Archive for the ‘विचार’ Category

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

देवीप्रसाद चट्टोपाध्यायांनी त्यांच्या ‘लोकायत’ या गंभीर ग्रंथातील एका प्रकरणात इजिप्तमधील दैवतशास्त्राचा आधार त्यांच्या मुख्य लेखनप्रपंचाच्या मजबूतीसाठी घेतला आहे. दैवते कशी जन्माला येतात आणि समाजाला व देशाला ललामभूत वाटणाऱ्या मानचिन्हांचे मूळ कोणते असते हा या शास्त्राच्या शोधाचा विषय आहे. बहिरी ससाणा किंवा बाज हा पक्षी हे इजिप्तचे मानचिन्ह आहे. (भारताचे असे राष्ट्रीय मानचिन्ह तीन सिंह हे आहे.) ते त्या देशाने कां व कसे स्वीकारले याचा जो शोध तिकडच्या संशोधकांनी इजिप्तचा प्राचीन इतिहास व दैवतशास्त्र यांच्या आधारे घेतला त्याचा उल्लेख या ग्रंथात आला आहे. जगभरच्या सगळया समाजांप्रमाणेच इजिप्तचाही प्राचीन समाज एकेकाळी आदिम जमातींच्या स्वरुपात राहणारा होता. या जमाती स्वतःची ओळख त्यांच्या कुलचिन्हांच्या (टॉटेम) नावाने सांगत आणि जपत. आजही जगातले आदिम समूह अशी कुलचिन्हे लावत व सांगत असतात. नागलोक म्हणून ज्यांचा उल्लेख येतो त्या समूहाचे कुलचिन्ह नाग तर हनुमान ज्या जमातीत जन्माला आला तिचे कुलचिन्ह वानर होते. नागकुलोत्पन्न किंवा वानरकुलोत्पन्न अशी ही ओळख आहे आणि मानववंशशास्त्राच्या कोणत्याही विद्यार्थ्याला ती चांगली ठाऊक आहे. (रामायणातील जांबुवंताचे कुलचिन्ह अस्वल तर मकरध्वजाचे मगर हे होते. या कुलचिन्हांच्या उल्लेखांचा आधार घेत आपले पुराणग्रंथ वाचू लागलो की आदिवासींच्या समुदायांच्या तेजस्वी व पराक्रमी इतिहासाचे एक नवे दालनच खुले होते. या दालनाची दारे ठोठावायला पुढे होणे हा आदिवासींना व साऱ्यांनाच त्यांच्या मूळ स्वरुपापर्यंत पोहचण्याचा खरा व प्रशस्त मार्ग आहे.)

प्रत्येकच काळाची एक भाषा असते. ती कालानुरुप बदलतेही. एकेकाळी आपल्याकडे शाळेतल्या हजेरीबुकात मुलांची आडनावे नसायची. त्याऐवजी त्यांची जात लिहिली जायची. अशी जातीने ओळखली जाणारी माणसे एकेकाळी जमातींच्या किंवा त्यांच्या कुलचिन्हांच्या नावाने ओळखली जायची, एवढेच.
इजिप्त हा देश जेव्हा जमातींच्या अवस्थेत जगत होता तेव्हा त्यातही कुलचिन्हांच्या नावाने ओळखले जाणारे समूहगट होते. त्यांच्यात भांडणे होती, हाणामाऱ्या आणि युध्देही होती. अन्न मिळविण्यासाठी होणाऱ्या या जमातयुध्दात ज्या एका जमातीने बाकीच्या बहुसंख्य जमातींचा पराभव करून त्यांना आपल्या हुकूमतीखाली आणले तिचे कुलचिन्ह बहिरी ससाणा हे होते. जेत्यांचे कुलचिन्ह हेच कालांतराने जितांच्या वर्गांचे दैवत बनले. कारण त्या वर्गांनी त्या चिन्हासमोरच शरणागती पत्करून नतमस्तक व्हायचे होते. इजिप्तमध्ये बहिरी ससाण्याला हा मान मिळण्यामागे एवढा सारा इतिहास आहे.

देवीप्रसादांनी या न्यायाने भारतातील देवीदेवतांच्या जन्मांच्या कहाण्या शोधण्याचा प्रयत्न केला आहे. गणपती या दैवताला आपल्याकडे अग्रपूजेचा मान आहे आणि त्याला माणसाचा देह आणि हत्तीचे मस्तक आहे. झालेच तर त्या अगडबंब दैवताला उंदीर हे छोटेसे वाहन परंपरेने दिले आहे. वेदांमध्ये येणाऱ्या गणानाम् त्वाम् गणपतीला मानवी शीर आहे. तर महाभारताचे व्यासांनी सांगितलेले श्लोक लिहून घेणाऱ्या गणपतीला हत्तीचे मस्तक आहे. गणपतीच्या या बदललेल्या रुपाचा शोध मांडताना देवीप्रसादांनी बहिरी ससाण्याच्या इजिप्तमधील इतिहासाचा वापर केला आहे.

हत्ती हे कुलचिन्ह असलेल्या जमातीने आजच्या उत्तर भारतातील व विशेषतः बिहार व बंगालच्या परिसरातील इतर जमातींना आपल्या हुकूमतीखाली आणले. परिणामी हत्ती हे जेत्यांचे जमातीचे कुलचिन्ह जितांसाठी दैवत बनले. आपल्या परंपरेत मूर्तीपूजा होती आणि आपली दैवते मानवी तोंडवळयाची व देहाकृतीचीही होती. जेत्यांच्या कुलचिन्हाला दैवताचा मान द्यायचा तर त्याला मानवी देह द्यावा लागला व त्यातून आजचा आपला गणपती गजानन साकार झाला. पुढच्या काळात प्रगत धर्मात स्थान मिळाले तेव्हा त्याला अग्रपूजेचा मानही मिळाला. मग त्याच्या नावावर सूक्ते आली, स्तोत्रे लिहिली गेली आणि महाभारताच्या निर्मितीचे श्रेय त्याला व्यासांसोबत वाटून घेता आले. तो गणांचा म्हणजे जमातींचा पती (नेता) होताच, पुढे त्याला धर्माचे आद्यदैवत होण्याचाही मान मिळाला. हत्ती हे कुलचिन्ह असणाऱ्या जमातीने सर्वात प्रथम ज्या जमातीला पराभूत केले तिचे कुलचिन्ह उंदीर असावे आणि त्याचमुळे उंदीर हा आपल्या आजच्या गणपतीचे वाहन झाला असावा अशी उपपत्ती देवीप्रसादांनी मांडली आहे.

हा सारा तपशील येथे देण्याचे कारण आपल्याकडे दैवतशास्त्राचा म्हणावा तसा विकास अजून झाला नाही आणि दैवते कशी निर्माण होतात याविषयीचे संशोधन समाजाच्या फारशा परिचयाचेही झाले नाही हे आहे. आपल्या प्रतिपादनाच्या पुष्टीसाठी देवीप्रसादांनी दिलेले पुरावेही आपल्या दैवतांच्या जमातोद्भवी स्वरुपावर प्रकाश टाकणारे आहे. तोंडातून लांबवर जीभ काढलेली विक्राळ स्वरुपातली काली ही देवता कधी शंकराला तर कधी गणपतीला पायाखाली तुडवीत असल्याचे दाखविणारी चित्रे आपण पाहिली आहेत. बंगाल व बिहारात तशी शिल्पेही सापडणारी आहेत. देवीप्रसादांच्या मते पराभूत झालेल्या जमातींच्या मनात जेत्यांविषयीचा साचलेला सूडच या चित्रांमधून आणि शिल्पांमधून प्रगट झाला आहे. (दा व्हिन्सी कोड या जगप्रसिध्द कादंबरीतील मोनालिसाच्या चित्राचा लेखकाने लावलेला ऐतिहासिक अर्थ येथे लक्षात यावा.)

देव आणि दैवतांचा हा मानवी इतिहास लक्षात घेतला तर त्यासंबंधीच्या अनेक बऱ्या व चुकीच्या समजुतींची उत्तरे मिळू शकतात. सुग्रीव, हनुमान आणि जांबुवंत रामाला सहाय्य करतात याचा अर्थ रामाच्या बाजूने वानर आणि अस्वल कुळातील सगळया जमाती जातात असा होतो. त्याचबरोबर वानरकुळातील एका गटाचे (सुग्रीव) रावणाच्या कुळाशी असलेले वैर आणि दुसऱ्याचे (वाली) त्याच्याशी असलेले सख्यही स्पष्ट होते. सुग्रीव आणि वालीचे भांडण हे एकाच जमातीतील प्रमुख कुळातले भांडण ठरते. पांडवांनी सर्पसत्र आरंभले याचा अर्थ त्यांनी नागलोकांना हुसकून लावत त्यांच्या ताब्यातील भूभागावर आपली सत्ता कायम केली असा होतो.

हा भाग येथवर थांबतही नाही. तो धर्मग्रंथांच्या गाभ्यापर्यंत जातो. ऋत ही वेदांमधली देवता. सारे ऋतू, ऊन, वारा, पाऊस यांचा नित्यक्रम, पिकांचे उगवणे, स्त्रियांचे ऋतुमती होणे, मुलांचे जन्म, वृध्दांचे मृत्यू आणि सृष्टीतला एकूणच नियमितपणा यावर या देवतेचे नियंत्रण. जोवर पाऊस वेळेवर पडतो, सृष्टीचा सारा क्रम ठरल्यानुसार चालतो आणि ती माणसांच्या अन्नवस्त्रासारख्या गरजा भागवते तोवर वेदांमधले ऋताचे श्रेष्ठत्व कायम असते. वरुण ही देवताही सृष्टीच्या नियमाचे निर्धारण करणारी म्हणून त्यावेळी श्रेष्ठ असते. मात्र पाऊस अपुरा पडला, पिके कमी झाली, अन्नाचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले आणि त्यासाठी लढाया कराव्या लागल्या की वरुणाची जागा एका लढाऊ दैवताकडे, इंद्राकडे जाते. मग इंद्र हा देवांचा राजा व वेदातील सर्वशक्तिमान दैवत होतो. समाज आपल्या गरजांप्रमाणे आपली दैवते घडवीत असतो. पशुपालकांच्या टोळयांची सगळी दैवते पुरुषरुपी तर कृषीप्रधान समाजाची दैवते स्त्रीरुपातील असतात. पशुपालनासाठी लागणारे शरीरबळ पुरुषात असते तर शेतीचा शोधच स्त्रीने लावला असल्यामळे असे होते. आपल्या पूजेतल्या साऱ्या देवदेवता निर्मितीशी संबंध असणाऱ्या. त्यातून गौरीची पूजा, शिवलिंगाचे पूजनही त्यामुळेच. या दैवतांची आजची रुपे बरीच प्रतिकात्मक असली तरी त्यांची आरंभीची रुपे कमालीची उघड आणि स्पष्ट होती. हरप्पा-मोहेंजोदारोच्या मूर्तीतील स्त्रीदेवतेच्या जननस्थानातून बाहेर पडणारे पिकांचे कोंभही याच प्रकारातून येणारे. कामाख्य मंदिरात उघडपणे होणारी योनीपूजाही याच स्वरुपाची. मानवी गरज आणि त्यासाठी निर्मितीच्या साधनांची उपासना यातून केवळ दैवतांचीच रुपे घडत नाहीत. ओंकार हेही समागमाचेच प्रतिक असते आणि ते आद्य म्हणून पूजले जाते.

सांख्यांच्या तत्त्वज्ञानात स्त्री कर्तृत्त्वशाली आणि कृतीप्रवण तर पुरुष नाकर्ता असतो. मातृसत्ताक कुटूंबात (मानववंशशास्त्रज्ञांच्या आताच्या मतानुसार मातृवंशाधिष्ठित कुटूंबात) स्त्री स्वामिनी असणारी आणि घर व कुटूंबाचे सर्वाधिकार वापरणारी असते. या कुटूंबात पुरुष घराबाहेर असतो. तो अधूनमधून भेटणारा असतो. अशा समाजाच्या ज्या अवस्थेत मुलांच्या जन्मातला पुरुषाचा सहभाग कोणाला कळला नसतो त्या अवस्थेचे पुढे चालत आलेले हे सांख्यरुप असते. प्रत्येकच भारतीय दैवताची आणि तत्वविचाराची सांगड अशी जडप्रकृतीत चालणाऱ्या व्यवहाराशी घालून दाखविता येते व तशी ती देवीप्रसादांनी घालून दाखविली आहे.

बौध्द आणि जैनांच्या विचारांचा उगमही समाजाच्या तत्कालीन अवस्थांशी आणि त्या अवस्थांत माणसांना भेडसावणाऱ्या प्रश्नांशी घालून दाखविता येणारा आहे. गरजा आणि मागण्या पूर्ण न होण्याच्या अवस्थेत इच्छा जिंका, तृष्णा संपवा किंवा सारे दुःखमयच असल्याचे सांगणारी, संन्यास वा निर्वाणाकडे वळण्याची शिकवण देणारी तत्त्वज्ञाने कां जन्माला येतात याची उत्तरे फारशा चिंतनात न शिरताही हाती येणारी आहेत. राजा बिंबिसार आणि राजपुत्र अजातशत्रू हे दोघेही गौतमाचे शिष्य होते. त्याचे शिष्यत्व पत्करूनही त्यांची सत्तेची तृष्णा तशीच राहिली होती. बिंबिसार वृध्द होऊनही आपल्यासाठी गादी सोडत नाही म्हणून अजातशत्रूने त्याला कैदेत टाकले व मारलेही. पुढे अजातशत्रूचा मुलगा विदुदभा याने अजातशत्रूला कैदेत टाकून स्वतः गादी बळकावली. विदुदभा हा क्रूरकर्मा होता. एका संतापाच्या भरात त्याने कपिलवस्तुतील (प्रत्यक्ष बुध्दाच्या गणराज्यातील) साऱ्या स्त्रीपुरुषांसह आबालवृध्दांची कत्तल केली. हा सारा संहार प्रत्यक्ष पाहावा लागलेल्या त्या परमकारुणिकाच्या संदेशात दुःख आणि तृष्णा यांच्यावर मिळवावयाच्या विजयाखेरीज दुसरे काय असू शकेल?

अलेक्झांडरचे साम्राज्य लयाला गेले आणि साऱ्या मध्य आशियातील समाजांचे ज्ञान व वैभवही संपुष्टात आले. रोमच्या साम्राज्याचा सुवर्णकाळ दूर होता. त्या अंधाऱ्या व उपेक्षित काळात आक्रमणकारी वा विजिगिषु विचार जन्माला येणे शक्य नव्हते. येशूचा सेवाधर्म या संदर्भात तपासून पाहण्याजोगा आहे.
कृतज्ञता बुध्दी हा मानवी स्वभावाचा एक चांगला व नित्याचा विशेष आहे. ज्यांनी समाजासाठी मोठी कामे केली त्यांना दैवत मानू लागणे ही त्याची वृत्तीही त्यातूनच येते. पाणिनी म्हणाला, ‘समाजासाठी मोठी कामे करणारी माणसेच कालांतराने त्या समाजाची दैवते होतात. असे एक उदाहरण नर-नारायणाचे (अर्जुन आणि कृष्ण) आहे.’ महाभारताचा चिंतामणराव वैद्यांनी निश्चित केलेला सनपूर्व 2300 वर्षे हा काळ मान्य केला तर पाणिनी त्यानंतर 1500 वर्षांनी येतो. तोवर कृष्णार्जुन या कर्तृत्वशाली नेत्यांना ईश्वराचे स्वरुप येऊ लागले होते असा व्याकरणकाराच्या या वचनाचा अर्थ आहे. दैवते कशी जन्माला येतात आणि विचारसरणींच्या मागे कोणते वास्तव उभे असते हे असे ध्यानात घेतले की धर्मांच्या उभारणीचे आणि त्यामागच्या ईश्वरी किंवा करुणेच्या वा सेवेच्या प्रेरणांचे स्पष्ट आकलनही होऊ शकते. पाश्चात्य अभ्यासकांनी धर्मसंस्थापकांच्या मानसिक आंदोलनांची जी अतिशय सूक्ष्म उकल करून दाखविली आहे, ती करण्याचे धाडस आपल्याकडे अजून व्हायचे राहिले आहे हेही येथेच नमूद करण्याजोगे. जडवादी दृष्टीकोनातून ईश्वर, धर्म किंवा विचारसरणी यांची लावता येणारी ही उपपत्ती शंभर टक्के खरीच मानावी असे कुणी म्हणणार नाही. मात्र ती या साऱ्या व्यवहाराच्या मूळ स्वरुपावर लक्षात घ्यावा एवढा प्रकाश टाकण्याएवढी प्रभावी नक्कीच आहे. दा व्हिन्सी कोडने प्रकाशात आणलेली रहस्ये किंवा इस्लामच्या निर्मितीमागे उभ्या असलेल्या ईश्वरी प्रेरणांचे मानसिक रुपही असेच आणि त्याविषयीचे आजवर न समजलेले गूढ उकलून दाखविणारे आहे.

(अनेक वाचकांना हा त्यांचा मानसिक छळ वाटणारा अध्ययन प्रकार आहे. मात्र सत्य हे नेहमीच फार सुंदर आणि गोड वगैरे नसते हे मनात आणले की हा छळ काहीसा सुसह्य होणाराही आहे. हा छळ टाळण्याचा एक सोपा मार्गही उपलब्ध आहे. या साऱ्या अध्ययन-विवेचनाची दखल न घेता त्याकडे पाठ फिरविता येते. आपल्यातील अनेकजण तो अनुसरतातही. पाश्चात्य जगाने याआधी असे केले आहे. त्या जगाने स्पिनोझाला वाळीत टाकले आणि कांटला पुन्हा न लिहिण्याची तंबी दिली. गॅलिलिओ आणि कोपर्निकस यांचा त्याआधीचा इतिहास सर्वज्ञात आहे.

आशियायी देशातील जनतेला असले ‘पाखंड’ जन्माला येऊ शकते हेच अजून मान्य व्हायचे आहे. भारतातल्या कितीजणांना देवीप्रसादांची दखल घ्यावीशी वाटली हाही येथे विचार करण्याजोगा प्रश्न आहे. ते तत्वज्ञानाचे अतिशय आदरणीय अभ्यासक होते. राज्यसभेचे सदस्य आणि राजस्थानचे राज्यपालही होते. त्यांचा हा ग्रंथही 1950 च्या दशकात प्रकाशीत झाला. मात्र मराठवाडयातील काही विचारवंतांचा अपवाद वगळला तर त्याची दखल घ्यावी असे कोणाला वाटले नाही. विचार करणाऱ्यांचा जो वर्ग अजूनही अन्यत्र राहिला त्यानेही त्यांच्याकडे पाठ फिरवणे हा आपल्या सुरक्षिततेचा मार्ग असल्याचे ठरवून टाकले.)

धर्म, धर्मपुरुष आणि धर्मग्रंथ यांचे अर्थ व गरज काळानुरुप कसे बदलतात याचे आपल्या परिचयाचे उदाहरण भगवत्गीतेचे आहे. गीतेचा देशाला ठाऊक झालेला पहिला गंभीर अर्थ आठव्या शतकातील आद्य शंकराचार्यांचा आहे व तो संन्यासपर आहे. (शंकराचार्यांचा या क्षेत्रातील अधिकार आणि दरारा एवढा की गीतेतील श्लोकांची संख्याही त्यांच्या गीताभाष्यानुसारच निश्चित करण्यात आली आहे) पुढे तेराव्या शतकात झालेल्या ज्ञानेश्वरांनी हाच अर्थ चिद्विलासपर लावला. विसाव्या शतकाच्या आरंभी तो कर्मपर असल्याचे मत लोकमान्यांनी त्यांच्या गीतारहस्यात मांडले. गांधीजींनी गीता हा अहिंसेची शिकवण देणारा ग्रंथ असल्याचा अभिप्राय, त्या ग्रंथावरच्या त्यांच्या आयुष्यभराच्या चिंतनानंतर नोंदविला. दरम्यान रामानुज, मध्व, निंबार्क या विशिष्टाद्वैती, द्वैती आणि द्वैताद्वैती आचार्यांनीही त्यांच्या गीताभाष्यांत याच ग्रंथातून त्यांच्या चिंतनाला अनुकूल असणारे अर्थ काढून दाखविले. सारांश, भगवत्गीतेचे मार्गदर्शन व चिंतन या देशात शंकराचार्यांच्या पश्चात बाराशे वर्षे सुरू राहिले आणि यापुढेही ते थांबणारे नाही. त्यामुळे हा ग्रंथ प्रत्येक शतकाला आणि काळाला मार्गदर्शक ठरणारा आहे असाच त्याचा लौकिक कायम झाला.

चिकित्सक अभ्यास करू पाहणाऱ्याला या संदर्भात पडणारा प्रश्न, गीतेच्या एवढया सगळया अर्थांपैकी खरा व नेमका अर्थ कोणता मानायचा, हा आहे. (ज्ञानेश्वरीवर अधिकारवाणीने बोलणाऱ्या एका मराठी महाराजांना प्रस्तुत लेखकाने हा प्रश्न विचारला तेव्हा ‘माझा गीतेचा अभ्यास अजून व्हायचा आहे’ असे उत्तर देऊन ते थांबले होते.) या पेचातून एका विश्वसनीय मार्गाने बाहेर पडता येते. शंकराचार्य आणि ज्ञानेश्वर काय किंवा टिळक आणि गांधी काय, ही सगळी लोकोत्तर विद्वत्ता आणि प्रज्ञा घेऊन जन्माला आलेली माणसे आहेत. त्यांचा समाजजीवनावरील प्रभाव आणि त्याविषयीची त्यांची जबाबदारी मोठी आहे. ही माणसे भगवत्गीतेवर गाईड लिहायला कशाला बसतील? सहाव्या शतकापासून समाजात आणि धर्मात होत असलेली नैतिक पडझड आणि वाढीला लागलेला अनाचार थांबवायचा तर शंकराचार्यांना संन्यासवृत्ती आणि कर्मत्याग यांचाच उपदेश समाजाला करणे भाग होते. ज्ञानेश्वरांसमोरचे आव्हान देशावर चालून आलेल्या मोगली आपत्तीपासून आपली प्राचीन संस्कृती आणि सभ्यता टिकवून ठेवण्याचे आणि समाजमनात तोवर रुजलेल्या चांगल्या श्रध्दा कायम करण्याचे होते. त्यासाठी संन्यासाच्या मागे येणे आणि चिद्विलासाचा विचार मांडणे ही जबाबदारी त्यांच्यावर होती. हे जीवन नुसतेच निःसार नाही. ते चैतन्याने भरले आहे ही त्यांची शिकवण त्यातून येते. लोकमान्यांसमोरचे आव्हान स्वातंत्र्यप्राप्तीचे आणि त्यासाठी समाजमनात कार्यप्रवणता उभी करण्याचे आहे. ही माणसे गीतेचे अर्थ लिहायला बसली नव्हती. समाजाला जे सांगायचे ते सांगत असताना आपल्या उपदेशामागे गीतेतल्या ईश्वरी वचनांचे बळ उभे आहे हे त्यांना समाजमनावर ठसवायचे होते. शंकराचार्यांचे आणि ज्ञानेश्वरांचे वय लक्षात घेतले तर ती त्यांची गरज होती हे कळते. लोकमान्यांची लोकप्रियता मोठी असली तरी त्यांनाही आपल्या शब्दामागे ईश्वरी वचन उभे करावेसे वाटणे ही त्या काळाचीही गरज होती… अनेकांना हा फार ओढून ताणून आणलेल्या स्पष्टीकरणाचा भाग वाटेल. मात्र अशावेळी त्यांना कोणाचा अर्थ बरोबर आणि कोणाचा चुकीचा वा अपुरा हे सांगण्याची जबाबदारी घ्यावी लागेल. अखेर शंकराचार्य, ज्ञानदेव, टिळक किंवा गांधी हे त्यांच्या काळाचेही पुत्र असतात हे येथे विसरता येणारे नसते.

विचार आणि तत्वज्ञान यांनी इतिहास घडतो काय? व्हॉल्टेअर म्हणाला, जगावर पुस्तके राज्य करतात. पण प्रत्यक्षात राज्य पुस्तकांचे असते की ती हाती असणाऱ्यांचे? रशियाचे राज्य दास कॅपिटल या ग्रंथाचे होते की लेनिन आणि स्टॅलीन या जोडगोळीचे? वेद राज्य करतात की त्यातल्या मंत्रांनी अभिषिक्त झालेले राजे? राज्य येशूचे असते की कॉन्स्टँटिनोपलचे आणि पोपचे? इस्लामची राजवट ही तरी शरियतची असते की खलिफांची आणि बादशहांची? या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे कधीतरी इतिहासाला द्यावी लागतील आणि वर्तमानाला ती मिळवावी लागतील. ग्रंथांच्या नावाने त्यावर ताबा मिळवणारी माणसेच राज्य करीत असतील तर ती ग्रंथांच्या मूळ प्रयोजनापासून भरकटतच जातात. कारण सत्तेचे प्रयोजन ग्रंथ किंवा ग्रंथांनी प्रतिपादन केलेली मूल्ये हे नसते. सत्तेचे प्रयोजन सत्ता हेच असते. असलेल्या सत्तेचा वापर करून सत्तेत वाढ करायची आणि वाढीव सत्तेचा वापर आणखी मोठी सत्ता मिळवण्यासाठी करायचा. सत्तेला वाढावेच लागते. तिला थांबता वा स्थिर होता येत नाही. तिचे वाढणे थांबले की शेजारच्या सत्ता बळावतात. सत्तेभोवतीची माणसेच तिला आव्हान द्यायला मग उभी होतात. मग सत्ता आणि सत्ताधारी आपल्या सत्तावाढीसाठी ज्या मार्गांचा वापर करतात त्यातला सैन्य आणि शस्त्रवाढीचा मार्ग सर्वज्ञात आहे. त्यासाठी लागणारे अर्थबळ वाढविणे हाही त्याचा एक उपाय आहे. त्याशिवाय जनतेवर स्वामीभक्तीचा संस्कार करण्यासाठी ग्रंथांचा आणि धर्मग्रंथांचाही वापर करता येणारा आहे. सत्तेच्या राजकारणात मंदीर, मशिद आणि पुतळे वापरता येतात तसे ग्रंथ आणि त्यातली शिकवणही वापरता येते. जडवादाचे अध्ययन करताना या साऱ्या वास्तवाचे भान अभ्यासकाला राखावे लागते.

दुर्गा भागवत, सौजन्य – मटा

भरभराट इच्छिणा-या कोणत्याही समाजाला परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात , तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या पंरपरा जेव्हा घट्ट , खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात , तेव्हा मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात… अशी मांडणी केली विदुषी दुर्गा भागवत यांनी. २ एप्रिल १९८९ ला महाराष्ट्र टाइम्सच्या मैफल पुरवणीत हा लेख छापून आला होता.
…………………………….

गेले काही दिवस महाराष्ट्रभर महात्मा फुल्यांच्या संदर्भात मोठे वादंग माजल्याचे आपण पाहताहोत. हे वादंग त्यांच्या हिंदूधर्माबद्दलच्या विवेचनासंबंधी आहे आणि त्यातून प्रकरण हातघाईवर आल्याचे दिसते आहे , अशा वेळी या देशाची एक जबाबदार नागरिक , थोडीबहुत शिकलेली ,थोडासा नावलौकिक असलेली आणि विशेष म्हणजे समाजशास्त्राची अभ्यासक म्हणून चार समजुतीचे व जबाबदारीचे शब्द सांगावे यासाठी मी आज वा लेखाचा प्रपंच करते आहे.

फुल्यांसारखी माणसे हवीत की नकोत ? फुल्यांसारख्या व्यक्तीच्या बाबतीत पहिला महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो की , समाजाला अशा व्यक्तीची गरज असते की नसते ? किंवा फायद्यापेक्षा तोटाच अधिक होत असतो ? फुल्यांसाख्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा , मृत्यूला शतकापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला असतानासुद्धा तुम्ही – आम्ही कुठली भूमिका घ्यायची हे ठरविण्याची वेळ येते ती का ?

पण फुल्यांसारख्या व्यक्ती म्हणजे कुठल्या प्रकारच्या व्यक्ती बरे ? तर त्या व्यक्ती म्हणजे सामाजिक बंडखोरी करू पाहणा-या व्यक्ती. विचार आणि कृती या दोन्ही अंगांनी समाज सुधारायचा प्रयत्न करू पाहणा-या व्यक्ती. थोडक्यात , ज्यांना आपण ‘रेव्होल्युशनरी क्रिटिक ’ (क्रांतिकारक टीकाकार) म्हणतो अशा व्यक्ती. अशा व्यक्ती स्वभावतःच आदर्शवादी असतात आणि आदर्शवादी असल्याने त्यांना समाजाची अपेक्षित आदर्श स्थिती या दोहोंतली तफावर चटकन् जाणवते. जाणवते एवढेच नव्हे ,तर अंतर्यामी खोलवर खुपते ; आणि ही तफावत दूर करण्यासाठी ही माणसं कंबर कसतात. प्रस्थापित समाजावरचा त्यांचा हल्ला दोन वेगवेगळ्या बाजूंनी असतो.  एक वैचारिक टीकेच्या स्वरुपात आणि दुसरा प्रत्यक्ष कार्याच्या स्वरुपात. तात्विक उपपत्ती मांडून एकीकडे प्रचलित समाजाचे दोष दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि दुसरीकडे त्याचवेळी हे दोष दुरुस्त करण्यासाठी हे लोक त्यांच्या परीने निरनिराळ्या प्रकारचे इलाजही सुचवीत असतात.

आता समाजामध्ये सामाजिक क्रांती घडून यावी यासाठी समाजावर टीका करणारे समाजसुधारक हवेत की नकोत? या प्रश्नाचे उत्तर कुणीही जबाबदार माणूस ’हवेत’ असेच देईल, असे मला वाटते. समाजाला स्थैर्य हवे असते आणि तसेच परिवर्त्न सुद्धा हवे असते. समाज नुसता एका जागी  स्थिर राहिला तर त्याचे डबके होईल. म्हणून भरभराट इच्छिणा-या या कोणत्याही समाजाचा परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात. तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या परंपरा जेव्हा घट्ट, खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात, तेव्हा त्या मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात. समाजाची प्रगती पाहिली तर ती जुन्यातले सारेच काही टाकून देत नाही, ती काही नवे आत्मसात करीतच फक्त होऊ शकते.

रूढीवर टीका

समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखी सामाजिक अन्याय व दु:खे यांच्यावर बोट ठेवणारी नि त्यासाठी समाजाला धारेवर धरणारी माणसे हवीत, असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचवेळी ही माणसे प्रचलित धर्मसंस्थेवर, धार्मिक समजुतींवर, आचार धर्मावर कठोर प्रहार करणार आहेत, हेही मान्य करावे लागते. धर्मावरची त्यांची टीका अपरिहार्य असते. कारण धार्मिक समजुतींच्या बैठकीवरच सगळ्या जुन्या समाजांचा बराचसा कारभार चाललेला असतो. रिच्युअल्स ऊर्फ विधिजाल आणि देवादिकांबद्दलची मिथ्थके यांच्या मदतीनेच धर्म हे माणसांचे आपसाआपसांतले व्यवहार नियंत्रिक करीत असतात. काही प्रमाणात प्रजेला दिल्या गेलेल्या प्रत्यक्ष आदेशाच्या रुपात, तर ब-याच प्रमाणात प्रेरक स्वरुपाच्या सूचनांच्या स्वरुपात हे सर्व घडत असते.

