Posts Tagged ‘शिक्षक दिन’

नरहर कुरुंदकर, व्यक्तिवेध या पुस्तकातुन साभार

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे भारताचे दुसरे राष्ट्रपती व्हावेत हा एक आश्चर्यकारक योगायोग होता. ज्यांची विवेकबुद्धी त्यांच्या राजकारणावर कधी कधी मात करते असे राजकीय इतिहासातील राधाकृष्णन हे एक उदाहरण होय.पहिले राष्ट्रपती राजेंद्रबाबू हे सात्त्विक, सज्जन, चारित्र्यसंपन्न म्हणून प्रसिद्ध होते. प्रत्यक्षात ते अतिशय कसलेले मुत्सद्दी होते. राजकारणी व संघटनेवर बळकट पकड असणारे नेते होते. स्वातंत्र्य युद्धातून तावून सुलाखून निघालेले देशभक्त होते. तिसरे राष्ट्रपती झाकीर हुसेन हे थोर शिक्षण शास्त्रज्ञ, चारित्र्यवान आणि आदरणीय असे गृहस्थ होते. जुने कॉंग्रेसमन व देशभक्त होते.

डॉ. राधाकृष्णन यांची परिस्थिती याहून निराळी होती. ते कोणत्याही राजकीय़ पक्षांशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्यांच्या जीवनात नव्हत्या. म. गांधींशी त्यांचे संबंध होते. पण तेही देशावर प्रेम करणार्‍या नागरिकांचे राष्ट्रनेत्याशी आदराचे संबंध असावेत असे होते. कोणाशीही त्यांचे घनिष्ठ व व्यक्तिगत संबंध नव्हते. राधाकृष्णन हे तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्धी होती. कॉंग्रेसमधील शेकडो, हजारो लोक त्यांच्या ग्रंथांचे चाहते होते. स्वत: जवाहरलाल नेहरु त्यांच्या लेखनाचे चाहते होते. पण त्यांचा कॉंग्रेस राजकारणाशी काही संबंध नव्हता. राजकीय नेते मधून मधून त्यांना भेटत; पण त्यांच्याशी ते राजकारणावर कधी बोलत नसत.

त्यांच्या जीवनात प्रमुख तीन प्रश्न होते. आणि कुणाशीही ते याच तीन प्रश्नांच्या अनुरोधाने बोलत. पहिला प्रश्न असा की, नीतिमान पण चिकित्सक, विज्ञानोन्मुख पण अध्यात्मप्रवण असा नवा माणूस कसा निर्माण करता येईल? या दृष्टीने शिक्षणाचा काही उपयोग होऊ शकेल का? दुसरा प्रश्न असा होता की, प्राचीन भारतीय तत्त्वचिंतन सर्व जगाला आधुनिक भाषाशैलीत, आधुनिक पद्धतीने कसे समजावून सांगता येईल? भारतीय तत्त्वचिंतनाचे वैभव जगाला नेमकेपणाने कसे सांगावे? कसे पटवून द्यावे? तिसरा प्रश्न असा होता की; मानव जातीचे भवितव्य घडवण्यासाठी सांस्कृतिक संचिताचा उपयोग किती?

स्वातंत्र्याच्या उदयकाळी कॉंग्रेसचे श्रेष्ठ नेते राधाकृष्णन ह्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांनी संविधान सभेचे सदस्य होण्यास पाचारण केले. आम्हांला तत्त्वज्ञ मार्गदर्शकाची गरज होती. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापूर्वी काही वर्षे ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापीठाचे ते कुलगुरु होते. प्रशासन त्यांनी सांभाळलेले होते. कौशल्याने सांभाळलेले होते. पण त्यांना त्यात रस नव्हता. क्षमता नसणे ही जीवनाची उणीव असते. पण क्षमता असूनही रस नसणे हा ऋषीचा स्वभाव असतो. राधाकृष्णनच्या रुपाने तत्त्वज्ञ राजा आपल्यापुढे उभा आहे हे नेहरुंनी जाणले म्हणून त्यांना रशियाचे वकील म्हणून पाठवण्यात आले. पुढे १० वर्षे ते उपराष्ट्रपती होते. इ.स. १९६२ मध्ये ते भारताचे राष्ट्रपती झाले.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे असे राष्ट्रपती होते; ज्या माणसाचे राजकीय सामर्थ्य शून्य होते. संघटना, मुत्सद्देगिरी, डावपेच यांत जो रस घेत नव्हता; पण त्यांचे नैतिक वजनच एवढे मोठे होते की, त्या सामर्थ्यावर नतमस्तक होण्यात सत्तेलाही आपला गौरव झाला आहे असे वाटे. दु:ख-निराशेच्या क्षणी ज्याचा सहवास हेच एक मोठे सांत्वन होते, असा हा आमचा राष्ट्रपती होता. राधाकृष्णन हे ऋजू स्वभावाचे म्हणूनच प्रसिद्ध होते. फटकळपणा, तुसडेपणा हा त्यांचा गुण नव्हता. पण त्यांचा सरळ, साधा प्रश्नच कित्येक वेळा समोरच्या माणसाला सपाट करत असे. एका मंत्र्याशी ते सॉक्रेटीसवर बोलत होते. सॉक्रेटीसचे असे एक मत आहे की, आपल्याला कोणकोणत्या विषयांत काहीही कळत नाही हे नक्की माहित असणे शहाणपणाचे लक्षण आहे. राधाकृष्णन उपराष्ट्रपती होते. त्यांनी मंत्र्याला विचारले, “आपल्याला ज्या विषयात काही कळत नाही त्यांची यादी तुम्ही केली आहे का?” मंत्री म्हणाले, “यादी आहे पण अपूर्ण आहे.” राधाकृष्णन म्हणाले, “काही हरकत नाही. आपण दोघं बसून ती यादी पूर्ण करुन टाकू”.

