Archive for जानेवारी, 2011

भालचंद नेमाडे , सौजन्य – म टा २६ एप्रिल २००३
( महाराष्ट्र फाऊंडेशनच्या पुरस्कार सोहळ्यातील अध्यक्षीय भाषणातून साभार)

मलिक अंबर हा अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा माणूस होता. आजच्या भूम परांड्यापासून , म्हणजे लातूरपासून ते चौल म्हणजे अलिबागपर्यंत अहमदनगरची निजामशाही त्यानं सांभाळली. बलाढ्य मोगलांपासून सांभाळलं. एवढंच नाही , तर त्याने धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था स्थापन केली. मोगलांच्या विरुद्ध मराठा अशी एक फळी उभी केली आणि महसुलाची , रयतवारीची पद्धत सुरू केली , जी शेतकऱ्यांच्या बाजूची होती. तीच पुढे शिवाजीनं चालवली आणि तीच पुढे इंग्रजांनी चालवली , आजही तीच चालली आहे. एवढ्या अफलातून माणसाचं आज महाराष्ट्रात कुठे काही चित्र आहे ?

… माझ्या एका पुढच्या कादंबरीत- मराठी स्वराज्य सुरू झाले , शहाजी , शिवाजी , संभाजी ,पेशवे आणि नंतर ते संपलं , यांच्यावर एक प्रकरण आहे. हे प्रकरण मी कसं लिहिलं , हे थोडक्यात सांगतो. मी औरंगाबादला एक घर भाड्याने घेतलं. त्यावेळी त्या घरासमोर उंच बुरुजासारखा एक काही तरी भाग होता. सगळ्यांनी सांगितलं की , तो पाडून त्या जागी बसायला ओटा वगैरे बांधा. तुम्हाला जे हवं ते करून घेत चला , असं मालकांनी सांगितलंच होतं. मी मग बराच खर्च वगैरे करून , त्यात डायनामाइट लावला , पण तो बुरूज काही ढासळत नव्हता. लोक म्हणाले , अरे ,ही ‘ नहरे-अंबरी ‘ मलिक अंबराच्या काळापासूनची पाणीपुरवठ्याची व्यवस्था आहे. ती कधी फुटत नाही.

मी अहमदनगरला असताना दोन महिने एका घोड्याच्या पागेत राहत होतो. ती पागा आजच्या अतिशय आलिशान माणसाच्या घरापेक्षाही सुंदर होती. सुंदर प्रतीचे घोडेच तिथे राहात असतील. सदाशिव अमरापूरकर हे एकदा मला भेटले. ते या मलिक अंबरची इतिहासप्रसिद्ध कबर असलेल्या मूळ अंबरापूर गावचे. इथे विख्यात फ्रेंच तत्त्वज्ञ फुका जे म्हणतो की , ष्ठश्ाष्ह्वद्वद्गठ्ठह्लह्य आणि रूश्ाठ्ठह्वद्वद्गठ्ठह्लह्य यांच्यातून इतिहास घडतो. तसं हा आपलाच इतिहास मी मॉन्युमेन्ट्समधून स्वत: जुळवत गेलो आणि हळूहळू असं लक्षात आलं की , तो रयतवारी पद्धतीचा शोध लावून अजरामर झालेला मलिक अंबर कोण होता ? मूळचा इथियोपियामधला हा आफ्रिकी मुलगा आठ वर्षांचा असताना गुलाम म्हणून बगदादला विकला गेला. तिथून तो अहमदनगरला गुलाम म्हणून विकला. या हबशी शिपायानं फक्त दहा शिपायांबरोबर स्वत:चं सैन्य उभारलं. शहाजी वगैरे इथले लढवय्ये तयार केले. गनिमी कावा शोधला. अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा तो राज्यकर्ता होता. महाराष्ट्रातल्या प्रत्येक खेड्यात त्यानं रयतवारी पद्धत लावून जमिनीची मोजणी केली.

प्रत्येक खेड्यात पाटील आणि कुलकर्णी ही दोन वतनं एकमेकांवर वचक ठेवण्यासाठी निर्माण केली. आपल्या समाजाचं त्याला अतिशय खोल ज्ञान असलं पाहिजे की , पाटील आणि कुलकणीर् प्रत्येक गावात असलेच पाहिजेत. त्याच्याशिवाय गाव चालणार नाही. मार्क्सचं जसं एक डायलेक्टिक्स होतं , तसं हे मलिक अंबरचं मराठी डायलेक्टिक्स महाराष्ट्राच्या गाभ्यापर्यंत पोहोचतं.

अशा पद्धतीचा हा थोर पुरुष. याच्याबद्दल काही वाचलं पाहिजे म्हणून मग मी सोळाव्या शतकातले कागदपत्र वाचले , तेव्हा असं लक्षात आलं की , हा अत्यंत दूरदृष्टीचा आणि अफलातून असा माणूस होता. आजच्या भूम परांड्यापासून , म्हणजे लातूरपासून ते चौल म्हणजे अलिबागपर्यंत अहमदनगरची निजामशाही त्यानं सांभाळली. बलाढ्य अशा मोगलांपासून सांभाळलं. एवढंच नाही , तर मलिक अंबरने धर्मनिरपेक्ष न्यायव्यवस्था स्थापन केली , हे कऱ्हाडच्या जगदाळे प्रकरणावरून सुप्रसिद्ध आहे. त्यानं मोगलांच्या विरुद्ध मराठा अशी एक फळी उभी केली आणि महसुलाची आणि रयतवारीची पद्धत सुरू केली , जी शेतकऱ्यांच्या बाजूची होती. तीच पुढे शिवाजीनं चालवली आणि तीच पुढे इंग्रजांनी चालवली , आजही तीच चालली आहे. एवढ्या अफलातून माणसाचं आज महाराष्ट्रात कुठे काही चित्र आहे ?

परवा अहमदनगरला गेलो , मला असं वाटलं , इथे मलिक अंबरचा मोठा पुतळा असला पाहिजे. इथिओपियातल्या या हबशी माणसानं एवढे कष्ट केले , एवढी कृतघ्न आपण मराठी माणसं आहोत की काय ?

मराठा शक्ती मलिक अंबरने स्थापन केली. याबाबतीत माझं दुमत नाही आणि हे मी वारंवार वाचून पाहिलं आहे ; कारण तुम्हाला माहिती आहे , खंडागळेचा हत्ती लखूजी जाधवच्या गोटात शिरला , त्यानं खूप लोक तुडवले , मारामाऱ्या झाल्या , लखूजीचा मुलगा मेला ; तिकडे त्यामुळे शहाजी आणि लखूजी चिडले. भोसले संभाजी त्यात मारला गेला. नंतर पुन्हा संघर्ष इतका वाढला की , बुरहान निजामशहाही हताश झाला आणि हे मराठे आपसात का भांडतात , असं मोठ्या प्रमाणावर त्यावेळी चिंतन केल्यानं मलिक अंबरनी ही शक्ती जमा केली आणि आज आपण ज्याला स्वतंत्र मराठा साम्राज्य म्हणतो , त्याची बीजं आपल्याला या अशा परदेशी माणसात दिसतात. म्हणजे एका दृष्टीने मलिक अंबर त्या काळचा एन.आय.आर.च म्हटला पाहिजे.

आज लोक आंतरराष्ट्रीय सहकार्याचं बोलतात. इथिओपियाचा माणूस एकदा इकडे आला आणि नगरला त्यानं मलिक अंबरचं स्मारक पाहिलं , तर आपल्या देशाचं केवढं मोठेपण त्याला जाणवेल?

अब्दुल कादर मुकादम, सौजन्य – लोकसत्ता, १४ जाने २००४

’नेमेचि येतो मग पावसाळा’  या उक्तीप्रमाणे हज यात्रेच्या अनुदानाचा प्रश्न सतत चर्चेत येत असतो. अलीकडेच पुण्याच्या दैनिक ‘राष्ट्रतेज‘चे संपादक अमरसिंह जाधवराव यांनी उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली असून, अशा प्रकारे एकाच धर्माच्या लोकांना धार्मिक तीर्थयात्रेसाठी अनुदान देणे राज्यघटनेच्या धर्मनिरपेक्ष तत्त्वाच्या विरुद्ध आहे व म्हणून ते बंद केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. केंद्र शासनाने याची दखल घेतली असून, हे अनुदान भविष्यात टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा व जे प्राप्तिकर भरतात, अशा हजयात्रेकरूंना ही सवलत न देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने एका पत्राद्वारे जाधव यांना कळविले आहे (लोकसत्ता, २१डिसेंबर). पण हा साराच प्रकार ‘साप समजून दोरीला झोडपण्याचा‘ आहे. कारण मुळात हज यात्रेकरूंना असे अनुदान देण्यात येते, हीच गोष्ट खोटी आहे. खरे हे आहे की, हज यात्रेच्या नावाने एअर इंडियाला कारण नसताना दिला जाणारा हा पैसा आहे.

हज यात्रेला जाण्याची व्यवस्था दोन प्रकारे होत असते. एक म्हणजे केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या हज कमिटीमार्फत (मुंबईतील म. फुले मार्केटजवळील हज हाऊस हे हज कमिटीचे प्रमुख केंद्र आहे). दुसरा प्रकार म्हणजे खाजगी प्रवासी संस्थांच्या मार्फत स्वतंत्र व्यवस्था करून जाणे. यावरून खाजगी प्रवासी संस्थांमार्फत ही तीर्थयात्रा केली, तर ती महागात पडेल असा कुणाचाही समज होईल. पण प्रत्यक्षात परिस्थिती नेमकी उलटी आहे. हज कमिटीमार्फत जाणार्‍या यात्रेकरूंना या तीर्थयात्रेसाठी जास्त पैसे मोजावे लागतात. याचे एकमेव कारण म्हणजेहज कमिटीमार्फत जाणार्‍या यात्रेकरूंनी एअर इंडियाच्या विमानांतूनच प्रवास केला पाहिजे, असा सरकारी नियम आहे. याचाच फायदा घेऊन एअर इंडिया मुंबई ते जेद्दाच्या प्रवासासाठी अवास्तव भाडे आकारते. त्यातला काही भाग प्रवाशांकडून वसूल केला जातो व उरलेला भाग सरकारकडून एअर इंडियाला दिला जातो. हे जर अनुदान असेल तर ते एअर इंडियाला दिले जाते, यात्रेकरूंना नव्हे.

२००१ सालातील प्रत्यक्ष आकडेवारी उपलब्ध आहे. ती तपासून पाहिली की हे गौडबंगाल काय आहे याची कल्पना येऊ शकेल. त्या वर्षी एकूण एक लाख वीस हजारांहून अधिक भारतीय मुस्लिमांनीÇ हजची यात्रा केली. यापैकी ७२ हजार लोकांनी हज कमिटीतर्फे, तर उरलेल्या सुमारे ५० हजार यात्रेकरूंनी खाजगी प्रवासी संस्थांमार्फत ही तीर्थयात्रा केली.हज कमिटीने या यात्रेसाठी प्रत्येकी ९२ हजार १४३ रुपये आकारले. एअर इंडियाने या प्रवासासाठी प्रत्येकी ३२ हजार रुपये आकारले. यापैकी १२ हजार रुपये हज कमिटी यात्रेकरूंकडून प्रवासभाडे म्हणून एअर इंडियाला देते. उरलेले २० हजार रुपये शासन एअर इंडियाला अनुदानम्हणून देते. एकूण ९२ हजार रुपयांपैकी ६० हजार रुपये यात्रेकरूंच्या तेथील वास्तव्यासाठी, खाणे-पिणे व इतर अनुषंगिक खर्चासाठी आकारले जातात.

याच वर्षी मुंबईतील ऍटलास ट्रॅव्हल्स या खाजगी कंपनीने प्रति यात्रेकरू ६७ हजार ५०० रुपय आकारले. या रकमेत विमान प्रवासभाडे, हजच्या काळातील राहण्या-जेवण्याचा व इतर अनुषंगिक खर्च अंतर्भूत होता. या कंपनीने कुणाकडून कसलेही अर्थसीहाय्य घेतले नव्हते. त्यांच्यासाठी हा व्यवसायाचाच भाग होता. कदाचित त्यांनी या यात्रेचे धार्मिक स्वरूप विचारात घेऊन नफ्याचे प्रमाण कमी ठेवले असावे. पण हा व्यवहार आतबट्ट्याचा निश्चितच नव्हता. या पॅकेजचा फायदा घेऊन ५० हजार यात्रेकरूंनी या वर्षी हज यात्रा केली.

या दोन उदाहरणांतून अनेक प्रश्न उद्‌भवतात. खाजगी प्रवासी कंपन्या कसलेही अनुदान न घेता, कमी खर्चात हज यात्रा घडवून आणत असताना शासकीय हज समिती त्याच यात्रेसाठी ९२ हजार रुपये का आकारते? इतर विमान कंपन्या कमी प्रवासभाडे आकारत असताना एअर इंडिया त्याच प्रवासासाठी अवास्तव भाडे का आकारते? एअर इंडियाच्याच विमानातून हा प्रवास केला पाहिजे, अशी जाचक अट कशासाठी, की अशी अट घालून अनुदानाच्या नावाखाली एअर इंडियाची भर करण्याचा हा प्रकार आहे?

एअर इंडियाच्या विमानाची अट काढून टाकली, तरी अनुदानाचा हा प्रश्न सुटू शकेल. कारण अनेक देशी आणि परदेशी कंपन्या, या प्रवासाच्या भाड्यात सवलत देण्यास तयार आहेत. विमानसेवा उद्योगातील तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, कुठल्याही विमान प्रवासात ४० टक्के बुकिंग झाले की त्या विमानफेरीचा सर्व खर्च भरून निघतो. त्यापेक्षा अधिक बुकिंग म्हणजे विमान कंपनीचा निखळ फायदा असतो. हजयात्रेसाठी प्रवासी घेऊन जाणारी व काही दिवसांनी त्यांना तेथून परत आणणारी एअर-इंडियाची विमाने एका फेरीत पूर्ण भरून जातात, तर दुसर्‍या फेरीत रिकामी येतात हे वास्तव आहे; परंतु ४० टक्क्यांच्या गणिताप्रमाणे हिशेब केला तरी सौदीला जाण्याचा व तेथून परत येण्याचा अशा विमानाच्या दोन्ही फेर्‍यांचा खर्च ८० टक्के प्रवासी भरून काढू शकतात. इथे तर विमाने जाताना व येतानाही पूर्ण भरून येतात. म्हणजेच खर्च-वेच वजा करता विमान कंपनीला २० टक्के नफा होऊ शकतो. असे असताना प्रतिप्रवासी किमान २० हजार रुपयांचे अनुदानदिले जाते, असे भासवून लोकांची दिशाभूल करण्यात येते, असे म्हटले तर चूक ठरेल का ? ही वस्तुस्थिती झाली. या विषयाला एक नैतिक बाजूही आहे. अल्लाह व पैगंबर यांवर अविचल श्रद्धा, नमाज, रमजानच्या महिन्यातील उपवास, जकात म्हणजे प्रत्येकाच्या उत्पन्नाचा अडीच टक्के भाग दानधर्म करणे व मक्केची हजची तीर्थयात्रा करणे ही इस्लामने प्रत्येक मुसलमानासाठी घालून दिलेली कर्तव्ये आहेत. यापैकी पहिली तीन अनिवार्यपणे बंधनकारक आहेत. उरलेली दोन म्हणजे जकात व हजयात्रा, ही आवश्यक पण शक्याशक्यतेवर अवलंबून आहेत. हजयात्रा आयुष्यातून एकदाच व तीही ज्यांना शारीरिक, बौद्धिक व आर्थिकृष्ट्या शक्य असेल त्यांनीच करावयाची असते. इतरांना ती बंधनकारक नसते. हजयात्रेसाठी लागणारा पैसा हा त्या व्यक्तीने स्वतःच्या श्रमातून व नैतिक, कायदेशीर मार्गाने मिळविलेला असला पाहिजे. ही रक्कम संपूर्ण हजयात्रेचा खर्च भागू शकेल इतकी असली पाहिजे. यात्रेला प्रस्थान ठेवण्यापूर्वी आपल्या मागे आपल्या कुटुंबाचा खर्च भागविण्यासाठी प्रत्येक इच्छुकाने पुरेशा रकमेची तरतूद केलेली असली पाहिजे (हजयात्रेचा एकूण कालखंड सुमारे ४० दिवसांचा असतो). तीर्थयात्रेहून परत आल्यानंतर त्या व्यक्तीचे व त्याच्या कुटुंबाचे पूर्वीचे जीवनमान किमान सहा महिने राखता येईल, अशी उपजीविकेची नैतिक साधने त्या व्यक्तीपाशी असली पाहिजेत. हे नियम पाळले तरच हजयात्रेचे पुण्य पदरी पडू शकते, अशी शरीयतची भूमिका आहे. भौतिक कर्तव्यांबाबतही काही दंडक घालण्यात आले आहेत. उपवर मुलींच्या विवाहासारख्या कौटुंबिक जबाबदार्‍या इच्छुक हजयात्रेकरूवर असतील तर जाण्यापूर्वी त्याने त्या पार पाडल्या पाहिजेत. कर्ज असेल तर त्याने यात्रेला निघण्यापूर्वी त्याची परतफेड केली पाहिजे. हजयात्रेसंबंधीचे शरीयतचे वरील नियम व अटी पाहिल्या की, कुणाकडूनही अनुदान वा अर्थसाहाय्य घेऊन केलेली हजयात्रा निष्फळ ठरते हे लक्षात येईल. तेव्हा मुळात हजयात्रेसाठी देण्यात येत नसलेल्या पण दिले जाते असे भासविण्यात येणार्‍या या अनुदानाचा विषय जितक्या लवकर निकालात निघेल तितका बरा.

या संदर्भात दोन घटनांचा उल्लेख करावासा वाटतो. पहिली घटना आहे १९९७ सालची. पाकिस्तान सरकारही आपल्या नागरिकांना हजयात्रेसाठी अनुदान देत असे. हे अनुदान बंद करावे, अशी मागणी करणारी एक याचिका लाहोर उच्च न्यायालयात सादर करण्यात आली होती. त्या न्यायालयाचे न्यायमूर्ती तन्वीर अहमद यांनी हजयात्रेकरूंना अर्थसाहाय्य शरीयतच्या तत्त्वांविरोधी व म्हणून गैर आहे, तेव्हा हेअनुदान सरकारने बंद करावे, असा निकाल दिला. तेव्हापासून हजयात्रेसाठी अनुदान देण्याचे पाकिस्तान सरकारने बंद केले. दुसरी घटना आहे जानेवारी २००१ मधली. तेव्हाचे भारताचे परराष्ट्रमंत्री जसवंत सिंग यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ सौदी अरेबियाला गेले होते. त्या वेळी सौदी अरेबियाचे भारतातील तत्कालीन राजदूत ए. रहमान एन. अलोहाली आणि सौदी परराष्ट्रमंत्री सौद अल्‌ फझल या दोघांनी, ‘‘भारत सरकारने हजयात्रेसाठी अनुदान देणे शरीयतच्या तत्त्वांविरोधी आहे, तेव्हा ते बंद करावे,‘‘ असे भारतीय शिष्टमंडळाला सांगितले. ते असेही म्हणाले की, या बाबतीत आणखी काही मार्गदर्शन हवे असल्यास आमचे उलेमा तुम्हाला मदत करतील.

तात्पर्य, हजयात्रेसाठी अनुदान देण्यात येते असे जे सांगितले व समजले जाते त्यात तथ्य नाही आणि असलेच तर ते बंद केल्यामुळे काहीही बिघडणार नाही. उलट हजयात्रेचे खरे उद्दिष्ट त्यामुळे साध्य होणार आहे. पण असे घडणार नाही, कारण ती राजकीय पक्षांची गरज आहे. अमरसिंह जाधवराव यांनी न्यायालयात याचिका सादर करताना या विषयाचा हा संपूर्ण आवाका विचारात घेतला नाही, ही या विषयाची शोकांतिका आहे.

विश्वास दांडेकर, सौजन्य – लोकसत्ता, १५ जुलै २००३

एक काळ असा होता की वसमत हे गाव आठवले की नरहर कुरुंदकरांचे नाव ओठावर यावे, इतका कुरुंदकरांच्या प्रगाढ व्यासंगाचा दबदबा मराठी सारस्वताच्या प्रांतात गाजत होता. इतिहास, साहित्य, प्राचीन वाङ्‌मय, राज्यशास्त्र, संगीत, समाजशास्त्र… कुरुंदकरांच्या प्रज्ञेला कुठलाही प्रांत वर्ज्य नव्हता. वाचता वाचता एखाद्या क्षणी बुद्धीला अवचित थकवा यावा अशा चिरेबंदी तर्काने नटलेल्या आपल्या लेखनशैलीने कुरुंदकरांनी वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात आपला खास ‘कुरुंदकरी बाज‘ निर्माण केला. आयुष्यभर निखळ वैचारिकतेचीच बांधीलकी मानल्यामुळे निरनिराळ्या व्यासपीठांवरून कुरुंदकरांनी अव्याहत संचार केला. मात्र ते कुठल्याही तंबूत दाखल झाले नाहीत. म्हणूनच बहुधा कर्मठांइतकीच पुरोगाम्यांच्या गोटामधूनही त्यांची उपेक्षा झाली. कुरुंदकरांना जाऊनही आता पुरी दोन दशके उलटली, तरी त्यांचे समग्र लेखन संग्रहीत स्वरूपात समाजासमोर येऊ नये, हा महाराष्ट्राच्या ‘वैचारिक अनुशेषा‘चा पुरावाच होय!

महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचा सहज आढावा घेतला तर त्यात अनिवार्यपणे येणार्‍या नामावलीमध्ये एक नाव नरहर अंबादास कुरुंदकर असे आहे. हयात असते तर आज त्यांनी बहात्तराव्या वर्षात प्रवेश केला असता. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२चा. अनेक विषयांचा स्तिमित व्हावे असा व्यासंग. त्या पार्श्वभूमीवर एक निराळाच अन्वयार्थ लावणारी प्रज्ञा, एकेक पाकळी उलगडत जिज्ञासूला विषयाच्या गाभ्यापर्यंत नेण्याची खर्‍या शिक्षकाची हातोटी आणि या सर्वांमागे आपले ज्ञान, बुद्धी ही खासगी मालमत्ता नाही या विश्वासाने ती सतत वाटण्यासाठी झटणारे मन, असे हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व फार अकाली अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले (निधन १०/२/८२).

पेशाने ते शिक्षक. प्राथमिक, माध्यमिक अशा पायर्‍या चढत पुढे प्राध्यापक आणि प्राचार्य झाले. मात्र हे त्या व्यवस्थेतला अपरिहार्य भाग म्हणून घडलेले. एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी ‘परीक्षा‘ या घटनेच्या नावाने आंघोळ केली. कितीजणांना पीएच.डी.च्या प्रबंधासाठी मदत केली याची गणती अवघड, पण त्या फंदात स्वतः कधी पडले नाहीत. व्यासंग हा डिग्रीवर मोजणे कसे गैर आहे त्याचे हे उदाहरण. वयाच्या बाविसाव्या वर्षी मुंबई मराठी साहित्य संघाचे ते आमंत्रित वक्ते होते, तर रणजित देसाईंच्या ‘श्रीमान योगी‘ची महाराष्ट्रात गाजलेली प्रस्तावना त्यांनी वयाच्या तिशीत लिहिली होती, असे प्रसंग पुष्कळ नोंदवता येतील.

त्यांचे अभ्यासाचे विषय छाती दडपून टाकणारे होते. राजकारण, इतिहास, समीक्षा, महाभारत, भरताचे नाट्यशास्त्र, तत्त्वज्ञान, शास्त्रीय संगीत, प्राचीन-अर्वाचीन मराठी साहित्य, सामाजिक चळवळी… नुसती यादी करायची म्हटली तरी स्तिमित करणारी. शिवाय हे सर्व पुस्तकी नव्हते. सर्व महाराष्ट्रभर हिंडत, गटचर्चा, व्याख्याने यांतून ज्ञानगंगा वाहती ठेवण्याची त्यांची धडपड असे.

त्यांची एक नाजूक जागा म्हणजे पंडित नेहरू. स्वतंत्र भारत, त्यात राष्ट्र उभारणीसाठी नेहरू कुठल्या मार्गाने जात आहेत याचा त्यांनी फार सखोल विचार केला होता. यदुनाथ थत्ते-नरहर कुरुंदकर या जोडीने वर्षानुवर्षे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांमधून जे प्रबोधन घडवले त्याच्या केंद्रस्थानी ‘नेहरू‘ असत. बांगलादेश युद्धानंतर तीन-चार वर्षांत जी परिस्थिती भारतात निर्माण झाली त्याचे विश्लेषण करताना त्यांनी १९७१ चा युद्धखर्च, १९७२ चा दुष्काळ, १९७३ चे खनिज तेलाचे भडकलेले भाव या गोष्टी नियंत्रित करणे भारताच्या अखत्यारीत नसल्याने या तीन गोष्टींचा एकत्रित परिणाम बाद करून मग उरलेला दोष शासनाचा असे परखड विश्लेषण केले होते. मात्र आणीबाणी लादण्यास त्यांचा विरोध होता. आणीबाणीनंतर जनता पक्ष ज्या मार्गाने गेला त्यातले धोके त्यांनी जाहीरपणे मांडले होते. विचाराने ते डावे, मार्क्सवादी असले, समाजवादी विचारसरणीचे पाठीराखे असले तरी पोथीनिष्ठ आंधळेपण त्यांनी कधी जोपासले नाही. मतभेद स्पष्टपणे मांडले.

महाराष्ट्रात मृत्युलेख लिहावा तर आचार्य अत्र्यांनी, खेळकर व्यक्तिरेखा रंगवावी तर पु. ल. देशपांडे यांनी अशी काही सार्थ समीकरणे आहेत. यात भर अशी घालता येते की, मूल्यमापन करणारा लेख लिहावा नरहर कुरुंदकरांनी. सरदार पटेल, मौलाना आझाद, अकबर, शेजवलकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, स्थान, भूमिका, मर्यादा ज्या सामर्थ्याने त्यांनी उलगडल्या ती खास कुरुंदकरी परंपरा म्हणता येते. इरावती कर्वे यांचा ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया‘, दुर्गाबाई भागवतांचा ‘लोकसाहित्याची रूपरेखा‘, वा. सी. बेंद्रे यांचा संभाजी, गोपाळ गोडसे यांचे ‘गांधीहत्या व मी‘, द. ग. गोडसे यांचे ‘पोत‘ या व अशा पुस्तकांची विस्तृत परीक्षणे त्यांनी लिहिली. पुस्तकाचे मर्म उलगडून दाखवत मर्यादाही परखडपणे मांडणारी ती शैली ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देत असतानाच त्या त्या विषयाचा आवाकाही मांडत असत, त्रुटीही नोंदवत असत.

मराठीत ‘प्रस्तावना‘ हा एक संपन्न लेखन प्रकार आहे. पुस्तकातले प्रत्येक पान उलगडून दाखवणे, संपूर्ण विरोधी दृष्टिकोन मांडणे, त्या क्षेत्रात नवे दालन उघडणे अशी ही परंपरा शेजवलकर, खरेशास्त्री, राजवाडे अशा दिग्गज नामावलींमुळे झळाळते. या परंपरेत कुरुंदकरांनी विस्तृत आणि मोलाची भर घातली. ‘श्रीमान योगी‘, ‘चलो कलकत्ता‘, ‘चतुर्भाणी‘, ‘महाडचा मुक्तिसंग्राम‘, ‘महाभारत- एक सूडाचा प्रवास‘, ‘हिमालयाची सावली‘, ‘चक्रपाणी‘, ‘लोकायत‘ या व अशा प्रस्तावना त्या त्या ग्रंथांचे भूषण ठरत ग्रंथातल्या विषयाची व्याप्ती विस्तारणार्‍या आहेत.

