Archive for फेब्रुवारी, 2010

प्रबोधनकार ठाकरे, मटा वरुन साभार

श्रीधरपंत उर्फ बापू टिळकांचे प्रबोधनकार जवळचे स्नेही. त्यांच्या ‘ माझी जीवनगाथा’ या रसाळ आत्मचरित्रात श्रीधरपंत डोकावून जातात. श्रीधरपंतांची सामाजिकबांधिलकी , तळमळ ,टिळकवाद्यांशी असलेल्या वादाचे तात्विक स्वरूप स्पष्ट करणारे हे प्रकरण या आत्मचरित्रातून साभार.

——————————————————————————————————–

मी पुण्यात पाऊल टाकल्यापासून (सन १९२५) कर्मठ बामण मंडळी माझ्याकडे जरी दु:स्वासाने पाहू लागली. तरी काय योगायोग असेल तो असो! अगदी पहिल्याच दिवशी बापू (श्रीधरपंत) टिळक आपणहून मला येऊन भेटला. मागास बहुजन समाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी त्याने आपली कळकळ मनमोकळी व्यक्त केली. त्याच क्षणाला बापूचा आणि माझा आत्यंतिक जिव्हाळ्याचा जो संबंध जुळला तो त्याच्या दुदैर्वी अंतापर्यंत!

त्यावेळी ट्रस्टी आणि टिळक बंधू यांच्यात तीव्र स्वरूपाची वादावादी , बाचाबाची आणि प्रसंगी धक्काबुक्कीपर्यंत प्रकरणे चालली होती. अरसपरस फिर्यादींचे सत्र चालू होते. वाड्यातल्या राजकारणामुळे बापू नेहमी वैतागलेला असायचा. काही संतापजनक घटना घडली का तडक तो माझ्या घरापर्यंत धुसफुसत यायचा. खरे म्हणजे तो उसळला म्हणजे रामभाऊच त्याला , ‘ जा जाऊन बस ठाकऱ्याकडे ‘, म्हणून पिटळायचा. पुष्कळ वेळा सकाळीच आला तर दिवे लागणीनंतर घरी जायचा. माझ्याकडेच जोवायचा आणि ग्रंथ वाचन करीत पडायचा. अर्थात वाड्यातल्या भानगडींची चर्चा माझ्याजवळ व्हायचीच. वारंवार तो म्हणे , ‘ केसरी माझ्या हातात आला तर पुन्हा महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दखवीन ‘. बापूचा स्वभाव त्रासिक असला तरी फार सोशिक होता. पण रामभाऊचा स्वभाव वरवर जरी धिम्मा वाटला तरी ऊठ सोट्या तुझं राज्य हा प्रकार फार.

काय टिळकांच्या वाड्यात अस्पृश्यांचा मेळा ? अब्रम्हण्यम् !

टिळक बंधू यंदा अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात घेऊन येणार अशी भुमिका पुण्यात पसरली. आणि ती खरीही होती. एकीकडे दंगलबाज छत्रपती मेळ्याची दहशत आणि त्यातच टिळक बंधुंचा हा उपद्व्याप! ट्रस्टी मंडळी भेदरून गेली. बामणेतर मंडळींच्या पाठिंब्याने रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करतील ही त्यांची खात्री असल्यामुळे , त्यांनी दोन मार्ग पत्करले. पहिला अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरुन त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच , तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांच्या स्पर्श तरी होऊ नये , एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारुन त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर ? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला.

लोकमान्यांचा गणपती ट्रस्टींच्या तुरुंगात !

सकाळी एकदोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊ नि बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस , आत वाड्यात पाऊल टाकलंस तर याद राखून ठेव , असं धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेला. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही , असे दिसतातच , ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळकबंधंुशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंजऱ्याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्तऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला -अहो नाझर साहेब , आमच्या थोरं वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केली ना ? आता सहन होणार नाही ,तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच. असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार ? आला तसा निमूट परत गेला.

याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार , असे बजावून रामभाऊने बापूला माझ्याकडे जाऊन बसायला पिटाळले. घडल्या प्रकाराची साग्रसंगीत हकिकत बापूने सांगितली. सबंध दिवस तो माझ्याकडे होता.

संध्याकाळी दिवेलागणी होताच तो पुणे कँपात भोकर वाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन तो प्रबोधन कचेरीवर आला. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. सदाशिव पेठेसारख्या बामणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गदीर् जमली.मेळा तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता.

इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोऱ्या सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिसपाटीर् अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोरएकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५ ,१०-१० मिनिटांनी तिकडे फेऱ्या घालून रामभाऊच्या सूचना आणीत होता. खुशाल या, असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यातबघ्यांची गदीर् उसळली. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती.

मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपाटीर्ने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जण्टानेदोन्ही हात पसरून ‘ यू कॅनॉट एण्टर द वाडा ‘ असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलिस नि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य-गायनाला जोरात सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर , गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेशाशांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिसीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटिसीचा कागद हातात घेतला आणि टरटर फाडून टाकला.

मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. मी चालू केलेल्या लोकहितवादी साप्ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८ वे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजीवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन , ‘गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी ‘, या मथळ्याखाली सबंध पानभर हकिकत लोकहितवादी साप्ताहिकात छापून वक्तशीर बाहेर पडली.

बापूने आत्महत्या का केली ?

मनातली खळबळ , संताप आणि चीड सगळे गाठोडे विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आणून ओतण्याचे , बापू टिळकाला अवघ्या पुण्यात मी आणि माझे बिऱ्हाड हे एकच ठिकाण होते. वाड्यात ट्रस्टी लोकांशी काही गरमागरम बोलाचाली , तंटाभांडण किंवा रामभाऊंबरोबर हातघाईचे प्रकरण झाले का बापू तडाड उठून माझ्याकडे यायचा. मध्यरात्रीसुद्धा. पुणेरी राजकारणाच्या कंकासाला कंटाळून पुण्याला रामराम ठोकून मी दादरला आलो नसतो , तर माझी खात्री आहे , बापूने आत्महत्या केलीच नसती.

असत्य , अन्याय , अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदमउखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या , तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने माझ्यापुढे ओकला का धीराच्या नि विवेकाच्या चातर उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून मी त्याला शांत करीत असे. हरएकबऱ्यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणाऱ्या मंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला , म्हणजे ते लोक मनांतल्या मनांत कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच बापू टिळकाची आत्महत्या ही दुदैवी घटना घडली!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,  म टा वरुन साभार

श्रीधरपंतांच्या आत्महत्येनंतर ‘दुनिया ‘ या मामा वरेरकर यांच्या साप्ताहिकाने खास ‘ टिळक अंक ‘प्रसिद्ध केला होता. त्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी एक अप्रतीम लेख लिहिला होता. दोन असामान्य व्यक्तिमत्त्वांतील अकृत्रिक स्नेहाचा धागा येथे दिसतो.

—————————————————————————————————————-

मी , ता. २६ मेला जळगाव येथे बहिष्कृत वर्गाच्या सभेला गेलो होतो. आदल्या दिवशी जेव्हा मुंबईहून निघालो त्याच दिवशी रा. श्रीधर बळवंत टिळक यांचे एक पत्र मला आले होते. त्यात आपल्याला दापोलीच्या सभेला येता आले नाही याबद्दल वाईट वाटते वगैरे मजकूर होता. त्या आत्महत्या करण्यासारखा प्रसंग ओढवला आहे असा ध्वनी. उमटण्यासारखा काहीच मजकूर नव्हता.

दुपारी फार उन्हं असल्यामुळे रा. लखाचंद यांच्या अध्यक्षतेखाली सभा संध्याकाळी सहा वाजता सुरू झाली. या सभेस पाच हजार लोक आले असल्यामुळे सभेचे कामकाज फार उत्साहाने चालले होते. हिंदुमहासभेच्या कामापेक्षा समाज समता संघाचा कार्यक्रम कसा परिणामकारक आहे , या आशयाचे थोडेसे कडाक्याचे भाषण संपवून नुकताच मी खाली बसलो होतो. इतक्यात एक तार आली. तार येण्याचे काही कारण नसताना तार आली यामुळे मला थोडा धक्का बसला.

वाचून पाहातो तो ज्या समता संघाच्या कार्याची महती गाऊन मी खाली बसलो होतो त्याच समता संघाच्या पुणे येथील शाखेचे उपाध्यक्ष माझे मित्र रा. श्रीधर बळवंत टिळक वारले म्हणून बातमी! मी अगदी गांगरून गेलो , आधी हे खरेच वाटेना. परंतु तार संघाच्या सेक्रेटरीने केली असल्यामुळे ती खोटी म्हणता येईना. अशा परिस्थितीत एक दुखवट्याचा ठराव मांडून मी सभा सोडून तसाच तडक मुंबईस आलो.

गाडीत श्रीधरपंतांच्या मरणासंबंधी अनेक तर्क माझ्या मनात आले व आपणआरंभिलेल्या कार्यातील धडाडीचा एक मोठा जोडीदार नाहीसा झाला हे जाणून माझे मन फार उद्विग्न झाले. श्रीधरपंताला कोणीतरी दुष्टाने विषप्रयोग केला असावा असा माझा प्रबळ तर्क झाला. तारेत मरणाचे कारण काहीच दिलेले नव्हते. तेव्हा मरणाचे हेच कारण हेच की दुसरे कोणते , हे जाणण्यासाठी गाडी मुंबईस केव्हा पोहोचेल असे मला झाले होते. गाडी दादरला पोहोचल्याबरोबर मी माझ्या ऑफिसात गेलो. ‘ टाइम्स’ हातात धरतो तोच श्रीधरपंतांचे हातचे मरणापूवीर् तीन तास अगोदर मला लिहिलेले एक पत्र टेबलावर पडलेले दिसले. तेव्हा ‘ टाईम्स ‘ टाकून ते हाती घेतले. वाचतो तो आत्महत्त्या हेच मरणाचे कारण होय , हे अगदी स्पष्ट झाले.

मग तर अगदीच कष्टी झालो. श्रीधरपंताला मी थोडासा दोषही दिला. आत्महत्त्या हा मरणाचा भेसूर प्रकार आहे. परंतु ज्या कारणामुळे ही आत्महत्त्या घडली जी कारणे ध्यानात घेतली म्हणजे श्रीधरपंताची आत्महत्त्या मोठी हृदयदावक होती असे म्हणणे भाग पडते. आपले आयुष्य ‘ केसरी ‘ कंपूशी भांडण्यात जाणार , आपल्यालाविधायक काम करण्यास अवसर रहाणार नाही , यास्तव जगण्यात हशील नसून आत्महत्त्या करणे बरे , असे म्हणण्याची पाळी श्रीधरपंतांवर यावी यासारखी दुसरी अनिष्ट गोष्ट ती कोणती ?

