Archive for the ‘तत्वज्ञान’ Category

डॉ. यशवंत रायकर , सौजन्य – मटा

खलिल जिब्रान ( Khalil Gibran १८८३-१९३१) हा अलौकिक प्रतिभावंत, बंडखोर तत्त्वज्ञ साहित्यिक चित्रकार व जीवनाचा भाष्यकार. त्याचे पूर्वज फ्रान्सचे. पण फ्रेंच राज्यक्रांतीनंतर फ्रान्समधून हाकलून लावलेल्या कॅथॉलिक मॅरोनाइट पंथियांनी लेबनॉनच्या डोंगराळ भागात आश्रय घेतला. त्यात जिब्रानचे आई-बाप होते. पण सुवेझ कालवा सुरू झाल्यावर उंटावरून होणारा व्यापार बंद पडला.

पारंपरिक धंदे बुडाले. बहुसंख्य लोकांना उपजीविकेचे साधन राहिले नाही. शिवाय तुर्की अधिकारी छळ करीत, म्हणून अनेकांनी देशत्याग केला. त्यातच खलिल, आई व भावंडांबरोबर अमेरिकेला गेला. तरी तो एकटा परत आला. त्याचा बाप लेबनॉनमध्येच होता. बैरुत येथे ग्रॅज्युएट झाला. अनेक विषय त्याने आत्मसात केले. भ्रमणही खूप केले. पॅरीसला चित्रकलेचे शिक्षण घेतले. १९११ पासून तो न्यूयॉर्कला स्थायिक झाला. जिब्रानचे कुटुंब सावत्र आई-बाप, भावंडांचे होते. पण मनाचे पुरोगामी औदार्य हा त्यांचा सामायिक गुण. एकमेकांना त्यांनी नेहमीच साथ दिली. जिब्रानने आपले चिंतन प्रेषितांच्या तोंडून मोजक्या शब्दात काव्यमय शैलीत मांडले ते त्याच्या वयाच्या पंधराव्या वर्षी. त्याने ते आईला दाखविले. त्या असामान्य स्त्रीने त्याला उत्तेजन देऊन प्रसिद्ध करण्याची घाई करू नये असा सुज्ञ सल्ला दिला. नंतर अनेक वेळा सुधारणा करून त्याने २५ वर्षे धीर धरला. ‘प्रॉफेट’ हे पुस्तक १९२३ साली प्रथम इंग्रजीत व नंतर अरबी भाषेत प्रसिद्ध झाले. आपल्या अध्यात्मिक विकासाचे चित्रण त्याने ‘गार्डन ऑफ दि प्रॉफेट’मध्ये केले. ते त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. यांत्रिक जीवनशैलीला उबगलेल्या अमेरिकनांना या दोन पुस्तकांनी वेड लावले. गद्यकाव्ये, रूपककथा असे लिखाणही त्याने विपुल केले. जीवनातील विसंगतींवर तो खेळकर टीका करतो तर स्त्रीवरील अन्यायाचे हृदयदावक चित्रणही करतो. पॅरीस येथे त्याने ‘बंडखोर आत्मे’ हा छोटासा कथासंग्रह लिहिला. त्यातून तुर्की राज्यकर्ते व पादी यांनी लेबनॉनच्या जनतेचे चालविले शोषण जगापुढे मांडले. त्यामुळे तरुणांची मने पेटली पण पाद्यांनी पुस्तकाची जाहीर होळी केली. त्याला धर्मबाह्य ठरविले. तुर्कांनी त्याला हद्दपार केले पण अमेरिकेत तो सुखरूप होता. मानवाचा पुत्र येशू. हेसुद्धा कल्पनाशक्तीचा अजब आविष्कार आहे.

जिब्रान अत्यंत धार्मिक आहे. तो देव मानतो मात्र माणसाला पापी ठरवून त्याचे नियंत्रण व शोषण करणारी चर्चची सत्ता त्याला मान्य नाही. ख्रिश्चन असून तो पुनर्जन्म मानतो. जे बुद्धीला व भावनेला पटले ते व्यक्त करताना त्याला कुणाचे भय नसते. परिणामांची पर्वा नसते. धर्मश्रद्धा व देशप्रेम यात संकुचितपणाचा लवलेश नाही. त्याच्यात अनेक विसंगती आहेत पण कोणतीही गोष्ट तो सोयिस्करपणे स्वीकारत नाही. तो महामानव असला तरी एक साधासुधा माणूसही आहे. सततच्या आत्मपरीक्षणामुळे स्वत:ला तो पूर्णपणे ओळखतो. मागे वळून पाहिल्यावर त्याला स्वत:चा क्षुदपणा, रुक्षपणा व बडबड्या स्वभाव यांची लाज वाटते. मन भूतकाळात रमत नाही. त्याला गावाची तीव्र ओढ आहे, आई व बहिणीवर त्याचे नितांत प्रेम आहे. पण मन रोमँटिक परंपरेतले नाही. जिब्रानने लग्न केले नाही. कोणत्याही प्रेमळ स्त्रीची अपेक्षा आपण पुरी करू शकणार नाही हे तो ओळखून होता. तरी तो प्रेमी होता. पण त्याचे प्रेम वैषयिक नव्हते. त्याच्या जीवनात अनेक स्त्रिया येऊन गेल्या. बारबारा यंग ही त्याची शिष्या मृत्यूसमयी त्याच्या जवळ होती. तिनेच त्याचे चरित्र लिहिले. पण दोघे एका खोलीत कधी राहिले नाहीत. ‘मी जियादा’ ( May Ziadeh ) ही त्याची खास प्रेयसी. इजिप्तला स्थायिक झालेली. १९ वर्षे दोघांचे प्रेम व पत्रव्यवहार टिकून होते. जिब्रानच्या मृत्यूनंतर तो प्रसिद्ध झाला, तेव्हा जगाला या स्त्रीबद्दल कळले. दोघे एकमेकांना कधी भेटले नाहीत. त्याने तिचा फोटोसुद्धा कधी मागविला नाही. विरहोपि संगम: खलु परस्परसंगतं मनो येषाम्।

त्याला मृत्यूचे भय नव्हते तरी मरायची इच्छा नव्हती, कारण आणखी काही काम बाकी होते. तो स्वत:च्या प्रकृतीची काळजी घेत नसे. डॉक्टर मंडळी त्याला वाचविण्याची शिकस्त करीत होती. पण त्यांच्या प्रयत्नांवर जिब्रानचा विश्वास नव्हता. विश्रांती त्याला शिक्षा वाटे. ती भोगायला तो तयार नव्हता. त्याला शांत एकांताची ओढ होती. तरी न्यूयॉर्कच्या कोलाहलातच त्याच्या प्रतिमेला धार येई. सत्याला अखंड ओळखा पण शब्दबद्ध क्वचितच करा, असे तो म्हणतो पण सत्य सांगतच राहतो. तो स्वत:ला एक ढग मानतो, वस्तूंशी मिसळणारा पण एकरूप न होणारा. तरी कुणाकडून तरी ‘तू एकटा नाहीस’ हे ऐकू इच्छितो. त्याचे मन मोठे, करुणा विशाल म्हणून दु:खही मोठे. त्यापासून त्याला पलायन नकोय. साऱ्या जगाचे सुख मिळत असेल तरी त्या बदल्यात तो आपले दु:ख द्यायला तयार नव्हता. ‘दु:ख माझे माझियापाशी असू दे, ते बिचारे जाईल कुठे? मी असोनी का अनायासारिके त्याने फिरावे?’ अशीच वृत्ती. आपली सारी धडपड व्यर्थ जाणार की काय, या विचाराने त्याचे मन विषण्ण होई. काही सांगायचे होते ते सर्जनशील शब्दात सांगता येत नव्हते याचे त्याला दु:ख होते. ते दु:ख बरोबर घेऊनच त्याने इहलोक सोडला. त्याचे हे दु:ख म्हणजे मानवजातीबद्दल वाटणारे स्थायी दु:ख, गमे-जीवादा होते. एक शायर म्हणतो, ‘खुदा की देन है जिसको नसीब हो जाए। हर एक दिल को गमे-जावीदा नही मिलता.’

