Archive for मे 11, 2010

राजा पटवर्धन, सौजन्य – लोकसत्ता

मथुरा उत्तर प्रदेशात. कंस वधाचा भूकंप तिथेच झाला पण हादरे बसले ते मगधात. आजच्या पाटण्यात. कारण जरासंध मगधाचा राजा. कंस त्याचा जावई. कंस वध ही पुढच्या जरासंध वधाची रंगीत तालीमच होती. कंस मारला गेला व कृष्ण संपूर्ण भारताच्या राजकीय रंगमंचावर अवतरला. कृष्णाने तारुण्यात पदार्पण केले. पुढे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात समस्त राजांमधून भीष्माने अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला देऊन त्याच्या अखिल भारतीय नेतृत्वावर शिक्कामोर्तब केले. ‘महाभारत’ या कौरवपांडवांच्या पराक्रम गाथेत संपूर्ण कृष्णदर्शन होत नाही म्हणून व्यासांनी हरिवंश (खिलपर्व) लिहिला. त्यातली ही कंसवधाची कथा. याला पुराण म्हणा, इतिहास वा काव्य म्हणा. समाजशास्त्र ठासून भरलेली ही कथा आहे. कृष्णजन्म आपण आजही साजरा करतो.

श्रीकृष्ण हा महाभारताचा एकमेव नायक नसला तरी महाभारतात त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. साहित्यिकांनी त्याला युगपुरुष, पूर्ण पुरुष, सदोष्ण मानवासह ‘भगवान’ श्रीकृष्ण अशा नावांनी संबोधले आहे. महाभारताच्या अद्भूताप्रमाणे तो विष्णूचा अवतार. महाभारतात एका प्रमुख व्यक्तीचा उल्लेख झाला की त्याच्या जन्माची एक कथा महर्षी व्यास रंगवून सांगतात. कौरव- पांडवांच्या पराक्रम गाथेत जितका श्रीकृष्ण येतो त्याने व्यासांचे समाधान झाले नाही. श्रीकृष्णाचे संपूर्ण दर्शन त्यात होत नाही म्हणून ‘खिलपर्वाचे’ दोन खंड जोडून त्याला ‘हरिवंश’ म्हटले गेले. श्रीकृष्ण हा वसुदेव- देवकीचा पुत्र.

वसुदेवाचा गतजन्माचा इतिहास असा- ब्रह्मदेवाचा पुत्र मरिची. मरिचीचा पुत्र कश्यप. या कश्यपाच्या अनेक भार्यापैकी अदिती व सुरभी या प्रमुख. म्हणजे कश्यप त्यांचा शब्द अव्हेरीत नसे. यज्ञ संपन्न करण्यासाठी कश्यपाने वरुणाच्या दुधाळ कामधेून पळवल्या. यज्ञसमाप्तीनंतर या गाई कश्यपाने वरुणाला परत देऊ नयेत म्हणून अदिती व सुरभी या भार्यानी त्याला गळ घातली. वरुणाने ब्रह्मदेवाकडे तक्रार केली. गाईंचा अपमान हा ब्राह्मणांचाच अपमान समजून ब्रह्मदेवाने नातवाला (कश्यपाला) शाप दिला. ‘पुढच्या जन्मात पृथ्वीवर गोवर्धन पर्वताजवळ मथुरेत गोकुळात गोप वेषात गाईंचा सांभाळ करणारा गुराखी होशील. वसुदेव म्हणून राहत असताना अदिती व सुरभी अनुक्रमे देवकी व रोहिणी रूपाने तुझ्या भार्या होतील. देवकार्यासाठी देवकी कृष्णाला व रोहिणी बलरामाला जन्म देईल.’