माझ्या मते श्रीधरपंतांना ‘ केसरी ‘ त जागा मिळाली असती तर तो घोर प्रसंग आलाच नसता. ‘ केसरी ‘ पत्रात आपणास जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत्त्वाकांक्षा होती. टिळकांच्या मरणानंतर त्यांच्या हाती ‘ केसरी ‘ गेला त्यांनी केवळ टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधरपंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने ‘केसरी ‘ च्या चालकांत जागा द्यावयास पाहिजे होती. परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे , तर भारदस्त लेखक या दृष्टीने ‘ केसरी ‘ च्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावयास पाहिजे होता.

राजकीयदृष्ट्या ते काही मवाळ नव्हते. जहाल , सुताळ आणि बेताल या सर्वांच्यापेक्षा ते फारच पुढे गेलेले होते. तेव्हा त्यांच्या लिखाणाने ‘ केसरी ‘ ला काही धोका नव्हता ,असे असताना त्यांना ‘ केसरी ‘ त जागा मिळाली नाही. यांचे मला राहून राहून आश्चर्य वाटते. ‘ केसरी ‘ त जागा मिळाली असती तरीही ‘ केसरी ‘ कंपूचा भंड लागून जे व्हावयाचे ते झालेच असते असे काही लोक म्हणतील. कसेही असो एवढी गोष्ट खास की निदान पैशापायी काही भांडण झाले नसते. कारण श्रीधरपंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदार नव्हती. तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्टडीडवर बिनतक्रार सह्या केल्या नसत्या व आज ‘ केसरी ‘ कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण ‘ केसरी ‘ कंपूला असती तर बरे झाले असते.

मला त्यांच्यासंबंधी काय वाटते हे मी त्यांच्या निधनासंबंधीचा लेख लिहिण्यास उद्युक्त झालो आहे यावरून सर्वांना जाणता येण्यासारखे आहे. कै. श्रीधरपंत टिळक हे एका ब्राह्माण्याभिमानी गृहस्थाचे चिरंजीव. त्यांचे वडील लो. टिळक यांना १६१६ साली जेव्हा मी ‘ मूकनायक ‘ पत्र चालवीत असे त्यावेळी दर अंकात जरी नसले , तरी अंकाआड शिव्याशापांची लाखोली वाहात असे. ब्राह्माण्याशी अहनिर्श लढणाऱ्या माझ्यासारख्या अस्पृश्य ज्ञातीतील एका व्यक्तीने ब्राह्माण्याभिमानी व्यक्तीच्या पोटी जन्मास आलेल्या श्रीधरपंतांचे मरणाने दु:खित व्हावे हा योगायोग तर त्यांच्याही पेक्षा विलक्षण आहे हे कोणीही कबूल करील. परंतु हा योगायोगच मोठेपणाची एक मोठी साक्ष आहे.

कोणी काहीही म्हणो , श्रीधरपंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ होती. तेली , तांबोळी म्हणून बहुजनसमाजाचा उपहास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य म्हणणे म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणे , असे आमचे मत आहे. लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकास साजली असती तर ती श्रीधरपंतासच होय . टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही. खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते. तो करण्यास ते उरले नाहीत , ही महाराष्ट्रावरील नव्हे हिंदुस्तानावरील मोठीच आपत्ती आहे , असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्याकोणत्याही लोककल्याणेच्छू माणसास कबूल करणे भाग आहे.

उदय संखे, सौजन्य – लोकसत्ता

महाराष्ट्र हा दुर्गाचा प्रांत! सह्यपठारावर आपण जर नजर फिरवली तर, चार-दोन शिखरांआड एखादा किल्ला तट बुरुजांचा शेला पागोटा मिरवत दिमाखाने उभा असतो. यातील बहुतेक दुर्ग श्रीशिवछत्रपतींची पायधूळ आपल्या मस्तकी मळवट भरल्याप्रमाणे धारण करून अभिमानाने मिरवत उभे आहेत. या शिवस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्राची तीर्थक्षेत्रे आज मात्र उपेक्षेच्या गर्तेत गेलेली आहेत. अनेक पिढय़ांनी अभिमानाने सांगावा, असा इतिहास ज्या ठिकाणी घडला त्यांचे साक्षीदार असणाऱ्या या पाऊलखुणा आज संवर्धनाच्या उपेक्षेत आहेत.. आजही साडेतीनशे वर्षांनंतर शिवरायांच्या स्थापत्यशास्त्राचे दर्शन गड बारकाईने पाहिला तर घडू शकतं! वयाच्या १५-१६ व्या वर्षी बांधून घेतलेल्या तोरणगडापासून ते पन्नाशीत उभारलेल्या कुलाबा किल्ल्यापर्यंतचा आपण बारकाईने, अभ्यासू वृत्तीने विचार केला तर शिवरायांच्या दुर्गविज्ञानाची दृष्टी सतराव्या शतकातही काळाच्या किती पुढे होती हे दिसून येते.

प्रतापगड आपण अगदी पायथ्यापासून पाहिला तर गडाच्या गोमुखी रचनेपासून ते गडाच्या मुख्य दरवाजापर्यंतच दुर्गविज्ञानाची प्रचीती येते! मुख्य दरवाजापर्यंत जाण्यासाठी असणाऱ्या ७५ पायऱ्या या एक समान नसून उंच सखल आहेत. कारण साधारण दोन किलो वजनाची तलवार व तेवढय़ाच वजनाची ढाल पेलत या असमान पायऱ्या चढताना शत्रूंची चांगलीच दमछाक व्हावी, हा मुख्य हेतू! अत्यंत चिंचोळा मार्ग, जेणे करून हत्ती मुख्य दरवाजापर्यंत न यावा आणि गोमुखी रचनेमुळे मुख्यद्वार शोधण्यास अडचण यावी. शत्रू एक-दोन वेळा उलटसुलट फिरून भांबावून जावा हा त्यामागचा उद्देश. इतकेच नव्हे तर मुख्य दरवाजासमोरच्या तटबंदीत जंग्या (त्रिकोणी किंवा चौकोनी झरोके) मधून आणीबाणीच्या वेळी शत्रूस टिपण्यासाठी झरोके ठेवलेले दिसतात! किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे येणारी वाट नियोजनपूर्वक आखली तर शत्रूंच्या अडचणीत भर पडून त्यास भांबावून सोडणे हा मुख्य उद्देश! दोन बुरुजांच्या कवेत निर्माण केलेल्या चिंचोळ्या वाटेत गडाच्या तटावरून तेल, दगड, गरम पाणी फेकून बलाढय़ शत्रूला नामोहरम करण्याची ही नामी योजना या किल्ल्यांवर पाहावयास मिळते. ‘हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा’ या शिवप्रभूंच्या उक्तीस सार्थ करण्यासाठी त्यांच्या पाठीशी सह्याद्री उभा राहिला! या सह्याद्रीच्या अंगाखांद्यावरचे गड-किल्ले हीच मोठी विलक्षण गोष्ट आहे. आधीच सह्याद्री अभेद्य! काळ्याकभिन्न कडय़ांनी वेढलेली गिरिशिखरे, घनदाट जंगलात उतरणाऱ्या खोल दऱ्या, उंचच उंच कडे, घातकी वळणे, अडचणींच्या खिंडी, फसव्या वाटा हे सह्याद्रीचे रूप पाहत गनीम कितीही मोठा असला तरी या प्रदेशात लढाईसाठी विचार करूनच पाऊल उचलत असे!

राजगडाची संजीवनी माची हा तर दुर्गरचनेचा अनोखा आविष्कारच म्हणायला हवा! संजीवनी माचीच्या तीन टप्प्यांत उतरलेल्या डोंगरी सोंडेलगत बुरुजाचे केलेले पहिले बांधकाम, त्यालगत साधारण दोन मीटर अंतर सोडून बाहेरच्या बाजूस पुन्हा मजबूत तटबंदी असे चिलखती बांधकाम! या बांधकामाचं वैशिष्टय़ हे, की बाह्य चिलखती बांधकामाची उंची आतल्या बांधकामापेक्षा जास्त! आधीच दुर्गम भाग त्यामुळे शत्रू सैन्य आले किंवा तोफेच्या माऱ्यात हा बुरुज ढासळला तरी आतला चिलखती बुरुज शाबूत राहीलच; पण बाह्य बांधकाम पडल्यावर शत्रू आत आलाच तर दोन बुरुजादरम्यानच्या अरुंद दोन मीटर जागेत अडून हालचालींवर मर्यादा येऊन गडाच्या सैनिकांच्या हातात अलगद लागून त्यांना ठार मारणे सुलभ जाईल, ही रचना आजही थक्क करते!

आपण आठ शतकांचा साक्षीदार असलेला विजयदुर्ग पाहिला तर आपली मती गुंग होते. १६५३-५४ मध्ये शिवरायांनी हा किल्ला जिंकला आणि मूळचे काही बांधकाम पाडून नवीन तटबंदीयुक्त बांधकाम करून बेलाग किल्ला उभारला. शिवछत्रपतींच्या आरमाराचे मुख्यालय असलेला हा किल्ला, मराठय़ांच्या देदीप्यमान आरमारी पराक्रमाचा साक्षीदार आणि जलदुर्ग वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना असलेला विजयदुर्ग! किल्ल्याच्या जवळ बोटी येण्याआधीच फुटत. याचे कारण कोणालाच उमजत नव्हते. कदाचित किल्ल्याजवळ समुद्रकिनारी जे उथळ खडक पाण्यात आहेत, त्याचा हा परिणाम असावा. असाच तत्कालीन समज पसरून राहिला होता. मात्र १९ व्या शतकात पोर्तुगालमधील लिस्बन येथे भारतीय नौदलाचे कमांडर गुपचूप यांना तेथील पुराभिलेखागारात एक कागद सापडला आणि याचे रहस्य उमजले ते एकमेवाद्वितीयच होते. किल्ला अभेद्य राहावा म्हणून किल्ल्यापासून सुमारे १५० ते २०० मीटर अंतरावर इंग्रजी ‘एल’ आकारात पाण्याखाली थेट समुद्रात साडेचार किलोमीटर लांबीची भिंत बांधून किल्ल्याचे अनोखे संरक्षण करण्यात आले होते! कारण शिवरायांनी परकीय आरमाराचा, त्यांच्या जहाज बांधणीचा अभ्यास केला तेव्हा त्यांना जाणवले, की आपल्या आरमारी बोटीचे तळ हे उथळ असतात; परंतु पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांचे जहाजबांधणीचे ज्ञान जास्त प्रगत होते. ते आपल्या बोटी वेगवान हालचाली करण्यासाठी आपला तळ इंग्रजी ‘व्ही’ आकाराच्या तळाकडे निमुळता होत जाणारा असा बांधत असत. त्यामुळे त्यांच्या बोटी खोल समुद्रातून वेगात जात असत. त्यामुळे अशा प्रकारची भिंत बांधली, की त्यावर या बोटी आपटून-आदळून त्यांना जलसमाधी मिळेल! त्याकाळी सागरी विज्ञान विकसित झालेले नसतानादेखील समुद्राखाली भिंत बांधून किल्ल्याला दिलेले अनोखे संरक्षण हे अनोख्या दुर्गविज्ञानाचे प्रतीकच नाही काय?

