारही दिशांना आपले मठ स्थापन केले किंवा शिवाची व शक्तीची स्थाने- ज्योतिर्लिंगे व शक्तिपीठे देशभर विखुरलेली असून, नाना प्रकारच्या विपत्ती व अडचणी सोसूनही लोक त्यांच्या यात्रा करीत राहिले. हा मुद्दा फक्त हिंदू धर्मालाच लागू होतो, असे नसून इतर धर्मांच्या बाबतीतही सत्य आहे. सम्राट अशोकाने देशाच्या सर्व दिशांना महत्त्वाच्या ठिकाणी कोरीव लेखांची निर्मिती केली. बौद्धांचे स्तूपही सर्वत्र आढळतात. बौद्ध तत्त्वज्ञानाचे मानदंड मानले गेलेले दिङ्‌नागासारखे आचार्य दक्षिणेतून कदाचित महाराष्ट्रातूनही आलेले असतात. तीच गोष्ट जैन मंदिरांचीही आहे. भारतातील या धार्मिक-सांस्कृतिक एकतेला साधुसंतांचा फार मोठा हातभार लागलेला आहे.

उत्तरेमधील नाभादास किंवा महाराष्ट्रातील महीपती यांना आपल्या प्रांताबाहेरील साधुसंतांची चरित्रे लिहावीत, असे का वाटावे? तुकोबांच्या अभंगांमधून नरसी मेहता, कबीर, मीराबाई, धन्ना जाट यांच्या कथा का याव्यात? पंजाबातील शिखांनी आपल्या गुरुग्रंथसाहेब या धर्मग्रंथात महाराष्ट्रातील नामदेवांप्रमाणेच उत्तरेतील इतरही संतांच्या रचनांचा समावेश का करावा? आपल्याकडील सर्व ऋषी-मुनी झाडून उत्तरेतील आहेत. त्यांनी वेदांची, उपनिषदांची, गीतेची व ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली; परंतु या मूळ पायाभूत धार्मिक व तात्त्विक ग्रंथांचे सर्व प्रमुख भाषाकार आचार्य दक्षिणेत निपजले. शंकर, रामानुज, मध्व, वल्लभ- सर्व दक्षिणेतीलच. निंबार्क महाराष्ट्रातील असले तरी प्रसाराचा विचार केला तर मीराबाई व नरसी मेहता हे पश्‍चिमेतील, तर चैतन्य महाप्रभू व शंकरदेव थेट बंगाल-आसाममधील. बंगालमधील हे चैतन्य महाप्रभू कृष्णाचेच रूप मानल्या गेलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. त्यांच्या आधी शंकर आणि मध्व आणि नंतर वल्लभ या आचार्यांनीही हाच मार्ग चोखाळलेला असतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांचा संबंध आलाच नाही, असा एकच प्रदेश दाखवता येणार नाही. मग त्यास तुम्ही “मिथ’ म्हणा.

पांडव वनवासात असताना ते जिथून जिथून गेले ती स्थळे गणतीच्या पलीकडील आहेत. रामायण व महाभारताच्या कथावस्तू आत्मसात करून त्यांना स्थानिक वळण देत करण्यात आलेल्या नवनिर्मितीची संख्याही तशीच लक्षणीय आहे. भारताच्या या मूलभूत ऐतिहासिक ऐक्‍याकडे पहिल्यांदा महात्मा गांधींनी लक्ष वेधले. इंग्लंडसारख्या टीचभर देशाला भारतातील ही राष्ट्रीय एकता उमगणे शक्‍यच नव्हते. त्यांच्या राष्ट्रकल्पनेत राजकीय सत्तेला, म्हणजेच राज्याला मध्यवर्ती स्थान असल्यामुळे त्यांना भारतातील सांस्कृतिक एकजिनसीपणा दिसण्याऐवजी जातिधर्मांतील विस्कळितपणाच प्रकर्षाने जाणवू लागला.

वस्तुतः भारताने राज्यापेक्षा राष्ट्राला अधिक महत्त्व दिले होते आणि राजसत्तेला धर्माचेच अंग मानणाऱ्या मुसलमानांचे येथे आगमन झाल्यानंतरही त्यांच्या या भूमिकेत फारसा बदल झालेला नव्हता.

उलट भारतीयांचे हे शहाणपण अकबरासारख्या मुगल बादशहाच्या ध्यानात आल्यामुळे त्याने स्वतःच इस्लामच्या राज्यपद्धतीत बदल करायला सुरवात केली. अकबराचा हा वारसा शहाजहानचा मुलगा आणि औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शुकेह याच्याकडे आला होता. परंतु औरंगजेबाने धार्मिक माथेफिरूपणाला आश्रय देऊन तो दवडला. त्याने दाराला तर ठार मारलेच, परंतु दाराच्या धोरणांचाही नाश केला. “तुमच्याऐवजी दारा शुकोह पातशहा झाला असता तर आम्हाला या भानगडीत पडायची गरजच वाटली नसती,’ अशा आशयाचे उद्‌गार शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रात काढले आहेत, ते या संदर्भात फार महत्त्वाचे आहेत.

पण त्याचे गांभीर्य चर्चिण्याआधी लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या एका अग्रलेखातील विचार ज्ञात करणे सोयीचे होईल. टिळक लिहितात, “हिंदुस्थानातील लोकांस परराज्याची सवय आज पुष्कळ दिवस झाली आहे व निव्वळ परकी म्हणून राज्यकर्त्यांबद्दल त्यांस जर वाईट वाटत असते तर लॉर्ड रिपनसारख्याचा त्यांनी कधीच जन्मोत्सव केला नसता अथवा अकबर बादशहाची थोरवी गायली नसती. सारांश, हा आपला, हा परक्‍याचा, हा शूद्र भेद आमच्या वेदान्ती लोकांनी कधीच टाकून दिलेला आहे. राज्य कोणाचेही असो, ते आपल्या फायद्याचे आहे की नाही- हेच आमच्या लोकांचे मुख्य पाहणे असते.’

दारा शुकोह हा वेदान्ती होता, हे येथे मुद्दाम सांगायला हवे. दाराने संस्कृत पंडितांच्या साह्याने पन्नास उपनिषदांचा पर्शियन भाषेत अनुवाद केला. पाश्‍चात्त्य देशांतील शॉपेनहॉअरसारखे आधुनिक विचारवंत ज्या उपनिषदांनी प्रभावित झाले ती त्यांच्यापर्यंत दाराने केलेल्या भाषांतरामुळेच पोचली होती.

टिळकांनी जे थोडक्‍यात सूचित केले होते ते गांधीजींनी “हिंद स्वराज्य’ या पुस्तकात स्पष्टपणे मांडले. ब्रिटिशांना भारताचे सेवक म्हणून जर येथे राहायचे असेल तर ते राहू शकतात. त्यांना देशाबाहेर हाकलले म्हणजे स्वराज्य नव्हे, असे त्यात त्यांनी म्हटले आहे. स्वतः गांधी अराज्यवादी होते. म्हणून तर त्यांनी सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध करून ग्रामराज्याची कल्पना मांडली. गांधी अराज्यवादी होते, याचे कारण ते अहिंसेचे पुरस्कर्ते होते. राज्यवादात सत्ता गाजवणे मुख्य असते, परंतु सत्ता गाजवणे ही एक प्रकारची हिंसाच होय.

थोडक्‍यात, राष्ट्रवाद आणि राज्यवाद यांच्यात फरक आहे. राष्ट्रवाद हा संस्कृतीच्या अंगाने येतो, तर राज्यवाद सत्तेच्या अंगाने येतो. राष्ट्रवादाला जे सरकार अभिप्रेत व मान्य असते ते सत्तेचे प्रतिनिधी नसते. प्रशासन व व्यवस्थापन ही त्याची कामे व हीच त्याची मर्यादा. मार्क्‍सवादातही सरकार एवढ्यापुरतेच मान्य आहे. वासाहतिक काळात येथे आलेल्या पाश्‍चात्त्य विचारांच्या प्रभावामुळे आपल्या येथील विचारवंत राष्ट्रवाद व राज्यवाद यांची गल्लत करू लागले. प्राचीन काळी आपल्या देशात कोण कोण आले व त्यांनी राज्ये चालविली, याबद्दल ते आपल्या पूर्वजांनाही दोष देऊ लागले. वस्तुतः येथील विविधता व विविधतेतील एकता शाबूत ठेवून कोणी चांगले प्रशासन करीत असेल तर त्याला तो बाहेरून आला म्हणून विरोध करण्याची आपली परंपरा नव्हतीच. मात्र त्याने राज्य चालविणे म्हणजे सत्ता गाजविणे, असे समजून येथील राष्ट्रवाद धोक्‍यात आणला तर ते आपल्याला खपत नसे. दुसरे असे, की इंग्रजांपूर्वी येथे बाहेरून आलेले सर्व राज्यकर्ते येथेच राहिले. इथल्या मातीशी एकरूप झाले. इथल्या विविधतेत भर टाकून त्यांनी इथला राष्ट्रवाद आत्मसात केला. ब्रिटिशांचे तसे नव्हते.

सुरवातीला येथील लोकांनी त्यांचे स्वागत केले. याचे कारण सरकार या नात्याने त्यांनी चांगला कारभार करून दवला; पण थोड्याच दिवसांनी लक्षात आले, की त्यांना या देशाबद्दल आस्था नाही. ते या देशाची लूट करीत आहेत व त्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. मग लोक जागे झाले व त्यांना विरोध करू लागले.

पाश्‍चात्त्यांच्या राष्ट्र-राज्य कल्पनेने भारावून गेलेले आपले विचारवंत आपल्या परंपरेची तशी मांडणी करू लागले व आपले राष्ट्र तसेच राहील, अशा प्रकारचा राष्ट्रवाद पुरस्कारू लागले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपला हा राष्ट्रवाद शिवाजी महाराज व टिळक यांच्या माथ्यावर मारून तीच आपली प्रेरणा असल्याचे जाहीर केले. आपण त्यांचेच वारसदार असल्याचे ते सांगू लागले. वस्तुस्थिती तशी नव्हती.

शिवाजी महाराजांनी प्रस्थापित इस्लामी राजवटीविरुद्ध बंड केले, याचे कारण या राजवटीने आपल्या पारंपरिक राष्ट्रवादाशी विसंगत असा राज्यवाद आणून त्याच्यातून मिळणाऱ्या सत्तेच्या माध्यमातून इथल्या धार्मिक बहुविधतेचे उच्चाटन करायला सुरवात केली होती. भारतातील इतर प्रदेशांपेक्षा महाराष्ट्राचे वेगळेपण जर कोणते असेल, तर ते हेच आहे. मराठे देशभर पसरले ही गोष्ट खरी, पण त्यांना सत्तेच्या माध्यमातून आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे नव्हते. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त काबीज करण्याचे ध्येय समोर ठेवले नाही, याची अनेकांना खंत वाटते; पण तो मराठ्यांना समजलेल्या भारतीय राष्ट्रवादाचाच भाग होता.

त्याचा स्पष्ट उच्चार छत्रपती शाहू महाराजांनी केला. जुने मोडू नये, नवे करू नये, असे त्यांच्या राजनीतीचे सार सांगितले जाते. शाहू महाराजांनी दिल्लीचे मुगल तख्त मोडून तेथे मराठ्यांचा पातशहा बसवण्याचा बेत करणाऱ्यांना सांगितले, की नवे देऊळ बांधल्यामुळे जेवढे पुण्य मिळते तेवढीच पुण्यप्राप्ती जुन्या देवळाच्या जीर्णोद्धाराने होते. “जुने करू नये नवे। सांभाळावे ज्याचे त्याने ।।’ हा तुकाराम महाराजांच्या अभंगातील विचारच शाहू महाराज राजकारणात आणीत होते. “चकत्यांची पातशाही राखायची’ हा विचार पेशवाईतही कायम राहिलेला दिसतो. आमच्या राष्ट्राच्या मूळ स्वरूपास धक्का न लावणारे राज्य आम्ही सहन करू शकतो. 1857 च्या बंडातही नानासाहेब पेशव्यांसह सर्व हिंदूंनी दिल्लीच्या बहादूरशहा या मोगल पातशहाचे नेतृत्व मान्य केले, त्याचे इंगित हेच आहे. राजा ही एक ईश्‍वरी विभूती आहे, तो विष्णूचा अवतार आहे, असे आपले शास्त्र सांगते हे खरे आहे; परंतु तो लोकांचा सेवक आहे, याचीही जाणीव त्याला आहे. त्याला त्याला कर देऊन टाकायचा, संपले.

1893 मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत हिंदूंची बाजू घेणारे टिळक 1916 मध्ये मुस्लिम लीगबरोबर लखनौ करार करताना मुसलमानांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त जागा देऊ करतात, हे पाहून त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ अनुयायांनी आरडाओरडा करायला सुरवात केली. तेव्हा सगळ्याच जागा मुसलमानांना द्यायला माझी हरकत नाही, असे म्हणून टिळकांनी आपला वेदान्ती बाणा प्रगट केला. 1947 मध्ये फाळणी टाळण्यासाठी गांधींनी मुस्लिम लीगचे मंत्रिमंडळ बनवून जीना मुख्य प्रधान झाल्याने फाळणी टळत असेल तर हरकत नाही, असे म्हटले होते, ते कॉंग्रेसमधील भावी सत्ताधाऱ्यांना न मानवणे आपण समजू शकतो; पण खुद्द जीनांनीही ही कल्पना फेटाळून लावली. जीनांपुढील राष्ट्रवाद हा पाश्‍चात्त्य राज्यवाद होता, हे त्यामागचे कारण होते.

स्वराज्याची चळवळ ऐन भरात असताना ब्रिटिश सत्तेविरुद्ध चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या टिळकांना हिंदू विचारांप्रमाणे राजा हा ईश्‍वराची विभूती असल्याची आठवण कोणीतरी करून दिली. यावर टिळक उत्तरले, की “राजा ब्रह्म आहेच, पण मग प्रजा कोण? राजा जसा ब्रह्म आहे तशी प्रजासुद्धा ब्रह्मच आहे. प्रजारूपी ब्रह्माला राजारूपी ब्रह्माला जाब विचारण्याचा अधिकार नक्कीच आहे.’

टिळकांच्या उत्तरामागची वेदान्ती बैठक तुकाराम महाराजांनी एका अभंगातून फार चांगली स्पष्ट केली आहे. तेच महाराष्ट्राचे राजकीय तत्त्वज्ञान आहे.
“रामराज्य राम प्रजा लोकपाल। एकचि सकळ दुजे नाही ।।
मंगळावाचोनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एक रसा ।।
मोडले हे स्वामी ठायाठाय सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगे ।।
तुका म्हणे अवघे दुमदुमिले देवे । उरले ते गावे हेचि आता ।।

राजा, प्रजा आणि राज्ययंत्रणा या एकाच पातळीवरील गोष्टी आहेत. कोणी कोणावर सत्ता गाजवायचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. कोणाकडे सत्ता असेलच तर ते सेवेचे साधन म्हणून.

सौजन्य – मटा

मी आज इथे आपल्यासमोर ज्यांच्यामुळे उभा आहे त्या फुले-शाहू-आंबेडकरी परंपरेला सर्वप्रथम अभिवादन करतो. आपल्या सर्वांनाही नमस्कार करतो.

केवळ माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीचंच नव्हे, तर साहित्य, संस्कृती आणि विचारांचं ठाणं असलेल्या या शहरातून पहिल्यांदा रेल्वे तर धावलीच; शिवाय पहिल्यांदा काही पुरोगामी क्रांतिकारी विचारही या शहरातून बाहेर पडले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिलं साहित्य संमेलन घेण्याचा मान याच शहराला मिळाला. तेव्हा अध्यक्ष होते, रा. श्री. जोग आणि आता महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव होतानाही संमेलन घेण्याचा मान याच शहराला मिळाला. या संमेलनाचा अध्यक्ष आहे उत्तम कांबळे. जोग ते उत्तम कांबळे आणि मध्ये १९८८ ला नाशिकचेच वसंतराव कानेटकर अशा या लांबलचक प्रवासात बरंच वारं वाहून गेलं. या भूमीत उगवलेल्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना अंकुरही फुटले. अध्यक्ष झालेला हा उत्तम कांबळे कोण आणि कुठला याविषयी नेहमीच उत्सुकता आणि चर्चा होत राहिली आणि ती सारीच मला आनंददायी वाटली. कोल्हापूर, सांगली, बेळगाव, पुणे, की नाशिकचा आहे मी? खरं तर मी सा-याच ठिकाणांचा आहे. मी वैश्विक आहे. भाकरीची शिकार करण्यास कोण्या एकेकाळी मी बाहेर पडलो. शहरा-शहरांमध्ये गेलो. या सा-याच शहरांनी माझ्या श्वासांना बळ दिलं. मुळांना रुजण्यासाठी भुसभुशीत जमीन दिली. लिहितं होण्यासाठी नद्या-नाल्यांचा काठ दिला. जसा मी नाशिकचा, तसा कोल्हापूरचा, जसा सांगलीचा तसा आता ठाण्याचाही… मी या सा-यांचा म्हणूनच विश्वाचा… भाकरीनं आणि तिच्यासाठी झालेल्या लढाईनं मला सा-यांचा बनवलं. मी या सा-या शहरांचा, प्रदेशांचा मनापासून आभारी आहे. हे जग आणि इथला माणूस कधी स्थिर नव्हता. निसर्गातून बाहेर पडल्यापासून तो स्थलांतरच करत राहिला आहे. कधी भाकरीसाठी, तर कधी भाकरीच्या चंद्रासाठी… कधी विकास पावण्यासाठी तर कधी विकासाचीच पेरणी करण्यासाठी… या स्थलांतराचा अर्थ नीट समजून घेतला नाही, की युद्ध होतात आणि मी तर युद्ध नको; बुद्ध हवा म्हणणारा आहे. फुले, शाहू, डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी रुजलेल्या भूमीत स्वत:साठी घरटं बनवणारा आणि साहित्यात माणसासाठी काही शब्द कोरणारा आहे. काही शब्द बोलणारा आहे. आज मी इथं आपल्यासमोर, आपल्या छायेत उभा आहे, ते याचसाठी.

ठाण्याशी अगदी अलीकडं आणखी एका कारणानं माझं अतिशय भावनिक नातं जोडलं गेलं आहे. माझ्या मानलेल्या बापाचे म्हणजे नारायण सुर्व्यांचे शेवटचे काही श्वास याच शहरानं वाढवण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील लहान-मोठ्यांनी जमेल ती मदत केली या बापाला. महाराष्ट्रही मदत करीत होताच. याच शहरात माझ्या बापानं अतिदक्षता विभागात शेवटच्या घटका मोजत असताना म्हणजेच बेशुद्ध अवस्थेतही न दिसलेलं कविसंमेलन भरवलं होतं. आयुष्यभर एक महाकविताच बनलेल्या सुर्व्यांनी अतिदक्षता विभागातच मला एक प्रश्न विचारला होता, ‘ का रे, झालास का अध्यक्ष? ‘ मी तेव्हा निरुत्तर होतो. निवडणुकीच्या चक्रव्यूहात तेव्हा लढत होतो. मला माहीत नव्हतं, या लढाईचा फैसला काय होणार आहे? जेव्हा तो जाहीर झाला तेव्हा तो ऐकायला हा बाप नव्हता. खरं तर याच बापानं मला त्याच्या भल्या मोठ्या बापाच्या म्हणजे कुसुमाग्रजांच्या ओटीत टाकलं होतं. या थोरल्या बापानंही मला दहा-अकरा वर्षे पोरासारखं बाळगलं. गोदेकाठी तपस्वी बनून तळपणारा हा थोरला मोठा बापही आज हयात नाहीय. याच काठावर बसून विद्रोहाला धार लावणारा बाबूराव बागूल नावाचा आणखी एक बापही नाहीय. मी अनेक वर्षं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गं. बा. सरदार, रा. ग. जाधव, रावसाहेब कसबे, भास्कर भोळे आदी अनेकांनी घडवलेल्या प्रबोधन चळवळीचं बोट धरून चाललो. एका मोठ्या धर्मचिकित्सेच्या कार्यात भालचंद्र पडके यांनी मला दिलेली ऊर्जा घेऊन चाललो. माझ्या दृष्टीनं ही सारी बापमाणसं होती. आता यातील बहुतेक सारी काळाआड गेली आहेत. एक मोठी अनामिक पोकळी घेऊन मी उभा आहे, असं वाटतंय… पण साहित्याच्या उत्सवासाठी झालेली आपल्या सर्वांची गर्दी आणि तिच्या असंख्य सावल्या पाहून मी पुन्हा सनाथ झाल्यासारखं वाटतं आहे.

मला माहीत आहे, की ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथं मी पोचण्यापूर्वी ८३ अध्यक्षांच्या भल्यामोठ्या दिंड्या गेल्या. त्यांच्या लांबलचक सावल्या आणि त्यांची पाऊलचिन्हंही दिसत आहेत. विचाराचं एक भलंमोठं मंथन झालं आहे इथं… या सर्वांचा एक अनामिक सुगंध दरवळतो आहे इथं. या सुगंधामध्ये अनेक ऋषितुल्य माणसं आहेत. या सर्वांचा अभिमान वाटतो आहे मला. या सर्वांनी इथं आपल्या प्रतिभेच्या पंखांना मोकळं केलं होतं. मराठीचे पोवाडे गायले होते. तिच्या वाटचालीची चिकित्साही केली होती. तिच्या मार्गातील गतिरोधकही दाखवले होते. काहींनी जागल्याची भूमिका करत आपल्या हातात लाल कंदीलही धरले होते. या सर्वांनी चालेली वाट आणखी रुंद व्हावी. फुले,

शाहू, आंबेडकरी, विद्रोही, ग्रामीण, स्त्रीवादी अशा सर्व वाटा आणि तिथं घुमणारे एल्गार, या वाटेवर यावेत… या वाटंनंही मोठ्या आनंदानं या सर्वांचं त्यांच्या एल्गारासह स्वागत करावं, असंही मला वाटतं आहे. माझा तसा नम्र आग्रहही आहे. माझ्या प्रवासाचा प्रारंभ जग बदलण्याच्या घोषणांनी दुमदुमून गेलेल्या याच वाटांवरून झाला आहे. त्याचाही मला गर्व वाटतो आहे.

आपल्या वाटचालीचं ८४ वं पाऊल टाकणारं हे संमेलन आता उत्तर आधुनिकतेत उभं आहे. त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणात कधी नव्हे एवढ्या मोठ्या आवाजात विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्फोट होत आहेत. चंद्रावर-मंगळावर स्वा-या करण्यासाठी माणसांच्या आणि यंत्रांच्या झुंडी एक-एक पाऊल पुढं टाकताहेत. जिवांचे क्लोन करण्यासाठीच्या अर्जांचाही जगाच्या कचेरीत ढीग साचतो आहे. सुपर सुपर एक्स्प्रेस हायवेवरून जग धावतं आहे. शेषाच्या मस्तकावरचं हे जग, अण्णाभाऊंनी राबणा-यांच्या तळहातावर आणलं आणि संगणकाच्या क्रांतीनं ते पडदा नावाच्या आपल्या छोट्याशा छाताडावर आणलं आहे. नवनवे शोध, संशोधनं आणि प्रतिनिसर्ग बनवण्यासाठी माणसाच्या सुरू असलेल्या लढाया, या सा-यांमुळे जग चालण्याऐवजी धावतं आहे. माणसं धावताहेत… त्यांच्या गावांसह धावताहेत, तर काही जण गावं सोडून धावताहेत. तोंडातून फेस आणि आतडी बाहेर पडेपर्यंत धावताहेत… स्वप्नांसह धावताहेत… धावता धावता खाली पडणा-या स्वप्नांचे तुकडे मुठीत घेऊन धावताहेत. प्रचंड वेगानं धावणारं आणि धावण्यालाच जगणं मानणारं असं एक आगळंवेगळं जग प्रथमच आपल्या अवतीभोवती अवतरलं आहे. मी स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेलो आणि सतत धावत अस्थिर होत असलेल्या जगाचा एक प्रतिनिधी आहे. नव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी आधुनिकतेत मीही उभा आहे. खरं तर मी स्वत:च एक नवं युग आहे आणि या नव्या युगानं निर्माण केलेली धगही आहे. या युगानं माझ्या हातातला कागद कमी कमी करत आणला असला, तरीही मोठ्या कष्टानं कागदाऐवजी काळजावर गोंदवलेले ओंजळभर शब्द घेऊन मी तुमच्यासमोर उभा आहे.

मी आयुष्याचा प्रवास सुरू केला तेव्हा मोटेची गाणी माझ्या पाठ्यपुस्तकात होती हे जसं खरं आहे, तसं किर्लोस्करांच्या इंजिनानं मोटेची जागा घेतली होती, हेही खरं आहे. किर्लोस्करवाडीत कंदिलाची काच तयार करणारा कारखाना सुरू होता, हे जसं खरं आहे तसं कोयनेतील वीज घेऊन चकाकणा-या बल्बनी कंदिलाची जागा घेतली होती, हेही खरं आहे. ‘ आरं घरोटं घरोटं ‘ म्हणणाऱ्या बहिणाबाईंची गाणी ओठांवर आणि पुस्तकात होती हे जसं खरं आहे, तसं काही तासांत मणभर ज्वारीचं पीठ बाहेर टाकणारी यंत्रंही आली होती, हेही खरं आहे. ‘ उठा उठा चिऊताई ‘ ही कुसुमाग्रजांची कविताही मी पाठ करत होतो आणि त्याच वेळेला बंगल्यातील शोकेसमध्ये प्लास्टिकच्या चिमण्याही पाहत होतो. नवं आणि जुनं यांच्यातील घासाघाशी पाहत मी अशा बिंदूवर येऊन पोचलो, की जेथे जुन्या शतकाच्या कॅलेंडरवरचं शेवटचं पान गळून पडलं आणि नव्या शतकाचं नवं कॅलेंडर सुरू झालं. माझा ‘ अस्वस्थ नायक ‘येथेच जन्माला आला. मी स्वातंत्र्यानंतरचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून दीर्घकाळ चालत राहिलेल्या चळवळी मात्र पाहत आलो आहे. पाण्यासाठी, उजेडासाठी, समतेसाठी, हक्कासाठी, वेतनासाठी, स्त्रीमुक्तीसाठी आणि एवढंच नव्हे, तर मेल्यानंतर गाडण्यासाठी जागा मिळावी म्हणून सुरू असलेल्या चळवळी पाहत आलो आहे. आणखी ब-याच चळवळी आहेत. माणसाची जागा आता यंत्रानं ब-यापैकी घेतली होती आणि हे यंत्र माणसाला स्वत:च्या गतीवर धावायला लावत होतं. धावल्याशिवाय जगता येत नाही, हा माझ्या पिढीतील आणि आमच्या पोटी जन्माला आलेल्या पिढीचा सुविचार बनतो आहे. या धावण्याचीच पुढं स्पर्धा झाली. मी माणसाचा नागरिक झालो आणि आता नागरिकाचा स्पर्धक झालो. मी एक स्पर्धक, तू एक स्पर्धक, ती एक स्पर्धक आणि ही पृथ्वीच जणू एक स्पर्धक… माझा सारा भोवताल ज्या प्रचंड गतीनं धावतोय, त्या गतीनं माझ्या भोवतालच्या पुस्तकाची पानं हलताना दिसत नाहीत. दोन-पाच दशकांपलीकडं आपलं सारं साहित्यही लढायांनी भरलं होतं. आपले साहित्यिक या लढायांशी जोडले होते. भाकरी मिळवण्यासाठी लढाई होती, जात चोरण्यासाठी लढाई होती आणि विद्रोह होता. नवं विद्यापीठ उभारण्याची आणि नवी सनद लिहिण्याची लढाई होती. टाटाला सवाल विचारला जात होता. गर्जा जयजयकार होता आणि स्वातंत्र्यदेवतेस विनवणी करणारा स्वातंत्र्याचा लेखाजोखाही होता. लिहिणारेही लढत होते आणि लढणारेही लिहीत होते. पुढं तर हरणारेही लिहायला लागले. आपल्या जखमांचा हिशेब मागायला लागले आणि काही काही वेळा जखमांच्या माळा गळ्यात मिरवू लागले. दलित, आदिवासी, भटके, कामगार, श्रमिक या सर्वांच्या लढाया साहित्यात दिसू लागल्या. हे सर्व घडत असतानाच साता समुद्रापार तयार झालेली जागतिकीकरणाची लाट आपल्यापर्यंत पोचली. ती आपण थोपवू, असं काहींना वाटत होतं, तर ती आपल्यापर्यंत पोचणारच नाही, असंही काही जण सांगत होते. काही जण लाट पोडण्याची, तिच्या चिंध्या-चिंध्या करण्याची भाषा करत होते. यापैकी घडलं काहीच नाही आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपण कसं सहभागी झालो, हे भल्याभल्यांनाही कळलं नाही. जागतिकीकरणानं आपलं मन, मेंदू, मनगट, घर, वस्तू, स्वप्न, संवेदना या सा-या सा-यांना घेरलंय.

पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा केव्हा नवे प्रवाह येतात, तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी वा विरोधासाठी वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांची, साहित्याची निर्मिती होत असते. रशियातला साम्यवाद जेव्हा कोलमडायला लागला होता, तेव्हा एन्ड ऑप आयडॉलॉजी (तत्त्वज्ञानाचा शेवट) हे डॅनियल बेल यांचं पुस्तक आलं. जगाला तत्त्वज्ञानाची आता गरज नाही, असं त्याचं म्हणणं होतं. पुढं जगाला तत्त्वज्ञानाचीच नव्हे, तर इतिहास-भूगोलाचीही गरज असणार नाही, असं सांगणारी अंताची (एन्ड) एक मालिकाच सुरू झाली. द एन्ड ऑप हिस्ट्री अॅण्ड द लास्ट मॅन (इतिहासाचा अंत आणि शेवटचा माणूस) प्रान्सिस फुकुयामा, आय सायबर्ग-केवीन वारविक, द एन्ड ऑप फेथ (श्रद्धांचा अंत) – सॅम हॅरिस, द एन्ड ऑप सेक्स (सेक्सचा अंत)- जॉर्ज लिओनॉर्ड, असे अनेक ग्रंथ आले. आता सारं काही संपणार आणि जागतिकीकरणच शिल्लक राहणार, असाच हाकारा दिला जात होता. जागतिकीकरणात फक्त बाजारपेठा आणि त्यातील वस्तू, नफा-तोटाच शिल्लक राहील, असं सांगण्यात येत आहे.

जग एका मोठ्या पेचप्रसंगातून जातं आहे. या पेचप्रसंगात आपलं मराठी साहित्य कुठं उभं आहे, काय घेऊन उभं आहे, कसं उभं आहे आणि कोणासाठी उभं आहे हे पाहणं ओघानंच येत असतं. आपल्या पर्यावरणात आज जगण्यासाठीच्या लढाईतून रोज हजारो माणसं बाहेर फेकली जात आहेत. काही आत्महत्या करत आहेत. स्पर्धेला घाबरून शालेय जीवनातच आत्महत्या करत आहेत. काहींना मातेच्या गर्भातच मृत्यू मिळतो आहे. अशा वेळी मी कधी-कधी चिडून म्हणतो, हे जग कुणाचं? जगणा-यांचं की मरणा-यांचं? विकासाचा दर डबल आकड्यात जातानाही मृत्यू आणि विकासाचा आकडा घसरतानाही मृत्यू, असं काहीतरी विलक्षण चित्र आपण सारेच पाहतो आहोत. जग बदलत असतं. हे बदलतच राहणार आहे; पण माणूसघाणं जग निर्माण व्हावं हे काही बरोबर नाही. गुलाम जन्माला घालणारं नवं जग निर्माण व्हावं हेही काही बरोबर नाही.

