इमेजच्या मागे दडलेला हुसेन

Posted: जून 19, 2011 in Uncategorized
टॅगस्,

प्रभाकर कोलते, प्रसिद्ध चित्रकार,  सौजन्य – मटा

विद्याथीर्दशेत असताना मी ज्यांना फॉलो करत असे, त्यांच्यात हुसेन होताच. हुसेन, गायतोंडे, सामंत, अंबादास, हरकिशनलाल, पळशीकर (ते तर माझे गुरू होते), हे सारे माझे नेहमीच आवडते पेंटर होते. त्या दिवसांमध्ये हे सगळे आमच्या अस्तित्वाला कायमच चिकटून असल्यासारखे असायचे. आम्ही कधी गॅलरीत गेलो की, यांच्यापैकी एकाचं प्रदर्शन तिथं भरलेलं असायचंच. आम्हांला गॅलरीत जाताना कधी तरी गायतोंडे दिसत, त्यांची ती बुटकी मूतीर्, कोट वगैरे घातलेला अशी. आम्ही मुलं रस्त्याच्या पलीकडं उभं राहून त्यांच्याकडे भारावून बघत असायचो.

हुसेनचंही तसंच होतं. मात्र हुसेनचा प्रेझेन्सच जास्त लक्षवेधी असायचा. तो मुद्दाम काही करत असेल किंवा नसेलही, पण आपण कलाकार आहोत, याचा त्याला खूप अभिमान असल्याप्रमाणं त्याचं वागणं असायचं आणि ते त्याला शोभूनही दिसे. म्हणजे त्याच्या हातात काठीऐवजी लांबलचक ब्रश धरलेला असतो. यात दिखावा वाटू शकतो, पण त्याचं या वागण्यामागचं कारण साधं असू शकतं. मला हातात काही काठीसारखं धरायचंच आहे, तर मी ती ब्रशच्या आकाराचीच का धरू नये? मी चित्रकार आहे, हे लोकांना त्यातून समजेल, अशी त्याची भूमिका. वरवर बघता हुसेन माणसांच्या गराड्यात असला तरी मूलत: तो लोनर आहे, एकटा आहे. हे एकटेपण त्याला छान निभावून नेता येतं. तो आत्यंतिक एकटा आहे, म्हणूनच इतरांपेक्षा जास्त एक्स्ट्रोव्हर्ट बनू शकतो. बहिर्मुखतेची सीमा त्यानं ओलांडली. समाजाची त्याला फिकीर नाही.

तशी ती गायतोंडेंनाही नव्हती. गायतोंडेही एकटे होते, पण त्यांच्या आणि हुसेनच्या एकटेपणात एक मूलभूत फरक आहे. गायतोंडेंच्या एकटेपणात त्यांनी स्वीकारलेला एकांतवासही समाविष्ट होता. हुसेन माणसात असूनही एकटा बनू शकतो. कलाकारानं असं एकटेपण स्वीकारणं अत्यंत गरजेचं असतं. त्याची कला त्या एकटेपणातून येणाऱ्या आत्मचिंतनातूनच मोठी होत असते. गायतोंडे आणि हुसेन या दोघांनाही ते साध्य झालं. अशा एकटेपणाच्या स्वीकारासाठी फार मोठं धैर्य आणि मनाचं धाडस लागतं. रझा असाच प्रयत्न करत राहिला, पण ना त्याला हुसेनसारखा बहिर्मुखतेतून येणारा एकटेपणा जमला ना गायतोंडेंसारखा अंतर्मुखतेतून आलेला एकटेपणा पेलता आला. लोकप्रियता आणि एकटेपणा हे दोन्ही एक्स्प्लॉइट करणं आणि त्यातून आपल्यातला चित्रकार मोठा करणं, हे हुसेनलाच जमू शकलं.