कृष्ण राजा झाला नाही. गुराखी पित्याचा मुलगा राजा कसा होणार? त्यानेही पित्याप्रमाणे गाईंची खिल्लारे सांभाळली. डोक्यावर मोरपीस, हातात बासुरी. वनात गाई चरवून गोकुळात परत यायचे. गोप- गौळणींबरोबर खेळायचे. नदीत डुंबायचे. बलरामाने हातात नांगर घेतला. पशुधन आधारित ऋषीप्रधान भारताचे हे दोघे बंधू प्रतीक झाले. ‘बैलजोडी’ व ‘गायवासरू’ या चिन्हांचे माहात्म्य त्यामुळेच महाभारत काळाशी जोडलेले आहे. (महात्मा गांधींनी काँग्रेसला बैलजोडी दिली व इंदिरा गांधींनी गायवासरू दिले.)

अशा या गुराखी कृष्णाचा मामा मथुरेचा राजा कंस. हा कंस म्हणजे देव-असुर संग्रामात दैत्यांचा नेता म्हणून लढलेला ‘कालनेमी’. या कालनेमीचा विष्णूने संहार केला होता. कंस व कृष्ण ही मामा- भाचे जोडी दोघेही अवतारी. कृष्ण देवाचा तर कंस असुराचा अवतार.

महाभारतात कंसाला उग्रसेन पुत्र व देवकीला कंसभगिनी म्हटलेले आहे. उत्तरेत वृष्णी, अंधक, आहुक, सात्वत, भोज अशी क्षत्रियकुलांची नावे होती. हे सर्व यादव संपन्न व पराक्रमी म्हणून प्रसिद्ध. उग्रसेन हा भोज व वृष्णी राजा म्हणून ओळखला जात होता. मग उग्रसेन पुत्र कंसाने या यादवकुळाशी वैर का पत्करले? त्यांच्या नाशाला का प्रवृत्त झाला? कंसाने उग्रसेनाचा त्याग केला इतकेच नव्हे तर त्याला बंदिस्त केले. भगिनी देवकीला तिच्या पतीसह म्हणजे वसुदेवासह नजरकैदेत ठेवले आणि असे करायला ‘नारदाने’ प्रवृत्त केले.
नारद हा ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत संचार करणारा ब्रह्मर्षी. एकदा मेरुपर्वतावर देवसभेतली सल्लामसलत त्याने ऐकली. तो वृत्तांतच त्याने कंसाला सांगितला.

‘विष्णू कृष्णावतार म्हणून देवकीच्या पोटी जन्म घेणार आहे. तिचा आठवा गर्भ कंसाचा मृत्यू होणार आहे. कंसा! तुझा मित्र म्हणून हे रहस्य मी तुला सांगतो आहे. देवकीच्या गर्भाचा तू नाश कर. दुर्बल स्वजन म्हणून त्यांची उपेक्षा करू नकोस.’

नारदाची भविष्यवाणी आकाशवाणीच असते. त्याची बालसूर्यासारखी तेजस्वी दृष्टी. जटामुकुट. चंद्रकिरणाप्रमाणे शुभ्र वस्त्र. पाठीवर मृगाजीन. गळ्यात सुवर्णाचे यज्ञोपवीत. दंडकमंडलू हातात. सप्तसुरी महती वीणा वाजवीत चारवेद गाणारा नारद महामुनी बोलला ते ऐकून कंस सर्वागाने थरथरला. नारद कलहप्रिय युद्धोत्सुक म्हणूनही प्रसिद्ध होता. कंसाचा अहंकार नारदाने दुखावला होता.