विधिकल्प व मिथ्थके

जेव्हा कधी अगदी पूर्वकाळी या कथा वगैरे रचल्या जातात, तेव्हा त्यांचा उद्देश त्या घटितात (सिच्युएशन) किंवा मानवी प्रसंगामध्ये मानवाला कसे वागायचे हे शिकवावे हा असला, तरी कालांतराने त्या रुढींचे व कथांचे कठीणसे घट्ट साचे बनतात नि ते जनतेची हालचाल, चलनवलन वगैरे मर्यादितही करुन टाकतात.  हे कसे घडले हे दाखविण्यासाठी अशा कथांचे एक उदाहरणच देते. हे उदाहरण साध्या लोककथेचे आहे. मूळ किंवा आदिम प्राक-कथनातला धर्मवाचक आशय जेव्हा कमकुवत होतो, तेव्हा त्या प्राक-कथांचे रुपांतर लोककथांमध्ये होत असते. नवरा-बायकोच्या जोडीत नव-याने पुरुषाची कामे करावीत नि बायकोने बाई माणसाची करावीत, हा धडा किंवा पाठ देणा-या कथा या सर्व जगभर प्रचलित आहेत.  एका कथेत बायको शेतात जाऊन पुरुषाचे काम करु पाहते, तर नवरा घरात राहून रांधणे – वाढणे, धुणी – भांडी, मुले सांभाळणे हे बायकोचे काम करतो, तेव्हा त्यातून अनेक गमती-जमती आणि घोटाळे कसे होतात, त्याचे वर्णन येते. या कथेतील गमती – जमतीचा किंवा विनोदाचा भाग बाजूला सारला, तरी पुरुषांनी पुरुषांची नि बायकांनी बायकांची कामे केली, तरच संसार व्यवस्थित चालू शकतो, हा ’जैसे थे’ चा पुरस्कार करणार किंवा गतानुगतिकाचा गर्भित संदेश प्रतीत होतोच.

हीच गोष्ट थोड्या फरकाने अनेक प्रकारच्या धर्मसंलग्न मिथ्थकांच्या बाबतीत घडत असते आणि जैसे थे ऊर्फ गतानुगतिक परिस्थिती रुढी सांभाळून ठेवण्यासाठी समाजातले हितसंबंध गट त्या मिथ्थकांचा उपयोग करतात. समाजाच्या विकासाबरोबर असे हितसंबंध गट त्या समाजामध्ये उत्पन्न होणे हे देखील अपरिहार्य आहे. असो.

तर सांगायचा मुद्दा हा की, जो कुणी समाज सुधारण्याचा प्रयत्न करायचा म्हणून समाजातल्या दोषांवर टीका करु पाहतो त्याला धर्मावर टीका केल्यावाचून, धर्माची समीक्षा केल्यावाचून गत्यंतर नसते. कारण समाजातल्या हितसंबंधी गटांच्या हितसंबंधांवर आघात केल्यावाचून त्याला पुढे जाताच येत नाही.

समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखे आवश्यक आहेत, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते आपल्या धार्मिक समजुतींवर आघात करतात, हेही आपल्याला नुसते गृहित धरुन चालत नाही तर कबूल करावे लागते.

सुधारकांचा दुसरा प्रश्न
फुल्यांसारख्या समाजसुधारकांबद्दल दुसरा प्रश्न उत्पन्न होतो . समाजाच्या एकूण कल्याणासाठी फुल्यांसारखे लोक आवश्यक आहेत , ही गोष्ट खरी , पण म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानायचा काय ? माझ्या मते मानायचा नाही . फुल्यांसारखी माणसे समाजाला पुढे नेतात – ही गोष्ट खरी असली तरी ती शेवटी माणसेच आहेत . फार तर थोर माणसे म्हणा . पण शेवटी माणसेच . स्थल – काल – परिस्थिती यांनी बद्ध अशी माणसे . त्यामुळे त्यांचे शब्द , त्यांचे निष्कर्ष , त्यांची अनुमाने ही अंतिम सत्ये होऊच शकत नाहीत . त्यांचे शब्द , त्यांची वचने म्हणजे त्यांच्या वैयक्तिक भूमिका असतात आणि त्यांच्यावर त्यांनी स्वीकारलेल्या बौद्धिक दृष्टिकोनाचा ( परस्पेक्टिव्ह ) फार मोठा प्रभाव असतो . शिवाय तुमच्याआमच्या प्रत्येकाच्या विचाराला ज्या स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात , त्याही काही प्रमाणात तरी त्यांच्याही विचाराला असतात . तेव्हा फुल्यांसारख्या अगदी मोठ्या व्यक्तींच्या वक्तव्याचाही पुनर्विचार होणे आवश्यक ठरते . थोर व्यक्तींबद्दल आदर जरूर असावा . परंतु सत्याची कदर त्याच्याहीपेक्षा अधिक केली जावी , एवढंच . माणसाच्या शब्दांना परमेश्वराच्या शब्दाचा मान देण्याची गरज नाही . मुळात आमच्या संस्कृतीत परमेश्वर नैतिक वा अन्य प्रकारच्या आज्ञा देतो आहे , असा प्रकारच नाही .
समाजसुधारकांच्या धर्म आणि धर्मसंलग्न मिथ्थकावरच्या टीकांचा फेरविचार करणे आणखी एका कारणासाठी आवश्यक ठरते . समीक्षेसाठी विशेष अभ्यास आणि विशेष सहानुभूती या दोन्हींची नितांत गरज असते . अनेकदा हा विशेष अभ्यास समीक्षा करणारापाशी नसतो आणि मग तो समोरच्या धार्मिक साहित्यातून चुकीचे अर्थ काढतो . हे अर्थ चुकीचे असल्याने तज्ज्ञांनी ते केव्हा ना केव्हा दुरुस्त करणे त्यांचे कर्तव्यच ठरते. या विषयातील माहिती कच्ची असल्याने खुद्द फुल्यांनीच कशी चुकीची भाष्ये केली आहेत याचे एक उदाहरण येथे देत आहेत.

ब्रम्हदेव आणि त्याची मुलगी

ब्रम्हदेव स्वत : च्या मुलीशी (उषेशी किंवा सरस्वतीशी ) रममाण होते यावर फुलेंनी बरेच भाष्य केले आहे. परंतु ब्रम्हदेव आणि त्याची मुलगी या संबंधांबद्दल ज्या आदिम कथा आहेत त्या पहिल्या (आदिम) जोडप्याचे एकमेकांबरोबरचे नाते कोणते आणि कसे असावे याचा जो प्रश्न जगभराच्या सगळ्या संस्कृतींना पडला होता , त्याचा अपरिहार्य परिणाम होता. पहिल्याने कोण होते , पुरूष की स्त्री ? पुरूष असेल तर मागाहून येणारी स्त्री त्याची बहीण (अगर मुलगी) होते. स्त्री असेल तर मागाहून येणारा पुरूष तिचा मुलगा होतो. स्त्री-पुरूष दोन्ही एकदम असतील तर ती भावंडे असतील किंवा ज्यू आणि ख्रिस्ती परंपरेप्रमाणे पुरूषाच्या बरगडीपासून पहिली स्त्री उत्पन्न केली गेली असेल , तर ती स्त्री त्या पुरुषाची बहिण बनते. (ख्रिस्ती धर्मातील आदमचे पाप हे व्याभिचाराचे पाप होय.) फुल्यांपाशी हा धर्म आणि पुराणकथांचा किंवा प्राक-कथांचा तुलनात्मक अभ्यास नसल्याने त्यांनी जर या बाबतीत चुकीची विधाने केली असतील तर नंतरच्या लोकांना ती चूक आहेत हे सांगणे हे क्रमप्राप्त ठरते.

अश्वमेधाचा घोडा

हवे असल्यास धर्मसंलग्न मिथ्यांचे आणखी एक उदाहरण घेऊ. वाजसनेयी संहितेत अश्वमेध यज्ञाच्या वेळी होता आणि राजाची मुख्य महिषी यांच्या संवादाचे अनेकदा भांडवल केले जाते. हे संवाद अश्लील आहेत (अर्थात , आजच्या आमच्या दृष्टीने अश्लील. त्या काळातल्या लोकांच्या तर्फे नव्हेत.) .यात शंका नाही. परंतु शीर तुटलेल्या घोड्याच्या बाजूला राणी झोपते वगैरे सगळा जो पुजाविधी आहे त्याचे त्या काळाच्या दृष्टीने बरेच मोठे कार्य आहे. असाच विधी आयर्लंडमध्ये केला जात असे. मूळ स्वरूपात ही एक इंडो – युरोपियन मिथ्यकथा आहे. भारतीय , आयरिश , ग्रीक , रोमन , रशियन , वेल्श या सगळ्या लोकांमध्ये या ना त्या स्वरूपात ही मिथ्यकथा आढळते. अश्वमेधातला घोडा हे सूर्यदेवाचे प्रतिक आहे आणि म्हणूनच राजाचा ‘ अल्टर इगो ’ म्हणजे दुसरा आत्मा आहे. घोड्याचे डोके तोडणे म्हणजे घोड्याला खच्ची करणे. राणी घोड्याचे किंवा सूर्यदेवाचे पुरूषत्व त्याच्यापासून हिरावून घेते आणि आपल्या पतीला म्हणजेच राजाला बहाल करते. राजा हा परत विष्णूचा अवतार आहे. पृथ्वी ही त्याची पत्नी आहे. सूर्यापासून बीज घेऊन राजा पृथ्वीला सुफलित करतो असा एकुण मतितार्थ आहे. त्याकाळी अश्वमेध यज्ञ करणे हे राजाचे एक कर्तव्य होते. लोक त्याला तसे करायला भाग पाडीत असत.

आता वरीलसारखी विशेष माहिती ही फुल्यांना आणि त्यांच्यासारख्या इतरांना असणे दुरास्पात आहे. अशा वेळी त्यांनी यासंबंधी जी चुकीची विधाने केली आहेत , ती दुरूस्त करणेच योग्य ठरते.

खुद्द महात्मा फुल्यांना अशा प्रकारची आपल्या चुकीची दुरूस्ती भाग होती. कारण ‘ शेतक-यांचा आसूड ’ या आपल्या पुस्तकाच्या उपोदघातात ते लिहितात की ‘ या ग्रंथात जे काही मी माझ्या अल्पसमजुतीप्रमाणे शोध लिहिले आहेत , त्यात आमच्या विद्वान व सुज्ञ वाचणारांच्या ध्यानात जी जी व्यंगे दिसून येतील त्यांविषयी मला क्षमा करून… गुणलेषांचा स्वीकार करावा… आणि जर करिता त्यांच्या अवलोकनात कोणताही भाग अयोग्य अथवा खोटासा दिसेल तर किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ तर त्यास काही (ग्रंथकार वगैरे) सुचविणे असेल… आम्हास कळवावे…दुस-या आवृत्तीचे वेळी त्याचा योग्य विचार करू ’ (कीर-मालशे संपादित , पृ.३)

धार्मिक मिथ्यकथा वगैरेंच्या बाबतीत फुले हे विशेष तज्ज्ञ नव्हते. त्यामुळे त्या विषयाचे विश्लेषण करताना त्रुटी राहण्याची , चुका होण्याची शक्यता होती आणि म्हणूनच विचारांची फेरतपासणी आवश्यक ठरते. त्याप्रमाणेच दुस-याही एका कारणासाठी ती आवश्यक होते. फुले सामाजिक टीकाकार होते , तसेच ते कर्ते समाजसुधारकही होते. सामाजिक टीकाकाराच्या भूमिकेतून त्यांनी तत्कालीन सामाजिक स्थितीची चिकित्सा केली होती आणि त्या दु : खद स्थितीला कारणीभूत ठरलेल्या गोष्टींची चर्चा करून ही स्थिती दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या परिने काही इलाजही सुचविले होते. फुल्यांनी सुचविलेल्या या इलाजांचे पुढे काय झाले , त्यांनी व्यक्त केलेली उद्दिष्टे पुढील काळात प्रत्यक्षात आणली गेली काय इत्यादी विचारसुद्धा फुल्यांच्या बाबतीत आवश्यक ठरतो. कारण या प्रकारच्या अभ्यासातूनच फुल्यांनी तत्कालीन सामाजिक स्थितीते केलेले विवेचन आणि त्या स्थितीमागील कारणाचे निदान चूक होते की अचूक होते हे आपण पाहू शकणार असतो. येथे फुल्यांच्या सर्वच उद्दिष्टांचा विचार अभिप्रेत नाही. फक्त काही काही निवडक उद्दिष्टे आपण विचारात घेऊ शकतो. ‘ शेतक-याचा आसूड ’ पृ. ८ वर फुले म्हणतात की , ‘ माझ्या मते एकंदर सर्व सरकारी खात्यात शेतक-यांपैकी त्यांच्या संख्येच्या प्रमाणाने कामगार घातल्यास ते आपल्या जात बांधवास इतर कामगारांसारखे नाडणार नाही. फुल्यांच्या मते सरकारी खात्यात ब्राम्हण कामगार असल्याने ते शेतक-यांना फार नाडत होते. फुल्यांच्या या निरिक्षणाची आज अवस्था काय आहे. आज सरकारात बहुजन समाजातील लोकांची बहुसंख्या आहे. तथापि , गोरगरिबांना नाडण्याचे त्यांनी थांबविले आहे काय ? सरकारात ब्राम्हण कामगाराचे वर्चस्व आणि ब्राम्हणांनी त्यांना नाडण्याचा काहीही कार्यकारण संबंध नाही. मुळात जातीने वरिष्ठ व कनिष्ठ वर्ग अशी समाजाची विभागणी करणेच चूक असते. सत्तेने वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्ग अशी समाजाची विभागणी त्या मानाने अधिक बरोबर ठरू शकते. कामगारांचे हितकर्ते खुद्द मार्क्स व एंगल्स यांच्याही तत्वज्ञानाच्या बाबतीत शेवटी जगभर हाच अनुभव आलेला आहे. मार्क्सची अपेक्षा होती की कामगार शतकानुशतके विशिष्ट वर्गाकडून नाडला गेलेला आहे , जेव्हा त्याच्या हाती सत्ता येईल किंवा तो वरचढ ठरेल तेव्हा तो सतत कामगार वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या योजना आखील. परंतु तसे कुठेही घडले नाही. उलट असे दिसून आले की , कामगार फक्त आपल्याला आर्थिक व इतर फायदे जास्तीत जास्त कसे मिळतील त्याच्याकडे लक्ष पुरवतो.

साधी आपल्याकडच्या कामगारांचीच गोष्ट घ्या. आपल्याकडचा कामगार ज्या क्षेत्रात- उदा. कापड-गिरण्या वा तेलधंदा इ.- तो असतो तिथले फायदे फक्त त्याला मिळावेत म्हणून धडपडत आहे. किंबहुना त्या त्या क्षेत्रात जर का नोकरीच्या जागा उत्पन्न झाल्या तर त्याही आपल्याच पुत्रपौत्रांना मिळाव्यात म्हणून व्यवस्थापनावर सर्व प्रकारचे दडपण आणतानाही दिसतो. या वस्तुस्थितावरून आपण फार तर एवढेच म्हणू शकतो की , माणसे त्यांना मिळालेल्या सत्तेचा उपयोग स्वत : चा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी करतात. मग ती माणसे ब्राम्हण असोत वा ब्राम्हणेत्तर. त्यांच्या जातीचा , वर्गाचा वा धर्माचा परिणाम वस्तुस्थितीवर होत नाही. कामगारांच्या जातीचे लोक सरकारी कचेरीत आले की , ते आपल्या जातीला नाडणार नाहीत , हा फुल्यांचा अंदाज अशा प्रकारे चुकला आहे.

स्त्रियांचा प्रश्न

त्यांचा दुसरा अंदाज असा की , स्त्रियांना शिक्षण मिळाले की त्या स्वतंत्र होतील हा होय. आज स्त्रिया पूर्वीच्या मानाने ब-यापैकी शिकताहेत व शिकल्या आहेत. पण त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार पूर्वीच्या मानाने वाढले आहेत. म्हणजे येथेही फुल्यांचे विश्लेषण न निदान कुठेतरी चुकले होते.

शिक्षण : तिसरा अंदाज

त्यांचा तिसरा अंदाज शिक्षणाने प्रजा शहाणी व समजूतदार होईल. आज शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. पण प्रजा शहाणी झाल्याचे दिसत नाही. असो. तर सांगायची गोष्ट ही की , मार्क्स , एंगल्स , फुल्यांसारख्याचीही सामाजिक विश्लेषणात गफलत होऊ शकते आणि ती समजावून घेणे आपल्या हिताचे असते. किंबहुना ही मंडळी जर हयात असती तर त्यांनी स्वत : च्या विचारातल्या गफलती कबूल केल्या आहेत. इतके ते सत्यनिष्ठ होते.

पुनर्विचार आवश्यक

आणखीसुद्धा एका कारणासाठी फुल्यांसारख्यांच्या प्रतिपादनांचा पुनर्विचार करणे आज आवश्यक आहे. आमची लोकशाही ही गर्दीने (ऊर्फ झुंडीने) घडवायची लोकशाही आहे. गर्दी ठरवील त्याच्या हाती राज्यकारभाराच्या नाड्या जातात. अशा वेळी जो कुणी या गर्दीला आपल्या बाजूला वळविण्यात यशस्वी होतो तो सत्तास्थान पटकावतो. गर्दी नेहमी घोषणांना वश होत असते. आकर्षक , नेत्रदीपक घोषणांना वश होत असते ; आणि लोकप्रिय थोरांची नावे ही आजकाल घोषणांगत वापरली जाताहेत , नव्हे , या मोठ्या नावांचा एक प्रकारे बाजारच मांडला जातो आहे. कुणी घोषणा देतो ‘ श्री प्रभूरामचंद्र की जय ’ . लगेच लाखोंच्या संख्येने लोक त्या घोषणा देणा-याच्या मागे जातात. दुसरा कुणी म्हणतो. ‘ श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ’ किंवा ‘ महात्मा फुले की जय ’ लोक तिथेही गर्दी करतात. तथापि , एखाद्या नावाची घोषणा म्हणजे त्याचे ते नाव असते , त्याचे ते तत्वज्ञान नसते. घोषणा देणारे स्वत : च्या स्वार्थासाठी ती मोठी नावे वापरीत असतात. त्यांचा बाजार भरीत असतात. अशा वेळी घोषणेसाठी ज्यांची नावे घेतली जातात , त्यांनी मुळात काय सांगितले आहे , त्यात काय तथ्य आहे इ. सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो.

फुले महात्माच

वरील विवेचनावरून कुणी असा ग्रह करून घेऊ नये की , मी महात्मा फुल्यांना कमी लेखते आहे ; किंवा कुणी असेही समजू नये की , मी जुन्या जमान्याचा , जुन्या वैचारिक मूल्यांचा व समाजपद्धतीचा पुरस्कार करते आहे. तसे अजिबात नाही. महात्मा फुले हे खरोखरच महात्मा होते. कामगारांची दयनीय स्थिती पाहून त्या स्थितीचे विश्लेषण करणारे , ‘ द कंडिशन ऑफ द वर्किंग क्लास इन इंग्लंड ’ हे पुस्तक एंगल्सने सन १८४४ मध्ये लिहिले. महात्मा फुल्यांनी येथल्या शेतक-याची दयनीय अवस्था पाहून साधारण १८८० वगैरेच्या दरम्यान ‘ शेतक-याचा आसूड ’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या काळात अन्य कुणाला शेतक-यांच्या हाल अपेष्टांवर पुस्तक लिहिणे सुचू नये , यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो. त्यांनी स्त्रियांसाठी , अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. आणि इतरही अनेक परोपकाराची नि लोकहिताची कामे केली. ती केली नसती तरी ‘ शेतक-याचा आसूड ’ या एकाच पुस्तकानेही त्यांचे मोठेपण सिद्ध झाले असते.

विश्वास दांडेकर, सौजन्य – लोकसत्ता, १५ जुलै २००३

एक काळ असा होता की वसमत हे गाव आठवले की नरहर कुरुंदकरांचे नाव ओठावर यावे, इतका कुरुंदकरांच्या प्रगाढ व्यासंगाचा दबदबा मराठी सारस्वताच्या प्रांतात गाजत होता. इतिहास, साहित्य, प्राचीन वाङ्‌मय, राज्यशास्त्र, संगीत, समाजशास्त्र… कुरुंदकरांच्या प्रज्ञेला कुठलाही प्रांत वर्ज्य नव्हता. वाचता वाचता एखाद्या क्षणी बुद्धीला अवचित थकवा यावा अशा चिरेबंदी तर्काने नटलेल्या आपल्या लेखनशैलीने कुरुंदकरांनी वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात आपला खास ‘कुरुंदकरी बाज‘ निर्माण केला. आयुष्यभर निखळ वैचारिकतेचीच बांधीलकी मानल्यामुळे निरनिराळ्या व्यासपीठांवरून कुरुंदकरांनी अव्याहत संचार केला. मात्र ते कुठल्याही तंबूत दाखल झाले नाहीत. म्हणूनच बहुधा कर्मठांइतकीच पुरोगाम्यांच्या गोटामधूनही त्यांची उपेक्षा झाली. कुरुंदकरांना जाऊनही आता पुरी दोन दशके उलटली, तरी त्यांचे समग्र लेखन संग्रहीत स्वरूपात समाजासमोर येऊ नये, हा महाराष्ट्राच्या ‘वैचारिक अनुशेषा‘चा पुरावाच होय!

महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचा सहज आढावा घेतला तर त्यात अनिवार्यपणे येणार्‍या नामावलीमध्ये एक नाव नरहर अंबादास कुरुंदकर असे आहे. हयात असते तर आज त्यांनी बहात्तराव्या वर्षात प्रवेश केला असता. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२चा. अनेक विषयांचा स्तिमित व्हावे असा व्यासंग. त्या पार्श्वभूमीवर एक निराळाच अन्वयार्थ लावणारी प्रज्ञा, एकेक पाकळी उलगडत जिज्ञासूला विषयाच्या गाभ्यापर्यंत नेण्याची खर्‍या शिक्षकाची हातोटी आणि या सर्वांमागे आपले ज्ञान, बुद्धी ही खासगी मालमत्ता नाही या विश्वासाने ती सतत वाटण्यासाठी झटणारे मन, असे हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व फार अकाली अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले (निधन १०/२/८२).

पेशाने ते शिक्षक. प्राथमिक, माध्यमिक अशा पायर्‍या चढत पुढे प्राध्यापक आणि प्राचार्य झाले. मात्र हे त्या व्यवस्थेतला अपरिहार्य भाग म्हणून घडलेले. एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी ‘परीक्षा‘ या घटनेच्या नावाने आंघोळ केली. कितीजणांना पीएच.डी.च्या प्रबंधासाठी मदत केली याची गणती अवघड, पण त्या फंदात स्वतः कधी पडले नाहीत. व्यासंग हा डिग्रीवर मोजणे कसे गैर आहे त्याचे हे उदाहरण. वयाच्या बाविसाव्या वर्षी मुंबई मराठी साहित्य संघाचे ते आमंत्रित वक्ते होते, तर रणजित देसाईंच्या ‘श्रीमान योगी‘ची महाराष्ट्रात गाजलेली प्रस्तावना त्यांनी वयाच्या तिशीत लिहिली होती, असे प्रसंग पुष्कळ नोंदवता येतील.

त्यांचे अभ्यासाचे विषय छाती दडपून टाकणारे होते. राजकारण, इतिहास, समीक्षा, महाभारत, भरताचे नाट्यशास्त्र, तत्त्वज्ञान, शास्त्रीय संगीत, प्राचीन-अर्वाचीन मराठी साहित्य, सामाजिक चळवळी… नुसती यादी करायची म्हटली तरी स्तिमित करणारी. शिवाय हे सर्व पुस्तकी नव्हते. सर्व महाराष्ट्रभर हिंडत, गटचर्चा, व्याख्याने यांतून ज्ञानगंगा वाहती ठेवण्याची त्यांची धडपड असे.

त्यांची एक नाजूक जागा म्हणजे पंडित नेहरू. स्वतंत्र भारत, त्यात राष्ट्र उभारणीसाठी नेहरू कुठल्या मार्गाने जात आहेत याचा त्यांनी फार सखोल विचार केला होता. यदुनाथ थत्ते-नरहर कुरुंदकर या जोडीने वर्षानुवर्षे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांमधून जे प्रबोधन घडवले त्याच्या केंद्रस्थानी ‘नेहरू‘ असत. बांगलादेश युद्धानंतर तीन-चार वर्षांत जी परिस्थिती भारतात निर्माण झाली त्याचे विश्लेषण करताना त्यांनी १९७१ चा युद्धखर्च, १९७२ चा दुष्काळ, १९७३ चे खनिज तेलाचे भडकलेले भाव या गोष्टी नियंत्रित करणे भारताच्या अखत्यारीत नसल्याने या तीन गोष्टींचा एकत्रित परिणाम बाद करून मग उरलेला दोष शासनाचा असे परखड विश्लेषण केले होते. मात्र आणीबाणी लादण्यास त्यांचा विरोध होता. आणीबाणीनंतर जनता पक्ष ज्या मार्गाने गेला त्यातले धोके त्यांनी जाहीरपणे मांडले होते. विचाराने ते डावे, मार्क्सवादी असले, समाजवादी विचारसरणीचे पाठीराखे असले तरी पोथीनिष्ठ आंधळेपण त्यांनी कधी जोपासले नाही. मतभेद स्पष्टपणे मांडले.

महाराष्ट्रात मृत्युलेख लिहावा तर आचार्य अत्र्यांनी, खेळकर व्यक्तिरेखा रंगवावी तर पु. ल. देशपांडे यांनी अशी काही सार्थ समीकरणे आहेत. यात भर अशी घालता येते की, मूल्यमापन करणारा लेख लिहावा नरहर कुरुंदकरांनी. सरदार पटेल, मौलाना आझाद, अकबर, शेजवलकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, स्थान, भूमिका, मर्यादा ज्या सामर्थ्याने त्यांनी उलगडल्या ती खास कुरुंदकरी परंपरा म्हणता येते. इरावती कर्वे यांचा ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया‘, दुर्गाबाई भागवतांचा ‘लोकसाहित्याची रूपरेखा‘, वा. सी. बेंद्रे यांचा संभाजी, गोपाळ गोडसे यांचे ‘गांधीहत्या व मी‘, द. ग. गोडसे यांचे ‘पोत‘ या व अशा पुस्तकांची विस्तृत परीक्षणे त्यांनी लिहिली. पुस्तकाचे मर्म उलगडून दाखवत मर्यादाही परखडपणे मांडणारी ती शैली ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देत असतानाच त्या त्या विषयाचा आवाकाही मांडत असत, त्रुटीही नोंदवत असत.

मराठीत ‘प्रस्तावना‘ हा एक संपन्न लेखन प्रकार आहे. पुस्तकातले प्रत्येक पान उलगडून दाखवणे, संपूर्ण विरोधी दृष्टिकोन मांडणे, त्या क्षेत्रात नवे दालन उघडणे अशी ही परंपरा शेजवलकर, खरेशास्त्री, राजवाडे अशा दिग्गज नामावलींमुळे झळाळते. या परंपरेत कुरुंदकरांनी विस्तृत आणि मोलाची भर घातली. ‘श्रीमान योगी‘, ‘चलो कलकत्ता‘, ‘चतुर्भाणी‘, ‘महाडचा मुक्तिसंग्राम‘, ‘महाभारत- एक सूडाचा प्रवास‘, ‘हिमालयाची सावली‘, ‘चक्रपाणी‘, ‘लोकायत‘ या व अशा प्रस्तावना त्या त्या ग्रंथांचे भूषण ठरत ग्रंथातल्या विषयाची व्याप्ती विस्तारणार्‍या आहेत.

भरताचे नाट्यशास्त्र आणि विशेषतः त्यातील रससिद्धांत हा त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यास-चिंतनाचा विषय होता. ‘रूपवेध‘मध्ये काही प्रमाणात तो मांडला गेला. पुढे त्या विषयाची सांगोपांग चर्चा करणारी तीन व्याख्याने त्यांनी नाशिक येथे दिली. त्यावर एक महाग्रंथ जवळपास सिद्ध केला, पण तो अपूर्णच अवस्थेत त्यांच्या निधनोत्तर ‘रंगशाळा‘ या नावाने प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाचा पट पाहिला म्हणजे जर हा पूर्णपणे हातावेगळा झाला असता तर त्याने लेखन विषय कुठल्या उंचीवर नेऊन ठेवला असता याची कल्पनाच आज करावी लागते.

ही सर्व प्रतिभा, प्रज्ञा, विद्वत्ता कोरडी नव्हती. कुरुंदकर हे स्नेही, मित्र, विश्वासाने खांद्यावर मान टाकण्याची हक्काची जागा असे त्यांचे स्थान असंख्य कुटुंबांत होते. त्यांना व्याख्यानांच्या मानधनातून मिळणारा पैसा त्यांनी निरनिराळ्या संस्थांना शांतपणे दिला. स्वभावाला एक विलक्षण विनोदाचे अंग होते. कधी नर्म तर कधी तिरकस. गप्पांमध्ये रंगायचे पण कधीही गप्पा व्यक्तिकेंद्रित होऊ देत नसत. चर्चा मत- मुद्दे यावर असावी, व्यक्तीवर नको हा त्यांचा आग्रह असे. साधी शंका विचारली तरी विषय नीट समजावून सांगत. संपूर्ण मराठवाडा तर त्यांना गुरुजी म्हणूनच ओळखत असे.

ते गेल्यावर त्यांचा स्मृतिग्रंथ हैदराबादच्या आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषदेने काढला. मराठवाडा साहित्य परिषद व ‘साधना‘ परिवार या दोन संस्थांसाठी कुरुंदकर खूप श्रमले. पण त्यांच्या निधनोत्तर या दोन्ही संस्थांनी दुर्लक्षच केले, हे कटू सत्य खेदाने स्वीकारावे लागते.

त्यांनी मांडणी केलेले प्रश्न, विषय, क्षेत्रे कालबाह्य झालेली नाहीत. त्यावर चर्चा, मतभेद हे मंथन सुरू राहणे हिताचे आहे. यातले पहिले पाऊल म्हणजे निवडक कुरुंदकर असे काही खंड प्रकाशित करणे, ज्यात त्यांचे सर्व महत्त्वाचे लिखाण टीपा, सूची या व अशा संपादकीय संस्कारांनी परिपूर्ण स्वरूपात उपलब्ध होईल. तो सुदिन लवकर येवो.

सौजन्य – मटा

मी आज इथे आपल्यासमोर ज्यांच्यामुळे उभा आहे त्या फुले-शाहू-आंबेडकरी परंपरेला सर्वप्रथम अभिवादन करतो. आपल्या सर्वांनाही नमस्कार करतो.