भरताचे नाट्यशास्त्र आणि विशेषतः त्यातील रससिद्धांत हा त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यास-चिंतनाचा विषय होता. ‘रूपवेध‘मध्ये काही प्रमाणात तो मांडला गेला. पुढे त्या विषयाची सांगोपांग चर्चा करणारी तीन व्याख्याने त्यांनी नाशिक येथे दिली. त्यावर एक महाग्रंथ जवळपास सिद्ध केला, पण तो अपूर्णच अवस्थेत त्यांच्या निधनोत्तर ‘रंगशाळा‘ या नावाने प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाचा पट पाहिला म्हणजे जर हा पूर्णपणे हातावेगळा झाला असता तर त्याने लेखन विषय कुठल्या उंचीवर नेऊन ठेवला असता याची कल्पनाच आज करावी लागते.

ही सर्व प्रतिभा, प्रज्ञा, विद्वत्ता कोरडी नव्हती. कुरुंदकर हे स्नेही, मित्र, विश्वासाने खांद्यावर मान टाकण्याची हक्काची जागा असे त्यांचे स्थान असंख्य कुटुंबांत होते. त्यांना व्याख्यानांच्या मानधनातून मिळणारा पैसा त्यांनी निरनिराळ्या संस्थांना शांतपणे दिला. स्वभावाला एक विलक्षण विनोदाचे अंग होते. कधी नर्म तर कधी तिरकस. गप्पांमध्ये रंगायचे पण कधीही गप्पा व्यक्तिकेंद्रित होऊ देत नसत. चर्चा मत- मुद्दे यावर असावी, व्यक्तीवर नको हा त्यांचा आग्रह असे. साधी शंका विचारली तरी विषय नीट समजावून सांगत. संपूर्ण मराठवाडा तर त्यांना गुरुजी म्हणूनच ओळखत असे.

ते गेल्यावर त्यांचा स्मृतिग्रंथ हैदराबादच्या आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषदेने काढला. मराठवाडा साहित्य परिषद व ‘साधना‘ परिवार या दोन संस्थांसाठी कुरुंदकर खूप श्रमले. पण त्यांच्या निधनोत्तर या दोन्ही संस्थांनी दुर्लक्षच केले, हे कटू सत्य खेदाने स्वीकारावे लागते.

त्यांनी मांडणी केलेले प्रश्न, विषय, क्षेत्रे कालबाह्य झालेली नाहीत. त्यावर चर्चा, मतभेद हे मंथन सुरू राहणे हिताचे आहे. यातले पहिले पाऊल म्हणजे निवडक कुरुंदकर असे काही खंड प्रकाशित करणे, ज्यात त्यांचे सर्व महत्त्वाचे लिखाण टीपा, सूची या व अशा संपादकीय संस्कारांनी परिपूर्ण स्वरूपात उपलब्ध होईल. तो सुदिन लवकर येवो.

डॉ. अनिल काकोडकर, सौजन्य – लोकसत्ता

ठाणे जिल्ह्य़ात बोर्डी येथे झालेल्या अ. भा. मराठी विज्ञान संमेलनाचे  अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या भाषणाचा संपादित अंश..

विज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञान यामुळेच मानवाची आजवरची प्रगती व त्याचे सुधारलेले जीवनमान शक्य झाले आहे. समाजातील सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींवरपण तंत्रज्ञानाचा विशेष प्रभाव पडतो.सामाजिक सुधारणा, विकास, संपर्काची साधने, दळणवळण, स्वास्थ्य  या व इतर सर्व बाबतीत झालेली प्रगती तंत्रज्ञानामुळेच  शक्य झाली आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी इंटरनेट, मोबाईल, माहिती तंत्रज्ञान व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाने आज आपल्या सर्वाचे जीवन व्यापलेले आहे. आज नवीन तंत्रज्ञान झपाटय़ाने पुढे येत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडत असल्याने त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हेदेखील विज्ञान प्रसाराचे एक महत्त्वाचे अंग होऊन बसलेले आहे.

आजवर आपण बाहेरून आयात केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपली आर्थिक प्रगती साध्य करीत आलो आहोत. आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेचा  आपल्याला चांगलाच फायदा झालेला आहे. आज आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत की आता आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकून पुढे घेऊन जाऊ शकणारे नवीन तंत्रज्ञान अधिकाधिक प्रमाणात आणि तेही आपणच विकसित केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ इतरांचे अनुकरण करून, आपण फार तर पहिल्या स्थानाच्या जवळ जाऊ शकतो, पण पहिले स्थान मात्र मिळवू शकत नाही. त्यासाठी स्वत:चा नावीण्यपूर्ण पुढाकार असणे अत्यंत आवश्यक असते. तंत्रज्ञानाबाबतीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञानावर आधारित मुक्त अर्थव्यवस्थेत तर हे अधिकच प्रकर्षांने जाणवते.

आपल्याकडे विज्ञान संशोधनाची मोठी परंपरा आहे. पण आज संशोधन क्षेत्रात प्रचलित असलेली मूल्यव्यवस्था आपण तपासून पहावयास हवी. ‘रामन इफेक्ट’चा शोध डॉ. रामन यांनी आपल्या इथे लावला, पण त्यावर आधारित उपकरणे आपण देशात निर्माण केली नाहीत. आजही ती आपण आयात करतो. याचा अर्थ, आपण तंत्रज्ञानाबाबतीत काहीच केलेले नाही असे नाही. अणुशक्ती, अंतराळ, संरक्षण विषयक संशोधन अशा क्षेत्रांत चांगल्या प्रकारचे तंत्रज्ञान नक्कीच विकसित केले  गेले आहे. अशा संवेदनशील क्षेत्रात आपला देश बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण असणे आवश्यकही होते व ते आपण आपल्या बळावर साध्य केले ही महत्त्वाची व अभिमानास्पद बाब आहे.

आज आपल्या येथे संशोधन, तंत्रज्ञान विकास व त्याचा प्रत्यक्ष वापर ही वेगवेगळी व एकमेकांशी अत्यल्प संबंध असलेली क्षेत्रे बनलेली आहेत. एक प्रकारचे वर्णाश्रम निर्माण झालेले आहेत. त्यामुळे नावीण्यपूर्ण विकासाच्या कामात मोठी बाधा निर्माण  होत आहे. हे चित्र पालटणे आवश्यक आहे. यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करावयास हवेत. आपल्या उच्च शिक्षणाची आखणी अशी असावी की ज्या योगे विद्यार्थ्यांला एखाद्या विषयातील ज्ञानाबरोबरच त्यावर आधारित कौशल्ये साध्य करणे शक्य होऊ शकेल. अशा कसब-कौशल्यांचा विकास प्रत्यक्ष कामातून करण्याची व्यवस्था आपण करावयास हवी. यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग व सामाजिक संस्था यांचे निकटचे व विविध स्तरांवरील सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

सध्या मुंबई विद्यापीठात अणुशक्ती खात्याच्या सहकार्याने एक मूलभूत विज्ञान केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात बारावी ते एम.एस्सी, असा एकत्रित कार्यक्रम राबवला जात आहे. याच केंद्रात शिक्षकांनी आपला बराच वेळ शिकवण्याबरोबर संशोधन करण्यात घालवावा, तसेच डॉक्टरेट किंवा त्यापुढे संशोधन करण्याची व्यवस्थापण असावी, असा प्रयत्न आहे. या केंद्राचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे या केंद्रात  मुंबईत असलेल्या अन्य संशोधन संस्थांचा सहभाग. बीएआरसी, टीआयएफआर, आयआयटीसारख्या संस्थांतील संशोधक या केंद्रात शिकवण्याचे व संशोधनविषयक मार्गदर्शनाचे काम विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबर करीत असतात. या केंद्रातील अशा मान्यवर संशोधन केंद्राबरोबरच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची क्षितिजे विस्तारतात.

मूलभूत संशोधन व तंत्रज्ञान विकास यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट एक नवीन उपक्रम चालवत आहे. येथे विद्यार्थ्यांना मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येते. यासाठी दोन मार्गदर्शकांची व्यवस्था या कार्यक्रमात केलेली आहे. यापैकी एक मूलभूत विज्ञान व दुसरा तंत्रज्ञान क्षेत्रातील असेल. मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा विकास व असे कार्य करणाऱ्या संस्थांमधील सहकार्य अशा कार्यक्रमांमुळे वृद्धिंगत होईल, असा माझा विश्वास आहे.

आज पुढारलेल्या देशांनी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक साधनांचा मोठा वाटा केवळ आपल्यासाठी वापरून एका बाजूला जागतिक पर्यावरणाचा समतोल बिघडवलेला आहे व दुसऱ्या बाजूला विकसनशील देशांसाठी या साधनांच्या उपलब्धतेच्या संदर्भात मोठी समस्या निर्माण करून ठेवली आहे. या संदर्भात ऊर्जेचे उदाहरण घेता येईल. आज भारतात सरासरी दरडोई विजेचा वार्षिक वापर ६५० किलोव्ॉट तास इतका आहे. हे प्रमाण जागतिक सरासरीच्या केवळ २५ टक्के  इतके कमी आहे. औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेल्या देशांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३ ते  ६ टक्के आहे. आज तर आपण भारतात विजेचा वापर पुढारलेल्या देशांच्या बरोबरीने  करावयाचे ठरविले तर त्यासाठी लागणारी ऊर्जेची साधने उपलब्ध होणे अशक्य आहे.

जीवनमानाचा दर्जा बऱ्याच अंशी विजेच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. आपल्या देशात किमान जीवनमान सर्वाना उपलब्ध करायचे झाले तर विजेचा दरडोई वार्षिक वापर ५००० किलोव्ॉटतास इतका तरी कमीतकमी असावयास हवा. आपली लोकसंख्यापण अजून स्थिरावलेली नाही. ती १६० कोटीपर्यंत जाऊन स्थिरावेल असा अंदाज आहे. याचाच अर्थ, आपली विजेची उपलब्धता आजच्या प्रमाणाच्या दसपटीने वाढावयास हवी. यासाठी लागणारी ऊर्जेची साधने आपण कोठून मिळवणार हा खरा प्रश्न आहे. या प्रमाणावर ऊर्जेचा वापर अखंड चालू राहण्याच्या दृष्टीने विचार केला तर अणुऊर्जा व सौरऊर्जा सोडून इतर सर्वसाधने अगदी तुटपुंजी असल्याचे आपल्या लक्षात येते.

ऊर्जेच्या उपलब्धतेचा प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवला तरी आज जागतिक वातावरणाच्या तापमानवाढीचा व त्यामुळे समुद्रपातळीच्या वाढीचा आणि ऋतुचक्रात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या बदलाचा प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभा आहे. याचे मुख्य कारण वातावरणात मिथेन, कार्बन- डाय- ऑक्साईड अशा प्रकारच्या वायूंचे प्रमाण हे होय. कोळसा व काही प्रमाणात हायड्रोकार्बन यांचा ऊर्जेसाठी वापर हे याचे मुख्य कारण आहे.

कार्बनवर आधारित आजच्या ऊर्जाव्यवस्थेचे कार्बनविरहित ऊर्जाव्यवस्थेत रुपांतर करण्याची योजना आपण तयार करून ती राबवली पाहिजे. आज आपले दळणवळण पेट्रोल, डिझेल  यांसारख्या तरल (सहज बाष्पनशील) ऊर्जासाधनांवर अवलंबून आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारगाडय़ा हळूहळू बाजारात  येत आहे. हा बदल पूर्णाशाने अमलात येण्यास बराच अवधी लागेल. सौर व अणुऊर्जेवर आधारित हायड्रोजन निर्माण करणे, अशा हायड्रोजन व कार्बन-डाय  ऑक्साईड  यांचे संयुग करून तरल हायड्रोकार्बन बनवणे, जैविक  घन कचऱ्याचा बायोडायजेस्टरमध्ये उपयोग करून निर्माण होणाऱ्या मिथेनचे ज्वलन करून वीज निर्माण करणे, विजेबरोबर हायड्रोजनवर आधारित उपकरणे बनविणे असे तंत्रज्ञान निर्माण होत आहे.

सौरऊर्जा ही जवळपास पुढील ४.५ अब्ज वर्षे आपणास मिळत राहील, हे जरी खरे असले तरी ही ऊर्जा २४ तास उपलब्ध नसते. हायड्रोजन निर्माण करण्याच्या प्रक्रियेमुळे आपण ही ऊर्जा साठविण्याची व्यवस्था करू शकतो. दुसरे म्हणजे सौरऊर्जा ही मुबलक प्रमाणात गोळा करावयाची झाल्यास खूप मोठे क्षेत्रफळ त्यासाठी आवश्यक आहे. कारण उन्हाचे तापमान खूप कमी असते. याउलट अणुशक्ती ही एक अतिप्रखर अशी शक्ती आहे. थोडीशी साधने वापरून थोडय़ा जागेत आपण मुबलक वीज निर्माण करू  शकतो. आज जरी युरेनियमपासून आपण वीजनिर्मिती करत असलो तरी उद्या थोरियमपासून अधिक मुबलक प्रमाणात आपण वीज निर्मिती करू शकू. ही झाली अणुविभाजनातून निर्माण झालेली वीज. अणुच्या एकमेकांतील संमिलनाने (फ्यूजन)सुद्धा आता वीज  निर्माण करण्याची शक्यता फार  जवळ आलेली आहे. हे जर  झाले तर अणुऊर्जेची उपलब्धता आपल्या ऊर्जेच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने पुढील हजारो वर्षे पुरेल इतकी होऊ शकेल. भारतही या कार्यक्रमात मागे नाही. इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर  एक्सपरिमेंटल रिअ‍ॅक्टर -आयटीईआर प्रकल्पात भारताचा पूर्ण सहभाग आहे.

आज भारताची गणना अणुतंत्रज्ञानात जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांत होते. आपले हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर प्रगत मानले गेलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण आज आपली अणुकेंद्रे निर्माण करीत आहोत व त्यांचा वापर व्यापारीदृष्टय़ा अत्यंत सफलपणे चालू आहे. फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञानही आपण विकसित केलेले आहे. ५०० मेगाव्ॉट क्षमतेचे पहिले अणुवीज केंद्र सध्या आपण निर्माण करीत आहोत. या तंत्रज्ञानात आपली गणना जगातल्या पहिल्या दोन देशांत होते. थोरियम तंत्रज्ञानाबाबत तर आपण जगावेगळे महत्त्व प्राप्त केलेले आहे भविष्यात जेव्हा इतर देशांना थोरियमवर आधारित ऊर्जेची गरज जाणवेल, तेव्हा त्यांना भारताच्या सहकार्याचे महत्त्व अधिकच लक्षात येईल. थोरियमवर आधारित अ‍ॅडव्हान्स्ड हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरच्या निर्मितीचे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा करूया.

भारतातही आपण तंत्रज्ञान विकासाबाबतीत सफल वाटचाल केली असली तरी मुख्यत देशांतर्गत उपलब्ध युरोनियमच्या तुटवडय़ामुळे प्रत्यक्ष वीजनिर्मिती आपण खूप वाढवू शकलो नाही. आंतरराष्ट्रीय नागरी सहकार्याचे नवे दालन आता आपणासाठी उघडले गेले आहे. आता आपण आपला ठरलेला अणुशक्ती कार्यक्रम अबाधित ठेवून बाहेरून आयात केलेल्या युरेनियमच्या आधारावर आपली वीजनिर्मितीची क्षमता वाढवू शकतो. एवढेच नव्हे तर देशांतर्गत विकसित फास्ट रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरुवातीस आयात केलेल्या युरेनियमचे पुनर्चक्रीकरण करून वीजनिर्मितीची क्षमता दसपट किंवा त्यापेक्षाही अधिक वाढवू शकतो. ऊर्जेच्या बाबतीत देशास स्वयंपूर्ण करण्याचा हा उत्तम मार्ग होय. माझ्या मते या शतकाच्या मध्यापर्यंत जवळपास पन्नास टक्के वीज अणुऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करणे शक्य व्हावे.

सध्या आपण महाराष्ट्रात जैतापूर येथे होऊ घातलेल्या प्रकल्पाबद्दल बरीच चर्चा ऐकतो आहोत. खरे म्हणजे महाराष्ट्रातच तारापूर येथे देशातील पहिले अणुवीज केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्याकाळीसुद्धा ही संयंत्रे तेव्हा प्रचलित असलेल्या वीजनिर्मिती केंद्राच्या तुलनेत महाकाय अशीच होती. तारापूरबाबतसुद्धा उलटसुलट चर्चा झालेलीच आहे. पण आज ४० वर्षांंनंतरही ती सर्वप्रथम उभारलेली  दोन संयंत्रे देशातील जलविद्युत सोडल्यास सर्वात स्वस्त वीजनिर्मिती करीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तारापूरचे सुरक्षित काम पाहून अनेक विदेशी तज्ज्ञांनी कौतुक केले आहे.

जैतापूर येथे फ्रान्सच्या सहकार्याने १६५० मेगाव्ॉट क्षमतेची ६ संयंत्रे बसवण्याचा प्रस्ताव आहे. यातील पहिल्या दोन संयंत्रांच्या उभारणीचे कार्य सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. ही संयंत्रे  इव्हॅल्यूशनरी पॉवर रिअ‍ॅक्टर (ईपीआर) धर्तीची अत्यंत पुढारलेली अशी आहेत. फिनलंड, फ्रान्स व चीन येथे अशा संयंत्रांच्या उभारणीचे काम सध्या चालू आहे. या संयंत्रांची उभारणी अर्थातच अणुऊर्जा  नियामक  मंडळाच्या पूर्ण निरीक्षणाखालीच होईल. नियामक मंडळाचे तज्ज्ञ या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास करुन सुरक्षिततेबाबत पूर्ण खातरजमा झाल्यानंतर प्रकल्पासाठी  आपली संमती देतील.  त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.

पर्यावरणाच्या दृष्टीने या अणुवीज केंद्रातून कुठल्याही प्रकारचा अपाय संभवत नाही. आज आपण देशात २० अणुवीज केंद्रे चालवत आहोत. या केंद्राभोवतीच्या पर्यावरणाचा अभ्यास, त्यासाठी उभारलेल्या खास प्रयोगशाळांत केला जात आहे. या अनुभवावरून अणुवीज केंद्रांचा पर्यावरणावर नगण्य प्रभाव पडतो, असे आपण ठामपणे सांगू शकतो. अणुवीज केंद्र  स्वच्छ वीजनिर्मिती तर करतातच पण त्याचबरोबर  केंद्राच्या परिसरात बराच आर्थिक व सामाजिक विकास त्यामुळे साध्य होतो, असा आजवरचा अनुभव आहे.

अणुऊर्जेबाबत मी बरीच चर्चा केली. इतर अनेक क्षेत्रांत आपणास प्रगती करावयाची आहे. त्यातील काही अशी क्षेत्रे आहेत की जेथे आपणास भारतीय समस्यांवर भारतीय तोडगा काढणे अनिवार्य आहे. आपण आपल्या तरुण पिढीची अशी तयारी करावयास हवी की हे काम ते सक्षमतेने करू शकतील.

मेजर जनरल (निवृत्त) शशिकान्त पित्रे,  सौजन्य – लोकसत्ता

पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण! २५० वर्षे झाली तरी इतिहासातील हा धडा युद्धनीतीत महत्त्वाचा मानला जातो..
देशाच्या इतिहासात असा एखादा दिवस येतो तेव्हा काही तासांतच त्याच्या वर्तमानात आणि भविष्यामध्ये पराकोटीची उलथापालथ होते. ऑगस्ट- १९४५ मध्ये हिरोशिमा आणि नागासाकी ही शहरे अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने बेचिराख केली, तेव्हा जपानची अशी स्थिती झाली होती. १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील असेच एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.

दुर्दैवाने त्या लढाईत मराठा सैन्याचा निर्णायक पराभव झाला. त्याचा मराठी मानसावर झालेला आघात इतका जबरदस्त आहे की, कोणत्याही असीम अपयशाला ‘पानिपत झाले’अशी उपमा दिली जाते. ही मानसिकता पुसून टाकणे आवश्यक आहे.

१४ जानेवारी १७६१ या दिवशी सकाळी आरंभ झालेल्या लढाईत मध्यान्हीपर्यंत विजयाचे पारडे मराठय़ांकडे झुकत होते; परंतु काही तासांतच फासे पलटले आणि उन्हे कलण्याच्या वेळेपर्यंत मराठा सेनेचा धुव्वा उडाला. भाऊसाहेब पेशवे आणि विश्वासराव हे सरसेनापती धारातीर्थी पडले. इब्राहिम गार्दी आणि जनकोजी शिंदे वगैरे धुरंधर शत्रूच्या हातात पडले. अनेक सेनापती आणि सरदार कामी आले. दोन्ही बाजूंचे पन्नास-साठ हजार सैनिक ठार झाले आणि लाखांवर निष्पापांची कत्तल झाली.

पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन तीन शब्दांत करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल. मराठा सैन्य आपल्या आरंभीच्या यशाचा पाठपुरावा का करू शकले नाही, याचे हे लष्करी विश्लेषण!

युद्धविजयी घटक
प्रत्येक लढाईचे लष्करी इतिहासाच्या दृष्टिकोनातून निष्पक्ष परीक्षण होणे आवश्यक आहे. सैनिकी अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणात त्यांचा मोठा वाटा असतो. कोणतीही लढाई ही आधी घडलेल्या लढायांची पुनरावृत्ती असता कामा नये. युद्धातील प्रतिस्पध्र्याच्या प्रहारक्षमतेचे दोन प्रमुख घटक असतात- बल आणि बलगुणक. बल म्हणजे फौजफाटा, तोफा, घोडदळ वगैरे. बलगुणक (Force Multipliers) या लढाऊ क्षमता द्विगुणित करणाऱ्या गोष्टी.. सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती, सैन्याच्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, रसदव्यवस्था, नेतृत्वाचा कस, शाठय़ आणि विस्मय या युद्धतंत्रांचा परिणामकारक वापर- हे काही बलगुणक. युद्धाचा निकाल म्हणजे दोन घटकांचे अजब आणि वैचित्र्यपूर्ण रसायन असते. त्यात भर पडते ती आणखी एका अनपेक्षित घटकाची- अतक्र्यता. कधी निसर्गातील अचानक बदल, तर कधी अगम्य घटनांमुळे युद्धाच्या यशापयशावर होणारा कल्पनातीत परिणाम. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत या घटकांचा अफलातून खेळ कोणत्याही वाचकाला अचंबित आणि मंत्रमुग्ध करून सोडतो.

लढाईपूर्व घटना
जानेवारी-१७५७ मध्ये भारतीय अफगाणी सरदार नजीब उद्दौलाच्या निमंत्रणावरून अफगाण राजा अहमदशहा अब्दालीने भारताची मोहीम हाती घेतली. त्याचा उपकर्ता नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याने सत्ता बळकावली होती. नादीरशहाबरोबर तो त्यापूर्वी भारतात आला होता. दिल्लीपर्यंत मजल मारून बारा करोड रुपयांची लूट घेऊन तो एप्रिल-१७५७ मध्ये स्वदेशी परतला. दरम्यान, राघोबादादा पेशव्यांनी जंगी फौजेसह नोव्हेंबर-१७५६ मध्ये उत्तरेकडे कूच केले. ऑगस्ट-१७५७ मध्ये दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परतला होता. दिल्लीची सल्तनत पुनश्च स्थिरस्थावर करून त्यांनी १७५८ मध्ये अटकेपर्यंत भरारी मारली. त्यात नजीब उद्दौला त्यांच्या हातात सापडला, परंतु मल्हारराव होळकरांनी आपल्या या मानसपुत्राला जीवदान देण्याची गळ घालून नजीबला सोडणे भाग पाडले. ही घोडचूक ठरली.

१७५९ मध्ये मराठय़ांचे उत्तर हिंदुस्थानातील वर्चस्व आणि दिल्लीवरील भक्कम पकडीमुळे अस्वस्थ झालेल्या अब्दालीने हिंदुस्थानकडे पुनश्च मोर्चा वळवला. १० जानेवारी १७६० रोजी शुक्रतालच्या लढाईत पेशव्यांचा अग्रणी सरदार आणि उत्तर हिंदुस्थानातील प्रतिनिधी दत्ताजी शिंदे ठार झाला. अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज धाडण्याचा निर्णय नानासाहेब पेशव्यांनी घेतला. त्यानुसार त्यांचे चुलतबंधू सदाशिवराव भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ साठ-सत्तर हजारांची फौज मार्चमध्ये उत्तरेकडे रवाना झाली. त्यात वाटेत मिळालेल्या शिंदे, होळकर यांच्या तुकडय़ाही होत्या. फौजेत चाळीस हजाराचे घोडदळ आणि इब्राहिम गार्दी या धुरंधर तोफचीच्या नेतृत्वाखाली आधुनिक २०० फ्रेंच तोफांचा तोफखाना होता. फौजेबरोबर लाख-दीड लाख बुणगे आणि चाळीस-पन्नास हजार यात्रेकरू होते. इतक्या मोठय़ा फौजेच्या दिमतीसाठी काही हजार बुणग्यांची निश्चित आवश्यकता होती; परंतु दीड लाखांची संख्या मर्यादेबाहेर होती. यात्रेकरूंचा लवाजमा तर नाहक होता. ही दोन्ही लोढणी मराठा सैन्याला प्राणघातक ठरली.

संथ चालीने ऑगस्ट-१७६० मध्ये मराठा सेना दिल्लीत पोहोचली. पंजाब-सिंधमधील चौथाई रक्कम अब्दालीने हडप केल्यामुळे भाऊंना पैशाची चणचण भासली. दिल्ली आणि आसपासचा मुलूख लुटण्याची परवानगी देण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. शीख आणि जाट सरदारांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांच्या तुकडय़ा मराठा सेनेत सामील झाल्या नाहीत. बुणगे आणि यात्रेकरूंना आश्रय देण्याची तयारी मराठय़ांचा सहयोगी सरदार सूरजमलने दाखविली होती; परंतु भाऊंनी त्याला नकार दिला. या दोन्ही घटनांचे दूरगामी परिणाम मराठय़ांना भोगावे लागले.

पानिपतमधील मोर्चाबंदी
भाऊंनी सप्टेंबर-१७६० मध्ये पानिपतच्या दिशेने कूच केले. तिथे पोहोचल्यावर पश्चिमेस शहराभोवतीचा खंदक आणि पूर्वेस यमुना नदी यांच्या दरम्यान संरक्षक फळी उभी केली. १७ ऑक्टोबर रोजी पानिपतच्या उत्तरेला कुंजपुरा येथील अब्दालीच्या सैन्याच्या तुकडीवर मराठा सरदार विंचूरकरांनी यशस्वी हल्ला चढविला आणि कुंजपुरा काबीज केला. त्यावेळी पकडलेले एक हजार अफगाण सैनिक मात्र त्यांनी आपल्या शिबिरात  ठेवून घेतले आणि त्यांचा युद्धात आपल्या बाजूने वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला.

