Posts Tagged ‘राजकारण’

गिरीश कुबेर, सौजन्य – लोकसत्ता

कोणाच्या तरी मरणाचा कोणाला तरी आनंद व्हावा, हे तसं वाईटच. तसा तो होत असेल तर त्यातून काही गंभीर दोष दिसतो. जो गेला त्याचाही आणि जे त्यानंतर आनंद व्यक्त करतात, त्यांचाही. अल जमाहिरिया अल अरेबिया अल लिबिया अल शाबिया अल इश्तिराकिया अल उझ्मा या देशातला असा दोष दिसून आला. हा देश म्हणजे लिबिया आणि वर लिहिलं ते त्याचं खरं नाव.

कर्नल मुअम्मर गडाफी याच्या निधनानं लिबियाच्या रखरखीत प्रदेशात जो काही आनंद साजरा केला जातोय, तो अंगावर येतो. हातात स्टेनगन, एके ४७ घेतलेली कोवळी पोरं लिबियाची राजधानी त्रिपोलीच्या रस्त्यांवरनं फिरतायत..आणि फटाके उडवावेत तशा बंदुकांच्या फेऱ्या झाडतायत.. हा उन्माद कोणाही सुसंस्कृताची काळजी वाढवेल, असाच. एके काळी. म्हणजे बाराव्या/तेराव्या शतकात या त्रिपोलीतली वाचनालयं त्यांच्या ग्रंथसंग्रहासाठी ओळखली जात होती. त्यावेळच्या राजानं जेव्हा ख्रिस्ती फौजांचा पराभव केला, तेव्हा विजयाची किंमत त्यानं पुस्तकाच्या रूपानं वसूल केली होती. म्हणजे त्यानं पराभूताकडून रोख खंडणी घ्यायचं सोडून पुस्तकं घेतल्याची नोंद आहे. खरं तर आताचा राजासुद्धा असं काही करणार नाही. मुळात हल्ली राजा पुस्तकं वाचत नाही ते सोडा. म्हणजे एके काळच्या इतक्या समृद्ध संस्कृतीच्या पोटी हा असा गडाफी निपजला आणि त्याला मारलं गेल्यावर हषरेल्हास साजरा करणारी प्रजाही निपजली.

हा देश खरं तर होता ऑटोमान साम्राज्याचा भाग. पण पुढे त्रिपोलीच्या अहमद करमनली यानं इस्तंबूलच्या पाशाला हरवलं आणि काही काळ का होईना, या साम्राज्यातून आपली सुटका करून घेतली. नंतर या करमनली घराण्याला ऑटोमन साम्राज्याचा भाग बनावं लागलं. १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात इटलीची या प्रदेशावर नजर गेली. कारण फ्रान्स ही दुसरी युरोपीय महासत्ता हा प्रदेश गिळंकृत करू पाहात होती. त्यावेळच्या महासत्तांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी १८८७ पासून आपापल्यांतच करार केले आणि हा सगळा आफ्रिकी, आशियाई प्रदेश आपापसांत वाटून टाकला. त्या परिसरात राहणारे नागरिक हे जणू मातीचे गोळे आहेत, त्यांना काही भावभावना नाही, अशा पद्धतीनं त्यांची वाटणी करण्यात आली. त्यानुसार इटलीच्या वाटय़ाला पूर्वीच्या ऑटोमन साम्राज्यातला त्रिपोली आणि सायरेनिकाचा भाग आला. इतर भाग ब्रिटन, फ्रान्स आणि रशिया यांच्यात विभागले गेले. १९११च्या सुमारास यातल्या वाटय़ावरनं इटली आणि टर्की यांच्यात युद्ध झालं. महासत्तांच्या युद्धात विनाकारण चिल्लर मरतात, तसं इथंही झालं. ती टर्की राहिली बाजूला. नंतर त्रिपोलीयन आणि इटलीचे सैनिक हेच एकमेकांत लढू लागले. नंतर तर पहिलं महायुद्धच सुरू झालं. तेव्हाही हे सगळेच प्रदेश मग एकमेकांच्या विरोधात लढू लागले. कारण त्यांचे मालक एकमेकांच्या विरोधात लढत होते.

या प्रदेशाला असा काही चेहरा मिळाला नव्हता तोपर्यंत. युद्धानंतर इटली आणि ब्रिटन वगैरेंत काही करारमदार झाले आणि सय्यद इद्रिस याच्याकडे या प्रदेशाची सूत्रं दिली गेली. नंतर दुसऱ्या महायुद्धात हा सगळा प्रदेश तर युद्धभूमीच होता. जनरल रोमेलची आफ्रिकी बटालियन आणि ब्रिटिशांचं आठवं दळ यांच्यात या प्रदेशात तुंबळ युद्ध झालं. या युद्धानंतर जगाची वाटणीच झाली. पण या प्रदेशाचं काय करायचं हे नक्की होईना. त्यामुळे ब्रिटनकडे सायरेनिका आणि त्रिपोली गेलं आणि फ्रेंचांनी फेझ्झन भागात ठाण मांडलं. या वाटणीवर युनोची नजर होती. अखेर बरंच चर्वितचर्वण झाल्यानंतर या प्रदेशाचा स्वतंत्र देश करायचा निर्णय झाला.
लिबियाचा जन्म १९५१चा. एका बाजूला इजिप्त, सुदान, दुसरीकडे चाड आणि नायजेर, तर तिसरीकडे अल्जिरिया आणि टय़ुनिशिया तर चौथ्या बाजूने भूमध्य समुद्र. या सगळय़ाच्या बरोबर मध्ये हा लिबिया. त्यामुळे तो आफ्रिकीही आहे आणि अरबस्थानाशी असलेल्या भौगोलिक सख्ख्यामुळे आशियाईही वाटतो.

राजे इद्रिस यांच्याकडे या नव्या देशाची सूत्रं होती. तसे सुखातच होते म्हणायचे ते. कारण देश स्वतंत्र झाल्यानंतर आठच वर्षांनी लिबियाच्या भूमीत तेल सापडलं होतं. १९५९ सालच्या या घटनेनं या देशाला अचानक महत्त्व मिळालं आणि अमेरिकेला या प्रदेशात पहिल्यांदा मोठा रस निर्माण झाला. त्याआधी १९४४ साली, म्हणजे पहिलं महायुद्ध संपलंही नव्हतं तेव्हा, अमेरिकेनं सौदी राजा महंमद बिन इब्न सौद याला तेलासाठी तब्बल ६० वर्षांच्या करारात बांधून घेतलं होतं. त्यासाठी रुझवेल्ट खास सुवेझ कालव्यात अमेरिकी युद्धनौका घेऊन आले होते. त्यामुळे तेलाचं महत्त्व या देशाला सगळय़ात आधी कळलं होतं आणि अमेरिकी कंपन्या तेलाच्या वासावरच होत्या. १९५९ साली लिबियात तेल सापडलं आणि सगळय़ांची पावलं त्या देशाकडे वळली. या कंपन्यांची कामाची पद्धत सोपी होती. एक तर तेल ज्या ज्या प्रदेशांत सापडलं, ते सगळेच्या सगळे देशप्रमुख मागास होते. त्यामुळे त्यांना पटवणं सोपं होतं. राजे इद्रिस यांचंही तसंच होतं. चार पैसे त्यांच्या तोंडावर फेकले, ऐषारामाच्या रसदीची सोय झाली आणि राजे इद्रिस यांनी आपला भूप्रदेश तेल कंपन्यांसाठी खुला केला.

हा काळ होता अरब राष्ट्रवादाच्या जन्माचा. शेजारच्या इजिप्तमध्ये गमाल नासर हे या प्रदेशाची संघटना बांधण्याच्या प्रयत्नात होते. अमेरिकेच्या विरोधातली त्यांची भूमिका चांगलीच गाजली होती. त्या प्रदेशातले देशोदेशींचे तरुण त्यांच्या नासरप्रेमाने भारले गेले होते. त्यातलाच एक होता कर्नल मुअम्मर गडाफी. आपला देश लुटला जातोय आणि राजे इद्रिस यांना त्याचं काहीच वाटत नाहीये, हे त्याला दिसत होतं. आपल्या देशाला लुटणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्याला सत्ता हवी होती. ती सरळ मिळणार नाही, हे दिसतच होतं. ती त्यानं वेगळय़ा मार्गानं मिळवली. १ सप्टेंबर १९६९ या दिवशी लिबियात रक्तहीन उठाव झाला आणि राजे इद्रिस यांना पदच्युत करून गडाफी सत्तेवर आला.
लुटणाऱ्यांना धडा शिकवण्याची भाषा करणारा गडाफी स्वत:च मोठा लुटारू बनला. काल अखेर तो मारला गेला. म्हणजे आपल्या मरणानेच मेला तो.

पण या सगळय़ामागचा महत्त्वाचा घटक आहे तो तेल.  जगाचा डोळा आहे तो या तेलावर. कारण लिबियातलं तेल हे सौदी तेलाइतकं चांगलं असतं. त्याच्या शुद्धीकरणासाठी जास्त खर्च करावा लागत नाही आणि ते मिळवण्यासाठी जास्त खोल खणावंही लागत नाही. त्याचमुळे एकापाठोपाठ एक बडय़ा तेल कंपन्यांनी लिबियात आपलं घर केलं होतं आणि गडाफी त्यांना डोळय़ात खुपायला लागला. कारण या तेल कंपन्यांना तो शांतपणे जगू देत नव्हता. एकटा लिबिया दिवसाला सध्या एक कोटी ६० लाख बॅरल्स तेल जगाच्या बाजारात ओतत असतो. सध्या तेलाचा दर प्रति बॅरल १०० डॉलरच्या आसपास आहे. यावरून यात किती पैसा गुंतला आहे, ते कळू शकेल. सिर्ते, मुर्झुक आणि पेलजिया आदी परिसरात हे तेलसाठे आहेत. यातही सगळय़ात मोठा साठा आहे तो सिर्तेमध्ये. यातला योगायोग. म्हणजे त्याला योगायोग म्हणायचं असेल तर. हा की हेच नेमकं गडाफी याचंही गाव आहे. तो मारला गेलाही त्याच गावात.

गडाफी क्रूरकर्मा होता यात काही शंका नाही. मानवी हक्कांची पायमल्ली तो सर्रास करत होता, त्याबाबतही कोणाचं दुमत असणार नाही. पण तेल कंपन्यांना जोपर्यंत तो फायदेशीर ठरत होता तोपर्यंत त्याचं अमानुषत्व कधी कोणाच्या डोळय़ावर आलं नाही. म्हणजे हे इराकच्या सद्दाम हुसेन याच्यासारखंच झालं. जोपर्यंत त्यानं अमेरिकेच्या इराकमधल्या तेल कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण केलं नव्हतं, तोपर्यंत सद्दाम अमेरिकेचं लाडकं बाळ होतं. इतकं की १९८१ साली खुद्द डोनाल्ड रम्सफेल्ड यांनी त्याला जैविक अस्त्रांची खेळणी पुरवली होती. या अस्त्रांनी पुढे त्यानं लक्षावधींचे प्राण घेतले. अमानुष अत्याचार केले. पण कोणी काहीही म्हणालं नाही. पुढे अमेरिकी तेल कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण त्यानं केलं नसतं, तर त्याच्या या मानवी हक्क उल्लंघनांचा वगैरे गाजावाजा झालाही नसता. त्याही आधी इराणचे महंमद मोसादेघ यांचंही असंच झालं. त्यांना मारलं नाही. पण सत्तेवरनं उलथवून जन्मभरासाठी तुरुंगात डांबलं गेलं. तिथेच ते गेले. ज्यांनी ज्यांनी तेल कंपन्यांना आव्हान दिलं, ते असे बेमौत गेले.

जे हात आपल्याला भरवतात त्या हाताचा चावा. अगदी हुकूमशहा झाला तरीही.घ्यायचा नसतो, हे साधं जगण्याचं तत्त्व सद्दाम हुसेन विसरला. गडाफीही. हे तेल नसतं तर लिबियात कोण कोणावर किती अत्याचार करतोय, याची उठाठेव करायला कोणी गेलंही नसतं.

तेलाचा शाप हा असा असतो.

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

कोणाची प्रतिभा वेड लावते. कोणाचे ज्ञान आदर उभा करते. कोणाची वाणी, तर कोणाची लेखणी प्रेमात पाडते. आपल्या प्रज्ञेची दीप्तिमान आभा काही जणांभोवती प्रकाशाचे देखणे वलय नटवीत असते आणि या साऱ्याच गोष्टी एकत्र असतील, तर त्यातून उभे होणारे व्यक्तिमत्त्व एकाच वेळी आदराएवढाच दराराही उत्पन्न करते. हे व्यक्तिमत्त्व सहवासाने वा योगायोगाने जवळचे असेल तर त्यामुळे आपलीच उंची वाढून आपण श्रीमंत झाल्याचा अनुभव येतो. ज्याच्या किंवा जिच्या सहवासात आपली उंची वाढल्याचा असा संपन्न अनुभव येतो, तो किंवा ती व्यक्ती आपल्या प्रेमाचा विषय आहे असे समजायचे असते असे एका प्रख्यात अमेरिकी कादंबरीकाराचे म्हणणे आहे. आपल्या जवळच्या आणि दूरच्या स्नेहीजनांना अशा उंचीचा अनुभव देणारे व्यक्तिमत्त्व नरहर कुरुंदकर या पंडिताला लाभले होते.

ज्या माणसावर त्याच्या हयातीत आणि मृत्यूनंतर निकटच्या व दूरच्या मित्रांनी, टीकाकारांनी, चिल्लरांनी आणि मान्यवरांनी खूप सारे लिहिले; त्यावर एवढया दिवसांनी आणखी काय सांगायचे राहिले असते? पण काही माणसांची गंमतच अशी की त्यांच्याविषयी कितीही बोलले वा लिहिले तरी आणखी खूपसे बोला-लिहायचे राहून गेले आहे असे वाटावे.

चाळीसेक वर्षांपूर्वीच्या एका हिवाळया रात्री दोन-अडीचच्या सुमारास कुरुंदकर चंद्रपूरच्या रेल्वे स्थानकावर पॅसेंजरच्या तिसऱ्या वर्गाच्या डब्यातून उतरले. त्यांना उतरून घ्यायला आम्ही काहीजण फलाटावर थांबलो होतो. स्थानकावर चहा घेतला तेव्हा ते म्हणाले, ‘आता जरा तंबाखूचं पान बघा.’ त्या एका वाक्याने आमच्यातील अंतर घालविले.

सांगणाऱ्यांनी त्यांच्या विद्वत्तेएवढेच त्यांच्या विक्षिप्तपणाबद्दल ऐकवले होते. त्यांच्या लिखाणाने त्यांच्या विचारांच्या लख्खपणाची ओळख पटली होती. निष्कर्षावर येण्याची त्यांची तऱ्हा दीपवणारी, बुध्दीला जबर चकवा देणारी आणि तरीही वास्तवालाच धरून राहणारी होती. पुढल्या प्रवासात मी त्यांना प्रश्न विचारू लागलो. राजकारण, इतिहास, अर्थकारण, साहित्य. आणि सगळा प्रवास संपला तरी खूप विचारायचे राहून गेले. जरा विचार केला असता तर जे आपल्यालाही गवसू शकले असते ते अतिशय गंभीर आणि अतिशय जवळ असलेले सत्य हा माणूस इतक्या सहजपणे आपल्यासमोर मांडत असे की हवी ती वस्तू समोर असून दिसू नये आणि हताश झाल्यावर तिचे अस्तित्व एकदम जाणवावे तसे त्यांच्या वाचक श्रोत्यांना वाटत राहावे.

‘काँग्रेस ही हिंदूंची देशातली सर्वांत मोठी संघटना आहे’ हे त्यांचे विधान काँग्रेससकट कोणालाही उघडपणे मान्य करता येणे कठीण असले तरी खरे आहे. काँग्रेसला तिच्या सेक्युलरपणाच्या वावदुकीपायी ते खरे असून तसे म्हणता आले नाही आणि हिंदुत्ववाद्यांना खरे पण उघड दिसत असूनही ते कधी मान्य करता आले नाही. ज्या संघटनेमागे देशातील हिंदू बहुसंख्येने उभा राहिला ती संघटना ‘हिंदूंची’ की ज्याला हिंदूंनी सातत्याने नाकारले ते नेतृत्व हिंदूंचे असा प्रश्न कुरुंदकर विचारायचे. स्वातंत्र्यापूर्वी या देशातील मुस्लिमांचा वर्ग मुस्लीम लीगसोबत राहिला. त्या काळात हिंदू कोणाबरोबर होते या प्रश्नाचे खरे उत्तर गांधींसमवेत व काँग्रेससमवेत हे आहे. हिंदू ज्यांच्यासमवेत सातत्याने राहिले त्यांना हिंदूविरोधी म्हणायचे आणि ज्यांना कधी 7-8 टक्क्यांहून अधिक हिंदू मते मिळविता आली नाहीत त्यांनी आपल्या पक्ष व संघटनांना हिंदू म्हणवून घ्यायचे यातील विसंगती उघड आहे आणि तरीही राजकारणातल्या जाहीर भूमिकांमुळे ती तशी स्वीकारणे सगळयांना अडचणीचे आहे. ज्यांच्यासमवेत हिंदू नाहीत त्यांनी स्वत:ला हिंदूचे संघटन म्हणवून घेणे सोयीचे असेल तरी इतरांनी ते तसे मानण्याचे कारण नाही एवढेच सांगून कुरुंदकर थांबत नसत. ते म्हणत, ‘जे काँग्रेसला हिंदूंचे संघटन मानत नाहीत, ते बहुजन समाजालाही हिंदू मानत नाहीत असे म्हणावे लागेल.’

मी म्हणालो, या तर्काने कम्युनिस्ट आणि समाजवादी हे पक्षही हिंदूंचेच पक्ष ठरतात. त्यावर उत्तर देताना ते म्हणाले, ‘ते खरेच आहे. या देशातील हिंदुत्ववाद्यांना त्यांच्या राजकीय विचारांच्या हिंदूंचा पक्ष हवा आहे. नुसते हिंदूंचे संघटन नको. हिंदुत्व हा त्यांच्या धारणेचा भाग नसून धोरणाचा भाग आहे’.
हे वास्तव स्वीकारायचे ठरविले की राजकारणातील सगळयाच धारणा बदलतात आणि त्याची सगळी मांडणीही नव्याने करावी लागते. या नव्या मांडामांडीत हातचे खूप सोडावे लागते आणि ते करण्याची कोणाची तयारी नसते. परिणामी माणसे जाणूनबुजून खोटया भूमिका घेतात, समजून असत्ये मांडतात आणि वास्तवापेक्षा भूमिकांचे माहात्म्य माजवून खऱ्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न ठरवून करीत राहतात. कुरुंदकरांना अशी अवघड सत्ये सहजपणे सांगणे जमत असे; ती नाकारता येणे इतरांना अवघड होत असे. परिणामी त्यांना कुरुंदकरांचा मोहदेखील खऱ्याएवढाच पडायचा, त्यांची अडचणदेखील खऱ्याएवढीच व्हायची.

परभणीतील एका मराठा परिषदेत त्यांनी शिवाजी महाराजांवर एक प्रदीर्घ आणि अप्रतिम भाषण दिले आणि सगळा श्रोतृवृंद त्या भाषणाने धुंद झाला असताना त्यांनी समारोप केला. ‘शिवाजीराजा महान होता, हे आता कोणाही इतिहासकाराने नव्याने सांगण्याची गरज नाही. पण तुम्हा मराठयांनी शिवाजी आपला मानण्याचे कारण नाही. शिवाजी स्वत:ला राजपूत म्हणवीत होता.’ या समारोपाने सभेची धुंदी उतरली आणि तिने वक्त्यांच्या निषेधाचा ठराव त्याच सभेत तात्काळ मंजूर केला. खूप दिवसांनी या प्रसंगाविषयी सांगताना ते म्हणाले, ‘इतिहासपुरुषांची जातवार वाटणी करण्याचा प्रकार थांबवण्याची गरज आहे. त्यासाठी हे धक्के आवश्यकच आहेत’. कुरुंदकरांची मांडणी नाकारणे कुणाला जमणारे नव्हते. त्यांचा निषेध हा सोपा मार्ग होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवर भाषण करताना ते म्हणाले, ‘बाबासाहेब दलितांचे उध्दारकर्ते आणि या देशाचे भाग्यविधाते होते; पण त्यांना भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणणे मला मान्य नाही. ही घटना 1935 च्या कायद्याची सुधारलेली आवृत्ती आहे. संघराज्यपध्दती आणि सांसदीय शासन ही या घटनेची दोन्ही महत्त्वाची वैशिष्टये बाबासाहेबांना मान्य नव्हती. शेतजमिनींचे राष्ट्रीयीकरण त्यांना घटनेत हवे होते, ते तीत आलेले नाही. आपण घटना समितीत अत्यंत अल्पमतात असल्याने आपला संकोच झाल्याचे त्यांनीच अनेकवार सांगितले. ही घटना जाळून टाकणारा पहिला इसम होणे मला आवडेल, हे त्यांचेच उद्गार आहेत. ते काढणाऱ्या बाबासाहेबांना तिचे शिल्पकार म्हणणे ज्यांना आवडते वा ज्यांना सोयीचे आहे त्यांच्याविषयी मला राग नाही. माझे म्हणणे एवढेच की ते खोटे आहे’.

अशावेळी सामान्य माणसाला पडणारा खरा प्रश्न एखाद्याने एवढे खरे बोलावे काय हाच असतो. प्राचार्य राम शेवाळकर कुरुंदकरांचा उल्लेख ‘माझा बुध्दिमत्त मित्र’ असा करीत. कुरुंदकरांच्या मृत्यूनंतर एकाने त्यांच्या या वृत्तीला धश्चोट म्हटले. खरेपणाचे नागडेपण एवढे उघडे करायला रस्त्यात उभे राहून लोकांची धोतरेच कशाला फेडायला हवीत, हा या प्रश्नामागचा खुळा भाव आहे.

त्यांच्या महाविद्यालयात स्नेहसंमेलनाच्या पाहुण्या म्हणून ज्ञान आणि वय या दोन्ही बाबतीत वृध्द असणाऱ्या एक विदुषी आल्या. परिपाठाप्रमाणे पाहुण्यांचे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांसमवेत एक छायाचित्र काढायचे होते. प्राध्यापकांनी आपापल्या जागा घेतल्या. छायाचित्रकार तयार झाला. पण पाहुण्याबाई विद्यार्थ्यांच्या घोळातून बाहेर यायला तयार नव्हत्या. एकदा-दोनदा सांगून पाहिले तरी त्यांचे मुलांशी बोलणे संपेना. शेवटी प्राचार्य कुरुंदकरांनी बाईंचा दंड धरला आणि जवळजवळ ओढतच त्यांनी बाईंना त्यांच्या जागेवर आणून बसविले. बाई संतापल्या. म्हणाल्या, ‘पुरुषांनी असं अंगचटीला गेलेलं मला आवडत नाही.’ प्राचार्य थंडपणे म्हणाले, ‘का, तुम्हाला मुलंबाळं नाहीत का? बाई, मी तुमच्या नातवंडाच्या वयाचा आहे.’ बाई ओशाळल्या, कुरुंदकरांच्या पाठीवर हात ठेवीत म्हणाल्या, ‘मला माफ करा.’

‘तुम्ही आजन्म असे अविवाहित का राहिलात?’ असा प्रश्न अण्णासाहेब सहस्रबुध्दयांसारख्या ज्येष्ठ गांधीवाद्याला पहिल्या भेटीत विचारण्याचे धारिष्टय त्यांचेच आणि अण्णांनी त्यावर ‘दारिद्रयामुळे’ असे उत्तर दिले तेव्हा ‘दारिद्रयामुळे माणसे अविवाहित राहू लागली, तर देशातल्या दारिद्रयाचा आणि जगातल्या लोकसंख्येचाही प्रश्न सुटेल’ असा अभिप्राय ऐकविण्याचे धाडसही त्यांचेच.

राज्यशास्त्राच्या प्राध्यापकांसाठी मी त्यांचे सेक्युलॅरिझमवरचे एक व्याख्यान ठरविले तेव्हा त्यांना न ओळखणाऱ्या राज्यशास्त्रातल्या काही बडयांनी हा मराठीचा प्राध्यापक येथे कशाला असा प्रश्न विचारला. राजकारणावरील त्यांची पुस्तके कोणती असे एकाने विचारले. त्यावर ‘शिवरात्र’, ‘जागर’ अशी त्यांच्या पुस्तकांची नावे ऐकूनही त्यापैकी काहींनी भुवया उंचावल्या. पण ‘लोकशाहीचा अर्थ जसा ग्रीकांपुढे होता तसा तो आपल्यापुढे नाही. तो शतकाशतकात जसा बदलत गेला, तसा सेक्युलॅरिझमचा…’ अशी सुरुवात करून कुरुंदकरांनी बायबल आणि कुराणातील सेक्युलॅरिझमचा अर्थ सांगायला जेव्हा सुरुवात केली, तेव्हा सगळया नामवंतांनी नोंदवह्या उघडून टिपणे घ्यायला सुरुवात केली. त्याच रात्री भारताच्या परराष्ट्रीय धोरणावर झालेले त्यांचे व्याख्यान ‘एकदम नवे’ असल्याचे या तज्ज्ञांनी दुसरे दिवशी एकमेकांना एकमुखाने सांगितले.

