मधू लिमये (सत्याग्रही विचारधारा, १९९३), सौजन्य – लोकसत्ता

संघ परिवाराने अनेक ऐतिहासिक पूर्वग्रह आणि इतिहासाचे चुकीचे अर्थ जोपासले आहेत. आपल्या पूर्वग्रहदूषित कल्पनांच्या आधारे चुकीचाच नव्हे तर राष्ट्राच्या मूळ संकल्पनेला बाधक अन्‌ घातक प्रचारही गेली सत्तर वर्षे त्यांनी चालविला आहे.

महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानण्यास भाजपच्या नेत्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. महात्मा गांधी हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकातले एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होय. त्यांच्या जन्माच्या आधी, अगदी प्राचीन काळापासून आजचा इंडिया- भारत हे एक हिंदू राष्ट्र अस्तित्वात होते. म्हणून म. गांधींना- जे नंतरचे आहेत- त्यांनाच ‘भारताचे राष्ट्रपिता‘ असे मानणे चुकीचे ठरते, असा त्यांचा युक्तिवाद आहे. इतरांचा अतिशय आग्रह असेल तर म. गांधींना भारतमातेचा किंवा हिंदू राष्ट्राचा फार तर सुपुत्र मानायला त्यांची हरकत नाही. संघपरिवाराचा म. गांधींबद्दल असलेला पूर्वग्रह सर्वांना परिचित आहे. संघाच्याच लोकांनी माझ्याजवळ बोलताना सांगितले की, संघ स्थापनेच्या तब्बल पस्तीस-चाळीस वर्षांनंतर महात्मा गांधींच्या नावाचा संघाच्या प्रातःस्मरणात समावेश करण्यात आला.

संघ परिवार व भाजप यांच्या विशिष्ट मानसिकतेचा उगम केवळ म. गांधींबद्दल तीव्र अप्रीतीमध्ये नसून इतिहास व राज्य- राष्ट्रसंबंध याविषयी चुकीचे वाचन, चुकीचे अन्वयार्थ यामध्येही आहे. ‘राज्य‘, ‘राष्ट्र‘ या संकल्पना, तसेच ‘संस्कृती‘ (Culture), ‘मानवी सभ्यता‘(Civilisation) या संज्ञांबद्दल, त्यांच्या अन्योन्य नात्यांबद्दल त्यांच्या मनात चुकीचे अर्थ घर करून घट्ट बसले आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात म. गांधींनाराष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधिले. राष्ट्रपिता‘ हे गुणविशेषण वापरताना सुभाषबाबूंच्या मनात राष्ट्र (Nation) या संज्ञेचा आधुनिक अर्थ होता. प्राचीन संस्कृत वा प्राकृत भारतीय भाषांमध्ये किंवा बंगाली, मराठी, हिंदी या अर्वाचीन भारतीय भाषांमध्येही इंग्रजीमधील ‘नेशन‘(Nation) या शब्दामधील सर्व छटांचा अर्थ तंतोतंत व्यक्त करणारा समानार्थी शब्द अस्तित्वात नाही.

ज्या भूप्रदेशात सार्वभौमत्वाचा दावा करणारी शेकडो राज्ये अस्तित्वात असतील, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याला आपापला स्वतंत्र राज्यप्रमुख व स्वतंत्र सेना असेल; त्या भूप्रदेशाला भौगोलिक सलगता, सांस्कृतिक एकता व मानवी सभ्यतेची समानता या कसोटीवर उतरूनही आधुनिक अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही.

ज्या मानवसमूहाने विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करताना आपली स्पष्टपणे वेगळी व स्वतंत्र राजकीय अस्मिता प्राप्त केलेली असेल आणि ज्यांनी राजकीय एकीकरणामधून अशी एकच केंद्रीय राजकीय सत्ता निर्माण केलेली असेल की, ज्या केंद्रीय सत्तेचा अंमल व हुकूम त्या संपूर्ण भूप्रदेशभर चालतो; त्या मानवसमूहाला व त्यांच्या भूप्रदेशाला ‘राष्ट्र‘ हे नामाभिमान प्राप्त होते. आधुनिक ‘राष्ट्र‘ या शब्दामागे हा अर्थ गृहीत आहे.