देवकीसारख्या सामान्य स्त्रीचा पुत्र इंद्रासह देवांना जिंकणाऱ्या कंसाला मारणार? बाहुबळावर पृथ्वी ढवळून काढणारा मी देवांची पूजा करणाऱ्यांचा पशू- पक्ष्यांसह नाश करीन. नारदाने कंसाच्या बुद्धीचा नाश करून टाकला. कंसाने हय, प्रलंब, केशी, अरिष्ट, कालीय व पूतनेला आदेश दिले. यादवकुलांना त्रास द्या. शत्रू दिसताच ठार करा. देवकी तिच्या घरी सुरक्षित असते. माझ्या भार्या तिच्या सर्व अवस्थेवर नजर ठेवतील. वसुदेवावर खास दासींकडून लक्ष ठेवले. मला देवकीचे गर्भ जन्मत:च मारून टाकायचे आहेत. जरासंधाच्या सैन्याचा पराभव करणाऱ्या, इंद्राला धमकावून मेघवृष्टी करू शकणाऱ्या, जरासंधकन्यांचे हरण करणाऱ्या कंसाला देवकीच्या पुत्राकडून मृत्यू? कंस नारदाचे शब्द स्वीकारायला तयार नव्हता. पण दुर्लक्षही करणार नव्हता.
कंसाला स्वत:च्या ‘अमानुष’ गुणांची खात्री होती. मथुरेचा राजा उग्रसेनाच्या मनात पुत्रवात्सल्य त्याला जाणवले नाही. त्याने माता-पित्यांचा त्याग करून उग्रसेनाचे सिंहासन बळकावले. युवराजाला पित्यादेखत राज्याभिषेक झाला. सर्वज्ञ नारदालाच आपल्या जन्मरहस्याचे कोडे उलगडण्यास सांगितले. ‘कंसा! मथुरेचा राजा महाबली उग्रसेन तुझा जन्मदाता पिता नाही. तुझा उत्पादक पिता दानवराज सौभपती ‘द्रुमिल’ आहे.’ कंसाला स्फुरणच चढले. त्याचा आत्मविश्वास बळावला. उत्कंठा शिगेला पोहोचली. ‘हे ब्राह्मण ब्रह्मर्षी! हा द्रुमिल दानव कसा आहे? हे विप्रश्रेष्ठा, त्या द्रुमिल दानवाचा व माझ्या मातेचा समागम कसा झाला? कुठे झाला? सर्व वृत्तांत मला सविस्तर ऐकव.’ महाभारताच्या पारदर्शक शैलीत व्यासांनी नारदाकडून ‘सच का सामना’ हा रिअ‍ॅलिटी शोच दाखवला आहे. विषय- ‘माता-पित्याचा समागम’. ऐकणारा- पुत्र कंस. कथन करणारा- ब्रह्मर्षी नारद. ‘हे कंसा! तुझी माता रजस्वला अवस्थेत सखींसह सुमायुन पर्वतावर विहार करत होती. पक्ष्यांचे मधुर स्वर, टेकडय़ांतून उमटणारे प्रतिध्वनी, पुष्पगंधित मंद वारा, सर्व पृथ्वी तारुण्याने भरलेल्या स्त्रीसारखी मोहक दिसत होती. कामवासनेने उद्दीपित झालेली तुझी माता फुले वेचीत असताना सौभपती द्रुमिलाने पाहिली. वातावरणातली उत्कटता, भुंगे व पुष्पगंध चेतवीत होते. द्रुमिलाला वाटले की ही तिलोत्तमा किंवा ऊर्वशीच असणार. द्रुमिल रथातून उतरला. त्याने क्षणभर नजर स्थिर करून ही अप्सरा म्हणजे उग्रसेनपत्नी असल्याचे जाणले. मायावी द्रुमिलाने उग्रसेनाचे रूप घेऊन तिला वश केले. दोघांचाही कामज्वर शांत झाला. हे कंसा! त्या समागमातून तुझा जन्म झाला.’ तुझी आई त्या उन्मादातून बाहेर आली. भानावर आली. भेदरून गेली. द्रुमिलाला तिने विचारले, ‘पाप्या! तू कोण आहेस? नीचकर्माने माझे पातिव्रत्य भ्रष्ट केले आहेस. दुष्टा विश्वासघातक्या! परस्त्री भ्रष्ट करणाऱ्या तुझे आयुष्य क्षीण होईल.’ तुझा पिता या तळतळटाला डरला नाही. उलट मग्रुरपणे म्हणाला, ‘हे स्त्रिये, तू उग्रसेनासारख्या सामान्य मानवाची पत्नी आहेस. तूही एक चंचल स्त्री आहेस. स्वप्नातल्या व्यभिचाराने कुणाचे पातिव्रत्य भ्रष्ट होत नाही. तसेच अमानुष व्यभिचाराने स्त्री दूषित होत नसते. उलट अशा संबंधातून स्त्रियांनी बलवान देवतुल्य पराक्रमी पुत्रांना जन्म दिलेला आहे’. राक्षस तत्त्ववेत्ता झाला.