केवळ माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीचंच नव्हे, तर साहित्य, संस्कृती आणि विचारांचं ठाणं असलेल्या या शहरातून पहिल्यांदा रेल्वे तर धावलीच; शिवाय पहिल्यांदा काही पुरोगामी क्रांतिकारी विचारही या शहरातून बाहेर पडले. महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिलं साहित्य संमेलन घेण्याचा मान याच शहराला मिळाला. तेव्हा अध्यक्ष होते, रा. श्री. जोग आणि आता महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव होतानाही संमेलन घेण्याचा मान याच शहराला मिळाला. या संमेलनाचा अध्यक्ष आहे उत्तम कांबळे. जोग ते उत्तम कांबळे आणि मध्ये १९८८ ला नाशिकचेच वसंतराव कानेटकर अशा या लांबलचक प्रवासात बरंच वारं वाहून गेलं. या भूमीत उगवलेल्या फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना अंकुरही फुटले. अध्यक्ष झालेला हा उत्तम कांबळे कोण आणि कुठला याविषयी नेहमीच उत्सुकता आणि चर्चा होत राहिली आणि ती सारीच मला आनंददायी वाटली. कोल्हापूर, सांगली, बेळगाव, पुणे, की नाशिकचा आहे मी? खरं तर मी सा-याच ठिकाणांचा आहे. मी वैश्विक आहे. भाकरीची शिकार करण्यास कोण्या एकेकाळी मी बाहेर पडलो. शहरा-शहरांमध्ये गेलो. या सा-याच शहरांनी माझ्या श्वासांना बळ दिलं. मुळांना रुजण्यासाठी भुसभुशीत जमीन दिली. लिहितं होण्यासाठी नद्या-नाल्यांचा काठ दिला. जसा मी नाशिकचा, तसा कोल्हापूरचा, जसा सांगलीचा तसा आता ठाण्याचाही… मी या सा-यांचा म्हणूनच विश्वाचा… भाकरीनं आणि तिच्यासाठी झालेल्या लढाईनं मला सा-यांचा बनवलं. मी या सा-या शहरांचा, प्रदेशांचा मनापासून आभारी आहे. हे जग आणि इथला माणूस कधी स्थिर नव्हता. निसर्गातून बाहेर पडल्यापासून तो स्थलांतरच करत राहिला आहे. कधी भाकरीसाठी, तर कधी भाकरीच्या चंद्रासाठी… कधी विकास पावण्यासाठी तर कधी विकासाचीच पेरणी करण्यासाठी… या स्थलांतराचा अर्थ नीट समजून घेतला नाही, की युद्ध होतात आणि मी तर युद्ध नको; बुद्ध हवा म्हणणारा आहे. फुले, शाहू, डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी रुजलेल्या भूमीत स्वत:साठी घरटं बनवणारा आणि साहित्यात माणसासाठी काही शब्द कोरणारा आहे. काही शब्द बोलणारा आहे. आज मी इथं आपल्यासमोर, आपल्या छायेत उभा आहे, ते याचसाठी.

ठाण्याशी अगदी अलीकडं आणखी एका कारणानं माझं अतिशय भावनिक नातं जोडलं गेलं आहे. माझ्या मानलेल्या बापाचे म्हणजे नारायण सुर्व्यांचे शेवटचे काही श्वास याच शहरानं वाढवण्याचा प्रयत्न केला. ठाण्यातील लहान-मोठ्यांनी जमेल ती मदत केली या बापाला. महाराष्ट्रही मदत करीत होताच. याच शहरात माझ्या बापानं अतिदक्षता विभागात शेवटच्या घटका मोजत असताना म्हणजेच बेशुद्ध अवस्थेतही न दिसलेलं कविसंमेलन भरवलं होतं. आयुष्यभर एक महाकविताच बनलेल्या सुर्व्यांनी अतिदक्षता विभागातच मला एक प्रश्न विचारला होता, ‘ का रे, झालास का अध्यक्ष? ‘ मी तेव्हा निरुत्तर होतो. निवडणुकीच्या चक्रव्यूहात तेव्हा लढत होतो. मला माहीत नव्हतं, या लढाईचा फैसला काय होणार आहे? जेव्हा तो जाहीर झाला तेव्हा तो ऐकायला हा बाप नव्हता. खरं तर याच बापानं मला त्याच्या भल्या मोठ्या बापाच्या म्हणजे कुसुमाग्रजांच्या ओटीत टाकलं होतं. या थोरल्या बापानंही मला दहा-अकरा वर्षे पोरासारखं बाळगलं. गोदेकाठी तपस्वी बनून तळपणारा हा थोरला मोठा बापही आज हयात नाहीय. याच काठावर बसून विद्रोहाला धार लावणारा बाबूराव बागूल नावाचा आणखी एक बापही नाहीय. मी अनेक वर्षं तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, गं. बा. सरदार, रा. ग. जाधव, रावसाहेब कसबे, भास्कर भोळे आदी अनेकांनी घडवलेल्या प्रबोधन चळवळीचं बोट धरून चाललो. एका मोठ्या धर्मचिकित्सेच्या कार्यात भालचंद्र पडके यांनी मला दिलेली ऊर्जा घेऊन चाललो. माझ्या दृष्टीनं ही सारी बापमाणसं होती. आता यातील बहुतेक सारी काळाआड गेली आहेत. एक मोठी अनामिक पोकळी घेऊन मी उभा आहे, असं वाटतंय… पण साहित्याच्या उत्सवासाठी झालेली आपल्या सर्वांची गर्दी आणि तिच्या असंख्य सावल्या पाहून मी पुन्हा सनाथ झाल्यासारखं वाटतं आहे.

मला माहीत आहे, की ज्या ठिकाणी मी उभा आहे तिथं मी पोचण्यापूर्वी ८३ अध्यक्षांच्या भल्यामोठ्या दिंड्या गेल्या. त्यांच्या लांबलचक सावल्या आणि त्यांची पाऊलचिन्हंही दिसत आहेत. विचाराचं एक भलंमोठं मंथन झालं आहे इथं… या सर्वांचा एक अनामिक सुगंध दरवळतो आहे इथं. या सुगंधामध्ये अनेक ऋषितुल्य माणसं आहेत. या सर्वांचा अभिमान वाटतो आहे मला. या सर्वांनी इथं आपल्या प्रतिभेच्या पंखांना मोकळं केलं होतं. मराठीचे पोवाडे गायले होते. तिच्या वाटचालीची चिकित्साही केली होती. तिच्या मार्गातील गतिरोधकही दाखवले होते. काहींनी जागल्याची भूमिका करत आपल्या हातात लाल कंदीलही धरले होते. या सर्वांनी चालेली वाट आणखी रुंद व्हावी. फुले,

शाहू, आंबेडकरी, विद्रोही, ग्रामीण, स्त्रीवादी अशा सर्व वाटा आणि तिथं घुमणारे एल्गार, या वाटेवर यावेत… या वाटंनंही मोठ्या आनंदानं या सर्वांचं त्यांच्या एल्गारासह स्वागत करावं, असंही मला वाटतं आहे. माझा तसा नम्र आग्रहही आहे. माझ्या प्रवासाचा प्रारंभ जग बदलण्याच्या घोषणांनी दुमदुमून गेलेल्या याच वाटांवरून झाला आहे. त्याचाही मला गर्व वाटतो आहे.

आपल्या वाटचालीचं ८४ वं पाऊल टाकणारं हे संमेलन आता उत्तर आधुनिकतेत उभं आहे. त्याच्या सभोवतालच्या पर्यावरणात कधी नव्हे एवढ्या मोठ्या आवाजात विज्ञान-तंत्रज्ञानाचे स्फोट होत आहेत. चंद्रावर-मंगळावर स्वा-या करण्यासाठी माणसांच्या आणि यंत्रांच्या झुंडी एक-एक पाऊल पुढं टाकताहेत. जिवांचे क्लोन करण्यासाठीच्या अर्जांचाही जगाच्या कचेरीत ढीग साचतो आहे. सुपर सुपर एक्स्प्रेस हायवेवरून जग धावतं आहे. शेषाच्या मस्तकावरचं हे जग, अण्णाभाऊंनी राबणा-यांच्या तळहातावर आणलं आणि संगणकाच्या क्रांतीनं ते पडदा नावाच्या आपल्या छोट्याशा छाताडावर आणलं आहे. नवनवे शोध, संशोधनं आणि प्रतिनिसर्ग बनवण्यासाठी माणसाच्या सुरू असलेल्या लढाया, या सा-यांमुळे जग चालण्याऐवजी धावतं आहे. माणसं धावताहेत… त्यांच्या गावांसह धावताहेत, तर काही जण गावं सोडून धावताहेत. तोंडातून फेस आणि आतडी बाहेर पडेपर्यंत धावताहेत… स्वप्नांसह धावताहेत… धावता धावता खाली पडणा-या स्वप्नांचे तुकडे मुठीत घेऊन धावताहेत. प्रचंड वेगानं धावणारं आणि धावण्यालाच जगणं मानणारं असं एक आगळंवेगळं जग प्रथमच आपल्या अवतीभोवती अवतरलं आहे. मी स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेलो आणि सतत धावत अस्थिर होत असलेल्या जगाचा एक प्रतिनिधी आहे. नव्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी आधुनिकतेत मीही उभा आहे. खरं तर मी स्वत:च एक नवं युग आहे आणि या नव्या युगानं निर्माण केलेली धगही आहे. या युगानं माझ्या हातातला कागद कमी कमी करत आणला असला, तरीही मोठ्या कष्टानं कागदाऐवजी काळजावर गोंदवलेले ओंजळभर शब्द घेऊन मी तुमच्यासमोर उभा आहे.

मी आयुष्याचा प्रवास सुरू केला तेव्हा मोटेची गाणी माझ्या पाठ्यपुस्तकात होती हे जसं खरं आहे, तसं किर्लोस्करांच्या इंजिनानं मोटेची जागा घेतली होती, हेही खरं आहे. किर्लोस्करवाडीत कंदिलाची काच तयार करणारा कारखाना सुरू होता, हे जसं खरं आहे तसं कोयनेतील वीज घेऊन चकाकणा-या बल्बनी कंदिलाची जागा घेतली होती, हेही खरं आहे. ‘ आरं घरोटं घरोटं ‘ म्हणणाऱ्या बहिणाबाईंची गाणी ओठांवर आणि पुस्तकात होती हे जसं खरं आहे, तसं काही तासांत मणभर ज्वारीचं पीठ बाहेर टाकणारी यंत्रंही आली होती, हेही खरं आहे. ‘ उठा उठा चिऊताई ‘ ही कुसुमाग्रजांची कविताही मी पाठ करत होतो आणि त्याच वेळेला बंगल्यातील शोकेसमध्ये प्लास्टिकच्या चिमण्याही पाहत होतो. नवं आणि जुनं यांच्यातील घासाघाशी पाहत मी अशा बिंदूवर येऊन पोचलो, की जेथे जुन्या शतकाच्या कॅलेंडरवरचं शेवटचं पान गळून पडलं आणि नव्या शतकाचं नवं कॅलेंडर सुरू झालं. माझा ‘ अस्वस्थ नायक ‘येथेच जन्माला आला. मी स्वातंत्र्यानंतरचं स्वातंत्र्य मिळावं म्हणून दीर्घकाळ चालत राहिलेल्या चळवळी मात्र पाहत आलो आहे. पाण्यासाठी, उजेडासाठी, समतेसाठी, हक्कासाठी, वेतनासाठी, स्त्रीमुक्तीसाठी आणि एवढंच नव्हे, तर मेल्यानंतर गाडण्यासाठी जागा मिळावी म्हणून सुरू असलेल्या चळवळी पाहत आलो आहे. आणखी ब-याच चळवळी आहेत. माणसाची जागा आता यंत्रानं ब-यापैकी घेतली होती आणि हे यंत्र माणसाला स्वत:च्या गतीवर धावायला लावत होतं. धावल्याशिवाय जगता येत नाही, हा माझ्या पिढीतील आणि आमच्या पोटी जन्माला आलेल्या पिढीचा सुविचार बनतो आहे. या धावण्याचीच पुढं स्पर्धा झाली. मी माणसाचा नागरिक झालो आणि आता नागरिकाचा स्पर्धक झालो. मी एक स्पर्धक, तू एक स्पर्धक, ती एक स्पर्धक आणि ही पृथ्वीच जणू एक स्पर्धक… माझा सारा भोवताल ज्या प्रचंड गतीनं धावतोय, त्या गतीनं माझ्या भोवतालच्या पुस्तकाची पानं हलताना दिसत नाहीत. दोन-पाच दशकांपलीकडं आपलं सारं साहित्यही लढायांनी भरलं होतं. आपले साहित्यिक या लढायांशी जोडले होते. भाकरी मिळवण्यासाठी लढाई होती, जात चोरण्यासाठी लढाई होती आणि विद्रोह होता. नवं विद्यापीठ उभारण्याची आणि नवी सनद लिहिण्याची लढाई होती. टाटाला सवाल विचारला जात होता. गर्जा जयजयकार होता आणि स्वातंत्र्यदेवतेस विनवणी करणारा स्वातंत्र्याचा लेखाजोखाही होता. लिहिणारेही लढत होते आणि लढणारेही लिहीत होते. पुढं तर हरणारेही लिहायला लागले. आपल्या जखमांचा हिशेब मागायला लागले आणि काही काही वेळा जखमांच्या माळा गळ्यात मिरवू लागले. दलित, आदिवासी, भटके, कामगार, श्रमिक या सर्वांच्या लढाया साहित्यात दिसू लागल्या. हे सर्व घडत असतानाच साता समुद्रापार तयार झालेली जागतिकीकरणाची लाट आपल्यापर्यंत पोचली. ती आपण थोपवू, असं काहींना वाटत होतं, तर ती आपल्यापर्यंत पोचणारच नाही, असंही काही जण सांगत होते. काही जण लाट पोडण्याची, तिच्या चिंध्या-चिंध्या करण्याची भाषा करत होते. यापैकी घडलं काहीच नाही आणि जागतिकीकरणाच्या प्रवाहात आपण कसं सहभागी झालो, हे भल्याभल्यांनाही कळलं नाही. जागतिकीकरणानं आपलं मन, मेंदू, मनगट, घर, वस्तू, स्वप्न, संवेदना या सा-या सा-यांना घेरलंय.

पृथ्वीच्या पाठीवर जेव्हा केव्हा नवे प्रवाह येतात, तेव्हा त्यांना पाठिंबा देण्यासाठी वा विरोधासाठी वेगवेगळ्या तत्त्वज्ञानांची, साहित्याची निर्मिती होत असते. रशियातला साम्यवाद जेव्हा कोलमडायला लागला होता, तेव्हा एन्ड ऑप आयडॉलॉजी (तत्त्वज्ञानाचा शेवट) हे डॅनियल बेल यांचं पुस्तक आलं. जगाला तत्त्वज्ञानाची आता गरज नाही, असं त्याचं म्हणणं होतं. पुढं जगाला तत्त्वज्ञानाचीच नव्हे, तर इतिहास-भूगोलाचीही गरज असणार नाही, असं सांगणारी अंताची (एन्ड) एक मालिकाच सुरू झाली. द एन्ड ऑप हिस्ट्री अॅण्ड द लास्ट मॅन (इतिहासाचा अंत आणि शेवटचा माणूस) प्रान्सिस फुकुयामा, आय सायबर्ग-केवीन वारविक, द एन्ड ऑप फेथ (श्रद्धांचा अंत) – सॅम हॅरिस, द एन्ड ऑप सेक्स (सेक्सचा अंत)- जॉर्ज लिओनॉर्ड, असे अनेक ग्रंथ आले. आता सारं काही संपणार आणि जागतिकीकरणच शिल्लक राहणार, असाच हाकारा दिला जात होता. जागतिकीकरणात फक्त बाजारपेठा आणि त्यातील वस्तू, नफा-तोटाच शिल्लक राहील, असं सांगण्यात येत आहे.

जग एका मोठ्या पेचप्रसंगातून जातं आहे. या पेचप्रसंगात आपलं मराठी साहित्य कुठं उभं आहे, काय घेऊन उभं आहे, कसं उभं आहे आणि कोणासाठी उभं आहे हे पाहणं ओघानंच येत असतं. आपल्या पर्यावरणात आज जगण्यासाठीच्या लढाईतून रोज हजारो माणसं बाहेर फेकली जात आहेत. काही आत्महत्या करत आहेत. स्पर्धेला घाबरून शालेय जीवनातच आत्महत्या करत आहेत. काहींना मातेच्या गर्भातच मृत्यू मिळतो आहे. अशा वेळी मी कधी-कधी चिडून म्हणतो, हे जग कुणाचं? जगणा-यांचं की मरणा-यांचं? विकासाचा दर डबल आकड्यात जातानाही मृत्यू आणि विकासाचा आकडा घसरतानाही मृत्यू, असं काहीतरी विलक्षण चित्र आपण सारेच पाहतो आहोत. जग बदलत असतं. हे बदलतच राहणार आहे; पण माणूसघाणं जग निर्माण व्हावं हे काही बरोबर नाही. गुलाम जन्माला घालणारं नवं जग निर्माण व्हावं हेही काही बरोबर नाही.

आपण जागतिकीकरणाला विरोध करतो म्हणजे नेमकं काय करतो, हेही समजून घ्यायला हवं. आपला यंत्राला किंवा आधुनिकतेला विरोध नाही; पण त्यातून जन्माला येणा-या नव्या विषमतेला आणि जीवघेण्या स्पर्धेला मात्र विरोध असायला हवा. तंत्रज्ञानाचा वापर करून जगणा-या आणि हरणा-या अशा दोन जाती तयार करण्याला विरोध असायला हवा. नवे गुलाम जन्माला घालण्याला आणि यंत्राच्या मदतीनं नवा वसाहतवाद तयार करण्याला आपला विरोध असायला हवा. आपलं साहित्य हे सारं मुकाटपणे, त्रयस्थपणे पाहत राहणार, की हालचाल करणार आहे?

जागतिकीकरण पकडायला आणि त्याची उकल करायला आपण थोडाफार उशीरच केला, असं माझं स्वत:चं मत आहे. काही कविता आणि एखाद-दुस-या कादंबरीचे उपवाद वगळता आपण साहित्यात याविषयी फार काही करू शकलो नाही. यांत्रिकीकरण, मॉल, सेझ यांसारख्या गोष्टी आणि त्याच्या परिणामावर काहींनी लिहिलं; पण हे पुरेसं नाही. अन्य भाषांमध्ये जागतिकीकरणाचे बरेवाईट पैलू मोठ्या प्रमाणावर प्रकट होत आहेत. मॉलवर कादंब-या येत आहेत आणि उत्तर आधुनिकतेनं निर्माण केलेल्या मायावी जगाचे बुरखे फाडत आहेत. आपण काळाबरोबर चाललो नाही, आपल्या शब्दांनी काळ पकडला नाही, तर माणूस आणि साहित्य म्हणूनही आपण मागं पडू, असं मला वाटतं. जागतिकीकरण हे आता केवळ एखाद्या प्रदेशाचं, एखाद्या देशाचं नव्हे; सा-या नव्या जगाचं वास्तव झालं आहे. ते समजून घेणं जसं महत्त्वाचं आहे. तसं या जगात सर्वांनाच अवकाश कसं मिळेल, हे पाहणं आणि आपल्या साहित्यात त्याला अवकाश देणंही महत्त्वाचं आहे. संपर्क साधनांची महाक्रांती होत असतानाही आपल्याकडचे लाखो-कोट्यवधी लोक आपण रेंजबाहेरच आहोत, असं टाहो पोडून का सांगतात ? विकासाच्या रेंजमध्ये असणा-यांमधील अंतर का वाढतं आहे ? किंवा जाणूनबुजून ते का वाढवलं जातं आहे, याचा शोध घ्यायला हवा. त्यासाठी आपली प्रतिभा, सृजन आणि लेखणी वापरायला हवी. हे मरणाचे नवे पट्टे, हे भकासपणाचे नवे पट्टे, माणसाला रंगहीन करणारे पट्टे; आपला साहित्यिक पाहणार आहे की नाही? ते त्यांनी पाहायलाच हवेत, असा माझा आग्रह आहे.

साहित्य आणि भूमिका असा शब्द उच्चारला, की अनेकांच्या भुवया आजही उंचावतात हे मला कधीपासून माहीत आहे. याच शब्दावरून कला, कलेसाठी की कला जीवनासाठी? असे झडलेले वाद मी कितीतरी वर्षांपासून ऐकतो आहे. मला स्वत:ला या वादात शिरायचं नाही. त्यासाठी अनेक वादकरी आपल्याकडे आहेत. ते त्यांचं-त्यांचं काम करीत राहतील! तर मी भूमिकेविषयी, कलेविषयी बोलत होतो. मला स्वत:ला कला खूप आवडते आणि त्यापेक्षा ती जेथून जन्माला येते ते जीवन तर सर्वांत जास्त आवडतं. कलात्मकता लाभलेलं साहित्य वाचायला, पाहायला, परिणाम करायला बरं वाटतं; याविषयीही माझं दुमत नाही. पण तरीही या दोहोंमध्ये एक अदृश्य रेषा असतेच. मी अनेकदा आदिवासी पाड्यांवर त्यांच्या झोपड्यांमध्ये जात असतो. त्यांच्या भिंतींवर मस्तपैकी नक्षी असते. रंगकामही असतं. चित्रंही चांगली असतात. पाडे दारिद्र्याचे ओझे वाहणारे असले, तरी अनेक झोपडीवजा घरांच्या भिंती कलात्मक वाटायला लागतात. पण वास्तव हे आहे, की आदिवासींनी ज्या झोपड्या बांधल्या त्या निवाऱ्याची मूलभूत गरज भागविण्यासाठी, जगण्यासाठी. नंतर या साऱ्या जगण्यातून स्वाभाविकपणे कला आल्या. मी माझ्या आजीच्या मांडीवर पहाटे डोकं टेकवून अनेक वेळा जात्याची घरघर ऐकत झोपायचो. आजी अगोदर जातं साप करायची. त्याचा खुंटा बळकट करायची. धान्यानं भरलेलं सूप जवळ ओढायची. मग मूठभर दाणं जात्याच्या तोंडात टाकायची. पोटातली आतडी तोंडात येईपर्यंत जातं ओढायची. मग हळूहळू जाडं-भरडं आणि नंतर मऊ पीठ बाहेर पडायचं. जात्याची घरघर वाढली, की त्यातून संगीत बाहेर पडायचं. ते ऐकून मलाही खूप झोप यायची. जात्यातून बाहेर पडणारं संगीत इतरांप्रामाणेच मलाही खूप आवडायचं. नंतर मी एरंडासारखा वाढत गेलो आणि कळलं, की माझी आजी संगीतासाठी नव्हं, तर पिठासाठी जातं ओढायची. जगण्यासाठी जातं ओढायची. जातं ओढणं ही तिच्या जगण्याची एक लढाई होती. दुर्दैवानं आपण पिठाऐवजी, संगीतावर आणि दारिद्र्यानं भरलेल्या घरांऐवजी भिंतीवरल्या चित्रांवरच अधिक बोलत आलो.

माणसाच्या जगण्याला जसं एक प्रायोजन असावं लागतं, तसं साहित्यालाही एक प्रायोजन असतं आणि असायलाच हवं, यासाठी मी स्वत: आग्रही आहे. साहित्याला प्रायोजनच नसेल तर त्यानं काय करायचं? प्रायोजन हेच साहित्याला चालायला, बोलायला, काही करायला लावतं. प्रायोजन साहित्याचा कणा असतं. भूमिका त्याची कणा असते. कणा असलेलं साहित्य खूप प्राभावी ठरतं. ते केवळ ओठांवरच गुणगुणत राहत नाही, तर काळजात प्रावेश करतं. हिंदोळे निर्माण करतं. लाटा निर्माण करतं. लाटा धडकायला लागल्या, की व्यवस्था हलायला लागते. नवं जग, नव्या माणसासाठीची ती हाक असते. साद असते. माणसासाठी जागा करायची असेल तर साहित्यिकाला भूमिका घ्यावीच लागते. अलीकडच्या दशकात अनेक दुर्दैवी घटना घडल्या. माणुसकीच्या झाडालाच माणसाची मुंडकी लटकण्याच्या घटना घडल्या; पण आपण स्वत:लाच प्राश्न विचारायला हवेत, की त्या वेळी आपल्या साहित्याला भूमिका होत्या का? ‘ ग्लोबल वॉर्मिंग”च्या काळात सारी पृथ्वीच होरपळत असेल, करपत असेल तर आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल? लोकशाहीच्या अंगावरची एक-एक वस्त्रं गळून पडण्याच्या काळात आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल? नद्या-नाले, डोंगर, जंगले धनिकांच्या सात-बारावर जात असतील तर आपल्या साहित्याची भूमिका कोणती असेल? स्त्रीचं मोठ्या गतीनं वस्तूतः रूपांतर होत असेल तर भूमिका कोणती असेल? आणि खैरलांजी रोखण्यासाठी साहित्यिकांची भूमिका कोणती असेल? मला ठाऊक आहे, की अनेक जण असं म्हणतील, की सारे प्रश्न निखळ कलेच्या आड येतील. पण मला त्याची पर्वा नाही. कारण साहित्य माणसाच्या बाजूचंच असतं, यावर माजी निखळ श्रद्धा आहे. मी सांगलीच्या साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष असताना, गावाकडचं एक चित्र मांडलं होतं. तेच पुन्हा मांडण्याची इच्छा आहे. पुनरावृत्तीचा आरोप मान्य करून ते मला मांडायचं आहे. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. आता बघा, मला गावाकडच्या मोटेची गोष्ट आठवते. इथं बसलेल्या अनेकांना आठवत असेल, गावाकडं पूर्वी मोटेला बैल जुंपून विहिरीतलं पाणी पाटात आणि पाटातलं शेतात सोडलं जायचं. जेव्हा मोट विहिरीत बुडायला हवी असते तेव्हा बैल उलटं-उलटं म्हणजे विहिरीच्या दिशेनं चालू लागतो. जेव्हा मोट भरते तेव्हा ती पाटापर्यंत आणण्यासाठी बैल सुलटं म्हणजे नाकासमोर चालू लागतो. दिवसभर त्याची ही एक कष्टदायी कसरत चालू असते. मोटेचं पाणी पाटात पडतं तेव्हा त्याचा आवाज कोणता, जलध्वनी कोणता यावरची चर्चा गाजायला लागते. जलध्वनी खळखळ, खुळखुळ की सळसळ यावर वाद झडतात. त्यासाठी शब्दही खर्च होतात. होऊ देत बापडे! मला त्याच्याशी काही देणं-घेणं नाही. दुसरीकडं मोट ओढून-ओढून ज्या बैलांचा खांदा सुजतो, सुजून फुटतो, त्याच्या पाठीवर, पोटावर, चेह-यावर रक्त ओघळायला लागतं. यातील रक्ताच्या एखाद्या थेंबावर तरी आपण कथा-कविता लिहिणार की नाही, हा माझा साधा प्राश्न आहे. शब्दानं बैलाच्या जखमेवर पुंकर घालणं म्हणजे जीवनाशी सलगी करणं आहे. युद्धाशी सलगी करणं आहे. पाण्याचा आवाज आणि रक्ताचा थेंब यापैकी निवड करायची झाल्यास मी स्वत: बैलाच्या बाजूनं उभा राहीन. आपल्या साहित्यानं, आपण सर्वांनीही तेच केलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. आग्रह आहे. आपण सारे जीवनाच्या बाजूनं उभं राहूया. आपल्या शब्दांच्या ओठावर जीवनगाणेच देऊया.

आपल्या साहित्यानं, आपण सर्वांनीही तेच केलं पाहिजे, अशी माझी विनंती आहे. आग्रह आहे. आपण सारे जीवनाच्या बाजूनं उभं राहूया. आपल्या शब्दांच्या ओठावर जीवनगाणेच देऊया.

जागतिकीकरणाची चाहूल लागत होती तेव्हा जागतिकीकरणाचे वकील कोणती-कोणती आश्वासनं देत होते आणि कोणता जाहीरनामा जाहीर करत होते? राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याला मागं पाडेल असा जाहीरनामा होता, आता हेही थोडंसं आठवूया. पृथ्वीवरच्या सर्वांना स्वच्छ पाणी आणि आरोग्य मिळणार. चांगली हवा मिळणार. सर्वांना शिक्षणाचा हक्क लाभणार. वस्तूंचा मुबलक पुरवठा होणार. प्रात्येक मनगटाला काम मिळणार. सामाजिक, धार्मिक विषमता कमी होणार. माणसाचं मूल्य वाढणार, ज्ञानाचे स्पोट होणार, कुणाला कोणत्याही स्पधेर्त भाग घेता येणार इत्यादी. इत्यादी. या घोषणा, ही आश्वासनं, या हमी ऐकून सामान्य माणूस हरखून गेला होता. विकास मोजता यावा यासाठी तोही नवी परिमाणं शिकत होता. आकडे पाठ करत होता. स्वप्नांच्या ढिगाऱ्यावर बसला होता. आयुष्य कुरतडणाऱ्या जुन्या प्राश्नाचं दहन होईल आणि नवं जग येईल असं काय-काय तो बघत होता.

