Archive for जुलै, 2010

स.ह.देशपांडे, सौजन्य – लोकसत्ता

इतिहासात राष्ट्रवादाने जी विधायक कामगिरी केली आहे, तिच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. दोन गोष्टींचा आपण विशेषत्वाने परामर्श घेतला पाहिजे.
वर एका ठिकाणी आदिम समाजांमधल्या ‘टोळय़ां’चा उल्लेख केला आणि टोळीभावना व राष्ट्रभावना या मुळात एकाच स्वरूपाच्या असल्याचे सांगितले. मात्र एकूण राष्ट्रवादाचा विकासक्रम पाहिला तर लहान लहान टोळय़ा एकमेकांत मिसळून कालांतराने त्यांची राष्ट्रे झाल्याचे लक्षात येईल. या प्रक्रियेत समाजाचा प्रत्येक घटक मनाची सतत वाढत जाणारी एक विशालता अनुभवत असतो. छोटय़ा गटांवरच्या निष्ठांची जागा मोठय़ा गटांवरची निष्ठा घेते. मनावरची संकुचित आवरणे गळून पडतात. एका लहान गटापुरती मर्यादित असलेली बंधुत्वाची भावना व्यापक क्षेत्रावर कार्यान्वित होते. (ती अधिक व्यापक होऊन अखिल मानवत्वाला तिने कवेत घ्यावे हे स्वप्न योग्य आहे; पण आज तरी ते ‘स्वप्न’च आहे.)

या विकासक्रमातही एक नैतिक विकास अनुस्यूत आहे आणि हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे त्याचे थोडे स्पष्टीकरण केले पाहिजे. भारताच्या संदर्भात तर तो विशेष अगत्याचा आहे.

जगात आपल्याला नेहमी असे दिसून येते, की माणूस निखळ नीतिमान किंवा निखळ अनीतिमान असा नसतो. त्याच्या वागणुकीत एक नैतिक द्वैत असते. ज्यांना ‘आपले’ म्हणावे त्यांच्या बाबतीत त्याची वागणूक सर्वसाधारणपणे नीतीची असते. अगदी चोर, दरोडेखोर झाले तरी टोळीतल्या टोळीत त्यांची प्रवृत्ती परस्पर विश्वासाची, दिलेला शब्द पाळण्याची, खरे तेच बोलण्याची असते. इतरांना लुबाडणारा माणूस केवळ संकुचित वैयक्तिक अर्थाने स्वार्थी नसतो, तर त्याचा स्वार्थ हा बहुधा ‘कुटुंबस्वार्थ’ असतो. ‘मुलांनातवंडांचं’ तो कोटकल्याण करीत असतो. ही भावना प्रेमाची असते, प्रेम हा ‘आस्थे’चा एक उच्च प्रकारचा आविष्कार असतो. दुसऱ्याविषयी वाटणाऱ्या आस्थेतून सर्व सामाजिक नीतिमत्तेचा उगम होतो. मात्र ‘आपल्या’ मानलेल्या लोकांचे वर्तुळ संपले, की त्याबाहेरच्या लोकांशी वागण्याची रीत बदलते आणि ती अनैतिक वर्तणुकीचे रूप घेऊ शकते.

आपल्या देशात अजून जात, जमात, गाव इत्यादी छोटय़ा निष्ठा प्रबळ आहेत. ‘आपले’पणाची वर्तुळे फार छोटी आहेत. या वर्तुळांपलीकडील माणसांशी आपले व्यवहार नीतितत्त्वांना धरून होत नाहीत. आपल्या देशातील सामाजिक नीतिमत्तेची पातळी फारच खालची आहे हे सुप्रसिद्ध आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे समाजातल्या घटकांचे ‘आपले’पणाचे वर्तुळ संपूर्ण देशाएवढे मोठे झालेले नाही. आपणात राष्ट्रीय भावना नाही. राष्ट्रीय भावना आणि सामाजिक नीतिमत्ता यांचा हा संबंध आपण लक्षात घेतला तर आजच्या आपल्या नैतिक अवनतीच्या कारणांवरही थोडासा प्रकाश पडेल.

राष्ट्रवाद ही सर्व प्रकारच्या कर्तृत्वाची प्रेरणा बनू शकते हेही लक्षात घेतले पाहिजे. माणूस आपल्या गुणांच्या जोरावर पुढे जातो हे खरेच आहे, पण ‘माझ्या कर्तृत्वाने माझ्या देशाचे नाव मोठे होणार आहे,’ ही भावनाही कर्तृत्वाला पोषक ठरते. तीन-चार शतकांतले विशेष लक्ष वेधून घेणारे वेगवेगळय़ा देशांचे कर्तृत्व आर्थिक क्षेत्रातले आहे आणि या काळातला आर्थिक विकास आणि राष्ट्रवादाची मानसिक उभारी यांचा संबंध इतिहासाच्या अभ्यासकांनी ध्यानात आणून दिला आहे. ‘पूर्वी दुखावलेला स्वाभिमान आणि भविष्यकाळाविषयीची उमेद यामधून जर्मनीचा राष्ट्रवाद स्फुरलेला होता. जर्मनीच्या आधुनिकीकरणाचे हेच रहस्य आहे. नेपोलियनने केलेला अपमानास्पद पराभव जर्मनीला सलत होता. जर्मनी संघटित आणि स्वाभिमानी झाला तर तो किती सामथ्र्यशाली होईल, याची प्रशियन नेत्यांना बरोबर जाणीव होती. याच जर्मन राष्ट्रवादामुळे फ्रँकफर्टची १९४९ची क्रांती यशस्वी झाली आणि जर्मनीच्या यशस्वी (आर्थिक) उत्थानाची राजकीय पाश्र्वभूमी तयार झाली. रशियन उत्थानाबद्दलही असेच म्हणता येईल. जवळजवळ शतकभर रशियाचे युद्धात पराभव होत होते. प्रथम क्रायमियन युद्ध, नंतर रुसो-जपान युद्ध आणि शेवटी पहिले महायुद्ध. रशियात परिवर्तन घडून येण्यामागे या राष्ट्रीय अपमानाची चीड प्रबळ होती. जपानमध्ये परिवर्तन घडून आले याचे कारण नव्या उद्योगधंद्यांनी निर्माण केलेल्या सेव्य वस्तू विकून फार फायदा होतो, असे जपान्यांना वाटले हे नव्हे, तर चीनमधील अफूचे युद्ध आणि त्यानंतर दहा वर्षांनी सात ‘काळी जहाजे’ बरोबर घेऊन कमोडोर पेरीने जपानवर केलेले आक्रमण हे होय! चीनमधील पारंपरिक समाजरचना अत्यंत मंद गतीने बदलली, पण बदलली ती मात्र शतकभर परकीयांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा परिणाम म्हणूनच.’ राष्ट्रीय स्वाभिमान व आर्थिक विकास किंबहुना सर्वागीण विकास यांचा परस्परसंबंध राष्ट्रवादाच्या अभ्यासकांनी आवर्जून अभ्यासावा असा आहे.

धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था
‘विधायक राष्ट्रवादाच्या दिशेने’ या नवव्या प्रकरणात आपल्या राष्ट्रवादाची प्रमुख तत्त्वे काय असावीत, हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यात धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे सविस्तर प्रतिपादन करायला हवे होते. पुस्तक लिहिताना ते तत्त्व मी गृहीतच धरले होते आणि जागजागी त्याचे उल्लेख आलेलेही आहेत. पण सलग आणि विस्तृत विवेचनाची आवश्यकता होती आणि ते आता मी करीत आहे. खरे म्हणजे हा भाग त्या प्रकरणाच्या सुरुवातीस यायला हवा होता.

‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाला पर्याय म्हणून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द मी वापरीत आहे. ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाला संघपरिवाराचा विरोध असतो. त्या आक्षेपात अजिबात तथ्य नाही, असेही नाही. पण त्याचा फार बाऊ करण्यातही अर्थ नाही. ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्दही जितका रूढ झाला आहे, तितका ‘संप्रदायनिरपेक्षता’ हा झालेला नाही. मी एवढेच स्पष्ट करू इच्छितो, की येथे ‘धर्म’ म्हणताना ‘रिलिजन’ हाच अर्थ माझ्या मनात आहे. एकदा मनातला अभिप्राय स्पष्ट केल्यानंतर पुढे जे म्हणायचे आहे, त्याबद्दल गैरसमज होण्याचे कारण नाही. ज्यांना अवश्य वाटेल त्यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ या संज्ञेऐवजी ‘संप्रदायनिरपेक्ष’ किंवा ‘उपासनापंथनिरपेक्ष’ अशी दुरुस्ती करून घ्यावी.

धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम) या शब्दाचा नेमका अर्थ काय याबद्दल अकारण बराच वाद घातला जातो. खरे म्हणजे तो अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. तो पुढीलप्रमाणे मांडता येईल.

१) राजकीय व्यवहारात म्हणजे कायदे करणे, धोरणे ठरविणे, कार्यक्रम आखणे इत्यादी बाबतींत शासनाने धर्मग्रंथांचा आधार घेता कामा नये. कर्जावर व्याज आकारावे की नाही, कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम राबवावा की नाही, मुलांच्या लग्नाचे वय कोणते असावे, शिक्षणक्रम कसा असावा इत्यादी अनंत प्रश्न राज्यकर्त्यांना सोडवावे लागतात. मात्र ते सोडवताना मनुस्मृती, बायबल, ताळमुद, कुराण, झेंद-अवेस्ता इत्यादी धर्मग्रंथांत कोणते आदेश दिले आहेत याचा विचार न करता मनुष्यबुद्धीने, उपलब्ध ज्ञानाच्या आधारे आणि तर्कसुसंगत अशी उत्तरे शोधून ते सोडविणे याचा अर्थ धर्मनिरपेक्षता! हे सर्व सामाजिक प्रश्न म्हटले ते राज्यसंस्थेच्या अधिकारात येतात. सारांश, सर्वच प्रकारचे सामाजिक प्रश्न सोडविताना बुद्धिवादाचा आश्रय घेणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असणे. माणसाच्या बुद्धीलाही मर्यादा असतात हे खरे, पण जग समजून घेण्यासाठी माणसाजवळ दुसरे काही साधन नाही हेही खरे- या गृहीतकृत्यावर बुद्धिवाद आधारलेला आहे. तात्पर्य, सर्व सामाजिक व्यवहाराच्या क्षेत्रात धर्म गैरलागू ठरवून तेथे बुद्धिवादाची प्रतिष्ठापना करणे म्हणजे धर्मनिरपेक्षतावाद!
‘धर्म’ याचा येथे अर्थ एखाद्या प्रेषिताने, ऋषीने, मुनीने किंवा धर्मग्रंथाने दिलेले आदेश असा आहे. धर्म हा शब्द यापेक्षा व्यापक अर्थाने कधी कधी वापरला जातो, समाजधारणेची तत्त्वे, सर्वसाधारण नीतिविचार असा त्या वेळी धर्म या शब्दाचा अर्थ असतो. त्या अर्थाने अर्थातच कोणतेही शासन धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. वर म्हटल्याप्रमाणे तेथल्या विवेचनात धर्म शब्दाचा हा व्यापक अर्थ अभिप्रेत नाही हे लक्षात ठेवावे.

मात्र संकुचित अर्थानेही धर्माचा नाश घडवून आणणे, धर्माला राष्ट्रीय जीवनातून हद्दपार करणे असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही. सामाजिक व्यवहारात धर्माला प्रवेश नाही. एवढाच धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. म्हणजेच माणसाच्या खासगी जीवनात धर्माला जागा राहील. याचा अर्थ असा, की परमेश्वर मानणे किंवा न मानणे, एखाद्या धर्माचे अनुयायित्व पत्करणे किंवा न पत्करणे या गोष्टींबाबत व्यक्तीला स्वातंत्र्य असेल. लोकांच्या जीवनातूनच धर्म काढून टाकण्याचा प्रयत्न सोविएत शासनाने केला; धर्मनिरपेक्ष राज्याच्या संकल्पनेत असा प्रयत्न अनुस्यूत नाही. आपली मागणी फक्त धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेची (स्टेट) आहे; धर्मनिरपेक्ष समाजाची (सोसायटी) नाही.

