मृत्यूच्या छायेतील महापुरूष आणि खलपुरूष

Posted: जानेवारी 11, 2011 in इतिहास
टॅगस्,

विश्वास पाटील , सौजन्य – लोकप्रभा

विदर्भातील एक ज्येष्ठ संशोधक, लेखक डॉ. शरद कोलारकर यांच्या ‘काही महनीय व्यक्तींचे अखेरचे दिवस’ या आगामी ग्रंथाच्या प्रस्तावनेच्या निमित्ताने कादंबरीकार विश्वास पाटील यांनी घेतलेला महापुरुषांच्या आणि खलपुरुषांच्या अखेरच्या दिवसांचा घेतलेला अभ्यासपूर्ण, रोचक आणि दिशादर्शक धांडोळा!

——————————————————————

‘‘तो जन्माला आला तेव्हा नागडाच होता. आपल्या कफनासाठी एक वाव कपडा मिळावा या एका लालसेपायी पुढे जीवनभर तो खस्ता खात बसला!’’ मनुष्यदेहाचे असे अल्पाक्षरी, वास्तव वर्णन एका ऊर्दू शायराने केले आहे.

जेव्हा मनुष्य आपल्या कुमार अवस्थेत हुंदडत असतो, तेव्हा तो एका अज्ञानाच्या गाभुळत्या, उबदार धुंदीमध्ये वावरत असतो. अजून माझे खूप आयुष्य पडले आहे, जगायचे खूप बाकी आहे, असे म्हणता म्हणता सटकन बालपण संपून जाते. पुढे येतो तो तारुण्याचा कैफ. मी तरुण आहे, मी तरुण आहे असा रोमांरोमात चाललेला कंठरव काही र्वष कसाबसा टिकतो अन् एक दिवस तारुण्यही हरणाच्या पाडसासारखी चपळ उडी घेऊन, गुंगारा देऊन केव्हा पळून जाते हेसुद्धा समजत नाही. पंचावन्न-साठीच्या उंबरठय़ावर आपला अखेरचा अध्याय चालू झाल्याची जाणीव फार थोडय़ांना होते. त्यापुढे काही वर्षांनी शरीररूपी पानाचा देठ अधिक पिकला की, भलीभली माणसे- मग ते महापुरुष असोत वा खलपुरुष सारे कासावीस होऊ लागतात.

साफल्यपूर्ण जीवनाची पुरचुंडी गाठीला बांधून हरी हरी करण्याच्या तयारीत फार थोडे जण असतात. बाकीचे बहुतांशी गोंधळलेले. आतून हादरून गेलेले असतात. अजून माझी जगायची खूप तृष्णा होती. हे करायचे होते, ते करायचे बाकी राहिले, अशा विचाराने त्यांचे मस्तक पेटते. जर तुम्ही फाजील धनसंचय केला असेल तर त्या खजिन्याला विळखा घालायच्या इच्छेने अनेक विषस्पर्श जिभल्या चाटीत तुमच्या अवतीभोवती वळवळत रहातात. बनेल नातलगांचे तांडे हाकलून दूर लोटले तरी हक्क सांगत पाय रोवून उभे रहातात. तो कर्तृत्वान पुरुष एका नारीऐवजी अनेक जणींच्या बाहुपाशात गुंतून गेला असेल तर त्या हिसाबकिताबाची आणि संतापाची परी काही वेगळीच असते. महापुरुष असोत वा खलपुरुष त्यांचा एकदा मृत्यूच्या अटळ दरवाज्याकडे प्रवास सुरू झाला की, तो प्रवास अभ्यासकांसाठी चिंतनाचा, जनतेसाठी विस्मयाचा अन् कादंबरीकार व नाटककारांच्या लेखण्यांसाठी एक सुगीची पर्वणी ठरतो.

विदर्भातील एक ज्येष्ठ संशोधक, अभ्यासक आणि विद्वान ललित लेखक श्री. शरद कोलारकर यांचे ‘काही महनीय व्यक्तींचे अखेरचे दिवस’ हे पुस्तक जेव्हा माझ्याकडे प्रस्तावनेसाठी आले तेव्हा मला मोठी अपूर्वाई वाटली. या ग्रंथात एकीकडे महात्मा गांधी, अब्राहम लिंकन, चर्चिल, नेपोलियन, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, लेनिन, जवाहरलाल नेहरू, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. आंबेडकर अशा महापुरुषांच्या मांदियाळीत पोचलेल्या श्रेष्ठ व्यक्ती आहेत. तशाच इंदिरा गांधी, जॉन एफ. केनेडी, झुल्फीकार अलि भुट्टो, माओ, स्टॅलिन असे राजकारणाच्या वादळावर आरूढ झालेले तेजस्वी तारे आहेत. असेच हिटलर, मुसोलिनी, औरंगजेब, बॅ. जीना यांच्यासारखे रंगतदार नाटय़मय जीवन लाभलेले खलपुरुषही आहेत. या अत्यंत वाचनीय, ललितरम्य लेखांचे परिशीलन करताना इतिहासातल्या आणि साहित्यातल्या अनेक ज्येष्ठांचे अखेरचे दिवस, त्यांच्या कथा, दंतकथा माझ्या डोळ्यांसमोर तरळून गेल्याशिवाय राहिल्या नाहीत. मृत्यू छोटय़ा वा मोठय़ाचा असो, त्याच्या सावल्या, त्याची चाहूल वा हूल या गोष्टी तशा भीतीदायकच. त्याचे वर्णन कमी-अधिक शब्दांत करता येईल. या निमित्ताने बालपणी वसंत सबनीस आणि दादा कोंडके मंडळींनी सादर केलेली ‘विच्छा माझी पुरी करा’ची बतावणी आठवते. हवालदार झालेले दादा शाहिरांना म्हणजे सबनीसांना विचारतात, ‘‘राजा मरण पावला की त्याचे वर्णन कसे कराल?’’

‘‘राजासाहेबांचे महानिर्वाण.’’

‘‘अन् प्रधान मेला तर?’’ शाहीर उत्तर देतो- ‘‘प्रधान साहेबांचे दु:खद निधन!’’

‘‘अन् माझ्यासारखा एखादा हवालदार गचकला तर?’’- ‘‘चला मातीला चलाऽ!’’ एकूणच राजा असो वा रंक, श्रेष्ठ वा कनिष्ठ मृत्यू हा एक ना एक दिवस प्रत्येकाच्या दरवाजावर न चुकता खडा राहणारा पाहुणा असतो.

