सुरासुर संघर्ष आणि समुद्रमंथन

Posted: सप्टेंबर 25, 2011 in इतिहास
टॅगस्, , , ,

डॉ.  यशवंत रायकर, सौजन्य – लोकसत्ता

देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो.

—————————————————————

देव विरुद्ध दैत्य संघर्ष भारतीय परंपरेतील मध्यवर्ती पौराणिक विषय आहे. तसा तो केवळ हिंदू धर्मशास्त्राचा भाग नसून जगात अन्य समाजातही वेगवेगळ्या रूपात आढळून येतो, पण भारतात त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या संघर्षांतील एक अद्भुत घटना म्हणजे समुद्रमंथन. दोन कट्टर शत्रूंच्या सहकार्याचा तो प्रसंग असल्यामुळे नवलाईचा होय. लोकमानसावर आजही असलेला त्याचा प्रभाव पाहता त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. हा myth व legend यांचा अभ्यास आहे. ती ऐतिहासिक सत्ये नव्हेत, पण वास्तवाच्या कणाभोवती जमा झालेल्या कल्पिताच्या जलबिंदूसारखे त्यांचे स्वरूप असते. विशिष्ट समाजाची ती सामुदायिक स्वप्ने असतात. मिथ ही देवादिकांबद्दलची पवित्र प्राचीन कथा तर लीजण्ड म्हणजे दंतकथा प्रामुख्याने माणसासंबंधी असते असे धरून चालू. एरवी हे शब्द विविध अर्थाने येतात त्यांचा विचार येथे नको. हा अभ्यास म्हणजे कल्पितातून वास्तव वेगळे करण्याचा प्रयास होय. यामुळे मिथकांचे विलयन होते व श्रद्धेच्या नैतिक अधिष्ठानाला धक्का पोहोचतो. म्हणून धार्मिकांना ते कधीच रुचत नाही.

येथे भारतीय परंपरेतील देव आणि दैत्य यांचे बदलत गेलेले अर्थ प्रथम समजून घेतले पाहिजेत. पशुपालन अवस्थेतील आर्याना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. दृश्य-अदृश्य तत्त्वांना देवता मानून त्यांची आराधना केली जाई. देवांचा राजा इंद्र. त्याला वश करून घेण्यासाठी यज्ञ होत असत. यज्ञसंस्थेला अफाट महत्त्व असलेल्या काळात सुरासुर संग्रामाची कल्पना जन्मास आली. इंद्र व त्याला पुरून उरणारा वृत्र यांच्यातील युद्धाच्या काव्यमय वर्णनातून कथेची सुरुवात होते, पण हा वृत्र कोण? एक अर्थ असा की, वृत्रामुळे पृथ्वीवर प्रकाश पोहोचत नव्हता, पाऊस पडत नव्हता, नद्या वाहत नव्हत्या. वृत्राला ठार करून इंद्राने त्या वाटा मोकळ्या करून दिल्या. म्हणजे ही सृष्टीच्या आरंभाची दिव्यकथा होय, असे लोकमान्य टिळक म्हणतात. पण असुरांच्या पराभवासाठी यज्ञ केले जातात तेव्हा कथेला वेगळा अर्थ प्राप्त होतो. वैदिक देवतांना मानणारे ते देव व न मानणारे ते असुर यातील तो संघर्ष बनतो. वृत्राची वंशावळ मोठी मनोरंजक आहे. दक्ष प्रजापतीच्या तेरा कन्यांचा विवाह कश्यपशी झाला. या तेरापैकी अदितीचे पुत्र दैत्य, दनूचे दानव व अनायूचे असुर, असेही म्हटलेले आहे. याचा अर्थ सुरासुर संघर्ष सावत्र भावांमधील वैर ठरतो. सत्तेसाठी घडणाऱ्या भाऊबंदकीचे पहिले रूप, पण वैदिक देवतांना मानणारे देव हे सुजन व न मानणारे दैत्य हे दुर्जन असा अर्थ रूढ केला गेला व तोच लोकमानसात घट्ट रुजला. इराणी आर्यसुद्धा अग्निपूजक होते, पण ते वैदिक देवतांना मानीत नव्हते. त्यांच्यात अहुर (असुर) हे चांगले व देव वाईट आहेत. अहुरमज्दा अहुरांचा त्राता व देवांचा काळ. म्हणून वैदिक संस्कृतीत हे शब्द उलटय़ा अर्थाने रूढ झाले. यात आणखी एक गुंतागुंत आहे. अदितीचे पुत्र जे आदित्य त्यापैकी एक त्वष्टा म्हणजे विश्वकर्मा. त्याचा पुत्र वृत्र. अर्थात तो ब्राह्मण. वृत्राचा वध केल्यामुळे इंद्राला ब्रह्महत्येचे पातक लागते. म्हणून त्याला यज्ञ करावे लागतात.