किंबहुना व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य हे धर्मनिरपेक्ष राज्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. या धार्मिक स्वातंत्र्यात उपासनास्वातंत्र्याचा समावेश होतो, तसाच आपला धार्मिक दृष्टिकोन मांडण्याचा, तो इतरांना पटविण्याचा, म्हणजेच धर्मातर घडवून आणण्याच्या आणि त्यासाठी संघटित प्रयत्न करण्याच्या स्वातंत्र्याचाही समावेश होतो. मात्र अशी धर्मातरे जबरदस्तीने, लबाडीने किंवा प्रलोभन दाखवून न होता पूर्णपणे स्वेच्छेने झाली पाहिजेत.

धर्माचे उन्मूलन करणे, असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही असे वर म्हटले आणि वैयक्तिक पातळीवर तो कायम राहू शकतो, असे सांगितले. पण धर्मनिरपेक्षतेची स्पष्ट कल्पना येण्यासाठी या विधानाचा अर्थ गंभीरपणे विचारात घेतला पाहिजे. वस्तुत: कोणताही रूढ धर्म व्यक्ती आणि त्याचा परमेश्वर यांच्या संबंधापुरता, म्हणजेच खासगी पातळीपुरता मर्यादित राहात नाही. तो कमीजास्त प्रमाणात जीवनव्यापी असतो. विवाह, घटस्फोट, मालमत्तेचे विभाजन, आर्थिक व्यवहार इत्यादी जवळजवळ प्रत्येक बाबतीत धर्माचे काहीतरी म्हणणे असते. म्हणजेच धर्म व्यक्ती आणि परमेश्वर यांच्या संबंधांपलीकडे जाऊन व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधात, म्हणजेच सामाजिक व्यवहारात शिरकाव करतो, त्या व्यवहाराचे नियंत्रण करू बघतो. काही धर्म समाजाचे तपशीलवार नियंत्रण करतात, तर काही कमी तपशिलात जातात एवढाच फरक!

धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था सामाजिक व्यवहारावरील धर्माचे नियंत्रण बाजूला करते आणि त्या ठिकाणी मानवी बुद्धीची, विवेकाची (रीझन) प्रतिष्ठापना करते, या दृष्टीने पाहिले तर लक्षात येईल धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व रूढ अर्थाच्या धर्मावर जरूर आघात करते. ते अशा अर्थाने आघात करते, की धर्माच्या नियंत्रणाखालचा प्रदेश ते संकुचित करते.

धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेची बाकीची लक्षणे वर दिलेल्या पहिल्या लक्षणातूनच निर्माण होतात.

२. दुसरे लक्षण असे, की राज्य हे कोणत्याही धर्माचे असणार नाही. त्याने कोणत्याही धर्माला उत्तेजन देता कामा नये किंवा खाली दडपता कामा नये.

३. शासकीय सेवांमध्ये धर्मनिरपेक्षपणे भरती केली जाईल. (म्हणजेच पात्रता हा निकष राहील.)

राजकीय संस्था आणि धर्मनिरपेक्षता
धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेची वैशिष्टय़े सांगितल्यानंतर ओघानेच अशा राज्यसंस्थेतील राजकीय संस्थांची वैशिष्टय़े सांगणे येते. अशा संस्थांत राजकीय पक्ष विशेष महत्त्वाचे असतात. लोकशाहीत राजकीय पक्ष सत्ताधारी होऊ इच्छितात, शासन त्यांच्या ताब्यात येऊ शकते, म्हणून त्यांची वर्तणूक धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेच्या तत्त्वांशी सुसंगत असली पाहिजे. अर्थातच अशा राजकीय संस्थांनी पुढील दंडक पाळणे अवश्य असेल. १) धर्मनिरपेक्ष राज्याची वरची संकल्पना त्यांना मान्य असली पाहिजे. २) पक्षात सर्वाना धर्मनिरपेक्षपणे मुक्त प्रवेश असला पाहिजे. ३) पक्षाची म्हणून एका विशिष्ट धर्माशी अथवा धर्मपंथाशी बांधिलकी असता कामा नये. मतदारांना आवाहन करताना धार्मिक प्रतीके वापरू नयेत हा दंडक यातूनच निष्पन्न होतो.

धर्मनिरपेक्षता का इष्ट?
धर्मनिरपेक्षता म्हणजे सामाजिक व्यवहारात बुद्धिवादाचा आश्रय असे आपण वर पाहिले. यातूनच धर्मनिरपेक्षता का हवी याचे उत्तर मिळते. ते असे की त्यात मानवी बुद्धीची प्रतिष्ठा पाळली जाते. ही बुद्धी स्वतंत्र असून कुणातरी प्रेषिताने किंवा तथाकथित साक्षात्कारी पुरुषाने त्याच्या काळात जे सांगितले होते तेच आजही प्रमाण आहे असे मानण्यास तयार नसते. ती शब्दाचे दास्य पत्करीत नाही.

आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवून स्वतंत्र विचार करणारा माणूस आत्मनिर्भर असतो, प्रयत्नवादी असतो. राष्ट्राचे कर्तृत्त्व अशा माणसांमुळेच बहरून येते.
बुद्धिवादाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे विज्ञानाची भरभराट. धार्मिक बंधनांमधून माणसाची बुद्धी मुक्त होताच सृष्टीची रहस्ये उलगडू लागली. या शोधांमधून वेगवेगळी तंत्रज्ञाने निर्माण झाली आणि माणसाचे जीवन अधिक समृद्ध आणि सुखी होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. आपणालाही एक सबळ, समृद्ध आणि सुखी राष्ट्र निर्माण करायचे असेल तर धर्मनिरपेक्षतेचा अंगीकार करणे अवश्य आहे.

धर्मनिरपेक्षता का अपरिहार्य?
धर्मनिरपेक्षता का इष्ट हे वर सांगितले. त्याबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की भारताच्या आजच्या विशिष्ट परिस्थितीत ती अपरिहार्यही आहे. हा मुद्दा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे.

अनेक वैविध्यांनी नटलेला आपला देश बहुधार्मिकही आहे. किंबहुना अनेक धार्मिक समूहांच्या संघर्षांमुळेच येथल्या राष्ट्रवादाचा प्रश्न बिकट झालेला आहे. हे संघर्ष नाहीसे व्हावेत यासाठी राज्यसंस्था धर्मनिरपेक्ष असण्याची गरज आहे.

राज्यसंस्थेने एका विशिष्ट धर्माशी किंवा संप्रदायाशी बांधिलकी मानली किंवा त्याला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले तर इतर धर्माच्या अनुयायांमध्ये असंतोष निर्माण होईल हे स्पष्ट आहे. असंतोषाचे हे कारण धर्मनिरपेक्षतेत शिल्लक राहात नाही.

पण आपल्या देशात धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा स्वीकार करण्याचे याहून महत्त्वाचे आणि मूलभूत असे एक कारण आहे. त्याचा, विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी गंभीरपणे विचार करणे अवश्य आहे. मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात हा विचार करू या!

१९९१ च्या शिरगणतीप्रमाणे मुसलमानांची लोकसंख्या सुमारे साडे अकरा टक्के आहे आणि प्रस्तुत पुस्तकात दाखविल्याप्रमाणे त्यांची अलगतावादी वृत्ती स्वातंत्र्योत्तर काळात कमी न होता अधिक वाढल्याची अनेक प्रत्यंतरे आहेत. हा प्रश्न आपण कसा सोडविणार आहोत? जरा स्पष्ट शब्दांत बोलू या.
या मुसलमानांना देशाबाहेर घालवून देणे, त्यांचे धर्मातर करून त्यांना हिंदू करून घेणे किंवा त्यांची घाऊक प्रमाणावर हत्या करणे हे उपाय मानवतेला काळिमा फासणारे तर आहेतच, पण व्यवहार्यही नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. पहिल्या दोन उपाययोजनांना इतका विरोध होईल, की त्याचे पर्यवसान तिसऱ्या उपायातच होणे अपरिहार्य आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या बाबतीत हिंसेचा उपाय कुणी सुचवणार असेल तर त्याची गणना वेडय़ातच करावी लागेल. याबाबतीत आणखीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे टीकाकार काहीही म्हणोत, कोणत्याही जबाबदार हिंदुत्ववादी नेत्याने या पर्यायांचा उच्चार केलेला नाही. दुसरे सरसंघचालक श्री. गुरुजी यांचा पुस्तकात जो उतारा अन्यत्र दिला आहे त्यातला एक छोटासा भाग पुन्हा उद्धृत करण्यासारखा आहे. ‘. आपला दृष्टिकोन इतका तर्कसंगत आणि भावात्मक असतानाही काही लोकांना असे वाटते, की हिंदू राष्ट्राची कल्पना आपल्या मुसलमान व ख्रिस्ती नागरिक बंधूंच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी आहे. एक तर त्यांना हाकलून लावण्यात येईल किंवा त्यांचे निर्मूलन करण्यात येईल. याहून अधिक तर्कविसंगत व आपल्या राष्ट्रीय भावनेला मारक असा विचार असू शकत नाही. आपल्या थोर व सर्वसमावेशक संस्कृतीचा हा अपमान आहे. या सगळय़ांचा निष्कर्ष असा, की या मुस्लिम समाजाला राष्ट्रीय जीवनात सामावून घेणे एवढाच पर्याय शिल्लक आहे- आणि हिंदुत्ववाद्यांमधल्या विचारी नेत्यांनी हे ओळखलेलेही आहे.

राष्ट्रीय प्रवाहात सामावून जाण्यात मुसलमानांना कोणता अडसर आहे? मुस्लिम प्रश्नाच्या विवेचनाच्या ओघात आपण पाहिले आहे, की त्यांच्या धर्माची शिकवणच त्यांना प्रादेशिक निष्ठा स्वीकारू देत नाही. सावरकर, आंबेडकर, शहा, कुरुंदकर, दलवाई या सर्वानी हेच सांगितले. या संदर्भात असा श्लेष कधी कधी काढला जातो, की मुसलमानांचे धार्मिक पुढारीच त्यांना चुकीच्या धर्माची शिकवण देतात. याला एक उत्तर असे आहे, की यामुळे वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही. सर्वसामान्य मुसलमानाला जो धर्म सांगितला जातो तो परमेश्वराचा शब्द म्हणूनच सांगितला जातो. सर्वसामान्य मुसलमानाच्या दृष्टीने मुल्ला-मौलवी सांगत असलेला कुराणाचा अर्थ, चुकीचा असला तरी ‘धर्म’च असतो. दुसरे उत्तर असे, की मूळ धर्मग्रंथातच अनेक आदेश असे आहेत, की जे स्पष्टपणे प्रादेशिक राष्ट्रवादाच्या व शांततामय सहअस्तित्वाच्या आड येतात.

हे जर खरे असेल- आणि खरे आहे असे मला वाटते- तर मुसलमान समाज राष्ट्रप्रेमी होण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना मुस्लिम मानसात रुजणे अवश्य आहे आणि असे व्हायचे तर हिंदूंनाही धर्माचा परिसर खासगी जीवनापुरता मर्यादित करावा लागेल. म्हणजेच, त्यांनाही धर्मनिरपेक्षता आत्मसात करावी लागेल. अशा रीतीने मुस्लिम (आणि इतर अल्पसंख्य) समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणणे हे जे हिंदुत्ववाद्यांचे उद्दिष्ट आहे ते साध्य व्हायचे तर हिंदुत्ववाद्यांनी सक्त धर्मनिरपेक्षतेचा अवलंब केला पाहिजे.

(‘सावरकर ते भाजप – हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख’ या राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी लिहिलेल्या स्वतंत्र प्रस्तावनेचा संक्षिप्त भाग)

प्रताप थोरात, सौजन्य – लोकसत्ता

विन्स्टन चर्चिलसारख्या थोर मुत्सद्याचं भाकीत होतं : आम्ही जर भारत सोडून गेलो तर हा देश वेगाने अनेक शतकं मागे, मध्ययुगीन रानटीपणाच्या खोल गर्तेत फेकला जाईल आणि जगण्यासाठी साध्यासुध्या गोष्टी न मिळाल्यामुळे त्याचं जिणं हराम होऊन जाईल. इथं आपण वसाहतवाद्यांची स्वार्थानं बरबटलेली, अपुरी वाढ झालेली, रोगट मनं समजून घेतली पाहिजेत. नेमक्या याच मानसिकतेमुळे, पाश्चिमात्य विद्वान आणि नोबेल शांतता पारितोषिकाची निवड करणारी मंडळी महात्मा गांधींचं जागतिक शांतता आणि अहिंसक संघर्षांच्या मानवी इतिहासामधलं उच्च स्थान ओळखू शकली नाहीत आणि नोबेल पारितोषिकाचा दर्जा आणखी उच्च करण्याची त्यांना चालून आलेली संधी त्यांनी हुकवली. गांधी दर शतकात  निर्माण होत नाहीत. त्यांच्या लेखी गांधी होता एका विक्षिप्त भूभागावरून आलेला एक फक्त अर्धनग्न फकीर! यानंतर आपण बरीच मजल गाठली. भारत समजताना सत्याशी फारकत होऊ द्यायची नसेल तर डोळ्याला लावलेल्या दुर्बिणी आणि मुख्य म्हणजे काविळीचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल, याची जाण पश्चिमेला आली. भारताला वैभवसंपन्न भूतकाळ आहे, हे त्यांना झापडबंदपणामुळे कळत नव्हतं; आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याची आता उपरती होत चालली आहे.

