Archive for the ‘वैचारिक’ Category

प्रताप थोरात, सौजन्य – लोकसत्ता

विन्स्टन चर्चिलसारख्या थोर मुत्सद्याचं भाकीत होतं : आम्ही जर भारत सोडून गेलो तर हा देश वेगाने अनेक शतकं मागे, मध्ययुगीन रानटीपणाच्या खोल गर्तेत फेकला जाईल आणि जगण्यासाठी साध्यासुध्या गोष्टी न मिळाल्यामुळे त्याचं जिणं हराम होऊन जाईल. इथं आपण वसाहतवाद्यांची स्वार्थानं बरबटलेली, अपुरी वाढ झालेली, रोगट मनं समजून घेतली पाहिजेत. नेमक्या याच मानसिकतेमुळे, पाश्चिमात्य विद्वान आणि नोबेल शांतता पारितोषिकाची निवड करणारी मंडळी महात्मा गांधींचं जागतिक शांतता आणि अहिंसक संघर्षांच्या मानवी इतिहासामधलं उच्च स्थान ओळखू शकली नाहीत आणि नोबेल पारितोषिकाचा दर्जा आणखी उच्च करण्याची त्यांना चालून आलेली संधी त्यांनी हुकवली. गांधी दर शतकात  निर्माण होत नाहीत. त्यांच्या लेखी गांधी होता एका विक्षिप्त भूभागावरून आलेला एक फक्त अर्धनग्न फकीर! यानंतर आपण बरीच मजल गाठली. भारत समजताना सत्याशी फारकत होऊ द्यायची नसेल तर डोळ्याला लावलेल्या दुर्बिणी आणि मुख्य म्हणजे काविळीचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल, याची जाण पश्चिमेला आली. भारताला वैभवसंपन्न भूतकाळ आहे, हे त्यांना झापडबंदपणामुळे कळत नव्हतं; आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याची आता उपरती होत चालली आहे.

पंधरवडय़ापूर्वी आपण आपला ६२ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण आपला म्हणजे नेमका कुणाकुणाचा? हा प्रश्न मला दरवर्षी पडत असतो, तसाच तो यावर्षीही पडला. कितीही टाळला तरी!  या काळात किती जणांच्या बेडय़ा गळून पडल्या? नव्यानं किती जणांना लागल्या? वाटतं, इंग्रज ही वसाहत सोडून गेले त्या दिवसाचा फक्त हा वर्धापनदिन असावा. लुटणारे आपले हात थकून गेल्यानंतर गोऱ्या व्यापाऱ्यांनी त्या वेळी हिंदुस्थान नावाचं हे लुटीचं बोचकं दाणकन तर पायापाशी आदळलं नव्हतं ना? अन् नंतर कातडीचा रंग बदलून, वसाहतवादी नव्याने तर गोळा झालेले नाहीत ना, त्या फुटलेल्या बोचक्यापाशी? सारख्या शंका येत राहतात.

पण कदाचित तसंही नसावं. नाही तर हा देश, येत्या फक्त पाव शतकात एक जागतिक महासत्ता म्हणून शड्डू ठोकून उभा राहील, इतक्या तयारीचा आज दिसला नसता. तळपट होईल, म्हणून भल्याभल्यांनी बोटं कडाकडा मोडली होती तेव्हा. तरीही आज आपण जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून उभे आहोत. जरी आपल्या निम्म्या लोकांच्या पोटातला आगडोंब पुरेसा विझलेला नसला तरीही! महात्मा गांधी जिवंत असते, तर अंगावर चिंध्या पांघरणाऱ्या अर्धनग्नांची मोठी संख्या पाहून, त्यांच्या अंतरात्म्यानं त्यांना अजून सदरा घालण्याची परवानगी दिली नसती. आपली बहुविधता तर एवढी की, शोभादर्शक यंत्रालाही इतक्या विविध प्रकारच्या रचना करून दाखवता येणार नाहीत. पण वैविध्याच्या हातात हात घालून इथं आलेले विरोधाभासही विनोदी ठरले नाहीत अन् विविधतेतून बांधलेलं ऐक्यही कचकडय़ाइतकं तकलादू ठरलं नाही.

जागतिक महासत्तांना एक जुनी खोड आहे- आपल्या सैतानांचे कारखाने आणि त्यांच्या काळ्या कारवाया तीनही पाळ्यात चालवायची. छोटय़ा आणि दुबळ्या देशांचं सार्वभौमत्व हरण करण्याचा त्यांचा खेळ उसंत न घेता चालू असतो. पण भुकेल्या, तहानलेल्या, कंगाल, अर्धनग्न, आजारी, अर्धशिक्षित, वरकरणी दीनवाणा वाटणाऱ्या भारत नावाच्या पुराणपुरुषानं त्यांना धूप घातली नाही. गेल्या ६२ वर्षांत, दरवर्षी त्याच्या चेहऱ्यावर नवनवी झळाळी चढत गेली. म्हणावं तर हा तिसऱ्या जगातला य:कश्चित देश आहे, पण तरीही तो अद्याप उन्मळून कसा पडत नाही? या विचारानं सैतानांची निराशा वाढतच गेली.

साम्यवाद गाडला गेला- आधी सोव्हिएत साम्राज्याच्या डोलाऱ्याखाली आणि नंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था सर्वाधिक क्रूर आणि विधिनिषेधशून्य पद्धतीने, साम्यवादी राजकीय व्यवस्थेखालीच राबवणाऱ्या चीनच्या तत्त्वशून्यतेखाली! जागतिक अर्थव्यवस्थेला मस्तवाल बैलाच्या मुसंडय़ा मारत राहणाऱ्या अमेरिकेतल्या घरबांधणी कर्ज घोटाळ्यामुळे; आणि केवळ डॉलर मजबूत ठेवण्यासाठीच, लाखो निष्पाप जिवांना मारून, जगभर लोकशाही विकण्याची कंत्राटं घेत फिरणाऱ्या भांडवलशाहीमुळे. तिचे जन्मजात दोष आणि तुटपुंजेपणा बीभत्स स्वरूपात उघडे पडले. पण भारताने जन्म घेताक्षणीच मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. यापेक्षा आणखी किती मोठी आदरांजली आधुनिक भारताचे निर्माते पं. जवाहरलाल नेहरू यांना, उलगडत जाणारा जागतिक इतिहास वाहू शकतो? व्यवहारवादाच्याही वर असलेला हा द्रष्टा व्यवहारवाद आहे. तुम्ही आम्ही नेहरूंना आदरांजली वाहावी किंवा न वाहावी, आपापल्या खुजेपणाचं प्रदर्शन करावं की न करावं, हा ज्याचा त्याच्या सभ्य कृतज्ञतेचा प्रश्न आहे. नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांची तुलना करण्याचा आव आणताना  एकाला मुद्दाम स्वप्नाळू म्हणायचं आणि दुसऱ्याला व्यवहारवादी! त्यामुळे अनाथ बालकांना स्वातंत्र्यलढय़ात पटेलांसारखे नसलेले आईबाप शोधण्याची सोय उपलब्ध होते, इतकेच! खरं तर अनाथाला का फरक पडावा भूतकाळ नसला म्हणून? उज्ज्वल करण्यासाठी भविष्यकाळ तर उपलब्ध असतो ना?

मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है, तुम्हारे पास क्या है, एँ?- हिंदी चित्रपटातला एक भाऊ विचारतो. दुसरा भाऊ शांतपणे म्हणतो- मेरे पास माँ है. हा डायलॉग भारतापेक्षा पकिस्तानात जास्त म्हटला जातो, पण फक्त नेहरूंच्या संदर्भात! भारताजवळ नेहरू होते ना! ही पाकिस्तानातली आणि इथल्या पाकिस्तानवाद्यांतली समान  चरफड! शेवटी मूलतत्त्ववादी ही एकच जात असते आणि ते असतात- जत्रेत बचपन में खोये हुए भाई!

फाळणीत मायभूमी हरवलेल्या अडवाणींबद्दल आपल्याला सहवेदना असते. जसवंतसिंह काही वर्षांपूर्वी बलुचिस्तानातल्या आपल्या मूळ कुलदैवताच्या पूजेसाठी गेलेले अन् त्यांच्या स्वागतासाठी बलुची, ब्रोही जमातीचे लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले आपण टीव्हीवर पाहिले होते. पण या दोघांचीही कुलदैवते इस्लामाबादेतल्या कबरींमध्येच पहुडलेली असतील तर मात्र कठीण आहे. अन् नेहरूंचं सवरेत्कृष्ट स्मारक असलेल्या आयआयटीतून शिकून बाहेर पडलेल्या त्यांच्या सल्लागारांनी नेहरूंना खलनायक ठरवण्याचं पेटंट मिळवावं यासारखा द्रोह नाही. आठवणींना आणखीही उजाळा देता येईल. काही वर्षांपूर्वी अडवाणींनी  पाकिस्तानात जाऊन प्रयत्न केले होते की, १८५७ सालच्या स्वातंत्र्यलढय़ाचा १५० वा वर्धापनदिन,  जो २००६-०७ साली येत होता, भारत आणि पाकिस्तानने एकत्रित साजरा करावा. इतिहासात अधिक खोल डुबकी मारण्यामागचा डाव उघड होता- राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे इत्यादी स्वातंत्र्ययोद्धय़ांवर संघ-भाजपने आपले पितृत्व लादणे, त्यांना फोटोत विवेकानंदांशेजारी, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून, हतबल उभे करणे आणि त्यांचा राष्ट्रीय नव्हे तर खासगी मालमत्ता म्हणून पुढे वापर करीत राहाणे. काँग्रेसने गांधींचे जे केले तेच! मंत्रालयातून लायसन्स घेऊन गेल्यानंतर दारूच्या गुत्त्यात महात्मा गांधींचा फोटो लावणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. भाजपला देशद्रोही म्हणणे दुष्टपणाचे होईल. पण १९४७ सालचे त्यांना इतके वावडे का? हे लहान मुलासारखे झाले- तुमचा कोंबडा आरवून सूर्य उगवलाय ना, मग आम्हाला नको तुमचा सूर्य. आम्ही बसू अंधारात! नाही आवडत ना तुम्हाला १५ ऑगस्ट? ना आवडू देत, पण निदान १४ ऑगस्ट तरी आवडू देऊ नका! काय करायचं? देशातले जे नाही-रे आहेत, त्यांना आपली वसाहतवादी, लुटारू यंत्रणा राष्ट्रीय प्रवाहात येऊ देत नाही; आणि त्यांच्या बेडय़ाही ते काढायला तयार नाहीत. अन् दुसरीकडे आहेत हे अति-आहे-रे वर्गातले, ज्यांना स्वातंत्र्यसूर्याचं ४७ सालातलं उगवणं मंजूर नाही.

अभिमानानं सांगाव्यात अशा आज आमच्याकडं बऱ्याच गोष्टी आहेत. शास्त्रज्ञांची आणि तंत्रज्ञांची जगातली सर्वात मोठी पलटण भारताची आहे. सॉफ्टवेअरची जणू महासत्ताच भारत आहे. पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांच्या भरभराटीमध्ये भारतामध्येच प्रशिक्षित झालेल्या मनुष्यबळाचा वाटा बऱ्यापैकी मोठा आहे. जगात कितीही मोठी मंदी असली तरीही, भारतातल्या आयआयटी आणि आयआयएममधून बाहेर पडलेल्या तंत्रज्ञ आणि मॅनेजर्सनी आपल्याकडेच नोकरीला राहावं, म्हणून युरोप-अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये खेचाखेच चालू असते. आपल्या आर्थिक वाढीचा वार्षिक दर जगात दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि तो जगभर कौतुकाचा किंवा असूयेचा विषय आहे. जगातलं सर्वात मोठं पशुधन आपल्याकडे आहे आणि जगातलं सर्वाधिक दूध-उत्पादन आपण करतो. कधी कधी जगातली सर्वाधिक साखरदेखील! अन्नधान्याच्या बाबतीत आपण बहुतेक सर्व वर्षी स्वयंपूर्ण असतो. भारत भले आता स्वतंत्र जरी होत असला, तरी भुकेच्या कडकलक्ष्मीच्या चाबकाच्या फटकाऱ्याखाली काळानिळा होऊन, तो सतत कण्हत पडून राहील, असं भाकीत त्यावेळी पाश्चिमात्य शेती व अर्थतज्ज्ञांनी वर्तवलं होतं.

विन्स्टन चर्चिलसारख्या थोर मुत्सद्याचं भाकीत होतं : आम्ही जर भारत सोडून गेलो तर हा देश वेगाने अनेक शतकं मागे, मध्ययुगीन रानटीपणाच्या खोल गर्तेत फेकला जाईल आणि जगण्यासाठी साध्यासुध्या गोष्टी न मिळाल्यामुळे त्याचं जिणं हराम होऊन जाईल. इथं आपण वसाहतवाद्यांची स्वार्थानं बरबटलेली, अपुरी वाढ झालेली, रोगट मनं समजून घेतली पाहिजेत. नेमक्या याच मानसिकतेमुळे, पाश्चिमात्य विद्वान आणि नोबेल शांतता पारितोषिकाची निवड करणारी मंडळी महात्मा गांधींचं जागतिक शांतता आणि अहिंसक संघर्षांच्या मानवी इतिहासामधलं उच्च स्थान ओळखू शकली नाहीत आणि नोबेल पारितोषिकाचा दर्जा आणखी उच्च करण्याची त्यांना चालून आलेली संधी त्यांनी हुकवली. गांधी दर शतकात  निर्माण होत नाहीत. त्यांच्या लेखी गांधी होता एका विक्षिप्त भूभागावरून आलेला एक फक्त अर्धनग्न फकीर! यानंतर आपण बरीच मजल गाठली. भारत समजताना सत्याशी फारकत होऊ द्यायची नसेल तर डोळ्याला लावलेल्या दुर्बिणी आणि मुख्य म्हणजे काविळीचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल, याची जाण पश्चिमेला आली. भारताला वैभवसंपन्न भूतकाळ आहे, हे त्यांना झापडबंदपणामुळे कळत नव्हतं; आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याची आता उपरती होत चालली आहे.

आपल्या खटोखटच्या कर्तबगारीने आपली छाती फुगून येणं साहजिकच आहे. पण काही विदारक सत्यांकडे सहज नुसती नजर जरी गेली तरी फुग्यातली हवा फसकन् जाईल. लोकशाही कारभार करण्यासाठी म्हणून ज्या संस्था आपण उभारल्या आहेत त्या सर्वाचा आणि त्या चालवण्याचं नाटक करणाऱ्या बहुतांश मंडळींच्या दर्जा आणि वकुबापुढे फार मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. परमेश्वरापेक्षाही सर्वव्यापी असलेला भ्रष्टाचार; आर्थिक संस्थांचे डुगडुगणारे डोलारे; कमालीच्या तोकडय़ा पायाभूत सुविधा; वेगानं खालावत गेलेलं पर्यावरण; विविध जाती-जमातींना एकत्र बांधून ठेवणारे पण ठिकठिकाणी विदीर्ण होत गेलेले रेशमी बंध, भयावहरीत्या वाढत गेलेल्या सामाजिक आणि आर्थिक दऱ्या; मिळेल त्या कारणापोटी होणारी गुणवत्तेची गळचेपी; दीनदुबळ्या, हवालदिल लोकसंख्येचा अक्राळविक्राळ आकार आणि त्यापेक्षाही भयावह आणि ठसठसणारी वेदना देणारी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वाच्या संवेदनशीलतेची झालेली फार मोठी पडझड!

फक्त एखाद्या वर्षीच पाऊस नीट झाला नाही तर, जिथवर नजर जाईल तिथवर दुष्काळ दिसू लागतो. देश विकलांग झाल्यासारखा भासतो. गुरांचे लोंढे खाटिकखान्याकडे ढकलले जातात अन् शेतकरी गळफासाकडे किंवा एन्ड्रीनच्या बाटलीकडे! पण याचवेळी पाटबंधारे खात्यातल्या कार्यकारी अभियंत्याच्या नुसत्या बदलीचा भाव पन्नास लाख रुपये असतो. धरणं, रस्ते, पूल, वीजप्रकल्प किंवा अन्य कुठलंही सार्वजनिक बांधकाम दहा टक्के किक-बॅकशिवाय पूर्णच होत नाही. सरकार मध्येच बदललं तर किक-बॅक पुनरुज्जीवित होतो. जाणाऱ्या सरकारबरोबर तो पूर्ण मरत नाही. दुष्काळ हटविण्यासाठी अद्यापि भूगर्भातूनच गावं स्वयंपूर्ण झाली नाहीत आणि जमिनीवर पाणी साठवण्यासाठी लहान-मोठी धरणंही पुरेशी झाली नाहीत. हुकलेला एक मान्सून एवढा हाहा:कार माजवू शकतो याचं विकसित देशांना राहून राहून आश्चर्य वाटत राहातं! दुष्काळापासून स्वातंत्र्य  ही आपल्या देशात अजून कविकल्पनाच आहे.
क्षणभर विचार करा, एक समाज म्हणून आपण एक झालोय का. स्वतंत्र, बंधमुक्त? एकदा दुष्काळात होरपळलेल्या आणि सामाजिक अत्याचारात तिच्या शाळकरी मुलीचे लचके तोडले गेलेल्या नेस्तनाबूत झालेल्या बाईला मी विचारलं होतं- बाई, सरकारनं उद्या तुमच्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बाई म्हणाल्या- अरे बाबा, येका सरकारनं कुनाकुनाचं कुठवर पाहावं? सरकार पन मानूसच है ना? या सर्वानी आभाळाला टेकू लावले आहेत. म्हणून ते कोसळत नाही.

गेल्या ६२ वर्षांत आपली मनं बऱ्यापैकी बधिर झालेली  आहेतच, पण आपले कानही बधिर  झालेले आहेत हे आपल्या लक्षातच येत नाही. कारण आपण सोयीस्कर तेवढंच ऐकतो. शिवाय आपल्या कानात सेलफोनच्या नाही तर म्युझिक सिस्टिमच्या वायरी घुसलेल्या असतात. आपण भावूक गर्दी आहोत. त्यामुळे घाईघाईत लोकशाही- मंदिराच्या कळसाचं बाहेरूनच तेवढं दर्शन घेतो आणि पुढं चालू लागतो. हे मंदिर तोलून धरणारे आपल्या लोकशाहीचे स्तंभ काय पुटपुटत असतात, ते आपण ऐकत बसत नाही. कार्यबाहुल्यामुळे सवडही नसते. आपण हे लक्षात घेत नाही की, स्वत:शी पुटपुटणारी सर्वच मंडळी काही डोक्यावर परिणाम झालेली नसतात. बऱ्याचदा ती अतिश्रमानं थकलेली असतात. तीही शोध घेत असतात ऐकणाऱ्या कानांचा!

लोकशाही  तोलणाऱ्या या खांबांच्याही तक्रारी आहेत आणि आत्मसंतुष्टताही आहे. सगळ्यांच्या काही समान तक्रारी असतात. सीमेंट आणि लोखंड कमी पडलं, हे पालुपद असतंच. आपल्याला  दिसतात ते निघालेले पापुद्रे. पडलेल्या ढपल्या. उघडय़ा पडलेल्या तांबूस-पिवळ्या, लोखंडाच्या वाकलेल्या सळ्यांचं भंगार! झाकण्यासाठी रंग तरी किती वेळा लावायचा? पण कुणीही सांगायला तयार नाही की, वापरलेला माल कमअस्सल होता. मात्र हे खरंय, की त्यांनी अजून पडू दिलेलं नाही, तोलून धरलेलं वरचं मंदिर!

आपल्या लोकशाहीचे चारही खांब काय पुटपुटताहेत ते जरा पाहू यात..

मी न्यायमूर्ती आहे. आपली झोपेची मुळीच तक्रार नाही. न्यायदानातला विलंब म्हणजे न्याय नाकारणं, ही जी शिंची म्हण आहे, तीमुळे आपल्या झोपेचं बुवा कधीही खोबरं होत नाही. न्यायसंस्थेची गेल्या ६२ वर्षांतली वाढ ही लोकशाहीचा सर्वात अकार्यक्षम, दुबळा आणि टेकू द्यायचा कमी (असून नसल्यासारखा) खांब अशी झाली आहे, असं मला चुकून कधी, अगदी गाफील अवस्थेतही वाटत नाही. मी देवळाच्या सुरक्षित गाभाऱ्यात राहणारा परमेश्वर आहे. माझा आशीर्वाद रांगेत प्रतीक्षा करणाऱ्या माझ्या भक्तगणांपर्यंत त्यांच्या  जिवंतपणी पोहोचलाच, तर त्यांनी स्वत:ला पुण्यवान समजावं. भक्ताला अधिक संकटात टाकून त्याची परीक्षा पाहणं  हे देवाचं कामच आहे! परमेश्वराची श्रीशिल्लक किती आहे याची नसती उठाठेव भिक्कारडय़ा भक्तांनी कशाला करावी? त्यांचा संबंध काय, माझा प्रतिवार्षिक गल्ला कितीनं वाढला ते जाणून घेण्याशी? देवावर तुमची अंधश्रद्धा नको का? भक्ताचं काम काय? फळांचा, दुधाचा नैवेद्य भक्तिभावाने आणून पुजाऱ्याकडे देणं आणि डोळे मिटून अंमळशानं अनशेपोटी नामस्मरण करणं. फार वेळ तिथं थांबू नये. त्यानंतर श्रींच्या वामकुक्षीसाठी गाभारा बंद होईल. अहो, देव कुठं फळं खातो का? तो भक्तीचा भुकेला! माझी लीला अगाध आहे. येथे उभं राहून गैरलागू अर्थ काढू नयेत. सक्त कारवाई करण्यात येईल. – आदेशावरून.

