Archive for जानेवारी, 2010

पु.ल. देशपांडे, सौजन्य – दिपक (पु.ल. प्रेम संकेतस्थळावरुन साभार)

‘सावरकरांच्या जिवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती’

मित्रहो,
माझ्या आयुष्यातली हा मी एक परमभाग्याचा दिवस समजतो. पूर्वजन्मावर माझी श्रद्धा नाही. त्यामुळे ह्या भाग्याचा मी पूर्वजन्माशी संबंध जुळवू इच्छित नाही. पण हा क्षण माझ्या आयुष्यात यावा ह्याला ‘भाग्य’ या पलिकडे मला काय म्हणावं ते सुचत नाही.

आपण आत्ताच सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. त्या खोलीचा उल्लेख अंदमानतली कोठडी असा केला जातो, परंतु ज्या वेळेला एखाद्या कोठडीमध्ये प्रत्यक्ष तेजच वस्तीला येत असतं, त्यावेळी त्या कोठडीचा गाभारा होतो. आपण आता जिथे गेलो होतो तो असाच एक गाभारा झालेला आहे. तिथे एक मुर्तीमंत तेज वावरत होत. ‘तेजस्विनावधीत्मस्तु’ असं आपण पुष्कळ वेळेला नुसतं म्हणतो आणि म्हटलेलं विसरुन जात असतो. पुन्हा रोज म्हणत असतो, परंतु ज्याची काया, वाचा, मन, अवघं व्यक्तिमत्व अंतबार्ह्य तेजस्वी होतं अशी अलिकडल्या काळातली भारतीय इतिहासातली व्यक्ती शोधायला गेली तर वीर सावरकरांची मुर्ती डोळ्यापुढे आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक क्षण हा जीवन उजळण्यासाठी आहे अशा इर्षेने ते जगले. अधांराचे ते सगळ्यात मोठे शत्रू होते. मग तो अंधार अंधश्रद्धेने आलेला असो, अंधविश्वासाने आलेला असो किंवा पारतंत्र्याचा असो. त्या अंधाराविरुद्ध त्यांची झुंज होती. जीवनात प्रत्येक माणसाला तीन शक्तीशी सतत झूंज द्यावी लागते. बर्टुड रसेलने त्याचं वर्गीकरण केलं आहे. मनुष्य आणि निसर्ग, मनुष्य आणि समाज, आणि मनुष्य आणि तो स्वत: ह्या तिन्ही शक्तीशी त्याची रस्सीखेच चाललेली असते. ‘रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग’ असं तुकोबांनी म्हटलं आहे. हे एक अंतर्गत युद्ध चालु असतं. आणि युद्धाचा पहिला नियम असा आहे की मी जिंकणारच आहे अशा भावनेनेच युद्धात उतरावं लागतं.सावरकरांनीसुद्धा ‘मारिता मारिता मरावे’ ह्याचाच जयघोष केला होता. पराजित मनाने लढणारा माणूस कधीही युद्ध जिंकू शकत नाही. सावरकरांच्या सगळ्या साहित्यातून ज्या जिवनविषयक तत्वज्ञानातून ते साहित्य निर्माण झाले होती. त्यातून जर सार काढायंचं असेल तर तर असंच म्हणावं लागेल की, केवळ राजकिय शत्रूंवरच नव्हे तर जिथे जिथे तुम्हाला अंधश्रद्धा दिसेल, अज्ञान दिसेल तिथे तिथे वीर पुरुषासारखे त्याच्यावर तुटून पडा. म्हणूनच आधुनिक काळातल्या इहवादी महर्षींमध्ये सावरकरांच नाव आदराने घायला हवे. विज्ञाननिष्ठेवरचे त्यांचे निंबंध ह्या दृष्टीने अभ्यास करण्यासारखे आहेत आणि ही विज्ञाननिष्ठा का? तर ती सदैव अज्ञानापोटी जन्माला येणाऱ्या अंधश्रद्धेच्या काळोखावर मात करायला निघालेली असते म्हणून. काळोख याचा अर्थ भय, आंधळेपण, सर्व क्षेत्रातलं आंधळेपण जावं ह्यासाठी त्यांनी आपल्या सर्वस्वाचा होम पेटवला.

आजच्या दिवसाचा आपण सावरकरांच्या अत्मार्पणाचा दिवस म्हणतो. केवळ तिथीच्या हिशेबात, ‘जीवनाध्वरि पडे आज पूर्णाहुती’ ह्या दृष्टीने हा दिवस आत्मार्पणाचा म्हणणे संयुक्तिक होईल. पण वयाच्या सातव्या आठव्या वर्षापासून त्यांच्या जीवनातली प्रत्येक घडी ही आत्मार्पणाचीच होती. ‘एकच तारा समोर आणिक पायतळी अंगार’ अश्या निष्ठेने ज्यांच्या जीवनातली वाटचाल क्रांतिपथावरुन चालत असते त्यांचा मृर्त्यु हा सांगाती असतो. आपण पुष्कळसे लोक केवळ मरता येत नाही म्हणुन जगत असतो. क्षणोक्षणी मरणाच्या धास्तीने जगत असतो. असल्या जगण्याला श्वासोच्छवास घेणे यापलिकडे फारसा अर्थ नसतो. परंतू ज्या वेळेला मनुष्य हा श्वासोच्छवास मी कशासाठी घेतो आहे याचा विचार करील त्यावेळी सार्थ जगण्याचा वाटा तो शोधायला लागेल आणि जिथे राजकिय धार्मिक किंवा आर्थिक दडपणामुळे आलेला गुदमरलेपणा, धूत:शरीरेण मृत:स जीवती अशी परिस्थिती त्याला आढळेल. जिथे जिथे म्हणून मोकळा श्वास घेता येत नाही तिथे उडी मारून तो श्वास मोकळेपणाने घेता येण्याची परिस्थिती निर्माण करण्यासाठी स्वत:चे प्राण पणाला लावेल त्याचवेळी ते जगणं खऱ्या अर्थाने पारमार्थिक होईल. आपण पारमार्थिक ह्याचा अर्थ गळ्यात माळा आणि कपाळी टिळा लावून जयजय राम कृष्ण हरी करित राहणं असा करतो पण जोवर माणुस आणि निसर्ग, माणुस आणि माणुस, माणुस आणि तो स्वत: ह्या द्वंद्वांना सामोरे जाऊन ती कोडी उलगडण्याच्या मागे लागत नाही तोवर ते जगणं केवळ आहार, निद्रा, भय, मैथुन ह्या चौकोनातच पशुवत सीमित राहिल. ते पारमार्थिक होणार नाही आणि एकदा का ह्या जीवनाचं यशार्धत्व पटलं की मग चित्त भयशून्य होत. प्रथम ते मुक्त होतं मरणाच्या महामायतून. सावरकरांना मुर्त्युंजय म्हणायचं ते ह्या अर्थाने.

