Archive for the ‘Uncategorized’ Category

प्रभाकर कोलते, प्रसिद्ध चित्रकार,  सौजन्य – मटा

विद्याथीर्दशेत असताना मी ज्यांना फॉलो करत असे, त्यांच्यात हुसेन होताच. हुसेन, गायतोंडे, सामंत, अंबादास, हरकिशनलाल, पळशीकर (ते तर माझे गुरू होते), हे सारे माझे नेहमीच आवडते पेंटर होते. त्या दिवसांमध्ये हे सगळे आमच्या अस्तित्वाला कायमच चिकटून असल्यासारखे असायचे. आम्ही कधी गॅलरीत गेलो की, यांच्यापैकी एकाचं प्रदर्शन तिथं भरलेलं असायचंच. आम्हांला गॅलरीत जाताना कधी तरी गायतोंडे दिसत, त्यांची ती बुटकी मूतीर्, कोट वगैरे घातलेला अशी. आम्ही मुलं रस्त्याच्या पलीकडं उभं राहून त्यांच्याकडे भारावून बघत असायचो.

हुसेनचंही तसंच होतं. मात्र हुसेनचा प्रेझेन्सच जास्त लक्षवेधी असायचा. तो मुद्दाम काही करत असेल किंवा नसेलही, पण आपण कलाकार आहोत, याचा त्याला खूप अभिमान असल्याप्रमाणं त्याचं वागणं असायचं आणि ते त्याला शोभूनही दिसे. म्हणजे त्याच्या हातात काठीऐवजी लांबलचक ब्रश धरलेला असतो. यात दिखावा वाटू शकतो, पण त्याचं या वागण्यामागचं कारण साधं असू शकतं. मला हातात काही काठीसारखं धरायचंच आहे, तर मी ती ब्रशच्या आकाराचीच का धरू नये? मी चित्रकार आहे, हे लोकांना त्यातून समजेल, अशी त्याची भूमिका. वरवर बघता हुसेन माणसांच्या गराड्यात असला तरी मूलत: तो लोनर आहे, एकटा आहे. हे एकटेपण त्याला छान निभावून नेता येतं. तो आत्यंतिक एकटा आहे, म्हणूनच इतरांपेक्षा जास्त एक्स्ट्रोव्हर्ट बनू शकतो. बहिर्मुखतेची सीमा त्यानं ओलांडली. समाजाची त्याला फिकीर नाही.

तशी ती गायतोंडेंनाही नव्हती. गायतोंडेही एकटे होते, पण त्यांच्या आणि हुसेनच्या एकटेपणात एक मूलभूत फरक आहे. गायतोंडेंच्या एकटेपणात त्यांनी स्वीकारलेला एकांतवासही समाविष्ट होता. हुसेन माणसात असूनही एकटा बनू शकतो. कलाकारानं असं एकटेपण स्वीकारणं अत्यंत गरजेचं असतं. त्याची कला त्या एकटेपणातून येणाऱ्या आत्मचिंतनातूनच मोठी होत असते. गायतोंडे आणि हुसेन या दोघांनाही ते साध्य झालं. अशा एकटेपणाच्या स्वीकारासाठी फार मोठं धैर्य आणि मनाचं धाडस लागतं. रझा असाच प्रयत्न करत राहिला, पण ना त्याला हुसेनसारखा बहिर्मुखतेतून येणारा एकटेपणा जमला ना गायतोंडेंसारखा अंतर्मुखतेतून आलेला एकटेपणा पेलता आला. लोकप्रियता आणि एकटेपणा हे दोन्ही एक्स्प्लॉइट करणं आणि त्यातून आपल्यातला चित्रकार मोठा करणं, हे हुसेनलाच जमू शकलं.

हुसेन खरोखरच युगप्रवर्तक आहे, असं मला वाटतं. आधुनिक भारतीय चित्रकलेला आंतरराष्ट्रीय चेहरा केवळ हुसेनमुळे मिळाला. प्रोग्रेसिव्ह चळवळीतल्या सहाही जणांमध्ये इथं मुंबईत भक्कमपणे पाय रोवून राहिला तो हुसेनच. त्यानं त्याची मुळं इथं रोवली होती आणि विस्तार जगभर केला. त्याचा फार मोठा फायदा पुढच्या कलावंतांना झाला आहे. हुसेन नसता, तर आज भारतीय चित्रकारांच्या चित्रांना लिलावांमध्ये इतकी किंमत कशाला मिळाली असती? त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे, हुसेननं चित्रकाराला सामान्यांच्या जवळ नेलं. हुसेननं जे काही केलं, त्यामुळे निदान लोकांचं चित्रकारांकडे, पर्यायानं चित्रकलेकडे लक्ष वेधलं जायला लागलं, हे योगदान काय कमी आहे?

हुसेन सगळ्यांपासून अलिप्त असलेला मनुष्य आहे. त्या अर्थानं त्याचं व्यक्तिमत्त्व वैश्विक आहे. भले तो इंटरव्ह्यूमध्ये काहीही बोलत असो की, मी माझा देश मिस करतोय वगैरे, पण त्याला आपण कुठे राहतो वगैरे गोष्टींनी काहीही फरक पडत नाही. असा माणूसच अनवाणी चालू शकतो. ज्या पृथ्वीचा मी एक भाग आहे त्याच्याशी माझं जोडलं जाणं, असा त्याचा दृष्टिकोन आहे. त्याच्या अनवाणी चालण्याची मिडियानंच खूप हवा केली. लोक त्याला उगीच स्टंट किंवा काही म्हणाले, तरी त्याला त्याचं काही नसतंच. त्याची या वयातली एनजीर् थक्क करून टाकते. चित्र रंगवण्याचा त्याचा झपाटा विलक्षण आहे. आणि त्याचं ते रंग लावणं… अप्रतिम! बाकी कलाकार कॅनव्हास रंगवतात, पण हुसेनसारखे कलावंत कॅनव्हासचं रूपच बदलून टाकतात. तिथं फक्त रंग उरतात. भाकरीसाठी पीठ हातानं मळण्यात आणि मशीनवर करण्यात जो फरक आहे, त्या मळण्यात जो आत्मा किंवा भाव उतरलेला असतो; तो हुसेनच्या त्या रंगांना कालवण्यातून दिसतो. काय वाटायचंय ते रंगातून, व्यक्त व्हायचं ते रंगातून डायरेक्ट. आधी स्केचिंग वगैरे काही भानगडच नाही.

हुसेनच्या प्रत्येक गोष्टीतच एक शॉकिंग इफेक्ट असतो. मात्र बरेचदा माणसापेक्षा त्याची इमेज मोठी होत जाते आणि मग लोकांना ती इमेज म्हणजेच त्याचं खरं व्यक्तिमत्त्व आहे, असं वाटायला लागतं, हुसेनच्या बाबतीत तसं काहीसं झालं असं वाटतं. पण या इमेजच्या मागे दडलेला हुसेन फार म्हणजे फार संवेदनशील, सच्चा असा कलावंत आहे. काही प्रसंगांतून, कवडशांतून मला त्याचं हे रूप पाहायला मिळालं म्हणून आज मी हे म्हणू शकतो. सुरुवातीला माझेही बरेच गैरसमज होते.

दुबईत असताना हुसेनला आम्ही जे अनेक प्रश्न विचारले, त्यांतला एक प्रश्न अपरिहार्यपणे हुसेनच्या माधुरी-वेडाबद्दलचा होता. पण सर्वांना अनपेक्षित काय होतं तर हुसेनचं त्यावरचं उत्तर. हुसेननं बनवलेल्या त्या फिल्मसारखं, मुळापासूनच्या धारणा तोडून टाकून पुन्हा नव्यानं जाणिवा विकसित करायला लावण्यासारखंच हुसेनचं ते उत्तर होतं.

हुसेन त्याच्या माधुरी फॅसिनेशनबद्दल बोलताना क्षणभर थांबला आणि मग शांतपणे म्हणाला, ‘सब लोग सोचते हैं वैसा इसमें कुछ नही हैं. मला आयुष्यात आईच मिळाली नाही. मेरी माँ जब मै बहोत छोटा था तब गुजर गयी. माँ जब गुजर गयी तब शायद माधुरीकी एज की थी. जब माधुरी को मैने देखा था तब मुझे एक अलगसा अहसास हुआ. माधुरी मे मैं मां-अधुरी देखता हूं. मुझे माँ जादा मिली ही नही. मै जब भी पंढरपूर गया तब मुझे लगा, वो अब भी किसी खंबे के पिछे खडी रह कर मुस्कुराते हुए मुझे देख रही है. वो सामने इसलिये नही आती क्यों की वो शरमा रही है. माँ मरी तब सिर्फ २५ साल की थी और मैं बच्चा था. आज मैं नब्बे साल का बुढा हो गया हूं. २५ साल की माँ, वो कैसे कहेगी नब्बे साल के बुढे को बेटा? इसलिये वो शरमा रही है. माधुरी मे मैने वही मां-अधुरा सामने आते हुए देखी।’

खरं सांगतो, आय वॉज शॉक्ड टु हिअर धिस. त्या दिवशी हुसेनच्या तोंडून हे ऐकताना अंगावर काटा आला. हुसेनच्या बोलण्यातून शॉकिंग इफेक्ट मिळू शकतो, हे माहीत असूनही जे ऐकलं त्याला मी प्रिपेअर्ड नव्हतोच. एका बाजूला धरून चालू की हे तो मुद्दाम शॉक बसावा या हेतूनेच बोलला, तरी पण त्या बोलण्यातलं भावनात्मक सौंदर्य झाकून टाकता येत नाही. आणि त्यानं ज्या पद्धतीनं या सगळ्याचा विचार केला आहे, तेच किती सुंदर आहे. हुसेन भावुक मनाचा कवी आहे आणि त्याचं हे कवी पण त्याच्या मुलात, ओवेसमध्येही उतरलं आहे.

हुसेनसारखा एक पद्मपुरस्कार विजेता देश सोडून जातो याची सरकारला काहीच खंत नाही, याचं आश्चर्य वाटतं. पद्मपुरस्कार दिल्यावर आपलं सरकार त्या व्यक्तीची काही जबाबदारी नैतिकतेनं स्वीकारू पाहतंय की नाही, हा खरा प्रश्न होता आणि सरकारनं ती जबाबदारी झटकली, हे सत्य आहे. त्यानं नेहमीप्रमाणेच या प्रकरणात काही भूमिकाच घेतली नाही. तशी भूमिका समाजातल्याही इतर कोणी घेतली नाही आणि कलावंतांनीही घेतली नाही.

हुसेनबाबत नक्की काय भूमिका घ्यावी, याची एकवाक्यता कोणालाच दाखवता आलेली नाही. त्यासाठी हुसेनही काही प्रमाणात जबाबदार आहे. कलाकाराला अभिव्यक्ती स्वातंत्र्यासोबत सामाजिक जबाबदारीचंही भान असायला हवं, याची सर्वांना असलेली जाणीव हुसेनला नसेल असं कसं म्हणता येईल? तुम्ही समाजव्यवस्थेचे फायदे घेता, त्यानं दिलेले मानसन्मान उपभोगता, कौतुक स्वीकारता; तेव्हाच तुम्ही त्या समाजाच्या संस्कृतीचं, चालीरितींचं पालन करण्याचं नैतिक उत्तरदायित्व स्वीकारलेलं असतं.

हुसेनची ती चित्रं ‘चित्र’ म्हणून कशी आहेत, त्यानं ती तशी काढायला हवी होती का, हा मुळातच वेगळा प्रश्न आहे. हुसेनला हिंदू देवदेवतांचं काही चित्रण करायचं होतं आणि त्यानं ते अशा प्रकारं केलं आणि ते विकृत आहे, असं म्हणण्यापूवीर् हुसेन एक कलावंत आहे, तो एक चित्रकार आहे आणि त्याच्या चित्रकार नजरेला त्यामध्ये फक्त एक फॉर्म दिसला होता आणि त्यानं तो चितारला, असं आपण का म्हणत नाही? धर्माच्या पलीकडे चित्रकाराची नजर जाऊ शकते हे आपण स्वीकारू शकत नाही, हे सत्य आहे.

( पुढील आठवड्यात प्रसिध्द होणाऱ्या सतीश नाईक संपादित ‘चिन्ह’च्या ‘नग्नता: चित्रातली आणि मनातली’ या विशेषांकातून साभार. शब्दांकन- शमिर्ला फडके)

राजेंद्र जोशी, सौजन्य – लोकसत्ता

कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कष्टकरी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी साठ वर्षांहून अधिक काळ संघर्ष करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरेंचा  अमृतमहोत्सव मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात साजरा होतो आहे. त्यानिमित्ताने..

पुरोगामी वळणाचे आणि रांगडय़ा बांधणीचे कोल्हापूर आता आधुनिकतेच्या मार्गावर प्रवास करू लागले आहे. इथे अस्सल मराठीची जागा हिंग्लिश घेऊ लागली आहे, तालमी ओस पडून निवडणुकीत सौदे करणारी तरुण मंडळे तयार झाली आहेत, म्हशीचे दूध कट्टे बंद पडले असून परमिट रूम बिअरबारची रेलचेल सुरू झाली आहे, पाश्चिमात्य संस्कृतीचे आगमन आणि पाठोपाठ पिझ्झा बर्गरही दाखल झाला आहे. पण तरीही कोटय़वधी रूपयांची औद्योगिक गुंतवणूक करणारा उद्योजक आज कोल्हापूरच्याच पंचतारांकित वसाहतीला प्राधान्य देतांना दिसतो. पुण्या-मुंबईचे नोकरदार निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी कोल्हापुरातच निवाऱ्याची व्यवस्था करताना दिसतात. या साऱ्याला कोल्हापूरची औद्योगिक शांतता आणि जातीय सलोखा या दोन गोष्टी कारणीभूत आहेत. इथे देश पेटला तरी जातीय वणवे पेटत नाहीत आणि औद्योगिक मंदीतही कामगारांची शांतता भंग होत नाही. या गोष्टीला राजर्षी शाहूंच्या सामाजिक समतेचा भक्कम पाया जबाबदार असला तरी राजर्षीच्या विचारांची ही पताका २१ व्या शतकापर्यंत आपल्या खांद्यावरून घेऊन जाणाऱ्या काही मोजक्या नेत्यांचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. यामध्ये ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

कॉ. गोविंद  पंढरीनाथ पानसरे हे नाव महाराष्ट्राला अपरिचित नाही. शेकडो लढे आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधून पानसरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. कोल्हापुरात तर पानसरे माहीत नसणारा माणूस शोधून काढावा लागेल. पण हे पानसरे मूळचे अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार गावचे हे आज कोणाला सांगून पटणार नाही, इतके ते पक्के कोल्हापुरी झाले आहेत. गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या पण शिक्षण घेण्याची आर्थिक कुवत नसलेल्या या तरुणाला मूळच्या कोल्हापूरच्या पण स्वातंत्र्यपूर्व काळात दहशतवादी गटात काम करणाऱ्या गोविंद दामोदर पत्की या स्वातंत्र्यसैनिकाने हात दिला आणि शिक्षणासाठी वयाच्या १५व्या वर्षी पत्कींचे बोट धरून पानसरे कोल्हापुरात आले. तेव्हापासून आजपर्यंत पानसरे हे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनातील सामाजिक चळवळींचा प्रमुख आधारस्तंभ बनून राहिले आहेत. माणसाच्या नशिबी गरिबीचे जिणे किती असावे ?

याची कल्पना पानसरेंच्या जीवन प्रवासावर नजर टाकली तर कळून चुकते. कोल्हापुरला दोन फाटक्या कपडय़ानिशी शिक्षणासाठी दाखल झालेल्या गोविंदरावांना राहण्यासाठी ना निवारा होता ना भुकेची व्यवस्था! कधी बिंदू चौकात कम्युनिस्ट पुस्तकांची विक्री करणाऱ्या ‘बुक स्टॉल द रिपब्लिक’ या दुकानात तर कधी बिंदू चौकात फुले, आंबेडकरांच्या पुतळ्याखाली झोपून त्यांनी रात्र काढली आणि कधी सणगर गल्लीतील बी. एन. भोसले या शिक्षकाच्या घरी त्यांना स्वयंपाकाला मदत करून तर कधी सांगलीहून येणाऱ्या एम. के. जाधव या एस. टी. कामगाराच्या डब्यामध्ये त्यांनी आपला जठराग्नी शमविला. पुढे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग येथे प्रवेश मिळाल्यानंतर पानसरे पदवीधरही झाले आणि कायद्याचे शिक्षण घेवून नामवंत वकील ही बिरूदावली त्यांच्या नावामागे लागली. अर्थात या  प्रवासात नगरपालिकेच्या जकात नाक्यावर शिपाई म्हणून त्यांनी नोकरीही केली, वृत्तपत्रे विकली आणि प्रसंगी रस्त्यांवर कंगवेही विकले. या सर्व प्रकारात त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. म्हणूनच आज पानसरे नावाचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व सामाजिक चळवळींचा आदर्श म्हणून उभं आहे.

कॉ. पानसरे हे मूळचे हाडाचे कम्युनिस्ट. शालेय जीवनापासून मार्क्‍सवादाचा प्रभाव असलेले पानसरे १९५२ पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद बनले. कोल्हापुरात आल्यापासून तर कम्युनिस्ट विचार रूजविण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. पण त्या मानाने त्यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही हे मान्यच करावे लागेल. कोल्हापूर ही तशी राजर्षी शाहूंची सामाजिक समतेची नगरी. या समतेच्या तत्वज्ञानाने कोल्हापुरला पुरोगामीपण दिले. अन्यायाविरूद्ध पराकोटीचा संघर्ष उभा करण्याची आणि जुलमी व्यवस्थेविरूध्द लढण्याची शक्ती या शाहूंच्या सामाजिक समतेच्या बाळकडूने कोल्हापूरकरांच्या रक्तात भिनवली. यामुळे कोल्हापुरात स्वातंत्र्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा दिमाखाने फडकला. काँग्रेसला काही काळ हद्दपार करून जनतेने शेकापला सत्तेत बसविले. पण शेकापचे ‘विळा-कणीस’ हातात धरणाऱ्या जनतेने कम्युनिस्टांचा ‘विळा-हातोडा’ काही स्वीकारला नाही. यामुळे कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्ष जरी मर्यादित वर्तुळात वावरला असला तरी कॉ. पानसरेंना मात्र कोल्हापुरकरांनी आपला नेता मानण्यात हयगय केली नाही.  कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्ष आकाराने जरी छोटा असला तरी कॉ. पानसरे यांनी आपल्या प्रखर बुध्दीमत्तेने, उत्तुंग ध्येयवादाने, प्रामाणिक तत्वज्ञानाने आणि कडव्या संघर्षांच्या जोरावर सार्वजनिक जीवनात आपले अढळस्थान निर्माण केले. खरेतर एवढय़ा राजकीय शिदोरीवर आजकाल कोणीही महाराष्ट्राच्या मंत्रीपदावर पोहचला असता, पण लोकांनी पानसरे स्वीकारले तरी त्यांचा पक्ष स्वीकारला नाही आणि ऐनवेळी त्यांच्या डाव्या साथीदारांनीही हाराकिरी केल्यामुळे पानसरे नावाचे वादळ महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पोहचलेच नाही. ही जर योग्य संधी मिळाली असती तर गरीबी, दारिद्रय आणि शोषणाच्या दुृष्टचक्रात अडकलेल्या उपेक्षित, वंचित घटकांच्या वेदनांचा हुंकार विधीमंडळाच्या भिंतींपर्यंत पोहचला असता, इतके मात्र निश्चित.

