राजकन्य़ा मस्तानी

Posted: मार्च 24, 2011 in इतिहास
टॅगस्, , , ,

प्रताप गंगावणे, सौजन्य – लोकसत्ता

मस्तानीचे व्यक्तिमत्त्व नेमके कसे होते? ती कायम गैरसमजांच्या झाकोळाखाली का राहिली? बाजीरावांचे असामान्यत्व या ना त्या कारणाने सिद्ध होत राहील. परंतु मस्तानीचे काय? मस्तानीबद्दल तिरस्कार मात्र तिच्या मृत्यूनंतरही संपला नाही. ‘श्रीमंत पेशवे बाजीराव-मस्तानी’ या ‘ई  टी. व्ही. मराठी’ वरील मालिकेतून सध्या तिच्या खऱ्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेतला जात आहे. मस्तानीच्या अगम्य व्यक्तिरेखेचे रहस्य उलगडण्यासाठी या मालिकेच्या लेखकाने सखोल संशोधन केले आहे. या लेखकाचा, मस्तानीचे व्यक्तिमत्त्व उलगडून दाखवणारा लेख-

———————————————————————————————

‘मस्तानी’ हे इतिहासातील एक जरतारी, परंतु बदनामीची किनार लाभलेले एक अद्भुत रहस्य. ते अजून इतिहासकारांना आव्हान देत आहे. मस्तानी एक बुंदेल स्त्री, जी बाजीराव पेशवे यांच्यासोबत पुण्यात आली आणि बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्या धक्क्याने हे जग सोडून गेली. मूर्तिमंत निष्ठेची भाषा ती समस्त मराठी मुलुखाला शिकवून गेली. १७४० साली झालेल्या या घटनेला आज ३०० वर्षे होत आलीत आणि तरीही ती मराठी साहित्यात, मराठी मनात वारंवार तिच्या व्यक्तिमत्त्वाचे उल्लेख येतात. परंतु तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या आविष्काराला कायम  थट्टेचा, टिंगल-टवाळीचा उपसर्ग पोहोचला आणि तो अबाधित राहिला, म्हणूनच आजही या ३०० वर्षांत महाराष्ट्रातील एकाही घरात, एकाही नवजात बालिकेचे नाव ‘मस्तानी’ असे ठेवलेले आढळून आले नाही. मस्तानी हे नाव कुटुंबापेक्षा बाजारातच जास्त दिसले. चटपटीत पदार्थाना ठसठशीतपणा आणण्यासाठी या नावाचा उपयोग झाला. म्हणजे मस्तानी भेळ, मस्तानी मिसळ, मस्तानी कुल्फी, मस्तानी उदबत्ती.. मस्तानीच्या नावाची विरूपता झाली, ती अशी.

मस्तानीची दुसरी ओळख आहे, ती म्हणजे रखेल मस्तानी, नाची मस्तानी, कंचन मस्तानी आणि तिची शेवटची ओळख म्हणजे तिने पान खाल्ल्यानंतर पानाची पिंक तिच्या गळ्यातून खाली उतरताना दिसायची व ती पान खाऊन सज्जात बसायची त्याला लोक ‘मस्तानीचा सज्जा’ म्हणून ओळखत. मस्तानी या पद्धतीने इतिहासपटलावर प्रतीत झाली.

परंतु खरंच मस्तानी अशी होती का? काय आहे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे रहस्य?

मस्तानीला समजून घ्यायचे असेल तर प्रथम आपल्याला छत्रसाल महाराजांना समजून घ्यावे लागेल. राजा छत्रसाल महाराज हे प्रौढप्रतापी, सहिष्णू, आनंदधर्म उद्गाते, बुंदेल खंडाचे भाग्यविधाते. आजही बुंदेल खंडात परमेश्वराअगोदर त्यांची पूजा केली जाते. ‘छत्रसाल महाबली! कर दे भली! कर दे भली!’ अशी प्रार्थना म्हणून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. एवढे मोठेपण हिंदुस्थानातील कोणत्याही राजाला लाभले नाही. छत्रसाल महाराज हे प्रणामी पंथाचे होते. प्रगत, उदारमतवादी प्रणामी पंथात हिंदू-मुस्लीम या धार्मिक भेदास मान्यता नव्हती. वेद आणि कुराण यातील ईश्वर एकच असून, मनुष्यमात्राची समानता, धार्मिक सहिष्णुता आणि निरामय प्रेमभावना ही या पंथाची तत्त्वे होती. या प्रणामी पंथास निगडित असलेली खूप मोठी मोठी नावे आहेत. त्यातील एक नाव म्हणजे महात्मा गांधी यांचे. ते व त्यांचे कुटुंब हे प्रणामी पंथीय होते. हे ऐकले तर आश्चर्य वाटेल; परंतु हे सत्य आहे.