ह्या जेलमध्ये आजसुद्धा पहा. हे पर्यटनस्थान असूनही नुसत्या त्या जेलच्या विराट स्वरुपामुळे सारं कसं भयाण वाटतं.
आपण कल्पना करा १९११ साली वर्षापूर्वी यापुढली थोडी थोडकी नाही पन्नास वर्ष या ठिकाणी डांबलेल्या असस्थेत सजा भोगण्यासाठी ते शिरत होते. भोवताली दैत्यांसारखे पहारेकरी होते ब्रिटीश सत्ता टिकवण्यासाठी. स्वातंत्र्य हा शब्द उच्चारण्यालाही ठार मारणं, त्याचे अनन्वित हाल करणं हा त्यांचा खेळ होता. अशा ह्या नरकपुरीत प्रवेश करताना सावरकरांनी उद्गार काय काढावे? ते म्हणाले होते, ‘मित्रांनो एक दिवस इथे आमचे पुतळे उभे राहतील. मी जिंकणारच ह्या आत्मविश्वासाने युद्धात पडायचं असतं.’ ह्या तत्वज्ञानाच्या खरेपणाचं आणखी दुसरं उदाहरण आवश्यकच नाही. हा भाबडा विश्वास नव्हता. साम्राज्यशाहिच्या आत्म्याचे गणित ते वैज्ञानिक पद्धतीने मांडू शकत होते. लोंकांमध्ये गूलामगिरीविरुद्ध द्वेष उत्पन्न होत असलेले ते पाहत होते. त्या द्वेषाला सामर्थ्या़ची जोड हवी याची त्यांना जाणीव होती. त्यासाठी प्रथम आपल्या देशबांधवांच्या मनाचे सामर्थ्य अपरंपार वाढवले पाहिजे याची तळमळ होती. त्यासाठी त्यांनी देवधर्मापेक्षा ‘राष्ट्र’ ह्या कल्पनेला अग्रमान दिला. आमचे देव इंग्रजांच्या बंदीत नव्हते. त्याची षोडपचार पुजा चालू होती. धर्मातही राज्यकर्ता इंग्रज लुडबुड करीत नव्हता. पण इथला माणुस मात्र त्याला सदैव दुबळाच राहायला हवा होता. सावरकरांनी हिंदु हा शब्द्च राष्ट्राला समानार्थी करुन टाकला. मी हिंदुस्थानाचाच रहिवासी आहे. माझी पुण्यभू, मातृभू, धर्मभू हिंदुस्थान हीच आहे असे म्हणणारा तो हिंदू, अशी त्यांनी धर्माची इहवादी व्याख्या बनवली आणि त्या हिंदुला समर्थ करण्यासाठी त्यांनी इथल्या रहिवाश्यांना तुम्ही ‘अमृताचे पुत्र’ अहात. तुम्ही मरण स्विकारायचे आहे ती होतात्म्यातून तुम्हाला अमर करणारे- हा मंत्र सांगितला हिंदू-मुसलमान-खि्स्ती कुणाचाही देव दुबळ्याच्या मदतीला धावत नाही हे ते पक्के जाणुन होते. त्यांनी सतत जर कसला धिक्कार केला असेल तर तो दुबळेपणाचा. दैववादाचा, मनुष्य बुद्धीच्या निकषावर प्रत्येक गोष्ट घासून मगच ती स्विकारतो. त्यावेळी त्याच्या आचारविचारांत एक निराळेच तेज दिसू लागते. तो जय-पराजयाची भाषा करीत नाही प्रयत्नात आपण कमी पडलो असे मानुन पराजयाच्या क्षणीही पुन्हा उठुन उभा राहतो. मर्ढेकरांनी म्हटलं आहे ‘भावनेला येऊ दे गा शास्त्रकाट्य़ाची कसोटी.’ अखाद्या दृश्याने किंवा कल्पनेने भावनाबंबाळ होणं ह्याला अर्थ नाही. उदाहरणार्थ हा सेल्युलर जेल पाहून मी लगेच भावनाविव्हळ होऊन ओक्साबोक्सी रडायला लागणं आणि थयथयाट करून मला किती दु:ख झालं आणि सावरकरांना भोगाव्या लागलेल्या भळाच्या आठवणींनी मी किती व्हिवळ झालो याचं प्रदर्शन माम्डणं म्हणजे माझी भावना शंभर टक्के खरी आहे असं नाही. एखाद्या गोष्टीच्या बाबतीतली उत्कट भावना तिला अश्रूंची वाट करून देण्याने सिद्ध होत नाही. उलट स्वत:ला आवर घालून जे कार्य हाती घ्याचं असतं. ते करण्याच्या हेतूने सामर्थ्य मिळायला लागणे हे महत्वाचं असतं.

