Posts Tagged ‘विज्ञान’

डॉ. अनिल काकोडकर, सौजन्य – लोकसत्ता

ठाणे जिल्ह्य़ात बोर्डी येथे झालेल्या अ. भा. मराठी विज्ञान संमेलनाचे  अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांच्या भाषणाचा संपादित अंश..

विज्ञान व त्यावर आधारित तंत्रज्ञान यामुळेच मानवाची आजवरची प्रगती व त्याचे सुधारलेले जीवनमान शक्य झाले आहे. समाजातील सर्व प्रकारच्या आर्थिक बाबींवरपण तंत्रज्ञानाचा विशेष प्रभाव पडतो.सामाजिक सुधारणा, विकास, संपर्काची साधने, दळणवळण, स्वास्थ्य  या व इतर सर्व बाबतीत झालेली प्रगती तंत्रज्ञानामुळेच  शक्य झाली आहे. आपण कुठल्याही क्षेत्रात काम करीत असलो तरी इंटरनेट, मोबाईल, माहिती तंत्रज्ञान व अन्य आधुनिक तंत्रज्ञानाने आज आपल्या सर्वाचे जीवन व्यापलेले आहे. आज नवीन तंत्रज्ञान झपाटय़ाने पुढे येत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या जीवनावर फार मोठा प्रभाव पडत असल्याने त्याची माहिती सर्वांपर्यंत पोहोचविणे हेदेखील विज्ञान प्रसाराचे एक महत्त्वाचे अंग होऊन बसलेले आहे.

आजवर आपण बाहेरून आयात केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपली आर्थिक प्रगती साध्य करीत आलो आहोत. आजच्या मुक्त अर्थव्यवस्थेचा  आपल्याला चांगलाच फायदा झालेला आहे. आज आपण अशा टप्प्यावर येऊन पोहोचलो आहोत की आता आपल्याला जागतिक स्पर्धेत टिकून पुढे घेऊन जाऊ शकणारे नवीन तंत्रज्ञान अधिकाधिक प्रमाणात आणि तेही आपणच विकसित केलेले असणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ इतरांचे अनुकरण करून, आपण फार तर पहिल्या स्थानाच्या जवळ जाऊ शकतो, पण पहिले स्थान मात्र मिळवू शकत नाही. त्यासाठी स्वत:चा नावीण्यपूर्ण पुढाकार असणे अत्यंत आवश्यक असते. तंत्रज्ञानाबाबतीत हे अत्यंत महत्त्वाचे आहे. ज्ञानावर आधारित मुक्त अर्थव्यवस्थेत तर हे अधिकच प्रकर्षांने जाणवते.

आपल्याकडे विज्ञान संशोधनाची मोठी परंपरा आहे. पण आज संशोधन क्षेत्रात प्रचलित असलेली मूल्यव्यवस्था आपण तपासून पहावयास हवी. ‘रामन इफेक्ट’चा शोध डॉ. रामन यांनी आपल्या इथे लावला, पण त्यावर आधारित उपकरणे आपण देशात निर्माण केली नाहीत. आजही ती आपण आयात करतो. याचा अर्थ, आपण तंत्रज्ञानाबाबतीत काहीच केलेले नाही असे नाही. अणुशक्ती, अंतराळ, संरक्षण विषयक संशोधन अशा क्षेत्रांत चांगल्या प्रकारचे तंत्रज्ञान नक्कीच विकसित केले  गेले आहे. अशा संवेदनशील क्षेत्रात आपला देश बऱ्याच अंशी स्वयंपूर्ण असणे आवश्यकही होते व ते आपण आपल्या बळावर साध्य केले ही महत्त्वाची व अभिमानास्पद बाब आहे.

आज आपल्या येथे संशोधन, तंत्रज्ञान विकास व त्याचा प्रत्यक्ष वापर ही वेगवेगळी व एकमेकांशी अत्यल्प संबंध असलेली क्षेत्रे बनलेली आहेत. एक प्रकारचे वर्णाश्रम निर्माण झालेले आहेत. त्यामुळे नावीण्यपूर्ण विकासाच्या कामात मोठी बाधा निर्माण  होत आहे. हे चित्र पालटणे आवश्यक आहे. यासाठी विविध स्तरांवर प्रयत्न करावयास हवेत. आपल्या उच्च शिक्षणाची आखणी अशी असावी की ज्या योगे विद्यार्थ्यांला एखाद्या विषयातील ज्ञानाबरोबरच त्यावर आधारित कौशल्ये साध्य करणे शक्य होऊ शकेल. अशा कसब-कौशल्यांचा विकास प्रत्यक्ष कामातून करण्याची व्यवस्था आपण करावयास हवी. यासाठी शैक्षणिक संस्था, उद्योग व सामाजिक संस्था यांचे निकटचे व विविध स्तरांवरील सहकार्य अत्यंत आवश्यक आहे.

सध्या मुंबई विद्यापीठात अणुशक्ती खात्याच्या सहकार्याने एक मूलभूत विज्ञान केंद्र सुरू झाले आहे. या केंद्रात बारावी ते एम.एस्सी, असा एकत्रित कार्यक्रम राबवला जात आहे. याच केंद्रात शिक्षकांनी आपला बराच वेळ शिकवण्याबरोबर संशोधन करण्यात घालवावा, तसेच डॉक्टरेट किंवा त्यापुढे संशोधन करण्याची व्यवस्थापण असावी, असा प्रयत्न आहे. या केंद्राचा दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे या केंद्रात  मुंबईत असलेल्या अन्य संशोधन संस्थांचा सहभाग. बीएआरसी, टीआयएफआर, आयआयटीसारख्या संस्थांतील संशोधक या केंद्रात शिकवण्याचे व संशोधनविषयक मार्गदर्शनाचे काम विद्यापीठातील प्राध्यापकांबरोबर करीत असतात. या केंद्रातील अशा मान्यवर संशोधन केंद्राबरोबरच्या सहकार्यामुळे विद्यार्थ्यांची क्षितिजे विस्तारतात.

मूलभूत संशोधन व तंत्रज्ञान विकास यांच्यातील दुवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने होमी भाभा नॅशनल इन्स्टिटय़ूट एक नवीन उपक्रम चालवत आहे. येथे विद्यार्थ्यांना मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञान विकासाच्या क्षेत्रात पीएच.डी. करण्यासाठी विशेष प्रोत्साहन देण्यात येते. यासाठी दोन मार्गदर्शकांची व्यवस्था या कार्यक्रमात केलेली आहे. यापैकी एक मूलभूत विज्ञान व दुसरा तंत्रज्ञान क्षेत्रातील असेल. मूलभूत संशोधनावर आधारित तंत्रज्ञानाचा विकास व असे कार्य करणाऱ्या संस्थांमधील सहकार्य अशा कार्यक्रमांमुळे वृद्धिंगत होईल, असा माझा विश्वास आहे.

आज पुढारलेल्या देशांनी पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या नैसर्गिक साधनांचा मोठा वाटा केवळ आपल्यासाठी वापरून एका बाजूला जागतिक पर्यावरणाचा समतोल बिघडवलेला आहे व दुसऱ्या बाजूला विकसनशील देशांसाठी या साधनांच्या उपलब्धतेच्या संदर्भात मोठी समस्या निर्माण करून ठेवली आहे. या संदर्भात ऊर्जेचे उदाहरण घेता येईल. आज भारतात सरासरी दरडोई विजेचा वार्षिक वापर ६५० किलोव्ॉट तास इतका आहे. हे प्रमाण जागतिक सरासरीच्या केवळ २५ टक्के  इतके कमी आहे. औद्योगिकदृष्टय़ा पुढारलेल्या देशांच्या तुलनेत हे प्रमाण केवळ ३ ते  ६ टक्के आहे. आज तर आपण भारतात विजेचा वापर पुढारलेल्या देशांच्या बरोबरीने  करावयाचे ठरविले तर त्यासाठी लागणारी ऊर्जेची साधने उपलब्ध होणे अशक्य आहे.

जीवनमानाचा दर्जा बऱ्याच अंशी विजेच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. आपल्या देशात किमान जीवनमान सर्वाना उपलब्ध करायचे झाले तर विजेचा दरडोई वार्षिक वापर ५००० किलोव्ॉटतास इतका तरी कमीतकमी असावयास हवा. आपली लोकसंख्यापण अजून स्थिरावलेली नाही. ती १६० कोटीपर्यंत जाऊन स्थिरावेल असा अंदाज आहे. याचाच अर्थ, आपली विजेची उपलब्धता आजच्या प्रमाणाच्या दसपटीने वाढावयास हवी. यासाठी लागणारी ऊर्जेची साधने आपण कोठून मिळवणार हा खरा प्रश्न आहे. या प्रमाणावर ऊर्जेचा वापर अखंड चालू राहण्याच्या दृष्टीने विचार केला तर अणुऊर्जा व सौरऊर्जा सोडून इतर सर्वसाधने अगदी तुटपुंजी असल्याचे आपल्या लक्षात येते.

ऊर्जेच्या उपलब्धतेचा प्रश्न तात्पुरता बाजूला ठेवला तरी आज जागतिक वातावरणाच्या तापमानवाढीचा व त्यामुळे समुद्रपातळीच्या वाढीचा आणि ऋतुचक्रात मोठय़ा प्रमाणात होणाऱ्या बदलाचा प्रश्न आपल्यापुढे आ वासून उभा आहे. याचे मुख्य कारण वातावरणात मिथेन, कार्बन- डाय- ऑक्साईड अशा प्रकारच्या वायूंचे प्रमाण हे होय. कोळसा व काही प्रमाणात हायड्रोकार्बन यांचा ऊर्जेसाठी वापर हे याचे मुख्य कारण आहे.

कार्बनवर आधारित आजच्या ऊर्जाव्यवस्थेचे कार्बनविरहित ऊर्जाव्यवस्थेत रुपांतर करण्याची योजना आपण तयार करून ती राबवली पाहिजे. आज आपले दळणवळण पेट्रोल, डिझेल  यांसारख्या तरल (सहज बाष्पनशील) ऊर्जासाधनांवर अवलंबून आहे. विजेवर चालणाऱ्या मोटारगाडय़ा हळूहळू बाजारात  येत आहे. हा बदल पूर्णाशाने अमलात येण्यास बराच अवधी लागेल. सौर व अणुऊर्जेवर आधारित हायड्रोजन निर्माण करणे, अशा हायड्रोजन व कार्बन-डाय  ऑक्साईड  यांचे संयुग करून तरल हायड्रोकार्बन बनवणे, जैविक  घन कचऱ्याचा बायोडायजेस्टरमध्ये उपयोग करून निर्माण होणाऱ्या मिथेनचे ज्वलन करून वीज निर्माण करणे, विजेबरोबर हायड्रोजनवर आधारित उपकरणे बनविणे असे तंत्रज्ञान निर्माण होत आहे.

सौरऊर्जा ही जवळपास पुढील ४.५ अब्ज वर्षे आपणास मिळत राहील, हे जरी खरे असले तरी ही ऊर्जा २४ तास उपलब्ध नसते. हायड्रोजन निर्माण करण्याच्या प्रक्रियेमुळे आपण ही ऊर्जा साठविण्याची व्यवस्था करू शकतो. दुसरे म्हणजे सौरऊर्जा ही मुबलक प्रमाणात गोळा करावयाची झाल्यास खूप मोठे क्षेत्रफळ त्यासाठी आवश्यक आहे. कारण उन्हाचे तापमान खूप कमी असते. याउलट अणुशक्ती ही एक अतिप्रखर अशी शक्ती आहे. थोडीशी साधने वापरून थोडय़ा जागेत आपण मुबलक वीज निर्माण करू  शकतो. आज जरी युरेनियमपासून आपण वीजनिर्मिती करत असलो तरी उद्या थोरियमपासून अधिक मुबलक प्रमाणात आपण वीज निर्मिती करू शकू. ही झाली अणुविभाजनातून निर्माण झालेली वीज. अणुच्या एकमेकांतील संमिलनाने (फ्यूजन)सुद्धा आता वीज  निर्माण करण्याची शक्यता फार  जवळ आलेली आहे. हे जर  झाले तर अणुऊर्जेची उपलब्धता आपल्या ऊर्जेच्या गरजा भागविण्याच्या दृष्टीने पुढील हजारो वर्षे पुरेल इतकी होऊ शकेल. भारतही या कार्यक्रमात मागे नाही. इंटरनॅशनल थर्मोन्यूक्लियर  एक्सपरिमेंटल रिअ‍ॅक्टर -आयटीईआर प्रकल्पात भारताचा पूर्ण सहभाग आहे.

आज भारताची गणना अणुतंत्रज्ञानात जगातील अत्यंत पुढारलेल्या देशांत होते. आपले हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञान जागतिक स्तरावर प्रगत मानले गेलेले आहे. या तंत्रज्ञानाच्या आधारावर आपण आज आपली अणुकेंद्रे निर्माण करीत आहोत व त्यांचा वापर व्यापारीदृष्टय़ा अत्यंत सफलपणे चालू आहे. फास्ट ब्रीडर रिअ‍ॅक्टरचे तंत्रज्ञानही आपण विकसित केलेले आहे. ५०० मेगाव्ॉट क्षमतेचे पहिले अणुवीज केंद्र सध्या आपण निर्माण करीत आहोत. या तंत्रज्ञानात आपली गणना जगातल्या पहिल्या दोन देशांत होते. थोरियम तंत्रज्ञानाबाबत तर आपण जगावेगळे महत्त्व प्राप्त केलेले आहे भविष्यात जेव्हा इतर देशांना थोरियमवर आधारित ऊर्जेची गरज जाणवेल, तेव्हा त्यांना भारताच्या सहकार्याचे महत्त्व अधिकच लक्षात येईल. थोरियमवर आधारित अ‍ॅडव्हान्स्ड हेवी वॉटर रिअ‍ॅक्टरच्या निर्मितीचे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा करूया.

भारतातही आपण तंत्रज्ञान विकासाबाबतीत सफल वाटचाल केली असली तरी मुख्यत देशांतर्गत उपलब्ध युरोनियमच्या तुटवडय़ामुळे प्रत्यक्ष वीजनिर्मिती आपण खूप वाढवू शकलो नाही. आंतरराष्ट्रीय नागरी सहकार्याचे नवे दालन आता आपणासाठी उघडले गेले आहे. आता आपण आपला ठरलेला अणुशक्ती कार्यक्रम अबाधित ठेवून बाहेरून आयात केलेल्या युरेनियमच्या आधारावर आपली वीजनिर्मितीची क्षमता वाढवू शकतो. एवढेच नव्हे तर देशांतर्गत विकसित फास्ट रिअ‍ॅक्टर तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुरुवातीस आयात केलेल्या युरेनियमचे पुनर्चक्रीकरण करून वीजनिर्मितीची क्षमता दसपट किंवा त्यापेक्षाही अधिक वाढवू शकतो. ऊर्जेच्या बाबतीत देशास स्वयंपूर्ण करण्याचा हा उत्तम मार्ग होय. माझ्या मते या शतकाच्या मध्यापर्यंत जवळपास पन्नास टक्के वीज अणुऊर्जेच्या माध्यमातून निर्माण करणे शक्य व्हावे.

सध्या आपण महाराष्ट्रात जैतापूर येथे होऊ घातलेल्या प्रकल्पाबद्दल बरीच चर्चा ऐकतो आहोत. खरे म्हणजे महाराष्ट्रातच तारापूर येथे देशातील पहिले अणुवीज केंद्र निर्माण करण्यात आले होते. त्याकाळीसुद्धा ही संयंत्रे तेव्हा प्रचलित असलेल्या वीजनिर्मिती केंद्राच्या तुलनेत महाकाय अशीच होती. तारापूरबाबतसुद्धा उलटसुलट चर्चा झालेलीच आहे. पण आज ४० वर्षांंनंतरही ती सर्वप्रथम उभारलेली  दोन संयंत्रे देशातील जलविद्युत सोडल्यास सर्वात स्वस्त वीजनिर्मिती करीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तारापूरचे सुरक्षित काम पाहून अनेक विदेशी तज्ज्ञांनी कौतुक केले आहे.

जैतापूर येथे फ्रान्सच्या सहकार्याने १६५० मेगाव्ॉट क्षमतेची ६ संयंत्रे बसवण्याचा प्रस्ताव आहे. यातील पहिल्या दोन संयंत्रांच्या उभारणीचे कार्य सुरू करण्याच्या दृष्टीने तयारी सुरू आहे. ही संयंत्रे  इव्हॅल्यूशनरी पॉवर रिअ‍ॅक्टर (ईपीआर) धर्तीची अत्यंत पुढारलेली अशी आहेत. फिनलंड, फ्रान्स व चीन येथे अशा संयंत्रांच्या उभारणीचे काम सध्या चालू आहे. या संयंत्रांची उभारणी अर्थातच अणुऊर्जा  नियामक  मंडळाच्या पूर्ण निरीक्षणाखालीच होईल. नियामक मंडळाचे तज्ज्ञ या प्रकल्पाचा पूर्ण अभ्यास करुन सुरक्षिततेबाबत पूर्ण खातरजमा झाल्यानंतर प्रकल्पासाठी  आपली संमती देतील.  त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही.

पर्यावरणाच्या दृष्टीने या अणुवीज केंद्रातून कुठल्याही प्रकारचा अपाय संभवत नाही. आज आपण देशात २० अणुवीज केंद्रे चालवत आहोत. या केंद्राभोवतीच्या पर्यावरणाचा अभ्यास, त्यासाठी उभारलेल्या खास प्रयोगशाळांत केला जात आहे. या अनुभवावरून अणुवीज केंद्रांचा पर्यावरणावर नगण्य प्रभाव पडतो, असे आपण ठामपणे सांगू शकतो. अणुवीज केंद्र  स्वच्छ वीजनिर्मिती तर करतातच पण त्याचबरोबर  केंद्राच्या परिसरात बराच आर्थिक व सामाजिक विकास त्यामुळे साध्य होतो, असा आजवरचा अनुभव आहे.

अणुऊर्जेबाबत मी बरीच चर्चा केली. इतर अनेक क्षेत्रांत आपणास प्रगती करावयाची आहे. त्यातील काही अशी क्षेत्रे आहेत की जेथे आपणास भारतीय समस्यांवर भारतीय तोडगा काढणे अनिवार्य आहे. आपण आपल्या तरुण पिढीची अशी तयारी करावयास हवी की हे काम ते सक्षमतेने करू शकतील.

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

मोक्ष, निर्वाण, अपवर्ग किंवा स्वर्ग यांच्या मागे सारी ज्ञानपरंपरा लागल्यामुळे आणि तिने ऐहिक जीवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याकडील विज्ञान संशोधनाच्या परंपरा तर थांबल्याच शिवाय (या परंपरांवर हक्क सांगणाऱ्यांखेरीज इतरांना विचार करण्याचा अधिकारच नसल्यामुळे) विज्ञानाला पोषक असणाऱ्या आरंभीच्या विचारसरणींचाही येथे शेवट झाला. कणाद, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट किंवा तेव्हाची गणितज्ञांची व खगोलशास्त्रज्ञांची परंपरा थांबली आणि ऐहिक जीवनाच्या विचारावर भर देणाऱ्या जडवादाच्या परंपराही लोप पावल्या. जीवन मिथ्या आहे, ते दुःखमय आणि क्षणभंगुर आहे व त्याकडे पाठ फिरवून संन्यास किंवा निर्वाण साधणे हेच जीवनाचे परमोच्च ध्येय आहे ही शिकवण ऐहिकतेच्या व जडवादाच्या जीवावर उठणारीही होती. ज्या समाजात जडवादाच्या व ऐहिकतेच्या विचारपरंपरा शाबूत राहिल्या त्या समाजात विज्ञान अंकुरले आणि शोधपरंपराही टिकल्या.

विचार करणाऱ्यांचा वर्ग वेगळा आणि श्रम करणाऱ्यांचे समूह वेगळे असे विभाजन जेव्हा समाजात घडून येते तेव्हाच समाजात अध्यात्मवादी आणि जडवादी परंपरा अशा वेगळया होत असतात. कष्टकऱ्यांच्या वाटयाला आलेले कष्ट त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून आले आहेत. हे प्रायश्चित्त पूर्ण केल्याखेरीज त्यांना पुढचा चांगला जन्म चांगला मिळणार नाही हे जोवर त्यांच्या मनावर बिंबविले जात नाही तोवर विचारांवर ताबा ठेवणाऱ्यांचे जीवन व्यवहार सुरक्षीत होत नाहीत. धनवंतांच्या वाटयाला येणारे सुख त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे त्यांना मिळाले आहे हेही त्याचसाठी श्रम करणाऱ्यांच्या मनावर ठसवावे लागत असते. हा संस्कार समाजमनावर उमटविण्याचे काम धर्माने केले. (याचसाठी मार्क्सने त्याला अफूची गोळी म्हटले आहे) तेवढयावरच या धर्मपरंपरा थांबल्या नाहीत. ऐहिक जीवनाचा विचार करणाऱ्या आणि ते सुखी बनविण्याचा ध्यास घेतलेल्या जडवादाच्या परंपराही त्यांनी नाहिशा करून संपविण्याचे काम केले.

वास्तविक जडवादाच्या (बार्हस्पत्य, लोकायत किंवा चार्वाकमताच्या) मांडणीची देशातील परंपरा वेदांहून जुनी आहे. वेदोपनिषदात त्या परंपरेवर आलेली टीका आणि विरोध लक्षात घेतला की तिचे चेतन परंपरेएवढेच किंबहुना तिच्याहूनही प्राचीन असलेले अस्तित्व लक्षात येते. ही परंपरा एकेकाळी अतिशय प्रतिष्ठित व सन्माननीयच राहिली असावी असे मानण्याएवढा पुरावा आपल्या आदरणीय धर्मग्रंथात उपलब्ध आहे. महाभारताच्या वनपर्वात द्रौपदी म्हणते,’माझ्या वडिलांनी मला लोकायतमताची शिकवण देण्यासाठी अधिकारी माणसांची नियुक्ती केली होती.’ एखादा राजपुरुष आपल्या कन्येच्या शिक्षणासाठी ज्या संप्रदायाच्या गुरूंची नियुक्ती करतो तो संप्रदाय प्रतिष्ठित व सन्माननीय असणेच भाग आहे. पुढच्या काळात झालेल्या पाणिनीने चार्वाक किंवा लोकायत हा अन्विक्षकीचा विचार असल्याचे मत नोंदविले आहे. कृषी, उत्पादन आणि ऐहिक उपलब्धींची चर्चा करणारी शास्त्रे अन्विक्षकीत येणारी आहेत हे लक्षात घेतले की लोकायत मताचे पाणिनीच्या काळात मान्य असलेले श्रेष्ठत्वही ध्यानात येते. चार्वाकांच्या परंपरेला पहिला ज्ञात विरोध बौध्द परंपरेकडून झाला. बुध्द भिक्षुंनी चार्वाकांचे ग्रंथ वाचू नयेत अशी या परंपरेची आरंभीची शिकवण आहे.