‘तू कोण अशी मोठी पतिपरायण सती लागून गेलीस? हे उन्मत्त स्त्रिये! कंस नावाचा शत्रूंचा नाश करणारा पुत्र तुला होईल. बल, वीर्य, मद, प्रभाव, तेज, शौर्य व पराक्रमाने तो युक्त होईल. द्रुमिलाच्या या वक्तव्याचा कंसा! तुझ्या मातेने धि:कार केला.’ ‘सदाचरणाचा नाश करणारा पुत्र मला देऊन तुझ्या मृत्यूलाच तू जवळ केले आहेस. माझ्या पतीच्या कुळात जन्मलेला एक पुत्र तुझ्या या पुत्राचा साक्षात मृत्यू होईल.’ नारद एवढे बोलून अंतर्धान पावला. कंसाला नवीन साक्षात्कार झाला होता. मानवाच्या क्षुद्र विर्यातून माझा जन्म झालेला नाही. एका दानवेंद्राचा मी मुलगा आहे. यादवांचे कुळ वृद्धिंगत करणाऱ्या उग्रसेनाला कंसाने राज्यावरून दूर सारून बंदिस्त केले. उग्रसेन राजा कंसाचा लौकिकार्थाने पिताच होता. देवकी बहीण होती. मातापित्यांना व भगिनीसह तिच्या पतीला कैदेत ठेवून कंस मथुरेचा राजा झाला. बंधूंसह पित्याला तुरुंगात टाकणे ही मोगल परंपरा आहे, इस्लामी रीत आहे अशी आपल्याकडे दृढ समजूत आहे, परंतु ही मथुरेची परंपरा आहे. असो.