जिब्रान, टागोर व इक्बाल हे तीन महाकवी समकालीन. अनेकांच्या मते जिब्रान त्यात सर्वश्रेष्ठ. टागोरांना ‘नोबेल’ मिळाले, इक्बालला वगळले गेले म्हणून दोघांमध्ये तेढ निर्माण झाली. या सन्मानासाठी जिब्रानचा विचार कधी झालाच नाही, पण याचा विचार जिब्रानला कधी शिवलाच नाही. खरोखरीच ग्रेट!

प्रा. नरहर कुरुंदकर , सौजन्य – लोकसत्ता
(ध्वनिमुद्रण, लेखन, संपादन, पुनर्लेखन- राम देशपांडे, कोल्हापूर)

लोकमान्य टिळक ही भारताच्या स्वातंत्र्यलढय़ातील असामान्य विभूती मानली पाहिजे. विसाव्या शतकात भगवद्गीतेचे जे भाष्यकार झाले त्यात लोकमान्य हे सर्वात महत्त्वाचे आणि थोर भाष्यकार होत, असे मत डॉ. राधाकृष्णन यांनीच दिले असल्यामुळे सर्वसंमत मत मानायला हरकत नाही. माझे व्यक्तिगत मत तर असे आहे की, गेल्या हजार-बाराशे वर्षांत गीतेचे जे अलौकिक भाष्यकार होऊन गेले त्यात ज्ञानमार्गाचे नेते म्हणून शंकराचार्य, भक्तिमार्गाचे नेते म्हणून ज्ञानेश्वर आणि कर्ममार्गाचे नेते म्हणून लोकमान्य टिळक हे तीन भाष्यकार सर्वात महत्त्वाचे मानले पाहिजेत. भगवद्गीतेत ज्ञान, भक्ती आणि कर्म या तीनही सूत्रांचे प्रतिपादन आहे. गीतेच्या कोणत्याही भाष्यकाराने या तीन प्रवाहांचा अर्थ अन्य लावलेला नाही. शंकाराचार्याना कर्म आणि भक्ती यांचे महत्त्व मान्यच असते; पण त्यांच्या मते ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. टिळकांचीसुद्धा पद्धती हीच आहे. आपण लोकमान्यांनी गीतेचा अर्थ कर्मयोगपर लावला आहे, असे म्हणतो. स्थूलपणे ते खरेही आहे. पण टिळकांचे नेमके म्हणणे मात्र वेगळ्या भाषेत सांगावे लागेल. त्यांच्या मते भगवद्गीतेत ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग सांगितलेला आहे. लोकमान्यांचे हे ‘गीताभाष्य’ त्यांच्या जीवनाच्या शेवटच्या टप्प्यात प्रकाशित झाले आहे.

लोकमान्यांच्या सार्वजनिक जीवनाला स्थूलमानाने सांगायचे तर त्यांच्या पंचविशीपासून आरंभ होतो. या सार्वजनिक जीवनाची पंचविशी पूर्ण होतात न होतात तोच त्यांना मंडालेच्या तुरुंगात दीर्घकाळ राहण्याचा योग आला. जन्मभर टिळक जे आचरण करीत आले, त्याचे तात्त्विक स्पष्टीकरण करण्याचा योग मंडालेच्या तुरुंगवासामुळे आला. लोकमान्यांनी भगवद्गीतेचा अभ्यास केला. या गीतेच्या सूक्ष्म व्यासंगामुळे गीतेचे प्रतिपाद्य कर्मयोग आहे, या निर्णयावर ते आले असा प्रकार नाही. खरा प्रकार असा आहे की, ज्ञानमूलक, भक्तिप्रधान, निष्काम कर्मयोग लोकमान्य जन्मभर आचरणात आणीतच होते. योग आला म्हणून गीताभाष्य त्यांनी लिहिले. गीतेवरील रहस्य भाष्य न लिहिता ‘माझे जीवनविषयक तत्त्वज्ञान’ या नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिला असता तरी त्या ग्रंथात तीच भूमिका आली असती. भगवद्गीता हे निमित्त आहे. कर्मयोगाचे प्रतिपादन हा खरा हेतू! या कर्मयोगाचे स्वरूप आपण नीट समजून घेतले पाहिजे. कोणते तरी कर्म करीत राहा, कारण माणसाने कर्म केले पाहिजे, इतका एकेरी ढोबळ विचार लोकमान्यांनी कधी मान्य केला नसता. लाकूडफोडय़ा, मजूर जन्मभर कर्म करीतच असतो.

आपल्यासारख्या गरीब देशात कोटय़वधी माणसांचे जीवन जन्मभर कोणते तरी काम करीतच जाणारे असते. ‘बाबा रे, आळशी बसून राहू नकोस, कोणते तरी काम कर’ हा उपदेश निराळा आणि कर्मयोग निराळा. तो स्वत: कर्मयोगी आहे. माणूस जेव्हा स्वत:च्या अस्तित्वासाठी, स्वत:च्या हितासाठी, लाभासाठी कर्म करतो तो कर्मयोग नव्हे. व्यक्तिगत स्वार्थ आणि हित या परिघाबाहेर जाऊन समूहाच्या कल्याणात स्वत:च्या स्वार्थाचा लोप जेव्हा करतो, त्या वेळी कर्म ही साधना आणि उपासना होते. कर्मयोगात स्वार्थाचा लोप हा गृहीत आहे म्हणून तर काबाडकष्ट असा शब्दप्रयोग न करता ‘कर्मयोग’ म्हणायचे. हे कर्म अज्ञानाने करून चालणार नाही. समाजाची गरज काय, राष्ट्राची गरज काय? भोवतालची परिस्थिती कोणती, त्या परिस्थितीत शक्य काय, अशक्य काय इ. विचार केलाच पाहिजे. म्हणून कर्मयोगात जे कर्म अपेक्षित आहे ते ज्ञानमूलक आहे. सर्वसामान्यपणे टिळकांच्या भूमिकेवर जो आक्षेप घेण्यात येतो त्याचा आरंभ या ठिकाणी आहे.

फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म करायचे असेल तर मग कर्म बरोबर की चूक हे ठरविण्याची कसोटीच शिल्लक राहणार नाही, असे आक्षेपकांचे म्हणणे असते. हा आक्षेप घेणारी मंडळी एक मुद्दा विसरूनच जातात. लोकमान्य कर्माला फळ नसते असे म्हणत नाहीत. कर्माला फळ असते हेच त्यांचे म्हणणे आहे. जर कर्माला फळच नसते तर मग कर्म कोणतेही केले तरी बिघडले नसते. कर्माला फळ असते म्हणूनच कर्म ज्ञानमूलक असायला हवे. हा आपला देश इंग्रजांच्या ताब्यात होता. भारत स्वतंत्र असणे अगर स्वतंत्र नसणे दोन्ही बाबी सारख्याच, असे जर टिळकांचे मत असते तर त्यांना कुणी लोकमान्य म्हटलेच नसते. टिळकांना भारत स्वतंत्र हवा होता. ते स्वातंत्र्यात जन्मले असते तर ते म्हणाले असते, ‘स्वतंत्र भारत बलवान आणि स्वावलंबी झाला.’ हा हेतू डोळ्यासमोर ठेवूनच सारे काम चालणार आहे. आपण ज्या मार्गाने जात आहोत तो लोकजागृतीचा व लोकसंघटनेचा आहे हे त्यांना कळतच होतं.

