Archive for the ‘वैचारिक’ Category

ज्ञानेश्वर मुळे, उच्चायुक्त, भारतीय दुतावास मालदिव , सौजन्य – मटा

प्रवास, ज्ञान, नोकरी, तंत्रज्ञान, शिक्षण एवढेच काय पण वाचन माणसाला जगाशी जोडू शकते. जगाशी जोडू शकणाऱ्या नव्या शक्यतांचे स्वागत आपण आनंदाने केले पाहिजे. ‘जय भारत’ म्हणता म्हणता ‘जय जगत्’ म्हणणेही आवश्यक आहे..

———————————————————

काही दिवसांपूवीर् भारतातून पर्यटन व्यवसायातील काही मंडळी, भारतीय पर्यटक मोठ्या प्रमाणात मालदीवला यावेत यासाठी काय करता येईल; याचा अभ्यास करण्यासाठी आली होती. त्यातील एक गृहस्थ बोलता बोलता म्हणाले, ‘आमच्यातही आता खूप बदल झाले आहेत. पूवीर् क्रिकेटमध्ये पाकिस्तानचा विजय झाला की, आमच्यातले काही जण फटाके उडवत असत. आता मात्र सगळे शिक्षण घेताहेत, अनेक जणांनी माहिती तंत्रज्ञानात नोकरी मिळवलीय. हीच आमची माती आहे आणि आमचे भविष्य इथेच आहे याची आता सर्वांना खात्री आहे.’ त्याने ती माहिती मला का सांगितली याचा मला अजूनही बोध होत नाहीये. कुणाच्याही देशभक्तीविषयी शंका घ्यावी असे वातावरण असताना फक्त त्या गृहस्थानेच ते स्पष्टीकरण का दिले असावे?

मालदीवमध्ये ताज उद्योगसमूहाच्या एका रिसॉर्टच्या व्यवस्थापकांच्या दोनेक वर्षांच्या मुलीशी मी बोलायचा प्रयत्न करत होतो. तुला काय काय आवडते या प्रश्नांची तिची उत्तरं अशी होती, ‘शाळा, टीचर, माले शहर, आईवडील, पाच वर्षाचा भाऊ… दिवेही भाषा, स्पीड बोट.’ मी विचारले, ‘हाऊ अबाउट इंडिया?’

‘ आय डोंट नो इंडिया.’… ही भारतीय मुलगी अशीच भारताबाहेर राहिली तर तिच्या देशप्रेमाचे नेमके स्वरूप काय असेल? भविष्यात तिचे मालदीववरचे प्रेम दृढ होईल, भारतावरचे कमी होईल की वाढेल की तिसऱ्याच देशात (अमेरिका, जपान किंवा अन्य कोणताही) जिथं तिची नोकरी असेल, प्रियकर असेल तो देश तिला अधिक जवळचा वाटेल? मग तिच्या देशभक्तीचे नेमके स्वरूप काय असेल?

काही दिवसांपूवीर् भारत आणि मालदीव यांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांमध्ये दोस्तीचा सामना झाला. मी मनातल्या मनात स्वत:ला हा प्रश्न विचारला, ‘कोणत्या संघाचा विजय झाला पाहिजे?’ नि:संदिग्ध उत्तर आले नाही, ‘जो संघ चांगला खेळेल त्याचा विजय व्हायला हवा की भारताचाच विजय कोणत्याही परिस्थितीत होणे गरजेचे आहे?’ मी या सामन्याला प्रमुख पाहुणा होतो. मी भारताच्या वतीने जल्लोष करत होतो पण, जेव्हा जेव्हा विरोधी संघ चांगला खेळ दाखवत होता तेव्हा टाळ्या वाजवून त्यांनाही दाद देत होतो. माझ्या शेजारी मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद नशीद बसलेले होते. भारताचा खेळाडू जेव्हा चांगला खेळत होता तेव्हा तेही मनापासून टाळ्या वाजवत होते. सुदैवाने सामना बरोबरीचा झाला. पण खेळ खेळ म्हणून पाह्यचा की राष्ट्राभिमानाची खूण म्हणून?

त्याचे उत्तर सामन्याच्या आधी दोन तासांपूवीर् मला आलेल्या एका फोनमध्ये असावे. तो फोन इब्राहीम वाहीद यांचा. ते मालदीवच्या निवडणूक आयोगाचे सदस्य आहेत पण, माझी त्यांची मैत्री ते लेखक आणि विचारवंत असल्याने अधिक दृढ झाली. फोनवरती ते म्हणाले, ‘मी तुमची माफी मागण्यासाठी फोन करतोय. आजच्या भारत, मालदीव सामन्याची टीव्हीवर जोरदार जाहिरात होतेय. इंग्रजीत ‘फ्रेंडली मॅच’ असा शब्द वापरताहेत. मात्र स्थानिक दिवेही भाषेत ‘भारताविरुद्ध…’ असा शब्द वापरताहेत. मी टीव्ही स्टेशनला फोन करून खडसावले आणि दिवेही भाषेतही ‘फ्रेंडली मॅच’ला समानाथीर् शब्द वापरावेत अशी सूचना केली. त्यांनी ती मान्य केलीच पण, या आधीच्या त्यांच्या चुकीबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो.’ त्यांच्या त्या स्पष्टीकरणानं मी थोडा गोंधळलो. ‘चुकीच्या’ शब्द प्रयोगामुळे होणारा दोन देशांमधला गैरसमज टळावा हा त्यांचा उदात्त हेतू होता. त्यांचे मी आभार मानले. पण भारतीय टीव्हीवर अशा सामन्यांच्या वेळेस ‘महायुद्ध, रणसंग्राम, घमासान…’ असे शब्द मी सर्रास पाहतो आणि मला त्यात फारसे आश्चर्य वाटले नाही, याचे कारण काय असावे? इब्राहीम वाहीद यांची देशभक्ती अपुरी की माझी? की यातून घ्यायचा संदेश काही वेगळाच आहे. सर्व राष्ट्रांवर प्रेम, मानवतेवर प्रेम, पृथ्वीवर प्रेम हाच तर नवा ‘राष्ट्रधर्म’ नव्हे?

काही मूलभूत प्रश्न मला सतत छळतात? आजच्या काळात देशभक्तीचे नेमके परिमाण कोणते? आजच्या परस्परावलंबी जगात निखळ देशभक्ती असा प्रकार असू शकतो का? युद्धाच्या काळात देशाच्या बाजूने उभे राहाणे ही राष्ट्रभक्ती, मग तिचे शांतीच्या काळातले निकष कोणते? अख्खे आयुष्य दुसऱ्या देशात काढलेल्या भारतीयांची राष्ट्रभक्ती मोजण्याची मोजपट्टी कोणती? देशात राहून जनतेची फसवणूक करून अप्रामाणिक जीवन जगणाऱ्यांना आपण ‘राष्ट्रदोही’ का समजत नाही? देशात राहून विदेशी कंपन्यांची नोकरी करत आपल्याच देशातील भ्रष्टाचार, अस्वच्छता व विषमता यांच्यावर ताशेरे मारत बसणारे भारतीय, त्यांचे देशप्रेम नेमके कोणते? आपण कमावलेल्या अमाप संपत्तीचा एक मोठा भाग भारतासह वेगवेगळ्या गरीब देशातील आरोग्य सेवेसाठी देणाऱ्या बिल गेट्सचे अमेरिका प्रेम गढूळ तर होत नाही ना? मुळात देशप्रेम, देशभक्ती, राष्ट्रप्रेम या संज्ञा कालबाह्य झाल्या आहेत का?

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला, तेव्हाची व आजची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा राष्ट्र ही संकल्पना बळकट होती. आपले व परके यांच्यातले अंतर स्पष्ट होते. आपले बहुसंख्य लोक शेती किंवा तत्सम उद्योग करत होते. त्यांचे जीवन ‘स्थानिक’ होते. त्यात राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय असे फारसे नव्हते. शेतकऱ्यांचे जसे जमिनीवर प्रेम, त्याच प्रेमाचा विस्तार राष्ट्र, राष्ट्रभूमी, देशप्रेम यांच्यात प्रतिबिंबित होत असे. ‘बर्फाचे तट पेटून उठले सदन शिवाचे कोसळते, रक्त आपल्या प्रिय आईचे शुभ्र हिमावर कोसळते’ हे शब्द ऐकूनच रक्त पेटायचे. आता काळ पूर्ण बदलला आहे. स्थळ, काळ, अंतर, वेग यांचे अर्थ बदललेत. चीन आमचा विदेश व्यापारातील सगळ्यात मोठा भागीदार आहे. पाकिस्तान प्रकरण थोडे वेगळे असले तरी आपले नाते एकायामी नाही. परवा कुणीतरी किस्सा सांगितला की, विवाहसमारंभाला गेलेली एक पाकिस्तानी मुलगी आईला विचारत होती, ‘मम्मी, अभी फेरे नही हुए है वो कब होंगे?’ हिंदी चित्रपट आणि मालिकांचा तो प्रभाव आहे. एक मोठा भूभाग आणि सार्वभौमत्व (स्वत:चे निर्णय देशहितार्थ स्वत: घेण्याचे अधिकार) हे कोणत्याही राष्ट्राला लागू पडणारे दोन निकष. पण सरहद्द या पारंपरिक कल्पनेला तडा गेला आहे आणि सार्वभौमत्वाच्या कल्पनेतल्या मर्यादाही अधिकाधिक स्पष्ट होत चालल्या. शिवाय लष्करी तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे समोरासमोर तलवारी, बंदुका किंवा तोफगोळे यांच्यावर अवलंबून असलेली पारंपरिक युद्धेही जवळजवळ संपत आलेली आहेत. सध्या एकाही जवानाचा बळी न देता अमेरिकन शस्त्रास्त्रांचा वर्षाव लिबियावर होतो आहे, ही गोष्ट लक्षणीय आहे. क्षेपणास्त्रे, ड्रोन्स यांच्या युगात सीमेवरच्या सैनिकांची भूमिका पूवीर्सारखी राहिली नाही. नोव्हेंबर २०१०मध्ये युरोपियन युनियनच्या अध्यक्षांनी ”राष्ट्र’ संकल्पना इतिहासजमा झाली असून, राष्ट्रे स्वत:च्या पायावर उभी राहू शकतात हे ‘मृगजळ’ आणि ‘धादांत खोटे’ आहे’, असे विधान केले. हे वाक्य युरोपियन युनियनच्या संदर्भातले असले तरी प्रत्येकाला विचार करायला लावणारे आहे.

या बदलत्या वस्तुस्थितीला जबाबदार घटक कोणते? पहिली गोष्ट, वस्तू आणि सेवा आता मुक्तपणे आयात व निर्यात केल्या जाताहेत. भारतातील माहिती उद्योग अमेरिकेतील बेकारीला जबाबदार ठरतो. दुसरी गोष्ट, प्रवास सुकर व वेगवान झाला आहे. माणसं जगभर भटकू लागलीत अभूतपूर्व संख्येने. युरोप अमेरिकेत मुलं असलेल्या एकाकी मराठी आईबापांना पुण्यासारख्या ठिकाणी स्वत:च्या संघटनेची गरज वाटते. तिसरी गोष्ट, तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा धुमधडाका सगळ्या भिंतींचा धुव्वा उडवतोय. आभासी विश्वातल्या फेसबुकच्या सदस्यांची संख्या ३० कोटींवर आहे. जगातले तिसरे विशाल ‘राष्ट्र’ खरे तर ‘फेसबुक’ आहे. तंत्रज्ञानाचे विशेषत: माहितीचे ‘लोकशाहीकरण’ ही स्थानिक नसून जागतिक क्रांतीची नांदी आहे. चौथी गोष्ट, फक्त वस्तू आणि सेवाच नव्हे तर संकल्पनांचा प्रवास सुकर आणि सरहद्दींना कालबाह्य ठरवतो आहे. यू ट्यूब असो वा ट्विटर, ईमेल असो वा स्काइप पारंपरिक राष्ट्र संकल्पनेला छेदून जाणाऱ्या आणि अख्ख्या मानवतेला जोडणाऱ्या नवीन साधनांचा अभूतपूर्व जल्लोष सगळीकडे सुरू आहे. शेवटी पाचवा आणि महत्त्वाचा परिवर्तन बिंदू आहे मानवतेसमोरचे धोके. तापमान बदल, आतंकवाद, गरिबी, विषमता आणि रोगराई या मानवतेसमोरच्या धोक्यांनी जगभरच्या राष्ट्रांना राष्ट्रसंघ, जागतिक आरोग्य संघटना वगैरे आंतरराष्ट्रीय मंचावर एकत्र आणले आहे.

अशा या गोंधळाच्या वातावरणात माणसाने आपली देशभक्ती जिवंत ठेवायची कशी आणि का? दोन मार्ग संभवतात. पहिला ‘थिंक ग्लोबल अॅक्ट लोकल’ हा मार्ग. आपणा सगळ्यांचे मानवतेशी लाखो प्रकारे नातेसंबंध आहेत, हे लक्षात घेऊन स्वत:च्या वैयक्तिक, सामाजिक व बौद्धिक विश्वात बदल घडवून तसे वागायचे. दुसरा मार्ग, सर्वार्थाने विश्व नागरिक बनायचे. या क्षणी राष्ट्र या संकल्पनेवर अनेक बाजूंनी अतिक्रमण होत असले तरी अजून राष्ट्राला ठोस पर्याय उपलब्ध नाही. अशा पार्श्वभूमीवर प्रवास, ज्ञान, नोकरी, तंत्रज्ञान, शिक्षण एवढेच काय पण वाचन माणसाला जगाशी जोडू शकते. जगाशी जोडू शकणाऱ्या नव्या शक्यतांचे स्वागत आपण आनंदाने केले पाहिजे.

भारताचे राष्ट्र म्हणून काही महत्त्वाचे हितसंबंध आहेत. त्यात राष्ट्राची सुरक्षा, राष्ट्रभूमीचे संरक्षण, आथिर्क व सामाजिक स्थैर्य वगैरे महत्त्वाच्या गोष्टी येतात. पण या सांभाळण्यासाठीसुद्धा जगभरच्या अनेक राष्ट्रांशी तह, करार व मैत्रीसंबंध असणे गरजेचे आहे. भारताचे राष्ट्रगीत लिहिणाऱ्या रवींदनाथ टागोरांच्याच दुसऱ्या एका कृतीला बांगलादेशने राष्ट्रगीत म्हणून स्वीकारले आहे. राष्ट्रीय अस्मिता कशी असू शकते किंवा कशी बदलते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. म्हणूनच जी राष्ट्रे दूरदशीर् आहेत त्यांनी जगभर स्वत:च्या हितसंबंधांचे जाळे विणून टाकले आहे. भारतही याबाबतीत आघाडीवर आहे.

जगभर पसरलेले भारतीय वंशाचे आणि अनिवासी भारतीय यांची संख्या जवळजवळ तीन कोटी आहे. शिवाय मॉरिशस आणि त्रिनिदाद अँड टोबॅगो इथे भारतवंशी पंतप्रधान आहेत. या वातावरणात फक्त ‘जय भारत’ म्हणता म्हणता ‘जय जगत्’ म्हणणेही आवश्यक आहे.

डॉ. सदानंद मोरे, सौजन्य – साप्ताहिक सकाळ

एखाद्या लोकसमूहामध्ये एकत्वाची जाणीव निर्माण झाली म्हणजे त्या लोकांच्या राष्ट्राचा उदय झाला, असे स्थूलमानाने म्हणता येईल. जोतिराव फुले यालाच एकमय लोक असे म्हणतात. अशा प्रकारच्या एकत्वाची जाणीव ज्या घटकांमुळे निर्माण होऊ शकते त्यांच्यामध्ये वंश, धर्म, भाषा यांचा समावेश होतो. व्यापक अर्थाने संस्कृतीलासुद्धा असा घटक मानायला हरकत नाही. आता यातील कोणत्या घटकाला केव्हा प्राधान्य मिळेल, याचा काही नियम सांगता येत नाही. बॅ. महंमदअली जीना यांनी भारतीय उपखंडात मुसलमान धर्मीयांचे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात असल्याचा आग्रह धरला आणि त्याचे अंतिम पर्यवसान पाकिस्तानच्या निर्मितीत झाले, हे सर्वज्ञात आहे. तथापि नंतरच्या काळात पूर्व पाकिस्तानातील लोकांना त्यांची भाषा ही धर्मापेक्षा अधिक महत्त्वाची वाटायला लागली आणि त्यांनी अलग होऊन बांगलादेशाची निर्मिती केली, हा आपल्या डोळ्यासमोर घडलेला इतिहास आहे.

वंशाने आणि धर्माने ज्यू किंवा यहुदी असलेले लोक जगभर विखुरले होते. ते ज्या ज्या देशात गेले तेथील लोकांच्या त्या त्या भाषा त्यांनी आत्मसात केल्या. त्यांच्यात एकतेची जाणीव ओतप्रोत होती; परंतु आपल्या वंशाची मूळ भाषा ते विसरले होते. परंतु तरीही त्यांनी आपली मूळ भूमी मिळवण्यात व नंतर आपल्या मूळ हिब्रू भाषेचे पुनरुज्जीवन करण्यात यश मिळवले. त्यांचा राष्ट्रवाद निदान सध्या तरी सर्वात बळकट असल्याचे दिसून येते. अशाच प्रकारच्या एका शीख राष्ट्राची निर्मिती पूर्वी महाराजा रणजितसिंगांनी केली होती. या सर्व पसाऱ्यात लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे, आधुनिक काळात- विशेषतः युरोपियन राष्ट्रांमधील साम्राज्यवादी स्पर्धेमुळे राजकीय सत्ता या गोष्टीत अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले. म्हणजेच राज्य हा घटक निर्णायक ठरू लागला.

पूर्वीच्या व्यक्ती निदान भारतीय उपखंडात तरी या घटकाला फारसे महत्त्व नव्हते. भारत नावाचे राष्ट्र अस्तित्वात होते; परंतु राज्य नव्हते असे म्हटले जाते, त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. वेगवेगळे धर्म, वेगवेगळ्या भाषा, अनेक जाती या सर्व गोष्टी जमेस धरूनही येथे एकमयपणाची भावना जागृत होती. ती कालानुरूप वेगवेगळ्या माध्यमांतून प्रगट व्हायची, एवढेच. काशीच्या गंगेचे पाणी कावडीने भरून ती कावड रामेश्‍वराच्या समुद्रात रिकामी करायची, हे या एकतेचे प्रतीकात्मक प्रगटीकरण आहे. ते धार्मिक असल्याने फारसे बिघडत नाही.

शंकराचार्यांनी देशाच्या चारही दिशांना आपले मठ स्थापन केले किंवा शिवाची व शक्तीची स्थाने- ज्योतिर्लिंगे व शक्तिपीठे देशभर विखुरलेली असून, नाना प्रकारच्या विपत्ती व अडचणी सोसूनही लोक त्यांच्या यात्रा करीत राहिले. हा मुद्दा फक्त हिंदू धर्मालाच लागू होतो, असे नसून इतर धर्मांच्या बाबतीतही सत्य आहे. सम्राट अशोकाने देशाच्या सर्व दिशांना महत्त्वाच्या ठिकाणी कोरीव लेखांची निर्मिती केली. बौद्धांचे स्तूपही सर्वत्र आढळतात. बौद्ध तत्त्वज्ञानाचे मानदंड मानले गेलेले दिङ्‌नागासारखे आचार्य दक्षिणेतून कदाचित महाराष्ट्रातूनही आलेले असतात. तीच गोष्ट जैन मंदिरांचीही आहे. भारतातील या धार्मिक-सांस्कृतिक एकतेला साधुसंतांचा फार मोठा हातभार लागलेला आहे.

उत्तरेमधील नाभादास किंवा महाराष्ट्रातील महीपती यांना आपल्या प्रांताबाहेरील साधुसंतांची चरित्रे लिहावीत, असे का वाटावे? तुकोबांच्या अभंगांमधून नरसी मेहता, कबीर, मीराबाई, धन्ना जाट यांच्या कथा का याव्यात? पंजाबातील शिखांनी आपल्या गुरुग्रंथसाहेब या धर्मग्रंथात महाराष्ट्रातील नामदेवांप्रमाणेच उत्तरेतील इतरही संतांच्या रचनांचा समावेश का करावा? आपल्याकडील सर्व ऋषी-मुनी झाडून उत्तरेतील आहेत. त्यांनी वेदांची, उपनिषदांची, गीतेची व ब्रह्मसूत्रांची निर्मिती केली; परंतु या मूळ पायाभूत धार्मिक व तात्त्विक ग्रंथांचे सर्व प्रमुख भाषाकार आचार्य दक्षिणेत निपजले. शंकर, रामानुज, मध्व, वल्लभ- सर्व दक्षिणेतीलच. निंबार्क महाराष्ट्रातील असले तरी प्रसाराचा विचार केला तर मीराबाई व नरसी मेहता हे पश्‍चिमेतील, तर चैतन्य महाप्रभू व शंकरदेव थेट बंगाल-आसाममधील. बंगालमधील हे चैतन्य महाप्रभू कृष्णाचेच रूप मानल्या गेलेल्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात. त्यांच्या आधी शंकर आणि मध्व आणि नंतर वल्लभ या आचार्यांनीही हाच मार्ग चोखाळलेला असतो. मच्छिंद्रनाथ आणि गोरखनाथ यांचा संबंध आलाच नाही, असा एकच प्रदेश दाखवता येणार नाही. मग त्यास तुम्ही “मिथ’ म्हणा.

पांडव वनवासात असताना ते जिथून जिथून गेले ती स्थळे गणतीच्या पलीकडील आहेत. रामायण व महाभारताच्या कथावस्तू आत्मसात करून त्यांना स्थानिक वळण देत करण्यात आलेल्या नवनिर्मितीची संख्याही तशीच लक्षणीय आहे. भारताच्या या मूलभूत ऐतिहासिक ऐक्‍याकडे पहिल्यांदा महात्मा गांधींनी लक्ष वेधले. इंग्लंडसारख्या टीचभर देशाला भारतातील ही राष्ट्रीय एकता उमगणे शक्‍यच नव्हते. त्यांच्या राष्ट्रकल्पनेत राजकीय सत्तेला, म्हणजेच राज्याला मध्यवर्ती स्थान असल्यामुळे त्यांना भारतातील सांस्कृतिक एकजिनसीपणा दिसण्याऐवजी जातिधर्मांतील विस्कळितपणाच प्रकर्षाने जाणवू लागला.

वस्तुतः भारताने राज्यापेक्षा राष्ट्राला अधिक महत्त्व दिले होते आणि राजसत्तेला धर्माचेच अंग मानणाऱ्या मुसलमानांचे येथे आगमन झाल्यानंतरही त्यांच्या या भूमिकेत फारसा बदल झालेला नव्हता.

उलट भारतीयांचे हे शहाणपण अकबरासारख्या मुगल बादशहाच्या ध्यानात आल्यामुळे त्याने स्वतःच इस्लामच्या राज्यपद्धतीत बदल करायला सुरवात केली. अकबराचा हा वारसा शहाजहानचा मुलगा आणि औरंगजेबाचा थोरला भाऊ दारा शुकेह याच्याकडे आला होता. परंतु औरंगजेबाने धार्मिक माथेफिरूपणाला आश्रय देऊन तो दवडला. त्याने दाराला तर ठार मारलेच, परंतु दाराच्या धोरणांचाही नाश केला. “तुमच्याऐवजी दारा शुकोह पातशहा झाला असता तर आम्हाला या भानगडीत पडायची गरजच वाटली नसती,’ अशा आशयाचे उद्‌गार शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पाठवलेल्या पत्रात काढले आहेत, ते या संदर्भात फार महत्त्वाचे आहेत.

पण त्याचे गांभीर्य चर्चिण्याआधी लोकमान्य टिळकांच्या केसरीच्या एका अग्रलेखातील विचार ज्ञात करणे सोयीचे होईल. टिळक लिहितात, “हिंदुस्थानातील लोकांस परराज्याची सवय आज पुष्कळ दिवस झाली आहे व निव्वळ परकी म्हणून राज्यकर्त्यांबद्दल त्यांस जर वाईट वाटत असते तर लॉर्ड रिपनसारख्याचा त्यांनी कधीच जन्मोत्सव केला नसता अथवा अकबर बादशहाची थोरवी गायली नसती. सारांश, हा आपला, हा परक्‍याचा, हा शूद्र भेद आमच्या वेदान्ती लोकांनी कधीच टाकून दिलेला आहे. राज्य कोणाचेही असो, ते आपल्या फायद्याचे आहे की नाही- हेच आमच्या लोकांचे मुख्य पाहणे असते.’

दारा शुकोह हा वेदान्ती होता, हे येथे मुद्दाम सांगायला हवे. दाराने संस्कृत पंडितांच्या साह्याने पन्नास उपनिषदांचा पर्शियन भाषेत अनुवाद केला. पाश्‍चात्त्य देशांतील शॉपेनहॉअरसारखे आधुनिक विचारवंत ज्या उपनिषदांनी प्रभावित झाले ती त्यांच्यापर्यंत दाराने केलेल्या भाषांतरामुळेच पोचली होती.

टिळकांनी जे थोडक्‍यात सूचित केले होते ते गांधीजींनी “हिंद स्वराज्य’ या पुस्तकात स्पष्टपणे मांडले. ब्रिटिशांना भारताचे सेवक म्हणून जर येथे राहायचे असेल तर ते राहू शकतात. त्यांना देशाबाहेर हाकलले म्हणजे स्वराज्य नव्हे, असे त्यात त्यांनी म्हटले आहे. स्वतः गांधी अराज्यवादी होते. म्हणून तर त्यांनी सत्तेच्या केंद्रीकरणाला विरोध करून ग्रामराज्याची कल्पना मांडली. गांधी अराज्यवादी होते, याचे कारण ते अहिंसेचे पुरस्कर्ते होते. राज्यवादात सत्ता गाजवणे मुख्य असते, परंतु सत्ता गाजवणे ही एक प्रकारची हिंसाच होय.

थोडक्‍यात, राष्ट्रवाद आणि राज्यवाद यांच्यात फरक आहे. राष्ट्रवाद हा संस्कृतीच्या अंगाने येतो, तर राज्यवाद सत्तेच्या अंगाने येतो. राष्ट्रवादाला जे सरकार अभिप्रेत व मान्य असते ते सत्तेचे प्रतिनिधी नसते. प्रशासन व व्यवस्थापन ही त्याची कामे व हीच त्याची मर्यादा. मार्क्‍सवादातही सरकार एवढ्यापुरतेच मान्य आहे. वासाहतिक काळात येथे आलेल्या पाश्‍चात्त्य विचारांच्या प्रभावामुळे आपल्या येथील विचारवंत राष्ट्रवाद व राज्यवाद यांची गल्लत करू लागले. प्राचीन काळी आपल्या देशात कोण कोण आले व त्यांनी राज्ये चालविली, याबद्दल ते आपल्या पूर्वजांनाही दोष देऊ लागले. वस्तुतः येथील विविधता व विविधतेतील एकता शाबूत ठेवून कोणी चांगले प्रशासन करीत असेल तर त्याला तो बाहेरून आला म्हणून विरोध करण्याची आपली परंपरा नव्हतीच. मात्र त्याने राज्य चालविणे म्हणजे सत्ता गाजविणे, असे समजून येथील राष्ट्रवाद धोक्‍यात आणला तर ते आपल्याला खपत नसे. दुसरे असे, की इंग्रजांपूर्वी येथे बाहेरून आलेले सर्व राज्यकर्ते येथेच राहिले. इथल्या मातीशी एकरूप झाले. इथल्या विविधतेत भर टाकून त्यांनी इथला राष्ट्रवाद आत्मसात केला. ब्रिटिशांचे तसे नव्हते.

