Archive for the ‘विज्ञान’ Category

अनिल काकोडकर, सौजन्य – लोकसत्ता

आपल्याला विकास साधायचा असेल तर अणुऊर्जेशिवाय पर्याय नाही. असे असतानाही अणुऊर्जेसंबंधीच्या कोणत्याही प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने न पाहता, हा प्रकल्प म्हणजे भविष्यात उद्भवणारे महासंकट आहे, असे चित्र उभे करणे, हे आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्यासारखे आहे.

जैतापूर प्रकल्पावरून महाराष्ट्रात सध्या मोठा वादंग सुरू आहे. त्यात मार्चमध्ये जपानमधील फुकुशिमातील अणुभट्टय़ांमधील अपघातानंतर तर अधिकच  भर पडली आहे. विकास आणि पुरोगामी विचारांच्या बाबतीत महाराष्ट्र कायम अग्रेसर राहिला आहे. म्हणूनच फुकुशिमा दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्राची प्रतिक्रिया आणि भविष्याच्या दृष्टीने आपली ऊर्जेची गरज, तसेच भावी विकास प्रकल्पांबाबत एकूणच भूमिका कशी असावी, याबाबत काही विचार मांडणे मला गरजेचे वाटते.

फुकुशिमा दुर्घटना ही सुनामीमुळे घडली. तथापि संपूर्ण जगभर सुनामीपेक्षाही मोठा परिणाम या घटनेचाच झाला. सर्वाच्या मनात मोठी भीती निर्माण झाली. प्रत्यक्षात सुनामीचाही एवढा परिणाम लोकांच्या मनावर झाला नाही. त्यामुळे एखादा धोका, जोखीम याचा प्रत्यक्षात परिणाम आणि अंदाज- तर्क याद्वारे मांडल्या जाणाऱ्या परिणामांबाबत सखोल विचार होणे आवश्यक आहे.

चीन, अमेरिका, जपान आणि रशिया ही आज जगातील सर्वात जास्त वीजनिर्मिती करणारी राष्ट्रे आहेत. भारत पाचव्या क्रमांकावर आहे. तथापि, दरडोई वीजनिर्मिती पाहता, भारताचा क्रमांक १५० वा आहे. चीन ८० व्या क्रमांकावर, रशिया २६ व्या क्रमांकावर, जपान १९ व्या क्रमांकावर आणि अमेरिका ११ व्या क्रमांकावर आहे.

दरडोई वार्षिक वीजवापर हे विकासाचे मुख्य परिमाण मानले जाते. भारतात वार्षिक दरडोई वीजवापर साधारणत: ६५० ते ७०० किलोव्ॉट अवर एवढा आहे. तो ‘ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को- ऑपरेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट’- (ओईसीडी) चे सदस्य नसलेल्या राष्ट्रांच्या सरासरीपेक्षा निम्म्यापेक्षाही कमी आहे. संपूर्ण जगाच्या सरासरी वीजवापराच्या एक चतुर्थाश आणि ‘ओइसीडी’चे सदस्य असलेल्या राष्ट्रांच्या सरासरी वीजवापराच्या १४ पटींनी कमी आहे. या पाश्र्वभूमीवर आता आपले उद्दिष्ट, काय असायला पाहिजे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. माझ्या मते पाच हजार  किलोव्ॉट अवर हा उचित आकडा आहे. तो जागतिक सरासरीच्या तुलनेत बरा आणि ‘ओईसीडी’ सदस्य राष्ट्रांच्या सरासरीच्या सुमारे ५० टक्के एवढा आहे. दीडशे कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशातील भविष्यातील दरडोई वीजवापर पाहता भविष्यात आपल्याला जगाच्या आजच्या वीजनिर्मितीच्या ४० टक्के अधिक वीजनिर्मितीची गरज आहे. अर्थात नजिकच्या भविष्यातील लोकसंख्या, विकास प्रकल्प, गरजा विचारात घेऊनच हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हेच उद्दिष्ट गाठण्यासाठी चीनला मात्र आपल्यापेक्षा निम्मी वीजनिर्मिती वाढवावी लागणार आहे. आपल्याकडील कोळशाचे भूमिगत साठे, कोळशाच्या खाणी वीजनिर्मितीसाठी आणखी दहा- अकरा वर्षे आपल्याला उपयोगी पडू शकतील.

या पाश्र्वभूमीवर अणुऊर्जा आणि सौरऊर्जा हे दोनच ऊर्जास्रोत आपल्याला विकास कामातील आव्हानांचा मुकाबला करण्यात, प्रगती साध्य करण्यात सहाय्यभूत ठरणार आहेत. तथापि, इतर ऊर्जास्रोतांकडे विशेष लक्ष द्यायचे नाही, असा मात्र याचा अर्थ नव्हे!

उपलब्ध असलेल्या सर्व ऊर्जास्रोतांचा योग्य आणि पुरेपूर वापर करून घेण्याची गरज आहे. सर्वप्रथम सौरऊर्जेबाबत पाहू! गरजपूर्तीसाठी सुमारे साडेचार दशलक्ष हेक्टर क्षेत्र यासाठी वापरावे लागेल. भारतातील एकूण ओसाड, नापीक जमीनक्षेत्राच्या एकचतुर्थाश इतके हे जमीनक्षेत्र आहे. याव्यतिरिक्त सौरऊर्जा तंत्रज्ञान अधिक विकसित, प्रगत करण्याचीही गरज आहे. शिवाय ते आपल्याला कमी, वाजवी खर्चात कसे वापरता येईल, हेही पाहिले पाहिजे. सूर्य काही २४ तास तळपत नाही. त्यामुळे कमी खर्चात ऊर्जा साठवण तंत्रज्ञान उपलब्ध करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञान विकासाच्या या पैलूकडे तातडीने लक्ष दिले गेले पाहिजे. या व्यतिरिक्त ‘फ्यूजन एनर्जी’ (एकत्रित ऊर्जा) आणि तत्सम इतर ऊर्जा तंत्रज्ञान विकासाच्या मुद्दय़ांचाही विचार व्हावा. आपल्याकडील कोळशाचे भूमिगत साठे फार फार तर आणखी ४०/५० वर्षे पुरतील. तत्पूर्वी पर्यायी ऊर्जास्रोत तयार ठेवणे आवश्यक आहे.

संपूर्ण जगाच्या तुलनेत वीज टंचाईची समस्या आपल्या देशात अधिक लवकर जाणवणार आहे. उर्वरित जगाला इतक्या लवकर ही समस्या ग्रासणार नाही, पण भारताला मात्र ती नजिकच्या काळात चांगलीच जाणवणार आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून त्या दृष्टीने अणुऊर्जेकडे पाहिले पाहिजे. अणुऊर्जा ही कमी खर्चात उपलब्ध होते. आजच जगाच्या गरजेच्या १६ टक्के वीज ही अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे उपलब्ध होते आहे. फुकुशिमा दुर्घटना, चेर्नोबिल दुर्घटना होऊनसुद्धा औद्योगिक वापराच्या ऊर्जेमध्ये अणुऊर्जा वापरात सर्वात कमी धोके आणि जोखीम आहे. हवामान बदलामुळे होणारे परिणाम, आणखी तत्सम इतर गोष्टी विचारात घेतल्या तरी अणुऊर्जेचा लाभ, फायदा जास्तच आहे. असे असूनसुद्धा आपल्याला अणुऊर्जेचा एवढा प्रमाणाबाहेर बाऊ का वाटावा?

संयुक्त राष्ट्रांच्या ‘चेर्नोबिल’ आरोग्यविषयक तज्ज्ञ समितीचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेने २००६ मध्ये प्रसिद्ध केला. चेर्नोबिल दुर्घटनेने बाधित झालेल्यांपैकी ४७ जणांचा २००४ पर्यंत मृत्यू झाला. १९९२ ते २००२ या दहा वर्षांच्या काळात चार हजार जणांना घशाचा कर्करोग झाल्याचे निष्पन्न झाले. त्याने मृत्यू पावलेल्यांची संख्या एक टक्क्य़ांपेक्षाही कमी आहे. इतरांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. चेर्नोबिल दुर्घटनेचे परिणाम पुढे काही वर्षे जाणवत राहिले, तरी ते बॉम्बस्फोटानंतर होणाऱ्या दुष्परिणामांच्या अडीच पटींनी कमी होते, ही वस्तुस्थिती असल्याचे या अहवालात म्हटले आहे. रशियातील चेर्नोबिल दुर्घटनेच्या आसपासच भारतात भोपाळमध्ये विषारी वायू दुर्घटना घडली. त्यात साडेतीन हजारावर लोकांचे बळी गेले. तरीसुद्धा आपल्या मनात चेर्नोबिल घटनाच कायमची घर करून बसली आहे.