संकेत त्यांच्याकडून पाळले जातीलच याची खात्री नसे. सर्व संकेतांच्या पलीकडे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. संकेत मोडले जात; तेव्हा बहुधा सत्यच त्यांच्या तोंडून बाहेर पडे. हा गृहस्थ निर्भयपणे सत्य बोलण्याचा संभव आहे, याचीच अनेकांना जरब बसे.

डॉ. राधाकृष्णन सोव्हिएत रशियाला भारताचे वकील होते. स्टॅलीनने एकदा त्यांना भेटीसाठी बोलवले. स्टॅलीन सामान्यपणे लोकांना भेट देत नसे. पण हा जगतविख्यात तत्त्वज्ञ. त्यामुळे स्टॅलीनने त्यांना बोलावले. इकडच्या तिकडच्या औपचारिक बाबी बोलून झाल्यावर स्टॅलीन म्हणाले, “डॉक्टर, आपण रशियात आहातच तर रशियन जनतेने जी महान संस्कृती उभारलेली आहे, तीही पाहून घ्या. नव्या भारताच्या उभारणीला आमच्या अनुभवाचा उपयोग होईल.”

राधाकृष्णन म्हणाले, “महाराज, आकाशातून आपण पाखरासारखे उडू शकता व समुद्रात माशाप्रमाणे खोल वावरु शकता हे तर मलाही माहीत आहे. पण पृथ्वीवर माणसाप्रमाणे वागायला शिकलात का?” तत्त्वज्ञाने हुकुमशहाच्या तोंडावर त्याच्या हुकुमशाहीचा निषेध नोंदवण्याचाच हा प्रकार होता. पण स्टॅलीनने हा फटका शांतपणे सहन केला. वकिलाने काय बोलावे या संकेताचा हा भंगच होता. पण तत्त्वज्ञाने काय बोलावे याच्याशी हा मुद्दा सुसंगत होता. इतर कुणी असे बोलले असते तर चोवीस तासांत रशियातून त्याची हकालपट्टीच झाली असती.

त्यांची व स्टॅलिनची अजून एक भेट प्रसिद्ध आहे. स्टॅलीन आजारी होता. म्हणून तो अंथरुणावर निजलेला होता. राधाकृष्णन शेजारच्या कोचावर बसले होते. थोडीफार चर्चा झाल्यावर ते म्हणाले, “आज तुमची प्रकृती बरी नाही. मी नंतर भेटेन”, आणि ते स्टॅलीनच्या जवळ गेले. त्यांच्या चेहर्‍यावरुन हात फिरवत म्हणाले, “भल्या माणसा, थोडा विसावा घे. शरीराचे आजार हे असणारच, ते धैर्याने भोगावे, मनाच्या आरोग्याची काळजी घ्यावी.” स्टॅलीन म्हणाला, “त्यांचा हात किती वात्सल्य व मायेने भरलेला आहे.” आता हाही संकेतभंग होय! पण आजारी माणसाला तत्त्वज्ञ काय सांगणार?

राधाकृष्णनांच्या वत्सलतेला राष्ट्र सीमेची बंधने थोडीच होती? ते राष्ट्रपती असताना झेकोस्लोव्हाकियाला गेले. तेथील संसदेसमोर त्यांचे व्याख्यान होते. व्याख्यानात ते म्हणाले,”जगभर शांतता नांदावी आणि मानव जातीचा उत्कर्ष व्हावा, यावर तुमच्या आणि माझ्या राष्ट्राचे व जनतेचे एकमत आहे. पण प्रत्येक राष्ट्राचे काही निराळेपण असते. आम्ही असे मानतो की, संसदेचे काम शासनाची तपासणी करुन शासनावर वचक ठेवण्याचे आहे, तुमच्याप्रमाणे संसदेचे काम शासनाच्या सर्व कृतींवर शिक्कामोर्तब करणे एवढेच आहे असे आम्ही मानत नाही.” हा पुन्हा एक हुकूमशाहीला फटका होता. पाहुण्या राष्ट्रपतीने यजमानाचा असा अपमान करायचा नसतो. पण तो राधाकृष्णननी निर्भयपणे केला. प्रसिद्ध पत्रकार लुई फिशर या व्याख्यानाला हजर होते. त्यांनी म्हटले आहे, “त्यांचा आवाज स्पष्टपणाने व गंभीरपणाने निनादत होता. विजेच्या प्रचंड कडकडाटाने सुन्न व्हावे, तसा त्यांचा आवाज होता.” झेकोस्लोव्हाकियाने वृत्तांत देताना ही वाक्ये गाळली. पण ते राष्ट्र गप्प बसले. निषेध वगैरे काही केला नाही. कदाचित राधाकृष्णननी निषेधाच्या पत्राला असे उत्तर पाठवले असते; “बाळांनो, तुमचे पत्र मिळाले. तुमचे कल्याण असो. असे खरे बोलल्यावर असे रागावू नये. अंतर्मुख होऊन चिंतन करावे, असो. सर्वांना आशीर्वाद.” हीच त्यांची पद्धत होती.