आपण जागतिकीकरणाला विरोध करतो म्हणजे नेमकं काय करतो, हेही समजून घ्यायला हवं. आपला यंत्राला किंवा आधुनिकतेला विरोध नाही; पण त्यातून जन्माला येणा-या नव्या विषमतेला आणि जीवघेण्या स्पर्धेला मात्र विरोध असायला हवा. तंत्रज्ञानाचा वापर करून जगणा-या आणि हरणा-या अशा दोन जाती तयार करण्याला विरोध असायला हवा. नवे गुलाम जन्माला घालण्याला आणि यंत्राच्या मदतीनं नवा वसाहतवाद तयार करण्याला आपला विरोध असायला हवा. आपलं साहित्य हे सारं मुकाटपणे, त्रयस्थपणे पाहत राहणार, की हालचाल करणार आहे?

जागतिकीकरण पकडायला आणि त्याची उकल करायला आपण थोडाफार उशीरच केला, असं माझं स्वत:चं मत आहे. काही कविता आणि एखाद-दुस-या कादंबरीचे उपवाद वगळता आपण साहित्यात याविषयी फार काही करू शकलो नाही. यांत्रिकीकरण, मॉल, सेझ यांसारख्या गोष्टी आणि त्याच्या परिणामावर काहींनी लिहिलं; पण हे पुरेसं नाही. अन्य भाषांमध्ये जागतिकीकरणाचे बरेवाईट पैलू मोठ्या प्रमाणावर प्रकट होत आहेत. मॉलवर कादंब-या येत आहेत आणि उत्तर आधुनिकतेनं निर्माण केलेल्या मायावी जगाचे बुरखे फाडत आहेत. आपण काळाबरोबर चाललो नाही, आपल्या शब्दांनी काळ पकडला नाही, तर माणूस आणि साहित्य म्हणूनही आपण मागं पडू, असं मला वाटतं. जागतिकीकरण हे आता केवळ एखाद्या प्रदेशाचं, एखाद्या देशाचं नव्हे; सा-या नव्या जगाचं वास्तव झालं आहे. ते समजून घेणं जसं महत्त्वाचं आहे. तसं या जगात सर्वांनाच अवकाश कसं मिळेल, हे पाहणं आणि आपल्या साहित्यात त्याला अवकाश देणंही महत्त्वाचं आहे. संपर्क साधनांची महाक्रांती होत असतानाही आपल्याकडचे लाखो-कोट्यवधी लोक आपण रेंजबाहेरच आहोत, असं टाहो पोडून का सांगतात ? विकासाच्या रेंजमध्ये असणा-यांमधील अंतर का वाढतं आहे ? किंवा जाणूनबुजून ते का वाढवलं जातं आहे, याचा शोध घ्यायला हवा. त्यासाठी आपली प्रतिभा, सृजन आणि लेखणी वापरायला हवी. हे मरणाचे नवे पट्टे, हे भकासपणाचे नवे पट्टे, माणसाला रंगहीन करणारे पट्टे; आपला साहित्यिक पाहणार आहे की नाही? ते त्यांनी पाहायलाच हवेत, असा माझा आग्रह आहे.

साहित्य आणि भूमिका असा शब्द उच्चारला, की अनेकांच्या भुवया आजही उंचावतात हे मला कधीपासून माहीत आहे. याच शब्दावरून कला, कलेसाठी की कला जीवनासाठी? असे झडलेले वाद मी कितीतरी वर्षांपासून ऐकतो आहे. मला स्वत:ला या वादात शिरायचं नाही. त्यासाठी अनेक वादकरी आपल्याकडे आहेत. ते त्यांचं-त्यांचं काम करीत राहतील! तर मी भूमिकेविषयी, कलेविषयी बोलत होतो. मला स्वत:ला कला खूप आवडते आणि त्यापेक्षा ती जेथून जन्माला येते ते जीवन तर सर्वांत जास्त आवडतं. कलात्मकता लाभलेलं साहित्य वाचायला, पाहायला, परिणाम करायला बरं वाटतं; याविषयीही माझं दुमत नाही. पण तरीही या दोहोंमध्ये एक अदृश्य रेषा असतेच. मी अनेकदा आदिवासी पाड्यांवर त्यांच्या झोपड्यांमध्ये जात असतो. त्यांच्या भिंतींवर मस्तपैकी नक्षी असते. रंगकामही असतं. चित्रंही चांगली असतात. पाडे दारिद्र्याचे ओझे वाहणारे असले, तरी अनेक झोपडीवजा घरांच्या भिंती कलात्मक वाटायला लागतात. पण वास्तव हे आहे, की आदिवासींनी ज्या झोपड्या बांधल्या त्या निवाऱ्याची मूलभूत गरज भागविण्यासाठी, जगण्यासाठी. नंतर या साऱ्या जगण्यातून स्वाभाविकपणे कला आल्या. मी माझ्या आजीच्या मांडीवर पहाटे डोकं टेकवून अनेक वेळा जात्याची घरघर ऐकत झोपायचो. आजी अगोदर जातं साप करायची. त्याचा खुंटा बळकट करायची. धान्यानं भरलेलं सूप जवळ ओढायची. मग मूठभर दाणं जात्याच्या तोंडात टाकायची. पोटातली आतडी तोंडात येईपर्यंत जातं ओढायची. मग हळूहळू जाडं-भरडं आणि नंतर मऊ पीठ बाहेर पडायचं. जात्याची घरघर वाढली, की त्यातून संगीत बाहेर पडायचं. ते ऐकून मलाही खूप झोप यायची. जात्यातून बाहेर पडणारं संगीत इतरांप्रामाणेच मलाही खूप आवडायचं. नंतर मी एरंडासारखा वाढत गेलो आणि कळलं, की माझी आजी संगीतासाठी नव्हं, तर पिठासाठी जातं ओढायची. जगण्यासाठी जातं ओढायची. जातं ओढणं ही तिच्या जगण्याची एक लढाई होती. दुर्दैवानं आपण पिठाऐवजी, संगीतावर आणि दारिद्र्यानं भरलेल्या घरांऐवजी भिंतीवरल्या चित्रांवरच अधिक बोलत आलो.

माणसाच्या जगण्याला जसं एक प्रायोजन असावं लागतं, तसं साहित्यालाही एक प्रायोजन असतं आणि असायलाच हवं, यासाठी मी स्वत: आग्रही आहे. साहित्याला प्रायोजनच नसेल तर त्यानं काय करायचं? प्रायोजन हेच साहित्याला चालायला, बोलायला, काही करायला लावतं. प्रायोजन साहित्याचा कणा असतं. भूमिका त्याची कणा असते. कणा असलेलं साहित्य खूप प्राभावी ठरतं. ते केवळ ओठांवरच गुणगुणत राहत नाही, तर काळजात प्रावेश करतं. हिंदोळे निर्माण करतं. लाटा निर्माण करतं. लाटा धडकायला लागल्या, की व्यवस्था हलायला लागते. नवं जग, नव्या माणसासाठीची ती हाक असते. साद असते. माणसासाठी जागा करायची असेल तर साहित्यिकाला भूमिका घ्यावीच लागते. अलीकडच्या दशकात अनेक दुर्दैवी घटना घडल्या. माणुसकीच्या झाडालाच माणसाची मुंडकी लटकण्याच्या घटना घडल्या; पण आपण स्वत:लाच प्राश्न विचारायला हवेत, की त्या वेळी आपल्या साहित्याला भूमिका होत्या का? ‘ ग्लोबल वॉर्मिंग”च्या काळात सारी पृथ्वीच होरपळत असेल, करपत असेल तर आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल? लोकशाहीच्या अंगावरची एक-एक वस्त्रं गळून पडण्याच्या काळात आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल? नद्या-नाले, डोंगर, जंगले धनिकांच्या सात-बारावर जात असतील तर आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल? स्त्रीचं मोठ्या गतीनं वस्तूतः रूपांतर होत असेल तर भूमिका कोणती असेल? आणि खैरलांजी रोखण्यासाठी साहित्यिकांची भूमिका कोणती असेल? मला ठाऊक आहे, की अनेक जण असं म्हणतील, की सारे प्रश्न निखळ कलेच्या आड येतील. पण मला त्याची पर्वा नाही. कारण साहित्य माणसाच्या बाजूचंच असतं, यावर माजी निखळ श्रद्धा आहे. मी सांगलीच्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष असताना, गावाकडचं एक चित्र मांडलं होतं. तेच पुन्हा मांडण्याची इच्छा आहे. पुनरावृत्तीचा आरोप मान्य करून ते मला मांडायचं आहे. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, मला गावाकडच्या मोटेची गोष्ट आठवते. इथं बसलेल्या अनेकांना आठवत असेल, गावाकडं पूर्वी मोटेला बैल जुंपून विहिरीतलं पाणी पाटात आणि पाटातलं शेतात सोडलं जायचं. जेव्हा मोट विहिरीत बुडायला हवी असते तेव्हा बैल उलटं-उलटं म्हणजे विहिरीच्या दिशेनं चालू लागतो. जेव्हा मोट भरते तेव्हा ती पाटापर्यंत आणण्यासाठी बैल सुलटं म्हणजे नाकासमोर चालू लागतो. दिवसभर त्याची ही एक कष्टदायी कसरत चालू असते. मोटेचं पाणी पाटात पडतं तेव्हा त्याचा आवाज कोणता, जलध्वनी कोणता यावरची चर्चा गाजायला लागते. जलध्वनी खळखळ, खुळखुळ की सळसळ यावर वाद झडतात. त्यासाठी शब्दही खर्च होतात. होऊ देत बापडे! मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. दुसरीकडं मोट ओढून-ओढून ज्या बैलांचा खांदा सुजतो, सुजून फुटतो, त्याच्या पाठीवर, पोटावर, चेह-यावर रक्त ओघळायला लागतं. यातील रक्ताच्या एखाद्या थेंबावर तरी आपण कथा-कविता लिहिणार की नाही, हा माझा साधा प्राश्न आहे. शब्दानं बैलाच्या जखमेवर पुंकर घालणं म्हणजे जीवनाशी सलगी करणं आहे. युद्धाशी सलगी करणं आहे. पाण्याचा आवाज आणि रक्ताचा थेंब यापैकी निवड करायची झाल्यास मी स्वत: बैलाच्या बाजूनं उभा राहीन. आपल्या साहित्यानं, आपण सर्वांनीही तेच केलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. आग्रह आहे. आपण सारे जीवनाच्या बाजूनं उभं राहूया. आपल्या शब्दांच्या ओठावर जीवनगाणेच देऊया.

आपल्या साहित्यानं, आपण सर्वांनीही तेच केलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. आग्रह आहे. आपण सारे जीवनाच्या बाजूनं उभं राहूया. आपल्या शब्दांच्या ओठावर जीवनगाणेच देऊया.

जागतिकीकरणाची चाहूल लागत होती तेव्हा जागतिकीकरणाचे वकील कोणती-कोणती आश्वासनं देत होते आणि कोणता जाहीरनामा जाहीर करत होते? राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याला मागं पाडेल असा जाहीरनामा होता, आता हेही थोडंसं आठवूया. पृथ्वीवरच्या सर्वांना स्वच्छ पाणी आणि आरोग्य मिळणार. चांगली हवा मिळणार. सर्वांना शिक्षणाचा हक्क लाभणार. वस्तूंचा मुबलक पुरवठा होणार. प्रात्येक मनगटाला काम मिळणार. सामाजिक, धार्मिक विषमता कमी होणार. माणसाचं मूल्य वाढणार, ज्ञानाचे स्पोट होणार, कुणाला कोणत्याही स्पधेर्त भाग घेता येणार इत्यादी. इत्यादी. या घोषणा, ही आश्वासनं, या हमी ऐकून सामान्य माणूस हरखून गेला होता. विकास मोजता यावा यासाठी तोही नवी परिमाणं शिकत होता. आकडे पाठ करत होता. स्वप्नांच्या ढिगाऱ्यावर बसला होता. आयुष्य कुरतडणाऱ्या जुन्या प्राश्नाचं दहन होईल आणि नवं जग येईल असं काय-काय तो बघत होता.

जागतिकीकरण स्थिरस्थावर झालं तेव्हा आपण काय पाहतो आहोत? विकासाचा दर वाढला. वस्तूंचं उत्पादन वाढलं. ज्ञान-तंत्रज्ञानाचा स्फोट झाला. हे सारं सारं खरं आहे; पण त्यातून एक वेगळाच समाज निर्माण झाला. विशिष्ट वर्गाचाच विकास वाढत राहिला. एकदिशा विकास होत राहिला. त्याचे लाभ घेणाराही विशिष्ट वर्ग तयार झाला. जुनी दु:खं कायम राहून नवी दु:खं तयार झाली. संस्कृतिसंघर्ष कमी होण्याऐवजी तो वाढला. धर्माच्या, देवाच्या नावानं जागोजागी स्फोट होऊ लागले. कोणी टॉवर उडवलं. कुणी रेल्वे उडवली, तर कोणी मनुष्यजात उडवण्याचा प्रायत्न करतोय. अध्यात्माची एक प्राचंड बाजारपेठ झाली. कोट्यवधी पुस्तकं आणि मोजता येणार नाही एवढी उलाढाल त्यातून बाहेर पडते आहे. मूलतत्त्ववाद गोंजारणा-या फौजाच्या फौजा तयार झाल्या. त्या समूहावर आणि शासनावरही हल्लाबोल करू लागल्या. मुंबई-मालेगावातही आपण असे हल्ले पाहिले आहेत. त्यात बळी गेलेल्यांच्या किंकाळ्या अजूनही आपल्याभोवती घुमत आहेत. नव्या व्यवस्थेनं वस्तूंची बाजारपेठ जशी वाढवली तशी अध्यात्माच्या बाजारपेठेलाही चालना दिली. अध्यात्मालाही नखं फुटली. त्यानं समाजाला आणि मूलभूत स्वातंत्र्यालाच कुरतडायला सुरुवात केली. कधी कुणाच्या लेखनामुळे कुणाच्या भावना दुखावतील आणि स्फोटाचं रूप घेऊन बाहेर पडतील, याचा नेम राहिलेला नाही. साहित्यिकांच्या लेखण्यांवरही मूलतत्त्ववाद आक्रमण करत आहे. जगभरात अशा अनेक घटना घडत आहेत. घडल्या आहेत. जागतिकीकरणात संस्कृतिसंघर्ष कमी होतील आणि वैश्विक खेड्यात सारे गुण्यागोंविदानं नांदतील, असंही एक स्वप्न ठेवण्यात आलं होतं. भूगोल आकसेल. इतिहास अदृश्य होईल. तत्त्वज्ञान संपेल आणि संपर्कसाधनांच्या जोरावर नवी क्रांती करणारा माणूस सा-या भेदाभेदांतून मुक्त होईल, असंही सांगण्यात येत होतं. प्रत्यक्ष तसं घडलेलं नाही. माणूस स्क्रीनमेकरही होतो आणि स्क्रीनसेवरही होतो. मला वाटतं, आजच्या आणि उद्याच्या लेखकांनी माणसाचं हे अवमूल्यन, त्याचं कोसळणं, माणसातून निघून वस्तूत अडकणं हे समजून घेतलं पाहिजे. त्याला मानवी कळपात आणण्याचा प्रायत्न केला पाहिजे. एकीकडं हे शक्तीचे, समृद्धीचे अचाट प्रायोग, तर दुसरीकडं कालचा आणि आजचा पाऊस पडलाच नाही आणि उद्या तरी पडणार की नाही, अशी भ्रांत असणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पाण्यावरून जगभर नवे संघर्ष निर्माण झाले. आकाशातले ढग पळवण्याचे बेत आखले जाऊ लागले. पाण्यावरून नव्या जाती निर्माण झाल्या. बिसलरीवाली माणसं, पिल्टर केलेलं पाणी पिणारी माणसं, डबक्यातलं पाणी पिणारी माणसं आणि कसलंही पाणी न पिता शीतपेयं पिऊन जगणारी माणसं… पाणी मिळविण्यासाठी… रस्ता मिळविण्यासाठी… भाकरी मिळविण्यासाठी एक नवी लढाई सुरू झाली. गाव विरुद्ध शहर, शहर विरुद्ध महानगर, महानगर विरुद्ध ग्लोब, बिसलरीविरुद्ध डबकेवाले, भाकरीविरुद्ध बर्गर, ऑनलाइन विरुद्ध ऑफलाइन, रेंज मिळवणारे विरुद्ध रेंज गमावणारे अशा नाना प्राकारच्या लढाया सुरू झाल्या. आपलं साहित्य हे सारं पाहतं आहे का, आणि त्याचं चित्रण त्याच्या साहित्यात होत आहे का, हे पाहायला हवं. या नव्या लढाया, नवी मैदानं, नवे नियम आपल्या कवितेत येत आहेत का? वाघ आणि शेळीच्या लढाईत कोण हरेल, याचं उत्तर पूर्वी शेळी असं यायचं. आता ते ज्याला एसएमएस अधिक मिळतील तो जिंकेल असं येतं. आपण सारे लिहिणारे, हे नियम समजावून घेतो आहोत काय? त्याचे परिणाम पाहतो आहोत काय? मला वाटतं, आपलं दुर्लक्ष होत आहे. कोणत्या ना कोणत्या तरी लढाईत परिवर्तनाच्या प्रावाहात स्वत:ला गुंतवून ठेवणा-या साहित्यिकांची संख्या एकेकाळी आपल्याकडं प्रचंड होती. तो स्वत:ला बांधून घ्यायचा. कृतीला आणि विचारालाही बांधून घ्यायचा. त्याचा त्याला अभिमान वाटायचा. मी बांधीलकी मानणारा माणूस आहे, लेखक आहे हेही तो अभिमानानं सांगायचा. पण काळ बदलत गेला आणि लेखकाचं हे बांधून घेणं कमी होऊ लागलंय. सैल होऊ लागलंय. हे जे वर्तमान मी मांडतो आहे त्याला भिडण्याचं काम आपल्या साहित्यानं केलं पाहिजे. मी कुणाशीच बांधील नाही, माझा मी मुक्त, मी वर्तमानाला भिडणार नाही, मी भविष्याचा वेध घेणार नाही अशा प्राकारची मानसिकता वाढताना मला दिसत आहे. ती साहित्याचा प्राभाव कमी करणारी आहे आणि माणसाच्या लढायांपासून दूर जाणारीही आहे. आपली कविता, कथा, कादंबरी, नाटक जर वास्तवाचं प्रातिबिंब असेल तर ते ठिसूळ, अस्पष्ट, प्रभावहीन का होतं आहे? वर्तमान पकडण्यात जर आपण कमी पडलो, तो बदलण्याच्या प्रायत्नांपासून दूर झालो तर आपलं साहित्य कुपोषित होईल. मला आठवतं, केरळमध्ये काही मुलांनी एकत्र येऊन, एका मोठ्या कागदावर चित्रात जागतिकीकरण पकडण्याचा प्रायत्न केला होता. कागदावर डुकरांची भली-मोठी रांग होती. सर्व डुकरं सशक्त होती. सर्वांत शेवटच्या डुकरामागे बिथरलेल्या, हरलेल्या माणसाचे डोळे भास वाटावेत अशाप्रामाणे दाखवले होते. जागतिकीकरणात डुकरं मोठी होतात. माणूस छोटा आणि दुर्बल होतो हे त्या मुलांना सुचवायचं होतं. आपल्या मराठी साहित्यात माणसाच्या नव्या लढाया दिसायला हव्यात. नवी आयुधं दिसायला हवीत. शब्दांचा माणसाला आधार वाटायला हवा आणि त्यातील ऊर्जाही त्याला मिळायला हवी. आपण वर्तमान पाहण्यात, तो पचवण्यात, त्याला भिडण्यात लेखक म्हणून कमी पडतो आहोत का, असं मला वाटायला लागलं आहे. वर्तमान खरोखरच पेचप्रसंगांनी भरलेला आहे. त्याला सामोरा जाणारा आणि लढणारा नवा महानायक आपल्या साहित्यानं जन्मास घालायला हवा. असा महानायक जन्माला घालावा, की जो या पेचप्रसंगात डुकरापेक्षा माणूस मोठा आहे, वस्तूपेक्षा माणूस मोठा आहे असं बुलंद आवाजात सांगेल.

यांत्रिकीकरणाच्या झपाट्यात एकतर माणसाच्या संवेदनाच बोथट होऊ लागल्या आहेत किंवा त्याचंही यांत्रिकीकरण होऊ लागलं आहे. आज अशी परिस्थिती आली आहे, की जेथे साहित्यानं जीवनवादी भूमिका अधिक व्यापक करायला हवी. जीवनवादी किंवा माणूसवादी याचा अर्थ प्रारंभी आणि शेवटी माणसांचाच विचार करणारं साहित्य. आपल्या लेखनात अनेक प्रश्न येतात. येत राहतील; पण त्याचं विश्लेषण करताना सारे जुनेच मार्ग आपण वापरतो. जागतिकीकरणात हे प्राश्न कसे गुंत्याचे झाले आहेत, हेही आपण लिहायला हवं. जुन्या गुलामीविरुद्ध तर लिहिलंच पाहिजे; पण नव्यानं आलेल्या गुलामीचा वेध आपण कसा घेणार? एक बँक हलायला लागली, की जगभरातल्या लाखो लोकांच्या नोक-या जातात. कंत्राटी संस्कृतीत नवे गुलाम जन्माला येतात. भूदास, श्रमदास आणि हा नवा ग्लोबलदास असा हा प्रवास चालू आहे. या विषयावरही अन्य भाषांमध्ये भरपूर लेखन येत आहे. माझ्या माय मराठीत ते का येत नाही? आपला लेखक-कवी हे नवं पर्यावरण भेदण्याचा प्रायत्न करतो आहे काय किंवा काठावर बसून पाहतो आहे हे सारं… पर्यावरणात नव्यानं तयार होणा-या लढायांतून तो स्वत:ला दूर ठेवू पाहतो आहे काय किंवा त्याची उपस्थिती कमी होते काय? एकीकडे प्रचंड स्वातंत्र्य आणि दुसरीकडे व्यक्त होण्याचाही संकोच, असं दुभंगलेलं चित्र जे निर्माण होतं आहे, त्याचा तो अर्थ शोधून घेतोय काय? नव्या काळातील या कथित उदंड स्वातंत्र्याचा अर्थ तरी समजून घेतोय का? मला वाटतं, तसा प्रयत्न करायला हवा.

गेल्या दशकात जागतिकीकरणाचे खरे-खोटे चेहरे उघड करणारं साहित्य मराठीबाहेर मोठ्या प्रामाणात लिहिलं-वाचलं जातं आहे. आपल्याला उशीर का लागतो? जीवनाला भिडताना आपण वेळ का गमावतो? या नव्या पर्यावरणाचा आणि त्यात घुसमटणा-या मानवी मूल्यांचा आणि ती जन्माला घालणा-या व्यवस्थेचा वेध आपण घेणार की नाही? किती वर्षं आपण व्याख्या आणि संज्ञातच अडकणार? या नव्या साहित्यासाठी नव्या फूटपट्ट्या आणणार की नाही? नाकावर लटकलेल्या चष्म्याची धूळ झटकणार की नाही? असे अनेक प्राश्न माझ्यासमोर आहेत. मूल्यऱ्हास होत असेल, तर आपण सरसावून लिहीत का नाही? आपण नव्या वातावरणात महाकादंबऱ्या, महानाट्ये, महाकाव्यं, महाचित्रं का जन्माला घालत नाही? आपण चटकन युगांतर का करत नाही? हे सारं घडलं, तर आपलं साहित्य समृद्ध होईल. आधुनिक होईल. भाषा समृद्ध होईल. जीवनमूल्यं समृद्ध होतील. आपण आता कशाची वाट पाहतोय? कुणाची वाट पाहतोय?

जागतिकीकरणात माणूस इतका धावतो आहे, इतका धावतो आहे, की कधी-कधी तो स्वत:ची सावली आणि स्वत:चा चेहराच हरवून बसतो. या धावण्यात त्याच्या संवेदनाही सांडून जातात आणि त्याच्या सावल्याही बेईमान होऊन, पितूर होऊन गळून पडतात कुठंतरी कोसावर… माणसाला नव्या युगानं नुसती गतीच दिली नाही, तर त्याचं विभाजन केलंय. पूर्वी तो जाती, धर्म, पंथ, प्रादेशात विभागला गेला होताच. आता त्याचं विभाजन अन्य असंख्य गोष्टींत झालं आहे. जुन्या जाती कायम असताना त्यांना नवी जातसुद्धा चिकटवली गेलीय. उदाहरणार्थ, पूर्वी सर्व कामगारांची विभागणी दोन घटकांत केली जायची. पांढ-या कॉलरचा आणि निळ्या कॉलरचा श्रमिक. आता कॉलरची संख्या मोजता येत नाही, ती एवढी वाढली आहे, की प्रात्येक जण हातात हात घालून चालण्याऐवजी हात सोडून स्वतंत्रपणे धावू लागला आहे. प्रत्येकाचं एक स्वतंत्र ठिकाण आहे. त्याला तिथंच पोचायचं आहे; पण हे ठिकाणही मृगजळासारखं आहे. माणूस जसा जवळ जाईल तसं हे ठिकाण दूर-दूर जातं. धावताना, पळताना, ठिकाण पकडताना त्याची दमछाक होते. हात सोडून पळण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा त्याच्या संवेदना चहूबाजूला सांडतात. पुढं धावणारा आणि मागून येणारा यांची टक्कर होते. सबल आणि दुर्बलांच्या टकरीत आणि गतिरोधकावरून उड्या मारतानाही माणसं रक्तबंबाळ होतात. काही वेळा त्यांच्यातील माणूसपणही सांडून जातं किंवा तेही जखमी होतं. विखुरलेल्या संवेदनांची माळ त्याच्या गळ्यात घालण्याचं, हरवत चाललेलं त्याचं माणूसपण त्याच्या ओंजळीत टाकण्याचं, त्याच्या जखमांवर मूल्यांची पुंकर घालण्याचं काम साहित्याला करावं लागणार आहे. वाङ्मय म्हणजे मनोरंजनाचंच साधन, वाङ्मय म्हणजे केवळ घडवून घडवून तयार केलेला एक दागिनाच, वाङ्मय म्हणजे कोणीतरी तयार केलेल्या सांगाड्यात गच्च बसवण्याचं साधन या संकुचित कल्पनेतून बाहेर पडायला हवं. जीवन अखंड धावत असतं… वेगवेगळं रूप धारण करून धावत असतं. हे नवं रूप काय आहे? त्याला अस्वस्थ करणारे कोणते नवे विषाणू तयार झाले आहेत, हे पाहण्याचं आणि त्याबाबत जागल्याची भूमिका करण्याचं कामही साहित्याचंच असतं.

वेगवेगळ्या प्राकारच्या विषमतेवर उभ्या असलेल्या समाजात अनेक वेळा माणूस जसा चेहरा हरवून बसतो, तसा व्यवस्था त्याचा चेहरा हिरावूनही घेते. वरची चामडी तर पाडून काढतेच; शिवाय तिच्या मागं लपलेल्या चामड्याचे सर्व पदरही पाडून, कुरतडून काढते. त्याचा इतिहास, भूगोल नाकारते. वर्तमान आणि भविष्य नाकारते. असे बिनचेहऱ्याचे किंवा व्यवस्थेच्या जबड्यात आपला चेहरा गमावून बसलेले कोट्यवधी लोक जगात आहेत. जागतिकीकरणात अशा लोकांची संख्या वाढते आहे. ती कोणी मोजत नाही. स्पधेर्ला मरणाच्या संख्येशी देणंघेणं नसतं; पण साहित्यिकाला मात्र ते असतंच असतं. असावंच लागतं. माणसाला, ‘ तू माणूस आहेस ‘ हे सांगण्याचं काम सर्वांत अधिक करतं ते साहित्यच! जर माणसाला चेहराच नसेल किंवा त्याची स्वत:च स्वत:ला ओळख नसेल तर काय होईल, याविषयी ओशोंनी एक मोठं मार्मिक उदाहरण सांगितलं आहे, ते आपल्यासमोर मांडणं मला उचित वाटतं… तर आरसा सर्वांपर्यंत पोहोचलाच नव्हता तेव्हाची ही गोष्ट. एके दिवशी एका शेतकऱ्याला घरी परतताना एका मळलेल्या वाटेवर एक काचेचा तुकडा सापडला. तो आरशाचाच एक तुकडा होता; पण शेतक-याला ते माहीत नव्हतं. त्यानं त्याच्या सात पिढ्यांत कधी आरसाच पाहिला नव्हता. त्यानं तो तुकडा उचलला. साप केला. आपल्या डोळ्यासमोर पकडला. क्षणभर त्यात पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला तो ओरडला, ‘ कितने दिनों के बाद मिल रहे हो दादाजान! ‘ त्याला दादाजान भेटल्याचा खूप आनंद झाला. तो रोज-रोज हा तुकडा बघू लागला. रोज-रोज ‘ सलाम अलेकूम दादाजान ‘ म्हणू लागला. आपला नवरा खूपच आनंदी दिसतोय म्हणून त्याच्या पत्नीनं एक दिवस त्याला या आनंदाचं रहस्य विचारलं; पण रहस्य वगैरे काही नाही, असं सांगत तो शेतावर निघून गेला. तो गेल्यानंतर तिनं पतीच्या खोलीची झाडाझडती घेतली. तिलाही हाच काचेचा तुकडा सापडला. तिनंही आपल्या डोळ्यांसमोर तो धरला आणि ती जोरात कडाडली, ‘ इस बजारबटू को देखकर वो रोज रोज हसता है क्या? खुश रहता है क्या? ‘ नवरा परतल्यावर तिनं तो काचेचा तुकडा त्याच्या डोळ्यांसमोर पकडला आणि विचारलं, ‘या बजारबटूला बघून तुम्ही रोज रोज हसता काय? ‘ तो म्हणाला, ‘ भलतंच काय, यात तर माझे दादाजान आहेत. ‘ ती म्हणाली, ‘ खोटं आहे, बजारबटू आहे ‘ आणि तो म्हणाला, ‘ दादाजान! ‘ दोघांचं भांडण सुरू झालं. ते मिटवण्यासाठी ते काझीकडं गेले. त्यानंही तो तुकडा पाहिला. त्यालाही आरसाबिरसा काही माहिती नव्हता. तुकडा पाहून तोही गंभीरपणे म्हणाला, ‘ हे पहा मुलांनो, या काचेच्या तुकड्यात ना कोणी बजारबटू आहे, ना कुणाचा दादाजान. खरंच ऐकायचं असलं तर मी सांगतो, की यात माझे स्वत:चे नानाजान आहेत. ‘

ज्याला स्वत:चा चेहराच ओळखता येत नसेल, तर तो स्वत:ला काहीही समजतो. साहित्याचं हे काम आहे, की त्यानं माणसाला त्याचा चेहरा प्राप्त करून देणं. आरसा नीट राहावा म्हणून त्याच्यामागचा पाराही जपणं. महानगर, नगर, खेडी, झोपड्या या साऱ्याच ठिकाणी माणसाच्या चेहऱ्यावरचं वस्तूचं ओझं वाढतं आहे. चेहरा पराभूत होतो आहे आणि वस्तू जिंकते आहे. महानगरातला माणूस सर्वांत सुखी आहे आणि सगळा उजेड त्याच्याच चेह-यावर आहे, असंही समजण्याचं काही कारण नाही. तो पूवीर् आपल्या घराचा पत्ता सांगताना शाळेच्या मागं, बागेच्या पुढं, मंदिराजवळ असं काहीतरी बोलायचा. आता त्याची ही भाषा बदलली. तो आता दंगल झाली होती त्या ठिकाणाजवळ, विटंबना झालेल्या पुतळ्यामागं, बॉम्बस्पोट झाला त्याच्याच पुढं किंवा धर्माचं नाव घेत माणसं कापली गेली त्या ठिकाणी; असं काही तरी सांगतोय. स्वत:च्या घराचा बदललेला पत्ता सांगण्यासाठी अशी ठिकाणं वापरतोय… सशाचं काळीज घेऊन तो जगतोय. कधी नव्हं एवढी एक विलक्षण अस्वस्थता, विलक्षण असुरक्षितता त्याला घेरते आहे. मी माझ्याच एका कवितेत या अस्वस्थ माणसाचं वर्णन करताना म्हटलं आहे, की-

कॅरिबॅगमधून आता

प्रश्न वाहून नेताहेत

इथले सारे लोक

दुधाच्या पिशव्या

फ्रिजमध्ये ठेवाव्यात त्याप्रमाणे

आसवांच्या पिशव्या

फ्रिजमध्ये ठेवून

फिरताहेत इथले सारे लोक

फ्लॅटवर काळीज ठेवून

रस्त्यावर फिरताहेत इथले सारे लोक…

मला वाटतं, या सा-या असुरक्षित जिवांच्या काळजात डोकावणं आणि त्यांची जगण्याची उमेद वाढवणं हे साहित्याचं काम आहे. जेव्हा सारी व्यवस्था सडायला लागते, मूल्यं कुजायला लागतात, आपल्याच सावल्या आपल्याशी बेइमानी करायला लागतात आणि आपलीच आसवं आपल्या डोळ्यांत ठिणग्या बनून बंड करायला लागतात, तेव्हा साहित्यिकांनाच पुढं यावं लागतं. त्यांनी आलंच पाहिजे. त्यासाठी पारंपरिक चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे. जुन्या परंपरा पाळत आपल्याला नवे प्रश्न कळणार नाहीत. मांजराची जुनी कथा सांगत स्क्रीनवरच्या उंदराचा खेळ कळणार नाही. एका क्षणात आपण ‘ डिलीट ‘ का होतोय हेही कळणार नाही. मला वाटतं, या सा – या विषयावर व्यापक चर्चा करण्यासाठी संमेलनासारखं दुसरं व्यापक ठिकाण नाही. आपल्याला धावायचं तर खूप आहे. चालायचं तर खूप आहे; पण हातातील मूल्यं घरंगळत आपल्याच पायांखाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी साहित्य कधी लाल, तर कधी हिरवा झेंडा घेऊन उभं राहतं. कधी जागल्याची भूमिका करतं. माणसाचा शेवट संगणकाच्या नव्हे, तर माणसाच्याच खांद्यावर होईल, याची काळजी घेतं.

