Archive for जानेवारी 12, 2011

अयोध्यानगरी

Posted: जानेवारी 12, 2011 in इतिहास

सौजन्य- लोकसत्ता

दत्तात्रय बळवंत पारसनीस यांनी १८९९ मध्ये लिहिलेल्या ‘अयोध्येचे नवाब’ या पुस्तकात अयोध्येचे केलेले हे स्थलवर्णन. अयोध्या तेव्हा कशी दिसत होती, हे त्यांच्याच शब्दांत..

————————————————————————-
अयोध्या ही प्राचीन पुराणप्रसिद्ध नगरी सांप्रत वायव्य प्रांतातील फैजाबाद जिल्हय़ात फैजाबाद शहरानजीक पाच-सहा मैलांवर आहे. काशीहून लखनौकडे जाणारा औंध-रोहिलखंड रेल्वे म्हणून जो रेल्वेचा रस्ता आहे, त्या रस्त्यावर लखनौच्या अलीकडे ८९ मैलांवर फैजाबाद हे स्टेशन आहे. येथून अयोध्या गावात जाण्यास उत्तम रस्ता असून, वाहने वगैरे चांगली मिळतात. फैजाबाद हे अयोध्येच्या नवाबाच्या कारकीर्दीत इ.स. १७२४ ते इ.स. १७७५ पर्यंत राजधानीचे शहर असल्यामुळे तेथील गतवैभवदर्शक कित्येक स्थळे पाहण्यासारखी आहेत. या शहरास ‘बंगला’ असेही नाव आहे. अयोध्या येथे शरयू नदी असून, तिच्यामध्ये ‘स्वर्गद्वार’ म्हणून एक मोठे तीर्थ आहे. तेथून श्रीरामचंद्र आपले अवतारचरित्र समाप्त करून स्वर्गास गेले. म्हणून त्यास ‘स्वर्गद्वार’ असे नाव पडले आहे. त्याचे माहात्म्य अयोध्या पुराणात वर्णन केले आहे. रामचंद्राचे जन्मस्थान  येथेच असल्यामुळे हे स्थळ फार पुण्यदायक मानले जाते. एवढेच नव्हे तर अयोध्यानगरी ही पुराणांतरी वर्णन केलेल्या-

‘अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका।।
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायका:।।१।।’

– या सात मोक्ष देणाऱ्या नगरींमध्ये आद्यस्थानी गणलेली आहे. या प्रांताचे प्राचीन नाव उत्तर कोसल असे आहे. रामचंद्राच्या वेळची अयोध्या आता मुळीच राहिली नाही. रामायणात ज्या अयोध्येचे वर्णन दिले आहे, ती इसवी सनापूर्वी ५०० वर्षांची अयोध्या अद्यापि असेल ही कल्पनाही संभवत नाही. तथापि, अयोध्येइतके प्राचीन शहर दुसरे कोणतेच नाही, ही गोष्ट अगदी सिद्ध आहे. पूर्वीची अयोध्या दोन-तीन वेळा उद्ध्वस्त झाली होती, अशीही माहिती मिळते. वैवस्वताने इ.स.पूर्वी १३६६ या वर्षी ही नगरी प्रथमत: वसविली, असे लिहिले आहे; पण त्याबद्दलची विश्वसनीय माहिती मिळणे कठीण आहे. नवीन अयोध्या विक्रमादित्य राजाने इ.स.पूर्वी ५७ व्या वर्षी बांधली, असा जो लेख सापडतो, तो मात्र बराच भरवसा ठेवण्यासारखा दिसतो. यवनांच्या कारकीर्दीमध्ये ही सुप्रसिद्ध नगरी अनेक वेळा उद्ध्वस्त झाली होती. विक्रमादित्य राजाने बांधलेली अयोध्या ही प्रस्तुतच्या अयोध्येपासून एक-दोन मैल लांब होती, असे म्हणतात. फैजाबादेजवळ जुन्या इमारतीचे जे सामान जमिनीमध्ये दृष्टीस पडते ते पूर्वीच्या अयोध्येचे दर्शक होय, असे प्राक्कालीन वस्तुशोधकांचे मत आहे. विक्रमादित्य राजाने जी नगरी वसविली तीमध्ये ३६० देवालये बांधली होती. पण ती देवालये यवनांच्या कारकीर्दीत जमीनदोस्त होऊन त्यांच्याच सामानाने पुढे औरंगजेबाने मशिदी बांधल्या, असे इतिहासावरून दिसून येते. अयोध्येमध्ये प्रस्तुत प्राचीन देवालये फार थोडी आहेत. हनुमानगड व रामगड अशी जी दोन स्थळे येथे दृष्टीस पडतात ती मात्र बरीच प्राचीन असावीत, अशी कल्पना आहे. या दोन स्थळांपैकी हनुमानगड, ज्यास तेथील लोक ‘हनुमाननगरी’ म्हणतात ते मात्र सध्या अस्तित्वात आहे. दुसरे रामगड हे नाममात्र राहिले आहे. त्या स्थळी पूर्वी रामजन्मस्थान होते; परंतु ते नष्ट करून त्यावर औरंगजेब बादशहाने मशीद बांधली आहे. येथून जवळच मणिपर्वत, कुबेरपर्वत आणि सुग्रीवपर्वत अशी जुनी स्थाने आहेत; परंतु त्यामध्ये दर्शनीय अशी एकही गोष्ट राहिली नाही.