आधुनिक राजकीय जाणिवांचे केंद्र म्हणून बंगालचे आद्यस्थान सर्वमान्य आहे. तथापि बंगाली नेत्यांनी व लेखकांनी तारतम्याचा विचार न करता ‘देश‘, ‘राष्ट्र‘, ‘जाती‘ अशा शब्दांचा वापर केलेला आहे, हे नाकारून चालणार नाही. या शब्दप्रयोगांमागील खरा अर्थ संदर्भाशिवाय शोधता येणार नाही.. काही वेळा या शब्दांचा वापर बंगाली भाषक जेथे वास्तव्य करतात, त्या बंगालसाठी केलेला आहे. काही वेळा भारताला राष्ट्र म्हणून संबोधण्यासाठी या शब्दांचा वापर झालेला आहे.

हा शाब्दिक आणि वैचारिक गोंधळ बंगाली भाषकांपुरता मर्यादित नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातही राजकीय जागृती झाली. या काळात मराठी भाषक नेत्यांनी आणि लेखकांनीही बरोबर तसाच वैचारिक गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे. लोकमान्य टिळक हे या काळातील एक राष्ट्रवादी महान नेते होते, याबद्दल कोणतीही शंका नाही. संघ परिवारदेखील हे मान्य करतो. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी लोकमान्यांपासूनच राजकीय प्रेरणा घेतली. ज्यांनी लो. टिळकांच्या लिखाणाचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे, त्यांना माहीत आहे की भिन्न काळात. (कधी एकाच काळातही) व त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत लोकमान्यांनी ‘राष्ट्र‘ हा शब्द तीन भिन्न अर्थांनी वापरलेला आहे. काही उदाहरणांनी हे स्पष्ट करता येईल.
आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात लो. टिळक म्हणतात, ‘‘सिंध, गुजराथ, महाराष्ट्र व कर्नाटक या चार राष्ट्रांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी बनली आहे.‘‘ बंगालच्या फाळणीच्या संदर्भात बोलताना त्यांनी लिहिले आहे की, बंगाली भाषिक राष्ट्राचे विभाजन करण्यामागे ब्रिटिशांची अत्यंत दुष्ट योजना आहे. त्याच लेखात बंगालचा ‘प्रांत‘ असाही उल्लेख करून त्यांनी प्रांत-राष्ट्र या शब्दांचा घोळ करून ठेवला आहे. राष्ट्र आणि प्रांत या संकल्पनांचे भिन्नत्व लो. टिळकांनी काळजीपूर्वक लक्षात घेतलेले नव्हते.

स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट सोसल्यामुळे आपल्या राजकीय आयुष्याच्या मध्यावर लोकमान्य राष्ट्रीय नेते बनले. या वेळचे राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नावर टिळकांचे विचार पाहिल्यास राष्ट्र ही संकल्पना साकार करताना, ‘वसुधैव कुटुंबकम्‌‘- अखिल मानवजात हे एकच कुटुंब असल्याची कल्पना, आंतरराष्ट्रीय ध्येय म्हणून टिळक नाकारतात. हे ध्येय आकर्षक असले तरी प्रत्यक्षात उतरणार नाही, असे कारण ते देतात. दुसर्‍या बाजूला ते म्हणतात की, व्यक्ती, कुटुंब वा प्रदेश या अस्मिता बाळगणे म्हणजे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. राष्ट्र ही संकल्पना या दोन टोकांच्या मध्ये कोठेतरी आहे. या काळात लोकमान्य
आपल्या लोकप्रियतेचा पाया महाराष्ट्रात मजबूत करीत होते. त्यासाठी त्यांनी दोन उत्सवांचे माध्यम योजले. त्यातून मराठी राष्ट्रीयचा व हिंदू राष्ट्रीयता एकत्रितपणे जागवता येणार होती. समान भाषा व समान ऐतिहासिक पार्श्वभूमी हा या दोन्ही राष्ट्रीयतांचा पाया होता. गणेशोत्सवाने भाषिक नात्याची व शिवजयंतीमुळे समान ऐतिहासिक पार्श्वभूमीची गरज भागत होती.