फुकुशिमा दुर्घटनेत किरणोत्साराने अद्याप एकही मृत्यू झालेला नाही. जे मृत्यू झाले ते भूकंप आणि सुनामीमुळे झालेले आहेत. लोकांच्या डोक्यात, मनात अकारण भीती घर करून आहे आणि ती निघून जाण्यासाठी काही काळ जावा लागेल. किरणोत्सर्जनाचा थोडाफार परिणाम ज्या लोकांवर झाला आहे, त्याने फार मोठी हानी होण्याची शक्यता नाहीच. फुकुशिमा दुर्घटना सुनामीमुळे घडली. या सुनामीने १३ हजारावर लोक मृत्युमुखी पडले, तर आजही १४ हजारांवर लोकांचा ठावठिकाणा, लागलेला नाही. तरीही सुनामीपेक्षा फुकुशिमा दुर्घटनेचाच प्रसिद्धीमाध्यमांत अधिक बोलबाला झाला. सुनामीबद्दल कमी, पण फुकुशिमातील अणुभट्टय़ांच्या दुर्घटनेनेच वृत्तपत्रांमधील रकानेच्या रकाने भरले गेले.

भूकंपप्रवण क्षेत्र म्हणून विचार केला तर भारतातील हिमालय क्षेत्रातील पट्टा काहीसा तसा आहे. म्हणूनच धोरणात्मक बाब म्हणून आपण त्या भागात अणुऊर्जा केंद्र उभारलेले नाही. जपानच्या तुलनेत आपल्याकडे सुरक्षेचा विचार अधिक झाला आहे. ज्यामुळे सुनामीचा धोका संभवतो अशी भूकंपाच्या संभाव्य केंद्रबिंदूची ठिकाणे जपानच्या तुलनेत भारतात भूकंपप्रवण क्षेत्रापासून किमान दहा पट अधिक दूर अंतरावर आहेत. ज्या अणुभट्टय़ांची दुरुस्ती, उपाययोजना शक्य आहे त्या अणुभट्टय़ा जपाननेही बंद केलेल्या नाहीत. अर्थात हे फुकुशिमा दुर्घटनेचे समर्थन नव्हे! अशा दुर्घटना होता कामा नये हेही तितकेच खरे आहे. फुकुशिमा दुर्घटनेपासून बोध घेऊन आपण सध्या आहे त्यात संतुष्ट न राहता आपल्या अणुऊर्जा प्रकल्पांची सुरक्षा आणखी वाढविली पाहिजे.

अणुभट्टय़ांसाठीच्या ‘एएचडब्ल्यूआर’ प्रगत प्रणालीत अंगभूत सुरक्षा क्षमता अधिक असते. ती किंवा तत्सम प्रणाली (सिस्टिम) आपल्याकडील अणुभट्टय़ांसाठी आणण्याच्या दृष्टीने त्वरेने पावले उचलली गेली पाहिजेत. तथापि, दरवाजा ठोठावू लागलेली वीज समस्या, हवामान बदलाचे धोके, संकटे आणि या सर्वावर मात करण्यासाठी आपल्याकडे असलेला अत्यंत कमी वेळ या गोष्टीसुद्धा नजरेआड करून चालणार नाहीत.

अणुऊर्जेसंबंधीच्या कोणत्याही प्रकल्पाकडे सकारात्मक दृष्टीने न पाहता, हा प्रकल्प म्हणजे भविष्यात उद्भवणारे महासंकट आहे, असे चित्र उभे करणे आणि स्वत: गोंधळून लोकांच्याही मनात भीतीची भावना वाढविण्यास हातभार लावणे, प्रगती आणि विकासाच्या मार्गात अडथळे निर्माण करणे, महत्त्वाकांक्षी ध्येय गाठण्यापासून भारताला वंचित ठेवण्याची प्रवृत्ती ही स्वत:च्याच पायावर धोंडा मारून घेणारी आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर, सौजन्य – लोकसत्ता

ndabholkar@rediffmail.com


शंभराहून अधिक देशांत स्वत:चा आध्यात्मिक व आíथक पसारा असणाऱ्या सत्यसाईबाबांचे निधन झाले. अत्यंत सामान्य ग्रामीण कुटुंबातून आलेल्या. तेलुगू भाषाच बोलता येणाऱ्या आणि स्वत:च्या राज्याच्या सीमा क्वचितच ओलांडणाऱ्या बाबांच्या प्रभावाचा हा विस्तार थक्क करणारा आहे. हजारो खेडेगावांना िवधन-विहिरी, पंचतारांकित दर्जाच्या शिक्षण संस्था, त्याच तोडीची नि:शुल्क आरोग्य व्यवस्था देणारी इस्पितळे अशा अनेक सेवासुविधा सत्यसाईबाबांच्या ट्रस्टमार्फत पुरविण्यात येतात. त्यांची एकूण मालमत्ता ४० हजार कोटी ते एक लाख कोटी रुपये एवढी महाप्रचंड असल्याचे अंदाज आहेत. राष्ट्रपती, पंतप्रधान, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, झगमगते सितारे, सेलिब्रेटींचे सेलिब्रेटी मानले गेलेले क्रिकेटचे परमेश्वर अशा असंख्य लोकांचा समावेश सत्यसाईबाबांच्या भक्तगणांत आहे. गेल्या तीन-चार दशकांत सत्यसाईबाबांनी असंख्य वेळा आपल्या भक्तसमुदायासमोर चमत्कार केले. विभूती, रुद्राक्ष, सोन्याची अंगठी, चेन, भारी घडय़ाळे इत्यादी वस्तू त्यांच्या रिकाम्या हातात अवकाशाच्या अथांग पोकळीतून आपोआप येत होत्या. भाविकांना त्यांचा प्रसाद मिळत होता.

चमत्कार करण्याची शक्ती ही परमेश्वराने मला बहाल केलेले ‘व्हिजिटिंग कार्ड’ आहे असे ते सांगत. ‘मानवी उद्धारासाठी पाठवलेला महापुरुष तो हाच’ याची खूण जनसामान्यांना पटावी यासाठी जगन्नियंत्याने दैवीशक्तीचा आविष्कार घडवणारे हे चमत्कार करण्याची अद्भुत शक्ती त्यांना बहाल केली आहे, असा त्यांचा दावा होता. ते जाहीरपणे सांगत की, ‘माझ्या अमर्याद शक्तीचा केवळ मर्यादित बाह्य़ आविष्कार म्हणजे ‘चमत्कार’. अशा काही उच्च दर्जाच्या शक्ती आहेत की, त्यांच्या मार्फत तुम्ही आपल्या मनातून संकल्पाने वा शुभेच्छेने वस्तू निर्माण करू शकता. (माझ्यासारखा) जो मनुष्य ईश्वरीशक्तीनुसारच काम करतो त्याच्या बाबतीत या शक्ती संपुष्टात येण्याचा प्रश्नच येत नाही. त्याच्या मार्फत साक्षात ईश्वरीशक्तीच काम करीत असते. ज्याच्यापासून वेद निघाले त्या माझ्या आध्यात्मिक वैभवाच्या तुलनेत माझे चमत्कार हे प्रचंड हत्तीवर बसलेल्या चिलटाप्रमाणे आहेत.’ हे सर्व प्रतिपादन आजच्या वैज्ञानिक जगाचा मूलाधार असलेल्या कार्यकारणभावाला रद्दबातल ठरवणारे आहे. याबाबतचे ‘सत्य’ शोधले तर? परंतु याबाबतच्या शास्त्रीय तपासणीची सर्व आव्हाने सत्यसाईबाबांनी संपूर्ण दुर्लक्षित केली. म्हणूनच त्यांच्या दु:खद निधनाबाबत संपूर्ण सहवेदना दाखवूनही काही प्रश्न उपस्थित करणे आवश्यक वाटते. कृपया तो औचित्यभंग मानला जाऊ नये.

या देशातील बहुतेकांची मानसिकता ही चमत्कारशरण असते. सामान्यपणे असंभव, अशक्य, अतक्र्य वाटणाऱ्या घटनांस अगर कृतींस चमत्कार म्हटले जाते. चमत्कार करणाऱ्या व्यक्तीबद्दल लोकांच्या मनात प्रचंड आदर, पूज्यभाव आणि श्रेष्ठत्वाची भावना असते.बाबांच्या चमत्कारावरील विश्वास हा खरे तर प्रचितीचा भाग नसतो; तर श्रद्धेचा मामला असतो. ज्या बाबावर त्याच्या अनुयायांची श्रद्धा असते, त्याला स्वत:चे कल्याण बाबांच्या हातांत सुरक्षित आहे याबद्दल नि:शंकता असते. लहान मुलांची आपल्या आईवडिलांवर जशी श्रद्धा असते, तसाच हा प्रकार आहे. ज्ञानेंद्रियांपलीकडच्या सत्याचा – परतत्त्वाचा स्पर्श झालेल्या या महापुरुषांच्या खाणाखुणा कोणत्या? ही असामान्य माणसे दोन प्रकारे सामान्यांपेक्षा वेगळी असतात असे मानले जाते. एक तर त्यांच्याकडे दैवी सामथ्र्य असते, विज्ञानाचे नियम लागू नसल्याने ते चमत्कार करू शकतात. अशी व्यक्ती जे भविष्य वर्तवते, ते खरे ठरते. तिने उच्चारलेला शब्द आपोआप सत्य बनतो. अथवा दुसरे म्हणजे, अशा व्यक्ती पराकोटीच्या सद्वर्तनी, सद्गुणी, सज्जन असतात. त्यांचे जीवन हे वेगळ्या पातळीवरचे जीवन असते. तुकाराम, विनोबा, गाडगेबाबा ही या स्वरूपाची उदाहरणे आहेत. वरील दोन्ही स्वरूपांच्या खाणाखुणा शोधण्याचे अजब आकर्षण बहुतेकांना असते. त्या मानसिकतेतून तपासणीला तयार नसणाऱ्या, चिकित्सेला नकार देणाऱ्या श्रद्धेचा जन्म होतो. चमत्काराला बळी पडणारे हे मन एका मानसिक गुलामगिरीला जन्म देत असते. भारतीय समाजाची जडणघडण मुळातच दैववादावर आधारलेली आहे. कोणतीही लहानमोठी संकटे हे लोकांना नशिबाचे भोग वाटतात. दैवी शक्तीमुळे चमत्कार करणारा बाबा यातून आपली सुटका करील, अशी लोकांची (अंध)श्रद्धा असते.