मराठा सेनेची पानिपतजवळील मोर्चाबंदी आणि कुंजपुरा हातातून गेल्याने बिथरलेल्या अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस जाऊन त्यांची कोंडी करण्यासाठी धूर्त आणि दूरगामी डावपेच अमलात आणण्याची महत्त्वाची योजना आखली. पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी यमुना ओलांडणे आवश्यक होते; परंतु अडचणींना न जुमानता त्याने २४ ते २६ ऑक्टोबर १७६० ला बाघपत येथे ते साधले आणि तेही मराठय़ांच्या नकळत. अब्दालीचे हे खंबीर पाऊल आणि तीन दिवस चालणारी ही कारवाई वेळेत शोधून न काढण्यातील मराठय़ांच्या टेहेळणीतील गफलत ही मराठा सेनेच्या अपयशाची नांदी म्हटली पाहिजे.

त्यानंतर अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस आपली मोर्चाबंदी केली. त्यामुळे मराठय़ांचे दक्षिणेकडून येणारे रसदमार्ग खुंटले. अब्दालीच्या सैन्याला मात्र अफगाण रोहिल्यांच्या दोआब (अंतर्वेदी) प्रदेशातून रसद मिळत राहिली. एकदा का आपल्या डावपेचाची पूर्तता झाल्यावर अब्दालीने त्याचा पद्धतशीर पाठपुरावा केला आणि वेगवेगळ्या कारवायांकरवी मराठय़ांच्या रसदेचा पूर्णपणे कोंडमारा केला. दिल्लीच्या बाजूने प्रचंड रक्कम घेऊन येणाऱ्या मराठय़ांचे उत्तरेकडील मामलतदार गोविंदपंत बुंदेल्यांची पाळत ठेवून हत्या करण्यात आली. अब्दालीच्या सैन्याचा मराठय़ांभोवतीचा विळखा अधिकाधिक आवळत गेला.  गवताच्या प्रचंड साठय़ांच्या गंजींना आग लावण्यात आली. कालव्याचे पाणी अडविण्यात आले. लाख-दोन लाखांच्या बुणगे आणि यात्रेकरूंच्या लोंढय़ामुळे अन्नपुरवठा आणखीनच क्षीण झाला. पानिपतमधील उरल्यासुरल्या नागरिकांचे अन्न हरपल्यामुळे तेही मराठय़ांविरुद्ध जाऊ लागले.

डिसेंबपर्यंत माणसे आणि जनावरे अन्नाशिवाय रोडावू लागली. पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या पराजयाचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लढणाऱ्या सैनिकांची अक्षमता नव्हे, तर रसदीची वाण!

व्यूहरचना आणि रणनीती
दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४०,०००च्या घरात. दुराणी पायदळात काहीसे सरस. मराठय़ांच्या ३०-३५ हजारांसमोर अफगाणी ५०-५५ हजार, तर मराठय़ांचा तोफखाना संख्येत आणि बनावटीत दुराण्यांपेक्षा उजवा. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा १००० तोफांची योजना केली होती. या तोफा कमालीच्या प्रभावी ठरल्या. अब्दालीच्या सैन्यात अफगाणिस्तानी आणि हिंदुस्थानी गिलचे सम प्रमाणात होते.

मराठा सैन्य, पश्चिमेस पानिपत खंदक आणि पूर्वेस यमुनेच्या दरम्यान पश्चिम-पूर्व सरळ रेषेत तैनात होते. पश्चिमेस होळकर व शिंद्यांच्या तुकडय़ा, मध्यभागी भाऊ आणि विश्वासरावांची शाही तुकडी आणि पूर्वेस इब्राहिम गार्दी, विंचूरकर आणि गायकवाड वगैरे तुकडय़ा. भाऊंनी राखीव अशी तुकडी मागे ठेवली नव्हती. शीख जाटांच्या अनुपस्थितीमुळे कदाचित त्यांना पायदळाची चणचण भासली असावी; परंतु हा असमर्थनीय प्रमाद होता. अब्दालीने सैन्याची रचना एका तिरकस रेषेत केली होती. अब्दालीचा हिंदुस्थानातील अफगाणी तुकडय़ांवर पूर्ण विश्वास नसावा. म्हणूनच त्याने दोन्ही कडांस अफगाणिस्तानातून आणलेल्या तुकडय़ा उभ्या केल्या होत्या. त्या हिंदुस्थानी अफगाणांवर कडी नजर ठेवण्यासाठी! त्यानुसार शहापसंद पश्चिमेस, त्यानंतर नजीब आणि शुजाउद्दौलाच्या तुकडय़ा, मध्यभागी त्याचा सेनापती शहावलीचा कणा, त्यांच्या पूर्वेस बुंदेखान, सदुल्ला या रोहिल्यांच्या तुकडय़ा आणि सर्वात पूर्वेस बरखुरदार आणि अमीरबेग यांची अफगाणी फौज. या सर्वाच्या दक्षिणेला काही अंतरावर अब्दालीच्या पंधरा हजार राखीव सैनिकांची तुकडी योग्य वेळी आणि ठिकाणी युद्धाचे पालटे फिरविण्यासाठी सज्ज होती. भाऊंसारखा अब्दाली आघाडीवर नव्हता. शहावलीवर सेनापतित्व सोपवून तो महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी मागे मोक्याच्या ठिकाणी होता. राखीव तुकडीची योजना आणि अब्दालीचा आघाडीच्या रणतुंबडीपासून दुरावा हे दोन्ही युद्धविजयक घटक ठरले.

मराठा सैन्याच्या सेनापतींमध्ये रणनीतीबाबत मतभेद होते. इब्राहिम गार्दीचे मत गोलाईच्या लढाई बाजूने होते. गोलाईची लढाई म्हणजे सर्व फळ्या शाबूत ठेवून प्रथम शत्रूसैन्याला बलवत्तर तोफखान्याने भाजून काढायचे. शिंदे-होळकरांच्या मते गनिमी  काव्याला कौल होता; परंतु भाऊंनी गार्दीची सूचना स्वीकारली.

निर्णायक लढाई
अखेरीस कोंडीला आणि उपासमारीस कंटाळून १४ जानेवारीला भाऊंनी अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे आणि ओढाताणीला न जुमानता मराठय़ांनी अहमहमिकेने आणि निकराने सकाळीच लढाईला सुरुवात केली. काही गोळाफेक अब्दालीच्या आघाडीच्या तुकडय़ांपल्याड गेली तरी तोफखान्याचा मारा इतका  भयंकर होता की, पश्चिमेस रोहिल्यांच्या फळीत एक भले मोठे खिंडार पडले. त्याचबरोबर भाऊसाहेबांच्या शाही तुकडीनेही शहावलीला मागे रेटले. पूर्वेस शिंदे-होळकरांच्या तुकडय़ांना मात्र नजीबने तटवून धरले होते. बारा-एक वाजेपर्यंत मराठय़ांची सरशी स्पष्ट दिसत होती.

दुर्दैवाने तेव्हापासूनच पारडे पलटू लागले. सूर्य दक्षिणायनात असल्यामुळे भर दुपारी उत्तरेकडून दक्षिणेकडे चाल करून जाणाऱ्या घोडय़ांच्या डोळ्यांत सूर्यकिरणे पडू लागली आणि ते बुजू लागले. त्याचबरोबर उपासमारीने रोडावलेले घोडे आणि त्यांच्यावरील स्वार पार थकून गेले आणि जागीच कोसळू लागले. इब्राहिम गार्दीच्या तोफांनी पाडलेले खिंडार पाहून हल्ला करण्यास अधीर झालेले विंचूरकर आणि गायकवाड या दोघांनी इब्राहिमच्या आर्जवांना भीक न घालता अवेळी चढाई केली. बिनबंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव केला आणि मराठी तुकडय़ा परत फिरल्या. भाऊ आणि विश्वासराव आपल्या हत्तीवरून खाली उतरून लढू लागले आणि ठार झाले. मोकळ्या अंबाऱ्या पाहून मराठा सैन्याचा धीर खचला आणि ते सैरावैरा धावू लागले. हीच संधी साधून अब्दालीने आपले ताजेतवाने राखीव सैन्य पुढे केले आणि पळणाऱ्या मराठी सैन्यावर प्राणघाती हल्ला चढवला. याचवेळी विंचूरकरांच्या शिबिरात ठेवलेल्या अफगाणांनीही उठाव केला. दुसरा कोणता पर्याय नसल्याचे पाहून होळकर आणि शिंद्यांच्या तुकडय़ांनी सापडलेल्या फटींमधून दक्षिणेकडे कूच केले.

सूर्यास्तापर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला. बाकी होती ती गिलच्यांकडून मराठी बंदी सेनेची, बुणग्यांची आणि यात्रेकरूंची निर्घृण कत्तल! तो एक केवळ काळा इतिहास!

युद्धतत्त्वांच्या निकषांवर परीक्षण
युद्धशास्त्रात युद्धाची दहा तत्त्वे (Principles of War) गठीत करण्यात आली आहेत. या निकषांवर तिसऱ्या लढाईचे परीक्षण-

उद्दिष्टाची निवड आणि त्याचा सातत्याने पाठपुरावा (Selection and Maintenance of Aim)- याबाबतीत दोन्ही सरसेनापती अपुरे ठरले. अब्दाली आणि भाऊ या दोघांनी वारंवार तहाचा विचार केला आणि त्यामुळे दोघांच्याही युद्धशक्तीवर परिणाम झाला. याबाबतीत खरा ठरला तो नजीबद्दौला. मराठय़ांचा उत्तरेतून नायनाट करायचा, हे त्याचे उद्दिष्ट. त्यानेच जिहादची घोषणा करून अब्दालीला लढाईच्या भरीस घातले आणि आपले उद्दिष्ट तडीस नेले.

सुरक्षितता (Security)- सैन्यक्षेत्र, सैन्यदल आणि आपल्या रसद मार्गाची सुरक्षितता साधणे महत्त्वाचे आहे. यासाठी टेहळणी पथक आणि पहाऱ्याची आवश्यकता असते. मराठा सैन्याचा या बाबीतील हलगर्जीपणा त्यांना भोवला. बुणगे आणि यात्रेकरूंचे ओझे हा सुरक्षिततेला मोठा धोका ठरला.

इच्छाशक्ती टिकवणे (Maintenance of Morale)- मराठा सैन्याची लढण्याची इच्छाशक्ती दिवसागणिक क्षीण झाली होती. तरीसुद्धा सुरुवातीचा विजय हे त्यांच्या लढाऊ वृत्तीचे द्योतक आहे.

विस्मय आणि शाठय़ (Surprise and Deception)-  अब्दालीची यमुनापार चाल याबाबतीत निर्णायक ठरली. मराठय़ांची ही प्रमुख त्रुटी.

सैन्यबळाचे एकवटीकरण (Concentration of  Force)- युद्धशक्तीच्या प्रकाराचा हा सर्वात मोठा गुणक. आपली शक्ती वेगवेगळ्या जागी विभाजित करून ती खच्ची करणे, हे सेनापतीच्या अपरिपक्वतेचे दर्शक आहे. सर्व फळ्यांनी हल्ला करण्यापेक्षा एकच भगदाड पाडून बाकी सर्व ठिकाणी संरक्षणात्मक पवित्रा घेणे, हे फायदेशीर असते. मराठे याबाबतीतही कमी पडले.

सैन्यबलाचा वित्तव्यय (Economy of  Force)- अत्यंत धूर्त व्यूहरचना, मोक्याच्या ठिकाणी घणाघात आणि राखीव दलाच्या साहाय्याने हे सिद्ध होऊ शकते. मराठे हे साधू शकले नाहीत.

लवचिकता (Flexibility)- नवनव्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी युद्धयोजनेत लवचिकता हवी. शिवाजी महाराजांच्या सर्व लढाया ही याची उदाहरणे आहेत. यासाठी राखीव दलाची योजना आवश्यक आहे. भाऊंची ही एक महत्त्वाची चूक होती.

सहकार्य (Co-operation)- सैन्याच्या विविध अंगांमध्ये आणि तुकडय़ांत सहकार्याची नितांत गरज असते. मराठा सैन्यातील दुफळीने त्यांच्या क्षमतेवर दुष्परिणाम झाले.

व्यवस्थापन (Administration)- हा मराठा सैन्याचा सर्वात मोठा दोष. निर्णयकर्त्यांनी याच्याकडे पूर्णतया दुर्लक्ष केले. किंबहुना व्यवस्थापनाचा बोजडपणा आणि अनावश्यक यात्रेकरूंचे लोढणे हा मराठय़ांच्या अपयशाचा सर्वात मोठा पाईक आहे.

निर्णायक वळणे
पानिपतच्या लढाईत पाच मोक्याची वळणे नमूद करता येतील. पहिले- गरजेपेक्षा अधिक बुणगे आणि यात्रेकरू फौजेबरोबर पाठविण्याचा निर्णय आणि सूरजमलच्या प्रस्तावाला भाऊंचा नकार. दुसरे- अब्दालीचे यमुना उल्लंघन. तिसरे- नोव्हेंबरमध्येच अब्दालीवर हल्ला चढविण्याची गमावलेली संधी. चौथे- एकाच ठिकाणी प्रहार करून भगदाड पाडण्याऐवजी सैन्याची पसरण आणि पाचवे- राखीव दलाचा अब्दालीकडून वापर आणि त्याबाबतीत मराठय़ांची त्रुटी.
सदाशिवरावभाऊंच्या नेतृत्वावर बऱ्याच शंका घेतल्या जातात. अब्दाली त्यांच्यापेक्षा अधिक अनुभवी होता. भाऊ त्याआधी फक्त उदगीरची लढाईच जिंकले होते. पण तरीही अनेक अडचणींवर मात करून शत्रूवर हल्ला करण्याचा खंबीरपणा हे त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाचे द्योतक आहे. ते अत्यंत शूर होते. जर मध्यान्हीनंतर नशीब फिरले नसते तर कदाचित आज एक उत्तुंग नेतृत्व म्हणून त्यांचा गौरव झाला असता.

पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठेजिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर  मराठी झेंडा फडकला असता.

पानिपतची लढाईमुळे मराठी मानसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

अभद्र आणि अशुभ बोलू वा लिहू नये, असा संकेत आहे. पण पोलीस, हेरखाते आणि सुरक्षा यंत्रणा यांना काहीतरी भयानक, हिंसक, अभद्र घडण्याची शक्यता लक्षात घेऊनच सर्व तयारी करावी लागते. मुंबईवर झालेल्या ‘२६/११’ च्या थरारक हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत असताना नेमक्या त्याच शक्यतांचा विचार करावा लागणे अपरिहार्य आहे. दोन वर्षांत माओवाद्यांचे अनेक हल्ले झाले; पण ‘सीमेपलीकडे’ रचलेले ‘जिहादी’ हल्ले फारसे झाले नाहीत. खरे म्हणजे, पुणे येथे झालेला जर्मन बेकरीवरचा हल्ला वगळता, दहशतवादाने देशातील जीवन विस्कटून टाकलेले नाही. माओवाद्यांचे हल्ले आणि अलकाइदा, तालिबान, इंडियन मुजाहिदीन या वा अशा संघटनांनी केलेले हल्ले यात फरक आहे. माओवाद्यांचे हल्ले ‘स्वदेशी’ आहेत. एतद्देशीय आदिवासी वा शेतमजुरांना संघटित करून पुकारलेल्या यादवीचा ते भाग आहेत; परंतु ‘२६/११’चा दहशतवाद  वा त्यापूर्वीचे काही (मुंबईतील लोकल गाडय़ांमधील साखळी स्फोट (२००६) किंवा १९९३ मार्चमधील स्फोटमालिका) हे पाकिस्तानात तयार झालेल्या हल्ल्याच्या कटांचा भाग होते. हल्ले माओवाद्यांचे असोत वा जिहाद्यांचे, दोन्हीतील हिंस्रता समान आहे; परंतु एका दहशतवादाला परकीय आक्रमणाचा वेगळा वेश आहे आणि दुसरा देशांतर्गत विषमता आणि असंतोषातून निर्माण झाला आहे. पुढील १० वर्षांत २०२० पर्यंत, हे दोन्ही प्रकारचे हल्ले वाढण्याची शक्यता आहे- मग सरकार कुणाचेही असो, पंतप्रधान कुणीही असो. हे ‘अभद्र’ भाकीत नाही तर सध्या भारतीय उपखंडात (आणि जगात) जी कमालीची अस्वस्थतेची परिस्थिती आहे, ज्या प्रमाणात शस्त्रास्त्रनिर्मिती आणि बेकायदा शस्त्रास्त्र खरेदी-विक्री चालू आहे ती पाहता ‘२६/११’ हा येत्या दशकासाठी बनविलेला ‘ट्रेलर’ किंवा ‘प्रोमो’ वाटावा, असे मानायला हवे. सर्वानी सजग राहायला हवे, सुरक्षा यंत्रणांनी अधिक जागरूक राहायला हवे हे खरेच; पण त्यामुळे दहशतवादाविरुद्धचे युद्ध आटोक्यात येईल वा संपेल, असे अजिबात नाही. कारण एका बाजूला धार्मिक अभिनिवेश आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकेची आक्रमकता; एका बाजूला अतिरेकी राष्ट्रवाद आणि दुसऱ्या बाजूला ऐतिहासिक सुडाची भावना हे सर्व आता इतके टोकाला गेले आहे, की मार्टिन रीज् या जगप्रसिद्ध विचारवंत- वैज्ञानिकाच्या- वैज्ञानिकांच्या शब्दांत सांगायचे तर हे शतकच सिव्हिलायझेशनचे अखेरचे शतक ठरू शकेल. (त्यांच्या पुस्तकाचे नाव ‘अवर फायनल सेंच्युरी’)

तीन दिवसांपूर्वी उत्तर कोरियाने आकस्मिकपणे दक्षिण कोरियावर एक हल्ला चढविला. वर वर पाहता त्या हल्ल्याचे स्वरूप (हानी किती झाली हे पाहता) किरकोळ वाटावे असे होते; जगभर त्या हल्ल्याने खळबळ उडाली. उत्तर कोरियाकडे अण्वस्त्रे आहेत आणि त्या अण्वस्त्र-क्षेपणास्त्रांचे लक्ष्य दक्षिण कोरिया आहे. अमेरिकेच्या सुरक्षा कवचाखाली असलेल्या दक्षिण कोरियावर हल्ला (अण्वस्त्र हल्ला!) झाल्यास तो अमेरिकेवर झालेल्या हल्ल्यासारखाच मानला जाईल. अमेरिकेने त्याचा प्रतिकार केला तर त्याची परिणती अणुयुद्धातही होऊ शकते, अशी चर्चाही जगभर सुरू झाली. ही भीती अवास्तव वाटत असली तरी तिच्यात तथ्य आहेच.

त्याचप्रमाणे ओबामांनी जाहीर केल्याप्रमाणे अफगाणिस्तानातून आणि नंतर इराकमधूनही अमेरिकन सैन्य काढून घेतले तर अक्षरश: हजारो तालिबानी आणि अलकाइदा प्रशिक्षित अतिरेकी मध्यपूर्व आशियात व भारतीय उपखंडात थैमान घालू शकतील. अमेरिकन अध्यक्षांकडे डॉ. मनमोहनसिंग यांनी ही भय-शक्यता बोलून दाखविली आहे. एका बाजूला आपण जगातील सर्व देश सार्वभौम आहेत, असे मानतो आणि आजच्या विशिष्ट स्थितीत आपणच अमेरिकेला सुचवित आहोत, की त्यांनी सैन्य मागे घेतले तर भारत असुरक्षित होईल. पाकिस्तानने तयार केलेल्या काश्मिरी अतिरेक्यांच्या फौजेला, त्यांच्या गनिमी दहशतवादी हल्ल्यांसाठी तालिबानची मदत व्हायला लागलीच आहे, पण अमेरिकन सैन्य परत गेल्यावर त्यांचे एकमेव लक्ष्य भारत असणार आहे.

दिल्लीत झालेल्या एका सुरक्षाविषयक परिषदेत एक माजी सेनाधिकारी असे म्हणाले, की ‘२६/११’च्या धर्तीवरचा आणखी एक हल्ला मुंबई वा दिल्लीवर झाला तर जो समाज-प्रक्षोभ निर्माण होईल त्यातून भारत-पाकिस्तान युद्ध उद्भवू शकेल. या दोन्ही देशांकडे अण्वस्त्रे आहेत. त्यामुळे त्याचे पर्यवसान अणुयुद्धातही होऊ शकेल. बॉम्ब वुडवर्ड यांनी लिहिलेल्या ‘ओबामाज् वॉर’ या पुस्तकात ही शक्यता व्यक्त केलेली आहेच.

वुडवर्ड यांनी तर पाकिस्तानमधील वाढते दहशतवादी संघटन आणि अफगाणिस्तानवरील अमेरिकेचे सुटत चाललेले नियंत्रण यामुळे भारतीय उपखंड हिंसेच्या खाईत सापडण्याची भीती अधोरेखित केली आहे. भारतात एक मोठा राजकीय विचारप्रवाह असा आहे, की ज्यांच्या मते पाकिस्तान पूर्णत: नेस्तनाबूत करायला हवा. या विचारप्रणालीनुसार बहुसंख्य मुस्लीम हे ‘मनाने’ पाकिस्तानी आहेत. मागील कोणत्याही दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात हिंदू-मुस्लीम दंगे उसळले नाहीत हा काही प्रमाणात नशिबाचा आणि काही प्रमाणात त्या त्या समाजातील राजकीय जाणतेपणाचा भाग मानायला हवा; परंतु तो जाणतेपणा आळवावरच्या पाण्यासारखा असतो. समाजात अजूनही तीव्र गैरसमज, विद्वेष आणि विखार आहे. तो केव्हाही भडकेल या शक्यतेनेच अयोध्येच्या निकालाच्या दिवशी देशभर भयाकूल वातावरण होते. प्रत्यक्षात कुठेही दंगा झाला नाही याचे कारण त्या न्यायालयीन निर्णयातील संदिग्धता आणि न्यायमूर्तीनी घेतलेली सावध भूमिका. प्रश्न ‘न्याया’चा नव्हताच; कारण ६० वर्षे तो न्यायालयातच पडून आहे. मुद्दा हा, की जातीय विद्वेषाचे निखारे ठिकठिकाणी आहेतच आणि त्यातून ज्वाळा निर्माण व्हायला निमित्त, शस्त्रास्त्र आणि संघटना हव्यात. यापैकी शस्त्रास्त्र आणि अतिरेकी संघटना आहेतच. निमित्त मिळाले, की स्फोट व्हायला वेळ लागणार नाही. ज्यांनी बाबरी मशिदीचा विध्वंस केला ते आणि ज्यांनी मुंबईत स्फोटांची मालिका घडवून आणली ते, स्वतंत्रपणे आपापली शस्त्रास्त्रे परजून तयार ठेवीत असतात. त्यांना दहशतवादी हल्ल्याचे निमित्त मिळाले तर दोन वर्षांपूर्वी दाखविलेला समजुतदारपणा ते पुन्हा (वा नेहमी) दाखवतीलच असे नाही.

दहशतवाद हा ‘हिरवा’ आहे, की ‘भगवा’, की ‘लाल’ याबाबत बरीच चर्चा चालते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक म्हणतात, की ‘हिंदू दहशतवाद’ हा शब्दप्रयोगच अर्थशून्य आहे. कारण हिंदू हे मूलत:च सहिष्णू, शांतताप्रिय आणि सहजीवनवादी आहेत.’ मोहन भागवतांना असे अभिप्रेत असते, की ‘मुस्लीम’ मात्र तसे सहिष्णू व शांतताप्रिय नाहीत.’ परंतु बाबरी मशीद उद्ध्वस्त करणारे हिंदू स्वयंसेवक हे कोणत्या दृष्टिकोनातून सहिष्णू व शांतताप्रिय ठरतात हे त्यांनी कधीच स्पष्ट केले नाही. काही मुस्लीम धर्मपंडितही म्हणतात, की इस्लाम हा दहशतवादी होऊच शकत नाही. कारण इस्लाम या शब्दापासून ते त्याच्या शिकवणीपर्यंत प्रेम व शांतता हाच त्या धर्माचा आशय आहे. ‘प्रेम व शांतता’ हा आशय असलेल्या धर्माच्या अनुयायांनीच अफगाणिस्तानातील बामियान बुद्धाचे महापुतळे तोफखाने लावून उद्ध्वस्त केले होते. ख्रिश्चन आणि ज्यू धर्मवादीही सांगतात, की मानवी संस्कृतीचा विकास त्यांच्या शिकवणीतून व परंपरेतूनच झाला. येशूचा प्रेमाचा संदेश जगाला सांगणारे आर्यलडमधील ख्रिश्चन तर ‘प्रोटेस्टण्ट विरुद्ध कॅथलिक’ या धर्मयुद्धात कित्येक शतके लढत आहेत. विसाव्या शतकातील ‘आयरिश रिपब्लिकन आर्मी’चा कॅथलिक दहशतवाद आणि त्याच्या विरोधात प्रस्थापित शासनाकडून झालेली प्रोटेस्टण्ट सुरक्षा सैनिकांची हिंस्रता याची मुळे कुठे शोधणार?

बहुसंख्य हिंदू (व ख्रिश्चनांनाही) वाटते, की तमाम मुस्लीम देश हे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दहशतवादाचे समर्थक आहेत; परंतु शिया आणि सुन्नी या दोन मुस्लीम पंथातील अतिरेक्यांनी परस्परांच्या मशिदी बॉम्ब टाकून उद्ध्वस्त केल्या आहेत. आज इराकमध्ये तर शिया-सुन्नी यांच्यात एक समांतर यादवी सुरू आहे. इराकमधील शियांना तेथील सुन्नींविरुद्ध लढण्यासाठी इराणकडून पैशाची आणि शस्त्रास्त्रांची मदत होत असते. सद्दाम हुसेन यांच्या इराकचा पाडाव करून, सद्दाम यांना फाशी देईपर्यंत इराणने अमेरिकेला अप्रत्यक्ष मदत केली होती. साहजिकच त्या काळात वितुष्ट असूनही अमेरिका व इस्राएल दोघेही इराणवर फारशी टीका करीत नसत.

परंतु इराक पूर्ण विस्कळीत करून टाकल्यानंतर आणि अफगाणिस्तानात हाहाकार व अराजक माजविल्यानंतर तो भस्मासूर अमेरिकेवर पुन्हा उलटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पहिले आखाती युद्ध १९९१ साली झाले, ते इराकच्या आक्रमणातून कुवेत मुक्त करण्यासाठी. तेव्हा लाखो इराकी लहान मुले युद्धामुळे व उपासमारीने वा औषधे न मिळाल्याने मरण पावली. जगाने त्याची फारशी दखल घेतली नाही. त्या आक्रमणाचा सूड अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर हवाई दहशतवादी हल्ल्याने घेण्यात आला (पण त्या दहशतवाद्यांमध्ये इराकी कुणीही नव्हते. तो अमेरिकेवर धार्मिक सूड उगवला गेला होता.) त्या हल्ल्याचा हिंस्र प्रतिकार म्हणजे ‘९/११’ नंतर प्रथम अफगाणिस्तानवर आणि नंतर इराकवर अमेरिकेने केलेले हवाई बॉम्ब हल्ले. अमेरिकेचे तत्कालिन संरक्षणमंत्री त्या हल्ल्यांचे वर्णन ‘शॉक अ‍ॅण्ड ऑ’ असे करीत. त्यांना असे म्हणायचे असे, की अमेरिकेची अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची हिंस्र ताकद इराकने (म्हणजे जगानेच) ओळखली नाही; पण आता आम्ही त्यांना हा जबरदस्त आणि आश्चर्यजनक असा धक्का दिला आहे, त्यातून तरी ते शिकतील!