अर्थात कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्षाचे आकारमान जरी छोटे असले तरी त्यातही सामाजिक भान असणाऱ्या निष्ठावंत लढाऊ कार्यकर्त्यांची एक फळी गेल्या ४० वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये या ना त्या लढय़ाच्या निमित्ताने लढताना दिसते आहे, याचे संपूर्ण श्रेय पानसरे यांना द्यावे लागेल. आजकाल अन्य पक्षांत पुढारी होणे खूप सोपे आहे. चार डिजिटल फलक लावले अथवा खादी भांडारातून शे-दोनशे रूपयाला झब्बा-पायजमा विकत घेवून हात वर करणारी छबी वृत्तपत्रातून छापून आणली तर एका रात्रीत कुणीही नेता होतो. पण कम्युनिस्ट पक्षाचे मात्र तसे नाही. पक्षात येण्यासाठी दोन वर्षांची उमेदवारी आणि त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर मग पक्षाचे सदस्यत्व. अशा कसोटीला उतरलेल्या कार्यकर्त्यांना घडविण्यासाठी पानसरेंनी काय काय करावे ? ते भाषणाचे वर्ग घेत होते, मार्क्‍सवादाचे मोफत क्लास चालवित होते, जागतिक घडामोडी आणि राष्ट्रीय घडामोडी यांची तरूण कार्यकर्त्यांना ओळख करून देण्यासाठी त्यांनी हजारो व्याख्याने दिली. ही मूसच इतकी भक्कम की त्यातून तयार झालेल्या कार्यकर्त्यांने आयुष्यात कधी सत्ता वा प्रलोभनासाठी पक्ष सोडल्याचे आठवत नाही. पक्ष हाच जणू त्यांचा संसार होता आणि कार्यकर्ते ही त्यांची मुले म्हणूनच ‘रेड फ्लॅग बिल्डिंग’ मध्ये वावरत होती. आपल्या कार्यकर्त्यांची सुखदुखे त्यांच्या अडचणी यामध्ये धावून जाणाऱ्यात पानसरेंचा पहिला नंबर असायचा. यामुळे ‘अण्णा’ या नावाने वावरणारे हे व्यक्तिमत्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना कधी आपल्या कुटुंबापासून दूरचे वाटलेच नाही.

कम्युनिस्ट पक्षाचा एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून पानसरे गेली ६० वर्षे देशाच्या सार्वजनिक जीवनात वावरताहेत. या काळात त्यांनी असंख्य आंदोलने केली. संघर्ष केले, तुरूंगवास भोगला, पोलीसांच्या लाठय़ा झेलल्या. पण अनेक डाव्या तरुणांचे ऊर्जाकेंद्र असलेला हा नेता कधी डगमगला नाही. कोल्हापुरात तर जिथे अन्याय तिथे पानसरे हे समीकरणच जणू ठरलेले! विशेषत: सामाजिक अन्याय आणि अंधश्रध्दा यांनी जिथे जिथे डोके वर काढण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे संघर्षांने पेटून उठून या प्रकारांना जमिनीत गाडण्यात ते अग्रेसर राहिले. अशा आंदोलनांची यादी करण्याचा प्रयत्न केला तर एक जाडजूड ग्रंथ झाल्याशिवाय राहणार नाही. वर्णव्यवस्थेबाबत शंकराचार्यानी केलेल्या विधानाचा निषेध असो अथवा पावसासाठी प्रार्थना करण्यासाठी राज्यपालांनी काढलेल्या फतव्याचा निषेध असो, कोडोलीच्या नग्न पूजेच्या विरोधातील आंदोलन असो वा वाशीचे दारूबंदी आंदोलन असो, अथवा राज्य शासनाच्या फलज्योतिष अभ्यासक्रमाला विरोध असो, इतकेच काय हुपरीच्या दलित-सवर्ण दंगलीत जळलेल्या दलितांची घरे पुन्हा सवर्णाकडूनच उभे करून घेणारे आणि चिप्रीच्या ऑक्झ्ॉलिक अ‍ॅसिड प्रकल्पात कारखाना बंद करण्याच्या आंदोलनात कामगार विरूध्द पर्यावरणवादी हा संघर्ष असो, पर्यावरणवाद्यांच्या बाजूने निर्णय देणारे  पानसरे प्रत्येक ठिकाणी आपली निश्चित भूमिका घेवून उभे राहिले. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. धनागरे यांच्या विरोधात आणि कोल्हापुरात गांधी मैदानात आयोजित शांतीयज्ञाच्या समर्थनार्थ बडय़ा शक्ती उभ्या राहिल्या तरी पानसरेंनी आपल्या तत्वाशी कधी तडजोड केली नाही. प्रा. एन. डी. पाटील यांच्या समवेत मूठभर कार्यकर्त्यांना घेवून त्यांनी लोकशाही मार्गाने केलेला विरोध हा कदाचित तत्कालीन चेष्टेचा विषय बनला असला तरी या विरोधानेच लोकशाहीची लाज राखली हे विसरून चालणार नाही. पानसरेंच्या आयुष्यात शोषित, कष्टकरी, गरीब आणि ‘नाही रे’ वर्गातील लोकांसाठी त्यांनी केलेल्या शेकडो आंदोलनांचा परामर्ष जागेच्या मर्यादेमुळे घेता येत नसला तरी त्यांच्या दोन आंदोलनांचा उल्लेख अवश्य केला पाहिजे. ‘मी नथुराम गोडसे’ या नाटकावर कोल्हापुरात ‘अ‍ॅरिस्टॉटल क्लब’ ने आयोजित केलेल्या परिसंवादाला जेव्हा जिल्हा प्रशासनाने संयोजकांवर दबाब आणून बंदी घातली तेव्हा शाहू स्मारकाच्या दारात दोनशे कार्यकर्त्यांसमवेत ‘कॉरिडॉर’ मध्ये परिसंवाद घेऊन त्यांनी घटनेतील आपल्या स्वातंत्र्याची जाणीव प्रशासनाला करून दिली. केशवराव भोसले नाटय़गृहात पत्नीसमवेत ‘यदा कदाचित’ या नाटकाचा खेळ पाहत असताना हिंदुत्ववाद्यांनी गोंधळ करून नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा जिवाची पर्वा न करता तडक रंगमंचावर जावून आव्हान देऊन त्यांनी या नाटकातील विघ्न दूर केले. ही आंदोलने त्यांच्यातील सच्च्या कार्यकर्त्यांचे दर्शन घडविल्याशिवाय राहत नाहीत. याखेरीज आज महाराष्ट्राच्या विधानसभेत घरेलू मोलकरणींसाठी जो कायदा संमत झाला आहे त्याचे खरेखुरे शिल्पकारही कॉ. पानसरेच आहेत.

उत्तम वक्ते, कुशल संघटक, लढाऊ नेते, अनुभवसिध्द लेखक, संशोधक आणि अनेकांचे आधारस्तंभ अशी अनेक बिरूदे आज कॉ. पानसरे यांच्या नावाला अलगदपणे चिकटली आहेत. संघर्ष हा जणू त्यांच्या पाचवीलाच पूजला होता. पण त्यांच्या जीवनात त्यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक, त्यांनी स्थापन केलेली ‘श्रमिक प्रतिष्ठान’ व ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ ही दोन व्यासपीठे त्यांच्या कार्यप्रवासातील मैलाचा दगड ठरावीत. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे नाव घेवून जेव्हा राजकारणाला वेगळे वळण लागत होते, तेव्हा हतबल झालेल्या डाव्या पुरोगाम्यांच्या चळवळीला त्यांनी ‘शिवाजी कोण होता’ हा वस्तुनिष्ठ दस्तऐवज उपलब्ध करून दिला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ही कोणा एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही हे ठासून सांगता येणे कार्यकर्त्यांना शक्य झाले. या छोटेखानी पुस्तकाने १९८४ मध्ये मोठा दबदबा निर्माण केला. कानडी, उर्दू, गुजराथी, इंग्रजी आणि हिंदूी भाषेत त्याच्या आवृत्त्या निघाल्या. एकूण १७ आवृत्त्यात प्रसिध्द झालेल्या या दस्तावेजाच्या लाखांहून अधिक प्रति घराघरांत पोहचल्या आहेत.

त्यांनी स्थापन केलेल्या श्रमिक प्रतिष्ठानमुळे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात पुरोगामी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींसाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे आणि ‘आम्ही भारतीय लोक आंदोलना’ मुळे कोल्हापुरात जातीय सलोख्याला कधी गालबोट लागलेले नाही. म्हणूनच १९९२ मध्ये बाबरी मस्जिद कोसळल्यानंतर संपूर्ण देश जातीय वणव्यात होरपळून निघत असताना ती झळ कोल्हापुरात प्रवेश करू शकली नाही.

विचारांशी प्रामाणिक आणि धीरोदात्तपणा हे पानसरे नावाच्या अद््भूत रसायनाचे आणखी एक वैशिष्ठय़. माणूस आपले दुख किती गिळू शकतो आणि गिळतागिळता आपण स्विकारलेल्या तत्वज्ञानाला पुढे नेण्याचा प्रयत्न कसा करतो याचे दर्शन कॉ. पानसरे यांनी आपल्या एकुलत्याएक मुलाच्या निधनावेळी कोल्हापूरकरांना घडविले. कॉ. अविनाश पानसरे हा खरा तर नव्या पिढीचा दुसरा पानसरे होता. पित्याप्रमाणेच लढाऊ बाणा असलेल्या या युवा नेत्याला नियतीने अकाली आपली शिकार बनविले. ऐन उमेदीच्या काळात हृदयविकाराचा बळी ठरलेल्या या तरूणाच्या निधनाच्या वार्तेने अख्खा कम्युनिस्ट पक्षच काय, कोल्हापूरची डावी पुरोगामी चळवळ मुळापासून हादरून गेली. अविनाशच्या अंत्ययात्रेतील हे प्रसंग कोल्हापुरकरांच्या मनाच्या कुपीत आजही बंदिस्त झाले आहेत. हजारोंच्या उपस्थितीत निघालेली अविनाशच्या पार्थिवाची अंत्ययात्रा जेव्हा बिंदू चौकातील ‘रेड फ्लॅग बिल्डिंग’ जवळ आली तेव्हा सर्वत्र शांतता पसरली होती.

जो तो आपल्या अश्रूंना वाट करून देत होता. कोणाला काय करायचे हेच कळत नव्हते. अशावेळी पुत्र वियोगाने मुळापासून हादरलेले गोविंदराव पानसरे पार्थिव असलेल्या गाडीवर चढले आणि पक्षाचा झेंडा अविनाशच्या पार्थिवावर अंथरून त्यांनी आपली मूठ आवळली. ‘अविनाश पानसरे लाल सलाम’, ‘अविनाश का अधुरा काम कौन करेगा ?, हम करेंगे, हम करेंगे..’ अशी पानसरेंची घोषणा आसंमतात घुमली तेव्हा उपस्थितांच्या हृदयाला पाझर फुटल्यावाचून राहिला नाही. स्वतच्या डोळ्यातील अश्रू लपवून कार्यकर्त्यांना आधार देणाऱ्या पानसरेंचा धीरोदात्तपणाही कोल्हापूरकरांनी तेव्हा अनुभवला आणि तत्वज्ञानाशी असलेल्या त्यांच्या प्रामाणिकपणाचे अनोखे दर्शनही घेतले.

पुत्र नश्वर आहे, पण मार्क्‍सवाद चिरंतन आहे असाच संदेश पानसरे यांनी यावेळी दिला. म्हणूनच कॉ. पानसरे राजकारणात असूनही  इतरांपेक्षा वेगळे दिसतात. राजकारणात अशी व्यक्तिमत्वे खूपच दुर्मिळ असतात. वयाची ७५ वर्षे अखंड एका निष्ठेला वाहून घेणारी तर दुर्मिळात दुर्मिळ असतात. कॉ.गोविंद पानसरे यांचे तर महाराष्ट्रावर मोठे सामाजिक ऋण आहे. या ऋणातून थोडे तरी उतराई होण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राने क्षणभर उभे राहून त्यांना मानवंदनाच दिली पाहिजे.


ज्ञानयोगी

Posted: ऑक्टोबर 8, 2010 in Uncategorized

अनिल शिदोरे, सौजन्य – लोकसत्ता

अभयची भेट पहिल्यांदा कधी झाली ते नीटसं आठवत नाही. तीस-एक वर्षांपूर्वी वध्र्याला एकदा जंगल जमिनीच्या प्रश्नावर आदिवासी कार्यकर्त्यांची बैठक झाली होती. तेव्हा शरद कुलकर्णीना भेटायला तो आला असताना भेटला असावा असं वाटतं. पण खात्री नाही. तो तेव्हा भेटण्याच्या आधी डॉ. सुखात्मे आणि डॉ. वि. म. दांडेकरांशी वृत्तपत्रातून चर्चा करणारा, वाद घालणारा, शास्त्रीय मांडणी करून माणसाला जगायला किमान उष्मांक किती लागतात, हे सांगणारा एक तरूण डॉक्टर म्हणून महाराष्ट्राला आणि मला माहीत होताच. त्याच्याशी प्रत्यक्ष भेट आणि मैत्री त्यानंतर दहा-एक वर्षांनी झाली.

आज एक सामाजिक संशोधक म्हणून, शास्त्रीय अभ्यासक म्हणून, उत्तम लेखक, प्रभावी वक्ते असून, महाराष्ट्रभूषण म्हणून डॉ. अभय बंग यांची उभ्या महाराष्ट्राला ओळख आहे. असे हे डॉ. अभंय बंग २३ सप्टेंबरला आपल्या वयाची साठ वर्षे पूर्ण करत आहेत. महाराष्ट्रातल्या मोजक्या, जाणत्या आणि आदरणीय व्यक्तींपैकी आज डॉ. अभय बंग एक असले, तरी मी मात्र आज लिहिताना ‘माझा मित्र अभय’ याच नात्यानं लिहिणार आहे. कारण तशा भूमिकेतून लिहिलं नाही तर मला लिहिताच येणार नाही.

अभयचा जन्म पन्नास सालचा. स्वातंत्र्य मिळून तीनच वर्षे झालेली. पं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली उभ्या देशाला उभारी आलेली आणि अभय लहान होता. प्राथमिक शाळेत होता. तेव्हा विनोबांच्या भूदान पदयात्रेनं देशात समाजकारणाचा नवा आयाम बसवण्याचं काम चाललेलं! अभय अगदी तरूण होता, तेव्हा जगभर, देशात, ठिकठिकाणी संघर्षवादी तरूण आंदोलनांचा मार्ग स्वीकारत होते. अभय चाळीस वर्षांचा होता, तेव्हा देशभरात आर्थिक सुधारणांचं ताजं, जोमदार वारं सुटलेलं! अभयची साठी त्याही अर्थानं आपल्या सर्वाना, महाराष्ट्राला काळाच्या एका टप्प्याची जाणीव करून देणारी!

या सर्व काळात अभयची भेट वेगवेगळ्या कारणांनी होत राहिली. काही प्रकल्पांवर, उपक्रमांमध्ये आम्ही एकत्र कामही केलं. खूप बोललो, चर्चा केली. एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे, या प्रत्येक भेटीत अभयकडे सांगण्याजोगं काहीतरी होतंच. काहीतरी असायचंच. मग तो रोजच्या रोज भेटताना असो किंवा सध्या भेटतो तसं चार-सहा महिन्यांनी असो. अभयकडे काहीतरी असतंच; सांगण्याजोगं, देण्याजोगं!

अगदी परवाचीच गोष्ट पाहा. महाराष्ट्राच्या सार्वजनिक आरोग्याविषयी आम्ही बोलत होतो. ‘सध्याची स्थिती अशी आहे की, सरकारनं आणीबाणी जाहीर करावी’, असं काहीसं मी म्हटल्याबरोबर अभयनं एक उत्तम रेखीव आणि प्रखर अभ्यासू माडंणी केली. त्या विषयातल्या खाचाखोचा सांगितल्या. तेव्हा त्याने १८६०च्या आसपासच्या लंडनमधील सार्वजनिक स्वच्छतेविषयीच्या एका मोठय़ा लोकचळवळीची माहिती तर दिलीच, पण तशीच चळवळ आता महाराष्ट्रात, मुंबई-पुण्यासारख्या शहरांतही करायला हवी, असं सांगितलं. लोकांच्या चळवळीसाठी काय करायला हवं, हेही मांडलं.

तो अवघी पाच-एक मिनिटं बोलला असेल-नसेल, पुढे कित्येक दिवस त्यानं दाखवलेल्या दिशेनं मी शोधत राहिलो. मला त्यातून कितीतरी गोष्टी सापडल्या. अभयचं हे मोठं वैशिष्टय़! सतत दक्ष, जिवंत असं मन आणि तत्पर, तीक्ष्ण अशी बुद्धी! यातून अभय प्रासादिक विद्वतेचं, शहाणपणाचं दर्शन कायम देतो आणि ही फक्त देवाची देणगी आहे, असं मला मुळीच वाटत नाही.

एखाद्या गोष्टीवर, मग तो लेख असो, भाषणाची तयारी असो किंवा एखादा अहवाल असो, अभय जे काही कष्ट घेतो त्याला तोड नाही. पुन:पुन्हा घोटून घोटून, तपासून, फेरफार करून तो जी अस्सल गोष्ट आपल्यासमोर ठेवतो, तो लख्ख शुद्ध आणि तेजस्वी असा मानवी आविष्काराचा नमुना असतो. अचूक, तरीही रंजक, आकर्षक असं स्वच्छ शहाणपण त्यातून समोर येतं. ज्ञानयोगीच तो! त्यानं स्वत:वर ज्या पद्धतीनं काम केलं आहे, आपल्या मनाची – विचार कसा करावा याची- जी एक शिस्त बसवली आहे, स्वत:ला जसे पैलू पाडले आहेत; त्याची कथा त्यानं एकदा त्याच्याच अभ्यासू पद्धतीनं पुढच्या पिढीसमोर ठेवावी. खूप गुणी मुलांचं आयुष्य बदलेल त्यानं! अर्थात हेही त्याचं संचित तो पुढच्या पिढीला देण्याचं काम त्याच्या ‘निर्माण’मधल्या ताज्या प्रयत्नांद्वारे करतो आहेच.