हुसेन खरोखरच युगप्रवर्तक आहे, असं मला वाटतं. आधुनिक भारतीय चित्रकलेला आंतरराष्ट्रीय चेहरा केवळ हुसेनमुळे मिळाला. प्रोग्रेसिव्ह चळवळीतल्या सहाही जणांमध्ये इथं मुंबईत भक्कमपणे पाय रोवून राहिला तो हुसेनच. त्यानं त्याची मुळं इथं रोवली होती आणि विस्तार जगभर केला. त्याचा फार मोठा फायदा पुढच्या कलावंतांना झाला आहे. हुसेन नसता, तर आज भारतीय चित्रकारांच्या चित्रांना लिलावांमध्ये इतकी किंमत कशाला मिळाली असती? त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, हुसेननं चित्रकाराला सामान्यांच्या जवळ नेलं. हुसेननं जे काही केलं, त्यामुळे निदान लोकांचं चित्रकारांकडे, पर्यायानं चित्रकलेकडे लक्ष वेधलं जायला लागलं, हे योगदान काय कमी आहे?

हुसेन सगळ्यांपासून अलिप्त असलेला मनुष्य आहे. त्या अर्थानं त्याचं व्यक्तिमत्त्व वैश्विक आहे. भले तो इंटरव्ह्यूमध्ये काहीही बोलत असो की, मी माझा देश मिस करतोय वगैरे, पण त्याला आपण कुठे राहतो वगैरे गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. असा माणूसच अनवाणी चालू शकतो. ज्या पृथ्वीचा मी एक भाग आहे त्याच्याशी माझं जोडलं जाणं, असा त्याचा दृष्टिकोन आहे. त्याच्या अनवाणी चालण्याची मिडियानंच खूप हवा केली. लोक त्याला उगीच स्टंट किंवा काही म्हणाले, तरी त्याला त्याचं काही नसतंच. त्याची या वयातली एनजीर् थक्क करून टाकते. चित्र रंगवण्याचा त्याचा झपाटा विलक्षण आहे. आणि त्याचं ते रंग लावणं… अप्रतिम! बाकी कलाकार कॅनव्हास रंगवतात, पण हुसेनसारखे कलावंत कॅनव्हासचं रूपच बदलून टाकतात. तिथं फक्त रंग उरतात. भाकरीसाठी पीठ हातानं मळण्यात आणि मशीनवर करण्यात जो फरक आहे, त्या मळण्यात जो आत्मा किंवा भाव उतरलेला असतो; तो हुसेनच्या त्या रंगांना कालवण्यातून दिसतो. काय वाटायचंय ते रंगातून, व्यक्त व्हायचं ते रंगातून डायरेक्ट. आधी स्केचिंग वगैरे काही भानगडच नाही.

हुसेनच्या प्रत्येक गोष्टीतच एक शॉकिंग इफेक्ट असतो. मात्र बरेचदा माणसापेक्षा त्याची इमेज मोठी होत जाते आणि मग लोकांना ती इमेज म्हणजेच त्याचं खरं व्यक्तिमत्त्व आहे, असं वाटायला लागतं, हुसेनच्या बाबतीत तसं काहीसं झालं असं वाटतं. पण या इमेजच्या मागे दडलेला हुसेन फार म्हणजे फार संवेदनशील, सच्चा असा कलावंत आहे. काही प्रसंगांतून, कवडशांतून मला त्याचं हे रूप पाहायला मिळालं म्हणून आज मी हे म्हणू शकतो. सुरुवातीला माझेही बरेच गैरसमज होते.

दुबईत असताना हुसेनला आम्ही जे अनेक प्रश्न विचारले, त्यांतला एक प्रश्न अपरिहार्यपणे हुसेनच्या माधुरी-वेडाबद्दलचा होता. पण सर्वांना अनपेक्षित काय होतं तर हुसेनचं त्यावरचं उत्तर. हुसेननं बनवलेल्या त्या फिल्मसारखं, मुळापासूनच्या धारणा तोडून टाकून पुन्हा नव्यानं जाणिवा विकसित करायला लावण्यासारखंच हुसेनचं ते उत्तर होतं.

