Posts Tagged ‘गांधी’

रामचंद्र गुहा, सौजन्य – लोकसत्ता

 

सुमारे १५ वर्षांपूर्वी मुंबईच्या हुतात्मा चौकातील पदपथावर मला हमीद दलवाई यांचे ‘मुस्लिम पॉलिटिक्स इन इंडिया’ हे पुस्तक आढळले. अत्यंत अल्प किमतीत म्हणजे २०-२५ रुपयांना मिळालेल्या या पुस्तकाचे मूल्य मात्र अमूल्य आहे. गेल्या १५ वर्षांत मी या पुस्तकाची किमान सहा-सात पारायणे केली असतील. हमीद दलवाई आज फार थोडय़ा लोकांना माहिती असले तरी भारतीय मुस्लिमांमधील एक निर्भीड आणि परखड विचारवंत म्हणून जुन्या पिढीला ते माहिती आहेत. कोकणच्या लाल मातीत जन्मलेल्या हमीद दलवाई यांनी डाव्या विचारसरणीच्या राजकारणात स्वत:ला झोकून दिले. काही सुंदर लघुकथा आणि विचारप्रवर्तक राजकीय लेख त्यांनी लिहिले. त्यांचे स्नेही आणि सहकारी दिलीप चित्रे यांनी हमीद दलवाई यांचे लेखन अनुवादित करून पुस्तकरूपाने प्रसिद्ध केले तेच हे पुस्तक होय. या पुस्तकात मुस्लिम समाजातील प्रतिगामी आणि हिंदू रूढीप्रिय, कर्मठ या दोघांचीही झाडाझडती घेण्यात आली आहे.  धर्मनिरपेक्ष, सर्वसमावेशक आधुनिक भारताच्या उभारणीसाठी सर्व जाती-पंथ-धर्मातील सुधारणावाद्यांना एकत्र येण्याचे आवाहन त्यात करण्यात आले आहे. भारतीय राजकीय विचारधारेवरील एका संकलन ग्रंथात मी हमीद दलवाई यांच्या लेखनाचा समावेश केला; तेव्हा काही समीक्षक कमालीचे गोंधळले. त्याचे एक कारण म्हणजे या समीक्षकांनी दलवाई यांचे नाव पूर्वी कधी ऐकले नव्हते. दुसरे कारण म्हणजे या संकलन ग्रंथात मी मौलाना अबुल कलम आझाद यांना वगळले होते. दलवाई यांचे अगदी चाळीशीतच निधन झाल्याने आजच्या पिढीतील बहुतांश लोकांना ते माहिती नाहीत, हे खरे आहे. तथापि मौलाना आझाद यांच्याऐवजी मी दलवाई यांची निवड करण्यामागील आणखी एक कारण म्हणजे मौलाना आझाद हे थोर विद्वान, विचारवंत आणि राष्ट्रवादी असले तरी त्यांच्या लेखनात त्यावेळच्या समस्यांचे प्रतिबिंब दिसत नाही. याउलट हमीद दलवाई यांनी त्यावेळच्या ज्वलंत समस्या, प्रश्न यावरच आपल्या लेखनात भर दिलेला आढळतो.

हमीद दलवाई यांचा दिलीप चित्रे यांनी अनुवादित केलेला एक लेख अलिकडेच मी वाचला आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला. महंमद अली जिना यांचे जीवन आणि वारसा यांचे पुनर्विलोकन या निबंधात आहे. हा अनुवाद १९७३ मध्ये ‘क्वेस्ट’ या साहित्यविषयक नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. हे नियतकालिक आज अस्तित्वात नाही. तथापि ‘द बेस्ट ऑफ क्वेस्ट’ (क्वेस्टमधील सवरेत्कृष्ट, निवडक लेख) या नावाने प्रसिद्ध झालेल्या एका संकलन ग्रंथात दलवाई यांच्या लेखाचा समावेश आहे. या लेखाची सुरुवातच दलवाई यांनी अशी केली आहे- ‘‘बांगलादेशची निर्मिती हा महंमद अली जिना यांच्या मोठय़ा राजकीय स्वप्नांवरील अखेरचा प्रहार आहे.’’
जिना हे सर्वधर्मसमभाव मानणारे, आधुनिक विचारसरणीचे होते; परंतु राजकारण, तसेच समाजकारण यांच्यात तडजोडीला सतत विरोध करणाऱ्या काही हिंदू नेत्यांच्या वागण्यामुळे आणि महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यामुळे (त्यांचे विचार न पटल्याने) नाईलाजाने जिना यांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्रासाठी आग्रह धरणे भाग पडले, असा जो समज होता तो चुकीचा, अनाठायी असल्याचे हमीद दलवाई यांनी या लेखात उघड केले आहे. १९१६ चा लखनौ करार आणि १९४६ चा ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ या दोन गोष्टींवर दलवाई यांनी चांगले विश्लेषण केले आहे. वसाहतवाद्यांविरुद्धच्या लढय़ात हिंदूंना साथ द्यायची, असा जिना यांचा उद्देश होता, असे जिना यांचे समर्थक ठामपणे सांगतात. खरोखरच तसे असेल तर मग लखनौ करारानंतर ब्रिटिशांविरुद्धच्या लढय़ात जिना हे केंद्रस्थानी असायला हवे होते; परंतु तसे घडले नाही. उलट मध्यंतरीच्या काळात ब्रिटिश राज्यकर्ते आपल्या कोणत्या गोष्टी, मागण्या मान्य करतात याचीच चाचपणी जिना हे करीत होते, अंदाज घेत होते. मुस्लिमांसाठी कोणत्या सवलतींच्या मागण्या पुढे करायच्या, त्या कशा रेटायच्या याचाच जिना हे सातत्याने विचार करीत होते; ही बाब हमीद दलवाई यांनी उघड केली आहे.

त्यानंतर ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’संबंधांतही दलवाई यांनी विश्लेषण केले आहे. ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार मुस्लिमबहुल प्रांतांत मुस्लिमांना राजकीय सत्ता-अधिकार तर मिळणारच होते; त्याशिवाय केंद्रातही त्यांना ५० टक्के आरक्षण मिळणार होते; म्हणूनच  जिना यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ ताबडतोब स्वीकारला, मान्य केला. आणखी एक गोष्ट म्हणजे भारतातील जी राजेशाही राज्ये होती ती या ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’नुसार तशीच राहणार होती. त्यांचा दर्जा बदलणार नव्हता. त्यामुळे जिना यांनी या योजनेचे स्वागत केले. ‘मुस्लिम इंडिया’  आणि ‘प्रिन्सली इंडिया’  या दोघांचा ‘हिंदू इंडिया’  विरुद्ध आपल्याला वापर करता येईल, अशी अटकळ जिना यांनी बांधली होती. भारतात त्यावेळी असलेले नवाब आणि महाराजे यांचे हक्क अबाधित राहावे, अशी भूमिका जिना यांनी घेतली होती, हे दलवाई यांनी स्पष्ट केले आहे.

जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅनह्ण मान्य केला नाही म्हणून इतिहासकारांनी त्या दोघांना दोष दिला, टीका केली. हे इतिहासकार गतस्मृतींमध्ये रमण्यात धन्यता मानणारे, आहे तेच पुढे चालू द्यावे, बदल-सुधारणा नको अशा मताचे होते. गांधी आणि नेहरू यांनी ‘कॅबिनेट मिशन प्लॅन’ मान्य केला असता तर देश आज अखंड राहिला असता (फाळणी झाली नसती; पाकिस्तानची निर्मिती झाली नसती) असे त्यांचे म्हणणे!
जिना यांच्या मागण्या गांधी आणि नेहरू यांनी मान्य केल्या असत्या तर फाळणी निश्चितपणे टळली असती हे दलवाईही मान्य करतात. तथापि ते   पुढे जे म्हणतात ते अधिक महत्त्वाचे आहे. हमीद दलवाई लिहितात- ‘‘कोणत्याही स्थितीत, पडेल ती किंमत मोजून देशाची फाळणी टाळायची हे गांधी आणि नेहरू यांचे मुख्य उद्दिष्ट नव्हते. फाळणी टाळण्यासाठी पडेल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवली असती तर त्याचा किती विपरीत परिणाम झाला असता ते पाहा- फाळणी टळली असती, पण देशाचे धार्मिक तत्त्वावर आतल्या आतच विभाजन झाले असते. प्रत्येक भारतीय हा एकतर हिंदू नाहीतर मुस्लिम झाला असता. भारतीयत्वाची भावना राहिलीच नसती. हा मोठा धोका होता. मग देशाच्या त्या अखंडतेला काय महत्त्व  राहिले असते?

सुधारणावादी विद्वज्जन हे महात्मा गांधींकडे नवचेतनावादी म्हणून तर जिना यांच्याकडे आधुनिक विचारसरणीचा माणूस म्हणून पाहात होते. म्हणजेच दोघांबद्दलही विद्वज्जनांमध्ये आदरभावना होती. असे असले तरी प्रत्यक्षात गांधीजींच्या ‘नवचेतनावादी’ भारतात अल्पसंख्याकांना समाधानाने राहता येत होते. देशाला धर्मनिरपेक्ष राज्यघटना आहे. आधुनिक राष्ट्रउभारणीचा मोठा प्रयोग सुरू झाला आहे. १६ प्रमुख भाषा आणि आठशेवर बोली भाषा असलेला हा बहुधर्मीय, बहुवंशीय देश आजही अखंड आहे, एकात्म आहे. या देशातील महिलांना मतदानाचा हक्क न झगडता मिळाला आहे. मतदानाच्या हक्कासाठी महिलांना संघर्ष करण्याची वेळ आली नाही, तो हक्क त्यांना आपसूक मिळाला. याउलट दुसरीकडे जिना यांच्या पाकिस्तानात काय आहे? पाकिस्तान तर धर्मनिरपेक्षतेविरुद्धच्या तसेच लोकशाहीविरोधी दिशेने जातो आहे. पाकिस्तानच्या निर्मितीनंतर केवळ दोनच महिन्यांत तेथील अध्र्याअधिक हिंदूंना देश सोडून जावे लागले; म्हणजेच त्यांना जबरदस्तीने हाकलून देण्यात आले. इस्लामच्या संकुचित आणि जाचक परंपरा, रूढींना खतपाणी मिळाले आणि पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र झाले. त्यात लोकशाहीमूल्यांचा मागमूसही नाही. देशाची राष्ट्रीय ओळख, अस्तित्व आजही स्पष्ट नाही. महंमद अली जिना हे जर खरोखरच आधुनिक धर्मनिरपेक्ष, लोकशाहीवादी नेते होते; तर मग त्यांच्या पाकिस्तानात  अशी स्थिती का ? पाकिस्तानचे राजकारण हे सुरुवातीपासून आतापर्यंत आंधळेपणाने हिंदूंचा दीर्घद्वेष करण्याच्या पायावरच का उभे आहे? असा सवाल हमीद दलवाई यांनी उपस्थित केला आहे. जाता जाता शेवटी त्यांनी जिना यांच्या दुर्बलतेबद्दलही लिहिले आहे. फाळणीच्या वेळी दोन्ही ठिकाणी जो प्रचंड हिंसाचार झाला तेव्हा जिना यांच्या मनात प्रचंड भीती घर करून होती. गांधीजींनी मात्र हिंसाचार थोपविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली हे सर्वाना माहिती आहे.

अल्पसंख्याकांच्या रक्षणासाठी सहाय्यभूत ठरेल असे एक संयुक्त निवेदन प्रसृत करण्याची योजना गांधीजींनी पुढे केली; परंतु त्यावर स्वाक्षरी करण्यास जिना यांनी स्पष्ट नकार दिला. १९४७-४८ च्या हिवाळ्यात भारतात आणि पाकिस्तानातही हिंसाचाराने कळस गाठला होता तेव्हाची ही गोष्ट आहे. दंगली थांबविण्यासाठी गांधीजींेनी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांना कलकत्त्यात यशही आले. याउलट त्यावेळी जिना हे गव्हर्नर जनरलच्या निवासस्थानातून बाहेरही पडले नाहीत. एवढेच नव्हे तर ३० जानेवारीला गांधीजींची दिल्लीत हत्या झाल्याचे समजल्यावर आपलेही असेच होईल की काय, या भीतीने जिना यांनी आपल्या निवासस्थानाच्या परसदाराभोवती भक्कम भिंत उभारण्याचे आदेश दिले.  यावरून जिना यांचा भित्रेपणा आणि राजकीय दांभिकपणा दिसून येतो तसेच मानवी मूल्यांबाबतच्या त्यांच्या भावनाही दुर्बल असल्याचे स्पष्ट होते, असे दलवाई म्हणतात.
१९४७-४८ च्या हिवाळ्यामध्ये जिना यांना वयोमानाने शारीरिक दौर्बल्य आले होते. १९७३ नंतर भारतातही परिस्थिती बदलत गेली. १९७५ मध्ये आलेली आणीबाणी, हिंदुत्वाचा उदय अशा अनेक गोष्टी होऊनसुद्धा भारतातील मुस्लिम बांधव हे पाकिस्तानातील हिंदूंपेक्षा सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित आणि सुखात आहेत. बंगाली भाषा आणि बंगाली माणसे यांच्या दमन-दडपशाहीमुळे पाकिस्तानात फूट पडली. याउलट भारतात बहुभाषिकतेला कधी विरोध झाला नाही. बहुभाषिकता  समृध्द होऊ दिली गेली. पाकिस्तानच्या तुलनेत भारतात महिलांचे सक्षमीकरण अधिक झाले आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तानात प्रथमपासून आणि आजही राजकारणात लष्कराचा हस्तक्षेप, किंबहुना वरचष्मा कायम आहे; तर भारताच्या राजकारणात लष्कराचा अजिबात हस्तक्षेप नाही, भूमिका नाही.

स्वातंत्र्यानंतर भारत एकसंध, अखंड राहावा की त्याचे विभाजन व्हावे या मुद्दय़ावर गांधीजींचा पराभव झाला हे मान्य! इच्छा नसतानासुद्धा फाळणी झालीच; परंतु तरीही इतिहास मात्र आजही गांधीजींचे विचार, भूमिका आणि कार्य यांचे समर्थन करतो. स्वातंत्र्यानंतरच्या अनेक वर्षांमध्ये जे पाहायला मिळाले; त्यावरून नवचेतनावादी गांधीजींचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. जिना यांचा दिखाऊ, बेगडी तथाकथित आधुनिकतावाद त्यापुढे खुजा वाटतो. आता उपखंडाबाबत विचार करणे सोडून जरा बाहेरच्या जगाचा विचार करू या. उत्तर अमेरिका, पूर्व युरोप, पश्चिम युरोप, दक्षिण आफ्रिका, तिबेट आणि ब्रह्मदेश (म्यानमार) आदी ठिकाणी जिना यांचे नावही कोणाला माहिती नाही. याउलट लोकशाही, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, सर्वधर्मसमभाव, तत्सम मानवी मूल्ये आणि हक्कांसाठी प्रभावी लढा देणारा म्हणून महात्मा गांधी यांचे नाव आजही जगभर घेतले जाते. त्यांना ‘जाऊन’ ६३ वर्षे झाल्यानंतरही..!

अनुवाद: अनिल पं. कुळकर्णी

रोहिणी गवाणकर, सौजन्य – लोकसत्ता

एकदा कस्तुरबांचे व गांधीजींचे संडास सफाईवरून मतभेद झाले. गांधीजींनी कस्तुरबांना घराबाहेर काढले. कस्तुरबा गेल्या तर नाहीतच. पण ‘तुम्ही मला चालती हो असं सांगूच शकत नाही’ असेही  कस्तुरबांनी ठणकावले. पुढे गांधीजी हे स्त्री-पुरुष समानतेचे कट्टर समर्थक बनले. समाजाला त्यांनी समानतेचे धडे दिले. गांधीजींच्या स्वत:च्या आयुष्यातील काही घटनांमुळे त्यांचा दृष्टिकोन तसा घडला होता.

समाजातील या दोन प्रमुख घटकांना राजकीय चळवळीत सामील करून घ्यायचे असेल, तर त्यांच्यावरील सामाजिक अन्याय दूर करणे अगत्याचे आहे, हे गांधीजींनी ओळखले होते. त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याची सांगड घालण्याचे महत्त्वाचे काम केले.

स्त्रियांवरील सामाजिक अन्याय दूर करून, त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळवून देण्यासाठी आपल्या अनुनयांना सतत मार्गदर्शन केले. स्त्रियांनी स्वातंत्र्याच्या लढय़ात भाग घेण्यास त्यांनी प्रेरणा दिली. कार्यकर्त्यांनाही त्या दृष्टीनेच मार्गदर्शन केले. स्त्रिया ही देशाची अर्धी शक्ती आहे व ती निष्प्रभ व सामाजिक व राजकीयदृष्टय़ा निष्क्रिय राहाणे, नव्हे तिला तसे मुद्दाम ठेवणे; हे योग्य नाही असे त्यांना वाटे. स्त्रियांमधील सहनशक्ती, सेवाधर्म व जबाबदाऱ्या, हे गुण कुटुंबाकडून वापरून घेतले जातात, ते कुटुंबाचा तो एक हक्क आहे या गैरसमजापोटी. कुटुंबासाठी स्त्रियांनी झटले पाहिजे, स्वार्थत्याग केला पाहिजे; ही गोष्ट गांधीजींना मान्य असली, तरी पुरुषांनीही याच गोष्टी केल्या पाहिजेत, हा त्यांचा आग्रह होता. स्त्रीवर या गोष्टी करण्याबद्दल जो अतिरेक होतो, तो त्यांना मान्य नव्हता. स्त्री कौटुंबिक जबाबदाऱ्यांखाली इतकी भरडली जाते, की तिला स्वत:बद्दल विचार करायला किंवा स्वत:चा विकास करण्याच्या दृष्टीने थोडा वेळ घराबाहेर जायलाही जमत नाही. इतकेच काय तशी तिला परवानगीही नाही. ही परिस्थती बदलली पाहिजे. स्त्री देशकार्याच्या मध्यम प्रवाहात पुरुषांच्या बरोबरीने आलीच पाहिजे, हे सूत्र त्यांनी आपल्या अनेक भाषणांतून व लेखांतून मांडले आहे. स्त्रिया समाजाच्या सांस्कृतिक कणा (बॅकबोन) आहेत. उदात्तता, सहनशीलता, दुसऱ्याबरोबर सामावून घेणे, एकात्मता व आध्यात्मिक शक्ती, हे सद्गुण त्यांच्यामध्ये आहेत. म्हणूनच त्यांचा दर्जा पुरुषांच्या बरोबरीचा आहे. स्त्रिया आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होणं, हे त्यांच्या व समाजाच्या स्वास्थ्यासाठी आवश्यक आहे. म्हणूनच गांधीजींनी कुटिरोद्योग व सूतकताई याला प्रोत्साहन देणं, त्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण देणं महत्त्वाचं मानलं. निरनिराळे विधायक कार्यक्रम आखताना, त्यांनी स्त्रिया व दलित या समाजातील वंचित मानलेल्या घटकांना केंद्रस्थानी मानले ते त्याच करता. या सर्वच उपेक्षित समाजाला शिक्षणापासून समाजाने हेतूत: वंचित ठेवले आहे. त्यांच्यासाठी खास त्यांनी मूलोद्योग शिक्षण पद्धती सुरू केली. गांधी आश्रमातून व त्या धर्तीवर चालणाऱ्या आश्रमातून याच पद्धतीने शिक्षण दिले जाण्याची व्यवस्था केली.

स्त्रियांना पाळाव्या लागणाऱ्या पडदा प्रथेपासून त्या मुक्त झाल्या पाहिजेत, त्यासाठी स्त्री-पुरुष दोघांचीही मानसिकता बदलली पाहिजे, कार्यकर्त्यांनी त्यासाठी झटले पाहिजे. मुसलमान कार्यकर्त्यांनी आपल्या घरापासून त्याची सुरुवात करावी, असा त्यांचा आग्रह होता. जनाब हसरत मोहानी यांची पत्नी त्यांच्याबरोबरच काँग्रेस कार्यात झटली होती. सुरुवाती सुरुवातीला ती बुरखा घालूनच भाषणे करी. पण लवकरच तिने बुरखा  घालणे बंद केले. बेगम अली, शौकत अली महमद अलींची आई ‘बी अमन’ या सर्व खानदानी मुसलमान स्त्रियांनी स्वत: बुरख्याचा त्याग केला व इतरही मुसलमान स्त्रियांमध्ये बुरखाविरोधी वातावरण निर्माण केले, ते केवळ महात्माजींच्या प्रयत्नामुळेच.

गांधीजी भारतात आल्यावरच त्यांचे लक्ष सामाजिक क्षेत्राकडे- विशेषत: स्त्रियांच्या परिस्थितीकडे- गेले, हे म्हणणे पूर्णपणे बरोबर नाही. त्यांच्या स्वत:च्या आयुष्यातील काही घटनांमुळे हे घडत गेले. कस्तुरबांचे व त्यांचे संडास सफाईवरून झालेल्या मतभेदानंतर त्यांनी कस्तुरबांना घराबाहेर काढले. कस्तुरबा गेल्या तर नाहीतच. पण ‘तुम्ही मला चालती हो असं सांगूच शकत नाही’ असेही  कस्तुरबांनी ठणकावले.

भारतीय स्त्री ही काय चीज आहे, हे जसे त्यांना कळले तसेच भारतीय नवरा व त्याची मानसिकताही त्यांच्या लक्षात आली; तेही स्वत:च्या वागण्यावरून. स्त्रीचा निर्धार व तिची सहनशक्ती याची पारख झाली. आफ्रिकेतील सत्याग्रहानंतर गांधीजींना अटक झाल्यावर पुढील सत्याग्रहाची सर्व सूत्रे त्यांची स्टेनोटायपिस्ट ‘सोनी’ हिने हातात घेतली होती. सत्याग्रहाचे सत्र पुढे चालूच ठेवले. फोईनेक्स आश्रमातील स्त्रिया व द. आफ्रिकेच्या सत्याग्रहातील स्त्रियांचा सहभाग हा फारच प्रेरणादायक होता. वेलूआम्मा नावाच्या १६ वर्षीय सत्याग्रही मुलीने तुरुंगात उपोषण केले. प्रत्यक्ष गांधीजींनी तिला उपोषण मागे घ्यायला सांगितले. ‘आपण सत्याग्रहींना जी शिकवण दिलीत त्याच्याविरुद्ध सांगूच कसे शकता?’ असा उलटा सवाल तिने गांधीजींना केला.

गांधीजींनी सुरू केलेल्या लढय़ात पहिली हुतात्मा एक षोडशवर्षीय तरुणी झाली. त्याचाही परिणाम गांधीवर झाला. त्याशिवाय त्यांची आई पुतळाबाई व दाई रंभाबेन यांच्या वागणुकीतूनही त्यांना निर्भयता म्हणजे काय असते, हे कळले होते. द. आफ्रिका व चंपारण्यातील स्त्रियांच्या परिस्थितीबद्दलच्या अनुभवावरून आपल्या सर्व कार्यक्रमात स्त्रियांच्या सामाजिक परिस्थितीचे भान आपल्या चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आणले पाहिजे, हे त्यांनी जाणले.

जीवनात एक शिस्तबद्ध भागिदारी घेण्याचा पवित्र संस्कार म्हणून गांधीजी विवाहाकडे पाहात. केवळ शारीरिक संबंधाकरता सामाजिक परवाना म्हणून विवाहाकडे पाहाणे त्यांना चुकीचे वाटे. आदर्श विवाह म्हणजे शारीरिक संबंधातून आध्यात्मिक संबंध प्रस्थापित होणे. आध्यात्मिक विकास, सेवा, सामाजिक न्यायामध्ये मनाची गुंतवणूक व प्रेम या चार गोष्टी विवाहाकरिता अटी असाव्यात. स्त्री ही पुरुषाची दासी नाही. पुरुषांना जर आपली पत्नी सीतेसारखी असावी असे वाटत असेल, तर पुरुषानेही रामाप्रमाणे एकपत्नीव्रत व सदाचार यांचे पालन केले पाहिजे. स्त्रीला आपली बाजू न्यायाची वाटत असेल, तर तिच्याआड येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला विरोध करण्याचा अधिकार तिला आहे. विवाह समारंभ साधेपणाने व श्रीमंतीचे प्रदर्शन न करता करावे, अशी विनंती गांधीजींनी समाजाला केली. कारण मध्यमवर्गीय व कनिष्ठ वर्गीय त्यांचेच अनुकरण करतात- अगदी आपली आर्थिक परिस्थिती नसताही. ही परिस्थिती बदलण्यासाठीही गांधीजींनी आपल्या घरापासून सुरुवात केली. आपला धाकटा मुलगा रामदास याचा विवाह रूढ पद्धतीप्रमाणे मुलीच्या घरी न करता साबरमती आश्रमात अगदी साध्या पद्धतीने केले. वराचे स्वागत मुलीच्या घरी ज्या पद्धतीने होते, त्याच पद्धतीने त्यांनी वधूचे स्वागत लग्नघरी केले. साध्या पद्धतीने केलेला हा विवाह त्यावेळी खूप गाजला. अनेक कार्यकर्त्यांची लग्ने पुढे या पद्धतीने झाली. लोक या पद्धतीने केलेल्या विवाहाला ‘गांधीविवाह’ म्हणू लागले. आपल्या मुलाच्या लग्नात गांधीजींनी आणखी एक महत्त्वाची घोषणा केली. वधूवरांपैकी एक कोणीतरी हरिजन असल्याशिवाय ते वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी हजर राहाणार नाहीत. आणि हे तत्त्व त्यांनी आजन्म पाळले. समाजाच्या ऐक्यासाठी सवर्ण व हरिजन यामध्ये विवाह होणे ते आवश्यक मानीत.
समाजातील कुप्रथांचे उच्चाटण करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना चार नियम सांगितले.