मी आहे राजकीय पुढारी. मी- एकदम कॅपिटल! म्हणजे पहिल्या लिपितला. माझा, माझी, माझे, माझ्यासाठी, मला सर्व कॅपिटल! मी १८ तास काम करतो. पण नोकरी टिकेल याची शाश्वती नाही. मग चार पैसे केले मी गोळा, अन् ठेवले परदेशी अकाऊंटमध्ये! बिघडलं कुठं? चांगली पायाभरणी करण्यापूर्वीच, वेळ येण्याआधीच, दारिद्रय़ाच्या दलदलीत थोरामोठय़ांनी हा जो लोकशाहीचा सांगाडा उभा करून ठेवलाय ना, तो का डुगडुगत नाही किंवा कोसळून पडत नाही, माहीत आहे का? हे भरभक्कम पाय या राडय़ारोडय़ात रोवून उभा आहे ना मी, अन् पेलतोय तो माझ्या रुंद भरीव खांद्यांवर, पिळदार दंडांचा जोर लावून! सुटलेल्या पोटाकडं टक लावून बघू नका. रोज उठून शिव्या खायला मी एकटा! अक्कल शिकवायला बाकीचे सगळे. गाव  चालवणाऱ्या पाटलाला कधी कुणी चांगलं म्हटलंय का? मी म्हणतो, रोज डोंगराएवढा पैसा खायची या अधिकाऱ्यांना गरजच काय? यांची फक्त घेना बँक आहे, देना नाहीच! यांना काय निवडणुका लढवाव्या लागतात का? आल्या गेलेल्यांना चहा सोडाच, आयुष्यात कधी ग्लासभर पाणी तरी विचारलंय का यांनी? मंत्रालयाला जर संध्याकाळी पाचनंतर आग लागली तर समोरच्या स्वत:च्या राहत्या घरातून पेलाभर पाणी आणून कधी विझवतील का? स्वत:च्या घरी कधी चालत गेलेत का? लोकल बंद पडते म्हणजे काय होतं, आहे का ठाऊक? यांचं दळणसुद्धा शिपाई सरकारी गाडीतून आणतो. यांची मुलं अमेरिकेत खुशालीत आहेत. ते अमेरिकेत भारतीय संस्कृती कशी जिवंत ठेवतात हा गुणगौरव ऐकत चला जरा न चुकता. भारतात काय संस्कृती राहिलीय आता? श्शी! हे असलं बघितल्यावर मला बुवा भारताची फारच काळजी वाटते. सततची टोचणी- आपलं कसं होणार? म्हणून मी माझे राजपुत्र आणि राजकन्या सगळ्यांना राजकारणात आणून सोडलेलं आहे. उगीच पोकळी नको निर्माण व्हायला. वेळवखत काय सांगून येतो का? घराण्यात पुढं सेवेचं बाळकडू शिल्लक राहिलं पाहिजे. ते नसतील तर उद्या अंधार होईल. केलाय कुणी विचार? हे काय फुकटचं केकाटताय- घराणेशाही, घराणेशाही! अरे, आणा की तुम्ही पर्याय. कुणी धरलेत तुमचे हात? आमच्या मुलामुलींना, पुतण्या-भाचरांना, सुना-जावयांना लोकांनी निवडून दिलंय. कुणी सांगावं, एक दिवशी येईल पण घराणेशाहीशिवाय लोकशाही. आपला देशच महान आहे. कुठल्या बेटय़ाची ना आहे त्याला?

मी सनदी नोकर आहे. साहेब आहे. ज्याला सरकार सरकार म्हणतात तो मीच! मी विनम्र आहे. कायम नव्वद अंशात वाकलेला असतो. आणखी काय करावं मी या लोकशाहीसाठी? तरी तुम्ही म्हणता- अति नमणे, अति लवणे, ही धोकेबाज हलकटाची लक्षणं! बोलणाऱ्याचं काय? त्याची फाईल नसते म्हणून अवडताही येत नाही. राज्यकारभार कसा करावा, ही कला तर आहेच, पण ते एक पूर्ण विकसित झालेलं शास्त्र आहे. आम्हीच केवळ तो शास्त्रार्थ जाणतो. आमचं तसं प्रशिक्षणच झालेलं असतं. पण नेत्यांना वाटतं, त्यांच्याकडं ती कला आहे. स्त्रीलिंगी असलेली प्रत्येक गोष्ट आपलीच, असं त्यांना वाटतं. बाकी काय? निरक्षर माठ सगळे! आम्ही आपलं ऐकून घेतो, कारण इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आम्हाला पहिला धडा शिकवतात- तुमचा बॉस जरी गाढव असला, खादाड डुक्कर असला, मारका बैल असला, तरी त्याला वाकून सतत यस सर म्हणायचं. कारण ही लोकशाही आहे आणि ती फार पवित्र आहे. नंतर त्याची कशी वजवायची ते अधिकृतपणे शिकवत नाहीत. ती कला आपापली आपण नंतर विकसित करायची असते. आम्ही घोडं असतो. हे  टिक्कोजी फक्त स्वार असतात. आम्ही नेऊ तिकडंच जाऊ शकतात. स्वारानं पहिल्यांदा मांड ठोकली की लगेच घोडय़ाला कळतं, गडी पक्का आहे का कच्चा! किती सवाऱ्या आल्या अन् गेल्यात! गेल्यात नाही घालवल्यात! पण काय करायचं? आमच्या बढत्या आणि बदल्या या मूर्खाच्या हातात ना! तोंडदेखलं हसून वागावं लागतं. किती कष्ट पडतात या एरंडेल प्यायलेल्या चेहऱ्याला! आमच्या हाऊसिंग सोसायटीसाठी मोक्याचा प्लॉट द्यायला लागले की, समजून घ्यायचं की समुद्र कुठं तरी बुजवायचाय. आमच्या बायकांच्या महिला मंडळाच्या महान कार्यासाठी, आमच्या क्लबसाठी आम्हालासुद्धा काही तरी मागावंच लागतं मग. आमच्यावर पण घरच्यांचं प्रेशर असतं ना! या नेते लोकांना काही कळत नाही. गुन्हा करावा तो नेहमी कायदा पाळून. अन् कायदा करावा नेहमी अस्पष्टसा, अनेक लूपहोल्स ठेवून. इतरांसाठी तो नेहमी ताठ, कडक पाहिजे.

मी पत्रकार आहे. माझं आयुष्य म्हणजे आहे अहंकाराची एक कधीही न संपणारी यात्रा! माजोरीपणा हे त्यागाचं जुळं भावंड! मिळालेलं सोडणं हा त्याग नव्हे, न मिळणं म्हणजे माझ्या लेखी त्याग! आमच्या अहंकाराचा आकार हा विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता यापेक्षा खूपच अधिक असतो. मलाही ते जाणवतं. पण इथं वेळ कुणाला आहे ग्रंथांच्या संगतीत जगायला? कुटुंबाला देण्यासाठी तरी कुठं वेळ असतो? तेही बरंच आहे म्हणा. कुटुंबाला वेळ द्यायचा तर खिसा काही तरी भरलेला पाहिजे ना. दारिद्रय़, मग ते बौद्धिक असो किंवा आर्थिक, जेवढं माझं दारिद्रय़ जास्त तेवढा माझ्या अहंकाराचा दर्प अधिक! सरस्वतीला आणि लक्ष्मीला माझ्याकडे बघून हसायला वेळ नसला, तरी मी कशाला करू त्याची चिंता? माझा अडाणी, बावळटपणा हा करमणुकीचा विषय असतो, पण मी कशाला करू त्याची पर्वा? वाचकांनी पेपर उघडला की, त्यांना लगेच माझा वकूब कळतो. बंद दरवाज्याआड ढळणाऱ्या उत्तररात्री जे खरं राजकारण शिजतं, त्याची मला गंधवर्ताही नसते. मी त्या वेळी धापा टाकत पकडत असतो शेवटची लोकल गाडी. आमच्या पेपरचे शेटजीच मला नंतर कधी त्या राजकारणाच्या एखाद्या तुकडय़ाचा संदर्भ देतात. लाज वाटते. आता तर अनेक राजकीय पुढारीच पेपरचे शेटजी असतात. काळ्या रात्रीच्या व्यवहारी राजकारणाला मी फक्त, गुळगुळीत झालेल्या जुन्या पुस्तकी तत्त्वज्ञानाचा मुलामा देत असतो आणि त्याचं उदात्तीकरण करत असतो. कधी पूर्ण अज्ञानापोटी, तर कधी ते शोभून दिसावं म्हणून- जेणेकरून लोकांना खऱ्या राजकारणाची किळस येऊ नये! शेटजी म्हणत असतात, पेपर जाहिरातींवर चालतो, बातम्या-संपादकीयांमुळे नाही!

फार काही बोलत असतात हे पुटपुटणारे खांब! पण त्यांचं ऐकायला कुणाला वेळ आहे, हे असं चालायचंच.

– डॉ. अभय बंग, सौजन्य – अनुभव मासिक

पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने “आजचा काळ, आजचे साहित्य’ या विषयावरील “युनिक फीचर्स’ने संपादित केलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते झालं.

या भाषणात त्यांनी साहित्यिकांकडून समाजाला असलेल्या अपेक्षा मांडल्या आहेत, मात्र “तंबाखूने रंगवलेला पैसा संमेलनात नको’ या त्यांच्या विधानावरच प्रामुख्याने चर्चा घडली, त्यामुळे मूळ भाषणातील महत्त्वाच्या मुद्‌द्यांकडे दुर्लक्ष झालं, म्हणून “अनुभव’च्या वाचकांसाठी त्या मुद्‌द्यांशी संबंधित भाषण इथे प्रकाशित करत आहेत.

————————————————

मी साहित्यिक नसल्याने साहित्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे मी साहित्याविषयी जवळपास बोलणार नाही. पण मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठीपण म्हणजे काय याविषयी बोलणार आहे. या स्मरणिकेचा विषय “आजचा काळ आणि आजचं साहित्य’ असा आहे, त्या अनुषंगानेही मी काही बाबींकडे सर्व साहित्यिकांचं लक्ष वेधू इच्छितो.

संकुचित सांस्कृतिक दृष्टीचं आव्हान
मराठी भाषी आणि महाराष्ट्र यांच्या अस्मिता आणि ओळखी विषयी सध्या बराच राजकीय वाद सुरू आहे. स्वत:ला “राष्ट्र’ नव्हे, “महाराष्ट्र’ म्हणवणारा हा प्रांत आहे. “महाराष्ट्र’ही दर्पोक्ती आहे का? की ही साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा आहे? माझं असं मानणं आहे, की “महाराष्ट्र’ ही दर्पोक्तीही नाही आणि भूभाग वाढवण्याची साम्राज्यवादी आकांक्षाही नाही. ही आमची आध्यात्मिक आकांक्षा आहे. आम्हाला आमचं हृदय इतकं व्यापक करायचं आहे की ते “महाराष्ट्र’ व्हावं! त्यामुळे महाराष्ट्र ही भौगोलिक आकांक्षा नाही, ती आध्यात्मिक आकांक्षा आहे. “महाराष्ट्र’ हे नाव निवडून आपण सर्व मराठी मंडळींनी अशी घोषणा केलेली आहे, की आम्ही भौगोलिकतेच्या सीमा ओलांडून, स्थानिकतेच्या आणि संकुचिततेच्या सीमा ओलांडून आमच्या हृदयाचं महाराष्ट्र करू. तसं केलं नाही तर “राष्ट्रा’च्या पोटामध्ये “महाराष्ट्र’ कसा बरं मावणार आहे?

आज काही राजकीय शक्तींमुळे आपल्यासमोर, महाराष्ट्रासमोर हे एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही भारतात कुठेही जा, महाराष्ट्रातील काही मंडळींच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राविषयी बराच गैरसमज आढळतो. म्हणूनच आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे, की महाराष्ट्र ही साम्राज्यवादी संकल्पना नसून एक आध्यात्मिक घोषणा आहे. ही घोषणा मोठी कालानुरूप आहे.
जागतिकीकरणाच्या जमान्यात स्थानिकतेचा आग्रह टिकणार नसला तरी महाराष्ट्रात आज काही छोटे-मोठे तंटे, वाद उद्‌भवत आहेत. मुंबईकरांना कधी दक्षिण भारतीय चालत नाहीत, कधी उत्तर भारतीय चालत नाहीत. पुण्याचं आधी झपाट्याने औद्योगीकरण झालं आणि नंतर आयटी कंपन्या आल्या, त्यामुळे पुण्याचं पुणेरी स्वरूप बदलतं आहे. त्याची खंत वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पुण्याचं पुणेरीपणच गेलं तर गंमत काय राहिली?

पण प्रश्न असा आहे, की हे सर्व कसं टाळता येईल? आम्हाला जागतिकीकरणाचे आर्थिक आणि राजकीय फायदे हवे आहेत, पण सांस्कृतिक परिवर्तन नको आहे, ही एक असंभव मागणी आपण करतो आहोत. “हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू’ हे जगातलं मॅनेजमेंटमधलं अव्वल क्रमांकाचं मासिक आहे. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी एक कव्हरस्टोरी आली होती. त्यांनी अशी मांडणी केली, की जे शहर जगातून कुठूनही आलेल्या माणसाला परकेपणाचा भाव तर देणार नाहीच, उलट आपलेपणाचा भाव देईल, त्या शहराकडे जगातील बुध्दिमत्तेचं मानवीय भांडवल वळणार आहे. अशा सर्वसमावेशक सांस्कृतिक निर्देशकांवर त्यांनी रॅंकिंग केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की अमेरिकेतील ऑस्टिन नावाचं एक छोटंसं शहर वैश्विक संस्कृतीच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचं शहर ठरलं. या निरीक्षणानंतर दोनच वर्षांनी अमेरिकेमध्ये सर्वात झपाट्याने वाढणारं शहर कोणतं असा शोेध घेतला गेला तेव्हा प्रथम क्रमांकावर ऑस्टिनच आलं. जे शहर त्या शहराबाहेरच्या लोकांना आपलेपणाचा भाव देईल, परकेपणाचा भाव निर्माण करणार नाही त्या शहराचाच आर्थिक विकास आणि राजकीय विकास होणार आहे, ही बाब त्यातून स्पष्ट झाली. त्यामुळे जागतिकीकरणामुळे येणारा आर्थिक विकास हवा पण सांस्कृतिक बदल नको, अशी अशक्य मागणी आपल्याला करता येईल का?

दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरची माणसं आल्याने आमची संस्कृती बिघडते, आमची संस्कृती लयाला जाते, वाहून जाते, अशी मानसिक असुरक्षिततेची भावना पसरलेली दिसते. अशी भावना पसरण्याचं प्रमुख कारण कदाचित संस्कृती म्हणजे काय याविषयीच आपल्या मनामध्ये काही तरी गफलत असावी, काही तरी गोंधळ असावा असं मला वाटतं. नऊवारी साडी, की तलवार- फेटा, की शिवराळ भाषा, की पुरणपोळी- तुळशीवृंदावन अशा काही सवयींमार्फत आपण आपली संस्कृती व्याख्यित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या गोष्टी बदलणाऱ्या आहेत, बदलतही आहेत. हे बदलायला बाहेरच्या माणसाची गरज नाही. महाराष्ट्राच्या नव्या आधुनिक पिढीने या सगळ्या गोष्टींचा केव्हाच त्याग केलेला आहे. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीमध्ये मराठी संस्कृती म्हणजे काय? स्थानिकतेचा आग्रह आणि संकुचित सांस्कृतिकवाद याचा राजकीय आग्रह धरून महाराष्ट्राचा विकास होणार आहे का, असा प्रश्न आहे.

माझी अशी भावना आहे, की या बाबतीत महाराष्ट्राला मार्गदर्शन आणि नेतृत्व राजकीय लोकांकडून नको आहे, तर ते साहित्यिकांकडून हवं आहे. आपण पूर्वकालीन तीन साहित्यिकांकडे वळून बघू या. आपले आद्य साहित्यिक ज्ञानेश्र्वर काय म्हणाले? ते म्हणाले, “आता विश्र्वात्मके देवे…’, दुसरे साहित्यिक तुकाराम काय म्हणाले?… ” तुका आकाशाएवढा…’ आणि तिसरे साहित्यिक विनोबा म्हणाले, “जय जगत्‌!’ आजपासून शंभर-दोनशे-तीनशे वर्षांनी आजच्या कोणत्या साहित्यिकांचं साहित्य वाचलं जाईल हे मला माहीत नाही, पण ज्या तीन साहित्यिकांचं साहित्य जरूर वाचलं जाईल असं मला व्यक्तिश: वाटतं ते असतील ज्ञानेश्र्वर, तुकाराम आणि विनोबा. या तिघांनी आपल्याला अगोदरच सांस्कृतिक मार्गदर्शन केलेलं आहे, की महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय? या तिघांनीही जी विश्र्वबंधुत्वाची घोषणा दिली आहे तो मराठीपणा आहे की नाही? मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक नवी वैश्र्विक मराठी संस्कृती व विश्र्वमानस निर्माण व्हायला हवं. परंतु निव्वळ दुबई आणि मॉरिशसमध्ये संमेलनं घेऊन ते निर्माण होणार नाही. आपण आपल्या दृष्टीत बदल घडवत आणला आणि आपलं हृदय व्यापक केलं तरच हे शक्य आहे. आपलं हृदय खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आणि त्याही पलीकडे वैश्र्विक झालं तरच वैश्र्विक मराठी संस्कृती निर्माण होऊ शकेल.

ही विश्र्वधर्मी मराठी संस्कृती प्रत्यक्षात येण्यासाठी साहित्य संमेलन आणि साहित्यिक यांनी नेतृत्व करणं अपेक्षित आहे. आजचे साहित्यिक असं नेतृत्व देऊ शकतील का? अख्खा महाराष्ट्र याकरता आपल्याकडे बघणार आहे.

साहित्यिकांनी कालभेदी दृष्टी द्यावी

काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे लोक एखादं नवं संशोधन करण्यापूर्वी त्याआधीच्या वैज्ञानिकांनी काय केलं होतं याचा शोध घेतात. त्या सोबतच काही जण तर ज्या विषयासंबंधी संशोधन करू इच्छितात त्याबद्दल साहित्यिकांनी काय लिहिलेलं आहे हे बघत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वैज्ञानिकांच्या अस्सल बुद्धिनिष्ठ दृष्टीला जे दिसत नाही ते बऱ्याचदा साहित्यिकांना दिसत असतं. साहित्यिकांना आजचंही वास्तव दिसत असतं आणि भविष्यकाळाचंदेखील दिसत असतं. याचा अर्थ असा, की आपल्याला कालभेदी दृष्टी हवी असेल तर साहित्यिकांकडे जावं लागतं.

शरत्‌चंद्र चट्टोपाध्यायांची एक अतिशय सुंदर कादंबरी आहे- “पथेरदाबी’. भारताच्या राजकारणात गांधी आणि सुभाष यांच्यामधला अहिंसा आणि हिंसा यांचा साधनशुद्धी बाबत जो संघर्ष नंतर राजकीय पटलावर घडला त्याच्या अनेक दशकांपूर्वी “पथेरदाबी’मध्ये सव्यसाची आणि भारती यांच्या वैचारिक आणि नैतिक संघर्षामधून शरदबाबूंनी तो रेखाटलेला होता. रवींद्रनाथ टागोरांची एक नृत्यनाटिका आहे- “रक्तकरबी’. रशियातील क्रांती होण्यापूर्वी रवींद्रनाथ टागोरांनी होऊ घातलेल्या राजकीय क्रांतीचं आणि त्या हिंसक क्रांतीमधून निर्माण होणाऱ्या समस्यांचं अतिशय सुंदर चित्रण त्यात केलेलं होतं. आणि सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे आपण सगळेच ऐकतो, की रामायण घडण्यापूर्वीच वाल्मीकींनी रामकथा लिहिली होती….या उदाहरणांचा अर्थ असा, की काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते व त्यातून त्यांना येणारा भविष्यकाळ दिसू शकतो.

ईशावास्योपनिषदात विनोबांनी “कवी म्हणजे क्रांतदर्शी’ असे म्हटले आहे. “ऋषी’ या शब्दाची विनोबांनी मोठी सुंदर फोड केली आहे. “ऋष’ म्हणजे बघणे, निरीक्षण करणे. जो काळाच्या अंधारातून पुढच्या काळात बघू शकतो तो “ऋषी’! ज्ञानेश्र्वर, तुकाराम, विनोबा, शरत्‌चंद्र, रवींद्रनाथ टागोर हे सगळे कवी व ऋषी होते. त्यांना ती कालभेदी दृष्टी होती.

मराठी साहित्यामध्ये अशी दृष्टी आम्हाला हवी आहे. परंतु मराठी साहित्य तर बऱ्याच प्रमाणात भूतकाळामध्येच रमताना दिसतं. भूतकाळ आमचाच आहे. आमच्याच संस्कृतीचा, परंपरेचा आहे. त्याच्याविषयी प्रेम वाटणं अगदी स्वाभाविक आहे, आवश्यकही आहे. पण आम्ही त्याच्यामध्येच रंगून चालेल, अडकून कसं चालेल? म्हणून किमान काही साहित्यिकांनी तरी आम्हाला ऋषीसारखी कालभेदी पुढची दृष्टी द्यावी, पुढच्या समाजाचं दर्शन द्यावं, ही आमची अपेक्षा आहे. भविष्यकाळ कोणत्या दिशेने जाणार आहे, आम्ही कसं वागावं, या व अशा प्रश्नांबाबत आम्हाला दृष्टीची गरज आहे.

