Posts Tagged ‘आयडिऑलॉजी’

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

सवंग सुख ही संस्कृती अधिकाधिक सत्ता हे साध्य, नीतिनिरपेक्ष स्पर्धा हे साधन अशा कोलाहलाने भरलेल्या वर्तमानात वैचारिकतेचा संकोच होतोय. मुक्त विचारांशी शत्रुत्व म्हणजे हुकूमशाहीला अन् झुंडशाहीला आमंत्रण. ही वेळ आहे विचारांचे जागरण करण्याची. म्हणून वेद – उपनिषदांपासून फुले – आगरकरांपर्यंत, सॉक्रेटीस – प्लेटोपासून चॉम्स्की – डेरिडापर्यंत पूर्व – पश्र्िचमेतील प्रमुख विचारवंतांचा आणि  त्यांनी मांडलेल्या विचारधारांचा वेध घेणारे हे पुस्तक

एखादे पुस्तक लिहिणे हेही कधीकधी धाडस असते. अगदी हिमालयाचे शिखर चढून जाण्याइतके वा अ‍ॅमेझॉनच्या घनदाट जंगलात घुसून, कुणाच्याही मदतीशिवाय तेथील वनस्पती व प्राणीसृष्टीचा अभ्यास करण्याइतके. प्रा.डॉ. केशव रंगनाथ शिरवाडकर हे असेच धाडसी शोधयात्री आहेत.

त्यांनी ‘आपले विचारविश्व’ या पुस्तकात जागतिक तत्त्वज्ञानाच्या अथांग चिंतनाचा शोध घेतला आहे. वयाची ८० वर्षे ओलांडल्यानंतर अशा विषयाचा असा अभ्यास व लेखन करणे आणि तेही वाचकाला थेट जाऊन त्या शोधयात्रेत सामील करून घेणे सोपे नाही. वेदांपासून आईनस्टाईनपर्यंत, अ‍ॅरिस्टॉटलपासून फ्रॉईडपर्यंत, बसवेश्वरांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत आणि रामदास-तुकारामांपासून कांट, हेगेल, स्पेन्सपर्यंतची वैचारिक परिक्रमा करणे हे गंगा नदीच्या काठावरून त्या अवघ्या भूप्रदेशाची परिक्रमा करण्यासारखे आहे. ती परिक्रमा करताना त्यांना भगवान श्रीकृष्ण भेटतात आणि महात्मा गांधीही. योगी श्रीअरविंद आणि कार्ल मार्क्‍सही. गुरु नानक आणि लोकमान्य टिळकही. या पुस्तकासाठी केलेल्या शोधयात्रेत त्यांना भेटलेले असे युगप्रवर्तक लोक पाहिले की, गेल्या सुमारे साडेतीन-चार हजार वर्षांंत माणसाचे विचारविश्व किती समृद्ध होत गेले आहे याचा अंदाज येतो. पण फक्त ‘अंदाज’च, कारण यातील प्रत्येक प्रकरण हा स्वतंत्र ग्रंथाचा (नव्हे, अनेक ग्रंथांचा!) विषय आहे. तरीही या विचारविश्वाचा फेरफटका आपल्याला शिरवाडकरांनी असा घडविला आहे की, आपण तत्त्वज्ञानाकडे अधिक कुतूहल व चिकित्सेने पाहू. तत्त्वज्ञान हा काही ‘फॅशनेबल’ विषय नव्हे. साहित्याच्या कथा-कादंबरी कक्षेतही तो मोडत नाही. एके काळी राजकारणाचा संबंध तत्त्वज्ञानाशी होता. त्यामुळे सॉक्रेटिस, प्लेटोपासून ते थेट बट्र्राड रसेल वा अल्बर्ट काम्यू वा मायकेल ऊर्फ मिशेल फुकोपर्यंत बऱ्याच तत्त्वज्ञांनी राजकारणाचीही चर्चा ‘फिलॉसॉफिकल’ अंगाने केली. आता राजकारण हे मुख्यत: व्यवहारवाद, उपयुक्ततावाद आणि सत्ताकारण व अर्थकारण या चौकटीबाहेर जाताना दिसत नाही. खरे म्हणजे अर्थकारणही तत्त्वज्ञानाच्या वास्तूतच जन्माला आले. अ‍ॅडॅम स्मिथ असो वा कार्ल मार्क्‍स- ते अगदी अमर्त्य सेन हे सर्व जण तसे ‘फिलॉसॉफर्स’. पण आता अर्थकारण हेसुद्धा सर्वार्थाने ‘मुक्त’ झाले आहे. नीतीशास्त्र व धर्मशास्त्रे सुद्धा तत्त्वज्ञानाच्या मुशीतून तयार झाली, पण पुढे त्यातून मूलभूत चिकित्सेपेक्षा परंपरावाद आणि धार्मिक ताकद हेच उग्रपणे पुढे आले. मानसशास्त्रानेही तत्त्वज्ञानाची संगत सोडली आणि ते स्वभावशास्त्र व मेंदू/संवेदन यंत्रणा शास्त्र (न्युरॉलॉजी) या दिशेने गेले.