वरच्या सत्याला सामोरा जाणाऱ्या रिअ‍ॅलिटी शोमुळे एक गोष्ट स्पष्ट होते. कंस हा राजा उग्रसेनाचा ‘औरस’ पुत्र नाही, तर ‘क्षेत्रज’ पुत्र आहे. याचा अर्थ असा की ‘क्षेत्र’ म्हणजे स्त्री. जमिनीसारखी एखादी चीजवस्तू. कंसाची आई हे उग्रसेनाचे क्षेत्र. तिच्या पोटचा म्हणून क्षेत्रज. प्रश्न असा पडतो की द्रुमिलाच्या या फसवणुकीची (बलात्कारच) कल्पना कंसाच्या आईने पतीला दिली का? खिलपर्वात तसा स्पष्ट उल्लेख कुठेही नाही. आई-वडिलांनी मला टाकले आहे. ते माझा द्वेष करतात, असे कंस म्हणतो. आता प्रश्न आहे देवकीचा. कंसाची भगिनी म्हणून देवकी व देवकीचा बंधू म्हणून कंस असे उल्लेख आहेत. कंस देवकीचे सहा गर्भ जन्मताच मारून टाकतो. देवकी व रोहिणी  या वसुदेवाच्या भार्या म्हणजे सवती. गोकुळातला नंद व यशोदा ही गोपजोडी यदुवंशीयच. यांच्या संगनमताने व योगसामर्थ्यांने देवकीचा सात महिन्यांचा सातवा गर्भ रोहिणी धारण करते. (देवकी सातवा गर्भ टिकला नाही असे सांगते.) देवकीला पुन्हा आठवी गर्भधारणा होते. तिकडे यशोदेलाही दिवस जातात. कंसाच्या हेरांना किंवा जरासंधाच्या मुलींना (कंसाच्या दोघी भार्या) न कळता योगसामर्थ्यांने यशोदा व देवकीच्या पोटी एकाच वेळी मुले जन्मतात. देवकीचा पुत्र व यशोदेची कन्या यांची अदलाबदल घडवून आणली जाते. आजचे हिंदी चित्रपट बिनतक्रार करोडो लोक जर पाहू शकतात तर महाभारताचे अद्भूत खटकण्याचे कारण काय? देवकीचे सातवे अपत्य समजून कंस यशोदेची मुलगी ताब्यात घेतो. शिळेवर आपटणार एवढय़ात ती हातातून निसटते. भयानक रूप घेऊन ती देवी गर्जना करते. ‘दुष्ट कंसा! तुझ्या नाशासाठीच तू दुष्कृत्य केले आहेस. तुझ्या अंतकाळी तुझा शत्रू तुला फरफटवीत असताना मी तुझे रक्त प्राशन करीन.’ कंसाला नारदाचे शब्द आठवले. देवकीचा आठवा पुत्र तुझा मृत्यू होईल. कंस पूर्णपणे हतबुद्ध होतो. रोहिणीला बलराम झालेला असतो. देवकीचा कृष्ण यशोदा सांभाळते. वसुदेव-देवकी कंसाच्या नजरकैदेतच असतात.

कंस हा जसा उग्रसेनाचा औरस पुत्र नव्हे. त्याप्रमाणे देवकी ही उग्रसेनाची कन्या नव्हे. उग्रसेनाचा देवक नावाचा एक भाऊ असतो. त्याची कन्या देवकी. याचा अर्थ कंस व देवकी ही दोन जावांची मुले. चुलत बहीण-भाऊ आणि त्या नात्याने कंस हा कृष्णाचा चुलत मामा. आता मामा-भाचे म्हटले की मामाचे वडील भाच्याचे आजोबा असतात. परंतु कंसाचा पिता द्रुमिल असल्याने तो कृष्णाचा आजोबा नाही व उग्रसेनही सख्खा आजोबा नाही.

हरिदासाची कथा मूळ पदावर आणायची तर आपण कंसाचे जन्मरहस्य पाहत होतो. कृष्णाचे जन्मदाते मातापिता कंसाचे दास होते. कैदेत होते. कंसाचा काळ गोकुळात क्रीडा करीत होता. त्याच्या क्रीडा दंतकथा बनून मथुरेपर्यंत पोहोचल्या. कृष्णाने तर परंपरेने चाललेला इंद्रोत्सव बंद करण्याचा विचार मांडला, आपले रक्षण गोवर्धन पर्वत करतो. वनातल्या वाघ-सिंहांच्या भीतीने वनाचा नाश थांबतो. या वनामुळेच आपली गाई-गुरे जगतात. आपण धान्य पिकवतो. आपण इंद्रपूजेऐवजी गिरिपूजा, गोपूजा करूया. हा बंडखोर विचार होता. इंद्र देवांचा राजा असेल तर देव त्याची पूजा करोत. आपण गुराखी, गवळी यांनी इंद्राला कशाला देव मानायचे? कृष्णाने  इंद्राचे ‘उपरेपण’ सिद्ध केले. इंद्रोत्सव बंद झाला. इंद्र खवळला. त्याने मेघांना गोकुळ परिसरात ‘ढगफुटीचा’ आदेश दिला. कृष्णाने गोवर्धन उपटून विवरात गाई सुरक्षित ठेवल्या. गोवर्धन उचलून धरला. गोपाळांच्या प्रचंड संघटित शक्तीसमोर इंद्र हतबल झाला. त्याने कृष्णाशी तडजोड केली. वर्षांकालाचे चार महिने. त्यातले दोन वज्रधारी इंद्राने कृष्णाला दिले. कृष्ण गिरिधर, गोविंद झाला व स्वर्गात इंद्राने त्याला उपेंद्र बनवले.

