Archive for मे, 2010

पु. ल. देशपांडे


भारतीय समाजप्रबोधनाच्या बाबतीत आपल्या देशातले नेते हे एक प्रकारच्या भ्रमातच वावरत होते असे मला वाटते. निखळ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे एकूणच आपल्या देशातील हिंदूंना आणि मुसलमानांना वावडे. बरे, ज्या ख्रिस्ती लोकांशी संबंध आला, ते पाद्री धर्मप्रसारक. शाळा-कॉलेजे त्यांनीच चालवली. त्यांच्याही डोळ्यांना झापडे बांधलेली. शिवाय आपल्या देशात शारीरिक श्रमाइतकाच वैचारिक श्रमाचा तिटकारा. बाबासाहेब आंबेडकरांनी एके ठिकाणी म्हटले आहे, की ब्राम्हण इंग्रजी विद्या शिकले ते कारकुनी नोकऱ्या मिळाव्यात म्हणून. लाखात एखादा सोडला तर ब्राम्हणांच्या घरातही पाठ्यपुस्तकापलीकडे व्यासंगासाठी ग्रंथसंग्रह नव्हता. वेदांचा फक्त अभिमान बाळगायचा; त्याला अक्कल लागत नाही. पण वेद वाचून वेदांचा अभिमान बाळगणारे शोधून सापडायचे नाहीत. सारे अभिमान आंधळे! कुणी तरी भारतात सोन्याचा धूर निघत होता म्हणायचे आणि इतरांना तो आपण पाहिल्यासारखे वागायचे. आमचे इतिहाससंग्रह हे जवळजवळ कल्पनारम्य पुराणासारखे. ऐतिहासिक घटनांचे विश्लेषण नाही, आत्मपरीक्षण नाही. सदैव वास्तव नाकारत जगायचे. कुठल्याही घटनांचे कार्यकारणभाव लावण्याच्या फंदात पडायचे नाही. सारा हवाला एक तर देवावर नाही तर दैवावर. न्यायमूर्ती रानड्यांसारखी माणसेदेखील इंग्रजी राज्य हे Divine dispensation मानताना पाहिली की आश्चर्य वाटते. आमचे देवदेखील वरती हिंदुस्थानचा नकाशा घेऊन जरा चार इंग्रज पाठवून भारतीयांना शहाणे करू या म्हणत बसले होते. स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात जातिभेद नष्ट झाल्याच्या भ्रमातच आपण सारे जण वावरत होतो. जातीय संघटनांच्या शक्तीची जाणीव, मते पदरात पाडून घ्यायला स्वातंत्र्यानंतर जेव्हा व्हायला लागली तेव्हा सेक्युलर भारताचा जयजयकार करणाऱ्या नेत्यांची गाळण उडाली. लाखातला एखादा अपवाद वगळला तर उमेदवारांच्या निवडीपासून ते प्रचारापर्यत सारे काही जात, धर्म, पंथ यांच्या दुराभिमानाला जागवतच चालत असत. मग निवडणूक-प्रचाराचे नारळ तुळजाभवानीपुढे फुटतात, दर्ग्यावर चादर चढते, देवळावर कळस चढतात. तान्ही पोरे दुधावाचून तडफडत असली तरी दगडी पुतळ्यावर शेकडो दुधाच्या घागरी उपड्या होतात. आपल्या देशात केवळ हिंदूच नव्हे तर मुसलमान, ख्रिश्चन, बुध्द, जैन, शीख- सगळ्यांची अस्मिता जात आणि पंथाधिष्ठितच आहे. एखाद्या राजकीय किंवा भाषिक चळवळीच्या प्रसंगी किंवा चीन-पाकिस्तानसारख्या युध्दाच्या प्रसंगी माणसे एकत्र आल्यासारखी वाटतात; पण लगेच पुन्हा आपापल्या जातीच्या कळपात जातात. मुसलमानांतले शिया आणि सुनी, आगाखानी, कटियारी, मोमीन, खोजे, बोहरी वगैरे लोकही एकमेकांपासून विधर्मीयांइतकेच दूर आहेत. केरळातले सिरीयन ख्रिस्ती आणि मंगळूरचे कॅथॉलिक किंवा महाराष्ट्रातले प्रोटेस्टंट किंवा मेथॉडिक यांच्यात वैमनस्याच्या भिंती उभ्या आहेत. गोव्याच्या ख्रिस्ती लोकांत बामण खिरिस्तॉव आहेत. आहिंसा परमो धर्म मानणाऱ्या श्वेतांबर आणि दिगंबर पंथांच्या जैनांच्या देवाच्या अलीकडील घटना तुम्हाला ठाऊक असतीलच.

मनुष्यस्वभावात हा जा नावाचा व्हायरस इतका घट्टपणे कसा रोवून घेऊन बसतो हे एक विलक्षण कोडे आहे. आर्थिक अभ्युदयाबरोबर जातीच्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल असे वाटले होते. कामगार-चळवळीला जोर आल्यावर सारे कामगार यापुढे ‘कामगार’ हीच जात मानतील, असाही विश्वास होता. पण तेही खरे ठरले नाही. त्या चळवळीच्या नेत्यांचे पितळ कामगार-चळवळीच्या प्रारंभीच्या काळात सूत-गिरण्यांतल्या अस्पृश्य मानल्या गेलेल्या कामगारांना दूर ठेवण्यापासूनच उघडे पडले होते. खुद्द कम्युनिस्ट देशांतही पुन्हा एकदा राष्ट्रवादाने जोर धरल्यासारखे दिसते. रशियन कामगार आणि चिनी कामगार आता एकमेकांचे वैरी झालेले दिसताहेत. ज्या चीनमध्ये माओचे रेड बुक म्हणजे रोज सकाळी उठून भक्तिभावाने वाचायचा ग्रंथ होता आणि ‘माओच्छिष्ठम् जगत् सर्वम्’ अशी परिस्थिती होती, तिथे इतिहासातून माओचे नाव पुसून टाकायचा चंग बांधलेला दिसतो आहे. अरब राष्ट्रांकडे पहावे तर अंधश्रद्धा, रूढी, धर्म-दुराभिमान ही मध्ययुगीन भुते थैमान घालताना दिसताहेत. खोमिनीच्या राज्यात बायका पुन्हा एकदा घरातल्या अंधारात कोठड्यात गेल्या. ही भुते उतरवण्याऐवजी त्यांचे सामर्थ्य वाढीला लावण्यात येत असलेले दिसत आहे.

आपल्या देशात पुरोगामी विचारांचा झेंडा मिरवणाऱ्या साम्यवाद्यांनी तर बुद्धिप्रामाण्य वाढीला लावण्यासाठी किंवा एकूणच समाजप्रबोधनासाठी कुठलेही धाडसी पाऊल टाकलेले नाही. कम्युनिस्ट युनियनचे सभासद असलेले मुंबईतले गिरणी-कामगार एकीकडून क्रांतीचा जयजयकार करतात आणि दुसरीकडून देवीला कोंबडा मारून नवस फेडतात. आपल्या देशात एकाच काळात आदिमानव-युगापासून apple-युगापर्यत सारे काही एकदम नांदत असते. त्या वेळी तुम्ही कशालाही भारतीय संस्कृती म्हणू शकता! फक्त ही वास्तवापासून अधिक दूर असेल तितकी अधिक भारतीय. जयप्रकाशजींचे नवनिर्माण-आंदोलन प्रचंड जोराने करणाऱ्या गुजरातेत राखीव जागाविरोधी आंदोलनही तितक्याच तीव्रतेने होऊन हजारो दलिनांना उध्द्वस्त करण्यात येते. मराठवाड्याची अस्मिता विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव देण्याच्या बाबतीत इतकी जागी होती, की शेकडो दलितांना आपल्या झोपड्या भस्मसात होताना पाहाव्या लागतात. कसले प्रबोधन, कसले फुले आणि कसले काय?

एक तर धर्म, ईश्वर, पूजा-पाठ ह्यात मला कधीही रस वाटला नाही. शिल्पकारांचे कौशल्य म्हणून मला मूर्ती पहायला आवडतात. समजू लागलेल्या वयापासून माझा कोणत्याही मूर्तीला नमस्कार घडलेला नाही. पूर्वजन्म, पुनर्जन्म वगैरे थोतांडावर माझा विश्वास नाही. देव, धर्म या कल्पना धूर्त सत्ताधाऱ्यांनी दहशतीसाठी वापरलेल्या आहेत, याविषयी मला यत्किंचितही शंका नाही. संतांची देवाची कल्पना आणि राजे लोक किंवा धनिकांची देवाची कल्पना यांत काडीचेही साम्य नाही. आपल्या देशात इतके संत जन्माला यायच्याऐवजी ऐहिक जीवनाला विज्ञानाचे अधिष्ठान देणारे शास्त्रज्ञ जन्माला आले असते तर हा देश अधिक सुखी झाला असता. मला कुठल्याही संतापेक्षा अॅनेस्थेशियाचा शोध लावून वैद्यकीय शस्त्रक्रिया वेदनाहीन करणारा संशोधक हा अधिक मोठा वाटतो. विज्ञान जन्मजात श्रेष्ठत्वकनिष्ठत्व मानत नाही. सत्याचे दर्शन घडवणाऱ्या वैज्ञानिकांचा, देवाचे नाव घेणाऱ्या धर्मगुरूंनी आणि त्यांच्या दहशतीखाली असणाऱ्या अडाणी राजे लोकांनी सगळ्यात अधिक छळ केला आहे. धर्म धर्म करणाऱ्या लोकांइतके सत्याचे आणि वास्तवाचे शत्रू नसतील. मग ते बायकांना नवऱ्याच्या चितेवर जिवंत जाळतील, नरबळी देऊन आपले राजमहाल आणि देवळे टिकाऊ करतील, कुणाला अस्पृश्य म्हणतील, कुणाला वाळीत टाकतील, काय वाटेल ते करतील. धर्म आणि पंथाच्या दुरभिमानातून माणसाचे रक्त सगळ्यात अधिक सांडलेले आहे; आणि या साऱ्या खटाटोपातून शेवटी नवे हुकूमशहाच उदयाला आलेले दिसतात. पण आपला इतिहास हा मुख्यतः राजे लोकांनी मुलूख बळकावण्यासाठी केलेल्या लढायांचा, जयापराजयाचा इतिहास आहे; आणि प्रत्येक विजयी राजाच्या भाट-चारणांची ही प्राचीन परंपरा आजही कशी टिकून आहे, ते आपण पाहतोच आहो. विजयी राजाच्या भाट-चारणांनी त्यातील सत्यावर स्तुतिस्तोत्रांच्या इतक्या झुली पांघरल्या आहेत, की भूतकाळातल्या त्या तसल्या व्यक्तींना झाकणारी शब्दांची आरास म्हणजे इतिहास हीच आपली समजूत आहे. संजय गांधीला बुध्द आणि ख्रिस्ताच्या पंक्तीला नेऊन बसवणारे नेते (?) निघाले. अशा ह्या देशात बुध्दीला आणि निश्चित पुराव्याला साक्ष ठेवून काही लिहिणे आणि बोलणे हा गुन्हा ठरतो. त्यातून आपल्या देशात नाममहात्म्याला फार मोठे स्थान आहे. नामस्मरणाने तरून जाता येते ही श्रद्धा. कुठे जाता येते आणि तरणे म्हणजे काय याचा विचार नाही. अंधश्रद्ध समाजात कुठलीही घटना पारखून घेण्याची शक्तीच उरत नाही. भाषेचा वापर मूठभर लोकांच्या स्वार्थासाठी भरमसाट रीतीने केला जातो. उच्चार आणि आचार यांच्यात मेळ नसल्याचे कुणालाही दुःख नाही. ‘सहनाववतु सहनौ भुनक्तु’ ही आमच्या वेदातील प्रार्थना, त्यातल्या मानवतेवेषयी गळा काढून बोलायचे आणि ‘सहनाववतु’ म्हणताना “दूर हो. विटाळ होईल.” म्हणून माणसाला दूर लोटायचे. पुन्हा वेद श्रेष्ठ ते श्रेष्ठ, ते धडाधड पाठ म्हणणारे त्याहूनही श्रेष्ठ. त्यांना शासनाच्या वतीने शाली पांघरणारे आणखी श्रेष्ठ. सकाळी रेडियो लावला की देव दीनांचा वाली असल्याचे कुणी ना कुणी तालासुरात सांगत असते; आणि गॅलरीत आल्यावर समोरच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात बेवारशी पोरे शिळेपाके शोधून काढताना दिसत असतात. त्या देवावर आणि सत्तेवर असलेल्या माणसांवर विशेषणांची खैरात चालू असते. दुर्दैवाने वास्तवाला विशेषणे मंजूर नसतात.