चार्वाक मताचे खंडन करणारी वैदिकांची परंपराही जुनी आहे. ती बादरायणाच्या ब्रह्मसूत्रांपासून (इ.स.पूर्वी दिडशे वर्ष) सुरू होत असली तरी या सूत्रांनी या मताला निंद्य ठरविल्याचे दिसत नाही. वेदांत विचारांचे श्रेष्ठत्व सांगण्यासाठी ज्या परंपरांचे खंडन नंतरच्या काळात वैदिकांनी केले त्यात चार्वाक मत पहिल्या क्रमांकावर आहे. ते सर्वप्रथम खोडून काढण्यावर साऱ्या वैदिकांनी भर दिला आहे. मात्र शंकराचार्यांपर्यंतच्या या परंपरेनेही चार्वाकांना अनैतिक वा चंगळवादी ठरविल्याचे दिसत नाही. या काळापर्यंत बौध्द व जैनांच्या परंपरांनीही चार्वाकांवर टीका केली आहे. मात्र त्यांनी त्यांना अनैतिक वा अमंगल मानल्याचे दिसत नाही.

या मताची टवाळी करण्याचा व ते अनीतीमान ठरविण्याचा प्रयत्न दहाव्या शतकानंतर सुरू होतो. ते अनैतिक ठरवत असतानाच त्यावर पोरकटपणाचा शिक्का उमटविला जातो. त्यासाठी त्यांची विचार परंपरा तोडून मोडून मांडणे, त्यांच्या तोंडी त्यांनी न उच्चारलेले श्लोक पेरणे आणि त्यांच्या संप्रदायाशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या गोष्टींना त्यांच्या परंपरेत मांडून दाखविणे यासारखे अशास्त्रीयच नव्हे तर कमालीचे हास्यास्पद प्रकार या टीकाकारांनी केले. ऋण काढून तूप प्या, हे बदनाम वचन चार्वाकांचे असल्याची मांडणी आपल्या सर्वदर्शन संग्रहात माधवाचार्यांनी (चौदावे शतक) केली. वास्तविक हा श्लोकार्ध चार्वाकांचा नाही. तो वेदांत्यांनी तयार करून त्यांच्या तोंडी घातला आहे. मुळात हा श्लोक जयंत भट्ट या नैय्यायिकाच्या नवव्या शतकातील ग्रंथात आला आहे. तो असा,

यावत् जीवेत् सुखम् जीवेत्, नास्ति मृत्युः अगोचरः,
भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनम् कृतः

यात माधवाचार्यांनी ‘दुरुस्ती’ करून ‘नास्ति मृत्युः अगोचरः’ हा चरण गाळला आणि त्याऐवजी ‘ऋण,,, कृत्वा…’ हा आता साऱ्यांना तोंडपाठ असलेला श्लोकार्ध बसवला. चार्वाक केवळ प्रत्यक्ष प्रमाणवादी होते हे वेदांत्यांचे सांगणेही खरे नाही. त्यांना प्रत्यक्षावर आधारलेले अनुमानही मान्य होते.

अनुमानप्रामाण्याखेरीज विचारच जेथे अशक्य होतो तेथे त्यावाचून एखादी विचारसरणी उभी राहणे शक्यही नसते. मात्र टीकाकारांनी प्रत्यक्षाधारच तेवढा पुढे केला आणि त्यावर आधारलेले अनुमान बाजूला सारले. मग ‘चार्वाक समोर दिसतो तोपर्यंत त्याची पत्नी सधवा आणि तो बाहेर गावी गेला वा दृष्टीआड झाला की ती विधवा’ असे युक्तीवाद करून चार्वाकांना खोडून काढण्याचे सोपे मार्ग निवडले. वास्तव हे की, प्रत्यक्ष शंकराचार्यांनी चार्वाकमत हे जनसामान्यांचे मत आहे असा अभिप्राय नोंदविला आहे. त्या मताचा त्यांनी गौरव केला नसला तरी त्याला अनैतिक वा खोटे म्हणण्याचा प्रकारही केला नाही. जनसामान्यांचे मत चंगळवादी वा अनैतिक असणारही नाही. ज्यांना चंगळ परवडणारी आहे त्याच वर्गात तशी मते जन्माला येऊ शकतात. शंकराचार्यांचा समकालीन असलेला जैन विचारवंत हरिभद्र म्हणतो,’ इंद्रियांच्या प्रत्ययाला येणारे जगत् व पदार्थसमूह म्हणजे लोक. हा लोक ज्या तत्वज्ञानाचा आधार आहे ते म्हणजे लोकायत.’ हा विचार चार्वाकमताचा ऐहिक जीवनाशी असलेला संबंध सांगणारा आहे. पाचव्या शतकात झालेल्या बुध्दघोषाने ‘लोक म्हणजे ईहलोक व तो ज्यांच्या विचारसरणीचा आधार आहे ते लोकायित’ असे म्हटले आहे. दुसऱ्या शतकातील दिव्यावदान सुत्तात जनतेत रुढ असलेले मत ते लोकायत असे म्हटले आहे. त्याआधी विनयपिटकात, कात्यायनाच्या ग्रंथात आणि पातंजलीतही लोकायतमताचा असाच उल्लेख आहे. कौटिल्याने त्याला तर्कशास्त्रातच स्थान दिले आहे. तात्पर्य, शंकराचार्यांपूर्वीच्या विचारवंतांना चार्वाकांचे ईहलोकाश्रयी असणे आणि त्यांना प्रत्यक्षाएवढेच अनुमानप्रमाण मान्य असणे या गोष्टी मान्य आहेत. त्यानंतरच्या काळात वैदिक, बौध्द व जैनांच्या परंपरांनी या विचाराकडे तुच्छ व त्याज्य म्हणून पहायला सुरूवात केली आहे.

प्रत्यक्ष आणि अनुमान ही दोन्ही विज्ञानाची प्रमाणे आहेत. चार्वाकांना ती मान्य होती हे लक्षात घेतले की चार्वाकच भारतातील पहिले वैज्ञानिक विचारवंत ठरतात. त्यांच्या या वैज्ञानिक साधनांचा परिणाम असा की त्यांच्यासमोर कोणतेही कल्पित उभे राहू शकत नाही. मग ईश्वर जातो, धर्म जातात, स्वर्ग-नरक नाहिसे होतात आणि पूर्वजन्म व पुनर्जन्मासारख्या गोष्टी भाकड ठरू लागतात… अडचण ही की जगातला कोणताही धर्म या कल्पितांच्या कुबडयांखेरीज उभा राहू शकत नाही. ज्या धर्मांच्या संस्थापकांना ही कल्पिते आरंभी मान्य नव्हती त्यांच्या उत्तरकालीन अनुयायांनी नीतीअनितीचे नियम लोकांमध्ये ठसविण्यासाठी ती त्यांच्याही धर्मात आणली. वैदिक धर्मात पूर्वजन्म-पुनर्जन्म होते. ईश्वर ही कल्पना त्यातल्या पूर्वमिमांसकांना, सांख्यांना आणि वैशेषिकांना मान्य नसली तरी वेदांताला, नैय्यायिकांना आणि योगाला मान्य होती. त्यांना स्वर्ग-नरक मान्य होता. अवतार कल्पना त्यांनी उशीरा (म्हणजे बुध्दधर्मात बोधीसत्व आल्यानंतर) स्वीकारली. जैनांना मृत्यूनंतरचे जग मान्य होते. बौध्दांनी आत्मा नाकारला. तरी एका वेगळया स्वरुपात पुनर्जन्म स्वीकारला. तिकडे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांना होली घोस्ट, गॉड आणि अल्ला यांच्याखेरीज उभे राहता येणे शक्य नव्हते. सगळेच धर्म प्रत्यक्ष व अनुमान यापैकी कशानेही सिध्द न होणाऱ्या या गोष्टी मान्य करणारे असल्यामुळे त्यांचा चार्वाकांवर व साऱ्या जडवादावर राग असणे स्वाभाविक होते. त्यातून धर्मांना असलेला राजाश्रय चार्वाकांना नव्हता. त्यामुळे धर्मसत्ता, राजसत्ता आणि त्या दोहोंचीही मांडलिक असणारी तेव्हाची अर्थसत्ता या साऱ्यांनी मिळून चार्वाक मत निंद्य ठरविण्याचाच नव्हे तर संपविण्याचाही प्रयत्न केला…

चार्वाकमताचा एकही ग्रंथ आज उपलब्ध नसणे या दुर्दैवाची संगती याखेरीज लागत नाही. चार्वाक सगळी कल्पितेच उध्वस्त करीत नाहीत, त्यावर आधारलेल्या धर्मकल्पनांचाही ते विध्वंस करतात. धर्म आणि त्यांचे अनुयायी, सत्ता आणि तिचे सैनिक, धनवंत आणि त्यांचे आश्रित या साऱ्यांनी मिळून चार्वाकांचे मत आणि नाव मिटविण्याचा प्रयत्न या काळात केला असेल तर त्याचे नवल वाटण्याचेही त्याचमुळे कारण नाही. द्रौपदीला आदरणीय असलेले चार्वाकमत धर्मांच्या दावेदारांनी पुढल्या काळात अनीतीमान आणि चंगळवादी कसे ठरविले याचा ऐतिहासिक शोध घेणे या संदर्भात महत्वाचे ठरावे.
तेराव्या शतकात ‘तत्वोपप्लव सिंह’ या नावाचा एक ग्रंथ उपलब्ध झाला आणि अनेकांना तो चार्वाक मताचा वाटला. मात्र त्याचा कर्ता जयराशी भट्ट स्वतःच ‘मी जगातील कोणतेही मत, अगदी चार्वाकांचेदेखील बाधित करून दाखवू शकतो’ असे त्यात म्हणाल्याने तो शोध निरर्थक ठरला. शंकर, रामानुज, मध्व आणि निंबार्कानंतर आलेली सगळी संत परंपरा वेदांतमताचा पाठपुरावा करणारी होती. तिला चार्वाक आपला वाटणे शक्य नव्हते. पंत परंपरेतील सारेच ग्रंथकार पुन्हा वेदांतमताचे होते. नंतरच्या काळात आलेल्या सुधारकांच्या परंपराही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात ईश्वर व धर्म मान्य करणाऱ्या होत्या. राजा राममोहन रॉयांना ब्रह्म मान्य तर ज्योतिबांना निर्मिक मान्य होता. टिळक आणि गांधी हे धर्म आणि ईश्वर मानणारे होते. डॉ. आंबेडकरही धर्मशरण झालेले काळाने पाहिले. डॉ. राधाकृष्णन् आणि दासगुप्ता हे तत्वचिंतक वेदांतमताचे असल्याने चार्वाकाला त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नाही. यापैकी अनेक थोरामोठयांची बुध्दीनिष्ठा मान्य केली तरी त्यांची धर्मशरणता दृष्टीआड करता येत नाही आणि ही धर्मशरणता त्यांना चार्वाकांजवळ जाऊ देत नाही हेही अमान्य करता येत नाही. चार्वाकांना फक्त वैदिकांनी विरोध केला हे म्हणणे खरे नाही. त्यांना बौध्द-जैनांचाही तेवढाच कठोर विरोध होता. आपल्याकडचे जे जोरकस वक्ते एकाच दमात ‘बौध्द-जैन-चार्वाक’ ही नावे ओळीने उच्चारतात त्या ‘बंधूभगिनी’वाल्यांपैकी अनेकांनी त्या तिन्हींतले अंतर आणि विरोध लक्षात घेतला नसतो किंवा समोरच्या श्रोत्यांना तो ठाऊक नाही हे त्यांनी गृहित धरले असते.

धर्म आणि श्रध्देच्या परंपरांनी जडवाद आणि त्याला जवळचा असणारा किंवा त्याचाच अविष्कार असणारा विज्ञानवाद यांची जी कोंडी भारतात केली ती पाश्चात्यांत चर्च आणि इस्लामच्या धर्मश्रध्दांनी कशी केली याचा इतिहास सर्वज्ञात आहे. वैज्ञानिकांचा छळ, ज्ञानाचे नवे अंकूर मुळातून करपून टाकण्याची वृत्ती आणि चिकित्सेला नकार हे सारे तिकडेही घडले. त्यामुळे केवळ तो एकटया भारतीय मनोवृत्तीचा दोष ठरत नाही. श्रध्देच्या आहारी जाऊन विचारांचे श्रम न घेणाऱ्या जगभरच्या एकूणच मानसिकतेचा तो परिणाम आहे. पाश्चात्यांबाबत एक गोष्ट मात्र नोंदविली पाहिजे. त्यांच्या परंपरेत जडवादाचे आग्रही उपासक कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात टिकून राहिले आणि त्यांनी आपल्या कलेतून आणि सांस्कृतिक अविष्कारातून जडवादाच्या नोंदी कायम ठेवल्या. बर्नी, लिओनार्दो यासारख्या ख्यातनाम कलावंतांच्या कलानिर्मितीत या नोंदी आल्या आहेत.

मात्र धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि विद्वत्सत्ता या साऱ्यांच्या शतकानुशतकांच्या विरोधानंतरही भारतात चार्वाक मत कायम राहिले याचे मुख्य कारण प्रत्यक्ष व अनुमान या त्याच्या विचार कसोटया हे आहे. या विज्ञानाच्याच कसोटया असल्यामुळे उत्तरकाळात झालेल्या विज्ञानाच्या विकासाबरोबर त्यांचे महत्व वाढले आणि चार्वाक पुन्हा जिवंत व सबळ झाले. भारतात चार्वाकमत नाकारले गेल्याने प्रत्यक्ष व अनुमानाधारित विचारप्रणाली विचारांच्या कक्षेबाहेर गेली आणि कणाद, ब्रह्मगुप्त, चरक आदींपासून सुरू झालेली शोधपरंपरा थांबली. चार्वाक नाकारल्यामुळे केवळ वैज्ञानिक विचारच भारतात थांबला नाही तर त्याने मांडलेली ऐहिकाच्या व्यवस्थेची व जवळिकीची बाजूच येथे नाकारली गेली. त्यामुळे वर्तमान जीवनाहून त्या पलिकडचे (म्हणजे मृत्यूनंतरचे) जीवन महत्त्वाचे ठरले आणि जीवनमुक्ती त्या दोहोंहून महत्त्वाची ठरली. याचा परिणाम विकासावर झाल्यावाचून राहिला नाही. पारलौकिकाकडे लक्ष लावणे आणि जीवनाकडे पाठ फिरवणे हेच जीवनाचे सर्वश्रेष्ठ निधान होणे याचा ऐहिकावर जो परिणाम झाला तो आपण अजून अनुभवत आहोत. पराजय, गुलामगिरी, परक्यांच्या सत्ता आणि देशीत्वाचा क्रमाने होत गेलेला संकोच हे सारे त्यातून आले. जपावे, टिकवावे आणि वाढवावे असे काही नाहीच हे एकदा मनाने घेतले की करायचे काही उरतही नाही. या मानसिकतेतून बाहेर पडायला देशाला 19 आणि 20 या शतकांपर्यंत रखडावे लागले. अजूनही ती पुरती गेली नाही. आपल्या तुलनेत पाश्चात्यांमध्ये सुधारणावादाचा उदय लवकर झाला. मात्र आपण असू वा ते, साऱ्यांनीच तशा उदयाआधीची किती शतके गमावली? 21 वे शतक उजाडले तरी चार्वाकाचे मत उच्चारायला माणसे धजावत नसतील तर त्याचे कारणही परंपरेने त्या मतावर लादलेल्या पापाचरणाच्या व चंगळवादाच्या शिक्क्यातच शोधावे लागते.

या प्राक्तनाला चार्वाकपंथाचे लोकही काहीसे जबाबदार आहेत. चारू + वाक् म्हणजे चतुर बोलणारे असा त्यांच्या नावाचा अर्थ होत असला तरी त्यातले अनेकजण फार उदंड आणि उध्दटही असावे. चार्वाकांना प्रश्न विचारण्याची सवय होती. ते व्यवस्थेला प्रश्न विचारायचे. त्यातून ते ‘काय’ किंवा ‘कसे’ यासारखे नम्र प्रश्न विचारीत नसत. श्रध्दावानांच्या परंपरेला न मानवणारा प्रश्न ‘कां’ आणि ‘कशावरून’ हा आहे. चार्वाक तोच नेमका विचारीत असत. वेदवाक्यम् प्रमाणम् किंवा बुध्दं शरणम् असे मनोमन म्हणणाऱ्या काळात ‘पण ते कशासाठी’ असा प्रश्न विचारणारे लोक इतर शरणागतांना उध्दट वाटले असतील तर ते नवलाचेही नव्हते. वेद ही धूर्त, भंड आणि निशाचरांची निर्मिती आहे हे त्यांचे प्रसिध्द वचन त्यातले आहे. कौरवांना पराजीत करून रणांगणावरून परतणाऱ्या पांडवांना उद्देशून ‘आलात भाऊबंदांना मारून, आता खुशाल राज्य भोगा’ असे ते तोंडावर ऐकवणार असतील तर त्याचा परिणामही त्यांना भोगावाच लागणार. यज्ञाच्या मंडपात शिरून प्रत्यक्ष यजमानाला ‘यज्ञवेदीवर मारलेला बोकड सरळ स्वर्गात जात असेल तर बोकडाऐवजी आपल्या बापाचाच बळी कां देत नाही’ असे ते विचारणार असतील तर त्यांना मंडपात मारच खावा लागणार. चार्वाकांवर सगळे धर्म आणि सत्ता कां उलटल्या असाव्या याची कारणे युरोपातील वैज्ञानिकांचा तिकडच्या चर्चने जो छळ केला त्यावरूनही लक्षात येण्याजोगी आहेत.

चार्वाकांचा जडवाद जगला असता तर जीवनाविषयीची आस्था वाढली असती आणि ते सुखी करण्यासाठी जास्तीचे काही करण्याच्या प्रवृत्ती वाढीला लागल्या असत्या. जीवन मिथ्या नाही. ते दुःखमयही नाही. ते आपले आहे, शिवाय ते एकच आहे, यानंतर पुनर्जन्म नाही, दुसरे आयुष्य नाही, मृत्यूनंतर स्वर्ग-नरक असे काही नाही. सबब आहे ते जीवन नीट, सुंदर आणि सुखकर करू ही शिकवण प्रभावी झाली असती तर ज्ञानविज्ञानाच्या परंपरा आपल्याकडेही वाढीला लागल्या असत्या… प्रत्यक्षात असे काही झाले नाही हे मात्र खरे आहे.

जडवादाची मांडणी थांबल्यामुळे चर्चा आणि वादविवाद संपले. आपल्या विचारांची आणि श्रध्दांची चिकित्सा करणाऱ्या प्रश्नार्थक प्रवृत्ती नाकारल्यामुळे धर्मविचारात आत्मसंतुष्टता आली. परिणामी तेही फारसे पुढे गेले नाहीत. ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींच्या ऱ्हासाला जडवादाची समाप्ती कारणीभूत झाली तशी ती एकूण बुध्दीच्या वाढीलाही मारक ठरली असा या साऱ्या अनुभवाचा अर्थ होतो. ग्रीकांच्या परंपरांत जडवाद आहे. त्यांची आरंभीची परंपराच विज्ञानवाद्यांची आहे. त्या परंपरेचे जे अंग अरबांनी जपले त्यात जडवादाचा भाग शिल्लक राहिला. युरोपात झालेल्या रेनेसॉमध्ये जे वैचारिक मंथन उभे राहिले त्यातही जडवाद आहे. तर्क, ज्ञान आणि विज्ञानाच्या शोध आणि चिकित्सेच्या सगळया प्रवाहांशीच या वादाचे नाते आहे. वैज्ञानिक प्रगती कल्पिताच्या आधारे होत नाही, ती जडवादातील इंद्रियगोचर सत्याची कास धरूनच होत असते.

हा विचार एवढा दडपला गेल्याने आपले माघारलेपण वाढले. विचारांऐवजी श्रध्दा, प्रयोगांऐवजी निष्ठा आणि बुध्दीऐवजी मन यांना प्राधान्य आल्याने आपली परंपरा विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिली. भारतीय धर्मांमध्ये वाद होते, धर्मचर्चा आणि संगिष्ठीसारख्या परंपरा होत्या. नंतरचे भाष्यकार अगोदरच्या भाष्यकारांचे खंडन करताना दिसले. काही जागी नंतरच्या ग्रंथांनी जुन्या ग्रंथांना आणि त्यांच्या प्रतिपादनांना छेद दिल्याचेही आढळले. मात्र एका परंपरेने वा धर्माने दुसऱ्या परंपरेचे वा धर्माचे ग्रंथ जाळून नाहिसे केल्याचा पुरावा आपल्या इतिहासात नाही. भिन्न धर्म आणि परंपरा येथे एकाच वेळी राहिल्या आणि आपल्या बळावर विकसीत झाल्या वा खुरटल्या. सर्व धर्मांचे ग्रंथ आहेत, त्यातल्या पंथोपपंथांचेही ग्रंथ उपलब्ध आहेत… एवढया उदार परंपरेत चार्वाकांचेच ग्रंथ तेवढे कां नसावेत? जो तत्वविचार महाभारतात प्रतिष्ठित होता, ज्याचे अस्तित्व प्रमाणांनी सिध्द होत होते आणि ज्याचे खंडन प्रथम करणे नंतरच्या सर्व धर्मग्रंथांना गरजेचे वाटले त्या विचाराचा एकही ग्रंथ देशाला शोधता येऊ नये याचा अर्थ कसा लावायचा? काही विचारवंतांच्या मते हे ग्रंथ सापडण्याची शक्यता अजून संपली नाही. भरताच्या नाटयशास्त्रासारखा निरुपद्रवी ग्रंथ, अर्ध्यामर्ुध्या स्वरुपात का होईना सापडायला विसावे शतक यावे लागले तर उद्या चार्वाकांचे ग्रंथही हाती येतील असे या वर्गाचे म्हणणे आहे. ते जेव्हा सापडायचे तेव्हा सापडतील. मात्र तोवर त्या ग्रंथांची अनुपलब्धी आपल्या धर्मपरंपरांच्या औदार्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरते हे नाकारून कसे चालेल?