पंधरवडय़ापूर्वी आपण आपला ६२ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण आपला म्हणजे नेमका कुणाकुणाचा? हा प्रश्न मला दरवर्षी पडत असतो, तसाच तो यावर्षीही पडला. कितीही टाळला तरी!  या काळात किती जणांच्या बेडय़ा गळून पडल्या? नव्यानं किती जणांना लागल्या? वाटतं, इंग्रज ही वसाहत सोडून गेले त्या दिवसाचा फक्त हा वर्धापनदिन असावा. लुटणारे आपले हात थकून गेल्यानंतर गोऱ्या व्यापाऱ्यांनी त्या वेळी हिंदुस्थान नावाचं हे लुटीचं बोचकं दाणकन तर पायापाशी आदळलं नव्हतं ना? अन् नंतर कातडीचा रंग बदलून, वसाहतवादी नव्याने तर गोळा झालेले नाहीत ना, त्या फुटलेल्या बोचक्यापाशी? सारख्या शंका येत राहतात.

पण कदाचित तसंही नसावं. नाही तर हा देश, येत्या फक्त पाव शतकात एक जागतिक महासत्ता म्हणून शड्डू ठोकून उभा राहील, इतक्या तयारीचा आज दिसला नसता. तळपट होईल, म्हणून भल्याभल्यांनी बोटं कडाकडा मोडली होती तेव्हा. तरीही आज आपण जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून उभे आहोत. जरी आपल्या निम्म्या लोकांच्या पोटातला आगडोंब पुरेसा विझलेला नसला तरीही! महात्मा गांधी जिवंत असते, तर अंगावर चिंध्या पांघरणाऱ्या अर्धनग्नांची मोठी संख्या पाहून, त्यांच्या अंतरात्म्यानं त्यांना अजून सदरा घालण्याची परवानगी दिली नसती. आपली बहुविधता तर एवढी की, शोभादर्शक यंत्रालाही इतक्या विविध प्रकारच्या रचना करून दाखवता येणार नाहीत. पण वैविध्याच्या हातात हात घालून इथं आलेले विरोधाभासही विनोदी ठरले नाहीत अन् विविधतेतून बांधलेलं ऐक्यही कचकडय़ाइतकं तकलादू ठरलं नाही.

जागतिक महासत्तांना एक जुनी खोड आहे- आपल्या सैतानांचे कारखाने आणि त्यांच्या काळ्या कारवाया तीनही पाळ्यात चालवायची. छोटय़ा आणि दुबळ्या देशांचं सार्वभौमत्व हरण करण्याचा त्यांचा खेळ उसंत न घेता चालू असतो. पण भुकेल्या, तहानलेल्या, कंगाल, अर्धनग्न, आजारी, अर्धशिक्षित, वरकरणी दीनवाणा वाटणाऱ्या भारत नावाच्या पुराणपुरुषानं त्यांना धूप घातली नाही. गेल्या ६२ वर्षांत, दरवर्षी त्याच्या चेहऱ्यावर नवनवी झळाळी चढत गेली. म्हणावं तर हा तिसऱ्या जगातला य:कश्चित देश आहे, पण तरीही तो अद्याप उन्मळून कसा पडत नाही? या विचारानं सैतानांची निराशा वाढतच गेली.

साम्यवाद गाडला गेला- आधी सोव्हिएत साम्राज्याच्या डोलाऱ्याखाली आणि नंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था सर्वाधिक क्रूर आणि विधिनिषेधशून्य पद्धतीने, साम्यवादी राजकीय व्यवस्थेखालीच राबवणाऱ्या चीनच्या तत्त्वशून्यतेखाली! जागतिक अर्थव्यवस्थेला मस्तवाल बैलाच्या मुसंडय़ा मारत राहणाऱ्या अमेरिकेतल्या घरबांधणी कर्ज घोटाळ्यामुळे; आणि केवळ डॉलर मजबूत ठेवण्यासाठीच, लाखो निष्पाप जिवांना मारून, जगभर लोकशाही विकण्याची कंत्राटं घेत फिरणाऱ्या भांडवलशाहीमुळे. तिचे जन्मजात दोष आणि तुटपुंजेपणा बीभत्स स्वरूपात उघडे पडले. पण भारताने जन्म घेताक्षणीच मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. यापेक्षा आणखी किती मोठी आदरांजली आधुनिक भारताचे निर्माते पं. जवाहरलाल नेहरू यांना, उलगडत जाणारा जागतिक इतिहास वाहू शकतो? व्यवहारवादाच्याही वर असलेला हा द्रष्टा व्यवहारवाद आहे. तुम्ही आम्ही नेहरूंना आदरांजली वाहावी किंवा न वाहावी, आपापल्या खुजेपणाचं प्रदर्शन करावं की न करावं, हा ज्याचा त्याच्या सभ्य कृतज्ञतेचा प्रश्न आहे. नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांची तुलना करण्याचा आव आणताना  एकाला मुद्दाम स्वप्नाळू म्हणायचं आणि दुसऱ्याला व्यवहारवादी! त्यामुळे अनाथ बालकांना स्वातंत्र्यलढय़ात पटेलांसारखे नसलेले आईबाप शोधण्याची सोय उपलब्ध होते, इतकेच! खरं तर अनाथाला का फरक पडावा भूतकाळ नसला म्हणून? उज्ज्वल करण्यासाठी भविष्यकाळ तर उपलब्ध असतो ना?

मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है, तुम्हारे पास क्या है, एँ?- हिंदी चित्रपटातला एक भाऊ विचारतो. दुसरा भाऊ शांतपणे म्हणतो- मेरे पास माँ है. हा डायलॉग भारतापेक्षा पकिस्तानात जास्त म्हटला जातो, पण फक्त नेहरूंच्या संदर्भात! भारताजवळ नेहरू होते ना! ही पाकिस्तानातली आणि इथल्या पाकिस्तानवाद्यांतली समान  चरफड! शेवटी मूलतत्त्ववादी ही एकच जात असते आणि ते असतात- जत्रेत बचपन में खोये हुए भाई!

फाळणीत मायभूमी हरवलेल्या अडवाणींबद्दल आपल्याला सहवेदना असते. जसवंतसिंह काही वर्षांपूर्वी बलुचिस्तानातल्या आपल्या मूळ कुलदैवताच्या पूजेसाठी गेलेले अन् त्यांच्या स्वागतासाठी बलुची, ब्रोही जमातीचे लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले आपण टीव्हीवर पाहिले होते. पण या दोघांचीही कुलदैवते इस्लामाबादेतल्या कबरींमध्येच पहुडलेली असतील तर मात्र कठीण आहे. अन् नेहरूंचं सवरेत्कृष्ट स्मारक असलेल्या आयआयटीतून शिकून बाहेर पडलेल्या त्यांच्या सल्लागारांनी नेहरूंना खलनायक ठरवण्याचं पेटंट मिळवावं यासारखा द्रोह नाही. आठवणींना आणखीही उजाळा देता येईल. काही वर्षांपूर्वी अडवाणींनी  पाकिस्तानात जाऊन प्रयत्न केले होते की, १८५७ सालच्या स्वातंत्र्यलढय़ाचा १५० वा वर्धापनदिन,  जो २००६-०७ साली येत होता, भारत आणि पाकिस्तानने एकत्रित साजरा करावा. इतिहासात अधिक खोल डुबकी मारण्यामागचा डाव उघड होता- राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे इत्यादी स्वातंत्र्ययोद्धय़ांवर संघ-भाजपने आपले पितृत्व लादणे, त्यांना फोटोत विवेकानंदांशेजारी, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून, हतबल उभे करणे आणि त्यांचा राष्ट्रीय नव्हे तर खासगी मालमत्ता म्हणून पुढे वापर करीत राहाणे. काँग्रेसने गांधींचे जे केले तेच! मंत्रालयातून लायसन्स घेऊन गेल्यानंतर दारूच्या गुत्त्यात महात्मा गांधींचा फोटो लावणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. भाजपला देशद्रोही म्हणणे दुष्टपणाचे होईल. पण १९४७ सालचे त्यांना इतके वावडे का? हे लहान मुलासारखे झाले- तुमचा कोंबडा आरवून सूर्य उगवलाय ना, मग आम्हाला नको तुमचा सूर्य. आम्ही बसू अंधारात! नाही आवडत ना तुम्हाला १५ ऑगस्ट? ना आवडू देत, पण निदान १४ ऑगस्ट तरी आवडू देऊ नका! काय करायचं? देशातले जे नाही-रे आहेत, त्यांना आपली वसाहतवादी, लुटारू यंत्रणा राष्ट्रीय प्रवाहात येऊ देत नाही; आणि त्यांच्या बेडय़ाही ते काढायला तयार नाहीत. अन् दुसरीकडे आहेत हे अति-आहे-रे वर्गातले, ज्यांना स्वातंत्र्यसूर्याचं ४७ सालातलं उगवणं मंजूर नाही.

अभिमानानं सांगाव्यात अशा आज आमच्याकडं बऱ्याच गोष्टी आहेत. शास्त्रज्ञांची आणि तंत्रज्ञांची जगातली सर्वात मोठी पलटण भारताची आहे. सॉफ्टवेअरची जणू महासत्ताच भारत आहे. पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांच्या भरभराटीमध्ये भारतामध्येच प्रशिक्षित झालेल्या मनुष्यबळाचा वाटा बऱ्यापैकी मोठा आहे. जगात कितीही मोठी मंदी असली तरीही, भारतातल्या आयआयटी आणि आयआयएममधून बाहेर पडलेल्या तंत्रज्ञ आणि मॅनेजर्सनी आपल्याकडेच नोकरीला राहावं, म्हणून युरोप-अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये खेचाखेच चालू असते. आपल्या आर्थिक वाढीचा वार्षिक दर जगात दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि तो जगभर कौतुकाचा किंवा असूयेचा विषय आहे. जगातलं सर्वात मोठं पशुधन आपल्याकडे आहे आणि जगातलं सर्वाधिक दूध-उत्पादन आपण करतो. कधी कधी जगातली सर्वाधिक साखरदेखील! अन्नधान्याच्या बाबतीत आपण बहुतेक सर्व वर्षी स्वयंपूर्ण असतो. भारत भले आता स्वतंत्र जरी होत असला, तरी भुकेच्या कडकलक्ष्मीच्या चाबकाच्या फटकाऱ्याखाली काळानिळा होऊन, तो सतत कण्हत पडून राहील, असं भाकीत त्यावेळी पाश्चिमात्य शेती व अर्थतज्ज्ञांनी वर्तवलं होतं.

विन्स्टन चर्चिलसारख्या थोर मुत्सद्याचं भाकीत होतं : आम्ही जर भारत सोडून गेलो तर हा देश वेगाने अनेक शतकं मागे, मध्ययुगीन रानटीपणाच्या खोल गर्तेत फेकला जाईल आणि जगण्यासाठी साध्यासुध्या गोष्टी न मिळाल्यामुळे त्याचं जिणं हराम होऊन जाईल. इथं आपण वसाहतवाद्यांची स्वार्थानं बरबटलेली, अपुरी वाढ झालेली, रोगट मनं समजून घेतली पाहिजेत. नेमक्या याच मानसिकतेमुळे, पाश्चिमात्य विद्वान आणि नोबेल शांतता पारितोषिकाची निवड करणारी मंडळी महात्मा गांधींचं जागतिक शांतता आणि अहिंसक संघर्षांच्या मानवी इतिहासामधलं उच्च स्थान ओळखू शकली नाहीत आणि नोबेल पारितोषिकाचा दर्जा आणखी उच्च करण्याची त्यांना चालून आलेली संधी त्यांनी हुकवली. गांधी दर शतकात  निर्माण होत नाहीत. त्यांच्या लेखी गांधी होता एका विक्षिप्त भूभागावरून आलेला एक फक्त अर्धनग्न फकीर! यानंतर आपण बरीच मजल गाठली. भारत समजताना सत्याशी फारकत होऊ द्यायची नसेल तर डोळ्याला लावलेल्या दुर्बिणी आणि मुख्य म्हणजे काविळीचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल, याची जाण पश्चिमेला आली. भारताला वैभवसंपन्न भूतकाळ आहे, हे त्यांना झापडबंदपणामुळे कळत नव्हतं; आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याची आता उपरती होत चालली आहे.

