Posts Tagged ‘साधना’

सौजन्य – लोकसत्ता

साधना प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘तारांगण’ या सुरेश द्वादशीवार लिखित व्यक्तिचित्र-संग्रहाच्या प्रकाशन समारंभप्रसंगी दिलीप माजगावकर  यांनी केलेले भाषण..

————————————————————————
समारंभाचे अध्यक्ष रा. ग. जाधव, ‘तारांगण’ पुस्तकाचे लेखक सुरेश द्वादशीवार, ‘साधना’चे संपादक नरेंद्र दाभोलकर आणि मित्रहो.. सुरुवातीलाच एक गोष्ट मोकळेपणाने सांगतो की, या पुस्तकाच्या प्रकाशनाला मी यावं, म्हणून मला डॉ. दाभोलकरांचा फोन आला तेव्हा, इतर काही अडचणींमुळे मी येऊ शकणार नाही, असं त्यांना सांगितलं. त्यानंतर दोन दिवसांनी माझ्याकडे विनोद शिरसाठ आले आणि त्यावेळी झालेल्या गप्पांमध्ये त्यांनी माझ्या नकाराचा ‘होकार’ करून घेतला. आता मी न येण्यामागचं खरं कारण काय होतं, ते सांगतो. एखादी मुलगी आपल्याला आवडावी, नजरेत भरावी, तिच्याविषयी आपण काही विचार करावा आणि तिचं कोणाशीतरी लग्न व्हावं, इथपर्यंत ठीक आहे. कारण असे अनुभव अनेकांना येतातच. पण त्याच मुलीच्या लग्नाला मंगलाष्टकं म्हणण्यासाठी जाण्याची आपल्यावर वेळ यावी, हा खरोखरच कठीण प्रसंग असतो. या पुस्तकाच्या बाबतीत असंच काहीसं झालं. म्हणजे ‘तारांगण’ ही लेखमाला गेल्या वर्षी ‘साधना’ साप्ताहिकातून क्रमश येत होती तेव्हा मी ती वाचत होतो आणि दोन-चार व्यक्तिचित्रं वाचून झाल्यावर माझ्या असं लक्षात आलं की, इथे व्यक्तिचित्रणातला काहीसा वेगळा बाज, काहीसा वेगळा ऐवज आहे आणि हा दागिना आपल्याकडे असला पाहिजे. म्हणून मग माझ्या ओळखीच्या मृणाल नानिवडेकर यांच्या माध्यमातून द्वादशीवारांना फोन केला आणि म्हणालो, ‘मला ही लेखमाला आवडतेय. इतर कोणाशी तुमचं बोलणं झालेलं नसेल तर मला हे पुस्तक ‘राजहंस प्रकाशन’कडून करायला आवडेल.’ पण द्वादशीवार म्हणाले, ‘अलीकडेच माझं ‘मन्वंतर’ हे पुस्तक ‘साधना’ने प्रकाशित केलंय. आणि याही पुस्तकात त्यांनी रस दाखवलाय. त्यामुळे साहजिकच हे पुस्तक त्यांच्याकडून येईल.’ तर अशा पुस्तकाच्या प्रकाशनासाठी दाभोलकरांनी मला बोलावलं, हे माझ्या नकारामागचं कारण होतं. पण ते काहीही असो, ‘साधना’ने हे पुस्तक चांगलं केलंय. मुलगी खऱ्या अर्थाने सुस्थळी पडली, असं मी मनापासून म्हणतो. आणि द्वादशीवारांना आनंद वाटावा अशी गोष्ट सांगतो की, आजकाल बहुसंख्य प्रकाशकांना प्रकाशनासाठी आलेली हस्तलिखितं परत कशी करावी, ही विवंचना असताना त्यांचं पुस्तक दोन-तीन प्रकाशन संस्थांना प्रकाशित करावंसं वाटणं, ही ‘तारांगण’च्या वाङ्मयीन गुणवत्तेची पावती आहे असं त्यांनी समजावं.

‘तारांगण’ हा १६ व्यक्तिचित्रांचा संग्रह आहे. (अनंत भालेराव, यदुनाथ थत्ते, नरहर कुरुंदकर, सुरेश भट, बाबा आमटे, राम शेवाळकर, मारोतराव कन्नमवार, प्रमोद महाजन, जन्रेलसिंग िभद्रनवाले, तारकेश्वरी सिन्हा, सविता डेका, राजे विश्वोश्वर राव, चौधरी चरणसिंह, विष्णुदत्त शर्मा, एम. एफ. हुसेन, जनार्दन पांडुरंग) सुंदर व्यक्तिचित्र कसं असतं, तर ती त्या व्यक्तीची लेखकाने वाचकांशी घडवून दिलेली ‘थेट भेट’ असते. त्या भेटीत लेखक उपस्थित असतो, ते केवळ त्या दोघांची ओळख करून देण्यापुरता, किंवा गरज पडली तर ती ओळख पुढे सरकवण्यापुरता! माझ्या कल्पनेप्रमाणे, चांगल्या व्यक्तिचित्रणात लेखक एका मर्यादेपेक्षा जास्त स्वतला वाचकांवर लादत नाही, किंवा त्या व्यक्तीच्या बुरख्याआडून स्वत: वारंवार डोकावूनही बघत नाही. या दोनही निकषांवर द्वादशीवारांची व्यक्तिचित्रं फार सरस उतरली आहेत.

आपल्याला माहीत आहे की, मराठीत व्यक्तिचित्रांची मोठी परंपरा आहे. अगदी चार-सहा नावं सांगायची म्हटली तर श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, पु. ल. देशपांडे, सुनीताबाई, विजय तेंडुलकर, ह. मो. मराठे अशी सांगता येतील. अलीकडच्या काळात विनय हर्डीकर, रामदास भटकळ यांनीही चांगली व्यक्तिचित्रं लिहिली आहेत. या सर्व लेखकांनी सातत्याने लेखन करून व्यक्तिचित्रांची ही परंपरा सकस, समृद्ध आणि वाहती ठेवली आहे. या प्रत्येकाचं त्या व्यक्तीकडे बघणं वेगळं आहे. लेखन वेगळं आहे. त्यांचे दृष्टिकोन वेगळे आहेत. या पाहण्यात व दृष्टिकोनात कसा फरक पडतो, हे चटकन समजून घ्यायचं असेल तर एक उदाहरण देतो. माधव आचवल यांच्यावर जवळपास एकाच काळात पु. ल. देशपांडे, सुनीताबाई व विजय तेंडुलकर या तिघांनी लिहिलं आहे. ही तीनही व्यक्तिचित्रं एकाच वेळी व सलग वाचा, म्हणजे मग मला काय म्हणायचंय, ते नेमकेपणाने समजून येईल. ही तीनही व्यक्तिचित्रं उत्तमच आहेत. व्यक्ती एकच आहे, बघणारे तिघे आहेत. तिघेही साहित्यातील मातब्बर आहेत. पण तिघांच्या बघण्यात, दृष्टिकोनात व लिहिण्यात फरक आहे. पु.लं. ना माधव आचवल त्यांच्या अंतर्बाह्य़ गुणदोषांसकट नक्कीच समजलेले असणार. पण तरीही का कोण जाणे, लेखनापुरती पु.लं.नी ‘गुण गाईन आवडी’ अशी भूमिका ठेवलेली असल्याने त्यांच्या लेखनात एक सरळ साधेपणा आणि आज तर काही प्रसंगी भाबडेपणा वाटावा असा भाग वाटतो. तर ‘माधव मला असा दिसला, तो असा होता आणि तो असाच होता,’ असा काहीसा आग्रही व थोडासा उंच स्वर सुनीताबाईंच्या लेखात दिसतो. आणि माधव असा असावा, निदान मला तो असा दिसला, आणि मला दिसला त्यापलीकडे तो बरंच काही होता, पण मला तो समजला नाही, मी जे काही मांडलंय ते तुम्हाला पटतंय का बघा, अशी तेंडुलकरांची भूमिका दिसते. मला व्यक्तिश: तेंडुलकरांची भूमिका आवडते. आणि द्वादशीवारांची भूमिका तेंडुलकरांच्या भूमिकेसारखी आहे, म्हणूनही कदाचित ‘तारांगण’मधील व्यक्तिचित्रे मला अधिक आवडली असतील.