कुरुंदकरांचा संगीतावरील विचार पं. ओंकारनाथ ठाकुरांसारख्या तप:पूत कलावंताला मौलिक वाटला आणि गांधीवादाचे त्यांनी केलेले विश्लेषण आचार्य शंकरराव देवांसारख्या ज्येष्ठ गांधीवाद्याला महत्त्वाचे वाटले. वेदान्तावरचे त्यांचे भाष्य वेदान्त्यांना सुखविणारे नसले तरी त्याच्या मौलिकेतेविषयी त्यांच्या मनात शंका नव्हती. चित्रकला, सौंदर्यशास्त्र ते नवगणित अशा विषयावरील त्यांचे मूलगामी चिंतन त्या-त्या क्षेत्रातील अभ्यासूंना नुसता प्रकाशच नव्हे तर चटका देऊन गेले.

जडातून चेतनाची उत्पत्ती कशी होते यावरचे शंकराचार्यांचे ‘जशी शेणातून विंचवांची उत्पत्ती होते तसे’ हे उत्तर त्यांना प्राणिशास्त्र ठाऊक नव्हते हे सांगणारे तर आहेच पण त्यांच्या जड चेतनाच्या सगळया भूमिकांचे ठिसूळपण स्पष्ट करणारे आहे हे कुरुंदकरांचे मत वेदान्त्यांना धक्का देणारे आणि आचार्यभक्तांना डिवचणारे होते. ब्रह्मसूत्र भाष्यात शंकराचार्यांनी सूत्रांचा खरा अर्थ लावण्यापेक्षा त्यांना हवा असणारा अर्थ त्यावर लादला आहे हे त्यांचे वाक्य ऐकून त्यांच्या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या आचार्यभक्त द.वा. जोग यांनी सभात्यागच केला होता. कुरूंदकरांच्या मते ब्रह्मसूत्रे परिणामवादी आहेत. आचार्य सांगतात तशी ती विवर्तवादी नाहीत.

दुसरीकडे भांडवलदारांचा वर्ग समाजाची सगळी क्रयशक्तीच हिरावून घेत असेल तर तो आपल्या उत्पादनाची बाजारात होणारी विक्री स्वत:च थांबवतो आणि आपोआप मरतो. त्यासाठी क्रांतीची गरज कोणती हा त्यांचा मूलभूत प्रश्न मार्क्सवाद्यांना गोठवून टाकणारा होता. दामोदर कोसंबींची भारतीय इतिहासाची प्रस्तावना, देवीप्रसाद चट्टोपाध्यायांचे लोकायत, राहुल सांकृत्यायनांचे लिखाण हे त्यांच्या अभ्यासाचेच नव्हे तर चिकित्सेचे विषय. ग्रंथकाराचे प्रतिपादन त्याच्या मूळ भूमिकेनिशी समजावून घेऊन त्याविषयीचा आपला अभिप्राय अत्यंत गंभीरपणे मांडायचा. ग्रंथकारावर अन्याय न करता त्याला त्याच्या मर्यादांचे भान करून द्यायचे हा प्रयत्न. ‘महाभारत- एक सूडाचा प्रवास’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने आपल्या मांडणीच्या युक्तिवादासाठी निवडलेले सगळेच प्रसंग प्रक्षिप्त असल्याचे सांगून त्यातील प्रतिपादनाचा पायाच त्यांनी उखडला आणि त्याचवेळी एका सूडसत्रात सारे महाभारत बसवून दाखविण्याच्या लेखकाच्या ताकदीचे कौतुकही केले.

प्रत्येक समस्येचे मूळ तपासून पाहण्याची आणि परंपरेने दिलेल्या उत्तरांपेक्षा वेगळया, नव्या आणि सामान्य माणसांना सहजपणे पटणाऱ्या निष्कर्षावर येण्याची त्यांची ताकद जबर होती. या सामर्थ्याबाबतच एकदा त्यांना छेडले, तेव्हाचे त्यांचे उत्तर सरळ साधे, पण त्यांच्या नित्याच्या सवयीप्रमाणे धक्का देणारे होते. ‘व्यास काय आणि वाल्मिकी काय, बुध्द काय आणि शंकराचार्य काय, ही सगळी आपल्यासारखीच माणसे होती. त्यांनी आपल्याहून जास्तीचे काही जन्माला येताना आणले नव्हते. आपल्यापैकी कोणीही अध्ययन व प्रयत्नाने त्यांच्याएवढी स्वत:ची समज वाढवून घेऊ शकतो, एखाद्या प्रश्नांकडे ते जसे पाहत तसे आपणही पाहू शकतो आणि त्यांना समजले ते जर खरेच असेल तर ते तसा प्रयत्न करणाऱ्यालाही समजूच शकेल. ज्ञान-विज्ञानाची जेवढी साधने आपल्याला उपलब्ध आहेत तेवढी ती त्यांना नव्हती ही आपल्याला जास्तीची अनुकूल असणारी बाब आहे.’

भरताचे नाटयशास्त्र अभिनव गुप्ताच्या भाष्यावाचून समजावून घेण्याची आणि देण्याची त्यांची तयारी अशी होती. भरत अभिनव गुप्ताला कळतो तर नरहर कुरुंदकराला का समजू नये, असा त्यांचा जिद्दी प्रश्न होता. ब्रह्मसूत्रांबाबतही त्यांचा हा आग्रह होता. बादरायणाची ही सूत्रे समजावून घ्यायला शंकराचार्यांचे गाईड कशाला हवे असे ते विचारत. ही भूमिका केवळ बुध्दिवंताची वा विचारवंताची नाही. स्वतंत्र प्रज्ञेच्या माणसाची ही भूमिका आहे. कुरुंदकरांच्या प्रज्ञावादाला मंजूर असणारे किनारे फक्त माणुसकीचे होते. ‘तुम्ही बुध्दीची आणि बुध्दिवादाची मर्यादा कोणती मानता?’ या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, ‘बुध्दी आणि बुध्दिवाद, विज्ञान आणि विज्ञाननिष्ठा या साऱ्यांना माणुसकीच्या मर्यादा आहेत. माणुसकीची उंची आणि वैभव वाढविणे, हे बुध्दीचे व विज्ञानाचे काम आहे. ती घालविणे वा कमी करणे बुध्दीला वा विज्ञानाला जमणारे आहे. पण मी त्यांच्याकडून अशी अपेक्षा बाळगणार नाही. माणुसकीच्या नावावर माणसांनाच मारायला शिकविणारी तत्त्वज्ञाने थोडी नाहीत; पण ती तत्त्वज्ञाने टिकणारी नाहीत.’

स्वाभाविकच, कुरुंदकरांच्या उपस्थितीचे दडपण कोणत्याही व्यासपीठाला जाणवत असे. अनेक सभा जिंकणाऱ्या फडर्या वक्त्यांवर त्यांच्या उपस्थितीचे दडपण आलेले मी पाहिले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्याच नावाने उभारण्यात आलेल्या शामियान्यात नांदेडला झालेल्या नाटय संमेलनात एक वक्ते जाहीरपणे म्हणालेच, ‘आता आपल्याला निर्भयपणे बोलायला हरकत नाही, कारण आपल्याला खोडून काढणारा कुरुंदकर आता हयात नाही.”

कुरुंदकर नावाच्या माणसात चालणाऱ्या बुध्दी आणि भावना यांच्यातील संघर्षाचे मला नेहमीच कुतूहल वाटत आले. मी माझ्या भावनांना माझ्यावर कधी मात करू दिली नाही, हे वाक्य त्यांनी अनेकांप्रमाणे मलाही ऐकविले आहे. मात्र भावनेचा असा पराभव चर्चेच्या, वैचारिक लिखाणाच्या आणि भाषणाच्या क्षेत्रातच होत राहिला; माणसांच्या संबंधात त्यांना कधी कोरडे राहता आले नाही. आपल्या भावनांना आणि मनाला आवर घालतानाची त्यांची पराभूत ओढाताण त्यांना जवळून पाहणाऱ्या अनेकांना दिसणारी होती.

वणीत प्राचार्यपदी रूजू होण्याआधी काही वर्षे राम शेवाळकरांनी नांदेडच्या पिपल्स कॉलेजमध्ये काढली. त्यावेळची त्यांनी सांगितलेली एक आठवण हृद्य आहेत. रामभाऊ मुलाखतीसाठी कॉलेजमध्ये पोहचले तेव्हा त्यांना कळले की मराठीच्या प्राध्यापक पदासाठी आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती नरहर कुरूंदकर नावाचे तेव्हाचे शाळामास्तर घेणार आहेत. रामभाऊंना तो प्रकार अपमानकारक वाटला आणि त्यांनी तशी तक्रार संस्थेच्या अध्यक्षांजवळ, स्वामी रामानंद तीर्थांजवळ केली. स्वामीजी हसून म्हणाले, या प्रकारात तुमचा अपमान नाही, गौरवच आहे. मुलाखत सुरू झाली तेव्हा समोरच्या खुर्चीवर सगळया देहासह उकीडवे बसलेल्या कुरूंदकरांनी सौंदर्यशास्त्रावर दोन तास प्रश्न विचारून रामभाऊंची परीक्षा चालविली आणि तिच्या शेवटी स्वामीजींकडे वळूनही न बघता निकाल जाहीर केला,’तुम्ही उद्यापासून कामावर या.’ पुढे नांदेडच्या मुक्कामात त्या दोघांनीही एका व्यासपीठावर अनेक व्याख्याने दिली. शेवाळकर आस्वादक अंगाने तर कुरूंदकर चिकित्सक प्रकृतीने वेगवेगळे विषय खुलवीत राहिले. रामभाऊंनी नांदेड सोडले तेव्हा सगळे कॉलेज त्यांना निरोप द्यायला बसस्टँडवर आले. सर्वात शेवटी कुरूंदकर आले आणि ते आपल्याहून वयाने लहान आहेत हे ठाऊक असणाऱ्या रामभाऊंनी त्यांच्या पायावर डोके ठेवले. डोळयातले अश्रू लपवीत कुरूंदकर म्हणाले, ‘ मला फार भावनाप्रधान होता येत नाही.’

मात्र अशी भावनाप्रधानता नाकारणारे कुरुंदकर आपल्या आजारी विद्यार्थिनीच्या उशाशी रात्र-रात्र बसून तिची शुश्रूषा करणारे महाराष्ट्रातील बहुधा एकटेच प्राचार्य असावे, गरीब विद्यार्थ्यांना पालकासारखा आधार वाटावा असे दुर्मिळ प्राध्यापक असावे आणि सार्वजनिक संस्थांचा संसार मार्गाला लागावा यासाठी अखंड धडपड करणारे आणि सोबतच्या मित्रांना प्रोत्साहन देण्यासाठी नुसता जीवाचा आटापिटा करणारेच नव्हे तर त्यासाठी प्रत्यक्ष जीव सांडणारे, एकटेच दुर्लभ मित्रही असावे.

कुरूंदकरांचा धाकटा भाऊ नाथा आणि मी आणीबाणीत एकाच तुरूंगात होतो. घरी वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचे माझ्या पत्नीने पत्राने कळविले. नाथाने ते वृत्त कुरूंदकरांना सांगितले. आठवडयाच्या आत कुरूंदकर चंद्रपूरला आले आणि तब्बल दोन दिवस अंथरुणावर पडलेल्या माझ्या वडिलांना राजकारणातल्या गंमती सांगून त्यांना हंसविण्यात घालविले. नंतरची अनेक वर्षे वडिलांना त्या आठवणींनी भरून येत राहिले. मोठेपणाची छोटी बीजे आपल्याभोवती नेहमीच विखुरलेली असतात. ती ओळखण्याचे आणि त्यातल्या अव्यक्त मोठेपणाची ओळख इतरांना करून देण्याचे कसब थोडयाजणांकडेच असते. ज्यांच्याजवळ ते असते त्या साऱ्यांजवळ त्यासाठी लागणारे मनाचे मोठेपणही पुष्कळदा नसते. वहीतल्या नोंदी या माझ्या पुस्तकात कुरूंदकरांच्या मोठेपणाची अशी एक नोंद आहे.

महाराष्ट्रातल्या एका ख्यातनाम वक्त्याच्या वाणीवर लुब्ध झालेल्या एका पदवीधर युवतीने आपण त्याला मनाने वरले असल्याची लोकविलक्षण प्रतिज्ञा मांडली आणि त्या विवाहित व पापभिरु वक्त्याची तारांबळ उडवून दिली. तिच्या प्रेमाचे खरेपण असे की त्या वक्त्यांच्या आठवणींनी ती बेभान व्हायची आणि त्या अवस्थेत तिला अतिशय देखण्या कविता स्फुरायच्या. या मुलीला भानावर आणायला कुरूंदकरांनी केलेला प्रयोगही तसाच लोकविलक्षण होता. त्या वक्त्यांशी तेही मैत्रीने बांधले होते. तिच्या शहरात कुरूंदकरांनी तीन व्याख्याने दिली आणि तिच्या आमंत्रणावरून ते तिच्या घरी जेवायला गेले. आपल्या कवितांची वही दाखवायला जेव्हा ती त्यांच्याजवळ आली तेव्हा प्राचार्यमजकुर म्हणाले, ‘बाई, आता फार पुढे सरकू नका. कारण तुम्ही आणखी पुढे सरकाल तर मग मागे सरकायला मी तुमचा तो नाही.’

बाई हबकल्या. संतापल्या. त्यावर ते शांतपणे म्हणाले, ‘रागावयाचं कारण नाही. तुम्हाला प्रेमासाठी पुरुष हवा, तो नाही म्हणतो, मी तयार आहे. माझ्यावर प्रेम करा.’ त्यावर त्या बाईंनी आपल्या प्रेमाची कहाणी ज्या तऱ्हेने त्यांना सांगितली तिने हे गहिवरले. त्या प्रेमात नावाची, लग्नाची, प्रतिष्ठेची किंवा देहाची अशी कोणतीही मागणी नव्हती. फक्त मनाने आपले मानायचे एवढीच अट होती. कुरूंदकरांनी तिचा निरोप घेतला. वक्त्यांचे गाव गाठले आणि त्यांच्याजवळ जमा झालेल्या त्यांच्या या अनोख्या प्रेयसीच्या सगळया कविता घेऊन ते नांदेडला परतले. पुढे एका दिवाळी अंकात त्या कविता आपल्या प्रस्तावनेसह ‘राधेच्या कविता’ म्हणून त्यांनी प्रकाशीत केल्या. हा त्यांच्यातल्या मैत्रीतील सहृदयतेचा भाग होता. त्यांच्यातला कार्यकर्ता अजून शांत व्हायचा होता. नांदेडला पोहचल्यापासून दर आठवडयाला बाईंना एक कार्ड टाकण्याचा त्यांनी नेम केला. या कार्डावर फक्त एक वाक्य असे. ‘बाई, आता लग्न करा.’

ही सगळी हकिकत त्यांनीच मला त्या वक्त्यांच्या उपस्थितीत सांगितली. म्हणाले, ‘वर्षभराच्या या पोस्टकार्डांना यश आले आणि बाई एकदाच्या लग्नाला तयार झाल्या. मात्र त्यांनी आम्हाला एक अट कळविली. त्या लग्नाला मी आणि वक्त्यांनी येऊ नये. पण आम्ही गेलो, अक्षता वगैरे टाकून, पुत्रवती भव् असा आशीर्वाद देऊन परत आलो.’ सगळी कहाणी हंसून सांगणाऱ्या कुरूंदकरांचा कंठ मात्र रुध्द झाला होता.

कुरूंदकरांना मी खूपदा भेटलो. नागपूरला, नांदेडला, साहित्य संमेलनात, चंद्रपूरच्या व्याख्यानांना आले की त्यांचा मुक्काम माझ्याकडे असे. या सगळया भेटींत कुरूंदकर आमचे होऊन गेले. ‘प्राध्यापकबाई, जरा बसा.’ स्वयंपाकघरातल्या डायनिंग टेबलाशी बसून ते माझ्या पत्नीला आदेश द्यायचे. ‘हे तुमचे यजमान राजकारणात आहेत. ते तुरूंगाबिरूंगात जातात. तुम्ही स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभ्या रहा.’ एका मुक्कामात म्हणाले, ‘तुमच्या संग्रहातली झाडून सगळी चावट पुस्तके काढून द्या.’ महिनाअखेर नांदेडहून त्या पुस्तकांचा गठ्ठा रजिस्टर्ड पार्सलने परत आला. सोबतच्या पत्रात त्यातल्या प्रत्येक पुस्तकाविषयीचा आपला अभिप्राय त्यांनी लिहून धाडला होता आणि त्या क्षेत्रातली आणखी चांगली पुस्तके कोणती ते कळविले होते. ते यायचे असले की दरम्यानच्या काळात मनात जमा झालेल्या सगळया प्रश्नांची मी एक यादीच तयार करून ठेवत असे. त्यात राजकारणापासून स्त्री-पुरुष संबंधांपर्यंतचे सगळे प्रश्न असत. हाततोंड धुवून बैठकीत आले की म्हणायचे, ‘हं, करा सुरू.’ मग सगळा दिवस आणि बरेचदा सगळी रात्र ती चर्चा सुरू रहायची. माझ्या पत्नीला त्यांचा आदेश असे, ‘प्राध्यापिकाबाई, कंटाळा येत नसेल तर तुम्हीही ऐका. फक्त आम्हाला अधूनमधून चहा देत चला.’

तत्त्वज्ञान आणि धर्मशास्त्र, दैवतशास्त्र आणि नीतिशास्त्र इथपासून इतिहास, समाजशास्त्र या साऱ्या क्षेत्रात अधिकाराने संचार करणाऱ्या कुरुंदकरांना कोणत्याही विषयाचा मूलगामी वेध घेता येत असे आणि त्याचे सगळे पैलू उलगडून दाखविता येत असत. त्यांच्या महाविद्यालयातील प्राध्यापकांचा त्यांच्याविषयीचा एक प्रसिध्द विनोद नंतर ऐकला. महाविद्यालयातील प्राध्यापकांना कोणती वेतनश्रेणी मिळावी हा नांदेडच्याच नव्हे तर सगळया महाराष्ट्रातील प्राध्यापकांचा अत्यंत जिव्हाळयाचा विषय आहे. या प्रश्नाचे उत्तर कुरुंदकर कसे देतील असा प्रश्न निघाला. तेव्हा एक प्राध्यापक म्हणाले, ‘ते म्हणतील, आर्य जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या गरजा अतिशय मर्यादित होत्या. आतापर्यंत त्या वाढत जाऊन… इ.’

अशी चिकित्सा करणाऱ्या या ज्ञानर्षीत एक विलक्षण मिस्कील माणूस दडला होता. भारत इतिहास संशोधनाच्या एका गंभीर बैठकीत महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार एकदा भडकून उठले आणि समोर बसलेल्या सगळयांवर आपला संताप ओकू लागले. नेहमी हसणाऱ्या आणि हसविणाऱ्या महामहोपाध्यायांना तसे रागावलेले पाहून सगळी सभा अवाक् झाली. त्यांच्या संतापाचा पहिला भर ओसरला तेव्हा कुरुंदकर त्यांना शांतपणे म्हणाले, ‘दोष तुमचा नाही. जी माणसे आयुष्यात लग्न करीत नाहीत, त्यांचा संताप असा अनावर होण्याचीच शक्यता अधिक असते.’ सगळा तणाव संपला. दत्तो वामन म्हणाले, ‘तुम्ही माझ्यासाठी घनपाठी मुलगी शोधून देत असाल, तर मी आताही लग्नाला तयार आहे.’ त्यावर कुरुंदकर म्हणाले, ‘घनपाठी नाही; पण मी तुमच्यासाठी जटापाठी मुलगी शोधून आणायला तयार आहे. जिच्या पाठीवर जटा आहेत, अशी.’

एकदा यदुनाथ थत्ते म्हणाले, ‘हा माणूस जपला पाहिजे.’ यदुनाथ थत्त्यांना माणसे शोधण्याचा, जपण्याचा आणि प्रकाशात आणून फुलविण्याचा सोसच होता. एकदा ते म्हणाले, कुरुंदकरांसारखा माणूस परदेशात असता, तर लोकांनी त्याला विमान घेऊन दिले असते. आम्ही त्याला बसने, ट्रकने, मिळेल त्या वाहनाने व्याख्यानांना नेतो. तरुणांची शिबिरे-चर्चासत्रे ही त्यांच्या आवडीची ठिकाणे आहेत; पण लोक व्याख्यानांनाही त्यांना तसेच नेतात.’ अशावेळी यदुनाथांचा संताप दिसायचा. अशा प्रवासात बसस्थानकावर सगळी रात्र बसून काढल्याची एक कथा कुरुंदकरांनीच मला सांगितली.

महाराष्ट्रातील बहुतेक सगळे नामवंत वक्ते मी आजवर ऐकले. प्रत्येकाची तऱ्हा वेगळी, थाट निराळा. काही नामांकित वक्ते तास-दीड तास श्रोत्यांना पार गुंगवून टाकताना पाहिले. एखाद्या प्रखर प्रकाशझोतातून बाहेर येताना दिपल्यासारखे व्हावे तसा त्यांच्या व्याख्यानांचा प्रभाव पाहिला आणि अनुभवला. पण वक्त्यांनी काय सांगितले याचा विचार करायला गेलो, की काही तेजस्वी वाक्प्रयोग आणि पल्लेदार शब्दावलीखेरीज फारसे काही हाती येत नसे. अशा वक्त्याच्या भाषणाचे वृत्त लिहिताना पत्रकारांची होणारी तारांबळ मी पाहिली आहे. राजकारणातील भाषणे तडाखेबंद असतात, पण ते प्रकरण फार सवंग असते. आम्ही सज्जन आहोत हे धृपद आणि तिकडचे सारे लुच्चे आहेत हा अंतरा. बाकी त्यात नुसत्याच तानाबिना असतात. काही नामांकित व्याख्यात्यांच्या भाषणाची गंमत अशी की लोक त्यात हटकून येणाऱ्या कोटयांची आणि विनोदांची वाट पाहतात. बाकीचे भाषण त्यांच्या लेखी फारसे महत्त्वाचे नसते. वक्तृत्व आणि विद्वत्ता यांनी भरलेली पांडित्यपूर्ण व्याख्यानेही ऐकली आणि तृप्त होत असतानाच त्यांना लालित्याची जोड असती तर बहार आली असती असे वाटत राहिले. कुरुंदकर या सगळया मागण्या पूर्ण करणारे वक्ते होते. विद्वत्ता आणि लालित्य या अलंकारांसह त्यांचे वक्तृत्व प्रकटत असे. त्यात तर्कशुध्दता असे, तपशीलावरची पकड असे आणि उत्तरोत्तर वाढत जाणारी रंगत असे. विश्राम बेडेकरांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सोमनाथच्या साहित्य संमेलनातील त्यांचे उद्धाटनाचे भाषण, यवतमाळच्या संमेलनातील परिसंवादाचे भाषण, सरदार पटेल, कृष्ण, शाकुंतल आणि ययातीवरील भाषणे, नेहरूंच्या परराष्ट्रीय धोरणावरचे व्याख्यान अशी त्यांची किती तरी भाषणे माझ्या स्मरणात आहेत. त्या व्याख्यानांचे वैशिष्टय हे की त्यात विषयाच्या ओघात विनोद असत. विनोदासाठी विषयाला वळण देण्याचा खटाटोप नसे आणि विनोदाने विद्वत्तेची लय जरादेखील बिघडणारी नसे. पण, त्याहून मोठा विशेष हा की ते श्रोत्यांपुढे कोणत्याही प्रश्नाबाबतची तयार उत्तरे मांडत नसत. प्रत्येक प्रतिपादनासोबत श्रोत्यांच्या मनात प्रश्नांचे नवे काहूर ते उभे करीत असत. आपल्या विचाराच्या प्रक्रियेत ते श्रोत्यांना सामील करून घेत नसत; पण त्यांना सहविचारात साथीला घेण्याचे अजब कसब त्यांच्या वक्तृत्वात आणि त्यात आढळणाऱ्या विचारपध्दतीत असे. आपण आजवर गृहीत धरून चाललो ती सर्वपरिचित वाटणारी सत्ये केवढी ठिसूळ होती याचे त्यातून येणारे भान नवा आनंद देणारे आणि विचारांची वर्तुळे विस्तारणारे असे. आपल्या भाषणांनी श्रोत्यांच्या डोक्यात सूर्याची पिले सोडणारा असा वक्ता माझ्या पाहण्यात दुसरा नाही.

कुरुंदकरांविषयी त्यांच्या जिव्हाळयाच्या वर्तुळातही बऱ्यावाईट समजांचा भरपूर घोळ होता. अशा समजांची पेरणी करीत राहणे हा अनेकांचा आवडता उद्योग असतो. एक विद्वान प्राचार्य रस्त्याने पुस्तके वाचत जातो आणि पुस्तकात गुंतल्याने महाविद्यालयाचा रस्ता मागे पडून तो कित्येक फर्लांग पुढे चालत जातो. भर उन्हाळयात डोक्याचा तुळतुळीत गोटा करून त्याला भरपूर तेल चोपडतो अन् तसाच उघडया डोक्याने उन्हातून हिंडून येतो. या आणि अशाच किती तरी गोष्टी त्यांच्या नावावर प्रचलित आहेत. आपल्या ज्ञानाचा ते फार अहंकार मिरवितात इथपासून त्यांना आपल्या उंचीचा जरादेखील अंदाज नाही इथपर्यंतचे समज त्यांच्याविषयी जवळच्या म्हणविणाऱ्यांतच होते.