प्रत्यक्षात, ‘शॉक अ‍ॅण्ड ऑ’च्या या धडय़ातून अमेरिकेलाच शिकायची वेळ आली आहे. अमेरिकेचे (आणि ब्रिटनचे) हजारो सैनिक ठार झाले आहेत आणि त्या दोन्ही देशांत शांतता व लोकशाही प्रस्थापित करण्याचे उद्दिष्ट पूर्ण फसले आहे. याच काळात इस्राएलने अधिक आक्रमक होऊन, अमेरिकन सैन्याच्या व सत्तेच्या पाठिंब्याच्या आधारे आपले हातपाय अधिक पसरले आहेत. त्यामुळे मध्यपूर्व आशिया १९७३ प्रमाणे पुन्हा धुमसू लागला आहे. इस्राएलला भौगोलिक वेढा असलेले अरब देश केव्हाही ‘ज्यू सिव्हिलायझेशन’ उधळून टाकतील अशी भीती दाखवून इस्राएलने जगभरचे धनाढय़ ज्यू एकत्र आणले आहेत. आपल्यावर तसा ‘अंतिम’ हल्ला व्हायच्या आतच आपण अरब राष्ट्रांना हिसका दाखवावा या मनाचे अनेक सत्ताधारी व धर्मगुरू जेरुसलेममध्ये आहेत. फक्त अरब राष्ट्रांनाच नव्हे तर शिया धर्मीय इराणवरही आकस्मिक हल्ला करून त्यांना नामोहरम करायचा विचार इस्राएली राज्यकर्त्यांच्या मनात आहे. इराण हा अरब संस्कृतीतील देश नव्हे; पण इराणवर हल्ला झाल्यास अरब देशातील शिया आणि सुन्नी इस्राएलच्या विरोधात एकत्र येतील. इराणवर अमेरिकेनेच हवाई बॉम्बहल्ला करून त्यांचे अणुप्रकल्प उद्ध्वस्त करावेत, असे काही इस्राएली व काही अमेरिकनांचे मत (आणि इरादाही) आहे.

परंतु इराणवर तसा हल्ला झाल्यास जगभर जेथे जेथे अमेरिकन हितसंबंध आहेत, तेथे तेथे दहशतवादी हल्ले केले जातील, असा इशारा इराणने दिला आहे. त्या प्रकारच्या दहशतवादात अप्रत्यक्षपणे का होईना, पण शिया व सुन्नी एकत्र येतील. कारण त्या दोघांचा मुख्य शत्रू इस्राएल व अमेरिका यांची आघाडी हाच आहे.

भारताने अमेरिकेबरोबर अणुकरार केला आहे. इस्राएलकडून अनेक प्रकारची सुरक्षा-तंत्रज्ञान यंत्रणा घेतली आहे. इस्राएलबरोबर भारताने मैत्रीचे, सहकार्याचे आणि जागतिक-स्ट्रॅटेजिक स्वरूपाचे संबंध प्रस्थापित केले आहेत. त्याचबरोबर आपले इराणबरोबरचे संबंध बिघडले आहेत.

म्हणजेच मध्यपूर्व आशियातील वा दक्षिण आशियातील विविध प्रकारचे प्रक्षोभक वातावरण काश्मीर वा अन्य निमित्ताने भारतात स्फोटक होऊ शकेल. दहशतवादाचा हा फटका खुद्द पाकिस्तानलाच बसू लागला आहे. कारण पाकिस्तानी सरकार हे अमेरिकन सत्ताधाऱ्यांचे अंकित आहे असे तालिबानी व अलकाइदाचे मत आहे. या सर्व प्रक्षोभाचा हिंस्र आविष्कार म्हणजे बेभान, दिशाहीन दहशतवाद.

आपण इतकेच लक्षात ठेवायला हवे, की ‘२६/११’ला दोन वर्षे झाली, ती तुलनेने बरी गेली याचा असा नाही की येणारे दशक सुरक्षित व शांततेने पार पाडेल. तो धोका केवळ पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांकडून नाही तर जागतिक अशाश्वत प्रक्षोभात आहे!

अयोध्यानगरी

Posted: जानेवारी 12, 2011 in इतिहास

सौजन्य- लोकसत्ता

दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी १८९९ मध्ये लिहिलेल्या ‘अयोध्येचे नवाब’ या पुस्तकात अयोध्येचे केलेले हे स्थलवर्णन. अयोध्या तेव्हा कशी दिसत होती, हे त्यांच्याच शब्दांत..

————————————————————————-
अयोध्या ही प्राचीन पुराणप्रसिद्ध नगरी सांप्रत वायव्य प्रांतातील फैजाबाद जिल्हय़ात फैजाबाद शहरानजीक पाच-सहा मैलांवर आहे. काशीहून लखनौकडे जाणारा औंध-रोहिलखंड रेल्वे म्हणून जो रेल्वेचा रस्ता आहे, त्या रस्त्यावर लखनौच्या अलीकडे ८९ मैलांवर फैजाबाद हे स्टेशन आहे. येथून अयोध्या गावात जाण्यास उत्तम रस्ता असून, वाहने वगैरे चांगली मिळतात. फैजाबाद हे अयोध्येच्या नवाबाच्या कारकीर्दीत इ.स. १७२४ ते इ.स. १७७५ पर्यंत राजधानीचे शहर असल्यामुळे तेथील गतवैभवदर्शक कित्येक स्थळे पाहण्यासारखी आहेत. या शहरास ‘बंगला’ असेही नाव आहे. अयोध्या येथे शरयू नदी असून, तिच्यामध्ये ‘स्वर्गद्वार’ म्हणून एक मोठे तीर्थ आहे. तेथून श्रीरामचंद्र आपले अवतारचरित्र समाप्त करून स्वर्गास गेले. म्हणून त्यास ‘स्वर्गद्वार’ असे नाव पडले आहे. त्याचे माहात्म्य अयोध्या पुराणात वर्णन केले आहे. रामचंद्राचे जन्मस्थान  येथेच असल्यामुळे हे स्थळ फार पुण्यदायक मानले जाते. एवढेच नव्हे तर अयोध्यानगरी ही पुराणांतरी वर्णन केलेल्या-

‘अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका।।
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायका:।।१।।’

– या सात मोक्ष देणाऱ्या नगरींमध्ये आद्यस्थानी गणलेली आहे. या प्रांताचे प्राचीन नाव उत्तर कोसल असे आहे. रामचंद्राच्या वेळची अयोध्या आता मुळीच राहिली नाही. रामायणात ज्या अयोध्येचे वर्णन दिले आहे, ती इसवी सनापूर्वी ५०० वर्षांची अयोध्या अद्यापि असेल ही कल्पनाही संभवत नाही. तथापि, अयोध्येइतके प्राचीन शहर दुसरे कोणतेच नाही, ही गोष्ट अगदी सिद्ध आहे. पूर्वीची अयोध्या दोन-तीन वेळा उद्ध्वस्त झाली होती, अशीही माहिती मिळते. वैवस्वताने इ.स.पूर्वी १३६६ या वर्षी ही नगरी प्रथमत: वसविली, असे लिहिले आहे; पण त्याबद्दलची विश्वसनीय माहिती मिळणे कठीण आहे. नवीन अयोध्या विक्रमादित्य राजाने इ.स.पूर्वी ५७ व्या वर्षी बांधली, असा जो लेख सापडतो, तो मात्र बराच भरवसा ठेवण्यासारखा दिसतो. यवनांच्या कारकीर्दीमध्ये ही सुप्रसिद्ध नगरी अनेक वेळा उद्ध्वस्त झाली होती. विक्रमादित्य राजाने बांधलेली अयोध्या ही प्रस्तुतच्या अयोध्येपासून एक-दोन मैल लांब होती, असे म्हणतात. फैजाबादेजवळ जुन्या इमारतीचे जे सामान जमिनीमध्ये दृष्टीस पडते ते पूर्वीच्या अयोध्येचे दर्शक होय, असे प्राक्कालीन वस्तुशोधकांचे मत आहे. विक्रमादित्य राजाने जी नगरी वसविली तीमध्ये ३६० देवालये बांधली होती. पण ती देवालये यवनांच्या कारकीर्दीत जमीनदोस्त होऊन त्यांच्याच सामानाने पुढे औरंगजेबाने मशिदी बांधल्या, असे इतिहासावरून दिसून येते. अयोध्येमध्ये प्रस्तुत प्राचीन देवालये फार थोडी आहेत. हनुमानगड व रामगड अशी जी दोन स्थळे येथे दृष्टीस पडतात ती मात्र बरीच प्राचीन असावीत, अशी कल्पना आहे. या दोन स्थळांपैकी हनुमानगड, ज्यास तेथील लोक ‘हनुमाननगरी’ म्हणतात ते मात्र सध्या अस्तित्वात आहे. दुसरे रामगड हे नाममात्र राहिले आहे. त्या स्थळी पूर्वी रामजन्मस्थान होते; परंतु ते नष्ट करून त्यावर औरंगजेब बादशहाने मशीद बांधली आहे. येथून जवळच मणिपर्वत, कुबेरपर्वत आणि सुग्रीवपर्वत अशी जुनी स्थाने आहेत; परंतु त्यामध्ये दर्शनीय अशी एकही गोष्ट राहिली नाही.

सांप्रतची अयोध्या ही एक जुनाट, वैभवहीन व सौंदर्यरहित अशी लहानशी नगरी आहे. रामायणामध्ये-
कोशलो नाम मुदित: स्फीतो जनपदो महान।।
निविष्ट: शरयूतीरे प्रभूतधनधान्यवान।।१।।
अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता।।
मनुना मानवेन्द्रेण या पूरीनिर्मिता स्वयम्।।२।।

म्हणून ज्या नगरीचे वर्णन केले आहे त्या नगरीचा आता मागमूसही राहिला नाही. प्रस्तुत येथे लहान लहान, पण जीर्ण अशा गृहपंक्ती दिसत असून, दारिद्रय़ावस्थेने गांजलेले नागरिक मात्र दृष्टीस पडतात. यावरून हे सर्व स्थित्यंतर मुसलमानांच्या कारकीर्दीत झाले असून, आता या नगरीमध्ये प्राचीन सौंदर्यदर्शक एकही चिन्ह राहिले नाही, असे स्पष्ट म्हणणे भाग पडते.

प्रासादैर्रत्नविकृतै: पर्वतैरिव शोभिताम्।।
कूटागारैश्च संपूर्णामिंद्रस्येवामरावतीम्।।१।।

अशी नगरी आता दारिद्रय़ाचे वसतिस्थान बनावी ही काळाची केवढी अजब लीला आहे बरे?

वाल्मीकी रामायणातील अयोध्येचे वर्णन ऐकल्यामुळे प्रत्येक प्रेक्षकास अयोध्यादर्शनाची उत्कंठा अतितर असते; परंतु ती सांप्रतच्या अयोध्यानगरीत प्रवेश केल्याबरोबर लागलीच कमी होते. प्रस्तुतच्या पुण्यकर क्षेत्रामध्ये नेत्रानंददायक स्थले फारशी नाहीत; तथापि भक्तिभावाने जाणाऱ्या यात्रेकरूस हृदयाल्हादकारक अशी देवालये बरीच आहेत. त्यात ‘हनुमानगढी’ ही प्रमुख होय. येथे पूर्वी ‘रामगढी’ व ‘हनुमानगढी’ अशा दोन गढय़ा असून, त्यात श्रीराम व त्यांचा भक्त हनुमान यांची देवालये होती. त्यापैकी यवनांच्या कारकीर्दीत रामगढीचा नाश झाला. आता फक्त हनुमानगढी हेच देवस्थान पाहण्यासारखे राहिले आहे. ही गढी केवळ किल्ल्याप्रमाणे भव्य असून, आपल्या प्राचीनत्वाची साक्ष ठिकठिकाणी देत असते. या गढीचे प्रचंड बुरुज व तोफेसही हार न जाणाऱ्या खंबीर भिंती दूरवर दिसत असतात. या गढीचा दरवाजा अत्यंत मोठा असून, त्यातून वर जाण्यास दगडी पायऱ्या आहेत. त्या चढून वर गेले म्हणजे रामदूत श्रीहनुमान यांचे एक देवालय दृष्टीस पडते. हे देवालय लहानच आहे, तरी त्याचे बांधकाम सवरेत्कृष्ट असून, ते प्रेक्षकांचे रंजन केल्यावाचून राहात नाही. या मंदिराचा कळस सुवर्णमय असल्यामुळे त्याची प्रभा दिनकराच्या दिव्य तेजाने आसमंतात चमकत असते. येथे एक भगवी ध्वजा लावली आहे. ती वायूच्या लहरीबरोबर एकसारखी फडकत असते. त्यावरून जणू पवन स्वपुत्राची (अंजनीसुताची) अद्वितीय रामभक्ती प्रेमाने गात आहे, असा भास होतो!

या देवालयामध्ये हनुमंताची प्रचंड मूर्ती असून, तिचा पूजाअर्चादी समारंभ फार प्रेक्षणीय असतो. हनुमंताचे मुख व नेत्र इतके तेजस्वी आहेत की, त्या योगाने प्रेक्षकाचे हृदय हर्षभरित होऊन त्या स्वरूपाचे कितीही दर्शन घेतले तरी नेत्रांची तृप्ती होत नाही. देवाचे अलंकार व पोषाख बहुमूल्य असून, पुण्यदिनी त्यांचा उपयोग करीत असतात. हे स्थान इतके शांत व रम्य आहे की, तेथे भक्तिमान दर्शनोत्सुकांची हृदये आनंदाने भरून जातात. या देवालयाच्या पुढील भागात श्रीरामचंद्रजी, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. त्या मूर्ती अगदी लहान असून, त्यांचे मंदिरही अगदी लहान आहे. या श्रीरामचंद्रजींच्या नगरीमध्ये रामसेवकाचेच माहात्म्य विशेष आहे. यावरून परमेश्वरास भक्ताची प्रीती जास्त आहे असे दिसून येते. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की, ज्या भक्ताचा परमेश्वराच्या ठायी निस्सीम भाव असतो, त्यास परमेश्वर ‘मस्तकीचा मुकुट करीन मी’ असे म्हणत असतात. त्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण होय! असो. या उच्च स्थलावरून दूरवरचा फार मनोहर देखावा दृष्टीस पडत असतो. त्याचे वर्णन करावे तितके थोडेच आहे.

हनुमानगढीशिवाय येथे सप्तहरींची स्थाने फार प्रसिद्ध आहेत. नागेश्वर महादेव या नावाचे एक शिवस्थान आहे, तेथे महाराष्ट्रीय ब्राह्मण दृष्टीस पडतात. पण ते याचनावृत्तीमध्ये गढून गेले आहेत. अयोध्येमध्ये राममंदिर तर पुष्कळ आहेत. त्या सर्वाचे उत्सव रामनवमीमध्ये सुरू होतात. त्यावेळी अयोध्येस हजारो यात्रेकरू जमत असतात. बैरागी लोकांचे मेळे येथे फारच आहेत. त्यांचे माहात्म्य पूर्वी विशेष असून, त्यांचे निरनिराळे पंथ व त्या प्रत्येक पंथाचे वेगवेगळे आखाडे असत. त्यात निर्वाणी, निर्मोही, दिगंबरी, खाकी, महानिर्वाणी, संतोखी, निरालंभी हे पंथ फार प्रसिद्ध असून, त्या प्रत्येक पंथाचे निरनिराळे आचार्य असत व त्यांचा फार मान असे. पुढेपुढे त्यांचे प्रस्थ बरेच कमी झाले. तथापि इंग्रज अंमल होण्यापूर्वी सुग्रीवकिल्ला, रामप्रसादका काना व विद्याकुंड येथे अनुक्रमे १००, १५०, २०० बैरागी मोठे मानकरी असत. इ.स. १८५५ साली येथे बैरागी व मुसलमान लोकांमध्ये मोठय़ा मारामाऱ्या झाल्या. त्यामुळेच तेथे इंग्रज सरकारचा बंदोबस्त कडेकोट झाला. बहुविध राममंदिरांशिवाय येथे तीर्थे व रामकुंडे अनेक आहेत. या सर्व ठिकाणी यात्रेकरूंना क्षेत्रविधी करावे लागतात.

अयोध्येतील सृष्टीसौंदर्याचा सर्वात उत्तम देखावा शरयूतीरी दृष्टीस पडतो. प्रात:काळी व सायंकाळी येथे जो उदात्त, सुशांत व आल्हाददायक देखावा दृष्टीस पडतो, तो वर्णन करणे कठीण आहे! नदीच्या एका तीरावर सर्व देवालये एका ओळीने बांधलेली असल्यामुळे त्यांची उंच उंच शिखरे जणू गगनमंडलास भेदीत आहेत. एकीकडे हिरवीगार शेते आपल्या हरितप्रभेने पृथ्वीस शालू नेसविल्याचे भासवीत आहेत; शरयूच्या पश्चिम तीरावरील देवालयांतून गंभीर घंटारव ऐकू येत आहेत; निरनिराळ्या कुंडांवर व घाटांवर तद्देशीय ब्राह्मण व गोसावी संध्यावंदनात निमग्न झालेले दिसत आहेत; कोठे जटाजूट धारण केलेले साधुजन श्रीरामभक्त तुलसीदास यांची प्रासादिक पद्ये म्हणत आहेत; असा तो रमणीय देखावा कोणाचे हृदय संतुष्ट करणार नाही!

रामचंद्रांच्या लीलेसंबंधाने एतद्देशीय लोक हजारो स्थळे दाखवितात व प्रत्येक ठिकाणी ‘महाराज, दर्शन करो’ म्हणून विनंती करतात; परंतु तेथे पूर्वीच्या रामलीला झाल्या असतील की नाही याबद्दल सूज्ञ यात्रिकांस निराळा विचार करण्याचे कारणच नाही. खरी अयोध्या जी आहे तिचे उत्तररामचरित्रात म्हटल्याप्रमाणे-

पुरा यत्र स्रोत:पुलिनमधुना तत्र सरिताम्
विपर्यासं यातो घनविरलभाव: क्षितिरुहाम्।
बहोर्दृष्टं कालादपरमिव मन्ये वनमिदम्
निवेश: शैलानां तदिदमिति बुद्धिं दृढयति।।

इतके रूपांतर होऊन गेले आहे. तेव्हा तीत घडलेल्या सर्व रामलीला दाखविण्यास कोण समर्थ आहे? तथापि महाकवी वाल्मीकी यांनी आपल्या सुरस वाणीने जे रामचरित्र वर्णिले आहे, ते प्रत्येक हिंदू हृदयात पूर्णपणे प्रतिबिंबित झाल्यामुळे कल्पनादृष्टीस ते येथे घडले असेल असे भासून चित्तास आनंद वाटतो. यावरून कवी वाल्मीकी यांच्या कृतीची थोरवी अगाध आहे, असे वाटून त्यांच्या चरणी प्रत्येकाने लीन व्हावे अशी इच्छा होते.

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरूढकविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्।।१।।
(तळेगाव येथील रामनाथ पंडित भारतीय रंगभूमी संशोधन केंद्राच्या संग्रहातून साभार.)

यवनांच्या कारकीर्दीमध्ये ही सुप्रसिद्ध नगरी अनेक वेळा उद्ध्वस्त झाली होती. विक्रमादित्य राजाने बांधलेली अयोध्या ही प्रस्तुतच्या अयोध्येपासून एक-दोन मैल लांब होती, असे म्हणतात. फैजाबादेजवळ जुन्या इमारतीचे जे सामान जमिनीमध्ये दृष्टीस पडते ते पूर्वीच्या अयोध्येचे दर्शक होय, असे प्राक्कालीन वस्तुशोधकांचे मत आहे. विक्रमादित्य राजाने जी नगरी वसविली तीमध्ये ३६० देवालये बांधली होती. पण ती देवालये यवनांच्या कारकीर्दीत जमीनदोस्त होऊन त्यांच्याच सामानाने पुढे औरंगजेबाने मशिदी बांधल्या, असे इतिहासावरून दिसून येते.

विश्वास पाटील , सौजन्य – लोकप्रभा

विदर्भातील एक ज्येष्ठ संशोधक, लेखक डॉ. शरद कोलारकर यांच्या ‘काही महनीय व्यक्तींचे अखेरचे दिवस’ या आगामी ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने कादंबरीकार विश्वास पाटील यांनी घेतलेला महापुरुषांच्या आणि खलपुरुषांच्या अखेरच्या दिवसांचा घेतलेला अभ्यासपूर्ण, रोचक आणि दिशादर्शक धांडोळा!

——————————————————————

‘‘तो जन्माला आला तेव्हा नागडाच होता. आपल्या कफनासाठी एक वाव कपडा मिळावा या एका लालसेपायी पुढे जीवनभर तो खस्ता खात बसला!’’ मनुष्यदेहाचे असे अल्पाक्षरी, वास्तव वर्णन एका ऊर्दू शायराने केले आहे.

जेव्हा मनुष्य आपल्या कुमार अवस्थेत हुंदडत असतो, तेव्हा तो एका अज्ञानाच्या गाभुळत्या, उबदार धुंदीमध्ये वावरत असतो. अजून माझे खूप आयुष्य पडले आहे, जगायचे खूप बाकी आहे, असे म्हणता म्हणता सटकन बालपण संपून जाते. पुढे येतो तो तारुण्याचा कैफ. मी तरुण आहे, मी तरुण आहे असा रोमांरोमात चाललेला कंठरव काही र्वष कसाबसा टिकतो अन् एक दिवस तारुण्यही हरणाच्या पाडसासारखी चपळ उडी घेऊन, गुंगारा देऊन केव्हा पळून जाते हेसुद्धा समजत नाही. पंचावन्न-साठीच्या उंबरठय़ावर आपला अखेरचा अध्याय चालू झाल्याची जाणीव फार थोडय़ांना होते. त्यापुढे काही वर्षांनी शरीररूपी पानाचा देठ अधिक पिकला की, भलीभली माणसे- मग ते महापुरुष असोत वा खलपुरुष सारे कासावीस होऊ लागतात.

साफल्यपूर्ण जीवनाची पुरचुंडी गाठीला बांधून हरी हरी करण्याच्या तयारीत फार थोडे जण असतात. बाकीचे बहुतांशी गोंधळलेले. आतून हादरून गेलेले असतात. अजून माझी जगायची खूप तृष्णा होती. हे करायचे होते, ते करायचे बाकी राहिले, अशा विचाराने त्यांचे मस्तक पेटते. जर तुम्ही फाजील धनसंचय केला असेल तर त्या खजिन्याला विळखा घालायच्या इच्छेने अनेक विषस्पर्श जिभल्या चाटीत तुमच्या अवतीभोवती वळवळत रहातात. बनेल नातलगांचे तांडे हाकलून दूर लोटले तरी हक्क सांगत पाय रोवून उभे रहातात. तो कर्तृत्वान पुरुष एका नारीऐवजी अनेक जणींच्या बाहुपाशात गुंतून गेला असेल तर त्या हिसाबकिताबाची आणि संतापाची परी काही वेगळीच असते. महापुरुष असोत वा खलपुरुष त्यांचा एकदा मृत्यूच्या अटळ दरवाज्याकडे प्रवास सुरू झाला की, तो प्रवास अभ्यासकांसाठी चिंतनाचा, जनतेसाठी विस्मयाचा अन् कादंबरीकार व नाटककारांच्या लेखण्यांसाठी एक सुगीची पर्वणी ठरतो.

विदर्भातील एक ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक आणि विद्वान ललित लेखक श्री. शरद कोलारकर यांचे ‘काही महनीय व्यक्तींचे अखेरचे दिवस’ हे पुस्तक जेव्हा माझ्याकडे प्रस्तावनेसाठी आले तेव्हा मला मोठी अपूर्वाई वाटली. या ग्रंथात एकीकडे महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, चर्चिल, नेपोलियन, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, लेनिन, जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर अशा महापुरुषांच्या मांदियाळीत पोचलेल्या श्रेष्ठ व्यक्ती आहेत. तशाच इंदिरा गांधी, जॉन एफ. केनेडी, झुल्फीकार अलि भुट्टो, माओ, स्टॅलिन असे राजकारणाच्या वादळावर आरूढ झालेले तेजस्वी तारे आहेत. असेच हिटलर, मुसोलिनी, औरंगजेब, बॅ. जीना यांच्यासारखे रंगतदार नाटय़मय जीवन लाभलेले खलपुरुषही आहेत. या अत्यंत वाचनीय, ललितरम्य लेखांचे परिशीलन करताना इतिहासातल्या आणि साहित्यातल्या अनेक ज्येष्ठांचे अखेरचे दिवस, त्यांच्या कथा, दंतकथा माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेल्याशिवाय राहिल्या नाहीत. मृत्यू छोटय़ा वा मोठय़ाचा असो, त्याच्या सावल्या, त्याची चाहूल वा हूल या गोष्टी तशा भीतीदायकच. त्याचे वर्णन कमी-अधिक शब्दांत करता येईल. या निमित्ताने बालपणी वसंत सबनीस आणि दादा कोंडके मंडळींनी सादर केलेली ‘विच्छा माझी पुरी करा’ची बतावणी आठवते. हवालदार झालेले दादा शाहिरांना म्हणजे सबनीसांना विचारतात, ‘‘राजा मरण पावला की त्याचे वर्णन कसे कराल?’’

‘‘राजासाहेबांचे महानिर्वाण.’’

‘‘अन् प्रधान मेला तर?’’ शाहीर उत्तर देतो- ‘‘प्रधान साहेबांचे दु:खद निधन!’’

‘‘अन् माझ्यासारखा एखादा हवालदार गचकला तर?’’- ‘‘चला मातीला चलाऽ!’’ एकूणच राजा असो वा रंक, श्रेष्ठ वा कनिष्ठ मृत्यू हा एक ना एक दिवस प्रत्येकाच्या दरवाजावर न चुकता खडा राहणारा पाहुणा असतो.

पानिपताच्या ऐन घमासान महायुद्धात अहमदशहा अब्दाली गोविंदपंत बुंदेल्यांची मुंडी कापून ती भाऊसाहेबांकडे संदुकीमध्ये घालून पाठवून देतो. गोविंदपंत पेशव्यांचे उत्तरेतील कारभारी. पातशहा मुंडीसोबत पेशव्यांना चिठ्ठी पाठवतो, ‘‘तुमच्या स्वागताची तयारी करावी यासाठी तुमच्या आधी तुमच्या कारभाऱ्याला तिकडे स्वर्गात पाठविले आहे.’’ तेव्हा पेशवे त्याला जाबसाल पाठवून देतात, ‘‘तो रस्ता कुणाला चुकला आहे? आम्ही मृत्यूचा मुका घ्यायला सिद्ध आहोत!’’

महापुरुषांच्या वर्तनाने देश घडतात आणि काही वेळा त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे बिघडतातसुद्धा. त्यांच्या वास्तव्याने, कर्तृत्वाने देशाची, मानवी समाजाची उंची वाढते. खलपुरुषांच्या कारवायांमुळे काही राष्ट्रांची घडी विस्कटली आहे. दुसऱ्या महायुद्धात लक्षावधी ज्यूंची कत्तल हिटलरने केली. नेपोलियनने आपल्या तलवारीने अध्र्या जगाचा नकाशा बदलला. बॅ.मोहमद अलि जीनांच्या अंध महत्त्वाकांक्षेमुळे हिंदुस्तानसारख्या खंडप्राय देशाचे तुकडे झाले.