आपल्या भूमिकेबाबत द्वादशीवारांनी प्रस्तावनेतच एक वाक्य असं लिहिलंय की, ‘मला माणूस समजून घ्यायला आवडतो आणि त्यासाठी मी त्याच्या भूमिकेत जाऊन त्या माणसाच्या आनंदाच्या, दुखाच्या, अडचणीच्या, तडजोडीच्या, महत्त्वाकांक्षेच्या ज्या काही जागा असतील, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो..’ माणसं समजून घेण्याची द्वादशीवारांची ही समज फार प्रगल्भ आहे. ते माणसाकडे एकाच खिडकीतून, एकाच कोनातून बघत नाहीत. ते अनेक कोनांतून बघतात. इतकेच नाही तर वाचकालाही ते व्यक्तिचित्र वाचून झाल्यावर त्या व्यक्तीविषयी विचार करण्यासाठी अनेक दिशा मोकळ्या ठेवतात. त्यांच्या व्यक्तिचित्रणात त्या व्यक्तीच्या बाह्य़ जीवनाचा तपशील तर वाचकाला मिळतोच, महत्त्वाच्या घडामोडीही मिळतात, पण त्याही पलीकडे जाऊन त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध द्वादशीवार घेताना दिसतात. आपल्या सगळ्यांनाच दुसऱ्या व्यक्तीविषयी एक प्रकारचं कुतूहल असतं. त्यात ती व्यक्ती दिसते कशी, वागते कशी, बोलते कशी, त्याही पलीकडे ती व्यक्ती एखाद्या प्रसंगात, एखाद्या घटनेच्या वेळी विचार कसा करते, त्यावेळी त्या व्यक्तीचं मानसिक चलनवलन कसं चालतं, हे जाणून घेण्याविषयी अधिक कुतूहल असतं. याच कुतूहलातून द्वादशीवारांसारखा लेखक जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या अंतरंगात जाण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ते व्यक्तिचित्रण आपल्याला अधिक भावतं, मनावर अधिक परिणाम करून जातं.

चांगलं व्यक्तिचित्रण कसं असतं, याविषयीची या पुस्तकाबाहेरची दोन उदाहरणं सांगतो. नेपोलियनचं चरित्र आपण सर्वानीच त्या- त्या काळात वाचलेलं असतं. नेपोलियन, त्याच्या लढाया, त्याचं सहकाऱ्यांबरोबरचं वागणं याची ढोबळमानाने माहिती आपल्याला असतेच. पण हा नेपोलियन त्याच्या जनरल्सची निवड कशी करायचा, यासंदर्भातील एक मार्मिक आठवण त्याच्या एका चरित्रकाराने सांगितली आहे. तो त्याच्या जनरलची निवड करताना उमेदवाराचा बायोडाटा मागवून घ्यायचा. त्याने केलेल्या लढाया, त्याची घरची परिस्थिती, त्याचं जगणं, वागणं याचा बारकाईने अभ्यास करायचा. पण अंतिम निर्णय घेताना मात्र तो त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्याला विचारायचा, Tell me, is he lucky? तो नशीबवान आहे का, हे मला सांग; बाकी मला सर्व कळलं. आता ही साधी आठवण नेपोलियनच्या व्यक्तिमत्त्वाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देऊन जाते.

दुसरा एक प्रसंग पुपुल जयकर यांनी लिहिलेल्या इंदिरा गांधी यांच्या चरित्रातील आहे. इंदिरा गांधींची इंग्रजीत अनेक चरित्रं आहेत. पण पुपुल जयकरांनी लिहिलेलं चरित्र विशेष उजवं समजलं जातं. याची दोन कारणं आहेत. एक तर त्या इंदिरा गांधींच्या निकट होत्या आणि दुसरं म्हणजे त्या जे. कृष्णमूर्तींच्या सहवासात असल्याने त्यांच्या विचारांना तत्त्वज्ञानाची भक्कम बठक होती. या वैचारिक बठकीतूनच त्या दुसऱ्या व्यक्तीकडे बघत असत. त्यामुळे ते चरित्र दर्जाच्या दृष्टीने इतर चरित्रांपेक्षा उजवं वाटतं. त्या पुस्तकातला एक प्रसंग आहे. संजय गांधींचं विमान अपघातात निधन झाल्यावर त्यांच्या शवाशेजारी इंदिराजी उभ्या आहेत. मोठमोठे लोक शोकसमाचाराला येत आहेत. नमस्कार करताहेत. इंदिराजी त्यांच्याशी उपचाराची एक-दोन वाक्ये बोलताहेत आणि मग ते लोक निघून जाताहेत. अटलबिहारी वाजपेयी येतात आणि कसं कोण जाणे, वाजपेयींच्या बोलण्यातून इंदिराजींना असं जाणवलं असावं की, आपल्यावर कोसळलेल्या या प्रसंगामुळे वाजपेयींना आपली कींव येतेय की काय, दया वाटतेय की काय! तेव्हा त्याही प्रसंगात आपली कोणी कींव करावी, दया करावी, हे मानी स्वभावाच्या इंदिरा गांधींना आवडलं नाही. त्यामुळे त्यांना आलेला राग त्यांच्या गॉगलमधल्या डोळ्यांतून जवळच उभ्या असलेल्या पुपुल जयकरांनी बरोबर टिपला. इतकंच नाही, तर आपण किती नॉर्मल आहोत, हे वाजपेयींना कळावं म्हणून इंदिराजींनी वाजपेयींकडे पूर्ण दुर्लक्ष करून त्यांच्या शेजारीच उभ्या असलेल्या चंद्रशेखर यांच्याशी त्यानंतर दोन दिवसांनी होणाऱ्या एका मीटिंगबद्दल जुजबी बोलणं केलं. आता क्षणार्धात घडून गेलेली ही घटना; पण पुपुल जयकर ज्या पद्धतीने बघतात व लिहितात, त्यातून इंदिराबाईंच्या व्यक्तिमत्त्वातला संपूर्ण पीळ त्या वाचकांसमोर उभा करतात. ही व्यक्तिचित्रणाची खरी ताकद असते.