जागतिकीकरण स्थिरस्थावर झालं तेव्हा आपण काय पाहतो आहोत? विकासाचा दर वाढला. वस्तूंचं उत्पादन वाढलं. ज्ञान-तंत्रज्ञानाचा स्फोट झाला. हे सारं सारं खरं आहे; पण त्यातून एक वेगळाच समाज निर्माण झाला. विशिष्ट वर्गाचाच विकास वाढत राहिला. एकदिशा विकास होत राहिला. त्याचे लाभ घेणाराही विशिष्ट वर्ग तयार झाला. जुनी दु:खं कायम राहून नवी दु:खं तयार झाली. संस्कृतिसंघर्ष कमी होण्याऐवजी तो वाढला. धर्माच्या, देवाच्या नावानं जागोजागी स्फोट होऊ लागले. कोणी टॉवर उडवलं. कुणी रेल्वे उडवली, तर कोणी मनुष्यजात उडवण्याचा प्रायत्न करतोय. अध्यात्माची एक प्राचंड बाजारपेठ झाली. कोट्यवधी पुस्तकं आणि मोजता येणार नाही एवढी उलाढाल त्यातून बाहेर पडते आहे. मूलतत्त्ववाद गोंजारणा-या फौजाच्या फौजा तयार झाल्या. त्या समूहावर आणि शासनावरही हल्लाबोल करू लागल्या. मुंबई-मालेगावातही आपण असे हल्ले पाहिले आहेत. त्यात बळी गेलेल्यांच्या किंकाळ्या अजूनही आपल्याभोवती घुमत आहेत. नव्या व्यवस्थेनं वस्तूंची बाजारपेठ जशी वाढवली तशी अध्यात्माच्या बाजारपेठेलाही चालना दिली. अध्यात्मालाही नखं फुटली. त्यानं समाजाला आणि मूलभूत स्वातंत्र्यालाच कुरतडायला सुरुवात केली. कधी कुणाच्या लेखनामुळे कुणाच्या भावना दुखावतील आणि स्फोटाचं रूप घेऊन बाहेर पडतील, याचा नेम राहिलेला नाही. साहित्यिकांच्या लेखण्यांवरही मूलतत्त्ववाद आक्रमण करत आहे. जगभरात अशा अनेक घटना घडत आहेत. घडल्या आहेत. जागतिकीकरणात संस्कृतिसंघर्ष कमी होतील आणि वैश्विक खेड्यात सारे गुण्यागोंविदानं नांदतील, असंही एक स्वप्न ठेवण्यात आलं होतं. भूगोल आकसेल. इतिहास अदृश्य होईल. तत्त्वज्ञान संपेल आणि संपर्कसाधनांच्या जोरावर नवी क्रांती करणारा माणूस सा-या भेदाभेदांतून मुक्त होईल, असंही सांगण्यात येत होतं. प्रत्यक्ष तसं घडलेलं नाही. माणूस स्क्रीनमेकरही होतो आणि स्क्रीनसेवरही होतो. मला वाटतं, आजच्या आणि उद्याच्या लेखकांनी माणसाचं हे अवमूल्यन, त्याचं कोसळणं, माणसातून निघून वस्तूत अडकणं हे समजून घेतलं पाहिजे. त्याला मानवी कळपात आणण्याचा प्रायत्न केला पाहिजे. एकीकडं हे शक्तीचे, समृद्धीचे अचाट प्रायोग, तर दुसरीकडं कालचा आणि आजचा पाऊस पडलाच नाही आणि उद्या तरी पडणार की नाही, अशी भ्रांत असणाऱ्यांची संख्या वाढते आहे. पाण्यावरून जगभर नवे संघर्ष निर्माण झाले. आकाशातले ढग पळवण्याचे बेत आखले जाऊ लागले. पाण्यावरून नव्या जाती निर्माण झाल्या. बिसलरीवाली माणसं, पिल्टर केलेलं पाणी पिणारी माणसं, डबक्यातलं पाणी पिणारी माणसं आणि कसलंही पाणी न पिता शीतपेयं पिऊन जगणारी माणसं… पाणी मिळविण्यासाठी… रस्ता मिळविण्यासाठी… भाकरी मिळविण्यासाठी एक नवी लढाई सुरू झाली. गाव विरुद्ध शहर, शहर विरुद्ध महानगर, महानगर विरुद्ध ग्लोब, बिसलरीविरुद्ध डबकेवाले, भाकरीविरुद्ध बर्गर, ऑनलाइन विरुद्ध ऑफलाइन, रेंज मिळवणारे विरुद्ध रेंज गमावणारे अशा नाना प्राकारच्या लढाया सुरू झाल्या. आपलं साहित्य हे सारं पाहतं आहे का, आणि त्याचं चित्रण त्याच्या साहित्यात होत आहे का, हे पाहायला हवं. या नव्या लढाया, नवी मैदानं, नवे नियम आपल्या कवितेत येत आहेत का? वाघ आणि शेळीच्या लढाईत कोण हरेल, याचं उत्तर पूर्वी शेळी असं यायचं. आता ते ज्याला एसएमएस अधिक मिळतील तो जिंकेल असं येतं. आपण सारे लिहिणारे, हे नियम समजावून घेतो आहोत काय? त्याचे परिणाम पाहतो आहोत काय? मला वाटतं, आपलं दुर्लक्ष होत आहे. कोणत्या ना कोणत्या तरी लढाईत परिवर्तनाच्या प्रावाहात स्वत:ला गुंतवून ठेवणा-या साहित्यिकांची संख्या एकेकाळी आपल्याकडं प्रचंड होती. तो स्वत:ला बांधून घ्यायचा. कृतीला आणि विचारालाही बांधून घ्यायचा. त्याचा त्याला अभिमान वाटायचा. मी बांधीलकी मानणारा माणूस आहे, लेखक आहे हेही तो अभिमानानं सांगायचा. पण काळ बदलत गेला आणि लेखकाचं हे बांधून घेणं कमी होऊ लागलंय. सैल होऊ लागलंय. हे जे वर्तमान मी मांडतो आहे त्याला भिडण्याचं काम आपल्या साहित्यानं केलं पाहिजे. मी कुणाशीच बांधील नाही, माझा मी मुक्त, मी वर्तमानाला भिडणार नाही, मी भविष्याचा वेध घेणार नाही अशा प्राकारची मानसिकता वाढताना मला दिसत आहे. ती साहित्याचा प्राभाव कमी करणारी आहे आणि माणसाच्या लढायांपासून दूर जाणारीही आहे. आपली कविता, कथा, कादंबरी, नाटक जर वास्तवाचं प्रातिबिंब असेल तर ते ठिसूळ, अस्पष्ट, प्रभावहीन का होतं आहे? वर्तमान पकडण्यात जर आपण कमी पडलो, तो बदलण्याच्या प्रायत्नांपासून दूर झालो तर आपलं साहित्य कुपोषित होईल. मला आठवतं, केरळमध्ये काही मुलांनी एकत्र येऊन, एका मोठ्या कागदावर चित्रात जागतिकीकरण पकडण्याचा प्रायत्न केला होता. कागदावर डुकरांची भली-मोठी रांग होती. सर्व डुकरं सशक्त होती. सर्वांत शेवटच्या डुकरामागे बिथरलेल्या, हरलेल्या माणसाचे डोळे भास वाटावेत अशाप्रामाणे दाखवले होते. जागतिकीकरणात डुकरं मोठी होतात. माणूस छोटा आणि दुर्बल होतो हे त्या मुलांना सुचवायचं होतं. आपल्या मराठी साहित्यात माणसाच्या नव्या लढाया दिसायला हव्यात. नवी आयुधं दिसायला हवीत. शब्दांचा माणसाला आधार वाटायला हवा आणि त्यातील ऊर्जाही त्याला मिळायला हवी. आपण वर्तमान पाहण्यात, तो पचवण्यात, त्याला भिडण्यात लेखक म्हणून कमी पडतो आहोत का, असं मला वाटायला लागलं आहे. वर्तमान खरोखरच पेचप्रसंगांनी भरलेला आहे. त्याला सामोरा जाणारा आणि लढणारा नवा महानायक आपल्या साहित्यानं जन्मास घालायला हवा. असा महानायक जन्माला घालावा, की जो या पेचप्रसंगात डुकरापेक्षा माणूस मोठा आहे, वस्तूपेक्षा माणूस मोठा आहे असं बुलंद आवाजात सांगेल.

यांत्रिकीकरणाच्या झपाट्यात एकतर माणसाच्या संवेदनाच बोथट होऊ लागल्या आहेत किंवा त्याचंही यांत्रिकीकरण होऊ लागलं आहे. आज अशी परिस्थिती आली आहे, की जेथे साहित्यानं जीवनवादी भूमिका अधिक व्यापक करायला हवी. जीवनवादी किंवा माणूसवादी याचा अर्थ प्रारंभी आणि शेवटी माणसांचाच विचार करणारं साहित्य. आपल्या लेखनात अनेक प्रश्न येतात. येत राहतील; पण त्याचं विश्लेषण करताना सारे जुनेच मार्ग आपण वापरतो. जागतिकीकरणात हे प्राश्न कसे गुंत्याचे झाले आहेत, हेही आपण लिहायला हवं. जुन्या गुलामीविरुद्ध तर लिहिलंच पाहिजे; पण नव्यानं आलेल्या गुलामीचा वेध आपण कसा घेणार? एक बँक हलायला लागली, की जगभरातल्या लाखो लोकांच्या नोक-या जातात. कंत्राटी संस्कृतीत नवे गुलाम जन्माला येतात. भूदास, श्रमदास आणि हा नवा ग्लोबलदास असा हा प्रवास चालू आहे. या विषयावरही अन्य भाषांमध्ये भरपूर लेखन येत आहे. माझ्या माय मराठीत ते का येत नाही? आपला लेखक-कवी हे नवं पर्यावरण भेदण्याचा प्रायत्न करतो आहे काय किंवा काठावर बसून पाहतो आहे हे सारं… पर्यावरणात नव्यानं तयार होणा-या लढायांतून तो स्वत:ला दूर ठेवू पाहतो आहे काय किंवा त्याची उपस्थिती कमी होते काय? एकीकडे प्रचंड स्वातंत्र्य आणि दुसरीकडे व्यक्त होण्याचाही संकोच, असं दुभंगलेलं चित्र जे निर्माण होतं आहे, त्याचा तो अर्थ शोधून घेतोय काय? नव्या काळातील या कथित उदंड स्वातंत्र्याचा अर्थ तरी समजून घेतोय का? मला वाटतं, तसा प्रयत्न करायला हवा.

गेल्या दशकात जागतिकीकरणाचे खरे-खोटे चेहरे उघड करणारं साहित्य मराठीबाहेर मोठ्या प्रामाणात लिहिलं-वाचलं जातं आहे. आपल्याला उशीर का लागतो? जीवनाला भिडताना आपण वेळ का गमावतो? या नव्या पर्यावरणाचा आणि त्यात घुसमटणा-या मानवी मूल्यांचा आणि ती जन्माला घालणा-या व्यवस्थेचा वेध आपण घेणार की नाही? किती वर्षं आपण व्याख्या आणि संज्ञातच अडकणार? या नव्या साहित्यासाठी नव्या फूटपट्ट्या आणणार की नाही? नाकावर लटकलेल्या चष्म्याची धूळ झटकणार की नाही? असे अनेक प्राश्न माझ्यासमोर आहेत. मूल्यऱ्हास होत असेल, तर आपण सरसावून लिहीत का नाही? आपण नव्या वातावरणात महाकादंबऱ्या, महानाट्ये, महाकाव्यं, महाचित्रं का जन्माला घालत नाही? आपण चटकन युगांतर का करत नाही? हे सारं घडलं, तर आपलं साहित्य समृद्ध होईल. आधुनिक होईल. भाषा समृद्ध होईल. जीवनमूल्यं समृद्ध होतील. आपण आता कशाची वाट पाहतोय? कुणाची वाट पाहतोय?

जागतिकीकरणात माणूस इतका धावतो आहे, इतका धावतो आहे, की कधी-कधी तो स्वत:ची सावली आणि स्वत:चा चेहराच हरवून बसतो. या धावण्यात त्याच्या संवेदनाही सांडून जातात आणि त्याच्या सावल्याही बेईमान होऊन, पितूर होऊन गळून पडतात कुठंतरी कोसावर… माणसाला नव्या युगानं नुसती गतीच दिली नाही, तर त्याचं विभाजन केलंय. पूर्वी तो जाती, धर्म, पंथ, प्रादेशात विभागला गेला होताच. आता त्याचं विभाजन अन्य असंख्य गोष्टींत झालं आहे. जुन्या जाती कायम असताना त्यांना नवी जातसुद्धा चिकटवली गेलीय. उदाहरणार्थ, पूर्वी सर्व कामगारांची विभागणी दोन घटकांत केली जायची. पांढ-या कॉलरचा आणि निळ्या कॉलरचा श्रमिक. आता कॉलरची संख्या मोजता येत नाही, ती एवढी वाढली आहे, की प्रात्येक जण हातात हात घालून चालण्याऐवजी हात सोडून स्वतंत्रपणे धावू लागला आहे. प्रत्येकाचं एक स्वतंत्र ठिकाण आहे. त्याला तिथंच पोचायचं आहे; पण हे ठिकाणही मृगजळासारखं आहे. माणूस जसा जवळ जाईल तसं हे ठिकाण दूर-दूर जातं. धावताना, पळताना, ठिकाण पकडताना त्याची दमछाक होते. हात सोडून पळण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा त्याच्या संवेदना चहूबाजूला सांडतात. पुढं धावणारा आणि मागून येणारा यांची टक्कर होते. सबल आणि दुर्बलांच्या टकरीत आणि गतिरोधकावरून उड्या मारतानाही माणसं रक्तबंबाळ होतात. काही वेळा त्यांच्यातील माणूसपणही सांडून जातं किंवा तेही जखमी होतं. विखुरलेल्या संवेदनांची माळ त्याच्या गळ्यात घालण्याचं, हरवत चाललेलं त्याचं माणूसपण त्याच्या ओंजळीत टाकण्याचं, त्याच्या जखमांवर मूल्यांची पुंकर घालण्याचं काम साहित्याला करावं लागणार आहे. वाङ्मय म्हणजे मनोरंजनाचंच साधन, वाङ्मय म्हणजे केवळ घडवून घडवून तयार केलेला एक दागिनाच, वाङ्मय म्हणजे कोणीतरी तयार केलेल्या सांगाड्यात गच्च बसवण्याचं साधन या संकुचित कल्पनेतून बाहेर पडायला हवं. जीवन अखंड धावत असतं… वेगवेगळं रूप धारण करून धावत असतं. हे नवं रूप काय आहे? त्याला अस्वस्थ करणारे कोणते नवे विषाणू तयार झाले आहेत, हे पाहण्याचं आणि त्याबाबत जागल्याची भूमिका करण्याचं कामही साहित्याचंच असतं.

वेगवेगळ्या प्राकारच्या विषमतेवर उभ्या असलेल्या समाजात अनेक वेळा माणूस जसा चेहरा हरवून बसतो, तसा व्यवस्था त्याचा चेहरा हिरावूनही घेते. वरची चामडी तर पाडून काढतेच; शिवाय तिच्या मागं लपलेल्या चामड्याचे सर्व पदरही पाडून, कुरतडून काढते. त्याचा इतिहास, भूगोल नाकारते. वर्तमान आणि भविष्य नाकारते. असे बिनचेहऱ्याचे किंवा व्यवस्थेच्या जबड्यात आपला चेहरा गमावून बसलेले कोट्यवधी लोक जगात आहेत. जागतिकीकरणात अशा लोकांची संख्या वाढते आहे. ती कोणी मोजत नाही. स्पधेर्ला मरणाच्या संख्येशी देणंघेणं नसतं; पण साहित्यिकाला मात्र ते असतंच असतं. असावंच लागतं. माणसाला, ‘ तू माणूस आहेस ‘ हे सांगण्याचं काम सर्वांत अधिक करतं ते साहित्यच! जर माणसाला चेहराच नसेल किंवा त्याची स्वत:च स्वत:ला ओळख नसेल तर काय होईल, याविषयी ओशोंनी एक मोठं मार्मिक उदाहरण सांगितलं आहे, ते आपल्यासमोर मांडणं मला उचित वाटतं… तर आरसा सर्वांपर्यंत पोहोचलाच नव्हता तेव्हाची ही गोष्ट. एके दिवशी एका शेतकऱ्याला घरी परतताना एका मळलेल्या वाटेवर एक काचेचा तुकडा सापडला. तो आरशाचाच एक तुकडा होता; पण शेतक-याला ते माहीत नव्हतं. त्यानं त्याच्या सात पिढ्यांत कधी आरसाच पाहिला नव्हता. त्यानं तो तुकडा उचलला. साप केला. आपल्या डोळ्यासमोर पकडला. क्षणभर त्यात पाहिलं आणि दुसऱ्याच क्षणाला तो ओरडला, ‘ कितने दिनों के बाद मिल रहे हो दादाजान! ‘ त्याला दादाजान भेटल्याचा खूप आनंद झाला. तो रोज-रोज हा तुकडा बघू लागला. रोज-रोज ‘ सलाम अलेकूम दादाजान ‘ म्हणू लागला. आपला नवरा खूपच आनंदी दिसतोय म्हणून त्याच्या पत्नीनं एक दिवस त्याला या आनंदाचं रहस्य विचारलं; पण रहस्य वगैरे काही नाही, असं सांगत तो शेतावर निघून गेला. तो गेल्यानंतर तिनं पतीच्या खोलीची झाडाझडती घेतली. तिलाही हाच काचेचा तुकडा सापडला. तिनंही आपल्या डोळ्यांसमोर तो धरला आणि ती जोरात कडाडली, ‘ इस बजारबटू को देखकर वो रोज रोज हसता है क्या? खुश रहता है क्या? ‘ नवरा परतल्यावर तिनं तो काचेचा तुकडा त्याच्या डोळ्यांसमोर पकडला आणि विचारलं, ‘या बजारबटूला बघून तुम्ही रोज रोज हसता काय? ‘ तो म्हणाला, ‘ भलतंच काय, यात तर माझे दादाजान आहेत. ‘ ती म्हणाली, ‘ खोटं आहे, बजारबटू आहे ‘ आणि तो म्हणाला, ‘ दादाजान! ‘ दोघांचं भांडण सुरू झालं. ते मिटवण्यासाठी ते काझीकडं गेले. त्यानंही तो तुकडा पाहिला. त्यालाही आरसाबिरसा काही माहिती नव्हता. तुकडा पाहून तोही गंभीरपणे म्हणाला, ‘ हे पहा मुलांनो, या काचेच्या तुकड्यात ना कोणी बजारबटू आहे, ना कुणाचा दादाजान. खरंच ऐकायचं असलं तर मी सांगतो, की यात माझे स्वत:चे नानाजान आहेत. ‘

ज्याला स्वत:चा चेहराच ओळखता येत नसेल, तर तो स्वत:ला काहीही समजतो. साहित्याचं हे काम आहे, की त्यानं माणसाला त्याचा चेहरा प्राप्त करून देणं. आरसा नीट राहावा म्हणून त्याच्यामागचा पाराही जपणं. महानगर, नगर, खेडी, झोपड्या या साऱ्याच ठिकाणी माणसाच्या चेहऱ्यावरचं वस्तूचं ओझं वाढतं आहे. चेहरा पराभूत होतो आहे आणि वस्तू जिंकते आहे. महानगरातला माणूस सर्वांत सुखी आहे आणि सगळा उजेड त्याच्याच चेह-यावर आहे, असंही समजण्याचं काही कारण नाही. तो पूवीर् आपल्या घराचा पत्ता सांगताना शाळेच्या मागं, बागेच्या पुढं, मंदिराजवळ असं काहीतरी बोलायचा. आता त्याची ही भाषा बदलली. तो आता दंगल झाली होती त्या ठिकाणाजवळ, विटंबना झालेल्या पुतळ्यामागं, बॉम्बस्पोट झाला त्याच्याच पुढं किंवा धर्माचं नाव घेत माणसं कापली गेली त्या ठिकाणी; असं काही तरी सांगतोय. स्वत:च्या घराचा बदललेला पत्ता सांगण्यासाठी अशी ठिकाणं वापरतोय… सशाचं काळीज घेऊन तो जगतोय. कधी नव्हं एवढी एक विलक्षण अस्वस्थता, विलक्षण असुरक्षितता त्याला घेरते आहे. मी माझ्याच एका कवितेत या अस्वस्थ माणसाचं वर्णन करताना म्हटलं आहे, की-

कॅरिबॅगमधून आता

प्रश्न वाहून नेताहेत

इथले सारे लोक

दुधाच्या पिशव्या

फ्रिजमध्ये ठेवाव्यात त्याप्रमाणे

आसवांच्या पिशव्या

फ्रिजमध्ये ठेवून

फिरताहेत इथले सारे लोक

फ्लॅटवर काळीज ठेवून

रस्त्यावर फिरताहेत इथले सारे लोक…

मला वाटतं, या सा-या असुरक्षित जिवांच्या काळजात डोकावणं आणि त्यांची जगण्याची उमेद वाढवणं हे साहित्याचं काम आहे. जेव्हा सारी व्यवस्था सडायला लागते, मूल्यं कुजायला लागतात, आपल्याच सावल्या आपल्याशी बेइमानी करायला लागतात आणि आपलीच आसवं आपल्या डोळ्यांत ठिणग्या बनून बंड करायला लागतात, तेव्हा साहित्यिकांनाच पुढं यावं लागतं. त्यांनी आलंच पाहिजे. त्यासाठी पारंपरिक चौकटीतून बाहेर पडलं पाहिजे. जुन्या परंपरा पाळत आपल्याला नवे प्रश्न कळणार नाहीत. मांजराची जुनी कथा सांगत स्क्रीनवरच्या उंदराचा खेळ कळणार नाही. एका क्षणात आपण ‘ डिलीट ‘ का होतोय हेही कळणार नाही. मला वाटतं, या सा – या विषयावर व्यापक चर्चा करण्यासाठी संमेलनासारखं दुसरं व्यापक ठिकाण नाही. आपल्याला धावायचं तर खूप आहे. चालायचं तर खूप आहे; पण हातातील मूल्यं घरंगळत आपल्याच पायांखाली पडणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे. या ठिकाणी साहित्य कधी लाल, तर कधी हिरवा झेंडा घेऊन उभं राहतं. कधी जागल्याची भूमिका करतं. माणसाचा शेवट संगणकाच्या नव्हे, तर माणसाच्याच खांद्यावर होईल, याची काळजी घेतं.

जागतिकीकरणाच्या रेट्याचा सर्वात अधिक परिणाम ग्रामीण भागावर होतो आहे, हे मी आपल्याला सांगण्याची आवश्यकता आहे, असं वाटत नाही. तेथील साधनसामग्रीवर कुणातरी कंपनीचा, कुणातरी धनदांडग्यांचा हक्क प्रास्थापित होतो आहे. वेगवेगळ्या नावांनी येणारे झोन ग्रामीण भागाला समृद्ध करण्याऐवजी त्यांचं शोषण करत आहेत. पाणी, जंगलं, नद्या, नाले, डोंगर आदी अनेक गोष्टींचं खासगीकरण होत आहे. हंडा, घागरीत भरलं जाणारं पाणी आता बाटल्यांत भरलं जातं आहे. जागतिकीकरणाला टक्कर देण्याची क्षमता गावांत राहिली नाही. गावंच्या गावं स्थलांतरित होत आहेत. शहरातील फूटपाथवर चुली मांडत आहेत. महानगरात भाकरीच्या तुकड्यासाठी बंबाळ होणारी, स्पीडब्रेकरला ठेच लागून पडणारी आणि स्थलांतरित; असा एक शिक्का कपाळावर घेऊन जगणारी माणसं वाढत आहेत. ग्रामीण भागावर आपल्याकडं खूप लिहून झालं आणि लिहिलं जातं आहे. आता ग्रामीण साहित्यानं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर केवळ लिहून चालणार नाही, तर कशामुळे घडत आहेत या आत्महत्या आणि कोणता नवा खलनायक त्या घडवतो आहे, हे शोधायलाही म.फुल्यांनी साहित्य सभेला जसं पत्र दिलं होतं, तसं शेतकऱ्यांच्या जगण्या-मरण्याविषयी इंग्रज मायबापालाही एक पत्र लिहिलं होतं. या देशात जेव्हा जेव्हा महामारी येते, जेव्हा जेव्हा दुष्काळ येतो, महापूर येतो तेव्हा त्यात आपला बळीराजाच का मरतो, असा त्यांचा प्राश्न होता. दुर्दैवानं या प्राश्नाचं उत्तर आपण आतापर्यंत देऊ शकलो नाही. ना सरकारनं ना साहित्यानं दिलं. बळीराजा रोज मरत असल्याच्या काळातही आपण उत्तर देऊ शकलो नाही. पॅकेजचा पाऊस पाडूनही देऊ शकलो नाही. मरणाचे आकडे आपण अचूक मोजतो. मृतदेहाचं वर्णनही अतिशय संवेदनशील होऊन करतो. जागतिकीकरणामध्ये दिसत असलेल्या मरणाचं एक मोठं वैशिष्ट्य असतं आणि ते म्हणजे येथे मृतदेह दिसतात, मरण दिसतं पण ते घडवून आणणारी व्यक्ती किंवा खलनायकी घटक मात्र दिसत नाहीत.शेतकऱ्यांच्या आत्महत्येबद्दल आतापर्यंत कोणत्या अर्थव्यवस्थेला, घटकाला शिक्षा झाल्याचं किंवा कुणाची खुचीर् गेल्याचंही मला माहीत नाही. ही मरणं अशीच सुरू राहणार आणि मारेकरी नेहमीच अदृश्य राहणार का; हा माझा प्राश्न आहे. याचं उत्तर देण्यासाठी फुल्यांचा आसूड लिहिण्याची गरज निर्माण झाली आहे. जागतिकीकरण ओळखेल आणि अदृश्य खलनायक शोधून काढेल अशा आसूडाची गरज आहे. हे सांगताना मी पुन्हा पुन्हा एक गोष्ट नमूद करू इच्छितो आणि ती म्हणजे, आपला विरोध जागतिकीकरणाला नाही, तर त्यानं आणलेल्या नव्या शोषणव्यवस्थेला आणि अदृश्य खलनायकांना आहे. म.फुल्यांनी आपलं एक पुस्तक अमेरिकेतील निग्रो बांधवांना अर्पण करून एका अर्थानं जागतिक पातळीवरील दु:खाशी नातं जोडलं होतं. इथंही मानवमुक्तीची लढाई सुरू होती आणि तिकडं अमेरिकेतही सुरू होती. या दोन महालढायांचं नातं त्यांनी जोडलं होतं. या नात्यांचंच जागतिकीकरण केलं होतं आणि शोषणाला करावयाच्या विरोधाचंही जागतिकीकरण केलं होतं. आपण आपलं कोणतं साहित्य कोणत्या महालढायांना अर्पण करत आहोत? कोणत्या लढायांचं जागतिकीकरण आपल्या साहित्यातून होतं आहे, याचा थोडा तरी विचार करू या. मी जीवनवादी होऊन कलेकडं दुर्लक्ष करतोय, असा त्याचा अर्थ नव्हे. कला जीवनातच निर्माण होत असते आणि जीवनही तितकंच वाहक असतं, असंही मला वाटतंय. याच ठाण्याला पहिले कामगार पुढारी मेघाजी लोखंडे यांची कामगार, श्रमिक चळवळींची परंपरा आहे. सत्यशोधकी विचारांची परंपरा आहे. बंडखोर भागवत शास्त्रींची परंपरा आहे. विशेष म्हणजे म.फुल्यांनी शेतकऱ्यांच्या आसुडाचं लेखन याच ठाणे जिल्ह्यातील वांगणी या गावी केलं होतं. ही परंपरा ऐकून माझी अपेक्षा बळावलीय.याच परंपरेत होत असलेल्या संमेलनात कोणीतरी माझा भाऊ, बहीण पुढे येईल आणि नवा आसूड तयार करील, असा मला विश्वास आहे. नव्या आसुडाची निर्मिती हेच या संमेलनाचं पलित असेल. चला, नव्या आसुडाच्या निमिर्तीला लागू या. ग्रामीण जीवनाचं वर्णन करणारं आपण भरपूर लिहिलं. ते लोकमान्यही झालं.राजमान्यही झालं. विद्यापीठाच्या बुकातही गेलं. पण, आजचं ग्रामीण वास्तवही मी मांडायचा प्रायत्न करतोय. हे वास्तव खूप वेगळं आहे. पिकं अंगावर घेणा-या जमिनीवरही तर लिहावंच लागेल आणि ती तरारून यावीत म्हणून मातीच्या गर्भाशयात जे रासायनिक प्रायोग केले जात आहेत, त्यावरही लिहावं लागेल. शेतात राबणाऱ्या एका कवयित्रीनं अशी कविता लिहिलीय. पूर्ण पिकण्याआधीच कापली जाणारी कणसं तिला हुंडाबळीसाठी मारल्या जाणाऱ्या बायाबापड्यांसारखी वाटतात. कणसांचा मरणोत्सव वाटतो तिला. इव्हेन्ट साजरा करणाऱ्यांनी हे नवं तंत्र आणलंय. जमीन लवकर निर्मितीक्षम व्हावी, ती लवकर वयात यावी, लवकर बाळंत व्हावी यासाठी जे रासायनिक प्रायोग केले जात आहेत, त्याचंही वर्णन तिनं केलंय. जमिनीचं बाळंतपण झटपट व्हावं, खूप लवकर पिकं यावीत, असं व्यवस्थेला वाटतंय. अकाली बाळंतपण या जमिनीच्या वाट्याला आलंय. ते नको म्हणून आता माझं सीझर कर, अशी विनंती जमीनच करू लागलीय. एक छान पण काळीज हादरून टाकणारी कविता वाचायला मिळाली, याचा आनंद मला वाटतोय. कल्पना दुधाळनं ती लिहिलीय. तिला जागतिकीकरणही कळलं, असं मला वाटतंय. साऱ्यांनीच ते समजून घ्यायला हवं.नुसतं वर्णनात्मक नव्हे, तर संघर्षात्मकही लिहायला हवं. जमिनीचा गर्भ कोणी भ्रष्ट करू नये, यासाठी विषाणू मारणारंही लिहायला हवं.

मी हे जसं ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचं सांगतो आहे, तसं शहरात राबणाऱ्या माणसांचं आहे. तेही लढून लढून रक्तबंबाळ होत आहेत. त्यांचीही दिशाभूल होत आहे. बर्गरवाले आणि भाकरीच्या शिकारीतच खलास होणारे चेहराहीन, यांच्यातील दरी वाढते आहे. बर्गर आणि भाकरी यांच्यातील लढाईतून हरणारे जसे तयार होतील, तसेच भाकरीसाठी गुन्हा करणारेही तयार होतील. विषमतेवर प्राहार करीत आणि समताधिष्ठित जगाचं एक सुंदर स्वप्न साहित्य तयार करतं. काव्यात्म न्यायाची भाषा करतं. ते स्वातंत्र्यासाठीच्या लढायांमध्येही भाग घेतं. लढाया पेटवत माणसाला जागं करतं. लढणारं साहित्य आजही जगाच्या पाठीवर आहे. जागतिकीकरण समूहाचे तुकडे तुकडे करतं आणि प्रात्येकाच्या चेहऱ्यावर एका खोट्या प्रातिष्ठेची, खोट्या स्वातंत्र्याची, भ्रामक विकासाची चिकटपट्टी चिकटवतं.साहित्यिकांनी ह्या सर्व चिकटपट्ट्या ओरबाडून काढायला हव्यात. माझा मी बरा आहे, अशा भ्रमात त्यानं राहू नये.कारण हे कथित बरेपण अल्पजीवी आहे. आताच त्याचा वेध आपल्या साहित्यिकांनी घ्यावा. आपला समाज आणि आपला लेखक यांच्यात जे तुटलेपण आलंय, त्याची कारणंही शोधायला पाहिजेत. जागतिकीकरणामध्ये माणसाला समूहातून बाहेर काढण्याचा जो एक प्रायत्न असतो, त्याचाही हा एक भाग असू शकतो.क्षीण होत चाललेल्या चळवळी, क्षीण होत चाललेलं शासन, कल्याणकारी योजनांचा बट्ट्याबोळ या सर्वांचाही परिणाम असू शकतो. पण हेही खरं आहे, की या साऱ्या शक्ती क्षीण होतात तेव्हा साहित्यिकाची जबाबदारी पुन:पुन्हा वाढत असते. जागतिकीकरणात जन्माला आलेले, दोन शतकांची घासाघीस होताना जन्माला आलेले आणि नव्या शतकाच्या प्रासववेदनांचे साक्षीदार असलेले; अशा सर्वांची ही जबाबदारी आहे, की त्यांनी जीवनवादी साहित्याच्या पालखीला आपला खांदा द्यावा. नव्या प्रावाहात वाहून जाणाऱ्या, गटांगळ्या खाणाऱ्या माणसाच्या बाजूनं लिहावं.