कल्पनारम्यतेला मात्र ती पोषक ठरतात. अस्पृश्य मानल्या गेलेल्यांना ‘हरिजन’ म्हटले, की जादूचा मंत्र म्हटल्यासारखी अस्पृश्यता नष्ट होईल असे मानणे किंवा स्त्रियांना देवता म्हटल्यानंतर त्यांची गुलामी नष्ट होईल असे धरून चालणे, हे ह्या असल्या वास्तवापासून दूर असलेल्या कल्पनारम्यतेचे लक्षण आहे. पुण्याच्या फुले मंडईत त्या भिक्षुकशाहीविरोधी सत्यशोधकांच्या नावावर टिच्चून सार्वजनिक सत्य(?)नारायणाची पोथी वाचली जाते. लोक तीर्थप्रसाद घेऊन धन्य होतात आणि दिवसेंदिवस ह्या अंधश्रद्धेला शासनाकडून भरपूर खतपाणी घातले जात आहे. माझ्या वयाची साठ वर्ष मी ओलांडली पण गेल्या काही वर्षांत मी ही जी काही हिंदी सिनेमा नट-नटींसारखी देवदेवता आणि बुवा-माताजी मंडळींची चलती पाहतोय, तशी माझ्या तरुणपणीही पाहिली नव्हती. देऊळ बांधणे हा सत्तेवरच्या राजकीय पक्षात जाण्याइतकाच किफायतशीर धंदा झाला आहे. कधी कुठल्या शंकराचार्यांचे नावदेखील ऐकले नव्हते. त्यांची दीड दीड हजार रुपये भरून पाद्यपूजा करायला भक्तांचा क्यू लागतो. आमच्या सेक्युलर भारताच्या पंतप्रधानबाई त्यांच्या दर्शनाला जातात. चर्चेस्, मशिदी यांचे उत्पन्न भरमसाट वाढते आहे. यातून आपण विशिष्ट जातीचे किंवा पंथाचे अनुयायी या अहंकाराखेरीज पदरात काहीही पडत नाही. ह्या साऱ्या सामाजिक वास्तवाकडे पाहिले, की प्रबोधन हा शब्दच निरर्थक वाटायला लागतो. खुर्ची जाईल या भयाने ग्रस्त असलेले नेते, श्रीमंती जाईल या भयाने अस्वस्थ असलेले धनिक आणि असहायतेने निदान देव तरी आपल्या मदतीला येतो की काय हे पाहू या म्हणणारे दरिद्री लोक असाच देखावा दिसतो अाहे. वैचारिक आधुनिकतेचा समाजाला स्पर्शही झालेला दिसत नाही. शेवटी हेच खरे आहे असे वाटायला लागते. ‘Justice is Simply the interest of the Stronger’.

मनाच्या निराश मूडमध्ये हे लिहिले आहे असे तुम्हाला वाटेल. व्यक्तिगत जीवनात दुःख बाळगत राहावे असे माझ्या बाबतीत काहीही नाही. उद्या मला जेवायला मिळणार आहे किंवा नाही आणि आज रात्री झोपायला जागा सापडणार की नाही, ह्या चिंता घेऊन ज्या देशात लाखो लोक जगताहेत, तिथे माझ्यासारख्याने वैयक्तिक दुःख हा शब्दही उच्चारू नये, ह्या जाणिवेने मी कसलेही वैयक्तिक दुःख माझ्याभोवती रेंगाळू देत नाही. साहित्य, संगीत, नाट्य असल्या कलांत रमण्यात आणि थोडेफार इतरांना रमवण्यात आयुष्य गेले. उर्दू शायराच्या ढंगात बोलायचे झाले तर आजवर आयुष्याच्या वाटेत काट्यांपेक्षा फुलेच जास्त लाभली. ‘उपरा’, ‘बलुतं’, ‘आठवणीचे पक्षी’ ह्या पुस्तकांसारखे काही वाचले, की आपले जगणे सामाजिक दृष्ट्या असंबद्ध वाटायला लागते. कुणी मोठेपणा द्यायला लागले की ओशाळल्यासारखे वाटते.

(’एक शुन्य मी’ या पुस्तकातुन)

उत्तम कांबळे, सौजन्य – सकाळ

मुलांना भरपूर देऊनही आई कधी रिती होत नाही. ती समृद्धच होते सागरासारखी… कसं जमतं हे सारं जगभरातील मातांना? कोणती ऊर्जा लाभत असते त्यांना? आई कोणत्याही प्रदेशातली किंवा व्यवस्थेनं कोणत्याही जातीत ढकललेली असली तरी तिचं प्रेम सारखंच असतं… जातीच्या कप्प्यात ते कधीच मावत नाही… कोणत्याही सीमांजवळ अडखळत नाही… जगभरातील आयांची भाषा सारखी… स्पर्शातलं वात्सल्य सारखं… हे कसं घडत असेल मला काही कळलेलं नाही, हेही प्रामाणिकपणे सांगायला हवं. तुम्हाला कळलं तर जरूर सांगा.

कधी जगण्याचं, कधी भाकरीच्या शोधात मजल- दरमजल करण्याचं, तर कधी बिनभाकरीचं कारण घडलं आणि आम्हा माय-लेकरात ताटातूट होत राहिली…

मी जन्मल्याजन्मल्या मोठाच प्रश्‍न निर्माण झाला होता. मला पाजण्यासाठी माझ्या आईला दूधच नव्हतं. त्याच वेळेला बाळंत झालेल्या आपल्या मोठ्या बहिणीच्या कुशीत मला तिनं दुधासाठी सोडलं. तेव्हापासून मी मावशीत आई पाहायला लागलो. पुढे मावशीचं दूध आम्हा दोघांना म्हणजे मला आणि तिच्या स्वतःच्या मुलीला कमी पडू लागलं, म्हणून माझ्या आजोबानं आपल्या सासूरवाडीहून एक शेळी आणली. तिच्या दुधावर माझी गुजराण चालू झाली. मी शेळीतही आई पाहायला लागलो…

पुढं माझी आई माझ्या वडिलांबरोबर मिलिटरीत गेली. जाताना तिनं मला आपल्या आईच्या म्हणजे आजीच्या पदराखाली ठेवलं.

मी माझ्या आजीत दोन दोन आया पाहू लागलो. एक तिच्यातली आणि एक माझ्यासाठी जन्माला आलेली आई… प्रत्येक नातवासाठी आजी आईचं रूप घेऊन उभी राहते, हेही मला जाणवायला लागलं…

भाकरीच्या लढाईत आई हरवून गेली. लेकराबाळांवर माया करण्यासाठी, त्यांना मांडीवर खेळवण्यासाठी तिच्याकडे वेळच राहिलेला नव्हता…

आईच्या मांडीवर झोपण्याची हौस पुरी व्हावी, म्हणून मी माझ्या दुसऱ्या मावशीकडं जाऊ लागलो. निवांत तिच्या मांडीवर डोकं टेकवून झोपी जायचो. तिच्यातही मला आई दिसायची…”माय मरो मावशी उरो’ या शाळेत मास्तरांनी पाठ फोडून शिकवलेल्या म्हणीही आठवायला लागल्या…

शिक्षणासाठी मी गाव सोडलं आणि ओघानंच आईही सुटली… रायबागमध्ये हायस्कूलला असताना शिकंदर नावाचा मित्र भेटला. खूप जिव्हाळ्याचा झाला.

दुष्काळात होरपळणाऱ्या विद्यार्थ्यांना बोर्डिंगमध्ये रोज मक्‍याची भाकरी, मक्‍याचा भात, मक्‍याचं पिठलं आणि मक्‍याचं उपीट मिळतं हे त्याच्या लक्षात आलं. अधूनमधून तो मला आपल्या घरी घेऊन जाऊ लागला. त्याच्या आईशी माझी ओळख झाली. त्याच्या आईचं नाव शरिफा… अतिशय सुंदर आणि कष्टाळू आई होती ती… तिच्या पंखाखाली तिनं स्वतः जन्माला घातलेले बारा मुलगे आणि एक मुलगी अशी तेरा लेकरं होती. ती मला आपल्या मुलांबरोबर त्यांच्याच थाळीत जेवायला लावायची. जेवण वाढून संपलं, की दोन-चार वितांवर बसायची. आम्ही भरभरून जेवू लागलो, की ती आपल्या दोन्ही हातांची बोटं आपल्याच कानावर काडकाड मोडून आनंद व्यक्त करायची. खा-खा, बोर्डिंगवर पोटभर मिळंल की नाही माहीत नाही… माझ्या शिकूबरोबर रोज घरी येत जा, असा ती आग्रह धरायची…

तिनं कधीच मला किंवा आपल्या लेकरांना विचारलं नाही, की आपल्या घरात, आपल्या लेकरांच्या थाळीत, आपल्या लेकरांच्या मांडीला मांडी लावून जेवणाऱ्या या पोराची जात कोणती, धर्म कोणता?

मी अनेकदा शिकंदरच्या घरात जायचो… चिलीम आणि अधूनमधून विडी ओढणाऱ्या त्याच्या वडिलांशी गप्पा मारायचो… छान वाटायचं…

स्वतःची इतकी सारी मुलं असताना शिकंदरची आई माझ्यावरही भरपूर प्रेम का करते, असा प्रश्‍न निर्माण व्हायचा; पण मी तो कधीच विचारला नाही…

ईद असो, लग्न समारंभ असो मी शिकंदरच्या घरी जायचो… भरपूर खायचो… खूप खूप खायचो… मी जसा खात जाईन तसा माझ्या या मॉंचा चेहरा उजळत जायचा… ती मला एकदा म्हणाली होती, “”मेरे खुद के तेरा बच्चे है लेकिन फिर भी तू तो मेरा चौदवी का चॉंद है…”

आई आपल्या लेकराचं रूपांतर माणसातच नव्हे तर सूर्य, चंद्र आणि ताऱ्यांमध्येही करते नाही का… लेकराची लायकी कशी का असेना; पण आईला मात्र तिच्या रक्तामांसाचा गोळा सूर्य, चंद्रच वाटत असतो… मी तर उपरा; पण तिच्या प्रेमानं हे उपरेपण दूर करून मलाही चंद्राच्या रांगेत बसवलं होतं…

मुलगा म्हणून मला स्वीकारताना या मॉंच्या आणि माझ्यामध्ये माणसांनीच निर्माण केलेले कोणतेच धर्म, कोणत्याच जाती आड आल्या नाहीत…

मॉं तुझे सलाम!
हायस्कूलचं शिक्षण संपवून सांगलीत शांतिनिकेतन महाविद्यालयात आलो. आणीबाणीचा काळ होता तो. शिवाय, आईपासून पुन्हा दूरच राहायचं होतं…
इथंही भाकरीसाठी आणि शिक्षणासाठी आणखी एक लढाई वाढून ठेवली होती. असंख्य विद्यार्थ्यांनी त्यात भाग घेतला होता. त्यापैकी मीही एक.

महाविद्यालयीन जीवनात कोणतं तरी कारण घडलं आणि बापू ठाणेदार नावाचा मित्र मला मिळाला. होस्टेलमध्ये आम्ही अनेक विद्यार्थी भाकऱ्या वाळत टाकून किंवा सुतळ्यांमध्ये त्या ओवून त्यांचे आयुष्य वाढवण्यासाठी चित्रविचित्र प्रयोग करायचो. बापूलाही ते माहीत होतं. तो त्याच्या आईला हे सारं सांगायचा. तिचं नाव सुमन. बापूची आई शिक्षिका होती. दोन मुलगे आणि दोन मुली असा तिचा कुटुंबकबिला. परिस्थितीच्या एका फटकाऱ्यानं तिला विधवा केलं होतं. कपाळ पांढरफट केलं होतं…

बापूच्या आईनंही मला मुलाप्रमाणं सांभाळायला सुरवात केली. सणावाराला आणि इतर दिवशीही भरपेट जेवण देऊ लागली. सणाच्या दिवशी पाटाभोवती रांगोळी काढली जायची. आम्ही राजकुमाराप्रमाणं जेवायला बसायचो. जेवतानासुद्धा एक संस्कृती पाळायची असते, हे या माऊलीनं आम्हाला, खरं तर मला एकट्याला शिकवलं. तिच्या मुलांना ते अगोदरच माहीत होतं. गावाकडं बहुतेक वेळा डाव्या हातात भाकरी पकडायचो. उजव्या हातानं ती मोडायचो. हे सारं आता बंद झालं होतं. डावा हात अन्नाला लावायचा नाही. सुरवातीला वरण- भाताचे चार घास, मग पोळी मग पुन्हा भात. अधूनमधून लोणच्याला बोट लावून ते चाखायचं वगैरे वगैरे…

अनेकदा बापूच्या घरी मुक्काम व्हायचा. रात्री-अपरात्री उठून माऊली माझ्या अंगावरचं पांघरूण नीट करायची. मी तिच्या मुलासारखा आणि ती माझ्या खरोखरच्या आईसारखी वागत होती. तिच्यात आणि माझ्यात समाजव्यवस्थेनं निर्माण केलेलं भलं मोठं अंतर कधीच गळून पडलं होतं. ती ब्राह्मण आहे, हे मला कधीच तिच्या वर्तनातून जाणवलं नाही. उलट, व्यवस्था मोडणारी एक रणरागिणी अशीच ती मला वाटली. सुमारे तीस वर्षांनी पुण्यात तिची भेट झाली. एवढ्या मोठ्या कालखंडानंतरही माझ्याविषयी असलेला जिव्हाळा कमी झालेला नव्हता. मी तिला एक साडी घेतली होती आणि माझ्या एका मुलानं ती घेतली म्हणून नंतर ती इमारतीमधील आपल्या मैत्रिणींना दाखवत होती.