मराठवाडयातील एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि साहित्यिक त्यांच्याएवढेच माझ्याही आदरातले. एकदा ते मला म्हणाले, ‘आमच्या नरहरला आपल्या विद्वत्तेचा जबर दंभ आहे.’ काही दिवसातच कुरुंदकरांची आणि त्यांची माझ्या उपस्थितीत गाठ पडली. कुरुंदकरांनी त्यांना सरळ साष्टांग नमस्कार घातला. गप्पा-टप्पा होऊन ते निघून गेल्यावर मी त्या साहित्यिक कार्यकर्त्यांना म्हणालो, ‘बघा, तुमच्यापुढे केवढे नम्र होतात कुरुंदकर.’ त्यावर मिस्कील हसत ते म्हणाले, ‘त्याच्या नमस्कारावर जाऊ नका, त्याच्या नमस्कारातही अहंकार लपलेला असतो. मी एवढा विद्वान असून बघा कसा तुम्हाला नमस्कार करतो, हे त्याला सुचवायचे असते.’ त्यानंतर खूप दिवसांनी कुरुंदकरांना मी हा अभिप्राय सांगितला, तेव्हा ते घायाळ झाल्यासारखे दिसले. त्या गृहस्थांविषयीचा आपल्या मनातील श्रध्दाभाव सांगताना ते गहिवरले होते.

कुरूंदकरांच्या अंत्ययात्रेला मी हजर होतो. नांदेडच्या गोदावरीचा गंगाघाट मुकाट माणसांनी नुसता दाटून आला होता. सुशिक्षित, अशिक्षित, प्राध्यापक, कामगार, विद्यार्थी, शेतकरी… एका विद्वान माणसावर गावाने केलेल्या कृतज्ञ प्रेमाचे ते दृश्य. सत्तेच्या कोणत्याही पदावर नसलेल्या, केवळ बुध्दिवैभव हे सामर्थ्य आणि माणुसकी हे देखणेपण लाभलेल्या माणसाला अखेरचा नमस्कार करायला किती लोकांनी एकत्र यावे याची सीमा मी पाहत होतो.

कुरुंदकरांच्या पार्थिवाभोवती नमस्कारासाठी माणसांची दाटी होती. मला त्यांचा धाकटा भाऊ नाथा दिसला. मला घट्ट मिठी मारत तो म्हणाला, ‘आम्ही पोरके झालो.’ जरा वेळाने भानावर येऊन मी कुरुंदकरांची चर्या न्याहाळली. त्या चर्येवर 15 वर्षापूर्वीच्या रात्री रेल्वेस्थानकावर पाहिला तोच प्रसन्न ज्ञानताठा होता. तसाच एक तृप्त व ताजा अभिमान.

त्यांच्या चितेला अग्नी दिला तेव्हा त्या सहस्रावधीच्या समुदायाला हुंदके देताना, डोळे पुसताना पाहिले. अनंतराव भालेरावांच्या अध्यक्षतेखाली शोकसभा झाली. तीत विद्वानांपासून कामगारांपर्यंत चाळीसेक लोकांची भाषणे झाली, पण कोणालाही भाषण पूर्ण करता आले नाही. अनंतरावांना मी नेहमीच पहाडासारखे पाहिले; पण सगळा पहाडच तेथे खचून गेल्यासारखा दिसला.

कुरुंदकर कोण होते? समाजवादी? ते स्वत:ही तसे म्हणायचे. मार्क्सवादाच्या सगळया मर्यादा अधिकारवाणीने सांगून ते समाजवाद मांडायचे. समाजवाद हाच राष्ट्रीय एकात्मतेचा मार्ग आहे. जोवर इथल्या उपेक्षितांना या देशात आपला हितसंबंध आहे असे वाटणार नाही तोवर त्यांच्यात राष्ट्रभावनेचा खरा परिपोष होणार नाही असे ते म्हणत.

मात्र समाजवाद्यांना या देशातल्या हिंदू-मुस्लिम प्रश्नाची खरी ओळख पटलीच नसल्याचे आणि अशोक मेहतांचा जातीय त्रिकोणाचा मुद्दा भाबडया समजुतींवर आधारला असल्याचे ते सांगत. या देशातल्या मुस्लिम-मनाचे त्यांचे आकलन आंबेडकर-सावरकरांच्या जवळ जाणारे होते. या मनात सेक्युलर विचार रुजल्याखेरीज त्यात राष्ट्रभक्ती यायची नाही. कारण तो धर्म त्यांना या देशावर प्रेम करू देत नाही हे ते परखडपणे मांडायचे.

एका मुस्लिम परिषदेत भाषण करताना त्यांनी सरळ प्रश्न विचारला ‘माझे जिवंत राहणे तुम्हाला मान्य आहे काय? याला एकदम होय असे भाबडे उत्तर देऊ नका. कारण मुस्लिम, ख्रिश्चन आणि ज्यू यांच्याखेरीज इतरांनी जिवंत राहणे तुमच्या धर्मालाच मान्य नाही, म्हणून जपून उत्तर द्या. माझे जिवंत राहणे तुम्हाला मान्य नसताना मी मात्र तुम्हाला सन्मानाने वागवावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते शहाणपणाचे आहे काय याचा विचार करा.’
महाराष्ट्रातील समाजवाद्यांच्या मुस्लिमधार्जिण्या सेक्युलरपणाला असा कुरुंदकर मानवणे जमणारे नव्हते. परिणामी समाजवादी मंडळी जाहीरपणे कुरुंदकर आपला असल्याचे सांगत आणि खासगीत त्यांच्याविषयी एखाद्या व्रात्य मुलाविषयी बोलावे तशी तक्रार करत.

कुरुंदकर हा कोणत्याही बांधिलकीवाल्याला, मग ती बांधिलकी समाजवादाचीच का असेना, परवडणारा माणूस नव्हे. तो समजायला बांधिलकीच्या वरच उठावे लागणार हे यदुनाथ थत्त्यांचे त्यांच्याविषयीचे मत. समाजवाद्यांचा एक गट त्यांना उघडपणे ‘प्रच्छन्न हिंदुत्ववादी’ म्हणे. हैदराबादच्या उस्मानशाही राजवटीविरुध्द झालेल्या स्वातंत्र्याच्या लढयातील कुरुंदकर हे एक लहानसे पाईक होते. त्या लढयाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ हे संन्याशी होते. म्हणून कुरुंदकर स्वत:ला संन्याशाचे अनुयायी म्हणत आणि हैदराबादचा मुक्तिसंग्राम हा भारताला राजकीय आणि प्रादेशिक अखंडता प्रदान करणारा अखेरचा लढा मानत. उस्मानशाहीच्या जुलुमाला धार्मिक अत्याचाराचा रंग होता. त्यामुळे त्याविरुध्दच्या लढयालाही तशी किनार असणे स्वाभाविक होते. शिवाय या लढयात भाग घेणाऱ्या माणसांना सत्ताधारी मुस्लिम मन समजून घेता येणे अधिक सोपे होते.

तथापि मुस्लिम मनात सेक्युलॅरिझम रुजायला आधी तो हिंदू मनात रुजावा लागेल अशी त्यांची मांडणी असे. देशातील बहुसंख्य वर्ग जे करील त्याचे अनुकरण इतर वर्ग नकळत करीत जातात. म्हणून प्रथम हिंदूंना सेक्युलर व्हावे लागेल असे ते म्हणायचे. असा कुरुंदकर अर्थातच हिंदुत्ववाद्यांनाही नकोसा होता.

मार्क्सच्या विचारसरणीतील दोष सांगणारा कोणताही माणूस त्या विचारांच्या पोथीनिष्ठांना वर्गशत्रू आणि बर्ुझ्वा वाटला तर तो त्यांचाही दोष नव्हे. नामांतराविरुध्द उघड भूमिका घेतल्यामुळे अखेरच्या काळात आंबेडकरवादीही त्यांच्याविरुध्द उभे राहिले आणि तरी या सगळया बांधील गटातील युवा वर्गाचे आणि स्वतंत्रपणे विचार करणाऱ्यांचे कुरुंदकरांशी अखेरपर्यंत एक अतूट नाते राहिले. त्यांनी केलेली टीकाही साऱ्यांना गंभीरपणे घ्यावीशी वाटली. प्रत्येक नव्या प्रश्नावर त्यांनी आपल्या पाठीशी राहावे असे साऱ्यांना वाटत राहिले.

आपल्या स्वतंत्र विचारांसाठी समाजातले बांधील गट आपल्याविरुध्द उभे राहिले तरी चालतील अशी भूमिका घेणाऱ्यांना समाजकारणात फार मोठी किंमत मोजावी लागते. जॉन एफ. केनेडी यांनी ‘प्रोफाईल्स इन करेज’ या नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. मूल्यनिष्ठा की लोकप्रियता अशा संघर्षात आपल्या लोकप्रियतेला तिलांजली देऊन मूल्यांच्या बाजूने उभे राहण्याचे धाडस पत्करलेल्या अमेरिकी नेत्यांविषयीचे हे पुस्तक आहे. कुरुंदकरांनी अशी किंमत मोजली. आयुष्यभर ज्यांची साथ केली, ती माणसे विरोधात गेलेली पाहिली. ज्या चळवळींना जन्मभर हात दिला, त्याच चळवळींच्या पुढाऱ्यांना आपल्यावर तोफा डागताना पाहिले आणि शत्रूच्या हल्ल्यांनी कधी घायाळ न होणारे कुरुंदकर या मित्रांच्या हल्ल्यांनी विव्हळ झालेले मी पाहिले.

मृत्यूपूर्वी तीन महिने अगोदर ते माझ्याकडे दोन दिवस मुक्कामाला होते. सारा वेळ ते आपल्यावरच्या स्वकियांच्या हल्ल्याविषयी बोलत राहिले. सारे आयुष्य प्रामाणिक व स्वच्छ भूमिका घेऊनही समूहमनाला हव्या असणाऱ्या एकाच कोणत्या तरी निकषावर समाज आपल्या सबंध आयुष्याचा कसा क्रूर निकाल लावतो, याचे दु:ख त्या बोलण्यातून प्रकट होत होते. आयुष्यभर घेतलेल्या बुध्दिवादी भूमिकेची समूहभावनेकडून होणारी अवहेलना मान्य करणे त्यांना कठीण जात होते. त्या बोलण्यात राग नव्हता, पराभव नव्हता, आपला प्रामाणिकपणा कोणी समजून घेत नसल्याची दु:खद खंत तेवढी होती. वाटले, कुरुंदकरांना थांबवावे. म्हणावे, ‘विसरा’. पण त्याचवेळी मनात येत राहिले कुरुंदकरांएवढा जबर स्मरणाचा माणूस काही विसरणारच नाही. त्याला हे बोलू देणेच बरे आणि परतीसाठी बसमध्ये चढेपर्यंत ते बोलतच राहिले.

आम्हाला विद्वत्तेचा आदर असतो. फक्त ती विद्वत्ता आम्हाला हवी तशी बोलावी अशी आमची मागणी असते. जोवर ती तशी बोलते तोवर आम्ही तिची महत्ता सांगणार. जेव्हा तिचे निष्कर्ष आमच्या आवडीतून वेगळे येतील तेव्हा ती प्रथम दुर्लक्षिणार आणि सोयीची नसेल तर आम्ही ती तुडविणार. कुरुंदकरांच्या निधनानंतर या व्यथेविषयी लिहिताना एकाने लिहिले-

तुझी उंचीच तुझी वैरीण होती
आकाशावर उठणारी तुझी उत्तुंगता
निकटस्थ खुज्यांना कशी कळणार
मग त्यांना तुझ्या मुलाचे मौजीबंधनच आकर्षक वाटले
वैरीही करणार नाहीत असा छळ
त्या करंटयांनी मांडला
तुझ्या रूपानं पुढे गेलेली सर्वस्पर्शी
जाण त्या अभावपूजकांना कधी ओळखता आली नाही.
आश्चर्य नव्हे, सगळयाच ज्ञानेश्वरांचे हे दुर्दैव आहे.

कुरुंदकरांचे निधन व्यासपीठावर झाले. वयाची 50 वर्षे पूर्ण होण्याआधी त्यांना मृत्यू आला. मृत्यपूर्वी लातूरला एका स्नेह्याशी बोलताना ते म्हणाले, ‘आपली गरज कायम आहे आणि समाजाचा लोभ शाबूत आहे तोवरच मरण्यात अर्थ आहे.’

हा माणूस पुढची काही दशके समाजाला वैचारिक नेतृत्व देणारा असेल, एका स्वतंत्र व्यासपीठाची घडण याच्या हातून होईल; असा आशावाद सर्वत्र निर्माण होत असतानाच हा मृत्यू आला. महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत कुरुंदकरांच्या हयातीत म्हणाले होते, ‘हा माणूस आणखी 30 वर्षे समाजाला नव्या वाटा दाखवीत राहील.’ दुसऱ्या एका पंडिताने म्हटले, ‘आम्ही अभ्यासाने जेथे पोचतो, तेथून याच्या अभ्यासविचारांचा आरंभ होतो, हा प्रज्ञावान माणूस आहे.’

हे बोलले जात असताना कुरुंदकरांना आलेला मृत्यू त्यांच्या दृष्टीने अर्थपूर्ण असला, तरी त्याने अनेकांना मृत्यूच्या निरर्थकतेचा आणखी एक पुरावा उपलब्ध करून दिला. माझ्यासारख्या वर्षातून एखाददुसऱ्यांदा त्यांना भेटणाऱ्याचे आयुष्य त्याने रिते केले. जी माणसे सतत त्यांच्यासमवेत राहणारी होती त्यांच्या पायाखालची जमीन त्यांना एवढया दिवसानंतरही सापडली नसणार.

प्रकाश बाळ, सौजन्य – लोकसत्ता

विकास प्रकल्पांना विरोध  करणाऱ्यांच्या हातात सत्ता दिली तर? आजच्या २१ व्या शतकातील जागतिकीकरणाच्या युगातील जगात वावरणाऱ्या भारतासारख्या ११५ कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय देशाचा कारभार चालवताना, ‘हमारे गाव मे हमारा राज’ ही भूमिका किंवा खाजगी भांडवलदारांना प्रतिबंध अथवा बाजारपेठीय अर्थव्यवस्था बदलून ती पुन्हा पूर्वीप्रमाणं संमिश्र वा सरकारी नियंत्रणाखाली आणणं, ही धोरणं राबवता येणं या मंडळींना शक्य आहे काय? थोडक्यात सध्या जो काही विकासाचा मार्ग आहे, त्यातील अन्याय, अपारदर्शीपणा, वाढती विषमता टाळून पुढं जाण्याविना काही दुसरा मार्ग आहे काय?

एकीकडं विकास प्रकल्पांचं समर्थन करणारे सत्ताधारी व त्यांना पािठबा देणारे समाजघटक आणि दुसरया बाजूला अशा प्रकल्पांना विरोध करणाऱ्या  संघटना असे दोन तट देशात पडलेले दिसतात. सत्ताधारी व त्यांचे समर्थक हे जनहिताला फाटा देऊन देशी व परदेशी भांडवलदारांच्या कह्यात जाऊन देशाला विनाशाच्या वाटेवर नेत आहेत, असा आरोप होत आहे.

अशा या परिस्थितीत समजा हे जे विकास प्रकल्पांचे विरोधक आहेत, त्यांच्या हातात सत्ता दिली तर? आजच्या २१ व्या शतकातील जागतिकीकरणाच्या युगातील जगात वावरणाऱ्या भारतासारख्या ११५ कोटी लोकसंख्या असलेल्या खंडप्राय देशाचा कारभार चालवताना, ‘हमारे गाव मे हमारा राज’ ही भूमिका किंवा खाजगी भांडवलदारांना प्रतिबंध अथवा बाजारपेठीय अर्थव्यवस्था बदलून ती पुन्हा पूर्वीप्रमाणं संमिश्र वा सरकारी नियंत्रणाखाली आणणं, ही धोरणं राबवता येणं या मंडळींना शक्य आहे काय? थोडक्यात सध्या जो काही विकासाचा मार्ग आहे, त्यातील अन्याय, अपारदर्शीपणा, वाढती विषमता टाळून पुढं जाण्याविना काही दुसरा मार्ग आहे काय?

हे प्रश्न उपस्थित करण्याचं कारण म्हणजे आज जो विकासाचा वितंडवाद सुरू आहे, त्यानं कोणाची काही राजकीय उद्दिष्ट साध्य झाली असली वा होणर असली, तरी त्यानं राज्यसंस्थेच्या (स्टेट) अधिमान्यतेचा (लेजिटिमसी)चा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सरकार म्हणजे राज्यसंस्था नव्हे. सरकारं येतात असतात आणि जातातही. राज्यसंस्था कायम असते. या राज्यसंस्थेची अधिमान्यता संपुष्टात येणं, याचा अर्थ अराजकाची नांदी, असाच असतो. देशातील लोकशाहीचे जे नक्षलवाद्यांसारखे शत्रू आहेत आणि पाकसारखी जी परकीय राष्ट्र आहेत, त्यांचा प्रयत्न भारतीय राज्यसंस्थेची ही अधिमान्यता संपावी, असाच आहे. विकासाच्या प्रश्नावर प्रस्थापित सरकारला विरोध करताना जे युक्तिवाद केले जात आहेत, जे मार्ग अवलंबिले जात आहेत आणि ज्या प्रकारे नकारत्मक भूमिका घेतल्या जात आहेत, त्यानं राज्यसंस्थेच्या अधिमान्यतेलाच आव्हान मिळत आहे, याची फारशी जाणीव ठेवली जाताना दिसत नाही. येथे विरोधात उतरणारे राजकीय पक्ष जमेस धरलेले नाहीत. हे पक्ष सत्तेवर असताना हेच करीत होते आणि पुन्हा सत्ता हाती आल्यास तेच करणार आहेत. विकास प्रकल्पांचे विरोधक जमेस धरले आहेत, ते विविध स्वयंसेवी संघटना आणि राजकारणाच्या परिघावर असलेले छोटे पक्ष आणि अर्थात डावे पक्ष.

गेल्या दोन दशकांत आपल्या देशात जे नवं अर्थकारण आकारला येत गेलं आहे आणि त्याला जागतिक घटनांचा जो संदर्भ आहे, तो लक्षात घेता आज जे विकास प्रकल्पांचे विरोधक आहेत, त्यांच्याकडं व्यवहार्य व अंमलात आणला जाऊ शकणारा कोणता दुसरा पर्याय आहे काय? पक्षीय व संघटनात्मक अभिनिवेश आणि कालविसंगत झालेल्या विचारांची झापडं दूर करून तटस्थपणं बघितल्यास या दोन्ही प्रश्नांचं उत्तर ’नाही’ असंच द्यावी लागेल.

भारतासारख्या खंडप्राय देशाचा कारभार हाकणं, ही विरोधी पक्षांच्या बाकांवर बसून आरोप करण्याएवढी किंवा रस्त्यावर उतरून घोषणा देणं वा मोच्रे काढण्याएवढी सोपी गोष्ट नाही. सत्तेवर गेल्यावर भल्या भल्या लोकांचं काय झालं, ते १९७७ नंतर सर्व विरोधी पक्षांच्या हाती सत्ता येत गेली, तेव्हा दिसून आलं. मग ते ’संपूर्ण क्रांती’च्या लढयातील ’घनघोर लोहियावादी’ लालूप्रसाद यादव व मुलायमसिंह यादव असू देत किंवा ’आम्ही वेगळे’ असं म्हणणारे वाजपेयी वा अडवाणी असू देत, ’रिमोट कंट्रेल’वाले सेनाप्रमुख ठाकरे असू देत, ’दलित मसिहा’ मायावती असू देत अथवा ’जायंट किलर’ जॉर्ज फर्नाडिस असू देत. हे सारे इंदिरा गांधी यांच्यावर तुटून पडत असत. पण इंदिरा गांधी व संजय गांधी यांनी घालून दिलेली भ्रष्ट राज्यकारभाराचीच चाकोरी या सर्वानी स्वीकारली. निरंकुश पध्दतीनं या सर्वानी कारभार केला आहे. अगदी ही चाकोरी बदलायची चांगली संधी मतदारांनी दिली असूनही या सर्वानी तसा मूलभूत प्रयत्नही केलेला दिसून आला नाही. जो कोणी देशाची सूत्रं हाती घेईल, त्याला भारताची एकूण व्यापक आíथक सामाजिक परिस्थिती, सत्ता राबवताना देशांतर्गत व जागतिक स्तरावरून येणारे र्निबध व दडपणं आणि या सगळयाला तोंड देतानाच वास्तवाचं भान हरपू न देणं व एक राजकीय पक्ष म्हणून सत्ता टिकवण्यााची अपरिहार्यता सांभाळणं, अशी तारेवरची कसरत करावी लागत असते. याचा अनुभव सर्व राजकीय पक्षांनी घेतला आहे. म्हणूनच एन्रॉन समुद्रात बुडवायला निघालेल्या सेना भाजप युतीनं हा प्रकल्प तरवला आणि पश्चिम बंगालमधील बुध्ददेव भट्टाचार्य सरकारला सिंघूर व नंदीग्रामच्या प्रकरणांची झळ बसली.

याचा अर्थ सत्ता राबवताना काँग्रेस व या पक्षांनी कार्यक्षमता दाखवली किंवा घोटाळे केले नाहीत, असा नाही. या गोष्टी झाल्याच. किंबहुना गेल्या ३० वर्षांत परिस्थिती इतकी घसरत गेली आहे की, आता कडेलोट होण्याची वेळ आली आहे, हेही खरंच आहे. मात्र या विरोधात बोलताना, आंदोलनं करताना, उपाय काय, हेही सांगण्याची गरज नाही काय?

राजकारण्यांच्या अशा संधीसाधू व विधिनिषेधशून्य भ्रष्ट कारभारामुळं नकारात्मक भूमिका घेऊन प्रस्थापित सरकारला विरोध करण्याची परंपराच आपल्या देशात आता रूजली आहे. त्यामुळं धरणं नकोत, ऊर्जा निर्मिती केंद्र नकोत, मोठे कारखाने नकोत, शेतीत नवं तंत्रज्ञान नको, बाजारपेठा नकोत, अशी एक ना अनेक प्रकारे नकार घंटा सतत वाजवली जात असते. अशा नकार घंटेला जर कोणी विरोध केला, तर लगेच त्यांच्या हेतूंविषयीच शंका घेतली जाते. ’आम्ही लोकांच्या बाजूचे’ अशा नतिक भूमिकेतून ही मंडळी बोलत असतात. म्हणूनच मग या मंडळींना विरोध, याचा अर्थ लोकाना विरोध आणि जनद्रोह. आपले सर्व विरोधक प्रस्थापित सत्ताधारी आणि त्यांच्या मागच्या धनदांडग्यांना ’विकले’ गेले आहेत, अशी या मंडळींची भूमिका असते. कोणत्याही क्षेत्रातील कितीही मोठा जगभर मान्यता पावलेला तज्ज्ञ असू दे, तो आम्हाला विरोध करतो व आम्ही जनतेच्या बाजूचे, म्हणून मग तो तज्ज्ञ प्रस्थापितांना विकला गेला, अशी या मंडळींची भूमिका असते. कोणाची आधीची भूमिका बदलू शकते, त्याच्या मतात परिवर्तन होऊ शकतं, आधीची भूमिका चुकली, ही गोष्ट ती व्यक्ती मान्य करीत असेल, तरी ही मंडळी हेत्वारोप करीत असतात. तेही अंतिम टप्प्यापर्यंत स्वत:चं मतपरिवर्तन करण्याची भूमिका घेणारया महात्मा गांधी यांचं नाव घेत. हा जो नतिक अहंगड आहे, तो निव्वळ पोकळा असतो; कारण किती ’लोक’ या मंडळींच्या मागं असतात, हे कधीच सिध्द होत नाही.

गंमत म्हणजे ही मंडळी सतत गांधीजींचं नाव पालूपदासारखं घेत असतात. लोकशाहीवरील आपली निष्ठा असल्याचे झेंडे फडकावत असतात. किंबहुना ’आम्हीच खरे लोकशाहीवादी’, अशी त्यांची भूमिका असते. मात्र ही मंडळी एकाही निवडणुकीत कधीही निवडून आलेली नाहीत. निवडणुका हा धनदांडगंचा खेळ आहे, त्यात लोकांचा  खरा सहभाग नसतो, अशी या मंडळीची पळवाट असते. लोक यांच्यामागं जातात, ते प्रस्थापित राज्यकर्त्यांच्या अन्यायाच्या विरोधात उभे राहण्यासाठी त्यांना कोणी तरी वाली हवा असतो म्हणून. मात्र ही मंडळी राज्यकारभार करू शकत नाहीत, याबाबत लोकांची खात्री असते. म्हणूनच मुंबई जवळच्या रायगडमध्ये ’सेझ’ विरोधी आंदोलन इतकं प्रखर होऊनही २००९ सालच्या निवडणुकीत विरोधकांनी उभ्या केलेल्या उमेदवारला हजारांत सोडा, शेकडयांतही जेमतेम मतं मिळाली. ती निवडणूक जिंकली, ती प्रस्थापित पक्षांपकी एकानंच.

अशी सततची नकार घंटा वाजवणारी ही मंडळी जे सांगतात, तसं कधी वागताना दिसत नाहीत. विजेचा वापर कमी करायचा असेल, तर या मंडळींनी आपल्या घरातील फ्रीज, वातानुकूलित यंत्रं, चित्रवाणी संच काढून टाकवेत. ऊर्जेचा वापर कमी करण्यासाठी सायकली वापराव्यात. मोबाई फोन वापरणं सोडून द्यावं. पर्यावरणचा नाश करणारे व प्रदूषण पसरवणारे मोठे कारखानेच नको असल्यानं कुटिरोद्योगात वा छोटया व्यवसारात तयार होणारया वस्तूंवर या मंडळींना आपलं आयुष्य बेतावं. अशा तरहेनं आयुष्य जगणारे निदान १०० लोक तरी  ११५ कोटीच्या देशात ही मंडळी उभी करू शकतात काय? आजपर्यंत या गप्पा मारणारया कोणीच अशा तरहेचं आयुष्य जगण्याचा प्रयत्न केलेला नाही. या सर्वाना अत्याधुनिक सोईसुविध हव्यात, पण त्यांच्या निर्मितमागचं जे तर्कशास्त्र आहे, ते स्वीकारण्याची त्यांची तयारी नाही.

