पुणे बदलले…

Posted: जानेवारी 6, 2012 in इतिहास
टॅगस्, , ,

श्री. ज. जोशी, सौजन्य – मटा

(पूर्वप्रसिध्दी ९ एप्रिल १९७२)

पुण्याचं सोज्ज्वळ-सात्त्विक रुपडं अनुभवलेले प्रसिद्ध लेखक श्री. ज. जोशी यांनी या बदलत्या शहराचा चाळीस वर्षांपूर्वी घेतलेला खास ‘पुणेरी’ वेध…
…….

डेक्कन जिमखान्यावर ‘पूना कॉफी हाऊस’च्या जवळ एक पेट्रोल पंप आहे. रस्त्याच्या कडेला तिथे एक छोटीशी भिंत आहे. एखाद्या दिवशी मी उगाच त्या भिंतीवर टेकतो. वेळ संध्याकाळची असते. समोरचा रस्ता तुडुंब भरून चाललेला असतो. सुसाट वाहणाऱ्या नदीकडे पहावं त्याप्रमाणे पुण्यातल्या त्या गदीर्कडे मी गमतीने पहात बसतो. माझं मलाच आश्चर्य वाटतं. माझा मलाच मी एखाद्या पुराणपुरुषासारखा वाटतो. तीस-चाळीस वर्षांपूवीर् पुण्यातला हाच परिसर किती शांत होता-किती निराळा होता, याचं चित्र डोळ्यापुढे उभं रहातं.

भिंतीच्या डाव्या बाजूला किंचित दूर, ताज्या अंड्यांचा स्टॉल आहे. पांढरी शुभ्र टपोरी अंडी तिथं हारीने मांडून ठेवलेली असतात. हिंडून परत जाणारी तरुण जोडपी तिथं थांबतात आणि अंडी विकत घेतात. कोपऱ्यावर इराण्याचं हॉटेल आहे. पुण्याच्या जीवनात उडुपी हॉटेलवाल्यांनी इराण्यांचा संपूर्ण पराभव केलेला आहे. ठिकठिकाणच्या मोक्याच्या जागा उडुप्यांनी काबीज केल्या आहेत. परंतु जिमखान्यावरच्या कोपऱ्यावरच्या हा इराणी किल्ला अजूनही तग धरून आहे. तिथल्या गदीर्ला खळ नाही. समोरच्या बाजूला पी.एम.टी.चं मोठं स्टेशन आहे. लाल रंगाच्या अजस बसेस तिथे सारख्या येत-जात असतात. मला उगाचच पुण्यातील बसच्या पहिल्या वहिल्या दिवसांची आठवण होते. पुण्यात बस चालणार नाही- मंडईत जायला किंवा तुळशीबाग-बेलबाग करायला बसची चैन करण्याइतका पैसा पुणेकरांजवळ नाही, असं तेव्हा बोललं जात होतं. बाईजवळ बसमध्ये बसणे तेव्हा महासंकट वाटे.

बस-स्टेशनच्या पलीकडे पूनम रेस्टॉरंट आहे. तिथले बाहेरचे प्रांगण खाजगी मोटारगाड्यांनी भरलेले असते. आत जेवणाचा मोठा हॉल आहे. तिथं सारख्या पाटर््या झडत असतात. स्त्री-पुरुषांचे समुदाय हसत-खेळत भोजनाचा आनंद लुटत असतात. ते स्त्री-पुरुष पती-पत्नीच असतात, असं नव्हे.

पूनमच्या बाहेर विलायती दारूचं दुकान आहे. वरच्या मजल्यावरच्या स्पेशल खोल्यांत राहणाऱ्या उच्चभ्रू स्त्री-पुरुषांची त्या दुकानामुळे सोय होते. थोडं पुढे गेल्यावर कोपऱ्यावर फ्रूट स्टॉल आहे. त्याचा मालक अर्थातच पंजाबी आहे. तिथल्या कट्ट्यावर अनेक स्त्री-पुरुष फळांचे रस चाखत बसलेले असतात. मुसुंब्याच्या रसाचा एक ग्लास तिथे सव्वा रुपयाला मिळतो, पैशाअभावी पुण्यातली बस चालणार नाही, असं समजणाऱ्या माझ्या पूर्वजांनी सव्वा रुपयाला एक ग्लास सहज पिणाऱ्या आजच्या पिढीकडे जर पाहिलं तर स्वर्गातदेखील त्यांचं हार्टफेल झाल्याशिवाय राहणार नाही.