कोल्हापुरात शिक्षणासाठी आलो. गोखले कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहू लागलो. तिथं भाकरी थापण्यासाठी अनसूया शिंदे नावाची मराठा समाजातील महिला यायची. तिलाही दोन मुली, एक मुलगा, नवरा. एका छोट्याशा जागेत ती राहायची. खूप छान भाकऱ्या आणि अन्य सर्व स्वयंपाक करायची शिंदे मावशी. काही दिवसांनी मेस बंद पडली आणि भाकरीचा प्रश्‍न पुन्हा फणा काढून उभा राहिला. काही विद्यार्थी गावी परतले. मला ते शक्‍य नव्हतं; कारण शिक्षणासाठी मी आलो होतो. आमची उपासमार होतेय हे शिंदे मावशीच्या लक्षात आलं. ती होस्टेलसमोरच राहायची. अतिशय प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. शिंदे मावशी मदतीला आली. एक तर तिचीही परिस्थिती कठीण बनली होती. मेस बंद पडल्यानं तिचंही काम बंद झालं होतं. घरची परिस्थिती अतिशय कठीण असताना तिनं सकाळ, संध्याकाळ मला दोन-दोन भाकऱ्या आणि आमटीनं भरलेलं ताट द्यायला सुरवात केली. जेवताना खूप आनंद वाटायचा; पण पैसे कोठून द्यायचे हा प्रश्‍नही निर्माण व्हायचा. पैशाविषयी एक दिवस धाडस करून विचारलंच, “”मावशी तू जेवण देते आहेस हे ठीक आहे; पण बिल कसं देणार, हा प्रश्‍न आहे.” यावर मावशीनं हसत उत्तर दिलं, “”का रे बाबा लेकराकडून आईनं जेवणाचं बिल मागण्याची पद्धतबिद्धत सुरू झाली आहे का? आमच्याकडं नाही ही पद्धत. निवांत जेव आणि भरपूर अभ्यास कर.”

शिंदे मावशीनं अन्न दिलं नसतं तर काय झालं असतं? कदाचित कोल्हापूर सोडावं लागलं असतं, शिक्षण थांबवावं लागलं असतं किंवा अन्य काही तरी झालं असतं… पायाखालची वाट दगा देणारी ठरली असती. दिशा चुकल्या असत्या… भूक कुठंही घेऊन गेली असती मला… ओढत… फरफटत… जेथे दिशाच असत नाहीत अशा ठिकाणी…

पंचवीस-तीस-चाळीस वर्षांपूर्वी जेव्हा व्यवस्थेच्या डोळ्यावर जातीचं कातडं टणक होतं, तेव्हा घडत होत्या या साऱ्या गोष्टी… विविध जाती-धर्मांतील या साऱ्या आया घडवत होत्या… व्यवस्थेच्या गालावर थप्पड मारत घडवत होत्या…

या महिलांच्या मध्ये फक्त माताच नव्हती, तर व्यवस्थेच्या विरुद्ध जाणारा विद्रोहही होता. आम्ही माता आहोत जाती नव्हे, असंच काही तरी त्या मला सांगत होत्या.

नोकरीच्या निमित्तानं नाशिकमध्ये स्थिरावलो. कवी किशोर भेटला. त्याच्याकडे ये-जा होऊ लागली. या भेटीत त्याच्या आईनं आपले पंख पसरले आणि मलाही मुलगा समजून आपल्या पंखाखाली घेतलं. भरपूर प्रेम केलं माझ्यावर. म. गांधींच्या प्रार्थनासभेत म्हटलेल्या प्रार्थना मला किशोरच्या आईनं म्हणजे सुशीलानं अनेकदा ऐकवल्या होत्या. तिला कसली तरी पेन्शन मिळायची. तुला पैसे हवेत का, असं अधूनमधून ती विचारायची. तिच्या खोलीत खूप गप्पा मारायचो. पुढं युरोपच्या दौऱ्यावर जाताना तिनं आशीर्वाद घेण्यासाठी घरी बोलावलं. भरपूर जेवायला दिलं. जाताना हातावर दही ठेवलं. दहा की वीस रुपयांची नोट ठेवली. प्रवासात ठेव बरोबर, असं ती म्हणाली. मी आगाऊपणा करत पटकन म्हणालो, “”आई, अगं परदेशात डॉलर चालतात; रुपये नाही.” यावर ती म्हणाली, “”आईनं दिलेला पैसा सगळीकडंच चालतो.”

सुशीला आई आजारी पडली. एकदा तिला डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं. ती सारखी माझी आठवण काढायची. मीही हॉस्पिटलमध्ये तिच्या उशाशी बसायचो. तिला बरं वाटायचं. असाच सारखा सारखा येत जा, असा ती आग्रह धरायची. तू माझा तिसरा मुलगा आहेस, असं सांगायची. माझ्या लेकराचीही चौकशी करायची.

सुशीला आईच्या निधनानंतर जे काही धार्मिक विधी करायचे होते, त्यासाठी मीही तिसरा मुलगा म्हणून उपस्थित होतो. विधी चालू असताना माझी नजर एकसारखी तिच्या खोलीकडं जायची. घरातून बाहेर पडताना ती माझ्या मागंमागं येत आहे असा भास होऊ लागला. ती पुन्हा माझ्या तळहातावर दही ठेवतेय… पुन्हा माझ्या हाती पैसे ठेवतेय… पुन्हा ती सांगतेय की, आईचे पैसे जगभर चालतात… पळतात…

खूप अस्वस्थ होत होतं. खरंच आई हयात नसतानाही ती असते… तिच्या आठवणी जिवंत होऊन आशीर्वादाचे, प्रेमाचे पांघरून होऊन उभ्या राहतात. आई गेल्यानंतर चादरीलाच आई समजून आम्ही भावंडांनी ती चादर पांघरली, असं कविवर्य सुर्व्यांनी एका कवितेत म्हटलंय.

सुर्व्यांची आठवण सुटी येत नाही, ती कृष्णाबाईंना बरोबर घेऊन येतेय. कृष्णाबाईनंही माझ्यावर मुलगा समजून प्रचंड प्रेम केलं. अजूनही करतेय. तिच्या मुलांना लाभलं नसेल एवढं प्रेम मला लाभलं. जेवण वाढताना तिचा एक विचित्र सिद्धांत असतो. आपल्याला जेवढं वाटतं, तेवढंच खाता येत नाही, तर तिला जेवढं वाटेल तेवढं खायचं असतं. एकदा मी तिला रागावून म्हणालो, “”आई तू कशाला एवढा आग्रह धरतेस? माझी शुगर वाढेल, डायबेटिस वाढेल?”

त्यावर आई उसळून म्हणाली, “”आईच्या हातचं खाल्लं की शुगर वाढेल असं कोण मूर्ख डॉक्‍टर म्हणतो?”
आईच्या प्रश्‍नावर माझ्याकडं उत्तर नव्हतं. मीही माझा अनुभव थोडा तपासून पाहिला. आईच्या म्हणजे कृष्णाबाईंच्या हातचं खाल्ल्यानंतर माझी शुगर खरंच वाढलेली नव्हती. आता ही मानसिकता आहे, की खरंच मी कमी जेवलो होतो, की माझ्या नसानसात पसरलेली आई होती, यापैकी मला काहीच सांगता येणार नाही. कृष्णाबाईंनं आपलं आत्मचरित्रच मला अर्पण करून टाकलं आहे आणि एका अर्थानं सुर्व्यांना सांगितलं आहे, की मास्तर माझा जीव नवऱ्यापेक्षा मुलात अधिक गुंतलेला आहे.

व्याधींवर मात करत लढावं कसं आणि जगावं कसं हे शिकवण्यासाठी आईचं रूप घेऊन माझ्यासाठी धावली ती आणखी एक आई. साधना प्रभाकर गणोरकर आई… प्रसिद्ध डॉक्‍टर संजय गणोरकरांची आई… तिची आणि माझी ओळख नेमकी कशामुळे झाली, हे मला माहीत नाही. ते शोधण्याची मला आवश्‍यकताही कधी वाटली नाही. कॅन्सरसारख्या एक धोकादायक आजारावर मात करून ही आई नाशिकपासून काही अंतरावर स्वतः बांधावर राहून शेती करते आहे. ही आई एकदम कर्तव्यदक्ष, बोलण्यात रोखठोक, आपलं चुकलंच तर कानाखाली आवाज काढायला कधी घाबरायची नाही. या आईलाही स्वतःची मुलं- बाळं, नातवंडं, सुना… सारे उच्चविद्याविभूषित. आपापल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेले; पण ही आई मात्र राबण्यात आनंद मानणारी. लेकरांचा संसार पाहत पाहत स्वतःही स्वाभिमानाचं जगणं जगणारी. एकदा तिनं मला घरी बोलावलं. खाऊ घातलं. घर फिरून दाखवलं. एक जुनी तलवारही दाखवली. माझ्या बायकोला सून समजून साडीचोळी केली. शेवटी म्हणाली, “”माझा परवा वाढदिवस झाला. माझ्याकडे जे काही पैसे होते, ते साऱ्या लेकरा-बाळांना वाटले. तुझा वाटाही बाजूला काढला आहे. मुकाट्यानं तो घे. वाद घालू नकोस.”

आईनं माझ्या हातात एक सुंदर पाकीट दिलं. त्यात काही रक्कम होती. आईनं सहजपणे मला काळजात जागा दिली आणि नंतर सात-बारातही…

एकदा आई, बाबांबरोबर म्हणजे प्रभाकर गणोरकरांबरोबर श्रीलंकेत जाऊन आली. दौरा संपल्यावर तिनं मला घरी बोलावलं. दौऱ्यातून आणलेलं आणि माझ्यासाठी जपून ठेवलेलं तळहाताएवढं एक सुंदर पिंपळपान मला दिलं. अतिशय आनंदानं या पानाचा इतिहास सांगताना म्हणाली, “”भगवान बुद्धांना ज्या पिंपळाच्या वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली, त्या वृक्षाच्या फांद्या सम्राट अशोकाच्या मुलांनी श्रीलंकेत नेल्या. तेथे हा वृक्ष लावला. तो वर्षानुवर्षे टिकवला. एकातून दुसरा वृक्ष निर्माण झाला. कोलंबोत मी स्वतः तुझ्या बाबांसह अशाच वृक्षाखाली गेले. तेथे वृक्षाच्या इतिहासाची आणि त्याला लाभलेल्या बुद्ध परंपरेची माहिती लिहिली होती. मला वाटलं, की एक पान तुझ्यासाठी तोडावं. तुला बुद्ध आवडतो; पण तिथला सुरक्षारक्षक काही केल्या पान तोडू देईना. शेवटी त्याला कुणाशी तरी बोलण्यात गुंतवलं आणि तुझ्यासाठी एक पान तोडून घेतलं. हे ते पान! जपून ठेव…”

मला मुलगा समजणाऱ्या मातांची मी अशी विलक्षण रूपं पाहत आलो. आई मला नेहमीच जगातली सर्वांत मोठी धर्मनिरपेक्षता वाटली. लेकरासाठी हवं ते करणारी वाटली. एकाही मातेनं मला कधीच विचारलं नाही, की तुझी जात कंची? किंवा तुझी इत्ता कंची?