१) आपल्या मुलीचे वय १५ वर्षे पूर्ण झाल्याशिवाय तिचे लग्न करू नकाच, पण आजूबाजूच्या पालकांनाही अशा विचारापासून परावृत्त करा.
२) १५ वर्षांपेक्षा लहान वयात लग्न होऊन मुलगी विधवा झाली असेल, तर तिच्या बापाने स्वत: पुढाकार घेऊन तिचा पुनर्विवाह लावून द्यावा.
३) लग्नानंतर पहिल्याच वर्षांत तरुण मुलीचा नवरा गेला, तर कुटुंबियांनी तिचा पुनर्विवाह लावून द्यावा.
४) प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील विधवेला सन्मानाने वागवावे व तिला ज्ञानोपासना करण्याची संधी मिळवून द्यावी.

विधूर व विधवा यांना एकच नियम लावला पाहिजे. पुनर्विवाहाच्या बाजूने ते शास्त्रातील दाखलेही देतात. विधुरांनी लहान वयातील कुमारिकांबरोबर लग्न करू नये. करायचेच असले तर आपल्याला शोभेल अशा वयाच्या मुलीशी करावे, असे ते सांगत. स्त्री, पुरुषाच्या शुद्धतेबद्दल आग्रह धरू शकत नाही; पण पुरुष ते धरतो. कुणी दिला व का मिळाला पुरुषांना हा अधिकार?  ज्याप्रमाणे स्त्रीला पुनर्विवाहाचा अधिकार मिळाला पाहिजे; त्याप्रमाणेच तिला घटस्फोटाचा व संतती नियमनाचाही अधिकार असला पाहिजे, असे ते आग्रहाने प्रतिपादन करीत.

स्त्री-पुरुष समानता, गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी, अस्पृश्यांचे प्रश्न हे राजकीय स्वातंत्र्य मिळविण्याच्या मार्गातील मोठेच अडसर आहेत, देशभर या सामाजिक परिस्थितीच्या विरुद्ध आवाज उठत राहिला, तरच राजकीय स्वातंत्र्य मिळवणे  सुलभ होईल, असे गांधीजी मानत. सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून राजकीय स्वातंत्र्य मिळविण्यासाठी गांधीजींनी स्त्रिया, हरिजन, गरीबांसाठी आर्थिक कार्यक्रम दिले; म्हणूनच गांधीजींना ‘समाजपरिवर्तक गांधीजी’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

मार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेते महात्मा गांधींना आदर्श मानतात. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्ते हादरले, उखडले गेले तर ‘ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात’, असे जगभर म्हटले जाते. अमेरिका वा युरोपातल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा मान मिळतो; याची पोटदुखीच ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, त्यातून त्यांचाच वंशवाद प्रकट होतो, असे म्हटले तर वावगे होणार नाही. जोसेफ ललीव्हेल्ड यांच्या ‘ग्रेट सोल-महात्मा गांधी अॅण्ड हीज स्ट्रगल विथ इंडिया’ या पुस्तकाने सध्या सर्वत्र (विशेषत: भारतात) वादळ उठवले आहे. महात्मा गांधी यांना समलिगी आणि वंशवादी संबोधणाऱ्या या पुस्तकावर बंदी घालण्याचा (नेहमीचा) उपाय भारतात अवलंबला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारताच्या राष्ट्रपित्याविषयी अशी खळबळजनक विधाने करण्याच्या पश्चिमी प्रवृत्तीबद्दल आपल्याला काय वाटते? – अशी पृच्छा करणारे पत्र ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीचे संपादक हेमंत कुलकर्णी यांनी दीर्घकाळ अमेरिकेत वास्तव्यास असणारे ज्येष्ठ संपादक गोविद तळवलकर यांना इ-मेलद्वारे पाठवले होते. त्या पृच्छेला गोविदरावांनी पाठवलेले हे उत्तर अशा प्रासंगिक विवादांकडे पाहाण्याचा दृष्टिकोन कसा असावा; याचा जणू वस्तुपाठच ठरावे.

————————————————————————–

३० मार्च २०११

स.न.वि.वि.,

तुमची त्रोटक इ-मेल मिळाली. जोसेफ ललीव्हेल्ड हे ‘न्यूयॉर्क टाइम्स’चे एक काळ संपादक होते. त्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत व नंतर भारतात त्याच पत्राचे प्रतिनिधी म्हणून काम करत होते. दक्षिण आफ्रिकेसंबंधी त्यांनी या अगोदर पुस्तक लिहिले आहे. त्यांचे महात्माजींच्या संबंधीचे पुस्तक मी अजून वाचले नाही. परंतु ‘वॉलस्ट्रीट जर्नल’ या दैनिकात दर शनिवारी पुस्तक परीक्षणे येतात. परवाच्या शनिवारी या पुस्तकावर पानभर परीक्षण आलेले वाचले. तसेच ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’ या दोन दैनिकांतील परीक्षणे वाचली.

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने तर दोन परीक्षणे दोन वेगळ्या दिवशी छापली आहेत. त्यापैकी एक हरी कुंझरू यांचे आहे. ते बहुधा अमेरिकेतच राहत असावेत. कुंझरू हे कादंबरीकार आहेत. त्यांनी तर ललीव्हेल्ड यांचे पुस्तक न्याय्य व विचारपूर्ण असल्याची शिफारस केलेली दिसेल !

आपल्याकडे वृत्तसंस्थेचे वृत्त प्रसारित झालेले दिसते. ‘वॉलस्ट्रीट जर्नल’मध्ये परीक्षण लिहिणारे अॅण्ड्र्यू रॉबर्ट्स हे इतिहासविषयक लिखाण करीत असतात. ते ललीव्हेल्ड यांच्याच मताचे दिसतात.

मराठी वृत्तपत्रांत जो मथळा वाचला तो समलिगी संभोगाबद्दल. त्याचा प्रत्यक्ष उल्लेख परीक्षणात आढळला नाही; पण अप्रत्यक्ष एक उल्लेख आहे तो जर्मन ज्यू गृहस्थ हर्मन कॅलेनबाख याचा. तो स्थापत्यशास्त्रज्ञ व शारीरिक व्यायामाचे धडे देणारा होता. नंतर त्याने गांधींना अकराशे एकर जमीन दिली व तिथेच गांधींनी टॉल्स्टॉय आश्रम स्थापन केला. कॅलेनबाख याचे शरीर अर्थातच कमावलेले होते. तो गांधींना व्यायामाचे धडे देत होता की नाही, हे परीक्षणावरून समजत नाही. पण त्याच्यासारख्या माणसाचे शरीर कमावलेले असणारच. त्याची प्रशंसा गांधींच्या पत्रात आहे.

त्याचा फोटो गांधींच्या झोपण्याच्या खोलीत होता. गांधींनी आपल्या पत्नीला दूर ठेवले होते, असा निष्कर्ष लेखक काढतो; पण खुद्द गांधींच्या पत्राचा वगैरे हवाला देत नाही. तो सर्व परिच्छेद हा लेखकाने अगोदर निष्कर्ष काढून मग दिल्याचा संशय येतो. ‘ख्रिश्चन सायन्स मॉनिटर’मध्ये परीक्षण लिहिणाऱ्याने ललीव्हेल्ड हे याच बाबतीत नव्हे तर अनेक वेळा कोणत्या आधारावर विधाने करीत आहेत याची नोंद करण्याचे टाळतात, असे म्हटलेच आहे.

या संबंधात एक-दोन गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. लेखकाने जो मजकूर अवतरणचिन्हांत दिला आहे तो गांधींच्या समग्र वाङ्मयाच्या एखाद्या खंडात असेल. लेखकाच्या पुस्तकात त्या खंडाचा क्रमांक व पान नंबर असू शकेल. तेव्हा हे चरित्र व गांधींचे खंड यांचे वाचन सत्य शोधण्यासाठी करून मगच निष्कर्ष काढणे योग्य होईल.

ग्रंथलेखक हा ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा संपादक होता. ‘न्यूयॉर्क टाइम्स’चा एक विशेष हा की, तो समलिगी संभोगाचा भक्कम पाठिराखा आहे. गेल्या काही वर्षात अमेरिकेमध्ये या प्रकारच्या संबंधाचा पंथ वाढत असून, अध्यक्षीय निवडणुकीतही हा प्रश्न चर्चेचा व महत्त्वाचा मानला जातो. वस्तुत: इंग्लंड व युरोपमध्ये या प्रकारचे संबंध हे गेल्याच शतकात नव्हे तर त्याही अगोदर प्रचलित होते. तिथे याची चर्चा वा प्रदर्शन होत नाही. अमेरिकेत मात्र या प्रकारच्या संबंधाच्या लोकांनी कामगार संघटना चालवावी तशी संघटना चालवली आहे. ती मोर्चे काढते आणि ‘टाइम्स’ प्रसिद्धी देतो. टिबकटुमध्ये कोणी समलिगी संभोगाचे दोघेजण असले तरी ‘टाइम्स’ त्यांचे छायाचित्र प्रसिद्ध करील. तेव्हा गांधींच्या काही वाक्यांचा विकृत बुद्धीने उपयोग करून आपल्या आवडत्या पंथाला मोठा आधार मिळत असेल तर हा ‘टाइम्स’वाला ग्रंथलेखक तो देण्यास चटकन तयार होईल यात शंका नाही.

गांधींनी त्यांच्या कामवासनेसंबंधी व कामजीवनासंबंधी बरेच लिहिले आहे. गांधींच्या बरोबर नौखालीतील शांतीयात्रेत फिरणाऱ्या एका गांधीवादी बंगाली गृहस्थांनी ५५ सालात लिहिलेल्या पुस्तकात हे सर्व लिहिले होते. आचार्य अत्रे व मी ५५-५६ मध्ये एकदा अचानक डेक्कन क्विनमध्ये भेटलो तेव्हा त्यांच्या हातात तो ग्रंथ होता आणि अत्र्यांनी त्या ग्रंथात काय आहे ते प्रवासात रंगवून सांगितल्याचे आठवते. पण त्या पुस्तकात समलिगी संभोगाचा विषय असल्याचे अत्र्यांनी सांगितले नाही. हा विषय संपल्यावर स्टिफन झ्वाइग याने लिहिलेल्या बाल्झॅकच्या चरित्राच्या विषयावर आमच्या गप्पा झाल्या आणि त्या काळात आचार्य हे तुकोबांवर कीर्तने करत असल्यामुळे त्यांचे याच विषयावर अतिशय रसाळ विवेचन ऐकले. गांधी कामवासनेसंबंधी स्वत:चीच परीक्षा घेत असत, ते त्यांना कामवासनेतून पूर्णत: मुक्त होण्याची आस होती म्हणून. आपण जर इतरांना ब्रह्यचर्याचा उपदेश करतो, तर आपली वासनासुद्धा संपुष्टात आली आहे की नाही, याचा तपास ते घेत होते.

ग्रंथलेखक हा कमालीचा गांधीद्वेषाने पछाडलेला असावा. तो लिहितो की, हरिजन, मुसलमान व आफ्रिकन यांच्याबद्दल गांधींना तिरस्कार होता. त्याने काही उतारे दिले आहेत. ते तपासल्याशिवाय त्याबद्दल लिहिणे बरोबर नाही. पण लेखक विकृत निष्कर्ष काढण्यात आणि भलतेच तर्क करण्यात तरबेज आहे.

एक उदाहरण आहे ते म्हणजे हरिजनांना राखीव मतदारसंघ देण्याची तरतूद पंतप्रधान मॅक्डोनाल्ड यांच्या निवाड्यात होती; पण गांधींनी त्याच्या निषेधार्थ उपोषण केले. त्यांचे म्हणणे असे होते की, हरिजन हे हिदूच आहेत आणि म्हणून त्यांना स्वतंत्र मतदारसंघ देऊ नयेत. या मतदारसंघाची मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी गोलमेज परिषदेत केली होती. पण गांधींचे प्राण उपोषणात धोक्यामध्ये येतात हे पाहून बाबासाहेबांनी राखीव मतदारसंघाची मागणी सोडून दिली. पण दलितांना काही न्याय हवा ही त्यांची मागणी होती. म्हणून मग निवडणूक कायद्यात तेव्हा बदल करण्यासाठी एक समिती नेमण्यास गांधी तयार झाले. तीत पंडित मालवीय यांच्यासारखे परंपरावादी होते. त्यांनी असे काही बदल कायद्यात केले की, दलितांना न्याय न मिळता अन्यायच होईल. त्यात सुधारणा न करून गांधींनी चूक केली. पण गांधी दलितविरोधी होते आणि मंदिरप्रवेशालाही त्यांचा विरोध होता हे ग्रंथलेखकाचे विधान निराधार आहे. त्याने गांधींच्या उपोषणाचा विषय ऐतिहासिक संदर्भ वगळून हाताळला आहे.

नौखालीत गांधींची नात मनू तेथील पेटलेल्या वातावरणास घाबरली आणि आपण मरू, असे वाटून घरी परत आली. तेव्हा तू मेली असतीस तरी चालले असते. इतकेच नव्हे तर आपल्याबरोबरचे सर्व मेले असते तरी चालले असते, असे गांधी म्हणाले, त्या अर्थी ते किती भावनाशून्य होते, असे लेखक विचारतो. पण अहिसा आणि नौखालीत पेटलेली आग शमवणे ही गांधींची उद्दिष्टे होती; आणि त्यासाठी मृत्यू आला तरी ते मोठे समाधानाचे आहे, अशी त्यांची ध्येयवादी वृत्ती होती.

अहिसेवरील उत्कट निष्ठेमुळे गांधींनी दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी हिटलरला पत्र लिहिले व ‘प्रिय मित्र’ असा त्या पत्राचा मायना होता. हे पत्र गांधींनी व्हॉइसरॉय लॉर्ड लिनलिथगो यांच्याकडे धाडले होते. परंतु लिनलिथगो यांनी ते न धाडता स्वत:कडेच ठेवले. गांधींनी त्या पत्रात हिटलरला गोंजारले होते आणि हिसाचाराचा त्याग करण्यास सांगितले होते. युद्धपूर्व काळात गांधी इंग्लंडला गोलमेज परिषदेसाठी गेले असता वाटेत रोममध्ये मुसोलिनीची त्यांनी भेट घेतली होती. पण याचा अर्थ त्यांना हिटलर व मुसोलिनी यांचे राजकारण पसंत होते असे नव्हे. कोणालाही असा पुरावा देता येणार नाही.

ललीव्हेल्ड यांनी न्याय्य लिखाण केल्याचे शिफारसपत्र हरी कुंझरू देतात. त्यांनी हिटलरसंबंधात गांधींचे पत्र देऊन न थांबता टॉयनबी या इतिहासकाराचे व खुद्द अमेरिकन लोकप्रतिनिधींचे वर्तन काय होते, हेही सांगायला हवे होते. गांधींनी हिटलरला हिसाचाराचा त्याग करण्याचे आवाहन पत्रात केले होते.

युद्धपूर्व भेटीमुळे टॉयनबी हिटलरवर खूश झाला व तो शांततावादी असल्याचा निर्वाळा त्याने जाहीरपणे दिला. मग युद्ध सुरू झाल्यावर आपल्या वृत्तपत्रीय मुलाखतीस विकृत स्वरूपात प्रसिद्धी मिळाली, अशी तक्रार करून त्याने कांगावखोर-पणा केला. ट्रेव्हर-रोपर हे नाणावलेले इतिहासकार होते. त्यांनी टॉयनबीचा हा दुटप्पीपणा तेव्हा व नंतर जगापुढे मांडला होता.

हिटलर व मुसोलिनी यांनी युरोपपुढेच नव्हे तर जगापुढे मोठे संकट उभे केल्याची जाणीव तेव्हांचे अध्यक्ष रुझवेल्ट यांना झालेली होती. परंतु अमेरिकेच्या काँग्रेसच्या दोन्ही सभागृहातील बहुसंख्य सभासद पहिल्या युद्धानंतर केलेल्या तटस्थतेच्या ठरावाचा आग्रह धरूनच होते. हिटलरने ब्रिटनवर हल्ला केला तेव्हा रुझवेल्ट मदत पाठवू पहात होते; पण अमेरिकन काँग्रेसचा विरोध होता. तेव्हा ब्रिटनमध्ये अमेरिकेचे राजदूत होते केनेडी यांचे वडील जोसेफ. त्यांनी कळवले की, ब्रिटन टिकाव धरणार नाही; आपण हिटलरबरोबर व्यापारासंबंधी करार करावा, तो कमालीचा फायदेशीर होईल. रुझवेल्ट यांनी बदसल्ला न ऐकता जोसेफ केनेडींना परत बोलावले.

गांधी व टॉयनबी तसेच केनेडी यांच्या वर्तनांची तुलना करणे ललीव्हेल्ड यांनी टाळले हे न्याय्य मानायचे असेल तर गोष्ट वेगळी.

गांधींना मुसलमान विरोधी ठरवणाऱ्या या लेखकाने गांधींनी कलकत्ता व दिल्लीत मुसलमानांना वाचवण्यासाठी उपोषण केले आणि अखेरीस ते एका हिदू खुन्याच्या गोळीला बळी पडले हे लक्षात घेतले नाही. इतकेच नव्हे तर गांधी वंशवादी असल्याचा अत्यंत बेशरमपणाचा आरोप लेखकाने केला आहे. वस्तुस्थिती उलटी आहे.

अमेरिकेत आफ्रो-अमेरिकनांना दीर्घ काळ गुलाम म्हणून वागवले जात होते. तसेच रोझेन्थॉल व इतर न्यूयॉर्क टाइम्सचे भारतात काम करण्यासाठी आलेले प्रतिनिधी हे कमालीची भारतविरोधी वार्तापत्रे धाडत होते. अशा या लोकांना गांधींसारख्या हिदी नेत्याचा जगभर अनेकदा गौरव होतो, मार्टिन ल्युथर किग, नेल्सन मंडेला यांच्यासारखे जगन्मान्य नेतेही गांधींना आदर्श मानतात, हे सहन होत नाही. कोठे शांततापूर्वक निदर्शने होऊन तेथील राज्यकर्ते हादरले वा उखडले गेले तर ती निदर्शने गांधींची आठवण करून देतात असे जगभर म्हटले जाते. अमेरिका ही महासत्ता म्हणून मिरवत असता त्यातल्या वा युरोपांतल्या कोणाहीपेक्षा एका भारतीयास हा सार्वत्तिक मान मिळतो याची पोटदुखी ललीव्हेल्ड यांना असण्याचा संभव असून, यातून त्यांचाच वंशवाद प्रगट होत आहे असे म्हटले तर ते वावगे होणार नाही.

आपला,

– गोविद तळवलकर

( govindtalwalkar@hotmail.com)

संजय चिटणीस, सौजन्य – लोकसत्ता

सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली १९२८ साली एक कमिशन भारतात आले होते. या कमिशनवर भारतातील सर्व पक्षांनी बहिष्कार घातला होता. हे कमिशन जिथे जिथे जाई, तिथे हरताळ पाळण्यात येऊन निषेधाच्या प्रचंड मिरवणुका निघत व ‘सायमन गो बॅक‘ अशा घोषणा दिल्या जात. ३१ ऑक्टोबर १९२८ रोजी हे कमिशन लाहोर येथे गेले असता जनतेने लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोठे निदर्शन केले. त्या वेळी, पोलीस सुपरिंटेंडेंट स्कॉट व सँडर्स यांनी लाठीमार केला. त्यात लाला लजपतराय यांच्या छातीवर मार बसला व त्यामुळे पुढे लालाजींचे निधन झाले.

लालाजींच्या मृत्यूमुळे देशातील वातावरण प्रक्षुब्ध झाले. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी वासंतीदेवी यांनी तर एक पत्रक काढून, भारतातील युवक या राष्ट्रीय अपमानाचा बदला घेणार नाहीत का, असा सवाल केला. भगतसिंग यांनी हे पत्रक पुनःपुन्हा वाचले आणि निश्चय केला की, लालाजींच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या सँडर्सर्ला यमसदनाला पाठविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. त्यांच्या या संकल्पाला चंद्रशेखर आझाद, सुखदेव व राजगुरू यांची साथ होतीच. त्यानुसार १७ डिसेंबर १९२८ रोजी सँडर्स हा दयानंद कॉलेजसमोरील पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना राजगुरू यांनी पुढे उडी मारून त्यांच्या मानेवर गोळी झाडली. त्यानंतर भगतसिंग यांनी आणखी चार-पाच गोळ्या झाडून सँडर्सला यमसदनास धाडण्याचे काम पूर्ण केले. पुढे त्याबद्दल भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांवर खटला भरण्यात आला.या खटल्याच्या अखेरीस भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि २३ मार्च १९३१ रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली.

परंतु भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांना देण्यात आलेल्या फाशीमुळे मोठे राजकीय वादळ उठले. विशेषतः महात्मा गांधींना त्यासंदर्भात लक्ष्य बनविण्यात आले. या देशभक्तांची फाशीची शिक्षा रद्द करून घेण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले नाहीत, असा ठपका काहींनी गांधींवर ठेवला. इतकेच नव्हे, तर गांधीजी कराची येथे काँग्रेसच्या अधिवेशनाला गेले तेव्हा त्यांच्यासमोर निदर्शनेही करण्यात आली. ‘गांधी परत जा‘, ‘गांधीवादाचा धिक्कार असो‘, ‘गांधींच्या समेटामुळे भगतसिंग फासावर गेले‘, ‘भगतसिंग अमर रहे‘ अशा घोषणा नवजवान सभेचे सदस्य देत होते. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी काळ्या कापडात गुंडाळलेली फुले गांधींना दिली. फासावर गेलेल्या हुतात्म्यांच्या रक्षेचीच ती प्रतीके होती. परंतु निदर्शक भारदस्त होते. मनात आणले असते तर ते गांधींना धक्काबुक्की करू शकले असते, त्यांचा अपमानही करू शकले असते. पण तसे त्यांनी काहीही केले नाही. स्वतः गांधींनीच तशी नोंद करून ठेवली आहे.

वास्तविक त्या वेळी स्वातंत्र्यासाठी जो अहिंसात्मक लढा सुरू होता त्याचे एक पर्व संपले होते. गांधी व व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात समेटाची बोलणी चालू होती. लढ्याचा हिंसक मार्ग गांधींना मान्य नव्हता. पण त्याचबरोबर शूर माणसांबद्दल त्यांना आदर वाटायचा. त्यांची अहिंसा ही शूराची होती. अहिंसेच्या अनुषंगाने एका सभेत भाषण करताना गांधीजी म्हणाले, ‘माझ्या अहिंसेच्या तत्त्वात चोर, दरोडेखोरच नव्हेत तर खुन्यांनाही फाशी देणे बसत नाही. कोणालाही सुळावर चढविणे हे माझ्या सदसदि्‌्‌ववेकबुद्धीला पटत नाही. अशा पार्श्वभूमीवर, भगतसिंगांसारख्या वीराला फाशी देणे, ही कल्पनाच सहन होत नाही.‘

भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरना मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल, असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांनी फाशी देण्याचा अघोरी कार्यक्रम उरकून घेतला. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अगदी २३ मार्च उजाडतो न उजाडतो तोच गांधींनी आयर्विन यांना पत्र दिले व भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयी कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा आयर्विनवर काहीही परिणाम झाला नाही. ते आपल्या निर्णयावर ठाम होते.

