Posts Tagged ‘मार्क्सवाद’

सौजन्य – लोकसत्ता

कम्युनिस्ट चळवळीतील ज्येष्ठ नेते कॉ. शरद पाटील हे अत्यंत व्यासंगी व्यक्तिमत्व असून त्यांनी इतिहासाकडे अत्यंत वेगळ्या व चिकित्सक दृष्टीने पाहून अत्यंत विचारप्रवर्तक अशी पुस्तके लिहिली. त्यांनी लिहिलेल्या ‘प्रिमिटिव्ह कम्युनिझम मॅट्रिआर्की – गायनॉक्रसी अँड मॉडर्न सोश्ॉलिझम, खंड – ४’ या पुस्तकाचे गेल्या महिन्यात प्रकाशन झाले. हे पुस्तक मौजाई प्रकाशनने प्रसिद्ध केले आहे. कॉ. शरद पाटील यांच्या या तसेच अन्य ग्रंथांतील संदर्भ देत मधु शेटय़े यांनी प्राचीन भारत, तेथील परंपरा, समाजरचना व मार्क्‍सवादी विचारधारा यासंबंधी विवेचन केले आहे. त्यातील मातृसत्ताक पध्दतीबद्दलची मांडणी थोडक्यात येथे देत आहोत.

भारताचा समाजवादी लोकशाहीचा स्वतंत्र मार्ग असू शकतो का? सोव्हिएत युनियनचे पतन, चीन आणि इतर कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी भांडवलदारी मार्ग स्वीकारल्यामुळे या समस्येवर जगभरच्या कम्युनिस्टांमध्ये विपुल चर्चा झाली आहे आणि होत आहे.

जागतिक साम्राज्यवादी भांडवलशाहीच्या अरिष्टाची चर्चाही होत आहे. माहिती तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे भांडवलशाही व साम्राज्यवादी पर्याय कुंठित झाले आहेत. भारतातील दोन्ही कम्युनिस्ट पक्षांचे राजकारण कोंडीत सापडून पश्चिम बंगाल, केरळ इत्यादी राज्यांतून त्यांची सत्ताही संकटात सापडली आहे. अशा अरिष्टग्रस्त परिस्थितीत भारतातील समाजवादी लोकशाही क्रांतीचा मार्ग काय असावा यांवर ठाम मार्गदर्शक दार्शनिक ऐतिहासिक कामगिरी सत्यशोधक मार्क्‍सवादी कॉ. शरद पाटील यांनी आपल्या ‘दास क्षुद्रांची कामगिरी’पासून ते ‘आदिम साम्यवाद, मातृशासन, स्त्री सत्ता आणि आधुनिक समाजवाद’ याच्या चार खंडांतून तसेच अब्राम्हणी साहित्याचे सौंदर्यशास्त्र, सामंती सेवकत्वाचा प्राचीन इतिहास विकसित करून जे सर्जनशील प्रतिभावंत कार्य केलेले आहे ते भारताच्या आधुनिक समाजवादी पर्यायांमध्ये अभूतपूर्व म्हटले पाहिजे. दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी या स्वयंप्रज्ञ नेत्याला त्यांच्या स्वतंत्र संशोधनाला मदत तर राहोच पण बहिष्कृत करावे यात प्रस्थापित कम्युनिस्टांचा अध:पातच उघड आहे. नवा माणूस विकसित कसा करावा अशी समस्या आजवर डाव्या आंदोलनातील विचारवंतांच्या विवंचनेचा विषय होता. पण त्यासाठी प्राचीन भारतातील समाजव्यवस्थेच्या मुलगामी संशोधनाचीच ऐतिहासिक नितांत गरज होती. ती भरून काढण्याचा निर्धार करुन कॉ. शरद पाटीलांनी जे संशोधन मांडले आहे त्यासाठी त्यांना दोन्ही कम्युनिस्ट पक्षांच्या बाहेर पडून आदिवासी, ग्रामीण विभागात मार्क्‍सवादी सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाची स्थापना करावी लागली. त्याचप्रमाणे प्राच्य विद्येची संस्कृत, मागधी, पाली इत्यादी भाषांतून दोन तपाहून खास अभ्यासपूर्वक संशोधन करून त्यांनी ही मांडणी केली आहे.