भारतीय विचार : परिवर्तनाला नकार

पहिल्या सहस्रकातील भारतीय विचार बव्हंशी अध्यात्मवादी असल्याचे दिसते. लोकायत, बौद्धवाद, मनुस्मृती, कौटिल्यविचार इत्यादींमध्ये दैनंदिन जीवन डोकावले आहे; पण भारतीय विचाराचा मध्यप्रवाह अध्यात्ममग्नच राहिला. भौतिक प्रगतीच्या अभावाचे ते कारण की परिणाम हा प्रश्न कठीण आहे; पण नव्या सहस्रकाची दोन ठळक वैशिष्टय़े सांगता येतील. एक तर, आध्यात्मिक दृष्टिकोनाने नव्या कालखंडात भक्तिमार्गावर वाटचाल सुरू केली. त्यामुळे व्यावहारिक जीवनात कोठलाच फरक पडला नाही. अध्यात्म आणि व्यवहार यातील विसंगती, किंबहुना विरोध भक्ती आणि संसार या द्वंद्वात चालू राहिला. त्यामुळे संसाराला विचाराची शक्ती प्रगत करू शकली नाही आणि विचाराला व्यवहारवास्तवाचे दर्शन झाले नाही. त्याचप्रमाणे विचाराच्या सामाजिक एकीकरणाचे सामथ्र्यही कुणा द्रष्टय़ाच्या लक्षात आले नाही.

तत्त्वज्ञानाची वसाहत
माणसाने ताजमहाल बांधले, पिरॅमिड उभे केले, मोठमोठी धरणे तयार केली आणि अशा कितीतरी असंख्य आश्चर्यकारक गोष्टी निर्माण केल्या; पण या सर्वाच्या एकत्रित आश्चर्यापेक्षा अधिक आश्चर्यकारक असे त्याचे कार्य म्हणजे त्याने विचारांच्या शाश्वत वसाहती वसविल्या, ज्या आपापल्या प्रकाशाने मानवी मनाला सदैव आकर्षित करीत असतात. या विचारवसाहतीत सर्वात महत्त्वाची वसाहत आहे तत्त्वज्ञानाची. मूलगामी अशा विविध विचारांची उभारणी हा तत्त्वज्ञानाचा विषय. त्यामुळे विचारविश्वात त्याला अग्रेसरत्व मिळणे अपरिहार्य आहे.

युरोप-अमेरिकेत अजूनही तत्त्वज्ञान ‘जिवंत’ आहे, पण मुख्यत: इंटेलेक्च्युअल/अ‍ॅकॅडमिक वर्तुळांमध्ये ‘न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्स’, ‘न्यू लेफ्ट रिव्ह्यू’ ही व अशी नियतकालिके मूलभूत तत्त्वचिंतनाचे विषय हिरीरीने मांडतात, त्यावर वाद-चर्चाही होतात. भारतात अलिकडेच सुरू झालेले ‘द लिटल् मॅगेझिन’ काही प्रमाणात कला, तत्त्वज्ञान, साहित्य अशा संदर्भात मांडणी करते. महाराष्ट्रात ‘परामर्श’, ‘नवभारत’, ‘नवे विश्व’ असे काही नियतकालिकीय उपक्रम आहेत, पण त्यांना न्यूयॉर्क रिव्ह्यू ऑफ बुक्सचे विस्तीर्ण क्षितिज प्राप्त झालेले नाही. साहजिकच आपल्याकडील बहुतेक साहित्यिक चर्चा, राजकीय वाद, समाजशास्त्रीय टीका-टिपणी इत्यादी तत्त्वज्ञानविरहित असते. कधी कधी तात्त्विकतेचा, नैतिक मुद्दय़ांचा वा समाजशास्त्रीय प्रबोधनाचा आविर्भाव असतो, पण फारच वरवरचा. गांधीजी, पंडित नेहरू, कॉम्रेड डांगे असे काही मोजके शिलेदार सोडले, तर गेल्या काही वर्षांंत तत्त्वज्ञान क्षेत्र वाळवंटसदृश आहे.
त्यामुळे देशातील/महाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाची चर्चा मुख्यत: भगवद्गीता (महाभारत), ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा व इतर संतसाहित्य यांच्या पलीकडे समकालीन झालेली नाही. आपल्याकडील सर्व तत्त्वज्ञानाच्या चर्चा या संतसाहित्याच्या, अध्यात्माच्या व धर्मवाङ्मयाच्या संदर्भात होतात. आजचे, आधुनिकतेचे, विज्ञान वा गणिताचे, समाजशास्त्राचे संदर्भ घेऊन तत्त्वज्ञानाची चर्चा होत नाही.