२६ मार्च १९३१ रोजी कराचीच्या काँग्रेस अधिवेशनात बोलताना या तीन देशभक्तांना वाचविण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले हे गांधींनी विशद केले. आपण ज्या वाटाघाटी व बोलणी केली, त्यामुळे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे प्राण वाचतील, अशी आपल्याला आशा वाटू लागली होती, असे उद्‌गार काढून गांधीजी म्हणाले, ‘मी व्हाइसरॉयना समजावून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. माझी बाजू परिणामकारकपणे मांडण्याची मी शिकस्त केली. भगतसिंगांच्या नातेवाईकांबरोबर माझी शेवटची मुलाखत २३ मार्च रोजी ठरली होती. त्या दिवशी व्हाइसरॉयना लिहिलेल्या पत्रात मी माझे अंतःकरण ओतले होते.‘

भगतसिंग प्रभृतींची फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून गांधीजींनी कसे प्रयत्न केले, यावर जवाहरलाल नेहरूंनीही प्रकाश पाडला आहे. ते आत्मचरित्रात लिहितात, ‘भगतसिंगांची फाशी रद्द व्हावी म्हणून गांधींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण सरकारने आपला हट्ट सोडला नाही. गांधी- आयर्विन कराराशी वस्तुतः या प्रयत्नांचा संबंध नव्हता. परंतु या प्रश्नाबद्दल देशात किती प्रखर भावना आहेत, हे लक्षात घेऊन गांधींनी त्यासंबंधी स्वतंत्रपणे प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.‘

स्वतः नेहरूंना भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका होईल, अशी आशा वाटत होती. १० मार्च १९३१ रोजी अलाहाबाद येथे केलेल्या भाषणात नेहरू म्हणाले, ‘भगतसिंग आज हयात आहेत, याचे श्रेय गांधींना आहे. केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळेच भगतसिंग व हिंसात्मक कृत्यांना जबाबदार अशा इतर राजकीय कैद्यांची मुक्तताही होऊ शकेल, अशी मला आशा आहे.‘ पण व्हाइसरॉय आयर्विन या प्रश्नावर ताठर राहिले. कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे पुढीलप्रमाणे समर्थन केले- ‘कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. फाशीच्या शिक्षेला सर्वात कोण पात्र असेल, तर तो भगतसिंग, हे मी श्रीमान गांधींना सुनावले. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरविले.‘ काँग्रेसच्या कराची येथील अधिवेशनात भगतसिंग प्रभृतींच्या फाशीसंबंधीच्या ठरावाचा मसुदा स्वतः गांधींनी तयार केला होता. हा ठराव पुढीलप्रमाणे होता- ‘कोणत्याही स्वरूपाची व प्रकारची हिंसा काँग्रेसला मान्य नसली, तरीही काँग्रेस भगतसिंग व त्यांचे दोन सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांचे शौर्य व त्याग यांचा गौरव करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे जाहीर करते.‘ हा ठराव जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या अधिवेशनात मांडला.‘भगतसिंगांच्या त्यागाने अगदी वरची पातळी गाठली आहे,‘ असे उद्‌गार काढून नेहरू म्हणाले, ‘भगतसिंगांना फाशी दिल्यामुळे देशात चमत्कारिक वातावरण निर्माण झाले आहे. आज प्रत्येकाच्या मनात भगतसिंगांबद्दलचे विचार का घोळत आहेत? खेड्यापाड्यातील मुलांनाही भगतसिंगांचे नाव माहीत आहे. त्यांच्यापूर्वी अनेकांनी त्याग केला आहे आणि आजही त्याग करीत आहेत. मग भगतसिंगांचेच नाव प्रत्येकाच्या जिभेवर का? त्यांची छायाचित्रे अनेकांच्या घरांत भिंतीवर का लटकलेली दिसतात? यामागे काही तरी कारण असले पाहिजे. भगतसिंग हे स्वच्छ वृत्तीचे लढवय्ये होते. त्यांनी उघड्या मैदानात शत्रूशी दोन हात केले. देशाविषयीच्या कळकळीने ते भारावून गेले होते. ते जणू काय एखाद्या ठिगणीसारखे असून, अल्पावधीतच या ठिगणीतून ज्वाला निर्माण झाली आणि ही ज्वाला देशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पसरली. सर्व ठिकाणचा अंधकार घालवणारी अशी ही ज्वाला होती.‘

थोडक्यात, रूढ अर्थाने माहीत असलेले क्रांतिकारक व गांधींसारखा अद्वितीय क्रांतिकारक यांच्यामधील संबंधांचा विचार करताना तो सर्वंकष असला पाहिजे. गांधींचे आकलन ही काही साधी गोष्ट नाही.

अनिल अवचट, सौजन्य – अनुभव दिवाळी २०१०

छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राचं दैवत. चतुर, मुत्सद्दी, दूरदर्शी, पराक्रमी, आघाडीवर राहून लढणारा जाणता राजा! दुसर्‍या धर्माचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो हे दाखवणारा लोकहितदक्ष राजा! आज त्यांचे अभिमानी पुष्कळ आहेत, पण लोक खर्‍या शिवाजी महाराजांना कधी ओळखतील? एक ललित चिंतन.

————————————————————————————

मध्यंतरी दिल्लीला एका अभ्यासकाला भेटण्याचा योग आला. त्याच्या संशोधनाचा विषय वेगळाच होता. पण त्याने जाता जाता एक छोटा अभ्यास म्हणून शिवाजीवरही निबंध लिहिला होता. त्यात अलेक्झांडर आणि नेपोलियनशी त्याने तुलना केली होती. शिवाजीच्या बर्‍याच जमेच्या बाजू आणि काही मर्यादा दाखवल्या होत्या. त्याने मांडलेल्या मतावर त्याने मला मत विचारले. मी विचारात पडलो. म्हणालो, ‘‘मला नाही बुवा यात काही सांगता येत. कारण शिवाजी हा इतका माझा आहे, की त्याविषयी मला क्रिटिकली, टीकाकाराच्या दृष्टीतून काही विचारच करता येणार नाही.’’ माझ्या या म्हणण्याचे त्याला खूप आश्चर्य वाटले. पण खरंच आहे ना ते. माझी सगळी लहानपणाची घडण शिवाजीबरोबरच नाही का झाली? जेव्हा वाचता येऊ लागलं तेव्हा ब. मो. पुरंदर्‍यांची वेगवेगळ्या गडांची नावं असलेली पुस्तकं अधाशासारखी रंगून रंगून वाचली होती. त्याच्या धैर्याचा, शौर्याचा, सगळ्याचा आपल्यावर केवढा खोलवर परिणाम झाला, ते विसरणं शक्य आहे का?

अलीकडे त्याचे अभिमानी लोक जागोजाग दिसतात. त्यातला मी नाही. ते ‘शिवाजी महाराज’ म्हणावे असा आग्रह धरतात. काही तर ‘छत्रपती शिवाजी महाराज’ म्हणतात. मला शिवाजी म्हणायला आवडतं, आणि तेही ‘तो शिवाजी’ असं. कृष्णाला आपण श्रीकृष्णमहाराज म्हणतो का? संतांनी विठ्ठलाला विठ्ठलेश्वर नाही केलं. ते तर त्याला ‘विठ्ठला’, ‘विठोबा’ अशी एकेरी हाक मारतात. कोणी संत, ‘विठूराया’ म्हणते, तर कोणी आपुलकीने ‘विठ्या’ही. संत ज्ञानेश्वर महाराज हे कानाला बरे वाटते, की आपल्या ग्यानबा-तुकाराममधला ग्यानबा किंवा ज्ञानोबामाउली-तुकाराममधला ज्ञानोबा? अलीकडे जन्मलेल्या, म्हणजे डॉ. आंबेडकर, म. फुले, गांधीजी यांना ते तसेच प्रिय असूनही आपण अशी जवळीक दाखवत नाही. असं का असं विचाराल, तर माहीत नाही.
नावावरून आठवलं. व्ही. टी. स्टेशनचं नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ केलं गेलं. मला याचं तेव्हा आश्‍चर्य वाटलं होतं. त्यापेक्षा साधं-सोपं ‘शिवाजी’ टर्मिनस नाव दिलं असतं तर? लोकांच्या तोंडी शिवाजीचं नाव आलं असतं. त्यावरून कदाचित एखादवेळेस कुणाला त्याच्या कर्तृत्वाची आठवणही आली असती. आता ते झालंय केवळ ‘सी. एस.टी.’! तेच विमानतळाविषयीही झालंय. नावं देताना अशी विशेषणं लावली की मूळ उद्देश बाजूला पडतो, हे नावं देणार्‍यांच्या कसं लक्षात आलं नाही?

लहानपणी शिवाजी माझ्या स्वप्नातही यायचा. आमच्याकडे दीनानाथ दलालांनी काढलेलं शिवाजीचं चित्र ङ्ग्रेम करून लावलेलं होतं. ते धारदार नाक, त्या डौलदार मिशा, ती टोकदार दाढी…पण मला एक उणीव नेहमीच जाणवली ती म्हणजे त्याचं समोरून काढलेलं एकही चित्र मी पाहिलं नव्हतं. त्या काळात मी पाटीवर सारखे शिवाजीचेच चित्र काढायचो. तसेच नाक, मिशी, दाढी…कपाळावर शिवाचे आडवे तीन पदरी गंध…डोक्यावर मागे वळ्यावळ्यांनी बनलेला शिरेटोप काढायचो. तसाच मागे जाणारा तुरा, खाली लोंबणारा मोत्यांचा झुपका…मी मोती न् मोती मन लावून काढायचो. आमच्या घरासमोर एक देऊळ होते. ते माझे विश्वच जसे. तिथल्या दारांवर खडूने शिवाजी काढायचो. तुळयांवर खडूने अशी ऐतिहासिक काव्यांची वाक्ये लिहून ठेवायचो. एक आठवतंय, ‘मुक्या मनाने किती उडवावे शब्दांचे बुडबुडे, तुझे पवाडे गातिल पुढती तोफांचे चौघडे.’ आणि हो, मी पोवाडेही म्हणायचो. डोक्याला एखादे फडके फेट्यासारखे बांधून. सगळंच इतकं शिवाजीमय, की एक थोडासा गोलाकार खड्डा असलेल्या दगडाला आम्ही शिवाजीच्या घोड्याचा उठलेला पाय म्हणूनच दाखवायचो.
अलीकडे एका राजकीय पोस्टरवर शिवाजीचे डोळे वटारलेले चित्र पाहिले. मनात म्हणालो, ‘नाही, नाही. असा तो उग्रट नव्हता रे भाऊ. तो शांत, संयमी, माणुसकीचा जिव्हाळा असलेला माणूस होता. प्रसंगी तो रागावतही असेल, पण ते प्रसंगीच. लोकांना त्याच्या जवळ जावेसे वाटायचे. मनातले बोलावेसे वाटायचे. मनात आलेला नवा डावपेच सांगावा, असे वाटून तो निर्भयपणे शिवबादादाला सांगता यायचा. निदान माझा शिवाजी तरी तसा होता. अलीकडे काहीजणांनी त्याला मुस्लिमविरोधी भावनांचंही प्रतीक केलंय. शिवाजीदादा, सांग रे या लोकांना, की तू नव्हतास तसा. किती देवळांबरोबर मशिदींना तू अनुदानं दिलीस. किती मुस्लिम सैनिक, सरदार तुझ्या सैन्यात होते. आणि ते केवढे तुझे जिवाभावाचे होते. अंगरक्षक, हेर, किती किती सांगावं….

तर ते जाऊ द्या. आपला शिवाजी आपण सांभाळू यात. पुरंदर्‍यांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा मोठा ग्रंथ आला. नंतर रणजित देसाईंचं ‘श्रीमान योगी’ आलं. त्यातलं उजवं-डावं कसं सांगणार? कुठलंही पान उघडावं आणि वाचत बसावं आणि शिवाजीचं बोट धरून लहान होऊन जावं. तसा शिवाजी लहानशा जहागिरीचा जहागीरदार. वडील मोठे सरदार असले, तरी ते कुठे तरी लांब, धावपळीत. तरी या पोरानं स्वराज्याचा डाव मांडला. सवंगडी जमवले, सगळ्या पोरांनी स्वराज्याची शपथ काय घेतली, सगळंच अजब. (ज्ञानेश्वरांच्या बाबतीत हेच आश्‍चर्य वाटतं. एवढ्या वीस-बावीस वर्षांच्या तरुण पोरास हे कुठून आलं शहाणपण? तसंच शिवाजीविषयीही वाटतं.) हे राज्य आपलं नाही, हे त्याला कसं कळलं असेल? त्याला त्याची जहागीर हेच राज्य का नाही वाटलं? हे त्याचं स्वप्न उपजतच होतं की काय? मग लक्ष जातं जिजाऊ, जिजाबाई, जिजामाता यांच्याकडे. काय म्हणावं तिला? शिवबाची आई, ती आपली आज्जीच नाही का? तर त्या आज्जीनं कसं घडवलं असेल त्याला? शहाजीराजानं ही फार जोखमीची जबाबदारी सोपवली. आपल्या आज्जीने किती शांतपणे, मागे राहून निभावली! आजीचा चेहराच येत नाही डोळ्यांसमोर. सीरियलमध्ये दाखवतात तशी सुंदर, तरुण…हे मन स्वीकारतच नाही. ती असणार मध्यमवयातली. तिचा चेहरा सुंदर नसणार, पण त्यावर शहाणपणाचे तेज असणार. त्यात कणखरपणा असेल. पण सदासर्वकाळ कणखरपणा कसा असेल? शिवाजी स्वारीवर गेल्यावर त्याची काळजी करत बसणार्‍या आपल्या आज्जीचा चेहरा कसा असेल? आणि आग्र्‍याला लाडक्या नातवासह शिवाजी गेला तेव्हा हृदयाचं पाणी पाणी झालं असेल…तेव्हा तर वार्धक्याने चेहरा सुरकुतलेला असणार. राज्याभिषेकासाठी आजीनं जसा जीव धरून ठेवला होता! तो झाला आणि संपलंही ते कृतार्थ जीवन, केवळ पंधरा दिवसांत. काय या मायलेकरांचं नातं असेल नाही? घरचा कारभार बघणं, सुनांना आपलंसं करणं, मुलाच्या अपरोक्ष राज्यकारभार सांभाळणं, बापाचा सहवास मिळत नाही म्हणून रुसलेल्या नातवाला माया लावणं…बाप रे किती गुंतागुंतीचं जीवन होतं आपल्या या आज्जीचं!

शिवाजीचा जन्म झाला तो शिवनेरी गड आमच्या ओतूरजवळच. अनेकदा तिथं सहली गेल्या होत्या. सिंहगडही पुण्याच्या परिसरातला. त्यामुळे तिथंही बर्‍याचदा जाणं-येणं. पण इतरांना अशा ठिकाणी गेल्यावर जशा वेगळ्याच संवेदना होतात तशा मला झाल्या नाहीत. काही पडके, दोन-चार दरवाजे… हे पाहून काय वाटणार? मला या किल्ल्यांची ही दुर्दशा करणार्‍या ब्रिटिशांचा संताप येतो. आश्‍चर्यही वाटतं. इतकं जुनं जपणारे लोक ते. त्यांना म्हणे परत या गडांच्या आधाराने बंड होईल अशी भीती होती, म्हणून त्यांनी ते उद्ध्वस्त केले! अरे, ब्रिटिशांनो, ङ्गार तर तटबंदी काही ठिकाणी पाडायची होतीत. पण आतल्या सगळ्या इमारती, घोड्यांच्या पागा, तलाव, रस्ते, बाजार…यांनी काय केलं होतं तुमचं वाकडं? मी कधी स्वप्न पाहतो, हे सगळे किल्ले, त्यातल्या इमारती अगदी जशाच्या तशा आहेत. त्यांची छपरे तशीच आहेत त्या भिंतींवरची चित्रेही तशीच. अगदी तक्के, गालिचे, झुंबरंही तशीच. किल्ले पूर्वी जसे होते, तसे राहिले असते तर तिथे शाळेच्या सहली आल्या असत्या. शिवबादादा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचला असता. तर मला कदाचित तिथं शिवबादादा भेटला असता, आज्जी भेटली असती. तिच्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो असतो आणि म्हणालो असतो, ‘आज्जी, मला आपल्या शिवबादादाच्या लहानपणच्या गोष्टी सांग ना!’

सगळ्या पराक्रमातली अफजलखानाच्या वधाची हकीगत मला ङ्गार आवडते. किती वेळा वाचली असेल, पण तरी कंटाळा म्हणून येत नाही. ते ‘थ्रिल’ आजही सोडून गेलं नाही. तो खान विजापूरहून निघाला- मंदिरं फोडत, वगैरे. तो डिवचत होता शिवबाला. पण संयम बघा याचा. त्याला तो प्रतिकार करायला, वीरश्री गाजवायला बाहेर पडला नाही. नको ते साहस त्याने केलं नाही. इतका हाहाकार कानावर येऊनही शिवाजी शांत कसा राहिला? आणि ते घाबरल्याचे नाटक? खूप वर्षांपूर्वी वसंत व्याख्यानमालेत आचार्य अत्र्यांचे भाषण होते. अध्यक्षस्थानी दत्तो वामन पोतदार. अत्र्यांनी त्या दिवशी अफजलखानाच्या वधाचे जसे आख्यानच लावले. खानाला कसा खेचून आणला वगैरे…शेवटी त्यांनी सांगितले, ‘शिवाजीने वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला, हे खरे नाही. त्याने कट्यार लपवून नेली होती. त्या कट्यारीने पोट फाडले’…वगैरे. दत्तो वामन अध्यक्षीय भाषणात मिश्किलपणे म्हणाले, ‘‘त्याने वाघनखं चालवली की कट्यार हे मला सांगता येणार नाही. कारण ते पाहायला मी तिथं नव्हतो!’’ हास्यकल्लोळ थांबल्यावर म्हणाले, ‘‘खानाला मूर्ख समजू नका. त्याला तो प्रदेश चांगला माहीत होता. किती तरी वर्षं तो वाई प्रांताचा सुभेदार होता!’’ (आणि नंतर सदाशिव आठवल्यांनी सांगितलं, की आपण कदाचित परत येणार नाही म्हणून खानानं आपल्या सर्व बेगमांचा वध केला. त्यांच्या कबरी आजही तिथं आहेत.)

या वाक्याने माझे विश्वच जसे हलले. मग मी वाचलेली ती पुस्तके, त्या कथा? थोडं अधिक समजून घ्यायची जबाबदारी आली आता. मग खान शिवबाच्या हातात कसा सापडला? हे माझं कुतूहल शमवलं पाचगणीच्या दीक्षित सरांनी. डॉ. नलिनी गित्यांबरोबर त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी ब्रिटिशकाळापासून आजवर अनेकांना तो परिसर हिंडवून आणलाय. ते म्हणाले, ‘‘शिवाजीचे डावपेच अभ्यासावर आधारलेले होते. खान येणार, कळल्यापासूनच त्याचा अभ्यास शिवाजीने सुरू केला. मागे कुठे खानाने असाच वेढा घातला होता. आतल्या राजाला त्याने वाटाघाटीसाठी बोलावले. त्याला अभय दिले, शब्द दिला. म्हणून तो राजा गडाबाहेर भेटायला आला. आणि त्याला खानाने मारून टाकले. असे आणखी एका ठिकाणीही त्याने केले होते. हे कळल्यावर शिवाजीने डावपेच आखले. ज्या ‘मोडस ऑपरेंडी’ची खानाला सवय होती, जी नेहमीची, हात बसलेली युक्ती होती, ती टाळण्याऐवजी शिवाजीने ती मुद्दाम वापरली. मनुष्यस्वभावाचा कसा अचूक अंदाज होता त्याला! वा:! वा:! दादा, यू आर ग्रेट!’’

लहानपणी एक प्रसंग वाचायला ङ्गार आवडायचे. रायबागन आणि कातरलबखानाला कोकणात जाणार्‍या खिंडीत गाठल्याचा प्रसंग. त्या रायबागनचा तोराच उतरवला शिवाजीने. शाहिस्तेखानाच्या छावणीत, पुणे शहरात काही निवडक स्वारांसह शिवाजीने जाणे, हे केवढे धाडस! कोणता राजा असे करू शकेल हो? पण शाहिस्तेखानाला असा काही मानसिक झटका बसला की पूछो मत. औरंगजेबाचा तो मामा. म्हणजे धक्का थेट दिल्लीपर्यंत पोहोचला असणार. शाहिस्तेखान चंबूगबाळं उचलून चालताच झाला दिल्लीला.

तो राजा असला तरी इतर राजांसारखा नव्हता. सैन्याला हुकूम देऊन स्वत: मागे सुरक्षित राहणारे राजे अनेक होते. पण हा आघाडीवर राहणारा राजा होता. सर्वांत धोका पहिल्या ङ्गळीला. तिथेच हा, अगदी पुढे. त्याच्या या गुणांवरच त्याचे सहकारी, सैनिक फिदा असले पाहिजेत. स्वत:पेक्षा कसल्या तरी मोठ्या उद्देशासाठी हे चाललंय, त्या ‘कसल्या तरी’ उद्देशासाठी स्वत:चा जीवसुद्धा द्यावा? हा उद्देश फक्त शिवाजीची जहागीर वाढवायचा उद्योग नाहीये, हे सर्वांना शिवाजीच्या या ‘धडक’ कृतींमधून कळत असावं. अशी जिवाला जीव देणारी माणसं किती मिळवली असतील त्यानं? इतिहास फक्त काही निवडकांची आठवण ठेवतो. पण इथे तेही इतके भरभरून आहेत की बस्स! ओतूरच्या शाळेच्या स्नेहसंमेलनात आम्ही ‘गड आला पण सिंह गेला’ या नाटकातला प्रवेश केला होता, (किंवा त्यावरची एकांकिका असेल). त्यात कोंढाणा घ्यायचा त्याच वेळी तानाजीच्या पुतण्याचं रायबाचं लग्न येत होतं. आमच्या वर्गातला पोरगा तानाजी झाला होता. त्याचं वाक्य आठवतंय, ‘‘आधी लगीन कोंढाण्याचं, मंग रायबाचं!’ तो हे वाक्य इतकं जोरात ठासून म्हणायचा की अंगावर शहारे यायचे. आणि कोंढाणा घेतलाच त्यानं. पण रायबाच्या लग्नाला ‘काही अपरिहार्य’ कारणाने हजर राहू शकला नाही. काय जिव्हारी लागलं असेल शिवाजीला! सुख निर्भेळ मिळूच नये का? नेत्रदीपक यशात काही जिवाभावाचे सहकारी, सवंगडी गमावणे, हा काय योग आहे हो? कसं पचवत असेल तो असं दु:ख?
काय वातावरण निर्माण केलं असेल शिवबानं! सर्वसामान्य माणसं जिवाला जपतात आणि शूर प्राणांची आहुती देतात, असं नेहमीच ऐकलेलं. पण जेव्हा सर्वसामान्य माणसंच उठतात अशी आहुती द्यायला तेव्हा? काय म्हणायचं त्याला? बाजीप्रभूचं बलिदान तर कोरलं गेलंय इतिहासात, आपल्या मनात. मला आणखी कुणाची आठवण होते. शत्रूला फसवून बुचकळ्यात टाकण्यासाठी शिवाजीसारख्या दिसणार्‍या काही शिपायांना पालखीत बसवून त्या वेढ्यात पाठवल्या गेल्या. ते पकडले गेले. पुढे काय होणार ते या शिपायांना ठाऊकच होतं. तरीही ते शिवाजीसारखे सजून पालखीत बसले? का बरं? तसंच ‘आग्र्‍याहून सुटका’च्या बाबत. शिवाजीच्या जागी कोण तो पडून राहिला? कोणी आते-मामे भाऊ? छे हो. तो आपल्या स्वराज्यातला कोणी साधा शिलेदार. काय अभिनय वठवला असेल त्यानं! रंगभूमीवर कुठल्या नटाने असा मृत्यूच्या छायेत अभिनय केला असेल?

मला त्या आपल्या संभाजीबाळाचंही नवल वाटतं. आग्र्‍यात ते पोर घाबरलं नाही. पळून जाताना हूं की चूं केलं नाही. उरलेला प्रवास वडलांविना, अनोळखी भागात, रानावनातून कसा केला असेल त्यानं? संभाजीला समजून घेण्यात आम्ही सगळे कमीच पडलो. शिवबाने आपल्या राज्याभिषेकाबरोबर त्याचा युवराज्याभिषेक करूनही त्या सगळ्या अमात्य मंडळींनी गृहकलह सुरू करावा? परवा तर वाचलं, की सोयराबाईला त्यानं भिंतीत चिणून मारलं, याला काही पुरावा नाही. त्यानंतर दीड वर्षाने विष खाऊन किंवा विषप्रयोग होऊन ती गेली. ज्या अमात्यांना देहान्त सजा दिली त्यांच्याच मुलांना त्याने परत मंत्रिमंडळात घेतले. याहून त्याच्या शहाणपणाचा, समतोल बुद्धीचा काय पुरावा पाहिजे? घरावर रुसून (त्यात कार्यमग्न शिवाजी किंवा सावत्र आई यांचा सहभाग असणे शक्य आहे.) दिलेरखानाला मिळाला, त्याच्यावरचा मोठा डाग. पण पुढे त्याने खानाच्या ङ्गौजेचं गाव लुटणं पाहिलं, एका स्त्रीस खानाने मुसलमान करून जनानखान्यात ठेवली, ते पाहिल्यावर तो स्वत: होऊन परत घरी निघून आला. चूक झाली. चुका कोण करत नाही? पण चूक सुधारली ना त्यानं? वडलांनंतर जेमतेम सात-आठ वर्षंच मिळाली, पण तो त्यात सतत लढायाच करत राहिला. पोर्तुगीज, मोगल या सगळ्या आघाड्यांवर. खाली थेट कर्नाटकात जिंजीपर्यंत. तर तिकडे मराठवाड्यात. अशा नुसत्या लढायांत वेळ गेला. तो व्यसनाधीन आणि लंपट असता तर हे जमलं असतं? तो संस्कृतमधला इतका जाणकार, की त्याने संस्कृतात काव्यग्रंथ लिहिलाय. उन्मत्त वतनदारांना जरब बसवणारी त्याची आज्ञापत्रं पाहिली की थेट शिवबादादाचीच आठवण यावी. आणि मरण? मरणातच तो असे जगला की अंगावर शहारेच येतात. ते नुसते युद्धातले मरण नव्हे. ते विटंबना करून दिलेले मरण…काय त्याची ती धिंड…छे छे वाचवत नाही तो भाग. त्याच्या गुणांमध्ये, व्यक्तिमत्त्वात, निष्ठेमध्ये जरा कमतरता असती, तर तो अशा वेळी पिचला असता आणि शरण गेला असता औरंगजेबाला. पण त्या मरणात तो असे जगला की सर्व मराठी शिपायांच्या डोक्यावर जसा स्वार झाला. आणि तिथून सुरू झाले एक विलक्षण, निर्नायकी युद्ध. या पर्वाला सलाम, नमस्कार, हॅट्‌स ऑफ…कितीही शब्द वापरा, पण नाहीच कशाची सर त्याला. ते युद्ध या निनावी शिपायांचं. प्रोत्साहन द्यायला, डावपेच आखायला, पाठ थोपटायला तिथं शिवाजी-संभाजी नव्हते. राजाराम दूरस्थ. कोणी श्रेयासाठी हे करत नव्हते की इनाम, वतनासाठी. शांत, अविरत, निश्‍चयी लढाई. आपण असू तेच रणांगण. आपण एकटे असलो तरी तीच ङ्गौज. शत्रूचं बळ किती का असेना! अखेर औरंगजेबाला दिल्ली सोडून इकडे यावे लागले. तरी त्याला हे थैमान आवरेना. शेवटी इथंच त्याचा मृत्यू झाला. एक संताजी, धनाजी सोडले तर त्या विलक्षण वीरांची नावंही माहीत नाहीत आपल्याला. या अनामिक वीरांचं एखादं चांगलं स्मारक का असू नये? संभाजीच्या मृत्यूनंतरच्या या लढ्याची चांगली आठवण का असू नये? व्हिएतनाम युद्धात मरण पावलेल्यांचं वॉशिंग्टनमध्ये एक स्मारक आहे. तिथे कुठलाही पुतळा नाही. तिथं आहे लांबलचक ग्रॅनाइटने मढवलेली एक भिंत. त्यावर कोरली आहेत त्या सैनिकांची नावं. त्यांचे नातेवाईक, मित्र येऊन त्यापुढे ङ्गुले ठेवतात. हृदय गलबललंच आपलं, भाऊ. पण आपल्याकडे स्मारक म्हटलं, की ते एकसुरी पुतळे आठवतात, तलवार उपसलेले. मला एक प्रश्‍न नेहमी पडतो, की शिवाजी आम्हाला फक्त एवढाच का दिसतो? खरं पाहता इतक्या बहुपदरी माणसाची किती हृद्यतेने आठवण ठेवता येईल! पण आपणा सगळ्यांना आपला हा शिवाजी किती बहुपदरी होता, तो किती वेगवेगळ्या प्रकारे मोठा होता, हे का नाही समजू शकत? आमच्याच माणसाचे मोठेपण आम्हीच समजू नये?