तीन प्रमुख वैश्विक प्रश्र्न

आज तीन प्रमुख वैश्र्विक प्रश्न उभे आहेत- पहिला आहे भांडवलशाहीचं पाप, दुसरा आहे पृथ्वीला ताप आणि तिसरा आहे धार्मिक हिंसाचाराचा शाप. भांडवलशाही असं म्हणाली, की माणसाच्या व्यक्तिगत, अपरिमित लोभाच्या प्रेरणेतूनच समाजाचा आर्थिक विकास होत असतो. ऍडम स्मिथ तसं म्हणाला आणि आम्ही सगळे जगभर त्या पद्धतीने वागत सुटलो. या अपरिमित लोभामुळे, अनियंत्रित लोभामुळे, बॅंकर्सनी केलेल्या प्रचंड घोटाळ्यांमुळे, चुकांमुळे आज जागतिक मंदी आलेली आहे. भांडवलशाहीच्या पापाखाली लोभाची समस्या लपलेली आहे. अपरिमित लोेभ योग्य आहे का, त्यावर आधारित अर्थरचना शक्य आहे का? ही एक मोठी वैश्र्विक समस्या आपल्यापुढे आज उभी आहे.

दुसरी समस्या पृथ्वीला आलेला ताप ही आहे. अनियंत्रित यंत्रवाद, निसर्गाला नष्ट करणं आणि चंगळवाद यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला इकडची काडी तिकडे हलवायची नाही. कोणतेही शारीरिक श्रम करायचे नाहीत. पण अमाप भोग हवा. त्यामुळे आम्हाला पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, कोळसा पाहिजे, वीज पाहिजे, कारखाने पाहिजेत. या सगळ्यातून वैश्र्विक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामानात बदल (क्लायमेट चेंज) हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याच्या विस्तृत वर्णनात जाण्याची गरज नाही. कारण आपण वर्तमानपत्रात वाचत असतो की ग्लोबल वॉर्मिंगचे किती प्रचंड गंभीर परिणाम होणार आहेत!

तिसरी समस्या आहे, धार्मिक हिंसाचाराचा शाप. आधी इराणमध्ये घडू लागलं. मग अफगाणिस्तानमध्ये घडायला लागलं. पुढे पाकिस्तानमध्ये घडायला लागलं. आता हे लोण मुंबईला नि पुण्यालाही आलं आहे. कोणीही या शापापासून मुक्त नाही. आयर्लंडमध्ये ख्रिश्चनांनी वेडाचार केला. आयआरएने अनेक दशकं धार्मिक हिंसाचार नि दहशतवाद केला. नंतर शिखांनी केला, मुस्लिमांनी केला, आणि आता हिंदूही करायला लागले आहेत.

शंभर वर्षांपूर्वी 1909 साली एका चाळीस वर्षांच्या माणसाने या तीन प्रमुख समस्या आपल्या कालभेदी दृष्टीने पाहिल्या आणि इंग्लंडमधून दक्षिण आफ्रिकेत परत जाताना जहाजावर त्याने एक छोटेखानी पुस्तक घाईघाईने लिहिलं. ते लिहिताना उजवा हात जेव्हा थकायचा तेव्हा तो माणूस डाव्या हाताने लिहायचा. हा माणूस होता मोहनदास करमचंद गांधी. . पुस्तकाचं नाव आहे- “हिंद स्वराज’. “हिंद स्वराज’मध्ये महात्मा गांधींनी भारतीय समाजाला या तीनही समस्यांविषयी सावध केलेलं आहे. पाश्र्चात्त्य समाजाची दिसत असणारी समृद्धी आणि भरभराट, त्यांचा अतिरेकी यंत्रवाद आणि अपरिमित भोगवाद, आणि समाज बदलायला हिंसेवरती असलेला त्यांचा विश्र्वास, या तिन्हींकडे इंग्लंडमधले भारतीय तरुण तेव्हा आकर्षित होत होते. या तीनही चुकांपासून गांधींनी भारतीय माणसाला तेव्हा सावध केलं होतं. “हिंद स्वराज’मध्ये त्यांनी यावर उपायही सांगितलेले आहेत. गांधीजींनी जे उपाय सुचवलेले आहेत ते आज कालानुरूप असल्यामुळे मी त्यांचा ऊहापोह आणि चर्चा करतो आहे.

गांधीजींनी सांगितलेले उपाय

आज आमच्यासमोर उभे ठाकलेले तीनही प्रश्र्न “बाह्य’ जगातले आहेत. भांडवलशाही, चंगळवाद, यंत्रवाद, हिंसा हे सगळे प्रश्र्न “बाह्य’ आहेत. पण गंमत अशी की या सगळ्यांवर गांधींनी सांगितलेले उपाय मात्र “आंतरिक’ आहेत. गांधी म्हणतात, की “स्वराज्य’ म्हणजे “स्वत:चं’ राज्य नाही, तर “स्व’वरती राज्य. स्वराज्य म्हणजे “मला राज्य करण्याचा अधिकार पाहिजे’ असं आपण म्हणतो. पण हा माणूस तर म्हणतो, “बाबा रे, प्रथम स्वत:वर राज्य करायला शीक.’ स्वत:वर राज्य कसं कर? कसं शीक? या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरंही गांधींनी आपल्या पुस्तकात दिली आहेत. उपायही सांगितले आहेत. गांधींनी लोभावर उपाय सुचवला आहे तो अपरिग्रहाचा. जास्त संग्रहच करू नका, आणि तुमच्याकडे जी काही संपत्ती आहे ती समाजाची आहे, अशा विश्र्वस्तवृत्तीने त्याचा समाजाकरता उपयोग करा. भांडवलशाहीचा नारा आहे- “फ्रीडम ऑफ डिझायर’. पाश्र्चिमात्य जगात या नाऱ्याचं प्रचंड कौतुकही आहे. अमेरिकेत तर “फ्रीडम ऑफ चॉइस’ असणं हे जणू कोणत्याही समाजव्यवस्थेची सगळ्यात अंतिम कसोटी आहे. “फ्रीडम ऑफ चॉइस’ असं म्हणताना त्यांना अभिप्रेत असतं, की “वुई मस्ट हॅव अनलिमिटेड फ्रीडम ऑफ डिझायर’!- आम्हाला जे जे हवं आहे, आम्ही जे इच्छिलं आहे ते आम्हाला अपरिमित मिळायला पाहिजे. गांधी असं म्हणतात, की आपल्याला “फ्रीडम ऑफ डिझायर’ नव्हे तर “फ्रीडम फ्रॉम डिझायर’ हवं आहे. डिझायरवर विजय मिळवा, सर्व प्रश्र्न आपोआप सुटतील.

यंत्रवाद आणि चंगळवाद यावर गांधी अुपाय सांगतात शरीरश्रम आणि मित-भोग, म्हणजेच आपल्या गरजा कमी करा. अपरिमित गरजा कुणालाच पूर्ण करता येणार नाहीत. “देअर इज इनफ ऑन द अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड, बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड.’ आणि धार्मिक हिंसेवर तर त्यांनी अर्थातच सर्वधर्मसमभाव आणि अहिंसा हे उत्तर दिलेलं आहे.

“अति’ आणि “गती’च्या वेडाने बेभान झालेल्या आधुनिक माणसाला गांधींनी “हिंद स्वराज’मधून सावधगिरीचा इशारा दिला आहे. आजच्या आधुनिक युगातले जितके काही अतिरेकाचे प्रश्र्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं गांधींनी “हिंद स्वराज’मध्ये दिली आहेत, तीही शंभर वर्षांपूर्वी. गांधीजींना प्रश्र्नही दिसतात आणि उत्तरंही दिसतात. याचा अर्थ गांधी कालभेदी साहित्यिकाच्या अटी पूर्ण करतात. आम्हाला आमच्या साहित्यिकांकडून गांधींसारखी कालभेदी दृष्टी हवी आहे, मार्गदर्शन हवं आहे.

चळवळीचे दिवस संपले हा भ्रम

ज्या तीन शापांचा मी उल्लेख केला त्यांच्यापासून शापमुक्ती कशी होणार, असा प्रश्र्न अनेकांना पडलेला आहे. एक व्यथा आपण वारंवार ऐकतो; विशेषत: साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांतली जी मंडळी आहेत त्यांना ही व्यथा अधिकच आहे. त्यांचं म्हणणं असं, की आजकाल समाज परिवर्तनाच्या चळवळीच दिसत नाहीत. चळवळी लोपल्यामुळे माणसांमध्ये जी घुसळण होत होती ती थांबली. आणि चळवळीच नसतील तर आपल्या समाजाचे प्रश्र्न कसे सुटणार?

माझी अशी नम्र समजूत आहे, की चळवळींचे दिवस गेले हा दृष्टीचा प्रश्र्न आहे. चळवळींचे दिवस गेलेले नाहीत, चळवळींचं स्वरूप बदललं आहे. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात बहुतेक मुख्य बदल हे मोठ्या राजकीय चळवळींच्या माध्यमातून घडले आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळी असोत, मजुरांच्या चळवळी असोत, काळ्या लोकांच्या चळवळी असोत, पीस मूव्हमेंट्‌स असोत की शेतकरी चळवळ असो या सर्व चळवळी हजारो-लाखो लोकांच्या सहभागातून घडल्या आहेत. त्यामुळे लाखो माणसं रस्त्यावर येत आहेत, त्यांचा कुणी एक नेता असणार आहे, त्यांची एक विचारसरणी असणार आहे, त्यांचा एक झेंडा असणार आहे, त्यांची एक घोषणा असणार आहे, कार्यक्रम असणार आहे आणि हजारो-लाखो लोक त्याचं अनुसरण करणार आहेत या प्रकारच्या चळवळींची आम्हाला सवय झाली आहे. आताशा अशा प्रकारच्या चळवळी दिसत नसल्याने आम्ही म्हणतो की चळवळी मागे पडल्या आहेत. गोष्ट खरी आहे की अशा प्रकारच्या चळवळी दिसत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की समाजपरिवर्तनाची प्रक्रियाच थांबली आहे.

चळवळी थांबल्या पण परिवर्तन चालू आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स मात्र बदललं आहे, आणि ते आपल्यासाठी अतिशय अनुरूप आहे, आपल्याला, सामान्य माणसाला सक्षम करणारं आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स असं बदललं की राजकीय नेतृत्व आणि राजकीय चळवळींच्या मार्फत होणाऱ्या परिवर्तनाऐवजी आता हे परिवर्तन माणसा-माणसांच्या पातळीवर घडतं आहे. ह्युमन बीइंग इज द युनिट ऑफ चेंज. माणसाचं मानस आणि माणसाचं रोजचं जगणं हे परिवर्तनाचं कुरुक्षेत्र बनलं आहे. टीव्हीच्या जमान्यात माणसांना आता हजारो-लाखोंच्या संख्येने एकत्र येण्याला फुरसत राहिलेली नाही. राजकिय नेत्यांच्या सभांनाही आता माणसं मोठ्या संख्येने एकत्र येत नाहीत म्हणून गर्दी जमवण्यासाठी फिल्मस्टार आणावे लागतात. मात्र राजकीय नेत्यांच्या मागे माणसं येत नाहीत याचा अर्थ माणसं बदलत नाहीत असा नाही. माणसं आपापल्या जागी बदलताहेत आणि माणसा-माणसांत संथ बदलाची एक प्रक्रिया घडते आहे.

एक साधं उदाहरण घेऊ. योगाच्या चळवळीत रामदेवबाबा आता आता आले; पण अन्यथा गेली ऐंशी वर्षं योगाची चळवळ जगभर पसरते आहे. आज अमेरिकेतली पाच ते दहा टक्के लोकसंख्या योग शिकलेली आहे आणि नियमितपणे योग करते आहे. जगभरात आज कोट्यवधी लोक योग करतात. ही चळवळ कशी पसरली? माणसाकडून माणसापर्यंत, अशा रीतीनेच ती पसरली.

लोकांची जीवनशैली बदलते आहे. मुली शिकायला लागल्यात.माणसं आता आरोग्यासाठी चालायला लागली आहेत, व्यायाम करायला लागली आहेत. लोकांची जीवनशैली कशी बदलली? त्यामागे कुणी राजकीय नेता होता की कोणती राजकीय चळवळ होती? -असं काही नव्हतं. एका माणसात परिवर्तन झालं, त्याने दुसऱ्याला सांगितलं, त्याने तिसऱ्याला सांगितलं. चौथ्याने पाहिलं, अनुसरण केलं. हीच आहे “मॅन टु मॅन प्रोसेस ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन’. हे सांस्कृतिक परिवर्तन आहे. हे माणसाच्या हृदयात घडणारं परिवर्तन आहे. आज घडणाऱ्या परिवर्तनाचं गतिशास्त्र हे असं आहे!

माणसांच्या विचारात आणि आचरणात परिवर्तन घडवून आणण्याची अशी विलक्षण हातोटी गांधींमधे होती. “खादी’ हा अतिशय साधा वाटणारा कार्यक्रम त्यांनी दिला होता; परंतु त्यातून स्वत:चे आचार-विचार बदलण्याचा कार्यक्रमही अंतर्भूत होता. खादीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, गरिबासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, पर्यावरणासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, मित-भोग किंवा साध्या राहणीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, स्वातंत्र्य चळवळीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो आणि स्वत:च्या हाताने सूत कातल्याने मी शरीरश्रमासोबतही स्वत:ला जोडून घेऊ शकतो. परिवर्तनाच्या सहा मूल्यांसोबत मी स्वत:ला जोडून घेऊ शकतो. गांधींनी खादीमार्फत वस्त्रसंस्कृतीत क्रांती तर घडवलीच, परंतु किमान सहा मूल्यांबाबत स्वत:च्या आचार-विचारात परिवर्तन घडवून आणण्याची कृतीही घडवून आणली. नेहरू, पटेल, सुभाष या सगळ्या विदेशांत शिकलेल्या बॅरिस्टरांना गांधींनी स्वयंपाकघरात जशी भाजी चिरायला लावली तसंच सूतही कातायला लावलं. राजकीय क्रांतीच्या अगोदर गांधींनी सांस्कृतिक क्रांती सुरू केली.

मित्रांनो आपलं रोजचं जगणं हा आपला जाहीरनामा असतो. माझं रोजचं जगणं हा माझा सांस्कृतिक जाहीरनामा असतो. आणि खरं म्हणजे आजचा माणूस असं म्हणतो आहे, की हाच माझा राजकीय जाहीरनामादेखील आहे. माझ्या रोजच्या जगण्यातूनच मला जग कसं हवं आहे हे मी प्रगट करतो आहे.

थोडक्यात सांगायचं, तर व्यक्तिव्यक्तींचे विचार बदलले तर जग बदलतं, माणसाचं आचरण बदललं तर जग बदलतं. आणि हे आपल्याला सक्षम करणारं अशाकरता आहे कारण माझं रोजचं जगणं बदलायला मला कोणत्या राजकीय नेत्यावर अवलंबून राहावं लागत नाही. माझं रोजचं जगणं बदलणं हे माझ्याच हातात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते “स्वराज्य’ आहे. माझं रोजचं जगणं कसं असावं ते मीच ठरवू शकतो, मी स्वत:च स्वत:ला बदलवू शकतो. या अर्थाने परिवर्तनाच्या चळवळीचा केंद्रबिंदू आता मी स्वत:च आहे. प्रत्येक नागरिकाला केवढी शक्ती देणारी ही दृष्टी आहे! हे सांस्कृतिक परिवर्तन राजकीय परिवर्तनापेक्षा सामान्य माणसासाठी अधिक अनुकूल आहे, त्यामुळे ते लोकशाहीसाठीही अधिक अनुकूल आहे. इथे सत्ता ही खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या हातात आहे. पाच वर्षांनी एकदा मतदान करण्यापुरती ही सत्ता मर्यादित नाही. रोजच्या जगण्याची, रोजच्या मतदान करण्याची ही सत्ता आहे. मी काय नेसतो, मी काय खातो, मी काय वाचतो, मी पायी चालतो की मोटार वापरतो, हे सर्व जग म्हणजे जग कसं असावं याबद्दलचा जग बदलायचा माझा जाहीरनामा आहे. तो मी रोज जाहीर करू शकतो, रोज प्रगट करू शकतो, रोज तसं जगू शकतो आणि रोज मी जग बदलवू शकतो.

साहित्यिकांकडून सांस्कृतिक परिवर्तनाची अपेक्षा

रोजच्या जगण्यात जो बदल घडतो त्यालाच सांस्कृतिक परिवर्तन म्हणतात. जग बदलायची आणखी एक पद्धत विनोबांनी सांगितली आहे. ते असं म्हणतात, की जुन्या शब्दांवर नव्या अर्थांचं कलम करणं म्हणजे सांस्कृतिक परिवर्तन, अहिंसक परिवर्तन. असं परिवर्तन घडवण्याची शक्ती साहित्यिकांमध्येच असू शकते. आणि म्हणून सांस्कृतिक परिवर्तन ही जग बदलण्याची पद्धत तुमच्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आणि साहित्यिकांच्याही हातामध्ये अतिशय मोठी प्रभावी साधनं देणारी गोष्ट आहे.

हे परिवर्तन कोण करेल? माझा असा समज आहे, की सर्वप्रथम विज्ञान हे परिवर्तन आणते आहे. दुसरा प्रभावी घटक असतील स्त्रिया. कारण समाजाच्या संस्कृतीचं वहन मोठ्या प्रमाणात स्त्रियाच करतात. तरुण पिढी हा तिसरा महत्त्वाचा घटक असणार आहे, कारण ते उद्याच्या जगाची घोषणा आहेत. चौथं स्थान रिक्त आहे. आणि मला त्या चौथ्या स्थानावर साहित्यिकांच्या आगमनाची वाट आहे. साहित्यिकांनी आजच्या काळाला अनुरूप अशा प्रकारच्या समाजपरिवर्तनाचं नि सांस्कृतिक परिवर्तनाचं नेतृत्व करावं, अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे.

या साहित्य संमेलनात अशा प्रकारच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या मूल्यांचं दर्शन व्हावं, अशी आपली सर्वांची किमान अपेक्षा राहणार आहे. हे सर्वसमावेशक संमेलन व्हावं, अशी आपली अपेक्षा राहणार आहे. महाराष्ट्रातले जे काही संकुचित वाद आहेत त्यांनी यामध्ये अडथळा बनू नये. सर्वांचं हृदय व्यापक व्हावं. मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर, असले वादच यात येऊ नयेत, अशी आम्हाला अपेक्षा राहील. जे विश्र्वहृदय आम्ही जगाकडून अपेक्षा करतो, त्याची सगळ्यात पहिल्यांदा साहित्यिकांकडून आम्ही अपेक्षा करणार आहोत. साधेपणा आणि मितव्ययता यांचं दर्शन या संमेलनातून व्हावं, अशी अपेक्षा राहणार आहे.

महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे आजचे जे भडकते प्रश्न आहेत त्यांची यादी मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही, कारण ती सगळ्यांना माहीत आहेच. परंतु साहित्याचा, साहित्यिकांचा जीवनासोबत काही तरी अनुबंध या संमेलनात प्रकट व्हावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. साहित्यामध्ये निव्वळ स्वत:वरच भाळणं असा नार्सिसिझम्‌ व्यक्त होऊ नये, तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहोत, त्यांचं आम्ही देणं लागतो, हे प्रकट व्हावं. महाराष्ट्र जळतो आहे. आम्ही त्याचा भाग आहोत की नाही, आम्हाला देणंघेणं आहे की नाही, याचा जरूर विचार व्हायला हवा.

इथं एक कविता आठवते. आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये सहाराचं वाळवंट आहे. एके काळी ते सगळं जंगल होतं. पण जंगल तुटत गेलं, त्याचं वाळवंट होत गेलं. जसाजसा निसर्ग नष्ट होतो आहे, सहाराचं वाळवंट मोठंमोठं होत आहे. आणि सहाराचं वाळवंट आफ्रिकेमधे दक्षिणेकडे पसरतं आहे. एक कवी म्हणतो,

“सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स अँड साऊथवर्ड्‌स.

स्लोली, बट रिलेन्टलेसली, इंच बाय इंच
सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स’.
आफ्रिकेच्या उत्तरेमध्ये जी माणसं आहेत युरोप-अमेरिकेमधली, ती काय म्हणणात? जाऊ द्या ना, सहारा गेलं दक्षिणेकडे तर आमचं काय बिघडलं? आम्ही उत्तरेला सुरक्षित आहोत. आफ्रिकेला नष्ट होऊ द्या. त्यांना हा कवी सांगतो,
“डोन्ट लाफ ओ फूल्स इन द नॉर्थ
द अर्थ इज राऊंड’.
त्यामुळे प्रश्न असा आहे, की आज महाराष्ट्र जळत असताना साहित्यिक आणि साहित्य संमेलन कुठे उभं राहणार? सहाराच्या दक्षिणेला लोकांसोबत उभं राहणार की उत्तरेच्या मूर्खांमध्ये उभं राहणार? आम्ही जनतेच्या प्रश्नासोबत स्वत:ला जोडून घेणार, की आम्ही म्हणणार, अजून माझ्या दारावर थाप पडलेली नाही! जर्मनीत जेव्हा एकेका स्वातंत्र्याचा संकोच होत होता, तेव्हा कवी म्हणाला,
“प्रथम त्यांनी ज्यूंना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी ज्यू नाही.
नंतर कम्युनिस्टांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी कम्युनिस्ट नाही.
त्यानंतर विचारवंतांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो
की मी विचारवंत नाही.
आणि आज माझ्याच दारावर टकटक होत आहे.
पण आता मदतीला धावून यायला कुणीच शिल्लक उरलेलं नाही.’
जेव्हा अख्खा महाराष्ट्र दुष्काळात, आत्महत्यांत, बालमृत्यूंत, कुपोषणात, हिंसाचारात, असंख्य प्रश्नांत अक्षरश: जळतो आहे, तेव्हा साहित्य संमेलन कुठे उभं राहणार?
निवड आपल्या सर्वांना करायची आहे.