साहित्याला विचारांची, तत्त्वज्ञानाची मुळं असावी लागतात. वैचारिक साहित्य हे काम वर्षानुवर्षं करत आलं आहे. पायाभूत वाटावं असं हे काम आहे. त्रिकोणातील पाया म्हणजे वैचारिक साहित्य असतं. उरलेल्या कोनाला ते ऊर्जा पुरवत असतं. गेल्या दशकापासून वैचारिक साहित्याचा दुष्काळ आपल्याकडं नजरेत भरावा इतपत जाणवत आहे. गावोगाव विचार करणारी मंडळं असायची. कोल्हापुरात तर अनेक महाविद्यालयांमध्ये प्लेटो क्लब, अॅरिस्टॉटल क्लब, सॉक्रेटिस क्लब मी पाहिले आहेत. भोवतालच्या गंभीर प्राश्नावर चर्चा त्यात होत असे. विद्यार्थ्यांना विचारांकडं झुकवलं जात असे. आता यापैकी काही, महाविद्यालयांत आणि महाविद्यालयांबाहेरही राहिलं नाही. विचार वाहून नेणारी नियतकालिकं आणि अनियतकालिकंही कमी होत आहेत. त्यातून आणि त्याबाहेर झडणा-या चर्चाही कमी होत आहेत. मला वाटतं, विचारांचा आटणारा प्रावाह काही चांगल्या समाजाचं लक्षण म्हणता येत नाही. हे जे मांडलं, ते दृश्य आहे आणि ते का जन्माला आलं, याची कारणंही शोधलीच पाहिजेत. समाजाची वैचारिक भूक का कमी होते आहे आणि कोण ती कमी करतं आहे; हेही अशा संमेलनाच्या निमित्तानं शोधलं पाहिजे. सार्वजनिक व्याख्यानमालांमधूनही वैचारिक, गंभीर विषय हद्दपार होऊ लागले आहेत. गंभीर विषयावर बोलू नका. श्रोते येत नाहीत किंवा एखादा गंभीर बोलतो म्हणून त्याला बोलावलंही जात नाही. लोकांना हे असं गंभीर का नको आहे आणि त्याला हास्य क्लब का जवळचे वाटू लागले आहेत? मी कोणी हास्य क्लबचा विरोधक नाहीय. हसण्याचं महत्त्व मान्य करूनही हा प्राश्न मी उपस्थित करतो आहे. लोकांना खरंच मनापासून हसायचं, की स्वत:ला पसवण्यासाठीही हसायचं हेही तपासायला हवं. तर, मी वैचारिक साहित्यावर बोलत होतो. जागतिकीकरण, नवभांडवलशाही, नव्या स्पर्धा, लोकशाहीचा आणि सरकारचा संकोच, जगण्याचा संकोच आदी अनेक विषयांवर अपवाद वगळता आपल्याकडं अलीकडं पारसं लिहिलं गेलेलं आपल्याला दिसत नाही. वैचारिक साहित्य मागं पडणार असेल, तर मूळ साहित्याचं कुपोषण होईल. राजकारण, शिक्षण, अर्थकारण, पर्यावरण आदी नाना विषयांतून वैचारिक साहित्य फुलत राहिलेलं आपण सर्वांनी पाहिलं आहे. आता मात्र त्याची न परवडणारी अशी पानगळ चालू आहे. ती थांबवायला हवी. वैचारिक साहित्याची घसरण कुणालाच परवडणारी नसते. त्यामुळे समाज मागंमागं जायला लागतो. साहित्यातही मागंमागं जायला लागतं. वैचारिक साहित्य पुढं जाण्यासाठी ऊर्जा देतं आणि डोळेही देतं.

समाजातील अनेक घटक अजून आपल्या साहित्यात अवतरायचे आहेत. काही प्रातिनिधिक स्वरूपात अवतरत आहेत, तर काही अजून सीमांवर आहेत. अनेक जातींमध्ये शिक्षण पोहोचलेलं नाही. शिक्षणाचा हक्क मिळूनही ते पोहोचलेलं नाही. ज्यांना शिक्षणाची परंपराच नाही असा समूह अजूनही शिक्षणाकडं येत नाही. शिक्षण नाही म्हणून लेखन नाही, असंही घडतं आहे. या सर्वांना शिक्षित करून त्यांच्यात लिहिण्याच्या प्रोरणा निर्माण करायला हव्यात. अंध, अपंग, निराधार, अनाथ, मतिमंद यांच्यापैकी अनेक जण आता लिहिते होत आहेत, ही स्वागतार्ह गोष्ट आहे. अनाथही लिहीत आहेत. आपले अनुभव मांडत आहेत. अनाथपण जन्माला घालणाऱ्या व्यवस्थेची चिरपाडही करत आहेत. ऊसतोडणी कामगारावर पुस्तकं येत आहेत. या सर्व अनुभवांचं स्वत:ला मुख्य समजणाऱ्या साहित्यानं स्वागत तर केलंच पाहिजे; शिवाय त्यांना अधिकाधिक प्रोरणा देऊन स्वत:लाच समृद्धही करून घेतलं पाहिजे. विज्ञानकथांकडं आपण अजून निकोप भावनेनं पाहत नाही. विज्ञानकथा म्हणजे कलाहीन, प्रातिभाहीन केवळ तंत्राची जंत्री सांगणाऱ्या असे काहीतरी गैरसमज आपण करून घेतले आहेत. तेही तातडीनं दूर करण्याची आवश्यकता आहे. विज्ञानकथा जशा आवश्यक आहेत, तशा विज्ञानकादंबऱ्या आणि विज्ञानकविताही आवश्यक आहेत. या सर्वांना साहित्य म्हणताना खळखळ करता कामा नये.

राजकारणावरील साहित्याचाही वानवा निर्माण झाला आहे. काही सन्माननीय अपवाद वगळता राजकीय विषयावर साहित्यनिर्मिती झालेली नाही. आपण राजकारणाला आणि राजकारण्यांना तुच्छ समजायला लागलो. समाज नासवणारे, कोणीतरी परग्रहावरील ते जीव आहेत, या भावनेनं त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन वाढीस लागला आहे. आम्हाला त्यांचा शेजार नको, अशा गोष्टी बोलल्या जात आहेत. मला वाटतं, त्याविषयी मतभेद असू शकतात, होऊ शकतात. आपल्या जीवनाचा एक मोठा भाग राजकारणानं व्यापला आहे. अशा परिस्थितीत हा मोठा भाग आपण पाहणारच नाही. त्यावर लिहिणारच नाही, असं म्हणणं टोकाचं ठरावं. चांगली लोकशाही पाहिजे असेल, तर चांगल्या लोकांबरोबर चांगल्या राजकारण्यांचीही गरज भासते. ते तयार करण्याचं काम, त्याला गती देण्याचं काम समाज आणि साहित्यिक या दोघांचंही आहे. एक प्रचंड मोठं विश्व साहित्यबाह्य करण्यानं साहित्याचीच हानी होईल. राजकारणावरील लेखनाचंही स्वागत केलं पाहिजे आणि साहित्यानंही राजकारणालाही जागा दिली पाहिजे. आपल्याला लाभलेली लोकशाही तपासत राहिलं पाहिजे. ती धनदांडग्यांच्या हातात का जाते आहे? ती विशिष्ट घराण्यांच्याच हातात का जाते आहे? ती मनगटशाहीच्या प्राभावाखाली का जात आहे? खरंच आज जिला आपण लोकशाही म्हणतो, ती लोकशाहीच आहे, की तिची भ्रष्ट प्रातिमा आहे, हे तपासण्यामध्ये साहित्यिकही आघाडीवर असावा लागतो. नव्या समाजाचं, नव्या माणसाचं स्वप्न तोच पेरत असतो. साहित्यिक आणि राजकारणी यांच्या नातेसंबंधावर आतापर्यंत खूप चर्चा झाली आहे. राजकारण्यांच्या प्राभावाखाली राहून लेखन करा असं कोणी म्हणत नाही आणि ते कोणी ऐकणारही नाही आणि ऐकण्याचं काही कारणही नाही. आपापल्या बिंदूवर राहून या दोन्ही घटकांनी परस्परांकडं जरूर पाहायला हवं. एकानं दुस-याला बहिष्कृत करण्याचं काही कारण नाही. आपल्याकडे मगाशी म्हटल्याप्रामाणं राजकारणाविषयी सकस आणि मुबलक लेखन साहित्यात येत नाही. कविता होतात अधूनमधून; पण कथा-कादंबऱ्यांमध्ये त्याला नावालाच जागा मिळत असते. तसं प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात राजकारण असतंच असतं. लोकशाहीत प्रत्येकाला मत असतंच असतं. ते मत म्हणजे एखादी गोष्ट ठरवण्याचा अधिकार आहे, तसं आपापल्या ठायी असणाऱ्या राजकारणाचं ते प्रतिनिधित्वही आहे. साहित्यात हा विषय नको, अमकाच पाहिजे, अमक्यामुळं अमुक घडतं असा वाद बरोबर नाही, असं माझं मत आहे. निरर्थक वाद किती ताणवायचा आणि तो कुठं थांबवायचा, हेही ठरवता आलं पाहिजे. तो कुठं थांबवायचा, हेही ठरवता आलं पाहिजे.

समाजात सुरू असलेल्या आर्थिक बदलामुळे नवे वर्ग किंवा समाजघटक तयार होत आहेत. विस्थापित, धरणग्रस्त, स्थलांतरित, प्रकल्पग्रस्त, सेझग्रस्त वगैरे वगैरे; अशी अनेक नावं सांगता येतील. विस्थापित झाल्यानंतर सामाजिक दर्जांपासून त्याचे अनेक प्राश्न निर्माण होत आहेत. गावात जगता येत नाही म्हणून कायमचं स्थलांतर करणारे, अर्धस्थलांतर करणारे, वेगवेगळ्या कामांसाठी हंगामी स्थलांतर करणारे असे अनेकजण यांच्यात आहेत. सेझविरुद्ध लढणारे आहेत, प्रकल्पानं आपलं गाव गिळू नये म्हणून लढणारे आहेत. स्थलांतर करणा-याचा प्रश्न जगभरातील साहित्यात दिसू लागला आहे. तो आपल्याही साहित्यात दिसायला हवा. हा जो नवा उपेक्षित वर्ग आहे, त्याच्या वेदनांना आपण शब्द द्यायला हवेत. गर्भातच मुलींची होत असलेली कत्तल, नव्या व्यवस्थेनं महिलांचं वस्तूत केलेलं रूपांतर, मोठ्या प्रामाणात जन्मास येत असलेल्या परित्यक्ता असे कितीतरी विषय साहित्यिकांना खुणावत आहेत. भांडवलशाही व्यक्तीला प्रचंड स्वातंत्र्य देत असतं; पण त्याचं प्रायोजन व्यक्तीपासून व्यक्तीला अलग करण्यासाठी, माणसाचीच वस्तू करण्यासाठी असतं. महिला आज नेमकं कोणतं स्वातंत्र्य मिळवत आहेत आणि ती काय गमावते आहे, तिच्या आत्मसन्मानाचं काय होतं आहे, हाही आजच्या आणि उद्याच्या कवितेचा विषय आहे.

केवळ आपल्यालाच नव्हे, तर जगाला भेडसावणारा दहशतवाद आणि मूलतत्त्ववाद हे विषय तर अतिशय गंभीर बनत आहेत. आपल्या साहित्यात मोठ्या प्रामाणात ते प्रातिबिंबित होताना दिसत नाहीत. गुजरातमधील हत्याकांड असो, मुंबईवरील हल्ला असो, मालेगावमधील स्पोट असोत, पुण्यावरील हल्ला असो; आपल्या साहित्यिकांनी नेमकी कोणती भूमिका घेतली आणि किती भूमिका घेतली हे आपणच आपल्याला विचारायला हवं. या सर्व परिस्थितीत आपला लेखक भूमिका घेणारच नाही का? मला वाटतं, भूमिका घ्यायला हवी. मूलतत्त्ववादाला विरोध करण्यासाठी आपली लेखणी सरसावून पुढं आली पाहिजे.

आता थोडं मराठीविषयीही बोलू या. मराठी भाषेचं काय होणार? जागतिकीकरणाचा परिणाम तिच्या अस्तित्वावर कसा होणार असे प्राश्न आहेत. संमेलनात आणि संमेलनाबाहेरही आपण त्याचा विचार करतो. शासनालाही साकडं घालतो. मुळात भाषा समाजच जन्माला घालतो. समाजच ती जगवतो आणि समाजच ती विकसित किंवा अविकसित बनवतो. भाषेच्या संवर्धनात शासनाची भूमिका तर असतेच; पण त्याहून समाजाची भूमिका खूप मोठी असते.सरकार या भूमिकेला तांत्रिक मदत करत असतं. समाज म्हणून आज आपण मराठीकडं कसं पाहतो, हा विचार अतिशय महत्त्वाचा आहे. एखादी भाषा, व्यवहाराची, ज्ञानाची झाली, परिवर्तनाची झाली, की ती सर्व प्रकारचे धोके पचवू लागते. काळाबरोबर ती चालू लागते.व्यवहारात ती मराठी भाषेचा परीघ कसा वाढवता येईल, ज्ञानाचा कोष म्हणून तिच्याकडं कसं पाहता येईल हा विषय सर्वात अधिक महत्त्वाचा आहे. रस्त्यावर चालणारा व्यवहार, रस्त्यावर होत असलेले ज्ञान-विज्ञानाचे स्फोट यांच्याशी आपण आपल्या भाषेचं नातं जोडायला हवं. आपल्या हातात येणाऱ्या मोबाइलचा एक हँडसेट दीडदोन हजार इंग्रजी शब्द आपल्याकडून पाठ करून घेतो. या नव्या शब्दांच्या संस्कृतीत आपल्याला घेऊनही जातो. स्वाभाविकच मातृभाषेचा संकोच व्हायला लागला, असं आपल्याला वाटायला लागतं. खरं तर, लोकजीवनात आणि व्यवहारात रूढ होणारे सारे इंग्रजी शब्दही मराठीनं आत्मसात करायला हवेत. अन्य भाषा तसा प्रायत्न करत आहेत. इंग्रजीनं तर तो कधीच सुरू केला आहे. लोकजीवनात मराठीचा जो वापर होतो आहे, त्याकडं आपण सोवळं नेसून न पाहता तेथील शब्दही मराठीनं आत्मसात करून स्वत:ला समृद्ध केलं पाहिजे. तसं घडायचं असलं, तर प्रामाण-अप्रामाणच्या चौकटी सैल केल्या पाहिजेत. आदिवासी भागातील काही मुली एकत्रित करून आम्ही त्यांना नाशिकमध्ये आणलं होतं. या मुलींनी कधीच आधुनिक उपकरणं पाहिली नव्हती. पंखा सुरू असलेल्या एका हॉलमध्ये त्यांना आणलं. डोक्यावर गरगर फिरणारा पंखा त्या पाहू लागल्या; पण या उपकरणाला काय म्हणावं, त्यांना कळत नव्हतं. पंखा हा शब्द त्यांना माहीत नव्हता. शेवटी एका मुलीनं लागलीच एक शब्द जन्माला घातला. ‘ वर काय आहे? ‘ असं विचारता ती म्हणाली, ‘ भिरभिऱ्या! ‘ जो भिरभिर करतो, तो भिरभिऱ्या. एक नवा शब्द जन्माला आला होता. आता प्रश्न निर्माण होईल, की तो प्रामाण मानायचा, की अप्रमाण? माझ्या गावात माझ्याच गल्लीतल्या एका पोराचं नाव ‘ दुष्काळ्या ‘ असं ठेवण्यात आलं होतं. तीव्र दुष्काळात तो जन्माला आला होता. प्रमाणवाल्यांनी नाम म्हणून स्वीकारायला अमान्य केलं. पोराची टिंगलटवाळी होऊ लागली. असंच एका पोराचं नाव अतिसुंदर होतं. त्याचीही टिंगल झाली. पुढं त्यानंही आपलं नाव बदलून घेतलं; प्रमाण नाव ठेवलं. गुन्हेगारी जगामध्ये तर अनेक पोरांची नावं बंदुक्या, पोलिस्या, रिमांड वगैरे आहेत. आपापल्या पर्यावरणातून ही माणसं नवे शब्द जन्माला घालत असतात. भाषासमृद्धीसाठी अशा सर्व शब्दांचं स्वागत करायला हवं. लोकजीवनातील, बोलीभाषेतील अनेक शब्द आपण प्रामाणभाषेच्या वेशीवरच ताटकळत ठेवले आहेत. त्यांना आत घ्यायला हवं. इंग्रजी शब्द स्वीकारताना ते व्याकरणासह घेतो आहे का, हा विचारही महत्त्वाचा आहे. बस, टेबल, डॉक्टर, कलेक्टर, फॅन, पोन आदी अनेक शब्दांची अनेकवचनं इंग्रजी पद्धतीनं मराठीत करू लागलो, तर मात्र अडचण होईल. तात्पर्य, मराठी समृद्ध करण्यासाठी लोकजीवनाची, बोलीभाषेची, ग्रामी.ण भागाची दारं उघडायला हवीत. ‘ उपाशीपोटी पाणी प्यायल्यावर ते आतड्याला चावतं ‘ असं कुष्ठरोग झालेली एक बाई, मला तिच्या घरात पाणी देताना म्हणाली होती. पाणी आतड्याला चावणं हे मोठं विलक्षण वर्णन आहे. दारिद्र्याला कंटाळून शेतीच करणारी एक बाई शेतीची आणि त्यात रुतलेल्या माणसाची दुर्दशा सांगताना म्हणाली, की ‘ मडं पेरलं की पीक उगवतं! ‘ खूप काबाडकष्ट करायला लागतं, अक्षरश: मरायला लागतं, तेव्हा कुठंतरी पीक उगवतं, हेच तिला सांगायचं होतं. त्यासाठी काळीज पिळवटून टाकणारं विशेषण तिनं वापरलं आहे. आता हे सारे शब्द माझ्या मराठीत उगवतील का, हे मी पाहतो आहे. साहित्यात येऊ घातलेले जे विविध समूह आहेत, तेही आपली भाषा घेऊन येतील. मराठी समृद्ध करतील. म्हणून त्यांना लवकर बोलवा; त्यांचं स्वागतही लवकर करा.

मराठी भाषा संवर्धनात शासनाचीही जबाबदारी आहे. त्यानं त्याचा सारा कारभार मराठीतूनच केला पाहिजे, याविषयी आता कुणाला शंका राहिलेली नाही. सरकारनं जाणीवपूर्वक मराठी शाळा वाढवल्या पाहिजेत. शिक्षणाच्या हक्काची कशीतरी अंमलबजावणी केली एवढाच हेतू त्यामागं असता कामा नये. मुळात सरकारी मराठी शाळा बंद का पडताहेत, त्यामागची सारी कारणं शोधून ती संपवली पाहिजेत. दुसरं म्हणजे स्वत:च्या खर्चातून नव्या शाळा उघडल्या पाहिजेत. शिक्षणातील आनंद वाढवणा-या आणि नव्या ज्ञानाला भिडणा-या त्या असल्या पाहिजेत. विनाअनुदान तत्त्वावर चालणारी शाळारूपी जी अनेक दुकानं आहेत, त्यांची अवस्था कधीतरी गांभीर्यानं पाहिली पाहिजे. मुलं सरकारी शाळेत अन्न, वस्त्र मिळूनही जायला का कुरकुरतात, याचीही कारणं शोधून ती संपवली पाहिजेत. मातृभाषेविषयी प्रोम निर्माण होईल, अशा प्राकारचं अध्ययन करणाऱ्या शाळा असायला हव्यात. त्याविषयीचं नवं धोरणही ठरवायला हवं. इंग्रजीचा किंवा अन्य कोणत्याही भाषेचा द्वेष करून हे सारं करता येणार नाही. इंग्रजीचं अस्तित्व आणि विस्तार समजून घ्यायलाच हवा. उपयुक्तता समजून घ्यायला हवी. आपली मातृभाषा केवळ घरात न अडकता रस्त्यावरूनही डौलात प्रावास कसा करेल, याचा विचार करायला हवा. त्यासाठी शाळा-महाविद्यालयांत पुस्तकांच्या नेमणुकीपासून फेरविचार करायला हवा. मराठी माध्यमातील मुलांसाठी आणि इंग्रजी माध्यमातील मुलांसाठी कोणती मराठी द्यायला हवी, याचाही विचार करायला हवा. सहज, सुलभ आणि भाषाप्रोम वाढवणारी अशी मराठी त्यांच्यासाठी असायला हवी. सध्या आपण कोणती मराठी देतो, याचा ज्यानं त्यानं विचार करायला हवा. मराठीचा विषय म्हणजे शाळा-महाविद्यालयांत अध्ययन करणाऱ्यांचा विषय होऊ नये, तर तो आपल्या सर्वांचा विषय बनायला पाहिजे.

आपल्या दैनंदिन जीवनात मराठी वाढवण्याच्या आणि ती टिकवून ठेवण्याच्या अनेक जागा आहेत. यापूर्वी अनेक अध्यक्षांनी त्यांचा उच्चारही केलेला आहे. दोन मराठी माणसांनी परस्परांत मराठीच बोलायला हवं. आपली सही मराठीत का करू नये? आपल्या सभा-समारंभाच्या निमंत्रणपत्रिका मराठीत का काढू नयेत? ग्रंथखरेदीवरचा खर्च का वाढवू नये? मराठी चित्रपट का पाहू नये? जागतिकीकरणात मातृभाषेकडे गेलो, की अप्रातिष्ठा होते अशा पालतू मानसिकतेतून बाहेर पडायला हवं.

मराठी वाचणारा वर्ग कमी होतो आहे, हे वास्तव नाकारता येत नाही. अजूनही महाराष्ट्रात दरवर्षी दरडोई पक्त आठ-बारा रुपयांचीच ग्रंथखरेदी होते. विशेष म्हणजे एकीकडे लिहिणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असताना, वाचणारा वर्ग मात्र कमी होत आहे. शहरातलं हे चित्रच अधिक चिंताजनक आहे. अनुवादित पुस्तकं जास्त खपताहेत. हजारो पुस्तकं बाळगणा-या शेकडो ग्रंथालयांचा सदस्यवर्ग कमी होतो आहे. या ग्रंथालयांना नवे सदस्य मिळत नाहीत आणि दुसरीकडे आहे ते सदस्य टिकवून ठेवणं अवघड होतं आहे. ग्रंथालयसेवकांचे प्रश्नही गंभीर होत आहेत. महाविद्यालयातील बहुतेक वाङ्मय मंडळं मोडकळीस आलेली आहेत. उद्याचा साहित्यिक, उद्याचा वाचक घडवण्यासाठी प्रायत्न होत नाहीत. जे होतात, ते पुरेसे नाहीत. मराठीतून होणाऱ्या वादविवाद किंवा वक्तृत्व स्पर्धांनाही विद्यार्थी मिळेनासे झाले आहेत. वार्षिकात लिहिण्यासाठी नवे विद्यार्थीलेखक मिळेनासे झाले आहेत. मराठी विभागाच्या कार्यक्रमाला अन्य विभागांतील मराठी विद्यार्थी येत नाहीत. आणखी किती कहाण्या सांगाव्यात? मराठी विषयात पदवी घेतली, की आयुष्य वाया गेलं असं का वाटतं आहे, याचा विचार व्यवस्थेनं करायला हवा. विचार करत करत मुळाशी जायला हवं. तेथे तयार होणारी कारणं शोधायला हवीत. नुसतेच छाती बडवून, आक्रोश करून सुटण्यासारखा हा सोपा प्राश्न नाही.

भाषा संकटात आहे, याविषयी कुणाचंही दुमत नाही. प्रश्न आहे तो, ती संकटमुक्त कशी करण्याचा आणि भाषेला जीवनधारेप्रामाणं स्थान देण्याचा. केवळ बौद्धिक चर्चा करून हा प्राश्न सुटणार नाही. सारा समाज आपल्या भाषेबाबत जागृत झाला पाहिजे. त्यासाठीचे कार्यक्रम आपल्याकडे असायला हवेत. जे प्रायत्न सुरू आहेत, त्याला समाज म्हणून पाठिंबा देण्याची आवश्यकता आहे. आपली मराठी भाषा संचारासाठी नवं तंत्रज्ञान वापरते आहे, ही सर्वात चांगली गोष्ट आहे. आपल्या कविता, आपल्या कथा कागदाबरोबरच संगणकाच्या पडद्यावर दिसत आहेत. आपले कवीही अशा पडद्यावर परस्परांना भेटत आहेत, गतीनं भेटत आहेत, ही चांगली आणि स्वागतार्ह गोष्ट आहे.

आता थोडं आणि गांभीर्यानं महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्राश्नाविषयी. हा प्रश्न लवकरात लवकर सुटला पाहिजे आणि लाखो मराठी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, अशी माझी आग्रही मागणी आहे. गेली साठ वर्षं अशी मागणी या संमेलनाच्या व्यासपीठावरून होते आहे. बुलंद आवाजात ठरावही होत आहेत. प्रात्यक्षात हा प्राश्न सुटलेला नाही. या प्राश्नाच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्रातील एकेकाळची बलदंड लोकेच्छा आणि राजकीय इच्छा आज कमी होताना आपण सर्वच जण पाहत आहोत, ही दुर्दैवी गोष्ट आहे. एखादा प्राश्न दीर्घकाळ भिजत पडला, की उदासीनता यायला लागते, तसं होऊ नये म्हणून लोकमताचा आणि लोकरेट्याचा जागर सातत्यानं सुरू ठेवला पाहिजे. राजकीय शक्तींवर आणि शासनव्यवस्थेवर लोकमताचा दबाव आणला पाहिजे. मला वाटतं, की या प्राश्नावर महाकादंबऱ्या, महानाट्यं आणि सिनेमे जन्माला यायला पाहिजेत. मराठी बांधवांच्या संघर्षाचे पोवाडेही व्हायला पाहिजेत.मी स्वत: ह्या प्राश्नाची होरपळ सहन केलेली आणि पाहिलेलीहीह्म आहे. हा प्राश्न न्यायालयात आहे, हे उत्तर आपण किती काळ देणार आहोत? न्यायालय म्हणजे प्राश्न लोंबकळत ठेवणारी खुंटी होऊ नये यासाठीही पुढाकार घेतला पाहिजे. न्यायालयाबाहेरच्या प्रायत्नांना चालना दिली पाहिजे. भाषकसंवेदना जागी ठेवली पाहिजे. एकीकडे प्राश्न लोंबकळत पडतो आहे आणि दुसरीकडे सीमाभागातील मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीचा संकोच होतो आहे. तेथील मराठी शाळा बंद पडत आहेत. कशातरी तग धरून राहिलेल्या शाळांची अवस्था वाईट होत आहे. मराठी शिकणारे विद्यार्थी कमी होत आहेत आणि जे मराठीला चिकटून आहेत, त्यांना आपलं भवितव्य काय, असा प्रश्न पडला आहे. संस्कृतीच्या अंगानंही असंच घडतं आहे. मराठी चित्रपट, नाट्य-कला या साऱ्यांची तेथे घुसमट होत आहे. ती थांबवण्यासाठी खूप काही करता येण्यासारखं आहे. समाज आणि शासन दोहोंनी करण्यासारखं आहे. एक म्हणजे, सीमाभागातील मराठी संस्कृतीला चालना देण्यासाठी तेथे चित्रपट, नाटक सातत्यानं होईल, याची काळजी घेतली पाहिजे. मराठी शाळांची दुरवस्था होणार नाही, त्या बंद पडणार नाहीत याची काळजी घेण्याचं महाराष्ट्र सरकारनं कर्नाटक सरकारला वारंवार सांगायला हवं. मराठी ग्रंथ तातडीनं सीमाभागात उपलब्ध होतील, प्रासंगी सवलतीत उपलब्ध होतील, यासाठी प्रायत्न करायला हवेत. अशीच काळजी एकूण बृहन्महाराष्ट्रात घ्यायला हवी. एक तर, तेथील मराठी बांधवांनी जाणीवपूर्वक मराठी भाषेचं, संस्कृतीचं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जतन आणि संवर्धन केलं आहे. पुढंही त्यांचे प्रायत्न चालूच राहणार आहेत. त्यांच्या प्रयत्नांना महाराष्ट्र शासन आणि मराठी समाजानं प्रतिसाद द्यायला हवा. हा प्रातिसाद आथिर्क स्वरूपात आणि अन्य स्वरूपातही असू शकतो. पुढं मागं आपल्या मंत्रालयात भाषासंवर्धन आणि प्रासाराचंच पूर्णवेळ काम करणारं स्वतंत्र खातंही सुरू करायला हवं. अन्य अनेक राज्यांनी या गोष्टीस खूप प्राधान्य दिलं आहे. मला वाटतं, आपण याबाबतीतही थोडं मागंच आहोत. मराठी माणसांनी सांस्कृतिक कार्यक्रम तयार करून बृहन्महाराष्ट्रात सातत्यानं पाठवावेत. त्यांच्याबरोबर ग्रंथही असावेत. लोकसाहित्य, लोकनाट्य, ललित कार्यक्रम, चर्चा, परिसंवाद, काव्यवाचन, कथाकथन यांसारखे उपक्रम बाराही महिने बृहन्महाराष्ट्रात चालतील अशी व्यवस्था करायला हवी. शासनानं त्यासाठी आथिर्क पाठबळ उपलब्ध करून द्यायला हवं. महाराष्ट्रात भाषा, संस्कृती यासाठी काम करणाऱ्या शासकीय समित्यांमध्ये एक तरी प्रातिनिधी महाराष्ट्राबाहेरचा घ्यावा. तो साहित्य संस्कृती मंडळातही असावा. विश्वकोषातही असावा. पाठ्यपुस्तकनिर्मिती मंडळातही असावा. बृहन्महाराष्ट्रातील माणूस अतिशय निष्ठेनं मराठी भाषा टिकवण्याचा प्रायत्न करतोय. आता गरज आहे, ती महाराष्ट्रानं त्याला विधायक साथ देण्याची.

मी सर्वांनाच आवाहन करतोय, महाराष्ट्राबाहेरील मराठी बांधवांच्या प्रायत्नांना पाठिंबा देण्यासाठी. एखादा ठोस कार्यक्रम तयार होईल, यासाठी आजपासूनच प्रायत्न करावेत. शासन, समाज, साहित्य महामंडळ यापैकी कोणीही त्यासाठी पुढाकार घेऊ शकतं. महाराष्ट्र महोत्सवापासून ते लोककला, ग्रंथ, संस्कृती महोत्सवापर्यंत अनेक कार्यक्रम महाराष्ट्राबाहेरच्या बांधवांसाठी आयोजित करता येतील. मराठी भाषा महाराष्ट्रात टिकवण्याची आणि वाढवण्याची जशी गरज आहे, तशी ती महाराष्ट्राबाहेरही आहे. परिस्थिती कशीही असली, तरी भारतात सर्व प्रादेशिक भाषांमध्ये सर्वाधिक बोलली जाणारी एक प्रामुख भाषा मराठीसुद्धा आहे. हे सुखद वास्तव आहे. प्राश्न आहे तो, ते टिकवून ठेवण्याचा. वाढवत नेण्याचा. तिच्यासमोर येणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्याचा… मला वाटतं, मी खूपच बोलत राहिलो. आपल्या भोवताली असलेल्या धगधगत्या आणि कोलमडणा-या सर्वच प्रकारच्या पर्यावरणाविषयी बोलत राहिलो. खूप खूप अपेक्षा व्यक्त करत आपल्याशी संवाद साधत राहिलो…मी नव्या युगाचा, नव्या जगाचा आणि जग बदलण्यासाठी प्रायत्न करणाऱ्यांचा एक प्रातिनिधी आहे. जग बदलावं, इथली व्यवस्था बदलावी याविषयी सर्वांत जास्त घाई मलाही आहे. बोलत राहू या. काही करत राहू या. सर्व प्राकारचे भेदाभेद ओलांडून जाण्यासाठी साहित्याची मदत घेऊ या. तसं साहित्य तयार करू या. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद.

सौजन्य – लोकसत्ता

कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. शरद पाटील हे अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व असून त्यांनी इतिहासाकडे अत्यंत वेगळ्या व चिकित्सक दृष्टीने पाहून अत्यंत विचारप्रवर्तक अशी पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेल्या ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की – गायनॉक्रसी अँड मॉडर्न सोश्ॉलिझम, खंड – ४’ या पुस्तकाचे गेल्या महिन्यात प्रकाशन झाले. हे पुस्तक मौजाई प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. कॉ. शरद पाटील यांच्या या तसेच अन्य ग्रंथांतील संदर्भ देत मधु शेटय़े यांनी प्राचीन भारत, तेथील परंपरा, समाजरचना व मार्क्‍सवादी विचारधारा यासंबंधी विवेचन केले आहे. त्यातील मातृसत्ताक पध्दतीबद्दलची मांडणी थोडक्यात येथे देत आहोत.