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य-लोकप्रभा

परलोक निर्माण करण्यासाठी आत्म्याचे अस्तित्व, त्याचे अमरत्व, स्वर्गातील सुख, नरकातील दु:ख व परमेश्वर या संकल्पना समाजात दृढ व्हाव्या लागतात. मग या संकल्पनांचे नैतिक समर्थन करण्याची गरज वर्चस्व टिकवण्यासाठी प्रस्थापितांमध्ये निर्माण होते. म्हणून सुखवस्तू वर्गातील विचारवंत परलोक उभा करतात.
—————————————————————————————————————————

मृत्यूनंतर काय होते, परलोक म्हणजे काय, सृष्टीची निर्मिती कशी झाली, दु:खापासून मुक्ती कशी मिळवायची; हे धर्माचे क्षेत्र मानले जाते. पण कोणताही धर्म इहलोकाचा विचार आपल्या कक्षेतून कधीच सोडत नाही. धर्म एक सामाजिक वास्तव असतं, अधिकार गाजवणारी संस्था असतो. प्रत्येक धर्माने आपल्या अनुयायांसाठी काही श्रद्धा, चाली-रीती बंधनकारक करून ठेवलेल्या असतात. इहलोकात पाप काय, पुण्य काय, हे स्वतंत्र बुद्धीने ठरविण्याचा अधिकार अनुयायांना नसतो. तो विचार परलोकातून आलेल्या आदेशानुसार केला जातो. ही परलोकातील माहिती उपलब्ध होते कशी? ते ज्ञान उच्चकोटीच्या काही साक्षात्कारी माणसांना किंवा परमेश्वराने निवडलेल्या खास व्यक्तींना होते. ते अतींद्रिय असते. अशा व्यक्ती धर्मसंस्थापक किंवा धमार्ंतर्गत पंथाच्या संस्थापक बनतात. या ज्ञानावर आधारलेले पवित्र ग्रंथ, त्यावरील टीका, भाष्ये त्यातील वादविवाद, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास म्हणजे धर्मशास्त्र. अनुयायांना ते दुबरेध असते. म्हणून त्यात काय सांगितले आहे, धर्माचरण म्हणजे काय, आपला धर्म सर्वश्रेष्ठ कसा, हे लोकाना समजावून सांगण्याचे काम धर्मशास्त्रज्ञ करतात. धर्मशास्त्रज्ञांखेरीज धर्माला पुरोहित लागतो. धार्मिक विधींचा तो जाणकार असतो. म्हणजे एकप्रकारचा तंत्रज्ञ होय. देव व माणूस यांच्यातला तो दुवा ठरतो. हिंदूंमध्ये पुरोहित म्हटले की ब्राह्मणच डोळ्यासमोर येतो. पण समाजशास्त्रीय अभ्यासानुसार केवळ २० टक्के पुरोहितच ब्राह्मण असून ८० टक्के ब्राह्मणेतर आहेत. या व्यवस्थेत संत बसत नाहीत. संत वेगळे व गॉडमेन वेगळे. गॉडमेन हे इहलोकात वावरणारे देहधारी लोक असतात. खरा संत धर्माच्या बऱ्याच परंपरा, रुढी धुडकावून लावतो. तो आध्यात्मिक असतो, पण रुढार्थाने धार्मिक नसतो. थोडक्यात, धर्मसंस्थापक, धर्मशास्त्रज्ञ व पुरोहित हे परलोक संकल्पनेचे आधारस्तंभ असून परलोकाच्या नावाने चाललेला इहलोकाचा व्यवहार हेच धर्माचे स्वरूप असते.

पण मानवाच्या इतिहासात परलोक ही संकल्पना आली कधीपासून? प्राथमिक अवस्थेतील समाजात परलोक नव्हता. तेव्हा श्रद्धा होत्या, दैवते होती. त्यांच्यात तारक व मारक असा भेद होता. मृत्यू टळावा, आपत्तींपासून रक्षण व्हावे, अन्न-पाणी मिळावे एवढय़ासाठीच देवतांची करुणा भाकली जात असे. परलोक निर्माण करण्यासाठी आत्म्याचे अस्तित्व, त्याचे अमरत्व, स्वर्गातील सुख, नरकातील दु:ख व परमेश्वर या संकल्पना समाजात दृढ व्हाव्या लागतात. अशा संकल्पना जन्मास येण्यासाठी कष्ट करणारा व विचार करणारा, अशा दोन वर्गात समाजाची विभागणी व्हावी लागते. कष्ट करणाऱ्या श्रमातून निर्माण होणारे उत्पादन, कष्ट न करणाऱ्या जमीनदार सदृश वर्गाला आयते मिळते, तेव्हा त्याचे नैतिक समर्थन करण्याची गरज निर्माण होते. कारण या अल्पसंख्य वर्गाला बहुसंख्याकावर वर्चस्व प्रस्थापित करायचे असते. असे समर्थन इहलोकवादाच्या आधारे होऊच शकत नाही. म्हणून या सुखवस्तू वर्गातील विचारवंत परलोक उभा करतात. जगाच्या उत्पत्तीचे गूढ सोडवतात.

सृष्टी कोणी निर्माण केली?
परमात्मा, गॉड, अल्लाह याने!

का? त्याला तशी इच्छा झाली म्हणून. माणसाच्या वाटय़ाला एवढे दारिद्रय़, दु:ख का? तो पापी आहे म्हणून. हे पाप पूर्वजन्माचे असो किंवा ‘ओरिजनल सिन’चे. असो.

हे मनात बिंबल्यावर माणूस भयभीत होतो. व परमेश्वराचे म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या मानवी प्रतिनिधींचे दास्य पत्करतो आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांचे मुकाटय़ाने पालन करतो. धर्मसत्ता, राजसत्ता व अर्थसत्ता यांचा त्यात सामायिक लाभ असतो. यातून एक व्यवस्था किंवा प्रस्थापना निर्माण होते. ती पवित्र मानली जाते.

पण याचा अर्थ धर्म ही केवळ अफूची गोळी आहे असा नव्हे. धर्माचा तसा वापर करता येतो एवढाच याचा अर्थ आहे. धर्माची विधायक बाजूसुद्धा पहावी लागते. माणसाला त्याच्या रानटी बर्बर अवस्थेतून बाहेर काढण्याचे पहिले श्रेय धर्माकडे जाते. त्याला मर्यादा पालनाचे नीतीचे, अनुशासित सामूहिक जीवन जगण्याचे पहिले धडे धर्मानेच दिले. धर्मामुळेच ज्ञान-तत्वज्ञान व वैचारिक मंथन यांची सुरुवात झाली. विचाराला शिस्त लागली. शिवाय धर्मशास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळेच धर्म या सामाजिक संस्थेचा, ज्ञानाचा व मानवी संकल्पनांचा इतिहास उभा करणे शक्य झाले. अर्थात ज्ञान-तत्वज्ञानाची पाळेमुळे ते ज्या परिस्थितीत उदयाला आले त्यात दडलेली असतात. त्याला त्या त्या काळाच्या मर्यादा असतात. म्हणून धर्मशास्त्राचे योगदान आजच्या संदर्भात तपासून पहावे लागते. इच्छेतून सृष्टीची निर्मिती झाली हा चैतन्यवाद (स्पिरिच्युअलिझम)आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. जड सृष्टीतूनच सचेतन सृष्टी निर्माण झाली असे मानणे म्हणजे जडवाद (मटेरिअलिझम). जडवाद तर्क व अनुमान यावरून कधीच सिद्ध होत नसतो. त्यासाठी प्रायोगिक विज्ञान व तंत्रज्ञान यांचा पुरेसा विकास व्हावा लागतो. जडवाद निरीश्वरवाद, इहवाद हे पूर्वीपासून होते, पण तर्क व अनुमान यांवर आधारलेले होते.

सर्व मानवी व्यवहार स्थल-कालबद्ध असतात, अंतिम सत्य असे काहीच नसते. हे जाणण्यासाठी मार्क्‍सवादी व्हावे लागत नाही. मानवी भूतकाळाच्या सूक्ष्म अभ्यासातून व विज्ञानाच्या इतिहासातून ते कळते. सत्यशोधन करताना एखादी पवित्र संकल्पना किंवा पूज्य व्यक्ती आड येत असली तर तिला बाजूला सारण्याची मानसिक तयारी म्हणजे डावा विचार. जे प्रस्थापित आहे, प्रतिष्ठित आहे ते योग्य आहे असे मानणे हा उजवा विचार. माणसात या दोन्ही प्रवृत्ती कमी-अधिक प्रमाणात कार्यरत असतात. म्हणून जीवनात विसंगती निर्माण होतात आणि विसंगती हेसुद्धा मानवी जीवनातील एक सत्य आहे. त्यालाही सामोरे जावे लागते.

प्रायोगिक विज्ञानाची सुरुवात गॅलिलिओ (१५६४-१६७२) पासून झाली असली तरी १७-१८-१९ व्या शतकातील प्रगतीचे टप्पे ओलांडत ज्ञानाच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली ती विसाव्या शतकात. अणुविज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूविज्ञान, गणित, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, मनोविज्ञान व तत्तवज्ञान यातील संशोधनातून एकीकडे विशेषज्ञांचा काळ आला तर दुसरीकडे असंख्य ज्ञानशाखा कधी नव्हत्या इतक्या एकमेकींजवळ आल्या. ज्ञानाचे एकीकरण होऊन माणसाला आपण कोण आहोत व काय नाही हे चांगले कळून चुकले. विचारवंतांच्या आशावादाला तडा गेला. ज्ञानातील ही क्रांती धर्मशास्त्रज्ञांना पचणे अशक्य होते. म्हणून वैज्ञानिक परिभाषेच्या नव्या आकर्षक मद्यकुंभातून ते जुनीच मदिरा देत राहिले आहेत. उत्क्रांतिवादाला अमेरिकेतसुद्धा आजही विरोध आहे. अशा बाबतीत प्रश्न हितसंबंध सांभाळण्याचा बनतो, सत्यशोधनाचा राहत नाही.

पण विसाव्या शतकात डाव्या विचारसरणीनेसुद्धा वेगवेगळ्या मानवतावादी वाटा शोधून काढल्या. त्यांचे सार थोडक्यात असे सांगता येईल: माणूस ही देवाची खास लाडकी जमात नव्हे. अन्य प्राण्यांतीलच तो एक सदस्य आहे. माणसाला असलेली बुद्धी ही देवाची देणगी नसून उत्क्रांतीत त्याने प्राप्त करून घेतलेली उपलब्धी आहे. देवाला विरोध नाही, पण देव ही संकल्पना व्यक्तिनिष्ठ (सब्जेक्टिव) आहे. आपण धरून चालतो तसा माणूस रॅशनल प्राणी नाही. तो मिथके व प्रतिके बनविणारा, त्यांना पूजणारा व दुसऱ्यांच्या प्रतिकांचा तिरस्कार करणारा व त्यासाठी हिंसेवर उतरणारा प्राणी आहे. तो अपूर्ण आहे. श्रद्धा व बुद्धी ही दोन्ही त्याची आयुधे आहेत. दोहोंचा तो सदुपयोग व सर्वनाश घडवून आणणारा दुरुपयोगही करू शकतो. निसर्गाचे कवींनी रंगविलेले रोमॅण्टिक चित्र केवळ किंचित सत्य आहे. निसर्ग आपली माता आहे, पण ती निष्ठुर आहे. आपल्या अपत्यांची तिला दयामाया नाही. ‘निसर्गाकडे चला’ म्हणजे नेमके कुठे चला हे माणसाला कळत नाही. मानवी अस्तित्व हेतूहीन व विवेकशून्य आहे.

हे विदारक सत्य माणूस पेलू शकत नाही. त्याला मृत्यूचे भय असते म्हणून तो अमरत्वाच्या शोधात असतो. आपल्या एकाकीपणात व दु:खात परमेश्वर त्याला मोठा भावनिक आधार वाटतो. मृत्यूनंतर सर्वकाही संपत नाही, त्यानंतरसुद्धा आशा आहे सांगणारा परलोक हा त्याची भावनात्मक गरज आहे. त्या श्रद्धेच्या आधारे तो निकोप सदाचारी जीवन जगू शकत असेल तर त्यात वाईट काय? वैफल्यग्रस्त आयुष्य कंठत राहण्यापेक्षा ते केव्हाही श्रेयस्कर. आणि असे मानणारे डावे विचारवंत स्वत: परलोकवादी नाहीत. फक्त त्यांना धर्मशास्त्रांची अधिकारशाही व कुणाचीही हुकूमशाही मान्य नाही. त्यांनी देवाला नव्हे, पण माणसाला ओळखले आहे. देवाच्या शोधात ते कधीच नव्हते. म्हणून परलोक व मृत्यूनंतरचे जीवन या संकल्पनांकडे उदार व सहिष्णू दृष्टिकोनातून पाहण्याचा धडा ते बुद्धिवाद्यांना देतात. त्याचबरोबर धर्माच्या नावाखाली चाललेला धुमाकूळ धिक्कारतात.

याचा अर्थ असा नव्हे की आमच्या पूर्वजांना हे सर्व आधीच गवसले होते. अनेक चुकीच्या पवित्र धार्मिक संकल्पना मोडीत काढणारे संशोधन ज्यांनी केले ते वैज्ञानिक तत्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत वगैरे ज्यू व ख्रिश्चन होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी कठोर आत्मपरीक्षण केले. धर्मसत्तेशी व राजसत्तेशी लढा दिला, छळ सोसला, त्याग केला. तेव्हा कुठे सत्याचा विजय झाला. भारतीय मानसिकता मात्र आजही मध्ययुगीन आहे. तिला आत्मपरीक्षणाची गरजच वाटत नाही. भूतकाळाच्या उदात्तीकरणात आम्ही आत्मगौरव उपभोगतो. तिला आत्मपरीक्षणाची गरजच वाटत नाही. भूतकाळाच्या उदात्तीकरणात आम्ही आत्मगौरव उपभोगतो. इहलोक व परलोक यातील अंतरच आम्ही नष्ट केले आहे.

– डॉ. अभय बंग, सौजन्य – अनुभव मासिक

पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने “आजचा काळ, आजचे साहित्य’ या विषयावरील “युनिक फीचर्स’ने संपादित केलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते झालं.

या भाषणात त्यांनी साहित्यिकांकडून समाजाला असलेल्या अपेक्षा मांडल्या आहेत, मात्र “तंबाखूने रंगवलेला पैसा संमेलनात नको’ या त्यांच्या विधानावरच प्रामुख्याने चर्चा घडली, त्यामुळे मूळ भाषणातील महत्त्वाच्या मुद्‌द्यांकडे दुर्लक्ष झालं, म्हणून “अनुभव’च्या वाचकांसाठी त्या मुद्‌द्यांशी संबंधित भाषण इथे प्रकाशित करत आहेत.

————————————————

मी साहित्यिक नसल्याने साहित्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे मी साहित्याविषयी जवळपास बोलणार नाही. पण मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठीपण म्हणजे काय याविषयी बोलणार आहे. या स्मरणिकेचा विषय “आजचा काळ आणि आजचं साहित्य’ असा आहे, त्या अनुषंगानेही मी काही बाबींकडे सर्व साहित्यिकांचं लक्ष वेधू इच्छितो.

संकुचित सांस्कृतिक दृष्टीचं आव्हान
मराठी भाषी आणि महाराष्ट्र यांच्या अस्मिता आणि ओळखी विषयी सध्या बराच राजकीय वाद सुरू आहे. स्वत:ला “राष्ट्र’ नव्हे, “महाराष्ट्र’ म्हणवणारा हा प्रांत आहे. “महाराष्ट्र’ही दर्पोक्ती आहे का? की ही साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा आहे? माझं असं मानणं आहे, की “महाराष्ट्र’ ही दर्पोक्तीही नाही आणि भूभाग वाढवण्याची साम्राज्यवादी आकांक्षाही नाही. ही आमची आध्यात्मिक आकांक्षा आहे. आम्हाला आमचं हृदय इतकं व्यापक करायचं आहे की ते “महाराष्ट्र’ व्हावं! त्यामुळे महाराष्ट्र ही भौगोलिक आकांक्षा नाही, ती आध्यात्मिक आकांक्षा आहे. “महाराष्ट्र’ हे नाव निवडून आपण सर्व मराठी मंडळींनी अशी घोषणा केलेली आहे, की आम्ही भौगोलिकतेच्या सीमा ओलांडून, स्थानिकतेच्या आणि संकुचिततेच्या सीमा ओलांडून आमच्या हृदयाचं महाराष्ट्र करू. तसं केलं नाही तर “राष्ट्रा’च्या पोटामध्ये “महाराष्ट्र’ कसा बरं मावणार आहे?

आज काही राजकीय शक्तींमुळे आपल्यासमोर, महाराष्ट्रासमोर हे एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही भारतात कुठेही जा, महाराष्ट्रातील काही मंडळींच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राविषयी बराच गैरसमज आढळतो. म्हणूनच आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे, की महाराष्ट्र ही साम्राज्यवादी संकल्पना नसून एक आध्यात्मिक घोषणा आहे. ही घोषणा मोठी कालानुरूप आहे.
जागतिकीकरणाच्या जमान्यात स्थानिकतेचा आग्रह टिकणार नसला तरी महाराष्ट्रात आज काही छोटे-मोठे तंटे, वाद उद्‌भवत आहेत. मुंबईकरांना कधी दक्षिण भारतीय चालत नाहीत, कधी उत्तर भारतीय चालत नाहीत. पुण्याचं आधी झपाट्याने औद्योगीकरण झालं आणि नंतर आयटी कंपन्या आल्या, त्यामुळे पुण्याचं पुणेरी स्वरूप बदलतं आहे. त्याची खंत वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पुण्याचं पुणेरीपणच गेलं तर गंमत काय राहिली?

पण प्रश्न असा आहे, की हे सर्व कसं टाळता येईल? आम्हाला जागतिकीकरणाचे आर्थिक आणि राजकीय फायदे हवे आहेत, पण सांस्कृतिक परिवर्तन नको आहे, ही एक असंभव मागणी आपण करतो आहोत. “हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू’ हे जगातलं मॅनेजमेंटमधलं अव्वल क्रमांकाचं मासिक आहे. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी एक कव्हरस्टोरी आली होती. त्यांनी अशी मांडणी केली, की जे शहर जगातून कुठूनही आलेल्या माणसाला परकेपणाचा भाव तर देणार नाहीच, उलट आपलेपणाचा भाव देईल, त्या शहराकडे जगातील बुध्दिमत्तेचं मानवीय भांडवल वळणार आहे. अशा सर्वसमावेशक सांस्कृतिक निर्देशकांवर त्यांनी रॅंकिंग केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की अमेरिकेतील ऑस्टिन नावाचं एक छोटंसं शहर वैश्विक संस्कृतीच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचं शहर ठरलं. या निरीक्षणानंतर दोनच वर्षांनी अमेरिकेमध्ये सर्वात झपाट्याने वाढणारं शहर कोणतं असा शोेध घेतला गेला तेव्हा प्रथम क्रमांकावर ऑस्टिनच आलं. जे शहर त्या शहराबाहेरच्या लोकांना आपलेपणाचा भाव देईल, परकेपणाचा भाव निर्माण करणार नाही त्या शहराचाच आर्थिक विकास आणि राजकीय विकास होणार आहे, ही बाब त्यातून स्पष्ट झाली. त्यामुळे जागतिकीकरणामुळे येणारा आर्थिक विकास हवा पण सांस्कृतिक बदल नको, अशी अशक्य मागणी आपल्याला करता येईल का?

दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरची माणसं आल्याने आमची संस्कृती बिघडते, आमची संस्कृती लयाला जाते, वाहून जाते, अशी मानसिक असुरक्षिततेची भावना पसरलेली दिसते. अशी भावना पसरण्याचं प्रमुख कारण कदाचित संस्कृती म्हणजे काय याविषयीच आपल्या मनामध्ये काही तरी गफलत असावी, काही तरी गोंधळ असावा असं मला वाटतं. नऊवारी साडी, की तलवार- फेटा, की शिवराळ भाषा, की पुरणपोळी- तुळशीवृंदावन अशा काही सवयींमार्फत आपण आपली संस्कृती व्याख्यित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या गोष्टी बदलणाऱ्या आहेत, बदलतही आहेत. हे बदलायला बाहेरच्या माणसाची गरज नाही. महाराष्ट्राच्या नव्या आधुनिक पिढीने या सगळ्या गोष्टींचा केव्हाच त्याग केलेला आहे. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीमध्ये मराठी संस्कृती म्हणजे काय? स्थानिकतेचा आग्रह आणि संकुचित सांस्कृतिकवाद याचा राजकीय आग्रह धरून महाराष्ट्राचा विकास होणार आहे का, असा प्रश्न आहे.

माझी अशी भावना आहे, की या बाबतीत महाराष्ट्राला मार्गदर्शन आणि नेतृत्व राजकीय लोकांकडून नको आहे, तर ते साहित्यिकांकडून हवं आहे. आपण पूर्वकालीन तीन साहित्यिकांकडे वळून बघू या. आपले आद्य साहित्यिक ज्ञानेश्र्वर काय म्हणाले? ते म्हणाले, “आता विश्र्वात्मके देवे…’, दुसरे साहित्यिक तुकाराम काय म्हणाले?… ” तुका आकाशाएवढा…’ आणि तिसरे साहित्यिक विनोबा म्हणाले, “जय जगत्‌!’ आजपासून शंभर-दोनशे-तीनशे वर्षांनी आजच्या कोणत्या साहित्यिकांचं साहित्य वाचलं जाईल हे मला माहीत नाही, पण ज्या तीन साहित्यिकांचं साहित्य जरूर वाचलं जाईल असं मला व्यक्तिश: वाटतं ते असतील ज्ञानेश्र्वर, तुकाराम आणि विनोबा. या तिघांनी आपल्याला अगोदरच सांस्कृतिक मार्गदर्शन केलेलं आहे, की महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय? या तिघांनीही जी विश्र्वबंधुत्वाची घोषणा दिली आहे तो मराठीपणा आहे की नाही? मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक नवी वैश्र्विक मराठी संस्कृती व विश्र्वमानस निर्माण व्हायला हवं. परंतु निव्वळ दुबई आणि मॉरिशसमध्ये संमेलनं घेऊन ते निर्माण होणार नाही. आपण आपल्या दृष्टीत बदल घडवत आणला आणि आपलं हृदय व्यापक केलं तरच हे शक्य आहे. आपलं हृदय खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आणि त्याही पलीकडे वैश्र्विक झालं तरच वैश्र्विक मराठी संस्कृती निर्माण होऊ शकेल.

ही विश्र्वधर्मी मराठी संस्कृती प्रत्यक्षात येण्यासाठी साहित्य संमेलन आणि साहित्यिक यांनी नेतृत्व करणं अपेक्षित आहे. आजचे साहित्यिक असं नेतृत्व देऊ शकतील का? अख्खा महाराष्ट्र याकरता आपल्याकडे बघणार आहे.

साहित्यिकांनी कालभेदी दृष्टी द्यावी

काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे लोक एखादं नवं संशोधन करण्यापूर्वी त्याआधीच्या वैज्ञानिकांनी काय केलं होतं याचा शोध घेतात. त्या सोबतच काही जण तर ज्या विषयासंबंधी संशोधन करू इच्छितात त्याबद्दल साहित्यिकांनी काय लिहिलेलं आहे हे बघत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वैज्ञानिकांच्या अस्सल बुद्धिनिष्ठ दृष्टीला जे दिसत नाही ते बऱ्याचदा साहित्यिकांना दिसत असतं. साहित्यिकांना आजचंही वास्तव दिसत असतं आणि भविष्यकाळाचंदेखील दिसत असतं. याचा अर्थ असा, की आपल्याला कालभेदी दृष्टी हवी असेल तर साहित्यिकांकडे जावं लागतं.