सुरवातीला येथील लोकांनी त्यांचे स्वागत केले. याचे कारण सरकार या नात्याने त्यांनी चांगला कारभार करून दवला; पण थोड्याच दिवसांनी लक्षात आले, की त्यांना या देशाबद्दल आस्था नाही. ते या देशाची लूट करीत आहेत व त्यासाठी त्यांना सत्ता हवी आहे. मग लोक जागे झाले व त्यांना विरोध करू लागले.

पाश्‍चात्त्यांच्या राष्ट्र-राज्य कल्पनेने भारावून गेलेले आपले विचारवंत आपल्या परंपरेची तशी मांडणी करू लागले व आपले राष्ट्र तसेच राहील, अशा प्रकारचा राष्ट्रवाद पुरस्कारू लागले. इतकेच नव्हे, तर त्यांनी आपला हा राष्ट्रवाद शिवाजी महाराज व टिळक यांच्या माथ्यावर मारून तीच आपली प्रेरणा असल्याचे जाहीर केले. आपण त्यांचेच वारसदार असल्याचे ते सांगू लागले. वस्तुस्थिती तशी नव्हती.

शिवाजी महाराजांनी प्रस्थापित इस्लामी राजवटीविरुद्ध बंड केले, याचे कारण या राजवटीने आपल्या पारंपरिक राष्ट्रवादाशी विसंगत असा राज्यवाद आणून त्याच्यातून मिळणाऱ्या सत्तेच्या माध्यमातून इथल्या धार्मिक बहुविधतेचे उच्चाटन करायला सुरवात केली होती. भारतातील इतर प्रदेशांपेक्षा महाराष्ट्राचे वेगळेपण जर कोणते असेल, तर ते हेच आहे. मराठे देशभर पसरले ही गोष्ट खरी, पण त्यांना सत्तेच्या माध्यमातून आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे नव्हते. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त काबीज करण्याचे ध्येय समोर ठेवले नाही, याची अनेकांना खंत वाटते; पण तो मराठ्यांना समजलेल्या भारतीय राष्ट्रवादाचाच भाग होता.

त्याचा स्पष्ट उच्चार छत्रपती शाहू महाराजांनी केला. जुने मोडू नये, नवे करू नये, असे त्यांच्या राजनीतीचे सार सांगितले जाते. शाहू महाराजांनी दिल्लीचे मुगल तख्त मोडून तेथे मराठ्यांचा पातशहा बसवण्याचा बेत करणाऱ्यांना सांगितले, की नवे देऊळ बांधल्यामुळे जेवढे पुण्य मिळते तेवढीच पुण्यप्राप्ती जुन्या देवळाच्या जीर्णोद्धाराने होते. “जुने करू नये नवे। सांभाळावे ज्याचे त्याने ।।’ हा तुकाराम महाराजांच्या अभंगातील विचारच शाहू महाराज राजकारणात आणीत होते. “चकत्यांची पातशाही राखायची’ हा विचार पेशवाईतही कायम राहिलेला दिसतो. आमच्या राष्ट्राच्या मूळ स्वरूपास धक्का न लावणारे राज्य आम्ही सहन करू शकतो. 1857 च्या बंडातही नानासाहेब पेशव्यांसह सर्व हिंदूंनी दिल्लीच्या बहादूरशहा या मोगल पातशहाचे नेतृत्व मान्य केले, त्याचे इंगित हेच आहे. राजा ही एक ईश्‍वरी विभूती आहे, तो विष्णूचा अवतार आहे, असे आपले शास्त्र सांगते हे खरे आहे; परंतु तो लोकांचा सेवक आहे, याचीही जाणीव त्याला आहे. त्याला त्याला कर देऊन टाकायचा, संपले.

1893 मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत हिंदूंची बाजू घेणारे टिळक 1916 मध्ये मुस्लिम लीगबरोबर लखनौ करार करताना मुसलमानांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त जागा देऊ करतात, हे पाहून त्यांच्या हिंदुत्वनिष्ठ अनुयायांनी आरडाओरडा करायला सुरवात केली. तेव्हा सगळ्याच जागा मुसलमानांना द्यायला माझी हरकत नाही, असे म्हणून टिळकांनी आपला वेदान्ती बाणा प्रगट केला. 1947 मध्ये फाळणी टाळण्यासाठी गांधींनी मुस्लिम लीगचे मंत्रिमंडळ बनवून जीना मुख्य प्रधान झाल्याने फाळणी टळत असेल तर हरकत नाही, असे म्हटले होते, ते कॉंग्रेसमधील भावी सत्ताधाऱ्यांना न मानवणे आपण समजू शकतो; पण खुद्द जीनांनीही ही कल्पना फेटाळून लावली. जीनांपुढील राष्ट्रवाद हा पाश्‍चात्त्य राज्यवाद होता, हे त्यामागचे कारण होते.

स्वराज्याची चळवळ ऐन भरात असताना ब्रिटिश सत्तेविरुद्ध चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या टिळकांना हिंदू विचारांप्रमाणे राजा हा ईश्‍वराची विभूती असल्याची आठवण कोणीतरी करून दिली. यावर टिळक उत्तरले, की “राजा ब्रह्म आहेच, पण मग प्रजा कोण? राजा जसा ब्रह्म आहे तशी प्रजासुद्धा ब्रह्मच आहे. प्रजारूपी ब्रह्माला राजारूपी ब्रह्माला जाब विचारण्याचा अधिकार नक्कीच आहे.’

टिळकांच्या उत्तरामागची वेदान्ती बैठक तुकाराम महाराजांनी एका अभंगातून फार चांगली स्पष्ट केली आहे. तेच महाराष्ट्राचे राजकीय तत्त्वज्ञान आहे.
“रामराज्य राम प्रजा लोकपाल। एकचि सकळ दुजे नाही ।।
मंगळावाचोनि उमटेना वाणी । अखंडचि खाणी एक रसा ।।
मोडले हे स्वामी ठायाठाय सेवा । वाढवावा हेवा कोणा अंगे ।।
तुका म्हणे अवघे दुमदुमिले देवे । उरले ते गावे हेचि आता ।।

राजा, प्रजा आणि राज्ययंत्रणा या एकाच पातळीवरील गोष्टी आहेत. कोणी कोणावर सत्ता गाजवायचा प्रश्‍नच उद्‌भवत नाही. कोणाकडे सत्ता असेलच तर ते सेवेचे साधन म्हणून.

संदीप वासलेकर, सौजन्य – लोकसत्ता

भारताने भविष्याला सामोरे जाण्यासाठी कोणती दिशा निवडायची? आपल्याला नक्की काय व कसे साध्य करायचे आहे? कोणता देश वा कोणती पद्धती आदर्श मानता येईल? हे व अशा प्रकारचे प्रश्न आजच नव्हे, तर अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून विचारले जात आहेत. आजही काहींना वाटते, की भारताने महासत्ता व्हावे. काहींच्या मते तर आपण २०२० साली महासत्ता होऊनसुद्धा! पण महासत्ता होऊन तरी काय करायचे? महासत्ता होण्यासाठी अक्राळविक्राळ लष्करी सामथ्र्य, अण्वस्त्रे- क्षेपणास्त्रे आणि आक्रमकता असावी लागते. मग भले कोटय़वधी लोक भुकेकंगाल, मागासलेले आणि उजाड झालेले का असेनात! काहींना वाटते आपण बलाढय़ ‘हिंदू राष्ट्र’ व्हायला हवे तर काहींना वाटते भारताने समाजवादाचे स्वप्न साकार करावे. अशा अनेक कल्पना.. संदीप वासलेकर, अशी कोणतीच दिशा सांगत नाहीत, कारण ते ‘एका दिशेच्या शोधात’ आहेत. याच नावाचे त्यांचे पुस्तक लवकरच ‘राजहंस प्रकाशन’तर्फे प्रकाशित होत आहे. वासलेकरांचा अभ्यासाचा आणि जगप्रवासाचा, चिंतनाचा आणि संशोधनाचा विषयही तोच आहे, जवळजवळ सर्व जग एकदा नव्हे तर अनेकदा जवळून पाहिलेल्या वासलेकरांचा ध्यास आहे तो भारतच एक आदर्श देश व्हावा हा! पण तो ‘आदर्श’ व्हायचा तर जगातील अनेक देशातील आदर्श पद्धती, तसे चारित्र्य, तसा व्यवहार, तसा समाज निर्माण करावा लागेल. आज जगातील कोणताच देश सर्वार्थाने आदर्श नाही, पण अनेक देशांमधल्या काही बाबी अनुकरण कराव्या अशा आहेत. त्या एका शोधयात्रेतून वाचकांसमोर ठेवायचा त्यांचा प्रयत्न आहे. आपण ठरवायचे आहे, दिशा कोणती? वासलेकर ‘स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप’ (एसएफजी) या ‘थिंक टँक’चे संस्थापक आहेत आणि जगातील अनेक सरकारांचे सल्लागारही आहेत. त्यांच्या मते भारताकडे अनेक अंगभूत गुण व सुप्त सामथ्र्य आहे; साधनसामग्री व बौद्धिक उंची आहे आणि तरीही आपण गरीब आहोत, अविकसित आहोत, तसेच उपेक्षितही आहोत! गेल्या काही दशकात आपण अर्थकारण आणि हाय-टेक, लोकशाही आणि आधुनिकता यात बरेच काही साध्य करूनही मंजिल अब भी दूर है! तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी घेतलेल्या ‘दिशेच्या शोधा’तील एका प्रकरणातील काही भाग..

अमेरिकेत वा अन्य देशांत स्थायिक होण्यासाठी फिरणारी, स्वत:च्या देशाबद्दल नाऊमेद व उदासीन असणारी, गरिबीने लाचार होऊन आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करणारी, पैशाने श्रीमंत व सत्तेने महान असलेली पण अपरिपक्व अशी मंडळी ज्या समाजात आहेत, तोच समाज मागासलेला राहतो. आपणाला प्रगत व्हायचे आहे, की मागासलेले राहायचे आहे, हे त्या त्या समाजातील लोकांनी स्वत:च ठरविले पाहिजे. (कॅनडात माझा एक मित्र आहे. त्याचे नाव जीम बाल्सीली. सुप्रसिद्ध ‘ब्लॅकबेरी’ ही फोन व दळणवळण सेवा जीमने निर्माण केली. ती अल्प काळात लोकप्रिय झाल्यामुळे चाळीशीतले जीम बाल्सीली अब्जाधीश झाले आहेत. जीम यांनी अब्जाधीश होऊनही आपले छोटेसे वॉटर्लू गाव सोडलेले नाही. त्यांना न्यूयॉर्क अथवा टोरँटोमध्ये स्थलांतर करणे सहज जमले असते; पण त्यांनी वॉटर्लू या छोटय़ा गावी राहूनच आपला पसारा वाढविला, गावाची भरभराट केली. तिथल्या विद्यापीठांना खूप मोठी देणगी देऊन तरुण विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय संबंधांवर संशोधन व प्रशिक्षण देणारी संस्था स्थापन केली. त्याशिवाय ज्येष्ठ तज्ज्ञ मंडळींसाठी आंतरराष्ट्रीय संबंधांवर उच्च दर्जाचे संशोधन करण्यासाठी एक नवीन केंद्र स्थापन केले. या दोन संस्थांमध्ये जगभरातील पंडितांना बोलाविले व छोटय़ा वॉटर्लू गावात राहून अभ्यास, लिखाण  संशोधन करण्यासाठी खूप मोठे पगार दिले.

जीमचे हे कार्य पाहून त्यांच्या भागीदाराने पदार्थविज्ञानावर मूलभूत संशोधन करणारी संस्था वॉटर्लू गावात स्थापन केली. तिथे जगातून अग्रगण्य शास्त्रज्ञांना बोलाविले. जीमला व त्याच्या सहकाऱ्यांना आपल्या मुलांचा विवाह शतकातील सर्वात मोठा सोहोळा करण्याची महत्त्वाकांक्षा नसून त्यांना आपले छोटेसे गाव जगातील एक प्रमुख संशोधन केंद्र बनावे, अशी इच्छा आहे आणि त्यासाठी ते पैसा खर्च करीत आहेत.

इस्राएलमध्ये स्टेफ वर्थहाइमर हे सर्वात प्रमुख उद्योगपती आहेत. राष्ट्रीय उत्पन्नाच्या १० टक्के उत्पन्न ते त्यांच्या उद्योगात निर्माण करतात. जगप्रसिद्ध वॉरेन बफे त्यांचे अलीकडे भागीदार झाले आहेत. स्टेफना राजधानी तेल अवीव किंवा युरोप-अमेरिकेत धंदा करता आला असता; परंतु त्यांनी इस्राएलच्या मागासलेल्या उत्तर भागात उद्योगनिर्मिती केली आहे. हा विभाग लेबेनॉनच्या सीमेवर आहे. युद्ध झाल्यास स्टेफच्या उद्योगांना धोका आहे; परंतु त्यांचे राष्ट्रप्रेम व मागासलेल्या भागातील युवकांना संधी देण्याची तळमळ एवढी मोठी आहे, की स्टेफना क्षेपणास्त्रांची पर्वा नाही. त्यांच्या कंपनीत रोबोट ऊर्फ यंत्रमानव बराचसा कारभार पाहतात. त्याशिवाय त्यांनी टेफेन औद्योगिक केंद्र निर्माण केले आहे. तिथे होतकरू तरुण उद्योजकांना जागा व सर्व सोयी उपलब्ध करून देण्यात येतात. इतकेच काय  विरंगुळा मिळावा म्हणून आर्ट गॅलरी व संग्रहालयेदेखील केली आहेत.

याशिवाय त्या औद्योगिक केंद्रात स्टेफनी औद्योगिक शाळा उघडल्या आहेत. तेथे १४ ते १८ वयोगटांतील विद्यार्थ्यांना उद्योगनिर्मितीचे प्रशिक्षण दिले जाते. शिवाय संशोधन केंद्रात सुमारे १८०० इंजिनीअर काम करतात. मी ज्या वेळेस टेफेन औद्योगिक केंद्राला भेट दिली, तेव्हा स्टेफ स्वत: चार तास माझ्याबरोबर प्रत्येक विभागात आले होते; पण कोणत्याही कामगाराने काम सोडून त्यांच्याकडे पाहिले देखील नाही, की कोणत्याही शिपायाने मोठय़ा साहेबांना सलामही ठोकला नाही..

ऑस्ट्रेलियाचे उद्योगपती स्टीव्ह किलेलिया यांनी एक अतिशय यशस्वी सॉफ्टवेअर कंपनी उभारली आहे ते अब्जाधीश झाले. मग त्यांना समजलं, की एक अब्ज काय व दहा अब्ज काय, सर्व सारखेच. म्हणूनच स्वत: स्टीव्ह आपली बरीचशी संपत्ती आफ्रिकेत उपासमारीने बळी जाणाऱ्या गरीब लोकांना जीवदान मिळावे, यासाठी खर्च करतात. शेतीसुधार, पाणीपुरवठा, आरोग्य योजना या प्रकल्पांमध्ये ते मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक करतात. त्यांनी काही कोटी डॉलर्स ‘जागतिक शांतता’ या विषयात संशोधन करण्यात खर्च केले आहेत. त्यांची मुले साध्या नोकऱ्या करतात आणि त्याही त्यांच्या कंपन्यांमध्ये नव्हे, तर शाळेत व इतर संस्थांमध्ये.

जॉर्ज सोरोस जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जातात. त्यांनी आपली सारी संपत्ती जगात सर्वत्र व्यक्तीस्वातंत्र्य प्रस्थापित करण्यासाठी खर्च केली आहे. त्याशिवाय जागतिक शांततेचे काम करणाऱ्या ‘इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुप’ या संस्थेची उभारणी करण्यासाठीही त्यांनी मोठय़ा प्रमाणावर अर्थसाहाय्य केले आहे. या ग्रुपमध्ये १५० संशोधक काम करतात. जगातील ज्या भागात हिंसा असेल, त्या भागाचे ते अवलोकन करतात व दरवर्षी सुमारे शंभर अहवाल प्रसिद्ध करतात.

व्हर्जिन अटलांटिक या विमानसेवेचे संस्थापक व व्हर्जिन म्युझिक या उद्योग समूहाचे प्रमुख रिचर्ड ब्रॅन्सन यांनी ‘दि एल्डर्स’ म्हणजे ज्येष्ठ मंडळी अशी एक संस्था निर्माण केली आहे. त्याची स्फूर्ती त्यांना नेल्सन मंडेलांकडून मिळाली. या संस्थेत दक्षिण आफ्रिकेतील नोबेल पारितोषिक विजेते बिशप डेस्मंड टुटू, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जिमी कार्टर, भारतातील ‘सेवा’ या संघटनेच्या संस्थापिका इला भट, युनोचे माजी महासचिव कोफी अन्नान, आर्यलडच्या माजी राष्ट्राध्यक्षा मेरी रॉबीनसन्स आदी प्रभृती मंडळी आहेत. जागतिक समस्या सोडविण्यासाठी वृद्ध व अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन मिळावे, अशी त्यामागची भूमिका आहे. रिचर्ड ब्रॅन्सन स्वत:च्या व मित्रांच्या खर्चाने या ज्येष्ठ मंडळींच्या बैठका घेतात व प्रसारमाध्यमांद्वारा त्याचा आवाज जगभर पोहोचवितात.
स्टिव्ह किलेलिया यांनी ‘जागतिक शांतता निदेर्शाकाची स्थापना केली. ते दरवर्षी लंडनच्या ‘इकॉनॉमिस्ट’ वृत्तपत्राला भरघोस देणगी देतात. त्या पैशाने जगातील सर्व देशांचा अभ्यास केला जातो व प्रत्येक देशात शांतता किती आहे, याचे अनेक निकष लावून चाचणी केली जाते. दरवर्षी मे महिन्यात एक अहवाल प्रसिद्ध होतो व त्यात जगातील सर्व देशांचे शांततेनुसार क्रमांक जाहीर होतात.

सुप्रसिद्ध उद्योगपती बिल गेट्स व वॉरेन बफे यांनी आपली सारी संपत्ती सामाजिक कार्यासाठी वाहिली आहे, हे सर्वाना माहिती आहे. रिचर्ड ब्रॅन्सन, स्टिव्ह कलेलिया, जॉर्ज सोरोस, जीम बाल्सीली हे उद्योगपती जागतिक शांततेसाठी गुंतवणूक करतात. त्यात त्यांचा स्वत:चा, समाजाचा देशाचा अथवा त्यांच्या उद्योग समूहाचा काहीही फायदा नसतो. जागतिक पातळीवर विचार करण्यासाठी व्यापक इच्छाशक्ती व वैचारिक उंची असते. हे लोक केवळ पैसा गोळा करण्यामागे, नट-नटय़ांच्या मेजवान्या आणि क्रिकेटचे सामने आयोजित करण्यात वेळ व संपत्ती वाया घालवत नाहीत, तसेच बाकीचे उद्योगपती चमकतात म्हणून स्वत:ही प्रसिद्धीमागे धावत नाहीत तर सारे विश्व हे एक शांततामय व्हावे म्हणून मनस्वीपणे प्रयत्न करतात. त्यामुळे प्रसिद्धी त्यांच्यामागे धावत जाते. या कार्यासाठी फारसा खर्च लागत नाही, तर एक जागतिक पातळीवर विचार करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. जे उद्योगपती फक्त डोळे मिटून भौतिक यशामागे धावत सुटतात. त्यांना हे जमणार नाही.

हान्स एकदाल हे भारतावर प्रेम करणारे उद्योगपती एका बहुराष्ट्रीय कंपनीचे अध्यक्ष होते. सुमारे ७० देशांत त्यांचा कारभार होता. एकदा माझ्याबरोबर कॉफी पित असताना, फोनवर बोलता बोलता न्यूझीलंडमधील एक कंपनी त्यांनी विकत घेतली. ते एका साध्या घरात राहतात. कधी ‘पेज थ्री’वर येण्याची ते धडपड करीत नाहीत. त्यांची पत्नी सर्वसाधारण महिलांप्रमाणे नोकरी करते. मुलाने अनेक प्रयत्न करून, वडिलांचा कुठलाही वशिला न लावता कशीबशी नोकरी मिळवली. मी त्यांना त्यांच्या साध्या राहणीविषयी विचारले, तर त्यांनी मला टॉलस्टॉयची लिहिलेली एक कथा ऐकवली.

ती अशी, ‘‘एक शेतकरी होता. त्याला कोणीतरी सांगितले, की बाजूच्या गावात जमीन खूप सुपीक आहे. तिथे जमीन घेतली तर तुला खूप कमाई होईल. शेतकऱ्याने तसे केले. काही दिवसांनी त्याला दुसऱ्या काही गावांची माहिती मिळाली. तिथेही त्याने जमीन घेतली. तो अजून श्रीमंत झाला. असे करता करता तो एका गावात आला. तिथला पाटील त्याला म्हणाला, सूर्यास्तापर्यंत या गावाला तू पूर्ण फेरी मारलीस तर तुला सर्व जमीन फुकटात मिळेल; पण फेरी पूर्ण केली पाहिजे. शेतकरी जोरात धावला. त्याला शक्य होईल तेवढी मोठी फेरी मारण्याची त्याची इच्छा होती. जसजशी संध्याकाळ होत आली तसा तो फेरी पूर्ण करण्यासाठी वेगाने धावू लागला. सूर्य क्षितिजावर अस्तास जात असताना त्याची फेरी पूर्ण होऊन तो अनेक मैल जमिनींचा मालक झाला; पण त्याने ही प्रदक्षिणा पूर्ण केली अन् तो धापा टाकत कोसळला व मृत्युमुखी पडला. ग्रामस्थांनी त्याला ६ बाय २ फुटाचा खड्डा खणून पुरले. त्या वेळी पाटील म्हणाले, खरे तर त्याला फक्त एवढय़ाच जमिनीची गरज होती..’’

पूर्वी भारतातही श्रीमंत उद्योगपती सामाजिक कार्यासाठी संपत्तीचा उपयोग करीत. टाटा समूहाने मुंबईत कॅन्सर, पदार्थविज्ञान व समाजशास्त्र या तीन विषयांत संशोधन करणाऱ्या संस्था स्थापन केल्या. त्याशिवाय इतरही अनेक संस्थांना सढळ हस्ते मदत केली. बिर्ला समूहाने पिलानी येथील अभियांत्रिकी शिक्षणसंस्था, मुंबईतील क्रीडा केंद्र व अनेक इस्पितळे आणि मंदिरे यांना मदत केली; पण हा सर्व भूतकाळ झाला. अलीकडे बजाज उद्योग समूहाने सामाजिक कार्य सुरू ठेवले आहे. ते मुंबई

विद्यापीठात नवीन विभाग उघडण्यासाठी भरघोस मदत करतात; पण अजिबात प्रसिद्धी मिळवत नाहीत. संगणक व्यवसायातील ‘विप्रो’ व ‘इन्फोसिस’ या दोन व्यवसायांनी शैक्षणिक संस्थांना हातभार लावला आहे; पण हे झाले अपवादात्मक. गेल्या २५-३० वर्षांत मानवी समस्यांवर संशोधन करणारी एकही संस्था खासगी मदतीने उभी राहिली नाही. याउलट मेजवान्या, क्रिकेटचे सामने, फॅशन शो व जिथे स्वत:ची जाहिरात करता येईल, अशा गोष्टींसाठी मुबलक पैसा उपलब्ध होत आहे.

या साऱ्यांचे चिंतन केल्यानंतर एकच निष्कर्ष निघतो तो म्हणजे आंधळी कोशिंबीर खेळत बसण्यापेक्षा डोळे उघडे करून विचार करण्याचीच जास्त गरज आहे. हा खेळ थांबण्यासाठी आपल्याला स्वत:पासून सुरुवात करावी लागेल. आपले विचार, सवयी बदलाव्या लागतील. खासगी आयुष्यात गाडी, बंगला यांच्यासारखा दिखाऊपणा तर राष्ट्रीय दृष्टिकोनातून महासत्ता होण्याची महत्त्वाकांक्षा सोडली पाहिजे.

पैसा हा एक अद्भुत प्रकार आहे. आपण त्याच्यामागे धावलो तर पैसा आपल्यापुढे काही अंतर ठेवून धावतो. सत्तेचेही तसेच आहे, आपण सत्तेमागे धावलो तर सत्ता फक्त दुरून दिसते. आपल्या हाती येत नाही. यासाठी आपल्याला सामाजिक हितासाठी पोषक असलेल्या अनेक उदाहरणांचेही अनुकरण करावे लागते.

सुरेश द्वादशीवार, सौजन्य – साप्ताहिक साधना

मोक्ष, निर्वाण, अपवर्ग किंवा स्वर्ग यांच्या मागे सारी ज्ञानपरंपरा लागल्यामुळे आणि तिने ऐहिक जीवनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याकडील विज्ञान संशोधनाच्या परंपरा तर थांबल्याच शिवाय (या परंपरांवर हक्क सांगणाऱ्यांखेरीज इतरांना विचार करण्याचा अधिकारच नसल्यामुळे) विज्ञानाला पोषक असणाऱ्या आरंभीच्या विचारसरणींचाही येथे शेवट झाला. कणाद, ब्रह्मगुप्त, आर्यभट्ट किंवा तेव्हाची गणितज्ञांची व खगोलशास्त्रज्ञांची परंपरा थांबली आणि ऐहिक जीवनाच्या विचारावर भर देणाऱ्या जडवादाच्या परंपराही लोप पावल्या. जीवन मिथ्या आहे, ते दुःखमय आणि क्षणभंगुर आहे व त्याकडे पाठ फिरवून संन्यास किंवा निर्वाण साधणे हेच जीवनाचे परमोच्च ध्येय आहे ही शिकवण ऐहिकतेच्या व जडवादाच्या जीवावर उठणारीही होती. ज्या समाजात जडवादाच्या व ऐहिकतेच्या विचारपरंपरा शाबूत राहिल्या त्या समाजात विज्ञान अंकुरले आणि शोधपरंपराही टिकल्या.

विचार करणाऱ्यांचा वर्ग वेगळा आणि श्रम करणाऱ्यांचे समूह वेगळे असे विभाजन जेव्हा समाजात घडून येते तेव्हाच समाजात अध्यात्मवादी आणि जडवादी परंपरा अशा वेगळया होत असतात. कष्टकऱ्यांच्या वाटयाला आलेले कष्ट त्यांच्या पूर्वजन्मीच्या पापाचे प्रायश्चित्त म्हणून आले आहेत. हे प्रायश्चित्त पूर्ण केल्याखेरीज त्यांना पुढचा चांगला जन्म चांगला मिळणार नाही हे जोवर त्यांच्या मनावर बिंबविले जात नाही तोवर विचारांवर ताबा ठेवणाऱ्यांचे जीवन व्यवहार सुरक्षीत होत नाहीत. धनवंतांच्या वाटयाला येणारे सुख त्यांच्या पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे त्यांना मिळाले आहे हेही त्याचसाठी श्रम करणाऱ्यांच्या मनावर ठसवावे लागत असते. हा संस्कार समाजमनावर उमटविण्याचे काम धर्माने केले. (याचसाठी मार्क्सने त्याला अफूची गोळी म्हटले आहे) तेवढयावरच या धर्मपरंपरा थांबल्या नाहीत. ऐहिक जीवनाचा विचार करणाऱ्या आणि ते सुखी बनविण्याचा ध्यास घेतलेल्या जडवादाच्या परंपराही त्यांनी नाहिशा करून संपविण्याचे काम केले.