जात, पात, धर्म, प्रवेश, पंथ यांना छेदून जी उभी असते तीच तर आई असते, असं माझं स्वतःचं मत झालंय. मला लाभलेल्या आयांना मी आजपर्यंत काही दिलेलं आहे, असं मला कधी आठवत नाही. त्याच देत राहिल्या मला आणि देता देता वजा होण्याऐवजी अधिकच होत राहिल्या. कसं जमतं हे सारं जगभरातील मातांना? कोणती ऊर्जा लाभत असते त्यांना? आई कोणत्याही प्रदेशातली किंवा व्यवस्थेनं कोणत्याही जातीत ढकललेली असली तरी तिचं प्रेम सारखंच असतं… जगभरातील आयांची भाषा सारखी… स्पर्शातलं वात्सल्य सारखं… हे कसं घडत असेल मला काही कळलेलं नाही, हेही प्रामाणिकपणे सांगायला हवं. तुम्हाला कळलं तर जरूर सांगा. आई या विषयावर जरूर बोलू. ते आनंददायी असतं. तूर्त एवढंच, की…

आभाळभर पसरत असते माय
सागरभर विस्तारत असते माय
धर्म, पंथ, प्रदेश नि जाती संपवत
लेकरासाठी उभी ठाकत असते माय!!

सौजन्य – लोकसत्ता

आपल्या विविधांगी प्रतिभेने केवळ भारतीयांनाच नव्हे, तर साऱ्या जगाला मोहित करणारे स्व. रवींद्रनाथ टागोर हे स्व. पु. ल. देशपांडे यांचे ‘दैवत’च होते. पुलंनी रवींद्रनाथांच्या जीवनकार्याचा उलगडा करणारी तीन व्याख्याने पुणे विद्यापीठाच्या टागोर व्याख्यानमालेत दिली होती. त्यातील एका व्याख्यानाचा हा संपादित अंश.

रवींद्रनाथांचं साहित्य वाचणं, त्यांच्या जीवनाचा आणि कार्याचा अर्थ समजून घेणं हा माझा छंद आहे. जानपदापासून ते विबुधजनांपर्यंत सर्व थरांवर रवींद्रनाथांनी एक अलौकिक विश्वास संपादन केला होता. त्यांचा एकदा संग जडला की, त्यांची संगत सतत हवीहवीशी वाटते. बंगाली माणसाला तर त्यांच्या बाबतीत ‘तू माझा सांगाती’ म्हणावं असंच वाटतं. एखाद्या वातावरणात सुगंध दरवळून राहावा तसे ते बंगाली जीवनात भरून राहिलेले आहेत. आजच्या सर्व नामवंत बंगाली साहित्यिक, संगीतप्रेमी, चित्रकार यांच्यावर त्यांचे खोल संस्कार आहेत. आपल्याला जे काही म्हणायचंय ते परिणामकारक शब्दांत सांगायचं झालं की त्यांच्या लेखणीतून नकळत रवींद्रनाथांचा सूर उमटतो. तो त्यांच्या व्यक्तिमत्त्वात इतका एकरूप झालेला असतो की, तो रवींद्रनाथांचा आहे. याचं त्यांना भानही राहात नाही. इंग्रजी भाषेत जसा शेक्सपियर कधी उमटून जातो ते कळतही नाही तशीच बंगाली साहित्यात रवींद्रांची उपस्थिती आहे. आपण जसे बोलता बोलता संतवाणीचा नकळत आश्रय घेतो तसेच बंगाली लोक रवींद्रनाथांचे बोट धरतात. माझं आजचं भाषण म्हणजे रवींद्रांच्या बोटाला धरून त्यांच्या दुनियेत केलेल्या प्रवासाच्या कथेसारखं आहे. प्रवासात आपण बागाही पाहतो आणि बाजारही पाहतो. देऊळ पाहतो आणि एखादा प्रचंड कारखानाही पाहतो. त्या पाहण्यातून मनावर उमटलेल्या निरनिराळ्या चित्रांविषयी बोलत असतो. तसंच रवींद्रनाथांचं मला जे निरनिराळं दर्शन घडलं त्यासंबंधी मी बोलणार आहे. त्यामुळे विषयांतर हाच आजच्या माझ्या बोलण्याचा स्थायीभाव असण्याची अधिक शक्यता आहे. ते अपरिहार्य आहे असं मला वाटतं. खुद्द रवींद्रनाथांना म्हणे कोणीतरी प्रश्न विचारला होता- ‘‘तुमच्यातला एकत्र नांदणारा गुण आणि दोष कोणता?’ त्यांनी उत्तर दिलं होतं Inconsistency- असंबद्धता.’

रवींद्रनाथांनी इतक्या क्षेत्रात ही दौलत आपल्यासाठी ठेवली आहे की, काय पाहू आणि काय नको असं होऊन जातं. ती काही केवळ बंगाली लोकांसाठीच नाही. भाषांतरातूनही ती आपल्याला मिळू शकते. कुठल्यातरी एखाद्या भाषेतल्या शब्दांची शरीरं घेऊनच साहित्यातल्या सौंदर्याला आणि विचारांना यावं लागतं. भाषांतरात त्या भाषेचा प्रत्यक्ष स्पर्श जातो. भाषांतरातून मूळ कवितेचा आस्वाद घेणं हे हातमोजे घालून प्रेयसीच्या गालावरून हात फिरवण्यासारखं आहे, असं म्हटलं आहे तेही खोटं नाही. पण तरीही शब्दांच्या पलीकडलं रहस्य गवसतच नाही असं म्हणता येत नाही.

रवींद्रनाथांची ओढ कुठल्याक्षणी कोणाला आणि कशी लागेल हे सांगणं कठीण आह. ती केवळ साहित्यकलेच्या नित्य उपासकापुरतीच मर्यादित नाही. या माणसाने जिथे जिथे म्हणून स्पर्श केला तिथे तिथे आपला शिक्का उमटवला. चाळिशी उलटल्यानंतर चित्र काढायला सुरुवात केली तर दोन अडीच हजार कॅन्व्हासेस रंगवले. पॅरिसचे चित्रकला- समीक्षक थक्क झाले. सुमारे दोन ते अडीच हजार गाणीच लिहिली नाहीत तर त्यांना चाली दिल्या. त्यामुळे कुठल्या क्षेत्रातल्या माणसाला रवींद्रनाथांना हाक मारावी असं कुठल्या क्षणी वाटेल ते सांगता येत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर महात्मा गांधींचं देता येईल. गांधीजींची काही कवितेचा आस्वाद घेणारे रसिक म्हणून ख्याती नाही. उलट अनेकांना ते अरसिक वाटतात. ते तितकंसं बरोबर नाही. काही विशिष्ट ध्येयांनी प्रेरित झालेल्या महाभागांना जीवनातले अग्रक्रम ठरवावे लागतात. गांधीजींनी असे काही अग्रक्रम ठरवून इतर दोर कापून टाकले होते असं म्हणायला हावं. तरीदेखील जीवनातल्या एका उत्कट प्रसंगी गांधीजींना रवींद्रनाथांच्या कवितेची आठवण होते हे पाहिल्यावर रवींद्रनाथांच्याच नव्हे तर काव्यकलेच्या सामर्थ्यांची एका निराळ्या रीतीने प्रचिती येते. ज्ञानेश्वरांनी ‘जे चला कल्पतरूंचे आरव’ असं म्हटलं आहे- चालत्या कल्पवृक्षांचे बाग म्हटलं आहे. रवींद्रनाथांनी आपल्या प्रतिभेने उभ्या केलेल्या या कल्पवृक्षांच्या बागेतलं वैभव आता सर्वाचं आहे. फक्त त्या बगीच्यात हिंडायची ओढ मनाला लागायला हवी. थोर साहित्यकृतींकडे, कण्वाच्या आश्रमात जाताना दुष्यन्त म्हणाला होता तसं विनीत वेषाने नसलं तरी विनम्र होऊनच जायला हवं. रवींद्रांच्या सृष्टीत शिरल्यावर, त्यांनी जीवनात ज्या ज्या पार्थिव आणि अपार्थिवाला स्पर्श केला तो एका महाकवीचा स्पर्श होता हे ध्यानात आल्याशिवाय राहात नाही. मी हे केवळ भाविकतेनं बोलतो आहे असं कृपा करून समजू नका. अलौकिक प्रतिभेच्या स्पर्शानी एखाद्या दगडाची जेव्हा घारापुरीच्या लेण्यात प्रचंड त्रिमूर्ती झालेली दिसते किंवा कोणार्कच्या सूर्य मंदिरात, अशाच दगडातून टीचभर उंचीची नर्तकी साऱ्या शंृगाररसाचा अर्कबिंदू होऊन आपल्याला आव्हान देते त्या वेळी आपण प्रथम विनम्रच होतो. शब्दसृष्टीच्या ईश्वरांना वंदन करावं असं समर्थानासुद्धा वाटतं ते उगाच नाही. पण ज्याच्या सृष्टीत हे ‘ऐश्वर्य’ लाभतं असा कविश्वर मात्र शतकाशतकातून एखादाच येतो. एरवी ‘कविता गवताऐसी उदंड वाढली’ असं त्या समर्थाना म्हणावंसं वाटायला लावणारे कवी असतातच.