इंद्रालाही कृष्णाने नमविल्यानंतर कंसाला नारदाचे वचन आठवले. कृष्ण हाच देवकीचा पुत्र आहे. नारदाने तसे सांगितलेही व बलराम वसुदेवाचाच पुत्र असून देवकी-रोहिणीच्या संगनमताने हे सर्व घडले आहे. कंसाची पाचावर धारण बसली. भयभीत होऊन त्याने सुनामाला सज्ज केला. सुनामा हा कंसाचा बंधू. उग्रसेनाला कंसाच्या आईपासून झालेला पुत्र. त्याने गोकुळावर हल्ला केला पण देवकी पुत्रांनी त्याला पराभूत केले. केशी, अरिष्टासुर हे अश्व, वृषभरूपी राक्षसही मारले गेले. कालीयाचे मर्दन करून कृष्णाने त्याला सागरात घालवून दिले. कृष्ण हा देवकीचा पुत्रच आहे याबद्दल कंसाची खात्री पटली.

त्याने कूटनीतीचा अवलंब केला. धनुष्ययागाचे निमित्त करून एक महोत्सव आयोजित केला. कृष्णबलराम, नंदादी गोपाळांना ‘कर’ घेऊन मथुरेत आमंत्रण दिले. कृष्ण-बलरामांना पाहण्याची इच्छा आहे व कुस्ती खेळण्याची हौस भागवावी असा भरगच्च कार्यक्रम आखला. अक्रुराकडून निमंत्रण गेले; परंतु उग्रसेन, वसुदेव, देवकीला खरा बेत कळला.
कृष्णाने हे आमंत्रण स्वीकारले. रामकृष्ण मथुरेत दाखल झाले. चाणूर व मुष्टिक हे महामल्ल कंसाने तयार ठेवले होते. रामकृष्ण युवक होते. चाणूर मुष्टिकानी यादवपुत्र गोकुळात पुन्हा प्रवेश करू शकणार नाहीत असे वचन कंसाला दिले. पण कंसाचा या मल्लांपेक्षा गजराजावर जास्त विश्वास होता. ‘कुवलयापीड’ नावाचा प्रशिक्षित हत्ती माहुतासह प्रवेशद्वारावर खडा पहारा देत स्वागतास सज्ज होता. यादवांचा सर्वनाश प्रत्यक्ष पाहण्यासाठी कंस सज्ज झाला. आखाडय़ात येण्यापूर्वीच हत्ती यादवपुत्रांना मारणार होता.

कृष्ण-बलरामांनी राजमार्गावरून चालत जाऊन प्रथम धोब्याकडून कंसाची राजवस्त्रे परिधान केली. माळ्याकडून पुष्पहार घालून घेतले. कुब्जेकडून कंसासाठी तयार झालेली चंदनाची उटी स्वत:च्या अंगाला लावली. शस्त्रागारातील राक्षसांनी पूजन केलेले अजिंक्य धनुष्य मधोमध तोडून आसमंतात भयंकर ध्वनी घुमवला. कंसाच्या घशाला कोरड व अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. मल्ल युद्धासाठी आखाडा सज्ज होता.