कार्ल मार्क्‍स ने ‘भांडवल’च्या पहिल्या खंडात क्रयवस्तूंचे विश्लेषण मांडले आहे. मार्क्‍सच्या सहकाऱ्यांनी  ते सोपे करून मांडण्याची सूचना केली. त्यावर मार्क्‍स म्हणतो की, शास्त्राला सोपे करणारा राजमार्ग नाही. कॉ. शरद पाटील म्हणतात की, अकोला जेलमध्ये कॉ. बी. टी. रणदिवे यांना त्या प्रकरणावर माझे टिपण दिले होते (१९६२-६३). पण कॉ. रणदिव्यांकडून त्यावर स्पष्टीकरण आलेच नाही. शरद पाटील हे मार्क्‍सवादी पक्षातून राजीनामा देऊन बाहेर पडले व मार्क्‍सवादी पक्षाकडून बहिष्कृत झाले. १९७८ साली त्यांनी ‘सत्यशोधक मार्क्‍सवादी पक्ष’ आदिवासी भागात स्थापन केला.

मार्क्‍सने ‘भांडवल’ ग्रंथात भांडवलशाही जगातील अंतर्विरोध दाखविले आणि ते इतक्या विकोपाला जातील की भांडवलशाही कोसळेल असे भाकित मांडले. शरद पाटील हे कम्युनिस्ट पक्षाच्या मुंबईतील मुख्य कचेरीत स्टाफ आर्टिस्ट होते. त्याच सुमाराला राहुल सांकृत्यायन मुंबईत हिंदी साहित्य संमेलनाचे उद्घाटन करीत असताना (१९४६-४७) राहुलजींनी भारतीय मुस्लिमांना राष्ट्रीय प्रवाहात येण्याची विनंती आपल्या भाषणात केली. पण दुसऱ्याच दिवशी वृत्तपत्रांमध्ये आम्ही वाचले की राहुल सांस्कृत्यायन यांची कम्युनिस्ट पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सोव्हिएत युनियनमध्ये शेतीच्या सामुदायिकीकरणातून संकट निर्माण झाले होते आणि अन्नधान्याची आयात करावी लागली. विज्ञानात जेनेटिक्सची संभावना भांडवलदारी विचार करण्यात आली. आयकॅन पावलोव्ह (१८४९-१९३६) याला सिग्मंड फ्रॉईडपेक्षा श्रेष्ठ ठरविण्यात आले. ब्रिटिश मार्क्‍सवादी साहित्यिक व समीक्षक ख्रिस्तोफर कॉडवेल याने फ्रॉईडच्या नेणीवेच्या सिद्धांताचा पुरस्कार केला असताना कॉडवेललाही नाकारण्यात आले कारण त्यामुळे मार्क्‍सवादी व कम्युनिस्टांच्या मार्क्‍सच्या एकप्रवाही ज्ञानशास्त्राला आव्हान मिळत होत. अशा पध्दतींमुळेच  सोव्हिएत युनियन तत्वज्ञानात ठोकळेबाज राहिले आणि मार्क्‍सवादी आणि कम्युनिस्ट हे आजही तीच री ओढत आहेत. अखेरीस पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांनी संकटग्रस्त डाव्या आघाडीच्या कटू अनुभवातून गेल्यावर (५ जानेवारी २००८ रोजी) वैफल्याने समाजवाद अव्यावहारिक आहे आणि बुद्धदेव भट्टाचार्याना पाठिंबा देताना भांडवलशाहीचे समर्थन करण्यापर्यंत मजल मारली.

प्राथमिक साम्यवाद, मातृशासन आणि स्त्रीसत्ता हे प्रकरण तर समाजशास्त्रज्ञांसाठी (भारतातील) मोठेच कोडे आहे. शरद पाटील यांनी पाश्चिमात्य बिफ्रॉ, मॉर्गन यांचे संशोधन भारताला कोठे लागू पडते त्याची उदाहरणे तर दिलीच आहेत पण भारतीय संदर्भात आद्य व्याकरणकार संकटायनापासून पाणिनीपर्यंत भाषातील धातूशास्त्रापासून मातृशासन आणि स्त्रीसत्ता ही साऱ्या जगातील सर्वात प्राचीन व्यवस्था भारतातच नव्हे तर जगातील भौगोलिक खंडातून किती प्रभावी होती व तीतूनच स्वातंत्र्य, समता आणि मित्रत्व ही तत्कालिन समाज व्यवस्थेची तत्व यांचे विश्लेषण नव्याने मांडले आहे. उदाहरणार्थ, गण समाज हा स्त्रीसत्तेचाच होता. नंतर ‘कुल’ आणि ‘ज्ञाती’ यांची समिती पुरुषांनी स्थापन केली. भारताप्रमाणेच चीनमध्येही तशीच व्यवस्था मातृशासित ‘मोसुओइस्ट’ होती. महायान बुद्धिझम (इ.स.वि. १०० शतकापुढे) भारतीय बुद्धिझम शिकण्यासाठी तिबेटच्या लामांनी नालंदामध्ये महाविहारातून त्याची मांडणी केली होती. बुद्धिस्ट यात्रेकरू आंध्रमधील श्रीशैल या धर्मस्थानातून यात्रा करीत कारण ते स्त्रीराज्य होते. स्त्रीसत्तात्मक तांत्रिझमचे त्या काळात प्रभावी स्थान होते. त्यांनी चीनला गेल्यावर चीनमधील दिग्नाग विचारपीठाची स्थापना केली आणि नेणीवेच्या संकल्पनेचा बोध आणि शोध सुरू केला.