जागतिकीकरणाच्या रेट्याचा सर्वात अधिक परिणाम ग्रामीण भागावर होतो आहे, हे मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे, असं वाटत नाही. तेथील साधनसामग्रीवर कुणातरी कंपनीचा, कुणातरी धनदांडग्यांचा हक्क प्रास्थापित होतो आहे. वेगवेगळ्या नावांनी येणारे झोन ग्रामीण भागाला समृद्ध करण्याऐवजी त्यांचं शोषण करत आहेत. पाणी, जंगलं, नद्या, नाले, डोंगर आदी अनेक गोष्टींचं खासगीकरण होत आहे. हंडा, घागरीत भरलं जाणारं पाणी आता बाटल्यांत भरलं जातं आहे. जागतिकीकरणाला टक्कर देण्याची क्षमता गावांत राहिली नाही. गावंच्या गावं स्थलांतरित होत आहेत. शहरातील फूटपाथवर चुली मांडत आहेत. महानगरात भाकरीच्या तुकड्यासाठी बंबाळ होणारी, स्पीडब्रेकरला ठेच लागून पडणारी आणि स्थलांतरित; असा एक शिक्का कपाळावर घेऊन जगणारी माणसं वाढत आहेत. ग्रामीण भागावर आपल्याकडं खूप लिहून झालं आणि लिहिलं जातं आहे. आता ग्रामीण साहित्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर केवळ लिहून चालणार नाही, तर कशामुळे घडत आहेत या आत्महत्या आणि कोणता नवा खलनायक त्या घडवतो आहे, हे शोधायलाही म.फुल्यांनी साहित्य सभेला जसं पत्र दिलं होतं, तसं शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याविषयी इंग्रज मायबापालाही एक पत्र लिहिलं होतं. या देशात जेव्हा जेव्हा महामारी येते, जेव्हा जेव्हा दुष्काळ येतो, महापूर येतो तेव्हा त्यात आपला बळीराजाच का मरतो, असा त्यांचा प्राश्न होता. दुर्दैवानं या प्राश्नाचं उत्तर आपण आतापर्यंत देऊ शकलो नाही. ना सरकारनं ना साहित्यानं दिलं. बळीराजा रोज मरत असल्याच्या काळातही आपण उत्तर देऊ शकलो नाही. पॅकेजचा पाऊस पाडूनही देऊ शकलो नाही. मरणाचे आकडे आपण अचूक मोजतो. मृतदेहाचं वर्णनही अतिशय संवेदनशील होऊन करतो. जागतिकीकरणामध्ये दिसत असलेल्या मरणाचं एक मोठं वैशिष्ट्य असतं आणि ते म्हणजे येथे मृतदेह दिसतात, मरण दिसतं पण ते घडवून आणणारी व्यक्ती किंवा खलनायकी घटक मात्र दिसत नाहीत.शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आतापर्यंत कोणत्या अर्थव्यवस्थेला, घटकाला शिक्षा झाल्याचं किंवा कुणाची खुचीर् गेल्याचंही मला माहीत नाही. ही मरणं अशीच सुरू राहणार आणि मारेकरी नेहमीच अदृश्य राहणार का; हा माझा प्राश्न आहे. याचं उत्तर देण्यासाठी फुल्यांचा आसूड लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिकीकरण ओळखेल आणि अदृश्य खलनायक शोधून काढेल अशा आसूडाची गरज आहे. हे सांगताना मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट नमूद करू इच्छितो आणि ती म्हणजे, आपला विरोध जागतिकीकरणाला नाही, तर त्यानं आणलेल्या नव्या शोषणव्यवस्थेला आणि अदृश्य खलनायकांना आहे. म.फुल्यांनी आपलं एक पुस्तक अमेरिकेतील निग्रो बांधवांना अर्पण करून एका अर्थानं जागतिक पातळीवरील दु:खाशी नातं जोडलं होतं. इथंही मानवमुक्तीची लढाई सुरू होती आणि तिकडं अमेरिकेतही सुरू होती. या दोन महालढायांचं नातं त्यांनी जोडलं होतं. या नात्यांचंच जागतिकीकरण केलं होतं आणि शोषणाला करावयाच्या विरोधाचंही जागतिकीकरण केलं होतं. आपण आपलं कोणतं साहित्य कोणत्या महालढायांना अर्पण करत आहोत? कोणत्या लढायांचं जागतिकीकरण आपल्या साहित्यातून होतं आहे, याचा थोडा तरी विचार करू या. मी जीवनवादी होऊन कलेकडं दुर्लक्ष करतोय, असा त्याचा अर्थ नव्हे. कला जीवनातच निर्माण होत असते आणि जीवनही तितकंच वाहक असतं, असंही मला वाटतंय. याच ठाण्याला पहिले कामगार पुढारी मेघाजी लोखंडे यांची कामगार, श्रमिक चळवळींची परंपरा आहे. सत्यशोधकी विचारांची परंपरा आहे. बंडखोर भागवत शास्त्रींची परंपरा आहे. विशेष म्हणजे म.फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसुडाचं लेखन याच ठाणे जिल्ह्यातील वांगणी या गावी केलं होतं. ही परंपरा ऐकून माझी अपेक्षा बळावलीय.याच परंपरेत होत असलेल्या संमेलनात कोणीतरी माझा भाऊ, बहीण पुढे येईल आणि नवा आसूड तयार करील, असा मला विश्वास आहे. नव्या आसुडाची निर्मिती हेच या संमेलनाचं पलित असेल. चला, नव्या आसुडाच्या निमिर्तीला लागू या. ग्रामीण जीवनाचं वर्णन करणारं आपण भरपूर लिहिलं. ते लोकमान्यही झालं.राजमान्यही झालं. विद्यापीठाच्या बुकातही गेलं. पण, आजचं ग्रामीण वास्तवही मी मांडायचा प्रायत्न करतोय. हे वास्तव खूप वेगळं आहे. पिकं अंगावर घेणा-या जमिनीवरही तर लिहावंच लागेल आणि ती तरारून यावीत म्हणून मातीच्या गर्भाशयात जे रासायनिक प्रायोग केले जात आहेत, त्यावरही लिहावं लागेल. शेतात राबणाऱ्या एका कवयित्रीनं अशी कविता लिहिलीय. पूर्ण पिकण्याआधीच कापली जाणारी कणसं तिला हुंडाबळीसाठी मारल्या जाणाऱ्या बायाबापड्यांसारखी वाटतात. कणसांचा मरणोत्सव वाटतो तिला. इव्हेन्ट साजरा करणाऱ्यांनी हे नवं तंत्र आणलंय. जमीन लवकर निर्मितीक्षम व्हावी, ती लवकर वयात यावी, लवकर बाळंत व्हावी यासाठी जे रासायनिक प्रायोग केले जात आहेत, त्याचंही वर्णन तिनं केलंय. जमिनीचं बाळंतपण झटपट व्हावं, खूप लवकर पिकं यावीत, असं व्यवस्थेला वाटतंय. अकाली बाळंतपण या जमिनीच्या वाट्याला आलंय. ते नको म्हणून आता माझं सीझर कर, अशी विनंती जमीनच करू लागलीय. एक छान पण काळीज हादरून टाकणारी कविता वाचायला मिळाली, याचा आनंद मला वाटतोय. कल्पना दुधाळनं ती लिहिलीय. तिला जागतिकीकरणही कळलं, असं मला वाटतंय. साऱ्यांनीच ते समजून घ्यायला हवं.नुसतं वर्णनात्मक नव्हे, तर संघर्षात्मकही लिहायला हवं. जमिनीचा गर्भ कोणी भ्रष्ट करू नये, यासाठी विषाणू मारणारंही लिहायला हवं.

मी हे जसं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं सांगतो आहे, तसं शहरात राबणाऱ्या माणसांचं आहे. तेही लढून लढून रक्तबंबाळ होत आहेत. त्यांचीही दिशाभूल होत आहे. बर्गरवाले आणि भाकरीच्या शिकारीतच खलास होणारे चेहराहीन, यांच्यातील दरी वाढते आहे. बर्गर आणि भाकरी यांच्यातील लढाईतून हरणारे जसे तयार होतील, तसेच भाकरीसाठी गुन्हा करणारेही तयार होतील. विषमतेवर प्राहार करीत आणि समताधिष्ठित जगाचं एक सुंदर स्वप्न साहित्य तयार करतं. काव्यात्म न्यायाची भाषा करतं. ते स्वातंत्र्यासाठीच्या लढायांमध्येही भाग घेतं. लढाया पेटवत माणसाला जागं करतं. लढणारं साहित्य आजही जगाच्या पाठीवर आहे. जागतिकीकरण समूहाचे तुकडे तुकडे करतं आणि प्रात्येकाच्या चेहऱ्यावर एका खोट्या प्रातिष्ठेची, खोट्या स्वातंत्र्याची, भ्रामक विकासाची चिकटपट्टी चिकटवतं.साहित्यिकांनी ह्या सर्व चिकटपट्ट्या ओरबाडून काढायला हव्यात. माझा मी बरा आहे, अशा भ्रमात त्यानं राहू नये.कारण हे कथित बरेपण अल्पजीवी आहे. आताच त्याचा वेध आपल्या साहित्यिकांनी घ्यावा. आपला समाज आणि आपला लेखक यांच्यात जे तुटलेपण आलंय, त्याची कारणंही शोधायला पाहिजेत. जागतिकीकरणामध्ये माणसाला समूहातून बाहेर काढण्याचा जो एक प्रायत्न असतो, त्याचाही हा एक भाग असू शकतो.क्षीण होत चाललेल्या चळवळी, क्षीण होत चाललेलं शासन, कल्याणकारी योजनांचा बट्ट्याबोळ या सर्वांचाही परिणाम असू शकतो. पण हेही खरं आहे, की या साऱ्या शक्ती क्षीण होतात तेव्हा साहित्यिकाची जबाबदारी पुन:पुन्हा वाढत असते. जागतिकीकरणात जन्माला आलेले, दोन शतकांची घासाघीस होताना जन्माला आलेले आणि नव्या शतकाच्या प्रासववेदनांचे साक्षीदार असलेले; अशा सर्वांची ही जबाबदारी आहे, की त्यांनी जीवनवादी साहित्याच्या पालखीला आपला खांदा द्यावा. नव्या प्रावाहात वाहून जाणाऱ्या, गटांगळ्या खाणाऱ्या माणसाच्या बाजूनं लिहावं.

साहित्याला विचारांची, तत्त्वज्ञानाची मुळं असावी लागतात. वैचारिक साहित्य हे काम वर्षानुवर्षं करत आलं आहे. पायाभूत वाटावं असं हे काम आहे. त्रिकोणातील पाया म्हणजे वैचारिक साहित्य असतं. उरलेल्या कोनाला ते ऊर्जा पुरवत असतं. गेल्या दशकापासून वैचारिक साहित्याचा दुष्काळ आपल्याकडं नजरेत भरावा इतपत जाणवत आहे. गावोगाव विचार करणारी मंडळं असायची. कोल्हापुरात तर अनेक महाविद्यालयांमध्ये प्लेटो क्लब, अॅरिस्टॉटल क्लब, सॉक्रेटिस क्लब मी पाहिले आहेत. भोवतालच्या गंभीर प्राश्नावर चर्चा त्यात होत असे. विद्यार्थ्यांना विचारांकडं झुकवलं जात असे. आता यापैकी काही, महाविद्यालयांत आणि महाविद्यालयांबाहेरही राहिलं नाही. विचार वाहून नेणारी नियतकालिकं आणि अनियतकालिकंही कमी होत आहेत. त्यातून आणि त्याबाहेर झडणा-या चर्चाही कमी होत आहेत. मला वाटतं, विचारांचा आटणारा प्रावाह काही चांगल्या समाजाचं लक्षण म्हणता येत नाही. हे जे मांडलं, ते दृश्य आहे आणि ते का जन्माला आलं, याची कारणंही शोधलीच पाहिजेत. समाजाची वैचारिक भूक का कमी होते आहे आणि कोण ती कमी करतं आहे; हेही अशा संमेलनाच्या निमित्तानं शोधलं पाहिजे. सार्वजनिक व्याख्यानमालांमधूनही वैचारिक, गंभीर विषय हद्दपार होऊ लागले आहेत. गंभीर विषयावर बोलू नका. श्रोते येत नाहीत किंवा एखादा गंभीर बोलतो म्हणून त्याला बोलावलंही जात नाही. लोकांना हे असं गंभीर का नको आहे आणि त्याला हास्य क्लब का जवळचे वाटू लागले आहेत? मी कोणी हास्य क्लबचा विरोधक नाहीय. हसण्याचं महत्त्व मान्य करूनही हा प्राश्न मी उपस्थित करतो आहे. लोकांना खरंच मनापासून हसायचं, की स्वत:ला पसवण्यासाठीही हसायचं हेही तपासायला हवं. तर, मी वैचारिक साहित्यावर बोलत होतो. जागतिकीकरण, नवभांडवलशाही, नव्या स्पर्धा, लोकशाहीचा आणि सरकारचा संकोच, जगण्याचा संकोच आदी अनेक विषयांवर अपवाद वगळता आपल्याकडं अलीकडं पारसं लिहिलं गेलेलं आपल्याला दिसत नाही. वैचारिक साहित्य मागं पडणार असेल, तर मूळ साहित्याचं कुपोषण होईल. राजकारण, शिक्षण, अर्थकारण, पर्यावरण आदी नाना विषयांतून वैचारिक साहित्य फुलत राहिलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे. आता मात्र त्याची न परवडणारी अशी पानगळ चालू आहे. ती थांबवायला हवी. वैचारिक साहित्याची घसरण कुणालाच परवडणारी नसते. त्यामुळे समाज मागंमागं जायला लागतो. साहित्यातही मागंमागं जायला लागतं. वैचारिक साहित्य पुढं जाण्यासाठी ऊर्जा देतं आणि डोळेही देतं.

समाजातील अनेक घटक अजून आपल्या साहित्यात अवतरायचे आहेत. काही प्रातिनिधिक स्वरूपात अवतरत आहेत, तर काही अजून सीमांवर आहेत. अनेक जातींमध्ये शिक्षण पोहोचलेलं नाही. शिक्षणाचा हक्क मिळूनही ते पोहोचलेलं नाही. ज्यांना शिक्षणाची परंपराच नाही असा समूह अजूनही शिक्षणाकडं येत नाही. शिक्षण नाही म्हणून लेखन नाही, असंही घडतं आहे. या सर्वांना शिक्षित करून त्यांच्यात लिहिण्याच्या प्रोरणा निर्माण करायला हव्यात. अंध, अपंग, निराधार, अनाथ, मतिमंद यांच्यापैकी अनेक जण आता लिहिते होत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अनाथही लिहीत आहेत. आपले अनुभव मांडत आहेत. अनाथपण जन्माला घालणाऱ्या व्यवस्थेची चिरपाडही करत आहेत. ऊसतोडणी कामगारावर पुस्तकं येत आहेत. या सर्व अनुभवांचं स्वत:ला मुख्य समजणाऱ्या साहित्यानं स्वागत तर केलंच पाहिजे; शिवाय त्यांना अधिकाधिक प्रोरणा देऊन स्वत:लाच समृद्धही करून घेतलं पाहिजे. विज्ञानकथांकडं आपण अजून निकोप भावनेनं पाहत नाही. विज्ञानकथा म्हणजे कलाहीन, प्रातिभाहीन केवळ तंत्राची जंत्री सांगणाऱ्या असे काहीतरी गैरसमज आपण करून घेतले आहेत. तेही तातडीनं दूर करण्याची आवश्यकता आहे. विज्ञानकथा जशा आवश्यक आहेत, तशा विज्ञानकादंबऱ्या आणि विज्ञानकविताही आवश्यक आहेत. या सर्वांना साहित्य म्हणताना खळखळ करता कामा नये.

राजकारणावरील साहित्याचाही वानवा निर्माण झाला आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता राजकीय विषयावर साहित्यनिर्मिती झालेली नाही. आपण राजकारणाला आणि राजकारण्यांना तुच्छ समजायला लागलो. समाज नासवणारे, कोणीतरी परग्रहावरील ते जीव आहेत, या भावनेनं त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन वाढीस लागला आहे. आम्हाला त्यांचा शेजार नको, अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. मला वाटतं, त्याविषयी मतभेद असू शकतात, होऊ शकतात. आपल्या जीवनाचा एक मोठा भाग राजकारणानं व्यापला आहे. अशा परिस्थितीत हा मोठा भाग आपण पाहणारच नाही. त्यावर लिहिणारच नाही, असं म्हणणं टोकाचं ठरावं. चांगली लोकशाही पाहिजे असेल, तर चांगल्या लोकांबरोबर चांगल्या राजकारण्यांचीही गरज भासते. ते तयार करण्याचं काम, त्याला गती देण्याचं काम समाज आणि साहित्यिक या दोघांचंही आहे. एक प्रचंड मोठं विश्व साहित्यबाह्य करण्यानं साहित्याचीच हानी होईल. राजकारणावरील लेखनाचंही स्वागत केलं पाहिजे आणि साहित्यानंही राजकारणालाही जागा दिली पाहिजे. आपल्याला लाभलेली लोकशाही तपासत राहिलं पाहिजे. ती धनदांडग्यांच्या हातात का जाते आहे? ती विशिष्ट घराण्यांच्याच हातात का जाते आहे? ती मनगटशाहीच्या प्राभावाखाली का जात आहे? खरंच आज जिला आपण लोकशाही म्हणतो, ती लोकशाहीच आहे, की तिची भ्रष्ट प्रातिमा आहे, हे तपासण्यामध्ये साहित्यिकही आघाडीवर असावा लागतो. नव्या समाजाचं, नव्या माणसाचं स्वप्न तोच पेरत असतो. साहित्यिक आणि राजकारणी यांच्या नातेसंबंधावर आतापर्यंत खूप चर्चा झाली आहे. राजकारण्यांच्या प्राभावाखाली राहून लेखन करा असं कोणी म्हणत नाही आणि ते कोणी ऐकणारही नाही आणि ऐकण्याचं काही कारणही नाही. आपापल्या बिंदूवर राहून या दोन्ही घटकांनी परस्परांकडं जरूर पाहायला हवं. एकानं दुस-याला बहिष्कृत करण्याचं काही कारण नाही. आपल्याकडे मगाशी म्हटल्याप्रामाणं राजकारणाविषयी सकस आणि मुबलक लेखन साहित्यात येत नाही. कविता होतात अधूनमधून; पण कथा-कादंबऱ्यांमध्ये त्याला नावालाच जागा मिळत असते. तसं प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात राजकारण असतंच असतं. लोकशाहीत प्रत्येकाला मत असतंच असतं. ते मत म्हणजे एखादी गोष्ट ठरवण्याचा अधिकार आहे, तसं आपापल्या ठायी असणाऱ्या राजकारणाचं ते प्रतिनिधित्वही आहे. साहित्यात हा विषय नको, अमकाच पाहिजे, अमक्यामुळं अमुक घडतं असा वाद बरोबर नाही, असं माझं मत आहे. निरर्थक वाद किती ताणवायचा आणि तो कुठं थांबवायचा, हेही ठरवता आलं पाहिजे. तो कुठं थांबवायचा, हेही ठरवता आलं पाहिजे.

समाजात सुरू असलेल्या आर्थिक बदलामुळे नवे वर्ग किंवा समाजघटक तयार होत आहेत. विस्थापित, धरणग्रस्त, स्थलांतरित, प्रकल्पग्रस्त, सेझग्रस्त वगैरे वगैरे; अशी अनेक नावं सांगता येतील. विस्थापित झाल्यानंतर सामाजिक दर्जांपासून त्याचे अनेक प्राश्न निर्माण होत आहेत. गावात जगता येत नाही म्हणून कायमचं स्थलांतर करणारे, अर्धस्थलांतर करणारे, वेगवेगळ्या कामांसाठी हंगामी स्थलांतर करणारे असे अनेकजण यांच्यात आहेत. सेझविरुद्ध लढणारे आहेत, प्रकल्पानं आपलं गाव गिळू नये म्हणून लढणारे आहेत. स्थलांतर करणा-याचा प्रश्न जगभरातील साहित्यात दिसू लागला आहे. तो आपल्याही साहित्यात दिसायला हवा. हा जो नवा उपेक्षित वर्ग आहे, त्याच्या वेदनांना आपण शब्द द्यायला हवेत. गर्भातच मुलींची होत असलेली कत्तल, नव्या व्यवस्थेनं महिलांचं वस्तूत केलेलं रूपांतर, मोठ्या प्रामाणात जन्मास येत असलेल्या परित्यक्ता असे कितीतरी विषय साहित्यिकांना खुणावत आहेत. भांडवलशाही व्यक्तीला प्रचंड स्वातंत्र्य देत असतं; पण त्याचं प्रायोजन व्यक्तीपासून व्यक्तीला अलग करण्यासाठी, माणसाचीच वस्तू करण्यासाठी असतं. महिला आज नेमकं कोणतं स्वातंत्र्य मिळवत आहेत आणि ती काय गमावते आहे, तिच्या आत्मसन्मानाचं काय होतं आहे, हाही आजच्या आणि उद्याच्या कवितेचा विषय आहे.

केवळ आपल्यालाच नव्हे, तर जगाला भेडसावणारा दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद हे विषय तर अतिशय गंभीर बनत आहेत. आपल्या साहित्यात मोठ्या प्रामाणात ते प्रातिबिंबित होताना दिसत नाहीत. गुजरातमधील हत्याकांड असो, मुंबईवरील हल्ला असो, मालेगावमधील स्पोट असोत, पुण्यावरील हल्ला असो; आपल्या साहित्यिकांनी नेमकी कोणती भूमिका घेतली आणि किती भूमिका घेतली हे आपणच आपल्याला विचारायला हवं. या सर्व परिस्थितीत आपला लेखक भूमिका घेणारच नाही का? मला वाटतं, भूमिका घ्यायला हवी. मूलतत्त्ववादाला विरोध करण्यासाठी आपली लेखणी सरसावून पुढं आली पाहिजे.

आता थोडं मराठीविषयीही बोलू या. मराठी भाषेचं काय होणार? जागतिकीकरणाचा परिणाम तिच्या अस्तित्वावर कसा होणार असे प्राश्न आहेत. संमेलनात आणि संमेलनाबाहेरही आपण त्याचा विचार करतो. शासनालाही साकडं घालतो. मुळात भाषा समाजच जन्माला घालतो. समाजच ती जगवतो आणि समाजच ती विकसित किंवा अविकसित बनवतो. भाषेच्या संवर्धनात शासनाची भूमिका तर असतेच; पण त्याहून समाजाची भूमिका खूप मोठी असते.सरकार या भूमिकेला तांत्रिक मदत करत असतं. समाज म्हणून आज आपण मराठीकडं कसं पाहतो, हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. एखादी भाषा, व्यवहाराची, ज्ञानाची झाली, परिवर्तनाची झाली, की ती सर्व प्रकारचे धोके पचवू लागते. काळाबरोबर ती चालू लागते.व्यवहारात ती मराठी भाषेचा परीघ कसा वाढवता येईल, ज्ञानाचा कोष म्हणून तिच्याकडं कसं पाहता येईल हा विषय सर्वात अधिक महत्त्वाचा आहे. रस्त्यावर चालणारा व्यवहार, रस्त्यावर होत असलेले ज्ञान-विज्ञानाचे स्फोट यांच्याशी आपण आपल्या भाषेचं नातं जोडायला हवं. आपल्या हातात येणाऱ्या मोबाइलचा एक हँडसेट दीडदोन हजार इंग्रजी शब्द आपल्याकडून पाठ करून घेतो. या नव्या शब्दांच्या संस्कृतीत आपल्याला घेऊनही जातो. स्वाभाविकच मातृभाषेचा संकोच व्हायला लागला, असं आपल्याला वाटायला लागतं. खरं तर, लोकजीवनात आणि व्यवहारात रूढ होणारे सारे इंग्रजी शब्दही मराठीनं आत्मसात करायला हवेत. अन्य भाषा तसा प्रायत्न करत आहेत. इंग्रजीनं तर तो कधीच सुरू केला आहे. लोकजीवनात मराठीचा जो वापर होतो आहे, त्याकडं आपण सोवळं नेसून न पाहता तेथील शब्दही मराठीनं आत्मसात करून स्वत:ला समृद्ध केलं पाहिजे. तसं घडायचं असलं, तर प्रामाण-अप्रामाणच्या चौकटी सैल केल्या पाहिजेत. आदिवासी भागातील काही मुली एकत्रित करून आम्ही त्यांना नाशिकमध्ये आणलं होतं. या मुलींनी कधीच आधुनिक उपकरणं पाहिली नव्हती. पंखा सुरू असलेल्या एका हॉलमध्ये त्यांना आणलं. डोक्यावर गरगर फिरणारा पंखा त्या पाहू लागल्या; पण या उपकरणाला काय म्हणावं, त्यांना कळत नव्हतं. पंखा हा शब्द त्यांना माहीत नव्हता. शेवटी एका मुलीनं लागलीच एक शब्द जन्माला घातला. ‘ वर काय आहे? ‘ असं विचारता ती म्हणाली, ‘ भिरभिऱ्या! ‘ जो भिरभिर करतो, तो भिरभिऱ्या. एक नवा शब्द जन्माला आला होता. आता प्रश्न निर्माण होईल, की तो प्रामाण मानायचा, की अप्रमाण? माझ्या गावात माझ्याच गल्लीतल्या एका पोराचं नाव ‘ दुष्काळ्या ‘ असं ठेवण्यात आलं होतं. तीव्र दुष्काळात तो जन्माला आला होता. प्रमाणवाल्यांनी नाम म्हणून स्वीकारायला अमान्य केलं. पोराची टिंगलटवाळी होऊ लागली. असंच एका पोराचं नाव अतिसुंदर होतं. त्याचीही टिंगल झाली. पुढं त्यानंही आपलं नाव बदलून घेतलं; प्रमाण नाव ठेवलं. गुन्हेगारी जगामध्ये तर अनेक पोरांची नावं बंदुक्या, पोलिस्या, रिमांड वगैरे आहेत. आपापल्या पर्यावरणातून ही माणसं नवे शब्द जन्माला घालत असतात. भाषासमृद्धीसाठी अशा सर्व शब्दांचं स्वागत करायला हवं. लोकजीवनातील, बोलीभाषेतील अनेक शब्द आपण प्रामाणभाषेच्या वेशीवरच ताटकळत ठेवले आहेत. त्यांना आत घ्यायला हवं. इंग्रजी शब्द स्वीकारताना ते व्याकरणासह घेतो आहे का, हा विचारही महत्त्वाचा आहे. बस, टेबल, डॉक्टर, कलेक्टर, फॅन, पोन आदी अनेक शब्दांची अनेकवचनं इंग्रजी पद्धतीनं मराठीत करू लागलो, तर मात्र अडचण होईल. तात्पर्य, मराठी समृद्ध करण्यासाठी लोकजीवनाची, बोलीभाषेची, ग्रामी.ण भागाची दारं उघडायला हवीत. ‘ उपाशीपोटी पाणी प्यायल्यावर ते आतड्याला चावतं ‘ असं कुष्ठरोग झालेली एक बाई, मला तिच्या घरात पाणी देताना म्हणाली होती. पाणी आतड्याला चावणं हे मोठं विलक्षण वर्णन आहे. दारिद्र्याला कंटाळून शेतीच करणारी एक बाई शेतीची आणि त्यात रुतलेल्या माणसाची दुर्दशा सांगताना म्हणाली, की ‘ मडं पेरलं की पीक उगवतं! ‘ खूप काबाडकष्ट करायला लागतं, अक्षरश: मरायला लागतं, तेव्हा कुठंतरी पीक उगवतं, हेच तिला सांगायचं होतं. त्यासाठी काळीज पिळवटून टाकणारं विशेषण तिनं वापरलं आहे. आता हे सारे शब्द माझ्या मराठीत उगवतील का, हे मी पाहतो आहे. साहित्यात येऊ घातलेले जे विविध समूह आहेत, तेही आपली भाषा घेऊन येतील. मराठी समृद्ध करतील. म्हणून त्यांना लवकर बोलवा; त्यांचं स्वागतही लवकर करा.