शरत्‌चंद्र चट्टोपाध्यायांची एक अतिशय सुंदर कादंबरी आहे- “पथेरदाबी’. भारताच्या राजकारणात गांधी आणि सुभाष यांच्यामधला अहिंसा आणि हिंसा यांचा साधनशुद्धी बाबत जो संघर्ष नंतर राजकीय पटलावर घडला त्याच्या अनेक दशकांपूर्वी “पथेरदाबी’मध्ये सव्यसाची आणि भारती यांच्या वैचारिक आणि नैतिक संघर्षामधून शरदबाबूंनी तो रेखाटलेला होता. रवींद्रनाथ टागोरांची एक नृत्यनाटिका आहे- “रक्तकरबी’. रशियातील क्रांती होण्यापूर्वी रवींद्रनाथ टागोरांनी होऊ घातलेल्या राजकीय क्रांतीचं आणि त्या हिंसक क्रांतीमधून निर्माण होणाऱ्या समस्यांचं अतिशय सुंदर चित्रण त्यात केलेलं होतं. आणि सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे आपण सगळेच ऐकतो, की रामायण घडण्यापूर्वीच वाल्मीकींनी रामकथा लिहिली होती….या उदाहरणांचा अर्थ असा, की काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते व त्यातून त्यांना येणारा भविष्यकाळ दिसू शकतो.

ईशावास्योपनिषदात विनोबांनी “कवी म्हणजे क्रांतदर्शी’ असे म्हटले आहे. “ऋषी’ या शब्दाची विनोबांनी मोठी सुंदर फोड केली आहे. “ऋष’ म्हणजे बघणे, निरीक्षण करणे. जो काळाच्या अंधारातून पुढच्या काळात बघू शकतो तो “ऋषी’! ज्ञानेश्र्वर, तुकाराम, विनोबा, शरत्‌चंद्र, रवींद्रनाथ टागोर हे सगळे कवी व ऋषी होते. त्यांना ती कालभेदी दृष्टी होती.

मराठी साहित्यामध्ये अशी दृष्टी आम्हाला हवी आहे. परंतु मराठी साहित्य तर बऱ्याच प्रमाणात भूतकाळामध्येच रमताना दिसतं. भूतकाळ आमचाच आहे. आमच्याच संस्कृतीचा, परंपरेचा आहे. त्याच्याविषयी प्रेम वाटणं अगदी स्वाभाविक आहे, आवश्यकही आहे. पण आम्ही त्याच्यामध्येच रंगून चालेल, अडकून कसं चालेल? म्हणून किमान काही साहित्यिकांनी तरी आम्हाला ऋषीसारखी कालभेदी पुढची दृष्टी द्यावी, पुढच्या समाजाचं दर्शन द्यावं, ही आमची अपेक्षा आहे. भविष्यकाळ कोणत्या दिशेने जाणार आहे, आम्ही कसं वागावं, या व अशा प्रश्नांबाबत आम्हाला दृष्टीची गरज आहे.

तीन प्रमुख वैश्विक प्रश्र्न

आज तीन प्रमुख वैश्र्विक प्रश्न उभे आहेत- पहिला आहे भांडवलशाहीचं पाप, दुसरा आहे पृथ्वीला ताप आणि तिसरा आहे धार्मिक हिंसाचाराचा शाप. भांडवलशाही असं म्हणाली, की माणसाच्या व्यक्तिगत, अपरिमित लोभाच्या प्रेरणेतूनच समाजाचा आर्थिक विकास होत असतो. ऍडम स्मिथ तसं म्हणाला आणि आम्ही सगळे जगभर त्या पद्धतीने वागत सुटलो. या अपरिमित लोभामुळे, अनियंत्रित लोभामुळे, बॅंकर्सनी केलेल्या प्रचंड घोटाळ्यांमुळे, चुकांमुळे आज जागतिक मंदी आलेली आहे. भांडवलशाहीच्या पापाखाली लोभाची समस्या लपलेली आहे. अपरिमित लोेभ योग्य आहे का, त्यावर आधारित अर्थरचना शक्य आहे का? ही एक मोठी वैश्र्विक समस्या आपल्यापुढे आज उभी आहे.

दुसरी समस्या पृथ्वीला आलेला ताप ही आहे. अनियंत्रित यंत्रवाद, निसर्गाला नष्ट करणं आणि चंगळवाद यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला इकडची काडी तिकडे हलवायची नाही. कोणतेही शारीरिक श्रम करायचे नाहीत. पण अमाप भोग हवा. त्यामुळे आम्हाला पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, कोळसा पाहिजे, वीज पाहिजे, कारखाने पाहिजेत. या सगळ्यातून वैश्र्विक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामानात बदल (क्लायमेट चेंज) हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याच्या विस्तृत वर्णनात जाण्याची गरज नाही. कारण आपण वर्तमानपत्रात वाचत असतो की ग्लोबल वॉर्मिंगचे किती प्रचंड गंभीर परिणाम होणार आहेत!

तिसरी समस्या आहे, धार्मिक हिंसाचाराचा शाप. आधी इराणमध्ये घडू लागलं. मग अफगाणिस्तानमध्ये घडायला लागलं. पुढे पाकिस्तानमध्ये घडायला लागलं. आता हे लोण मुंबईला नि पुण्यालाही आलं आहे. कोणीही या शापापासून मुक्त नाही. आयर्लंडमध्ये ख्रिश्चनांनी वेडाचार केला. आयआरएने अनेक दशकं धार्मिक हिंसाचार नि दहशतवाद केला. नंतर शिखांनी केला, मुस्लिमांनी केला, आणि आता हिंदूही करायला लागले आहेत.

शंभर वर्षांपूर्वी 1909 साली एका चाळीस वर्षांच्या माणसाने या तीन प्रमुख समस्या आपल्या कालभेदी दृष्टीने पाहिल्या आणि इंग्लंडमधून दक्षिण आफ्रिकेत परत जाताना जहाजावर त्याने एक छोटेखानी पुस्तक घाईघाईने लिहिलं. ते लिहिताना उजवा हात जेव्हा थकायचा तेव्हा तो माणूस डाव्या हाताने लिहायचा. हा माणूस होता मोहनदास करमचंद गांधी. . पुस्तकाचं नाव आहे- “हिंद स्वराज’. “हिंद स्वराज’मध्ये महात्मा गांधींनी भारतीय समाजाला या तीनही समस्यांविषयी सावध केलेलं आहे. पाश्र्चात्त्य समाजाची दिसत असणारी समृद्धी आणि भरभराट, त्यांचा अतिरेकी यंत्रवाद आणि अपरिमित भोगवाद, आणि समाज बदलायला हिंसेवरती असलेला त्यांचा विश्र्वास, या तिन्हींकडे इंग्लंडमधले भारतीय तरुण तेव्हा आकर्षित होत होते. या तीनही चुकांपासून गांधींनी भारतीय माणसाला तेव्हा सावध केलं होतं. “हिंद स्वराज’मध्ये त्यांनी यावर उपायही सांगितलेले आहेत. गांधीजींनी जे उपाय सुचवलेले आहेत ते आज कालानुरूप असल्यामुळे मी त्यांचा ऊहापोह आणि चर्चा करतो आहे.

गांधीजींनी सांगितलेले उपाय

आज आमच्यासमोर उभे ठाकलेले तीनही प्रश्र्न “बाह्य’ जगातले आहेत. भांडवलशाही, चंगळवाद, यंत्रवाद, हिंसा हे सगळे प्रश्र्न “बाह्य’ आहेत. पण गंमत अशी की या सगळ्यांवर गांधींनी सांगितलेले उपाय मात्र “आंतरिक’ आहेत. गांधी म्हणतात, की “स्वराज्य’ म्हणजे “स्वत:चं’ राज्य नाही, तर “स्व’वरती राज्य. स्वराज्य म्हणजे “मला राज्य करण्याचा अधिकार पाहिजे’ असं आपण म्हणतो. पण हा माणूस तर म्हणतो, “बाबा रे, प्रथम स्वत:वर राज्य करायला शीक.’ स्वत:वर राज्य कसं कर? कसं शीक? या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरंही गांधींनी आपल्या पुस्तकात दिली आहेत. उपायही सांगितले आहेत. गांधींनी लोभावर उपाय सुचवला आहे तो अपरिग्रहाचा. जास्त संग्रहच करू नका, आणि तुमच्याकडे जी काही संपत्ती आहे ती समाजाची आहे, अशा विश्र्वस्तवृत्तीने त्याचा समाजाकरता उपयोग करा. भांडवलशाहीचा नारा आहे- “फ्रीडम ऑफ डिझायर’. पाश्र्चिमात्य जगात या नाऱ्याचं प्रचंड कौतुकही आहे. अमेरिकेत तर “फ्रीडम ऑफ चॉइस’ असणं हे जणू कोणत्याही समाजव्यवस्थेची सगळ्यात अंतिम कसोटी आहे. “फ्रीडम ऑफ चॉइस’ असं म्हणताना त्यांना अभिप्रेत असतं, की “वुई मस्ट हॅव अनलिमिटेड फ्रीडम ऑफ डिझायर’!- आम्हाला जे जे हवं आहे, आम्ही जे इच्छिलं आहे ते आम्हाला अपरिमित मिळायला पाहिजे. गांधी असं म्हणतात, की आपल्याला “फ्रीडम ऑफ डिझायर’ नव्हे तर “फ्रीडम फ्रॉम डिझायर’ हवं आहे. डिझायरवर विजय मिळवा, सर्व प्रश्र्न आपोआप सुटतील.

यंत्रवाद आणि चंगळवाद यावर गांधी अुपाय सांगतात शरीरश्रम आणि मित-भोग, म्हणजेच आपल्या गरजा कमी करा. अपरिमित गरजा कुणालाच पूर्ण करता येणार नाहीत. “देअर इज इनफ ऑन द अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड, बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड.’ आणि धार्मिक हिंसेवर तर त्यांनी अर्थातच सर्वधर्मसमभाव आणि अहिंसा हे उत्तर दिलेलं आहे.

“अति’ आणि “गती’च्या वेडाने बेभान झालेल्या आधुनिक माणसाला गांधींनी “हिंद स्वराज’मधून सावधगिरीचा इशारा दिला आहे. आजच्या आधुनिक युगातले जितके काही अतिरेकाचे प्रश्र्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं गांधींनी “हिंद स्वराज’मध्ये दिली आहेत, तीही शंभर वर्षांपूर्वी. गांधीजींना प्रश्र्नही दिसतात आणि उत्तरंही दिसतात. याचा अर्थ गांधी कालभेदी साहित्यिकाच्या अटी पूर्ण करतात. आम्हाला आमच्या साहित्यिकांकडून गांधींसारखी कालभेदी दृष्टी हवी आहे, मार्गदर्शन हवं आहे.

चळवळीचे दिवस संपले हा भ्रम

ज्या तीन शापांचा मी उल्लेख केला त्यांच्यापासून शापमुक्ती कशी होणार, असा प्रश्र्न अनेकांना पडलेला आहे. एक व्यथा आपण वारंवार ऐकतो; विशेषत: साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांतली जी मंडळी आहेत त्यांना ही व्यथा अधिकच आहे. त्यांचं म्हणणं असं, की आजकाल समाज परिवर्तनाच्या चळवळीच दिसत नाहीत. चळवळी लोपल्यामुळे माणसांमध्ये जी घुसळण होत होती ती थांबली. आणि चळवळीच नसतील तर आपल्या समाजाचे प्रश्र्न कसे सुटणार?

माझी अशी नम्र समजूत आहे, की चळवळींचे दिवस गेले हा दृष्टीचा प्रश्र्न आहे. चळवळींचे दिवस गेलेले नाहीत, चळवळींचं स्वरूप बदललं आहे. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात बहुतेक मुख्य बदल हे मोठ्या राजकीय चळवळींच्या माध्यमातून घडले आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळी असोत, मजुरांच्या चळवळी असोत, काळ्या लोकांच्या चळवळी असोत, पीस मूव्हमेंट्‌स असोत की शेतकरी चळवळ असो या सर्व चळवळी हजारो-लाखो लोकांच्या सहभागातून घडल्या आहेत. त्यामुळे लाखो माणसं रस्त्यावर येत आहेत, त्यांचा कुणी एक नेता असणार आहे, त्यांची एक विचारसरणी असणार आहे, त्यांचा एक झेंडा असणार आहे, त्यांची एक घोषणा असणार आहे, कार्यक्रम असणार आहे आणि हजारो-लाखो लोक त्याचं अनुसरण करणार आहेत या प्रकारच्या चळवळींची आम्हाला सवय झाली आहे. आताशा अशा प्रकारच्या चळवळी दिसत नसल्याने आम्ही म्हणतो की चळवळी मागे पडल्या आहेत. गोष्ट खरी आहे की अशा प्रकारच्या चळवळी दिसत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की समाजपरिवर्तनाची प्रक्रियाच थांबली आहे.

चळवळी थांबल्या पण परिवर्तन चालू आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स मात्र बदललं आहे, आणि ते आपल्यासाठी अतिशय अनुरूप आहे, आपल्याला, सामान्य माणसाला सक्षम करणारं आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स असं बदललं की राजकीय नेतृत्व आणि राजकीय चळवळींच्या मार्फत होणाऱ्या परिवर्तनाऐवजी आता हे परिवर्तन माणसा-माणसांच्या पातळीवर घडतं आहे. ह्युमन बीइंग इज द युनिट ऑफ चेंज. माणसाचं मानस आणि माणसाचं रोजचं जगणं हे परिवर्तनाचं कुरुक्षेत्र बनलं आहे. टीव्हीच्या जमान्यात माणसांना आता हजारो-लाखोंच्या संख्येने एकत्र येण्याला फुरसत राहिलेली नाही. राजकिय नेत्यांच्या सभांनाही आता माणसं मोठ्या संख्येने एकत्र येत नाहीत म्हणून गर्दी जमवण्यासाठी फिल्मस्टार आणावे लागतात. मात्र राजकीय नेत्यांच्या मागे माणसं येत नाहीत याचा अर्थ माणसं बदलत नाहीत असा नाही. माणसं आपापल्या जागी बदलताहेत आणि माणसा-माणसांत संथ बदलाची एक प्रक्रिया घडते आहे.

एक साधं उदाहरण घेऊ. योगाच्या चळवळीत रामदेवबाबा आता आता आले; पण अन्यथा गेली ऐंशी वर्षं योगाची चळवळ जगभर पसरते आहे. आज अमेरिकेतली पाच ते दहा टक्के लोकसंख्या योग शिकलेली आहे आणि नियमितपणे योग करते आहे. जगभरात आज कोट्यवधी लोक योग करतात. ही चळवळ कशी पसरली? माणसाकडून माणसापर्यंत, अशा रीतीनेच ती पसरली.

लोकांची जीवनशैली बदलते आहे. मुली शिकायला लागल्यात.माणसं आता आरोग्यासाठी चालायला लागली आहेत, व्यायाम करायला लागली आहेत. लोकांची जीवनशैली कशी बदलली? त्यामागे कुणी राजकीय नेता होता की कोणती राजकीय चळवळ होती? -असं काही नव्हतं. एका माणसात परिवर्तन झालं, त्याने दुसऱ्याला सांगितलं, त्याने तिसऱ्याला सांगितलं. चौथ्याने पाहिलं, अनुसरण केलं. हीच आहे “मॅन टु मॅन प्रोसेस ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन’. हे सांस्कृतिक परिवर्तन आहे. हे माणसाच्या हृदयात घडणारं परिवर्तन आहे. आज घडणाऱ्या परिवर्तनाचं गतिशास्त्र हे असं आहे!

माणसांच्या विचारात आणि आचरणात परिवर्तन घडवून आणण्याची अशी विलक्षण हातोटी गांधींमधे होती. “खादी’ हा अतिशय साधा वाटणारा कार्यक्रम त्यांनी दिला होता; परंतु त्यातून स्वत:चे आचार-विचार बदलण्याचा कार्यक्रमही अंतर्भूत होता. खादीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, गरिबासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, पर्यावरणासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, मित-भोग किंवा साध्या राहणीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, स्वातंत्र्य चळवळीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो आणि स्वत:च्या हाताने सूत कातल्याने मी शरीरश्रमासोबतही स्वत:ला जोडून घेऊ शकतो. परिवर्तनाच्या सहा मूल्यांसोबत मी स्वत:ला जोडून घेऊ शकतो. गांधींनी खादीमार्फत वस्त्रसंस्कृतीत क्रांती तर घडवलीच, परंतु किमान सहा मूल्यांबाबत स्वत:च्या आचार-विचारात परिवर्तन घडवून आणण्याची कृतीही घडवून आणली. नेहरू, पटेल, सुभाष या सगळ्या विदेशांत शिकलेल्या बॅरिस्टरांना गांधींनी स्वयंपाकघरात जशी भाजी चिरायला लावली तसंच सूतही कातायला लावलं. राजकीय क्रांतीच्या अगोदर गांधींनी सांस्कृतिक क्रांती सुरू केली.

मित्रांनो आपलं रोजचं जगणं हा आपला जाहीरनामा असतो. माझं रोजचं जगणं हा माझा सांस्कृतिक जाहीरनामा असतो. आणि खरं म्हणजे आजचा माणूस असं म्हणतो आहे, की हाच माझा राजकीय जाहीरनामादेखील आहे. माझ्या रोजच्या जगण्यातूनच मला जग कसं हवं आहे हे मी प्रगट करतो आहे.

थोडक्यात सांगायचं, तर व्यक्तिव्यक्तींचे विचार बदलले तर जग बदलतं, माणसाचं आचरण बदललं तर जग बदलतं. आणि हे आपल्याला सक्षम करणारं अशाकरता आहे कारण माझं रोजचं जगणं बदलायला मला कोणत्या राजकीय नेत्यावर अवलंबून राहावं लागत नाही. माझं रोजचं जगणं बदलणं हे माझ्याच हातात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते “स्वराज्य’ आहे. माझं रोजचं जगणं कसं असावं ते मीच ठरवू शकतो, मी स्वत:च स्वत:ला बदलवू शकतो. या अर्थाने परिवर्तनाच्या चळवळीचा केंद्रबिंदू आता मी स्वत:च आहे. प्रत्येक नागरिकाला केवढी शक्ती देणारी ही दृष्टी आहे! हे सांस्कृतिक परिवर्तन राजकीय परिवर्तनापेक्षा सामान्य माणसासाठी अधिक अनुकूल आहे, त्यामुळे ते लोकशाहीसाठीही अधिक अनुकूल आहे. इथे सत्ता ही खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या हातात आहे. पाच वर्षांनी एकदा मतदान करण्यापुरती ही सत्ता मर्यादित नाही. रोजच्या जगण्याची, रोजच्या मतदान करण्याची ही सत्ता आहे. मी काय नेसतो, मी काय खातो, मी काय वाचतो, मी पायी चालतो की मोटार वापरतो, हे सर्व जग म्हणजे जग कसं असावं याबद्दलचा जग बदलायचा माझा जाहीरनामा आहे. तो मी रोज जाहीर करू शकतो, रोज प्रगट करू शकतो, रोज तसं जगू शकतो आणि रोज मी जग बदलवू शकतो.

साहित्यिकांकडून सांस्कृतिक परिवर्तनाची अपेक्षा

रोजच्या जगण्यात जो बदल घडतो त्यालाच सांस्कृतिक परिवर्तन म्हणतात. जग बदलायची आणखी एक पद्धत विनोबांनी सांगितली आहे. ते असं म्हणतात, की जुन्या शब्दांवर नव्या अर्थांचं कलम करणं म्हणजे सांस्कृतिक परिवर्तन, अहिंसक परिवर्तन. असं परिवर्तन घडवण्याची शक्ती साहित्यिकांमध्येच असू शकते. आणि म्हणून सांस्कृतिक परिवर्तन ही जग बदलण्याची पद्धत तुमच्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आणि साहित्यिकांच्याही हातामध्ये अतिशय मोठी प्रभावी साधनं देणारी गोष्ट आहे.

हे परिवर्तन कोण करेल? माझा असा समज आहे, की सर्वप्रथम विज्ञान हे परिवर्तन आणते आहे. दुसरा प्रभावी घटक असतील स्त्रिया. कारण समाजाच्या संस्कृतीचं वहन मोठ्या प्रमाणात स्त्रियाच करतात. तरुण पिढी हा तिसरा महत्त्वाचा घटक असणार आहे, कारण ते उद्याच्या जगाची घोषणा आहेत. चौथं स्थान रिक्त आहे. आणि मला त्या चौथ्या स्थानावर साहित्यिकांच्या आगमनाची वाट आहे. साहित्यिकांनी आजच्या काळाला अनुरूप अशा प्रकारच्या समाजपरिवर्तनाचं नि सांस्कृतिक परिवर्तनाचं नेतृत्व करावं, अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे.

या साहित्य संमेलनात अशा प्रकारच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या मूल्यांचं दर्शन व्हावं, अशी आपली सर्वांची किमान अपेक्षा राहणार आहे. हे सर्वसमावेशक संमेलन व्हावं, अशी आपली अपेक्षा राहणार आहे. महाराष्ट्रातले जे काही संकुचित वाद आहेत त्यांनी यामध्ये अडथळा बनू नये. सर्वांचं हृदय व्यापक व्हावं. मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर, असले वादच यात येऊ नयेत, अशी आम्हाला अपेक्षा राहील. जे विश्र्वहृदय आम्ही जगाकडून अपेक्षा करतो, त्याची सगळ्यात पहिल्यांदा साहित्यिकांकडून आम्ही अपेक्षा करणार आहोत. साधेपणा आणि मितव्ययता यांचं दर्शन या संमेलनातून व्हावं, अशी अपेक्षा राहणार आहे.

महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे आजचे जे भडकते प्रश्न आहेत त्यांची यादी मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही, कारण ती सगळ्यांना माहीत आहेच. परंतु साहित्याचा, साहित्यिकांचा जीवनासोबत काही तरी अनुबंध या संमेलनात प्रकट व्हावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. साहित्यामध्ये निव्वळ स्वत:वरच भाळणं असा नार्सिसिझम्‌ व्यक्त होऊ नये, तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहोत, त्यांचं आम्ही देणं लागतो, हे प्रकट व्हावं. महाराष्ट्र जळतो आहे. आम्ही त्याचा भाग आहोत की नाही, आम्हाला देणंघेणं आहे की नाही, याचा जरूर विचार व्हायला हवा.

इथं एक कविता आठवते. आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये सहाराचं वाळवंट आहे. एके काळी ते सगळं जंगल होतं. पण जंगल तुटत गेलं, त्याचं वाळवंट होत गेलं. जसाजसा निसर्ग नष्ट होतो आहे, सहाराचं वाळवंट मोठंमोठं होत आहे. आणि सहाराचं वाळवंट आफ्रिकेमधे दक्षिणेकडे पसरतं आहे. एक कवी म्हणतो,

“सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स अँड साऊथवर्ड्‌स.