सांप्रतची अयोध्या ही एक जुनाट, वैभवहीन व सौंदर्यरहित अशी लहानशी नगरी आहे. रामायणामध्ये-
कोशलो नाम मुदित: स्फीतो जनपदो महान।।
निविष्ट: शरयूतीरे प्रभूतधनधान्यवान।।१।।
अयोध्या नाम नगरी तत्रासील्लोकविश्रुता।।
मनुना मानवेन्द्रेण या पूरीनिर्मिता स्वयम्।।२।।

म्हणून ज्या नगरीचे वर्णन केले आहे त्या नगरीचा आता मागमूसही राहिला नाही. प्रस्तुत येथे लहान लहान, पण जीर्ण अशा गृहपंक्ती दिसत असून, दारिद्रय़ावस्थेने गांजलेले नागरिक मात्र दृष्टीस पडतात. यावरून हे सर्व स्थित्यंतर मुसलमानांच्या कारकीर्दीत झाले असून, आता या नगरीमध्ये प्राचीन सौंदर्यदर्शक एकही चिन्ह राहिले नाही, असे स्पष्ट म्हणणे भाग पडते.

प्रासादैर्रत्नविकृतै: पर्वतैरिव शोभिताम्।।
कूटागारैश्च संपूर्णामिंद्रस्येवामरावतीम्।।१।।

अशी नगरी आता दारिद्रय़ाचे वसतिस्थान बनावी ही काळाची केवढी अजब लीला आहे बरे?

वाल्मीकी रामायणातील अयोध्येचे वर्णन ऐकल्यामुळे प्रत्येक प्रेक्षकास अयोध्यादर्शनाची उत्कंठा अतितर असते; परंतु ती सांप्रतच्या अयोध्यानगरीत प्रवेश केल्याबरोबर लागलीच कमी होते. प्रस्तुतच्या पुण्यकर क्षेत्रामध्ये नेत्रानंददायक स्थले फारशी नाहीत; तथापि भक्तिभावाने जाणाऱ्या यात्रेकरूस हृदयाल्हादकारक अशी देवालये बरीच आहेत. त्यात ‘हनुमानगढी’ ही प्रमुख होय. येथे पूर्वी ‘रामगढी’ व ‘हनुमानगढी’ अशा दोन गढय़ा असून, त्यात श्रीराम व त्यांचा भक्त हनुमान यांची देवालये होती. त्यापैकी यवनांच्या कारकीर्दीत रामगढीचा नाश झाला. आता फक्त हनुमानगढी हेच देवस्थान पाहण्यासारखे राहिले आहे. ही गढी केवळ किल्ल्याप्रमाणे भव्य असून, आपल्या प्राचीनत्वाची साक्ष ठिकठिकाणी देत असते. या गढीचे प्रचंड बुरुज व तोफेसही हार न जाणाऱ्या खंबीर भिंती दूरवर दिसत असतात. या गढीचा दरवाजा अत्यंत मोठा असून, त्यातून वर जाण्यास दगडी पायऱ्या आहेत. त्या चढून वर गेले म्हणजे रामदूत श्रीहनुमान यांचे एक देवालय दृष्टीस पडते. हे देवालय लहानच आहे, तरी त्याचे बांधकाम सवरेत्कृष्ट असून, ते प्रेक्षकांचे रंजन केल्यावाचून राहात नाही. या मंदिराचा कळस सुवर्णमय असल्यामुळे त्याची प्रभा दिनकराच्या दिव्य तेजाने आसमंतात चमकत असते. येथे एक भगवी ध्वजा लावली आहे. ती वायूच्या लहरीबरोबर एकसारखी फडकत असते. त्यावरून जणू पवन स्वपुत्राची (अंजनीसुताची) अद्वितीय रामभक्ती प्रेमाने गात आहे, असा भास होतो!