अरबांमधले श्रेष्ठ तत्त्वज्ञ
अल्-किंडी, अल्-फराबी आणि इब्न-सिना (पाश्चात्त्य नाव, Avicenna) हे तिघे अरबांमधले श्रेष्ठ तत्त्वज्ञ. अल्-किंडी (इ. स. ८००-८७०) हा अरबांचा पहिला  तत्त्वज्ञ. त्याने इतर विचारवंतांप्रमाणेच, ग्रीक तत्त्वज्ञान, विशेषत: अ‍ॅरिस्टॉटलचे तत्त्वज्ञान, प्रसृत केले. तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र यातील फरक स्पष्ट करून त्याने विचारस्वातंत्र्यावर भर दिला. ‘तुम्हाला माहीत आहे ते मला माहीत आहे, पण मला माहीत आहे ते तुम्हाला माहीत नाही.’ असे बोलून त्याने तत्त्वज्ञानाच्या वतीने एका धर्मशास्त्राला सुनावले. अल्-फराबीने आपल्या ‘इहसा-अल्-उलम’मध्ये ज्ञानाची वर्गवारी करून ते संघटित करण्याचा प्रयत्न केला. त्यातील प्रमुख वर्ग आहेत भाषिकशास्त्रे, तर्कशास्त्र, गणितशास्त्र, खगोलशास्त्र आणि दृकशास्त्र (Optics), पदार्थविज्ञान, अध्यात्म, राज्यशास्त्र, धर्मशास्त्र. इब्न सिन्नानेही (Avicenna  इ. स. ९८०-१०३७) प्लेटो, अ‍ॅरिस्टॉटल आणि कुराण यांचा संयोग साधण्याचा प्रयत्न केला.

अर्थातच, विज्ञान- तत्त्वज्ञान यातील संबंध अधिकाधिक घनिष्ट होत असताना दिसत असूनही आपल्याकडील बहुतेक विज्ञान लेखन हे ‘निखळ’ वैज्ञानिक ठेवण्याकडेच बहुतेक विज्ञान लेखकांचा कल असतो. तत्त्वज्ञानाची अशी उपेक्षा ही सामाजिक- सांस्कृतिक स्थितीशीलतेचे लक्षण आहे. अशा स्थितीशीलतेमुळे ऱ्हास होण्याची शक्यता असते, कारण ‘स्थिती’ फार काळ ‘स्थिर’ राहत नाही.
आपल्याकडे अध्यात्म, साक्षात्कार, अनुभूती या संकल्पनांविषयीसुद्धा अनेक भ्रम वा गूढ आहे. भारत हा एक आध्यात्मिक देश आहे, असे आपणच जगाला सांगितले आहे.