तो नुसता गनिमी काव्याने लढू शकत होता असे नाही. साल्हेरच्या लढाईचा वृत्तान्त (डॉ. श्रीनिवास सामंत यांच्या पुस्तकात) वाचला. तर बाप रे! ती सपाटीवरची, समोरासमोरची लढाई! शिवाजीने ङ्गौजेचे वेगवेगळे भाग करून अशी काय जिंकलीय की बस्स! कोणी म्हणू शकणार नाही, तो ङ्गक्त सह्याद्रीच्या दर्‍याखोर्‍यांत लढू शकत होता, असे. जो लढणारा आहे, आपण कशासाठी लढतोय याचे ज्याला अचूक भान आहे, शत्रूच्या कमतरतांचा ज्याने अभ्यास केलेला आहे आणि स्वबळाची वास्तव कल्पना आहे…असा तो शिवाजी.

थंड डोक्याने वेगळ्याच कल्पना शोधणारा शिवाजी. सतत ‘प्रो-ऍक्टिव्ह’. शत्रूंच्या डावपेचांमागे तो फरफटत गेला नाही. शत्रूला कल्पना यायच्या आत त्याच्यावर झडप घालून शत्रूच्या मर्मावर हल्ला करायचा. असा तो शिवाजी!

शिवाजीच्या बाजू तरी किती! प्रत्येक बाबतीत त्यानं कसं लक्ष घातलं? इंग्रज, पोर्तुगिजांचं आरमारी बळ पाहून त्याने स्वत:चं आरमार बनवायचं ठरवलं. हीच एक क्रांतिकारक कल्पना. त्या वेळच्या समाजात समुद्रपर्यटन निषिद्ध होतं. बंदी होती धर्माची. ती शिवबाने सहज ओलांडली. तेही त्या जमान्यात. पण त्याने इंग्रज पोर्तुगिजांच्या गलबतांची नक्कल नाही केली. त्यांची जहाजे मोठी, खाली ‘व्ही’च्या आकाराची, निमुळती होत गेलेली. लांबच्या प्रवासाला ती उपयुक्त. पण शिवबादादाने इथला विचार केला. त्याची गरज काय हे ओळखून सपाट तळाच्या छोट्या होड्या बांधल्या. त्या छोट्या होड्या मोठ्या गलबतांवर हल्ले करून नाहीशा होत. एका पोर्तुगीज पत्रात असे म्हटले आहे, की ‘‘हा सीवा कुठून येतो आणि हल्ले करून कुठे गडप होतो ते कळतही नाही.’ शिवाजीने जमिनीवरच्या लढाईत जो गनिमी कावा वापरला, तोच आरमारी युद्धातही. म्हणून गुरू, किती शिकायचंय आपल्याला शिवबादादाकडून! आता आता आपण शस्त्रास्त्रांच्या बाबतीत नुसत्या कॉप्या करतो त्या अमेरिकेच्या. आपलं असं काय आहे की जे आपल्याला अनुरूप आहे? एवढंच काय, त्यांच्या माणसं न लागणार्‍या कारखानदारीचीही आपण नक्कल करतो, इथं लाखो माणसं बेकार बसली असली तरी. काय म्हणावे या अनुकरणाला?

तर नुसत्या अनुरूप बोटी बांधल्या नाहीत, तर समुद्री किल्ले बांधले, सुधारले. उदय संखे यांच्या लेखात शिवबाराजाला दुर्ग-बांधणीची किती नवी दृष्टी होती, हे कळतं. विजयदुर्गच्या आसपास शत्रूच्या बोटी येत आणि फुटत, याचे कारण त्यांना कळले नव्हते. नंतर कळले. त्यांच्या कागदपत्रांत आपल्या कमांडर गुपचूप यांना एक कागद सापडला. शत्रूच्या बोटी विजयदुर्गच्या आसपास फुटत कारण पाण्यातच शिवबाने भिंत बांधली होती. ती वरून कुणाला दिसत नसे, पण गलबते त्यावर फुटत असत. ती भिंत बंदरापासून १५० ते २०० मीटर अंतरावर होती. आणि किती लांब? तर साडेचार किलोमीटर! संरक्षणाची किती साधी पण किती परिणामकारक युक्ती! किल्ल्यांभोवतीचे समुद्रातले खडक तो तसेच ठेवायचा. त्या ‘व्ही’ आकाराच्या बोटी त्या उथळ पाण्यात, खडकाळ भागात येऊ शकत नसत, पण सपाट तळाच्या छोट्या बोटी सरासरा जायच्या. त्यानं या बांधकामात शिसं आणि चुना वापरला. चुना करण्यात शिवबाचे लोक इतके पुढे गेलेले, की पाण्याने किल्ल्याच्या तटांचे दगड झिजले, पण चुना कायम. बोला!

खांदेरीची लढाई हे तर अप्रतिमच नाट्य. हे बेट मुंबईच्या तोंडावर असल्याने त्याने इंग्रजांना चाप बसणार होता. ते ताब्यात घेऊन शिवबाच्या लोकांनी बांधकाम सुरू केले. ते इंग्रजांनी उधळून लावले. पण आपला शिवबादादा किती संयमी! सहा वर्षे थांबला. ‘ठंडा करके खाओ’ ही म्हण त्याच्यात मुरलेली होती. परत काम सुरू. मधल्या काळात बेटावर तोङ्गा चढवलेल्या. इंग्रजांनी नाकेबंदी केली. ते तोङ्गांच्या मार्‍यामुळे जवळ जाऊ शकत नव्हते. तरी बिघडलेल्या हवेचा, वादळाचा ङ्गायदा घेऊन वेढा तोडून मराठे आत जात आणि रसद पुरवत. इंग्रज काहीच करू शकत नसत. मग शिवबाने आवई उठवली (त्याही तंत्रात तो वाकबगार), की ‘पनवेलहून मराठा सैन्य मुंबईवर चाल करून येतंय.’ मग घाबरून इंग्रजांनी मराठ्यांकडे तहाची बोलणी केली, आणि त्यात शिवबाने खांदेरी बेट मिळवलेच.

या लढाईत किती विशेष गोष्टी आहेत बघा. खांदेरी बेटाची अचूक निवड, संयम, छोट्या होड्यांची करामत. त्यातला गनिमी कावा. आवई उठवून शत्रूला संभ्रमात टाकणे. आणि तहात हवे ते मिळवणे. एरवी भारतीय परंपरेत युद्धात जिंकतात पण तहात हरतात. इथे आपला शिवबादादा जिंकलेला नसूनही तहात त्याने मिळवले. क्या बात है दादा!

इतर ठिकाणी शिवबाचे पुतळे उभारण्यापेक्षा, अशा एका खांदेरीवर त्याचं योग्य स्मारक का होऊ नये? तिथं त्याच्या होड्या, पडाव, गलबतांचं प्रदर्शन का भरवू नये? खांदेरीच्या लढाईचं आत्ता शूटींग करून संध्याकाळी त्याचा दृकश्राव्य कार्यक्रम का करू नये?

मी मच्छीमार समाजाची पाहणी करताना अलिबागला गेलो होतो आणि यांत्रिक होडीत बसून जवळच्या एका बेटाला फेरी मारून आलो होतो. आता नकाशात पाहतो तेच ते बेट तर नसेल ना? माहीत असतं तर उतरून मोकळेपणाने श्वास भरून घेतला असता. तेव्हा हे सगळं वाचलेलं असतं तर.

लहानपणी शिवबावरची गोष्टीरूप पुस्तके वाचली होती. नंतर प्रत्यक्ष इतिहासावरची वाचू लागलो. त्यातून माझा शिवबादादा मलाच मस्त उलगडत गेला. त्याची काही आज्ञापत्रे वाचली. ती तर ‘अहाहा’च आहेत. त्यात त्याचं शहाणपण आहे, बारीकसारीक पाहण्याची बुद्धी आहे. एका आज्ञापत्रात तो म्हणतो, ‘गडावर तुम्ही शेकोट्या पेटवता, त्या नीट विझवा. एखाद्या ठिणगीने हा हा कार होईल. तेलाच्या पणत्या विझवून मग झोपा. उंदीर तेलाची जळती वात घेऊन जातील, आणि ती जळती वात गवताच्या गंजीपाशी नेऊन टाकली की गडावरच्या गवताच्या गंजी जळून खाक होतील…’ बघा हा बारकावा. छोट्या गोष्टीतून मोठा उत्पात होऊ शकतो. एक बेजबाबदार दुर्लक्ष सर्वांच्या हिताला केवढे मारक ठरू शकते!

अनवधानाने असं गवत जळालं तर करणार काय? अन्नसाठा? सगळ्याच गोष्टी खालून वर आणायच्या. पण शिवाजीच तो, ज्यानं गडांचा इतका नेमका उपयोग करून घेतला हे त्याचं मुलखावेगळं ‘लॅटरल थिंकिंग!’

आणखी एक आपल्या शिवाजीदादाचं आज्ञापत्र मला ङ्गार आवडतं. आंबे, फणस अशी लाकडं आरमारासाठी म्हणजेच स्वराज्यासाठी आवश्यक. ‘परंतु त्यास हात लावू न द्यावा,’ अशी शिवाजीची आज्ञा होती. का बुवा? आताचं सरकार तर आर्थिक विकासासाठी हव्या त्या जमिनी, गावं ताब्यात घेतं, आणि आपला दादा, ‘रयतेच्या मालकीच्या अगदी उपयुक्त असलेल्या झाडांना’ही हात लावायला मनाई करतो? रस्ते मोठे करताना हजारो झाडांची कत्तल करणारं आताचं सरकार कुठं नि रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असं सैनिकांना बजावणारा शिवबादादा कुठं! तो नुसती आज्ञा देत नाही, तर त्याचं कारणही सांगतो ‘काय म्हणोन, की ही झाडे वर्षा दोन वर्षांनी होतात, असे नाही. रयतेने ही झाडे लावून लेकरासारखी बहुत काळ जतन करून वाढवली. ती झाडे तोडलीयावरी त्यांचे दु:खास पारावार काय?’ प्रजेला होणार्‍या अशा दु:खांची काळजी करणारा तो राजा होता. त्या काळचे कुठले आदिलशहा, कुतुबशहा, औरंगजेब अशी काळजी करत असतील? पुढे तो त्याचेही कारण देतो : ‘येकास दु:ख देऊन जे कार्य करील म्हणेल ते (कार्य) करणारासहित स्वल्पकाळे बुडोन नाहीसे होते. धन्याचे पदरी प्रजा पीडण्याचा दोष पडतो. या वृक्षांच्या अभावी हानीही होते.’ हे चिंतन त्या काळामधले. बरे, मग स्वराज्याची आरमाराची गरज भागवावी कशी, तर शिवाजीचे म्हणणे असे की, ‘एखादे झाड, जे बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल, तर धन्यास राजी करून, द्रव्य देऊन, त्याचा संतोष करून तोडून न्यावे. बलात्कार सर्वथा न करावा.’ बोला आता. शिवबादादा आत्ता असता तर त्याने धरणग्रस्तांचे हाल होऊच दिले नसते. परकीय कंपन्यांना त्याच्या काळातही कसे दूर आणि धाकात ठेवले असते! आज तो असता तर सेझ कायदा होऊच दिला नसता. पण काय करता? नुसता राज्यकर्त्यांना दोष कसा द्यायचा? आमच्यातच शिवबा पुरेसा मुरलेला नाही. हा दोष आपलाच.

शिवबादादाच्या आज्ञापत्रात तो आज्ञा करताना समजावूनही सांगतो. ‘तुम्ही निष्काळजीपणा केलात तर वैरण पेटल्याने नष्ट होईल. मग चार्‍याअभावी घोडे मेले तर तो दोष तुमच्यावर लागेल. तुम्ही त्यासाठी रयतेचे धान्य लुटू लागाल. मग रयत म्हणेल, त्या मोगलांमध्ये आणि यांच्यात ङ्गरक काय? आणि लोकांचा आधार तुटला तर राज्यच कोसळेल…’ असे बरेच. एका पत्रात तर ‘कुणा शत्रूचे सैन्य या मार्गाने येत आहे. गाव उठवा आणि लोकांना घाटात सुरक्षित ठिकाणी लपवा,’ असे लिहिले आहे. मला आठवतेय, नेपोलियनने रशियात धडक मारली होती, तेव्हा गावकर्‍यांनी पलायन केले होते. जाताना आपापली गावे पेटवून दिली. त्यामुळे पुढे हिवाळ्यात तो तिथे सापडला, आणि गावंच अस्तित्वात नसल्याने त्याला माघारी ङ्गिरावं लागलं होतं. त्या गावकर्‍यांचं वागणं शिवबादादाच्या त्या माणसे हलवण्याच्या युक्तीशी किती मिळतं जुळतं आहे. त्यात परत घरं पेटवून देणं ही भानगड नाही. शत्रू पुढे गेला की परत गाव जसंच्या तसं.

तर त्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये सेतुमाधवराव पगडींनी लिहिलेलं छोटं आणि छान शिवचरित्र आहे. अलीकडे गजाजन मेहंदळ्यांचे दोन ग्रंथही छान आहेत. शिवाय सामंतांचे ते फक्त लढायांवरचे पुस्तक. ते तर अप्रतिमच. अ. रा. कुलकर्णी आणि ग. ह. खर्‍यांनी संपादित केलेले ‘मराठ्यांचा इतिहास’चे दोन खंड तर ग्रेटच!

पण सगळ्यात ज्यांनी डोळे उघडले ते त्र्यं. शं. शेजवलकरांच्या पुस्तकांनी. त्यांच्या लेखसंग्रहात ‘रियासत’कार सरदेसाईंच्या ‘नानासाहेब पेशवे’ या पुस्तकाला त्यांनी लिहिलेली प्रस्तावना आहे. त्या लेखाने मला हादरवलेच. पुढे मी त्यांचे बरेच लिखाण, ग्रंथही वाचले. पण जमलेला लेख हाच. त्यांच्या आयुष्याच्या सर्व आकलनाचे गाळीव रूप त्यात आले आहे. पेशव्यांच्या उणिवा, कमतरता सांगताना त्याने समोर शिवाजी आरशासारखा धरला आहे. त्यामुळे पेशवे बाजूलाच राहिलेत. सरदेसाईंचं मोठेपण हे, की त्यांच्या आतल्या पुस्तकाला ही प्रस्तावना सर्वस्वी प्रतिकूल असूनही त्यांनी ती छापलीय. शिवाजीने दिल्ली सत्तेला आव्हान देऊन नवे स्वतंत्र राज्य स्थापन केले, तर पहिल्या पेशव्यांनी दिल्लीला जाऊन अधिकाराची वस्त्रे आणली. थोडक्यात, मांडलिकत्व पत्करले. शिवाजीने आपल्या अर्थव्यवहारासाठी स्वतंत्र चलन निर्माण केले, नाणी पाडली. ‘मुद्रा भद्राय राजते’- आठवतंय ना? ते नुसतं नाणं नाही. एका भूमिपुत्रानं आक्रमक सत्तेला दिलेलं ते आव्हानच आहे. या उलट पेशव्यांनी ती नाणी रद्द करून दिल्लीश्वरांचे चलन स्वीकारले. शिवाजीने मराठी राजभाषा बनवली. त्यासाठी राज्यव्यवहारकोष लिहून घेतले. पण पेशव्यांनी ते परत ङ्गारसीवर आणले. आपल्याला आता पेशव्यांविषयी काही म्हणायचे नाही. पण हे खरे, की पेशव्यांनी शिवाजीला एक ‘कॉन्ट्रास्ट’ पुरवला आहे. थोरले बाजीराव आणि थोरले माधवराव हे चमकून गेले आणि त्यांनी त्यांच्यात भिनलेले शिवाजीचे स्फुल्लिंग दाखवले. पण ते तितकेच. शेजवलकरांनी लिहिलेला ‘पानिपत’ हा तर युद्धशास्त्रावरील अप्रतिम ग्रंथ. आपला मुख्य शत्रू अब्दाली आहे, तर पेशव्यांनी उत्तरेकडे जाताना इतर सर्व छोट्या सत्तांशी तह करत जावे ना… तर त्याऐवजी त्यांना दुखवतच हे पुढे गेले. यमुनेला पूर येण्याआधी अब्दालीला गाठायचे होते, तरी पेशवे ठिकठिकाणी तीर्थक्षेत्री होमहवन करत राहिले. इतक्या लांबचा पल्ला, तरी सर्व कुटुंबकबिला घेऊन सगळे निघाले. आणि व्हायचे तेच झाले. किती मोती गळाले आणि किती खुर्दा सांडला, याचे हिशोब करणे नशिबी आले.

शिवाजी किती वेगळा होता! त्याच्या हल्ल्यात किती आश्‍चर्याचे धक्के असायचे. शत्रूच्या विचारांच्या तो किती पुढे होता! शेजवलकर लिहितात, ‘अब्दाली हा अङ्गगाणिस्तानातला शिवाजीच. थोड्या पण चपळ फौजेनिशी हल्ले करून पळून जाणारा,’ म्हणजे बघा. काळचक्र कसे उलटे झाले! शिवाजीने सुस्त व प्रचंड मोगल ङ्गौजेस हल्ले करून जेरीस आणले. आता शिवाजीच्या जागी अब्दाली आणि मोगलांच्या जागी पेशवे, म्हणजे आपणच. काय हा योग म्हणायचा?

शेजवलकरांचं अखेरचं कार्य होतं शिवचरित्र लिहिण्याचं. त्यासाठी त्यांनी आयुष्यभर अभ्यास केला, साधनं जमवली. पण शेवटी तब्येत साथ देईना. त्यांचे एक विद्यार्थी मला सांगत होते, की ते म्हणायचे, ‘थोडा काळ मिळाला तर हे काम पुरे होईल.’ त्या आजाराशी झगडत त्यांनी शेकडो पानांची प्रदीर्घ प्रस्तावना लिहिली, प्रत्येक प्रकरणाचा आराखडा लिहिला आणि प्राण ठेवला. नंतर मराठा मंदिर संस्थेने त्यांचा ‘राजा शिवछत्रपती’ हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला. काय प्रस्तावना आहे ती! जसा एक प्रबंधच. शिवाजीच्या वेळची भारतातली परिस्थिती, जगातली परिस्थिती, इथली सामाजिक स्थिती, इथला तोपर्यंतचा इतिहास, इथले ङ्गसलेले प्रयोग…काय नाही त्यात? हे जेव्हा वाचले तेव्हा वाटले, आयुष्य दुसर्‍याला द्यायची सोय असती तर मी शेजवलकरांना माझी दहा निरोगी वर्षे देऊन त्यांचे ऋण थोडे तरी ङ्गेडले असते. एवढ्या समग्रपणे पाहणारा इतिहासकार मला दुसरा अजून सापडला नाही.

शिवाजीने आधीच्या वतनदारांना बाजूला सारून ही सर्वसामान्यांतली ङ्गौज जमा केली. अगदी अठरापगड जातींची. कसलीही प्रतिष्ठा नसलेली, पण जिवाला जीव देणारी. त्या अस्थिर जमान्यात लढाया होत्याच; पण तरीही शिवाजीने शेतकर्‍यांना स्थैर्य दिले, प्रोत्साहन दिले. अकबराला जसा राजा तोरडमल किंवा आणखी कुणाला मलिक अंबर मिळाला, तसा शिवाजीला कुणी चांगला प्रतिभावान सहायक मिळायला हवा होता. मग त्याने महसुलाची योग्य पद्धत बसवून त्याच्या स्वप्नातला महाराष्ट्र निर्माण केला असता. पण शिवाजीचे सगळे आयुष्य धावपळीचे. एकूण फक्त जेमतेम पन्नास वर्षे. त्यात एका संकटाशी दोन हात करावे तो दुसरे संकट उभे, ही परिस्थिती. पण त्याही परिस्थितीत त्याने व्यवस्था बसवली, लोकांना स्थैर्य दिले.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, आजच्या काळातही त्याच्या पायाशी बसून धडे घ्यावेत असा त्याचा धर्मविषयक दृष्टिकोन. दुसर्‍या धर्मांचा द्वेष न करता आपला धर्म पाळता येतो, हे त्या वेळच्या मुस्लिम सत्तांना त्याने दाखवून दिले. मोगलांच्या प्रभावळीत अकबर असा होता. अकबराविषयी जेवढे वाचतो तेवढा तो आवडत जातो. वडील हुमायून अगदी विपन्नावस्थेत. अकबरानेही जवळपास शून्यातून सुरुवात करून साम्राज्य उभारले. त्या वेळच्या प्रस्थ असलेल्या मुस्लिम सरदारांपेक्षा त्याने राजपुतांना जवळ केले. काही राजपूत स्त्रियांशी लग्न केले, पण त्यांचा धर्म बदलला नाही. त्यांच्या महालात देऊळ बांधून देवपूजा करण्यास मुभा होती. एवढंच काय, पुढचा वारसही त्यांच्याच पोटचा. त्याने मुल्ला-मौलवींचं प्रस्थ कमी करून मोकळं वातावरण तयार केलं. अगदी बरेचसे गुण शिवाजीसारखेच. कधी वाटतं, अकबर आणि शिवाजी एकाच काळात असते तर? किती ङ्गायदा झाला असता आपल्या सगळ्यांचाच! अकबरानंतर अकबराने तयार केलेले वातावरण विरून गेले आणि त्याबरोबर उलट्या वृत्तीचा औरंगजेब निर्माण झाला. आणि शिवाजीची ही प्रेरणा दुसर्‍या बाजीरावापर्यंत पूर्ण लयाला गेली. हे महापुरुष एकत्र आले असते तर न पुसता येणारी संमिश्र संस्कृती उदयाला येऊन टिकलीही असती. त्या काळात लोकांमध्ये ती होतीच. सूङ्गी संत, भक्ती संप्रदायातले आपले संत यांत विरोध तर नव्हताच, पण एकमेकांकडे आदानप्रदान होते. एकमेकांबरोबर इष्ट परिणाम होत होते. काही संत, त्यांचे गुरू यांना हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही नावांनी ओळखले जायचे. काही मुस्लिम संत तर अगदी भागवत संप्रदायी होते. ते वातावरण मीही माझ्या लहानपणी अनुभवलंय. आमच्या लहानपणी मुस्लिमांचे डोले नाचत यायचे. माझी आई हातात पाण्याचा तांब्या घेऊन दारात उभी राहायची. डोले जवळ आले की घरापुढे रस्ताभर पाणी शिंपायची, त्यांच्या स्वागताला. असे प्रत्येक घराच्या दारात स्वागत. गणेशोत्सवाची सजावट मुस्लिमांकडे, हे मी अनेक ठिकाणी पाहिलंय. अनेक गवय्ये खानसाहेब देवीचे भक्त होते. त्यांनी देवाच्या वर्णनाच्या चीजा बांधल्यात. गेल्या पिढीतले बरेच हिंदू गवई सांगतात, खानसाहेबांनी मला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळून विद्या दिली…अशी अनेक उदाहरणे.

मग कुठं लयाला गेलं सगळं हे ? आधी देशाचे दोन तुकडे झाले. जो मिळाला त्यात ही अशांतता, एकमेकांविषयी संशय, दंगली, बॉंम्बस्ङ्गोट…वगैरे. आणि तरीही आम्ही वारसा सांगतो शिवाजीचा आणि त्याच्याकडून शिकत नाही काही, याला काय म्हणावे?

कधी कधी वाटते, लोक खर्‍या शिवाजीला ओळखतील! शिवाजीला लढाया कराव्या लागल्या. सन्मानाने राहण्यासाठी, आपली जागा तयार करण्यासाठी. ती जागा आधीच उपलब्ध असती, तर त्याने छान, एकोप्याने नांदणारे सुखी राज्य निर्माण केले असते. मग करू या का सुरुवात? आपल्या राजकारण्यांनी, धुरीणांनी जरा शिवाजीकडून शिकावे ना थोडे. एक भव्य स्वप्न उराशी घेऊन उतरावे या गरिबीविरुद्धच्या लढ्यात. अन्नावाचून, औषधावाचून कुणी मरताच कामा नये, अशी करूयात का आपण प्रतिज्ञा? हा नुसता महाराष्ट्र नाही आहे, हे शिवाजीचे स्वप्न आहे. गुंडगिरी, झुंडशाहीला फाटा देऊन आपण होऊयात सर्वसामान्यांचे, निसर्गाचे रक्षक?

