Posts Tagged ‘कुरुंदकर’

सौजन्य – लोकसत्ता

साधना प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘तारांगण’ या सुरेश द्वादशीवार लिखित व्यक्तिचित्र-संग्रहाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी दिलीप माजगावकर  यांनी केलेले भाषण..

————————————————————————
समारंभाचे अध्यक्ष रा. ग. जाधव, ‘तारांगण’ पुस्तकाचे लेखक सुरेश द्वादशीवार, ‘साधना’चे संपादक नरेंद्र दाभोलकर आणि मित्रहो.. सुरुवातीलाच एक गोष्ट मोकळेपणाने सांगतो की, या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी यावं, म्हणून मला डॉ. दाभोलकरांचा फोन आला तेव्हा, इतर काही अडचणींमुळे मी येऊ शकणार नाही, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी माझ्याकडे विनोद शिरसाठ आले आणि त्यावेळी झालेल्या गप्पांमध्ये त्यांनी माझ्या नकाराचा ‘होकार’ करून घेतला. आता मी न येण्यामागचं खरं कारण काय होतं, ते सांगतो. एखादी मुलगी आपल्याला आवडावी, नजरेत भरावी, तिच्याविषयी आपण काही विचार करावा आणि तिचं कोणाशीतरी लग्न व्हावं, इथपर्यंत ठीक आहे. कारण असे अनुभव अनेकांना येतातच. पण त्याच मुलीच्या लग्नाला मंगलाष्टकं म्हणण्यासाठी जाण्याची आपल्यावर वेळ यावी, हा खरोखरच कठीण प्रसंग असतो. या पुस्तकाच्या बाबतीत असंच काहीसं झालं. म्हणजे ‘तारांगण’ ही लेखमाला गेल्या वर्षी ‘साधना’ साप्ताहिकातून क्रमश येत होती तेव्हा मी ती वाचत होतो आणि दोन-चार व्यक्तिचित्रं वाचून झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, इथे व्यक्तिचित्रणातला काहीसा वेगळा बाज, काहीसा वेगळा ऐवज आहे आणि हा दागिना आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून मग माझ्या ओळखीच्या मृणाल नानिवडेकर यांच्या माध्यमातून द्वादशीवारांना फोन केला आणि म्हणालो, ‘मला ही लेखमाला आवडतेय. इतर कोणाशी तुमचं बोलणं झालेलं नसेल तर मला हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन’कडून करायला आवडेल.’ पण द्वादशीवार म्हणाले, ‘अलीकडेच माझं ‘मन्वंतर’ हे पुस्तक ‘साधना’ने प्रकाशित केलंय. आणि याही पुस्तकात त्यांनी रस दाखवलाय. त्यामुळे साहजिकच हे पुस्तक त्यांच्याकडून येईल.’ तर अशा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दाभोलकरांनी मला बोलावलं, हे माझ्या नकारामागचं कारण होतं. पण ते काहीही असो, ‘साधना’ने हे पुस्तक चांगलं केलंय. मुलगी खऱ्या अर्थाने सुस्थळी पडली, असं मी मनापासून म्हणतो. आणि द्वादशीवारांना आनंद वाटावा अशी गोष्ट सांगतो की, आजकाल बहुसंख्य प्रकाशकांना प्रकाशनासाठी आलेली हस्तलिखितं परत कशी करावी, ही विवंचना असताना त्यांचं पुस्तक दोन-तीन प्रकाशन संस्थांना प्रकाशित करावंसं वाटणं, ही ‘तारांगण’च्या वाङ्मयीन गुणवत्तेची पावती आहे असं त्यांनी समजावं.

‘तारांगण’ हा १६ व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. (अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, सुरेश भट, बाबा आमटे, राम शेवाळकर, मारोतराव कन्नमवार, प्रमोद महाजन, जन्रेलसिंग िभद्रनवाले, तारकेश्वरी सिन्हा, सविता डेका, राजे विश्वोश्वर राव, चौधरी चरणसिंह, विष्णुदत्त शर्मा, एम. एफ. हुसेन, जनार्दन पांडुरंग) सुंदर व्यक्तिचित्र कसं असतं, तर ती त्या व्यक्तीची लेखकाने वाचकांशी घडवून दिलेली ‘थेट भेट’ असते. त्या भेटीत लेखक उपस्थित असतो, ते केवळ त्या दोघांची ओळख करून देण्यापुरता, किंवा गरज पडली तर ती ओळख पुढे सरकवण्यापुरता! माझ्या कल्पनेप्रमाणे, चांगल्या व्यक्तिचित्रणात लेखक एका मर्यादेपेक्षा जास्त स्वतला वाचकांवर लादत नाही, किंवा त्या व्यक्तीच्या बुरख्याआडून स्वत: वारंवार डोकावूनही बघत नाही. या दोनही निकषांवर द्वादशीवारांची व्यक्तिचित्रं फार सरस उतरली आहेत.

आपल्याला माहीत आहे की, मराठीत व्यक्तिचित्रांची मोठी परंपरा आहे. अगदी चार-सहा नावं सांगायची म्हटली तर श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, विजय तेंडुलकर, ह. मो. मराठे अशी सांगता येतील. अलीकडच्या काळात विनय हर्डीकर, रामदास भटकळ यांनीही चांगली व्यक्तिचित्रं लिहिली आहेत. या सर्व लेखकांनी सातत्याने लेखन करून व्यक्तिचित्रांची ही परंपरा सकस, समृद्ध आणि वाहती ठेवली आहे. या प्रत्येकाचं त्या व्यक्तीकडे बघणं वेगळं आहे. लेखन वेगळं आहे. त्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. या पाहण्यात व दृष्टिकोनात कसा फरक पडतो, हे चटकन समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरण देतो. माधव आचवल यांच्यावर जवळपास एकाच काळात पु. ल. देशपांडे, सुनीताबाई व विजय तेंडुलकर या तिघांनी लिहिलं आहे. ही तीनही व्यक्तिचित्रं एकाच वेळी व सलग वाचा, म्हणजे मग मला काय म्हणायचंय, ते नेमकेपणाने समजून येईल. ही तीनही व्यक्तिचित्रं उत्तमच आहेत. व्यक्ती एकच आहे, बघणारे तिघे आहेत. तिघेही साहित्यातील मातब्बर आहेत. पण तिघांच्या बघण्यात, दृष्टिकोनात व लिहिण्यात फरक आहे. पु.लं. ना माधव आचवल त्यांच्या अंतर्बाह्य़ गुणदोषांसकट नक्कीच समजलेले असणार. पण तरीही का कोण जाणे, लेखनापुरती पु.लं.नी ‘गुण गाईन आवडी’ अशी भूमिका ठेवलेली असल्याने त्यांच्या लेखनात एक सरळ साधेपणा आणि आज तर काही प्रसंगी भाबडेपणा वाटावा असा भाग वाटतो. तर ‘माधव मला असा दिसला, तो असा होता आणि तो असाच होता,’ असा काहीसा आग्रही व थोडासा उंच स्वर सुनीताबाईंच्या लेखात दिसतो. आणि माधव असा असावा, निदान मला तो असा दिसला, आणि मला दिसला त्यापलीकडे तो बरंच काही होता, पण मला तो समजला नाही, मी जे काही मांडलंय ते तुम्हाला पटतंय का बघा, अशी तेंडुलकरांची भूमिका दिसते. मला व्यक्तिश: तेंडुलकरांची भूमिका आवडते. आणि द्वादशीवारांची भूमिका तेंडुलकरांच्या भूमिकेसारखी आहे, म्हणूनही कदाचित ‘तारांगण’मधील व्यक्तिचित्रे मला अधिक आवडली असतील.

आपल्या भूमिकेबाबत द्वादशीवारांनी प्रस्तावनेतच एक वाक्य असं लिहिलंय की, ‘मला माणूस समजून घ्यायला आवडतो आणि त्यासाठी मी त्याच्या भूमिकेत जाऊन त्या माणसाच्या आनंदाच्या, दुखाच्या, अडचणीच्या, तडजोडीच्या, महत्त्वाकांक्षेच्या ज्या काही जागा असतील, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो..’ माणसं समजून घेण्याची द्वादशीवारांची ही समज फार प्रगल्भ आहे. ते माणसाकडे एकाच खिडकीतून, एकाच कोनातून बघत नाहीत. ते अनेक कोनांतून बघतात. इतकेच नाही तर वाचकालाही ते व्यक्तिचित्र वाचून झाल्यावर त्या व्यक्तीविषयी विचार करण्यासाठी अनेक दिशा मोकळ्या ठेवतात. त्यांच्या व्यक्तिचित्रणात त्या व्यक्तीच्या बाह्य़ जीवनाचा तपशील तर वाचकाला मिळतोच, महत्त्वाच्या घडामोडीही मिळतात, पण त्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध द्वादशीवार घेताना दिसतात. आपल्या सगळ्यांनाच दुसऱ्या व्यक्तीविषयी एक प्रकारचं कुतूहल असतं. त्यात ती व्यक्ती दिसते कशी, वागते कशी, बोलते कशी, त्याही पलीकडे ती व्यक्ती एखाद्या प्रसंगात, एखाद्या घटनेच्या वेळी विचार कसा करते, त्यावेळी त्या व्यक्तीचं मानसिक चलनवलन कसं चालतं, हे जाणून घेण्याविषयी अधिक कुतूहल असतं. याच कुतूहलातून द्वादशीवारांसारखा लेखक जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या अंतरंगात जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते व्यक्तिचित्रण आपल्याला अधिक भावतं, मनावर अधिक परिणाम करून जातं.

चांगलं व्यक्तिचित्रण कसं असतं, याविषयीची या पुस्तकाबाहेरची दोन उदाहरणं सांगतो. नेपोलियनचं चरित्र आपण सर्वानीच त्या- त्या काळात वाचलेलं असतं. नेपोलियन, त्याच्या लढाया, त्याचं सहकाऱ्यांबरोबरचं वागणं याची ढोबळमानाने माहिती आपल्याला असतेच. पण हा नेपोलियन त्याच्या जनरल्सची निवड कशी करायचा, यासंदर्भातील एक मार्मिक आठवण त्याच्या एका चरित्रकाराने सांगितली आहे. तो त्याच्या जनरलची निवड करताना उमेदवाराचा बायोडाटा मागवून घ्यायचा. त्याने केलेल्या लढाया, त्याची घरची परिस्थिती, त्याचं जगणं, वागणं याचा बारकाईने अभ्यास करायचा. पण अंतिम निर्णय घेताना मात्र तो त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्याला विचारायचा, Tell me, is he lucky? तो नशीबवान आहे का, हे मला सांग; बाकी मला सर्व कळलं. आता ही साधी आठवण नेपोलियनच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन जाते.