चीनमधील ‘मोसुओइस्ट’ यांना ते मातृशासित असल्यामुळे सर्वोच्च स्थान आहे. त्यांची लोकसंख्या ३० हजार असून ते युनान आणि सिचुआन या प्रांतांच्या सीमेवर राहातात. त्यांची स्वतंत्र भाषा असून तिची लिपी नाही. उत्तर आफ्रिकेत काबाईल  प्रदेशात मातृसत्ताक वस्ती आहे. इटलीमध्ये एट्रस्कॉन वस्तीतही मातृसत्ताक धर्तीवरची लैंगिक समता आहे. पॅसिफिक महासागरातील वनाटीनाईज वस्तीमध्ये मातृसत्ताक पद्घती आहे. केरळमध्ये मल्याळी लोकांत मातृसत्ताक शासन मौर्यकालापर्यंत होते हे शरद पाटलांच्या पूर्वीच्या दासशूद्रांच्या गुलामगिरीच्या खंडात विस्तृतरित्या दिले आहे. इंडोनेशियामध्ये पश्चिम सुमात्रा प्रदेशात आजही ‘मिनांगनॉस’ या प्रदेशात मातृसत्ताक समाज आहे. उत्तर अमेरिकेच्या दक्षिण-पश्चिमेकडील प्रदेशात प्युब्लोज, होपीज आणि झुनीस या प्रदेशातील भागात मुलांना जन्म देणारी म्हणून स्त्रीदेहाला धार्मिक पावित्र्य मिळते. मनुष्यजन्म आणि शेती उत्पादन ही आदिम समाजात सर्वश्रेष्ठ माया (जादू) समजली जाते. या प्रदेशात स्कसंबंधांमुळे माता स्त्री कुळांना गणांचे स्वरूप देते. गण हे तांत्रिकी श्रुतीचे अपत्य आहे, वैदिकी नव्हे. युरोपात सोआमी जमातीत आजीची सत्ता असते. उत्तर आफ्रिकेत त्वारेगल (पश्चिम सहारा) ही मातृशासित जमात आहे आणि स्त्रियांपुरतीच शिक्षणाची तरतूद मर्यादित आहे. पश्चिम आफ्रिकेत गिनी बिसॉ येथे महिलाच कुटुंबप्रमुख आहे. या प्रदेशातील हौसा भागात १७ राज्यांच्या घराण्यांची सत्ता होती. तसेच टोगोमध्ये व्यापार महिलांच्या हाती आहे. अरबांमध्ये दक्षिण अरबस्तानातील कृषी प्रदेशात अभिजात स्त्रीसत्ता नांदत होती. महंमदी धर्मापूर्वी तेथील स्त्रियांना नवरा निवडण्याचे स्वातंत्र्य होते तर येमेन हे स्त्रीसत्ताकच होते. उत्तर अमेरिकेत विवाहित स्त्रियांना मालमत्ता मालकीचा अधिकार होता. आणि वारसाहक्क स्त्रियांमार्फत प्रस्थापित होई. कॅनडामध्ये मोन्टमनेन-नस्कापी  येथे स्त्रियांना समाजात श्रेष्ठ मान होता. उत्तर अमेरिकेत मातृशासित समाजात स्त्रिया आपले प्रतिनिधी पंचायतीत निवडून देत. स्त्रिया कुळप्रमुख समजल्या जात. स्त्रियांच्या कौन्सिलमधील प्रतिनिधींतून युद्धप्रमुख स्त्रीला प्रिय महिला अशी उपाधी होती. प्वेब्लोमध्ये स्त्रियांच्या संतती उत्पादकतेमुळे त्यांना सर्वश्रेष्ठ मानमरातब मिळत होता. झुनी प्रदेशात धर्मात प्रवेश करण्याचा अधिकार महिलांना होता. ते जमिनीला आई मानीत, तिच्यातील धान्याला बालके समजत आणि शिकारीच्या जनावरांना पितृस्थानी मानीत. स्त्रियांना जगातील मध्यवर्ती स्थान असे. नवडो प्रदेशातील संस्कृती मातृसत्ताक आहे. तेथे स्त्री सत्तेवर असून स्वतंत्र आहे.

