अशोक चौसाळकर, सौजन्य – लोकसत्ता
महाराष्ट्रातील बहुजन समाजात ज्या निरनिराळ्या चळवळी निर्माण झाल्या त्यांचा समाजवादी व साम्यवादी राजकारणाशी असणारा संबंध प्रा. भा. ल. भोळे यांनी अभ्यासला; तोच विषय त्यांनी पीएच. डी.च्या संशोधनासाठीही घेतला. सतत ९-१० वर्षे संशोधन करून १९८१ साली नागपूर विद्यापीठाने तो प्रबंध स्वीकारला. त्यानंतर तब्बल ३० वर्षांनी भोळे यांचा हा प्रबंध पुस्तकरुपाने प्रसिद्ध झाला असून, ग्रंथाला अशोक चौसाळकर यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश..
महाराष्ट्रातील बहुजन समाज व समाजवाद यांच्यातील परस्परसंबंध कशा प्रकारचे होते; बहुजन समाजात ज्या निरनिराळ्या चळवळी निर्माण झाल्या त्यांचा समाजवादी राजकारणाशी काय संबंध होता याबाबत महाराष्ट्रातील अभ्यासकांच्या मनात कुतूहल होतेच, राज्यशास्त्राचे ख्यातनाम अभ्यासक व संशोधक प्रा. भा. ल. भोळे यांना या दोन्ही चळवळींतील परस्पर संबंध तपासायचे होते. हा विषय त्यांनी त्यांच्या पीएच. डी.च्या संशोधनासाठी घेतला. सतत नऊ-दहा वर्षे ते या प्रबंधाचे काम करीत होते. शेवटी १९८१ साली नागपूर विद्यापीठाने हा प्रबंध स्वीकारला. आपल्या या प्रबंधात काही उणिवा आहेत व त्या दूर करून आपणास तो छापायचा आहे, असे प्रा. भोळे यांचे म्हणणे पडले; पण त्यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांना अपेक्षित असणाऱ्या दुरुस्त्या ते शेवटपर्यंत करू शकले नाहीत. आज जवळजवळ तीस वर्षांनी प्रा. भोळे यांचा प्रबंध पुस्तकरुपाने आहे त्या स्वरूपात प्रकाशित होत आहे.
प्रा. भोळे यांच्या प्रबंधाची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े होती. त्यातील पहिले वैशिष्टय़ म्हणजे प्रा. भोळे यांनी हा प्रबंध मराठीत लिहिला. १९७९-८० साली मराठीत सामाजिकशास्त्रात अशा प्रकारचा प्रबंध लिहिला जात नव्हता; पण इंग्रजीत न लिहिण्याची प्रा. भोळे यांनी प्रतिज्ञा केली होती व ती प्रतिज्ञा त्यांनी अखेपर्यंत पाळली. प्रबंधाचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे या प्रबंधासाठी संशोधन करताना प्रा. भोळे यांनी स्वत:ची अशी संशोधनपद्धती विकसित केली. त्यांनी स्वत:स कोणत्याही एका प्रस्थापित संशोधनपद्धतीत बांधून घेतले नाही. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी शेकापच्या १९८० पर्यंतच्या कामाचा आढावा घेतला नाही. त्यांनी महाराष्ट्राच्या स्थापनेपर्यंतच्या शेकापच्या कामाचाच आढावा घेतला. कारण त्यांच्या मते १९६० नंतर या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात फारशी महत्त्वाची कामगिरी केली नाही. वस्तुत: १९६० नंतर खऱ्या अर्थाने हा पक्ष स्थिरावला होता व पक्षास नवे सामुदायिक नेतृत्वच प्राप्त झाले होते. पक्षाचे काही क्षेत्रांत महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे स्वत: प्रा. भोळे यांना हे काम काहीसे अपूर्ण वाटत होते; पण त्यात काही भर घालणे त्यांना अशक्यप्राय वाटत होते.