द्वादशीवारांच्या लेखनातही अशा अनेक जागा त्या ताकदीने पकडलेल्या आहेत. त्यादृष्टीने नरहर कुरुंदकर, सुरेश भट, अनंतराव भालेराव, बाबा आमटे यांच्यावरचे लेख वाचण्यासारखे आहेत. या पुस्तकातील बहुतेक व्यक्ती तुमच्या-आमच्या माहितीतील आहेत.  व्यक्तीचित्रण केलेली व्यक्ती जेव्हा वाचकांना अनोळखी असते किंवा पूर्णत: काल्पनिक असते तेव्हा त्याचा एक फायदा असा असतो की, वाचकांच्या मनाचा कॅनव्हास त्या व्यक्तीबाबत पूर्ण कोरा असतो. पण ती व्यक्ती माहितीची असेल किंवा प्रसिद्ध असेल तर वाचकांच्या मनावर त्या व्यक्तीविषयीचं काही ना काही रेखाटन झालेलं असतं. त्यातून ती व्यक्ती कौतुकाची, प्रेमाची, अतीव आदराची असेल, तर त्या व्यक्तीबद्दलचा एखादाही विपरीत सूर वाचकांच्या मनावर ओरखडा उमटवून जाऊ शकतो. किंवा त्या व्यक्तीच्या राजकीय विचारांमुळे, सामाजिक पाश्र्वभूमीमुळे, कौटुंबिक परिस्थितीमुळे वाचकांच्या मनात राग असेल तर त्या व्यक्तीविषयी लिहिताना लेखकाची कसोटी असते. या पुस्तकातील बहुसंख्य व्यक्तिचित्रणाच्या बाबतीत या कसोटीला द्वादशीवार उत्तम पद्धतीने उतरले आहेत. उदाहरणार्थ, या पुस्तकातील जन्रेलसिंग िभद्रनवाले हे व्यक्तिचित्रण वाचा. िभद्रनवाल्याचा तो २०-२५ वर्षांपूर्वीचा काळ आठवा. त्या काळातील पंजाबमधील दहशतीचं वातावरण आठवा. त्या वातावरणात घडत गेलेली िभद्रनवाल्याची मतं आणि त्याचं व्यक्तिमत्त्व, त्याच्या बोलण्यातला प्रेमळपणा तसाच खुनशीपणा या सर्वाचे तपशील तर द्वादशीवार देतातच; पण मध्येच विचारांचा रूळ झटकन बदलतात आणि लिहून जातात- ‘आतापर्यंत खोमेनीच्या शीख अवताराची जागा एका सामान्य शीख गृहस्थानं घेतल्याचं लक्षात येतं. त्याच्या शस्त्रांची आता वाद्यं झालेली असतात. आईच्या हाताला असलेल्या चवीची आठवण मनात ठेवणारा तो सामान्य मुलगा झालेला असतो. िभद्रनवाल्यांचा हा हळवा क्षण पकडायला एखादा गांधी असता तर..’
द्वादशीवारांच्या व्यक्तिचित्रणातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे त्यांची शैली. कोणीतरी जाणकार समीक्षकाने द्वादशीवारांच्या लेखनशैलीचा अभ्यास करायला हवा. एकच वैशिष्टय़ त्या शैलीचं सांगतो. एखाद्या व्यक्तीचं मोठेपण सांगताना ही लेखणी जशी तालेवार भाषा वापरते, तीच लेखणी त्या व्यक्तीचा हळुवारपणा, खेळकरपणा सांगताना त्याच्या चांगल्या खोडय़ाही काढू शकते. त्यांच्या शैलीचं सामथ्र्य दाखवणारं या पुस्तकातील सर्वात चांगलं व्यक्तिचित्र जनार्दन पांडुरंग यांचं आहे (त्यांच्या वडिलांचं). या पुस्तकात हे व्यक्तिचित्र सर्वात शेवटी आहे. हे जाणीवपूर्वक शेवटी टाकलंय काय, हे मला माहीत नाही. पण ते शेवटी टाकलंय, हे फार चांगलं केलं आहे. कारण ते व्यक्तिचित्र वाचल्यावर खरोखरच पुस्तक बंद करून आपण थांबावं असं वाटतं. ‘जनार्दन पांडुरंग’ हे औपचारिक नाव द्वादशीवारांनी घेतलंय, यातून त्यांचे वडिलांबरोबरचे संबंध लक्षात येतात. या व्यक्तिचित्रणातील अनेक जागा सांगता येतील. या व्यक्तिचित्रणाची सुरुवातच त्यांनी किती मनात घुसणारी केली आहे, ते पहा.. ‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे..’ या वाक्याने या व्यक्तिचित्रणाची त्यांनी सुरुवात केली आहे. मी तुम्हाला सांगतो, भल्या भल्या लेखकांना हे वाक्य लिहिता येणार नाही. ते पुढे लिहितात, ‘जनार्दन पांडुरंग हे अपयशाचं नाव आहे. प्रखर बुद्धिमत्ता आणि तिला लीलया पेलून धरणारा दांडगा उत्साह आपल्या लहानखुऱ्या देहयष्टीत धारण करणाऱ्या या माणसात वाहून जाण्याचा दोष होता.’ या दोन वाक्यांत पुढे काहीतरी वेगळं वाचायला मिळणार, याच्या खुणा मिळून जातात आणि खरोखरच पुढे हे व्यक्तिचित्रं अनेक वाटा-वळणाने वाहत राहतं आणि शेवटी एका जागी तर अंतर्मुख करून जातं. द्वादशीवार लिहितात, ‘तुरुंगात शिक्षेत सूट मिळाल्यावर जनार्दन पांडुरंग एका मध्यरात्री अचानक घरी आले. येताना त्यांनी तुरुंगात स्वत विणलेल्या जाडजूड सतरंज्या बरोबर आणल्या होत्या. त्यातल्या प्रत्येकीवर माझं नाव कोरलेलं होतं.’ या व्यक्तिचित्रात द्वादशीवारांचा प्रत्येक शब्द तर आपल्याशी बोलतोच बोलतो, पण त्या वाक्यातील विरामसुद्धा एक प्रकारचा संवाद साधतात, इतकं ते प्रभावी झालं आहे. हे व्यक्तिचित्र वाचताना मनाला खूप उदासी वाटते. कारण जनार्दन पांडुरंगाच्या आयुष्यात अनेक उलटसुलट घटना घडत गेल्या. पण त्या घटना वाचतानाही असं वाटतं की, द्वादशीवार आपल्या वडिलांचं चित्रण करतानाही विनाकारण हळवेपणाचं ओझं आपल्या लेखणीवर ठेवत नाहीत, वा नाटकी वाटावं, खोटं वाटावं, बेगडी वाटावं असा दूरस्थपणाही त्यांची लेखणी धारण करत नाही. त्यांची लेखणी त्यांच्या स्वभावातला हळुवारपणा, समजूतदारपणा फार चांगल्या पद्धतीने टिपत पुढे जाते आणि आपल्याला अंतर्मुख करून टाकणारं काहीतरी त्यातून मिळतं.

या पुस्तकातील कुरुंदकरांचं व्यक्तिचित्र वाचताना माझ्या मनात अशी शंका होती की, यात आता द्वादशीवार वेगळं असं काय लिहिणार आहेत? कारण कुरुंदकरांबद्दल इतकं लिहून, सांगून झालेलं आहे. कुरुंदकर गेल्यावर मराठवाडा साहित्य परिषदेने त्यांच्यावर एक स्मृतिग्रंथ काढला होता. स्मृतिग्रंथ अथपासून इतिपर्यंत वाचनीय कसा असू शकतो, याचा आदर्श वाटावा असा अडीचशे-तीनशे पानांचा ग्रंथ होता. त्यामुळे यापलीकडे कुरुंदकर या लेखातून काही दिसतील का, असे वाटले होते. पण त्यातही दोन-चार जागा अशा आहेत की, द्वादशीवारांनी माझा अंदाज खोटा ठरवला. विशेषत: मुस्लिम विद्यार्थ्यांसमोर भाषण करायला उभे राहिल्यावर कुरुंदकर पहिलं वाक्य काय बोलले, तो प्रसंग किंवा कॉलेजमध्ये एक मोठय़ा विदुषी आल्या असताना छायाचित्राच्या निमित्ताने एक विनोदी घटना घडली, त्यावेळचं कुरुंदकरांचं बोलणं आणि वागणं. हे प्रसंग कुरुंदकरांच्या स्वभावातील विक्षिप्तपणा व बौद्धिक शार्पनेस दाखवणारे आहेत.

द्वादशीवारांच्या इतर व्यक्तिचित्रणातील अशा अनेक प्रसंगांबद्दल बोलता येईल. पण त्यांचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे त्यांना संयम फार चांगला कळतो. प्रत्येक व्यक्तिचित्र वाचताना असं वाटत राहतं की, द्वादशीवारांना या व्यक्तीची यापलीकडे माहिती आहे, पण ती ते सांगत नाहीत. कोणाविषयी, काय, किती आणि केवढं लिहावं, याचं भान त्यांना पक्कं राहिलेलं आहे. त्यामुळे कोणतंही व्यक्तिचित्र पाल्हाळिक झालेलं नाही आणि आता हे संपावं, असं न वाटता ‘अरे, आता एकच पान राहिलं का?’ असं वाटून व्यक्तिचित्र संपतं. ही त्यांच्या लेखणीची जागरूकता लक्षात घेता त्यांच्या पुस्तकाबद्दल बोलताना मी तो संयम पाळायला हवा, नाहीतर त्यांच्या पुस्तकाने मला काहीच दिलं नाही, असं म्हणावं लागेल.