दुसरा एक प्रसंग पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या चरित्रातील आहे. इंदिरा गांधींची इंग्रजीत अनेक चरित्रं आहेत. पण पुपुल जयकरांनी लिहिलेलं चरित्र विशेष उजवं समजलं जातं. याची दोन कारणं आहेत. एक तर त्या इंदिरा गांधींच्या निकट होत्या आणि दुसरं म्हणजे त्या जे. कृष्णमूर्तींच्या सहवासात असल्याने त्यांच्या विचारांना तत्त्वज्ञानाची भक्कम बठक होती. या वैचारिक बठकीतूनच त्या दुसऱ्या व्यक्तीकडे बघत असत. त्यामुळे ते चरित्र दर्जाच्या दृष्टीने इतर चरित्रांपेक्षा उजवं वाटतं. त्या पुस्तकातला एक प्रसंग आहे. संजय गांधींचं विमान अपघातात निधन झाल्यावर त्यांच्या शवाशेजारी इंदिराजी उभ्या आहेत. मोठमोठे लोक शोकसमाचाराला येत आहेत. नमस्कार करताहेत. इंदिराजी त्यांच्याशी उपचाराची एक-दोन वाक्ये बोलताहेत आणि मग ते लोक निघून जाताहेत. अटलबिहारी वाजपेयी येतात आणि कसं कोण जाणे, वाजपेयींच्या बोलण्यातून इंदिराजींना असं जाणवलं असावं की, आपल्यावर कोसळलेल्या या प्रसंगामुळे वाजपेयींना आपली कींव येतेय की काय, दया वाटतेय की काय! तेव्हा त्याही प्रसंगात आपली कोणी कींव करावी, दया करावी, हे मानी स्वभावाच्या इंदिरा गांधींना आवडलं नाही. त्यामुळे त्यांना आलेला राग त्यांच्या गॉगलमधल्या डोळ्यांतून जवळच उभ्या असलेल्या पुपुल जयकरांनी बरोबर टिपला. इतकंच नाही, तर आपण किती नॉर्मल आहोत, हे वाजपेयींना कळावं म्हणून इंदिराजींनी वाजपेयींकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या चंद्रशेखर यांच्याशी त्यानंतर दोन दिवसांनी होणाऱ्या एका मीटिंगबद्दल जुजबी बोलणं केलं. आता क्षणार्धात घडून गेलेली ही घटना; पण पुपुल जयकर ज्या पद्धतीने बघतात व लिहितात, त्यातून इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वातला संपूर्ण पीळ त्या वाचकांसमोर उभा करतात. ही व्यक्तिचित्रणाची खरी ताकद असते.

द्वादशीवारांच्या लेखनातही अशा अनेक जागा त्या ताकदीने पकडलेल्या आहेत. त्यादृष्टीने नरहर कुरुंदकर, सुरेश भट, अनंतराव भालेराव, बाबा आमटे यांच्यावरचे लेख वाचण्यासारखे आहेत. या पुस्तकातील बहुतेक व्यक्ती तुमच्या-आमच्या माहितीतील आहेत.  व्यक्तीचित्रण केलेली व्यक्ती जेव्हा वाचकांना अनोळखी असते किंवा पूर्णत: काल्पनिक असते तेव्हा त्याचा एक फायदा असा असतो की, वाचकांच्या मनाचा कॅनव्हास त्या व्यक्तीबाबत पूर्ण कोरा असतो. पण ती व्यक्ती माहितीची असेल किंवा प्रसिद्ध असेल तर वाचकांच्या मनावर त्या व्यक्तीविषयीचं काही ना काही रेखाटन झालेलं असतं. त्यातून ती व्यक्ती कौतुकाची, प्रेमाची, अतीव आदराची असेल, तर त्या व्यक्तीबद्दलचा एखादाही विपरीत सूर वाचकांच्या मनावर ओरखडा उमटवून जाऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीच्या राजकीय विचारांमुळे, सामाजिक पाश्र्वभूमीमुळे, कौटुंबिक परिस्थितीमुळे वाचकांच्या मनात राग असेल तर त्या व्यक्तीविषयी लिहिताना लेखकाची कसोटी असते. या पुस्तकातील बहुसंख्य व्यक्तिचित्रणाच्या बाबतीत या कसोटीला द्वादशीवार उत्तम पद्धतीने उतरले आहेत. उदाहरणार्थ, या पुस्तकातील जन्रेलसिंग िभद्रनवाले हे व्यक्तिचित्रण वाचा. िभद्रनवाल्याचा तो २०-२५ वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळातील पंजाबमधील दहशतीचं वातावरण आठवा. त्या वातावरणात घडत गेलेली िभद्रनवाल्याची मतं आणि त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या बोलण्यातला प्रेमळपणा तसाच खुनशीपणा या सर्वाचे तपशील तर द्वादशीवार देतातच; पण मध्येच विचारांचा रूळ झटकन बदलतात आणि लिहून जातात- ‘आतापर्यंत खोमेनीच्या शीख अवताराची जागा एका सामान्य शीख गृहस्थानं घेतल्याचं लक्षात येतं. त्याच्या शस्त्रांची आता वाद्यं झालेली असतात. आईच्या हाताला असलेल्या चवीची आठवण मनात ठेवणारा तो सामान्य मुलगा झालेला असतो. िभद्रनवाल्यांचा हा हळवा क्षण पकडायला एखादा गांधी असता तर..’
द्वादशीवारांच्या व्यक्तिचित्रणातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची शैली. कोणीतरी जाणकार समीक्षकाने द्वादशीवारांच्या लेखनशैलीचा अभ्यास करायला हवा. एकच वैशिष्टय़ त्या शैलीचं सांगतो. एखाद्या व्यक्तीचं मोठेपण सांगताना ही लेखणी जशी तालेवार भाषा वापरते, तीच लेखणी त्या व्यक्तीचा हळुवारपणा, खेळकरपणा सांगताना त्याच्या चांगल्या खोडय़ाही काढू शकते. त्यांच्या शैलीचं सामथ्र्य दाखवणारं या पुस्तकातील सर्वात चांगलं व्यक्तिचित्र जनार्दन पांडुरंग यांचं आहे (त्यांच्या वडिलांचं). या पुस्तकात हे व्यक्तिचित्र सर्वात शेवटी आहे. हे जाणीवपूर्वक शेवटी टाकलंय काय, हे मला माहीत नाही. पण ते शेवटी टाकलंय, हे फार चांगलं केलं आहे. कारण ते व्यक्तिचित्र वाचल्यावर खरोखरच पुस्तक बंद करून आपण थांबावं असं वाटतं. ‘जनार्दन पांडुरंग’ हे औपचारिक नाव द्वादशीवारांनी घेतलंय, यातून त्यांचे वडिलांबरोबरचे संबंध लक्षात येतात. या व्यक्तिचित्रणातील अनेक जागा सांगता येतील. या व्यक्तिचित्रणाची सुरुवातच त्यांनी किती मनात घुसणारी केली आहे, ते पहा.. ‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे..’ या वाक्याने या व्यक्तिचित्रणाची त्यांनी सुरुवात केली आहे. मी तुम्हाला सांगतो, भल्या भल्या लेखकांना हे वाक्य लिहिता येणार नाही. ते पुढे लिहितात, ‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे. प्रखर बुद्धिमत्ता आणि तिला लीलया पेलून धरणारा दांडगा उत्साह आपल्या लहानखुऱ्या देहयष्टीत धारण करणाऱ्या या माणसात वाहून जाण्याचा दोष होता.’ या दोन वाक्यांत पुढे काहीतरी वेगळं वाचायला मिळणार, याच्या खुणा मिळून जातात आणि खरोखरच पुढे हे व्यक्तिचित्रं अनेक वाटा-वळणाने वाहत राहतं आणि शेवटी एका जागी तर अंतर्मुख करून जातं. द्वादशीवार लिहितात, ‘तुरुंगात शिक्षेत सूट मिळाल्यावर जनार्दन पांडुरंग एका मध्यरात्री अचानक घरी आले. येताना त्यांनी तुरुंगात स्वत विणलेल्या जाडजूड सतरंज्या बरोबर आणल्या होत्या. त्यातल्या प्रत्येकीवर माझं नाव कोरलेलं होतं.’ या व्यक्तिचित्रात द्वादशीवारांचा प्रत्येक शब्द तर आपल्याशी बोलतोच बोलतो, पण त्या वाक्यातील विरामसुद्धा एक प्रकारचा संवाद साधतात, इतकं ते प्रभावी झालं आहे. हे व्यक्तिचित्र वाचताना मनाला खूप उदासी वाटते. कारण जनार्दन पांडुरंगाच्या आयुष्यात अनेक उलटसुलट घटना घडत गेल्या. पण त्या घटना वाचतानाही असं वाटतं की, द्वादशीवार आपल्या वडिलांचं चित्रण करतानाही विनाकारण हळवेपणाचं ओझं आपल्या लेखणीवर ठेवत नाहीत, वा नाटकी वाटावं, खोटं वाटावं, बेगडी वाटावं असा दूरस्थपणाही त्यांची लेखणी धारण करत नाही. त्यांची लेखणी त्यांच्या स्वभावातला हळुवारपणा, समजूतदारपणा फार चांगल्या पद्धतीने टिपत पुढे जाते आणि आपल्याला अंतर्मुख करून टाकणारं काहीतरी त्यातून मिळतं.

या पुस्तकातील कुरुंदकरांचं व्यक्तिचित्र वाचताना माझ्या मनात अशी शंका होती की, यात आता द्वादशीवार वेगळं असं काय लिहिणार आहेत? कारण कुरुंदकरांबद्दल इतकं लिहून, सांगून झालेलं आहे. कुरुंदकर गेल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्यावर एक स्मृतिग्रंथ काढला होता. स्मृतिग्रंथ अथपासून इतिपर्यंत वाचनीय कसा असू शकतो, याचा आदर्श वाटावा असा अडीचशे-तीनशे पानांचा ग्रंथ होता. त्यामुळे यापलीकडे कुरुंदकर या लेखातून काही दिसतील का, असे वाटले होते. पण त्यातही दोन-चार जागा अशा आहेत की, द्वादशीवारांनी माझा अंदाज खोटा ठरवला. विशेषत: मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर भाषण करायला उभे राहिल्यावर कुरुंदकर पहिलं वाक्य काय बोलले, तो प्रसंग किंवा कॉलेजमध्ये एक मोठय़ा विदुषी आल्या असताना छायाचित्राच्या निमित्ताने एक विनोदी घटना घडली, त्यावेळचं कुरुंदकरांचं बोलणं आणि वागणं. हे प्रसंग कुरुंदकरांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा व बौद्धिक शार्पनेस दाखवणारे आहेत.