रवींद्रनाथांची शब्दसृष्टी आपल्याला वेळोवेळी या ऐश्वर्याची साक्ष पटवीत असते. त्यांच्या अभिव्यक्तीचं त्यांचं सर्वात आवडतं माध्यम म्हणजे कविता. ते प्रथम कवी होते, नंतर इतर सर्व. अर्थात त्या इतर सर्वातही त्यांच श्रेष्ठत्व त्यांनी सिद्ध केलेलंच आहे. शरदबाबूंसारख्या कादंबरीकाराने ‘गोरा’ कादंबरीबद्दल म्हटलंय की ‘‘ती मी साठ पासष्ठ वेळा वाचली आहे. मी लोकांसाठी लिहिणारा कादंबरीकार असलो तरी रवींद्रनाथ हे माझ्यासाठी लिहिणारे कादंबरीकार आहेत.’’ हे जरी खरं असलं तरी त्यांचा जीव जडलाय तो कवितेशीच. आपल्या आणि कवितेच्या नात्यासंबंधी रवींद्रांनी आपल्या पुतणीला एक सुंदर पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे- ‘कविता माझी पूर्वीपासूनची प्रेयसी. मला वाटतं मी रथीच्या वयाचा होतो तेव्हाच माझा तिच्याशी वाङ्निश्चय झाला. तेव्हापासून आमच्या पुष्करणीचा काठ, वडाचा पार, बंगल्यातला बगीचा, मोलकरणींच्या तोंडून ऐकलेल्या कहाण्या, गाणी, हे सारं माझ्या मनात एक प्रकारची जादूची सृष्टी उभी करीत असे. त्या वेळची माझ्या मनाची धुसर पण अपूर्व अशी अवस्था समजावून सांगणं अवघड आहे. एक मात्र मी नक्की सांगू शकेन- की त्या काळी कवितेबरोबरच माझं शुभमंगल झालं होतं. पण या पोरीची लक्षणं धड नाहीत हे मात्र मान्य केलंच पाहिजे. बाकीचं जाऊन दे पण मोठंसं भाग्यही घेऊन आली नाही ती. सुख दिलं नाही असं नाही मी म्हणणार, पण स्वास्थ्य देण्याचं नाव नको. ज्याला वरते त्याला भरपूर आनंद देते पण कधी कधी तिच्या त्या घट्ट मिठीतून हृद्पिंडातलं रक्त बाहेर काढते. एकदा तिनी एखाद्याची निवड केली की घरदार सांभाळीत स्वस्थ बसेन म्हणायची सोय नाही. तरीसुद्धा माझं खरं जीवन तिच्याशीच निगडित आहे. ‘साधने’त लिहितो. जमीनदारीही सांभाळतो. पण ज्या क्षणी कविता लिहायला लागतो त्या क्षणी मात्र माझं चिरंतन अस्तित्व माझ्यामध्ये प्रवेश करीत असतं. हे माझं स्थान मी चांगले ओळखतो. जीवनात माझ्या हातून कळत नकळत खोटं, आचरण घडलं असेल पण कवितेशी मात्र कधी खोटेपणा करून चालत नाही. माझ्या जीवनातल्या सखोल सत्याचं हे एकच आश्रयस्थान. रवींद्रनाथांच्या कवितेच्या बाबतीत आणखी एक घटक आहे, तो म्हणजे संगीतातला सूर. काही अपवाद सोडले तर कविता गद्यात वाचणं त्यांना रुचतच नव्हतं. आपल्याकडे ‘गीत’ हा शब्द काहीशा तुच्छतेनेचे कवितेच्या संदर्भात वापरायची फॅशन आहे. रवींद्रांनी आपल्या कवितांचा उल्लेख ‘गीत’ असाच केलेला आहे. ज्या त्यांच्या संग्रहाला नोबेल पारितोषिक मिळाले ती ‘गीतांजली’ आहे. मला पुष्कळदा वाटतं की सुरांशी नातं तुटलेली कविता ही इंग्रजांमुळे आपल्या देशात आली. एरवी आम्ही आमचे वैचारिक तत्त्वज्ञानपर श्लोक आणि ओव्यासुद्धा सुरात बुडवून स्वीकारले. इंग्रजी कविता ही अशी नैसर्गिक रीतीने सुरातून आमच्या मनात झिरपली नाही. याचा अर्थ अंग्रजी कवितेला ताल छंद नाही, असा नव्हे. आम्ही ती कविता प्रथम मनातल्या भाषांतर विभागात टाकून शब्दार्थाना महत्त्व देत समजून घेतली. वैचारिक साहित्याचा स्वीकार आणि कवितेचा स्वीकार हा एकाच पद्धतीने होत नसतो. कविता गायला किंवा ओव्या गायला आमच्या देशातल्या लोकांना काही गायन क्लासात जाऊन शिकावं लागत नव्हतं. सुरांचं हे सामथ्र्य रवींद्रनाथांइतकं आधुनिक काळातल्या इतर फारशा कवींनी ओळखलेलं दिसत नाही. पण संतांसारखं त्यांनी सुरांना केवळ भक्तिरसातच स्थान आहे, असं मानलं नाही. रवींद्रनाथांना संगीत हे सर्वव्यापी वाटत होतं. जीवनातले सुख- दु:खाचे, हर्षशोकाचे सारे अनुभव प्रकट करताना शब्दांनी सुरांची साथ सोडणं हे त्यांच्या प्रकृतीला मानवण्यासारखंच नव्हतं.  क्रियापदाहूनही अधिक वेळा आलेले आहेत. त्यांच्या तोंडून त्यांच्या गीताचं गायन ऐकण्याचं भाग्य ज्यांना लाभलं त्यांनी तर त्या अनुभवाचं वर्णन करताना आपली सारी शब्दशक्ती पणाला लावलेली आहे. तद्रूपतेच्या क्षणी प्रथम त्यांच्या मनात सूर जागायचा. त्यांची ‘रांगिये दिये जाव’ अशी एक कविता आहे. जाव, जाव, जाव गो एबार, जाबार आगे रांगिये दिये जाव- जा जा पण जाण्यापूर्वी मला एकदा संपूर्ण रंगवून जा – मला जागवून जा. असा अर्थ आहे. रसिकत्वी परतत्वस्पर्श म्हणजे काय ते कळायला रवींद्रनाथांचं जीवन, त्यांची कार्यक्षेत्रं, त्यांची ध्यानक्षेत्रं, त्यांची कलानिर्मितीची क्षेत्रं यातून आपल्या सर्वाच्याच असलेल्या ‘मी’ला आपण यात्रा घडवली पाहिजे. त्या यात्रेचं पुण्य एकाच वरदानाने आपल्या पदरात पडण्याची शक्यता आहे. ते म्हणजे चित्ताला भयशून्यता लाभणे आणि चित्त भयशून्य झाल्याखेरीज ‘आनंद’ या शब्दाचा अनुभवातून येणारा अर्थ आपल्याला कळणार नाही. उपनिषत्कालीन ऋषींची ‘अमृताच्या पुत्रांनो’ ही हाक आणि ‘पितानोऽहसि’ ही प्रार्थना रवींद्रांच्या फार आवडीची. पारतंत्र्याच्या काळात सारा धीर गमावून बसलेल्या देशबांधनांना त्यांनी ‘अरे तुम्ही अमृताचे पुत्र आहात’ हेच नाना प्रकारांनी पटवण्याचं कार्य केलं आणि हे सारं त्यांच्या जोडीने गात गात केलं. पंचविशीतल्या रवींद्रनाथांनी ‘निर्झरेर स्वप्नभंग’ ही कविता लिहिली होती. नुसताच डोह होऊन पडलेल्या निर्झराच्या प्राणाला रविकिरणाचा स्पर्श होतो आणि तो निर्झर जागून उठतो. मग कडय़ावरून उडय़ा टाकीत, अभेद्य खडक फोडीत सारं जीवन एका नव्या चैतन्याने कसं फुलवून टाकतो हे या कवितेत सांगितलं आहे. असंख्य सत्कर्मामध्ये झोकून दिलेलं रवींद्रनाथांचं जीवन आणि निर्मिती पाहिली की, त्यांच्या कवितेतला निर्झरच रवींद्रनाथांचं रूप धारण करून आपल्यात आला होता असं वाटतं. शांतिनिकेतन जर रवींद्रनाथांची tangible poem  असेल तर निर्झरेर स्वप्नभंग म्हणजे intangible Rabindranath असंच म्हणायला हवं. ही कविता मूळ बंगालीतूनच अनुभवली पाहिजे. मी त्या कवितेचं मराठी भाषांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. केवळ आपल्याला अंधुक कल्पना यावी म्हणून-

आज पहाटे रविकर आला
न कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला
प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला आणि जाहला अंधाऱ्या ह्य़ा
गव्हरात मज स्पर्श आज त्या
पहाट पक्ष्याच्या गीताचा
इतुक्या दिवसामागुनि माझा प्राण कसा मज
नकळे ऐसा जागुनि उठला.
जागुनि उठला प्राण
अरे अन् उसळुन आले नीर
प्राण वासना रोधु न शकली
मत्प्राणांचा धीर।
थरथर थरथर कंपित भूधर
शिलाखंड कोसळून पडले
फुलून फुलून मग फेस उसळला
गर्जत जल संतापुनि उठले
इथे तिथे मग वेडय़ापरि जल
मत्त भिंगऱ्या मारीत सुटले
शोधू लागले- तरी न दिसले
बंदिगृहाचे दार कोठले
सांग विधात्या पाषाणांच्या
कशास येथे राशी पडल्या
चहू दिशांना कशास त्यांच्या
उंच उंच ह्य़ा भिंती घडल्या?
हृदय आता
सर्व बंधने । तोड तोड ही
प्राणांची साधना करोनी
मने जोड ही ।।
लाटेवरती उचलुनि लाटा
आघातावर कर आघाता
मत्त होउनी प्राण जागला
कुठला तम अन् फत्तर कुठला
उसळुनि उठता सर्व वासना
जगती कोणाचे ही भय ना ।।
करुणाधारा आता ढाळिन
पाषाणांच्या कारा फोडिन
बुडवुनि सारे जग हे टाकिन
चहू दिशांना भटकत भटकत
पिशापरी मी गाइन गाणी
केस पिंजुनी- फुले उधळुनी
इंद्रधनूने रंगवलेले
पंख पसरुनी
रविकिरणातून हासू फुलवित
टाकिन पंचप्राण उधळुनी
या शिखरातून त्या शिखरातून
देईन झोकून
ह्य़ा खडकातून त्या खडकातून
घेइन लोळण,
हसेन खळखळ गाइन कलकल
धरुनि ताल मग टाळी देऊन
माझ्यापाशी कथा कितीतरी
गाणी कितीतरी
प्राणांची अन् शक्ती कितीतरी
सुखे किती अन् अनंत ऊर्मी
मम जीवाची कोण उभारी
काय आज मज झाले न कळे,
कानी माझ्या महार्णवाचे
गाणे आले
चहू दिशांना कसले हे कारागृह दिसते
फोड फोड रे कारा ती तव वज्राघाते
पहाट पक्षी कसले गाणे गाऊ लागला
कुठला रविकर आज असा मज स्पर्शुन गेला
न कळे कैसा प्राणा माझ्या स्पर्शुनि गेला

‘आमार जीबोन आमार बानी’ या रवींद्रनाथांच्या उक्तीची सत्यता पटवणारी ही कविता आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याचि कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया यातला साचभाव आणि वर्तन या दोन्हींची अनुभूती लाभून आपल्यातला सतत मलिन आणि दुबळा होणारा ‘मी’ सबळ आणि निर्मळ होतो. आपल्यातल्या त्या ‘मी’ ची मरगळ घालवायला रवींद्रनाथांकडे काहीही मागायला जावे. अशी मागणाऱ्यांची भूमिका घेऊन मी त्यांच्यापाशी जेव्हा जातो तेव्हा माझ्या झोळीत जे पडले त्याबद्दल मी आपल्याशी बोललो. रवींद्रनाथ आणि मी असं ज्या वेळी मी म्हणतो त्या वेळी एक उदार दाता आणि सदा अतृप्त याचक हेचं आमचं नातं असतं.

(‘रवींद्रनाथ : तीन व्याख्याने’ या श्रीविद्या प्रकाशनतर्फे प्रकाशित पुस्तकातून साभार.)

राजा पटवर्धन, सौजन्य – लोकसत्ता

मथुरा उत्तर प्रदेशात. कंस वधाचा भूकंप तिथेच झाला पण हादरे बसले ते मगधात. आजच्या पाटण्यात. कारण जरासंध मगधाचा राजा. कंस त्याचा जावई. कंस वध ही पुढच्या जरासंध वधाची रंगीत तालीमच होती. कंस मारला गेला व कृष्ण संपूर्ण भारताच्या राजकीय रंगमंचावर अवतरला. कृष्णाने तारुण्यात पदार्पण केले. पुढे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात समस्त राजांमधून भीष्माने अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला देऊन त्याच्या अखिल भारतीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. ‘महाभारत’ या कौरवपांडवांच्या पराक्रम गाथेत संपूर्ण कृष्णदर्शन होत नाही म्हणून व्यासांनी हरिवंश (खिलपर्व) लिहिला. त्यातली ही कंसवधाची कथा. याला पुराण म्हणा, इतिहास वा काव्य म्हणा. समाजशास्त्र ठासून भरलेली ही कथा आहे. कृष्णजन्म आपण आजही साजरा करतो.

श्रीकृष्ण हा महाभारताचा एकमेव नायक नसला तरी महाभारतात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्यिकांनी त्याला युगपुरुष, पूर्ण पुरुष, सदोष्ण मानवासह ‘भगवान’ श्रीकृष्ण अशा नावांनी संबोधले आहे. महाभारताच्या अद्भूताप्रमाणे तो विष्णूचा अवतार. महाभारतात एका प्रमुख व्यक्तीचा उल्लेख झाला की त्याच्या जन्माची एक कथा महर्षी व्यास रंगवून सांगतात. कौरव- पांडवांच्या पराक्रम गाथेत जितका श्रीकृष्ण येतो त्याने व्यासांचे समाधान झाले नाही. श्रीकृष्णाचे संपूर्ण दर्शन त्यात होत नाही म्हणून ‘खिलपर्वाचे’ दोन खंड जोडून त्याला ‘हरिवंश’ म्हटले गेले. श्रीकृष्ण हा वसुदेव- देवकीचा पुत्र.

वसुदेवाचा गतजन्माचा इतिहास असा- ब्रह्मदेवाचा पुत्र मरिची. मरिचीचा पुत्र कश्यप. या कश्यपाच्या अनेक भार्यापैकी अदिती व सुरभी या प्रमुख. म्हणजे कश्यप त्यांचा शब्द अव्हेरीत नसे. यज्ञ संपन्न करण्यासाठी कश्यपाने वरुणाच्या दुधाळ कामधेून पळवल्या. यज्ञसमाप्तीनंतर या गाई कश्यपाने वरुणाला परत देऊ नयेत म्हणून अदिती व सुरभी या भार्यानी त्याला गळ घातली. वरुणाने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. गाईंचा अपमान हा ब्राह्मणांचाच अपमान समजून ब्रह्मदेवाने नातवाला (कश्यपाला) शाप दिला. ‘पुढच्या जन्मात पृथ्वीवर गोवर्धन पर्वताजवळ मथुरेत गोकुळात गोप वेषात गाईंचा सांभाळ करणारा गुराखी होशील. वसुदेव म्हणून राहत असताना अदिती व सुरभी अनुक्रमे देवकी व रोहिणी रूपाने तुझ्या भार्या होतील. देवकार्यासाठी देवकी कृष्णाला व रोहिणी बलरामाला जन्म देईल.’

कृष्ण राजा झाला नाही. गुराखी पित्याचा मुलगा राजा कसा होणार? त्यानेही पित्याप्रमाणे गाईंची खिल्लारे सांभाळली. डोक्यावर मोरपीस, हातात बासुरी. वनात गाई चरवून गोकुळात परत यायचे. गोप- गौळणींबरोबर खेळायचे. नदीत डुंबायचे. बलरामाने हातात नांगर घेतला. पशुधन आधारित ऋषीप्रधान भारताचे हे दोघे बंधू प्रतीक झाले. ‘बैलजोडी’ व ‘गायवासरू’ या चिन्हांचे माहात्म्य त्यामुळेच महाभारत काळाशी जोडलेले आहे. (महात्मा गांधींनी काँग्रेसला बैलजोडी दिली व इंदिरा गांधींनी गायवासरू दिले.)