या प्रश्नावर बृहदारण्यकोपनिषदातील माहिती अधिक चांगला प्रकाश टाकते. त्यानुसार देव हे कनिटास (कनिष्ठ), अल्पसंख्य, अर्वाचीन (नव्या पक्षाचे) व अध्यात्मावर भर देणारे होते. याउलट असुर ज्यायस (ज्येष्ठ), बहुसंख्य, प्राचीन (जुन्या पक्षाचे) व भौतिक सामर्थ्यांवर जोर देणारे आहेत. असुरांची प्रतिमा दानव, राक्षस शब्दांनी सतत डागाळण्याचा प्रयत्न झाला तरी त्यांना कुठेही असंस्कृत (uncivilized) व नास्तिक म्हटलेले नाही. त्यांची देवांशी सोयरिक होते. शिवाय वैदिक ऋषी दोहोंचे गुरू असतात.

या संदर्भात ऋग्वेदातील दाशरज्ञ सुक्त उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक घटनेचा आधार असलेले ते एकमेव सुक्त होय. पुरु, अनु, द्रुह्य़ू, तुर्वास व यदू या सप्तसिंधूमध्ये आलेल्या आर्याच्या पहिल्या टोळ्या. त्यांना पंचजना: म्हटले आहे. नंतर सुदास याच्या नेतृत्वाखाली भरत टोळीचे लोक मोठय़ा संख्येने आले. त्यांचा पुरोहित विश्वामित्र होता, पण पंचजनांशी भरताचे युद्ध जुंपले तेव्हा भरतांनी विश्वामित्राला काढून त्याच्या जागी वसिष्ठाची नेमणूक केली. त्यामुळे खवळलेल्या विश्वामित्राने भरतांविरुद्ध १० राजांचा संघ उभारला. तरी युद्धात भरतांचा विजय झाला. म्हणून या उपखंडाला भारतवर्ष हे नाव मिळाले. पुढे शेतीची सुरुवात झाल्यावर भटक्या लोकांचा आडदांड इंद्र कालबाह्य़ झाला. अशा काळात मैदानी प्रदेशातील लोकांना शांतताप्रिय विष्णू भावला. पहाडी भागांत अवैदिक शिवाला महत्त्व आले. भारतवर्ष एका छत्राखाली आणणे गरजेचे होते. त्यासाठी वैष्णवांनी पुढाकार घेतला. रामायणात रामप्रधान वैष्णवांनी उत्तरेकडून दक्षिणेकडे व महाभारतात कृष्णप्रधानांनी पश्चिमेकडून पूर्वेकडे. त्यामुळे देव-दैत्य संघर्षांला वैष्णव-शैव असे नवे परिमाण प्राप्त झाले. दोहोंमध्ये एकमेकांवर कुरघोडी करणाऱ्या पौराणिक कथा निर्माण होऊ लागल्या.