स्लोली, बट रिलेन्टलेसली, इंच बाय इंच
सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स’.
आफ्रिकेच्या उत्तरेमध्ये जी माणसं आहेत युरोप-अमेरिकेमधली, ती काय म्हणणात? जाऊ द्या ना, सहारा गेलं दक्षिणेकडे तर आमचं काय बिघडलं? आम्ही उत्तरेला सुरक्षित आहोत. आफ्रिकेला नष्ट होऊ द्या. त्यांना हा कवी सांगतो,
“डोन्ट लाफ ओ फूल्स इन द नॉर्थ
द अर्थ इज राऊंड’.
त्यामुळे प्रश्न असा आहे, की आज महाराष्ट्र जळत असताना साहित्यिक आणि साहित्य संमेलन कुठे उभं राहणार? सहाराच्या दक्षिणेला लोकांसोबत उभं राहणार की उत्तरेच्या मूर्खांमध्ये उभं राहणार? आम्ही जनतेच्या प्रश्नासोबत स्वत:ला जोडून घेणार, की आम्ही म्हणणार, अजून माझ्या दारावर थाप पडलेली नाही! जर्मनीत जेव्हा एकेका स्वातंत्र्याचा संकोच होत होता, तेव्हा कवी म्हणाला,
“प्रथम त्यांनी ज्यूंना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी ज्यू नाही.
नंतर कम्युनिस्टांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी कम्युनिस्ट नाही.
त्यानंतर विचारवंतांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो
की मी विचारवंत नाही.
आणि आज माझ्याच दारावर टकटक होत आहे.
पण आता मदतीला धावून यायला कुणीच शिल्लक उरलेलं नाही.’
जेव्हा अख्खा महाराष्ट्र दुष्काळात, आत्महत्यांत, बालमृत्यूंत, कुपोषणात, हिंसाचारात, असंख्य प्रश्नांत अक्षरश: जळतो आहे, तेव्हा साहित्य संमेलन कुठे उभं राहणार?
निवड आपल्या सर्वांना करायची आहे.

शब्दांकन : शुभदा चंद्रचूड


उदय संखे, सौजन्य – लोकसत्ता

महाराष्ट्र हा दुर्गाचा प्रांत! सह्यपठारावर आपण जर नजर फिरवली तर, चार-दोन शिखरांआड एखादा किल्ला तट बुरुजांचा शेला पागोटा मिरवत दिमाखाने उभा असतो. यातील बहुतेक दुर्ग श्रीशिवछत्रपतींची पायधूळ आपल्या मस्तकी मळवट भरल्याप्रमाणे धारण करून अभिमानाने मिरवत उभे आहेत. या शिवस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे आज मात्र उपेक्षेच्या गर्तेत गेलेली आहेत. अनेक पिढय़ांनी अभिमानाने सांगावा, असा इतिहास ज्या ठिकाणी घडला त्यांचे साक्षीदार असणाऱ्या या पाऊलखुणा आज संवर्धनाच्या उपेक्षेत आहेत.. आजही साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचे दर्शन गड बारकाईने पाहिला तर घडू शकतं! वयाच्या १५-१६ व्या वर्षी बांधून घेतलेल्या तोरणगडापासून ते पन्नाशीत उभारलेल्या कुलाबा किल्ल्यापर्यंतचा आपण बारकाईने, अभ्यासू वृत्तीने विचार केला तर शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची दृष्टी सतराव्या शतकातही काळाच्या किती पुढे होती हे दिसून येते.

प्रतापगड आपण अगदी पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंतच दुर्गविज्ञानाची प्रचीती येते! मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या ७५ पायऱ्या या एक समान नसून उंच सखल आहेत. कारण साधारण दोन किलो वजनाची तलवार व तेवढय़ाच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूंची चांगलीच दमछाक व्हावी, हा मुख्य हेतू! अत्यंत चिंचोळा मार्ग, जेणे करून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्यद्वार शोधण्यास अडचण यावी. शत्रू एक-दोन वेळा उलटसुलट फिरून भांबावून जावा हा त्यामागचा उद्देश. इतकेच नव्हे तर मुख्य दरवाजासमोरच्या तटबंदीत जंग्या (त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके) मधून आणीबाणीच्या वेळी शत्रूस टिपण्यासाठी झरोके ठेवलेले दिसतात! किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूंच्या अडचणीत भर पडून त्यास भांबावून सोडणे हा मुख्य उद्देश! दोन बुरुजांच्या कवेत निर्माण केलेल्या चिंचोळ्या वाटेत गडाच्या तटावरून तेल, दगड, गरम पाणी फेकून बलाढय़ शत्रूला नामोहरम करण्याची ही नामी योजना या किल्ल्यांवर पाहावयास मिळते. ‘हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा’ या शिवप्रभूंच्या उक्तीस सार्थ करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा राहिला! या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे गड-किल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे. आधीच सह्याद्री अभेद्य! काळ्याकभिन्न कडय़ांनी वेढलेली गिरिशिखरे, घनदाट जंगलात उतरणाऱ्या खोल दऱ्या, उंचच उंच कडे, घातकी वळणे, अडचणींच्या खिंडी, फसव्या वाटा हे सह्याद्रीचे रूप पाहत गनीम कितीही मोठा असला तरी या प्रदेशात लढाईसाठी विचार करूनच पाऊल उचलत असे!

राजगडाची संजीवनी माची हा तर दुर्गरचनेचा अनोखा आविष्कारच म्हणायला हवा! संजीवनी माचीच्या तीन टप्प्यांत उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुरुजाचे केलेले पहिले बांधकाम, त्यालगत साधारण दोन मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलखती बांधकाम! या बांधकामाचं वैशिष्टय़ हे, की बाह्य चिलखती बांधकामाची उंची आतल्या बांधकामापेक्षा जास्त! आधीच दुर्गम भाग त्यामुळे शत्रू सैन्य आले किंवा तोफेच्या माऱ्यात हा बुरुज ढासळला तरी आतला चिलखती बुरुज शाबूत राहीलच; पण बाह्य बांधकाम पडल्यावर शत्रू आत आलाच तर दोन बुरुजादरम्यानच्या अरुंद दोन मीटर जागेत अडून हालचालींवर मर्यादा येऊन गडाच्या सैनिकांच्या हातात अलगद लागून त्यांना ठार मारणे सुलभ जाईल, ही रचना आजही थक्क करते!

आपण आठ शतकांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते. १६५३-५४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि मूळचे काही बांधकाम पाडून नवीन तटबंदीयुक्त बांधकाम करून बेलाग किल्ला उभारला. शिवछत्रपतींच्या आरमाराचे मुख्यालय असलेला हा किल्ला, मराठय़ांच्या देदीप्यमान आरमारी पराक्रमाचा साक्षीदार आणि जलदुर्ग वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला विजयदुर्ग! किल्ल्याच्या जवळ बोटी येण्याआधीच फुटत. याचे कारण कोणालाच उमजत नव्हते. कदाचित किल्ल्याजवळ समुद्रकिनारी जे उथळ खडक पाण्यात आहेत, त्याचा हा परिणाम असावा. असाच तत्कालीन समज पसरून राहिला होता. मात्र १९ व्या शतकात पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय नौदलाचे कमांडर गुपचूप यांना तेथील पुराभिलेखागारात एक कागद सापडला आणि याचे रहस्य उमजले ते एकमेवाद्वितीयच होते. किल्ला अभेद्य राहावा म्हणून किल्ल्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावर इंग्रजी ‘एल’ आकारात पाण्याखाली थेट समुद्रात साडेचार किलोमीटर लांबीची भिंत बांधून किल्ल्याचे अनोखे संरक्षण करण्यात आले होते! कारण शिवरायांनी परकीय आरमाराचा, त्यांच्या जहाज बांधणीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवले, की आपल्या आरमारी बोटीचे तळ हे उथळ असतात; परंतु पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांचे जहाजबांधणीचे ज्ञान जास्त प्रगत होते. ते आपल्या बोटी वेगवान हालचाली करण्यासाठी आपला तळ इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या तळाकडे निमुळता होत जाणारा असा बांधत असत. त्यामुळे त्यांच्या बोटी खोल समुद्रातून वेगात जात असत. त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधली, की त्यावर या बोटी आपटून-आदळून त्यांना जलसमाधी मिळेल! त्याकाळी सागरी विज्ञान विकसित झालेले नसतानादेखील समुद्राखाली भिंत बांधून किल्ल्याला दिलेले अनोखे संरक्षण हे अनोख्या दुर्गविज्ञानाचे प्रतीकच नाही काय?

विजयदुर्गाप्रमाणे सिंधुदुर्ग बांधतानासुद्धा त्यांनी दुर्गविज्ञान वापरले. कुरटे बेटावर १६६४ ते ६७ मध्ये त्यांनी बेलाग अशी शिवलंकाच उभारली! यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले! शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘चौऱ्याऐशी बंदरी ऐसी जागा दुसरी नाही. इथे नूतन जंजिरा बसवावा’ हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला! किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरीत्या सर्पाकृती आहे, कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले. परक्यांची जहाजे, तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील, अशी योजना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पद्दुर्ग ऊर्फ कांसा किल्ल्याच्या बांधकामाबाबतीत दगडी चिरे झिजलेत; पण चुन्याचा दर्जा मात्र जसाच्या तसा आहे! उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र शिवराय आणि त्यांच्या स्थपतीजवळ होते, त्याला शास्त्राची जोड होती हेच सिद्ध होत! खांदेरी किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी वेगळेच तंत्र वापरले. त्यांनी किल्ल्याच्या बेटाभोवती न घडवलेले ओबड-धोबड दगड, चिरे असे बेमालूम पेरले, की भरतीच्या वेळीही दगड दिसावेत. समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांवर धारदार शंख-शिंपल्यांची वाढ होऊन त्याच्या धारदार कडांमुळे खडकावर वावरणे  अशक्य होऊन बसले. कारण त्याकाळी पादत्राणे ही कच्च्या चामडय़ाची असत. समुद्राचे खारे पाणी अशी पादत्राणे खराब करून टाकीत. त्यामुळे चपला घालता येत नाही आणि चालताही येत नाही, अशा परिस्थितीमुळे लढणे जिकिरीचे होई. शिवाय लाटांचे भरतीच्या वेळी येणारे पाणी दगडावर आपटून मुख्य तटबंदीपर्यंत पाणी न पोहोचू देण्याची पद्धत शिवरायांच्या स्थपतींनी यशस्वीरीत्या वापरली!

कुलाबा किल्ल्याच्या बांधणीत तर भले मोठे चिरे नुसते एकमेकांवर ठेवले आहेत. लाटांचा जोर हा जास्त असल्याने या भिंतीवर लाटा आपटल्या, की पाणी दोन दगडांच्या फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर उणावतो. ही पद्धत कुलाबा किल्ल्याच्या बांधकामात वापरली गेली, अन् आज साडेतीनशे वर्षांनंतरही या किल्ल्यांच्या बांधकामातील एक चिराही सरकलेला नाही! दुर्गनिर्मितीमधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला. रायगडावरील महादरवाजाजवळ काही फुटके हौद दिसतात, जे आपणास केवळ फुटके हौद म्हणून दाखविले जातात; परंतु हा प्रकार म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी केलेली योजना आहे. हे  न पटणारे आहे. रायगडाच्या महादरवाजापर्यंतची अवघड चढण चढून शत्रू सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला तर दरवाजाजवळ असणारे हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावर असलेल्या महादरवाजाजवळ वेगाने वाहील व अकस्मात झालेल्या या जलहल्ल्याने, चिखलराडय़ाने शत्रू सैन्याचा धीर खचून त्याची मानसिकता व अवसान गळून पडेल हा त्या मागचा उद्देश! साठवलेल्या पाण्यातून दुर्ग संरक्षण करण्याचा कल्पक हेतू मनी बाळगणारे शिवाजी महाराज हे जगातील पहिले आणि शेवटचे राजे होत!

तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जे किल्ले, दुर्ग बांधले तेथे शौचकुपाची व्यवस्था होती. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांवर आजही अगदी सुस्थितीत असलेले शौचकूप पाहणे रोमांचकारी आहे. त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आवर्जून पाहण्यासारखे आहे. ज्या काळात अभियांत्रिकी किंवा स्थापत्यशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या संस्था नव्हत्या. दुर्गबांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याएवढे राजकीय स्थैर्य नव्हते, राज्यात कधीही परकीय दमनचक्र येणाऱ्या काळात, स्वकीय, तसेच परकीयांशी झुंजण्यात कालापव्यय होत असताना शिवाजी महाराजांचे असे एकमेवाद्वितीय, शास्त्रीय आधारांवर दुर्गबांधणीचे प्रयोग त्यांची दुर्गबांधणीतील वैज्ञानिक बैठक ही आश्चर्यकारकच आहे.

महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते.

।। शिवरायांसी आठवावे।।
जीवित तृणवत मानावे..।।

पु.ल. देशपांडे, सौजन्य – दिपक (पु.ल. प्रेम संकेतस्थळावरुन साभार)

‘सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती’

मित्रहो,
माझ्या आयुष्यातली हा मी एक परमभाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नाही. त्यामुळे ह्या भाग्याचा मी पूर्वजन्माशी संबंध जुळवू इच्छित नाही. पण हा क्षण माझ्या आयुष्यात यावा ह्याला ‘भाग्य’ या पलिकडे मला काय म्हणावं ते सुचत नाही.

आपण आत्ताच सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख अंदमानतली कोठडी असा केला जातो, परंतु ज्या वेळेला एखाद्या कोठडीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येत असतं, त्यावेळी त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आता जिथे गेलो होतो तो असाच एक गाभारा झालेला आहे. तिथे एक मुर्तीमंत तेज वावरत होत. ‘तेजस्विनावधीत्मस्तु’ असं आपण पुष्कळ वेळेला नुसतं म्हणतो आणि म्हटलेलं विसरुन जात असतो. पुन्हा रोज म्हणत असतो, परंतु ज्याची काया, वाचा, मन, अवघं व्यक्तिमत्व अंतबार्ह्य तेजस्वी होतं अशी अलिकडल्या काळातली भारतीय इतिहासातली व्यक्ती शोधायला गेली तर वीर सावरकरांची मुर्ती डोळ्यापुढे आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे अशा इर्षेने ते जगले. अधांराचे ते सगळ्यात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतंत्र्याचा असो. त्या अंधाराविरुद्ध त्यांची झुंज होती. जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असं तुकोबांनी म्हटलं आहे. हे एक अंतर्गत युद्ध चालु असतं. आणि युद्धाचा पहिला नियम असा आहे की मी जिंकणारच आहे अशा भावनेनेच युद्धात उतरावं लागतं.सावरकरांनीसुद्धा ‘मारिता मारिता मरावे’ ह्याचाच जयघोष केला होता. पराजित मनाने लढणारा माणूस कधीही युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या साहित्यातून ज्या जिवनविषयक तत्वज्ञानातून ते साहित्य निर्माण झाले होती. त्यातून जर सार काढायंचं असेल तर तर असंच म्हणावं लागेल की, केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा. म्हणूनच आधुनिक काळातल्या इहवादी महर्षींमध्ये सावरकरांच नाव आदराने घायला हवे. विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून. काळोख याचा अर्थ भय, आंधळेपण, सर्व क्षेत्रातलं आंधळेपण जावं ह्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला.

आजच्या दिवसाचा आपण सावरकरांच्या अत्मार्पणाचा दिवस म्हणतो. केवळ तिथीच्या हिशेबात, ‘जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती’ ह्या दृष्टीने हा दिवस आत्मार्पणाचा म्हणणे संयुक्तिक होईल. पण वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून त्यांच्या जीवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती. ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ अश्या निष्ठेने ज्यांच्या जीवनातली वाटचाल क्रांतिपथावरुन चालत असते त्यांचा मृर्त्यु हा सांगाती असतो. आपण पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणुन जगत असतो. क्षणोक्षणी मरणाच्या धास्तीने जगत असतो. असल्या जगण्याला श्वासोच्छवास घेणे यापलिकडे फारसा अर्थ नसतो. परंतू ज्या वेळेला मनुष्य हा श्वासोच्छवास मी कशासाठी घेतो आहे याचा विचार करील त्यावेळी सार्थ जगण्याचा वाटा तो शोधायला लागेल आणि जिथे राजकिय धार्मिक किंवा आर्थिक दडपणामुळे आलेला गुदमरलेपणा, धूत:शरीरेण मृत:स जीवती अशी परिस्थिती त्याला आढळेल. जिथे जिथे म्हणून मोकळा श्वास घेता येत नाही तिथे उडी मारून तो श्वास मोकळेपणाने घेता येण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वत:चे प्राण पणाला लावेल त्याचवेळी ते जगणं खऱ्या अर्थाने पारमार्थिक होईल. आपण पारमार्थिक ह्याचा अर्थ गळ्यात माळा आणि कपाळी टिळा लावून जयजय राम कृष्ण हरी करित राहणं असा करतो पण जोवर माणुस आणि निसर्ग, माणुस आणि माणुस, माणुस आणि तो स्वत: ह्या द्वंद्वांना सामोरे जाऊन ती कोडी उलगडण्याच्या मागे लागत नाही तोवर ते जगणं केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या चौकोनातच पशुवत सीमित राहिल. ते पारमार्थिक होणार नाही आणि एकदा का ह्या जीवनाचं यशार्धत्व पटलं की मग चित्त भयशून्य होत. प्रथम ते मुक्त होतं मरणाच्या महामायतून. सावरकरांना मुर्त्युंजय म्हणायचं ते ह्या अर्थाने.

ह्या जेलमध्ये आजसुद्धा पहा. हे पर्यटनस्थान असूनही नुसत्या त्या जेलच्या विराट स्वरुपामुळे सारं कसं भयाण वाटतं.
आपण कल्पना करा १९११ साली वर्षापूर्वी यापुढली थोडी थोडकी नाही पन्नास वर्ष या ठिकाणी डांबलेल्या असस्थेत सजा भोगण्यासाठी ते शिरत होते. भोवताली दैत्यांसारखे पहारेकरी होते ब्रिटीश सत्ता टिकवण्यासाठी. स्वातंत्र्य हा शब्द उच्चारण्यालाही ठार मारणं, त्याचे अनन्वित हाल करणं हा त्यांचा खेळ होता. अशा ह्या नरकपुरीत प्रवेश करताना सावरकरांनी उद्गार काय काढावे? ते म्हणाले होते, ‘मित्रांनो एक दिवस इथे आमचे पुतळे उभे राहतील. मी जिंकणारच ह्या आत्मविश्वासाने युद्धात पडायचं असतं.’ ह्या तत्वज्ञानाच्या खरेपणाचं आणखी दुसरं उदाहरण आवश्यकच नाही. हा भाबडा विश्वास नव्हता. साम्राज्यशाहिच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते. लोंकांमध्ये गूलामगिरीविरुद्ध द्वेष उत्पन्न होत असलेले ते पाहत होते. त्या द्वेषाला सामर्थ्या़ची जोड हवी याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी प्रथम आपल्या देशबांधवांच्या मनाचे सामर्थ्य अपरंपार वाढवले पाहिजे याची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी देवधर्मापेक्षा ‘राष्ट्र’ ह्या कल्पनेला अग्रमान दिला. आमचे देव इंग्रजांच्या बंदीत नव्हते. त्याची षोडपचार पुजा चालू होती. धर्मातही राज्यकर्ता इंग्रज लुडबुड करीत नव्हता. पण इथला माणुस मात्र त्याला सदैव दुबळाच राहायला हवा होता. सावरकरांनी हिंदु हा शब्द्च राष्ट्राला समानार्थी करुन टाकला. मी हिंदुस्थानाचाच रहिवासी आहे. माझी पुण्यभू, मातृभू, धर्मभू हिंदुस्थान हीच आहे असे म्हणणारा तो हिंदू, अशी त्यांनी धर्माची इहवादी व्याख्या बनवली आणि त्या हिंदुला समर्थ करण्यासाठी त्यांनी इथल्या रहिवाश्यांना तुम्ही ‘अमृताचे पुत्र’ अहात. तुम्ही मरण स्विकारायचे आहे ती होतात्म्यातून तुम्हाला अमर करणारे- हा मंत्र सांगितला हिंदू-मुसलमान-खि्स्ती कुणाचाही देव दुबळ्याच्या मदतीला धावत नाही हे ते पक्के जाणुन होते. त्यांनी सतत जर कसला धिक्कार केला असेल तर तो दुबळेपणाचा. दैववादाचा, मनुष्य बुद्धीच्या निकषावर प्रत्येक गोष्ट घासून मगच ती स्विकारतो. त्यावेळी त्याच्या आचारविचारांत एक निराळेच तेज दिसू लागते. तो जय-पराजयाची भाषा करीत नाही प्रयत्नात आपण कमी पडलो असे मानुन पराजयाच्या क्षणीही पुन्हा उठुन उभा राहतो. मर्ढेकरांनी म्हटलं आहे ‘भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी.’ अखाद्या दृश्याने किंवा कल्पनेने भावनाबंबाळ होणं ह्याला अर्थ नाही. उदाहरणार्थ हा सेल्युलर जेल पाहून मी लगेच भावनाविव्हळ होऊन ओक्साबोक्सी रडायला लागणं आणि थयथयाट करून मला किती दु:ख झालं आणि सावरकरांना भोगाव्या लागलेल्या भळाच्या आठवणींनी मी किती व्हिवळ झालो याचं प्रदर्शन माम्डणं म्हणजे माझी भावना शंभर टक्के खरी आहे असं नाही. एखाद्या गोष्टीच्या बाबतीतली उत्कट भावना तिला अश्रूंची वाट करून देण्याने सिद्ध होत नाही. उलट स्वत:ला आवर घालून जे कार्य हाती घ्याचं असतं. ते करण्याच्या हेतूने सामर्थ्य मिळायला लागणे हे महत्वाचं असतं.

आत्ताच श्री. हर्षे यांनी सांगितलं की सावरकरांच्या विषयीच्या माझ्या काही आठवणी असल्या तर त्या मी सांगाव्या. खरं सांगायचं तर त्यांच्याजवळ जाण्याची छाती आणि हिंमत मला नव्हती. सुर्याचं तेज दुरून घ्यावं, फार जवळ गेलो तर भस्मसात होण्याची भि्ती. त्यामुळे आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या पुस्तकातून. पण माझ्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला होता तो म्हणजे परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर त्यांचा मृत्यंजय समारंभ झाला त्यावेळी मी त्यांचे भाषण ऎकलं.