विजयदुर्गाप्रमाणे सिंधुदुर्ग बांधतानासुद्धा त्यांनी दुर्गविज्ञान वापरले. कुरटे बेटावर १६६४ ते ६७ मध्ये त्यांनी बेलाग अशी शिवलंकाच उभारली! यामध्ये किल्ल्याच्या उभारणीसाठी त्यांनी पाया बांधताना शिसे व चुना यांचा वापर करून समुद्राच्या लाटांच्या माऱ्याचा परिणाम होणार नाही हे पाहिले! शिशाचा रस ओतून चिरे बसवण्याची कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणून ‘चौऱ्याऐशी बंदरी ऐसी जागा दुसरी नाही. इथे नूतन जंजिरा बसवावा’ हे सार्थ करून उत्कृष्ट जलदुर्ग साकारला! किल्ल्यापर्यंत जाणारा मार्ग हा नैसर्गिकरीत्या सर्पाकृती आहे, कारण मधले समुद्रातील खडक हे तसेच ठेवले. परक्यांची जहाजे, तरांडी अंदाज न आल्यामुळे फुटतील, अशी योजना त्यांनी केली. त्याचप्रमाणे पद्दुर्ग ऊर्फ कांसा किल्ल्याच्या बांधकामाबाबतीत दगडी चिरे झिजलेत; पण चुन्याचा दर्जा मात्र जसाच्या तसा आहे! उत्कृष्ट चुनानिर्मितीचे तंत्र शिवराय आणि त्यांच्या स्थपतीजवळ होते, त्याला शास्त्राची जोड होती हेच सिद्ध होत! खांदेरी किल्ल्याच्या रक्षणासाठी शिवरायांनी वेगळेच तंत्र वापरले. त्यांनी किल्ल्याच्या बेटाभोवती न घडवलेले ओबड-धोबड दगड, चिरे असे बेमालूम पेरले, की भरतीच्या वेळीही दगड दिसावेत. समुद्राच्या पाण्यामुळे या दगडांवर धारदार शंख-शिंपल्यांची वाढ होऊन त्याच्या धारदार कडांमुळे खडकावर वावरणे  अशक्य होऊन बसले. कारण त्याकाळी पादत्राणे ही कच्च्या चामडय़ाची असत. समुद्राचे खारे पाणी अशी पादत्राणे खराब करून टाकीत. त्यामुळे चपला घालता येत नाही आणि चालताही येत नाही, अशा परिस्थितीमुळे लढणे जिकिरीचे होई. शिवाय लाटांचे भरतीच्या वेळी येणारे पाणी दगडावर आपटून मुख्य तटबंदीपर्यंत पाणी न पोहोचू देण्याची पद्धत शिवरायांच्या स्थपतींनी यशस्वीरीत्या वापरली!

कुलाबा किल्ल्याच्या बांधणीत तर भले मोठे चिरे नुसते एकमेकांवर ठेवले आहेत. लाटांचा जोर हा जास्त असल्याने या भिंतीवर लाटा आपटल्या, की पाणी दोन दगडांच्या फटीत घुसते व लाटेच्या तडाख्याचा जोर उणावतो. ही पद्धत कुलाबा किल्ल्याच्या बांधकामात वापरली गेली, अन् आज साडेतीनशे वर्षांनंतरही या किल्ल्यांच्या बांधकामातील एक चिराही सरकलेला नाही! दुर्गनिर्मितीमधला हा एक साधा पण वैज्ञानिक तत्त्वावर आधारलेला प्रयोग यशस्वी ठरला. रायगडावरील महादरवाजाजवळ काही फुटके हौद दिसतात, जे आपणास केवळ फुटके हौद म्हणून दाखविले जातात; परंतु हा प्रकार म्हणजे गडाच्या संरक्षणासाठी केलेली योजना आहे. हे  न पटणारे आहे. रायगडाच्या महादरवाजापर्यंतची अवघड चढण चढून शत्रू सैन्याने किल्ल्यात प्रवेश केला तर दरवाजाजवळ असणारे हे हौद सुरुंगाने उडवून देऊन पाण्याचा लोंढा उतारावर असलेल्या महादरवाजाजवळ वेगाने वाहील व अकस्मात झालेल्या या जलहल्ल्याने, चिखलराडय़ाने शत्रू सैन्याचा धीर खचून त्याची मानसिकता व अवसान गळून पडेल हा त्या मागचा उद्देश! साठवलेल्या पाण्यातून दुर्ग संरक्षण करण्याचा कल्पक हेतू मनी बाळगणारे शिवाजी महाराज हे जगातील पहिले आणि शेवटचे राजे होत!

तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी जे किल्ले, दुर्ग बांधले तेथे शौचकुपाची व्यवस्था होती. रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग आदी किल्ल्यांवर आजही अगदी सुस्थितीत असलेले शौचकूप पाहणे रोमांचकारी आहे. त्यातील विज्ञान आणि तंत्रज्ञान आवर्जून पाहण्यासारखे आहे. ज्या काळात अभियांत्रिकी किंवा स्थापत्यशास्त्राचे शिक्षण देणाऱ्या शिक्षणसम्राटांच्या संस्था नव्हत्या. दुर्गबांधणीमध्ये वेगवेगळे प्रयोग करून पाहण्याएवढे राजकीय स्थैर्य नव्हते, राज्यात कधीही परकीय दमनचक्र येणाऱ्या काळात, स्वकीय, तसेच परकीयांशी झुंजण्यात कालापव्यय होत असताना शिवाजी महाराजांचे असे एकमेवाद्वितीय, शास्त्रीय आधारांवर दुर्गबांधणीचे प्रयोग त्यांची दुर्गबांधणीतील वैज्ञानिक बैठक ही आश्चर्यकारकच आहे.

महाराष्ट्रात दुर्गकारण यशस्वी करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर याच किल्ल्यांच्या साक्षीने मराठी आणि मावळी मन लढले! आज किल्ल्यांची दुरवस्था झाली असली तरी निखळलेला प्रत्येक चिरा स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या पराक्रमी पूर्वजांची कहाणी सांगतो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या असामान्य दुर्गविज्ञानाची दृष्टी पाहून म्हणावेसे वाटते.

।। शिवरायांसी आठवावे।।
जीवित तृणवत मानावे..।।

सुहास पळशीकर , सौजन्य – म टा

[लेख २००४ साली लिहिला आहे.]

राजकारण म्हणजे काय असते ? बहुतेकांच्या मनात राजकारणाची अशी प्रतिमा असते की लबाडी, चलाखी किंवा गैरमार्गाने स्वार्थ साधणे म्हणजे राजकारण. पण या स्वार्थसाधनाच्या पलीकडे ,सार्वजनिक व्यवहारांमध्ये असलेल्या सार्वजनिक वादक्षेत्राला (खरे तर त्यालाच) राजकारण म्हणतात. आता येऊ घातलेला निवडणुकांचा उत्सव हा या राजकारणाचाच एक भाग आहे. हे राजकारण म्हणजे काय असते ?

सार्वजनिक व्यवहारांमधील तीन वादक्षेत्रे मिळून ‘ राजकारण ‘ नावाची वस्तू साकारते. एक वाद असतो हितसंबंधांचा. भिन्न समूहांच्या गरजा , अपेक्षा , साधन-सामग्रीमधील त्यांचा वाटा म्हणजे त्यांचे हितसंबंध. हे हितसंबंध भिन्न असतात , परस्परविरोधी असतात. त्यामुळे ‘ कोणाला काय आणि किती ‘ याबद्दल विवाद होत असतात. त्या विवादातून वाट काढीत धोरणे ठरविण्यासाठी जी रस्सीखेच चालते ती राजकारणाचा एक भाग असते. शेतकऱ्यांच्या सब्सिडीवरचे वाद ,कामगारांच्या बोनसबद्दलचे वाद , शेतमजुरांच्या मजुरीच्या दराबद्दलचा वाद , शहरांना पाणी किती द्यावे याबद्दलचा वाद… अशी हितसंबंधांवर आधारित वादाची उदाहरणे देता येतील. दुसरा वाद हा भिन्न समूहांच्या आत्मभानाचा , प्रतिष्ठेचा , सन्मानाचा असतो. आपला इतिहास , प्रतीके, ऐतिहासिक स्मृती यातून प्रत्येक समूहाची ‘ स्व-प्रतिमा ‘ तयार होते. आपण त्याला ‘ अस्मिता ‘असेही म्हणतो. या अस्मितेच्या आधारे आणि तिच्यासाठी होणारे राजकारण हे अस्मितेचे राजकारण म्हणता येईल. जात , धर्म , वंश , प्रांत यांच्या आधारे आणि त्या घटकांसाठी चालणारे वाद हे अशा अस्मितेच्या राजकारणाची उदाहरणे म्हणून दाखविता येतील. खालिस्तानची मागणी, नागा किंवा बोडोंच्या मागण्या , वेगळ्या राज्याच्या मागण्या , भारत हे हिंदुराष्ट्र आहे असे दावे ,ही या राजकारणाची उदाहरणे.

तिसरा वाद असतो तो सत्तेतील एखाद्या समूहाच्या वाट्याबद्दलचा. सार्वजनिक सत्ता एकाच समूहाने बळकावल्याची तक्रार करीत जेव्हा प्रादेशिक , जातीच्या किंवा धर्माच्या वगैरे आधारावर सत्तेत वाटा मागितला जातो तेव्हा या प्रकारचा वाद अस्तित्वात येतो. अर्थातच या तीन वादक्षेत्रांचे अस्तित्व एकमेकांपासून पूर्ण अलिप्त नसते. त्यांची अनेक वेळा सरमिसळ होते व त्यातून प्रत्यक्ष राजकारण घडते.

राजकारणाची चौकट बदलते आहे/ बदलली आहे , असे आपण म्हणतो तेव्हा या तीन वादक्षेत्रांमधील बदलांविषयी आपण बोलत असतो.

1947 ते 1977 या तीस वर्षांच्या काळात भारतात राजकारणाची एक चौकट विकसित झाली होती. विविध छोट्या समूहांच्या अस्मितांचा मुद्दा वादग्रस्त असला तरी एक विविधतापूर्ण ,बहुविध अस्मितांचे राष्ट्र ही आपली ओळख आपण सर्वसाधारणपणे स्वीकारली होती. मग या मोठ्या छत्रीत आपल्याला जास्त/पुरेशी जागा मिळावी म्हणून रेटारेटी चालत होती. या कालखंडात सत्तेला एक सामाजिक चारित्र्य नक्कीच होते. त्याबद्दल धुसफूसही चालू असे. ढोबळ मानाने , उच्च आणि काही वरिष्ठ मध्यम जातींकडे एकूण पुढारपण होते. हितसंबंधांचे राजकारण श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरीवर आधारलेले होते. एकीकडे बड्या भांडवली हितसंबंधांची पाठराखण आणि दुसरीकडे ‘ गरीबी हटाव ‘ चे स्वप्न या चौकटीत हितसंबंधांचे राजकारण उभे राहिले होते.