सर्व चमत्कार सिद्धीमुळे शक्य होतात, पण त्या सिद्धींचा मोह टाळावा, त्या क्षुद्र आहेत असे साधुसंतांचे, धर्मपरंपरेचे मत आहे. ज्यांच्याजवळ निखळ नतिक धर्मभावना आहे, ते नेहमीच चमत्कार करण्याच्या विरोधात राहिले आहेत. जो माणूस चमत्कार करून शिष्य गोळा करतो त्याचा संतवाङ्मयात धिक्कार केला आहे. हातातून सोन्याच्या साखळ्या सहजपणे व अनेक वेळा निर्माण करणाऱ्या सत्यसाईबाबांची अद्भुत शक्ती खरी आहे, असे क्षणभर मानूया. मग स्वाभाविकच असा प्रश्न पडतो, की देशाचा कर्जबाजारीपणा हटवण्यासाठी आणि भारताला सुवर्णभूमीचे पूर्ववैभव प्राप्त करून देण्यासाठी काहीतरी करावे असे त्यांना कधीच कसे वाटले नाही? बंगलोर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, ज्येष्ठ गांधीवादी व शास्त्रज्ञ एच. नरसिंह राव यांनी सत्यसाईबाबांना काटेकोरपणे चमत्कार तपासण्याच्या केलेल्या तिन्ही विनंत्यांना साधी पोचही का देण्यात आली नाही? बाबांनी सोन्याची अंगठी देताच तीच मूठ मिटून तत्क्षणी त्यातून बाबांना रस गुल्ला देणाऱ्या सुप्रसिद्ध जादूगार पी. सी. सरकार यांना धक्के मारून बाहेर का काढण्यात आले? हातातून भक्तांना सोन्याची चेन पंतप्रधान नरसिंह रावांच्या उपस्थितीत देत असताना ती बाबांच्या हातात स्मृतिचिन्हाखालून भक्ताने कशी हस्तांतरित केली याचे स्वच्छ-स्पष्ट चित्रीकरण उपलब्ध असताना त्याबद्दल बाबांनी मौन का बाळगले? चमत्कार करणारे आणि तो भक्तिभावाने स्वीकारणारे हा एक सिद्ध-साधकांचा खेळ आहे. चमत्कार करणाऱ्या बाबाकडे लोक कशाला जातात? वासना आणि स्वार्थ सोडावयाचा असतो, उदात्त व पवित्र व्हावयाचे असते, म्हणून क्वचितच कोणी बाबाकडे जातात. त्यांपकी प्रत्येकाला काही ना काही आधार वा लाभ हवा असतो. आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, मोक्ष, मुक्ती, विश्वाचे नियंत्रण करणारी अलौकिक शक्ती आहे व ती अवतार घेते या सर्व कल्पना या देशातील बहुसंख्यांच्या मनात पक्क्या असतात. स्वाभाविकच चमत्कार करू शकणारा बाबा हा साक्षात् परमेश्वराचा अवतार आणि प्रारब्ध बदलू शकणारा तारणहार वाटतो. बाबा-बुवा यांच्या बुवाबाजीचे वाहक बनलेल्या चमत्कारांना विरोध केला की संतांनी केलेल्या चमत्कारांचा दाखला देण्यात येतो. शेकडो वर्षांपूर्वी ज्या बाबी घडून गेल्या असे सांगण्यात येते, ज्यांचा कसलाही पुरावा उपलब्ध नाही, त्यामुळे शास्त्रीय तपासही अशक्य आहे. अशा चमत्कारांबद्दल जणू काही ते सत्यच आहेत अशी अभिनिवेशाची भूमिका खरे तर घेतली जाऊ नये.

चमत्कारावर विश्वास ठेवणे आणि ते करणाऱ्या बाबांना मान्यता देणे यातील मुख्य तोटा हा की, अशी माणसे प्रयत्न आणि पुरुषार्थ यांवरचा स्वत:चा विश्वास गमावतात, इतरांनीही तो गमवावा असे वातावरण तयार करतात. चमत्कारांच्या बाबतीत ही पलायनवादी भूमिका अधिक ठळकपणे दिसते. चमत्कारांचे माहात्म्य वाढण्याचे अनेक तोटेच व्यक्तिगत व सामाजिक जीवनात दिसतात. अशा परिस्थितीत खरे तर चमत्काराची शास्त्रीय चाचणी देण्याची जबाबदारी तसा दावा करणाऱ्या बाबा-बुवांवर द्यावयास हवी. त्यामुळे घटनेत नागरिकाचे कर्तव्य सांगितलेला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजेच कार्यकारणभाव सोडून कोणताही चमत्कार घडत नाही, याची प्रचीती मिळेल. माणसाचे सर्वात प्रभावी हत्यार म्हणजे त्याची बुद्धी. ‘बुद्धीने तपासेन आणि सिद्ध होईल तेच मानेन’ हीच शास्त्रीय दृष्टिकोनाची प्रतिज्ञा असते. ती विसरल्याशिवाय चमत्कारावर विश्वास ठेवताच येत नाही. आपल्या इच्छांच्या पूर्ततेसाठी, ‘अज्ञाताचे दर्शन कोणामार्फत तरी चमत्काराच्या दैवी सामर्थ्यांने होते असे मानून त्याच्यापुढे नतमस्तक होणे ही गोष्ट माणूस नक्कीच टाळू शकतो. वैज्ञानिक दृष्टिकोन शैक्षणिक धोरणातील महत्त्वाचा गाभा, घटक आहे, महत्त्वाचा म्हणून मूल्यशिक्षणात समाविष्ट आहे, तो किती थेटपणे चमत्काराच्या विरोधात उभा आहे हे विद्यार्थ्यांना समजावले जात नाही. संस्कारित करणे तर दूरच राहिले. चमत्कारांना सत्य मानणे आणि कोणतीही शंका उपस्थित न करता चमत्कारांना शरण जाणे ही मानसिक गुलामगिरीची सुरुवात असते. बाबांनी दिलेल्या चिमूटभर अंगाऱ्याने स्वत:च्या सर्व अडचणी दूर होतील व सर्व मनोकामना पूर्ण होतील अशी (अंध)श्रद्धा ती विभूती लाभलेला भाविक बाळगतो. ज्या चमत्कारामुळे बाबा अंगारा निर्माण करतो त्यामुळेच कार्यकारणभाव मोडीत काढणारे दैवी सामथ्र्य त्याला प्राप्त होते. हे कसे शक्य आहे, हा प्रश्न विचारणे पाखंडाचे लक्षण ठरते. त्यामुळे संबंधित संतप्त होतात. याचे कारण चमत्काराच्या प्रभावाने निर्माण झालेली मानसिक गुलामगिरी माणसाची बुद्धी दुबळी, पांगळी आणि आंधळी करते. माणसाचे व्यक्तिमत्त्व मोडून पडते. बाबा, बुवा, स्वामी, महाराज यांच्या कथित अलौकिक शक्तीच्या हातांत स्वत:ला सोपवून व्यक्ती मोकळी होते.