या देवालयामध्ये हनुमंताची प्रचंड मूर्ती असून, तिचा पूजाअर्चादी समारंभ फार प्रेक्षणीय असतो. हनुमंताचे मुख व नेत्र इतके तेजस्वी आहेत की, त्या योगाने प्रेक्षकाचे हृदय हर्षभरित होऊन त्या स्वरूपाचे कितीही दर्शन घेतले तरी नेत्रांची तृप्ती होत नाही. देवाचे अलंकार व पोषाख बहुमूल्य असून, पुण्यदिनी त्यांचा उपयोग करीत असतात. हे स्थान इतके शांत व रम्य आहे की, तेथे भक्तिमान दर्शनोत्सुकांची हृदये आनंदाने भरून जातात. या देवालयाच्या पुढील भागात श्रीरामचंद्रजी, लक्ष्मण व सीता यांच्या मूर्ती आहेत. त्या मूर्ती अगदी लहान असून, त्यांचे मंदिरही अगदी लहान आहे. या श्रीरामचंद्रजींच्या नगरीमध्ये रामसेवकाचेच माहात्म्य विशेष आहे. यावरून परमेश्वरास भक्ताची प्रीती जास्त आहे असे दिसून येते. ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे की, ज्या भक्ताचा परमेश्वराच्या ठायी निस्सीम भाव असतो, त्यास परमेश्वर ‘मस्तकीचा मुकुट करीन मी’ असे म्हणत असतात. त्याचे हे प्रत्यक्ष उदाहरण होय! असो. या उच्च स्थलावरून दूरवरचा फार मनोहर देखावा दृष्टीस पडत असतो. त्याचे वर्णन करावे तितके थोडेच आहे.

हनुमानगढीशिवाय येथे सप्तहरींची स्थाने फार प्रसिद्ध आहेत. नागेश्वर महादेव या नावाचे एक शिवस्थान आहे, तेथे महाराष्ट्रीय ब्राह्मण दृष्टीस पडतात. पण ते याचनावृत्तीमध्ये गढून गेले आहेत. अयोध्येमध्ये राममंदिर तर पुष्कळ आहेत. त्या सर्वाचे उत्सव रामनवमीमध्ये सुरू होतात. त्यावेळी अयोध्येस हजारो यात्रेकरू जमत असतात. बैरागी लोकांचे मेळे येथे फारच आहेत. त्यांचे माहात्म्य पूर्वी विशेष असून, त्यांचे निरनिराळे पंथ व त्या प्रत्येक पंथाचे वेगवेगळे आखाडे असत. त्यात निर्वाणी, निर्मोही, दिगंबरी, खाकी, महानिर्वाणी, संतोखी, निरालंभी हे पंथ फार प्रसिद्ध असून, त्या प्रत्येक पंथाचे निरनिराळे आचार्य असत व त्यांचा फार मान असे. पुढेपुढे त्यांचे प्रस्थ बरेच कमी झाले. तथापि इंग्रज अंमल होण्यापूर्वी सुग्रीवकिल्ला, रामप्रसादका काना व विद्याकुंड येथे अनुक्रमे १००, १५०, २०० बैरागी मोठे मानकरी असत. इ.स. १८५५ साली येथे बैरागी व मुसलमान लोकांमध्ये मोठय़ा मारामाऱ्या झाल्या. त्यामुळेच तेथे इंग्रज सरकारचा बंदोबस्त कडेकोट झाला. बहुविध राममंदिरांशिवाय येथे तीर्थे व रामकुंडे अनेक आहेत. या सर्व ठिकाणी यात्रेकरूंना क्षेत्रविधी करावे लागतात.