राजेंद्र जोशी, सौजन्य – लोकसत्ता

कोल्हापूरच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात कष्टकरी व उपेक्षितांना न्याय मिळवून देण्यासाठी साठ वर्षांहून अधिक काळ संघर्ष करणाऱ्या कॉ. गोविंद पानसरेंचा  अमृतमहोत्सव मंगळवार, २३ नोव्हेंबर रोजी कोल्हापुरात साजरा होतो आहे. त्यानिमित्ताने..

पुरोगामी वळणाचे आणि रांगडय़ा बांधणीचे कोल्हापूर आता आधुनिकतेच्या मार्गावर प्रवास करू लागले आहे. इथे अस्सल मराठीची जागा हिंग्लिश घेऊ लागली आहे, तालमी ओस पडून निवडणुकीत सौदे करणारी तरुण मंडळे तयार झाली आहेत, म्हशीचे दूध कट्टे बंद पडले असून परमिट रूम बिअरबारची रेलचेल सुरू झाली आहे, पाश्चिमात्य संस्कृतीचे आगमन आणि पाठोपाठ पिझ्झा बर्गरही दाखल झाला आहे. पण तरीही कोटय़वधी रूपयांची औद्योगिक गुंतवणूक करणारा उद्योजक आज कोल्हापूरच्याच पंचतारांकित वसाहतीला प्राधान्य देतांना दिसतो. पुण्या-मुंबईचे नोकरदार निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखासमाधानाने जगण्यासाठी कोल्हापुरातच निवाऱ्याची व्यवस्था करताना दिसतात. या साऱ्याला कोल्हापूरची औद्योगिक शांतता आणि जातीय सलोखा या दोन गोष्टी कारणीभूत आहेत. इथे देश पेटला तरी जातीय वणवे पेटत नाहीत आणि औद्योगिक मंदीतही कामगारांची शांतता भंग होत नाही. या गोष्टीला राजर्षी शाहूंच्या सामाजिक समतेचा भक्कम पाया जबाबदार असला तरी राजर्षीच्या विचारांची ही पताका २१ व्या शतकापर्यंत आपल्या खांद्यावरून घेऊन जाणाऱ्या काही मोजक्या नेत्यांचे योगदानही तितकेच महत्वाचे आहे. यामध्ये ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते कॉ. गोविंद पानसरे यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

कॉ. गोविंद  पंढरीनाथ पानसरे हे नाव महाराष्ट्राला अपरिचित नाही. शेकडो लढे आणि सामाजिक चळवळींच्या माध्यमातून पायाला भिंगरी बांधून पानसरे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. कोल्हापुरात तर पानसरे माहीत नसणारा माणूस शोधून काढावा लागेल. पण हे पानसरे मूळचे अहमदनगर जिल्ह्य़ातील श्रीरामपूर तालुक्यातील कोल्हार गावचे हे आज कोणाला सांगून पटणार नाही, इतके ते पक्के कोल्हापुरी झाले आहेत. गरीब शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या पण शिक्षण घेण्याची आर्थिक कुवत नसलेल्या या तरुणाला मूळच्या कोल्हापूरच्या पण स्वातंत्र्यपूर्व काळात दहशतवादी गटात काम करणाऱ्या गोविंद दामोदर पत्की या स्वातंत्र्यसैनिकाने हात दिला आणि शिक्षणासाठी वयाच्या १५व्या वर्षी पत्कींचे बोट धरून पानसरे कोल्हापुरात आले. तेव्हापासून आजपर्यंत पानसरे हे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनातील सामाजिक चळवळींचा प्रमुख आधारस्तंभ बनून राहिले आहेत. माणसाच्या नशिबी गरिबीचे जिणे किती असावे ?