अशा पंथातून, अशा संस्कारातून मस्तानी आली होती. ती छत्रसाल महाराजांना यवन उपपत्नीपासून झाली होती. प्रणामी पंथाच्या तत्त्वाप्रमाणे हिंदू-मुस्लीम भेद हा तर ग्राह्य धरत नसत. त्यामुळे मस्तानी ही छत्रसालांची औरस राजकन्याच ठरते. तिचे शिक्षण, संगोपन, तिच्यावरचे धार्मिक, सामाजिक संस्कार हे छत्रसालानेच केले होते. म्हणूनच ती नृत्य, गायन, तलवार, तिरंदाजी यात प्रवीण होती. त्याचबरोबर संत कबीर, मीरा, मस्ताना, केशवदास तुलसीदास हे संत तिला मुखोद्गत होते. उर्दू साहित्याचा, कुराणाचाही तिचा अभ्यास होता. वैभवात ती राहिली होती. गजान्तलक्ष्मीचा अनुभव तिला होता. तिच्या पिखादीला (अंगरखा) गुंडी म्हणून हिरे लावण्यात येत असत आणि हे हिरे त्या काळात लाख लाख रुपये किमतीचे असत.

अशा या लाडक्या, राजकन्येचा मस्तानीचा खांडा पद्धतीने बाजीराव पेशवे यांच्याशी विवाह झाला. छत्रसाल राजाने त्या वेळी बाजीरावांना साडेतेहतीस लाखांचा जहागिरीचा प्रदेश व पन्ना येथील हिऱ्यांच्या खाणीतील तिसरा हिस्सा भेट दिला. ही भेट म्हणजे बुंदेल खंडावर आक्रमण करणाऱ्या महमंद बंगषाला बाजीरावांनी पराभूत केल्याची कृतज्ञता होती. विशेष म्हणजे या विवाह सोहळ्यास पिलाजीराव जाधव, नारोशंकर, तुकोजी पवार, राणोजी शिंदे, गोविंदपंत खेर, दावलजी सोमवंशी असे मातब्बर मराठा सरदार होते. मस्तानीच्या लग्नाच्या निमित्ताने छत्रसाल राजाने मराठे व बुंदेला ही सोयरीक निर्माण केली. बाजीरावांचाही या विवाहामागील हेतू पाहिला तर मस्तानी लावण्यवती होती, एवढाच नव्हता, तर  बाजीरावांनी तो एक राजकीय व्यवहारच केला होता. बाजीरावांचे दिल्ली हे निश्चित लक्ष्य होते आणि त्यासाठी त्यांना बुंदेल खंडासारखे संपन्न आणि मोगलांचे शत्रूराज्य कायम आपल्या बाजूने राहणे गरजेचे होते. ही गरज बाजीरावांनी ओळखली होती. पुढे पुढे मात्र या व्यवहारात भावनिक जवळीक निर्माण झाली. छत्रसालांनी बाजीरावांना आपला मुलगाच मानले. छत्रसालाच्या मृत्यूनंतर बाजीरावांचे सांत्वनपत्र उपलब्ध आहे. त्यात ते छत्रसाल पुत्रास म्हणतात, ‘हाल मालुम भयो, श्री श्री श्री महाराज ककाजू साहिब को वैकुंठवास हो गयो, बडी भारी रंज भयी.’

‘महाराजने हम कौ लडम्का कर कै मानो है, सो मैं वही तरह आप को अपनौ भाई समझे हो.’ पत्राची तारीख आहे शनिवार, २३ सप्टेंबर १७३२. सदर पत्रातून  बाजीरावांचा आणि मस्तानीच्या परिवाराबद्दलचा जिव्हाळा किती होता, हेच दिसून येतं. बाजीरावांनी केवळ सौंदर्यवती मस्तानीला पुण्यात आणले नाही, तर त्यांनी मस्तानीसोबत प्रणामी पंथाची भेदाभेदातीत निरामय प्रेमतत्त्वाची, अनोखी जीवनदृष्टीही आणली होती. हा नाही म्हटला तरी पुण्यातील लोकांना धक्काच होता आणि आव्हानही. त्यातच  बाजीराव-मस्तानी यांच्या परस्परासंबंधीच्या निष्ठा फारच पक्क्या होत्या. परस्परांतील प्रेमही अतूट होते.
सुरुवातीची तीन वर्षे मस्तानीची ठीक गेली. त्यातील निजामभेट, कोकण मोहीम सात-आठ महिने. त्याअगोदर डबईचे युद्ध आणि नंतर उत्तरेची मोहीम. म्हणजे पावसाळ्याचे चार महिने सोडले तर मस्तानीला रायांचा सहवास असा नव्हताच. पेशवे कुटुंबाचेही तसे दुर्लक्षच होते. एक रखेल या पलीकडे मस्तानीचे अस्तित्व पेशवे कुटुंबाच्या लेखी नव्हते.