अयोध्येतील सृष्टीसौंदर्याचा सर्वात उत्तम देखावा शरयूतीरी दृष्टीस पडतो. प्रात:काळी व सायंकाळी येथे जो उदात्त, सुशांत व आल्हाददायक देखावा दृष्टीस पडतो, तो वर्णन करणे कठीण आहे! नदीच्या एका तीरावर सर्व देवालये एका ओळीने बांधलेली असल्यामुळे त्यांची उंच उंच शिखरे जणू गगनमंडलास भेदीत आहेत. एकीकडे हिरवीगार शेते आपल्या हरितप्रभेने पृथ्वीस शालू नेसविल्याचे भासवीत आहेत; शरयूच्या पश्चिम तीरावरील देवालयांतून गंभीर घंटारव ऐकू येत आहेत; निरनिराळ्या कुंडांवर व घाटांवर तद्देशीय ब्राह्मण व गोसावी संध्यावंदनात निमग्न झालेले दिसत आहेत; कोठे जटाजूट धारण केलेले साधुजन श्रीरामभक्त तुलसीदास यांची प्रासादिक पद्ये म्हणत आहेत; असा तो रमणीय देखावा कोणाचे हृदय संतुष्ट करणार नाही!

रामचंद्रांच्या लीलेसंबंधाने एतद्देशीय लोक हजारो स्थळे दाखवितात व प्रत्येक ठिकाणी ‘महाराज, दर्शन करो’ म्हणून विनंती करतात; परंतु तेथे पूर्वीच्या रामलीला झाल्या असतील की नाही याबद्दल सूज्ञ यात्रिकांस निराळा विचार करण्याचे कारणच नाही. खरी अयोध्या जी आहे तिचे उत्तररामचरित्रात म्हटल्याप्रमाणे-

पुरा यत्र स्रोत:पुलिनमधुना तत्र सरिताम्
विपर्यासं यातो घनविरलभाव: क्षितिरुहाम्।
बहोर्दृष्टं कालादपरमिव मन्ये वनमिदम्
निवेश: शैलानां तदिदमिति बुद्धिं दृढयति।।

इतके रूपांतर होऊन गेले आहे. तेव्हा तीत घडलेल्या सर्व रामलीला दाखविण्यास कोण समर्थ आहे? तथापि महाकवी वाल्मीकी यांनी आपल्या सुरस वाणीने जे रामचरित्र वर्णिले आहे, ते प्रत्येक हिंदू हृदयात पूर्णपणे प्रतिबिंबित झाल्यामुळे कल्पनादृष्टीस ते येथे घडले असेल असे भासून चित्तास आनंद वाटतो. यावरून कवी वाल्मीकी यांच्या कृतीची थोरवी अगाध आहे, असे वाटून त्यांच्या चरणी प्रत्येकाने लीन व्हावे अशी इच्छा होते.

कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्।
आरूढकविताशाखां वन्दे वाल्मीकिकोकिलम्।।१।।
(तळेगाव येथील रामनाथ पंडित भारतीय रंगभूमी संशोधन केंद्राच्या संग्रहातून साभार.)

यवनांच्या कारकीर्दीमध्ये ही सुप्रसिद्ध नगरी अनेक वेळा उद्ध्वस्त झाली होती. विक्रमादित्य राजाने बांधलेली अयोध्या ही प्रस्तुतच्या अयोध्येपासून एक-दोन मैल लांब होती, असे म्हणतात. फैजाबादेजवळ जुन्या इमारतीचे जे सामान जमिनीमध्ये दृष्टीस पडते ते पूर्वीच्या अयोध्येचे दर्शक होय, असे प्राक्कालीन वस्तुशोधकांचे मत आहे. विक्रमादित्य राजाने जी नगरी वसविली तीमध्ये ३६० देवालये बांधली होती. पण ती देवालये यवनांच्या कारकीर्दीत जमीनदोस्त होऊन त्यांच्याच सामानाने पुढे औरंगजेबाने मशिदी बांधल्या, असे इतिहासावरून दिसून येते.