तसंच मला, आपल्या अगदी जवळच्या, म्हणजे कर्नाटकमधल्या विजयनगरच्या कृष्णदेवरायाची आठवण होते. कसला पराक्रमी होता तो! शिवाजीने जसं शून्यातून स्वराज्य उभं केलं, तसं त्याचं नव्हतं. त्याच्याआधी दीडेकशे वर्षं ते साम्राज्य चालूच होतं, पण ते मोडकळीला आलेलं होतं. विजापूर, गुलबर्गा इथल्या मुस्लिम सत्तांनी लचके तोडणं, अंतर्गत कलह, हे सगळं चालू होतंच. त्याची (त्याला ‘राया’ म्हणायचे. ते मला ङ्गार आवडलं.) कारकीर्द ती केवढीशी…फक्त वीस वर्षांची. तो वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी गेलाच. पण त्या वीस वर्षांत कसले पराक्रम केलेत! खरंच वाटत नाही. त्या आदिल, कुतुब वगैरे सगळ्या शाह्यांना त्याने सपाटून मार दिला. एकदा नव्हे, तर अनेकदा. शिवाय त्या काळात राज्य समृद्ध, सुसंस्कृत केले. संगीत, काव्य, शिल्प यांना प्रोत्साहन दिले, वगैरे वगैरे…आपल्या शिवबाच्या आधी शंभरेक वर्षं आधी हे घडले.

कधी वाटतं, या काळाच्या प्रवाहात खोडरबराने काही खाडाखोड करावी, किंवा इकडून तिकडे बाण काढून घटनांचा क्रम बदलावा आणि रायाला जरा पुढे ओढावं. म्हणजे तिकडून रायाने आणि इकडून शिवबाने त्या आक्रमक मुस्लिम सत्तांना असा काही मार दिला असता की पळता भुई… त्यातनं रायानं शिवबाला जरा शांत वेळ मिळू दिला असता. त्याच्या राज्यातलं संगीत ऐकवलं असतं, शिल्पं दाखवली असती…

आणि हो, तोही शिवबासारखाच. रायाही सर्व धर्मांचा आदर करणारा. सगळ्या देवस्थानांना अनुदाने देणारा. मुस्लिम आपल्याला समजावेत म्हणून आपल्या राज्यात मुस्लिम वसाहतच वसवली त्यानं. अंगरक्षकही मुस्लिम. कित्येक सरदारही.

इतिहास हा कुणाच्या इच्छेचा प्रश्‍न नसतो, हे माहीत आहे मला, पण सदिच्छेने मनाचे खेळ खेळायला बंदी आहे का? राया, शिवबा, अकबर यांच्यात समान धागा दिसला म्हणून हे स्वप्न पाहिले.

मला तर शिवाजी आणि गांधीजी दोघेही जवळचे वाटतात. एक युद्धवीर आणि दुसरे अहिंसावीर. वरकरणी विरोध वाटेल, पण भव्य स्वप्न तेच, तसेच. त्यासाठी झोकून देणे, जिवाची पर्वा न करता, तसेच. ध्येयासाठी निडरपणे जागी उभे ठाकणे, तसेच अगदी.

शिवाजीच्या काळातल्या लढायांचे आजच्या जीवनात स्थान नाही, पण गांधीजींचा मार्ग मात्र आजही अनुसरता येईल. मग असे करूयात का, शिवबाचे स्वप्न आणि गांधीजींचा मार्ग? पण त्यात हवी त्या दोघांची सर्वसामान्यांविषयीची कळकळ, त्यात हवी आयुष्यभराची अखंड तपश्चर्या, त्याला हवी पुढचे पाहणारी दृष्टी. वा…वा…मी स्वप्नच पाहू लागलो रे शिवबादादा…हसतोस काय मिशीत?…तूच नाही का शिकवलंस मला स्वप्नं पाहायला?

डॉ. सदानंद मोरे, सौजन्य – साप्ताहिक सकाळ

एखाद्या लोकसमूहामध्ये एकत्वाची जाणीव निर्माण झाली म्हणजे त्या लोकांच्या राष्ट्राचा उदय झाला, असे स्थूलमानाने म्हणता येईल. जोतिराव फुले यालाच एकमय लोक असे म्हणतात. अशा प्रकारच्या एकत्वाची जाणीव ज्या घटकांमुळे निर्माण होऊ शकते त्यांच्यामध्ये वंश, धर्म, भाषा यांचा समावेश होतो. व्यापक अर्थाने संस्कृतीलासुद्धा असा घटक मानायला हरकत नाही. आता यातील कोणत्या घटकाला केव्हा प्राधान्य मिळेल, याचा काही नियम सांगता येत नाही. बॅ. महंमदअली जीना यांनी भारतीय उपखंडात मुसलमान धर्मीयांचे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात असल्याचा आग्रह धरला आणि त्याचे अंतिम पर्यवसान पाकिस्तानच्या निर्मितीत झाले, हे सर्वज्ञात आहे. तथापि नंतरच्या काळात पूर्व पाकिस्तानातील लोकांना त्यांची भाषा ही धर्मापेक्षा अधिक महत्त्वाची वाटायला लागली आणि त्यांनी अलग होऊन बांगलादेशाची निर्मिती केली, हा आपल्या डोळ्यासमोर घडलेला इतिहास आहे.

वंशाने आणि धर्माने ज्यू किंवा यहुदी असलेले लोक जगभर विखुरले होते. ते ज्या ज्या देशात गेले तेथील लोकांच्या त्या त्या भाषा त्यांनी आत्मसात केल्या. त्यांच्यात एकतेची जाणीव ओतप्रोत होती; परंतु आपल्या वंशाची मूळ भाषा ते विसरले होते. परंतु तरीही त्यांनी आपली मूळ भूमी मिळवण्यात व नंतर आपल्या मूळ हिब्रू भाषेचे पुनरुज्जीवन करण्यात यश मिळवले. त्यांचा राष्ट्रवाद निदान सध्या तरी सर्वात बळकट असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारच्या एका शीख राष्ट्राची निर्मिती पूर्वी महाराजा रणजितसिंगांनी केली होती. या सर्व पसाऱ्यात लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे, आधुनिक काळात- विशेषतः युरोपियन राष्ट्रांमधील साम्राज्यवादी स्पर्धेमुळे राजकीय सत्ता या गोष्टीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. म्हणजेच राज्य हा घटक निर्णायक ठरू लागला.

पूर्वीच्या व्यक्ती निदान भारतीय उपखंडात तरी या घटकाला फारसे महत्त्व नव्हते. भारत नावाचे राष्ट्र अस्तित्वात होते; परंतु राज्य नव्हते असे म्हटले जाते, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या भाषा, अनेक जाती या सर्व गोष्टी जमेस धरूनही येथे एकमयपणाची भावना जागृत होती. ती कालानुरूप वेगवेगळ्या माध्यमांतून प्रगट व्हायची, एवढेच. काशीच्या गंगेचे पाणी कावडीने भरून ती कावड रामेश्‍वराच्या समुद्रात रिकामी करायची, हे या एकतेचे प्रतीकात्मक प्रगटीकरण आहे. ते धार्मिक असल्याने फारसे बिघडत नाही.

शंकराचार्यांनी देशाच्या चारही दिशांना आपले मठ स्थापन केले किंवा शिवाची व शक्तीची स्थाने- ज्योतिर्लिंगे व शक्तिपीठे देशभर विखुरलेली असून, नाना प्रकारच्या विपत्ती व अडचणी सोसूनही लोक त्यांच्या यात्रा करीत राहिले. हा मुद्दा फक्त हिंदू धर्मालाच लागू होतो, असे नसून इतर धर्मांच्या बाबतीतही सत्य आहे. सम्राट अशोकाने देशाच्या सर्व दिशांना महत्त्वाच्या ठिकाणी कोरीव लेखांची निर्मिती केली. बौद्धांचे स्तूपही सर्वत्र आढळतात. बौद्ध तत्त्वज्ञानाचे मानदंड मानले गेलेले दिङ्‌नागासारखे आचार्य दक्षिणेतून कदाचित महाराष्ट्रातूनही आलेले असतात. तीच गोष्ट जैन मंदिरांचीही आहे. भारतातील या धार्मिक-सांस्कृतिक एकतेला साधुसंतांचा फार मोठा हातभार लागलेला आहे.

उत्तरेमधील नाभादास किंवा महाराष्ट्रातील महीपती यांना आपल्या प्रांताबाहेरील साधुसंतांची चरित्रे लिहावीत, असे का वाटावे? तुकोबांच्या अभंगांमधून नरसी मेहता, कबीर, मीराबाई, धन्ना जाट यांच्या कथा का याव्यात? पंजाबातील शिखांनी आपल्या गुरुग्रंथसाहेब या धर्मग्रंथात महाराष्ट्रातील नामदेवांप्रमाणेच उत्तरेतील इतरही संतांच्या रचनांचा समावेश का करावा? आपल्याकडील सर्व ऋषी-मुनी झाडून उत्तरेतील आहेत. त्यांनी वेदांची, उपनिषदांची, गीतेची व ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली; परंतु या मूळ पायाभूत धार्मिक व तात्त्विक ग्रंथांचे सर्व प्रमुख भाषाकार आचार्य दक्षिणेत निपजले. शंकर, रामानुज, मध्व, वल्लभ- सर्व दक्षिणेतीलच. निंबार्क महाराष्ट्रातील असले तरी प्रसाराचा विचार केला तर मीराबाई व नरसी मेहता हे पश्‍चिमेतील, तर चैतन्य महाप्रभू व शंकरदेव थेट बंगाल-आसाममधील. बंगालमधील हे चैतन्य महाप्रभू कृष्णाचेच रूप मानल्या गेलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. त्यांच्या आधी शंकर आणि मध्व आणि नंतर वल्लभ या आचार्यांनीही हाच मार्ग चोखाळलेला असतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांचा संबंध आलाच नाही, असा एकच प्रदेश दाखवता येणार नाही. मग त्यास तुम्ही “मिथ’ म्हणा.

पांडव वनवासात असताना ते जिथून जिथून गेले ती स्थळे गणतीच्या पलीकडील आहेत. रामायण व महाभारताच्या कथावस्तू आत्मसात करून त्यांना स्थानिक वळण देत करण्यात आलेल्या नवनिर्मितीची संख्याही तशीच लक्षणीय आहे. भारताच्या या मूलभूत ऐतिहासिक ऐक्‍याकडे पहिल्यांदा महात्मा गांधींनी लक्ष वेधले. इंग्लंडसारख्या टीचभर देशाला भारतातील ही राष्ट्रीय एकता उमगणे शक्‍यच नव्हते. त्यांच्या राष्ट्रकल्पनेत राजकीय सत्तेला, म्हणजेच राज्याला मध्यवर्ती स्थान असल्यामुळे त्यांना भारतातील सांस्कृतिक एकजिनसीपणा दिसण्याऐवजी जातिधर्मांतील विस्कळितपणाच प्रकर्षाने जाणवू लागला.

वस्तुतः भारताने राज्यापेक्षा राष्ट्राला अधिक महत्त्व दिले होते आणि राजसत्तेला धर्माचेच अंग मानणाऱ्या मुसलमानांचे येथे आगमन झाल्यानंतरही त्यांच्या या भूमिकेत फारसा बदल झालेला नव्हता.

उलट भारतीयांचे हे शहाणपण अकबरासारख्या मुगल बादशहाच्या ध्यानात आल्यामुळे त्याने स्वतःच इस्लामच्या राज्यपद्धतीत बदल करायला सुरवात केली. अकबराचा हा वारसा शहाजहानचा मुलगा आणि औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शुकेह याच्याकडे आला होता. परंतु औरंगजेबाने धार्मिक माथेफिरूपणाला आश्रय देऊन तो दवडला. त्याने दाराला तर ठार मारलेच, परंतु दाराच्या धोरणांचाही नाश केला. “तुमच्याऐवजी दारा शुकोह पातशहा झाला असता तर आम्हाला या भानगडीत पडायची गरजच वाटली नसती,’ अशा आशयाचे उद्‌गार शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रात काढले आहेत, ते या संदर्भात फार महत्त्वाचे आहेत.

पण त्याचे गांभीर्य चर्चिण्याआधी लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या एका अग्रलेखातील विचार ज्ञात करणे सोयीचे होईल. टिळक लिहितात, “हिंदुस्थानातील लोकांस परराज्याची सवय आज पुष्कळ दिवस झाली आहे व निव्वळ परकी म्हणून राज्यकर्त्यांबद्दल त्यांस जर वाईट वाटत असते तर लॉर्ड रिपनसारख्याचा त्यांनी कधीच जन्मोत्सव केला नसता अथवा अकबर बादशहाची थोरवी गायली नसती. सारांश, हा आपला, हा परक्‍याचा, हा शूद्र भेद आमच्या वेदान्ती लोकांनी कधीच टाकून दिलेला आहे. राज्य कोणाचेही असो, ते आपल्या फायद्याचे आहे की नाही- हेच आमच्या लोकांचे मुख्य पाहणे असते.’

दारा शुकोह हा वेदान्ती होता, हे येथे मुद्दाम सांगायला हवे. दाराने संस्कृत पंडितांच्या साह्याने पन्नास उपनिषदांचा पर्शियन भाषेत अनुवाद केला. पाश्‍चात्त्य देशांतील शॉपेनहॉअरसारखे आधुनिक विचारवंत ज्या उपनिषदांनी प्रभावित झाले ती त्यांच्यापर्यंत दाराने केलेल्या भाषांतरामुळेच पोचली होती.

टिळकांनी जे थोडक्‍यात सूचित केले होते ते गांधीजींनी “हिंद स्वराज्य’ या पुस्तकात स्पष्टपणे मांडले. ब्रिटिशांना भारताचे सेवक म्हणून जर येथे राहायचे असेल तर ते राहू शकतात. त्यांना देशाबाहेर हाकलले म्हणजे स्वराज्य नव्हे, असे त्यात त्यांनी म्हटले आहे. स्वतः गांधी अराज्यवादी होते. म्हणून तर त्यांनी सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध करून ग्रामराज्याची कल्पना मांडली. गांधी अराज्यवादी होते, याचे कारण ते अहिंसेचे पुरस्कर्ते होते. राज्यवादात सत्ता गाजवणे मुख्य असते, परंतु सत्ता गाजवणे ही एक प्रकारची हिंसाच होय.

थोडक्‍यात, राष्ट्रवाद आणि राज्यवाद यांच्यात फरक आहे. राष्ट्रवाद हा संस्कृतीच्या अंगाने येतो, तर राज्यवाद सत्तेच्या अंगाने येतो. राष्ट्रवादाला जे सरकार अभिप्रेत व मान्य असते ते सत्तेचे प्रतिनिधी नसते. प्रशासन व व्यवस्थापन ही त्याची कामे व हीच त्याची मर्यादा. मार्क्‍सवादातही सरकार एवढ्यापुरतेच मान्य आहे. वासाहतिक काळात येथे आलेल्या पाश्‍चात्त्य विचारांच्या प्रभावामुळे आपल्या येथील विचारवंत राष्ट्रवाद व राज्यवाद यांची गल्लत करू लागले. प्राचीन काळी आपल्या देशात कोण कोण आले व त्यांनी राज्ये चालविली, याबद्दल ते आपल्या पूर्वजांनाही दोष देऊ लागले. वस्तुतः येथील विविधता व विविधतेतील एकता शाबूत ठेवून कोणी चांगले प्रशासन करीत असेल तर त्याला तो बाहेरून आला म्हणून विरोध करण्याची आपली परंपरा नव्हतीच. मात्र त्याने राज्य चालविणे म्हणजे सत्ता गाजविणे, असे समजून येथील राष्ट्रवाद धोक्‍यात आणला तर ते आपल्याला खपत नसे. दुसरे असे, की इंग्रजांपूर्वी येथे बाहेरून आलेले सर्व राज्यकर्ते येथेच राहिले. इथल्या मातीशी एकरूप झाले. इथल्या विविधतेत भर टाकून त्यांनी इथला राष्ट्रवाद आत्मसात केला. ब्रिटिशांचे तसे नव्हते.

सुरवातीला येथील लोकांनी त्यांचे स्वागत केले. याचे कारण सरकार या नात्याने त्यांनी चांगला कारभार करून दवला; पण थोड्याच दिवसांनी लक्षात आले, की त्यांना या देशाबद्दल आस्था नाही. ते या देशाची लूट करीत आहेत व त्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. मग लोक जागे झाले व त्यांना विरोध करू लागले.

पाश्‍चात्त्यांच्या राष्ट्र-राज्य कल्पनेने भारावून गेलेले आपले विचारवंत आपल्या परंपरेची तशी मांडणी करू लागले व आपले राष्ट्र तसेच राहील, अशा प्रकारचा राष्ट्रवाद पुरस्कारू लागले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपला हा राष्ट्रवाद शिवाजी महाराज व टिळक यांच्या माथ्यावर मारून तीच आपली प्रेरणा असल्याचे जाहीर केले. आपण त्यांचेच वारसदार असल्याचे ते सांगू लागले. वस्तुस्थिती तशी नव्हती.

शिवाजी महाराजांनी प्रस्थापित इस्लामी राजवटीविरुद्ध बंड केले, याचे कारण या राजवटीने आपल्या पारंपरिक राष्ट्रवादाशी विसंगत असा राज्यवाद आणून त्याच्यातून मिळणाऱ्या सत्तेच्या माध्यमातून इथल्या धार्मिक बहुविधतेचे उच्चाटन करायला सुरवात केली होती. भारतातील इतर प्रदेशांपेक्षा महाराष्ट्राचे वेगळेपण जर कोणते असेल, तर ते हेच आहे. मराठे देशभर पसरले ही गोष्ट खरी, पण त्यांना सत्तेच्या माध्यमातून आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे नव्हते. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त काबीज करण्याचे ध्येय समोर ठेवले नाही, याची अनेकांना खंत वाटते; पण तो मराठ्यांना समजलेल्या भारतीय राष्ट्रवादाचाच भाग होता.

त्याचा स्पष्ट उच्चार छत्रपती शाहू महाराजांनी केला. जुने मोडू नये, नवे करू नये, असे त्यांच्या राजनीतीचे सार सांगितले जाते. शाहू महाराजांनी दिल्लीचे मुगल तख्त मोडून तेथे मराठ्यांचा पातशहा बसवण्याचा बेत करणाऱ्यांना सांगितले, की नवे देऊळ बांधल्यामुळे जेवढे पुण्य मिळते तेवढीच पुण्यप्राप्ती जुन्या देवळाच्या जीर्णोद्धाराने होते. “जुने करू नये नवे। सांभाळावे ज्याचे त्याने ।।’ हा तुकाराम महाराजांच्या अभंगातील विचारच शाहू महाराज राजकारणात आणीत होते. “चकत्यांची पातशाही राखायची’ हा विचार पेशवाईतही कायम राहिलेला दिसतो. आमच्या राष्ट्राच्या मूळ स्वरूपास धक्का न लावणारे राज्य आम्ही सहन करू शकतो. 1857 च्या बंडातही नानासाहेब पेशव्यांसह सर्व हिंदूंनी दिल्लीच्या बहादूरशहा या मोगल पातशहाचे नेतृत्व मान्य केले, त्याचे इंगित हेच आहे. राजा ही एक ईश्‍वरी विभूती आहे, तो विष्णूचा अवतार आहे, असे आपले शास्त्र सांगते हे खरे आहे; परंतु तो लोकांचा सेवक आहे, याचीही जाणीव त्याला आहे. त्याला त्याला कर देऊन टाकायचा, संपले.

1893 मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत हिंदूंची बाजू घेणारे टिळक 1916 मध्ये मुस्लिम लीगबरोबर लखनौ करार करताना मुसलमानांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त जागा देऊ करतात, हे पाहून त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ अनुयायांनी आरडाओरडा करायला सुरवात केली. तेव्हा सगळ्याच जागा मुसलमानांना द्यायला माझी हरकत नाही, असे म्हणून टिळकांनी आपला वेदान्ती बाणा प्रगट केला. 1947 मध्ये फाळणी टाळण्यासाठी गांधींनी मुस्लिम लीगचे मंत्रिमंडळ बनवून जीना मुख्य प्रधान झाल्याने फाळणी टळत असेल तर हरकत नाही, असे म्हटले होते, ते कॉंग्रेसमधील भावी सत्ताधाऱ्यांना न मानवणे आपण समजू शकतो; पण खुद्द जीनांनीही ही कल्पना फेटाळून लावली. जीनांपुढील राष्ट्रवाद हा पाश्‍चात्त्य राज्यवाद होता, हे त्यामागचे कारण होते.

स्वराज्याची चळवळ ऐन भरात असताना ब्रिटिश सत्तेविरुद्ध चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या टिळकांना हिंदू विचारांप्रमाणे राजा हा ईश्‍वराची विभूती असल्याची आठवण कोणीतरी करून दिली. यावर टिळक उत्तरले, की “राजा ब्रह्म आहेच, पण मग प्रजा कोण? राजा जसा ब्रह्म आहे तशी प्रजासुद्धा ब्रह्मच आहे. प्रजारूपी ब्रह्माला राजारूपी ब्रह्माला जाब विचारण्याचा अधिकार नक्कीच आहे.’

टिळकांच्या उत्तरामागची वेदान्ती बैठक तुकाराम महाराजांनी एका अभंगातून फार चांगली स्पष्ट केली आहे. तेच महाराष्ट्राचे राजकीय तत्त्वज्ञान आहे.
“रामराज्य राम प्रजा लोकपाल। एकचि सकळ दुजे नाही ।।
मंगळावाचोनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एक रसा ।।
मोडले हे स्वामी ठायाठाय सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगे ।।
तुका म्हणे अवघे दुमदुमिले देवे । उरले ते गावे हेचि आता ।।

राजा, प्रजा आणि राज्ययंत्रणा या एकाच पातळीवरील गोष्टी आहेत. कोणी कोणावर सत्ता गाजवायचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. कोणाकडे सत्ता असेलच तर ते सेवेचे साधन म्हणून.

मधू लिमये (सत्याग्रही विचारधारा, १९९३), सौजन्य – लोकसत्ता

संघ परिवाराने अनेक ऐतिहासिक पूर्वग्रह आणि इतिहासाचे चुकीचे अर्थ जोपासले आहेत. आपल्या पूर्वग्रहदूषित कल्पनांच्या आधारे चुकीचाच नव्हे तर राष्ट्राच्या मूळ संकल्पनेला बाधक अन्‌ घातक प्रचारही गेली सत्तर वर्षे त्यांनी चालविला आहे.

महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानण्यास भाजपच्या नेत्यांनी आपला विरोध दर्शविला आहे. महात्मा गांधी हे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातले आणि विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकातले एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व होय. त्यांच्या जन्माच्या आधी, अगदी प्राचीन काळापासून आजचा इंडिया- भारत हे एक हिंदू राष्ट्र अस्तित्वात होते. म्हणून म. गांधींना- जे नंतरचे आहेत- त्यांनाच ‘भारताचे राष्ट्रपिता‘ असे मानणे चुकीचे ठरते, असा त्यांचा युक्तिवाद आहे. इतरांचा अतिशय आग्रह असेल तर म. गांधींना भारतमातेचा किंवा हिंदू राष्ट्राचा फार तर सुपुत्र मानायला त्यांची हरकत नाही. संघपरिवाराचा म. गांधींबद्दल असलेला पूर्वग्रह सर्वांना परिचित आहे. संघाच्याच लोकांनी माझ्याजवळ बोलताना सांगितले की, संघ स्थापनेच्या तब्बल पस्तीस-चाळीस वर्षांनंतर महात्मा गांधींच्या नावाचा संघाच्या प्रातःस्मरणात समावेश करण्यात आला.

संघ परिवार व भाजप यांच्या विशिष्ट मानसिकतेचा उगम केवळ म. गांधींबद्दल तीव्र अप्रीतीमध्ये नसून इतिहास व राज्य- राष्ट्रसंबंध याविषयी चुकीचे वाचन, चुकीचे अन्वयार्थ यामध्येही आहे. ‘राज्य‘, ‘राष्ट्र‘ या संकल्पना, तसेच ‘संस्कृती‘ (Culture), ‘मानवी सभ्यता‘(Civilisation) या संज्ञांबद्दल, त्यांच्या अन्योन्य नात्यांबद्दल त्यांच्या मनात चुकीचे अर्थ घर करून घट्ट बसले आहेत.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी दुसर्‍या महायुद्धाच्या काळात म. गांधींनाराष्ट्रपिता म्हणून प्रथम संबोधिले. राष्ट्रपिता‘ हे गुणविशेषण वापरताना सुभाषबाबूंच्या मनात राष्ट्र (Nation) या संज्ञेचा आधुनिक अर्थ होता. प्राचीन संस्कृत वा प्राकृत भारतीय भाषांमध्ये किंवा बंगाली, मराठी, हिंदी या अर्वाचीन भारतीय भाषांमध्येही इंग्रजीमधील ‘नेशन‘(Nation) या शब्दामधील सर्व छटांचा अर्थ तंतोतंत व्यक्त करणारा समानार्थी शब्द अस्तित्वात नाही.