वास्तविक जडवादाच्या (बार्हस्पत्य, लोकायत किंवा चार्वाकमताच्या) मांडणीची देशातील परंपरा वेदांहून जुनी आहे. वेदोपनिषदात त्या परंपरेवर आलेली टीका आणि विरोध लक्षात घेतला की तिचे चेतन परंपरेएवढेच किंबहुना तिच्याहूनही प्राचीन असलेले अस्तित्व लक्षात येते. ही परंपरा एकेकाळी अतिशय प्रतिष्ठित व सन्माननीयच राहिली असावी असे मानण्याएवढा पुरावा आपल्या आदरणीय धर्मग्रंथात उपलब्ध आहे. महाभारताच्या वनपर्वात द्रौपदी म्हणते,’माझ्या वडिलांनी मला लोकायतमताची शिकवण देण्यासाठी अधिकारी माणसांची नियुक्ती केली होती.’ एखादा राजपुरुष आपल्या कन्येच्या शिक्षणासाठी ज्या संप्रदायाच्या गुरूंची नियुक्ती करतो तो संप्रदाय प्रतिष्ठित व सन्माननीय असणेच भाग आहे. पुढच्या काळात झालेल्या पाणिनीने चार्वाक किंवा लोकायत हा अन्विक्षकीचा विचार असल्याचे मत नोंदविले आहे. कृषी, उत्पादन आणि ऐहिक उपलब्धींची चर्चा करणारी शास्त्रे अन्विक्षकीत येणारी आहेत हे लक्षात घेतले की लोकायत मताचे पाणिनीच्या काळात मान्य असलेले श्रेष्ठत्वही ध्यानात येते. चार्वाकांच्या परंपरेला पहिला ज्ञात विरोध बौध्द परंपरेकडून झाला. बुध्द भिक्षुंनी चार्वाकांचे ग्रंथ वाचू नयेत अशी या परंपरेची आरंभीची शिकवण आहे.

चार्वाक मताचे खंडन करणारी वैदिकांची परंपराही जुनी आहे. ती बादरायणाच्या ब्रह्मसूत्रांपासून (इ.स.पूर्वी दिडशे वर्ष) सुरू होत असली तरी या सूत्रांनी या मताला निंद्य ठरविल्याचे दिसत नाही. वेदांत विचारांचे श्रेष्ठत्व सांगण्यासाठी ज्या परंपरांचे खंडन नंतरच्या काळात वैदिकांनी केले त्यात चार्वाक मत पहिल्या क्रमांकावर आहे. ते सर्वप्रथम खोडून काढण्यावर साऱ्या वैदिकांनी भर दिला आहे. मात्र शंकराचार्यांपर्यंतच्या या परंपरेनेही चार्वाकांना अनैतिक वा चंगळवादी ठरविल्याचे दिसत नाही. या काळापर्यंत बौध्द व जैनांच्या परंपरांनीही चार्वाकांवर टीका केली आहे. मात्र त्यांनी त्यांना अनैतिक वा अमंगल मानल्याचे दिसत नाही.

या मताची टवाळी करण्याचा व ते अनीतीमान ठरविण्याचा प्रयत्न दहाव्या शतकानंतर सुरू होतो. ते अनैतिक ठरवत असतानाच त्यावर पोरकटपणाचा शिक्का उमटविला जातो. त्यासाठी त्यांची विचार परंपरा तोडून मोडून मांडणे, त्यांच्या तोंडी त्यांनी न उच्चारलेले श्लोक पेरणे आणि त्यांच्या संप्रदायाशी दुरान्वयानेही संबंध नसलेल्या गोष्टींना त्यांच्या परंपरेत मांडून दाखविणे यासारखे अशास्त्रीयच नव्हे तर कमालीचे हास्यास्पद प्रकार या टीकाकारांनी केले. ऋण काढून तूप प्या, हे बदनाम वचन चार्वाकांचे असल्याची मांडणी आपल्या सर्वदर्शन संग्रहात माधवाचार्यांनी (चौदावे शतक) केली. वास्तविक हा श्लोकार्ध चार्वाकांचा नाही. तो वेदांत्यांनी तयार करून त्यांच्या तोंडी घातला आहे. मुळात हा श्लोक जयंत भट्ट या नैय्यायिकाच्या नवव्या शतकातील ग्रंथात आला आहे. तो असा,

यावत् जीवेत् सुखम् जीवेत्, नास्ति मृत्युः अगोचरः,
भस्मिभूतस्य देहस्य पुनरागमनम् कृतः

यात माधवाचार्यांनी ‘दुरुस्ती’ करून ‘नास्ति मृत्युः अगोचरः’ हा चरण गाळला आणि त्याऐवजी ‘ऋण,,, कृत्वा…’ हा आता साऱ्यांना तोंडपाठ असलेला श्लोकार्ध बसवला. चार्वाक केवळ प्रत्यक्ष प्रमाणवादी होते हे वेदांत्यांचे सांगणेही खरे नाही. त्यांना प्रत्यक्षावर आधारलेले अनुमानही मान्य होते.

अनुमानप्रामाण्याखेरीज विचारच जेथे अशक्य होतो तेथे त्यावाचून एखादी विचारसरणी उभी राहणे शक्यही नसते. मात्र टीकाकारांनी प्रत्यक्षाधारच तेवढा पुढे केला आणि त्यावर आधारलेले अनुमान बाजूला सारले. मग ‘चार्वाक समोर दिसतो तोपर्यंत त्याची पत्नी सधवा आणि तो बाहेर गावी गेला वा दृष्टीआड झाला की ती विधवा’ असे युक्तीवाद करून चार्वाकांना खोडून काढण्याचे सोपे मार्ग निवडले. वास्तव हे की, प्रत्यक्ष शंकराचार्यांनी चार्वाकमत हे जनसामान्यांचे मत आहे असा अभिप्राय नोंदविला आहे. त्या मताचा त्यांनी गौरव केला नसला तरी त्याला अनैतिक वा खोटे म्हणण्याचा प्रकारही केला नाही. जनसामान्यांचे मत चंगळवादी वा अनैतिक असणारही नाही. ज्यांना चंगळ परवडणारी आहे त्याच वर्गात तशी मते जन्माला येऊ शकतात. शंकराचार्यांचा समकालीन असलेला जैन विचारवंत हरिभद्र म्हणतो,’ इंद्रियांच्या प्रत्ययाला येणारे जगत् व पदार्थसमूह म्हणजे लोक. हा लोक ज्या तत्वज्ञानाचा आधार आहे ते म्हणजे लोकायत.’ हा विचार चार्वाकमताचा ऐहिक जीवनाशी असलेला संबंध सांगणारा आहे. पाचव्या शतकात झालेल्या बुध्दघोषाने ‘लोक म्हणजे ईहलोक व तो ज्यांच्या विचारसरणीचा आधार आहे ते लोकायित’ असे म्हटले आहे. दुसऱ्या शतकातील दिव्यावदान सुत्तात जनतेत रुढ असलेले मत ते लोकायत असे म्हटले आहे. त्याआधी विनयपिटकात, कात्यायनाच्या ग्रंथात आणि पातंजलीतही लोकायतमताचा असाच उल्लेख आहे. कौटिल्याने त्याला तर्कशास्त्रातच स्थान दिले आहे. तात्पर्य, शंकराचार्यांपूर्वीच्या विचारवंतांना चार्वाकांचे ईहलोकाश्रयी असणे आणि त्यांना प्रत्यक्षाएवढेच अनुमानप्रमाण मान्य असणे या गोष्टी मान्य आहेत. त्यानंतरच्या काळात वैदिक, बौध्द व जैनांच्या परंपरांनी या विचाराकडे तुच्छ व त्याज्य म्हणून पहायला सुरूवात केली आहे.

प्रत्यक्ष आणि अनुमान ही दोन्ही विज्ञानाची प्रमाणे आहेत. चार्वाकांना ती मान्य होती हे लक्षात घेतले की चार्वाकच भारतातील पहिले वैज्ञानिक विचारवंत ठरतात. त्यांच्या या वैज्ञानिक साधनांचा परिणाम असा की त्यांच्यासमोर कोणतेही कल्पित उभे राहू शकत नाही. मग ईश्वर जातो, धर्म जातात, स्वर्ग-नरक नाहिसे होतात आणि पूर्वजन्म व पुनर्जन्मासारख्या गोष्टी भाकड ठरू लागतात… अडचण ही की जगातला कोणताही धर्म या कल्पितांच्या कुबडयांखेरीज उभा राहू शकत नाही. ज्या धर्मांच्या संस्थापकांना ही कल्पिते आरंभी मान्य नव्हती त्यांच्या उत्तरकालीन अनुयायांनी नीतीअनितीचे नियम लोकांमध्ये ठसविण्यासाठी ती त्यांच्याही धर्मात आणली. वैदिक धर्मात पूर्वजन्म-पुनर्जन्म होते. ईश्वर ही कल्पना त्यातल्या पूर्वमिमांसकांना, सांख्यांना आणि वैशेषिकांना मान्य नसली तरी वेदांताला, नैय्यायिकांना आणि योगाला मान्य होती. त्यांना स्वर्ग-नरक मान्य होता. अवतार कल्पना त्यांनी उशीरा (म्हणजे बुध्दधर्मात बोधीसत्व आल्यानंतर) स्वीकारली. जैनांना मृत्यूनंतरचे जग मान्य होते. बौध्दांनी आत्मा नाकारला. तरी एका वेगळया स्वरुपात पुनर्जन्म स्वीकारला. तिकडे ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांना होली घोस्ट, गॉड आणि अल्ला यांच्याखेरीज उभे राहता येणे शक्य नव्हते. सगळेच धर्म प्रत्यक्ष व अनुमान यापैकी कशानेही सिध्द न होणाऱ्या या गोष्टी मान्य करणारे असल्यामुळे त्यांचा चार्वाकांवर व साऱ्या जडवादावर राग असणे स्वाभाविक होते. त्यातून धर्मांना असलेला राजाश्रय चार्वाकांना नव्हता. त्यामुळे धर्मसत्ता, राजसत्ता आणि त्या दोहोंचीही मांडलिक असणारी तेव्हाची अर्थसत्ता या साऱ्यांनी मिळून चार्वाक मत निंद्य ठरविण्याचाच नव्हे तर संपविण्याचाही प्रयत्न केला…

चार्वाकमताचा एकही ग्रंथ आज उपलब्ध नसणे या दुर्दैवाची संगती याखेरीज लागत नाही. चार्वाक सगळी कल्पितेच उध्वस्त करीत नाहीत, त्यावर आधारलेल्या धर्मकल्पनांचाही ते विध्वंस करतात. धर्म आणि त्यांचे अनुयायी, सत्ता आणि तिचे सैनिक, धनवंत आणि त्यांचे आश्रित या साऱ्यांनी मिळून चार्वाकांचे मत आणि नाव मिटविण्याचा प्रयत्न या काळात केला असेल तर त्याचे नवल वाटण्याचेही त्याचमुळे कारण नाही. द्रौपदीला आदरणीय असलेले चार्वाकमत धर्मांच्या दावेदारांनी पुढल्या काळात अनीतीमान आणि चंगळवादी कसे ठरविले याचा ऐतिहासिक शोध घेणे या संदर्भात महत्वाचे ठरावे.
तेराव्या शतकात ‘तत्वोपप्लव सिंह’ या नावाचा एक ग्रंथ उपलब्ध झाला आणि अनेकांना तो चार्वाक मताचा वाटला. मात्र त्याचा कर्ता जयराशी भट्ट स्वतःच ‘मी जगातील कोणतेही मत, अगदी चार्वाकांचेदेखील बाधित करून दाखवू शकतो’ असे त्यात म्हणाल्याने तो शोध निरर्थक ठरला. शंकर, रामानुज, मध्व आणि निंबार्कानंतर आलेली सगळी संत परंपरा वेदांतमताचा पाठपुरावा करणारी होती. तिला चार्वाक आपला वाटणे शक्य नव्हते. पंत परंपरेतील सारेच ग्रंथकार पुन्हा वेदांतमताचे होते. नंतरच्या काळात आलेल्या सुधारकांच्या परंपराही कोणत्या ना कोणत्या स्वरुपात ईश्वर व धर्म मान्य करणाऱ्या होत्या. राजा राममोहन रॉयांना ब्रह्म मान्य तर ज्योतिबांना निर्मिक मान्य होता. टिळक आणि गांधी हे धर्म आणि ईश्वर मानणारे होते. डॉ. आंबेडकरही धर्मशरण झालेले काळाने पाहिले. डॉ. राधाकृष्णन् आणि दासगुप्ता हे तत्वचिंतक वेदांतमताचे असल्याने चार्वाकाला त्यांच्याकडूनही न्याय मिळाला नाही. यापैकी अनेक थोरामोठयांची बुध्दीनिष्ठा मान्य केली तरी त्यांची धर्मशरणता दृष्टीआड करता येत नाही आणि ही धर्मशरणता त्यांना चार्वाकांजवळ जाऊ देत नाही हेही अमान्य करता येत नाही. चार्वाकांना फक्त वैदिकांनी विरोध केला हे म्हणणे खरे नाही. त्यांना बौध्द-जैनांचाही तेवढाच कठोर विरोध होता. आपल्याकडचे जे जोरकस वक्ते एकाच दमात ‘बौध्द-जैन-चार्वाक’ ही नावे ओळीने उच्चारतात त्या ‘बंधूभगिनी’वाल्यांपैकी अनेकांनी त्या तिन्हींतले अंतर आणि विरोध लक्षात घेतला नसतो किंवा समोरच्या श्रोत्यांना तो ठाऊक नाही हे त्यांनी गृहित धरले असते.

धर्म आणि श्रध्देच्या परंपरांनी जडवाद आणि त्याला जवळचा असणारा किंवा त्याचाच अविष्कार असणारा विज्ञानवाद यांची जी कोंडी भारतात केली ती पाश्चात्यांत चर्च आणि इस्लामच्या धर्मश्रध्दांनी कशी केली याचा इतिहास सर्वज्ञात आहे. वैज्ञानिकांचा छळ, ज्ञानाचे नवे अंकूर मुळातून करपून टाकण्याची वृत्ती आणि चिकित्सेला नकार हे सारे तिकडेही घडले. त्यामुळे केवळ तो एकटया भारतीय मनोवृत्तीचा दोष ठरत नाही. श्रध्देच्या आहारी जाऊन विचारांचे श्रम न घेणाऱ्या जगभरच्या एकूणच मानसिकतेचा तो परिणाम आहे. पाश्चात्यांबाबत एक गोष्ट मात्र नोंदविली पाहिजे. त्यांच्या परंपरेत जडवादाचे आग्रही उपासक कला आणि संस्कृतीच्या क्षेत्रात टिकून राहिले आणि त्यांनी आपल्या कलेतून आणि सांस्कृतिक अविष्कारातून जडवादाच्या नोंदी कायम ठेवल्या. बर्नी, लिओनार्दो यासारख्या ख्यातनाम कलावंतांच्या कलानिर्मितीत या नोंदी आल्या आहेत.

मात्र धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता आणि विद्वत्सत्ता या साऱ्यांच्या शतकानुशतकांच्या विरोधानंतरही भारतात चार्वाक मत कायम राहिले याचे मुख्य कारण प्रत्यक्ष व अनुमान या त्याच्या विचार कसोटया हे आहे. या विज्ञानाच्याच कसोटया असल्यामुळे उत्तरकाळात झालेल्या विज्ञानाच्या विकासाबरोबर त्यांचे महत्व वाढले आणि चार्वाक पुन्हा जिवंत व सबळ झाले. भारतात चार्वाकमत नाकारले गेल्याने प्रत्यक्ष व अनुमानाधारित विचारप्रणाली विचारांच्या कक्षेबाहेर गेली आणि कणाद, ब्रह्मगुप्त, चरक आदींपासून सुरू झालेली शोधपरंपरा थांबली. चार्वाक नाकारल्यामुळे केवळ वैज्ञानिक विचारच भारतात थांबला नाही तर त्याने मांडलेली ऐहिकाच्या व्यवस्थेची व जवळिकीची बाजूच येथे नाकारली गेली. त्यामुळे वर्तमान जीवनाहून त्या पलिकडचे (म्हणजे मृत्यूनंतरचे) जीवन महत्त्वाचे ठरले आणि जीवनमुक्ती त्या दोहोंहून महत्त्वाची ठरली. याचा परिणाम विकासावर झाल्यावाचून राहिला नाही. पारलौकिकाकडे लक्ष लावणे आणि जीवनाकडे पाठ फिरवणे हेच जीवनाचे सर्वश्रेष्ठ निधान होणे याचा ऐहिकावर जो परिणाम झाला तो आपण अजून अनुभवत आहोत. पराजय, गुलामगिरी, परक्यांच्या सत्ता आणि देशीत्वाचा क्रमाने होत गेलेला संकोच हे सारे त्यातून आले. जपावे, टिकवावे आणि वाढवावे असे काही नाहीच हे एकदा मनाने घेतले की करायचे काही उरतही नाही. या मानसिकतेतून बाहेर पडायला देशाला 19 आणि 20 या शतकांपर्यंत रखडावे लागले. अजूनही ती पुरती गेली नाही. आपल्या तुलनेत पाश्चात्यांमध्ये सुधारणावादाचा उदय लवकर झाला. मात्र आपण असू वा ते, साऱ्यांनीच तशा उदयाआधीची किती शतके गमावली? 21 वे शतक उजाडले तरी चार्वाकाचे मत उच्चारायला माणसे धजावत नसतील तर त्याचे कारणही परंपरेने त्या मतावर लादलेल्या पापाचरणाच्या व चंगळवादाच्या शिक्क्यातच शोधावे लागते.

या प्राक्तनाला चार्वाकपंथाचे लोकही काहीसे जबाबदार आहेत. चारू + वाक् म्हणजे चतुर बोलणारे असा त्यांच्या नावाचा अर्थ होत असला तरी त्यातले अनेकजण फार उदंड आणि उध्दटही असावे. चार्वाकांना प्रश्न विचारण्याची सवय होती. ते व्यवस्थेला प्रश्न विचारायचे. त्यातून ते ‘काय’ किंवा ‘कसे’ यासारखे नम्र प्रश्न विचारीत नसत. श्रध्दावानांच्या परंपरेला न मानवणारा प्रश्न ‘कां’ आणि ‘कशावरून’ हा आहे. चार्वाक तोच नेमका विचारीत असत. वेदवाक्यम् प्रमाणम् किंवा बुध्दं शरणम् असे मनोमन म्हणणाऱ्या काळात ‘पण ते कशासाठी’ असा प्रश्न विचारणारे लोक इतर शरणागतांना उध्दट वाटले असतील तर ते नवलाचेही नव्हते. वेद ही धूर्त, भंड आणि निशाचरांची निर्मिती आहे हे त्यांचे प्रसिध्द वचन त्यातले आहे. कौरवांना पराजीत करून रणांगणावरून परतणाऱ्या पांडवांना उद्देशून ‘आलात भाऊबंदांना मारून, आता खुशाल राज्य भोगा’ असे ते तोंडावर ऐकवणार असतील तर त्याचा परिणामही त्यांना भोगावाच लागणार. यज्ञाच्या मंडपात शिरून प्रत्यक्ष यजमानाला ‘यज्ञवेदीवर मारलेला बोकड सरळ स्वर्गात जात असेल तर बोकडाऐवजी आपल्या बापाचाच बळी कां देत नाही’ असे ते विचारणार असतील तर त्यांना मंडपात मारच खावा लागणार. चार्वाकांवर सगळे धर्म आणि सत्ता कां उलटल्या असाव्या याची कारणे युरोपातील वैज्ञानिकांचा तिकडच्या चर्चने जो छळ केला त्यावरूनही लक्षात येण्याजोगी आहेत.

चार्वाकांचा जडवाद जगला असता तर जीवनाविषयीची आस्था वाढली असती आणि ते सुखी करण्यासाठी जास्तीचे काही करण्याच्या प्रवृत्ती वाढीला लागल्या असत्या. जीवन मिथ्या नाही. ते दुःखमयही नाही. ते आपले आहे, शिवाय ते एकच आहे, यानंतर पुनर्जन्म नाही, दुसरे आयुष्य नाही, मृत्यूनंतर स्वर्ग-नरक असे काही नाही. सबब आहे ते जीवन नीट, सुंदर आणि सुखकर करू ही शिकवण प्रभावी झाली असती तर ज्ञानविज्ञानाच्या परंपरा आपल्याकडेही वाढीला लागल्या असत्या… प्रत्यक्षात असे काही झाले नाही हे मात्र खरे आहे.

जडवादाची मांडणी थांबल्यामुळे चर्चा आणि वादविवाद संपले. आपल्या विचारांची आणि श्रध्दांची चिकित्सा करणाऱ्या प्रश्नार्थक प्रवृत्ती नाकारल्यामुळे धर्मविचारात आत्मसंतुष्टता आली. परिणामी तेही फारसे पुढे गेले नाहीत. ज्ञान आणि विज्ञान या दोन्हींच्या ऱ्हासाला जडवादाची समाप्ती कारणीभूत झाली तशी ती एकूण बुध्दीच्या वाढीलाही मारक ठरली असा या साऱ्या अनुभवाचा अर्थ होतो. ग्रीकांच्या परंपरांत जडवाद आहे. त्यांची आरंभीची परंपराच विज्ञानवाद्यांची आहे. त्या परंपरेचे जे अंग अरबांनी जपले त्यात जडवादाचा भाग शिल्लक राहिला. युरोपात झालेल्या रेनेसॉमध्ये जे वैचारिक मंथन उभे राहिले त्यातही जडवाद आहे. तर्क, ज्ञान आणि विज्ञानाच्या शोध आणि चिकित्सेच्या सगळया प्रवाहांशीच या वादाचे नाते आहे. वैज्ञानिक प्रगती कल्पिताच्या आधारे होत नाही, ती जडवादातील इंद्रियगोचर सत्याची कास धरूनच होत असते.

हा विचार एवढा दडपला गेल्याने आपले माघारलेपण वाढले. विचारांऐवजी श्रध्दा, प्रयोगांऐवजी निष्ठा आणि बुध्दीऐवजी मन यांना प्राधान्य आल्याने आपली परंपरा विकासाच्या प्रवाहापासून दूर राहिली. भारतीय धर्मांमध्ये वाद होते, धर्मचर्चा आणि संगिष्ठीसारख्या परंपरा होत्या. नंतरचे भाष्यकार अगोदरच्या भाष्यकारांचे खंडन करताना दिसले. काही जागी नंतरच्या ग्रंथांनी जुन्या ग्रंथांना आणि त्यांच्या प्रतिपादनांना छेद दिल्याचेही आढळले. मात्र एका परंपरेने वा धर्माने दुसऱ्या परंपरेचे वा धर्माचे ग्रंथ जाळून नाहिसे केल्याचा पुरावा आपल्या इतिहासात नाही. भिन्न धर्म आणि परंपरा येथे एकाच वेळी राहिल्या आणि आपल्या बळावर विकसीत झाल्या वा खुरटल्या. सर्व धर्मांचे ग्रंथ आहेत, त्यातल्या पंथोपपंथांचेही ग्रंथ उपलब्ध आहेत… एवढया उदार परंपरेत चार्वाकांचेच ग्रंथ तेवढे कां नसावेत? जो तत्वविचार महाभारतात प्रतिष्ठित होता, ज्याचे अस्तित्व प्रमाणांनी सिध्द होत होते आणि ज्याचे खंडन प्रथम करणे नंतरच्या सर्व धर्मग्रंथांना गरजेचे वाटले त्या विचाराचा एकही ग्रंथ देशाला शोधता येऊ नये याचा अर्थ कसा लावायचा? काही विचारवंतांच्या मते हे ग्रंथ सापडण्याची शक्यता अजून संपली नाही. भरताच्या नाटयशास्त्रासारखा निरुपद्रवी ग्रंथ, अर्ध्यामर्ुध्या स्वरुपात का होईना सापडायला विसावे शतक यावे लागले तर उद्या चार्वाकांचे ग्रंथही हाती येतील असे या वर्गाचे म्हणणे आहे. ते जेव्हा सापडायचे तेव्हा सापडतील. मात्र तोवर त्या ग्रंथांची अनुपलब्धी आपल्या धर्मपरंपरांच्या औदार्यासमोर प्रश्नचिन्ह उभे करणारी ठरते हे नाकारून कसे चालेल?

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

गांधीजींचे अध्यात्म हे धार्मिक अथवा साक्षात्कारी नव्हते. त्याला सामाजिक परिमाणे होती. समाजाची सेवा, निसर्गाचे रक्षण, जलसंवर्धन, सार्वजनिक आरोग्याची काळजी हे त्यांना अभिप्रेत होते. व्यक्तिगत त्याग व व्यक्तिगत विकास यातून समाजाच्या हिताचा व्यापक विचार त्यांनी मांडला होता. एकाही डोळ्यातून एकही अश्रू निघू नये, गरिबी, अन्याय, विषमता यांचे उच्चाटन व्हावे, हीच त्यांची जीवनदृष्टी होती, हेच त्यांचे अध्यात्म होते आणि हाच त्यांचा परमार्थ होता. स्वातंत्र्याचा उल्लेख करणाऱ्यांनी स्वातंत्र्याकडे कसे पाहावे, याची दृष्टी गांधीजींच्या आचरणातून मिळते..

भारताला ‘कुणामुळे’ आणि ‘कशामुळे’ स्वातंत्र्य मिळाले? जे मिळाले ते खरोखरच ‘स्वातंत्र्य’ होते का?  स्वातंत्र्याची नक्की व्याख्या काय? गेल्या ६३ वर्षांकडे पाहता भारताने स्वातंत्र्य मिळविल्यानंतर काय व किती प्रमाणात साध्य केले आहे?

वरवर पाहता हे प्रश्न सोपे वाटतात. परंतु या प्रश्नांच्या ऊहापोहावरून देशात व परदेशात प्रचंड खडाजंगी वाद झाले आहेत. (काही वाद आजही चालू आहेत.) काहींना असे प्रश्न विचारणे हेही देशद्रोहीपणाचे वाटते. पण असे अनेक इतिहासकार, राजकीय नेते वा संघटना आहेत की ज्यांच्या मते ‘खरा’ इतिहास समजून घेण्यासाठी या प्रश्नांची उत्तरे शोधायलाच हवीत आणि त्यात देशद्रोह वगैरे काही नाही, असे त्यांना मनापासून वाटते.

भारताच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत   उपनगरीय मराठी साहित्य संमेलनात खुद्द कविवर्य वसंत बापट यांनी प्रश्न विचारला होता- स्वातंत्र्य? कुणा स्वातंत्र्य? कुठे स्वातंत्र्य? कसले स्वातंत्र्य?.. वगैरे.

त्याच वर्षी दलित पॅन्थर्सच्या काही कवींनीही ‘तिरंगा गेला खड्डय़ात!’ अशा आशयाचे विधान केले होते. प्रत्यक्षात त्यांनी वापरलेला शब्द ‘खड्डय़ात’ असा नव्हता, तर तो पॅन्थर शैलीतील अधिक उग्र शब्द होता. विशेष म्हणजे तोच काळ म्हणजे १९७२ ते १९७५ हा देशातील कमालीचा अस्वस्थतेचा काळ होता. सर्व जीवनावश्यक वस्तूंची टंचाई, साठेबाजी, काळाबाजार, महागाई, सामाजिक असंतोष, प्रक्षोभक वातावरण आणि प्रखर राजकीय आंदोलने- यामुळे स्वातंत्र्याबद्दलची पवित्र भावनाही अवकळाग्रस्त झाली होती. इंदिरा गांधींच्या पाकिस्तानविरोधी युद्धातील अपूर्व विजय आणि बांगलादेशच्या निर्मितीनंतर निर्माण झालेले १९७१-७२ चे वातावरण लयाला जाऊ लागले होते. आणि त्या परिस्थितीत, अतिशय हिंस्र अशा नक्षलवादाच्या पाश्र्वभूमीवर, इंटलेक्च्युअल वर्तुळातील काही लोकही ‘कुणा स्वातंत्र्य, कुठे स्वातंत्र्य?’ असे प्रश्न विचारू लागले होते. त्या सिनिसिझमच्या वातावरणातच गुजरातचे नवनिर्माण आंदोलन, जयप्रकाशांची संपूर्ण क्रांती, रेल्वे संप आणि त्या अराजकाला उत्तर म्हणून आणीबाणी- असा तो तीन वर्षांचा राजकीय प्रवास होता. आणीबाणीमध्ये तर सर्वच लोकशाही स्वातंत्र्याच्या हक्कांचे आकुंचन झाले होते.