चमत्काराचा वादग्रस्त मुद्दा उभा करून बाबांच्या अफाट सेवाकार्याकडे दुर्लक्ष केले जाते असा एक आक्षेप असतो. बाबांनी शाळा, दवाखाने वगरे गोष्टी उभ्या केल्या हे खरेच आहे, चांगलेही आहे. पण या स्वरूपाची असंख्य काय्रे याहीपेक्षा फार मोठय़ा प्रमाणावर कोणतेही राज्य शासन वा केंद्र शासन करतच असते. त्याचे कौतुक नसते, कारण लोकांच्या करातून मिळालेल्या पशांतूनच हे सारे घडवले जाते. अब्जावधी रुपयांचा अखंड ओघ येत असेल तर काही सेवाकाय्रे त्यातून उभी राहणारच. असंख्य सेवाकाय्रे करणाऱ्या सरकारला सामान्य नागरिक प्रश्न विचारतो, चिकित्सा करतो, पाच वर्षांनी पदच्युतही करू शकतो. तो त्याचा अधिकार मानला जातो. बाबांच्या ट्रस्टला अफाट देणग्या मिळण्यात त्यांच्या चमत्काराचा नि:संशय वाटा आहे. मग त्या चमत्कारांना प्रश्न विचारणे, त्यांची चिकित्सा करणे यामुळे बाबांचा अधिक्षेप का मानला जातो? कोणतेही बाबा कितीही ‘सत्य’ असले तरी व्यवस्थापरिवर्तनाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. माणसाला माणसाशी प्रेमस्वरूप जोडणे हे चांगलेच आहे, पण येथील जातिव्यवस्था, विषमतेची दरी, भ्रष्टाचार, भ्रूणहत्या, क्षणाक्षणाला हे प्रेमस्वरूप उद्ध्वस्त करत असते. त्याच्याबद्दल फक्त मौनच कसे बाळगले जाते?  त्यातच भक्ताचे परमकल्याण असल्याचा पुकारा असतो. बाबाचा प्रत्येक शब्द हेच ब्रह्मवाक्य व नतिकता असते. स्वत:च्या चरणी रुजू होणाऱ्याचे सर्व कल्याण करण्याची ग्वाही दिलेली असते. अट फक्त एकच असते, बुद्धी वापरायची नाही. त्यामुळेच विज्ञान-तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री शिवराज पाटील बाबांचे चमत्कार अद्भुत दैवीशक्तीचा आविष्कार म्हणून पाहू शकतात.  स्वत:च्या मर्यादेत माणुसकीच्या आधारे प्रामाणिकपणे व धर्याने जगणे यातच माणसाची प्रतिष्ठा आहे. स्वत: चमत्काराच्या भूलभुलयापासून दूर राहणे, इतरांना मानसिक गुलामगिरीपासून दूर ठेवणे यातच जीवनाची सार्थकता आहे. ती ओळखावयास हवी, जोपासावयास हवी.

डॉ. अनिल काकोडकर, सौजन्य – लोकसत्ता

ठाणे जिल्ह्य़ात बोर्डी येथे झालेल्या अ. भा. मराठी विज्ञान संमेलनाचे  अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या भाषणाचा संपादित अंश..

विज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञान यामुळेच मानवाची आजवरची प्रगती व त्याचे सुधारलेले जीवनमान शक्य झाले आहे. समाजातील सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींवरपण तंत्रज्ञानाचा विशेष प्रभाव पडतो.सामाजिक सुधारणा, विकास, संपर्काची साधने, दळणवळण, स्वास्थ्य  या व इतर सर्व बाबतीत झालेली प्रगती तंत्रज्ञानामुळेच  शक्य झाली आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी इंटरनेट, मोबाईल, माहिती तंत्रज्ञान व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाने आज आपल्या सर्वाचे जीवन व्यापलेले आहे. आज नवीन तंत्रज्ञान झपाटय़ाने पुढे येत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडत असल्याने त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हेदेखील विज्ञान प्रसाराचे एक महत्त्वाचे अंग होऊन बसलेले आहे.

आजवर आपण बाहेरून आयात केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपली आर्थिक प्रगती साध्य करीत आलो आहोत. आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेचा  आपल्याला चांगलाच फायदा झालेला आहे. आज आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत की आता आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकून पुढे घेऊन जाऊ शकणारे नवीन तंत्रज्ञान अधिकाधिक प्रमाणात आणि तेही आपणच विकसित केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ इतरांचे अनुकरण करून, आपण फार तर पहिल्या स्थानाच्या जवळ जाऊ शकतो, पण पहिले स्थान मात्र मिळवू शकत नाही. त्यासाठी स्वत:चा नावीण्यपूर्ण पुढाकार असणे अत्यंत आवश्यक असते. तंत्रज्ञानाबाबतीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञानावर आधारित मुक्त अर्थव्यवस्थेत तर हे अधिकच प्रकर्षांने जाणवते.

आपल्याकडे विज्ञान संशोधनाची मोठी परंपरा आहे. पण आज संशोधन क्षेत्रात प्रचलित असलेली मूल्यव्यवस्था आपण तपासून पहावयास हवी. ‘रामन इफेक्ट’चा शोध डॉ. रामन यांनी आपल्या इथे लावला, पण त्यावर आधारित उपकरणे आपण देशात निर्माण केली नाहीत. आजही ती आपण आयात करतो. याचा अर्थ, आपण तंत्रज्ञानाबाबतीत काहीच केलेले नाही असे नाही. अणुशक्ती, अंतराळ, संरक्षण विषयक संशोधन अशा क्षेत्रांत चांगल्या प्रकारचे तंत्रज्ञान नक्कीच विकसित केले  गेले आहे. अशा संवेदनशील क्षेत्रात आपला देश बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण असणे आवश्यकही होते व ते आपण आपल्या बळावर साध्य केले ही महत्त्वाची व अभिमानास्पद बाब आहे.

आज आपल्या येथे संशोधन, तंत्रज्ञान विकास व त्याचा प्रत्यक्ष वापर ही वेगवेगळी व एकमेकांशी अत्यल्प संबंध असलेली क्षेत्रे बनलेली आहेत. एक प्रकारचे वर्णाश्रम निर्माण झालेले आहेत. त्यामुळे नावीण्यपूर्ण विकासाच्या कामात मोठी बाधा निर्माण  होत आहे. हे चित्र पालटणे आवश्यक आहे. यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करावयास हवेत. आपल्या उच्च शिक्षणाची आखणी अशी असावी की ज्या योगे विद्यार्थ्यांला एखाद्या विषयातील ज्ञानाबरोबरच त्यावर आधारित कौशल्ये साध्य करणे शक्य होऊ शकेल. अशा कसब-कौशल्यांचा विकास प्रत्यक्ष कामातून करण्याची व्यवस्था आपण करावयास हवी. यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग व सामाजिक संस्था यांचे निकटचे व विविध स्तरांवरील सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

सध्या मुंबई विद्यापीठात अणुशक्ती खात्याच्या सहकार्याने एक मूलभूत विज्ञान केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात बारावी ते एम.एस्सी, असा एकत्रित कार्यक्रम राबवला जात आहे. याच केंद्रात शिक्षकांनी आपला बराच वेळ शिकवण्याबरोबर संशोधन करण्यात घालवावा, तसेच डॉक्टरेट किंवा त्यापुढे संशोधन करण्याची व्यवस्थापण असावी, असा प्रयत्न आहे. या केंद्राचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे या केंद्रात  मुंबईत असलेल्या अन्य संशोधन संस्थांचा सहभाग. बीएआरसी, टीआयएफआर, आयआयटीसारख्या संस्थांतील संशोधक या केंद्रात शिकवण्याचे व संशोधनविषयक मार्गदर्शनाचे काम विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबर करीत असतात. या केंद्रातील अशा मान्यवर संशोधन केंद्राबरोबरच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची क्षितिजे विस्तारतात.

मूलभूत संशोधन व तंत्रज्ञान विकास यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट एक नवीन उपक्रम चालवत आहे. येथे विद्यार्थ्यांना मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येते. यासाठी दोन मार्गदर्शकांची व्यवस्था या कार्यक्रमात केलेली आहे. यापैकी एक मूलभूत विज्ञान व दुसरा तंत्रज्ञान क्षेत्रातील असेल. मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा विकास व असे कार्य करणाऱ्या संस्थांमधील सहकार्य अशा कार्यक्रमांमुळे वृद्धिंगत होईल, असा माझा विश्वास आहे.

आज पुढारलेल्या देशांनी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक साधनांचा मोठा वाटा केवळ आपल्यासाठी वापरून एका बाजूला जागतिक पर्यावरणाचा समतोल बिघडवलेला आहे व दुसऱ्या बाजूला विकसनशील देशांसाठी या साधनांच्या उपलब्धतेच्या संदर्भात मोठी समस्या निर्माण करून ठेवली आहे. या संदर्भात ऊर्जेचे उदाहरण घेता येईल. आज भारतात सरासरी दरडोई विजेचा वार्षिक वापर ६५० किलोव्ॉट तास इतका आहे. हे प्रमाण जागतिक सरासरीच्या केवळ २५ टक्के  इतके कमी आहे. औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेल्या देशांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३ ते  ६ टक्के आहे. आज तर आपण भारतात विजेचा वापर पुढारलेल्या देशांच्या बरोबरीने  करावयाचे ठरविले तर त्यासाठी लागणारी ऊर्जेची साधने उपलब्ध होणे अशक्य आहे.

जीवनमानाचा दर्जा बऱ्याच अंशी विजेच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. आपल्या देशात किमान जीवनमान सर्वाना उपलब्ध करायचे झाले तर विजेचा दरडोई वार्षिक वापर ५००० किलोव्ॉटतास इतका तरी कमीतकमी असावयास हवा. आपली लोकसंख्यापण अजून स्थिरावलेली नाही. ती १६० कोटीपर्यंत जाऊन स्थिरावेल असा अंदाज आहे. याचाच अर्थ, आपली विजेची उपलब्धता आजच्या प्रमाणाच्या दसपटीने वाढावयास हवी. यासाठी लागणारी ऊर्जेची साधने आपण कोठून मिळवणार हा खरा प्रश्न आहे. या प्रमाणावर ऊर्जेचा वापर अखंड चालू राहण्याच्या दृष्टीने विचार केला तर अणुऊर्जा व सौरऊर्जा सोडून इतर सर्वसाधने अगदी तुटपुंजी असल्याचे आपल्या लक्षात येते.