मग देव आणि दैत्य म्हणजे कोण? देव म्हणजे प्रस्थापित, सत्ताधारी अल्पसंख्य ज्यांची नीती (Value system) इतरांना प्रमाण मानणे भाग पडते. अर्थात dominant minority. आपला व परका असा भेद करून लोकांकडे पाहणे, हितसंबंध लक्षात घेऊन ‘आपल्या’ला पाठीशी घालणे व ‘परक्या’मागे हात धुवून लागणे, पण गरज पडल्यास त्याच्याशी जमवून घेणे ही वृत्ती त्यामागे आहे. राजकारण व समाजकारण यात त्याचेच चित्र उमटलेले असते. जगभरच्या कहाण्यांमध्ये हा सुरासुर संघर्ष आढळतो. दुर्गाबाई भागवतांनी काही उदाहरणे दिली आहेत. आर्यलड, स्कॉटलंड येथील मिथ्यकथांत ओडिन हा देवांचा राजा व यमर दैत्य आहे. देव यमरला ठार मारतात. नॉर्वे येथील कहाण्यांत ओडिन देवांचा राजा व लोक हा त्याचा धाकटा भाऊ दुष्ट आहे. तो शत्रूला मिळतो. देवांपुढे हिमदैत्याचा धोका उभा राहतो तेव्हा ते चलाखीने हिमदैत्याचा वापर करून नंतर झालेल्या युद्धात त्याला मारतात. सर्व दैत्य नरकात जातात, लोकांना नियंत्रित करण्यासाठी त्यांच्या मनात नरकाची भीती घालायची व मग त्यातून वाचण्याचे मार्ग सांगायचे ही सर्वच धर्माची रणनीती असते.

या पाश्र्वपटलावर समुद्रमंथन पाहू. ही कथा अतिप्राचीन वाटली तरी ती स्मृतिपुराणांच्या काळातली निर्मिती आहे. रामायण, महाभारत, भागवत वगैरेत त्याचे उल्लेख असले तरी विष्णुपुराण हा त्यांचा प्रमुख आधार होय. ते इसवी सनाच्या ३, ४ शतकापूर्वीचे नाही. त्यात मेरु पर्वत, दशावतार यांची माहिती असून गुप्त साम्राज्याचाही उल्लेख येतो. महाभारतात इ. स. ४०० पर्यंत ४ शतकात जी भर पडली त्यातच समुद्रमंथन येऊ शकते. भागवत ६ व्या शतकापूर्वीचे नाही. श्रीकृष्णचरित्राचा तो मुख्य आधार. माणसाला वैराग्य कठीण असल्यामुळे पुराणे भक्तिमार्ग आवर्जून शिकवितात. मत्स्य, कूर्म, वराह, वामन ही उत्तरकालीन पुराणे एकेका अवतारांची महती सांगतात. त्यात अतिशयोक्तीचा अतिरेक असतो, पण तो केवळ पुराणाकडूनच होतो असे नाही. तत्कालीन धर्मपंथांची आपसात चाललेली चढाओढ लक्षात घेतली तर सर्व धर्म त्या बाबतीत एकाच माळेचे मणी असतात हे कळून येते. काही उदाहरणे पाहा. भरताच्या नाटय़शास्त्रात कलांची संख्या ६४, जैन वाङ्मयात ७२ तर बौद्धांच्या ललित विस्तारात ९६. जैनांचे र्तीथकर २४, महायानांचे बुद्ध २४ तर भागवतात विष्णूचे अवतार १० वरून २४ वर येतात. लिंगपुराण शंकराचे २८ अवतार सांगून त्यावर कडी करते. आता बौद्ध त्यापुढचे पाऊल टाकतात. लंकावतार सूत्रात बुद्ध ३६, ललित विस्तारात ५४ तर महावस्तूमध्ये १०० च्या वर बुद्ध आहेत. आपल्या हीरोंना तोंडे किती किती असावीत यातही दुसऱ्याला मागे टाकण्याची धडपड दिसते. रावण दशानन तर बौद्धांचा अवलोकितेश्वर ११ तोंडांचा (कन्हेरी येथील शिल्प पाहा.) आणि शाक्तांची सीता कालीचे रूप धारण करून ज्या रावणाचा वध करते तो रावण सहस्रमुखी असतो. तसेच जैन पुराणांनुसार महावीर १२ फूट उंच, पाश्र्वनाथ १६ फूट, तर वृषभनाथ ३००० फूट उंच होते. आपला भूतकाळ जास्तीत जास्त प्राचीन करण्याचीही वृत्ती असते. पहिला मत्स्यावतार कृतयुगाच्या सुरुवातीस झाला. म्हणजे ४३ लक्ष २० हजार वर्षांपूर्वी, तर वृषभनाथाचे वय पृथ्वीच्या वयापेक्षाही अधिक आहे. असे होण्याचे कारण मानवी मनाला गूढ, अलौकिक, अघटित, असंभवनीय अशा गोष्टींचे आकर्षण असते. लोकांचा चमत्कारावर विश्वास असतो व तो आजही आहे. समुद्रमंथन ही घटना त्याचाच परिपाक होय. ती एक Monumental Fantasy आहे.