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

लहान मुलाने जेवढया उत्साहाने अडगळीत पडलेली खेळणी गोळा करावी तेवढयाच जोमाने मिळेल तेथून गुणवत्ता शोधत हिंडण्याचे काम यदुनाथ थत्ते करीत. कर्तृत्त्व, प्रतिभा आणि मूल्यनिष्ठा या महत्तांएवढाच वाणी, लेखणी, कुंचला या गुणांचा सततचा शोध हे त्या फिरत्या माणसाचे कायमचे वेड होते.

कर्तृत्त्व आणि गुणवत्ता या लपणाऱ्या गोष्टी नाहीत. त्यांची दखल समाज घेतही असतो. मात्र समाजाची नजर त्याबाबत जरा जडच राहत आली आहे. त्यातून अलिकडच्या काळात या नजरेवर जातीधर्मांचे आणि पक्षविचारांचे रंगीबेरंगी चष्मे आले आहेत. त्यामुळे खूपशी गुणवत्ता बेदखल राहण्याचीच शक्यता वाढली आहे. त्यातून समाजाचे नेतृत्त्व करतो म्हणणाऱ्यांच्याही अहंता निबर असतात. आपल्याहून पुढे जाऊ शकणाऱ्यांना अनुल्लेखाने, बेदखलीने मारण्याची, पडद्याआड ठेवण्याची पराकाष्ठा या वर्गाकडून चालते. आपण एखाद्याला मोठे म्हटल्यानेच तो मोठा होतो असा कुरुप आत्मविश्वास काहींच्या ठिकाणी असतो. मग ते तसे म्हणणे शक्यतो टाळत असतात.

नागपूरच्या एका जुन्या दैनिकाच्या थोर संपादकांनी विदर्भातल्या काही संस्था आणि व्यक्तींना आपल्या पत्रातून अजिबात उमटू न देण्याची आपल्या संपादकीय हयातीत शिकस्त केली होती. त्या काळात त्यांचेच वर्तमानपत्र विदर्भात चालायचे. मग तेच नेते, तेच विचारवंत, तेच साहित्यिक आणि तेच कर्तृत्त्वसंपन्न पत्रकार. असे संपादकीय नमुने महाराष्ट्रभूने काही थोडे जन्माला घातले नाहीत. यदुनाथ हा या परंपरेला अपवाद असलेला विचारवंत, पत्रकार आणि कर्तृत्त्वसंपन्न लेखक होता. ‘तुमची आजवर किती पुस्तके प्रकाशीत झाली?’ या माझ्या प्रश्नावर अत्यंत सहजगत्या यदुनाथ म्हणाले, ‘दिडेकशे असावीत.’ त्यात लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकांपासून विचारवंतांना मार्गदर्शक ठरणाऱ्या ग्रंथांपर्यंतची पुस्तके होती. मुस्लीम प्रश्नापासून युवकांच्या चळवळींशी संबंध असणारी बरीच अध्ययनसिध्द पुस्तकेही त्यात होती. मात्र या माणसाचा मोठा विशेष, माणसे शोधण्याचा, निवडण्याचा, जोडण्याचा आणि त्यांचे कर्तृत्त्व खुलवण्या-फुलवण्याचा होता. प्रसंगी मागे उभे राहून अशा माणसांची पाठराखण करण्याचाही तो होता.

महाराष्ट्राला आज ज्ञात असलेली आणि त्याच्या आदर व अभिमानाचा विषय झालेली किती माणसे यदुनाथांनी प्रथम समाजासमोर उभी केली याची यादी करायची ठरविली तर ती फार मोठी असेल. सगळी श्रेये ती आपली नव्हेत या वृत्तीने नाकारणाऱ्या यदुनाथांना ती मान्य होणारीही ती नसेल. थेट आनंदवन आणि बाबा आमटे यांच्यापासून ही यादी सुरू होते. नरहर कुरुंदकर आणि हमीद दलवाई तीत येतात. शरणकुमार लिंबाळे, रझिया पटेल आणि त्यांच्या जोडीला परिवर्तनाच्या चळवळी रुजवत खेडयापाडयात ठाण मांडून बसलेल्या शेकडो लहानमोठया कार्यकर्त्यांची नावेही तीत येतात. या यादीतल्या साऱ्यांच्या मनात यदुनाथांविषयीची कृतज्ञता होती. फक्त आपण असे काही केले आहे याचे यदुनाथांनाच स्मरण नव्हते.

अध्यात्माच्या सगळया साधनेचे लक्ष्य आपल्यातला ‘मी’ पुसून टाकणे हे आहे आणि अध्यात्माची कोणतीही साधना न करता आपल्यातला मी पुसून टाकणे यदुनाथांना जमले होते. कुणातही मिसळून जाऊन त्यांचे होणे ही सिध्दी त्यांना साधली होती. विचारवंतांसोबतची बैठक असो नाहीतर तरुण शिबिरार्थ्यांचे एखादे चर्चासत्र असो, ते तिथे सर्वांचे आपले असत. चर्चा किंवा वाद करणाऱ्यांची एक नित्य अनुभवाला येणारी गंमत अशी की चर्चा वा वादाचा विषय तीत खूपदा गौण होतो आणि त्यात भाग घेणाऱ्यांची व्यक्तिमत्त्वेच महत्त्वाची होतात. विषयाबाबतची आपली बाजू लढविण्यापेक्षा माणसांचा कल आपल्या व्यक्तिमत्त्वाचे प्रभावीपण दुसऱ्यावर ठसविण्याकडे असतो. परिणामी चर्चेचा विषय हरवतो आणि व्यक्तिमत्त्वांचीच दंगल उभी होते. यदुनाथांशी वाद करावा असे ठरवून आलेल्या वा त्यांना वादात ओढू पाहणाऱ्या माणसांची याबाबत नेहमीच एक फसगत व्हायची. आपला वैचारिक आग्रह न सोडता यदुनाथ संथपणे बोलत असत. व्यक्तीगत खुमारी घेऊन येणाऱ्यांना मग वाद सुचत नसे. खूपदा येणारा अनुभव असा की वादाला म्हणून आलेला माणूस यदुनाथांचाच विचार वेगळया भाषेत त्यांना पटवून देताना दिसे आणि यदुनाथ तो शांतपणे ऐकून घेत असल्याचे पाहून आपण जिंकल्याचे समाधान घेऊन परतही जात असे. अशावेळी आपल्या विचाराच्या स्वीकाराबरोबर विजयाचे समाधान त्याला मिळवून दिल्याचा संतोष ही यदुनाथांची जमेची बाजू असे. काही काळापूर्वी पुण्यातल्या समाजवादी सुधारकांवर टीका करणारा माझा एक लेख प्रकाशीत झाला. त्यात या मंडळीने महाराष्ट्रात एक फुकटची वैचारिक दहशत उभी केली असल्याचे मी म्हटले होते. यदुनाथ त्याच संप्रदायात वावरणारे. त्यांना त्या लेखाचा राग येईलसे वाटले होते. पण यदुनाथ भेटले तेव्हा शांतपणे म्हणाले, ‘जे थोडे असतात त्यांना दहशतीचाच मार्ग अनुसरावा लागतो.’