ऊर्जेच्या उपलब्धतेचा प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवला तरी आज जागतिक वातावरणाच्या तापमानवाढीचा व त्यामुळे समुद्रपातळीच्या वाढीचा आणि ऋतुचक्रात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या बदलाचा प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभा आहे. याचे मुख्य कारण वातावरणात मिथेन, कार्बन- डाय- ऑक्साईड अशा प्रकारच्या वायूंचे प्रमाण हे होय. कोळसा व काही प्रमाणात हायड्रोकार्बन यांचा ऊर्जेसाठी वापर हे याचे मुख्य कारण आहे.

कार्बनवर आधारित आजच्या ऊर्जाव्यवस्थेचे कार्बनविरहित ऊर्जाव्यवस्थेत रुपांतर करण्याची योजना आपण तयार करून ती राबवली पाहिजे. आज आपले दळणवळण पेट्रोल, डिझेल  यांसारख्या तरल (सहज बाष्पनशील) ऊर्जासाधनांवर अवलंबून आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारगाडय़ा हळूहळू बाजारात  येत आहे. हा बदल पूर्णाशाने अमलात येण्यास बराच अवधी लागेल. सौर व अणुऊर्जेवर आधारित हायड्रोजन निर्माण करणे, अशा हायड्रोजन व कार्बन-डाय  ऑक्साईड  यांचे संयुग करून तरल हायड्रोकार्बन बनवणे, जैविक  घन कचऱ्याचा बायोडायजेस्टरमध्ये उपयोग करून निर्माण होणाऱ्या मिथेनचे ज्वलन करून वीज निर्माण करणे, विजेबरोबर हायड्रोजनवर आधारित उपकरणे बनविणे असे तंत्रज्ञान निर्माण होत आहे.

सौरऊर्जा ही जवळपास पुढील ४.५ अब्ज वर्षे आपणास मिळत राहील, हे जरी खरे असले तरी ही ऊर्जा २४ तास उपलब्ध नसते. हायड्रोजन निर्माण करण्याच्या प्रक्रियेमुळे आपण ही ऊर्जा साठविण्याची व्यवस्था करू शकतो. दुसरे म्हणजे सौरऊर्जा ही मुबलक प्रमाणात गोळा करावयाची झाल्यास खूप मोठे क्षेत्रफळ त्यासाठी आवश्यक आहे. कारण उन्हाचे तापमान खूप कमी असते. याउलट अणुशक्ती ही एक अतिप्रखर अशी शक्ती आहे. थोडीशी साधने वापरून थोडय़ा जागेत आपण मुबलक वीज निर्माण करू  शकतो. आज जरी युरेनियमपासून आपण वीजनिर्मिती करत असलो तरी उद्या थोरियमपासून अधिक मुबलक प्रमाणात आपण वीज निर्मिती करू शकू. ही झाली अणुविभाजनातून निर्माण झालेली वीज. अणुच्या एकमेकांतील संमिलनाने (फ्यूजन)सुद्धा आता वीज  निर्माण करण्याची शक्यता फार  जवळ आलेली आहे. हे जर  झाले तर अणुऊर्जेची उपलब्धता आपल्या ऊर्जेच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने पुढील हजारो वर्षे पुरेल इतकी होऊ शकेल. भारतही या कार्यक्रमात मागे नाही. इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर  एक्सपरिमेंटल रिअ‍ॅक्टर -आयटीईआर प्रकल्पात भारताचा पूर्ण सहभाग आहे.

आज भारताची गणना अणुतंत्रज्ञानात जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांत होते. आपले हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर प्रगत मानले गेलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण आज आपली अणुकेंद्रे निर्माण करीत आहोत व त्यांचा वापर व्यापारीदृष्टय़ा अत्यंत सफलपणे चालू आहे. फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञानही आपण विकसित केलेले आहे. ५०० मेगाव्ॉट क्षमतेचे पहिले अणुवीज केंद्र सध्या आपण निर्माण करीत आहोत. या तंत्रज्ञानात आपली गणना जगातल्या पहिल्या दोन देशांत होते. थोरियम तंत्रज्ञानाबाबत तर आपण जगावेगळे महत्त्व प्राप्त केलेले आहे भविष्यात जेव्हा इतर देशांना थोरियमवर आधारित ऊर्जेची गरज जाणवेल, तेव्हा त्यांना भारताच्या सहकार्याचे महत्त्व अधिकच लक्षात येईल. थोरियमवर आधारित अ‍ॅडव्हान्स्ड हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरच्या निर्मितीचे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा करूया.

भारतातही आपण तंत्रज्ञान विकासाबाबतीत सफल वाटचाल केली असली तरी मुख्यत देशांतर्गत उपलब्ध युरोनियमच्या तुटवडय़ामुळे प्रत्यक्ष वीजनिर्मिती आपण खूप वाढवू शकलो नाही. आंतरराष्ट्रीय नागरी सहकार्याचे नवे दालन आता आपणासाठी उघडले गेले आहे. आता आपण आपला ठरलेला अणुशक्ती कार्यक्रम अबाधित ठेवून बाहेरून आयात केलेल्या युरेनियमच्या आधारावर आपली वीजनिर्मितीची क्षमता वाढवू शकतो. एवढेच नव्हे तर देशांतर्गत विकसित फास्ट रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरुवातीस आयात केलेल्या युरेनियमचे पुनर्चक्रीकरण करून वीजनिर्मितीची क्षमता दसपट किंवा त्यापेक्षाही अधिक वाढवू शकतो. ऊर्जेच्या बाबतीत देशास स्वयंपूर्ण करण्याचा हा उत्तम मार्ग होय. माझ्या मते या शतकाच्या मध्यापर्यंत जवळपास पन्नास टक्के वीज अणुऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करणे शक्य व्हावे.

सध्या आपण महाराष्ट्रात जैतापूर येथे होऊ घातलेल्या प्रकल्पाबद्दल बरीच चर्चा ऐकतो आहोत. खरे म्हणजे महाराष्ट्रातच तारापूर येथे देशातील पहिले अणुवीज केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्याकाळीसुद्धा ही संयंत्रे तेव्हा प्रचलित असलेल्या वीजनिर्मिती केंद्राच्या तुलनेत महाकाय अशीच होती. तारापूरबाबतसुद्धा उलटसुलट चर्चा झालेलीच आहे. पण आज ४० वर्षांंनंतरही ती सर्वप्रथम उभारलेली  दोन संयंत्रे देशातील जलविद्युत सोडल्यास सर्वात स्वस्त वीजनिर्मिती करीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तारापूरचे सुरक्षित काम पाहून अनेक विदेशी तज्ज्ञांनी कौतुक केले आहे.

जैतापूर येथे फ्रान्सच्या सहकार्याने १६५० मेगाव्ॉट क्षमतेची ६ संयंत्रे बसवण्याचा प्रस्ताव आहे. यातील पहिल्या दोन संयंत्रांच्या उभारणीचे कार्य सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. ही संयंत्रे  इव्हॅल्यूशनरी पॉवर रिअ‍ॅक्टर (ईपीआर) धर्तीची अत्यंत पुढारलेली अशी आहेत. फिनलंड, फ्रान्स व चीन येथे अशा संयंत्रांच्या उभारणीचे काम सध्या चालू आहे. या संयंत्रांची उभारणी अर्थातच अणुऊर्जा  नियामक  मंडळाच्या पूर्ण निरीक्षणाखालीच होईल. नियामक मंडळाचे तज्ज्ञ या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास करुन सुरक्षिततेबाबत पूर्ण खातरजमा झाल्यानंतर प्रकल्पासाठी  आपली संमती देतील.  त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.

पर्यावरणाच्या दृष्टीने या अणुवीज केंद्रातून कुठल्याही प्रकारचा अपाय संभवत नाही. आज आपण देशात २० अणुवीज केंद्रे चालवत आहोत. या केंद्राभोवतीच्या पर्यावरणाचा अभ्यास, त्यासाठी उभारलेल्या खास प्रयोगशाळांत केला जात आहे. या अनुभवावरून अणुवीज केंद्रांचा पर्यावरणावर नगण्य प्रभाव पडतो, असे आपण ठामपणे सांगू शकतो. अणुवीज केंद्र  स्वच्छ वीजनिर्मिती तर करतातच पण त्याचबरोबर  केंद्राच्या परिसरात बराच आर्थिक व सामाजिक विकास त्यामुळे साध्य होतो, असा आजवरचा अनुभव आहे.

अणुऊर्जेबाबत मी बरीच चर्चा केली. इतर अनेक क्षेत्रांत आपणास प्रगती करावयाची आहे. त्यातील काही अशी क्षेत्रे आहेत की जेथे आपणास भारतीय समस्यांवर भारतीय तोडगा काढणे अनिवार्य आहे. आपण आपल्या तरुण पिढीची अशी तयारी करावयास हवी की हे काम ते सक्षमतेने करू शकतील.