पानिपताच्या ऐन घमासान महायुद्धात अहमदशहा अब्दाली गोविंदपंत बुंदेल्यांची मुंडी कापून ती भाऊसाहेबांकडे संदुकीमध्ये घालून पाठवून देतो. गोविंदपंत पेशव्यांचे उत्तरेतील कारभारी. पातशहा मुंडीसोबत पेशव्यांना चिठ्ठी पाठवतो, ‘‘तुमच्या स्वागताची तयारी करावी यासाठी तुमच्या आधी तुमच्या कारभाऱ्याला तिकडे स्वर्गात पाठविले आहे.’’ तेव्हा पेशवे त्याला जाबसाल पाठवून देतात, ‘‘तो रस्ता कुणाला चुकला आहे? आम्ही मृत्यूचा मुका घ्यायला सिद्ध आहोत!’’

महापुरुषांच्या वर्तनाने देश घडतात आणि काही वेळा त्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे बिघडतातसुद्धा. त्यांच्या वास्तव्याने, कर्तृत्वाने देशाची, मानवी समाजाची उंची वाढते. खलपुरुषांच्या कारवायांमुळे काही राष्ट्रांची घडी विस्कटली आहे. दुसऱ्या महायुद्धात लक्षावधी ज्यूंची कत्तल हिटलरने केली. नेपोलियनने आपल्या तलवारीने अध्र्या जगाचा नकाशा बदलला. बॅ.मोहमद अलि जीनांच्या अंध महत्त्वाकांक्षेमुळे हिंदुस्तानसारख्या खंडप्राय देशाचे तुकडे झाले.

बॅ. जीना यांना कॅन्सर झाल्याची वार्ता आधीच ठाऊक असती तर देशाची फाळणी टळली असती , असे काही भाबडय़ा मंडळींना वाटते.

त्यामुळेच समाजउद्धारक आणि देशतारक महापुरुषांच्या चरित्राबद्दल समाजमनाला आकर्षण असते. भविष्यातील चुका टाळण्यासाठी खलपुरुषांचे, क्रूरकम्र्याचे चारित्र्यही तपासून पहावे लागते.

बऱ्याचदा मनुष्य मेल्याशिवाय त्याची किंमत लोकांना कळत नाही. अन् जेव्हा ती कळते तेव्हा दुर्दैवाने वेळ निघून गेलेली असते. जॉन एफ. केनेडी आपल्या तारुण्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत फक्त ०.२ टक्के मताधिक्याने, केवळ दैव बलवत्तर म्हणून निवडून आले होते. त्यांनी निक्सनचा पराभव केला होता. त्यांना लाभलेली शेलाटी शरीरयष्टी, त्यांचे मृदू हास्य आणि संभाषणातील चातुर्य या बळावर पाहता पाहता ते लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन पोचले; परंतु अमेरिकेचे अध्यक्ष असलेल्या आपल्या कर्तृत्ववान पतीची किंमत त्यांची पत्नी जॅकलिन केनेडी हिला फारशी कधी समजली नाही. तिला म्हणे अध्यक्षांच्या राजप्रासादाची, ‘व्हाइट हाऊस’ची अ‍ॅलर्जी आली होती. त्यामुळेच नवऱ्याच्या विरोधाची तमा न बाळगता ती ओनॅसिस नावाच्या कोटय़धीशाच्या ख्रिस्तिना नावाच्या महागडय़ा ग्रीक जहाजावर मौजमजा करायला बाहेर पडायची. २२ नोव्हेंबर १९६३ या दिवशी डलास येथे केनेडी जनतेला अभिवादन करत उघडय़ा मोटारीतून पुढे चालले होते. तेव्हा गर्दीतून दोन गोळ्या आल्या आणि जॉन केनेडी रक्तबंबाळ झाले. तेव्हा ‘ओऽऽनो; करीत जॅकलिनने त्यांना कळवळून मिठी मारली होती. दुर्दैवाने त्या गोळीबारातच तरुण केनेडींचा मृत्यू ओढवला.

महापुरुषांच्या अखेरच्या पर्वात त्याच्या सोबत राहणारे, त्याच्या सहवासाचा सुगंध लाभलेले कोणी कुशल लेखणीबहाद्दर सोबत असतील तर त्यासारखी बहार नाही. टी. जी. तेंडुलकरांसारखा सव्यसाची अभ्यासक जीवनभर गांधीजींच्या सावलीची सोबत करत होता. त्यामुळेच त्यांनी लिहिलेले नऊखंडी चरित्र आणि टिपलेली असंख्य छायाचित्रे हा आज आपल्या राष्ट्राचा ठेवा बनला आहे. वंगबंधू चित्तरंजन दास यांच्या अखेरच्या दिवसांचे करुण चित्र साक्षीदार या नात्याने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी मोठय़ा तन्मयतेने आपल्या आत्मचरित्रात रेखाटलेले आहे.

बऱ्याचदा मृत्युपंथाच्या कुशीवरसुद्धा महापुरुष आपली विनोदबुद्धी शाबूत ठेवल्याशिवाय राहात नाहीत. मुंबईच्या सरदारगृहामध्ये जेव्हा लोकमान्य टिळक आपला अखेरचा अध्याय व्यतीत करत होते तेव्हा आपल्या थोर पित्याच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी त्यांच्या सर्व मुली त्यांच्याभोवती गोळा झाल्या होत्या. तेव्हा त्यांच्याकडे पाहात लोकमान्य विनोदाने बोलले, ‘‘पुन्हा सगळ्या जमलात का तुम्ही? नाही तरी उठल्यासुटल्या माहेरी यायची सवयच जडली आहे तुम्हाला.’’

महापुरुषांच्या महानिर्वाणावेळी अनेक श्रद्धा-अंधश्रद्धांनाही ऊत आल्याशिवाय राहात नाही. लोकमान्यांना जेव्हा अखेरची घरघर लागली तेव्हा ब्रह्मवृंदाना त्यांचा शेवट शुष्क पलंगावर होऊ नये असे वाटले म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी जमिनीवर दर्भाचे उच्चासन उभारले होते.

लोकमान्य टिळकांच्या प्रेतयात्रेला सुमारे दोन लाखांहून अधिक लोक गोळा झाले होते. पावसाची पर्वा न करता ती प्रचंड महायात्रा चालली होती. एका महनीय व्यक्तीने पुढे होऊन लोकमान्यांच्या ताटीला खांदा दिला. तेव्हा टिळकांच्या शिष्याने त्यांना हटकले, ‘‘तुम्ही ब्राह्मण नसल्यामुळे तुम्हाला खांदा देण्याचा अधिकार पोचत नाही.’’ ती महनीय व्यक्ती म्हणजे मोहनदास करमचंद गांधी. गांधीजींनी तिथल्या तिथे उत्तर दिले होते, ‘‘मी लोकसेवक आहे. लोकसेवकाला जात नसते.’’