पारल्याला माझ्या लहानपणी सावर्करांची टिळक मंदिरात झालेली भाषणंही मी ऎकली आहेत. चांगल्या वक्तृत्वाच्या बाबतीत आपण ‘गंगेसारखा ओघ’ असं म्हणतो. त्या ओघाचा साक्षात्कार सावरकरांइतका शंभरटक्के मला कोणत्याही भाषणाने झाला नाही. विचार आणि उचार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे. मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक महत्वाचा घटक असतो. सामर्थ्याच्च्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राज्यकर्त्याच्या उदासीपणातून, अवलबित्यातून वाचवणं हा विवेक सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीमागे होता. वास्तविक एंग्रजीवर त्यांच चांगलंच प्रभुत्व होतं. मराठी भाषणाच्या ओघात एकादा मुळातला इंग्रजी उतारा स्मरणाने धडाधड म्हणत. कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रहण्यम मानले नाही. त्यांना आमान्य होतं ते दुबळेपणाच्या भावनेने विदेसी भाषेतल्या श्ब्दांची घूसखोरी चालू देणं. सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजून घेतली नाही. त्यांनी त्यांच्या भाषाशुद्धीची चेष्टा केला. हे शब्द रूढच होणे शक्य नाही असे म्हणायला सूरुवात केली. पण ते सरकारी शब्दांच्या टाकसाळीत तयार केलेले नव्हते. एका प्रतिभावंत कवीची ती निर्मीती होती.

सरकारात मोले घातले रडाया (की खरडाया?) ह्या भावनेने भाषाशुद्धीचे पगारी कर्मचारी जेव्हा बसतात तेव्हा”ते इकडली इंग्रजी डिक्शनरी आणि कर त्याचा मराठी शब्दकोश’ असा व्यवहार चालतो. सावरकरांना तो शब्द कोशात पडून राहणारा नको होता. तो कवितेसारखा लोंकाच्या तोंडी रूळायला हवा होता. त्यांनी रिपोर्टरला ‘वार्ताहर’ हा शब्द निर्माण केला. वार्ता खेचून आणणारा. इथे इंग्रजी शब्दाच्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द असे होता, एक कविनिर्मीत प्रतिमा तयार झाली. प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकरनिर्मीत आहेत ह्याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच जास्त अप्रिचित आहे. वृत्तपत्रांच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक मराठी शब्द त्यांनी दिले आहेत. तीच गोष्ट चित्रपटसुर्ष्टीची, दिग्दर्शन, संकलन, ध्वनिमुद्रण, पटकथा हे सारे त्यांचे शब्द. मराठीला त्यांचं हे सत्व जागविण्यासाठी दिलेल मोठं देण आहे. शिवाय ते उत्तम वक्ते असल्यामुळे शब्द निर्मिती करताना त्यात उच्चारांचा सोपेपणाही त्यांनी सांभाळला. पुष्कळदा मला वाटतं की भाषेचं सामर्थ्य म्हणजे काय, ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे ‘माणसाचा देव आणि विश्वाचा देव.’ दीन शब्दांत संस्कृती, ह्या सारखे निंबंध मोठ्याने वाचून घायला हवेत. वैचारिक संस्कार आणि भाषेचे उत्तम संस्कार ह्या दोन्ही दृष्टीनी हे वाचन उपयोगी ठरेल. सावरकरांच्या जीवनात तर ग्रीक नाट्य़ातल्या महान नायकांसारखं नाट्य होतं. आणि ते त्यांच्या वाणी-लेखणीतूनही ओसंडत होतं. ते स्वत: नाटककार, थोर कवी असल्याचा दुर्दवाने त्यांच्या केवळ राजकिय कर्तूत्वाकडेच पाहिल्यामुळे विसर पडतो. ‘उत्कट भव्यतेज्याचे मिळमिळीत अवघेची टाकावे’ हा समर्थांचा उपदेश सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेला क्ववित आढळतो. त्यामुळे कवितेत देखील ते कल्पनेची हिमालयीन शिखरे गाठतात. प्रियकर प्रेयसीच्या मीलनाच्या प्रतिक्षा काळाबद्दल कविता लिहिताना ते म्हणतात-

‘शतजन्म शोधताना शत आति व्यर्थ झाल्या !
शत सुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या !’

कालाचं किती विराट स्वरूप दोन ओळीत त्यांनी उभं केलं आहे पहा ! एका सुर्य मालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणताना आपण थकून जाऊ हा महाकवी शतसुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या म्हणून जातो. इतकी प्रचंड प्रतिमा घेऊन आलेल्या ह्या कोठडीत राहावं लागलं आणि ही भयाण कोठडी ‘कमला सप्तर्षी, विरहाच्चवास असल्या प्रतिभेची उत्तुंग शिखर दाखवून देणाऱ्या काव्यांचं जन्मस्थळ ठरली.

ह्या कोठडीत त्यांनी जे हाल सहन केले त्याची कल्पना ‘माझी जन्मठेप’ वरुन येते. पण मला वाट्तं. त्यांनी खरोखरी जे शारीरिक आणि मानसिक हाल सहन केले असतील त्यातल्या एक दशांशाचं सुद्धा वर्णन त्यात लिहिलेलं नसेल. कारण हालाच वर्णन करताना त्यांना जराही संषय आला असावा की ह्या कथनामुळे लोकांच्या मनात करुणा उत्पन्न होणार आहे. तर त्या महापुरूषाला ते कदापीही रुचलं नसतं. म्हणून मला नेहमी वाटतं की इथे झालेले सगळे हाल त्यांनी लिहीलेच नाहीत. त्यांना हे पुस्तक वाचुन एखाद्या आजीबाईंनी ‘आई आई गं काय हो हे हाल’ म्हणायला नको होत, त्यांना असल्या हालावर मी मात करीत अशा विश्वासाने ह्या संकटात उडी टाकायला सिद्ध होणारा तरुण वाचक अभिप्रेत होता. स्वत:बद्दलची कणव निर्माण करण्याचा किंवा आपल्या त्यागाचे भांडवल करण्याचा तिटकारा होता. वार्ध्यक्याच्या काळात ते कुणालाही भेटायला उत्सुक नसत. ‘त्याच कारण मला तरी असं वाटतं, की आपल्या आयुष्यातल्या थकलेल्या अवस्थेत आपल्याला कुणी पहावे हे त्याना आवडणं शक्य नव्हतं. एखाद्या म्हाताऱ्या सिंहाला वाचा फूटली तर तो जसा म्हणेल. ‘मला सर्कशीतला सिंह म्हणून काय पहाता. जंगलात हत्तींची गंडस्थंळ फोडीत होतो तेव्हा पहायचं होतंत-‘ त्याच वृत्तीने ते एक प्रकारच्या एकांतात राहिले त्या वाधंक्यात एकच व्याधी त्यांना आतून पोखरत होती. ती म्हणजे देश दुभंगल्याची अशा अवस्थेतच त्यांनी मृत्युला आपण सामोरे जाऊन भेटण्याचा निश्चय केला.

विज्ञाननिष्ठ सावरकरांचे त्यांना धर्माभिमानी संकुचित म्हणणाऱ्यांना त्यांच्या मृत्युच्या प्रसंगी एक हादरून टाकणारे दर्शन झाले. आपल्याकडे बहुतेक लोकांची बुद्धिनिष्ठा औद्वदेहीक संस्काराच्या प्रसंगी लुळी पडते. परंपरागत रुढींचे पालन केले नाही. तर मानगुटीला बसेल त्याला नरकवास घडेल अशी नाना प्रकारची भीती मनात असते. मरणाऱ्याचीही आपल्याला मंत्राग्नी मिळावा-भंडांग्नी नको अशी अखेरची इच्छा असते आणि मुख्यत भितीपोटी ह्या इच्छेला त्याचे उत्तराधिकारी मान देत असतात. आणि अशा ह्या परिस्थितीत सावरकर आपल्या अखेरच्या इच्छापत्रात आपलें शव विद्दुत दाहिनीत टाकून द्यावे अशी इच्छा व्यक्त करतात. हे शव आहे त्याला एक काष्ठ या पलिकडे अर्थ राहिलेला नाही असं मानणं हे आद्द शंकराचार्यासारखं झालं. आद्द शंकराचार्याची आई मरण पावली. ब्राह्मणांनी तिच्या अंत्यंसंस्कारावर बहीष्कार टाकला. मृतदेह एकट्या शंकराचार्यांना उचलून स्मशानात नेता येईना. त्यांनी हे काष्ठ आहे. असं म्हणुन त्या मृतदेहांचे तीन तुकडे केले आणि एकेक तुकडा नेऊन दहन केले. विज्ञानिष्ठेची हीच परंपरा सावरकरांनी पाळली. आज आम्ही पाहतो. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे लोक आपल्या इच्छापत्रात आपली रक्षा कुठल्या सोर्वात नेऊन टाकावी हे नमुद करतात. मरणानंतर उतरांवर संकुचित धार्मिक्तेचा आरोप करणाऱ्या नेंत्यांच्या रक्षा विसर्जनाचा तमाशा दहा दहा दिवस चाललेला असतो आणि सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.

यापुढे धर्मभोळ्या-मंत्रतंत्राच्या युगात आपल्याला राहयचं नसून विज्ञानीने समर्थ झालेल्या जगात जगायचं आहे हा विचार एका विलक्षण द्वष्टेपणाने ते मांडत आले. त्या नव्या जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आदिम अवस्थेतल्या जमातीतल्या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत. अशा प्रकारच्या बावळटपणाला सावरकरांना तिटकरा असे. त्यांना दुबळा, वाकलेला, लाचार असा माणुस सहनच होत नसे. तेज:पुजतेने आकर्षण त्यांच्या साहित्यातून सदैव प्रकट झालेले दिसते. स्वातंत्र्याचं नातं देखील त्यांनी ’आत्मतेजीवाले’ प्रकटणाऱ्या रवीशी जुळवलेलं आहे, त्यांनी शेवटी मृत्युला अलिंगन दिले. ते देखील तेजाच्या एका ज्योतीने दुसऱ्या प्रचंड ज्योतीत मिळून जावे तरी. मृत्युला आपल्यावर झडप घालू न देता त्याच्या दरबारी ते धोरदात्त नायकासारखे चालत गेले. समिधेसारखं जीवन जगणाऱ्या सावरकरांची जीवनयद्वत स्वखुशीने आहुती पडली.

आपण आत्ताच ह्या बंदिगृहातल्या त्यांच्या एका गाभाऱ्यात जाउन आलो. निर्भयतेचा एक उपासक तिथे ठेवला गेला होता. नाना प्रकारचे हाल त्याला सहन करावे लागले. कोणासाठी त्यांनी ते सर्व सोसलं? तुमचा आमचा श्वासोच्छवास स्वतंत्र हिंदुस्थानातल्या हवेत मोकळेपणाने घेता यावा म्हणून. आज आपण इथे येतो. निर्भयपणाने हा भयाण कारागृहात हिंडतो. ती, सावरकरांची आणि राजबंदी म्हणून ज्या क्रांतिकारकांना इथे जन्मठेपेची सजा भोगावी लागली त्यांची पुण्याई आहे. त्या पुण्याईचे आज आपण स्मरण करतो म्हणुन आजच्या दिवसाला आपण सावरकरांची पुण्यतिथी म्हणतो. त्यांनी मिळवलं ते पुण्य जपजाप करुन नव्हे तर आयुष्याचं मौल देऊन निर्भयतेची साधना करुन आणि ती साधना कृतीत उतरवून अशा प्रसंगी त्या निर्भयतेचा थोडा तरी अंश आपल्यात उतरो ही आपली प्रार्थना असायला हवी.
प्रार्थनेचा उल्लेख आल्यावर मला स्त्रोत्राची आठवण आली. मी वाचलेल्या स्त्रोत्र-साहित्यात मला सगळ्यात आवडलेल स्त्रोत्र कुठलं असेल तर ते सावरकरांनी लिहिलेलं स्वतंत्रेच स्त्रोत्र. ’जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे.’ ह्या जयोस्तुतेच्या संदर्भात माझ्या मनाला स्पर्श करुन गेलेली एक घटना सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. अस्पृश्यता निवारणाविषयींच्या सावरकरांच्या तळमळीविषयी आणि सहभोजन, मंदिरप्रवेश इत्यादी कार्यक्रमांविषयी मी आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही. काही वर्षापूर्वी मी सांगलीजवळ म्हैसाळ म्हणून गांव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा प्रयोग केला आहे तो पहायला गेलो होतो. भारतातल्या उत्तम ग्रामिण प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रियांच्या अंगावर लज्जरक्षणापुरतीही वस्त्रं नसायची म्हणून त्यांना झोपडीबाहेर पडणं मुष्किल होतं. तिथे आम्ही गेलो त्या दलित वस्तीतली सर्व स्त्रीपुरूष मंडळी लग्नंसमारंभाला जावे तसा पोषाख करुन जमली होती. सहकारी शेतीने त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणलं होतं आणि ते केवळ आर्थिक परिवर्तनच नव्हतं हे लगेच माझ्या लक्षात आलं. त्या स्त्रियां समारंभात गाणं म्हणणारं होत्या. अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. – जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या. एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.

अशा या पुण्यशाली महापुरुषाला जिथे बंदिवास घडला ते हे क्षेत्र आता इहवादी सत्पुरुषाचं जिथे स्मरण करावं असं तिर्थक्षेत्र झालेलं आहे. ज्यामुळे आपल्या मनाला स्नान घडतं ते तिर्थ असं मी मानतो. भयाने, स्वार्थाने, संकुचीत वृत्तीने मालिन झालेली आपली मन धुवायला आपण आता ठिकाणी येतो. बाळारावांनी आणि श्रि. हर्षे यांनी इथे सर्वांना एकत्र आणण्याचा योग आणला. त्यांच्या आयोजनामुळे इथे येण्याचे भाग्य मला लाभले, मी त्यांचा आभारी आहे.
वीर सावरकरांच्या स्मृतीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ह्या सभेची सांगता एकेकाळी ज्या गीताने आपले सारे राष्ट्र जागृत झाले होते त्या त्या गिताचे पडसाद ह्या बंदिक्षेत्रात उठवून आपण करुया. मुक्त मनाने वंदेमातरम गाऊ या धन्यवाद !
[२६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेल्युलर तुरूंगातील मैदानात केलेल्या पु.ल.देशपांडे यांच्या भाषणावरून.]

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये एक चर्चासत्र आयोजित केलेले होते. विषय होता ‘विज्ञान, श्रद्धा आणि धर्म’. बहुतेक चर्चासत्रांप्रमाणे अर्थातच त्या चर्चेतून सर्वमान्य निष्कर्ष निघाले नाहीत. गेल्या महिन्याच्या ‘सायंटिफिक अमेरिकन’ अंकात लॉरेन्स क्रॉस या पदार्थविज्ञानशास्त्रज्ञाने त्या चर्चेसंबंधात जे निवेदन केले आहे ते पाहता अजूनही मतभेदांची कोंडी फुटलेली नाही. मतभेदांचा मुद्दा अर्थातच ‘परमेश्वर’ हा आहे. ‘देव आहे, की नाही’ या विषयावर गेली सुमारे तीन-चारशे वर्षे खडाजंगी चालू आहे. हा प्रश्न अर्थातच लोकशाही पद्धतीने, जनमताचा कौल घेऊन सोडविण्यात अर्थ नाही. प्रचंड बहुमताने ‘परमेश्वरवादी’ पार्टीचा विजय होईल आणि देवाचे अस्तित्व ‘लोकशाही’ने ‘सिद्ध’ झाले असे मानले जाईल. जगातील जवळजवळ सर्व राजकारणी व्यक्ती देवाचे अस्तित्व मानतात. भारतातले बहुतेक उमेदवार निवडणुकीपूर्वी शिर्डीच्या साईबाबांपासून सिद्धीविनायकापर्यंत आणि तिरुपतीच्या बालाजीपासून ते माऊंट मेरीपर्यंत सर्वाचे आशीर्वाद घेत फिरत असतात. त्यांची श्रद्धा इतकी दुर्दम्य असते, की निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांच्या श्रद्धेत तसूभरही फरक पडत नाही. त्यांच्या श्रद्धेला देवाच्या अस्तित्वाचा पुरावा लागत नाही.

खरे म्हणजे, ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी अशा श्रद्धावानांबरोबर वाद घालण्यात अर्थ नसतो; परंतु अनेक कट्टर नास्तिक, ठाम विज्ञानवादी आणि स्केप्टिक्स ऊर्फ शंका / संशयवादी ‘देव नाहीच’ हे सिद्ध करू पाहात असतात. फारच थोडे आस्तिक हे विचाराने नास्तिक झालेले आहेत. पंडित नेहरू हे विचाराने नास्तिक होते, वृत्तीने व व्यवहाराने १०० टक्के विज्ञानवादी होते; पण स्वभावाने सहिष्णू व उदारमतवादी असल्याने त्यांनी ‘परमेश्वरवाद्यां’ची टिंगल-टवाळी केली नाही वा त्यांच्या तोंडी ते लागले नाहीत. श्रद्धा व धर्म राजकारणात शक्यतो येऊ नयेत हा त्यांचा प्रयत्न होता.

‘नास्तिकांची नास्तिकवादावरची श्रद्धा आस्तिकांच्या देवावरच्या श्रद्धेपेक्षाही अधिक कडवी असते,’ असे नेहरूंनी एके ठिकाणी म्हटले आहे. बटर्रण्ड रसेल शंकावादी म्हणजे स्केप्टिक होते आणि देवाच्या मुद्दय़ावर ते ‘अ‍ॅग्नॉस्टिक’ ऊर्फ अज्ञेयवादी होते, ‘एथीइस्ट’ म्हणजे निरीश्वरवादी नव्हते. त्यांनी तर ‘मी ख्रिश्चन का नाही’ (हँ८ क ंे ल्ल३ ं उँ१्र२३्रल्ल) या विषयावर  प्रबंधरूपी पुस्तिका लिहून इंग्लंडमध्ये खळबळच माजविली होती; पण रसेल यांनीच ‘मी कम्युनिस्ट का नाही’ (हँ८ क ंे ल्ल३ ं उे४ल्ल्र२३) अशीही पुस्तिका लिहून डाव्या मंडळींमध्ये एक सुरुंग पेरला होता. त्यामुळे रसेल असोत वा नेहरू, या दोघांबद्दल बोलताना कम्युनिस्ट मंडळी कधी बुद्धिवादी अहंतेने तर कधी तुच्छतेने बोलतात. पण गंमत म्हणजे जेव्हा ईश्वरवाद्यांशी वाद घालायचा प्रसंग येतो तेव्हा रसेलच्या तर्कवादी मांडणीचाच आधार घेतात.

कार्ल मार्क्‍स अर्थातच निरीश्वरवादी; परंतु स्वयंभू कम्युनिस्टांच्या अरेरावीला व दुराग्रहीपणाला कंटाळून त्यांनी ‘थँक गॉड, आय अ‍ॅम नॉट अ मार्क्‍सिस्ट!’ असे उद्गार काढले होते. मुद्दा हा, की नास्तिक-आस्तिक- शंकावादी यांच्यातील वाद पूर्णपणे मिटणे अशक्य आहे. शिवाय आयझ्ॉक न्यूटनपासून अनेक वैज्ञानिकच देववादी (आणि दैववादीही) असल्यामुळे नास्तिकवाद्यांची थोडीशी पंचाईत होते. परंतु न्यूटनचा तथाकथित आस्तिकवाद हा श्रद्धा वा रूढिवादी नव्हता. समुद्राच्या किनाऱ्यावर बसून अथांग पसरलेल्या पाण्याकडे आणि वर आकाशाकडे पाहून, तो म्हणत असे, की येथील वाळूच्या एका कणाइतकीही आपली अस्तित्व-खूण नाही; पण त्या अथांगतेचा गणिती थांग लावण्याचा त्याने अखेपर्यंत प्रयत्न केला. ‘परमेश्वरनिर्मित’ सृष्टीचे रहस्य शोधून काढणे हेच आपल्याला त्याने दिलेले काम (ध्येय) आहे, अशा स्वरूपाची त्याची विचारसरणी होती. म्हणूनच झाडावरून खाली पडणाऱ्या सफरचंदात त्याला गुरुत्वाकर्षणाचे भौतिकशास्त्रीय नियम सापडले. नाहीतर लाखो वर्षे सफरचंदे व अन्य फळे वरून खाली पडत होतीच- फक्त इंग्लंडमध्येच नव्हे तर भारतातही! न्यूटन जर विज्ञानमार्गाऐवजी भक्तिमार्गाने गेला असता तर या विश्वाच्या अथांगाचा थांग लागायला तेव्हा सुरुवात झाली नसती. एका अर्थाने न्यूटन-गॅलिलिओंनीच देव वा धर्मविरोधी काहीही थेट भाष्य न करता त्यांच्या अस्तित्वाला व श्रद्धावादाला मूलभूत आव्हान दिले. किंबहुना विज्ञानवाद्यांमध्ये आणि वैज्ञानिकांमध्ये देव ‘अवतरला’ तो तेव्हापासूनच. (नास्तिक विज्ञानवाद्यांनी तेव्हापासून परमेश्वराविरुद्ध एक आघाडी उभी केली आहे. जे परमेश्वरवादी त्या वादात उतरतात, त्यांची पंचाईत होते, कारण त्यांना सिद्ध काहीच करता येत नाही; पण अशा सिद्ध न करता येण्यासारख्या, न दिसणाऱ्या, प्रयोगात न बसणाऱ्या अनेक गोष्टी जर आपण मानतो तर देवाचे अस्तित्व मानायला काय हरकत आहे, अशा प्रकारचे अतक्र्य तर्कशास्त्र ते सांगतात. याउलट विज्ञानवादी जवळजवळ प्रत्येक गोष्ट तर्काने, गणिताने, प्रयोगशीलतेने सिद्ध करण्याच्या मागे असल्यामुळे त्या दोघांमध्ये संवाद असंभवनीयच असतो. त्यामुळे सहिष्णुता आणि परस्परांबद्दलचा सांस्कृतिक आदरभाव इतकेच संदर्भ त्यांच्या चर्चेला असतात वा उरतात. धर्मवादी / देववादी आस्तिक आणि विज्ञानवादी नास्तिक यांच्यातील विसंवाद वा असंवाद समजण्यासारखा आहे, परंतु कला-संस्कृतिवादी आणि विज्ञानवादी यांच्यात अक्षरश: उभा दावा असावा हे मात्र न मानवण्यासारखे वाटते. परंतु अशी स्थिती युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व नंतर विज्ञानाचाच नव्हे तर विज्ञानवादाचा प्रभाव खूपच वाढला होता. विद्यापीठांमध्ये, अगदी शाळांमध्येसुद्धा, तसेच सामाजिक जीवनात ‘आर्ट्स’ शाखांकडे जाणारे बुद्धीने दुय्यम दर्जाचे आणि विज्ञान शाखा निवडणारे ‘हुशार’, ‘हाय आयक्यू’ असणारे असतात असे मानण्याचा कल वाढला होता. (आपल्याकडेसुद्धा ९० टक्क्यांच्यावर मार्क मिळविणाऱ्यांनी सायन्सला जायचे- इंजिनीअरिंग, मेडिकल, सॉफ्टवेअर वगैरे- आणि ५० टक्क्यांच्या आसपास मार्क्‍स मिळविणाऱ्यांनी ‘आर्ट्स’ला जायचे ही प्रथा गेली ३० वर्षे आहेच.)