आत्ताच श्री. हर्षे यांनी सांगितलं की सावरकरांच्या विषयीच्या माझ्या काही आठवणी असल्या तर त्या मी सांगाव्या. खरं सांगायचं तर त्यांच्याजवळ जाण्याची छाती आणि हिंमत मला नव्हती. सुर्याचं तेज दुरून घ्यावं, फार जवळ गेलो तर भस्मसात होण्याची भि्ती. त्यामुळे आम्ही सावरकरांना भेटत आलो ते त्यांच्या पुस्तकातून. पण माझ्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला होता तो म्हणजे परशुरामभाऊ कॉलेजच्या मैदानावर त्यांचा मृत्यंजय समारंभ झाला त्यावेळी मी त्यांचे भाषण ऎकलं.

पारल्याला माझ्या लहानपणी सावर्करांची टिळक मंदिरात झालेली भाषणंही मी ऎकली आहेत. चांगल्या वक्तृत्वाच्या बाबतीत आपण ‘गंगेसारखा ओघ’ असं म्हणतो. त्या ओघाचा साक्षात्कार सावरकरांइतका शंभरटक्के मला कोणत्याही भाषणाने झाला नाही. विचार आणि उचार एकाच सामर्थ्याने तळपत असायचे. मातृभाषाप्रेम हा राष्ट्रप्रेमाचाच एक महत्वाचा घटक असतो. सामर्थ्याच्च्या उपासनेत आपल्या भाषेला जुलमी राज्यकर्त्याच्या उदासीपणातून, अवलबित्यातून वाचवणं हा विवेक सावरकरांच्या भाषाशुद्धीच्या चळवळीमागे होता. वास्तविक एंग्रजीवर त्यांच चांगलंच प्रभुत्व होतं. मराठी भाषणाच्या ओघात एकादा मुळातला इंग्रजी उतारा स्मरणाने धडाधड म्हणत. कुठल्याही सोवळेपणाच्या भावनेने त्यांनी इंग्रजीला अब्रहण्यम मानले नाही. त्यांना आमान्य होतं ते दुबळेपणाच्या भावनेने विदेसी भाषेतल्या श्ब्दांची घूसखोरी चालू देणं. सावरकरांची ही राष्ट्रीय अस्मिता जागवण्याची भावना ज्यांनी समजून घेतली नाही. त्यांनी त्यांच्या भाषाशुद्धीची चेष्टा केला. हे शब्द रूढच होणे शक्य नाही असे म्हणायला सूरुवात केली. पण ते सरकारी शब्दांच्या टाकसाळीत तयार केलेले नव्हते. एका प्रतिभावंत कवीची ती निर्मीती होती.

सरकारात मोले घातले रडाया (की खरडाया?) ह्या भावनेने भाषाशुद्धीचे पगारी कर्मचारी जेव्हा बसतात तेव्हा”ते इकडली इंग्रजी डिक्शनरी आणि कर त्याचा मराठी शब्दकोश’ असा व्यवहार चालतो. सावरकरांना तो शब्द कोशात पडून राहणारा नको होता. तो कवितेसारखा लोंकाच्या तोंडी रूळायला हवा होता. त्यांनी रिपोर्टरला ‘वार्ताहर’ हा शब्द निर्माण केला. वार्ता खेचून आणणारा. इथे इंग्रजी शब्दाच्या ठिकाणी मराठी प्रतिशब्द असे होता, एक कविनिर्मीत प्रतिमा तयार झाली. प्रारंभी थट्टेवारी नेलेले शब्द व्यवहारात आले. हे शब्द सावरकरनिर्मीत आहेत ह्याचा देखील लोकांना विसर पडला. आज महाराष्ट्रात सामान्य माणसाला मेयरपेक्षा महापौरच जास्त अप्रिचित आहे. वृत्तपत्रांच्या क्षेत्रात तर संपादकापासुन स्तंभापर्यंत अनेक मराठी शब्द त्यांनी दिले आहेत. तीच गोष्ट चित्रपटसुर्ष्टीची, दिग्दर्शन, संकलन, ध्वनिमुद्रण, पटकथा हे सारे त्यांचे शब्द. मराठीला त्यांचं हे सत्व जागविण्यासाठी दिलेल मोठं देण आहे. शिवाय ते उत्तम वक्ते असल्यामुळे शब्द निर्मिती करताना त्यात उच्चारांचा सोपेपणाही त्यांनी सांभाळला. पुष्कळदा मला वाटतं की भाषेचं सामर्थ्य म्हणजे काय, ओघवती भाषा म्हणजे काय ह्याचा मुलांना साक्षात्कार घडवायचा असेल तर त्यांच्याकडून सावरकरांचे ‘माणसाचा देव आणि विश्वाचा देव.’ दीन शब्दांत संस्कृती, ह्या सारखे निंबंध मोठ्याने वाचून घायला हवेत. वैचारिक संस्कार आणि भाषेचे उत्तम संस्कार ह्या दोन्ही दृष्टीनी हे वाचन उपयोगी ठरेल. सावरकरांच्या जीवनात तर ग्रीक नाट्य़ातल्या महान नायकांसारखं नाट्य होतं. आणि ते त्यांच्या वाणी-लेखणीतूनही ओसंडत होतं. ते स्वत: नाटककार, थोर कवी असल्याचा दुर्दवाने त्यांच्या केवळ राजकिय कर्तूत्वाकडेच पाहिल्यामुळे विसर पडतो. ‘उत्कट भव्यतेज्याचे मिळमिळीत अवघेची टाकावे’ हा समर्थांचा उपदेश सावरकरांइतका तंतोतंत आचरणात आणलेला क्ववित आढळतो. त्यामुळे कवितेत देखील ते कल्पनेची हिमालयीन शिखरे गाठतात. प्रियकर प्रेयसीच्या मीलनाच्या प्रतिक्षा काळाबद्दल कविता लिहिताना ते म्हणतात-

‘शतजन्म शोधताना शत आति व्यर्थ झाल्या !
शत सुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या !’