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे. एफ. केनेडी यांचा खून झाला होता.

न. चिं. केळकरांसारख्या ज्येष्ठ पत्रकार, देशसेवकांनी वृत्तांत लिहिल्यामुळे लोकमान्यांच्या अखेरच्या दिवसांचे चांगले चित्रण झाले आहे. मात्र जेव्हा रायगडावर शिवरायांचे महानिर्वाण झाले तेव्हाचे प्रथमदर्शी पुरावे नाहीत. बखरकारांनी रेखाटलेल्या बखरी या खूप वर्षांच्या अंतरांनी लिहिलेल्या असल्यामुळे त्या ऐकीव गप्पांवर आधारीत आणि बऱ्याचशा पूर्वग्रहदूषित अशाच आहेत. याउलट डॉ. सुशीला नायरांसारख्या व्यक्तीमुळे महात्मा गांधी आणि कस्तुरबा गांधी यांच्या अखेरच्या कालखंडावर चांगला प्रकाश पडतो.
गांधीजींच्या सोबत बासष्ट वर्षे संसार करणाऱ्या कस्तुरबांचाही अंतकाळ खूप करुण आहे. त्यांचे दु:खद निधन पुण्याच्या आगाखान पॅलेसमध्ये कारावासात झाले तेव्हा दुष्ट ब्रिटिश सरकारने त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी जास्तीत जास्त शंभर लोकांना हजर राहायची परवानगी दिली होती. कस्तुरबांच्या कृश देहाला बापूजींनीच स्नान करविले. स्वत: चरख्यावर कातलेली लाल काठाची साडी त्यांनी त्यांना नेसवल्याचे सुशीला नायर यांनी आपल्या डायरीत लिहिले आहे.

लोकमान्यांच्या ताटीला खांदा देण्यासाठी महात्मा गांधींना ते ब्राह्मण नसल्यामुळे परवानगी नाकारण्यात आली होती.

एखाद्या कोणा हरीलालला गांधीजींनी बाप या नात्याने न्याय दिला नाही, असा गळा काढणारे आजकाल अनेकजण भेटतात. मात्र त्यांनी हे विसरू नये की, न्यायमूर्ती खोसलांच्या अहवालानुसार भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान झालेल्या भीषण दंगलीमध्ये सुमारे पाच लाख निरपराध जिवांना आपले प्राण गमवावे लागले होते. हिरोशिमा आणि नागासाकीमध्येसुद्धा मिळून दोन लक्ष लोक मृत्यू पावले होते. १५ ऑगस्टच्या लाल किल्ल्यावरील सोहळ्याला नवी कोरी वस्त्रेप्रावरणे परिधान करून अनेकजण हजर होते. त्या खाशा समारंभात अनेकांची काव्यमय भाषणेही झाली; परंतु त्या क्षणी मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस त्या उत्सवी समारंभाच्या आजूबाजूलाही फिरकला नाही. त्याच दरम्यान बंगालच्या नौखालीसारख्या भागात हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली माजल्या होत्या तेव्हा गांधीजी स्वत:चा जीव धोक्यात घालून आगीच्या वणव्यातून फिरत होते. जर गांधीजींनी जागोजाग दंगलग्रस्त भागांना भेटी देऊन लोकांची मने वळवली नसती तर किमान पंचवीस लाख निरपराध जिवांना आपल्या प्राणाला मुकावे लागले असते.

काळच जणू थोरांच्या मृत्युपर्वाचे अनेकदा संकेत देत असतो. गांधीजींच्या जीवनातील २९ आणि ३० जानेवारी हे दोन दिवस खूप महत्त्वाचे ठरतात. दिल्लीच्या तीन मूर्तीच्या लायब्ररीमधील पत्रव्यवहार, रोजनिशा, ध्वनिमुद्रित संभाषणांचा धांडोळा घेतला की अनेक गोष्टी बाहेर येतात. २९ जानेवारीच्या दुपारी ‘बिर्ला हाऊस’च्या हिरवळीवर गांधीजी उघडय़ाबंब अंगाने एका साध्या पंचानिशी उन्हाचा लाभ घेत होते. त्यांच्या डोक्यावर आसामी वळणाची टोपी होती. तेव्हा बापूंच्या भेटीसाठी इंदिरा गांधी, त्यांच्या कडेवर असलेला चार वर्षांचा राजीव आणि नेहरूंची भाची व प्रसिद्ध लेखिका नयनतारा सेहगल तेथे पोचल्या. चाचा नेहरूंची कन्या आली या कौतुकापोटी तेथे काम करणाऱ्या माळ्याने ओंजळभर मोगऱ्याची टपोरी फुले इंदिराजींना भेट दिली. गांधीजी आणि इंदिरा गांधीमध्ये संभाषण चालू असतानाच लहानग्या राजीवने मोगऱ्याचे एक एक फूल बापूजींच्या पायाच्या लांब बोटांमध्ये खोवून टाकले. थोडय़ा उशिराच गांधीजींच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी राजीवला जवळ घेऊन चपापल्या सुरात सांगितले, ‘‘बेटा पायाच्या बोटात अशा तऱ्हेने फुले फक्त मृत व्यक्तीसाठी खोवायची असतात, जिवंत मनुष्यासाठी नव्हे!’’ अन् दुर्दैवाने अवघ्या पंचवीस-तीस तासांमध्येच त्याच ठिकाणी गांधीजींची दुर्दैवी हत्या घडून यावी या गोष्टीला काय म्हणावे!

३० जानेवारी १९४८ च्या दिवसाचे कोलारकर उत्तम वर्णन करतात. पहाटे पावणेचार वाजताच गांधीजींनी प्रार्थना आटोपली. त्यांना त्या दिवशी खोकल्याचा खूप त्रास होत होता. त्यामुळे मनू लवंगीची पूड तयार करत म्हणाली, ‘‘बापू, संध्याकाळच्या प्रार्थनेपूर्वी देईन मी तुम्हाला.’’ त्यावर बापूजी नकळत उद्गारले, ‘‘संध्याकाळच्या प्रार्थनेपर्यंत मी जिवंत राहीन किंवा नाही हेच मला सांगता येणार नाही.’’ मृत्यूच्या उंबरठय़ावर पोचल्यावरसुद्धा महापुरुष हे विद्यार्थीच राहतात. नित्य काहीं ना काही शिकतात, हे गांधीजींनी त्या अखेरच्या दिवशीही सिद्ध करून दाखवले. त्या पहाटे ते बंगाली भाषा शिकण्यासाठी आपले नित्याचे पाठ काही वेळ गिरवत राहिले होते. एकीकडे मोठमोठय़ा जबाबदारीचे आणि दुसरीकडे एका दुभंगलेल्या खंडप्राय देशाचे ओझे गांधीजींच्या पाठीवर होते. त्यामुळेच ते अनेकांच्या पापाचे आणि शापाचेही धनी बनले होते. आदल्या दिवशी त्यांना शिखांचे नेते मास्तर तारासिंग यांनी राजकारण सोडून हिमालयात निघून जाण्याचा सल्ला दिला होता. एवढेच नव्हे तर एका निर्वासितानेही आदल्या दिवशी त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला होता.