1977 च्या काँग्रेसच्या पराभवानंतर या साचेबंद राजकीय चौकटीला तडे जाणे स्वाभाविक होते. जनता पक्षाच्या फाटाफुटीचा तमाशा आणि इंदिरा गांधींच्या खुनाचा धक्का या घटकांमुळे बदलत्या चौकटीकडे पुरेसे लक्ष गेले नाही (जनतेचे आणि अभ्यासकांचेही). पण राजीव गांधींच्या तरुणाईची धमक ओसरल्यानंतर जे राजकारण घडले ते एका नव्या चौकटीत साकारले होते.

अस्मितांच्या रणभूमीवर ‘ मंदिर ‘ प्रकरणातून एक नवी अस्मिता उभी राहिली. ‘ हिंदू अस्मिता ‘हे तिचे नाव. ती एकाच वेळी छत्रीसारखी समावेशकही होती आणि ‘ पर ‘ वर्जकही होती. ‘ मंदिर’ प्रकरणाने एक नवे द्वैत उभारण्याचा प्रयत्न केला. ‘ हिंदू राष्ट्रवाद वि. धर्मनिरपेक्षता ‘ असे त्या द्वैताचे चुकीचे आकलन गेली दहा-पंधरा वषेर् सतत मांडले जात आहे. हिंदू राष्ट्रवाद विरुद्ध भारतीय राष्ट्रवाद असे हे द्वैत आहे. राष्ट्राची भावनिक सीमारेषा ‘ हिंदू ‘ नावाच्या अस्मितेपाशी आखायची की भारत नावाच्या ऐतिहासिक अस्मितेपाशी आखायची असा हा वाद आहे.

भारतीय राजकारणाच्या चौकटीत बदल घडविणारा दुसरा ‘ म ‘ कार म्हणजे ‘ मंडल ‘. जसा ‘मंदिर ‘ विषयक वाद हा काही विशिष्ट जागी मंदिर बांधण्यापुरता नव्हता तसेच ‘ मंडल ‘ चा वाद केवळ आरक्षणाच्या मुद्यापुरता नव्हता. मध्यम आणि कनिष्ठ जातींच्या सत्तेतील वाट्याचा प्रश्न त्याने उभा केला.

1980 पासूनच भारताच्या आथिर्क धोरणांमध्ये काही बदल घडून येत होते. पुढे नव्वदीच्या दशकात अधिकृतपणे नवभांडवलशाहीची पालखी काँग्रेसने खांद्यावर घेतली. यातून मध्यमवर्गाचा राजकीय अर्थव्यवस्थेवर वरचष्मा निर्माण होण्याचा मार्ग खुला झाला. श्रीमंत वि. गरीब या द्वैताऐवजी मध्यमवर्ग वि. गरीब असे नवे द्वैत हितसंबंधांच्या वादक्षेत्रात अवतरले. त्यामुळे धोरणविषयक चचेर्चा सगळा नूर पालटला. आथिर्क वादांमागचे युक्तिवाद बदलले ,विचारप्रणालींची टोके बोथट झाली.

नव्वदीच्या दशकातील या बदलांमुळे राजकारणातील वादांचे स्वरूप बदलले. वादक्षेत्राच्या सीमा बदलल्या. या बदलांचे प्रतिबिंब 1996-98-99 च्या निवडणुकांमध्येही पडले. दशकभरातील राजकीय घुसळण या तीन ‘ म ‘ कारांभोवती झाली.

पण खरा मुद्दा वेगळाच आहे. या बदलांच्या पाठोपाठ आपल्या राजकारणाच्या चौकटीत आणखीही एक स्थित्यंतर घडून येत आहे. एक नवी राजकीय चौकट उदयाला येऊ पाहात आहे. मंदिर , मंडल आणि मध्यमवर्ग हे तिन्ही ‘ म ‘ कार आता स्थिरावल्यासारखे दिसत आहेत. जणू काही राजकारणातील विवादक्षेत्रासाठीची लढाई अचानकपणे खंडित झाली आहे. राजकारणाला जणू अद्वैत कळा प्राप्त झाली आहे. हितसंबंधांच्या प्रांगणात मध्यमवर्गाचे वर्चस्व प्रस्थापित झाले आहे ;अस्मितांच्या शर्यतीत हिंदुत्वाचा रथ बराच पुढे निघून गेला आहे आणि सत्तेच्या वाटणीत हाती आलेल्या मर्यादित संधींवर समाधान मानणे मंडलवाद्यांना भाग पडले आहे.

1991 पासून आलेली अर्थव्यवस्था मध्यमवर्गाला आणि उच्च मध्यमवर्गाला सुखाने गुदगुल्या करणारी होतीच. पण गेल्या चार-पाच वर्षांमध्ये मध्यमवर्गाच्या उत्कर्षाला पारावार राहिला नाही. दुसरीकडे , भाजपाच्या विचारप्रणालीविषयीचे वाद चालू राहिले तरी हिंदू राष्ट्रवाद ही एका छोट्या गटाची विचारप्रणाली न राहता बुद्धिवादी , मध्यमवगीर्य , शहरी-ग्रामीण , उच्च जाती ते कनिष्ठ जाती अशा विविध स्तरांमध्ये तिची स्वीकारार्हता वाढली. ‘ मंडल ‘ चा मुद्दा वेगळ्या रीतीने संपला. बहुतेक पक्षांनी आपापल्या यंत्रणेत ‘ मंडल ‘ ची ऊर्जा सामावून घेण्याचा प्रयत्न केला आणि मंडलवादाला मात्र सोडचिठ्ठी दिली.

या सर्र्व घडामोडींचा परिणाम म्हणजे नव्वदीच्या दशकातले ‘ वाद ‘ आणि ‘ विग्रह ‘ झपाट्याने बाजूला पडून राजकीय पक्षांमधल्या मतभिन्नतेचं क्षेत्र कमी-कमी होत चालले आहे. आथिर्क धोरणे एकसारखीच असलेले राजकीय पक्ष एकमेकांना विरोध करण्याचे मुद्दे शोधण्यात गुंतलेले आहेत. नव्वदीच्या दशकात मंडलवादाचा जोश आज लालू-मुलायम यांच्यात दिसत नाही आणि जमातवादाविरोधात आघाडी उभारण्याचा उत्साहही आढळत नाही.

अनेक राजकीय पक्षांमध्ये कळीच्या मुद्द्यांबद्दल कमीअधिक एकवाक्यता झाल्यामुळे राजकारणात पोकळ विवादांना तोंड फुटते. राजकारणातील वादक्षेत्रांचा संकोच होतो. अस्सल सार्वजनिक विवादांचा निर्णय लांबणीवर पडतो. चळवळी , आंदोलने यांची ताकद रोडावते. लोक आणि राजकारण यांच्यात फारकत होण्याची शक्यता निर्माण होते.

हितसंबंध , अस्मिता आणि सत्तेतील वाटा या तीन विषयांबद्दलचे दावे-प्रतिदावे यामधून निवडणुकीचे राजकारण जिवंत बनते ; त्यातून जनतेच्या हिताची शक्यता निर्माण होते. सहमतीच्या राजकारणातून नकली स्पर्धा घडून येते. विवादाच्या राजकारणातून समूहांच्या आकांक्षांना तोंड फुटते. येत्या निवडणुकीच्या गदारोळात नुसतीच ‘ कोणी गाविंद घ्या – कोणी गोपाळ घ्या ‘ अशा थाटाची पोकळ स्पर्धा होणार की भिन्न जनसमूहांचे प्रतिनिधित्व करणारे अस्सल विवाद होणार यावर आगामी काळातल्या राजकारणाचे स्वरूप ठरणार आहे. निवडणुकीचा ‘ गोंधळ ‘ महत्त्वाचा आहे तो याच कारणासाठी.

उत्तम कांबळे, सौजन्य – सकाळ

डाळ महागलेली, तांदूळ महागलेला, एकूणच जगणं महागलेलं, सोबतीला पाणी आणि विजेची टंचाई आहेच. अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा मानल्या जातात, त्यांचीही पूर्तता होऊ नये, अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. अशा वेळी सामान्य माणसानं ज्यांच्याकडे उत्तरासाठी पाहायचं, ती राजकीय मंडळी मात्र भावनेच्या राजकारणात मश्‍गूल आहेत. कधी भाषेची, कधी भावनांची, तर कधी प्रांताची आरोळी ठोकत आहेत.

महाराष्ट्रात नेहमीइतकी नसली, तरी थोडीफार थंडी आहे. तिचा लोकांना त्रास होऊ नये, वातावरण तप्त नसले, तरी ऊबदार राहावे यासाठी राजकारण्यांनी पुन्हा चर्चेसाठी गरमागरम विषय घेतले आहेत. रोज असा कोणता ना कोणता विषय येतो आणि तो याच सामान्यांना त्यांच्या मूळ प्रश्‍नांकडून गर्रकन वळवतो व आपल्या आंबट-गोड चर्चेकडे लक्ष वेधून घेतो. चर्चेसाठी कोणते विषय कधी आणायचे यासाठी महाराष्ट्रातील राजकारण्यांकडे असणारी कल्पकता जगातल्या अन्य कोणत्याही राजकारण्यांकडे नसेल. नवे सरकार सत्तेवर येऊन आज फेब्रुवारीच्या सात तारखेला 93 इतके दिवस पूर्ण होतील. पुढच्या रविवारी सरकार शंभर दिवसांचे होईल. निवडणूक काळात दिलेल्या आश्‍वासनांकडे सत्ताधारी लक्ष देतील आणि विरोधक त्यांना भाग पाडतील, असे वाटत होते. नागपूरचे अधिवेशन नेहमीप्रमाणे मोर्चे, निदर्शने आणि मेळाव्यांनी गाजले. त्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला तो बिनविषयाचे (र्खीीीशश्रशीी झेश्रळींळली) राजकारण करण्याचा.