द्वादशीवारांच्या इतर व्यक्तिचित्रणातील अशा अनेक प्रसंगांबद्दल बोलता येईल. पण त्यांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना संयम फार चांगला कळतो. प्रत्येक व्यक्तिचित्र वाचताना असं वाटत राहतं की, द्वादशीवारांना या व्यक्तीची यापलीकडे माहिती आहे, पण ती ते सांगत नाहीत. कोणाविषयी, काय, किती आणि केवढं लिहावं, याचं भान त्यांना पक्कं राहिलेलं आहे. त्यामुळे कोणतंही व्यक्तिचित्र पाल्हाळिक झालेलं नाही आणि आता हे संपावं, असं न वाटता ‘अरे, आता एकच पान राहिलं का?’ असं वाटून व्यक्तिचित्र संपतं. ही त्यांच्या लेखणीची जागरूकता लक्षात घेता त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलताना मी तो संयम पाळायला हवा, नाहीतर त्यांच्या पुस्तकाने मला काहीच दिलं नाही, असं म्हणावं लागेल.

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

कोणाची प्रतिभा वेड लावते. कोणाचे ज्ञान आदर उभा करते. कोणाची वाणी, तर कोणाची लेखणी प्रेमात पाडते. आपल्या प्रज्ञेची दीप्तिमान आभा काही जणांभोवती प्रकाशाचे देखणे वलय नटवीत असते आणि या साऱ्याच गोष्टी एकत्र असतील, तर त्यातून उभे होणारे व्यक्तिमत्त्व एकाच वेळी आदराएवढाच दराराही उत्पन्न करते. हे व्यक्तिमत्त्व सहवासाने वा योगायोगाने जवळचे असेल तर त्यामुळे आपलीच उंची वाढून आपण श्रीमंत झाल्याचा अनुभव येतो. ज्याच्या किंवा जिच्या सहवासात आपली उंची वाढल्याचा असा संपन्न अनुभव येतो, तो किंवा ती व्यक्ती आपल्या प्रेमाचा विषय आहे असे समजायचे असते असे एका प्रख्यात अमेरिकी कादंबरीकाराचे म्हणणे आहे. आपल्या जवळच्या आणि दूरच्या स्नेहीजनांना अशा उंचीचा अनुभव देणारे व्यक्तिमत्त्व नरहर कुरुंदकर या पंडिताला लाभले होते.

ज्या माणसावर त्याच्या हयातीत आणि मृत्यूनंतर निकटच्या व दूरच्या मित्रांनी, टीकाकारांनी, चिल्लरांनी आणि मान्यवरांनी खूप सारे लिहिले; त्यावर एवढया दिवसांनी आणखी काय सांगायचे राहिले असते? पण काही माणसांची गंमतच अशी की त्यांच्याविषयी कितीही बोलले वा लिहिले तरी आणखी खूपसे बोला-लिहायचे राहून गेले आहे असे वाटावे.

चाळीसेक वर्षांपूर्वीच्या एका हिवाळया रात्री दोन-अडीचच्या सुमारास कुरुंदकर चंद्रपूरच्या रेल्वे स्थानकावर पॅसेंजरच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून उतरले. त्यांना उतरून घ्यायला आम्ही काहीजण फलाटावर थांबलो होतो. स्थानकावर चहा घेतला तेव्हा ते म्हणाले, ‘आता जरा तंबाखूचं पान बघा.’ त्या एका वाक्याने आमच्यातील अंतर घालविले.

सांगणाऱ्यांनी त्यांच्या विद्वत्तेएवढेच त्यांच्या विक्षिप्तपणाबद्दल ऐकवले होते. त्यांच्या लिखाणाने त्यांच्या विचारांच्या लख्खपणाची ओळख पटली होती. निष्कर्षावर येण्याची त्यांची तऱ्हा दीपवणारी, बुध्दीला जबर चकवा देणारी आणि तरीही वास्तवालाच धरून राहणारी होती. पुढल्या प्रवासात मी त्यांना प्रश्न विचारू लागलो. राजकारण, इतिहास, अर्थकारण, साहित्य. आणि सगळा प्रवास संपला तरी खूप विचारायचे राहून गेले. जरा विचार केला असता तर जे आपल्यालाही गवसू शकले असते ते अतिशय गंभीर आणि अतिशय जवळ असलेले सत्य हा माणूस इतक्या सहजपणे आपल्यासमोर मांडत असे की हवी ती वस्तू समोर असून दिसू नये आणि हताश झाल्यावर तिचे अस्तित्व एकदम जाणवावे तसे त्यांच्या वाचक श्रोत्यांना वाटत राहावे.

‘काँग्रेस ही हिंदूंची देशातली सर्वांत मोठी संघटना आहे’ हे त्यांचे विधान काँग्रेससकट कोणालाही उघडपणे मान्य करता येणे कठीण असले तरी खरे आहे. काँग्रेसला तिच्या सेक्युलरपणाच्या वावदुकीपायी ते खरे असून तसे म्हणता आले नाही आणि हिंदुत्ववाद्यांना खरे पण उघड दिसत असूनही ते कधी मान्य करता आले नाही. ज्या संघटनेमागे देशातील हिंदू बहुसंख्येने उभा राहिला ती संघटना ‘हिंदूंची’ की ज्याला हिंदूंनी सातत्याने नाकारले ते नेतृत्व हिंदूंचे असा प्रश्न कुरुंदकर विचारायचे. स्वातंत्र्यापूर्वी या देशातील मुस्लिमांचा वर्ग मुस्लीम लीगसोबत राहिला. त्या काळात हिंदू कोणाबरोबर होते या प्रश्नाचे खरे उत्तर गांधींसमवेत व काँग्रेससमवेत हे आहे. हिंदू ज्यांच्यासमवेत सातत्याने राहिले त्यांना हिंदूविरोधी म्हणायचे आणि ज्यांना कधी 7-8 टक्क्यांहून अधिक हिंदू मते मिळविता आली नाहीत त्यांनी आपल्या पक्ष व संघटनांना हिंदू म्हणवून घ्यायचे यातील विसंगती उघड आहे आणि तरीही राजकारणातल्या जाहीर भूमिकांमुळे ती तशी स्वीकारणे सगळयांना अडचणीचे आहे. ज्यांच्यासमवेत हिंदू नाहीत त्यांनी स्वत:ला हिंदूचे संघटन म्हणवून घेणे सोयीचे असेल तरी इतरांनी ते तसे मानण्याचे कारण नाही एवढेच सांगून कुरुंदकर थांबत नसत. ते म्हणत, ‘जे काँग्रेसला हिंदूंचे संघटन मानत नाहीत, ते बहुजन समाजालाही हिंदू मानत नाहीत असे म्हणावे लागेल.’

मी म्हणालो, या तर्काने कम्युनिस्ट आणि समाजवादी हे पक्षही हिंदूंचेच पक्ष ठरतात. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘ते खरेच आहे. या देशातील हिंदुत्ववाद्यांना त्यांच्या राजकीय विचारांच्या हिंदूंचा पक्ष हवा आहे. नुसते हिंदूंचे संघटन नको. हिंदुत्व हा त्यांच्या धारणेचा भाग नसून धोरणाचा भाग आहे’.
हे वास्तव स्वीकारायचे ठरविले की राजकारणातील सगळयाच धारणा बदलतात आणि त्याची सगळी मांडणीही नव्याने करावी लागते. या नव्या मांडामांडीत हातचे खूप सोडावे लागते आणि ते करण्याची कोणाची तयारी नसते. परिणामी माणसे जाणूनबुजून खोटया भूमिका घेतात, समजून असत्ये मांडतात आणि वास्तवापेक्षा भूमिकांचे माहात्म्य माजवून खऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न ठरवून करीत राहतात. कुरुंदकरांना अशी अवघड सत्ये सहजपणे सांगणे जमत असे; ती नाकारता येणे इतरांना अवघड होत असे. परिणामी त्यांना कुरुंदकरांचा मोहदेखील खऱ्याएवढाच पडायचा, त्यांची अडचणदेखील खऱ्याएवढीच व्हायची.

परभणीतील एका मराठा परिषदेत त्यांनी शिवाजी महाराजांवर एक प्रदीर्घ आणि अप्रतिम भाषण दिले आणि सगळा श्रोतृवृंद त्या भाषणाने धुंद झाला असताना त्यांनी समारोप केला. ‘शिवाजीराजा महान होता, हे आता कोणाही इतिहासकाराने नव्याने सांगण्याची गरज नाही. पण तुम्हा मराठयांनी शिवाजी आपला मानण्याचे कारण नाही. शिवाजी स्वत:ला राजपूत म्हणवीत होता.’ या समारोपाने सभेची धुंदी उतरली आणि तिने वक्त्यांच्या निषेधाचा ठराव त्याच सभेत तात्काळ मंजूर केला. खूप दिवसांनी या प्रसंगाविषयी सांगताना ते म्हणाले, ‘इतिहासपुरुषांची जातवार वाटणी करण्याचा प्रकार थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी हे धक्के आवश्यकच आहेत’. कुरुंदकरांची मांडणी नाकारणे कुणाला जमणारे नव्हते. त्यांचा निषेध हा सोपा मार्ग होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर भाषण करताना ते म्हणाले, ‘बाबासाहेब दलितांचे उध्दारकर्ते आणि या देशाचे भाग्यविधाते होते; पण त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणणे मला मान्य नाही. ही घटना 1935 च्या कायद्याची सुधारलेली आवृत्ती आहे. संघराज्यपध्दती आणि सांसदीय शासन ही या घटनेची दोन्ही महत्त्वाची वैशिष्टये बाबासाहेबांना मान्य नव्हती. शेतजमिनींचे राष्ट्रीयीकरण त्यांना घटनेत हवे होते, ते तीत आलेले नाही. आपण घटना समितीत अत्यंत अल्पमतात असल्याने आपला संकोच झाल्याचे त्यांनीच अनेकवार सांगितले. ही घटना जाळून टाकणारा पहिला इसम होणे मला आवडेल, हे त्यांचेच उद्गार आहेत. ते काढणाऱ्या बाबासाहेबांना तिचे शिल्पकार म्हणणे ज्यांना आवडते वा ज्यांना सोयीचे आहे त्यांच्याविषयी मला राग नाही. माझे म्हणणे एवढेच की ते खोटे आहे’.