अशा या गुराखी कृष्णाचा मामा मथुरेचा राजा कंस. हा कंस म्हणजे देव-असुर संग्रामात दैत्यांचा नेता म्हणून लढलेला ‘कालनेमी’. या कालनेमीचा विष्णूने संहार केला होता. कंस व कृष्ण ही मामा- भाचे जोडी दोघेही अवतारी. कृष्ण देवाचा तर कंस असुराचा अवतार.

महाभारतात कंसाला उग्रसेन पुत्र व देवकीला कंसभगिनी म्हटलेले आहे. उत्तरेत वृष्णी, अंधक, आहुक, सात्वत, भोज अशी क्षत्रियकुलांची नावे होती. हे सर्व यादव संपन्न व पराक्रमी म्हणून प्रसिद्ध. उग्रसेन हा भोज व वृष्णी राजा म्हणून ओळखला जात होता. मग उग्रसेन पुत्र कंसाने या यादवकुळाशी वैर का पत्करले? त्यांच्या नाशाला का प्रवृत्त झाला? कंसाने उग्रसेनाचा त्याग केला इतकेच नव्हे तर त्याला बंदिस्त केले. भगिनी देवकीला तिच्या पतीसह म्हणजे वसुदेवासह नजरकैदेत ठेवले आणि असे करायला ‘नारदाने’ प्रवृत्त केले.
नारद हा ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत संचार करणारा ब्रह्मर्षी. एकदा मेरुपर्वतावर देवसभेतली सल्लामसलत त्याने ऐकली. तो वृत्तांतच त्याने कंसाला सांगितला.

‘विष्णू कृष्णावतार म्हणून देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. तिचा आठवा गर्भ कंसाचा मृत्यू होणार आहे. कंसा! तुझा मित्र म्हणून हे रहस्य मी तुला सांगतो आहे. देवकीच्या गर्भाचा तू नाश कर. दुर्बल स्वजन म्हणून त्यांची उपेक्षा करू नकोस.’

नारदाची भविष्यवाणी आकाशवाणीच असते. त्याची बालसूर्यासारखी तेजस्वी दृष्टी. जटामुकुट. चंद्रकिरणाप्रमाणे शुभ्र वस्त्र. पाठीवर मृगाजीन. गळ्यात सुवर्णाचे यज्ञोपवीत. दंडकमंडलू हातात. सप्तसुरी महती वीणा वाजवीत चारवेद गाणारा नारद महामुनी बोलला ते ऐकून कंस सर्वागाने थरथरला. नारद कलहप्रिय युद्धोत्सुक म्हणूनही प्रसिद्ध होता. कंसाचा अहंकार नारदाने दुखावला होता.

देवकीसारख्या सामान्य स्त्रीचा पुत्र इंद्रासह देवांना जिंकणाऱ्या कंसाला मारणार? बाहुबळावर पृथ्वी ढवळून काढणारा मी देवांची पूजा करणाऱ्यांचा पशू- पक्ष्यांसह नाश करीन. नारदाने कंसाच्या बुद्धीचा नाश करून टाकला. कंसाने हय, प्रलंब, केशी, अरिष्ट, कालीय व पूतनेला आदेश दिले. यादवकुलांना त्रास द्या. शत्रू दिसताच ठार करा. देवकी तिच्या घरी सुरक्षित असते. माझ्या भार्या तिच्या सर्व अवस्थेवर नजर ठेवतील. वसुदेवावर खास दासींकडून लक्ष ठेवले. मला देवकीचे गर्भ जन्मत:च मारून टाकायचे आहेत. जरासंधाच्या सैन्याचा पराभव करणाऱ्या, इंद्राला धमकावून मेघवृष्टी करू शकणाऱ्या, जरासंधकन्यांचे हरण करणाऱ्या कंसाला देवकीच्या पुत्राकडून मृत्यू? कंस नारदाचे शब्द स्वीकारायला तयार नव्हता. पण दुर्लक्षही करणार नव्हता.
कंसाला स्वत:च्या ‘अमानुष’ गुणांची खात्री होती. मथुरेचा राजा उग्रसेनाच्या मनात पुत्रवात्सल्य त्याला जाणवले नाही. त्याने माता-पित्यांचा त्याग करून उग्रसेनाचे सिंहासन बळकावले. युवराजाला पित्यादेखत राज्याभिषेक झाला. सर्वज्ञ नारदालाच आपल्या जन्मरहस्याचे कोडे उलगडण्यास सांगितले. ‘कंसा! मथुरेचा राजा महाबली उग्रसेन तुझा जन्मदाता पिता नाही. तुझा उत्पादक पिता दानवराज सौभपती ‘द्रुमिल’ आहे.’ कंसाला स्फुरणच चढले. त्याचा आत्मविश्वास बळावला. उत्कंठा शिगेला पोहोचली. ‘हे ब्राह्मण ब्रह्मर्षी! हा द्रुमिल दानव कसा आहे? हे विप्रश्रेष्ठा, त्या द्रुमिल दानवाचा व माझ्या मातेचा समागम कसा झाला? कुठे झाला? सर्व वृत्तांत मला सविस्तर ऐकव.’ महाभारताच्या पारदर्शक शैलीत व्यासांनी नारदाकडून ‘सच का सामना’ हा रिअ‍ॅलिटी शोच दाखवला आहे. विषय- ‘माता-पित्याचा समागम’. ऐकणारा- पुत्र कंस. कथन करणारा- ब्रह्मर्षी नारद. ‘हे कंसा! तुझी माता रजस्वला अवस्थेत सखींसह सुमायुन पर्वतावर विहार करत होती. पक्ष्यांचे मधुर स्वर, टेकडय़ांतून उमटणारे प्रतिध्वनी, पुष्पगंधित मंद वारा, सर्व पृथ्वी तारुण्याने भरलेल्या स्त्रीसारखी मोहक दिसत होती. कामवासनेने उद्दीपित झालेली तुझी माता फुले वेचीत असताना सौभपती द्रुमिलाने पाहिली. वातावरणातली उत्कटता, भुंगे व पुष्पगंध चेतवीत होते. द्रुमिलाला वाटले की ही तिलोत्तमा किंवा ऊर्वशीच असणार. द्रुमिल रथातून उतरला. त्याने क्षणभर नजर स्थिर करून ही अप्सरा म्हणजे उग्रसेनपत्नी असल्याचे जाणले. मायावी द्रुमिलाने उग्रसेनाचे रूप घेऊन तिला वश केले. दोघांचाही कामज्वर शांत झाला. हे कंसा! त्या समागमातून तुझा जन्म झाला.’ तुझी आई त्या उन्मादातून बाहेर आली. भानावर आली. भेदरून गेली. द्रुमिलाला तिने विचारले, ‘पाप्या! तू कोण आहेस? नीचकर्माने माझे पातिव्रत्य भ्रष्ट केले आहेस. दुष्टा विश्वासघातक्या! परस्त्री भ्रष्ट करणाऱ्या तुझे आयुष्य क्षीण होईल.’ तुझा पिता या तळतळटाला डरला नाही. उलट मग्रुरपणे म्हणाला, ‘हे स्त्रिये, तू उग्रसेनासारख्या सामान्य मानवाची पत्नी आहेस. तूही एक चंचल स्त्री आहेस. स्वप्नातल्या व्यभिचाराने कुणाचे पातिव्रत्य भ्रष्ट होत नाही. तसेच अमानुष व्यभिचाराने स्त्री दूषित होत नसते. उलट अशा संबंधातून स्त्रियांनी बलवान देवतुल्य पराक्रमी पुत्रांना जन्म दिलेला आहे’. राक्षस तत्त्ववेत्ता झाला.

‘तू कोण अशी मोठी पतिपरायण सती लागून गेलीस? हे उन्मत्त स्त्रिये! कंस नावाचा शत्रूंचा नाश करणारा पुत्र तुला होईल. बल, वीर्य, मद, प्रभाव, तेज, शौर्य व पराक्रमाने तो युक्त होईल. द्रुमिलाच्या या वक्तव्याचा कंसा! तुझ्या मातेने धि:कार केला.’ ‘सदाचरणाचा नाश करणारा पुत्र मला देऊन तुझ्या मृत्यूलाच तू जवळ केले आहेस. माझ्या पतीच्या कुळात जन्मलेला एक पुत्र तुझ्या या पुत्राचा साक्षात मृत्यू होईल.’ नारद एवढे बोलून अंतर्धान पावला. कंसाला नवीन साक्षात्कार झाला होता. मानवाच्या क्षुद्र विर्यातून माझा जन्म झालेला नाही. एका दानवेंद्राचा मी मुलगा आहे. यादवांचे कुळ वृद्धिंगत करणाऱ्या उग्रसेनाला कंसाने राज्यावरून दूर सारून बंदिस्त केले. उग्रसेन राजा कंसाचा लौकिकार्थाने पिताच होता. देवकी बहीण होती. मातापित्यांना व भगिनीसह तिच्या पतीला कैदेत ठेवून कंस मथुरेचा राजा झाला. बंधूंसह पित्याला तुरुंगात टाकणे ही मोगल परंपरा आहे, इस्लामी रीत आहे अशी आपल्याकडे दृढ समजूत आहे, परंतु ही मथुरेची परंपरा आहे. असो.

वरच्या सत्याला सामोरा जाणाऱ्या रिअ‍ॅलिटी शोमुळे एक गोष्ट स्पष्ट होते. कंस हा राजा उग्रसेनाचा ‘औरस’ पुत्र नाही, तर ‘क्षेत्रज’ पुत्र आहे. याचा अर्थ असा की ‘क्षेत्र’ म्हणजे स्त्री. जमिनीसारखी एखादी चीजवस्तू. कंसाची आई हे उग्रसेनाचे क्षेत्र. तिच्या पोटचा म्हणून क्षेत्रज. प्रश्न असा पडतो की द्रुमिलाच्या या फसवणुकीची (बलात्कारच) कल्पना कंसाच्या आईने पतीला दिली का? खिलपर्वात तसा स्पष्ट उल्लेख कुठेही नाही. आई-वडिलांनी मला टाकले आहे. ते माझा द्वेष करतात, असे कंस म्हणतो. आता प्रश्न आहे देवकीचा. कंसाची भगिनी म्हणून देवकी व देवकीचा बंधू म्हणून कंस असे उल्लेख आहेत. कंस देवकीचे सहा गर्भ जन्मताच मारून टाकतो. देवकी व रोहिणी  या वसुदेवाच्या भार्या म्हणजे सवती. गोकुळातला नंद व यशोदा ही गोपजोडी यदुवंशीयच. यांच्या संगनमताने व योगसामर्थ्यांने देवकीचा सात महिन्यांचा सातवा गर्भ रोहिणी धारण करते. (देवकी सातवा गर्भ टिकला नाही असे सांगते.) देवकीला पुन्हा आठवी गर्भधारणा होते. तिकडे यशोदेलाही दिवस जातात. कंसाच्या हेरांना किंवा जरासंधाच्या मुलींना (कंसाच्या दोघी भार्या) न कळता योगसामर्थ्यांने यशोदा व देवकीच्या पोटी एकाच वेळी मुले जन्मतात. देवकीचा पुत्र व यशोदेची कन्या यांची अदलाबदल घडवून आणली जाते. आजचे हिंदी चित्रपट बिनतक्रार करोडो लोक जर पाहू शकतात तर महाभारताचे अद्भूत खटकण्याचे कारण काय? देवकीचे सातवे अपत्य समजून कंस यशोदेची मुलगी ताब्यात घेतो. शिळेवर आपटणार एवढय़ात ती हातातून निसटते. भयानक रूप घेऊन ती देवी गर्जना करते. ‘दुष्ट कंसा! तुझ्या नाशासाठीच तू दुष्कृत्य केले आहेस. तुझ्या अंतकाळी तुझा शत्रू तुला फरफटवीत असताना मी तुझे रक्त प्राशन करीन.’ कंसाला नारदाचे शब्द आठवले. देवकीचा आठवा पुत्र तुझा मृत्यू होईल. कंस पूर्णपणे हतबुद्ध होतो. रोहिणीला बलराम झालेला असतो. देवकीचा कृष्ण यशोदा सांभाळते. वसुदेव-देवकी कंसाच्या नजरकैदेतच असतात.