बॅ. जीना यांना कॅन्सर झाल्याची वार्ता आधीच ठाऊक असती तर देशाची फाळणी टळली असती , असे काही भाबडय़ा मंडळींना वाटते.

त्यामुळेच समाजउद्धारक आणि देशतारक महापुरुषांच्या चरित्राबद्दल समाजमनाला आकर्षण असते. भविष्यातील चुका टाळण्यासाठी खलपुरुषांचे, क्रूरकम्र्याचे चारित्र्यही तपासून पहावे लागते.

बऱ्याचदा मनुष्य मेल्याशिवाय त्याची किंमत लोकांना कळत नाही. अन् जेव्हा ती कळते तेव्हा दुर्दैवाने वेळ निघून गेलेली असते. जॉन एफ. केनेडी आपल्या तारुण्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फक्त ०.२ टक्के मताधिक्याने, केवळ दैव बलवत्तर म्हणून निवडून आले होते. त्यांनी निक्सनचा पराभव केला होता. त्यांना लाभलेली शेलाटी शरीरयष्टी, त्यांचे मृदू हास्य आणि संभाषणातील चातुर्य या बळावर पाहता पाहता ते लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचले; परंतु अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या आपल्या कर्तृत्ववान पतीची किंमत त्यांची पत्नी जॅकलिन केनेडी हिला फारशी कधी समजली नाही. तिला म्हणे अध्यक्षांच्या राजप्रासादाची, ‘व्हाइट हाऊस’ची अ‍ॅलर्जी आली होती. त्यामुळेच नवऱ्याच्या विरोधाची तमा न बाळगता ती ओनॅसिस नावाच्या कोटय़धीशाच्या ख्रिस्तिना नावाच्या महागडय़ा ग्रीक जहाजावर मौजमजा करायला बाहेर पडायची. २२ नोव्हेंबर १९६३ या दिवशी डलास येथे केनेडी जनतेला अभिवादन करत उघडय़ा मोटारीतून पुढे चालले होते. तेव्हा गर्दीतून दोन गोळ्या आल्या आणि जॉन केनेडी रक्तबंबाळ झाले. तेव्हा ‘ओऽऽनो; करीत जॅकलिनने त्यांना कळवळून मिठी मारली होती. दुर्दैवाने त्या गोळीबारातच तरुण केनेडींचा मृत्यू ओढवला.

महापुरुषांच्या अखेरच्या पर्वात त्याच्या सोबत राहणारे, त्याच्या सहवासाचा सुगंध लाभलेले कोणी कुशल लेखणीबहाद्दर सोबत असतील तर त्यासारखी बहार नाही. टी. जी. तेंडुलकरांसारखा सव्यसाची अभ्यासक जीवनभर गांधीजींच्या सावलीची सोबत करत होता. त्यामुळेच त्यांनी लिहिलेले नऊखंडी चरित्र आणि टिपलेली असंख्य छायाचित्रे हा आज आपल्या राष्ट्राचा ठेवा बनला आहे. वंगबंधू चित्तरंजन दास यांच्या अखेरच्या दिवसांचे करुण चित्र साक्षीदार या नात्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मोठय़ा तन्मयतेने आपल्या आत्मचरित्रात रेखाटलेले आहे.

बऱ्याचदा मृत्युपंथाच्या कुशीवरसुद्धा महापुरुष आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवल्याशिवाय राहात नाहीत. मुंबईच्या सरदारगृहामध्ये जेव्हा लोकमान्य टिळक आपला अखेरचा अध्याय व्यतीत करत होते तेव्हा आपल्या थोर पित्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या सर्व मुली त्यांच्याभोवती गोळा झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्याकडे पाहात लोकमान्य विनोदाने बोलले, ‘‘पुन्हा सगळ्या जमलात का तुम्ही? नाही तरी उठल्यासुटल्या माहेरी यायची सवयच जडली आहे तुम्हाला.’’

महापुरुषांच्या महानिर्वाणावेळी अनेक श्रद्धा-अंधश्रद्धांनाही ऊत आल्याशिवाय राहात नाही. लोकमान्यांना जेव्हा अखेरची घरघर लागली तेव्हा ब्रह्मवृंदाना त्यांचा शेवट शुष्क पलंगावर होऊ नये असे वाटले म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी जमिनीवर दर्भाचे उच्चासन उभारले होते.

लोकमान्य टिळकांच्या प्रेतयात्रेला सुमारे दोन लाखांहून अधिक लोक गोळा झाले होते. पावसाची पर्वा न करता ती प्रचंड महायात्रा चालली होती. एका महनीय व्यक्तीने पुढे होऊन लोकमान्यांच्या ताटीला खांदा दिला. तेव्हा टिळकांच्या शिष्याने त्यांना हटकले, ‘‘तुम्ही ब्राह्मण नसल्यामुळे तुम्हाला खांदा देण्याचा अधिकार पोचत नाही.’’ ती महनीय व्यक्ती म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. गांधीजींनी तिथल्या तिथे उत्तर दिले होते, ‘‘मी लोकसेवक आहे. लोकसेवकाला जात नसते.’’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांचा खून झाला होता.

न. चिं. केळकरांसारख्या ज्येष्ठ पत्रकार, देशसेवकांनी वृत्तांत लिहिल्यामुळे लोकमान्यांच्या अखेरच्या दिवसांचे चांगले चित्रण झाले आहे. मात्र जेव्हा रायगडावर शिवरायांचे महानिर्वाण झाले तेव्हाचे प्रथमदर्शी पुरावे नाहीत. बखरकारांनी रेखाटलेल्या बखरी या खूप वर्षांच्या अंतरांनी लिहिलेल्या असल्यामुळे त्या ऐकीव गप्पांवर आधारीत आणि बऱ्याचशा पूर्वग्रहदूषित अशाच आहेत. याउलट डॉ. सुशीला नायरांसारख्या व्यक्तीमुळे महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या अखेरच्या कालखंडावर चांगला प्रकाश पडतो.
गांधीजींच्या सोबत बासष्ट वर्षे संसार करणाऱ्या कस्तुरबांचाही अंतकाळ खूप करुण आहे. त्यांचे दु:खद निधन पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये कारावासात झाले तेव्हा दुष्ट ब्रिटिश सरकारने त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी जास्तीत जास्त शंभर लोकांना हजर राहायची परवानगी दिली होती. कस्तुरबांच्या कृश देहाला बापूजींनीच स्नान करविले. स्वत: चरख्यावर कातलेली लाल काठाची साडी त्यांनी त्यांना नेसवल्याचे सुशीला नायर यांनी आपल्या डायरीत लिहिले आहे.

लोकमान्यांच्या ताटीला खांदा देण्यासाठी महात्मा गांधींना ते ब्राह्मण नसल्यामुळे परवानगी नाकारण्यात आली होती.

एखाद्या कोणा हरीलालला गांधीजींनी बाप या नात्याने न्याय दिला नाही, असा गळा काढणारे आजकाल अनेकजण भेटतात. मात्र त्यांनी हे विसरू नये की, न्यायमूर्ती खोसलांच्या अहवालानुसार भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान झालेल्या भीषण दंगलीमध्ये सुमारे पाच लाख निरपराध जिवांना आपले प्राण गमवावे लागले होते. हिरोशिमा आणि नागासाकीमध्येसुद्धा मिळून दोन लक्ष लोक मृत्यू पावले होते. १५ ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील सोहळ्याला नवी कोरी वस्त्रेप्रावरणे परिधान करून अनेकजण हजर होते. त्या खाशा समारंभात अनेकांची काव्यमय भाषणेही झाली; परंतु त्या क्षणी मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस त्या उत्सवी समारंभाच्या आजूबाजूलाही फिरकला नाही. त्याच दरम्यान बंगालच्या नौखालीसारख्या भागात हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली माजल्या होत्या तेव्हा गांधीजी स्वत:चा जीव धोक्यात घालून आगीच्या वणव्यातून फिरत होते. जर गांधीजींनी जागोजाग दंगलग्रस्त भागांना भेटी देऊन लोकांची मने वळवली नसती तर किमान पंचवीस लाख निरपराध जिवांना आपल्या प्राणाला मुकावे लागले असते.

काळच जणू थोरांच्या मृत्युपर्वाचे अनेकदा संकेत देत असतो. गांधीजींच्या जीवनातील २९ आणि ३० जानेवारी हे दोन दिवस खूप महत्त्वाचे ठरतात. दिल्लीच्या तीन मूर्तीच्या लायब्ररीमधील पत्रव्यवहार, रोजनिशा, ध्वनिमुद्रित संभाषणांचा धांडोळा घेतला की अनेक गोष्टी बाहेर येतात. २९ जानेवारीच्या दुपारी ‘बिर्ला हाऊस’च्या हिरवळीवर गांधीजी उघडय़ाबंब अंगाने एका साध्या पंचानिशी उन्हाचा लाभ घेत होते. त्यांच्या डोक्यावर आसामी वळणाची टोपी होती. तेव्हा बापूंच्या भेटीसाठी इंदिरा गांधी, त्यांच्या कडेवर असलेला चार वर्षांचा राजीव आणि नेहरूंची भाची व प्रसिद्ध लेखिका नयनतारा सेहगल तेथे पोचल्या. चाचा नेहरूंची कन्या आली या कौतुकापोटी तेथे काम करणाऱ्या माळ्याने ओंजळभर मोगऱ्याची टपोरी फुले इंदिराजींना भेट दिली. गांधीजी आणि इंदिरा गांधीमध्ये संभाषण चालू असतानाच लहानग्या राजीवने मोगऱ्याचे एक एक फूल बापूजींच्या पायाच्या लांब बोटांमध्ये खोवून टाकले. थोडय़ा उशिराच गांधीजींच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी राजीवला जवळ घेऊन चपापल्या सुरात सांगितले, ‘‘बेटा पायाच्या बोटात अशा तऱ्हेने फुले फक्त मृत व्यक्तीसाठी खोवायची असतात, जिवंत मनुष्यासाठी नव्हे!’’ अन् दुर्दैवाने अवघ्या पंचवीस-तीस तासांमध्येच त्याच ठिकाणी गांधीजींची दुर्दैवी हत्या घडून यावी या गोष्टीला काय म्हणावे!

३० जानेवारी १९४८ च्या दिवसाचे कोलारकर उत्तम वर्णन करतात. पहाटे पावणेचार वाजताच गांधीजींनी प्रार्थना आटोपली. त्यांना त्या दिवशी खोकल्याचा खूप त्रास होत होता. त्यामुळे मनू लवंगीची पूड तयार करत म्हणाली, ‘‘बापू, संध्याकाळच्या प्रार्थनेपूर्वी देईन मी तुम्हाला.’’ त्यावर बापूजी नकळत उद्गारले, ‘‘संध्याकाळच्या प्रार्थनेपर्यंत मी जिवंत राहीन किंवा नाही हेच मला सांगता येणार नाही.’’ मृत्यूच्या उंबरठय़ावर पोचल्यावरसुद्धा महापुरुष हे विद्यार्थीच राहतात. नित्य काहीं ना काही शिकतात, हे गांधीजींनी त्या अखेरच्या दिवशीही सिद्ध करून दाखवले. त्या पहाटे ते बंगाली भाषा शिकण्यासाठी आपले नित्याचे पाठ काही वेळ गिरवत राहिले होते. एकीकडे मोठमोठय़ा जबाबदारीचे आणि दुसरीकडे एका दुभंगलेल्या खंडप्राय देशाचे ओझे गांधीजींच्या पाठीवर होते. त्यामुळेच ते अनेकांच्या पापाचे आणि शापाचेही धनी बनले होते. आदल्या दिवशी त्यांना शिखांचे नेते मास्तर तारासिंग यांनी राजकारण सोडून हिमालयात निघून जाण्याचा सल्ला दिला होता. एवढेच नव्हे तर एका निर्वासितानेही आदल्या दिवशी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

मृत्यूनंतर कस्तुरबांच्या कृश देहाला बापूजींनीच साडी नेसवली..

गुप्तचर खात्याने गांधीजींवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अहवाल आधी काही महिने दिला होता. त्यामुळे ‘बिर्ला हाऊस’च्या परिसरात साध्या वेषातील पोलीस ठेवण्यास गांधीजींनी मोठय़ा मुश्किलीने परवानगी दिली होती. मात्र प्रार्थना सभेसाठी आपल्याकडे येणाऱ्या लोकांची झडती घेण्यास त्यांनी पोलिसांना मज्जाव केला होता. त्यामुळेच नथुराम गोडसे नावाचा माथेफिरू इसम पिस्तूल घेऊन सहजगत्या तेथे पोहोचू शकला. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये लपलेल्या अतिरेक्यांवर इंदिरा गांधींनी कठोर कारवाई केली. त्यानंतर पंतप्रधान श्रीमती गांधी यांनी आपल्या रक्षणासाठी नेमलेल्या फौजफाटय़ामध्ये शीख पोलीस व अधिकारी यांना टाळावे असाही गुप्त अहवाल गुप्तचरांनी सादर केला होता. तो श्रीमती गांधींनी जुमानला नाही. महात्मा गांधी असोत, वा इंदिरा गांधी असोत दोघांनीही आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे स्वत:हूनच मृत्यूला निमंत्रण दिले होते. नव्हे, स्वत:च्या प्राणाची, सुरक्षेची पर्वा न करता सर्वच जातीधर्मावर अन् मनुष्याच्या मांगल्यावर दोघांनीही अवाजवी श्रद्धा ठेवली होती.

जेव्हा कर्तृत्ववान पुरुषांचा वा ज्येष्ठांचा अंतकाळ जवळ येतो तेव्हा फायद्या-तोटय़ाची गणिते गृहीत धरूनच अनेक गोष्टी लपवल्या जातात. कैकांच्या दुर्धर आजाराची बिंगे चोरून ठेवली जातात. एवढेच नव्हे तर मृत्यूनंतरही मेल्या मुडद्याशी हे दुष्ट व्यवहारी जग खेळ खेळायला मागे-पुढे पाहात नाही. कागदोपत्री सह्या-अंगठे उठवण्यासाठी कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा पुरवठाही केला जातो (व्हेंटिलेटर).

श्रेष्ठ पुरुषांच्या महत्त्वाकांक्षेचा चावा हा काळसर्पापेक्षाही जहरी असतो. दादाभाई नवरोजी यांचे खासगी सचिव म्हणून काम केलेल्या आणि उभ्या देशाने अनेक वर्षे ‘हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दूत’ या बिरुदावलीने गौरव केलेल्या बॅ. जीना यांना महत्त्वाकाक्षेची इंगळी चावली. त्यामुळेच केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी हिंदूंचे वर्चस्व असलेल्या हिंदुस्थानात आणि गांधीजींचे श्रेष्ठत्व असलेल्या काँग्रेसमध्ये न राहण्याचे त्यांनी ठरविले. महत्त्वाकांक्षेच्या लालसेपायीच त्यांनी हिंदुस्तानसारखा देश तोडून इतिहासाचा प्रवाह बदलला आणि ते स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांचा क्षयाचा रोग जुना होता. मात्र त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे तेरा महिने आधी त्यांच्या निकटतम मंडळींच्या निदर्शनास आले होते. या कॅन्सरची गुप्त वार्ता आधीच ठाऊक असती तर कदाचित देशाची फाळणी टळली असती, असे काही भाबडय़ा मंडळींना वाटते. मात्र बॅ. जीना आणि त्यांच्या धर्माध पाठीराख्यांनी केलेली द्वेषाची पेरणी इतकी जहरी आणि पराकोटीची होती की, एखाद्या दरडीवरून खाली कोसळणारी बलाढय़ शिळा जशी थांबत नाही तशी देशाची फाळणी अटळ होती हेच खरे.

आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी पंतप्रधान बनले. त्यांना सतरा वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द लाभली. अलिप्त राष्ट्रसंघटनेची स्थापना करून ते शांतिदूत ठरले. ते एक सच्चे, सालस, सुहृदयी आणि विद्वान अभ्यासू नेते होते. ‘लोकशाही दिन’ नावाचे फॅड खूप नंतर आले. मात्र चाचा नेहरू रोज सकाळी आठ ते नऊ या वेळात स्वत: जनतेच्या तक्रारी ऐकत. देशाच्या कानाकोपऱ्यातला कोणीही मनुष्य त्यांना भेटू शकत असे. आपणास आलेल्या प्रत्येक पत्राचे उत्तर गेलेच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे अनेकदा पत्रांवर सह्या करता करता ते आपल्या बिछान्यावरपायजम्यात बसून पहाटेपर्यंत जागत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसुद्धा आलेल्या सर्व पत्रांना न चुकता उत्तरे देत असत.

नेहरू घराणे आणि भुवनेश्वर यांचे काय विचित्र नाते आहे?

१९६० साली पंडितजी भुवनेश्वरच्या दौऱ्यावर असताना त्यांना पॅरेलिसीसचा अटॅक आला. त्यामुळे त्यांना विमानाने दिल्लीत आणण्यात आले. ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी त्या नेमक्या भुवनेश्वरच्याच दौऱ्यावर होत्या. त्यामुळे नेहरू घराण्याचे भुवनेश्वरशी काय विचित्र नाते आहे याचा बोध होत नाही. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी चीन या शेजारी राष्ट्रावर खूप प्रेम केले. एक सच्चा सांस्कृतिक शेजारी समजून चीनला युनोमध्ये स्थान मिळावे म्हणून स्वत:चे वजन खर्चिले. मात्र त्याच चीनने १९६४ मध्ये भारतावर आक्रमण केल्याने त्यांना अतीव दु:ख झाले. नेहरूंच्या जाण्यामुळे, नेहरूयुगाच्या अस्तामुळे अनेकांना धक्का बसला. पंडितजींच्या निधनानंतर तो धक्का सहन न झाल्याने काही तासांतच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मेहबूबखानसुद्धा पैगंबरवासी झाले.

महापुरुषांचे आयुष्यही अनेक श्रद्धा, अंधश्रद्धा आणि अतक्र्य घटनांनी भरलेले असते. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अंतकाळाबद्दल भरभरून लिहिताना डॉ. कोलारकर यांनी पुपुल जयकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे. सुमारे सोळा वर्षांपूर्वी चंद्रशेखर प्रभू यांच्यासमवेत मी पुपुल जयकर यांच्या मलबार हिलवरील बंगल्यामध्ये अनेकदा गेलेलो आहे. त्या वेळी इंदिराजींच्या अंतिम पर्वाबद्दल त्यांच्या तोंडून खूप गोष्टी ऐकायचा योगही जुळून आला होता. खरे तर २३ जून १९८० या दिवशी संजय गांधी यांच्याबरोबर माधवराव शिंदेही विमान उड्डाण करण्यासाठी सफदरजंग विमानतळावर हजर होते. संजय त्यांना आपल्या सोबत नेणार होते; परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी अन्य सहकाऱ्याला सोबत घेतले अन् पुढे काही वर्षांनी माधवरावांचाही मृत्यू हवाई अपघातातच व्हावा या गोष्टीला काय म्हणावे!

संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर इंदिरा गांधी मनाने खूप हळव्या झाल्या होत्या. मानसिकदृष्टय़ा खचल्या होत्या. जयकरांच्या भाषेत अंधश्रद्धेच्या पूर्ण आहारी गेल्या होत्या. संजय यांच्या निधनापूर्वी काही भविष्यकारांनी इंदिराजींना पत्रे पाठवली होती. त्यामध्ये संजय यांच्या निधनाची अचूक तारीख दर्शवली होती. अशा पत्रांकडे आपण दुर्लक्ष केल्याचा श्रीमती गांधी शोक व्यक्त करत. त्यांच्याकडून पुढे झाशीजवळच्या एका काली मंदिरात लक्षचंडीचा पाठ अनेक वर्षे अखंडपणे चालू होता असे म्हणतात. राजकारण आणि राजव्यवहार अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धांनी भरून गेलेला असतो. महाराष्ट्रात काही गावच्या कार्यक्रमाला सहसा अधिकारपदावरील व्यक्ती जात नाहीत. महाराष्ट्रातील अनेक गावांतून असे अनेक आबा आणि अण्णा आहेत ज्यांच्याकडून आपल्या आवडत्या मंत्र्याच्या गळ्यात हार पडला की, काही महिन्यांतच तो अधिकारपदावरूनजातो अशा समजुती असतात. त्यामुळे त्यांच्याकडून हार पडू नये याची काळजी अनुयायी घेतात.

संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर इंदिरा गांधी अंधश्रद्धेच्या पूर्ण आहारी गेल्या.

चीनकडून भारताच्या झालेल्या पराभवाचे शल्य जसे नेहरूंना होते तसेच भारतीय लष्कराच्या चीनकडून जागोजाग झालेल्या पराभवाचे मोठे दु:ख स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही झाले होते. त्यामुळे ते असहाय अवस्थेत रडल्याची नोंदही कोलारकर करतात. १९५७ मध्ये १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला १०० र्वष पार पडली होती. त्या निमित्ताने भारतीय कार्यकर्त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक मोठा सोहळा आयोजित केला गेला होता. त्या ठिकाणी बॅ. सावरकर यांच्यासमवेत व्यासपीठावर येऊन बसायला नेहरूंनी नकार दिला. मात्र दिव्य दृष्टीच्या आणि कवी हृदयाच्या तात्यासाहेब सावरकरांनी एक अपूर्व नियोजन केले. त्यांनी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे एक भव्य तैलचित्र ठेवून दिले. विज्ञानशील दृष्टी असलेल्या सावरकरांनी आपल्या धर्मपत्नीच्या मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी केले नाहीत वा श्राद्धही घातले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यउद्धारासाठी जीवनभर दिलेला लढा, माईसाहेबांचे त्यांच्या जीवनातले आगमन, नागपूरचा तो ऐतिहासिक दीक्षा समारंभ, शेवटच्या १०-१२ वर्षांतला त्यांचा तो आजार, त्या करुण परंतु क्रियाशील दिवसांचे वर्णनही कोलारकरांनी अनेक तपशिलांसह केले आहे.

करालकाळाचे नाटय़ अनेकदा विस्मयजनक असेच असते. मनुष्याचा अटळ मृत्यू अनेकदा आपल्या अशुभ पावलांचे पूर्वसंकेत त्याच्या स्वप्नावस्थेत येऊन देऊन जात असतो. या निमित्ताने मला शेक्सपिअरच्या ‘ज्युलिअस सीझर’ या नाटय़कृतीची आठवण होते. ज्या दिवशी रोमच्या भर दरबारात त्याच्या सहकाऱ्यांकडून त्याची निर्घृण हत्या झाली होती, त्याच्या आदल्या रात्री सीझरच्या पत्नीच्या स्वप्नात त्याचा तांबडय़ा रक्ताने माखून गेलेला पुतळा येतो. त्यामुळे त्याने त्या दिवशी दरबारात जाऊ नये, असा हट्ट ती धरते. गुलामगिरीच्या पद्धतीविरुद्ध कठोर पावले उचलणारा आणि अमेरिकेच्या विविध राज्यांचे एकत्रीकरण घडवून आणणारा, महान वक्ता आणि अमेरिकेचा अध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या बाबतीत असेच काहीसे घडले होते. इथे नाटकातल्या सीझरच्या पत्नीसारखे अन्य कोणाला स्वप्न पडले नव्हते, तर खुद्द अध्यक्ष लिंकननेच काही दिवस आधी ते भीषण स्वप्न पाहिले होते. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये पसरलेली ती स्मशानवत शांतता. प्रत्येक कानाकोपऱ्यातून दाटून येणारा हुंदक्यांचा ध्वनी. स्वत: स्वप्नावस्थेत चाललेला लिंकन. तो तिथे उभ्या असलेल्या रक्षकाला विचारतो, ‘‘मुडदा कोणाचा?’’ रक्षक सांगतो, ‘‘अध्यक्षांचा.’’ पुढे अनेक दिवस त्या स्वप्नाने लिंकनला अस्वस्थ आणि चिंतातुर करून सोडले होते अन् दुर्दैवाने १४ एप्रिल १८६५ या दिवशी एका नाटय़गृहात कुटुंबीयांसमवेत नाटक पाहत बसलेल्या लिंकनची दुर्दैवी हत्या घडून आली. त्या कटामध्ये एका प्रसिद्ध नटाचा प्रत्यक्ष हात होता. ‘महानायक’ कादंबरीच्या लेखनावेळी मला एक संदर्भ मिळाला. १९३२ च्या दरम्यान मुंबईमध्ये स्वर्गीय नाथालाल पारेख यांच्या घरी सुभाषचंद्र बोस मुक्कामाला होते. तेव्हा त्यांना उंच आभाळात झेपावलेले एक विमान, नक्षत्रांच्या मंडपाला लागलेली भीषण आग अन् आगीच्या कल्लोळात सापडलेले आपण असे एक विचित्र स्वप्न पडले होते. जणू लिंकन आणि नेताजींसारख्या महापुरुषांना काळाने त्यांच्यावर झडप घालण्यापूर्वीच त्याच्या रंगीत तालमी आधी करून दाखवल्या होत्या.

कधी कधी एखाद्या मनुष्याच्या हातून क्षुल्लकशी चूक घडते आणि अंती ती त्याला मृत्यूच्या खिंडीकडे ओढून न्यायला कारणीभूत ठरते. भारताशी एक हजार र्वष युद्ध करण्याची वल्गना करणारे अन् भारतद्वेषाच्या व अमोघ वक्तृत्वाच्या बळावर पाकिस्तानच्या अध्यक्षपदी पोहोचलेले झुल्फिकार अलि भुट्टो.

पाकिस्तानी जनतेने आयुबखानला बाजूला करून भुट्टोला अध्यक्ष बनवले. त्याच भुट्टोंनी लेफ्टनंट झिया-उल्-हक नावाच्या एका ठेंगू, प्रभावहीन व सामान्य वकूबाच्या मनुष्याला पाकिस्तानचे सेनापती बनवले. झिया-उल्-हक हा भुट्टोचा केवळ प्रशंसक, केवळ मुंडी हलवणारा होयबा. एकूणच सोयीचा निरुपद्रवी लष्करी अधिकारी म्हणूनच त्याला भुट्टोने जवळ केले होते. मात्र भुट्टो कधी कधी त्याची ‘माकड’ म्हणून टर उडवायचे. पाहुण्यांसोबत खाना घेताना ‘अरे, माझा माकड सेनापती कुठे आहे? बोलवा रे त्याला’ असे अपमानकारक उद्गार काढायचे. पुढे अशा व्यकिगत अपमानामुळे झियासारखा एक सामान्य माणूस आतून पेटून उठला अन् त्याने आपल्या निर्माणकर्त्यां भुट्टोलाच कैदेत टाकले. त्याच्यावर सगळे गुन्हे दाखल करून जगापुढे न्यायव्यवस्थेचा देखावा मांडून ४ एप्रिल १९७९ ला त्याने झुल्फिकार अलि भुट्टोसारख्या बुद्धिमान आणि ताकदवान नेत्याला फासावर लटकवले.