कालाचं किती विराट स्वरूप दोन ओळीत त्यांनी उभं केलं आहे पहा ! एका सुर्य मालिकेचं चित्र डोळ्यांपुढे आणताना आपण थकून जाऊ हा महाकवी शतसुर्यमालिकांच्या दिपावली विझाल्या म्हणून जातो. इतकी प्रचंड प्रतिमा घेऊन आलेल्या ह्या कोठडीत राहावं लागलं आणि ही भयाण कोठडी ‘कमला सप्तर्षी, विरहाच्चवास असल्या प्रतिभेची उत्तुंग शिखर दाखवून देणाऱ्या काव्यांचं जन्मस्थळ ठरली.

ह्या कोठडीत त्यांनी जे हाल सहन केले त्याची कल्पना ‘माझी जन्मठेप’ वरुन येते. पण मला वाट्तं. त्यांनी खरोखरी जे शारीरिक आणि मानसिक हाल सहन केले असतील त्यातल्या एक दशांशाचं सुद्धा वर्णन त्यात लिहिलेलं नसेल. कारण हालाच वर्णन करताना त्यांना जराही संषय आला असावा की ह्या कथनामुळे लोकांच्या मनात करुणा उत्पन्न होणार आहे. तर त्या महापुरूषाला ते कदापीही रुचलं नसतं. म्हणून मला नेहमी वाटतं की इथे झालेले सगळे हाल त्यांनी लिहीलेच नाहीत. त्यांना हे पुस्तक वाचुन एखाद्या आजीबाईंनी ‘आई आई गं काय हो हे हाल’ म्हणायला नको होत, त्यांना असल्या हालावर मी मात करीत अशा विश्वासाने ह्या संकटात उडी टाकायला सिद्ध होणारा तरुण वाचक अभिप्रेत होता. स्वत:बद्दलची कणव निर्माण करण्याचा किंवा आपल्या त्यागाचे भांडवल करण्याचा तिटकारा होता. वार्ध्यक्याच्या काळात ते कुणालाही भेटायला उत्सुक नसत. ‘त्याच कारण मला तरी असं वाटतं, की आपल्या आयुष्यातल्या थकलेल्या अवस्थेत आपल्याला कुणी पहावे हे त्याना आवडणं शक्य नव्हतं. एखाद्या म्हाताऱ्या सिंहाला वाचा फूटली तर तो जसा म्हणेल. ‘मला सर्कशीतला सिंह म्हणून काय पहाता. जंगलात हत्तींची गंडस्थंळ फोडीत होतो तेव्हा पहायचं होतंत-‘ त्याच वृत्तीने ते एक प्रकारच्या एकांतात राहिले त्या वाधंक्यात एकच व्याधी त्यांना आतून पोखरत होती. ती म्हणजे देश दुभंगल्याची अशा अवस्थेतच त्यांनी मृत्युला आपण सामोरे जाऊन भेटण्याचा निश्चय केला.

विज्ञाननिष्ठ सावरकरांचे त्यांना धर्माभिमानी संकुचित म्हणणाऱ्यांना त्यांच्या मृत्युच्या प्रसंगी एक हादरून टाकणारे दर्शन झाले. आपल्याकडे बहुतेक लोकांची बुद्धिनिष्ठा औद्वदेहीक संस्काराच्या प्रसंगी लुळी पडते. परंपरागत रुढींचे पालन केले नाही. तर मानगुटीला बसेल त्याला नरकवास घडेल अशी नाना प्रकारची भीती मनात असते. मरणाऱ्याचीही आपल्याला मंत्राग्नी मिळावा-भंडांग्नी नको अशी अखेरची इच्छा असते आणि मुख्यत भितीपोटी ह्या इच्छेला त्याचे उत्तराधिकारी मान देत असतात. आणि अशा ह्या परिस्थितीत सावरकर आपल्या अखेरच्या इच्छापत्रात आपलें शव विद्दुत दाहिनीत टाकून द्यावे अशी इच्छा व्यक्त करतात. हे शव आहे त्याला एक काष्ठ या पलिकडे अर्थ राहिलेला नाही असं मानणं हे आद्द शंकराचार्यासारखं झालं. आद्द शंकराचार्याची आई मरण पावली. ब्राह्मणांनी तिच्या अंत्यंसंस्कारावर बहीष्कार टाकला. मृतदेह एकट्या शंकराचार्यांना उचलून स्मशानात नेता येईना. त्यांनी हे काष्ठ आहे. असं म्हणुन त्या मृतदेहांचे तीन तुकडे केले आणि एकेक तुकडा नेऊन दहन केले. विज्ञानिष्ठेची हीच परंपरा सावरकरांनी पाळली. आज आम्ही पाहतो. स्वत:ला सेक्युलर म्हणवणारे लोक आपल्या इच्छापत्रात आपली रक्षा कुठल्या सोर्वात नेऊन टाकावी हे नमुद करतात. मरणानंतर उतरांवर संकुचित धार्मिक्तेचा आरोप करणाऱ्या नेंत्यांच्या रक्षा विसर्जनाचा तमाशा दहा दहा दिवस चाललेला असतो आणि सावरकर मात्र आपले शव विद्दुतदाहिनीत टाका म्हणतात.(विद्दुत दाहिनी हा शब्दही त्यांचाच असावा असे मला वाटते.) मंत्रपठणाची गरज नाही म्हणतात. नंतरच्या क्रियाकर्माची आवश्यकता नाही म्हणून बजावतात. आयुष्यभर सावरकर ह्या बुद्धिनिष्ठेचा पाठपुरावा करीत आले. अंधश्रद्धा माणसाला दुबळं करते हे सांगत आले. इहवादाचा पुरस्कार करीत आले. राष्ट्रहिताविरुद्ध कारवाया करणाऱ्यां अनुयायी मिळवण्यासाठी त्यांनी सत्याशी तडजोड करणे नाकारले. सावरकारांनी गाईला केवळ एक उपयुक्त पशू म्हटल्यावर तिच्या पोटातल्या तेहतीस कोटी देवांच्या भाकड काथांवर आपली तुंबडी भरणारे त्यांच्यावर तुटून पडले होते.