पू. साने गुरूजी हे सगळया समाजवादी मंडळीचे श्रध्देचे ठिकाण आहे. यदुनाथ तर गुरूजींच्या अतिशय निकट वावरलेले. गुरूजींच्या अखेरच्या काळात त्यांची साथसोबत केलेले. ‘इस्लामी संस्कृती’ या आपल्या पुस्तकात त्या संस्कृतीच्या सहिष्णुतेची आणि संपन्नतेची महती गुरूजींनी गायिली आहे. मुस्लीम इतिहासाचा अत्यंत चिकित्सक अभ्यास नरहर कुरूंदकरांनी केलेला. या इतिहासात वा संस्कृतीत सहिष्णुता कशी अभावाने आढळते याविषयीची त्यांची मते स्पष्ट होती. बहुदा या पुस्तकावरून यदुनाथांशी आपला वाद होणार ही अटकळ त्यांनी मनात बांधली होती. त्यांनी विषयाला तोंड फोडले. ‘इस्लामी संस्कृतीचे जे स्वरुप गुरूजी सांगतात ते इतिहास म्हणून खरे नाही’
कुरुंदकरांना शांत करीत यदुनाथ म्हणाले, ‘ते स्वाभाविकच नाही काय? ऐतिहासिक सत्य निर्विकारपणे समजावून सांगणे हा गुरूजींचा पिंडच नव्हे. इस्लामी संस्कृती कशी आहे यापेक्षा गुरूजींना ती कशी जाणवली याचेच चित्र त्या पुस्तकात उमटले असणार.’ आपला सगळा आवेग अनाठायीच होता हे कुरूंदकरांना जाणवले. साने गुरूजींविषयीची केवढीही गाढ श्रध्दा मनात असली तरी त्यांच्या संतमनाचे भाबडेपण आणि त्यामुळे त्याला येणाऱ्या मर्यादा यदुनाथांना अगोदरच ज्ञात होत्या. आपल्या श्रध्दास्थानाचे सामर्थ्य आणि दुबळेपण यांची डोळस जाणीव असणारे मन त्यांना लाभले होते. आपल्या मनात ज्यांच्याविषयी श्रध्दा आहे त्या थोरांच्या मर्यादा लपवून ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही. मात्र त्याबाबत त्यांना कठोरही होता आले नाही. त्या मर्यादांच्या मागे असणाऱ्या भावनात्मक अडचणींची चिकित्सा करण्यावरच त्यांचा भर अधिक राहिला. अशा मर्यादांचे समर्थन करण्याचा प्रयत्न मात्र त्यांनी कधी केला नाही.

यदुनाथांचा आणि आनंदवनाचा स्नेह अतिशय पुराना होता. बाबा आमटे त्यांना आपल्या स्वप्नांचा सहोदर म्हणत. त्यांच्या सगळया योजना, प्रकल्पात यदुनाथ आरंभापासून अखेरपर्यंत बरोबरीने भाग घेत. पण तिथेही आपले अस्तित्त्व पुसून टाकत ते सामान्य कार्यकर्त्याच्या भावनेने वावरत. आनंदवनाच्या एका मित्र मेळाव्याच्यावेळी प्राचार्य राम शेवाळकर आणि मी रात्रीचे गप्पा मारीत एका खोलीत बसलो होतो. बाजूलाच एक पाहुणे तोंडावर पांघरूण घेऊन गाढ झोपी गेलेले दिसत होते. मी जरा चेष्टेच्या सुरात शेवाळकरांना म्हणालो, ‘नानासाहेब, तो स्वप्नांचा सहोदर येऊन दाखल झाला बरं का.’
त्यावर त्या बाजूला झोपी गेलेल्या पाहुण्याने तोंडावरचे पांघरूण दूर करीत म्हटले, ‘हो, आणि तो जागाही आहे बरं कां.’ आणि उडालेल्या हशांत तेथले सगळे दिलखुलासपणे सामील झाले.

बाबा आमटयांनी कन्याकुमारी ते काश्मीर आणि इम्फाल ते द्वारका अशा काढलेल्या भारत जोडो यात्रेत यदुनाथ तिच्या आखणीपासून सांगतेपर्यंत अग्रभागी होते. मात्र बाबांनी सरदार सरोवर प्रकरणात घेतलेली भूमिका त्यांना अमान्य होती. त्या भूमिकेला यदुनाथांनी जाहीरपणे विरोध करणे त्या दोघांच्याही जवळ असणाऱ्या कोणालाही आवडणारे नव्हते. या प्रकरणात धरणविरोधकांची केवळ एकच बाजू लोकांपुढे ठेवली जात आहे हे जाणवताच यदुनाथांनी सरोवर व्हावे असे गुजराती लोकांना कां वाटते हे सांगणारी एक प्रदीर्घ मुलाखतच मला दिली आणि तीत धरणविरोधकांचे सगळे युक्तीवाद उखडून टाकले. पण त्यांचा हा विरोध धरणाबाबतच्या भूमिकेएवढाच मर्यादित राहिला. पुढे एका कविश्रेष्ठाने जेव्हा बाबा आमटयांनी सरदार सरोवराचा पिच्छा सोडून गडचिरोलीतील नक्षलवाद्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे असा सल्ला जाहीररित्या दिला तेव्हा त्याला उत्तर देताना यदुनाथांनी लिहिले, ‘सगळी कामे एकटया बाबांनीच कां करावी?. त्यातली काही तुम्हीही कां करू नयेत?’ वैचारिक भूमिकांबाबतचा हा संयम सांभाळणे अनेकांना अवघड होते. त्यासाठी आयुष्यभराच्या व्रतस्थतेचा रियाज लागतो. यदुनाथांनी आपल्या जन्मभराच्या भटकंतीत तो सांभाळला होता. नाहीतर माणसांना नशेसारख्याच भूमिकाही चढत असतात. यदुनाथांना लोकप्रियताही कधी चढल्याचे कोणाला दिसले नाही. आक्रमक होणे ही त्यांची प्रकृती नव्हती. ठामपणा हा मात्र त्यांचा स्वभाव होता. त्या ठामपणाला प्रसन्नतेची जोड होती आणि त्या प्रसन्न ठामपणाचा संबंध विचारांशी होता, अहंतेशी नव्हता.

गाडीत भेटावे आणि एखाद्याशी ओळख व्हावी , पुढे तिचे ममत्वात रुपांतर व्हावे आणि आकस्मिक भेटलेला हा माणूस आपल्या आयुष्याचा भाग बनावा तसे यदुनाथ नकळत आयुष्यात येत आणि कायम मुक्कामाला राहत. त्या राहण्यात पाहूणपणाचा उपचार नसे. घरच्या माणसाचे आपलेपण असे. ‘तू खूप दिवसांत काही लिहिलं नाहीस’ असा मला तगादा करतानाच, ते माझ्या पत्नीला म्हणत,’काय करतो आताशा हा रिकाम्या वेळात? जरा त्याच्याकडून लिहून घे.’ नेमाने पत्र पाठवीत. मी उत्तराचा कंटाळा केला तरी त्यांची पत्रे येतच राहत. त्यातून सोबतीचा, पाठिंब्याचा दिलासा मिळत राही.

यदुनाथ थत्त्यांचे व्यक्तिमत्त्व गर्दीत हरवणारे होते. खादीच्या जाडयाभरडया कपडयातील हा साधा माणूस आपले वेगळेपण जपण्याचा प्रयत्नही करीत नसे. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाभोवती कोणते तेजोवलय वा दिप्तीमान आभा नव्हती. आणीबाणीच्या परिक्षापर्वात त्यांनी वृत्तपत्र स्वातंत्र्याच्या बाजूने जो एकाकी लढा दिला त्यामुळे त्यांच्याभोवती काही काळ असे वलय उभे राहिल्याचे महाराष्ट्राने पाहिले. आणीबाणीच्या दमन चक्रापुढे अनेक गर्जणाऱ्या तोफा थंड पडल्या. स्वातंत्र्य, समतेच्या नावाने एरव्ही भीमदेवी थाटात बोलणारे व लिहिणारे आणीबाणीचे आणि त्या काळातील दमनाचे स्तुतीपाठक बनलेले महाराष्ट्राने पाहिले. विरोधक म्हणविणाऱ्यांनी तडजोडीच्या शहाण्या जागा शोधल्या आणि भल्याभल्यांनी शरणागतीची पांढरी निशाणे हलविली. या काळात तुरूंगाबाहेरच्या मुक्या निषेधाला वाचा देण्याचे काम साऱ्या मराठी मुलूखात ज्या थोडया माणसांनी केले त्यात यदुनाथ थत्ते साऱ्यांत पुढे होते.