स्वातंत्र्याविषयी जनतेच्या मनात आस्था निर्माण करणे, लोक संघटित करणे, त्यांना निर्भय बनवणे व इंग्रजी राज्याविरुद्ध संघर्ष करण्यास शिकवणे या मार्गाने आपण स्वातंत्र्यापर्यंत जाऊ, हा विश्वास टिळकांना होताच आणि हे त्यांचे प्रतिपादन काळाने खरे ठरविले आहे. टिळकांना दोषी ठरवून जेव्हा सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली त्या वेळी टिळक केवळ एवढेच म्हणाले नाहीत, ‘याहून एक श्रेष्ठ न्यायालय आहे तिथं मी निर्दोष ठरेन’, तर त्याखेरीज ते असेही म्हणाले, ‘मी तुरुंगाबाहेर राहण्यापेक्षा मी तुरुंगात राहण्यामुळेच माझे कार्य अधिक बलवान होईल, असा नियतीचा संकेत दिसतो.’ आपणास काय हवे आहे ते टिळकांना माहीत होते. ते कसे मिळेल हेही त्यांना कळत होते. म्हणूनच टिळकांनी नेहमी ज्ञानमूलक कर्मयोगाचा आग्रह धरला. कर्माला फळ असते ते टिळकांना माहीत होते. ते त्यांनी नाकारले नाही. प्रश्न त्या फळाची आशा ठेवायची का, इतकाच आहे. राष्ट्राच्या पूर्वतयारीत काही पिढय़ा गृहीत धराव्या लागतात. या पिढय़ांना फळ मिळणारच असते. आजोबाच्या कष्टाचे फळ नातवाला मिळणार असते. कर्माला फळ आहे; फक्त ते आज नाही, या जन्मी नाही; आणि स्वातंत्र्यलढय़ाच्या दर चळवळीला अपयश कसे ठरल्याप्रमाणे येत असते. सर्व अपयश पचविण्यासाठी आपल्या पिढय़ा पायाभरणीत संपणार आहेत हे जाणूनही चिकाटी चालू ठेवण्यासाठी नुसता नि:स्वार्थीपणा पुरत नाही; फळाची आशासुद्धा सोडावी लागते. अशा वेळी आपण जे कर्म करतो आहोत ते बरोबर आहे की नाही हे कसे ठरणार? म्हणूनच निष्काम कृतीला भक्तीची गरज लागते. लोकमान्य निष्काम कर्मयोग सांगतात याचे कारण कर्माला फळ नसते हे नाही, तर कर्माला फळ असते हेच निष्काम कर्मयोग सांगण्याचे खरे कारण आहे. जगभरच्या सर्व स्वातंत्र्यलढय़ातील नेत्यांच्या जीवनाचे नेहमी निष्काम कर्मयोग हे सूत्र राहत आले आहे. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात सहा वर्षे काढली. गीतारहस्य लिहिले; पण ते सुटून आले तेव्हा दृश्य कोणते होते? दिसत असेल ते कार्य संपलेले आहे, मातीमोल झालेले आहे. लोकांची प्रतिकारक्षमता मावळलेली आहे. टिळकांनी हे वातावरण पाहिले आणि म्हटले ‘पुनश्च हरिओम’! पुन्हा एकदा पहिलेपणापासून आरंभ. ही कधीही निराश न होणारी अशीच श्रद्धा, हीच भक्ती आहे. ही भक्तीच फळाची आशा सोडून कर्म करण्यास शिकवते. जन्मभर टिळकांचा ज्ञानमूलक भक्तिप्रधान निष्काम कर्मयोग चालूच होता. ते त्यांच्या जन्मभराच्या उद्योगाचे सूत्र होते. हे सूत्रच गीतेच्या आधारे त्यांनी सांगितले. आपले कर्तव्य कोणते हे ठरविण्यासाठी ज्ञानाची उपासना हे कर्तव्य ठरतात, भक्तिपूर्वक आचरण हा या कर्मयोगाचा पूर्वार्ध समजावयाचा आणि सततचे अपयश पचवून पुन:पुन्हा कामाला लागायचे, हा या योगाचा उत्तरार्ध समजावयचा. आचार्य विनोबा भावे यांनी टिळकांच्या कर्मयोगाचे सूत्र आपल्या अनासक्ती योगात स्वीकारले आहे. अनासक्ती या शब्दप्रयोगात निष्काम भावना कर्मावरचा आग्रह सुटला आहे. ते जे सांगतात ते राष्ट्राच्या उभारणीचे, समाजाच्या फेरमांडणीचे, पुन्हा एकदा नवसामर्थ्यांने नवयुग निर्माण करण्याचे सूत्र म्हणून सांगतात. पारतंत्र्याच्या काळी समोर कोणतीही आशा नसताना आपल्याच अंतरंगातून प्रेरणा घेऊन जळतच जन्म काढीत असताना टिळकांचे तत्त्वज्ञान हा आधार असतो.

टिळकांचे जीवन हे या तत्त्वज्ञानाचे उदाहरण असते, तर स्वातंत्र्याच्या युगात या तत्त्वज्ञानाचे महत्त्व कमी होत नाही. सर्व मोह डोळ्यासमोर दिसत असताना आपण निष्काम कर्मयोग विसरलो, तर स्वार्थाच्या या सार्वजनिक जीवनात दुसरे काही दिसणारच नाही. मग कर्मयोगही कुठे उरणार नाही. म्हणूनच लोकमान्य टिळकांसारख्या कर्मयोग्याचे जीवन व चिंतन पिढय़ान् पिढय़ा राष्ट्राला पोषक देणारे ठरते असे म्हणायचे.

दुर्गा भागवत, सौजन्य – मटा

भरभराट इच्छिणा-या कोणत्याही समाजाला परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात , तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या पंरपरा जेव्हा घट्ट , खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात , तेव्हा मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात… अशी मांडणी केली विदुषी दुर्गा भागवत यांनी. २ एप्रिल १९८९ ला महाराष्ट्र टाइम्सच्या मैफल पुरवणीत हा लेख छापून आला होता.
…………………………….

गेले काही दिवस महाराष्ट्रभर महात्मा फुल्यांच्या संदर्भात मोठे वादंग माजल्याचे आपण पाहताहोत. हे वादंग त्यांच्या हिंदूधर्माबद्दलच्या विवेचनासंबंधी आहे आणि त्यातून प्रकरण हातघाईवर आल्याचे दिसते आहे , अशा वेळी या देशाची एक जबाबदार नागरिक , थोडीबहुत शिकलेली ,थोडासा नावलौकिक असलेली आणि विशेष म्हणजे समाजशास्त्राची अभ्यासक म्हणून चार समजुतीचे व जबाबदारीचे शब्द सांगावे यासाठी मी आज वा लेखाचा प्रपंच करते आहे.

फुल्यांसारखी माणसे हवीत की नकोत ? फुल्यांसारख्या व्यक्तीच्या बाबतीत पहिला महत्त्वाचा प्रश्न हा उपस्थित होतो की , समाजाला अशा व्यक्तीची गरज असते की नसते ? किंवा फायद्यापेक्षा तोटाच अधिक होत असतो ? फुल्यांसाख्या व्यक्तींच्या बाबतीत त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा , मृत्यूला शतकापेक्षा अधिक काळ उलटून गेलेला असतानासुद्धा तुम्ही – आम्ही कुठली भूमिका घ्यायची हे ठरविण्याची वेळ येते ती का ?

पण फुल्यांसारख्या व्यक्ती म्हणजे कुठल्या प्रकारच्या व्यक्ती बरे ? तर त्या व्यक्ती म्हणजे सामाजिक बंडखोरी करू पाहणा-या व्यक्ती. विचार आणि कृती या दोन्ही अंगांनी समाज सुधारायचा प्रयत्न करू पाहणा-या व्यक्ती. थोडक्यात , ज्यांना आपण ‘रेव्होल्युशनरी क्रिटिक ’ (क्रांतिकारक टीकाकार) म्हणतो अशा व्यक्ती. अशा व्यक्ती स्वभावतःच आदर्शवादी असतात आणि आदर्शवादी असल्याने त्यांना समाजाची अपेक्षित आदर्श स्थिती या दोहोंतली तफावर चटकन् जाणवते. जाणवते एवढेच नव्हे ,तर अंतर्यामी खोलवर खुपते ; आणि ही तफावत दूर करण्यासाठी ही माणसं कंबर कसतात. प्रस्थापित समाजावरचा त्यांचा हल्ला दोन वेगवेगळ्या बाजूंनी असतो.  एक वैचारिक टीकेच्या स्वरुपात आणि दुसरा प्रत्यक्ष कार्याच्या स्वरुपात. तात्विक उपपत्ती मांडून एकीकडे प्रचलित समाजाचे दोष दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो आणि दुसरीकडे त्याचवेळी हे दोष दुरुस्त करण्यासाठी हे लोक त्यांच्या परीने निरनिराळ्या प्रकारचे इलाजही सुचवीत असतात.