याचं कारण मनातील वैचारिक झळमटं दूर करून बदलत्या जगाकडं निरोगी दृष्टीनं बघण्याची या मंडळींची तयारीच नाही. ’निर्मिती’ या मुद्याशी या मंडळींचा काहीच संबंध राहिलेला नाही. ही मंडळी ’प्रयोग’च करीत राहिली. ’प्रयोगा’चं सार्वत्रिकीकरण होऊ शकलं, तरच त्याचा खरया अर्थानं उपयोग होतो आणि तसा तो होण्यासाठी सर्वसामान्यांना परवडेल आणि अंमलात आणता येईल, हे दोन निकष महत्त्वाचे असतात. असं न घडल्यास तो नुसता ’प्रयोग’च उरतो.

’पर्यायी विकासा’चा आग्रह धरणाऱ्यांनी जी ’धोरणं’ म्हणून पुढं केली, ते सगळे असे ’प्रयोग’च राहत आले आहेत आणि हे ’प्रयोग’ परवडणं व अंमलात आणलं जाणं, या दोन निकषांवर फोल ठरत गेले आहेत. सुईपासून विमानापर्यंतच्या सर्व गोष्टींची निर्मिती या ’पर्यायी विकासा’च्या मॉडेलमध्ये कशी होईल, संपत्तीच्या निर्मितीचा सिध्दांत या मॉडेलमध्ये कसा असेल आणि या संपत्तीच्या वाटपाची पध्दत कशी असेल, हे सांगण्याची या मंडळींची तयारी नसते. तसे बौध्दिक परिश्रमही ते घेत नाहीत. जर विमान नको असेल किंवा कोणतीही आधुनिकता नको असेल, तर तसं उघडपणं सांगून वैचारिक भूमिका घेण्याचीही धमक या मंडळींकडं नसते. मग शहरांतील फेरीवाले हटवले, झोपडया पाडल्या की ही मंडळी धावून जातात. सामान्य माणसाचं जनजीवन उध्दस्त केल्याचा ठपका ठेवतात. पण २१ व्या शतकातील जगातील भारतात नागरीकरणाची प्रक्रिया कशी नियोजनबध्द असावी, याचा पर्याय काय असेल आणि तो अब्जावधी डॉलर्सचं परकीय भांडवल न गुंतवता, अत्याधुनिक तंत्रज्ञान न वापरता, शहरात लोकांनी येण्यास प्रतिबंध न करता कसा अंमलात आणता येइंल, हे ही मंडळी कधीच सांगत नाहीत. या मंडळींत सामील होणारे अनेक जण मुंबई व इतर शहरांत चांगल्या वस्त्यांतील सर्व सुखसोईनी भरलेल्या उत्तम घरांत राहतात. बाहेर परकीय भांडवल, जागतिकीकरण इत्यादीच्या विरोधात बोलणारया या मंडळीचं आयुष्य याच गोष्टींनी सुखकर केलेलं असतं. त्यात थोडा जरी बिघाड झाला, तरी ही मंडळी कातावतात. यापकी अनेकांची मुलं परदेशात असतात आणि ही मंडळी भारतातील उन्हाळ्यात तेथे जाऊन राहतात. इतर जणं स्वयंसेवी संघटनांच्या आंतरराष्ट्रीय नेटवर्कमधून परदेश वाऱ्या करीत असतात. मात्र भारतात आल्यावर जागतिकीकरणाच्या विरोधात उभे राहत असतात. जैतापूरच्या विरोधात खांद्यावर झेंडे घेतात. अणुऊर्जा किती धोकादायक आहे, ते सांगत राहतात. आदिवासींवरील अन्यायाला आम्हीच तोंड फोडत असतो, असा दावा करतात.

मात्र व्यवहार्य व अंमलात आणण्याजोग पर्याय पुढं ठेवून त्या आधारे विधायक चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न ही मंडळी कधीच करीत नाहीत.  अणुऊर्जा नुसती धोकादायकच नाही, तर ती किती महाग आहे, हे सरकार लपवून ठेवत असल्याचा आरोप ही मंडळी करतात. उलट अपारंपरिक ऊर्जेचा वापर केला जायला हवा, असा आग्रह धरतात. पण सौर ऊर्जेसाठी सुरूवातीला किती खर्च येतो, हे सांगायला ही मंडळीही तयार नसतात. शिवाय भारतासारख्या देशात जेथे विजेची प्रचंड तूट असताना सौर अथवा इतर अपारंपरिक ऊर्जा हा पर्याय ही दरी भरून काढू शकतो काय, याचं ’मॉडेल’ ही मंडळी कधीच मांडून दाखवत नाहीत.

सरकारनं प्रकल्पाचा पुनर्वचिार करण्यााचं आश्वासन द्यावं, मगच चर्चा करू, अशी या मंडळींची भूमिका सत्ताधारी आघाडीच्या विश्वासार्हतेबद्दल जशी शंका निर्माण करते, तशीच ती राज्यसंस्थच्या अधिमान्यतेलाही आव्हान देणारी असते. शेवटी देशाचा विकास कसा करावा, हा प्रश्न लोकशाही मार्गानं सोडवायचा आहे. सत्ताधारयांनी लोकांची मतं ऐकून घेतलीच पाहिजेत. जो अन्याय होत असेल, तो दूर केलाच पाहिजे. विस्थापनाचा प्रश्न सोडवलाच हवा. पण विरोधकांनीही स्वत:च मत पारखून घेण्याची संधी स्वत:ला दिली पाजिे. आमचंच बरोबर हा अभिनिवेश लोकशाही विरोधी आहे. असा वितंडवाद होत आला आहे, त्याचं मूळ कारण १९९१ साली नवं अर्थकारण आपण स्वीकारलं, ते एका विशिष्ट परिस्थितीत. स्वतंत्र्यानंतरच्या विकासाच्या मॉडेलवर सर्वसाधारणत: एक प्रकारची सामाजिक सहमती होती. ती स्वातंत्र्य चळवळीतून आकाराला आली होती. पण अशी सहमती घडवून आणून नवं अर्थकारण स्वीकारलं गेलेलं नाही. म्हणून आजचे वितंडवाद होत आहेत. अशा परिस्थितीत देशातील राज्यसंस्थेची अधिमान्यता टिकवून भारताची अखंडता शाबूत ठेवायची असल्यास या वितंडवादावर तोडगा हा काढावाच लागेल. त्यासाठी जागतिकीकरणाचं वास्तव स्वीकारावं लागेल. खरी लढाई ही जागतिकीकरणाच्या विरोधातील नसून ती जागतिकीकरणाच्या मदानातील आहे. तेथे वाढत्या विषमतेच्या विरोधातील लढा देणं भाग आहे. पण  जुन्या वैचारिक आयुधांनी हा लढा देता येणार नाही. २१ व्या शतकातील सर्वात तरूण समाज गणला जाणाऱ्या भारतातील लोकांच्या बदललेल्या आशा आकांक्षा लक्षात घेऊनच ही आयुधं ठरवावी लागतील. अनेक वैचाीरक आग्रह-दुराग्रह सोडून देणं भाग आहे. उदाहरणार्थ बाजारपेठ वाईटच असते, हे गृहीत आता टाकून द्यावं लागेर. बाजारपेठ हवी, पण सट्टा नको, अशी व्यवस्था कशी तयार करता येईल, हे बघावं लागेल.

अशी अनेक उदाहरणं देता येतील. सांगवयाचा मुद्दा इतकाच की, एक व्यापक राजकीय सहमती झाल्याविना हा वितंडवाद संपणार नाही आणि अशी सहमती नकारात्मक भूमिका घेत राहिल्यास कधीच होऊ शकणार नाही. प्रश्न पारदर्शी व न्याय्य व्यवस्था निर्माण करण्याचा आहे. तो जागतिकीकरणाच्या विरोधातील नाही, आजच्या जगात मुक्त अर्थव्यवस्थेला पर्याय नाही, याची कबुली स्वत:लाच विरोधकांनी देण्याची ही वेळ आहे. पारदर्शीपणा व न्याय्य राज्यकारभार याच मुद्यावर जर चर्चा खरोखर झडली, तर जनतेतही एक विधायक मत आकाराला येऊ शकतं. त्याचा अंकुश सत्ताधाऱ्यांवर व प्रस्थापित राजकारण्यांवरही राहू शकतो. अन्यथा सध्याच्या वादामुळं आणि भ्रष्टाचाराच्या कहाण्यांमुळं जनतेच्या मनात सत्ताधारी व इतर राजकीय पक्ष आणि पर्यायानं राज्यसंस्था यांच्याबद्दल अविश्वासाची भावना निर्माण होत आहे. ती लोकशाही राज्यव्यवस्थेच्या भवितव्याच्या दृष्टीनं अत्यंत धोकादायक आहे.

विश्वास दांडेकर, सौजन्य – लोकसत्ता, १५ जुलै २००३

एक काळ असा होता की वसमत हे गाव आठवले की नरहर कुरुंदकरांचे नाव ओठावर यावे, इतका कुरुंदकरांच्या प्रगाढ व्यासंगाचा दबदबा मराठी सारस्वताच्या प्रांतात गाजत होता. इतिहास, साहित्य, प्राचीन वाङ्‌मय, राज्यशास्त्र, संगीत, समाजशास्त्र… कुरुंदकरांच्या प्रज्ञेला कुठलाही प्रांत वर्ज्य नव्हता. वाचता वाचता एखाद्या क्षणी बुद्धीला अवचित थकवा यावा अशा चिरेबंदी तर्काने नटलेल्या आपल्या लेखनशैलीने कुरुंदकरांनी वैचारिक लेखनाच्या क्षेत्रात आपला खास ‘कुरुंदकरी बाज‘ निर्माण केला. आयुष्यभर निखळ वैचारिकतेचीच बांधीलकी मानल्यामुळे निरनिराळ्या व्यासपीठांवरून कुरुंदकरांनी अव्याहत संचार केला. मात्र ते कुठल्याही तंबूत दाखल झाले नाहीत. म्हणूनच बहुधा कर्मठांइतकीच पुरोगाम्यांच्या गोटामधूनही त्यांची उपेक्षा झाली. कुरुंदकरांना जाऊनही आता पुरी दोन दशके उलटली, तरी त्यांचे समग्र लेखन संग्रहीत स्वरूपात समाजासमोर येऊ नये, हा महाराष्ट्राच्या ‘वैचारिक अनुशेषा‘चा पुरावाच होय!

महाराष्ट्राच्या वैचारिक परंपरेचा सहज आढावा घेतला तर त्यात अनिवार्यपणे येणार्‍या नामावलीमध्ये एक नाव नरहर अंबादास कुरुंदकर असे आहे. हयात असते तर आज त्यांनी बहात्तराव्या वर्षात प्रवेश केला असता. त्यांचा जन्म १५ जुलै १९३२चा. अनेक विषयांचा स्तिमित व्हावे असा व्यासंग. त्या पार्श्वभूमीवर एक निराळाच अन्वयार्थ लावणारी प्रज्ञा, एकेक पाकळी उलगडत जिज्ञासूला विषयाच्या गाभ्यापर्यंत नेण्याची खर्‍या शिक्षकाची हातोटी आणि या सर्वांमागे आपले ज्ञान, बुद्धी ही खासगी मालमत्ता नाही या विश्वासाने ती सतत वाटण्यासाठी झटणारे मन, असे हे लोकविलक्षण व्यक्तिमत्त्व फार अकाली अज्ञाताच्या प्रवासाला निघून गेले (निधन १०/२/८२).

पेशाने ते शिक्षक. प्राथमिक, माध्यमिक अशा पायर्‍या चढत पुढे प्राध्यापक आणि प्राचार्य झाले. मात्र हे त्या व्यवस्थेतला अपरिहार्य भाग म्हणून घडलेले. एम.ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी ‘परीक्षा‘ या घटनेच्या नावाने आंघोळ केली. कितीजणांना पीएच.डी.च्या प्रबंधासाठी मदत केली याची गणती अवघड, पण त्या फंदात स्वतः कधी पडले नाहीत. व्यासंग हा डिग्रीवर मोजणे कसे गैर आहे त्याचे हे उदाहरण. वयाच्या बाविसाव्या वर्षी मुंबई मराठी साहित्य संघाचे ते आमंत्रित वक्ते होते, तर रणजित देसाईंच्या ‘श्रीमान योगी‘ची महाराष्ट्रात गाजलेली प्रस्तावना त्यांनी वयाच्या तिशीत लिहिली होती, असे प्रसंग पुष्कळ नोंदवता येतील.

त्यांचे अभ्यासाचे विषय छाती दडपून टाकणारे होते. राजकारण, इतिहास, समीक्षा, महाभारत, भरताचे नाट्यशास्त्र, तत्त्वज्ञान, शास्त्रीय संगीत, प्राचीन-अर्वाचीन मराठी साहित्य, सामाजिक चळवळी… नुसती यादी करायची म्हटली तरी स्तिमित करणारी. शिवाय हे सर्व पुस्तकी नव्हते. सर्व महाराष्ट्रभर हिंडत, गटचर्चा, व्याख्याने यांतून ज्ञानगंगा वाहती ठेवण्याची त्यांची धडपड असे.

त्यांची एक नाजूक जागा म्हणजे पंडित नेहरू. स्वतंत्र भारत, त्यात राष्ट्र उभारणीसाठी नेहरू कुठल्या मार्गाने जात आहेत याचा त्यांनी फार सखोल विचार केला होता. यदुनाथ थत्ते-नरहर कुरुंदकर या जोडीने वर्षानुवर्षे संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांमधून जे प्रबोधन घडवले त्याच्या केंद्रस्थानी ‘नेहरू‘ असत. बांगलादेश युद्धानंतर तीन-चार वर्षांत जी परिस्थिती भारतात निर्माण झाली त्याचे विश्लेषण करताना त्यांनी १९७१ चा युद्धखर्च, १९७२ चा दुष्काळ, १९७३ चे खनिज तेलाचे भडकलेले भाव या गोष्टी नियंत्रित करणे भारताच्या अखत्यारीत नसल्याने या तीन गोष्टींचा एकत्रित परिणाम बाद करून मग उरलेला दोष शासनाचा असे परखड विश्लेषण केले होते. मात्र आणीबाणी लादण्यास त्यांचा विरोध होता. आणीबाणीनंतर जनता पक्ष ज्या मार्गाने गेला त्यातले धोके त्यांनी जाहीरपणे मांडले होते. विचाराने ते डावे, मार्क्सवादी असले, समाजवादी विचारसरणीचे पाठीराखे असले तरी पोथीनिष्ठ आंधळेपण त्यांनी कधी जोपासले नाही. मतभेद स्पष्टपणे मांडले.

महाराष्ट्रात मृत्युलेख लिहावा तर आचार्य अत्र्यांनी, खेळकर व्यक्तिरेखा रंगवावी तर पु. ल. देशपांडे यांनी अशी काही सार्थ समीकरणे आहेत. यात भर अशी घालता येते की, मूल्यमापन करणारा लेख लिहावा नरहर कुरुंदकरांनी. सरदार पटेल, मौलाना आझाद, अकबर, शेजवलकर, खान अब्दुल गफार खान, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य, स्थान, भूमिका, मर्यादा ज्या सामर्थ्याने त्यांनी उलगडल्या ती खास कुरुंदकरी परंपरा म्हणता येते. इरावती कर्वे यांचा ‘किनशिप ऑर्गनायझेशन इन इंडिया‘, दुर्गाबाई भागवतांचा ‘लोकसाहित्याची रूपरेखा‘, वा. सी. बेंद्रे यांचा संभाजी, गोपाळ गोडसे यांचे ‘गांधीहत्या व मी‘, द. ग. गोडसे यांचे ‘पोत‘ या व अशा पुस्तकांची विस्तृत परीक्षणे त्यांनी लिहिली. पुस्तकाचे मर्म उलगडून दाखवत मर्यादाही परखडपणे मांडणारी ती शैली ग्रंथाचा सांगोपांग परिचय करून देत असतानाच त्या त्या विषयाचा आवाकाही मांडत असत, त्रुटीही नोंदवत असत.

मराठीत ‘प्रस्तावना‘ हा एक संपन्न लेखन प्रकार आहे. पुस्तकातले प्रत्येक पान उलगडून दाखवणे, संपूर्ण विरोधी दृष्टिकोन मांडणे, त्या क्षेत्रात नवे दालन उघडणे अशी ही परंपरा शेजवलकर, खरेशास्त्री, राजवाडे अशा दिग्गज नामावलींमुळे झळाळते. या परंपरेत कुरुंदकरांनी विस्तृत आणि मोलाची भर घातली. ‘श्रीमान योगी‘, ‘चलो कलकत्ता‘, ‘चतुर्भाणी‘, ‘महाडचा मुक्तिसंग्राम‘, ‘महाभारत- एक सूडाचा प्रवास‘, ‘हिमालयाची सावली‘, ‘चक्रपाणी‘, ‘लोकायत‘ या व अशा प्रस्तावना त्या त्या ग्रंथांचे भूषण ठरत ग्रंथातल्या विषयाची व्याप्ती विस्तारणार्‍या आहेत.

भरताचे नाट्यशास्त्र आणि विशेषतः त्यातील रससिद्धांत हा त्यांच्या आयुष्यभराच्या अभ्यास-चिंतनाचा विषय होता. ‘रूपवेध‘मध्ये काही प्रमाणात तो मांडला गेला. पुढे त्या विषयाची सांगोपांग चर्चा करणारी तीन व्याख्याने त्यांनी नाशिक येथे दिली. त्यावर एक महाग्रंथ जवळपास सिद्ध केला, पण तो अपूर्णच अवस्थेत त्यांच्या निधनोत्तर ‘रंगशाळा‘ या नावाने प्रसिद्ध झाला. त्या ग्रंथाचा पट पाहिला म्हणजे जर हा पूर्णपणे हातावेगळा झाला असता तर त्याने लेखन विषय कुठल्या उंचीवर नेऊन ठेवला असता याची कल्पनाच आज करावी लागते.

ही सर्व प्रतिभा, प्रज्ञा, विद्वत्ता कोरडी नव्हती. कुरुंदकर हे स्नेही, मित्र, विश्वासाने खांद्यावर मान टाकण्याची हक्काची जागा असे त्यांचे स्थान असंख्य कुटुंबांत होते. त्यांना व्याख्यानांच्या मानधनातून मिळणारा पैसा त्यांनी निरनिराळ्या संस्थांना शांतपणे दिला. स्वभावाला एक विलक्षण विनोदाचे अंग होते. कधी नर्म तर कधी तिरकस. गप्पांमध्ये रंगायचे पण कधीही गप्पा व्यक्तिकेंद्रित होऊ देत नसत. चर्चा मत- मुद्दे यावर असावी, व्यक्तीवर नको हा त्यांचा आग्रह असे. साधी शंका विचारली तरी विषय नीट समजावून सांगत. संपूर्ण मराठवाडा तर त्यांना गुरुजी म्हणूनच ओळखत असे.

ते गेल्यावर त्यांचा स्मृतिग्रंथ हैदराबादच्या आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषदेने काढला. मराठवाडा साहित्य परिषद व ‘साधना‘ परिवार या दोन संस्थांसाठी कुरुंदकर खूप श्रमले. पण त्यांच्या निधनोत्तर या दोन्ही संस्थांनी दुर्लक्षच केले, हे कटू सत्य खेदाने स्वीकारावे लागते.

त्यांनी मांडणी केलेले प्रश्न, विषय, क्षेत्रे कालबाह्य झालेली नाहीत. त्यावर चर्चा, मतभेद हे मंथन सुरू राहणे हिताचे आहे. यातले पहिले पाऊल म्हणजे निवडक कुरुंदकर असे काही खंड प्रकाशित करणे, ज्यात त्यांचे सर्व महत्त्वाचे लिखाण टीपा, सूची या व अशा संपादकीय संस्कारांनी परिपूर्ण स्वरूपात उपलब्ध होईल. तो सुदिन लवकर येवो.

ग. प्र. प्रधान, सौजन्य – लोकसत्ता

प्रत्येक राजकीय विचारसरणी ही कालसापेक्ष असते आणि काळ पुढे गेल्यावर परिस्थिती बदलली की, त्या विचारसरणीतील तत्त्वांचा मूलभूत आशय कायम ठेवून तिच्यात आवश्यक ते बदल करावे लागतात. कृती करताना तत्कालीन समाजस्थितीचे भान ठेवावे लागते. विचारांमध्ये अशी गतिमानता ठेवली नाही तर राजकीय नेते आणि राजकीय पक्ष कर्मठ आणि ठोकळेबाज बनतात आणि त्यामुळे निष्प्रभही होत जातात. समाजवाद या विचारसरणीचा तात्त्विक गाभा श्रमिकांना न्याय मिळाला पाहिजे हा आहे. मार्क्सने हा विचार मांडला, त्याच्या आधारे लेनिनने रशियात १९१७ साली कम्युनिस्ट क्रांती केली आणि जगातील श्रमिकांच्या मनात आशा पल्लवित झाल्या. गेल्या काही वर्षांमध्ये रशियाचे विघटन झाले असले तरी जगातील श्रमिकांना न्याय मिळाला पाहिजे हे तत्त्व अबाधित आणि चिरंतन महत्त्वाचे आहे. मात्र विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत भांडवलशाहीकडून शोषित झालेला कामगारवर्ग हा क्रांतीचा अग्रदूत असेल असे मानले जात होते. भारतात स्वातंत्र्यप्राप्तीनंतर कामगारांनी संघटित लढे देऊन त्यांचे न्याय्य हक्क मिळविले. परंतु हा संघटित कामगार, शासकीय कर्मचारी, प्राध्यापक शिक्षक, हा वर्ग त्यांच्या मागण्या बव्हंशाने मान्य झाल्यावर १९७५ नंतर समाजातील असंघटित कामगार तसेच अल्पभूधारक शेतकरी आणि भूमिहीन शेतमजूर यांच्या लढ्यात सहभागी झाला नाही. म्हणून भारतातील समाजवादी चळवळीचा आजचा आशय शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, दलित, आदिवासी आणि स्त्रिया या समाजातील सर्व उपेक्षितांना न्याय देऊन समताधिष्ठित समाज स्थापन करणे हाच आहे आणि असला पाहिजे. या सर्व उपेक्षितांना आणि पददलितांना न्याय देण्यासाठी समाजाच्या राजकीय आणि आर्थिक रचनेत बदल करावे लागतील. १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या भावी विकासाची पायाभरणी करण्याकरिता आणि भारत स्वतःचे संरक्षण करण्यास समर्थ होण्यासाठी मूलभूत उद्योग, ऊर्जानिर्मितीसाठी मोठी धरणे आदी मोठे प्रकल्प हाती घ्यावे लागले. तसेच नॅशनल केमिकल लॅबोरेटरी, भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर आणि नवीन विज्ञान व तंत्रविज्ञान आत्मसात करण्याचे शिक्षण नव्या पिढीस देण्यासाठी आय. आय. टी. संस्था उभाराव्या लागल्या. ही सर्व पायाभरणी करण्यासाठी राजसत्ता आणि अर्थसत्ता यांचे केंद्रीकरण अपरिहार्य आणि आवश्यक होते. परंतु यामुळे देशाचा जो विकास झाला त्याचे फायदे मूठभरांनाच मिळाले आणि आर्थिक विषमता तीव्र होत गेली. ही परिस्थिती बदलून भारतातील ग्रामीण जनतेपर्यंत आणि शहरातील व ग्रामीण भागातीलही तळागाळातील माणसांपर्यंत विकासाचे हे फायदे पोहोचवावयाचे असतील तर राजसत्तेचे आणि अर्थसत्तेचे विकेंद्रीकरण करणे अत्यावश्यक आहे. समाजवादाचा विचार मांडताना औद्योगिक क्रांतीनंतरच्या युरोपच्या विचार करणार्‍या मार्क्सने समाजवादी समाजरचनेत राजसत्ता व अर्थसत्ता यांचे केंद्रीकरण आवश्यक मानले. भारतात आजच्या परिस्थितीत मार्क्सच्या या विचाराऐवजी म. गांधींच्या विकेंद्रित अर्थव्यवस्था आणि ग्रामस्वराज्य या विचारांच्या आधारे समाजवादाची मांडणी केली पाहिजे.

समाजवाद आणि सर्वोदय -आचार्य शं. द. जावडेकर हे महाराष्ट्रातील थोर विचारवंत. त्यांनी स्वातंत्र्यापूर्वीच सत्याग्रही- समाजवाद हा विचार मांडला आणि म. गांधींच्या विचारांना समाजवादाची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन केले. त्यानंतर १९५३-५४ त्यांनी ‘सर्वेदय आणिसमाजवाद‘ हे पुस्तक लिहून बदलत्या संदर्भात या दोन विचारसरणींचा सिंथेसिस (मिलाफ) करावा लागेल अशी भूमिका मांडली. आर्थिक समता आणि सामाजिक न्याय यासाठी सत्याग्रही मार्गाने संघर्ष करताना त्याला रचनात्मक विधायक कार्याची जोड द्यावी लागेल, असा हा विचार होता.