आपल्या खटोखटच्या कर्तबगारीने आपली छाती फुगून येणं साहजिकच आहे. पण काही विदारक सत्यांकडे सहज नुसती नजर जरी गेली तरी फुग्यातली हवा फसकन् जाईल. लोकशाही कारभार करण्यासाठी म्हणून ज्या संस्था आपण उभारल्या आहेत त्या सर्वाचा आणि त्या चालवण्याचं नाटक करणाऱ्या बहुतांश मंडळींच्या दर्जा आणि वकुबापुढे फार मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. परमेश्वरापेक्षाही सर्वव्यापी असलेला भ्रष्टाचार; आर्थिक संस्थांचे डुगडुगणारे डोलारे; कमालीच्या तोकडय़ा पायाभूत सुविधा; वेगानं खालावत गेलेलं पर्यावरण; विविध जाती-जमातींना एकत्र बांधून ठेवणारे पण ठिकठिकाणी विदीर्ण होत गेलेले रेशमी बंध, भयावहरीत्या वाढत गेलेल्या सामाजिक आणि आर्थिक दऱ्या; मिळेल त्या कारणापोटी होणारी गुणवत्तेची गळचेपी; दीनदुबळ्या, हवालदिल लोकसंख्येचा अक्राळविक्राळ आकार आणि त्यापेक्षाही भयावह आणि ठसठसणारी वेदना देणारी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वाच्या संवेदनशीलतेची झालेली फार मोठी पडझड!

फक्त एखाद्या वर्षीच पाऊस नीट झाला नाही तर, जिथवर नजर जाईल तिथवर दुष्काळ दिसू लागतो. देश विकलांग झाल्यासारखा भासतो. गुरांचे लोंढे खाटिकखान्याकडे ढकलले जातात अन् शेतकरी गळफासाकडे किंवा एन्ड्रीनच्या बाटलीकडे! पण याचवेळी पाटबंधारे खात्यातल्या कार्यकारी अभियंत्याच्या नुसत्या बदलीचा भाव पन्नास लाख रुपये असतो. धरणं, रस्ते, पूल, वीजप्रकल्प किंवा अन्य कुठलंही सार्वजनिक बांधकाम दहा टक्के किक-बॅकशिवाय पूर्णच होत नाही. सरकार मध्येच बदललं तर किक-बॅक पुनरुज्जीवित होतो. जाणाऱ्या सरकारबरोबर तो पूर्ण मरत नाही. दुष्काळ हटविण्यासाठी अद्यापि भूगर्भातूनच गावं स्वयंपूर्ण झाली नाहीत आणि जमिनीवर पाणी साठवण्यासाठी लहान-मोठी धरणंही पुरेशी झाली नाहीत. हुकलेला एक मान्सून एवढा हाहा:कार माजवू शकतो याचं विकसित देशांना राहून राहून आश्चर्य वाटत राहातं! दुष्काळापासून स्वातंत्र्य  ही आपल्या देशात अजून कविकल्पनाच आहे.
क्षणभर विचार करा, एक समाज म्हणून आपण एक झालोय का. स्वतंत्र, बंधमुक्त? एकदा दुष्काळात होरपळलेल्या आणि सामाजिक अत्याचारात तिच्या शाळकरी मुलीचे लचके तोडले गेलेल्या नेस्तनाबूत झालेल्या बाईला मी विचारलं होतं- बाई, सरकारनं उद्या तुमच्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बाई म्हणाल्या- अरे बाबा, येका सरकारनं कुनाकुनाचं कुठवर पाहावं? सरकार पन मानूसच है ना? या सर्वानी आभाळाला टेकू लावले आहेत. म्हणून ते कोसळत नाही.

गेल्या ६२ वर्षांत आपली मनं बऱ्यापैकी बधिर झालेली  आहेतच, पण आपले कानही बधिर  झालेले आहेत हे आपल्या लक्षातच येत नाही. कारण आपण सोयीस्कर तेवढंच ऐकतो. शिवाय आपल्या कानात सेलफोनच्या नाही तर म्युझिक सिस्टिमच्या वायरी घुसलेल्या असतात. आपण भावूक गर्दी आहोत. त्यामुळे घाईघाईत लोकशाही- मंदिराच्या कळसाचं बाहेरूनच तेवढं दर्शन घेतो आणि पुढं चालू लागतो. हे मंदिर तोलून धरणारे आपल्या लोकशाहीचे स्तंभ काय पुटपुटत असतात, ते आपण ऐकत बसत नाही. कार्यबाहुल्यामुळे सवडही नसते. आपण हे लक्षात घेत नाही की, स्वत:शी पुटपुटणारी सर्वच मंडळी काही डोक्यावर परिणाम झालेली नसतात. बऱ्याचदा ती अतिश्रमानं थकलेली असतात. तीही शोध घेत असतात ऐकणाऱ्या कानांचा!

लोकशाही  तोलणाऱ्या या खांबांच्याही तक्रारी आहेत आणि आत्मसंतुष्टताही आहे. सगळ्यांच्या काही समान तक्रारी असतात. सीमेंट आणि लोखंड कमी पडलं, हे पालुपद असतंच. आपल्याला  दिसतात ते निघालेले पापुद्रे. पडलेल्या ढपल्या. उघडय़ा पडलेल्या तांबूस-पिवळ्या, लोखंडाच्या वाकलेल्या सळ्यांचं भंगार! झाकण्यासाठी रंग तरी किती वेळा लावायचा? पण कुणीही सांगायला तयार नाही की, वापरलेला माल कमअस्सल होता. मात्र हे खरंय, की त्यांनी अजून पडू दिलेलं नाही, तोलून धरलेलं वरचं मंदिर!

आपल्या लोकशाहीचे चारही खांब काय पुटपुटताहेत ते जरा पाहू यात..

मी न्यायमूर्ती आहे. आपली झोपेची मुळीच तक्रार नाही. न्यायदानातला विलंब म्हणजे न्याय नाकारणं, ही जी शिंची म्हण आहे, तीमुळे आपल्या झोपेचं बुवा कधीही खोबरं होत नाही. न्यायसंस्थेची गेल्या ६२ वर्षांतली वाढ ही लोकशाहीचा सर्वात अकार्यक्षम, दुबळा आणि टेकू द्यायचा कमी (असून नसल्यासारखा) खांब अशी झाली आहे, असं मला चुकून कधी, अगदी गाफील अवस्थेतही वाटत नाही. मी देवळाच्या सुरक्षित गाभाऱ्यात राहणारा परमेश्वर आहे. माझा आशीर्वाद रांगेत प्रतीक्षा करणाऱ्या माझ्या भक्तगणांपर्यंत त्यांच्या  जिवंतपणी पोहोचलाच, तर त्यांनी स्वत:ला पुण्यवान समजावं. भक्ताला अधिक संकटात टाकून त्याची परीक्षा पाहणं  हे देवाचं कामच आहे! परमेश्वराची श्रीशिल्लक किती आहे याची नसती उठाठेव भिक्कारडय़ा भक्तांनी कशाला करावी? त्यांचा संबंध काय, माझा प्रतिवार्षिक गल्ला कितीनं वाढला ते जाणून घेण्याशी? देवावर तुमची अंधश्रद्धा नको का? भक्ताचं काम काय? फळांचा, दुधाचा नैवेद्य भक्तिभावाने आणून पुजाऱ्याकडे देणं आणि डोळे मिटून अंमळशानं अनशेपोटी नामस्मरण करणं. फार वेळ तिथं थांबू नये. त्यानंतर श्रींच्या वामकुक्षीसाठी गाभारा बंद होईल. अहो, देव कुठं फळं खातो का? तो भक्तीचा भुकेला! माझी लीला अगाध आहे. येथे उभं राहून गैरलागू अर्थ काढू नयेत. सक्त कारवाई करण्यात येईल. – आदेशावरून.

मी आहे राजकीय पुढारी. मी- एकदम कॅपिटल! म्हणजे पहिल्या लिपितला. माझा, माझी, माझे, माझ्यासाठी, मला सर्व कॅपिटल! मी १८ तास काम करतो. पण नोकरी टिकेल याची शाश्वती नाही. मग चार पैसे केले मी गोळा, अन् ठेवले परदेशी अकाऊंटमध्ये! बिघडलं कुठं? चांगली पायाभरणी करण्यापूर्वीच, वेळ येण्याआधीच, दारिद्रय़ाच्या दलदलीत थोरामोठय़ांनी हा जो लोकशाहीचा सांगाडा उभा करून ठेवलाय ना, तो का डुगडुगत नाही किंवा कोसळून पडत नाही, माहीत आहे का? हे भरभक्कम पाय या राडय़ारोडय़ात रोवून उभा आहे ना मी, अन् पेलतोय तो माझ्या रुंद भरीव खांद्यांवर, पिळदार दंडांचा जोर लावून! सुटलेल्या पोटाकडं टक लावून बघू नका. रोज उठून शिव्या खायला मी एकटा! अक्कल शिकवायला बाकीचे सगळे. गाव  चालवणाऱ्या पाटलाला कधी कुणी चांगलं म्हटलंय का? मी म्हणतो, रोज डोंगराएवढा पैसा खायची या अधिकाऱ्यांना गरजच काय? यांची फक्त घेना बँक आहे, देना नाहीच! यांना काय निवडणुका लढवाव्या लागतात का? आल्या गेलेल्यांना चहा सोडाच, आयुष्यात कधी ग्लासभर पाणी तरी विचारलंय का यांनी? मंत्रालयाला जर संध्याकाळी पाचनंतर आग लागली तर समोरच्या स्वत:च्या राहत्या घरातून पेलाभर पाणी आणून कधी विझवतील का? स्वत:च्या घरी कधी चालत गेलेत का? लोकल बंद पडते म्हणजे काय होतं, आहे का ठाऊक? यांचं दळणसुद्धा शिपाई सरकारी गाडीतून आणतो. यांची मुलं अमेरिकेत खुशालीत आहेत. ते अमेरिकेत भारतीय संस्कृती कशी जिवंत ठेवतात हा गुणगौरव ऐकत चला जरा न चुकता. भारतात काय संस्कृती राहिलीय आता? श्शी! हे असलं बघितल्यावर मला बुवा भारताची फारच काळजी वाटते. सततची टोचणी- आपलं कसं होणार? म्हणून मी माझे राजपुत्र आणि राजकन्या सगळ्यांना राजकारणात आणून सोडलेलं आहे. उगीच पोकळी नको निर्माण व्हायला. वेळवखत काय सांगून येतो का? घराण्यात पुढं सेवेचं बाळकडू शिल्लक राहिलं पाहिजे. ते नसतील तर उद्या अंधार होईल. केलाय कुणी विचार? हे काय फुकटचं केकाटताय- घराणेशाही, घराणेशाही! अरे, आणा की तुम्ही पर्याय. कुणी धरलेत तुमचे हात? आमच्या मुलामुलींना, पुतण्या-भाचरांना, सुना-जावयांना लोकांनी निवडून दिलंय. कुणी सांगावं, एक दिवशी येईल पण घराणेशाहीशिवाय लोकशाही. आपला देशच महान आहे. कुठल्या बेटय़ाची ना आहे त्याला?