देव आणि दैत्य यांची पहिल्यापासून एकच महत्त्वाकांक्षा असते, ती म्हणजे तीनही लोकांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणे. यामुळे सुरासुर संग्राम चालू राहतो. पण त्यात दोन्ही पक्षांपुढे एक अघटित समस्या उभी राहते, जी समुद्रमंथन केल्याशिवाय सुटणारी नसते. हे मंथन दोहोंनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. या महानाटय़ात तिसरा एक घटक असतो तो तपस्वी ऋषींचा. या ऋषींचे स्थान इंद्र, विष्णू व शिव यांच्या खालचे असले तरी त्यांच्या तपसामर्थ्यांला व शापाला देवसुद्धा भिऊन असतात. हे तपस्वी अत्यंत तापट, महत्त्वाकांक्षी व सूडबुद्धीचे असतात. एका पक्षात आपल्याला सर्वोच्च स्थान लाभले नाही तर विरोधी पक्षात जाऊन ते मिळवितात. विश्वामित्राचे उदाहरण मागे येऊन गेलेले आहे. समुद्रमंथनाच्या महानाटय़ात शुक्राचार्य व दुर्वास महत्त्वाच्या भूमिका बजावतात. पौराणिक कथांच्या तपशिलात न शिरता आपण समुद्रमंथनाचा घटनाक्रम पाहू. या कथा परस्परविरोधी व विसंगत असतात. येथे मेळ न घालता फक्त मर्म शोधणे आहे.

शुक्राचार्याला देवांचा गुरू व्हायचे असते, पण ती संधी हुकल्यामुळे तो दैत्यांचा गुरू बनतो. दैत्यांचा पराभव होऊ नये म्हणून मृतांना जिवंत करणारा संजीवनी मंत्र प्राप्त करून घेण्यासाठी शिवाची कठोर तपस्या करतो. त्याचा तपस्याभंग करण्यासाठी इंद्र कपट रचतो, पण शंकराच्या ते लक्षात येताच स्वत: प्रकट होऊन तो शुक्राचार्याला संजीवनी मंत्र देऊ करतो. त्यामुळे युद्धात मेलेले दैत्य जिवंत होतात. देवांचा पराभव होत राहतो. दुसऱ्या एका कथेनुसार इंद्राच्या हातून दुर्वास ऋषींचा अपमान होतो. त्यामुळे संतापलेला मुनीवर इंद्राचे सर्व सामथ्र्य व वैभव नष्ट होईल असा शाप देतो. यामुळे लज्जित व हताश झालेला इंद्र सर्व देवांना घेऊन विष्णूला शरण जातो.

शांत चित्ताचा प्रॅग्मॅटिक विष्णू देवांच्या कूटनीतीचा मास्टरमाइंड आहे. प्रत्येक संकटावर मात करण्याची योजना त्याच्याकडे तयार असते. तो युक्ती सुचवितो. त्यानुसार देव शुक्राचार्याला विश्वासात घेऊन म्हणतात, ‘‘तुझ्याकडे संजीवनी मंत्र आहे म्हणून तू दैत्यांना जिवंत करतोस. पण उद्या तूच नसलास तर कोण कुणाला जिवंत करील?’’ शुक्राचार्य बुचकळ्यात पडतो. मग त्यावरचा उपाय सांगतात. अमरत्व देणारे अमृत मिळविणे. पण ते समुद्राच्या पोटात असते. त्यासाठी समुद्रमंथन करायला हवे. जे देव व दैत्य यांनी परस्परसहकार्य केल्याशिवाय शक्य नसते. शुक्राचार्याला पटते. मग मंदार पर्वताची रवी, वासुकी नागाची दोरी करून देव व दैत्य समुद्र घुसळायला निघतात. पण मंदार पर्वत समुद्रात बुडू लागतो. तेव्हा विष्णू कूर्मावतार धारण करून पर्वताला पाठीवर उचलतो. मंथन यशस्वी होते. त्यातून १४ रत्ने बाहेर येतात. या रत्नांची यादी व संख्या वेगवेगळी असली तरी आपल्याकडे लग्नाच्या वेळी मंगलाष्टकांत म्हटले जाणारे कडवे प्रमाण मानू. (चौकट पाहा) या रत्नांमधील हलाहल गंभीर समस्या उभी करते. तेव्हा शिव जगाच्या कल्याणासाठी ते आपणहून प्राशन करतो. पण अंगात भिनू देत नाही. यात पार्वती विधायक भूमिका बजावते. त्यामुळे शिव नीलकण्ठ बनतो. हे मिथक अत्यंत उद्बोधक आहे. प्रत्येकाला जीवनातील कटू अनुभवांचे विष प्यावेच लागते. (जीवन ही अमर जहर है तो पीना ही पडेगा।) त्यामुळे मनात त्रासिक कडवटपणा भरतो, जो स्वत:ला व इतरांनासुद्धा सुख लागू देत नाही. पण मोठय़ा मनाची माणसे नीलकण्ठ बनतात.