कंस हा जसा उग्रसेनाचा औरस पुत्र नव्हे. त्याप्रमाणे देवकी ही उग्रसेनाची कन्या नव्हे. उग्रसेनाचा देवक नावाचा एक भाऊ असतो. त्याची कन्या देवकी. याचा अर्थ कंस व देवकी ही दोन जावांची मुले. चुलत बहीण-भाऊ आणि त्या नात्याने कंस हा कृष्णाचा चुलत मामा. आता मामा-भाचे म्हटले की मामाचे वडील भाच्याचे आजोबा असतात. परंतु कंसाचा पिता द्रुमिल असल्याने तो कृष्णाचा आजोबा नाही व उग्रसेनही सख्खा आजोबा नाही.

हरिदासाची कथा मूळ पदावर आणायची तर आपण कंसाचे जन्मरहस्य पाहत होतो. कृष्णाचे जन्मदाते मातापिता कंसाचे दास होते. कैदेत होते. कंसाचा काळ गोकुळात क्रीडा करीत होता. त्याच्या क्रीडा दंतकथा बनून मथुरेपर्यंत पोहोचल्या. कृष्णाने तर परंपरेने चाललेला इंद्रोत्सव बंद करण्याचा विचार मांडला, आपले रक्षण गोवर्धन पर्वत करतो. वनातल्या वाघ-सिंहांच्या भीतीने वनाचा नाश थांबतो. या वनामुळेच आपली गाई-गुरे जगतात. आपण धान्य पिकवतो. आपण इंद्रपूजेऐवजी गिरिपूजा, गोपूजा करूया. हा बंडखोर विचार होता. इंद्र देवांचा राजा असेल तर देव त्याची पूजा करोत. आपण गुराखी, गवळी यांनी इंद्राला कशाला देव मानायचे? कृष्णाने  इंद्राचे ‘उपरेपण’ सिद्ध केले. इंद्रोत्सव बंद झाला. इंद्र खवळला. त्याने मेघांना गोकुळ परिसरात ‘ढगफुटीचा’ आदेश दिला. कृष्णाने गोवर्धन उपटून विवरात गाई सुरक्षित ठेवल्या. गोवर्धन उचलून धरला. गोपाळांच्या प्रचंड संघटित शक्तीसमोर इंद्र हतबल झाला. त्याने कृष्णाशी तडजोड केली. वर्षांकालाचे चार महिने. त्यातले दोन वज्रधारी इंद्राने कृष्णाला दिले. कृष्ण गिरिधर, गोविंद झाला व स्वर्गात इंद्राने त्याला उपेंद्र बनवले.

इंद्रालाही कृष्णाने नमविल्यानंतर कंसाला नारदाचे वचन आठवले. कृष्ण हाच देवकीचा पुत्र आहे. नारदाने तसे सांगितलेही व बलराम वसुदेवाचाच पुत्र असून देवकी-रोहिणीच्या संगनमताने हे सर्व घडले आहे. कंसाची पाचावर धारण बसली. भयभीत होऊन त्याने सुनामाला सज्ज केला. सुनामा हा कंसाचा बंधू. उग्रसेनाला कंसाच्या आईपासून झालेला पुत्र. त्याने गोकुळावर हल्ला केला पण देवकी पुत्रांनी त्याला पराभूत केले. केशी, अरिष्टासुर हे अश्व, वृषभरूपी राक्षसही मारले गेले. कालीयाचे मर्दन करून कृष्णाने त्याला सागरात घालवून दिले. कृष्ण हा देवकीचा पुत्रच आहे याबद्दल कंसाची खात्री पटली.

त्याने कूटनीतीचा अवलंब केला. धनुष्ययागाचे निमित्त करून एक महोत्सव आयोजित केला. कृष्णबलराम, नंदादी गोपाळांना ‘कर’ घेऊन मथुरेत आमंत्रण दिले. कृष्ण-बलरामांना पाहण्याची इच्छा आहे व कुस्ती खेळण्याची हौस भागवावी असा भरगच्च कार्यक्रम आखला. अक्रुराकडून निमंत्रण गेले; परंतु उग्रसेन, वसुदेव, देवकीला खरा बेत कळला.
कृष्णाने हे आमंत्रण स्वीकारले. रामकृष्ण मथुरेत दाखल झाले. चाणूर व मुष्टिक हे महामल्ल कंसाने तयार ठेवले होते. रामकृष्ण युवक होते. चाणूर मुष्टिकानी यादवपुत्र गोकुळात पुन्हा प्रवेश करू शकणार नाहीत असे वचन कंसाला दिले. पण कंसाचा या मल्लांपेक्षा गजराजावर जास्त विश्वास होता. ‘कुवलयापीड’ नावाचा प्रशिक्षित हत्ती माहुतासह प्रवेशद्वारावर खडा पहारा देत स्वागतास सज्ज होता. यादवांचा सर्वनाश प्रत्यक्ष पाहण्यासाठी कंस सज्ज झाला. आखाडय़ात येण्यापूर्वीच हत्ती यादवपुत्रांना मारणार होता.

कृष्ण-बलरामांनी राजमार्गावरून चालत जाऊन प्रथम धोब्याकडून कंसाची राजवस्त्रे परिधान केली. माळ्याकडून पुष्पहार घालून घेतले. कुब्जेकडून कंसासाठी तयार झालेली चंदनाची उटी स्वत:च्या अंगाला लावली. शस्त्रागारातील राक्षसांनी पूजन केलेले अजिंक्य धनुष्य मधोमध तोडून आसमंतात भयंकर ध्वनी घुमवला. कंसाच्या घशाला कोरड व अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. मल्ल युद्धासाठी आखाडा सज्ज होता.

रामकृष्णांचे स्वागत करायला कुवलयापीड आतुर होता. माहुताने प्रेरणा दिली. कृष्ण बलराम सावध होते. सोंडेच्या कक्षेत येताच हत्तीने दोघांना सोंडेत पकडले. कृष्णाने हत्तीचे सुळे उपटून माहुताला प्रसाद दिला. तर बलरामाने कुवलयापीडाला विपुच्छ केले. रामकृष्ण काही घडलेच नाही असे भासवत आखाडय़ात उतरले. ‘बिग बॉस-कंस’ प्रेक्षागारात वसुदेव देवकीच्या समोर बसला होता. उग्रसेन, कंसमाता भेदरून गेले होते. मल्ल एकमेकांना भिडले. केशी- अरिष्टासुराचे झाले तेच चाणूर मुष्टिकाचे झाले. माती चाटून त्यांना आकाशदर्शन घडले. रामकृष्णांनी षड्डू ठोकला. कुणीही मल्ल आला नाही. क्षणार्धात कृष्णाने कंसाकडे धाव घेतली. त्याचा मुकुट फेकून केस पकडून त्याला फरफटवत आखाडय़ात फेकला. गळा दाबून कंसाचे धूड मातीत फेकले.
जन्मानंतर इतक्या वर्षांनी वसुदेव देवकीला पुन:दर्शन झाले. देवकीला आठ पुत्र झाले होते, परंतु एकदाही तिला कुणालाही दूध पाजता आले नव्हते. परंतु आज पुत्राना आपल्या दुधाने न्हाऊ घातले. पान्हा आटतच नव्हता.

कंस पत्नींनी आक्रंदन सुरू केले. स्वर्गातील आमच्यापेक्षाही सुंदर स्त्रियांनी तुला आकृष्ट केले का? म्हणून ऊर बडवू लागल्या. कंस माताही रडू लागली. कंसाच्या धनुर्याग महोत्सवाची अशी सांगता झाली.

कंसाच्या आईने उग्रसेनाला, आपल्या पतीला विनंती करून कंसाचे अंत्यसंस्कार कृष्णाकडून करवून घेतले. ‘मरणानंतर वैर संपले’ असे म्हणून कृष्णाने कंस मामाचे मृत्युसंस्कार पार पाडले. उग्रसेनाने संपूर्ण मथुरेचे राज्य खजिन्यासकट, दासींसह कृष्णाच्या स्वाधीन केले. कृष्णाने ते सर्व नाकारून उग्रसेनाला पुन्हा राज्यावर मथुरानरेश म्हणून स्थानापन्न केले. मला गाई राखायला आवडतात असे म्हणून कृष्ण गोवर्धन परिसरात पुन्हा गेला.

मथुरा उत्तर प्रदेशात. कंस वधाचा भूकंप तिथेच झाला पण हादरे बसले ते मगधात. आजच्या पाटण्यात. कारण जरासंध मगधाचा राजा. कंस त्याचा जावई. कंस वध ही पुढच्या जरासंध वधाची रंगीत तालीमच होती. कंस मारला गेला व कृष्ण संपूर्ण भारताच्या राजकीय रंगमंचावर अवतरला. कृष्णाने तारुण्यात पदार्पण केले. पुढे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात समस्त राजांमधून भीष्माने अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला देऊन त्याचे अखिल भारतीय नेतृत्व शिक्कामोर्तब केले. ‘महाभारत’ या कौरवपांडवांच्या पराक्रम गाथेत संपूर्ण कृष्णदर्शन होत नाही म्हणून व्यासांनी हरिवंश (खिलपर्व) लिहिला. त्यातली ही कंसवधाची कथा. याला पुराण म्हणा. इतिहास वा काव्य म्हणा. समाजशास्त्र ठासून भरलेली ही कथा आहे. कृष्णजन्म आपण आजही साजरा करतो.
वाचकांना एक विनंती. लक्षश्लोकी महाभारतातून (भांडारकरी-चिकित्सित संपादित प्रतीचा आग्रह नाही) कंसाच्या आईचे नाव ससंदर्भ सांगेल त्या वाचकाला कंसाचा उत्पादक पिता ‘द्रुमिल’ कुणी मारला हे मी सांगेन.

कुमार केतकर, सौजन्य – लोकसत्ता

ज्यादिवशी महाराष्ट्राला ५० वर्षे पूर्ण होतील, त्याच दिवशी गुजरातचाही सुवर्णमहोत्सव दिन साजरा होत असेल. पण महाराष्ट्र- मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र- होण्यासाठी जसा संघर्ष झाला तसा गुजरातसाठी झाला नव्हता. त्यांच्याकडे कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे, आचार्य अत्रे, एस. एम. जोशी अशा दिग्गजांची समिती नव्हती. कामगारांचे संप, हरताळ, मुंबई बंद, शिवतीर्थावर जंगी सभा, साहित्य संमेलनांमध्ये ठराव असले गुजरातमध्ये काही होत नव्हते. याचा अर्थ गुजराती लोकांना त्यांच्या भाषेचा, संस्कृतीचा अभिमान नव्हता? तसे तर शक्य नाही. शिवाय गेली काही वर्षे तर गुजरातचा अभिमान अक्षरश: ओसंडून वाहतो आहे. अमेरिका, आफ्रिका, युरोप, इतकेच काय- हाँगकाँग, सिंगापूर, मॉरिशस अशा जगातील अनेक ठिकाणी जे लक्षावधी गुजराती लोक आहेत, ते आज गुजरातच्या औद्योगिक व आर्थिक विकासासाठी प्रचंड भांडवल गोळा करीत आहोत. गुजराती भाषिक या आर्थिक अभिमानापोटी मराठी अस्मितेसारखा ऊठसूट रस्त्यावर उतरत नाही, त्यांच्या जंगी सभा होत नाहीत, मोर्चे- मिरवणुका निघत नाहीत आणि तरीही त्यांचा ‘गर्व’ किती जाज्ज्वल्य असतो, हे शिकागोपासून अहमदाबादपर्यंत आणि जोहान्सबर्गपासून ते कच्छपर्यंत सर्वत्र दिसून येते.

गुजराती अस्मितेचा आत्मा फक्त त्यांच्या भाषेत नाही, तो त्यांच्या जेवणशैलीतही आहे. उद्योगधंद्यांत, अर्थव्यवहारात तर तो ओतप्रोत भरलेला आहे. ज्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे, त्या मुंबईतील स्टॉक मार्केटमध्ये सुमारे तीन-साडेतीन हजार ब्रोकर्स गुजराती आहेत. आणखी तेवढेच मारवाडी आहेत. मुंबईत ज्या ६५ कापड गिरण्या होत्या, त्यांचे मालकही मारवाडी-गुजरातीच होते. त्या गिरण्या जमीनदोस्त झाल्यानंतर जे टोलेजंग मॉल्स आणि गगनचुंबी इमारती तिथे आणि मुंबईत सर्वत्र उभ्या राहत आहेत त्यातही गुजराती-मारवाडय़ांचेच र्सवकष वर्चस्व आहे. धान्य बाजारापासून कापड बाजारापर्यंत, किराणा मालापासून ते औषध बाजारापर्यंत जवळजवळ सर्व धंदे त्यांच्याच हातात आहेत. जे मुस्लीम-बोहरी वा अन्य या धंद्यांत आहेत त्यांची भाषाही गुजरातीच आहे. जे पारशी उद्योगात वा कलाक्षेत्रात आहेत, त्या सर्वाची ‘लिंग्वा फ्रँका’ म्हणजे संवाद-स्नेहभाषाही गुजरातीच आहे. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हाही हीच परिस्थिती होती.