मी सनदी नोकर आहे. साहेब आहे. ज्याला सरकार सरकार म्हणतात तो मीच! मी विनम्र आहे. कायम नव्वद अंशात वाकलेला असतो. आणखी काय करावं मी या लोकशाहीसाठी? तरी तुम्ही म्हणता- अति नमणे, अति लवणे, ही धोकेबाज हलकटाची लक्षणं! बोलणाऱ्याचं काय? त्याची फाईल नसते म्हणून अवडताही येत नाही. राज्यकारभार कसा करावा, ही कला तर आहेच, पण ते एक पूर्ण विकसित झालेलं शास्त्र आहे. आम्हीच केवळ तो शास्त्रार्थ जाणतो. आमचं तसं प्रशिक्षणच झालेलं असतं. पण नेत्यांना वाटतं, त्यांच्याकडं ती कला आहे. स्त्रीलिंगी असलेली प्रत्येक गोष्ट आपलीच, असं त्यांना वाटतं. बाकी काय? निरक्षर माठ सगळे! आम्ही आपलं ऐकून घेतो, कारण इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आम्हाला पहिला धडा शिकवतात- तुमचा बॉस जरी गाढव असला, खादाड डुक्कर असला, मारका बैल असला, तरी त्याला वाकून सतत यस सर म्हणायचं. कारण ही लोकशाही आहे आणि ती फार पवित्र आहे. नंतर त्याची कशी वजवायची ते अधिकृतपणे शिकवत नाहीत. ती कला आपापली आपण नंतर विकसित करायची असते. आम्ही घोडं असतो. हे  टिक्कोजी फक्त स्वार असतात. आम्ही नेऊ तिकडंच जाऊ शकतात. स्वारानं पहिल्यांदा मांड ठोकली की लगेच घोडय़ाला कळतं, गडी पक्का आहे का कच्चा! किती सवाऱ्या आल्या अन् गेल्यात! गेल्यात नाही घालवल्यात! पण काय करायचं? आमच्या बढत्या आणि बदल्या या मूर्खाच्या हातात ना! तोंडदेखलं हसून वागावं लागतं. किती कष्ट पडतात या एरंडेल प्यायलेल्या चेहऱ्याला! आमच्या हाऊसिंग सोसायटीसाठी मोक्याचा प्लॉट द्यायला लागले की, समजून घ्यायचं की समुद्र कुठं तरी बुजवायचाय. आमच्या बायकांच्या महिला मंडळाच्या महान कार्यासाठी, आमच्या क्लबसाठी आम्हालासुद्धा काही तरी मागावंच लागतं मग. आमच्यावर पण घरच्यांचं प्रेशर असतं ना! या नेते लोकांना काही कळत नाही. गुन्हा करावा तो नेहमी कायदा पाळून. अन् कायदा करावा नेहमी अस्पष्टसा, अनेक लूपहोल्स ठेवून. इतरांसाठी तो नेहमी ताठ, कडक पाहिजे.

मी पत्रकार आहे. माझं आयुष्य म्हणजे आहे अहंकाराची एक कधीही न संपणारी यात्रा! माजोरीपणा हे त्यागाचं जुळं भावंड! मिळालेलं सोडणं हा त्याग नव्हे, न मिळणं म्हणजे माझ्या लेखी त्याग! आमच्या अहंकाराचा आकार हा विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता यापेक्षा खूपच अधिक असतो. मलाही ते जाणवतं. पण इथं वेळ कुणाला आहे ग्रंथांच्या संगतीत जगायला? कुटुंबाला देण्यासाठी तरी कुठं वेळ असतो? तेही बरंच आहे म्हणा. कुटुंबाला वेळ द्यायचा तर खिसा काही तरी भरलेला पाहिजे ना. दारिद्रय़, मग ते बौद्धिक असो किंवा आर्थिक, जेवढं माझं दारिद्रय़ जास्त तेवढा माझ्या अहंकाराचा दर्प अधिक! सरस्वतीला आणि लक्ष्मीला माझ्याकडे बघून हसायला वेळ नसला, तरी मी कशाला करू त्याची चिंता? माझा अडाणी, बावळटपणा हा करमणुकीचा विषय असतो, पण मी कशाला करू त्याची पर्वा? वाचकांनी पेपर उघडला की, त्यांना लगेच माझा वकूब कळतो. बंद दरवाज्याआड ढळणाऱ्या उत्तररात्री जे खरं राजकारण शिजतं, त्याची मला गंधवर्ताही नसते. मी त्या वेळी धापा टाकत पकडत असतो शेवटची लोकल गाडी. आमच्या पेपरचे शेटजीच मला नंतर कधी त्या राजकारणाच्या एखाद्या तुकडय़ाचा संदर्भ देतात. लाज वाटते. आता तर अनेक राजकीय पुढारीच पेपरचे शेटजी असतात. काळ्या रात्रीच्या व्यवहारी राजकारणाला मी फक्त, गुळगुळीत झालेल्या जुन्या पुस्तकी तत्त्वज्ञानाचा मुलामा देत असतो आणि त्याचं उदात्तीकरण करत असतो. कधी पूर्ण अज्ञानापोटी, तर कधी ते शोभून दिसावं म्हणून- जेणेकरून लोकांना खऱ्या राजकारणाची किळस येऊ नये! शेटजी म्हणत असतात, पेपर जाहिरातींवर चालतो, बातम्या-संपादकीयांमुळे नाही!

फार काही बोलत असतात हे पुटपुटणारे खांब! पण त्यांचं ऐकायला कुणाला वेळ आहे, हे असं चालायचंच.

मंगला सामंत , सौजन्य – लोकसत्ता

केव्हाही स्त्री-पुरुष संबंध आणि केव्हाही मूल अशा नीतीनियमविरहित अवस्थेपासून ते विवाहबंधनापर्यंतचा मानवाचा प्रवास का आणि कसा झाला? या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे कोणते होते? विवाहानंतर पत्नीने पतीच्या घरी राहायला जायची पद्धत का व कशी सुरू झाली? विवाहाच्या उत्क्रांतीचा इतिहास उलगडून दाखविणारा लेख-

पुरुषाने क्रूर जंगली जीवनापासून परावृत्त व्हावे, कुटुंबव्यवस्थेत त्याला योग्य भूमिका मिळावी, तो स्थिर व्हावा, नातेसंबंधाशी तो भावनिकदृष्ट्या समरस व्हावा, त्याला अपत्यसुख मिळावे- असे प्रयत्न मातांनी सतत केले. आपल्या मातृकुटुंबात पुरुषाला सामावून घेण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर स्त्रियांनी पुरुषकुटुंबात, पतीगृहात आपला समावेश विवाहाद्वारे मान्य केला. त्याकरिता आपल्या नैसर्गिक मातृकुळाचा आधार आणि भावांचे संरक्षण डोळ्यादेखत कोसळू दिले..

विवाहाच्या उत्क्रांतीचा अभ्यास कशासाठी? तर विवाह ही शरीरसंबंधाची स्वीकारलेली एक पद्धत आहे. अशा शरीरसंबंधाच्या विविध पद्धती आपल्या पूर्वजांनीसुद्धा स्वीकारल्या, बदलल्या. त्यांनाही अडचणी आल्या, पेच निर्माण झाले. त्यातून त्यांनी मार्ग कसे काढले, त्याकरिता मानसिकता कशी बदलावी लागली, हे सर्व गेल्या ५० हजार वर्षांपासून जर आपण तपासलं तर आजही विवाहासमोर ज्या अडचणी आपल्याला वाटतात, त्या सोडविण्यासाठी आपल्या पूर्वजांच्या विचारपद्धतीचा काही उपयोग होऊ शकतो का, मार्ग सापडतो का, हे निश्चितच आपल्याला समजू शकेल.

विवाहाच्या उत्क्रांतीच्या इतिहासाला सुरुवात करताना, सर्वप्रथम माणसाच्या शरीरात त्याच्या पूर्वजांच्या तुलनेत कोणते बदल झाले, हे आपल्याला पाहावं लागेल, कारण तरच मानवाचे वर्तन, त्याच्या भाव-भावना, मानसिकता याचा अर्थ आपल्याला समजेल. पहिला शारीरिक बदल हा मानवी स्त्रीमध्ये झाला, तो म्हणजे तिचा ‘estrus period’ म्हणजेच तिचा ‘प्रजनन काल’ उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर नाहीसा झाला. म्हणजे स्त्री-पुरुषांचे केव्हाही संबंध आणि केव्हाही मूल अशी स्थिती निर्माण झाली. साहजिक मनुष्यसंख्येवरचं निसर्गाचं नियंत्रण गेलं आणि ती स्त्री-पुरुषांची जबाबदारी झाली. स्त्रीचा ‘estrus period’ जाणे ही शारीरिक घटनाच शरीरसंबंधाच्या नियमनाच्या पद्धतीची मानवाला गरज वाटण्याची जननी आहे.

त्यानंतर माणसातला दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे, त्याच्या मेंदूचा आश्चर्यकारक विकास! हा पूर्ण विकास गर्भातच झाला असता, तर डोक्याचा आकार इतका मोठा झाला असता की स्त्रीला जन्म देणं शक्य झालं नसतं. म्हणून अर्भकाच्या मेंदूचा गर्भाशयातला विकास हा सुमारे ३० टक्के असतो. बाकीचा विकास हा अर्भकाने जन्म घेतल्यानंतर पुढील १५ ते २० वर्षांत होत असतो. अर्थात मनुष्याची बाल्यावस्था प्रदीर्घ झाली. त्यामुळे बालसंगोपनाची स्त्री-मातेची वर्षे वाढत गेली. ही एक प्रकारे स्त्रीवरची आपत्ती होती. कारण एका बाजूला सततच्या बाळंतपणाचा धोका आणि त्यात बालसंगोपनाचा काळ वाढलेला. ही परिस्थिती अशीच राहिली असती, तर मनुष्यप्राणी जिवंत राहिला नसता. परंतु याची भरपाई म्हणून निसर्ग आणखी एक शरीरबदल स्त्रीमध्ये आणतो आणि तो म्हणजे ‘मेनापॉज’! हा मेनापॉज फक्त मानवी स्त्रीलाच आहे. तो चिपांझी-गोरिलाच्या प्राणीमातांना नाही.
‘मेनापॉज’मुळे स्त्री मातृत्वचक्रातून मुक्त होत असते. हीच स्त्री मग आपल्या मुलीच्या-मुलांच्या संगोपनात हातभार लावते. इथे Nature’s selection हा डार्विनचा मुद्दा दिसतो. वास्तविक पुरुष हा बालकाचा जैविक पिता असताना, त्याच्याच शरीरात पितृत्वादाखल बदल देऊन ‘पिता’ म्हणून त्याला स्त्रीच्या मदतीसाठी उभे करण्याचे काम निसर्ग करीत नाही, तर तो दोन मातांना तयार करतो. एक जन्म देणारी माता आणि दुसरी आजी-माता! अशा रीतीने आजी-पालकत्वाचा उदय आपल्याला फक्त मानवी जीवनातच दिसतो. अन्य प्राणीजीवनात आजी-पालकत्व आढळत नाही. याबाबतचं संशोधन अमेरिकेतील उटाह विद्यापीठ आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातील मानववंश शास्त्रज्ञ डॉ. क्रिस्टेन हॉक्स आणि डॉ. निकोलस जोन्स यांच्या टीमने सन १९९८-९९ मध्ये केलं. ते असे की, ‘स्त्रीला मुलं झाली की काही महिने ती अंगावर पीत असतात. मग आई त्यांना कंदमुळं देऊ लागते. पण आईला पुन्हा दिवस गेले की, त्या मुलांना ना अंगावरचं दूध मिळत ना कंदमुळं! अशा वेळी त्या मुलांची आजी, म्हणजे त्या स्त्रीची आई, त्यांच्या मदतीला येते व त्यांच्या खाण्याची जबाबदारी स्वत:कडे घेते. अशी आजी ज्या मुलाला  लाभते, ते मूल पुन्हा बाळसं धरतं व प्रगती करतं. याउलट आजी नसलेल्या मुलाचे हाल होतात.’

मुळातच स्त्रीला स्थैर्याची गरज पुरुषाच्या तुलनेत जास्त असते. तशी ती प्रत्येक प्राणीमातेलाच तिच्या बाळंतपणासाठी, एके ठिकाणी स्थैर्य गरजेचं असतं. मेंदूच्या विकासातून अग्नीचे उपयोग कळल्यावर, स्त्री ही अग्नी घेऊन गुहेत पहिली स्थिर झाली. स्त्री-समाज पुरुषाआधी स्थिर झाला, असे संशोधक मांडतात, कारण पुरुषाला स्थैर्याची गरज नव्हती.