शब्दांकन : शुभदा चंद्रचूड


डॉ. भालचंद्र मुणगेकर, सौजन्य – सकाळ

लोकशाहीमध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य विकृती स्पष्टपणे पाहू शकणाऱ्या ग्रीक तत्त्ववेत्ते ऍरिस्टॉटल यांनी लोकशाहीची ‘अधःपतित शासनपद्धती’ म्हणून निर्भर्त्सना केली आहे, तर दुसऱ्या बाजूला अब्राहम लिंकन यांनी ‘लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालविलेलं शासन’ असा लोकशाहीचा गौरव केला आहे. डॉ. आंबेडकरांनी ‘लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तविहीन मार्गांनी क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासनव्यवस्था’ अशा शब्दांत लोकशाहीवर भाष्य केलं आहे. आपल्याला यांपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही हवी?

स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भवितव्याशी संबंधित असलेले सर्व प्रश्‍न आणि समस्या यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जितक्‍या सर्वसमावेशक, विस्तृत, खोलवर आणि गंभीरपणे विचार केला, तसा आधुनिक भारताच्या राजकीय व सामाजिक इतिहासात फारच कमी जणांनी केल्याचं आपल्याला दिसून येईल. जातिव्यवस्था आणि अस्पृश्‍यतेचं समूळ उच्चाटन करून भारत हे एक एकसंध, आधुनिक आणि समर्थ राष्ट्र निर्माण करण्याची ऐतिहासिक जबाबदारी डॉ. आंबेडकरांवर पडल्यामुळे ते गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाले नाहीत.

एक प्रखर राष्ट्रभक्त असल्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला त्यांचा संपूर्ण पाठिंबा होता; परंतु राष्ट्रीय चळवळीच्या काही अंगभूत मर्यादांमुळे डॉ. आंबेडकर त्या चळवळीत सामील झाले नाहीत. “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वातंत्र्यात अस्पृश्‍यांचं स्थान कोणतं असेल?’ या डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांकडे समर्पक उत्तर नव्हते. स्वातंत्र्यानंतर गेल्या 60-62 वर्षांच्या काळात दलितांच्या जीवनामध्ये, विविध कारणांमुळे जे अनुकूल बदल झाले, ते ध्यानात घेतल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेला प्रश्‍न किती गंभीर आणि दूरदृष्टीचा होता, हे आपल्या लक्षात येईल.

लोकशाहीवरील नितांत श्रद्धा
स्वातंत्र्यचळवळीत सहभाग न घेतल्यामुळे वेळोवेळी दूषणं देऊनही त्याबद्दल मनात जराही कडवटपणा न ठेवता डॉ. आंबेडकरांनी घटना समितीच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद आनंदानं व कर्तव्यबुद्धीनं स्वीकारलं. घटना समितीतील त्यांचं कार्य ऐतिहासिक स्वरूपाचं ठरल्यामुळेच त्यांना “भारतीय घटनेचे शिल्पकार’ असं आदरानं संबोधलं जातं.

डॉ. आंबेडकरांची लोकशाहीवर नितांत श्रद्धा होती; पण भारताचा इतिहास आणि प्रचलित आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था लक्षात घेता, भारतातील लोकशाही ही काही स्वाभाविकपणे उत्क्रांतीत झालेली गोष्ट नव्हे, ही त्यांची धारणा होती. आधुनिक लोकशाही ही विशेषतः युरोपियन देशांच्या विकासक्रमांतून निर्माण झालेली व त्यायोगे ती भारतात आल्याचे त्यांचे मत होते. त्यामुळेच आपल्या देशात ही लोकशाही यशस्वी कशी होईल, हा त्यांच्या चिंतनाचा विषय सतत राहिला होता. डॉ. आंबेडकरांचा कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीला विरोध असल्यामुळे, लोकशाहीवर त्यांची निष्ठा होतीच; परंतु दलित, श्रमिक, स्त्रिया अशा सर्व कष्टकरी समाजघटकांच्या हातातील लोकशाही हेच एक प्रभावी शस्त्र असल्याची त्यांची धारणा होती. म्हणूनच त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, कार्यक्रम, त्यांचे विस्तृत लिखाण आणि विविध प्रसंगी केलेल्या शेकडो भाषणांमधून त्यांनी लोकशाहीच्या यशस्वितेसाठी आवश्‍यक असलेल्या काही गोष्टींचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. डॉ. आंबेडकरांच्या अशा भाषणांपैकी 22 डिसेंबर 1952 रोजी पुण्यातील विधी ग्रंथालयाच्या सभागृहात केलेलं भाषण लोकशाहीवरील त्यांच्या श्रद्धेचं व त्याचबरोबर त्यांच्या द्रष्टेपणाचं द्योतकच आहे. प्रस्तुत भाषणात त्यांनी संसदीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता आहे, याचं प्रतिपादन केलं आहे. स्वाभाविकपणे ते देशातील आजच्या परिस्थितीवरही विदारक प्रकाश टाकणारं आहे.

समाज हवा एकसंध
यशस्वी लोकशाहीसाठी आवश्‍यक असलेली पहिली अट म्हणजे समाजामध्ये प्रखरपणे जाणवू शकेल अशी विषमता असता कामा नये. भावनिक ऐक्‍यावर आधारलेला एकसंध समाज निर्माण करण्यासाठी अशी विषमता केवळ घातकच ठरत नाही, तर ती समाजामध्ये फुटीरता आणि हिंसेची बीजं पेरत असते. स्वातंत्र्योत्तर काळात देशाने केलेल्या विकासाचे काही फायदे गरिबांनाही झाले, हे जरी खरं असलं, तरी सर्वाधिक फायदे समाजातील 15 ते 20 टक्के सधन घटकांनाच झाले आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षांतील आर्थिक सुधारणांमुळे विकासाचा दर वाढला ही गोष्ट समाधानकारक आणि स्वागतार्ह असली, तरी त्याच्या फायद्याचं वाटप मात्र पूर्वीपेक्षा अधिक विषम होत चाललं आहे. विविध प्रकारच्या लोककल्याणकारी विकास कार्यक्रमांवर हजारो कोटी रुपये खर्च होत असले, तरी गरीब-उपेक्षित घटकांपर्यंत अशा विकासाचे फायदे जात नाहीत. विविध मार्गांनी आपले हितसंबंध जोपासण्यासाठी निर्माण केलेली एक भ्रष्ट व समांतर अशी व्यवस्था त्याला जबाबदार आहे. परिणामतः स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या 60 वर्षांनंतरही देशातील सुमारे 30 ते 35 टक्के जनता दारिद्य्ररेषेखाली आहे.

जाती व अस्पृश्‍यताजन्य सामाजिक विषमता नष्ट करण्याबरोबरच स्त्रियांची सर्वांगीण प्रगती हा डॉ. आंबेडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळेच त्यांनी स्वतंत्र भारताच्या कायदामंत्रिपदी असताना स्त्रियांच्या हक्कांची सनद असलेलं “हिन्दू कोड बिल’ तयार केलं व ते संमत होत नाही, असं दिसताच जराही विलंब न लावता कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला. संसदेमध्ये स्त्रियांना 33 टक्के राखीव जागा ठेवण्याच्या विधेयकावरून आज देशात जी रणधुमाळी सुरू आहे, ती लक्षात घेता, स्त्रियांना सक्षम करण्याच्या भूमिकेवर डॉ. आंबेडकरांची श्रद्धा अधिकच उठून दिसते.

पक्षांमध्ये असावा विवेक
यासंदर्भात लोकशाहीच्या यशासाठी त्यांनी सांगितलेली दुसरी अट म्हणजे प्रबळ विरोधी पक्षाचं अस्तित्व आणि सत्ताधारी व विरोधी पक्षातील सामंजस्याचं वातावरण. सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणं हे जसं विरोधी पक्षाचं सर्वांत महत्त्वाचं कार्य आहे, तसंच विरोधी पक्षाच्या भूमिकेची कदर करणं हे सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी विविध पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणं लोकशाहीत अभिप्रेत असलं, तरी विवेक हादेखील लोकशाहीचा आधार आहे, हे राजकीय पक्षांनी विसरता कामा नये. राष्ट्रीय हितापेक्षा पक्षीय हित मोठं समजणं ही लोकशाहीला दुरवस्थेकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे महिला विधेयकाचा प्रश्‍न त्यादृष्टीने फारच बोलका आहे.

हवी श्रेष्ठ नैतिकता
डॉ. आंबेडकरांनी सांगितलेली तिसरी अट म्हणजे संविधानात्मक नैतिकता. राजकीय सत्तेच्या माध्यमांतून निर्माण झालेली प्रलोभनं दूर सारून सार्वजनिक जीवनात श्रेष्ठ दर्जाची नैतिकता प्रस्थापित करणे आणि त्याबद्दल जनतेच्या मनात विश्‍वास निर्माण करणे, ही सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत आवश्‍यक गोष्ट आहे. यादृष्टीने विचार करता, भारतातील प्रचलित परिस्थितीवर वेगळं भाष्य करण्याची आवश्‍यकता नाही.

कायद्यासमोर सारे समान
‘कायद्यासमोरील समानता’ ही डॉ. आंबेडकरांनी चौथी अट सांगितली. प्रत्यक्षात “कायद्यासमोरील समानता’ ही वरकरणी वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पराकोटीच्या आर्थिक आणि सामाजिक विषमतेमुळे तर “कायद्यासमोरील समानता’ हे तत्त्व निरर्थक ठरते.

द्या संरक्षणाची हमी
डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली पाचवी आणि शेवटची अट म्हणजे बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांना त्यांच्या संरक्षणाची हमी देणे, ही होय. खरं पाहता, “बहुसंख्य’ आणि “अल्पसंख्य’ या राज्यशास्त्रातील व्यावहारिक नि प्रसंगनिष्ठ संकल्पना आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे, मतसंख्येचा विचार करता आजचा “बहुसंख्य’ पक्ष हा उद्या “अल्पसंख्य’ आणि आजचा “अल्पसंख्य’ उद्याचा “बहुसंख्य’ होऊ शकतो. मात्र, असं असलं तरी काही समाजांत धार्मिक आणि भाषिक बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक घटक असतात. आपला देश हे एक त्याचं जगातलं सर्वांत मोठं उदाहरण आहे. अशा वेळी अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटणार नाही अशी काळजी घेणं हे बहुसंख्याकांचं कर्तव्य आहे. मात्र, त्याबरोबरच मतभेदांच्या मुद्‌द्‌यांवर अल्पसंख्याकांनी चर्चेसाठी तयार असण्याची मानसिकता दाखविणं अगत्याचं आहे. आज देशातील धार्मिक आणि प्रांतिक-भाषिक असहिष्णुता लक्षात घेतली, तर सामंजस्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला निकोप राजकीय परिस्थिती निर्माण करावी लागेल.

आपल्याला हवे काय?
लोकशाहीमध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य विकृती स्पष्टपणे पाहू शकणाऱ्या ग्रीक तत्त्ववेत्ते ऍरिस्टॉटल यांनी लोकशाहीची “अधःपतित शासनपद्धती’ म्हणून निर्भत्सना केली आहे, तर दुसऱ्या बाजूला अब्राहम लिंकन यांनी “लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालविलेलं शासन’ असा लोकशाहीचा गौरव केला आहे. डॉ. आंबेडकरांनी “लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तविहीन मार्गांनी क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासनव्यवस्था’ अशा शब्दांत लोकशाहीवर भाष्य केलं आहे.

आपल्याला यांपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही हवी आहे?

प्रताप थोरात, सौजन्य – लोकसत्ता

महाराष्ट्राचं शहरीकरण झालंय. आता राज्य करण्यासाठी बिल्डरचा मुलगा असणं सोयीचं. एफएसआयचं गणित कळलं म्हणजे झालं. राजकीय घराण्यांनी बहुजन समाजात रमण्याचे दिवस मागेच गेले. व्यापारी, दलाल हेच सख्खे वाटतात. नेतृत्व करू पाहणाऱ्यांची मानसिकता बदललीय. येऊ पाहणारे बडे उद्योग डझनावारी आजूबाजूच्या राज्यात पळवले गेले तरी कुणातच कळ उठत नाही. ना नेत्यांमध्ये, ना जनतेत! आम्हा सगळ्यांची मानसिकताच बदललीय सारी!

सुवर्णमहोत्सवानिमित्त महाराष्ट्र आपल्या कार्यक्रमपत्रिकेवर का होईना आला होता, हे एक बरेच झाले. महाराष्ट्राची मानसिकता म्हणून एकत्रित आणि व्यापक विचार करण्याचा ज्यावेळी प्रसंग येतो, त्यावेळी अनेक गोष्टी गृहित धराव्या लागतात.अन् हे करताना काही प्रश्न अनुत्तरीतही राहतात. या मराठी भाषिक प्रदेशामधल्या उपप्रादेशिक धारांचं गेल्या पन्नास वर्षांत मीलन होऊन, एक बऱ्यापैकी एकसंघ मुख्य प्रवाह निर्माण झालेला आहे, असं मानावं लागतं किंवा त्यांचा लसावि काढून त्याला महाराष्ट्राची मानसिकता म्हणून संबोधावं लागतं. मुळात एखाद्या प्रांताची मानसिकता ही सर्व काळाकरिता घट्ट, साचेबंद, अपरिवर्तनीय अशी गोष्ट असते का? की ती संस्कृतीप्रमाणेच झऱ्यासारखी अखंड वाहणारी असून, कालानुरुप आणि मार्गातल्या उंच-सखलपणाच्या आघातांमुळे तिच्यात बदल होत राहतात? तसं असेल तर प्रत्येक महत्त्वाच्या टप्प्यावर ती बदलत असणार.

विदर्भ, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र यांची अलग गुणवैशिष्टय़े नक्कीच आहेत. विदर्भ म्हटलं की, अघळपघळपणा, दिलदार वृत्ती, भरगच्च पाहुणचार आणि सुपीक जमिनीमुळे अंगात शिरलेला आळस या गोष्टी डोळ्यासमोर येतात. विदर्भाचं सगळंच होऊन राह्यलंय! व्याकरणातला अपूर्ण वर्तमानकाळ! तो प्रगतीचा वेगही अपूर्ण-अपुरा राखतो. अगदी विदर्भ वेगळा करणंसुद्धा दिलदारीपेक्षा आळसापोटी राहूनच जाणार.

निजामशाहीनं दिलेल्या गुलामगिरी, सरंजामशाही, दरबारी राजकारणाचा प्रभाव मराठवाडा काही अजून पुसून टाकू शकला नाही. त्यामुळे इथले सर्वच नेते दिल्लीचा विश्वास कमावू शकले आणि काँग्रेसअंतर्गत राजकारणात बव्हंशी यशस्वीही झाले. त्यांची संपूर्ण भिस्त पिरॅमिडच्या आकारावर. अन् विश्वास वरच्यांची मर्जी राखण्यावर आणि खालच्यांवर लत्ताप्रहार करण्यावर! दिल्लीश्वरांचा विश्वास कमवण्याबाबत फक्त मुंडे-महाजनच अपवादस्वरूप असतील. मराठवाडा ही संतांची भूमी. संतांनी शिकवलेला सोशिकपणा जनतेच्या हाडीमांसी मुरला. ते नेत्यांच्या पथ्यावरही पडलं.

कोकण म्हटलं की प्रखर बुद्धिमत्ता, अन् तिला जर कधी कष्टाची जोड मिळाली तर मग प्रचंड कर्तबगारी! काम करून टाकण्यापेक्षा दीर्घ प्रतिवाद करण्याची वृत्ती, कमालीचा चिकित्सकपणा, कायद्याचा आधार घेण्याची आवड या बाबी प्रथम नजरेस येतात. स्वतंत्र प्रज्ञा आणि बंडखोरी रक्तातंच! माणसं कुणाचंही नेतृत्व संपूर्ण स्वीकारत नाहीत. देशानं भले महात्मा गांधी आणि काँग्रेस स्वीकारली. कोकणाने नाही स्वीकारली. गांधींचे गुरू गोपाळकृष्ण गोखले अन् आध्यात्मिक वारसदार विनोबा भावे दोघेही कोकणचे होते तरीही! विनोदानं सांगतात की, सतत आज्ञेत राहणारा लक्ष्मणदेखील वनवासात असताना इथं आल्यावर रामाला जुमानेसा झाला. रामानं निमूटपणे सत्य स्वीकारलं की, कोकण प्रांतात प्रवास चालू असेपर्यंत हे असंच चालायचं. व्यक्तिगत कामगिरीत कोकण नेहमीच अग्रेसर! पण सामूहिक एकोप्याच्या, सहकाराच्या बाबतीत मागे.

सह्याद्रीनं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातली सीमारेषा उभी केली खरी, पण आपल्या दोन्ही अंगाला डोंगराएवढी मोठी माणसंदेखील जन्माला घातली. पश्चिम महाराष्ट्रातला खडकाळ जमिनीनं अन् प्रतिकूल निसर्गानं कष्टाची आवड, अंगी रग अन् वृत्तीत रगेलपणा दिला. शिवछत्रपतींनी नुसती स्वत्वाची ओळख आणि झळाळणारी अस्मिताच दिली नाही तर संघटनकौशल्याचं महत्त्व आणि अपुरी शस्त्रसामुग्री-मनुष्यबळ असताना गनिमी काव्याचं महत्त्व जनमानसात रुजवलं. भूगोलाच्या जोडीला इतिहास आला. अन् कर्तबगारीचे इमल्यावर इमले चढत राहिले. सहकाराच्या माध्यमातून गरीबीविरुद्धची लढाई इथं लढली गेली. तिखटजाळ माणसांनी साखर निर्माण केली. ब्रिटिशांनी नावं दिलेली मराठा लाईट इन्फन्ट्री असो, महार रेजिमेंट असो, वा अन्य काही. लोक चिवट लढवय्ये. पण वैरभावदेखील अर्धे-अर्धे शतक मनात अलगद जपून ठेवून, सूडाचा प्रवास करीत राहणारे. आपसात लढत राहण्याची सहजप्रवृत्ती असणारे. त्यांना झुंजवत ठेवण्यासाठी ब्रिटिशांची गरज नाही. राज्य करण्याचीदेखील सहजप्रवृत्तीच. पण दिल्लीचे तख्त फोडण्यासाठी नसून, बसण्यासाठी निर्माण केलेले आहे, याची उमज कमीच! इथली खिलार जातीची गुरं पण तापट, मारकुटी, काटक! गुजरातच्या गीर जातीच्या गुरांप्रमाणे अधिक दूध देणारी, गरीब, अंगानं थोराड नव्हेत.

मुंबई लढून मिळवली होती. संधी होती तेव्हा महाराष्ट्राचं वैभव अखंड सांगणाऱ्या संस्था इथं चिरस्थायी केल्या नाहीत. भूखंड लाटण्याची नव्हे, तर चिरीमिरीसाठी ते वाटण्याचीच स्पर्धा सुरू होती. दुसऱ्याचा भार वाहणारी नुसती माथाडी डोकी! मराठी मोलकरणींना मराठी घरात भांडी घासायची लाज वाटते, असा सार्वत्रिक अनुभव आहे. मुंबईमधली मराठी मानसिकता ही मोलकरणीचीच राहिलेली आहे. या उपप्रादेशिक गुणवैशिष्टय़ांची दखल घेताना अजूनही दुर्दैवाने आपण महाराष्ट्राच्या उत्तरेकडील किंवा अतिपूर्वेकडील आदिवासी पट्टय़ांना आपल्यात मोजत नसतो.

संपूर्ण महाराष्ट्राच्या अशा एकत्रित मानसिकतेचा विचार करताना आपल्याला अपरिहार्यपणे लसावि हा काढावाच लागतो. महाराष्ट्र म्हणजे पराक्रमी लढवय्यांचा, देशाचा विचार सर्वात आधी अन् स्वत:चा नंतर करून देशाच्या संरक्षणासाठी धावणारा, प्रखर क्षात्रतेजाचा, सामाजिकदृष्टय़ा पुरोगामी, औद्योगिकदृष्टय़ा उद्यमशील, प्रशासन उत्तम असलेला! शेती बेताची, सिंचन खूप कमी पण शेतमाल-प्रक्रिया उद्योग आणि सहकार जोरकस असलेला! वृत्तीने आक्रमक पण तरीही घरदार सोडून परमुलुखात जाऊन नवी क्षेत्रे धुंडाळून बस्तान बसवण्यापेक्षा इथंच राहून जमिनीवर प्रेम करणारा! जसा एक पाय भूगोलात अडकलेला तसाच दुसरा इतिहासात घट्ट रोवलेला! भक्तीमध्ये कर्मकांडापेक्षा संसारात राहूनही वारकऱ्याची विरक्ती जोपासणारा! व्यापाराची आवड महाराष्ट्राला तुकोबा वाण्याएवढीच!