प्रा. भोळे यांनी त्यांच्या हयातीत हा प्रबंध प्रकाशित केला नाही; पण तो आहे त्या स्वरूपात प्रकाशित केला तरी खूप मोलाचा आहे याची अभ्यासकांना जाणीव होती. कारण शेतकरी कामगार पक्ष या महाराष्ट्रातील अत्यंत वैशिष्टय़पूर्ण पक्षाचा अजूनही गंभीरपणे अभ्यास झालेला नाही. त्यामुळे हा प्रबंध प्रकाशित करण्याचा विजयताई भोळे यांचा निर्णय योग्यच असून, अनेक बाबतीत तो पुढे येणाऱ्या संशोधकांस मार्गदर्शक ठरणार आहे.
आपल्या आरंभीच्या निवेदनात प्रा. भोळे यांनी हा अभ्यास आपण का हाती घेतला याबद्दलचे आपले मत मांडले आहे. त्यांच्या मते शेकाप ही एका दृष्टीने म. फुले यांनी सुरू केलेल्या सामाजिक बदलाच्या चळवळीची विकसित अवस्था होती. आता या चळळीस नवे समाजवादी वळण लागले होते. म. फुले यांच्या परीप्रेक्ष्यातून शेकाप नवे वैचारिक आव्हान निर्माण करील, असे वाटले होते; पण ते शक्य झाले नाहीत. या संदर्भात प्रा. भोळे यांचे दुसरे महत्त्वाचे मत असे आहे, की म. गांधी यांचे तत्त्वज्ञानही सत्यशोधक विचारांची कालसापेक्ष सुधारित आवृत्ती आहे. या सर्व बाबींचा विचार करून शेकाप नवा विचार मांडील, असे त्यांना वाटत होते. आपल्या प्रबंधाच्या प्रयोजनाबद्दल ते लिहितात, ‘‘शेकापला या कार्यात कितपत यश मिळाले याचा मागोवा घेणे, त्याच्या यशापयशाची कारणमीमांसा करून बहुजन समाजाची चळवळ अधिक प्रभावी व पुरोगामी करण्याच्या दृष्टीने उपयोगी ठरतील, असे निष्कर्ष शक्य झाल्यास मांडणे हे माझ्या संशोधनाचे प्रयोजन होते.’’ आपल्या संशोधनाचे निष्कर्ष मांडताना प्रा. भोळे म्हणतात, की ‘‘पक्ष स्थापन झाल्यानंतर हा पक्ष अस्मितेच्या शोधात होता. त्याला स्वत:ची अशी विचारसरणी मांडता आली नाही. निवडणुकीच्या राजकारणात तो अयशस्वी ठरला. राजकारणाच्या व्यापक संदर्भात तो निष्प्रभ ठरला. १९६० नंतर पक्षाने केलेली वाटचाल फारशी महत्त्वाची नाही.’’
१९४९ साली शेतकरी कामगार पक्ष आणि समाजवादी पक्ष हे दोन पक्ष काँग्रेसमधून बाहेर पडले. या वेळी शेतकरी कामगार पक्षात तीन वेगवेगळे घटक सामील झाले होते. पक्षाचा गाभा असणारा घटक म्हणजे जुन्या ब्राह्मणेतर आणि सत्यशोधक समाजातून आलेला व्यावसायिक व मध्यम शेतकरी जातीतील मराठा समाजातील कार्यकर्ता होता. पक्षाचा हा कायम राहिला. दुसरा घटक काँग्रेस पक्षातून आलेल्या नाराज कार्यकर्त्यांचा होता. कारण त्यांचे देव, देवगिरीकर व बाळासाहेब खेर यांच्याशी मतभेद झाले होते. तिसरा घटक नवजीवन संघटनेतील कार्यकर्त्यांचा होता. हा गट असंतुष्ट कम्युनिस्टांचा गट होता. सुरुवातीस शेतकरी कामगार पक्षास लोकांचा चांगला पाठिंबा मिळाला. शंकरराव मोरे, केशवराव जेधे, नाना पाटील, दत्ता देशमुख, तुळशीदास जाधव यांच्या सभा गाजत होत्या. पक्षाला पाठिंबा मिळत होता. त्या काळात मुंबई राज्य होते. ते मोठे त्रभाषिक राज्य होते. या राज्याच्या विधानसभेत एकूण ३१५ सभासद होते. त्याच पश्चिम महाराष्ट्राचे १४१, मुंबईचे २७, गुजरातचे ९८ व कर्नाटकचे ४९ सभासद होते. १९५२ च्या निवडणुकीत शेकापचा मोठा पराभव झाला व त्यास फक्त १३ जागा मिळाल्या. मराठवाडय़ात त्यास ११ व विदर्भात २ जागा मिळाल्या. तिन्ही राज्यांत मिळून २६ जागा मिळाल्या. पण काँग्रेसला ३१५ पैकी २३४ जागा मिळाल्या. पश्चिम महाराष्ट्रात १४१ पैकी ११४ जागा मिळाल्या. काँग्रेसची ताकद मोठी होती व तो पक्ष महाराष्ट्रात कधीही नष्टप्राय झालेला नव्हता. त्यानंतर शेकापचे विभाजन झाले. मोरे, जेधे, जाधव काँग्रेसमध्ये परत गेले. पण पक्षाचासामाजिक पाया कायम राहिला.
