Posts Tagged ‘भगतसिंग’

संजय चिटणीस, सौजन्य – लोकसत्ता

सर जॉन सायमन यांच्या नेतृत्वाखाली १९२८ साली एक कमिशन भारतात आले होते. या कमिशनवर भारतातील सर्व पक्षांनी बहिष्कार घातला होता. हे कमिशन जिथे जिथे जाई, तिथे हरताळ पाळण्यात येऊन निषेधाच्या प्रचंड मिरवणुका निघत व ‘सायमन गो बॅक‘ अशा घोषणा दिल्या जात. ३१ ऑक्टोबर १९२८ रोजी हे कमिशन लाहोर येथे गेले असता जनतेने लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली मोठे निदर्शन केले. त्या वेळी, पोलीस सुपरिंटेंडेंट स्कॉट व सँडर्स यांनी लाठीमार केला. त्यात लाला लजपतराय यांच्या छातीवर मार बसला व त्यामुळे पुढे लालाजींचे निधन झाले.

लालाजींच्या मृत्यूमुळे देशातील वातावरण प्रक्षुब्ध झाले. देशबंधू चित्तरंजन दास यांच्या पत्नी वासंतीदेवी यांनी तर एक पत्रक काढून, भारतातील युवक या राष्ट्रीय अपमानाचा बदला घेणार नाहीत का, असा सवाल केला. भगतसिंग यांनी हे पत्रक पुनःपुन्हा वाचले आणि निश्चय केला की, लालाजींच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या सँडर्सर्ला यमसदनाला पाठविल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. त्यांच्या या संकल्पाला चंद्रशेखर आझाद, सुखदेव व राजगुरू यांची साथ होतीच. त्यानुसार १७ डिसेंबर १९२८ रोजी सँडर्स हा दयानंद कॉलेजसमोरील पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना राजगुरू यांनी पुढे उडी मारून त्यांच्या मानेवर गोळी झाडली. त्यानंतर भगतसिंग यांनी आणखी चार-पाच गोळ्या झाडून सँडर्सला यमसदनास धाडण्याचे काम पूर्ण केले. पुढे त्याबद्दल भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांवर खटला भरण्यात आला.या खटल्याच्या अखेरीस भगतसिंग, सुखदेव व राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि २३ मार्च १९३१ रोजी तिची अंमलबजावणी करण्यात आली.

परंतु भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांना देण्यात आलेल्या फाशीमुळे मोठे राजकीय वादळ उठले. विशेषतः महात्मा गांधींना त्यासंदर्भात लक्ष्य बनविण्यात आले. या देशभक्तांची फाशीची शिक्षा रद्द करून घेण्यासाठी गांधींनी प्रयत्न केले नाहीत, असा ठपका काहींनी गांधींवर ठेवला. इतकेच नव्हे, तर गांधीजी कराची येथे काँग्रेसच्या अधिवेशनाला गेले तेव्हा त्यांच्यासमोर निदर्शनेही करण्यात आली. ‘गांधी परत जा‘, ‘गांधीवादाचा धिक्कार असो‘, ‘गांधींच्या समेटामुळे भगतसिंग फासावर गेले‘, ‘भगतसिंग अमर रहे‘ अशा घोषणा नवजवान सभेचे सदस्य देत होते. पण एवढ्यावरच न थांबता त्यांनी काळ्या कापडात गुंडाळलेली फुले गांधींना दिली. फासावर गेलेल्या हुतात्म्यांच्या रक्षेचीच ती प्रतीके होती. परंतु निदर्शक भारदस्त होते. मनात आणले असते तर ते गांधींना धक्काबुक्की करू शकले असते, त्यांचा अपमानही करू शकले असते. पण तसे त्यांनी काहीही केले नाही. स्वतः गांधींनीच तशी नोंद करून ठेवली आहे.

वास्तविक त्या वेळी स्वातंत्र्यासाठी जो अहिंसात्मक लढा सुरू होता त्याचे एक पर्व संपले होते. गांधी व व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांच्यात समेटाची बोलणी चालू होती. लढ्याचा हिंसक मार्ग गांधींना मान्य नव्हता. पण त्याचबरोबर शूर माणसांबद्दल त्यांना आदर वाटायचा. त्यांची अहिंसा ही शूराची होती. अहिंसेच्या अनुषंगाने एका सभेत भाषण करताना गांधीजी म्हणाले, ‘माझ्या अहिंसेच्या तत्त्वात चोर, दरोडेखोरच नव्हेत तर खुन्यांनाही फाशी देणे बसत नाही. कोणालाही सुळावर चढविणे हे माझ्या सदसदि्‌्‌ववेकबुद्धीला पटत नाही. अशा पार्श्वभूमीवर, भगतसिंगांसारख्या वीराला फाशी देणे, ही कल्पनाच सहन होत नाही.‘

भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका व्हावी म्हणून १९ मार्च रोजी गांधींनी दिल्ली येथे व्हाइसरॉय लॉर्ड आयर्विन यांची भेट घेतली. पण गांधींच्या रदबदलीचा उपयोग झाला नाही. परंतु या रदबदलीची बातमी पंजाबच्या तत्कालीन गव्हर्नरना मिळाली. ही रदबदली कदाचित यशस्वी होईल, असे त्यांना वाटले. त्यामुळे २४ मार्च हा फाशीचा दिवस ठरला असूनही, आदल्या दिवशी रात्रीच लाहोरच्या तुरुंगात त्यांनी फाशी देण्याचा अघोरी कार्यक्रम उरकून घेतला. सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे अगदी २३ मार्च उजाडतो न उजाडतो तोच गांधींनी आयर्विन यांना पत्र दिले व भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांची फाशीची शिक्षा रद्द करण्याविषयी कळकळीचे आवाहन केले. पण त्याचा आयर्विनवर काहीही परिणाम झाला नाही. ते आपल्या निर्णयावर ठाम होते.