जागतिकीकरणाचे आव्हान -अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणानंतर भारतात प्रथम नियंत्रणांच्या शिथिलीकरणाचं (लिबरलायझेशन) धोरण काँग्रेसचे नरसिंह राव पंतप्रधान असताना त्या वेळचे अर्थमंत्री मनमोहनसिंग यांनी स्वीकारले. त्यानंतर राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अटलबिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाल्यावर अगदी अलीकडेपर्यंत अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी ‘आर्थिक सुधारणा‘ या आत्मवंचना करणार्‍या नावाखाली अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असलेल्या जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक व्यापारी संघटना (डब्ल्यू. टी. ओ.) यांच्या सापळ्यात भारताला अडकवून टाकले आहे.

या धोरणाचे अपरिहार्य पर्यवसान, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये गुंतवलेले भांडवल काढून घेऊन ते उद्योग बहुराष्ट्रीय कंपन्यांना विकणे आणि वृत्तपत्रांमध्ये २६ टक्के परकीय भांडवलाची गुंतवणूक करण्यास परवानगी देणे, यात झाले आहे. अमेरिकेसारख्या धनवान राष्ट्रांच्या आणि बड्या भांडवलदार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या सापळ्यात सापडून आपण आपले आर्थिक स्वातंत्र्य गमावीत आहोत. दुसर्‍या महायुद्धानंतर राजकीय साम्राज्ये विलयाला गेली, परंतु या साम्राज्यांचे आधुनिक रूप आर्थिक साम्राज्ये असे आहे आणि विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांचे आर्थिक शोषण करून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली कायम जखडून टाकणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. याविरुद्ध लढा देणे भारताला सोपे नाही. कारण येथील राष्ट्रीय आघाडी सरकार तसेच विरोधी पक्षांमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि चंद्राबाबू नायडूंची तेलगू देसम्‌ पार्टी व जयललितांचा अण्णा द्रमुक पक्ष यांना अर्थव्यवस्थेच्या जागतिकीकरणाशी जुळवून घेणे अपरिहार्य आणि अटळ वाटते. आपण पाश्चात्त्य जगातील भांडवल आणि अत्याधुनिक तंत्रविज्ञान यांच्या साहाय्याने भारताचा आर्थिक विकास करू शकू असे आज भारतातील केंद्र शासनाला आणि बहुसंख्य विरोधी पक्षांना वाटते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि अन्य डावे पक्ष यांचा आर्थिक सुधारणांच्या नावाखाली भांडवलशाही राष्ट्रांचे मांडलिकत्व पत्करण्यास विरोध आहे. परंतु ही डावी आघाडी आज तरी फार प्रभावी नाही. वेगवेगळ्या प्रश्नांवर संसदेमध्ये विरोध करणे आणि संसदेबाहेर जनतेचे प्रबोधन करून आर्थिक गुलामगिरीविरुद्ध शक्य तेथे संघर्ष करण्याचे कार्य या डाव्या पक्षांच्या राजकीय आघाडीस करावे लागेल.

नवे नेतृत्व – आता समाजाची राजकीय व आर्थिक घडी बदलण्याचे काम मुख्यतः देशभर विखुरलेल्या, विधायक कामे करणार्‍या आणि संघर्ष करणार्‍या कार्यकर्त्यांच्या गटांनाच एकजुटीने करावे लागेल. महाराष्ट्रापुरती काही नावे घ्यावयाची असतील तर धरणग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणार्‍या मेधा पाटकर, आदिवासींमध्ये विधायक काम करणारे अभय बंग, राणी बंग, मोहन हिराबाई हिरालाल, सांगली भागात श्रमिकांच्या प्रश्नांवर पुरोगामी विचारांच्या आधारे श्रमिकांचे संघर्ष करणारे भारत पाटणकर आणि औरंगाबादचे कानगो आदींना समाजवादाच्या या लढ्याचे नेतृत्व करावे लागणार आहे. अखिल भारतीय पातळीवर शैक्षणिक क्षेत्रामध्ये नवे प्रयोग करणारे संदीप पांडे आणि राजस्थानमधील शेतकर्‍यांच्या जीवनाला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणारे राजेंद्र सिंह तसेच वंदना शिवा या पर्यावरणवादी कार्यकर्त्या व त्यांचे सहकारी अशा विधायक कार्यकर्त्यांचा उल्लेख केला पाहिजे. त्याचबरोबर केरळमध्ये विज्ञानाचा प्रसार करणारी चळवळ चालविणारे, कार्यकर्त्यांची संघटना, आंध्र, तामीळनाडू आणि मध्य प्रदेश येथे ग्रामीण स्त्रियांना एकत्र आणणारे गट अशा संस्था व संघटना तसेच देशभरचे पर्यावरणवादी कार्यकर्ते व संघटना हीच समाजाच्या परिवर्तनाची प्रभावी साधने आहेत. २१ व्या शतकातील समाजवादी चळवळीचे अग्रदूत हे विधायक आणि संघर्षशील कार्यकर्ते आणि त्याच रीतीने कार्य करणार्‍या ग्रामीण श्रमिकांच्या संस्था हेच असतील. भारतातील सर्व नागरिकांच्या हातांना वा बुद्धीला काम आणि भारतीय तंत्रवैज्ञानिकांनी आत्मसात केलेले तंत्रविज्ञान यांच्या जोरावरच भारताचा विकास होऊ शकेल, अशी भूमिका घेऊनच भावी काळात विकासाचे व बेकारी निर्मूलनाचे काम करावे लागेल.

म. गांधींच्या विकेंद्रीकरणाच्या आणि ग्राम स्वराज्याच्या संकल्पनांचा मी उल्लेख केला असला तरी त्या विचारांत आणि त्यांच्या साधनांमध्ये कालानुरूप बदल करावेच लागतील. आज पूर्वीचा चरखा कालबाह्य झाला आहे. हे लक्षात घेऊन विजेवर चालणारा अंबर चरखा तयार करावा लागेल. तरच तो चालविणार्‍यांना जीवनवेतन मिळेल. अलीकडेच महाराष्ट्रात झालेल्या सर्वेदय संमेलनात अभय बंग यांनी हा विचार प्रभावीपणे मांडला होता.

या समाजपरिवर्तनाचे स्वरूप, विश्वभारती विद्यापीठाचे माजी कुलगुरू आणि थोर विचारवंत अमलान दत्ता यांनी लिहिल्याप्रमाणे, मूक क्रांती (सायलेंट रेव्होल्युशन) असे असेल. सत्याग्रही मार्गानेच संघर्ष करणार्‍या या क्रांतीमध्ये रक्तपात असणार नाही. संघर्षाइतकाच विधायक कामावर, रचनेवर भर देणार्‍या या क्रांतीचे नगारे, ढोल वाजणार नाहीत. या मूक क्रांतीसाठी काम करणार्‍या व्यक्ती आणि संघटना यांना कोणी आजच्या व्यवस्थेतील सत्ता देणार नाही. आज सत्ता आणि संपत्ती यांच्या अनिष्ठ युतीतून काही राजकीय पक्ष, त्यांचे नेते आणि भांडवलदार हे एक टक्का श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गीय यांचा चंगळवादी, भोगवादी समाज निर्माण करीत आहेत. त्यांच्याशी संघर्ष करणे सोपे नाही. देशभर पसरलेल्या ग्रामीण श्रमिकांच्या मनात योग्य ते प्रबोधन करून, त्यांना समतेवर आणि न्यायावर आधारलेला समाज निर्माण करण्याच्या व्यापक जनआंदोलनात सहभागी करून घ्यावयाचे आहे.

२१ व्या शतकातील भारतातील समाजवादी चळवळीला हे साध्य करण्यासाठी दीर्घकाळ प्रयत्न करावे लागतील. देशातील ज्या अनेक तरुण कार्यकर्त्यांना मी भेटलो, त्यांच्या ध्येयवादी कार्यामुळे, मला ते भारताच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार होतील आणि समता व सामाजिक न्याय यावर आधारलेल्या समाजवादी चळवळीचा ध्वज फडकवतील असा विश्वास वाटतो.

मिलिंद मुरुगकर, सौजन्य – लोकसत्ता

अनेकांना बाळासाहेबांची भाषा रांगडी आणि बंडखोर वाटते तर काहींना ती असभ्य आणि शिवराळ वाटते. अलीकडच्या काळात तर त्यांच्या भाषेवर टीका होणेही कमी झाले आहे (हा त्यांच्या बाजूने जाणारा मुद्दा आहे की त्यांच्या ओसरत्या प्रभावाचे ते लक्षण आहे हा चर्चेचा विषय आहे.). पण भाषेतील शिवराळपणापलीकडे जाणारा एक जास्त गंभीर मुद्दा त्यांच्या भाषेतून कोणत्या मूल्यांना प्रतिष्ठा दिली जाते हा आहे.

शिवसेनेच्या दसऱ्याच्या मेळाव्यातील बाळासाहेबांच्या खणखणीत आवाजातील भाषणामुळे अनेक निष्ठावान शिवसैनिकांना केवळ हायसे वाटले इतकेच नाही तर त्यांचा उत्साहही वाढला. नेहमीच्या लकबीतील त्यांच्या भाषणाला उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत होता.

अनेकांना बाळासाहेबांची भाषा रांगडी आणि बंडखोर वाटते तर काहींना ती असभ्य आणि शिवराळ वाटते. अलीकडच्या काळात तर त्यांच्या भाषेवर टीका होणेही कमी झाले आहे (हा त्यांच्या बाजूने जाणारा मुद्दा आहे की त्यांच्या ओसरत्या प्रभावाचे ते लक्षण आहे हा चर्चेचा विषय आहे.). पण भाषेतील शिवराळपणापलीकडे जाणारा एक जास्त गंभीर मुद्दा त्यांच्या भाषेतून कोणत्या मूल्यांना प्रतिष्ठा दिली जाते हा आहे. बाळासाहेबांच्या भाषणातील असभ्य, शिवराळ शब्दांना ‘भाषेचा रांगडेपणा’ म्हणून स्वीकारले तरी त्या भाषेची मूल्यचिकित्सा टाळणे महाराष्ट्राला परवडणारे नाही.

दसऱ्याच्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी व उद्धव ठाकरेंनी मर्द, नामर्द, हिजडे अशा शब्दांचा मुक्त वापर केला. काँग्रेसच्या नेत्यांचा उल्लेख हिजडे असा केला. शिवसेना ही मर्दाची संघटना आहे व सेना सोडून गेलेले नामर्द आहेत असे म्हटले गेले.

समाजात एखाद्या माणसाचा अपमान करण्यासाठी हिजडे, नामर्द असे शब्द वापरण्यात येतातच. फक्त ते असभ्य मानले जाते, नामर्द हा शब्द तर असभ्यही मानला जात नाही. मग ठाकरेंनी हे शब्द सभ्यतेची मर्यादा काहीशी ओलांडून वापरले तर त्यात एवढे काय बिघडले असा युक्तिवाद करण्यात येऊ शकतो. पण आपण वापरत असलेली भाषा आपली नैतिक मूल्येही सांगत असते.

हिजडा हा शब्द एखाद्या माणसाला हिणवण्यासाठी वापरण्यामागे कोणती मानसिकता असते? आपल्याला रेल्वेमध्ये, रस्त्यावर पैसे मागणारे हिजडे माहीत असतात. या लोकांच्या शरीराची रचना व लैंगिकता (सेक्शुअॅलिटी) ही स्त्री किंवा पुरुष यांच्याहून भिन्न असते. हे त्यांचे वेगळेपण असते. हा त्यांचा दोष नसतो. जन्मजात असलेले वेगळेपण स्वीकारणे हे कोणत्याही सुसंस्कृत समाजाचे एक महत्त्वाचे लक्षण मानले पाहिजे. पण ‘हिजडा’ या शब्दाचा वापर अपमानासाठी होतो तो आणखी वेगळ्या कारणाने. मोगलांच्या काळातील राजे आपला जनानखाना सांभाळणाऱ्या पुरुषाला त्या जनानखान्यातील स्त्रियांशी लैंगिक संबंध ठेवता येऊ नयेत म्हणून अशा पुरुषांचे लहानपणीच लिंग छाटून टाकत व त्यांना हिजडा करत. यातील क्रौर्य दोन प्रकारचे आहे. त्या पुरुषावरील घोर अन्याय तर उघड आहेच, पण दुसरे क्रौर्य त्या स्त्रियांच्या बाबतीत आहे. आपण कितीही स्त्रियांशी संबंध ठेवला तर चालतो, पण जनानखान्यातील प्रत्येक स्त्रीने लैंगिकबाबतीत केवळ आपल्याशीच एकनिष्ठ असले पाहिजे. त्यांच्या इच्छेचा प्रश्नच नाही. त्या एक प्रकारे त्या राजाच्या गुलामच. जनानखाना जितका मोठा तितकी राजाची ‘लैंगिक सत्ता’ अर्थातच मोठी. जास्त स्त्रियांवर लैंगिक सत्ता गाजवणाऱ्या राजाची राजकीय ताकदही अर्थातच मोठी. लैंगिकतेचा (सेक्शुअॅलिटी) दुसऱ्यावर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी वापर करणारी ही मध्ययुगीन हिणकस मानसिकता. मध्ययुगीन काळातील मोगल राजे जेव्हा एखाद्याला ‘हिजडा’ करत तेव्हा त्यांच्या लैंगिक सत्तेला आव्हान देण्याची त्याची ‘ताकद’ ते संपुष्टात आणत. लैंगिकता आणि दुसऱ्या व्यक्तीवरील सत्ता यांचा असा थेट संबंध मध्ययुगीन मूल्यव्यवस्थेत होता (अर्थातच त्याचा प्रभाव आजही आहेच. दसऱ्याच्या सेनेच्या मेळाव्यात तो दिसलाच.).

आज जेव्हा आपण एखाद्याला हिजडा म्हणून हिणवतो तेव्हा त्याला आपण केवळ कर्तृत्वशून्य, राजकीय ताकद नसलेला म्हणून हिणवत नसतो तर लैंगिक क्रियेसाठीही तो अक्षम आहे असे सूचित करत असतो. आपण जेव्हा एखाद्या माणसाला हिजडा म्हणून हिणवतो तेव्हा आपल्यावरचा हाच मध्ययुगीन गलिच्छ मूल्याचा प्रभाव आपण व्यक्त करत असतो आणि ‘हिजडा’ शब्दाचा शिवीसारखा, कोणाला तरी हिणवण्यासाठी वापर करणे हा हिजडय़ाचाही अपमान असतो. कारण हिजडा असणे हा काही त्या व्यक्तीचा गुन्हा नसतो. ते त्याचे वेगळेपण असते. निसर्गत: लाभलेल्या वेगळेपणाबद्दल, कमतरतेबद्दल एखाद्याला हिणवणे हे हत्यार आपल्या मध्ययुगीन मानसिकता जपणाऱ्या समाजात सर्रास वापरले जाते. आणि ते वेगळेपण, ती कमतरता लैंगिक बाबतीत असेल तर ते हत्यार जास्तच प्रभावी ठरते. मूल होत नसलेल्या स्त्रीला वांझ म्हणून हिणवणे, लैंगिक क्रिया करू न शकणाऱ्या पुरुषाला स्वत:बद्दल प्रचंड न्यूनगंड वाटणे ही सर्वच त्या मध्ययुगीन हिणकस मूल्यव्यवस्थेची निशाणी.

एखाद्याला नामर्द म्हणण्यातही हेच मूल्य असते. अकर्तृत्ववान म्हणून हिणवणे वेगळे आणि नामर्द म्हणणे यात गुणात्मक फरक असतो. आणि तो लैंगिकतेचा असतो. नामर्द म्हणून हिणवण्यात काय अभिप्रेत असते हे उघड आहे. शिवसेनेच्या दसऱ्याच्या मेळाव्यात शिवसेना सोडून गेलेल्यांची केवळ नामर्द म्हणून संभावना करण्यात आली इतकेच नाही तर पुढे असेही म्हटले गेले की, आम्ही मर्द आहोत व या नामर्दाना जर हवे असेल तर त्यांनी इथे यावे म्हणजे आम्ही त्यांना हव्या त्या पद्धतीने आमचा मर्दपणा सिद्ध करून दाखवू. या वाक्यामधील लैंगिकतेचे सूचन स्पष्ट आहे. इथे मर्द-नामर्दपणाचा संबंध केवळ शौर्याशी नाही तर लैंगिकतेशीही जोडलेला आहे आणि म्हणूनच नामर्द म्हणून हिणवण्यामागील मूल्य असंस्कृत व हिणकस मूल्य ठरते. पण इतकेच नाही तर यात स्त्रियांच्या दुय्यम दर्जाचे मूल्यही अभिप्रेत असते. ‘मर्द’पणाचा उल्लेख शिवसेनेच्या नारायण राणेंच्या विधानाला अभिप्रेत होता. नीलम गोऱ्हेंना उद्देशून माझ्याशी मुकाबला करायला शिवसेनेकडे कुणी मर्द शिल्लक नाहीत काय, अशा तऱ्हेची भाषा राणेंनी वापरली, त्याला सेनेने त्याच मुद्दय़ांवर बळकटी देणारा प्रतिसाद दिला. एखाद्या कर्तृत्व नसलेल्या पुरुषाला जेव्हा आपण ‘‘तू काय हातात बांगडय़ा भरल्या आहेस का?’’ असे म्हणतो तेव्हा त्या वाक्यात बांगडय़ा भरणारा समाजघटक, म्हणजे स्त्रिया कर्तृत्ववान असूच शकत नाहीत हेच मूल्य अभिप्रेत असते.

मध्ययुगातीलच शिवाजी महाराजांचे मोठेपण या पाश्र्वभूमीवर आणखीनच उठून दिसते. त्या काळातील मर्दपणाचे एक लक्षण म्हणजे आपला जनानखाना वाढवणे. शत्रुपक्षाच्या स्त्रिया पळवून आणणे हे तर मर्दपणाचे मोठेच लक्षण. अशी मूल्यव्यवस्था असलेल्या काळात शिवाजी महाराजांनी मर्दपणाचे हे हिणकस मूल्य ठोकरले. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर करून तिला परत पाठवले. त्यांनी तसे केले नसते तरी मध्ययुगीन मर्दानगीच्या मूल्यकल्पनेप्रमाणे ते आक्षेपार्ह नव्हतेच. पराभूत शत्रूच्या बायका या विजयी राजाच्या मालमत्ताच ठरत. परंतु शिवाजी महाराजांनी ‘मर्द’ होण्याचे नाकारले व सुसंस्कृतपणाचे मूल्य स्वीकारले.

आधुनिक काळातील व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य त्या काळात स्वीकारले. एकविसाव्या शतकातील महाराष्ट्राला मध्ययुगीन मूल्यांना प्रतिष्ठा देणारे राजकीय नेते लाभावेत हे आपले दुर्दैव. पण शिवाजी महाराजांनी मध्ययुगात ‘मर्द’पणा की सुसंस्कृतपणा यात जी निवड केली ती आता आपल्याला करायचीय. आपला लाडका महाराष्ट्र ‘मर्द’ लोकांचा असेल की सुसंस्कृत लोकांचा असेल हे ठरवायचेय.

भक्ती बिसुरे, सौजन्य – लोकसत्ता

काश्मीरमधील कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाम या जिल्ह्यांत सततच्या दहशतवादी कारवायांपायी निराधार झालेली हजारो मुलं आहेत. त्यापैकी मुलींची अवस्था अत्यंत वाईट आहे. या मुलींना अडनिडय़ा वयात दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागत आहेत. त्या आघातांनी हादरलेल्या या मुली रस्त्यांवर दिशाहीन भटकताना दिसतात. त्यांचे ते भावनाशून्य डोळे पाहून पुण्यातला अधिक कदम हा तरुण कमालीचा उद्विग्न झाला आणि त्यातूनच बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या  ‘बसेरा-ए-तबस्सुम’ या कल्पनेचा जन्म झाला. ‘बसेरा-ए-तबस्सुम’ म्हणजे ‘खुशीयोंका घर’! या ‘खुशियोंका घर’मध्ये आज काश्मिरातील दहशतग्रस्त भागांतील २० महिने ते २० र्वष वयोगटातील १३३ मुली राहतात. रूढार्थाने जरी ते अनाथाश्रम असले तरी त्यांना अनाथाश्रम म्हणणं या मुलींना मान्य नाही. या मुलींना आसरा देऊन देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम ही संस्था करते आहे..
गेले तीन महिने काश्मीर पुन्हा पेटलंय. दगडफेक, संचारबंदी आणि सततचा खूनखराबा यामुळे या नंदनवनात राहणाऱ्या सामान्यांचे हाल होताहेत. सततच्या अस्थिरतेला लोक कंटाळलेत. तरीही ते हतबल आहेत, कारण अशा परिस्थितीत स्वत:ला घरात कोंडून घेण्याशिवाय त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही. वर्षांनुर्वष भिजत घोंगडय़ासारख्या राहिलेल्या काश्मीर प्रश्नावर अजूनही निर्णय होत नाहीए. अत्यंत पिचलेल्या आणि गांजलेल्या परिस्थितीत काश्मिरी लोक मागच्या पानावरून पुढे आयुष्य रेटत आहेत. जागतिक महासत्ता होण्याची स्वप्नं पाहणाऱ्या भारताच्या काश्मीरमध्ये मात्र ‘भय इथले संपत नाही..’ असा प्रकार आजही आहे.

संजय नहार यांचा काश्मीरवरील लेख (‘लोकसत्ता’- रविवार, ८ ऑगस्ट) वाचला. काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जे काही मोजके प्रामाणिक प्रयत्न होत आहेत त्यामध्ये संजय नहार आणि त्यांच्या ‘सरहद्द’ संघटनेचा वाटा मोठा आहे. काश्मिरी मुलांना पुण्यात निवारा देऊन त्यांच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने झटणाऱ्या संजय नहार यांचा काश्मिरी तरुणांना मोठा आधार वाटतो. असे आधारस्तंभ पावलोपावली उभे राहिले तर काश्मीरमधली परिस्थिती लवकरच पालटेल अशी आशा वाटते. काश्मीरमधील जनतेच्या मनात भारताविषयी आश्वासक चित्र उभं करण्यात भारतीय जनतेने- विशेषत: महाराष्ट्राने पुढाकार घ्यावा, हा पर्याय खरंच स्वागतार्ह आहे. कारण प्रेम व विश्वास पेरला तर प्रेम आणि विश्वास उगवतोच, याचा अनुभव मी सध्या घेत आहे. पुण्यातील ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ ही स्वयंसेवी संस्था सीमारेषांचे सगळे बंध झुगारून गेली आठ र्वष काश्मीरमधील अनाथ मुलींसाठी काम करते आहे. मी या संस्थेशी जोडली गेल्याला आता दोन र्वष होऊन गेलीत. या अनाथ मुलींशी जुळलेले प्रेमाचे आणि मैत्रीचे बंध दिवसेंदिवस दृढ होत आहेत.

‘दिव्याने दिवा लागतो’ असं म्हणतात. संजय नहार यांनी मराठी युवकांना काश्मीर प्रश्नाची जाणीव करून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. पुण्यातून इथल्या तरुणांना त्यांनी काश्मीरला नेलं. तिथलं आयुष्य डोळसपणे पाहायला शिकवलं. अशाच एका दौऱ्यात पुण्याचा अधिक कदम हा तरुण काश्मीरला गेला आणि तिथलं भीषण वास्तव पाहून तो स्वतंत्रपणे काश्मीरला जातच राहिला. तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करताना त्याच्या एक गोष्ट लक्षात आली-

काश्मीरमधील एकटय़ा कुपवाडा जिल्ह्यात २४,००० पेक्षा जास्त अनाथ मुलं होती. त्यापैकी मुलींची परिस्थिती अत्यंत वाईट होती. ज्या कुपवाडा जिल्ह्यात अक्षरश: राजरोसपणे दहशतवादी कारवाया चालतात, तिथे या दहशतवादापायी हजारो लहान मुली बेघर झालेल्या आहेत. अडनिडय़ा वयात त्यांना दुर्दैवाचे दशावतार भोगावे लागले. माणुसकीचा विसर पडलेल्यांनी या मुलींचा पुरेपूर वापर केला. या आघातांमुळे हादरलेल्या या मुलींनी काश्मीरच्या रस्त्यांवर दिशाहीन भटकायला सुरुवात केली. त्यांचे भावनाशून्य डोळे पाहून तो उद्विग्न झाला आणि त्या कमालीच्या उद्विग्नतेतूनच बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशनच्या ‘बसेरा-ए-तबस्सुम’ या कल्पनेचा जन्म झाला. ‘बसेरा-ए-तबस्सुम’चा अर्थ ‘खुशीयोंका घर’! आज काश्मीरमधील कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाममध्ये, तसेच जम्मूमध्ये अशी चार ‘खुशियोंका घर’ आहेत. पैकी काश्मीरमधील घरं मुस्लिम मुलींसाठी आणि जम्मूमधील घर काश्मिरी पंडित- अर्थात हिंदू मुलींसाठी आहे! महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुस्लिम आणि हिंदू यांच्यासाठी एकत्रपणे काम करणारी बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन ही एकमेव संस्था आहे.

‘खुशियोंका घर’मध्ये २० महिने ते २० र्वष वयापर्यंतच्या १३३ मुली राहतात. एवढं मोठ्ठं कुटुंब आहे अधिक कदमचं! गौरव कौल, बिपीन ताकवले, अजय हेगडे, प्रिया घोरपडे, सलिमा, रजनी, आकांक्षा अशी तरुण ‘टीम’ अधिकसोबत आहे. आणि या यंग ब्रिगेडला वेळोवेळी अनुभवाचा हात देणारे मोहन अवधी, सुधा गोखलेंसारखी ज्येष्ठ मंडळीही आहेत. शिवाय या प्रवासात भारतीदीदी, तन्वीरभय्यांसारखे लोकही संस्थेत सामील आहेत. काही वैयक्तिक जबाबदाऱ्यांमुळे ते आज या प्रवासात नाहीत, तरी त्यांच्या कामाचं योगदान आणि शुभेच्छांचं पाठबळ आहेच सोबत.