रामकृष्णांचे स्वागत करायला कुवलयापीड आतुर होता. माहुताने प्रेरणा दिली. कृष्ण बलराम सावध होते. सोंडेच्या कक्षेत येताच हत्तीने दोघांना सोंडेत पकडले. कृष्णाने हत्तीचे सुळे उपटून माहुताला प्रसाद दिला. तर बलरामाने कुवलयापीडाला विपुच्छ केले. रामकृष्ण काही घडलेच नाही असे भासवत आखाडय़ात उतरले. ‘बिग बॉस-कंस’ प्रेक्षागारात वसुदेव देवकीच्या समोर बसला होता. उग्रसेन, कंसमाता भेदरून गेले होते. मल्ल एकमेकांना भिडले. केशी- अरिष्टासुराचे झाले तेच चाणूर मुष्टिकाचे झाले. माती चाटून त्यांना आकाशदर्शन घडले. रामकृष्णांनी षड्डू ठोकला. कुणीही मल्ल आला नाही. क्षणार्धात कृष्णाने कंसाकडे धाव घेतली. त्याचा मुकुट फेकून केस पकडून त्याला फरफटवत आखाडय़ात फेकला. गळा दाबून कंसाचे धूड मातीत फेकले.
जन्मानंतर इतक्या वर्षांनी वसुदेव देवकीला पुन:दर्शन झाले. देवकीला आठ पुत्र झाले होते, परंतु एकदाही तिला कुणालाही दूध पाजता आले नव्हते. परंतु आज पुत्राना आपल्या दुधाने न्हाऊ घातले. पान्हा आटतच नव्हता.

कंस पत्नींनी आक्रंदन सुरू केले. स्वर्गातील आमच्यापेक्षाही सुंदर स्त्रियांनी तुला आकृष्ट केले का? म्हणून ऊर बडवू लागल्या. कंस माताही रडू लागली. कंसाच्या धनुर्याग महोत्सवाची अशी सांगता झाली.

कंसाच्या आईने उग्रसेनाला, आपल्या पतीला विनंती करून कंसाचे अंत्यसंस्कार कृष्णाकडून करवून घेतले. ‘मरणानंतर वैर संपले’ असे म्हणून कृष्णाने कंस मामाचे मृत्युसंस्कार पार पाडले. उग्रसेनाने संपूर्ण मथुरेचे राज्य खजिन्यासकट, दासींसह कृष्णाच्या स्वाधीन केले. कृष्णाने ते सर्व नाकारून उग्रसेनाला पुन्हा राज्यावर मथुरानरेश म्हणून स्थानापन्न केले. मला गाई राखायला आवडतात असे म्हणून कृष्ण गोवर्धन परिसरात पुन्हा गेला.

मथुरा उत्तर प्रदेशात. कंस वधाचा भूकंप तिथेच झाला पण हादरे बसले ते मगधात. आजच्या पाटण्यात. कारण जरासंध मगधाचा राजा. कंस त्याचा जावई. कंस वध ही पुढच्या जरासंध वधाची रंगीत तालीमच होती. कंस मारला गेला व कृष्ण संपूर्ण भारताच्या राजकीय रंगमंचावर अवतरला. कृष्णाने तारुण्यात पदार्पण केले. पुढे युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञात समस्त राजांमधून भीष्माने अग्रपूजेचा मान श्रीकृष्णाला देऊन त्याचे अखिल भारतीय नेतृत्व शिक्कामोर्तब केले. ‘महाभारत’ या कौरवपांडवांच्या पराक्रम गाथेत संपूर्ण कृष्णदर्शन होत नाही म्हणून व्यासांनी हरिवंश (खिलपर्व) लिहिला. त्यातली ही कंसवधाची कथा. याला पुराण म्हणा. इतिहास वा काव्य म्हणा. समाजशास्त्र ठासून भरलेली ही कथा आहे. कृष्णजन्म आपण आजही साजरा करतो.
वाचकांना एक विनंती. लक्षश्लोकी महाभारतातून (भांडारकरी-चिकित्सित संपादित प्रतीचा आग्रह नाही) कंसाच्या आईचे नाव ससंदर्भ सांगेल त्या वाचकाला कंसाचा उत्पादक पिता ‘द्रुमिल’ कुणी मारला हे मी सांगेन.