मृत्यूनंतर कस्तुरबांच्या कृश देहाला बापूजींनीच साडी नेसवली..

गुप्तचर खात्याने गांधीजींवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचा अहवाल आधी काही महिने दिला होता. त्यामुळे ‘बिर्ला हाऊस’च्या परिसरात साध्या वेषातील पोलीस ठेवण्यास गांधीजींनी मोठय़ा मुश्किलीने परवानगी दिली होती. मात्र प्रार्थना सभेसाठी आपल्याकडे येणाऱ्या लोकांची झडती घेण्यास त्यांनी पोलिसांना मज्जाव केला होता. त्यामुळेच नथुराम गोडसे नावाचा माथेफिरू इसम पिस्तूल घेऊन सहजगत्या तेथे पोहोचू शकला. अमृतसरच्या सुवर्ण मंदिरामध्ये लपलेल्या अतिरेक्यांवर इंदिरा गांधींनी कठोर कारवाई केली. त्यानंतर पंतप्रधान श्रीमती गांधी यांनी आपल्या रक्षणासाठी नेमलेल्या फौजफाटय़ामध्ये शीख पोलीस व अधिकारी यांना टाळावे असाही गुप्त अहवाल गुप्तचरांनी सादर केला होता. तो श्रीमती गांधींनी जुमानला नाही. महात्मा गांधी असोत, वा इंदिरा गांधी असोत दोघांनीही आपल्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून एक प्रकारे स्वत:हूनच मृत्यूला निमंत्रण दिले होते. नव्हे, स्वत:च्या प्राणाची, सुरक्षेची पर्वा न करता सर्वच जातीधर्मावर अन् मनुष्याच्या मांगल्यावर दोघांनीही अवाजवी श्रद्धा ठेवली होती.

जेव्हा कर्तृत्ववान पुरुषांचा वा ज्येष्ठांचा अंतकाळ जवळ येतो तेव्हा फायद्या-तोटय़ाची गणिते गृहीत धरूनच अनेक गोष्टी लपवल्या जातात. कैकांच्या दुर्धर आजाराची बिंगे चोरून ठेवली जातात. एवढेच नव्हे तर मृत्यूनंतरही मेल्या मुडद्याशी हे दुष्ट व्यवहारी जग खेळ खेळायला मागे-पुढे पाहात नाही. कागदोपत्री सह्या-अंगठे उठवण्यासाठी कृत्रिम श्वासोच्छ्वासाचा पुरवठाही केला जातो (व्हेंटिलेटर).

श्रेष्ठ पुरुषांच्या महत्त्वाकांक्षेचा चावा हा काळसर्पापेक्षाही जहरी असतो. दादाभाई नवरोजी यांचे खासगी सचिव म्हणून काम केलेल्या आणि उभ्या देशाने अनेक वर्षे ‘हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दूत’ या बिरुदावलीने गौरव केलेल्या बॅ. जीना यांना महत्त्वाकाक्षेची इंगळी चावली. त्यामुळेच केवळ व्यक्तिगत स्वार्थापोटी हिंदूंचे वर्चस्व असलेल्या हिंदुस्थानात आणि गांधीजींचे श्रेष्ठत्व असलेल्या काँग्रेसमध्ये न राहण्याचे त्यांनी ठरविले. महत्त्वाकांक्षेच्या लालसेपायीच त्यांनी हिंदुस्तानसारखा देश तोडून इतिहासाचा प्रवाह बदलला आणि ते स्वतंत्र पाकिस्तानचे पहिले राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांचा क्षयाचा रोग जुना होता. मात्र त्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर झाल्याचे तेरा महिने आधी त्यांच्या निकटतम मंडळींच्या निदर्शनास आले होते. या कॅन्सरची गुप्त वार्ता आधीच ठाऊक असती तर कदाचित देशाची फाळणी टळली असती, असे काही भाबडय़ा मंडळींना वाटते. मात्र बॅ. जीना आणि त्यांच्या धर्माध पाठीराख्यांनी केलेली द्वेषाची पेरणी इतकी जहरी आणि पराकोटीची होती की, एखाद्या दरडीवरून खाली कोसळणारी बलाढय़ शिळा जशी थांबत नाही तशी देशाची फाळणी अटळ होती हेच खरे.

आपले पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू वयाच्या सत्तावन्नव्या वर्षी पंतप्रधान बनले. त्यांना सतरा वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द लाभली. अलिप्त राष्ट्रसंघटनेची स्थापना करून ते शांतिदूत ठरले. ते एक सच्चे, सालस, सुहृदयी आणि विद्वान अभ्यासू नेते होते. ‘लोकशाही दिन’ नावाचे फॅड खूप नंतर आले. मात्र चाचा नेहरू रोज सकाळी आठ ते नऊ या वेळात स्वत: जनतेच्या तक्रारी ऐकत. देशाच्या कानाकोपऱ्यातला कोणीही मनुष्य त्यांना भेटू शकत असे. आपणास आलेल्या प्रत्येक पत्राचे उत्तर गेलेच पाहिजे असा त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे अनेकदा पत्रांवर सह्या करता करता ते आपल्या बिछान्यावरपायजम्यात बसून पहाटेपर्यंत जागत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसुद्धा आलेल्या सर्व पत्रांना न चुकता उत्तरे देत असत.

नेहरू घराणे आणि भुवनेश्वर यांचे काय विचित्र नाते आहे?

१९६० साली पंडितजी भुवनेश्वरच्या दौऱ्यावर असताना त्यांना पॅरेलिसीसचा अटॅक आला. त्यामुळे त्यांना विमानाने दिल्लीत आणण्यात आले. ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली त्याच्या आदल्या दिवशी त्या नेमक्या भुवनेश्वरच्याच दौऱ्यावर होत्या. त्यामुळे नेहरू घराण्याचे भुवनेश्वरशी काय विचित्र नाते आहे याचा बोध होत नाही. स्वातंत्र्यानंतर पंडित नेहरूंनी चीन या शेजारी राष्ट्रावर खूप प्रेम केले. एक सच्चा सांस्कृतिक शेजारी समजून चीनला युनोमध्ये स्थान मिळावे म्हणून स्वत:चे वजन खर्चिले. मात्र त्याच चीनने १९६४ मध्ये भारतावर आक्रमण केल्याने त्यांना अतीव दु:ख झाले. नेहरूंच्या जाण्यामुळे, नेहरूयुगाच्या अस्तामुळे अनेकांना धक्का बसला. पंडितजींच्या निधनानंतर तो धक्का सहन न झाल्याने काही तासांतच प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मेहबूबखानसुद्धा पैगंबरवासी झाले.