या १३३ अनाथ मुलींसाठी ‘खुशीयोंका घर’ हे आज सर्वस्व झाले आहे. रूढार्थाने जरी ते अनाथाश्रम असले तरी त्यांना अनाथाश्रम म्हणणं मुलींनाच मान्य नाही. यापैकी ३० मुली गेल्या डिसेंबरमध्ये हिवाळी सहलीसाठी पुण्यात आल्या होत्या तेव्हा माझं त्यांच्याशी घट्टमुट्ट गुळपीठ जमलं. मी त्यांची ‘दीदी’ झाले. दोन-तीन तासांतच त्या इतक्या मोकळेपणी बोलायला लागल्या, की माझी आणि त्यांची कित्येक वर्षांची जुनी ओळख असल्यासारखं मला वाटलं.

या मुलींचं काश्मीरमधलं आयुष्य आपण पुण्या-मुंबईतले लोक कल्पनाही करू शकणार नाही इतकं बिकट आहे.  ‘A For AK-47’  आणि ‘B For Blast’  हेच लहानपणापासून मनावर ठसलेलं. कुणाचे वडील त्यांच्या डोळ्यासमोर दहशतवाद्यांच्या गोळीला बळी पडलेत, तर कुणाच्या वडिलांनी परिस्थितीला कंटाळून स्वत:च AK-47 हातात घेतलीय. कुणाचं कुटुंब दहशतवादी आणि लष्कराच्या क्रॉस फायरिंगला बळी पडलंय. प्रत्येकीची कथा आणि व्यथा वेगळी! आणि अशा सगळ्या मुली ‘खुशियोंका घर’मध्ये गुण्यागोविंदाने नांदताहेत. त्या पुण्यात आल्या तेव्हा मी त्यांना जवळून अनुभवू शकले. इथे त्यांच्यासाठी आखलेल्या सगळ्या कार्यक्रमांत त्यांनी हौसेने भाग घेतला. वेळोवेळी त्यांच्याशी झालेल्या संवादातून त्यांचं चौकसपण दिसत होतं. इतकी र्वष काश्मीरमध्ये राहिल्यामुळे आणि अनेक छोटय़ा-मोठय़ा प्रसंगांतून तावूनसुलाखून निघाल्यामुळे की काय कुणास ठाऊक, पण या मुली अकाली प्रौढ झाल्यासारख्या भासतात. त्यांच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर भाष्य करतानाही त्यांची परिपक्वता थक्क करणारी आहे. ही परिपक्व समज जर मोठय़ा माणसांकडे असती, तर असं आयुष्य या मुलांच्या वाटय़ाला आलं नसतं, ही टोचणी आपल्याला लागून राहते.

त्यांना भेटल्यावर आणि त्यांच्या सहवासात आठ दिवस काढल्यावर एक गोष्ट अगदी प्रकर्षांने जाणवली- शिस्त! लहान मुलींची जेवणं झाल्यावर मोठय़ांनी जेवायचं, ही ‘घर’ची शिस्त इथेही पाळली जात होती. जेवायची वेळ झाल्यावर आधी लहान मुलींना खायला घालून मग मोठय़ा मुली आपली पानं वाढून घेत. ‘घरी’सुद्धा कामाच्या समान वाटण्या आहेत. त्यामुळे कुणा एकीवर कामाचा ताण पडत नाही. म्हणूनच प्रत्येकीला स्वत:च्या जबाबदाऱ्यांचं पुरेपूर भान आहे. आजकाल इन-मिन-तीन माणसांच्या घरातही न सापडणारी शिस्त या १३३ मुलींच्या कुटुंबानं मात्र पुरेपूर जपलीय.

पुण्याहून मुंबई, मुंबईहून कोकण, मग नाशिक, दिल्ली या ठिकाणी या मुली गेल्या. या संपूर्ण सहलीत आपला देश, त्याचा इतिहास, भूगोल आणि संस्कृती याबद्दलची माहिती त्यांनी मनापासून घेतली. प्रत्येक नवीन शिकलेल्या गोष्टीचं अप्रूप त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. त्यांचा पुण्याचा मुक्काम संपत आला तसा ‘दीदी, आप हमारे साथ चलो,’ असा लकडा त्यांनी लावला. पण माझं कॉलेज बुडवणं शक्य नसल्यामुळे त्यांचा हा हट्ट पुरवणं शक्य नव्हतं. मात्र, तरी रोजच्या रोज फोनवर मला माहिती मिळत होती. ‘खुशियोंका घर’मधल्या चार मुली उत्तम फोटोग्राफर आहेत. दिल्लीत एनसीईआरटीने घेतलेल्या स्पर्धेत पहिली चारही बक्षिसं आमच्या या मुलींना मिळाली, तेव्हा तर आनंदाची परमावधी झाली! त्यांच्या फोटोग्राफीचं दिल्लीत प्रदर्शन भरवलं होतं. त्याच्या उद्घाटनाला आणि मुलींना बक्षिसं द्यायला खुद्द किरण बेदी आल्या होत्या. त्यांनी या मुलींशी छान गप्पा मारल्या. त्यांचं भरपूर कौतुक केलं आणि प्रोत्साहनही दिलं. त्या आनंदात चिंब भिजून आणि आयुष्यभर जपता येईलसं संचित सोबत घेऊन मुली काश्मीर घाटीत परत गेल्या. मात्र, त्या परत गेल्या तरी मनानं मात्र दूर गेल्या नाहीत. माझं नियमितपणे त्यांच्याशी फोनवर बोलणं होत असतं. त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक बारीकसारीक गोष्टी त्या मला सांगतात. आणि काही कारणानंफोन करणं राहून गेलं तर हक्काने रुसूनही बसतात. शिवाय प्रत्येक फोनमध्ये ‘दीदी, कश्मीर कब आओगे?’ हा प्रेमळ प्रश्न असतोच. वर- ‘कम से कम दो महिने की छुट्टी लेकर आओ दीदी. वहाँ अपने चार घर है, तो चारो घरों में रहने के लिए उतना वक्त तो आपके पास होना ही चाहीए..’ असा आग्रहही! इतकी र्वष मला माझ्या आई-बाबांचं एकच घर होतं, पण आता मात्र ‘अपने चार घर’ म्हणून त्यांनी मला आपल्या मोठय़ा कुटुंबात सामील करून घेतलंय. या घराचं वर्णन करताना मुली एक गाणं म्हणतात..

‘क्यूँ ना हो हमको ये प्यारा
इसके हम है, ये हमारा
भैय्या के मेहेर नजर है ये घर..’

भैय्या म्हणजे ‘अधिकभैय्या’! तो सगळ्यांचाच जीव की प्राण आहे! गेल्या दोन वर्षांत ‘खुशियोंका घर’ व ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’ आणि या मुलींबद्दल भान हरपून बोलणारा अधिक मी अनेकदा पाहिलाय. त्याच्या आयुष्याची सगळी स्वप्नं आता या मुलींच्या भोवती गुंफलीयत. या सगळ्या चिमण्यांना त्याने तळहाताच्या फोडासारखं वाढवलंय. त्यांच्या वेण्या घालण्यापासून ते त्यांना खाऊपिऊ घालण्यापर्यंत सगळं अधिकने केलंय. त्यांच्या अडनिडय़ा वयात तो त्यांची ‘आई’ झाला. कुपवाडा, अनंतनाग आणि बडगाम हे काश्मीरचे तिन्ही जिल्हे अगदी बॉर्डरजवळ. शिवाय तिथं औषधालाही हिंदू माणूस सापडणार नाही. उघडपणे दहशतवाद्यांना आसरा देणारे गावकरी. अशा परिस्थितीत केवळ आपल्यासाठी अधिकभैय्याने जिवाची बाजी लावून इथे राहायचा धोका पत्करलाय, हे मुलींना माहीत आहे. अतिरेक्यांनी त्याचा केलेला ‘पाहुणचार’ही त्यांना माहीत आहे. रोजच्या रोज त्याच्या विरोधात फतवे निघत होते. असंख्य वेळा लोक त्याला मारायला उठले होते. आणि तरीही आपला भैय्या आपल्याला सोडून गेला नाही, याची मुलींना जाणीव आहे. त्याचबरोबर गावकऱ्यांना जशी अधिकच्या निरलसपणाची कल्पना आलीय, तशीच सर्वानी त्याला कशी मदत केलीय, हेही मुलींनी पाहिलंय. आणि म्हणूनच अधिकभैय्या हा त्यांच्यासाठी ‘फरिश्ता’ आहे!

गेले दोन महिने काश्मीरमधील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. संचारबंदी, हरताळ, बंद यामुळे शाळा-कॉलेज, ऑफिसेस बंद पडलीयेत. मुलांचं प्रचंड प्रमाणात शैक्षणिक नुकसान होतंय. शिवाय सुरक्षेचा प्रश्न आहेच. आजही काश्मीर घाटीत असंख्य निराधार मुली आहेत. त्यांच्या तुलनेत ‘खुशियोंका घर’मधल्या आमच्या मुलींची परिस्थिती निश्चितच जास्त सुरक्षित आहे. ‘भारत बंद’च्या दिवशी पुण्यात फक्त एक दिवस मला घरी बसून काढावा लागला तेव्हा संध्याकाळी मी किती सैरभैर झाले होते, ते मला आठवलं. मग ही लहान मुलं काय करत असतील? घरात कोंडून घेतलंय सगळ्यांनी- हे फोन केला तेव्हा समजलं. भीती आणि नैराश्याचं सावट सगळीकडे भरून राहिलंय. ‘दीदी, सिर्फ स्कूलही है, जो हमारी जिंदगी में entertainment है.. वो भी बंद रहे, तो हम क्या करे?’ या त्यांच्या प्रश्नावर माझ्याकडे खरंच उत्तर नव्हतं. तरीही काही बोलायचं म्हणून मी केविलवाणा उपाय सुचवला- ‘कोई बात नहीं अगर स्कूल बंद है तो.. आप लोग घरपे बैठके पढाई करो.. खेलो!’ यावर असहायपणे उत्तर आलं- ‘दीदी, हर रोज आजूबाजू में कोई मरता है, सुबह-शाम पुलिस किसी ना किसी को उठाके लेके जाती है. जी नहीं लगता दीदी..’ हे अनुभवाचे बोल! माझ्या अंगावर सरसरून काटा आला. एवढय़ा- एवढय़ाशा मनांवर हे एवढे मोठे आघात झालेत! हे सारं आपल्या विचारांच्या कक्षेपलीकडचं आहे, याची जाणीव झाली. रोज निदान दोन मिनिटं तरी मी त्यांना फोन करायचा, असं शेवटी आमच्यात ठरलं. त्यांच्या होरपळलेल्या आयुष्यात माझ्या फोनने जर त्यांना थोडा गारवा मिळणार असेल तर माझीही हरकत नव्हती. इथल्या वर्तमानपत्रांत किंवा अगदी वृत्तवाहिन्यांवरही आपल्याला फक्त श्रीनगरच्या बातम्या बघायला मिळतात. पण अतिसंवेदनशील असलेल्या कुपवाडा, अनंतनागबद्दल आपण साफ अनभिज्ञ असतो. माझ्या काश्मिरी मैत्रिणींकडून मला तिथल्या परिस्थितीचा ‘ऑंखों देखा हाल’ समजत असतो. सरतेशेवटी आपल्या मुली-मैत्रिणी सुरक्षित आहेत म्हणून ‘खुदा का लाख लाख शुकर’ म्हणून गप्प बसायचं, की काश्मीरचा दिवसेंदिवस गुंतागुंतीचा होत जाणारा प्रश्न ‘रामभरोसे’ सोडून मोकळं व्हायचं, हा प्रश्न आहेच.

राजकीय हेवेदावे आणि मत्सर यांच्या कचाटय़ात सर्वसामान्य जनता आणि लहान मुलं यांची नेहमीच वाताहत होते, हे आपण वर्षांनुर्वष पाहतो आहोत. काश्मीर तरी याला अपवाद कसा असेल? संजय नहार आणि त्यांची ‘सरहद्द’ मिळून काश्मिरी युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिवाचं रान करताहेत आणि दुसऱ्या बाजूला ‘बॉर्डरलेस वर्ल्ड फाऊंडेशन’च्या माध्यमातून अधिकने काश्मिरी मुलींना शिक्षण आणि संस्कार देण्याचं असिधाराव्रत घेतलंय. या मुलींना पुण्यात आणून त्यांना इथे शिकवणं, हे आमच्यासाठी तुलनेनं सोपं आणि कमी जोखमीचं आहे. पण आम्हाला त्यांची काश्मीरशी असलेली नाळ तोडायची नाहीये. कारण त्यांची खरी गरज काश्मीरमध्ये आहे. एक मुलगी शिकली की कुटुंब शिकतं आणि गावाला शिकवतं, असं म्हणतात. आज आम्ही फक्त १३३ मुलींना शिकवतोय आणि सांभाळतोय. पण बुलंद आशीर्वाद आणि शुभेच्छांच्या बळावर आम्ही ही संख्या नक्की मोठी करू, असा विश्वास वाटतो. आमच्या मुली हे गाणं नेहमी म्हणतात-

‘मुश्लीक नहीं है ये सफर,
तेरा साथ मिल जाए अगर..
मैं मोहब्बत की मंजिल को पा लूँ,
प्यार से देख ले तू मुझे इक नजर..’

हाच आशावाद मला काश्मीरबद्दल वाटतो. आपण प्रेमाचा हात पुढे केला तर खरंच- मुश्कील नहीं है ये सफर..

हुसेन जमादार,  सौजन्य – मटा


इस्लाममधील समतावादी तत्वामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मनात इस्लामविषयी आदरभाव होता, परंतु भारतात तो समाजवादी आशय लोप पावल्यामुळे त्यांना दु:खही झाले होते. इस्लाममध्ये वंश आणि वर्ग यांच्या सीमा ओलांडून विविध लोकांना बंधुत्वाच्या भावनेने एकत्र बांधण्याची क्षमता असली तरी भारतीय मुसलमानांतील जातीव्यवस्था नष्ट करण्यात त्यास यश आलेले नाही.

‘मुस्लिम समाजातील काही रुढींबद्दल आणि त्याहुनही त्यात बदल घडवू पाहणाऱ्या इच्छेचा त्यांच्यातील अभाव याविषयी डॉ.आंबेडकरांनी प्रखर टिका केलीली आहे. उदा. मुस्लिम महिलांतील बुरखा पध्दती. त्याबद्दल ते म्हणतात,’ रत्यावरुन चालत जाणाऱ्या या बुरखाधारी महिला हे भारतात आढळणाऱ्या अगदी हिणकस दृश्यांपैकी एक दृश्य आहे. पडदा पध्दतीमुळे मुस्लिम महिलांच्या शारीरिक रचनेवर अनेक दुष्परिणाम होतात. अनेमिया, क्षय, दातांचे विविध रोग, यासारख्या रोगांना त्या बळी पडतात. पाठीत बाक निर्माण होणे, हात-पाय वाकडे होणे इत्यादी. या पडदा पध्दतीमुळे मुस्लिम महिला बौध्दिक व नैतिक पोषणापासून वंचित ठेवल्या जातात. त्यांना बाह्य जगापासून पूर्णत: विभक्त केल्यामुळे कुटूंबातील लहान-सहान भांडणामध्ये त्या गुंतून राहतात. परिणामत: त्या कोत्या मनाच्या व संकुचित दृष्टिच्या बनतात. आंबेडकरांच्या मते, पडदा पध्दतीमुळे हिंदूना सामाजिकदृष्टया मुस्लिम समुदायापासून विभक्त करण्याचे कार्य घडत आहे. जे भारतातील सामाजिक जीवनाच्या विनाशाचे एक कारण आहे.’

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची खंत आहे की, मुस्लिमांनी त्या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केल्याचा एकही पुरावा आढळत नाही.

डॉ. आंबेडकरांनी भारतीय मुस्लिम समाजाच्या सामाजिक जीवनाबरोबरच राजकीय जीवनातील भूमिका अधोरेखित करताना म्हटले आहे की, मुस्लिमांना राजकारणात काहीही रस नाही.धर्मातच त्यांना मुख्यत: रस आहे. मुस्लिम मतदार संघातील निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला पाठींबा देण्यासाठी ज्या अटी घातल्या जातात त्या अशा – उमेदवाराने स्वखर्चाने मशीदीतील जुने दिवे काढून त्या जागी नवे दिवे लावावे, जुन्या सतरंज्या फाटल्याने त्या नव्या आणाव्यात, मशिद मोडकळीस आल्याने तिची दुरुस्ती करावी! मुस्लिम राजकारण हें प्रामुख्याने पुराहितप्रवण आहे, आणि त्याला फक्त एक फरक कळतो, तो म्हणजे हिंदू व मुसलमांनातील फरक. मुस्लिम समाजातील राजकारणात जीवनाच्या कुठल्याही ऐहिक व धर्मनिरपेक्ष घटकाला स्थान नाही. डॉ. आंबेडकर म्हणतात, ‘त्यांना अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे, त्याविरुध्द एखाद्या संघटित समाज सुधारणा चळवळीचा अभाव होय.’ हिंदूंमधील निदान काही घटकांमध्ये अशी या सामाजिक दोषाबाबत जाणीव निर्माण झाली आहे, आणि त्यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत, त्याप्रमाणे मुस्लिमांमध्ये अशी चळवळ राहोच, पण या दोषांची जाणीवही निर्माण झालेली नाही.’

इस्लाम हा सर्व लोकांना सर्व काळ सर्व परिस्थितीत योग्य ठरणारा वैश्विक धर्म आहे, हे मुस्लिमांचे मुलभूत गृहीत याला कारणीभूत आहे, असे अनेक विचारवंतानी स्पष्टीकरण दिलेले आहे.

भारतातील मुसलमानांमध्ये परिवर्तनाच्या वृत्तीचा जो अभाव दिसून येतो, याचे कारण भारतीय समाजातील विशिष्ट स्थानामध्ये शोधले पाहिजे. त्याला प्रामुख्याने हिंदू वातावरण हळूवार परंतू सातत्यपूर्ण रितीने त्याच्यावर अतिक्रमण करीत असते.ते त्याच्या गैरमुसलमानीकरण करीत आहे,असे त्याला वाटते. या संथपणे चाललेल्या इस्लामपासून परावृत्त करण्याच्या प्रक्रियेपासून बचाव म्हणून आपल्या समाजाला काय उपकारक आणि काय हानीकारक ठरेल याची चिकित्सा न करता जे जे इस्लामिक तें ते जतन करण्याचा त्यांना अट्टाहास करावा लागत आहे. दुसरे, भारतातील मुसलमानांस ज्या राजकीय वातावरणात रहावे लागत आहे, ते वातावरणसुध्दा प्रामुख्याने हिंदूच आहे. त्यामुळे आपण दडपले जाऊ आणि या राजकीय दडपणामुळे मुसलमान हे एका शोषित वर्गात ढकलले जातील अशी त्यांची भावना झालेली आहे.

राजकीय व सामाजिकदृष्टया हिंदूद्वारे होणाऱ्या अतिक्रमणापासून स्वत:चा बचाव करावा लागणार आहे. राजकीय व सामाजिकदृष्टया हिंदूद्वारे होणाऱ्या अतिक्रमणापासून स्वतःचा बचाव करावा लागणार आहे. ‘ही जाणीवच माझ्या मते भारतीय मुस्लिम इतर देशातील मुस्लिमांच्या तुलनेत सामाजिक सुधारणेच्या बाबतीस मागास असल्याचे प्राथमिक कारण आहे. जागा व पदांसाठी हिंदूशी सातत्याने भांडण्यातच त्यांची सर्व शक्ती खर्च होत आहे. सामाजिक सुधारणेच्या प्रश्नासाठी वेळ देणे, त्यासंबंधी विचारमंथन करणे आणि अवसर उपलब्ध करुन देणे या बाबी घडत असताना दिसत नाहीत. आणि जरी तसे काही घडले तरी हिंदू व हिंदूधर्माच्या उपद्रवाविरुध्द कुठल्याही किंमतीवर सामाजिक- धार्मिक संघटीत फळी उभी करु पाहणाऱ्या सांप्रदायिक तणावातून निर्माण होणाऱ्या इच्छेखाली दबून जाते, दडपले जाते.’

”भारतातील मुस्लिम समाजाच्या राजकीय कुंठितावस्थे विषयीदेखील हेच स्पष्टीकरण लागू होते. मुस्लिम राजकारणी जीवनाच्या इहवादी घटकांना त्यांच्या राजकारणाचा आधार बनवू इच्छित नाहीत. कारण त्यामुळे हिंदूविरोधी लढयात त्यांचा समुदाय कमजोर होईल, असे त्याना वाटते. गरीब मुस्लिम, गरीब हिंदूशी एकजूट करुन श्रीमंताकडून न्याय मिळवण्यासाठी झटणार नाहीत. जमीनदारांच्या जुलमाला विरोध करण्यासाठी हिंदू कुळाबरोबर मुस्लिम कुळे एकत्र येणार नाहीत. असे का? उत्तर सरळ आहे. कुळाला असे वाटते की, जर त्याने जमिनदारीविरोधी मोहिमेत भाग घेतला तर त्याला एखाद्या मुस्लिम जमिनदाराविरोधात लढावे लागेल. त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की, एखाद्या श्रीमंत मुस्लिमाचे, मुस्लिम जमिनदाराचे अथवा मुस्लिम गिरणीमालकाचे नुकसान होणे म्हणजे मुस्लिम समाजाची हानी करणे होय. कारण त्यामुळे हिंदू समाजविरोधी लढयात तो समाज कमजोर होण्याची शक्यता आहे.’

मुस्लिम समुदायावर डॉ. आंबेडकरांनी केलेली ही टीका आणि त्याच्याबद्दल व्यक्त केलेली नकारात्मक मते आंबेडकर कसे मुस्लिमविरोधी होते, हे दर्शविण्यासाठी हिंदुत्ववाद्यांना उत्साहवर्धक वाटत असतील. परंतु काय हे खरे आहे? त्यात एक अंशसुध्दा तथ्य नाही. मुस्लिम समाज इतका -हासशील व अंतर्लक्षी का आहे याबद्दल डॉ. आंबेडकरांचे विश्लेषण वाचल्यास वस्तुस्थिती नेमकी उलटी आहे हे लक्षात येते. ‘प्रतिगामीपणा हा मुस्लिमांचा स्थायीभाव आहे. इस्लाम त्याच्या पलिकडे इतर विचारांना मान्यता देत नाही. त्यातच मुस्लिम समाजाच्या मागासलेपणाची कारणे शोधावी लागतात’. – हे भारतीय मुस्लिम समाजाच्या प्रतिगामी स्वरुपाबद्दल दिले जाणारे एकसाची स्पष्टीकरण बाबासाहेब आंबेडकर स्पष्टपणे नाकारतात. त्यांना हे स्पष्टीकरण असमर्थनीय वाटते. कारण इतर देशातील मुस्लिमांनी इस्लामचा त्याग न करता मूलगामी सुधारणा घडवून आणल्या आहेत.भारतातील मुस्लिमांच्या मागासलेपणाचे कारण त्यांना त्यांच्या भोवतालच्या वैशिष्टयपूर्ण हिंदू वातावरणात सापडते. हिंदू समाजात इतरांना सहभागी करुन घेण्याची वृत्ती नाही. तिचे स्वरुप प्रभावशाली आहे. अंगभूतपणे हिंसक आहे. हिंसा हे सर्व हिंदू देवतांचे वैशिष्टय आहे. त्यांचे प्रभुत्व अमान्य करणाऱ्या लोकांसाठी आश्वासक वातावरण निर्माण करण्यास हे सक्षम नाहीत. आणि त्यामुळे हे कट्टर पुराणमतवादी बनले आहेत. या सत्य परिस्थितीच्या प्रकाशात डॉ. आंबेडकर हे मुस्लिमविरोधी होते अथवा नव्हते हे वाचकच चांगल्या प्रकारे ठरवू शकतील, असे डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी म्हटले आहे.

डॉ. आंबेडकरांच्या निर्वाणानंतर १४-१५ वर्षात महाराष्ट्रात मुस्लिम सत्यशोधक मंडळ नावाचे प्रबोधनवादी आंदोलन उभे राहिले. मरहूम हमीद दलवाईंच्या नेतृत्वाखाली २२ मार्च १९७० रोजी पुण्यात स्थापना झालेल्या या चळवळीचा प्रस्तुत लेखक संस्थापक सभासद असून १९७१ ते १९८० या काळात पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलेले आहे. सध्या सरचिटणीस आहे. आम्हा प्रबोधनवादी कार्यकर्त्यांना डॉ. आंबेडकरांची वरील मांडणी अत्यंत तर्कशुध्द व वस्तुस्थितीदर्शक आहे, असे वाटते. किंबहूना मुस्लिम सुधारकांच्या डोळयात अंजन घालणारी आहे. आम्ही मुल्ला-मौलवीना जबाबदर धरुन चळवळीची आखणी करीत गेलो. मुस्लिम स्त्रीवर होत असलेले अन्याय उदा. तोंडी तलाक कायद्याने बंद झाला पाहिजे, सवतबंदीचा कायदा भारतीय मुस्लिमांना लागू करावा, पुढे चालून समान नागरी कायदा व्हावा अशी भूमिका मांडत आलो.

मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा जाहीरनामा म्हणतो- ”भारतीय मुस्लिम समाजापुढे स्वातंत्र्योत्तर काळात नवी आव्हाने उभी राहिली आहेत.स्वातंत्र्यपूर्व काळातील सर सैयद अहमदखान यांचा मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि ऐहिक दृष्टिकोनातून मुलभूत बदल घडवून आणण्याचा आरंभीचा प्रयत्न वगळल्यास एरवी निराशाच पदरी येते. भारतीय मुस्लिम समाज या सर्व काळात आपल्या अल्पसंख्यांक स्थानाविषयी विनाकारण अतीव जाणीव बाळगून आपल्या सनातन, परंपरागत श्रध्दा कवटाळून बसलेला आणि बहुसंख्य हिंदू समाजविरोधी आंदोलने करीत राहिला. सर सैयद अहमदखानाच्या प्रयत्नाने सुरु झालेल्या मुस्लिम सुधारणांचा गाडादेखील अखेरीला विभक्तवादाच्या दलदलीत रुतून गेला. पाकिस्तानची निर्मिती आणि भारतातील हिंदू-मुस्लिम संबंधातील तफावाचा इतिहास सर्वांना माहीत आहेच.”

भारताला सर्वधर्मीय राष्ट्रीयता निर्माण करण्याच्या झालेल्या सर्व प्रयत्नात एक मूलभूत चूक सतत होत राहिली आहे. ती अशी की, हिंदू समाजाला आधुनिक, विशाल आणि पुरोगामी बनवण्याच्या आड येणाऱ्या जुनाट धर्मनिष्ठा बदलण्याचा एक सततचा प्रयत्न चालला असतानाच मुस्लिम समाजाच्या काल- विसंगत अशा परंपरागत श्रध्दांना हात न लावण्याचा आटापिटा मुस्लिम समाजाकडून करण्यात येत होता. आणि बहुसंख्य हिंदू समाजातील परिवर्तनवादी मंडळीदेर्खींल या प्रक्रीयेला कळत न कळत हातभार लावीत होता. आज देखील या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही. याचा परिणाम म्हणजे हिंदू समाजात आधुनिक राष्ट्रवादाचे, धर्मनिरपेक्षतेचे आणि समानतेच्या आधुनिक मानवी मूल्यांचे प्रवाह तुलनेने अधिक बळकट होत गेले आणि मुस्लिम समाज मात्र आपल्या जुन्याच श्रध्दांना चिकटून राहिला. सुशिक्षित मुस्लिमांची मजल यामुळे विभक्तवादी प्रवृत्तीपलिकडे कधी जाऊ शकली नाही. बदललेल्या परिस्थितीचे आव्हान यामुळेच मुस्लिम समाज स्वीकारु शकला नाही.

भारतातील हिंदू आणि मुसलमान समाजातील ही प्रबोधनाची दरी भरुन काढल्याशिवाय खऱ्या अर्थाने या दोन्ही समाजाचे संबंध सुधारणार नाहीत, राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणार नाही, आणि नव्या भारतातील प्रजासत्ताकात मुस्लिम समाज राष्ट्रजीवनाचा एक सन्माननीय घटक म्हणून नांदू शकणार नाही. आपण लोकशाही जीवनपध्दती स्विकारलेली असल्याने या प्रबोधनाची निकड निर्माण झालेली आहे. त्याशिवाय समाजातील सर्व क्षेत्रात स्त्री-पुरुष समानता निर्माण होणार नाही व लोकशाहीचा पाया कमकुवतच राहील.

हे कार्य व्हावे म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाची स्थापना करण्यात येत आहे. ‘सत्यशोधक’ शब्दाला महाराष्ट्राच्या जीवनात एक विशिष्ट अर्थ आहे. त्यामध्ये सामाजिक सुधारणांच्या प्रखर आंदोलनाची पार्श्वभूमी आहे. या मंडळाचे ‘मुस्लिम सत्यशोधक मंडळ’ हे नाव ठेवताना महाराष्ट्रातील सामाजिक परिवर्तनाची जाणीव या मंडळाच्या संस्थापक सभासदांपुढे आहे.”

आता बदललेल्या राजकीय, सामाजिक परिस्थितीचा विचार करता मंडळाने आपली भूमिका बदलली आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षांनी प्रथमच मुस्लिमांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक प्रश्नांचा विचार करुन न्या. सच्चर समितीचा अहवाल पंतप्रधानांना सादर करण्यात आला आहे. त्याचा निष्कर्ष लिहीताना न्या. सच्चरनी असे नमूद केले आहे की, इथल्या बी.सी. समाजापेक्षाही येथील मुस्लिम समाज मागासलेला आहे. जे हिंदूत्ववादी पक्ष आणि संघटना म्हणत होत्या की, मुसलमानांचे लाड होतात. त्यांच्या मुस्काटात सणसणीत चपराक न्या. सच्चरनी लावलेली आहे.

या अहवालाला घेऊन मुस्लिम समाजात काम करण्याची गरज वाटली. कारण अहवाल येऊन वर्ष उलटले तरी मुस्लिम समाजाला त्याची माहिती नव्हती. इंटरनेटवर असलेला हा जवळ जवळ पाचशेहे पानांचा रिपोर्ट कोण वाचणार? मुस्लिम्स फॉर सेक्युलर डेमॉक्रसी, मुंबई या संघटनेने त्यावर एक परिषद आयोजिली होती. त्याला आम्ही उपस्थित राहिलो व तेथे त्यांनी ‘कम्युनॅलिझम कॉम्बॅट’मध्ये प्रसिध्द केलेला संक्षिप्त रिपोर्ट मिळाला. त्याचे मराठी व हिंदीमध्ये भाषांतर करुन महाराष्ट्र प्रदेश सर्वोदय मंडळाच्या सहाय्याने पुस्तिका प्रसिध्द करुन विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सुमारे ५० गावातून मुस्लिमांच्या सभा घेतल्या. इतरही मंडळी या विषयावर काम करीत आहेत. त्या अंमलात आल्या तर मुस्लिम समाजाला फायद्याचे ठरणार आहे. पण या शिफारशी अमलात आणा म्हणून मुस्लिम समाजाचा रेटा निर्माण झाला तरच शासन त्या अंमलात आणील. म्हणून वरील प्रयत्न केले. परंतु त्याची एक चळवळ निर्माण होत नाही. छुट-पुट सभा होतात असे चित्र दिसले. असे का होते याचे उत्तर डॉ. आंबेडकरांनी केलेल्या वरील विवेचनात सापडते.

काही ठिकाणी मुस्लिमांनी अशी भिती व्यक्त केली की, आधीच इथे मुस्लिमांचे लाड होतात अशी ओरड सुरु असताना आम्ही सच्चर आयोग लागू करा अशी मागणी सुरु केल्यास काय होईल? तेव्हा सर्वोदय मंडळ व तुमर्चीं संघटना असा एकत्रित कार्यक्रम घेऊ म्हटल्यावर त्यानी ते मान्य केले व तशी परिषद घेण्याचे मुस्लिम समाजातील नेत्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य मुस्लिमांना एकत्र करुन काम करण्याची गरज आहे.

नुकतीच धुळयाला दंगल झली. तेथे सर्वोदय मंडळाची टीम गेली होती. दहा दिवस कर्फ्यु होता. ३ तास कर्फ्यु उठल्यावर आम्ही गांधींच्या पुतळयासमोर दोन दिवस सर्व धर्म प्रार्थना घेतली. दंगलीत ज्यांची घरे जळाली त्या मंडळींना भेटायला गेलो. गजानन कॉलनीमधील बरीच घरे जाळण्यात होती. पाच किलोचे गॅस सिलींडर वापरुन घरे पेटविली असे आम्हाला सांगण्यात आले. बाहेरुन आलेली मंडळी होती. तोंडाला रुमाल बांधलेली मंडळी होती. नॅशनल उर्दू हायस्कूलमध्ये मुस्लिम मंडळींचा कँप होता. तेथील लोकांची घरेदेखील वरीलप्रमाणे जाळली होती. अनेक ठिकाणची मंडळी तेथे होती.काही जण तर दंगली सुरु झाल्यावर घराला कुलूप लावून आली होती. आज घराची अवस्था काय आहे त्याना माहित नव्हते.

तेथे चार मौलाना होते. मौ. मजहरुद्दीन, मौ.मुक्तार, मौ.अबुल आस, मौ.मुक्ती कशिम. ही मंडळी स्थानिक टी. व्ही. वरून शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवाहन करत होती.

त्यांनी सांगितले की, मुस्लिम समाजाने दहशतवादाचा पुतळा जाळण्यासाठी मिरवणूक काढली होती. (खरे पाहता या त्यांच्या कृतीचे स्वागत व्हायला हवे होते.) परंतु हिंदू रक्षक समितीने अशी भूमिका घेतली की, दहशतवादी मुस्लिमच आहेत व तेच दहशतवादाचा पुतळा जाळतात म्हणजे काय?आपण त्यांच्या विरुध्द सभा घेऊ. व त्यांनी मुस्लिम दंगे घडवतात अशा आशयाचे डिजिटल बोर्डस् लावले व ते बोर्ड फाडल्यावरून दंगल सुरू झाली. येत्या निवडणूकीवर डोळा ठेवून हे घडले आहे, असे अनेकांनी सांगितले.

परंतु दोन्ही समाजातील स्रीयांना ही दंगल पसंत नसल्याचे दिसले.नेहमी आपण शेजारी शेजारी राहणार आहोत असे कसे जगता येईल? असे त्या म्हणत होत्या. तेव्हा दोन्ही समाजातील स्रिया व मुलांना घेऊन शांती मोर्चा काढावा असे आम्ही ठरविले व जिल्हाधिकारी श्रीमंती प्राजक्ता लवंगाारे यांची भेट घेतली. त्यांनी या कल्पनेचे स्वागत केले परंतु १४४ कलम उठल्यानंतर करु असे म्हणल्या.

वरील मौलानांनी आम्ही हिंदू समाजाबरोबर बसून बोलू इच्छीतो. एकमेकांची काय चूक आहे यावर चर्चा करू असे म्हणाले. तोही एक मार्ग हाताळून पहाता येईल.

हिंदू रक्षक समितीमध्ये बजरंग दल व इतर हिंदूत्वावादी संघटना आहेत. त्यांची भूमिका आक्रमक आहे.समन्वयाची नाही. याचे आणखी एक उदाहरण सांगता येईल. भाजप व संघ परिवाराने बाबरी मशिद उध्वस्त केल्यानंतर देशात हिंदू-मुस्लिम विद्वेषाचे वातावरण निर्माण झाले. यावर मार्ग काढवा म्हणून मुस्लिम सत्यशोधक मंडळाने तडजोडीचा एक मुद्दा पुढे केला की, मुस्लिम समाजाने बाबरी मशिदीच्या जागेवरील ताबा सोडून द्यावा. हिंदू समाजाने राम मंदिराबरोबर दुसरीकडे बाबरी मशिद बांधावी आणि इथून पुढे कोणत्याही मंदिर मशिदीचा प्रश्न उपस्थित न करता १९४७ ची स्थिती जैसे थे मान्य करावी.

हा तडजोडीचा मुद्दा घेऊन मुस्लिम सत्यशोधक मंडळ महाराष्ट्रात व देशभर सद्भावना यात्रा काढू इच्छित होते.आम्ही पुण्यात पत्रकार बैठक घेऊन जाहीर केले.तेव्हा विश्व हिंदू परिषदेच्या प्रवीण तोगडीया यांनी पुण्यात जाहीर केले की, ‘यह अच्छी बात है, हम राम जन्मभूमि की जगह ले लेंगे और काशी मथुरा के लिए और लढ़ेंगे’ तोगडीयांच्या या आढयताखोर भूमिकेमुळे मंडळाची सद्भावना यात्र निघू शकली नाही. हिंदूत्ववादी संघटनांच्या या आक्रमक भूमिकेचा पुढचा भाग म्हणजे भारत हे हिंदू राष्ट्र आहे ही भूमिका.

‘भारतात इतर धर्मांचे लोक आहेत.आम्ही मुस्लिम आहोत. फाळणीनंतर फक्त २० टक्के मुस्लिम पाकिस्तानात गेले. ८० टक्के मुस्लिम मेरा देश मेरी मिट्टी म्हणतात. इथे राहिले आहेत, ते मुख्यतः धर्मांतरीत आहेत. आम्ही कांही अरबस्तानातून आलेलो नाही. हिंदु धर्मातील चातुरर््वण्य व्यवस्थेने केलेल्या अनन्वित अत्याचारामुळें हिंदू धर्मातील विशेषत: अस्पृश्य जमातीने हिंदू धर्म टाकून कोणी मुस्लिम, कोणी ख्रिश्चन तर कोणी बौध्द धर्म स्विकारला आहे. त्यामुळे आम्ही आज मुस्लिम असलो तरी आम्ही या देशाचे भूमिपूत्र आहोत.तेंव्हा आम्हां सर्वाना घेऊन हिंदू राष्ट्र बनवावे लागेल व भारताची धर्मनिरपेक्ष घटना कायम ठेवूनच ते करावे लागेल. तसेच जो जो भारतीय वंशांचा आहे (मग त्याचा धर्म कोणताही असो) त्या प्रत्येकाला इथे राहण्याचा व आपला विकास करून घेण्याची संधी असली पाहीजे,अशी व्यवस्था असणारे हिंदू राष्ट्र असायला आमची हरकत असणार नाही.’

या संदर्भात डॉ. आंबेडकरांनी झरज्ञळीींरप ेी ींहश झरीींळींळेप ेष खपवळर या पुस्तकात आपली भूमिका मांडली आहे की, ‘हिंदू राज्या’विषयी मुस्लिमांच्या मनातील कुशंकांचा आधार नष्ट करुन आंबेडकर जाहिरपणे भविष्यवाणी करतात,’ हिंदु राज्य अस्तित्वात आले तर ते या देशासाठी फार भयंकर संकट ठरेल यात शंका नाही. हिंदू काहीही म्हणोत, परंतू हिंदू धर्म हा स्वातंत्र्य, समता व बंधुता या तत्वांना उपद्रवकारक आहे. त्याबाबतीत तो लोकशाहीशी विसंगत आहे. त्यामुळें कोणत्याही परिस्थितीत ‘हिंदू राज्या’ला प्रतिबंध केलाच पाहिजे. ‘अनेक देशांमध्ये बहुसंख्यांक-अल्पसंख्यांक हा विवाद असला तरी कुठेही जमातवादी राज्य उदयाला आल्याचे दिसत नाही. उदा. कॅनडामध्ये ब्रिटीशराज, दक्षिण आफ्रीकेमध्ये डचराज, अथवा स्वित्झर्लंडमध्ये जर्मनराज आले नाही, असे ते नमुद करतात,’ एखाद्या देशातील विविध समुदयांच्या सापेक्ष क्षमतांमध्ये लक्षणीय तफावत असल्यामुळेच जमातवादी राज्य संभावते. जमातवादाला राजकारणाला मध्ये परवानगी न दिल्यामुळेच या देशांना जमातवादी राज्यांचा उदय रोखता आला आहे.’

हिंदू धर्मातील साम्राजवादी वैशिष्ठयांमुळे अल्पसंख्यांकांसाठी शांततामय सहजीवन जगण्यासाठी आवश्यक ती परिस्थिती निर्माण होऊ शकेल, या बददल डॉ.आंबेडकर जरी साशंक असले तरी मुस्लिमांच्या अल्पसंख्यांक जमादवादाचीसुध्दा ते हयगय करीत नाहीत. जमातवादाचा राक्षस निर्माण करण्याबद्दल त्यांना दोष देत ते म्हणतात,’ हिंदू महासभा आणि त्यांच्या हिंदूशाही व हिंदू राज्याच्या घोषणांबद्दल मुस्लिम आक्रोश करत आहेत,पण या साठी कोण जबाबदार आहे?

हिंदू महासभा आणि हिंदू राज्य या मुस्लिमांनी मुस्लिम लिग स्थापन करुन स्वत:वर ओढवून घेतलेल्या अनिवार्य अशा दैवी शिक्षा आाहेत. ही क्रिया आणि प्रतिक्रिया आहे. एकीमुळे दुसरीला बळ मिळते. फाळणी नव्हे, तर मुस्लिम लिगचे विसर्जन आणि हिंदू मुस्लिमांच्या मिश्र पक्षाची स्थापना हाच हिंदू राज्याचे पिशाच्च गाडून टाकण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे.’ हिंदू व मुस्लिमांचा मिश्र पक्ष स्थापण्यात त्यांना कोणतीच अडचण दिसत नाही. ‘हिंदू समाजात असे अनेक कनिष्ठ स्तर आहेत, की ज्यांच्या आर्थिक, सामाजिक आणि सामाजिक गरजा बहुसंख्य मुस्लिमांप्रमाणे आहेत आणि जे शेकडो वर्षापासून त्यांचे साधे मानवी हक्कही नाकारणाऱ्या व हिरावून घेणाऱ्या उच्च जातीय हिंदूपेक्षा मुस्लिमांबरोबर समान ध्येय गाठण्यासाठी एकत्र येण्यासाठी निश्चितच तयार होतील.’ आंबेडकरांना हे साहसवादी वाटत नाही.१९२०ते १९३७ या काळात माँटेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणांर्गत बहुसंख्य प्रांतात मुस्लिम, ब्राम्ह्मणेतर आणि मागासवर्गीय यांनी एकत्र येऊन या सुधारणा राबवल्या, याची ते आठवण करुन देतात. त्यांच्या मते,’ हिंदू व मुस्लिमांमध्ये जातीय सलोखा राखून हिंदू राज्याचा धोका नष्ट करण्याची ही सर्वात फलदायी पध्दत आहे.’

(लेखक मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक – सदस्य असून मुस्लिम समाजात जागृती घडवून आणण्याचे कार्य गेली चार दशके अविरतपणे करीत आहेत.)

दत्तप्रसाद दाभोलकर , सौजन्य – लोकसत्ता

संयुक्त महाराष्ट्राचा अमृतकलश बरोबर घेऊन नेहरू, यशवंतराव चव्हाण वगैरे मंडळी शिवतीर्थावर जमली होती त्या वेळची गोष्ट. १०५ हुतात्म्यांच्या रक्ताची शपथ आता सुटली होती. साऱ्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही मराठी माणूस आनंदात कसा चिंब भिजून निघाला होता. सारा महाराष्ट्र एकसंध एकजीव होऊन बाहेर पडला होता. पाटसकरांचा पराभव करीत नौशेर भरुचाला आम्ही निवडून दिले होते. आम्ही जात आणि धर्म विसरलो होतो. आम्हाला तोडणाऱ्या त्या भिंती आम्ही आमच्या मनात जमीनदोस्त केल्या होत्या. अमरशेख, नौशेर भरुचा, आंबेडकर, एस. एम. जोशी यांचा धर्म आणि जात कोणी काढली असती तर त्याच्या कानाखाली आवाज काढून आम्ही मोकळे झालो असतो!

आमचे स्वप्न सत्य बनून समोर आले होते. मराठी माणूस आता फक्त शेतमजूर, घरगडी किंवा गिरणी कामगार राहणार नव्हता. तुकाराम, रामदास, ज्ञानेश्वर, चोखा मेळा यांच्या भाषेचा वनवास आता संपला होता. ज्ञानेश्वरीच्या बरोबर ‘विज्ञानेश्वरी’ आता आम्ही खेडय़ापाडय़ांतून झोपडीझोपडीतून देणार होतो. खरे तर आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञान खेडय़ापाडय़ांतील माणसांपर्यंत त्यांच्या भाषेत पोहोचल्याने, कोयनेची वीज दारात पोहोचल्याने, उद्योगांचे जाळे महाराष्ट्रभर पसरल्याने त्या झोपडय़ा, झोपडय़ा उरणार नव्हत्या, त्यांची छोटी टुमदार घरे बनणार होती. मराठी माणूस आता मुंबईत बिचकणार नव्हता. कारण खाजगी व सरकारी कचेऱ्या त्याच्या भाषेत बोलणार होत्या-‘हिचे पुत्र आम्ही, हिचे पांग फेडू, हिला बैसवू वैभवाच्या शिरी’ ही कवीउक्ती कृतीत येणार होती!

असे असले तरी आम्हा मित्रमंडळींच्या दृष्टीने काही वांदे होते. पारशी कॉलनीतील आमचे मित्र आम्हाला चिडवत असत, ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची!’ एक खटय़ाळ मित्र तर यांच्यापुढे गेला! ‘मराठा गडी यशाचा धनी’ म्हणून आम्ही शाळेत फळ्यावर जे लिहिले होते त्यातल्या ‘गडी’ या शब्दाखाली तो लाल खडूने एक छान जाड रेघ ओढून गेला!-सारी शाळकरीच मुले, त्यांचीही काही चूक नव्हती. संयुक्त महाराष्ट्र निर्माण करताना कटुता वाढली होती. आम्हाला त्यांचा राग यायचा नाही तर त्यांची कीव यायची. -आम्ही म्हणायचो, ‘चिडा बच्चमजी चिडा हवे तेवढे! आता संयुक्त महाराष्ट्र झालाय. माझ्या कामगार बांधवांचे आणि मराठी भाषेचे वाईट दिवस आता संपलेत. तुम्ही जरूर महाराष्ट्रात राहा.-पण महाराष्ट्रात राहावयाचे असेल तर तुम्हाला मराठी शिकावे लागेल!’

आता पन्नास वर्षे मागे पडलीत. त्या मुलांचे सोडा; आमची आणि आमच्या नेतेमंडळींची मुले-नातवंडे इंग्रजी माध्यमात शिकलीत. आणखी एक भलतेच आक्रीत घडलेय. ‘मुंबई तुमची, भांडी घासा आमची’नेही ‘करवट’ बदललीय. मुंबईत ती भांडी घासायला मिळत नाहीत तर बिहारी माणसे ती येथे येऊन घासताहेत म्हणून राडा करीत मराठी तरुण रस्त्यावर उतरलेत!

आज महाराष्ट्रात ३२ टक्क्यांहून अधिक लोक दारिद्रय़रेषेखाली आहेत. म्हणजे मुंबई आमच्या ताब्यात असताना आमचे दारिद्रय़रेषेचे प्रमाण भारताच्या सरासरीपेक्षा पाच टक्क्यांनी जास्त आहे. महाराष्ट्रातील दारिद्रय़रेषेचे प्रमाण बिहार, उत्तर प्रदेशशी स्पर्धा करीत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत आमच्याशी स्पर्धा करण्याची हिंमत कोणत्याही राज्यात नाही.

५० वर्षांत हे असे का झाले, हे प्रथम लक्षात घ्यावयास हवे. संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून प्राणाची बाजी लावलेल्या कृष्णा देसाई यांना मराठी तरुणांनीच राडा करून संपवले. आणि या खुनी तरुणांना वाचविण्यासाठी मराठी बोलताही न येणाऱ्या एका वकिलाला आणून त्याला मुंबईत प्रस्थापित व्हावयास मदत केली. मराठी बोलताही न येणाऱ्या माणसांना महाराष्ट्राचे खासदार म्हणून आम्ही राज्यसभेत पाठविले. महाराष्ट्र आणि मुंबई आमच्या हातात असताना, साथीच्या रोगासारख्या, परप्रांतीयांच्या नव्हेत तर बांगलादेशीयांच्या झोपडपट्टय़ा आम्ही मुंबईत वाढावयास दिल्या.

मुंबईतील मराठी माणसांनी ‘राडा संस्कृती’ रुजवली. मुंबईत राहतात त्यापेक्षा खूप अधिक मराठी माणसे महाराष्ट्राबाहेर भारतभर राहतात. मात्र ज्या ज्या वेळी मुंबईत मराठी माणसांनी राडा केला तेव्हा भारतभर या मराठी माणसांना जगणे कठीण केले गेले. साऱ्या भारतभर ‘राडा करणारा प्रदेश’ म्हणून महाराष्ट्र बदनाम झाला. मुंबईतील भूखंडाचे श्रीखंड आणि राडा संस्कृतीतून हाती आलेल्या अमाप पैशाच्या जोरावर नेते मंडळींनी महाराष्ट्रातील गावोगावचे राजकारण नासवले.

याच कालखंडात महाराष्ट्र व मुंबई यांच्या दृष्टीने एक सर्वात भयावह गोष्ट घडली. मुंबईतील गिरणी कामगार हा संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाचा कणा होता. मुंबईतील गिरणी कामगार हा मुंबई आणि महाराष्ट्र यांना जोडणारा सेतू होता. हे कामगार मनाने आपल्या खेडय़ात गुंतलेले होते. तेथील एखाद्या तरुणाला मुंबईत यावयाचे असेल तर तो चक्क मुंबईत येऊन गिरणी कामगाराच्या चाळीतील गॅलरीत आपली पथारी पसरे. चाळीतील सार्वजनिक सुविधा वापरी आणि दिवसभर हिंडून मुंबईत उद्योगधंदा शोधे. मुंबईत होणारी खेडय़ांतील मराठी तरुणांची आवक प्रामुख्याने अशा प्रकारे होत असे. ती आपली ‘सप्लाय लाइन’ होती. मुंबईतील गिरण्या बंद पडल्या त्या वेळी दीड-दोन लाख मराठी कामगार बेकार झाले. प्रत्येक कामगाराचे कुटुंब होते. दहा लाख मराठी माणसे मुंबईच्या बाहेर फेकली गेली. मुंबईत येणारी मराठी माणसांची सप्लाय लाइन  तुटली. आता मुंबईच्या झोपडपट्टीत येऊन राहू शकणारा व वणवण करीत काम शोधणारा बिहारी तरुण मुंबईत भरती झाला.