यापुढे धर्मभोळ्या-मंत्रतंत्राच्या युगात आपल्याला राहयचं नसून विज्ञानीने समर्थ झालेल्या जगात जगायचं आहे हा विचार एका विलक्षण द्वष्टेपणाने ते मांडत आले. त्या नव्या जगात जगायला आपण नालायक ठरलो तर आपण आदिम अवस्थेतल्या जमातीतल्या माणसांसारखे ठरणार आहोत, बावळट ठरणार आहोत. अशा प्रकारच्या बावळटपणाला सावरकरांना तिटकरा असे. त्यांना दुबळा, वाकलेला, लाचार असा माणुस सहनच होत नसे. तेज:पुजतेने आकर्षण त्यांच्या साहित्यातून सदैव प्रकट झालेले दिसते. स्वातंत्र्याचं नातं देखील त्यांनी ’आत्मतेजीवाले’ प्रकटणाऱ्या रवीशी जुळवलेलं आहे, त्यांनी शेवटी मृत्युला अलिंगन दिले. ते देखील तेजाच्या एका ज्योतीने दुसऱ्या प्रचंड ज्योतीत मिळून जावे तरी. मृत्युला आपल्यावर झडप घालू न देता त्याच्या दरबारी ते धोरदात्त नायकासारखे चालत गेले. समिधेसारखं जीवन जगणाऱ्या सावरकरांची जीवनयद्वत स्वखुशीने आहुती पडली.

आपण आत्ताच ह्या बंदिगृहातल्या त्यांच्या एका गाभाऱ्यात जाउन आलो. निर्भयतेचा एक उपासक तिथे ठेवला गेला होता. नाना प्रकारचे हाल त्याला सहन करावे लागले. कोणासाठी त्यांनी ते सर्व सोसलं? तुमचा आमचा श्वासोच्छवास स्वतंत्र हिंदुस्थानातल्या हवेत मोकळेपणाने घेता यावा म्हणून. आज आपण इथे येतो. निर्भयपणाने हा भयाण कारागृहात हिंडतो. ती, सावरकरांची आणि राजबंदी म्हणून ज्या क्रांतिकारकांना इथे जन्मठेपेची सजा भोगावी लागली त्यांची पुण्याई आहे. त्या पुण्याईचे आज आपण स्मरण करतो म्हणुन आजच्या दिवसाला आपण सावरकरांची पुण्यतिथी म्हणतो. त्यांनी मिळवलं ते पुण्य जपजाप करुन नव्हे तर आयुष्याचं मौल देऊन निर्भयतेची साधना करुन आणि ती साधना कृतीत उतरवून अशा प्रसंगी त्या निर्भयतेचा थोडा तरी अंश आपल्यात उतरो ही आपली प्रार्थना असायला हवी.
प्रार्थनेचा उल्लेख आल्यावर मला स्त्रोत्राची आठवण आली. मी वाचलेल्या स्त्रोत्र-साहित्यात मला सगळ्यात आवडलेल स्त्रोत्र कुठलं असेल तर ते सावरकरांनी लिहिलेलं स्वतंत्रेच स्त्रोत्र. ’जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे.’ ह्या जयोस्तुतेच्या संदर्भात माझ्या मनाला स्पर्श करुन गेलेली एक घटना सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. अस्पृश्यता निवारणाविषयींच्या सावरकरांच्या तळमळीविषयी आणि सहभोजन, मंदिरप्रवेश इत्यादी कार्यक्रमांविषयी मी आपल्याला सांगायला पाहिजे असं नाही. काही वर्षापूर्वी मी सांगलीजवळ म्हैसाळ म्हणून गांव आहे तिथे मधुकरराव देवल यांनी दलितांच्या सहकारी शेती संस्थेचा प्रयोग केला आहे तो पहायला गेलो होतो. भारतातल्या उत्तम ग्रामिण प्रकल्पापैकी हा एक प्रकल्प आहे. एक काळ असा होता की वस्तीतल्या स्त्रियांच्या अंगावर लज्जरक्षणापुरतीही वस्त्रं नसायची म्हणून त्यांना झोपडीबाहेर पडणं मुष्किल होतं. तिथे आम्ही गेलो त्या दलित वस्तीतली सर्व स्त्रीपुरूष मंडळी लग्नंसमारंभाला जावे तसा पोषाख करुन जमली होती. सहकारी शेतीने त्यांच्या जीवनात आर्थिक परिवर्तन घडवून आणलं होतं आणि ते केवळ आर्थिक परिवर्तनच नव्हतं हे लगेच माझ्या लक्षात आलं. त्या स्त्रियां समारंभात गाणं म्हणणारं होत्या. अलीकडे कुठेही सभेला गेल्यावर गाणी ऎकावी लागतात ती बहुदा सिनेमातली किंवा प्रसंगाला साजेशी अशी तितल्याच शाळेतल्या गुरुजीनीं कानामात्रांची यथेच्छ मोडतोड करून जुळवलेली स्वागतपर पद्दं. आणि इथे पेटीवाल्यांनी सुर धरला तबलजीने ठेका सुरू केला आणि अस्खलित वाणीने त्या दलित भगिनींनी गाणे सुरू केले. – जयोस्तुते श्री महन्मगंले शिवास्पदे शुभदे! स्वतंत्रते भगवती त्यामहं यशो युतावंदे! माझ्या अंगावर सर्रकन काटा आला. ज्या दलितांचे जीवन सुधारावं, त्यांना समाजात मानाने जगता यांव- मोकळेपणाने गाता यांव वावरता यांव म्हणून सनातनी धर्मबांधवांचे शिव्याशाप सहन करित ज्या सावरकरांनी जींवाचं रान केलं त्यांनी रचनेत हे स्त्रोत्र मुक्तमनाने दलित स्त्रिया बिनचुकपणाने उत्तम सुराचालात गात होत्या. एखाद्याचं पुण्य फळाला येणं म्हणजे काय याचा मला त्या क्षणी अनुभव आला.