मराठी भाषा संवर्धनात शासनाचीही जबाबदारी आहे. त्यानं त्याचा सारा कारभार मराठीतूनच केला पाहिजे, याविषयी आता कुणाला शंका राहिलेली नाही. सरकारनं जाणीवपूर्वक मराठी शाळा वाढवल्या पाहिजेत. शिक्षणाच्या हक्काची कशीतरी अंमलबजावणी केली एवढाच हेतू त्यामागं असता कामा नये. मुळात सरकारी मराठी शाळा बंद का पडताहेत, त्यामागची सारी कारणं शोधून ती संपवली पाहिजेत. दुसरं म्हणजे स्वत:च्या खर्चातून नव्या शाळा उघडल्या पाहिजेत. शिक्षणातील आनंद वाढवणा-या आणि नव्या ज्ञानाला भिडणा-या त्या असल्या पाहिजेत. विनाअनुदान तत्त्वावर चालणारी शाळारूपी जी अनेक दुकानं आहेत, त्यांची अवस्था कधीतरी गांभीर्यानं पाहिली पाहिजे. मुलं सरकारी शाळेत अन्न, वस्त्र मिळूनही जायला का कुरकुरतात, याचीही कारणं शोधून ती संपवली पाहिजेत. मातृभाषेविषयी प्रोम निर्माण होईल, अशा प्राकारचं अध्ययन करणाऱ्या शाळा असायला हव्यात. त्याविषयीचं नवं धोरणही ठरवायला हवं. इंग्रजीचा किंवा अन्य कोणत्याही भाषेचा द्वेष करून हे सारं करता येणार नाही. इंग्रजीचं अस्तित्व आणि विस्तार समजून घ्यायलाच हवा. उपयुक्तता समजून घ्यायला हवी. आपली मातृभाषा केवळ घरात न अडकता रस्त्यावरूनही डौलात प्रावास कसा करेल, याचा विचार करायला हवा. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत पुस्तकांच्या नेमणुकीपासून फेरविचार करायला हवा. मराठी माध्यमातील मुलांसाठी आणि इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी कोणती मराठी द्यायला हवी, याचाही विचार करायला हवा. सहज, सुलभ आणि भाषाप्रोम वाढवणारी अशी मराठी त्यांच्यासाठी असायला हवी. सध्या आपण कोणती मराठी देतो, याचा ज्यानं त्यानं विचार करायला हवा. मराठीचा विषय म्हणजे शाळा-महाविद्यालयांत अध्ययन करणाऱ्यांचा विषय होऊ नये, तर तो आपल्या सर्वांचा विषय बनायला पाहिजे.

आपल्या दैनंदिन जीवनात मराठी वाढवण्याच्या आणि ती टिकवून ठेवण्याच्या अनेक जागा आहेत. यापूर्वी अनेक अध्यक्षांनी त्यांचा उच्चारही केलेला आहे. दोन मराठी माणसांनी परस्परांत मराठीच बोलायला हवं. आपली सही मराठीत का करू नये? आपल्या सभा-समारंभाच्या निमंत्रणपत्रिका मराठीत का काढू नयेत? ग्रंथखरेदीवरचा खर्च का वाढवू नये? मराठी चित्रपट का पाहू नये? जागतिकीकरणात मातृभाषेकडे गेलो, की अप्रातिष्ठा होते अशा पालतू मानसिकतेतून बाहेर पडायला हवं.

मराठी वाचणारा वर्ग कमी होतो आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. अजूनही महाराष्ट्रात दरवर्षी दरडोई पक्त आठ-बारा रुपयांचीच ग्रंथखरेदी होते. विशेष म्हणजे एकीकडे लिहिणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असताना, वाचणारा वर्ग मात्र कमी होत आहे. शहरातलं हे चित्रच अधिक चिंताजनक आहे. अनुवादित पुस्तकं जास्त खपताहेत. हजारो पुस्तकं बाळगणा-या शेकडो ग्रंथालयांचा सदस्यवर्ग कमी होतो आहे. या ग्रंथालयांना नवे सदस्य मिळत नाहीत आणि दुसरीकडे आहे ते सदस्य टिकवून ठेवणं अवघड होतं आहे. ग्रंथालयसेवकांचे प्रश्नही गंभीर होत आहेत. महाविद्यालयातील बहुतेक वाङ्मय मंडळं मोडकळीस आलेली आहेत. उद्याचा साहित्यिक, उद्याचा वाचक घडवण्यासाठी प्रायत्न होत नाहीत. जे होतात, ते पुरेसे नाहीत. मराठीतून होणाऱ्या वादविवाद किंवा वक्तृत्व स्पर्धांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. वार्षिकात लिहिण्यासाठी नवे विद्यार्थीलेखक मिळेनासे झाले आहेत. मराठी विभागाच्या कार्यक्रमाला अन्य विभागांतील मराठी विद्यार्थी येत नाहीत. आणखी किती कहाण्या सांगाव्यात? मराठी विषयात पदवी घेतली, की आयुष्य वाया गेलं असं का वाटतं आहे, याचा विचार व्यवस्थेनं करायला हवा. विचार करत करत मुळाशी जायला हवं. तेथे तयार होणारी कारणं शोधायला हवीत. नुसतेच छाती बडवून, आक्रोश करून सुटण्यासारखा हा सोपा प्राश्न नाही.

भाषा संकटात आहे, याविषयी कुणाचंही दुमत नाही. प्रश्न आहे तो, ती संकटमुक्त कशी करण्याचा आणि भाषेला जीवनधारेप्रामाणं स्थान देण्याचा. केवळ बौद्धिक चर्चा करून हा प्राश्न सुटणार नाही. सारा समाज आपल्या भाषेबाबत जागृत झाला पाहिजे. त्यासाठीचे कार्यक्रम आपल्याकडे असायला हवेत. जे प्रायत्न सुरू आहेत, त्याला समाज म्हणून पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. आपली मराठी भाषा संचारासाठी नवं तंत्रज्ञान वापरते आहे, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आपल्या कविता, आपल्या कथा कागदाबरोबरच संगणकाच्या पडद्यावर दिसत आहेत. आपले कवीही अशा पडद्यावर परस्परांना भेटत आहेत, गतीनं भेटत आहेत, ही चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे.

आता थोडं आणि गांभीर्यानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्राश्नाविषयी. हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे आणि लाखो मराठी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी आग्रही मागणी आहे. गेली साठ वर्षं अशी मागणी या संमेलनाच्या व्यासपीठावरून होते आहे. बुलंद आवाजात ठरावही होत आहेत. प्रात्यक्षात हा प्राश्न सुटलेला नाही. या प्राश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्रातील एकेकाळची बलदंड लोकेच्छा आणि राजकीय इच्छा आज कमी होताना आपण सर्वच जण पाहत आहोत, ही दुर्दैवी गोष्ट आहे. एखादा प्राश्न दीर्घकाळ भिजत पडला, की उदासीनता यायला लागते, तसं होऊ नये म्हणून लोकमताचा आणि लोकरेट्याचा जागर सातत्यानं सुरू ठेवला पाहिजे. राजकीय शक्तींवर आणि शासनव्यवस्थेवर लोकमताचा दबाव आणला पाहिजे. मला वाटतं, की या प्राश्नावर महाकादंबऱ्या, महानाट्यं आणि सिनेमे जन्माला यायला पाहिजेत. मराठी बांधवांच्या संघर्षाचे पोवाडेही व्हायला पाहिजेत.मी स्वत: ह्या प्राश्नाची होरपळ सहन केलेली आणि पाहिलेलीहीह्म आहे. हा प्राश्न न्यायालयात आहे, हे उत्तर आपण किती काळ देणार आहोत? न्यायालय म्हणजे प्राश्न लोंबकळत ठेवणारी खुंटी होऊ नये यासाठीही पुढाकार घेतला पाहिजे. न्यायालयाबाहेरच्या प्रायत्नांना चालना दिली पाहिजे. भाषकसंवेदना जागी ठेवली पाहिजे. एकीकडे प्राश्न लोंबकळत पडतो आहे आणि दुसरीकडे सीमाभागातील मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा संकोच होतो आहे. तेथील मराठी शाळा बंद पडत आहेत. कशातरी तग धरून राहिलेल्या शाळांची अवस्था वाईट होत आहे. मराठी शिकणारे विद्यार्थी कमी होत आहेत आणि जे मराठीला चिकटून आहेत, त्यांना आपलं भवितव्य काय, असा प्रश्न पडला आहे. संस्कृतीच्या अंगानंही असंच घडतं आहे. मराठी चित्रपट, नाट्य-कला या साऱ्यांची तेथे घुसमट होत आहे. ती थांबवण्यासाठी खूप काही करता येण्यासारखं आहे. समाज आणि शासन दोहोंनी करण्यासारखं आहे. एक म्हणजे, सीमाभागातील मराठी संस्कृतीला चालना देण्यासाठी तेथे चित्रपट, नाटक सातत्यानं होईल, याची काळजी घेतली पाहिजे. मराठी शाळांची दुरवस्था होणार नाही, त्या बंद पडणार नाहीत याची काळजी घेण्याचं महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारला वारंवार सांगायला हवं. मराठी ग्रंथ तातडीनं सीमाभागात उपलब्ध होतील, प्रासंगी सवलतीत उपलब्ध होतील, यासाठी प्रायत्न करायला हवेत. अशीच काळजी एकूण बृहन्महाराष्ट्रात घ्यायला हवी. एक तर, तेथील मराठी बांधवांनी जाणीवपूर्वक मराठी भाषेचं, संस्कृतीचं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जतन आणि संवर्धन केलं आहे. पुढंही त्यांचे प्रायत्न चालूच राहणार आहेत. त्यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र शासन आणि मराठी समाजानं प्रतिसाद द्यायला हवा. हा प्रातिसाद आथिर्क स्वरूपात आणि अन्य स्वरूपातही असू शकतो. पुढं मागं आपल्या मंत्रालयात भाषासंवर्धन आणि प्रासाराचंच पूर्णवेळ काम करणारं स्वतंत्र खातंही सुरू करायला हवं. अन्य अनेक राज्यांनी या गोष्टीस खूप प्राधान्य दिलं आहे. मला वाटतं, आपण याबाबतीतही थोडं मागंच आहोत. मराठी माणसांनी सांस्कृतिक कार्यक्रम तयार करून बृहन्महाराष्ट्रात सातत्यानं पाठवावेत. त्यांच्याबरोबर ग्रंथही असावेत. लोकसाहित्य, लोकनाट्य, ललित कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद, काव्यवाचन, कथाकथन यांसारखे उपक्रम बाराही महिने बृहन्महाराष्ट्रात चालतील अशी व्यवस्था करायला हवी. शासनानं त्यासाठी आथिर्क पाठबळ उपलब्ध करून द्यायला हवं. महाराष्ट्रात भाषा, संस्कृती यासाठी काम करणाऱ्या शासकीय समित्यांमध्ये एक तरी प्रातिनिधी महाराष्ट्राबाहेरचा घ्यावा. तो साहित्य संस्कृती मंडळातही असावा. विश्वकोषातही असावा. पाठ्यपुस्तकनिर्मिती मंडळातही असावा. बृहन्महाराष्ट्रातील माणूस अतिशय निष्ठेनं मराठी भाषा टिकवण्याचा प्रायत्न करतोय. आता गरज आहे, ती महाराष्ट्रानं त्याला विधायक साथ देण्याची.

मी सर्वांनाच आवाहन करतोय, महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधवांच्या प्रायत्नांना पाठिंबा देण्यासाठी. एखादा ठोस कार्यक्रम तयार होईल, यासाठी आजपासूनच प्रायत्न करावेत. शासन, समाज, साहित्य महामंडळ यापैकी कोणीही त्यासाठी पुढाकार घेऊ शकतं. महाराष्ट्र महोत्सवापासून ते लोककला, ग्रंथ, संस्कृती महोत्सवापर्यंत अनेक कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरच्या बांधवांसाठी आयोजित करता येतील. मराठी भाषा महाराष्ट्रात टिकवण्याची आणि वाढवण्याची जशी गरज आहे, तशी ती महाराष्ट्राबाहेरही आहे. परिस्थिती कशीही असली, तरी भारतात सर्व प्रादेशिक भाषांमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी एक प्रामुख भाषा मराठीसुद्धा आहे. हे सुखद वास्तव आहे. प्राश्न आहे तो, ते टिकवून ठेवण्याचा. वाढवत नेण्याचा. तिच्यासमोर येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याचा… मला वाटतं, मी खूपच बोलत राहिलो. आपल्या भोवताली असलेल्या धगधगत्या आणि कोलमडणा-या सर्वच प्रकारच्या पर्यावरणाविषयी बोलत राहिलो. खूप खूप अपेक्षा व्यक्त करत आपल्याशी संवाद साधत राहिलो…मी नव्या युगाचा, नव्या जगाचा आणि जग बदलण्यासाठी प्रायत्न करणाऱ्यांचा एक प्रातिनिधी आहे. जग बदलावं, इथली व्यवस्था बदलावी याविषयी सर्वांत जास्त घाई मलाही आहे. बोलत राहू या. काही करत राहू या. सर्व प्राकारचे भेदाभेद ओलांडून जाण्यासाठी साहित्याची मदत घेऊ या. तसं साहित्य तयार करू या. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.

सौजन्य – लोकसत्ता

कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. शरद पाटील हे अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व असून त्यांनी इतिहासाकडे अत्यंत वेगळ्या व चिकित्सक दृष्टीने पाहून अत्यंत विचारप्रवर्तक अशी पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेल्या ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की – गायनॉक्रसी अँड मॉडर्न सोश्ॉलिझम, खंड – ४’ या पुस्तकाचे गेल्या महिन्यात प्रकाशन झाले. हे पुस्तक मौजाई प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. कॉ. शरद पाटील यांच्या या तसेच अन्य ग्रंथांतील संदर्भ देत मधु शेटय़े यांनी प्राचीन भारत, तेथील परंपरा, समाजरचना व मार्क्‍सवादी विचारधारा यासंबंधी विवेचन केले आहे. त्यातील मातृसत्ताक पध्दतीबद्दलची मांडणी थोडक्यात येथे देत आहोत.

भारताचा समाजवादी लोकशाहीचा स्वतंत्र मार्ग असू शकतो का? सोव्हिएत युनियनचे पतन, चीन आणि इतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी भांडवलदारी मार्ग स्वीकारल्यामुळे या समस्येवर जगभरच्या कम्युनिस्टांमध्ये विपुल चर्चा झाली आहे आणि होत आहे.

जागतिक साम्राज्यवादी भांडवलशाहीच्या अरिष्टाची चर्चाही होत आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे भांडवलशाही व साम्राज्यवादी पर्याय कुंठित झाले आहेत. भारतातील दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे राजकारण कोंडीत सापडून पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यांतून त्यांची सत्ताही संकटात सापडली आहे. अशा अरिष्टग्रस्त परिस्थितीत भारतातील समाजवादी लोकशाही क्रांतीचा मार्ग काय असावा यांवर ठाम मार्गदर्शक दार्शनिक ऐतिहासिक कामगिरी सत्यशोधक मार्क्‍सवादी कॉ. शरद पाटील यांनी आपल्या ‘दास क्षुद्रांची कामगिरी’पासून ते ‘आदिम साम्यवाद, मातृशासन, स्त्री सत्ता आणि आधुनिक समाजवाद’ याच्या चार खंडांतून तसेच अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, सामंती सेवकत्वाचा प्राचीन इतिहास विकसित करून जे सर्जनशील प्रतिभावंत कार्य केलेले आहे ते भारताच्या आधुनिक समाजवादी पर्यायांमध्ये अभूतपूर्व म्हटले पाहिजे. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी या स्वयंप्रज्ञ नेत्याला त्यांच्या स्वतंत्र संशोधनाला मदत तर राहोच पण बहिष्कृत करावे यात प्रस्थापित कम्युनिस्टांचा अध:पातच उघड आहे. नवा माणूस विकसित कसा करावा अशी समस्या आजवर डाव्या आंदोलनातील विचारवंतांच्या विवंचनेचा विषय होता. पण त्यासाठी प्राचीन भारतातील समाजव्यवस्थेच्या मुलगामी संशोधनाचीच ऐतिहासिक नितांत गरज होती. ती भरून काढण्याचा निर्धार करुन कॉ. शरद पाटीलांनी जे संशोधन मांडले आहे त्यासाठी त्यांना दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या बाहेर पडून आदिवासी, ग्रामीण विभागात मार्क्‍सवादी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करावी लागली. त्याचप्रमाणे प्राच्य विद्येची संस्कृत, मागधी, पाली इत्यादी भाषांतून दोन तपाहून खास अभ्यासपूर्वक संशोधन करून त्यांनी ही मांडणी केली आहे.

कार्ल मार्क्‍स ने ‘भांडवल’च्या पहिल्या खंडात क्रयवस्तूंचे विश्लेषण मांडले आहे. मार्क्‍सच्या सहकाऱ्यांनी  ते सोपे करून मांडण्याची सूचना केली. त्यावर मार्क्‍स म्हणतो की, शास्त्राला सोपे करणारा राजमार्ग नाही. कॉ. शरद पाटील म्हणतात की, अकोला जेलमध्ये कॉ. बी. टी. रणदिवे यांना त्या प्रकरणावर माझे टिपण दिले होते (१९६२-६३). पण कॉ. रणदिव्यांकडून त्यावर स्पष्टीकरण आलेच नाही. शरद पाटील हे मार्क्‍सवादी पक्षातून राजीनामा देऊन बाहेर पडले व मार्क्‍सवादी पक्षाकडून बहिष्कृत झाले. १९७८ साली त्यांनी ‘सत्यशोधक मार्क्‍सवादी पक्ष’ आदिवासी भागात स्थापन केला.

मार्क्‍सने ‘भांडवल’ ग्रंथात भांडवलशाही जगातील अंतर्विरोध दाखविले आणि ते इतक्या विकोपाला जातील की भांडवलशाही कोसळेल असे भाकित मांडले. शरद पाटील हे कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील मुख्य कचेरीत स्टाफ आर्टिस्ट होते. त्याच सुमाराला राहुल सांकृत्यायन मुंबईत हिंदी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करीत असताना (१९४६-४७) राहुलजींनी भारतीय मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात येण्याची विनंती आपल्या भाषणात केली. पण दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रांमध्ये आम्ही वाचले की राहुल सांस्कृत्यायन यांची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोव्हिएत युनियनमध्ये शेतीच्या सामुदायिकीकरणातून संकट निर्माण झाले होते आणि अन्नधान्याची आयात करावी लागली. विज्ञानात जेनेटिक्सची संभावना भांडवलदारी विचार करण्यात आली. आयकॅन पावलोव्ह (१८४९-१९३६) याला सिग्मंड फ्रॉईडपेक्षा श्रेष्ठ ठरविण्यात आले. ब्रिटिश मार्क्‍सवादी साहित्यिक व समीक्षक ख्रिस्तोफर कॉडवेल याने फ्रॉईडच्या नेणीवेच्या सिद्धांताचा पुरस्कार केला असताना कॉडवेललाही नाकारण्यात आले कारण त्यामुळे मार्क्‍सवादी व कम्युनिस्टांच्या मार्क्‍सच्या एकप्रवाही ज्ञानशास्त्राला आव्हान मिळत होत. अशा पध्दतींमुळेच  सोव्हिएत युनियन तत्वज्ञानात ठोकळेबाज राहिले आणि मार्क्‍सवादी आणि कम्युनिस्ट हे आजही तीच री ओढत आहेत. अखेरीस पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी संकटग्रस्त डाव्या आघाडीच्या कटू अनुभवातून गेल्यावर (५ जानेवारी २००८ रोजी) वैफल्याने समाजवाद अव्यावहारिक आहे आणि बुद्धदेव भट्टाचार्याना पाठिंबा देताना भांडवलशाहीचे समर्थन करण्यापर्यंत मजल मारली.

प्राथमिक साम्यवाद, मातृशासन आणि स्त्रीसत्ता हे प्रकरण तर समाजशास्त्रज्ञांसाठी (भारतातील) मोठेच कोडे आहे. शरद पाटील यांनी पाश्चिमात्य बिफ्रॉ, मॉर्गन यांचे संशोधन भारताला कोठे लागू पडते त्याची उदाहरणे तर दिलीच आहेत पण भारतीय संदर्भात आद्य व्याकरणकार संकटायनापासून पाणिनीपर्यंत भाषातील धातूशास्त्रापासून मातृशासन आणि स्त्रीसत्ता ही साऱ्या जगातील सर्वात प्राचीन व्यवस्था भारतातच नव्हे तर जगातील भौगोलिक खंडातून किती प्रभावी होती व तीतूनच स्वातंत्र्य, समता आणि मित्रत्व ही तत्कालिन समाज व्यवस्थेची तत्व यांचे विश्लेषण नव्याने मांडले आहे. उदाहरणार्थ, गण समाज हा स्त्रीसत्तेचाच होता. नंतर ‘कुल’ आणि ‘ज्ञाती’ यांची समिती पुरुषांनी स्थापन केली. भारताप्रमाणेच चीनमध्येही तशीच व्यवस्था मातृशासित ‘मोसुओइस्ट’ होती. महायान बुद्धिझम (इ.स.वि. १०० शतकापुढे) भारतीय बुद्धिझम शिकण्यासाठी तिबेटच्या लामांनी नालंदामध्ये महाविहारातून त्याची मांडणी केली होती. बुद्धिस्ट यात्रेकरू आंध्रमधील श्रीशैल या धर्मस्थानातून यात्रा करीत कारण ते स्त्रीराज्य होते. स्त्रीसत्तात्मक तांत्रिझमचे त्या काळात प्रभावी स्थान होते. त्यांनी चीनला गेल्यावर चीनमधील दिग्नाग विचारपीठाची स्थापना केली आणि नेणीवेच्या संकल्पनेचा बोध आणि शोध सुरू केला.

चीनमधील ‘मोसुओइस्ट’ यांना ते मातृशासित असल्यामुळे सर्वोच्च स्थान आहे. त्यांची लोकसंख्या ३० हजार असून ते युनान आणि सिचुआन या प्रांतांच्या सीमेवर राहातात. त्यांची स्वतंत्र भाषा असून तिची लिपी नाही. उत्तर आफ्रिकेत काबाईल  प्रदेशात मातृसत्ताक वस्ती आहे. इटलीमध्ये एट्रस्कॉन वस्तीतही मातृसत्ताक धर्तीवरची लैंगिक समता आहे. पॅसिफिक महासागरातील वनाटीनाईज वस्तीमध्ये मातृसत्ताक पद्घती आहे. केरळमध्ये मल्याळी लोकांत मातृसत्ताक शासन मौर्यकालापर्यंत होते हे शरद पाटलांच्या पूर्वीच्या दासशूद्रांच्या गुलामगिरीच्या खंडात विस्तृतरित्या दिले आहे. इंडोनेशियामध्ये पश्चिम सुमात्रा प्रदेशात आजही ‘मिनांगनॉस’ या प्रदेशात मातृसत्ताक समाज आहे. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिमेकडील प्रदेशात प्युब्लोज, होपीज आणि झुनीस या प्रदेशातील भागात मुलांना जन्म देणारी म्हणून स्त्रीदेहाला धार्मिक पावित्र्य मिळते. मनुष्यजन्म आणि शेती उत्पादन ही आदिम समाजात सर्वश्रेष्ठ माया (जादू) समजली जाते. या प्रदेशात स्कसंबंधांमुळे माता स्त्री कुळांना गणांचे स्वरूप देते. गण हे तांत्रिकी श्रुतीचे अपत्य आहे, वैदिकी नव्हे. युरोपात सोआमी जमातीत आजीची सत्ता असते. उत्तर आफ्रिकेत त्वारेगल (पश्चिम सहारा) ही मातृशासित जमात आहे आणि स्त्रियांपुरतीच शिक्षणाची तरतूद मर्यादित आहे. पश्चिम आफ्रिकेत गिनी बिसॉ येथे महिलाच कुटुंबप्रमुख आहे. या प्रदेशातील हौसा भागात १७ राज्यांच्या घराण्यांची सत्ता होती. तसेच टोगोमध्ये व्यापार महिलांच्या हाती आहे. अरबांमध्ये दक्षिण अरबस्तानातील कृषी प्रदेशात अभिजात स्त्रीसत्ता नांदत होती. महंमदी धर्मापूर्वी तेथील स्त्रियांना नवरा निवडण्याचे स्वातंत्र्य होते तर येमेन हे स्त्रीसत्ताकच होते. उत्तर अमेरिकेत विवाहित स्त्रियांना मालमत्ता मालकीचा अधिकार होता. आणि वारसाहक्क स्त्रियांमार्फत प्रस्थापित होई. कॅनडामध्ये मोन्टमनेन-नस्कापी  येथे स्त्रियांना समाजात श्रेष्ठ मान होता. उत्तर अमेरिकेत मातृशासित समाजात स्त्रिया आपले प्रतिनिधी पंचायतीत निवडून देत. स्त्रिया कुळप्रमुख समजल्या जात. स्त्रियांच्या कौन्सिलमधील प्रतिनिधींतून युद्धप्रमुख स्त्रीला प्रिय महिला अशी उपाधी होती. प्वेब्लोमध्ये स्त्रियांच्या संतती उत्पादकतेमुळे त्यांना सर्वश्रेष्ठ मानमरातब मिळत होता. झुनी प्रदेशात धर्मात प्रवेश करण्याचा अधिकार महिलांना होता. ते जमिनीला आई मानीत, तिच्यातील धान्याला बालके समजत आणि शिकारीच्या जनावरांना पितृस्थानी मानीत. स्त्रियांना जगातील मध्यवर्ती स्थान असे. नवडो प्रदेशातील संस्कृती मातृसत्ताक आहे. तेथे स्त्री सत्तेवर असून स्वतंत्र आहे.

संदीप वासलेकर, सौजन्य – लोकसत्ता

भारताने भविष्याला सामोरे जाण्यासाठी कोणती दिशा निवडायची? आपल्याला नक्की काय व कसे साध्य करायचे आहे? कोणता देश वा कोणती पद्धती आदर्श मानता येईल? हे व अशा प्रकारचे प्रश्न आजच नव्हे, तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून विचारले जात आहेत. आजही काहींना वाटते, की भारताने महासत्ता व्हावे. काहींच्या मते तर आपण २०२० साली महासत्ता होऊनसुद्धा! पण महासत्ता होऊन तरी काय करायचे? महासत्ता होण्यासाठी अक्राळविक्राळ लष्करी सामथ्र्य, अण्वस्त्रे- क्षेपणास्त्रे आणि आक्रमकता असावी लागते. मग भले कोटय़वधी लोक भुकेकंगाल, मागासलेले आणि उजाड झालेले का असेनात! काहींना वाटते आपण बलाढय़ ‘हिंदू राष्ट्र’ व्हायला हवे तर काहींना वाटते भारताने समाजवादाचे स्वप्न साकार करावे. अशा अनेक कल्पना.. संदीप वासलेकर, अशी कोणतीच दिशा सांगत नाहीत, कारण ते ‘एका दिशेच्या शोधात’ आहेत. याच नावाचे त्यांचे पुस्तक लवकरच ‘राजहंस प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. वासलेकरांचा अभ्यासाचा आणि जगप्रवासाचा, चिंतनाचा आणि संशोधनाचा विषयही तोच आहे, जवळजवळ सर्व जग एकदा नव्हे तर अनेकदा जवळून पाहिलेल्या वासलेकरांचा ध्यास आहे तो भारतच एक आदर्श देश व्हावा हा! पण तो ‘आदर्श’ व्हायचा तर जगातील अनेक देशातील आदर्श पद्धती, तसे चारित्र्य, तसा व्यवहार, तसा समाज निर्माण करावा लागेल. आज जगातील कोणताच देश सर्वार्थाने आदर्श नाही, पण अनेक देशांमधल्या काही बाबी अनुकरण कराव्या अशा आहेत. त्या एका शोधयात्रेतून वाचकांसमोर ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण ठरवायचे आहे, दिशा कोणती? वासलेकर ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’ (एसएफजी) या ‘थिंक टँक’चे संस्थापक आहेत आणि जगातील अनेक सरकारांचे सल्लागारही आहेत. त्यांच्या मते भारताकडे अनेक अंगभूत गुण व सुप्त सामथ्र्य आहे; साधनसामग्री व बौद्धिक उंची आहे आणि तरीही आपण गरीब आहोत, अविकसित आहोत, तसेच उपेक्षितही आहोत! गेल्या काही दशकात आपण अर्थकारण आणि हाय-टेक, लोकशाही आणि आधुनिकता यात बरेच काही साध्य करूनही मंजिल अब भी दूर है! तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेल्या ‘दिशेच्या शोधा’तील एका प्रकरणातील काही भाग..

अमेरिकेत वा अन्य देशांत स्थायिक होण्यासाठी फिरणारी, स्वत:च्या देशाबद्दल नाऊमेद व उदासीन असणारी, गरिबीने लाचार होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी, पैशाने श्रीमंत व सत्तेने महान असलेली पण अपरिपक्व अशी मंडळी ज्या समाजात आहेत, तोच समाज मागासलेला राहतो. आपणाला प्रगत व्हायचे आहे, की मागासलेले राहायचे आहे, हे त्या त्या समाजातील लोकांनी स्वत:च ठरविले पाहिजे. (कॅनडात माझा एक मित्र आहे. त्याचे नाव जीम बाल्सीली. सुप्रसिद्ध ‘ब्लॅकबेरी’ ही फोन व दळणवळण सेवा जीमने निर्माण केली. ती अल्प काळात लोकप्रिय झाल्यामुळे चाळीशीतले जीम बाल्सीली अब्जाधीश झाले आहेत. जीम यांनी अब्जाधीश होऊनही आपले छोटेसे वॉटर्लू गाव सोडलेले नाही. त्यांना न्यूयॉर्क अथवा टोरँटोमध्ये स्थलांतर करणे सहज जमले असते; पण त्यांनी वॉटर्लू या छोटय़ा गावी राहूनच आपला पसारा वाढविला, गावाची भरभराट केली. तिथल्या विद्यापीठांना खूप मोठी देणगी देऊन तरुण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांवर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन केली. त्याशिवाय ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांवर उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी एक नवीन केंद्र स्थापन केले. या दोन संस्थांमध्ये जगभरातील पंडितांना बोलाविले व छोटय़ा वॉटर्लू गावात राहून अभ्यास, लिखाण  संशोधन करण्यासाठी खूप मोठे पगार दिले.