हुकूमशहा आणि खलपुरुषांच्या बाबतीत तर मृत्यूचा चेहरा अधिक करपलेला असतो. मोठा मनुष्यसंहार घडवून आणणाऱ्या हिटलरचा मृत्यू एप्रिल १९४५ मध्ये एका बंकरमध्ये झाला. हिटलरची प्रेयसी इव्हा ब्राऊन हिची हिटलरची पत्नी म्हणून मरायची इच्छा होती. त्यामुळे त्या दोघांनी मृत्यूच्या दारातच आपले मंगल पार पाडले. हुकूमशहांच्या व सैतानाच्या काळजाच्या कोपऱ्यातसुद्धा हिरव्या जागा असतात हेच खरे. या निमित्ताने मला औरंगजेबाची आठवण होते. तो अगदी सतरा-अठरा वर्षांचा होता तेव्हा बुऱ्हाणपूर येथे एका सुंदर तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. दुर्दैवाने कसल्याशा आजाराने तिचे खूप लवकर निधन झाले. या दु:खद प्रसंगामुळे तर त्याच्या निर्दयीपणामध्ये वाढ झाली नसावी ना?

अखेरच्या काही वर्षांत आजारी असूनही डॉ. आंबेडकर क्रियाशील होते.

औरंगजेब खुल्ताबादजवळ वयाच्या नव्वदाव्या वर्षी अतिशय निराश अवस्थेत मृत्यू पावला. अवघ्या पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्राचे धिरडे भाजून काढू अशा महत्त्वांकाक्षेने तो इकडे चालून आला होता. मात्र त्याच्या विरोधात सतत आठ वर्षांहून अधिक काळ संभाजीराजांनी १०४ लढाया खेळून त्याच्या नाकात दम भरला. पुढे सोळा-सतरा र्वष शिवाजीराजांच्या ताराबाई आणि येसूबाई या मर्द सुनांनी त्याच्याविरुद्ध जंग छेडले. हा औरंगजेब स्वत: पाहिलेली एखादी व्यक्ती आणि ऐकलेला शब्द कधीही विसरत नसे. त्याच्या अखेरच्या दिवसांचा लेखाजोखा मांडताना डॉ. कोलारकरांनी त्याचे मृत्युपत्रच उद्धृत केले आहे. ते मला महत्त्वाचे वाटते. स्वत: टोप्या शिवून प्राप्त झालेल्या चार रुपये दोन आण्यांमधून आपल्या कफनावरचा खर्च पार पाडावा, असे तो लिहितो. त्याच वेळी ‘सन्मार्ग सोडून इतरत्र भटकणाऱ्या माझ्यासारख्या (पापी) मनुष्याला बोडक्या डोक्याने दफन करावे’, असे तो लिहितो. कारण ‘पापी मनुष्याला बोडक्या डोक्याने अल्लासमोर नेल्यास अल्ला त्याला क्षमा करतो’ अशीही कबुली औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात दिली आहे. आपल्या सेवकांकडून काही गुन्हे घडले असल्यास त्यांना उदार अंत:करणाने क्षमा करावी असे तो लिहितो. याचाच दुसरा अर्थ असा की, जेव्हा मनुष्याला मृत्यूचा भयप्रद चेहरा दिसतो, तेव्हा औरंगजेबासारख्या सैतानांनाही चळाचळा कापरे भरते. ज्या पद्धतीने त्याने दारासारख्या आपल्या अनेक भावांना सत्तेसाठी निष्ठुरपणे मारले, त्यांच्याच करुण किंकाळ्या त्याला ऐकू येत असाव्यात. त्यामुळेच रेडय़ाने वेद बोलावा तशी दुसऱ्यांना क्षमा करण्याची तो भाषा बोलतो.

आपल्या मृत्युपत्रात राजाने नेहमी जागरूक असावे. राजाकडून झालेली एखादी क्षुल्लक चूक वा बेसावधपणा त्याने वर्षांनुवर्षे केलेल्या कार्याचा नाश घडवून आणतो, असे तो लिहितो. केवळ आपल्या निष्काळजीपणामुळे शिवाजी आपल्या कैदेतून निसटला अन् पुढे आपली उभी जिंदगी मराठय़ांशी लढण्यात हकनाक वाया गेली, अशी रुखरुखही औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात न चुकता नोंदवली आहे.

नोकरीच्या निमित्ताने मला अलीकडे एका सैतानाचा चेहरा जवळून पाहायला मिळाला. २६/११च्या वेळी अतिरेक्यांनी मुंबईवर जो दुर्दैवी हल्ला केला, त्यामध्ये सांताक्रूझजवळ एका टॅक्सीत बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने मी खटला भरावयास परवानगी दिली होती. त्या निमित्ताने साक्षीदार म्हणून काही महिन्यांपूर्वी मला स्पेशल कोर्टाचे समन्स आले. त्यामुळेच मी ऑर्थररोड तुरुंगातील कोर्टात साक्षीदार म्हणून दाखल झालो होतो. तेव्हा समोर लाकडी पिंजऱ्यात अजमल कसाब हा विशी-बाविशीतला पोरगा पाय पसरून कठडय़ाला टेकून बसला होता. त्याचा चेहरा सात्त्विक अन् चेहऱ्यावरील भाव खूप निर्मळ वाटत होते. एखाद्या चाळीच्या बाल्कनीत एखाद्याचा भाचा बारीला टेकून बसावा तसा तो बसला होता, तेव्हा सरकारी वकील उज्ज्वल निकम त्याला गमतीनं बोलले, ‘‘अरे अजमल, ये हमारे पाटीलजी बहुत अच्छे उपन्यास लिखते है. चाहे तो तेरे जीवनपरभी वे अच्छा उपन्यास लिखेंगे.’’ तेव्हा अजमल तोंड पसरून निर्मळ हसला.

विज्ञानवादी दृष्टी असलेल्या सावरकरांनी आपल्या धर्मपत्नीच्या मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी केले नाहीत वा श्राद्धही घातले नाही.

२६/११ ला करकरे, ओंबळे, शिंदे, कामटे, साळसकर अशा मुंबई पोलिसांतील बहाद्दर मोहऱ्यांचे दुर्दैवाने शिरकाण झाले. पैकी विजय साळसकर माझा जवळचा मित्र. २६/११च्या दोनच दिवसांपूर्वी माझ्याकडे दुपारी येऊन पिठलं-भाकरी खाऊन गेला होता. त्याला बांद्रय़ाच्या अमेय हॉटेलांतले पिठलं-भाकर खूप आवडायचे. त्या निमित्ताने महिन्यातून दोन-तीन वेळा तरी तो न चुकता दुपारी माझ्या अँटिचेंबरमध्ये यायचा. गप्पा रंगायच्या. अनेकदा विजय बोलायचा, ‘‘समाजासाठी, लोकांच्या भल्यासाठी अनेक गुंडांशी सामना केला. गोळीबारांच्या फैरी खेळलो. कोणी सांगावे एक दिवस गोळागोळीचा रंग खेळतानाच आयुष्याची यात्रा संपून जायची.’’ आज दु:ख याचेच वाटते. त्या दिवशी विजयकडे त्याची लाडकी एके-४७ असती तर मरणापूर्वी हा मर्दमराठा पाचपन्नासांच्या मुडद्यांचा सडा प्रथम पाडूनच मग देवाघरी निघून गेला असता. पण काय करावे? आमच्या इतिहासाचा वसूलच असा आहे की, मराठय़ांनी कधी धोरण ठरविण्यात सहभागी व्हायचे नसते! मरणाच्या दारात मात्र न चुकता आघाडीवर राहून लढून मरायचे असते! विजयचा तो गोबरा चेहरा, दाट काळ्या मिशा, बोलके-टपोरे डोळे माझ्या डोळ्यांपुढून हलता हलत नाहीत.

जीवनाचे कसले हे विचित्र नाटय़! औरंगजेबासारखा क्रूरकर्मा मृत्यूच्या सावलीत गेल्यावर एकीकडे पश्चातापाने पोळून जातो. लोकांनी क्षमाशील राहावे असे धडे देतो अन् इकडे अजमल कसाबचा तो बाळसेदार, फसवा, पोरकट चेहरा ज्याला शेकडो निरपराध नागरिकांच्या हत्येचा जराही विधिनिषेध नाही. उलट तो आमच्या न्यायव्यवस्थेसह सर्वांवर थुंकतो आहे. या कसाबचे नव्हे तर त्याला घडविणाऱ्या पाकिस्तानातल्या त्या सैतानांच्या शाळेचे कौतुक (?) करावेसे वाटते!

एप्रिल १६८० मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचे झालेले महानिर्वाण हा एका अभूतपूर्व कर्तृत्वशाली युगाचा अस्त होता. राजांनी आग्य््रााहून स्वत:हून करून घेतलेली सुटका, त्या काळात निबीड अरण्यातून प्रथम काशीकडे आणि नंतर हैदराबादकडून दक्षिणेत शत्रूला चुकवत आपल्या राजधानीकडे घेतलेला वळसा. या मोहिमेत त्यांनी वेचलेले कष्ट, उपासमार याचा खोलवर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला होता. बालपणापासून सातत्याने कैक वर्षे त्यांनी घोडाफेक केली होती. मृत्यूपूर्वी काही र्वष मात्र ते नेहमी पालखीतून प्रवास करायचे. रायगडावर सात दिवसांच्या ज्वराचे निमित्त होऊन त्यांचे दु:खद निधन झाले. मात्र त्याआधी काही वर्षे ते अनेकदा आजारी पडायचे. दोन र्वष आधी तर साताऱ्याला सलग दोन-तीन महिने ते अंथरुणावर पडून होते.

हिटलरसारख्या हुकूमशहा व सैतानांच्या काळजाच्या कोपऱ्यातसुद्धा हिरव्या जागा असतात..

आपल्या महानिर्वाणापूर्वी शिवाजीराजे संभाजी राजांबाबत पूर्ण समाधानी असल्याचे आज इतिहासात अनेक घसघशीत पुरावे आढळतात. मृत्यूपूर्वी तीन महिने आधी त्यांनी संभाजी राजांना फ्रेंचांशी वाटाघाटी करायचा अधिकार दिला होता. प्रभावळीचा म्हणजेच पन्हाळा, विशाळगडासह कोकणपट्टीच्या मोठय़ा विभागाचे पूर्ण अधिकार त्यांनी आपल्या युवराजांच्या ताब्यात दिले होते. मात्र संभाजीराजांच्या सावत्र मातोश्री सोयराबाई आणि मुख्यत: अण्णाजी दत्तोसारख्या हलकट, पाताळयंत्री कारभाऱ्यांनी रायगडावर संभाजीविरुद्ध कुभांडे रचली. परिणामी पन्हाळ्याला मुक्कामी असलेल्या शंभूला त्यांच्या भावाच्या राजारामाच्या लग्नासाठी बोलावणे पाठवले गेले नाही. जेव्हा हनुमान जयंती दिवशी थोरल्या राजांचे निधन झाले त्या निधनाची बातमीही रायगडावर कैक दिवस गुप्त ठेवण्यात आली. राजांच्या आकस्मित निधनावेळी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंतांसारखे कारभारीही गडावर मौजूद नव्हते. अंत्यसंस्कारापूर्वी नाशिक परिसरात असणाऱ्या मोरोपतांना तातडीने बोलावून घेण्यात आले. त्या काळातील नद्या, अरण्यांचा विचार करता नाशकाहून रायगडावर पोचायला मोरोपंतांना चार ते पाच दिवस घोडय़ावरून सहज लागले असते. तेच पन्हाळावरून मलकापूर, अंबाघाट मार्गे संभाजीराजे आपल्या पित्याच्या अंत्यदर्शनासाठी दीड दिवसात सहज पोचू शकले असते. आजही मराठा समाजात एखाद्याचा ज्येष्ठ मुलगा ठार वेडा असला तरी त्याच्याच हस्ते पित्याचे अग्निसंस्कार पार पाडले जातात. मात्र कारस्थानी कारभाऱ्यांनी रायगडावर इवल्या राजारामासोबत शिंगणापूरच्या साबाजी भोसले नावाच्या दूरच्या सोयऱ्याला अग्निसंस्कारासाठी उभे केले होते.

माझ्या ‘संभाजी’ कादंबरीमध्ये अनेक गोष्टी मी तपशीलवार नमूद केल्या आहेत. त्यामुळे या मुद्दय़ाचा विस्तार इथे अधिक न करता मी एवढेच म्हणेन, राष्ट्रबांधणीसाठी साफल्यपूर्ण जीवन कसे जगावे हे शिवाजीराजांनी तर आपल्या मातृभूमीसाठीमरणाला कोणत्या बहाद्दुरीने मिठी मारावी याची शिकवण संभाजीराजे देतात, हेच या थोर पितापुत्रांचे श्रेष्ठ योगदान आहे.

एका नाटय़गृहात कुटुंबीयांसमवेत नाटक पाहत बसलेल्या लिंकनची दुर्दैवी हत्या घडून आली.

महापुरुषांचा मृत्युकाळ हा जणू तैलबुद्धीचा एक उत्तम शिक्षक असतो. तो समाजजीवनाला जागृतीचे अनेक धडे देतो, तर खलपुरुष मृत्यूच्या आगमनाने भयभीत होतात. या अटळ उंबरठय़ावर त्यांच्यातील दुष्टावा गळून पडतो अन् तेही क्षमाशील राहण्याची शिकवण देतात. लबाड नातेवाईकांसाठी थोरामोठय़ांचा मृत्यू म्हणजे त्यांची संपत्ती हडप करण्याची जणू महापर्वणीच. कर्तृत्ववान, ज्ञानी पुरुषाच्या ग्रंथसंपदेकडे त्याच्या पश्चात लक्ष द्यायला वाळवी सोडून अन्य कोणाकडे उसंत नसते. मात्र त्याने बांधलेल्या प्रासादतुल्य बंगल्यांचा ताबा घेण्यासाठी त्याचे कलेवर घाटावर जाण्यापूर्वीच नातेवाईकांमध्ये उडालेल्या हातघाईच्या लढायाही अनेकदा पहायला मिळतात. नातेवाईकांचे सोडाच, अनेक ज्येष्ठ मंडळींच्या फाजील लाडाकोडात वाढलेल्या संस्काराच्या वाऱ्यापासून दूर राहिलेल्या बाळांना बऱ्याचदा बुढ्ढा गचकतो कधी आणि त्याची गादी आणि त्याने उभारलेल्या संस्था ताब्यात घेतो कधी अन् उंची गाडय़ा अन् बाया उडवतो कधी याची घाई लागून राहिलेली असते. अशा मंडळींच्या अखेरच्या करुणपर्वाची कल्पनाच केलेली बरी. एकूणच डॉ. कोलारकर यांच्या ‘काही महनीय व्यक्तींचे अखेरचे दिवस’ या आगामी ग्रंथाच्या निमित्ताने या विषयाकडे जागरूकपणे पहायची दृष्टी मिळते. आपल्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी डॉक्टरसाहेबांनी कष्टाने केलेले संकलन, संशोधन आणि उत्तम मराठीचा साज असलेले लेखन यामुळे डॉ. कोलारकर यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे!

लोकमान्य टिळक

(संपादित अंश) , सौजन्य – लोकसत्ता

श्रीमद्भगवद्गीतेवर अनेक संस्कृत भाष्यें, टीका किंवा प्राकृत भाषांतरे अगर विस्तृत सर्वमान्य निरुपणे असतां, हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कारण काय हे जरी ग्रंथारंभींच सांगितले आहे, तरी ग्रंथामधील प्रतिपाद्य विषयाच्या विवेचनात सांगता न येणाऱ्या काही गोष्टींचा खुलासा करण्यास प्रस्तावनेखेरीज दुसरा मार्ग नाही. पैकी पहिली गोष्ट स्वत: ग्रंथकारासंबंधी होय. भगवद्गीतेचा व आमचा प्रथम परिचय होऊन आज सुमारे त्रेचाळीस वर्षे झाली. इसवीसन १८७२  सालीं वडील शेवटच्या दुखण्याने आजारी असता भगवद्गीतेवरील भाषाविवृति नांवाची प्राकृत टीका त्यांस वाचून दाखविण्याचे काम आमचेकडे आलें होते. तेव्हां म्हणजे आमच्या वयाच्या सोळाव्या वर्षी गीतेचा भावार्थ पूर्णपणे लक्षांत येणे शक्य नव्हते. तथापि लहान वयांत मनावर घडणारे संस्कार टिकाऊ असल्यामुळे भगवद्गीतेबद्दल तेव्हा उत्पन्न झालेली आवड कायम राहून संस्कृताचा व इंग्रजीचा पुढे अधिक अभ्यास झाल्यावर गीतेवरील संस्कृत भाष्यें व दुसऱ्या टीका आणि इंग्रजीत व मराठींत अनेक पंडितांनी केलेली विवेचनेहि वेळोवेळीं वाचण्यांत आली. परंतु स्वकीयांबरोबर युद्ध करणे हे मोठे कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनास त्याच युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेंत ब्रह्मज्ञानाने किंवा भक्तीने मोक्ष कसा मिळवावा याचें, म्हणजे नुस्त्या मोक्षमार्गाचे, विवेचन कशाला, ही शंका मनांत येऊन तीच उत्तरोत्तर बळावत चालली. कारण गीतेवरील कोणत्याही टीकेत त्याचे योग्य उत्तर आढळून येईना.

आमच्याप्रमाणें दुसऱ्यांना हीच शंका आली असेल, नाही असें नाही. पण टीकांतच गुंतून राहिले म्हणजे, टीकाकारांनीं दिलेले उत्तर समाधानकारक न वाटलें तरी त्याखेरीज दुसरे उत्तर सुचत नाहींसें होतें. म्हणून सर्व टीका व भाष्यें बाजूला ठेवून नुस्त्या गीतेचीच स्वतंत्र विचारपूर्वक आम्ही अनेक पारायणे केलीं. तेव्हां टीकाकारांच्या छापेंतून सुटका होऊन मूळ गीता निवृत्तिपर नसून कर्मयोगपर आहे, किंबहुना गीतेंत ‘योग’ हा एकेरी शब्दच ‘कर्मयोग’ या अर्थी योजिलेला आहे, असा बोध झाला; व महाभारत, वेदान्तसूत्रें, उपनिषदें आणि वेदान्तशास्त्रावरील इतर संस्कृत व इंग्रजी ग्रंथांच्या अध्ययनानेंहि तेच मत दृढ होत जाऊन, ते लोकांत प्रसिद्ध केल्यानें या विषयाचा अधिक ऊहापोह होईल व खरें काय याचा निर्णय करण्याला सोयीचंे पडेल, अशा बुद्धीनें या विषयावर चारपाच ठिकाणी निरनिराळ्या वेळी जाहीर व्याख्यानें दिली.
*
गीताधर्माची इतर धर्माशी किंवा तत्त्वज्ञानांशी तुलना करण्याचे काम बऱ्याच प्रयासाचें असल्यामुळें, तेंहि थोडक्या कालांत नीट उरकण्यासारखे नव्हतें. म्हणून आम्ही गीतेवर एक नवीन ग्रंथ लवकरच प्रसिद्ध करणार आहों, असे आमचे मित्र रा. रा. दाजीसाहेब खरे व दादासाहेब खापर्डे यांनी थोडय़ा घाईने आगाऊच जरी जाहीर केलें होतें, तरी आपली सामग्री अद्याप पुरी नाही असे वाटून ग्रंथ लिहिण्याचे काम दिरंगाईवर पडत चाललें; आणि पुढे सन १९०८ सालीं शिक्षा होऊन ब्रह्मदेशांत मन्दले शहरी जेव्हां आमची रवानगी करण्यात आली, तेव्हां तर हा ग्रंथ लिहिण्याचा संभव बहुतेक खुंटल्यासारखाच झाला होता. परंतु ग्रंथ लिहिण्यास अवश्य लागणारी पुस्तकादि साधनें पुण्याहून तेथे नेण्याची परवानगी कांहीं कालानें सरकारच्या मेहेरबानीनें मिळाल्यानंतर सन १९१०-११ च्या हिवाळ्यात (शके १८३२, कार्तिक शुद्ध १ ते फाल्गुन वद्य ३० च्या दरम्यान) या ग्रंथाचा खर्डा मन्दलेच्या तुरुंगांत प्रथम लिहून काढिला; आणि पुढें वेळोवेळी सुचत गेल्याप्रमाणे त्यात सुधारणा केली, व तेव्हां सर्व पुस्तके जवळ नसल्यामुळें कित्येक स्थळीं जो अपुरेपणा राहिला होता तो तेथून सुटका झाल्यावर पुरा करून घेतला. तथापि अद्यापहि हा ग्रंथ सर्वाशी पूर्ण झाला असे म्हणतां येत नाही. कारण मोक्ष व नीतिधर्म यांची तत्त्वें गहन असून त्यासंबंधाने अनेक प्राचीन व अर्वाचीन पंडितांनी इतके विस्तृत विवेचन केले आहे की, फाजील संचार जाऊं न देतां त्यातील कोणत्या गोष्टी या लहानशा ग्रंथांत घ्याव्या याचा योग्य निर्णय करणे पुष्कळदां कठिण पडतें.
*
सर्वच वाचक संस्कृत जाणणारे असण्याचा संभव नसल्यामुळे, एकंदर ग्रंथाची रचना अशी ठेविली आहे की, संस्कृत न जाणणारा वाचक संस्कृत श्लोक सोडून देऊन ग्रंथ वाचू लागल्यास, त्याच्या वाचनांत अर्थाचा कोठेंहि खंड पडू नये. यामुळे संस्कृत श्लोकांचे शब्दश: भाषांतर न देता कित्येकदां त्यातील सारांश देऊनच निर्वाह करून घ्यावा लागाल आहे. परंतु मूळ श्लोक नेहमीच वर दिलेला असल्यामुळे या पद्धतीने कोणताही गैरसमज होण्याची भीति रहात नाही.
कोहिनूर हिऱ्याची अशी गोष्ट सांगतात कीं, तो हिंदुस्थानांतून विलायतेंत नेल्यावर तेथे त्याचे पुन: नवे पैलू पाडण्यात आले व त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसू लागला. हिऱ्यास लागू पडणारा हा न्याय सत्यरूपी रत्नांसहि लागू पडतो. गीतेंतील धर्म सत्य व अभय खरा; पण तो ज्या काली ज्या स्वरूपाने सांगण्यांत आला त्या देशकालादि परिस्थितींत पुष्कळ फरक पडल्यामुळें, कित्येकांच्या डोळ्यात त्याचे तेज आता पूर्वीप्रमाणे भरत नाहीसें झाले आहे. कोणतें कर्म चांगले व कोणतें वाईट हे ठरविण्यापूर्वी कर्म करावें किंवा नाही हा सामान्य प्रश्नच ज्या काळीं महत्त्वाचा समजत असत, तेव्हां गीता सांगितलेली असल्यामुळें, त्यातील बराच भाग आता कित्येकांस अनवश्यक वाटतो; आणि त्यावरच आणखी निवृत्तिमार्गीय टीकाकारांचे सारवण पडल्यामुळे गीतेंतील कर्मयोगाचे विवेचन सध्यांचे काळीं पुष्कळांस दुबरेध झालें आहे. शिवाय आधिभौतिक ज्ञानाची अर्वाचीन कालीं पाश्चिमात्य देशांत जी वाढ झाली आहे, त्यामुळें अध्यात्मशास्त्राला धरून केलेली प्राचीन कर्मयोगाची विवेचनें हल्लीच्या कालास पूर्णपणे लागू पडणें शक्य नाही, अशीहि कित्येक नव्या विद्वानांची समजूत झालेली असत्ये.  हे समज खरे नव्हेत, असे दाखविण्यासाठीं गीतारहस्यांतील विवेचनांतच गीतेच्या सिद्धातांच्या जोडीचे पाश्चात्य पंडितांचे सिद्धान्त आम्ही जागोजाग संक्षेपानें दिले आहेत. सध्यांच्या एकदेशीय शिक्षणपद्दतीमुळें नीतिशास्त्राचा आधिभौतिक म्हणजे बाह्य़ दृष्टीनें विचार करण्यास जे शिकले आहेत, त्यांस या तुलनेवरून एवढे स्पष्ट कळून येईल कीं, मोक्ष धर्म व नीति हे दोन्ही विषय आधिभौतिक ज्ञानाच्या पलीकडचे असल्यामुळे प्राचीन काळी आमच्या शास्त्रकारांनीं या बाबतीत जे सिद्धान्त केले आहेत त्यांच्या पुढें मानवी ज्ञानाची गति अद्याप गेलेली नाही, इतकेंच नव्हे तर पाश्चिमात्य देशांतहि अध्यात्मदृष्टय़ा या प्रश्नांचा ऊहापोह अद्याप चालू असून सदर आध्यात्मिक ग्रंथकारांचे विचार गीताशास्त्रांतील सिद्धान्तांहून फारसे भिन्न नाहीत. गीतारहस्यांच्या निरनिराळ्या प्रकरणांतील तुलनात्मक विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट होईल. परंतु हा विषय अत्यंत व्यापक असल्यामुळे पाश्चात्य पंडितांच्या मतांचा जो सारांश ठिकठिकाणी आम्ही दिला आहे, त्याबद्दल येथें एवढें सांगणे जरूर आहे कीं, गीतार्थ प्रतिपादन करणे हेच आमचे मुख्य काम असल्यामुळे गीतेतील सिद्धान्त प्रमाण धरून मग त्यांशी पाश्चिमात्य नीतिशास्त्रज्ञांचे किंवा पंडितांचे सिद्धान्त कितपत जुळतात हें दाखविण्यापुरताच आम्ही पाश्चिमात्य मतांचा अनुवाद केलेला आहे; व तोही अशा बेताने केलेला आहे कीं, सामान्य मराठी वाचकांस त्यातील मतलब लक्षांत येण्यास कठिण पडूं नये.