या आत्मसंतुष्ट करणाऱ्या गैरसमजामुळेच आपल्याकडे मूलभूत तत्त्वचिंतन, वैज्ञानिक संशोधन आणि  सखोल समाजशास्त्रीय/मानसशास्त्रीय विचार विकसित होताना दिसत नाही. वस्तुत: ‘विचारविश्व’ हे सर्वव्यापी मानायला हवे. सोयीसाठी भारतीय, युरोपियन, चिनी, अरब इ. तत्त्वज्ञान परंपरा मानणे वेगळे आणि दुराभिमानापोटी ‘भारतीय तत्त्वज्ञान जगात सर्वश्रेष्ठ आहे’ असे म्हणणे वेगळे. असा दुराभिमान भारतातच आहे असे नाही, तर युरोपात, चीनमध्ये वा अरब-मुस्लिम देशांमध्येही आहे. त्यातूनच ‘जिहादी’ प्रवृत्ती, अतिरेकी धर्मवाद, उग्र परंपरावाद निर्माण होतात. असा प्रक्षोभक अभिमान फक्त ‘इस्लामी’च असतो असे अजिबात नाही. कडव्या ज्यूंचा ‘झायोनिझम’ तेवढाच हिंसक आणि आक्रमक आहे. ‘हिंदुत्व’ ही स्वत:ला ‘सहिष्णू’ म्हणत म्हणत किती असहिष्णू होते हे आपल्या देशातील ‘खाप’ पंचायती, दलितांवरील अत्याचार आणि अतिरेकी भाषावाद यातून दिसले आहे. शिवाय ‘लढाऊ’ हिंदुत्ववाद म्हणजेच पराकोटीचा मुस्लिमद्वेषही आपल्या तथाकथित सहिष्णुतेत बसतो.

पाश्चिमात्य संस्कृतीतही उग्र व असहिष्णू कॅथलिक व प्रोटेस्टंट ख्रिश्चन संघटना आहेत, पण एकूण तत्त्वविचारात धर्मशास्त्रे-पुराणे आणि तत्त्वज्ञान हे एकमेकांपासून विभक्त झाले आहेत. ही प्रक्रिया अर्वाचीन अर्थाने रेनेसाँपासून म्हणजे सुमारे पाच-सहाशे वर्षांंपूर्वीपासून सुरू झाली. आजही पाश्चिमात्य देशांत जे तत्त्वसंशोधन व तत्त्वचिंतन होते. त्यातूनच आधुनिक विज्ञानही प्रगत होत आहे. विज्ञान-तत्त्वज्ञान हे एकमेकांत सर्जनशील चिंतनातून मिसळून गेल्यामुळेच ‘जीवन म्हणजे काय?’, ‘कॉन्शियसनेस म्हणजे काय?’, ‘ज्ञान म्हणजे काय?’, ‘विश्व म्हणजे काय?’, ‘जीवसृष्टी म्हणजे काय?’ आणि ‘काळ-टाइम म्हणजे काय’, असे प्रश्न एकदम विज्ञान- तत्त्वज्ञानात शोधले जात आहेत. ‘अंतिम सत्य’ आणि ‘संपूर्ण सत्य’ कधीही माणसाला प्राप्त होणार नाही, हे माहीत असूनही हा शोध अथकपणे सुरू आहे.

बुद्ध विचार : निर्वाण हेच मोक्ष
जैन विचार आणि जैन धर्म भारतात निर्माण झाला तरी तो भारतापुरताच मर्यादित राहिला. बौद्ध विचार आणि बौद्ध धर्मही भारताबाहेर- नेपाळ, श्रीलंका, चीन, जपान, म्यानमार, तिबेट आणि इतर आशियन देशांत पसरला. मात्र ज्या भागात तो जन्मला तेथे तो राहिला नाही. बौद्ध धर्माचा संस्थापक सिद्धार्थ (इ. स. पू. ५६३-४८३) ऐषआरामात वाढलेला राजपुत्र. भोवतालचे दैन्य आणि दु:ख पाहून त्याला उपरती झाली आणि माणसाच्या अशा दु:खापासून मुक्ती मिळविण्याच्या मार्गाचा शोध लावण्याचा त्याने ध्यास घेतला. त्यासाठी राजसंन्यास घेऊन त्याने तपश्चर्याही केली. शेवटी माणसाच्या दु:खाचे मूळ त्याच्या इच्छा, अभिलाषा, आसक्ती यांमध्ये आहे, तेव्हा त्यांचा (म्हणजेच मीपणाचा) त्याग करून (मोक्षवत) निर्वाण पदाला माणूस पोहोचू शकला तरच त्याची मुक्तता होऊ शकेल, अशा निष्कर्षांला तो येऊन पोहोचला.