ज्या भूप्रदेशात सार्वभौमत्वाचा दावा करणारी शेकडो राज्ये अस्तित्वात असतील, त्याचप्रमाणे प्रत्येक राज्याला आपापला स्वतंत्र राज्यप्रमुख व स्वतंत्र सेना असेल; त्या भूप्रदेशाला भौगोलिक सलगता, सांस्कृतिक एकता व मानवी सभ्यतेची समानता या कसोटीवर उतरूनही आधुनिक अर्थाने राष्ट्र म्हणता येणार नाही.

ज्या मानवसमूहाने विशिष्ट भूप्रदेशात वास्तव्य करताना आपली स्पष्टपणे वेगळी व स्वतंत्र राजकीय अस्मिता प्राप्त केलेली असेल आणि ज्यांनी राजकीय एकीकरणामधून अशी एकच केंद्रीय राजकीय सत्ता निर्माण केलेली असेल की, ज्या केंद्रीय सत्तेचा अंमल व हुकूम त्या संपूर्ण भूप्रदेशभर चालतो; त्या मानवसमूहाला व त्यांच्या भूप्रदेशाला ‘राष्ट्र‘ हे नामाभिमान प्राप्त होते. आधुनिक ‘राष्ट्र‘ या शब्दामागे हा अर्थ गृहीत आहे.

आधुनिक राजकीय जाणिवांचे केंद्र म्हणून बंगालचे आद्यस्थान सर्वमान्य आहे. तथापि बंगाली नेत्यांनी व लेखकांनी तारतम्याचा विचार न करता ‘देश‘, ‘राष्ट्र‘, ‘जाती‘ अशा शब्दांचा वापर केलेला आहे, हे नाकारून चालणार नाही. या शब्दप्रयोगांमागील खरा अर्थ संदर्भाशिवाय शोधता येणार नाही.. काही वेळा या शब्दांचा वापर बंगाली भाषक जेथे वास्तव्य करतात, त्या बंगालसाठी केलेला आहे. काही वेळा भारताला राष्ट्र म्हणून संबोधण्यासाठी या शब्दांचा वापर झालेला आहे.

हा शाब्दिक आणि वैचारिक गोंधळ बंगाली भाषकांपुरता मर्यादित नाही. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातही राजकीय जागृती झाली. या काळात मराठी भाषक नेत्यांनी आणि लेखकांनीही बरोबर तसाच वैचारिक गोंधळ निर्माण करून ठेवलेला आहे. लोकमान्य टिळक हे या काळातील एक राष्ट्रवादी महान नेते होते, याबद्दल कोणतीही शंका नाही. संघ परिवारदेखील हे मान्य करतो. संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी लोकमान्यांपासूनच राजकीय प्रेरणा घेतली. ज्यांनी लो. टिळकांच्या लिखाणाचा काळजीपूर्वक अभ्यास केला आहे, त्यांना माहीत आहे की भिन्न काळात. (कधी एकाच काळातही) व त्यांच्या राजकीय नेतृत्वाच्या वेगवेगळ्या टप्प्यांत लोकमान्यांनी ‘राष्ट्र‘ हा शब्द तीन भिन्न अर्थांनी वापरलेला आहे. काही उदाहरणांनी हे स्पष्ट करता येईल.
आपल्या राजकीय कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात लो. टिळक म्हणतात, ‘‘सिंध, गुजराथ, महाराष्ट्र व कर्नाटक या चार राष्ट्रांनी मिळून बॉम्बे प्रेसिडेन्सी बनली आहे.‘‘ बंगालच्या फाळणीच्या संदर्भात बोलताना त्यांनी लिहिले आहे की, बंगाली भाषिक राष्ट्राचे विभाजन करण्यामागे ब्रिटिशांची अत्यंत दुष्ट योजना आहे. त्याच लेखात बंगालचा ‘प्रांत‘ असाही उल्लेख करून त्यांनी प्रांत-राष्ट्र या शब्दांचा घोळ करून ठेवला आहे. राष्ट्र आणि प्रांत या संकल्पनांचे भिन्नत्व लो. टिळकांनी काळजीपूर्वक लक्षात घेतलेले नव्हते.

स्वातंत्र्यासाठी अपार कष्ट सोसल्यामुळे आपल्या राजकीय आयुष्याच्या मध्यावर लोकमान्य राष्ट्रीय नेते बनले. या वेळचे राष्ट्रीयत्वाच्या प्रश्नावर टिळकांचे विचार पाहिल्यास राष्ट्र ही संकल्पना साकार करताना, ‘वसुधैव कुटुंबकम्‌‘- अखिल मानवजात हे एकच कुटुंब असल्याची कल्पना, आंतरराष्ट्रीय ध्येय म्हणून टिळक नाकारतात. हे ध्येय आकर्षक असले तरी प्रत्यक्षात उतरणार नाही, असे कारण ते देतात. दुसर्‍या बाजूला ते म्हणतात की, व्यक्ती, कुटुंब वा प्रदेश या अस्मिता बाळगणे म्हणजे संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. राष्ट्र ही संकल्पना या दोन टोकांच्या मध्ये कोठेतरी आहे. या काळात लोकमान्य
आपल्या लोकप्रियतेचा पाया महाराष्ट्रात मजबूत करीत होते. त्यासाठी त्यांनी दोन उत्सवांचे माध्यम योजले. त्यातून मराठी राष्ट्रीयचा व हिंदू राष्ट्रीयता एकत्रितपणे जागवता येणार होती. समान भाषा व समान ऐतिहासिक पार्श्वभूमी हा या दोन्ही राष्ट्रीयतांचा पाया होता. गणेशोत्सवाने भाषिक नात्याची व शिवजयंतीमुळे समान ऐतिहासिक पार्श्वभूमीची गरज भागत होती.

समान भूप्रदेश, भाषा, धर्म यापैकी कोणत्याही एकाच वा एकत्रित गोष्टींचा आधार राष्ट्रबांधणीला पुरेसा नाही, असे लोकमान्य म्हणत. राष्ट्रबांधणीसाठी समान हितसंबंध व समान गतस्मृती पायाभूत आहेत, असे मानल्यामुळे ‘समानहिततत्त्व‘ व ‘पूर्वेतिहासस्मरण‘ या दोन शब्दांचा त्यांनी राष्ट्रवादासाठी उपयोग केला. या दोन तात्त्विक कसोट्या लावून ‘भारत (India) हे एक राष्ट्र आहे, असे कसे म्हणता येईल ?‘ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
लोकमान्य टिळकांना ‘राष्ट्र‘ या संकल्पनेचा व्यापक अर्थ माहीत नव्हता, असे मानता येणार नाही. लॉर्ड ए. ओ. ह्यूमच्या (काँग्रेसचे संस्थापक) निवेदनाचा परामर्श घेताना त्यांनी दाखवून दिले की, ‘सर्व जाती-जमाती व भारताचे सर्व प्रांत एक राष्ट्र निर्माण करण्यास एकत्र आले आहेत.‘

राजकीय, वैचारिक परिपक्वता प्राप्त केल्यानंतर राष्ट्रीय नेते म्हणून मान्यता पावल्यानंतर आणि लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झाल्यानंतरदेखील लो. टिळकांचा राष्ट्र या संकल्पनेमागचा अस्पष्टपणा शिल्लकच होता. राजद्रोहाच्या दुसर्‍या खटल्याच्या काळात ते म्हणतात, ‘‘इंडिया अजून ‘राष्ट्र‘ नाही.‘‘ हे दुर्दैव आहे की, लोकमान्य टिळकांसारखा महान नेता संकुचित महाराष्ट्रीय राष्ट्रवादाच्या प्रवृत्तीच्या वारंवार होणार्‍या प्रादुर्भावापासून स्वतःला अखेरपर्यंत मुक्त करू शकला नाही. त्यांच्या राजकीय कारकीर्दीच्या मध्य काळात लिहिलेल्या एका लेखात त्यांनी म्हटले आहे की, ‘‘प्रत्येक व्यक्तीची नियती अलग असते. त्याचप्रमाणे भारताच्या प्रत्येक प्रांताचे भवितव्य एकच कसे असेल ? कोणास ठाऊक, भविष्यकाळात ते कदाचित अलगही होतील.‘‘ भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास करणार्‍या सर्व विद्यार्थ्यांना लोकमान्यांच्या वक्तव्यांची जाणीव असेलच. त्यांच्या (अधिक…)

ग. प्र. प्रधान, सौजन्य – लोकसत्ता

प्रत्येक राजकीय विचारसरणी ही कालसापेक्ष असते आणि काळ पुढे गेल्यावर परिस्थिती बदलली की, त्या विचारसरणीतील तत्त्वांचा मूलभूत आशय कायम ठेवून तिच्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. कृती करताना तत्कालीन समाजस्थितीचे भान ठेवावे लागते. विचारांमध्ये अशी गतिमानता ठेवली नाही तर राजकीय नेते आणि राजकीय पक्ष कर्मठ आणि ठोकळेबाज बनतात आणि त्यामुळे निष्प्रभही होत जातात. समाजवाद या विचारसरणीचा तात्त्विक गाभा श्रमिकांना न्याय मिळाला पाहिजे हा आहे. मार्क्सने हा विचार मांडला, त्याच्या आधारे लेनिनने रशियात १९१७ साली कम्युनिस्ट क्रांती केली आणि जगातील श्रमिकांच्या मनात आशा पल्लवित झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये रशियाचे विघटन झाले असले तरी जगातील श्रमिकांना न्याय मिळाला पाहिजे हे तत्त्व अबाधित आणि चिरंतन महत्त्वाचे आहे. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भांडवलशाहीकडून शोषित झालेला कामगारवर्ग हा क्रांतीचा अग्रदूत असेल असे मानले जात होते. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कामगारांनी संघटित लढे देऊन त्यांचे न्याय्य हक्क मिळविले. परंतु हा संघटित कामगार, शासकीय कर्मचारी, प्राध्यापक शिक्षक, हा वर्ग त्यांच्या मागण्या बव्हंशाने मान्य झाल्यावर १९७५ नंतर समाजातील असंघटित कामगार तसेच अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर यांच्या लढ्यात सहभागी झाला नाही. म्हणून भारतातील समाजवादी चळवळीचा आजचा आशय शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, दलित, आदिवासी आणि स्त्रिया या समाजातील सर्व उपेक्षितांना न्याय देऊन समताधिष्ठित समाज स्थापन करणे हाच आहे आणि असला पाहिजे. या सर्व उपेक्षितांना आणि पददलितांना न्याय देण्यासाठी समाजाच्या राजकीय आणि आर्थिक रचनेत बदल करावे लागतील. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या भावी विकासाची पायाभरणी करण्याकरिता आणि भारत स्वतःचे संरक्षण करण्यास समर्थ होण्यासाठी मूलभूत उद्योग, ऊर्जानिर्मितीसाठी मोठी धरणे आदी मोठे प्रकल्प हाती घ्यावे लागले. तसेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर आणि नवीन विज्ञान व तंत्रविज्ञान आत्मसात करण्याचे शिक्षण नव्या पिढीस देण्यासाठी आय. आय. टी. संस्था उभाराव्या लागल्या. ही सर्व पायाभरणी करण्यासाठी राजसत्ता आणि अर्थसत्ता यांचे केंद्रीकरण अपरिहार्य आणि आवश्यक होते. परंतु यामुळे देशाचा जो विकास झाला त्याचे फायदे मूठभरांनाच मिळाले आणि आर्थिक विषमता तीव्र होत गेली. ही परिस्थिती बदलून भारतातील ग्रामीण जनतेपर्यंत आणि शहरातील व ग्रामीण भागातीलही तळागाळातील माणसांपर्यंत विकासाचे हे फायदे पोहोचवावयाचे असतील तर राजसत्तेचे आणि अर्थसत्तेचे विकेंद्रीकरण करणे अत्यावश्यक आहे. समाजवादाचा विचार मांडताना औद्योगिक क्रांतीनंतरच्या युरोपच्या विचार करणार्‍या मार्क्सने समाजवादी समाजरचनेत राजसत्ता व अर्थसत्ता यांचे केंद्रीकरण आवश्यक मानले. भारतात आजच्या परिस्थितीत मार्क्सच्या या विचाराऐवजी म. गांधींच्या विकेंद्रित अर्थव्यवस्था आणि ग्रामस्वराज्य या विचारांच्या आधारे समाजवादाची मांडणी केली पाहिजे.

समाजवाद आणि सर्वोदय -आचार्य शं. द. जावडेकर हे महाराष्ट्रातील थोर विचारवंत. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच सत्याग्रही- समाजवाद हा विचार मांडला आणि म. गांधींच्या विचारांना समाजवादाची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन केले. त्यानंतर १९५३-५४ त्यांनी ‘सर्वेदय आणिसमाजवाद‘ हे पुस्तक लिहून बदलत्या संदर्भात या दोन विचारसरणींचा सिंथेसिस (मिलाफ) करावा लागेल अशी भूमिका मांडली. आर्थिक समता आणि सामाजिक न्याय यासाठी सत्याग्रही मार्गाने संघर्ष करताना त्याला रचनात्मक विधायक कार्याची जोड द्यावी लागेल, असा हा विचार होता.

जागतिकीकरणाचे आव्हान -अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणानंतर भारतात प्रथम नियंत्रणांच्या शिथिलीकरणाचं (लिबरलायझेशन) धोरण काँग्रेसचे नरसिंह राव पंतप्रधान असताना त्या वेळचे अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी स्वीकारले. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाल्यावर अगदी अलीकडेपर्यंत अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ‘आर्थिक सुधारणा‘ या आत्मवंचना करणार्‍या नावाखाली अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक व्यापारी संघटना (डब्ल्यू. टी. ओ.) यांच्या सापळ्यात भारताला अडकवून टाकले आहे.

या धोरणाचे अपरिहार्य पर्यवसान, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवलेले भांडवल काढून घेऊन ते उद्योग बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकणे आणि वृत्तपत्रांमध्ये २६ टक्के परकीय भांडवलाची गुंतवणूक करण्यास परवानगी देणे, यात झाले आहे. अमेरिकेसारख्या धनवान राष्ट्रांच्या आणि बड्या भांडवलदार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सापळ्यात सापडून आपण आपले आर्थिक स्वातंत्र्य गमावीत आहोत. दुसर्‍या महायुद्धानंतर राजकीय साम्राज्ये विलयाला गेली, परंतु या साम्राज्यांचे आधुनिक रूप आर्थिक साम्राज्ये असे आहे आणि विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांचे आर्थिक शोषण करून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली कायम जखडून टाकणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. याविरुद्ध लढा देणे भारताला सोपे नाही. कारण येथील राष्ट्रीय आघाडी सरकार तसेच विरोधी पक्षांमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि चंद्राबाबू नायडूंची तेलगू देसम्‌ पार्टी व जयललितांचा अण्णा द्रमुक पक्ष यांना अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाशी जुळवून घेणे अपरिहार्य आणि अटळ वाटते. आपण पाश्चात्त्य जगातील भांडवल आणि अत्याधुनिक तंत्रविज्ञान यांच्या साहाय्याने भारताचा आर्थिक विकास करू शकू असे आज भारतातील केंद्र शासनाला आणि बहुसंख्य विरोधी पक्षांना वाटते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य डावे पक्ष यांचा आर्थिक सुधारणांच्या नावाखाली भांडवलशाही राष्ट्रांचे मांडलिकत्व पत्करण्यास विरोध आहे. परंतु ही डावी आघाडी आज तरी फार प्रभावी नाही. वेगवेगळ्या प्रश्नांवर संसदेमध्ये विरोध करणे आणि संसदेबाहेर जनतेचे प्रबोधन करून आर्थिक गुलामगिरीविरुद्ध शक्य तेथे संघर्ष करण्याचे कार्य या डाव्या पक्षांच्या राजकीय आघाडीस करावे लागेल.

नवे नेतृत्व – आता समाजाची राजकीय व आर्थिक घडी बदलण्याचे काम मुख्यतः देशभर विखुरलेल्या, विधायक कामे करणार्‍या आणि संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्यांच्या गटांनाच एकजुटीने करावे लागेल. महाराष्ट्रापुरती काही नावे घ्यावयाची असतील तर धरणग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणार्‍या मेधा पाटकर, आदिवासींमध्ये विधायक काम करणारे अभय बंग, राणी बंग, मोहन हिराबाई हिरालाल, सांगली भागात श्रमिकांच्या प्रश्नांवर पुरोगामी विचारांच्या आधारे श्रमिकांचे संघर्ष करणारे भारत पाटणकर आणि औरंगाबादचे कानगो आदींना समाजवादाच्या या लढ्याचे नेतृत्व करावे लागणार आहे. अखिल भारतीय पातळीवर शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवे प्रयोग करणारे संदीप पांडे आणि राजस्थानमधील शेतकर्‍यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणारे राजेंद्र सिंह तसेच वंदना शिवा या पर्यावरणवादी कार्यकर्त्या व त्यांचे सहकारी अशा विधायक कार्यकर्त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्याचबरोबर केरळमध्ये विज्ञानाचा प्रसार करणारी चळवळ चालविणारे, कार्यकर्त्यांची संघटना, आंध्र, तामीळनाडू आणि मध्य प्रदेश येथे ग्रामीण स्त्रियांना एकत्र आणणारे गट अशा संस्था व संघटना तसेच देशभरचे पर्यावरणवादी कार्यकर्ते व संघटना हीच समाजाच्या परिवर्तनाची प्रभावी साधने आहेत. २१ व्या शतकातील समाजवादी चळवळीचे अग्रदूत हे विधायक आणि संघर्षशील कार्यकर्ते आणि त्याच रीतीने कार्य करणार्‍या ग्रामीण श्रमिकांच्या संस्था हेच असतील. भारतातील सर्व नागरिकांच्या हातांना वा बुद्धीला काम आणि भारतीय तंत्रवैज्ञानिकांनी आत्मसात केलेले तंत्रविज्ञान यांच्या जोरावरच भारताचा विकास होऊ शकेल, अशी भूमिका घेऊनच भावी काळात विकासाचे व बेकारी निर्मूलनाचे काम करावे लागेल.

म. गांधींच्या विकेंद्रीकरणाच्या आणि ग्राम स्वराज्याच्या संकल्पनांचा मी उल्लेख केला असला तरी त्या विचारांत आणि त्यांच्या साधनांमध्ये कालानुरूप बदल करावेच लागतील. आज पूर्वीचा चरखा कालबाह्य झाला आहे. हे लक्षात घेऊन विजेवर चालणारा अंबर चरखा तयार करावा लागेल. तरच तो चालविणार्‍यांना जीवनवेतन मिळेल. अलीकडेच महाराष्ट्रात झालेल्या सर्वेदय संमेलनात अभय बंग यांनी हा विचार प्रभावीपणे मांडला होता.

या समाजपरिवर्तनाचे स्वरूप, विश्वभारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत अमलान दत्ता यांनी लिहिल्याप्रमाणे, मूक क्रांती (सायलेंट रेव्होल्युशन) असे असेल. सत्याग्रही मार्गानेच संघर्ष करणार्‍या या क्रांतीमध्ये रक्तपात असणार नाही. संघर्षाइतकाच विधायक कामावर, रचनेवर भर देणार्‍या या क्रांतीचे नगारे, ढोल वाजणार नाहीत. या मूक क्रांतीसाठी काम करणार्‍या व्यक्ती आणि संघटना यांना कोणी आजच्या व्यवस्थेतील सत्ता देणार नाही. आज सत्ता आणि संपत्ती यांच्या अनिष्ठ युतीतून काही राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि भांडवलदार हे एक टक्का श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय यांचा चंगळवादी, भोगवादी समाज निर्माण करीत आहेत. त्यांच्याशी संघर्ष करणे सोपे नाही. देशभर पसरलेल्या ग्रामीण श्रमिकांच्या मनात योग्य ते प्रबोधन करून, त्यांना समतेवर आणि न्यायावर आधारलेला समाज निर्माण करण्याच्या व्यापक जनआंदोलनात सहभागी करून घ्यावयाचे आहे.

२१ व्या शतकातील भारतातील समाजवादी चळवळीला हे साध्य करण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतील. देशातील ज्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना मी भेटलो, त्यांच्या ध्येयवादी कार्यामुळे, मला ते भारताच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार होतील आणि समता व सामाजिक न्याय यावर आधारलेल्या समाजवादी चळवळीचा ध्वज फडकवतील असा विश्वास वाटतो.

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..

भारताला ‘कुणामुळे’ आणि ‘कशामुळे’ स्वातंत्र्य मिळाले? जे मिळाले ते खरोखरच ‘स्वातंत्र्य’ होते का?  स्वातंत्र्याची नक्की व्याख्या काय? गेल्या ६३ वर्षांकडे पाहता भारताने स्वातंत्र्य मिळविल्यानंतर काय व किती प्रमाणात साध्य केले आहे?

वरवर पाहता हे प्रश्न सोपे वाटतात. परंतु या प्रश्नांच्या ऊहापोहावरून देशात व परदेशात प्रचंड खडाजंगी वाद झाले आहेत. (काही वाद आजही चालू आहेत.) काहींना असे प्रश्न विचारणे हेही देशद्रोहीपणाचे वाटते. पण असे अनेक इतिहासकार, राजकीय नेते वा संघटना आहेत की ज्यांच्या मते ‘खरा’ इतिहास समजून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवीत आणि त्यात देशद्रोह वगैरे काही नाही, असे त्यांना मनापासून वाटते.

भारताच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत   उपनगरीय मराठी साहित्य संमेलनात खुद्द कविवर्य वसंत बापट यांनी प्रश्न विचारला होता- स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य? कसले स्वातंत्र्य?.. वगैरे.

त्याच वर्षी दलित पॅन्थर्सच्या काही कवींनीही ‘तिरंगा गेला खड्डय़ात!’ अशा आशयाचे विधान केले होते. प्रत्यक्षात त्यांनी वापरलेला शब्द ‘खड्डय़ात’ असा नव्हता, तर तो पॅन्थर शैलीतील अधिक उग्र शब्द होता. विशेष म्हणजे तोच काळ म्हणजे १९७२ ते १९७५ हा देशातील कमालीचा अस्वस्थतेचा काळ होता. सर्व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, साठेबाजी, काळाबाजार, महागाई, सामाजिक असंतोष, प्रक्षोभक वातावरण आणि प्रखर राजकीय आंदोलने- यामुळे स्वातंत्र्याबद्दलची पवित्र भावनाही अवकळाग्रस्त झाली होती. इंदिरा गांधींच्या पाकिस्तानविरोधी युद्धातील अपूर्व विजय आणि बांगलादेशच्या निर्मितीनंतर निर्माण झालेले १९७१-७२ चे वातावरण लयाला जाऊ लागले होते. आणि त्या परिस्थितीत, अतिशय हिंस्र अशा नक्षलवादाच्या पाश्र्वभूमीवर, इंटलेक्च्युअल वर्तुळातील काही लोकही ‘कुणा स्वातंत्र्य, कुठे स्वातंत्र्य?’ असे प्रश्न विचारू लागले होते. त्या सिनिसिझमच्या वातावरणातच गुजरातचे नवनिर्माण आंदोलन, जयप्रकाशांची संपूर्ण क्रांती, रेल्वे संप आणि त्या अराजकाला उत्तर म्हणून आणीबाणी- असा तो तीन वर्षांचा राजकीय प्रवास होता. आणीबाणीमध्ये तर सर्वच लोकशाही स्वातंत्र्याच्या हक्कांचे आकुंचन झाले होते.

१९४७ नंतर प्रथमच वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने आली. मोर्चे, आंदोलने, संप, हरताळ यावर बंदी आली. ‘विनाकारण’ लोकांना अटकेत टाकायचा परवाना पोलिसांना प्राप्त झाला. वरवरच्या शांत व शिस्तबद्ध परिस्थितीला भीती व शासकीय दहशतीने आतून ग्रासलेले होते. साहजिक स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत, १९७२ साली, उपस्थित झालेल्या प्रश्नांना आणीबाणीने अधोरेखित केले. आणीबाणी म्हणजे ‘दुसरे पारतंत्र्य’ आणि १९७७ चा इंदिरा-काँग्रेसचा पराभव आणि जनता पक्षाचा विजय हे ‘दुसरे स्वातंत्र्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यातूनच ‘पहिल्या स्वातंत्र्या’विषयीसुद्धा पुन्हा ऐतिहासिक प्रश्न नव्याने मांडले जाऊ लागले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व काही तत्सम हिंदू संघटनांनी १५ ऑगस्ट १९४७ हा स्वातंत्र्यदिन म्हणून स्वीकारलाच नव्हता. फाळणी होऊन मिळालेले स्वातंत्र्य त्यांना मान्यच नव्हते. त्यांच्यापैकी काहींच्या दृष्टिकोनातून तर तो ‘काळा दिवस’ होता. पुढे जवळजवळ ५० वर्षे संघकार्यालयांवर १५ ऑगस्टला तिरंगा फडकाविणे निषिद्ध होते! (अजूनही काही संघ कार्यालयांवर तिरंगा फडकत नाही.) स्वातंत्र्यानंतर पाचच महिन्यांनी गांधीजींची हत्या झाली. नथुराम हा संघाचा कार्यकर्ता होता की, सावरकरांचा अनुयायी होता, वगैरे चर्चा फिजूूल आहे. कारण तो कट्टर हिंदुत्ववादी होता आणि गांधीजींचे नेतृत्व व स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी त्याला मान्य नव्हत्या. पुढे कित्येक वर्षे, म्हणजे संघाने गांधीजींना ‘प्रात:स्मरणीय’ दर्जा देईपर्यंत हिंदुत्ववादी वर्तुळात गांधीजी (आणि नेहरू) हे मुख्य राजकीय/ वैचारिक शत्रू होते.