अशावेळी सामान्य माणसाला पडणारा खरा प्रश्न एखाद्याने एवढे खरे बोलावे काय हाच असतो. प्राचार्य राम शेवाळकर कुरुंदकरांचा उल्लेख ‘माझा बुध्दिमत्त मित्र’ असा करीत. कुरुंदकरांच्या मृत्यूनंतर एकाने त्यांच्या या वृत्तीला धश्चोट म्हटले. खरेपणाचे नागडेपण एवढे उघडे करायला रस्त्यात उभे राहून लोकांची धोतरेच कशाला फेडायला हवीत, हा या प्रश्नामागचा खुळा भाव आहे.

त्यांच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या पाहुण्या म्हणून ज्ञान आणि वय या दोन्ही बाबतीत वृध्द असणाऱ्या एक विदुषी आल्या. परिपाठाप्रमाणे पाहुण्यांचे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसमवेत एक छायाचित्र काढायचे होते. प्राध्यापकांनी आपापल्या जागा घेतल्या. छायाचित्रकार तयार झाला. पण पाहुण्याबाई विद्यार्थ्यांच्या घोळातून बाहेर यायला तयार नव्हत्या. एकदा-दोनदा सांगून पाहिले तरी त्यांचे मुलांशी बोलणे संपेना. शेवटी प्राचार्य कुरुंदकरांनी बाईंचा दंड धरला आणि जवळजवळ ओढतच त्यांनी बाईंना त्यांच्या जागेवर आणून बसविले. बाई संतापल्या. म्हणाल्या, ‘पुरुषांनी असं अंगचटीला गेलेलं मला आवडत नाही.’ प्राचार्य थंडपणे म्हणाले, ‘का, तुम्हाला मुलंबाळं नाहीत का? बाई, मी तुमच्या नातवंडाच्या वयाचा आहे.’ बाई ओशाळल्या, कुरुंदकरांच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाल्या, ‘मला माफ करा.’

‘तुम्ही आजन्म असे अविवाहित का राहिलात?’ असा प्रश्न अण्णासाहेब सहस्रबुध्दयांसारख्या ज्येष्ठ गांधीवाद्याला पहिल्या भेटीत विचारण्याचे धारिष्टय त्यांचेच आणि अण्णांनी त्यावर ‘दारिद्रयामुळे’ असे उत्तर दिले तेव्हा ‘दारिद्रयामुळे माणसे अविवाहित राहू लागली, तर देशातल्या दारिद्रयाचा आणि जगातल्या लोकसंख्येचाही प्रश्न सुटेल’ असा अभिप्राय ऐकविण्याचे धाडसही त्यांचेच.

राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांसाठी मी त्यांचे सेक्युलॅरिझमवरचे एक व्याख्यान ठरविले तेव्हा त्यांना न ओळखणाऱ्या राज्यशास्त्रातल्या काही बडयांनी हा मराठीचा प्राध्यापक येथे कशाला असा प्रश्न विचारला. राजकारणावरील त्यांची पुस्तके कोणती असे एकाने विचारले. त्यावर ‘शिवरात्र’, ‘जागर’ अशी त्यांच्या पुस्तकांची नावे ऐकूनही त्यापैकी काहींनी भुवया उंचावल्या. पण ‘लोकशाहीचा अर्थ जसा ग्रीकांपुढे होता तसा तो आपल्यापुढे नाही. तो शतकाशतकात जसा बदलत गेला, तसा सेक्युलॅरिझमचा…’ अशी सुरुवात करून कुरुंदकरांनी बायबल आणि कुराणातील सेक्युलॅरिझमचा अर्थ सांगायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा सगळया नामवंतांनी नोंदवह्या उघडून टिपणे घ्यायला सुरुवात केली. त्याच रात्री भारताच्या परराष्ट्रीय धोरणावर झालेले त्यांचे व्याख्यान ‘एकदम नवे’ असल्याचे या तज्ज्ञांनी दुसरे दिवशी एकमेकांना एकमुखाने सांगितले.

कुरुंदकरांचा संगीतावरील विचार पं. ओंकारनाथ ठाकुरांसारख्या तप:पूत कलावंताला मौलिक वाटला आणि गांधीवादाचे त्यांनी केलेले विश्लेषण आचार्य शंकरराव देवांसारख्या ज्येष्ठ गांधीवाद्याला महत्त्वाचे वाटले. वेदान्तावरचे त्यांचे भाष्य वेदान्त्यांना सुखविणारे नसले तरी त्याच्या मौलिकेतेविषयी त्यांच्या मनात शंका नव्हती. चित्रकला, सौंदर्यशास्त्र ते नवगणित अशा विषयावरील त्यांचे मूलगामी चिंतन त्या-त्या क्षेत्रातील अभ्यासूंना नुसता प्रकाशच नव्हे तर चटका देऊन गेले.

जडातून चेतनाची उत्पत्ती कशी होते यावरचे शंकराचार्यांचे ‘जशी शेणातून विंचवांची उत्पत्ती होते तसे’ हे उत्तर त्यांना प्राणिशास्त्र ठाऊक नव्हते हे सांगणारे तर आहेच पण त्यांच्या जड चेतनाच्या सगळया भूमिकांचे ठिसूळपण स्पष्ट करणारे आहे हे कुरुंदकरांचे मत वेदान्त्यांना धक्का देणारे आणि आचार्यभक्तांना डिवचणारे होते. ब्रह्मसूत्र भाष्यात शंकराचार्यांनी सूत्रांचा खरा अर्थ लावण्यापेक्षा त्यांना हवा असणारा अर्थ त्यावर लादला आहे हे त्यांचे वाक्य ऐकून त्यांच्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आचार्यभक्त द.वा. जोग यांनी सभात्यागच केला होता. कुरूंदकरांच्या मते ब्रह्मसूत्रे परिणामवादी आहेत. आचार्य सांगतात तशी ती विवर्तवादी नाहीत.

दुसरीकडे भांडवलदारांचा वर्ग समाजाची सगळी क्रयशक्तीच हिरावून घेत असेल तर तो आपल्या उत्पादनाची बाजारात होणारी विक्री स्वत:च थांबवतो आणि आपोआप मरतो. त्यासाठी क्रांतीची गरज कोणती हा त्यांचा मूलभूत प्रश्न मार्क्सवाद्यांना गोठवून टाकणारा होता. दामोदर कोसंबींची भारतीय इतिहासाची प्रस्तावना, देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचे लोकायत, राहुल सांकृत्यायनांचे लिखाण हे त्यांच्या अभ्यासाचेच नव्हे तर चिकित्सेचे विषय. ग्रंथकाराचे प्रतिपादन त्याच्या मूळ भूमिकेनिशी समजावून घेऊन त्याविषयीचा आपला अभिप्राय अत्यंत गंभीरपणे मांडायचा. ग्रंथकारावर अन्याय न करता त्याला त्याच्या मर्यादांचे भान करून द्यायचे हा प्रयत्न. ‘महाभारत- एक सूडाचा प्रवास’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने आपल्या मांडणीच्या युक्तिवादासाठी निवडलेले सगळेच प्रसंग प्रक्षिप्त असल्याचे सांगून त्यातील प्रतिपादनाचा पायाच त्यांनी उखडला आणि त्याचवेळी एका सूडसत्रात सारे महाभारत बसवून दाखविण्याच्या लेखकाच्या ताकदीचे कौतुकही केले.

प्रत्येक समस्येचे मूळ तपासून पाहण्याची आणि परंपरेने दिलेल्या उत्तरांपेक्षा वेगळया, नव्या आणि सामान्य माणसांना सहजपणे पटणाऱ्या निष्कर्षावर येण्याची त्यांची ताकद जबर होती. या सामर्थ्याबाबतच एकदा त्यांना छेडले, तेव्हाचे त्यांचे उत्तर सरळ साधे, पण त्यांच्या नित्याच्या सवयीप्रमाणे धक्का देणारे होते. ‘व्यास काय आणि वाल्मिकी काय, बुध्द काय आणि शंकराचार्य काय, ही सगळी आपल्यासारखीच माणसे होती. त्यांनी आपल्याहून जास्तीचे काही जन्माला येताना आणले नव्हते. आपल्यापैकी कोणीही अध्ययन व प्रयत्नाने त्यांच्याएवढी स्वत:ची समज वाढवून घेऊ शकतो, एखाद्या प्रश्नांकडे ते जसे पाहत तसे आपणही पाहू शकतो आणि त्यांना समजले ते जर खरेच असेल तर ते तसा प्रयत्न करणाऱ्यालाही समजूच शकेल. ज्ञान-विज्ञानाची जेवढी साधने आपल्याला उपलब्ध आहेत तेवढी ती त्यांना नव्हती ही आपल्याला जास्तीची अनुकूल असणारी बाब आहे.’

भरताचे नाटयशास्त्र अभिनव गुप्ताच्या भाष्यावाचून समजावून घेण्याची आणि देण्याची त्यांची तयारी अशी होती. भरत अभिनव गुप्ताला कळतो तर नरहर कुरुंदकराला का समजू नये, असा त्यांचा जिद्दी प्रश्न होता. ब्रह्मसूत्रांबाबतही त्यांचा हा आग्रह होता. बादरायणाची ही सूत्रे समजावून घ्यायला शंकराचार्यांचे गाईड कशाला हवे असे ते विचारत. ही भूमिका केवळ बुध्दिवंताची वा विचारवंताची नाही. स्वतंत्र प्रज्ञेच्या माणसाची ही भूमिका आहे. कुरुंदकरांच्या प्रज्ञावादाला मंजूर असणारे किनारे फक्त माणुसकीचे होते. ‘तुम्ही बुध्दीची आणि बुध्दिवादाची मर्यादा कोणती मानता?’ या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘बुध्दी आणि बुध्दिवाद, विज्ञान आणि विज्ञाननिष्ठा या साऱ्यांना माणुसकीच्या मर्यादा आहेत. माणुसकीची उंची आणि वैभव वाढविणे, हे बुध्दीचे व विज्ञानाचे काम आहे. ती घालविणे वा कमी करणे बुध्दीला वा विज्ञानाला जमणारे आहे. पण मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा बाळगणार नाही. माणुसकीच्या नावावर माणसांनाच मारायला शिकविणारी तत्त्वज्ञाने थोडी नाहीत; पण ती तत्त्वज्ञाने टिकणारी नाहीत.’

स्वाभाविकच, कुरुंदकरांच्या उपस्थितीचे दडपण कोणत्याही व्यासपीठाला जाणवत असे. अनेक सभा जिंकणाऱ्या फडर्या वक्त्यांवर त्यांच्या उपस्थितीचे दडपण आलेले मी पाहिले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या शामियान्यात नांदेडला झालेल्या नाटय संमेलनात एक वक्ते जाहीरपणे म्हणालेच, ‘आता आपल्याला निर्भयपणे बोलायला हरकत नाही, कारण आपल्याला खोडून काढणारा कुरुंदकर आता हयात नाही.”