मंथनातून अखेर देवांचा डॉक्टर धन्वंतरी अमृतकलश घेऊन बाहेर येतो तेव्हा तो पळविण्यासाठी देव व दैत्य यांच्यात युद्ध जुंपते. पण विष्णूचा गरुड कलश घेऊन वरच्या वर उडतो. त्यातले चार थेंब प्रयाग, हरिद्वार, उज्जयिनी व नाशिक येथे पडतात. म्हणून ती पवित्र तीर्थक्षेत्रे बनून दर बारा वर्षांनी तेथे कुंभमेळा भरतो. ही प्रथा आजही चालू आहे. पण दैत्य पुन्हा कुंभावर झडप घालतात. तेव्हा त्यांचे मन विचलित करण्यासाठी विष्णू मोहिनीचे रूप धारण करतो. त्यामुळे कलश देवांना प्राप्त होतो. अमृत पिऊन देव अमर बनतात. त्यातही गुंतागुंत आहे. एक दैत्य राहूचे रूप धारण करून देवांच्यात घुसतो व अमृत पिऊ लागतो. सूर्य व चंद्र यांच्या ते लक्षात येते. ते मोहिनीला सावध करतात. लगेच सुदर्शन चक्र त्या दैत्याचा शिरच्छेद करते. पण थोडे अमृत घशापर्यंत गेल्यामुळे मुंडके (म्हणजे राहू) अमर बनते व धड (म्हणजे केतू) वेगळे पडते. चंद्र सूर्यानी चुगली केल्यामुळे राहू व केतू त्यांना आळीपाळीने ग्रहण लावून कायमचा बदला घेत राहतात.

समुद्रमंथनाच्या कथेत विष्णूचा महिमा, त्याच्या अवतारांचे माहात्म्य, शिवाचा परोपकारी, सरळसोट, निष्कपट स्वभाव, त्याला लाभलेली पत्नीची साथ, तीर्थक्षेत्रे व तीर्थयात्रांचे पावित्र्य, ग्रहणासारख्या खगोलशास्त्रीय घटना या सर्वाचे मिश्रण करून, मानवी मनावर राज्य करणारी मॉन्युमेंटल फॅन्टसी उभी करण्यात आली. थायलँड, कंबोडिया, इंडोनेशिया, मलायसिया येथील लोकांचे पूर्वज भारतातून आलेले असल्यामुळे या फॅन्टसीच्या माध्यमातून ते त्यांची आठवण जपतात. बँकॉक (थायलँड) येथील सुवर्णभूमी विमानतळावर समुद्रमंथनाचे भव्यदिव्य शिल्प पाहून प्रवाशांची मने थक्क होतात.

प्रतिक्रिया
  1. मनोहर म्हणतो आहे:

    बृहदारण्यकोपनिषदात फक्त इंद्रियांच्या सहजप्रेरणेला महत्त्व देऊन त्याप्रमाणे वर्तन करणारे ते असुर तर इंद्रियांच्या सहजप्रेरणेबरोबर प्रत्यक्ष इंद्रिये व सहजप्रेरणांचे परिणाम यांचा विचार करून त्याप्रमाणे वर्तन करणारे ते देव असे सांगितले आहे. त्या व्याख्येत माझ्या माहितीप्रमाणे बदल झालतला नाही.

यावर आपले मत नोंदवा