भोळे यांच्या मते शेकाप हा म. फुले व सत्यशोधक समाजाच्या क्रांतिकारक विचारसरणींशी जोडलेला होता. स्त्री-शूद्रादी मागास जाती, अतिशूद्र शेतकरी, कामगार यांना सर्व प्रकारच्या शोषणाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा म. फुले यांना दिली. त्यातून एक नवी मूल्यव्यवस्था त्यांना समाजात रुजवायची होती. नवविचारांची रुजवात करून नव्या सांस्कृतिक बंडाची सुरुवात म. फुले यांनी केली होती. शेकापने या प्रेरणांचा विकास करून, आपल्या देशातील परिस्थिती लक्षात घेऊन क्रांतिकारक विचार मांडण्याऐवजी दाभाडी प्रबंधात उसना मार्क्सवाद-लेनिनवाद आणला. जेधे-मोरे यांनी स्वत: तर सुरुंग पेरलेच नाहीत. उलट फुल्यांच्या चळवळीतील सुरुंग त्यांनी वाया घालवले. संपूर्ण समाज हे फुल्यांच्या चळवळीचे कार्यक्षेत्र होते. तर राज्ययंत्रणा, मंत्रिमंडळ व सत्ताक्षेत्र जेधे-मोरे यांचे लक्ष्य ठरले. गांधीजींच्या चळवळीशी त्यांचे नाते जुळले नाही. कारण त्यातील उच्च विचार सत्यशोधक विचारांचा पुढचा भाग आहेत, हे त्यांनी लक्षात घेतले नाही. शेकापने हा वारसा विकसित केला नाही याबद्दल भोळे यांनी सातत्याने शेकापवरटीका केली आहे.
शेकापचा प्रसार ब्राह्मणेतर चळवळीचा प्रभाव ज्या भागात होता, त्या भागात जास्त झाला. सुरुवातीच्या काळात जेधे-मोरे, नाना पाटील, दत्ता देशमुख, तुळशीदास जाधव यांनी पक्षाचा झंझावाती प्रचार केला. संस्थानिकांविरुद्धच्या चळवळीत भाग घेतला. कोल्हापूरचे नेते माधवराव बागल स्वतंत्र कोल्हापूरची मागणी करीत असताना शेकापने विलिनीकरणाच्या बाजूने भूमिका घेतली. त्यांच्या मते छत्रपतीची सरंजामशाही सत्ता कायम ठेवणे म्हणजे प्रतिगामी शक्तींना हातमिळवणी करण्यास वाव ठेवणे होय! शेकापचे काम मुख्यत: शेतकऱ्यांत होते. कामगारांत, काही अपवाद वगळता, पक्षाची संघटना नव्हती. हा पक्ष जातीयवादी पक्ष आहे अशी टीका त्यावर काँग्रेसने केली. आपला पक्ष जातीयवादी नसून समाजवादी आहे असे आत्मसमर्थन पक्षाने केले.मार्क्सवाद-लेनिनवादाचा स्वीकार करून आपला पक्ष बौद्धिक पातळीवर कम्युनिस्ट पक्षाशी संलग्न ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण त्यांचा वारसा लेनिनवादी पक्षाचा नव्हता व त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचे त्याच्या सर्व चुकांसह अनुकरण केले. क्रांतीचे कल्पित, पुस्तकी व ठोकळेबाज डोलारे उभे केले. बहुजन समाजाचा क्रांतिकारक वारसा उपेक्षून त्यांनी स्याद समाजवादाचे (Psudo Socialism) अनुकरण केले. प्रा. भोळ्यांच्या मते शेकापने दाभाडी प्रबंधाचा स्वीकार करीत असताना माओ त्से तुंगने चीनमध्ये केलेल्या किसान क्रांतीचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवला होता. चीनमध्ये माओने किसान व कामगार यांना एकत्र आणून तेथे लाल क्रांती घडवून आणली होती. ही क्रांती भारतात पण व्हावी असे डाव्या विचारांच्या काही लोकांना वाटत होते. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांमध्ये पण त्याबाबत चर्चा होत होती. शेकापच्या नेत्यांवर चीनी क्रांतीचा प्रभाव पडला. पक्षातील नवजीवन संघटनेचे नेते पण त्या विचारांचे होते.