हे करायला त्यांना कोणी सांगितले नाही. ते करणे हा त्यांचा प्रकृतीधर्म होता. आयुष्यभर जी ध्येये प्राणपणाने जपली त्यांच्यावरच्या संकटाचेवेळी उभारावयाचा संघर्षही प्राणपणानेच लढवावा लागतो. त्यासाठी व्यक्तीजीवनच नव्हे तर प्रसंगी संस्थांचे जीवनही धोक्यात घालावे लागते. ज्या संस्था ध्येयांसाठी जन्माला येतात त्या आपल्या मूळ प्रेरणांपायी खर्ची पडल्या तरी चालतील. मूळ ध्येयवाद वाऱ्यावर सोडून संस्था सांभाळणाऱ्यांनी मुत्सद्देगिरीची टिमकी मिरवायची असते, पराक्रमावर हक्क सांगायचा नसतो. ‘साधना’ साप्ताहिकाच्या प्रत्येक अंकावर त्याकाळात बंदी यायची. सरकार जमानत म्हणून मोठी रक्कम मागायचे. स्वातंत्र्यावर मनापासून प्रेम करणारी माणसे ही रक्कम दर हप्त्याला यदुनाथांच्या स्वाधीन करीत. साधना बंद पडले तेव्हा ‘जनता’ सुरू झाले आणि जनतेवर बंदी आली तेव्हा आणखी नवे नाव घेऊन ते पत्र पुन्हा प्रकाशीत झाले. यदुनाथांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी जो लढा आणीबाणीत दिला त्याचा गौरव करताना पु.ल. म्हणाले, ‘संपादक म्हणून जे दिव्य लोकमान्यांनी केले तेच नंतरच्या काळात यदुनाथने पत्करले.’

यदुनाथांनी नंतरच्या अल्पावधीत हे वलय मिटवून टाकले आणि सामान्य कार्यकर्त्यांत व आपल्यात येऊ पाहणारे अंतर प्रयत्नपूर्वक नाहिसे केले. असामान्यांच्या मोठेपणाचे आकर्षण त्यांनाही होतेच. असामान्य व्यक्तीविषयीचा श्रध्दाभावही त्यांच्या मनात होता. मात्र अनेक मोठया माणसांना एक विशेष असा की त्यांचे मोठेपण इतरांना ओझ्यासारखे सतत वहावे लागत असते. त्यातल्या अनेकांना हे असे दुसऱ्यांच्या खांद्यावरच्या पालखीतून मिरवणे मानवतही असते. आपल्या मोठेपणाचे ओझे कोणालाही जाणवायला नको असेल तर ते अगोदर स्वतःच्या अंगावरून उतरून ठेवावे लागते. ते तसे उतरवून ठेवण्याची असामान्य कलाच यदुनाथांना अवगत होती. उपचाराचे अंतर एकदा संपले की यदुनाथ दूरचे राहत नसत आणि मग त्यांचे मोठेपणही उरत नसे. ते प्रत्येकाशी त्याच्या पातळीवरून बोलत आणि तसेच वागत. मग यदुनाथ सगळयांचे मित्र होत. साधना नावाच्या भारदस्त पत्राचा इतिहास घडविणारा संपादक, आंतरभारतीचा महत्त्वाचा आधार, महाराष्ट्रापासून मणीपूरपर्यंत पसरलेल्या शेकडो युवक चळवळींचा मार्गदर्शक प्रणेता आणि शेकडो पुस्तकांचा लेखक इ…इ.. सगळे विस्मृतीत जाई. फक्त यदुनाथच तेवढे मागे उरत.

यदुनाथ जेवढे साधे दिसत तेवढयाच साधेपणी ते बोलत अन् लिहीतही. त्यांच्या वाणीला आणि लेखणीला अलंकारांचा सोडा, साध्या तेल-पावडरीचाही सोस नव्हता. तरीही त्यांचे बोलणे प्रभावी होते. त्यांचा सहजसाधा शब्द थेट काळजापर्यंत जायचा. हा माणूस हातचे राखून बोलत वा लिहीत नव्हता. साधे पत्र लिहावे तेवढया साधेपणी आणि पुस्तकाचा मजकूर ते लिहीत अन् तेवढयाच सहजपणे तो हातावेगळा करीत. पण साधेपणाच दुर्मिळ होत असलेल्या या काळात त्यांच्या या अलंकारशून्य सहजतेत निखळ माणुसकीचा साक्षात्कार व्हायचा आणि श्रोते त्यांच्या व्याख्यानात तल्लीन व्हायचे. त्यांनी सांगितलेले सारे ऐकायचे अन् त्यांनी गायला सांगितले तर ते गायचेदेखील. प्राथमिक शिक्षकांच्या एका राज्यव्यापी अधिवेशनाचे उद्धाटन त्यांनी केले. अधिवेशनाच्या मंडपात पंधरा हजारांवर शिक्षक जमले होते. व्यासपीठावर मंत्री, अधिकारी, विचारवंत, समाजसेवक अशी गर्दी. यदुनाथांनी व्याख्यानाच्या मध्येच एक कोरस म्हणायला सुरूवात केली आणि सगळया अधिवेशनाला आपल्या मागून ते म्हणायला सांगितले. मला क्षणभर भीती वाटली. यदुनाथांचा आवाज गायकाचा नव्हता. त्याला गोडव्याचा फारसा स्पर्शही नव्हता. आपल्या सहजसाध्या आवाजात श्लोक म्हणावा तसे त्यांनी कोरस म्हटले आणि तिथल्या प्रत्येकाने ते त्यांच्या मागून म्हणत सारा मंडप दणाणून टाकला. एका शाळेच्या स्नेहसंमेलनात मुलांना उद्देशून ते म्हणाले, ‘भारत हा माझा देश आहे असं रोज म्हणता ना? मग तो असा दरिद्री, अर्धपोटी आणि बेकार कां, हे आपण स्वतःला विचारणार की नाही? सगळे भारतीय माझे बांधव म्हणता तर मग हा हिंदू, हा मुसलमान, हा दलित, हा उच्चवर्णीय असा प्रश्न आपल्याला पडतो की नाही?…’ ती सगळी चिमुकली प्रजा यदुनाथांच्या प्रश्नांनी अंतर्मुख आणि हतबल होऊन गेली. या कमावलेल्या, जोपासलेल्या विनम्र साधेपणामागे साधूगिरीचा सोस नव्हता. साऱ्यांना जवळचे वाटावे हाही हव्यास नव्हता. त्यामागे अत्यंत विचारपूर्वक स्वीकारलेली एक व्यापक बैठक होती. मानवी जीवनाचे अत्युच्च विकसन म्हणजे विचारांचे शासन होय अशी यदुनाथांची धारणा होती. जेव्हा दंडशासनाची जागा विचारांचे शासन घेईल तेव्हा मानवी संस्कृती ही विकासाच्या सर्वोच्च अवस्थेला पोहचलेली असेल. अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याची चिंता वाहणाऱ्यांना हे आवाहन सतत डोळयासमोर ठेवावे लागेल. शस्त्रशक्तीच्या परिणामकारकतेचा मुद्दा आता अण्वस्त्रांनी निकालात काढला असल्यामुळे शस्त्रांनी प्रश्न सुटतात यावरचा माणसांचा विश्वास संपला आहे आणि शस्त्रांना फक्त शब्द हाच पर्याय उरला आहे.
यदुनाथांची श्रध्दा अशी की शस्त्रशक्तीचा पर्याय होण्याचे सामर्थ्य शब्दशक्तीत आहे. पण ते सामर्थ्य सिध्द व मान्य करायचे असेल तर शब्द वापरणाऱ्यांनी अधिक नम्र आणि सावध असले पाहिजे. शब्दसुध्दा तितकेच घातक आणि जीव घेणारे ठरू शकतात. हत्यारांचे भय शरीराला आणि इंद्रियांना असेल, शब्दाचे भय आत्म्याला आणि सनातनाला आहे. पायाखाली येणारे किडाकिटुकदेखील हतप्राय होऊ नये याची काळजी वाहणाऱ्या जैन श्रावकाची ही भूमिका आहे. आधुनिक भाषेत सांगायचे तर हे हृदयपरिवर्तनाचे आवाहन आहे. हृदय परिवर्तनासाठी त्याला भावेल अशाच शब्दात विचार यावा लागेल. शब्दांच्या आक्रस्ताळया आतषबाजीतून येणारे दीप्तीमान झोत आणि शब्दांच्या समईतून प्रगटणारा मंद प्रकाश या दोहोंचीही जातकुळी एकच. एक दिपवणारी, क्वचित भाजणारी तर दुसरी सातत्याने जीवन उजळणारी, मंगलमय.