याची कल्पना पानसरेंच्या जीवन प्रवासावर नजर टाकली तर कळून चुकते. कोल्हापुरला दोन फाटक्या कपडय़ानिशी शिक्षणासाठी दाखल झालेल्या गोविंदरावांना राहण्यासाठी ना निवारा होता ना भुकेची व्यवस्था! कधी बिंदू चौकात कम्युनिस्ट पुस्तकांची विक्री करणाऱ्या ‘बुक स्टॉल द रिपब्लिक’ या दुकानात तर कधी बिंदू चौकात फुले, आंबेडकरांच्या पुतळ्याखाली झोपून त्यांनी रात्र काढली आणि कधी सणगर गल्लीतील बी. एन. भोसले या शिक्षकाच्या घरी त्यांना स्वयंपाकाला मदत करून तर कधी सांगलीहून येणाऱ्या एम. के. जाधव या एस. टी. कामगाराच्या डब्यामध्ये त्यांनी आपला जठराग्नी शमविला. पुढे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग येथे प्रवेश मिळाल्यानंतर पानसरे पदवीधरही झाले आणि कायद्याचे शिक्षण घेवून नामवंत वकील ही बिरूदावली त्यांच्या नावामागे लागली. अर्थात या  प्रवासात नगरपालिकेच्या जकात नाक्यावर शिपाई म्हणून त्यांनी नोकरीही केली, वृत्तपत्रे विकली आणि प्रसंगी रस्त्यांवर कंगवेही विकले. या सर्व प्रकारात त्यांनी कधी कमीपणा मानला नाही. म्हणूनच आज पानसरे नावाचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व सामाजिक चळवळींचा आदर्श म्हणून उभं आहे.

कॉ. पानसरे हे मूळचे हाडाचे कम्युनिस्ट. शालेय जीवनापासून मार्क्‍सवादाचा प्रभाव असलेले पानसरे १९५२ पासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सभासद बनले. कोल्हापुरात आल्यापासून तर कम्युनिस्ट विचार रूजविण्यासाठी त्यांनी हरतऱ्हेने प्रयत्न केले. पण त्या मानाने त्यांना म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही हे मान्यच करावे लागेल. कोल्हापूर ही तशी राजर्षी शाहूंची सामाजिक समतेची नगरी. या समतेच्या तत्वज्ञानाने कोल्हापुरला पुरोगामीपण दिले. अन्यायाविरूद्ध पराकोटीचा संघर्ष उभा करण्याची आणि जुलमी व्यवस्थेविरूध्द लढण्याची शक्ती या शाहूंच्या सामाजिक समतेच्या बाळकडूने कोल्हापूरकरांच्या रक्तात भिनवली. यामुळे कोल्हापुरात स्वातंत्र्यानंतर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा दिमाखाने फडकला. काँग्रेसला काही काळ हद्दपार करून जनतेने शेकापला सत्तेत बसविले. पण शेकापचे ‘विळा-कणीस’ हातात धरणाऱ्या जनतेने कम्युनिस्टांचा ‘विळा-हातोडा’ काही स्वीकारला नाही. यामुळे कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्ष जरी मर्यादित वर्तुळात वावरला असला तरी कॉ. पानसरेंना मात्र कोल्हापुरकरांनी आपला नेता मानण्यात हयगय केली नाही.  कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्ष आकाराने जरी छोटा असला तरी कॉ. पानसरे यांनी आपल्या प्रखर बुध्दीमत्तेने, उत्तुंग ध्येयवादाने, प्रामाणिक तत्वज्ञानाने आणि कडव्या संघर्षांच्या जोरावर सार्वजनिक जीवनात आपले अढळस्थान निर्माण केले. खरेतर एवढय़ा राजकीय शिदोरीवर आजकाल कोणीही महाराष्ट्राच्या मंत्रीपदावर पोहचला असता, पण लोकांनी पानसरे स्वीकारले तरी त्यांचा पक्ष स्वीकारला नाही आणि ऐनवेळी त्यांच्या डाव्या साथीदारांनीही हाराकिरी केल्यामुळे पानसरे नावाचे वादळ महाराष्ट्राच्या विधानसभेपर्यंत पोहचलेच नाही. ही जर योग्य संधी मिळाली असती तर गरीबी, दारिद्रय आणि शोषणाच्या दुृष्टचक्रात अडकलेल्या उपेक्षित, वंचित घटकांच्या वेदनांचा हुंकार विधीमंडळाच्या भिंतींपर्यंत पोहचला असता, इतके मात्र निश्चित.