दाभाडी प्रबंधात त्याबाबतचे विवेचन करण्यात आले. आपला पक्ष हा कट्टर मार्क्सवादी पक्ष आहे आणि शेतकरी व कामगार यांच्या एकजुटीतून भारतात लोकशाही क्रांती करता येईल असे पक्षास वाटत होते. प्रा. भोळे यांच्या मते ‘रशिया’ व ‘कॉमिनफॉर्म’ यांच्याशी संबंध जोडण्याचा शेकापचा प्रयत्न चुकीचा होता. कारण तो कम्युनिस्ट पक्षाप्रमाणे आंतरराष्ट्रीय समाजवादी चळवळीचा भाग नव्हता. दाभाडी प्रबंध हा काही असंतुष्ट कम्युनिस्ट नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या गळ्यात बांधला व हे लोढणे त्या पक्षाने आयुष्यभर गळ्यात बांधले असे याबाबत प्रा. भोळे यांचे मत आहे.
त्यांच्या मते शेकापत संधी कमी व विग्रहच जास्त होता. तसे पाहिले असता जन्मापासून या पक्षास विग्रहाने पछाडलेले होते. पक्ष सतत बेरजेपेक्षा वजाबाकीचे राजकारण करीत होता. या संघर्षांत प्रथम पक्षास कॉ. दत्ता देशमुख, नाना पाटील व व्ही. एन. पाटील यांच्यासारख्या नेत्यांना मुकावे लागले. त्यानंतर पक्षाचे नेते शंकरराव मोरे, केशवराव जेधे व तुळशीदास जाधव हे पक्षाचे संस्थापकच काँग्रेस पक्षात परतले. त्यानंतर पक्षाचे नवे सरचिटणीस रघुनाथ खाडिलकर यांनी आपला नवा पक्ष स्थापन करून शेकापशी फारकत घेतली. या सर्व विग्रहाचा अत्यंत विपरीत असा परिणाम पक्षाच्या वाटचालीवर झाला. शेतकरी कामगार पक्ष व इतर गट यांच्यातील विग्रहाचे भोळे यांनी त्यातील गुंतागुंत नीट समजून घेऊन विवेचन केले आहे. त्यांच्या मते शेकाप व समाजवादी पक्ष आणि शेकाप व भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्यातही सौहार्दपूर्ण संबंध नव्हते. भोळे यांच्या मते समाजवादी पक्ष हा शेकापला सर्वात जवळचा पक्ष. पण त्या पक्षाशी जोडून घेण्याऐवजी त्यावर टीका करण्यात पक्षाने धन्यता मानली. त्याच्याशी केलेला खंडाळा करार यशस्वी झाला नाही. कम्युनिस्ट पक्षाचा शेकापकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा सौहार्दाचा नव्हता. शेकापचे त्या पक्षात विलिनीकरण करावे असा कॉ. वसंतराव तुळपुळ्यांचा आग्रह होता. पक्षाची मराठवाडा शाखा पण विलिनीकरणाच्या बाजूची होती. पण दाजिबा देसाईंसारखे ब्राह्मणेतर चळवळीतून आलेले नेते पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व ठेवण्याच्या बाजूचे होते. अखेर पक्षाने स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला.