रुसो म्हणाला, तुमच्या एकाही शब्दाशी मी सहमत नसलो तरी तुमचे म्हणणे मांडण्याचा तुमचा अधिकार कायम रहावा म्हणून मी लढायला मागेपुढे पाहणार नाही. ही भूमिका वैज्ञानिक आहे आणि कोणताही वैज्ञानिक आपल्याला अंतिम सत्य गवसले असल्याचा दावा करीत नाही. आजची कल्पना हे उद्याचे सत्य ठरू शकते आणि आजचे सत्य हा सत्यशोधनाच्या मार्गावरील फक्त एक टप्पाच ठरू शकतो. सापेक्ष सत्याच्या आधारे प्रयोग करीत राहणे आणि प्रयोगांती नवे सत्य समोर आले तर त्याचा उमदेपणाने स्वीकार करणे ही वैज्ञानिक भूमिका आहे.

यदुनाथ विज्ञानाचे विद्यार्थी होते आणि विज्ञाननिष्ठा हे त्यांचे जीवनव्रत होते. ज्ञान हा अनंतकाळापर्यंत वाहणारा सनातन प्रवाह आहे. तो कोणत्याही ग्रंथापाशी थांबत नाही व गुरू केवढाही मोठा असला तरी तो ज्ञानाचा पूर्णविराम ठरत नाही ही विज्ञाननिष्ठ मनाची भूमिका आहे. म्हणूनच ‘जगातील सगळी ग्रंथालये जाळून टाका. कारण सगळे ज्ञान कुराणात आले आहे’ ही मागणी या मनाला जशी मान्य होणार नाही तसे ‘सगळे ज्ञान वेदात आले असल्याने त्यावरच्या निष्ठाच तेवढया अंतिम सत्याप्रत नेणाऱ्या आहेत’ ही श्रध्दाही त्याला भावणारी नाही. व्यास आणि बुध्द हे ज्ञानाचे पूर्णविराम नाहीत आणि मार्क्स आणि गांधीजवळही ज्ञानाचा प्रवाह थांबणारा नाही. आपल्या श्रध्दास्थानांना ज्ञानाचे अंतिम निकष मानून थांबणारे लोक ज्ञान वाढवीत नाहीत. आपापल्या श्रध्दास्थानांचे ते फक्त देव्हारे माजवीत असतात. त्यात ज्ञानोपासनेपेक्षा महंतगिरीच बलवत्तर असते. कोणताही विज्ञाननिष्ठ माणूस अशा महंतगिरीचा उपासक असणार नाही. गुलाल उधळला काय आणि नीळ उधळली काय अखेर दोन्हीतल्या अंधश्रध्देचे कूळ एकच असणार.

यदुनाथ थत्त्यांची विज्ञानोपासना अशी खणखणीत बुध्दीवादाच्या अधिष्ठानावर उभी होती. आठव्या शतकातल्या क्युरेश जमातीतले काही प्रश्न निकालात काढण्यासाठी सलिवुल्ला वसल्लम महंमद पैगंबर काही सुधारणा सुचवितात. तो काळ धर्माच्या भाषेत बोलणारा असल्यामुळे आपला विचार तो धर्माच्या परिभाषेत सांगतो आणि हाडामासाच्या माणसाचे म्हणणे कुणी ऐकत नाही म्हणून हा विचार अल्लाने आपल्या दूतांकरवी माझ्यापर्यंत पोहचविला असे म्हणतो व त्यातून इस्लामचा जन्म होतो. सन पूर्व सहाव्या शतकातल्या वैदिक धर्मातील हिंसाचाराला विरोध करण्यासाठी त्या हिंसेमागच्या प्रेरणांनाच सिध्दार्थ आव्हान देतो. हे आव्हान तेव्हाच्या धर्माच्या परिभाषेत येते. ते बुध्दमुखातून येते आणि नव्या धर्माचे प्रवर्तन सुरू होते.

तत्कालीन समाजाचे प्रश्न सोडविण्याचा तत्कालीन भाषेतून झालेला प्रयत्न हे सर्व धर्मांचे जन्मकारण आहे आणि तसेच ते समजून घेतले पाहिजे. विसाव्या शतकाचे निकष जसे पैगंबराच्या किंवा बुध्दाच्या काळाला लावता येत नाहीत तसे कुराण व स्मृतींच्या कायद्याच्या आधारे विसाव्या शतकातले प्रश्नही सोडविता येणार नाहीत. हा विज्ञाननिष्ठ बुध्दीवादातून साकारणारा सेक्युरॅलिझम आहे. यदुनाथ अशा सेक्युलर विचाराचे कृतीशील कार्यकर्ते होते. एक गाव एक पाणवठा ही बाबा आढावांची चळवळ असेल किंवा मुस्लीम सुधारणावादाचा हमीद दलवाईचा भव्य प्रयत्न असेल, यदुनाथ अशा कामांचे दायित्व स्वतःहून शिरावर घेत आणि आपले काम म्हणून त्यासाठी झिजत. मात्र करडया बुध्दीवादाने वा चिकित्सक सेक्युलॅरिझमने यदुनाथांना रुक्ष किंवा कोरडे बनविले नाही. जीवनातील ऋजुता आणि गोडवा यांच्याशी आपले नाते त्यांनी तेवढयाच हळूवारपणे जपले. म्हणून लहान मुलांसाठी त्यांना समजेल, रुचेल, पचेल अशा भाषेत पुस्तके लिहिणे त्यांना जमले. साहित्य संमेलनांमधून उद्याच्या या वाचकांचा म्हणजे बाल वाचकांचा विचार होत नाही याचा त्यांना राग यायचा आणि तरुण मुलामुलींच्या मनाची जपणूकही त्यांना साधायची.

बुध्दीवादाने त्यांना अश्रध्द बनविले नाही उलट त्यांच्या जीवनातील सगळया श्रध्दा बुध्दीवादाने डोळस केल्या. व्यक्तीपूजेचे स्तोम न माजविणारे ममत्व त्यांना साधले आणि त्या ममत्वाला आपल्या चिकित्सा बुध्दीवर मात करू न देणारा आत्मसंयमही त्यांना जमला. मराठी बुध्दीवादाला अलिकडच्या काही दशकात अहंतेचा विकार जडला आहे. इथला प्रत्येक बुध्दीवादी हा एक स्वतंत्र तिरसिंगराव आहे आणि इतरांकडे पुरेशा तुच्छतेने पाहणारा तुच्छतावादीही आहे. आपला बुध्दीवाद सतत गर्जून सांगणाऱ्या अनेकांची एक आणखीही गंमत असते. त्यांच्या बुध्दीवादात त्यांच्या स्वतःच्या बुध्दीखेरीज इतरांच्या बुध्दीला मान नसतो. अशी तापदायक माणसे आपल्या बुध्दीच्या बेटांवर एकेकटीच आरामात राहतात आणि इतर कोणी आपल्याजवळ येणार नाही अशी स्वतःच व्यवस्थाही करतात. यदुनाथांचा बुध्दीवाद असा स्वयंकेद्री नव्हता. मुळात त्यांचा प्रयासच स्वतःचे असे केंद्र मोडीत काढण्याचा होता. म्हणून त्यांचा बुध्दवाद खुपणारा नव्हता, तो माणसे जोडणारा होता. यदुनाथांच्या पायात अखंड घुमणारे एक चक्रीवादळ होते. ते त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यातून सतत घुमवीत होते. माणसे, प्रेरणा, संस्था आणि स्वप्ने दाखवीत होते. या देशाच्या भविष्याचे अंकुर जपत, फुलवत आणि वाढवत यदुनाथ देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्यापर्यंत अखंडपणे फिरत. त्यासाठी त्यांना बोलवावे लागत नसे. त्या अंकुरांचा सुवास थेट त्यांच्यापर्यंत निमंत्रणासारखा पोहचत असे.