या ‘ज्ञान-शोधयात्रे’चे सर्वार्थाने चित्तवेधक आणि उत्कंठावर्धक निवेदन करणारे पुस्तक म्हणजे डॉ. के.रं. शिरवाडकर यांचे ‘राजहंस प्रकाशन’ने प्रसिद्ध केलेले ‘आपले विचारविश्व’. या नावातील ‘आपले’ हा शब्दही महत्त्वाचा आहे. हा ‘आपले’ शब्द म्हणजे ‘भारतीय’ वा ‘हिंदू’ या अर्थाने नाही. ‘आपले’ म्हणजे अवघ्या माणसांचे विचारविश्व कसे घडत गेले, त्यातूनच ज्ञान-विज्ञानाच्या कक्षा कशा रुंदावत गेल्या. सौंदर्यशास्त्रापासून नीतीशास्त्रापर्यंत आणि राजकारणापासून विज्ञानापर्यंतच्या संकल्पना कशा सिव्हिलायझेशनच्या संदर्भात विकसित व उत्क्रांत होत गेल्या. याचा मागोवा म्हणजे हे पुस्तक. (‘ग्रंथ’हा शब्द मुद्दामच वापरलेला नाही. कारण ‘ग्रंथ’ हा विद्वानांसाठी आणि ‘ग्रंथालयासाठी’ असतो आणि ‘पुस्तक’ हे कुणीही वाचण्यासाठी असते असे उगाचच काहींना वाटते.) शिरवाडकरांचे हे पुस्तक अगदी अनभिज्ञ वाचकालाही खिळवून ठेवू शकेल इतके वाचनीय व सुलभ झाले आहे.

वर म्हटल्याप्रमाणे या ‘विचारविश्वा’चे स्थूल भौगोलिक व सांस्कृतिक विभाग शिरवाडकरांनी केले आहेत, पण त्याचा हेतू एखादी विशिष्ट विचारतत्त्व परंपरा दुसऱ्या परंपरेपेक्षा श्रेष्ठ वा कनिष्ठ आहे हे दाखविण्यासाठी नव्हे, तर आपल्या ऐतिहासिक व पारंपरिक गृहितकांचा आधार घेतला तर समजायला अधिक सोपे जाईल म्हणून. ‘तत्त्वज्ञान’ हा विषय कठीण, गंभीर, बोजड आणि कंटाळवाणा (बोअरिंग) आहे, असा जो समज आहे. तो पूर्णपणे दूर करण्याचे सामथ्र्य या पुस्तकात आहे. ‘प्राचीन’ म्हणजे प्रगल्भ आणि आधुनिक म्हणजे उथळ असाही एक तत्त्वज्ञानाबद्दलचा समज आहे. भारत (वा चीन, अरब) यांचा तत्त्वज्ञानाचा इतिहास प्राचीन आहे आणि म्हणून ते चिंतन अधिक श्रेष्ठ व मूलभूत आहे, असा एक ‘गर्व’ भारतात आहे. तो दूर व्हायलाही या पुस्तकाने मदत होईल. भारतातील प्राचीन तत्त्वचिंतन किती विलक्षण, मूलभूत व सखोल होते, हे दाखवितानाच युरोपातील तत्त्वचिंतन कसे उत्क्रांत होत गेले आणि भारत प्राचीनत्वाच्या सापळ्यात कसा अडकत गेला, हेही पुस्तक वाचताना उलगडत जाते.
वस्तुत: जैनांचे महावीर वर्धमान, बौद्धांचा सिद्धार्थ ऊर्फ गौतम बुद्ध, चिन्यांचा कन्फ्यूशियस आणि ग्रीकांचा सॉक्रेटिस वा प्लेटो यांच्यातील ऐतिहासिक अंतर फार नाही.