महापुरुषांचे आयुष्यही अनेक श्रद्धा, अंधश्रद्धा आणि अतक्र्य घटनांनी भरलेले असते. श्रीमती इंदिरा गांधी यांच्या अंतकाळाबद्दल भरभरून लिहिताना डॉ. कोलारकर यांनी पुपुल जयकर यांच्या पुस्तकाचा आधार घेतला आहे. सुमारे सोळा वर्षांपूर्वी चंद्रशेखर प्रभू यांच्यासमवेत मी पुपुल जयकर यांच्या मलबार हिलवरील बंगल्यामध्ये अनेकदा गेलेलो आहे. त्या वेळी इंदिराजींच्या अंतिम पर्वाबद्दल त्यांच्या तोंडून खूप गोष्टी ऐकायचा योगही जुळून आला होता. खरे तर २३ जून १९८० या दिवशी संजय गांधी यांच्याबरोबर माधवराव शिंदेही विमान उड्डाण करण्यासाठी सफदरजंग विमानतळावर हजर होते. संजय त्यांना आपल्या सोबत नेणार होते; परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी अन्य सहकाऱ्याला सोबत घेतले अन् पुढे काही वर्षांनी माधवरावांचाही मृत्यू हवाई अपघातातच व्हावा या गोष्टीला काय म्हणावे!

संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर इंदिरा गांधी मनाने खूप हळव्या झाल्या होत्या. मानसिकदृष्टय़ा खचल्या होत्या. जयकरांच्या भाषेत अंधश्रद्धेच्या पूर्ण आहारी गेल्या होत्या. संजय यांच्या निधनापूर्वी काही भविष्यकारांनी इंदिराजींना पत्रे पाठवली होती. त्यामध्ये संजय यांच्या निधनाची अचूक तारीख दर्शवली होती. अशा पत्रांकडे आपण दुर्लक्ष केल्याचा श्रीमती गांधी शोक व्यक्त करत. त्यांच्याकडून पुढे झाशीजवळच्या एका काली मंदिरात लक्षचंडीचा पाठ अनेक वर्षे अखंडपणे चालू होता असे म्हणतात. राजकारण आणि राजव्यवहार अनेक श्रद्धा आणि अंधश्रद्धांनी भरून गेलेला असतो. महाराष्ट्रात काही गावच्या कार्यक्रमाला सहसा अधिकारपदावरील व्यक्ती जात नाहीत. महाराष्ट्रातील अनेक गावांतून असे अनेक आबा आणि अण्णा आहेत ज्यांच्याकडून आपल्या आवडत्या मंत्र्याच्या गळ्यात हार पडला की, काही महिन्यांतच तो अधिकारपदावरूनजातो अशा समजुती असतात. त्यामुळे त्यांच्याकडून हार पडू नये याची काळजी अनुयायी घेतात.

संजय गांधी यांच्या अपघाती मृत्यूनंतर इंदिरा गांधी अंधश्रद्धेच्या पूर्ण आहारी गेल्या.

चीनकडून भारताच्या झालेल्या पराभवाचे शल्य जसे नेहरूंना होते तसेच भारतीय लष्कराच्या चीनकडून जागोजाग झालेल्या पराभवाचे मोठे दु:ख स्वातंत्र्यवीर सावरकरांनाही झाले होते. त्यामुळे ते असहाय अवस्थेत रडल्याची नोंदही कोलारकर करतात. १९५७ मध्ये १८५७ च्या स्वातंत्र्यसमराला १०० र्वष पार पडली होती. त्या निमित्ताने भारतीय कार्यकर्त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ दिल्लीच्या रामलीला मैदानावर एक मोठा सोहळा आयोजित केला गेला होता. त्या ठिकाणी बॅ. सावरकर यांच्यासमवेत व्यासपीठावर येऊन बसायला नेहरूंनी नकार दिला. मात्र दिव्य दृष्टीच्या आणि कवी हृदयाच्या तात्यासाहेब सावरकरांनी एक अपूर्व नियोजन केले. त्यांनी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे एक भव्य तैलचित्र ठेवून दिले. विज्ञानशील दृष्टी असलेल्या सावरकरांनी आपल्या धर्मपत्नीच्या मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी केले नाहीत वा श्राद्धही घातले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

डॉ. आंबेडकरांनी अस्पृश्यउद्धारासाठी जीवनभर दिलेला लढा, माईसाहेबांचे त्यांच्या जीवनातले आगमन, नागपूरचा तो ऐतिहासिक दीक्षा समारंभ, शेवटच्या १०-१२ वर्षांतला त्यांचा तो आजार, त्या करुण परंतु क्रियाशील दिवसांचे वर्णनही कोलारकरांनी अनेक तपशिलांसह केले आहे.