जीमचे हे कार्य पाहून त्यांच्या भागीदाराने पदार्थविज्ञानावर मूलभूत संशोधन करणारी संस्था वॉटर्लू गावात स्थापन केली. तिथे जगातून अग्रगण्य शास्त्रज्ञांना बोलाविले. जीमला व त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मुलांचा विवाह शतकातील सर्वात मोठा सोहोळा करण्याची महत्त्वाकांक्षा नसून त्यांना आपले छोटेसे गाव जगातील एक प्रमुख संशोधन केंद्र बनावे, अशी इच्छा आहे आणि त्यासाठी ते पैसा खर्च करीत आहेत.

इस्राएलमध्ये स्टेफ वर्थहाइमर हे सर्वात प्रमुख उद्योगपती आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के उत्पन्न ते त्यांच्या उद्योगात निर्माण करतात. जगप्रसिद्ध वॉरेन बफे त्यांचे अलीकडे भागीदार झाले आहेत. स्टेफना राजधानी तेल अवीव किंवा युरोप-अमेरिकेत धंदा करता आला असता; परंतु त्यांनी इस्राएलच्या मागासलेल्या उत्तर भागात उद्योगनिर्मिती केली आहे. हा विभाग लेबेनॉनच्या सीमेवर आहे. युद्ध झाल्यास स्टेफच्या उद्योगांना धोका आहे; परंतु त्यांचे राष्ट्रप्रेम व मागासलेल्या भागातील युवकांना संधी देण्याची तळमळ एवढी मोठी आहे, की स्टेफना क्षेपणास्त्रांची पर्वा नाही. त्यांच्या कंपनीत रोबोट ऊर्फ यंत्रमानव बराचसा कारभार पाहतात. त्याशिवाय त्यांनी टेफेन औद्योगिक केंद्र निर्माण केले आहे. तिथे होतकरू तरुण उद्योजकांना जागा व सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. इतकेच काय  विरंगुळा मिळावा म्हणून आर्ट गॅलरी व संग्रहालयेदेखील केली आहेत.

याशिवाय त्या औद्योगिक केंद्रात स्टेफनी औद्योगिक शाळा उघडल्या आहेत. तेथे १४ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांना उद्योगनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. शिवाय संशोधन केंद्रात सुमारे १८०० इंजिनीअर काम करतात. मी ज्या वेळेस टेफेन औद्योगिक केंद्राला भेट दिली, तेव्हा स्टेफ स्वत: चार तास माझ्याबरोबर प्रत्येक विभागात आले होते; पण कोणत्याही कामगाराने काम सोडून त्यांच्याकडे पाहिले देखील नाही, की कोणत्याही शिपायाने मोठय़ा साहेबांना सलामही ठोकला नाही..

ऑस्ट्रेलियाचे उद्योगपती स्टीव्ह किलेलिया यांनी एक अतिशय यशस्वी सॉफ्टवेअर कंपनी उभारली आहे ते अब्जाधीश झाले. मग त्यांना समजलं, की एक अब्ज काय व दहा अब्ज काय, सर्व सारखेच. म्हणूनच स्वत: स्टीव्ह आपली बरीचशी संपत्ती आफ्रिकेत उपासमारीने बळी जाणाऱ्या गरीब लोकांना जीवदान मिळावे, यासाठी खर्च करतात. शेतीसुधार, पाणीपुरवठा, आरोग्य योजना या प्रकल्पांमध्ये ते मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यांनी काही कोटी डॉलर्स ‘जागतिक शांतता’ या विषयात संशोधन करण्यात खर्च केले आहेत. त्यांची मुले साध्या नोकऱ्या करतात आणि त्याही त्यांच्या कंपन्यांमध्ये नव्हे, तर शाळेत व इतर संस्थांमध्ये.

जॉर्ज सोरोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांनी आपली सारी संपत्ती जगात सर्वत्र व्यक्तीस्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी खर्च केली आहे. त्याशिवाय जागतिक शांततेचे काम करणाऱ्या ‘इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप’ या संस्थेची उभारणी करण्यासाठीही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर अर्थसाहाय्य केले आहे. या ग्रुपमध्ये १५० संशोधक काम करतात. जगातील ज्या भागात हिंसा असेल, त्या भागाचे ते अवलोकन करतात व दरवर्षी सुमारे शंभर अहवाल प्रसिद्ध करतात.

व्हर्जिन अटलांटिक या विमानसेवेचे संस्थापक व व्हर्जिन म्युझिक या उद्योग समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी ‘दि एल्डर्स’ म्हणजे ज्येष्ठ मंडळी अशी एक संस्था निर्माण केली आहे. त्याची स्फूर्ती त्यांना नेल्सन मंडेलांकडून मिळाली. या संस्थेत दक्षिण आफ्रिकेतील नोबेल पारितोषिक विजेते बिशप डेस्मंड टुटू, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर, भारतातील ‘सेवा’ या संघटनेच्या संस्थापिका इला भट, युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान, आर्यलडच्या माजी राष्ट्राध्यक्षा मेरी रॉबीनसन्स आदी प्रभृती मंडळी आहेत. जागतिक समस्या सोडविण्यासाठी वृद्ध व अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन मिळावे, अशी त्यामागची भूमिका आहे. रिचर्ड ब्रॅन्सन स्वत:च्या व मित्रांच्या खर्चाने या ज्येष्ठ मंडळींच्या बैठका घेतात व प्रसारमाध्यमांद्वारा त्याचा आवाज जगभर पोहोचवितात.
स्टिव्ह किलेलिया यांनी ‘जागतिक शांतता निदेर्शाकाची स्थापना केली. ते दरवर्षी लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’ वृत्तपत्राला भरघोस देणगी देतात. त्या पैशाने जगातील सर्व देशांचा अभ्यास केला जातो व प्रत्येक देशात शांतता किती आहे, याचे अनेक निकष लावून चाचणी केली जाते. दरवर्षी मे महिन्यात एक अहवाल प्रसिद्ध होतो व त्यात जगातील सर्व देशांचे शांततेनुसार क्रमांक जाहीर होतात.

सुप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स व वॉरेन बफे यांनी आपली सारी संपत्ती सामाजिक कार्यासाठी वाहिली आहे, हे सर्वाना माहिती आहे. रिचर्ड ब्रॅन्सन, स्टिव्ह कलेलिया, जॉर्ज सोरोस, जीम बाल्सीली हे उद्योगपती जागतिक शांततेसाठी गुंतवणूक करतात. त्यात त्यांचा स्वत:चा, समाजाचा देशाचा अथवा त्यांच्या उद्योग समूहाचा काहीही फायदा नसतो. जागतिक पातळीवर विचार करण्यासाठी व्यापक इच्छाशक्ती व वैचारिक उंची असते. हे लोक केवळ पैसा गोळा करण्यामागे, नट-नटय़ांच्या मेजवान्या आणि क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात वेळ व संपत्ती वाया घालवत नाहीत, तसेच बाकीचे उद्योगपती चमकतात म्हणून स्वत:ही प्रसिद्धीमागे धावत नाहीत तर सारे विश्व हे एक शांततामय व्हावे म्हणून मनस्वीपणे प्रयत्न करतात. त्यामुळे प्रसिद्धी त्यांच्यामागे धावत जाते. या कार्यासाठी फारसा खर्च लागत नाही, तर एक जागतिक पातळीवर विचार करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. जे उद्योगपती फक्त डोळे मिटून भौतिक यशामागे धावत सुटतात. त्यांना हे जमणार नाही.

हान्स एकदाल हे भारतावर प्रेम करणारे उद्योगपती एका बहुराष्ट्रीय कंपनीचे अध्यक्ष होते. सुमारे ७० देशांत त्यांचा कारभार होता. एकदा माझ्याबरोबर कॉफी पित असताना, फोनवर बोलता बोलता न्यूझीलंडमधील एक कंपनी त्यांनी विकत घेतली. ते एका साध्या घरात राहतात. कधी ‘पेज थ्री’वर येण्याची ते धडपड करीत नाहीत. त्यांची पत्नी सर्वसाधारण महिलांप्रमाणे नोकरी करते. मुलाने अनेक प्रयत्न करून, वडिलांचा कुठलाही वशिला न लावता कशीबशी नोकरी मिळवली. मी त्यांना त्यांच्या साध्या राहणीविषयी विचारले, तर त्यांनी मला टॉलस्टॉयची लिहिलेली एक कथा ऐकवली.

ती अशी, ‘‘एक शेतकरी होता. त्याला कोणीतरी सांगितले, की बाजूच्या गावात जमीन खूप सुपीक आहे. तिथे जमीन घेतली तर तुला खूप कमाई होईल. शेतकऱ्याने तसे केले. काही दिवसांनी त्याला दुसऱ्या काही गावांची माहिती मिळाली. तिथेही त्याने जमीन घेतली. तो अजून श्रीमंत झाला. असे करता करता तो एका गावात आला. तिथला पाटील त्याला म्हणाला, सूर्यास्तापर्यंत या गावाला तू पूर्ण फेरी मारलीस तर तुला सर्व जमीन फुकटात मिळेल; पण फेरी पूर्ण केली पाहिजे. शेतकरी जोरात धावला. त्याला शक्य होईल तेवढी मोठी फेरी मारण्याची त्याची इच्छा होती. जसजशी संध्याकाळ होत आली तसा तो फेरी पूर्ण करण्यासाठी वेगाने धावू लागला. सूर्य क्षितिजावर अस्तास जात असताना त्याची फेरी पूर्ण होऊन तो अनेक मैल जमिनींचा मालक झाला; पण त्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली अन् तो धापा टाकत कोसळला व मृत्युमुखी पडला. ग्रामस्थांनी त्याला ६ बाय २ फुटाचा खड्डा खणून पुरले. त्या वेळी पाटील म्हणाले, खरे तर त्याला फक्त एवढय़ाच जमिनीची गरज होती..’’

पूर्वी भारतातही श्रीमंत उद्योगपती सामाजिक कार्यासाठी संपत्तीचा उपयोग करीत. टाटा समूहाने मुंबईत कॅन्सर, पदार्थविज्ञान व समाजशास्त्र या तीन विषयांत संशोधन करणाऱ्या संस्था स्थापन केल्या. त्याशिवाय इतरही अनेक संस्थांना सढळ हस्ते मदत केली. बिर्ला समूहाने पिलानी येथील अभियांत्रिकी शिक्षणसंस्था, मुंबईतील क्रीडा केंद्र व अनेक इस्पितळे आणि मंदिरे यांना मदत केली; पण हा सर्व भूतकाळ झाला. अलीकडे बजाज उद्योग समूहाने सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. ते मुंबई

विद्यापीठात नवीन विभाग उघडण्यासाठी भरघोस मदत करतात; पण अजिबात प्रसिद्धी मिळवत नाहीत. संगणक व्यवसायातील ‘विप्रो’ व ‘इन्फोसिस’ या दोन व्यवसायांनी शैक्षणिक संस्थांना हातभार लावला आहे; पण हे झाले अपवादात्मक. गेल्या २५-३० वर्षांत मानवी समस्यांवर संशोधन करणारी एकही संस्था खासगी मदतीने उभी राहिली नाही. याउलट मेजवान्या, क्रिकेटचे सामने, फॅशन शो व जिथे स्वत:ची जाहिरात करता येईल, अशा गोष्टींसाठी मुबलक पैसा उपलब्ध होत आहे.

या साऱ्यांचे चिंतन केल्यानंतर एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे आंधळी कोशिंबीर खेळत बसण्यापेक्षा डोळे उघडे करून विचार करण्याचीच जास्त गरज आहे. हा खेळ थांबण्यासाठी आपल्याला स्वत:पासून सुरुवात करावी लागेल. आपले विचार, सवयी बदलाव्या लागतील. खासगी आयुष्यात गाडी, बंगला यांच्यासारखा दिखाऊपणा तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडली पाहिजे.

पैसा हा एक अद्भुत प्रकार आहे. आपण त्याच्यामागे धावलो तर पैसा आपल्यापुढे काही अंतर ठेवून धावतो. सत्तेचेही तसेच आहे, आपण सत्तेमागे धावलो तर सत्ता फक्त दुरून दिसते. आपल्या हाती येत नाही. यासाठी आपल्याला सामाजिक हितासाठी पोषक असलेल्या अनेक उदाहरणांचेही अनुकरण करावे लागते.

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

सवंग सुख ही संस्कृती अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशा कोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद – उपनिषदांपासून फुले – आगरकरांपर्यंत, सॉक्रेटीस – प्लेटोपासून चॉम्स्की – डेरिडापर्यंत पूर्व – पश्र्िचमेतील प्रमुख विचारवंतांचा आणि  त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध घेणारे हे पुस्तक

एखादे पुस्तक लिहिणे हेही कधीकधी धाडस असते. अगदी हिमालयाचे शिखर चढून जाण्याइतके वा अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलात घुसून, कुणाच्याही मदतीशिवाय तेथील वनस्पती व प्राणीसृष्टीचा अभ्यास करण्याइतके. प्रा.डॉ. केशव रंगनाथ शिरवाडकर हे असेच धाडसी शोधयात्री आहेत.

त्यांनी ‘आपले विचारविश्व’ या पुस्तकात जागतिक तत्त्वज्ञानाच्या अथांग चिंतनाचा शोध घेतला आहे. वयाची ८० वर्षे ओलांडल्यानंतर अशा विषयाचा असा अभ्यास व लेखन करणे आणि तेही वाचकाला थेट जाऊन त्या शोधयात्रेत सामील करून घेणे सोपे नाही. वेदांपासून आईनस्टाईनपर्यंत, अ‍ॅरिस्टॉटलपासून फ्रॉईडपर्यंत, बसवेश्वरांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि रामदास-तुकारामांपासून कांट, हेगेल, स्पेन्सपर्यंतची वैचारिक परिक्रमा करणे हे गंगा नदीच्या काठावरून त्या अवघ्या भूप्रदेशाची परिक्रमा करण्यासारखे आहे. ती परिक्रमा करताना त्यांना भगवान श्रीकृष्ण भेटतात आणि महात्मा गांधीही. योगी श्रीअरविंद आणि कार्ल मार्क्‍सही. गुरु नानक आणि लोकमान्य टिळकही. या पुस्तकासाठी केलेल्या शोधयात्रेत त्यांना भेटलेले असे युगप्रवर्तक लोक पाहिले की, गेल्या सुमारे साडेतीन-चार हजार वर्षांंत माणसाचे विचारविश्व किती समृद्ध होत गेले आहे याचा अंदाज येतो. पण फक्त ‘अंदाज’च, कारण यातील प्रत्येक प्रकरण हा स्वतंत्र ग्रंथाचा (नव्हे, अनेक ग्रंथांचा!) विषय आहे. तरीही या विचारविश्वाचा फेरफटका आपल्याला शिरवाडकरांनी असा घडविला आहे की, आपण तत्त्वज्ञानाकडे अधिक कुतूहल व चिकित्सेने पाहू. तत्त्वज्ञान हा काही ‘फॅशनेबल’ विषय नव्हे. साहित्याच्या कथा-कादंबरी कक्षेतही तो मोडत नाही. एके काळी राजकारणाचा संबंध तत्त्वज्ञानाशी होता. त्यामुळे सॉक्रेटिस, प्लेटोपासून ते थेट बट्र्राड रसेल वा अल्बर्ट काम्यू वा मायकेल ऊर्फ मिशेल फुकोपर्यंत बऱ्याच तत्त्वज्ञांनी राजकारणाचीही चर्चा ‘फिलॉसॉफिकल’ अंगाने केली. आता राजकारण हे मुख्यत: व्यवहारवाद, उपयुक्ततावाद आणि सत्ताकारण व अर्थकारण या चौकटीबाहेर जाताना दिसत नाही. खरे म्हणजे अर्थकारणही तत्त्वज्ञानाच्या वास्तूतच जन्माला आले. अ‍ॅडॅम स्मिथ असो वा कार्ल मार्क्‍स- ते अगदी अमर्त्य सेन हे सर्व जण तसे ‘फिलॉसॉफर्स’. पण आता अर्थकारण हेसुद्धा सर्वार्थाने ‘मुक्त’ झाले आहे. नीतीशास्त्र व धर्मशास्त्रे सुद्धा तत्त्वज्ञानाच्या मुशीतून तयार झाली, पण पुढे त्यातून मूलभूत चिकित्सेपेक्षा परंपरावाद आणि धार्मिक ताकद हेच उग्रपणे पुढे आले. मानसशास्त्रानेही तत्त्वज्ञानाची संगत सोडली आणि ते स्वभावशास्त्र व मेंदू/संवेदन यंत्रणा शास्त्र (न्युरॉलॉजी) या दिशेने गेले.

भारतीय विचार : परिवर्तनाला नकार

पहिल्या सहस्रकातील भारतीय विचार बव्हंशी अध्यात्मवादी असल्याचे दिसते. लोकायत, बौद्धवाद, मनुस्मृती, कौटिल्यविचार इत्यादींमध्ये दैनंदिन जीवन डोकावले आहे; पण भारतीय विचाराचा मध्यप्रवाह अध्यात्ममग्नच राहिला. भौतिक प्रगतीच्या अभावाचे ते कारण की परिणाम हा प्रश्न कठीण आहे; पण नव्या सहस्रकाची दोन ठळक वैशिष्टय़े सांगता येतील. एक तर, आध्यात्मिक दृष्टिकोनाने नव्या कालखंडात भक्तिमार्गावर वाटचाल सुरू केली. त्यामुळे व्यावहारिक जीवनात कोठलाच फरक पडला नाही. अध्यात्म आणि व्यवहार यातील विसंगती, किंबहुना विरोध भक्ती आणि संसार या द्वंद्वात चालू राहिला. त्यामुळे संसाराला विचाराची शक्ती प्रगत करू शकली नाही आणि विचाराला व्यवहारवास्तवाचे दर्शन झाले नाही. त्याचप्रमाणे विचाराच्या सामाजिक एकीकरणाचे सामथ्र्यही कुणा द्रष्टय़ाच्या लक्षात आले नाही.

तत्त्वज्ञानाची वसाहत
माणसाने ताजमहाल बांधले, पिरॅमिड उभे केले, मोठमोठी धरणे तयार केली आणि अशा कितीतरी असंख्य आश्चर्यकारक गोष्टी निर्माण केल्या; पण या सर्वाच्या एकत्रित आश्चर्यापेक्षा अधिक आश्चर्यकारक असे त्याचे कार्य म्हणजे त्याने विचारांच्या शाश्वत वसाहती वसविल्या, ज्या आपापल्या प्रकाशाने मानवी मनाला सदैव आकर्षित करीत असतात. या विचारवसाहतीत सर्वात महत्त्वाची वसाहत आहे तत्त्वज्ञानाची. मूलगामी अशा विविध विचारांची उभारणी हा तत्त्वज्ञानाचा विषय. त्यामुळे विचारविश्वात त्याला अग्रेसरत्व मिळणे अपरिहार्य आहे.

युरोप-अमेरिकेत अजूनही तत्त्वज्ञान ‘जिवंत’ आहे, पण मुख्यत: इंटेलेक्च्युअल/अ‍ॅकॅडमिक वर्तुळांमध्ये ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’, ‘न्यू लेफ्ट रिव्ह्यू’ ही व अशी नियतकालिके मूलभूत तत्त्वचिंतनाचे विषय हिरीरीने मांडतात, त्यावर वाद-चर्चाही होतात. भारतात अलिकडेच सुरू झालेले ‘द लिटल् मॅगेझिन’ काही प्रमाणात कला, तत्त्वज्ञान, साहित्य अशा संदर्भात मांडणी करते. महाराष्ट्रात ‘परामर्श’, ‘नवभारत’, ‘नवे विश्व’ असे काही नियतकालिकीय उपक्रम आहेत, पण त्यांना न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सचे विस्तीर्ण क्षितिज प्राप्त झालेले नाही. साहजिकच आपल्याकडील बहुतेक साहित्यिक चर्चा, राजकीय वाद, समाजशास्त्रीय टीका-टिपणी इत्यादी तत्त्वज्ञानविरहित असते. कधी कधी तात्त्विकतेचा, नैतिक मुद्दय़ांचा वा समाजशास्त्रीय प्रबोधनाचा आविर्भाव असतो, पण फारच वरवरचा. गांधीजी, पंडित नेहरू, कॉम्रेड डांगे असे काही मोजके शिलेदार सोडले, तर गेल्या काही वर्षांंत तत्त्वज्ञान क्षेत्र वाळवंटसदृश आहे.
त्यामुळे देशातील/महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाची चर्चा मुख्यत: भगवद्गीता (महाभारत), ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा व इतर संतसाहित्य यांच्या पलीकडे समकालीन झालेली नाही. आपल्याकडील सर्व तत्त्वज्ञानाच्या चर्चा या संतसाहित्याच्या, अध्यात्माच्या व धर्मवाङ्मयाच्या संदर्भात होतात. आजचे, आधुनिकतेचे, विज्ञान वा गणिताचे, समाजशास्त्राचे संदर्भ घेऊन तत्त्वज्ञानाची चर्चा होत नाही.

अरबांमधले श्रेष्ठ तत्त्वज्ञ
अल्-किंडी, अल्-फराबी आणि इब्न-सिना (पाश्चात्त्य नाव, Avicenna) हे तिघे अरबांमधले श्रेष्ठ तत्त्वज्ञ. अल्-किंडी (इ. स. ८००-८७०) हा अरबांचा पहिला  तत्त्वज्ञ. त्याने इतर विचारवंतांप्रमाणेच, ग्रीक तत्त्वज्ञान, विशेषत: अ‍ॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान, प्रसृत केले. तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र यातील फरक स्पष्ट करून त्याने विचारस्वातंत्र्यावर भर दिला. ‘तुम्हाला माहीत आहे ते मला माहीत आहे, पण मला माहीत आहे ते तुम्हाला माहीत नाही.’ असे बोलून त्याने तत्त्वज्ञानाच्या वतीने एका धर्मशास्त्राला सुनावले. अल्-फराबीने आपल्या ‘इहसा-अल्-उलम’मध्ये ज्ञानाची वर्गवारी करून ते संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्यातील प्रमुख वर्ग आहेत भाषिकशास्त्रे, तर्कशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र आणि दृकशास्त्र (Optics), पदार्थविज्ञान, अध्यात्म, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र. इब्न सिन्नानेही (Avicenna  इ. स. ९८०-१०३७) प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल आणि कुराण यांचा संयोग साधण्याचा प्रयत्न केला.

अर्थातच, विज्ञान- तत्त्वज्ञान यातील संबंध अधिकाधिक घनिष्ट होत असताना दिसत असूनही आपल्याकडील बहुतेक विज्ञान लेखन हे ‘निखळ’ वैज्ञानिक ठेवण्याकडेच बहुतेक विज्ञान लेखकांचा कल असतो. तत्त्वज्ञानाची अशी उपेक्षा ही सामाजिक- सांस्कृतिक स्थितीशीलतेचे लक्षण आहे. अशा स्थितीशीलतेमुळे ऱ्हास होण्याची शक्यता असते, कारण ‘स्थिती’ फार काळ ‘स्थिर’ राहत नाही.
आपल्याकडे अध्यात्म, साक्षात्कार, अनुभूती या संकल्पनांविषयीसुद्धा अनेक भ्रम वा गूढ आहे. भारत हा एक आध्यात्मिक देश आहे, असे आपणच जगाला सांगितले आहे.

या आत्मसंतुष्ट करणाऱ्या गैरसमजामुळेच आपल्याकडे मूलभूत तत्त्वचिंतन, वैज्ञानिक संशोधन आणि  सखोल समाजशास्त्रीय/मानसशास्त्रीय विचार विकसित होताना दिसत नाही. वस्तुत: ‘विचारविश्व’ हे सर्वव्यापी मानायला हवे. सोयीसाठी भारतीय, युरोपियन, चिनी, अरब इ. तत्त्वज्ञान परंपरा मानणे वेगळे आणि दुराभिमानापोटी ‘भारतीय तत्त्वज्ञान जगात सर्वश्रेष्ठ आहे’ असे म्हणणे वेगळे. असा दुराभिमान भारतातच आहे असे नाही, तर युरोपात, चीनमध्ये वा अरब-मुस्लिम देशांमध्येही आहे. त्यातूनच ‘जिहादी’ प्रवृत्ती, अतिरेकी धर्मवाद, उग्र परंपरावाद निर्माण होतात. असा प्रक्षोभक अभिमान फक्त ‘इस्लामी’च असतो असे अजिबात नाही. कडव्या ज्यूंचा ‘झायोनिझम’ तेवढाच हिंसक आणि आक्रमक आहे. ‘हिंदुत्व’ ही स्वत:ला ‘सहिष्णू’ म्हणत म्हणत किती असहिष्णू होते हे आपल्या देशातील ‘खाप’ पंचायती, दलितांवरील अत्याचार आणि अतिरेकी भाषावाद यातून दिसले आहे. शिवाय ‘लढाऊ’ हिंदुत्ववाद म्हणजेच पराकोटीचा मुस्लिमद्वेषही आपल्या तथाकथित सहिष्णुतेत बसतो.

पाश्चिमात्य संस्कृतीतही उग्र व असहिष्णू कॅथलिक व प्रोटेस्टंट ख्रिश्चन संघटना आहेत, पण एकूण तत्त्वविचारात धर्मशास्त्रे-पुराणे आणि तत्त्वज्ञान हे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. ही प्रक्रिया अर्वाचीन अर्थाने रेनेसाँपासून म्हणजे सुमारे पाच-सहाशे वर्षांंपूर्वीपासून सुरू झाली. आजही पाश्चिमात्य देशांत जे तत्त्वसंशोधन व तत्त्वचिंतन होते. त्यातूनच आधुनिक विज्ञानही प्रगत होत आहे. विज्ञान-तत्त्वज्ञान हे एकमेकांत सर्जनशील चिंतनातून मिसळून गेल्यामुळेच ‘जीवन म्हणजे काय?’, ‘कॉन्शियसनेस म्हणजे काय?’, ‘ज्ञान म्हणजे काय?’, ‘विश्व म्हणजे काय?’, ‘जीवसृष्टी म्हणजे काय?’ आणि ‘काळ-टाइम म्हणजे काय’, असे प्रश्न एकदम विज्ञान- तत्त्वज्ञानात शोधले जात आहेत. ‘अंतिम सत्य’ आणि ‘संपूर्ण सत्य’ कधीही माणसाला प्राप्त होणार नाही, हे माहीत असूनही हा शोध अथकपणे सुरू आहे.

बुद्ध विचार : निर्वाण हेच मोक्ष
जैन विचार आणि जैन धर्म भारतात निर्माण झाला तरी तो भारतापुरताच मर्यादित राहिला. बौद्ध विचार आणि बौद्ध धर्मही भारताबाहेर- नेपाळ, श्रीलंका, चीन, जपान, म्यानमार, तिबेट आणि इतर आशियन देशांत पसरला. मात्र ज्या भागात तो जन्मला तेथे तो राहिला नाही. बौद्ध धर्माचा संस्थापक सिद्धार्थ (इ. स. पू. ५६३-४८३) ऐषआरामात वाढलेला राजपुत्र. भोवतालचे दैन्य आणि दु:ख पाहून त्याला उपरती झाली आणि माणसाच्या अशा दु:खापासून मुक्ती मिळविण्याच्या मार्गाचा शोध लावण्याचा त्याने ध्यास घेतला. त्यासाठी राजसंन्यास घेऊन त्याने तपश्चर्याही केली. शेवटी माणसाच्या दु:खाचे मूळ त्याच्या इच्छा, अभिलाषा, आसक्ती यांमध्ये आहे, तेव्हा त्यांचा (म्हणजेच मीपणाचा) त्याग करून (मोक्षवत) निर्वाण पदाला माणूस पोहोचू शकला तरच त्याची मुक्तता होऊ शकेल, अशा निष्कर्षांला तो येऊन पोहोचला.

या ‘ज्ञान-शोधयात्रे’चे सर्वार्थाने चित्तवेधक आणि उत्कंठावर्धक निवेदन करणारे पुस्तक म्हणजे डॉ. के.रं. शिरवाडकर यांचे ‘राजहंस प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले ‘आपले विचारविश्व’. या नावातील ‘आपले’ हा शब्दही महत्त्वाचा आहे. हा ‘आपले’ शब्द म्हणजे ‘भारतीय’ वा ‘हिंदू’ या अर्थाने नाही. ‘आपले’ म्हणजे अवघ्या माणसांचे विचारविश्व कसे घडत गेले, त्यातूनच ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा कशा रुंदावत गेल्या. सौंदर्यशास्त्रापासून नीतीशास्त्रापर्यंत आणि राजकारणापासून विज्ञानापर्यंतच्या संकल्पना कशा सिव्हिलायझेशनच्या संदर्भात विकसित व उत्क्रांत होत गेल्या. याचा मागोवा म्हणजे हे पुस्तक. (‘ग्रंथ’हा शब्द मुद्दामच वापरलेला नाही. कारण ‘ग्रंथ’ हा विद्वानांसाठी आणि ‘ग्रंथालयासाठी’ असतो आणि ‘पुस्तक’ हे कुणीही वाचण्यासाठी असते असे उगाचच काहींना वाटते.) शिरवाडकरांचे हे पुस्तक अगदी अनभिज्ञ वाचकालाही खिळवून ठेवू शकेल इतके वाचनीय व सुलभ झाले आहे.

वर म्हटल्याप्रमाणे या ‘विचारविश्वा’चे स्थूल भौगोलिक व सांस्कृतिक विभाग शिरवाडकरांनी केले आहेत, पण त्याचा हेतू एखादी विशिष्ट विचारतत्त्व परंपरा दुसऱ्या परंपरेपेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ आहे हे दाखविण्यासाठी नव्हे, तर आपल्या ऐतिहासिक व पारंपरिक गृहितकांचा आधार घेतला तर समजायला अधिक सोपे जाईल म्हणून. ‘तत्त्वज्ञान’ हा विषय कठीण, गंभीर, बोजड आणि कंटाळवाणा (बोअरिंग) आहे, असा जो समज आहे. तो पूर्णपणे दूर करण्याचे सामथ्र्य या पुस्तकात आहे. ‘प्राचीन’ म्हणजे प्रगल्भ आणि आधुनिक म्हणजे उथळ असाही एक तत्त्वज्ञानाबद्दलचा समज आहे. भारत (वा चीन, अरब) यांचा तत्त्वज्ञानाचा इतिहास प्राचीन आहे आणि म्हणून ते चिंतन अधिक श्रेष्ठ व मूलभूत आहे, असा एक ‘गर्व’ भारतात आहे. तो दूर व्हायलाही या पुस्तकाने मदत होईल. भारतातील प्राचीन तत्त्वचिंतन किती विलक्षण, मूलभूत व सखोल होते, हे दाखवितानाच युरोपातील तत्त्वचिंतन कसे उत्क्रांत होत गेले आणि भारत प्राचीनत्वाच्या सापळ्यात कसा अडकत गेला, हेही पुस्तक वाचताना उलगडत जाते.
वस्तुत: जैनांचे महावीर वर्धमान, बौद्धांचा सिद्धार्थ ऊर्फ गौतम बुद्ध, चिन्यांचा कन्फ्यूशियस आणि ग्रीकांचा सॉक्रेटिस वा प्लेटो यांच्यातील ऐतिहासिक अंतर फार नाही.