अशा हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून फक्त तेच स्वातंत्र्य ‘खरे’ ठरले असते, जर अफगाणिस्तानपर्यंतचा भारतीय उपखंड एकवटलेला व स्वतंत्र झाला असता तर! गेल्या ६३ वर्षांतील हिंदुत्ववाद्यांच्या विविध छटांमधून हा ‘स्वातंत्र्यविरोध’ व्यक्त झाला आहे. नरेंद्र मोदींपासून प्रज्ञा ठाकूपर्यंत आणि बाळासाहेब ठाकरेंपासून ते बजरंग दलापर्यंत. आता उघडपणे १५ ऑगस्ट हा त्यांच्यापैकी कुणीही ‘काळा दिवस’ म्हणून मानत नसले, तरी ती मानसिकता गेल्या सहा दशकात पुसली गेलेली नाही.

फक्त अशा हिंदू परिवारामध्येच १५ ऑगस्ट हा ‘काळा दिवस’ नव्हता, तर काही कम्युनिस्ट संघटना व पक्षांनाही तो स्वातंत्र्यदिन म्हणून मान्य नव्हता. त्यांचे म्हणणे होते की, जोपर्यंत सर्व कामगार, कष्टकरी, शेतकरी वर्ग, भांडवलशाही, सरंजामशाही, जमीनदारी, सावकारी यांच्या पाशातून मुक्त झालेला नाही, तोपर्यंत हे स्वातंत्र्य खोटे आणि फसवे आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीशी ‘तडजोड’ करून हे स्वातंत्र्य ‘शोषक’ वर्गाने म्हणजे भांडवलदार- सरंजामदारांनी प्राप्त केले आहे. इंग्रजांचा युनियन जॅक जाऊन ‘तिरंगा’ फडकला असला तरी कामगार- शेतकऱ्यांना आता ‘खऱ्या’ स्वातंत्र्यासाठी पुन्हा सज्ज व्हावे लागणार आहे. पुढे गाजलेला तेलंगणचा सशस्त्र मुक्ती लढा हा त्याच खऱ्या स्वातंत्र्यासाठी कम्युनिस्टांनी (मुख्यत: कॉम्रेड बी. टी. रणदिवेंच्या प्रबंधानुसार) केलेला संघर्ष होता. आजही तेलंगणमध्ये काही वृद्ध क्रांतीकारकांच्या त्यावेळच्या आठवणी ताज्या आहेत. कम्युनिस्टांमधील दोन मुख्य मतप्रवाह तेव्हाच पक्षात प्रकट होऊ लागले होते. कॉम्रेड रणदिवेंच्या मते १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन नव्हता. कॉम्रेड डांगे यांच्या मते हे स्वातंत्र्य म्हणजे कामगार- शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या मार्गावरील महत्त्वाचा टप्पा होता. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या पराभवामुळे भारतीय जनतेला सर्व लोकशाही हक्क प्राप्त झाले असून त्यांच्या आधारे पुढील संघर्षांसाठी व्यापक संघटना उभारणे आता शक्य होते.

कॉम्रेड मोहित सेन यांनी तर पुढे भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे वर्णन ‘अनोखी व ऐतिहासिक भारतीय क्रांती’ असेच केले होते. परंतु १५ ऑगस्ट १९४७ आणि पुढेही बरीच वर्षे कम्युनिस्ट संघटना स्वातंत्र्यदिन मानत नसत, साजरा करणे दूरच राहो. उग्रवादी कॉम्रेड्स् तर तो ‘काळा दिवस’च मानत. (आजच्या नक्षलवाद्यांची मानसिकताही त्याच तत्कालीन प्रवृत्तीत आहे.)

म्हणजेच वसंत बापटांनी १९७२ साली व्यक्त केलेली ‘कुणा स्वातंत्र्य- कुठे स्वातंत्र्य?’ ही भावना समाजात होतीच. असे असूनही बहुसंख्य भारतीयांनी १५ ऑगस्ट हाच स्वातंत्र्यदिन मानला होता. २६ जानेवारी १५५० रोजी भारत देश अधिकृतपणे लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ साली होऊन भारतीय जनतेने ते स्वातंत्र्य स्वीकारले आणि १५ ऑगस्टचे ऐतिहासिक महत्त्व  जगाच्या इतिहासात यथार्थपणे नोंदवले गेले.

आज आपण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असलो तरी हे स्वातंत्र्य कुणामुळे व कसे आणि कोणत्या परिस्थितीत मिळाले, यासंबंधी इतिहासकारांमध्ये वाद आहेतच. म्हणूनच १९४७ ते १९५० (स्वातंत्र्य ते प्रजासत्ताक) या तीन वर्षांतील जागतिक संदर्भ महत्त्वाचे ठरतात.

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर दोन वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ज्या नाझी जर्मनीने हिटलरच्या पाशवी नेतृत्वाखाली युरोप पादाक्रांत करून नंतर जगावर आपली अधिसत्ता प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती, तो जर्मनी बऱ्याच अंशी बेचिराख झाला होता आणि हिटलरला स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करावी लागली होती. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपियन साम्राज्यशाही खिळखिळी झाली होती. युरोपातील सर्वात प्रभावी व विस्तृत साम्राज्य अर्थातच इंग्रजांचे. त्यामुळे काही स्वयंभू इतिहास अभ्यासक असे मानतात की, भारतीय स्वातंत्र्याचा (अप्रत्यक्ष) जनक हिटलर आहे. जर हिटलरने (जर्मनी बेचिराख होईपर्यंत) युद्ध चालविले नसते, तर इंग्रज साम्राज्याला असा जबरदस्त तडाखा बसला नसता. क्षीण आणि खिळखिळ्या झालेल्या इंग्रज राज्यकर्त्यांना भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याखेरीज पर्यायच उरला नव्हता. ज्या विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने जर्मनीचा पराभव केला, त्याच चर्चिल यांचा इंग्लंडच्या मजूर पक्षाने दारुण पराभव केला. तेथे मजूर पक्षाचे राज्य आल्यावर पंतप्रधान अ‍ॅटली यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया सुरू केली. (परंतु फाळणीचे कारस्थानही १९४० नंतर इंग्लंडच्या बारभाईंमध्ये शिजू लागले होते. महमद अली जिनांनी पाकिस्तानची घोषणा १९४० नंतर आक्रमकपणे प्रचारायला सुरुवात केली, हा योगायोग नाही.)

भारताला स्वातंत्र्य ‘दिल्यानंतरही’ दक्षिण आशियात कारवाया करण्यासाठी एक तळ इंग्रज साम्राज्यवाद्यांना (आणि नंतर अमेरिकेला) हवा होता. तो पाकिस्तानच्या रुपाने त्यांनी निर्माण केला. गेली ६३ वर्षे भारताचे स्वातंत्र्य फाळणीच्या त्या जोखडात अडकून पडले आहे. भारताचे सुमारे दीड लाख कोटी रुपये दरवर्षी केवळ संरक्षणावर खर्च होतात- म्हणजे पाकिस्तानापासून (आणि दहशतवादी, काश्मिरी फुटीरवादी यांच्यापासून) आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी. या युद्धखर्चाचा मोठा फायदा अमेरिकन व युरोपीय शस्त्रास्त्रनिर्मात्यांना होतो. शिवाय भारताचे अमेरिका-इंग्लंडवरचे अवलंबित्त्वही वाढते. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेच मुळी दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर. अमेरिका-ब्रिटन पाकिस्तानच्या बाजूने आणि सोविएत रशिया भारताच्या बाजूने अशी ती शीतयुद्धकालीन सत्तेची नेपथ्यरचना होती.

किंबहुना असेही म्हणता येईल की, शीतयुद्धाच्या कॅनव्हासमुळेच भारतीय स्वातंत्र्याचे (आणि फाळणीचे) परिमाणच बदलून गेले. वस्तुत: भारताची लोकसंख्या या घडीला १२० कोटी आणि पाकिस्तानची १७ कोटी. म्हणजे पाकिस्तानपेक्षा लोकसंख्येने भारत सातपट मोठा आहे. भारतात ६३ वर्षे लोकशाही प्रजासत्ताक व सेक्युलॅरिझमचा ढाचा टिकून आहे. याच काळात पाकिस्तानात सुमारे ४० वर्षे लष्करी हुकूमशाही आहे. तरीही ‘लोकशाहीवादी’ पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा (व मदत) पाकिस्तानला आहे. कारण अर्थातच वर म्हटल्याप्रमाणे शीतयुद्धाचे परिणाम.

सोविएत युनियनचे विघटन झाल्यानंतर पारंपरिक अर्थाने शीतयुद्ध संपले तरी त्या शीतयुद्धाचे ढग अजूनही जागतिक राजकारणाच्या आकाशात आहेतच. एका अर्थाने असेही म्हणता येईल की, दहशतवाद हासुद्धा त्या शीतयुद्धाचाच ‘उपसंहार’ आहे. भारताच्या स्वातंत्र्याला आज त्याच उपसंहाराने घेरलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला जसे दुसऱ्या महायुद्धाचे व नंतर शीतयुद्धाचे संदर्भ आहेत, तसेच चीनमधील क्रांतीचेही आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि चीनचा क्रांतीसंघर्ष हे पूर्णपणे समकालीन आहेत. (डॉ. कोटणीस की अमर कहानी!) भारतीय स्वातंत्र्यलढय़ाला चीनची आणि चीनच्या क्रांतीला भारताची पूर्ण सहानुभूती होती. भारतीय राज्यघटना तयार होत होती, तेव्हाच चीनची क्रांती यशस्वी झाली- १ ऑक्टोबर १९४९ (म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी पण भारतीय प्रजासत्ताक स्थापनेच्या चार महिने अगोदर). चीनने केलेल्या जमीन सुधारणा कायद्यापासून ते सामाजिक विषमता निर्मूलनापर्यंत, शेतकरी क्रांतीपासून ते गतिमान आर्थिक परिवर्तनाच्या कार्यक्रमापर्यंत भारत व चीन यांचा समांतर प्रवास झाला आहे. चीनची प्रगती कम्युनिस्ट एकाधिकारशाहीच्या पद्धतीतून आणि भारताची प्रगती लोकशाही पद्धतीतून झाली आहे. त्याचे संस्कार दोन्ही देशांवर झालेले आपण पाहात आहोत.
माओंच्या नेतृत्वाचा चीनमधील उदय, विकास आणि विस्तार आणि भारतातील गांधीजींचे नेतृत्व थोडय़ाफार वर्षांच्या फरकांनी समांतरच वाढलेले आहे. मुख्य फरक हा की क्रांती यशस्वी झाल्यानंतर पुढे २७ वर्षे माओंचेच नेतृत्व चीनमध्ये प्रभावी राहिले. गांधीजींची हत्या स्वातंत्र्यानंतर पाच महिन्यांनी झाली.
गांधीजींची हत्या झाली नसती तर भारतात स्वातंत्र्योत्तर काळात काय झाले असते? हा प्रश्न इतिहासातील ‘जर-तर’मधला आहे. गांधीजी माओंपेक्षा वयाने मोठे होते, पण दोघांमधील समान धागा म्हणजे त्यांचे र्सवकष व्यवधान. माओंना फक्त राजकीय-आर्थिक-सामाजिक परिवर्तन अभिप्रेत नव्हते, तर ‘सांस्कृतिक’ क्रांतीही अभिप्रेत होती. गांधीजींचा ‘स्वातंत्र्य’ संकल्पनेचा अर्थही फक्त राजकीय वा आर्थिक नव्हता, तर सामाजिक- सांस्कृतिक पण होता. पण हे समान घटक झाले.

त्यांच्यातील मुख्य फरक होता तो साध्य आणि साधन यातील विवेकाचा. माओंना वर्गयुद्ध अभिप्रेत होते आणि भांडवलदार- जमीनदार वर्गाचे निर्दालन हे त्यांचे उद्दिष्ट होते. हिंसेशिवाय ते निर्दालन म्हणजेच क्रांती संभवतच नाही. माओंचा अर्थातच ‘अहिंसा’ तत्त्वज्ञानावर विश्वास नव्हता. (जो आजही कोणत्याच माओवाद्यांचा नाही. भारतातील कम्युनिस्टांनी लोकशाही परंपरा स्वीकारली असली, तरी अहिंसेचे तत्त्वज्ञान त्यांना मान्य नाहीच.) गांधीजींनाही भांडवलशाही, जमीनदारशाही मान्य नव्हती. परंतु भांडवलदार वर्गाचे निर्दालन करण्याऐवजी त्या वर्गाचे हृदयपरिवर्तन करून सामाजिक-आर्थिक विषमता दूर करता येईल, असे त्यांचे मत होते. त्यांना ‘भूदान’ प्रक्रिया स्वेच्छेने घडवून आणायची होती आणि विनोबांनी नेमका तोच प्रयत्न केला. गांधीजींच्या दृष्टिकोनातून भांडवलदार हे उद्योगांचे व संपत्तीचे ‘ट्रस्टी’ म्हणजे विश्वस्त होते. लोभ आणि संपत्तीचा संचय वा आर्थिक मक्तेदारी गांधीजींना मान्य नव्हती. पण सर्जनशीलता, उद्यमशीलता आणि व्यापारशीलता समाजात ठेवायची असेल तर व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे, असे त्यांचे मत होते. माओंना व्यक्तिस्वातंत्र्य हे तत्त्वज्ञान म्हणूनच अमान्य होते. व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना ही ‘भांडवली फसवणूक’ आहे, असे माओंचे मत होते. गांधीजींच्या दृष्टिकोनातून ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा पाया मूलत: ‘आध्यात्मिक’ होता. कम्युनिस्टांच्या दृष्टीकोनातून अध्यात्म हे थोतांड होते.

गंमत म्हणजे येथील हिंदुत्ववादी हे भारताच्या आध्यात्मिक वारशाचा गाजावाजा करीत असले तरी त्यांचा गांधीजींना विरोध होता आणि अहिंसेच्या संकल्पनेलाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ हवा होता,  पण गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक/सामाजिक परिवर्तनाला त्यांचा विरोध होता. कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर कम्युनिस्ट दोघेही गांधीजींच्या विरोधात होते आणि हिंसेचे समर्थक होते.

भारतीय स्वातंत्र्य हे गांधीजींमुळे नव्हे तर सुभाषचंद्र बोस, भगतसिंग वा सावरकर यांच्या प्रयत्नामुळे मिळाले, असे मानणारेही कमी नाहीत. विरोधाभास हा की अहिंसेचा तत्त्वज्ञ हिंसेने मारला गेला आणि तोही हिंदू तत्त्वज्ञानाच्या थोरवीने प्रेरित होऊन! परंतु खुद्द सुभाषचंद्र बोस गांधीजींना सर्वोच्च आदराचे स्थान देत. कॉम्रेड रणदिवेंनाही पुढे बऱ्याच वर्षांनी साक्षात्कार झाला की, गांधीजी हे जगातील एक सर्वश्रेष्ठ ‘मॉरल रिव्होल्यूशनरी’ म्हणजे नैतिक क्रांती घडवू पाहणारे महान क्रांतीकारक होते. ज्या कम्युनिस्टांनी १५ ऑगस्ट हा काळा दिवस मानला होता, त्यांनीच गांधीजींना हे क्रांतीकारकाचे प्रशस्तिपत्र द्यावे, हे कॉम्रेड्स्चे हृदयपरिवर्तन म्हणायचे की विचारपरिवर्तन?

त्याचप्रमाणे संघपरिवाराला गांधीजी प्रात:स्मरणीय वाटावे. हे त्यांचे सांस्कृतिक- आध्यात्मिक परिवर्तन की त्यांच्यातील राजकीय परिवर्तन? भारतीय स्वातंत्र्यलढय़ाने, गांधीजींनी आणि पंडित नेहरूंनी जगाच्या इतिहासाला नवीन मापदंड दिले. खुद्द चीनमध्ये आज भांडवलशाही पद्धतीने विकास होत आहे आणि तेथील कम्युनिस्ट पक्ष त्या लाल भांडवलशाहीचा ‘ट्रस्टी’ म्हणजे विश्वस्त होऊ पाहात आहे. नेल्सन मंडेलांपासून ते बराक ओबामांपर्यंत सर्वाना गांधीजी हेच आदर्श वाटावेत, हे भारतीय स्वातंत्र्याचे व स्वातंत्र्यलढय़ाचे मोठे यश मानावे लागेल. लेनिन, माओ, चर्चिल, रुझवेल्ट यांच्यापेक्षा कितीतरी वरचे स्थान आज गांधीजींना जगभर दिले जाते. भारताचे भविष्य केवळ आर्थिक विकासावर नाही, तर सामाजिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक विकासावर मोजले जाणार आहे!

– डॉ. अभय बंग, सौजन्य – अनुभव मासिक

पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने “आजचा काळ, आजचे साहित्य’ या विषयावरील “युनिक फीचर्स’ने संपादित केलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते झालं.

या भाषणात त्यांनी साहित्यिकांकडून समाजाला असलेल्या अपेक्षा मांडल्या आहेत, मात्र “तंबाखूने रंगवलेला पैसा संमेलनात नको’ या त्यांच्या विधानावरच प्रामुख्याने चर्चा घडली, त्यामुळे मूळ भाषणातील महत्त्वाच्या मुद्‌द्यांकडे दुर्लक्ष झालं, म्हणून “अनुभव’च्या वाचकांसाठी त्या मुद्‌द्यांशी संबंधित भाषण इथे प्रकाशित करत आहेत.

————————————————

मी साहित्यिक नसल्याने साहित्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे मी साहित्याविषयी जवळपास बोलणार नाही. पण मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठीपण म्हणजे काय याविषयी बोलणार आहे. या स्मरणिकेचा विषय “आजचा काळ आणि आजचं साहित्य’ असा आहे, त्या अनुषंगानेही मी काही बाबींकडे सर्व साहित्यिकांचं लक्ष वेधू इच्छितो.

संकुचित सांस्कृतिक दृष्टीचं आव्हान
मराठी भाषी आणि महाराष्ट्र यांच्या अस्मिता आणि ओळखी विषयी सध्या बराच राजकीय वाद सुरू आहे. स्वत:ला “राष्ट्र’ नव्हे, “महाराष्ट्र’ म्हणवणारा हा प्रांत आहे. “महाराष्ट्र’ही दर्पोक्ती आहे का? की ही साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा आहे? माझं असं मानणं आहे, की “महाराष्ट्र’ ही दर्पोक्तीही नाही आणि भूभाग वाढवण्याची साम्राज्यवादी आकांक्षाही नाही. ही आमची आध्यात्मिक आकांक्षा आहे. आम्हाला आमचं हृदय इतकं व्यापक करायचं आहे की ते “महाराष्ट्र’ व्हावं! त्यामुळे महाराष्ट्र ही भौगोलिक आकांक्षा नाही, ती आध्यात्मिक आकांक्षा आहे. “महाराष्ट्र’ हे नाव निवडून आपण सर्व मराठी मंडळींनी अशी घोषणा केलेली आहे, की आम्ही भौगोलिकतेच्या सीमा ओलांडून, स्थानिकतेच्या आणि संकुचिततेच्या सीमा ओलांडून आमच्या हृदयाचं महाराष्ट्र करू. तसं केलं नाही तर “राष्ट्रा’च्या पोटामध्ये “महाराष्ट्र’ कसा बरं मावणार आहे?

आज काही राजकीय शक्तींमुळे आपल्यासमोर, महाराष्ट्रासमोर हे एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही भारतात कुठेही जा, महाराष्ट्रातील काही मंडळींच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राविषयी बराच गैरसमज आढळतो. म्हणूनच आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे, की महाराष्ट्र ही साम्राज्यवादी संकल्पना नसून एक आध्यात्मिक घोषणा आहे. ही घोषणा मोठी कालानुरूप आहे.
जागतिकीकरणाच्या जमान्यात स्थानिकतेचा आग्रह टिकणार नसला तरी महाराष्ट्रात आज काही छोटे-मोठे तंटे, वाद उद्‌भवत आहेत. मुंबईकरांना कधी दक्षिण भारतीय चालत नाहीत, कधी उत्तर भारतीय चालत नाहीत. पुण्याचं आधी झपाट्याने औद्योगीकरण झालं आणि नंतर आयटी कंपन्या आल्या, त्यामुळे पुण्याचं पुणेरी स्वरूप बदलतं आहे. त्याची खंत वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पुण्याचं पुणेरीपणच गेलं तर गंमत काय राहिली?

पण प्रश्न असा आहे, की हे सर्व कसं टाळता येईल? आम्हाला जागतिकीकरणाचे आर्थिक आणि राजकीय फायदे हवे आहेत, पण सांस्कृतिक परिवर्तन नको आहे, ही एक असंभव मागणी आपण करतो आहोत. “हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू’ हे जगातलं मॅनेजमेंटमधलं अव्वल क्रमांकाचं मासिक आहे. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी एक कव्हरस्टोरी आली होती. त्यांनी अशी मांडणी केली, की जे शहर जगातून कुठूनही आलेल्या माणसाला परकेपणाचा भाव तर देणार नाहीच, उलट आपलेपणाचा भाव देईल, त्या शहराकडे जगातील बुध्दिमत्तेचं मानवीय भांडवल वळणार आहे. अशा सर्वसमावेशक सांस्कृतिक निर्देशकांवर त्यांनी रॅंकिंग केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की अमेरिकेतील ऑस्टिन नावाचं एक छोटंसं शहर वैश्विक संस्कृतीच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचं शहर ठरलं. या निरीक्षणानंतर दोनच वर्षांनी अमेरिकेमध्ये सर्वात झपाट्याने वाढणारं शहर कोणतं असा शोेध घेतला गेला तेव्हा प्रथम क्रमांकावर ऑस्टिनच आलं. जे शहर त्या शहराबाहेरच्या लोकांना आपलेपणाचा भाव देईल, परकेपणाचा भाव निर्माण करणार नाही त्या शहराचाच आर्थिक विकास आणि राजकीय विकास होणार आहे, ही बाब त्यातून स्पष्ट झाली. त्यामुळे जागतिकीकरणामुळे येणारा आर्थिक विकास हवा पण सांस्कृतिक बदल नको, अशी अशक्य मागणी आपल्याला करता येईल का?

दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरची माणसं आल्याने आमची संस्कृती बिघडते, आमची संस्कृती लयाला जाते, वाहून जाते, अशी मानसिक असुरक्षिततेची भावना पसरलेली दिसते. अशी भावना पसरण्याचं प्रमुख कारण कदाचित संस्कृती म्हणजे काय याविषयीच आपल्या मनामध्ये काही तरी गफलत असावी, काही तरी गोंधळ असावा असं मला वाटतं. नऊवारी साडी, की तलवार- फेटा, की शिवराळ भाषा, की पुरणपोळी- तुळशीवृंदावन अशा काही सवयींमार्फत आपण आपली संस्कृती व्याख्यित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या गोष्टी बदलणाऱ्या आहेत, बदलतही आहेत. हे बदलायला बाहेरच्या माणसाची गरज नाही. महाराष्ट्राच्या नव्या आधुनिक पिढीने या सगळ्या गोष्टींचा केव्हाच त्याग केलेला आहे. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीमध्ये मराठी संस्कृती म्हणजे काय? स्थानिकतेचा आग्रह आणि संकुचित सांस्कृतिकवाद याचा राजकीय आग्रह धरून महाराष्ट्राचा विकास होणार आहे का, असा प्रश्न आहे.

माझी अशी भावना आहे, की या बाबतीत महाराष्ट्राला मार्गदर्शन आणि नेतृत्व राजकीय लोकांकडून नको आहे, तर ते साहित्यिकांकडून हवं आहे. आपण पूर्वकालीन तीन साहित्यिकांकडे वळून बघू या. आपले आद्य साहित्यिक ज्ञानेश्र्वर काय म्हणाले? ते म्हणाले, “आता विश्र्वात्मके देवे…’, दुसरे साहित्यिक तुकाराम काय म्हणाले?… ” तुका आकाशाएवढा…’ आणि तिसरे साहित्यिक विनोबा म्हणाले, “जय जगत्‌!’ आजपासून शंभर-दोनशे-तीनशे वर्षांनी आजच्या कोणत्या साहित्यिकांचं साहित्य वाचलं जाईल हे मला माहीत नाही, पण ज्या तीन साहित्यिकांचं साहित्य जरूर वाचलं जाईल असं मला व्यक्तिश: वाटतं ते असतील ज्ञानेश्र्वर, तुकाराम आणि विनोबा. या तिघांनी आपल्याला अगोदरच सांस्कृतिक मार्गदर्शन केलेलं आहे, की महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय? या तिघांनीही जी विश्र्वबंधुत्वाची घोषणा दिली आहे तो मराठीपणा आहे की नाही? मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक नवी वैश्र्विक मराठी संस्कृती व विश्र्वमानस निर्माण व्हायला हवं. परंतु निव्वळ दुबई आणि मॉरिशसमध्ये संमेलनं घेऊन ते निर्माण होणार नाही. आपण आपल्या दृष्टीत बदल घडवत आणला आणि आपलं हृदय व्यापक केलं तरच हे शक्य आहे. आपलं हृदय खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आणि त्याही पलीकडे वैश्र्विक झालं तरच वैश्र्विक मराठी संस्कृती निर्माण होऊ शकेल.

ही विश्र्वधर्मी मराठी संस्कृती प्रत्यक्षात येण्यासाठी साहित्य संमेलन आणि साहित्यिक यांनी नेतृत्व करणं अपेक्षित आहे. आजचे साहित्यिक असं नेतृत्व देऊ शकतील का? अख्खा महाराष्ट्र याकरता आपल्याकडे बघणार आहे.