अर्थात कोल्हापुरात कम्युनिस्ट पक्षाचे आकारमान जरी छोटे असले तरी त्यातही सामाजिक भान असणाऱ्या निष्ठावंत लढाऊ कार्यकर्त्यांची एक फळी गेल्या ४० वर्षांच्या सार्वजनिक जीवनामध्ये या ना त्या लढय़ाच्या निमित्ताने लढताना दिसते आहे, याचे संपूर्ण श्रेय पानसरे यांना द्यावे लागेल. आजकाल अन्य पक्षांत पुढारी होणे खूप सोपे आहे. चार डिजिटल फलक लावले अथवा खादी भांडारातून शे-दोनशे रूपयाला झब्बा-पायजमा विकत घेवून हात वर करणारी छबी वृत्तपत्रातून छापून आणली तर एका रात्रीत कुणीही नेता होतो. पण कम्युनिस्ट पक्षाचे मात्र तसे नाही. पक्षात येण्यासाठी दोन वर्षांची उमेदवारी आणि त्यातून तावून सुलाखून निघाल्यानंतर मग पक्षाचे सदस्यत्व. अशा कसोटीला उतरलेल्या कार्यकर्त्यांना घडविण्यासाठी पानसरेंनी काय काय करावे ? ते भाषणाचे वर्ग घेत होते, मार्क्‍सवादाचे मोफत क्लास चालवित होते, जागतिक घडामोडी आणि राष्ट्रीय घडामोडी यांची तरूण कार्यकर्त्यांना ओळख करून देण्यासाठी त्यांनी हजारो व्याख्याने दिली. ही मूसच इतकी भक्कम की त्यातून तयार झालेल्या कार्यकर्त्यांने आयुष्यात कधी सत्ता वा प्रलोभनासाठी पक्ष सोडल्याचे आठवत नाही. पक्ष हाच जणू त्यांचा संसार होता आणि कार्यकर्ते ही त्यांची मुले म्हणूनच ‘रेड फ्लॅग बिल्डिंग’ मध्ये वावरत होती. आपल्या कार्यकर्त्यांची सुखदुखे त्यांच्या अडचणी यामध्ये धावून जाणाऱ्यात पानसरेंचा पहिला नंबर असायचा. यामुळे ‘अण्णा’ या नावाने वावरणारे हे व्यक्तिमत्व पक्षाच्या कार्यकर्त्यांना कधी आपल्या कुटुंबापासून दूरचे वाटलेच नाही.