करालकाळाचे नाटय़ अनेकदा विस्मयजनक असेच असते. मनुष्याचा अटळ मृत्यू अनेकदा आपल्या अशुभ पावलांचे पूर्वसंकेत त्याच्या स्वप्नावस्थेत येऊन देऊन जात असतो. या निमित्ताने मला शेक्सपिअरच्या ‘ज्युलिअस सीझर’ या नाटय़कृतीची आठवण होते. ज्या दिवशी रोमच्या भर दरबारात त्याच्या सहकाऱ्यांकडून त्याची निर्घृण हत्या झाली होती, त्याच्या आदल्या रात्री सीझरच्या पत्नीच्या स्वप्नात त्याचा तांबडय़ा रक्ताने माखून गेलेला पुतळा येतो. त्यामुळे त्याने त्या दिवशी दरबारात जाऊ नये, असा हट्ट ती धरते. गुलामगिरीच्या पद्धतीविरुद्ध कठोर पावले उचलणारा आणि अमेरिकेच्या विविध राज्यांचे एकत्रीकरण घडवून आणणारा, महान वक्ता आणि अमेरिकेचा अध्यक्ष अब्राहम लिंकन याच्या बाबतीत असेच काहीसे घडले होते. इथे नाटकातल्या सीझरच्या पत्नीसारखे अन्य कोणाला स्वप्न पडले नव्हते, तर खुद्द अध्यक्ष लिंकननेच काही दिवस आधी ते भीषण स्वप्न पाहिले होते. अमेरिकेच्या व्हाइट हाऊसमध्ये पसरलेली ती स्मशानवत शांतता. प्रत्येक कानाकोपऱ्यातून दाटून येणारा हुंदक्यांचा ध्वनी. स्वत: स्वप्नावस्थेत चाललेला लिंकन. तो तिथे उभ्या असलेल्या रक्षकाला विचारतो, ‘‘मुडदा कोणाचा?’’ रक्षक सांगतो, ‘‘अध्यक्षांचा.’’ पुढे अनेक दिवस त्या स्वप्नाने लिंकनला अस्वस्थ आणि चिंतातुर करून सोडले होते अन् दुर्दैवाने १४ एप्रिल १८६५ या दिवशी एका नाटय़गृहात कुटुंबीयांसमवेत नाटक पाहत बसलेल्या लिंकनची दुर्दैवी हत्या घडून आली. त्या कटामध्ये एका प्रसिद्ध नटाचा प्रत्यक्ष हात होता. ‘महानायक’ कादंबरीच्या लेखनावेळी मला एक संदर्भ मिळाला. १९३२ च्या दरम्यान मुंबईमध्ये स्वर्गीय नाथालाल पारेख यांच्या घरी सुभाषचंद्र बोस मुक्कामाला होते. तेव्हा त्यांना उंच आभाळात झेपावलेले एक विमान, नक्षत्रांच्या मंडपाला लागलेली भीषण आग अन् आगीच्या कल्लोळात सापडलेले आपण असे एक विचित्र स्वप्न पडले होते. जणू लिंकन आणि नेताजींसारख्या महापुरुषांना काळाने त्यांच्यावर झडप घालण्यापूर्वीच त्याच्या रंगीत तालमी आधी करून दाखवल्या होत्या.

कधी कधी एखाद्या मनुष्याच्या हातून क्षुल्लकशी चूक घडते आणि अंती ती त्याला मृत्यूच्या खिंडीकडे ओढून न्यायला कारणीभूत ठरते. भारताशी एक हजार र्वष युद्ध करण्याची वल्गना करणारे अन् भारतद्वेषाच्या व अमोघ वक्तृत्वाच्या बळावर पाकिस्तानच्या अध्यक्षपदी पोहोचलेले झुल्फिकार अलि भुट्टो.

पाकिस्तानी जनतेने आयुबखानला बाजूला करून भुट्टोला अध्यक्ष बनवले. त्याच भुट्टोंनी लेफ्टनंट झिया-उल्-हक नावाच्या एका ठेंगू, प्रभावहीन व सामान्य वकूबाच्या मनुष्याला पाकिस्तानचे सेनापती बनवले. झिया-उल्-हक हा भुट्टोचा केवळ प्रशंसक, केवळ मुंडी हलवणारा होयबा. एकूणच सोयीचा निरुपद्रवी लष्करी अधिकारी म्हणूनच त्याला भुट्टोने जवळ केले होते. मात्र भुट्टो कधी कधी त्याची ‘माकड’ म्हणून टर उडवायचे. पाहुण्यांसोबत खाना घेताना ‘अरे, माझा माकड सेनापती कुठे आहे? बोलवा रे त्याला’ असे अपमानकारक उद्गार काढायचे. पुढे अशा व्यकिगत अपमानामुळे झियासारखा एक सामान्य माणूस आतून पेटून उठला अन् त्याने आपल्या निर्माणकर्त्यां भुट्टोलाच कैदेत टाकले. त्याच्यावर सगळे गुन्हे दाखल करून जगापुढे न्यायव्यवस्थेचा देखावा मांडून ४ एप्रिल १९७९ ला त्याने झुल्फिकार अलि भुट्टोसारख्या बुद्धिमान आणि ताकदवान नेत्याला फासावर लटकवले.

हुकूमशहा आणि खलपुरुषांच्या बाबतीत तर मृत्यूचा चेहरा अधिक करपलेला असतो. मोठा मनुष्यसंहार घडवून आणणाऱ्या हिटलरचा मृत्यू एप्रिल १९४५ मध्ये एका बंकरमध्ये झाला. हिटलरची प्रेयसी इव्हा ब्राऊन हिची हिटलरची पत्नी म्हणून मरायची इच्छा होती. त्यामुळे त्या दोघांनी मृत्यूच्या दारातच आपले मंगल पार पाडले. हुकूमशहांच्या व सैतानाच्या काळजाच्या कोपऱ्यातसुद्धा हिरव्या जागा असतात हेच खरे. या निमित्ताने मला औरंगजेबाची आठवण होते. तो अगदी सतरा-अठरा वर्षांचा होता तेव्हा बुऱ्हाणपूर येथे एका सुंदर तरुणीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. दुर्दैवाने कसल्याशा आजाराने तिचे खूप लवकर निधन झाले. या दु:खद प्रसंगामुळे तर त्याच्या निर्दयीपणामध्ये वाढ झाली नसावी ना?

अखेरच्या काही वर्षांत आजारी असूनही डॉ. आंबेडकर क्रियाशील होते.

औरंगजेब खुल्ताबादजवळ वयाच्या नव्वदाव्या वर्षी अतिशय निराश अवस्थेत मृत्यू पावला. अवघ्या पाच-सहा महिन्यांच्या कालावधीत महाराष्ट्राचे धिरडे भाजून काढू अशा महत्त्वांकाक्षेने तो इकडे चालून आला होता. मात्र त्याच्या विरोधात सतत आठ वर्षांहून अधिक काळ संभाजीराजांनी १०४ लढाया खेळून त्याच्या नाकात दम भरला. पुढे सोळा-सतरा र्वष शिवाजीराजांच्या ताराबाई आणि येसूबाई या मर्द सुनांनी त्याच्याविरुद्ध जंग छेडले. हा औरंगजेब स्वत: पाहिलेली एखादी व्यक्ती आणि ऐकलेला शब्द कधीही विसरत नसे. त्याच्या अखेरच्या दिवसांचा लेखाजोखा मांडताना डॉ. कोलारकरांनी त्याचे मृत्युपत्रच उद्धृत केले आहे. ते मला महत्त्वाचे वाटते. स्वत: टोप्या शिवून प्राप्त झालेल्या चार रुपये दोन आण्यांमधून आपल्या कफनावरचा खर्च पार पाडावा, असे तो लिहितो. त्याच वेळी ‘सन्मार्ग सोडून इतरत्र भटकणाऱ्या माझ्यासारख्या (पापी) मनुष्याला बोडक्या डोक्याने दफन करावे’, असे तो लिहितो. कारण ‘पापी मनुष्याला बोडक्या डोक्याने अल्लासमोर नेल्यास अल्ला त्याला क्षमा करतो’ अशीही कबुली औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात दिली आहे. आपल्या सेवकांकडून काही गुन्हे घडले असल्यास त्यांना उदार अंत:करणाने क्षमा करावी असे तो लिहितो. याचाच दुसरा अर्थ असा की, जेव्हा मनुष्याला मृत्यूचा भयप्रद चेहरा दिसतो, तेव्हा औरंगजेबासारख्या सैतानांनाही चळाचळा कापरे भरते. ज्या पद्धतीने त्याने दारासारख्या आपल्या अनेक भावांना सत्तेसाठी निष्ठुरपणे मारले, त्यांच्याच करुण किंकाळ्या त्याला ऐकू येत असाव्यात. त्यामुळेच रेडय़ाने वेद बोलावा तशी दुसऱ्यांना क्षमा करण्याची तो भाषा बोलतो.