कुरुंदकर नावाच्या माणसात चालणाऱ्या बुध्दी आणि भावना यांच्यातील संघर्षाचे मला नेहमीच कुतूहल वाटत आले. मी माझ्या भावनांना माझ्यावर कधी मात करू दिली नाही, हे वाक्य त्यांनी अनेकांप्रमाणे मलाही ऐकविले आहे. मात्र भावनेचा असा पराभव चर्चेच्या, वैचारिक लिखाणाच्या आणि भाषणाच्या क्षेत्रातच होत राहिला; माणसांच्या संबंधात त्यांना कधी कोरडे राहता आले नाही. आपल्या भावनांना आणि मनाला आवर घालतानाची त्यांची पराभूत ओढाताण त्यांना जवळून पाहणाऱ्या अनेकांना दिसणारी होती.

वणीत प्राचार्यपदी रूजू होण्याआधी काही वर्षे राम शेवाळकरांनी नांदेडच्या पिपल्स कॉलेजमध्ये काढली. त्यावेळची त्यांनी सांगितलेली एक आठवण हृद्य आहेत. रामभाऊ मुलाखतीसाठी कॉलेजमध्ये पोहचले तेव्हा त्यांना कळले की मराठीच्या प्राध्यापक पदासाठी आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नरहर कुरूंदकर नावाचे तेव्हाचे शाळामास्तर घेणार आहेत. रामभाऊंना तो प्रकार अपमानकारक वाटला आणि त्यांनी तशी तक्रार संस्थेच्या अध्यक्षांजवळ, स्वामी रामानंद तीर्थांजवळ केली. स्वामीजी हसून म्हणाले, या प्रकारात तुमचा अपमान नाही, गौरवच आहे. मुलाखत सुरू झाली तेव्हा समोरच्या खुर्चीवर सगळया देहासह उकीडवे बसलेल्या कुरूंदकरांनी सौंदर्यशास्त्रावर दोन तास प्रश्न विचारून रामभाऊंची परीक्षा चालविली आणि तिच्या शेवटी स्वामीजींकडे वळूनही न बघता निकाल जाहीर केला,’तुम्ही उद्यापासून कामावर या.’ पुढे नांदेडच्या मुक्कामात त्या दोघांनीही एका व्यासपीठावर अनेक व्याख्याने दिली. शेवाळकर आस्वादक अंगाने तर कुरूंदकर चिकित्सक प्रकृतीने वेगवेगळे विषय खुलवीत राहिले. रामभाऊंनी नांदेड सोडले तेव्हा सगळे कॉलेज त्यांना निरोप द्यायला बसस्टँडवर आले. सर्वात शेवटी कुरूंदकर आले आणि ते आपल्याहून वयाने लहान आहेत हे ठाऊक असणाऱ्या रामभाऊंनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. डोळयातले अश्रू लपवीत कुरूंदकर म्हणाले, ‘ मला फार भावनाप्रधान होता येत नाही.’

मात्र अशी भावनाप्रधानता नाकारणारे कुरुंदकर आपल्या आजारी विद्यार्थिनीच्या उशाशी रात्र-रात्र बसून तिची शुश्रूषा करणारे महाराष्ट्रातील बहुधा एकटेच प्राचार्य असावे, गरीब विद्यार्थ्यांना पालकासारखा आधार वाटावा असे दुर्मिळ प्राध्यापक असावे आणि सार्वजनिक संस्थांचा संसार मार्गाला लागावा यासाठी अखंड धडपड करणारे आणि सोबतच्या मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी नुसता जीवाचा आटापिटा करणारेच नव्हे तर त्यासाठी प्रत्यक्ष जीव सांडणारे, एकटेच दुर्लभ मित्रही असावे.

कुरूंदकरांचा धाकटा भाऊ नाथा आणि मी आणीबाणीत एकाच तुरूंगात होतो. घरी वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचे माझ्या पत्नीने पत्राने कळविले. नाथाने ते वृत्त कुरूंदकरांना सांगितले. आठवडयाच्या आत कुरूंदकर चंद्रपूरला आले आणि तब्बल दोन दिवस अंथरुणावर पडलेल्या माझ्या वडिलांना राजकारणातल्या गंमती सांगून त्यांना हंसविण्यात घालविले. नंतरची अनेक वर्षे वडिलांना त्या आठवणींनी भरून येत राहिले. मोठेपणाची छोटी बीजे आपल्याभोवती नेहमीच विखुरलेली असतात. ती ओळखण्याचे आणि त्यातल्या अव्यक्त मोठेपणाची ओळख इतरांना करून देण्याचे कसब थोडयाजणांकडेच असते. ज्यांच्याजवळ ते असते त्या साऱ्यांजवळ त्यासाठी लागणारे मनाचे मोठेपणही पुष्कळदा नसते. वहीतल्या नोंदी या माझ्या पुस्तकात कुरूंदकरांच्या मोठेपणाची अशी एक नोंद आहे.

महाराष्ट्रातल्या एका ख्यातनाम वक्त्याच्या वाणीवर लुब्ध झालेल्या एका पदवीधर युवतीने आपण त्याला मनाने वरले असल्याची लोकविलक्षण प्रतिज्ञा मांडली आणि त्या विवाहित व पापभिरु वक्त्याची तारांबळ उडवून दिली. तिच्या प्रेमाचे खरेपण असे की त्या वक्त्यांच्या आठवणींनी ती बेभान व्हायची आणि त्या अवस्थेत तिला अतिशय देखण्या कविता स्फुरायच्या. या मुलीला भानावर आणायला कुरूंदकरांनी केलेला प्रयोगही तसाच लोकविलक्षण होता. त्या वक्त्यांशी तेही मैत्रीने बांधले होते. तिच्या शहरात कुरूंदकरांनी तीन व्याख्याने दिली आणि तिच्या आमंत्रणावरून ते तिच्या घरी जेवायला गेले. आपल्या कवितांची वही दाखवायला जेव्हा ती त्यांच्याजवळ आली तेव्हा प्राचार्यमजकुर म्हणाले, ‘बाई, आता फार पुढे सरकू नका. कारण तुम्ही आणखी पुढे सरकाल तर मग मागे सरकायला मी तुमचा तो नाही.’

बाई हबकल्या. संतापल्या. त्यावर ते शांतपणे म्हणाले, ‘रागावयाचं कारण नाही. तुम्हाला प्रेमासाठी पुरुष हवा, तो नाही म्हणतो, मी तयार आहे. माझ्यावर प्रेम करा.’ त्यावर त्या बाईंनी आपल्या प्रेमाची कहाणी ज्या तऱ्हेने त्यांना सांगितली तिने हे गहिवरले. त्या प्रेमात नावाची, लग्नाची, प्रतिष्ठेची किंवा देहाची अशी कोणतीही मागणी नव्हती. फक्त मनाने आपले मानायचे एवढीच अट होती. कुरूंदकरांनी तिचा निरोप घेतला. वक्त्यांचे गाव गाठले आणि त्यांच्याजवळ जमा झालेल्या त्यांच्या या अनोख्या प्रेयसीच्या सगळया कविता घेऊन ते नांदेडला परतले. पुढे एका दिवाळी अंकात त्या कविता आपल्या प्रस्तावनेसह ‘राधेच्या कविता’ म्हणून त्यांनी प्रकाशीत केल्या. हा त्यांच्यातल्या मैत्रीतील सहृदयतेचा भाग होता. त्यांच्यातला कार्यकर्ता अजून शांत व्हायचा होता. नांदेडला पोहचल्यापासून दर आठवडयाला बाईंना एक कार्ड टाकण्याचा त्यांनी नेम केला. या कार्डावर फक्त एक वाक्य असे. ‘बाई, आता लग्न करा.’

ही सगळी हकिकत त्यांनीच मला त्या वक्त्यांच्या उपस्थितीत सांगितली. म्हणाले, ‘वर्षभराच्या या पोस्टकार्डांना यश आले आणि बाई एकदाच्या लग्नाला तयार झाल्या. मात्र त्यांनी आम्हाला एक अट कळविली. त्या लग्नाला मी आणि वक्त्यांनी येऊ नये. पण आम्ही गेलो, अक्षता वगैरे टाकून, पुत्रवती भव् असा आशीर्वाद देऊन परत आलो.’ सगळी कहाणी हंसून सांगणाऱ्या कुरूंदकरांचा कंठ मात्र रुध्द झाला होता.

कुरूंदकरांना मी खूपदा भेटलो. नागपूरला, नांदेडला, साहित्य संमेलनात, चंद्रपूरच्या व्याख्यानांना आले की त्यांचा मुक्काम माझ्याकडे असे. या सगळया भेटींत कुरूंदकर आमचे होऊन गेले. ‘प्राध्यापकबाई, जरा बसा.’ स्वयंपाकघरातल्या डायनिंग टेबलाशी बसून ते माझ्या पत्नीला आदेश द्यायचे. ‘हे तुमचे यजमान राजकारणात आहेत. ते तुरूंगाबिरूंगात जातात. तुम्ही स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभ्या रहा.’ एका मुक्कामात म्हणाले, ‘तुमच्या संग्रहातली झाडून सगळी चावट पुस्तके काढून द्या.’ महिनाअखेर नांदेडहून त्या पुस्तकांचा गठ्ठा रजिस्टर्ड पार्सलने परत आला. सोबतच्या पत्रात त्यातल्या प्रत्येक पुस्तकाविषयीचा आपला अभिप्राय त्यांनी लिहून धाडला होता आणि त्या क्षेत्रातली आणखी चांगली पुस्तके कोणती ते कळविले होते. ते यायचे असले की दरम्यानच्या काळात मनात जमा झालेल्या सगळया प्रश्नांची मी एक यादीच तयार करून ठेवत असे. त्यात राजकारणापासून स्त्री-पुरुष संबंधांपर्यंतचे सगळे प्रश्न असत. हाततोंड धुवून बैठकीत आले की म्हणायचे, ‘हं, करा सुरू.’ मग सगळा दिवस आणि बरेचदा सगळी रात्र ती चर्चा सुरू रहायची. माझ्या पत्नीला त्यांचा आदेश असे, ‘प्राध्यापिकाबाई, कंटाळा येत नसेल तर तुम्हीही ऐका. फक्त आम्हाला अधूनमधून चहा देत चला.’

तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र, दैवतशास्त्र आणि नीतिशास्त्र इथपासून इतिहास, समाजशास्त्र या साऱ्या क्षेत्रात अधिकाराने संचार करणाऱ्या कुरुंदकरांना कोणत्याही विषयाचा मूलगामी वेध घेता येत असे आणि त्याचे सगळे पैलू उलगडून दाखविता येत असत. त्यांच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचा त्यांच्याविषयीचा एक प्रसिध्द विनोद नंतर ऐकला. महाविद्यालयातील प्राध्यापकांना कोणती वेतनश्रेणी मिळावी हा नांदेडच्याच नव्हे तर सगळया महाराष्ट्रातील प्राध्यापकांचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय आहे. या प्रश्नाचे उत्तर कुरुंदकर कसे देतील असा प्रश्न निघाला. तेव्हा एक प्राध्यापक म्हणाले, ‘ते म्हणतील, आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या गरजा अतिशय मर्यादित होत्या. आतापर्यंत त्या वाढत जाऊन… इ.’

अशी चिकित्सा करणाऱ्या या ज्ञानर्षीत एक विलक्षण मिस्कील माणूस दडला होता. भारत इतिहास संशोधनाच्या एका गंभीर बैठकीत महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार एकदा भडकून उठले आणि समोर बसलेल्या सगळयांवर आपला संताप ओकू लागले. नेहमी हसणाऱ्या आणि हसविणाऱ्या महामहोपाध्यायांना तसे रागावलेले पाहून सगळी सभा अवाक् झाली. त्यांच्या संतापाचा पहिला भर ओसरला तेव्हा कुरुंदकर त्यांना शांतपणे म्हणाले, ‘दोष तुमचा नाही. जी माणसे आयुष्यात लग्न करीत नाहीत, त्यांचा संताप असा अनावर होण्याचीच शक्यता अधिक असते.’ सगळा तणाव संपला. दत्तो वामन म्हणाले, ‘तुम्ही माझ्यासाठी घनपाठी मुलगी शोधून देत असाल, तर मी आताही लग्नाला तयार आहे.’ त्यावर कुरुंदकर म्हणाले, ‘घनपाठी नाही; पण मी तुमच्यासाठी जटापाठी मुलगी शोधून आणायला तयार आहे. जिच्या पाठीवर जटा आहेत, अशी.’

एकदा यदुनाथ थत्ते म्हणाले, ‘हा माणूस जपला पाहिजे.’ यदुनाथ थत्त्यांना माणसे शोधण्याचा, जपण्याचा आणि प्रकाशात आणून फुलविण्याचा सोसच होता. एकदा ते म्हणाले, कुरुंदकरांसारखा माणूस परदेशात असता, तर लोकांनी त्याला विमान घेऊन दिले असते. आम्ही त्याला बसने, ट्रकने, मिळेल त्या वाहनाने व्याख्यानांना नेतो. तरुणांची शिबिरे-चर्चासत्रे ही त्यांच्या आवडीची ठिकाणे आहेत; पण लोक व्याख्यानांनाही त्यांना तसेच नेतात.’ अशावेळी यदुनाथांचा संताप दिसायचा. अशा प्रवासात बसस्थानकावर सगळी रात्र बसून काढल्याची एक कथा कुरुंदकरांनीच मला सांगितली.

महाराष्ट्रातील बहुतेक सगळे नामवंत वक्ते मी आजवर ऐकले. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी, थाट निराळा. काही नामांकित वक्ते तास-दीड तास श्रोत्यांना पार गुंगवून टाकताना पाहिले. एखाद्या प्रखर प्रकाशझोतातून बाहेर येताना दिपल्यासारखे व्हावे तसा त्यांच्या व्याख्यानांचा प्रभाव पाहिला आणि अनुभवला. पण वक्त्यांनी काय सांगितले याचा विचार करायला गेलो, की काही तेजस्वी वाक्प्रयोग आणि पल्लेदार शब्दावलीखेरीज फारसे काही हाती येत नसे. अशा वक्त्याच्या भाषणाचे वृत्त लिहिताना पत्रकारांची होणारी तारांबळ मी पाहिली आहे. राजकारणातील भाषणे तडाखेबंद असतात, पण ते प्रकरण फार सवंग असते. आम्ही सज्जन आहोत हे धृपद आणि तिकडचे सारे लुच्चे आहेत हा अंतरा. बाकी त्यात नुसत्याच तानाबिना असतात. काही नामांकित व्याख्यात्यांच्या भाषणाची गंमत अशी की लोक त्यात हटकून येणाऱ्या कोटयांची आणि विनोदांची वाट पाहतात. बाकीचे भाषण त्यांच्या लेखी फारसे महत्त्वाचे नसते. वक्तृत्व आणि विद्वत्ता यांनी भरलेली पांडित्यपूर्ण व्याख्यानेही ऐकली आणि तृप्त होत असतानाच त्यांना लालित्याची जोड असती तर बहार आली असती असे वाटत राहिले. कुरुंदकर या सगळया मागण्या पूर्ण करणारे वक्ते होते. विद्वत्ता आणि लालित्य या अलंकारांसह त्यांचे वक्तृत्व प्रकटत असे. त्यात तर्कशुध्दता असे, तपशीलावरची पकड असे आणि उत्तरोत्तर वाढत जाणारी रंगत असे. विश्राम बेडेकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोमनाथच्या साहित्य संमेलनातील त्यांचे उद्धाटनाचे भाषण, यवतमाळच्या संमेलनातील परिसंवादाचे भाषण, सरदार पटेल, कृष्ण, शाकुंतल आणि ययातीवरील भाषणे, नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणावरचे व्याख्यान अशी त्यांची किती तरी भाषणे माझ्या स्मरणात आहेत. त्या व्याख्यानांचे वैशिष्टय हे की त्यात विषयाच्या ओघात विनोद असत. विनोदासाठी विषयाला वळण देण्याचा खटाटोप नसे आणि विनोदाने विद्वत्तेची लय जरादेखील बिघडणारी नसे. पण, त्याहून मोठा विशेष हा की ते श्रोत्यांपुढे कोणत्याही प्रश्नाबाबतची तयार उत्तरे मांडत नसत. प्रत्येक प्रतिपादनासोबत श्रोत्यांच्या मनात प्रश्नांचे नवे काहूर ते उभे करीत असत. आपल्या विचाराच्या प्रक्रियेत ते श्रोत्यांना सामील करून घेत नसत; पण त्यांना सहविचारात साथीला घेण्याचे अजब कसब त्यांच्या वक्तृत्वात आणि त्यात आढळणाऱ्या विचारपध्दतीत असे. आपण आजवर गृहीत धरून चाललो ती सर्वपरिचित वाटणारी सत्ये केवढी ठिसूळ होती याचे त्यातून येणारे भान नवा आनंद देणारे आणि विचारांची वर्तुळे विस्तारणारे असे. आपल्या भाषणांनी श्रोत्यांच्या डोक्यात सूर्याची पिले सोडणारा असा वक्ता माझ्या पाहण्यात दुसरा नाही.

कुरुंदकरांविषयी त्यांच्या जिव्हाळयाच्या वर्तुळातही बऱ्यावाईट समजांचा भरपूर घोळ होता. अशा समजांची पेरणी करीत राहणे हा अनेकांचा आवडता उद्योग असतो. एक विद्वान प्राचार्य रस्त्याने पुस्तके वाचत जातो आणि पुस्तकात गुंतल्याने महाविद्यालयाचा रस्ता मागे पडून तो कित्येक फर्लांग पुढे चालत जातो. भर उन्हाळयात डोक्याचा तुळतुळीत गोटा करून त्याला भरपूर तेल चोपडतो अन् तसाच उघडया डोक्याने उन्हातून हिंडून येतो. या आणि अशाच किती तरी गोष्टी त्यांच्या नावावर प्रचलित आहेत. आपल्या ज्ञानाचा ते फार अहंकार मिरवितात इथपासून त्यांना आपल्या उंचीचा जरादेखील अंदाज नाही इथपर्यंतचे समज त्यांच्याविषयी जवळच्या म्हणविणाऱ्यांतच होते.

मराठवाडयातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक त्यांच्याएवढेच माझ्याही आदरातले. एकदा ते मला म्हणाले, ‘आमच्या नरहरला आपल्या विद्वत्तेचा जबर दंभ आहे.’ काही दिवसातच कुरुंदकरांची आणि त्यांची माझ्या उपस्थितीत गाठ पडली. कुरुंदकरांनी त्यांना सरळ साष्टांग नमस्कार घातला. गप्पा-टप्पा होऊन ते निघून गेल्यावर मी त्या साहित्यिक कार्यकर्त्यांना म्हणालो, ‘बघा, तुमच्यापुढे केवढे नम्र होतात कुरुंदकर.’ त्यावर मिस्कील हसत ते म्हणाले, ‘त्याच्या नमस्कारावर जाऊ नका, त्याच्या नमस्कारातही अहंकार लपलेला असतो. मी एवढा विद्वान असून बघा कसा तुम्हाला नमस्कार करतो, हे त्याला सुचवायचे असते.’ त्यानंतर खूप दिवसांनी कुरुंदकरांना मी हा अभिप्राय सांगितला, तेव्हा ते घायाळ झाल्यासारखे दिसले. त्या गृहस्थांविषयीचा आपल्या मनातील श्रध्दाभाव सांगताना ते गहिवरले होते.

कुरूंदकरांच्या अंत्ययात्रेला मी हजर होतो. नांदेडच्या गोदावरीचा गंगाघाट मुकाट माणसांनी नुसता दाटून आला होता. सुशिक्षित, अशिक्षित, प्राध्यापक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी… एका विद्वान माणसावर गावाने केलेल्या कृतज्ञ प्रेमाचे ते दृश्य. सत्तेच्या कोणत्याही पदावर नसलेल्या, केवळ बुध्दिवैभव हे सामर्थ्य आणि माणुसकी हे देखणेपण लाभलेल्या माणसाला अखेरचा नमस्कार करायला किती लोकांनी एकत्र यावे याची सीमा मी पाहत होतो.

कुरुंदकरांच्या पार्थिवाभोवती नमस्कारासाठी माणसांची दाटी होती. मला त्यांचा धाकटा भाऊ नाथा दिसला. मला घट्ट मिठी मारत तो म्हणाला, ‘आम्ही पोरके झालो.’ जरा वेळाने भानावर येऊन मी कुरुंदकरांची चर्या न्याहाळली. त्या चर्येवर 15 वर्षापूर्वीच्या रात्री रेल्वेस्थानकावर पाहिला तोच प्रसन्न ज्ञानताठा होता. तसाच एक तृप्त व ताजा अभिमान.

त्यांच्या चितेला अग्नी दिला तेव्हा त्या सहस्रावधीच्या समुदायाला हुंदके देताना, डोळे पुसताना पाहिले. अनंतराव भालेरावांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. तीत विद्वानांपासून कामगारांपर्यंत चाळीसेक लोकांची भाषणे झाली, पण कोणालाही भाषण पूर्ण करता आले नाही. अनंतरावांना मी नेहमीच पहाडासारखे पाहिले; पण सगळा पहाडच तेथे खचून गेल्यासारखा दिसला.