समान भूप्रदेश, भाषा, धर्म यापैकी कोणत्याही एकाच वा एकत्रित गोष्टींचा आधार राष्ट्रबांधणीला पुरेसा नाही, असे लोकमान्य म्हणत. राष्ट्रबांधणीसाठी समान हितसंबंध व समान गतस्मृती पायाभूत आहेत, असे मानल्यामुळे ‘समानहिततत्त्व‘ व ‘पूर्वेतिहासस्मरण‘ या दोन शब्दांचा त्यांनी राष्ट्रवादासाठी उपयोग केला. या दोन तात्त्विक कसोट्या लावून ‘भारत (India) हे एक राष्ट्र आहे, असे कसे म्हणता येईल ?‘ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लोकमान्य टिळकांना ‘राष्ट्र‘ या संकल्पनेचा व्यापक अर्थ माहीत नव्हता, असे मानता येणार नाही. लॉर्ड ए. ओ. ह्यूमच्या (काँग्रेसचे संस्थापक) निवेदनाचा परामर्श घेताना त्यांनी दाखवून दिले की, ‘सर्व जाती-जमाती व भारताचे सर्व प्रांत एक राष्ट्र निर्माण करण्यास एकत्र आले आहेत.‘

राजकीय, वैचारिक परिपक्वता प्राप्त केल्यानंतर राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता पावल्यानंतर आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाल्यानंतरदेखील लो. टिळकांचा राष्ट्र या संकल्पनेमागचा अस्पष्टपणा शिल्लकच होता. राजद्रोहाच्या दुसर्‍या खटल्याच्या काळात ते म्हणतात, ‘‘इंडिया अजून ‘राष्ट्र‘ नाही.‘‘ हे दुर्दैव आहे की, लोकमान्य टिळकांसारखा महान नेता संकुचित महाराष्ट्रीय राष्ट्रवादाच्या प्रवृत्तीच्या वारंवार होणार्‍या प्रादुर्भावापासून स्वतःला अखेरपर्यंत मुक्त करू शकला नाही. त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या मध्य काळात लिहिलेल्या एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘प्रत्येक व्यक्तीची नियती अलग असते. त्याचप्रमाणे भारताच्या प्रत्येक प्रांताचे भवितव्य एकच कसे असेल ? कोणास ठाऊक, भविष्यकाळात ते कदाचित अलगही होतील.‘‘ भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना लोकमान्यांच्या वक्तव्यांची जाणीव असेलच. त्यांच्या या धारणेमुळे मराठी माणसाने महाराष्ट्राचा इतिहास व मराठी भाषेचा विकास यावर लक्ष केंद्रित करावे; असा सल्ला त्यांनी दिला.

