Posts Tagged ‘गीतारहस्य’

प्रा. नरहर कुरुंदकर , सौजन्य – लोकसत्ता
(ध्वनिमुद्रण, लेखन, संपादन, पुनर्लेखन- राम देशपांडे, कोल्हापूर)

लोकमान्य टिळक ही भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातील असामान्य विभूती मानली पाहिजे. विसाव्या शतकात भगवद्गीतेचे जे भाष्यकार झाले त्यात लोकमान्य हे सर्वात महत्त्वाचे आणि थोर भाष्यकार होत, असे मत डॉ. राधाकृष्णन यांनीच दिले असल्यामुळे सर्वसंमत मत मानायला हरकत नाही. माझे व्यक्तिगत मत तर असे आहे की, गेल्या हजार-बाराशे वर्षांत गीतेचे जे अलौकिक भाष्यकार होऊन गेले त्यात ज्ञानमार्गाचे नेते म्हणून शंकराचार्य, भक्तिमार्गाचे नेते म्हणून ज्ञानेश्वर आणि कर्ममार्गाचे नेते म्हणून लोकमान्य टिळक हे तीन भाष्यकार सर्वात महत्त्वाचे मानले पाहिजेत. भगवद्गीतेत ज्ञान, भक्ती आणि कर्म या तीनही सूत्रांचे प्रतिपादन आहे. गीतेच्या कोणत्याही भाष्यकाराने या तीन प्रवाहांचा अर्थ अन्य लावलेला नाही. शंकाराचार्याना कर्म आणि भक्ती यांचे महत्त्व मान्यच असते; पण त्यांच्या मते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. टिळकांचीसुद्धा पद्धती हीच आहे. आपण लोकमान्यांनी गीतेचा अर्थ कर्मयोगपर लावला आहे, असे म्हणतो. स्थूलपणे ते खरेही आहे. पण टिळकांचे नेमके म्हणणे मात्र वेगळ्या भाषेत सांगावे लागेल. त्यांच्या मते भगवद्गीतेत ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. लोकमान्यांचे हे ‘गीताभाष्य’ त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाशित झाले आहे.

लोकमान्यांच्या सार्वजनिक जीवनाला स्थूलमानाने सांगायचे तर त्यांच्या पंचविशीपासून आरंभ होतो. या सार्वजनिक जीवनाची पंचविशी पूर्ण होतात न होतात तोच त्यांना मंडालेच्या तुरुंगात दीर्घकाळ राहण्याचा योग आला. जन्मभर टिळक जे आचरण करीत आले, त्याचे तात्त्विक स्पष्टीकरण करण्याचा योग मंडालेच्या तुरुंगवासामुळे आला. लोकमान्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. या गीतेच्या सूक्ष्म व्यासंगामुळे गीतेचे प्रतिपाद्य कर्मयोग आहे, या निर्णयावर ते आले असा प्रकार नाही. खरा प्रकार असा आहे की, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग लोकमान्य जन्मभर आचरणात आणीतच होते. योग आला म्हणून गीताभाष्य त्यांनी लिहिले. गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता तरी त्या ग्रंथात तीच भूमिका आली असती. भगवद्गीता हे निमित्त आहे. कर्मयोगाचे प्रतिपादन हा खरा हेतू! या कर्मयोगाचे स्वरूप आपण नीट समजून घेतले पाहिजे. कोणते तरी कर्म करीत राहा, कारण माणसाने कर्म केले पाहिजे, इतका एकेरी ढोबळ विचार लोकमान्यांनी कधी मान्य केला नसता. लाकूडफोडय़ा, मजूर जन्मभर कर्म करीतच असतो.

आपल्यासारख्या गरीब देशात कोटय़वधी माणसांचे जीवन जन्मभर कोणते तरी काम करीतच जाणारे असते. ‘बाबा रे, आळशी बसून राहू नकोस, कोणते तरी काम कर’ हा उपदेश निराळा आणि कर्मयोग निराळा. तो स्वत: कर्मयोगी आहे. माणूस जेव्हा स्वत:च्या अस्तित्वासाठी, स्वत:च्या हितासाठी, लाभासाठी कर्म करतो तो कर्मयोग नव्हे. व्यक्तिगत स्वार्थ आणि हित या परिघाबाहेर जाऊन समूहाच्या कल्याणात स्वत:च्या स्वार्थाचा लोप जेव्हा करतो, त्या वेळी कर्म ही साधना आणि उपासना होते. कर्मयोगात स्वार्थाचा लोप हा गृहीत आहे म्हणून तर काबाडकष्ट असा शब्दप्रयोग न करता ‘कर्मयोग’ म्हणायचे. हे कर्म अज्ञानाने करून चालणार नाही. समाजाची गरज काय, राष्ट्राची गरज काय? भोवतालची परिस्थिती कोणती, त्या परिस्थितीत शक्य काय, अशक्य काय इ. विचार केलाच पाहिजे. म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे.

फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म करायचे असेल तर मग कर्म बरोबर की चूक हे ठरविण्याची कसोटीच शिल्लक राहणार नाही, असे आक्षेपकांचे म्हणणे असते. हा आक्षेप घेणारी मंडळी एक मुद्दा विसरूनच जातात. लोकमान्य कर्माला फळ नसते असे म्हणत नाहीत. कर्माला फळ असते हेच त्यांचे म्हणणे आहे. जर कर्माला फळच नसते तर मग कर्म कोणतेही केले तरी बिघडले नसते. कर्माला फळ असते म्हणूनच कर्म ज्ञानमूलक असायला हवे. हा आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता. भारत स्वतंत्र असणे अगर स्वतंत्र नसणे दोन्ही बाबी सारख्याच, असे जर टिळकांचे मत असते तर त्यांना कुणी लोकमान्य म्हटलेच नसते. टिळकांना भारत स्वतंत्र हवा होता. ते स्वातंत्र्यात जन्मले असते तर ते म्हणाले असते, ‘स्वतंत्र भारत बलवान आणि स्वावलंबी झाला.’ हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच सारे काम चालणार आहे. आपण ज्या मार्गाने जात आहोत तो लोकजागृतीचा व लोकसंघटनेचा आहे हे त्यांना कळतच होतं.

स्वातंत्र्याविषयी जनतेच्या मनात आस्था निर्माण करणे, लोक संघटित करणे, त्यांना निर्भय बनवणे व इंग्रजी राज्याविरुद्ध संघर्ष करण्यास शिकवणे या मार्गाने आपण स्वातंत्र्यापर्यंत जाऊ, हा विश्वास टिळकांना होताच आणि हे त्यांचे प्रतिपादन काळाने खरे ठरविले आहे. टिळकांना दोषी ठरवून जेव्हा सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली त्या वेळी टिळक केवळ एवढेच म्हणाले नाहीत, ‘याहून एक श्रेष्ठ न्यायालय आहे तिथं मी निर्दोष ठरेन’, तर त्याखेरीज ते असेही म्हणाले, ‘मी तुरुंगाबाहेर राहण्यापेक्षा मी तुरुंगात राहण्यामुळेच माझे कार्य अधिक बलवान होईल, असा नियतीचा संकेत दिसतो.’ आपणास काय हवे आहे ते टिळकांना माहीत होते. ते कसे मिळेल हेही त्यांना कळत होते. म्हणूनच टिळकांनी नेहमी ज्ञानमूलक कर्मयोगाचा आग्रह धरला. कर्माला फळ असते ते टिळकांना माहीत होते. ते त्यांनी नाकारले नाही. प्रश्न त्या फळाची आशा ठेवायची का, इतकाच आहे. राष्ट्राच्या पूर्वतयारीत काही पिढय़ा गृहीत धराव्या लागतात. या पिढय़ांना फळ मिळणारच असते. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जगभरच्या सर्व स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांच्या जीवनाचे नेहमी निष्काम कर्मयोग हे सूत्र राहत आले आहे. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे काढली. गीतारहस्य लिहिले; पण ते सुटून आले तेव्हा दृश्य कोणते होते? दिसत असेल ते कार्य संपलेले आहे, मातीमोल झालेले आहे. लोकांची प्रतिकारक्षमता मावळलेली आहे. टिळकांनी हे वातावरण पाहिले आणि म्हटले ‘पुनश्च हरिओम’! पुन्हा एकदा पहिलेपणापासून आरंभ. ही कधीही निराश न होणारी अशीच श्रद्धा, हीच भक्ती आहे. ही भक्तीच फळाची आशा सोडून कर्म करण्यास शिकवते. जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. आचार्य विनोबा भावे यांनी टिळकांच्या कर्मयोगाचे सूत्र आपल्या अनासक्ती योगात स्वीकारले आहे. अनासक्ती या शब्दप्रयोगात निष्काम भावना कर्मावरचा आग्रह सुटला आहे. ते जे सांगतात ते राष्ट्राच्या उभारणीचे, समाजाच्या फेरमांडणीचे, पुन्हा एकदा नवसामर्थ्यांने नवयुग निर्माण करण्याचे सूत्र म्हणून सांगतात. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हा आधार असतो.

टिळकांचे जीवन हे या तत्त्वज्ञानाचे उदाहरण असते, तर स्वातंत्र्याच्या युगात या तत्त्वज्ञानाचे महत्त्व कमी होत नाही. सर्व मोह डोळ्यासमोर दिसत असताना आपण निष्काम कर्मयोग विसरलो, तर स्वार्थाच्या या सार्वजनिक जीवनात दुसरे काही दिसणारच नाही. मग कर्मयोगही कुठे उरणार नाही. म्हणूनच लोकमान्य टिळकांसारख्या कर्मयोग्याचे जीवन व चिंतन पिढय़ान् पिढय़ा राष्ट्राला पोषक देणारे ठरते असे म्हणायचे.