साहित्यिकांनी कालभेदी दृष्टी द्यावी

काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे लोक एखादं नवं संशोधन करण्यापूर्वी त्याआधीच्या वैज्ञानिकांनी काय केलं होतं याचा शोध घेतात. त्या सोबतच काही जण तर ज्या विषयासंबंधी संशोधन करू इच्छितात त्याबद्दल साहित्यिकांनी काय लिहिलेलं आहे हे बघत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वैज्ञानिकांच्या अस्सल बुद्धिनिष्ठ दृष्टीला जे दिसत नाही ते बऱ्याचदा साहित्यिकांना दिसत असतं. साहित्यिकांना आजचंही वास्तव दिसत असतं आणि भविष्यकाळाचंदेखील दिसत असतं. याचा अर्थ असा, की आपल्याला कालभेदी दृष्टी हवी असेल तर साहित्यिकांकडे जावं लागतं.

शरत्‌चंद्र चट्टोपाध्यायांची एक अतिशय सुंदर कादंबरी आहे- “पथेरदाबी’. भारताच्या राजकारणात गांधी आणि सुभाष यांच्यामधला अहिंसा आणि हिंसा यांचा साधनशुद्धी बाबत जो संघर्ष नंतर राजकीय पटलावर घडला त्याच्या अनेक दशकांपूर्वी “पथेरदाबी’मध्ये सव्यसाची आणि भारती यांच्या वैचारिक आणि नैतिक संघर्षामधून शरदबाबूंनी तो रेखाटलेला होता. रवींद्रनाथ टागोरांची एक नृत्यनाटिका आहे- “रक्तकरबी’. रशियातील क्रांती होण्यापूर्वी रवींद्रनाथ टागोरांनी होऊ घातलेल्या राजकीय क्रांतीचं आणि त्या हिंसक क्रांतीमधून निर्माण होणाऱ्या समस्यांचं अतिशय सुंदर चित्रण त्यात केलेलं होतं. आणि सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे आपण सगळेच ऐकतो, की रामायण घडण्यापूर्वीच वाल्मीकींनी रामकथा लिहिली होती….या उदाहरणांचा अर्थ असा, की काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते व त्यातून त्यांना येणारा भविष्यकाळ दिसू शकतो.

ईशावास्योपनिषदात विनोबांनी “कवी म्हणजे क्रांतदर्शी’ असे म्हटले आहे. “ऋषी’ या शब्दाची विनोबांनी मोठी सुंदर फोड केली आहे. “ऋष’ म्हणजे बघणे, निरीक्षण करणे. जो काळाच्या अंधारातून पुढच्या काळात बघू शकतो तो “ऋषी’! ज्ञानेश्र्वर, तुकाराम, विनोबा, शरत्‌चंद्र, रवींद्रनाथ टागोर हे सगळे कवी व ऋषी होते. त्यांना ती कालभेदी दृष्टी होती.

मराठी साहित्यामध्ये अशी दृष्टी आम्हाला हवी आहे. परंतु मराठी साहित्य तर बऱ्याच प्रमाणात भूतकाळामध्येच रमताना दिसतं. भूतकाळ आमचाच आहे. आमच्याच संस्कृतीचा, परंपरेचा आहे. त्याच्याविषयी प्रेम वाटणं अगदी स्वाभाविक आहे, आवश्यकही आहे. पण आम्ही त्याच्यामध्येच रंगून चालेल, अडकून कसं चालेल? म्हणून किमान काही साहित्यिकांनी तरी आम्हाला ऋषीसारखी कालभेदी पुढची दृष्टी द्यावी, पुढच्या समाजाचं दर्शन द्यावं, ही आमची अपेक्षा आहे. भविष्यकाळ कोणत्या दिशेने जाणार आहे, आम्ही कसं वागावं, या व अशा प्रश्नांबाबत आम्हाला दृष्टीची गरज आहे.

तीन प्रमुख वैश्विक प्रश्र्न

आज तीन प्रमुख वैश्र्विक प्रश्न उभे आहेत- पहिला आहे भांडवलशाहीचं पाप, दुसरा आहे पृथ्वीला ताप आणि तिसरा आहे धार्मिक हिंसाचाराचा शाप. भांडवलशाही असं म्हणाली, की माणसाच्या व्यक्तिगत, अपरिमित लोभाच्या प्रेरणेतूनच समाजाचा आर्थिक विकास होत असतो. ऍडम स्मिथ तसं म्हणाला आणि आम्ही सगळे जगभर त्या पद्धतीने वागत सुटलो. या अपरिमित लोभामुळे, अनियंत्रित लोभामुळे, बॅंकर्सनी केलेल्या प्रचंड घोटाळ्यांमुळे, चुकांमुळे आज जागतिक मंदी आलेली आहे. भांडवलशाहीच्या पापाखाली लोभाची समस्या लपलेली आहे. अपरिमित लोेभ योग्य आहे का, त्यावर आधारित अर्थरचना शक्य आहे का? ही एक मोठी वैश्र्विक समस्या आपल्यापुढे आज उभी आहे.

दुसरी समस्या पृथ्वीला आलेला ताप ही आहे. अनियंत्रित यंत्रवाद, निसर्गाला नष्ट करणं आणि चंगळवाद यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला इकडची काडी तिकडे हलवायची नाही. कोणतेही शारीरिक श्रम करायचे नाहीत. पण अमाप भोग हवा. त्यामुळे आम्हाला पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, कोळसा पाहिजे, वीज पाहिजे, कारखाने पाहिजेत. या सगळ्यातून वैश्र्विक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामानात बदल (क्लायमेट चेंज) हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याच्या विस्तृत वर्णनात जाण्याची गरज नाही. कारण आपण वर्तमानपत्रात वाचत असतो की ग्लोबल वॉर्मिंगचे किती प्रचंड गंभीर परिणाम होणार आहेत!

तिसरी समस्या आहे, धार्मिक हिंसाचाराचा शाप. आधी इराणमध्ये घडू लागलं. मग अफगाणिस्तानमध्ये घडायला लागलं. पुढे पाकिस्तानमध्ये घडायला लागलं. आता हे लोण मुंबईला नि पुण्यालाही आलं आहे. कोणीही या शापापासून मुक्त नाही. आयर्लंडमध्ये ख्रिश्चनांनी वेडाचार केला. आयआरएने अनेक दशकं धार्मिक हिंसाचार नि दहशतवाद केला. नंतर शिखांनी केला, मुस्लिमांनी केला, आणि आता हिंदूही करायला लागले आहेत.

शंभर वर्षांपूर्वी 1909 साली एका चाळीस वर्षांच्या माणसाने या तीन प्रमुख समस्या आपल्या कालभेदी दृष्टीने पाहिल्या आणि इंग्लंडमधून दक्षिण आफ्रिकेत परत जाताना जहाजावर त्याने एक छोटेखानी पुस्तक घाईघाईने लिहिलं. ते लिहिताना उजवा हात जेव्हा थकायचा तेव्हा तो माणूस डाव्या हाताने लिहायचा. हा माणूस होता मोहनदास करमचंद गांधी. . पुस्तकाचं नाव आहे- “हिंद स्वराज’. “हिंद स्वराज’मध्ये महात्मा गांधींनी भारतीय समाजाला या तीनही समस्यांविषयी सावध केलेलं आहे. पाश्र्चात्त्य समाजाची दिसत असणारी समृद्धी आणि भरभराट, त्यांचा अतिरेकी यंत्रवाद आणि अपरिमित भोगवाद, आणि समाज बदलायला हिंसेवरती असलेला त्यांचा विश्र्वास, या तिन्हींकडे इंग्लंडमधले भारतीय तरुण तेव्हा आकर्षित होत होते. या तीनही चुकांपासून गांधींनी भारतीय माणसाला तेव्हा सावध केलं होतं. “हिंद स्वराज’मध्ये त्यांनी यावर उपायही सांगितलेले आहेत. गांधीजींनी जे उपाय सुचवलेले आहेत ते आज कालानुरूप असल्यामुळे मी त्यांचा ऊहापोह आणि चर्चा करतो आहे.

गांधीजींनी सांगितलेले उपाय

आज आमच्यासमोर उभे ठाकलेले तीनही प्रश्र्न “बाह्य’ जगातले आहेत. भांडवलशाही, चंगळवाद, यंत्रवाद, हिंसा हे सगळे प्रश्र्न “बाह्य’ आहेत. पण गंमत अशी की या सगळ्यांवर गांधींनी सांगितलेले उपाय मात्र “आंतरिक’ आहेत. गांधी म्हणतात, की “स्वराज्य’ म्हणजे “स्वत:चं’ राज्य नाही, तर “स्व’वरती राज्य. स्वराज्य म्हणजे “मला राज्य करण्याचा अधिकार पाहिजे’ असं आपण म्हणतो. पण हा माणूस तर म्हणतो, “बाबा रे, प्रथम स्वत:वर राज्य करायला शीक.’ स्वत:वर राज्य कसं कर? कसं शीक? या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरंही गांधींनी आपल्या पुस्तकात दिली आहेत. उपायही सांगितले आहेत. गांधींनी लोभावर उपाय सुचवला आहे तो अपरिग्रहाचा. जास्त संग्रहच करू नका, आणि तुमच्याकडे जी काही संपत्ती आहे ती समाजाची आहे, अशा विश्र्वस्तवृत्तीने त्याचा समाजाकरता उपयोग करा. भांडवलशाहीचा नारा आहे- “फ्रीडम ऑफ डिझायर’. पाश्र्चिमात्य जगात या नाऱ्याचं प्रचंड कौतुकही आहे. अमेरिकेत तर “फ्रीडम ऑफ चॉइस’ असणं हे जणू कोणत्याही समाजव्यवस्थेची सगळ्यात अंतिम कसोटी आहे. “फ्रीडम ऑफ चॉइस’ असं म्हणताना त्यांना अभिप्रेत असतं, की “वुई मस्ट हॅव अनलिमिटेड फ्रीडम ऑफ डिझायर’!- आम्हाला जे जे हवं आहे, आम्ही जे इच्छिलं आहे ते आम्हाला अपरिमित मिळायला पाहिजे. गांधी असं म्हणतात, की आपल्याला “फ्रीडम ऑफ डिझायर’ नव्हे तर “फ्रीडम फ्रॉम डिझायर’ हवं आहे. डिझायरवर विजय मिळवा, सर्व प्रश्र्न आपोआप सुटतील.

यंत्रवाद आणि चंगळवाद यावर गांधी अुपाय सांगतात शरीरश्रम आणि मित-भोग, म्हणजेच आपल्या गरजा कमी करा. अपरिमित गरजा कुणालाच पूर्ण करता येणार नाहीत. “देअर इज इनफ ऑन द अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड, बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड.’ आणि धार्मिक हिंसेवर तर त्यांनी अर्थातच सर्वधर्मसमभाव आणि अहिंसा हे उत्तर दिलेलं आहे.

“अति’ आणि “गती’च्या वेडाने बेभान झालेल्या आधुनिक माणसाला गांधींनी “हिंद स्वराज’मधून सावधगिरीचा इशारा दिला आहे. आजच्या आधुनिक युगातले जितके काही अतिरेकाचे प्रश्र्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं गांधींनी “हिंद स्वराज’मध्ये दिली आहेत, तीही शंभर वर्षांपूर्वी. गांधीजींना प्रश्र्नही दिसतात आणि उत्तरंही दिसतात. याचा अर्थ गांधी कालभेदी साहित्यिकाच्या अटी पूर्ण करतात. आम्हाला आमच्या साहित्यिकांकडून गांधींसारखी कालभेदी दृष्टी हवी आहे, मार्गदर्शन हवं आहे.

चळवळीचे दिवस संपले हा भ्रम

ज्या तीन शापांचा मी उल्लेख केला त्यांच्यापासून शापमुक्ती कशी होणार, असा प्रश्र्न अनेकांना पडलेला आहे. एक व्यथा आपण वारंवार ऐकतो; विशेषत: साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांतली जी मंडळी आहेत त्यांना ही व्यथा अधिकच आहे. त्यांचं म्हणणं असं, की आजकाल समाज परिवर्तनाच्या चळवळीच दिसत नाहीत. चळवळी लोपल्यामुळे माणसांमध्ये जी घुसळण होत होती ती थांबली. आणि चळवळीच नसतील तर आपल्या समाजाचे प्रश्र्न कसे सुटणार?

माझी अशी नम्र समजूत आहे, की चळवळींचे दिवस गेले हा दृष्टीचा प्रश्र्न आहे. चळवळींचे दिवस गेलेले नाहीत, चळवळींचं स्वरूप बदललं आहे. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात बहुतेक मुख्य बदल हे मोठ्या राजकीय चळवळींच्या माध्यमातून घडले आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळी असोत, मजुरांच्या चळवळी असोत, काळ्या लोकांच्या चळवळी असोत, पीस मूव्हमेंट्‌स असोत की शेतकरी चळवळ असो या सर्व चळवळी हजारो-लाखो लोकांच्या सहभागातून घडल्या आहेत. त्यामुळे लाखो माणसं रस्त्यावर येत आहेत, त्यांचा कुणी एक नेता असणार आहे, त्यांची एक विचारसरणी असणार आहे, त्यांचा एक झेंडा असणार आहे, त्यांची एक घोषणा असणार आहे, कार्यक्रम असणार आहे आणि हजारो-लाखो लोक त्याचं अनुसरण करणार आहेत या प्रकारच्या चळवळींची आम्हाला सवय झाली आहे. आताशा अशा प्रकारच्या चळवळी दिसत नसल्याने आम्ही म्हणतो की चळवळी मागे पडल्या आहेत. गोष्ट खरी आहे की अशा प्रकारच्या चळवळी दिसत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की समाजपरिवर्तनाची प्रक्रियाच थांबली आहे.

चळवळी थांबल्या पण परिवर्तन चालू आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स मात्र बदललं आहे, आणि ते आपल्यासाठी अतिशय अनुरूप आहे, आपल्याला, सामान्य माणसाला सक्षम करणारं आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स असं बदललं की राजकीय नेतृत्व आणि राजकीय चळवळींच्या मार्फत होणाऱ्या परिवर्तनाऐवजी आता हे परिवर्तन माणसा-माणसांच्या पातळीवर घडतं आहे. ह्युमन बीइंग इज द युनिट ऑफ चेंज. माणसाचं मानस आणि माणसाचं रोजचं जगणं हे परिवर्तनाचं कुरुक्षेत्र बनलं आहे. टीव्हीच्या जमान्यात माणसांना आता हजारो-लाखोंच्या संख्येने एकत्र येण्याला फुरसत राहिलेली नाही. राजकिय नेत्यांच्या सभांनाही आता माणसं मोठ्या संख्येने एकत्र येत नाहीत म्हणून गर्दी जमवण्यासाठी फिल्मस्टार आणावे लागतात. मात्र राजकीय नेत्यांच्या मागे माणसं येत नाहीत याचा अर्थ माणसं बदलत नाहीत असा नाही. माणसं आपापल्या जागी बदलताहेत आणि माणसा-माणसांत संथ बदलाची एक प्रक्रिया घडते आहे.

एक साधं उदाहरण घेऊ. योगाच्या चळवळीत रामदेवबाबा आता आता आले; पण अन्यथा गेली ऐंशी वर्षं योगाची चळवळ जगभर पसरते आहे. आज अमेरिकेतली पाच ते दहा टक्के लोकसंख्या योग शिकलेली आहे आणि नियमितपणे योग करते आहे. जगभरात आज कोट्यवधी लोक योग करतात. ही चळवळ कशी पसरली? माणसाकडून माणसापर्यंत, अशा रीतीनेच ती पसरली.

लोकांची जीवनशैली बदलते आहे. मुली शिकायला लागल्यात.माणसं आता आरोग्यासाठी चालायला लागली आहेत, व्यायाम करायला लागली आहेत. लोकांची जीवनशैली कशी बदलली? त्यामागे कुणी राजकीय नेता होता की कोणती राजकीय चळवळ होती? -असं काही नव्हतं. एका माणसात परिवर्तन झालं, त्याने दुसऱ्याला सांगितलं, त्याने तिसऱ्याला सांगितलं. चौथ्याने पाहिलं, अनुसरण केलं. हीच आहे “मॅन टु मॅन प्रोसेस ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन’. हे सांस्कृतिक परिवर्तन आहे. हे माणसाच्या हृदयात घडणारं परिवर्तन आहे. आज घडणाऱ्या परिवर्तनाचं गतिशास्त्र हे असं आहे!

माणसांच्या विचारात आणि आचरणात परिवर्तन घडवून आणण्याची अशी विलक्षण हातोटी गांधींमधे होती. “खादी’ हा अतिशय साधा वाटणारा कार्यक्रम त्यांनी दिला होता; परंतु त्यातून स्वत:चे आचार-विचार बदलण्याचा कार्यक्रमही अंतर्भूत होता. खादीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, गरिबासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, पर्यावरणासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, मित-भोग किंवा साध्या राहणीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, स्वातंत्र्य चळवळीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो आणि स्वत:च्या हाताने सूत कातल्याने मी शरीरश्रमासोबतही स्वत:ला जोडून घेऊ शकतो. परिवर्तनाच्या सहा मूल्यांसोबत मी स्वत:ला जोडून घेऊ शकतो. गांधींनी खादीमार्फत वस्त्रसंस्कृतीत क्रांती तर घडवलीच, परंतु किमान सहा मूल्यांबाबत स्वत:च्या आचार-विचारात परिवर्तन घडवून आणण्याची कृतीही घडवून आणली. नेहरू, पटेल, सुभाष या सगळ्या विदेशांत शिकलेल्या बॅरिस्टरांना गांधींनी स्वयंपाकघरात जशी भाजी चिरायला लावली तसंच सूतही कातायला लावलं. राजकीय क्रांतीच्या अगोदर गांधींनी सांस्कृतिक क्रांती सुरू केली.

मित्रांनो आपलं रोजचं जगणं हा आपला जाहीरनामा असतो. माझं रोजचं जगणं हा माझा सांस्कृतिक जाहीरनामा असतो. आणि खरं म्हणजे आजचा माणूस असं म्हणतो आहे, की हाच माझा राजकीय जाहीरनामादेखील आहे. माझ्या रोजच्या जगण्यातूनच मला जग कसं हवं आहे हे मी प्रगट करतो आहे.

थोडक्यात सांगायचं, तर व्यक्तिव्यक्तींचे विचार बदलले तर जग बदलतं, माणसाचं आचरण बदललं तर जग बदलतं. आणि हे आपल्याला सक्षम करणारं अशाकरता आहे कारण माझं रोजचं जगणं बदलायला मला कोणत्या राजकीय नेत्यावर अवलंबून राहावं लागत नाही. माझं रोजचं जगणं बदलणं हे माझ्याच हातात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते “स्वराज्य’ आहे. माझं रोजचं जगणं कसं असावं ते मीच ठरवू शकतो, मी स्वत:च स्वत:ला बदलवू शकतो. या अर्थाने परिवर्तनाच्या चळवळीचा केंद्रबिंदू आता मी स्वत:च आहे. प्रत्येक नागरिकाला केवढी शक्ती देणारी ही दृष्टी आहे! हे सांस्कृतिक परिवर्तन राजकीय परिवर्तनापेक्षा सामान्य माणसासाठी अधिक अनुकूल आहे, त्यामुळे ते लोकशाहीसाठीही अधिक अनुकूल आहे. इथे सत्ता ही खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या हातात आहे. पाच वर्षांनी एकदा मतदान करण्यापुरती ही सत्ता मर्यादित नाही. रोजच्या जगण्याची, रोजच्या मतदान करण्याची ही सत्ता आहे. मी काय नेसतो, मी काय खातो, मी काय वाचतो, मी पायी चालतो की मोटार वापरतो, हे सर्व जग म्हणजे जग कसं असावं याबद्दलचा जग बदलायचा माझा जाहीरनामा आहे. तो मी रोज जाहीर करू शकतो, रोज प्रगट करू शकतो, रोज तसं जगू शकतो आणि रोज मी जग बदलवू शकतो.

साहित्यिकांकडून सांस्कृतिक परिवर्तनाची अपेक्षा

रोजच्या जगण्यात जो बदल घडतो त्यालाच सांस्कृतिक परिवर्तन म्हणतात. जग बदलायची आणखी एक पद्धत विनोबांनी सांगितली आहे. ते असं म्हणतात, की जुन्या शब्दांवर नव्या अर्थांचं कलम करणं म्हणजे सांस्कृतिक परिवर्तन, अहिंसक परिवर्तन. असं परिवर्तन घडवण्याची शक्ती साहित्यिकांमध्येच असू शकते. आणि म्हणून सांस्कृतिक परिवर्तन ही जग बदलण्याची पद्धत तुमच्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आणि साहित्यिकांच्याही हातामध्ये अतिशय मोठी प्रभावी साधनं देणारी गोष्ट आहे.

हे परिवर्तन कोण करेल? माझा असा समज आहे, की सर्वप्रथम विज्ञान हे परिवर्तन आणते आहे. दुसरा प्रभावी घटक असतील स्त्रिया. कारण समाजाच्या संस्कृतीचं वहन मोठ्या प्रमाणात स्त्रियाच करतात. तरुण पिढी हा तिसरा महत्त्वाचा घटक असणार आहे, कारण ते उद्याच्या जगाची घोषणा आहेत. चौथं स्थान रिक्त आहे. आणि मला त्या चौथ्या स्थानावर साहित्यिकांच्या आगमनाची वाट आहे. साहित्यिकांनी आजच्या काळाला अनुरूप अशा प्रकारच्या समाजपरिवर्तनाचं नि सांस्कृतिक परिवर्तनाचं नेतृत्व करावं, अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे.

या साहित्य संमेलनात अशा प्रकारच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या मूल्यांचं दर्शन व्हावं, अशी आपली सर्वांची किमान अपेक्षा राहणार आहे. हे सर्वसमावेशक संमेलन व्हावं, अशी आपली अपेक्षा राहणार आहे. महाराष्ट्रातले जे काही संकुचित वाद आहेत त्यांनी यामध्ये अडथळा बनू नये. सर्वांचं हृदय व्यापक व्हावं. मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर, असले वादच यात येऊ नयेत, अशी आम्हाला अपेक्षा राहील. जे विश्र्वहृदय आम्ही जगाकडून अपेक्षा करतो, त्याची सगळ्यात पहिल्यांदा साहित्यिकांकडून आम्ही अपेक्षा करणार आहोत. साधेपणा आणि मितव्ययता यांचं दर्शन या संमेलनातून व्हावं, अशी अपेक्षा राहणार आहे.

महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे आजचे जे भडकते प्रश्न आहेत त्यांची यादी मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही, कारण ती सगळ्यांना माहीत आहेच. परंतु साहित्याचा, साहित्यिकांचा जीवनासोबत काही तरी अनुबंध या संमेलनात प्रकट व्हावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. साहित्यामध्ये निव्वळ स्वत:वरच भाळणं असा नार्सिसिझम्‌ व्यक्त होऊ नये, तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहोत, त्यांचं आम्ही देणं लागतो, हे प्रकट व्हावं. महाराष्ट्र जळतो आहे. आम्ही त्याचा भाग आहोत की नाही, आम्हाला देणंघेणं आहे की नाही, याचा जरूर विचार व्हायला हवा.

इथं एक कविता आठवते. आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये सहाराचं वाळवंट आहे. एके काळी ते सगळं जंगल होतं. पण जंगल तुटत गेलं, त्याचं वाळवंट होत गेलं. जसाजसा निसर्ग नष्ट होतो आहे, सहाराचं वाळवंट मोठंमोठं होत आहे. आणि सहाराचं वाळवंट आफ्रिकेमधे दक्षिणेकडे पसरतं आहे. एक कवी म्हणतो,

“सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स अँड साऊथवर्ड्‌स.

स्लोली, बट रिलेन्टलेसली, इंच बाय इंच
सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स’.
आफ्रिकेच्या उत्तरेमध्ये जी माणसं आहेत युरोप-अमेरिकेमधली, ती काय म्हणणात? जाऊ द्या ना, सहारा गेलं दक्षिणेकडे तर आमचं काय बिघडलं? आम्ही उत्तरेला सुरक्षित आहोत. आफ्रिकेला नष्ट होऊ द्या. त्यांना हा कवी सांगतो,
“डोन्ट लाफ ओ फूल्स इन द नॉर्थ
द अर्थ इज राऊंड’.
त्यामुळे प्रश्न असा आहे, की आज महाराष्ट्र जळत असताना साहित्यिक आणि साहित्य संमेलन कुठे उभं राहणार? सहाराच्या दक्षिणेला लोकांसोबत उभं राहणार की उत्तरेच्या मूर्खांमध्ये उभं राहणार? आम्ही जनतेच्या प्रश्नासोबत स्वत:ला जोडून घेणार, की आम्ही म्हणणार, अजून माझ्या दारावर थाप पडलेली नाही! जर्मनीत जेव्हा एकेका स्वातंत्र्याचा संकोच होत होता, तेव्हा कवी म्हणाला,
“प्रथम त्यांनी ज्यूंना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी ज्यू नाही.
नंतर कम्युनिस्टांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी कम्युनिस्ट नाही.
त्यानंतर विचारवंतांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो
की मी विचारवंत नाही.
आणि आज माझ्याच दारावर टकटक होत आहे.
पण आता मदतीला धावून यायला कुणीच शिल्लक उरलेलं नाही.’
जेव्हा अख्खा महाराष्ट्र दुष्काळात, आत्महत्यांत, बालमृत्यूंत, कुपोषणात, हिंसाचारात, असंख्य प्रश्नांत अक्षरश: जळतो आहे, तेव्हा साहित्य संमेलन कुठे उभं राहणार?
निवड आपल्या सर्वांना करायची आहे.

शब्दांकन : शुभदा चंद्रचूड