वेद : ‘वेदोऽखिलो धर्ममूलम्’
भारतीय जीवनाच्या विराट वृक्षाची पाळेमुळे वेदोपनिषदांच्या जमीन-पाण्यात पोसली गेली आहेत. वेदवाङ्मय हा भारतीय विचाराचा मूळ स्रोत. वेदांविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध असल्याचा दावा कुणालाही करता येणार नाही; पण त्यासंबंधी झालेल्या संशोधनातून जे समजते, त्यावरून वेदांच्या निर्मितीचा काळ इ. पू. १२००-१५०० असावा.  पश्चिम आशियातून भारताकडे आलेल्या आर्याच्या टोळ्यांनी लिहिलेले वाङ्मय काही भागांत तिकडेच लिहिलेले असावे. त्यामुळे भूमध्ये समुद्रालगतच्या प्रदेशांपासून तर भारतीय प्रदेशांपर्यंतच्या मानवगणांची आणि प्रदेशांची नावे वेदातील नावांशी जुळतात. वेदांचा काही भाग (ऋग्वेद आणि यजुर्वेद) पंजाबच्या भूमीवर लिहिला गेला असावा. संस्कृतमधल्या ‘विद्’ (जाणणे) या धातूपासून या वाङ्मयाला ‘वेद’ म्हणजे ज्ञान हे नाव मिळाले. ‘ईप्सित फलाची प्राप्ती आणि अनिष्ट गोष्ट दूर करण्याचा मानवी बुद्धीला अगम्य उपाय जो ग्रंथ दाखवून देतो तो वेद,’ असे सायणाचार्यानी म्हटले आहे. परमेश्वराच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द म्हणूनही वेदांचे वर्णन करण्यात येते. मनूच्या मते वेद सर्व धर्माचे मूळ आहे. (‘वेदोऽखिलो धर्ममूलम्’) वेद चार आहेत- ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद;  आणि ते वेगवेगळ्या काळात लिहिले गेले आहेत. वेदांचे संहिता, ब्राह्मणे, आरण्यके आणि उपनिषदे असे चार भाग पडतात. वेद मंत्रांतून किंवा ब्राह्मणांतून लिहिले गेले आहेत. मंत्र पद्यात आणि ब्राह्मणे गद्यात आहेत. प्रत्येक वेदात दोन्ही प्रकारचे आविष्कार असले, तरी प्रमाण वेगळे आहेत. ऋग्वेद मुख्यत: मंत्रांतून म्हणजे पद्यातून, तर यजुर्वेद गद्यातून आहे. मंत्रांचा संग्रह ‘संहिता’ या संज्ञेने ओळखला जातो.

महावीर वर्धमान (इसवी सन पूर्व ५४०-४६८)
गौतम बुद्ध (इसपू ५६३-४८३)
कन्फ्यूशियस (इसपू ५५१-४७९)
सॉक्रेटिस (इसपू ४६९-३९९)
प्लेटो (इसपू ४२७-३४७)
म्हणजे हे सर्व तत्त्वज्ञ साधारणपणे अडीच हजार वर्षांंपूर्वीचे आहेत. त्यांनी केलेले तत्त्वचिंतन आजही संदर्भ व व्यवहारयुक्त वाटते. यावरूनच त्यांच्या विचारातील कमालीची प्रगल्भता आणि काही प्रमाणात कालातीतता लक्षात येईल. मग कुणी म्हणेल की तत्त्वज्ञानाचा ‘विकास’ व अधिक ‘संशोधन’ करायची काय गरज?

सामान्यता संपादन
कॉलेजमध्ये आणि विद्यापीठात असताना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मी मराठवाडय़ातून शक्यतो शोध-निबंधासह सहभागी होत असे. अशा परिषदांमधील चर्चासत्रांमध्ये एक चमत्कारिक गोष्ट माझ्या लक्षात येई. एक तर महाराष्ट्रीय प्राध्यापकांची उपस्थिती कमी. जे उपस्थित असत ते केविलवाणे होऊन बसत. ज्येष्ठ प्राध्यापक उद्घाटन कार्यक्रमाला नटूनथटून बसत आणि नंतर जवळपासची प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी अदृश्य होत. चर्चासत्रे, त्यांच्या दृष्टीने, मूर्खाचा बाजार असे. वस्तुत: चर्चासत्रांत शोधनिबंध सादर करणे, स्वत:च्या आणि इतरांच्या निबंधांवर वाद घालणे, ज्ञान देणे आणि घेणे यात एक विशेष आनंद होता आणि हे प्राध्यापक त्याला मुकत होते. अशा परिषदांमधून, चर्चासत्रांतून, विद्यापीठे आणि महाविद्यालये यातील मराठी बुद्धिजीवींचे काही दोष लक्षात आले ते म्हणजे बेट प्रवृत्ती (Insularity, स्वत:ला अलग ठेवण्याची सवय), त्यामुळे येणारा आत्मविश्वासाचा अभाव, अनुभवांच्या विविधतेला दिलेल्या नकारामुळे येणारा मानसिक मागासलेपणा, न्यूनगंडातून आत्मतुष्टीसाठी निर्माण झालेला इतरेजनांबद्दलचा तुच्छता भाव आणि इतर भाषांमध्ये; पण विशेषकरून इंग्रजीमधील दुर्बलता. त्यामुळे मराठी माणूस अथवा त्याचे म्हणणे क्वचितच लक्षवेधी ठरे. कित्येक वेळा मराठी वृद्धिंगत आपला कमकुवतपणा इतरांबद्दलच्या तुच्छता वृत्तीने झाकण्याचा प्रयत्न करतात. जणू हे टिळक, राजवाडे, केतकर, शेजवलकर यांच्या बैठकीतले, त्यांचे वारसदार!