हुसेन त्याच्या माधुरी फॅसिनेशनबद्दल बोलताना क्षणभर थांबला आणि मग शांतपणे म्हणाला, ‘सब लोग सोचते हैं वैसा इसमें कुछ नही हैं. मला आयुष्यात आईच मिळाली नाही. मेरी माँ जब मै बहोत छोटा था तब गुजर गयी. माँ जब गुजर गयी तब शायद माधुरीकी एज की थी. जब माधुरी को मैने देखा था तब मुझे एक अलगसा अहसास हुआ. माधुरी मे मैं मां-अधुरी देखता हूं. मुझे माँ जादा मिली ही नही. मै जब भी पंढरपूर गया तब मुझे लगा, वो अब भी किसी खंबे के पिछे खडी रह कर मुस्कुराते हुए मुझे देख रही है. वो सामने इसलिये नही आती क्यों की वो शरमा रही है. माँ मरी तब सिर्फ २५ साल की थी और मैं बच्चा था. आज मैं नब्बे साल का बुढा हो गया हूं. २५ साल की माँ, वो कैसे कहेगी नब्बे साल के बुढे को बेटा? इसलिये वो शरमा रही है. माधुरी मे मैने वही मां-अधुरा सामने आते हुए देखी।’

खरं सांगतो, आय वॉज शॉक्ड टु हिअर धिस. त्या दिवशी हुसेनच्या तोंडून हे ऐकताना अंगावर काटा आला. हुसेनच्या बोलण्यातून शॉकिंग इफेक्ट मिळू शकतो, हे माहीत असूनही जे ऐकलं त्याला मी प्रिपेअर्ड नव्हतोच. एका बाजूला धरून चालू की हे तो मुद्दाम शॉक बसावा या हेतूनेच बोलला, तरी पण त्या बोलण्यातलं भावनात्मक सौंदर्य झाकून टाकता येत नाही. आणि त्यानं ज्या पद्धतीनं या सगळ्याचा विचार केला आहे, तेच किती सुंदर आहे. हुसेन भावुक मनाचा कवी आहे आणि त्याचं हे कवी पण त्याच्या मुलात, ओवेसमध्येही उतरलं आहे.

हुसेनसारखा एक पद्मपुरस्कार विजेता देश सोडून जातो याची सरकारला काहीच खंत नाही, याचं आश्चर्य वाटतं. पद्मपुरस्कार दिल्यावर आपलं सरकार त्या व्यक्तीची काही जबाबदारी नैतिकतेनं स्वीकारू पाहतंय की नाही, हा खरा प्रश्न होता आणि सरकारनं ती जबाबदारी झटकली, हे सत्य आहे. त्यानं नेहमीप्रमाणेच या प्रकरणात काही भूमिकाच घेतली नाही. तशी भूमिका समाजातल्याही इतर कोणी घेतली नाही आणि कलावंतांनीही घेतली नाही.

हुसेनबाबत नक्की काय भूमिका घ्यावी, याची एकवाक्यता कोणालाच दाखवता आलेली नाही. त्यासाठी हुसेनही काही प्रमाणात जबाबदार आहे. कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत सामाजिक जबाबदारीचंही भान असायला हवं, याची सर्वांना असलेली जाणीव हुसेनला नसेल असं कसं म्हणता येईल? तुम्ही समाजव्यवस्थेचे फायदे घेता, त्यानं दिलेले मानसन्मान उपभोगता, कौतुक स्वीकारता; तेव्हाच तुम्ही त्या समाजाच्या संस्कृतीचं, चालीरितींचं पालन करण्याचं नैतिक उत्तरदायित्व स्वीकारलेलं असतं.

हुसेनची ती चित्रं ‘चित्र’ म्हणून कशी आहेत, त्यानं ती तशी काढायला हवी होती का, हा मुळातच वेगळा प्रश्न आहे. हुसेनला हिंदू देवदेवतांचं काही चित्रण करायचं होतं आणि त्यानं ते अशा प्रकारं केलं आणि ते विकृत आहे, असं म्हणण्यापूवीर् हुसेन एक कलावंत आहे, तो एक चित्रकार आहे आणि त्याच्या चित्रकार नजरेला त्यामध्ये फक्त एक फॉर्म दिसला होता आणि त्यानं तो चितारला, असं आपण का म्हणत नाही? धर्माच्या पलीकडे चित्रकाराची नजर जाऊ शकते हे आपण स्वीकारू शकत नाही, हे सत्य आहे.