भारताचा समाजवादी लोकशाहीचा स्वतंत्र मार्ग असू शकतो का? सोव्हिएत युनियनचे पतन, चीन आणि इतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी भांडवलदारी मार्ग स्वीकारल्यामुळे या समस्येवर जगभरच्या कम्युनिस्टांमध्ये विपुल चर्चा झाली आहे आणि होत आहे.

जागतिक साम्राज्यवादी भांडवलशाहीच्या अरिष्टाची चर्चाही होत आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे भांडवलशाही व साम्राज्यवादी पर्याय कुंठित झाले आहेत. भारतातील दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे राजकारण कोंडीत सापडून पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यांतून त्यांची सत्ताही संकटात सापडली आहे. अशा अरिष्टग्रस्त परिस्थितीत भारतातील समाजवादी लोकशाही क्रांतीचा मार्ग काय असावा यांवर ठाम मार्गदर्शक दार्शनिक ऐतिहासिक कामगिरी सत्यशोधक मार्क्‍सवादी कॉ. शरद पाटील यांनी आपल्या ‘दास क्षुद्रांची कामगिरी’पासून ते ‘आदिम साम्यवाद, मातृशासन, स्त्री सत्ता आणि आधुनिक समाजवाद’ याच्या चार खंडांतून तसेच अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, सामंती सेवकत्वाचा प्राचीन इतिहास विकसित करून जे सर्जनशील प्रतिभावंत कार्य केलेले आहे ते भारताच्या आधुनिक समाजवादी पर्यायांमध्ये अभूतपूर्व म्हटले पाहिजे. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी या स्वयंप्रज्ञ नेत्याला त्यांच्या स्वतंत्र संशोधनाला मदत तर राहोच पण बहिष्कृत करावे यात प्रस्थापित कम्युनिस्टांचा अध:पातच उघड आहे. नवा माणूस विकसित कसा करावा अशी समस्या आजवर डाव्या आंदोलनातील विचारवंतांच्या विवंचनेचा विषय होता. पण त्यासाठी प्राचीन भारतातील समाजव्यवस्थेच्या मुलगामी संशोधनाचीच ऐतिहासिक नितांत गरज होती. ती भरून काढण्याचा निर्धार करुन कॉ. शरद पाटीलांनी जे संशोधन मांडले आहे त्यासाठी त्यांना दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या बाहेर पडून आदिवासी, ग्रामीण विभागात मार्क्‍सवादी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करावी लागली. त्याचप्रमाणे प्राच्य विद्येची संस्कृत, मागधी, पाली इत्यादी भाषांतून दोन तपाहून खास अभ्यासपूर्वक संशोधन करून त्यांनी ही मांडणी केली आहे.

कार्ल मार्क्‍स ने ‘भांडवल’च्या पहिल्या खंडात क्रयवस्तूंचे विश्लेषण मांडले आहे. मार्क्‍सच्या सहकाऱ्यांनी  ते सोपे करून मांडण्याची सूचना केली. त्यावर मार्क्‍स म्हणतो की, शास्त्राला सोपे करणारा राजमार्ग नाही. कॉ. शरद पाटील म्हणतात की, अकोला जेलमध्ये कॉ. बी. टी. रणदिवे यांना त्या प्रकरणावर माझे टिपण दिले होते (१९६२-६३). पण कॉ. रणदिव्यांकडून त्यावर स्पष्टीकरण आलेच नाही. शरद पाटील हे मार्क्‍सवादी पक्षातून राजीनामा देऊन बाहेर पडले व मार्क्‍सवादी पक्षाकडून बहिष्कृत झाले. १९७८ साली त्यांनी ‘सत्यशोधक मार्क्‍सवादी पक्ष’ आदिवासी भागात स्थापन केला.

मार्क्‍सने ‘भांडवल’ ग्रंथात भांडवलशाही जगातील अंतर्विरोध दाखविले आणि ते इतक्या विकोपाला जातील की भांडवलशाही कोसळेल असे भाकित मांडले. शरद पाटील हे कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील मुख्य कचेरीत स्टाफ आर्टिस्ट होते. त्याच सुमाराला राहुल सांकृत्यायन मुंबईत हिंदी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करीत असताना (१९४६-४७) राहुलजींनी भारतीय मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात येण्याची विनंती आपल्या भाषणात केली. पण दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रांमध्ये आम्ही वाचले की राहुल सांस्कृत्यायन यांची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोव्हिएत युनियनमध्ये शेतीच्या सामुदायिकीकरणातून संकट निर्माण झाले होते आणि अन्नधान्याची आयात करावी लागली. विज्ञानात जेनेटिक्सची संभावना भांडवलदारी विचार करण्यात आली. आयकॅन पावलोव्ह (१८४९-१९३६) याला सिग्मंड फ्रॉईडपेक्षा श्रेष्ठ ठरविण्यात आले. ब्रिटिश मार्क्‍सवादी साहित्यिक व समीक्षक ख्रिस्तोफर कॉडवेल याने फ्रॉईडच्या नेणीवेच्या सिद्धांताचा पुरस्कार केला असताना कॉडवेललाही नाकारण्यात आले कारण त्यामुळे मार्क्‍सवादी व कम्युनिस्टांच्या मार्क्‍सच्या एकप्रवाही ज्ञानशास्त्राला आव्हान मिळत होत. अशा पध्दतींमुळेच  सोव्हिएत युनियन तत्वज्ञानात ठोकळेबाज राहिले आणि मार्क्‍सवादी आणि कम्युनिस्ट हे आजही तीच री ओढत आहेत. अखेरीस पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी संकटग्रस्त डाव्या आघाडीच्या कटू अनुभवातून गेल्यावर (५ जानेवारी २००८ रोजी) वैफल्याने समाजवाद अव्यावहारिक आहे आणि बुद्धदेव भट्टाचार्याना पाठिंबा देताना भांडवलशाहीचे समर्थन करण्यापर्यंत मजल मारली.

प्राथमिक साम्यवाद, मातृशासन आणि स्त्रीसत्ता हे प्रकरण तर समाजशास्त्रज्ञांसाठी (भारतातील) मोठेच कोडे आहे. शरद पाटील यांनी पाश्चिमात्य बिफ्रॉ, मॉर्गन यांचे संशोधन भारताला कोठे लागू पडते त्याची उदाहरणे तर दिलीच आहेत पण भारतीय संदर्भात आद्य व्याकरणकार संकटायनापासून पाणिनीपर्यंत भाषातील धातूशास्त्रापासून मातृशासन आणि स्त्रीसत्ता ही साऱ्या जगातील सर्वात प्राचीन व्यवस्था भारतातच नव्हे तर जगातील भौगोलिक खंडातून किती प्रभावी होती व तीतूनच स्वातंत्र्य, समता आणि मित्रत्व ही तत्कालिन समाज व्यवस्थेची तत्व यांचे विश्लेषण नव्याने मांडले आहे. उदाहरणार्थ, गण समाज हा स्त्रीसत्तेचाच होता. नंतर ‘कुल’ आणि ‘ज्ञाती’ यांची समिती पुरुषांनी स्थापन केली. भारताप्रमाणेच चीनमध्येही तशीच व्यवस्था मातृशासित ‘मोसुओइस्ट’ होती. महायान बुद्धिझम (इ.स.वि. १०० शतकापुढे) भारतीय बुद्धिझम शिकण्यासाठी तिबेटच्या लामांनी नालंदामध्ये महाविहारातून त्याची मांडणी केली होती. बुद्धिस्ट यात्रेकरू आंध्रमधील श्रीशैल या धर्मस्थानातून यात्रा करीत कारण ते स्त्रीराज्य होते. स्त्रीसत्तात्मक तांत्रिझमचे त्या काळात प्रभावी स्थान होते. त्यांनी चीनला गेल्यावर चीनमधील दिग्नाग विचारपीठाची स्थापना केली आणि नेणीवेच्या संकल्पनेचा बोध आणि शोध सुरू केला.

चीनमधील ‘मोसुओइस्ट’ यांना ते मातृशासित असल्यामुळे सर्वोच्च स्थान आहे. त्यांची लोकसंख्या ३० हजार असून ते युनान आणि सिचुआन या प्रांतांच्या सीमेवर राहातात. त्यांची स्वतंत्र भाषा असून तिची लिपी नाही. उत्तर आफ्रिकेत काबाईल  प्रदेशात मातृसत्ताक वस्ती आहे. इटलीमध्ये एट्रस्कॉन वस्तीतही मातृसत्ताक धर्तीवरची लैंगिक समता आहे. पॅसिफिक महासागरातील वनाटीनाईज वस्तीमध्ये मातृसत्ताक पद्घती आहे. केरळमध्ये मल्याळी लोकांत मातृसत्ताक शासन मौर्यकालापर्यंत होते हे शरद पाटलांच्या पूर्वीच्या दासशूद्रांच्या गुलामगिरीच्या खंडात विस्तृतरित्या दिले आहे. इंडोनेशियामध्ये पश्चिम सुमात्रा प्रदेशात आजही ‘मिनांगनॉस’ या प्रदेशात मातृसत्ताक समाज आहे. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिमेकडील प्रदेशात प्युब्लोज, होपीज आणि झुनीस या प्रदेशातील भागात मुलांना जन्म देणारी म्हणून स्त्रीदेहाला धार्मिक पावित्र्य मिळते. मनुष्यजन्म आणि शेती उत्पादन ही आदिम समाजात सर्वश्रेष्ठ माया (जादू) समजली जाते. या प्रदेशात स्कसंबंधांमुळे माता स्त्री कुळांना गणांचे स्वरूप देते. गण हे तांत्रिकी श्रुतीचे अपत्य आहे, वैदिकी नव्हे. युरोपात सोआमी जमातीत आजीची सत्ता असते. उत्तर आफ्रिकेत त्वारेगल (पश्चिम सहारा) ही मातृशासित जमात आहे आणि स्त्रियांपुरतीच शिक्षणाची तरतूद मर्यादित आहे. पश्चिम आफ्रिकेत गिनी बिसॉ येथे महिलाच कुटुंबप्रमुख आहे. या प्रदेशातील हौसा भागात १७ राज्यांच्या घराण्यांची सत्ता होती. तसेच टोगोमध्ये व्यापार महिलांच्या हाती आहे. अरबांमध्ये दक्षिण अरबस्तानातील कृषी प्रदेशात अभिजात स्त्रीसत्ता नांदत होती. महंमदी धर्मापूर्वी तेथील स्त्रियांना नवरा निवडण्याचे स्वातंत्र्य होते तर येमेन हे स्त्रीसत्ताकच होते. उत्तर अमेरिकेत विवाहित स्त्रियांना मालमत्ता मालकीचा अधिकार होता. आणि वारसाहक्क स्त्रियांमार्फत प्रस्थापित होई. कॅनडामध्ये मोन्टमनेन-नस्कापी  येथे स्त्रियांना समाजात श्रेष्ठ मान होता. उत्तर अमेरिकेत मातृशासित समाजात स्त्रिया आपले प्रतिनिधी पंचायतीत निवडून देत. स्त्रिया कुळप्रमुख समजल्या जात. स्त्रियांच्या कौन्सिलमधील प्रतिनिधींतून युद्धप्रमुख स्त्रीला प्रिय महिला अशी उपाधी होती. प्वेब्लोमध्ये स्त्रियांच्या संतती उत्पादकतेमुळे त्यांना सर्वश्रेष्ठ मानमरातब मिळत होता. झुनी प्रदेशात धर्मात प्रवेश करण्याचा अधिकार महिलांना होता. ते जमिनीला आई मानीत, तिच्यातील धान्याला बालके समजत आणि शिकारीच्या जनावरांना पितृस्थानी मानीत. स्त्रियांना जगातील मध्यवर्ती स्थान असे. नवडो प्रदेशातील संस्कृती मातृसत्ताक आहे. तेथे स्त्री सत्तेवर असून स्वतंत्र आहे.

संदीप वासलेकर, सौजन्य – लोकसत्ता

भारताने भविष्याला सामोरे जाण्यासाठी कोणती दिशा निवडायची? आपल्याला नक्की काय व कसे साध्य करायचे आहे? कोणता देश वा कोणती पद्धती आदर्श मानता येईल? हे व अशा प्रकारचे प्रश्न आजच नव्हे, तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून विचारले जात आहेत. आजही काहींना वाटते, की भारताने महासत्ता व्हावे. काहींच्या मते तर आपण २०२० साली महासत्ता होऊनसुद्धा! पण महासत्ता होऊन तरी काय करायचे? महासत्ता होण्यासाठी अक्राळविक्राळ लष्करी सामथ्र्य, अण्वस्त्रे- क्षेपणास्त्रे आणि आक्रमकता असावी लागते. मग भले कोटय़वधी लोक भुकेकंगाल, मागासलेले आणि उजाड झालेले का असेनात! काहींना वाटते आपण बलाढय़ ‘हिंदू राष्ट्र’ व्हायला हवे तर काहींना वाटते भारताने समाजवादाचे स्वप्न साकार करावे. अशा अनेक कल्पना.. संदीप वासलेकर, अशी कोणतीच दिशा सांगत नाहीत, कारण ते ‘एका दिशेच्या शोधात’ आहेत. याच नावाचे त्यांचे पुस्तक लवकरच ‘राजहंस प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. वासलेकरांचा अभ्यासाचा आणि जगप्रवासाचा, चिंतनाचा आणि संशोधनाचा विषयही तोच आहे, जवळजवळ सर्व जग एकदा नव्हे तर अनेकदा जवळून पाहिलेल्या वासलेकरांचा ध्यास आहे तो भारतच एक आदर्श देश व्हावा हा! पण तो ‘आदर्श’ व्हायचा तर जगातील अनेक देशातील आदर्श पद्धती, तसे चारित्र्य, तसा व्यवहार, तसा समाज निर्माण करावा लागेल. आज जगातील कोणताच देश सर्वार्थाने आदर्श नाही, पण अनेक देशांमधल्या काही बाबी अनुकरण कराव्या अशा आहेत. त्या एका शोधयात्रेतून वाचकांसमोर ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण ठरवायचे आहे, दिशा कोणती? वासलेकर ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’ (एसएफजी) या ‘थिंक टँक’चे संस्थापक आहेत आणि जगातील अनेक सरकारांचे सल्लागारही आहेत. त्यांच्या मते भारताकडे अनेक अंगभूत गुण व सुप्त सामथ्र्य आहे; साधनसामग्री व बौद्धिक उंची आहे आणि तरीही आपण गरीब आहोत, अविकसित आहोत, तसेच उपेक्षितही आहोत! गेल्या काही दशकात आपण अर्थकारण आणि हाय-टेक, लोकशाही आणि आधुनिकता यात बरेच काही साध्य करूनही मंजिल अब भी दूर है! तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेल्या ‘दिशेच्या शोधा’तील एका प्रकरणातील काही भाग..

अमेरिकेत वा अन्य देशांत स्थायिक होण्यासाठी फिरणारी, स्वत:च्या देशाबद्दल नाऊमेद व उदासीन असणारी, गरिबीने लाचार होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी, पैशाने श्रीमंत व सत्तेने महान असलेली पण अपरिपक्व अशी मंडळी ज्या समाजात आहेत, तोच समाज मागासलेला राहतो. आपणाला प्रगत व्हायचे आहे, की मागासलेले राहायचे आहे, हे त्या त्या समाजातील लोकांनी स्वत:च ठरविले पाहिजे. (कॅनडात माझा एक मित्र आहे. त्याचे नाव जीम बाल्सीली. सुप्रसिद्ध ‘ब्लॅकबेरी’ ही फोन व दळणवळण सेवा जीमने निर्माण केली. ती अल्प काळात लोकप्रिय झाल्यामुळे चाळीशीतले जीम बाल्सीली अब्जाधीश झाले आहेत. जीम यांनी अब्जाधीश होऊनही आपले छोटेसे वॉटर्लू गाव सोडलेले नाही. त्यांना न्यूयॉर्क अथवा टोरँटोमध्ये स्थलांतर करणे सहज जमले असते; पण त्यांनी वॉटर्लू या छोटय़ा गावी राहूनच आपला पसारा वाढविला, गावाची भरभराट केली. तिथल्या विद्यापीठांना खूप मोठी देणगी देऊन तरुण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांवर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन केली. त्याशिवाय ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांवर उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी एक नवीन केंद्र स्थापन केले. या दोन संस्थांमध्ये जगभरातील पंडितांना बोलाविले व छोटय़ा वॉटर्लू गावात राहून अभ्यास, लिखाण  संशोधन करण्यासाठी खूप मोठे पगार दिले.

जीमचे हे कार्य पाहून त्यांच्या भागीदाराने पदार्थविज्ञानावर मूलभूत संशोधन करणारी संस्था वॉटर्लू गावात स्थापन केली. तिथे जगातून अग्रगण्य शास्त्रज्ञांना बोलाविले. जीमला व त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मुलांचा विवाह शतकातील सर्वात मोठा सोहोळा करण्याची महत्त्वाकांक्षा नसून त्यांना आपले छोटेसे गाव जगातील एक प्रमुख संशोधन केंद्र बनावे, अशी इच्छा आहे आणि त्यासाठी ते पैसा खर्च करीत आहेत.

इस्राएलमध्ये स्टेफ वर्थहाइमर हे सर्वात प्रमुख उद्योगपती आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के उत्पन्न ते त्यांच्या उद्योगात निर्माण करतात. जगप्रसिद्ध वॉरेन बफे त्यांचे अलीकडे भागीदार झाले आहेत. स्टेफना राजधानी तेल अवीव किंवा युरोप-अमेरिकेत धंदा करता आला असता; परंतु त्यांनी इस्राएलच्या मागासलेल्या उत्तर भागात उद्योगनिर्मिती केली आहे. हा विभाग लेबेनॉनच्या सीमेवर आहे. युद्ध झाल्यास स्टेफच्या उद्योगांना धोका आहे; परंतु त्यांचे राष्ट्रप्रेम व मागासलेल्या भागातील युवकांना संधी देण्याची तळमळ एवढी मोठी आहे, की स्टेफना क्षेपणास्त्रांची पर्वा नाही. त्यांच्या कंपनीत रोबोट ऊर्फ यंत्रमानव बराचसा कारभार पाहतात. त्याशिवाय त्यांनी टेफेन औद्योगिक केंद्र निर्माण केले आहे. तिथे होतकरू तरुण उद्योजकांना जागा व सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. इतकेच काय  विरंगुळा मिळावा म्हणून आर्ट गॅलरी व संग्रहालयेदेखील केली आहेत.

याशिवाय त्या औद्योगिक केंद्रात स्टेफनी औद्योगिक शाळा उघडल्या आहेत. तेथे १४ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांना उद्योगनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. शिवाय संशोधन केंद्रात सुमारे १८०० इंजिनीअर काम करतात. मी ज्या वेळेस टेफेन औद्योगिक केंद्राला भेट दिली, तेव्हा स्टेफ स्वत: चार तास माझ्याबरोबर प्रत्येक विभागात आले होते; पण कोणत्याही कामगाराने काम सोडून त्यांच्याकडे पाहिले देखील नाही, की कोणत्याही शिपायाने मोठय़ा साहेबांना सलामही ठोकला नाही..

ऑस्ट्रेलियाचे उद्योगपती स्टीव्ह किलेलिया यांनी एक अतिशय यशस्वी सॉफ्टवेअर कंपनी उभारली आहे ते अब्जाधीश झाले. मग त्यांना समजलं, की एक अब्ज काय व दहा अब्ज काय, सर्व सारखेच. म्हणूनच स्वत: स्टीव्ह आपली बरीचशी संपत्ती आफ्रिकेत उपासमारीने बळी जाणाऱ्या गरीब लोकांना जीवदान मिळावे, यासाठी खर्च करतात. शेतीसुधार, पाणीपुरवठा, आरोग्य योजना या प्रकल्पांमध्ये ते मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यांनी काही कोटी डॉलर्स ‘जागतिक शांतता’ या विषयात संशोधन करण्यात खर्च केले आहेत. त्यांची मुले साध्या नोकऱ्या करतात आणि त्याही त्यांच्या कंपन्यांमध्ये नव्हे, तर शाळेत व इतर संस्थांमध्ये.

जॉर्ज सोरोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांनी आपली सारी संपत्ती जगात सर्वत्र व्यक्तीस्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी खर्च केली आहे. त्याशिवाय जागतिक शांततेचे काम करणाऱ्या ‘इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप’ या संस्थेची उभारणी करण्यासाठीही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर अर्थसाहाय्य केले आहे. या ग्रुपमध्ये १५० संशोधक काम करतात. जगातील ज्या भागात हिंसा असेल, त्या भागाचे ते अवलोकन करतात व दरवर्षी सुमारे शंभर अहवाल प्रसिद्ध करतात.

व्हर्जिन अटलांटिक या विमानसेवेचे संस्थापक व व्हर्जिन म्युझिक या उद्योग समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी ‘दि एल्डर्स’ म्हणजे ज्येष्ठ मंडळी अशी एक संस्था निर्माण केली आहे. त्याची स्फूर्ती त्यांना नेल्सन मंडेलांकडून मिळाली. या संस्थेत दक्षिण आफ्रिकेतील नोबेल पारितोषिक विजेते बिशप डेस्मंड टुटू, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर, भारतातील ‘सेवा’ या संघटनेच्या संस्थापिका इला भट, युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान, आर्यलडच्या माजी राष्ट्राध्यक्षा मेरी रॉबीनसन्स आदी प्रभृती मंडळी आहेत. जागतिक समस्या सोडविण्यासाठी वृद्ध व अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन मिळावे, अशी त्यामागची भूमिका आहे. रिचर्ड ब्रॅन्सन स्वत:च्या व मित्रांच्या खर्चाने या ज्येष्ठ मंडळींच्या बैठका घेतात व प्रसारमाध्यमांद्वारा त्याचा आवाज जगभर पोहोचवितात.
स्टिव्ह किलेलिया यांनी ‘जागतिक शांतता निदेर्शाकाची स्थापना केली. ते दरवर्षी लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’ वृत्तपत्राला भरघोस देणगी देतात. त्या पैशाने जगातील सर्व देशांचा अभ्यास केला जातो व प्रत्येक देशात शांतता किती आहे, याचे अनेक निकष लावून चाचणी केली जाते. दरवर्षी मे महिन्यात एक अहवाल प्रसिद्ध होतो व त्यात जगातील सर्व देशांचे शांततेनुसार क्रमांक जाहीर होतात.

सुप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स व वॉरेन बफे यांनी आपली सारी संपत्ती सामाजिक कार्यासाठी वाहिली आहे, हे सर्वाना माहिती आहे. रिचर्ड ब्रॅन्सन, स्टिव्ह कलेलिया, जॉर्ज सोरोस, जीम बाल्सीली हे उद्योगपती जागतिक शांततेसाठी गुंतवणूक करतात. त्यात त्यांचा स्वत:चा, समाजाचा देशाचा अथवा त्यांच्या उद्योग समूहाचा काहीही फायदा नसतो. जागतिक पातळीवर विचार करण्यासाठी व्यापक इच्छाशक्ती व वैचारिक उंची असते. हे लोक केवळ पैसा गोळा करण्यामागे, नट-नटय़ांच्या मेजवान्या आणि क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात वेळ व संपत्ती वाया घालवत नाहीत, तसेच बाकीचे उद्योगपती चमकतात म्हणून स्वत:ही प्रसिद्धीमागे धावत नाहीत तर सारे विश्व हे एक शांततामय व्हावे म्हणून मनस्वीपणे प्रयत्न करतात. त्यामुळे प्रसिद्धी त्यांच्यामागे धावत जाते. या कार्यासाठी फारसा खर्च लागत नाही, तर एक जागतिक पातळीवर विचार करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. जे उद्योगपती फक्त डोळे मिटून भौतिक यशामागे धावत सुटतात. त्यांना हे जमणार नाही.

हान्स एकदाल हे भारतावर प्रेम करणारे उद्योगपती एका बहुराष्ट्रीय कंपनीचे अध्यक्ष होते. सुमारे ७० देशांत त्यांचा कारभार होता. एकदा माझ्याबरोबर कॉफी पित असताना, फोनवर बोलता बोलता न्यूझीलंडमधील एक कंपनी त्यांनी विकत घेतली. ते एका साध्या घरात राहतात. कधी ‘पेज थ्री’वर येण्याची ते धडपड करीत नाहीत. त्यांची पत्नी सर्वसाधारण महिलांप्रमाणे नोकरी करते. मुलाने अनेक प्रयत्न करून, वडिलांचा कुठलाही वशिला न लावता कशीबशी नोकरी मिळवली. मी त्यांना त्यांच्या साध्या राहणीविषयी विचारले, तर त्यांनी मला टॉलस्टॉयची लिहिलेली एक कथा ऐकवली.

ती अशी, ‘‘एक शेतकरी होता. त्याला कोणीतरी सांगितले, की बाजूच्या गावात जमीन खूप सुपीक आहे. तिथे जमीन घेतली तर तुला खूप कमाई होईल. शेतकऱ्याने तसे केले. काही दिवसांनी त्याला दुसऱ्या काही गावांची माहिती मिळाली. तिथेही त्याने जमीन घेतली. तो अजून श्रीमंत झाला. असे करता करता तो एका गावात आला. तिथला पाटील त्याला म्हणाला, सूर्यास्तापर्यंत या गावाला तू पूर्ण फेरी मारलीस तर तुला सर्व जमीन फुकटात मिळेल; पण फेरी पूर्ण केली पाहिजे. शेतकरी जोरात धावला. त्याला शक्य होईल तेवढी मोठी फेरी मारण्याची त्याची इच्छा होती. जसजशी संध्याकाळ होत आली तसा तो फेरी पूर्ण करण्यासाठी वेगाने धावू लागला. सूर्य क्षितिजावर अस्तास जात असताना त्याची फेरी पूर्ण होऊन तो अनेक मैल जमिनींचा मालक झाला; पण त्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली अन् तो धापा टाकत कोसळला व मृत्युमुखी पडला. ग्रामस्थांनी त्याला ६ बाय २ फुटाचा खड्डा खणून पुरले. त्या वेळी पाटील म्हणाले, खरे तर त्याला फक्त एवढय़ाच जमिनीची गरज होती..’’

पूर्वी भारतातही श्रीमंत उद्योगपती सामाजिक कार्यासाठी संपत्तीचा उपयोग करीत. टाटा समूहाने मुंबईत कॅन्सर, पदार्थविज्ञान व समाजशास्त्र या तीन विषयांत संशोधन करणाऱ्या संस्था स्थापन केल्या. त्याशिवाय इतरही अनेक संस्थांना सढळ हस्ते मदत केली. बिर्ला समूहाने पिलानी येथील अभियांत्रिकी शिक्षणसंस्था, मुंबईतील क्रीडा केंद्र व अनेक इस्पितळे आणि मंदिरे यांना मदत केली; पण हा सर्व भूतकाळ झाला. अलीकडे बजाज उद्योग समूहाने सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. ते मुंबई

विद्यापीठात नवीन विभाग उघडण्यासाठी भरघोस मदत करतात; पण अजिबात प्रसिद्धी मिळवत नाहीत. संगणक व्यवसायातील ‘विप्रो’ व ‘इन्फोसिस’ या दोन व्यवसायांनी शैक्षणिक संस्थांना हातभार लावला आहे; पण हे झाले अपवादात्मक. गेल्या २५-३० वर्षांत मानवी समस्यांवर संशोधन करणारी एकही संस्था खासगी मदतीने उभी राहिली नाही. याउलट मेजवान्या, क्रिकेटचे सामने, फॅशन शो व जिथे स्वत:ची जाहिरात करता येईल, अशा गोष्टींसाठी मुबलक पैसा उपलब्ध होत आहे.

या साऱ्यांचे चिंतन केल्यानंतर एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे आंधळी कोशिंबीर खेळत बसण्यापेक्षा डोळे उघडे करून विचार करण्याचीच जास्त गरज आहे. हा खेळ थांबण्यासाठी आपल्याला स्वत:पासून सुरुवात करावी लागेल. आपले विचार, सवयी बदलाव्या लागतील. खासगी आयुष्यात गाडी, बंगला यांच्यासारखा दिखाऊपणा तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडली पाहिजे.

पैसा हा एक अद्भुत प्रकार आहे. आपण त्याच्यामागे धावलो तर पैसा आपल्यापुढे काही अंतर ठेवून धावतो. सत्तेचेही तसेच आहे, आपण सत्तेमागे धावलो तर सत्ता फक्त दुरून दिसते. आपल्या हाती येत नाही. यासाठी आपल्याला सामाजिक हितासाठी पोषक असलेल्या अनेक उदाहरणांचेही अनुकरण करावे लागते.

सौजन्य – लोकसत्ता, १४ मार्च २०१०

‘लोकसंस्कृती’चे उपासक आणि संशोधक डॉ. रा. चिं. ढेरे यांना यंदाचा ‘पुण्यभूषण पुरस्कार’ रविवारी पुण्यात ज्येष्ठ कन्नड साहित्यिक डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या हस्ते देण्यात आला. या समारंभात डॉ. ढेरे यांनी  केलेले  भाषण.

आज त्रिदल फाउंडेशनच्या वतीने मला माझ्या ध्यासभूमीच्या कर्नाटकाच्या, म्हणजेच दक्षिण भारताच्या मातीतल्या एका फार मोठय़ा साहित्यकाराच्या हातून ‘पुण्यभूषण’ पुरस्कार दिला जातो आहे आणि माझ्या जिव्हाळ्याच्या परिवारातला एक प्रतिभावंत मराठी साहित्यकार माझ्याविषयीच्या प्रेमानं त्यासाठी इथे उपस्थित आहे, हा माझ्यासाठी आनंदाचा योग आहे.

माझी मूळ माती मावळची आहे, पण माझ्या तेरा-चौदा वर्षांच्या वयापासून गेली सहासष्ट वर्षे ज्ञानाचा फाळ लावून पुण्यानं मला नांगरलं आहे आणि आज आलेल्या पिकाचं कौतुक करण्यासाठी, सोन्याच्या नांगरानं पुण्यभूमी नांगरणाऱ्या शिवरायांची प्रतिमाच ‘त्रिदल’नं मला दिलेली आहे. मनात आनंद आहे आणि संकोचही आहे. सभासंमेलनं आणि भाषणं यांच्या वाटेला मी फारसा गेलेलो नाही. सार्वजनिक क्षेत्रातला वावरही मी शक्यतो टाळत आलो आहे. लेखन-संशोधन हीच माझी आवडीची, आग्रहाची आणि समाजसंवादाची मुख्य वाट राहिली आहे.

फार क्वचित मी व्यासपीठावर आलो आहे आणि थोडंबहुत बोललो आहे. पण त्या अपवादप्रसंगी मला फार संकोचल्यासारखं, अवघडल्यासारखं वाटत आलं आहे. माझ्यामध्ये आहे तो अंदर मावळातल्या एका अगदी लहानशा खेडय़ातला एक सामान्य मुलगा. सहासष्ट र्वष पुण्यात घालवूनही तो मुलगा, पुण्यावर प्रेम करत असला तरी पुण्यातल्या नागर जीवनाला सरावलेला नाही. उन्हाळ्यात अनवाणी पायांनी माळरानावरच्या शेण्या वेचणं किंवा झाडाच्या वाळक्या काटक्या गोळा करून आजीला स्वयंपाकासाठी आणून देणं तसं सोपं होतं. पावसाळ्यात स्वत: इरली विणून, रानभाज्या खुडून आणणं किंवा भातकापणी झाल्यावर खाचरातला सरवा गोळा करून आणणं सोपं होतं.