स्थिर झालेली स्त्री, आपल्या अपत्य संगोपनात अनेक वर्षे घालवू लागल्यावर स्त्रीमध्ये ममत्व आणि वात्सल्य या भावना बहरू लागल्या. त्याचबरोबर जंगली अवस्थेतील तिची क्रूरता आणि हिंसकता यांचा झपाटय़ाने ऱ्हास होऊ लागला. मातेच्या दीर्घकाळ सान्निध्यामध्ये अपत्ये राहिल्यामुळे, त्यांच्यामध्ये जिव्हाळा निर्माण होऊ लागला. मात्र, आजच्या भाऊ-भाऊ, बहीण-भाऊ वगैरे भावना तेव्हा नव्हत्या. फक्त स्त्री-पुरुषांच्या जोडय़ांना जन्माला घालणारी एक माता आणि एकाच मातृत्वाने बांधलेल्या या जोडय़ा, म्हणून त्यांच्यामध्ये एक सौहार्द होते. हीच भावंडे मोठी होऊन आजच्या भाषेतल्या मामा-मावश्या व्यक्तिमत्त्वाचा मातृटोळीत समावेश होत होता. अशा रीतीने आई-अपत्ये, मामा-मावश्या, आजी असे मिळून मातृटोळ्या जमिनीवर स्थिर होऊ लागल्या.
स्त्री-समाजाच्या स्थिरतेमुळेच शरीरसंबंधाचा प्रश्न ऐरणीवर आला. कारण आधीच्या अस्थिर आणि झाडावर राहून संरक्षण करण्याच्या कालखंडात स्त्रिया पुरुषांना सहज उपलब्ध होत नव्हत्या. त्यामुळे शरीरसंबंधाचे नियमन आपोआपच होत होते. परंतु स्थिर झाल्यावर जंगली पुरुष टोळ्यांना स्त्रिया एका जागी उपलब्ध होऊ लागल्या.

पुरुषांचे ४० हजार वर्षांपूर्वीचे जीवन कसे होते? मेंदूच्या विकासामुळे पुरुष हा कळप-अवस्थेतून टोळी-अवस्थेत आलेला होता. पुरुषांमध्ये एरव्ही पितृत्वादाखल कोणताही शारीरिक बदल आणि भावनिक जाणीव निसर्गाने निर्माण केलेली नव्हती. अपत्य जन्मामध्ये आपलाही भाग असतो, याची पुरुषाला जाणीव नसल्यामुळे, मातृकुळात त्याला बांधून ठेवणारे कोणतेही पाश नव्हते. आक्रमक, हिंसक अशा जंगली पुरुषांच्या टोळ्या तेव्हा होत्या. जंगली पुरुषांचे स्थिर मातृटोळ्यांवरचे हल्ले आणि अर्भके पळविणे, हा मातांचा अत्यंत चिंतेचा विषय होता. अशा वेळेस मातृकुळांची व अपत्यांची सुरक्षितता हा प्राधान्याचा विषय मानून, कुळाबाहेरील जंगली पुरुषांशी शरीरसंबंध टाळण्यातूनच त्या पुरुषांना दूर ठेवत असत. कुळातील पुरुषांशी म्हणजे भाऊ, मामा, भाचे यांच्याबरोबर स्त्रियांनी शरीरसंबंध ठेवणं हे त्यांना कमी धोक्याचे वाटू लागले.

आज जरी आपल्याला सख्खे भाऊ, मावसभावंडे, मामा वगैरे नात्यातले संबंध धक्कादायक वाटत असले तरी या अतिप्राचीन काळात नात्याने एकमेकांना कोणी ओळखत नसल्यामुळे, नात्यात शरीरसंबंध करू नयेत, ही संकल्पनाच अस्तित्वात नव्हती. जंगली पुरुषाशी कोणत्याच स्त्रीने संबंध करू नयेत, अशी बंदी घालण्यासाठी कुळातल्याच पुरुषाशी संबंध करावेत, अशी सक्ती निर्माण करणे गरजेचे होते. त्याकरिता मातांनी ‘टॉटेम-विश्वासाचा’ उपयोग करून घेतला. कोणा पशु-पक्ष्यामुळे टोळी जन्माला आली असे मानून त्या प्राण्याचे नाव टोळ्यांना दिलेले आढळते. भारतीय संस्कृतीत अशा मूषक, मातंग, नाग, वृषभ टोळ्यांची नावे आहेत. या टॉटेमिझम्मुळे एकच कुलचिन्ह (टॉटेम) असणाऱ्या कुळातील स्त्री-पुरुष यांचे शरीरसंबंध सक्तीचे करणे सोपे गेले.

Endogamy ही अशा रीतीने शरीरसंबंधाची पद्धत म्हणून पुढील काही हजार वर्षे स्थिर झाली. या कालखंडात भावाला काही अधिकार देण्यात आले. त्यापैकी बहिणीची मालमत्ता व तिचा आईकडून येणारा वारसाहक्क सांभाळणे आणि तिच्या मुलांच्या संगोपनात हातभार लावणे, असे दोन अधिकार होते. बहिणीची अपत्ये मात्र कुळातल्या अनेक पुरुषांपासून जन्मलेली असायची. Endogamy च्या पुढील ५ ते १० हजार वर्षांत अनेक शोध लागले. त्यामुळे मातृकुळातून अनेक व्यवसाय, उद्योग उदयाला आले. हळूहळू भाऊ, मामा, भाचे या उद्योगात लक्ष घालू लागले तसेच त्यांचे जंगलातले निर्थक भटकणे संपले आणि ते अर्थपूर्ण झाले. ही मातांच्या दृष्टीने अत्यंत समाधानाची बाब होती. लक्ष घालू लागल्यावर त्यांचं कुळातले वास्तव्य वाढलं. त्यामुळे कुळातील शरीरसंबंधाचं प्रमाण वाढून कुळाची मनुष्यसंख्या हाताबाहेर जाऊ लागली, ही मातांना चिंता होती. त्यापेक्षाही मोठी चिंता अशी होती की, वाढलेल्या शरीरसंबंधामुळे भाऊ, मामा, भाचे यांचे स्त्रियांवरून संघर्ष होऊन हिंसा होऊ लागली.

मात्र याच कालखंडात एक चांगले सामाजिक परिवर्तन येत होते. पुरुष जो कच्चा माल जंगलातून आणत होते, तो अन्य मातृकुळांनाही ते पुरवीत होते, ज्याची कुलचिन्हे भिन्न होती, त्या कुळातील स्त्रियांशी परिचय होऊन त्यांच्याशी पुरुषांशी संबंध होऊ लागले. त्याचप्रमाणे स्त्रिया आपापली उत्पादने घेऊन दुसऱ्या मातृकुळामध्ये जात असत, तिथे रात्री वास्तव्याला राहण्यातून तिथल्या पुरुषांशी शरीरसंबंध होऊ लागले. अशा रीतीने कुळातच सक्तीचे असणारे संबंध हळूहळू कुळाबाहेर जाऊ लागले. म्हणजे त्याही काळात सक्ती वा बंधने मोडणारे स्त्री-पुरुष होते, हे विशेष!

कुळाबाहेर जाणारे शरीरसंबंध हे मातांसाठी सुचिन्ह होते. त्यायोगे कुळातील संबंधांवर बंदी आणणे सोपे होते. अर्थात हळूहळू शरीरसंबंधाची पद्धत उलटी फिरली. एकाच कुळात संबंधाची जिथे काही हजार वर्षे सक्ती होती, तिथे बंदी आली. म्हणजे तांत्रिक शोधामुळे अर्थव्यवस्थेत आणि जीवनपद्धतीत झालेल्या बदलामुळे आधीची शरीरसंबंध पद्धत endogamy पूर्वजांनी संपूर्णपणे रद्द करून exogamy मध्ये प्रवेश केला.

नात्यातल्या संबंधाची काही हजार सवय झालेली असल्यामुळे, हे शरीरसंबंध लगेच बंद पडणार नव्हते. हे ओळखून त्याकरिता काही उपाययोजना आखण्यात आल्या-

* बाहेरील स्त्री-पुरुष संबंधांना मोठं उत्तेजन देण्यात आलं. जसं, आजही आदिवासी जमातीत ‘घोटुळ’ नावाची dormitory गावाबाहेर बांधून देऊन वयात आलेल्या मुला- मुलींना तिथे जाण्यात उत्तेजन देण्यात येत असते. ज्या मातृकुळातील बहुतेक स्त्री-पुरुषांनी कुळाबाहेर संबंध पत्करले त्या कुळातील शांतता व प्रगती हा अन्य कुळांचा आदर्श झाला.

* दुसरा उपाय म्हणजे एकाच मातृकुळामधील हत्या व हिंसांना बंदी आणली गेली. अर्थात ही हिंसा होण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे कुळांतर्गत असणारे शरीरसंबंध होते. ते थांबवले तरच हिंसा थांबू शकते. त्यातून endogamy बद्दल नकारात्मक मानसिकता तयार होऊ लागली.

* तिसरा उपाय म्हणजे कोणी कुळात शरीरसंबंध केलेच तर मृत्युदंड- डोके छाटण्याची शिक्षा देण्यात येऊ लागली. त्यामुळे स्त्रियांनी आपले मुलगे व भाऊ यांना या शिक्षा होऊ नयेत म्हणून त्यांना अशा संबंधापासून परावृत्त करण्यास व स्वत: नकार देण्यास सुरुवात केली.

शेवटचा अत्यंत महत्त्वाचा उपाय म्हणजे भाऊ व बहीण यांचे वेगळे भावनिक नाते याच कालखंडापासून विकसित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. भाऊ-बहीण नात्यात जिव्हाळा व प्रेम हवे, पण शरीरसंबंध नकोत, असे अत्यंत अवघड काम मातांनी अत्यंत कौशल्याने पुढे अनेक शतके अथक परिश्रमाने केले. भाऊ-बहीण नाते हा मानवी जीवनातला चमत्कार होता. हे नाते नैसर्गिक नाही. ते कोणत्याही प्राणी जातीत नाही. ते नाते सांस्कृतिक आहे आणि मानवाच्या उत्क्रांतीच्या एका टप्प्यावर निर्माण झालेले आहे आणि तो टप्पा हाच आहे, असे माझे मत आहे.

मातांचे हे प्रयत्न इतके यशस्वी झाले की, भावा-बहिणीमधील शरीरसंबंध ही लाजिरवाणी बाब होऊन ती निषेधार्ह, तिरस्करणीय झाली, ती आजतागायत! निव्वळ भाऊ-बहीणच नाही, तर मामा, भाचे, मावसभाऊ या एकाच कुळातील नात्यातील स्त्री- पुरुष शरीरसंबंध थांबवण्यात आले. एकच कुलचिन्ह असणाऱ्या कुळामधील नात्यात संबंधांना बंदी, हीच परंपरा पुढे ‘सगोत्र विवाहबंदी’ म्हणून पितृसंस्कृतीत आलेली दिसते.

अशा रीतीने endogamy सुमारे २० ते २५ हजार वर्षांपूर्वी पूर्णपणे अस्ताला गेली, की तिचे अवशेष आजच्या आदिम, आदिवासी जमातीतही शिल्लक राहिले नाहीत. पण कुळात संबंध आलेच तर प्राचीन काळात सांगितलेल्या शिक्षा तेवढय़ा या आदिम जमातीत दिसतात.

आपण पाहिले की, आपल्या पूर्वजांनी आपली जुनी endogamy सोडून देऊन त्यांनी exogamy पत्करली, यातून आज आपल्याला खूप शिकण्यासारखे आहे, असे म्हणायला लागेल.
आज आपणही exogamy मध्ये आहोत; परंतु १५-२० हजार वर्षांमागीली exogamy ची वैशिष्टय़े फार वेगळी होती. मुख्य म्हणजे, मातृकुळातील भाऊ-बहिणी हे कुळाबाहेर शरीरसंबंध करीत होते, तरी ते दोघेही मातृकुळातच राहत होते. भाऊ संबंध करण्यापुरते कुळाबाहेर जात होते आणि बहिणींचे संबंधित पुरुष हे बाहेरून बहिणींकडे येत होते. बहिणी आपले मातृकूळ सोडत नव्हत्या. इथे बहिणींची सुरक्षितता जपली जात होती. हा रिवाज आजही काही आदिम आदिवासीमधून टिकून आहे, याचे पुरावे रॉबर्ट ब्रिफो हा आपल्या ‘X The mothers’  या खंडातून देतो. तसेच कमलाताई चट्टोपाध्याय आपल्या ‘Tribes in India’ या पुस्तकातून देतात. तसेच स्टीफन फ्यूज आपल्या १९६३च्या ‘The origin of Man and his culture’ या पुस्तकातून नागा ट्राईब्स, आसाममधील खासी, द. भारतातील नायर तसेच मध्य व पूर्व आफ्रिका, न्यू गिनी, बोर्निओ, ब्राझील वगैरे ठिकाणी मातृकुळातच भाऊ-बहिणी राहत असल्याचे पुरावे देतो. अशा प्रकारे मातृकुळाबाहेर जाऊन संबंध करण्याच्या पद्धतीला आजचे संशोधक Visiting marriage अशी संज्ञा देतात.

