उत्तरा सहस्रबुद्धे , सौजन्य – लोकसत्ता
प्रपाठक, राज्यशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ
(स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉ. ना. दा. सावरकर हे लेखिकेचे (आईचे वडील)आजोबा. )
काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीत सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते? सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते.
स्वातंत्र्यवीर सावरकर पुन्हा एकदा या देशातील गलिच्छ राजकारणाचा केंद्रबिंदू ठरले आहेत. राजकीय पक्षांच्या धुळवडीमध्ये आज सावरकर हा एक ‘मुद्दा‘ झाला आहे. तसे या देशात दिवंगत नेत्यांना वेठीला धरून राजकारणी डावपेच रंगविण्याचे प्रकार नवीन नाहीत. आपल्या समाजाला विधायक टीका पचविता तर येत नाहीच. ऐतिहासिक व्यक्तींचे परखड मूल्यमापन हे कोणत्याही समाजाला हितकारकच असते. परंतु तशी कुवतच नसलेल्या आपल्या या देशातहोते ती नुसती चिखलफेक. अलीकडे सावरकरांवर वारंवार अशी चिखलफेक होताना दिसत आहे. आज केंद्रीय पेट्रोलियम मंत्री मणिशंकर अय्यर त्याला कारणीभूत झाले आहेत, काही महिन्यांपूर्वी संसदेत सावरकरांचे चित्र लावण्याच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी अशीच ठिणगी टाकलेली होती.
दुर्दैवाने आज देशाच्या राजकारणाचे ‘भाजप वि. भाजपेतर‘ म्हणजेच ‘हिंदुत्ववादी वि. सेक्युलर‘, असे विचित्र ध्रुवीकरण झालेले आहे. त्यामुळे वैचारिक माहौल असा झाला आहे की, काँग्रेसला वाईट म्हणणार्याचीही लगेच ‘जातीयवादी‘ अशी संभावना होते. त्यामुळे निष्पक्ष विवेचन करू इच्छिणार्या आणि कोणत्याही विचारसरणीच्या जोखडापासून मुक्त असू पाहणार्या व्यक्तींची अतिशय पंचाईत होते. शीतयुद्धाच्या काळात गटनिरपेक्ष परराष्ट्रधोरण राबवू इच्छिणार्या तिसर्या जगातील राष्ट्रांना, ‘तुम्ही आमच्याबरोबर नसाल, तर आमच्या विरुद्धच आहात‘ असे दरडावणार्या अमेरिका आणि सोविएत संघासारखी दहशत आज इथल्या वैचारिक क्षेत्रात निर्माण झाली आहे. त्यामुळेच, एनडीए सरकारच्या परराष्ट्रधोरणाची वाखाणणी करणार्या व्यक्तीला सरळ ‘प्रतिगामी हिंदुत्ववादी‘ ठरविले जाते! आणि अलीकडच्या काळात संघपरिवाराने सावरकरांचे चक्क ‘अपहरण‘ केलेले असल्यामुळे, आजच्या विवादात सावरकरांची बाजू मांडणार्याचीही तशीच वाट लावली जाईल. परंतु सावरकरांनीच मांडलेली हिंदुत्वाची अतिरेकी विचारसरणी समूळ अमान्य करूनही,सावरकर या व्यक्तीची देशभक्ती, त्यासाठी त्यांनी केलेला त्याग, भोगलेल्या हालअपेष्टा याविषयी शंका घेणे अत्यंत अप्रस्तुत आणि असंस्कृत आहे, हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे.