मराठी-अमराठी…
चर्चेसाठी कोणताच विषय मिळाला नाही, तर “मराठी-अमराठी’ हा कधीही मदतीला येणारा हुकमी विषय आहे. या विषयाचा कीस पाडण्याचे प्रयोग होतात. कधी तेंडुलकरांच्या, कधी आझमींच्या, कधी कोणा उद्योगपतीच्या विधानावर मुंबईला हलवण्याचा प्रयत्न होतो. मुंबई कुणाची, असा एक अवघड प्रश्‍न मांडला जातो. मुंबई महाराष्ट्राची याविषयी शंका कुणालाच नाही; पण याच एक सनातन प्रश्‍नावर चर्चा करण्याचा मोह भल्याभल्यांना होतो. मुंबई चर्चेत येते; पण विकासात येत नाही. मराठी माणूस चर्चेत येतो; पण तो मुंबईत तग धरेल, अशी व्यवस्था नाही. ती तशी करावयाची कुणाला इच्छा आहे, की नाही, हाच प्रश्‍न आहे. मग कधी टॅक्‍सी ड्रायव्हर चर्चेचा विषय बनतो, कधी पाववडा, तर कधी कांदापोहे… वाढत्या बर्गरविरुद्ध, वाढत्या चायनीजविरुद्ध वडापाव किंवा कांदापोहे कसा टिकाव धरणार, याचा फॉर्म्युला कुणाकडे नाही. राजकीय बनलेले हे दोन पदार्थ हॉटेल मॅनेजमेंटमधून कसे हद्दपार झाले, याची चौकशी कोणत्याही शाखेने केली नाही. जेव्हा हे पदार्थ वादासाठी कमी पडायला लागतात, तेव्हा मग कोथळा गाजायला लागतो. तो कमी पडला, की नामफलक गाजायला लागतात. ते कमी पडू लागले, की निर्माण न होणाऱ्या नोकऱ्यांचा प्रश्‍न गाजतो. महाराष्ट्रात नेमक्‍या नोकऱ्या किती तयार होतात, त्यावर अधिकार सांगण्यासाठी कोणती भलीमोठी रांग आहे आणि रांगेत राहूनही ज्यांची मनगटे रिकामीच राहणार आहेत, त्यांचे काय करायचे, यावर कधी चर्चेचा फड रंगलेला नाही. दर वर्षी मराठी शाळा बंद पडत आहेत. त्या जागी मॉडर्न इंग्लिश स्कूल उभ्या राहत आहेत. मराठीसाठी गळे काढणाऱ्यांनी बंद पडणाऱ्या किती शाळा वाचवल्या आणि महाराष्ट्राबाहेर जाणारे किती उद्योगधंदे रोखून धरले, हा प्रश्‍न आता विचारायला हवा.

उदय नव्या सेन्सॉरचा
राजकारण्यांचे एक बरे असते. त्यांना कुठेही कबुतराप्रमाणे घुटर्रगुम करता येते. कोणत्याही विषयात असलेले आणि नसलेले राजकारण त्यांना बाहेर काढता येते. अगदी “झेंडा’ आणि “शिक्षणाच्या आयचा घो’ यांसारख्या चित्रपटांचेच उदाहरण घ्या. हे चित्रपट पडद्यावर येण्यापूर्वीच सारा महाराष्ट्र ढवळून काढण्याचा महापराक्रम राजकारण्यांनी केला. गावाकडचा शेतकरी धान्याच्या राशीतील पहिली मूठ जशी ग्रामदेवतेला वाहतो, तसा आता “पहिला शो’ राजकारण्यांच्या दरबारात करावा लागतो. अभिव्यक्तीसाठी मानेच्या शिरा ताणेपर्यंत बोलणारे आणि चित्रपट काढणारे काही लोकही अशा दरबारात हजेरी लावून डावा-उजवा कौल घेतात, ही आणखी वेगळी गोष्ट.
पूर्वी चित्रपटांच्या श्रेयनामावलीत कुणी विचारवंत, कुणी समाजसेवक, कुणी एक चळवळ यांची नावे यायची. आता ती जागा राजकारणातील बाहुबलींनी घेतलीय. कुणा तरी दादा-अण्णा किंवा संघटनेचे नाव सुरवातीला दिसते. अगोदर त्यांच्यासाठी नमन झाले, की मग सिनेमा सुरू होतो. कायदेशीरदृष्ट्या अस्तित्वात असलेल्या सेन्सॉरच्या बाहेर नव्या सेन्सॉरचा उदय लोकशाहीत अशा प्रकारे होतो आहे. उद्या कदाचित या शक्ती स्वतःच चित्रपटवाल्यांना विषय पुरवतील. एक यादी तयार करतील. यादीबाहेर जाण्यास कदाचित बंदीही घालतील.

चित्रविचित्र विधानांचा पूर
स्वतंत्र विदर्भाचा प्रश्‍न एक स्वतंत्र प्रश्‍न आहे; पण अशा प्रश्‍नासाठी नक्षलवाद्यांची मदत घ्यावी की नाही, अशी चर्चा सुरू झाली. नक्षलवादी म्हणजे दहशतवादी आणि लोकशाहीचे मारेकरी आहेत, असे सांगणारे आता नक्षलवाद्यांमध्ये नवे रूप पाहू लागले आहेत. अशा प्रकारे नक्षलवाद्यांच्या उदात्तीकरणाचे नेमके परिणाम काय होतील, हेही सांगायला कोणी तयार नाही.

आणखी काही चित्रविचित्र विधानांवरही राजकारणातील हवा थोडीफार गरम झाली. जातपडताळणीसाठी आदिवासी बांधवांची “डीएनए’ चाचणी घेतली पाहिजे, असे विधान बबनराव पाचपुते यांनी केले. अर्थात, हे विधान व ही योजनाच अव्यवहार्य! एकाची “डीएनए’ चाचणी करायची म्हटली, की अकराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. लाखो आदिवासींसाठी एवढे पैसे कोणत्या तिजोरीतून आणणार, समजा पैसे आणल्यावर प्रयोगशाळा कोठून येणार? त्या आणायच्या असतील, तर मग आपल्याच नात्यागोत्यातील कुणाला तरी खासगीत प्रयोगशाळा सुरू करा, असे सांगण्याची वेळ येणार. अर्थात, हा सारा प्रकार एका दिवसासाठीचा नाही; पण बबनरावांनी विधान केले आणि ते मोकळे झाले. मग अशा मंत्र्यांचीच डीएनए चाचणी करा, अशी मागणी पुढे आली. लक्ष्मणराव ढोबळ्यांचे दांडकेही असेच गाजले किंवा गाजवण्यात आले. असे कितीतरी विषय सांगता येतील, की ज्यांना आगा-पिछा नाही किंवा जे भावनाप्रधान आहेत आणि त्यावरच आपण चर्चा करीत आहोत. या चर्चेतून कुणाला काय मिळणार, असा प्रश्‍न उचित ठरणार नाही; कारण असे प्रश्‍न नेहमीच निरुत्तरित राहतात. नितीन गडकरी यांनी मोदी आणि गांधी यांची केलेली तुलना असो किंवा मुंबईत हल्ल्याच्या वेळी बिगरमराठी बांधवांनीच तिचे रक्षण केले, हे राहुल गांधींचे विधान असो… सारे काही भावना कुरवळणारे किंवा ओरबडणारे आणि त्यावर राजकारणाचे पातेले ठेवणारे, असेच काही आहे.

‘उगवती’कडे पाहणार की नाही?
शेतकऱ्यांच्या आत्महत्येची लाट आता कुठे थोडीफार ओसरत असतानाच महाराष्ट्रात नव्या वर्षापासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची लाट सुरू झाली. गेल्या 30-35 दिवसांपैकी प्रत्येक दिवस महाराष्ट्रातील कोणा तरी मुलखातून कोणा तरी विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी आणतो. एरवी एखादा दारू ढोसून मरण पावला, तरी आपण भरपाई देतो. झाडावरून पडून किंवा विजेचा तडाखा सोसून मरण पावला, तरी भरपाई देतो. अशी भरपाई देऊ नये, असे कोणी म्हणणार नाही. गरिबांचे संसार उघड्यावर पडणार नाहीत, याची काळजी कल्याणकारी राज्यात घ्यावीच लागते. एरवी पुढारी अशा कुटुंबीयांकडे जातात. त्यांच्याबरोबर फोटो काढून घेतात. पाच हजारांची मदत देऊन माध्यमातील दहा हजारांची जागा अडवतात, तो भाग वेगळा; पण अशी करुणा विद्यार्थ्यांबाबत का येत नाही? महिनाभरात 65 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करणे, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. उद्याचा देश ज्यांच्या खांद्यावर उभा राहणार आहे, ते खांदे देशाऐवजी मरण का वाहून नेत असतील, याचा गांभीर्याने कोणी विचार केला नाही. शिक्षणव्यवस्थेविषयी कुणी गंभीर चर्चा केली नाही. काही अपवाद वगळता पालकांचे अश्रू पुसण्यासाठी कुणी गेले नाही, की कुठे शोकसभाही भरली नाही. मृत्यूला सामोरे जाण्याचा प्रयत्न उगवतीने करू नये यासाठी सरकारने कोणता कार्यक्रम आखला आणि राबविला आहे, असा प्रश्‍न आज नसेना का; पण डोळ्यांतील पाणी सुकल्यानंतर तरी काही अभागी पालक विचारतील.

पाणी, वीज टंचाईचे करणार काय?
मार्च उजाडण्यापूर्वीच महाराष्ट्रातील 20 हजार 240 गावांनी पाण्यासाठी टाहो फोडला आहे. मार्च संपला, की हा आकडा आणखी फुगेल. मुंबईत पाणीटंचाई वाढतेय. उर्वरित महाराष्ट्रातही टॅंकर पळू लागले आहेत; पण ते पळूनपळून किती पळणार? जर विहिरींनाच तहान लागत असेल, तर पाणी कोठून आणणार? प्रश्‍न पाण्याचा जसा निर्माण होतो आहे, तसाच तो विजेची टंचाईही घेऊन येतो. महाराष्ट्राला रोज तीन-चार हजार मेगावॉट विजेची टंचाई आहे. पुढच्या महिन्यात ती आणखी वाढेल. दिल्लीपती थोडे फार प्रसन्न झाले आणि दाभोळने खरोखरच निर्मिती वाढवली, तरीही लोडशेडिंग संपणार नाही. नागरिकांना याबाबत विश्‍वासात घेणे, त्यांना दिलासा देणे, उपलब्ध साधनसामग्रीत जगण्याचे नवे मार्ग सांगणे आदी अनेक गोष्टी राजकारणी करू शकतात; पण प्रश्‍न घेऊन राजकारण करायचेच नाही, असा जणू एक अलिखित सिद्धांतच झाला आहे. तोच रोज रोज गिरवला जातोय.