आपल्या संस्थापकांच्या पक्षत्यागाने आहत झालेल्या शेकापला संयुक्त महाराष्ट्राची चळवळ संजीवनी देणारी ठरली. या लढय़ासाठी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची फौज पक्षाने तयार केली. या लढय़ात जास्तीत जास्त कार्यकर्ते शेकापने उतरवले होते. १९५७ च्या निवडणुकीत शेकापला त्याचा लाभ झाला. या निवडणुका समितीच्या झेंडय़ाखाली लढवण्यात आल्या. त्यात पक्षाने एकूण २७ जागा जिंकल्या.
त्याआधी १९५२ साली शेकापला मराठवाडय़ात चांगल्या जागा मिळाल्या होत्या. पक्षात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात फूट होऊन व कामगार किसान पक्षाचे लचांड पाठीमागे लागले असताना मिळालेले हे यश लक्षणीय होते. विधानसभेच्या बाहेर पक्षाने संयुक्त महाराष्ट्राचा लढा, साराबंदीचा लढा, सक्तीच्या सरकारी लेव्हीविरुद्धचा लढा, सीमा भागातील लोकांचा लढा व शेतकऱ्यांचे अनेक छोटे-मोठे लढे हिरीरीने लढवले. विधानसभेत शेकापच्या आमदारांनी स्वाभाविकपणे शेती व शेतकरी, कूळकायदा, जमीनसुधारणा या प्रश्नांवर चर्चा केली. अनेक वेळा सरकारला कायद्यात दुरुस्त्या करावयास भाग पाडले. पण शेतमजुरांचा प्रश्न त्यांच्याकडून चर्चिला गेला नाही.
शेकापचे नेतृत्व व पक्षबांधणी याविषयी लिहिताना भोळे यांनी पक्षनेतृत्वाचा आकृतिबंध काढला असून केशवराव जेधे, शंकरराव मोरे, र. के. खाडिलकर, तुळशीराम जाधव, माधवराव बागल इत्यादी नेत्यांच्या नेतृत्वाची वैशिष्टय़े व मर्यादा सांगितल्या आहेत.
या पक्षाचा एकही नेता वा शेतकरी कामगार चळवळीतून उदयास आला नव्हता. त्या क्षेत्रात पूर्णवेळ काम करणारा कुणीही नव्हता. सर्वच नेत्यांच्या भूमिका संमिश्र स्वरूपाच्या असल्यामुळे पक्षाची बलस्थाने त्यांना वापरता आली नाहीत. संघटनेच्या बाबतीत पक्ष स्वीकृत घटनादर्शाच्या बाबतीत खूप कमी पडला. पक्षसदस्य नोंदणी अत्यंत अनियमित होती व पक्षाच्या सदस्यत्वाची आकडेवारी कधीच घोषित करण्यात आली नाही. चळवळीतून एकगठ्ठा सदस्य नोंदणी करण्याचा पक्षाचा पायंडा होता.
भोळे यांच्या मते सत्यशोधक समाजाच्या चळवळीतून बहुजन समाजाची क्रांती करण्याची शेतकरी कामगार पक्षाची इतिहासदत्त जबाबदारी होती. निवडणुकीतील यशापेक्षा ही जबाबदारी कितपत पार पाडली यावरच पक्षाचे यशापयश मोजले पाहिजे. त्यांच्या मते पक्ष हे कर्तव्य विसरला. पक्षाने स्वीकारलेला मार्क्सवाद-लेनिनवाद हा आपल्या भूतकाळास लपवण्याची लटपट होती. वास्तविक पाहता पक्षास मिळालेला जनतेचा प्रतिसाद हा ब्राह्मणेतर चळवळीच्या संस्कारातून मिळालेला प्रतिसाद होता. पक्षाचा स्वर्गीय विस्तार हा भूधारक मध्य किसानांपुरता मर्यादित होता. इतर मोठे वर्ग त्याच्यापासून दूरच राहिले.