देवळात आजारी मामांऐवजी जाऊन पोथ्या-पुराणं वाचणं सोपं होतं. पण तिथून निघून, म्हाताऱ्या आजीचं बोट धरून चाललेल्या धाकटय़ा बहिणीच्या पाठोपाठ, आजारी मामांसोबत शहर पुण्यात पहिलं पाऊल ठेवताना छातीत जी धडधड झाली होती आणि नळाच्या तोटीतून धो-धो पाणी अचानक येताना पाहिल्यावर जो धसका बसला होता, तो धसका आणि ती धडधड, अजून ऐंशीव्या वर्षीही माझ्या मनात कायमच आहे.

‘शाकुंतल’ नाटकात कण्वांच्या शकुंतलेला राजाघरी पोचवण्यासाठी दोघे ऋषिकुमार जातात. रानावनात वाढलेल्या त्या कुमारवयीन मुलांना राजधानीत प्रवेश केल्यावर, आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या परिसरात पाय ठेवल्यासारखं वाटतं. शहराबद्दलची माझी खरीच भावना उघड करणारा तो प्रसंग दृष्टांत म्हणून मी गमतीनं नेहमीच इतरांना सांगत आलो आणि आता ‘पुण्यभूषण’ पुरस्कार मिळाल्याचं जाहीर झालं, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुण्यात बॉम्बस्फोट झाला हा कसला योगायोग आहे. हे शहर आगीच्या ज्वाळांनी वेढलं जाण्याच्या अवस्थेपर्यंत खरोखरीच पोचेल अशी कल्पनाही मी केली नव्हती. माझ्या कल्पनेतलं पुणं वेगळंच होतं. आठ-नऊ वर्षांचा असताना देवराम अभंग नावाच्या माझ्या शिक्षकांच्या तोंडून मी पुण्याचं खूप वर्णन ऐकलं होतं. तेव्हा मित्राला पत्र लिहितो आहे, अशी कल्पना करून, माझ्या कल्पनेतल्या पुण्याविषयीचा एक निबंधही लिहिला होता. पुण्याला जाण्याची तेव्हा विलक्षण ओढ होती. प्रत्यक्षात पुण्याला आलो तेव्हा बरोबर थोडे कपडे आणि भांडी यांचं ओझं होतं. भर माध्यान्हीच्या उन्हात पाय पोळत होते आणि शनिवारवाडय़ाची प्रचंड भिंत पाहून जीव दडपला होता.

पुढे मात्र याच पुण्यानं मला अक्षरश: मातीतून वर काढलं. काहीच नव्हतं माझ्याजवळ. जन्मतारखेचा दाखला नव्हता, की कुठलीही परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला नव्हता. पण त्यावेळच्या अत्तरदे नावाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी माझी केवळ तोंडी परीक्षा घेऊन मला पाचवीच्या वर्गात प्रवेश दिला. एकेका वर्षांत दोन दोन इयत्तांचा अभ्यास करत गेलेली र्वष मी भरून काढली आणि दिवसा पोटापाण्याचे उद्योग धुंडाळत सरस्वती मंदिर रात्रशाळेतून शिक्षण पूर्ण केलं.
त्या काळात भेटलेल्या कितीतरी शिक्षकांची आज मला आठवण येते. शिक्षण माणसाला घडवतं याचा अनुभव देणारे शिक्षक होते ते. त्यांनी नुसती पाठय़पुस्तकंच शिकवली नाहीत; तर मला जगायला शिकवलं. चांगल्या गोष्टींचा ध्यास लावला. म्युनिसिपालिटीच्या आठ नंबरच्या शाळेत मला बोरकर गुरुजी भेटले आणि मला कवितेची गोडी लागली. मन पाझरत ठेवणाऱ्या, यक्षिणीच्या त्या अद्भुत कांडीचा स्पर्श मला बोरकर गुरुजींमुळे झाला आणि दु:ख- दारिद्रय़ाचा विसर पाडणाऱ्या एका विलक्षण जगात मी प्रवेश करू शकलो. पुढे मीही कविता लिहिल्या, स्तोत्रं आणि आरत्या लिहिल्या, मित्रांबरोबर सविता मंडळ स्थापन केलं, नभोवाणीसाठी संगीतिका लिहिल्या.

संशोधनाकडे वळल्यावर कविता लिहिणं थांबलं, बोरकर-माडगूळकरांबरोबरच्या खासगीत रंगणाऱ्या मैफिली थांबल्या, पण कविता सोबतीला राहिलीच. माझ्या शैलीचा ती अविभाज्य भाग बनली. ती अर्थात स्वाभाविक गोष्ट. पण त्याहीपेक्षा तिनं दिलेलं मोठं देणं म्हणजे संशोधन; हाही एक प्रातिभ व्यापारच असतो याची जाणीव.

केवळ माहितीचे भारे जमवणं म्हणजे संशोधन नव्हे. अनेकदा असं माहितीच्या संकलनाचं काम काही क्षेत्रात, काही पातळ्यांवर आवश्यक असतं आणि महत्त्वाचंही असतं. पण शेवटी संदर्भाचे दुवे जुळवत, त्यातून विषयाच्या, व्यक्तींच्या, काळाच्या आकलनापर्यंत पोचणं ही प्रतिभाबळानंच घडणारी गोष्ट असते. कवितेनं मला संशोधनाच्या प्रांतातही कायम सर्जनाशी बांधून ठेवलं. तिनं मला तर्ककर्कश होऊ दिलं नाही. भावात्मतेपासून दूर जाऊ दिलं नाही आणि अगदी निकरानं विरोधाला तोंड देण्याची वेळ आली, तेव्हाही आपल्याला सापडलेल्या सत्याला सोडून जाऊ दिलं नाही. नव्या-जुन्या कविता आजही पुष्कळ सोबत करतात. भरवसा देत राहतात.

सत्याच्या जातीला दु:ख असे मिळणारच
दु:खातून करुणेचे मर्म सहज कळणारच

अशी मुक्तिबोधांची एक कविता आहे. कवितांचे असे दिलासे माझ्या वाटेवर सारखे भेटत राहिले. मी निवडलेलं अभ्यासाचं क्षेत्रंच असं आहे, की तिथे आत जायचं तर मानव्याच्या महाद्वारातूनच जावं लागतं. संतपरंपरा आणि लोकपरंपरा हे माझे अभ्यासाचे विषय. मला या अभ्यासानं माझ्या लहानपणाचं भान दिलं, तरी त्याची खंत मिटवली आणि मोठय़ा गोष्टींचा ध्यास लावला. ज्ञानाचं अपारपण दाखवलं, अखंडत्व दाखवलं, उदारपण दाखवलं आणि समन्वयाचा साक्षात्कार घडवला.

विविध ज्ञानशाखांचा समन्वय करतच मी माझी अभ्यास साधनं, अभ्यासक्षेत्रं आणि अभ्यासदिशा विस्तारू शकलो. सर्वसामान्य माणसांविषयीचं प्रेम हा इथल्या लोकपरंपरेचाच नव्हे तर संतपरंपरेचाही गाभा आहे. या गाभ्याशी जाण्याची वाट मी सिद्ध करू शकलो आणि तिथंपर्यंत पोचल्यानंतर, इथल्या सार्वजनिक जीवनात न वावरताही माणसांचं अलोट प्रेम मला मिळालं. माझ्यासारख्या पोरकेपणाचा अनुभव घेतलेल्या, वेदनांनी पोळलेल्या आणि व्यवहारात अडाणी राहिलेल्या माणसासाठी या प्रेमाचं मोल किती आहे हे कसं सांगू? आधी पुण्यानं आणि मग सगळ्याच मराठी जगानं मला माझ्या दुबळेपणासकट स्वीकारलं. मर्यादांसकट स्वीकारलं. अगदी फाटका माणूस होतो मी. जवळजवळ रस्त्यावर वाढत होतो; पण आबासाहेब मुजुमदार, सिद्धेश्वरशास्त्री चित्राव, दत्तो वामन पोतदार अशा त्या काळातल्या पुण्यातल्या थोर शास्त्री-पंडितांनी माझ्यासारख्या दरिद्री, अल्पवयीन आणि अल्पज्ञानी मुलाला अगदी सहज जवळ केलं.

पुणं हे माझी ज्ञानाची भूक वाढवणारं आणि पुरवणारं एक मुक्त विद्यापीठ झालं. मोठय़ा माणसांचं दर्शन घडवणारं आणि मला माझ्या ज्ञानधर्माची दीक्षा देणारं महाकेंद्र झालं. या शहरानंच मला सामान्य माणसांमधल्या भलेपणाचा आणि सामर्थ्यांचा अनुभव दिला. खऱ्या समाधानाची आंतरज्योत पेटवणारी पुस्तकं आणि त्या पुस्तकांतून भेटणारे कित्येक महान लेखक, कवी, चिंतक मला इथेच सापडले. सहासष्ट वर्षांपूर्वी इथे येताना मी जो कुणीच नव्हतो, तो इथे येऊन अभ्यासक झालो, संशोधक झालो आणि मुख्य म्हणजे माणूस झालो. पुण्याचं माझ्यावर हे ऋण आहे.

खरं तर आता मागे वळून पाहताना, मला वाटतं आहे की, ऐंशी वर्षांच्या आयुष्यात आपण केलेलं सगळं लेखन म्हणजे ऋणमुक्त होण्यासाठीचं एक तर्पणच आहे.

वडील गेल्यानंतर तेराव्या दिवशीच, प्रायोपवेशनानं स्वत:ला संपवून, अवघ्या एकविसाच्या वर्षी, स्त्रीत्वाच्या कणखर निग्रहाचं दर्शन घडविणाऱ्या माझ्या आईला आणि भागवतधर्माचं सार जगणाऱ्या, गावकुसाचा आधार बनलेल्या माझ्या आजीला ते तर्पण आहे. इतिहासरचनेची दृष्टी मला देणाऱ्या आणि सामाजिक-सांस्कृतिक अभ्यासातलं मिथकांचं सामथ्र्य माझ्यासमोर उलगडणाऱ्या राजवाडय़ांना ते तर्पण आहे. मला समन्वयाची दृष्टी आणि समग्रतेचं भान देणाऱ्या न्यायमूर्ती रानडय़ांना ते तर्पण आहे. लोकपरंपरेच्या अभ्यासाचा पैस दाखवणाऱ्या कर्वे-चापेकरांना, ज्ञानाचा प्रचंड विस्तार पेलू पाहणाऱ्या भारताचार्य वैद्यांना, चित्रावांना, इरावतीबाईंना, तर्कतीर्थाना आणि माझ्यावर पुत्रवत प्रेम करणाऱ्या दादा पोतदारांना ते तर्पण आहे.

मी तर्पणाची भाषा करतो आहे म्हणून परंपरावादी धार्मिकाचा आरोप कुणी माझ्यावर करेलही, पण परंपरा आणि परिवर्तन यांची सहृदय, तरी निर्भय चिकित्सा मी आयुष्यभर करत आलो आहे. मी सश्रद्ध माणूस आहे. श्रद्धेचं सामथ्र्य अनुभवानं जाणणारा माणूस आहे. पण रूढ कर्मकांडापलीकडे जाण्याचा आणि ‘कर्माचे डोळे ज्ञान, ते चोख होआवे’ या ज्ञानदेवांच्या इशाऱ्याला सजगपणे स्वीकारत पुढे जाण्याचा प्रयत्न मी आयुष्यभर करत आलो आहे.
श्रद्धेची तपासणी करण्याची वेळ आली तेव्हा ती करायला मी कधी कचरलो नाही आणि सांप्रदायिक श्रद्धांनी घातलेल्या मर्यादा ओलांडून, संशोधनानं समोर ठेवलेल्या सत्यांकडे जाताना मी कधी पाऊल मागे घेतलं नाही. एखाद्या धर्मकार्याइतक्या निष्ठेनं मी लेखन करत राहिलो आहे; किंबहुना लेखन-संशोधन हाच माझा स्वधर्म राहिला आहे.

खरं म्हणजे आज धर्म किंवा जात हा शब्द उच्चारणंही अवघड झालं आहे. धर्मद्वेषाचा आणि जातिद्वेषाचा आज उठलेला गदारोळ कमालीचा क्लेशकारक आहे. जाती मिटवण्याची भाषा बोलत, आपण जातीयवादच धगधगत ठेवतो आहोत. निधर्मी राष्ट्रवादाची भाषा बोलत धार्मिक अहंतांना आणि स्वतंत्र प्रादेशिक अस्मितांना खतपाणी घालतो आहोत.

धर्माची सांगड आपण कायम नीतीशी घालत आलो आहोत. धर्माधिष्ठित समाजव्यवस्थेत ती स्वाभाविक प्रक्रियाच होती. पण आज नवसमाजरचनेचा प्रयत्न करताना आपण धर्म दूर सारला, तशी नीतीही दूर सारण्याची अक्षम्य चूक केली आहे. धर्म कोणताही असो, किंबहुना धर्म असो किंवा नसो, नैतिकता ही माणसाच्या व्यक्तिगत आणि सार्वजनिक चारित्र्याचं संवर्धन करणारी गोष्ट आहे. त्याच्या सामूहिक जगण्याचं निरोगी नियमन-संगोपन करणारी शक्ती आहे. त्या नैतिकतेचा सर्व क्षेत्रांमधला पाडाव आज कोणाही संवेदनशील माणसाला अस्वस्थ करणारा आहे.

ज्ञानाचं क्षेत्रही आज कमालीचं गढूळ आणि अशुद्ध झालं आहे. लोकपरंपरा आणि संतपरंपरा यांच्याइतक्याच आस्थेनं मी एकोणिसाव्या शतकातल्या प्रबोधन परंपरेचा विचार करीत आलो आहे आणि त्या परंपरेत उदयाला आलेल्या प्रखर विवेकवादाकडे स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्राने कशी पाठ फिरवली आहे हे पाहात असताना कमालीचा व्यथित झालो आहे. गावाकडे याच दिवसात शिमग्याची सोंगं निघायची. सर्वसामान्य माणसाचा शीणभाग घालवणारी ती एक निरागस उत्सवी मौज होती. पण आज आपल्याला ज्ञानवंतांची सोंगं घेऊन वावरणारी सामान्य वकुबाची विषारी महत्त्वाकांक्षा, स्वार्थाध स्पर्धावृत्ती आणि फुटीरतेला पोसणारी विकृतीच वेळीअवेळी समोर नाचताना दिसते आहे.

राजवाडय़ांच्या निरीक्षणाचा, जिज्ञासेचा आणि विश्लेषणाचा वारसा मिळालेल्या अभ्यासकांच्या पिढय़ा याच पुण्यात माझ्यामागे उभ्या होत्या तेव्हा जातीजमातींचा विचार म्हणजे आपला समाज समजून घेण्याचं साधन वाटायचं. एखाद्याची जात समजली, कुलदैवत समजलं किंवा ग्रामनाम समजलं तरी आपल्या बहुजिनसी समाजातल्या माणसांच्या स्थलांतरांची, उपजीविकांची, जीवनशैलीची, स्वभाववैशिष्टय़ांची आणि गुणधर्माची ओळख पटत जायची. एकूणच आपली सामाजिक – सांस्कृतिक घडण समजत जायची. माणसं समजून घेण्याचीच ती एक वाट होती. त्या वाटेवरून चालताना भूतकाळाच्या निबिड अंधारातून, संस्कृतीची न समजलेली, न दिसलेली अस्तित्व प्रयोजनं उजेडात आणताना मानवी जीवनाच्या अर्थपूर्णतेजवळ जात राहिल्याची एक भावना मनात असायची. माझं सगळं संशोधन या भावनेनं भारलेल्या अवस्थेतच झालं आहे. संप्रदायांचा समन्वय, उपासनांचा समन्वय, सामाजिक- प्रादेशिक धारणांचा समन्वय – विसंगतीचं आणि विरोधाचं विष पचवीत एका उदार, सहिष्णू, सहृदय आणि सत्त्वशील अशा महासमन्वयाकडे जाणं ही भारतीय संस्कृतीची आणि मराठी संस्कृतीचीही आजपर्यंतची आत्मखूण राहिली आहे आणि या खुणेची ओळख पटवणं हेच माझ्या कामाचं आंतरउद्दिष्ट राहिलं आहे.

पूर्वी माझे चित्रकार स्नेही अनंतराव सालकर यांच्या आग्रहानं, त्यांच्याबरोबर मी अनेकदा पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या भेटीला गेलो आहे. स्वामी तेव्हा क्षीण अवस्थेत अंथरुणावर पडून असायचे. एका भेटीत सालकर स्वामींना म्हणाले, ‘यांना अजून खूप काम करायचं आहे, पण प्रकृती साथ देत नाही. सतत आजारपण पाठीला लागलं आहे. यांना काही उपाय सांगा.’ स्वामी किंचित हसले. म्हणाले, ‘‘लहान मूल असतं, खेळत असतं अंगणात. जोवर ते खेळात दंग असतं तोवर त्याला कशाचं काही वाटत नाही. पडणं-झडणं, खरचटणं त्याला काही भानच नसतं. मग केव्हातरी आई हाक मारते. खेळ थांबतो, मूल भानावर येतं आणि आईजवळ गेल्यावर नंतर मग त्या लागण्या-पडण्याच्या वेदना जाणवून रडू येतं. पण तेव्हा काळजी घ्यायला, कुशीत घ्यायला आई असतेच. तुम्हीही एक खेळ मांडला आहे. संशोधनाचा खेळ. तो मनापासून खेळत राहा. आई बोलावून घेईल तेव्हा पडण्या-झडण्याच्या जखमांची काळजी ती घेईलच.’’
स्वामी म्हणाले ते फार खरं होतं. मी एक खेळ मांडला आणि आजपर्यंत भान विसरून तो खेळत राहिलो आहे आणि खेळही असा मिळाला आहे की स्वत:ला देऊन टाकल्याखेरीज तो खेळताच येत नाही. स्वरूपानंदांचीच एक ओवी आहे-

व्हावया वस्तूची प्राप्ती। साधक साधना करिती।
परि ते वस्तू आहुती। साधकाचीच मागे।।

वस्तू म्हणजे ब्रह्मवस्तू, परब्रह्माचा साक्षात्कार व्हावा म्हणून साधक साधना करतात खरी; पण त्या ब्रह्माला हवं असतं ते साधकाचंच समर्पण. संपूर्ण समर्पण. तुमचाच प्राण, तुमचीच आहुती त्याला हवी असते. मी माझ्या ज्ञानब्रह्मापुढे अशा आहुतीच्या तयारीनं उभा राहिलो आहे.

डॉ. अभय बंग, सौजन्य – दै.लोकमत (मंथन पुरवणीतुन, १५ ऑगस्ट २०१०)

उंच होत जाणाऱ्या पिरॅमिडच्या रुंद तळाशी  गोरगरिबांची, स्त्तिया आणि आदिवासींची ऊर्जा सामावलेली आहे. या माणसांना सबळ होण्यासाठी साधने पुरवणे, त्यांचे प्रश्न शोधून, त्यांना सोबत घेऊन उत्तरे शोधणे हे मोठे आव्हान आहे. ती सामान्य वाटणाऱ्या अडाणी माणसांकडे असते…त्यांच्याकडे जा !

——————————————————————————————————————————–

ज्ञान-विज्ञानातली नवनवी संशोधने नव्या, आधुनिक जगाचा पाया रचत आली आहेत. त्या आधारानेच आजच्या जगाची घडण झाली आहे. वाफेच्या इंजिनाचा शोध, वाहने-टेलिफोन आणि टेलिव्हिजनचा शोध, रोगप्रतिबंधक लसी आणि जीवनसत्त्वांचा शोध अशा संशोधनांनी जग बदलत गेले. देशोदेशीचे सर्व सत्ताधीश नेते, अध्यक्ष आणि पंतप्रधान यांच्यापेक्षाही जगभरातल्या सर्वसामान्य माणसांचे आयुष्य बदलण्याचे, घडवण्याचे श्रेय आधुनिक ज्ञान-विज्ञानाला अधिक जाते.

‘देशाच्या आर्थिक विकासाची प्रक्रिया गतिमान करून दहा टक्के विकास दर कसा गाठता येईल?’ – या कळीच्या प्रश्नाला प्रचंड महत्त्व आलेले आपण पाहातो. त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचा असा एक प्रश्न आहे –

संशोधनाची प्रक्रिया अधिक गतिमान करून या देशातल्या ज्ञान-विकासाचा दर अधिकाधिक कसा वाढवता येईल?’

– पण हा प्रश्न सोपा नाही.

त्यात अनेक कळीचे मुद्दे आहेत. गुंतागुंत आहे.

जे अभ्यास आणि संशोधन करतील, ज्ञानाचा विकास करतील; त्यांचा ज्ञानावर हक्क असेल आणि त्या ज्ञानाच्या-संशोधनाच्या आधारावर जे जग उभे राहील त्या जगावरही ज्ञानाच्या निर्मात्यांचीच मालकी राहील. ज्यांच्याकडे ज्ञानाची मालकी अगर माहिती नाही, ते सारेच गुलाम बनतील.
हे वास्तव एका नव्या समीकरणाला जन्म देते.

यापुढच्या जगात आर्थिक विषमतेपेक्षाही ज्ञान-विज्ञान-संशोधनाच्या क्षमता आणि शक्यतांमधली विषमता अधिक भयंकर, जीवघेणी ठरेल.
अशा काळात समाजातल्या सर्व स्तरांवरील लोकांना संशोधनात, ज्ञानाच्या निर्मितीत सहभागाची संधी दिल्याखेरीज लोकशाही व्यवस्थेचा गाडा सुरळीत चालू शकणार नाही.

हे प्रत्यक्षात आणता येऊ शकेल का?
कशा रीतीने?

गडचिरोली जिल्ह्यातील साधारणत: १०० गावे ही गेल्या अनेक वर्षांपासून माझी शाळा आहे. इथे मी शिकत असतो.
आदिवासी पट्टा. विकासापासून दूरच राहिलेला. शेती आणि जंगलातल्या लाकूडफाट्याच्या आधाराने तग धरून जीव जगवणारी खेडुत माणसे. अशिक्षित. काही तर निरक्षरच. रूढ भाषेत ज्यांना अडाणी म्हणतात अशा या माणसांनी गेल्या २५ वर्षात आम्हाला केवढे शिकवले. लोकांबरोबर-लोकांसाठीच्या संशोधनाची, अभ्यासाची रीत आणि या संशोधनातले काही कळीचे नियम आम्ही इथेच शिकलो.

त्यातला पहिला नियम.
एखादा प्रश्न सोडवायचा असेल तर त्यासाठीचा अभ्यास – संशोधन तो प्रश्न जिथे आहे त्या भागात जाऊन, तिथे राहूनच केले पाहिजे. जिथे संशोधनाची साधने विपुल असतात अशा एखाद्या सुसज्ज प्रयोगशाळेत अगर विद्यापीठात बसून नव्हे. अशा ठिकाणी अतिमहत्त्वाकांक्षा आणि फर्निचर – एवढेच फक्त असते.
हगवणीने बेजार होऊन मरणाऱ्या माणसांची भूमी शोधत रॉबर्ट कॉक दहा हजार मैलांचा प्रवास करून गेला तेव्हाच त्याला कॉलऱ्याचे मूळ असलेला बॅक्टेरिया सापडला होता. तो आधी इजिप्तला गेला. मग भारतात आला. त्या सागरी भ्रमंतीच्या अखेरीस त्याचे संशोधन पूर्णत्वाला गेले. त्यानंतरच रॉबर्ट सूक्ष्मजंतूशास्त्र या नव्या शाखेचा पाया रचू शकला.

जिथे प्रश्न असेल तिकडे जा… तुम्ही स्वत:च ‘एक प्रश्न’ असता तिथेच घुटमळू नका; हे याचे सार !

मी आणि राणी.
आम्ही दोघेही भारतात डॉक्टर झालो. पुढे अमेरिकेत जाऊन ‘पब्लिक हेल्थ’ या विषयातले धडे घेतले आणि काम करायला पुन्हा भारतात परतलो तेव्हा आमच्यासमोर एक प्रश्न होता.

भारतातल्या सर्वसामान्य माणसांचे आरोग्य कसे सुधारता येईल?

नवे-नवखे होतो तेव्हा धडपडलो. ठेचकाळलो. चुकत गेलो. त्या चुकांमधून दुसरा धडा शिकलो.
एखादा विषय माझ्या स्वत:च्या बुद्धीला उत्तेजन / आव्हान देतो म्हणून त्या विषयावरच्या अभ्यासाला-संशोधनाला हात घालणे हे काही खरे नव्हे. तुम्ही ज्या लोकांसाठी ज्या लोकांबरोबर काम करता, त्या समूहाच्या गरजांमधून समोर येईल तोच तुमच्या अभ्यासाचा विषय ! जगभरातल्या संशोधकांच्या गटाला महत्त्वाचा वाटतो, तो नाही !

असे महत्त्वाचे विषय कुठे सापडणार? कसे सापडणार?

तिसरा महत्त्वाचा नियम –
ज्याच्यावर काम करण्यासाठी अख्खे आयुष्य अपुरे पडेल असे अनेक अत्यंत महत्त्वाचे विषय आपल्या अवतीभवती अक्षरश: विखुरलेले असतात. ते वरवर अत्यंत सामान्य दिसतात. कमी महत्त्वाचे वाटतात. आणि बौद्धिक आव्हाने अंगावर घ्यायला आसुसलेल्या संशोधकांचे तिकडे लक्षच जात नाही. प्रत्यक्षात अत्यंत सामान्य दिसणाऱ्या, तात्कालिक वाटणाऱ्या विषयातच जगाला नवी दिशा देणाऱ्या संशोधनाची बीजे असतात. झाडावरून खाली पडणारे सफरचंद या घटनेत काय असे जगावेगळे होते? पण न्यूटनला ते ‘दिसले’. अशी सफरचंदे रोज आपल्या आजूबाजूला पडतच असतात.

—————————————

भारतातल्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या म्हणजे प्राधान्याने कोणत्या?
त्यातल्या कोणत्या समस्येवर तातडीने संशोधन-अभ्यास करण्याची निकड आहे? कोणाला विचारावे?
आम्ही आजूबाजूच्या चाळीस गावातल्या बाया-बापड्यांना बोलावले आणि एक साधा प्रश्न विचारला,
‘तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास कसला आहे?’
बाया म्हणाल्या, ‘आमची पोरं दगावतात, भाऊ !’

आम्ही कामाला लागलो. संशोधन अभ्यासाची पद्धत ठरवली. आमच्या आरोग्यसेवकांनी – बेअर फूट डॉक्टर्स असतात तशा बेअर फूट संशोधकांनी आजूबाजूच्या ८६ गावातल्या बालमृत्यूंची नोंद करण्याचे मोठे काम तडीला नेले. २० वर्षांपूर्वी केलेल्या या अभ्यासातून एक महत्त्वाचे निरीक्षण आमच्या हाती लागले.

जन्माला आल्यानंतरचे पहिले २८ दिवस हा आमच्या भागातल्या नवजात बालकांसाठी सर्वात धोक्याचा काळ असतो. जवळपास ७५ टक्केबालमृत्यू याच काळात होतात. (जागतिक तज्ञांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार सबंध जगभरात दरवर्षी सुमारे ४० लाख बालमृत्यू होतात आणि त्यातले सुमारे ११ लाख बालमृत्यू भारताच्या नशिबी लिहिलेले असतात.)

या बाळांना कसे वाचवता येईल?
आजारी पडलेल्या नवजात बालकांना तत्काळ इस्पितळात दाखल करावे, असे वैद्यकशास्त्र सांगते.
पण इथे तर इस्पितळे शेकडो किलोमीटर्सवर आणि जी आहेत तीही मरणाऱ्या बाळाच्या आई-बापाला न परवडणारी. त्यातून जुन्या प्रथा परंपरा आणि समजुतींचा घट्ट पगडा. ओली बाळंतीण आणि तिचे बाळ या दोघांनाही घराबाहेर पडण्याची बंदी.

याचा अर्थ बाळ आणि त्याची आई औषधोपचारापर्यंत, इस्पितळांपर्यंत पोचणे मुश्कील… मग वैद्यकीय सेवाच त्यांच्या घरी पोचवल्या तर?
पण मग हे काम करणार कोण?

त्या बाळाच्या आईला आणि आजीलाच ‘बाळाची काळजी कशी घ्यावी’ हे शिकवले तर?
प्रत्येक गावातली एक बाई निवडून तिला पुरेसे प्रशिक्षण, अत्यावश्यक साधने आणि ती साधने वापरण्याचा सराव दिला तर? – तर मग तीच त्या दुर्गम भागातल्या बालरोग तज्ञाचे काम-तात्पुरते का असेना – करू शकेल.

संशोधनाच्या शास्त्रीय परिभाषेत बोलायचे तर यातूनच ‘सर्च’चे नवे मॉडेल जन्माला आले. होम-बेस्ड न्यूबॉर्न केअर !
नवजात बालकांना त्यांच्या घरीच वैद्यकीय सेवा पुरवण्याची व्यवस्था.

——————————————————————–
आमचे हे मॉडेल डॉक्टर्स, नर्सेस, हॉस्पिटल्स किवा कसल्याही अत्याधुनिक, महागड्या साधनांवर अवलंबून नाही. गावातल्या बायकांनाच नवजात बालकांची काळजी घेण्याचे मूलभूत तंत्र शिकवून बालमृत्यूला आळा घालणारी व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न या मॉडेलमध्ये आहे.

हे मॉडेल विकसित केल्यानंतर आम्ही पाठपुरावा जारी ठेवला. पाहणी अद्ययावत ठेवली. गडचिरोली जिल्ह्यातल्या ३९ गावांत आमच्या प्रयोगाच्या पहिल्या तीन वर्षात (१९९५-९८) नवजात अर्भकांचा मृत्युदर ६२ टक्क्यांनी खाली आला. बालकांचे मृत्यू रोखले गेल्याने ते प्रमाण १२१ वरून ३० वर आले. अख्ख्या देशाने समोर ठेवलेले हे लक्ष्य आम्ही उर्वरित (प्रगत) देशाच्या कितीतरी आधी गाठू शकलो.

हे संशोधन पुढे ‘लॅन्सेट’ या वैद्यकीय विश्वातल्या अत्यंत प्रतिष्ठित प्रकाशनात प्रसिद्ध झाले आणि जागतिक पातळीवर ‘ट्रेण्ड सेटर’ ठरले. दक्षिण आशिया आणि आफ्रिकेतल्या अनेक देशांनी त्यांच्याकडे हा प्रयोग करण्याची तयारी चालवली आहे. देशाच्या खेड्यापाड्यात या प्रयोगाचा अंगीकार करण्याचा निर्णय भारत सरकारने जाहीर केला. बालमृत्यू रोखण्यासाठी हा प्रयोग सर्व विकसनशील देशांनी राबवावा, असे निर्देश जागतिक आरोग्य संघटना आणि युनिसेफने गेल्याच वर्षी जारी केले.

गेल्या २४ वर्षात याच रितीने केलेली किमान चार संशोधने गडचिरोलीच्या जंगलातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर गेली. महत्त्वाची ठरली. गडचिरोलीतल्या लोकांसाठी इथल्या लोकांबरोबरच केलेल्या अभ्यासाच्या, संशोधनाच्या निष्कर्षांवर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आरोग्य धोरणे ठरवली गेली.
‘योग्य आकाराची तरफ मला कुणी आणून दिली तर मी ही अख्खी पृथ्वीसुद्धा हलवून दाखवीन,’ असे आर्किमिडीज म्हणाला होता.