*
प्राचीन टीकाकारांनीं प्रतिपादिलेलें गीतेचें तात्पर्य आणि आमच्या मताप्रमाणे गीतेचें रहस्य यात भेद कां पडतो याची कारणें गीतारहस्यांत सविस्तर सांगितलीं आहेत. परंतु गीता-तात्पर्यासंबंधाने जरी याप्रमाणें मतभेद असला तरी गीतेवर जी अनेक भाष्यें व टीका आहेत, किंवा पूर्वी अगर अलीकडे गीतेची प्राकृतांत जी भाषांतरे झाली आहेत त्यांचें प्रस्तुत ग्रंथ लिहितांना इतर बाबतीत नेहमींच प्रसंगानुसार थोडेंबहुत साहाय्य झालेलें असल्यामुळे त्या सर्वाचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत, हे येथे सांगणें अवश्य आहे. आणि तसेच ज्या पाश्चिमात्य पंडितांच्या ग्रंथांतील सिद्धान्तांचा जागोजाग उल्लेख केलेला आहे  त्याचेही आभार मानिले पाहिजेत. किंबहुना या सर्व ग्रंथांच्या मदतीखेरीज प्रस्तुतचा ग्रंथ लिहितां आला असता की नाही याची वानवाच असल्यानें या प्रस्तावनेच्या आरंभी ‘‘संतांची उच्छिष्टें बोलतों उत्तरें’’ हे तुकारामबुवांचें वाक्य आम्ही घातले आहे. सर्व कालीं एकासारखेंच लागू पडणारे म्हणजे त्रिकालाबाधित ज्ञान सांगणाऱ्या गीतेसारख्या ग्रंथाने कालभेदानुरूप नवें नवें स्फुरण मनुष्याला प्राप्त व्हावे यात कांही नवल नाही; कारण अशा व्यापक ग्रंथाचा हा धर्मच असतो. परंतु तेवढय़ानें प्राचीन पंडितांनी असल्या ग्रंथांवर जे परिश्रम केलेले असतात ते व्यर्थ होत नाहींत. गीतेचीं इंग्रजी, जर्मन वगैरे भाषांतून पाश्चात्य पंडितांनीं जी भाषान्तरे केली आहेत त्यासही हाच न्याय लागू पडतो. ही भाषांतरे प्राय: गीतेच्या प्राचीन टीकाकारांस अनुसरून केलेलीं असतात. तथापि कांही पाश्चिमात्य  पंडितांनी गीतेचा स्वतंत्ररीत्या अर्थ लावण्याचीहि खटपट सुरू केली आहे. पण खऱ्या (कर्म-) योगाचें तत्त्व अथवा वैदिक धार्मिक संप्रदायांचा इतिहास नीट लक्षांत न आल्यामुळें, अथवा बहिरंगपरीक्षणाकडेच त्यांचा विशेष कल असल्यामुळे, किंवा दुसऱ्या अशाच कारणांनी पाश्चात्य पंडितांचीं ही विवेचने पुष्कळ अपुरीं व कांही काही स्थळी तर नि:संशय भ्रामक व चुकीचीं आहेत. गीतेवरील पाश्चात्य पंडितांच्या या ग्रंथांचा येथे सविस्तर विचार किंवा परीक्षा करण्याचें कारण नाही. त्यांनीं उपस्थित केलेल्या प्रमुख प्रश्नांसंबंधीं आमचे काय म्हणणे आहे तें या ग्रंथाच्या परिशिष्टप्रकरणांत दिलें आहे.
*
ज्या विषयाच्या विचारांत आज पुष्कळ वर्षे घालविली व ज्याच्या नित्य सहवासानें व चिंतनानें मनाचे समाधान होऊन आनंद होत गेला, तो विषय ग्रंथरूपाने हातानिराळा होणार म्हणून वाईट वाटत असले तरी हे विचार – साधल्यास सव्याज, नाहीपेक्षा निदान जसेच्या तसे – पुढील पिढीतील लोकांस देण्यासाठीच आम्हांस प्राप्त झाले असल्यामुळे, वैदिक धर्मातील राजगुह्य़ाचा हा परीस ‘‘उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्य वरान्निबोधत!’’ – उठा! जागे व्हा! आणि (भगवंतांनी दिलेले) हे वर समजून घ्या! या कठोपनिषदांतील मंत्राने (कठ ३.१४) प्रेमोदकपूर्वक आम्ही होतकरू वाचकांच्या हवाली करितों. यांतच कर्माकर्माचें सर्व बीज आहे; आणि या धर्माचे स्वल्पाचरणहि मोठय़ा संकटांतून सोडवितें, असे खुद्द भगवंतांचेच निश्चयपूर्वक आश्वासन आहे. यापेक्षां आणखी जास्त काय पाहिजे? ‘‘केल्याविण काही होत नाही’’ हा सृष्टीचा नियम लक्षांत आणून तुम्ही मात्र निष्कामबुद्धीने कर्ते व्हा म्हणजे झालें. निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीनें संसार करून थकल्याभागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ, किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनहि गीता सांगितलेली नसून संसारच मोक्षदृष्टय़ा कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरें कर्तव्य काय याचा तात्त्विकदृष्टय़ा उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ति झालेली आहे. म्हणून पूर्ववयातच गृहस्थाश्रमाचे किंवा संसाराचे हे प्राचीन शास्त्र जितक्या लवकर समजून घेणें शक्य असेल तितक्या लवकर प्रत्येकाने समजून घेतल्याखेरीज राहूं नये, एवढीच आमची शेवटीं विनंति आहे.

पुणे, अधिक वैशाख शके १८३७

अनिल अवचट, सौजन्य – अनुभव दिवाळी २०१०

छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचं दैवत. चतुर, मुत्सद्दी, दूरदर्शी, पराक्रमी, आघाडीवर राहून लढणारा जाणता राजा! दुसर्‍या धर्माचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो हे दाखवणारा लोकहितदक्ष राजा! आज त्यांचे अभिमानी पुष्कळ आहेत, पण लोक खर्‍या शिवाजी महाराजांना कधी ओळखतील? एक ललित चिंतन.

————————————————————————————

मध्यंतरी दिल्लीला एका अभ्यासकाला भेटण्याचा योग आला. त्याच्या संशोधनाचा विषय वेगळाच होता. पण त्याने जाता जाता एक छोटा अभ्यास म्हणून शिवाजीवरही निबंध लिहिला होता. त्यात अलेक्झांडर आणि नेपोलियनशी त्याने तुलना केली होती. शिवाजीच्या बर्‍याच जमेच्या बाजू आणि काही मर्यादा दाखवल्या होत्या. त्याने मांडलेल्या मतावर त्याने मला मत विचारले. मी विचारात पडलो. म्हणालो, ‘‘मला नाही बुवा यात काही सांगता येत. कारण शिवाजी हा इतका माझा आहे, की त्याविषयी मला क्रिटिकली, टीकाकाराच्या दृष्टीतून काही विचारच करता येणार नाही.’’ माझ्या या म्हणण्याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. पण खरंच आहे ना ते. माझी सगळी लहानपणाची घडण शिवाजीबरोबरच नाही का झाली? जेव्हा वाचता येऊ लागलं तेव्हा ब. मो. पुरंदर्‍यांची वेगवेगळ्या गडांची नावं असलेली पुस्तकं अधाशासारखी रंगून रंगून वाचली होती. त्याच्या धैर्याचा, शौर्याचा, सगळ्याचा आपल्यावर केवढा खोलवर परिणाम झाला, ते विसरणं शक्य आहे का?

अलीकडे त्याचे अभिमानी लोक जागोजाग दिसतात. त्यातला मी नाही. ते ‘शिवाजी महाराज’ म्हणावे असा आग्रह धरतात. काही तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणतात. मला शिवाजी म्हणायला आवडतं, आणि तेही ‘तो शिवाजी’ असं. कृष्णाला आपण श्रीकृष्णमहाराज म्हणतो का? संतांनी विठ्ठलाला विठ्ठलेश्वर नाही केलं. ते तर त्याला ‘विठ्ठला’, ‘विठोबा’ अशी एकेरी हाक मारतात. कोणी संत, ‘विठूराया’ म्हणते, तर कोणी आपुलकीने ‘विठ्या’ही. संत ज्ञानेश्वर महाराज हे कानाला बरे वाटते, की आपल्या ग्यानबा-तुकाराममधला ग्यानबा किंवा ज्ञानोबामाउली-तुकाराममधला ज्ञानोबा? अलीकडे जन्मलेल्या, म्हणजे डॉ. आंबेडकर, म. फुले, गांधीजी यांना ते तसेच प्रिय असूनही आपण अशी जवळीक दाखवत नाही. असं का असं विचाराल, तर माहीत नाही.
नावावरून आठवलं. व्ही. टी. स्टेशनचं नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ केलं गेलं. मला याचं तेव्हा आश्‍चर्य वाटलं होतं. त्यापेक्षा साधं-सोपं ‘शिवाजी’ टर्मिनस नाव दिलं असतं तर? लोकांच्या तोंडी शिवाजीचं नाव आलं असतं. त्यावरून कदाचित एखादवेळेस कुणाला त्याच्या कर्तृत्वाची आठवणही आली असती. आता ते झालंय केवळ ‘सी. एस.टी.’! तेच विमानतळाविषयीही झालंय. नावं देताना अशी विशेषणं लावली की मूळ उद्देश बाजूला पडतो, हे नावं देणार्‍यांच्या कसं लक्षात आलं नाही?

लहानपणी शिवाजी माझ्या स्वप्नातही यायचा. आमच्याकडे दीनानाथ दलालांनी काढलेलं शिवाजीचं चित्र ङ्ग्रेम करून लावलेलं होतं. ते धारदार नाक, त्या डौलदार मिशा, ती टोकदार दाढी…पण मला एक उणीव नेहमीच जाणवली ती म्हणजे त्याचं समोरून काढलेलं एकही चित्र मी पाहिलं नव्हतं. त्या काळात मी पाटीवर सारखे शिवाजीचेच चित्र काढायचो. तसेच नाक, मिशी, दाढी…कपाळावर शिवाचे आडवे तीन पदरी गंध…डोक्यावर मागे वळ्यावळ्यांनी बनलेला शिरेटोप काढायचो. तसाच मागे जाणारा तुरा, खाली लोंबणारा मोत्यांचा झुपका…मी मोती न् मोती मन लावून काढायचो. आमच्या घरासमोर एक देऊळ होते. ते माझे विश्वच जसे. तिथल्या दारांवर खडूने शिवाजी काढायचो. तुळयांवर खडूने अशी ऐतिहासिक काव्यांची वाक्ये लिहून ठेवायचो. एक आठवतंय, ‘मुक्या मनाने किती उडवावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातिल पुढती तोफांचे चौघडे.’ आणि हो, मी पोवाडेही म्हणायचो. डोक्याला एखादे फडके फेट्यासारखे बांधून. सगळंच इतकं शिवाजीमय, की एक थोडासा गोलाकार खड्डा असलेल्या दगडाला आम्ही शिवाजीच्या घोड्याचा उठलेला पाय म्हणूनच दाखवायचो.
अलीकडे एका राजकीय पोस्टरवर शिवाजीचे डोळे वटारलेले चित्र पाहिले. मनात म्हणालो, ‘नाही, नाही. असा तो उग्रट नव्हता रे भाऊ. तो शांत, संयमी, माणुसकीचा जिव्हाळा असलेला माणूस होता. प्रसंगी तो रागावतही असेल, पण ते प्रसंगीच. लोकांना त्याच्या जवळ जावेसे वाटायचे. मनातले बोलावेसे वाटायचे. मनात आलेला नवा डावपेच सांगावा, असे वाटून तो निर्भयपणे शिवबादादाला सांगता यायचा. निदान माझा शिवाजी तरी तसा होता. अलीकडे काहीजणांनी त्याला मुस्लिमविरोधी भावनांचंही प्रतीक केलंय. शिवाजीदादा, सांग रे या लोकांना, की तू नव्हतास तसा. किती देवळांबरोबर मशिदींना तू अनुदानं दिलीस. किती मुस्लिम सैनिक, सरदार तुझ्या सैन्यात होते. आणि ते केवढे तुझे जिवाभावाचे होते. अंगरक्षक, हेर, किती किती सांगावं….

तर ते जाऊ द्या. आपला शिवाजी आपण सांभाळू यात. पुरंदर्‍यांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा मोठा ग्रंथ आला. नंतर रणजित देसाईंचं ‘श्रीमान योगी’ आलं. त्यातलं उजवं-डावं कसं सांगणार? कुठलंही पान उघडावं आणि वाचत बसावं आणि शिवाजीचं बोट धरून लहान होऊन जावं. तसा शिवाजी लहानशा जहागिरीचा जहागीरदार. वडील मोठे सरदार असले, तरी ते कुठे तरी लांब, धावपळीत. तरी या पोरानं स्वराज्याचा डाव मांडला. सवंगडी जमवले, सगळ्या पोरांनी स्वराज्याची शपथ काय घेतली, सगळंच अजब. (ज्ञानेश्वरांच्या बाबतीत हेच आश्‍चर्य वाटतं. एवढ्या वीस-बावीस वर्षांच्या तरुण पोरास हे कुठून आलं शहाणपण? तसंच शिवाजीविषयीही वाटतं.) हे राज्य आपलं नाही, हे त्याला कसं कळलं असेल? त्याला त्याची जहागीर हेच राज्य का नाही वाटलं? हे त्याचं स्वप्न उपजतच होतं की काय? मग लक्ष जातं जिजाऊ, जिजाबाई, जिजामाता यांच्याकडे. काय म्हणावं तिला? शिवबाची आई, ती आपली आज्जीच नाही का? तर त्या आज्जीनं कसं घडवलं असेल त्याला? शहाजीराजानं ही फार जोखमीची जबाबदारी सोपवली. आपल्या आज्जीने किती शांतपणे, मागे राहून निभावली! आजीचा चेहराच येत नाही डोळ्यांसमोर. सीरियलमध्ये दाखवतात तशी सुंदर, तरुण…हे मन स्वीकारतच नाही. ती असणार मध्यमवयातली. तिचा चेहरा सुंदर नसणार, पण त्यावर शहाणपणाचे तेज असणार. त्यात कणखरपणा असेल. पण सदासर्वकाळ कणखरपणा कसा असेल? शिवाजी स्वारीवर गेल्यावर त्याची काळजी करत बसणार्‍या आपल्या आज्जीचा चेहरा कसा असेल? आणि आग्र्‍याला लाडक्या नातवासह शिवाजी गेला तेव्हा हृदयाचं पाणी पाणी झालं असेल…तेव्हा तर वार्धक्याने चेहरा सुरकुतलेला असणार. राज्याभिषेकासाठी आजीनं जसा जीव धरून ठेवला होता! तो झाला आणि संपलंही ते कृतार्थ जीवन, केवळ पंधरा दिवसांत. काय या मायलेकरांचं नातं असेल नाही? घरचा कारभार बघणं, सुनांना आपलंसं करणं, मुलाच्या अपरोक्ष राज्यकारभार सांभाळणं, बापाचा सहवास मिळत नाही म्हणून रुसलेल्या नातवाला माया लावणं…बाप रे किती गुंतागुंतीचं जीवन होतं आपल्या या आज्जीचं!

शिवाजीचा जन्म झाला तो शिवनेरी गड आमच्या ओतूरजवळच. अनेकदा तिथं सहली गेल्या होत्या. सिंहगडही पुण्याच्या परिसरातला. त्यामुळे तिथंही बर्‍याचदा जाणं-येणं. पण इतरांना अशा ठिकाणी गेल्यावर जशा वेगळ्याच संवेदना होतात तशा मला झाल्या नाहीत. काही पडके, दोन-चार दरवाजे… हे पाहून काय वाटणार? मला या किल्ल्यांची ही दुर्दशा करणार्‍या ब्रिटिशांचा संताप येतो. आश्‍चर्यही वाटतं. इतकं जुनं जपणारे लोक ते. त्यांना म्हणे परत या गडांच्या आधाराने बंड होईल अशी भीती होती, म्हणून त्यांनी ते उद्ध्वस्त केले! अरे, ब्रिटिशांनो, ङ्गार तर तटबंदी काही ठिकाणी पाडायची होतीत. पण आतल्या सगळ्या इमारती, घोड्यांच्या पागा, तलाव, रस्ते, बाजार…यांनी काय केलं होतं तुमचं वाकडं? मी कधी स्वप्न पाहतो, हे सगळे किल्ले, त्यातल्या इमारती अगदी जशाच्या तशा आहेत. त्यांची छपरे तशीच आहेत त्या भिंतींवरची चित्रेही तशीच. अगदी तक्के, गालिचे, झुंबरंही तशीच. किल्ले पूर्वी जसे होते, तसे राहिले असते तर तिथे शाळेच्या सहली आल्या असत्या. शिवबादादा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला असता. तर मला कदाचित तिथं शिवबादादा भेटला असता, आज्जी भेटली असती. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो असतो आणि म्हणालो असतो, ‘आज्जी, मला आपल्या शिवबादादाच्या लहानपणच्या गोष्टी सांग ना!’

सगळ्या पराक्रमातली अफजलखानाच्या वधाची हकीगत मला ङ्गार आवडते. किती वेळा वाचली असेल, पण तरी कंटाळा म्हणून येत नाही. ते ‘थ्रिल’ आजही सोडून गेलं नाही. तो खान विजापूरहून निघाला- मंदिरं फोडत, वगैरे. तो डिवचत होता शिवबाला. पण संयम बघा याचा. त्याला तो प्रतिकार करायला, वीरश्री गाजवायला बाहेर पडला नाही. नको ते साहस त्याने केलं नाही. इतका हाहाकार कानावर येऊनही शिवाजी शांत कसा राहिला? आणि ते घाबरल्याचे नाटक? खूप वर्षांपूर्वी वसंत व्याख्यानमालेत आचार्य अत्र्यांचे भाषण होते. अध्यक्षस्थानी दत्तो वामन पोतदार. अत्र्यांनी त्या दिवशी अफजलखानाच्या वधाचे जसे आख्यानच लावले. खानाला कसा खेचून आणला वगैरे…शेवटी त्यांनी सांगितले, ‘शिवाजीने वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला, हे खरे नाही. त्याने कट्यार लपवून नेली होती. त्या कट्यारीने पोट फाडले’…वगैरे. दत्तो वामन अध्यक्षीय भाषणात मिश्किलपणे म्हणाले, ‘‘त्याने वाघनखं चालवली की कट्यार हे मला सांगता येणार नाही. कारण ते पाहायला मी तिथं नव्हतो!’’ हास्यकल्लोळ थांबल्यावर म्हणाले, ‘‘खानाला मूर्ख समजू नका. त्याला तो प्रदेश चांगला माहीत होता. किती तरी वर्षं तो वाई प्रांताचा सुभेदार होता!’’ (आणि नंतर सदाशिव आठवल्यांनी सांगितलं, की आपण कदाचित परत येणार नाही म्हणून खानानं आपल्या सर्व बेगमांचा वध केला. त्यांच्या कबरी आजही तिथं आहेत.)

या वाक्याने माझे विश्वच जसे हलले. मग मी वाचलेली ती पुस्तके, त्या कथा? थोडं अधिक समजून घ्यायची जबाबदारी आली आता. मग खान शिवबाच्या हातात कसा सापडला? हे माझं कुतूहल शमवलं पाचगणीच्या दीक्षित सरांनी. डॉ. नलिनी गित्यांबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी ब्रिटिशकाळापासून आजवर अनेकांना तो परिसर हिंडवून आणलाय. ते म्हणाले, ‘‘शिवाजीचे डावपेच अभ्यासावर आधारलेले होते. खान येणार, कळल्यापासूनच त्याचा अभ्यास शिवाजीने सुरू केला. मागे कुठे खानाने असाच वेढा घातला होता. आतल्या राजाला त्याने वाटाघाटीसाठी बोलावले. त्याला अभय दिले, शब्द दिला. म्हणून तो राजा गडाबाहेर भेटायला आला. आणि त्याला खानाने मारून टाकले. असे आणखी एका ठिकाणीही त्याने केले होते. हे कळल्यावर शिवाजीने डावपेच आखले. ज्या ‘मोडस ऑपरेंडी’ची खानाला सवय होती, जी नेहमीची, हात बसलेली युक्ती होती, ती टाळण्याऐवजी शिवाजीने ती मुद्दाम वापरली. मनुष्यस्वभावाचा कसा अचूक अंदाज होता त्याला! वा:! वा:! दादा, यू आर ग्रेट!’’

लहानपणी एक प्रसंग वाचायला ङ्गार आवडायचे. रायबागन आणि कातरलबखानाला कोकणात जाणार्‍या खिंडीत गाठल्याचा प्रसंग. त्या रायबागनचा तोराच उतरवला शिवाजीने. शाहिस्तेखानाच्या छावणीत, पुणे शहरात काही निवडक स्वारांसह शिवाजीने जाणे, हे केवढे धाडस! कोणता राजा असे करू शकेल हो? पण शाहिस्तेखानाला असा काही मानसिक झटका बसला की पूछो मत. औरंगजेबाचा तो मामा. म्हणजे धक्का थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असणार. शाहिस्तेखान चंबूगबाळं उचलून चालताच झाला दिल्लीला.

तो राजा असला तरी इतर राजांसारखा नव्हता. सैन्याला हुकूम देऊन स्वत: मागे सुरक्षित राहणारे राजे अनेक होते. पण हा आघाडीवर राहणारा राजा होता. सर्वांत धोका पहिल्या ङ्गळीला. तिथेच हा, अगदी पुढे. त्याच्या या गुणांवरच त्याचे सहकारी, सैनिक फिदा असले पाहिजेत. स्वत:पेक्षा कसल्या तरी मोठ्या उद्देशासाठी हे चाललंय, त्या ‘कसल्या तरी’ उद्देशासाठी स्वत:चा जीवसुद्धा द्यावा? हा उद्देश फक्त शिवाजीची जहागीर वाढवायचा उद्योग नाहीये, हे सर्वांना शिवाजीच्या या ‘धडक’ कृतींमधून कळत असावं. अशी जिवाला जीव देणारी माणसं किती मिळवली असतील त्यानं? इतिहास फक्त काही निवडकांची आठवण ठेवतो. पण इथे तेही इतके भरभरून आहेत की बस्स! ओतूरच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात आम्ही ‘गड आला पण सिंह गेला’ या नाटकातला प्रवेश केला होता, (किंवा त्यावरची एकांकिका असेल). त्यात कोंढाणा घ्यायचा त्याच वेळी तानाजीच्या पुतण्याचं रायबाचं लग्न येत होतं. आमच्या वर्गातला पोरगा तानाजी झाला होता. त्याचं वाक्य आठवतंय, ‘‘आधी लगीन कोंढाण्याचं, मंग रायबाचं!’ तो हे वाक्य इतकं जोरात ठासून म्हणायचा की अंगावर शहारे यायचे. आणि कोंढाणा घेतलाच त्यानं. पण रायबाच्या लग्नाला ‘काही अपरिहार्य’ कारणाने हजर राहू शकला नाही. काय जिव्हारी लागलं असेल शिवाजीला! सुख निर्भेळ मिळूच नये का? नेत्रदीपक यशात काही जिवाभावाचे सहकारी, सवंगडी गमावणे, हा काय योग आहे हो? कसं पचवत असेल तो असं दु:ख?
काय वातावरण निर्माण केलं असेल शिवबानं! सर्वसामान्य माणसं जिवाला जपतात आणि शूर प्राणांची आहुती देतात, असं नेहमीच ऐकलेलं. पण जेव्हा सर्वसामान्य माणसंच उठतात अशी आहुती द्यायला तेव्हा? काय म्हणायचं त्याला? बाजीप्रभूचं बलिदान तर कोरलं गेलंय इतिहासात, आपल्या मनात. मला आणखी कुणाची आठवण होते. शत्रूला फसवून बुचकळ्यात टाकण्यासाठी शिवाजीसारख्या दिसणार्‍या काही शिपायांना पालखीत बसवून त्या वेढ्यात पाठवल्या गेल्या. ते पकडले गेले. पुढे काय होणार ते या शिपायांना ठाऊकच होतं. तरीही ते शिवाजीसारखे सजून पालखीत बसले? का बरं? तसंच ‘आग्र्‍याहून सुटका’च्या बाबत. शिवाजीच्या जागी कोण तो पडून राहिला? कोणी आते-मामे भाऊ? छे हो. तो आपल्या स्वराज्यातला कोणी साधा शिलेदार. काय अभिनय वठवला असेल त्यानं! रंगभूमीवर कुठल्या नटाने असा मृत्यूच्या छायेत अभिनय केला असेल?

मला त्या आपल्या संभाजीबाळाचंही नवल वाटतं. आग्र्‍यात ते पोर घाबरलं नाही. पळून जाताना हूं की चूं केलं नाही. उरलेला प्रवास वडलांविना, अनोळखी भागात, रानावनातून कसा केला असेल त्यानं? संभाजीला समजून घेण्यात आम्ही सगळे कमीच पडलो. शिवबाने आपल्या राज्याभिषेकाबरोबर त्याचा युवराज्याभिषेक करूनही त्या सगळ्या अमात्य मंडळींनी गृहकलह सुरू करावा? परवा तर वाचलं, की सोयराबाईला त्यानं भिंतीत चिणून मारलं, याला काही पुरावा नाही. त्यानंतर दीड वर्षाने विष खाऊन किंवा विषप्रयोग होऊन ती गेली. ज्या अमात्यांना देहान्त सजा दिली त्यांच्याच मुलांना त्याने परत मंत्रिमंडळात घेतले. याहून त्याच्या शहाणपणाचा, समतोल बुद्धीचा काय पुरावा पाहिजे? घरावर रुसून (त्यात कार्यमग्न शिवाजी किंवा सावत्र आई यांचा सहभाग असणे शक्य आहे.) दिलेरखानाला मिळाला, त्याच्यावरचा मोठा डाग. पण पुढे त्याने खानाच्या ङ्गौजेचं गाव लुटणं पाहिलं, एका स्त्रीस खानाने मुसलमान करून जनानखान्यात ठेवली, ते पाहिल्यावर तो स्वत: होऊन परत घरी निघून आला. चूक झाली. चुका कोण करत नाही? पण चूक सुधारली ना त्यानं? वडलांनंतर जेमतेम सात-आठ वर्षंच मिळाली, पण तो त्यात सतत लढायाच करत राहिला. पोर्तुगीज, मोगल या सगळ्या आघाड्यांवर. खाली थेट कर्नाटकात जिंजीपर्यंत. तर तिकडे मराठवाड्यात. अशा नुसत्या लढायांत वेळ गेला. तो व्यसनाधीन आणि लंपट असता तर हे जमलं असतं? तो संस्कृतमधला इतका जाणकार, की त्याने संस्कृतात काव्यग्रंथ लिहिलाय. उन्मत्त वतनदारांना जरब बसवणारी त्याची आज्ञापत्रं पाहिली की थेट शिवबादादाचीच आठवण यावी. आणि मरण? मरणातच तो असे जगला की अंगावर शहारेच येतात. ते नुसते युद्धातले मरण नव्हे. ते विटंबना करून दिलेले मरण…काय त्याची ती धिंड…छे छे वाचवत नाही तो भाग. त्याच्या गुणांमध्ये, व्यक्तिमत्त्वात, निष्ठेमध्ये जरा कमतरता असती, तर तो अशा वेळी पिचला असता आणि शरण गेला असता औरंगजेबाला. पण त्या मरणात तो असे जगला की सर्व मराठी शिपायांच्या डोक्यावर जसा स्वार झाला. आणि तिथून सुरू झाले एक विलक्षण, निर्नायकी युद्ध. या पर्वाला सलाम, नमस्कार, हॅट्‌स ऑफ…कितीही शब्द वापरा, पण नाहीच कशाची सर त्याला. ते युद्ध या निनावी शिपायांचं. प्रोत्साहन द्यायला, डावपेच आखायला, पाठ थोपटायला तिथं शिवाजी-संभाजी नव्हते. राजाराम दूरस्थ. कोणी श्रेयासाठी हे करत नव्हते की इनाम, वतनासाठी. शांत, अविरत, निश्‍चयी लढाई. आपण असू तेच रणांगण. आपण एकटे असलो तरी तीच ङ्गौज. शत्रूचं बळ किती का असेना! अखेर औरंगजेबाला दिल्ली सोडून इकडे यावे लागले. तरी त्याला हे थैमान आवरेना. शेवटी इथंच त्याचा मृत्यू झाला. एक संताजी, धनाजी सोडले तर त्या विलक्षण वीरांची नावंही माहीत नाहीत आपल्याला. या अनामिक वीरांचं एखादं चांगलं स्मारक का असू नये? संभाजीच्या मृत्यूनंतरच्या या लढ्याची चांगली आठवण का असू नये? व्हिएतनाम युद्धात मरण पावलेल्यांचं वॉशिंग्टनमध्ये एक स्मारक आहे. तिथे कुठलाही पुतळा नाही. तिथं आहे लांबलचक ग्रॅनाइटने मढवलेली एक भिंत. त्यावर कोरली आहेत त्या सैनिकांची नावं. त्यांचे नातेवाईक, मित्र येऊन त्यापुढे ङ्गुले ठेवतात. हृदय गलबललंच आपलं, भाऊ. पण आपल्याकडे स्मारक म्हटलं, की ते एकसुरी पुतळे आठवतात, तलवार उपसलेले. मला एक प्रश्‍न नेहमी पडतो, की शिवाजी आम्हाला फक्त एवढाच का दिसतो? खरं पाहता इतक्या बहुपदरी माणसाची किती हृद्यतेने आठवण ठेवता येईल! पण आपणा सगळ्यांना आपला हा शिवाजी किती बहुपदरी होता, तो किती वेगवेगळ्या प्रकारे मोठा होता, हे का नाही समजू शकत? आमच्याच माणसाचे मोठेपण आम्हीच समजू नये?