१९४७ नंतर प्रथमच वृत्तपत्र स्वातंत्र्यावर बंधने आली. मोर्चे, आंदोलने, संप, हरताळ यावर बंदी आली. ‘विनाकारण’ लोकांना अटकेत टाकायचा परवाना पोलिसांना प्राप्त झाला. वरवरच्या शांत व शिस्तबद्ध परिस्थितीला भीती व शासकीय दहशतीने आतून ग्रासलेले होते. साहजिक स्वातंत्र्याच्या रौप्यमहोत्सवी वर्षांत, १९७२ साली, उपस्थित झालेल्या प्रश्नांना आणीबाणीने अधोरेखित केले. आणीबाणी म्हणजे ‘दुसरे पारतंत्र्य’ आणि १९७७ चा इंदिरा-काँग्रेसचा पराभव आणि जनता पक्षाचा विजय हे ‘दुसरे स्वातंत्र्य’ म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यातूनच ‘पहिल्या स्वातंत्र्या’विषयीसुद्धा पुन्हा ऐतिहासिक प्रश्न नव्याने मांडले जाऊ लागले होते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व काही तत्सम हिंदू संघटनांनी १५ ऑगस्ट १९४७ हा स्वातंत्र्यदिन म्हणून स्वीकारलाच नव्हता. फाळणी होऊन मिळालेले स्वातंत्र्य त्यांना मान्यच नव्हते. त्यांच्यापैकी काहींच्या दृष्टिकोनातून तर तो ‘काळा दिवस’ होता. पुढे जवळजवळ ५० वर्षे संघकार्यालयांवर १५ ऑगस्टला तिरंगा फडकाविणे निषिद्ध होते! (अजूनही काही संघ कार्यालयांवर तिरंगा फडकत नाही.) स्वातंत्र्यानंतर पाचच महिन्यांनी गांधीजींची हत्या झाली. नथुराम हा संघाचा कार्यकर्ता होता की, सावरकरांचा अनुयायी होता, वगैरे चर्चा फिजूूल आहे. कारण तो कट्टर हिंदुत्ववादी होता आणि गांधीजींचे नेतृत्व व स्वातंत्र्य या दोन्ही गोष्टी त्याला मान्य नव्हत्या. पुढे कित्येक वर्षे, म्हणजे संघाने गांधीजींना ‘प्रात:स्मरणीय’ दर्जा देईपर्यंत हिंदुत्ववादी वर्तुळात गांधीजी (आणि नेहरू) हे मुख्य राजकीय/ वैचारिक शत्रू होते.

अशा हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टिकोनातून फक्त तेच स्वातंत्र्य ‘खरे’ ठरले असते, जर अफगाणिस्तानपर्यंतचा भारतीय उपखंड एकवटलेला व स्वतंत्र झाला असता तर! गेल्या ६३ वर्षांतील हिंदुत्ववाद्यांच्या विविध छटांमधून हा ‘स्वातंत्र्यविरोध’ व्यक्त झाला आहे. नरेंद्र मोदींपासून प्रज्ञा ठाकूपर्यंत आणि बाळासाहेब ठाकरेंपासून ते बजरंग दलापर्यंत. आता उघडपणे १५ ऑगस्ट हा त्यांच्यापैकी कुणीही ‘काळा दिवस’ म्हणून मानत नसले, तरी ती मानसिकता गेल्या सहा दशकात पुसली गेलेली नाही.

फक्त अशा हिंदू परिवारामध्येच १५ ऑगस्ट हा ‘काळा दिवस’ नव्हता, तर काही कम्युनिस्ट संघटना व पक्षांनाही तो स्वातंत्र्यदिन म्हणून मान्य नव्हता. त्यांचे म्हणणे होते की, जोपर्यंत सर्व कामगार, कष्टकरी, शेतकरी वर्ग, भांडवलशाही, सरंजामशाही, जमीनदारी, सावकारी यांच्या पाशातून मुक्त झालेला नाही, तोपर्यंत हे स्वातंत्र्य खोटे आणि फसवे आहे. ब्रिटिश साम्राज्यशाहीशी ‘तडजोड’ करून हे स्वातंत्र्य ‘शोषक’ वर्गाने म्हणजे भांडवलदार- सरंजामदारांनी प्राप्त केले आहे. इंग्रजांचा युनियन जॅक जाऊन ‘तिरंगा’ फडकला असला तरी कामगार- शेतकऱ्यांना आता ‘खऱ्या’ स्वातंत्र्यासाठी पुन्हा सज्ज व्हावे लागणार आहे. पुढे गाजलेला तेलंगणचा सशस्त्र मुक्ती लढा हा त्याच खऱ्या स्वातंत्र्यासाठी कम्युनिस्टांनी (मुख्यत: कॉम्रेड बी. टी. रणदिवेंच्या प्रबंधानुसार) केलेला संघर्ष होता. आजही तेलंगणमध्ये काही वृद्ध क्रांतीकारकांच्या त्यावेळच्या आठवणी ताज्या आहेत. कम्युनिस्टांमधील दोन मुख्य मतप्रवाह तेव्हाच पक्षात प्रकट होऊ लागले होते. कॉम्रेड रणदिवेंच्या मते १५ ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन नव्हता. कॉम्रेड डांगे यांच्या मते हे स्वातंत्र्य म्हणजे कामगार- शेतकऱ्यांच्या मुक्तीच्या मार्गावरील महत्त्वाचा टप्पा होता. ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या पराभवामुळे भारतीय जनतेला सर्व लोकशाही हक्क प्राप्त झाले असून त्यांच्या आधारे पुढील संघर्षांसाठी व्यापक संघटना उभारणे आता शक्य होते.

कॉम्रेड मोहित सेन यांनी तर पुढे भारतीय स्वातंत्र्यलढय़ाचे वर्णन ‘अनोखी व ऐतिहासिक भारतीय क्रांती’ असेच केले होते. परंतु १५ ऑगस्ट १९४७ आणि पुढेही बरीच वर्षे कम्युनिस्ट संघटना स्वातंत्र्यदिन मानत नसत, साजरा करणे दूरच राहो. उग्रवादी कॉम्रेड्स् तर तो ‘काळा दिवस’च मानत. (आजच्या नक्षलवाद्यांची मानसिकताही त्याच तत्कालीन प्रवृत्तीत आहे.)

म्हणजेच वसंत बापटांनी १९७२ साली व्यक्त केलेली ‘कुणा स्वातंत्र्य- कुठे स्वातंत्र्य?’ ही भावना समाजात होतीच. असे असूनही बहुसंख्य भारतीयांनी १५ ऑगस्ट हाच स्वातंत्र्यदिन मानला होता. २६ जानेवारी १५५० रोजी भारत देश अधिकृतपणे लोकशाही प्रजासत्ताक म्हणून घोषित झाला. पहिल्यावहिल्या सार्वत्रिक निवडणुका १९५२ साली होऊन भारतीय जनतेने ते स्वातंत्र्य स्वीकारले आणि १५ ऑगस्टचे ऐतिहासिक महत्त्व  जगाच्या इतिहासात यथार्थपणे नोंदवले गेले.

आज आपण देशाचा स्वातंत्र्यदिन साजरा करीत असलो तरी हे स्वातंत्र्य कुणामुळे व कसे आणि कोणत्या परिस्थितीत मिळाले, यासंबंधी इतिहासकारांमध्ये वाद आहेतच. म्हणूनच १९४७ ते १९५० (स्वातंत्र्य ते प्रजासत्ताक) या तीन वर्षांतील जागतिक संदर्भ महत्त्वाचे ठरतात.

दुसरे महायुद्ध संपल्यानंतर दोन वर्षांनी भारताला स्वातंत्र्य मिळाले. ज्या नाझी जर्मनीने हिटलरच्या पाशवी नेतृत्वाखाली युरोप पादाक्रांत करून नंतर जगावर आपली अधिसत्ता प्रस्थापित करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली होती, तो जर्मनी बऱ्याच अंशी बेचिराख झाला होता आणि हिटलरला स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या करावी लागली होती. परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या काळात युरोपियन साम्राज्यशाही खिळखिळी झाली होती. युरोपातील सर्वात प्रभावी व विस्तृत साम्राज्य अर्थातच इंग्रजांचे. त्यामुळे काही स्वयंभू इतिहास अभ्यासक असे मानतात की, भारतीय स्वातंत्र्याचा (अप्रत्यक्ष) जनक हिटलर आहे. जर हिटलरने (जर्मनी बेचिराख होईपर्यंत) युद्ध चालविले नसते, तर इंग्रज साम्राज्याला असा जबरदस्त तडाखा बसला नसता. क्षीण आणि खिळखिळ्या झालेल्या इंग्रज राज्यकर्त्यांना भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याखेरीज पर्यायच उरला नव्हता. ज्या विन्स्टन चर्चिल यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने जर्मनीचा पराभव केला, त्याच चर्चिल यांचा इंग्लंडच्या मजूर पक्षाने दारुण पराभव केला. तेथे मजूर पक्षाचे राज्य आल्यावर पंतप्रधान अ‍ॅटली यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याची प्रक्रिया सुरू केली. (परंतु फाळणीचे कारस्थानही १९४० नंतर इंग्लंडच्या बारभाईंमध्ये शिजू लागले होते. महमद अली जिनांनी पाकिस्तानची घोषणा १९४० नंतर आक्रमकपणे प्रचारायला सुरुवात केली, हा योगायोग नाही.)

भारताला स्वातंत्र्य ‘दिल्यानंतरही’ दक्षिण आशियात कारवाया करण्यासाठी एक तळ इंग्रज साम्राज्यवाद्यांना (आणि नंतर अमेरिकेला) हवा होता. तो पाकिस्तानच्या रुपाने त्यांनी निर्माण केला. गेली ६३ वर्षे भारताचे स्वातंत्र्य फाळणीच्या त्या जोखडात अडकून पडले आहे. भारताचे सुमारे दीड लाख कोटी रुपये दरवर्षी केवळ संरक्षणावर खर्च होतात- म्हणजे पाकिस्तानापासून (आणि दहशतवादी, काश्मिरी फुटीरवादी यांच्यापासून) आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी. या युद्धखर्चाचा मोठा फायदा अमेरिकन व युरोपीय शस्त्रास्त्रनिर्मात्यांना होतो. शिवाय भारताचे अमेरिका-इंग्लंडवरचे अवलंबित्त्वही वाढते. भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेच मुळी दुसऱ्या महायुद्धानंतर लगेचच सुरू झालेल्या शीतयुद्धाच्या पाश्र्वभूमीवर. अमेरिका-ब्रिटन पाकिस्तानच्या बाजूने आणि सोविएत रशिया भारताच्या बाजूने अशी ती शीतयुद्धकालीन सत्तेची नेपथ्यरचना होती.

किंबहुना असेही म्हणता येईल की, शीतयुद्धाच्या कॅनव्हासमुळेच भारतीय स्वातंत्र्याचे (आणि फाळणीचे) परिमाणच बदलून गेले. वस्तुत: भारताची लोकसंख्या या घडीला १२० कोटी आणि पाकिस्तानची १७ कोटी. म्हणजे पाकिस्तानपेक्षा लोकसंख्येने भारत सातपट मोठा आहे. भारतात ६३ वर्षे लोकशाही प्रजासत्ताक व सेक्युलॅरिझमचा ढाचा टिकून आहे. याच काळात पाकिस्तानात सुमारे ४० वर्षे लष्करी हुकूमशाही आहे. तरीही ‘लोकशाहीवादी’ पाश्चिमात्य देशांचा पाठिंबा (व मदत) पाकिस्तानला आहे. कारण अर्थातच वर म्हटल्याप्रमाणे शीतयुद्धाचे परिणाम.

सोविएत युनियनचे विघटन झाल्यानंतर पारंपरिक अर्थाने शीतयुद्ध संपले तरी त्या शीतयुद्धाचे ढग अजूनही जागतिक राजकारणाच्या आकाशात आहेतच. एका अर्थाने असेही म्हणता येईल की, दहशतवाद हासुद्धा त्या शीतयुद्धाचाच ‘उपसंहार’ आहे. भारताच्या स्वातंत्र्याला आज त्याच उपसंहाराने घेरलेले आहे.
भारतीय स्वातंत्र्याला जसे दुसऱ्या महायुद्धाचे व नंतर शीतयुद्धाचे संदर्भ आहेत, तसेच चीनमधील क्रांतीचेही आहेत. भारतीय स्वातंत्र्यलढा आणि चीनचा क्रांतीसंघर्ष हे पूर्णपणे समकालीन आहेत. (डॉ. कोटणीस की अमर कहानी!) भारतीय स्वातंत्र्यलढय़ाला चीनची आणि चीनच्या क्रांतीला भारताची पूर्ण सहानुभूती होती. भारतीय राज्यघटना तयार होत होती, तेव्हाच चीनची क्रांती यशस्वी झाली- १ ऑक्टोबर १९४९ (म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर दोन वर्षांनी पण भारतीय प्रजासत्ताक स्थापनेच्या चार महिने अगोदर). चीनने केलेल्या जमीन सुधारणा कायद्यापासून ते सामाजिक विषमता निर्मूलनापर्यंत, शेतकरी क्रांतीपासून ते गतिमान आर्थिक परिवर्तनाच्या कार्यक्रमापर्यंत भारत व चीन यांचा समांतर प्रवास झाला आहे. चीनची प्रगती कम्युनिस्ट एकाधिकारशाहीच्या पद्धतीतून आणि भारताची प्रगती लोकशाही पद्धतीतून झाली आहे. त्याचे संस्कार दोन्ही देशांवर झालेले आपण पाहात आहोत.
माओंच्या नेतृत्वाचा चीनमधील उदय, विकास आणि विस्तार आणि भारतातील गांधीजींचे नेतृत्व थोडय़ाफार वर्षांच्या फरकांनी समांतरच वाढलेले आहे. मुख्य फरक हा की क्रांती यशस्वी झाल्यानंतर पुढे २७ वर्षे माओंचेच नेतृत्व चीनमध्ये प्रभावी राहिले. गांधीजींची हत्या स्वातंत्र्यानंतर पाच महिन्यांनी झाली.
गांधीजींची हत्या झाली नसती तर भारतात स्वातंत्र्योत्तर काळात काय झाले असते? हा प्रश्न इतिहासातील ‘जर-तर’मधला आहे. गांधीजी माओंपेक्षा वयाने मोठे होते, पण दोघांमधील समान धागा म्हणजे त्यांचे र्सवकष व्यवधान. माओंना फक्त राजकीय-आर्थिक-सामाजिक परिवर्तन अभिप्रेत नव्हते, तर ‘सांस्कृतिक’ क्रांतीही अभिप्रेत होती. गांधीजींचा ‘स्वातंत्र्य’ संकल्पनेचा अर्थही फक्त राजकीय वा आर्थिक नव्हता, तर सामाजिक- सांस्कृतिक पण होता. पण हे समान घटक झाले.

त्यांच्यातील मुख्य फरक होता तो साध्य आणि साधन यातील विवेकाचा. माओंना वर्गयुद्ध अभिप्रेत होते आणि भांडवलदार- जमीनदार वर्गाचे निर्दालन हे त्यांचे उद्दिष्ट होते. हिंसेशिवाय ते निर्दालन म्हणजेच क्रांती संभवतच नाही. माओंचा अर्थातच ‘अहिंसा’ तत्त्वज्ञानावर विश्वास नव्हता. (जो आजही कोणत्याच माओवाद्यांचा नाही. भारतातील कम्युनिस्टांनी लोकशाही परंपरा स्वीकारली असली, तरी अहिंसेचे तत्त्वज्ञान त्यांना मान्य नाहीच.) गांधीजींनाही भांडवलशाही, जमीनदारशाही मान्य नव्हती. परंतु भांडवलदार वर्गाचे निर्दालन करण्याऐवजी त्या वर्गाचे हृदयपरिवर्तन करून सामाजिक-आर्थिक विषमता दूर करता येईल, असे त्यांचे मत होते. त्यांना ‘भूदान’ प्रक्रिया स्वेच्छेने घडवून आणायची होती आणि विनोबांनी नेमका तोच प्रयत्न केला. गांधीजींच्या दृष्टिकोनातून भांडवलदार हे उद्योगांचे व संपत्तीचे ‘ट्रस्टी’ म्हणजे विश्वस्त होते. लोभ आणि संपत्तीचा संचय वा आर्थिक मक्तेदारी गांधीजींना मान्य नव्हती. पण सर्जनशीलता, उद्यमशीलता आणि व्यापारशीलता समाजात ठेवायची असेल तर व्यक्तिस्वातंत्र्य असलेच पाहिजे, असे त्यांचे मत होते. माओंना व्यक्तिस्वातंत्र्य हे तत्त्वज्ञान म्हणूनच अमान्य होते. व्यक्तिस्वातंत्र्याची संकल्पना ही ‘भांडवली फसवणूक’ आहे, असे माओंचे मत होते. गांधीजींच्या दृष्टिकोनातून ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचा पाया मूलत: ‘आध्यात्मिक’ होता. कम्युनिस्टांच्या दृष्टीकोनातून अध्यात्म हे थोतांड होते.

गंमत म्हणजे येथील हिंदुत्ववादी हे भारताच्या आध्यात्मिक वारशाचा गाजावाजा करीत असले तरी त्यांचा गांधीजींना विरोध होता आणि अहिंसेच्या संकल्पनेलाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ हवा होता,  पण गांधीजींना अभिप्रेत असलेल्या सांस्कृतिक/सामाजिक परिवर्तनाला त्यांचा विरोध होता. कट्टर हिंदुत्ववादी आणि कट्टर कम्युनिस्ट दोघेही गांधीजींच्या विरोधात होते आणि हिंसेचे समर्थक होते.

भारतीय स्वातंत्र्य हे गांधीजींमुळे नव्हे तर सुभाषचंद्र बोस, भगतसिंग वा सावरकर यांच्या प्रयत्नामुळे मिळाले, असे मानणारेही कमी नाहीत. विरोधाभास हा की अहिंसेचा तत्त्वज्ञ हिंसेने मारला गेला आणि तोही हिंदू तत्त्वज्ञानाच्या थोरवीने प्रेरित होऊन! परंतु खुद्द सुभाषचंद्र बोस गांधीजींना सर्वोच्च आदराचे स्थान देत. कॉम्रेड रणदिवेंनाही पुढे बऱ्याच वर्षांनी साक्षात्कार झाला की, गांधीजी हे जगातील एक सर्वश्रेष्ठ ‘मॉरल रिव्होल्यूशनरी’ म्हणजे नैतिक क्रांती घडवू पाहणारे महान क्रांतीकारक होते. ज्या कम्युनिस्टांनी १५ ऑगस्ट हा काळा दिवस मानला होता, त्यांनीच गांधीजींना हे क्रांतीकारकाचे प्रशस्तिपत्र द्यावे, हे कॉम्रेड्स्चे हृदयपरिवर्तन म्हणायचे की विचारपरिवर्तन?

त्याचप्रमाणे संघपरिवाराला गांधीजी प्रात:स्मरणीय वाटावे. हे त्यांचे सांस्कृतिक- आध्यात्मिक परिवर्तन की त्यांच्यातील राजकीय परिवर्तन? भारतीय स्वातंत्र्यलढय़ाने, गांधीजींनी आणि पंडित नेहरूंनी जगाच्या इतिहासाला नवीन मापदंड दिले. खुद्द चीनमध्ये आज भांडवलशाही पद्धतीने विकास होत आहे आणि तेथील कम्युनिस्ट पक्ष त्या लाल भांडवलशाहीचा ‘ट्रस्टी’ म्हणजे विश्वस्त होऊ पाहात आहे. नेल्सन मंडेलांपासून ते बराक ओबामांपर्यंत सर्वाना गांधीजी हेच आदर्श वाटावेत, हे भारतीय स्वातंत्र्याचे व स्वातंत्र्यलढय़ाचे मोठे यश मानावे लागेल. लेनिन, माओ, चर्चिल, रुझवेल्ट यांच्यापेक्षा कितीतरी वरचे स्थान आज गांधीजींना जगभर दिले जाते. भारताचे भविष्य केवळ आर्थिक विकासावर नाही, तर सामाजिक-सांस्कृतिक-आध्यात्मिक विकासावर मोजले जाणार आहे!

डॉ. यशवंत रायकर, सौजन्य-लोकप्रभा

परलोक निर्माण करण्यासाठी आत्म्याचे अस्तित्व, त्याचे अमरत्व, स्वर्गातील सुख, नरकातील दु:ख व परमेश्वर या संकल्पना समाजात दृढ व्हाव्या लागतात. मग या संकल्पनांचे नैतिक समर्थन करण्याची गरज वर्चस्व टिकवण्यासाठी प्रस्थापितांमध्ये निर्माण होते. म्हणून सुखवस्तू वर्गातील विचारवंत परलोक उभा करतात.
—————————————————————————————————————————

मृत्यूनंतर काय होते, परलोक म्हणजे काय, सृष्टीची निर्मिती कशी झाली, दु:खापासून मुक्ती कशी मिळवायची; हे धर्माचे क्षेत्र मानले जाते. पण कोणताही धर्म इहलोकाचा विचार आपल्या कक्षेतून कधीच सोडत नाही. धर्म एक सामाजिक वास्तव असतं, अधिकार गाजवणारी संस्था असतो. प्रत्येक धर्माने आपल्या अनुयायांसाठी काही श्रद्धा, चाली-रीती बंधनकारक करून ठेवलेल्या असतात. इहलोकात पाप काय, पुण्य काय, हे स्वतंत्र बुद्धीने ठरविण्याचा अधिकार अनुयायांना नसतो. तो विचार परलोकातून आलेल्या आदेशानुसार केला जातो. ही परलोकातील माहिती उपलब्ध होते कशी? ते ज्ञान उच्चकोटीच्या काही साक्षात्कारी माणसांना किंवा परमेश्वराने निवडलेल्या खास व्यक्तींना होते. ते अतींद्रिय असते. अशा व्यक्ती धर्मसंस्थापक किंवा धमार्ंतर्गत पंथाच्या संस्थापक बनतात. या ज्ञानावर आधारलेले पवित्र ग्रंथ, त्यावरील टीका, भाष्ये त्यातील वादविवाद, तत्त्वज्ञान यांचा अभ्यास म्हणजे धर्मशास्त्र. अनुयायांना ते दुबरेध असते. म्हणून त्यात काय सांगितले आहे, धर्माचरण म्हणजे काय, आपला धर्म सर्वश्रेष्ठ कसा, हे लोकाना समजावून सांगण्याचे काम धर्मशास्त्रज्ञ करतात. धर्मशास्त्रज्ञांखेरीज धर्माला पुरोहित लागतो. धार्मिक विधींचा तो जाणकार असतो. म्हणजे एकप्रकारचा तंत्रज्ञ होय. देव व माणूस यांच्यातला तो दुवा ठरतो. हिंदूंमध्ये पुरोहित म्हटले की ब्राह्मणच डोळ्यासमोर येतो. पण समाजशास्त्रीय अभ्यासानुसार केवळ २० टक्के पुरोहितच ब्राह्मण असून ८० टक्के ब्राह्मणेतर आहेत. या व्यवस्थेत संत बसत नाहीत. संत वेगळे व गॉडमेन वेगळे. गॉडमेन हे इहलोकात वावरणारे देहधारी लोक असतात. खरा संत धर्माच्या बऱ्याच परंपरा, रुढी धुडकावून लावतो. तो आध्यात्मिक असतो, पण रुढार्थाने धार्मिक नसतो. थोडक्यात, धर्मसंस्थापक, धर्मशास्त्रज्ञ व पुरोहित हे परलोक संकल्पनेचे आधारस्तंभ असून परलोकाच्या नावाने चाललेला इहलोकाचा व्यवहार हेच धर्माचे स्वरूप असते.

पण मानवाच्या इतिहासात परलोक ही संकल्पना आली कधीपासून? प्राथमिक अवस्थेतील समाजात परलोक नव्हता. तेव्हा श्रद्धा होत्या, दैवते होती. त्यांच्यात तारक व मारक असा भेद होता. मृत्यू टळावा, आपत्तींपासून रक्षण व्हावे, अन्न-पाणी मिळावे एवढय़ासाठीच देवतांची करुणा भाकली जात असे. परलोक निर्माण करण्यासाठी आत्म्याचे अस्तित्व, त्याचे अमरत्व, स्वर्गातील सुख, नरकातील दु:ख व परमेश्वर या संकल्पना समाजात दृढ व्हाव्या लागतात. अशा संकल्पना जन्मास येण्यासाठी कष्ट करणारा व विचार करणारा, अशा दोन वर्गात समाजाची विभागणी व्हावी लागते. कष्ट करणाऱ्या श्रमातून निर्माण होणारे उत्पादन, कष्ट न करणाऱ्या जमीनदार सदृश वर्गाला आयते मिळते, तेव्हा त्याचे नैतिक समर्थन करण्याची गरज निर्माण होते. कारण या अल्पसंख्य वर्गाला बहुसंख्याकावर वर्चस्व प्रस्थापित करायचे असते. असे समर्थन इहलोकवादाच्या आधारे होऊच शकत नाही. म्हणून या सुखवस्तू वर्गातील विचारवंत परलोक उभा करतात. जगाच्या उत्पत्तीचे गूढ सोडवतात.

सृष्टी कोणी निर्माण केली?
परमात्मा, गॉड, अल्लाह याने!

का? त्याला तशी इच्छा झाली म्हणून. माणसाच्या वाटय़ाला एवढे दारिद्रय़, दु:ख का? तो पापी आहे म्हणून. हे पाप पूर्वजन्माचे असो किंवा ‘ओरिजनल सिन’चे. असो.

हे मनात बिंबल्यावर माणूस भयभीत होतो. व परमेश्वराचे म्हणजे प्रत्यक्ष त्याच्या मानवी प्रतिनिधींचे दास्य पत्करतो आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांचे मुकाटय़ाने पालन करतो. धर्मसत्ता, राजसत्ता व अर्थसत्ता यांचा त्यात सामायिक लाभ असतो. यातून एक व्यवस्था किंवा प्रस्थापना निर्माण होते. ती पवित्र मानली जाते.

पण याचा अर्थ धर्म ही केवळ अफूची गोळी आहे असा नव्हे. धर्माचा तसा वापर करता येतो एवढाच याचा अर्थ आहे. धर्माची विधायक बाजूसुद्धा पहावी लागते. माणसाला त्याच्या रानटी बर्बर अवस्थेतून बाहेर काढण्याचे पहिले श्रेय धर्माकडे जाते. त्याला मर्यादा पालनाचे नीतीचे, अनुशासित सामूहिक जीवन जगण्याचे पहिले धडे धर्मानेच दिले. धर्मामुळेच ज्ञान-तत्वज्ञान व वैचारिक मंथन यांची सुरुवात झाली. विचाराला शिस्त लागली. शिवाय धर्मशास्त्रज्ञांच्या मेहनतीमुळेच धर्म या सामाजिक संस्थेचा, ज्ञानाचा व मानवी संकल्पनांचा इतिहास उभा करणे शक्य झाले. अर्थात ज्ञान-तत्वज्ञानाची पाळेमुळे ते ज्या परिस्थितीत उदयाला आले त्यात दडलेली असतात. त्याला त्या त्या काळाच्या मर्यादा असतात. म्हणून धर्मशास्त्राचे योगदान आजच्या संदर्भात तपासून पहावे लागते. इच्छेतून सृष्टीची निर्मिती झाली हा चैतन्यवाद (स्पिरिच्युअलिझम)आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर टिकत नाही. जड सृष्टीतूनच सचेतन सृष्टी निर्माण झाली असे मानणे म्हणजे जडवाद (मटेरिअलिझम). जडवाद तर्क व अनुमान यावरून कधीच सिद्ध होत नसतो. त्यासाठी प्रायोगिक विज्ञान व तंत्रज्ञान यांचा पुरेसा विकास व्हावा लागतो. जडवाद निरीश्वरवाद, इहवाद हे पूर्वीपासून होते, पण तर्क व अनुमान यांवर आधारलेले होते.