महाराष्ट्रात टिळक, राजवाडे यांच्यासारख्या श्रेष्ठ विचारवंतांची परंपरा नाहीशी का झाली हे एक कोडेच आहे. आज या परंपरेला शोभणारे आणि परिस्थितीला अनुरूप असे प्रगल्भ विचार देणाऱ्यांची किती नावे घेता येतील? हा प्रश्न सविस्तर संशोधनाचा आहे. (त्यात अनेक कारण समाविष्ट असू शकतील.) पण एक कारण सहज जाणवते. महाराष्ट्रातील शिक्षणसंस्था, विशेषकरून महाविद्यालये आणि विद्यापीठे यांना आपली जबाबदारी पेलता आली नाही. १९५० नंतर जागतिक ज्ञान ज्या गतीने पुढे जात होते त्याचा महाराष्ट्रातील उच्चशिक्षण क्षेत्रात पत्ताही नव्हता. बेप्रवृत्ती आणि इतरांविषयी तुच्छता, आत्मतुष्टी आणि संकुचित दृष्टी यांनी उच्चशिक्षण ग्रासले गेले. परिणामी मराठी विद्यार्थी, म्हणजेच मराठी मन सामान्य गुणवत्तेकडे ढकलले जात होते. त्यात इंग्रजीतला कच्चेपणा! त्यामुळे ‘सामान्यता संपादन’ (Achievement of mediocrity) हा महाराष्ट्रातील उच्चशिक्षणाचा आदर्श बनला!

या वरवर साध्या वाटणाऱ्या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या भागात ‘पश्चिमेचा विचारविकास’ आणि तिसऱ्या भागात ‘वास्तवाचे वेध’ यात सापडू शकेल. त्याचप्रमाणे पाचव्या भागात ‘विज्ञान आणि धर्म’ आणि अखेरच्या ‘सफर संपवताना’ या प्रकरणात वाचकाला मिळते. पुस्तक वाचता वाचताच आपण अंतर्मुख होत राहतो आणि वाचून संपल्यावर परत परत मागील प्रकरणांकडे वळत राहतो. माझा अनुभव तर असा आहे की, दुसऱ्यांदा (कुठूनही वाचायला सुरुवात करूनही) वाचताना आकलनाचा आनंद पाचपट होतो. ज्या थोर तत्त्वज्ञांची फक्त नावेच कानावरून गेलेली होती ती माणसे डोळ्यांसमोर त्यांच्या कालसंदर्भासहित उभी राहू लागतात आणि आपल्याला पडणाऱ्या चिरंतन प्रश्नांची उकल करण्याचा  त्यांनी कसा प्रयत्न केला, हे लक्षात आल्यावर आपले विचारविश्व इतके संकुचित का राहिले, याची खंतही वाटू लागते.

आपल्याकडील अनेक सुशिक्षितांनाही अरब व इस्लाम वा (मुस्लिम) हे समानार्थी शब्द वाटतात. प्रत्यक्षात इस्लामच्या अगोदरही अरब संस्कृती उदयाला आली होती. शिवाय अरबांमध्येही ख्रिश्चन अरब, ज्यू अरब आणि धर्मविरहित पाखंडी अरब आहेतच. पण तो काळ बाजूला ठेवू या. आपल्याकडील दुसरा गैरसमज म्हणजे इस्लामचे तत्त्वज्ञानच प्रतिगामी, परंपरावादी/सनातनी व उग्रवादी आहे.