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

तत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केले होते। ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम!’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे!’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहे?आपल्यातला ‘मी’चा उगम व विकास, त्यातून येणारा ‘अहं’ आणि त्या एकाच ‘मी’चे होणारे अनेक आविष्कार हे केवळ ‘मेंदू’पुरते मर्यादित ठेवता येत नाहीत, असेही शास्त्रज्ञांचे मत आहे.

मी कोण आहे? कुठून आलो? कुठे जाणार आहे? हे वा असे प्रश्न सर्वाना कधी ना कधी पडतातच. विशेषत: कुणाच्या मृत्यूनंतर वा स्मशानात जाऊन आल्यानंतर. ती सुन्न भावना फार काळ टिकत नाही आणि प्रत्येक जण दैनंदिन व्यवहारात पूर्ण बुडून जातो. कधी ते दु:ख दीर्घकाळ मनातल्या मनात स्रवत राहते, कधी आटून जाते; पण प्रत्येकाला आपणही मरणारच आहोत, याची मनोमन खात्री असतेच. मरण म्हणजे पूर्णविराम!जवळजवळ सर्वानाच जीवनाची आसक्ती असते. (आत्महत्या करणाऱ्यांनासुद्धा मरणाची आसक्ती नसते. त्यांची जगण्याची आसक्ती इच्छेनुसार पुरी होत नाही म्हणून ते आत्महत्या करतात. म्हणजेच आत्महत्यासुद्धा जीवनासक्तीचाच एक आविष्कार- कितीही विरोधाभास त्यात वाटला तरीही!) या दुर्दम्य (आणि अनाकलनीयही) जीवनासक्तीमुळेच माणसाला ‘अमर’ व्हावे असे वाटू लागले. अगदी प्राचीन काळी, माणसाच्या प्राथमिक अवस्थेत, जोपर्यंत त्याला मरणाची अपरिहार्यता ध्यानात आली नव्हती, तोपर्यंत ‘अमरत्वा’ची संकल्पना निर्माण झाली नाही; परंतु मेलेली व्यक्ती ‘परलोकी’ म्हणजे दुसऱ्या ‘प्रकारच्या’ जीवनविश्वात गेली, असे मानले जाऊ लागले. अनेक अंधश्रद्धांचा उगम या जीवन-मरणाच्या गूढामुळे झाला आहे.

त्या ‘गूढा’चा वैज्ञानिक भेद करण्याचे एका प्रसिद्ध गणिती व शास्त्रज्ञ व्यक्तीने ठरविले. त्याचे नाव थॉमस डोनाल्डसन. गणित, जीवशास्त्र आणि ‘इन्फर्मेशन सायन्स’ (‘माहितीशास्त्र’ असे याचे भाषांतर होऊ शकत नाही) यात प्रदीर्घ संशोधन केलेल्या डोनाल्डसनलाही तेच प्रश्न पडले होते, जे सामान्यांना आणि भल्या भल्या तत्त्वज्ञांनाही पडतात- मी कोण आहे? कुठून आलो आणि कुठे जाणार आहे?जेव्हा डोनाल्डसनने या प्रश्नांचा विचार सुरू केला तेव्हा त्याला त्यातील उपप्रश्न अधिक भेडसावू लागले. ‘मी कोण आहे?’ या प्रश्नापेक्षा ‘मी म्हणजे कोण,’ हे अगोदर ठरवावे लागेल आणि हा ‘मी’ किंवा ‘अहं’ नक्की कुठे व कसा निर्माण होतो, तेही.‘मी’पणाची जाणीव आणि माझे ‘अस्तित्व’ आपल्या मेंदूत ठरते, असे त्याला वाटले. पण त्याचबरोबर त्याला जन्म-मृत्यूचे रहस्यही भेदायचे होते. अचेतन वस्तूला- म्हणजे खडक, दगड, धोंडे, वाळू यांना जीवसृष्टीचे नियम, म्हणजे जन्म-विकास-विनाश/ मृत्यूचे चक्र लागू नसते. हे कळण्यासाठी अर्थातच ‘वैज्ञानिक’ असण्याची गरज नव्हती. डोनाल्डसनचा जन्म १९४५ चा. दुसऱ्या महायुद्धानंतरचा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर विज्ञान-विचाराने, प्रयोगशीलतेने आणि धाडसी कल्पनांनी एकच झेप घेतली होती. अणुविभाजनापासून- कॉम्प्युटर्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीपर्यंत आणि जेनेटिक्स/डीएनएपासून विश्वाच्या जन्मकहाणीपर्यंतच्या संशोधनाचा प्रचंड विस्तार आणि विकास गेल्या ६०-७० वर्षांत झाला आहे. हे सर्व विज्ञान जरी सुमारे पाच-सहाशे वर्षेच ‘वयाचे’ असले तरी गेल्या ६०-७० वर्षांमधील त्याची झेप अक्षरश: अचाट आहे!

डोनाल्डसन पंचविशीत असतानाच त्याला वाटू लागले की, ‘मरण’ ही गोष्टच ‘अनैसर्गिक’ आहे! कारण शरीर हे एक यंत्र आहे. हृदयक्रिया बंद पडली की माणूस मरतो असे आपण मानतो. ‘मरतो’ म्हणजे ‘सचेतन’ माणूस ‘अचेतन’ होतो. कृत्रिमरीत्या हृदयक्रिया चालू ठेवण्याचे, इतकेच नव्हे तर एकाचे हृदय दुसऱ्याला लावण्याचे, हार्ट ट्रान्स्प्लॅन्टचे, शल्यशास्त्र तेव्हा प्रचलित होते. त्यानंतर ‘ब्रेन डेड’ची संकल्पना आली. जोपर्यंत ‘मेंदू’ मृतवत होत नाही, तोपर्यंत एखादी व्यक्ती ‘मेली’ असे मानता येणार नाही असे वैज्ञानिकांनीच नव्हे तर न्यायालयांनीही मान्य केले. त्यानंतर वैद्यकविश्वात ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्टस्’चे प्रयोग व चर्चा सुरू झाली. ससे, डुक्कर, वानर यांच्या मेंदूंवर आणि त्यांच्या ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्ट्स’चे प्रयोग करण्यात येऊ लागले.तोपर्यंत तत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केलेलेच होते. ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम!’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे!’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहे?डोनाल्डसनचे मत होते की, मेंदू हे ते विचारकेंद्र.

वयाच्या ४३ व्या (१९८८ साली) वर्षी डोनाल्डसनला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. तपासणी केल्यावर लक्षात आले की त्याच्या मेंदूवर एक छोटासा ‘टय़ूमर’ आहे. आपल्याला कॅन्सर झाला आहे हे लक्षात आल्यावर त्याने स्वत:वरच प्रयोग करून घ्यायचे ठरविले. त्याने काही शल्यविशारदांना सांगितले की ‘‘नाहीतरी मी लवकरच मरणार आहे. मी जिवंत आहे तोवरच माझा मेंदू ‘क्रायोनिक’ शस्त्रक्रिया करून काढून घ्या. जेव्हा केव्हा, म्हणजे पाच-पन्नास वर्षांनी या कॅन्सरवर उपाय सापडेल तेव्हा ती शस्त्रक्रिया करा आणि ते डोके परत जोडून टाका. माझे धड आणि डोके मायनस ३२० फॅरनहाइट तापमानात ठेवा. त्या तापमानात ते खूप काळ आहे त्या स्थितीत राहू शकेल. उपाय सापडेपर्यंत शरीर व डोके त्या स्थितीत ठेवण्यासाठी दर वर्षांला एक लाख डॉलर खर्च येईल. मी पैशाची सोय करून ठेवीत आहे.’’ डोनाल्डसनच्या या सूचनेवर शल्यविशारदांची बैठक झाली. त्यांनी म्हटले की, जिवंत असताना मेंदू बाजूला काढणे म्हणजे डोनाल्डसनला ठार मारणे आहे. तो कायद्याने खून ठरेल. त्यामुळे तसे करणे शक्य नाही. डोनाल्डसन जिद्दीला पेटला होता. त्याने अमेरिकन न्यायालयाला विनंती केली, की विज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि माणसाला अमरत्व प्राप्त करण्याच्या प्रयोगांसाठी त्याला तो प्रयोग करण्याची परवानगी द्यावी.न्यायालयाने परवानगी नाकारली. डोनाल्डसन ज्या संस्थेमार्फत हा प्रयत्न करीत होता त्याचे संस्थेचे नाव आहे अल्कर लाइफ एक्स्टेन्शन फाऊंडेशन (Alcor Life Extension Foundation). या संस्थेचे तेव्हा अध्यक्ष होते कार्लोज मोंड्रागॉन. अध्यक्षांनीही न्यायालयाला सांगितले की, ‘‘हा खून मानला जाऊ शकत नाही. कारण उपाय मिळताच आम्ही डोके त्या शरीराला जोडून त्याला ‘शुद्धीवर’ आणणार आहोत.’’ या संस्थेच्या मते तो मरणार नाही तर अ‍ॅनास्थाशिया दिलेल्या रुग्णाप्रमाणे ‘सस्पेन्डेड’ जीवनस्थितीत असेल.’’ न्यायालयाने या संस्थेचे म्हणणे स्वीकारले नाही.