अशा या पुण्यशाली महापुरुषाला जिथे बंदिवास घडला ते हे क्षेत्र आता इहवादी सत्पुरुषाचं जिथे स्मरण करावं असं तिर्थक्षेत्र झालेलं आहे. ज्यामुळे आपल्या मनाला स्नान घडतं ते तिर्थ असं मी मानतो. भयाने, स्वार्थाने, संकुचीत वृत्तीने मालिन झालेली आपली मन धुवायला आपण आता ठिकाणी येतो. बाळारावांनी आणि श्रि. हर्षे यांनी इथे सर्वांना एकत्र आणण्याचा योग आणला. त्यांच्या आयोजनामुळे इथे येण्याचे भाग्य मला लाभले, मी त्यांचा आभारी आहे.
वीर सावरकरांच्या स्मृतीला मी मनापासून श्रद्धांजली अर्पण करतो. ह्या सभेची सांगता एकेकाळी ज्या गीताने आपले सारे राष्ट्र जागृत झाले होते त्या त्या गिताचे पडसाद ह्या बंदिक्षेत्रात उठवून आपण करुया. मुक्त मनाने वंदेमातरम गाऊ या धन्यवाद !
[२६ फेब्रुवारी १९८३ ह्या दिवशी, अंदमानच्या सेल्युलर तुरूंगातील मैदानात केलेल्या पु.ल.देशपांडे यांच्या भाषणावरून.]

शिवराज तिवारी, सौजन्य – लोकसत्ता

पाश्चिमात्य राष्ट्रांहून भारताची राष्ट्र म्हणून संकल्पना वेगळी आहे. येथे अनेक जाती, भाषा, धर्म आणि आचारविचार यांचा एक दृढ समाज आहे.  इंग्रजांनी प्रशासकीय दृष्टीने भारताचे एकीकरण केले. राजकीय राष्ट्रीयता किंवा राष्ट्रवाद ही इंग्रजांनी दिलेली देणगी आहे. स्वातंत्र्य संग्रामाच्या वेळी अखिल भारतीय राष्ट्रवाद आणि राष्ट्रीयतेचा जन्म झाला. तरी राष्ट्रीयतेमुळे प्रादेशिक अस्मिता संपली नाही. प्रादेशिक वैशिष्टय़े आणि व्यक्तित्व राखून ठेवून आमची अखिल भारतीय राष्ट्रीयता आपले कार्य करत राहिली.

वंगभंग (१९०५) चळवळीच्या वेळी देशात जे आंदोलन झाले त्यातून दिसतं की, क्षेत्रीय राष्ट्रीयता हे अ.भा. राष्ट्रीयतेचे अविभाज्य अंग आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये गांधींच्या आगमनापूर्वी मवाळ (गोखले, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, दादाभाई नौरोजी, फिरोजशाह मेहता) हे बहुजातीयता, बहुधार्मिकता आणि बहुभाषिकतेच्या सिद्धांताचा प्रचार करत होते, तर जहाल (बिपिनचंद्र पाल, रवींद्र घोष, चिदंबरम पिल्ले, लाला लजपतराय) अ. भा. राष्ट्रीयतेसोबत प्रादेशिक राष्ट्रीयतेचाही प्रचार करीत होते. १९०५-०६ मध्ये टिळकांनी अशा राज्याच्या निर्मितीसाठी पुढाकार घेऊन जेथे निवासी एकच भाषा बोलतात त्या राज्याच्या निर्मितीचा पुरस्कार केला. इंग्रजांनी पूर्वीच्या राज्यांचे संघराज्यात विलीनीकरण केले तेव्हा तेथील नैसर्गिक समरूपता, भाषिक आणि सांस्कृतिक समानता यात दुरावा निर्माण झाला. त्यामुळे भाषिक राज्याची मागणी पुढे आली.

वंगभंगानंतर देशव्यापी आंदोलनाने स्वदेश आणि स्वराज्याचे विचार ठळक केले. मुंबईतील कामगारांचे आंदोलन, लोकमान्य टिळकांचा खटला, १९०७ च्या सुरत अधिवेशनातील घटना तसेच तेलुगू भाषकांच्या वेगळ्या राज्यासाठी १९११ मध्ये आंध्र महासभेची स्थापना व मद्रास विधानसभेत आंध्र प्रदेश निर्मितीचा प्रस्ताव, यामुळे भाषावार राज्यरचनेच्या विचारांच्या प्रसारास मदत झाली.

१९११ मध्ये लॉर्ड हॉर्डिगनी बंगालचे एकीकरण, बंगालपासून बिहार वेगळा करून नव्या हिंदी भाषक राज्याची स्थापना तसेच ओरिसा (ओरिया भाषकांसाठी) राज्याची निर्मिती करण्याची शिफारस केली होती. याच विचारांच्या प्रभावामुळे १९२०मध्ये काँग्रेसची भाषेच्या आधारावर पुनर्निर्मिती झाली. १९१५ मध्ये मुंबई अधिवेशनात डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांनी भाषावर पुनर्निर्मितीचा प्रस्ताव मांडला. मात्र या प्रस्तावामुळे विघटनप्रक्रिया जन्माला येईल, असं म्हणत उत्तर प्रदेश, बिहारच्या नेत्यांनी विरोध केला. आंध्रच्या काही नेत्यांनी १९१६च्या लखनऊ अधिवेशनात हा प्रस्ताव सादर केला. तो मंजूर झाला नाही. तिसऱ्यांदा १९१७च्या कलकत्ता अधिवेशनात डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांनी हा प्रस्ताव मांडला तेव्हा प्रस्तावाच्या बाजूने आणि विरोधात जोरदार चर्चा झाली. गांधीजींनी त्या वेळी असं म्हटलं की, या मुद्दय़ावर सध्या निर्णय न घेतलेला बरा. मात्र त्याचा अर्थ असा नव्हता की गांधीजी भाषावार राज्यनिर्मितीचे समर्थक नव्हते. वास्तविक प्रादेशिक भाषांचा विकास होऊन त्या माध्यमातून स्वातंत्र्यलढय़ासाठी जनजागृती व्हावी, ही त्यांची इच्छा होती.