वेद : ‘वेदोऽखिलो धर्ममूलम्’
भारतीय जीवनाच्या विराट वृक्षाची पाळेमुळे वेदोपनिषदांच्या जमीन-पाण्यात पोसली गेली आहेत. वेदवाङ्मय हा भारतीय विचाराचा मूळ स्रोत. वेदांविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचा दावा कुणालाही करता येणार नाही; पण त्यासंबंधी झालेल्या संशोधनातून जे समजते, त्यावरून वेदांच्या निर्मितीचा काळ इ. पू. १२००-१५०० असावा.  पश्चिम आशियातून भारताकडे आलेल्या आर्याच्या टोळ्यांनी लिहिलेले वाङ्मय काही भागांत तिकडेच लिहिलेले असावे. त्यामुळे भूमध्ये समुद्रालगतच्या प्रदेशांपासून तर भारतीय प्रदेशांपर्यंतच्या मानवगणांची आणि प्रदेशांची नावे वेदातील नावांशी जुळतात. वेदांचा काही भाग (ऋग्वेद आणि यजुर्वेद) पंजाबच्या भूमीवर लिहिला गेला असावा. संस्कृतमधल्या ‘विद्’ (जाणणे) या धातूपासून या वाङ्मयाला ‘वेद’ म्हणजे ज्ञान हे नाव मिळाले. ‘ईप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा मानवी बुद्धीला अगम्य उपाय जो ग्रंथ दाखवून देतो तो वेद,’ असे सायणाचार्यानी म्हटले आहे. परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द म्हणूनही वेदांचे वर्णन करण्यात येते. मनूच्या मते वेद सर्व धर्माचे मूळ आहे. (‘वेदोऽखिलो धर्ममूलम्’) वेद चार आहेत- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद;  आणि ते वेगवेगळ्या काळात लिहिले गेले आहेत. वेदांचे संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे असे चार भाग पडतात. वेद मंत्रांतून किंवा ब्राह्मणांतून लिहिले गेले आहेत. मंत्र पद्यात आणि ब्राह्मणे गद्यात आहेत. प्रत्येक वेदात दोन्ही प्रकारचे आविष्कार असले, तरी प्रमाण वेगळे आहेत. ऋग्वेद मुख्यत: मंत्रांतून म्हणजे पद्यातून, तर यजुर्वेद गद्यातून आहे. मंत्रांचा संग्रह ‘संहिता’ या संज्ञेने ओळखला जातो.

महावीर वर्धमान (इसवी सन पूर्व ५४०-४६८)
गौतम बुद्ध (इसपू ५६३-४८३)
कन्फ्यूशियस (इसपू ५५१-४७९)
सॉक्रेटिस (इसपू ४६९-३९९)
प्लेटो (इसपू ४२७-३४७)
म्हणजे हे सर्व तत्त्वज्ञ साधारणपणे अडीच हजार वर्षांंपूर्वीचे आहेत. त्यांनी केलेले तत्त्वचिंतन आजही संदर्भ व व्यवहारयुक्त वाटते. यावरूनच त्यांच्या विचारातील कमालीची प्रगल्भता आणि काही प्रमाणात कालातीतता लक्षात येईल. मग कुणी म्हणेल की तत्त्वज्ञानाचा ‘विकास’ व अधिक ‘संशोधन’ करायची काय गरज?

सामान्यता संपादन
कॉलेजमध्ये आणि विद्यापीठात असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मी मराठवाडय़ातून शक्यतो शोध-निबंधासह सहभागी होत असे. अशा परिषदांमधील चर्चासत्रांमध्ये एक चमत्कारिक गोष्ट माझ्या लक्षात येई. एक तर महाराष्ट्रीय प्राध्यापकांची उपस्थिती कमी. जे उपस्थित असत ते केविलवाणे होऊन बसत. ज्येष्ठ प्राध्यापक उद्घाटन कार्यक्रमाला नटूनथटून बसत आणि नंतर जवळपासची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी अदृश्य होत. चर्चासत्रे, त्यांच्या दृष्टीने, मूर्खाचा बाजार असे. वस्तुत: चर्चासत्रांत शोधनिबंध सादर करणे, स्वत:च्या आणि इतरांच्या निबंधांवर वाद घालणे, ज्ञान देणे आणि घेणे यात एक विशेष आनंद होता आणि हे प्राध्यापक त्याला मुकत होते. अशा परिषदांमधून, चर्चासत्रांतून, विद्यापीठे आणि महाविद्यालये यातील मराठी बुद्धिजीवींचे काही दोष लक्षात आले ते म्हणजे बेट प्रवृत्ती (Insularity, स्वत:ला अलग ठेवण्याची सवय), त्यामुळे येणारा आत्मविश्वासाचा अभाव, अनुभवांच्या विविधतेला दिलेल्या नकारामुळे येणारा मानसिक मागासलेपणा, न्यूनगंडातून आत्मतुष्टीसाठी निर्माण झालेला इतरेजनांबद्दलचा तुच्छता भाव आणि इतर भाषांमध्ये; पण विशेषकरून इंग्रजीमधील दुर्बलता. त्यामुळे मराठी माणूस अथवा त्याचे म्हणणे क्वचितच लक्षवेधी ठरे. कित्येक वेळा मराठी वृद्धिंगत आपला कमकुवतपणा इतरांबद्दलच्या तुच्छता वृत्तीने झाकण्याचा प्रयत्न करतात. जणू हे टिळक, राजवाडे, केतकर, शेजवलकर यांच्या बैठकीतले, त्यांचे वारसदार!

महाराष्ट्रात टिळक, राजवाडे यांच्यासारख्या श्रेष्ठ विचारवंतांची परंपरा नाहीशी का झाली हे एक कोडेच आहे. आज या परंपरेला शोभणारे आणि परिस्थितीला अनुरूप असे प्रगल्भ विचार देणाऱ्यांची किती नावे घेता येतील? हा प्रश्न सविस्तर संशोधनाचा आहे. (त्यात अनेक कारण समाविष्ट असू शकतील.) पण एक कारण सहज जाणवते. महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, विशेषकरून महाविद्यालये आणि विद्यापीठे यांना आपली जबाबदारी पेलता आली नाही. १९५० नंतर जागतिक ज्ञान ज्या गतीने पुढे जात होते त्याचा महाराष्ट्रातील उच्चशिक्षण क्षेत्रात पत्ताही नव्हता. बेप्रवृत्ती आणि इतरांविषयी तुच्छता, आत्मतुष्टी आणि संकुचित दृष्टी यांनी उच्चशिक्षण ग्रासले गेले. परिणामी मराठी विद्यार्थी, म्हणजेच मराठी मन सामान्य गुणवत्तेकडे ढकलले जात होते. त्यात इंग्रजीतला कच्चेपणा! त्यामुळे ‘सामान्यता संपादन’ (Achievement of mediocrity) हा महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाचा आदर्श बनला!

या वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या भागात ‘पश्चिमेचा विचारविकास’ आणि तिसऱ्या भागात ‘वास्तवाचे वेध’ यात सापडू शकेल. त्याचप्रमाणे पाचव्या भागात ‘विज्ञान आणि धर्म’ आणि अखेरच्या ‘सफर संपवताना’ या प्रकरणात वाचकाला मिळते. पुस्तक वाचता वाचताच आपण अंतर्मुख होत राहतो आणि वाचून संपल्यावर परत परत मागील प्रकरणांकडे वळत राहतो. माझा अनुभव तर असा आहे की, दुसऱ्यांदा (कुठूनही वाचायला सुरुवात करूनही) वाचताना आकलनाचा आनंद पाचपट होतो. ज्या थोर तत्त्वज्ञांची फक्त नावेच कानावरून गेलेली होती ती माणसे डोळ्यांसमोर त्यांच्या कालसंदर्भासहित उभी राहू लागतात आणि आपल्याला पडणाऱ्या चिरंतन प्रश्नांची उकल करण्याचा  त्यांनी कसा प्रयत्न केला, हे लक्षात आल्यावर आपले विचारविश्व इतके संकुचित का राहिले, याची खंतही वाटू लागते.

आपल्याकडील अनेक सुशिक्षितांनाही अरब व इस्लाम वा (मुस्लिम) हे समानार्थी शब्द वाटतात. प्रत्यक्षात इस्लामच्या अगोदरही अरब संस्कृती उदयाला आली होती. शिवाय अरबांमध्येही ख्रिश्चन अरब, ज्यू अरब आणि धर्मविरहित पाखंडी अरब आहेतच. पण तो काळ बाजूला ठेवू या. आपल्याकडील दुसरा गैरसमज म्हणजे इस्लामचे तत्त्वज्ञानच प्रतिगामी, परंपरावादी/सनातनी व उग्रवादी आहे.

सफर संपवताना
विचारविश्वातील (बहुधा कष्टदायक) सफर संपवताना एक गोष्ट लक्षात येते, की गेल्या काही हजार वर्षांतील माणसाचे विचार एखाद्या अथांग, अमर्याद सागरासारखे पसरले आहेत. एका पुस्तकाच्या ओंजळीने त्या सागरातले कितीसे पाणी आपण साठवू शकणार? शेवटी या सागराचे समग्र, सम्यक दर्शन प्रत्येकाने आपापल्या अध्ययनाची नाव सागरात लोटून घ्यावे हे श्रेयस्कर. त्यातील थरार (Thrill) हा तात्काळ आणि निश्चित लाभ. मात्र विचारांच्या इतिहासात शिरताना एक पथ्य पाळणे आवश्यक आणि लाभदायकही असते. या प्रयासात आग्रह, दुराग्रह बाजूला ठेवूनच संचार करणे उचित. दुराग्रहांच्या धुक्यातून विचारसृष्टीचे स्पष्ट, समग्र ज्ञान मिळणे शक्य नाही आणि हे लक्षात न घेतल्यास हाती लागते ते अज्ञान. ज्ञान म्हणून दुराग्रही अज्ञानाचे वितरण हा वैचारिकच नव्हे, तर नैतिक भ्रष्टाचार समजला पाहिजे. हे मान्य, की विचारक्षेत्रात संपूर्ण वस्तुनिष्ठता एक भ्रम असतो; पण हेही खरे, की परिपक्व मन दुराग्रहानेच सुरुवात करणार नाही. शेवट आग्रहात व्हावा, पण प्रारंभ दुराग्रहाने होऊ नये.

माणसाचा पृथ्वीवरील इतिहास लक्षावधी वर्षांचा आहे. निसर्गाने सर्व प्राणिमात्रांना बुद्धीचे वरदान दिले, पण त्यात माणूसच एवढा वरचढ कसा ठरला? लक्षावधी वर्षांपूर्वी माणसाच्या (ज्या वेळी तो चिंपाझी अधिक आणि माणूस कमी होता) इतिहासात क्रांतिकारक उत्क्रांती घडली. माणूस या काळात मागील दोन पायांवर उभा राहून चालू लागला. या उभ्या माणसा  (Homo-Erectus) चे ‘हात’ (म्हणजे पुढील दोन पाय) मोकळे झाले. हातांनी तो कुशलतेची कामे करू लागला. (उदा. दगडाची हत्यारे बनविणे). बुद्धी (विचार) आणि हाताचे कौशल्य (कृती) यांच्या अन्योन्य सहकार्यातून त्याच्या प्रगतीची वाटचाल सुरू झाली. त्यातूनच तो पशू अवस्थेतून मानवी अवस्थेत आला. निसर्गावर प्रभुत्व प्रस्थापित करणाऱ्या त्याच्या बौद्धिक क्षमतेच्या प्रभावांचा प्रारंभ असा झाला. इतर प्राणी मात्र निसर्गाने दिलेल्या चौकटीतच राहिले- आजपर्यंत.

शिरवाडकरांनी ‘पूर्वेची प्रज्ञा’ या पहिल्या भागात भारतीय विचारातील वेद, जैन व बौद्धवाद याचबरोबर ‘इस्लामचे योगदान’ही सांगितले आहे. सुमारे दीड हजार वर्षांंपूर्वी झालेल्या इस्लामच्या उदयानंतर त्या धर्मातील विचारवंतांनी कसे ‘वैचारिक जागतिकीकरण’ अंगीकारले हे पुस्तकात आहे. अरबांचा इस्लाम काळातील पहिला तत्त्वज्ञ अल्किंडी हा ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रसारक होता आणि इस्लामला ‘कोंडून’ ठेवणाऱ्यांच्या विरोधात त्या काळी कसे वैचारिक-तात्त्विक प्रयत्न झाले, हेही शिरवाडकर सांगतात. पण पुढे इस्लामी उदारमतवादाला काही प्रमाणात ग्रहण लागत गेले आणि इस्लामी समाजाला स्थितीशीलता येऊ लागली. तत्त्वज्ञानाची व विज्ञानाची उपेक्षा केल्यावर काय होते याचा तो पुरावा आहे. (पण या पुस्तकात एकूण अरब सिव्हिलायझेशन व फिलॉसॉफीबद्दल अधिक यायला हवे होते. असो.)

अशोक चौसाळकर, सौजन्य – लोकसत्ता

महाराष्ट्रातील बहुजन समाजात ज्या निरनिराळ्या चळवळी निर्माण झाल्या त्यांचा समाजवादी व साम्यवादी राजकारणाशी असणारा संबंध प्रा. भा. ल. भोळे यांनी अभ्यासला; तोच विषय त्यांनी पीएच. डी.च्या संशोधनासाठीही घेतला. सतत ९-१० वर्षे संशोधन करून १९८१ साली नागपूर विद्यापीठाने तो प्रबंध स्वीकारला. त्यानंतर तब्बल ३० वर्षांनी भोळे यांचा हा प्रबंध पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाला असून, ग्रंथाला अशोक चौसाळकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश..

महाराष्ट्रातील बहुजन समाज व समाजवाद यांच्यातील परस्परसंबंध कशा प्रकारचे होते; बहुजन समाजात ज्या निरनिराळ्या चळवळी निर्माण झाल्या त्यांचा समाजवादी राजकारणाशी काय संबंध होता याबाबत महाराष्ट्रातील अभ्यासकांच्या मनात कुतूहल होतेच, राज्यशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक व संशोधक प्रा. भा. ल. भोळे यांना या दोन्ही चळवळींतील परस्पर संबंध तपासायचे होते. हा विषय त्यांनी त्यांच्या पीएच. डी.च्या संशोधनासाठी घेतला. सतत नऊ-दहा वर्षे ते या प्रबंधाचे काम करीत होते. शेवटी १९८१ साली नागपूर विद्यापीठाने हा प्रबंध स्वीकारला. आपल्या या प्रबंधात काही उणिवा आहेत व त्या दूर करून आपणास तो छापायचा आहे, असे प्रा. भोळे यांचे म्हणणे पडले; पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना अपेक्षित असणाऱ्या दुरुस्त्या ते शेवटपर्यंत करू शकले नाहीत. आज जवळजवळ तीस वर्षांनी प्रा. भोळे यांचा प्रबंध पुस्तकरुपाने आहे त्या स्वरूपात प्रकाशित होत आहे.

प्रा. भोळे यांच्या प्रबंधाची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े होती. त्यातील पहिले वैशिष्टय़ म्हणजे प्रा. भोळे यांनी हा प्रबंध मराठीत लिहिला. १९७९-८० साली मराठीत सामाजिकशास्त्रात अशा प्रकारचा प्रबंध लिहिला जात नव्हता; पण इंग्रजीत न लिहिण्याची प्रा. भोळे यांनी प्रतिज्ञा केली होती व ती प्रतिज्ञा त्यांनी अखेपर्यंत पाळली. प्रबंधाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे या प्रबंधासाठी संशोधन करताना प्रा. भोळे यांनी स्वत:ची अशी संशोधनपद्धती विकसित केली. त्यांनी स्वत:स कोणत्याही एका प्रस्थापित संशोधनपद्धतीत बांधून घेतले नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी शेकापच्या १९८० पर्यंतच्या कामाचा आढावा घेतला नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेपर्यंतच्या शेकापच्या कामाचाच आढावा घेतला. कारण त्यांच्या मते १९६० नंतर या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात फारशी महत्त्वाची कामगिरी केली नाही. वस्तुत: १९६० नंतर खऱ्या अर्थाने हा पक्ष स्थिरावला होता व पक्षास नवे सामुदायिक नेतृत्वच प्राप्त झाले होते. पक्षाचे काही क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे स्वत: प्रा. भोळे यांना हे काम काहीसे अपूर्ण वाटत होते; पण त्यात काही भर घालणे त्यांना अशक्यप्राय वाटत होते.

प्रा. भोळे यांनी त्यांच्या हयातीत हा प्रबंध प्रकाशित केला नाही; पण तो आहे त्या स्वरूपात प्रकाशित केला तरी खूप मोलाचा आहे याची अभ्यासकांना जाणीव होती. कारण शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील अत्यंत वैशिष्टय़पूर्ण पक्षाचा अजूनही गंभीरपणे अभ्यास झालेला नाही. त्यामुळे हा प्रबंध प्रकाशित करण्याचा विजयताई भोळे यांचा निर्णय योग्यच असून, अनेक बाबतीत तो पुढे येणाऱ्या संशोधकांस मार्गदर्शक ठरणार आहे.

आपल्या आरंभीच्या निवेदनात प्रा. भोळे यांनी हा अभ्यास आपण का हाती घेतला याबद्दलचे आपले मत मांडले आहे. त्यांच्या मते शेकाप ही एका दृष्टीने म. फुले यांनी सुरू केलेल्या सामाजिक बदलाच्या चळवळीची विकसित अवस्था होती. आता या चळळीस नवे समाजवादी वळण लागले होते. म. फुले यांच्या परीप्रेक्ष्यातून शेकाप नवे वैचारिक आव्हान निर्माण करील, असे वाटले होते; पण ते शक्य झाले नाहीत. या संदर्भात प्रा. भोळे यांचे दुसरे महत्त्वाचे मत असे आहे, की म. गांधी यांचे तत्त्वज्ञानही सत्यशोधक विचारांची कालसापेक्ष सुधारित आवृत्ती आहे. या सर्व बाबींचा विचार करून शेकाप नवा विचार मांडील, असे त्यांना वाटत होते. आपल्या प्रबंधाच्या प्रयोजनाबद्दल ते लिहितात, ‘‘शेकापला या कार्यात कितपत यश मिळाले याचा मागोवा घेणे, त्याच्या यशापयशाची कारणमीमांसा करून बहुजन समाजाची चळवळ अधिक प्रभावी व पुरोगामी करण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरतील, असे निष्कर्ष शक्य झाल्यास मांडणे हे माझ्या संशोधनाचे प्रयोजन होते.’’ आपल्या संशोधनाचे निष्कर्ष मांडताना प्रा. भोळे म्हणतात, की ‘‘पक्ष स्थापन झाल्यानंतर हा पक्ष अस्मितेच्या शोधात होता. त्याला स्वत:ची अशी विचारसरणी मांडता आली नाही. निवडणुकीच्या राजकारणात तो अयशस्वी ठरला. राजकारणाच्या व्यापक संदर्भात तो निष्प्रभ ठरला. १९६० नंतर पक्षाने केलेली वाटचाल फारशी महत्त्वाची नाही.’’

१९४९ साली शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष हे दोन पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडले. या वेळी शेतकरी कामगार पक्षात तीन वेगवेगळे घटक सामील झाले होते. पक्षाचा गाभा असणारा घटक म्हणजे जुन्या ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक समाजातून आलेला व्यावसायिक व मध्यम शेतकरी जातीतील मराठा समाजातील कार्यकर्ता होता. पक्षाचा हा कायम राहिला. दुसरा घटक काँग्रेस पक्षातून आलेल्या नाराज कार्यकर्त्यांचा होता. कारण त्यांचे देव, देवगिरीकर व बाळासाहेब खेर यांच्याशी मतभेद झाले होते. तिसरा घटक नवजीवन संघटनेतील कार्यकर्त्यांचा होता. हा गट असंतुष्ट कम्युनिस्टांचा गट होता. सुरुवातीस शेतकरी कामगार पक्षास लोकांचा चांगला पाठिंबा मिळाला. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, नाना पाटील, दत्ता देशमुख, तुळशीदास जाधव यांच्या सभा गाजत होत्या. पक्षाला पाठिंबा मिळत होता. त्या काळात मुंबई राज्य होते. ते मोठे त्रभाषिक राज्य होते. या राज्याच्या विधानसभेत एकूण ३१५ सभासद होते. त्याच पश्चिम महाराष्ट्राचे १४१, मुंबईचे २७, गुजरातचे ९८ व कर्नाटकचे ४९ सभासद होते. १९५२ च्या निवडणुकीत शेकापचा मोठा पराभव झाला व त्यास फक्त १३ जागा मिळाल्या. मराठवाडय़ात त्यास ११ व विदर्भात २ जागा मिळाल्या. तिन्ही राज्यांत मिळून २६ जागा मिळाल्या. पण काँग्रेसला ३१५ पैकी २३४ जागा मिळाल्या. पश्चिम महाराष्ट्रात १४१ पैकी ११४ जागा मिळाल्या. काँग्रेसची ताकद मोठी होती व तो पक्ष महाराष्ट्रात कधीही नष्टप्राय झालेला नव्हता. त्यानंतर शेकापचे विभाजन झाले. मोरे, जेधे, जाधव काँग्रेसमध्ये परत गेले. पण पक्षाचासामाजिक पाया कायम राहिला.

भोळे यांच्या मते शेकाप हा म. फुले व सत्यशोधक समाजाच्या क्रांतिकारक विचारसरणींशी जोडलेला होता. स्त्री-शूद्रादी मागास जाती, अतिशूद्र शेतकरी, कामगार यांना सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा म. फुले यांना दिली. त्यातून एक नवी मूल्यव्यवस्था त्यांना समाजात रुजवायची होती. नवविचारांची रुजवात करून नव्या सांस्कृतिक बंडाची सुरुवात म. फुले यांनी केली होती. शेकापने या प्रेरणांचा विकास करून, आपल्या देशातील परिस्थिती लक्षात घेऊन क्रांतिकारक विचार मांडण्याऐवजी दाभाडी प्रबंधात उसना मार्क्‍सवाद-लेनिनवाद आणला. जेधे-मोरे यांनी स्वत: तर सुरुंग पेरलेच नाहीत. उलट फुल्यांच्या चळवळीतील सुरुंग त्यांनी वाया घालवले. संपूर्ण समाज हे फुल्यांच्या चळवळीचे कार्यक्षेत्र होते. तर राज्ययंत्रणा, मंत्रिमंडळ व सत्ताक्षेत्र जेधे-मोरे यांचे लक्ष्य ठरले. गांधीजींच्या चळवळीशी त्यांचे नाते जुळले नाही. कारण त्यातील उच्च विचार सत्यशोधक विचारांचा पुढचा भाग आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले नाही. शेकापने हा वारसा विकसित केला नाही याबद्दल भोळे यांनी सातत्याने शेकापवरटीका केली आहे.

शेकापचा प्रसार ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव ज्या भागात होता, त्या भागात जास्त झाला. सुरुवातीच्या काळात जेधे-मोरे, नाना पाटील, दत्ता देशमुख, तुळशीदास जाधव यांनी पक्षाचा झंझावाती प्रचार केला. संस्थानिकांविरुद्धच्या चळवळीत भाग घेतला. कोल्हापूरचे नेते माधवराव बागल स्वतंत्र कोल्हापूरची मागणी करीत असताना शेकापने विलिनीकरणाच्या बाजूने भूमिका घेतली. त्यांच्या मते छत्रपतीची सरंजामशाही सत्ता कायम ठेवणे म्हणजे प्रतिगामी शक्तींना हातमिळवणी करण्यास वाव ठेवणे होय! शेकापचे काम मुख्यत: शेतकऱ्यांत होते. कामगारांत, काही अपवाद वगळता, पक्षाची संघटना नव्हती. हा पक्ष जातीयवादी पक्ष आहे अशी टीका त्यावर काँग्रेसने केली. आपला पक्ष जातीयवादी नसून समाजवादी आहे असे आत्मसमर्थन पक्षाने केले.मार्क्‍सवाद-लेनिनवादाचा स्वीकार करून आपला पक्ष बौद्धिक पातळीवर कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांचा वारसा लेनिनवादी पक्षाचा नव्हता व त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे त्याच्या सर्व चुकांसह अनुकरण केले. क्रांतीचे कल्पित, पुस्तकी व ठोकळेबाज डोलारे उभे केले. बहुजन समाजाचा क्रांतिकारक वारसा उपेक्षून त्यांनी स्याद समाजवादाचे (Psudo Socialism) अनुकरण केले. प्रा. भोळ्यांच्या मते शेकापने दाभाडी प्रबंधाचा स्वीकार करीत असताना माओ त्से तुंगने चीनमध्ये केलेल्या किसान क्रांतीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. चीनमध्ये माओने किसान व कामगार यांना एकत्र आणून तेथे लाल क्रांती घडवून आणली होती. ही क्रांती भारतात पण व्हावी असे डाव्या विचारांच्या काही लोकांना वाटत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांमध्ये पण त्याबाबत चर्चा होत होती. शेकापच्या नेत्यांवर चीनी क्रांतीचा प्रभाव पडला. पक्षातील नवजीवन संघटनेचे नेते पण त्या विचारांचे होते.

दाभाडी प्रबंधात त्याबाबतचे विवेचन करण्यात आले. आपला पक्ष हा कट्टर मार्क्‍सवादी पक्ष आहे आणि शेतकरी व कामगार यांच्या एकजुटीतून भारतात लोकशाही क्रांती करता येईल असे पक्षास वाटत होते. प्रा. भोळे यांच्या मते ‘रशिया’ व ‘कॉमिनफॉर्म’ यांच्याशी संबंध जोडण्याचा शेकापचा प्रयत्न चुकीचा होता. कारण तो कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे आंतरराष्ट्रीय समाजवादी चळवळीचा भाग नव्हता. दाभाडी प्रबंध हा काही असंतुष्ट कम्युनिस्ट नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या गळ्यात बांधला व हे लोढणे त्या पक्षाने आयुष्यभर गळ्यात बांधले असे याबाबत प्रा. भोळे यांचे मत आहे.

त्यांच्या मते शेकापत संधी कमी व विग्रहच जास्त होता. तसे पाहिले असता जन्मापासून या पक्षास विग्रहाने पछाडलेले होते. पक्ष सतत बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण करीत होता. या संघर्षांत प्रथम पक्षास कॉ. दत्ता देशमुख, नाना पाटील व व्ही. एन. पाटील यांच्यासारख्या नेत्यांना मुकावे लागले. त्यानंतर पक्षाचे नेते शंकरराव मोरे, केशवराव जेधे व तुळशीदास जाधव हे पक्षाचे संस्थापकच काँग्रेस पक्षात परतले. त्यानंतर पक्षाचे नवे सरचिटणीस रघुनाथ खाडिलकर यांनी आपला नवा पक्ष स्थापन करून शेकापशी फारकत घेतली. या सर्व विग्रहाचा अत्यंत विपरीत असा परिणाम पक्षाच्या वाटचालीवर झाला. शेतकरी कामगार पक्ष व इतर गट यांच्यातील विग्रहाचे भोळे यांनी त्यातील गुंतागुंत नीट समजून घेऊन विवेचन केले आहे. त्यांच्या मते शेकाप व समाजवादी पक्ष आणि शेकाप व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यातही सौहार्दपूर्ण संबंध नव्हते. भोळे यांच्या मते समाजवादी पक्ष हा शेकापला सर्वात जवळचा पक्ष. पण त्या पक्षाशी जोडून घेण्याऐवजी त्यावर टीका करण्यात पक्षाने धन्यता मानली. त्याच्याशी केलेला खंडाळा करार यशस्वी झाला नाही. कम्युनिस्ट पक्षाचा शेकापकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा सौहार्दाचा नव्हता. शेकापचे त्या पक्षात विलिनीकरण करावे असा कॉ. वसंतराव तुळपुळ्यांचा आग्रह होता. पक्षाची मराठवाडा शाखा पण विलिनीकरणाच्या बाजूची होती. पण दाजिबा देसाईंसारखे ब्राह्मणेतर चळवळीतून आलेले नेते पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याच्या बाजूचे होते. अखेर पक्षाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला.

आपल्या संस्थापकांच्या पक्षत्यागाने आहत झालेल्या शेकापला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संजीवनी देणारी ठरली. या लढय़ासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची फौज पक्षाने तयार केली. या लढय़ात जास्तीत जास्त कार्यकर्ते शेकापने उतरवले होते. १९५७ च्या निवडणुकीत शेकापला त्याचा लाभ झाला. या निवडणुका समितीच्या झेंडय़ाखाली लढवण्यात आल्या. त्यात पक्षाने एकूण २७ जागा जिंकल्या.

त्याआधी १९५२ साली शेकापला मराठवाडय़ात चांगल्या जागा मिळाल्या होत्या. पक्षात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात फूट होऊन व कामगार किसान पक्षाचे लचांड पाठीमागे लागले असताना मिळालेले हे यश लक्षणीय होते. विधानसभेच्या बाहेर पक्षाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा, साराबंदीचा लढा, सक्तीच्या सरकारी लेव्हीविरुद्धचा लढा, सीमा भागातील लोकांचा लढा व शेतकऱ्यांचे अनेक छोटे-मोठे लढे हिरीरीने लढवले. विधानसभेत शेकापच्या आमदारांनी स्वाभाविकपणे शेती व शेतकरी, कूळकायदा, जमीनसुधारणा या प्रश्नांवर चर्चा केली. अनेक वेळा सरकारला कायद्यात दुरुस्त्या करावयास भाग पाडले. पण शेतमजुरांचा प्रश्न त्यांच्याकडून चर्चिला गेला नाही.

शेकापचे नेतृत्व व पक्षबांधणी याविषयी लिहिताना भोळे यांनी पक्षनेतृत्वाचा आकृतिबंध काढला असून केशवराव जेधे, शंकरराव मोरे, र. के. खाडिलकर, तुळशीराम जाधव, माधवराव बागल इत्यादी नेत्यांच्या नेतृत्वाची वैशिष्टय़े व मर्यादा सांगितल्या आहेत.

या पक्षाचा एकही नेता वा शेतकरी कामगार चळवळीतून उदयास आला नव्हता. त्या क्षेत्रात पूर्णवेळ काम करणारा कुणीही नव्हता. सर्वच नेत्यांच्या भूमिका संमिश्र स्वरूपाच्या असल्यामुळे पक्षाची बलस्थाने त्यांना वापरता आली नाहीत. संघटनेच्या बाबतीत पक्ष स्वीकृत घटनादर्शाच्या बाबतीत खूप कमी पडला. पक्षसदस्य नोंदणी अत्यंत अनियमित होती व पक्षाच्या सदस्यत्वाची आकडेवारी कधीच घोषित करण्यात आली नाही. चळवळीतून एकगठ्ठा सदस्य नोंदणी करण्याचा पक्षाचा पायंडा होता.

भोळे यांच्या मते सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून बहुजन समाजाची क्रांती करण्याची शेतकरी कामगार पक्षाची इतिहासदत्त जबाबदारी होती. निवडणुकीतील यशापेक्षा ही जबाबदारी कितपत पार पाडली यावरच पक्षाचे यशापयश मोजले पाहिजे. त्यांच्या मते पक्ष हे कर्तव्य विसरला. पक्षाने स्वीकारलेला मार्क्‍सवाद-लेनिनवाद हा आपल्या भूतकाळास लपवण्याची लटपट होती. वास्तविक पाहता पक्षास मिळालेला जनतेचा प्रतिसाद हा ब्राह्मणेतर चळवळीच्या संस्कारातून मिळालेला प्रतिसाद होता. पक्षाचा स्वर्गीय विस्तार हा भूधारक मध्य किसानांपुरता मर्यादित होता. इतर मोठे वर्ग त्याच्यापासून दूरच राहिले.