कुरुंदकर कोण होते? समाजवादी? ते स्वत:ही तसे म्हणायचे. मार्क्सवादाच्या सगळया मर्यादा अधिकारवाणीने सांगून ते समाजवाद मांडायचे. समाजवाद हाच राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग आहे. जोवर इथल्या उपेक्षितांना या देशात आपला हितसंबंध आहे असे वाटणार नाही तोवर त्यांच्यात राष्ट्रभावनेचा खरा परिपोष होणार नाही असे ते म्हणत.

मात्र समाजवाद्यांना या देशातल्या हिंदू-मुस्लिम प्रश्नाची खरी ओळख पटलीच नसल्याचे आणि अशोक मेहतांचा जातीय त्रिकोणाचा मुद्दा भाबडया समजुतींवर आधारला असल्याचे ते सांगत. या देशातल्या मुस्लिम-मनाचे त्यांचे आकलन आंबेडकर-सावरकरांच्या जवळ जाणारे होते. या मनात सेक्युलर विचार रुजल्याखेरीज त्यात राष्ट्रभक्ती यायची नाही. कारण तो धर्म त्यांना या देशावर प्रेम करू देत नाही हे ते परखडपणे मांडायचे.

एका मुस्लिम परिषदेत भाषण करताना त्यांनी सरळ प्रश्न विचारला ‘माझे जिवंत राहणे तुम्हाला मान्य आहे काय? याला एकदम होय असे भाबडे उत्तर देऊ नका. कारण मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू यांच्याखेरीज इतरांनी जिवंत राहणे तुमच्या धर्मालाच मान्य नाही, म्हणून जपून उत्तर द्या. माझे जिवंत राहणे तुम्हाला मान्य नसताना मी मात्र तुम्हाला सन्मानाने वागवावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते शहाणपणाचे आहे काय याचा विचार करा.’
महाराष्ट्रातील समाजवाद्यांच्या मुस्लिमधार्जिण्या सेक्युलरपणाला असा कुरुंदकर मानवणे जमणारे नव्हते. परिणामी समाजवादी मंडळी जाहीरपणे कुरुंदकर आपला असल्याचे सांगत आणि खासगीत त्यांच्याविषयी एखाद्या व्रात्य मुलाविषयी बोलावे तशी तक्रार करत.

कुरुंदकर हा कोणत्याही बांधिलकीवाल्याला, मग ती बांधिलकी समाजवादाचीच का असेना, परवडणारा माणूस नव्हे. तो समजायला बांधिलकीच्या वरच उठावे लागणार हे यदुनाथ थत्त्यांचे त्यांच्याविषयीचे मत. समाजवाद्यांचा एक गट त्यांना उघडपणे ‘प्रच्छन्न हिंदुत्ववादी’ म्हणे. हैदराबादच्या उस्मानशाही राजवटीविरुध्द झालेल्या स्वातंत्र्याच्या लढयातील कुरुंदकर हे एक लहानसे पाईक होते. त्या लढयाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हे संन्याशी होते. म्हणून कुरुंदकर स्वत:ला संन्याशाचे अनुयायी म्हणत आणि हैदराबादचा मुक्तिसंग्राम हा भारताला राजकीय आणि प्रादेशिक अखंडता प्रदान करणारा अखेरचा लढा मानत. उस्मानशाहीच्या जुलुमाला धार्मिक अत्याचाराचा रंग होता. त्यामुळे त्याविरुध्दच्या लढयालाही तशी किनार असणे स्वाभाविक होते. शिवाय या लढयात भाग घेणाऱ्या माणसांना सत्ताधारी मुस्लिम मन समजून घेता येणे अधिक सोपे होते.

तथापि मुस्लिम मनात सेक्युलॅरिझम रुजायला आधी तो हिंदू मनात रुजावा लागेल अशी त्यांची मांडणी असे. देशातील बहुसंख्य वर्ग जे करील त्याचे अनुकरण इतर वर्ग नकळत करीत जातात. म्हणून प्रथम हिंदूंना सेक्युलर व्हावे लागेल असे ते म्हणायचे. असा कुरुंदकर अर्थातच हिंदुत्ववाद्यांनाही नकोसा होता.

मार्क्सच्या विचारसरणीतील दोष सांगणारा कोणताही माणूस त्या विचारांच्या पोथीनिष्ठांना वर्गशत्रू आणि बर्ुझ्वा वाटला तर तो त्यांचाही दोष नव्हे. नामांतराविरुध्द उघड भूमिका घेतल्यामुळे अखेरच्या काळात आंबेडकरवादीही त्यांच्याविरुध्द उभे राहिले आणि तरी या सगळया बांधील गटातील युवा वर्गाचे आणि स्वतंत्रपणे विचार करणाऱ्यांचे कुरुंदकरांशी अखेरपर्यंत एक अतूट नाते राहिले. त्यांनी केलेली टीकाही साऱ्यांना गंभीरपणे घ्यावीशी वाटली. प्रत्येक नव्या प्रश्नावर त्यांनी आपल्या पाठीशी राहावे असे साऱ्यांना वाटत राहिले.

आपल्या स्वतंत्र विचारांसाठी समाजातले बांधील गट आपल्याविरुध्द उभे राहिले तरी चालतील अशी भूमिका घेणाऱ्यांना समाजकारणात फार मोठी किंमत मोजावी लागते. जॉन एफ. केनेडी यांनी ‘प्रोफाईल्स इन करेज’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मूल्यनिष्ठा की लोकप्रियता अशा संघर्षात आपल्या लोकप्रियतेला तिलांजली देऊन मूल्यांच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस पत्करलेल्या अमेरिकी नेत्यांविषयीचे हे पुस्तक आहे. कुरुंदकरांनी अशी किंमत मोजली. आयुष्यभर ज्यांची साथ केली, ती माणसे विरोधात गेलेली पाहिली. ज्या चळवळींना जन्मभर हात दिला, त्याच चळवळींच्या पुढाऱ्यांना आपल्यावर तोफा डागताना पाहिले आणि शत्रूच्या हल्ल्यांनी कधी घायाळ न होणारे कुरुंदकर या मित्रांच्या हल्ल्यांनी विव्हळ झालेले मी पाहिले.

मृत्यूपूर्वी तीन महिने अगोदर ते माझ्याकडे दोन दिवस मुक्कामाला होते. सारा वेळ ते आपल्यावरच्या स्वकियांच्या हल्ल्याविषयी बोलत राहिले. सारे आयुष्य प्रामाणिक व स्वच्छ भूमिका घेऊनही समूहमनाला हव्या असणाऱ्या एकाच कोणत्या तरी निकषावर समाज आपल्या सबंध आयुष्याचा कसा क्रूर निकाल लावतो, याचे दु:ख त्या बोलण्यातून प्रकट होत होते. आयुष्यभर घेतलेल्या बुध्दिवादी भूमिकेची समूहभावनेकडून होणारी अवहेलना मान्य करणे त्यांना कठीण जात होते. त्या बोलण्यात राग नव्हता, पराभव नव्हता, आपला प्रामाणिकपणा कोणी समजून घेत नसल्याची दु:खद खंत तेवढी होती. वाटले, कुरुंदकरांना थांबवावे. म्हणावे, ‘विसरा’. पण त्याचवेळी मनात येत राहिले कुरुंदकरांएवढा जबर स्मरणाचा माणूस काही विसरणारच नाही. त्याला हे बोलू देणेच बरे आणि परतीसाठी बसमध्ये चढेपर्यंत ते बोलतच राहिले.

आम्हाला विद्वत्तेचा आदर असतो. फक्त ती विद्वत्ता आम्हाला हवी तशी बोलावी अशी आमची मागणी असते. जोवर ती तशी बोलते तोवर आम्ही तिची महत्ता सांगणार. जेव्हा तिचे निष्कर्ष आमच्या आवडीतून वेगळे येतील तेव्हा ती प्रथम दुर्लक्षिणार आणि सोयीची नसेल तर आम्ही ती तुडविणार. कुरुंदकरांच्या निधनानंतर या व्यथेविषयी लिहिताना एकाने लिहिले-

तुझी उंचीच तुझी वैरीण होती
आकाशावर उठणारी तुझी उत्तुंगता
निकटस्थ खुज्यांना कशी कळणार
मग त्यांना तुझ्या मुलाचे मौजीबंधनच आकर्षक वाटले
वैरीही करणार नाहीत असा छळ
त्या करंटयांनी मांडला
तुझ्या रूपानं पुढे गेलेली सर्वस्पर्शी
जाण त्या अभावपूजकांना कधी ओळखता आली नाही.
आश्चर्य नव्हे, सगळयाच ज्ञानेश्वरांचे हे दुर्दैव आहे.

कुरुंदकरांचे निधन व्यासपीठावर झाले. वयाची 50 वर्षे पूर्ण होण्याआधी त्यांना मृत्यू आला. मृत्यपूर्वी लातूरला एका स्नेह्याशी बोलताना ते म्हणाले, ‘आपली गरज कायम आहे आणि समाजाचा लोभ शाबूत आहे तोवरच मरण्यात अर्थ आहे.’

हा माणूस पुढची काही दशके समाजाला वैचारिक नेतृत्व देणारा असेल, एका स्वतंत्र व्यासपीठाची घडण याच्या हातून होईल; असा आशावाद सर्वत्र निर्माण होत असतानाच हा मृत्यू आला. महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत कुरुंदकरांच्या हयातीत म्हणाले होते, ‘हा माणूस आणखी 30 वर्षे समाजाला नव्या वाटा दाखवीत राहील.’ दुसऱ्या एका पंडिताने म्हटले, ‘आम्ही अभ्यासाने जेथे पोचतो, तेथून याच्या अभ्यासविचारांचा आरंभ होतो, हा प्रज्ञावान माणूस आहे.’

हे बोलले जात असताना कुरुंदकरांना आलेला मृत्यू त्यांच्या दृष्टीने अर्थपूर्ण असला, तरी त्याने अनेकांना मृत्यूच्या निरर्थकतेचा आणखी एक पुरावा उपलब्ध करून दिला. माझ्यासारख्या वर्षातून एखाददुसऱ्यांदा त्यांना भेटणाऱ्याचे आयुष्य त्याने रिते केले. जी माणसे सतत त्यांच्यासमवेत राहणारी होती त्यांच्या पायाखालची जमीन त्यांना एवढया दिवसानंतरही सापडली नसणार.