आता समाजामध्ये सामाजिक क्रांती घडून यावी यासाठी समाजावर टीका करणारे समाजसुधारक हवेत की नकोत? या प्रश्नाचे उत्तर कुणीही जबाबदार माणूस ’हवेत’ असेच देईल, असे मला वाटते. समाजाला स्थैर्य हवे असते आणि तसेच परिवर्त्न सुद्धा हवे असते. समाज नुसता एका जागी  स्थिर राहिला तर त्याचे डबके होईल. म्हणून भरभराट इच्छिणा-या या कोणत्याही समाजाचा परंपरा मांडून दाखवणारे मनू लागतात. तसेच मनूंनी मांडून ठेवलेल्या परंपरा जेव्हा घट्ट, खोडागत बनून पुढची वाट थांबवून धरतात, तेव्हा त्या मनूंना आव्हान देणारे फुलेसुद्धा आवश्यक असतात. समाजाची प्रगती पाहिली तर ती जुन्यातले सारेच काही टाकून देत नाही, ती काही नवे आत्मसात करीतच फक्त होऊ शकते.

रूढीवर टीका

समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखी सामाजिक अन्याय व दु:खे यांच्यावर बोट ठेवणारी नि त्यासाठी समाजाला धारेवर धरणारी माणसे हवीत, असे आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा त्याचवेळी ही माणसे प्रचलित धर्मसंस्थेवर, धार्मिक समजुतींवर, आचार धर्मावर कठोर प्रहार करणार आहेत, हेही मान्य करावे लागते. धर्मावरची त्यांची टीका अपरिहार्य असते. कारण धार्मिक समजुतींच्या बैठकीवरच सगळ्या जुन्या समाजांचा बराचसा कारभार चाललेला असतो. रिच्युअल्स ऊर्फ विधिजाल आणि देवादिकांबद्दलची मिथ्थके यांच्या मदतीनेच धर्म हे माणसांचे आपसाआपसांतले व्यवहार नियंत्रिक करीत असतात. काही प्रमाणात प्रजेला दिल्या गेलेल्या प्रत्यक्ष आदेशाच्या रुपात, तर ब-याच प्रमाणात प्रेरक स्वरुपाच्या सूचनांच्या स्वरुपात हे सर्व घडत असते.

विधिकल्प व मिथ्थके

जेव्हा कधी अगदी पूर्वकाळी या कथा वगैरे रचल्या जातात, तेव्हा त्यांचा उद्देश त्या घटितात (सिच्युएशन) किंवा मानवी प्रसंगामध्ये मानवाला कसे वागायचे हे शिकवावे हा असला, तरी कालांतराने त्या रुढींचे व कथांचे कठीणसे घट्ट साचे बनतात नि ते जनतेची हालचाल, चलनवलन वगैरे मर्यादितही करुन टाकतात.  हे कसे घडले हे दाखविण्यासाठी अशा कथांचे एक उदाहरणच देते. हे उदाहरण साध्या लोककथेचे आहे. मूळ किंवा आदिम प्राक-कथनातला धर्मवाचक आशय जेव्हा कमकुवत होतो, तेव्हा त्या प्राक-कथांचे रुपांतर लोककथांमध्ये होत असते. नवरा-बायकोच्या जोडीत नव-याने पुरुषाची कामे करावीत नि बायकोने बाई माणसाची करावीत, हा धडा किंवा पाठ देणा-या कथा या सर्व जगभर प्रचलित आहेत.  एका कथेत बायको शेतात जाऊन पुरुषाचे काम करु पाहते, तर नवरा घरात राहून रांधणे – वाढणे, धुणी – भांडी, मुले सांभाळणे हे बायकोचे काम करतो, तेव्हा त्यातून अनेक गमती-जमती आणि घोटाळे कसे होतात, त्याचे वर्णन येते. या कथेतील गमती – जमतीचा किंवा विनोदाचा भाग बाजूला सारला, तरी पुरुषांनी पुरुषांची नि बायकांनी बायकांची कामे केली, तरच संसार व्यवस्थित चालू शकतो, हा ’जैसे थे’ चा पुरस्कार करणार किंवा गतानुगतिकाचा गर्भित संदेश प्रतीत होतोच.

हीच गोष्ट थोड्या फरकाने अनेक प्रकारच्या धर्मसंलग्न मिथ्थकांच्या बाबतीत घडत असते आणि जैसे थे ऊर्फ गतानुगतिक परिस्थिती रुढी सांभाळून ठेवण्यासाठी समाजातले हितसंबंध गट त्या मिथ्थकांचा उपयोग करतात. समाजाच्या विकासाबरोबर असे हितसंबंध गट त्या समाजामध्ये उत्पन्न होणे हे देखील अपरिहार्य आहे. असो.

तर सांगायचा मुद्दा हा की, जो कुणी समाज सुधारण्याचा प्रयत्न करायचा म्हणून समाजातल्या दोषांवर टीका करु पाहतो त्याला धर्मावर टीका केल्यावाचून, धर्माची समीक्षा केल्यावाचून गत्यंतर नसते. कारण समाजातल्या हितसंबंधी गटांच्या हितसंबंधांवर आघात केल्यावाचून त्याला पुढे जाताच येत नाही.

समाजाच्या आरोग्यासाठी फुल्यांसारखे आवश्यक आहेत, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा ते आपल्या धार्मिक समजुतींवर आघात करतात, हेही आपल्याला नुसते गृहित धरुन चालत नाही तर कबूल करावे लागते.

सुधारकांचा दुसरा प्रश्न
फुल्यांसारख्या समाजसुधारकांबद्दल दुसरा प्रश्न उत्पन्न होतो . समाजाच्या एकूण कल्याणासाठी फुल्यांसारखे लोक आवश्यक आहेत , ही गोष्ट खरी , पण म्हणून त्यांचा प्रत्येक शब्द प्रमाण मानायचा काय ? माझ्या मते मानायचा नाही . फुल्यांसारखी माणसे समाजाला पुढे नेतात – ही गोष्ट खरी असली तरी ती शेवटी माणसेच आहेत . फार तर थोर माणसे म्हणा . पण शेवटी माणसेच . स्थल – काल – परिस्थिती यांनी बद्ध अशी माणसे . त्यामुळे त्यांचे शब्द , त्यांचे निष्कर्ष , त्यांची अनुमाने ही अंतिम सत्ये होऊच शकत नाहीत . त्यांचे शब्द , त्यांची वचने म्हणजे त्यांच्या वैयक्तिक भूमिका असतात आणि त्यांच्यावर त्यांनी स्वीकारलेल्या बौद्धिक दृष्टिकोनाचा ( परस्पेक्टिव्ह ) फार मोठा प्रभाव असतो . शिवाय तुमच्याआमच्या प्रत्येकाच्या विचाराला ज्या स्थळ आणि काळाच्या मर्यादा असतात , त्याही काही प्रमाणात तरी त्यांच्याही विचाराला असतात . तेव्हा फुल्यांसारख्या अगदी मोठ्या व्यक्तींच्या वक्तव्याचाही पुनर्विचार होणे आवश्यक ठरते . थोर व्यक्तींबद्दल आदर जरूर असावा . परंतु सत्याची कदर त्याच्याहीपेक्षा अधिक केली जावी , एवढंच . माणसाच्या शब्दांना परमेश्वराच्या शब्दाचा मान देण्याची गरज नाही . मुळात आमच्या संस्कृतीत परमेश्वर नैतिक वा अन्य प्रकारच्या आज्ञा देतो आहे , असा प्रकारच नाही .
समाजसुधारकांच्या धर्म आणि धर्मसंलग्न मिथ्थकावरच्या टीकांचा फेरविचार करणे आणखी एका कारणासाठी आवश्यक ठरते . समीक्षेसाठी विशेष अभ्यास आणि विशेष सहानुभूती या दोन्हींची नितांत गरज असते . अनेकदा हा विशेष अभ्यास समीक्षा करणारापाशी नसतो आणि मग तो समोरच्या धार्मिक साहित्यातून चुकीचे अर्थ काढतो . हे अर्थ चुकीचे असल्याने तज्ज्ञांनी ते केव्हा ना केव्हा दुरुस्त करणे त्यांचे कर्तव्यच ठरते. या विषयातील माहिती कच्ची असल्याने खुद्द फुल्यांनीच कशी चुकीची भाष्ये केली आहेत याचे एक उदाहरण येथे देत आहेत.