‘क्रायोनिक सस्पेन्शन ऑफ लाइफ’ ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेवर अधिक संशोधन सुरू होण्यापूर्वी अमेरिकेत ‘लाइफ एक्स्टेन्शन सोसायटी’ स्थापन झाली होती. डोनाल्डसन हा जिद्दीचा भविष्य-वेधी वैज्ञानिक होता. त्याने आजारी असतानाच अमरत्वाच्या शक्यतेविषयी आणि ‘२४ व्या शतकातील आरोग्या’विषयी प्रबंध लिहिला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ‘मेंदूत’ साठविलेली सर्व माहिती (म्हणजे आठवणी, विचार, भावना, ज्ञान इत्यादी) कॉम्प्युटरप्रमाणे जशीच्या तशी राहील आणि ती पुन्हा प्राप्त करता येईल. न्यायालयाने परवानगी न दिल्यामुळे त्याने असे मृत्युपत्र केले की तो मरताक्षणी त्याला वैद्यकीय शीतपेटीत ठेवण्यात यावे. तीन वर्षांपूर्वी (जानेवारी १९, २००६) डोनाल्डसन रूढ अर्थाने मरण पावला आणि आता त्याच्या शरीरावर A-1097 हा क्रमांक चिकटवून त्याचा देह शीतपेटीत ठेवण्यात आला आहे. असे आणखीही काही देह त्या प्रयोगशाळेत आहेत. परंतु त्यांना मृतदेह असे म्हणता येणार नाही आणि ते ज्या पेटीत बंद आहेत, तिला ‘शवपेटी’ असेही म्हणता येणार नाही.डोनाल्डसनला ‘मी कोण आहे? कुठून आलो? आणि कुठे जाणार आहे,’ हे प्रश्न पडले होते, पण त्यातल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याने ‘शोधले’ होते. ते उत्तर होते, ‘मी कुठेही जाणार नाही! शिवाय मी पुन्हा शुद्धीवर येईन तेव्हा तो पुनर्जन्म नसेल. कारण मी मेलेलो नाहीच- फक्त दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत आहे!’रेमंड कुर्झवेल हा एक जगप्रसिद्ध फ्यूचरॉलॉजिस्ट म्हणजे त्रिकालवेधी शास्त्रज्ञ विचारवंत आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्या गतीने विज्ञान-तंत्रज्ञान विकासते आहे ते पाहता पुढील ४०-५० वर्षांतच ‘लाइफ एक्स्टेन्शन’चे प्रयोग सिद्ध होतील.या संबंधात, याच स्तंभातून लिहिताना यापैकीकाही मुद्दे पूर्वी मांडले होते. परंतु तेव्हा ‘मी कोण आहे?’ या विषयावरील संशोधन आज कुठपर्यंत आले आहे त्याचे संदर्भ दिलेले नव्हते.

‘मी कोण आहे,’ याबद्दलची मुख्य मांडणी आता समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. अर्थातच जीवशास्त्रात आणि मेंदूविषयक झालेल्या संशोधनाच्या मदतीने. डग्लस हॉपस्टअ‍ॅटर (Douglas Hofstadter) आणि डॅनिएल डेनेट (Daniel Dennett) यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी एक पुस्तक प्रसिद्ध केले. ‘The Mind’s I’ हे त्या पुस्तकाचे नाव. आपल्यातला ‘मी’चा उगम व विकास, त्यातून येणारा ‘अहं’ वा ‘इगो’ आणि त्या एकाच ‘मी’चे होणारे अनेक अविष्कार हे केवळ ‘मेंदू’पुरते मर्यादित ठेवता येत नाहीत असे त्यांचे मत आहे.त्यातूनच आता ‘कॉन्शियस स्टडीज्’ ही नवीन संशोधन शाखा जन्माला आली आहे. प्रत्येक व्यक्तीचा एका मोठा ‘कॉन्शियसनेस कॅनव्हास’ असला तरी त्याच्या स्वभावाचे वेगवेगळे आविष्कार होतात. एखादी अतिशय व्यवस्थितपणे वागणारी व्यक्ती एकदम विचित्र वागते, एखादा साधा माणूस खूनही करायला प्रवृत्त होतो (पूर्वी कधीही गुन्हेगारी प्रवृत्ती नसलेला), किंवा इतर वेळेस समजूतदारपणे वागणारी व्यक्ती एकदम बेभानपणे आणि बेदरकारीने वागते वगैरे वगैरे. डॅनिएल डेनेट या विचारवंत संशोधकाने लिहिलेल्या ‘Brainstorms : Philosophical Essays on Mind and Psychology’ या पुस्तकात माणसाच्या मनाचा, मेंदूचा, व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा शोध घेताना असेही म्हटले आहे की, एकच ‘मी’ आहे असे गृहीत धरता कामा नये.

‘स्किझोफ्रेनिया’ वा दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे संशोधन सिग्मंड फ्रॉइडने व इतर काही मानसशास्त्रज्ञांनी एकोणिसाव्या शतकातच सुरू केले होते.आता विज्ञान व तत्त्वज्ञान एकमेकांत अशा रीतीने मिसळून जाऊ लागले आहे की, शरीरशास्त्र व जीवशास्त्रापासून, न्यूरॉलॉजी व मेंदूविषयक संशोधनापासून मानसशास्त्र आणि समाजशास्त्र वेगळे करणे अशक्य होत आहे.समाजच नसेल, सामाजिक/ कौटुंबिक/ सांस्कृतिक जीवनच नसेल तर ‘मी’ आणि ‘अहं’- इगो जन्मालाच येत नाही! पृथ्वीवर एकच माणूस जन्माला आला असता तर ‘मी’चा उगम झालाच नसता. इतके कशाला, रॉबिन्सन क्रूसोला तो जंगलात एकटा सापडल्यावर इतर माणसांबरोबर स्वत:चाही नवा शोध लागत होता!

पराधीन नाही जगती पुत्र मानवाचा…

सप्टेंबर-ऑक्‍टोबर १९७५ मधली गोष्ट. “द ह्यूमनिस्ट’ नावाच्या अमेरिकेतील नियतकालिकात १८६ विख्यात शास्त्रज्ञांच्या सहीचे एक पत्रक प्रसिद्ध झाले. मानव जीवनावर ग्रहताऱ्यांच्या प्रभाव पडतो, ही कल्पना त्या पत्रकात स्पष्ट शब्दांत खोडून काढली होती. त्यातील काही मोजके उतारे पहा- ……..
“मानवाच्या जन्माच्या वेळी ग्रह-ताऱ्यांची स्थिती त्याच्या भवितव्यास आकार देते, ही कल्पना निव्वळ चुकीची आहे. दूरच्या ग्रहांच्या विशिष्ट स्थितीमुळे ठराविक उपक्रमांसाठी अमुक वेळ शुभ वा अशुभ असते किंवा एका राशीच्या लोकांचे विशिष्ट राशींच्या लोकांशी जुळणे वा न जुळणे हे सत्य नाही… आजकालच्या अनिश्‍चित वातावरणात पुष्कळांना महत्त्वाचे निर्णय घेताना मार्गदर्शनाची गरज भासते. म्हणून त्यांना वाटते, की त्यांचे भवितव्य त्यांच्या नियंत्रणापलीकडे तारकांच्या प्रभावाखाली ठरते; पण आपण सर्वांनी जगातल्या वास्तवाला तोंड देणे आवश्‍यक आहे; आपल्याला याची जाणीव बाळगायला पाहिजे, की आपली भविष्ये आपल्या हातात आहेत, तारकांच्या नाही.’

पत्रकावर सही करणारे विविध विषयांतले शास्त्रज्ञ होते. त्यांत नोबेल पारितोषिकविजेतेही होते. ही मंडळी सहसा एका व्यासपीठावर दिसत नाही; पण वरील पत्रकासाठी एकत्र येणे त्यांना आवश्‍यक वाटले, ही गोष्ट महत्त्वाची.

आपण जर एखादे पाश्‍चात्त्य वृत्तपत्र पाहिले, तर त्यात तारका-भविष्याला वाहिलेला कॉलम असतो; परंतु युरोप आणि अमेरिकेत दीर्घ काल वास्तव्य केल्यानंतर मी असे म्हणू शकतो, की अशा प्रकारच्या फलज्योतिषी रकान्यांत रस घेणारे वाचक असले तरी त्यावर विश्‍वास ठेवणारे थोडे-थोडकेच असतील. कुंडल्या जुळवून लग्न ठरवणे, चांगला मुहूर्त पाहून नव्या घरात प्रवेश करणे किंवा प्रस्थान ठेवून प्रवासाला निघणे, आदी वैयक्तिक जीवनातल्या क्रिया जशा भारतात मोठ्या प्रमाणात दिसतात, तशा या देशांत दिसत नाहीत. सार्वजनिक जीवनातदेखील मुहूर्त पाहून नव्या मंत्रिमंडळाला शपथ देणे, नवीन राज्याची सुरवात करणे, पंतप्रधान झाल्यावर शासकीय निवासात गृहप्रवेश करणे, अशा गोष्टींचा सुळसुळाट मी फक्त भारतात पाहिला. मला वाटते, वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात फलज्योतिषाच्या नादी लागलेला भारत हा एकमेव मोठा देश असावा.