भोळे यांच्या मते दाभाडी प्रबंध हे शेकापच्या गळ्यातील लोढणे होते. त्यातूनच त्याची नवजीवन संघटनेशी कृत्रिम व अनिष्ट अशी युती झाली. शेकापची अवस्था त्यामुळे आपली परंपरा हरवलेला व नवता न सापडलेला पक्ष अशी झाली. पक्षाने मार्क्सवाद-लेनिनवादाचा व चीनमधील किसान क्रांतीचा पुरस्कार केला. हा पुरस्कार अनवधानाने व अविचाराने करण्यात आला. कारण भोळे यांच्या मते मार्क्सवाद-लेनिनवाद ही मोकळेपणाने विकसित तत्त्वप्रणाली नव्हती तर ती एका महान राजसत्तेच्या राजकीय व बौद्धिक सूत्रधारांच्या निर्णयांचे व धोरणांचे मार्क्स-लेनिनप्रणीत तत्त्वांच्या आधारे करायच्या समर्थनाची केवळ खटपट व लटपट होती. मार्क्सच्या मूल्यात्मक साध्याच्या जवळपासही या राजवटी जाऊ शकत नव्हत्या. त्यातून एक पक्षीय हुकूमशाही, संधिसाधू, पाशवीपणा व विधिनिषेधशून्य राजकारण सुरू झाले. शेकापच्या नेत्यांनी याबाबत कोणताही विचार न करता बिनदिक्कत मार्क्सवादाचा पुरस्कार केला! मात्र मार्क्सवादातील ज्या मूळ मानवतावादी प्रेरणा व परंपरा आहेत त्याकडे मात्र दुर्लक्ष केले.
प्रा. भोळे यांच्या प्रतिपादनाचा मुख्य आशय हाच होता की, शेकापने आपली सत्यशोधक प्रेरणा व परंपरा नीट विकसित न केल्यामुळे त्याचा बहुजन समाजात विस्तार झाला नाही. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट नेते ब्राह्मण समाजातून आलेले असल्यामुळे जातीचा प्रश्न त्यांना महत्त्वाचा वाटला नाही. कम्युनिस्ट पक्षाचे ब्राह्मणेतर चळवळीचे विश्लेषण मॉस्को छापापेक्षा सदाशिवपेठी जास्त होते, त्या पक्षाच्या ऱ्हासाची कारणे त्या पक्षाच्या रचनेमध्येच अनुस्यूत होती. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाल्यावर यशवंतराव चव्हाण यांनी सहकारी संस्था व पंचायत राज्य यांच्या मदतीने विकासाचे जे राजकारण सुरू केले. त्यामुळे ग्रामीण नेते त्यांच्याकडे वळले. काँग्रेसच्या सबगोलंकारी समाजवादामागे बहुजन समाजाची ताकद उभी राहिली. १९६० नंतर शेकाप जास्त नीटनेटका व एकजिनसी झाला असला तरी पक्षाचे मुख्य अपयश जनसंघटनांच्या क्षेत्रातील असून दाभाडीच्या भूमिकेचा फेरविचार केल्याशिवाय ते धुऊन काढणे पक्षास शक्य होणार नाही. शेकापने गांधीवादाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. गांधीवाद हा सत्यशोधक विचारांचा पुढचा विस्तार होता. महात्मा गांधी, मार्क्स व माओ यांच्या विचारांचा समन्वय करण्याचे आव्हान शेकापसमोर आहे. आपल्या अभ्यासाचा निष्कर्ष सांगताना भोळे लिहितात, ‘‘बहुजन समाजाची स्वाश्रयी व सहकारी एकजूटच श्रेष्ठींची सत्ता, संपत्ती व प्रतिष्ठा निष्प्रभ करू शकतील. फुले व गांधी यांच्या मार्गाने आलेला व त्यांच्याशी सुसंवादी असणारा मार्क्सवादच या क्रांतीचे दिग्दर्शन करून तिला यशसिद्धीपर्यंत नेऊ शकेल.’’
शेतकरी कामगार पक्ष व महाराष्ट्रातील डावी चळवळ याबाबत विचार करीत असताना प्रा. भोळे यांनी सहा महत्त्वाचे मुद्दे मांडले, ते खालीलप्रमाणे :
१) भारतीय शेतकरी कामगार पक्षास स्वत:ची अस्मिता शोधता आली नाही. तो धड कम्युनिस्ट पक्षही झाला नाही व तो धड प्रादेशिक पक्षही झाला नाही. मार्क्सादी-लेनिनवादी पक्षाचे आदर्श त्यास पचले नाही. माओ त्से तुंगच्या किसान क्रांतीचे रहस्य त्याच्या ध्यानी आले नाही.
२) दाभाडी प्रबंध हा पक्षाच्या गळ्यात अडकलेला अडसर होता.