अर्थात या मानसिकतेची प्रतिमादेखील कैक दशकांपूर्वी साकारलेली. उत्क्रांती ही थांबून राहणारी आळशी बाई नव्हे. बदल हे घडणारच. म्हणून चौकट तीच असेल, पण प्रतिमेत काही बदल झालेलेदेखील असतील. गेल्या पन्नास-साठ वर्षांत महाराष्ट्रात काहीच चांगलं घडलं नाही, असं म्हणणंही कृतघ्नपणाचं ठरेल. खासगी इंजिनिअरिंग कॉलेजं वारेमाप निघाली. कला-वाणिज्य शाखांचे पदवीधर म्हणून बेकार राहाण्यापेक्षा बेकार इंजिनिअर म्हणून भले परवडेल. ही बदललेली मानसिकता खूप छान होती. इंजिनिअरिंग कॉलेजंदेखील मुलींनी निम्मी भरलेली दिसू लागली. जगात सर्वाधिक साखर क्यूबा बनवत असतानाच्या काळात, काही वर्षी एकटय़ा महाराष्ट्रानंही क्यूबाहून अधिक साखर बनवलेली आहे. दूधाचाही पूर आला. रोजगार हमी योजना आम्ही देशाला दिली. पहिल्या भारतीय चित्रपटाचं बीज पेरलं. मराठी सिनेमानंही दोनदा ऑस्करची वारी केली. क्रिकेट-संगीतामधली विश्वरत्नं इथं निपजली. पूर्वी बृहन्महाराष्ट्र ग्वाल्हेर ते तंजावर पसरलेला होता. आज त्याचं एक टोक सिलिकॉन व्हॅलीत आहे. जागतिकीकरणाचे पडघम अलिकडे वाजले. पण ज्ञानेश्वर नावाच्या सोळा वर्षांच्या एका मुलानं आमच्या मानसिकतेला वैश्विक परिमाण सातशे वर्षांपूर्वी देऊन ठेवलंय. जरी त्याची पायपीट तीन-चार जिल्ह्यांपुरती मर्यादित होती तरीही. आजच्या जागतिक खेडय़ात अनेक क्षेत्रात मंडळी संकुचितपणा पुढे रेटताना दिसतात, तेव्हा मात्र भीती वाटून जाते.

अखिल महाराष्ट्राचा विचार केला तर समतेचं बाळकडू संतांनी आणि समाजसुधारकांनी भरपूर पाजलेलं असलं, तरी आजची स्थिती काय दिसते? समाजपुरुषाची (होय, पुरुषाची) किळस यावी असं, खैरलांजी हत्याकांड परवा-परवा घडलं. क्षात्रतेज आणि प्रशासनवाल्या महाराष्ट्राच्या मुंबईला दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पुरे तीन दिवस गॅसवर ठेवलं. राष्ट्रीय पुरुष जाती-जातींनी आपसात वाटून घेतले. समतेच्या नावानं जातींच्या परिषदा होतात. चार-दोन राजकीय पक्ष जातींना वाहिलेले असतात. मध्ययुगीन सरंजामी मानसिकतेचा संसर्ग मराठवाडय़ामुळं आम्हाला झाला, असं पश्चिम महाराष्ट्रानं म्हणायचं काहीच कारण नाही. तालुक्यातालुक्यात सरंजामदारी वाढण्याकरता काही सहकार चळवळ जन्माला घातलेली नव्हती. आमच्यामागं नव्हे, आम्ही जिवंत असतानाच, आमची मुलं-मुली सहकारात महर्षी आणि राजकारणात राजर्षी व्हावीत! समतेचा हात धरून काही लोकशाही चाललीही नाही अन् वाढलीही नाही. पूर्वी नेत्याचं चारित्र्य साधेपणात शोधलं जायचं. आता शे-पन्नास कोटींचं जाहीर स्थावर-जंगम अन् गळ्यात चार-दोन किलोचं सोनं असलं तरीही लोक मतं देतात. आमची मानसिकता बदललीय.

शेतीत काय, आत्महत्त्या होतच असतात. रोज मरं त्याला कोण रडं? ज्वारीची दारू प्याल तर दु:खही विसराल अन् भाकरीही! नाही परवडत ना शेती? शेतजमीन चौरस फुटाच्या भावानं बिल्डरला विका. मी शेतकऱ्यांचा मुलगा आहे, हे सांगणं पूर्वी राज्य करण्यासाठी गरजेचं होतं. आता निम्म्याहून अधिक महाराष्ट्राचं शहरीकरण झालंय. आता राज्य करण्यासाठी बिल्डरचा मुलगा असणं सोयीचं. एफएसआयचं गणित कळलं म्हणजे झालं. राजकीय घराण्यांनी बहुजन समाजात रमण्याचे दिवस मागेच गेले. व्यापारी, दलाल हेच सख्खे वाटतात. नेतृत्व करू पाहणाऱ्यांची मानसिकता बदललीय. येऊ पाहणारे बडे उद्योग डझनावारी आजूबाजूच्या राज्यात पळवले गेले तरी कुणातच कळ उठत नाही. ना नेत्यांमध्ये, ना जनतेत! आम्हा सगळ्यांची मानसिकताच बदललीय सारी!

डॉ. भालचंद मुणगेकर , सौजन्य – मटा

डॉ. राममनोहर लोहिया यांची जन्मतारीख २३ मार्च, १९१०. दोन दिवसांनी त्यांची शंभरावी जयंती. भारतीय समाजवादाचे सर्वांत प्रभावी प्रवक्ते डॉ. लोहियाच होते. त्यांच्या मूलगामी विचारांनी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श केला. त्यांच्या विचारांचा आजचा अर्थ सांगणारा हा विशेष लेख.

—————————-

काँग्रेस सोशालिस्ट पक्षाची १९३४ साली स्थापना झाली. बौद्ध तत्त्वज्ञानाचे भाष्यकार, मार्क्सवादी विचारांचा प्रभाव असलेले आणि समाजवादाला नैतिक अधिष्ठान हवे, असा आग्रह धरणारे आचार्य नरेंद देव मे १९३४ मध्ये पाटण्यातल्या पक्षाच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. जयप्रकाश नारायण त्याचे प्रमुख सूत्रधार होते. १९५६ साली आचार्य गेले. १९५३ साली समाजवादी कार्यक्रमांवर जयप्रकाशांची नेहरूंशी झालेली बोलणी फिसकटली. त्यामुळे, तसेच पक्षातील कारणांमुळे १९५४ साली जेपी सवोर्दयी चळवळीत गेले. १९५३ मध्ये अशोक मेहता ‘मागास अर्थव्यवस्थेतील राजकीय अपरिहार्यता आणि सहकार्याची समान क्षेत्रे’ असा सिद्धान्त मांडून काँग्रेस लोकशाही समाजवादीकडे जात आहे अशी भूमिका मांडून काँग्रेसमध्ये गेले. या पार्श्वभूमीवर १९५२ मधल्या पंचमढी अधिवेशनापासून १९६८ मध्य५हत्त्वाचा आहे. लोहियांनी मार्क्सनंतर अर्थशास्त्राचे स्वरूप कसे बदलले, उत्पादन तंत्रातील बदलांचा कामगारवर्ग आणि शोषणाच्या स्वरूपावर कसा परिणाम झाला, गरिबी-बेकारी-विषमता नष्ट करण्यासाठी भांडवलशाही आणि साम्यवाद हे दोन्ही पर्याय कसे गैरलागू आहेत हे यात सांगितले, तर ‘समाजवाद : काळा-गोरा’ या पुस्तकात पाश्चिमात्य देशातील समाजवादापेक्षा आशियातील समाजवाद कसा वेगळा असेल, केंद-राज्य-जिल्हा व खेडे या चौखांब्यावर आधारित विकेंदित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार आहे. जमिनीच्या फेरवाटपावर आधारित शेतीची पुनर्रचना आणि मोठ्या उद्योगांचे राष्ट्रीयीकरण त्यांना अभिप्रेत होते. समाजवादी आणि संयुक्त समाजवादी पक्षांच्या जाहीरनाम्यात त्यांनी समाजवादाचे कार्यक्रम सुचविले. परंतु लोहियांसकट सर्व समाजवाद्यांच्या आथिर्क भूमिकेचे ‘श्रेष्ठ श्रेणीची संमिश्र अर्थव्यवस्था’ असे सारांशाने वर्णन करता येईल.

व्यक्तिस्वातंत्र्य आणि अहिंसेवर अपार निष्ठा असल्यामुळे लोहियांचा साम्यवादाला कडवा विरोध होता. त्यामुळे साम्यवाद्यांची ‘कामगार वर्गाची हुकूमशाही’ त्यांना मान्य असण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे भारतात साम्यवादी आणि समाजवादी चळवळी समांतरच नव्हेत, तर एकमेकांच्या कट्टर विरोधक राहिल्या. साम्यवाद्यांनी सुधारणावादी म्हणून समाजवाद्यांची हेटाळणी केली; तर समाजवाद्यांना जमातवाद्यांशी जवळीक करायला संकोच वाटला नाही. त्यातच साम्यवाद्यांच्या भूमिका दीर्घकाळ सोविएत युनियनवर अवलंबून राहिल्या. साम्यवादी आणि समाजवाद्यांच्या एकांगी आणि परस्परविरोधी भूमिकांमुळे भारतात श्रमिकांचे राजकारण सतत क्षीण राहिले.

आचार्य नरेंद देव आणि जेपींवर जसा मार्क्सवादाचा प्रभाव शेवटपर्यंत राहिला, तसा लोहियांवर गांधीजींचा राहिला. लोहिया मार्क्सवादाच्या मर्यादा सांगूनच थांबले नाहीत. तर त्यांनी मार्क्सवादाविरोधी भूमिका घेतली. पंचमढीत, कार्यर्कत्यांच्या आग्रहाने ‘मी मार्क्सवादी नाही’ किंवा मार्क्सवादाच्या विरोधात नाही,’ असे जरी लोहिया स्पष्ट म्हणाले, तरी ते शंभर टक्के गांधीवादी असल्यामुळे ते मार्क्सवादाच्या विरोधात असणे स्वाभाविकच होते. समाजवादी चळवळीत मार्क्सवादाच्या विरोधात मनोभूमिका तयार होणे, हा त्याचा अपरिहार्य परिणाम होता. समाजवादी चळवळीचे नुकसान होण्याचे तेही एक कारण आहे.

गैरकाँग्रेसवाद

१९६३मध्ये फरुकाबाद पोटनिवडणुकीतून लोकसभेत गेल्यानंतर त्यांनी पहिल्याच भाषणात तीस कोटी लोकांचे दरडोई उत्पन्न तीन आणे असल्याचे सांगून चचेर्चा प्रारंभ केला. परंतु संपत्तीबरोबर सर्व प्रकारची सत्ता आणि प्रतिष्ठेचेही विषम वाटप झाल्याचा त्यांना संताप होता. डॉ. आंबेडकरांशिवाय जातिव्यवस्थेमुळे समाजाचे कसे अध:पतन झाले, याचा सकस विचार फक्त लोहियांनी केला. ‘जात म्हणजे अपिरवर्तनीय वर्ग आणि वर्ग म्हणजे बंदिस्त जात’ अशी त्यांची मीमांसा होती. ‘जात म्हणजे बंदिस्त वर्ग’ या डॉ. आंबेडकरांच्या मीमांसेशी ती मिळतीजुळती होती.

भारतातील दैन्य, गरिबी, विषमता या साऱ्याला काँग्रेसच जबाबदार आहे, अशी खात्री झाल्यानेच लोहियांनी ‘गैरकाँग्रेसवाद’ मांडला आणि जनसंघापासून स्वतंत्र पक्षापर्यंत सर्वांची एकजूट करून १९६७ मध्ये नऊ राज्यांत संविद सरकारे आणली. लोहियांच्या निधनानंतर समाजवाद्यांचा ‘गैर काँग्रेसवाद’ इतका टोकाला गेला की जनसंघ असलेल्या जनता पक्षात आपले अस्तित्व विलीन करायला ते कचरले नाहीत. १९८० नंतर ‘हिंदू राष्ट्रवाद’ ही ठाम भूमिका असल्याने भाजपच्या रूपाने जनसंघ पुन्हा उभा राहिला. सत्तेवरही आला. परंतु १९८० मध्ये समाजवादी पक्ष आणि चळवळ कायमची संपली. नकारात्मक राजकारण आणि सुस्पष्ट राजकीय विचारप्रणालीचा पर्याय उभा करण्यातली असमर्थता हीच त्याची प्रमुख कारणे होत.

सांस्कृतिक संदर्भ

डॉ. लोहियांना स्वातंत्र्यानंतर राजर्कत्यांची मानसिकता, त्यांचे धोरणात्मक अग्रक्रम, साम्राज्यवादाच्या प्रतिकांविषयींची भूमिका, आथिर्क ढांचा, समाजरचना, विषमता इ. बाबतीत गुणात्मक बदल होईल, असे वाटले व तसे न झाल्याची मनस्वी चीड आली. त्यासाठी त्यांनी काँग्रेसला जबाबदार धरले.

ज्या ‘वंदे मातरम्’साठी हजारोंनी तुरुंगवास भोगला त्याऐवजी ‘जन गण मन’ राष्ट्रगीत केल्याचा त्यांना खेद होता. क्रिकेटला जवळपास मिळालेल्या राष्ट्रीय दर्जाचा राग होता. इंग्रजी हे शोषणाचे हत्यार असल्याची त्यांची भूमिका होती. लोहियांचा विरोध इंग्रजीला ‘भाषा’ म्हणून नव्हता, तिला मिळालेल्या असाधारण प्रतिष्ठेला होता. आरोपीच्या जीवनमरणाचा वाद न्यायालयात त्याला न समजणाऱ्या इंग्रजीत चालण्याला होता. आजही शुद्ध मराठी बोलणाऱ्यापेक्षा अशुद्ध वा चूक इंग्रजी बोलणाऱ्याला अधिक प्रतिष्ठा आहेच.

स्त्री-पुरुष समानता

डॉ. आंबेडकरांचा अपवाद सोडला तर स्त्रियांचे गौणत्व आणि त्यांची सक्षमता याचा विचार लोहियांइतका कुणी केला नाही. जातिप्रथा आणि स्त्रियांची अवनती ही भारताच्या अध:पतनाची दोन प्रमुख कारणे असल्याचे ते आग्रहाने म्हणत. कनिष्ठ जाती, अन्य मागास आणि मुसलमान यांना केवळ समान संधीच नव्हे, तर ‘विशेष संधीचा’ पुरस्कार करताना लोहियांनी त्यात स्त्रियांचाही समावेश केला. आज लोहियांनी महिला आरक्षणात ओबीसी व मुस्लिम महिलांच्या स्वतंत्र आरक्षणाचा आग्रह धरलाच असता.

विवाह आणि स्त्री-पुरुष संबंधाबाबत भारतीयांचे मन गलिच्छ असल्याचे लोहियांचे मत होते. पावित्र्याच्या कल्पनांमुळे स्त्रीची गुलामी फक्त चुलींपुरती राहिली नाही तर पापपुण्याच्या बेड्याही तिच्या पायात अडकल्या. त्यातही तिच्या शरीराला अधिक महत्त्व देण्यात आले. स्त्री-पुरुष संबंधात दोनच अपराध आहेत : बलात्कार आणि खोटे बोलणे वा वचनभंग. सावित्रीपेक्षा बंडखोर दौपदीविषयी अभिमान वाटणाऱ्या लोहियांना रुढी व संकेतांच्या विरोधात तरुणींचे बंड अभिप्रेत होते. स्त्रियांची चळवळ आज या दिशेने जाते आहे ही समाधानाची गोष्ट आहे.

गौर वर्णाचे साम्राज्य

आशियासारख्या उष्मा कटिबंधात गौरवर्ण हा सौंदर्याचा निकष मानणे, हा सौंदर्यशास्त्राचा विपर्यास आहे, असे लोहिया म्हणत. दौपदी सावळी होती, याचा त्यांना अभिमान वाटे. जवळपास तीन शतके युरोपीय गोऱ्यांनी जगावर अधिसत्ता गाजविली. जेत्यांची गुणवैशिष्ट्ये नेहमीच पराभूतांवर लादली जातात. किंवा पराभूत ती भूषण म्हणून मिरवतात. लोहिया म्हणतात, ‘कृष्णवणिर्यांची जगावर सत्ता असती तर स्त्रीसौंदर्याचे निकष बदलले असते. राजकारण सौंदर्यकल्पनांवरही वर्चस्व गाजविते. अद्वितीय सत्ता तर सुंदरही दिसू लागते.’

अभिजात रसिकता

लोहियांनी भारतातील शिल्प, साहित्य आणि इतर कलांचा आस्वाद घेतला. त्यावर भाष्य केले. शिल्पकलेविषयी ते म्हणतात, ‘इतिहासाचे ग्रंथ कधीतरी नाश पावतात म्हणूनच की काय, भारतीय जनतेने अनंत काळ प्रचलित राहणाऱ्या कथा-कहाण्यांच्याद्वारे तो सांगून ठेवला आहे. इतिहास संतापला. त्याने सूड घेतला आणि सर्वांत अधिक काळ टिकणाऱ्या पाषाणावर चित्ररूपाने त्याने स्वत:ला खोदून ठेवले.’ परंतु ते त्वरित या पोकळपणावर बोट ठेवतात. एका बाजूला श्वास रोखून धरणारे शिल्पांतील चिरंतन सौंदर्य, तर दुसऱ्या बाजूला इतिहास आणि धर्मचिंतनातील रितेपण हा विरोधाभास त्यांना अस्वस्थ करतो. त्यांनी दिल्लीचे मनोज्ञ वर्णन केले आहे. ते म्हणतात की पॅरिस, वॉशिंग्टन, लंडन, टोकिया यांच्यापेक्षा दिल्ली सर्वांत मोहक आहे हे खरे, परंतु ती अत्यंत नीच वेश्या आहे. जेत्यांसमोर ती नेहमीच वक्ष:स्थळ उघडत आली आहे.

हवी नवी मांडणी

सोव्हिएत युनियनच्या विघटनानंतर समाजवादाचे स्वरूपच बदलले आहे. आता बाजारपेठेचे दुष्परिणाम कसे टाळता येतील, त्याचा विचार करणे अत्यावश्यक आहेच. त्यासाठी दैन्य, विषमता व बेरोजगारी दूर करून चिरंतन विकासासाठी बाजारपेठेवर निर्णायक व अतिरेकी भिस्त ठेवणारे आणि साम्यवादी या दोघांनाही लोकशाही समाजवादाचा स्वीकार केल्याशिवाय पर्याय नाही. जातिनिर्मूलन, स्त्री-पुरुष समानता, जमातवादविरोध, धर्मनिरपेक्षता, व्यामिश्र संस्कृतीवर आधारित राष्ट्रवाद, संतुलित प्रादेशिक विकास, जागतिक शांतता अशा मूलभूत कार्यक्रमांवर आधारित विचारप्रणाली तयार करावी लागेल. कोणत्याही एका ग्रंथात किंवा विचारप्रणालीत याची उत्तरे नाहीत. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय यावर आधारित लोकशाही समाजवादाची पुनर्मांडणी करणे, हीच डॉ. लोहियांना खरी श्रद्धांजली ठरेल!

सचिन परब, सौजन्य – मटा

चले जाव, करेंगे या मरेंगे, हे राम… अशा साधासुध्या शब्दांना वेदमंत्रांहून मोठं प्रामाण्य भारतवर्षात मिळालं. कारण त्यामागे मोहनदास करमचंद गांधी या साध्यासुध्या दिसणाऱया महापुरुषाच्या संतपणाचं सामर्थ्य होतं. हे संतपण आलं होतं ते खरयाच्या प्रयोगातून आणि संस्कारातून. देशोदेशींचे, पिढ्यानपिढ्यांचे संस्कार रिचवून असं सामर्थ्य उभं राहतं. त्यात एक संस्कार मराठी माती घडवणाऱ्या तुकाराम महाराजांचाही होता.

आपल्या मराठी मनांवर कळत नकळत असा संस्कार होत असतो. पण रिचवण्या आणि पचवण्याआधीच तो संस्कार कापरासारखा उडून जातो. मात्र गांधीजींनी तुकोबारायाचे संस्कार कसे पचवले होते, ते समजून घेण्याचा सोपा मार्ग आहे. गांधीजींनी तुकोबांच्या सोळा अभंगांचे भाषांतर वाचण्याचा. गांधीजींच्या भाषांतरात साहेबाचा भाषेचा, त्या भाषेच्या संपूर्णपणे वेगळ्या पार्श्वभूमीचा कोणताही अडथळा न होता तुकोबांचे विचार जसेच्या तसे वाचकांपर्यंत पोहचतात. लेखक आणि भाषांतरकारातलं असं अद्वैत क्वचितच अनुभवायला मिळतं. दोन सच्च्या वैष्णवांमधलं हे अद्वैत.

विशेष म्हणजे गांधीजींनी मराठी मातीत बसून हे लिहिलंय. हे भाषांतर त्यांनी येरवडा तुरुंगात म्हणजे त्यांच्या शब्दांत येरवडा आश्रमात बंदी असताना केलंय. त्यांच्या सगळ्या सोळा अभंगाचं भाषांतर आता एकामागून एक रोज देणार आहोत. त्यानंतर संतपरंपरेतल्या आणखी काही अभंगांची भाषंतरे आम्ही वारी संपेपर्यंत सादर करणार आहोत.