अभयचा मूळ पिंड काय, असं म्हटल्यास तो अभ्यासकाचा, संशोधकाचा आणि द्रष्टय़ा विचारवंताचा आहे, असं मी म्हणेन. त्यानं आणि राणीनं मिळून लाखो बालमृत्यू वाचवले असतील. जगातल्या बऱ्याच देशांनी आणि आपल्या देशातल्या बऱ्याच राज्यांनी आता बालमृत्यू वाचविण्यासाठी हीच पद्धत अंगिकारली आहे. कामाचा विस्तार या अर्थानं खूपच व्यापक पल्ला आज अभयने – राणीच्या आणि शोधग्रामच्या इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं – गाठला आहे. त्यावर एकदा स्वतंत्रपणे लिहायला हवं.

मला आजही बऱ्याच वर्षांपूर्वीचं गडचिरोलीच्या जवळचं, झाडांनी आच्छादलेलं मैदान आठवतं. एका संध्याकाळी अभय मला तिथं घेऊन गेला होता आण एका छोटय़ा ढिगाऱ्यावर उभं राहून, ‘इथं आपण आता ‘सर्च’ हलवू’ असं म्हणाला होता. आज मी जेव्हा जेव्हा शोधग्रामला जातो, तेव्हा मला तो प्रसंग आठवतो आणि त्या जागेवर अभयनं आणि राणीनं जो काही सुंदर आश्रम उभा केला आहे त्याचं अप्रूप वाटतं. शोधग्रामच्या त्या वातावरणात मला अभयचा नेटकेपणा, काटेकोरपणा, शिस्त, कल्पकता आणि राणीचं मार्दव, सर्जनशीलता, आस्था यांचा विलक्षण संगम झालेला दिसतो.

१९९२ च्या आसपास गडचिरोली जिल्हा दारूमुक्त व्हावा म्हणून चळवळ चालली होती. गावागावांत बैठका चालू होत्या. आपल्या गावातून दारू हटवावी म्हणून बायकांनी जोर लावला होता. त्या आंदोलनाचं नेतृत्वही अभयकडे होतं. तो ज्या तन्मयतेनं, मनाचा ठाव घेत गावात लोकांशी संवाद साधायचा तो अनुभव, त्याची ती प्रतिमा माझ्या आठवणीत अजूनही ताजी आहे. पुढे त्यानं संशोधनाचा ज्ञानमार्ग स्वीकारला आणि त्यात खूप प्रवास केला. पण लोकांशी बोलणं, त्यांना प्रोत्साहित करणं, संघटित करणं, लढाईला तयार करणं यातही तो खूप वाकबगार आहे. तिथली मुलूखगिरी आणि त्यातला मोह अभयनं नंतर टाळलेला दिसतो.

आमचं महाराष्ट्रभर बालमृत्यूविषयक सर्वेक्षण चालू होतं. महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांत, गावांत, वस्त्यांमध्ये जाऊन माहिती गोळा करण्याचं काम आम्ही करत होतो. या कामाची आखणी, नियोजन अभयने अत्यंत चोख केलं होतं. आम्हाला प्रशिक्षण दिलं होतं. प्रत्यक्ष गावात जाऊन माहिती मिळवावी, कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी म्हणून आम्ही दोघं मिरज तालुक्यातल्या एका गावात पोहोचलो. पूर्वी सव्‍‌र्हे झालेल्या एका घराची, तिथल्या बाळाची माहिती घ्यायला अभयने सुरुवात केली. अभय शांतपणे एक-एक प्रश्न विचारत होता. बाळाची आई तिच्या गतीनं उत्तर सांगत होती. त्या बाळाच्या तब्येतीविषयी चौकशी करता करता एकूणच सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा वेध घेतला जात होता. पद्धतशीरपणे, शांतपणे, शास्त्रोक्त पद्धतीने! खूप उशीर होत होता. पोटात भुकेनं कावळे ओरडत होते, पण तब्बल दोन तास अभयची ती विचारपूस चालू होती. माझ्या आयुष्यात पाहिलेली सामाजिक क्षेत्रातली ती सर्वात उत्तम मुलाखत!

त्या दिवशी मला त्याचं जे दर्शन झालं, ते मी कधीही विसरणार नाही. विसरू शकणारच नाही. मला तो पुढय़ात बाळ ठेवून त्याच्याकडे बघणारा, गंभीर मुद्रेचा; पण शांत, अविचल, शहाणा असा योगीच वाटत होता. ज्ञानयोगी! दोन दशकांची खडतर तपस्या पाठीशी असताना ज्या तन्मयतेनं, एकाग्र चित्तानं तो ज्ञानाचा शोध घेत होता, ती अवस्था फारच थोर होती. एखाद्या महान गायकाची उत्तम गाताना असते, तशी ज्ञानी, योगी भावमुद्रा!

अभय थोर आहे, असं माझं मत आहे. मी त्याला असं म्हणणं कदाचित त्याला आवडणार नाही. कदाचित आम्ही भेटल्यावर तो तसं म्हणेलही, पण आज मला ते सांगू दे.

आज तो साठ वर्षांचा झाला आहे, पण त्याचा शोध संपलेला नाही. स्वत:वर काम करणं तर त्यानं अजिबात थांबवलेलं नाही. कालपरवाच त्यानं नव्या कुठल्या दोन गोष्टींचा शोध घेण्याचं ठरवलं आहे, ते सांगितलं. नित्य नवा विचार, नवी प्रमेयं, नव्या पद्धती, नवी माहिती, नवं संशोधन याची तपासणी चालूच आहे आणि ज्ञानाच्या, विचारांच्या क्षेत्रात पूर्ण रममाण होऊन त्याचा आनंद देण्याघेण्याचं अभयचं कामही!  अभयबरोबर अनुभवलेले क्षण माझ्या आयुष्यातला मोठा ठेवा आहे. खूपच मोठा ठेवा! कितीतरी गोष्टी मी अभयकडून शिकलो. कामाची शिस्त, पद्धत, चिकाटी-चिवटपणा, खडतर अभ्यास, ज्ञानाचा शोध. कितीतरी गोष्टी!

सध्या आमची क्षेत्रं खूपच वेगळी झाली आहेत. आमचा संवाद तरीही चालू आहे. त्याला त्याविषयी कुतूहल आहे. मागे मला तो म्हटला होता, ‘अनिल, तू राजकारणाचं नवं क्षेत्र स्वीकारलं आहेस. खूप वेगळं क्षेत्र आहे ते. त्या राजकारणात काहीही होऊ दे बाबा, पण तू सगळ्या गोष्टी नीट लिहून ठेव. मागाहून त्यावर लिहिता येईल.’ इथंही मला त्यानं अभ्यासच करायला सांगितला आहे. राजकारणातले वेगवेगळे पदर समजून घ्यायला, नोंदी ठेवायला सांगितले आहे. त्याच्या मते सारं संपतं; पण ज्ञान नाही, ज्ञानाचा शोध नाही. अगदी राजकारणाच्या क्षेत्रातदेखील!

अभय माझा मित्र आहे हे माझं भाग्य आहे. अभय महाराष्ट्रात काम करतो, मराठीत लिहितो ते महाराष्ट्राचं भाग्य आहे. प्रत्येकानं आपापल्या भाग्याचं काय करायचं हे ठरवायचं असतं. तसंच महाराष्ट्रानंही ठरवायचं आहे, अभय बंग यांच्या ज्ञानसाधनेचा उपयोग आपण कसा करावा ते!

त्याच्या साठाव्या वर्षी आमचं एवढंच मागणं आहे की, डॉ. अभय बंग यांनी आजवर आपल्याला जे दिलं, तसं ते आणखी देत राहोत. अनेक र्वष, अनेक दशकं! आज त्याच्या साठाव्या वाढदिवसादिवशी त्याच्या कामास आणि ज्ञानसाधनेस माझ्या शुभेच्छा!

नरहर कुरुंदकर, व्यक्तिवेध या पुस्तकातुन साभार

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक आश्चर्यकारक योगायोग होता. ज्यांची विवेकबुद्धी त्यांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय.पहिले राष्ट्रपती राजेंद्रबाबू हे सात्त्विक, सज्जन, चारित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते. राजकारणी व संघटनेवर बळकट पकड असणारे नेते होते. स्वातंत्र्य युद्धातून तावून सुलाखून निघालेले देशभक्त होते. तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन हे थोर शिक्षण शास्त्रज्ञ, चारित्र्यवान आणि आदरणीय असे गृहस्थ होते. जुने कॉंग्रेसमन व देशभक्त होते.

डॉ. राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून निराळी होती. ते कोणत्याही राजकीय़ पक्षांशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्यांच्या जीवनात नव्हत्या. म. गांधींशी त्यांचे संबंध होते. पण तेही देशावर प्रेम करणार्‍या नागरिकांचे राष्ट्रनेत्याशी आदराचे संबंध असावेत असे होते. कोणाशीही त्यांचे घनिष्ठ व व्यक्तिगत संबंध नव्हते. राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्धी होती. कॉंग्रेसमधील शेकडो, हजारो लोक त्यांच्या ग्रंथांचे चाहते होते. स्वत: जवाहरलाल नेहरु त्यांच्या लेखनाचे चाहते होते. पण त्यांचा कॉंग्रेस राजकारणाशी काही संबंध नव्हता. राजकीय नेते मधून मधून त्यांना भेटत; पण त्यांच्याशी ते राजकारणावर कधी बोलत नसत.

त्यांच्या जीवनात प्रमुख तीन प्रश्न होते. आणि कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?

स्वातंत्र्याच्या उदयकाळी कॉंग्रेसचे श्रेष्ठ नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांनी संविधान सभेचे सदस्य होण्यास पाचारण केले. आम्हांला तत्त्वज्ञ मार्गदर्शकाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापूर्वी काही वर्षे ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापीठाचे ते कुलगुरु होते. प्रशासन त्यांनी सांभाळलेले होते. कौशल्याने सांभाळलेले होते. पण त्यांना त्यात रस नव्हता. क्षमता नसणे ही जीवनाची उणीव असते. पण क्षमता असूनही रस नसणे हा ऋषीचा स्वभाव असतो. राधाकृष्णनच्या रुपाने तत्त्वज्ञ राजा आपल्यापुढे उभा आहे हे नेहरुंनी जाणले म्हणून त्यांना रशियाचे वकील म्हणून पाठवण्यात आले. पुढे १० वर्षे ते उपराष्ट्रपती होते. इ.स. १९६२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे असे राष्ट्रपती होते; ज्या माणसाचे राजकीय सामर्थ्य शून्य होते. संघटना, मुत्सद्देगिरी, डावपेच यांत जो रस घेत नव्हता; पण त्यांचे नैतिक वजनच एवढे मोठे होते की, त्या सामर्थ्यावर नतमस्तक होण्यात सत्तेलाही आपला गौरव झाला आहे असे वाटे. दु:ख-निराशेच्या क्षणी ज्याचा सहवास हेच एक मोठे सांत्वन होते, असा हा आमचा राष्ट्रपती होता. राधाकृष्णन हे ऋजू स्वभावाचे म्हणूनच प्रसिद्ध होते. फटकळपणा, तुसडेपणा हा त्यांचा गुण नव्हता. पण त्यांचा सरळ, साधा प्रश्नच कित्येक वेळा समोरच्या माणसाला सपाट करत असे. एका मंत्र्याशी ते सॉक्रेटीसवर बोलत होते. सॉक्रेटीसचे असे एक मत आहे की, आपल्याला कोणकोणत्या विषयांत काहीही कळत नाही हे नक्की माहित असणे शहाणपणाचे लक्षण आहे. राधाकृष्णन उपराष्ट्रपती होते. त्यांनी मंत्र्याला विचारले, “आपल्याला ज्या विषयात काही कळत नाही त्यांची यादी तुम्ही केली आहे का?” मंत्री म्हणाले, “यादी आहे पण अपूर्ण आहे.” राधाकृष्णन म्हणाले, “काही हरकत नाही. आपण दोघं बसून ती यादी पूर्ण करुन टाकू”.

संकेत त्यांच्याकडून पाळले जातीलच याची खात्री नसे. सर्व संकेतांच्या पलीकडे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. संकेत मोडले जात; तेव्हा बहुधा सत्यच त्यांच्या तोंडून बाहेर पडे. हा गृहस्थ निर्भयपणे सत्य बोलण्याचा संभव आहे, याचीच अनेकांना जरब बसे.

डॉ. राधाकृष्णन सोव्हिएत रशियाला भारताचे वकील होते. स्टॅलीनने एकदा त्यांना भेटीसाठी बोलवले. स्टॅलीन सामान्यपणे लोकांना भेट देत नसे. पण हा जगतविख्यात तत्त्वज्ञ. त्यामुळे स्टॅलीनने त्यांना बोलावले. इकडच्या तिकडच्या औपचारिक बाबी बोलून झाल्यावर स्टॅलीन म्हणाले, “डॉक्टर, आपण रशियात आहातच तर रशियन जनतेने जी महान संस्कृती उभारलेली आहे, तीही पाहून घ्या. नव्या भारताच्या उभारणीला आमच्या अनुभवाचा उपयोग होईल.”

राधाकृष्णन म्हणाले, “महाराज, आकाशातून आपण पाखरासारखे उडू शकता व समुद्रात माशाप्रमाणे खोल वावरु शकता हे तर मलाही माहीत आहे. पण पृथ्वीवर माणसाप्रमाणे वागायला शिकलात का?” तत्त्वज्ञाने हुकुमशहाच्या तोंडावर त्याच्या हुकुमशाहीचा निषेध नोंदवण्याचाच हा प्रकार होता. पण स्टॅलीनने हा फटका शांतपणे सहन केला. वकिलाने काय बोलावे या संकेताचा हा भंगच होता. पण तत्त्वज्ञाने काय बोलावे याच्याशी हा मुद्दा सुसंगत होता. इतर कुणी असे बोलले असते तर चोवीस तासांत रशियातून त्याची हकालपट्टीच झाली असती.

त्यांची व स्टॅलिनची अजून एक भेट प्रसिद्ध आहे. स्टॅलीन आजारी होता. म्हणून तो अंथरुणावर निजलेला होता. राधाकृष्णन शेजारच्या कोचावर बसले होते. थोडीफार चर्चा झाल्यावर ते म्हणाले, “आज तुमची प्रकृती बरी नाही. मी नंतर भेटेन”, आणि ते स्टॅलीनच्या जवळ गेले. त्यांच्या चेहर्‍यावरुन हात फिरवत म्हणाले, “भल्या माणसा, थोडा विसावा घे. शरीराचे आजार हे असणारच, ते धैर्याने भोगावे, मनाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.” स्टॅलीन म्हणाला, “त्यांचा हात किती वात्सल्य व मायेने भरलेला आहे.” आता हाही संकेतभंग होय! पण आजारी माणसाला तत्त्वज्ञ काय सांगणार?

राधाकृष्णनांच्या वत्सलतेला राष्ट्र सीमेची बंधने थोडीच होती? ते राष्ट्रपती असताना झेकोस्लोव्हाकियाला गेले. तेथील संसदेसमोर त्यांचे व्याख्यान होते. व्याख्यानात ते म्हणाले,”जगभर शांतता नांदावी आणि मानव जातीचा उत्कर्ष व्हावा, यावर तुमच्या आणि माझ्या राष्ट्राचे व जनतेचे एकमत आहे. पण प्रत्येक राष्ट्राचे काही निराळेपण असते. आम्ही असे मानतो की, संसदेचे काम शासनाची तपासणी करुन शासनावर वचक ठेवण्याचे आहे, तुमच्याप्रमाणे संसदेचे काम शासनाच्या सर्व कृतींवर शिक्कामोर्तब करणे एवढेच आहे असे आम्ही मानत नाही.” हा पुन्हा एक हुकूमशाहीला फटका होता. पाहुण्या राष्ट्रपतीने यजमानाचा असा अपमान करायचा नसतो. पण तो राधाकृष्णननी निर्भयपणे केला. प्रसिद्ध पत्रकार लुई फिशर या व्याख्यानाला हजर होते. त्यांनी म्हटले आहे, “त्यांचा आवाज स्पष्टपणाने व गंभीरपणाने निनादत होता. विजेच्या प्रचंड कडकडाटाने सुन्न व्हावे, तसा त्यांचा आवाज होता.” झेकोस्लोव्हाकियाने वृत्तांत देताना ही वाक्ये गाळली. पण ते राष्ट्र गप्प बसले. निषेध वगैरे काही केला नाही. कदाचित राधाकृष्णननी निषेधाच्या पत्राला असे उत्तर पाठवले असते; “बाळांनो, तुमचे पत्र मिळाले. तुमचे कल्याण असो. असे खरे बोलल्यावर असे रागावू नये. अंतर्मुख होऊन चिंतन करावे, असो. सर्वांना आशीर्वाद.” हीच त्यांची पद्धत होती.

इ.स. १९६५ साली भारत-पाक युद्धाच्या संदर्भात ते अमेरिकेला गेले. पाकिस्तान आक्रमक असूनसुद्धा अमेरिकेची सहानुभूती पाकिस्तानलाच होती. या वातावरणात हा दौरा झाला. राधाकृष्णन विमानतळावर पोहचले त्यावेळी पाऊस पडत होता. अमेरिकेचे अध्यक्ष विमानतळावर छत्री घेऊन आले होते. त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींचे स्वागत केले. डोक्यावर छत्री धरली. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “महोदय, निसर्गावर आमचा ताबा नाही, आपले स्वागत असो!” राधाकृष्णन म्हणाले, “अध्यक्ष महाराज, निसर्गावर आपला ताबा नाही हे खरेच आहे. पण आपल्या भावना व बोलणे यावर तर आपण ताबा ठेऊ शकतो, तेवढे केलेत तरी पुरे!”

राधाकृष्णन यांच्या अशा अनेक आठवणी सांगता येतील. त्या आपल्या देशातील आहेत तशा परदेशातीलही आहेत. ह्या सर्वच कथांमधून त्यांचे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व आणि सरळ व प्रांजळ मनच प्रकट होते. खरे म्हणजे भारतीय संस्कृतीत जे जे काही मधुर व मंगल आहे; त्या सर्वांचा वारसा लाभलेले ते व्यक्तिमत्त्व होते.