३) पक्षाने आपला वारसा सत्यशोधक चळवळीत शोधून फुले, गांधी व माओ यांचा समन्वय करणारा नवा विचार मांडला नाही. त्यास नवा सर्जनशील विचार सुचला नाही.
४) शेकापच्या ऱ्हासास १९६० पूर्वीच सुरुवात झाली. १९६० नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात शेकापने कोठलेही महत्त्वाचे योगदान केले नाही.
५) शेतमालास जास्त भाव मिळवण्याच्या बाबतीत शेकापने उपस्थित केलेल्या प्रश्नाचे शरद जोशी यांनी केलेले विवेचन व त्यात शेकापने केलेले योगदान.
६) कम्युनिस्टांचे ब्राह्मणेतर चळवळीचे विश्लेषण हे सदाशिवपेठी आहे.
प्रा. भोळे यांनी असे म्हटले आहे की, महाराष्ट्रातील कम्युनिस्टांचे ब्राह्मणेतर चळवळीचे विश्लेषण सदाशिवपेठी आहे. खरे पाहिले असता हिंदुत्ववादाच्या रंगात सदाशिवपेठेचा साम्यवादाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नव्हता. या संबंधात कॉ. डांगे यांच्यावर मोठय़ा प्रमाणात अन्याय केला जातो. डांग्यांनी ‘सोशलिस्ट’च्या अंकात वर्गीय दृष्टिकोनातून ब्राह्मणेतर चळवळीची चिकित्सा केली. त्यांच्या मते ज्या दिवशी ब्राह्मणांनी आपण इतरांपेक्षा श्रेष्ठ आहोत अशी घोषणा केली त्याच दिवशी ब्राह्मण-ब्राह्मणेतरवादाचे बीज रोवले गेले. त्यातून सातत्याने संघर्ष झाले. त्यातून चातुर्वण्र्य समाजात वर्गनिर्मिती झाली व समाजातील शोषितवर्गाने शोषण करणाऱ्या वर्गाविरुद्ध उभे राहण्याचा निर्णय घेतला. पण या संघर्षांतून जातींचा नाश झाला नाही, त्याचे पर्यवसान व्यक्तीव्यक्तींच्या संघर्षांत झाले. याच्या मूळ कारणांचा शोध घेणारे थोर विचारवंत निर्माण झाले. लिंगायत पंथाचे संस्थापक बसवेश्वर, महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांनी याविरुद्ध बंड पुकारले. महानुभाव पंथाचा प्रसार खालच्या मानल्या गेलेल्या वर्गात झाला. ज्ञानेश्वर-तुकाराम यांनी पण समाजातील या विषमतेविरुद्ध आवाज उठवला. जातीव्यवस्थेविरुद्धचे हे बंड पूर्णत: यशस्वी झाले नाही. कारण समाजाचा वर्गीय पाया बदलला नाही. जाती या ब्राह्मणांच्या कटकारस्थानांतून निर्माण झाल्या नाहीत. त्या समाजविकासाच्या प्रक्रियेत निर्माण झाल्या. त्या गुंतागुंतीच्या श्रमविभागणीवर आधारलेल्या होत्या.
उत्पादन करणारा प्रत्येक उत्पादक तुटकपणे व स्वतंत्रपणे काम करीत असल्यामुळे त्यास अलग पाडून त्यावर वर्चस्व स्थापन करणे ब्राह्मणांना शक्य झाले. त्यामुळे बसवेश्वर, चक्रधर जाती तोडू शकले नाहीत. त्यांची चळवळ ‘पंथ’ बनली.