आपल्या मृत्युपत्रात राजाने नेहमी जागरूक असावे. राजाकडून झालेली एखादी क्षुल्लक चूक वा बेसावधपणा त्याने वर्षांनुवर्षे केलेल्या कार्याचा नाश घडवून आणतो, असे तो लिहितो. केवळ आपल्या निष्काळजीपणामुळे शिवाजी आपल्या कैदेतून निसटला अन् पुढे आपली उभी जिंदगी मराठय़ांशी लढण्यात हकनाक वाया गेली, अशी रुखरुखही औरंगजेबाने आपल्या मृत्युपत्रात न चुकता नोंदवली आहे.

नोकरीच्या निमित्ताने मला अलीकडे एका सैतानाचा चेहरा जवळून पाहायला मिळाला. २६/११च्या वेळी अतिरेक्यांनी मुंबईवर जो दुर्दैवी हल्ला केला, त्यामध्ये सांताक्रूझजवळ एका टॅक्सीत बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. त्यासाठी जिल्हाधिकारी या नात्याने मी खटला भरावयास परवानगी दिली होती. त्या निमित्ताने साक्षीदार म्हणून काही महिन्यांपूर्वी मला स्पेशल कोर्टाचे समन्स आले. त्यामुळेच मी ऑर्थररोड तुरुंगातील कोर्टात साक्षीदार म्हणून दाखल झालो होतो. तेव्हा समोर लाकडी पिंजऱ्यात अजमल कसाब हा विशी-बाविशीतला पोरगा पाय पसरून कठडय़ाला टेकून बसला होता. त्याचा चेहरा सात्त्विक अन् चेहऱ्यावरील भाव खूप निर्मळ वाटत होते. एखाद्या चाळीच्या बाल्कनीत एखाद्याचा भाचा बारीला टेकून बसावा तसा तो बसला होता, तेव्हा सरकारी वकील उज्ज्वल निकम त्याला गमतीनं बोलले, ‘‘अरे अजमल, ये हमारे पाटीलजी बहुत अच्छे उपन्यास लिखते है. चाहे तो तेरे जीवनपरभी वे अच्छा उपन्यास लिखेंगे.’’ तेव्हा अजमल तोंड पसरून निर्मळ हसला.

विज्ञानवादी दृष्टी असलेल्या सावरकरांनी आपल्या धर्मपत्नीच्या मृत्यूनंतर कोणतेही धार्मिक विधी केले नाहीत वा श्राद्धही घातले नाही.

२६/११ ला करकरे, ओंबळे, शिंदे, कामटे, साळसकर अशा मुंबई पोलिसांतील बहाद्दर मोहऱ्यांचे दुर्दैवाने शिरकाण झाले. पैकी विजय साळसकर माझा जवळचा मित्र. २६/११च्या दोनच दिवसांपूर्वी माझ्याकडे दुपारी येऊन पिठलं-भाकरी खाऊन गेला होता. त्याला बांद्रय़ाच्या अमेय हॉटेलांतले पिठलं-भाकर खूप आवडायचे. त्या निमित्ताने महिन्यातून दोन-तीन वेळा तरी तो न चुकता दुपारी माझ्या अँटिचेंबरमध्ये यायचा. गप्पा रंगायच्या. अनेकदा विजय बोलायचा, ‘‘समाजासाठी, लोकांच्या भल्यासाठी अनेक गुंडांशी सामना केला. गोळीबारांच्या फैरी खेळलो. कोणी सांगावे एक दिवस गोळागोळीचा रंग खेळतानाच आयुष्याची यात्रा संपून जायची.’’ आज दु:ख याचेच वाटते. त्या दिवशी विजयकडे त्याची लाडकी एके-४७ असती तर मरणापूर्वी हा मर्दमराठा पाचपन्नासांच्या मुडद्यांचा सडा प्रथम पाडूनच मग देवाघरी निघून गेला असता. पण काय करावे? आमच्या इतिहासाचा वसूलच असा आहे की, मराठय़ांनी कधी धोरण ठरविण्यात सहभागी व्हायचे नसते! मरणाच्या दारात मात्र न चुकता आघाडीवर राहून लढून मरायचे असते! विजयचा तो गोबरा चेहरा, दाट काळ्या मिशा, बोलके-टपोरे डोळे माझ्या डोळ्यांपुढून हलता हलत नाहीत.

जीवनाचे कसले हे विचित्र नाटय़! औरंगजेबासारखा क्रूरकर्मा मृत्यूच्या सावलीत गेल्यावर एकीकडे पश्चातापाने पोळून जातो. लोकांनी क्षमाशील राहावे असे धडे देतो अन् इकडे अजमल कसाबचा तो बाळसेदार, फसवा, पोरकट चेहरा ज्याला शेकडो निरपराध नागरिकांच्या हत्येचा जराही विधिनिषेध नाही. उलट तो आमच्या न्यायव्यवस्थेसह सर्वांवर थुंकतो आहे. या कसाबचे नव्हे तर त्याला घडविणाऱ्या पाकिस्तानातल्या त्या सैतानांच्या शाळेचे कौतुक (?) करावेसे वाटते!

एप्रिल १६८० मध्ये रायगडावर शिवाजी महाराजांचे झालेले महानिर्वाण हा एका अभूतपूर्व कर्तृत्वशाली युगाचा अस्त होता. राजांनी आग्य््रााहून स्वत:हून करून घेतलेली सुटका, त्या काळात निबीड अरण्यातून प्रथम काशीकडे आणि नंतर हैदराबादकडून दक्षिणेत शत्रूला चुकवत आपल्या राजधानीकडे घेतलेला वळसा. या मोहिमेत त्यांनी वेचलेले कष्ट, उपासमार याचा खोलवर परिणाम त्यांच्या प्रकृतीवर झाला होता. बालपणापासून सातत्याने कैक वर्षे त्यांनी घोडाफेक केली होती. मृत्यूपूर्वी काही र्वष मात्र ते नेहमी पालखीतून प्रवास करायचे. रायगडावर सात दिवसांच्या ज्वराचे निमित्त होऊन त्यांचे दु:खद निधन झाले. मात्र त्याआधी काही वर्षे ते अनेकदा आजारी पडायचे. दोन र्वष आधी तर साताऱ्याला सलग दोन-तीन महिने ते अंथरुणावर पडून होते.