भोळे यांच्या मते दाभाडी प्रबंध हे शेकापच्या गळ्यातील लोढणे होते. त्यातूनच त्याची नवजीवन संघटनेशी कृत्रिम व अनिष्ट अशी युती झाली. शेकापची अवस्था त्यामुळे आपली परंपरा हरवलेला व नवता न सापडलेला पक्ष अशी झाली. पक्षाने मार्क्‍सवाद-लेनिनवादाचा व चीनमधील किसान क्रांतीचा पुरस्कार केला. हा पुरस्कार अनवधानाने व अविचाराने करण्यात आला. कारण भोळे यांच्या मते मार्क्‍सवाद-लेनिनवाद ही मोकळेपणाने विकसित तत्त्वप्रणाली नव्हती तर ती एका महान राजसत्तेच्या राजकीय व बौद्धिक सूत्रधारांच्या निर्णयांचे व धोरणांचे मार्क्‍स-लेनिनप्रणीत तत्त्वांच्या आधारे करायच्या समर्थनाची केवळ खटपट व लटपट होती. मार्क्‍सच्या मूल्यात्मक साध्याच्या जवळपासही या राजवटी जाऊ शकत नव्हत्या. त्यातून एक पक्षीय हुकूमशाही, संधिसाधू, पाशवीपणा व विधिनिषेधशून्य राजकारण सुरू झाले. शेकापच्या नेत्यांनी याबाबत कोणताही विचार न करता बिनदिक्कत मार्क्‍सवादाचा पुरस्कार केला! मात्र मार्क्‍सवादातील ज्या मूळ मानवतावादी प्रेरणा व परंपरा आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष केले.

प्रा. भोळे यांच्या प्रतिपादनाचा मुख्य आशय हाच होता की, शेकापने आपली सत्यशोधक प्रेरणा व परंपरा नीट विकसित न केल्यामुळे त्याचा बहुजन समाजात विस्तार झाला नाही. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट नेते ब्राह्मण समाजातून आलेले असल्यामुळे जातीचा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटला नाही. कम्युनिस्ट पक्षाचे ब्राह्मणेतर चळवळीचे विश्लेषण मॉस्को छापापेक्षा सदाशिवपेठी जास्त होते, त्या पक्षाच्या ऱ्हासाची कारणे त्या पक्षाच्या रचनेमध्येच अनुस्यूत होती. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी सहकारी संस्था व पंचायत राज्य यांच्या मदतीने विकासाचे जे राजकारण सुरू केले. त्यामुळे ग्रामीण नेते त्यांच्याकडे वळले. काँग्रेसच्या सबगोलंकारी समाजवादामागे बहुजन समाजाची ताकद उभी राहिली. १९६० नंतर शेकाप जास्त नीटनेटका व एकजिनसी झाला असला तरी पक्षाचे मुख्य अपयश जनसंघटनांच्या क्षेत्रातील असून दाभाडीच्या भूमिकेचा फेरविचार केल्याशिवाय ते धुऊन काढणे पक्षास शक्य होणार नाही. शेकापने गांधीवादाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. गांधीवाद हा सत्यशोधक विचारांचा पुढचा विस्तार होता. महात्मा गांधी, मार्क्‍स व माओ यांच्या विचारांचा समन्वय करण्याचे आव्हान शेकापसमोर आहे. आपल्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगताना भोळे लिहितात, ‘‘बहुजन समाजाची स्वाश्रयी व सहकारी एकजूटच श्रेष्ठींची सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा निष्प्रभ करू शकतील. फुले व गांधी यांच्या मार्गाने आलेला व त्यांच्याशी सुसंवादी असणारा मार्क्‍सवादच या क्रांतीचे दिग्दर्शन करून तिला यशसिद्धीपर्यंत नेऊ शकेल.’’

शेतकरी कामगार पक्ष व महाराष्ट्रातील डावी चळवळ याबाबत विचार करीत असताना प्रा. भोळे यांनी सहा महत्त्वाचे मुद्दे मांडले, ते खालीलप्रमाणे :
१) भारतीय शेतकरी कामगार पक्षास स्वत:ची अस्मिता शोधता आली नाही. तो धड कम्युनिस्ट पक्षही झाला नाही व तो धड प्रादेशिक पक्षही झाला नाही. मार्क्‍सादी-लेनिनवादी पक्षाचे आदर्श त्यास पचले नाही. माओ त्से तुंगच्या किसान क्रांतीचे रहस्य त्याच्या ध्यानी आले नाही.

२) दाभाडी प्रबंध हा पक्षाच्या गळ्यात अडकलेला अडसर होता.

३) पक्षाने आपला वारसा सत्यशोधक चळवळीत शोधून फुले, गांधी व माओ यांचा समन्वय करणारा नवा विचार मांडला नाही. त्यास नवा सर्जनशील विचार सुचला नाही.

४) शेकापच्या ऱ्हासास १९६० पूर्वीच सुरुवात झाली. १९६० नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शेकापने कोठलेही महत्त्वाचे योगदान केले नाही.

५) शेतमालास जास्त भाव मिळवण्याच्या बाबतीत शेकापने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे शरद जोशी यांनी केलेले विवेचन व त्यात शेकापने केलेले योगदान.

६) कम्युनिस्टांचे ब्राह्मणेतर चळवळीचे विश्लेषण हे सदाशिवपेठी आहे.

प्रा. भोळे यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कम्युनिस्टांचे ब्राह्मणेतर चळवळीचे विश्लेषण सदाशिवपेठी आहे. खरे पाहिले असता हिंदुत्ववादाच्या रंगात सदाशिवपेठेचा साम्यवादाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. या संबंधात कॉ. डांगे यांच्यावर मोठय़ा प्रमाणात अन्याय केला जातो. डांग्यांनी ‘सोशलिस्ट’च्या अंकात वर्गीय दृष्टिकोनातून ब्राह्मणेतर चळवळीची चिकित्सा केली. त्यांच्या मते ज्या दिवशी ब्राह्मणांनी आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशी घोषणा केली त्याच दिवशी ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादाचे बीज रोवले गेले. त्यातून सातत्याने संघर्ष झाले. त्यातून चातुर्वण्र्य समाजात वर्गनिर्मिती झाली व समाजातील शोषितवर्गाने शोषण करणाऱ्या वर्गाविरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घेतला. पण या संघर्षांतून जातींचा नाश झाला नाही, त्याचे पर्यवसान व्यक्तीव्यक्तींच्या संघर्षांत झाले. याच्या मूळ कारणांचा शोध घेणारे थोर विचारवंत निर्माण झाले. लिंगायत पंथाचे संस्थापक बसवेश्वर, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांनी याविरुद्ध बंड पुकारले. महानुभाव पंथाचा प्रसार खालच्या मानल्या गेलेल्या वर्गात झाला. ज्ञानेश्वर-तुकाराम यांनी पण समाजातील या विषमतेविरुद्ध आवाज उठवला. जातीव्यवस्थेविरुद्धचे हे बंड पूर्णत: यशस्वी झाले नाही. कारण समाजाचा वर्गीय पाया बदलला नाही. जाती या ब्राह्मणांच्या कटकारस्थानांतून निर्माण झाल्या नाहीत. त्या समाजविकासाच्या प्रक्रियेत निर्माण झाल्या. त्या गुंतागुंतीच्या श्रमविभागणीवर आधारलेल्या होत्या.

उत्पादन करणारा प्रत्येक उत्पादक तुटकपणे व स्वतंत्रपणे काम करीत असल्यामुळे त्यास अलग पाडून त्यावर वर्चस्व स्थापन करणे ब्राह्मणांना शक्य झाले. त्यामुळे बसवेश्वर, चक्रधर जाती तोडू शकले नाहीत. त्यांची चळवळ ‘पंथ’ बनली.

सध्याची ब्राह्मणेतर चळवळ लोकशाही अधिकारांसाठी आहे पण त्यात दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती कार्यरत आहेत. त्यातील एक वर्ग ब्रिटिशांच्या मदतीने मध्यमवर्गात सामील झाला असून तो ब्राह्मणांशी सत्तास्थानांसाठी स्पर्धा करीत आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करीत असताना वंचित व शोषितवर्गाच्या स्वातंत्र्याचा व मुक्तीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पेटीबूज्र्वा ब्राह्मणेतर वर्ग सत्तेत व संपत्तीत वाटा मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहे. या चळवळीत प्रामाणिक व प्रागतिक शक्ती कार्यरत आहेत. जातिसंघर्षांमागे असणाऱ्या वर्गीय वास्तवाची त्यांना जाण आहे. परंतु नव्या वर्गसमाजाच्या रचनेचा त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला नाही. कारण आता नव्या व्यवस्थेत जातीची अस्मिता गळून पडणार असून कामगार म्हणून त्यास नवी ओळख प्राप्त होणार आहे. त्यामुळे यानंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष कामगार व भांडवल यांच्यातील संघर्षांत परिवर्तित होणार आहे. ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी समाजवादाच्या तत्त्वज्ञानाचा अवश्य अभ्यास करावा असे कॉ. डांगे सांगतात. आता डांगे यांच्या या मांडणीत कोणत्या प्रकारचा सदाशिवपेठीपणा आहे? प्रा. भोळे यांनी डांगे यांच्या ‘आदि भारत’ या ग्रंथावर टीका करताना तो आर्य-अनार्य सिद्धान्तावर व कुंटे-राजवाडे या ब्राह्मण इतिहासकारांच्या अभ्यासावर आधारलेला आहे असे मत प्रा. दि. के. बेडेकरांची साक्ष देऊन व्यक्त केले आहे. पहिली गोष्ट म्हणजे ‘आदि भारता’त आर्य-अनार्य कल्पनेबाबत फारशी वेगळी मांडणी नाही. प्रा. दि. के. बेडेकरांनी या पुस्तकावर टीका करताना डांग्यांच्या मांडणीवर टीका केली. त्यात त्यांनी मार्क्‍स-एंगल्सऐवजी कुंटे व राजवाडे या ब्राह्मण इतिहासकारांची मदत घेतल्याबद्दल डांगे यांच्यावर टीका केली नाही. त्यांचे असे मत होते की, वैदिक यज्ञासंदर्भात या ग्रंथात डांगे यांनी जी मांडणी केली आहे ती कुंटे यांच्या संशोधनावर आधारलेली आहे. पण कुंटे यांचे हे योगदान डांगे यांनी नोंदवले नाही. बेडेकरांच्या टीकेचा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाशी संबंध नव्हता. १९८० नंतर पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांत कॉ. डांगे यांच्यावर त्यांच्या जातीमुळे अकारण अन्यायी टीका कशी होत होती याचे हे उदाहरण आहे.

प्रा. भोळे यांचा हा ग्रंथ मराठी वैचारिक वाङ्मयात मैलाचा दगड ठरणार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात वैशिष्टय़पूर्ण योगदान करणाऱ्या पक्षाच्या इतिहासातील पहिला टप्पा त्यांनी अभ्यासपूर्ण रीतीने आपल्यासमोर मांडला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्राच्या मातीत जन्मास आलेला, महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात नव्या शक्तीस्रोतांना प्रवाहित करणारा पक्ष म्हणून प्रा. भोळे यांच्या मनात त्याबद्दल अगत्य होते. असा पक्ष महाराष्ट्रातील बहुजन समाजाने निर्माण केला याबद्दल त्यांना अभिमान वाटत होता. सर्वसामान्य शेकाप कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना होती म्हणून त्यांनी खूप मेहनत करून हा ग्रंथ सिद्ध केला. पक्ष त्यांच्या अपेक्षांना उतरू शकला नाही. पण पक्षाने आपल्या वेगवेगळ्या चळवळींच्या द्वारा लाखो लोकांना जो आधार दिला, त्यांच्या अधिकारांचे जे रक्षण केले या योगदानाबद्दल त्यांच्या मनात सकारात्मक भावना होती.

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य – लोकप्रभा

गौतम बुद्ध हा जगातील ‘यासम हा’ असा महापुरुष. त्याचा उद्भव कोणत्या परिस्थितीत झाला, केवळ नैतिक बळावर तो विभवाला कसा पोहोचला आणि अखेर या निरीश्वरवाद्याचा झालेला देवच त्याच्या दिग्विजयाचा अ‍ॅन्टिक्लायमॅक्स कसा घडवून आणतो याचा मागोवा घेत जाणे ही जितकी विस्मयकारक तितकीच शोकात्म अनुभूती आहे.

बुद्धाला आपण ओळखतो ते त्याच्या प्रतिमा पाहून. पण इ.स.पू. सहाव्या शतकात होऊन गेलेल्या बुद्धाच्या सर्वात जुन्या मूर्ती आढळतात त्या इ.स.पू. पहिल्या शतकाअखेरच्या आहेत. कुशाणांच्या प्रभावामुळे सुरू झालेल्या गांधार शिल्पशैलीने बुद्धाच्या मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. अर्थात त्या संकल्पनात्मक आहेत. बुद्ध कसा दिसत होता ते कुणालाच माहीत नाही. त्यातून बुद्ध हा कुणी देव होय अशी समजूत १८९६ पर्यंत प्रचलित होती. त्या वर्षी लुंबिनी (नेपाळ) येथे सापडलेल्या अशोक स्तंभावर तो शाक्यमुनीच्या जन्मस्थानी उभारल्याचा लेख आढळला व बुद्धाचे ऐतिहासिकत्व प्रथमच सिद्ध झाले. पुढे १९९५ साली लुम्बिनी येथील मायादेवी मंदिराच्या तळघरात बुद्धासंबंधीचे अवशेष मिळाले. बुद्धाची शिकवण मौखिक होती. त्याच्या शिष्यांमध्ये वैदिकांसारखी अचूक पठणाची परंपरा नव्हती तरी काहींनी ही शिकवण आठवणीत साठविलेली असल्यामुळेच लेखणीतून उतरली. मात्र सर्वात जुने बौद्ध वाङ्मय बुद्धानंतर जवळजवळ चारशे वर्षे उलटून गेल्यावर अक्षरबद्ध झाले. बुद्धाची सहा धार्मिक चरित्रे लिहिली गेली. पण ऐतिहासिक पुरावा म्हणून त्यांचा फारसा उपयोग होत नाही. धर्मानंद कोसंबी यांनी बुद्धचरित्रावर प्रकाश टाकणारी विखुरलेली माहिती अथक परिश्रमाने एकत्र केली. तरी बुद्धाचे ऐतिहासिक चरित्र जाणून घेणे अगत्याचे होते. बौद्ध पंडित व तटस्थ इतिहासकार यांच्या प्रयत्नामुळे ते बरेचसे सुकर झाले. त्यामुळे दंतकथांतून ऐतिहासिक महापुरुष उभा राहिला, शिवाय त्याच्यातला माणूसही भेटला.

बुद्धाच्या तारखांबद्दल एकवाक्यता नाही. तरी इ.स.पू. ५६३ ते ४८३ हा त्याचा काळ धरता येतो. महावीर जैन त्याचा ज्येष्ठ समकालीन. त्या वेळी उत्तर भारतात लहान मोठी राज्ये होती. त्यात बिहारमध्ये शाक्यांचे गणराज्य होते. ते कोसलचे मांडलिक. गणराज्याची वस्ती १,८०,०००; राजधानी कपिलवस्तू. गणप्रमुखांना महाजन म्हणत व त्यांच्या मुख्याला अध्यक्ष. शाक्यांचा अध्यक्ष शुद्धोधन. त्याच्या पुत्राचे नाव गौतम, पण त्याला सिद्धार्थ म्हणत. तो वैभवात वाढला. राजपुत्राला साजेसे शिक्षण त्याला लाभले. पण तो बनला विरागी. जरा, व्याधी, मृत्यू सर्वाना अटळ आहेत व संसारात सर्वच दु:खी आहेत हे त्याला तीव्रतेने जाणवले. त्यावर उपाय शोधण्यासाठी त्याने घर सोडले. पत्नी यशोधरा व पुत्र राहुल यांचा त्याग केला. त्या वेळी तो २९ वर्षाचा होता. डी. डी. कोसंबींच्या मते बुद्धाचे असे चुपचाप घर सोडून जाणे ही दंतकथा होय. संन्यास घेण्यासाठी पत्नीची अनुमती लागे. शिवाय राजवाडय़ाच्या सुरक्षा व्यवस्थेची नजर चुकवून राजपुत्र निसटतो हे संभव नाही. मात्र त्याने गृहत्याग केला हे खरे. सिद्धार्थाला दिसलेले दु:ख तत्कालीन परिस्थितीचे वास्तव होते. गंगेच्या खोऱ्यात प्रथमच उदयास आलेली नगरे, वस्तुविनिमय अवस्थेतून चलनव्यवस्थेत होणारे पदार्पण, नाण्यांचा वापर, जमिनीची खासगी मालकी, पगारी सैन्य वगैरेमुळे जीवनात प्रचंड उलथापालथ घडत होती. त्यात अवर्षणे व मानवी आस्थांतरणे यांची भर पडलेली होती. राज्या-राज्यांतील लढाया व यज्ञयाग यामुळे वाढलेली हिंसा, शाक्यांच्या गणराज्याला उभा राहिलेला धोका, निर्धन व धनवान अशा सर्वानाच दु:खी करणारे होते. म्हणून मानवी दु:खावर सार्वकालिक उपाय शोधून काढण्याच्या हेतूने गौतमाने सर्व पाश आपणहून तोडले.

भिक्षेवर निर्वाह करून लोकांशी संवाद साधत स्वस्थपणे खूप भ्रमण केले. निरनिराळ्या तत्त्वज्ञानांचा परिचय करून घेतला. स्वत: प्रयोग करून पाहिले. यज्ञयाग त्याने नाकारले होते. म्हणून तपश्चर्येचा मार्ग चोखाळून पाहिला. पण मनोनिग्रहातून लोककल्याण साधणार नाही हे जाणले. हटयोग केला; कायाक्लेशाने तत्त्वबोध होत नाही हे ओळखले. निरीक्षण, मनन, चिंतन यातून त्याला मार्ग काढायचा होता. पण चिंतनात व्यत्यय आणणाऱ्या मनोवृत्तींशी झगडणे किती कठीण असते हे अनुभवले. चित्तवृत्तीनिरोध करण्यासाठी तो शुद्ध हवेचे निसर्गरम्य ठिकाण निवडीत असे. एका जागी बसून व्यायाम होत नाही म्हणून तो येरझारा घालीत चिंतन करीत असे. अखेर गया येथे पिंपळाच्या झाडाखाली ध्यान करीत असताना त्याला आपला मार्ग सापडला. अनुकूल वातावरण निर्माण करण्यात पिंपळाने महत्त्वाची भूमिका बजावली म्हणूनच तो बोधिवृक्ष ठरला. एक मोठा पिंपळ २४ तासांत १२०० किलोग्रॅम प्रश्नणवायू निर्माण करतो असे आधुनिक विज्ञान सांगते.

गौतमबुद्ध काळाच्या पुढे होता तसाच काही बाबतीत काळाचे अपत्यही होता. तत्कालीन समाजाचे काही पूर्वग्रह त्याच्यात होते. संगीत, नाटक, नृत्य या कला ज्ञानमार्गातील अडथळे होत असे त्याला वाटे. नाचणे म्हणजे वेडेपणा व दात दाखवून हसणे हा पोरकटपणा होय असे तो सांगे. त्यांचे स्त्रीविषयक धोरण उदार नव्हते. स्त्रीचे रूप, गंध, ध्वनी, स्पर्श, संपर्क यांसारखे पुरुषाला दुसरे प्रलोभन नाही. म्हणून ब्रह्मचर्यपालनात स्त्री ही मोठी आडकाठी होय असे त्याचे मत होते. भिख्खुणींचा संघ स्थापण्यास मुळात त्याचा विरोध होता. पुढे तशी परवानगी दिल्यावर स्त्रियांवर पुरुषांपेक्षा खूपच जास्त बंधने त्याने घातली. भिख्खुंसाठी २२७ तर भिख्खुणींसाठी ३११ नियम होते. बुद्धाचे नियम (विनय) फार कडक होते. सर्वाना एकभुक्त राहावे लगे. नियमांचा भंग केल्यास शिक्षा कठोर असे. हा नियमांचा अतिरेकच बुद्धामागे संघाच्या पहिल्या विभाजनास कारणीभूत झाला.

बुद्धाला समाजव्यवस्थेत चातुर्वण्र्यच अभिप्रेत होते. त्याविरुद्ध त्याने आवाज उठविलेला नाही. बुद्धकालीन संघातील जातीय टक्केवारी एच. डब्ल्यू. शूमन (H. W. Schuman) यांनी दाखवून दिली आहे ती अशी : ब्राह्मण ४८.२, क्षत्रिय २८.६, वैश्य १३.५, अवर्ण ६.६ व शुद्र ३.१. यात उच्चवर्णीयांचा भरणा स्पष्ट कळून येतो. कश्यप, सारीपुत, मोग्गलीयन, भारद्वाज हे त्याचे अनुयायी विद्वान ब्राह्मण होते. त्यांच्या हेतूबद्दल संशय व्यक्त करणे बुद्धावर अन्याय करण्यासारखे ठरेल. असे ब्राह्मण व बुद्ध यांच्यातील संबंधामुळे समाजाकडून बौद्ध धर्माचा स्वीकार कडव्या संघर्षाविना झाला. बुद्धाकडे खासकरून सत्ताधारी, व्यापारी, महाजन असाच वर्ग आकृष्ट झाला होता. बुद्धाला मनुष्य स्वभावाची अचूक पारख होती. राजनीतीचे उत्तम ज्ञान होते. पात्रतेबद्दल पूर्ण खात्री पटल्याखेरीज कुणाला तो संघात प्रवेश देत नसे. हेरगिरी करायला कोणी घुसेल हे शक्य नव्हते. काही करून धर्मप्रसार करणे हा त्याचा हेतू नव्हता, हे लक्षात घ्यावे. शिवाय दीक्षा ही फक्त भिख्खू बनण्यासाठी लागे. एरवी त्याचा उपदेश घ्यायला कुणीही जाऊ शकत असे. त्यात धर्मातर होत नव्हते. दु:खी लोकांना नैतिक धैर्य व दिलासा द्यावा, सन्मार्गाला लावावे यासाठी तो झटला, धर्मप्रसारासाठी नव्हे.

धर्माच्या इतिहासात बुद्ध अद्वितीय होय. बौद्धिक व नैतिक बळावर प्रस्थापनेला त्याने एकटय़ाने आव्हान दिले. पण त्याचा उदय शून्यातून झालेला नव्हता. बौद्धिक बंडखोरीची परंपरा या मातीतच होती. प्रश्नचीन उपनिषदांतील १०० पैकी १८ ऋषी यांना या ना त्या मुद्दय़ावर बंडखोर होते. निरीश्वरवाद येथे परका नव्हता. नास्तिक चार्वाकही आपले अस्तित्व टिकवून होते. पण त्यापैकी कुणाचा खून किंवा छळ झाला नाही. कारण सहिष्णुतेची परंपरासुद्धा याच मातीचा गुण. हे वातावरण बुद्धाला पोषक ठरले. बुद्धाने नवीन काय दिले हा प्रश्न महत्त्वाचा. त्याचे नाव अहिंसेसाठी प्रसिद्ध आहे. पण त्याच्या दोनशे वर्षे आधी पाश्र्वनाथाने अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह यांची शिकवण दिली होती. (पाश्र्वनाथाच्या आधीचे र्तिथकर ऐतिहासिक व्यक्ती नव्हेत. हे जैनधर्मीयांना पटत नाही.) महावीराने त्यात ब्रह्मचर्य व तपस्या यांची भर घातली. बुद्धाने ही सहाही तत्त्वे स्वीकारली. (दुसऱ्याचे काही स्वीकारण्यात त्याने संकोच केला नाही.) पण त्यांना समाधी व प्रज्ञा यांची मौलिक जोड दिली. यज्ञयाग व पुरोहितशाही झुगारणाऱ्या बुद्धाने पुनर्जन्म व कर्म या वैदिकांच्या संकल्पना स्वीकारल्या पण आत्मा व परमात्मा मानले नाहीत. त्यामुळे आत्मा नाही तर पुनर्जन्म कशाचा असा प्रश्न उभा राहिला. पण ज्यांची उत्तरे मिळत नाहीत अशा अमूर्त प्रश्नांवर बोलण्याचे बुद्ध टाळीत असे. सैद्धान्तिक वादविवादातून लोककल्याण साधत नाही हे तो ओळखून होता. अखेर प्रज्ञेच्या धर्माचीसुद्धा श्रद्धा ही एक आधारशिला असते. बौद्धिक चर्चेत त्याला रस नव्हता. वादविवादात निपुण असलेले काशीचे पंडित त्याच्या विरोधात होते. म्हणून सारनाथच्या जवळ असूनही काशीस जाणे त्याने टाळले.

भिख्खुसंघ स्थापणे हे बुद्धाचे खास योगदान. अशी संस्था वैदिकांमध्ये नव्हती. संघाने धर्माचे नेतृत्व केले, विद्वान धर्मप्रचारक निर्माण केले. चातुर्वण्र्य बुद्धाने स्वीकारले तरी ते त्याच्या धर्माला अटळ नव्हते. म्हणून वेगवेगळ्या स्वरूपात का होईना, बौद्ध धर्म विदेशात पसरला. स्वत:ला विश्वधर्म म्हणविणारा हिंदू धर्म याबाबतीत तोकडा पडला. त्याच्या छत्राखाली आलेल्या समाजांना जातीच्या उतरंडीत कोठेतरी स्थान ग्रहण करणे भाग होते. बुद्ध बराच व्यवहारी होता. त्याची अहिंसा जैनांप्रमाणे अतिरेकी नव्हती. प्रश्नणिमात्रांबद्दल करुणा म्हणजे अहिंसा ही सकारात्मक व्याख्या त्याने दिली. काही बाबतीत मांसाहार मान्य केला. अहिंसेचा पुरस्कार करून त्याने काळाची एक गरज पूर्ण केली. राजसत्तेला नवे परिमाण प्रश्नप्त करून दिले. वैदिकांवरही त्याचा परिणाम झाला. यज्ञातील बळी प्रतीकात्मक बनले. मांसाहारी समाजांनी शाकाहाराचे पावित्र्य मानले. बऱ्याच ब्राह्मण जातींनी शाकाहार स्वीकारला. स्त्रीविषयक धोरणातही त्याने तडजोड स्वीकारली. त्याची सावत्र माता गौतमी हिने संन्यास घेण्याची इच्छा प्रकट केली तेव्हा शिष्य आनंद याने तिची बाजू घेतली. ‘‘स्त्रियांना ज्ञानप्रश्नप्ती कधीच होणार नाही काय?’’ असा बिनतोड सवाल केला. त्यावर बुद्ध नमला. स्त्रीला अशी अनुमती देणारा इतिहासातील तो पहिला पुरुष ठरला.

स्वत: राज्यत्याग केलेल्या बुद्धाला राजकारणाबद्दल तुच्छता नव्हती. मानवी जीवनात राजसत्तेला असलेले स्थान तो ओळखून होता. विश्वशांती कशी नांदेल ही त्याची चिंता होती. छोटय़ा राज्यातील लढाया थांबविण्यासाठी तत्कालीन उपाय म्हणून त्याने साम्राज्याला पाठिंबा दिला. याचे काही दूरगामी परिणाम झाले हा भाग वेगळा. कालांतराने भिख्खुसंघ व सम्राट परस्परांना पूरक बनले. संघाकडे संपत्ती आली व अध:पात सुरू झाला. राजसत्ता, अर्थसत्ता व धर्मसत्ता यांचे साटेलोटे अखेर अटळ असते.

बुद्धाचा धर्म जनसामान्यांना पेलणारा नव्हता हे तितकेच खरे. लालसा हे मानवी दु:खाचे मूळ असल्याची जाणीव संवेदनाशील सुजाण मनात निर्माण होते ही सुस्थिती उपभोगल्यानंतर अशी माणसे साध्या राहणीकडे वळतात. पण ज्याला प्यायला पाणी नाही त्याला तृष्णा हे दु:खाचे मूळ नसून पाण्याचा अभाव हे असते. त्याला पाणीच हवे, अध्यात्म नको. म्हणून बुद्धाकडे आकृष्ट झालेल्यांमध्ये व्यापारी, राजेरजवाडे, अभिजन अशा वर्गाचाच भरणा होता. गांजलेले लोक अदृश्य शक्तींची आराधना करीत त्यांच्या कृपेच्या आशेवर जगतात त्यांना प्रज्ञेचा धर्म उपयोगी नसतो.

बुद्धाने स्वत:ला देव, प्रेषित किंवा अवतार घोषित केले नाही यांसारखे आणखी मोठेपण ते काय असणार? ‘मला गवसलेले सत्य सांगतो, तपासून पाहा, पटले तरच स्वीकारा’ असेच तो सांगे. भ्रम, पलायन, दांभिकपणा, फलज्योतिष यांना त्याने थारा दिला नाही. त्याची करुणा अपार होती म्हणून तो समाजविन्मुख झाला नाही. सर्वत्र पसरलेले दु:ख त्याने आतून अनुभवले होते. ‘मी’ काबूत आणला की मुक्ती साधता येते सांगणाऱ्यांचा ‘मी’ अधिक दृढ झालेला असतो हे त्याने निरखले होते. वैदिक विद्वान ज्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नाही अशा त्रविद्यकांतारात भटकत असल्याचे ओळखले होते. म्हणून माणसाच्या प्रज्ञेतून निर्माण झालेला जगातील एकमेव धर्म त्याचे हातून स्थापन झाला. अध्ययन, चिंतन, सत्कर्म, दया, क्षमा यांच्या जोरावर माणूस उच्चकोटीला पोहोचू शकतो हे त्याने दाखवून दिले. ज्यातून काही निष्पन्न होत नाही अशा चर्चेत आपण वेळ दवडतो तेव्हा बुद्धाची आठवण करावी. कटुतेची शिकार न होता, तणावमुक्त मनाने बुद्धीचा वापर करून जगाल तरच तगाल हा त्याचा सार्वकालिक संदेश आहे.

असा हा महामानव त्याच्या अनुयायांना पचणे शक्य नव्हते. बुद्धामागे बौद्ध धर्म फोफावला पण तो बुद्धाला अभिप्रेत असलेला, प्रज्ञेचा निरीश्वरवादी धर्म नव्हता. बुद्धाने कुणाला आपला उत्तराधिकारी नेमले नाही. धर्माचे नेतृत्व त्याने भिख्खुसंघाकडे सोपविले. त्यामुळे त्याची जागा घेणारा कुणी राहिला नाही. शिवाय निर्वाणानंतर शून्यात विलीन झालेला बुद्ध इहलोकातील सुख-दु:खाचे नियंत्रण कसे करणार असा प्रश्न पडला. अनुयायांमध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली. बुद्धाचा धर्मसुद्धा समजायला सोपा असला तरी आचरणाला अत्यंत कठीण. अशा परिस्थितीत धर्म वाचवायचा तर बौद्ध नेतृत्वाला काही उपाय करणे भाग होते. धार्मिक मनाला देवशास्त्र (theology) व दिव्यकथा (mythology) हे मोठे आधार असतात. याबाबतीत हिंदूधर्म अत्यंत समृद्ध. तेथे दुष्टांचा नाश व सुष्टांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वर अवतार घेतो. लोकांना तो मोठा भावनात्मक आधार असतो. सगुण-साकार रूपात त्याची उपासना करून लोक भवसागर पार करतात. बौद्ध नेतृत्वाने यातून धडा घेतला.