ब्रम्हदेव आणि त्याची मुलगी

ब्रम्हदेव स्वत : च्या मुलीशी (उषेशी किंवा सरस्वतीशी ) रममाण होते यावर फुलेंनी बरेच भाष्य केले आहे. परंतु ब्रम्हदेव आणि त्याची मुलगी या संबंधांबद्दल ज्या आदिम कथा आहेत त्या पहिल्या (आदिम) जोडप्याचे एकमेकांबरोबरचे नाते कोणते आणि कसे असावे याचा जो प्रश्न जगभराच्या सगळ्या संस्कृतींना पडला होता , त्याचा अपरिहार्य परिणाम होता. पहिल्याने कोण होते , पुरूष की स्त्री ? पुरूष असेल तर मागाहून येणारी स्त्री त्याची बहीण (अगर मुलगी) होते. स्त्री असेल तर मागाहून येणारा पुरूष तिचा मुलगा होतो. स्त्री-पुरूष दोन्ही एकदम असतील तर ती भावंडे असतील किंवा ज्यू आणि ख्रिस्ती परंपरेप्रमाणे पुरूषाच्या बरगडीपासून पहिली स्त्री उत्पन्न केली गेली असेल , तर ती स्त्री त्या पुरुषाची बहिण बनते. (ख्रिस्ती धर्मातील आदमचे पाप हे व्याभिचाराचे पाप होय.) फुल्यांपाशी हा धर्म आणि पुराणकथांचा किंवा प्राक-कथांचा तुलनात्मक अभ्यास नसल्याने त्यांनी जर या बाबतीत चुकीची विधाने केली असतील तर नंतरच्या लोकांना ती चूक आहेत हे सांगणे हे क्रमप्राप्त ठरते.

अश्वमेधाचा घोडा

हवे असल्यास धर्मसंलग्न मिथ्यांचे आणखी एक उदाहरण घेऊ. वाजसनेयी संहितेत अश्वमेध यज्ञाच्या वेळी होता आणि राजाची मुख्य महिषी यांच्या संवादाचे अनेकदा भांडवल केले जाते. हे संवाद अश्लील आहेत (अर्थात , आजच्या आमच्या दृष्टीने अश्लील. त्या काळातल्या लोकांच्या तर्फे नव्हेत.) .यात शंका नाही. परंतु शीर तुटलेल्या घोड्याच्या बाजूला राणी झोपते वगैरे सगळा जो पुजाविधी आहे त्याचे त्या काळाच्या दृष्टीने बरेच मोठे कार्य आहे. असाच विधी आयर्लंडमध्ये केला जात असे. मूळ स्वरूपात ही एक इंडो – युरोपियन मिथ्यकथा आहे. भारतीय , आयरिश , ग्रीक , रोमन , रशियन , वेल्श या सगळ्या लोकांमध्ये या ना त्या स्वरूपात ही मिथ्यकथा आढळते. अश्वमेधातला घोडा हे सूर्यदेवाचे प्रतिक आहे आणि म्हणूनच राजाचा ‘ अल्टर इगो ’ म्हणजे दुसरा आत्मा आहे. घोड्याचे डोके तोडणे म्हणजे घोड्याला खच्ची करणे. राणी घोड्याचे किंवा सूर्यदेवाचे पुरूषत्व त्याच्यापासून हिरावून घेते आणि आपल्या पतीला म्हणजेच राजाला बहाल करते. राजा हा परत विष्णूचा अवतार आहे. पृथ्वी ही त्याची पत्नी आहे. सूर्यापासून बीज घेऊन राजा पृथ्वीला सुफलित करतो असा एकुण मतितार्थ आहे. त्याकाळी अश्वमेध यज्ञ करणे हे राजाचे एक कर्तव्य होते. लोक त्याला तसे करायला भाग पाडीत असत.

आता वरीलसारखी विशेष माहिती ही फुल्यांना आणि त्यांच्यासारख्या इतरांना असणे दुरास्पात आहे. अशा वेळी त्यांनी यासंबंधी जी चुकीची विधाने केली आहेत , ती दुरूस्त करणेच योग्य ठरते.

खुद्द महात्मा फुल्यांना अशा प्रकारची आपल्या चुकीची दुरूस्ती भाग होती. कारण ‘ शेतक-यांचा आसूड ’ या आपल्या पुस्तकाच्या उपोदघातात ते लिहितात की ‘ या ग्रंथात जे काही मी माझ्या अल्पसमजुतीप्रमाणे शोध लिहिले आहेत , त्यात आमच्या विद्वान व सुज्ञ वाचणारांच्या ध्यानात जी जी व्यंगे दिसून येतील त्यांविषयी मला क्षमा करून… गुणलेषांचा स्वीकार करावा… आणि जर करिता त्यांच्या अवलोकनात कोणताही भाग अयोग्य अथवा खोटासा दिसेल तर किंवा या ग्रंथाच्या दृढीकरणार्थ तर त्यास काही (ग्रंथकार वगैरे) सुचविणे असेल… आम्हास कळवावे…दुस-या आवृत्तीचे वेळी त्याचा योग्य विचार करू ’ (कीर-मालशे संपादित , पृ.३)

धार्मिक मिथ्यकथा वगैरेंच्या बाबतीत फुले हे विशेष तज्ज्ञ नव्हते. त्यामुळे त्या विषयाचे विश्लेषण करताना त्रुटी राहण्याची , चुका होण्याची शक्यता होती आणि म्हणूनच विचारांची फेरतपासणी आवश्यक ठरते. त्याप्रमाणेच दुस-याही एका कारणासाठी ती आवश्यक होते. फुले सामाजिक टीकाकार होते , तसेच ते कर्ते समाजसुधारकही होते. सामाजिक टीकाकाराच्या भूमिकेतून त्यांनी तत्कालीन सामाजिक स्थितीची चिकित्सा केली होती आणि त्या दु : खद स्थितीला कारणीभूत ठरलेल्या गोष्टींची चर्चा करून ही स्थिती दुरुस्त करण्यासाठी त्यांच्या परिने काही इलाजही सुचविले होते. फुल्यांनी सुचविलेल्या या इलाजांचे पुढे काय झाले , त्यांनी व्यक्त केलेली उद्दिष्टे पुढील काळात प्रत्यक्षात आणली गेली काय इत्यादी विचारसुद्धा फुल्यांच्या बाबतीत आवश्यक ठरतो. कारण या प्रकारच्या अभ्यासातूनच फुल्यांनी तत्कालीन सामाजिक स्थितीते केलेले विवेचन आणि त्या स्थितीमागील कारणाचे निदान चूक होते की अचूक होते हे आपण पाहू शकणार असतो. येथे फुल्यांच्या सर्वच उद्दिष्टांचा विचार अभिप्रेत नाही. फक्त काही काही निवडक उद्दिष्टे आपण विचारात घेऊ शकतो. ‘ शेतक-याचा आसूड ’ पृ. ८ वर फुले म्हणतात की , ‘ माझ्या मते एकंदर सर्व सरकारी खात्यात शेतक-यांपैकी त्यांच्या संख्येच्या प्रमाणाने कामगार घातल्यास ते आपल्या जात बांधवास इतर कामगारांसारखे नाडणार नाही. फुल्यांच्या मते सरकारी खात्यात ब्राम्हण कामगार असल्याने ते शेतक-यांना फार नाडत होते. फुल्यांच्या या निरिक्षणाची आज अवस्था काय आहे. आज सरकारात बहुजन समाजातील लोकांची बहुसंख्या आहे. तथापि , गोरगरिबांना नाडण्याचे त्यांनी थांबविले आहे काय ? सरकारात ब्राम्हण कामगाराचे वर्चस्व आणि ब्राम्हणांनी त्यांना नाडण्याचा काहीही कार्यकारण संबंध नाही. मुळात जातीने वरिष्ठ व कनिष्ठ वर्ग अशी समाजाची विभागणी करणेच चूक असते. सत्तेने वरिष्ठ आणि कनिष्ठ वर्ग अशी समाजाची विभागणी त्या मानाने अधिक बरोबर ठरू शकते. कामगारांचे हितकर्ते खुद्द मार्क्स व एंगल्स यांच्याही तत्वज्ञानाच्या बाबतीत शेवटी जगभर हाच अनुभव आलेला आहे. मार्क्सची अपेक्षा होती की कामगार शतकानुशतके विशिष्ट वर्गाकडून नाडला गेलेला आहे , जेव्हा त्याच्या हाती सत्ता येईल किंवा तो वरचढ ठरेल तेव्हा तो सतत कामगार वर्गाचे हित डोळ्यासमोर ठेवून आपल्या योजना आखील. परंतु तसे कुठेही घडले नाही. उलट असे दिसून आले की , कामगार फक्त आपल्याला आर्थिक व इतर फायदे जास्तीत जास्त कसे मिळतील त्याच्याकडे लक्ष पुरवतो.