सर्व मानवी व्यवहार स्थल-कालबद्ध असतात, अंतिम सत्य असे काहीच नसते. हे जाणण्यासाठी मार्क्‍सवादी व्हावे लागत नाही. मानवी भूतकाळाच्या सूक्ष्म अभ्यासातून व विज्ञानाच्या इतिहासातून ते कळते. सत्यशोधन करताना एखादी पवित्र संकल्पना किंवा पूज्य व्यक्ती आड येत असली तर तिला बाजूला सारण्याची मानसिक तयारी म्हणजे डावा विचार. जे प्रस्थापित आहे, प्रतिष्ठित आहे ते योग्य आहे असे मानणे हा उजवा विचार. माणसात या दोन्ही प्रवृत्ती कमी-अधिक प्रमाणात कार्यरत असतात. म्हणून जीवनात विसंगती निर्माण होतात आणि विसंगती हेसुद्धा मानवी जीवनातील एक सत्य आहे. त्यालाही सामोरे जावे लागते.

प्रायोगिक विज्ञानाची सुरुवात गॅलिलिओ (१५६४-१६७२) पासून झाली असली तरी १७-१८-१९ व्या शतकातील प्रगतीचे टप्पे ओलांडत ज्ञानाच्या क्षेत्रात आमुलाग्र क्रांती झाली ती विसाव्या शतकात. अणुविज्ञान, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, भूविज्ञान, गणित, मानवशास्त्र, भाषाशास्त्र, मनोविज्ञान व तत्तवज्ञान यातील संशोधनातून एकीकडे विशेषज्ञांचा काळ आला तर दुसरीकडे असंख्य ज्ञानशाखा कधी नव्हत्या इतक्या एकमेकींजवळ आल्या. ज्ञानाचे एकीकरण होऊन माणसाला आपण कोण आहोत व काय नाही हे चांगले कळून चुकले. विचारवंतांच्या आशावादाला तडा गेला. ज्ञानातील ही क्रांती धर्मशास्त्रज्ञांना पचणे अशक्य होते. म्हणून वैज्ञानिक परिभाषेच्या नव्या आकर्षक मद्यकुंभातून ते जुनीच मदिरा देत राहिले आहेत. उत्क्रांतिवादाला अमेरिकेतसुद्धा आजही विरोध आहे. अशा बाबतीत प्रश्न हितसंबंध सांभाळण्याचा बनतो, सत्यशोधनाचा राहत नाही.

पण विसाव्या शतकात डाव्या विचारसरणीनेसुद्धा वेगवेगळ्या मानवतावादी वाटा शोधून काढल्या. त्यांचे सार थोडक्यात असे सांगता येईल: माणूस ही देवाची खास लाडकी जमात नव्हे. अन्य प्राण्यांतीलच तो एक सदस्य आहे. माणसाला असलेली बुद्धी ही देवाची देणगी नसून उत्क्रांतीत त्याने प्राप्त करून घेतलेली उपलब्धी आहे. देवाला विरोध नाही, पण देव ही संकल्पना व्यक्तिनिष्ठ (सब्जेक्टिव) आहे. आपण धरून चालतो तसा माणूस रॅशनल प्राणी नाही. तो मिथके व प्रतिके बनविणारा, त्यांना पूजणारा व दुसऱ्यांच्या प्रतिकांचा तिरस्कार करणारा व त्यासाठी हिंसेवर उतरणारा प्राणी आहे. तो अपूर्ण आहे. श्रद्धा व बुद्धी ही दोन्ही त्याची आयुधे आहेत. दोहोंचा तो सदुपयोग व सर्वनाश घडवून आणणारा दुरुपयोगही करू शकतो. निसर्गाचे कवींनी रंगविलेले रोमॅण्टिक चित्र केवळ किंचित सत्य आहे. निसर्ग आपली माता आहे, पण ती निष्ठुर आहे. आपल्या अपत्यांची तिला दयामाया नाही. ‘निसर्गाकडे चला’ म्हणजे नेमके कुठे चला हे माणसाला कळत नाही. मानवी अस्तित्व हेतूहीन व विवेकशून्य आहे.

हे विदारक सत्य माणूस पेलू शकत नाही. त्याला मृत्यूचे भय असते म्हणून तो अमरत्वाच्या शोधात असतो. आपल्या एकाकीपणात व दु:खात परमेश्वर त्याला मोठा भावनिक आधार वाटतो. मृत्यूनंतर सर्वकाही संपत नाही, त्यानंतरसुद्धा आशा आहे सांगणारा परलोक हा त्याची भावनात्मक गरज आहे. त्या श्रद्धेच्या आधारे तो निकोप सदाचारी जीवन जगू शकत असेल तर त्यात वाईट काय? वैफल्यग्रस्त आयुष्य कंठत राहण्यापेक्षा ते केव्हाही श्रेयस्कर. आणि असे मानणारे डावे विचारवंत स्वत: परलोकवादी नाहीत. फक्त त्यांना धर्मशास्त्रांची अधिकारशाही व कुणाचीही हुकूमशाही मान्य नाही. त्यांनी देवाला नव्हे, पण माणसाला ओळखले आहे. देवाच्या शोधात ते कधीच नव्हते. म्हणून परलोक व मृत्यूनंतरचे जीवन या संकल्पनांकडे उदार व सहिष्णू दृष्टिकोनातून पाहण्याचा धडा ते बुद्धिवाद्यांना देतात. त्याचबरोबर धर्माच्या नावाखाली चाललेला धुमाकूळ धिक्कारतात.

याचा अर्थ असा नव्हे की आमच्या पूर्वजांना हे सर्व आधीच गवसले होते. अनेक चुकीच्या पवित्र धार्मिक संकल्पना मोडीत काढणारे संशोधन ज्यांनी केले ते वैज्ञानिक तत्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विचारवंत वगैरे ज्यू व ख्रिश्चन होते, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी कठोर आत्मपरीक्षण केले. धर्मसत्तेशी व राजसत्तेशी लढा दिला, छळ सोसला, त्याग केला. तेव्हा कुठे सत्याचा विजय झाला. भारतीय मानसिकता मात्र आजही मध्ययुगीन आहे. तिला आत्मपरीक्षणाची गरजच वाटत नाही. भूतकाळाच्या उदात्तीकरणात आम्ही आत्मगौरव उपभोगतो. तिला आत्मपरीक्षणाची गरजच वाटत नाही. भूतकाळाच्या उदात्तीकरणात आम्ही आत्मगौरव उपभोगतो. इहलोक व परलोक यातील अंतरच आम्ही नष्ट केले आहे.

स.ह.देशपांडे, सौजन्य – लोकसत्ता

इतिहासात राष्ट्रवादाने जी विधायक कामगिरी केली आहे, तिच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. दोन गोष्टींचा आपण विशेषत्वाने परामर्श घेतला पाहिजे.
वर एका ठिकाणी आदिम समाजांमधल्या ‘टोळय़ां’चा उल्लेख केला आणि टोळीभावना व राष्ट्रभावना या मुळात एकाच स्वरूपाच्या असल्याचे सांगितले. मात्र एकूण राष्ट्रवादाचा विकासक्रम पाहिला तर लहान लहान टोळय़ा एकमेकांत मिसळून कालांतराने त्यांची राष्ट्रे झाल्याचे लक्षात येईल. या प्रक्रियेत समाजाचा प्रत्येक घटक मनाची सतत वाढत जाणारी एक विशालता अनुभवत असतो. छोटय़ा गटांवरच्या निष्ठांची जागा मोठय़ा गटांवरची निष्ठा घेते. मनावरची संकुचित आवरणे गळून पडतात. एका लहान गटापुरती मर्यादित असलेली बंधुत्वाची भावना व्यापक क्षेत्रावर कार्यान्वित होते. (ती अधिक व्यापक होऊन अखिल मानवत्वाला तिने कवेत घ्यावे हे स्वप्न योग्य आहे; पण आज तरी ते ‘स्वप्न’च आहे.)

या विकासक्रमातही एक नैतिक विकास अनुस्यूत आहे आणि हा विषय महत्त्वाचा असल्यामुळे त्याचे थोडे स्पष्टीकरण केले पाहिजे. भारताच्या संदर्भात तर तो विशेष अगत्याचा आहे.

जगात आपल्याला नेहमी असे दिसून येते, की माणूस निखळ नीतिमान किंवा निखळ अनीतिमान असा नसतो. त्याच्या वागणुकीत एक नैतिक द्वैत असते. ज्यांना ‘आपले’ म्हणावे त्यांच्या बाबतीत त्याची वागणूक सर्वसाधारणपणे नीतीची असते. अगदी चोर, दरोडेखोर झाले तरी टोळीतल्या टोळीत त्यांची प्रवृत्ती परस्पर विश्वासाची, दिलेला शब्द पाळण्याची, खरे तेच बोलण्याची असते. इतरांना लुबाडणारा माणूस केवळ संकुचित वैयक्तिक अर्थाने स्वार्थी नसतो, तर त्याचा स्वार्थ हा बहुधा ‘कुटुंबस्वार्थ’ असतो. ‘मुलांनातवंडांचं’ तो कोटकल्याण करीत असतो. ही भावना प्रेमाची असते, प्रेम हा ‘आस्थे’चा एक उच्च प्रकारचा आविष्कार असतो. दुसऱ्याविषयी वाटणाऱ्या आस्थेतून सर्व सामाजिक नीतिमत्तेचा उगम होतो. मात्र ‘आपल्या’ मानलेल्या लोकांचे वर्तुळ संपले, की त्याबाहेरच्या लोकांशी वागण्याची रीत बदलते आणि ती अनैतिक वर्तणुकीचे रूप घेऊ शकते.

आपल्या देशात अजून जात, जमात, गाव इत्यादी छोटय़ा निष्ठा प्रबळ आहेत. ‘आपले’पणाची वर्तुळे फार छोटी आहेत. या वर्तुळांपलीकडील माणसांशी आपले व्यवहार नीतितत्त्वांना धरून होत नाहीत. आपल्या देशातील सामाजिक नीतिमत्तेची पातळी फारच खालची आहे हे सुप्रसिद्ध आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे समाजातल्या घटकांचे ‘आपले’पणाचे वर्तुळ संपूर्ण देशाएवढे मोठे झालेले नाही. आपणात राष्ट्रीय भावना नाही. राष्ट्रीय भावना आणि सामाजिक नीतिमत्ता यांचा हा संबंध आपण लक्षात घेतला तर आजच्या आपल्या नैतिक अवनतीच्या कारणांवरही थोडासा प्रकाश पडेल.

राष्ट्रवाद ही सर्व प्रकारच्या कर्तृत्वाची प्रेरणा बनू शकते हेही लक्षात घेतले पाहिजे. माणूस आपल्या गुणांच्या जोरावर पुढे जातो हे खरेच आहे, पण ‘माझ्या कर्तृत्वाने माझ्या देशाचे नाव मोठे होणार आहे,’ ही भावनाही कर्तृत्वाला पोषक ठरते. तीन-चार शतकांतले विशेष लक्ष वेधून घेणारे वेगवेगळय़ा देशांचे कर्तृत्व आर्थिक क्षेत्रातले आहे आणि या काळातला आर्थिक विकास आणि राष्ट्रवादाची मानसिक उभारी यांचा संबंध इतिहासाच्या अभ्यासकांनी ध्यानात आणून दिला आहे. ‘पूर्वी दुखावलेला स्वाभिमान आणि भविष्यकाळाविषयीची उमेद यामधून जर्मनीचा राष्ट्रवाद स्फुरलेला होता. जर्मनीच्या आधुनिकीकरणाचे हेच रहस्य आहे. नेपोलियनने केलेला अपमानास्पद पराभव जर्मनीला सलत होता. जर्मनी संघटित आणि स्वाभिमानी झाला तर तो किती सामथ्र्यशाली होईल, याची प्रशियन नेत्यांना बरोबर जाणीव होती. याच जर्मन राष्ट्रवादामुळे फ्रँकफर्टची १९४९ची क्रांती यशस्वी झाली आणि जर्मनीच्या यशस्वी (आर्थिक) उत्थानाची राजकीय पाश्र्वभूमी तयार झाली. रशियन उत्थानाबद्दलही असेच म्हणता येईल. जवळजवळ शतकभर रशियाचे युद्धात पराभव होत होते. प्रथम क्रायमियन युद्ध, नंतर रुसो-जपान युद्ध आणि शेवटी पहिले महायुद्ध. रशियात परिवर्तन घडून येण्यामागे या राष्ट्रीय अपमानाची चीड प्रबळ होती. जपानमध्ये परिवर्तन घडून आले याचे कारण नव्या उद्योगधंद्यांनी निर्माण केलेल्या सेव्य वस्तू विकून फार फायदा होतो, असे जपान्यांना वाटले हे नव्हे, तर चीनमधील अफूचे युद्ध आणि त्यानंतर दहा वर्षांनी सात ‘काळी जहाजे’ बरोबर घेऊन कमोडोर पेरीने जपानवर केलेले आक्रमण हे होय! चीनमधील पारंपरिक समाजरचना अत्यंत मंद गतीने बदलली, पण बदलली ती मात्र शतकभर परकीयांनी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचा परिणाम म्हणूनच.’ राष्ट्रीय स्वाभिमान व आर्थिक विकास किंबहुना सर्वागीण विकास यांचा परस्परसंबंध राष्ट्रवादाच्या अभ्यासकांनी आवर्जून अभ्यासावा असा आहे.

धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था
‘विधायक राष्ट्रवादाच्या दिशेने’ या नवव्या प्रकरणात आपल्या राष्ट्रवादाची प्रमुख तत्त्वे काय असावीत, हे सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे. त्यात धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाचे सविस्तर प्रतिपादन करायला हवे होते. पुस्तक लिहिताना ते तत्त्व मी गृहीतच धरले होते आणि जागजागी त्याचे उल्लेख आलेलेही आहेत. पण सलग आणि विस्तृत विवेचनाची आवश्यकता होती आणि ते आता मी करीत आहे. खरे म्हणजे हा भाग त्या प्रकरणाच्या सुरुवातीस यायला हवा होता.

‘सेक्युलॅरिझम’ या शब्दाला पर्याय म्हणून ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्द मी वापरीत आहे. ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाला संघपरिवाराचा विरोध असतो. त्या आक्षेपात अजिबात तथ्य नाही, असेही नाही. पण त्याचा फार बाऊ करण्यातही अर्थ नाही. ‘धर्मनिरपेक्षता’ हा शब्दही जितका रूढ झाला आहे, तितका ‘संप्रदायनिरपेक्षता’ हा झालेला नाही. मी एवढेच स्पष्ट करू इच्छितो, की येथे ‘धर्म’ म्हणताना ‘रिलिजन’ हाच अर्थ माझ्या मनात आहे. एकदा मनातला अभिप्राय स्पष्ट केल्यानंतर पुढे जे म्हणायचे आहे, त्याबद्दल गैरसमज होण्याचे कारण नाही. ज्यांना अवश्य वाटेल त्यांनी ‘धर्मनिरपेक्ष’ या संज्ञेऐवजी ‘संप्रदायनिरपेक्ष’ किंवा ‘उपासनापंथनिरपेक्ष’ अशी दुरुस्ती करून घ्यावी.

धर्मनिरपेक्षता (सेक्युलॅरिझम) या शब्दाचा नेमका अर्थ काय याबद्दल अकारण बराच वाद घातला जातो. खरे म्हणजे तो अर्थ पुरेसा स्पष्ट आहे. तो पुढीलप्रमाणे मांडता येईल.

१) राजकीय व्यवहारात म्हणजे कायदे करणे, धोरणे ठरविणे, कार्यक्रम आखणे इत्यादी बाबतींत शासनाने धर्मग्रंथांचा आधार घेता कामा नये. कर्जावर व्याज आकारावे की नाही, कुटुंबनियोजनाचा कार्यक्रम राबवावा की नाही, मुलांच्या लग्नाचे वय कोणते असावे, शिक्षणक्रम कसा असावा इत्यादी अनंत प्रश्न राज्यकर्त्यांना सोडवावे लागतात. मात्र ते सोडवताना मनुस्मृती, बायबल, ताळमुद, कुराण, झेंद-अवेस्ता इत्यादी धर्मग्रंथांत कोणते आदेश दिले आहेत याचा विचार न करता मनुष्यबुद्धीने, उपलब्ध ज्ञानाच्या आधारे आणि तर्कसुसंगत अशी उत्तरे शोधून ते सोडविणे याचा अर्थ धर्मनिरपेक्षता! हे सर्व सामाजिक प्रश्न म्हटले ते राज्यसंस्थेच्या अधिकारात येतात. सारांश, सर्वच प्रकारचे सामाजिक प्रश्न सोडविताना बुद्धिवादाचा आश्रय घेणे म्हणजे धर्मनिरपेक्ष असणे. माणसाच्या बुद्धीलाही मर्यादा असतात हे खरे, पण जग समजून घेण्यासाठी माणसाजवळ दुसरे काही साधन नाही हेही खरे- या गृहीतकृत्यावर बुद्धिवाद आधारलेला आहे. तात्पर्य, सर्व सामाजिक व्यवहाराच्या क्षेत्रात धर्म गैरलागू ठरवून तेथे बुद्धिवादाची प्रतिष्ठापना करणे म्हणजे धर्मनिरपेक्षतावाद!
‘धर्म’ याचा येथे अर्थ एखाद्या प्रेषिताने, ऋषीने, मुनीने किंवा धर्मग्रंथाने दिलेले आदेश असा आहे. धर्म हा शब्द यापेक्षा व्यापक अर्थाने कधी कधी वापरला जातो, समाजधारणेची तत्त्वे, सर्वसाधारण नीतिविचार असा त्या वेळी धर्म या शब्दाचा अर्थ असतो. त्या अर्थाने अर्थातच कोणतेही शासन धर्मनिरपेक्ष असू शकत नाही. वर म्हटल्याप्रमाणे तेथल्या विवेचनात धर्म शब्दाचा हा व्यापक अर्थ अभिप्रेत नाही हे लक्षात ठेवावे.

मात्र संकुचित अर्थानेही धर्माचा नाश घडवून आणणे, धर्माला राष्ट्रीय जीवनातून हद्दपार करणे असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही. सामाजिक व्यवहारात धर्माला प्रवेश नाही. एवढाच धर्मनिरपेक्षतेचा अर्थ आहे. म्हणजेच माणसाच्या खासगी जीवनात धर्माला जागा राहील. याचा अर्थ असा, की परमेश्वर मानणे किंवा न मानणे, एखाद्या धर्माचे अनुयायित्व पत्करणे किंवा न पत्करणे या गोष्टींबाबत व्यक्तीला स्वातंत्र्य असेल. लोकांच्या जीवनातूनच धर्म काढून टाकण्याचा प्रयत्न सोविएत शासनाने केला; धर्मनिरपेक्ष राज्याच्या संकल्पनेत असा प्रयत्न अनुस्यूत नाही. आपली मागणी फक्त धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेची (स्टेट) आहे; धर्मनिरपेक्ष समाजाची (सोसायटी) नाही.

किंबहुना व्यक्तीचे धार्मिक स्वातंत्र्य हे धर्मनिरपेक्ष राज्याचे महत्त्वाचे वैशिष्टय़ आहे. या धार्मिक स्वातंत्र्यात उपासनास्वातंत्र्याचा समावेश होतो, तसाच आपला धार्मिक दृष्टिकोन मांडण्याचा, तो इतरांना पटविण्याचा, म्हणजेच धर्मातर घडवून आणण्याच्या आणि त्यासाठी संघटित प्रयत्न करण्याच्या स्वातंत्र्याचाही समावेश होतो. मात्र अशी धर्मातरे जबरदस्तीने, लबाडीने किंवा प्रलोभन दाखवून न होता पूर्णपणे स्वेच्छेने झाली पाहिजेत.

धर्माचे उन्मूलन करणे, असा धर्मनिरपेक्षतेचा अर्थ नाही असे वर म्हटले आणि वैयक्तिक पातळीवर तो कायम राहू शकतो, असे सांगितले. पण धर्मनिरपेक्षतेची स्पष्ट कल्पना येण्यासाठी या विधानाचा अर्थ गंभीरपणे विचारात घेतला पाहिजे. वस्तुत: कोणताही रूढ धर्म व्यक्ती आणि त्याचा परमेश्वर यांच्या संबंधापुरता, म्हणजेच खासगी पातळीपुरता मर्यादित राहात नाही. तो कमीजास्त प्रमाणात जीवनव्यापी असतो. विवाह, घटस्फोट, मालमत्तेचे विभाजन, आर्थिक व्यवहार इत्यादी जवळजवळ प्रत्येक बाबतीत धर्माचे काहीतरी म्हणणे असते. म्हणजेच धर्म व्यक्ती आणि परमेश्वर यांच्या संबंधांपलीकडे जाऊन व्यक्ती-व्यक्तींच्या संबंधात, म्हणजेच सामाजिक व्यवहारात शिरकाव करतो, त्या व्यवहाराचे नियंत्रण करू बघतो. काही धर्म समाजाचे तपशीलवार नियंत्रण करतात, तर काही कमी तपशिलात जातात एवढाच फरक!

धर्मनिरपेक्ष राज्यसंस्था सामाजिक व्यवहारावरील धर्माचे नियंत्रण बाजूला करते आणि त्या ठिकाणी मानवी बुद्धीची, विवेकाची (रीझन) प्रतिष्ठापना करते, या दृष्टीने पाहिले तर लक्षात येईल धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व रूढ अर्थाच्या धर्मावर जरूर आघात करते. ते अशा अर्थाने आघात करते, की धर्माच्या नियंत्रणाखालचा प्रदेश ते संकुचित करते.

धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेची बाकीची लक्षणे वर दिलेल्या पहिल्या लक्षणातूनच निर्माण होतात.

२. दुसरे लक्षण असे, की राज्य हे कोणत्याही धर्माचे असणार नाही. त्याने कोणत्याही धर्माला उत्तेजन देता कामा नये किंवा खाली दडपता कामा नये.

३. शासकीय सेवांमध्ये धर्मनिरपेक्षपणे भरती केली जाईल. (म्हणजेच पात्रता हा निकष राहील.)

राजकीय संस्था आणि धर्मनिरपेक्षता
धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेची वैशिष्टय़े सांगितल्यानंतर ओघानेच अशा राज्यसंस्थेतील राजकीय संस्थांची वैशिष्टय़े सांगणे येते. अशा संस्थांत राजकीय पक्ष विशेष महत्त्वाचे असतात. लोकशाहीत राजकीय पक्ष सत्ताधारी होऊ इच्छितात, शासन त्यांच्या ताब्यात येऊ शकते, म्हणून त्यांची वर्तणूक धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेच्या तत्त्वांशी सुसंगत असली पाहिजे. अर्थातच अशा राजकीय संस्थांनी पुढील दंडक पाळणे अवश्य असेल. १) धर्मनिरपेक्ष राज्याची वरची संकल्पना त्यांना मान्य असली पाहिजे. २) पक्षात सर्वाना धर्मनिरपेक्षपणे मुक्त प्रवेश असला पाहिजे. ३) पक्षाची म्हणून एका विशिष्ट धर्माशी अथवा धर्मपंथाशी बांधिलकी असता कामा नये. मतदारांना आवाहन करताना धार्मिक प्रतीके वापरू नयेत हा दंडक यातूनच निष्पन्न होतो.

धर्मनिरपेक्षता का इष्ट?
धर्मनिरपेक्षता म्हणजे सामाजिक व्यवहारात बुद्धिवादाचा आश्रय असे आपण वर पाहिले. यातूनच धर्मनिरपेक्षता का हवी याचे उत्तर मिळते. ते असे की त्यात मानवी बुद्धीची प्रतिष्ठा पाळली जाते. ही बुद्धी स्वतंत्र असून कुणातरी प्रेषिताने किंवा तथाकथित साक्षात्कारी पुरुषाने त्याच्या काळात जे सांगितले होते तेच आजही प्रमाण आहे असे मानण्यास तयार नसते. ती शब्दाचे दास्य पत्करीत नाही.

आपल्या बुद्धीवर विश्वास ठेवून स्वतंत्र विचार करणारा माणूस आत्मनिर्भर असतो, प्रयत्नवादी असतो. राष्ट्राचे कर्तृत्त्व अशा माणसांमुळेच बहरून येते.
बुद्धिवादाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे विज्ञानाची भरभराट. धार्मिक बंधनांमधून माणसाची बुद्धी मुक्त होताच सृष्टीची रहस्ये उलगडू लागली. या शोधांमधून वेगवेगळी तंत्रज्ञाने निर्माण झाली आणि माणसाचे जीवन अधिक समृद्ध आणि सुखी होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या. आपणालाही एक सबळ, समृद्ध आणि सुखी राष्ट्र निर्माण करायचे असेल तर धर्मनिरपेक्षतेचा अंगीकार करणे अवश्य आहे.

धर्मनिरपेक्षता का अपरिहार्य?
धर्मनिरपेक्षता का इष्ट हे वर सांगितले. त्याबरोबर हेही लक्षात घेतले पाहिजे, की भारताच्या आजच्या विशिष्ट परिस्थितीत ती अपरिहार्यही आहे. हा मुद्दा काळजीपूर्वक समजून घेतला पाहिजे.

अनेक वैविध्यांनी नटलेला आपला देश बहुधार्मिकही आहे. किंबहुना अनेक धार्मिक समूहांच्या संघर्षांमुळेच येथल्या राष्ट्रवादाचा प्रश्न बिकट झालेला आहे. हे संघर्ष नाहीसे व्हावेत यासाठी राज्यसंस्था धर्मनिरपेक्ष असण्याची गरज आहे.

राज्यसंस्थेने एका विशिष्ट धर्माशी किंवा संप्रदायाशी बांधिलकी मानली किंवा त्याला उत्तेजन देण्याचे धोरण स्वीकारले तर इतर धर्माच्या अनुयायांमध्ये असंतोष निर्माण होईल हे स्पष्ट आहे. असंतोषाचे हे कारण धर्मनिरपेक्षतेत शिल्लक राहात नाही.

पण आपल्या देशात धर्मनिरपेक्ष राज्यसंस्थेचा स्वीकार करण्याचे याहून महत्त्वाचे आणि मूलभूत असे एक कारण आहे. त्याचा, विशेषत: हिंदुत्ववाद्यांनी गंभीरपणे विचार करणे अवश्य आहे. मुस्लिम प्रश्नाच्या संदर्भात हा विचार करू या!

१९९१ च्या शिरगणतीप्रमाणे मुसलमानांची लोकसंख्या सुमारे साडे अकरा टक्के आहे आणि प्रस्तुत पुस्तकात दाखविल्याप्रमाणे त्यांची अलगतावादी वृत्ती स्वातंत्र्योत्तर काळात कमी न होता अधिक वाढल्याची अनेक प्रत्यंतरे आहेत. हा प्रश्न आपण कसा सोडविणार आहोत? जरा स्पष्ट शब्दांत बोलू या.
या मुसलमानांना देशाबाहेर घालवून देणे, त्यांचे धर्मातर करून त्यांना हिंदू करून घेणे किंवा त्यांची घाऊक प्रमाणावर हत्या करणे हे उपाय मानवतेला काळिमा फासणारे तर आहेतच, पण व्यवहार्यही नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे. पहिल्या दोन उपाययोजनांना इतका विरोध होईल, की त्याचे पर्यवसान तिसऱ्या उपायातच होणे अपरिहार्य आहे. एवढय़ा मोठय़ा लोकसंख्येच्या बाबतीत हिंसेचा उपाय कुणी सुचवणार असेल तर त्याची गणना वेडय़ातच करावी लागेल. याबाबतीत आणखीही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे टीकाकार काहीही म्हणोत, कोणत्याही जबाबदार हिंदुत्ववादी नेत्याने या पर्यायांचा उच्चार केलेला नाही. दुसरे सरसंघचालक श्री. गुरुजी यांचा पुस्तकात जो उतारा अन्यत्र दिला आहे त्यातला एक छोटासा भाग पुन्हा उद्धृत करण्यासारखा आहे. ‘. आपला दृष्टिकोन इतका तर्कसंगत आणि भावात्मक असतानाही काही लोकांना असे वाटते, की हिंदू राष्ट्राची कल्पना आपल्या मुसलमान व ख्रिस्ती नागरिक बंधूंच्या अस्तित्वालाच आव्हान देणारी आहे. एक तर त्यांना हाकलून लावण्यात येईल किंवा त्यांचे निर्मूलन करण्यात येईल. याहून अधिक तर्कविसंगत व आपल्या राष्ट्रीय भावनेला मारक असा विचार असू शकत नाही. आपल्या थोर व सर्वसमावेशक संस्कृतीचा हा अपमान आहे. या सगळय़ांचा निष्कर्ष असा, की या मुस्लिम समाजाला राष्ट्रीय जीवनात सामावून घेणे एवढाच पर्याय शिल्लक आहे- आणि हिंदुत्ववाद्यांमधल्या विचारी नेत्यांनी हे ओळखलेलेही आहे.

