ज्ञानेश्वर मुळे, उच्चायुक्त, भारतीय दुतावास मालदिव , सौजन्य – मटा
प्रवास, ज्ञान, नोकरी, तंत्रज्ञान, शिक्षण एवढेच काय पण वाचन माणसाला जगाशी जोडू शकते. जगाशी जोडू शकणाऱ्या नव्या शक्यतांचे स्वागत आपण आनंदाने केले पाहिजे. ‘जय भारत’ म्हणता म्हणता ‘जय जगत्’ म्हणणेही आवश्यक आहे..
———————————————————
काही दिवसांपूवीर् भारतातून पर्यटन व्यवसायातील काही मंडळी, भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात मालदीवला यावेत यासाठी काय करता येईल; याचा अभ्यास करण्यासाठी आली होती. त्यातील एक गृहस्थ बोलता बोलता म्हणाले, ‘आमच्यातही आता खूप बदल झाले आहेत. पूवीर् क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा विजय झाला की, आमच्यातले काही जण फटाके उडवत असत. आता मात्र सगळे शिक्षण घेताहेत, अनेक जणांनी माहिती तंत्रज्ञानात नोकरी मिळवलीय. हीच आमची माती आहे आणि आमचे भविष्य इथेच आहे याची आता सर्वांना खात्री आहे.’ त्याने ती माहिती मला का सांगितली याचा मला अजूनही बोध होत नाहीये. कुणाच्याही देशभक्तीविषयी शंका घ्यावी असे वातावरण असताना फक्त त्या गृहस्थानेच ते स्पष्टीकरण का दिले असावे?
मालदीवमध्ये ताज उद्योगसमूहाच्या एका रिसॉर्टच्या व्यवस्थापकांच्या दोनेक वर्षांच्या मुलीशी मी बोलायचा प्रयत्न करत होतो. तुला काय काय आवडते या प्रश्नांची तिची उत्तरं अशी होती, ‘शाळा, टीचर, माले शहर, आईवडील, पाच वर्षाचा भाऊ… दिवेही भाषा, स्पीड बोट.’ मी विचारले, ‘हाऊ अबाउट इंडिया?’
‘ आय डोंट नो इंडिया.’… ही भारतीय मुलगी अशीच भारताबाहेर राहिली तर तिच्या देशप्रेमाचे नेमके स्वरूप काय असेल? भविष्यात तिचे मालदीववरचे प्रेम दृढ होईल, भारतावरचे कमी होईल की वाढेल की तिसऱ्याच देशात (अमेरिका, जपान किंवा अन्य कोणताही) जिथं तिची नोकरी असेल, प्रियकर असेल तो देश तिला अधिक जवळचा वाटेल? मग तिच्या देशभक्तीचे नेमके स्वरूप काय असेल?
काही दिवसांपूवीर् भारत आणि मालदीव यांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांमध्ये दोस्तीचा सामना झाला. मी मनातल्या मनात स्वत:ला हा प्रश्न विचारला, ‘कोणत्या संघाचा विजय झाला पाहिजे?’ नि:संदिग्ध उत्तर आले नाही, ‘जो संघ चांगला खेळेल त्याचा विजय व्हायला हवा की भारताचाच विजय कोणत्याही परिस्थितीत होणे गरजेचे आहे?’ मी या सामन्याला प्रमुख पाहुणा होतो. मी भारताच्या वतीने जल्लोष करत होतो पण, जेव्हा जेव्हा विरोधी संघ चांगला खेळ दाखवत होता तेव्हा टाळ्या वाजवून त्यांनाही दाद देत होतो. माझ्या शेजारी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद बसलेले होते. भारताचा खेळाडू जेव्हा चांगला खेळत होता तेव्हा तेही मनापासून टाळ्या वाजवत होते. सुदैवाने सामना बरोबरीचा झाला. पण खेळ खेळ म्हणून पाह्यचा की राष्ट्राभिमानाची खूण म्हणून?