हे घडत असताना ‘मला काय त्याचे?’ म्हणून मुंबईतील मराठी माणसे आणि त्यांना नाचवणारे मराठी पक्ष व नेते शांत राहिले; त्यांनी याविरुद्ध राडा वगैरे राहू देत, साधी मुंबई बंदसुद्धा केली नाही. किमान गिरण्यांच्या जागांवरचा कामगारांचा हक्क वसूल केला असता.. आपण त्या जागांवर बहुगुणांचे ‘चिपको आंदोलन’ करू शकलो असतो.. कदाचित आजही करू शकू. पण आपण असले काही अजिबात करणार नाही.. प्रेताच्या टाळूवरील लोणी खावे त्याप्रमाणे या जागा विकत घेण्यासाठी आपले नेते धडपडताहेत.

महाराष्ट्र उद्योगधंद्यात नव्हता. व्यापारातही नव्हता. पण शिक्षणाच्या जोरावर महाराष्ट्र अभिमानाने दिमाखात उभा होता. महात्मा फुलेंनी ‘इतुके अनर्थ एका अविद्येने केले’ हे बहुजन समाजाला पटवून दिले आणि पहिले सक्षम पाऊल उचलून, पुण्यात एका ब्राह्मणाच्या वाडय़ात, आपल्या सहधर्मचारिणीबरोबर दलित मुलींसाठी, भारतातील पहिली शाळा काढली. भारतरत्न कर्वेनी स्त्री-शिक्षणाचाच नव्हे तर विधवाविवाहाचा आणि विधवाशिक्षणाचा पाया घातला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा मंत्र दिला आणि तो उपेक्षित समाजाने झेलला. आणि आमच्या कर्मवीर अण्णांनी, महाराष्ट्रातच नव्हे, भारतातच नव्हे, तर सबंध जगात प्रथमच श्रमावर आधारित स्वावलंबी शिक्षण बहुजन समाजातील वंचित मुलांसमोर ठेवले. स्वावलंबी शिक्षणातून कर्तबगार तरुणांची एक पिढी महाराष्ट्राचे पुनर्निर्माण करण्यासाठी मैदानात उतरली.

आज परिस्थिती काय आहे? साखरसम्राटांना खिशात घालतील असे शिक्षणसम्राट; त्यांच्या शिक्षणसंस्थांमधील घोटाळे; साटेलोटे करून आपले दुय्यम सहकारी त्यांना जपणारे राज्यकर्ते. महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था या दुष्ट चक्रातून बाहेर कशी काढावयाची याचा विचार करावयास हवा. शिक्षणसम्राटांना मिळणाऱ्या नफ्यापैकी ८०-९० टक्के नफा आपणाला ग्रामीण विभागातील प्राथमिक शिक्षणाकडे वळविण्यापासून सुरुवात करावी लागेल.

गेल्या ५० वर्षांत महाराष्ट्राची खरी ओळख आपण पुसून टाकली आहे. ‘विचार’ हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आधार आहे. गुजरातच्या, व्यापारातून आलेल्या समृद्धीचे कारण सांगताना दादूमिया एकदा म्हणाले होते, ‘गुजरातमध्ये बनिया बनिया असतोच. पण ब्राह्मणही बनिया असतो. क्षत्रिय आणि शूद्रही बनिया असतो. वर्णाश्रमधर्म मोडून व्यापार सर्वत्र रक्तात भिनलाय! महाराष्ट्रात घृणास्पद वर्णाश्रमधर्म पार मोडून लखलखता विचार देणारे महापुरुष निर्माण झाले. आगरकर, टिळक, विनोबा भावे, सावरकर, महात्मा फुले, राजर्षी शाहू, भारतरत्न आंबेडकर लखलखते विचार घेऊन हे महापुरुष पुढे आले. साऱ्या भारताने विस्मयचकित होऊन त्यांच्याकडे पाहिले आणि आजही त्यांच्या विचारांच्या आधाराने भारतातील वैचारिक चळवळींची आणि राजकीय पक्षांची वाटचाल चालू आहे.
मात्र गेल्या ४० वर्षांत महाराष्ट्रात आलेल्या राडा संस्कृतीने महाराष्ट्रातील एकही वैचारिक चळवळ वा आंदोलन वाढू दिले नाही. ‘शेतकरी संघटना’, ‘अंनिस’, ‘दलित पँथर’,  ‘एक गाव एक पाणवठा’ यातील प्रत्येकाचे प्राक्तन महाराष्ट्रातील ‘राडा संस्कृतीने’ ठरविले. वैचारिक चळवळी वाढावयास एक वातावरण लागते. शांतपणे विचार केला तर राजर्षी शाहू, आंबेडकर, महात्मा फुले अगदी सावरकर पेशवाईत वाढू शकले नसते किंवा अगदी इंग्रज राजवटीतसुद्धा लोणी येथे झालेल्या ‘सनातन धर्म’ परिषदेने सावकरांना सुनावले होते, ‘आज पेशवाई असती तर शूद्रांबरोबर भोजन करणाऱ्या आणि शूद्र-ब्राह्मण विवाह करणाऱ्या या धर्म मोडणाऱ्या पापी माणसाला पेशव्यांनी हत्तीच्या पायाखाली देहान्त प्रायश्चित्त दिले असते!’ इंग्रज राजवट गेली. पेशवाईही आली नाही. मात्र ४० वर्षांत राडा संस्कृतीने महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आधार असलेल्या वैचारिक चळवळी मोडीत काढल्या.

ते असो! एका अगदी वेगळ्या गोष्टीचा आपण शांतपणे विचार करावयास हवा. एखाद्या भाषक विभागाची अस्मिता व ओळख टिकविण्यासाठी व त्याची प्रगती करण्यासाठी त्या भाषक विभागाचे ‘एकक’ असणे गरजेचे आहे का? महात्मा गांधींनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे व वैचारिक चळवळींचे मोहोळ असे म्हटले होते. त्या वेळी ‘महाराष्ट्र’ म्हणून काही अस्तित्वात नव्हता. मुंबई प्रांतात सिंध, कराची वगैरे प्रदेश होते- गुजरातचा भाग होता, कर्नाटकचा थोडा भाग होता. सबंध विदर्भ त्या वेळी वेगळा होता. मराठवाडय़ाचे सहा जिल्हे निजामी राजवटीत होते. गोवा पार्तुगीज अंमलाखाली होता. तरीही महाराष्ट्र हा ‘महाराष्ट्र’ म्हणूनच ओळखला जात होता. बडोदा, इंदूर, हैदराबाद, दिल्ली येथील महाराष्ट्र मंडळे दिमाखात उभी होती. चांगले साहित्यिक-सांस्कृतिक कार्यक्रम होत होते. महाराष्ट्रात सामील होण्याचे नाकारणाऱ्या गोव्यात आजही पुणे, मुंबई, सातारा यापेक्षा अधिक आपुलकीने आणि दिमाखात साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडतात आणि आज जर आपण पुन्हा महाराष्ट्रात विलिनीकरण व्हावे की होऊ नये यासाठी सार्वमत घेतले तर विलिनीकरणाच्या बाजूने तेव्हापेक्षा कमी मते पडतील. गोव्यात परप्रांतीयांचे प्रमाण वाढले हे त्यामागचे कारण नव्हे; तेथील मराठी माणसांशी बोललो तर वेगळे राहून शहाणपण केले,असेच प्रामुख्याने का ऐकायला मिळते?

भाषेची व भाषक विभागाची अस्मिता, स्वाभिमान जपण्यासाठी व वाढविण्यासाठी आणि त्यांची प्रगती होण्यासाठी भाषक विभागाने एकत्रच राहावयास हवे का? हिंदी भाषक विभाग, राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार असा विखुरलेला आहे. छोटी राज्ये, प्रगतीच्या दृष्टीने अधिक सक्षम असतात असेही अहवाल आहेत. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विभागांची मानसिकता वेगळी आहे का? त्यांना एकत्र ठेवून आपण तीन पायांची शर्यत खेळतोय का? हा देश प्रामुख्याने भाषांचे नव्हे तर जातींचे संघराज्य आहे आणि भाषावार प्रांतरचनेत एखाद्या जातीची अघोषित हुकूमशाही निर्माण होण्याचा धोका आहे का? आर्थिक स्तर, साधनसंपत्ती आणि मानसिकता वेगळी असलेल्या विभागांची भाषेच्या नावावर तीन पायांची शर्यत केली तर त्यातून फरपटच हातात येत राहणार का? विदर्भामध्ये सुविधांचा अनुशेष, पश्चिम महाराष्ट्रात श्रीमंती सूज आणि मुंबईत मृगजळ मराठी माणूस कवटाळून बसणार..

आज मुंबईत ४० टक्क्यांहून कमी मराठी माणसे राहतात. पण महाराष्ट्रातील सर्व खेडी आणि शहरे अंधारात ठेवून शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना वीज न देता महाराष्ट्र मुंबईला २४ तास मुबलक वीज पुरवतो. मॉल आणि आयपीएलचे क्रीडा संकुल यांनासुद्धा आपले जनरेटर्स लावा असे का म्हणू शकत नाही? पाणी महाराष्ट्राचेच मात्र ६० टक्क्यांहून अधिक परभाषिक असलेल्या मुंबईला आपण सर्वाधिक पाणी देतो. तेसुद्धा फार स्वस्त दरात. मुंबईत पाणी साडेतीन रुपये हजार लिटर्स. सातारा येथे सदर बझार विभागात १० रुपये हजार लिटर्स, ते पण मुंबईला मिळते त्याच्या १० टक्के. केंद्र सरकार मुंबईतील सागरी सेतूसारख्या उपक्रमाला हजारो कोटी रुपये देते. त्या वेळी साऱ्या भारतातील लोकांना वाटते महाराष्ट्राला केवढे झुकते माप! पण त्याचा मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांना तरी कितीसा फायदा असतो?

५० वर्षांनंतर काही नवी रचना आपण शोधावयास हवी का? महाराष्ट्राचे विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र असे छोटे विभाग करावेत. मुंबई केंद्रशासित करावी. मात्र मुंबईपासून महाराष्ट्राला आज जे महसुली उत्पन्न मिळते ते पुढील १०० वर्षे केंद्राने चलनवाढीतील वाढीप्रमाणे महाराष्ट्राच्या या पाच विभागांना समान वाटून द्यावे. ही रचना अनेकांना चुकीची वाटेल. बरोबर असली तरी त्यात अनेक त्रुटी असतील, पण विचार हा महाराष्ट्राच्या अस्तित्वाचा आधार आहे हे मान्य करून राडा संस्कृतीला न घाबरता यावर चर्चा तरी करावयास नको का? आपण असे काही करणार नसू तर आणखी ५० वर्षांनी गावोगावी ‘भांडी घासा आमची’ असे परप्रांतीयच म्हणत असतील.. किंबहुना आजच त्याची ठाणे, नाशिक अशा ठिकाणी सुरुवात झाली आहे.

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

ज्यादिवशी महाराष्ट्राला ५० वर्षे पूर्ण होतील, त्याच दिवशी गुजरातचाही सुवर्णमहोत्सव दिन साजरा होत असेल. पण महाराष्ट्र- मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र- होण्यासाठी जसा संघर्ष झाला तसा गुजरातसाठी झाला नव्हता. त्यांच्याकडे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी अशा दिग्गजांची समिती नव्हती. कामगारांचे संप, हरताळ, मुंबई बंद, शिवतीर्थावर जंगी सभा, साहित्य संमेलनांमध्ये ठराव असले गुजरातमध्ये काही होत नव्हते. याचा अर्थ गुजराती लोकांना त्यांच्या भाषेचा, संस्कृतीचा अभिमान नव्हता? तसे तर शक्य नाही. शिवाय गेली काही वर्षे तर गुजरातचा अभिमान अक्षरश: ओसंडून वाहतो आहे. अमेरिका, आफ्रिका, युरोप, इतकेच काय- हाँगकाँग, सिंगापूर, मॉरिशस अशा जगातील अनेक ठिकाणी जे लक्षावधी गुजराती लोक आहेत, ते आज गुजरातच्या औद्योगिक व आर्थिक विकासासाठी प्रचंड भांडवल गोळा करीत आहोत. गुजराती भाषिक या आर्थिक अभिमानापोटी मराठी अस्मितेसारखा ऊठसूट रस्त्यावर उतरत नाही, त्यांच्या जंगी सभा होत नाहीत, मोर्चे- मिरवणुका निघत नाहीत आणि तरीही त्यांचा ‘गर्व’ किती जाज्ज्वल्य असतो, हे शिकागोपासून अहमदाबादपर्यंत आणि जोहान्सबर्गपासून ते कच्छपर्यंत सर्वत्र दिसून येते.

गुजराती अस्मितेचा आत्मा फक्त त्यांच्या भाषेत नाही, तो त्यांच्या जेवणशैलीतही आहे. उद्योगधंद्यांत, अर्थव्यवहारात तर तो ओतप्रोत भरलेला आहे. ज्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, त्या मुंबईतील स्टॉक मार्केटमध्ये सुमारे तीन-साडेतीन हजार ब्रोकर्स गुजराती आहेत. आणखी तेवढेच मारवाडी आहेत. मुंबईत ज्या ६५ कापड गिरण्या होत्या, त्यांचे मालकही मारवाडी-गुजरातीच होते. त्या गिरण्या जमीनदोस्त झाल्यानंतर जे टोलेजंग मॉल्स आणि गगनचुंबी इमारती तिथे आणि मुंबईत सर्वत्र उभ्या राहत आहेत त्यातही गुजराती-मारवाडय़ांचेच र्सवकष वर्चस्व आहे. धान्य बाजारापासून कापड बाजारापर्यंत, किराणा मालापासून ते औषध बाजारापर्यंत जवळजवळ सर्व धंदे त्यांच्याच हातात आहेत. जे मुस्लीम-बोहरी वा अन्य या धंद्यांत आहेत त्यांची भाषाही गुजरातीच आहे. जे पारशी उद्योगात वा कलाक्षेत्रात आहेत, त्या सर्वाची ‘लिंग्वा फ्रँका’ म्हणजे संवाद-स्नेहभाषाही गुजरातीच आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हाही हीच परिस्थिती होती.

मुंबई द्विभाषिक आणि वेगळी ठेवायचा प्रस्ताव जेव्हा होता तेव्हा तिचे स्वरूप मराठी व गुजराती या दोन भाषांपुरतेच होते. कानडी, तामीळ, मल्याळी समाज त्यावेळीही मुंबईत होते, पुढे त्यांची संख्याही वाढली; पण मुंबईवरचा प्रभाव हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती यापलीकडे गेला नाही. हिंदी चित्रपटसृष्टीची राजधानी तेव्हाही मुंबईच होती. ‘बॉलीवूड’ नावाचे बारसे तेव्हा झाले नव्हते. तेव्हाही त्या बॉलीवूडपूर्व चित्रसृष्टीवर प्रभुत्व (व्ही. शांतारामांसारखे अपवाद वगळता) बिगरमराठी ‘उत्तरे’चेच होते. राज व शम्मी कपूर, दिलीपकुमार, देव आनंद, मोहम्मद रफी, मुकेश, नौशाद, ओ. पी. नय्यर, हसरत जयपुरी, मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, वहिदा रहमान या अभिनेते- अभिनेत्री, संगीतकार, कवींचाच तेव्हाही वरचष्मा होता. मुंबईबद्दल देशभर आकर्षण होते ते या शहराच्या मराठी बाण्यामुळे नव्हे, तर या महानगरातील चंदेरी सृष्टीमुळे, उद्योगधंद्यांमुळे, शेअरबाजारामुळे!
कामगार चळवळ हाही मुंबईचा ‘स्वभाव’ होता. पण त्याचे नेतृत्वही कॉम्रेड डांगेंप्रमाणेच डिमेलो, जॉर्ज फर्नाडिस, शांती पटेल, अशोक मेहता यांच्याकडे होते. कामगार प्रामुख्याने मराठी होते. त्यामुळे एकूण ट्रेड युनियन चळवळीवर मराठी ठसा असला तरी त्या वर्गाने ‘आंतरराष्ट्रीयत्व’ स्वीकारलेले असल्याने तो बाणा जितका मराठी होता, तितकाच ‘लाल’ही होता. गिरगावपासून पाल्र्यापर्यंत आणि गिरणगावापासून दादपर्यंत पांढरपेशा चाकरमान्यांचा जो मध्यमवर्ग होता, त्याची जीवन-भाषाशैली मराठी होती; पण त्यांचा प्रभाव अवघ्या मुंबईवर नव्हता.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला खरा; पण मुंबईचा ‘एलिट’ वर्ग, त्यांच्याच वर्तुळात वावरणारा ‘सेलिब्रिटी क्लास’ किंवा मुंबईची देशाला ओळख करून देणारा उच्चभ्रू श्रीमंत वर्ग हा जवळजवळ ९० टक्के (कदाचित त्याहूनही अधिक) बिगरमराठीच होता. (आजही बऱ्याच अंशी तीच स्थिती आहे.)
मराठी रंगभूमी, मराठी संगीत, नाटय़संगीत, मराठी साहित्य, मराठी सामाजिक- सांस्कृतिक विचार, विविध कोश-ज्ञानकोशांची परंपरा हे सर्व बऱ्यापैकी समृद्ध होते. (पण ती समृद्धीही फार होती, असा भ्रम बाळगण्याचे कारण नाही. या सर्व सांस्कृतिकतेलाही मर्यादा होत्या. आणि मागे वळून पाहताना तर ते सर्व अधिकच खुजे भासते. असो.) मराठी नाटके गुजरातीमध्ये भाषांतर होऊन सादर होत. (आजही होतात!) मराठी कादंबऱ्याही गुजरातीमध्ये येत. पण मराठी साहित्यसृष्टीने तामीळ वा बंगाली, मल्याळी वा पंजाबी साहित्य-संस्कृतीवर प्रभाव टाकला, असे झाले नाही. रवींद्रनाथ टागोर, सत्यजीत रे, मृणाल सेन, शंभू मित्रा इत्यादी बंगाली संस्कृतीवैभवाचा मराठीवर परिणाम झाला. प्रेमचंद, मुल्कराज आनंद, फणेश्वरनाथ रेणू या व इतर काही हिंदी साहित्यिकांचा मराठी साहित्यविश्वात गाजावाजा झाला. इतरही उदाहरणे देता येतील. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ही वानगीदाखल उदाहरणे दिली.

याउलट थोडय़ाफार प्रमाणात विजय तेंडुलकरांचा अपवाद वगळता पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, विंदा, मर्ढेकर, सुर्वे यांचा साहित्यसंस्कार इतरभाषिक मानसिकतेवर मात्र उमटलेला दिसत नाही. तेंडुलकरांचाही थोडाफार प्रभाव महाराष्ट्राबाहेर पोहोचला तो हिंदी चित्रपट आणि हिंदी नाटय़सृष्टीमुळे, आणि मुंबईच्या ‘कॉस्मोपोलिटन’ एलिट वर्गाने (म्हणजे श्याम बेनेगल, अलेक पदमसी, कुमुद मेहता, गिरीश कर्नाड) त्यांना सीमेपलीकडे नेले म्हणून! मर्ढेकर किंवा पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज वा विंदांना ते ‘भाग्य’ लाभले नाही.

मुद्दा हा, की मराठी बाण्याचा वा अस्मितेचा, भाषेचा वा संस्कृतीचा ‘गर्व’ करावा, अवास्तव अभिमान बाळगावा असे गेल्या ५०-७५ वर्षांत आपण काहीही केलेले नाही. विज्ञान क्षेत्रातही नारळीकर, माशेलकर, काकोडकर अशी मोजकीच नावे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहेत. तुलनेने बंगाली, तामीळ, तेलुगु, इतकेच काय, पंजाबी व हिंदीभाषिक वैज्ञानिकांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती संपादन केली आहे. अर्थतज्ज्ञतेवर तर बंगाली, गुजराती, दाक्षिणात्य यांचीच नावे घेतली जातात. (अमर्त्य सेन, कौशिक बसू, जगदीश भगवती, मेघनाद देसाई, इ. इ.) म्हणजेच स्कॉलरशिप ऊर्फ विद्वत्ता, क्रिएटिव्हिटी ऊर्फ सर्जनशीलता, एण्टरप्राइज ऊर्फ उद्यमशीलता अशा कुठल्याही क्षेत्रात आपण दिवे लावलेले नाहीत.

आताही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळून ५० वर्षे होत असताना टॅक्सी कुणी चालवावी, भेळ-पाणीपुरी कुणी विकावी, शिववडापाव हे प्रतीक असावे की कांदे-पोहे, पोवाडा- तमाशा- लावण्यांचा कार्यक्रम करावा की नक्षत्रांचे देणे, सारेगमप सादर करावे, याच्यापलीकडे आपण गेलेलो नाही.
तीच गोष्ट राजकारणातली. यशवंतराव चव्हाणांनंतर त्यांच्या तोडीचा एकही राजकीय नेता महाराष्ट्राने केंद्रीय पातळीवर दिलेला नाही. शरद पवारांच्या नेतृत्वाला आविर्भाव आहे, पण चव्हाणांच्यासारखा दर्जा नाही. यशवंतरावांच्या काळात टी. व्ही., ’24×7′ चे न्यूज चॅनल्स नव्हते. आज हा सर्व प्रसिद्धी माध्यमांचा लवाजमा आहे; पण तरीही पवार त्यांच्या दबदब्याचे रूपांतर राष्ट्रीय प्रतिष्ठेत करू शकलेले नाहीत.

संयुक्त महाराष्ट्र ५० वर्षांचा होत आहे, शिवसेना ४५ वर्षांची होईल आणि शरद पवार सुमारे ४० र्वष राज्यात अथकपणे सत्ताकारणात आहेत. (खरे म्हणजे त्यांचाही काळ १९६७ साली ते प्रथम निवडून आले तेव्हापासून मोजता येईल.) पवार प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा ते ३८ वर्षांचे होते. आज ते ७० वर्षांचे आहेत.
या सर्व काळात महाराष्ट्राने कोणते आदर्श निर्माण केले? कोणते नेते देशव्यापी झाले? कोणता विचार दिला? कोणते साहित्य दिले? कोणती अर्थनीती वा उद्योगपती दिले?

‘उज्ज्वल’ इतिहास सगळ्यांनाच असतो. मुद्दा हा असतो की, त्या उज्ज्वल इतिहासातून कोणते उज्ज्वल भविष्य आपण गेल्या ५० वर्षांत मराठी माणसाला वा महाराष्ट्राला दिले? किंवा पुढील ५० वर्षांत देण्याची शक्यता आहे? शिवाय मराठी माणसाच्या उज्ज्वल इतिहासाचा संदर्भ शिवाजीमहाराजांपासून सुरू होऊन त्यांच्याबरोबरच संपतो. काहीजण तो पेशवाईशी जोडतात. पण शिवाजीमहाराज असोत वा पेशवाई, इतिहासाचे संदर्भ त्या चौकटीपलीकडे जात नाहीत. महाराजांच्या मृत्यूनंतर २७ वर्षांनी- १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. पण भारतीय उपखंडात ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन झाल्यानंतरही मोगलांचे समांतर राज्य अस्तित्वात होतेच.

महाराष्ट्राचा अर्वाचीन / वैचारिक इतिहास सुरू होतो तो युनियन जॅक शनिवारवाडय़ावर फडकल्यानंतर.. म्हणजे १८१८ नंतर. बाळशास्त्री जांभेकरांचे ‘दर्पण’ १८३२ चे. त्यानंतर लोकहितवादी, महात्मा फुले, रानडे, टिळक-आगरकर, आणि त्यापाठोपाठ आधुनिक साहित्याचा पहिला आविष्कार. (परंतु ही जागा आपल्या त्या ‘रेनेसाँ’चा आढावा घेण्याची नाही.) तरीही ढोबळपणे आपण असे म्हणू शकतो की, १९०० ते १९६० या साठ वर्षांत महाराष्ट्रात सांस्कृतिक चैतन्य होते. नवसाहित्य आणि नव-कृषीप्रयोग या दोन्ही पातळ्यांवर काहीतरी अभिमानास्पद घडत होते.

स्थितीशीलता आली ती महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर! संयुक्त महाराष्ट्र समिती कोणताही धडाडीचा, आदर्शवादी, क्रांतिकारक कार्यक्रम न देता विसर्जित केली गेली. (तसा कार्यक्रम देण्याची त्यांची क्षमता नव्हती, की त्यासाठी लागणारी राजकीय सर्जनशीलता त्यांच्याकडे नव्हती?) त्या राजकीय पोकळीत संयुक्त महाराष्ट्र समितीची जागा शिवसेनेने घेतली. परंतु आजही ते एखादी रेकॉर्ड अडकावी त्याप्रमाणे मराठी अस्मितेच्या पुढे जाऊ शकलेले नाहीत. राज ठाकरेही त्याच अडकलेल्या रेकॉर्डची पिन बदलून तेच सूर आळवतो आहे. शेकाप संदर्भ हरवून बसला आहे. राष्ट्रवादी भूखंडबाजीत गुंग आहे. आणि काँग्रेसचा लोकसंपर्क व लोकसंवाद पूर्णपणे संपला आहे. समाजवादी भरकटलेले होतेच; ते अधिकच ‘डिसओरियण्ट’ झाले. कम्युनिस्टांना त्यांच्या मार्क्‍सवादी पोथीत महाराष्ट्र बसविता येत नाही. थोडक्यात- राजकारणी अर्थशून्य, साहित्यिक आत्ममग्न, दिशाहीन मध्यमवर्ग, उद्यमशीलता नाहीच- मग उरते काय? तर मराठी भाषेचा दर्पयुक्त अभिमान आणि अस्मिताबाजी! पण केवळ या दोन गोष्टींच्या आधारे भविष्यातील महाराष्ट्र उभा राहणार नाही. कधीच!