कोणत्याही आदरणीय शब्दाच्या वाटयाला अवमूल्यनाखेरीज काही येऊ नये असा हा दुर्दैवी काळ आहे. या काळात मूल्यनिष्ठा हा खरेतर जाणकारांच्या कुचाळीचा आणि उपहासाचा विषय. अशावेळी मूल्यांवरची ज्याची निष्ठा प्रामाणिक असेल त्याला दरक्षणी आपल्या सच्चाईची किंमत चुकवावी लागते आणि चुकवता आली नाही तर तिच्या कर्जाचे ओझे आयुष्यभर अंगावर वागवावे लागते. यदुनाथ थत्ते हा माणूस हे मोल चुकवीत होता आणि ते चुकविल्यानंतर त्याचा भार अभिमानाने ओढतही होता. अशा माणसाला कसलीही जाहिरात न करता अपरिग्रहाचे व्रत घ्यावे लागते आणि त्याची उपासनाही आयुष्यभर करावी लागते. यदुनाथांना आयुष्याच्या उत्तरार्धात घर मिळाले तेही पत्रकारांसाठी कॉलनी झाली त्यात. त्यातले श्रीमंतीचे एकमेव लक्षण त्यांच्याजवळच्या ग्रंथांच्या संग्रहाचे.

फिरत जगणे ही यदुनाथांची साधना. या साधनेचेच त्यांना वेड राहिले. त्यापुढे साध्याचा मोहदेखील त्यांना कधी थांबवू शकला नाही. ते ज्यांना श्रध्दास्थानी मानत त्या गांधींनीही म्हटले, साधनांची काळजी करणेच तेवढे आपल्या हाती असते. माणसे जोडत हिंडणाऱ्या यदुनाथांची माणसे हीच मिळकत आणि श्रीमंती होती. त्यासाठी त्यांनी सोसलेल्या हालअपेष्टांची माहिती ज्यांना आहे त्यांनाच तिचे मोल कळणारे आहे. मतभेद मान्य, पण मतभेद करणाऱ्या माणसाचा दुरावा अमान्य असा हा ध्यास आहे. एखादे माणूस तुटले आणि दूर गेले की त्यातून येणारे रितेपण अशा माणसांना सतत छळत असते. शिवाय ही गोष्ट त्यांच्यापुरती मर्यादितही नसते. आपण आपल्या मानलेल्या माणसांनी एकमेकांपासून दूर झालेलेही त्यांना चालत नसते.

यदुनाथांना जीवनाची चांगली बाजूच तेवढी पाहता आली. माणसांचे विकार माणूस म्हणून क्षम्य असल्याचे मत त्यांनी अभ्यासपूर्वक बनवले होते. म्हणून महात्म्यांनाही क्षुद्र होताना पाहून त्यांना त्याचा धक्का बसत नसे. ‘अरे, शेवटी मोठा झाला तरी तो माणूसच’ असा त्यांचा अभिप्राय असे आणि ‘त्याचे विकार त्याच्यापाशी, तुला आणि मला त्याची चांगली बाजूच महत्त्वाची वाटली पाहिजे’ हा वर उपदेश. जीवनाकडे पाहण्याचा विधायक वगैरे म्हणतात तो हाच दृष्टीकोन असावा. गांधी ज्याला सत्याग्रहाची साधना म्हणायचे तीही हीच असावी. त्यांच्यासोबत पंजाबच्या दहशतग्रस्त ग्रामीण भागातून फिरत असतानाची गोष्ट. अमृतसरजवळच्या तरणतारण या शिखांच्या पवित्र क्षेत्री त्यांचा मुक्काम होता. तेथे मी त्यांना भेटलो आणि मग फतेहाबाद, अमृतसर, वाघा, बियास, फिरोजपूर, होशियारपूर अशी आमची फिरस्ती सुरू झाली. प्रत्येक गावात अतिरेक्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या निरपराधांच्या कुटूंबात आम्ही जात होतो. त्यांचे सांत्वन करणे आमच्या ताकदीबाहेरचे होते. पण त्यांना मिळणारी सरकारी मदत वेळच्यावेळी आणि पुरेशी मिळते की नाही, त्यातल्या अडचणी कोणत्या याची माहिती आम्ही घेत होतो. जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन त्या अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून सांगत होतो.

मला हा तात्पुरत्या मलमपट्टीचा आणि आमच्याच मानसिक समाधानाचा उपक्रम वाटत होता. त्यातून कोणताही मूळ प्रश्न निकाली निघत नाही असे वाटत होते. एकदा मी हे यदुनाथांना सांगितले तेव्हा ते शांतपणे म्हणाले, ‘जे प्रश्न सरकारांना सोडवता येत नाहीत ते आपल्या हाती निकालात निघावे ही आकांक्षा बाळगणे हेच मुळात चुकीचे.’

मी म्हणालो, ‘मग आपल्या पायपिटीला अर्थ कोणता?’ यदुनाथ म्हणाले, ‘यातून आपण काही शिकलो की नाही? जे शिकलो ती उपलब्धी. आपल्या प्रयत्नांनी इतरांची जाण किती वाढते याहूनही आपली जाणीव विस्तारते की नाही हे पाहणे महत्त्वाचे.’

गांधी म्हणाले, सत्याग्रह कोणाही विरुध्द नसतो, कशाही विरुध्द नसतो आणि काही मिळवायचे म्हणूनही नसतो. तो आत्मसामर्थ्य वाढविण्याचा मार्ग आहे. यदुनाथजींची आयुष्यभराची पायपीट ही गांधीजींचा असा सत्याग्रही होण्याची होती.

याच दौऱ्यात एकदा मी त्यांना चेष्टेने विचारले, ‘पंजाबच्या भूमीवर शहिद-बिहीद होण्याचे तर तुमच्या मनात नाही?’ त्यावर प्रसन्न हंसत ते म्हणाले, ‘खुळा की काय, अरे आपल्यावर गोळी झाडायला अतिरेक्यांना वेडबिड लागलं कां? आपली गोळी कोणावरही वाया दवडू नये एवढं त्यांना चांगलं समजतं.’
यदुनाथ फिरत राहिले. तरुणांना भेटत अन् बोलत राहिले. मित्र जमवण्याचे व्यसन त्यांनी अखेरपर्यंत जोपासले. कोणतीही ठोकळेबाज विचारसरणी न सांगता ते स्वतंत्र विचारांचे मार्ग सांगत राहिले. माझ्या स्वभावापायी यदुनाथांसारखी माणसे नुसतीच जोडणे मला जमले नाही. पण मला अंतरलेली माणसे पुन्हा माझ्याजवळ आणण्यासाठी त्यांची झालेली घालमेल मी पाहिली आहे. आपल्या विस्तारालेल्या परिवारातली माणसे नेहमी भेटावीत, त्यांचे परस्पर सौहार्द कायम असावे आणि आपण जसे एखाद्याला प्रोत्साहनाने फुलवतो तसे त्यांनीही करावे ही त्यांची इच्छा असे.

एखाद्या लहानशा स्टेशनावर अंधाऱ्या रात्री गाडी थांबते. तिथल्या अपुऱ्या प्रकाशात हाती रॉकेलचा उंच दिवा घेऊन एक कामगार गाडीच्या चाकांवर ठोके देऊन जातो. त्याच्या एका हाती तेलाचा कॅन असतो. जिथे गरज असेल तिथे त्या कॅनमधले तेल घालत तो गाडीचा पुढला प्रवास सुखाचा करतो. यदुनाथ थत्त्यांची आठवण झाली की मला रात्रीच्या काळोखात गाडीच्या चाकांत तेल ओतणारा तो माणूस आठवतो. सगळया भविष्याची वाटचाल सोपी करणारी अशी माणसे हीच समाजाच्या निर्धास्तपणाची हमी असते आणि अशी माणसे आपल्याजवळची असणे हा आपल्याला लाभलेल्या आशीर्वादाचा भाग असतो. केव्हाही येणारा असा माणूस आपल्या मनातला सगळा कुंदपणा घालवणारा, त्यात प्रकाशकणांची पेरणी करणारा आणि आला तसाच नकळत निघून जाणारा असतो.