हिटलरसारख्या हुकूमशहा व सैतानांच्या काळजाच्या कोपऱ्यातसुद्धा हिरव्या जागा असतात..

आपल्या महानिर्वाणापूर्वी शिवाजीराजे संभाजी राजांबाबत पूर्ण समाधानी असल्याचे आज इतिहासात अनेक घसघशीत पुरावे आढळतात. मृत्यूपूर्वी तीन महिने आधी त्यांनी संभाजी राजांना फ्रेंचांशी वाटाघाटी करायचा अधिकार दिला होता. प्रभावळीचा म्हणजेच पन्हाळा, विशाळगडासह कोकणपट्टीच्या मोठय़ा विभागाचे पूर्ण अधिकार त्यांनी आपल्या युवराजांच्या ताब्यात दिले होते. मात्र संभाजीराजांच्या सावत्र मातोश्री सोयराबाई आणि मुख्यत: अण्णाजी दत्तोसारख्या हलकट, पाताळयंत्री कारभाऱ्यांनी रायगडावर संभाजीविरुद्ध कुभांडे रचली. परिणामी पन्हाळ्याला मुक्कामी असलेल्या शंभूला त्यांच्या भावाच्या राजारामाच्या लग्नासाठी बोलावणे पाठवले गेले नाही. जेव्हा हनुमान जयंती दिवशी थोरल्या राजांचे निधन झाले त्या निधनाची बातमीही रायगडावर कैक दिवस गुप्त ठेवण्यात आली. राजांच्या आकस्मित निधनावेळी अण्णाजी दत्तो आणि मोरोपंतांसारखे कारभारीही गडावर मौजूद नव्हते. अंत्यसंस्कारापूर्वी नाशिक परिसरात असणाऱ्या मोरोपतांना तातडीने बोलावून घेण्यात आले. त्या काळातील नद्या, अरण्यांचा विचार करता नाशकाहून रायगडावर पोचायला मोरोपंतांना चार ते पाच दिवस घोडय़ावरून सहज लागले असते. तेच पन्हाळावरून मलकापूर, अंबाघाट मार्गे संभाजीराजे आपल्या पित्याच्या अंत्यदर्शनासाठी दीड दिवसात सहज पोचू शकले असते. आजही मराठा समाजात एखाद्याचा ज्येष्ठ मुलगा ठार वेडा असला तरी त्याच्याच हस्ते पित्याचे अग्निसंस्कार पार पाडले जातात. मात्र कारस्थानी कारभाऱ्यांनी रायगडावर इवल्या राजारामासोबत शिंगणापूरच्या साबाजी भोसले नावाच्या दूरच्या सोयऱ्याला अग्निसंस्कारासाठी उभे केले होते.

माझ्या ‘संभाजी’ कादंबरीमध्ये अनेक गोष्टी मी तपशीलवार नमूद केल्या आहेत. त्यामुळे या मुद्दय़ाचा विस्तार इथे अधिक न करता मी एवढेच म्हणेन, राष्ट्रबांधणीसाठी साफल्यपूर्ण जीवन कसे जगावे हे शिवाजीराजांनी तर आपल्या मातृभूमीसाठीमरणाला कोणत्या बहाद्दुरीने मिठी मारावी याची शिकवण संभाजीराजे देतात, हेच या थोर पितापुत्रांचे श्रेष्ठ योगदान आहे.

एका नाटय़गृहात कुटुंबीयांसमवेत नाटक पाहत बसलेल्या लिंकनची दुर्दैवी हत्या घडून आली.

महापुरुषांचा मृत्युकाळ हा जणू तैलबुद्धीचा एक उत्तम शिक्षक असतो. तो समाजजीवनाला जागृतीचे अनेक धडे देतो, तर खलपुरुष मृत्यूच्या आगमनाने भयभीत होतात. या अटळ उंबरठय़ावर त्यांच्यातील दुष्टावा गळून पडतो अन् तेही क्षमाशील राहण्याची शिकवण देतात. लबाड नातेवाईकांसाठी थोरामोठय़ांचा मृत्यू म्हणजे त्यांची संपत्ती हडप करण्याची जणू महापर्वणीच. कर्तृत्ववान, ज्ञानी पुरुषाच्या ग्रंथसंपदेकडे त्याच्या पश्चात लक्ष द्यायला वाळवी सोडून अन्य कोणाकडे उसंत नसते. मात्र त्याने बांधलेल्या प्रासादतुल्य बंगल्यांचा ताबा घेण्यासाठी त्याचे कलेवर घाटावर जाण्यापूर्वीच नातेवाईकांमध्ये उडालेल्या हातघाईच्या लढायाही अनेकदा पहायला मिळतात. नातेवाईकांचे सोडाच, अनेक ज्येष्ठ मंडळींच्या फाजील लाडाकोडात वाढलेल्या संस्काराच्या वाऱ्यापासून दूर राहिलेल्या बाळांना बऱ्याचदा बुढ्ढा गचकतो कधी आणि त्याची गादी आणि त्याने उभारलेल्या संस्था ताब्यात घेतो कधी अन् उंची गाडय़ा अन् बाया उडवतो कधी याची घाई लागून राहिलेली असते. अशा मंडळींच्या अखेरच्या करुणपर्वाची कल्पनाच केलेली बरी. एकूणच डॉ. कोलारकर यांच्या ‘काही महनीय व्यक्तींचे अखेरचे दिवस’ या आगामी ग्रंथाच्या निमित्ताने या विषयाकडे जागरूकपणे पहायची दृष्टी मिळते. आपल्या वयाच्या ऐंशीव्या वर्षी डॉक्टरसाहेबांनी कष्टाने केलेले संकलन, संशोधन आणि उत्तम मराठीचा साज असलेले लेखन यामुळे डॉ. कोलारकर यांचे अभिनंदन करावे तेवढे थोडे!

प्रतिक्रिया
  1. झम्प्या झपाटलेला म्हणतो आहे:

    या लेखाबद्दल आपले खूप खूप आभार 🙂

  2. dinesh gupta म्हणतो आहे:

    sir tumche lekh vachun amchya dyna madhe bhar padli

Leave a reply to dinesh gupta उत्तर रद्द करा.