तत्त्वज्ञानाच्या पातळीवर लोकमान्य अद्वैतवादी होते. परंतु भाषा, प्रांत, धर्म, राष्ट्र यांच्या परस्परांना छेद जाणार्‍या अस्मितांचा ते कधी मेळ घालू शकले नाहीत. त्या कालखंडात, भारतीय जनतेला समानहिततत्त्व व समान पूर्वेतिहासस्मरण आहे, असे त्यांना वाटत नव्हते. त्यामुळे महाराष्ट्रीय अस्मिता हीच फक्त त्यांच्या राष्ट्रीय चळवळीचा पाया होऊ शकेल, अशी त्यांची धारणा बनली. सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना होऊन सोळा वर्षे लोटल्यानंतरही त्यांची ही धारणा कायम राहू शकली. केवळ नऊ वर्षांपूर्वी आपण या उलट भूमिका घेऊन भारतीय राष्ट्रवादाचा हिरीरीने पुरस्कार केला होता, याचेही त्यांना विस्मरण झाले होते. तात्कालिक राजकीय गरजेपोटी त्यांनी आपल्याच पूर्वीच्या भूमिकेशी विसंगत भूमिका अनेक वेळा घेतली. राजकीय संधीसाधूपणा आणि वैचारिक गोंधळ याचा परिणाम झाल्यामुळे विसंगती निर्माण झालेल्या दिसतात. त्यांनी केलेली सैद्धान्तिक मांडणी अखेरीस घातक होती, हे लक्षात घेतले पाहिजे.

लोकमान्य सर्वेच्च राष्ट्रीय नेते बनले, त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या अखेरच्या पर्वात त्यामुळे त्यांनी संमिश्र प्रादेशिक राष्ट्रवादाच्या संकल्पनेचा अत्यंत उत्साहाने प्रचार करण्यास सुरुवात केली. दादाभाई नौरोजी व म. गांधी यांच्याबरोबर तुलना करता, लोकमान्यांच्या राष्ट्रवादाच्या संकल्पनेला काही वेळा मराठी अभिमानाची बाधा होत असे.

म. गांधींच्या आधीच्या काळातील सर्वात महान नेत्यांचे मन राष्ट्रवादाच्या कल्पनेबाबत वैचारिक गोंधळाने जसे ग्रासले होते, तसेच सर सय्यद अहमद खान- ज्यांना मुस्लिम समाजातील नवजागृतीचे प्रणेते म्हणता येईल- त्यांचीही राष्ट्र या कल्पनेबाबत हीच अवस्था होती. राष्ट्र, जमात, प्रांत हे शब्द त्यांनी असेच परस्पर विसंगत अर्थाने वापरले.

देशी भाषा बोलणार्‍या अन्य नेत्यांचे आणि सर सय्यद अहमद खानांचे प्रश्न सारखेच होते. त्यांना ‘राष्ट्र‘ ही पाश्चिमात्य कल्पना देशी भाषेमधून समजावून सांगताना नेमक्या शब्दांचा अभाव जाणवत होता. त्यांना शब्दांचा शोध घ्यावा लागे, नवे शब्द निर्माण करावे लागत. राष्ट्र या शब्दामागील संकल्पना (विविध पदरांसह) भारतात व पूर्वेकडील देशात निर्माण झालेल्या नव्हत्या. बंगाली भाषेप्रमाणेच उर्दू भाषेची अवस्था! नेशन (र्‍aूग्दह) या इंग्रजी शब्दाला समानार्थी शब्द उर्दू भाषेमध्ये नाही. सर सय्यद अहमद यांनी ‘कौम‘ ‘वतन‘ हे शब्दप्रगोय वापरले. विचारांचा गोंधळ व भाषेचा घोटाळा यामुळे व्हायचे ते नुकसान झालेच. सर सय्यद अहमद खानांसारखा आधुनिक भारतीय राष्ट्रवादाचा पुरस्कर्ता सामान्य मुस्लिम जनतेपर्यंत राष्ट्रवादाची संकल्पना पोहोचवू शकला नाही.