राष्ट्रीय प्रवाहात सामावून जाण्यात मुसलमानांना कोणता अडसर आहे? मुस्लिम प्रश्नाच्या विवेचनाच्या ओघात आपण पाहिले आहे, की त्यांच्या धर्माची शिकवणच त्यांना प्रादेशिक निष्ठा स्वीकारू देत नाही. सावरकर, आंबेडकर, शहा, कुरुंदकर, दलवाई या सर्वानी हेच सांगितले. या संदर्भात असा श्लेष कधी कधी काढला जातो, की मुसलमानांचे धार्मिक पुढारीच त्यांना चुकीच्या धर्माची शिकवण देतात. याला एक उत्तर असे आहे, की यामुळे वस्तुस्थितीत काही फरक पडत नाही. सर्वसामान्य मुसलमानाला जो धर्म सांगितला जातो तो परमेश्वराचा शब्द म्हणूनच सांगितला जातो. सर्वसामान्य मुसलमानाच्या दृष्टीने मुल्ला-मौलवी सांगत असलेला कुराणाचा अर्थ, चुकीचा असला तरी ‘धर्म’च असतो. दुसरे उत्तर असे, की मूळ धर्मग्रंथातच अनेक आदेश असे आहेत, की जे स्पष्टपणे प्रादेशिक राष्ट्रवादाच्या व शांततामय सहअस्तित्वाच्या आड येतात.

हे जर खरे असेल- आणि खरे आहे असे मला वाटते- तर मुसलमान समाज राष्ट्रप्रेमी होण्यासाठी धर्मनिरपेक्षतेची संकल्पना मुस्लिम मानसात रुजणे अवश्य आहे आणि असे व्हायचे तर हिंदूंनाही धर्माचा परिसर खासगी जीवनापुरता मर्यादित करावा लागेल. म्हणजेच, त्यांनाही धर्मनिरपेक्षता आत्मसात करावी लागेल. अशा रीतीने मुस्लिम (आणि इतर अल्पसंख्य) समाजाला राष्ट्रीय प्रवाहात आणणे हे जे हिंदुत्ववाद्यांचे उद्दिष्ट आहे ते साध्य व्हायचे तर हिंदुत्ववाद्यांनी सक्त धर्मनिरपेक्षतेचा अवलंब केला पाहिजे.

(‘सावरकर ते भाजप – हिंदुत्व विचाराचा चिकित्सक आलेख’ या राजहंस प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी लिहिलेल्या स्वतंत्र प्रस्तावनेचा संक्षिप्त भाग)

प्रताप थोरात, सौजन्य – लोकसत्ता

विन्स्टन चर्चिलसारख्या थोर मुत्सद्याचं भाकीत होतं : आम्ही जर भारत सोडून गेलो तर हा देश वेगाने अनेक शतकं मागे, मध्ययुगीन रानटीपणाच्या खोल गर्तेत फेकला जाईल आणि जगण्यासाठी साध्यासुध्या गोष्टी न मिळाल्यामुळे त्याचं जिणं हराम होऊन जाईल. इथं आपण वसाहतवाद्यांची स्वार्थानं बरबटलेली, अपुरी वाढ झालेली, रोगट मनं समजून घेतली पाहिजेत. नेमक्या याच मानसिकतेमुळे, पाश्चिमात्य विद्वान आणि नोबेल शांतता पारितोषिकाची निवड करणारी मंडळी महात्मा गांधींचं जागतिक शांतता आणि अहिंसक संघर्षांच्या मानवी इतिहासामधलं उच्च स्थान ओळखू शकली नाहीत आणि नोबेल पारितोषिकाचा दर्जा आणखी उच्च करण्याची त्यांना चालून आलेली संधी त्यांनी हुकवली. गांधी दर शतकात  निर्माण होत नाहीत. त्यांच्या लेखी गांधी होता एका विक्षिप्त भूभागावरून आलेला एक फक्त अर्धनग्न फकीर! यानंतर आपण बरीच मजल गाठली. भारत समजताना सत्याशी फारकत होऊ द्यायची नसेल तर डोळ्याला लावलेल्या दुर्बिणी आणि मुख्य म्हणजे काविळीचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल, याची जाण पश्चिमेला आली. भारताला वैभवसंपन्न भूतकाळ आहे, हे त्यांना झापडबंदपणामुळे कळत नव्हतं; आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याची आता उपरती होत चालली आहे.

पंधरवडय़ापूर्वी आपण आपला ६२ वा स्वातंत्र्यदिन साजरा केला. पण आपला म्हणजे नेमका कुणाकुणाचा? हा प्रश्न मला दरवर्षी पडत असतो, तसाच तो यावर्षीही पडला. कितीही टाळला तरी!  या काळात किती जणांच्या बेडय़ा गळून पडल्या? नव्यानं किती जणांना लागल्या? वाटतं, इंग्रज ही वसाहत सोडून गेले त्या दिवसाचा फक्त हा वर्धापनदिन असावा. लुटणारे आपले हात थकून गेल्यानंतर गोऱ्या व्यापाऱ्यांनी त्या वेळी हिंदुस्थान नावाचं हे लुटीचं बोचकं दाणकन तर पायापाशी आदळलं नव्हतं ना? अन् नंतर कातडीचा रंग बदलून, वसाहतवादी नव्याने तर गोळा झालेले नाहीत ना, त्या फुटलेल्या बोचक्यापाशी? सारख्या शंका येत राहतात.

पण कदाचित तसंही नसावं. नाही तर हा देश, येत्या फक्त पाव शतकात एक जागतिक महासत्ता म्हणून शड्डू ठोकून उभा राहील, इतक्या तयारीचा आज दिसला नसता. तळपट होईल, म्हणून भल्याभल्यांनी बोटं कडाकडा मोडली होती तेव्हा. तरीही आज आपण जगातला सर्वात मोठा लोकशाही देश म्हणून उभे आहोत. जरी आपल्या निम्म्या लोकांच्या पोटातला आगडोंब पुरेसा विझलेला नसला तरीही! महात्मा गांधी जिवंत असते, तर अंगावर चिंध्या पांघरणाऱ्या अर्धनग्नांची मोठी संख्या पाहून, त्यांच्या अंतरात्म्यानं त्यांना अजून सदरा घालण्याची परवानगी दिली नसती. आपली बहुविधता तर एवढी की, शोभादर्शक यंत्रालाही इतक्या विविध प्रकारच्या रचना करून दाखवता येणार नाहीत. पण वैविध्याच्या हातात हात घालून इथं आलेले विरोधाभासही विनोदी ठरले नाहीत अन् विविधतेतून बांधलेलं ऐक्यही कचकडय़ाइतकं तकलादू ठरलं नाही.

जागतिक महासत्तांना एक जुनी खोड आहे- आपल्या सैतानांचे कारखाने आणि त्यांच्या काळ्या कारवाया तीनही पाळ्यात चालवायची. छोटय़ा आणि दुबळ्या देशांचं सार्वभौमत्व हरण करण्याचा त्यांचा खेळ उसंत न घेता चालू असतो. पण भुकेल्या, तहानलेल्या, कंगाल, अर्धनग्न, आजारी, अर्धशिक्षित, वरकरणी दीनवाणा वाटणाऱ्या भारत नावाच्या पुराणपुरुषानं त्यांना धूप घातली नाही. गेल्या ६२ वर्षांत, दरवर्षी त्याच्या चेहऱ्यावर नवनवी झळाळी चढत गेली. म्हणावं तर हा तिसऱ्या जगातला य:कश्चित देश आहे, पण तरीही तो अद्याप उन्मळून कसा पडत नाही? या विचारानं सैतानांची निराशा वाढतच गेली.

साम्यवाद गाडला गेला- आधी सोव्हिएत साम्राज्याच्या डोलाऱ्याखाली आणि नंतर भांडवलशाही अर्थव्यवस्था सर्वाधिक क्रूर आणि विधिनिषेधशून्य पद्धतीने, साम्यवादी राजकीय व्यवस्थेखालीच राबवणाऱ्या चीनच्या तत्त्वशून्यतेखाली! जागतिक अर्थव्यवस्थेला मस्तवाल बैलाच्या मुसंडय़ा मारत राहणाऱ्या अमेरिकेतल्या घरबांधणी कर्ज घोटाळ्यामुळे; आणि केवळ डॉलर मजबूत ठेवण्यासाठीच, लाखो निष्पाप जिवांना मारून, जगभर लोकशाही विकण्याची कंत्राटं घेत फिरणाऱ्या भांडवलशाहीमुळे. तिचे जन्मजात दोष आणि तुटपुंजेपणा बीभत्स स्वरूपात उघडे पडले. पण भारताने जन्म घेताक्षणीच मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. यापेक्षा आणखी किती मोठी आदरांजली आधुनिक भारताचे निर्माते पं. जवाहरलाल नेहरू यांना, उलगडत जाणारा जागतिक इतिहास वाहू शकतो? व्यवहारवादाच्याही वर असलेला हा द्रष्टा व्यवहारवाद आहे. तुम्ही आम्ही नेहरूंना आदरांजली वाहावी किंवा न वाहावी, आपापल्या खुजेपणाचं प्रदर्शन करावं की न करावं, हा ज्याचा त्याच्या सभ्य कृतज्ञतेचा प्रश्न आहे. नेहरू आणि वल्लभभाई पटेल यांची तुलना करण्याचा आव आणताना  एकाला मुद्दाम स्वप्नाळू म्हणायचं आणि दुसऱ्याला व्यवहारवादी! त्यामुळे अनाथ बालकांना स्वातंत्र्यलढय़ात पटेलांसारखे नसलेले आईबाप शोधण्याची सोय उपलब्ध होते, इतकेच! खरं तर अनाथाला का फरक पडावा भूतकाळ नसला म्हणून? उज्ज्वल करण्यासाठी भविष्यकाळ तर उपलब्ध असतो ना?

मेरे पास गाडी है, बंगला है, दौलत है, तुम्हारे पास क्या है, एँ?- हिंदी चित्रपटातला एक भाऊ विचारतो. दुसरा भाऊ शांतपणे म्हणतो- मेरे पास माँ है. हा डायलॉग भारतापेक्षा पकिस्तानात जास्त म्हटला जातो, पण फक्त नेहरूंच्या संदर्भात! भारताजवळ नेहरू होते ना! ही पाकिस्तानातली आणि इथल्या पाकिस्तानवाद्यांतली समान  चरफड! शेवटी मूलतत्त्ववादी ही एकच जात असते आणि ते असतात- जत्रेत बचपन में खोये हुए भाई!

फाळणीत मायभूमी हरवलेल्या अडवाणींबद्दल आपल्याला सहवेदना असते. जसवंतसिंह काही वर्षांपूर्वी बलुचिस्तानातल्या आपल्या मूळ कुलदैवताच्या पूजेसाठी गेलेले अन् त्यांच्या स्वागतासाठी बलुची, ब्रोही जमातीचे लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे राहिलेले आपण टीव्हीवर पाहिले होते. पण या दोघांचीही कुलदैवते इस्लामाबादेतल्या कबरींमध्येच पहुडलेली असतील तर मात्र कठीण आहे. अन् नेहरूंचं सवरेत्कृष्ट स्मारक असलेल्या आयआयटीतून शिकून बाहेर पडलेल्या त्यांच्या सल्लागारांनी नेहरूंना खलनायक ठरवण्याचं पेटंट मिळवावं यासारखा द्रोह नाही. आठवणींना आणखीही उजाळा देता येईल. काही वर्षांपूर्वी अडवाणींनी  पाकिस्तानात जाऊन प्रयत्न केले होते की, १८५७ सालच्या स्वातंत्र्यलढय़ाचा १५० वा वर्धापनदिन,  जो २००६-०७ साली येत होता, भारत आणि पाकिस्तानने एकत्रित साजरा करावा. इतिहासात अधिक खोल डुबकी मारण्यामागचा डाव उघड होता- राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे, मंगल पांडे इत्यादी स्वातंत्र्ययोद्धय़ांवर संघ-भाजपने आपले पितृत्व लादणे, त्यांना फोटोत विवेकानंदांशेजारी, हाताची घडी तोंडावर बोट ठेवून, हतबल उभे करणे आणि त्यांचा राष्ट्रीय नव्हे तर खासगी मालमत्ता म्हणून पुढे वापर करीत राहाणे. काँग्रेसने गांधींचे जे केले तेच! मंत्रालयातून लायसन्स घेऊन गेल्यानंतर दारूच्या गुत्त्यात महात्मा गांधींचा फोटो लावणारे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. भाजपला देशद्रोही म्हणणे दुष्टपणाचे होईल. पण १९४७ सालचे त्यांना इतके वावडे का? हे लहान मुलासारखे झाले- तुमचा कोंबडा आरवून सूर्य उगवलाय ना, मग आम्हाला नको तुमचा सूर्य. आम्ही बसू अंधारात! नाही आवडत ना तुम्हाला १५ ऑगस्ट? ना आवडू देत, पण निदान १४ ऑगस्ट तरी आवडू देऊ नका! काय करायचं? देशातले जे नाही-रे आहेत, त्यांना आपली वसाहतवादी, लुटारू यंत्रणा राष्ट्रीय प्रवाहात येऊ देत नाही; आणि त्यांच्या बेडय़ाही ते काढायला तयार नाहीत. अन् दुसरीकडे आहेत हे अति-आहे-रे वर्गातले, ज्यांना स्वातंत्र्यसूर्याचं ४७ सालातलं उगवणं मंजूर नाही.

अभिमानानं सांगाव्यात अशा आज आमच्याकडं बऱ्याच गोष्टी आहेत. शास्त्रज्ञांची आणि तंत्रज्ञांची जगातली सर्वात मोठी पलटण भारताची आहे. सॉफ्टवेअरची जणू महासत्ताच भारत आहे. पाश्चिमात्य अर्थव्यवस्थांच्या भरभराटीमध्ये भारतामध्येच प्रशिक्षित झालेल्या मनुष्यबळाचा वाटा बऱ्यापैकी मोठा आहे. जगात कितीही मोठी मंदी असली तरीही, भारतातल्या आयआयटी आणि आयआयएममधून बाहेर पडलेल्या तंत्रज्ञ आणि मॅनेजर्सनी आपल्याकडेच नोकरीला राहावं, म्हणून युरोप-अमेरिकेतल्या कंपन्यांमध्ये खेचाखेच चालू असते. आपल्या आर्थिक वाढीचा वार्षिक दर जगात दुसऱ्या क्रमांकाचा आहे आणि तो जगभर कौतुकाचा किंवा असूयेचा विषय आहे. जगातलं सर्वात मोठं पशुधन आपल्याकडे आहे आणि जगातलं सर्वाधिक दूध-उत्पादन आपण करतो. कधी कधी जगातली सर्वाधिक साखरदेखील! अन्नधान्याच्या बाबतीत आपण बहुतेक सर्व वर्षी स्वयंपूर्ण असतो. भारत भले आता स्वतंत्र जरी होत असला, तरी भुकेच्या कडकलक्ष्मीच्या चाबकाच्या फटकाऱ्याखाली काळानिळा होऊन, तो सतत कण्हत पडून राहील, असं भाकीत त्यावेळी पाश्चिमात्य शेती व अर्थतज्ज्ञांनी वर्तवलं होतं.

विन्स्टन चर्चिलसारख्या थोर मुत्सद्याचं भाकीत होतं : आम्ही जर भारत सोडून गेलो तर हा देश वेगाने अनेक शतकं मागे, मध्ययुगीन रानटीपणाच्या खोल गर्तेत फेकला जाईल आणि जगण्यासाठी साध्यासुध्या गोष्टी न मिळाल्यामुळे त्याचं जिणं हराम होऊन जाईल. इथं आपण वसाहतवाद्यांची स्वार्थानं बरबटलेली, अपुरी वाढ झालेली, रोगट मनं समजून घेतली पाहिजेत. नेमक्या याच मानसिकतेमुळे, पाश्चिमात्य विद्वान आणि नोबेल शांतता पारितोषिकाची निवड करणारी मंडळी महात्मा गांधींचं जागतिक शांतता आणि अहिंसक संघर्षांच्या मानवी इतिहासामधलं उच्च स्थान ओळखू शकली नाहीत आणि नोबेल पारितोषिकाचा दर्जा आणखी उच्च करण्याची त्यांना चालून आलेली संधी त्यांनी हुकवली. गांधी दर शतकात  निर्माण होत नाहीत. त्यांच्या लेखी गांधी होता एका विक्षिप्त भूभागावरून आलेला एक फक्त अर्धनग्न फकीर! यानंतर आपण बरीच मजल गाठली. भारत समजताना सत्याशी फारकत होऊ द्यायची नसेल तर डोळ्याला लावलेल्या दुर्बिणी आणि मुख्य म्हणजे काविळीचा दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल, याची जाण पश्चिमेला आली. भारताला वैभवसंपन्न भूतकाळ आहे, हे त्यांना झापडबंदपणामुळे कळत नव्हतं; आणि भविष्यकाळ उज्ज्वल आहे, याची आता उपरती होत चालली आहे.

आपल्या खटोखटच्या कर्तबगारीने आपली छाती फुगून येणं साहजिकच आहे. पण काही विदारक सत्यांकडे सहज नुसती नजर जरी गेली तरी फुग्यातली हवा फसकन् जाईल. लोकशाही कारभार करण्यासाठी म्हणून ज्या संस्था आपण उभारल्या आहेत त्या सर्वाचा आणि त्या चालवण्याचं नाटक करणाऱ्या बहुतांश मंडळींच्या दर्जा आणि वकुबापुढे फार मोठं प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. परमेश्वरापेक्षाही सर्वव्यापी असलेला भ्रष्टाचार; आर्थिक संस्थांचे डुगडुगणारे डोलारे; कमालीच्या तोकडय़ा पायाभूत सुविधा; वेगानं खालावत गेलेलं पर्यावरण; विविध जाती-जमातींना एकत्र बांधून ठेवणारे पण ठिकठिकाणी विदीर्ण होत गेलेले रेशमी बंध, भयावहरीत्या वाढत गेलेल्या सामाजिक आणि आर्थिक दऱ्या; मिळेल त्या कारणापोटी होणारी गुणवत्तेची गळचेपी; दीनदुबळ्या, हवालदिल लोकसंख्येचा अक्राळविक्राळ आकार आणि त्यापेक्षाही भयावह आणि ठसठसणारी वेदना देणारी गोष्ट म्हणजे आपल्या सर्वाच्या संवेदनशीलतेची झालेली फार मोठी पडझड!

फक्त एखाद्या वर्षीच पाऊस नीट झाला नाही तर, जिथवर नजर जाईल तिथवर दुष्काळ दिसू लागतो. देश विकलांग झाल्यासारखा भासतो. गुरांचे लोंढे खाटिकखान्याकडे ढकलले जातात अन् शेतकरी गळफासाकडे किंवा एन्ड्रीनच्या बाटलीकडे! पण याचवेळी पाटबंधारे खात्यातल्या कार्यकारी अभियंत्याच्या नुसत्या बदलीचा भाव पन्नास लाख रुपये असतो. धरणं, रस्ते, पूल, वीजप्रकल्प किंवा अन्य कुठलंही सार्वजनिक बांधकाम दहा टक्के किक-बॅकशिवाय पूर्णच होत नाही. सरकार मध्येच बदललं तर किक-बॅक पुनरुज्जीवित होतो. जाणाऱ्या सरकारबरोबर तो पूर्ण मरत नाही. दुष्काळ हटविण्यासाठी अद्यापि भूगर्भातूनच गावं स्वयंपूर्ण झाली नाहीत आणि जमिनीवर पाणी साठवण्यासाठी लहान-मोठी धरणंही पुरेशी झाली नाहीत. हुकलेला एक मान्सून एवढा हाहा:कार माजवू शकतो याचं विकसित देशांना राहून राहून आश्चर्य वाटत राहातं! दुष्काळापासून स्वातंत्र्य  ही आपल्या देशात अजून कविकल्पनाच आहे.
क्षणभर विचार करा, एक समाज म्हणून आपण एक झालोय का. स्वतंत्र, बंधमुक्त? एकदा दुष्काळात होरपळलेल्या आणि सामाजिक अत्याचारात तिच्या शाळकरी मुलीचे लचके तोडले गेलेल्या नेस्तनाबूत झालेल्या बाईला मी विचारलं होतं- बाई, सरकारनं उद्या तुमच्यासाठी काय केलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? बाई म्हणाल्या- अरे बाबा, येका सरकारनं कुनाकुनाचं कुठवर पाहावं? सरकार पन मानूसच है ना? या सर्वानी आभाळाला टेकू लावले आहेत. म्हणून ते कोसळत नाही.

गेल्या ६२ वर्षांत आपली मनं बऱ्यापैकी बधिर झालेली  आहेतच, पण आपले कानही बधिर  झालेले आहेत हे आपल्या लक्षातच येत नाही. कारण आपण सोयीस्कर तेवढंच ऐकतो. शिवाय आपल्या कानात सेलफोनच्या नाही तर म्युझिक सिस्टिमच्या वायरी घुसलेल्या असतात. आपण भावूक गर्दी आहोत. त्यामुळे घाईघाईत लोकशाही- मंदिराच्या कळसाचं बाहेरूनच तेवढं दर्शन घेतो आणि पुढं चालू लागतो. हे मंदिर तोलून धरणारे आपल्या लोकशाहीचे स्तंभ काय पुटपुटत असतात, ते आपण ऐकत बसत नाही. कार्यबाहुल्यामुळे सवडही नसते. आपण हे लक्षात घेत नाही की, स्वत:शी पुटपुटणारी सर्वच मंडळी काही डोक्यावर परिणाम झालेली नसतात. बऱ्याचदा ती अतिश्रमानं थकलेली असतात. तीही शोध घेत असतात ऐकणाऱ्या कानांचा!

लोकशाही  तोलणाऱ्या या खांबांच्याही तक्रारी आहेत आणि आत्मसंतुष्टताही आहे. सगळ्यांच्या काही समान तक्रारी असतात. सीमेंट आणि लोखंड कमी पडलं, हे पालुपद असतंच. आपल्याला  दिसतात ते निघालेले पापुद्रे. पडलेल्या ढपल्या. उघडय़ा पडलेल्या तांबूस-पिवळ्या, लोखंडाच्या वाकलेल्या सळ्यांचं भंगार! झाकण्यासाठी रंग तरी किती वेळा लावायचा? पण कुणीही सांगायला तयार नाही की, वापरलेला माल कमअस्सल होता. मात्र हे खरंय, की त्यांनी अजून पडू दिलेलं नाही, तोलून धरलेलं वरचं मंदिर!

आपल्या लोकशाहीचे चारही खांब काय पुटपुटताहेत ते जरा पाहू यात..

मी न्यायमूर्ती आहे. आपली झोपेची मुळीच तक्रार नाही. न्यायदानातला विलंब म्हणजे न्याय नाकारणं, ही जी शिंची म्हण आहे, तीमुळे आपल्या झोपेचं बुवा कधीही खोबरं होत नाही. न्यायसंस्थेची गेल्या ६२ वर्षांतली वाढ ही लोकशाहीचा सर्वात अकार्यक्षम, दुबळा आणि टेकू द्यायचा कमी (असून नसल्यासारखा) खांब अशी झाली आहे, असं मला चुकून कधी, अगदी गाफील अवस्थेतही वाटत नाही. मी देवळाच्या सुरक्षित गाभाऱ्यात राहणारा परमेश्वर आहे. माझा आशीर्वाद रांगेत प्रतीक्षा करणाऱ्या माझ्या भक्तगणांपर्यंत त्यांच्या  जिवंतपणी पोहोचलाच, तर त्यांनी स्वत:ला पुण्यवान समजावं. भक्ताला अधिक संकटात टाकून त्याची परीक्षा पाहणं  हे देवाचं कामच आहे! परमेश्वराची श्रीशिल्लक किती आहे याची नसती उठाठेव भिक्कारडय़ा भक्तांनी कशाला करावी? त्यांचा संबंध काय, माझा प्रतिवार्षिक गल्ला कितीनं वाढला ते जाणून घेण्याशी? देवावर तुमची अंधश्रद्धा नको का? भक्ताचं काम काय? फळांचा, दुधाचा नैवेद्य भक्तिभावाने आणून पुजाऱ्याकडे देणं आणि डोळे मिटून अंमळशानं अनशेपोटी नामस्मरण करणं. फार वेळ तिथं थांबू नये. त्यानंतर श्रींच्या वामकुक्षीसाठी गाभारा बंद होईल. अहो, देव कुठं फळं खातो का? तो भक्तीचा भुकेला! माझी लीला अगाध आहे. येथे उभं राहून गैरलागू अर्थ काढू नयेत. सक्त कारवाई करण्यात येईल. – आदेशावरून.

मी आहे राजकीय पुढारी. मी- एकदम कॅपिटल! म्हणजे पहिल्या लिपितला. माझा, माझी, माझे, माझ्यासाठी, मला सर्व कॅपिटल! मी १८ तास काम करतो. पण नोकरी टिकेल याची शाश्वती नाही. मग चार पैसे केले मी गोळा, अन् ठेवले परदेशी अकाऊंटमध्ये! बिघडलं कुठं? चांगली पायाभरणी करण्यापूर्वीच, वेळ येण्याआधीच, दारिद्रय़ाच्या दलदलीत थोरामोठय़ांनी हा जो लोकशाहीचा सांगाडा उभा करून ठेवलाय ना, तो का डुगडुगत नाही किंवा कोसळून पडत नाही, माहीत आहे का? हे भरभक्कम पाय या राडय़ारोडय़ात रोवून उभा आहे ना मी, अन् पेलतोय तो माझ्या रुंद भरीव खांद्यांवर, पिळदार दंडांचा जोर लावून! सुटलेल्या पोटाकडं टक लावून बघू नका. रोज उठून शिव्या खायला मी एकटा! अक्कल शिकवायला बाकीचे सगळे. गाव  चालवणाऱ्या पाटलाला कधी कुणी चांगलं म्हटलंय का? मी म्हणतो, रोज डोंगराएवढा पैसा खायची या अधिकाऱ्यांना गरजच काय? यांची फक्त घेना बँक आहे, देना नाहीच! यांना काय निवडणुका लढवाव्या लागतात का? आल्या गेलेल्यांना चहा सोडाच, आयुष्यात कधी ग्लासभर पाणी तरी विचारलंय का यांनी? मंत्रालयाला जर संध्याकाळी पाचनंतर आग लागली तर समोरच्या स्वत:च्या राहत्या घरातून पेलाभर पाणी आणून कधी विझवतील का? स्वत:च्या घरी कधी चालत गेलेत का? लोकल बंद पडते म्हणजे काय होतं, आहे का ठाऊक? यांचं दळणसुद्धा शिपाई सरकारी गाडीतून आणतो. यांची मुलं अमेरिकेत खुशालीत आहेत. ते अमेरिकेत भारतीय संस्कृती कशी जिवंत ठेवतात हा गुणगौरव ऐकत चला जरा न चुकता. भारतात काय संस्कृती राहिलीय आता? श्शी! हे असलं बघितल्यावर मला बुवा भारताची फारच काळजी वाटते. सततची टोचणी- आपलं कसं होणार? म्हणून मी माझे राजपुत्र आणि राजकन्या सगळ्यांना राजकारणात आणून सोडलेलं आहे. उगीच पोकळी नको निर्माण व्हायला. वेळवखत काय सांगून येतो का? घराण्यात पुढं सेवेचं बाळकडू शिल्लक राहिलं पाहिजे. ते नसतील तर उद्या अंधार होईल. केलाय कुणी विचार? हे काय फुकटचं केकाटताय- घराणेशाही, घराणेशाही! अरे, आणा की तुम्ही पर्याय. कुणी धरलेत तुमचे हात? आमच्या मुलामुलींना, पुतण्या-भाचरांना, सुना-जावयांना लोकांनी निवडून दिलंय. कुणी सांगावं, एक दिवशी येईल पण घराणेशाहीशिवाय लोकशाही. आपला देशच महान आहे. कुठल्या बेटय़ाची ना आहे त्याला?