युरोपमध्ये तर १९३० ते १९६० या काळात लेखक, कवी, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ इत्यादी ‘ह्युमॅनिटीज्’ किंवा ‘आर्ट्स’ शाखांमधले ‘विचारवंत’ एका बाजूला आणि वैज्ञानिक, गणिती, तंत्रज्ञ दुसऱ्या बाजूला असे उभे दोन तटच पडले होते. इतके, की जगद्विख्यात फिजिसिस्ट रुदरफोर्ड आणि ख्यातनाम गणिती जी.एच. हार्डी काहीसे छद्मीपणे उद्गारले, की ‘आम्ही विज्ञान-गणित क्षेत्रात काम करतो त्यामुळे आम्हाला ‘इंटेलेक्च्युअल’ म्हणून संबोधण्याची प्रथा नाही. आम्ही ‘सायन्टिस्ट!’- इण्टेलेक्च्युअल नाही.. विचारवंत फक्त सॉक्रेटिस आणि शेक्सपियर, वा शेली आणि शॉपेनहॉवर यांचा अभ्यास करणारे प्राध्यापक वा तत्सम कुणी.. आम्ही अणुसंशोधन, जीवसृष्टीतील कूट प्रश्न, गणितातील जटिल समस्यांचा अभ्यास करणारे लोक.. आम्हाला इंटेलेक्च्युअल कसे म्हणणार?’ म्हटले तर ही खंत होती, म्हटले तर तथाकथित ‘विचारवंतां’वरचे स्पष्ट भाष्य! समाजातला वा राजकारणातला वा अर्थकारणातला कोणताही प्रश्न असो- मग तो युद्धविषयक असो, औद्योगीकरणाचा असो वा नव्या उत्पादन तंत्राचा- त्यासाठी हे कवी, लेखक, विचारवंत कामाचे नसतात, तेव्हा त्यांना आमची गरज भासते, असे त्यांना म्हणायचे होते.

‘कलावादी’ आणि ‘विज्ञानवादी’ यांच्यातील परस्परविरोधी भावना इतक्या पराकोटीला गेल्या होत्या, की त्या वेळेस इंग्लंडमध्ये ‘विचारवंत’ म्हणून प्रसिद्ध असलेले सी. पी. स्नो यांनी ‘द टू कल्चर्स’ नावाचे एक छोटेसे पुस्तकच लिहिले. या विषयावरील त्यांच्याच एका  भाषणाचा आधार घेऊन. त्यांचे ते भाषण सर्वार्थाने ऐतिहासिक ठरले. त्याचे एक कारण स्नो हे स्वत: ज्येष्ठ वैज्ञानिक होते आणि सर्जनशील लेखकही होते. दोन्ही ‘गटां’मध्ये त्यांना प्रतिष्ठा होती, पण त्या दोन गटांमधील मंडळींमध्ये संवाद घडवून आणण्यात ते अयशस्वी ठरले होते. आपण या प्रयत्नात का अयशस्वी ठरलो हे सांगण्याचे निमित्त करून ‘आर्ट्स’ आणि ‘सायन्स’ या दोन्ही शाखा सर्जनशील आहेत. माणसाला, समाजाला त्यापैकी केवळ एकाच्याच आधारे जीवन जगणे आनंददायी होणार नाही, असे साधे पण विलक्षण वेधक व भेदकपणे मांडलेले ते मुक्त चिंतन होते. ‘सायंटिफिक अमेरिकन’च्या ज्या अंकाचा वर संदर्भ दिला त्या अंकाने, त्या भाषणाला बरोबर ५० वर्षे झाली म्हणून पुन्हा या वैचारिक यादवीचा आढावा घेतला आहे.

सी. पी. स्नो यांनी जे दोन तट / गट संवादी करायचा प्रयत्न केला, त्यात देव वा धर्म हा मुद्दा अजिबात नव्हता. कारण कित्येक ‘विचारवंत’ (‘आर्ट्स’ वा ‘ह्युमॅनिटीज्’वाले) हे नास्तिक होते आणि कित्येक वैज्ञानिक हे धर्माला वा देवाला मानणारे होते. त्यामुळे वैज्ञानिक हा आपसूकच निरीश्वरवादी असतो, असे मानण्याला थारा नव्हता. परंतु कोणत्याही गणितसूत्रापेक्षा (गणितज्ज्ञापेक्षा) शेक्सपियर वा शेली व त्यांची नाटके व कविता सांस्कृतिकतेच्या अधिक ‘उच्च स्तरावर’ आहेत, असे बहुसंख्यांचे मत होते आणि वैज्ञानिक हे मुख्यत: माणसांच्या ऐहिक गरजा भागवू पाहणारे लोक आहेत, असा ग्रह होता. (साधारणपणे ‘भाकरी की फूल’ वा ‘भावना की ज्ञान’ या चालीवर!)

परंतु वस्तुस्थिती अशी नव्हतीच. अनेक वैज्ञानिक असे होते की, जे शेक्सपियरचे, संगीताचे, बॅले व ऑपेराचे, उत्कृष्ट चित्रांचे, शिल्पकलांचे चाहते होते, रसिक होते आणि संग्राहकही होते. त्यांच्या मनात सर्जनशील कलेविषयी ग्रहपूर्वग्रह नव्हते, पण लेखक-कवींना मात्र विज्ञानाविषयी काहीही माहिती नसताना ते बिनदिक्कत नवीन संशोधनांविषयी, शास्त्रज्ञांविषयी बोलत असत. त्यामुळे प्रश्न तथाकथित ‘इंटेलेक्च्युअल’ भासणारा आणि अलंकारिकपणे व्यक्त होणारा ‘भाकरी का फूल’ असा नव्हताच.

त्यानंतरच्या काळात, ‘सायंटिफिक अमेरिकन’ने म्हटल्याप्रमाणे ‘टू कल्चर्स’ची जागा ‘थ्री कल्चर्स’ने घेतली. अनेक वैज्ञानिक थेट कथा-कविता-कादंबऱ्याच लिहू लागले. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषयांवर अतिशय उत्तम दर्जाचे लेखन करू लागले. फक्त ‘विज्ञान साहित्य’ नव्हे. बट्र्राण्ड रसेल यांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. ‘मॅरेज अ‍ॅण्ड मॉरल्स’ हा सामाजिक विषयावरचा वादग्रस्त प्रबंध प्रकाशित झाला. रसेल हे विलक्षण प्रतिभेचे गणिती होते; पण त्यांची ख्याती दिगंतात पसरली ती सामाजिक विचारवंत म्हणून. बिगर-विज्ञान क्षेत्रातल्या लोकांसाठी त्यांनी अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत सुलभपणे समजावून सांगणारा ‘एबीसी ऑफ रिलेटिव्हिटी’ हा छोटेखानी ग्रंथ लिहिला. (रसेल तर गंमतीने म्हणत, की तो सिद्धांत फक्त आइनस्टाईनला व त्यांनाच समजला होता. जगाला समजला तो रसेल यांच्या त्या पुस्तिकेमुळेच!) स्वत: स्नो तर लेखक होतेच. ५० वर्षांत हे ‘थर्ड कल्चर’ प्रचंड प्रमाणावर विस्तारले आहे. आयझ्ॉक अ‍ॅसिमोवसारख्या लेखकांनी (त्यांनी एकूण ५०० पुस्तके लिहिली) केवळ विलक्षण ‘विज्ञान कादंबऱ्या’च लिहिल्या नाहीत तर शेक्सपियर, बायबल आणि समाजशास्त्रविषयक लेखन केले. त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. ऑर्थर सी क्लार्क, कार्ल सगान ते अगदी होमी भाभा व जयंत नारळीकर व यशपाल अशा सर्वानीच आपली सर्जनशीलता दाखवून दिली. भाभा स्वत: उत्कृष्ट चित्रकार होते आणि त्याची कलादृष्टी ही तर भल्या भल्या समीक्षकांपेक्षा कितीतरी पटींनी प्रगल्भ होती.

काही वर्षांत या तटबंदी बऱ्याच प्रमाणात कोसळून पडल्या आहेत. आता शेक्सपियरच्या नाटकांवर (म्हणजे त्यातील अनेक नैसर्गिक व मानसशास्त्रीय संदर्भावर) वैज्ञानिक मंडळी संशोधन करीत आहेत आणि कित्येक विज्ञानविषय हे सहजगत्या साहित्यविषय झाले आहेत. जॉन ल कार यांच्या गुप्त हेरकथा / (ी२स्र््रंल्लंॠी ल्ल५ी’२) किंवा टॉम क्लान्सी यांच्या युद्ध व शस्त्रास्त्र संशोधन कादंबऱ्यांमध्ये इतके विज्ञान असते आणि तरीही त्या कथा-कादंबऱ्यांना आपण विज्ञान-साहित्य म्हणू शकत नाही.

स्नो यांनी देव / धर्म / श्रद्धा यांच्या विरोधात व खिल्ली उडविणारे काहीही लिहिले नाही. त्यांच्या मते सर्जनशील साहित्यात आणि विज्ञानात, देवाला तसे फारसे स्थान नाही. त्याबद्दल वारही घालायची गरज नाही. माणसाला या भूतलावर पडणारे प्रश्न (किंवा माणसानेच निर्माण केलेले प्रश्न) येथेच सोडवायचे आहेत. ते सोडवायला देव प्रत्यक्ष अवतरणार नाही हे अगदी कट्टर परमेश्वरवाद्यांनाही माहीत असते; पण त्यांच्या श्रद्धेला तडा जाईल या भीतीने ते स्वत:शीसुद्धा तसे बोलत नाहीत. ‘संभवामि युगे युगे’ ही फक्त बोलण्यापुरते असते.

बट्र्राण्ड रसेल यांनी एका निबंधात म्हटले होते, की देवाचे अस्तित्व कुठच्याही अनुभवातून (साक्षात्कारींचा स्वयंभू अनुभव वगळता) वा तर्कशास्त्रात बसत नाही; पण असे असूनही हजारो वर्षे लोक देव आणि दानव, भूत-पिशाच्च आणि देवदूत अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत आले आहेत. प्रश्न हा आहे, की त्यांची अशी तर्कशून्य श्रद्धा कशातून निर्माण होते? रसेल यांनी पुढे म्हटले, की याचे एक मुख्य कारण माणूस हा पूर्णपणे ‘इरॅशनल अ‍ॅनिमल’ म्हणजे विवेक / तर्कशून्य प्राणी आहे आणि तरीही तितक्याच अतार्किकपणे त्याने स्वत:लाच ‘रॅशनल अ‍ॅनिमल’ ऊर्फ सुज्ञ-विवेकी प्राणी असे म्हणवून घेतले आहे.

का. अ. खासगीवाले

पोखरण दोनची चाचणी यशस्वी झाली की नाही, याबद्दल चर्चा झडत आहेत. पण सध्याच्या प्रश्ानंच्या संदर्भात अशा चर्चांना खरोखरच काही अर्थ आहे का? विशेषत: ग्लोबल वॉमिर्ंगमुळे पर्जन्यमान असेच अनिश्चित होत राहून, पाणी, अन्नधान्य, भाजीपाला यांची टंचाई होत राहाण्याची चिन्हं आहेत. दोन वेळ पोटभर अन्नाचे सोडाच पण स्वच्छ पेय जलाला मोताद असलेली भारतीय लोकसंख्या खूप आहे. असे असतानाही गुप्तता, स्वामिनष्ठा, सार्वजनिक हित वगैरेंच्या शपथांचा अर्थ झुगारून ६० वर्षांपूर्वी काय झाले? याची राजकीय नेते व १५ वर्षांपूर्वी काय घडले याची चर्चा शास्त्रज्ञांना करताना पाहून बुद्ध पुन्हा हसत आहे.
…………

जीनांच्या निधमीर्पणाची ग्वाही देत, फाळणीला आपल्याच नेत्यांची सत्तालालसा कशी कारणीभूत झाली? कंदाहार विमान अपहरण प्रकरणी खरे दोषी कोण? यांच्या प्रतिपादनांची राजकीय धूळ जरा खाली बसत असतानााच, पोखरण दोन ‘शक्ती’ अणुबाँब चाचणी शंृृंखलेत एस १ या हैड्रोजन बाँबच्या चाचणीच्या यशस्वीतेबद्दल आता पंधरा वर्षांनी किरणोत्सारी धूळ उठत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष बुश यांनी इंडो-अमेरिकन अणुकरार करताना भारतावर अण्वस्त्र चाचणी बंदी करारावर सही करण्याची सक्ती केली नव्हती; कारण पोखरण दोनच्या अनुभवावरूनच अशी सक्ती स्वीकारावी लागलीच तरी त्या अंतर्गतच आपण प्रयोग आणि प्रगती करू शकू याची पूर्ण खात्री झाली होती. म्हणूनच आपण स्वेच्छा बंदी (मोरॅटोरीयम) घालून घेतली. त्यामुळेच शेजाऱ्यांनी प्रथम अणुहल्ला करू नये इतका धावा (मिनिमम क्रीडिबल डीटरनन्स) त्यांना वाटावा इतके अणुबॉम्ब (अंदाजे १०) बाळगण्यास आपल्याला परवानगी दिली.

अध्यक्ष ओबामा सत्तेवर येताच भारताला बंदी करारावर सही करण्यास भाग पाडावे असा दबाव वाढल्यामुळेच ते आता कोलांटी उडी मारत आहेत. ही बातमी येताच, पोखरण दोन शृंखलेत हायड्रोजन बाँब एस १ चाचणी यशस्वी झाली का, फुसकी ठरली? यशस्वी झाली नसली तरीही बंदी स्वीकारावी का? या राजकीय अधिक आण्विक चचेर्ची किरणोत्सारी धूळ पंधरा वर्षांनी उडत आहे.

माजी राष्ट्रपती कलाम आणि संरक्षण खात्याचे प्रमुख (डीआरडीओ) संताम एका बाजूस, दुसऱ्या बाजूस अणुऊर्जा (डीएई) खात्याचे निवृत्त प्रमुख, सेठना, अय्यंगार, प्रसाद असे बलाढ्य अधिकारी आहेत. तिसऱ्या बाजूस, ब्रिजेश मिश्ाा, नारायणन असे माजी-आजी सुरक्षा सल्लागार आहेत. तर चौथ्या बाजूस आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा, किरणोत्सर्ग, भूकंपशास्त्र तज्ज्ञ आहेत. विद्यमान अणुऊर्जा प्रमुख डॉ. काकोडकर व राष्ट्रपतींचे सल्लागार चिदंबरम या सर्वांचा समारोप करू पहात आहेत.

हे सर्व जरी आपणा सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाशी थेट निगडित नसले तरीही यावरचा अफाट खर्च व खऱ्या सुरक्षिततेशी अप्रत्यक्षरीत्या निश्चित निगडित आहेत. यासाठीच राजस्थानातील खेतोली या गावापासून अवघ्या पाच कि.मी. दूर असलेल्या पोखरण दोन या चाचणी मैदानात ११-५-१९९८ ते १३-५-१९९८ बहुतांशी माध्यान्ह काळी म्हणजे १२.२१ ते १५.४५ या काळात काय घडले ते जाणून घेऊ. तेथे एस १ ते एस ५ असे निरनिराळ्या क्षमतेचे, निरनिराळ्या हेतूने पाच अण्वस्त्र स्फोट घडवून आणले. बाकीच्या चार स्फोटांबद्दल फार मतभेद नाहीत. तथापि एस १ या ४५ किलोटन (टी.एन.टी.) क्षमतेच्या हायड्रोजन बॉम्ब चाचणीबद्दल मात्र पराकोटीचे मतभेद आहेत. एरवी मेगॅटन प्रमाणात वापरली जात असतानाही, एस २, एस ३, एस ४, एस ५ या इतर चाचण्यांना व मुख्यत: आसपासच्या गावांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देऊन सर्व ‘बारुदे’ किलो प्रमाणातच वापरली. आर. चिदंबरम या अणुऊर्जा खात्याच्या प्रमुखांनी जाहीर केले की ‘या अनुभवारून भारत २०० केटी (टीएनटी) क्षमतेचे हायड्रोजन बॉम्ब निश्चित बनवू शकेल.’ यात १५ वर्षांनी वाद उकरून काढण्याजोगे काहीही नाही. भारत अणुबॉम्ब बनवू शकतो हे तर सिद्धच आहे. आता हायड्रोजन बॉम्बही बनवू शकतो हेही सिद्ध झाले. पण प्रथम स्पष्ट केल्याप्रमाणे ओबामांच्या फिरकीमुळेच हा सर्व गदारोळ उठला.

थमोर्न्युक्लिअर उर्फ हायड्रोजन बॉम्ब हे एक विनाशकाकरी अस्त्र. एक अण्वस्त्र तर हे ‘ब्रह्माास्त्र.’ अमेरिकेने, पॅसिफिक महासागरात दूर खाली ‘एविनटोक’ बेटावर अशा बॉम्बच्या केलेल्या चाचणीत त्या बेटावरचा सर्व पृष्ठभागच नष्ट झाला. डबल भूछत्रासमान किरणोत्सारी ढगाची राख हजारो मैल दूर जपानी किनारा आणि मच्छीमार बोटींवर पडून कैकांना कॅन्सरबाधा झाली. अजूनही ते बेट पूर्ण ‘शांत’ झालेलं नाही. या ब्रह्माास्त्राचा उपयोग शांततामय, कल्याणकारी कामास झाल्याचे वृत्तांत आढळत नाहीत. हा झाला संहारक परिचय.

उरला प्रश्ान् आपली हायड्रोजन बॉम्ब चाचणी एस १ कितपत यशस्वी झाली? गौरी बिडणूर (भारत) व आलिर्ंग्टन (यूएसए) येथील माहिती केंदांच्या भूकंपमापनानुसार यशस्वी झाली; पण आपण म्हणतो तितकी नाही. या बॉम्बच्या चाचणीनंतर २२ सोडियम व ५४ मॅगॅनीज या नवउत्सजिर्त अणूंचे प्रमाण अणुस्फोटाहून खूप जास्त आढळते. ते तसे आढळले. यावरून सिद्ध होते की आपला हायड्रोजन बॉम्ब ‘फुसका’ बार मुळीच नव्हता. अशा बॉम्बमध्ये दुसऱ्या (सेकंडरी, फ्यूजन) स्फोटाची क्षमता ५० टक्क्याहून जातच नाही अशी माहिती मिळते. ही जी माहिती मजसारख्या सामान्याला मिळते ती तज्ज्ञांना नाही असे मानणे फार कठीण आहे. स्फोट करण्याशी डीआरडीओचा प्रत्यक्ष संबंध काहीही नव्हता. त्यांचे किरणोत्सार मापन यंत्र त्या दिवशी बंद पडले होते. तरीही संताम त्या वेळीच का बोलले नाहीत? आज १० वर्षांनी का? त्याचप्रमाणे अय्यांगारही आखणी किंवा चाचण्या यांत सहभागी नव्हते. त्यांचा मतभेद यशस्वितेच्या टक्क्यांबद्दल आहे. सारांश, हायड्रोजन बॉम्ब चाचणी एस १ यशस्वीच झाली आहे. आणि आपण आपल्या गरजेनुसार असा बॉम्ब बनवू शकू.

खरा मुद्दा निराळाच आहे. शेजाऱ्यांनी जर प्रथम अणुहल्ला कुठल्याही भारतीय महानगरांवर केला, तर उर्वरित जीवित भारतीय त्यांच्या पाच शहरांवर प्रति अणुहल्ला करू शकतील का नाही? होय! तितके अणुबॉम्ब व जिगरबाज संरक्षक दल समर्थ आहेत. पण अणु-हायड्रोजन बॉम्बची गोष्ट बाजूला ठेवा. शेजाऱ्यांचे भाडोत्री गुंड दरवषीर् साध्या बंदुकी, बॉम्बनीच, मुंबई, अहमदाबाद, दिल्लीकरांना हैराण करून राहिले आहेत. साधे ट्रॉलर पळवून समुदमागे मुंबई तीन दिवस ताब्यात ठेवतात. हे जोपर्यंत बंद होऊ शकत नाही, तोपर्यंत हायड्रोजन बॉम्ब, न्यूक्लियर पाणबुडी यांची जरूरी आहे? त्याहीपेक्षा अक्राळ-विक्राळ यक्ष प्रश्ान् म्हणजे धरणी ज्वरामुळे (ग्लोबल वॉमिर्ंग) पर्जन्यमान असेच अनिश्चित होत राहून, पाणी, अन्नधान्य, भाजीपाला यांची टंचाई होत रहाणार. दोन वेळ पोटभर अन्नाचे सोडाच पण स्वच्छ पेय जलाला मोताद असलेली भारतीय लोकसंख्या खूप आहे. असे असतानाही, गुप्तता, स्वामिनष्ठा, सार्वजनिक हित वगैरेंच्या शपथांचा अर्थ झुगारून ६० वर्षांपूर्वी काय झाले? याची राजकीय नेते व १५ वर्षांपूर्वी काय घडले याची चर्चा शास्त्रज्ञांना करताना पाहून बुद्ध पुन्हा हसत आहे.

ए पी जे अब्दुल कलाम, सौजन्य – लोकसत्ता

आज शिक्षकदिन! डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या या जन्मदिनी निरनिराळ्या क्षेत्रांतील मान्यवरांनी त्यांच्या शिक्षकांबद्दल लिहावे, यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क साधला. आश्चर्याचा पहिला धक्का दिला भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी! त्यांनी चक्क दीड दिवसांत आपले उत्स्फूर्त व सविस्तर मनोगत पाठविले. युवापिढीला समर्थ राष्ट्राचे स्वप्न बघायला शिकविणाऱ्या या ऋषितुल्य व्यक्तिमत्त्वाने या पत्रातून त्यांच्या शिक्षकांच्या स्मृती तर जागवल्याच; त्याचबरोबर आजच्या शिक्षकांसाठी एक खास प्रतिज्ञाही लिहून पाठविली. आजच्या पुरवणीत विविध क्षेत्रांतील प्रतिभावंतांनी त्यांच्या शिक्षकांच्या सांगितलेल्या हृद्य आठवणी प्रसिद्ध करीत आहोत. देशाची भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांना वंदन करण्याचा आमचा हा प्रयत्न शिक्षकांचे मनोबल वाढविणारा ठरेल, यात शंकाच नाही.