ज्या दोन मुद्द्यांवरून मुख्यतः आज सावरकरविरोधी राळ उडविली जात आहे, त्यातील पहिला मुद्दा आहे गांधी हत्येतील सावरकरांच्या सहभागाचा. कितीही तीव्र मतभेद असले तरी गांधी या देशबांधव असलेल्या व्यक्तीची हत्या करणे हे कायद्यालाच नव्हे तर नैतिकतेलाही धरून नव्हते. सावरकर अशा कृत्यास पाठिंबा देतील अशी सुतराम शक्यता नव्हती. तत्कालीन सरकारने सावरकरांना या खटल्यात गोवले खरे; परंतु सर्व पुरावे तपासून न्यायालयाने सर्व आरोपांतून सावरकरांची सन्मानाने मुक्तता केली. तसेच आकसाने सावरकरांना या खटल्यात गुंतविल्याबद्दल सरकारवर ताशेरेही ओढले. त्या वेळी सरकारनेही हा निकाल मानला. त्यावर अपील करण्याची संधी असूनही तसे केले नाही आणि या प्रकरणावर पडदा टाकला. आज जर काँग्रेस आणि डावे पक्ष पुनःपुन्हा तोच मुद्दा उकरून काढत असतील तर न्यायालयाचा निर्णय त्यांना अमान्य आहे, असे समजायचे का? ही मंडळी एक प्रकारे न्यायालयाचा अवमानच करीत नाहीत का? अयोध्या प्रकरणी चाललेल्या केसचा निकाल आमच्या विरुद्ध गेला तर आम्ही तो मानणार नाही, असे सांगणार्या विहिंप- संघ परिवारात आणि काँग्रेस- डाव्या पक्षांमध्ये मग काय फरक राहिला? गांधी हत्येमध्ये सावरकरसहभागी होते असा दावा करणार्यांना सावरकरांचे राजकारण समजलेच नाही, असे म्हटले पाहिजे. सावरकर हे जसे ‘अहिंसेचे पक्षपाती‘ नव्हते तसेच ‘हिंसेचे पक्षपाती‘ही नव्हते. आपल्या ध्येयप्राप्तीसाठी केवळ हिंसेच्या मार्गाचा वापर त्यांनी केला नाही. त्यांचे विद्यार्थिदशेतील पुण्यातील राजकारण, त्यांचे इंग्लंडमधील राजकारण पाहता असे लक्षात येते की, त्यांनी क्रांतिकारी मार्गाबरोबरीनेच, प्रतिकाराच्या निःशस्त्र आणि लोकशाहीसंमत मार्गांचाही भरपूर वापर केला. मुख्यतः निःशस्त्र असलेल्या हैद्राबाद मुक्तिसंग्रामास त्यांनी पाठिंबा दिला आणि हिंदुसभेच्या सभासदांनी त्यात सहभागी होण्याची हाक दिली. अखंड हिंदुस्थानसाठी त्यांनी चालविलेला लढा हा सेक्युलर जरी नव्हता तरी निःशस्त्रच होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पिस्तुल सोडून मतपेटीचा मार्ग पत्करला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले होते. अंदमानात असताना त्यांना नामदार गोखल्यांच्या निधनाची बातमी समजली, तेव्हा गोखल्यांच्या राजकारणाला टोकाचा विरोध करणार्या सावरकरांनी, गोखल्यांची देशभक्ती आणि त्याग याविषयी आदर व्यक्त करण्यासाठी, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी एक दिवसाचा कडकडीत उपास केला होता. हे सावरकर गांधीहत्येच्या कटात सहभागी होतील, अशी शक्यताच नाही. सावरकर ‘क्रांतिकारक‘ होते, ‘दहशतवादी‘ नव्हते!
काही महिन्यांपासून मुख्यतः डाव्या पक्षांनी पुढे आणलेला आणखी एक मुद्दा म्हणजे सावरकर ब्रिटिश सरकारची माफी मागून अंदमानातून सुटले. यावरून सावरकरांच्या देशभक्तीविषयी शंका उपस्थित करणार्या डाव्यांच्या देशनिष्ठेविषयी किती आणि काय बोलावे ? दुसर्या महायुद्धाविषयीची सोव्हिएत संघाची भूमिका जसजशी बदलली, तसतशी इथल्या साम्यवाद्यांची भूमिका बदलत गेली हे तर सर्वश्रुत आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धाच्या वेळी चीनच्या भूमिकेचे समर्थन करणारे डावेही होते. गमतीचा भाग म्हणजे या युद्धाच्या वेळी सोव्हिएत संघ तटस्थ राहिला. चीन नावाच्या साम्यवादी ‘बंधूला‘ भारत नावाच्या ‘मित्रा‘विरुद्ध काही सोव्हिएत संघाने पाठिंबा दिला नाही. त्यानंतर आंतरराष्ट्रीय कम्युनिस्ट परिषदेमध्ये झालेल्या चर्चेत जेव्हा भूपेश गुप्ता या युद्धातील चीनची बाजू मांडू लागले तेव्हा प्रत्यक्ष क्रुश्चेव्हनी त्यांना ‘आधी आपल्या देशबांधवांना चीनच बरोबर हे पटवून द्या!‘ असा टोला हाणला होता.