त्याचे उत्तर सामन्याच्या आधी दोन तासांपूवीर् मला आलेल्या एका फोनमध्ये असावे. तो फोन इब्राहीम वाहीद यांचा. ते मालदीवच्या निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत पण, माझी त्यांची मैत्री ते लेखक आणि विचारवंत असल्याने अधिक दृढ झाली. फोनवरती ते म्हणाले, ‘मी तुमची माफी मागण्यासाठी फोन करतोय. आजच्या भारत, मालदीव सामन्याची टीव्हीवर जोरदार जाहिरात होतेय. इंग्रजीत ‘फ्रेंडली मॅच’ असा शब्द वापरताहेत. मात्र स्थानिक दिवेही भाषेत ‘भारताविरुद्ध…’ असा शब्द वापरताहेत. मी टीव्ही स्टेशनला फोन करून खडसावले आणि दिवेही भाषेतही ‘फ्रेंडली मॅच’ला समानाथीर् शब्द वापरावेत अशी सूचना केली. त्यांनी ती मान्य केलीच पण, या आधीच्या त्यांच्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.’ त्यांच्या त्या स्पष्टीकरणानं मी थोडा गोंधळलो. ‘चुकीच्या’ शब्द प्रयोगामुळे होणारा दोन देशांमधला गैरसमज टळावा हा त्यांचा उदात्त हेतू होता. त्यांचे मी आभार मानले. पण भारतीय टीव्हीवर अशा सामन्यांच्या वेळेस ‘महायुद्ध, रणसंग्राम, घमासान…’ असे शब्द मी सर्रास पाहतो आणि मला त्यात फारसे आश्चर्य वाटले नाही, याचे कारण काय असावे? इब्राहीम वाहीद यांची देशभक्ती अपुरी की माझी? की यातून घ्यायचा संदेश काही वेगळाच आहे. सर्व राष्ट्रांवर प्रेम, मानवतेवर प्रेम, पृथ्वीवर प्रेम हाच तर नवा ‘राष्ट्रधर्म’ नव्हे?
काही मूलभूत प्रश्न मला सतत छळतात? आजच्या काळात देशभक्तीचे नेमके परिमाण कोणते? आजच्या परस्परावलंबी जगात निखळ देशभक्ती असा प्रकार असू शकतो का? युद्धाच्या काळात देशाच्या बाजूने उभे राहाणे ही राष्ट्रभक्ती, मग तिचे शांतीच्या काळातले निकष कोणते? अख्खे आयुष्य दुसऱ्या देशात काढलेल्या भारतीयांची राष्ट्रभक्ती मोजण्याची मोजपट्टी कोणती? देशात राहून जनतेची फसवणूक करून अप्रामाणिक जीवन जगणाऱ्यांना आपण ‘राष्ट्रदोही’ का समजत नाही? देशात राहून विदेशी कंपन्यांची नोकरी करत आपल्याच देशातील भ्रष्टाचार, अस्वच्छता व विषमता यांच्यावर ताशेरे मारत बसणारे भारतीय, त्यांचे देशप्रेम नेमके कोणते? आपण कमावलेल्या अमाप संपत्तीचा एक मोठा भाग भारतासह वेगवेगळ्या गरीब देशातील आरोग्य सेवेसाठी देणाऱ्या बिल गेट्सचे अमेरिका प्रेम गढूळ तर होत नाही ना? मुळात देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रप्रेम या संज्ञा कालबाह्य झाल्या आहेत का?
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला, तेव्हाची व आजची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा राष्ट्र ही संकल्पना बळकट होती. आपले व परके यांच्यातले अंतर स्पष्ट होते. आपले बहुसंख्य लोक शेती किंवा तत्सम उद्योग करत होते. त्यांचे जीवन ‘स्थानिक’ होते. त्यात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय असे फारसे नव्हते. शेतकऱ्यांचे जसे जमिनीवर प्रेम, त्याच प्रेमाचा विस्तार राष्ट्र, राष्ट्रभूमी, देशप्रेम यांच्यात प्रतिबिंबित होत असे. ‘बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते’ हे शब्द ऐकूनच रक्त पेटायचे. आता काळ पूर्ण बदलला आहे. स्थळ, काळ, अंतर, वेग यांचे अर्थ बदललेत. चीन आमचा विदेश व्यापारातील सगळ्यात मोठा भागीदार आहे. पाकिस्तान प्रकरण थोडे वेगळे असले तरी आपले नाते एकायामी नाही. परवा कुणीतरी किस्सा सांगितला की, विवाहसमारंभाला गेलेली एक पाकिस्तानी मुलगी आईला विचारत होती, ‘मम्मी, अभी फेरे नही हुए है वो कब होंगे?’ हिंदी चित्रपट आणि मालिकांचा तो प्रभाव आहे. एक मोठा भूभाग आणि सार्वभौमत्व (स्वत:चे निर्णय देशहितार्थ स्वत: घेण्याचे अधिकार) हे कोणत्याही राष्ट्राला लागू पडणारे दोन निकष. पण सरहद्द या पारंपरिक कल्पनेला तडा गेला आहे आणि सार्वभौमत्वाच्या कल्पनेतल्या मर्यादाही अधिकाधिक स्पष्ट होत चालल्या. शिवाय लष्करी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे समोरासमोर तलवारी, बंदुका किंवा तोफगोळे यांच्यावर अवलंबून असलेली पारंपरिक युद्धेही जवळजवळ संपत आलेली आहेत. सध्या एकाही जवानाचा बळी न देता अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वर्षाव लिबियावर होतो आहे, ही गोष्ट लक्षणीय आहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन्स यांच्या युगात सीमेवरच्या सैनिकांची भूमिका पूवीर्सारखी राहिली नाही. नोव्हेंबर २०१०मध्ये युरोपियन युनियनच्या अध्यक्षांनी ”राष्ट्र’ संकल्पना इतिहासजमा झाली असून, राष्ट्रे स्वत:च्या पायावर उभी राहू शकतात हे ‘मृगजळ’ आणि ‘धादांत खोटे’ आहे’, असे विधान केले. हे वाक्य युरोपियन युनियनच्या संदर्भातले असले तरी प्रत्येकाला विचार करायला लावणारे आहे.