—————————————————————————————————————-

माझे औपचारिक शिक्षण सुरू झाले १९३६ साली. मी तेव्हा पाच वर्षांचा होतो. रामेश्वरम पंचायत प्राथमिक शाळेत मुथू अय्यर यांनी मला पहिले पाठ दिले- साक्षरतेचे आणि सदाचाराचेही. त्या पहिल्या इयत्तेत मी चांगला अभ्यास केला म्हणून अय्यर सर चक्क माझ्या घरी आले होते आणि त्यांनी माझ्या आई-वडिलांना माझे कौतुक सांगितले. त्यामुळे माझ्या आईने माझ्यावर खूश होऊन चक्क माझ्या आवडीचा गोड पदार्थ बनवला आणि  मला खाऊ घातला होता! ते प्रोत्साहन तेव्हा मला किती मोलाचे वाटले होते! एके दिवशी मला ताप आला म्हणून मी शाळेत गेलो नव्हतो, तर अय्यर सर काळजीपोटी घरी विचारपूस करायला हजर. सर म्हणजे फक्त वर्गात शिकवत नाहीत, तर ते आपली काळजी घेतात, ही व्याख्या मनात ठसली. तेव्हा माझे हस्ताक्षर फारसे चांगले नव्हते. अय्यर सरांनी माझ्याकडून प्रयत्नपूर्वक ते सुधारून घेतले. ते सर स्वत: अतिशय सदाचारी होते आणि आमच्यात चांगल्या सवयी भिनाव्यात याकडे त्यांचा कटाक्ष असे, असे माझ्या वडिलांनी मला मोठेपणी आवर्जून सांगितल्याचे आठवते.

आठवीत मला इयादुराई सोलोमन नावाचे शिक्षक होते. त्यांनी फार महत्त्वाची शिकवण दिली- जीवनात यशस्वी होण्यासाठी तीन गोष्टी आवश्यक ठरतात- ‘इच्छाशक्ती, श्रद्धा आणि आकांक्षा.’ जबर इच्छाशक्ती बाळगून, प्रयत्नांवर विश्वास ठेवून स्वप्नांचा पाठलाग केला, तर यश नक्की मिळतं हे रेव्हरंड सोलोमन सरांचे तत्त्वज्ञान. वर्गात अभ्यासात मागे पडणाऱ्या मुलांकडे ते विशेष लक्ष देत आणि त्यांची इच्छाशक्ती वाढवण्यासाठी त्यांना प्रेरित करीत. मूल्याधारित शिक्षणाची कास धरणे आणि मुलांमध्ये प्रेरणा व आकांक्षा निर्माण करणे हे शिक्षकांचे महत्त्कार्य आहे. आजच्या शिक्षकांनी जर हे लक्षात ठेवले तर ते नक्कीच उत्तम पिढी घडवू शकतील.

मी त्रिचीच्या सेंट जोसेफ कॉलेजमध्ये शिकत असताना आम्हाला रेव्ह. फादर टी. एन. सिक्वेरा शेक्सपिअर शिकवत असत. आम्हाला वाटायचे जर खुद्द शेक्सपीअर त्यांच्या लेक्चरला बसला असता, तर त्यांचे ते रंगून जाऊन शिकवणे बघून सद्गदित झाला असता. सिक्वेरा सर आमच्या हॉस्टेलचे वॉर्डनही होते. रोज रात्री ते हॉस्टेलला फेरी मारायचे. एकदा माझा रूममेट सच्चिदानंदन आजारी होता. फादर सिक्वेरांनी त्याची आस्थेने विचारपूस केली. त्याला औषध दिले. डॉक्टरांकडे पाठवले आणि आमच्या एका मित्राच्या हातात कोरे आंतरदेशीय पत्र देत ते म्हणाले, ‘आधी त्याच्या वडिलांना पत्र पाठवून कळव बरं?’ कारण सच्चिदानंद त्याच्या वडिलांना अजिबात ख्यालीखुशाली कळवत नसे हे फादर सिक्वेरांना माहीत होते. फादर सिक्वेरा या पितृतुल्य व्यक्तीने आम्हाला जे प्रेम दिले, त्यातून आम्ही परोपकार शिकलो. हेच ‘फादर’ आम्हा मातृभाषेतून शालेय शिक्षण घेऊन कॉलेजला आलेल्या विद्यार्थ्यांसाठी रोज सायंकाळी खास इंग्रजी भाषेचा वर्ग घेत असत. त्यांनी आम्हाला इंग्रजी वाचनाची गोडी लावली.

न्युक्लिअर फिजिक्सचे प्रा. चिन्नादुराई यांचाही माझ्या जडणघडणीवर मोठा प्रभाव आहे. त्यांनी फक्त तो विषय शिकवला नाही, तर त्या विषयावरचे संदर्भग्रंथ व अभ्यासपूर्ण लेख वाचायला दिले. या विषयात मूलभूत संशोधन करण्याची प्रेरणा त्यांनी दिली. आजही मी त्यांना भेटतो आणि पुन्हा पुन्हा नव्याने भारावला जातो.

प्रो. थोथात्री अय्यंगार हेही मला लाभलेले एक विलक्षण शिक्षक. सेंट जोसेफ कॉलेजमध्ये ते आमचे गणिताचे प्राध्यापक म्हणजे चालताबोलता ज्ञानकोष होता. मला आठवते, त्यांनी एकदा आम्हाला भारतातील ‘प्राचीन गणिती आणि खगोलतज्ज्ञ’ या विषयावर लेक्चर दिले होते. आर्यभट्ट हे थोर गणिती होते तसेच खगोलतज्ज्ञही, हे त्यांनी आम्हाला सोदाहरण पटवून दिले होते. ते लेक्चर आजही माझ्या कानात घुमते आहे. प्राचीन भारतीय संस्कृतीचे गणित-विज्ञानातील योगदान किती मोठे होते, हा नवा दृष्टिकोन तेव्हा आम्हाला अय्यंगार सरांमुळे मिळाला होता.

मूल्यशिक्षणाला फाटा दिल्यास शिक्षण ही संकल्पना पूर्ण होऊच शकत नाही. खरे तर शिक्षकांकडून मुलांपर्यंत स्वाभाविकपणे मूल्ये  झिरपली पाहिजेत. आमचे तर भाग्य की आम्हाला रेव्ह. फादर रेक्टर कलाथिल नावाचे खास शिक्षक होते. जे दर सोमवारी एक तास चक्क गोष्टी सांगायचे. गौतम बुद्ध, कॅल्क्युलस, सेंट ऑगस्टिन, म. गांधी, आईनस्टाईन, अब्राहम लिंकन अशा थोरांच्या गोष्टी ते सांगत. या व्यक्तींचे मोठेपण सांगताना माणसाने मोठे व्हायचे म्हणजे नेमके कोणते गुण अंगी बाणायचे, याची व्याख्या मनात ठसून गेली.

मी चेन्नईला एम.आय.टी. कॉलेजमध्ये एरोनॉटिकल इंजिनिअरिंग शिकत असताना आम्हाला प्रो. श्रीनिवासन प्रोजेक्ट डिझायनिंग शिकवत. अख्ख्या टीमने मिळून विशिष्ट वेळेत प्रोजेक्ट पूर्ण करण्याचे कौशल्य आम्ही शिकावे हा त्यांचा कटाक्ष असे. हा गुण आम्हाला प्रत्येकाला आयुष्यभर उपयोगी ठरला.
या सर्व शिक्षकांकडून मला मोठे संचित मिळाले. त्यांच्यामुळे जीवनाला मूल्याधार मिळाला. कल्पनाशक्ती फुलवण्याची स्फूर्ती दिली. आत्मविश्वासाचे पंख दिले आणि स्वाभिमानाने स्वतंत्र विहार करण्याची ताकद दिली.

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

तत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केले होते। ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम!’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे!’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहे?आपल्यातला ‘मी’चा उगम व विकास, त्यातून येणारा ‘अहं’ आणि त्या एकाच ‘मी’चे होणारे अनेक आविष्कार हे केवळ ‘मेंदू’पुरते मर्यादित ठेवता येत नाहीत, असेही शास्त्रज्ञांचे मत आहे.

मी कोण आहे? कुठून आलो? कुठे जाणार आहे? हे वा असे प्रश्न सर्वाना कधी ना कधी पडतातच. विशेषत: कुणाच्या मृत्यूनंतर वा स्मशानात जाऊन आल्यानंतर. ती सुन्न भावना फार काळ टिकत नाही आणि प्रत्येक जण दैनंदिन व्यवहारात पूर्ण बुडून जातो. कधी ते दु:ख दीर्घकाळ मनातल्या मनात स्रवत राहते, कधी आटून जाते; पण प्रत्येकाला आपणही मरणारच आहोत, याची मनोमन खात्री असतेच. मरण म्हणजे पूर्णविराम!जवळजवळ सर्वानाच जीवनाची आसक्ती असते. (आत्महत्या करणाऱ्यांनासुद्धा मरणाची आसक्ती नसते. त्यांची जगण्याची आसक्ती इच्छेनुसार पुरी होत नाही म्हणून ते आत्महत्या करतात. म्हणजेच आत्महत्यासुद्धा जीवनासक्तीचाच एक आविष्कार- कितीही विरोधाभास त्यात वाटला तरीही!) या दुर्दम्य (आणि अनाकलनीयही) जीवनासक्तीमुळेच माणसाला ‘अमर’ व्हावे असे वाटू लागले. अगदी प्राचीन काळी, माणसाच्या प्राथमिक अवस्थेत, जोपर्यंत त्याला मरणाची अपरिहार्यता ध्यानात आली नव्हती, तोपर्यंत ‘अमरत्वा’ची संकल्पना निर्माण झाली नाही; परंतु मेलेली व्यक्ती ‘परलोकी’ म्हणजे दुसऱ्या ‘प्रकारच्या’ जीवनविश्वात गेली, असे मानले जाऊ लागले. अनेक अंधश्रद्धांचा उगम या जीवन-मरणाच्या गूढामुळे झाला आहे.

त्या ‘गूढा’चा वैज्ञानिक भेद करण्याचे एका प्रसिद्ध गणिती व शास्त्रज्ञ व्यक्तीने ठरविले. त्याचे नाव थॉमस डोनाल्डसन. गणित, जीवशास्त्र आणि ‘इन्फर्मेशन सायन्स’ (‘माहितीशास्त्र’ असे याचे भाषांतर होऊ शकत नाही) यात प्रदीर्घ संशोधन केलेल्या डोनाल्डसनलाही तेच प्रश्न पडले होते, जे सामान्यांना आणि भल्या भल्या तत्त्वज्ञांनाही पडतात- मी कोण आहे? कुठून आलो आणि कुठे जाणार आहे?जेव्हा डोनाल्डसनने या प्रश्नांचा विचार सुरू केला तेव्हा त्याला त्यातील उपप्रश्न अधिक भेडसावू लागले. ‘मी कोण आहे?’ या प्रश्नापेक्षा ‘मी म्हणजे कोण,’ हे अगोदर ठरवावे लागेल आणि हा ‘मी’ किंवा ‘अहं’ नक्की कुठे व कसा निर्माण होतो, तेही.‘मी’पणाची जाणीव आणि माझे ‘अस्तित्व’ आपल्या मेंदूत ठरते, असे त्याला वाटले. पण त्याचबरोबर त्याला जन्म-मृत्यूचे रहस्यही भेदायचे होते. अचेतन वस्तूला- म्हणजे खडक, दगड, धोंडे, वाळू यांना जीवसृष्टीचे नियम, म्हणजे जन्म-विकास-विनाश/ मृत्यूचे चक्र लागू नसते. हे कळण्यासाठी अर्थातच ‘वैज्ञानिक’ असण्याची गरज नव्हती. डोनाल्डसनचा जन्म १९४५ चा. दुसऱ्या महायुद्धानंतरचा. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर विज्ञान-विचाराने, प्रयोगशीलतेने आणि धाडसी कल्पनांनी एकच झेप घेतली होती. अणुविभाजनापासून- कॉम्प्युटर्स/इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीपर्यंत आणि जेनेटिक्स/डीएनएपासून विश्वाच्या जन्मकहाणीपर्यंतच्या संशोधनाचा प्रचंड विस्तार आणि विकास गेल्या ६०-७० वर्षांत झाला आहे. हे सर्व विज्ञान जरी सुमारे पाच-सहाशे वर्षेच ‘वयाचे’ असले तरी गेल्या ६०-७० वर्षांमधील त्याची झेप अक्षरश: अचाट आहे!

डोनाल्डसन पंचविशीत असतानाच त्याला वाटू लागले की, ‘मरण’ ही गोष्टच ‘अनैसर्गिक’ आहे! कारण शरीर हे एक यंत्र आहे. हृदयक्रिया बंद पडली की माणूस मरतो असे आपण मानतो. ‘मरतो’ म्हणजे ‘सचेतन’ माणूस ‘अचेतन’ होतो. कृत्रिमरीत्या हृदयक्रिया चालू ठेवण्याचे, इतकेच नव्हे तर एकाचे हृदय दुसऱ्याला लावण्याचे, हार्ट ट्रान्स्प्लॅन्टचे, शल्यशास्त्र तेव्हा प्रचलित होते. त्यानंतर ‘ब्रेन डेड’ची संकल्पना आली. जोपर्यंत ‘मेंदू’ मृतवत होत नाही, तोपर्यंत एखादी व्यक्ती ‘मेली’ असे मानता येणार नाही असे वैज्ञानिकांनीच नव्हे तर न्यायालयांनीही मान्य केले. त्यानंतर वैद्यकविश्वात ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्टस्’चे प्रयोग व चर्चा सुरू झाली. ससे, डुक्कर, वानर यांच्या मेंदूंवर आणि त्यांच्या ‘ब्रेन ट्रान्स्प्लॅन्ट्स’चे प्रयोग करण्यात येऊ लागले.तोपर्यंत तत्त्वज्ञानाने एक सूत्र जवळजवळ मान्य केलेलेच होते. ‘आय थिंक, देअरफोर आय अ‍ॅम!’ म्हणजे ‘मी विचार करतो हाच माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे!’ पण हा विचार कोण करतो- म्हणजे शरीराच्या कुठच्या भागात विचारकेंद्र आहे?डोनाल्डसनचे मत होते की, मेंदू हे ते विचारकेंद्र.

वयाच्या ४३ व्या (१९८८ साली) वर्षी डोनाल्डसनला डोकेदुखीचा त्रास होऊ लागला. तपासणी केल्यावर लक्षात आले की त्याच्या मेंदूवर एक छोटासा ‘टय़ूमर’ आहे. आपल्याला कॅन्सर झाला आहे हे लक्षात आल्यावर त्याने स्वत:वरच प्रयोग करून घ्यायचे ठरविले. त्याने काही शल्यविशारदांना सांगितले की ‘‘नाहीतरी मी लवकरच मरणार आहे. मी जिवंत आहे तोवरच माझा मेंदू ‘क्रायोनिक’ शस्त्रक्रिया करून काढून घ्या. जेव्हा केव्हा, म्हणजे पाच-पन्नास वर्षांनी या कॅन्सरवर उपाय सापडेल तेव्हा ती शस्त्रक्रिया करा आणि ते डोके परत जोडून टाका. माझे धड आणि डोके मायनस ३२० फॅरनहाइट तापमानात ठेवा. त्या तापमानात ते खूप काळ आहे त्या स्थितीत राहू शकेल. उपाय सापडेपर्यंत शरीर व डोके त्या स्थितीत ठेवण्यासाठी दर वर्षांला एक लाख डॉलर खर्च येईल. मी पैशाची सोय करून ठेवीत आहे.’’ डोनाल्डसनच्या या सूचनेवर शल्यविशारदांची बैठक झाली. त्यांनी म्हटले की, जिवंत असताना मेंदू बाजूला काढणे म्हणजे डोनाल्डसनला ठार मारणे आहे. तो कायद्याने खून ठरेल. त्यामुळे तसे करणे शक्य नाही. डोनाल्डसन जिद्दीला पेटला होता. त्याने अमेरिकन न्यायालयाला विनंती केली, की विज्ञानाच्या प्रगतीसाठी आणि माणसाला अमरत्व प्राप्त करण्याच्या प्रयोगांसाठी त्याला तो प्रयोग करण्याची परवानगी द्यावी.न्यायालयाने परवानगी नाकारली. डोनाल्डसन ज्या संस्थेमार्फत हा प्रयत्न करीत होता त्याचे संस्थेचे नाव आहे अल्कर लाइफ एक्स्टेन्शन फाऊंडेशन (Alcor Life Extension Foundation). या संस्थेचे तेव्हा अध्यक्ष होते कार्लोज मोंड्रागॉन. अध्यक्षांनीही न्यायालयाला सांगितले की, ‘‘हा खून मानला जाऊ शकत नाही. कारण उपाय मिळताच आम्ही डोके त्या शरीराला जोडून त्याला ‘शुद्धीवर’ आणणार आहोत.’’ या संस्थेच्या मते तो मरणार नाही तर अ‍ॅनास्थाशिया दिलेल्या रुग्णाप्रमाणे ‘सस्पेन्डेड’ जीवनस्थितीत असेल.’’ न्यायालयाने या संस्थेचे म्हणणे स्वीकारले नाही.

‘क्रायोनिक सस्पेन्शन ऑफ लाइफ’ ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. या प्रक्रियेवर अधिक संशोधन सुरू होण्यापूर्वी अमेरिकेत ‘लाइफ एक्स्टेन्शन सोसायटी’ स्थापन झाली होती. डोनाल्डसन हा जिद्दीचा भविष्य-वेधी वैज्ञानिक होता. त्याने आजारी असतानाच अमरत्वाच्या शक्यतेविषयी आणि ‘२४ व्या शतकातील आरोग्या’विषयी प्रबंध लिहिला होता. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ‘मेंदूत’ साठविलेली सर्व माहिती (म्हणजे आठवणी, विचार, भावना, ज्ञान इत्यादी) कॉम्प्युटरप्रमाणे जशीच्या तशी राहील आणि ती पुन्हा प्राप्त करता येईल. न्यायालयाने परवानगी न दिल्यामुळे त्याने असे मृत्युपत्र केले की तो मरताक्षणी त्याला वैद्यकीय शीतपेटीत ठेवण्यात यावे. तीन वर्षांपूर्वी (जानेवारी १९, २००६) डोनाल्डसन रूढ अर्थाने मरण पावला आणि आता त्याच्या शरीरावर A-1097 हा क्रमांक चिकटवून त्याचा देह शीतपेटीत ठेवण्यात आला आहे. असे आणखीही काही देह त्या प्रयोगशाळेत आहेत. परंतु त्यांना मृतदेह असे म्हणता येणार नाही आणि ते ज्या पेटीत बंद आहेत, तिला ‘शवपेटी’ असेही म्हणता येणार नाही.डोनाल्डसनला ‘मी कोण आहे? कुठून आलो? आणि कुठे जाणार आहे,’ हे प्रश्न पडले होते, पण त्यातल्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तर त्याने ‘शोधले’ होते. ते उत्तर होते, ‘मी कुठेही जाणार नाही! शिवाय मी पुन्हा शुद्धीवर येईन तेव्हा तो पुनर्जन्म नसेल. कारण मी मेलेलो नाहीच- फक्त दीर्घकाळ बेशुद्धावस्थेत आहे!’रेमंड कुर्झवेल हा एक जगप्रसिद्ध फ्यूचरॉलॉजिस्ट म्हणजे त्रिकालवेधी शास्त्रज्ञ विचारवंत आहे. त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्या गतीने विज्ञान-तंत्रज्ञान विकासते आहे ते पाहता पुढील ४०-५० वर्षांतच ‘लाइफ एक्स्टेन्शन’चे प्रयोग सिद्ध होतील.या संबंधात, याच स्तंभातून लिहिताना यापैकीकाही मुद्दे पूर्वी मांडले होते. परंतु तेव्हा ‘मी कोण आहे?’ या विषयावरील संशोधन आज कुठपर्यंत आले आहे त्याचे संदर्भ दिलेले नव्हते.

‘मी कोण आहे,’ याबद्दलची मुख्य मांडणी आता समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ करीत आहेत. अर्थातच जीवशास्त्रात आणि मेंदूविषयक झालेल्या संशोधनाच्या मदतीने. डग्लस हॉपस्टअ‍ॅटर (Douglas Hofstadter) आणि डॅनिएल डेनेट (Daniel Dennett) यांनी सुमारे ३० वर्षांपूर्वी एक पुस्तक प्रसिद्ध केले. ‘The Mind’s I’ हे त्या पुस्तकाचे नाव. आपल्यातला ‘मी’चा उगम व विकास, त्यातून येणारा ‘अहं’ वा ‘इगो’ आणि त्या एकाच ‘मी’चे होणारे अनेक अविष्कार हे केवळ ‘मेंदू’पुरते मर्यादित ठेवता येत नाहीत असे त्यांचे मत आहे.त्यातूनच आता ‘कॉन्शियस स्टडीज्’ ही नवीन संशोधन शाखा जन्माला आली आहे. प्रत्येक व्यक्तीचा एका मोठा ‘कॉन्शियसनेस कॅनव्हास’ असला तरी त्याच्या स्वभावाचे वेगवेगळे आविष्कार होतात. एखादी अतिशय व्यवस्थितपणे वागणारी व्यक्ती एकदम विचित्र वागते, एखादा साधा माणूस खूनही करायला प्रवृत्त होतो (पूर्वी कधीही गुन्हेगारी प्रवृत्ती नसलेला), किंवा इतर वेळेस समजूतदारपणे वागणारी व्यक्ती एकदम बेभानपणे आणि बेदरकारीने वागते वगैरे वगैरे. डॅनिएल डेनेट या विचारवंत संशोधकाने लिहिलेल्या ‘Brainstorms : Philosophical Essays on Mind and Psychology’ या पुस्तकात माणसाच्या मनाचा, मेंदूचा, व्यक्तिमत्त्वाचा, स्वभावाचा शोध घेताना असेही म्हटले आहे की, एकच ‘मी’ आहे असे गृहीत धरता कामा नये.

‘स्किझोफ्रेनिया’ वा दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाविषयीचे संशोधन सिग्मंड फ्रॉइडने व इतर काही मानसशास्त्रज्ञांनी एकोणिसाव्या शतकातच सुरू केले होते.आता विज्ञान व तत्त्वज्ञान एकमेकांत अशा रीतीने मिसळून जाऊ लागले आहे की, शरीरशास्त्र व जीवशास्त्रापासून, न्यूरॉलॉजी व मेंदूविषयक संशोधनापासून मानसशास्त्र आणि समाजशास्त्र वेगळे करणे अशक्य होत आहे.समाजच नसेल, सामाजिक/ कौटुंबिक/ सांस्कृतिक जीवनच नसेल तर ‘मी’ आणि ‘अहं’- इगो जन्मालाच येत नाही! पृथ्वीवर एकच माणूस जन्माला आला असता तर ‘मी’चा उगम झालाच नसता. इतके कशाला, रॉबिन्सन क्रूसोला तो जंगलात एकटा सापडल्यावर इतर माणसांबरोबर स्वत:चाही नवा शोध लागत होता!