साधी आपल्याकडच्या कामगारांचीच गोष्ट घ्या. आपल्याकडचा कामगार ज्या क्षेत्रात- उदा. कापड-गिरण्या वा तेलधंदा इ.- तो असतो तिथले फायदे फक्त त्याला मिळावेत म्हणून धडपडत आहे. किंबहुना त्या त्या क्षेत्रात जर का नोकरीच्या जागा उत्पन्न झाल्या तर त्याही आपल्याच पुत्रपौत्रांना मिळाव्यात म्हणून व्यवस्थापनावर सर्व प्रकारचे दडपण आणतानाही दिसतो. या वस्तुस्थितावरून आपण फार तर एवढेच म्हणू शकतो की , माणसे त्यांना मिळालेल्या सत्तेचा उपयोग स्वत : चा जास्तीत जास्त फायदा करून घेण्यासाठी करतात. मग ती माणसे ब्राम्हण असोत वा ब्राम्हणेत्तर. त्यांच्या जातीचा , वर्गाचा वा धर्माचा परिणाम वस्तुस्थितीवर होत नाही. कामगारांच्या जातीचे लोक सरकारी कचेरीत आले की , ते आपल्या जातीला नाडणार नाहीत , हा फुल्यांचा अंदाज अशा प्रकारे चुकला आहे.

स्त्रियांचा प्रश्न

त्यांचा दुसरा अंदाज असा की , स्त्रियांना शिक्षण मिळाले की त्या स्वतंत्र होतील हा होय. आज स्त्रिया पूर्वीच्या मानाने ब-यापैकी शिकताहेत व शिकल्या आहेत. पण त्यांच्यावरचे अन्याय अत्याचार पूर्वीच्या मानाने वाढले आहेत. म्हणजे येथेही फुल्यांचे विश्लेषण न निदान कुठेतरी चुकले होते.

शिक्षण : तिसरा अंदाज

त्यांचा तिसरा अंदाज शिक्षणाने प्रजा शहाणी व समजूतदार होईल. आज शिक्षणाचे प्रमाण वाढले आहे. पण प्रजा शहाणी झाल्याचे दिसत नाही. असो. तर सांगायची गोष्ट ही की , मार्क्स , एंगल्स , फुल्यांसारख्याचीही सामाजिक विश्लेषणात गफलत होऊ शकते आणि ती समजावून घेणे आपल्या हिताचे असते. किंबहुना ही मंडळी जर हयात असती तर त्यांनी स्वत : च्या विचारातल्या गफलती कबूल केल्या आहेत. इतके ते सत्यनिष्ठ होते.

पुनर्विचार आवश्यक

आणखीसुद्धा एका कारणासाठी फुल्यांसारख्यांच्या प्रतिपादनांचा पुनर्विचार करणे आज आवश्यक आहे. आमची लोकशाही ही गर्दीने (ऊर्फ झुंडीने) घडवायची लोकशाही आहे. गर्दी ठरवील त्याच्या हाती राज्यकारभाराच्या नाड्या जातात. अशा वेळी जो कुणी या गर्दीला आपल्या बाजूला वळविण्यात यशस्वी होतो तो सत्तास्थान पटकावतो. गर्दी नेहमी घोषणांना वश होत असते. आकर्षक , नेत्रदीपक घोषणांना वश होत असते ; आणि लोकप्रिय थोरांची नावे ही आजकाल घोषणांगत वापरली जाताहेत , नव्हे , या मोठ्या नावांचा एक प्रकारे बाजारच मांडला जातो आहे. कुणी घोषणा देतो ‘ श्री प्रभूरामचंद्र की जय ’ . लगेच लाखोंच्या संख्येने लोक त्या घोषणा देणा-याच्या मागे जातात. दुसरा कुणी म्हणतो. ‘ श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय ’ किंवा ‘ महात्मा फुले की जय ’ लोक तिथेही गर्दी करतात. तथापि , एखाद्या नावाची घोषणा म्हणजे त्याचे ते नाव असते , त्याचे ते तत्वज्ञान नसते. घोषणा देणारे स्वत : च्या स्वार्थासाठी ती मोठी नावे वापरीत असतात. त्यांचा बाजार भरीत असतात. अशा वेळी घोषणेसाठी ज्यांची नावे घेतली जातात , त्यांनी मुळात काय सांगितले आहे , त्यात काय तथ्य आहे इ. सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो.

फुले महात्माच

वरील विवेचनावरून कुणी असा ग्रह करून घेऊ नये की , मी महात्मा फुल्यांना कमी लेखते आहे ; किंवा कुणी असेही समजू नये की , मी जुन्या जमान्याचा , जुन्या वैचारिक मूल्यांचा व समाजपद्धतीचा पुरस्कार करते आहे. तसे अजिबात नाही. महात्मा फुले हे खरोखरच महात्मा होते. कामगारांची दयनीय स्थिती पाहून त्या स्थितीचे विश्लेषण करणारे , ‘ द कंडिशन ऑफ द वर्किंग क्लास इन इंग्लंड ’ हे पुस्तक एंगल्सने सन १८४४ मध्ये लिहिले. महात्मा फुल्यांनी येथल्या शेतक-याची दयनीय अवस्था पाहून साधारण १८८० वगैरेच्या दरम्यान ‘ शेतक-याचा आसूड ’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्या काळात अन्य कुणाला शेतक-यांच्या हाल अपेष्टांवर पुस्तक लिहिणे सुचू नये , यातच फुल्यांचा मोठेपणा स्पष्ट होतो. त्यांनी स्त्रियांसाठी , अस्पृश्यांच्या मुलांसाठी शाळा काढल्या. बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. आणि इतरही अनेक परोपकाराची नि लोकहिताची कामे केली. ती केली नसती तरी ‘ शेतक-याचा आसूड ’ या एकाच पुस्तकानेही त्यांचे मोठेपण सिद्ध झाले असते.