जसजशी संध्याकाळ गडद होत जाते तसतसं डेक्कन जिमखान्याच्या परिसरातलं ते वातावरण जास्त मदिर होत जातं. पूनमच्या बाजूकडील नटराज थिएटरचे दिवे मनात भरतात. तिथलं कारंजं थुई थुई नाचायला लागतं. त्या फूटपाथवर माणसांची नुसती खेचाखेच होते. साधं चालणंही कठीण होऊन जातं. नऊवारी लुगडे किंवा झिरमिळ्याची पगडी आजच्या पुण्यात दिसत नाही. रँग्लर परांजप्यांचा देहान्त होऊन दहा वषेर्देखील झालेली नाहीत. परंतु आज जर ते पगडी घालून जिमखान्याच्या गदीर्तून चालले असते तर लोक त्यांच्याकडे टकामका बघत राहिले असते. स्त्रियांच्या पोशाखांनी विविधतेच्या बाबतीत आज उच्चांक गाठलेला आहे. पाचवारीतल्या स्त्रियाही आता ‘काकूबाई’ झाल्या आहेत. पूवीर् चोळीऐवजी पोलके आले किंवा पोलक्याचा ब्लाऊज झाला तेव्हा पुण्यात किती गदारोळ उडाला होता, हे मी प्रत्यक्ष पाहिलेले आहे. आज बहुतेकींच्या कमरा, पाठी उघड्या असतात. त्याबद्दल वादंग माजवण्याचीच काय, पण साधी चर्चा करण्याचीही आवश्यकता कुणाला वाटत नाही!

टिळक रोडवर एस. पी. कॉलेजपाशी प्रथम इराण्याचे हॉटेल सुरू झाले, ते पस्तीस-छत्तीस साल असावे. त्यावेळी माटेमास्तरांनी केवढे आकांडतांडव केले होते! टिळक रस्त्याचे ‘ब्राह्माणी’-तपोवनासारखे शुद्ध आणि पवित्र वातावरण इराण्याच्या हॉटेलने दूषित होईल, अशी त्यांना भीती वाटली होती. आज त्या टिळक रोडची अवस्था काय आहे? गरीब बिचाऱ्या इराणी हॉटेलचे तर राहोच, पण सणसांच्या ‘हॉटेल जवाहर’ या विलायती दारू गुत्त्याचेदेखील आता कुणाला काही वाटत नाही. तो दारूगुत्ता मोठ्या समारंभाने सुरू झाला, तेव्हा काकासाहेब गाडगीळांनी निषेध दर्शविला होता. एका काँग्रेस पुढाऱ्याने नेहरूंच्या नावानं दारूचं दुकान काढावं याविषयी त्यांनी नापसंती व्यक्त केली होती. त्या गुत्त्यातील तळघरात टिळक रोडवरील तरुण-तरुणींची किती गदीर् असते, हे प्रत्यक्ष जाऊनच बघायला हवे! कॅबरे डान्स हा विषय पूवीर्च्या पुण्यात असणं शक्यच नव्हतं. सोन्या मारुतीपलीकडे इब्राहीम थिएटर आहे. तिथे तमाशा चालत. परंतु तिथे जाण्याची आमची छाती नव्हती. आता तर खुद्द टिळक रोडवर कॅबरे बघण्याची सोय आहे. हातात मद्याचे प्याले घेऊन चांगल्या घराण्यातले स्त्री-पुरुषदेखील कॅबरेचा आनंद उपभोगताना मी बघितले आहेत.

आजच्या पुण्याला कसलाच रंग नाही, रूप नाही. शनवारवाड्यापुढे अजूनही राजकीय पक्षांची भाषणे होतात, पण त्यांत ती मजा नसते. सारसबागेतील गणपतीला दर्शनासाठी झुंबड उडते, पण कसबा गणपतीच्या किंवा जोगेश्वरीच्या देवळात पूवीर् जो भाविकपणा दिसत असे तो नाही. पन्नास वर्षांपूवीर्च्या बहुतेक सर्व सार्वजनिक संस्था अजूनही काम करीत आहेत. इतिहास, संशोधक मंडळात पाक्षिक सभा होतात. वेद शास्त्रोत्तेजक सभेचे अहवाल प्रसिद्ध होतात. वसंत व्याख्यानमालेत दररोज व्याख्याने असतात. टिळक रोडवरच्या साहित्य परिषदेच्या हॉलमध्ये पंचवीस-तीस लोकांसमोर साहित्यविषयक व्याख्याने झडतात. सर्व काही आहे. पण पोटतिडिक कुठेच नाही. आजचं पुणं त्या दृष्टीनं चैतन्यहीन आहे.