विश्वास दांडेकर, सौजन्य – लोकसत्ता, १५ जुलै २००३

एक काळ असा होता की वसमत हे गाव आठवले की नरहर कुरुंदकरांचे नाव ओठावर यावे, इतका कुरुंदकरांच्या प्रगाढ व्यासंगाचा दबदबा मराठी सारस्वताच्या प्रांतात गाजत होता. इतिहास, साहित्य, प्राचीन वाङ्‌मय, राज्यशास्त्र, संगीत, समाजशास्त्र… कुरुंदकरांच्या प्रज्ञेला कुठलाही प्रांत वर्ज्य नव्हता. वाचता वाचता एखाद्या क्षणी बुद्धीला अवचित थकवा यावा अशा चिरेबंदी तर्काने नटलेल्या आपल्या लेखनशैलीने कुरुंदकरांनी वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात आपला खास ‘कुरुंदकरी बाज‘ निर्माण केला. आयुष्यभर निखळ वैचारिकतेचीच बांधीलकी मानल्यामुळे निरनिराळ्या व्यासपीठांवरून कुरुंदकरांनी अव्याहत संचार केला. मात्र ते कुठल्याही तंबूत दाखल झाले नाहीत. म्हणूनच बहुधा कर्मठांइतकीच पुरोगाम्यांच्या गोटामधूनही त्यांची उपेक्षा झाली. कुरुंदकरांना जाऊनही आता पुरी दोन दशके उलटली, तरी त्यांचे समग्र लेखन संग्रहीत स्वरूपात समाजासमोर येऊ नये, हा महाराष्ट्राच्या ‘वैचारिक अनुशेषा‘चा पुरावाच होय!

महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचा सहज आढावा घेतला तर त्यात अनिवार्यपणे येणार्‍या नामावलीमध्ये एक नाव नरहर अंबादास कुरुंदकर असे आहे. हयात असते तर आज त्यांनी बहात्तराव्या वर्षात प्रवेश केला असता. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२चा. अनेक विषयांचा स्तिमित व्हावे असा व्यासंग. त्या पार्श्वभूमीवर एक निराळाच अन्वयार्थ लावणारी प्रज्ञा, एकेक पाकळी उलगडत जिज्ञासूला विषयाच्या गाभ्यापर्यंत नेण्याची खर्‍या शिक्षकाची हातोटी आणि या सर्वांमागे आपले ज्ञान, बुद्धी ही खासगी मालमत्ता नाही या विश्वासाने ती सतत वाटण्यासाठी झटणारे मन, असे हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व फार अकाली अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले (निधन १०/२/८२).

पेशाने ते शिक्षक. प्राथमिक, माध्यमिक अशा पायर्‍या चढत पुढे प्राध्यापक आणि प्राचार्य झाले. मात्र हे त्या व्यवस्थेतला अपरिहार्य भाग म्हणून घडलेले. एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी ‘परीक्षा‘ या घटनेच्या नावाने आंघोळ केली. कितीजणांना पीएच.डी.च्या प्रबंधासाठी मदत केली याची गणती अवघड, पण त्या फंदात स्वतः कधी पडले नाहीत. व्यासंग हा डिग्रीवर मोजणे कसे गैर आहे त्याचे हे उदाहरण. वयाच्या बाविसाव्या वर्षी मुंबई मराठी साहित्य संघाचे ते आमंत्रित वक्ते होते, तर रणजित देसाईंच्या ‘श्रीमान योगी‘ची महाराष्ट्रात गाजलेली प्रस्तावना त्यांनी वयाच्या तिशीत लिहिली होती, असे प्रसंग पुष्कळ नोंदवता येतील.

त्यांचे अभ्यासाचे विषय छाती दडपून टाकणारे होते. राजकारण, इतिहास, समीक्षा, महाभारत, भरताचे नाट्यशास्त्र, तत्त्वज्ञान, शास्त्रीय संगीत, प्राचीन-अर्वाचीन मराठी साहित्य, सामाजिक चळवळी… नुसती यादी करायची म्हटली तरी स्तिमित करणारी. शिवाय हे सर्व पुस्तकी नव्हते. सर्व महाराष्ट्रभर हिंडत, गटचर्चा, व्याख्याने यांतून ज्ञानगंगा वाहती ठेवण्याची त्यांची धडपड असे.

त्यांची एक नाजूक जागा म्हणजे पंडित नेहरू. स्वतंत्र भारत, त्यात राष्ट्र उभारणीसाठी नेहरू कुठल्या मार्गाने जात आहेत याचा त्यांनी फार सखोल विचार केला होता. यदुनाथ थत्ते-नरहर कुरुंदकर या जोडीने वर्षानुवर्षे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांमधून जे प्रबोधन घडवले त्याच्या केंद्रस्थानी ‘नेहरू‘ असत. बांगलादेश युद्धानंतर तीन-चार वर्षांत जी परिस्थिती भारतात निर्माण झाली त्याचे विश्लेषण करताना त्यांनी १९७१ चा युद्धखर्च, १९७२ चा दुष्काळ, १९७३ चे खनिज तेलाचे भडकलेले भाव या गोष्टी नियंत्रित करणे भारताच्या अखत्यारीत नसल्याने या तीन गोष्टींचा एकत्रित परिणाम बाद करून मग उरलेला दोष शासनाचा असे परखड विश्लेषण केले होते. मात्र आणीबाणी लादण्यास त्यांचा विरोध होता. आणीबाणीनंतर जनता पक्ष ज्या मार्गाने गेला त्यातले धोके त्यांनी जाहीरपणे मांडले होते. विचाराने ते डावे, मार्क्सवादी असले, समाजवादी विचारसरणीचे पाठीराखे असले तरी पोथीनिष्ठ आंधळेपण त्यांनी कधी जोपासले नाही. मतभेद स्पष्टपणे मांडले.

महाराष्ट्रात मृत्युलेख लिहावा तर आचार्य अत्र्यांनी, खेळकर व्यक्तिरेखा रंगवावी तर पु. ल. देशपांडे यांनी अशी काही सार्थ समीकरणे आहेत. यात भर अशी घालता येते की, मूल्यमापन करणारा लेख लिहावा नरहर कुरुंदकरांनी. सरदार पटेल, मौलाना आझाद, अकबर, शेजवलकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, स्थान, भूमिका, मर्यादा ज्या सामर्थ्याने त्यांनी उलगडल्या ती खास कुरुंदकरी परंपरा म्हणता येते. इरावती कर्वे यांचा ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया‘, दुर्गाबाई भागवतांचा ‘लोकसाहित्याची रूपरेखा‘, वा. सी. बेंद्रे यांचा संभाजी, गोपाळ गोडसे यांचे ‘गांधीहत्या व मी‘, द. ग. गोडसे यांचे ‘पोत‘ या व अशा पुस्तकांची विस्तृत परीक्षणे त्यांनी लिहिली. पुस्तकाचे मर्म उलगडून दाखवत मर्यादाही परखडपणे मांडणारी ती शैली ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देत असतानाच त्या त्या विषयाचा आवाकाही मांडत असत, त्रुटीही नोंदवत असत.

मराठीत ‘प्रस्तावना‘ हा एक संपन्न लेखन प्रकार आहे. पुस्तकातले प्रत्येक पान उलगडून दाखवणे, संपूर्ण विरोधी दृष्टिकोन मांडणे, त्या क्षेत्रात नवे दालन उघडणे अशी ही परंपरा शेजवलकर, खरेशास्त्री, राजवाडे अशा दिग्गज नामावलींमुळे झळाळते. या परंपरेत कुरुंदकरांनी विस्तृत आणि मोलाची भर घातली. ‘श्रीमान योगी‘, ‘चलो कलकत्ता‘, ‘चतुर्भाणी‘, ‘महाडचा मुक्तिसंग्राम‘, ‘महाभारत- एक सूडाचा प्रवास‘, ‘हिमालयाची सावली‘, ‘चक्रपाणी‘, ‘लोकायत‘ या व अशा प्रस्तावना त्या त्या ग्रंथांचे भूषण ठरत ग्रंथातल्या विषयाची व्याप्ती विस्तारणार्‍या आहेत.

भरताचे नाट्यशास्त्र आणि विशेषतः त्यातील रससिद्धांत हा त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यास-चिंतनाचा विषय होता. ‘रूपवेध‘मध्ये काही प्रमाणात तो मांडला गेला. पुढे त्या विषयाची सांगोपांग चर्चा करणारी तीन व्याख्याने त्यांनी नाशिक येथे दिली. त्यावर एक महाग्रंथ जवळपास सिद्ध केला, पण तो अपूर्णच अवस्थेत त्यांच्या निधनोत्तर ‘रंगशाळा‘ या नावाने प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाचा पट पाहिला म्हणजे जर हा पूर्णपणे हातावेगळा झाला असता तर त्याने लेखन विषय कुठल्या उंचीवर नेऊन ठेवला असता याची कल्पनाच आज करावी लागते.

ही सर्व प्रतिभा, प्रज्ञा, विद्वत्ता कोरडी नव्हती. कुरुंदकर हे स्नेही, मित्र, विश्वासाने खांद्यावर मान टाकण्याची हक्काची जागा असे त्यांचे स्थान असंख्य कुटुंबांत होते. त्यांना व्याख्यानांच्या मानधनातून मिळणारा पैसा त्यांनी निरनिराळ्या संस्थांना शांतपणे दिला. स्वभावाला एक विलक्षण विनोदाचे अंग होते. कधी नर्म तर कधी तिरकस. गप्पांमध्ये रंगायचे पण कधीही गप्पा व्यक्तिकेंद्रित होऊ देत नसत. चर्चा मत- मुद्दे यावर असावी, व्यक्तीवर नको हा त्यांचा आग्रह असे. साधी शंका विचारली तरी विषय नीट समजावून सांगत. संपूर्ण मराठवाडा तर त्यांना गुरुजी म्हणूनच ओळखत असे.

ते गेल्यावर त्यांचा स्मृतिग्रंथ हैदराबादच्या आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषदेने काढला. मराठवाडा साहित्य परिषद व ‘साधना‘ परिवार या दोन संस्थांसाठी कुरुंदकर खूप श्रमले. पण त्यांच्या निधनोत्तर या दोन्ही संस्थांनी दुर्लक्षच केले, हे कटू सत्य खेदाने स्वीकारावे लागते.

त्यांनी मांडणी केलेले प्रश्न, विषय, क्षेत्रे कालबाह्य झालेली नाहीत. त्यावर चर्चा, मतभेद हे मंथन सुरू राहणे हिताचे आहे. यातले पहिले पाऊल म्हणजे निवडक कुरुंदकर असे काही खंड प्रकाशित करणे, ज्यात त्यांचे सर्व महत्त्वाचे लिखाण टीपा, सूची या व अशा संपादकीय संस्कारांनी परिपूर्ण स्वरूपात उपलब्ध होईल. तो सुदिन लवकर येवो.