विशेष म्हणजे,exogamy च्या कालखंडात स्त्री चमत्काराने मूल जन्मास घालते, हे अज्ञान लयास गेले आणि पुरुषामुळे स्त्रीला मूल होते, या शास्त्रापर्यंत मानव पोहोचला. या ज्ञानामुळे पुरुषाची मन:स्थिती द्विधा झाली. आपले कुळाबाहेरील ज्या स्त्रीशी संबंध आहेत, त्या स्त्रीच्या मुलांमध्ये आपले मूल असणार आहे, याचे भान त्याला येऊ लागले. त्याचप्रमाणे ज्या स्त्रीशी आपले संबंध, ती आणि तिच्या मुलांबद्दल आपल्याला कोणतेही अधिकार नाहीत आणि ज्या बहिणीबद्दल अधिकार आणि तिच्या मुलांविषयीची कर्तव्ये, ती मुले आपली नाहीत, ही जाणीव पुरुषाला अस्वस्थ करू लागली.

पुरुषामधील हा बदल, मातृसंस्कृतीला आशादायक व आनंददायक वाटत होता. पुरुषाची अपत्यांमध्ये होणारी गुंतवणूक हा मानवी संस्कृतीच्या एका टप्प्यावरचा महत्त्वाचा बदल होता. पुरुषाच्या या हळुवार भावनेला प्रतिसाद देण्यासाठी, जगातील काही संस्कृतींनी पुरुषाला ‘सामाजिक पितृत्व’ देण्याचा रिवाज निर्माण केलेला दिसतो. मातृकुळातील पुरुषालाही इच्छा असल्यास अपत्यसान्निध्य मिळावे, हा त्यामागील उद्देश होता. अंदाजे १० ते १५ हजार वर्षांदरम्यानचा हा काळ होता.

स्त्रीला अनेक पुरुषांपासून मुले होत होती. त्या सर्व मुलांचे पितृत्व पुरुषाला देण्याचा हा रिवाज होता. हा संस्कार म्हणजे ‘पिता बनण्याचे व्रत’ असे होते- पुरुषाची पत्नी-स्त्री (आजच्या अर्थाने पत्नी नाही) जेव्हा मूल जन्माला घालणार अशा लक्षणाची दिसते, ते चार-पाच महिने पुरुषाने भाला, कुदळीसारख्या शस्त्रांना स्पर्श करायचा नाही. शिकारीला जाण्याचे थांबवायचे. गवत, झाड, लाकूड कापायचं नाही. रक्त वाहील, असे कोणतेही काम करायचे नाही. मांस भक्षण करायचे नाही. पत्नी-स्त्री बाळंत होईपर्यंत त्याने जास्तीत जास्त झोपून राहायचे. झोपून राहण्याचे कारण बाहेर समाजात कोणी कुणाची हत्या केल्यास ते या व्रत करणाऱ्या पुरुषावर घातले जाऊ नये, म्हणून पुरुषाने मातृकुळातच जास्तीत जास्त शांत राहावे असे हे व्रत! Paternity leave ची त्या काळातील ही कल्पना म्हणावी लागेल.

या व्रतामधून एक बाब स्पष्ट जाणवते म्हणजे, पुरुषाठायीची हिंसकता कमी झालेली नव्हती. त्यामुळे अशा पुरुषाच्या अधिकारात स्त्री व तिची मुले सोपविणे, हे मातृकुळांना मान्य होणारे नव्हते. म्हणून मग त्या पुरुषाने चार-पाच महिने शस्त्र, शिकार, मांसभक्षण यापासून दूर राहून हिंसा व शिकार न करता तो राहू शकतो हे त्याने प्रथम सिद्ध करावे, असा संकेत रूढ झाला. त्या काळच्या पुरुषाच्या ‘लाइफस्टाइल’नुसार त्याच्या पालकत्वाचे हे प्रशिक्षण म्हणायला पाहिजे. हे व्रत केल्यावर झालेले मूल सदोष निघाले किंवा मृत झाले तर त्याचा ठपका व्रत करणाऱ्या पुरुषावर येत असे. ज्या पुरुषाला असे पितृत्व हवे आहे त्याने पितृत्वभावनेशी वचनबद्ध असले पाहिजे, म्हणून वर वर्णन केलेल्या व्रताचे महत्त्व प्राचीन काळात होते.

म्हणजे इथे स्पष्ट आहे की, सामाजिक पितृत्वकल्पना येऊनही समाजाची प्राचीन मातृव्यवस्था कायमच राहिली. प्रत्येक स्त्रीची मुले या नेमलेल्या पित्याजवळ राहून सात-आठ वर्षांची होताच मामाच्या तालमीत येत होती. सामाजिक पितृत्वाची ही कल्पना सुमारे दोन-तीन हजार वर्षे टिकली. पण या कालावधीत जे एक सत्य उघडकीस आले, त्या सत्याने ही कल्पना उद्ध्वस्त केली. आतापर्यंत पुरुषापासून स्त्रीला मूल होते, इथपर्यंत मानवी समाज ज्ञानी झाला होता. पण हे मूल अनेक पुरुषांमुळे स्त्रीच्या उदरात तयार होते, अशी कल्पना होती. पण सामाजिक पितृत्व संस्कारामुळे पिता-पुरुषाचे, स्त्रीबरोबर सान्निध्य वाढले. त्यातून, एकाच पुरुषाच्या सततच्या स्त्री-सान्निध्याने स्त्रीला होणारे मूल, हे त्याच पुरुषाचे असते, हे ज्ञान या प्राचीन स्त्री-पुरुषांना प्राप्त झाले. हा कालखंड ८ ते १० हजार वर्षे दरम्यानचा असावा. अर्थात आपली मुले पुरुषाला स्पष्टपणे ओळखता येऊ लागली. त्यामुळे त्यांचा स्वत:च्या मुलांचे हित पाहण्याकडे कल होऊ लागला आणि बहिणीच्या मुलांकडे दुर्लक्ष होऊ लागले. त्यातून मातृकुळात मामा-भाचे तंटे सुरू झाले. भाऊ-बहिणीचे संबंध बिघडले. बहिणीची मुले व भावाची मुले असे आते-मामे भावंडांत संघर्ष सुरू होऊन त्याची परिणती हिंसेमध्ये होऊ लागली.

पुरुषाला पितृत्वादाखल अधिकार हवे होते, पण हजारो वर्षे लाभलेले भावाचे अधिकारही, त्या संस्कारामुळे, सोडून देण्याची त्याची मानसिकता तयार झालेली नव्हती. परंतु दोन्ही अधिकार एकाच वेळेस पुरुषास प्राप्त होणे, हे व्यवहारात अडचणीचे होत होते. त्यामुळे तत्कालीन समाजाची बंधुप्रधान आणि पितृप्रधान अशा दोन गटांत सरळ विभागणी झाली. मातृप्राधान्य बाजूलाच राहिले. माझ्या मते, याच कालखंडापासून मातांची मातृकुळावरील पकड सैल झाली. माता व बहिणींचा प्रभाव कमी होत गेला, कारण इथे भांडण हे पुरुषांच्या दोन अधिकारातलं होतं आणि पुरुष काय निर्णय घेणार, हे महत्त्वाचं झालं. स्त्रीच्या निर्णयाला अर्थ राहिला नाही.

पुरुषाने बंधुप्रधानकी किंवा पितृप्रधानकी यापैकी एक काहीतरी मान्य करण्याने समाजात शांतता नांदणार होती. तेव्हा काही संस्कृतींनी त्याकरिता क्रूर प्रथा स्वीकारल्या. ज्या पुरुषाला पितृप्रधानकी मान्य आहे, त्याने बंधुप्राधान्य सोडले हे सिद्ध करण्यास, बहिणीचा पहिला मुलगा बळी द्यायचा आणि त्याउलट बंधुप्रधानकी मान्य करणाऱ्या पुरुषाने पितृप्रधानकी सोडली हे दाखविण्याकरिता पत्नी-स्त्रीचा पहिला मुलगा ठार करायचा. या प्रथेमुळे मातृकुळात हाहाकार उडाला. प्रत्येक स्त्री ही कुणाची बहीण किंवा पत्नी-स्त्री होतीच. त्यामुळे प्रत्येक स्त्रीचे अपत्य बळी जाऊ लागले. कालांतराने पशुबळीची कल्पना स्वीकारली जाऊन हे प्रकार थांबवण्यात आले.

बंधुप्राधान्य विरुद्ध पितृप्राधान्य हा झगडा म्हणजे मातृसंस्कृती विरुद्ध पितृसंस्कृती अशाच एका अर्थाने तो संस्कृती संघर्ष होता. हा संस्कृती संघर्ष पुढील काही हजार वर्षे चाललेला होता. भारतात तर तो आर्य आल्यानंतरही चालू होता.

मध्यंतरीच्या काळात नांगराचा शोध सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी लागला. या नव्या तांत्रिक बदलाने संपूर्ण समाजव्यवस्था नंतरच्या तीन हजार वर्षांत पूर्णत: उलटी फिरवली. नांगर या अवजड साधनामुळे शेती करण्याचे काम पूर्वी स्त्रियांकडे होते, ते पुरुषांकडे आले. पुरुष जमिनी जिंकून आणण्याचे काम प्राचीन काळापासून करीत होते. नांगरामुळे जास्त जमीन लागवडीखाली येऊन भरपूर धान्य निर्माण होऊन धान्यसाठे निर्माण झाले. शेती उद्योग इतर उद्योगांना ‘किरकोळ’ करून पुढे गेला आणि जमीनदारी उदयास आली. जमीन जिंकून आणणारे आणि ती कसणारेही पुरुष, म्हणून जमीनदारांना शेती उत्पादन आणि जमीन पुढे सांभाळणारा स्वत:चा वारस मुलगा हवा, असे स्वाभाविकपणे वाटू लागले. म्हणून विशेषत: जमीनदार व राज्यकर्त्यांनी रीती, रिवाज, परंपरा निर्माण करून स्त्रियांनी एकाच पुरुषाशी शरीरसंबंध करण्याचे बंधन आणले, तीच विवाहप्रथा होय! साम, दाम, दंड व भेद असे विविध प्रकार वापरून सत्ताधारी पुरुषांनी स्त्री-समाजावर विवाहाची सक्ती लादली. ही विवाह प्रथा राजघराण्यातून झिरपत सामान्य जनतेतही रूढ झाली.

थोडक्यात, गेल्या सुमारे ५० हजार वर्षांत, शरीरसंबंधाच्या प्रस्तुत पद्धती म्हणजे पुरुषाला मातृकुळात सामावून घेण्याचे, त्याला माणूस म्हणून घडविण्याचे मातांनी केलेले प्रयत्न म्हणावे लागतात. पुरुषाने क्रूर जंगली जीवनातून परावृत्त व्हावे, कुटुंबव्यवस्थेत त्याला योग्य भूमिका मिळावी, तो स्थिर व्हावा, नातेसंबंधाशी तो भावनिक समरस व्हावा, त्याला अपत्यसुख मिळावे- असे प्रयत्न मातांनी सतत केले.

आपल्या मातृकुटुंबात पुरुषाला सामावून घेण्याचे प्रयत्न विफल झाल्यावर स्त्रियांनी पुरुषकुटुंबात, पतीगृहातही आपला समावेश विवाहाद्वारे मान्य केला. त्याकरिता आपल्या नैसर्गिक मातृकुळाचा आधार आणि भावांचे संरक्षण डोळ्यादेखत कोसळू दिले आणि गेली  ३-४ हजार वर्षे, पुरुषाचे हित सांभाळण्यासाठी, पतीगृहात पती देईल ते स्थान पत्करून त्या आपला जीव वेचीत राहिल्या, ही आजची वस्तुस्थिती आहे.

‘विवाह’ हा नेहमीच मला पुरुषाचा प्रश्न वाटला. तो स्त्रीचा प्रश्न कधीही नव्हता आणि आजही नाही. आणि हा अभ्यास केल्यावर मात्र विवाह म्हणजे ‘पुरुष जन्मा ही तुझी कहाणी’ असे म्हणावेसे वाटले.
मार्गारेट मीड या संशोधिकेने आपल्या १९४९ साली लिहिलेल्या Male and Female या पुस्तकात वेगळ्या शब्दात हेच मांडलेले आढळते. ती म्हणते, ‘पुरुषाला नक्की कोणती भूमिका द्यावी, ही प्रत्येक समाजाची कायमच मध्यवर्ती समस्या राहिली.’