काँग्रेसच्या भाषावार पुनर्निर्मितीपासून नेहरू  अहवालाच्या पूर्वीपर्यंतचा काळ म्हणजे सन १९२० ते १९२८ हाही लक्षणीय आहे. काँग्रेस संघटन २० भागांत होऊनही यात हिंदी आणि उर्दूचा वेगळा उल्लेख नव्हता. हिंदी आणि उर्दूला हिंदुस्थानी भाषा म्हटलं जायचं.  आंध्र महासभेने पृथक राज्याची मागणी वार्षिक अधिवेशनात लावूून धरली होती. आंध्रच्या जनतेचे अनुकरण करीत भाषावार राज्यरचना व प्राथमिक शाळा ते विद्यापीठ स्तरापर्यंत प्रादेशिक भाषेत शिक्षणाची मागणी तमिळ, मल्याळम, मराठी, गुजराती, उडिया व बंगला जनतेने लावून धरली. ‘प्रादेशिक स्वायत्ततेसाठी भाषावार राज्यरचनेच्या पूर्वी याची आवश्यकता आहे,’ हे टिळकांचे म्हणणेही प्रचारात येऊ लागले.

नेहरू रिपोर्टनेही भाषिक राज्यनिर्मितीस बळकटी दिली. १९२८ मध्ये अलाहाबादेत झालेल्या सर्वपक्षीय संमेलनात मोतीलाल नेहरूंच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. भाषिक राज्यरचनेवरचा समितीचा अहवाल हाच नेहरू रिपोर्ट. गंभीरपणे व वैज्ञानिक रीतीने भाषावार राज्ये स्थापण्याची शिफारस केलेला हा प्रथम अहवाल.

अहवालात नमूद मुद्दय़ांमध्ये म्हटले होते की,  ब्रिटिश सरकारने आपल्या सोयीसाठी केलेले प्रदेशांचे विभाजन निराधार व अस्वाभाविक आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक, राजनैतिक व सांस्कृतिक प्रगतीत अडथळा येतो. भौगोलिक, ऐतिहासिक, आर्थिक, भाषिक, प्रशासनिक सुविधा नजरेसमोर ठेवून व विशेषत्वाने नागरिकांच्या भावना, आकांक्षाची कदर करीत राज्यांची स्थापना व्हावी. यात असाही मुद्दा होता  की व्यक्ती व समाजाच्या समग्र विकासात त्यांच्या मातृभाषेचे फार मोठे योगदान असते, हे लक्षात घेत शिक्षण मातृभाषेत देण्यात यावे.

राष्ट्रीय काँग्रेसने नेहरू अहवालाचा स्वीकार केला, पण ब्रिटिश सरकारने याकडे लक्ष दिले नाही. काँग्रेस आपल्या अधिवेशनात नेहरू रिपोर्टची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव पारित करत राहिली. लंडनमध्ये झालेल्या गोलमेज परिषदेत आंध्र, कर्नाटक व उत्कल (ओरिसा)शी संबंधित संघटनांनी भाषावार राज्यनिर्मितीच्या मागणीसाठी ब्रिटिश सरकारला निवेदने दिली.

याच काळात इतर भाषांच्या प्रदेशांतही भाषावार राज्याची मागणी पुढे येऊ लागली. संयुक्त महाराष्ट्र, महागुजरात, विशालांध्रा आणि ऐक्य केरळच्या मागणीसाठी भाषिक संघटन काँग्रेसवर आणि ब्रिटिश सरकारवर दबाव टाकू लागले. दरम्यान प्रजासत्ताक भारताचे संविधान तयार होत होते. भाषावार राज्याची मागणी तीव्र व व्यापक झाली होती. म्हणून संविधान-सभेने या विषयाचे अध्ययन करून अहवाल सादर करण्यासाठी ‘धर’ आयोग स्थापन केला. धर आयोगाने १०-१२-१९४८ मध्ये अहवाल दिला. त्यात सैद्धांतिक दृष्टीने भाषावार राज्य गठन केले जावे, पण वर्तमान परिस्थितीत सर्वप्रथम देशाच्या आर्थिक विकासाला व सुरक्षेला प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे, असे सुचविले होते. शिवाय भाषावार राज्य केल्याने अल्पसंख्याकांची समस्याही उभी राहील व ती देशाच्या ऐक्यासाठी घातक ठरेल; दहा वर्षांपर्यंत हा प्रश्न स्थगित ठेवावा, असेही म्हटले होते. या अहवालाचा सर्वत्र, विशेषत: दक्षिणेत निषेध झाला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपण दिलेल्या पूर्ववचनाचा भंग केला, त्यामुळे जनतेची निराशा झाली.