सध्याची ब्राह्मणेतर चळवळ लोकशाही अधिकारांसाठी आहे पण त्यात दोन वेगवेगळ्या प्रकारच्या शक्ती कार्यरत आहेत. त्यातील एक वर्ग ब्रिटिशांच्या मदतीने मध्यमवर्गात सामील झाला असून तो ब्राह्मणांशी सत्तास्थानांसाठी स्पर्धा करीत आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करीत असताना वंचित व शोषितवर्गाच्या स्वातंत्र्याचा व मुक्तीचा प्रश्न महत्त्वाचा आहे. पेटीबूज्र्वा ब्राह्मणेतर वर्ग सत्तेत व संपत्तीत वाटा मिळविण्यासाठी संघर्ष करीत आहे. या चळवळीत प्रामाणिक व प्रागतिक शक्ती कार्यरत आहेत. जातिसंघर्षांमागे असणाऱ्या वर्गीय वास्तवाची त्यांना जाण आहे. परंतु नव्या वर्गसमाजाच्या रचनेचा त्यांनी पूर्ण अभ्यास केलेला नाही. कारण आता नव्या व्यवस्थेत जातीची अस्मिता गळून पडणार असून कामगार म्हणून त्यास नवी ओळख प्राप्त होणार आहे. त्यामुळे यानंतर ब्राह्मण-ब्राह्मणेतर संघर्ष कामगार व भांडवल यांच्यातील संघर्षांत परिवर्तित होणार आहे. ब्राह्मणेतर चळवळीच्या नेत्यांनी समाजवादाच्या तत्त्वज्ञानाचा अवश्य अभ्यास करावा असे कॉ. डांगे सांगतात. आता डांगे यांच्या या मांडणीत कोणत्या प्रकारचा सदाशिवपेठीपणा आहे? प्रा. भोळे यांनी डांगे यांच्या ‘आदि भारत’ या ग्रंथावर टीका करताना तो आर्य-अनार्य सिद्धान्तावर व कुंटे-राजवाडे या ब्राह्मण इतिहासकारांच्या अभ्यासावर आधारलेला आहे असे मत प्रा. दि. के. बेडेकरांची साक्ष देऊन व्यक्त केले आहे. पहिली गोष्ट म्हणजे ‘आदि भारता’त आर्य-अनार्य कल्पनेबाबत फारशी वेगळी मांडणी नाही. प्रा. दि. के. बेडेकरांनी या पुस्तकावर टीका करताना डांग्यांच्या मांडणीवर टीका केली. त्यात त्यांनी मार्क्स-एंगल्सऐवजी कुंटे व राजवाडे या ब्राह्मण इतिहासकारांची मदत घेतल्याबद्दल डांगे यांच्यावर टीका केली नाही. त्यांचे असे मत होते की, वैदिक यज्ञासंदर्भात या ग्रंथात डांगे यांनी जी मांडणी केली आहे ती कुंटे यांच्या संशोधनावर आधारलेली आहे. पण कुंटे यांचे हे योगदान डांगे यांनी नोंदवले नाही. बेडेकरांच्या टीकेचा ब्राह्मण-ब्राह्मणेतर वादाशी संबंध नव्हता. १९८० नंतर पुरोगामी चळवळीच्या कार्यकर्त्यांत कॉ. डांगे यांच्यावर त्यांच्या जातीमुळे अकारण अन्यायी टीका कशी होत होती याचे हे उदाहरण आहे.
प्रा. भोळे यांचा हा ग्रंथ मराठी वैचारिक वाङ्मयात मैलाचा दगड ठरणार आहे. कारण महाराष्ट्राच्या राजकीय जीवनात वैशिष्टय़पूर्ण योगदान करणाऱ्या पक्षाच्या इतिहासातील पहिला टप्पा त्यांनी अभ्यासपूर्ण रीतीने आपल्यासमोर मांडला आहे. शेतकरी कामगार पक्ष हा महाराष्ट्राच्या मातीत जन्मास आलेला, महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जीवनात नव्या शक्तीस्रोतांना प्रवाहित करणारा पक्ष म्हणून प्रा. भोळे यांच्या मनात त्याबद्दल अगत्य होते. असा पक्ष महाराष्ट्रातील बहुजन समाजाने निर्माण केला याबद्दल त्यांना अभिमान वाटत होता. सर्वसामान्य शेकाप कार्यकर्त्यांबद्दल त्यांच्या मनात आदराची भावना होती म्हणून त्यांनी खूप मेहनत करून हा ग्रंथ सिद्ध केला. पक्ष त्यांच्या अपेक्षांना उतरू शकला नाही. पण पक्षाने आपल्या वेगवेगळ्या चळवळींच्या द्वारा लाखो लोकांना जो आधार दिला, त्यांच्या अधिकारांचे जे रक्षण केले या योगदानाबद्दल त्यांच्या मनात सकारात्मक भावना होती.