प्रतिक्रिया
  1. सुरेख लिहिलं आहे. जुनं पुणं आठवलं नि त्याची तुलना आत्ताच्या पुण्याशी केली कि खूप वाईट वाटतं.

    • आज जर आमच्यासारखे तरुण असे विचार घेऊन बोलायला लागलो तर सध्याचे पुणेकर आम्हालाच बुरसटलेले आणि सनातनी म्हणतात. शिवाजीनगरच्या मोडर्न महाविद्यालयातून मागच्याच वर्षी मी बाहेर पडलो. तिथे आलेले अनुभव देखील असेच काहीसे होते. पुणेकर फारसा पुण्यात उरलाच कुठे आहे? प्रत्येक घरात एखादी व्यक्ती तरी अमेरिकत सहज असते. पु. लंचं तो “जाज्ज्वल्य” अभिमान बाळगायला पुणेकर पुण्यात राहिलाच कुठे आहे…

  2. swanand sardeshmukh म्हणतो आहे:

    ekhadya goshticha vichar karayala vel milana he jitka kami hot jail titaki pot-tidik kami hot jana sahajik aahe. paise milavane aani te udavane yamadhe dhanyata mananari loksankhya sahaj vadhu shakate. punyache chaitanya hi shikshan sansthanchi denagi hoti. tithe jeva bajar chalu zala teva te chaitanya harpayala suruwat zali. aaj Fergusson college he tithalya shikshanapeksha shikshanetar goshtinsathi prasiddha aahe. lakhavari fees na bharata jeva khare shikshan milel teva harawleli puneri pot-tidik kadachit parat yeu shakel. anyatha, keval paishacha soda gheun apachan thik karayacha prayatna chalu rahil.

    • पुण्यात बाहेरून येणाऱ्या लोकांकडून तिथली संस्कृती जपण्याची अपेक्षा आपण करू शकत नाही. शुद्ध पैसे कमावण्याच्या हेतूनेच ते इथे येतात. पण पुणेकरांचं काय? त्यांचे ते कर्तव्यच आहे. आम्ही पुणं सोडून दोन वर्षे उलटली. पण तिथे पुन्हा जाऊन राहावं असं मनातून खरंच वाटत नाही. मी इथे UAE मधल्या फुजैरह या छोट्याशा गावात सध्या राहतो. इथल्या अरबांची त्यांच्या संस्कृतीविषयी असलेली भावना पाहून थक्क व्हायला होतं. पुण्याची वाटचाल जर अशीच सुरु राहिली तर काही वर्षांनी आपण पाहिलेलं जुनं पुणं दंतकथाच वाटेल. या वर खरंच काय उपाय आहे का? आत्ताची परिस्थिती पाहून मी खूप pessimistic झालोये असं वाटतं मला…

      (ता.क. : ब्लोग व्यवस्थापकाला एक विनंती, सदर लेख मला आमच्या “अंतर्नाद मनाचे” ह्या ब्लोग वर प्रसिद्ध करायची इच्छा आहे. त्याविषयी जरूर कळवावे. ब्लोग ची लिंक खाली देत आहे….
      http://antarnadmanache.wordpress.com/)

      • दीपक म्हणतो आहे:

        मयुरजी,

        सदर लेख हा मटा मध्ये छापून आलेला आहे. मी इथे फक्त लेखांचा संग्रह करतो आहे. त्यामुळे या लेखावर माझा कुठलाही अधिकार नाही. मूळ लेखकाचे नाव आणि लेखाचे मूळ प्रसिद्धीस्थान यांचे नाव देऊन तुम्ही तुमच्या ब्लॉगवर प्रसिद्ध करु शकता. 🙂

  3. धन्यवाद दीपक.
    “अंतर्नाद मनाचे” वर सदर लेख प्रकाशित केलं आहे. खालील दुव्यास नक्की भेट द्यावी…

    पुणे बदलले…

Leave a reply to Mayur Indi / मयूर इंडी / ময়ুর ইন্দি उत्तर रद्द करा.