परंतु जयपूरमध्ये १९४८ ला झालेल्या काँग्रेस अधिवेशनात आंध्र, केरळ, कर्नाटक व महाराष्ट्रातील प्रतिनिधींनी भाषावार राज्ये स्थापण्याची पुन्हा मागणी मांडली. या अधिवेशनात जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल व डॉ. पट्टाभी सीतारामय्या यांची एक समिती स्थापून काँग्रेसच्या पूर्वनिर्णयाबाबत वर्तमान परिस्थितीत विचार करून रिपोर्ट सादर करण्याची जबाबदारी तिच्यावर सोपविण्यात आली.  खश्ढ समितीने एप्रिल १९४९ मध्ये आपला अहवाल काँग्रेसला सादर केला. त्या वेळी त्यांनी अशी शिफारस केली की, तत्कालीन परिस्थितीत भाषावार राज्ये स्थापणे योग्य नाही. देशात विभाजनवादी शक्तींची ताकद त्याने वाढेल. तसेच देशाने आर्थिक स्वावलंबन प्राप्त केलेले नसल्याने राजनैतिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठीच तूर्त समग्र स्रोत वापरले जावेत.
१९५१मध्ये स्वामी सीताराम यांनी आंध्र राज्याच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला आरंभ केला. त्यांच्या समर्थनात जागोजागी सामूहिक उपोषणे झाली. ३५ दिवसांनंतर विनोबाजींच्या आग्रहानंतर त्यांनी उपोषण मागे घेतले. विनोबाजींनी केंद्र सरकारला विनंती केली की, आंध्र राज्य स्थापन करावे. पण सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. डिसेंबर १९५२ मध्ये पृथक आंध्र राज्याच्या मागणीसाठी पोट्टी श्रीरामलू यांनी ५८ दिवस आमरण उपोषण करून आत्माहुती दिली. यामुळे असंतोष माजला व आंदोलने सुरू झाली. त्यामुळे पं. नेहरूंना आंध्र राज्य स्थापण्याची घोषणा करावी लागली.

आयोगाने गुजराती व पंजाबी वेगळ्या राज्याची शिफारस केली नव्हती. तरी जनतेच्या मागणीच्या आधारावर सन १९६० मध्ये मुंबई राज्याचे विभाजन करून गुजरात व महाराष्ट्र राज्ये स्थापन करण्यात आली. सन १९६३ मध्ये नागालँड हे राज्य आसामपासून वेगळे काढण्यात आले. १९६६ मध्ये पंजाबचे विभाजन करून हरियाणा अस्तित्त्वात आला.

पंडित नेहरू देशाच्या सुरक्षेला विकास आणि देशातील आधुनिकीकरण या कार्याला  महत्त्व द्यायचे. लोकशाही प्रक्रियेत देशाच्या स्वस्थ राजकारणात भाषाई तत्त्वाने प्रमुख भूमिका बजवावी अशी पंडित नेहरूंची इच्छा कधीच नव्हती. म्हणूनच भाषावार राज्यनिर्मितीसाठी जेव्हा मोठी आंदोलने झाली. तेव्हा प्रशासकीय व्यवस्थेत अडचणी निर्माण झाल्या तेव्हा पंडित नेहरू असे म्हणाले की, आंदोलने अविवेकपूर्ण आणि घातक आहेत. असे विचार एकटय़ा नेहरूजींचे नव्हते तर अनेक नेत्यांचे विचारही असेच होते. एवढेच नव्हे तर आंध्रच्या आंदोलनाच्या वेळी रायलसीमेच्या काही नेत्यांचे विचारही नेहरूंच्या विचाराशी मेळ खात असे. पंडितजींनी जेव्हा बघितले जनतेची मागणी मोठय़ा प्रमाणात स्वतंत्र आंध्र राज्यनिर्मितीसाठी आहे तेव्हा एका खऱ्या लोकशाहीवादी नेत्याची भूमिका वठवून पृथक आंध्र राज्याची निर्मितीची घोषणा केली. नंतर पूर्ण देशात भाषेच्या आधारावर राज्यनिर्मिती करण्यासाठी फाजल अली आयोगाची निर्मिती करण्यात आली ज्या आधारावर आजही सर्व प्रमुख भाषिकांसाठी स्वतंत्र राज्ये कायम आहेत आणि ती राज्ये आपल्या भाषेच्या माध्यमातून जनतेची सेवा करीत आहेत व आपल्या भाषेच्या विकासासह आपल्या जनतेचाही विकास करू शकतात. गांधीजींनी म्हटले होते की, ‘‘जर आमची इच्छा असेल, की आमच्या प्रादेशिक भाषांचा समग्र विकास व्हावा तर जरुरी आहे की, भाषावार राज्य गठन व्हावे,  हिंदुस्थानी भारताची संपर्कभाषा, राष्ट्रभाषा आहे. पण ही प्रादेशिक भाषांचे स्थान घेऊ शकत नाही. हिंदुस्थानी प्रदेशामध्ये शिक्षणाचे माध्यम होऊ शकत नाही. इंग्रजी तर अजिबात नाही. गांधीजींच्या विचारानुसार स्वतंत्र भारताने त्वरित भाषावार प्रांताचेच निर्माण केले नाही व निर्माणानंतरही प्रादेशिक भाषांना प्रशासनात व शिक्षण व्यवस्थेत उचित स्थान दिले गेले नाही. त्यामुळे भाषिक संघर्ष उभे राहिले. हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये परस्पर विद्वेष पसरला आणि हिंदी व अन्य भारतीय भाषांचा विकासही कुंठित केला गेला आणि या संघर्षांमुळे इंग्रजीचे वर्चस्व वाढत गेले व वाढतच आहे. हिंदीसहित संपूर्ण प्रादेशिक भाषांची घोर उपेक्षा होत आहे. मध्य देशाची भाषा असल्याने व बहुसंख्यांची भाषा असल्याने हिंदी भाषेचे नेतृत्व करायला पाहिजे होते, पण ते झाले नाही. जेव्हा भाषावार राज्ये झाली तेव्हापासून जर आपल्या प्रादेशिक सरकारांनी भाषावार राज्यरचनेमागचा जो विचार होता त्याला यथायोग्य वळण दिले असते तर आजची परिस्थिती उद्भवली नसती. दुर्दैवाने तिथली सरकारे आजही नोकरशाही व्यवस्थेतून बाहेर निघाली नसून लोकशाही खऱ्या अर्थाने, स्वातंत्र्यानंतर ६२ वर्षे झाली तर, जनतेच्या माध्यमातून कार्यरत होत नाही.

आमचे नेते व प्रबुद्ध जनता हे विसरली की, समाजाचा विकास त्या समाजाच्या भाषेच्या माध्यमातूनच होऊ शकतो, इतर भाषांतून तो शक्य नाही. याचा आमचे राज्यकर्ते आणि सुजाण जनतेलाही विसर पडलेला दिसतो.