मला या नादाचा फायदा कसा झाला, ते सांगतो! काही वर्षांपूर्वी माझ्या कॉलेजला जाणाऱ्या कन्येला स्कूटी घ्यायची होती. तिला घेऊन तिची आई स्कूटीच्या दुकानात गेली, तेव्हा कळले, की “वेटिंग लिस्ट’ असल्याने दोन-तीन आठवडे थांबावे लागेल; पण तिथे बऱ्याच स्कूटी रांगेत उभ्या केलेल्या दिसल्या. “”इतक्‍या स्कूटी इथे असताना वेटिंग लिस्ट कशी?” माझ्या पत्नीने विचारले. “”त्या “बुक’ झाल्यात; पण कालपासून पितृपक्ष चालू झाल्यामुळे तो संपेपर्यंत त्या उचलल्या जाणार नाहीत.” दुकानदार म्हणाला. “”मग आम्ही आज यातली एक विकत नेली तर तुम्ही तिच्याऐवजी एक पुढच्या १०-१२ दिवसांत आणून ठेवू शकता!” माझी कन्या म्हणाली. “”आमची तयारी आहे,” दुकानदार म्हणाला. “”पण पितृपंधरवड्यात अशी खरेदी करायला तुमची तयारी आहे?” दुकानदाराने मुलीऐवजी आईला विचारले. तिने अनुमोदन दिले आणि स्कूटीचे पैसे भरून ती विकत आणली. अर्थात या “धाडसी’ कारवाईमुळे आम्हाला आकाशातल्या कोणाचा कोप सहन करावा लागला नाही.

“फलज्योतिष हे विज्ञान आहे का?’ हा प्रश्‍न मला पुष्कळदा विचारला जातो. त्यापाठोपाठ अशी टीकाही ऐकायला मिळते, की फलज्योतिषाचा अभ्यास व तपासणी न करता शास्त्रज्ञ त्याला “अवैज्ञानिक’ ठरवून मोकळे होतात. वस्तुस्थिती वेगळी आहे. विज्ञानाचा किताब मिळवायला त्या विषयाला काही पथ्ये पाळावी लागतात. त्या विषयाची मूळ गृहीतके स्पष्ट मांडावी लागतात. त्यांच्यावर आधारलेला डोलारा कसा उभा केला जातो, ती कार्यपद्धती निःसंदिग्धपणे मांडायला हवी व शेवटी प्रत्यक्ष निरीक्षणातून खरे, खोटे तपासता येईल, असे भाकीत करावे लागते. भाकीत खरे ठरले का खोटे, हे तपासण्याचे संख्याशास्त्राचे नियम आहेत. उदाहरणार्थ, नाणेफेकीत “हेड’ वर, का “टेल’ वर, हे बरोबर भाकीत करता येते, हा दावा तपासून पाहायला एका नाणेफेकीने ठरवणे योग्य होणार नाही… शंभर वेळा नाणे फेकून आलेल्या निष्कर्षांना संख्याशास्त्राचे निकष लावून ठरवावे. कुंडल्या जुळवून केलेले विवाह कुंडल्या न जुळणाऱ्या असताना केलेल्या विवाहांपेक्षा अधिक यशस्वी, सुखी असतात का, हे तपासायला शेकडो जोडप्यांचे सॅम्पल तपासायला पाहिजे. अमेरिकेत अशा तऱ्हेने केलेल्या चाचणीत कुंडली जुळणे-न जुळणे याचा, विवाह सुखी होईल- न होईल याच्याशी काहीही संबंध नाही, असे आढळून आले.

फलज्योतिषाची कार्यपद्धती, मूळ गृहीतके आणि भाकिते यांबद्दल त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांत एकवाक्‍यता नसल्याचे दिसून येते. एकदा मी काही प्रख्यात फलज्योतिषांनी तत्कालीन राजकारण्यांबद्दल केलेल्या चुकीच्या भाकितांचा गोषवारा एका चर्चेत मांडला असता, येथील फलज्योतिषी म्हणाले, की भाकीत चुकले, कारण ते चांगले फलज्योतिषी नसावेत. अशा वेळी मला भारतीय क्रिकेट टीमच्या पराजयानंतर टीकाकारांच्या सल्ल्यांची आठवण होते. त्यांच्या मते, ज्यांना खेळवले गेले नाही, त्यांना घेतले असते तर निकाल वेगळा झाला असता.

पुष्कळदा फलज्योतिषाचे उदात्तीकरण करायला त्याचा संबंध वेदांशी जोडण्यात येतो; पण जन्मकुंडली मांडणे, जन्मवेळेच्या ग्रहांची स्थिती मानवाचे भवितव्य ठरवते, ही कल्पना हे सर्व वेदातले नसून, ग्रीक-बॅबिलोनियन प्रभावाखाली भारतात आले, असा इतिहास आहे. सूर्यसिद्धान्तातला एक श्‍लोक त्या बाबतीत बोलका आहे. त्यात सूर्यदेव मयासुराला सांगतो ः “तुला या विषयाची (फलज्योतिष) सविस्तर माहिती हवी असेल तर रोमला (म्हणजे ग्रीक-रोमन प्रदेशात) जा. तेथे मी यवनाच्या रूपात ही माहिती देईन.’ “यवन’ शब्दाचा वापर परदेशी, बहुधा ग्रीक, अशा अर्थी होतो. म्हणजे आपली ही अंधश्रद्धा मूळ भारतीय नसून “इंपोर्टेड’ आहे!

खुद्द ग्रीकांमध्ये ही अंधश्रद्धा कशी आली? आकाशातल्या तारकांचे अनेक वर्षे निरीक्षण केल्यावर त्यांना आढळून आले, की आकाशातल्या तारामंडळाच्या पार्श्‍वभूमीवर काही तारका अनियमितपणे मागे-पुढे जात आहेत. त्यांच्या या स्वैरगतीमुळे ग्रीकांनी त्या तारकांना “प्लॅनेट’ म्हणजे “भटके’ हे नाव दिले. त्यांच्यापैकी वैज्ञानिक वृत्तीच्या लोकांनी या स्वैरगतीमागे काहीतरी नियम असेल, तो शोधायचा प्रयत्न केला; पण बहुसंख्य लोकांनी या स्वैर फिरण्याचा अर्थ “या भटक्‍यांमध्ये काही तरी खास शक्ती आहे ज्यामुळे ते मनमाने फिरतात,’ असा लावला. त्यातून पुढे जाऊन असाही समज करून घेतला, की हे ग्रह आपल्या शक्तीचा वापर मानवाचे भवितव्य ठरवण्यात करतात.

पण कालांतराने ग्रह असे का फिरतात, याचे उत्तर विज्ञानाने दिले. ऍरिस्टार्कस, आर्यभट, कोपर्निकस, गॅलिलिओ, केप्लर, न्यूटन अशा मालिकेतून अखेर गुरुत्वाकर्षण हे मूलभूत बळ ग्रहांना सूर्याभोवती फिरवत ठेवते, हे सिद्ध झाले. म्हणजे ग्रह स्वेच्छाचारी नसून, सूर्याभोवती फिरायला बांधले गेलेत. अशा तऱ्हेने विज्ञानाने फलज्योतिषाच्या मुळाशी असलेला भ्रमाचा भोपळाच फोडला. आज अंतराळ युगाला प्रारंभ होऊन अर्धशतक उलटले. मानवाने चंद्रावर पदार्पण केले. मंगळावर याने उतरवली. इतर ग्रहांजवळ अंतराळयाने पाठवून त्यांचे जवळून दर्शन घेतले. दर वेळी गणिताबरहुकूम यान प्रवास करते. नियोजित ग्रहाजवळ नियोजित वेळी जाते. यानातली दूरसंचार यंत्रणा ठरल्याप्रमाणे चालते. यावरून मानवाची कर्तबगारी तर दिसतेच; पण त्याचबरोबर ग्रहांच्या गतीमागे कसलेही रहस्य राहिले नाही, याचीदेखील कल्पना येते. ही कर्तबगारी दाखवणारा मानव पराधीन खचित नाही.

ही विज्ञानाची प्रगती विचारात घेतल्यावर आजही जेव्हा मला एखादा शिकलेला माणूस विचारतो, की ग्रहांचे मानवजीवनावर परिणाम होतात का, तेव्हा मला आश्‍चर्य आणि खेद, दोन्ही अनुभवायला मिळतात. आश्‍चर्य यासाठी, की एकविसाव्या शतकातला मानव हा प्रश्‍न विचारतोय. खेद यासाठी, की विचारणारा भारतीय आहे.

– जयंत नारळीकर
(लेखक ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

डॉ. जयंत नारळीकरांच्या ’याला जीवन ऐसे नाव’ या पुस्तकातला हा लेख –

naralikar_1

naralikar_2

naralikar_3

naralikar_4

naralikar_5

naralikar_6

naralikar_7