डॉ. राधाकृष्णन यांचा स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर नितांत विश्वास होता. जे बलवान आहेत त्यांनीच सत्ता गाजवावी , हे तर जनावरातही घडते. मग तसेच जर माणसांमध्ये घडले, तर मग माणसांत व जनावरात फरक काय? स्वतंत्रपणे विचार करण्याचा माझा हक्क गेला तर मी माणूस आहे याला काय अर्थ उरला? माणसाच्या माणूसपणाशी सुसंगत अशी रचना फक्त लोकशाहीच करु शकते, असा त्यांचा विश्वास होता. पण या विश्वासाला धरुनच त्यांचा एक इशाराही होता. आपण माणूस तयार न करताच लोकशाही राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तोही अशा रीतीने की; जे अर्धे मुर्धे माणूस आहेत त्यांनी माणसाप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करत आहोत. यामुळे स्वातंत्र्याचा आविष्कार बेजबाबदार व स्वार्थी वागणुकीत, अनिर्बंध वागणुकीत दिसू लागतो. यालाच सर्वांगीण भ्रष्टाचार असे म्हणतात. मग आपण लोकशाही रुजवणार कशी, हा त्यांनी आपल्यासमोर उपस्थित केलेला खरा प्रश्न आहे.

राष्ट्रपतीचे पद हे पाच वर्षांचे होते. नियमाप्रमाणे ते आले आणि गेलेही. पण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्त्व हे तत्त्वचिंतक म्हणून मात्र आहे तसेच स्थिर राहिले. त्यांचे विचार, चिंतन व त्यातून मिळणारे मार्गदर्शन आहे तसेच स्थिर आहे. काही काही शिक्षक हे केवळ वर्गातल्याच विद्यार्थ्यांचे शिक्षक असतात. समाजात त्यांचीच संख्या अधिक असते. यापुढे जाऊन काही काही शिक्षक मात्र आपल्या बरोबरच्या आणि अनेक भावी पिढ्यांचेही शिक्षक असतात. हे शिक्षकपण किंवा गुरुपद त्यांच्या खोल व तत्त्वनिष्ठ, तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण होत असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे असे दुसर्‍य़ा गटातील थोर आचार्य होते. त्यांच्या ऋषितुल्य तत्त्वचिंतक तपस्वी व्यक्तिमत्त्वामुळे शिक्षक हे पद भूषणावह ठरले आहे.

सौजन्य – लोकसत्ता

आपल्या विविधांगी प्रतिभेने केवळ भारतीयांनाच नव्हे, तर साऱ्या जगाला मोहित करणारे स्व. रवींद्रनाथ टागोर हे स्व. पु. ल. देशपांडे यांचे ‘दैवत’च होते. पुलंनी रवींद्रनाथांच्या जीवनकार्याचा उलगडा करणारी तीन व्याख्याने पुणे विद्यापीठाच्या टागोर व्याख्यानमालेत दिली होती. त्यातील एका व्याख्यानाचा हा संपादित अंश.

रवींद्रनाथांचं साहित्य वाचणं, त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा अर्थ समजून घेणं हा माझा छंद आहे. जानपदापासून ते विबुधजनांपर्यंत सर्व थरांवर रवींद्रनाथांनी एक अलौकिक विश्वास संपादन केला होता. त्यांचा एकदा संग जडला की, त्यांची संगत सतत हवीहवीशी वाटते. बंगाली माणसाला तर त्यांच्या बाबतीत ‘तू माझा सांगाती’ म्हणावं असंच वाटतं. एखाद्या वातावरणात सुगंध दरवळून राहावा तसे ते बंगाली जीवनात भरून राहिलेले आहेत. आजच्या सर्व नामवंत बंगाली साहित्यिक, संगीतप्रेमी, चित्रकार यांच्यावर त्यांचे खोल संस्कार आहेत. आपल्याला जे काही म्हणायचंय ते परिणामकारक शब्दांत सांगायचं झालं की त्यांच्या लेखणीतून नकळत रवींद्रनाथांचा सूर उमटतो. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतका एकरूप झालेला असतो की, तो रवींद्रनाथांचा आहे. याचं त्यांना भानही राहात नाही. इंग्रजी भाषेत जसा शेक्सपियर कधी उमटून जातो ते कळतही नाही तशीच बंगाली साहित्यात रवींद्रांची उपस्थिती आहे. आपण जसे बोलता बोलता संतवाणीचा नकळत आश्रय घेतो तसेच बंगाली लोक रवींद्रनाथांचे बोट धरतात. माझं आजचं भाषण म्हणजे रवींद्रांच्या बोटाला धरून त्यांच्या दुनियेत केलेल्या प्रवासाच्या कथेसारखं आहे. प्रवासात आपण बागाही पाहतो आणि बाजारही पाहतो. देऊळ पाहतो आणि एखादा प्रचंड कारखानाही पाहतो. त्या पाहण्यातून मनावर उमटलेल्या निरनिराळ्या चित्रांविषयी बोलत असतो. तसंच रवींद्रनाथांचं मला जे निरनिराळं दर्शन घडलं त्यासंबंधी मी बोलणार आहे. त्यामुळे विषयांतर हाच आजच्या माझ्या बोलण्याचा स्थायीभाव असण्याची अधिक शक्यता आहे. ते अपरिहार्य आहे असं मला वाटतं. खुद्द रवींद्रनाथांना म्हणे कोणीतरी प्रश्न विचारला होता- ‘‘तुमच्यातला एकत्र नांदणारा गुण आणि दोष कोणता?’ त्यांनी उत्तर दिलं होतं Inconsistency- असंबद्धता.’

रवींद्रनाथांनी इतक्या क्षेत्रात ही दौलत आपल्यासाठी ठेवली आहे की, काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. ती काही केवळ बंगाली लोकांसाठीच नाही. भाषांतरातूनही ती आपल्याला मिळू शकते. कुठल्यातरी एखाद्या भाषेतल्या शब्दांची शरीरं घेऊनच साहित्यातल्या सौंदर्याला आणि विचारांना यावं लागतं. भाषांतरात त्या भाषेचा प्रत्यक्ष स्पर्श जातो. भाषांतरातून मूळ कवितेचा आस्वाद घेणं हे हातमोजे घालून प्रेयसीच्या गालावरून हात फिरवण्यासारखं आहे, असं म्हटलं आहे तेही खोटं नाही. पण तरीही शब्दांच्या पलीकडलं रहस्य गवसतच नाही असं म्हणता येत नाही.

रवींद्रनाथांची ओढ कुठल्याक्षणी कोणाला आणि कशी लागेल हे सांगणं कठीण आह. ती केवळ साहित्यकलेच्या नित्य उपासकापुरतीच मर्यादित नाही. या माणसाने जिथे जिथे म्हणून स्पर्श केला तिथे तिथे आपला शिक्का उमटवला. चाळिशी उलटल्यानंतर चित्र काढायला सुरुवात केली तर दोन अडीच हजार कॅन्व्हासेस रंगवले. पॅरिसचे चित्रकला- समीक्षक थक्क झाले. सुमारे दोन ते अडीच हजार गाणीच लिहिली नाहीत तर त्यांना चाली दिल्या. त्यामुळे कुठल्या क्षेत्रातल्या माणसाला रवींद्रनाथांना हाक मारावी असं कुठल्या क्षणी वाटेल ते सांगता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर महात्मा गांधींचं देता येईल. गांधीजींची काही कवितेचा आस्वाद घेणारे रसिक म्हणून ख्याती नाही. उलट अनेकांना ते अरसिक वाटतात. ते तितकंसं बरोबर नाही. काही विशिष्ट ध्येयांनी प्रेरित झालेल्या महाभागांना जीवनातले अग्रक्रम ठरवावे लागतात. गांधीजींनी असे काही अग्रक्रम ठरवून इतर दोर कापून टाकले होते असं म्हणायला हावं. तरीदेखील जीवनातल्या एका उत्कट प्रसंगी गांधीजींना रवींद्रनाथांच्या कवितेची आठवण होते हे पाहिल्यावर रवींद्रनाथांच्याच नव्हे तर काव्यकलेच्या सामर्थ्यांची एका निराळ्या रीतीने प्रचिती येते. ज्ञानेश्वरांनी ‘जे चला कल्पतरूंचे आरव’ असं म्हटलं आहे- चालत्या कल्पवृक्षांचे बाग म्हटलं आहे. रवींद्रनाथांनी आपल्या प्रतिभेने उभ्या केलेल्या या कल्पवृक्षांच्या बागेतलं वैभव आता सर्वाचं आहे. फक्त त्या बगीच्यात हिंडायची ओढ मनाला लागायला हवी. थोर साहित्यकृतींकडे, कण्वाच्या आश्रमात जाताना दुष्यन्त म्हणाला होता तसं विनीत वेषाने नसलं तरी विनम्र होऊनच जायला हवं. रवींद्रांच्या सृष्टीत शिरल्यावर, त्यांनी जीवनात ज्या ज्या पार्थिव आणि अपार्थिवाला स्पर्श केला तो एका महाकवीचा स्पर्श होता हे ध्यानात आल्याशिवाय राहात नाही. मी हे केवळ भाविकतेनं बोलतो आहे असं कृपा करून समजू नका. अलौकिक प्रतिभेच्या स्पर्शानी एखाद्या दगडाची जेव्हा घारापुरीच्या लेण्यात प्रचंड त्रिमूर्ती झालेली दिसते किंवा कोणार्कच्या सूर्य मंदिरात, अशाच दगडातून टीचभर उंचीची नर्तकी साऱ्या शंृगाररसाचा अर्कबिंदू होऊन आपल्याला आव्हान देते त्या वेळी आपण प्रथम विनम्रच होतो. शब्दसृष्टीच्या ईश्वरांना वंदन करावं असं समर्थानासुद्धा वाटतं ते उगाच नाही. पण ज्याच्या सृष्टीत हे ‘ऐश्वर्य’ लाभतं असा कविश्वर मात्र शतकाशतकातून एखादाच येतो. एरवी ‘कविता गवताऐसी उदंड वाढली’ असं त्या समर्थाना म्हणावंसं वाटायला लावणारे कवी असतातच.

रवींद्रनाथांची शब्दसृष्टी आपल्याला वेळोवेळी या ऐश्वर्याची साक्ष पटवीत असते. त्यांच्या अभिव्यक्तीचं त्यांचं सर्वात आवडतं माध्यम म्हणजे कविता. ते प्रथम कवी होते, नंतर इतर सर्व. अर्थात त्या इतर सर्वातही त्यांच श्रेष्ठत्व त्यांनी सिद्ध केलेलंच आहे. शरदबाबूंसारख्या कादंबरीकाराने ‘गोरा’ कादंबरीबद्दल म्हटलंय की ‘‘ती मी साठ पासष्ठ वेळा वाचली आहे. मी लोकांसाठी लिहिणारा कादंबरीकार असलो तरी रवींद्रनाथ हे माझ्यासाठी लिहिणारे कादंबरीकार आहेत.’’ हे जरी खरं असलं तरी त्यांचा जीव जडलाय तो कवितेशीच. आपल्या आणि कवितेच्या नात्यासंबंधी रवींद्रांनी आपल्या पुतणीला एक सुंदर पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे- ‘कविता माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. मला वाटतं मी रथीच्या वयाचा होतो तेव्हाच माझा तिच्याशी वाङ्निश्चय झाला. तेव्हापासून आमच्या पुष्करणीचा काठ, वडाचा पार, बंगल्यातला बगीचा, मोलकरणींच्या तोंडून ऐकलेल्या कहाण्या, गाणी, हे सारं माझ्या मनात एक प्रकारची जादूची सृष्टी उभी करीत असे. त्या वेळची माझ्या मनाची धुसर पण अपूर्व अशी अवस्था समजावून सांगणं अवघड आहे. एक मात्र मी नक्की सांगू शकेन- की त्या काळी कवितेबरोबरच माझं शुभमंगल झालं होतं. पण या पोरीची लक्षणं धड नाहीत हे मात्र मान्य केलंच पाहिजे. बाकीचं जाऊन दे पण मोठंसं भाग्यही घेऊन आली नाही ती. सुख दिलं नाही असं नाही मी म्हणणार, पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको. ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते पण कधी कधी तिच्या त्या घट्ट मिठीतून हृद्पिंडातलं रक्त बाहेर काढते. एकदा तिनी एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीत स्वस्थ बसेन म्हणायची सोय नाही. तरीसुद्धा माझं खरं जीवन तिच्याशीच निगडित आहे. ‘साधने’त लिहितो. जमीनदारीही सांभाळतो. पण ज्या क्षणी कविता लिहायला लागतो त्या क्षणी मात्र माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करीत असतं. हे माझं स्थान मी चांगले ओळखतो. जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं, आचरण घडलं असेल पण कवितेशी मात्र कधी खोटेपणा करून चालत नाही. माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं हे एकच आश्रयस्थान. रवींद्रनाथांच्या कवितेच्या बाबतीत आणखी एक घटक आहे, तो म्हणजे संगीतातला सूर. काही अपवाद सोडले तर कविता गद्यात वाचणं त्यांना रुचतच नव्हतं. आपल्याकडे ‘गीत’ हा शब्द काहीशा तुच्छतेनेचे कवितेच्या संदर्भात वापरायची फॅशन आहे. रवींद्रांनी आपल्या कवितांचा उल्लेख ‘गीत’ असाच केलेला आहे. ज्या त्यांच्या संग्रहाला नोबेल पारितोषिक मिळाले ती ‘गीतांजली’ आहे. मला पुष्कळदा वाटतं की सुरांशी नातं तुटलेली कविता ही इंग्रजांमुळे आपल्या देशात आली. एरवी आम्ही आमचे वैचारिक तत्त्वज्ञानपर श्लोक आणि ओव्यासुद्धा सुरात बुडवून स्वीकारले. इंग्रजी कविता ही अशी नैसर्गिक रीतीने सुरातून आमच्या मनात झिरपली नाही. याचा अर्थ अंग्रजी कवितेला ताल छंद नाही, असा नव्हे. आम्ही ती कविता प्रथम मनातल्या भाषांतर विभागात टाकून शब्दार्थाना महत्त्व देत समजून घेतली. वैचारिक साहित्याचा स्वीकार आणि कवितेचा स्वीकार हा एकाच पद्धतीने होत नसतो. कविता गायला किंवा ओव्या गायला आमच्या देशातल्या लोकांना काही गायन क्लासात जाऊन शिकावं लागत नव्हतं. सुरांचं हे सामथ्र्य रवींद्रनाथांइतकं आधुनिक काळातल्या इतर फारशा कवींनी ओळखलेलं दिसत नाही. पण संतांसारखं त्यांनी सुरांना केवळ भक्तिरसातच स्थान आहे, असं मानलं नाही. रवींद्रनाथांना संगीत हे सर्वव्यापी वाटत होतं. जीवनातले सुख- दु:खाचे, हर्षशोकाचे सारे अनुभव प्रकट करताना शब्दांनी सुरांची साथ सोडणं हे त्यांच्या प्रकृतीला मानवण्यासारखंच नव्हतं.  क्रियापदाहूनही अधिक वेळा आलेले आहेत. त्यांच्या तोंडून त्यांच्या गीताचं गायन ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांनी तर त्या अनुभवाचं वर्णन करताना आपली सारी शब्दशक्ती पणाला लावलेली आहे. तद्रूपतेच्या क्षणी प्रथम त्यांच्या मनात सूर जागायचा. त्यांची ‘रांगिये दिये जाव’ अशी एक कविता आहे. जाव, जाव, जाव गो एबार, जाबार आगे रांगिये दिये जाव- जा जा पण जाण्यापूर्वी मला एकदा संपूर्ण रंगवून जा – मला जागवून जा. असा अर्थ आहे. रसिकत्वी परतत्वस्पर्श म्हणजे काय ते कळायला रवींद्रनाथांचं जीवन, त्यांची कार्यक्षेत्रं, त्यांची ध्यानक्षेत्रं, त्यांची कलानिर्मितीची क्षेत्रं यातून आपल्या सर्वाच्याच असलेल्या ‘मी’ला आपण यात्रा घडवली पाहिजे. त्या यात्रेचं पुण्य एकाच वरदानाने आपल्या पदरात पडण्याची शक्यता आहे. ते म्हणजे चित्ताला भयशून्यता लाभणे आणि चित्त भयशून्य झाल्याखेरीज ‘आनंद’ या शब्दाचा अनुभवातून येणारा अर्थ आपल्याला कळणार नाही. उपनिषत्कालीन ऋषींची ‘अमृताच्या पुत्रांनो’ ही हाक आणि ‘पितानोऽहसि’ ही प्रार्थना रवींद्रांच्या फार आवडीची. पारतंत्र्याच्या काळात सारा धीर गमावून बसलेल्या देशबांधनांना त्यांनी ‘अरे तुम्ही अमृताचे पुत्र आहात’ हेच नाना प्रकारांनी पटवण्याचं कार्य केलं आणि हे सारं त्यांच्या जोडीने गात गात केलं. पंचविशीतल्या रवींद्रनाथांनी ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही कविता लिहिली होती. नुसताच डोह होऊन पडलेल्या निर्झराच्या प्राणाला रविकिरणाचा स्पर्श होतो आणि तो निर्झर जागून उठतो. मग कडय़ावरून उडय़ा टाकीत, अभेद्य खडक फोडीत सारं जीवन एका नव्या चैतन्याने कसं फुलवून टाकतो हे या कवितेत सांगितलं आहे. असंख्य सत्कर्मामध्ये झोकून दिलेलं रवींद्रनाथांचं जीवन आणि निर्मिती पाहिली की, त्यांच्या कवितेतला निर्झरच रवींद्रनाथांचं रूप धारण करून आपल्यात आला होता असं वाटतं. शांतिनिकेतन जर रवींद्रनाथांची tangible poem  असेल तर निर्झरेर स्वप्नभंग म्हणजे intangible Rabindranath असंच म्हणायला हवं. ही कविता मूळ बंगालीतूनच अनुभवली पाहिजे. मी त्या कवितेचं मराठी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आपल्याला अंधुक कल्पना यावी म्हणून-

आज पहाटे रविकर आला
न कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला
प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला आणि जाहला अंधाऱ्या ह्य़ा
गव्हरात मज स्पर्श आज त्या
पहाट पक्ष्याच्या गीताचा
इतुक्या दिवसामागुनि माझा प्राण कसा मज
नकळे ऐसा जागुनि उठला.
जागुनि उठला प्राण
अरे अन् उसळुन आले नीर
प्राण वासना रोधु न शकली
मत्प्राणांचा धीर।
थरथर थरथर कंपित भूधर
शिलाखंड कोसळून पडले
फुलून फुलून मग फेस उसळला
गर्जत जल संतापुनि उठले
इथे तिथे मग वेडय़ापरि जल
मत्त भिंगऱ्या मारीत सुटले
शोधू लागले- तरी न दिसले
बंदिगृहाचे दार कोठले
सांग विधात्या पाषाणांच्या
कशास येथे राशी पडल्या
चहू दिशांना कशास त्यांच्या
उंच उंच ह्य़ा भिंती घडल्या?
हृदय आता
सर्व बंधने । तोड तोड ही
प्राणांची साधना करोनी
मने जोड ही ।।
लाटेवरती उचलुनि लाटा
आघातावर कर आघाता
मत्त होउनी प्राण जागला
कुठला तम अन् फत्तर कुठला
उसळुनि उठता सर्व वासना
जगती कोणाचे ही भय ना ।।
करुणाधारा आता ढाळिन
पाषाणांच्या कारा फोडिन
बुडवुनि सारे जग हे टाकिन
चहू दिशांना भटकत भटकत
पिशापरी मी गाइन गाणी
केस पिंजुनी- फुले उधळुनी
इंद्रधनूने रंगवलेले
पंख पसरुनी
रविकिरणातून हासू फुलवित
टाकिन पंचप्राण उधळुनी
या शिखरातून त्या शिखरातून
देईन झोकून
ह्य़ा खडकातून त्या खडकातून
घेइन लोळण,
हसेन खळखळ गाइन कलकल
धरुनि ताल मग टाळी देऊन
माझ्यापाशी कथा कितीतरी
गाणी कितीतरी
प्राणांची अन् शक्ती कितीतरी
सुखे किती अन् अनंत ऊर्मी
मम जीवाची कोण उभारी
काय आज मज झाले न कळे,
कानी माझ्या महार्णवाचे
गाणे आले
चहू दिशांना कसले हे कारागृह दिसते
फोड फोड रे कारा ती तव वज्राघाते
पहाट पक्षी कसले गाणे गाऊ लागला
कुठला रविकर आज असा मज स्पर्शुन गेला
न कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला

‘आमार जीबोन आमार बानी’ या रवींद्रनाथांच्या उक्तीची सत्यता पटवणारी ही कविता आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया यातला साचभाव आणि वर्तन या दोन्हींची अनुभूती लाभून आपल्यातला सतत मलिन आणि दुबळा होणारा ‘मी’ सबळ आणि निर्मळ होतो. आपल्यातल्या त्या ‘मी’ ची मरगळ घालवायला रवींद्रनाथांकडे काहीही मागायला जावे. अशी मागणाऱ्यांची भूमिका घेऊन मी त्यांच्यापाशी जेव्हा जातो तेव्हा माझ्या झोळीत जे पडले त्याबद्दल मी आपल्याशी बोललो. रवींद्रनाथ आणि मी असं ज्या वेळी मी म्हणतो त्या वेळी एक उदार दाता आणि सदा अतृप्त याचक हेचं आमचं नातं असतं.