इ.स. १९६५ साली भारत-पाक युद्धाच्या संदर्भात ते अमेरिकेला गेले. पाकिस्तान आक्रमक असूनसुद्धा अमेरिकेची सहानुभूती पाकिस्तानलाच होती. या वातावरणात हा दौरा झाला. राधाकृष्णन विमानतळावर पोहचले त्यावेळी पाऊस पडत होता. अमेरिकेचे अध्यक्ष विमानतळावर छत्री घेऊन आले होते. त्यांनी भारताच्या राष्ट्रपतींचे स्वागत केले. डोक्यावर छत्री धरली. अमेरिकेचे अध्यक्ष म्हणाले, “महोदय, निसर्गावर आमचा ताबा नाही, आपले स्वागत असो!” राधाकृष्णन म्हणाले, “अध्यक्ष महाराज, निसर्गावर आपला ताबा नाही हे खरेच आहे. पण आपल्या भावना व बोलणे यावर तर आपण ताबा ठेऊ शकतो, तेवढे केलेत तरी पुरे!”

राधाकृष्णन यांच्या अशा अनेक आठवणी सांगता येतील. त्या आपल्या देशातील आहेत तशा परदेशातीलही आहेत. ह्या सर्वच कथांमधून त्यांचे तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व आणि सरळ व प्रांजळ मनच प्रकट होते. खरे म्हणजे भारतीय संस्कृतीत जे जे काही मधुर व मंगल आहे; त्या सर्वांचा वारसा लाभलेले ते व्यक्तिमत्त्व होते.

डॉ. राधाकृष्णन यांचा स्वातंत्र्य आणि लोकशाहीवर नितांत विश्वास होता. जे बलवान आहेत त्यांनीच सत्ता गाजवावी , हे तर जनावरातही घडते. मग तसेच जर माणसांमध्ये घडले, तर मग माणसांत व जनावरात फरक काय? स्वतंत्रपणे विचार करण्याचा माझा हक्क गेला तर मी माणूस आहे याला काय अर्थ उरला? माणसाच्या माणूसपणाशी सुसंगत अशी रचना फक्त लोकशाहीच करु शकते, असा त्यांचा विश्वास होता. पण या विश्वासाला धरुनच त्यांचा एक इशाराही होता. आपण माणूस तयार न करताच लोकशाही राबवण्याचा प्रयत्न करतो आहोत. तोही अशा रीतीने की; जे अर्धे मुर्धे माणूस आहेत त्यांनी माणसाप्रमाणे वागावे अशी अपेक्षा करत आहोत. यामुळे स्वातंत्र्याचा आविष्कार बेजबाबदार व स्वार्थी वागणुकीत, अनिर्बंध वागणुकीत दिसू लागतो. यालाच सर्वांगीण भ्रष्टाचार असे म्हणतात. मग आपण लोकशाही रुजवणार कशी, हा त्यांनी आपल्यासमोर उपस्थित केलेला खरा प्रश्न आहे.

राष्ट्रपतीचे पद हे पाच वर्षांचे होते. नियमाप्रमाणे ते आले आणि गेलेही. पण डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे व्यक्तिमत्त्व हे तत्त्वचिंतक म्हणून मात्र आहे तसेच स्थिर राहिले. त्यांचे विचार, चिंतन व त्यातून मिळणारे मार्गदर्शन आहे तसेच स्थिर आहे. काही काही शिक्षक हे केवळ वर्गातल्याच विद्यार्थ्यांचे शिक्षक असतात. समाजात त्यांचीच संख्या अधिक असते. यापुढे जाऊन काही काही शिक्षक मात्र आपल्या बरोबरच्या आणि अनेक भावी पिढ्यांचेही शिक्षक असतात. हे शिक्षकपण किंवा गुरुपद त्यांच्या खोल व तत्त्वनिष्ठ, तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्वामुळे निर्माण होत असते. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे असे दुसर्‍य़ा गटातील थोर आचार्य होते. त्यांच्या ऋषितुल्य तत्त्वचिंतक तपस्वी व्यक्तिमत्त्वामुळे शिक्षक हे पद भूषणावह ठरले आहे.