महागाईचे चटके सामान्यांनाच
वाढती महागाई हा आणखी एक ज्वलंत विषय. जगभरच महागाईने आपला जबडा पसरला आहे. या कालखंडात तरी शिधावाटप दुकाने सक्रिय आणि प्रामाणिक असावीत, माणूस जगवण्याच्या प्रयत्नातील त्रुटी संपून गती यावी, जनजागर व्हावा, असा कार्यक्रम कुणाच्याच अजेंड्यावर नाही. महागाईचे चटके सामान्यांनाच बसतात. पुढाऱ्यांना, आमदार, खासदार आणि मंत्र्यांना महागाई शोधूनही सापडत नाही. सरकारी खर्चातूनच त्यांना चंगळवादी जीवन उपभोगता येते. उदाहरण म्हणून खासदाराला नियमाप्रमाणे मिळणाऱ्या सवलतींचा तक्ता दिला आहे. हा लेख लिहीत असतानाच माझ्या एका सहकाऱ्याने मला तो पाठवला आहे. असो. कधी तरी कुणाचे तरी तोंड काळे केले आणि कॅमेऱ्यात स्वतःला फिट केले की झाले आंदोलन, अशी धारणा अलीकडे वाढीला लागली आहे. एकीकडे महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव आणि दुसरीकडे प्रश्‍नांचा हा चक्रव्यूह… असे चित्र आहे. हे सर्व बदलण्यासाठी संवेदनशील राजकारण्यांची गरज असते; पण पाण्याप्रमाणेच याही गोष्टीचा दुष्काळ महाराष्ट्रात वाढतो आहे. सागरातील खारे पाणी एखाद्या वेळी पाण्याप्रमाणे पैसा ओतून गोडेही करता येते; पण संवेदना जन्माला घालण्यासाठी अजून तरी कोणी लॅबमध्ये प्रयोग केलेला नाही.

लोकांचे प्रश्‍न घ्या अजेंड्यावर
राजकारण्यांच्या अजेंड्यावर लोकांचे प्रश्‍न किती आहेत आणि राजकीय साठमाऱ्या किती आहेत, हे लोकांनीच विचारायला हवे. बरोबर आठ दिवसांनी म्हणजे 14 फेब्रुवारीला राज्य सरकारचे नवे शंभर दिवस पूर्ण होतील. तेव्हा तरी हे प्रश्‍न विचारायला हवे आहेत. विरोधकांनीही विचारायला हवेत. कुणाच्या अंगावर किती सोने याचे मोजमाप करण्याऐवजी सर्वार्थाने अडचणीत सापडलेल्या आणि आपल्या डोक्‍यावर एक लाख 80 हजार कोटींचे कर्ज घेऊन थकलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण करणार की नाही, असाही प्रश्‍न आहे. विषयहीन राजकारण पुढाऱ्यांचे भले करेल कदाचित; पण सामान्य माणसाला त्याचा काय लाभ?

असा हा आजचा महाराष्ट्र
* 35 दिवसांत सुमारे 70 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
* सुमारे 21 हजार गावांचे घसे पडले कोरडे
* भारनियमनाचा हंगाम सुरूच राहणार
* महाराष्ट्राच्या डोक्‍यावर एक लाख 80 हजार कोटींचे कर्ज
* रोजगारनिर्मितीला नाही वेग, अनेक उद्योग जाताहेत महाराष्ट्राबाहेर.
* मुंबईसह ठिकठिकाणी मराठी शाळा बंद होताहेत.

राजकीय अजेंड्यावर…
* मराठी-अमराठी वाद
* चित्रपटाचे राजकारण
* परवान्याचे राजकारण
* जुन्या वादाची नव्याने धुणी-भांडी
* प्रतीकात्मक आंदोलने

कशी समजणार यांना महागाई
लोकप्रतिनिधींना महागाई लवकर का कळत नाही त्याचे हे एक कारण. प्रत्येक खासदाराला मिळणाऱ्या पुढील सवलती पाहा…
* मासिक वेतन 12,000 रुपये
* कामकाजासाठी मासिक खर्च 10,000 रुपये
* कार्यालयीन खर्च 14,000 रुपये
* प्रवासभत्ता (किलोमीटरला आठ रुपयांप्रमाणे) 48,000 रुपये
* अधिवेशन काळात रोज 500 रुपये
* रेल्वेत प्रथम वर्गातून देशभर कुठेही कितीही प्रवास
* विमानात बिझनेस क्‍लासमधून पत्नी किंवा पीए सोबत 40 वेळा मोफत प्रवास
* घरगुती वापरासाठी 50 हजार युनिटपर्यंत वीज मोफत
* स्थानिक संपर्कासाठी एक लाख 70 हजार कॉल मोफत
* कार्यालयासाठी काही अत्यावश्‍यक वस्तू / सुविधा
* प्रत्येक खासदारावर सरकारी तिजोरीतून दरमहा अंदाजे 2.66 लाख आणि वर्षाला 32 लाख रुपये खर्च
* सर्व म्हणजे 534 खासदारांवर वर्षाला सरकारी तिजोरीतले होतात 855 कोटी रुपये खर्च
* मंत्र्यांचा तोरा न्यारा

मूळ लेखक : डॉ. असगरअली इंजिनीअर
अनुवाद : नंदिनी चव्हाण

सौजन्य – लोकसत्ता

इस्लाममध्ये बहुपत्नीत्वाचा मुद्दा खूपच वादग्रस्त आहे. कट्टरपंथी मुस्लिम उलेमांचे असे मत आहे की, ही प्रथा इस्लामी शरियतचा भाग आहे. त्यामुळे कुठलेही योग्य वा सयुक्तिक कारण न देता पुरुषाला वाटलं तर तो चार बायका (पत्नी) करू शकतो. कुराणात नेमके काय म्हटले आहे? कुराणाचा अंतस्थ हेतू हा ‘बहुपत्नीत्वा’च्या प्रथेला नष्ट करणं हाच आहे..

————-

इस्लाममध्ये बहुपत्नीत्वाचा मुद्दा खूपच वादग्रस्त आहे. कट्टरपंथी मुस्लिम उलेमांचे असे मत आहे की, ही प्रथा इस्लामी शरियतचा भाग आहे. त्यामुळे कुठलेही योग्य वा सयुक्तिक कारण न देता पुरुषाला वाटलं तर तो चार बायका (पत्नी) करू शकतो. दुसऱ्या बाजूने आधुनिकतावादी आणि स्त्री-अधिकारांच्या समर्थकांचे म्हणणे असे आहे की, बहुपत्नीत्वाला विशिष्ट परिस्थितीतच मान्यता दिली गेली आहे. तीही कडक अटी लागू करूनच! त्यात सगळ्या पत्नींना त्या पुरुषाने समान न्याय देणे अभिप्रेत आहे. पुरुष एखादी स्त्री त्याला आवडली किंवा तिच्या सौंदर्याची त्याला भुरळ पडली म्हणून एकापेक्षा अधिक विवाह करू शकत नाही. कुराणाची रीत एकपत्नी विवाहाचीच आहे. परंतु काही विशिष्ट अपवादात्मक परिस्थितीत (न्यायासाठी कडक अटी लागू करून) बहुपत्नीत्वाची परवानगी दिली गेली आहे.

कट्टरपंथी उलेमा जी कारणे देऊन बहुपत्नीत्वाचे समर्थन करतात, त्यांचा कुराणामध्ये साधा उल्लेखही नाही. ते असा युक्तिवाद करतात की, पुरुषाच्या लैंगिक गरजा या स्त्रीपेक्षा अधिक असतात. स्त्रीशी गरोदरपणात आणि प्रसूतीकाळात कामक्रीडा करणे शक्य नसते, त्यामुळे या कालावधीत पुरुषाला एकापेक्षा अधिक पत्नींची आवश्यकता भासते. त्यांचे असेही म्हणणे आहे की, एखादी स्त्री असाध्य रोगाने ग्रस्त असेल तर तिला घटस्फोट देऊन मानसिक आघात देण्यापेक्षा दुसरा विवाह करणे अधिक सयुक्तिक असते. आणि समजा, एखाद्या स्त्रीमध्ये वंध्यत्व आले असेल तर तिला अधिक दुखावण्यापेक्षा दुसरा विवाह करणे श्रेयस्कर ठरेल.

ही कारणे नि:शंकपणे व निर्विवादपणे कुराणात दिलेली नाहीत. आणि महम्मद पैगंबरसाहेबांच्या सुन्नतमध्येही (हदीस) त्याचा उल्लेख आढळत नाही. ही कारणे काही उलेमांनी बहुपत्नीत्व न्याय्य ठरवण्यासाठी दिलेली आहेत. याव्यतिरिक्त ते हेही कारण देतात की, स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे, त्यामुळे बहुपत्नीत्वाची ही प्रथा स्त्रियांना बदनामीपासून वाचविण्यासाठी अल्लाहने घालून दिलेल्या मर्यादांचा भंग न करता त्यांना सन्माननीय जीवन जगणे शक्य करते.

आधुनिकतावादी आणि स्त्री-अधिकाराचे पुरस्कर्ते ही सर्व कारणे अमान्य करतात. त्यांचे म्हणणे असे की, विज्ञान आणि जीवशास्त्रानुसार हे सिद्ध होत नाही की, स्त्रियांच्या लैंगिक गरजा पुरुषांच्या तुलनेत कमी असतात. मात्र, स्त्रियांची सामाजिक जडणघडणच अशी झालेली असते, की त्या लैंगिकतेला मुरड घालताना दिसतात. त्यांना सुयोग्य वातावरण मिळाले तर त्याही लैंगिकदृष्टय़ा पुरुषांइतक्याच सक्रिय होऊ शकतील. स्त्री-अधिकारांच्या समर्थकांचे असेही म्हणणे (मानणं) आहे की, पुरुष हा केवळ लैंगिक प्राणी नाही, की तो आपल्या पत्नीच्या गरोदरपणी आणि प्रसूतीकाळात स्वत:च्या लैंगिक भावनांवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. हजारो पुरुष संयम पाळतात. सर्व पुरुषांचा कल बहुपत्नीत्वाकडे असत नाही. उलटपक्षी अधिकांश पुरुष एकच विवाह करतात आणि जेव्हा कधी त्यांची पत्नी दीर्घकाळाकरिता आजारी पडते, त्यांच्या लैंगिक गरजा पूर्ण करू शकत नाही, तेव्हाही ते आपल्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवतात. अशावेळी आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासाठी ते करत असलेला त्याग मोलाचा असतो. विवाह हा फक्त लैंगिक पूर्तीसाठी असत नाही; विवाहसंस्था त्यापेक्षा खूपच व्यापक आहे. त्यात दोन जीवांची आयुष्यभराची साथसोबत अपेक्षित आहे. प्रत्यक्षात ‘बहुपत्नीत्व’ ही एक मध्ययुगीन संस्था आहे, जी पुरुषांनी आपली लैंगिक भूक शमविण्यासाठी आणि स्त्रीला आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी बनविली आहे.