परंतु मस्तानीस जसा समशेर हा मुलगा झाला, तसे पेशवे कुटुंबास एका भीतीने ग्रासले की, कदाचित मस्तानीचा वंशज पेशव्यांच्या गादीवर हक्क सांगेल. झाले त्याच दिवसापासून मस्तानीच्या खच्चीकरणास सुरुवात झाली. त्यात तिला नाची कंचनी ठरविले. तिला मद्य पिणारी- प्राशनी ठरविले. एवढेच नाहीतर या संकटास कायमचे पंगू करण्यासाठी  बाजीराव-मस्तानी हा संबंध वैवाहिक नाही, ती पत्नी नसून रखेल आहे, शिवाय ती खानदानी नसून ती निजामाच्या रक्षेची मुलगी आहे, शहाजन खानाची कलावंतीण आहे- अशा कपोलकल्पित गोष्टींचा पुण्यात बोभाटा सुरू केला.

आणखी एक आवई अशीच उठवली गेली, ती म्हणजे मस्तानी आल्यामुळे बाजीरावांचे काशीबाईंवरील लक्ष उडाले. परंतु वास्तवात मात्र मस्तानीचे व काशीबाईंचे संबंध सौहार्दाचे होते. मस्तानी आल्यानंतर ही काशीबाईंना तीन अपत्ये झाली. यातून एक गोष्ट दिसते, ती म्हणजे चारही बाजूंनी मस्तानीवर हल्ले होत होते. यात थोडा अंकुश होता, तो शाहू महाराजांचा.

त्यातच  बाजीरावांनी मस्तानीला तीन गावे इनाम दिली. पाबळ इथे मोठा वाडा बांधला. शनिवारवाडय़ात प्रशस्त हवेली बांधली. एवढे नव्हे तर, समशेरच्या मुंजेची तयारी सुरू झाली.

या सर्व गोष्टींनी पेशवे कुटुंब धास्तावले. त्यांचा विरोधास आणखीनच धार चढली. त्यातच या लढय़ात पुण्यातील ब्रह्मवृंद उतरला आणि बघता बघता राजकारणात व रणभूमीवर महाप्रतापी ठरलेले बाजीराव कौटुंबिक संघर्षांत मात्र पराभूत झाले.

पेशवे कुटुंबाने मस्तानीला अटक केली. मस्तानीला मारण्याचे गुप्त मनसुबे रचले गेले. खरे तर मस्तानी ही योद्धा होती. तिने दिल्लीच्या मोहिमेत बाजीरावांच्या रिकिबीला रिकीब लावून घोडा पळविला होता; परंतु इथे मात्र बाजीरावांच्या अनुपस्थितीत एकटी मस्तानी असहाय्य झाली, अगतिक झाली. ती सहनशीलतेची ढाल पुढे करून जगण्याची पराकाष्ठा करीत होती; परंतु अखेरीस ती कोसळली.

आजही मस्तानी-बाजीरावांचे इंदोर येथील वंशज म्हणतात ते खरेच! मस्तानीला मराठी मुलखाने न्याय दिला नाही. मस्तानी ही कधीच सत्तालोलुप नव्हती. महत्त्वाकांक्षी नव्हती. सुखलोलुप नव्हती. तसे असते तर एवढे बुंदेला येथील वैभव, ऐश्वर्य, आई-वडील आपला मुलुख सोडून ती हजार किलोमीटर एवढय़ा दूर पुण्यात आली नसती, यावरूनही ते सिद्ध होते. ती पुण्यात आली. राहिली. तिने इथली भाषा, पेहराव स्वीकारला. राऊंच्या पाठोपाठ काशीबाईंचे प्रेम मिळवले. मात्र ही पुण्याई तिच्यासाठी तुटपुंजी ठरली.