(‘रवींद्रनाथ : तीन व्याख्याने’ या श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तकातून साभार.)

राजा पटवर्धन, सौजन्य – लोकसत्ता

मथुरा उत्तर प्रदेशात. कंस वधाचा भूकंप तिथेच झाला पण हादरे बसले ते मगधात. आजच्या पाटण्यात. कारण जरासंध मगधाचा राजा. कंस त्याचा जावई. कंस वध ही पुढच्या जरासंध वधाची रंगीत तालीमच होती. कंस मारला गेला व कृष्ण संपूर्ण भारताच्या राजकीय रंगमंचावर अवतरला. कृष्णाने तारुण्यात पदार्पण केले. पुढे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात समस्त राजांमधून भीष्माने अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला देऊन त्याच्या अखिल भारतीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. ‘महाभारत’ या कौरवपांडवांच्या पराक्रम गाथेत संपूर्ण कृष्णदर्शन होत नाही म्हणून व्यासांनी हरिवंश (खिलपर्व) लिहिला. त्यातली ही कंसवधाची कथा. याला पुराण म्हणा, इतिहास वा काव्य म्हणा. समाजशास्त्र ठासून भरलेली ही कथा आहे. कृष्णजन्म आपण आजही साजरा करतो.

श्रीकृष्ण हा महाभारताचा एकमेव नायक नसला तरी महाभारतात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्यिकांनी त्याला युगपुरुष, पूर्ण पुरुष, सदोष्ण मानवासह ‘भगवान’ श्रीकृष्ण अशा नावांनी संबोधले आहे. महाभारताच्या अद्भूताप्रमाणे तो विष्णूचा अवतार. महाभारतात एका प्रमुख व्यक्तीचा उल्लेख झाला की त्याच्या जन्माची एक कथा महर्षी व्यास रंगवून सांगतात. कौरव- पांडवांच्या पराक्रम गाथेत जितका श्रीकृष्ण येतो त्याने व्यासांचे समाधान झाले नाही. श्रीकृष्णाचे संपूर्ण दर्शन त्यात होत नाही म्हणून ‘खिलपर्वाचे’ दोन खंड जोडून त्याला ‘हरिवंश’ म्हटले गेले. श्रीकृष्ण हा वसुदेव- देवकीचा पुत्र.

वसुदेवाचा गतजन्माचा इतिहास असा- ब्रह्मदेवाचा पुत्र मरिची. मरिचीचा पुत्र कश्यप. या कश्यपाच्या अनेक भार्यापैकी अदिती व सुरभी या प्रमुख. म्हणजे कश्यप त्यांचा शब्द अव्हेरीत नसे. यज्ञ संपन्न करण्यासाठी कश्यपाने वरुणाच्या दुधाळ कामधेून पळवल्या. यज्ञसमाप्तीनंतर या गाई कश्यपाने वरुणाला परत देऊ नयेत म्हणून अदिती व सुरभी या भार्यानी त्याला गळ घातली. वरुणाने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. गाईंचा अपमान हा ब्राह्मणांचाच अपमान समजून ब्रह्मदेवाने नातवाला (कश्यपाला) शाप दिला. ‘पुढच्या जन्मात पृथ्वीवर गोवर्धन पर्वताजवळ मथुरेत गोकुळात गोप वेषात गाईंचा सांभाळ करणारा गुराखी होशील. वसुदेव म्हणून राहत असताना अदिती व सुरभी अनुक्रमे देवकी व रोहिणी रूपाने तुझ्या भार्या होतील. देवकार्यासाठी देवकी कृष्णाला व रोहिणी बलरामाला जन्म देईल.’

कृष्ण राजा झाला नाही. गुराखी पित्याचा मुलगा राजा कसा होणार? त्यानेही पित्याप्रमाणे गाईंची खिल्लारे सांभाळली. डोक्यावर मोरपीस, हातात बासुरी. वनात गाई चरवून गोकुळात परत यायचे. गोप- गौळणींबरोबर खेळायचे. नदीत डुंबायचे. बलरामाने हातात नांगर घेतला. पशुधन आधारित ऋषीप्रधान भारताचे हे दोघे बंधू प्रतीक झाले. ‘बैलजोडी’ व ‘गायवासरू’ या चिन्हांचे माहात्म्य त्यामुळेच महाभारत काळाशी जोडलेले आहे. (महात्मा गांधींनी काँग्रेसला बैलजोडी दिली व इंदिरा गांधींनी गायवासरू दिले.)

अशा या गुराखी कृष्णाचा मामा मथुरेचा राजा कंस. हा कंस म्हणजे देव-असुर संग्रामात दैत्यांचा नेता म्हणून लढलेला ‘कालनेमी’. या कालनेमीचा विष्णूने संहार केला होता. कंस व कृष्ण ही मामा- भाचे जोडी दोघेही अवतारी. कृष्ण देवाचा तर कंस असुराचा अवतार.

महाभारतात कंसाला उग्रसेन पुत्र व देवकीला कंसभगिनी म्हटलेले आहे. उत्तरेत वृष्णी, अंधक, आहुक, सात्वत, भोज अशी क्षत्रियकुलांची नावे होती. हे सर्व यादव संपन्न व पराक्रमी म्हणून प्रसिद्ध. उग्रसेन हा भोज व वृष्णी राजा म्हणून ओळखला जात होता. मग उग्रसेन पुत्र कंसाने या यादवकुळाशी वैर का पत्करले? त्यांच्या नाशाला का प्रवृत्त झाला? कंसाने उग्रसेनाचा त्याग केला इतकेच नव्हे तर त्याला बंदिस्त केले. भगिनी देवकीला तिच्या पतीसह म्हणजे वसुदेवासह नजरकैदेत ठेवले आणि असे करायला ‘नारदाने’ प्रवृत्त केले.
नारद हा ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत संचार करणारा ब्रह्मर्षी. एकदा मेरुपर्वतावर देवसभेतली सल्लामसलत त्याने ऐकली. तो वृत्तांतच त्याने कंसाला सांगितला.

‘विष्णू कृष्णावतार म्हणून देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. तिचा आठवा गर्भ कंसाचा मृत्यू होणार आहे. कंसा! तुझा मित्र म्हणून हे रहस्य मी तुला सांगतो आहे. देवकीच्या गर्भाचा तू नाश कर. दुर्बल स्वजन म्हणून त्यांची उपेक्षा करू नकोस.’

नारदाची भविष्यवाणी आकाशवाणीच असते. त्याची बालसूर्यासारखी तेजस्वी दृष्टी. जटामुकुट. चंद्रकिरणाप्रमाणे शुभ्र वस्त्र. पाठीवर मृगाजीन. गळ्यात सुवर्णाचे यज्ञोपवीत. दंडकमंडलू हातात. सप्तसुरी महती वीणा वाजवीत चारवेद गाणारा नारद महामुनी बोलला ते ऐकून कंस सर्वागाने थरथरला. नारद कलहप्रिय युद्धोत्सुक म्हणूनही प्रसिद्ध होता. कंसाचा अहंकार नारदाने दुखावला होता.

देवकीसारख्या सामान्य स्त्रीचा पुत्र इंद्रासह देवांना जिंकणाऱ्या कंसाला मारणार? बाहुबळावर पृथ्वी ढवळून काढणारा मी देवांची पूजा करणाऱ्यांचा पशू- पक्ष्यांसह नाश करीन. नारदाने कंसाच्या बुद्धीचा नाश करून टाकला. कंसाने हय, प्रलंब, केशी, अरिष्ट, कालीय व पूतनेला आदेश दिले. यादवकुलांना त्रास द्या. शत्रू दिसताच ठार करा. देवकी तिच्या घरी सुरक्षित असते. माझ्या भार्या तिच्या सर्व अवस्थेवर नजर ठेवतील. वसुदेवावर खास दासींकडून लक्ष ठेवले. मला देवकीचे गर्भ जन्मत:च मारून टाकायचे आहेत. जरासंधाच्या सैन्याचा पराभव करणाऱ्या, इंद्राला धमकावून मेघवृष्टी करू शकणाऱ्या, जरासंधकन्यांचे हरण करणाऱ्या कंसाला देवकीच्या पुत्राकडून मृत्यू? कंस नारदाचे शब्द स्वीकारायला तयार नव्हता. पण दुर्लक्षही करणार नव्हता.
कंसाला स्वत:च्या ‘अमानुष’ गुणांची खात्री होती. मथुरेचा राजा उग्रसेनाच्या मनात पुत्रवात्सल्य त्याला जाणवले नाही. त्याने माता-पित्यांचा त्याग करून उग्रसेनाचे सिंहासन बळकावले. युवराजाला पित्यादेखत राज्याभिषेक झाला. सर्वज्ञ नारदालाच आपल्या जन्मरहस्याचे कोडे उलगडण्यास सांगितले. ‘कंसा! मथुरेचा राजा महाबली उग्रसेन तुझा जन्मदाता पिता नाही. तुझा उत्पादक पिता दानवराज सौभपती ‘द्रुमिल’ आहे.’ कंसाला स्फुरणच चढले. त्याचा आत्मविश्वास बळावला. उत्कंठा शिगेला पोहोचली. ‘हे ब्राह्मण ब्रह्मर्षी! हा द्रुमिल दानव कसा आहे? हे विप्रश्रेष्ठा, त्या द्रुमिल दानवाचा व माझ्या मातेचा समागम कसा झाला? कुठे झाला? सर्व वृत्तांत मला सविस्तर ऐकव.’ महाभारताच्या पारदर्शक शैलीत व्यासांनी नारदाकडून ‘सच का सामना’ हा रिअ‍ॅलिटी शोच दाखवला आहे. विषय- ‘माता-पित्याचा समागम’. ऐकणारा- पुत्र कंस. कथन करणारा- ब्रह्मर्षी नारद. ‘हे कंसा! तुझी माता रजस्वला अवस्थेत सखींसह सुमायुन पर्वतावर विहार करत होती. पक्ष्यांचे मधुर स्वर, टेकडय़ांतून उमटणारे प्रतिध्वनी, पुष्पगंधित मंद वारा, सर्व पृथ्वी तारुण्याने भरलेल्या स्त्रीसारखी मोहक दिसत होती. कामवासनेने उद्दीपित झालेली तुझी माता फुले वेचीत असताना सौभपती द्रुमिलाने पाहिली. वातावरणातली उत्कटता, भुंगे व पुष्पगंध चेतवीत होते. द्रुमिलाला वाटले की ही तिलोत्तमा किंवा ऊर्वशीच असणार. द्रुमिल रथातून उतरला. त्याने क्षणभर नजर स्थिर करून ही अप्सरा म्हणजे उग्रसेनपत्नी असल्याचे जाणले. मायावी द्रुमिलाने उग्रसेनाचे रूप घेऊन तिला वश केले. दोघांचाही कामज्वर शांत झाला. हे कंसा! त्या समागमातून तुझा जन्म झाला.’ तुझी आई त्या उन्मादातून बाहेर आली. भानावर आली. भेदरून गेली. द्रुमिलाला तिने विचारले, ‘पाप्या! तू कोण आहेस? नीचकर्माने माझे पातिव्रत्य भ्रष्ट केले आहेस. दुष्टा विश्वासघातक्या! परस्त्री भ्रष्ट करणाऱ्या तुझे आयुष्य क्षीण होईल.’ तुझा पिता या तळतळटाला डरला नाही. उलट मग्रुरपणे म्हणाला, ‘हे स्त्रिये, तू उग्रसेनासारख्या सामान्य मानवाची पत्नी आहेस. तूही एक चंचल स्त्री आहेस. स्वप्नातल्या व्यभिचाराने कुणाचे पातिव्रत्य भ्रष्ट होत नाही. तसेच अमानुष व्यभिचाराने स्त्री दूषित होत नसते. उलट अशा संबंधातून स्त्रियांनी बलवान देवतुल्य पराक्रमी पुत्रांना जन्म दिलेला आहे’. राक्षस तत्त्ववेत्ता झाला.

‘तू कोण अशी मोठी पतिपरायण सती लागून गेलीस? हे उन्मत्त स्त्रिये! कंस नावाचा शत्रूंचा नाश करणारा पुत्र तुला होईल. बल, वीर्य, मद, प्रभाव, तेज, शौर्य व पराक्रमाने तो युक्त होईल. द्रुमिलाच्या या वक्तव्याचा कंसा! तुझ्या मातेने धि:कार केला.’ ‘सदाचरणाचा नाश करणारा पुत्र मला देऊन तुझ्या मृत्यूलाच तू जवळ केले आहेस. माझ्या पतीच्या कुळात जन्मलेला एक पुत्र तुझ्या या पुत्राचा साक्षात मृत्यू होईल.’ नारद एवढे बोलून अंतर्धान पावला. कंसाला नवीन साक्षात्कार झाला होता. मानवाच्या क्षुद्र विर्यातून माझा जन्म झालेला नाही. एका दानवेंद्राचा मी मुलगा आहे. यादवांचे कुळ वृद्धिंगत करणाऱ्या उग्रसेनाला कंसाने राज्यावरून दूर सारून बंदिस्त केले. उग्रसेन राजा कंसाचा लौकिकार्थाने पिताच होता. देवकी बहीण होती. मातापित्यांना व भगिनीसह तिच्या पतीला कैदेत ठेवून कंस मथुरेचा राजा झाला. बंधूंसह पित्याला तुरुंगात टाकणे ही मोगल परंपरा आहे, इस्लामी रीत आहे अशी आपल्याकडे दृढ समजूत आहे, परंतु ही मथुरेची परंपरा आहे. असो.

वरच्या सत्याला सामोरा जाणाऱ्या रिअ‍ॅलिटी शोमुळे एक गोष्ट स्पष्ट होते. कंस हा राजा उग्रसेनाचा ‘औरस’ पुत्र नाही, तर ‘क्षेत्रज’ पुत्र आहे. याचा अर्थ असा की ‘क्षेत्र’ म्हणजे स्त्री. जमिनीसारखी एखादी चीजवस्तू. कंसाची आई हे उग्रसेनाचे क्षेत्र. तिच्या पोटचा म्हणून क्षेत्रज. प्रश्न असा पडतो की द्रुमिलाच्या या फसवणुकीची (बलात्कारच) कल्पना कंसाच्या आईने पतीला दिली का? खिलपर्वात तसा स्पष्ट उल्लेख कुठेही नाही. आई-वडिलांनी मला टाकले आहे. ते माझा द्वेष करतात, असे कंस म्हणतो. आता प्रश्न आहे देवकीचा. कंसाची भगिनी म्हणून देवकी व देवकीचा बंधू म्हणून कंस असे उल्लेख आहेत. कंस देवकीचे सहा गर्भ जन्मताच मारून टाकतो. देवकी व रोहिणी  या वसुदेवाच्या भार्या म्हणजे सवती. गोकुळातला नंद व यशोदा ही गोपजोडी यदुवंशीयच. यांच्या संगनमताने व योगसामर्थ्यांने देवकीचा सात महिन्यांचा सातवा गर्भ रोहिणी धारण करते. (देवकी सातवा गर्भ टिकला नाही असे सांगते.) देवकीला पुन्हा आठवी गर्भधारणा होते. तिकडे यशोदेलाही दिवस जातात. कंसाच्या हेरांना किंवा जरासंधाच्या मुलींना (कंसाच्या दोघी भार्या) न कळता योगसामर्थ्यांने यशोदा व देवकीच्या पोटी एकाच वेळी मुले जन्मतात. देवकीचा पुत्र व यशोदेची कन्या यांची अदलाबदल घडवून आणली जाते. आजचे हिंदी चित्रपट बिनतक्रार करोडो लोक जर पाहू शकतात तर महाभारताचे अद्भूत खटकण्याचे कारण काय? देवकीचे सातवे अपत्य समजून कंस यशोदेची मुलगी ताब्यात घेतो. शिळेवर आपटणार एवढय़ात ती हातातून निसटते. भयानक रूप घेऊन ती देवी गर्जना करते. ‘दुष्ट कंसा! तुझ्या नाशासाठीच तू दुष्कृत्य केले आहेस. तुझ्या अंतकाळी तुझा शत्रू तुला फरफटवीत असताना मी तुझे रक्त प्राशन करीन.’ कंसाला नारदाचे शब्द आठवले. देवकीचा आठवा पुत्र तुझा मृत्यू होईल. कंस पूर्णपणे हतबुद्ध होतो. रोहिणीला बलराम झालेला असतो. देवकीचा कृष्ण यशोदा सांभाळते. वसुदेव-देवकी कंसाच्या नजरकैदेतच असतात.