प्रश्न वंध्यत्वाचाच असेल तर प्रजननासाठी दुसरा विवाह करण्यात काही अंशी तरी तथ्य जाणवते. कारण विवाहाच्या उद्देशांमध्ये ‘प्रजनन’ हा एक उद्देश आहे. परंतु आपल्या समाजात मूल न होण्यास स्त्रीलाच जबाबदार धरले जाते. प्रत्यक्षात पुरुषांतसुद्धा वांझपण असू शकते. आणि बऱ्याचदा तसे असतेही. त्यामुळे जोपर्यंत वैद्यकीय तपासणीतून जोवर हे सिद्ध होत नाही की, संबंधित स्त्री वांझ आहे, तोवर प्रजननासाठी दुसऱ्या स्त्रीशी विवाह करण्याची घाई पुरुषाने करू नये. जेव्हा हे सिद्ध होईल की, पहिली पत्नी मूल जन्माला घालण्यास वैद्यकीयदृष्टय़ा असमर्थ आहे, तेव्हा एखाद्या वेळेस दुसरी पत्नी करणे हे न्याय्य ठरू शकेल.

विज्ञानाने आता जी प्रगती केली आहे, त्यामुळे नवनवीन शक्यता जन्माला आल्या आहेत. ‘टेस्ट टय़ूब बेबी’चेच उदाहरण घेता येईल. अजूनही ‘टेस्ट टय़ूब बेबी’च्या बाबतीत इस्लामला संमत असणाऱ्या ‘इज्म्मा’द्वारे उलेमांमध्ये स्वीकृती झालेली नाही. तरी हा प्रश्न त्या संबंधित व्यक्तींच्या सदसद्विवेकबुद्धीवर सोडायला हवा. काही सुज्ञ मुस्लीम याबाबतीत संभ्रमात आहेत. पत्नी वैद्यकीयदृष्टय़ा संतती देण्यास असमर्थ असल्याचे सिद्ध झाल्यास पती कुठल्याही प्रकारे बळजबरी न करता आपल्या पत्नीकडून दुसऱ्या विवाहाची संमती घेऊ शकतो. परंतु यातही कुराणाने दिलेल्या आदेशानुसार, पती दोन्ही पत्नींना समान न्याय व वागणूक देण्यास समर्थ असायला हवा.

बहुपत्नीत्वासाठी आणखी एक तर्क मांडला जातो की, स्त्रियांनी अवहेलनापूर्ण जीवन व्यतीत करण्यापेक्षा त्यांना सहपत्नीचा दर्जा देणे उचित ठरेल. खरं तर असे खूपच कमी समाज आहेत, जिथे स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे. महायुद्धांच्या वेळी जेव्हा लाखो माणसं मारली गेली, तेव्हा निश्चितपणे स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त होती. परंतु ही स्थिती तात्पुरती असते, कायमस्वरूपी नसते. कदाचित अशा वेळी काही अंशी बहुपत्नीत्वाला मान्यता दिली जाऊ शकेल. मात्र असे म्हणणे उचित होणार नाही की, स्त्रियांचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे समाजात वेश्यावृत्ती बोकाळते. जिथे पुरुषांचे प्रमाण स्त्रियांपेक्षा जास्त आहे, अशा ठिकाणीही वेश्यावृत्ती पाहावयास मिळते.

वेश्यावृत्तीची अनेक कारणे आहेत. जागतिक इतिहासाचा मागोवा घेतल्यास वेश्यावृत्ती सर्वत्र आढळते. संपत्तीचे असमान वितरण, रोजगारासाठी पुरुषांचे इतर देशांत वा शहरांत स्थलांतरण, अतिदारिद्रय़, नैतिक मूल्यांचा ऱ्हास आणि संघटित गुन्हेगारी या बाबीही वेश्यावृत्तीस कारणीभूत आहेत. बहुपत्नीत्वामुळे वेश्यावृत्तीचे उच्चाटन केले जाऊ शकते, हा चुकीचा समज आहे. या संदर्भात कठोर कायदे लागू केल्यास ते वेश्यावृत्ती थोपवू शकतील, परंतु तिचे समूळ उच्चाटन शक्य नाही.

बहुपत्नीत्वाला पुष्टी देणारे असे सगळे तर्क फोल ठरतात. इतका प्रदीर्घ काळ बहुपत्नीत्वाची व्यवस्था टिकून राहण्याची कारणे वेगळी आहेत. ती समजून घेणे क्रमप्राप्त आहे.

बहुपत्नीत्वाच्या संदर्भात कुराणात जी वचने आली आहेत, त्यांचा विचार विलगपणे न करता कुराणाची जी अंतस्थ प्रेरणा आहे, ती लक्षात घेऊनच त्याचे स्पष्टीकरण द्यायला हवे. जिथवर एकापेक्षा अधिक पत्नींचा संबंध आहे, त्यासंदर्भात कुराणात दोन वचने दिली गेली आहेत. ती म्हणजे ४:३ आणि ४:१२९; परंतु कुराणाचे अंतरंग समजून घेण्यासाठी या दोन वचनांव्यतिरिक्त आणखीन काही वचनेसुद्धा विचारात घ्यावी लागतात. बहुपत्नीत्वासारख्या वादग्रस्त विषयासंदर्भात कुराणाची दृष्टी जाणून घेण्यासाठी ही वचने पण तितकीच महत्त्वाची आहेत.

४:३ या पहिल्या वचनात चार पत्नी करण्यास परवानगी दिलेली दिसते; वचन क्रमांक ४:१२९ मात्र बहुपत्नीत्वामुळे उद्भवणाऱ्या संभवित  (संभाव्य) धोक्यापासून सावध/ सतर्क करते. दोन्ही वचने एकत्रितपणे वाचल्यास अल्लाहचा त्यामागचा असलेला नेमका उद्देश समजतो. पहिल्या वचनात म्हटले गेले आहे, ‘जर तुम्हाला भय असेल की, तुम्ही अनाथांशी न्याय करू शकणार नाही, तर ज्या स्त्रिया तुम्हाला पसंत पडतील, त्यांच्यापैकी दोन, तीन किंवा चार जणींशी विवाह करा; परंतु जर तुम्हाला भय असेल की, तुम्ही त्यांना समान वागणूक देऊ शकणार नाही (न्याय देऊ  शकणार नाही) तर मग एकच पत्नी करा किंवा विधिवत जे तुमच्या अधिकारात आहे ते करा’. ४:३ या वचनाचे विविध पद्धतीने विश्लेषण केले गेले आहे. त्यात स्पष्टता नाही, की एका वेळी दोन, तीन किंवा चार (पत्नी असू शकतात) की संपूर्ण आयुष्यात.

याचा अर्थ एकाच वेळी दोन, तीन किंवा चार पत्नी असा आहे, तरीही कुराण कुठल्याही पुरुषाला मनमानी करण्याचा अधिकार देत नाही. कुराणाने सर्व पत्नींशी समान न्यायाने आणि समान वागणूक देण्यासाठी कडक अटी लागू केल्या आहेत आणि जर तुमच्या मनात याबाबतीत भय असेल की, तुम्ही त्यांच्यासोबत समान न्याय करू शकणार नाहीत, तर फक्त एकीशीच विवाह करा. अशा प्रकारे कुणी जरी शब्दश: एकच वचन वाचले, तरीही ज्या गोष्टीवर स्पष्टपणे जोर दिला गेला आहे तो म्हणजे सर्व पत्नींशी समान आणि योग्य वागणूक देण्याबाबत, एकापेक्षा अधिक पत्नी करण्याबाबत नाही. या बाबतीत निर्णय फक्त पतीद्वारा घेता येणार नाही की, तो आपल्या पत्नींना समान आणि योग्य वागणूक देतो अथवा नाही?

या वचनात जिथे सांगितले गेले आहे की, जर तुम्हाला या गोष्टीचे भय वाटत असेल की, तुम्ही त्यांच्यासोबत समान न्यायाने वागणार नाहीत, ही गोष्ट संपूर्ण मुस्लिम समाजाच्या वतीने मांडली जाते आणि यासाठी ‘न्यायिक संस्था’ (अदालाह) जे समाजाचे प्रतिनिधित्व करतात, तेच हे ठरवू शकतात की, कुणी व्यक्ती दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या पत्नीसोबत समान आणि योग्य न्यायाने वागण्याची कुवत राखतो किंवा नाही आणि हेसुद्धा की, त्याला याची आवश्यकता, गरज  आहे किंवा नाही. यातून हे स्पष्ट होते की, एकापेक्षा अधिक विवाह करणे (बहुपत्नीत्व) हा एक व्यक्तिगत निर्णय नाही. ती एक समाजनियंत्रित बाब आहे. त्यावर समाजाचे नियंत्रण अभिप्रेत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की, असा निर्णय बऱ्याचदा व्यक्तिगत पातळीवर घेतला जातो. जणू काही हा त्या व्यक्तीला दिलेला विशेषाधिकारच आहे आणि ज्यात सामाजिक हस्तक्षेपाला जागा नाही. दुसऱ्या बाजूने पाहता, कुराणाचा अंत:स्थ हेतू असा आहे की, ज्यात सामाजिक हस्तक्षेपाची निकड मांडली जाते आणि पत्नीसोबतच्या समान आणि योग्य न्यायपूर्ण वागणुकीला अत्यावश्यक मानले जाते.
या गोष्टीसंदर्भात असाही वाद उपस्थित केला जातो की, ‘समान आणि योग्य वागणूक याचा अर्थ फक्त सर्व पत्नींना समान खर्च आणि सुविधा देणं एवढंच नव्हे, तर त्यात समान प्रेम देणंही अंतर्भूत आहे. काही भाष्यकार प्रामुख्याने मुतझिला पंथाचे (इस्लाममधील एक पंथ) यावर जोर देतात की, सर्व पत्नींसोबत समान प्रेम करणं ही एक आवश्यक अट आहे आणि त्यांचा युक्तिवाद असा आहे की, समान प्रेम करणं ही मानवी दृष्टीने अशक्यप्राय गोष्ट आहे. (पुरुष नेहमीच कुणा एका पत्नीवरच इतर एक किंवा अनेक पत्नींपेक्षा अधिक प्रेम करण्याचा संभव अधिक असतो.) त्यामुळेच कुराणाने बहुपत्नीत्वाला बंदी घातली आहे. सगळ्या पत्नींसोबत न्यायाने वागणे, सर्व पत्नींना समान वागणूक देणे ही इतकी महत्त्वपूर्ण बाब आहे.