बुद्धानंतर शतक उलटल्यावर त्याच्या धर्मात पंथ व उपपंथ पडण्यास सुरुवात झाली होती आणि उत्तरोत्तर त्यांची संख्या वाढतच गेली. परिणामी बौद्ध धर्माचा इतिहास अत्यंत गुंतागुंतीचा व किचकट बनला. त्यातील महायान पंथाने मूर्तिपूजा, उपासना, कर्मकाण्ड यांचा उघड स्वीकार केला. शिवाय गोपनीय पवित्र ज्ञानाला (Esoteric knowledge) अफाट महत्त्व दिले. असे ज्ञान जे विशिष्ट सिद्ध किंवा प्रबुद्ध व्यक्तीकडेच असते व तिने दिल्यासच दुसऱ्याला प्रश्नप्त होते. अशा रहस्यमय गूढत्वावरील विश्वास धर्मगुरूंचे महत्त्व वाढविण्यास उपयुक्त ठरला. अन्य उणिवा भरून काढण्यासाठी महायानींनी दोन नव्या संकल्पना शोधल्या व त्या बौद्ध परंपरेत बसविल्या. एक, बोधिसत्व व दुसरी बुद्धाचे अवतार. हा बोधिसत्व म्हणजे बुद्धत्व प्रश्नप्त होण्याआधीची पायरी पण जातक कथांमधील पूर्वजन्मीचा बुद्ध नव्हे. लोकांचे दु:खनिवारण करणे हे स्वत:च्या आध्यात्मिक उन्नतीपेक्षा अधिक महत्त्वाचे वाटल्यामुळे तो बुद्धपद आपणहून नकारतो. संकटसमयी धावा करताच धावून येतो व भक्ताला वाचवितो. असे बोधिसत्व पाच असले तरी त्यातला व्यापारी व प्रवाशांचा देव अवलोकितेश्वर पद्मपाणी अत्यंत लोकप्रिय होऊन चीन, जपानपर्यंत जाऊन पोहोचला. मूर्ती व चित्रे यात विविध आविष्कार धारण करून अजरामर झाला. (पुढे भारतातून त्याला नामशेष केला तो गणपतीने.)

विष्णूचे चोवीस अवतारसुद्धा बौद्ध नेतृत्वापुढे एक आव्हान होते. मुळात २४ या आकडय़ाला पावित्र्य आणले ते जैनांनी, जैनांचे र्तीथकर २४, म्हणून विष्णूचे अवतारही १० वरून २४ वर नेण्यात आले. त्याच धर्तीवर पूर्वी होऊन गेलेल्या बुद्धांची नावासकट यादी तयार झाली. गौतमबुद्ध २५ वा. प्रत्येक बुद्धाने स्वत:ला ज्ञानप्रश्नप्ती होताच आपले आधीचे बोधिसत्वत्व नियोजित आगामी बुद्धाकडे परावर्तित केले. या परंपरेनुसार २६ वा आगामी बुद्ध मैत्रेय होय. जेथे एका ओळीत आठ बुद्ध मूर्ती कोरलेल्या असतात तेथे ७ वा गौतमबुद्ध व ८ वा मैत्रेय असतो. मैत्रेय सध्या बोधिसत्व आहे. तो तुशित नामक स्वर्गात राहतो व तेथून इहलोकावर कृपादृष्टी ठेवून असतो. बौद्ध धर्माची घडी पूर्णपणे विस्कटली की ती पुन्हा बसविण्यासाठी तो जन्म घेईल. मात्र हे गौतमबुद्धाच्या निर्वाणानंतर ५००० वर्षानी घडेल. गौतमबुद्ध रामासारखा कर्तव्यकठोर तर मैत्रेय श्रीकृष्णासारखा सखा, मदतीला तात्काळ धाऊन येणारा. श्रीकृष्णाची लोकप्रियता बौद्धांना नडत होती असे स्पष्ट दिसते. कारण बौद्धांना राम आदरणीय आहे पण घटजातकात श्रीकृष्णाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न दिसून येतो. तो ईक्ष्वाकूचा दासीपुत्र असून पिशाच्चासारखा कुरूप असल्याचे म्हटले आहे. या उलट मैत्रेय अत्यंत देखणा व तेजस्वी आहे. शिवाय तो सर्वाशी मैत्री करतो म्हणून मैत्रेय. हीनयान व महायान अशा दोन्ही पंथांना तो मान्य आहे. पाली भाषेतील मेट्टेय व चीनमधला मिलो फू. ह्य़ूएन्त्संग मैत्रेयाचा उपासक होता. मृत्युशय्येवर त्याने मैत्रेयाचीच प्रश्नर्थना केली होती. पण मैत्रेयाचे मूर्तिविज्ञान विकसले नाही. भारतात बौद्ध धर्माच्या ऱ्हासाबरोबर मैत्रेय विस्मृतीत केला.

गौतमबुद्धाच्या पराभवाच्या कहाणीला एक अनपेक्षित फाटा फुटला व इतिहासजमा झाला त्याचीही दखल येथे घेतली पाहिजे. १८७५ साली अमेरिकेत थिऑसॉफिकल सोसायटी या विश्वव्यापी संघटनेची स्थापना झाली. मानवजातीच्या आध्यात्मिक उद्धारासाठी देवाचे तत्त्वज्ञान शोधणाऱ्या या मंडळींना, प्रश्नचीन भारत हे मोठे आकर्षण ठरले. संस्थेचे संस्थापक कर्नल ऑलकॉट व मॅडॅम ब्लॅव्हॅट्स्की १८७९ मध्ये भारतात आले. अद्यार येथे त्यांनी आपले मुख्य ठाणे वसविले. गूढविद्या, अतिंद्रिय शक्ती,esoteric knowledge यावर त्यांचा पूर्ण विश्वास होता. त्यात योगविद्या शिकलेल्या मॅडमना अंतज्र्ञानामुळे बुद्धाचे २४ पूर्वजन्म दिसले. शिवाय २६ वा अवतारही गवसला. निर्वाणानंतर साधारण ५० वर्षानी बुद्धाने २६ वा जन्म घेतला तो आद्य शंकराचार्याच्या रूपात असा सिद्धांत बाईंनी मांडला. आत्मा व ब्रह्म वेगळे नव्हेतच असे आचार्याचे सांगणे म्हणजे बुद्धाचेच कार्य पुढे चालू ठेवणे होय असे मॅडमना वाटले. त्या १८९१ साली वारल्या पण त्यांच्या अभ्यासू अनुयायांनी या सिद्धांताचा पाठपुरावा चालू ठेवला. त्यात येणाऱ्या अडचणी म्हणजे शंकराचार्याचा ८ वे, ९ वे शतक हा काळ व वैदिक धर्माची घडी बसविण्याचे बौद्धविरोधी कार्य. त्यातून या थिऑसॉफिस्टांनी मार्ग काढला. बुद्धाचा अवतार असलेले ओरिजनल शंकराचार्य वेगळे व नंतरचे अभिनव शंकराचार्य वेगळे. अर्थात यातून काही निष्पन्न झाले नाही तरी ही कथा येथे संपली नाही.

१९०७ साली थिऑसॉफिकल सोसायटीचे अध्यक्ष कर्नल ऑलकॉट वारले व त्यांच्या जागी अ‍ॅनी बेझंटबाई आल्या, ज्या आधीच भारतात स्थायिक झालेल्या होत्या. त्यांनी लगेच कृष्णा नामक साधारण १२ वर्षाच्या मुलाला दत्तक घेऊन भावी जगद्गुरू म्हणून घडविण्याचा घाट घातला. त्या बाबतीत झालेले वाद येथे प्रस्तुत नाहीत. पण या कथेचा अ‍ॅन्टीक्लायमॅक्स म्हणजे १९२९ साली जे. कृष्णमूर्ती यांनी आपण मैत्रेय नाही असे घोषित करून त्यासाठी उभारलेली संघटना विसर्जित केली. मैत्रेय हा शब्द कृष्णमूर्ती, यांनी स्वत: वापरला आहे म्हणून ही घटना बुद्धाच्या कथेचा एक भाग ठरते. मात्र यातून जगाला जे. कृष्णमूर्तीसारखा विचारवंत लाभला हेही मान्य केले पाहिजे.

बुद्धाच्या या शोधयात्रेतून हेच निष्पन्न होते की, प्रज्ञेवर आधारलेला अन् सदाचाराला प्रश्नधान्य देणारा निरीश्वरवादी धर्म मानवजातीला पेलत नाही. म्हणून भगवान बुद्धाच्या यशातच गौतमबुद्ध नामक महामानवाचा शोकात्म पराभव प्रतीत होतो.

उत्तरा सहस्रबुद्धे , सौजन्य – लोकसत्ता

प्रपाठक, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ
(स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. ना. दा. सावरकर हे लेखिकेचे (आईचे वडील)आजोबा. )

काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीत सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्‍या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते? सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते.

स्वातंत्र्यवीर सावरकर पुन्हा एकदा या देशातील गलिच्छ राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. राजकीय पक्षांच्या धुळवडीमध्ये आज सावरकर हा एक ‘मुद्दा‘ झाला आहे. तसे या देशात दिवंगत नेत्यांना वेठीला धरून राजकारणी डावपेच रंगविण्याचे प्रकार नवीन नाहीत. आपल्या समाजाला विधायक टीका पचविता तर येत नाहीच. ऐतिहासिक व्यक्तींचे परखड मूल्यमापन हे कोणत्याही समाजाला हितकारकच असते. परंतु तशी कुवतच नसलेल्या आपल्या या देशातहोते ती नुसती चिखलफेक. अलीकडे सावरकरांवर वारंवार अशी चिखलफेक होताना दिसत आहे. आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर त्याला कारणीभूत झाले आहेत, काही महिन्यांपूर्वी संसदेत सावरकरांचे चित्र लावण्याच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी अशीच ठिणगी टाकलेली होती.

दुर्दैवाने आज देशाच्या राजकारणाचे ‘भाजप वि. भाजपेतर‘ म्हणजेच ‘हिंदुत्ववादी वि. सेक्युलर‘, असे विचित्र ध्रुवीकरण झालेले आहे. त्यामुळे वैचारिक माहौल असा झाला आहे की, काँग्रेसला वाईट म्हणणार्‍याचीही लगेच ‘जातीयवादी‘ अशी संभावना होते. त्यामुळे निष्पक्ष विवेचन करू इच्छिणार्‍या आणि कोणत्याही विचारसरणीच्या जोखडापासून मुक्त असू पाहणार्‍या व्यक्तींची अतिशय पंचाईत होते. शीतयुद्धाच्या काळात गटनिरपेक्ष परराष्ट्रधोरण राबवू इच्छिणार्‍या तिसर्‍या जगातील राष्ट्रांना, ‘तुम्ही आमच्याबरोबर नसाल, तर आमच्या विरुद्धच आहात‘ असे दरडावणार्‍या अमेरिका आणि सोविएत संघासारखी दहशत आज इथल्या वैचारिक क्षेत्रात निर्माण झाली आहे. त्यामुळेच, एनडीए सरकारच्या परराष्ट्रधोरणाची वाखाणणी करणार्‍या व्यक्तीला सरळ ‘प्रतिगामी हिंदुत्ववादी‘ ठरविले जाते! आणि अलीकडच्या काळात संघपरिवाराने सावरकरांचे चक्क ‘अपहरण‘ केलेले असल्यामुळे, आजच्या विवादात सावरकरांची बाजू मांडणार्‍याचीही तशीच वाट लावली जाईल. परंतु सावरकरांनीच मांडलेली हिंदुत्वाची अतिरेकी विचारसरणी समूळ अमान्य करूनही,सावरकर या व्यक्तीची देशभक्ती, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग, भोगलेल्या हालअपेष्टा याविषयी शंका घेणे अत्यंत अप्रस्तुत आणि असंस्कृत आहे, हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे.

ज्या दोन मुद्द्यांवरून मुख्यतः आज सावरकरविरोधी राळ उडविली जात आहे, त्यातील पहिला मुद्दा आहे गांधी हत्येतील सावरकरांच्या सहभागाचा. कितीही तीव्र मतभेद असले तरी गांधी या देशबांधव असलेल्या व्यक्तीची हत्या करणे हे कायद्यालाच नव्हे तर नैतिकतेलाही धरून नव्हते. सावरकर अशा कृत्यास पाठिंबा देतील अशी सुतराम शक्यता नव्हती. तत्कालीन सरकारने सावरकरांना या खटल्यात गोवले खरे; परंतु सर्व पुरावे तपासून न्यायालयाने सर्व आरोपांतून सावरकरांची सन्मानाने मुक्तता केली. तसेच आकसाने सावरकरांना या खटल्यात गुंतविल्याबद्दल सरकारवर ताशेरेही ओढले. त्या वेळी सरकारनेही हा निकाल मानला. त्यावर अपील करण्याची संधी असूनही तसे केले नाही आणि या प्रकरणावर पडदा टाकला. आज जर काँग्रेस आणि डावे पक्ष पुनःपुन्हा तोच मुद्दा उकरून काढत असतील तर न्यायालयाचा निर्णय त्यांना अमान्य आहे, असे समजायचे का? ही मंडळी एक प्रकारे न्यायालयाचा अवमानच करीत नाहीत का? अयोध्या प्रकरणी चाललेल्या केसचा निकाल आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही तो मानणार नाही, असे सांगणार्‍या विहिंप- संघ परिवारात आणि काँग्रेस- डाव्या पक्षांमध्ये मग काय फरक राहिला? गांधी हत्येमध्ये सावरकरसहभागी होते असा दावा करणार्‍यांना सावरकरांचे राजकारण समजलेच नाही, असे म्हटले पाहिजे. सावरकर हे जसे ‘अहिंसेचे पक्षपाती‘ नव्हते तसेच ‘हिंसेचे पक्षपाती‘ही नव्हते. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी केवळ हिंसेच्या मार्गाचा वापर त्यांनी केला नाही. त्यांचे विद्यार्थिदशेतील पुण्यातील राजकारण, त्यांचे इंग्लंडमधील राजकारण पाहता असे लक्षात येते की, त्यांनी क्रांतिकारी मार्गाबरोबरीनेच, प्रतिकाराच्या निःशस्त्र आणि लोकशाहीसंमत मार्गांचाही भरपूर वापर केला. मुख्यतः निःशस्त्र असलेल्या हैद्राबाद मुक्तिसंग्रामास त्यांनी पाठिंबा दिला आणि हिंदुसभेच्या सभासदांनी त्यात सहभागी होण्याची हाक दिली. अखंड हिंदुस्थानसाठी त्यांनी चालविलेला लढा हा सेक्युलर जरी नव्हता तरी निःशस्त्रच होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पिस्तुल सोडून मतपेटीचा मार्ग पत्करला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले होते. अंदमानात असताना त्यांना नामदार गोखल्यांच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा गोखल्यांच्या राजकारणाला टोकाचा विरोध करणार्‍या सावरकरांनी, गोखल्यांची देशभक्ती आणि त्याग याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिवसाचा कडकडीत उपास केला होता. हे सावरकर गांधीहत्येच्या कटात सहभागी होतील, अशी शक्यताच नाही. सावरकर ‘क्रांतिकारक‘ होते, ‘दहशतवादी‘ नव्हते!

काही महिन्यांपासून मुख्यतः डाव्या पक्षांनी पुढे आणलेला आणखी एक मुद्दा म्हणजे सावरकर ब्रिटिश सरकारची माफी मागून अंदमानातून सुटले. यावरून सावरकरांच्या देशभक्तीविषयी शंका उपस्थित करणार्‍या डाव्यांच्या देशनिष्ठेविषयी किती आणि काय बोलावे ? दुसर्‍या महायुद्धाविषयीची सोव्हिएत संघाची भूमिका जसजशी बदलली, तसतशी इथल्या साम्यवाद्यांची भूमिका बदलत गेली हे तर सर्वश्रुत आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनच्या भूमिकेचे समर्थन करणारे डावेही होते. गमतीचा भाग म्हणजे या युद्धाच्या वेळी सोव्हिएत संघ तटस्थ राहिला. चीन नावाच्या साम्यवादी ‘बंधूला‘ भारत नावाच्या ‘मित्रा‘विरुद्ध काही सोव्हिएत संघाने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट परिषदेमध्ये झालेल्या चर्चेत जेव्हा भूपेश गुप्ता या युद्धातील चीनची बाजू मांडू लागले तेव्हा प्रत्यक्ष क्रुश्चेव्हनी त्यांना ‘आधी आपल्या देशबांधवांना चीनच बरोबर हे पटवून द्या!‘ असा टोला हाणला होता.

सावरकरांच्या या तथाकथित माफीपत्राचा संदर्भाशिवाय विचार करणे चुकीचे आहे. संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यात दोन जन्मठेपांची शिक्षा झालेली सावरकर ही एकच व्यक्ती होती. (इतिहासतज्ज्ञांनी चूकभूल द्यावी-घ्यावी!) यावरून ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने त्यांनी केलेला ‘गुन्हा‘ किती गंभीर होता हे लक्षात यावे. अंदमानातील उणीपुरी १४ वर्षे त्यांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या त्याला सीमाच नाही. त्यातूनही सजगता, कविवृत्ती आणि विनोदबुद्धी टिकवून हा माणूस बाहेर पडला. अंदमानातून सुटल्यावरही काही वर्षे भारतातील तुरुंगात आणि दशकभराहून अधिक काळ रत्नागिरीत स्थानबद्धतेत काढावा लागला. हे काय सावरकरांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली आणि त्यावर ब्रिटिशांनी विश्वास ठेवला म्हणून ? युद्धामध्ये ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू ला मोठेच महत्त्व असते आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशा तर्‍हेन ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू घेण्याचे सावरकर हे काही एकमेव उदाहरण नव्हे. शेवटी १९३७ मध्ये सावरकरांची बिनशर्त मुक्तता झाली, तीही ब्रिटिशांच्या नव्हे, तर मुंबई प्रांतीय सरकारातील हिंदी नेत्यांच्या पुढाकाराने काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आज सावरकरांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केल्यावर संघ परिवार आज सावरकरांची बाजू घेऊ पाहतोय. परंतु सावरकर या व्यक्तीच्या आणि त्यांच्या विचारांच्या संदर्भात संघ परिवाराची नेमकी भूमिका काय आहे हा प्रश्न अप्रस्तुत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीमध्ये सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्‍या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते ? सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते. हिंदू संघटनांसाठी अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन केले पाहिजे हा सावरकरांचा विचार, तर गुरुजीप्रणीत संघाचा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर विश्वास. गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे, असे म्हणणारे सावरकर संघ परिवाराला कुठे मान्य आहेत ? आमच्या वेदांमध्ये सर्व काही ज्ञान आहे असे म्हणणे म्हणजे आम्ही गेल्या हजारो वर्षांत काहीच प्रगती केली नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच देणे आहे, असे प्रतिपादन करून; वेदांना ग्रंथालयाची शोभा म्हणून कपाटात जरूर ठेवावे, पण आज ते आचरणात मात्र मुळीच आणू नयेत; असे शिकवणारे सावरकर परिवारातल्या किती जणांना पचविता येतील ? पाश्चिमात्य आणि पौर्वात्य या दोन संस्कृतींमध्ये ‘अप-टु-डेट‘ आणि ‘श्रुति-स्मृतिपुराणोक्त‘ हा मूलभूत फरक असल्याकडे लक्ष वेधून ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त‘ वृत्तीमुळे आपल्या भारतीय समाजाचे जबर नुकसान झालेले आहे, असे ठासून सांगत, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच आपल्या रोगांवरचे औषध आहे, असे आग्रही प्रतिपादन करणारेसावरकर, संघ परिवाराला पेलतील का ? हिंदुत्वाची विचारसरणी आणि राजकारण नाकारूनही सावरकर हे देशनिष्ठा आणि त्याग यांचे प्रतीक आहे, हे मान्यच करावे लागते. सावरकरांवरून हीन पातळीवरचे राजकारण पुनःपुन्हा खेळले जाते, यात सावरकरांचे काहीच नुकसान नाही. परंतु यातून आपल्या समाजाचा इतिहासाच्या आकलनाविषयीचा असमंजसपणा दिसतो आणि म्हणून आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण होते.

मधू लिमये (सत्याग्रही विचारधारा, १९९३), सौजन्य – लोकसत्ता

संघ परिवाराने अनेक ऐतिहासिक पूर्वग्रह आणि इतिहासाचे चुकीचे अर्थ जोपासले आहेत. आपल्या पूर्वग्रहदूषित कल्पनांच्या आधारे चुकीचाच नव्हे तर राष्ट्राच्या मूळ संकल्पनेला बाधक अन्‌ घातक प्रचारही गेली सत्तर वर्षे त्यांनी चालविला आहे.

महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानण्यास भाजपच्या नेत्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. महात्मा गांधी हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकातले एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होय. त्यांच्या जन्माच्या आधी, अगदी प्राचीन काळापासून आजचा इंडिया- भारत हे एक हिंदू राष्ट्र अस्तित्वात होते. म्हणून म. गांधींना- जे नंतरचे आहेत- त्यांनाच ‘भारताचे राष्ट्रपिता‘ असे मानणे चुकीचे ठरते, असा त्यांचा युक्तिवाद आहे. इतरांचा अतिशय आग्रह असेल तर म. गांधींना भारतमातेचा किंवा हिंदू राष्ट्राचा फार तर सुपुत्र मानायला त्यांची हरकत नाही. संघपरिवाराचा म. गांधींबद्दल असलेला पूर्वग्रह सर्वांना परिचित आहे. संघाच्याच लोकांनी माझ्याजवळ बोलताना सांगितले की, संघ स्थापनेच्या तब्बल पस्तीस-चाळीस वर्षांनंतर महात्मा गांधींच्या नावाचा संघाच्या प्रातःस्मरणात समावेश करण्यात आला.

संघ परिवार व भाजप यांच्या विशिष्ट मानसिकतेचा उगम केवळ म. गांधींबद्दल तीव्र अप्रीतीमध्ये नसून इतिहास व राज्य- राष्ट्रसंबंध याविषयी चुकीचे वाचन, चुकीचे अन्वयार्थ यामध्येही आहे. ‘राज्य‘, ‘राष्ट्र‘ या संकल्पना, तसेच ‘संस्कृती‘ (Culture), ‘मानवी सभ्यता‘(Civilisation) या संज्ञांबद्दल, त्यांच्या अन्योन्य नात्यांबद्दल त्यांच्या मनात चुकीचे अर्थ घर करून घट्ट बसले आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात म. गांधींनाराष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधिले. राष्ट्रपिता‘ हे गुणविशेषण वापरताना सुभाषबाबूंच्या मनात राष्ट्र (Nation) या संज्ञेचा आधुनिक अर्थ होता. प्राचीन संस्कृत वा प्राकृत भारतीय भाषांमध्ये किंवा बंगाली, मराठी, हिंदी या अर्वाचीन भारतीय भाषांमध्येही इंग्रजीमधील ‘नेशन‘(Nation) या शब्दामधील सर्व छटांचा अर्थ तंतोतंत व्यक्त करणारा समानार्थी शब्द अस्तित्वात नाही.

ज्या भूप्रदेशात सार्वभौमत्वाचा दावा करणारी शेकडो राज्ये अस्तित्वात असतील, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याला आपापला स्वतंत्र राज्यप्रमुख व स्वतंत्र सेना असेल; त्या भूप्रदेशाला भौगोलिक सलगता, सांस्कृतिक एकता व मानवी सभ्यतेची समानता या कसोटीवर उतरूनही आधुनिक अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही.

ज्या मानवसमूहाने विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करताना आपली स्पष्टपणे वेगळी व स्वतंत्र राजकीय अस्मिता प्राप्त केलेली असेल आणि ज्यांनी राजकीय एकीकरणामधून अशी एकच केंद्रीय राजकीय सत्ता निर्माण केलेली असेल की, ज्या केंद्रीय सत्तेचा अंमल व हुकूम त्या संपूर्ण भूप्रदेशभर चालतो; त्या मानवसमूहाला व त्यांच्या भूप्रदेशाला ‘राष्ट्र‘ हे नामाभिमान प्राप्त होते. आधुनिक ‘राष्ट्र‘ या शब्दामागे हा अर्थ गृहीत आहे.

आधुनिक राजकीय जाणिवांचे केंद्र म्हणून बंगालचे आद्यस्थान सर्वमान्य आहे. तथापि बंगाली नेत्यांनी व लेखकांनी तारतम्याचा विचार न करता ‘देश‘, ‘राष्ट्र‘, ‘जाती‘ अशा शब्दांचा वापर केलेला आहे, हे नाकारून चालणार नाही. या शब्दप्रयोगांमागील खरा अर्थ संदर्भाशिवाय शोधता येणार नाही.. काही वेळा या शब्दांचा वापर बंगाली भाषक जेथे वास्तव्य करतात, त्या बंगालसाठी केलेला आहे. काही वेळा भारताला राष्ट्र म्हणून संबोधण्यासाठी या शब्दांचा वापर झालेला आहे.

हा शाब्दिक आणि वैचारिक गोंधळ बंगाली भाषकांपुरता मर्यादित नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातही राजकीय जागृती झाली. या काळात मराठी भाषक नेत्यांनी आणि लेखकांनीही बरोबर तसाच वैचारिक गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे. लोकमान्य टिळक हे या काळातील एक राष्ट्रवादी महान नेते होते, याबद्दल कोणतीही शंका नाही. संघ परिवारदेखील हे मान्य करतो. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी लोकमान्यांपासूनच राजकीय प्रेरणा घेतली. ज्यांनी लो. टिळकांच्या लिखाणाचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे, त्यांना माहीत आहे की भिन्न काळात. (कधी एकाच काळातही) व त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत लोकमान्यांनी ‘राष्ट्र‘ हा शब्द तीन भिन्न अर्थांनी वापरलेला आहे. काही उदाहरणांनी हे स्पष्ट करता येईल.
आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात लो. टिळक म्हणतात, ‘‘सिंध, गुजराथ, महाराष्ट्र व कर्नाटक या चार राष्ट्रांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी बनली आहे.‘‘ बंगालच्या फाळणीच्या संदर्भात बोलताना त्यांनी लिहिले आहे की, बंगाली भाषिक राष्ट्राचे विभाजन करण्यामागे ब्रिटिशांची अत्यंत दुष्ट योजना आहे. त्याच लेखात बंगालचा ‘प्रांत‘ असाही उल्लेख करून त्यांनी प्रांत-राष्ट्र या शब्दांचा घोळ करून ठेवला आहे. राष्ट्र आणि प्रांत या संकल्पनांचे भिन्नत्व लो. टिळकांनी काळजीपूर्वक लक्षात घेतलेले नव्हते.

स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट सोसल्यामुळे आपल्या राजकीय आयुष्याच्या मध्यावर लोकमान्य राष्ट्रीय नेते बनले. या वेळचे राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नावर टिळकांचे विचार पाहिल्यास राष्ट्र ही संकल्पना साकार करताना, ‘वसुधैव कुटुंबकम्‌‘- अखिल मानवजात हे एकच कुटुंब असल्याची कल्पना, आंतरराष्ट्रीय ध्येय म्हणून टिळक नाकारतात. हे ध्येय आकर्षक असले तरी प्रत्यक्षात उतरणार नाही, असे कारण ते देतात. दुसर्‍या बाजूला ते म्हणतात की, व्यक्ती, कुटुंब वा प्रदेश या अस्मिता बाळगणे म्हणजे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. राष्ट्र ही संकल्पना या दोन टोकांच्या मध्ये कोठेतरी आहे. या काळात लोकमान्य
आपल्या लोकप्रियतेचा पाया महाराष्ट्रात मजबूत करीत होते. त्यासाठी त्यांनी दोन उत्सवांचे माध्यम योजले. त्यातून मराठी राष्ट्रीयचा व हिंदू राष्ट्रीयता एकत्रितपणे जागवता येणार होती. समान भाषा व समान ऐतिहासिक पार्श्वभूमी हा या दोन्ही राष्ट्रीयतांचा पाया होता. गणेशोत्सवाने भाषिक नात्याची व शिवजयंतीमुळे समान ऐतिहासिक पार्श्वभूमीची गरज भागत होती.

समान भूप्रदेश, भाषा, धर्म यापैकी कोणत्याही एकाच वा एकत्रित गोष्टींचा आधार राष्ट्रबांधणीला पुरेसा नाही, असे लोकमान्य म्हणत. राष्ट्रबांधणीसाठी समान हितसंबंध व समान गतस्मृती पायाभूत आहेत, असे मानल्यामुळे ‘समानहिततत्त्व‘ व ‘पूर्वेतिहासस्मरण‘ या दोन शब्दांचा त्यांनी राष्ट्रवादासाठी उपयोग केला. या दोन तात्त्विक कसोट्या लावून ‘भारत (India) हे एक राष्ट्र आहे, असे कसे म्हणता येईल ?‘ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लोकमान्य टिळकांना ‘राष्ट्र‘ या संकल्पनेचा व्यापक अर्थ माहीत नव्हता, असे मानता येणार नाही. लॉर्ड ए. ओ. ह्यूमच्या (काँग्रेसचे संस्थापक) निवेदनाचा परामर्श घेताना त्यांनी दाखवून दिले की, ‘सर्व जाती-जमाती व भारताचे सर्व प्रांत एक राष्ट्र निर्माण करण्यास एकत्र आले आहेत.‘

राजकीय, वैचारिक परिपक्वता प्राप्त केल्यानंतर राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता पावल्यानंतर आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाल्यानंतरदेखील लो. टिळकांचा राष्ट्र या संकल्पनेमागचा अस्पष्टपणा शिल्लकच होता. राजद्रोहाच्या दुसर्‍या खटल्याच्या काळात ते म्हणतात, ‘‘इंडिया अजून ‘राष्ट्र‘ नाही.‘‘ हे दुर्दैव आहे की, लोकमान्य टिळकांसारखा महान नेता संकुचित महाराष्ट्रीय राष्ट्रवादाच्या प्रवृत्तीच्या वारंवार होणार्‍या प्रादुर्भावापासून स्वतःला अखेरपर्यंत मुक्त करू शकला नाही. त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या मध्य काळात लिहिलेल्या एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘प्रत्येक व्यक्तीची नियती अलग असते. त्याचप्रमाणे भारताच्या प्रत्येक प्रांताचे भवितव्य एकच कसे असेल ? कोणास ठाऊक, भविष्यकाळात ते कदाचित अलगही होतील.‘‘ भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना लोकमान्यांच्या वक्तव्यांची जाणीव असेलच. त्यांच्या (अधिक…)