आज त्यातला पहिला अभंग गाधीजींचा सर्वाधिक आवडता अभंग. भाषांतराची तारीख आहे, १६ ऑक्टोबर. आपल्या मुलाला लिहिलेल्या पत्रांत त्यांनी या अभंगाचा उल्लेख केला आहे. त्यांना या अभंगांमध्ये आपली तीन माकडे दिसत असत…

पापांची वासना नको दांवू डोळा l त्याहुनि आंधळा बराच मी ll

निंदेचे श्रवण नको माझे कानी l बधिर करोनि ठेवी देवा ll

अपवित्र वाणी नको माझ्या मुखा l त्याजहुनि मुका बराच मी ll

नको मज कधी परस्त्रिसंगती l जनांतुन मातीं उठता भली ll

तुका म्हणे मज अवघ्याचा कंटाळा l तू एक गोपाळा आवडसी ll

O God, let me not be witness to desire for sin, better make me blind;

Let me not hear ill of anyone, better make me deaf;

Let not a sinful word escape my lips, better make me dumb;

Let me not lust after another’s wife, better that I disappear from this earth.

Tuka says: I am tired of everything worldly, Thee alone I like, O Gopal.

संत नामदेवांनी भागवतधर्माची पताका अटकेपार लावली.  संपूर्ण भारतभर त्यांनी पांडुरंगाच्या भक्तीची मोहर उमटवली. गुजरातही त्याला अपवाद नव्हता. गुजराततेतल्या वैष्णव संतावंर नामदेवांचा प्रभाव स्पष्ट आहे. सर्वात प्रसिद्ध गुजराती संतकवी नरसी मेहतांच्या काव्यात तर नामदेवांचा उल्लेख अनेकदा येतो. ज्याने नामदेवासाठी दूधभात खाल्ला. ज्याने नामदेवासाठी मंदिर फिरवले असे भगंवताचे वर्णन त्यांनी केले आहे.

नरसी मेहतांच्या भक्तिकाव्याने सबंध गुजरातेवर प्रभाव टाकलाय. धामिर्क वैष्णव कुटुंबात जन्मलेल्या गांधीजींवरही त्याचा प्रभाव होता. विशेषत: नरसींच्या ‘वैष्णव जन तो…’ ने तर त्यांच्यावर लहानपणापासून गारूड केलं होतं. गांधीजींचा ध्यास नरसींनी वर्णन केलेला खरा वैष्णव बनण्याचाच होता.

त्यामुळे गांधीजींनी तुकाराम गाथा हाती घेतली असेल तेव्हा त्यांना ‘जे का रंजले गांजले’ हा अभंग सर्वात आधी आपला वाटला असावा. गांधीजींनी आपल्या अनुवादातही सर्वात वरचे स्थान याच अभंगाला दिले आहे.

शाळेतल्या निबंधपासून प्रमुख पाहुण्याच्या वापरून गुळगुळीत झाला असला तरी पुन्हा एकदा मूळातून वाचायला हवा. ‘आपल्या नोकरचाकरांवर मूलासारख प्रेम करणारा तोच खरा साधू’ अशी रोकडी व्याख्या त्यात आहे. आनंदाची गोष्ट ही इथे ही व्याख्या आणि त्याचा अनुवाद हे शब्दांचे बुडबुडे नाहीत. दोन्ही महात्म्यांनी हे शब्द आपल्या जीवनात उतरवून दाखविलेत.

जे का रंजले गांजले । त्यासि म्हणे जो आपले ।। १।।

तोची साधू ओळखावा ।। देव तेथे चि जाणावा ।।धृ.।।

मृदू सबाह नवनीत । तैसे सज्जनाचे चित्त ।। २।।

ज्यासि अंपगिता नाही । त्यासि घरी जो हृदयी ।। ३।।

दया करणे जे पुत्रासी । ते चि दासा आणि दासी ।। ४।।

तुका म्हणे सांगू किती । तो चि भगवंताची मूर्ती ।। ५।।

Know him to be a true man who takes to his bosom those who are in distress. Know that God resides in the heart of such a one. His heart is saturated with gentleness through and through. He receives as his only those who are forsaken. He bestows on his man servants and maid servants the same affection he shows to his children. Tukaram says: What need is there to describe him further? He is the very incarnation of divinity.

गांधीजी आणि आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचा प्रवास एकाच दिशेने पण समांतर झाला. आंबेडकरवाद्यांनी गांधीजींना समजून घेतले नाही आणि गांधीवाद्यांनी आंबेडकरांना. दोघांचा वारसा सांगणाऱ्या पुढाऱ्यांनी या दोघांना एकत्र आणलं ते फक्त राजकीय फायद्यासाठी. अन्यथा या दोन्ही विचारधारा जवळही येऊ नयेत म्हणून डोळ्यात तेल घालून प्रयत्न केले.

असे कितीही प्रयत्न केले असले, तरी अनेक बाबतीत गांधी आणि आंबेडकर एकमेकांची गळाभेट अनेकदा झालीय. तुकाराम त्यातली एक गोष्ट. स्वत:ला’यातिहीन’ म्हणणारा आणि विद्रोहाची पताका उंचावणारा तुकाराम आंबेडकरांना आपलासा वाटलाच. पण तितकाच ‘विष्णुदास’ असणारा आणि पदोपदी संतसंग मागणारा तुकाराम गांधीजींना आवडणे तितकेच स्वाभाविक होते.  आपण दोघांच्याही पूर्वपरंपरेत शोभून दिसणारा तुकाराम समजून घेऊया. एकदा ते झाले की गांधी आणि आंबेडकर दोघेही आरशासारखे समोर दिसू लागतील.

महारासि सिवे। कोपे ब्राम्हण तो नव्हे।।

तया प्रायश्चित्त कांही। देहत्याग करितां नाही।।

नातळे चांडाळ। त्याचा अंतरी विटाळ।।

ज्याचा संग चित्ती। तुका म्हणे तो त्या याती।।

He who becomes enraged at the touch of a Mahar is no Brahmin.

There is no penance for him even by giving his life.

There is the taint of untouchability in him who will not touch a Chandal.

Tuka says: A man becomes what he is continually thinking of.

नंतरच्या काळात सर्वोदयीचे  आश्रमातल्या प्रार्थना, भजन हे सारे माणसं घडवण्याचेच प्रयोग होते. स्वत: मोहनदासाचा महात्मा बनण्याचा प्रवासही अशाच प्रयोगांचा होता. प्रयोग, सत्याचे प्रयोग. साधन स्वत:, साधक स्वत: आणि साध्यही स्वत:चंच. तुकारामही असेच आतआत डोकावत सत्यापर्यंत पोहोचलेले. भगवंताच्या भेटीसाठी स्वत:च धावायचं, स्वत:च पडायचं, स्वत:च स्वत:ला हुरूप द्यायचा आणि स्वत:च स्वत:ला घडवायचं. तुकारामांचा कोणी गुरु नाही. गांधीजींचही तसंच. त्यांनी अनेकांचा गुरु म्हणून उल्लेख केला, पण फुलटाइम गुरु त्यांनाही नव्हता.

तसं पाहिलं, तर सद्विचार हेच या दोघांचे मार्गदर्शक होते. हे विचार जीवनात उतरवण्यासाठी दोघांनीही आटापिटा केला. विचार जीवनात उतरविणं हेच ज्ञान असतं. सॉक्रेटिस याविषयी ठाम सांगतो , virtue is knowledge असे विविध सद्विचार गांधीजींनी आश्रम भजनमाला मध्ये एकत्र आणले आहेत. आजचा अभंग संतपणाबद्दलचा.

नाहीं संतपण मिळतें हें हाटीं। हिंडतां कपाटीं रानींवनीं ।।

नये मोल देतां राशी । नाहीं तें आकाशीं पातळीं तें।।

तुका म्हणे मिळे जिवाचियें साठीं । नाहीं तरीं गोष्टी बोलों नये ।।

Saintliness is not to be purchased in shops nor is it to be had for wandering nor in cupboards nor in deserts nor in forests. It is not obtainable for a heap of riches. It is not in the heavens above nor in the entrails of the earth below. Tuka says: It is a life’s bargain and if you will not give your life to possess it better be silent. 24-10-1930

पावन देश कोणता, तुकाराम महाराज म्हणतात, जेथे हरिचे दास जन्म घेतात तो. त्या अर्थाने महाराष्ट्र आणि सौराष्ट्र हे दोन्ही प्रदेश अती पावन. संतांची मांदियाळी दोन्हीकडे बहरली. गांधीजी सौराष्ट्रातलेच. दुदैर्व हे की सौराष्ट्रातली जातीची उतरंड अजूनही पूर्णपणे ढळलेली नाही. तुकारामांनंतर शंभर वर्षांतच देहू ते पंढरीच्या वाटेत असणाऱ्या पुण्यात अस्पृश्यांना थुंकण्यासाठी गळ्यात गाडगी बांधावी लागली.

पण म्हणून भागवत धर्माने केलेल्या क्रांतीचं महत्त्व कमी होत नाही. महाराष्ट्रात अशी एकही जात नव्हती ज्यात त्याकाळी एकही संत झाला नाही. तुकोबांनी आपल्या अभंगात या संतांची जातवार यादीच दिली आहे. हा एक सामाजिक दस्तावेजच आहे. ज्ञानदेवे रचिला पाया… तुका झालासे कळस या बहिणाबाईंच्या अभंगा इतकाच मोलाचा.भारतीय इतिहासातील एका मोठ्या सामाजिक क्रांतीचा हा सज्जड पुरावा आहे. गांधीजींनी अनुवादासाठी हा अभंग निवडला नसता तरच नवल. त्यांनी उभ्या केलेल्या स्वातंत्र्य संगरातही अशीच समाजाच्या प्रत्येक घटकांत त्यांना जागृती अपेक्षित होती. काही प्रमाणात ती सफलही झाली. दोन्ही क्रांत्या अस्सल भारतीय मातीतल्या होत्या. दोन्ही तत्त्वज्ञानांचं अधिष्ठान भक्ती होतं. परिभाषा ही आध्यात्मिक होती, भारतीयांच्या मनात रूजलेली. त्यामुळेच वेदांचा हवाला देत जाती-धर्म नाकारण्यात विरोधाभास उरला नाही…

पवित्र तें कुळ पावन तो देश। जेथें हरिचे दास घेती जन्म।।

कर्मधर्म त्याचे जाला नारायण । त्याचेनी पावन तिन्ही लोक।।

वर्णअभिमानें कोण जाले पावन । ऐसें द्या सांगून मजपाशीं।।

अंत्यजादि योनि तरल्या हरिभजनें । तयाचीं पुराणें भाट जालीं।।

वैश्य तुळाधार गोरा कुंभार । धागा हा चांभार रोहिदास ।।

कबीर मोमीन लतिब मुसलमान। शेणा न्हवी जाण विष्णूदास।।

काणोपात्र खोदु पिंजारी तो दादु। भजनीं अभेदू हरिचे पायीं।।

चोखामेळा बंका जातीचा माहार । त्यासी सवेर्श्वर ऐक्य करी ।।

नामयाची जनी कोण तिच भाव ।  जेवी पंढरीराव तियेसवें।।

मैराळ जनक कोण कुळ त्याचें । महिमान तयाचें काय सांगों।।

यातायातीधर्म नाहीं विष्णूदासा ।  निर्णय हा ऐसा हा वेदशास्त्रीं।।

तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ। तारिले पतित नेणों किती।।

Blessed is that family and that country where servants of God take birth. God becomes their work and their religion. The three worlds become holy through them. Tell me who have become purified through pride of birth? The Puranas have testified like bards without reserve that those called untouchables have attained salvation through devotion to God. Tuladhar, the Vaishya, Gora, the potter, Rohidas, a tanner, Kabir, a Momin, Latif, a Muslim, Sena, a barber, and Vishnudas, Kanhopatra, Dadu, a carder, all become one at the feet of God in the company of hymn singers. Chokhamela and Banka, both Mahars by birth, became one with God. Oh, how great was the devotion of Jani the servant girl of Namdev! Pandharinath (God) dined with her. Meral Janak’s family no one knows, yet who can do justice to his greatness? For the servant of God there is no caste, no varna, so say the Vedic sages. Tuka says: I cannot count the degraded.

नामजपाला भारतीय अध्यात्म आणि तत्त्वज्ञानात मोठी जागा मिळाली आहे. भगवत्भक्तीच्या या पहिल्या पायरीबद्दल संतसाहित्यात सर्वाधिक लिहिले गेलंयं. विशेष म्हणजे सामाजिक दृष्टी असलेल्या संतांनी आणि वेदांताचा पुरस्कार करणाऱ्या नव्याजुन्या तत्त्ववेत्त्यांनीही नामजपला प्राधान्य दिले आहे.

तुकाराम महाराजांनी अनेक अभंगांमध्ये याच नामजपाचं महात्म्य गायले आहे. आजचा अभंगही त्यातलाच एक. हा अभंग सांगतो, विठोबाला शरण जाणं आणि त्याच्या नामाचा जप करणं हेच सगळ्या ज्ञानाचे सार आहे. मात्र लोक यापैकी पहिला भाग सोडून केवळ दुसरा दर्शनी सोपा वाटणारा नामजपाचाच मार्ग उचलतात. त्यामुळे देवाचिये द्वारी क्षणभरच काय तासंतास उभं राहूनही अधीर्मुर्धी मुक्तीही मिळत नाही.

गांधीजींनी अनेकदा रामनामाचा महिमा सांगितला आहे. त्यांच्या या श्रद्धेविषयीचे काही प्रसंगही आहेत. एवढंच नाही तर शेवटचा श्वास घेतानाही त्यांच्या मुखी रामनामच होतं.

वेद अनंत बोलला । अर्थ इतकाचि शोधिला ।।

विठोबासी शरण जावे । निजनिष्ठ नाम गावें ।।

सकळशास्त्रांचा विचार ।अंति इतकाचि निर्धार ।।

अठरापुराणी सिद्धांत । तुका म्हणे हा चि हेत ।।

The essence of the endless Vedas is this:

Seek the shelter of God and repeat His name with all thy heart.

The result of the cogitations of all the Shastras is also the same;

Tuka says: The burden of the eighteen Puranas is also identical.

‘कसं जगायचं, कसं वागायचं’ या विषयावरच सर्वाधिक आणि सवोर्त्तम चिंतन भारतात झालं. दुदैर्व हेच आयतेपणाला मिळालेल्या फाजील प्रतिष्ठेमुळे या सगळ्या चिंतनाचे वाटोळे झाले. कर्मसिद्धांत, कर्मकांड यांना तर अकर्मण्यतेसाठी पूरेपूर वापरून घेण्यात आलं.

‘असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी’ चही तेच झालं. वास्तविक हे समर्पण आणि भगवतनिष्ठेच्या परमावधीचे तत्त्वज्ञान आहे. मी भगवंताचे काम करीन, तर माझा चरितार्थ तोच चालवेल असा विश्वास सांगणारं हे तत्त्वज्ञान. हे जीवनात उतरवणही महाकर्मकठीण.

भारतीय तत्त्वज्ञानावरची राख झटकताना संतांनी प्रामुख्याने कर्मयोगाचाच अंगार फुलवला. कबीर, ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, एकनाथ, चोखामेळा यांनी शिकवला तो आत्मगौरवातून उभा राहणारा कर्मवादच. गेल्या शतकातही विवेकानंद, टिळक,अरविंद, गांधीजी, विनोबा, गाडगेबाबा यांनीही हाच कर्मयोग वेगवेगळ्या परिभाषेत मांडला.

तुकारामांनी या अभंगात आपल्या नेहमीच्य पद्धतीने रोकडा कर्मवाद मांडला आहे. योग्य अयोग्य हे असं आहे. आता तुम्हीच काय करायचं ते ठरवा असं सांगणारा हा तुकोबाचा कर्मवाद… आणि गांधीबाबाचाही.

पुण्य पर उपकार पाप ती परपीडा । आणिक नाही जोडा दुजा यासी ।।

सत्य तो चि धर्म असत्य ते कर्म । आणिक हे वर्म नाही दुजे ।।

गति ते चि मुखी नामाचे स्मरण । अधोगती जाण विन्मुखते ।।

संताचा संग तो चि स्वर्गवास । नर्क तो उदास अनर्गळा ।।

तुका म्हणे उघडे आहे हित घात । जयाचे उचित करा तैसे ।।

Merit consists in doing good to others, sin in doing harm to others.

There is no other pair comparable to this.

Truth is the only religion (or freedom); untruth is bondage,

there is no secret like this.God’s name on one’s lips is itself salvation,

disregard (of the name)know to be perdition.

Companionship of the good is the only heaven,studious indifference is hell.

Tuka says: It is thus clear what is good and what is injurious, let people choose what they will.

गांधीजींना मराठी येत होतं का, बहुधा नव्हतंच. महाराष्ट्रात त्यांचं अनेक वर्षाचं वास्तव्य, मराठीचं गुजराती-हिंदी-संस्कृतशी असलेलं साम्य यामुळे त्यांना निदान मराठी कळत असावं, असं  मानता येईल. असं असतानाही त्यांनी तुकारामांच्या गाथेमधल्या शेकडो अभंगांमधून अवघे सोळा अभंगांची केलेली निवड निव्वळ अप्रतिम आहे.

तुकारामांच्या अभंगांचे अनुवाद आश्रम भजनावलीसाठी आहेत.  त्यातून गांधीजींचं सगळं तत्त्वज्ञान आणि संस्कार स्पष्ट होतात. गांधीजींनी आपले वाटतील ते ते अभंग यात निवडले आहेत. त्यामुळे तुकोबांच्या अभंगांची निवड एवढी उत्तम झाली असावी.

अर्थात या अभंगांचे अर्थ समजून घेण्यासाठी त्यांना अनेकांची मदत झाली असेलच. महादेवभाई देसाई, स्वामी आनंद, काका कालेलकर, विनोबा,किशोरीलाल मश्रूवाला या गांधीजींच्या सगळ्या सावल्यांना मात्र मराठी उत्तम येत होतं. त्यापैकी काहीजण अनुवादाच्या प्रसंगी येरवड्यालाही सोबत होते. पण त्यांनी शब्दांचे अर्थ सांगितले असतील, या हृदयीचे त्या हृदयीपर्यंत पोहोचलेला भाव ट्रान्स्लेट होण्यासाठी हवं असतं अद्वैत. ते या दोन महात्म्यांमध्ये निश्चित होतं.

लगेच आठवणारे तुकारामांचे बहुतेक अभंग या सोळा अभंगांमध्ये सापडतात ते उगाच नव्हे! उदाहरणार्थ पुढे गाणं म्हणून गाजलेला, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती हा अभंग.

जेथे जातो तेथे तू माझा सांगाती । चालविसी हात धरुनिया ।।

चालो वाटे आम्ही तुझाचि आधार । चालविसी भार सवे माझा ।।

बोलो जाता बरळ करिसी ते नीट । नेली लाज धीट केलो देवा ।।

अवघे जन मज जाले लोकपाळ । सोइरे सकळ प्राणसखे ।।

तुका म्हणे आता खेळतो कौतुके ।जाले तुझे सुख अंतर्बाही ।।

Wherever I go, Thou art my companion.

Having taken me by the hand Thou movest me.

I go alone depending solely on Thee.

Thou bearest too my burdens.

If I am likely to say anything foolish,

Thou makest it right.

Thou hast removed my bashfulness and madest me self-confident,

O Lord. All the people have become my guards, relatives and bosom friends.

Tuka says: I now conduct myself without any care.

I have attained divine peace within and without.

तुकारामांचा गांधीजींच्या एकूणच व्यक्तिमत्त्वावर प्रभाव होता. त्यांना प्रत्यक्ष पाहिलेल्यांनीही तो प्रभाव नोंदवलाही आहे. ‘लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका’ नावाचं सदाशिव विनायक बापट यांचं पुस्तक आहे. त्यात १९१७ सालच्या आठवणींमध्ये त्यांनी लिहिलं आहे, ‘आश्रमाची सर्व व्यवस्था पाहून आम्ही परत येत असता निम्या वाटेवर महात्माजी आश्रमाकडे चालले आम्हास भेटले. भगवद्भक्त श्री तुकोबाप्रमाणे ती शांत वैराग्यमूर्ती डोक्यास गुजराथी पांढरे पागोटे घालून अंगात खादीचा अंगरखा घातलेली अनवाणी येत असलेली आम्ही दुरून पाहिली‘.

लोकमान्यांच्या प्रभावात असलेल्या बापटांचे हे निरीक्षण आहे, हे विशेष. वास्तविक टिळकवादी बड्या नेत्यांनी गांधीजींना कधीच आपले मानले नाही. उलट राष्ट्रीय लढ्याचे केंद्र पुण्यातून हलले याविषयी कायम हळहळ व्यक्त केली. त्यात ब्राह्मण बहुजन असा संघर्षाचाही एक पदर होता. त्यातून मग गांधीजींवर विखारी टीका झाली.

असं असलं तरी गांधीजींना टिळकांविषयी प्रचंड आदर होता. आपल्या महाराष्ट्रयात्रेचे वर्णन करताना त्यांनी लिहिलं आहे, जिथे लोकमान्य टिळक महाराजांचा जन्म झाला. आधुनिक युगाचे नायक असलेले शिवाजी महाराजांची जी भूमी आहे. जिथे तुकारामांनी आपले कार्य केले. ती महाराष्ट्राची भूमी माझ्यासाठी तीर्थक्षेत्राइतकीच पवित्र आहे… महाराष्ट्राने एकदा ठरवलं की तो कोणतीही अशक्य गोष्ट वास्तवात उतरवू शकतो, असं मी नेहमीच म्हणतो.