अशा प्रकारे वचन क्रमांक ४:३ मध्ये अन्याय होईल याची भीती दोनदा दर्शविली आहे. बहुपत्नीत्वाविषयीच्या नैतिक पैलूला इतक्या हलकेपणाने घेऊन चालणार नाही. त्यामुळेच एकतर या प्रथेला पूर्णपणे प्रतिबंध घालणे किंवा त्यावर कठोर नियंत्रण ठेवणे आणि दुसरी पत्नी करण्याचा अधिकार पूर्णत: त्या व्यक्तीवर न सोडता त्यात सामाजिक हस्तक्षेप असणेही जरुरीचे आहे. बहुपत्नीत्वावरील वचन क्रमांक ४:३ आणि दुसरे वचन क्रमांक ४:१२९ ही दोन्ही वचने संयुक्तपणे वाचली जायला हवीत. ही वचने इतर बाबींचाही खुलासा करतात की, तुमची कितीही तीव्र इच्छा असो तरीसुद्धा तुम्हाला कदापि सर्व पत्नींसोबत समान न्याय करणे शक्य होणार नाही. परंतु असेही व्हायला नको की फक्त एकीलाच झुकतं माप देऊन दुसरीला मात्र वाऱ्यावर सोडले जाईल. जर आपसांत मैत्रीपूर्ण सामंजस्य राहिले आणि आत्मसंयम राखण्याची सवय लागली, जर तुम्ही आपली वागणूक नीटनेटकी ठेवलीत, अल्लाहचे भय बाळगत राहिलात तर अल्लाह क्षमाशील आणि कृपा करणारा आहे.

या वचनात सर्व पत्नींसोबत समान आणि योग्य न्याय या मुद्दय़ाबाबत इतकी स्पष्टता आहे की हे वचन बहुपत्नीत्वाच्या प्रथेचे अस्तित्वच जवळपास नाहीसे करते. ‘तुम्ही न्याय करू शकणार नाही. मग तुमची तशी कितीही तीव्र इच्छा का असेना.’ असे जे विधान येते त्यामुळे याविषयी अधिक चर्चेची गरजच भासत नाही. मानवी पातळीवर सर्व पत्नींसोबत समानतेने वागणे अशक्य आहे. (विशेषत: प्रेमासंदर्भात) तेव्हा एका ‘स्त्री’ला वाऱ्यावर सोडू नये आणि दुसऱ्या ‘स्त्री’च्या पूर्णपणे आहारीही जाऊ नये.

प्राथमिक स्तरावर तर कुराण ‘गुलामगिरी’, ‘बहुपत्नीत्व’ अशाच काही समान सामाजिक प्रश्नांबद्दल काही सुधारणा सुचवितो. कुराण प्रथम मुसलमानांना सांगते की गुलामाशी माणुसकीने वागा आणि पुढे जाऊन असेही सुचविते की, जर तुम्ही रोजे करू शकत नसाल, तर त्याऐवजी एखाद्या गुलामाला मुक्त करा. तुम्ही आपल्या गुन्ह्य़ाचे प्रायश्चित म्हणून एखाद्या गुलामाला मुक्त करू शकता. बहुपत्नीत्वाबाबतीतही कुराणाने असाच दृष्टिकोन बाळगला आहे. त्याचबरोबर हेही सांगितले आहे की, ‘आपण सर्व आदमची लेकरे आहोत’ (लकडकराना बनी आदम) त्यामुळेच आदमच्या सर्व लेकरांना एकसमान पातळीवर सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. त्यात कुणीही मालक किंवा गुलाम नाही.  वास्तविक पाहता कुराणाने अनाथ आणि विधवांवरील अन्याय दूर करण्याच्या हेतूने बहुपत्नीत्वाच्या प्रथेला परवानगी दिली होती. (यतामा हा अरबी शब्द विधवा या अर्थानेही वापरला जातो.) कुराणावरील भाष्य ‘जमाक्षरी लिखित अल-कशाफ (खंड-क बैरूत १९७७ पृष्ठ ४९६) च्या अनुसार- ‘अरब लोक सुंदर आणि श्रीमंत अनाथ मुलींशी आणि विधवांशी विवाह करीत असत. (ते चारपेक्षा कितीतरी जास्त असत.) आणि त्यांची संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करीत, त्यांच्यावर अन्याय करीत. तात्पर्य, कुराणाने त्या अनाथांना अन्यायापासून वाचविण्यासाठी त्या अरबी लोकांना चार विवाह करण्याची मुभा दिली होती. प्रथम अरब इच्छेनुसार अगणित विवाह करू शकत होते. कुराणाने त्याला शह देत ती संख्या फक्त चापर्यंत सीमित केली.

समाजात बहुपत्नीत्वाची प्रथा अशा प्रकारे (‘पत्नी’च्या संख्येत कुठल्याही प्रकारचे बंधन न पाळता) पूर्वीपासूनच अस्तित्वात होती आणि अनाथांवर अन्यायही होत होता. यासाठी कुराणाने ‘न्याय’ ही सर्वात मूलभूत नैतिकता मानली आहे. ४:३ या वचनानुसार एका बाजूने अनाथ मुलींच्या संपत्तीसाठी होणारा दुरुपयोग रोखण्यात आला. (जे अत्यावश्यक होते) आणि दुसऱ्या बाजूने कुठलेही बंधन न पाळता केलेल्या पत्नींवर होणाऱ्या अन्यायालाही रोखण्यात आले. या वचनाने एका दगडात दोन पक्षी मारले. एका अनाथांसोबत न्याय करणे आणि पत्नींची संख्या चापर्यंत मर्यादित केल्याने असंख्य निराधार पत्नींना न्याय देणे, त्यांना समान, योग्य वागणूक देणे.

बहुपत्नीत्व प्रथेवर कुराणातील दुसऱ्या वचनात (४:१२९) मध्ये हे स्पष्टपणे मांडले आहे की,  तुमची कितीही आंतरिक इच्छा असो, सर्व पत्नींसोबत समान न्यायाने वागणे तुम्हाला शक्य नाही. त्यासाठी पुरुषाला सावध केले आहे की, पहिल्या पत्नीला वाऱ्यावर सोडू नका. त्यामुळेच दोन्ही वचने एकत्रितपणे वाचली गेल्यास एकपत्नीत्वाच्या तत्त्वालाच दुजोरा मिळतो आणि बहुपत्नीत्वाला मात्र काही विशेष परिस्थितीतच मान्यता दिली जाते.

कुराणाचा अंतस्थ हेतू हा ‘बहुपत्नीत्वा’च्या प्रथेला नष्ट करणं हाच आहे. ते हळूहळू साध्य होईल. काही भाष्यकारांनी याकडेही लक्ष वेधले आहे की, वचन क्रमांक ४:३ हे औहोदच्या युद्धानंतर अवतरले आहे. या युद्धाची पाश्र्वभूमी पाहिल्यास या युद्धात मुस्लिम पुरुष लोकसंख्येपैकी १०  टक्के मुस्लिम पुरुष मरण पावले. (मारले गेले.) अनेकजण अनाथ झाले, स्त्रियांना वैधव्य आले. अशा स्त्रियांचे पालनपोषण करणे, त्यांना आधार देणे गरजेचे होते. बहुपत्नीत्वाची प्रथा सदैव चालू राहावी, असा कुराणाचा कधीच उद्देश नव्हता.

कुराणाचे सुप्रसिद्ध अनुवादक अब्दुल्लाह युसूफअली यांनी वचन क्रमांक ४:३ च्या तळटिपेत लिहिले आहे, ‘अज्ञानकाळात पत्नींची संख्या जास्तीत जास्त चापर्यंतच काटेकोरपणे मर्यादित करण्यात आली होती, पण तीही याच अटीवर की, त्या पत्नींना ऐहिक आणि अऐहिक (प्रेम-जिव्हाळा) ही दोन्ही सुखे दिली जावीत आणि त्यात त्यांना समान वागणूक दिली जावी. खरे पाहता, या अटींची पूर्तता करणे ही अत्यंत कठीण बाब आहे, हे मी जाणतो म्हणूनच मी एकपत्नीत्वाचीच मागणी करतो.’

बहुपत्नीत्वाविषयी ४:३ या वचनाव्यतिरिक्त अनेक ठिकाणी चर्चा केली गेली आहे. या वचनांना समग्रतेने पाहणे अत्यावश्यक आहे. कुराणात एक पती आणि एक पत्नीसाठी ‘ज़्‍ाौज’ हा शब्द आलेला आहे, ज्याचा अर्थ ‘जोडपे’ असा आहे. मूलत: याचा अर्थ एक पती आणि एक पत्नी म्हणजे ‘जोडपे’ असा असल्याने त्यात एक पती आणि अनेक पत्नी (बायका) अभिप्रेत नाही. पहिले पैगंबर आदम यांना फक्त एक पत्नी होती. तिचे नाव ‘हव्वा’ होते. कुराणाने पती-पत्नीला एकमेकांचा पोशाख म्हणूनही संबोधले आहे.

स्त्री-पुरुष समानता आणि मैत्री हा या (२:१८७), (९:२७) वचनांचा गाभा आहे. वचन क्रमांक ३३:३५ व २:२२८ सुद्धाहेही प्रत्येक बाबतीत स्त्री-पुरुषाला समान मानते आणि बहुपत्नीत्वाला मात्र क्वचितच मान्यता देते. जिथपर्यंत पवित्र पैगंबरसाहेबांच्या सुन्नतचा संबंध आहे तिथेही बहुपत्नीत्वापेक्षा एकपत्नी विवाहाचाच अधिक स्वीकार केला आहे, अधिक पसंती दर्शविली आहे. पैगंबरसाहेबांनी त्यांची पत्नी खदम्ीजा, जी त्यांच्यापेक्षा पंधरा वर्षांनी मोठी होती, ती हयात असेपर्यंत तिच्याशी पूर्णत: प्रामाणिक राहिले. तिच्या हयातीत त्यांनी दुसरा विवाह केला नाही. ते अत्यंत प्रामाणिक आणि एकनिष्ठ पती होते. त्यांनी खदम्ीजाच्या मृत्यूनंतर आयेशाशी विवाह केला. त्यांनी केलेल्या विवाहांपैकी फक्त आयेशाच कुमारिका होती. त्यांच्या इतर पत्नी एकतर विधवा होत्या, नाहीतर घटस्फोटित होत्या आणि त्यांचे सगळे विवाह हे राजनैतिक स्वरूपाचे आणि टोळ्यांशी केलेल्या करारातून झाले होते. त्यांचा विवाहाचा उद्देश हा लैंगिक गरजा पूर्ण करणे हा नव्हता. त्यांची अशी इच्छा असती तर त्यांनी तरुण मुलींशीच (कुमारिकेशी) विवाह केले असते; परंतु आयेशानंतर त्यांनी कुठल्याही कुमारिकेशी विवाह केला नाही. पैगंबरसाहेबांच्या मुलीचे (फातिमा)चे पती हजरत अली यांना ती हयात असतानाच दुसरा विवाह करावयाचा होता. पैगंबरसाहेबांनी याबाबत अत्यंत कडक शब्दांत विरोध दर्शविला होता.

आज स्त्री अधिकारांविषयी अधिक सजगता आली आहे, त्यावर अधिकाधिक भर दिला जात आहे. ‘स्त्री’च्या प्रतिष्ठेची पुन:स्थापना करणे, प्रत्येक बाबतीत स्त्री  पुरुषाच्या बरोबरीने समान भागीदार आहे, हे समाजात प्रस्थापित होणे, ही कुराणाची मूलभूत मागणी आहे.