लोकमान्य टिळक

(संपादित अंश) , सौजन्य – लोकसत्ता

श्रीमद्भगवद्गीतेवर अनेक संस्कृत भाष्यें, टीका किंवा प्राकृत भाषांतरे अगर विस्तृत सर्वमान्य निरुपणे असतां, हा ग्रंथ प्रसिद्ध करण्याचे कारण काय हे जरी ग्रंथारंभींच सांगितले आहे, तरी ग्रंथामधील प्रतिपाद्य विषयाच्या विवेचनात सांगता न येणाऱ्या काही गोष्टींचा खुलासा करण्यास प्रस्तावनेखेरीज दुसरा मार्ग नाही. पैकी पहिली गोष्ट स्वत: ग्रंथकारासंबंधी होय. भगवद्गीतेचा व आमचा प्रथम परिचय होऊन आज सुमारे त्रेचाळीस वर्षे झाली. इसवीसन १८७२  सालीं वडील शेवटच्या दुखण्याने आजारी असता भगवद्गीतेवरील भाषाविवृति नांवाची प्राकृत टीका त्यांस वाचून दाखविण्याचे काम आमचेकडे आलें होते. तेव्हां म्हणजे आमच्या वयाच्या सोळाव्या वर्षी गीतेचा भावार्थ पूर्णपणे लक्षांत येणे शक्य नव्हते. तथापि लहान वयांत मनावर घडणारे संस्कार टिकाऊ असल्यामुळे भगवद्गीतेबद्दल तेव्हा उत्पन्न झालेली आवड कायम राहून संस्कृताचा व इंग्रजीचा पुढे अधिक अभ्यास झाल्यावर गीतेवरील संस्कृत भाष्यें व दुसऱ्या टीका आणि इंग्रजीत व मराठींत अनेक पंडितांनी केलेली विवेचनेहि वेळोवेळीं वाचण्यांत आली. परंतु स्वकीयांबरोबर युद्ध करणे हे मोठे कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनास त्याच युद्धास प्रवृत्त करण्यासाठी सांगितलेल्या गीतेंत ब्रह्मज्ञानाने किंवा भक्तीने मोक्ष कसा मिळवावा याचें, म्हणजे नुस्त्या मोक्षमार्गाचे, विवेचन कशाला, ही शंका मनांत येऊन तीच उत्तरोत्तर बळावत चालली. कारण गीतेवरील कोणत्याही टीकेत त्याचे योग्य उत्तर आढळून येईना.

आमच्याप्रमाणें दुसऱ्यांना हीच शंका आली असेल, नाही असें नाही. पण टीकांतच गुंतून राहिले म्हणजे, टीकाकारांनीं दिलेले उत्तर समाधानकारक न वाटलें तरी त्याखेरीज दुसरे उत्तर सुचत नाहींसें होतें. म्हणून सर्व टीका व भाष्यें बाजूला ठेवून नुस्त्या गीतेचीच स्वतंत्र विचारपूर्वक आम्ही अनेक पारायणे केलीं. तेव्हां टीकाकारांच्या छापेंतून सुटका होऊन मूळ गीता निवृत्तिपर नसून कर्मयोगपर आहे, किंबहुना गीतेंत ‘योग’ हा एकेरी शब्दच ‘कर्मयोग’ या अर्थी योजिलेला आहे, असा बोध झाला; व महाभारत, वेदान्तसूत्रें, उपनिषदें आणि वेदान्तशास्त्रावरील इतर संस्कृत व इंग्रजी ग्रंथांच्या अध्ययनानेंहि तेच मत दृढ होत जाऊन, ते लोकांत प्रसिद्ध केल्यानें या विषयाचा अधिक ऊहापोह होईल व खरें काय याचा निर्णय करण्याला सोयीचंे पडेल, अशा बुद्धीनें या विषयावर चारपाच ठिकाणी निरनिराळ्या वेळी जाहीर व्याख्यानें दिली.
*
गीताधर्माची इतर धर्माशी किंवा तत्त्वज्ञानांशी तुलना करण्याचे काम बऱ्याच प्रयासाचें असल्यामुळें, तेंहि थोडक्या कालांत नीट उरकण्यासारखे नव्हतें. म्हणून आम्ही गीतेवर एक नवीन ग्रंथ लवकरच प्रसिद्ध करणार आहों, असे आमचे मित्र रा. रा. दाजीसाहेब खरे व दादासाहेब खापर्डे यांनी थोडय़ा घाईने आगाऊच जरी जाहीर केलें होतें, तरी आपली सामग्री अद्याप पुरी नाही असे वाटून ग्रंथ लिहिण्याचे काम दिरंगाईवर पडत चाललें; आणि पुढे सन १९०८ सालीं शिक्षा होऊन ब्रह्मदेशांत मन्दले शहरी जेव्हां आमची रवानगी करण्यात आली, तेव्हां तर हा ग्रंथ लिहिण्याचा संभव बहुतेक खुंटल्यासारखाच झाला होता. परंतु ग्रंथ लिहिण्यास अवश्य लागणारी पुस्तकादि साधनें पुण्याहून तेथे नेण्याची परवानगी कांहीं कालानें सरकारच्या मेहेरबानीनें मिळाल्यानंतर सन १९१०-११ च्या हिवाळ्यात (शके १८३२, कार्तिक शुद्ध १ ते फाल्गुन वद्य ३० च्या दरम्यान) या ग्रंथाचा खर्डा मन्दलेच्या तुरुंगांत प्रथम लिहून काढिला; आणि पुढें वेळोवेळी सुचत गेल्याप्रमाणे त्यात सुधारणा केली, व तेव्हां सर्व पुस्तके जवळ नसल्यामुळें कित्येक स्थळीं जो अपुरेपणा राहिला होता तो तेथून सुटका झाल्यावर पुरा करून घेतला. तथापि अद्यापहि हा ग्रंथ सर्वाशी पूर्ण झाला असे म्हणतां येत नाही. कारण मोक्ष व नीतिधर्म यांची तत्त्वें गहन असून त्यासंबंधाने अनेक प्राचीन व अर्वाचीन पंडितांनी इतके विस्तृत विवेचन केले आहे की, फाजील संचार जाऊं न देतां त्यातील कोणत्या गोष्टी या लहानशा ग्रंथांत घ्याव्या याचा योग्य निर्णय करणे पुष्कळदां कठिण पडतें.
*
सर्वच वाचक संस्कृत जाणणारे असण्याचा संभव नसल्यामुळे, एकंदर ग्रंथाची रचना अशी ठेविली आहे की, संस्कृत न जाणणारा वाचक संस्कृत श्लोक सोडून देऊन ग्रंथ वाचू लागल्यास, त्याच्या वाचनांत अर्थाचा कोठेंहि खंड पडू नये. यामुळे संस्कृत श्लोकांचे शब्दश: भाषांतर न देता कित्येकदां त्यातील सारांश देऊनच निर्वाह करून घ्यावा लागाल आहे. परंतु मूळ श्लोक नेहमीच वर दिलेला असल्यामुळे या पद्धतीने कोणताही गैरसमज होण्याची भीति रहात नाही.
कोहिनूर हिऱ्याची अशी गोष्ट सांगतात कीं, तो हिंदुस्थानांतून विलायतेंत नेल्यावर तेथे त्याचे पुन: नवे पैलू पाडण्यात आले व त्यामुळे तो अधिक तेजस्वी दिसू लागला. हिऱ्यास लागू पडणारा हा न्याय सत्यरूपी रत्नांसहि लागू पडतो. गीतेंतील धर्म सत्य व अभय खरा; पण तो ज्या काली ज्या स्वरूपाने सांगण्यांत आला त्या देशकालादि परिस्थितींत पुष्कळ फरक पडल्यामुळें, कित्येकांच्या डोळ्यात त्याचे तेज आता पूर्वीप्रमाणे भरत नाहीसें झाले आहे. कोणतें कर्म चांगले व कोणतें वाईट हे ठरविण्यापूर्वी कर्म करावें किंवा नाही हा सामान्य प्रश्नच ज्या काळीं महत्त्वाचा समजत असत, तेव्हां गीता सांगितलेली असल्यामुळें, त्यातील बराच भाग आता कित्येकांस अनवश्यक वाटतो; आणि त्यावरच आणखी निवृत्तिमार्गीय टीकाकारांचे सारवण पडल्यामुळे गीतेंतील कर्मयोगाचे विवेचन सध्यांचे काळीं पुष्कळांस दुबरेध झालें आहे. शिवाय आधिभौतिक ज्ञानाची अर्वाचीन कालीं पाश्चिमात्य देशांत जी वाढ झाली आहे, त्यामुळें अध्यात्मशास्त्राला धरून केलेली प्राचीन कर्मयोगाची विवेचनें हल्लीच्या कालास पूर्णपणे लागू पडणें शक्य नाही, अशीहि कित्येक नव्या विद्वानांची समजूत झालेली असत्ये.  हे समज खरे नव्हेत, असे दाखविण्यासाठीं गीतारहस्यांतील विवेचनांतच गीतेच्या सिद्धातांच्या जोडीचे पाश्चात्य पंडितांचे सिद्धान्त आम्ही जागोजाग संक्षेपानें दिले आहेत. सध्यांच्या एकदेशीय शिक्षणपद्दतीमुळें नीतिशास्त्राचा आधिभौतिक म्हणजे बाह्य़ दृष्टीनें विचार करण्यास जे शिकले आहेत, त्यांस या तुलनेवरून एवढे स्पष्ट कळून येईल कीं, मोक्ष धर्म व नीति हे दोन्ही विषय आधिभौतिक ज्ञानाच्या पलीकडचे असल्यामुळे प्राचीन काळी आमच्या शास्त्रकारांनीं या बाबतीत जे सिद्धान्त केले आहेत त्यांच्या पुढें मानवी ज्ञानाची गति अद्याप गेलेली नाही, इतकेंच नव्हे तर पाश्चिमात्य देशांतहि अध्यात्मदृष्टय़ा या प्रश्नांचा ऊहापोह अद्याप चालू असून सदर आध्यात्मिक ग्रंथकारांचे विचार गीताशास्त्रांतील सिद्धान्तांहून फारसे भिन्न नाहीत. गीतारहस्यांच्या निरनिराळ्या प्रकरणांतील तुलनात्मक विवेचनावरून ही गोष्ट स्पष्ट होईल. परंतु हा विषय अत्यंत व्यापक असल्यामुळे पाश्चात्य पंडितांच्या मतांचा जो सारांश ठिकठिकाणी आम्ही दिला आहे, त्याबद्दल येथें एवढें सांगणे जरूर आहे कीं, गीतार्थ प्रतिपादन करणे हेच आमचे मुख्य काम असल्यामुळे गीतेतील सिद्धान्त प्रमाण धरून मग त्यांशी पाश्चिमात्य नीतिशास्त्रज्ञांचे किंवा पंडितांचे सिद्धान्त कितपत जुळतात हें दाखविण्यापुरताच आम्ही पाश्चिमात्य मतांचा अनुवाद केलेला आहे; व तोही अशा बेताने केलेला आहे कीं, सामान्य मराठी वाचकांस त्यातील मतलब लक्षांत येण्यास कठिण पडूं नये.