कंस हा जसा उग्रसेनाचा औरस पुत्र नव्हे. त्याप्रमाणे देवकी ही उग्रसेनाची कन्या नव्हे. उग्रसेनाचा देवक नावाचा एक भाऊ असतो. त्याची कन्या देवकी. याचा अर्थ कंस व देवकी ही दोन जावांची मुले. चुलत बहीण-भाऊ आणि त्या नात्याने कंस हा कृष्णाचा चुलत मामा. आता मामा-भाचे म्हटले की मामाचे वडील भाच्याचे आजोबा असतात. परंतु कंसाचा पिता द्रुमिल असल्याने तो कृष्णाचा आजोबा नाही व उग्रसेनही सख्खा आजोबा नाही.

हरिदासाची कथा मूळ पदावर आणायची तर आपण कंसाचे जन्मरहस्य पाहत होतो. कृष्णाचे जन्मदाते मातापिता कंसाचे दास होते. कैदेत होते. कंसाचा काळ गोकुळात क्रीडा करीत होता. त्याच्या क्रीडा दंतकथा बनून मथुरेपर्यंत पोहोचल्या. कृष्णाने तर परंपरेने चाललेला इंद्रोत्सव बंद करण्याचा विचार मांडला, आपले रक्षण गोवर्धन पर्वत करतो. वनातल्या वाघ-सिंहांच्या भीतीने वनाचा नाश थांबतो. या वनामुळेच आपली गाई-गुरे जगतात. आपण धान्य पिकवतो. आपण इंद्रपूजेऐवजी गिरिपूजा, गोपूजा करूया. हा बंडखोर विचार होता. इंद्र देवांचा राजा असेल तर देव त्याची पूजा करोत. आपण गुराखी, गवळी यांनी इंद्राला कशाला देव मानायचे? कृष्णाने  इंद्राचे ‘उपरेपण’ सिद्ध केले. इंद्रोत्सव बंद झाला. इंद्र खवळला. त्याने मेघांना गोकुळ परिसरात ‘ढगफुटीचा’ आदेश दिला. कृष्णाने गोवर्धन उपटून विवरात गाई सुरक्षित ठेवल्या. गोवर्धन उचलून धरला. गोपाळांच्या प्रचंड संघटित शक्तीसमोर इंद्र हतबल झाला. त्याने कृष्णाशी तडजोड केली. वर्षांकालाचे चार महिने. त्यातले दोन वज्रधारी इंद्राने कृष्णाला दिले. कृष्ण गिरिधर, गोविंद झाला व स्वर्गात इंद्राने त्याला उपेंद्र बनवले.

इंद्रालाही कृष्णाने नमविल्यानंतर कंसाला नारदाचे वचन आठवले. कृष्ण हाच देवकीचा पुत्र आहे. नारदाने तसे सांगितलेही व बलराम वसुदेवाचाच पुत्र असून देवकी-रोहिणीच्या संगनमताने हे सर्व घडले आहे. कंसाची पाचावर धारण बसली. भयभीत होऊन त्याने सुनामाला सज्ज केला. सुनामा हा कंसाचा बंधू. उग्रसेनाला कंसाच्या आईपासून झालेला पुत्र. त्याने गोकुळावर हल्ला केला पण देवकी पुत्रांनी त्याला पराभूत केले. केशी, अरिष्टासुर हे अश्व, वृषभरूपी राक्षसही मारले गेले. कालीयाचे मर्दन करून कृष्णाने त्याला सागरात घालवून दिले. कृष्ण हा देवकीचा पुत्रच आहे याबद्दल कंसाची खात्री पटली.

त्याने कूटनीतीचा अवलंब केला. धनुष्ययागाचे निमित्त करून एक महोत्सव आयोजित केला. कृष्णबलराम, नंदादी गोपाळांना ‘कर’ घेऊन मथुरेत आमंत्रण दिले. कृष्ण-बलरामांना पाहण्याची इच्छा आहे व कुस्ती खेळण्याची हौस भागवावी असा भरगच्च कार्यक्रम आखला. अक्रुराकडून निमंत्रण गेले; परंतु उग्रसेन, वसुदेव, देवकीला खरा बेत कळला.
कृष्णाने हे आमंत्रण स्वीकारले. रामकृष्ण मथुरेत दाखल झाले. चाणूर व मुष्टिक हे महामल्ल कंसाने तयार ठेवले होते. रामकृष्ण युवक होते. चाणूर मुष्टिकानी यादवपुत्र गोकुळात पुन्हा प्रवेश करू शकणार नाहीत असे वचन कंसाला दिले. पण कंसाचा या मल्लांपेक्षा गजराजावर जास्त विश्वास होता. ‘कुवलयापीड’ नावाचा प्रशिक्षित हत्ती माहुतासह प्रवेशद्वारावर खडा पहारा देत स्वागतास सज्ज होता. यादवांचा सर्वनाश प्रत्यक्ष पाहण्यासाठी कंस सज्ज झाला. आखाडय़ात येण्यापूर्वीच हत्ती यादवपुत्रांना मारणार होता.

कृष्ण-बलरामांनी राजमार्गावरून चालत जाऊन प्रथम धोब्याकडून कंसाची राजवस्त्रे परिधान केली. माळ्याकडून पुष्पहार घालून घेतले. कुब्जेकडून कंसासाठी तयार झालेली चंदनाची उटी स्वत:च्या अंगाला लावली. शस्त्रागारातील राक्षसांनी पूजन केलेले अजिंक्य धनुष्य मधोमध तोडून आसमंतात भयंकर ध्वनी घुमवला. कंसाच्या घशाला कोरड व अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. मल्ल युद्धासाठी आखाडा सज्ज होता.

रामकृष्णांचे स्वागत करायला कुवलयापीड आतुर होता. माहुताने प्रेरणा दिली. कृष्ण बलराम सावध होते. सोंडेच्या कक्षेत येताच हत्तीने दोघांना सोंडेत पकडले. कृष्णाने हत्तीचे सुळे उपटून माहुताला प्रसाद दिला. तर बलरामाने कुवलयापीडाला विपुच्छ केले. रामकृष्ण काही घडलेच नाही असे भासवत आखाडय़ात उतरले. ‘बिग बॉस-कंस’ प्रेक्षागारात वसुदेव देवकीच्या समोर बसला होता. उग्रसेन, कंसमाता भेदरून गेले होते. मल्ल एकमेकांना भिडले. केशी- अरिष्टासुराचे झाले तेच चाणूर मुष्टिकाचे झाले. माती चाटून त्यांना आकाशदर्शन घडले. रामकृष्णांनी षड्डू ठोकला. कुणीही मल्ल आला नाही. क्षणार्धात कृष्णाने कंसाकडे धाव घेतली. त्याचा मुकुट फेकून केस पकडून त्याला फरफटवत आखाडय़ात फेकला. गळा दाबून कंसाचे धूड मातीत फेकले.
जन्मानंतर इतक्या वर्षांनी वसुदेव देवकीला पुन:दर्शन झाले. देवकीला आठ पुत्र झाले होते, परंतु एकदाही तिला कुणालाही दूध पाजता आले नव्हते. परंतु आज पुत्राना आपल्या दुधाने न्हाऊ घातले. पान्हा आटतच नव्हता.

कंस पत्नींनी आक्रंदन सुरू केले. स्वर्गातील आमच्यापेक्षाही सुंदर स्त्रियांनी तुला आकृष्ट केले का? म्हणून ऊर बडवू लागल्या. कंस माताही रडू लागली. कंसाच्या धनुर्याग महोत्सवाची अशी सांगता झाली.

कंसाच्या आईने उग्रसेनाला, आपल्या पतीला विनंती करून कंसाचे अंत्यसंस्कार कृष्णाकडून करवून घेतले. ‘मरणानंतर वैर संपले’ असे म्हणून कृष्णाने कंस मामाचे मृत्युसंस्कार पार पाडले. उग्रसेनाने संपूर्ण मथुरेचे राज्य खजिन्यासकट, दासींसह कृष्णाच्या स्वाधीन केले. कृष्णाने ते सर्व नाकारून उग्रसेनाला पुन्हा राज्यावर मथुरानरेश म्हणून स्थानापन्न केले. मला गाई राखायला आवडतात असे म्हणून कृष्ण गोवर्धन परिसरात पुन्हा गेला.

मथुरा उत्तर प्रदेशात. कंस वधाचा भूकंप तिथेच झाला पण हादरे बसले ते मगधात. आजच्या पाटण्यात. कारण जरासंध मगधाचा राजा. कंस त्याचा जावई. कंस वध ही पुढच्या जरासंध वधाची रंगीत तालीमच होती. कंस मारला गेला व कृष्ण संपूर्ण भारताच्या राजकीय रंगमंचावर अवतरला. कृष्णाने तारुण्यात पदार्पण केले. पुढे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात समस्त राजांमधून भीष्माने अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला देऊन त्याचे अखिल भारतीय नेतृत्व शिक्कामोर्तब केले. ‘महाभारत’ या कौरवपांडवांच्या पराक्रम गाथेत संपूर्ण कृष्णदर्शन होत नाही म्हणून व्यासांनी हरिवंश (खिलपर्व) लिहिला. त्यातली ही कंसवधाची कथा. याला पुराण म्हणा. इतिहास वा काव्य म्हणा. समाजशास्त्र ठासून भरलेली ही कथा आहे. कृष्णजन्म आपण आजही साजरा करतो.
वाचकांना एक विनंती. लक्षश्लोकी महाभारतातून (भांडारकरी-चिकित्सित संपादित प्रतीचा आग्रह नाही) कंसाच्या आईचे नाव ससंदर्भ सांगेल त्या वाचकाला कंसाचा उत्पादक पिता ‘द्रुमिल’ कुणी मारला हे मी सांगेन.

उदय संखे, सौजन्य – लोकसत्ता

महाराष्ट्र हा दुर्गाचा प्रांत! सह्यपठारावर आपण जर नजर फिरवली तर, चार-दोन शिखरांआड एखादा किल्ला तट बुरुजांचा शेला पागोटा मिरवत दिमाखाने उभा असतो. यातील बहुतेक दुर्ग श्रीशिवछत्रपतींची पायधूळ आपल्या मस्तकी मळवट भरल्याप्रमाणे धारण करून अभिमानाने मिरवत उभे आहेत. या शिवस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे आज मात्र उपेक्षेच्या गर्तेत गेलेली आहेत. अनेक पिढय़ांनी अभिमानाने सांगावा, असा इतिहास ज्या ठिकाणी घडला त्यांचे साक्षीदार असणाऱ्या या पाऊलखुणा आज संवर्धनाच्या उपेक्षेत आहेत.. आजही साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचे दर्शन गड बारकाईने पाहिला तर घडू शकतं! वयाच्या १५-१६ व्या वर्षी बांधून घेतलेल्या तोरणगडापासून ते पन्नाशीत उभारलेल्या कुलाबा किल्ल्यापर्यंतचा आपण बारकाईने, अभ्यासू वृत्तीने विचार केला तर शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची दृष्टी सतराव्या शतकातही काळाच्या किती पुढे होती हे दिसून येते.

प्रतापगड आपण अगदी पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंतच दुर्गविज्ञानाची प्रचीती येते! मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या ७५ पायऱ्या या एक समान नसून उंच सखल आहेत. कारण साधारण दोन किलो वजनाची तलवार व तेवढय़ाच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूंची चांगलीच दमछाक व्हावी, हा मुख्य हेतू! अत्यंत चिंचोळा मार्ग, जेणे करून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्यद्वार शोधण्यास अडचण यावी. शत्रू एक-दोन वेळा उलटसुलट फिरून भांबावून जावा हा त्यामागचा उद्देश. इतकेच नव्हे तर मुख्य दरवाजासमोरच्या तटबंदीत जंग्या (त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके) मधून आणीबाणीच्या वेळी शत्रूस टिपण्यासाठी झरोके ठेवलेले दिसतात! किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूंच्या अडचणीत भर पडून त्यास भांबावून सोडणे हा मुख्य उद्देश! दोन बुरुजांच्या कवेत निर्माण केलेल्या चिंचोळ्या वाटेत गडाच्या तटावरून तेल, दगड, गरम पाणी फेकून बलाढय़ शत्रूला नामोहरम करण्याची ही नामी योजना या किल्ल्यांवर पाहावयास मिळते. ‘हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा’ या शिवप्रभूंच्या उक्तीस सार्थ करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा राहिला! या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे गड-किल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे. आधीच सह्याद्री अभेद्य! काळ्याकभिन्न कडय़ांनी वेढलेली गिरिशिखरे, घनदाट जंगलात उतरणाऱ्या खोल दऱ्या, उंचच उंच कडे, घातकी वळणे, अडचणींच्या खिंडी, फसव्या वाटा हे सह्याद्रीचे रूप पाहत गनीम कितीही मोठा असला तरी या प्रदेशात लढाईसाठी विचार करूनच पाऊल उचलत असे!

राजगडाची संजीवनी माची हा तर दुर्गरचनेचा अनोखा आविष्कारच म्हणायला हवा! संजीवनी माचीच्या तीन टप्प्यांत उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुरुजाचे केलेले पहिले बांधकाम, त्यालगत साधारण दोन मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलखती बांधकाम! या बांधकामाचं वैशिष्टय़ हे, की बाह्य चिलखती बांधकामाची उंची आतल्या बांधकामापेक्षा जास्त! आधीच दुर्गम भाग त्यामुळे शत्रू सैन्य आले किंवा तोफेच्या माऱ्यात हा बुरुज ढासळला तरी आतला चिलखती बुरुज शाबूत राहीलच; पण बाह्य बांधकाम पडल्यावर शत्रू आत आलाच तर दोन बुरुजादरम्यानच्या अरुंद दोन मीटर जागेत अडून हालचालींवर मर्यादा येऊन गडाच्या सैनिकांच्या हातात अलगद लागून त्यांना ठार मारणे सुलभ जाईल, ही रचना आजही थक्क करते!

आपण आठ शतकांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते. १६५३-५४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि मूळचे काही बांधकाम पाडून नवीन तटबंदीयुक्त बांधकाम करून बेलाग किल्ला उभारला. शिवछत्रपतींच्या आरमाराचे मुख्यालय असलेला हा किल्ला, मराठय़ांच्या देदीप्यमान आरमारी पराक्रमाचा साक्षीदार आणि जलदुर्ग वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला विजयदुर्ग! किल्ल्याच्या जवळ बोटी येण्याआधीच फुटत. याचे कारण कोणालाच उमजत नव्हते. कदाचित किल्ल्याजवळ समुद्रकिनारी जे उथळ खडक पाण्यात आहेत, त्याचा हा परिणाम असावा. असाच तत्कालीन समज पसरून राहिला होता. मात्र १९ व्या शतकात पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय नौदलाचे कमांडर गुपचूप यांना तेथील पुराभिलेखागारात एक कागद सापडला आणि याचे रहस्य उमजले ते एकमेवाद्वितीयच होते. किल्ला अभेद्य राहावा म्हणून किल्ल्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावर इंग्रजी ‘एल’ आकारात पाण्याखाली थेट समुद्रात साडेचार किलोमीटर लांबीची भिंत बांधून किल्ल्याचे अनोखे संरक्षण करण्यात आले होते! कारण शिवरायांनी परकीय आरमाराचा, त्यांच्या जहाज बांधणीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवले, की आपल्या आरमारी बोटीचे तळ हे उथळ असतात; परंतु पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांचे जहाजबांधणीचे ज्ञान जास्त प्रगत होते. ते आपल्या बोटी वेगवान हालचाली करण्यासाठी आपला तळ इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या तळाकडे निमुळता होत जाणारा असा बांधत असत. त्यामुळे त्यांच्या बोटी खोल समुद्रातून वेगात जात असत. त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधली, की त्यावर या बोटी आपटून-आदळून त्यांना जलसमाधी मिळेल! त्याकाळी सागरी विज्ञान विकसित झालेले नसतानादेखील समुद्राखाली भिंत बांधून किल्ल्याला दिलेले अनोखे संरक्षण हे अनोख्या दुर्गविज्ञानाचे प्रतीकच नाही काय?

विजयदुर्गाप्रमाणे सिंधुदुर्ग बांधतानासुद्धा त्यांनी दुर्गविज्ञान वापरले. कुरटे बेटावर १६६४ ते ६७ मध्ये त्यांनी बेलाग अशी शिवलंकाच उभारली! यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले! शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘चौऱ्याऐशी बंदरी ऐसी जागा दुसरी नाही. इथे नूतन जंजिरा बसवावा’ हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला! किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरीत्या सर्पाकृती आहे, कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले. परक्यांची जहाजे, तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील, अशी योजना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पद्दुर्ग ऊर्फ कांसा किल्ल्याच्या बांधकामाबाबतीत दगडी चिरे झिजलेत; पण चुन्याचा दर्जा मात्र जसाच्या तसा आहे! उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र शिवराय आणि त्यांच्या स्थपतीजवळ होते, त्याला शास्त्राची जोड होती हेच सिद्ध होत! खांदेरी किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी वेगळेच तंत्र वापरले. त्यांनी किल्ल्याच्या बेटाभोवती न घडवलेले ओबड-धोबड दगड, चिरे असे बेमालूम पेरले, की भरतीच्या वेळीही दगड दिसावेत. समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांवर धारदार शंख-शिंपल्यांची वाढ होऊन त्याच्या धारदार कडांमुळे खडकावर वावरणे  अशक्य होऊन बसले. कारण त्याकाळी पादत्राणे ही कच्च्या चामडय़ाची असत. समुद्राचे खारे पाणी अशी पादत्राणे खराब करून टाकीत. त्यामुळे चपला घालता येत नाही आणि चालताही येत नाही, अशा परिस्थितीमुळे लढणे जिकिरीचे होई. शिवाय लाटांचे भरतीच्या वेळी येणारे पाणी दगडावर आपटून मुख्य तटबंदीपर्यंत पाणी न पोहोचू देण्याची पद्धत शिवरायांच्या स्थपतींनी यशस्वीरीत्या वापरली!

कुलाबा किल्ल्याच्या बांधणीत तर भले मोठे चिरे नुसते एकमेकांवर ठेवले आहेत. लाटांचा जोर हा जास्त असल्याने या भिंतीवर लाटा आपटल्या, की पाणी दोन दगडांच्या फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर उणावतो. ही पद्धत कुलाबा किल्ल्याच्या बांधकामात वापरली गेली, अन् आज साडेतीनशे वर्षांनंतरही या किल्ल्यांच्या बांधकामातील एक चिराही सरकलेला नाही! दुर्गनिर्मितीमधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला. रायगडावरील महादरवाजाजवळ काही फुटके हौद दिसतात, जे आपणास केवळ फुटके हौद म्हणून दाखविले जातात; परंतु हा प्रकार म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी केलेली योजना आहे. हे  न पटणारे आहे. रायगडाच्या महादरवाजापर्यंतची अवघड चढण चढून शत्रू सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला तर दरवाजाजवळ असणारे हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावर असलेल्या महादरवाजाजवळ वेगाने वाहील व अकस्मात झालेल्या या जलहल्ल्याने, चिखलराडय़ाने शत्रू सैन्याचा धीर खचून त्याची मानसिकता व अवसान गळून पडेल हा त्या मागचा उद्देश! साठवलेल्या पाण्यातून दुर्ग संरक्षण करण्याचा कल्पक हेतू मनी बाळगणारे शिवाजी महाराज हे जगातील पहिले आणि शेवटचे राजे होत!

तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जे किल्ले, दुर्ग बांधले तेथे शौचकुपाची व्यवस्था होती. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांवर आजही अगदी सुस्थितीत असलेले शौचकूप पाहणे रोमांचकारी आहे. त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आवर्जून पाहण्यासारखे आहे. ज्या काळात अभियांत्रिकी किंवा स्थापत्यशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या संस्था नव्हत्या. दुर्गबांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याएवढे राजकीय स्थैर्य नव्हते, राज्यात कधीही परकीय दमनचक्र येणाऱ्या काळात, स्वकीय, तसेच परकीयांशी झुंजण्यात कालापव्यय होत असताना शिवाजी महाराजांचे असे एकमेवाद्वितीय, शास्त्रीय आधारांवर दुर्गबांधणीचे प्रयोग त्यांची दुर्गबांधणीतील वैज्ञानिक बैठक ही आश्चर्यकारकच आहे.

महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते.

।। शिवरायांसी आठवावे।।
जीवित तृणवत मानावे..।।

सुहास पळशीकर , सौजन्य – म टा

[लेख २००४ साली लिहिला आहे.]

राजकारण म्हणजे काय असते ? बहुतेकांच्या मनात राजकारणाची अशी प्रतिमा असते की लबाडी, चलाखी किंवा गैरमार्गाने स्वार्थ साधणे म्हणजे राजकारण. पण या स्वार्थसाधनाच्या पलीकडे ,सार्वजनिक व्यवहारांमध्ये असलेल्या सार्वजनिक वादक्षेत्राला (खरे तर त्यालाच) राजकारण म्हणतात. आता येऊ घातलेला निवडणुकांचा उत्सव हा या राजकारणाचाच एक भाग आहे. हे राजकारण म्हणजे काय असते ?

सार्वजनिक व्यवहारांमधील तीन वादक्षेत्रे मिळून ‘ राजकारण ‘ नावाची वस्तू साकारते. एक वाद असतो हितसंबंधांचा. भिन्न समूहांच्या गरजा , अपेक्षा , साधन-सामग्रीमधील त्यांचा वाटा म्हणजे त्यांचे हितसंबंध. हे हितसंबंध भिन्न असतात , परस्परविरोधी असतात. त्यामुळे ‘ कोणाला काय आणि किती ‘ याबद्दल विवाद होत असतात. त्या विवादातून वाट काढीत धोरणे ठरविण्यासाठी जी रस्सीखेच चालते ती राजकारणाचा एक भाग असते. शेतकऱ्यांच्या सब्सिडीवरचे वाद ,कामगारांच्या बोनसबद्दलचे वाद , शेतमजुरांच्या मजुरीच्या दराबद्दलचा वाद , शहरांना पाणी किती द्यावे याबद्दलचा वाद… अशी हितसंबंधांवर आधारित वादाची उदाहरणे देता येतील. दुसरा वाद हा भिन्न समूहांच्या आत्मभानाचा , प्रतिष्ठेचा , सन्मानाचा असतो. आपला इतिहास , प्रतीके, ऐतिहासिक स्मृती यातून प्रत्येक समूहाची ‘ स्व-प्रतिमा ‘ तयार होते. आपण त्याला ‘ अस्मिता ‘असेही म्हणतो. या अस्मितेच्या आधारे आणि तिच्यासाठी होणारे राजकारण हे अस्मितेचे राजकारण म्हणता येईल. जात , धर्म , वंश , प्रांत यांच्या आधारे आणि त्या घटकांसाठी चालणारे वाद हे अशा अस्मितेच्या राजकारणाची उदाहरणे म्हणून दाखविता येतील. खालिस्तानची मागणी, नागा किंवा बोडोंच्या मागण्या , वेगळ्या राज्याच्या मागण्या , भारत हे हिंदुराष्ट्र आहे असे दावे ,ही या राजकारणाची उदाहरणे.

तिसरा वाद असतो तो सत्तेतील एखाद्या समूहाच्या वाट्याबद्दलचा. सार्वजनिक सत्ता एकाच समूहाने बळकावल्याची तक्रार करीत जेव्हा प्रादेशिक , जातीच्या किंवा धर्माच्या वगैरे आधारावर सत्तेत वाटा मागितला जातो तेव्हा या प्रकारचा वाद अस्तित्वात येतो. अर्थातच या तीन वादक्षेत्रांचे अस्तित्व एकमेकांपासून पूर्ण अलिप्त नसते. त्यांची अनेक वेळा सरमिसळ होते व त्यातून प्रत्यक्ष राजकारण घडते.

राजकारणाची चौकट बदलते आहे/ बदलली आहे , असे आपण म्हणतो तेव्हा या तीन वादक्षेत्रांमधील बदलांविषयी आपण बोलत असतो.

1947 ते 1977 या तीस वर्षांच्या काळात भारतात राजकारणाची एक चौकट विकसित झाली होती. विविध छोट्या समूहांच्या अस्मितांचा मुद्दा वादग्रस्त असला तरी एक विविधतापूर्ण ,बहुविध अस्मितांचे राष्ट्र ही आपली ओळख आपण सर्वसाधारणपणे स्वीकारली होती. मग या मोठ्या छत्रीत आपल्याला जास्त/पुरेशी जागा मिळावी म्हणून रेटारेटी चालत होती. या कालखंडात सत्तेला एक सामाजिक चारित्र्य नक्कीच होते. त्याबद्दल धुसफूसही चालू असे. ढोबळ मानाने , उच्च आणि काही वरिष्ठ मध्यम जातींकडे एकूण पुढारपण होते. हितसंबंधांचे राजकारण श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीवर आधारलेले होते. एकीकडे बड्या भांडवली हितसंबंधांची पाठराखण आणि दुसरीकडे ‘ गरीबी हटाव ‘ चे स्वप्न या चौकटीत हितसंबंधांचे राजकारण उभे राहिले होते.

1977 च्या काँग्रेसच्या पराभवानंतर या साचेबंद राजकीय चौकटीला तडे जाणे स्वाभाविक होते. जनता पक्षाच्या फाटाफुटीचा तमाशा आणि इंदिरा गांधींच्या खुनाचा धक्का या घटकांमुळे बदलत्या चौकटीकडे पुरेसे लक्ष गेले नाही (जनतेचे आणि अभ्यासकांचेही). पण राजीव गांधींच्या तरुणाईची धमक ओसरल्यानंतर जे राजकारण घडले ते एका नव्या चौकटीत साकारले होते.

अस्मितांच्या रणभूमीवर ‘ मंदिर ‘ प्रकरणातून एक नवी अस्मिता उभी राहिली. ‘ हिंदू अस्मिता ‘हे तिचे नाव. ती एकाच वेळी छत्रीसारखी समावेशकही होती आणि ‘ पर ‘ वर्जकही होती. ‘ मंदिर’ प्रकरणाने एक नवे द्वैत उभारण्याचा प्रयत्न केला. ‘ हिंदू राष्ट्रवाद वि. धर्मनिरपेक्षता ‘ असे त्या द्वैताचे चुकीचे आकलन गेली दहा-पंधरा वषेर् सतत मांडले जात आहे. हिंदू राष्ट्रवाद विरुद्ध भारतीय राष्ट्रवाद असे हे द्वैत आहे. राष्ट्राची भावनिक सीमारेषा ‘ हिंदू ‘ नावाच्या अस्मितेपाशी आखायची की भारत नावाच्या ऐतिहासिक अस्मितेपाशी आखायची असा हा वाद आहे.

भारतीय राजकारणाच्या चौकटीत बदल घडविणारा दुसरा ‘ म ‘ कार म्हणजे ‘ मंडल ‘. जसा ‘मंदिर ‘ विषयक वाद हा काही विशिष्ट जागी मंदिर बांधण्यापुरता नव्हता तसेच ‘ मंडल ‘ चा वाद केवळ आरक्षणाच्या मुद्यापुरता नव्हता. मध्यम आणि कनिष्ठ जातींच्या सत्तेतील वाट्याचा प्रश्न त्याने उभा केला.

1980 पासूनच भारताच्या आथिर्क धोरणांमध्ये काही बदल घडून येत होते. पुढे नव्वदीच्या दशकात अधिकृतपणे नवभांडवलशाहीची पालखी काँग्रेसने खांद्यावर घेतली. यातून मध्यमवर्गाचा राजकीय अर्थव्यवस्थेवर वरचष्मा निर्माण होण्याचा मार्ग खुला झाला. श्रीमंत वि. गरीब या द्वैताऐवजी मध्यमवर्ग वि. गरीब असे नवे द्वैत हितसंबंधांच्या वादक्षेत्रात अवतरले. त्यामुळे धोरणविषयक चचेर्चा सगळा नूर पालटला. आथिर्क वादांमागचे युक्तिवाद बदलले ,विचारप्रणालींची टोके बोथट झाली.

नव्वदीच्या दशकातील या बदलांमुळे राजकारणातील वादांचे स्वरूप बदलले. वादक्षेत्राच्या सीमा बदलल्या. या बदलांचे प्रतिबिंब 1996-98-99 च्या निवडणुकांमध्येही पडले. दशकभरातील राजकीय घुसळण या तीन ‘ म ‘ कारांभोवती झाली.

पण खरा मुद्दा वेगळाच आहे. या बदलांच्या पाठोपाठ आपल्या राजकारणाच्या चौकटीत आणखीही एक स्थित्यंतर घडून येत आहे. एक नवी राजकीय चौकट उदयाला येऊ पाहात आहे. मंदिर , मंडल आणि मध्यमवर्ग हे तिन्ही ‘ म ‘ कार आता स्थिरावल्यासारखे दिसत आहेत. जणू काही राजकारणातील विवादक्षेत्रासाठीची लढाई अचानकपणे खंडित झाली आहे. राजकारणाला जणू अद्वैत कळा प्राप्त झाली आहे. हितसंबंधांच्या प्रांगणात मध्यमवर्गाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे ;अस्मितांच्या शर्यतीत हिंदुत्वाचा रथ बराच पुढे निघून गेला आहे आणि सत्तेच्या वाटणीत हाती आलेल्या मर्यादित संधींवर समाधान मानणे मंडलवाद्यांना भाग पडले आहे.

1991 पासून आलेली अर्थव्यवस्था मध्यमवर्गाला आणि उच्च मध्यमवर्गाला सुखाने गुदगुल्या करणारी होतीच. पण गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मध्यमवर्गाच्या उत्कर्षाला पारावार राहिला नाही. दुसरीकडे , भाजपाच्या विचारप्रणालीविषयीचे वाद चालू राहिले तरी हिंदू राष्ट्रवाद ही एका छोट्या गटाची विचारप्रणाली न राहता बुद्धिवादी , मध्यमवगीर्य , शहरी-ग्रामीण , उच्च जाती ते कनिष्ठ जाती अशा विविध स्तरांमध्ये तिची स्वीकारार्हता वाढली. ‘ मंडल ‘ चा मुद्दा वेगळ्या रीतीने संपला. बहुतेक पक्षांनी आपापल्या यंत्रणेत ‘ मंडल ‘ ची ऊर्जा सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मंडलवादाला मात्र सोडचिठ्ठी दिली.

या सर्र्व घडामोडींचा परिणाम म्हणजे नव्वदीच्या दशकातले ‘ वाद ‘ आणि ‘ विग्रह ‘ झपाट्याने बाजूला पडून राजकीय पक्षांमधल्या मतभिन्नतेचं क्षेत्र कमी-कमी होत चालले आहे. आथिर्क धोरणे एकसारखीच असलेले राजकीय पक्ष एकमेकांना विरोध करण्याचे मुद्दे शोधण्यात गुंतलेले आहेत. नव्वदीच्या दशकात मंडलवादाचा जोश आज लालू-मुलायम यांच्यात दिसत नाही आणि जमातवादाविरोधात आघाडी उभारण्याचा उत्साहही आढळत नाही.

अनेक राजकीय पक्षांमध्ये कळीच्या मुद्द्यांबद्दल कमीअधिक एकवाक्यता झाल्यामुळे राजकारणात पोकळ विवादांना तोंड फुटते. राजकारणातील वादक्षेत्रांचा संकोच होतो. अस्सल सार्वजनिक विवादांचा निर्णय लांबणीवर पडतो. चळवळी , आंदोलने यांची ताकद रोडावते. लोक आणि राजकारण यांच्यात फारकत होण्याची शक्यता निर्माण होते.

हितसंबंध , अस्मिता आणि सत्तेतील वाटा या तीन विषयांबद्दलचे दावे-प्रतिदावे यामधून निवडणुकीचे राजकारण जिवंत बनते ; त्यातून जनतेच्या हिताची शक्यता निर्माण होते. सहमतीच्या राजकारणातून नकली स्पर्धा घडून येते. विवादाच्या राजकारणातून समूहांच्या आकांक्षांना तोंड फुटते. येत्या निवडणुकीच्या गदारोळात नुसतीच ‘ कोणी गाविंद घ्या – कोणी गोपाळ घ्या ‘ अशा थाटाची पोकळ स्पर्धा होणार की भिन्न जनसमूहांचे प्रतिनिधित्व करणारे अस्सल विवाद होणार यावर आगामी काळातल्या राजकारणाचे स्वरूप ठरणार आहे. निवडणुकीचा ‘ गोंधळ ‘ महत्त्वाचा आहे तो याच कारणासाठी.

डॉ. आनंद तेलतुंबडे, सौजन्य – इ-सकाळ

शिक्षणाच्या अधिकाराचे विधेयक सामान्यांना शिक्षणाचा अधिकार देणार की आहे तेही काढून घेणार, या विधेयकाने शिक्षणक्षेत्रातील समस्या सुटणार की त्या आणखी चिघळणार, क्रांती होणार की प्रतिक्रांती?

————————————————————————————————————————————–

शिक्षणाच्या अधिकाराचे विधेयक लोकसभेत नुकतेच (४ ऑगस्ट) संमत झाले. सरकारला याविषयी खात्रीच असावी- कारण २० जुलैला राज्यसभेत त्यावर झालेल्या मतदानाच्या वेळी एकंदर २३० सदस्यांपैकी ज्या ५४ सदस्यांनी भाग घेतला, त्यात संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए)चे फक्त २५ सदस्य होते आणि विरोधी पक्षाचे २९, तरी ते अगदी शांतपणे, सर्वसंमतीने संमत झाले. या विधेयकावर, शिक्षण क्षेत्रात व्यापाराला मुक्तद्वार झाले, यांसारखे गंभीर आरोप करून देशभर मोहीम सुरू असताना आपल्या लोकप्रतिनिधींनी त्यावर चकार शब्द काढू नये, याला काय म्हणावे?
या विधेयकामुळे शिक्षण क्षेत्राचा चेहरा-मोहराच बदलून जाणार आहे. पण खरोखर हे विधेयक त्याच्या नावाप्रमाणे सर्वसामान्यांना शिक्षणाचा अधिकार देणार, की आहे तेही काढून घेणार, त्यामुळे आपल्या शिक्षण क्षेत्रातील समस्या सुटणार की त्या आणखी चिघळणार; थोडक्‍यात, खरोखर सरकार सांगते तशी ही क्रांती आहे, की प्रतिक्रांती- यासारखे प्रश्‍न समजून घेण्याची आवश्‍यकता आहे.

राज्यघटना व शिक्षणाचा अधिकार

मूळ राज्यघटनेत “शिक्षणाचा अधिकार’ मूलभूत अधिकारांच्या यादीत आलेला नाही. मात्र, त्याबाबत “राज्याच्या धोरणाची निर्देशक तत्त्वे’ या घटनेच्या प्रभागात अनन्य प्रकारचा निर्देश आहे. त्यातील कलम ४५ “बालकांसाठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचे प्रावधान’ या मथळ्याखाली म्हणते, “”राज्यघटनेच्या अमलाची सुरवात झाल्यापासून १० वर्षांच्या कालावधीत राज्य वयाच्या १४ वर्षांपर्यंत सर्व बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण पुरविण्यासाठी प्रयत्न करील? संपूर्ण घटनेत या प्रकारची कालमर्यादा कुठल्याच बाबतीत लादलेली पाहायला मिळत नाही. आपल्या राज्यकर्त्यांकडून घटनाकारांनी या अनन्य महत्त्वाच्या विषयावर मिळविलेले हे एक अभिवचन होते. मात्र, त्यांनी ते पाळले नाही. केवळ निर्देशित तत्त्वांतर्गत येणारी प्रावधाने ही न्यायालयांमधून लादता येणार नाही. या कलम ३७८ भाग ४ मधील स्पष्टीकरणानुसार या सबबीवर त्यांनी याकडे संपूर्ण दुर्लक्ष केले. त्या वाक्‍याचाच पुढील भाग- “”तथापि, ही तत्त्वे ही देशाच्या शासनासाठी मूलभूत आहेत आणि त्यांना कायदा करण्यामध्ये लागू करणे ही राज्याचे कर्तव्य राहील.” याचा त्यांना सोईस्कर विसर पडला. या मूळ घटनेतील तरतुदीची अंमलबजावणी, जी १० वर्षांत करायची होती, ती आता तब्बल ६० वर्षांनी या विधेयकाद्वारे होत आहे आणि त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्याऐवजी ते आपल्याला आपणच काही तरी क्रांतिकारी करत आहोत, असं भासवत आहेत.

तांत्रिकदृष्ट्या प्रत्यक्षपणे “शिक्षणाचा अधिकार’ घटनेतील मूलभूत अधिकाराच्या यादीमध्ये समाविष्ट नसला तरी अप्रत्यक्षपणे तो मूलभूत अधिकारच आहे, हे आपल्याला आपल्या सर्वोच्च न्यायालयाने १९९३ मध्ये सांगितले. “उन्नीकृष्णन विरुद्ध आंध्र प्रदेश’ या प्रकरणाचा निकाल देताना त्यात स्पष्ट सांगितले आहे, की “”कलम ४५ व ४१ च्या परिप्रेक्षात शिक्षणाचा अधिक ार म्हणजे

१) या देशातील प्रत्येक बालकाला / नागरिकाला जोवर तो वयाची १४ वर्षे पूर्ण करत नाही, तोवर मोफत शिक्षणाचा अधिकार आहे, आणि

२) वयाची १४ वर्षे पूर्ण झाल्यावर त्याचा हा अधिकार फक्त राज्याच्या आर्थिक क्षमता व विकासाच्या मर्यादा यांनी सीमित राहील,”

याचा अर्थ घटनेच्या मूळ स्वरूपातसुद्धा “शिक्षणाचा अधिकार’ हा देशातील सर्व पालकांना दिलेला होता, आपल्या राज्यकर्त्यांनी जाणून बुजून तो गेली ६० वर्षे नाकारला आणि कोट्यवधी लोकांना अज्ञानाच्या खाईत खितपत ठेवले.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर जवळपास एक दशकानंतर, २००२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने घटनेत ८६ वी दुरुस्ती करवून या “शिक्षणाच्या अधिकारा’ला औपचारिकरीत्या घटनात्मक अधिकाराच्या कक्षेत आणले. हे असे करण्याची खरे तर काही गरज नव्हती; पण सरकारला या घटना दुरुस्तीतून या अधिकाराचा आवाकाच मर्यादित करायचा होता. शिक्षणाचा अधिकार घटनासंमत करण्याचा क्रांतिकारी आव आणत सरकारने मूळ घटनेतील “वयाची १४ वर्षे पूर्ण करीपर्यंत “ऐवजी’ ६ ते १४ वर्षे वयातील “बालकांना हा अधिकार दिला आणि फटक्‍यासरशी त्यातून १७ कोटी बालकांना या अधिकारापासून वंचित केले.