कम्युनिस्ट पक्षाचा एक लढवय्या कार्यकर्ता म्हणून पानसरे गेली ६० वर्षे देशाच्या सार्वजनिक जीवनात वावरताहेत. या काळात त्यांनी असंख्य आंदोलने केली. संघर्ष केले, तुरूंगवास भोगला, पोलीसांच्या लाठय़ा झेलल्या. पण अनेक डाव्या तरुणांचे ऊर्जाकेंद्र असलेला हा नेता कधी डगमगला नाही. कोल्हापुरात तर जिथे अन्याय तिथे पानसरे हे समीकरणच जणू ठरलेले! विशेषत: सामाजिक अन्याय आणि अंधश्रध्दा यांनी जिथे जिथे डोके वर काढण्याचा प्रयत्न केला तिथे तिथे संघर्षांने पेटून उठून या प्रकारांना जमिनीत गाडण्यात ते अग्रेसर राहिले. अशा आंदोलनांची यादी करण्याचा प्रयत्न केला तर एक जाडजूड ग्रंथ झाल्याशिवाय राहणार नाही. वर्णव्यवस्थेबाबत शंकराचार्यानी केलेल्या विधानाचा निषेध असो अथवा पावसासाठी प्रार्थना करण्यासाठी राज्यपालांनी काढलेल्या फतव्याचा निषेध असो, कोडोलीच्या नग्न पूजेच्या विरोधातील आंदोलन असो वा वाशीचे दारूबंदी आंदोलन असो, अथवा राज्य शासनाच्या फलज्योतिष अभ्यासक्रमाला विरोध असो, इतकेच काय हुपरीच्या दलित-सवर्ण दंगलीत जळलेल्या दलितांची घरे पुन्हा सवर्णाकडूनच उभे करून घेणारे आणि चिप्रीच्या ऑक्झ्ॉलिक अ‍ॅसिड प्रकल्पात कारखाना बंद करण्याच्या आंदोलनात कामगार विरूध्द पर्यावरणवादी हा संघर्ष असो, पर्यावरणवाद्यांच्या बाजूने निर्णय देणारे  पानसरे प्रत्येक ठिकाणी आपली निश्चित भूमिका घेवून उभे राहिले. शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू डॉ. धनागरे यांच्या विरोधात आणि कोल्हापुरात गांधी मैदानात आयोजित शांतीयज्ञाच्या समर्थनार्थ बडय़ा शक्ती उभ्या राहिल्या तरी पानसरेंनी आपल्या तत्वाशी कधी तडजोड केली नाही. प्रा. एन. डी. पाटील यांच्या समवेत मूठभर कार्यकर्त्यांना घेवून त्यांनी लोकशाही मार्गाने केलेला विरोध हा कदाचित तत्कालीन चेष्टेचा विषय बनला असला तरी या विरोधानेच लोकशाहीची लाज राखली हे विसरून चालणार नाही. पानसरेंच्या आयुष्यात शोषित, कष्टकरी, गरीब आणि ‘नाही रे’ वर्गातील लोकांसाठी त्यांनी केलेल्या शेकडो आंदोलनांचा परामर्ष जागेच्या मर्यादेमुळे घेता येत नसला तरी त्यांच्या दोन आंदोलनांचा उल्लेख अवश्य केला पाहिजे. ‘मी नथुराम गोडसे’ या नाटकावर कोल्हापुरात ‘अ‍ॅरिस्टॉटल क्लब’ ने आयोजित केलेल्या परिसंवादाला जेव्हा जिल्हा प्रशासनाने संयोजकांवर दबाब आणून बंदी घातली तेव्हा शाहू स्मारकाच्या दारात दोनशे कार्यकर्त्यांसमवेत ‘कॉरिडॉर’ मध्ये परिसंवाद घेऊन त्यांनी घटनेतील आपल्या स्वातंत्र्याची जाणीव प्रशासनाला करून दिली. केशवराव भोसले नाटय़गृहात पत्नीसमवेत ‘यदा कदाचित’ या नाटकाचा खेळ पाहत असताना हिंदुत्ववाद्यांनी गोंधळ करून नाटक बंद पाडण्याचा प्रयत्न केला तेंव्हा जिवाची पर्वा न करता तडक रंगमंचावर जावून आव्हान देऊन त्यांनी या नाटकातील विघ्न दूर केले. ही आंदोलने त्यांच्यातील सच्च्या कार्यकर्त्यांचे दर्शन घडविल्याशिवाय राहत नाहीत. याखेरीज आज महाराष्ट्राच्या विधानसभेत घरेलू मोलकरणींसाठी जो कायदा संमत झाला आहे त्याचे खरेखुरे शिल्पकारही कॉ. पानसरेच आहेत.

उत्तम वक्ते, कुशल संघटक, लढाऊ नेते, अनुभवसिध्द लेखक, संशोधक आणि अनेकांचे आधारस्तंभ अशी अनेक बिरूदे आज कॉ. पानसरे यांच्या नावाला अलगदपणे चिकटली आहेत. संघर्ष हा जणू त्यांच्या पाचवीलाच पूजला होता. पण त्यांच्या जीवनात त्यांनी लिहिलेले ‘शिवाजी कोण होता ?’ हे पुस्तक, त्यांनी स्थापन केलेली ‘श्रमिक प्रतिष्ठान’ व ‘आम्ही भारतीय लोक आंदोलन’ ही दोन व्यासपीठे त्यांच्या कार्यप्रवासातील मैलाचा दगड ठरावीत. महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांचे नाव घेवून जेव्हा राजकारणाला वेगळे वळण लागत होते, तेव्हा हतबल झालेल्या डाव्या पुरोगाम्यांच्या चळवळीला त्यांनी ‘शिवाजी कोण होता’ हा वस्तुनिष्ठ दस्तऐवज उपलब्ध करून दिला. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज ही कोणा एका विशिष्ट समाजाची मक्तेदारी नाही हे ठासून सांगता येणे कार्यकर्त्यांना शक्य झाले. या छोटेखानी पुस्तकाने १९८४ मध्ये मोठा दबदबा निर्माण केला. कानडी, उर्दू, गुजराथी, इंग्रजी आणि हिंदूी भाषेत त्याच्या आवृत्त्या निघाल्या. एकूण १७ आवृत्त्यात प्रसिध्द झालेल्या या दस्तावेजाच्या लाखांहून अधिक प्रति घराघरांत पोहचल्या आहेत.