सावरकरांच्या या तथाकथित माफीपत्राचा संदर्भाशिवाय विचार करणे चुकीचे आहे. संपूर्ण स्वातंत्र्यलढ्यात दोन जन्मठेपांची शिक्षा झालेली सावरकर ही एकच व्यक्ती होती. (इतिहासतज्ज्ञांनी चूकभूल द्यावी-घ्यावी!) यावरून ब्रिटिश सरकारच्या दृष्टीने त्यांनी केलेला ‘गुन्हा‘ किती गंभीर होता हे लक्षात यावे. अंदमानातील उणीपुरी १४ वर्षे त्यांनी ज्या हालअपेष्टा सोसल्या त्याला सीमाच नाही. त्यातूनही सजगता, कविवृत्ती आणि विनोदबुद्धी टिकवून हा माणूस बाहेर पडला. अंदमानातून सुटल्यावरही काही वर्षे भारतातील तुरुंगात आणि दशकभराहून अधिक काळ रत्नागिरीत स्थानबद्धतेत काढावा लागला. हे काय सावरकरांनी ब्रिटिशांसमोर शरणागती पत्करली आणि त्यावर ब्रिटिशांनी विश्वास ठेवला म्हणून ? युद्धामध्ये ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू ला मोठेच महत्त्व असते आणि आपल्या स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासात अशा तर्हेन ूaम्ूग्म्aत् ÇाूÇर्ीू घेण्याचे सावरकर हे काही एकमेव उदाहरण नव्हे. शेवटी १९३७ मध्ये सावरकरांची बिनशर्त मुक्तता झाली, तीही ब्रिटिशांच्या नव्हे, तर मुंबई प्रांतीय सरकारातील हिंदी नेत्यांच्या पुढाकाराने काँग्रेस आणि डाव्या पक्षांनी आज सावरकरांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केल्यावर संघ परिवार आज सावरकरांची बाजू घेऊ पाहतोय. परंतु सावरकर या व्यक्तीच्या आणि त्यांच्या विचारांच्या संदर्भात संघ परिवाराची नेमकी भूमिका काय आहे हा प्रश्न अप्रस्तुत नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत संघाच्या ‘प्रातःस्मरणीय‘ व्यक्तींच्या यादीमध्ये सावरकरांचे नाव नव्हते. गांधीहत्येच्या आरोपातून स्वतःला मुक्त करू पाहणार्या संघाने तशाच हिरीरीने या बाबतीत कधी सावरकरांची बाजू मांडल्याचे ऐकिवात नाही. सावरकरांची विचारसरणी तरी संघ परिवाराला किती ग्राह्य वाटते ? सावरकर हिंदुत्वाच्या विचारसरणीचे जनक होते आणि संघपरिवार हिंदुत्वाचे राजकारण करतो. परंतु हे साम्य कदाचित इथेच संपते. हिंदू संघटनांसाठी अस्पृश्यता आणि जातिव्यवस्थेचे समूळ उच्चाटन केले पाहिजे हा सावरकरांचा विचार, तर गुरुजीप्रणीत संघाचा चातुर्वर्ण्य व्यवस्थेवर विश्वास. गाय हा केवळ उपयुक्त पशू आहे, असे म्हणणारे सावरकर संघ परिवाराला कुठे मान्य आहेत ? आमच्या वेदांमध्ये सर्व काही ज्ञान आहे असे म्हणणे म्हणजे आम्ही गेल्या हजारो वर्षांत काहीच प्रगती केली नाही अशी अप्रत्यक्ष कबुलीच देणे आहे, असे प्रतिपादन करून; वेदांना ग्रंथालयाची शोभा म्हणून कपाटात जरूर ठेवावे, पण आज ते आचरणात मात्र मुळीच आणू नयेत; असे शिकवणारे सावरकर परिवारातल्या किती जणांना पचविता येतील ? पाश्चिमात्य आणि पौर्वात्य या दोन संस्कृतींमध्ये ‘अप-टु-डेट‘ आणि ‘श्रुति-स्मृतिपुराणोक्त‘ हा मूलभूत फरक असल्याकडे लक्ष वेधून ‘श्रुतिस्मृतिपुराणोक्त‘ वृत्तीमुळे आपल्या भारतीय समाजाचे जबर नुकसान झालेले आहे, असे ठासून सांगत, विज्ञानवाद आणि विवेकवाद हेच आपल्या रोगांवरचे औषध आहे, असे आग्रही प्रतिपादन करणारेसावरकर, संघ परिवाराला पेलतील का ? हिंदुत्वाची विचारसरणी आणि राजकारण नाकारूनही सावरकर हे देशनिष्ठा आणि त्याग यांचे प्रतीक आहे, हे मान्यच करावे लागते. सावरकरांवरून हीन पातळीवरचे राजकारण पुनःपुन्हा खेळले जाते, यात सावरकरांचे काहीच नुकसान नाही. परंतु यातून आपल्या समाजाचा इतिहासाच्या आकलनाविषयीचा असमंजसपणा दिसतो आणि म्हणून आपल्या भविष्याच्या दृष्टिकोनाविषयीही प्रश्नचिन्ह निर्माण होते.