या बदलत्या वस्तुस्थितीला जबाबदार घटक कोणते? पहिली गोष्ट, वस्तू आणि सेवा आता मुक्तपणे आयात व निर्यात केल्या जाताहेत. भारतातील माहिती उद्योग अमेरिकेतील बेकारीला जबाबदार ठरतो. दुसरी गोष्ट, प्रवास सुकर व वेगवान झाला आहे. माणसं जगभर भटकू लागलीत अभूतपूर्व संख्येने. युरोप अमेरिकेत मुलं असलेल्या एकाकी मराठी आईबापांना पुण्यासारख्या ठिकाणी स्वत:च्या संघटनेची गरज वाटते. तिसरी गोष्ट, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा धुमधडाका सगळ्या भिंतींचा धुव्वा उडवतोय. आभासी विश्वातल्या फेसबुकच्या सदस्यांची संख्या ३० कोटींवर आहे. जगातले तिसरे विशाल ‘राष्ट्र’ खरे तर ‘फेसबुक’ आहे. तंत्रज्ञानाचे विशेषत: माहितीचे ‘लोकशाहीकरण’ ही स्थानिक नसून जागतिक क्रांतीची नांदी आहे. चौथी गोष्ट, फक्त वस्तू आणि सेवाच नव्हे तर संकल्पनांचा प्रवास सुकर आणि सरहद्दींना कालबाह्य ठरवतो आहे. यू ट्यूब असो वा ट्विटर, ईमेल असो वा स्काइप पारंपरिक राष्ट्र संकल्पनेला छेदून जाणाऱ्या आणि अख्ख्या मानवतेला जोडणाऱ्या नवीन साधनांचा अभूतपूर्व जल्लोष सगळीकडे सुरू आहे. शेवटी पाचवा आणि महत्त्वाचा परिवर्तन बिंदू आहे मानवतेसमोरचे धोके. तापमान बदल, आतंकवाद, गरिबी, विषमता आणि रोगराई या मानवतेसमोरच्या धोक्यांनी जगभरच्या राष्ट्रांना राष्ट्रसंघ, जागतिक आरोग्य संघटना वगैरे आंतरराष्ट्रीय मंचावर एकत्र आणले आहे.
अशा या गोंधळाच्या वातावरणात माणसाने आपली देशभक्ती जिवंत ठेवायची कशी आणि का? दोन मार्ग संभवतात. पहिला ‘थिंक ग्लोबल अॅक्ट लोकल’ हा मार्ग. आपणा सगळ्यांचे मानवतेशी लाखो प्रकारे नातेसंबंध आहेत, हे लक्षात घेऊन स्वत:च्या वैयक्तिक, सामाजिक व बौद्धिक विश्वात बदल घडवून तसे वागायचे. दुसरा मार्ग, सर्वार्थाने विश्व नागरिक बनायचे. या क्षणी राष्ट्र या संकल्पनेवर अनेक बाजूंनी अतिक्रमण होत असले तरी अजून राष्ट्राला ठोस पर्याय उपलब्ध नाही. अशा पार्श्वभूमीवर प्रवास, ज्ञान, नोकरी, तंत्रज्ञान, शिक्षण एवढेच काय पण वाचन माणसाला जगाशी जोडू शकते. जगाशी जोडू शकणाऱ्या नव्या शक्यतांचे स्वागत आपण आनंदाने केले पाहिजे.
भारताचे राष्ट्र म्हणून काही महत्त्वाचे हितसंबंध आहेत. त्यात राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्रभूमीचे संरक्षण, आथिर्क व सामाजिक स्थैर्य वगैरे महत्त्वाच्या गोष्टी येतात. पण या सांभाळण्यासाठीसुद्धा जगभरच्या अनेक राष्ट्रांशी तह, करार व मैत्रीसंबंध असणे गरजेचे आहे. भारताचे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या रवींदनाथ टागोरांच्याच दुसऱ्या एका कृतीला बांगलादेशने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. राष्ट्रीय अस्मिता कशी असू शकते किंवा कशी बदलते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच जी राष्ट्रे दूरदशीर् आहेत त्यांनी जगभर स्वत:च्या हितसंबंधांचे जाळे विणून टाकले आहे. भारतही याबाबतीत आघाडीवर आहे.
जगभर पसरलेले भारतीय वंशाचे आणि अनिवासी भारतीय यांची संख्या जवळजवळ तीन कोटी आहे. शिवाय मॉरिशस आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो इथे भारतवंशी पंतप्रधान आहेत. या वातावरणात फक्त ‘जय भारत’ म्हणता म्हणता ‘जय जगत्’ म्हणणेही आवश्यक आहे.