तो नुसता गनिमी काव्याने लढू शकत होता असे नाही. साल्हेरच्या लढाईचा वृत्तान्त (डॉ. श्रीनिवास सामंत यांच्या पुस्तकात) वाचला. तर बाप रे! ती सपाटीवरची, समोरासमोरची लढाई! शिवाजीने ङ्गौजेचे वेगवेगळे भाग करून अशी काय जिंकलीय की बस्स! कोणी म्हणू शकणार नाही, तो ङ्गक्त सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत लढू शकत होता, असे. जो लढणारा आहे, आपण कशासाठी लढतोय याचे ज्याला अचूक भान आहे, शत्रूच्या कमतरतांचा ज्याने अभ्यास केलेला आहे आणि स्वबळाची वास्तव कल्पना आहे…असा तो शिवाजी.

थंड डोक्याने वेगळ्याच कल्पना शोधणारा शिवाजी. सतत ‘प्रो-ऍक्टिव्ह’. शत्रूंच्या डावपेचांमागे तो फरफटत गेला नाही. शत्रूला कल्पना यायच्या आत त्याच्यावर झडप घालून शत्रूच्या मर्मावर हल्ला करायचा. असा तो शिवाजी!

शिवाजीच्या बाजू तरी किती! प्रत्येक बाबतीत त्यानं कसं लक्ष घातलं? इंग्रज, पोर्तुगिजांचं आरमारी बळ पाहून त्याने स्वत:चं आरमार बनवायचं ठरवलं. हीच एक क्रांतिकारक कल्पना. त्या वेळच्या समाजात समुद्रपर्यटन निषिद्ध होतं. बंदी होती धर्माची. ती शिवबाने सहज ओलांडली. तेही त्या जमान्यात. पण त्याने इंग्रज पोर्तुगिजांच्या गलबतांची नक्कल नाही केली. त्यांची जहाजे मोठी, खाली ‘व्ही’च्या आकाराची, निमुळती होत गेलेली. लांबच्या प्रवासाला ती उपयुक्त. पण शिवबादादाने इथला विचार केला. त्याची गरज काय हे ओळखून सपाट तळाच्या छोट्या होड्या बांधल्या. त्या छोट्या होड्या मोठ्या गलबतांवर हल्ले करून नाहीशा होत. एका पोर्तुगीज पत्रात असे म्हटले आहे, की ‘‘हा सीवा कुठून येतो आणि हल्ले करून कुठे गडप होतो ते कळतही नाही.’ शिवाजीने जमिनीवरच्या लढाईत जो गनिमी कावा वापरला, तोच आरमारी युद्धातही. म्हणून गुरू, किती शिकायचंय आपल्याला शिवबादादाकडून! आता आता आपण शस्त्रास्त्रांच्या बाबतीत नुसत्या कॉप्या करतो त्या अमेरिकेच्या. आपलं असं काय आहे की जे आपल्याला अनुरूप आहे? एवढंच काय, त्यांच्या माणसं न लागणार्‍या कारखानदारीचीही आपण नक्कल करतो, इथं लाखो माणसं बेकार बसली असली तरी. काय म्हणावे या अनुकरणाला?

तर नुसत्या अनुरूप बोटी बांधल्या नाहीत, तर समुद्री किल्ले बांधले, सुधारले. उदय संखे यांच्या लेखात शिवबाराजाला दुर्ग-बांधणीची किती नवी दृष्टी होती, हे कळतं. विजयदुर्गच्या आसपास शत्रूच्या बोटी येत आणि फुटत, याचे कारण त्यांना कळले नव्हते. नंतर कळले. त्यांच्या कागदपत्रांत आपल्या कमांडर गुपचूप यांना एक कागद सापडला. शत्रूच्या बोटी विजयदुर्गच्या आसपास फुटत कारण पाण्यातच शिवबाने भिंत बांधली होती. ती वरून कुणाला दिसत नसे, पण गलबते त्यावर फुटत असत. ती भिंत बंदरापासून १५० ते २०० मीटर अंतरावर होती. आणि किती लांब? तर साडेचार किलोमीटर! संरक्षणाची किती साधी पण किती परिणामकारक युक्ती! किल्ल्यांभोवतीचे समुद्रातले खडक तो तसेच ठेवायचा. त्या ‘व्ही’ आकाराच्या बोटी त्या उथळ पाण्यात, खडकाळ भागात येऊ शकत नसत, पण सपाट तळाच्या छोट्या बोटी सरासरा जायच्या. त्यानं या बांधकामात शिसं आणि चुना वापरला. चुना करण्यात शिवबाचे लोक इतके पुढे गेलेले, की पाण्याने किल्ल्याच्या तटांचे दगड झिजले, पण चुना कायम. बोला!

खांदेरीची लढाई हे तर अप्रतिमच नाट्य. हे बेट मुंबईच्या तोंडावर असल्याने त्याने इंग्रजांना चाप बसणार होता. ते ताब्यात घेऊन शिवबाच्या लोकांनी बांधकाम सुरू केले. ते इंग्रजांनी उधळून लावले. पण आपला शिवबादादा किती संयमी! सहा वर्षे थांबला. ‘ठंडा करके खाओ’ ही म्हण त्याच्यात मुरलेली होती. परत काम सुरू. मधल्या काळात बेटावर तोङ्गा चढवलेल्या. इंग्रजांनी नाकेबंदी केली. ते तोङ्गांच्या मार्‍यामुळे जवळ जाऊ शकत नव्हते. तरी बिघडलेल्या हवेचा, वादळाचा ङ्गायदा घेऊन वेढा तोडून मराठे आत जात आणि रसद पुरवत. इंग्रज काहीच करू शकत नसत. मग शिवबाने आवई उठवली (त्याही तंत्रात तो वाकबगार), की ‘पनवेलहून मराठा सैन्य मुंबईवर चाल करून येतंय.’ मग घाबरून इंग्रजांनी मराठ्यांकडे तहाची बोलणी केली, आणि त्यात शिवबाने खांदेरी बेट मिळवलेच.

या लढाईत किती विशेष गोष्टी आहेत बघा. खांदेरी बेटाची अचूक निवड, संयम, छोट्या होड्यांची करामत. त्यातला गनिमी कावा. आवई उठवून शत्रूला संभ्रमात टाकणे. आणि तहात हवे ते मिळवणे. एरवी भारतीय परंपरेत युद्धात जिंकतात पण तहात हरतात. इथे आपला शिवबादादा जिंकलेला नसूनही तहात त्याने मिळवले. क्या बात है दादा!

इतर ठिकाणी शिवबाचे पुतळे उभारण्यापेक्षा, अशा एका खांदेरीवर त्याचं योग्य स्मारक का होऊ नये? तिथं त्याच्या होड्या, पडाव, गलबतांचं प्रदर्शन का भरवू नये? खांदेरीच्या लढाईचं आत्ता शूटींग करून संध्याकाळी त्याचा दृकश्राव्य कार्यक्रम का करू नये?

मी मच्छीमार समाजाची पाहणी करताना अलिबागला गेलो होतो आणि यांत्रिक होडीत बसून जवळच्या एका बेटाला फेरी मारून आलो होतो. आता नकाशात पाहतो तेच ते बेट तर नसेल ना? माहीत असतं तर उतरून मोकळेपणाने श्वास भरून घेतला असता. तेव्हा हे सगळं वाचलेलं असतं तर.

लहानपणी शिवबावरची गोष्टीरूप पुस्तके वाचली होती. नंतर प्रत्यक्ष इतिहासावरची वाचू लागलो. त्यातून माझा शिवबादादा मलाच मस्त उलगडत गेला. त्याची काही आज्ञापत्रे वाचली. ती तर ‘अहाहा’च आहेत. त्यात त्याचं शहाणपण आहे, बारीकसारीक पाहण्याची बुद्धी आहे. एका आज्ञापत्रात तो म्हणतो, ‘गडावर तुम्ही शेकोट्या पेटवता, त्या नीट विझवा. एखाद्या ठिणगीने हा हा कार होईल. तेलाच्या पणत्या विझवून मग झोपा. उंदीर तेलाची जळती वात घेऊन जातील, आणि ती जळती वात गवताच्या गंजीपाशी नेऊन टाकली की गडावरच्या गवताच्या गंजी जळून खाक होतील…’ बघा हा बारकावा. छोट्या गोष्टीतून मोठा उत्पात होऊ शकतो. एक बेजबाबदार दुर्लक्ष सर्वांच्या हिताला केवढे मारक ठरू शकते!

अनवधानाने असं गवत जळालं तर करणार काय? अन्नसाठा? सगळ्याच गोष्टी खालून वर आणायच्या. पण शिवाजीच तो, ज्यानं गडांचा इतका नेमका उपयोग करून घेतला हे त्याचं मुलखावेगळं ‘लॅटरल थिंकिंग!’

आणखी एक आपल्या शिवाजीदादाचं आज्ञापत्र मला ङ्गार आवडतं. आंबे, फणस अशी लाकडं आरमारासाठी म्हणजेच स्वराज्यासाठी आवश्यक. ‘परंतु त्यास हात लावू न द्यावा,’ अशी शिवाजीची आज्ञा होती. का बुवा? आताचं सरकार तर आर्थिक विकासासाठी हव्या त्या जमिनी, गावं ताब्यात घेतं, आणि आपला दादा, ‘रयतेच्या मालकीच्या अगदी उपयुक्त असलेल्या झाडांना’ही हात लावायला मनाई करतो? रस्ते मोठे करताना हजारो झाडांची कत्तल करणारं आताचं सरकार कुठं नि रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असं सैनिकांना बजावणारा शिवबादादा कुठं! तो नुसती आज्ञा देत नाही, तर त्याचं कारणही सांगतो ‘काय म्हणोन, की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात, असे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडलीयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?’ प्रजेला होणार्‍या अशा दु:खांची काळजी करणारा तो राजा होता. त्या काळचे कुठले आदिलशहा, कुतुबशहा, औरंगजेब अशी काळजी करत असतील? पुढे तो त्याचेही कारण देतो : ‘येकास दु:ख देऊन जे कार्य करील म्हणेल ते (कार्य) करणारासहित स्वल्पकाळे बुडोन नाहीसे होते. धन्याचे पदरी प्रजा पीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावी हानीही होते.’ हे चिंतन त्या काळामधले. बरे, मग स्वराज्याची आरमाराची गरज भागवावी कशी, तर शिवाजीचे म्हणणे असे की, ‘एखादे झाड, जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तर धन्यास राजी करून, द्रव्य देऊन, त्याचा संतोष करून तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा.’ बोला आता. शिवबादादा आत्ता असता तर त्याने धरणग्रस्तांचे हाल होऊच दिले नसते. परकीय कंपन्यांना त्याच्या काळातही कसे दूर आणि धाकात ठेवले असते! आज तो असता तर सेझ कायदा होऊच दिला नसता. पण काय करता? नुसता राज्यकर्त्यांना दोष कसा द्यायचा? आमच्यातच शिवबा पुरेसा मुरलेला नाही. हा दोष आपलाच.

शिवबादादाच्या आज्ञापत्रात तो आज्ञा करताना समजावूनही सांगतो. ‘तुम्ही निष्काळजीपणा केलात तर वैरण पेटल्याने नष्ट होईल. मग चार्‍याअभावी घोडे मेले तर तो दोष तुमच्यावर लागेल. तुम्ही त्यासाठी रयतेचे धान्य लुटू लागाल. मग रयत म्हणेल, त्या मोगलांमध्ये आणि यांच्यात ङ्गरक काय? आणि लोकांचा आधार तुटला तर राज्यच कोसळेल…’ असे बरेच. एका पत्रात तर ‘कुणा शत्रूचे सैन्य या मार्गाने येत आहे. गाव उठवा आणि लोकांना घाटात सुरक्षित ठिकाणी लपवा,’ असे लिहिले आहे. मला आठवतेय, नेपोलियनने रशियात धडक मारली होती, तेव्हा गावकर्‍यांनी पलायन केले होते. जाताना आपापली गावे पेटवून दिली. त्यामुळे पुढे हिवाळ्यात तो तिथे सापडला, आणि गावंच अस्तित्वात नसल्याने त्याला माघारी ङ्गिरावं लागलं होतं. त्या गावकर्‍यांचं वागणं शिवबादादाच्या त्या माणसे हलवण्याच्या युक्तीशी किती मिळतं जुळतं आहे. त्यात परत घरं पेटवून देणं ही भानगड नाही. शत्रू पुढे गेला की परत गाव जसंच्या तसं.

तर त्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सेतुमाधवराव पगडींनी लिहिलेलं छोटं आणि छान शिवचरित्र आहे. अलीकडे गजाजन मेहंदळ्यांचे दोन ग्रंथही छान आहेत. शिवाय सामंतांचे ते फक्त लढायांवरचे पुस्तक. ते तर अप्रतिमच. अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खर्‍यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांचा इतिहास’चे दोन खंड तर ग्रेटच!

पण सगळ्यात ज्यांनी डोळे उघडले ते त्र्यं. शं. शेजवलकरांच्या पुस्तकांनी. त्यांच्या लेखसंग्रहात ‘रियासत’कार सरदेसाईंच्या ‘नानासाहेब पेशवे’ या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना आहे. त्या लेखाने मला हादरवलेच. पुढे मी त्यांचे बरेच लिखाण, ग्रंथही वाचले. पण जमलेला लेख हाच. त्यांच्या आयुष्याच्या सर्व आकलनाचे गाळीव रूप त्यात आले आहे. पेशव्यांच्या उणिवा, कमतरता सांगताना त्याने समोर शिवाजी आरशासारखा धरला आहे. त्यामुळे पेशवे बाजूलाच राहिलेत. सरदेसाईंचं मोठेपण हे, की त्यांच्या आतल्या पुस्तकाला ही प्रस्तावना सर्वस्वी प्रतिकूल असूनही त्यांनी ती छापलीय. शिवाजीने दिल्ली सत्तेला आव्हान देऊन नवे स्वतंत्र राज्य स्थापन केले, तर पहिल्या पेशव्यांनी दिल्लीला जाऊन अधिकाराची वस्त्रे आणली. थोडक्यात, मांडलिकत्व पत्करले. शिवाजीने आपल्या अर्थव्यवहारासाठी स्वतंत्र चलन निर्माण केले, नाणी पाडली. ‘मुद्रा भद्राय राजते’- आठवतंय ना? ते नुसतं नाणं नाही. एका भूमिपुत्रानं आक्रमक सत्तेला दिलेलं ते आव्हानच आहे. या उलट पेशव्यांनी ती नाणी रद्द करून दिल्लीश्वरांचे चलन स्वीकारले. शिवाजीने मराठी राजभाषा बनवली. त्यासाठी राज्यव्यवहारकोष लिहून घेतले. पण पेशव्यांनी ते परत ङ्गारसीवर आणले. आपल्याला आता पेशव्यांविषयी काही म्हणायचे नाही. पण हे खरे, की पेशव्यांनी शिवाजीला एक ‘कॉन्ट्रास्ट’ पुरवला आहे. थोरले बाजीराव आणि थोरले माधवराव हे चमकून गेले आणि त्यांनी त्यांच्यात भिनलेले शिवाजीचे स्फुल्लिंग दाखवले. पण ते तितकेच. शेजवलकरांनी लिहिलेला ‘पानिपत’ हा तर युद्धशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ. आपला मुख्य शत्रू अब्दाली आहे, तर पेशव्यांनी उत्तरेकडे जाताना इतर सर्व छोट्या सत्तांशी तह करत जावे ना… तर त्याऐवजी त्यांना दुखवतच हे पुढे गेले. यमुनेला पूर येण्याआधी अब्दालीला गाठायचे होते, तरी पेशवे ठिकठिकाणी तीर्थक्षेत्री होमहवन करत राहिले. इतक्या लांबचा पल्ला, तरी सर्व कुटुंबकबिला घेऊन सगळे निघाले. आणि व्हायचे तेच झाले. किती मोती गळाले आणि किती खुर्दा सांडला, याचे हिशोब करणे नशिबी आले.

शिवाजी किती वेगळा होता! त्याच्या हल्ल्यात किती आश्‍चर्याचे धक्के असायचे. शत्रूच्या विचारांच्या तो किती पुढे होता! शेजवलकर लिहितात, ‘अब्दाली हा अङ्गगाणिस्तानातला शिवाजीच. थोड्या पण चपळ फौजेनिशी हल्ले करून पळून जाणारा,’ म्हणजे बघा. काळचक्र कसे उलटे झाले! शिवाजीने सुस्त व प्रचंड मोगल ङ्गौजेस हल्ले करून जेरीस आणले. आता शिवाजीच्या जागी अब्दाली आणि मोगलांच्या जागी पेशवे, म्हणजे आपणच. काय हा योग म्हणायचा?

शेजवलकरांचं अखेरचं कार्य होतं शिवचरित्र लिहिण्याचं. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर अभ्यास केला, साधनं जमवली. पण शेवटी तब्येत साथ देईना. त्यांचे एक विद्यार्थी मला सांगत होते, की ते म्हणायचे, ‘थोडा काळ मिळाला तर हे काम पुरे होईल.’ त्या आजाराशी झगडत त्यांनी शेकडो पानांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली, प्रत्येक प्रकरणाचा आराखडा लिहिला आणि प्राण ठेवला. नंतर मराठा मंदिर संस्थेने त्यांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला. काय प्रस्तावना आहे ती! जसा एक प्रबंधच. शिवाजीच्या वेळची भारतातली परिस्थिती, जगातली परिस्थिती, इथली सामाजिक स्थिती, इथला तोपर्यंतचा इतिहास, इथले ङ्गसलेले प्रयोग…काय नाही त्यात? हे जेव्हा वाचले तेव्हा वाटले, आयुष्य दुसर्‍याला द्यायची सोय असती तर मी शेजवलकरांना माझी दहा निरोगी वर्षे देऊन त्यांचे ऋण थोडे तरी ङ्गेडले असते. एवढ्या समग्रपणे पाहणारा इतिहासकार मला दुसरा अजून सापडला नाही.

शिवाजीने आधीच्या वतनदारांना बाजूला सारून ही सर्वसामान्यांतली ङ्गौज जमा केली. अगदी अठरापगड जातींची. कसलीही प्रतिष्ठा नसलेली, पण जिवाला जीव देणारी. त्या अस्थिर जमान्यात लढाया होत्याच; पण तरीही शिवाजीने शेतकर्‍यांना स्थैर्य दिले, प्रोत्साहन दिले. अकबराला जसा राजा तोरडमल किंवा आणखी कुणाला मलिक अंबर मिळाला, तसा शिवाजीला कुणी चांगला प्रतिभावान सहायक मिळायला हवा होता. मग त्याने महसुलाची योग्य पद्धत बसवून त्याच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण केला असता. पण शिवाजीचे सगळे आयुष्य धावपळीचे. एकूण फक्त जेमतेम पन्नास वर्षे. त्यात एका संकटाशी दोन हात करावे तो दुसरे संकट उभे, ही परिस्थिती. पण त्याही परिस्थितीत त्याने व्यवस्था बसवली, लोकांना स्थैर्य दिले.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आजच्या काळातही त्याच्या पायाशी बसून धडे घ्यावेत असा त्याचा धर्मविषयक दृष्टिकोन. दुसर्‍या धर्मांचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो, हे त्या वेळच्या मुस्लिम सत्तांना त्याने दाखवून दिले. मोगलांच्या प्रभावळीत अकबर असा होता. अकबराविषयी जेवढे वाचतो तेवढा तो आवडत जातो. वडील हुमायून अगदी विपन्नावस्थेत. अकबरानेही जवळपास शून्यातून सुरुवात करून साम्राज्य उभारले. त्या वेळच्या प्रस्थ असलेल्या मुस्लिम सरदारांपेक्षा त्याने राजपुतांना जवळ केले. काही राजपूत स्त्रियांशी लग्न केले, पण त्यांचा धर्म बदलला नाही. त्यांच्या महालात देऊळ बांधून देवपूजा करण्यास मुभा होती. एवढंच काय, पुढचा वारसही त्यांच्याच पोटचा. त्याने मुल्ला-मौलवींचं प्रस्थ कमी करून मोकळं वातावरण तयार केलं. अगदी बरेचसे गुण शिवाजीसारखेच. कधी वाटतं, अकबर आणि शिवाजी एकाच काळात असते तर? किती ङ्गायदा झाला असता आपल्या सगळ्यांचाच! अकबरानंतर अकबराने तयार केलेले वातावरण विरून गेले आणि त्याबरोबर उलट्या वृत्तीचा औरंगजेब निर्माण झाला. आणि शिवाजीची ही प्रेरणा दुसर्‍या बाजीरावापर्यंत पूर्ण लयाला गेली. हे महापुरुष एकत्र आले असते तर न पुसता येणारी संमिश्र संस्कृती उदयाला येऊन टिकलीही असती. त्या काळात लोकांमध्ये ती होतीच. सूङ्गी संत, भक्ती संप्रदायातले आपले संत यांत विरोध तर नव्हताच, पण एकमेकांकडे आदानप्रदान होते. एकमेकांबरोबर इष्ट परिणाम होत होते. काही संत, त्यांचे गुरू यांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही नावांनी ओळखले जायचे. काही मुस्लिम संत तर अगदी भागवत संप्रदायी होते. ते वातावरण मीही माझ्या लहानपणी अनुभवलंय. आमच्या लहानपणी मुस्लिमांचे डोले नाचत यायचे. माझी आई हातात पाण्याचा तांब्या घेऊन दारात उभी राहायची. डोले जवळ आले की घरापुढे रस्ताभर पाणी शिंपायची, त्यांच्या स्वागताला. असे प्रत्येक घराच्या दारात स्वागत. गणेशोत्सवाची सजावट मुस्लिमांकडे, हे मी अनेक ठिकाणी पाहिलंय. अनेक गवय्ये खानसाहेब देवीचे भक्त होते. त्यांनी देवाच्या वर्णनाच्या चीजा बांधल्यात. गेल्या पिढीतले बरेच हिंदू गवई सांगतात, खानसाहेबांनी मला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळून विद्या दिली…अशी अनेक उदाहरणे.

मग कुठं लयाला गेलं सगळं हे ? आधी देशाचे दोन तुकडे झाले. जो मिळाला त्यात ही अशांतता, एकमेकांविषयी संशय, दंगली, बॉंम्बस्ङ्गोट…वगैरे. आणि तरीही आम्ही वारसा सांगतो शिवाजीचा आणि त्याच्याकडून शिकत नाही काही, याला काय म्हणावे?

कधी कधी वाटते, लोक खर्‍या शिवाजीला ओळखतील! शिवाजीला लढाया कराव्या लागल्या. सन्मानाने राहण्यासाठी, आपली जागा तयार करण्यासाठी. ती जागा आधीच उपलब्ध असती, तर त्याने छान, एकोप्याने नांदणारे सुखी राज्य निर्माण केले असते. मग करू या का सुरुवात? आपल्या राजकारण्यांनी, धुरीणांनी जरा शिवाजीकडून शिकावे ना थोडे. एक भव्य स्वप्न उराशी घेऊन उतरावे या गरिबीविरुद्धच्या लढ्यात. अन्नावाचून, औषधावाचून कुणी मरताच कामा नये, अशी करूयात का आपण प्रतिज्ञा? हा नुसता महाराष्ट्र नाही आहे, हे शिवाजीचे स्वप्न आहे. गुंडगिरी, झुंडशाहीला फाटा देऊन आपण होऊयात सर्वसामान्यांचे, निसर्गाचे रक्षक?

तसंच मला, आपल्या अगदी जवळच्या, म्हणजे कर्नाटकमधल्या विजयनगरच्या कृष्णदेवरायाची आठवण होते. कसला पराक्रमी होता तो! शिवाजीने जसं शून्यातून स्वराज्य उभं केलं, तसं त्याचं नव्हतं. त्याच्याआधी दीडेकशे वर्षं ते साम्राज्य चालूच होतं, पण ते मोडकळीला आलेलं होतं. विजापूर, गुलबर्गा इथल्या मुस्लिम सत्तांनी लचके तोडणं, अंतर्गत कलह, हे सगळं चालू होतंच. त्याची (त्याला ‘राया’ म्हणायचे. ते मला ङ्गार आवडलं.) कारकीर्द ती केवढीशी…फक्त वीस वर्षांची. तो वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी गेलाच. पण त्या वीस वर्षांत कसले पराक्रम केलेत! खरंच वाटत नाही. त्या आदिल, कुतुब वगैरे सगळ्या शाह्यांना त्याने सपाटून मार दिला. एकदा नव्हे, तर अनेकदा. शिवाय त्या काळात राज्य समृद्ध, सुसंस्कृत केले. संगीत, काव्य, शिल्प यांना प्रोत्साहन दिले, वगैरे वगैरे…आपल्या शिवबाच्या आधी शंभरेक वर्षं आधी हे घडले.

कधी वाटतं, या काळाच्या प्रवाहात खोडरबराने काही खाडाखोड करावी, किंवा इकडून तिकडे बाण काढून घटनांचा क्रम बदलावा आणि रायाला जरा पुढे ओढावं. म्हणजे तिकडून रायाने आणि इकडून शिवबाने त्या आक्रमक मुस्लिम सत्तांना असा काही मार दिला असता की पळता भुई… त्यातनं रायानं शिवबाला जरा शांत वेळ मिळू दिला असता. त्याच्या राज्यातलं संगीत ऐकवलं असतं, शिल्पं दाखवली असती…

आणि हो, तोही शिवबासारखाच. रायाही सर्व धर्मांचा आदर करणारा. सगळ्या देवस्थानांना अनुदाने देणारा. मुस्लिम आपल्याला समजावेत म्हणून आपल्या राज्यात मुस्लिम वसाहतच वसवली त्यानं. अंगरक्षकही मुस्लिम. कित्येक सरदारही.

इतिहास हा कुणाच्या इच्छेचा प्रश्‍न नसतो, हे माहीत आहे मला, पण सदिच्छेने मनाचे खेळ खेळायला बंदी आहे का? राया, शिवबा, अकबर यांच्यात समान धागा दिसला म्हणून हे स्वप्न पाहिले.

मला तर शिवाजी आणि गांधीजी दोघेही जवळचे वाटतात. एक युद्धवीर आणि दुसरे अहिंसावीर. वरकरणी विरोध वाटेल, पण भव्य स्वप्न तेच, तसेच. त्यासाठी झोकून देणे, जिवाची पर्वा न करता, तसेच. ध्येयासाठी निडरपणे जागी उभे ठाकणे, तसेच अगदी.

शिवाजीच्या काळातल्या लढायांचे आजच्या जीवनात स्थान नाही, पण गांधीजींचा मार्ग मात्र आजही अनुसरता येईल. मग असे करूयात का, शिवबाचे स्वप्न आणि गांधीजींचा मार्ग? पण त्यात हवी त्या दोघांची सर्वसामान्यांविषयीची कळकळ, त्यात हवी आयुष्यभराची अखंड तपश्चर्या, त्याला हवी पुढचे पाहणारी दृष्टी. वा…वा…मी स्वप्नच पाहू लागलो रे शिवबादादा…हसतोस काय मिशीत?…तूच नाही का शिकवलंस मला स्वप्नं पाहायला?