त्याही वेळी या हातचलाखीवर आपल्या विरोधी पक्षांकडून वा सरकारी विद्वानांकडून यावर विशेष चर्चा झाली नव्हती, हे विशेष! २००५ मध्ये ९३ वी घटना दुरुस्ती करून या दुरुस्तीला दुर्बळ घटकांच्या कैवाराची झालर चढविण्यात आली. या दुरुस्तीन्वये “”धर्म, वंश, जात, लिंग वा जन्मठिकाण यावरून भेदभावावर मनाई’ याला केंद्र कक्षात कलम १५ तील विभाग ३ मध्ये एक उपविभाग (२) जोडण्यात आला. आता सरकार अनुसूचित जाती व जमातींसह इतर सर्व सामाजिक व शैक्षणिकरीत्या मागास समाज गटांना फक्त “अल्पसंख्याकांच्या शैक्षणिक संस्था वगळता सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी विशेष तरतूद करू शकत होते. त्यानंतर आता चार वर्षांनी सरकारने या विधेयकाद्वारे या घटना दुरुस्तींना कायद्याचे स्वरूप आणले आहे. हे स्पष्ट आहे, की “शिक्षणाच्या अधिकारा’च्या गोंडस नावाखाली त्याने मुळातच घटनेने दिलेला शिक्षणाचा अधिकार काढून घेतला आहे. “”देर आए, दुरुस्त आए” याप्रमाणे ६० वर्षांचा उशीर जाऊ द्या; जर खरोखरच हे विधेयक जनतेच्या हिताचे असेल तर सारं काही माफ! आज आपल्याला या दृष्टीने पाहणे जास्त योग्य होईल.

या विधेयकात काय आहे?
या विधेयकात सर्व मुलांसाठी वर्ग १ ते ८ मध्ये मोफत शिक्षणासाठी सार्वजनिक खासगी भागीदारी तत्त्वावर शेजार शाळांची उभारणी व या सर्व शाळांमध्ये दुर्बल घटकांतील बालकांना २५ टक्के आरक्षण या मुख्य गोष्टीची तरतूद आहे. त्याशिवाय आठव्या वर्गापर्यंत कोणत्याही मुलाला अनुत्तीर्ण केले जाणार नाही, शाळेतील प्रवेशासाठी कॅपिटेशन फी किंवा मुलाखत होणार नाही, या शाळेतून त्या शाळेत जाण्यासाठी स्थानांतर दाखल्याची आवश्‍यकता असणार नाही, शिक्षकांना खासगी शिकवणी घेता येणार नाही, शाळेच्या व्यवस्थापनामध्ये स्त्रियांचा किमान ५० टक्के वाटा असेल, शाळांचे व्यवस्थापन व शैक्षणिक नियंत्रण हे कसे असणार, सर्व शाळांत किमान सोईसुविधा ठराविक वेळात तयार कराव्या लागतील. त्याचप्रमाणे शिक्षकांनासुद्धा मर्यादित काळात किमान पात्रता मिळवावी लागेल, अशा प्रकारच्या अनेक किरकोळ गोष्टींचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्रातील सध्या चाललेला सावळा गोंधळ पाहता या बऱ्याच गोष्टी वरकरणी स्वागतार्ह वाटाव्यात, अशाच आहेत; पण जरा खोलात जाऊन या बाबतीत काही मूलभूत प्रश्‍न विचारायला सुरवात करता आपला भ्रमनिरास होण्याचीच जास्त शक्‍यता आहे.

आपल्यासमोर शिक्षणाच्या बाबतीत सर्वांत महत्त्वाचा प्रश्‍न आहे, तो गरीब आणि श्रीमंत यांना उपलब्ध शिक्षणातील वाढता भेदभाव व विषमता. खेडे आणि शहरातील विषमता, सार्वजनिक व खासगी शाळांतील विषमता, सामान्य खासगी व आंतरराष्ट्रीय शाळांतील विषमता अशा अनेक विषमतांनी व्यापलेले हे महत्त्वाचे क्षेत्र या विधेयकामुळे भेदभाव व विषमतामुक्त होणार आहे काय? याला वरकरणी उत्तर “होय’ वाटेल; पण ते तसे नाही. या बहुस्तरीय शिक्षणाला आळा घालणारी कुठलीही तरतूद या विधेयकात नाही, फक्त दुर्बल घटकांना या सर्व प्रकारच्या शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणाची त्यात सोय केलेली आहे. जे विद्यार्थी या महागड्या खासगी शाळांची फी व खर्च झेपू शकणार नाही, त्यांना सरकार एज्युकेशन व्हाउचर सरकारी शाळेत विद्यार्थ्यामागे खर्च होणाऱ्या रकमेएवढ्या किमतीचे देईल. सरकारी शाळेतील खर्च व एका सामान्य स्तरावरील खासगी शाळेतील शुल्क यातील अंतर ज्यांना माहीत आहे, त्यांना या तरतुदीत अंतर्भूत असणाऱ्या मस्करीची प्रचिती येईल. नुसती शुल्कच नव्हे; तर या खासगी शाळा ज्या अनेक गोष्टींवर पैसे लाटतात, ते सर्व लक्षात घेता ७८ टक्के लोकांना २० रुपयांची मिळकत नसलेल्या या देशातील कोणते गरीब लोक या शाळांपर्यंत पोचू शकतील, याची कल्पनाच केलेली बरी.
सरकारच्या स्वतःच्याच पद्धतीने या बहुस्तरीय शिक्षणाचा पायंडा पाडला आहे, त्यात सर्वसामान्यांसाठी, फळा नसणाऱ्या, छत नसणाऱ्या, शिक्षक असला काय नसला काय अशी स्थिती असणाऱ्या, सामान्य शाळा आणि मूठभर ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालये, ११ व्या योजनेतील मॉडेल शाळा अशीही बहुस्तरीय व्यवस्था हे विधेयक घालवणार नाही. फक्त, त्यातील आश्‍वासनानुसार सर्वसामान्यांच्या शाळांचा स्तर मात्र त्यातून उंचावण्याची अपेक्षा आहे आणि तो उंचावणार ते केवळ या शाळांच्या खासगीकरणामधून. शिक्षणाच्या संदर्भात एक दुसरा चिंताजनक प्रश्‍न आहे तो शाळांतील गळतीच्या प्रमाणाचा. शाळातील गळतीचे प्राथमिक स्तरावरील प्रमाण जवळपास ३४ टक्के व त्यानंतरच्या स्तरावर ते ५२ टक्‍क्‍यांपर्यंत प्रचंड आहे. शाळेत दाखल झालेल्या १०० मुलांतील फक्त १०-१२ मुले महाविद्यालयात पोचतात, अशी ही गळतीची भयाण समस्या आहे. या विधेयकामुळे हे गळतीचे प्रमाण कमी होईल काय? याचे उत्तरसुद्धा वर वर पाहता “होय’ वाटेल; पण विचारांती ते “नाही’ असेच होणार.

प्राथमिक स्तरावरील गळतीचे प्रमाण रोखून धरण्यासाठी मुलांना शाळांत जेवण देण्याची व्यवस्था वगैरे करण्यात आली; पण त्यानंतरच्या स्तरावर गळती वाढली. आणि महाविद्यालयाच्या स्तरावर ती साधारणतः आहे त्याच स्तरावर आहे. या विधेयकामुळे वर्ग-१ ते ८ या दरम्यान जरी मोफत व सक्तीच्या शिक्षणाची व्यवस्था आहे आणि त्यामुळे तोपर्यंत गळतीची शक्‍यता थोपविली जाणार असली, तरी आठव्या वर्गानंतर काय, हा प्रश्‍न उभा ठाकतो. मोफत, सक्तीचे व अनुत्तीर्ण न करणारे शिक्षण घेत दुर्बल घटकातील विद्यार्थी आठवीतून नववीत आल्यावर त्यांना कोणताच आधार नसणार, त्या वेळी ते काय करतील? अर्थात, खालच्या स्तरावर थोपवलेली गळती ही आता नवव्या आणि दहाव्या वर्गात प्रकट होणार! या विधेयकामुळे सर्वसामान्यांच्या अधिकारात अगदी शिताफीने कपात केली गेली आहे, हा मुद्दा त्याचा समर्थनार्थ चाललेल्या आरडाओरडीत कोणाला शिवणारसुद्धा नाही. जर एखादा आदिवासी, दलित, मागास जातीतील वा मुस्लिम समुदायातील पालकाने आपल्या ४-५ वर्षाच्या मुलीला नर्सरी, केजीच्या शिक्षणाची सोय व्हावी, त्यांच्या गावात ६० मुलांसाठी दोन शिक्षक व दोन खोल्या आहेत, त्यात १९८६ च्या धोरणानुसार एक शिक्षक व एक खोलीची भर व्हावी, तिसरीत शिकणाऱ्या त्यांच्या मुलीला संगीत व कलेची फार आवड आहे; पण ते शिकविण्याची सोय गावात नाही, त्याची सोय व्हावी, त्यांच्या गावात ८ वी पर्यंत जी शाळा आहे, तेथे वीजजोड नाही, तो देण्यात यावा, तेथे संगणक व इंटरनेटची सुविधाही देण्यात यावी, अशा मागण्या घेऊन न्यायालयांकडे धाव घेतली, तर सर्वांना समतामूलक गुणवत्तेचे शिक्षण, जीवनात समान संधी या राज्यघटनेअंतर्गत दृष्टीने न्यायालयाने या पाचही मागण्या मंजूर करून सरकारला त्या पूर्ण करण्याचा आदेश दिला असता. या पूर्तीच्या आधारे मग सर्वच सरकारी शाळांमध्ये या सुविधा देणे ही सरकारची जबाबदारी मानली गेली असती. या सुविधांसाठी आपल्याजवळ पुरेसा पैसा नाही, असा युक्तिवाद सरकार करते तर संभवतः न्यायालयाने तो फेटाळून लावला असता, कारण शिक्षणाचा अधिकार हा घटनेनुसार मौलिक अधिकार आहे, आणि त्याला सरकारने प्राथमिकता देणे प्राप्त आहे. २०१० मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी जे १ लाख कोटी रुपये अनुमानित खर्च आहे, किंवा श्रीमंतांचे चोचले पुरविण्यासाठी विमानतळ, उड्डाणपूल, समुद्रसेतू वा कर्जाच्या पैशाने मोठाली स्मारके यावरील कोट्यवधी रुपयांची उधळण ही सरकारला शिक्षणाकडे वळवावी लागली असती; पण आज हे विधेयक संमत झाल्यावर व उद्या कायदा बनल्यावर वरील मागण्यातील एकही मागणी न्यायालयाला संमत करता येणार नाही किंवा सरकारला आदेश देता येणार नाही.

नवउदारमतवादी प्रतिक्रांती
घटनेच्या आदेशानुसार १९६० पर्यंत १४ वर्षे वयापर्यंतच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण न दिल्याची आठवण होता १९६४ मध्ये सरकारने शिक्षणाची व्यवस्था कशी असावी, याचा विचार करण्यासाठी कोठारी आयोग नेमला होता. कोठारी आयोगाने १९६६ मध्ये दिलेल्या अहवालावर १९६८ मध्ये पहिले शिक्षण धोरण तयार झाले. या धोरणात मुख्य तीन गोष्टींचा समावेश होता.

१) सर्व मुलांना समतामूलक गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी सार्वजनिक पैशावर चालणाऱ्या शेजार-शाळांच्या संकल्पनेवर आधारित समान शाळाप्रणालीची निर्मिती

२) शालेय आणि उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमात एक लोकतांत्रिक, धर्मनिरपेक्ष, समतामूलक तसेच प्रबुद्ध समाजाच्या निर्मितीसाठी नागरिकता तयार करण्यावर भर व

३) शिक्षणावर केला जाणारा खर्च या प्रमाणात वाढविण्यात यावा की १९८६ पर्यंत तो आपल्या सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) ६ टक्के असेल,

या धोरणाच्या दिशेने काही प्रयत्न झाले; पण दुर्दैवाने आपल्या राज्यकर्त्यांनी लवकरच त्याकडे पाठ फिरवली. १९८० च्या दशकात भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर ठाकलेल्या भांडवली अरिष्टाला निस्तारण्यासाठी तंत्रज्ञानाधिष्ठित आधुनिकीकरणाच्या आवश्‍यकतेतून १९८६ मध्ये दुसरे शिक्षण धोरण तयार झाले. या धोरणाने शिक्षणाच्या क्षेत्रात औपचारिक विषमतेला जन्म दिला. गरीब मुलांना नॉत-फॉर्मल शिक्षण आणि मूठभर मुलांसाठी अभिजात नवोदय विद्यालये आणि नवउदारमतवादाच्या प्रभावाखाली “साक्षरता मिशन’, स्वायत्त महाविद्यालये, शिक्षणात विदेशी संस्थांचा प्रवेश यांसारख्या गोष्टी याच धोरणांतर्गत होत गेल्या. पुढे १९९१ मध्ये औपचारिकरीत्या नवउदारमतवादी धोरण पत्करल्यावर भारताच्या सर्वच क्षेत्रांत जागतिकीकरणाचा प्रभाव दिसायला लागला, “संरचनात्मक समायोजने’नुसार त्याला शिक्षण, आरोग्य व जन-कल्याणाच्या सर्वच बाबीं वरील खर्च आवरता घ्यावा लागला. दुसरे, शिक्षणाच्या उद्दिष्टातच मूलभूत फरक करून त्याला उपभोगवादी मुक्त बाजारपेठेला अनुरूप जनमानस बनविण्याचे साधत मानण्यात आले, याप्रमाणे फक्त मोजक्‍या लोकांनाच गुणवत्ता शिक्षण मिळावे, बाकीच्यांना साक्षरता पुरे; जेणेकरून ते बाजारातून वगळले जाणार नाहीत- अशा प्रकारचे वळण शिक्षणाला लागले.
जागतिक बॅंकेच्या इशाऱ्यावर देशात उच्च शिक्षणाची बाजारपेठ निर्माण झाली. आजपर्यंत या बाबतीत सूर असा होता, की सरकारचा शिक्षणक्षेत्रातील हस्तक्षेप फक्त प्राथमिक शिक्षणापुरता मर्यादित असावा, उच्च शिक्षण हे संपूर्णतः बाजार तत्त्वावर मुक्त करण्यात यावे. (संदर्भ २००० चा मुकेश अंबानी- कुमारमंगलम बिर्ला यांनी कलेला “फ्रेमवर्क-फॉर रिफॉर्म्स इन एज्युकेशन’ हा अहवाल) मात्र, उच्च शिक्षणाची बाजारपेठ ही गळतीचे प्रमाण बघता फारच लहान आहे. त्या उलट प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची बाजारपेठ तिच्या अंतःसामर्थ्याच्या दृष्टीने अफाट आहे. शिवाय त्यातूनच उच्च शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा पुरवठा येत असल्यामुळे उच्च शिक्षणाच्या बाजारपेठेची वाढसुद्धा तिच्यावरच अवलंबून आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाच्या क्षेत्रात अगदी नर्सरी, के.जी. पासून श्रीमंत देशांच्या धर्तीवरील महागड्या शाळा, लाखो रुपयांचे शुल्क आकारणारे “इंटरनॅशनल स्कूल’ इत्यादींनी खासगी वित्तासाठी बाजारपेठ अस्तित्वात आली; पण ती अजूनही मूठभर लोकांपुरतीच मर्यादित आहे. अजूनही ९० टक्के विद्यार्थी त्यात समाविष्ट नाहीत. ही अफाट बाजारपेठेतील खासगी वित्ताला उपलब्ध करून देण्यासाठी जागतिक बॅंकेने पुरस्कारिलेले “पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप’चे मॉडेल अगदी उत्तम ठरते. त्यामुळे सरकारला आपली जनता-प्रवणता प्रदर्शित करता करता खासगी भांडवलाला सारे रान मोकळे करता येते. याच मार्गाने या विधेयकामार्फत सरकार मोफत व सक्तीच्या शिक्षणाची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊन शिक्षणाच्या संपूर्ण बाजारीकरणाला मुक्तद्वार करत आहे!

मनुष्यबळ विकासमंत्री कपिल सिब्बल यांनी लोकसभेत हे विधेयक सादर केले, त्या वेळी ते त्याला “क्रांती’ असे संबोधत होते. वस्तुतः जनतेच्या दृष्टिकोनातून ती एक प्रतिक्रांती आहे- नवउदारमतवादी प्रतिक्रांती!

नमस्कार !

Posted: ऑगस्ट 4, 2009 in Uncategorized
टॅगस्
नमस्कार !
मी तसा आंतरजालावर बराच वेळ पडीक असतो. इथे वावरत असताना कित्येकदा खुप चांगली माहिती मिळते, खुप चांगले लेख वाचायला मिळतात. पण काळाच्या ओघात त्यातलं फारसं मग लक्षात राहत नाही. आणि जेव्हा एखाद्या विषयावरची माहिती हवी असते, तेव्हा नेमकं लेखाचं शीर्षक आठवत नाही, लेखकाचं नाव आठवत नाही.. त्यामुळे मग शोधायला सुद्धा अवघड जातं. त्यावर उपाय म्हणुन हा माझा ब्लॉग प्रपंच !

मी तसा आंतरजालावर बराच वेळ पडीक असतो. इथे वावरत असताना कित्येकदा खुप चांगली माहिती मिळते, खुप चांगले लेख वाचायला मिळतात. पण काळाच्या ओघात त्यातलं फारसं मग लक्षात राहत नाही. आणि जेव्हा एखाद्या विषयावरची माहिती हवी असते, तेव्हा नेमकं लेखाचं शीर्षक आठवत नाही, लेखकाचं नाव आठवत नाही.. त्यामुळे मग शोधायला सुद्धा अवघड जातं. त्यावर उपाय म्हणुन हा माझा ब्लॉग प्रपंच !