( पुढील आठवड्यात प्रसिध्द होणाऱ्या सतीश नाईक संपादित ‘चिन्ह’च्या ‘नग्नता: चित्रातली आणि मनातली’ या विशेषांकातून साभार. शब्दांकन- शमिर्ला फडके)

प्रतिक्रिया
  1. हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

    लेख उत्तम! एक गोष्ट फक्त मनाला लागून राहते म्हणून बोलतो. पण याचा वेगळा अर्थ काढू नका. कलाकार कोणताही असो, तो लेखक, नाटकातील काम करणारा अथवा चित्रपटात. किंवा अगदी चित्रकार. त्याच्या कलेतून तो जीवनाचा नवा अंग सादर करत असतो. अनेकदा परंपरांचे ओझे तो टाकून एक नवी कलाकृती तो निर्माण करतो. पण यातून कलेचा एक नवा आविष्कार अनुभवायला मिळतो. कदाचित हुसेन जी खूप मोठे चित्रकार असतील. पण त्यांच्या कलेतून तो आविष्काराचा अनुभव येण्या-ऐवजी दुर्दैवाने बीभत्स आणि वासना मिळाल्याने त्यांच्यावर असे प्रसंग ओढवले गेले.
    मला अस बिलकुल बोलायला आवडत नाही आहे परंतु, जर यदाकदाचित तुमच्या आदरणीय ‘स्त्री’चे हुसेनजी ने नग्न चित्र काढले असते. तर कदाचित हा लेख वेगळा असता. माझ्या या अशा बोलण्याबद्दल क्षमस्व!

  2. डॉ.सुनील अहिरराव म्हणतो आहे:

    कलाकार हा फक्त कलाकार असतो. तो जेव्हा स्वत्व हरवून एखादी कलाकृती निर्माण करतो,तेव्हा त्याच्यात आणि त्याच्या कलाकृतीत द्वैत उरत नाही. शक्य आहे त्यातून एखाद्या समुदायाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात,पण याचा अर्थ असा होत नाही,की कलाकाराने जाणीवपूर्वक ते घडविले! खऱ्या कलाकाराकडून नेणिवेच्या पातळीवर महान कलाकृती घडतात.त्याचा संबंध धर्म,देव वगैरेंशी नसतो.तो फक्त स्वतःला मूर्त-अमूर्त जगाच्या सीमारेषेवर फरफटत नेत असतो

    • हेमंत आठल्ये म्हणतो आहे:

      त्याच कलाकाराने बनवलेला चित्रपटातील गाण्याने एका धर्माच्या भावना दुखावल्या होत्या. भावना दुखावतात अस लक्षात आल्यावर कलाकाराने ते गाणे त्या चित्रपटातून काढून टाकले. मग ते गाणे कलाकृती नव्हती काय? की दुखावलेला धर्म? मुळात वादाचा विषय हा नाही आहे की कलाकारावर बंधन असायला हवी की नको. विषय हा आहे की चित्रकार हा माणूस आहे. काय चुकीचे किंवा काय बरोबर हे त्यालाही समजते. एकदा केलेली चूक क्षम्य असते. सारख्या चुका या जाणीवपुर्वकच असतात.

      गेलेल्या व्यक्ती बद्दल वाईट बोलू नये असा संकेत आहे. कलाकार आदरणीयच असतात. पण देवीदेवतांच्या नग्न चित्रांना महान कलाकृती अस मानू शकतो? यदाकदाचित इतर धर्मियांच्या आराध्य दैवतांना देखील एखाद्या चित्रकाराने नग्न काढून आपली ‘महान कलाकृती’ सादर केली तर कोणीही त्याचे समर्थन करणार नाही.

  3. देवेंद्र चुरी म्हणतो आहे:

    हेमंतशी सहमत …

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s