सर सय्यद अहमद आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये खूप सारखेपणा जाणवतो. सय्यद अहमदांनी ‘कौम‘ हा शब्द विसंगत अर्थाने वापरला. एका धर्मावर आधारित समाज, एका प्रदेशातील समाज, एक भाषक समाज आणि राष्ट्र या सर्व अर्थांसाठी ‘कौम‘ या शब्दाचा त्यांनी वापर केला.
राष्ट्र या संकल्पनेची अभिव्यक्ती करताना निर्माण होणार्‍या वैचारिक गोंधळाचे मूळ आपल्या इतिहासात आहे. महाभारत हे महाकाव्य एका लेखकाची कलाकृती नाही. तो एकच ग्रंथ आहे, असेही म्हणता येणार नाही. महाभारताला संपूर्ण साहित्य म्हटले आहे, ते बरोबरच आहे. काव्यपंक्तींच्या माध्यमातून तयार केलेला तो एक विश्वकोश आहे. कल्पित कथांची भरताड असूनही प्राचीन इतिहासाचा तो ग्रंथ आहे. ‘यद्‌ इहास्ति तद्‌ सर्वत्र, यन्नेहास्ति न तत्‌ क्वचित्‌‘ जे महाभारतात सापडते ते इतरत्रही आढळू शकेल, पण जे महाभारतात सापडणार नाही, ते अन्यत्र कोठेही सापडणार नाही, असा या वचनाचा
वर्णभेदावर आधारलेली दक्षिण आफ्रिकेची वंशाभिमानाची राजवट व त्यांची धोरणे यामुळे तेथील भारतीयांमध्ये तीव्र जागृती झाली. महात्मा गांधींनी याच दक्षिण आफ्रिकेत आपल्या जीवनकार्यास सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांचे पुढारी बनल्यानंतर गांधींनी भारतीय राष्ट्रवादाची, राष्ट्रीय ऐक्याची संकल्पना व्यापक पायावर विकसित केली. राष्ट्राच्या आदर्श व स्पष्ट कल्पनेच्या माध्यमातून त्यांनी धार्मिक, प्रादेशिक व भाषिक गटांच्या छोट्या अस्मितेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय अस्मिता साकार केली. ही संकल्पना भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्थापनेपासून (१८८५ साली) जनतेसमोर सातत्याने मांडली होती.

१९३१ साली लंडनमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदेत निवेदन करताना महात्मा गांधी म्हणाले, ‘‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा एक नम्र प्रतिनिधी या नात्याने आपणास, काँग्रेस कोणत्या तत्त्वासाठी उभी आहे, याची आठवण करून देणे माझे कर्तव्य आहे. माझे निवेदन तुम्ही ऐकल्यानंतर माझ्याबद्दल नक्कीच सहानुभूती बाळगाल; कारण माझ्या खांद्यावर केवढ्या प्रचंड जबाबदारीचे ओझे आहे, हे आपणास समजेल. काँग्रेस ही भारतामधली सर्वात जुनी राजकीय संघटना आहे. या संघटनेच्या ५० वर्षांच्या राजकीय आयुष्यात एकदाही खंड न पडता वार्षिक अधिवेशन नियमितपणे भरविण्यात आलेले आहे. म्हणून ही संघटना खर्‍या अर्थाने राष्ट्रीय आहे. काँग्रेस कोणा एका विशिष्ट वर्गाची, जमातीची वा विशिष्ट हितसंबंधी गटाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना नाही. आम्ही भारतामधील सर्व वर्गांचे व सर्व हितसंबंधांचे प्रतिनिधित्व करतो, असा काँग्रेसचा दावा आहे. मला हे सांगताना जरूर आनंद होतोय की, ब्रिटिश माणसाच्या मेंदूमध्ये तिचा जन्म झाला. ऍलन ऑक्टेव्हियन ह्यूम यांना काँग्रेसचे जनक म्हणून आम्ही ओळखतो. फिरोजशहा मेहता व दादाभाई नौरोजी या दोन पारशी भारतीयांनी काँग्रेसची जोपासना केली. त्यांना भारतीय लोक प्रेमाने पितामह मानतात. प्रारंभापासूनच काँग्रेसमध्ये मुस्लिम, ख्रिश्चन, अँग्लोइंडियन आहेत. सर्व धर्म, पंथ, परंपरा काँग्रेसमध्ये सामील आहेत. पै. बद्रुद्दीन तय्यबजी काँग्रेसबरोबर एकरूप झाले होते. काँग्रेसचे अध्यक्षपद मुसलमान व पारशी व्यक्तींनी भूषविले आहे. कालिचरण बॅनर्जी हे भारतीय ख्रिश्चन काँग्रेसमध्ये नेते आहेत. त्यांच्यापेक्षा अधिक शुद्ध भारतीय माझ्या पाहण्यात नाही.‘‘
भारतीय इतिहासात राष्ट्राची ही संकल्पना अगदी नवीन होती. भूगोल, धार्मिक श्रद्धा वा सांस्कृतिक एकतेच्या आधारावर नव्हे, तर राजकीय ऐक्य व त्यातून भविष्यात साकार होणारे एकजिनसी राज्य या आधारावर भारतीय राष्ट्रवादाची बांधणी करण्यात आली. येथून पुढे भारतात एकमेकांशी संघर्ष करणार्‍या राज्यांचे अस्तित्व संपुष्टात येणार होते. पाचशेपेक्षा अधिक संख्येने अस्तित्वात असलेली राज्ये व त्यांचे राजे मिटवून एक राज्य निर्माण करण्याचे महान कार्य सरदार वल्लभभाई पटेलांनी पुरे केले. त्यामुळे राष्ट्र ही कल्पना वास्तवामध्ये रूपांतरित झाली आणि शासनव्यवस्था म्हणून लोकशाहीचा विचार केला गेला.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे कोणी अडाणी गृहस्थ नव्हते. भारताच्या धाडसी, शूर सुपुत्रांपैकी ते एक होते. महात्मा गांधींना राष्ट्रपिता या गुणविशेषणाने संबोधण्यापूर्वी त्या शब्दाचा अर्थ त्यांना पूर्णांशाने ठाऊक होता. (पाहा ः नेताजी सुभाषचंद्र बोस, ब्लड बाथ, प्रथमावृत्ती- सिंगापूर, पुनर्मुद्रण- लाहोर, १९४७. नेताजींचे ६ जुलै १९४४ रोजी झालेले आझाद हिंद रेडिओवरील भाषण, पान ५५) नेताजी जाणून होते की, आधुनिक भारतीय राष्ट्राचे म. गांधी हे मूर्तिरूप आहेत.