मुंबई द्विभाषिक आणि वेगळी ठेवायचा प्रस्ताव जेव्हा होता तेव्हा तिचे स्वरूप मराठी व गुजराती या दोन भाषांपुरतेच होते. कानडी, तामीळ, मल्याळी समाज त्यावेळीही मुंबईत होते, पुढे त्यांची संख्याही वाढली; पण मुंबईवरचा प्रभाव हिंदी, इंग्रजी, मराठी, गुजराती यापलीकडे गेला नाही. हिंदी चित्रपटसृष्टीची राजधानी तेव्हाही मुंबईच होती. ‘बॉलीवूड’ नावाचे बारसे तेव्हा झाले नव्हते. तेव्हाही त्या बॉलीवूडपूर्व चित्रसृष्टीवर प्रभुत्व (व्ही. शांतारामांसारखे अपवाद वगळता) बिगरमराठी ‘उत्तरे’चेच होते. राज व शम्मी कपूर, दिलीपकुमार, देव आनंद, मोहम्मद रफी, मुकेश, नौशाद, ओ. पी. नय्यर, हसरत जयपुरी, मजरुह सुलतानपुरी, साहिर लुधियानवी, नर्गिस, मधुबाला, मीनाकुमारी, वहिदा रहमान या अभिनेते- अभिनेत्री, संगीतकार, कवींचाच तेव्हाही वरचष्मा होता. मुंबईबद्दल देशभर आकर्षण होते ते या शहराच्या मराठी बाण्यामुळे नव्हे, तर या महानगरातील चंदेरी सृष्टीमुळे, उद्योगधंद्यांमुळे, शेअरबाजारामुळे!
कामगार चळवळ हाही मुंबईचा ‘स्वभाव’ होता. पण त्याचे नेतृत्वही कॉम्रेड डांगेंप्रमाणेच डिमेलो, जॉर्ज फर्नाडिस, शांती पटेल, अशोक मेहता यांच्याकडे होते. कामगार प्रामुख्याने मराठी होते. त्यामुळे एकूण ट्रेड युनियन चळवळीवर मराठी ठसा असला तरी त्या वर्गाने ‘आंतरराष्ट्रीयत्व’ स्वीकारलेले असल्याने तो बाणा जितका मराठी होता, तितकाच ‘लाल’ही होता. गिरगावपासून पाल्र्यापर्यंत आणि गिरणगावापासून दादपर्यंत पांढरपेशा चाकरमान्यांचा जो मध्यमवर्ग होता, त्याची जीवन-भाषाशैली मराठी होती; पण त्यांचा प्रभाव अवघ्या मुंबईवर नव्हता.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला खरा; पण मुंबईचा ‘एलिट’ वर्ग, त्यांच्याच वर्तुळात वावरणारा ‘सेलिब्रिटी क्लास’ किंवा मुंबईची देशाला ओळख करून देणारा उच्चभ्रू श्रीमंत वर्ग हा जवळजवळ ९० टक्के (कदाचित त्याहूनही अधिक) बिगरमराठीच होता. (आजही बऱ्याच अंशी तीच स्थिती आहे.)
मराठी रंगभूमी, मराठी संगीत, नाटय़संगीत, मराठी साहित्य, मराठी सामाजिक- सांस्कृतिक विचार, विविध कोश-ज्ञानकोशांची परंपरा हे सर्व बऱ्यापैकी समृद्ध होते. (पण ती समृद्धीही फार होती, असा भ्रम बाळगण्याचे कारण नाही. या सर्व सांस्कृतिकतेलाही मर्यादा होत्या. आणि मागे वळून पाहताना तर ते सर्व अधिकच खुजे भासते. असो.) मराठी नाटके गुजरातीमध्ये भाषांतर होऊन सादर होत. (आजही होतात!) मराठी कादंबऱ्याही गुजरातीमध्ये येत. पण मराठी साहित्यसृष्टीने तामीळ वा बंगाली, मल्याळी वा पंजाबी साहित्य-संस्कृतीवर प्रभाव टाकला, असे झाले नाही. रवींद्रनाथ टागोर, सत्यजीत रे, मृणाल सेन, शंभू मित्रा इत्यादी बंगाली संस्कृतीवैभवाचा मराठीवर परिणाम झाला. प्रेमचंद, मुल्कराज आनंद, फणेश्वरनाथ रेणू या व इतर काही हिंदी साहित्यिकांचा मराठी साहित्यविश्वात गाजावाजा झाला. इतरही उदाहरणे देता येतील. मुद्दा स्पष्ट करण्यासाठी ही वानगीदाखल उदाहरणे दिली.

याउलट थोडय़ाफार प्रमाणात विजय तेंडुलकरांचा अपवाद वगळता पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, विंदा, मर्ढेकर, सुर्वे यांचा साहित्यसंस्कार इतरभाषिक मानसिकतेवर मात्र उमटलेला दिसत नाही. तेंडुलकरांचाही थोडाफार प्रभाव महाराष्ट्राबाहेर पोहोचला तो हिंदी चित्रपट आणि हिंदी नाटय़सृष्टीमुळे, आणि मुंबईच्या ‘कॉस्मोपोलिटन’ एलिट वर्गाने (म्हणजे श्याम बेनेगल, अलेक पदमसी, कुमुद मेहता, गिरीश कर्नाड) त्यांना सीमेपलीकडे नेले म्हणून! मर्ढेकर किंवा पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज वा विंदांना ते ‘भाग्य’ लाभले नाही.

मुद्दा हा, की मराठी बाण्याचा वा अस्मितेचा, भाषेचा वा संस्कृतीचा ‘गर्व’ करावा, अवास्तव अभिमान बाळगावा असे गेल्या ५०-७५ वर्षांत आपण काहीही केलेले नाही. विज्ञान क्षेत्रातही नारळीकर, माशेलकर, काकोडकर अशी मोजकीच नावे राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचली आहेत. तुलनेने बंगाली, तामीळ, तेलुगु, इतकेच काय, पंजाबी व हिंदीभाषिक वैज्ञानिकांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर कीर्ती संपादन केली आहे. अर्थतज्ज्ञतेवर तर बंगाली, गुजराती, दाक्षिणात्य यांचीच नावे घेतली जातात. (अमर्त्य सेन, कौशिक बसू, जगदीश भगवती, मेघनाद देसाई, इ. इ.) म्हणजेच स्कॉलरशिप ऊर्फ विद्वत्ता, क्रिएटिव्हिटी ऊर्फ सर्जनशीलता, एण्टरप्राइज ऊर्फ उद्यमशीलता अशा कुठल्याही क्षेत्रात आपण दिवे लावलेले नाहीत.

आताही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळून ५० वर्षे होत असताना टॅक्सी कुणी चालवावी, भेळ-पाणीपुरी कुणी विकावी, शिववडापाव हे प्रतीक असावे की कांदे-पोहे, पोवाडा- तमाशा- लावण्यांचा कार्यक्रम करावा की नक्षत्रांचे देणे, सारेगमप सादर करावे, याच्यापलीकडे आपण गेलेलो नाही.
तीच गोष्ट राजकारणातली. यशवंतराव चव्हाणांनंतर त्यांच्या तोडीचा एकही राजकीय नेता महाराष्ट्राने केंद्रीय पातळीवर दिलेला नाही. शरद पवारांच्या नेतृत्वाला आविर्भाव आहे, पण चव्हाणांच्यासारखा दर्जा नाही. यशवंतरावांच्या काळात टी. व्ही., ’24×7′ चे न्यूज चॅनल्स नव्हते. आज हा सर्व प्रसिद्धी माध्यमांचा लवाजमा आहे; पण तरीही पवार त्यांच्या दबदब्याचे रूपांतर राष्ट्रीय प्रतिष्ठेत करू शकलेले नाहीत.

संयुक्त महाराष्ट्र ५० वर्षांचा होत आहे, शिवसेना ४५ वर्षांची होईल आणि शरद पवार सुमारे ४० र्वष राज्यात अथकपणे सत्ताकारणात आहेत. (खरे म्हणजे त्यांचाही काळ १९६७ साली ते प्रथम निवडून आले तेव्हापासून मोजता येईल.) पवार प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा ते ३८ वर्षांचे होते. आज ते ७० वर्षांचे आहेत.
या सर्व काळात महाराष्ट्राने कोणते आदर्श निर्माण केले? कोणते नेते देशव्यापी झाले? कोणता विचार दिला? कोणते साहित्य दिले? कोणती अर्थनीती वा उद्योगपती दिले?

‘उज्ज्वल’ इतिहास सगळ्यांनाच असतो. मुद्दा हा असतो की, त्या उज्ज्वल इतिहासातून कोणते उज्ज्वल भविष्य आपण गेल्या ५० वर्षांत मराठी माणसाला वा महाराष्ट्राला दिले? किंवा पुढील ५० वर्षांत देण्याची शक्यता आहे? शिवाय मराठी माणसाच्या उज्ज्वल इतिहासाचा संदर्भ शिवाजीमहाराजांपासून सुरू होऊन त्यांच्याबरोबरच संपतो. काहीजण तो पेशवाईशी जोडतात. पण शिवाजीमहाराज असोत वा पेशवाई, इतिहासाचे संदर्भ त्या चौकटीपलीकडे जात नाहीत. महाराजांच्या मृत्यूनंतर २७ वर्षांनी- १७०७ साली औरंगजेबाचा मृत्यू झाला. पण भारतीय उपखंडात ईस्ट इंडिया कंपनीचे आगमन झाल्यानंतरही मोगलांचे समांतर राज्य अस्तित्वात होतेच.

महाराष्ट्राचा अर्वाचीन / वैचारिक इतिहास सुरू होतो तो युनियन जॅक शनिवारवाडय़ावर फडकल्यानंतर.. म्हणजे १८१८ नंतर. बाळशास्त्री जांभेकरांचे ‘दर्पण’ १८३२ चे. त्यानंतर लोकहितवादी, महात्मा फुले, रानडे, टिळक-आगरकर, आणि त्यापाठोपाठ आधुनिक साहित्याचा पहिला आविष्कार. (परंतु ही जागा आपल्या त्या ‘रेनेसाँ’चा आढावा घेण्याची नाही.) तरीही ढोबळपणे आपण असे म्हणू शकतो की, १९०० ते १९६० या साठ वर्षांत महाराष्ट्रात सांस्कृतिक चैतन्य होते. नवसाहित्य आणि नव-कृषीप्रयोग या दोन्ही पातळ्यांवर काहीतरी अभिमानास्पद घडत होते.

स्थितीशीलता आली ती महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर! संयुक्त महाराष्ट्र समिती कोणताही धडाडीचा, आदर्शवादी, क्रांतिकारक कार्यक्रम न देता विसर्जित केली गेली. (तसा कार्यक्रम देण्याची त्यांची क्षमता नव्हती, की त्यासाठी लागणारी राजकीय सर्जनशीलता त्यांच्याकडे नव्हती?) त्या राजकीय पोकळीत संयुक्त महाराष्ट्र समितीची जागा शिवसेनेने घेतली. परंतु आजही ते एखादी रेकॉर्ड अडकावी त्याप्रमाणे मराठी अस्मितेच्या पुढे जाऊ शकलेले नाहीत. राज ठाकरेही त्याच अडकलेल्या रेकॉर्डची पिन बदलून तेच सूर आळवतो आहे. शेकाप संदर्भ हरवून बसला आहे. राष्ट्रवादी भूखंडबाजीत गुंग आहे. आणि काँग्रेसचा लोकसंपर्क व लोकसंवाद पूर्णपणे संपला आहे. समाजवादी भरकटलेले होतेच; ते अधिकच ‘डिसओरियण्ट’ झाले. कम्युनिस्टांना त्यांच्या मार्क्‍सवादी पोथीत महाराष्ट्र बसविता येत नाही. थोडक्यात- राजकारणी अर्थशून्य, साहित्यिक आत्ममग्न, दिशाहीन मध्यमवर्ग, उद्यमशीलता नाहीच- मग उरते काय? तर मराठी भाषेचा दर्पयुक्त अभिमान आणि अस्मिताबाजी! पण केवळ या दोन गोष्टींच्या आधारे भविष्यातील महाराष्ट्र उभा राहणार नाही. कधीच!