२६ मार्च १९३१ रोजी कराचीच्या काँग्रेस अधिवेशनात बोलताना या तीन देशभक्तांना वाचविण्यासाठी आपण कसे प्रयत्न केले हे गांधींनी विशद केले. आपण ज्या वाटाघाटी व बोलणी केली, त्यामुळे भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांचे प्राण वाचतील, अशी आपल्याला आशा वाटू लागली होती, असे उद्‌गार काढून गांधीजी म्हणाले, ‘मी व्हाइसरॉयना समजावून देण्याचा आटोकाट प्रयत्न केला. माझी बाजू परिणामकारकपणे मांडण्याची मी शिकस्त केली. भगतसिंगांच्या नातेवाईकांबरोबर माझी शेवटची मुलाखत २३ मार्च रोजी ठरली होती. त्या दिवशी व्हाइसरॉयना लिहिलेल्या पत्रात मी माझे अंतःकरण ओतले होते.‘

भगतसिंग प्रभृतींची फाशीची शिक्षा रद्द व्हावी म्हणून गांधीजींनी कसे प्रयत्न केले, यावर जवाहरलाल नेहरूंनीही प्रकाश पाडला आहे. ते आत्मचरित्रात लिहितात, ‘भगतसिंगांची फाशी रद्द व्हावी म्हणून गांधींनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण सरकारने आपला हट्ट सोडला नाही. गांधी- आयर्विन कराराशी वस्तुतः या प्रयत्नांचा संबंध नव्हता. परंतु या प्रश्नाबद्दल देशात किती प्रखर भावना आहेत, हे लक्षात घेऊन गांधींनी त्यासंबंधी स्वतंत्रपणे प्रयत्न केले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.‘

स्वतः नेहरूंना भगतसिंग व त्यांच्या सहकार्‍यांची फाशीच्या शिक्षेतून सुटका होईल, अशी आशा वाटत होती. १० मार्च १९३१ रोजी अलाहाबाद येथे केलेल्या भाषणात नेहरू म्हणाले, ‘भगतसिंग आज हयात आहेत, याचे श्रेय गांधींना आहे. केवळ त्यांच्या प्रयत्नांमुळेच भगतसिंग व हिंसात्मक कृत्यांना जबाबदार अशा इतर राजकीय कैद्यांची मुक्तताही होऊ शकेल, अशी मला आशा आहे.‘ पण व्हाइसरॉय आयर्विन या प्रश्नावर ताठर राहिले. कालांतराने बीबीसीवर दिलेल्या मुलाखतीत आयर्विन यांनी आपल्या ताठरपणाचे पुढीलप्रमाणे समर्थन केले- ‘कायद्याची अंमलबजावणी करणे हे माझे कर्तव्य होते. फाशीच्या शिक्षेला सर्वात कोण पात्र असेल, तर तो भगतसिंग, हे मी श्रीमान गांधींना सुनावले. मी भगतसिंगांसंबंधीचे कागदपत्र पाहिले व न्यायाची अंमलबजावणी करण्यात ढवळाढवळ न करण्याचे ठरविले.‘ काँग्रेसच्या कराची येथील अधिवेशनात भगतसिंग प्रभृतींच्या फाशीसंबंधीच्या ठरावाचा मसुदा स्वतः गांधींनी तयार केला होता. हा ठराव पुढीलप्रमाणे होता- ‘कोणत्याही स्वरूपाची व प्रकारची हिंसा काँग्रेसला मान्य नसली, तरीही काँग्रेस भगतसिंग व त्यांचे दोन सहकारी राजगुरू आणि सुखदेव यांचे शौर्य व त्याग यांचा गौरव करून त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचे जाहीर करते.‘ हा ठराव जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या अधिवेशनात मांडला.‘भगतसिंगांच्या त्यागाने अगदी वरची पातळी गाठली आहे,‘ असे उद्‌गार काढून नेहरू म्हणाले, ‘भगतसिंगांना फाशी दिल्यामुळे देशात चमत्कारिक वातावरण निर्माण झाले आहे. आज प्रत्येकाच्या मनात भगतसिंगांबद्दलचे विचार का घोळत आहेत? खेड्यापाड्यातील मुलांनाही भगतसिंगांचे नाव माहीत आहे. त्यांच्यापूर्वी अनेकांनी त्याग केला आहे आणि आजही त्याग करीत आहेत. मग भगतसिंगांचेच नाव प्रत्येकाच्या जिभेवर का? त्यांची छायाचित्रे अनेकांच्या घरांत भिंतीवर का लटकलेली दिसतात? यामागे काही तरी कारण असले पाहिजे. भगतसिंग हे स्वच्छ वृत्तीचे लढवय्ये होते. त्यांनी उघड्या मैदानात शत्रूशी दोन हात केले. देशाविषयीच्या कळकळीने ते भारावून गेले होते. ते जणू काय एखाद्या ठिगणीसारखे असून, अल्पावधीतच या ठिगणीतून ज्वाला निर्माण झाली आणि ही ज्वाला देशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पसरली. सर्व ठिकाणचा अंधकार घालवणारी अशी ही ज्वाला होती.‘

थोडक्यात, रूढ अर्थाने माहीत असलेले क्रांतिकारक व गांधींसारखा अद्वितीय क्रांतिकारक यांच्यामधील संबंधांचा विचार करताना तो सर्वंकष असला पाहिजे. गांधींचे आकलन ही काही साधी गोष्ट नाही.