डॉ. प्रकाश आमटे, सौजन्य – सकाळ

आदिवासींचे जगणे हा एक उत्सव असतो. आनंद साजरा करण्यासाठी त्यांना कारण लागत नाही. त्यांच्यातील ही आयुष्यावर प्रेम करण्याची जन्मजात अभिव्यक्ती मला सतत भावली आहे. एखाद्याचा जन्म झाला, की ते खूष होऊन नाचायला लागतात. लग्नात नाचतात. एवढेच काय; मृत्यू झाला असला तरी त्या संस्कारात नाचण्याला स्थान आहे.

विकास करवून घेण्याच्या नादात परंपरा विसरल्या, की काहीतरी विचित्रपणा पुढे उभा ठाकतो. ना धड विकास साधला जातो, ना परंपरा जपल्या जातात. परिसराचा कायापालट करण्याच्या नादात अशा चुका आपण करून बसतो. आदिवासींच्या एकूणच परंपरा खूप आशयगर्भ आहेत. सामूहिक आविष्कार असल्याने त्या देखण्या आहेत. संघटितपणाचे बाळकडू त्यांना परिसरातूनच मिळत असल्याने एकटेपणा त्यांच्यात भिनत नाही. धावून जाणे हा त्यांना निसर्गाने दिलेला वर आहे. “एकमेकांना मदत करावी,’ हे त्यांना वर्गातील सुभाषितांसारखे घोकावे लागत नाही. जगापासून तुटलेले अनेक आदिवासी आजही आपल्याला सापडतील; मात्र सहकाऱ्यांच्या भरवशावर त्यांनी व्यक्तिगत उन्नती घडवून आणलेली असते. मुळात त्यांच्याकडे मदतीची एक अलिखित परंपरा असते. समाजव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी ती सर्वाधिक गरजेची असते.
जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या सर्व टप्प्यावर त्यांचा उत्सव सुरू असतो. जगाचा निरोप घेतानाही जन्माबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्याचा भाव ते जपतात. या परंपरांचा पगडा आजही बहुतांश आदिवासी समाजावर कायम आहे. कुप्रथा मोडून काढल्या पाहिजेत. परंपरा मात्र टिकली पाहिजे. ती टिकवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. आदिवासींची “गोटूल’संस्कृती अनेकांना आठवत असेल. आता ती नामशेष होत चालली आहे. तरुण मुले व मुली एकत्र येऊन आपला आयुष्याचा जोडीदार निवडायचे. पोलिसांची मदत घेणे हा गावाचा अपमान समजला जायचा. एका अर्थाने सर्व समस्या एकत्र बसून सोडविण्याची पद्धत तेव्हा होती. गावातील प्रतिष्ठित किंवा वयस्क मंडळींचा पंचायतीत समावेश असतो. समस्या आली, की त्यांवर सर्वानुमते निर्णय होतो. प्रत्येक गावात ढोल वाजवला की लोक जमतात. ही वर्दी देण्याची पद्धत फार उत्तम आहे. आपल्याला महत्त्वाच्या कामाला जायचे आहे ही मनोवृत्ती तिकडच्या आबालवृद्धांमध्ये असते. दोघांचेही म्हणणे ऐकून नंतरच शिक्षा निश्‍चित केली जाते. गावखेड्यातील भाषेत सांगायचे तर आता लोक खुले झाले आहेत. पोलिसांकडे जायला लागले. आम्ही हेमलकशाला आलो, तेव्हा ९० टक्के लोक समस्यांवर उपाय गावातच शोधायचे. खुनाचा आरोप असलेल्यांवरदेखील पंचायतीने निकाल दिले होते. “क्रिया केली’ असे ते म्हणायचे. तेच ते प्रकरण सतत उकरून काढल्याचे प्रकार तेव्हा व्हायचे नाहीत. एखाद्याने निकाल मानला नाही, तर त्यांच्यावर बहिष्कार घातला जायचा.

“प्रॅक्‍टिकल ऍप्रोच’
लोक पोलिसांकडे जाऊ लागले, तेव्हापासून अधिक शोषण सुरू झाले. सिरोंच्याला कोर्टात जावे लागायचे. वकिलाचा खर्च देण्यासाठी गाय विका, बैल विका असे प्रकार व्हायचे. हेमलकशाला पोचताच आदिवासींच्या परंपरेप्रमाणे निर्णय घेऊ, असे मी सांगितले होते. इकडच्या प्रत्येक पंरपरेमागे जीवन जगण्याचा सिद्धांत आहे. योनीशुचितेचा बाऊ नाही, असा आरोप त्यांच्यावर होतो; मात्र चूक झाल्यानंतरही सांभाळून घेण्याची जी वृत्ती आहे, त्याकडे डोळेझाक कशी करता येईल? कौमार्यावस्थेतील चुकीचे प्रायश्‍चित्त म्हणजे आत्महत्या नव्हे, हे तथ्य आपल्या निरक्षर बांधवांना समजले आहे. एखादी अशी घटना घडली, तर लग्नाचा निर्णय घेतला जातो. अगदीच अडचणी आल्या, तर वेळेवर दुसऱ्या एखाद्या मुलाने संबंधित मुलीला स्वीकारल्याचीदेखील अनेक उदाहरणे आहेत. जगाकडे बघण्याचा हा “प्रॅक्‍टिकल ऍप्रोच’ मला फार महत्त्वाचा वाटतो. नवऱ्याचे निधन झाल्यानंतर विधवेला पुनर्विवाह करण्याचा अधिकार आदिवासी समाजात आहे. एवढेच काय, लग्न झाल्यानंतरही जोडीदार नाकारण्याचा अधिकार स्त्रीला आहे. ती दुसरा जोडीदार शोधू शकते.

तोडगा गावातल्या गावात
मुलीने नव्हे तर मुलाने हुंडा द्यायचा, अशी जगाच्या दृष्टीने उलटी पद्धत इकडच्या आदिवासी समाजात आहे. एखाद्या महिलेने पतीला सोडण्याचा निर्णय घेतला, तर तिच्यावर केलेला खर्च भरून द्यावा लागतो. “इज्जत भरून काढणे’ असा शब्दप्रयोग ते करतात. काही प्रकरणांमध्ये दंडदेखील ठोठावला जातो. लग्नाच्या वेळी मुलाच्या आईवडिलांकडे हुंड्यासाठी पैसा नसेल, तर मुलीच्या आईवडिलांकडे शेतीवर मजूर म्हणून काम करण्याचे कबूल करायचे आणि लग्न लावून द्यायचे असा सामोपचार त्यांनी स्वीकारला आहे. शहरी भागातील लोकांना वृत्तपत्रांमधून सतत बलात्काराच्या बातम्या वाचायला मिळतात. आदिवासी भागात तसे बलात्कार होत नाही. मुलींना तुलनेने बऱ्यापैकी स्वातंत्र्य आहे. हक्क आहेत. दोन्ही बाजू ऐकून दंडाची रक्कम भरण्याची पद्धत आहे. हेमलकशातील आमच्या दवाखान्यात अशा अनेक प्रकरणांवर सामोपचाराने तोडगा काढण्यात आला. शक्‍यतो गावातल्या गावात तिढा सुटावा, अशी सर्वांची इच्छा असते. पंचायतीने निष्पक्षपणे निर्णय द्यावा, अशी दोन्ही बाजूंची अपेक्षा असते. ती पूर्ण झाली तर सहसा पोलिसांकडे प्रकरण जात नाही. मुळात त्यामागचे आणखी एक कारण कुटुंबाच्या गरिबीतही दडले आहे. पोलिसांकडे किंवा कोर्टात गेल्यानंतर कर्ज काढावे लागते. बैल विकावा लागतो. आधीच तुटपुंजी कमाई असल्याने नवे संकट ओढवून घेण्यास कुटुंबे तयार नसतात. आता आम्हाला इतकी वर्षे झाली, गडचिरोली परिसरात तेव्हा कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्‍न नव्हता. भामरागडच्या संपूर्ण परिसराची जबाबदारी एका हवालदाराकडे होती, यावरून काय ते समजून घ्या. आता मात्र परिस्थिती बदलली आहे.

समाजाची घट्ट वीण
एकदा एक मुलगी गरोदर होती. दोन्ही बाजूंनी प्रकरण आमच्यापर्यंत आले. अर्थात, पंचायतीच्या निर्णयानेच तिढा सुटला; मात्र आम्ही त्यात सोनोग्राफी मशिन्सपासून अन्य अद्ययावत यंत्रांची मदत घेतली. अखेर मुलामुलीचे लग्न लावून देण्यात आले. जगाच्या दृष्टीने निरक्षर ठरलेले आदिवासी बाका प्रसंग ओढवल्यानंतर ज्या सामंजस्याने वागतात किंवा जी तडजोड करतात, ती फार मोठी असते. नको तिथे स्वाभिमानाचा बाऊ करणाऱ्या सभ्य समाजाने आदिवासी बांधवांकडून हा गुण शिकून घेतला पाहिजे. नम्रतेत मोठी ताकद असते. ती ज्याला शोधता आली, त्या समाजाची विण घट्ट होत गेली आहे. मदतीसाठी धावून जाण्यासाठी तरुण मोठ्या प्रमाणावर तयार असतात. रुग्णांना खाटेवर टाकून दवाखान्यात पोचविण्याच्या कामात प्रत्येक गावातील तरुण आघाडीवर असतात. गडचिरोलीतील माडिया आणि बस्तरमधील मुरिया आदिवासींमध्ये आता रोटीबेटीचे व्यवहार होतात. त्यांचे येणेजाणे सुरू असते. त्यांच्यातील चांगल्या गोष्टी आपण शिकल्या पाहिजेत. त्यांची संस्कृती नष्ट करायला आपण आलेलो नाहीत, हे त्यांना पटले की विरोध मावळतो.

“श्रीमंत’ आदिवासी
आदिवासी परंपरेनुसार त्यांची वेगळी यंत्रणा आहे. शिकारीला त्यांच्या परंपरेत अनन्य स्थान आहे. ती कधी धार्मिक कारणासाठी होते, तर कधी वैयक्तिक. बऱ्याचदा पोट भरणे हा त्यामागील उद्देश असतो. तेल, मसाले आणि डाळी पोचण्याआधीपासून ते शिकार करतात. डोंगरावर झाडे पेटवून ती शिकार भाजली जायची. छोट्या पक्ष्याची शिकार करून घरच्याघरी त्याची वासलात लावण्याचे प्रकार घडतात; मात्र शक्‍यतो वाटून खाण्याची प्रवृत्ती त्यांच्या रक्तात भिनली आहे. आपण सतत मागास, मागास म्हणून त्यांचा उच्चार करतो; पण लोकजीवनाचा अभ्यास केला तर आदिवासी समाज खरोखर खूप “श्रीमंत’ आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या समुदायात भिकेला स्थान नाही. भीक मागण्याची प्रथाच नाही.

मुळात आदिवासींचे जगणे हा एक उत्सव असतो. आनंद साजरा करण्यासाठी त्यांना कारण लागत नाही. त्यांच्यातील ही आयुष्यावर प्रेम करण्याची जन्मजात अभिव्यक्ती मला सतत भावली आहे. एखाद्याचा जन्म झाला, की ते खूष होऊन नाचायला लागतात. लग्नात नाचतात. एवढेच काय; मृत्यू झाला असला तरी त्या संस्कारात नाचण्याला स्थान आहे. त्यामागची भावना वेगळी असते एवढेच.

आयुष्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची साधीसरळ; पण तेवढीच सुसंस्कृत परंपरा आहे. आम्ही आलो तेव्हा, १९७० च्या काळात, इकडे कोणीच यायचे नाही. शासनाचे सर्व काम कागदोपत्री होते. शाळा कागदावर होत्या, त्यामुळे मुले यायची नाहीत. मुले येत नव्हती, त्यामुळे शिक्षक यायचे नाहीत. त्या काळातदेखील सामूहिक नृत्यपरंपरा होती. त्यांचे देव दगडाचे आहेत; पण अंतरंगात सहृदयता आहे. त्यांना ना शंकर माहिती ना राम. सरकार त्यांना हिंदू म्हणत असले तरी त्यांची संस्कृती निश्‍चितच वेगळी आहे. ती धर्मावरून भांडणारी नाही, माणसे जोडणारी आहे. मी हे का म्हणतोय ते इथे येऊन अनुभवल्याशिवाय कळायचे नाही.