त्यांनी स्थापन केलेल्या श्रमिक प्रतिष्ठानमुळे कोल्हापूरच्या सार्वजनिक जीवनात पुरोगामी सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळींसाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे आणि ‘आम्ही भारतीय लोक आंदोलना’ मुळे कोल्हापुरात जातीय सलोख्याला कधी गालबोट लागलेले नाही. म्हणूनच १९९२ मध्ये बाबरी मस्जिद कोसळल्यानंतर संपूर्ण देश जातीय वणव्यात होरपळून निघत असताना ती झळ कोल्हापुरात प्रवेश करू शकली नाही.

विचारांशी प्रामाणिक आणि धीरोदात्तपणा हे पानसरे नावाच्या अद््भूत रसायनाचे आणखी एक वैशिष्ठय़. माणूस आपले दुख किती गिळू शकतो आणि गिळतागिळता आपण स्विकारलेल्या तत्वज्ञानाला पुढे नेण्याचा प्रयत्न कसा करतो याचे दर्शन कॉ. पानसरे यांनी आपल्या एकुलत्याएक मुलाच्या निधनावेळी कोल्हापूरकरांना घडविले. कॉ. अविनाश पानसरे हा खरा तर नव्या पिढीचा दुसरा पानसरे होता. पित्याप्रमाणेच लढाऊ बाणा असलेल्या या युवा नेत्याला नियतीने अकाली आपली शिकार बनविले. ऐन उमेदीच्या काळात हृदयविकाराचा बळी ठरलेल्या या तरूणाच्या निधनाच्या वार्तेने अख्खा कम्युनिस्ट पक्षच काय, कोल्हापूरची डावी पुरोगामी चळवळ मुळापासून हादरून गेली. अविनाशच्या अंत्ययात्रेतील हे प्रसंग कोल्हापुरकरांच्या मनाच्या कुपीत आजही बंदिस्त झाले आहेत. हजारोंच्या उपस्थितीत निघालेली अविनाशच्या पार्थिवाची अंत्ययात्रा जेव्हा बिंदू चौकातील ‘रेड फ्लॅग बिल्डिंग’ जवळ आली तेव्हा सर्वत्र शांतता पसरली होती.

जो तो आपल्या अश्रूंना वाट करून देत होता. कोणाला काय करायचे हेच कळत नव्हते. अशावेळी पुत्र वियोगाने मुळापासून हादरलेले गोविंदराव पानसरे पार्थिव असलेल्या गाडीवर चढले आणि पक्षाचा झेंडा अविनाशच्या पार्थिवावर अंथरून त्यांनी आपली मूठ आवळली. ‘अविनाश पानसरे लाल सलाम’, ‘अविनाश का अधुरा काम कौन करेगा ?, हम करेंगे, हम करेंगे..’ अशी पानसरेंची घोषणा आसंमतात घुमली तेव्हा उपस्थितांच्या हृदयाला पाझर फुटल्यावाचून राहिला नाही. स्वतच्या डोळ्यातील अश्रू लपवून कार्यकर्त्यांना आधार देणाऱ्या पानसरेंचा धीरोदात्तपणाही कोल्हापूरकरांनी तेव्हा अनुभवला आणि तत्वज्ञानाशी असलेल्या त्यांच्या प्रामाणिकपणाचे अनोखे दर्शनही घेतले.

पुत्र नश्वर आहे, पण मार्क्‍सवाद चिरंतन आहे असाच संदेश पानसरे यांनी यावेळी दिला. म्हणूनच कॉ. पानसरे राजकारणात असूनही  इतरांपेक्षा वेगळे दिसतात. राजकारणात अशी व्यक्तिमत्वे खूपच दुर्मिळ असतात. वयाची ७५ वर्षे अखंड एका निष्ठेला वाहून घेणारी तर दुर्मिळात दुर्मिळ असतात. कॉ.गोविंद पानसरे यांचे तर महाराष्ट्रावर मोठे सामाजिक ऋण आहे. या ऋणातून थोडे तरी उतराई होण्यासाठी अवघ्या महाराष्ट्राने क्षणभर उभे राहून त्यांना मानवंदनाच दिली पाहिजे.