इतिहासाच्या कोणत्याही कालखंडात निर्दोष समाज हा भारतात कधीच नव्हता, आजही तो नाही. आणि तो तर तीनशे वर्षांपूर्वीचा काळ होता. परंतु, बाजीरावांनी सामाजिक सौहार्दाचा प्रकाश मस्तानीच्या रूपात पाहिला होता. तो मस्तानीच्या रुपाने त्यांना मराठी मुलुखात पेरायचा होता; परंतु तत्पूर्वीच बाजीराव मृत्यू पावले. त्यांच्या मृत्यूची खबर ऐकताच मस्तानीही त्या धक्क्याने पाबळ येथे मृत्यू पावली.

सर्वसाधारण समज आहे, की मस्तानीमुळे बाजीरावांची राजकारणावरील पकड ढिली झाली, दुर्लक्ष झाले. व्यसनाधीनता वाढली; परंतु तो समज निखालस खोटा आहे. मस्तानी बाजीरावांच्या जीवनात आली ते वर्ष आहे इ. स. १७२२. यानंतर ११ वर्षांत त्यांनी १२ लढाया केल्या आणि मस्तानीच्या अगोदर त्यांनी १० लढाया केल्या आहेत. दुसरी गोष्ट मस्तानीमुळे गृहकलह पेटला असतानाही परकीय नादीर शहाचे आक्रमण होताच सबंध हिंदुस्थान वाचवण्यासाठी त्यांनी नर्मदेच्या तटावर सैन्य उभे केले होते. दक्षिणेत नादीर शहा उतरला नाही, यातील एक प्रमुख कारण बाजीराव होते. नादीर शहापाठोपाठ त्यांचे नासीरजंगाशी युद्ध झाले, त्याला पराभूत केले. हे युद्ध मोठे होते. आपल्यावर व मस्तानीवर होणारी बदनामी तलवारीच्या टोकावर झेलत  त्यांनी मराठी राजकीय सत्तेची पुनर्रचना केली. त्याचे साम्राज्यात रूपांतर केले. होळकर, पवार, खेर (बुंदेला) शिंदे या मराठा सरदारांची नर्मदेपलीकडे अभेद्य फळी उभी केली, तो त्यांच्या व्यवस्थापनाचा व दूरदृष्टीचा महनीय नमुना होता.

चारित्र्यसंपन्न, निव्र्यसनी, बुद्धिमान, कष्टाळू, अलोट देशप्रेम अशा बाजीरावांच्या अकस्मात मृत्यूने मराठी राजसत्तेवर दूरगामी परिणाम झालेले आपल्याला आढळतात. वयाच्या विसाव्या वर्षी ते पेशवे झाले आणि चाळिसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे राजकीय आयुष्य फक्त २० वर्षांचे. या २० वर्षांत त्यांनी ज्ञात २२ लढाया केल्या. आपल्या सरदारांच्या ३००च्या आसपास लढायांचे व्यवस्थापन केले व मुख्य म्हणजे ते अजिंक्य राहिले. बाजीरावांचे असामान्यत्व या ना त्या कारणाने सिद्ध होत राहील. परंतु मस्तानीचे काय? मस्तानीबद्दल तिरस्कार मात्र तिच्या मृत्यूनंतरही संपला नाही हेच. ना हिंदू-मुस्लीम ऐक्याचा गुलाब गळून पडला, ना त्याच्या सौंदर्यास किंमत, ना त्याच्या सुगंधास. तो फक्त अणकुचीदार काटय़ांना धनी झाला.

खरे तर हा महाकादंबरीचा विषय. मस्तानीचे खरेखुरे वास्तववादी जीवन लोकांपुढे यावे, असा एक प्रयत्न प्रामाणिकपणे होण्याची गरज होती. तो प्रयत्न निर्माते नितीन चंद्रकांत देसाई यांच्या विजया राणे दिग्दर्शित ‘श्रीमंत पेशवे बाजीराव-मस्तानी’ या ‘ई  टी. व्ही. मराठी’वरील मालिकेतून सध्या घेतला जात आहे. मस्तानीच्या अगम्य व्यक्तिरेखेचे रहस्य उलगडण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे.

प्रतिक्रिया
  1. dr sarika patil म्हणतो आहे:

    i really hv sympathy abt mastani.