सफर संपवताना
विचारविश्वातील (बहुधा कष्टदायक) सफर संपवताना एक गोष्ट लक्षात येते, की गेल्या काही हजार वर्षांतील माणसाचे विचार एखाद्या अथांग, अमर्याद सागरासारखे पसरले आहेत. एका पुस्तकाच्या ओंजळीने त्या सागरातले कितीसे पाणी आपण साठवू शकणार? शेवटी या सागराचे समग्र, सम्यक दर्शन प्रत्येकाने आपापल्या अध्ययनाची नाव सागरात लोटून घ्यावे हे श्रेयस्कर. त्यातील थरार (Thrill) हा तात्काळ आणि निश्चित लाभ. मात्र विचारांच्या इतिहासात शिरताना एक पथ्य पाळणे आवश्यक आणि लाभदायकही असते. या प्रयासात आग्रह, दुराग्रह बाजूला ठेवूनच संचार करणे उचित. दुराग्रहांच्या धुक्यातून विचारसृष्टीचे स्पष्ट, समग्र ज्ञान मिळणे शक्य नाही आणि हे लक्षात न घेतल्यास हाती लागते ते अज्ञान. ज्ञान म्हणून दुराग्रही अज्ञानाचे वितरण हा वैचारिकच नव्हे, तर नैतिक भ्रष्टाचार समजला पाहिजे. हे मान्य, की विचारक्षेत्रात संपूर्ण वस्तुनिष्ठता एक भ्रम असतो; पण हेही खरे, की परिपक्व मन दुराग्रहानेच सुरुवात करणार नाही. शेवट आग्रहात व्हावा, पण प्रारंभ दुराग्रहाने होऊ नये.

माणसाचा पृथ्वीवरील इतिहास लक्षावधी वर्षांचा आहे. निसर्गाने सर्व प्राणिमात्रांना बुद्धीचे वरदान दिले, पण त्यात माणूसच एवढा वरचढ कसा ठरला? लक्षावधी वर्षांपूर्वी माणसाच्या (ज्या वेळी तो चिंपाझी अधिक आणि माणूस कमी होता) इतिहासात क्रांतिकारक उत्क्रांती घडली. माणूस या काळात मागील दोन पायांवर उभा राहून चालू लागला. या उभ्या माणसा  (Homo-Erectus) चे ‘हात’ (म्हणजे पुढील दोन पाय) मोकळे झाले. हातांनी तो कुशलतेची कामे करू लागला. (उदा. दगडाची हत्यारे बनविणे). बुद्धी (विचार) आणि हाताचे कौशल्य (कृती) यांच्या अन्योन्य सहकार्यातून त्याच्या प्रगतीची वाटचाल सुरू झाली. त्यातूनच तो पशू अवस्थेतून मानवी अवस्थेत आला. निसर्गावर प्रभुत्व प्रस्थापित करणाऱ्या त्याच्या बौद्धिक क्षमतेच्या प्रभावांचा प्रारंभ असा झाला. इतर प्राणी मात्र निसर्गाने दिलेल्या चौकटीतच राहिले- आजपर्यंत.

शिरवाडकरांनी ‘पूर्वेची प्रज्ञा’ या पहिल्या भागात भारतीय विचारातील वेद, जैन व बौद्धवाद याचबरोबर ‘इस्लामचे योगदान’ही सांगितले आहे. सुमारे दीड हजार वर्षांंपूर्वी झालेल्या इस्लामच्या उदयानंतर त्या धर्मातील विचारवंतांनी कसे ‘वैचारिक जागतिकीकरण’ अंगीकारले हे पुस्तकात आहे. अरबांचा इस्लाम काळातील पहिला तत्त्वज्ञ अल्किंडी हा ग्रीक तत्त्वज्ञानाचा प्रसारक होता आणि इस्लामला ‘कोंडून’ ठेवणाऱ्यांच्या विरोधात त्या काळी कसे वैचारिक-तात्त्विक प्रयत्न झाले, हेही शिरवाडकर सांगतात. पण पुढे इस्लामी उदारमतवादाला काही प्रमाणात ग्रहण लागत गेले आणि इस्लामी समाजाला स्थितीशीलता येऊ लागली. तत्त्वज्ञानाची व विज्ञानाची उपेक्षा केल्यावर काय होते याचा तो पुरावा आहे. (पण या पुस्तकात एकूण अरब सिव्हिलायझेशन व फिलॉसॉफीबद्दल अधिक यायला हवे होते. असो.)