*
प्राचीन टीकाकारांनीं प्रतिपादिलेलें गीतेचें तात्पर्य आणि आमच्या मताप्रमाणे गीतेचें रहस्य यात भेद कां पडतो याची कारणें गीतारहस्यांत सविस्तर सांगितलीं आहेत. परंतु गीता-तात्पर्यासंबंधाने जरी याप्रमाणें मतभेद असला तरी गीतेवर जी अनेक भाष्यें व टीका आहेत, किंवा पूर्वी अगर अलीकडे गीतेची प्राकृतांत जी भाषांतरे झाली आहेत त्यांचें प्रस्तुत ग्रंथ लिहितांना इतर बाबतीत नेहमींच प्रसंगानुसार थोडेंबहुत साहाय्य झालेलें असल्यामुळे त्या सर्वाचे आम्ही अत्यंत ऋणी आहोत, हे येथे सांगणें अवश्य आहे. आणि तसेच ज्या पाश्चिमात्य पंडितांच्या ग्रंथांतील सिद्धान्तांचा जागोजाग उल्लेख केलेला आहे  त्याचेही आभार मानिले पाहिजेत. किंबहुना या सर्व ग्रंथांच्या मदतीखेरीज प्रस्तुतचा ग्रंथ लिहितां आला असता की नाही याची वानवाच असल्यानें या प्रस्तावनेच्या आरंभी ‘‘संतांची उच्छिष्टें बोलतों उत्तरें’’ हे तुकारामबुवांचें वाक्य आम्ही घातले आहे. सर्व कालीं एकासारखेंच लागू पडणारे म्हणजे त्रिकालाबाधित ज्ञान सांगणाऱ्या गीतेसारख्या ग्रंथाने कालभेदानुरूप नवें नवें स्फुरण मनुष्याला प्राप्त व्हावे यात कांही नवल नाही; कारण अशा व्यापक ग्रंथाचा हा धर्मच असतो. परंतु तेवढय़ानें प्राचीन पंडितांनी असल्या ग्रंथांवर जे परिश्रम केलेले असतात ते व्यर्थ होत नाहींत. गीतेचीं इंग्रजी, जर्मन वगैरे भाषांतून पाश्चात्य पंडितांनीं जी भाषान्तरे केली आहेत त्यासही हाच न्याय लागू पडतो. ही भाषांतरे प्राय: गीतेच्या प्राचीन टीकाकारांस अनुसरून केलेलीं असतात. तथापि कांही पाश्चिमात्य  पंडितांनी गीतेचा स्वतंत्ररीत्या अर्थ लावण्याचीहि खटपट सुरू केली आहे. पण खऱ्या (कर्म-) योगाचें तत्त्व अथवा वैदिक धार्मिक संप्रदायांचा इतिहास नीट लक्षांत न आल्यामुळें, अथवा बहिरंगपरीक्षणाकडेच त्यांचा विशेष कल असल्यामुळे, किंवा दुसऱ्या अशाच कारणांनी पाश्चात्य पंडितांचीं ही विवेचने पुष्कळ अपुरीं व कांही काही स्थळी तर नि:संशय भ्रामक व चुकीचीं आहेत. गीतेवरील पाश्चात्य पंडितांच्या या ग्रंथांचा येथे सविस्तर विचार किंवा परीक्षा करण्याचें कारण नाही. त्यांनीं उपस्थित केलेल्या प्रमुख प्रश्नांसंबंधीं आमचे काय म्हणणे आहे तें या ग्रंथाच्या परिशिष्टप्रकरणांत दिलें आहे.
*
ज्या विषयाच्या विचारांत आज पुष्कळ वर्षे घालविली व ज्याच्या नित्य सहवासानें व चिंतनानें मनाचे समाधान होऊन आनंद होत गेला, तो विषय ग्रंथरूपाने हातानिराळा होणार म्हणून वाईट वाटत असले तरी हे विचार – साधल्यास सव्याज, नाहीपेक्षा निदान जसेच्या तसे – पुढील पिढीतील लोकांस देण्यासाठीच आम्हांस प्राप्त झाले असल्यामुळे, वैदिक धर्मातील राजगुह्य़ाचा हा परीस ‘‘उत्तिष्ठत! जाग्रत! प्राप्य वरान्निबोधत!’’ – उठा! जागे व्हा! आणि (भगवंतांनी दिलेले) हे वर समजून घ्या! या कठोपनिषदांतील मंत्राने (कठ ३.१४) प्रेमोदकपूर्वक आम्ही होतकरू वाचकांच्या हवाली करितों. यांतच कर्माकर्माचें सर्व बीज आहे; आणि या धर्माचे स्वल्पाचरणहि मोठय़ा संकटांतून सोडवितें, असे खुद्द भगवंतांचेच निश्चयपूर्वक आश्वासन आहे. यापेक्षां आणखी जास्त काय पाहिजे? ‘‘केल्याविण काही होत नाही’’ हा सृष्टीचा नियम लक्षांत आणून तुम्ही मात्र निष्कामबुद्धीने कर्ते व्हा म्हणजे झालें. निव्वळ स्वार्थपरायण बुद्धीनें संसार करून थकल्याभागल्या लोकांच्या कालक्रमणार्थ, किंवा संसार सोडून देण्याची तयारी म्हणूनहि गीता सांगितलेली नसून संसारच मोक्षदृष्टय़ा कसा केला पाहिजे व मनुष्यमात्राचे संसारातले खरें कर्तव्य काय याचा तात्त्विकदृष्टय़ा उपदेश करण्यासाठी गीताशास्त्राची प्रवृत्ति झालेली आहे. म्हणून पूर्ववयातच गृहस्थाश्रमाचे किंवा संसाराचे हे प्राचीन शास्त्र जितक्या लवकर समजून घेणें शक्य असेल तितक्या लवकर प्रत्येकाने समजून घेतल्याखेरीज राहूं नये, एवढीच आमची शेवटीं विनंति आहे.

पुणे, अधिक वैशाख शके १८३७