वादाचे, कार्यपद्धतीतले फरक असले तरी टिळक आणि गांधी या दोन्ही महापुरुषांमधले अद्वैतही आगळे होते. त्यामुळेच तर टिळकांच्या नेतृत्त्वाची धुरा गांधीजींनी यशस्वीपणे खांद्यावर घेतली. दोघांच्याही तत्त्वज्ञानाचे अधिष्ठान श्रीमद्भगवद्गीताच होते. गांधीजींवर तुकारामांचा प्रभाव होता. टिळकांवरही तो होताच होता. गीतारहस्याची सुरुवात तुकोबांच्याच अभंगाने झाली आहे. गीतारहस्यात तुकोबांचे एकूण २३ अभंग आहेत. टिळक आणि गांधी उपकारे देह कष्टवणाऱ्या या दोन विभूती होत्या.

काय वाणू आता न पुरे हे वाणी । मस्तक चरणीं ठेवीतसें ।

थोरीव सांडिली आपुली परिसे । नेणे सिवों कैसे लोखंडाशी ।

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती उपकारें।

भूतांची दया हे भांडवल संतां । आपुली ममता नाहीं देही ।

तुका म्हणे सुख पराविया सुखें। अमृत हे मुखे स्रवतसे ।

How now shall I describe (the praises of the good);

my speech is not enough (for the purpose).

I therefore put my head at their feet.

The magnet leaves its greatness and does not know that it may not touch iron.

Even so good men’s powers are for the benefit of the world.

They afflict the body for the service of others.

Mercy towards all is the stock-in-trade of the good.

They have no attachment for their own bodies.

Tuka says: Others’ happiness is their happiness; nectar drops from their lips.

१०

आपल म्हणजे भारतीय अध्यात्म म्हटल की जगण्यापासून पळून गेलेला जंगलामध्ये ध्यान लावून बसलेला साधुबुवा आठवतो. मोक्ष हेच आपल्या अध्यात्माचे अंतिम ध्येय, मग समष्टीचा, समाजाचा त्याच्याशी काय संबंध, अस वाटत खर. पण जगन्मिथ्या मानणाऱ्या शंकराचार्यांनी भारतभर चारदा परिक्रमा का केली? भवसागर पार करण्याविषयी बोलणाऱ्या संतांनी सर्वसामान्यांची काळजी का वाहिली?

मला मुक्ती नको, असं रोकडेपणे सांगणारा तुकोबा या प्रश्नांची अगदी खणखणीत उत्तर देतात. आजच्या अभंगात हे उत्तर अगदी सविस्तर आहे. नाहीतर आधीच्या वाक्यात ‘बैसला गोविंद जडोनिया चित्ती’ म्हणणारा तुकाराम पुढच्याच वाक्यात’बळबुद्धी त्याची उपकारासाठी’ कसे सांगतात ? चित्ती गोविंद जडवण्यासाठी बळबुद्धी उपकारासाठी वापरण्याचं हे अध्यात्म आहे. हे आर्मचेअर तत्त्वज्ञान नाही, जीवनाचं,जगण्याचं आणि मातीशी जोडलेलं तत्त्वज्ञान आहे.

भवसागरातून पार व्हायचं आहे, हे खरं. पण त्यासाठी संसार सोडून संन्यास नको. उलट सुखी संसारच हवा. आपले देव, ऋषी, आचार्य, संत सगळे बहुतांशी संसार करणारे आहेत.सगळ्या महापुरुषांनी लोकांमध्ये लोकांसारखं राहुन लोकांमधला राम जागवून रामाला आपल्याशी जोडण्याचे काम त्यांनी केलं. रामाचे काम करण्याचा त्यांचा मार्ग हाच होता आणि हाच मार्ग असू शकतो. तुकाराम आणि गांधीजी दोघांचीही आयुष्य याला साक्ष आहेत.

मुक्तिपांग नाही विष्णुचिया दासा । संसार तो कैसा न देखती ।।

बैसला गोविंद जडोनिया चित्ती ।आदि तेचि अंती अवसान ।।

भोग नारायणा देऊनि निराळी । ओविया मंगळी तोचि गाती ।।

बळबुद्धी त्यांची उपकारासाठी । अमृत ते पोटी साठवले ।।

द्यावेत तरी देवा च सारिखी । आपुली पारखी नोळखती ।।

तुका म्हणे त्यांचा जीव तोचि देव । वैकुंठ तो ठाव वसती तो ।।

To the servants of Vishnu there is no yearning even for salvation;

they do not want to know what the wheel of birth and death is like.

Govind sits steadily settled in their hearts; for them the beginning and the end are the same.

They make over happiness and misery to God and themselves remain untouched by them,

the auspicious songs sing of them.

Their strength and their intellect are dedicated to benevolent uses;

their hearts contain gentleness.

They are full of mercy even like God; they know no distinction between theirs and others’.

Tuka says: They are even like unto God and Vaikuntha is where they live.

११

आजकाल साधू आणि संत म्हणवून घेणाऱ्यांचे मठ आणि आखाडे एकमेकांविरुद्ध खरोखरच्या आखाड्यात उभे असल्यासारखे झगडत असतात. त्यांच्यात वर्षानुवर्षं कोर्टकेस सुरु असतात. साधुबोवांना सिक्युरिटी घेऊन फिरावं लागतं. असे आपल्या संतसमाज वगैरे युनियन बनवणारे हे संत खऱ्या संतांना कसं काय ओळखू शकणार. खरा भक्तच दुसऱ्या भक्ताला ओळखू शकतो.

म्हणून तर विठ्ठलाचे समकालीन भक्त एकटेदुकटे नाही, तर मांदियाळीने फिरत आलेले दिसतात. त्यांनी एकत्र यात्रा केलेल्या आहेत. एकमेकांशी चचेर्तून,एकमेकांच्या व्यक्तित्वातून प्रेरणा घेत विकसित झालेले आहेत. भगवंताच्या आणखी जवळ गेले आहेत. कधी ज्ञानोबांच्या प्रभावातून नामदेवांनी गुरु करण्याचा निर्णय घेतलेला दिसतो, तर त्याचवेळेस नामदेवांमुळे ज्ञानेश्वर योगाच्या प्रभावातून बाहेर पडून भक्तीकडे आलेले दिसतात. याचमुळे ज्ञानेश्वरांपासून आजपर्यंत वारकरी संप्रदायाने सदैव आपल्या पूर्वसूरींकडे केवळ आदराने पाहिलेले आहे.

फक्त आपल्या संप्रदायातीलच नाही, तर अन्य संप्रदायांतील संतांशी या संतांचं फार सौहार्दपूर्ण संबंध होते. नामदेव, तुकाराम, एकनाथ हे तर सुफी संतांशीही अगदी आपलेपणाचे वागल्याचे दाखले आहेत.

भक्त ऐसे जाणा जे देहीं उदास । गेले आशापाश निवारुनि ।।

विषय तो त्यांचा जाला नारायण ।  नावडे धन जन माता पिता ।।

निर्वाणी गोविंद असे मागेंपुढें ।  कांहीच सांकडे पडो नेदी ।।

तुका म्हणे सत्य कर्मा व्हावें साहे । घातलिया भये नरका जाणें ।।

He is a devotee who is indifferent about body, who has killed all desire,

whose one object in life is (to find) Narayana,

whom wealth or company or even parents will not distract,

for whom whether in front or behind there is only God in difficulty,

who will not allow any difficulty to cross his purpose.

Tuka says: Truth guides such men in all their doings.

१२

गांधीजींच्या लिखाणात , वक्तव्यांत तुकारामांच्या उल्लेख अनेकदा आलाय. गांधींचे समग्र साहित्य इंटरनेटवर उपलब्ध आहे , त्यात ‘ तुका ‘ असा सर्च दिला ,की अनेक संदर्भ समोर येतात.

त्यातला महत्त्वाचा संदर्भ वाईच्या भाषणाचा आहे. त्यात असहकार आंदोलनाची तात्त्विक भूमिका समजावून सांगताना त्यांनी तुकारामांचा दाखला दिला आहे. त्यात गांधीजींना ‘ कठीण वज्रास भेदू ऐसे ‘ आणि ‘ नाठाळाच्या माथी हाणू काठी ‘ सांगायचं असावं , असं वाटतं. महाराष्ट्रयात्रेच्या संदर्भात त्यांनी तुकोबांचा केलेला उल्लेख याच सदरात पूवीर् एकदा आला आहे.

पुढे हरिजनांच्या सभेसमोर हिंदूधर्माचं मोठेपण सांगताना त्यांनी हा ज्ञानेश्वर आणि तुकारामांचा धर्म असल्याचे सांगितले आहे. हा धर्म चिरकाल टिकणार आहे ,असं त्यांनी पुढे म्हटलं आहे. आंबेडकरांच्या धर्मांतराकडे आकर्षणाऱ्या दलितांना हिंदूधर्मात ठेवण्याची गांधीजींची कळकळ होती. कदाचित त्याचाही संदर्भ याला असू शकेल. याच भाषणात दाक्षिणात्य संत थिरुवल्लुवर यांची तुलना केवळ तुकारामांशीच होऊ शकते , असं सांगत ते तुकोबाचं मोठेपण अधोरेखित करतात.

बंगालहून पाठवलेल्या एका पत्रात गांधीजी देवाच्या अवतारांविषयी लिहितात. तुकाराम , ज्ञानेश्वर , नानक , कबीर हे दैवी अवतार नव्हते का , असा सवाल त्यांनी विचारला आहे. गावांच्या विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांनी तुकारामासारख्या संतांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी , असा सल्लाही त्यांनी दिला आहे. तसेच गोपुरी आश्रमातील एका अंत्यसंस्काराच्या वेळी आपल्या आग्रहानंतर विनोबांनी तुकारामांचा अभंग गायल्याची आठवणही त्यांनी एका प्रार्थनासभेत सांगितली आहे. तसेच आणखी एका अशाच प्रार्थनासभेत बाळासाहेब खेर आणि ठक्करबापांच्या उपस्थितीत त्यांनी तुकारामांचा ‘ पापाची वासना नको दावूं डोळा ‘ हा आवडता अभंग उद्धृत केला आहे.

डॉ. इंदुभूषण भिंगारे यांनी तुकाराम गाथेचं हिंदी भाषांतर केलं होतं. त्याची एक छोटी प्रस्तावना गांधीजींनी लिहिली आहे. आपल्याला फारसं मराठी येत नसलं तरी मला तुकाराम खूप प्रिय आहे , असं त्यांनी यात आवर्जून लिहिलं आहे. या गाथेसाठी त्यांनी शांतिनिकेतनातून खास तुकारामांचं चित्र काढून घेतलं होतं. गांधीजींनी अनुवादित केलेला तुकोबाचा आणखी एक अभंग.

न कळता काय करावा उपाय । जेणे राहे भाव तुझ्या पायी ।।

येऊनिया वास करिसी हृदयी । ऐसं घडे कई कासयाने ।।

साच भावे तुझे चिंतन मानसी । राहे हे करिसी कैं गा देवा ।।

लटिके हे माझे करुनिया दुरी । साच तू अंतरी येउनि राहे ।।

तुका म्हणे मज राखावे पतिता। आपुलिया सत्ता पांडुरंगा ।।

When one does not know, what is one to do so as to have devotion to Thy sacred feet?

When will it so happen that Thou wilt come and settle in my heart?

O God, when wilt Thou so ordain that I may meditate on Thee with a true heart?

Remove Thou my untruth and, O Truth, come and dwell Thou in my heart.

Tuka says: O Panduranga, do Thou protect by Thy power sinners like me.

१३

‘नेमिले या चित्तापासुनिया ‘ चा इंग्रजी अनुवाद करताना गांधीजींनी मेडिटेट असा शब्द वापरला आहे. मेडिटेशन म्हणजे ध्यान. त्याचा थेट संबंध चित्ताशी आहे. चित्तामधले तरंग नाहीशे करणे म्हणजे योग , असं भगवान पतंजली सांगतात. ध्यान त्या योगाची एक पायरी. त्यामुळे चित्त म्हणजे योग असं समीकरण बांधलं गेलं आहे.

भगवान पतंजलींनी सांगितलेला योग देव मानणारा आहे की नाही , यावर बरीच मतमतांतरे आहेत. पण असे वाद पुस्तकं लिहिणाऱ्या विद्वानांसाठी असतात किंवा मग डॉक्टरेट मिळवणाऱ्यांसाठी तरी. तुकारामांच्या काळी डॉक्टरेट नव्हती. मग असे लोक शास्त्रार्थाचा किस पाडत मोठे पंडित बनत. त्यातलेच मग तुकारामांना गाथा इंद्रायणीत बुडवण्याचे फतवे काढत. आता इंटरनेटवर एक सर्च मारला की जगभरची विद्वत्ता आपल्या बोटांजवळ येऊन पडते. या ग्लोबल जगात अशा पंडितांची दुकानं बंद पडली आहेत , हे बरं झालंय. पण सर्च मारून मंबाजी होता येईल ,तुकाराम नाही.

तुकारामांना या अशा वादांशी काही घेणंदेणं नव्हतं. तत्त्वज्ञानासाठी त्यांचं जीवन नव्हतं. त्यांच्या जीवनात तत्त्वज्ञान जगायचं होतं. त्यामुळे मग त्यांचा योग त्यांच्या पांडुरंगाशीच होता. योग म्हणजे जोडलं जाणं. ते पूर्णपणे पांडुरंगाशी जोडले गेले होते. तुकारामांनी पतंजलींनी लिहिलेली थिअरी अभ्यासली असेलही ,नसेलही. पण त्याने काय फरक पडतोय. ते ती थिअरी प्रॅक्टिकलमधे आणत होते. किंबहुना पतंजलींनी त्यांच्या भोवतालच्या तुकारामांसारख्या योग्यांच्या जीवनातच आपली सूत्र शोधली असतील.

पतंजलींचं एक भन्नाट योगसूत्र आहे , ‘ वीतरागविषयं वा चित्तम् ‘.संतांना आपल्या चित्ताचा विषय बनवा , असा त्याचा साधा अर्थ. आपण ज्यांच्याविषयी विचार करतो , तसे बनतो. संतांचा विचार करा , त्यांच्यासारखे व्हाल. पण रोजच्या व्यवहारातही हे तुकड्या तुकड्यात वापरता येण्याजोगं तत्त्वज्ञान आहे. कॉपोर्रेट जगात आपल्याला एखादा गुण आपल्यात हवा , असं वाटतंय. मग तसा रोजच्या पाहण्यातला माणूस शोधा. त्याचं बारीक निरीक्षण करा. त्या माणसाच्या त्या गुणासंबंधी विचार करून बघा. आपल्यात त्याच्यातला तो गुण कमीअधिक कधी येईल ते कळत पण नाही.

माणसंच आपल्याला शिकवत असतात. पुस्तकं नाहीत. पुस्तकांनी शिकवलं असं वाटलं , तर बारकाईनं विचार करा. बहुतेक त्या पुस्तकातल्या माणसांनीच आपल्याला शिकवलेलं असतं. गांधीजी , तुकाराम असेच शिकले असावेत.

आणिक दुसरे मज नाही आता । नेमिले या चित्तापासुनिया ।।

पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी । जाग्रती स्वप्नी पांडुरंग ।।

पडिले वळण इंदिया सकळां । भाव तो निराळा नाही दुजा ।।

तुका म्हणे नेत्री केले ओळखण । साजिरे ते ध्यान विटेवरी ।।

This heart of mine is determined that for me now there is nothing else;

I meditate on Panduranga, I think of Panduranga,

I see Panduranga whether awake or dreaming.

All the organs are so attuned that I have no other desire left.

Tuka says: My eyes have recognized that image standing on that brick transfixed in meditation unmoved by anything

१४

आतापर्यंत एकही राष्ट्रपती किंवा पंतप्रधान बनलेला नाही , अशी दोन महत्त्वाची राज्यं कालपर्यंत होती , एक महाराष्ट्र आणि दुसरं बंगाल. आज प्रतिभा पाटलांनी शपथ घेतली की महाराष्ट्र या यादीतून गळेल. या दोन राज्यांत अनेक साम्य असली तरी राष्ट्रपती-पंतप्रधान नसणं , हा निव्वळ योगायोग नाही.

या दोन्ही राज्यांनी गेल्या दोनशे वर्षांत एकमेकांवर खूप प्रभाव पाडलाय. बंगालचा आपल्या संस्कृती साहित्यावरचा प्रभाव आपल्याला ठावूक आहेच. पण महाराष्ट्राचा प्रभावही बंगालवर आहे. गुरुदेव रवींदनाथ टागोरांनी शिवाजी महाराजांवर लिहिलेल्या बंगाली कवितेचा पुलंनी केलेला अनुवाद शाळेच्या पुस्तकात अभ्यासालाच आहे. पण गुरुदेवांच्या तोडीचेच महाकवी असणाऱ्या अरविंद घोषांनी आपल्या पल्लेदार इंग्रजीत एक दीर्घकविता केलीय , कोणावर माहीतेय , बाजीप्रभूंवर.

गुरुदेव टागोरांवर तुकारामांचाही प्रभाव होता. त्यांनी तुकारामांचे बारा अभंग बंगालीत अनुवादितही केले आहेत.गुरुदेव आणि गांधीजींचे अगदी घनिष्ट संबंध होते. पण गुरुदेवांना तुकाराम आधीपासूनच माहीत होता. भारतातील पहिले आयसीएस आणि वडील बंधू सत्येंदनाथांमुळे रवींदनाथ तुकारामांकडे आकषिर्ले गेले.

गांधीजींमुळे गुरुदेवांच्या अगदी जवळच्या एका कलाकाराला तुकाराम कळला. तो कलाकार म्हणजे नंदलाल बोस. ते जागतिक कीतीर्चे चित्रकार. जगभर त्यांची प्रदर्शने भरली होती. तीस वर्ष त्यांनी शांतिनिकेतनातल्या कलाभवनचं प्रमुखपद भुषवलं. गांधीजींनी त्यांना तुकारामाची चित्र काढण्याची विनंती केली होती. डॉ. इंदूभुषण भिंगारेंनी तुकारामांच्या अभंगांचं ‘ तुकाराम की राष्ट्रगाथा ‘ या नावाने हिंदी भाषांतर केलं होतं. त्याला गांधीजींनी प्रस्तावना लिहिली आहे. आणि या पुस्तकात तुकारामांची चांगली चित्रं छापून यावीत म्हणून नंदलाल बोसांकडून चित्रं काढून घेतली. यात पुस्तकात बोसांची तीन चित्रे आहेत.या तुकारामाला गांधीजी ,रवींदनाथ आणि नंदलाल बोस अशा तीन दिग्गजांचा स्पर्श असल्याचा विचार डोक्यात येतो. आणि मग हा तुकाराम वेगळाच वाटू लागतो.

न मिळो खावया न वाढो संतान । परि हा नारायण कृपा करो।।

ऐसी माझी वाचा मज उपदेशी । आणि लोकांसी हेचि सांगे।।

विटंबो शरीर होत का विपत्ती । परि राहो चित्ती नारायण।।

तुका म्हणे नासिवंत हे सकळ । आठवे गोपाळ तेचि हेत।।

What though I get nothing to eat and have no progeny? I

t is enough for me that Narayana’s grace descends upon me.

My speech gives me that advice and says likewise to the other people.

Let the body suffer; let adversity befall one,

enough that Narayana is enthroned in my heart.

Tuka says: All the above things are fleeting; my welfare consists in always remembering Gopal.

१५

आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघा महाराष्ट्र ग्यानबा तुकारामाच्या गजरात डोलत असताना , आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये तुकारामाचे शब्द ऐकू आले. नव्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी आपल्या पहिल्या भाषणात तुकारामांचा अभंग सांगितला. जे का रंजले गांजले…

विठ्ठलमुक्तीला साठ वर्ष होत असताना महाराष्ट्राची लेक देशातील सवोर्च्च पदावर बसते , हा एक आनंददायी योगायोग आहे. आणि तेव्हा ती लेक आपल्या भाषणात तुकाराम , गांधीजी आणि आंबेडकर या तिघांची नावं घेते ,यापरता आनंद तो काय.

मावळते राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांनाही तुकाराम माहित आहे. त्यांनीही त्यांच्या ‘ विंग्ज ऑफ फायर ‘ या प्रसिद्ध पुस्तकात तुकारामांचा अभंग दिलाय. बहुधा पद्मभूषण मिळाल्यानंतरचा आनंद व्यक्त करताना त्यांनी लिहिलंय , आनंदाचे डोही आनंद तरंग. या प्रकरणाचा हिंदीतला अनुवाद करताना प्रख्यात कवी गुलजारांनी या अभंगाचाही गोड हिंदी अनुवाद केला आहे. तो अगदी मिळवून वाचण्यासारखा आहे.

लागोपाठ दोन राष्ट्रपतींवरचा तुकारामांचा प्रभाव हा काय फक्त एक योगायोग मानायचा ?

हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।

गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।

न लगे मुक्ती आणि संपदा ।  संतसंग देई सदा ।।

तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।

O God, grant only this boon. I may never forget Thee; and I shall prize it dearly. I desire neither salvation nor riches nor prosperity; give me always company of the good. Tuka says: On that condition Thou mayest send me to the earth again and again.

१६

सामाजिक परिवर्तनाचा रथ गांधीजींनी आणि त्यांच्या अनुयायांनी पुढे नेला.  साने गुरुजींनी विठ्ठलमंदिराची मुक्तीचा दिलेला यशस्वी लढा याचं खणखणीत उदाहरण आहे.