– तोच अनुभव आम्ही गडचिरोलीत घेतला. ‘ज्ञान’ ही नव्या युगातली तरफच आहे. अनेक पारंपरिक समज या तरफेच्या साहाय्याने उलथून टाकता येतात. खेड्यापाड्यात राहाणाऱ्या गरीब अशिक्षित आदिवासींना बरोबर घेऊन त्यांच्यासाठी केलेल्या अभ्यासाचे निष्कर्ष नवी दिल्लीपासून न्यू यॉर्कपर्यंत आणि लंडनपासून जीनिव्हापर्यंतच्या विचारांना संपूर्णत: नवी दिशा देण्याइतके महत्त्वाचे, सामर्थ्यशाली असू शकतात.
लोकांबरोबरच्या या संशोधनाला पाच महत्त्वाचे आधार असावे लागतात.

१) लोकांना त्या अभ्यासाची गरज असली पाहिजे.
२) तो अभ्यास लोकांच्या सहभागातून झाला पाहिजे.
३) नेमके काय आणि का चालू आहे, ते लोकांना स्पष्टपणाने कळलेले असले पाहिजे.
४) त्या अभ्यासाचा, निष्पन्न होणाऱ्या निष्कर्षांचा लोकांना वापर करता आला पाहिजे.
५) या अभ्यासावर लोकांची मालकी असली पाहिजे.

– हे सारे कुठे सापडू शकेल?

दिवंगत सी.के. प्रल्हाद यांनी मांडलेली संकल्पना वापरून एवढंच म्हणता येईल. – पिरॅमिडमच्या तळाशी ! तिथेच सारी संपत्ती दडलेली असते आणि भविष्यही ! उंच उंच होत जाणाऱ्या पिरॅमिडच्या रुंद होत जाणाऱ्या तळाशी गरीब माणसे असतात. स्त्तिया असतात. आदिवासी आणि खेडुत असतात. या शक्तीहीन माणसांना साधने पुरवणे, त्यांना सबळ होण्यासाठी मदत करणे म्हणजे त्या पायाशी दडलेल्या सुप्त शक्तीला हाकारे घालणे. लोकसहभागातून केलेला अभ्यास संशोधन आणि कृतिशीलतेच्या प्रेरणेतून हे घडू शकते.

नव्याने आर्थिक, औद्योगिक क्षितिजावर उदयाला येणाऱ्या देशांमध्ये जगाच्या व्यवहारात आमूलाग्र बदल घडवू शकणाऱ्या नव्या संशोधनांना बहर आला आहे, तो उगीच नाही. या गरीब देशांकडे अत्याधुनिक संशोधनासाठी लागणारा पैसा नसेल, महागडी तंत्रवैज्ञानिक सामग्री आणि सुविधा नसतील; पण या देशांकडे एक अत्यंत महत्त्वाचे साधन आहे – माणसे.

इंटरनेट आणि संगणकांनी जोडल्या गेलेल्या या आधुनिक जगात माहिती मिळण्याची सुविधा-अॅक्सेस सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध आहे. प्रत्येक मानवी मेंदूमध्ये प्रश्न विचारण्याची अंगभूत क्षमता असते. तशीच उत्तरे शोधण्याची प्रेरणाही असतेच. प्रश्न विचारू शकणाऱ्या, उत्तराचे पर्याय शोधू शकणाऱ्या प्रत्येक माणसाला संशोधक-अभ्यासक होण्यासाठी प्रशिक्षित केले जाऊ शकते.

– हे प्रत्यक्षात शक्य आहे का?
या प्रश्नाचे उत्तर एका चिनी कवितेत मला सापडले होते. तेच येथे देतो.

लोकांकडे जा.
त्यांच्याबरोबर त्यांच्यातले होऊन राहा.
त्यांच्यावर प्रेम करा.
त्यांचे ऐका.
त्यांना जे समजते, माहिती असते तिथून प्रारंभ करा.
त्यांच्याजवळ जे आहे; त्या पायावरच नवे जीवन उभारा.

पु. ल. देशपांडे, सौजन्य – मटा

मला तर कित्येकदा भारतीय संस्कृती नेमकं कशाला म्हणावं तेच कळत नाही. एकीकडून रामभक्तीचे सुंदर उमाळे काढणारा तुळसीदास ‘ढोरं , गॅंवार , शूद्र , पशु ,नारी , ये सब ताडनके अधिकारी ‘ म्हणतो , म्हणजे संत तुळशीदासांच्या मताने गुरं ,खेडवळ माणसं , इतर पशू आणि स्त्रिया ह्मा फक्त चोप खाण्याच्याच लायकीच्या आहेत!

बायकांना नव-यांनीलाथाबुक्क्यांचा प्रसाद देण्याच्या बाबतीत आपल्या देशातल्या लक्षावधी खेड्यांतसर्वधर्मसमभाव आहे. खुद्द दिल्लीतही आपल्या बायकांना फारशा न्यायबुद्धीनं वागवतातचअसं नाही. पुष्कळदा मला वाटतं की ह्मा देशात फक्त पुरुषाला स्वातंत्र्य मिळालं आहे.स्त्रिया पारतंत्रातच आहेत. अशा ह्मा आपल्या देशात भारतीयत्वाचा विचार रुजवायचाआहे.

‘ उपकार म्हणून तुम्हाला ह्मा देशात राहू देतो ‘ ही वृत्ती जशी हिंदूंनी सोडायला हवी तशीच कालबाह्म झालेल्या आणि देशाला पोषक नसलेल्या रुढींच्या उच्चाटनाचं कामकरायला मुसलमान आणि इतर धर्मीयांनीही आपल्यातील भारतीयत्वाला अग्रक्रम द्यायला हवा.

हमीद दलवाईंच्या अनुभवांवरुन मुसलमानात हे विचारपरिवर्तनाचं कार्य किती अवघड आहे हे ध्यानात येतं. इतर धर्मांत आणि जातींत ते सोपं आहे असं नाही. वास्तविक माणसांत देवाला पाहणाऱ्या भटजी , मुल्ला , शेख यांच्या संकुचितपपणाविरुद्ध पूर्वीपासून आमच्या भारतीय संतांनी झोड उठवलेली आहे.

‘ मुल्ला होकर बांग पुकारे वह क्या साहब बहिरा है ?’ असा सवाल कबीरानं केला आहे. महाकवी गालिबनं तर देव फक्त मशिदीतच नसतो हे ठसवण्यासाठी शेखजींना म्हटलं आहे की ‘ शेखजी मला मशिदीत बसून पिऊ दे , वर्ना ऐसी जगह बताव जहॉं खुदा नही! ‘ आमचे तुकोबा विचारतात , ‘ ऐसे कैसे रे सोवळे , शिवता होतसे ओवळे ?’ह्मा सर्व मंडळींची देवावरची श्रद्धा कमी प्रतीची होती असं कोण म्हणेल ?

त्यांनी ते देवत्व माणसांत पाहिलं. कलेच्या ख-या उपासकाला आणि रसिकाला तरराष्ट्रीयतेचं कुंपण देखील संकुचित वाटतं. मग धार्मिक कुंपणांची तर गोष्टच नको.म्हणूनच केशवसुतांनी ‘ ब्राह्मण नाही हिंदुही नाही , न मी एक पंथाचा | तेच पतति की जे आखडती प्रदेश साकल्याचा | खादाड असे माझी भूक | चतकोराने मला न सुख ,कूपातिल मी नच मंडूक | मळ्यास माझ्या कुंपण पडणे अगदी न मला साहे | कोण मला वठणीवर आणू शकतप ते मी पाहे ‘ असं विचारलं आहे.

मुखमें रामनाम बगलमे छुरी , ह्मा तत्वाचं आचरण करणा-याविरुद्ध प्रत्येक काळांतले साहित्यिक , कवी आणि कलावंत उभे राहिलेले आहेत. मुस्लिम धर्मांधतेविरुद्ध प्रेममार्ग सांगणारे सुफी उभे राहिले , जातिभेदाचं पोषण करणा-याविरुद्ध रामी धोबिणीबरोबर संसार करणारा ब्राह्मण चंडिदास ‘ सर्वांहून श्रेष्ठ माणूस त्याहून श्रेष्ठ कोणीही नाही ‘असं सांगत उभा राहिला.

यज्ञामुळे होणारी भरमसाठ पशुहत्या आपल्या देशातली शेती धोक्यात आणीत होती. त्याविरुद्ध गौतमबुद्ध प्रज्ञा आणि करुणेचा संदेश घेऊन उभे राहिले. बुद्धीला सतेज ठेवून प्रज्ञा आणि प्रत्यक्ष वृतीतून जी सिद्ध होते त्या करूणेचा मार्ग प्रमाण मानून ही एकात्मता साधायची आहे. रवीन्द्रनाथांनी त्याला ‘ मानुषेर धर्म माणसाचा धर्म ‘म्हटलं आहे ज्या रुढी आपल्यांत दूरत्व निर्माण करतात त्या दूर सारुन ह्मा प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गानंच भारतीयांची एकात्मता साधली जाईल.

‘ नान्य: पंथा अथ:नाय विद्यते ‘- दुसरा कुठलाच मार्ग यासाठी नाही ‘ समाजाच्या ऐहिक अभ्युदयासाठी ज्यांना तन देता येईल त्यांनी तन , धन देता येईल त्यांनी धन आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वांशी युक्त केल्यामुळे मुक्त झालेलं मन देण्याची ही एक ऐतिहासिक महत्वाची घडी आलेली आहे.

‘ हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणूनच मरणार नाही ‘ असं म्हणूनआंबेडकरांनी धर्माचं प्रवर्तन केलं. कुठल्याही धर्माचा किंवा प्रांताचा माझ्यावर शिक्का असला तरी मी भारतीय म्हणूनच जगेन , अशा विचारचक्र प्रवर्तनाचं हे कार्य आहेआणि ते होणं ही आजच्या काळातली भारताची सर्वांत मोठी गरज आहे….

( राष्ट्रीय एकात्मता परिषदेतील भाषण)

उत्तम कांबळे, सौजन्य – सकाळ

मुलांना भरपूर देऊनही आई कधी रिती होत नाही. ती समृद्धच होते सागरासारखी… कसं जमतं हे सारं जगभरातील मातांना? कोणती ऊर्जा लाभत असते त्यांना? आई कोणत्याही प्रदेशातली किंवा व्यवस्थेनं कोणत्याही जातीत ढकललेली असली तरी तिचं प्रेम सारखंच असतं… जातीच्या कप्प्यात ते कधीच मावत नाही… कोणत्याही सीमांजवळ अडखळत नाही… जगभरातील आयांची भाषा सारखी… स्पर्शातलं वात्सल्य सारखं… हे कसं घडत असेल मला काही कळलेलं नाही, हेही प्रामाणिकपणे सांगायला हवं. तुम्हाला कळलं तर जरूर सांगा.

कधी जगण्याचं, कधी भाकरीच्या शोधात मजल- दरमजल करण्याचं, तर कधी बिनभाकरीचं कारण घडलं आणि आम्हा माय-लेकरात ताटातूट होत राहिली…

मी जन्मल्याजन्मल्या मोठाच प्रश्‍न निर्माण झाला होता. मला पाजण्यासाठी माझ्या आईला दूधच नव्हतं. त्याच वेळेला बाळंत झालेल्या आपल्या मोठ्या बहिणीच्या कुशीत मला तिनं दुधासाठी सोडलं. तेव्हापासून मी मावशीत आई पाहायला लागलो. पुढे मावशीचं दूध आम्हा दोघांना म्हणजे मला आणि तिच्या स्वतःच्या मुलीला कमी पडू लागलं, म्हणून माझ्या आजोबानं आपल्या सासूरवाडीहून एक शेळी आणली. तिच्या दुधावर माझी गुजराण चालू झाली. मी शेळीतही आई पाहायला लागलो…

पुढं माझी आई माझ्या वडिलांबरोबर मिलिटरीत गेली. जाताना तिनं मला आपल्या आईच्या म्हणजे आजीच्या पदराखाली ठेवलं.

मी माझ्या आजीत दोन दोन आया पाहू लागलो. एक तिच्यातली आणि एक माझ्यासाठी जन्माला आलेली आई… प्रत्येक नातवासाठी आजी आईचं रूप घेऊन उभी राहते, हेही मला जाणवायला लागलं…

भाकरीच्या लढाईत आई हरवून गेली. लेकराबाळांवर माया करण्यासाठी, त्यांना मांडीवर खेळवण्यासाठी तिच्याकडे वेळच राहिलेला नव्हता…

आईच्या मांडीवर झोपण्याची हौस पुरी व्हावी, म्हणून मी माझ्या दुसऱ्या मावशीकडं जाऊ लागलो. निवांत तिच्या मांडीवर डोकं टेकवून झोपी जायचो. तिच्यातही मला आई दिसायची…”माय मरो मावशी उरो’ या शाळेत मास्तरांनी पाठ फोडून शिकवलेल्या म्हणीही आठवायला लागल्या…

शिक्षणासाठी मी गाव सोडलं आणि ओघानंच आईही सुटली… रायबागमध्ये हायस्कूलला असताना शिकंदर नावाचा मित्र भेटला. खूप जिव्हाळ्याचा झाला.

दुष्काळात होरपळणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डिंगमध्ये रोज मक्‍याची भाकरी, मक्‍याचा भात, मक्‍याचं पिठलं आणि मक्‍याचं उपीट मिळतं हे त्याच्या लक्षात आलं. अधूनमधून तो मला आपल्या घरी घेऊन जाऊ लागला. त्याच्या आईशी माझी ओळख झाली. त्याच्या आईचं नाव शरिफा… अतिशय सुंदर आणि कष्टाळू आई होती ती… तिच्या पंखाखाली तिनं स्वतः जन्माला घातलेले बारा मुलगे आणि एक मुलगी अशी तेरा लेकरं होती. ती मला आपल्या मुलांबरोबर त्यांच्याच थाळीत जेवायला लावायची. जेवण वाढून संपलं, की दोन-चार वितांवर बसायची. आम्ही भरभरून जेवू लागलो, की ती आपल्या दोन्ही हातांची बोटं आपल्याच कानावर काडकाड मोडून आनंद व्यक्त करायची. खा-खा, बोर्डिंगवर पोटभर मिळंल की नाही माहीत नाही… माझ्या शिकूबरोबर रोज घरी येत जा, असा ती आग्रह धरायची…

तिनं कधीच मला किंवा आपल्या लेकरांना विचारलं नाही, की आपल्या घरात, आपल्या लेकरांच्या थाळीत, आपल्या लेकरांच्या मांडीला मांडी लावून जेवणाऱ्या या पोराची जात कोणती, धर्म कोणता?

मी अनेकदा शिकंदरच्या घरात जायचो… चिलीम आणि अधूनमधून विडी ओढणाऱ्या त्याच्या वडिलांशी गप्पा मारायचो… छान वाटायचं…

स्वतःची इतकी सारी मुलं असताना शिकंदरची आई माझ्यावरही भरपूर प्रेम का करते, असा प्रश्‍न निर्माण व्हायचा; पण मी तो कधीच विचारला नाही…

ईद असो, लग्न समारंभ असो मी शिकंदरच्या घरी जायचो… भरपूर खायचो… खूप खूप खायचो… मी जसा खात जाईन तसा माझ्या या मॉंचा चेहरा उजळत जायचा… ती मला एकदा म्हणाली होती, “”मेरे खुद के तेरा बच्चे है लेकिन फिर भी तू तो मेरा चौदवी का चॉंद है…”

आई आपल्या लेकराचं रूपांतर माणसातच नव्हे तर सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांमध्येही करते नाही का… लेकराची लायकी कशी का असेना; पण आईला मात्र तिच्या रक्तामांसाचा गोळा सूर्य, चंद्रच वाटत असतो… मी तर उपरा; पण तिच्या प्रेमानं हे उपरेपण दूर करून मलाही चंद्राच्या रांगेत बसवलं होतं…

मुलगा म्हणून मला स्वीकारताना या मॉंच्या आणि माझ्यामध्ये माणसांनीच निर्माण केलेले कोणतेच धर्म, कोणत्याच जाती आड आल्या नाहीत…

मॉं तुझे सलाम!
हायस्कूलचं शिक्षण संपवून सांगलीत शांतिनिकेतन महाविद्यालयात आलो. आणीबाणीचा काळ होता तो. शिवाय, आईपासून पुन्हा दूरच राहायचं होतं…
इथंही भाकरीसाठी आणि शिक्षणासाठी आणखी एक लढाई वाढून ठेवली होती. असंख्य विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला होता. त्यापैकी मीही एक.

महाविद्यालयीन जीवनात कोणतं तरी कारण घडलं आणि बापू ठाणेदार नावाचा मित्र मला मिळाला. होस्टेलमध्ये आम्ही अनेक विद्यार्थी भाकऱ्या वाळत टाकून किंवा सुतळ्यांमध्ये त्या ओवून त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी चित्रविचित्र प्रयोग करायचो. बापूलाही ते माहीत होतं. तो त्याच्या आईला हे सारं सांगायचा. तिचं नाव सुमन. बापूची आई शिक्षिका होती. दोन मुलगे आणि दोन मुली असा तिचा कुटुंबकबिला. परिस्थितीच्या एका फटकाऱ्यानं तिला विधवा केलं होतं. कपाळ पांढरफट केलं होतं…

बापूच्या आईनंही मला मुलाप्रमाणं सांभाळायला सुरवात केली. सणावाराला आणि इतर दिवशीही भरपेट जेवण देऊ लागली. सणाच्या दिवशी पाटाभोवती रांगोळी काढली जायची. आम्ही राजकुमाराप्रमाणं जेवायला बसायचो. जेवतानासुद्धा एक संस्कृती पाळायची असते, हे या माऊलीनं आम्हाला, खरं तर मला एकट्याला शिकवलं. तिच्या मुलांना ते अगोदरच माहीत होतं. गावाकडं बहुतेक वेळा डाव्या हातात भाकरी पकडायचो. उजव्या हातानं ती मोडायचो. हे सारं आता बंद झालं होतं. डावा हात अन्नाला लावायचा नाही. सुरवातीला वरण- भाताचे चार घास, मग पोळी मग पुन्हा भात. अधूनमधून लोणच्याला बोट लावून ते चाखायचं वगैरे वगैरे…

अनेकदा बापूच्या घरी मुक्काम व्हायचा. रात्री-अपरात्री उठून माऊली माझ्या अंगावरचं पांघरूण नीट करायची. मी तिच्या मुलासारखा आणि ती माझ्या खरोखरच्या आईसारखी वागत होती. तिच्यात आणि माझ्यात समाजव्यवस्थेनं निर्माण केलेलं भलं मोठं अंतर कधीच गळून पडलं होतं. ती ब्राह्मण आहे, हे मला कधीच तिच्या वर्तनातून जाणवलं नाही. उलट, व्यवस्था मोडणारी एक रणरागिणी अशीच ती मला वाटली. सुमारे तीस वर्षांनी पुण्यात तिची भेट झाली. एवढ्या मोठ्या कालखंडानंतरही माझ्याविषयी असलेला जिव्हाळा कमी झालेला नव्हता. मी तिला एक साडी घेतली होती आणि माझ्या एका मुलानं ती घेतली म्हणून नंतर ती इमारतीमधील आपल्या मैत्रिणींना दाखवत होती.

कोल्हापुरात शिक्षणासाठी आलो. गोखले कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहू लागलो. तिथं भाकरी थापण्यासाठी अनसूया शिंदे नावाची मराठा समाजातील महिला यायची. तिलाही दोन मुली, एक मुलगा, नवरा. एका छोट्याशा जागेत ती राहायची. खूप छान भाकऱ्या आणि अन्य सर्व स्वयंपाक करायची शिंदे मावशी. काही दिवसांनी मेस बंद पडली आणि भाकरीचा प्रश्‍न पुन्हा फणा काढून उभा राहिला. काही विद्यार्थी गावी परतले. मला ते शक्‍य नव्हतं; कारण शिक्षणासाठी मी आलो होतो. आमची उपासमार होतेय हे शिंदे मावशीच्या लक्षात आलं. ती होस्टेलसमोरच राहायची. अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. शिंदे मावशी मदतीला आली. एक तर तिचीही परिस्थिती कठीण बनली होती. मेस बंद पडल्यानं तिचंही काम बंद झालं होतं. घरची परिस्थिती अतिशय कठीण असताना तिनं सकाळ, संध्याकाळ मला दोन-दोन भाकऱ्या आणि आमटीनं भरलेलं ताट द्यायला सुरवात केली. जेवताना खूप आनंद वाटायचा; पण पैसे कोठून द्यायचे हा प्रश्‍नही निर्माण व्हायचा. पैशाविषयी एक दिवस धाडस करून विचारलंच, “”मावशी तू जेवण देते आहेस हे ठीक आहे; पण बिल कसं देणार, हा प्रश्‍न आहे.” यावर मावशीनं हसत उत्तर दिलं, “”का रे बाबा लेकराकडून आईनं जेवणाचं बिल मागण्याची पद्धतबिद्धत सुरू झाली आहे का? आमच्याकडं नाही ही पद्धत. निवांत जेव आणि भरपूर अभ्यास कर.”

शिंदे मावशीनं अन्न दिलं नसतं तर काय झालं असतं? कदाचित कोल्हापूर सोडावं लागलं असतं, शिक्षण थांबवावं लागलं असतं किंवा अन्य काही तरी झालं असतं… पायाखालची वाट दगा देणारी ठरली असती. दिशा चुकल्या असत्या… भूक कुठंही घेऊन गेली असती मला… ओढत… फरफटत… जेथे दिशाच असत नाहीत अशा ठिकाणी…

पंचवीस-तीस-चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा व्यवस्थेच्या डोळ्यावर जातीचं कातडं टणक होतं, तेव्हा घडत होत्या या साऱ्या गोष्टी… विविध जाती-धर्मांतील या साऱ्या आया घडवत होत्या… व्यवस्थेच्या गालावर थप्पड मारत घडवत होत्या…

या महिलांच्या मध्ये फक्त माताच नव्हती, तर व्यवस्थेच्या विरुद्ध जाणारा विद्रोहही होता. आम्ही माता आहोत जाती नव्हे, असंच काही तरी त्या मला सांगत होत्या.

नोकरीच्या निमित्तानं नाशिकमध्ये स्थिरावलो. कवी किशोर भेटला. त्याच्याकडे ये-जा होऊ लागली. या भेटीत त्याच्या आईनं आपले पंख पसरले आणि मलाही मुलगा समजून आपल्या पंखाखाली घेतलं. भरपूर प्रेम केलं माझ्यावर. म. गांधींच्या प्रार्थनासभेत म्हटलेल्या प्रार्थना मला किशोरच्या आईनं म्हणजे सुशीलानं अनेकदा ऐकवल्या होत्या. तिला कसली तरी पेन्शन मिळायची. तुला पैसे हवेत का, असं अधूनमधून ती विचारायची. तिच्या खोलीत खूप गप्पा मारायचो. पुढं युरोपच्या दौऱ्यावर जाताना तिनं आशीर्वाद घेण्यासाठी घरी बोलावलं. भरपूर जेवायला दिलं. जाताना हातावर दही ठेवलं. दहा की वीस रुपयांची नोट ठेवली. प्रवासात ठेव बरोबर, असं ती म्हणाली. मी आगाऊपणा करत पटकन म्हणालो, “”आई, अगं परदेशात डॉलर चालतात; रुपये नाही.” यावर ती म्हणाली, “”आईनं दिलेला पैसा सगळीकडंच चालतो.”

सुशीला आई आजारी पडली. एकदा तिला डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. ती सारखी माझी आठवण काढायची. मीही हॉस्पिटलमध्ये तिच्या उशाशी बसायचो. तिला बरं वाटायचं. असाच सारखा सारखा येत जा, असा ती आग्रह धरायची. तू माझा तिसरा मुलगा आहेस, असं सांगायची. माझ्या लेकराचीही चौकशी करायची.

सुशीला आईच्या निधनानंतर जे काही धार्मिक विधी करायचे होते, त्यासाठी मीही तिसरा मुलगा म्हणून उपस्थित होतो. विधी चालू असताना माझी नजर एकसारखी तिच्या खोलीकडं जायची. घरातून बाहेर पडताना ती माझ्या मागंमागं येत आहे असा भास होऊ लागला. ती पुन्हा माझ्या तळहातावर दही ठेवतेय… पुन्हा माझ्या हाती पैसे ठेवतेय… पुन्हा ती सांगतेय की, आईचे पैसे जगभर चालतात… पळतात…

खूप अस्वस्थ होत होतं. खरंच आई हयात नसतानाही ती असते… तिच्या आठवणी जिवंत होऊन आशीर्वादाचे, प्रेमाचे पांघरून होऊन उभ्या राहतात. आई गेल्यानंतर चादरीलाच आई समजून आम्ही भावंडांनी ती चादर पांघरली, असं कविवर्य सुर्व्यांनी एका कवितेत म्हटलंय.

सुर्व्यांची आठवण सुटी येत नाही, ती कृष्णाबाईंना बरोबर घेऊन येतेय. कृष्णाबाईनंही माझ्यावर मुलगा समजून प्रचंड प्रेम केलं. अजूनही करतेय. तिच्या मुलांना लाभलं नसेल एवढं प्रेम मला लाभलं. जेवण वाढताना तिचा एक विचित्र सिद्धांत असतो. आपल्याला जेवढं वाटतं, तेवढंच खाता येत नाही, तर तिला जेवढं वाटेल तेवढं खायचं असतं. एकदा मी तिला रागावून म्हणालो, “”आई तू कशाला एवढा आग्रह धरतेस? माझी शुगर वाढेल, डायबेटिस वाढेल?”

त्यावर आई उसळून म्हणाली, “”आईच्या हातचं खाल्लं की शुगर वाढेल असं कोण मूर्ख डॉक्‍टर म्हणतो?”
आईच्या प्रश्‍नावर माझ्याकडं उत्तर नव्हतं. मीही माझा अनुभव थोडा तपासून पाहिला. आईच्या म्हणजे कृष्णाबाईंच्या हातचं खाल्ल्यानंतर माझी शुगर खरंच वाढलेली नव्हती. आता ही मानसिकता आहे, की खरंच मी कमी जेवलो होतो, की माझ्या नसानसात पसरलेली आई होती, यापैकी मला काहीच सांगता येणार नाही. कृष्णाबाईंनं आपलं आत्मचरित्रच मला अर्पण करून टाकलं आहे आणि एका अर्थानं सुर्व्यांना सांगितलं आहे, की मास्तर माझा जीव नवऱ्यापेक्षा मुलात अधिक गुंतलेला आहे.

व्याधींवर मात करत लढावं कसं आणि जगावं कसं हे शिकवण्यासाठी आईचं रूप घेऊन माझ्यासाठी धावली ती आणखी एक आई. साधना प्रभाकर गणोरकर आई… प्रसिद्ध डॉक्‍टर संजय गणोरकरांची आई… तिची आणि माझी ओळख नेमकी कशामुळे झाली, हे मला माहीत नाही. ते शोधण्याची मला आवश्‍यकताही कधी वाटली नाही. कॅन्सरसारख्या एक धोकादायक आजारावर मात करून ही आई नाशिकपासून काही अंतरावर स्वतः बांधावर राहून शेती करते आहे. ही आई एकदम कर्तव्यदक्ष, बोलण्यात रोखठोक, आपलं चुकलंच तर कानाखाली आवाज काढायला कधी घाबरायची नाही. या आईलाही स्वतःची मुलं- बाळं, नातवंडं, सुना… सारे उच्चविद्याविभूषित. आपापल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेले; पण ही आई मात्र राबण्यात आनंद मानणारी. लेकरांचा संसार पाहत पाहत स्वतःही स्वाभिमानाचं जगणं जगणारी. एकदा तिनं मला घरी बोलावलं. खाऊ घातलं. घर फिरून दाखवलं. एक जुनी तलवारही दाखवली. माझ्या बायकोला सून समजून साडीचोळी केली. शेवटी म्हणाली, “”माझा परवा वाढदिवस झाला. माझ्याकडे जे काही पैसे होते, ते साऱ्या लेकरा-बाळांना वाटले. तुझा वाटाही बाजूला काढला आहे. मुकाट्यानं तो घे. वाद घालू नकोस.”

आईनं माझ्या हातात एक सुंदर पाकीट दिलं. त्यात काही रक्कम होती. आईनं सहजपणे मला काळजात जागा दिली आणि नंतर सात-बारातही…

एकदा आई, बाबांबरोबर म्हणजे प्रभाकर गणोरकरांबरोबर श्रीलंकेत जाऊन आली. दौरा संपल्यावर तिनं मला घरी बोलावलं. दौऱ्यातून आणलेलं आणि माझ्यासाठी जपून ठेवलेलं तळहाताएवढं एक सुंदर पिंपळपान मला दिलं. अतिशय आनंदानं या पानाचा इतिहास सांगताना म्हणाली, “”भगवान बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्या वृक्षाच्या फांद्या सम्राट अशोकाच्या मुलांनी श्रीलंकेत नेल्या. तेथे हा वृक्ष लावला. तो वर्षानुवर्षे टिकवला. एकातून दुसरा वृक्ष निर्माण झाला. कोलंबोत मी स्वतः तुझ्या बाबांसह अशाच वृक्षाखाली गेले. तेथे वृक्षाच्या इतिहासाची आणि त्याला लाभलेल्या बुद्ध परंपरेची माहिती लिहिली होती. मला वाटलं, की एक पान तुझ्यासाठी तोडावं. तुला बुद्ध आवडतो; पण तिथला सुरक्षारक्षक काही केल्या पान तोडू देईना. शेवटी त्याला कुणाशी तरी बोलण्यात गुंतवलं आणि तुझ्यासाठी एक पान तोडून घेतलं. हे ते पान! जपून ठेव…”

मला मुलगा समजणाऱ्या मातांची मी अशी विलक्षण रूपं पाहत आलो. आई मला नेहमीच जगातली सर्वांत मोठी धर्मनिरपेक्षता वाटली. लेकरासाठी हवं ते करणारी वाटली. एकाही मातेनं मला कधीच विचारलं नाही, की तुझी जात कंची? किंवा तुझी इत्ता कंची?

जात, पात, धर्म, प्रवेश, पंथ यांना छेदून जी उभी असते तीच तर आई असते, असं माझं स्वतःचं मत झालंय. मला लाभलेल्या आयांना मी आजपर्यंत काही दिलेलं आहे, असं मला कधी आठवत नाही. त्याच देत राहिल्या मला आणि देता देता वजा होण्याऐवजी अधिकच होत राहिल्या. कसं जमतं हे सारं जगभरातील मातांना? कोणती ऊर्जा लाभत असते त्यांना? आई कोणत्याही प्रदेशातली किंवा व्यवस्थेनं कोणत्याही जातीत ढकललेली असली तरी तिचं प्रेम सारखंच असतं… जगभरातील आयांची भाषा सारखी… स्पर्शातलं वात्सल्य सारखं… हे कसं घडत असेल मला काही कळलेलं नाही, हेही प्रामाणिकपणे सांगायला हवं. तुम्हाला कळलं तर जरूर सांगा. आई या विषयावर जरूर बोलू. ते आनंददायी असतं. तूर्त एवढंच, की…

आभाळभर पसरत असते माय
सागरभर विस्तारत असते माय
धर्म, पंथ, प्रदेश नि जाती संपवत
लेकरासाठी उभी ठाकत असते माय!!