मी सनदी नोकर आहे. साहेब आहे. ज्याला सरकार सरकार म्हणतात तो मीच! मी विनम्र आहे. कायम नव्वद अंशात वाकलेला असतो. आणखी काय करावं मी या लोकशाहीसाठी? तरी तुम्ही म्हणता- अति नमणे, अति लवणे, ही धोकेबाज हलकटाची लक्षणं! बोलणाऱ्याचं काय? त्याची फाईल नसते म्हणून अवडताही येत नाही. राज्यकारभार कसा करावा, ही कला तर आहेच, पण ते एक पूर्ण विकसित झालेलं शास्त्र आहे. आम्हीच केवळ तो शास्त्रार्थ जाणतो. आमचं तसं प्रशिक्षणच झालेलं असतं. पण नेत्यांना वाटतं, त्यांच्याकडं ती कला आहे. स्त्रीलिंगी असलेली प्रत्येक गोष्ट आपलीच, असं त्यांना वाटतं. बाकी काय? निरक्षर माठ सगळे! आम्ही आपलं ऐकून घेतो, कारण इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आम्हाला पहिला धडा शिकवतात- तुमचा बॉस जरी गाढव असला, खादाड डुक्कर असला, मारका बैल असला, तरी त्याला वाकून सतत यस सर म्हणायचं. कारण ही लोकशाही आहे आणि ती फार पवित्र आहे. नंतर त्याची कशी वजवायची ते अधिकृतपणे शिकवत नाहीत. ती कला आपापली आपण नंतर विकसित करायची असते. आम्ही घोडं असतो. हे  टिक्कोजी फक्त स्वार असतात. आम्ही नेऊ तिकडंच जाऊ शकतात. स्वारानं पहिल्यांदा मांड ठोकली की लगेच घोडय़ाला कळतं, गडी पक्का आहे का कच्चा! किती सवाऱ्या आल्या अन् गेल्यात! गेल्यात नाही घालवल्यात! पण काय करायचं? आमच्या बढत्या आणि बदल्या या मूर्खाच्या हातात ना! तोंडदेखलं हसून वागावं लागतं. किती कष्ट पडतात या एरंडेल प्यायलेल्या चेहऱ्याला! आमच्या हाऊसिंग सोसायटीसाठी मोक्याचा प्लॉट द्यायला लागले की, समजून घ्यायचं की समुद्र कुठं तरी बुजवायचाय. आमच्या बायकांच्या महिला मंडळाच्या महान कार्यासाठी, आमच्या क्लबसाठी आम्हालासुद्धा काही तरी मागावंच लागतं मग. आमच्यावर पण घरच्यांचं प्रेशर असतं ना! या नेते लोकांना काही कळत नाही. गुन्हा करावा तो नेहमी कायदा पाळून. अन् कायदा करावा नेहमी अस्पष्टसा, अनेक लूपहोल्स ठेवून. इतरांसाठी तो नेहमी ताठ, कडक पाहिजे.

मी पत्रकार आहे. माझं आयुष्य म्हणजे आहे अहंकाराची एक कधीही न संपणारी यात्रा! माजोरीपणा हे त्यागाचं जुळं भावंड! मिळालेलं सोडणं हा त्याग नव्हे, न मिळणं म्हणजे माझ्या लेखी त्याग! आमच्या अहंकाराचा आकार हा विद्वत्ता आणि बुद्धिमत्ता यापेक्षा खूपच अधिक असतो. मलाही ते जाणवतं. पण इथं वेळ कुणाला आहे ग्रंथांच्या संगतीत जगायला? कुटुंबाला देण्यासाठी तरी कुठं वेळ असतो? तेही बरंच आहे म्हणा. कुटुंबाला वेळ द्यायचा तर खिसा काही तरी भरलेला पाहिजे ना. दारिद्रय़, मग ते बौद्धिक असो किंवा आर्थिक, जेवढं माझं दारिद्रय़ जास्त तेवढा माझ्या अहंकाराचा दर्प अधिक! सरस्वतीला आणि लक्ष्मीला माझ्याकडे बघून हसायला वेळ नसला, तरी मी कशाला करू त्याची चिंता? माझा अडाणी, बावळटपणा हा करमणुकीचा विषय असतो, पण मी कशाला करू त्याची पर्वा? वाचकांनी पेपर उघडला की, त्यांना लगेच माझा वकूब कळतो. बंद दरवाज्याआड ढळणाऱ्या उत्तररात्री जे खरं राजकारण शिजतं, त्याची मला गंधवर्ताही नसते. मी त्या वेळी धापा टाकत पकडत असतो शेवटची लोकल गाडी. आमच्या पेपरचे शेटजीच मला नंतर कधी त्या राजकारणाच्या एखाद्या तुकडय़ाचा संदर्भ देतात. लाज वाटते. आता तर अनेक राजकीय पुढारीच पेपरचे शेटजी असतात. काळ्या रात्रीच्या व्यवहारी राजकारणाला मी फक्त, गुळगुळीत झालेल्या जुन्या पुस्तकी तत्त्वज्ञानाचा मुलामा देत असतो आणि त्याचं उदात्तीकरण करत असतो. कधी पूर्ण अज्ञानापोटी, तर कधी ते शोभून दिसावं म्हणून- जेणेकरून लोकांना खऱ्या राजकारणाची किळस येऊ नये! शेटजी म्हणत असतात, पेपर जाहिरातींवर चालतो, बातम्या-संपादकीयांमुळे नाही!

फार काही बोलत असतात हे पुटपुटणारे खांब! पण त्यांचं ऐकायला कुणाला वेळ आहे, हे असं चालायचंच.

– डॉ. अभय बंग, सौजन्य – अनुभव मासिक

पुण्यात झालेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने “आजचा काळ, आजचे साहित्य’ या विषयावरील “युनिक फीचर्स’ने संपादित केलेल्या स्मरणिकेचं प्रकाशन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते झालं.

या भाषणात त्यांनी साहित्यिकांकडून समाजाला असलेल्या अपेक्षा मांडल्या आहेत, मात्र “तंबाखूने रंगवलेला पैसा संमेलनात नको’ या त्यांच्या विधानावरच प्रामुख्याने चर्चा घडली, त्यामुळे मूळ भाषणातील महत्त्वाच्या मुद्‌द्यांकडे दुर्लक्ष झालं, म्हणून “अनुभव’च्या वाचकांसाठी त्या मुद्‌द्यांशी संबंधित भाषण इथे प्रकाशित करत आहेत.

————————————————

मी साहित्यिक नसल्याने साहित्यावर बोलण्याचा मला अधिकार नाही. त्यामुळे मी साहित्याविषयी जवळपास बोलणार नाही. पण मराठी संस्कृती, मराठी भाषा आणि मराठीपण म्हणजे काय याविषयी बोलणार आहे. या स्मरणिकेचा विषय “आजचा काळ आणि आजचं साहित्य’ असा आहे, त्या अनुषंगानेही मी काही बाबींकडे सर्व साहित्यिकांचं लक्ष वेधू इच्छितो.

संकुचित सांस्कृतिक दृष्टीचं आव्हान
मराठी भाषी आणि महाराष्ट्र यांच्या अस्मिता आणि ओळखी विषयी सध्या बराच राजकीय वाद सुरू आहे. स्वत:ला “राष्ट्र’ नव्हे, “महाराष्ट्र’ म्हणवणारा हा प्रांत आहे. “महाराष्ट्र’ही दर्पोक्ती आहे का? की ही साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षा आहे? माझं असं मानणं आहे, की “महाराष्ट्र’ ही दर्पोक्तीही नाही आणि भूभाग वाढवण्याची साम्राज्यवादी आकांक्षाही नाही. ही आमची आध्यात्मिक आकांक्षा आहे. आम्हाला आमचं हृदय इतकं व्यापक करायचं आहे की ते “महाराष्ट्र’ व्हावं! त्यामुळे महाराष्ट्र ही भौगोलिक आकांक्षा नाही, ती आध्यात्मिक आकांक्षा आहे. “महाराष्ट्र’ हे नाव निवडून आपण सर्व मराठी मंडळींनी अशी घोषणा केलेली आहे, की आम्ही भौगोलिकतेच्या सीमा ओलांडून, स्थानिकतेच्या आणि संकुचिततेच्या सीमा ओलांडून आमच्या हृदयाचं महाराष्ट्र करू. तसं केलं नाही तर “राष्ट्रा’च्या पोटामध्ये “महाराष्ट्र’ कसा बरं मावणार आहे?

आज काही राजकीय शक्तींमुळे आपल्यासमोर, महाराष्ट्रासमोर हे एक मोठं आव्हान उभं राहिलं आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही भारतात कुठेही जा, महाराष्ट्रातील काही मंडळींच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राविषयी बराच गैरसमज आढळतो. म्हणूनच आपल्याला हे स्पष्ट केलं पाहिजे, की महाराष्ट्र ही साम्राज्यवादी संकल्पना नसून एक आध्यात्मिक घोषणा आहे. ही घोषणा मोठी कालानुरूप आहे.
जागतिकीकरणाच्या जमान्यात स्थानिकतेचा आग्रह टिकणार नसला तरी महाराष्ट्रात आज काही छोटे-मोठे तंटे, वाद उद्‌भवत आहेत. मुंबईकरांना कधी दक्षिण भारतीय चालत नाहीत, कधी उत्तर भारतीय चालत नाहीत. पुण्याचं आधी झपाट्याने औद्योगीकरण झालं आणि नंतर आयटी कंपन्या आल्या, त्यामुळे पुण्याचं पुणेरी स्वरूप बदलतं आहे. त्याची खंत वाटणं अगदी स्वाभाविक आहे. पुण्याचं पुणेरीपणच गेलं तर गंमत काय राहिली?

पण प्रश्न असा आहे, की हे सर्व कसं टाळता येईल? आम्हाला जागतिकीकरणाचे आर्थिक आणि राजकीय फायदे हवे आहेत, पण सांस्कृतिक परिवर्तन नको आहे, ही एक असंभव मागणी आपण करतो आहोत. “हार्वर्ड बिझिनेस रिव्ह्यू’ हे जगातलं मॅनेजमेंटमधलं अव्वल क्रमांकाचं मासिक आहे. त्यामध्ये काही वर्षांपूर्वी एक कव्हरस्टोरी आली होती. त्यांनी अशी मांडणी केली, की जे शहर जगातून कुठूनही आलेल्या माणसाला परकेपणाचा भाव तर देणार नाहीच, उलट आपलेपणाचा भाव देईल, त्या शहराकडे जगातील बुध्दिमत्तेचं मानवीय भांडवल वळणार आहे. अशा सर्वसमावेशक सांस्कृतिक निर्देशकांवर त्यांनी रॅंकिंग केलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, की अमेरिकेतील ऑस्टिन नावाचं एक छोटंसं शहर वैश्विक संस्कृतीच्या दृष्टीने प्रथम क्रमांकाचं शहर ठरलं. या निरीक्षणानंतर दोनच वर्षांनी अमेरिकेमध्ये सर्वात झपाट्याने वाढणारं शहर कोणतं असा शोेध घेतला गेला तेव्हा प्रथम क्रमांकावर ऑस्टिनच आलं. जे शहर त्या शहराबाहेरच्या लोकांना आपलेपणाचा भाव देईल, परकेपणाचा भाव निर्माण करणार नाही त्या शहराचाच आर्थिक विकास आणि राजकीय विकास होणार आहे, ही बाब त्यातून स्पष्ट झाली. त्यामुळे जागतिकीकरणामुळे येणारा आर्थिक विकास हवा पण सांस्कृतिक बदल नको, अशी अशक्य मागणी आपल्याला करता येईल का?

दुसरी गोष्ट म्हणजे बाहेरची माणसं आल्याने आमची संस्कृती बिघडते, आमची संस्कृती लयाला जाते, वाहून जाते, अशी मानसिक असुरक्षिततेची भावना पसरलेली दिसते. अशी भावना पसरण्याचं प्रमुख कारण कदाचित संस्कृती म्हणजे काय याविषयीच आपल्या मनामध्ये काही तरी गफलत असावी, काही तरी गोंधळ असावा असं मला वाटतं. नऊवारी साडी, की तलवार- फेटा, की शिवराळ भाषा, की पुरणपोळी- तुळशीवृंदावन अशा काही सवयींमार्फत आपण आपली संस्कृती व्याख्यित करण्याचा प्रयत्न करतो. परंतु या गोष्टी बदलणाऱ्या आहेत, बदलतही आहेत. हे बदलायला बाहेरच्या माणसाची गरज नाही. महाराष्ट्राच्या नव्या आधुनिक पिढीने या सगळ्या गोष्टींचा केव्हाच त्याग केलेला आहे. त्यामुळे या बदललेल्या परिस्थितीमध्ये मराठी संस्कृती म्हणजे काय? स्थानिकतेचा आग्रह आणि संकुचित सांस्कृतिकवाद याचा राजकीय आग्रह धरून महाराष्ट्राचा विकास होणार आहे का, असा प्रश्न आहे.

माझी अशी भावना आहे, की या बाबतीत महाराष्ट्राला मार्गदर्शन आणि नेतृत्व राजकीय लोकांकडून नको आहे, तर ते साहित्यिकांकडून हवं आहे. आपण पूर्वकालीन तीन साहित्यिकांकडे वळून बघू या. आपले आद्य साहित्यिक ज्ञानेश्र्वर काय म्हणाले? ते म्हणाले, “आता विश्र्वात्मके देवे…’, दुसरे साहित्यिक तुकाराम काय म्हणाले?… ” तुका आकाशाएवढा…’ आणि तिसरे साहित्यिक विनोबा म्हणाले, “जय जगत्‌!’ आजपासून शंभर-दोनशे-तीनशे वर्षांनी आजच्या कोणत्या साहित्यिकांचं साहित्य वाचलं जाईल हे मला माहीत नाही, पण ज्या तीन साहित्यिकांचं साहित्य जरूर वाचलं जाईल असं मला व्यक्तिश: वाटतं ते असतील ज्ञानेश्र्वर, तुकाराम आणि विनोबा. या तिघांनी आपल्याला अगोदरच सांस्कृतिक मार्गदर्शन केलेलं आहे, की महाराष्ट्र म्हणजे काय? महाराष्ट्राची संस्कृती म्हणजे काय? या तिघांनीही जी विश्र्वबंधुत्वाची घोषणा दिली आहे तो मराठीपणा आहे की नाही? मला असं वाटतं की महाराष्ट्रात एक नवी वैश्र्विक मराठी संस्कृती व विश्र्वमानस निर्माण व्हायला हवं. परंतु निव्वळ दुबई आणि मॉरिशसमध्ये संमेलनं घेऊन ते निर्माण होणार नाही. आपण आपल्या दृष्टीत बदल घडवत आणला आणि आपलं हृदय व्यापक केलं तरच हे शक्य आहे. आपलं हृदय खऱ्या अर्थाने अखिल भारतीय आणि त्याही पलीकडे वैश्र्विक झालं तरच वैश्र्विक मराठी संस्कृती निर्माण होऊ शकेल.

ही विश्र्वधर्मी मराठी संस्कृती प्रत्यक्षात येण्यासाठी साहित्य संमेलन आणि साहित्यिक यांनी नेतृत्व करणं अपेक्षित आहे. आजचे साहित्यिक असं नेतृत्व देऊ शकतील का? अख्खा महाराष्ट्र याकरता आपल्याकडे बघणार आहे.

साहित्यिकांनी कालभेदी दृष्टी द्यावी

काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते. विज्ञानाच्या क्षेत्रात काम करणारे लोक एखादं नवं संशोधन करण्यापूर्वी त्याआधीच्या वैज्ञानिकांनी काय केलं होतं याचा शोध घेतात. त्या सोबतच काही जण तर ज्या विषयासंबंधी संशोधन करू इच्छितात त्याबद्दल साहित्यिकांनी काय लिहिलेलं आहे हे बघत असतात. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण वैज्ञानिकांच्या अस्सल बुद्धिनिष्ठ दृष्टीला जे दिसत नाही ते बऱ्याचदा साहित्यिकांना दिसत असतं. साहित्यिकांना आजचंही वास्तव दिसत असतं आणि भविष्यकाळाचंदेखील दिसत असतं. याचा अर्थ असा, की आपल्याला कालभेदी दृष्टी हवी असेल तर साहित्यिकांकडे जावं लागतं.

शरत्‌चंद्र चट्टोपाध्यायांची एक अतिशय सुंदर कादंबरी आहे- “पथेरदाबी’. भारताच्या राजकारणात गांधी आणि सुभाष यांच्यामधला अहिंसा आणि हिंसा यांचा साधनशुद्धी बाबत जो संघर्ष नंतर राजकीय पटलावर घडला त्याच्या अनेक दशकांपूर्वी “पथेरदाबी’मध्ये सव्यसाची आणि भारती यांच्या वैचारिक आणि नैतिक संघर्षामधून शरदबाबूंनी तो रेखाटलेला होता. रवींद्रनाथ टागोरांची एक नृत्यनाटिका आहे- “रक्तकरबी’. रशियातील क्रांती होण्यापूर्वी रवींद्रनाथ टागोरांनी होऊ घातलेल्या राजकीय क्रांतीचं आणि त्या हिंसक क्रांतीमधून निर्माण होणाऱ्या समस्यांचं अतिशय सुंदर चित्रण त्यात केलेलं होतं. आणि सर्वांत मोठं उदाहरण म्हणजे आपण सगळेच ऐकतो, की रामायण घडण्यापूर्वीच वाल्मीकींनी रामकथा लिहिली होती….या उदाहरणांचा अर्थ असा, की काही साहित्यिकांना कालभेदी दृष्टी असते व त्यातून त्यांना येणारा भविष्यकाळ दिसू शकतो.

ईशावास्योपनिषदात विनोबांनी “कवी म्हणजे क्रांतदर्शी’ असे म्हटले आहे. “ऋषी’ या शब्दाची विनोबांनी मोठी सुंदर फोड केली आहे. “ऋष’ म्हणजे बघणे, निरीक्षण करणे. जो काळाच्या अंधारातून पुढच्या काळात बघू शकतो तो “ऋषी’! ज्ञानेश्र्वर, तुकाराम, विनोबा, शरत्‌चंद्र, रवींद्रनाथ टागोर हे सगळे कवी व ऋषी होते. त्यांना ती कालभेदी दृष्टी होती.

मराठी साहित्यामध्ये अशी दृष्टी आम्हाला हवी आहे. परंतु मराठी साहित्य तर बऱ्याच प्रमाणात भूतकाळामध्येच रमताना दिसतं. भूतकाळ आमचाच आहे. आमच्याच संस्कृतीचा, परंपरेचा आहे. त्याच्याविषयी प्रेम वाटणं अगदी स्वाभाविक आहे, आवश्यकही आहे. पण आम्ही त्याच्यामध्येच रंगून चालेल, अडकून कसं चालेल? म्हणून किमान काही साहित्यिकांनी तरी आम्हाला ऋषीसारखी कालभेदी पुढची दृष्टी द्यावी, पुढच्या समाजाचं दर्शन द्यावं, ही आमची अपेक्षा आहे. भविष्यकाळ कोणत्या दिशेने जाणार आहे, आम्ही कसं वागावं, या व अशा प्रश्नांबाबत आम्हाला दृष्टीची गरज आहे.

तीन प्रमुख वैश्विक प्रश्र्न

आज तीन प्रमुख वैश्र्विक प्रश्न उभे आहेत- पहिला आहे भांडवलशाहीचं पाप, दुसरा आहे पृथ्वीला ताप आणि तिसरा आहे धार्मिक हिंसाचाराचा शाप. भांडवलशाही असं म्हणाली, की माणसाच्या व्यक्तिगत, अपरिमित लोभाच्या प्रेरणेतूनच समाजाचा आर्थिक विकास होत असतो. ऍडम स्मिथ तसं म्हणाला आणि आम्ही सगळे जगभर त्या पद्धतीने वागत सुटलो. या अपरिमित लोभामुळे, अनियंत्रित लोभामुळे, बॅंकर्सनी केलेल्या प्रचंड घोटाळ्यांमुळे, चुकांमुळे आज जागतिक मंदी आलेली आहे. भांडवलशाहीच्या पापाखाली लोभाची समस्या लपलेली आहे. अपरिमित लोेभ योग्य आहे का, त्यावर आधारित अर्थरचना शक्य आहे का? ही एक मोठी वैश्र्विक समस्या आपल्यापुढे आज उभी आहे.

दुसरी समस्या पृथ्वीला आलेला ताप ही आहे. अनियंत्रित यंत्रवाद, निसर्गाला नष्ट करणं आणि चंगळवाद यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्हाला इकडची काडी तिकडे हलवायची नाही. कोणतेही शारीरिक श्रम करायचे नाहीत. पण अमाप भोग हवा. त्यामुळे आम्हाला पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, कोळसा पाहिजे, वीज पाहिजे, कारखाने पाहिजेत. या सगळ्यातून वैश्र्विक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) आणि हवामानात बदल (क्लायमेट चेंज) हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. याच्या विस्तृत वर्णनात जाण्याची गरज नाही. कारण आपण वर्तमानपत्रात वाचत असतो की ग्लोबल वॉर्मिंगचे किती प्रचंड गंभीर परिणाम होणार आहेत!

तिसरी समस्या आहे, धार्मिक हिंसाचाराचा शाप. आधी इराणमध्ये घडू लागलं. मग अफगाणिस्तानमध्ये घडायला लागलं. पुढे पाकिस्तानमध्ये घडायला लागलं. आता हे लोण मुंबईला नि पुण्यालाही आलं आहे. कोणीही या शापापासून मुक्त नाही. आयर्लंडमध्ये ख्रिश्चनांनी वेडाचार केला. आयआरएने अनेक दशकं धार्मिक हिंसाचार नि दहशतवाद केला. नंतर शिखांनी केला, मुस्लिमांनी केला, आणि आता हिंदूही करायला लागले आहेत.

शंभर वर्षांपूर्वी 1909 साली एका चाळीस वर्षांच्या माणसाने या तीन प्रमुख समस्या आपल्या कालभेदी दृष्टीने पाहिल्या आणि इंग्लंडमधून दक्षिण आफ्रिकेत परत जाताना जहाजावर त्याने एक छोटेखानी पुस्तक घाईघाईने लिहिलं. ते लिहिताना उजवा हात जेव्हा थकायचा तेव्हा तो माणूस डाव्या हाताने लिहायचा. हा माणूस होता मोहनदास करमचंद गांधी. . पुस्तकाचं नाव आहे- “हिंद स्वराज’. “हिंद स्वराज’मध्ये महात्मा गांधींनी भारतीय समाजाला या तीनही समस्यांविषयी सावध केलेलं आहे. पाश्र्चात्त्य समाजाची दिसत असणारी समृद्धी आणि भरभराट, त्यांचा अतिरेकी यंत्रवाद आणि अपरिमित भोगवाद, आणि समाज बदलायला हिंसेवरती असलेला त्यांचा विश्र्वास, या तिन्हींकडे इंग्लंडमधले भारतीय तरुण तेव्हा आकर्षित होत होते. या तीनही चुकांपासून गांधींनी भारतीय माणसाला तेव्हा सावध केलं होतं. “हिंद स्वराज’मध्ये त्यांनी यावर उपायही सांगितलेले आहेत. गांधीजींनी जे उपाय सुचवलेले आहेत ते आज कालानुरूप असल्यामुळे मी त्यांचा ऊहापोह आणि चर्चा करतो आहे.

गांधीजींनी सांगितलेले उपाय

आज आमच्यासमोर उभे ठाकलेले तीनही प्रश्र्न “बाह्य’ जगातले आहेत. भांडवलशाही, चंगळवाद, यंत्रवाद, हिंसा हे सगळे प्रश्र्न “बाह्य’ आहेत. पण गंमत अशी की या सगळ्यांवर गांधींनी सांगितलेले उपाय मात्र “आंतरिक’ आहेत. गांधी म्हणतात, की “स्वराज्य’ म्हणजे “स्वत:चं’ राज्य नाही, तर “स्व’वरती राज्य. स्वराज्य म्हणजे “मला राज्य करण्याचा अधिकार पाहिजे’ असं आपण म्हणतो. पण हा माणूस तर म्हणतो, “बाबा रे, प्रथम स्वत:वर राज्य करायला शीक.’ स्वत:वर राज्य कसं कर? कसं शीक? या सगळ्या प्रश्र्नांची उत्तरंही गांधींनी आपल्या पुस्तकात दिली आहेत. उपायही सांगितले आहेत. गांधींनी लोभावर उपाय सुचवला आहे तो अपरिग्रहाचा. जास्त संग्रहच करू नका, आणि तुमच्याकडे जी काही संपत्ती आहे ती समाजाची आहे, अशा विश्र्वस्तवृत्तीने त्याचा समाजाकरता उपयोग करा. भांडवलशाहीचा नारा आहे- “फ्रीडम ऑफ डिझायर’. पाश्र्चिमात्य जगात या नाऱ्याचं प्रचंड कौतुकही आहे. अमेरिकेत तर “फ्रीडम ऑफ चॉइस’ असणं हे जणू कोणत्याही समाजव्यवस्थेची सगळ्यात अंतिम कसोटी आहे. “फ्रीडम ऑफ चॉइस’ असं म्हणताना त्यांना अभिप्रेत असतं, की “वुई मस्ट हॅव अनलिमिटेड फ्रीडम ऑफ डिझायर’!- आम्हाला जे जे हवं आहे, आम्ही जे इच्छिलं आहे ते आम्हाला अपरिमित मिळायला पाहिजे. गांधी असं म्हणतात, की आपल्याला “फ्रीडम ऑफ डिझायर’ नव्हे तर “फ्रीडम फ्रॉम डिझायर’ हवं आहे. डिझायरवर विजय मिळवा, सर्व प्रश्र्न आपोआप सुटतील.

यंत्रवाद आणि चंगळवाद यावर गांधी अुपाय सांगतात शरीरश्रम आणि मित-भोग, म्हणजेच आपल्या गरजा कमी करा. अपरिमित गरजा कुणालाच पूर्ण करता येणार नाहीत. “देअर इज इनफ ऑन द अर्थ फॉर एव्हरीबडीज नीड, बट नॉट फॉर एव्हरीबडीज ग्रीड.’ आणि धार्मिक हिंसेवर तर त्यांनी अर्थातच सर्वधर्मसमभाव आणि अहिंसा हे उत्तर दिलेलं आहे.

“अति’ आणि “गती’च्या वेडाने बेभान झालेल्या आधुनिक माणसाला गांधींनी “हिंद स्वराज’मधून सावधगिरीचा इशारा दिला आहे. आजच्या आधुनिक युगातले जितके काही अतिरेकाचे प्रश्र्न आहेत त्या सगळ्यांची उत्तरं गांधींनी “हिंद स्वराज’मध्ये दिली आहेत, तीही शंभर वर्षांपूर्वी. गांधीजींना प्रश्र्नही दिसतात आणि उत्तरंही दिसतात. याचा अर्थ गांधी कालभेदी साहित्यिकाच्या अटी पूर्ण करतात. आम्हाला आमच्या साहित्यिकांकडून गांधींसारखी कालभेदी दृष्टी हवी आहे, मार्गदर्शन हवं आहे.