विठ्ठलमुक्ती आंदोलनाचा यंदा हिरकमहोत्सव. विठ्ठलमंदिरात कथित अस्पृशांना प्रवेश मिळाला त्याला या १० मे रोजी साठ वर्षं पूर्ण झाली. दलितांच्या मंदिरप्रवेशासाठी एक ब्राम्हण नेता आपला जीव पणाला लावतो. आपल्याच जातीतल्या कट्टरांशी भांडतो. त्याच्या पाठिशी उभे राहतात तेही बहुसंख्य ब्राम्हणच. ही भारताच्या इतिहासातली एक फार मोठी घटना आहे. साने गुरुजींच्या दहा दिवसांच्या उपोषण काळात सेनापती बापट , आचार्य अत्रे , अच्युतराव पटवर्धन ,दादासाहेब मावळंकर , बबनराव बडवे , पांडुरंग उत्पात , तात्या डिंगरे अशा ब्राम्हण पुढाऱ्यांनी आपली सारी पुण्याई चंदभागेच्या वाळवंटात उभी गुरुजींच्या मागे पुढे केली.

साने गुरुजी गांधीजींचं तत्त्वज्ञान आणि आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच लढत होते. पण बडव्यांनी एका गांधीवादी पुढाऱ्याला गाठून गांधीजींना या आंदोलनाबद्दल गैरसमज करून दिले. त्यामुळे गांधीजींनी गुरुजींना उपोषण मागे घेण्याची तार केली. पण गुरुजी हाडाचे गांधीवादी. सत्य आपल्या सोबत असल्याचा पूर्ण विश्वास असल्याने त्यांनी गांधीजींचा आदेशही धुडकावून लावला. लोकसभेचे पहिले अध्यक्ष दादासाहेब मावळंकर यांनी गांधीजींचे गैरसमज दूर केल्यावर मात्र त्यांनी पाठिंबा दिला. त्यानंतर लागलीच पावलं उचलली गेली आणि विठ्ठलमंदिर सर्वांसाठी खुले झाले.

तुकोबाच्या विठोबाची मुक्ती करण्यासाठी गांधीजींचं तत्त्वज्ञान धावलं. पण मुळात ते तत्त्वज्ञान तुकोबांच्या तत्त्वज्ञानापेक्षा वेगळं कुठे होतं ?

शेवटची विनवणी । संतजनीं परिसावी ।।

विसर तो न पडावा । माझा देवा तुह्यांसी ।।

पुढे फार बोलो काई । अवघे पायी विदित ।।

तुका म्हणे पडिलो पाया । करा छाया कृपेची ।।

This is my last prayer, saintly people listen to it,:

God, do not forget me; now what more need I say,

Your holy feet know everything.

Tuka says: I prostrate myself before Your feet,

let the shadow of Your grace descend upon me.

पी. साईनाथ, सौजन्य – लोकसत्ता

विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान काही वृत्तपत्रांनी, वाहिन्यांनी ज्या प्रकारे वार्ता प्रसिद्ध करण्यासाठी वा न करण्यासाठी पैसे स्वीकारून पत्रकारितेतील एक अनिष्ट प्रथा रुढ  करण्याचा प्रयत्न केला, त्याचा खरपूस समाचार घेणारे दोन लेख आम्ही गेल्या आठवडय़ात प्रसिद्ध केले. मराठी वृत्तपत्रसृष्टीत अशा मोहाला बळी न पडण्याचे धैर्य ज्या मोजक्या वृत्तपत्रांनी दाखवले त्यात ‘लोकसत्ता’ अग्रणी होता. गेल्या आठवडय़ात मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार पी. साईनाथ यांनी हिंदू मध्ये लेख लिहून या समस्येला आणखी वाचा फोडली.. त्यांचा तो लेख आणि त्यावरची ज्येष्ठ  पत्रकार गोविंद तळवलकर यांची प्रतिक्रिया आम्ही  येथे प्रसिद्ध करीत आहोत..

सी. राम पंडित यांचा साप्ताहिक स्तंभ आता पुन्हा सुरू होईल. डॉ. पंडित (नाव बदलले आहे.) गेला बराच काळ मराठीतील एका नामवंत वृत्तपत्रात हा स्तंभ चालवित आहेत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांना त्यांच्या संपादकांचा फोन आला. थोडय़ाशा दिलगिरीच्या स्वरात ते म्हणाले, ‘पंडितजी, तुमचा स्तंभ १३ ऑक्टोबरपासून पुन्हा सुरू होईल. तोपर्यंत आपल्या वृत्तपत्राचे प्रत्येक पान विकले गेले आहे.’ संपादक स्वत: अत्यंत प्रामाणिक आहेत. परंतु ते खरं तेच सांगत होते!

महाराष्ट्र विधानसभेच्या या वेळच्या निवडणुकीत जो ‘पैशाचा खेळ’ झाला त्यात मिडिया फार काही मागे नव्हता. अर्थात सगळाच मिडिया या खेळात सहभागी झाला असे नाही म्हणता येणार. पण मोठय़ा प्रमाणावर उतरला होता एवढे नक्की. पुन्हा छोटी मोठी लंगोटी वृत्तपत्रे अथवा स्थानिक चॅनेल्सच त्यात होती असेही नाही. शक्तिशाली आणि मोठमोठी वृत्तपत्रे आणि चॅनेल्सही या खेळात उतरली होती. अनेक उमेदवारांनी ‘खंडणीखोरी’ची तक्रार केली. परंतु मीडियाच्या भीतीने ही तक्रार तडीला नेण्याचे धैर्य कोणी दाखविले नाही हा भाग वेगळा. या पैशाच्या खेळाने अनेक वरिष्ठ, ज्येष्ठ पत्रकार आणि संपादकांनाही अडचणीत आणले.

या संदर्भात एकाने केलेली टिप्पणी अगदी मार्मिक होती. तो म्हणाला, ‘या निवडणुकीत सगळ्यात जास्त फायदा कोणाचा झाला असेल तर तो मीडियाचा.’ तर आणखी एकाच्या मते, ‘निवडणुकीच्या काळात मीडिया ‘मंदी’च्या विळख्यातून सफाईने बाहेर आला.’ निवडणुकीच्या काळात मिडियाने अक्षरश: कोटय़वधी रुपयांची कमाई केली, असे बोलले जाते. हे सगळेच पैसे काही राजकीय पक्षांच्या जाहिरातीतून आलेले नव्हते. त्यातील बराच मोठा हिस्सा उमेदवारांच्या प्रचार बातम्यांचे ‘पॅकेज’ करून आलेला होता.

या विधानसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यभर ‘कव्हरेज पॅकेज’ संस्कृतीचे उदंड पीक आले होते. अनेक ठिकाणी उमेदवाराला आपली कोणतीही बातमी छापून येण्यासाठी अन्य काही नाही, फक्त पैसे खर्च करावे लागले. मग त्या बातम्यांमध्ये ‘मुद्दा’ काहीही नव्हता.    तरीही त्या छापून आल्या. ‘पैसे नाहीत तर बातमी नाही’ असा हा सरळसाधा मामला होता. या प्रकारामुळे छोटे पक्ष, गरीब अपक्ष आणि लहानसहान उमेदवारांचे आवाजच दाबले गेले. स्वाभाविकच या छोटय़ांनी उपस्थित केलेले महत्त्वाचे मुद्देसुद्धा या प्रकारामुळे वाचकांपर्यंत पोहोचलेच नाहीत.

चेन्नईतील ‘द हिंदू’ने लोकसभा निवडणुकीच्या काळात (७ एप्रिल २००९) यासंदर्भात एक बातमी दिली होती. त्यात म्हटले होते की, अनेक वृत्तपत्रांनी ‘कव्हरेज पॅकेज’ देऊ केले असून त्यातही ‘स्वस्त’ आणि ‘मस्त’ अशी वर्गवारी केली होती. स्वस्तातील कव्हरेज पॅकेज साधारणपणे १५ ते २० लाखांत मिळू शकत होते. मस्त कव्हरेजला अधिक दाम मोजावा लागत होता. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हा प्रकार खूप पुढे गेल्याचे दिसून आले.
अर्थात यात फार काही नवीन नाही, असे काही संपादकांचे म्हणणे आहे. मात्र या वेळी ज्या प्रमाणात आणि ज्या किंमतीत हा प्रकार सुरू आहे तो थक्क करणारा आहे. आणि ज्या उघडपणे हे झाले ते भयावह आहे. आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे पूर्वी मूठभर पत्रकारांना हाताशी धरून (पैसे देऊन!) बातम्या छापून आणल्या जात. आता मिडिया मोठय़ा प्रमाणावर पैशांच्या बदल्यात पद्धतशीरपणे या खेळात सहभागी झाला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एका बंडखोर उमेदवाराच्या सांगण्यानुसार त्याच्या भागातील एका संपादकाने केवळ स्थानिक माध्यमांवरच सुमारे १ कोटी रुपये खर्च केले. आणि त्या संपादकाने पुरविलेल्या माहितीनुसार हा उमेदवार आपल्या पक्षाच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव करून निवडून आला.

या व्यवहारातील ‘डील्स’ अनेक प्रकारे होतात. उमेदवाराला आपले व्यक्तित्व छापून यावे, मुलाखत घेतली जावी, आपली आश्वासनपूर्ती प्रसिद्ध व्हावी अथवा विरोधकावर केलेला हल्ला छापून यावा असे काहीही वाटत असले तरी त्यासाठी वेगवेगळे दर आहेत. (चॅनेल्सच्या बाबतीत हे ‘लाइव्ह’ कव्हरेज, ‘स्पेशल फोकस’ अथवा ‘उमेदवारासोबत संपूर्ण दिवस’ अशा नावांनी  होत असे.) आपल्या विरोधकावर टीका करणे आणि आपल्या वाईट गोष्टी, उदा. पैसे देणाऱ्या उमेदवाराचे गुन्हेगारी चरित्र न छापणे असेही पर्याय या डीलमध्ये होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे या निवडणुकीत निवडून आलेल्या ५० टक्क्यांहून अधिक उमेदवारांवर गुन्हेगारीचा शिक्का आहे. त्यांच्यावर गुन्हेगारी खटले सुरू आहेत. तर काहींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मात्र प्रसार माध्यमांनी या गोष्टींना प्रसिद्धी मिळणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली.

या वेगवेगळ्या डील्समध्ये सगळ्यात जास्त दराचा पर्याय होता ‘विशेष पुरवणी’चा. राज्यातील एक अतिशय वजनदार राजकारणी असलेल्या एका नेत्याने आपली ‘कारकीर्द’ प्रसिद्ध करण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपये मोजल्याचे सांगितले जाते. याचा अर्थ उमेदवार म्हणून त्याने जेवढा खर्च करण्याची निवडणूक आयोगाची परवानगी आहे त्याच्या १५ पट अधिक रक्कम त्याने या एकटय़ा विशेष पुरवणीवर खर्च केली. तो निवडणूक जिंकला आणि त्याशिवायही बरेच काही त्याने मिळविले हे ओघाने आलेच.

या डीलमध्ये स्वस्तातला पर्याय सुमारे ४ लाख रुपयांच्या आसपास उपलब्ध होता. यामध्ये साधारणपणे ‘तुमच्या पसंतीच्या कोणत्याही चार बातम्या’ छापणे आणि जेवढे पैसे अधिक त्यानुसार त्या कोणत्या पानावर छापायच्या हे ठरविणे अशी सोय होती. या पर्यायात ‘तुमच्या पसंतीच्या’ या शब्दप्रयोगात बराच खोल अर्थ दडलेला आहे. याचा खरा अर्थ ‘ऑर्डरनुसार बातमी’ असा होतो. थोडे अधिक पैसे टाका आणि वृत्तपत्रातीलच एका चांगल्या ‘कॉपीरायटर’कडून तुम्हाला हवी तशी बातमी लिहून घ्या. या पर्यायामुळे वृत्तपत्राचे पान मनोरंजक स्वरूपात दिसते. उदा. एकाच दिवशी, एकाच पानावर, एकाच आकाराच्या बऱ्याच बातम्या दिसतात. आणि या बातम्या परस्परविरोधी माहिती देतात अथवा दावे करतात. या सगळ्या ‘पेड फॉर’ बातम्या असतात अथवा बातम्यांची सजावट केलेल्या जाहिराती असतात. या प्रकाराचा नेहमी आढळणारा आकार हा ४ कॉलम बाय १० से.मी. असा आहे. त्यामुळे भाजपकडे झुकलेल्या एका वृत्तपत्राने याच आकाराची परंतु काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भलामण करणारी बातमी छापल्यावर फार आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. अशा आश्चर्यकारक गोष्टी घडत असतात, असे म्हणून ते सोडून द्यायचे असते.

या सगळ्या प्रकाराला काही अपवादही अर्थातच होते. एक-दोन संपादकांनी या खेळातही निवडणूक वृत्त देताना संतुलन साधण्याचा आटोकाट प्रयत्न केला. एवढेच नव्हे तर बातम्यांचे काटेकोर ‘ऑडिट’ही केले. तर काही पत्रकारांनी या खेळाचा ‘चिखल’ आपल्या अंगावर उडू नये म्हणून निवडणुकीच्या काळात आपल्या ‘काँटॅक्ट्स’ना भेटणेच बंद केले. कारण ज्या पत्रकारांचा राजकारण्यांशी संपर्क असतो त्यांनी या खेळात ‘पुढाकार’ घ्यावा, अशी अपेक्षा असते. मात्र असे उल्लेखनीय अपवाद इतरांच्या भाऊगर्दीत पार दिसेनासे झाले.

दुर्दैव म्हणजे या सगळ्या प्रक्रियेचे समर्थन केले जाते. या समर्थनातील एक नेहमीचे विधान म्हणजे ‘जाहिरात पॅकेज’ ही मिडियाची भाजीभाकरी आहे. अशी जाहिरात करण्यात गैर काय आहे? सणासुदीला अशी पॅकेजेस असतात. दिवाळी पॅकेज असते. गणेशोत्सवाचे पॅकेज असते. मात्र अन्य जाहिरात पॅकेजेस आणि या पॅकेजेसमध्ये एक फरक आहे. चुकीची आणि खोटी माहिती ‘बातमी’ म्हणून या जाहिरात पॅकेजच्या माध्यमातून खपविणे हे भारतीय लोकशाहीच्या केंद्रस्थानी असलेल्या निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करते. शिवाय ज्यांच्याजवळ पैसे नाहीत अथवा अतिशय कमी आहेत अशा उमेदवारांवर ही प्रक्रिया अत्यंत अन्याय करते.

याव्यतिरिक्त आणखीही एक लंगडे समर्थन या प्रक्रियेच्या बाजूने दिले जाते. लोकसभा निवडणुकीत अनेक सेलिब्रिटी मतदारांनी मतदान करावे म्हणून पुढे सरसावल्या होत्या. या वेळी मात्र त्यातील अनेकजण वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या बाजूने मैदानात उतरले होते. त्यांना यासाठी किती पैसे मिळाले हे कुणीच सांगणार नाही. (मग प्रसारमाध्यमांनी असे काही केले तर त्यास आक्षेप का घ्यावा? असे हे समर्थन असते.)

उमेदवार, पैसा, सेलिब्रिटी, प्रसार माध्यमे या सगळ्या गोष्टी हातात घालून चालू लागल्या आहेत, ही दु:खाची बाब आहे. पैसा आणि मिडिया हे एका शेंगेतल्या दोन बियांसारखे बनले आहेत. मात्र यामुळे छोटे, पैसे खर्च करण्याची फारशी कुवत नसलेले आवाज पूर्णपणे दाबले जात आहेत हे कुणीच लक्षात घेत नाही. याचा परिणाम सामान्य जनतेवरही होतो. त्यांच्यासाठी लढणाऱ्यांचा आवाजच या प्रक्रियेत दाबला गेला आहे.

तुमच्याकडे जर १० कोटी रुपये असतील तर महाराष्ट्र विधानसभेवर निवडून येण्याची तुमची शक्यता १० लाख रुपये संपत्ती असणाऱ्या उमेदवारापेक्षा ४८ पटीने वाढते हे लक्षात घ्या. त्याहीपुढे जाऊन आणखी एक वस्तुस्थिती लक्षात घ्या. विधानसभेवर निवडून आलेल्या २८८ जणांमध्ये फक्त सहा जणांची घोषित संपत्ती ५ लाख रुपयांच्या घरातील आहे. याचा अर्थ ज्यांच्याकडे १० कोटीहून अधिक संपत्ती आहे त्यांना १० लाख ते १ कोटीपर्यंत संपत्ती असणाऱ्यांची फारशी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही.

या निवडणुकीत निवडून आलेल्या ‘करोडपती’ आमदारांची संख्या एकदम ७० टक्क्यांनी वाढली आहे.
२००४ च्या मागील निवडणुकीत १ कोटीहून अधिक संपत्ती असलेले १०८ उमेदवार निवडून आले होते. यंदा ही संख्या थेट १८४ वर गेली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सुमारे दोन तृतीयांश आमदार आणि हरियाणा विधानसभेतील तब्बल तीन चतुर्थाश उमेदवार करोडपती आहेत. ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ने (एनइडब्ल्यू) प्रसिद्ध केलेल्या अहवालात अशा अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला आहे. (एनईडब्ल्यू ही देशभरातील सुमारे १,२०० नागरी गटांची मिळून बनलेली संघटना आहे. अशा प्रकारच्या अनेक मुद्दय़ांवर या संघटनेने अतिशय उत्तम असे अहवाल प्रकाशित केले आहेत. एप्रिल-मेमध्ये निवडणुकीतही या संस्थेने असा अहवाल प्रकाशित केला होता.) मतदारांचे प्रबोधन करण्याच्या एनईडब्ल्यूच्या या कामात ‘असोसिएशन ऑफ डेमॉक्रॅटिक रिफॉम्र्स’ (एडीआर) या स्वयंसेवी संस्थेचीही मोलाची मदत होते.

महाराष्ट्र विधानसभेतील प्रत्येक आमदार हा सरासरी किमान ४० लाखांचा धनी निश्चितपणे आहे. हेसुद्धा या मंडळींनी निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील माहिती खरी आहे, असे गृहित धरले तर! त्यातही काँग्रेस आणि भाजपची मंडळी अधिक श्रीमंत असल्याचे दिसून येते. त्यांच्या संपत्तीमुळे सर्व आमदारांची सरासरी संपत्ती बरीच मोठी असल्याचे दिसते. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदारही त्यांच्यापेक्षा फार मागे नाहीत. या दोन पक्षांच्या आमदारांची सरासरी संपत्ती ३० लाखांहून अधिक आहे.

देशात जेव्हा जेव्हा निवडणूक होते आणि ही अतिशय गुंतागुंतीची आणि किचकट प्रक्रिया यशस्वीपणे पार पडते त्या वेळी आपण हे काम केल्याबद्दल निवडणूक आयोगाचे अभिनंदन करतो. हे अभिनंदन सहसा योग्यही असते. निवडणूक आयोगाने अनेकदा हस्तक्षेप करून मतदानकेंद्र ताब्यात घेणे, मतपत्रिका ताब्यात घेणे असे गैरप्रकार हाणून पाडले आहेत. या साऱ्या पाश्र्वभूमीवर पैशाचा खेळ, त्यातील मीडियाचा सहभाग, जाहिरातींचे पॅकेजिंग आदी गोष्टींना आळा घालण्यासाठी काही कठोर पावले उचलली गेल्याचे मात्र दुर्दैवाने दिसून येत नाही. वास्तविक निवडणूक प्रक्रियेला नख लावणाऱ्याच या बाबी आहेत. मतपत्रिका अथवा मतदानकेंद्रे ताब्यात घेण्यासारख्या गैरप्रकारांपेक्षा ही बाब अधिक पद्धतशीर, अधिक लबाडीने केली जाते. आपल्या निवडणूक प्रक्रियेलाच नव्हे तर संपूर्ण लोकशाही शासन प्रणालीलाच आव्हान देणारी ही गोष्ट आहे.

(अनुवाद – स्वानंद विष्णु ओक)
(दै. हिंदूवरून साभार)

काही वृत्तांकनाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे
पी. साईनाथ यांचा हिंदूमधील मिडियम, मेसेज अ‍ॅँड मनी हा लेख धक्कादायक आहे. त्यांनी नोंदवलेल्या गोष्टींविषयी मी माझ्या तीन मराठी पत्रकार मित्रांशी चर्चा केली, तेव्हा त्यांनीही अशा घटना घडल्याला दुजोरा दिला. हा सारा प्रकार दुर्दैवी आहे, पत्रकारितेला काळिमा फासणारा आहे. मी गेली ५० हून अधिक वर्षे सक्रीय पत्रकारितेत आहे. सुमारे २७ वर्षे मी महाराष्ट्र टाइम्सचा संपादक होतो. मी आजही मराठी वा इंग्रजी वर्तमानपत्रांमध्ये लिहित असतो. निवृत्तीनंतरची दहा वर्षे धरली तर मी या क्षेत्रात सुमारे ६० वर्षे आहे. माझ्या इतक्या वर्षांच्या पत्रकारितेतील वाटचालीत मी पत्रकारितेचे एवढे अध:पतन झालेले कधीच पाहिलेले नाही. काही वृत्तपत्रांनी निवडणुकीदरम्यान केलेल्या वृत्तांकनाची सीबीआय चौकशी झाली पाहिजे असे माझे मत आहे. एखादी संघटना वा एखादा व्यक्तीसमूह या प्रकाराच्या मुळाशी जाऊन चौकशी करू शकेल असे मला वाटत नाही.
गोविंद तळवलकर, टेक्सास