म. गांधींनी आपल्या सत्याग्रहाच्या संघर्षतंत्राच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपर्‍यात, सर्वदूर अशी राजकीय जागृती करून शस्त्रहीन, दडपलेल्या भारतीय जनतेला स्वातंत्र्यसंग्रामात समाविष्ट करून घेतले.

स्वातंत्र्यसंग्रामामध्ये ज्यांचे योगदान शून्य आहे आणि दुसर्‍या मुक्ती लढ्यात (आणीबाणीविरोधाच्या) ज्यांनी तुरुंगामधून शेकडो माफीपत्रे राज्यकर्त्यांकडे पाठवून त्या लढ्याची तेजस्वी प्रतिमा मलीन केली, त्यांना नेताजींनी म. गांधींना ‘राष्ट्रपिता‘ या गुणविशेषणाने का संबोधले याचे मर्म समजणार नाही. नेताजींनी म. गांधींना भारतीय संस्कृतीचे वा भारतीय धार्मिक परंपरेचे वा एकमेकांबरोबर भांडणार्‍या राज्यांचे राष्ट्रपिता ही पदवी प्रदान केलेली नाही. ज्या राष्ट्राची एकच राज्यघटना आणि राष्ट्राचे एकच केंद्र सरकार आहे, अशा भारत या आधुनिक राष्ट्राचे राष्ट्रपिता म्हणून म. गांधींना नेताजींनी राष्ट्राच्या रास्त हक्काने संबोधले.

आजच्या भारताचे राष्ट्रपिता, महात्मा गांधी आणि फक्त महात्मा गांधी असू शकतात, हा इतिहासाचा दाखला आहे. याबाबत तिळमात्र शंका घेण्याचे कारण नाही आणि खळखळ करण्याचे तर बिलकुलच कारण नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s