चळवळीचे दिवस संपले हा भ्रम

ज्या तीन शापांचा मी उल्लेख केला त्यांच्यापासून शापमुक्ती कशी होणार, असा प्रश्र्न अनेकांना पडलेला आहे. एक व्यथा आपण वारंवार ऐकतो; विशेषत: साठ-सत्तर-ऐंशीच्या दशकांतली जी मंडळी आहेत त्यांना ही व्यथा अधिकच आहे. त्यांचं म्हणणं असं, की आजकाल समाज परिवर्तनाच्या चळवळीच दिसत नाहीत. चळवळी लोपल्यामुळे माणसांमध्ये जी घुसळण होत होती ती थांबली. आणि चळवळीच नसतील तर आपल्या समाजाचे प्रश्र्न कसे सुटणार?

माझी अशी नम्र समजूत आहे, की चळवळींचे दिवस गेले हा दृष्टीचा प्रश्र्न आहे. चळवळींचे दिवस गेलेले नाहीत, चळवळींचं स्वरूप बदललं आहे. एकोणिसाव्या व विसाव्या शतकात बहुतेक मुख्य बदल हे मोठ्या राजकीय चळवळींच्या माध्यमातून घडले आहेत. स्वातंत्र्याच्या चळवळी असोत, मजुरांच्या चळवळी असोत, काळ्या लोकांच्या चळवळी असोत, पीस मूव्हमेंट्‌स असोत की शेतकरी चळवळ असो या सर्व चळवळी हजारो-लाखो लोकांच्या सहभागातून घडल्या आहेत. त्यामुळे लाखो माणसं रस्त्यावर येत आहेत, त्यांचा कुणी एक नेता असणार आहे, त्यांची एक विचारसरणी असणार आहे, त्यांचा एक झेंडा असणार आहे, त्यांची एक घोषणा असणार आहे, कार्यक्रम असणार आहे आणि हजारो-लाखो लोक त्याचं अनुसरण करणार आहेत या प्रकारच्या चळवळींची आम्हाला सवय झाली आहे. आताशा अशा प्रकारच्या चळवळी दिसत नसल्याने आम्ही म्हणतो की चळवळी मागे पडल्या आहेत. गोष्ट खरी आहे की अशा प्रकारच्या चळवळी दिसत नाहीत. परंतु याचा अर्थ असा नव्हे, की समाजपरिवर्तनाची प्रक्रियाच थांबली आहे.

चळवळी थांबल्या पण परिवर्तन चालू आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स मात्र बदललं आहे, आणि ते आपल्यासाठी अतिशय अनुरूप आहे, आपल्याला, सामान्य माणसाला सक्षम करणारं आहे. परिवर्तनाचं डायनॅमिक्स असं बदललं की राजकीय नेतृत्व आणि राजकीय चळवळींच्या मार्फत होणाऱ्या परिवर्तनाऐवजी आता हे परिवर्तन माणसा-माणसांच्या पातळीवर घडतं आहे. ह्युमन बीइंग इज द युनिट ऑफ चेंज. माणसाचं मानस आणि माणसाचं रोजचं जगणं हे परिवर्तनाचं कुरुक्षेत्र बनलं आहे. टीव्हीच्या जमान्यात माणसांना आता हजारो-लाखोंच्या संख्येने एकत्र येण्याला फुरसत राहिलेली नाही. राजकिय नेत्यांच्या सभांनाही आता माणसं मोठ्या संख्येने एकत्र येत नाहीत म्हणून गर्दी जमवण्यासाठी फिल्मस्टार आणावे लागतात. मात्र राजकीय नेत्यांच्या मागे माणसं येत नाहीत याचा अर्थ माणसं बदलत नाहीत असा नाही. माणसं आपापल्या जागी बदलताहेत आणि माणसा-माणसांत संथ बदलाची एक प्रक्रिया घडते आहे.

एक साधं उदाहरण घेऊ. योगाच्या चळवळीत रामदेवबाबा आता आता आले; पण अन्यथा गेली ऐंशी वर्षं योगाची चळवळ जगभर पसरते आहे. आज अमेरिकेतली पाच ते दहा टक्के लोकसंख्या योग शिकलेली आहे आणि नियमितपणे योग करते आहे. जगभरात आज कोट्यवधी लोक योग करतात. ही चळवळ कशी पसरली? माणसाकडून माणसापर्यंत, अशा रीतीनेच ती पसरली.

लोकांची जीवनशैली बदलते आहे. मुली शिकायला लागल्यात.माणसं आता आरोग्यासाठी चालायला लागली आहेत, व्यायाम करायला लागली आहेत. लोकांची जीवनशैली कशी बदलली? त्यामागे कुणी राजकीय नेता होता की कोणती राजकीय चळवळ होती? -असं काही नव्हतं. एका माणसात परिवर्तन झालं, त्याने दुसऱ्याला सांगितलं, त्याने तिसऱ्याला सांगितलं. चौथ्याने पाहिलं, अनुसरण केलं. हीच आहे “मॅन टु मॅन प्रोसेस ऑफ ट्रान्स्फॉर्मेशन’. हे सांस्कृतिक परिवर्तन आहे. हे माणसाच्या हृदयात घडणारं परिवर्तन आहे. आज घडणाऱ्या परिवर्तनाचं गतिशास्त्र हे असं आहे!

माणसांच्या विचारात आणि आचरणात परिवर्तन घडवून आणण्याची अशी विलक्षण हातोटी गांधींमधे होती. “खादी’ हा अतिशय साधा वाटणारा कार्यक्रम त्यांनी दिला होता; परंतु त्यातून स्वत:चे आचार-विचार बदलण्याचा कार्यक्रमही अंतर्भूत होता. खादीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, गरिबासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, पर्यावरणासोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, मित-भोग किंवा साध्या राहणीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो, स्वातंत्र्य चळवळीसोबत स्वत:ला जोडून घेऊ शकतो आणि स्वत:च्या हाताने सूत कातल्याने मी शरीरश्रमासोबतही स्वत:ला जोडून घेऊ शकतो. परिवर्तनाच्या सहा मूल्यांसोबत मी स्वत:ला जोडून घेऊ शकतो. गांधींनी खादीमार्फत वस्त्रसंस्कृतीत क्रांती तर घडवलीच, परंतु किमान सहा मूल्यांबाबत स्वत:च्या आचार-विचारात परिवर्तन घडवून आणण्याची कृतीही घडवून आणली. नेहरू, पटेल, सुभाष या सगळ्या विदेशांत शिकलेल्या बॅरिस्टरांना गांधींनी स्वयंपाकघरात जशी भाजी चिरायला लावली तसंच सूतही कातायला लावलं. राजकीय क्रांतीच्या अगोदर गांधींनी सांस्कृतिक क्रांती सुरू केली.

मित्रांनो आपलं रोजचं जगणं हा आपला जाहीरनामा असतो. माझं रोजचं जगणं हा माझा सांस्कृतिक जाहीरनामा असतो. आणि खरं म्हणजे आजचा माणूस असं म्हणतो आहे, की हाच माझा राजकीय जाहीरनामादेखील आहे. माझ्या रोजच्या जगण्यातूनच मला जग कसं हवं आहे हे मी प्रगट करतो आहे.

थोडक्यात सांगायचं, तर व्यक्तिव्यक्तींचे विचार बदलले तर जग बदलतं, माणसाचं आचरण बदललं तर जग बदलतं. आणि हे आपल्याला सक्षम करणारं अशाकरता आहे कारण माझं रोजचं जगणं बदलायला मला कोणत्या राजकीय नेत्यावर अवलंबून राहावं लागत नाही. माझं रोजचं जगणं बदलणं हे माझ्याच हातात आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते “स्वराज्य’ आहे. माझं रोजचं जगणं कसं असावं ते मीच ठरवू शकतो, मी स्वत:च स्वत:ला बदलवू शकतो. या अर्थाने परिवर्तनाच्या चळवळीचा केंद्रबिंदू आता मी स्वत:च आहे. प्रत्येक नागरिकाला केवढी शक्ती देणारी ही दृष्टी आहे! हे सांस्कृतिक परिवर्तन राजकीय परिवर्तनापेक्षा सामान्य माणसासाठी अधिक अनुकूल आहे, त्यामुळे ते लोकशाहीसाठीही अधिक अनुकूल आहे. इथे सत्ता ही खऱ्या अर्थाने सामान्य माणसाच्या हातात आहे. पाच वर्षांनी एकदा मतदान करण्यापुरती ही सत्ता मर्यादित नाही. रोजच्या जगण्याची, रोजच्या मतदान करण्याची ही सत्ता आहे. मी काय नेसतो, मी काय खातो, मी काय वाचतो, मी पायी चालतो की मोटार वापरतो, हे सर्व जग म्हणजे जग कसं असावं याबद्दलचा जग बदलायचा माझा जाहीरनामा आहे. तो मी रोज जाहीर करू शकतो, रोज प्रगट करू शकतो, रोज तसं जगू शकतो आणि रोज मी जग बदलवू शकतो.

साहित्यिकांकडून सांस्कृतिक परिवर्तनाची अपेक्षा

रोजच्या जगण्यात जो बदल घडतो त्यालाच सांस्कृतिक परिवर्तन म्हणतात. जग बदलायची आणखी एक पद्धत विनोबांनी सांगितली आहे. ते असं म्हणतात, की जुन्या शब्दांवर नव्या अर्थांचं कलम करणं म्हणजे सांस्कृतिक परिवर्तन, अहिंसक परिवर्तन. असं परिवर्तन घडवण्याची शक्ती साहित्यिकांमध्येच असू शकते. आणि म्हणून सांस्कृतिक परिवर्तन ही जग बदलण्याची पद्धत तुमच्यामाझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आणि साहित्यिकांच्याही हातामध्ये अतिशय मोठी प्रभावी साधनं देणारी गोष्ट आहे.

हे परिवर्तन कोण करेल? माझा असा समज आहे, की सर्वप्रथम विज्ञान हे परिवर्तन आणते आहे. दुसरा प्रभावी घटक असतील स्त्रिया. कारण समाजाच्या संस्कृतीचं वहन मोठ्या प्रमाणात स्त्रियाच करतात. तरुण पिढी हा तिसरा महत्त्वाचा घटक असणार आहे, कारण ते उद्याच्या जगाची घोषणा आहेत. चौथं स्थान रिक्त आहे. आणि मला त्या चौथ्या स्थानावर साहित्यिकांच्या आगमनाची वाट आहे. साहित्यिकांनी आजच्या काळाला अनुरूप अशा प्रकारच्या समाजपरिवर्तनाचं नि सांस्कृतिक परिवर्तनाचं नेतृत्व करावं, अशी त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे.

या साहित्य संमेलनात अशा प्रकारच्या सांस्कृतिक परिवर्तनाच्या मूल्यांचं दर्शन व्हावं, अशी आपली सर्वांची किमान अपेक्षा राहणार आहे. हे सर्वसमावेशक संमेलन व्हावं, अशी आपली अपेक्षा राहणार आहे. महाराष्ट्रातले जे काही संकुचित वाद आहेत त्यांनी यामध्ये अडथळा बनू नये. सर्वांचं हृदय व्यापक व्हावं. मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर, असले वादच यात येऊ नयेत, अशी आम्हाला अपेक्षा राहील. जे विश्र्वहृदय आम्ही जगाकडून अपेक्षा करतो, त्याची सगळ्यात पहिल्यांदा साहित्यिकांकडून आम्ही अपेक्षा करणार आहोत. साधेपणा आणि मितव्ययता यांचं दर्शन या संमेलनातून व्हावं, अशी अपेक्षा राहणार आहे.

महाराष्ट्राच्या लोकजीवनाचे आजचे जे भडकते प्रश्न आहेत त्यांची यादी मी आत्ता तुम्हाला सांगणार नाही, कारण ती सगळ्यांना माहीत आहेच. परंतु साहित्याचा, साहित्यिकांचा जीवनासोबत काही तरी अनुबंध या संमेलनात प्रकट व्हावा, अशी अपेक्षा मी व्यक्त करतो. साहित्यामध्ये निव्वळ स्वत:वरच भाळणं असा नार्सिसिझम्‌ व्यक्त होऊ नये, तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेमध्ये आहोत, त्यांचं आम्ही देणं लागतो, हे प्रकट व्हावं. महाराष्ट्र जळतो आहे. आम्ही त्याचा भाग आहोत की नाही, आम्हाला देणंघेणं आहे की नाही, याचा जरूर विचार व्हायला हवा.

इथं एक कविता आठवते. आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये सहाराचं वाळवंट आहे. एके काळी ते सगळं जंगल होतं. पण जंगल तुटत गेलं, त्याचं वाळवंट होत गेलं. जसाजसा निसर्ग नष्ट होतो आहे, सहाराचं वाळवंट मोठंमोठं होत आहे. आणि सहाराचं वाळवंट आफ्रिकेमधे दक्षिणेकडे पसरतं आहे. एक कवी म्हणतो,

“सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स अँड साऊथवर्ड्‌स.

स्लोली, बट रिलेन्टलेसली, इंच बाय इंच
सहारा इज क्रीपिंग साऊथवर्ड्‌स’.
आफ्रिकेच्या उत्तरेमध्ये जी माणसं आहेत युरोप-अमेरिकेमधली, ती काय म्हणणात? जाऊ द्या ना, सहारा गेलं दक्षिणेकडे तर आमचं काय बिघडलं? आम्ही उत्तरेला सुरक्षित आहोत. आफ्रिकेला नष्ट होऊ द्या. त्यांना हा कवी सांगतो,
“डोन्ट लाफ ओ फूल्स इन द नॉर्थ
द अर्थ इज राऊंड’.
त्यामुळे प्रश्न असा आहे, की आज महाराष्ट्र जळत असताना साहित्यिक आणि साहित्य संमेलन कुठे उभं राहणार? सहाराच्या दक्षिणेला लोकांसोबत उभं राहणार की उत्तरेच्या मूर्खांमध्ये उभं राहणार? आम्ही जनतेच्या प्रश्नासोबत स्वत:ला जोडून घेणार, की आम्ही म्हणणार, अजून माझ्या दारावर थाप पडलेली नाही! जर्मनीत जेव्हा एकेका स्वातंत्र्याचा संकोच होत होता, तेव्हा कवी म्हणाला,
“प्रथम त्यांनी ज्यूंना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी ज्यू नाही.
नंतर कम्युनिस्टांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो,
की मी कम्युनिस्ट नाही.
त्यानंतर विचारवंतांना पकडून नेलं तेव्हा मी म्हणालो
की मी विचारवंत नाही.
आणि आज माझ्याच दारावर टकटक होत आहे.
पण आता मदतीला धावून यायला कुणीच शिल्लक उरलेलं नाही.’
जेव्हा अख्खा महाराष्ट्र दुष्काळात, आत्महत्यांत, बालमृत्यूंत, कुपोषणात, हिंसाचारात, असंख्य प्रश्नांत अक्षरश: जळतो आहे, तेव्हा साहित्य संमेलन कुठे उभं राहणार?
निवड आपल्या सर्वांना करायची आहे.

शब्दांकन : शुभदा चंद्रचूड


डॉ. भालचंद्र मुणगेकर, सौजन्य – सकाळ

लोकशाहीमध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य विकृती स्पष्टपणे पाहू शकणाऱ्या ग्रीक तत्त्ववेत्ते ऍरिस्टॉटल यांनी लोकशाहीची ‘अधःपतित शासनपद्धती’ म्हणून निर्भर्त्सना केली आहे, तर दुसऱ्या बाजूला अब्राहम लिंकन यांनी ‘लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालविलेलं शासन’ असा लोकशाहीचा गौरव केला आहे. डॉ. आंबेडकरांनी ‘लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तविहीन मार्गांनी क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासनव्यवस्था’ अशा शब्दांत लोकशाहीवर भाष्य केलं आहे. आपल्याला यांपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही हवी?

स्वतंत्र भारताच्या उज्ज्वल भवितव्याशी संबंधित असलेले सर्व प्रश्‍न आणि समस्या यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जितक्‍या सर्वसमावेशक, विस्तृत, खोलवर आणि गंभीरपणे विचार केला, तसा आधुनिक भारताच्या राजकीय व सामाजिक इतिहासात फारच कमी जणांनी केल्याचं आपल्याला दिसून येईल. जातिव्यवस्था आणि अस्पृश्‍यतेचं समूळ उच्चाटन करून भारत हे एक एकसंध, आधुनिक आणि समर्थ राष्ट्र निर्माण करण्याची ऐतिहासिक जबाबदारी डॉ. आंबेडकरांवर पडल्यामुळे ते गांधीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यचळवळीत सहभागी झाले नाहीत.

एक प्रखर राष्ट्रभक्त असल्यामुळे देशाच्या स्वातंत्र्याला त्यांचा संपूर्ण पाठिंबा होता; परंतु राष्ट्रीय चळवळीच्या काही अंगभूत मर्यादांमुळे डॉ. आंबेडकर त्या चळवळीत सामील झाले नाहीत. “देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या स्वातंत्र्यात अस्पृश्‍यांचं स्थान कोणतं असेल?’ या डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेल्या प्रश्‍नाला राष्ट्रीय चळवळीतील नेत्यांकडे समर्पक उत्तर नव्हते. स्वातंत्र्यानंतर गेल्या 60-62 वर्षांच्या काळात दलितांच्या जीवनामध्ये, विविध कारणांमुळे जे अनुकूल बदल झाले, ते ध्यानात घेतल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी उपस्थित केलेला प्रश्‍न किती गंभीर आणि दूरदृष्टीचा होता, हे आपल्या लक्षात येईल.

लोकशाहीवरील नितांत श्रद्धा
स्वातंत्र्यचळवळीत सहभाग न घेतल्यामुळे वेळोवेळी दूषणं देऊनही त्याबद्दल मनात जराही कडवटपणा न ठेवता डॉ. आंबेडकरांनी घटना समितीच्या मसुदा समितीचं अध्यक्षपद आनंदानं व कर्तव्यबुद्धीनं स्वीकारलं. घटना समितीतील त्यांचं कार्य ऐतिहासिक स्वरूपाचं ठरल्यामुळेच त्यांना “भारतीय घटनेचे शिल्पकार’ असं आदरानं संबोधलं जातं.

डॉ. आंबेडकरांची लोकशाहीवर नितांत श्रद्धा होती; पण भारताचा इतिहास आणि प्रचलित आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक व्यवस्था लक्षात घेता, भारतातील लोकशाही ही काही स्वाभाविकपणे उत्क्रांतीत झालेली गोष्ट नव्हे, ही त्यांची धारणा होती. आधुनिक लोकशाही ही विशेषतः युरोपियन देशांच्या विकासक्रमांतून निर्माण झालेली व त्यायोगे ती भारतात आल्याचे त्यांचे मत होते. त्यामुळेच आपल्या देशात ही लोकशाही यशस्वी कशी होईल, हा त्यांच्या चिंतनाचा विषय सतत राहिला होता. डॉ. आंबेडकरांचा कोणत्याही प्रकारच्या हुकूमशाहीला विरोध असल्यामुळे, लोकशाहीवर त्यांची निष्ठा होतीच; परंतु दलित, श्रमिक, स्त्रिया अशा सर्व कष्टकरी समाजघटकांच्या हातातील लोकशाही हेच एक प्रभावी शस्त्र असल्याची त्यांची धारणा होती. म्हणूनच त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, कार्यक्रम, त्यांचे विस्तृत लिखाण आणि विविध प्रसंगी केलेल्या शेकडो भाषणांमधून त्यांनी लोकशाहीच्या यशस्वितेसाठी आवश्‍यक असलेल्या काही गोष्टींचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. डॉ. आंबेडकरांच्या अशा भाषणांपैकी 22 डिसेंबर 1952 रोजी पुण्यातील विधी ग्रंथालयाच्या सभागृहात केलेलं भाषण लोकशाहीवरील त्यांच्या श्रद्धेचं व त्याचबरोबर त्यांच्या द्रष्टेपणाचं द्योतकच आहे. प्रस्तुत भाषणात त्यांनी संसदीय लोकशाही यशस्वी करण्यासाठी कोणत्या गोष्टींची आवश्‍यकता आहे, याचं प्रतिपादन केलं आहे. स्वाभाविकपणे ते देशातील आजच्या परिस्थितीवरही विदारक प्रकाश टाकणारं आहे.

समाज हवा एकसंध
यशस्वी लोकशाहीसाठी आवश्‍यक असलेली पहिली अट म्हणजे समाजामध्ये प्रखरपणे जाणवू शकेल अशी विषमता असता कामा नये. भावनिक ऐक्‍यावर आधारलेला एकसंध समाज निर्माण करण्यासाठी अशी विषमता केवळ घातकच ठरत नाही, तर ती समाजामध्ये फुटीरता आणि हिंसेची बीजं पेरत असते. स्वातंत्र्योत्तर काळात देशाने केलेल्या विकासाचे काही फायदे गरिबांनाही झाले, हे जरी खरं असलं, तरी सर्वाधिक फायदे समाजातील 15 ते 20 टक्के सधन घटकांनाच झाले आहेत. गेल्या 15 ते 20 वर्षांतील आर्थिक सुधारणांमुळे विकासाचा दर वाढला ही गोष्ट समाधानकारक आणि स्वागतार्ह असली, तरी त्याच्या फायद्याचं वाटप मात्र पूर्वीपेक्षा अधिक विषम होत चाललं आहे. विविध प्रकारच्या लोककल्याणकारी विकास कार्यक्रमांवर हजारो कोटी रुपये खर्च होत असले, तरी गरीब-उपेक्षित घटकांपर्यंत अशा विकासाचे फायदे जात नाहीत. विविध मार्गांनी आपले हितसंबंध जोपासण्यासाठी निर्माण केलेली एक भ्रष्ट व समांतर अशी व्यवस्था त्याला जबाबदार आहे. परिणामतः स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या 60 वर्षांनंतरही देशातील सुमारे 30 ते 35 टक्के जनता दारिद्य्ररेषेखाली आहे.

जाती व अस्पृश्‍यताजन्य सामाजिक विषमता नष्ट करण्याबरोबरच स्त्रियांची सर्वांगीण प्रगती हा डॉ. आंबेडकरांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. त्यामुळेच त्यांनी स्वतंत्र भारताच्या कायदामंत्रिपदी असताना स्त्रियांच्या हक्कांची सनद असलेलं “हिन्दू कोड बिल’ तयार केलं व ते संमत होत नाही, असं दिसताच जराही विलंब न लावता कायदेमंत्रिपदाचा राजीनामा दिला. संसदेमध्ये स्त्रियांना 33 टक्के राखीव जागा ठेवण्याच्या विधेयकावरून आज देशात जी रणधुमाळी सुरू आहे, ती लक्षात घेता, स्त्रियांना सक्षम करण्याच्या भूमिकेवर डॉ. आंबेडकरांची श्रद्धा अधिकच उठून दिसते.

पक्षांमध्ये असावा विवेक
यासंदर्भात लोकशाहीच्या यशासाठी त्यांनी सांगितलेली दुसरी अट म्हणजे प्रबळ विरोधी पक्षाचं अस्तित्व आणि सत्ताधारी व विरोधी पक्षातील सामंजस्याचं वातावरण. सत्ताधारी पक्षावर अंकुश ठेवणं हे जसं विरोधी पक्षाचं सर्वांत महत्त्वाचं कार्य आहे, तसंच विरोधी पक्षाच्या भूमिकेची कदर करणं हे सत्ताधारी पक्षाचं कर्तव्य आहे. सत्ता हस्तगत करण्यासाठी विविध पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करणं लोकशाहीत अभिप्रेत असलं, तरी विवेक हादेखील लोकशाहीचा आधार आहे, हे राजकीय पक्षांनी विसरता कामा नये. राष्ट्रीय हितापेक्षा पक्षीय हित मोठं समजणं ही लोकशाहीला दुरवस्थेकडे घेऊन जाणारी गोष्ट आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे महिला विधेयकाचा प्रश्‍न त्यादृष्टीने फारच बोलका आहे.

हवी श्रेष्ठ नैतिकता
डॉ. आंबेडकरांनी सांगितलेली तिसरी अट म्हणजे संविधानात्मक नैतिकता. राजकीय सत्तेच्या माध्यमांतून निर्माण झालेली प्रलोभनं दूर सारून सार्वजनिक जीवनात श्रेष्ठ दर्जाची नैतिकता प्रस्थापित करणे आणि त्याबद्दल जनतेच्या मनात विश्‍वास निर्माण करणे, ही सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत आवश्‍यक गोष्ट आहे. यादृष्टीने विचार करता, भारतातील प्रचलित परिस्थितीवर वेगळं भाष्य करण्याची आवश्‍यकता नाही.

कायद्यासमोर सारे समान
‘कायद्यासमोरील समानता’ ही डॉ. आंबेडकरांनी चौथी अट सांगितली. प्रत्यक्षात “कायद्यासमोरील समानता’ ही वरकरणी वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. पराकोटीच्या आर्थिक आणि सामाजिक विषमतेमुळे तर “कायद्यासमोरील समानता’ हे तत्त्व निरर्थक ठरते.

द्या संरक्षणाची हमी
डॉ. आंबेडकरांना अभिप्रेत असलेली पाचवी आणि शेवटची अट म्हणजे बहुसंख्याकांनी अल्पसंख्याकांना त्यांच्या संरक्षणाची हमी देणे, ही होय. खरं पाहता, “बहुसंख्य’ आणि “अल्पसंख्य’ या राज्यशास्त्रातील व्यावहारिक नि प्रसंगनिष्ठ संकल्पना आहेत. दुसऱ्या भाषेत सांगायचं म्हणजे, मतसंख्येचा विचार करता आजचा “बहुसंख्य’ पक्ष हा उद्या “अल्पसंख्य’ आणि आजचा “अल्पसंख्य’ उद्याचा “बहुसंख्य’ होऊ शकतो. मात्र, असं असलं तरी काही समाजांत धार्मिक आणि भाषिक बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक घटक असतात. आपला देश हे एक त्याचं जगातलं सर्वांत मोठं उदाहरण आहे. अशा वेळी अल्पसंख्याकांना असुरक्षित वाटणार नाही अशी काळजी घेणं हे बहुसंख्याकांचं कर्तव्य आहे. मात्र, त्याबरोबरच मतभेदांच्या मुद्‌द्‌यांवर अल्पसंख्याकांनी चर्चेसाठी तयार असण्याची मानसिकता दाखविणं अगत्याचं आहे. आज देशातील धार्मिक आणि प्रांतिक-भाषिक असहिष्णुता लक्षात घेतली, तर सामंजस्याचं वातावरण निर्माण करण्यासाठी आपल्याला निकोप राजकीय परिस्थिती निर्माण करावी लागेल.

आपल्याला हवे काय?
लोकशाहीमध्ये निर्माण होणाऱ्या संभाव्य विकृती स्पष्टपणे पाहू शकणाऱ्या ग्रीक तत्त्ववेत्ते ऍरिस्टॉटल यांनी लोकशाहीची “अधःपतित शासनपद्धती’ म्हणून निर्भत्सना केली आहे, तर दुसऱ्या बाजूला अब्राहम लिंकन यांनी “लोकांनी, लोकांचे, लोकांसाठी चालविलेलं शासन’ असा लोकशाहीचा गौरव केला आहे. डॉ. आंबेडकरांनी “लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात रक्तविहीन मार्गांनी क्रांतिकारक बदल घडवून आणणारी शासनव्यवस्था’ अशा शब्दांत लोकशाहीवर भाष्य केलं आहे.

आपल्याला यांपैकी कोणत्या प्रकारची लोकशाही हवी आहे?