    • urmila wadwekar म्हणतो आहे:

      mastani baddal savistar mahiti mi pratham ch vachali. khara itihaas mahiti nasalyamule gairasamj hote. mastani che vanshaj indore la asatat ase aapan lihile aahe. te kon / konate gharane aahe te lihave.

  2. Prashant म्हणतो आहे:

    प्रताप गंगावणे यानी खरच खुप छान लेख लिहिला आहे.
    माझ्या अनुदिनीचा पत्ता: http://prashantredkarsobat.blogspot.com

  3. urmila wadwekar म्हणतो आहे:

    pl mail me about mastani’s present family varasdaar from indore

  4. ashish sawant म्हणतो आहे:

    सुंदर, मला हि माहिती नवीन होती. धन्यवाद अशी माहिती पुरवल्याबद्दल.

  5. Trupti म्हणतो आहे:

    मस्तानीविषयी नवीनच माहिती कळली. धन्यवाद.

    तुमचा ब्लॉग मस्त आहे. मी फॉलो करते. आणि शक्य होइल ते लेख वाचत असते. हा एक मस्त उपक्रम तुम्ही ब्लॉगरुपात चालवता आहात.

  6. raju narawade म्हणतो आहे:

    jatibhed ,swartha he maharashtrachya matila lagalele kalanka aheta !

  7. bhagwan bhoir म्हणतो आहे:

    like this masthani

  8. किशोर इंगळे,बुलढाणा म्हणतो आहे:

    राजकन्या मस्तानी खरोखर प्रेमळ,साधी होती. पेशव्यातील घरघुरती आंतरिक कलहामुले तिला वाईट ठरवले हे मात्र खरे आहे. बाजीराव यांचेवर खरोखर प्रेम करणारी ती राजकन्या होती. हे पुणेकरांना कळले नाही हे महाराष्ट्र लोकांचं दुर्भाग्य होय.

  9. kavita suryawanshi म्हणतो आहे:

    very nice. mastani baddal savistar mahit prathamach vachali. khara itihaas mahiti nasalymule gairasam hota.mastaniche vanshaj indorela asatat asa aapan lihile aahe te kon aahe /konate gharane aahe te lihave.

  10. suryakavita म्हणतो आहे:

    Thanks
    khoop chan lekh lehela aahey mala mastaniche maheti he savistar pahilyandach vachali. khara ithaas samajla.mastaniche vanshaj indorela aaheyt ten kon aahey ani konate gharane aahe te lihave. i like this mastani………………………………………….

  11. santosh doiphode म्हणतो आहे:

    खुप छान लेख लिहिला आहे..माहिती पुरवल्याबद्दल. धन्यवाद.

  12. amol म्हणतो आहे:

    mala mastani vishayi khant watate

  13. CHHOTULAL BORSE म्हणतो आहे:

    MASTANINE MARATHAI SANSKRUTILA AAPLESE KALL PAN LOBHI PESHWE KUTUMBANE TICHA VISVASGHAT KELA. HA KALANK KADHICH DHUTLA JANAR NAHI.

  14. Jatap Pramod म्हणतो आहे:

    Kharach Mast
    Mala sagli mahiti kontya pustkat melel

  15. S khamkar म्हणतो आहे:

    Mastani…ek…rajkanya

  16. Kusum A म्हणतो आहे:

    Can you please give citations or sources for the material you have obtained the above information from? Your article looks embellished, because there are hardly any credible references about Mastani’s life.

  17. Shilpa Madkar म्हणतो आहे:

    मस्तानी बद्दल इतका आदर आणि स्नेह असलेल्या या लेखकाला आणि सर्व बाजीराव-मस्तानी प्रेमींना काशीबाई पेशवे यांच्या हृदयाचे मर्म का जाणवले नाही? सुखी संसारात असलेल्या काशीबाईंना बाजीरावांनी त्यांच्या संमतीशिवाय सवत आणली, पडत्या फळाची आज्ञा म्हणून त्यांनी तिला निमूटपणे स्वीकारली, तिची काळजी वाहिली. तिच्या मागे तिच्या मुलाचे मायेने संगोपन केले, त्यांचे संदर्भ तुम्ही का नाही शोधून काढत? अखंड महाराष्ट्र फक्त बाजीराव-मस्तानी या युगुलाची शोकांतिका ऐकून हळवा होतो, नवऱ्यामागे एक केशवपन केलेल्या विधवेचे आयुष्य जगणाऱ्या काशीबाई महाराष्ट्राला आपल्याशा का वाटल्या नाहीत? याचे उत्तर देऊ शकता का?

यावर आपले मत नोंदवा